उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग १)

आमच्या उत्तर युरोप भटकंतीची ती सुरुवात होती. भोज्जे पर्यटन करायचं नाही, प्रत्येक ठिकाण जाऊन पाहण्याचा अट्टहास करायचा नाही, निवांत मनाला वाटेल तसं फिरायचं, इतकंच ठरवून निघालो होतो. पहिला मुक्काम डेन्मार्कमधल्या ओडेन्स इथे होता.

पहिल्याच दिवशी जुन्या ओडेन्स शहरात अक्षरशः वाट फुटेल तसे चाललो, फिरलो. जुन्या काळातली सुंदर लाकडी घरं, छोट्या शांत गल्ल्या, फरसबंदी रस्ते, पर्यटकांची तुरळक गर्दी...

ओडेन्स हे हान्स क्रिसचियन अँडरसनचं जन्मगाव. अठराव्या शतकातलं त्याचं घर बाहेरून पाहिलं; आता तिथे एक म्युझियम आहे.

एक-दोन ठिकाणी रस्त्यांमध्ये त्याच्या कथांमधल्या पात्रांचे पुतळे उभे केलेले दिसले. लहानपणी वाचलेल्या त्याच्या परिकथा अंधुक आठवत होत्या. त्यामुळे त्या पुतळ्यांचा संदर्भ तिथल्या तिथे लक्षात आला नाही; तरी ती कल्पना आवडलीच.
दिवसभराच्या पायपिटीनंतर घरी परतत होतो. ओडेन्स रेल्वे स्टेशनसमोरच
‘किंग्ज गार्डन’ ही एक मोठी बाग आहे. मुख्य रस्त्यालगतच ते छान, हिरवगार
मोकळं मैदान दिसलं; मनात आलं, तिथे जाऊन बसलो. उत्तर युरोपमधला
उन्हाळ्यातला लांबलेला दिवस, हवेतला ‘अहाहा’ गारवा, शांत वातावरण...
मैदानाच्या एका कोपर्यात काही स्थानिक लोक हळूहळू जमायला लागले होते.
एकंदर वातावरण उत्साही दिसत होतं. त्यांच्यासमोर एक छोटसं खुलं स्टेज
उभारलेलं होतं. स्टेजच्या एका बाजूला तात्पुरते छोटे तंबू, तिथे जुजबी
खायची-प्यायची व्यवस्था; हळूहळू वर्दळ वाढत होती. आम्ही डोळ्यांच्या एका
कोपर्यातून तिकडे लक्ष ठेवून होतो. न राहवून मी मध्येच त्या दिशेला एक
चक्करही मारून आले. कसला कार्यक्रम आहे, काय आहे, याची काही माहिती मिळते
का बघितलं. एक छोटासा बोर्ड दिसला, भाषा डॅनिश असल्यामुळे त्यावर काय
लिहिलं होतं ते समजलं नाही. कुठल्यातरी स्थानिक शाळेचा सांस्कृतिक
कार्यक्रम नाहीतर एखाद्या डान्स-क्लासचा कार्यक्रम असावा असा मी अंदाज
बांधला. तो कार्यक्रम बघण्याची उत्सुकता होतीच, मात्र अर्धा तास झाला तरी
स्टेजवर काही सुरू होण्याची चिन्हं दिसेनात. नाईलाजाने आम्ही तिथून निघालो.
आणि त्याच वेळी स्टेजच्या मागच्या बाजूने एक छान कॉश्च्युमधारी ग्रुप
येताना दिसला. आम्ही थबकलोच.
थोड्याच वेळात सूत्रसंचालिका स्टेजवर आली आणि काहीतरी बोलली. कदाचित त्या
कार्यक्रमाची थोडीफार पार्श्वभूमी सांगितली गेली असावी. ती समजायचा प्रश्नच
नव्हता. मग टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या ग्रुपचं सादरीकरण सुरू झालं;
पार्श्वसंगीत म्हणून कुठल्यातरी ऑपेराच्या वाटणार्या भारी वाद्यवृंदाची
रेकॉर्ड लावलेली. ग्रुपमधले तरुण कलाकार, त्यांच्या लयबद्ध हालचाली, काही
जागांवर प्रेक्षकांकडून येणारी दाद, खुलं मैदान, वरती मोकळं आकाश, मावळतीचं
सोनेरी ऊन... सगळं वातावरण नजरबंदी, श्रवणबंदी करणारं! ते सोडून आमचे पाय
निघेनात.

प्रेक्षक येत होते, जागा मिळेल तिथे ऐसपैस पथारी पसरून बसत होते. कुणीही कुणाला खाली बसा, बाजूला सरका, सांगत नव्हतं. विशेष उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे कुणीही आपल्या मोबाईलवर बॅलेचे फोटो किंवा व्हिडीओ काढण्याच्या फंदात पडलेलं नव्हतं. साडेसात-आठ वाजत आले होते; भूक लागायला लागली होती; दिवसभराची दमणूक होती; तरी आम्ही तिथे दहा-एक मिनिटं थांबून उभ्याउभ्याच तो पहिला परफॉर्मन्स बघितला.

