भारताबाहेरील काही ऐतिहासिक हिंदू मंदिरांविषयी माहिती संकलित करून (अर्थातच इंटरनेटवर) एक लेखांची मालिका लिहावी असा विचार मनात आला आणि मिपावरील एका मित्राच्या प्रोत्साहनाने थोडे फार लिखाण पूर्ण केले आहे.
याच मालिकेतील पहिला लेख आपल्यापुढे मांडत आहे.
लेखांतील माहिती आणि फोटो विकीपेडिया आणि इतर माहितीपर लेखांमधून संकलित केली आहे.
प्रंबानन मंदिर संयुगे (Prambanan Temple Compounds) – जावा, इंडोनेशिया
९ व्या शतकात बांधलेली ब्रह्मा, विष्णू आणि महेशांची "चांडी प्रंबानन किंवा चांडी रारा जोंग्ग्रंग" ही हिंदू मंदिरे इंडोनाशियाच्या जावामधील योग्यकर्ता शहराजवळ आहेत. १९९१ मध्ये युनेस्कोने या मंदिरांना जागतिक वारश्याचा (World Heritage Site) दर्जा प्रदान केला.

मंदिरांचा इतिहास
९ व्या शतकात आशिया खंडात बौद्ध धर्माचा प्रभाव झपाट्याने वाढत होता. याच काळात प्राचीन जावामध्ये शैलेंद्र हे बौद्ध साम्राज्य होते. त्यांनी आपल्या राज्यामध्ये बौद्ध धर्माची अनेक मंदिरे उभारली. जावामधील बोरोबुदूर आणि सेवू ही सुप्रसिद्ध बौद्ध मंदिरे याच काळात बांधली गेली.
सुमारे १०० वर्षांच्या बौद्ध साम्राज्याच्या प्रभावानंतर संजय राजवंशाने पुन्हा एकदा मेदंग हे हिंदू साम्राज्य निर्माण केले. बोरोबुदूर आणि सेवू या बौद्ध मंदिरांना प्रत्युत्तर म्हणून प्रंबानन मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
यावेळी संजय वंशांच्या राजांनी बौद्ध मंदिरांना कुठलीही इजा न पोहचावता हिंदू मंदिरे बांधली ही गोष्ट फारच उल्लेखनीय आहे. प्रंबानन मंदिरांची भव्यता ही त्याकाळातील मेदंग साम्राज्यातील लोकांवर हिंदू धर्माच्या असणाऱ्या मोठ्या प्रभावाची प्रतीके आहेत.
प्रंबानन मंदिराचे बांधकाम बहुदा संजय वंशातील रकई पिकातन या राजाने सुरु केले आणि ९ व्या शतकाच्या मध्यावर पहिल्या मंदिराचे काम पूर्ण झाले. तीन मुख्य मंदिरांपैकी हे सर्वात उंच मंदिर भगवान शंकराचे आहे. मंदिराजवळ सापडलेल्या एका शिलालेखावरील माहितीनुसार ह्या मंदिराच्या जवळूनच ओपक नदी वाहत असे. नदीचे पात्र मुख्य मंदिराच्या फारच जवळ होते. त्यामुळे ह्या नदीचे पात्र वळवण्याचा मोठा प्रकल्प त्यावेळी पूर्ण केला गेल्याचा उल्लेखसुद्धा या शिलालेखावर आहे.
राजा लोकपाल आणि राजा बालीतुंग महा शंभू यांनी पुढे या भागामध्ये अनेक मंदिरे बांधली. इथे असणारी ब्रह्मा आणि विष्णूची मंदिरे बहुदा त्यांनीच बांधली असावीत. पुढील काळातही दक्ष आणि तुलोडोंग या राजांनी प्रंबानन मंदिर परिसरात अनेक मंदिरे बांधली.
मंदिरांपासून लोकांचे स्थलांतर
१० व्या शतकामध्ये बौध्द शैलेंद्र आणि हिंदू संजय साम्राज्यांमध्ये मोठा सत्तासंघर्ष सुरु झाला. याच काळामध्ये प्रंबाननच्या उत्तरेस असणाऱ्या मेरापी ज्वालामुखीचाही वारंवार उद्रेक होऊ लागला. आपल्या राज्यावर वारंवार होणारे हल्ले आणि नैसर्गिक आपत्तींना कंटाळून राजा म्पू सिंदोक याने आपल्या जनतेसह जावाच्या पूर्व भागात स्थलांतर करून इस्याना राजवंशाची स्थापना केली. या स्थलांतरामुळे प्रंबानन मंदिर परिसर पूर्णपणे निर्मनुष्य झाला.
१६ व्या शतकातील एका शक्तिशाली भूकंपात प्रंबानन मंदिरे उध्वस्थ झाली. एकेकाळी जावामधील शक्तिशाली हिंदू साम्राज्याची प्रतिक असणाऱ्या या मंदिरांचे फक्त केविलवाणे भग्नावशेषच जावामध्ये शिल्लक राहिले आणि लोक हळू हळू या मंदिरांना विसरून गेले.
मंदिरांचा शोध आणि पुनर्बांधणी (जीर्णोद्धार)
१९ व्या शतकापर्यंत जावावर डच साम्राज्य होते. डच लोकांनी मंदिरातील अनेक मूर्ती युरोपला चोरून नेल्या तर स्थानिक लोकांनी मंदिराचे अवशेष घरे बांधण्यासाठी वापरले.
१९ व्या शतकात मर्यादित काळासाठी या भागावर इंग्रजांनी आपले राज्य प्रस्थापित केले. कॉलीन मेकेन्झी आणि सर थॉमस स्टॅमफोर्ड रफ्फेल यांना फिरायला गेले असताना या मंदिरांचे अवशेष सापडले. सर थॉमस स्टॅमफोर्ड रफ्फेल यांनी लगेच या परिसराचे पूर्ण सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. पण हे काम पूर्ण होण्याआधीच डच लोकांनी इंग्रजांना हाकलून परत आपली सत्ता स्थापन केली.
१९१८ मध्ये डच सरकारने मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सुरु केले आणि ते काम आजही सुरु आहे. मुख्य शिव मंदिराचे काम १९५३ मध्ये पूर्ण झाले. बाकी मंदिरांचे काही अवशेष नष्ट झाले तर काही चोरीला गेले. ज्या मंदिरांचे ७५% भाग उपलब्ध होतील अशाच मंदिराचे बांधकाम करण्याचा निर्णय इंडोनाशिया सरकारने घेतला. त्यामुळे अनेक मंदिरे आपल्यला आता कधीही पाहायला मिळणार नाहीत.
१९ व्या शतकात सापडलेले मंदिरांचे भग्नावशेष

