Monday, March 1, 2021

किल्ले निवती

 सिंधुदुर्गाच्या दक्षिण अंगाने कर्ली नदी समुद्राला मिळते.या खाडीच्या दक्षिण तीरावर एक नितांत सुंदर तुलनेने कमी प्रसिध्द असा समुद्रकिनारा आहे.भोगवे.सुंदर पांढरी वाळु,निळ्याशार लाटा,मागे टेकडीचा पॅनोरमा,त्यावर दाट झाडांची राई,समुद्रात घुसलेल्या कातळांचे रौद्र रुप आणि पश्चिम समुद्रात प्रकाशझोताचा खेळ दाखविणारे दीपगृह तासनतास अनुभव घ्यावा असा नजारा पहायचा असेल तर किल्ले निवती आदर्श जागा आहे. 
       निसर्गसौंदर्याचा मेरुमणी असणारा हा किल्ला मोक्याच्या जागी आहे.याची उभारणी कोणी केली हे मात्र ज्ञात नाही.शिवरायांनी सिंधुदुर्ग बांधल्यावर लगेचच किल्ले निवती सुद्धा बांधून घेतला असा इतिहासकारांचा कयास आहे. फोंड सावंत दुसरा इ.स.१७०९मध्ये गादीवर आल्यावर १७०९-१७३८ दरम्यान काही किल्ले बांधल्याचा उल्लेख सावंतवाडी संस्थानाचा इतिहास या पुस्तकात येतो. यात कोचरे येथे सावंतानी निवती किल्ला बांधल्याचा उल्लेख येतो. पण बहुधा शिवकाळातच या गडाची उभारणी झाली असावी. १७४८ च्या आधी हा किल्ला सावंतवाडीच्या राजाकडे होता अशी माहिती पिसुर्लेकर पोर्तुगीज कागदपत्रांच्या हवाल्याने देतात. सावंतवाडी संस्थानचा इतिहास या पुस्तकातील नोंदीनुसार १७०९ साली गादीवर आलेल्या फोंड सावंताने निवती किल्ला बांधला असा दावा केला गेला आहे. सावंतवडीचे सावंत हे तसे करवीरकरांचे चाकर मात्र त्यांचे धन्याशी पटायचे नाही.तसेच त्यांच्या राज्याची हद्द गोव्याला लागून असल्याने त्यांना पोर्तुगीजांशी जमवून घेण्याखेरीज पर्याय नव्हता.सावंत पोर्तुगीजांना खंडणी देत असत.मात्र पोर्तुगीजांशी त्यांचे फार सख्य होते अशातील भाग नव्हता.त्यात सावंतांनी पोर्तुगीजांशी आगळीक केली.म्हणून २ डिसेंबर १७४८ रोजी पोर्तुगीज व्हाईसरॉय मार्केझ कस्तेलू नोव्हू याने इस्माइल्खानच्या नेतृत्वाखाली निवती किल्ला घेण्यासाठी आरमार पाठवले. इस्माइलखानाने पराक्रमाची शर्थ करुन ४ डिसेंबर १७४८ रोजी निवती किल्ला घेतला वास्तविक हा इस्माईलखान मुळात संभाजी आंग्रेंचा नोकर.तिथून तो सावंताच्या पदरी गेला आणि त्यानंतर नोकर्‍या बदलत बदलत आता पोर्तुगीजांच्या चाकरीत होता.
   निवती घेतल्यावर पोर्तुगीज व्हॉइसरॉय स्वतः निवती किल्ल्यावर आला होता.गडावर असताना त्याला बातमी मिळाली कि "कर्ली नदीत ( म्हणजे किल्ले निवतीच्या उत्तरेस ) सावंतवाडीकर तारवे बांधत आहे व त्याच्या रक्षणार्थ त्याने नदीच्या तीरावर तोफा रचून ठेवल्या आहेत".
  व्हॉइसरॉयने इस्माईलखानास नावा जाळण्यास पाठविले.खानाने हल्ला चढवून कर्ली येथे सावंत बांधत असलेल्या बोटी जाळून टाकल्या."कर्लीची खाडी आपले कबजात आणुन तेथे अंमल चालविला व ते जागी सावंताचे नवी तरांडी बांधवीत होता ती जालून टाकिली.त्यामधील मालवणच्या आश्रयास गेली होती.तीही जबरदस्तीने दाखवोन मालवणकरांकडून आणून घेतली".
     पोर्तुगीजांकडून निवती किल्ला पुन्हा परत घ्यावा इतके लष्करी बळ सावंताकडे नव्हते.त्यात वरंवार त्रास देणार्‍या सावंतांचा परस्पर काटा निघालेला पाहून करवीरकरांनी पोर्तुगीजांकडे सदिच्छा प्रगट केली.नाईलाजाने मोठा मुलुख व खंडणी देण्याचा तह पोर्तुगीजांशी करुन सन १७५४ रेडीजवळचा यशवंतगड व निवती हे किल्ले सावंतांनी परत मिळवले.
बादशहाकडून सावंतांनी मोरचेल आणल्यामुळे करवीरकर व सावंत यांच्यात वितुष्ट आले.करवीरकरांनी सावंताच्या प्रदेशावर हल्ला करुन निवती,भरतगड,यशवंतगड यांना वेढा घातला.इ.स.१७८८निवतीवर चढाई करुन करवीरकरांनी किल्ला हस्तगत केला.निवतीसोबत सावंतांचे इतर किल्ल्यावर सुध्दा करवीरकरांनी ताबा मिळवला.मात्र सावंतांना पेशव्याची मदत असल्याने निवती सावंतांना सन १८०३ मध्ये परत केला. 
  पुढे सन १७०५-०६ मध्ये सावंतवाडी घराण्यात गृहकलह सुरु झाला.याचा फायदा घेउन करवीरकरांच्या रांगणा येथील किल्लेदाराने सावंतवाडीकरांच्या मुलुखावर हल्ला करुन यशवंतगड व निवती पुन्हा घेतले.करवीरकर पुढील चाल करण्यासाठी ससैन्य नांदोस येथे उतरले.मात्र लक्ष्मीबाई सावंतांनी स्वताचे बंधु रामचंद्रराव खानविलकर यांना पाठवून दिले.त्यांनी नांदोस येथे करवीरकरांचा पराभव करुन पुन्हा निवती व यशवंतगड ताब्यात घेतले.यानंतर निवतीवर बाबाणो गोपाळ यांची नेमणुक करन्यात आली.करवीरकरांच्या विरुध्द मदतीसाठी सावंताकडे निपाणीकर निंबाळकरांचा सरदार आपाजी सुबराव आला.त्याने सन १८०८ ला भाउसाहेब सावंत व लक्ष्मीबाईंना कैद केले व यशवंतगड व निवती आपल्या ताब्यात घेतले.सन १८१० मध्ये सुबरावाचा पराभव करुन सावंतांनी निवती व इतर स्थळांवरुन निपाणकरांना हाकलून काढले.
     सावंतांच्या चाचेगिरीचा त्रास इंग्रजांना होत होता.निवतीचा किल्लेदार बाबणो गोपाळ हा सावंताचा चाकर असला तरी त्यांच्या आज्ञेत नव्हता.इंग्रजांनी ऑक्टोबर १८१२ मध्ये सावंतांनी तह करण्यास भाग पाडले,तहात ठरले कि चाचेगिरी बंद व्हावी म्हणून सावंतांची सर्व जहाजे इंग्रजांना द्यावी.कोणतेही गलबत इंग्रजांनी तपासल्याशिवाय निवती बंदरातून बाहेर पडू नये.आणि तरीही सावंतांनी चाचेगिरी सुरु ठेवल्यास इंग्रज निवती व यशवंतगडाचा ताबा घेतील. इ.स.१८१२ मध्ये करवीरकर इंग्रज यांच्यात झालेल्या तहानुसार हा प्रांत जरी इंग्रजांच्या ताब्यात गेला तरी निवती किल्ला मात्र सावतांच्याच ताब्यात होता.मात्र सावंतांनी कारवाया करणे सुरुच ठेवले.अखेर इंग्रजांनी सन १८१२ च्या तहाचा आधार घेउन सन १८१९ मध्ये यशवंतगड व निवती तीन वर्षांसाठी ताब्यात देण्यास सावंतांना सांगितले.पण सावंत तयार झाले नाहीत.शेवटी इंग्रजांनी सावंतांच्या प्रदेशावर हल्ला केला.मेजर विल्यम ग्रॅथ कीर याच्या नेतृत्वाखाली चौकहून फौजा निवती घेण्यासाठी निघाल्या.जेव्हा कीर निवतीपाशी पोहचला तेव्हा समुद्रात पुढे घुसलेला भुभाग लक्षात घेउन निवती घ्यायचा असेल तर भारी तोफखाना व दारुगोळा पाहीजे हे त्याच्या लक्षात आले.
  मेजर कीरने जहाजातून तोफा व इतर साहित्य किनार्‍यावर उतरुन ते निवतीच्या रोखाने लावण्यात कसुर केली नाही.गडाला सर्व बाजुने इंग्रज सैन्याचा फास आवळला गेला.ब्रिटिश तोफा गडावर आग ओकु लागल्या. निवती त्यास दाद देईना.तेव्हा इंग्रजांनी तोफांचा अखंड मारा सुरु ठेवला. मात्र निवतीला बाहेरुन मदत मिळणे शक्य नव्हते,नाईलाजाने किल्लेदारने कीरशी बोलणे सुरु केले "गडावरील शिबंदीला आपल्या शस्त्रांसह सुरक्षितपणे जाउ दिल्यास आपण किल्ला हवाली करु".
   मेजर कीरने विनंती मान्य केली.गडावर पांढरे निशाण फडकले.गडावरचे सैनिक खाली उतरले.या घट्नेचे वर्णन मेजर कीरने केले आहे "यावेळी गडावर तीनशे शिबंदी असून यातील १२५ सैनिक घाटावरील होते.या घाटावरील सैन्याने घाटवर जाण्यासाठी परवाना मागितला.आणि इतर सैनिक आजुबाजुचे रहिवासी होते.आणि त्यांनी इथून गेल्यावर स्वतांच्याच घरी रहाण्याचे वचन दिले".
   निवतीवर ४ फेब्रुवारी १८१९ रोजी युनियन जॅक फडकले.या सर्व लढाईत खेदाची गोष्ट अशी कि लढाईत चांगली कामगिरी करणारे देशी लोक होते,इग्रंजाना सहाय्य केले ते बांद्याचा किल्लेदार चंद्रोजीने.निवती घेतल्यावर गडावरील साहित्य आणि आपला तोफखाना जहाजावर चढवून इंग्रज सैन्य निघून गेले.
 फारसा प्रसिध्द नसलेल्या पण निसर्गाचा मनमुराद आनंद देणारा हा किल्ला बघायचा तर मालवण व कुडाळ असे दोन पर्याय आहेत.
१) मालवण मार्गे:- मालवण बस स्थानकातून सागरी महामार्गाने जाणार्‍या वास्को, पणजी, वेंगुर्ला इत्यादी बसने परुळे गावातील "परुळे बाजार" ह्या थांब्यावर उतरावे. तेथून किल्ले निवतीला जाणार्‍या बसेस मिळू शकतात. परंतू किल्ले निवतीला जाणार्‍या बसेस मोजक्याच असल्यामुळे परुळे बाजारातून रिक्षा करुन ७ किमी वरील किल्ल्यापर्यंत जाणे सोयीस्कर पडते. मालवणहून निवती साधारण २५ किमी वर आहे.
२) कुडाळ मार्गे:- कुडाळ बस स्थानकातून "किल्ले निवती" बसने निवती गावात थेट जाता येते. येथे "किल्ले निवती" व निवती अशी दोन गावे आहेत. किल्ला "किल्ले निवती" गावात आहे.
३) किल्ले निवती गावातील बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरुन उजव्या बाजूच्या लालमातीच्या कच्च्या रस्त्याने १० मिनीटे चढाई केल्यावर निवती किल्ल्याजवळ पोहोचता येते.
      मालवणहुन सागरी महामार्गाने निवती गाव २६ कि.मी.वर असुन कुडाळहुन परुळेमार्गे हे अंतर २८ कि.मी.आहे. 
         निवती गावात दोन वाड्या असुन निवती किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला किल्ले निवती गाठावे लागते. गावात उतरले कि डावीकडे किल्ले निवतीचे एसटी बस स्थानक लागले नि मागेच समुद्रकिनाऱ्याकडे जाणारी वाट आहे.आपण मात्र उजवीकडच्या रस्त्याने समोरची टेकडी चढायला घ्यायची.स्वताचे वाहन असेल तर अजून एक पर्याय आहे. किल्ले निवती गावातील बस स्थानकातून एक डांबरी रस्ता किल्ल्यासमोरील पठारावर गेलेला असुन या रस्त्याने आपण थेट किल्ल्याच्या दरवाजासमोर येतो. 
 
