https://sahajsuchalamhanun.blogspot.com/2017/07/blog-post.html
आजकाल आपल्या संपूर्ण समाजाचीच मानसिकता इतकी खालावली आहे की प्रत्येक बाबतीत जात आणि धर्म हमखास बघितले जातात, मग ती गोष्टी चांगली असो वा वाईट. यात लोकशाहीचा तथाकथित स्तंभ देखिल मागे नाही. "दलित महीलेवर बलात्कार!", "दलित तरुणाची हत्या!" या जातीय भाषेत ठळक बातम्या देणारे तितकेच जबाबदार आहेत. त्या गुन्ह्यामागचे कारण स्पष्ट होण्याआधी बळी गेलेल्या दुर्दैवी जीवांना जात चिकटवली की अनेक सामाजिक आणि राजकिय गोष्टी साध्य होतात. या सगळ्यातून तयार झालेल्या समाजाचे फार काही वेगळे नाही. चित्रपटातील काल्पनिक पात्रांच्या जाती वरुनही भांडायचे लोकांनी बाकी ठेवलेले नाही तिथे खरच घडून गेलेल्या इतिहासाबाबत विचारायलाच नको. हा लेख लिहायला घेतला त्याचे कारण इतिहास नक्की काय आहे ह्याचे यथार्थ ज्ञान नसणे, संदर्भ न घेताच लिहून मोकळे होणे हे प्रकार आजकाल वाढले आहेत. १६ जुलै २०१७ च्या "लोकसत्तामध्येच" श्री पद्माकर कांबळे यांचा "’विजयस्तंभा’मागील इतिहास" हा इतिहासाचा अपलाप करणारा लेख छापून आलेला आहे. अर्धवट माहीतीच्या आधारे एखादा लेख लिहील्यास तो कसा फसू शकतो ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा लेख होय. त्या लेखाचा ससंदर्भ आणि तार्किक समाचार नक्कीच घेतला जाईल मात्र त्या लेखाच्या मागची प्रेरणा म्हणजे लोकसत्ता मधील दिनांक ९ जुलै २०१७ रोजी मधु कांबळे यांनी दिलेली "पेशवाईच्या पराभवाचा सरकारी जल्लोष" ही बातमी आहे.आधी थोडक्यात त्याची झाडाझडती घ्यावी लागेल.
मुळात भीमा - कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी ज्याला भीमा कोरेगावची लढाई म्हणतात आणि ५०० महारांनी २५ हजार पेशव्यांना हरवले वगैरे सांगितले जाते ती कशी झाली ह्याबाबत संदर्भ न वाचल्याने न घडलेला इतिहास सांगितला जातो. त्यातून पेशव्यांवर वाट्टेल ते आरोप केले तरी कुणाला फारशी पडलेली नसते हे लक्षात घेता पेशवे हे सोपे लक्ष झाले आहेत. पण समकालिन संदर्भ वेगळंच सांगतात. दुसर्या बाजीरावांना पकडायला दिड महिन्याहून अधिक काळ ब्रिटिश जंगजंग पछाडत होते पण त्यांना बाजीराव दृष्टिसही पडले नाहीत. गंमत म्हणजे पुण्यातून बाजीराव निघाले ते ४०० मैलांचा मोठा गोल फिरुन पुन्हा पुण्याकडेच आले. बाजीराव चाकण भागात आले आहेत ही बातमी मिळताच इंग्रजांची पाचावरती धारण बसली. ब्रिटिश कागदपत्रे आणि मराठी कागदपत्रे विशेषत: त्र्यंबकजी डेंगळेंची पत्रे वाचली की कोरेगावच्या लढाईत मराठ्यांच्या अंदाजे तीन हजार सैनिकांनी (ज्यात मुख्यत: अरब सैनिक होते) ब्रिटिशांची कशी ससेहोलपट केली हे स्वच्छ दिसतं.
ब्रिटिश आणि मराठी कागदपत्रे वाचल्यावर समोर चित्र ऊभं रहातं ते असं - ब्रिगेडिअर जनरल स्मिथला चकवा देऊन बाजीराव चाकणपर्यंत आल्याची बातमी कर्नल बरला मिळाली. बाजीराव परत पुण्यात शिरले तर कठीण होईल हे कर्नल बर ने ओळखलं. ब्रिगेडिअर जनरल स्मिथ कुठे आहे ह्याबाबत मात्र त्याला कल्पना नव्हती. मात्र बाजीरावांना पुण्याच्या बाहेरच थांबवावे ह्या हेतूने त्याने शिरुर येथून स्थानिक पायदळाची पलटण बोलावली. या बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्रीपैकी दुसरी बटालियन, दोन तोफा आणि अडिचशे घोडेस्वार घेऊन ३१ डिसेंबरच्या रात्री कॅप्टन स्टॉटन निघाला. रात्रभर चाल करुन दमलेल्या अवस्थेत सकाळी दहा वाजता तो कोरेगांव जवळील एका टेकडीवर पोहोचला. त्याला वरुन अंदाजे २० हजार घोडदळ आणि ८ हजार पायदळ अशी सेना घेऊन सज्ज असलेले मराठे दिसले. रात्रभर चालून ब्रिटि्शांचे सैनिक दमले होते, लढाईला तोंड लागले तेव्हा उन्ह चढायला सुरुवात झाली, नदिवरती मराठ्यांचे नियंत्रण असल्याने पाणी देखिल मिळेना. अखेर त्याने त्याच्या ८३४ लोकांसकट कोरेगांवच्या तटबंदित आश्रय घ्यायचा ठरवले, गावात शिरताना मराठ्यांनी देखिल त्याला बघितले आणि नदि पार करुन ते तीन बाजूंनी ब्रिटिशांवरती चालून गेले. ह्या मराठी सैन्याची संख्या साधारण अडीच -तीन हजार होती ज्यात मुख्यत: अरबांच्या कवायती फौजा होत्या. बाकी सैन्य नदिच्या पार अगदी आरामात तळ देऊन राहीले. यावेळी छावणीमध्ये खुद्द सातारकर छत्रपती होते. छत्रपती आणि पेशवे नदि पलिकडच्या टेकडीवरुन ही लढाई बघत होते. छत्रपतींनी भर उन्हात सुद्धा अब्दागीर घेतली नव्हती कारण इंग्रजांनी त्या दिशेने तोफ चालवायची शक्यता होती. मराठ्यांचा हा हल्ला इतका जबरदस्त होता की ब्रिटिश सेनेला सावरायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे सुरुवातीचा गोळीबार वगळता ही लढाई मुख्यत: तलवारींनी झाली. इंग्रजांच्या २ तोफांपैकी १ तोफ मराठ्यांनी बंद पाडली, तोफेच्या आजूबाजूचे २४ लोक ठार केले. त्या तोफेवरचा ब्रिटिश अधिकारी चिशील्म हा ठार झाला, त्याचे डोके कापून ते मराठ्यांच्या छावणीत पाठवले. लेफ्टनंट पॅटिन्सन हा सहा फूट सात इंचाचा राक्षसी ताकदिचा अधिकारी मराठ्यांच्या गोळीने जबर जखमी झाला मात्र मराठे प्रबळ होत आहेत हे बघून त्याने सोबत काही माणसे घेऊन पुन्हा हल्ला केला आणि ती तोफ पुन्हा मिळवली. मात्र त्याला दुसरी गोळी लागून तो ठार झाला.नंतर त्याचे बिनमुंडक्याचे धड ब्रिटिशांना मिळाले. असिस्टंट सर्जन वुइंगेट, लेफ्टनंट स्वानस्टन आणि लेफ्टनंट कोनेलन देखिल जबर जखमी झाले नाईलाजाने ब्रिटिशांनी कोरेगावच्या आतल्या भागात २ धर्मशाळांमध्ये आश्रय घेतला. पैकी संध्याकाळी मराठ्यांनी देवळा जवळची एक धर्मशाळा जिंकून घेतली. तिथे काही जखमी ब्रिटिश अधिकारी होते त्यापैकी वुइंगेटला मराठ्यांनी ठार केले. इतर अधिकारी मारले गेले असते मात्र लेफ्टनंट जोन्स आणि असिस्टंट सर्जन विलीने जीवावर उदार होऊन धर्मशाळेत घुसलेल्या मराठ्यांवरती हल्ला केला व त्या अधिकार्यांना वाचवले. . कोरेगावांत एक गढी देखिल होती इंग्रजांचे तिथे लक्ष नाही हे बघून मराठ्यांनी ती गढी ताब्यात घेऊन तिथला शेवटचा भक्कम आधार हिसकावून घेतला. रात्रीपर्यंत ह्या चकमकी कोरेगावात होत राहील्या. मराठ्यांनी देखिल २ तोफा आणल्या होत्या दिवसभर त्यांचा मारा सुरु होता. रात्री नऊ वाजता अचानक हा तोफांचा भडीमार थांबवला गेला आणि मराठे निघून गेले. ब्रिटिशांचे तब्बल अडिचशे लोक मारले गेले. त्यात तोफखान्यावरील २० इंग्रजांपैकी ११ जण ठार झाले. "गॅझेटिअर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सीनुसार" ब्रिटिशांचे २७५ लोक मारले गेले अथवा जबर जखमी झाले तर मराठ्यांचे ५००- ६०० लोक मारले गेले ज्यात मुख्यत: आधी चालून गेलेल्या अरबांचा भरणा होता.
मराठ्यांनी ब्रिटिशांची इतकी ससेहोलपट केली मात्र रात्री ९ च्या आसपास तोफा बंद करुन निघून का गेले हे एक कोडे आहे असे डॉ. आंबेडकरांनीही आपल्या एका लेखात नमूद केले आहे. इंग्रजांनी पेशवा घाबरून पळाला अशी फुशारकी मारली, पण दक्षिणेचा मार्ग मोकळा होण्यासाठी मराठ्यांनी इंग्रजांना दिवसभर कोरेगावात अडकवले होते. गोखल्यांच्या कैफियतीत बाजीराव पेशवे बापू गोखल्यांना म्हणतात, “आज लढाई करून मार्ग काढावा”. ‘ही आज्ञा घेऊन समस्त सरदार मंडली सहवर्तमान पलटणावर चालोन घेतले’ असं स्पष्ट नमूद आहे. मराठे निघून गेल्यावर दिवसभर तहानेने हैराण झालेल्या ब्रिटिशांच्या उरलेल्या सैन्याने पाणी पिण्यासाठी नदिकडे धाव घेतली. मधल्या काळात ब्रिगेडिअर जनरल स्मिथच्या सैन्याला ओझरच्या घाटात डेंगळ्यांच्या रामोशी लोकांच्या पथकाने लहान लहान हल्ले करुन हैराण केले. ब्रिटिश सैन्याचा विजय झाला असता तर ब्रिटिश त्याच दिवशी बाजीरावांच्या मागावर निघाले असते निदान बाजीरावांना अडथळा आणण्यासाठी पुण्याच्या दिशेने गेला असता मात्र कॅप्टन स्टॉटन दुसर्या दिवशी रात्री उशीरा पुण्याकडे न जाता पुन्हा शिरुर कडे गेला. इतके असूनही ब्रिटिश धडधडीत खोटं लिहीतात की आम्ही जिंकलो. आणि केवळ पेशव्यांचा पराभव झाला या लोणकढी थापेवरती अनेकजण आनंदित होतात. हा कोणी एका जातीचा विजय किंवा पराभव म्हणून घेत असेल तर देव त्याचे भले करो. हा सरळ सरळ ब्रिटिश आणि स्थानिक सत्ता म्हणजे मराठे यांच्यातला बखेडा होता. त्यातून सातारकर छत्रपती छावणीत असल्याने तर सरळ सरळ हा छत्रपतींचा विजय किंवा पराभव ठरतो. भारताचे दुर्दैवच हे आहे की स्थानिक लोकं परदेशी आक्रमकांना मदत करतात मग तो सिकंदराला मदत करणारा राजा अंभी असो, पनिपतावरती अब्दालीला मदत करणारा शुजा असो, प्लासीच्या लढाईत मीर जाफर असो किंवा १८५७ मध्ये ब्रिटिशांना मदत करणारे शिख असोत. अंतर्गत धार्मिक - जातीय - सामाजिक संघर्षात आपण आपापसातच लढून अर्धमेले होतो आणि आक्रामक आपला जम बसवतात. कोरेगावची लढाई ही माझ्या दृष्टिने अशीच एक लढाई. आणि गंमत म्हणजे मराठ्यांनी ही लढाई जिंकून सुद्धा विजयस्तंभ उभारला ब्रिटिशांनी. आणि मराठी सत्ता ही केवळ पेशवाई होती आणि त्यातून पेशवे म्हणजे समस्त ब्राह्मण समाज असे मनात धरुन ब्रिटिशांचा विजय हाच आपला विजय समजण्यात मोठी चूक होते आहे हे वरती ससंदर्भ नमूद केले आहेच.