मंदिरांचे स्थापत्य
प्रंबानन शिव मंदिराचे बांधकाम हे हिंदू वास्तूशास्त्रानुसार केले गेले असून त्यात भगवान शंकराचा निवास असणाऱ्या मेरु पर्वताची रचना करण्यात आली आहे. हिंदू विश्वउत्पत्तिशास्त्र आणि त्यात असलेले तीन लोक (भूरलोक, भूवरलोक आणि स्वरलोक) यांचाही मंदिराच्या रचनेत अंतर्भाव करण्यात आला आहे.
भूरलोक: मर्त्य असणाऱ्या, विकार आणि वासनांनी बांधल्या गेलेल्या मानव, पशु आणि दानवांचे लोक म्हणजे भूरलोक. मंदिराच्या स्थापत्यामध्ये मंदिराचा बाहेरील भाग आणि पायऱ्या भूरलोकाचे प्रतिक मानल्या जातात.
भूवरलोक: ऋषी-मुनी, संत आणि सत्याच्या मार्गावरील मार्गक्रमण करणाऱ्यांचे लोक म्हणजे भूवरलोक. मंदिराचा मध्य भाग भूवरलोकाचे प्रतिक मानले जाते.
स्वरलोक: देवादिकांचे लोक हे सर्वात पवित्र स्वरलोक किंवा स्वर्गलोक. मंदिराचे गर्भगृह आणि कळसाचा भाग (गोपूर) हे स्वरलोकाचे प्रतिक मानले जातात.

मंदिराच्या पुनर्बांधणीच्यावेळी भगवान शंकराच्या मूर्तीखाली सुमारे ६ मीटर खोल विहिरीसारखा खड्डा सापडला. या खड्ड्यामध्ये एक दगडी पेटी कोळसा, जाळलेल्या प्राण्याची हाडे, आणि भस्म (राख) यांच्या ढिगाऱ्यावर ठेवलेली आढळली. (भारतातील काही शिव मंदिरांमधील प्रथा पाहता ही हाडे आणि भस्म मानवी चितेतून आणलेले असू शकते) याशिवाय या ढिगाऱ्यामध्ये वरुणदेव आणि पर्वतदेव यांचा उल्लेख असणारी काही सोन्याची पानेसुद्धा सापडली.
दगडी पेटीमध्ये कासव, नाग आणि पद्माच्या मुद्रा असणारी १२ सोन्याची पाने, काही चांदीची पाने, काही रत्ने, २० नाणी, भस्म, शंख, आणि काही ताम्रपत्रे सापडली. या ताम्रपत्रावरील लिखाणाबद्दल फार माहिती उपलब्ध नसली तरी अशा प्रकारे सापडलेल्या इतर ताम्रपत्रांवर शिवभक्ती आणि भक्तीचे महात्म्य याबद्दल लिखाण सापडले आहे.
मंदिर संयुगे (Compounds)
मुलतः प्रंबानन मंदिर परिसरात एकूण २४० मंदिरे बांधण्यात आली होती. त्यामध्ये खालील मंदिरांचा समावेश होता,
३ त्रिमूर्ती मंदिरे - ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची तीन मुख्य मंदिरे
३ वाहन मंदिरे - ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या मंदिरांसमोरच त्याची वाहने असणाऱ्या हंस, गरुड आणि नंदीची मंदिरे आहेत.
२ अपीत मंदिरे - त्रिमूर्ती आणि वाहन मंदिरांच्या दोन्ही बाजून ही दोन मंदिरे आहेत.
४ केलीर मंदिरे - मंदिर परिसराच्या ४ दिशांना असणाऱ्या ४ मुख्य प्रवेशद्वारांपाशी ही ४ मंदिरे आहेत.
४ पताका मंदिरे - मंदिर परिसराच्या ४ कोपऱ्यांमध्ये आतील बाजून ही ४ मंदिरे आहेत.
२२४ पेर्वारा मंदिरे - मुख्य मंदिरांभोवती ४ समकेंद्री चौरस ओळींमध्ये ही २२४ मंदिरे आहेत. सर्वात आतील ओळीत ४४, त्याबाहेरील ओळीत ५२, त्या बाहेरील ओळीत ६० आणि सर्वात बाहेरील ओळीत ६८ मंदिरे अशी ही रचना आहेत.
खालील प्रतिकृतीमध्ये या मंदिर संयुगांची रचना दाखवण्यात आली आहे.

शिव मंदिर
प्रंबानन मंदिर परिसरात असणारे हे सर्वात महत्वाचे आणि सर्वात मोठे मंदिर आहे. ४७ मीटर उंच आणि ३४ मीटर रुंद असणारे हे मंदिर संयुगांच्या बरोबर मध्यभागी आहे. मंदिराभोवती दगडी भिंत असून मंदिराला चारही दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर कोरीव काम असून त्यामध्ये रामायणातील कथा मूर्तींच्या रुपात कोरण्यात आल्या आहेत. मंदिराच्या पूर्व भागाकडून आत शिरून जर मंदिरास प्रदक्षिणा घातल्यास या रामायणातील गोष्टी सलगपणे समजून घेता येतात.

मंदिरावर कोरलेली रामायणातील काही कथादृश्ये


शिव मंदिरामध्ये ५ खोल्या आहेत. मुख्य खोली (गर्भगृह) आणि मंदिराच्या चारही बाजूस चार तुलनेने लहान खोल्या आहेत. मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारातून आत आल्यास मंदिराच्या थेट गर्भगृहामध्ये प्रवेश मिळतो. या खोलीमध्ये भगवान शंकराची ३ मीटर उंचीची मूर्ती एका कमळाच्या फुलावर उभी आहे. कमळाचे फुल हे बौध्द धर्माचे प्रतिक मानले जाते. दक्षिण जावावर राज्य करणाऱ्या शैलेंद्र या बौध्द राजवंशाच्या राजकुमारीचा विवाह उत्तर जावावर राज्य करणाऱ्या संजय राजवंशाच्या राजकुमाराशी झाल्याची आख्यायिका आहे. या करणामुळेच ह्या मंदिराच्या बांधकामात हिंदू आणि बौध्द स्थापत्यकलांचे मिश्रण पहायला मिळत असावे.
मुख्य मंदिरातील भगवान शंकराची मूर्ती