 
 
किल्ल्याच्या दरवाजासमोर ८-१० खडकात कोरलेल्या पायऱ्या असुन उर्वरीत पायऱ्या व या दिशेला असलेला खंदक पठारावर आलेल्या डांबरी रस्त्यामुळे नष्ट झाला आहे. किल्ला व पठार यामध्ये १५ फुट रुंद व २० फुट खोल खंदक खोदुन किल्ल्याला पठारापासून वेगळे केले आहे. या खंदकात आज मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे.
 
 याच वाटेने आपण भग्न तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश करतो. पावसाळ्यात इथं गवत माजते आणि करवंदाच्या झाडांच्या फांद्या रानमेव्याने लगडलेल्या असतात.येथे डाव्या बाजूला दोन भव्य बुरुजांमध्ये प्रवेशद्वार आहे. पठाराच्या दिशेने असलेल्या किल्ल्याच्या तटबंदीत तीन बुरुज बांधलेले आहेत. किल्ल्याचा दरवाजा पुर्वाभिमुख असुन या दरवाजाशेजारी असलेला बुरुज ढासळून त्यांची दगडमाती दरवाजात पडल्याने दरवाजा बुजला आहे त्यामुळे आपला गडप्रवेश दरवाजाऐवजी शेजारील ढासळलेल्या तटबंदीतुन होतो. 
 प्रवेशद्वार आणि खंदक
     दरवाजाच्या आतील भागात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन यातून वाट काढत दरवाजाकडे आल्यास दरवाजाशेजारील बुरुजात पहारेकऱ्याच्या देवड्या दिसतात. पण प्रवेशद्वारापुढील मार्ग तुटल्यामुळे त्यातून प्रवेश करता येत नाही. साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला साडेचार एकरवर पसरलेला असुन मुख्य किल्ला व एका कोपऱ्यात बालेकिल्ला अशी याची रचना आहे. 

 बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ अर्ध्या एकरपेक्षा कमी असुन बालेकिल्ल्यासमोर खंदक खोदुन त्याला मुख्य किल्ल्यापासुन वेगळे केले आहे. बालेकिल्ला आजही सुस्थितीत आहे. तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन पायवाटा फूटतात. दरवाजाकडून डावीकडे जाणारी वाट बालेकिल्ल्यात तर सरळ जाणारी वाट किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला घेऊन जाते. ​
 
समोर जाणार्‍या पायवाटेने गेल्यास उजव्या बाजूस एक भव्य बुरुज दिसतो.हा पहिला बुरुज वरील बाजूने उध्वस्त झाला असुन त्यावर मोठमोठी झाडे वाढलेली आहेत. तिथून पुढे गेल्यावर अजून एक भव्य़ बुरुज त्यावरील जंग्यासह पाहायला मिळतो.  
 
 
 
या बुरुजाकडून खालील बाजूस सोनेरी वाळु असलेला भोगवे किनारा व कर्ली खाडीपर्यंतचा परिसर तसेच सागरात मच्छिमारी करणाऱ्या व पर्यटकांना समुद्रात फिरवणाऱ्या नौकाही दिसतात.तटबंदीहुन सरळ आल्यावर पुढे तटावर असलेल्या लहान बुरुजावर तोफ फिरवण्याची जागा दिसुन येते. 
 