तिथून निघालो तेव्हा वाटलं, का थांबलो आपण तिथे? नेमकं काय आवडलं आपल्याला त्यातलं? ना ती प्रस्तावना कळली होती, ना त्या नृत्यातून सांगितली गेलेली कथा समजली होती. बहुदा तिथल्या सगळ्या वातावरणाचा एकत्रित परिणाम, ते संगीत-नृत्य तिथल्या लोकांच्या आयुष्यातल्या विरंगुळ्याचा एक भाग असल्याची जाणीव, आपल्या विरंगुळ्याच्या कल्पनांपेक्षा असलेलं त्याचं वेगळेपण, असं ते सगळं मिश्रण होतं.
कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेल्या त्या छोट्याशा फलकाचा मी सवयीने फोटो
काढून ठेवला होता. रात्री सहज त्या फोटोतले डॅनिश शब्द मी इंटरनेटवर शोधले
आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो शाळेचा किंवा डान्स क्लासचा कार्यक्रम
नव्हता, त्याचं नाव होतं ’द रॉयल कोपनहेगन समर बॅले’! २०१६ पासून कोपनहेगन
शहरात या बॅलेचं आयोजन केलं जातं आहे. गेल्या वर्षीपासून हे कार्यक्रम
डेन्मार्कच्या इतर काही शहरांमध्येही व्हायला लागले आहेत. त्यादिवशी तो
बॅले ओडेन्स शहरात आला होता.
थोडक्यात, आम्ही आमच्या नकळतच अगदी योग्य वेळी योग्य जागी पोहोचलेलो होतो.
त्या योगायोगाने आमच्या भटकंतीच्या पहिल्याच दिवशी आम्हाला एक झकास कल्चरल
धक्का दिला होता. त्यात एक कलात्मक ‘सरप्राईज एलिमेंट’ होतं. पुढच्या
महिन्याभराच्या प्रवासातल्या अशा ‘कल्चरल शॉक्स’ची ती सुरुवात होती.
उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग २)
उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग १) : https://www.maayboli.com/node/77055
----------
ओडेन्समध्ये ध्यानीमनी नसताना बॅले पाहायला मिळाला, त्याच्या चार-पाच दिवसांनंतरची गोष्ट.
ऑस्लो, नॉर्वेची राजधानी. तिथल्या प्रसिद्ध फ्रॉग्नर पार्कमधली ‘विजेलँड इन्स्टॉलेशन्स’ बघायची होती. गुस्ताव विजेलँड हा २०व्या शतकातला नॉर्वेतला नावाजलेला शिल्पकार. त्याने २० वर्षं खपून फ्रॉग्नर पार्कमध्ये ब्राँझ आणि ग्रॅनाइटचे जवळपास दोनशेहून अधिक मानवी पुतळे उभे केले. खुल्या जागेतला हा पुतळ्यांचा संग्रह इथे पाहता येतो.

--

एक-एक शिल्प पाहत पाहत आपण पुढे जात राहतो; शेवटी एक उंचच उंच अजस्त्र खांब आहे- ‘मोनोलिथ’; त्या एका खांबावर शंभर-सव्वाशे मनुष्याकृतींची शिल्पं आहेत. एकूणच हा संग्रह सुरुवातीपासूनच नजरेचा ठाव घेणारा आहे. (त्याबद्दलही सविस्तर लिहायचं मनात आहे.)

सुरूवातीचे एक-दोन पुतळे पाहून होत नाहीत तोच कानावर एक ओळखीची लकेर आली- राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’मधली अॅकॉर्डियनवरची एक धून. त्या आवाजाच्या दिशेला पाहिलं तर एका कोपर्यात एक मध्यमवयीन मनुष्य लहानशा खुर्चीवर बसून खरंच अॅकॉर्डियन वाजवत होता. आम्ही ती धून ऐकून थबकलोय हे त्याच्या लक्षात आलं होतं. तो आमच्याकडे पाहून जरासा हसला आणि त्याने आपलं वादन सुरू ठेवलं. आम्ही त्याला जवळ जाऊन इंग्रजीतून सांगण्याचा प्रयत्न केला, की आम्ही भारतीय आहोत आणि ही धून भारतात खूप प्रसिद्ध आहे. त्याला आमचे उच्चार समजले नाहीत; आम्ही काय सांगू पाहत होतो तेही समजलं नाही. त्यातलं ‘इंडिया’ ताडून त्याने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला ‘आय अॅम फ्रॉम पोर्तुगाल’. घ्या! म्हणजे एका वेगळ्याच देशातला वादक, त्याच्या समोर उभे असलेले दोन श्रोते दुसर्याच कुठल्यातरी देशातले; हे तिघं आणखी तिसर्याच एका देशात त्या सुरावटीने ‘कनेक्ट’ झाले होते; आणि त्या वादकाला हे नेहमीचं असलं तरी त्या दोन श्रोत्यांना पुन्हा एकदा एक सुखद धक्का बसला होता.
दोन-तीन तासांनी सर्व शिल्पं, पुतळे बघून आम्ही परत आलो तोपर्यंत तो
मनुष्य तिथून निघून गेलेला होता. मुळात त्याची आणि आमची गाठ पडण्याचं काही
कारणच नव्हतं; पण ती पडली होती. आम्ही तिथे असतानाच त्याने ती ओळखीची धून
वाजवली होती; परत एकदा आम्ही आमच्या नकळत योग्य वेळी योग्य जागी पोचलो
होतो; एक मालिका सुरु झाली होती.
तरी या दोन अनुभवांनंतरही अशी मालिका सुरू झाली आहे अशी काही मनाने नोंद
घेतलेली नव्हती. आणि ते बरंच होतं. मुद्दाम शोधायला सुरुवात केली असती, तर
त्यात ती मजाच उरली नसती.
याच्या पुढच्याच दिवशी ऑस्लोच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये फिरत होतो. संसदेच्या इमारतीबाहेर पर्यावरणवाद्यांची सरकारविरोधी निदर्शनं सुरू होती. आत संसदेच्या अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता; त्यानंतर मंत्रिमंडळ दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर जाणार होतं; आणि बाहेर निदर्शक ’क्लायमेट डझन्ट गो ऑन अ व्हेकेशन’ अशा अर्थाच्या घोषणांसहित आपला निषेध व्यक्त करत होते.