मंदिरातील इतर खोल्यांपैकी दक्षिणेकडील खोलीमध्ये शंकराचा गुरु अवतार मानल्या गेलेल्या अगस्ती ऋषींची मूर्ती आहे. पश्चिमेकडील खोलीमध्ये शंकराचा पुत्र गणपती आणि उत्तरेकडील खोलीमध्ये महिषासुरमर्दिनी दुर्गेची मूर्ती आहे.
गणपतीची मूर्ती

महिषासुरमर्दिनी दुर्गेची मूर्ती

ब्रह्मा आणि विष्णू मंदिरे
ब्रह्मा आणि विष्णू मंदिरे शिव मंदिराच्या अनुक्रमे दक्षिण व उत्तर दिशेला आहेत. ही दोन्ही मंदिरे एकसारखी असून त्यांची उंची ३३ मीटर आणि रुंदी २० मीटर असून या दोन्ही मंदिरांमध्ये देवतेच्या मूर्तींसह एकच खोली आहे.
ब्रह्मा मूर्ती

विष्णू मूर्ती

रामायण नृत्यनाट्य
इंडोनेशियामध्ये नृत्यनाट्याची मोठी परंपरा आहे. या नृत्यनाट्यामधून जावामधील काकावीन पद्धतीने लिहिलेल्या रामायणातील कथा प्रेक्षकांसमोर सादर केल्या जातात.
रामायणाचे असे सादरीकरण प्रंबानन मंदिरांसमोरील मोठ्या व्यासपीठावरही केले जाते. आणि त्यासाठी भव्य प्रंबानन मंदिरांनाच पडदा म्हणून वापले जाते. या राम कथेचे ४ भाग करून रोज एक याप्रमाणे ४ दिवसात रामायणाच्या संपूर्ण कथेचे सादरीकरण होते. मे ते ऑक्टोबर महिन्यांच्या प्रत्येक पौर्णिमेच्या आधीच्या द्वादशीपासून रामायण कथांच्या सादरीकरणाला सुरुवात होते आणि पौर्णिमेला शेवटचा भाग सादर केला जातो. हे रामायण नृत्यनाट्य स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये फारच लोकप्रिय आहे.



हिंदू संस्कृती हजारो वर्षांपूर्वी भारतापासून खूप लांब असणाऱ्या इंडोनेशियाला पोहोचली आणि तिने त्या भूभागावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवले. याचकाळात तेथे या संस्कृतीचे दर्शन घडवणारी प्रंबानन मंदिरांसारखी भव्य प्रतीकेही उभारली गेली.
काळाबरोबर देश, तेथील लोक आणि त्यांचे धर्म देखील बदलले. आजच्या मितीला इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा इस्लामिक देश आहे. पण आजही इंडोनेशियन लोक आपली संस्कृती विसलेले नाहीत. अब्जावधी डॉलर्स खर्च करून हा देश प्रंबानन मंदिरांचा जीर्णोद्धार अविरतपणे करत आहे. धर्माने मुस्लिम असूनसुद्धा तेथील कलाकार रामायणाच्या कथा सादर करत आहेत. संस्कृतीला धर्माच्या मर्यादा नसतात याचे हे उत्तम उदाहरणच नाही का?
हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान)
भारतीय उपखंडामध्ये देवी सतीची (पार्वती) ५१ शक्तिपीठे आहेत. हिंगलाज माता शक्तीपीठ (हिंगलाज देवी, हिंगुला देवी) पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतामधील ल्यारी जिल्ह्यातील हिंगलाज या गावात आहे. हिंगोल नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरातील एका डोंगराच्या गुहेत हे मंदिर आहे. पाकिस्तानातील मुस्लिम लोक या मंदिराला नानी का मंदिर म्हणूनही ओळखतात. हिंदू समजाबरोबराच पाकिस्तानातील अनेक मुस्लिम लोक या मंदिराची वार्षिक यात्रा करतात. ही यात्रा पाकिस्तानात नानी का हज म्हणून प्रसिध्द आहे.
भारतीय उपखंडातील देवी सतीची ५२ पीठे

हिंगलाज माता मंदिर

मंदिराचे धार्मिक महत्व आणि इतिहास
हिंगलाज माता मंदिराविषयी बऱ्याच आख्यायिका असल्या तरी लोकप्रिय कथेनुसार, प्रजापती दक्षांची कन्या सती आणि भगवान शंकर यांचा विवाह झाला होता. प्रजापती दक्ष यांना शिवशंकर जावई म्हणून अजिबात पसंत नव्हते. त्यामुळे भगवान शंकरांचा अपमान करण्याच्या संधीची ते वाट पाहत होते.
प्रजापती दक्षांनी एकदा एक मोठा यज्ञ करण्याचे ठरवले. सर्व देवादिकांना यज्ञाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. परंतु भगवान शंकरांना मात्र आमंत्रण दिले नाही.
आपल्या पतीचा असा अपमान झालेला पाहून देवी सतीने वडिलांच्या यज्ञकुंडत कुंडात उडी घेतली. आपल्या पत्नीचा मृत्यू झालेला पाहून भगवान शंकर संतापले. त्यांनी आपल्या पत्नीचे मृत शरीर घेऊन आपला तिसरा डोळा उघडला आणि अतिशय विनाशकारी असे तांडव नृत्य करण्यास सुरुवात केली. तिन्ही लोकात हाहाकार माजला.
भगवान शंकर शांत झाले नाहीत तर विश्वाचा नाश होईल हे भगवान विष्णूंना कळून चुकले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले आणि ते ५१ निरनिराळ्या ठिकाणी नेउन टाकले. हिंगलाज येथे देवी सतीचे मस्तक येउन पडले. त्यामुळे ५१ पीठांपैकी हिंगलाज हे सर्वात महत्वाचे पीठ मानले जाते.
हिंगलाज माता मूर्ती
हिंगलाज माता मंदिराचा गाभारा

हिंगलाज माता यात्रा
पाकिस्तानातील अनेक हिंदू आणि भारतातील (मुख्यत्वे राजस्थान आणि गुजराथमधील) अनेक लोक हिंगलाज मातेला आपली कुलस्वमिनी मानतात.
दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये ४ दिवसांची हिंगलाज माता यात्रा (नानी का हज) आयोजित केली जाते. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार ही यात्रा कराचीमधील नानद पंथी आखाडा येथून सुरु होते. आखाड्यातील एका साधूची यात्रेचा प्रमुख निवड केली जाते आणि त्या साधूच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पार पडते. या यात्रेसाठी भारत आणि पाकिस्तानातून हजारो लोक हिंगलाजला जातात. काही लोक ही यात्रा पायी करण्याचा नवस बोलून या यात्रेचा कराची ते हिंगलाज हा अतिशय खडतर प्रवास पायी करतात.