 
 
 
 
इथुन तसेच पुढे आल्यावर किल्ल्याचा समुद्राच्या टोकावर असलेला बुरुज आहे. या बुरुजावर झेंडा रोवण्यासाठी नव्याने सिमेंट चौथरा बांधलेला आहे.
 
 
 
 येथून डाव्या हाताला वळून समुद्राच्या दिशेला चालत गेल्यावर गडाच्या पश्चिम टोकावरुन पायथ्याला समुद्रात असलेले नारींगी रंगाचे खडक पहायला मिळतात. याला ‘जुनागड‘ म्हणतात. पुळणीच्या बाजूने त्यावर चढता येते.
याच ठिकाणाहून उजव्या बाजूस समोर अरबी समुद्र व दूर समुद्रात दिसणारे एक खास दृश्य म्हणजे वेंगुर्ला रॉक्स किंवा बर्न्ट आयलंड या नावाने ओळखला जाणारा द्वीपसमूह. यावर १८३० आणि १९३० साली बांधलेली दीपगृहे आहेत. इथं जाण्यासाठी वेंगुर्ला बंदरातून खास होडी ठरवावी लागते. 

 
 
येथे एक खड्डा व त्यात उतरणार्‍या कातळात खोदलेल्या पायर्‍या पाहायला मिळतात. येथे खोदीव टाक असावे असे वाटते,.पण हे टाके नसुन चिरे काढताना निर्माण झालेला खड्डा असावा. याला स्थानिक लोक शिवाजीची तळी‘ म्हणतात.येथुन परत दरवाजाच्या दिशेने जाताना लहान लहान चौथरे व जोती पहायला मिळतात. किल्ल्याच्या या भागात मोठया प्रमाणात करवंदाची जाळी व इतर काटेरी झाडे वाढलेली आहेत.
  हे पाहून परत प्रवेशव्दारापाशी येऊन डाव्या बाजूच्या पायवाटेने गेल्यावर बालेकिल्ल्याकडे जाताना तटाला लागुन असलेल्या एका चौथऱ्यावर चार टोकाला चार असे चार मोठे बांधीव दगडी स्तंभ दिसतात. 
  
 




 
या ठिकाणी एखादी मोठी उंच इमारत असावी. बालेकिल्ल्यात जाणारी निमुळती वाट खंदकाला लागुनच असलेल्या तटबंदीखालून दुसऱ्या टोकाला असलेल्या बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाते. हि वाट तटावरून पुर्णपणे माऱ्याखाली ठेवलेली आहे. 
 
बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे काटकोनात बांधलेले असुन यातील एक दरवाजा व आतील देवड्या आजही शिल्लक आहेत. बालेकिल्ल्याची १५ फुट उंच तटबंदी दोन ठिकाणी ढासळलेली असुन या तटबंदीत जागोजाग बंदुका व तोफा यांचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवल्या आहेत. बालेकिल्ल्यात समुद्राच्या दिशेने असलेल्या तटबंदीच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावर ढालकाठीची म्हणजेच झेंडा रोवण्याची जागा आहे. बालेकिल्ल्याच्या आवारात मोठया प्रमाणात वास्तुंचे चौथरे असुन त्यात एक किल्ल्याच्या सदरेचा चौथरा असावा.
    दरवाजाकडे आल्यावर आपली तासाभराची गडफेरी पुर्ण होते. गडावर कोठेही पाण्याची सोय दिसुन येत नाही व शिवकाळात पाण्याची सोय असल्याशिवाय गड वसवला जात नसे हे ध्यानात घेता हा गड नंतरच्या काळातच बांधला गेला असावा.निवती किल्ल्यावरुन मालवण ते वेंगुर्ले पसरलेला समुद्र नजरेत येत असल्याने या समुद्रात संचार करणाऱ्या जहाजे सहजपणे नजरेस पडतात. त्यामुळे खोल समुद्रात टेहळणी करण्यासाठी निवती किल्ला महत्त्वाचा होता. 
   निवती पासून ८ किमी वरील परूळे गावात वेतोबा मंदीर संकुल आहे. त्यातील प्रमाणबद्ध कोरीव मूर्ती व वीरगळ पहाण्यासारखे आहेत.

श्री देव वेतोबा,परुळे याची माहिती:-

श्री देव वेतोबा ग्रामदेवतेच्या मूर्तीची निर्मिती परुळे या गावाची वाडी ‘कुशेवाडा’ या वाडीतील ठिकाण ‘भाटी’ या ठिकाणी एक मोठे पाषाण होते त्या पाषाणातून निघणारा ॐकार ध्वनी लोकांना ऐकू येत असे. सदर परिसरात थोडी फार ब्राम्हण वस्ती आहे. या ब्राम्हणांची गुरे चरावयास जाण्याच्या मार्गावर पाषाण असल्यामुळे गुरे पोहोचविणे व आणणे तसेच जाणे व येणे यामुळे लोकांच्या कानावर हा ॐकार ध्वनी पडत असे. हळू हळू या प्रकारचा गावात प्रसार झाला व प्रत्यक्ष ऐकण्यासाठी गावातील लोक जमा झाले. विचार विनीमय सुरु असता वर नमूद केल्याप्रमाणे वेताळ-भावई सेवेसाठी असलेला साधू त्या ठिकाणी आला व त्याचे आदेशानुसार ‘वेतोबा’ देवतेची निर्मिती झाली.
         वरील ठिकाणावरून सदर पाषाण मुख्य रस्त्यालगत देऊळवाडी येथे आणून, मूर्तीला आकार देण्याचे काम सुरु झाले. पण पूर्णत्व येईना- ‘काम उरले म्हणून त्या ठिकाणाला ‘कामुर्ले’ असे नाव पडले.
ब्राम्हणाकरवी स्थापनेचा मुहूर्त ठरला – शुद्धीकरणासाठी अपूर्ण मुर्तीयुक्त पाषाण हलवून तळीत ठेवण्यास नेणेसाठी मुख्य रस्त्यावर आणले गेले व तेथेच मूर्ती साकार करण्यात आली. पण मूर्ती हालेना. इतक्यात एक पांथस्थ आला त्याने हातभार लावताच पाषाण उचलणे शक्य झाले व सदर मूर्ती तळीत आणून ठेवली. ज्या व्यक्तीने हातभार लावला तो पांथस्थ (वाट मार्गी) वरून त्याचे आडनाव ’मार्गी’ संबोधिले गेले. त्याचे वंशज आज पावेतो दर वर्षी स्वतःचे घरी अन्न शिजवून आणून श्री देव वेतोबास नैवैद्य दाखवून स्वतः भक्षण करतात अशा रितीने मुख्यग्रामदेवतेची स्थापना केल्यावर ग्रामस्थांनी पंचायतन स्थापनेचा निर्णय घेतला.
१) श्री देव वेतोबा मंदिर समोर भावईमंदिर. यामंदिरी जैन ब्राम्हण, घाडीवंस, देवदासी वंस, पूर्वस व शिवलींग
२) भावई मंदिराचे पश्चिमेंसलगतच बाराचा पूर्वस देवालय – या देवालयी पूर्वस, परब वंस,शिवलिंग, महाविष्णू, महागणपती, दत्त व नवनाथ पादुका, नंदी, सिमापुरुष व कर्ता पुरुष.
३) त्याचे पश्चिमेस रवळनाथ मंदिर – यामंदिरी रवळनाथ (रेवतीनाथ) भूतनाथ, बंदाल (अडवंगनाथ) व गौरी.
४) ज्या ब्राम्हणाने देवतांची अर्चा ( धा. विधी) केली त्याचा वंशज कर्ता ब्राम्हण दक्षिण दिशेस श्री देव वेतोबा मंदिराचे मागील भागात आहे. लगत बारा पंचायतनाचा चव्हाटा व आग्नेय दिशेस बारांचा खुनी (काकडयाचा देवचार)
५) श्री देव वेतोबा मंदिराचे दक्षिण दिशेला ओढयापलीकडे महार गीरा.
६) श्री देवी भावई मंदिराचे पूर्व बाजूस नितकरी पाठीमागे देवकर्त्या पुरुषाची समाधी, नजरेचा चाळा व रस्त्याच्या उत्तरेस पातोळी.