चौकात त्यांची गडबड सुरू होती, पर्यटकांची गजबज होती; लख्ख ऊन होतं; कुणी फोटो काढत होते, कुणी उन्हात हिरवळीवर निवांत बसले होते, खातपीत होते; आम्हाला ऊन अजिबात नको होतं, त्यामुळे आम्ही अर्ध्या तासात तिथून निघालो. ज्या दिशेने आलो होतो त्याच्या उलट दिशा पकडली. हे अगदी सहज घडलं होतं; आणि उलट दिशेच्या चौकातल्या एका कोपर्यातून पुन्हा एक ओळखीची धून ऐकू आली- कॉलेजमध्ये असताना खूप लोकप्रिय झालेलं एक इंग्रजी प्रेमगीत- एक जण एका झाडाखाली उभा राहून व्हायलिनवर वाजवत होता.

एका क्षणात मी ती धून ओळखली. मन वीस-तीस वर्षं मागे गेलं. पार्लमेंट स्क्वेअर, तिथली शंभर-दोनशे वर्षं जुनी इमारत, दहा मिनिटांपूर्वी वाचलेला त्या इमारतीचा इतिहास, हे सगळं विसरायला झालं. तिथली माणसांची गजबज कानाआड गेली. मी त्या व्हायलीन वाजवणार्या माणसाच्या अगदी पुढ्यात जाऊन उभी राहिले. त्याचं वादन ऐकता ऐकता फोटो-व्हिडिओ काढायला सुरुवात केली. मग तेही ठेवूनच दिलं.
हे असे वादक सार्वजनिक ठिकाणी तल्लीन होऊन वादन करत असतात; तरी डोळ्यांच्या एका कोपर्यातून ते अवतीभोवती लक्ष ठेवून असतात. कोण ठेका धरून आवडीने ऐकत उभं आहे, कुणाला फक्त फोटो काढण्यात रस आहे, हे त्यांच्या लक्षात येतंच. काही मिनिटं जातात आणि खरोखर आवडीने ऐकत उभ्या असणार्या प्रत्येकाच्या डोळ्यांत ते क्षणभर का होईना थेट बघतात. समेवर आपली दाद गेली किंवा वादन संपल्यावर आपण टाळ्या वाजवल्या तर तेही हलकेच मान हलवून त्याचा स्वीकार करतात. इथेही ही देवाणघेवाण झालीच. माझं ते आवडतं गाणं संपलं, त्याने दुसरं कुठलंतरी गाणं वाजवायला सुरुवात केली. आम्ही तिथून निघालो... अशा ठिकाणी फार वेळ थांबायचं नसतं. आश्चर्याच्या धक्क्याचा ‘स्पाईक’ तसाच राहू दिलेला बरा असतो; तोच दीर्घकाळ लक्षात राहणारा असतो.
पण पुढल्या दहा-बारा दिवसांतच आम्हाला आणखी एक असा कल्चरल शॉक बसणार होता, की जिथे हा स्पाईकचा नियमही आम्ही अगदी आनंदाने गुंडाळून ठेवला.
उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग ३)
भाग १ : https://www.maayboli.com/node/77055
भाग २ : https://www.maayboli.com/node/77075
----------
आमचा प्रवास सुरू होऊन १५-२० दिवस झाले होते.
मध्य-पूर्व डेन्मार्क, नॉर्वे, दक्षिण स्वीडन इथली भटकंती संपवून आम्ही आता इस्टोनियाची राजधानी टालिन (Tallinn) इथे आलो होतो.
टालिन आमच्या मूळ ट्रॅव्हल प्लॅनमध्ये नव्हतंच. डेन्मार्क, नॉर्वे,
स्वीडन, फिनलंड हे चार(च) देश फिरायचं; नॉर्वे, स्वीडन, फिनलंडमध्ये
प्रत्येकी एका आर्क्टिक सिटीत तरी किमान जायचं; असं आधी ठरवलं होतं. कारण
होतं थंडी + midnight sun हे कॉम्बिनेशन!
त्याप्रमाणे ट्रॉम्सो (नॉर्वे) आणि रोवानिएमी (फिनलंड) इथला प्लॅन एकूण
प्लॅनमध्ये फिट बसला. स्वीडनमध्ये किरुना किंवा अॅबिस्को ही दोन ठिकाणं
शॉर्टलिस्ट केली होती. पण तिथे थेट विमान किंवा ट्रेन अप्रोच नव्हता. बस
प्रवासच करावा लागणार होता. आम्हाला दोघांनाही मोशन-सिकनेसचा खूप त्रास
होतो, त्यामुळे बसप्रवासावर आमची फुली असते. बसप्रवास टाळून किरुना किंवा
