Monday, March 1, 2021

कोटकामते

निसर्गसौंदर्याने नटलेली कोकणची भूमी ही तिथे असलेल्या विविध देवस्थानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. इथल्या जवळजवळ सगळ्याच देवस्थानांशी काही ना काही गूढ रम्य अशा कथा निगडित असतात. अत्यंत शांत वातावरण असलेल्या या मंदिरांमध्ये खरोखर मन:शांती मिळते. काहीसे वेगळे, पण मोठी ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेले असेच एक मंदिर म्हणजे कोटकामते येथील श्रीभगवती मंदिर होय. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या देवगड तालुक्यात असलेले हे मंदिर देवगडपासून ३० कि.मी. आणि कुणकेश्वर या प्रसिद्ध ठिकाणाहून फक्त १५ कि.मी.वर आहे. या गावचे अगदी खास असे वैशिष्टय़ म्हणजे, देशभरातील इतर व्यक्तिगत इनामे आणि संस्थाने जरी रद्द झाली असली तरी देवगड तालुक्यातील कोटकामते गावचे इनाम मात्र अजूनही चालू आहे. या गावाच्या सर्व जमिनीवर प्रमुख कब्जेदार म्हणून इनामदार ‘श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामते’ असा शिक्का प्रत्येक जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर आहे.
     या गावाला पूर्वी एक प्राचीन कोट होता. कोट असलेले गाव म्हणून कोटकामते असे याचे नाव पडले.कोकणातील बहुतेक भुईकोट काळाच्या उदरात नष्ट झाले असुन काही किल्ल्यांचे अवशेष आजही शिल्लक असले तरी ते किल्ले मात्र विस्मृतीत गेलेले आहेत. अशा किल्ल्यांचे अस्तीत्व आज नावापुरते इतिहासाच्या पानातच उरले आहे. कोटकामते हा असाच विस्मृतीत गेलेला एक कोट. देवगड तालुक्यात असलेला हा कोट आजही आपल्या अंगाखांद्यावर किल्ल्याचे अवशेष बाळगून असला तरी केवळ हा किल्ला अस्तीत्वात नसुन या किल्ल्याचा केवळ एक बुरुज गावाबाहेर रस्त्याच्या कडेला पहायला मिळतो या माहितीमुळे कोणीही या किल्ल्याकडे फिरकत नाही. तर काही ठिकाणी कोटकामतेचे भगवती मंदीर या कोटातच वसलेले आहे अशी माहिती वाचायला मिळते. पण प्रत्यक्षात कोटकामते कोट व भगवती मंदीर यामध्ये अर्धा कि.मी.अंतर आहे.
 कामते गावाला कोटकामते हे नाव या कोटामुळे पडले आहे. देवगड तालुक्यातील कोटकामते किल्ला देवगड शहरापासुन २० कि.मी. अंतरावर तर मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव फाट्यापासून ३० कि.मी. अंतरावर आहे. 
 या भुईकोटाकडे येण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१) मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून ३० किमी अंतरावर नारिंग्रे गाव आहे. या गावातून उजव्या बाजूस जाणारा रस्ता ५ किमी वरील कोटकामते गावात जातो.
२) देवगड - जामसांडे - तळेबाजार - तिठा यामार्गे (अंतर अंदाजे २० किमी) कोटकामते गावात जाता येते.
 
देवगड किल्ला व सदानंदगड यांच्या मधोमध हा किल्ला आहे.या दोन्ही मार्गांनी गावात शिरण्याआधी अर्धा कि.मी.अलीकडे या किल्ल्याचा बुरुज नजरेस पडतो. अनेक ठिकाणी किल्ल्याचा हा एकमेव बुरुज शिल्लक असल्याचे वाचनात येते पण प्रत्यक्षात वस्तुस्थिति मात्र वेगळीच आहे.  
नारिंग्रे नदीकाठावर असलेला चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण दिड एकर परिसरावर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एक-दोन नव्हे तर पाच बुरुज व मातीखाली दबत चाललेली तटबंदी पहायला मिळते. 
 