ग्रामदेवता प्रमुख श्री देव वेतोबा पंचायतन परुळे
        ग्रामदेवता पंचायतन निर्मिती झाली. सुरवातीस सदर देवतांची दैनंदिन पुजा-विधी इति. त्यावेळचे त्या त्या परिसरातील स्थानिक भक्त करीत असत. त्याकाळी कुडाळ प्रांतातील नारूर गावचे वाणी-व्यापारी भात, तांदुळ अशा स्वरूपाचा माल विक्रीसाठी आणावयाचे व परुळे गाव बागायती प्रधान सबब जाताना नारळ, सुपारी इत्यादी माल विक्रीस घेऊन जात. पूर्वीचे काळी ही वाहतूक बैलांचे पाठीवर गोणी घालून करत. एकदा विश्रांतीसाठी सदर वाणी व्यापारी श्री देवांचे परिसरात आज जो अश्वथ्थ (पिंपळ) वृक्ष आहे त्याखाली थांबले. दरम्याने बैलांना एकाएकी आजार सुरु झाला. वैद्य, हकीम उपचार करावयास आले पण व्यर्थ! ग्रामस्थांनी देवाना गा-हाणे देणे, प्रसाद घेणे असे प्रकार सुचविले त्या प्रमाणे सोपस्कार केले. बैलांना आराम पडला. त्या रात्री बैलांच्या मालकांना दृष्टांत झाला. या गावातील वतनवाडी उदर निर्वाहासाठी तुला मी देतो. तू या ठिकाणी येऊन माझी दैनंदिन पूजाविधी इत्यादी कामगिरी कर. वाणी व्यापारी यांनी आज्ञा मान्य केली पण आपण गावी जाऊन आपल्या कुलदेवतेचा प्रसाद घेतो त्याप्रमाणे प्रसाद घेतला गेला व आपल्या गावाचे दोन दगड घेऊन बैलासह या गावात आला. या व्यापा-याचे मूळ नांव ‘सुद्रीक वाणी’ देवाचे राऊळही आल्यामुळे ‘राऊळ’ हे नांव कागदोपत्री लावले गेले. श्री देव वेतोबाचे परिसरात या राऊळांचा ‘वाणीवंस’ देवस्थान आहे. मूळ व्यवसाय नारळाचा व्यापार सबब या राऊळांचे घरी लग्न कार्य असेल त्यावेळी वधु-वर मंडळी नारळांनी भरलेली गोणी निशाणी प्रित्यर्थ वधु-वर परस्परांचे गळ्यात घालतात.ज्या अश्वथ्थ वृक्षाखाली गोणीचे बैल आजारी झाले तो वृक्ष रवळनाथ मंदिरासमोर आज उभा ठाकलेला आहे.
         कटूबंध (उत्सव समारंभ) कामातील अग्रकामे ही सुरवातीस या गावचे कोंडसकर (परब) त्यांचे गैर हजेरीत सावंत करत असत. नंतर मात्र हा कार्यभार राऊळ वकलातील वडील घराण्याकडे (कै.वामन काका राऊळ) सुपूर्द करण्यात आला. त्याप्रमाणे तो अद्यापही चालू आहे. या राऊळ घराण्यातील वकलातील इतर घराणी पलाटाप्रमाणे देवसेवेची कामे पूर्वापार पद्धतीनुसार आजपर्यंत करत आहेत.
श्री देव  ग्रामदेवता वेतोबा मूर्तीचे वर्णन
मूर्ती काळ्या पाषाणाची, दगडी विटेवर उभी उंची ७ फूट ६ इंच, कमरेचा घेर ३ फूट ९ इंच दोन्ही बाजूला मागे पितळी कलश, डोकीवर शेषस्वरूप जाळ, कानांत रुद्राक्ष मुद्रीका, दोन्ही हाताचे दंडात सर्पाकृती, उजव्या हाती उभी तलवार, उजव्या हाती कंकण व अंगठी , डाव्या हातात तीर्थ कुंड, गळ्यात यज्ञोपवीत वारुंड माळा व दगडी पद्‍महार, कमरेभोवती दगडी विणलेला गोफ, दोन्ही मांडयांवर सर्पाचे वेस्टन, डोळे व कल्ले चांदीचे, पायांत पादुका पितळी व चांदीच्या. 
Laxmi Narayan Mandir, Walawal, Dist Sindhudurg

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वालावल नावेचे पुरातन निसर्गरम्य गाव आहे. या गावात नारायणाचे पुरातन कौलारू मंदिर आहे. वालावल गावाचे ६ व्या शतकातील नाव बल्लावल्ली होते. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दर्‍या, गावाच्या उत्तरेकडून वहाणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते.
त्यामुळे प्राचीन काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकारी यांनी या गावाचा आसरा घेतलेला आहे. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते. नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी व नंतर विजापूरच्या राजवटी पर्यंत प्रभूदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरदारी होती. त्यांचे वास्तव्यही वालावल गावात होते.
Laxmi Narayan Mandir, Walawal, Dist SindhudurgLaxmi Narayan Mandir, Walawal, Dist Sindhudurg
इ.सनाच्या ११ व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे महालातील हरमळ गावातून श्री देव नारोबाची मुर्ती ब्राम्हणांनी वालावल गावात आणली. त्यावेळी चंद्रभान व सूर्यभान हे वीर पुरुष याठिकाणी अधिकारी होते. त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले. मंदिरा समोरील दिपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणार्‍या कल्याण पुरुषाची देवळी बांधण्यात आली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इ.स.१३५० ते १४०० च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली.

 Kalyan Purush,Laxmi Narayan Mandir, Walawal, Dist Sindhudurg Laxmi Narayan Mandir, Walawal, Dist SindhudurgLaxmi Narayan Mandir, Walawal, Dist SindhudurgLaxmi Narayan Mandir, Walawal, Dist Sindhudurg

   दंतकथेनुसार श्री नारोबा व माऊली हे भाऊबहीण तिर्थयात्रेला चालले होते. वाटेत वालावल गावी कुपीच्या डोंगर पठारावर (सड्यावर) माऊलीला तहान लागली म्हणुन श्री नारोबा पाणी आणण्यासाठी दरीत (गावात) उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक चालू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच जेवला. पोट भरल्यावर त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीत भीतच तो डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन आला नाही म्हणून माऊलीला खुप राग आला होता. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. (श्री नारोबाच्या मुर्तीच्या गालावरील खडडा याची खुण म्हणून दाखवतात.) या भांडणामुळे पुढे न जाता माऊली तिथेच राहीली.माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले आहे. (या ठिकाणी नवरात्रोत्सव होतो.) श्रीनारायणाचे मंदिर गावात आहे. दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीस नारोबा, माऊलीस पाणी घेऊन जातो (श्रीनारायणाची पालखी पाणी घेऊन माऊली मंदिरात जाते.) 