अॅबिस्कोला कसं जाता येईल यावर आम्ही बराच काथ्याकूट केला. (सहा महिने आधी
प्लॅनिंग केल्याचा हा फायदा होता. हाताशी भरपूर वेळ होता.) पण तसं काहीही
शक्य नव्हतं.
मुळात त्या देशांमध्ये बाल्टिक समुद्राच्या आसपास एकवटलेल्या
शहरा-गावांव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्यासाठी पब्लिक ट्रान्स्पोर्टचे खूपच
मर्यादित पर्याय आहेत. नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे तिन्ही देश उत्तर-दक्षिण
पसरलेले; उत्तरेला अगदी निमुळते होत गेलेले; तरीही एका देशातल्या
उत्तरेतल्या गावातून दुसर्या देशातल्या उत्तरेतल्या ठिकाणी जायला बराच
उलटा घास घ्यावा लागतो, असं दिसलं. म्हणजे नॉर्वेच्या उत्तरेकडून आधी खाली
दक्षिणेला राजधानी ऑस्लोत यायचं, तिथून स्टॉकहोम (ते स्वीडनच्या दक्षिणेलाच
आहे), आणि तिथून मग स्वीडनच्या उत्तरेकडच्या ठिकाणी विमान असेल तर
विमानाने, नाहीतर विमान, ट्रेन, बस, असं मजल-दरमजल करत जायचं. तिथून
फिनलंडसाठीही तेच.
थोडक्यात या सगळ्या गणितात स्वीडिश आर्क्टिक सिटी बसेना. त्यासाठी राखून
ठेवलेले दोन दिवस रिकामे झाले. काही ना काही मार्ग सापडेलच म्हणत आम्ही
दरम्यान पुढची फिनलंड, कोपनहेगन (शेवटचा स्टॉप) इथली airbnb बुकिंग्ज करून
टाकली होती.
मग जरा बाल्टिक समुद्राच्या पश्चिम किनार्याकडे नजर वळवली. सेंट
पीटर्सबर्ग (रशिया) आणि टालिन (इस्टोनिया) हे दोन पर्याय इंटरेस्टिंग होते.
पैकी सें.पी.साठी शेंगेन विजा चालत नाही, वेगळा रशिया विजा आवश्यक असतो,
असं समजलं. टालिनला तो काही प्रश्न नव्हता. अशा रितीने ध्यानीमनी नसताना
टालिन आमच्या प्लॅनमध्ये आलं होतं.
आणि तिथे एक सरप्राइज आमची वाट बघत होतं.
तर इस्टोनियाची राजधानी टालिन.
९०च्या दशकापर्यंत हा देश रशियाच्या अधिपत्याखाली होता. आता मात्र
पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. टालिनमध्ये आम्हाला मुख्य बघायचं होतं- ओल्ड
टाउन. त्यामुळे दुसर्या दिवशी सकाळी आवरून बाहेर पडलो आणि ओल्ड टाउनच्या
दिशेला जाणारी ट्राम पकडली. किती स्टॉप्सनंतर आपल्याला उतरायचं आहे, त्या
सगळ्या स्टॉप्सची नावं इत्यादी माहिती नेटवरून घेऊन ठेवली होती. ट्राममध्ये
प्रत्येक स्टॉपच्या नावाची घोषणा होतच होती. तरी नावांची स्पेलिंग्ज आणि
त्यांचे उच्चार यात बराच फरक होता. एकीकडे त्या जोड्या जुळवण्याची आमची
कसरत सुरू होतीच. त्यातच एका स्टॉपवर चढलेल्या दोन बायकांमुळे ही कसरत जरा
वेळ बाजूला पडली. त्या दोघींचे वेष वेगळे आणि लक्ष वेधून घेणारे होते.
लाल-काळ्या रंगाचा पायघोळ स्कर्ट, वर पांढरं लांब हातांचं ब्लाऊज, त्यावर
सुंदर कलाकुसर केलेलं लाल-काळ्या-पिवळ्या रंगांचं जॅकेट, डोक्याला तशाच
कलाकुसरीचा स्कार्फ बांधलेला. त्यांच्या वेशभूषेत काहीतरी स्थानिक
वैशिष्ट्य होतं इतकं नक्की. गंमत म्हणजे त्यांचं तिथे असणं
आमच्याव्यतिरिक्त बाकी कुणालाच विशेष वेगळं वाटलेलं नव्हतं.
केवळ त्यांच्या त्या सुंदर वेशभूषेसाठी गुपचूप त्यांचा एखादा फोटो काढावा
का असा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. मात्र भरलेल्या ट्राममध्ये असा