किल्ला असलेल्या भागाचा उंचवटा आजही शिल्लक असुन दरवाजाकडील भाग वगळता कोठूनही सहजपणे किल्ल्यावर जाता येत नाही. कोटाच्या मागील भागात नारिंग्रे नदीचे पात्र असुन कोटाच्या तटबंदीला लागुनच या नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्या व एक बुरुज बांधलेला आहे.  
हा बुरुज व पायऱ्या आजही सुस्थितीत आहेत. कोटाच्या चारही बाजुस खंदक असुन आज हे सर्व खंदक मातीने भरलेले आहेत. या खंदकाची जमिनीकडील बाजु घडीव चिऱ्यानी बांधलेली आहे.  Picture
गाडीमार्गाच्या दिशेने कोटात शिरण्यासाठी वाट असुन वाटेच्या सुरवातीस असलेले मातीचे ढिगारे पहाता या ठिकाणी कोटाचा दरवाजा असावा असे वाटते. कोटाच्या आतील बाजुस आंब्याची बाग असुन या बागेची निगा न राखल्याने मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढली आहे. त्यामुळे कोटात फिरता येत नाही. कोटातील आंब्याची बाग पहाता आत विहीर असण्याची शक्यता आहे. संपुर्ण कोटाची बाहेरून फेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो.

     हा संपूर्ण परिसर आमराईने नटलेला आहे. इतिहास काळात कोटकामते गावात सिद्धीचे राज्य होते. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांनी मोठ्या शौर्याने वचक ठेवला होता. म्हणूनच सिद्धीचे राज्य असतानाही कोटकामते गावावर आंग्रेंची सत्ता होती.एका आख्यायिके नुसार कामते गावातील भगवती देवीस कान्होजी आंग्रे यांनी नवस केला होता, ‘‘जर मी लढाईत विजयी झालो तर, तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’’ त्याप्रमाणे युध्द जिंकल्यावर कांन्होजीं आंग्रे यांनी श्री देवी भगवतीदेवीचे भव्य मंदिर बांधले. 
 
या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पाहता येतो.शिलालेखातील मजकूर पुढील प्रमाणे:-‘‘श्री भगवती ॥श्री॥ मछक षोडश शत: सत्पचत्वारिंशत माधिक संबंछर विश्वात सुनामा ॥ सुभेतं स्थिच छरे आंगरे कान्होजी सरखेल श्रीमत्कामश देवा देवालय मकरोदिती जाना तु जनो भविष्य माण: ॥१॥याशिवाय कान्होजींनी साळशी, आचरा, कामते, किंजवडे ही गावे मंदिराला इनाम म्हणून दिली होती.      