यात्रेला पायी जाणाऱ्या लोकांसाठी ही यात्रा फारच खडतर आहे.
पाकिस्तानातील हिंदू आणि त्यांच्या मंदिरांची दयनीय अवस्था
जनरल झिया उल हक पाकिस्तानी राष्ट्रपती असताना त्यांनी पाकिस्तानचे पद्धतशिरपणे इस्लामीकरण घडवून आणले. अल्पसंख्यक हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम होण्यास भाग पाडण्यात आले. त्यांची मंदिरे तोडण्यात आली. याच काळात हिंगलाज माता मंदिराचीसुद्धा फार मोठी दुरवस्था झाली. सध्याचे पाकिस्तानी सरकार मंदिराला कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा इतर मदत देत नाही. हिंगलाज माता मंदिर कमिटी या मंदिराची देखभाल करते. ह्या मंदिरावरसुद्धा पाकिस्तानातील इतर मंदिरांप्रमाणे वेळोवेळी इस्लामी अतिरेक्यांकडून हल्ले होत असतात.
बलूच लोकांचा मंदिरासाठीचा त्याग
बलूचिस्तानमध्ये गेली अनेक वर्षे पाकिस्तानपासून स्वातंत्र्यासाठी युद्ध सुरु आहे. बहुसंख्य बलूच लोक मुस्लिम असले तरी हिंगलाज माता मंदिराला त्यांच्या संस्कृतीचा भाग मानतात. ही संस्कृती जपण्यासाठी त्यांनी मंदिराच्या रक्षणासाठी बलूच लोकांची खासगी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली असून त्यांनी कित्येक वेळा मंदिराचे अतिरेकी हल्ल्यांपासून रक्षण केले आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आजही हे मंदिर बलूच लोकांच्या बलिदानामुळे उभे आहे.
हिंगलजा देवीची दखल घेतली गेली हे छान. महाराष्ट्रात हिंगलाज देवीशी जुळणारी गडहिंगलज, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात हिंग्लजवाडी नावाचे गाव, शिवाय हिंगण/णा/णी अशी स्थलनामे ही महाराष्ट्रात दिसतात. आता जाहीरात : मराठी विकिपीडियावर हिंगलजा देवी बद्दल एक छोटासा लेख आहे.
जळगावमधे जुन्या गावात एक हिंगलाज माता मंदीर आहे. ती भावसार समाजाची इमारत ज्याला भावसार मढी म्हणतात. असे समजते कि हिंगलाज माता हि भावसार समाजाची कुलदैवत आहे. आता भावसार लोकांचा बलुचिस्तानाशी काय आणि कसा संबंध आहे ते माहित नाही.
असे मानले जाते की भावसार समाज हा बलुचीस्तान व सिंध प्रांतातून migrate होत राजस्तान, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक आन्द्र मध्ये पोहचला.
भानुशाली समाजाची कुळदेवता हिंगलाज देवी आहे. किंबहुना पाच सहाशे वर्षांपूर्वी गुजरात किंवा राजस्थानात स्थायीक झालेल्या बर्याच समाजाची ही कुलदेवता आहे. अलीबाग चौल रेवदंदा या भागात भानुशालींच्या बर्याच जमीनी -वाड्या आहेत.चौलला हिंगलाज देवीची स्थापना या समाजाने केली आहे. आता हे भानुशाली (भन्साळी ?) किनारपट्टीला कसे पोहचले हा आणखी एक वेगळा इतिहास आहे.
या लेखाच्या अनुषंगाने आपल्या इथल्या कोळी समाजाबद्दलही माहिती यायला हवी होती. इथला कोळी समाज हिंगलाज देवीचा भक्त आहे.
वेसावकर मंडळींचं एक प्रसिद्ध कोळी गीत आहे.
हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी
तू उभी हस वेसावे गावानु !
तुझे पुंजेला जमलाय गो
लोक सारा देवलानू !!
यातील एका कडव्यानुसार, वेसावे गावाच्या तळ्यात मूर्ती सापडली आहे. मागे लोकप्रभा/चित्रलेखा? मध्ये या देवीच्या भक्तांचे भारतात झालेले स्थलांतराबद्दल चांगली माहिती आली होती.
माहितीसाठी आणखी खोदकाम केले असता राणीवाडा (जलोर राजस्थान), बलोत्रा (बारमेर राजस्थान), मुसाफिरखाना अमेठी उत्तरप्रदेश), हिंगलजगढ (मंडसौर मध्यप्रदेश) या इतर ठिकाणि देवीची हिंगलजा मातेची मंदीरे असल्याचे दिसते. (अर्थात मुळ देवी बलोचीस्तानचीच राहते)
विकिमिडीया कॉमन्सवर उपलब्ध झालेली काही छायाचित्रे
हिंगलजगढ मध्यप्रदेश
कडसोर छोटीआ गुजराथ
भावसार समाजा विषयी थोडी माहिती त्या समाजाच्या website वरून.
History of Bhavsars
History or the Past is said to be a Mirror of Present. Our present directly or indirectly depends on our past. History has nothing to do with our present existence, but through someway or other it has played an important role in building our existence. Bhavsar Kshatriya Samaj, as name suggests is a community of Kshatriyas (the warriors). According to the epics and legendary Parshuram who was said to be an Avatar of Lord Vishnu, had vowed a vengeance against a community of warriors, where in the war he had wiped most of the warriors, off the earth.This had worried two young princes Bhavsingh and Sarsingh from Saurashtra who had foreseen their dynasty meeting its end. They had been directed to appeal Goddess Hinglaj at the holy shrine situated on the bank of river Hinghol in Baluchistan near Sindh which is now at Pakistan, where the goddess assured protection to their dynasty by compelling Parshuram to leave them alone, on one condition that none from their community would confront Parshuram.
Bhavsar HistoryThe community Bhavsar was named after these two Princes Bhavsingh and Sarsingh. But as the historical period passed away, there was a certain phase of civilization wherein there was a cultural and economic stability in ancient India. In the mean time apart from being at the royal service, few members from the community started developing skills in stitching and dyeing clothes. These skills enabled them to grow as professional artisans and in turn Royal Tailors & Dress Designers. These artisans had to travel a lot as their skills were well known throughout the nation. That was how they settled down across the country adapting to the culture of the area where they settled down, yet maintaining their own. They could flourish just because they could adapt to any kind of situation and adopt the profession that was the need of time
महाराष्ट्रात मुख्यता विर्दभ मराठवाडा व खानदेशात भावसार समाज विखुरला आहे.
गुजरात-राजस्थान-सिंद मधल्या पांचाल, लोहाणा समाजाची ही कुलदेवता. ह्या देवीच्या स्वातंत्र्यपूर्वकाळातल्या यात्रेचे वर्णन आणि थोडे स्थळवर्णन असलेले 'मरुतीर्थ हिंगलाज' हे पुस्तक एके काळी प्रसिद्ध होते. त्यावर चित्रपटही निघालेला असावा. मला वाटते श्रीपाद जोशी या बहुभाषिक लेखकवर्यांनी (मराठी व्युत्पत्तिकोश पुनर्संपादित करणारे) यावर लिहिले आहे. कराचीतल्या एका मठातून वार्षिक पदयात्रा फाळणी होईपर्यंत निघत होती. हिंगलाजच्या काठी उगवणार्या एका वनस्पतीची छडी-मुबारक हातात धरून महंत यात्रा सुरू करून देत. यात्रिक लोक परत येताना नदीकाठावरून स्वतःसाठी या छड्या आणत. वाचताना खूप अद्भुत वाटले होते.
सुधारणा : नदीचे नाव हिंगोल आहे.
असेही वाचले आहे की येथली थोडी थोडी चिखल माती 'हिंगूळ' म्हणून यात्रिक घरी आणीत. पण हे तितकेसे विश्वासार्ह वाटत नाही. अर्थात मकरान वाळवंटात तप्त चिखल ओकणारे ज्वालामुखी आहेतच.
हा लोहाणा समाज सध्या व्यापार उद्योगात खूपच पुढारलेला आहे. पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या गुजराती भाषिकांमध्ये लोहाणा समाजाचा वरचष्मा आहे.
युगांडा देशाच्या वार्षिक महसुलाचा १० टक्के वाटा एकटा माधवानी समूह मिळवून देतो. माधवानी, लाखानी, राजानी अशी 'नी' ने शेवट असणाऱ्या नावांचा या समाजात खूपच बोलबाला आहे.
लोहाणा समाज हा गुजराथी समाजाचा भाग असला तरी त्यांची भाषा कच्छी आहे.लोहाणा त्यांच्या रंगावरून आणि नाकावरून ओळखता येतात.लोहाणा आणि भाटीया (कंठी भाटीया) हे पंजाबातून शेकडो वर्षांपासून गुजरातेत स्थायीक झाले आहेत. किराणा भुसार माल -किरकोळ विक्रीची दुकाने हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्या सोबतच कोणत्याही देशात स्थायीक होण्याची धडाडी आहे. " बंबईका राजा कौन ? भिकू म्हात्रे हे आताचे उदाहरण झाले पण एके काळी लोहाणा आणि भाटीया हे मुंबईचे राजे होते . उदाहरणार्थ : राजाबाई टोवर बांधणारे प्रेमचंद रायचंद आता मुंबईची सूत्रे केव्हीओंकडे आहेत असे मानण्यास हरकत नसावी. विषयांतर नको. प्रतिसाद संपला.
हिंगलाज देवी हि भावसार समाजाशी निगडीत आहे. माझे एक मित्र आहेत श्री . सचिन बासुटकर त्यांच्या मते त्यांचे मुल अफगाणिस्थान मध्ये असून तीथे बासुट नावाचे गाव आहे त्यावरून त्यांचे आडनाव त्यांनी बासुटकर ठेवले. ते भावसार समाजाचे असून त्यांच्या समाजाचे काही नेते कराची हून हिंगलाज देवीला गेले होते तिकडून त्यांनी देवीचे मुळ छायाचित्र आणले .
पानिपत युद्धात बंदी झालेल्या मराठी लोकांचा ह्याच्याशी संबंध असेल अथवा नसेल काही ठामपणे सांगता येत नाही.
जे काही हजारो मराठा सैनिक अब्दालीने आपल्याबरोबर नेले . ते त्याने बलुचीस्थान च्या सरदारास खंडणी म्हणून देवून टाकले. ह्याच्या संबंधीचा एक लेख मागच्या लोकसत्ता दिवाळी अंकात आला होता. तोच मराठी समाज आज स्वतःला मराठा बुग्ती म्हनुवून घेत आहे व हा समाज प्रामुख्याने जमीनदार व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांचे बरेच रीतीरिवाज मराठी रीतीला धरून आहेत प्रामुख्याने लग्नातले उदा. लग्नात मुहूर्त मेढ रोवणे आणि बहिणीने दार अडवून होणा-या मुलीची सून म्हणून देशील का अशी मागणी करणे .भाग ३ - श्री श्री ढाकेश्वरी मंदिर, ढाका (बांग्लादेश)
ढाकेश्वरी मंदिर हे सध्याच्या बांग्लादेशमधील सर्वात महत्वाचे हिंदू मंदिर आहे. राजधानी ढाका येथील ढाका विद्यापीठाच्या मागील बाजूस हे मंदिर आहे. या मंदिराचे खास वैशिष्ठ्य म्हणजे मंदिराची मालकी बांग्लादेश सरकारकडे असून या मंदिराला बांग्लादेशच्या राष्ट्रीय मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे. १९७१ च्या बांग्लादेश स्वातंत्र्य लढयादरम्यान पाकिस्तानी सैन्याने बांग्लादेशातील श्री रमणा काली मंदिर पूर्णपणे नष्ट केल्यापासून ढाकेश्वरी मंदिर हे बांग्लादेशमधील सर्वात महत्वाचे हिंदू मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले.