फोटो काढता येणं कठीण होतं. शिवाय ते मलाच प्रशस्तही वाटेना. त्यामुळे
त्यांच्या लक्षात येणार नाही अशा बेताने त्यांचं निरीक्षण मी चालू ठेवलं.
जेमतेम पाच एक मिनिटं हे सगळं झालं असेल. आणि त्या दोघी एका स्टॉपवर उतरून
दिसेनाशाही झाल्या. मी मनोमन जराशी चुकचुकलेच.
पण आता आमचा स्टॉप कधी येतोय त्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. एक-दोन घोषणा
ऐकल्या आणि जाणवलं, की आम्हाला हव्या असलेल्या रस्त्याऐवजी ट्रामने जरा
वेगळाच रस्ता पकडला होता. (त्याचं कारण आम्हाला संध्याकाळी समजलं.
त्यादिवशी टालिन ट्राम नेटवर्कमध्ये, त्याच्या ट्राफिक किंवा सॉफ्टवेअर
कंट्रोलमध्ये काहीतरी मेजर घोळ झाला होता. संध्याकाळी आम्ही ओल्ड टाऊन बघून
परतीच्या ट्राम स्टॉपवर जवळजवळ तासभर ट्रामची वाट पाहत उभे होतो. काही
स्थानिक, रोज प्रवास करणारेही होते. कुणालाच काही माहिती नव्हतं. मग आम्ही
आमच्या घराच्या दिशेने सरळ चालायला सुरुवात केली. तर वाटेत आपल्याकडे
वाहनांचा ट्राफिक जॅम असतो तसा ट्राम्सचा ट्राफिक जॅम झालेला दिसला.
कित्येक ट्राम्स एकामागे एक अडकून पडलेल्या होत्या. ट्राम्सचे सर्व रूट्स
सर्क्युलर असल्यामुळे सगळंच ठप्प झालं होतं. पण ओल्ड टाऊनमधली भटकंती आणि
त्याआधीचं सरप्राइज यामुळे दिवस असला भारी गेला होता, की त्या अतिरिक्त
पायपीटीचं काहीही वाटलं नाही. असो.)
तर, आमच्या ट्रामने वेगळा रस्ता पकडल्याचं दिसल्यावर जरावेळ आम्ही
गडबडलो. आपल्याला हवा असणारा स्टॉप कुठेतरी मागे राहिलाय हे लक्षात आलं आणि
घाईघाईने आम्ही पुढच्या भलत्याच कुठल्यातरी स्टॉपवर उतरलो.
पुन्हा एकदा मोबाईलच्या नकाशात शोधाशोध करून आम्ही उलट दिशेला चालायला
लागलो. वाटेत एका जोडरस्त्यावर गजबज-वर्दळ होती आणि तिथे ट्राममधल्या त्या
दोघींसारख्या वेशभूषेतल्या आणखी बायका-मुली दिसत होत्या. आता माझी उत्सुकता
चांगलीच चाळवली. आता त्यांच्या कपड्यांच्या रंगसंगतीमध्ये विविध प्रकारही
दिसत होते. कुठे गडद तपकिरी रंग, त्यावर उठून दिसणारी फिक्या रंगाची
कलाकुसर; कुठे इस्टोनियाच्या झेंड्यात असतो तसा आकर्षक निळा रंग; कुठे लाल
गुलाबाचा सुंदर रंग; या सगळ्या रंगांसोबत उठून दिसणारा पांढरा रंग;
डोक्यावरच्या मुकुटाचे नाहीतर स्कार्फचे विविध प्रकार, ते देखील सगळे एक से
एक सुंदर...
पुन्हा एकदा त्यांच्या सुंदर घेरदार झग्यांचे पाठमोरे का होईना फोटो
काढावेत असं मला फार वाटायला लागलं. त्या रस्त्यापाशी पोहोचलो. कुठल्यातरी
मिरवणुकीची तयारी सुरू असलेली दिसत होती. तो रस्ता रहदारीसाठी बंद केलेला
होता. तिथे रेंगाळणार्या आमच्यासारख्यांना रस्त्यावर न जाण्याबद्दल तिथले
ट्रॅफिक पोलिस सांगत होते. आम्ही थोडा थोडा अंदाज घेत फुटपाथवरून हळूहळू
पुढे सरकायचं ठरवलं. आपल्याकडे गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वी रस्त्यावर
दृश्य दिसतं साधारण तसंच वातावरण होतं; फक्त गर्दी एक दशांश करायची. आता
आकर्षक रंगांचे, पारंपरिक कपडे घातलेले पुरुष, छोटी मुलंही दिसायला लागली
होती. तरी बायकांची वेशभूषा फारच सुंदर वाटत होती.