आपल्या लेखात श्री पद्माकर कांबळे यांनी अजून दोन अत्यंत विनोदी आरोप केले आहेत पहीला आरोप - "कान्होजी आंग्रेचे आरमार दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या मदतीने समुद्रात बुडविले होते." इतिहासाचा अभ्यास नसल्याचा सर्वात मोठा पुरावा. ही आंग्रें संबधित घटना फेब्रुवारी १७५६मध्येच नानासाहेब पेशव्यांच्या काळात घडून गेली होती म्हणजे पद्माकर कांबळेंचा तब्बल ६२ वर्षांचा हिशोब चूकला आहे. दुसरा विनोदी आरोप "पेशव्यांच्या काळात महारांना प्रवेश बंदी केली गेली. त्यांना पेशव्यांच्या सैन्यात प्रवेश मिळेना. अशा वेळी काही महार तरुण ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री’मध्ये दाखल झाले." यावर मी अगोदरच ९ जून २०१६ रोजी एक अख्खा लेख लिहीलेला आहे तो "या इथे" सविस्तर वाचता येईल. मात्र एक झलक म्हणून ३ परिच्छेद इथे देतो-
"जमिनीची पहाणी करुन सरकारने आकारलेल्या
करातून महारांना दरशेकडा रुपये ५ ची सुट दिल्याची नोंद तसेच मौजे कळंबी
प्रांत मिरज येथील एका गाववरतीच जप्ती आणली पुढे चौकशी अंती तो गाव राजनाक
वल्लद काळनाक महाराकडे पूर्वीपासून असून तो हुजुर चाकरी करतो हे समजतच
गावचा मोकासा व महसूल त्याकडे परत केला आणि गाव जप्तीतून मोकळी केली (थो.
मा. रो. भा १ पृष्ठ ३१० नोंद क्रमांक ३४०). पाली गावच्या भोयी महारास
सरकारचा अधिकारी म्हणून कुलकर्णी, खोतपाटीलांसारखाच गावठाण माफ केल्याचे
नानासाहेबाच्या रोजनीशीतील उल्लेखात कळते (रो भा पृ २०३). पंढरपुरात राडिचा
खेळ होत ती जागा खणून तयार करायचा मान महारांचा असे. एका वर्षी बडवे तो
खणू लागताच तंटा ऊभा राहीला व सवाई माधवराव रोजनीशी भाग ३ पृष्ठ २८५ नुसार
निकाल महारांच्या बाजूने देऊन बडव्यांना सख्त ताकिद केली. १७८९ मध्ये
कात्रज गावानजिक महार, चांभार व मांग समाजाची वस्ती होती ती. काही कारणाने
मोडावी लागली. लगोलग हुजुरातीतून २५१ रुपये आणि ३०० वासे नवीन घरे
बांधण्यासाठी दिल्याचे सवाई माधवराव रोजनिशी ३-२८६ नुसार स्पष्ट होते."
"हुजुरपागेत बिगार म्हणूनही काम असे. आरमारात चांभांरांची नेमणूक
होत असे. पुणे, राहुरी, खेड, संगमनेर, जुन्नर, पारनेर, नेवासे, कर्डे,
बेलापूर, गांडापूर ह्या ठिकाणी ३१३ महार, ५४ मांग, ५२ चांभार हुजुरकामी
असल्याचा उल्लेख नानासाहेबांच्या रोजनीशीत आहे. तसेच हुजुरपागेत २७७ महार
राबते म्हणून होते. राणोजी भोसल्यांकडे यांच्या पागेत असेच महार होते.
लढाईत जखमी माणसाला परत पिछाडिवरती आणायचे काम महार करत. (सवा माध रो भा
१-४३) इ.स. १७७८ मध्ये तळेगावाहुन लष्करातील जखमी लोकांना पुण्यास
हलविण्यासाठी महारांचेच पथक होते (सवा माध रो भा २ पृ ४३). वसईच्या मोहीमेत
अतिशय उत्तम पोहोणारे "पेटेकरी" हे महार - मांग होते. त्यावेळी महत्वाची
माणसे, पत्रे वगैरे पाण्यातून एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहोचविण्याचे
जोखमीचे काम ह्याच बहाद्दरांनी केले (पे.द. ३-२०९). देहू, बांबुर्डी,
भिमथडी, नागेवाडी-सातारा, भांबुर्डे अश्या अनेक ठिकाणची पाटिलकी देखिल
महारांकडे होती. जंजिरा मोहिमेत सिद्दी सातच्या बाजूने कोंडनाक महार लढत
होता अशी नोंद ब्र.स्वा चरीत्रात आहे. त्याची नावासकट नोंद घेतली आहे
म्हणजे कोंडनाक सिद्दीकडील महत्वाचा माणूस असणार. याखेरीज पेशवे सनदा १७-
३०४ नुसार महारांचे "हुलस्वारांचे पथक" असे.बहुदा शत्रुला हुल देऊन
दुसरीकडे लक्ष वळविण्याचे काम हे पथक करीत असावे असे नावावरुन दिसते."
" एका पाटिलकीच्या प्रकरणात भांडण राजाराम महाराजांपर्यंत गेले.
राजाराम महाराजांनी दावा सांगणार्या महारांनी वैराटगड जिंकून दाखवायचे
"दिव्य" करावे आणि बागेवाडीची पाटिलकी मिळवावी असे ठरविले. महारांनी मोठ्ठा
पराक्रम करुन वैराटगड स्वराज्याला परत मिळवून दिला व ती पाटिलकी मिळवली.
खर्ड्याच्या
लढाईत शिवनाक महाराचे पथक होते. हा तांसगावकडील कळंबी गावचा वतनदार.