जवळपास नष्ट झालेल्या या भुईकोटाच्या इतिहासात डोकावुया. सावंतांकडून होणाऱ्या सततच्या कुरापतीना आळा घालण्यासाठी मराठा आरमार सरखेल कान्होजी आंग्रे यांनी त्यांच्या ताब्यातील देवगड व साळशी या प्रांताच्या मध्यभागी कोटकामते या भुईकोटाची उभारणी केली. या कोटासोबतच त्यांनी भगवती देवीचे मंदीर बांधले असावे. त्या अर्थाचा शिलालेख या मंदिरावर पहायला मिळतो. या शिलालेखातील मजकुर :-‘‘श्री भगवती ॥श्री॥मछक षोडश शत: सत्पचत्वारिंशत माधिक संबंछर विश्वात सुनामा ॥ सुभे तं स्थिच छरे आंगरे कान्होजी सरखेल श्रीमत्कामश देवा देवालय मकरोदिती जाना तु जनो भविष्य माण: ॥१॥(शके १६४७) या किल्ल्याचा पहिला उल्लेख वाडीकर खेम सावंत यांनी ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर १७१९ दरम्यान पोर्तुगीजांना लिहिलेल्या पत्रात येतो. 
"संभाजी राजे यांनी कुडाळचा किल्ला घेतला.आता कन्होजी आंग्रे फोंड सावंत यांच्यावर चालून येत आहेत.ते त्यांच्या राज्याच्या हद्दीला येउन भिडले आहेत.त्यांनी तिकडे दोन किल्ले बांधले आहेत.या किल्ल्यांच्या सहाय्याने पुढे आक्रमण करायचा त्यांचा इरादा आहे.या राज्याच्या मदतीशिवाय त्यांना शत्रुशी दोन हात करता यावयाचे नाहीत. दहा तोफा शिवाय पाचशे तोफांचे गोळे दोन किल्ल्यांच्या रक्षणासाठी त्यांना हवे आहेत.हे दोन किल्ले त्यांनी आंग्र्यांच्या किल्ल्यासमोर बांधिले आहेत.पुन: त्यांना पन्नास घोड्यांची व युध्दनौकांचीही मदत हवी आहे."
या पत्रात सावंतानी आंग्रे यांनी बांधलेल्या नवीन किल्ल्याविषयी कळवले असुन त्या विरुद्ध लढण्यासाठी दहा तोफा,तोफगोळे,घोडे व नौका अशा सामानाची मागणी केली आहे. 
         आता कान्होजींनी बांधलेले दोन किल्ले कोणते हे पहाताना सावंताच्या राज्याची सीमा कुठवर होती हे समजून घेणे आवश्यक आहे.साळशी महाल हे सावंत व आंग्रे यांच्या राज्याच्या सीमेवरचे महत्वाचे ठिकाण व बंदर होते.सावंत सातारच्या शाहु रांजेच्या सेवेत रुजु झाल्याने शाहु छत्रपतींनी त्यांना व आंग्रे यांना साळशी महालाचे उत्पन्न अर्धे अर्धे वाटून घ्यायला सांगितले.मात्र सावंत व आंग्रे यांचे वैर कायम राहीले.साळशी महालात कोट कामथे हे गाव मोडत असल्याने आंग्रे यांनी बांधलेला एक गड म्हणजे नक्कीच कोट कामते असणार.अर्थात पोर्तुगीजांनी पत्रात उल्लेख केलेली मसुरेची नदी म्हणजेच कालावल खाडी हि आंग्रे व सावंत यांच्या प्रदेशातील सरहद्द होती.अर्थात आंग्रेंनी दुसरा किल्ला कोणता वांधला हे मात्र सांगता येत नाही.
    सन १७१३ मध्ये करवीरकरांचा पक्ष सोडून कान्होजी आंग्रे सातार्‍याच्या शाहु छत्रपतींना सामिल झाले.तेव्हा त्यांच्याशी झालेल्या तहात शाहु महाराजांनी जे २६ किल्ले दिले त्यात कोट कालावे असा उल्लेख आहे.मात्र हा बहूधा कोट कामते नसावा. 
   नानासाहेब पेशवे व इंग्रज यांच्या तुळाजी आंग्रे विरुद्धच्या संयुक्त मोहिमेत १७५५-५६ दरम्यान पेशव्यांनी कोटकामते जिंकला. इ.स. १७७४ मधील पोर्तुगीजांच्या नोंदीनुसार कोटकामते किल्ला विजयदुर्ग परीसराच्या मध्यभागी होता. ७ एप्रिल १८१८ रोजी कर्नल इम्लाकने देवगड घेतल्यावर कोटकामते किल्ला न लढताच शरण गेला. 
 
 
 
 
 
 १८६२ साली झालेल्या किल्ल्यांच्या पाहणीत कोटकामते किल्ल्यात चार तोफा असल्याचा उल्लेख येतो यातील तीन तोफा आपल्याला भगवती मंदिराच्या आवारात पहायला मिळतात. यातील २ तोफा मंदिराच्या दरवाजात असुन एक तोफ पाराजवळ उलट पुरलेली आहे.
Bhagawati Mandir, Kotkamate
    सहा प्रचंड लाकडी कोरीव खांबांनी तोललेली तक्तपोशी, जुन्या घंटा, देवतांचे तरंग, लामणदिवे आणि भगवतीची सर्वागसुंदर मनोहारी मूर्ती असे सगळे साग्रसंगीत सजलेले हे देवालय आहे. अत्यंत जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी अशी हिची ख्याती पंचक्रोशीमध्ये पसरलेली आहे.

   श्री देवी भगवती देवीची पुरातन मुर्ती काळ्या पाषाणात बनवलेली आहे. देवीच्या मूर्तीच्या वरच्या बाजूस २ हत्ती देवीवर पुष्पवृष्टी करताना कोरलेले आहेत. देवीच्या उजव्या हातात खडग आहे. देवीच्या सभा मंडपाचे खांब लाकडी असून त्यावर कोरीव काम केलेले आहे. त्यापैकी एक खांब तुळशीचा असल्याची वदंता आहे. मंदिराच्या परिसरात दोन पुरातन मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यास स्थानिक लोक रामेश्वर व पावणाई म्हणतात. श्री देवी भगवती मंदिरामागे रामेश्वर मंदिर आहे. त्यात एक पुरातन मूर्ती आहे. याशिवाय पुरातन दुमजली वाड्याचे अवशेषही पाहायला मिळतात.मंदिरापर्यंत जाण्यास उत्तम रस्ता आहे. मंदिरात देवीची पाषाणी रेखीव मूर्ती आहे. दक्षिण-उत्तर मंदिर असून समोरील दिशा दक्षिणेस आहे. मंदिरासमोर वड व पिंपळाचे दोन जुनाट वृक्ष आहेत. या वृक्षाखाली देवळाच्या प्रवेशद्वारापाशी देवीचे वाहन असलेली सिंह प्रतिमा आहे. मंदिराच्या सभा मंडपाला लाकडी खांब असून त्यावरील कोरीव नक्षीकाम अप्रतिम आहे. मंदिरा शेजारी दोन शिवकालीन तोफा आहेत. देवालयाचा परिसर अत्यंत निसर्ग सौंदर्याने नटलेला असून आवारास चिरेबंदी तटबंदी आहे. बाजूलाच कलात्मक बांधणीची पिण्याच्या पाण्याची विहीर व धर्मशाळा आहे.
  