...
आणखी थोडं पुढे गेल्यावर एका वाद्यवृंद पथकाच्या वादनाचा आवाज कानावर पडला. आम्ही त्या दिशेला वळलो. दहा-बारा जणांचं एक पथक, त्यात तरुण मुलं-मुली सगळे होते. आपल्याकडच्या ढोल-ताशासारखी कमरेला बांधलेली काही तालवाद्यं, लहान-मोठी क्लॅरिनेट्स; तरी तालवाद्यांची संख्या तुलनेने कमीच होती, त्यांच्यावर थापही अगदी हलकीच पडत होती. क्लॅरीनेट्स मात्र आघाडीवर होती.

आम्ही चार-पाच मिनिटं थांबून ते वादन ऐकलं. ते थांबल्यावर त्यांच्या पलीकडे उभ्या असलेल्या गटाने वादन सुरू केलं. आम्ही आमचा मोहरा लगेच तिकडे वळवला. त्या पथकात वादकांची संख्या जरा जास्त होती. आमच्यासारखेच इतर काही तुरळक पर्यटक तिथे होते. अजूनही ही वर्दळ नेमकी कशाची हे लक्षात येत नव्हतं. मी ओडेन्सप्रमाणे इथेही स्थानिक भाषेतला एखादा फलक दिसतो का ते शोधायचा प्रयत्न केला; पण तसंही काही दिसलं नाही. आणखी थोड्या अंतरावर प्रशस्त मोकळी जागा होती. तिथेही विविध पथकांची गर्दी वाढायला लागली होती. सर्वांचे पारंपरिक तरीही वेगवेगळ्या आकर्षक रंगांतले कपडे, प्रत्येकाच्या हातात कपड्यांच्याच रंगांचे छोटे छोटे झेंडे, नाहीतर लांब सॅटिनच्या रिबिनी; ती पथकं आळीपाळीने जयजयकार प्रकारच्या घोषणा देत होती.

ते सगळं उत्साही, उल्हसित वातावरण बघत आम्ही नुसते इकडे तिकडे फिरत होतो. ट्राममध्ये वाटलेली फोटो काढू की नको ही शंकाही आता मागे पडली होती. एका पथकाच्या चार-पाच बायका शेजारून जात असताना मी त्यांना विनंती केल्यावर त्या फोटो काढून घ्यायला लगेच तयार झाल्या. मी कॅमेरा सुरू केल्यावर त्यांनी मला एक झकास पोझही दिली. त्यांच्यापैकी एकीच्या हातात एक लहान फलक होता. मी त्याबद्दल त्यांना विचारलं. त्या फलकावर एक विशिष्ट कलाकुसरीचं भरतकाम केलेलं होतं, आणि तसंच भरतकाम त्यांच्या झग्याच्या काठांवरही होतं. ‘ती आमच्या गटाची निशाणी आहे’ असं त्यातल्या एकीने झग्याचा घेर फुलवत सांगितलं. तिला सांगताना आणि मला ते ऐकताना तेवढाच आनंद झाला होता.

आता मात्र आम्ही हे सगळं नेमकं काय आहे, याचा शोध घेण्याचं ठरवलं. हातात एकमेव साधन होतं- इंटरनेट. पण त्यावर तरी शोध घ्यायचा कसा? काहीच क्लू नव्हता. शेवटी सरळ ‘टालिन’ आणि त्यादिवशीची तारीख (सहा जुलै) असंच सर्च केलं, आणि पुन्हा एकदा आश्चर्याचा मोठा धक्का बसला- तिथलं उत्सवी वातावरण म्हणजे इस्टोनियाच्या ‘साँग अँड डान्स फेस्टिव्हल’ची तयारी होती. दर पाच वर्षांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टालिनमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. यात भाग घेणार्या पथकांमध्ये स्त्रिया-पुरूष-मुलं मिळून जवळपास ३० हजार हौशी कलाकार असतात. यंदा (२०१९) या उत्सवाचं १५०वं वर्ष आहे. इतकंच नव्हे तर हा फेस्टिवल युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समाविष्ट झालेला आहे... ही माहिती वाचल्यावर मला तर हर्षवायू व्हायचाच बाकी होता. योग्यवेळी योग्य जागी पोहोचणं कधीतरी समजू शकतो; पण हे म्हणजे अचाटच होतं!
त्या रस्त्यावर जमलेले ते एक एक गट आता वाजतगाजत मिरवणुकीतून दुसरीकडे एका स्टेडियमच्या दिशेने निघाले होते. उत्सवाचे प्रत्यक्ष कार्यक्रम तिथे होणार होते. ते ठिकाण आम्ही होतो तिथून लांब होतं. शिवाय आम्हाला ओल्ड टाऊन अजून बघायचं होतं. त्यामुळे त्या स्टेडियमच्या दिशेला जाण्याचा विचार आम्ही सोडून दिला; मात्र ती वाजतगाजत निघालेली मिरवणूक आम्ही तिथे जवळपास तासभर थांबून बघितली.

...
एक जरा मोठं पथक आमच्या पुढ्यातच थोडा वेळ थांबलं होतं. त्यातल्या काहींच्या हातात एक कापडी फलक होता. फलकावर इस्टोनियन भाषेतला एक शब्द होता. आम्ही त्याचा अर्थ विचारला तर ते त्यांच्या गटाचं नाव होतं. ते सर्वजण इस्टोनियाचाच भाग असलेल्या उत्तरेकडच्या एका बेटावरून मुद्दाम फेस्टिवलसाठी आलेले होते. ते बेट किती चिमुकलं आहे हेदेखील त्यातल्या दोघातिघांनी आम्हाला सांगितलं.

त्यांच्या चेहर्यावर ‘इन्क्लुजन’चा आनंद होता असं मला वाटून गेलं... आमच्या चेहर्यावरच्या आनंदाला कुठलं नाव द्यावं, हे मात्र सांगता आलं नसतं.
इस्टोनियातली ती मिरवणूक म्हणजे आमच्या ‘कल्चरल शॉक्स’च्या मालिकेचा कळसाध्याय मानायला मी अगदी एका पायावर तयार झाले असते; पण तसं व्हायचं नव्हतं...
उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग ४)
भाग १ : https://www.maayboli.com/node/77055
भाग २ : https://www.maayboli.com/node/77075
भाग ३ : https://www.maayboli.com/node/77104
----------
आमच्या महिन्याभराच्या भटकंतीचा शेवटचा दिवस.
डेन्मार्कमधल्या हेलसिंगॉर (Helsingør) इथला ‘क्रॉनबोर्ग कॅसल’ पाहायला
निघालो होतो. रेनेसाँ काळातला उत्तर युरोपमधला हा एक महत्त्वाचा किल्ला.
कोपनहेगन ते हेलसिंगॉर हा पाऊण तासाचा ट्रेन प्रवास, किल्ल्याचं स्थापत्य,
थोडाफार इतिहास आणि किल्ल्यालगतची खाडी- त्या दिवसाच्या भटकंतीची इतकी
पूंजी देखील भरपूर ठरली असती; स्वच्छ हवा, अहाहा गारवा, शांत वातावरण ही
नेहमीची यशस्वी मंडळी जोडीला होतीच; मात्र आमच्या पर्यटकी ललाटावर त्याहून
अधिक काही लिहिलेलं होतं आणि किल्ल्यात आतवर जाईपर्यंत त्याची आम्हाला
कल्पना नव्हती.