Laxmi Narayan Mandir, Walawal, Dist SindhudurgLaxmi Narayan Mandir, Walawal, Dist SindhudurgLaxmi Narayan Mandir, Walawal, Dist Sindhudurg  
नारायणाची मुर्ती उभी असून अंदाजे ४ फूट उंच आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मुर्तीच्या उजव्या पायाजवळ लक्ष्मी व डाव्या पायाजवळ गरूड कोरलेला आहे. मंदिराच्या गाभार्‍याच्या दारावर शेषशाही विष्णु कोरलेला आहे. मंदिराच्या सभामंडपात कोरीव काम केलेले लाकडी खांब व तुळया आहेत. काळाच्या ओघात त्यावरील कोरीवकाम पुसट झालेल आहे. त्यातील एक खांब तुळशीचा आहे अशी वदंता आहे. मंदिराच्या सभामंडपातील अंतराळाच्या (छताच्या) लाकडी पट्ट्य़ांवर पुराण कथांमधील प्रसंग कोरलेले आहेत. याशिल्पाच्या बाजूच्या पट्टीवर "गंडभेरुंड" कोरलेला आहे. (गंडभेरुंड म्हणजे एक धड, २ पाय,२ पंख व २ डोकी असलेला पक्षी, हे विजयनगर साम्राज्याचे चिन्ह होते.) हा "गंडभेरुंड" पटकन दिसण्यासाठी नारायणाच्या मुर्तीच्या नजरेच्या सरळ रेषेत पाहावे. या कौलारू मंदिराच्या बाहेर ५ दिपमाळा आहेत. त्यापैकी ४ बाजूला ४ एकाच उंचीच्या ४ दिपमाळा आहेत. त्यांच्या वरच्या टोकावर कलश बनवलेले आहेत. मध्यभागी असलेली ५ वी दिपमाळ इतर दिपमाळांपेक्षा उंच आहे. या दिपमाळेच्या एका बाजूला तुळशी वृंदावन आहे. त्यावर देवळाच्या बाजूला हनुमान कोरलेला आहे. दिपमाळेच्या दुसर्‍या बाजूला " कल्याण पुरुषाची" घुमटी आहे. या घुमटीतील मोठी मुर्ती वीरासनात बसलेली आहे. त्याच्या शेजारी छोटी मुर्ती आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस तळे आहे.

Laxmi Narayan Mandir, Walawal, Dist Sindhudurg

जाण्यासाठी :- वालावलला जाण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गावरील कुडाळ गाठावे. कुडाळ - वालावल हे अंतर १० किमी आहे. या मार्गावर एसटीची सेवा व रिक्षा उपलब्ध आहेत.
मालवण - वालावल हे अंतर ३० किमी आहे. मालवणहून परुळे गावापर्यंत एसटीने जाऊन पुढे रिक्षाने वालावलला जाता येते. 
 
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- १) सिंधुदुर्ग किल्ला, मालवण
   २) निवती किल्ला, निवती
   ३) वेतोबा मंदिर, परुळे 
   ४) भोगवे बीच, भोगवे
सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.

Laxmi Narayan Mandir, Walawal, Dist Sindhudurg
   मालवणहून खाजगी वहानाने सकाळी निघून निवतीचा किल्ला(२५ किमी) + यशवंतगड रेडी(४० किमी) + तेरेखोलचा किल्ला(७ किमी) पाहून मालवणला परत येता येते किंवा तेरेखोलहून(४० किमी) पणजीला मुक्कामी जाता येते. 

 संदर्भग्रंथ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील- सतिश अक्कलकोट
३) महाराष्ट्र देशातील किल्ले- श्री. चिंतामण गंगाधर गोगटे
४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के.घाणेकर
५) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
६)  www.trekshitiz.com हि वेबसाईट
७) www.durgbharari.com हि वेबसाईट
८) Being मालवणी हे फेसबुक पेज

 

 

 कोकण प्रांताला निसर्गाचे वरदान लाभले आहे पण त्यात निसर्गाने सौंदर्याचे भरभरून दान काही जास्तच प्रमाणात निवती गावाच्या पदरात टाकले आहे. माडांची बने,सोनेरी वाळु व निळाशार समुद्र अशा सौंदर्याने नटलेल्या या गावात येऊन येथील निसर्गाच्या प्रेमात न पडलेला पर्यटक विरळाच. कर्ली नदी जिथे समुद्राला मिळते त्या खाडीच्या दक्षिणेला असलेल्या निवती गावात समुद्रात घुसलेल्या एका उंच भुशीरावर निवतीचा किल्ला बांधण्यात आला आहे. 
























































प्रवेशद्वार आणि खंदक
साधारण अंदाज घेऊन एक पायवाट शोधली. इथून जरा सावधगिरीने गेलो. काही पायऱ्या दिसल्या आणि बाजूला खंदक. एक तर झाडी प्रचंड, त्यातून मोठा खंदक. एक खूप मोठा मोकळा भाग लागला. उजवीकडच्या टोकाला चालत गेलो, तर भोगवे समुद्रकिनारा खाली दिसला.
भोगवे समुद्र किनारा
भोगवे समुद्र किनारा
मुळातच मी समुद्र वेडा. त्यात आमच्या रत्नागिरीपेक्षा खालच्या पट्ट्यातली वाळू पांढरी. त्यातून मी उंचावर आणि संध्याकाळचे पाच वाजलेले. एवढे सगळे जोडून आल्यावर समोरचे दृश्य का नाही मोहवणार तिथे थांबायला? या किल्ल्याचे लोकेशनच मस्त आहे. या किल्ल्याचा भागच थोडा समुद्राच्या दिशेने पुढे आलेला आहे. उजवीकडे भोगवे तर डावीकडे निवती किनारा. समोर अथांग समुद्र! या निवृत्ती किल्ल्याजवळच “गोल्डन रॉक” म्हटला जाणारा जुना खडक आहे. विहंगम दृश्य!
बुरुज
बुरुज
किल्ल्याचे अवशेष म्हणजे काही बुरुज आहेत काही बुरुज पूर्णपणे जमिनीच्या वर, तर एक-दोन बुरुज असे समुद्राच्या बाजूला जमीन लगत. बुरुज उत्कृष्ट बांधणीचे आणि मजबूत आहेत. अर्थातच हे सगळे बांधकाम चिऱ्यांचे आहे.
बालेकिल्ला
बालेकिल्ला
किल्ल्याच्या मध्यभागी असलेला बालेकिल्ला मजबूत आहे आणि त्याची तटबंदीही शाबूत आहे. बांधकाम चिऱ्यांचेच असून भिंतीची बांधणी दोन हात रुंद अशी मजबूत आहे. बालेकिल्ल्याचा मधला भाग मोकळा असून तटबंदीत खिडक्या दिसतात. दरवाजा असा राहिलेला नसून फुटलेल्या तटबंदीतून आतमध्ये येता येते. ह्या बालेकिल्ल्यावर एक रेड्याचे राज्य असावे. तो शांतपणे चरत होता. मी आत शिरल्यावर आणि तोसुद्धा एकटाच म्हणून तो माझ्याकडे रोखून बघू लागला. त्याचा अवतार आणि आकार बघून मी घाबरत घाबरत थोडासाच भाग बघितला आणि माघार घेतली.
झाडीत लपलेले बुरुज
झाडीत लपलेले बुरुज
झाडीत लपलेले बुरुज

बाहेरचे काही बुरुज पूर्णपणे झाडीत झाकले गेले आहेत. वड, रान-पिंपळ, रान-केळी, कुडा अशा झाडांनी या अवशेषांना गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. हे सगळे बघून गाडीजवळ परत आलो. तृप्ती आणि श्रावणीला घेऊन किल्ल्याच्या उजवीकडच्या टोकाला गेलो, तिथून भोगवे किनारा दिसतो. मन भरेपर्यंत ते दृश्य पाहिले.













आता पुन्हा चौकशी केंद्र गाठले तर कळले थेट साडे दहाला एसटी.. काही फायदा नव्हता.. सगळाच उशीर होणार होता.. आम्हाला सहाच्या आत पुन्हा घरी पोचायचे होते.. नि वाट पाहणे कधीही त्रासदायक ! आम्ही काय करायचे या विवंचनेत असताना बाजूला उभे असलेले मास्तर म्हणाले की तुम्हाला किल्ले निवती ला जायचे असेल तर श्रीरामवाडी ची एसटी पकड़ा.. तिकडून एक डोंगर चढून जावे लागेल.. समुद्र छान दिसतो.. पुढे डुंगोबा चे देऊळ लागेल मग पालिकडेच किल्ले निवती आहे..इति माहिती ऐकताना डोळ्यासमोर आपसुकच चित्र उभे राहीले की डोंगरावर मंदीर असेल.. शांत परिसर.. लाटांची गूंज ऐकू येईल.. मंदिरातल्या कट्यावर बसून समुद्र न्याहाळता येईल.. विश्रांती घेऊन मग पलीकडे किनाऱ्यावर जिथे डोंगराची सोंड उतरत असेल तिथून किल्ले निवती !! वाह ! काल्पनिक चित्रातून बाहेर पड़त लगेच डन डना डन केले !