शिवनाकाचा तळ इतर ब्राह्मण आणि मराठा सरदारांच्या शेजारी पडला. लोकांत
कुरकुर सुरु झाली. ती सवाई माधवरावांपर्यंत आली. त्यावेळी बैठकीत पाटणकर
म्हणून वृद्ध सरदार होते. ते कडाडले - "ही तलवार बहदूरांची पंगत आहे येथे
विटाळचांडाळ काही नाही!" श्रीमंतांनी तोच निकाल दिला. शिवनाकाचे पथक तिथेच
सारख्याच मानाने राहीले. वसईच्या मोहीमेत तुकनाक महाराने मांडवीजवळील
मोर्चे उत्तम रीतीने सांभाळले. त्याचा सन्मान करताना पेशव्यांनी कंठी-तोडे
देऊन गौरव केला. जेष्ठ संशोधक श्री आबा चांदोरकरांनी पेशवे काळातील तब्बल ४४ महार पथकदारांची
नावे प्रसिद्ध केली होती - १) आपनाक २) उमनाक ३) उपनाक ४) कालनाक ५) कासनाक
६) कुसनाक ७) केरनाक ८) खंडनाक ९) गोमनाक १०) गोंदनाक ११) चांगनाक १२)
चिमणनाक १३) चिडनाक १४) जाननाक १५) झुकनाक १६) तुकनाक १७) दमेनाक १८) दसनाक
१९) दादनाक २०) देवनाक २१) धावनाक २२) धूळनाक २३) धोंडनाक २४) नागनाक २५)
पदनाक २६) पुजनाक २७) बदनाक २८) बाणनाक २९) माळनाक ३०) मायनाक ३१) मेघनाक
३२) येमनाक ३३)येसनाक ३४) रामनाक ३५) राजनाक ३६) राणनाक ३७) लाहालानाक ३८)
वामनाक ३९) सटवानाक ४०) संभनाक ४१) सिवनाक ४२) सुकनाक ४३) सुबनाक ४४)
सिदनाक"
यावरुन पेशवाईत महार जातीतील हुन्नरी आणि कर्तृत्ववान लोकांना
सैन्यात वाव होताच शिवाय गावची पाटिलकी देखिल मिळत असे हे ससंदर्भ सिद्ध
होते.
लेखातली तिसरी चूक महार रेजिमेंटच्या चिन्हाविषयी - "आजही ‘महार रेजिमेंट’च्या मानचिन्हावर कोरेगाव विजयस्तंभाच्या बरोबरीने दोन क्रॉस मशिनगन आणि मध्यभागी ‘एम. जी. ही आद्याक्षरे दिसतात." असे पद्माकर कांबळे म्हणतात मात्र तो विजयस्तंभ नसून ऊभी कट्यार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो स्तंभ होता आता तो नाही. अजून एक छोटी तांत्रिक चूक म्हणजे त्या चिन्हात दिसतात त्यांना नुसत्या मशिन गन नाही तर विकर्स MG म्हणतात. आणि सरते शेवटी त्यांनी महार रेजिमेंटच्या शौर्याबाबत एक अख्खा परिच्छेद लिहीला आहे मात्र महार रेजिमेंटमध्ये केवळ महार सैनिकच असतात असा त्यांचा गैरसमज नसावा अशी किमान अपेक्षा मी बाळगतो. भारतीय सैन्यात जात धर्म मानत नाहीत. रेजिमेंट्सची नावे काहीही असली तरी त्यात भारतभरातील सर्व जातीधर्मांचे सैनिक असतात.
संदर्भ न वापरता गोष्टी लिहायला घेतल्या की असे आपले न घडलेले पराभव आणि शत्रुंचे न झालेले विजय आपल्या इतिहासात शिरतात. कुठलाही संदर्भ नसताना गळ्यात मडकी आणि कंबरेला खराटा अश्या फक्त "ऐकीव" आणि निरर्थक गोष्टी समाजात पसरतात त्यामुळे दोन जातींमधली दरी अजून रुंदावते. इतिहासाचा अभ्यास हा समाज सुधरवण्यासाठी असतो. गैरसमजांमुळे जातीअंताच्या गोष्टी ह्या केवळ सुविचार म्हणून राहतात.
असे इतिहासाचे मुडदे पाडणारे संदर्भहीन लेख "लोकसत्ताच्या" मुख्य वर्तमानपत्रात छापले जातात याबद्दल "लोकसत्ताचे" कौतुक करावे तितके कमी आहे.
- सौरभ वैशंपायन.
===========
संदर्भ-
१) मराठी रियासत खंड ४ व ८
२) मराठ्यांच्या लढायांचा इतिहास
३) दुसर्य़ा बाजीरावांची रोजनिशी
४) थोरले माधवराव पेशवे रोजनिशी
५) सवाई माधवराव पेशवे रोजनिशी
६) ब्रह्मेंद्रस्वामी चरीत्र
७) समग्र श्री. म. माटे
८) मराठे व इंग्रज
९) Bombay Gazetteer
The lesson of History!!!
इतिहासाचा अभ्यास करताना साधारण कसा केला जावा ह्याबाबत स्वानुभवाचे चार शब्द देतो आहे. मी ह्या विषयातला अधिकारी वगैरे मुळीच नाही हे सर्वप्रथम सांगुन टाकतो. विद्यार्थी आपण कसा अभ्यास करतो हे मित्रांना सांगतो तद्वत हे एका परीने स्वानुभव कथन आहे. मी देखिल आत्ताशी कुठे अभ्यासाला प्रयत्नपूर्वक सुरुवात केली आहे. खाली लिहीलेल्यापैकी अनेक गोष्टी मलाही नीट जमत नाहीत पण त्याचा विचार करुन ठेवला आहे तो मांडतो आहे.
जगप्रसिद्ध अमेरीकन संशोधक व अत्यंत जेष्ठ श्रेष्ठ इतिहासकार विल ड्युरांट आणि त्यांची बायको व नंतरची सहलेखिका एरियल ड्युरांट ह्यांनी आपल्या आयुष्यातली किमान ३० वर्षे फक्त वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करण्यात, वेगवेगळे साहित्य, लेख, ताम्रपट, वस्तू, हस्तलिखिते, पोथ्या, कथा, वगैरे जमवण्यात घालवली आणि मग एक एक करत जगभरातील संस्कृतींवरती अवाढव्य ग्रंथ लिहीले. विल ड्युरांटचे फक्त "history of civilization" चेच ११ खंड आहेत. ते त्याने १९३५ ते १९७५ ह्या ४० वर्षांच्या काळात लिहीले व प्रसिद्ध केले. २० इतर ग्रंथ आहेत पैकी ५ ग्रंथ तर त्याच्या मृत्यु पश्चात तब्बल २ दशकांनी प्रसिद्ध केले गेले. सांगायचा मुद्दा असा की लोकं आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात संशोधनापोटी त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना इतिहास हा समुद्र आहे; समुद्र पिऊन संपवून टाकू म्हणणार्या टिटवीच्या चोचीत असे कितीसे पाणी मावणार? ह्याच विचाराने ह्याला हात घालावा. आपण जितके वाचू त्याच्या पलीकडे अस्पर्षित असे हजारपट उरलेले आहे ह्याची जाणीव सतत ठेवावी.