ठरलेली ट्रेन पकडून हेलसिंगॉरला पोहोचलो. स्टेशनवरून चालत, रस्ता शोधत शोधत कॅसल गाठला. तिकीट काढून आत शिरलो. तिथे येणार्या सर्वांनाच किल्ल्यात सहज मार्ग शोधत फिरता यावं अशी व्यवस्था होतीच. शिवाय तिकिटासोबत एक माहितीपत्रक आणि नकाशाही मिळालेला होता. माहितीपत्रकात लिहिल्यानुसार, क्रॉनबोर्ग किल्ल्याचा अभिजात इंग्रजी साहित्याशीही घनिष्ट संबंध आहे; कारण शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकाचं कथानक याच किल्ल्यात घडताना दाखवलं आहे. (नाटकात हॅम्लेट हा डेन्मार्कचा राजपुत्र असतो.) दरवर्षी उन्हाळ्याचे दोन महिने किल्ल्यात दररोज दोनदा नाटकातले काही महत्वाचे प्रवेश सादर केले जातात; या उपक्रमाचं नाव ‘हॅम्लेट लाइव्ह’... ओडेन्सनंतर पुन्हा इथे काल्पनिक पात्रांची प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणांशी सांगड घातलेली समोर आली; त्या कल्पकतेचं परत एकदा कौतुक वाटलं. माहितीपत्रकात पुढे नाटकाचं थोडक्यातलं कथानक, नाटकातल्या प्रमुख पात्रांची ओळख, असं काय काय दिलेलं होतं. त्यावरून नजर फिरवली. मात्र इथवर येऊन कुठेतरी एका जागी बसून नाटकातले प्रवेश पाहण्यात वेळ घालवावा असं काही वाटलं नाही. त्यामुळे आम्ही ते माहितीपत्रक पाठीवरच्या सॅकमध्ये कोंबलं आणि नकाशानुसार किल्ल्यात फिरायला सुरूवात केली.

...
किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी, प्रशस्त खुली अंगणासारखी जागा होती. फिरता फिरता तिथे येऊन पोहोचलो. सभोवताली दुमजली-तिमजली वाड्यातली दालनं, त्यांचे छज्जे, त्यावरचं कोरीवकाम, कलाकुसर केलेल्या खिडक्या... पुरातन ऐतिहासिक वास्तूची सगळी चिन्हं, वास्तू ४०० वर्षांहून अधिक जुनी असूनही बर्यापैकी जतन केलेली.

आम्ही इकडे तिकडे बघत होतो, फोटो काढत होतो; एवढ्यात एका कोपर्यातल्या दारातून अचानक एक भारदस्त मनुष्य बाहेर आला. तो त्याच्या शरीरयष्टीमुळे नव्हे तर वेशभूषेमुळे भारदस्त दिसत होता. राजेरजवाड्यांच्या काळचा वाटणारा भरजरी, पायघोळ अंगरखा; त्यावर कंबरपट्टा; डोक्यावर सरदार-दरकदार घालत असावेत असा टोप; भरघोस दाढी... त्याला पाहून त्याचे फोटो काढायला सरसावलेल्या आसपासच्या पर्यटकांकडे बघून (त्यांत मी देखील होतेच) त्याने दोन-तीन भरघोस इंग्रजी वाक्यं फेकली; त्याचे उच्चार, वाक्यांतली जुन्या धाटणीची इंग्रजी भाषा ऐकली आणि डोक्यात प्रकाश पडला, की आमच्यासमोर ‘हॅम्लेट लाइव्ह’ सुरू झालेलं होतं. हे लक्षात आलं आणि काही क्षण त्या मोकळ्या अंगणात आनंदाने बागडावंसंच वाटलं. ते नाटक अशा प्रकारे आपल्यासमोर येईल याची मुळी कल्पनाच केलेली नव्हती! तो भारदस्त मनुष्य म्हणजे पोलोनियस. (नाटकात त्याच्या मुलीवर, ऑफिलियावर, हॅम्लेटचं प्रेम असतं.) थोड्याच वेळात तिथे वेड्याचं सोंग घेतलेला हॅम्लेटही अवतरला. दोघांचा एक प्रवेश तिथे सादर झाला... just like that, कुठल्याही सेट-माइक-रंगमंचाविना... पण असं तरी कसं म्हणता आलं असतं? त्याहून उत्तम सेट हॅमलेटची भूमिका गाजवलेल्या भल्याभल्या अभिनेत्यांनाही लाभला नसता; तसा मुक्त रंगमंच पाहून त्यांनाही या कलाकारांचा हेवा वाटला असता. त्या एका प्रवेशाने अशी काही वातावरणनिर्मिती केली, की नाटकाबद्दल त्याआधी विशेष काहीच माहिती नसूनही आम्ही त्याकडे खेचले गेलो.