श्रीरामवाडीची एसटी बरोबर नऊच्या टोल्याला हजर ! एक नवीन गाव पण पहायला मिळणार म्हणून जास्त उत्सुक होतो.. कोकणात सगळी गाव दिसायला तशी सारखीच पण तरीही हवीहवीशी.. प्रवासात नाही म्हटले तरी आड़ आलेल्या गावांमध्ये कमळांनी भरलेले पाटपरुळयामधले तलाव, कौलारु घरावर बसलेला सांड म्हणावा इतका मोठा धनेश पक्षी अस बरच काही दिसले.. आम्ही कुठल्या दिशेने जातोय हे माहीत नव्हते वा स्टॉप कधी येणार काही पत्ता नव्हता.. दीडतासात एका गावात उतरवले गेले.. पण चौकशी केल्यावर कळले शेवटच्या स्टॉप ला उतरायला हवे होते.. एक आजोबा होते ते म्हणाले शेवटच्या स्टॉपला वाट आहे.. डोंगर चढ़ावा लागेल.. पुढे डुंगोबा मंदिर आहे.. वाट अगदी सरळ नाही पण जाऊ शकाल.. इति.. मला मात्र शेवटचे वाक्य खटकले..म्हटल बघू पुढे पण चौकशी करू.. रिक्षाने ५० रुपयाच्या बोलीवर अर्धा एक किमी अंतरावर श्रीरामवाडीच्या शेवटच्या स्टॉप ला सोडले.. त्यानेही ‘डुंगोबासाठी अस जा तस जा.. काही अडचण नाही.. प्रसिद्ध आहे.. बरीच लोक ये – जा करतात वगैरे’ म्हटले नि आमच्या आशा अजुन पल्लवीत केल्या..
अकराच्या सुमारास वाटेला लागलो.. सुरवातीलाच चढण लागते.. जेमतेम चार माणस जाऊ शकतील अशी लाल मातीची पाऊलवाट.. दोन्ही बाजूला डौलदार वृक्ष.. माजलेले झाडीझुडुपांचे रान.. फुललेली आकर्षक रंगाची मोहक रानफुलं.. नि दुरवरून ऐकू येणारी लाटांची गूंज.. सगळ काही आल्हाददायक…!

– –

– – –

पंधरा-एक मिनिटांतच डावीकडचे रान मोकळे झाले व निवतीचा सुंदर समुद्र किनारा नजरेस पडला.. किल्ले निवती व निवती ही दोन वेगवेगळी गावं आहेत.. गफलत नसावी.. ! कुडाळवरून किल्ले निवती व नुसते निवती अश्या दोन्ही ठिकाणी जायला एसटी आहेत.. मुळात हे गाव उंचावर असल्यामुळे पटकन ऊंची गाठल्यासारखे वाटते.. आम्ही वरती चढून मोकळ्या माळरानावर आलो.. कोणाचीच जाग नव्हती वा कुठले घर दिसत नव्हते तेव्हा अंदाज बांधत उजवीकडे जाणाऱ्या वाटेकड़े वळालो.

काही अंतरावर एक चीरे वापरून बांधलेले कुंपण लागले.. बरोबर मध्ये ते कुंपण तुटलेले अर्ध्या अवस्थेत दिसले नि इथेच ‘श्री डुंगेश्वर देवस्थान’चा छोटा फलक दिसला.. ! पण तो फलक दिशा सांगत नव्हता.. ! शिवाय फलकाच्या उजवीकडे नि डावीकडे जाणाऱ्या दोन वाटा यामुळे गोंधळ उडाला.. विस्तीर्ण अश्या या माळरानावर आम्ही दोघेच.. डावीकडची वाट निश्चित झाडीत लपलेल्या घराकडे जात असणार म्हणून आम्ही उजवीकडची वाट पकडली.. पुन्हा एकदा पाऊलवाट नि दोन्ही बाजूस झाडी सुरु.. सातभाई,कोतवाल, बुलबुल नि सूर्यपक्षी यांचीच काय ती वर्दळ.. डोईवर सूर्य तळपू लागलेला नि आम्ही कधी डुंगोबा ला पोचतोय असे झालेले.. म्हणजे किल्ले निवती चा मार्ग मोकळा..!
थोड पाचेक मिनिट चाललो तेव्हा कुठे एकच घर लागले . कोणी दिसले नाही म्हणून तसेच पुढे गेलो तर पुन्हा वाटेला दोन फाटे फुटले.. परिसर भन्नाट शांत होता.. उगीच दुपारची चुकामुक नको म्हणून मागे येऊन घरात हाक दिली.. चुकीची वाट पकडल्याचे कळले नि माघारी फिरलो.. आता पुन्हा त्याच फलकाजवळ ! त्या घरवाल्यांनी विजेचा खांब आहे तिकडून वाट जाते सांगितलेले.. पण इथे दोन खांब अंतर राखून होते नि एक वाट कुंपणापलीकडे जात होती.. कुंपण ओलांडायचे की नाही या संभ्रमात तेव्हा पुन्हा खात्री करण्यासाठी डावीकडच्या घराकडे जाणारा रस्ता पकडला.. चोहुबाजूंनी आंबा, नारळ अश्या झाडांच्या वेढयात टुमदार घर विसावलेले.. फ़क्त दिसायलाच प्रसन्न नाही तर त्या परिसरात प्रवेश केला नि विलक्षण गारवा जाणवला.. अंगणात मोहक अबोलीचा गंध दरवळत होता.. माडाच्या झाडाखाली शीतल छायेत दाटीवाटीन असलेल्या अबोलीच्या ताटव्याची ती किमया होती..

घरच्या ओट्यावर एक ताई त्या अबोलीचाच गजरा गुंफण्यात मग्न होती.. मी बाहेरच उभा राहून बायकोला रस्ता विचारण्यासाठी पाठवले.. ते कुंपण ओलांडूनच रस्ता असल्याचे कळले.. निघण्यापूर्वी ताईने आपुलकीने एक गजरा सप्रेम भेटही दिला.. बायकोच्या कपाळी कुंकू लावूनच ताईने पाठवले.. त्या पाच मिनिटाच्या आदरतिथ्याने अजिबात भारावलो नाही ! त्यांच्या काळजात भरली शहाळी…!!
आम्ही आता योग्य मार्गी लागलेलो.. मध्यान्ह ओलांडून गेली तरी आम्ही अजुन पोचतच होतो.. एव्हाना किल्ले निवतीबद्दल उत्सुकता कमी झाली होती.. नि डुंगोबाचा ध्यास लागला होता.. त्याचा पत्ता लागला की तिकडून किल्ले निवती.. ! पुढे वाटेत कुठेही गरज नसताना आता मात्र अजुन एक दिशादर्शक फलक लागला..

समोरच आम्हाला जंगलाने वेढलेला दुसरा डोंगर दिसू दिसला.. पण आमची वाट पुढे उतरणीला लागली.. नि चक्क जंगलात घुसली.. म्हटल मंदिर गेल कुठे ?? बर कुणाला विचारयाचे तर सगळा सुनसान परिसर..

– – –

– – –

पण वाटेत अधुनमधून भगवा दिसत असल्याने वाट बरोबर होती हे समजत होते.. दोन्ही बाजूच्या वृक्षदाटीने आता आसमंतही झाकून घेतले.. चार फूट रुंदीची पाऊलवाट आता केवळ दोन फुटाची बनली.. उतार कायम होता तेव्हा डोंगर उतरतोय हे लक्षात आले होते.. मग देवस्थान गेले कुठे नि निवतीला इकडून जायचे कसे.. मनात नुसता कल्लोळ उठला.. पुढे वाटही बिकट होत चालली.. दिडेक फुट रुंदीच्या वाटेमुळे आजुबाजूच्या झाडीशी झटापटी होऊ लागली.. अगदी सरळ अशी वाट नव्हतीच.. अधुनमधून झाडांची जाडजूड मुळं ओलांडावी लागत होती तर कधी आड़ येणाऱ्या वेलींचा अडथळा पार करावा लागत होता.. काही ठिकाणी आड़ येणाऱ्या वेली बांधून ठेवल्या होत्या.. पण त्यांना कितीसे थोपवणार.. पुढे तर अगदी काट्याकुट्यांच्या बोगदयातून वाकून जावे अशी वाट.. बर या गुंत्यात कुठे सरपटणारे जीव पायाखाली नाही आले म्हणजे झाल..