इतिहास हा फसवा असतो. विल ड्युरांटच्या "The lesson of History" ची प्रस्तावनाच इतिहासवाचकांसाठी गीता-बायबल-कुराण आहे. त्यात ते म्हणतात - "आपण हे सगळं का करतोय? आपल्या हाताला काय लागणार आहे? पराक्रमी राजांच्या दु:खद मृत्युच्या घटना? इतिहासातून मनुष्य स्वभावाबाबत तुम्हांला असं काय वेगळं मिळतं जे रस्त्यात चालणार्या कुणाही भणंगाला एकही पान न वाचताच समजू शकतं?" ...... "History is non-sense" ...... "To begin with, do we really know what the past was? what actually happened? or is history "a fable" not quite "agreed upon"? Our knowledge of any past event is always incomplete probably inaccurate, beclouded by ambivalent evidence & biased historians, & perhaps distorted by our own patriotic or religious partnership. "most history is guessing , & the rest is prejudice." विल ड्युरांटने फार ओघवत्या शैलीत हे सगळं लिहीलं आहे. जमल्यास नक्की मिळवुन वाचा.
आपल्याकडे इतिहासाचार्य राजवाडेंनी देखिल इतिहासाचा अभ्यास कसा करावा ह्याबाबत फार काटेकोर लिहीले आहे. "अस्सल कागदाचा एक चिठोराही समस्त बखरीं व इतर साधनांची मते हाणून पाडू शकतो!" इतक्या स्वच्छ शब्दांत त्यांनी अस्सल साधनांचे महत्व विशद केले आहे. म्हणून अस्सल साधने मिळतील तितकी मिळवण्याचा प्रयत्न करावा. ह्यातही प्रथम दर्जाची, दुय्यम व तिय्यम असे गट पडतात. शक्य तितक्या समकालिन साधनांवरती जोर देऊन इतिहास मांडता येतो. तुम्ही त्या काळापासून जितके दूर सरकता तितके गोंधळ वाढत जाणे, असलेली माहीती नष्ट होणे, नसलेली माहीती घुसवली जाणे हे प्रकार फार सर्रास घडतात. समकालिन साधनांतही पदरी ठेवलेले लेखनिक, भाट त्या त्या घराण्याची वाहवा करतानाच दिसतात. म्हणुन एकाच घटनेबाबत स्वकीय - परकिय काय म्हणतात त्यातले योग्य - अयोग्य काय हे समजून घेण्याची तयारी हवी. अनेकदा आपल्याला अप्रिय उल्लेखही सापडतात, अनेकद धक्कादायक माहीती हाताला लागते. ती स्वीकारायची तयारी हवी ..... निदान नवीन पुरावे समोर येईपर्यंत तरी. नवीन विश्वासजन्य पुरावे समोर आले तर ते स्वीकारावेत आधीचे मत बदलण्यात कमी पणा वाटून घेउ नये.
इतिहास वाचताना कधी अंगावरती
गुलाबपाणी शिंपडलं जात तर कधी कधी चिखलही. इतिहास दचकवणाही असू शकतो. एखादी
व्यक्ती बघता बघता नायक अथवा खलनायक बनू शकते. तरीही कुठलीही व्यक्ती
संपूर्णत: एकाच रंगात रंगवून टाकण्याचा मोह शक्य तितका आवरावा. बहुतांषी
प्रत्येक व्यक्ती आणि घटनेत चांगले व वाईट अश्या दोन्ही बाजू असतातच.
व्यक्ती अथवा साम्राज्यांची बलस्थाने व कमकुवत बाजू नोंद करुन आणि मान्य
करुन पुढे गेल्यास डोक्याला व पर्यायाने अभ्यास करताना त्रास कमी होतो. दोन
व्यक्तींमध्ये तुलना शक्यतो टाळावी खासकरुन त्यात एक वा अनेक पिढ्यांचे
अंतर असल्यास, कारण दोन व्यक्तींची मानसिक, शारिरीक, बौध्दिक, आर्थिक,
सामाजिक वगैरे अनेक पातळ्यांवरती परीस्थिती सारखी असेलच असे नाही. यातला
एखादा पैलू देखिल त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व अथवा एखाद्या घटनेचे परीमाण व
परीणाम टोकाचे बदलू शकतो.
अजून एक, खास करुन भारतीय मानसिकतेसाठी
नोंदवावंस वाटतं - चारीत्र्य व चरीत्र एकच समजू नये. बाई-बाटलीचा शौक,
रंगेल, इष्कबाझ म्हणजे ती व्यक्ती वाईटच हा पूर्वग्रह इतिहासाच्या
अभ्यासाचे फार मोठे नुकसान करतो. लेबल लावलं की विषय संपल्यात जमा असतो.
वैयक्तिक आयुष्याचा अभ्यास करताना ह्या नोंदी निश्चितच महत्वपूर्ण असतात
क्वचित प्रसंगी ह्यातूनच इतिहास घडत असतो हे देखिल मान्य पण सुरुवातच झापडं
लावून करु नये. जमल्यास ऐतिहासिक व्यक्तीचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य
वेगळं करुन अभ्यासावं.
इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ रक्ताचे पाट व
लढाया नव्हेत. "सामान्यांचे आयुष्य हाच इतिहासाचा विषय असतो" असे
टॉलस्टॉयने म्हंटले ते उगाच नाही. इतिहासात अवघं जग सामावलं आहे. इतिहासात
अगणित विषय आहेत. तरी एखाद्या व्यक्तीच्या चरीत्रापासून ते
महायुध्दासारख्या जगड्व्याळ विषयापर्यंत काहिही असू शकतं. उदा. एखादा
मानवसमूह अभ्यासासाठी घेतला तरी त्यावर तत्कालिन भूगोल, हवामान, रहाणीमान,
सामाजिक, आर्थिक, लष्करी, धार्मिक समजूतींचा पगडा अभ्यासावा लागतो. ह्या
कसोट्यांवरती घासून तो मानव समूह किती प्रगत होता हे समजू शकतं. इतिहासाचा
अभ्यास करताना घडून गेलेल्या घटनांवरती आपला सद्य कालखंड व आपले विचार लादू
नयेत. त्यात हमखास तफावत असते. अगदि २-३ दशकांमध्ये देखिल सर्वसाधारण
समाजमान्यतांमध्ये टोकाचा फरक पडलेला असू शकतो. त्यावेळची समाजमान्यता कशी
होती ह्याची नोंद करुन ठेवल्यास इतिहास सुटसुटित होतो. त्याच्याशी नाही -
नाही म्हणून झगडत बसण्यात वेळ वाया घालवू नये. नेमकं असं घडलं हा
"निष्कर्ष" अथवा असं व्हायला हवं होतं किंवा नको होतं हे आपला "मत" असू
शकतं - "हट्ट" नव्हे. शिवाय तो निष्कर्ष अथवा मत ही काळ्या दगडावरती रेघ
मानून चालू नये.
इतिहासाच्या अभ्यासात भूगोल, खगोल, हवामान, अन्न,
धार्मिक - जातीय प्रथा व परंपरा, कायदा व व्यवस्था, आर्थिक, सामाजिक व
लष्करी घडी, पत्रे, पोथ्या, दंतकथा, गाणी, तंत्रज्ञान, वास्तुशास्त्र अथवा
वास्तूसंरचना, तत्कालिन शिक्षण पद्धती, दळणवळणाची साधने, भाषा, लीपी, चलन,
शेती, करपद्धती, शस्त्रास्त्रे, तत्कालिन विज्ञान असे शेकडो विषय अभ्यासता
येतात. आमच्या पूर्वजांकडे हे होतं आणि ते होतं वगैरे म्हणणं अस्मितेचा भाग
असू शकतो त्याने जीवाला बरं वाटतं पण त्याची कसोटीवर उतरलेली सिद्धता व
डोळ्यांना दिसणारे अंतिम रुप काय? हा मोठा प्रश्न आहे. ह्यावर विचार
व्हावा. एखादे ऐतिहासिक साधन समोर धरले तर त्यातून आपण किती विषय काढू शकतो
ह्याचा विचार करावा. उदा. एक साधे पत्र घेतले तरी त्यातून त्या दोन
व्यक्तींचा एकमेकांशी असलेला नातेसंबध, दोघांची सामाजिक अथवा अर्थिक
परीस्थिती, वयातील अंतर, सामाजिक परीस्थिती, धार्मिक समजूती, वगैरे
आपल्याला शोधक नजरेने बाजूला काढता येतात का? हे बघावे, त्या पत्रातील
कालगणना, सही, शिक्के, पत्राची भाषा, मायने, लीपी ह्या तांत्रिकबाबी मेहनत
करुन आत्मसात केल्या तर साधने हाताळताना सोपी जातात. इतिहास अभ्यासताना
ज्योतिषापासून ते विज्ञानापर्यंत कशालाही त्याज्य अथवा तुच्छ समजू नये
समावेश करुन घ्यावा. तो इतिहासाकडे बघण्याचाच एक पैलू आहे. ऐकायला गंमत
वाटेल पण नेपोलियन वरती फ्रेंचांनी इतका अभ्यास केलाय की म्हणे एक पुस्तक
हे त्याला लहानपणापासून मरेपर्यंत झालेल्या आजारांवरतीच आहे. लोकं इथवर
इतिहास खणून काढतात. यावर थोडा विचार व्हावा.
दर्या्खोर्या तून
भटकणार्या माझ्या मित्र-मैत्रिणींना विनंती. ह्या भटकंती दरम्यान एक
कसलातरी छंद जीवाला लावून घ्या, फोटोग्राफी, वनस्पती - प्राणी - पक्षी -
किटक ह्यांच्या नोंदी, भौगोलिक रचना, गड - दुर्गांचे स्थापत्यशास्त्र, पाणी
साठवण्याच्या जुन्या सोयी आणि पद्धती, जुन्या कला, गावागावांतुन मिळणार्या
दंतकथा, कविता, गाणी, लोककथा, परंपरा, त्या त्या भागातले अन्न अश्या
विभिन्न गोष्टींपैकी एकाची नोंद करायचा व जमल्यास ब्लॉग - सोशल साईट्स वरती
त्या बाबतीत लिहिते होण्याचा तरी छंद लावून घ्या. विश्वास ठेवा इतिहास
ह्यातूनच जपला जातो - समजतो - उलगडतो. न जाणो तिथला कुणी म्हातारबाबा
वळचणीला अडकवलेलं एखादं शे - दोनशे वर्षांपूर्वीच तलवारीचं - भाला -
बरच्याचं पातं, एखादा जीर्ण कागद, जुनाट वस्तू, नाणं काढून तुमच्या समोर
ठेवेल आणि सुखद धक्का देईल. किंवा तुमच्या एकद्या झाडा-पाना-फुलाच्या अथवा
प्राणी-पक्षी -किटकाच्या नोंदिने/ फोटोने निसर्गाचा इतिहास उलगडला जाईल.
तुम्हांलाच नाही तर ह्या विषयांचा अभ्यास करणार्यांसाठी तुमची एक नोंद
अथवा फोटो हा घबाड मिळाल्याचा आनंद देऊ शकतो.
थोडक्यात काय? तर इतिहास फार सुरेख आहे. त्यावर कुठलाही पूर्वग्रह न ठेवता प्रेम करता यायला पाहीजे बस्स!
अजून काय लिहिणे? सुज्ञ असा.
लेखनसीमा.
- सौरभ वैशंपायन.
नायिकाभेद
बाई ठेवणे, अंगवस्त्र, नाटकशाळा, रक्षा, दासी, वेशस्त्रिया वगैरे उल्लेख आपण इतिहासात अनेकदा ऐकतो. त्याबाबत अर्थात खूप गैरसमज असतात. वास्तविक "चारीत्र्य" बघून मग "चरीत्र" ठरवण्याचा आपला "भारतीय" दृष्टीकोन इतिहासाचे फार मोठे नुकसान करतो असे माझे मत आहे. कारण एखादि व्यक्ती सामाजिक/धार्मिक/आर्थिक/राजकिय कारणांनी कितीही थोर असली तरी ज्याला आपण ठराविक मापदंड लावून तथाकथित "स्वच्छ" चारीत्र्य वगैरे म्हणतो त्यात ती व्यक्ती बसत नसेल तरी आपण बहुतेकवेळा त्या व्यक्तीवरती फुल्ली मारुन मोकळे होते. त्यातून ती व्यक्ती स्त्री असेल तर बघायलाच नको.