मंदिराचे धार्मिक महत्व आणि इतिहास
१२ व्या शतकात राजा बल्लाल (बल्लाळ) सेन याला एकदा स्वप्नामध्ये जंगलात देवी दुर्गेची मूर्ती सापडल्याचे पहिले. स्वप्नात पाहिल्याप्रमाणे त्याने मूर्तीचा शोध घेतल्यावर त्याला जंगलात खरंचच देवीची मूर्ती सापडली. त्याने या मूर्तीसाठी मंदिर बांधून त्याचे ढाकेश्वरी मंदिर असे नामकरण केले. सध्याच्या ढाका शहराचे नाव याच देवीच्या नावावरूनच घेतल्याचे बोलले जाते
गेल्या काही शतकांमध्ये या मंदिराची बऱ्याचवेळा दुरुस्ती, डागडुजी व नुतनीकरण करावे लागले. त्यामुळे मंदिराचा मूळ इतिहास आणि त्याचे सध्याचे स्थापत्य मेळ खात नाहीत.
ढाकेश्वरी मंदिर १९०४
मंदिर परिसर आणि मंदिराची रचना
ढाकेश्वरी मंदिर परिसरात ५ वेगवेगळी मंदिरे आहेत. दुर्गा मंदिर हे मुख्य मंदिर असून सध्याचे मंदिर साधारणपणे २०० वर्षे जुने आहे. याशिवाय येथे १६ व्या शतकात राजा मानसिंग याने बांधलेली एकाशेजारी एक अशी ही ४ भगवान शंकराची मंदिरेसुद्धा आहेत. परिसरातील मंदिरे निरनिराळ्या कालखंडांमध्ये बांधली असल्यामुळे आपल्याला येथे निरनिराळी स्थापत्यकला पहावयास मिळते. बंगाली चौचाला, शिखोर (शिखर) मंदिर आणि बौद्ध पॅगोडा या स्थापत्यकलांचे मिश्रण येथे आहे.
दुर्गा मंदिर (मुख्य ढाकेश्वरी मंदिर)
ढाकेश्वरी दुर्गा मूर्ती
मंदिरावरील हल्ल्यांचा इतिहास
१९७१ च्या बांग्लादेश स्वातंत्र्यलढयादरम्यान मंदिराचे फार मोठे नुकसान झाले. पाकिस्तानी सैन्याने मंदिराच्या मुख्य भागाचा वापर शस्त्रास्त्रे व दारुगोळा ठेवण्यासाठी केला. बंगालच्या सांस्कृतिक चिन्हांचा नायनाट करण्याचा चंग बांधलेल्या पाकिस्तानी लष्कराने मंदिराची मोठ्याप्रमाणावर नासधूस केली.
१९९० च्या दशकात भारतात बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ मोठ्या मुस्लिम जमावाने ढाकेश्वरी मंदिरावर हल्ला करून मंदिराची तोडफोड केली.
बांग्लादेशाच्या नव्या स्थावर मालमत्ता कायद्याच्या अंमलबजावणीदरम्यान मंदिराची बरीच जमीन सरकारने काढून घेतली. त्यामुळे सध्याचा मंदिर परिसर हा मूळ मंदिरापेक्षा फारच छोटा आहे.
ढाकेश्वरी मंदिराचे राष्ट्रीयीकरण
१९७१ पूर्वी रमणा काली मंदिर हे पूर्व पाकिस्तानातील (सध्याचा बांग्लादेश) हिंदूंचे मुख्य मंदिर होते. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यलढयादरम्यान पाकिस्तानी सैन्याने रमणा काली मंदिर पूर्णपणे नष्ट केले. बांग्लादेशाच्या निर्मितीनंतर देशातील हिंदूनी मंदिरासाठी मोठी चळवळ उभारली. बांग्लादेशाच्या संस्कृतीतील हिंदूंचे आणि त्यांच्या मंदिरांचे स्थान ओळखून बांग्लादेश सरकारने १९९६ मध्ये ढाकेश्वरी मंदिराचे राष्ट्रीयीकरण केले. मंदिराचे नाव बदलून श्री श्री ढाकेश्वरी जोतीय (राष्ट्रीय) मंदिर असे करण्यात आले.