जल्ला हे सगळ आमच्या पोषाखाला साजेस नव्हतच.. साहजिकच आता ठिणगी नाही तर बायकोचा भडका.. जल्ला मी पण वैतागलो होतो.. एवढं प्रसिद्ध देवस्थान मग वाट का नाही चांगली.. मंदीर वगैरे नसून नक्कीच आश्रम वगैरे असावे असे वाटू लागले.. बर समोर दहफुटा पालिकडच नि आजुबाजुला दोन फूटा पालिकडच दाट झाडीमुळे काही दिसत नव्हतं.. सकाळी ते मास्तर सांगत असताना मनात उमटलेल्या त्या काल्पनिक चित्राचे एव्हाना केव्हाच तुकडे पडलेले..!
कुठलाही धोका नको म्हणून माघारी परतायचा विचार मनात येत होता.. पण काही मिनिटांत उजव्या बाजूला खाली वाहत्या पाण्याचा आवाज ऐकू आला.. पाहिले तर काही बायकांची धुणी-भांडी सुरु होती.. झाड़ीमुळे काही स्पष्ट दिसत नव्हते तेव्हा तसेच पुढे गेलो.. उतार संपला एकदाचा..! सपाट वाट सुरु झाली पण जंगल मात्र तेवढेच.. थोड़ पुढे गेलो नि अचानक मोकळ्या जागेतील भगवा रंग डोळ्यात भरला.. या जागेचे वर्णन काय करावे.. गुढमय शांतता.. त्यात दाटीवाटीने बसवलेल्या असंख्य भगव्या निशाणांचा भड़क रंग.. हा परिसर लांबूनच बघताना समोरून मुंगूस आडवे गेले..! हेच ते श्री डुंगेश्वर देवस्थान.. डुंगोबा !
साध छप्परदेखील नसलेले पण येथील प्रसिद्ध असे हे श्री देव डुंगोबा देवस्थान.. भगव्या निशाणांच्या आश्रयाखाली एक शिवलिंग नि पुजेची दोन तीन भांडी.. आजुबाजूला झाडांच्या मूळांचा विळखा आणि तोरण म्हणून बहुसंख्येने असलेल्या घंटांच्या माळा.. ! बस्स बाकी काही नाही.. मागच्या बाजूस तीन-चार मोठी पातेली व भांडी ठेवलेली दिसली. म्हणजे भक्तजनांची ये-जा असावी.. बाकी हा परिसर अगदी स्वतःच ध्यान धारणेत हरवलेला.. या चिडीचूप परिसरातील शांतता ही तुम्ही घ्याल तशी असते.. मग काहीजणांना ती सुखावह वाटते तर काहीजणांना भयावह वाटते..!!!

– – –

(नंतर मिळालेल्या माहितीनुसार कळले की स्थानिक लोक या जंगलाला देवराई म्हणतात.. देवाचे जंगल म्हणून या भागात (जिथे जंगल सुरु होते तो भाग) वुक्षतोड तर नाही पण झाडाचे साध पानदेखील खुंटत नाहीत म्हणे. म्हणूनच ती वाट एवढी बिकट बनली असावी.. आणि येथील स्थानिक लोकांचा विघ्नहर्ता नि या जंगलाचा देवता म्हणजे श्री देव डुंगोबा _/\_ )
वाट इथेच संपत होती.. उजव्या बाजूला असलेला वाहता ओहोळ इथे मात्र स्थिराप्रज्ञेत होता.. आता पुढे काय करायचे हा गोंधळ असल्याने आम्ही लगबगीने आल्या वाटेने माघारी फिरलो.. जिथे धुणीभांडी करण्यास बायका आल्या होत्या त्यांना आवाज दिला.. पण उतरायचे कुठून हेच त्या दाट झाडीत समजत नव्हते.. शेवटी एकीने वरती येऊन खाली उतरण्याची वाट दाखवली.. तो ओहोळ पार करून पलिकडच्या वाटेने तिने आम्हाला गावात सोडले ! म्हणजे ओहोळ पार करणे गरजेचे..
किल्ले निवती कुठेय विचारल्यावर ह्याच गावाला किल्ले निवती म्हणतात कळले.. पण किल्ल्यावर जायचे म्हटल्यावर तिने वाट दाखवली.. 
दुपारचा एक वाजत आलेला.. तळपते उन नि आतापर्यंत झालेली बरीच तंगडतोड यांमुळे हैराण व्हायला झाले.. शेवटी अर्ध्या वाटेतच बायकोने माघार पत्करली.. वाटेतील घरच्या गेटवर सावली बघून बसली.. पाचेक मिनिट पुढे जायचे होते पण आता ती तयार नव्हती.. तरी बरीच मजल मारली होती.. ‘मग इथेच रहा.. येतो पटकन’ म्हणत मी धावतच पुढे गेलो.. पुढच्या वळणापर्यंत ती दिसत होती.. या वळणावरती किल्ले निवतीचा समुद्रकिनारा व समुद्रात घुसलेला डोंगरसदृश मोठा खडक हा नजारा खूपच छान दिसतो.. मनात म्हटल इथ नंतर जाऊ..

– – –

वळण घेतले की वरती पोचलो.. पण किल्ल्याचे अवशेष कुठे दिसले नाही.. या वरच्या पठारावर एक पत्र्याच घर होत.. इथून पलिकडच्या कड्यावर गेलो नि समोरच दृश्य पाहून थक्क झालो.. अथांग समुद्र नि पांढऱ्याशुभ्र वाळूचा लांबच्या लांब पसरलेला सुंदर समुद्रकिनारा.. जोडीला नारळाच्या बागेची किनार.. हाच तो भोगव्याचा समुद्रकिनारा.. लाटांची किनाऱ्यासंगे सुरु असलेले हितगुज सोडले तर बाकी सगळे शांत शांत.. असा निवांत समुद्रकिनारा पाहण्याची मजा काही औरच..

– – –

डावीकडे पाहीले तर झाडीत लपलेला बुरुज नजरेस पडला पण तिथे जाणे अशक्य वाटले.. शिवाय काळ्या तोंडाची वानरं तिथे बसली होती.. तेव्हा जवळ जाण्यात अर्थ नव्हता.. दोनेक मिनिटांतच माघारी फिरलो.. बस्स एवढाच किल्ला कसा असा विचार करतच वळणावर पोचलो.. दुरवर असलेल्या बायकोला आलोच सांगत पुन्हा शोधात निघालो तर वळणानंतर लगेच डावीकडे वाट दिसली.. पायऱ्या दिसल्या.. हा परिसर अगदीच दुर्लक्षित व झाडीझुडुपाच्या अडगळीत फसलेला दिसला.. मग ते सुरवातीला वाटेच्या दोन्ही बाजूस लागणारे खंदक असो वा अवशेष.. दुपारचे टळटळीत उन, तिथे थांबलेली बायको नि या सन्नाटात मी एकटा त्यामुळे पुढे जाण्यास निरुत्साही होतो.. शिवाय रान खूपच माजले होते.. म्हटल दोन चार पावल पुढ जाऊ तोच बाजूच्या झाडीतून जोरात आवाज आला.. क्षणभर माझ्यावर कुणाचा हल्ला होतोय असेच वाटले नि कोण आहे हे न बघताच मी भरवेगात मागे फिरलो.. कुणास ठाऊक क्षणभर काळजात धस्स झाल होत.. नक्कीच वानर असणार नि मला बघून दुसऱ्या झाडावर पळाल असणार असा अंदाज बांधला.. तिकडे तो घाबरला असणार नि इकडे मी.. आता पुन्हा जाण्यात पॉइंट नव्हता कारण मघाशी मोठी टोळी पाहिली होती त्यांची.. तसाच अर्धवट किल्ला बघून मागे फिरलो..