 देवळाच्या आवारात श्री पावणादेवीचे एक मंदिर असून हिमूर्ती संगमरवरी आहे. श्री पावणादेवीच्या मंदिराचे बांधकाम नव्यानेच करण्यात आले आहे. मंदिरा बाहेरील आवारात श्री देव रवळनाथ, श्री मारुती अशी मंदिरे आहेत.






 श्रीदेवी वडची, श्रीदेव गांगेश्वर,रामेश्वर, ब्राह्मणदेव, जठेश्वर, श्री विठलादेवी इ. मंदिरे कोटकामतेगावाच्या परिसरात आहेत.
 
 
 नवरात्रोत्सव हा कोटकामते गावाचा प्रमुख उत्सव. दस-यात या मंदिरात हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमी पर्यंत दहा दिवस फार मोठ्या आणि पारंपारिक पध्दतीने शाही थाटात संस्थानिकांना शोभेल असा साजरा केला जातो. नवरात्रात देवीचे तेजही काही आगळेच असते. देवीच्या संपुर्णअंगावर चांदीचे कवच चढवण्यात येते. पालखीदेखील खास चांदीच्या आभरणांनी सजवली जाते. सभामंडप जुन्या काळाच्या हंडया व झुंबरानी सजवले जातात.अत्यंत शिस्तबद्धता हे इथल्या नवरात्र उत्सवाचे प्रमुख वैशिष्ठय. देवसेवकांची वाटुन दिलेली कामे नियमितपणे पार पडतात. चैत्र व कार्तिक महिन्यात १ महिना पालखी सोहळा असतो. गोकुळाष्टमीच्याआधी सात दिवस अगोदर हरीनाम सप्ताहास सुरुवात होते. तर गोकुळा ष्टमीला या सप्ताहाची सांगता होते. येथील उत्सवाचा आनंद लुटणे म्हणजे एक पर्वणीच आहे.श्री देवी भगवती मंदिरा विषयीआख्यायिका सांगितले जाते, ती म्हणजे पूर्वीच्या काळी तानवडे नावाचे सद्गृहस्थ तंबाखूचा व्यापार करीत होते. या व्यापाराची वाहतूक बैलाच्या पाठीवरून केली जात होती. गावात आल्यावर ते सदगृहस्थ तंबाखूचू पोते पाठीवर मारून गावागावात तंबाखू विकत असत. मात्र एक दिवस काय झाले कि त्यांनी तंबाखूचे पोते पाठीवर मारल्यानंतर त्यांना ते पोते नेहमी पेक्षा जड झाले आणि म्हणून ते त्यांनी खाली टाकले. पोते नेहमीपेक्षा जड कसे झाले हे पाहण्या साठी त्यांनी पोते उघडले तर त्यांना त्या पोत्यात एक वाटोळा दगड दिसला. त्यांनी तो दगड बाहेर काढून टाकला तर तो पुन्हा त्याच पोत्यात सापडू लागल्याने ते सदगृहस्थ कंटाळले. नंतर त्यांनी असाच एक दगड एका ठिकाणी टाकला.त्यानंतर तो दगड पुन्हा पोत्यात न दिसल्याने त्याला निश्चिंत वाटले. ज्या ठिकाणी दगड टाकला त्यानंतर त्या जागेमध्ये आज भगवती मंदिर आहे. व्यापाराने ज्या ठिकाणी दगड टाकला तेथे पावणाई देवीचीमूर्ती बसलेली होती. देवीला स्वताःची जागा पाहिजे असल्याने तिने लहान कुमारिकेचे रूप घेतले व ती त्या मूर्तीजवळ गेली आणि तहानलागली असल्याचे सांगत पिण्यासाठी पाणी मागितले. त्याबरोबर तिने पाणी आणून देते असे सांगून ती विहिरीवर पाणी आणण्या साठी गेली. पाणी घेवून आल्यानंतर पाहते तो देवी तिच्या जागेवर बसली होती. तिने पाण्याचे भांडे पुढे केले, ते पाणी प्याल्या नंतर विचारणा केली. त्यावेळी तू माझ्या जागेवर बसलीस आता मी कोठे जावू..? तेव्हा देवीने तिला माझ्या शेजारी उजव्या बाजूला जावून बस असे सांगितले. त्याप्रमाणे ती उजव्या बाजूला बसली आहे. नंतर त्याठिकाणी लहान लहान मंदिरे बांधण्यात आली. काही कालांतराने त्या मंदिरांचा जीर्नोधार करून विस्तार करण्यात आला.