वार्षिक दुर्गा पूजा उत्सव (नवरात्र)
बांग्लादेशातील हिंदूंसाठी वार्षिक दुर्गा पूजा उत्सव (नवरात्र) हा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. ढाकेश्वरी मंदिरातसुद्धा हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बांग्लादेशचे राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते, खासदार आणि इतर सर्व क्षेत्रांतील लोक या उत्सवात आवर्जून सहभागी होतात. हजारो हिंदू आणि मुस्लिम लोक यावेळी मंदिरात येवून ढाकेश्वरी देवीचे दर्शन घेतात.
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ढाकेश्वरी मंदीर भेट
जून २०१५ मध्ये बांग्लादेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ढाकेश्वरी मंदीराला आवर्जून भेट दिली. मंदिर भेटींचे कार्यक्रम पंतप्रधानांच्या राजकीय दौऱ्याचे भाग सहसा नसतात त्यामुळे भारतीय हिंदू संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या या मंदिराला पंतप्रधानांनी दिलेली भेट उल्लेखनीय म्हणावी लागेल.
ढाकेश्वरी मंदिराचे विशेष पौराणिक महत्व नसले तरी भारताची झालेली फाळणी, पाकिस्तानी सैन्याचे पूर्व पाकिस्तानातील अत्याचार, बांग्लादेशची निर्मिती, बांग्लादेशातील हिंदूवरील अत्याचार हे सर्व या मंदिराने पाहिले आहे. एका मुस्लिम बहुल देशाचे राष्ट्रीय मंदिर होऊन हिंदू संस्कृतीचे प्रतिक म्हणून हे मंदिर आजही उभे आहे.
छान माहिती!
१९९० च्या दशकात भारतात बाबरी मशीद पाडल्याच्या निषेधार्थ मोठ्या मुस्लिम जमावाने ढाकेश्वरी मंदिरावर हल्ला करून मंदिराची तोडफोड केली.
ढाकेश्वरी मंदिरातसुद्धा हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बांग्लादेशचे राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते, खासदार आणि इतर सर्व क्षेत्रांतील लोक या उत्सवात आवर्जून सहभागी होतात. हजारो हिंदू आणि मुस्लिम लोक यावेळी मंदिरात येवून ढाकेश्वरी देवीचे दर्शन घेतात.
नोटेड!
Sandy
भाग ४ - पशुपतीनाथ मंदिर, काठमांडू (नेपाळ)
नेपाळची राजधानी काठमांडू येथील श्री पशुपतीनाथ मंदिर हिंदूधर्मियांचे एक अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीवाचा (पशुचा) स्वामी, भगवान पशुपतीनाथ (शिवशंकर) हे नेपाळचे राष्ट्रीय दैवत मानले जाते. पवित्र बागमती नदीच्या काठावर असणाऱ्या या मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरे आणि आश्रम आहेत. युनेस्कोने या मंदिर परिसराला जागतिक वारश्याचा (World Heritage Site) दर्जा प्रदान केला आहे. महाशिवरात्रीच्या वार्षिक महासोहळ्यासाठी जगभरातून लाखो भाविक पशुपतीनाथ मंदिराला भेट देतात.
भारतात असणाऱ्या १२ ज्योतिर्लिंगांना भगवान शंकरांचे शरीर तर नेपाळमधील पशुपतीनाथाला मस्तक मानले जाते.
मंदिराचा इतिहास
मंदिर उभारणीच्या कालखंडाबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नसली तरी नेपाळ महात्म्य आणि हिमवतखंड या प्राचीन ग्रंथांमध्ये मंदिराचा उल्लेख आढळतो. यावरून अंदाज केल्यास ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपूर्वी मंदिर अस्तित्वात असावे.
१५ व्या शतकादरम्यान पशुपतीनाथ मंदिर वाळवी लागून मोडकळीस आले होते. राजा सुपुष्प याने मंदिराचे पुनर्निर्माण केले. गेल्या अनेक शतकांमध्ये मंदिर परिसरात मुख्य मंदिराबरोबरच अनेक मंदिरे बांधली गेली. ११ व्या शतकातील श्री गुह्येश्वरी आणि राम मंदिरांचा यात समावेश होतो.
मंदिराच्या आख्यायिका
पशुपतीनाथ मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. त्यात पुढील दोन आख्यायिका विशेष प्रसिध्द आहेत,
१. सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामधेनु गाय चंद्रवन पर्वतातील एका गुहेत राहत असे. रोज सकाळी बाहेर जाऊन एका विशिष्ठ ठिकाणी ती आपल्या दुधाने अभिषेक करत असे. दहा हजार वर्षे हा नित्यक्रम चालू होता. आजूबाजूच्या लोकांनी त्याजागी खोदले असता त्यांना तेथे शिवलिंग सापडले. तेच पुढे पशुपतीनाथ नावाने प्रसिध्द झाले.
२. देवलोक आणि कैलासाला कंटाळून भगवान शंकर एकदा बागमती नदीकाठच्या जंगलात काळवीटाच्या रुपात लपून बसले. देवलोकात काळजी पसरली. देवांनी भगवान शंकरांचा शोध सुरु केला. अनेक ठिकाणी शोध घेतल्यावर त्यांना काळवीटाच्या रुपात लपून बसलेले भगवान शंकर सापडले. त्यांच्या शिंगांना धरून त्यांच्या मूळ रुपात आणण्याच्या प्रयत्नात एक शिंग तुटले. याच शिंगाची शिवलिंग म्हणून पूजा होऊ लागली आणि ते भगवान पशुपतीनाथ म्हणून प्रसिध्द झाले.
मंदिर परिसर
पशुपतीनाथ मंदिर परिसर २६४ हेक्टर जागेवर पसरला असून या परिसरात वैश्य आणि शैव परंपरांची ५१८ मंदिरे आहेत. यामध्ये खालील काही महत्वाच्या मंदिरांचा समावेश होतो,
- श्रीराम मंदिर
- गुह्येश्वरी मंदिर
- विराटस्वरूप मंदिर
- वासुकीनाथ मंदिर (देव आणि दानवांनी वासुकी नागाचा वापर समुद्रमंथना करता केला होता)
- उन्मत्त भैरव मंदिर (भैरव हा भगवान शंकरांचा अवतार मनाला जातो)
- सुर्यनारायण मंदिर
- कीर्तिमुख भैरव मंदिर
- हनुमान मदिर
- आणि १९७ इतर शिवलिंगे
मुख्य मंदिराचे स्थापत्य
पशुपतीनाथ मंदिराचे बांधकाम नेपाळी पॅगोडा पद्धतीचे असून मंदिरात सुरेख कोरीव काम असणाऱ्या लाकडाच्या तुळया आहेत. तांबे आणि सोन्याच्या पत्र्यांवर रेखीव काम असणारे छत दोन मजली आहे. मंदिराचा कळस सोन्याचा असून जमिनीपासून त्याची उंची सुमारे २४ मीटर आहे. मुख्य मजल्यावर मंदिराचा गाभारा असून तेथे शिवलिंग स्थापित केलेले आहे.
मंदिराच्या आतल्या आणि बाहेरच्या भागावर भगवान शंकर, पार्वती, गणेश, राम-लक्ष्मण-सीता, इतर देवादिक आणि अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
पशुपतीनाथ शिवलिंग
मंदिरातील सुमारे १ मीटर उंचीच्या दगडी शिवलिंगावर पाच चेहरे कोरलेले आहेत. या चेहऱ्यांचे महत्व पुढील प्रमाणे आहे,
१. दक्षिण दिशा: भगवान शंकराच्या अघोर रूपाचे प्रतिक असणारा हा चेहरा दक्षिणेला असणाऱ्या रामेश्वारचे प्रतिक मानले जाते.
२. पूर्व दिशा: जटाधारी तत्पुरुषाचे हे मुख पूर्वेला असणाऱ्या जगन्नाथाचे प्रतिक मानले जाते.
३. उत्तर दिशा: अर्धनारीनटेश्वराचे हे मुख उत्तरेला असणाऱ्या बद्रिनाथाचे प्रतिक मानले जाते.
४. पश्चिम दिशा: वरुणरुपी भगवान शंकराचे हे मुख पश्चिमेला असणाऱ्या द्वारकाधीशाचे (कृष्ण) प्रतिक मानले जाते.
५. ऊर्ध्व दिशा: कळसाकडे पाहणारे पाचवे मुख भगवान पशुपातीनाथाचे मुख्य मुख मानले जाते.
या चेहेऱ्यांवर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांची चिन्हे कोरलेली आहेत. उजव्या बाजूला रुद्राक्षाची माळ आणि डाव्या बाजूला कमंडलू ठेवलेला असतो. शिवलिंगावर चांदीचा नागही स्थापित केलेला असतो.