नाटकात किल्ल्याच्या तळघरात हॅम्लेटला त्याच्या बापाचं भूत भेटतं आणि
आपली हत्या कुणी घडवली ते त्याला सांगतं. तो प्रवेश खरंच तिथल्या एका
काळोख्या, तळघरावजा दालनात सादर झाला. हॅम्लेटच्या बापाच्या भुताची
प्रतिकृती लेसर वापरून उभी केली होती. गुडूप अंधार, ४०० वर्षांपूर्वीचं
किल्ल्याचं बांधकाम, अर्धगोल घुमटाकार दालन, त्याच्या दगडी भिंती... मी
मुद्दाम एका भिंतीलगत, एक हात भिंतीवर टेकवून उभी होते; खाली पायाशी सुद्धा
एक लहान, दगडी ओटा/कट्टा प्रकारचं स्ट्रक्चर फक्त जाणवत होतं, दिसत
नव्हतं... त्या भिंतीचा, पुरातन वास्तूचा म्हणून एक अजब गारवा, आपल्या
पर्यटनाच्या व्याख्येत न बसणारं काहीतरी समोर आकारत असताना पाहणं आणि ते
नसतं तर या दालनात आपण असे आलो नसतो ही जाणीव, हे सगळं अमेझिंग होतं.
त्याचवेळी पहिल्या मजल्यावरच्या ‘किंग्ज अपार्टमेंट’मध्ये नाटकाचा आणखी एक
प्रवेश सुरू होता. नाटकाला असा इतका मुक्त अवकाश दिला गेला होता.
पर्यटकांनी एकत्र जमून ते प्रवेश पाहायलाच हवेत असा आग्रह नव्हता. अनेक
पर्यटक या कलाकारांकडे विशेष लक्ष न देता अन्यत्र फिरत होतेच. अंगणातले दोन
प्रवेश पाहून आम्हीही पहिल्या मजल्यावर गेलो. तिथे लेअर्टेस (ऑफिलियाचा
भाऊ आणि हॅम्लेटचा मित्र) आणि क्लॉडिअसचा (डेन्मार्कचा राजा आणि हॅम्लेटचा
दगाबाज काका) महालातला एक ‘हाय-टेन्शन’ प्रवेश झाला; नंतर तिथे गर्ट्रूडही
(हॅम्लेटची आई) आली.

...
...
पहिल्या मजल्यावरच एक भलीथोरली, ६०-७० फुटी ‘बॉलरूम’ आहे. हे महालातले प्रवेश होईतोवर तिथे हॅम्लेटचा ‘टू बी ऑर नॉट टू बी’ प्रवेश सुरू झालेला होता. नंतरची त्याची आणि लेअर्टेसची तलवारबाजी, नाटकाचा दुःखद शेवट हे दर्शवणारे प्रवेशही तिथे सादर झाले. तिथून एका मोठ्या, पुरातन, अंधार्या गोल-गोल जिन्यावरून आम्ही परत खाली आलो.

...
...
सर्व मिळून साधारण एका तासाचा मामला; पण आमची महिन्याभराची भटकंती आणि
‘कल्चरल शॉक्स’ची मालिका यांचा याहून उत्तम समारोप कल्पनेतही अशक्य होता!
ओडेन्सप्रमाणेच इथेही वाटलं, का धावलो आपण या प्रवेशांमागे? नेमकं काय
आवडलं आपल्याला त्यातलं? ना त्या नाटकाचे डिटेल्स माहिती होते, ना ते
कलाकार परिचयाचे होते.... कदाचित ‘हॅम्लेट लाइव्ह’च्या त्या एका
आश्चर्याच्या धक्क्यात अनेक लहान लहान धक्के सामावलेले होते. आपल्याकडचे
किल्ले, त्यांच्याशी निगडित इतिहास, त्यावर आधारित गाजलेल्या कलाकृती यांची
तिथे हटकून आठवण झाली होती... त्यामुळेच तो अनुभव एकमेवाद्वितीय ठरला.
आपण एक वेगळा देश बघायला जातो तेव्हा त्या देशातल्या रस्त्यापासून ते
तिथली वाहनं, इमारती, माणसं, खाद्यपदार्थ, भाषा यातली प्रत्येक गोष्ट
आपल्यासाठी अनोखी, आश्चर्यकारकच असते. किंबहुना तिथे समोर येणार्या
प्रत्येक गोष्टीतला अनोखेपणा, वेगळेपणा, नाविन्य शोधण्यातच भटकंतीची खरी
मजा असते. आणि त्यात असे धक्के म्हणजे तर विचारायलाच नको!
परत आल्यावर कधीतरी या भटकंतीचे अनेकदा पाहिलेले फोटो पुन्हा एकदा पाहताना
या सर्व आश्चर्यकारक धक्क्यांची मालिका नजरेसमोर आकारत गेली. प्रवास संपला
तरी आश्चर्यं संपलेली नव्हती... हा सुद्धा एक सुखद आश्चर्याचा धक्काच
होता!
समाप्त.
No comments:
Post a Comment