या लेखाच्या सुरुवातीला ज्या संज्ञा वापरल्या त्यांचा उल्लेख आल्यावरती आपल्या डोक्यात पहीला विचार येतो तो राजाने अथवा त्या पुरुषाने "शरीरसुखासाठी" केलेली सोय असा आणि इतकाच असतो. इतिहासाचा अभ्यास करताना माझ्यामते एकतर बंद दरवाज्याआड ती व्यक्ती काय करते? हा आपला प्रश्न असूच शकत नाही. तरीही ह्याबाबत बोलायचे झालेच तर सुरुवात राजवाडेंनी लिहीलेल्या "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" काय होता हे समजुन मग करावी लागेल. निसर्गातील इतर बहुसंख्य प्राण्यांप्रमाणेच मुक्त लैंगिक संबध ते एकपती/पत्नीत्व हा प्रवास मानवी समाजजीवनातील बदलत राहीलेला पैलू आहे. व यापुढेही तो बदलत रहाणार. ह्यावर अनेक धक्कादायक चर्चा व लेख होऊ शकतात.
रामायण - महाभारतात बहुपत्नीत्व/पतीत्व दिसून येतेच पण दासींचेही अर्थात
अनेक उल्लेख आढळतात. विदुरचे मोठे उदाहरण आहेच. इतिहासाच्याबाबतीत आपण हे
लक्षात घ्यायला हवं की ह्या तत्कालिन समाजमान्य परंपरा होत्या. महाभारत
कालात उपस्त्रीयांना "वेशस्त्रिया" म्हणत. त्यांना राणीचा दर्जा नसे पण
त्यांचा मान राजांच्या विवाहित स्त्रियांच्या खालोखाल असे. नंतरच्या काळात
यांनाच रक्षा/राख म्हंटले गेले. ह्या "वेश्या" नव्हेत त्या फक्त राजाशी
एकनिष्ठ असत. व त्यांना मान असे. महाभारतातील उद्योगपर्वात अज्ञातवासांतुन
प्रकट झाल्यावर तहाचे बोलणे करण्यासाठी आलेल्या संजयाकडे युधिष्ठिराने
हस्तिनापुरातील वडिलधारे, बंधु यांचे कुशल विचारले त्यात तो बंधुंच्या अथवा
राजपरीवारातील वेशस्त्रीयांबाबत क्षेमकुशल विचारतो असा श्लोक आहे -
अलंकृता वस्त्रवत्या: सुगन्धा अबीभत्सा: सिखिता भोगवत्य:।
लघु यासां दर्शनं वाक् च लघ्वी वेशस्त्रिया: कुशलं तात पृच्छे:॥
(उद्योगपर्व अध्याय ३०) - अलंकार घातलेल्या, चांगली वस्त्रे नेसलेल्या व
नानाप्रकारचे सुवास लावलेल्या, सुखामध्ये वाढलेल्या व मर्यादाशील असणार्या
आणि सर्व प्रकारचे उपभोग मिळणार्या व ज्यांचे रुप व भाषण सुंदर आहे अश्या
वेशस्त्रियांस माझ्यातर्फे कुशल विचारा!" याचा अर्थ त्या मर्यादाशील असून
युधिष्ठिराच्या आदरास पात्र होत्या.
मुळात आपण हे समजुन घ्यायला हवं की अंगवस्त्रे, रक्षा ह्या केवळ आणि केवळ शरीरसुखासाठी नसत. पुर्वी मुलामुलींची लग्नं लहान वयातच होत. स्त्रीयांवर अनेक बंधने असत. त्यामुळे त्यांचे शिक्षण अल्प अथवा बिलकुल नसे. अश्यावेळी घरा बाहेर जात असलेला पुरुष व खास करुन तो रणांगण गाजवून आला असेल, बारा गावचं पाणी पिऊन आलेला व्यापारी असेल, स्वत: बहुश्रुत वा कलासक्त असेल तर अश्यांना आपल्या भावना आपली आवडनिवड त्याच पातळीवरती समजून घेणारं कोणीतरी लागे. आज मानसशास्त्र देखिल हे मान्य करतं की आपल्या भावना आपण भिन्नलिंगी व्यक्तीसमोर जरा जास्त चांगल्या व्यक्त करतो अथवा तशी सुप्त इच्छा कळत-नकळत असते. हे फार नैसर्गिक आहे. अश्यावेळी अश्या नाटकशाळा, अंगवस्त्र वगैरे त्यांची ही भावनिक - बौद्धिक गरज भागवत. त्या कलानिपुण असत, गायन, नृत्य, काव्य, चित्रकला वगैरे बाबतीत त्या हुशार असत. अनेकदा ह्याच स्त्रीया राजकारणाचे पट मांडत - उधळत. अर्थात मानसिक - बैद्धिक - शारिरीक पातळीवरती अशीच इच्छा स्त्रीयांच्या मनात येत असणे सहाजिक आहे पण पुरुषसत्ताक पद्धतीने स्त्रियांना त्यांच्या भावनांसकट दडपून टाकले.
चाणक्य तर अश्या स्त्रियांना आसरा द्यावा तसेच मुद्दाम अश्या स्त्रिया तयार कराव्या, अगदी विषकन्या सुद्धा. त्यांचा उपयोग हेर म्हणून करावा असेही म्हणतो. हे प्रकार त्याकाळी समाजमान्य होते, आज काही शे वर्षांनी त्याबाबत आपली मते बनवणे काहीच फायद्याचे नाही. त्यामुळे शहाजीराजे, संभाजीराजे, राजाराम, शाहुराजे, नानासाहेब पेशवे वगैरेंना नाटकशाळा होत्या ह्यात बिचकण्यासारखं काहीच नाहीये. तत्कालिन इतिहासात अजुन एक उल्लेख येतो तो म्हणजे "कुणबिणी". मध्ये ह्याला "जातीय" ठरवून बराच गदारोळ झाला होता. पण तो गदारोळ म्हणजे इतिहासाचे शून्य ज्ञान असल्याचे मोठे उदाहरण आहे.