मंदिराचे पुजारी
भट
पशुपतीनाथ मंदिरात पौरोहित्य करण्यासाठी वेदशास्त्रांचे उत्तम ज्ञान असणाऱ्या द्रविडी ब्राह्मणांची भट म्हणून नियुक्ती केली जाते. हे ब्राह्मण मुख्यत्वे भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून निवडले जातात. कोणत्याही एका कुटुंबाची मंदिरातील पौरोहीत्यावर मक्तेदारी नसते.
मंदिराचे राजगुरु भारतातून आलेल्या ब्राह्मणांची वेद आणि शिव आगमांच्या अभ्यासाबद्दल अतिशय कठीण अशी परीक्षा घेतात. यात उत्तीर्ण होणाऱ्या मोजक्या ब्राह्मणांची मंदिराचे भट म्हणून नियुक्ती केली जाते.
भारतातील ब्राह्मणांची भट म्हणून नियुक्ती करण्याची परंपरा शंकराचार्यांनी सुरु केली. निरनिराळ्या भागात राहणाऱ्या ब्राह्मण समाजामध्ये एकी घडवून आणण्यासाठी ही परंपरा शंकराचार्यांनी सुरू केली होती आणि ती आजही पाळली जात आहे.
भंडारी
अनेक वर्षांपूर्वी मंदिरात भट म्हणून नियुक्ती मिळालेल्या ब्राह्मणांसोबत त्याचे मदतनीस नेपाळमध्ये पोहोचले. कश्यप गोत्राचे आणि क्षत्रिय वंशाचे हे लोक नंतर भंडारी अथवा राजभंडारी म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिरातील भटांना नित्यकर्मांमध्ये मदत करणे, मंदिराच्या भांडाराचा (पैसे आणि इतर खजिना) हिशोब ठेवणे इत्यादी कामे मंदिराचे भंडारी करतात. मात्र त्यांना पूजा करणे अथवा शिवलिंगाला स्पर्श करण्याची परवानगी नसते.
मंदिर प्रवेश आणि दर्शन
पशुपतीनाथ मंदिराला चारही दिशांना चार दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा पश्चिम दिशेला असून तो बाराही महिने मंदीरप्रवेशाकरता वापरला जातो. इतर दरवाजे फक्त उत्सवादरम्यान उघडले जातात.
फक्त भारतीय आणि तिबेटी वंशाच्या हिंदू आणि बौद्धांनाच मंदिर परिसरामध्ये प्रवेश करण्याची परवानगी आहे. इतर धर्मीय आणि हिंदू धर्म पाळणाऱ्या पाश्चिमात्य लोकांना मंदिर परिसरात प्रवेश मिळत नाही. हिंदू पूर्वज असणाऱ्या भारतीय शीख आणि जैन धर्मियांना मंदिर परिसरात प्रवेश मिळू शकतो.
बाकी सर्व लोकांना बागमती नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर उभे राहून मंदिर पाहता येते. आजूबाजूची इतर मंदिरे पाहण्याकरता या लोकांना $१० फी भरावी लागते.
पशुपतीनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या भटांखेरीज कोणालाही प्रवेश मिळत नाही. शिवलिंगाचे दर्शन गाभाऱ्या बाहेरूनच घ्यावे लागते.
शिवलिंगाला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त मुख्य पुरोहित आणि इतर ३ भटांना आहे. या ४ व्यक्तींशिवाय कोणीही मूर्तीला स्पर्श करू शकत नाही.
महाशिवरात्री उत्सव
महाशिवरात्र हा पशुपतीनाथ मंदिराचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव असतो. महाशिवरात्रीला मंदिर २४ तास उघडे असते. रात्रीच्या वेळी संपूर्ण मंदिर साजूक तुपाच्या दिव्यांनी उजळून निघते. हे दिवे रात्रभर विझणार नाहीत याची खास काळजी घेतली जाते. भारत आणि नेपाळ मधून अनेक साधूही यावेळी पशुपतीनाथ मंदिरात येतात.
जगभरातून महाशिवरात्रीला सुमारे सात लाख भाविक येथे जमतात. बागमती मध्ये स्नान करून ते पशुपातीनाथाचे दर्शन घेण्याकरता कित्येक तास रांगेत उभे राहतात.
पशुपतीनाथ मंदिर आणि तेथील मृत्यूचे अस्तित्व
माणसाच्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्याला पुढील जन्म मिळतो असे हिंदूधर्मीय मानतात. मनुष्य जन्म हा त्यात सर्वोत्तम पण मनुष्य योनीत जन्माला येणे फारच दुर्लभ मानले जाते. ज्या मनुष्याला बागमती नदीकाठी पशुपतीनाथ मंदिर परिसरात मृत्यू येतो त्याला त्याच्या कर्मांचा लेखाजोखा न होता पुढील जन्मी नक्कीच मनुष्य योनी प्राप्त होते असे नेपाळमधील हिंदू मानतात.
मरणासन्न अवस्थेतील लोकांना त्यांच्या मृत्युसमयी बागमती नदीकाठी आणून ठेवण्यासाठी मंदिर परिसरात अनेक खोल्या भाड्याने उपलब्ध आहेत. नेपाळमधील लोक आपल्या घरातील अशा मृत्युशैयेवरील माणसांना या खोल्यामध्ये आणून ठेवतात..
खोलीमधील माणसाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा शोक आणि बाहेर उघड्यावरच चिता रचून केले जाणारे अंत्यसंस्कार यासर्व गोष्टींमुळे मंदिर परिसरामध्ये मृत्यूचे भयाण वातावरण आणि एक प्रकारचा विचित्र दर्प कायमच असतो.