देवीचा चमत्कार.-:१९७४ साली लिंगडाळ गावातील आडिवरे वाडी येथील श्री वडची देवी हिची यात्रा होती. या यात्रेस येथील देवस्वारी घेवून मानकरी,गावकरी गेले होते. यात्रेचा दिवस संपल्यानंतर माघारी येण्याच्या वेळी दुपारचे स्नेहभोजन आटोपल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास पुन्हा धूप जाळून श्रींचे तरंग काढण्यात आले. मात्र सर्व धार्मिक विधी होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले. याठिकाणी निघताना सोबत नेलेल्या सर्व सामानाची भांडी रिकामी झालेली होती.मशालजीकडील तेल संपले असल्याचे लक्षात आल्यानंतर मानकर्यांनी हि गोष्ट देवीच्या कानावर घातली. देवीने मानकर्यासोबत मशालजीना व रयतेलाही "मी जाईन त्याठिकाणी माझ्यासोबत चला ..!"अशी आज्ञा केली. सर्व मंडळी शिवकळेच्या मागून वडची देवी पाषाणाजवळ गेली. ती पाषाणाजवळगेल्यानंतर तिने ती पेटती मशाल रिकाम्या पासरीत म्हणजेच तेलाच्या भांड्यात बुडवून वर उचलले. आपल्या हातात मशाल घेवून आता माझ्यामागून या अशी आज्ञा केली.देवीच्या आज्ञेप्रमाणे हि मंडळी देवीच्या शेजारी असलेल्या ओहोळाजवळ गेली. तरंगपाण्यात बुडविला व पेटती मशालपाण्यात बुडवून वर काढली.पाण्यात बुडवूनही मशाल मात्र विझली नाही. ओहोळावरील पाणी पसरीत भरून ती पुन्हा पाषाणाजवळ आली आणि म्हणाली,"मी माझ्या दरबारात जाईपर्यंत या तेलाचा-पाण्याचावापर करा..! दरबारात गेल्यावर पासरीतील शिल्लक पाणी देवीच्या तळीत नेवून ओतण्यात आले. हि सत्यकथा येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अनुभवल्याचे सांगतात.
    इथले अजून एक वैशिष्टय़ म्हणजे सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी या गावात गोसावी समाजाची मंडळी राहत होती. ही मंडळी जवळच असलेल्या मिरवाडीच्या वहाळातून आणलेल्या दगडांमधून उत्कृष्ट भांडी घडवत असत. त्यामध्ये दगडी भांडी, सट, बरण्या, दगडी ताटं, अंगचे कान असलेले कप अशा सुंदर वस्तू घडवीत असत. भूशास्त्रीयदृष्टय़ा हा दगड ‘टाल्क क्लोराइड शिस्ट’ या प्रकारामध्ये मोडतो. मंदिराच्या मागील बाजूस उंचावर डॉ. प्रभुदेसाई यांचे घर आहे. हे सारे प्रभुदेसाई घराणे आयुर्वेदिक वैद्य आहेत. ते इथले वतनदारदेखील आहेत. त्यांच्या खापरपणजोबांनी इथेच संजीवन समाधी घेतली होती. त्या पुण्यपुरुषाचं स्मारक इथे नीटसपणे राखलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या पर्यटनामध्ये या कोटकामत्याच्या श्रीभगवती देवीचे दर्शन अवश्य घ्यावे.
संदर्भग्रंथः-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे -सतिश अक्कलकोट
३)  www.trekshitiz.com हि वेबसाईट
४) www.durgbharari.com हि वेबसाईट
५) https://www.marathisrushti.com/articles/shri-dev-bhagwati-sansthan-kotkamte/
६) https://www.loksatta.com/lokprabha/navratri-special-3-964814/


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...