– – –

– – –

आता आम्ही पुन्हा किल्ले निवती बस स्थानकाजवळ आलो.. संध्याकाळी पाच शिवाय एसटी नव्हती आणि ती नेहमी येतेच असही कोणी ठामपणे सांगत नव्हते.. ‘श्रीरामवाडीला जा.. शॉर्टकट आहे.. तिथून साडेतीन-चारच्या सुमारास एसटी नक्की येते’ असे कुणीतरी सांगितले नि बायकोच्या कपाळावर आटया पडल्या.. म्हटल बघू म्हणत 

– – –
खडकावरुन समोर दिसणारा निवती किल्ल्याचा डोंगर

– – –

आता पुन्हा मुळ रस्त्यावर आलो.. दोन वाजत आलेले.. श्रीरामवाडी शिवाय पर्याय नव्हता.. तेव्हा मुख्य रस्त्याला सोडून आम्ही उजवीकडच्या गल्लीत शिरलो.. सुपारी-नारळ अश्या विविध झाडांच्या गर्द सावलीत ही घर विसावली आहेत.. घर मागे पडली नि एका मोकळ्या जागेत सिमेंटची विहीर लागली.. पाउलवाटेेने ओहोळाजवळ आणून सोडले..

– – –

पाण्याने जवळपास तळ गाठला होता तरीसुद्धा खात्री म्हणून मीच आधी पाण्यात उतरलो.. फार नाही पण गुडघ्यापर्यंतच पाणी लागले.. पालिकडे पोचलो नि कुठे वाट दिसते का आधी पाहीले तर समोरच झाडी पलिकडे डुंगोबा देवस्थान दिसले.. आणि मार्ग लक्षात आला.. ! दोन डोंगराच्या घळीत कुठेतरी जंगलाच्या एका कोपऱ्यात आडोश्यात असलेले हे डुंगोबा देवस्थान माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते.. प्रसिद्ध देवस्थान म्हटले की भव्य मंदीर, येण्या-जाण्यासाठी बऱ्यापैंकी रस्ता असला काही प्रकार नव्हता.. . असो नमस्कार करून आम्ही पुन्हा जंगली ट्रेकला आरंभ केला.. ट्रेकच झाला हा.. श्रीरामवाडीवरून डोंगर चढायचा.. दुसऱ्या बाजूने जंगलातल्या घळीत उतरायचे.. नि पुन्हा किल्ल्यासाठी लाल रस्त्याच्या वाटेने दुसऱ्या डोंगरावर चढायचे ! एरवी ठिक होते पण उपाशी पोटी नि फॉर्मल कपड्यात.. !
सुरवातीला त्रासलेली बायकोही आता रिलॅक्स वाटत होती..

काहितरी वेगळं पहायला मिळाल्याचे समाधान वाटत होते.. श्रीरामवाडीत पोचायला सव्वातीन वाजले.. म्हणजे वेळेत आलो.. या श्रीरामवाडीच्या मागे असणाऱ्या समुद्रावरदेखील जाता येते.. पण आम्ही आता मात्र स्टॉपजवळ असणाऱ्या दुकानातून केळावेफर घेऊन निवांतपणे खात बसलो.. मांजरीची पिल्लं होतीच टाइमपासला.. त्यांच्यासोबत खेळताना एसटीची वाट बघणे रटाळवाणे वाटले नाही..

तसे म्हणा एसटी येइपर्यंत थोड़ी दागदुग होतीच.. कारण पुन्हा आता काही धाडस, तंगडतोड वगैरे करायची इच्छा नव्हती.. आता घरची ओढ़ लागलेली.. चहा घेइपर्यंत थोड़ी उशिराने का होईना एसटी आली नि आम्ही निश्चिंत झालो..
 

निवती किल्ला 

निवती किल्ला 





श्रीरामवाडी ते कुडाळ ते आमचे तेर्से बांबार्ड्याला असलेले घर असा प्रवास करत आम्ही अंधार पडायच्या आतच घरी पोचलो.. घरी काकीला डुंगोबाबद्दल सांगितले तर तिलाही ते देवस्थान ऐकून माहीत होते.. म्हणजे ख्याती आजुबाजूच्या गावांमध्ये पण आहे हे समजून गेलो.. तरीपण तिथे जाणारी वाट कशी वाट लावते हे तीला वा आईला बोललो नाही.. बायकोलाही सांगून ठेवले होतेच.. उगीच दोन शब्द ऐकायला लागले असते..!
एकंदर आजची अंगारकी चतुर्थी चांगलीच लक्षात राहणार होती.. किल्ले निवतीच्या मोहापायी नकळत ट्रेकच झाला होता.. शिवाय अगदी साध्या रुपात तरीही लक्षवेधक वाटणार्‍या श्री डुंगोबा देवस्थानाचे दर्शन घडलेले.. आता पुन्हा कधीतरी वेळेचे गणित जमवून फक्त किल्ले निवतीवर वेळ काढायचा आहे.. सूर्यास्त होइपर्यंत तासनतास बसून रहायचे आहे.. नभात उमटलेले मावळतीचे रंग पहायचे आहेत.. कितीही पाहिले वा अनुभवले तरी मनाची ओंजळ काही भरणार नाही.. पण अश्या अविस्मरणीय आठवणीच मग पुढच्या भटकंतीसाठी एक नवी उमेद निर्माण करतात.. तेव्हा पुन्हा कधीतरी कुठल्या आडवाटेवरी… तोपर्यंत _/\_
 
 

सागर सखा किल्ले निवती

Nivati fort bastion

निवती आणि भोगवे या दोन अप्रतिम समुद्र किनाऱ्यांच्या मध्ये असलेल्या एका डोंगरावर बांधलेला किल्ले निवती म्हणजे दर्याचा दोस्तच. ब्लू फ्लॅग चं आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेला शुभ्र वाळूचा किनारा पाहायला सर्वात योग्य जागा म्हणजे किल्ले निवतीचा उत्तरेकडे असलेला बुरुज.

Bhogawe beach

गोड मालवणी बोली, तितकेच गोड शहाळ्याचे पाणी, खारा पण थंड सागर वारा, नितळ निळाईचे विविध अविष्कार दाखवणारा समुद्र, नारळ पोफळीच्या हिरव्यागार बागांनी स्वच्छ सफेद वाळू बरोबर केलेली रंगसंगत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी दृष्टीने आणि दृढनिश्चयाने रचलेला इतिहास या सगळ्यांच्या मिश्रणातून घडलं आहे कोकण. एखाद्या शांत सकाळी किंवा धीरगंभीर संध्याकाळी किल्ले निवतीच्या माथ्यावरून कोकणचा अद्भुत अविष्कार अनुभवायला मिळणं अविस्मरणीयच.

Nivati fort ruins


किल्ल्यावर विविध बांधकामांचे अवशेष आपण पाहू शकतो. जांभा दगडातील या रचना सतराव्या शतकातील असाव्यात असे अभ्यासक मानतात.  किल्ला लहानच असला तरीही पश्चिमेला अथांग सागराचे अवर्णनीय दृश्य पाहायला तासभर बसलं तरीही मनाचं समाधान होत नाही. इथं समुद्रातून वर आलेले खडक हे ग्रॅनाईटचे असावेत असं मला वाटतं. पण यावर तज्ज्ञ लोकच प्रकाश टाकू शकतील.


Vengurla rocks

दर्या फिरस्तीच्या प्रवासात हे एकमेव ठिकाण असे उरले आहे जिथं मी अजून पोहोचलो नाही. लवकरच हा योग घडून यावा ही उत्सुकता आहेच. कोकणातील किल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, लेणी यांची गोष्ट आम्ही दर्या फिरस्ती ब्लॉगच्या माध्यमातून सांगत आहोत. या चित्र भ्रमंतीत सहभागी होण्यासाठी ब्लॉगला भेट देत रहा.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...