२००९ चा वाद
हिंदू मंदिरे आणि त्यांच्यावर होणारे हल्ले यांना फार मोठा इतिहास आहे. २००८ मध्ये नेपाळमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे सरकार आले. या सरकारने पशुपतीनाथ मंदिराच्या मुख्य भटांना राजीनामा देण्यास भाग पाडले. कुठलीही पारंपारिक निवड प्रक्रिया पार न पाडता नेपाळ सरकारने आपल्या मर्जीच्या नेपाळी पुरोहितांची भट म्हणून नियुक्ती केली.
मंदिराच्या भंडारींनी याला आक्षेप घेऊन या नियुक्तीला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने सरकारने केलेली भटांची नियुक्ती रद्द केली. पण नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही.
नेपाळमधील जनतेने याविरुध्द मोठे आंदोलन उभारले. नेपाळच्या विरोधीपक्षांनीसुद्धा या आंदोलनाला पाठींबा दिला. शेवटी या आंदोलनाच्या दबावाला बळी पडून सरकारने मंदिराच्या मूळ भटांची फेरनियुक्ती केली.
भारतातील इतर महत्वाच्या तीर्थक्षेत्रांप्रमाणेच नेपाळचे पशुपतीनाथ मंदिर हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. दरवर्षी लाखो भारतीय पशुपतीनाथ मंदिराला भेट देतात आणि या मंदिराचे महत्व येणारी अनेक वर्षे असेच अबाधित राहील यात शंकाच नाही.
भारतात पशुपातीनाथाचे एक मंदिर मध्यप्रदेशात मन्दसौर येथे शिवना नदिच्या काठी आहे.
No comments:
Post a Comment