मुळात बाजारात विकत मिळणार्या "कुणबिणी" हा जातीय उल्लेख मुळीच नाही; "कुणबी" जातीशी त्याचा संबध नाही.ब्राह्मण कुणबिणी हव्यात अशी मागणी असलेले अथवा हलक्या जातीतील कुणबीण घरात काही महीने वावरली त्याबद्दल तत्कालिन समाजरुढीनुसार एका कुटुंबाला प्रायश्चित्त घ्यायला लावल्याचे उल्लेख आहेत.
मुळात "कुणबिणी" हा उल्लेख घरातील पडेल ते काम करणार्या बायका म्हणून येतो.मेण्याबरोबर पाणी घेऊन वेगाने पळू शकतील अश्या काटक कुणबीणी हव्यात असे उल्लेख आढळतात. इतकेच कशाला खंडोजी माणकरास छत्रपती शाहु महाराजांचे "बटकीच्या पोरी दोन बहुत चांगल्या दहा अकरा वर्षांच्या निरोगी नाचावयालायक आणवणेविशी महाराजांची एकांताची फर्मास आहे" असे पत्र मिळाते. त्यावर खंडोजी माणकराने "कोंकणात अशा पोरी मिळत नाही!" असा जबाब पाठवला. नानासाहेबांनी देखिल शाहु महाराजांनी अशाच कुणबिणींची चौकशी केल्याबद्दलची पत्रे आहेत. माझ्या दृष्टिने ह्यात कुठेही जातीय, भावनिक वगैरे काहीच नाहीये. तो सगळा तत्कालिन मामला होता.
भारतीय कामसुत्रांत "नायिकाभेद" सांगितले आहेत. त्यावर अनेक ग्रंथ लिहीले गेले आहेत. अशा एकनिष्ठ अंगवस्त्रांपासून ते वेश्यांपर्यंत सर्वच स्त्रियांना वात्सायनाने कामसुत्रात तसेच इतरांनी राजतरंगिणी, शृंगारतिलक, श्रृंगारप्रकाश, अग्निपुराण, रसमंजीरी वगैरे ग्रंथात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. ह्या नाजुक विषयाला धसमुसळीने हाताळण्याऐवजी थोडं तारतम्य ठेवून हाताळलं तर अनेक गणिते सोपी होतात.
- सौरभ वैशंपायन
मुस्लिम धर्मातील चार्वाक - अकबर बादशहा!
कुठल्याही गोष्टीच्या दोनच नव्हे तर अनेक बाजू असू शकतात हे मी इतिहासाचा वाचक अथवा साधा अभ्यासक म्हणून सांगु इच्छितो. सरळसोट मापदंड लावणे अनेकदा अंदाज चुकवू शकते. एक व्यक्ती चांगली म्हणजे दुसरी व्यक्ती ठार वाईटच असते असं नाही. किंवा वाईट असलीच तरी जे चांगलं होतं ते चांगलंच अथवा चूकीचं होतं ते चूकीचंच होतं होतं हे मान्य करुन पुढे जायची गरज असते. दोन्ही व्यक्तींच्या वागण्याला वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक, वैचारीक कारणे असतात. ती समजून न घेता दात-ओठ खाऊन तुटून पडणे तत्कालिन समाधान देत असेलही पण त्याला ठोस आकार येईलच असे नाही. अकबर बादशहाच्या बाबतीत अनेकदा असे मापदंड लावले जाताना दिसतात. एकतर तो सरळसोट निधर्मी महान वगैरे असतो किंवा पुर्णत: क्रुर तरी असतो. शिवाय अकबराची कुठलीही एक बाजू उजळून दाखवली की लग्गेच त्याचा आपल्याला हवा तो अर्थ लावून धोपटायला दोन्ही बाजूची लोकं मोकळी होतात. अकबराबाबत इतिहास दाखवतो तेच ससंदर्भ चार बरे वाईट शब्द बोललो तर लोकांना धर्म बुडल्यागत कळ उठते. अकबराबाबत बरे बोलणे म्हणजे राणाप्रतापाचा अपमान वगैरे ठरवून लोकं मोकळी होतात. पुर्ण म्हणणे काय आहे हे मत का बनले वगैरे आगा-पिच्छा माहीत नसताना घरात फोटो लावा आणि पुजा करा वगैरे अनाहुत सल्लेही मिळतात. अकबराला पेनच्या एका फटक्यात किंवा कि-बोर्डच्या एका लेखात उडवून लावावा इतका अकबर साधा माणूस खचित नव्हता. त्याने घेतलेल्या निर्णयांनी भारताच्या लष्करी, राजकिय व मुख्यत: धार्मिक बाजूंवरती दूरागामी परीणाम झाले हे लक्षात घ्यावेच लागेल. अकबर हा आदर्श माणूस अथवा राजा नसेलही पण तो अतिउत्तम "राजकारणी" होता हे अजिबात नाकारता येत नाही.
अकबर सत्तेवरती आला तोच १४-१५ वर्षाच्या कोवळ्या वयात. अकबर शहाणा होईतो बैरामखान त्याचा पालक होता. अकबर "निरक्षर" होता. सुरुवातीचा सर्व वेळ शिकारींत जात असे. अकबराकडे जे काही म्हणून शहाणपण होतं ते त्याने निरिक्षणातून व प्राण्यांकडून जमवले होते. मग ते क्रौर्य असो वा मनाचा मोठेपणा. "स्व" ची जाणीव झाल्यावरती बैरामखानला मक्केला पाठवून मग मागहुन आजूबाजूच्या बंडखोरांना ताळ्यावर आणून सत्ता मिळवण्याचा अकबराचा इतिहास वादळी आहे; त्याची नशिबाशी जुगार खेळण्याची बेफिकीर वृत्ती, संतापी स्वभाव, डुख धरायची वृत्ती ह्याकडे कल असलेला आहे. अकबराचा इतिहास हा वयानुसार येत जाणारी समज व त्यायोगे माणूस कसा बदलत जातो ह्याचे फार मोठे उदाहरण आहे.
अकबर हा शब्दश: विक्षिप्त होता. त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक खरे-खोटे किस्से आहेत. अकबराची, सत्ता टिकवण्यासाठी धडपडणारा तरुण ते सत्तेसाठी वाट्टेल ते राजकारण - समाजकारण करणारा बादशहा आणि नंतर स्वयंघोषित प्रेषित बानलेला सम्राट ही वाटचाल स्तिमीत करणारी आहे. अकबराच्या काळात ग्रंथसंपदा, अनेक उत्तम व भव्य वास्तू, अनेक शहरे उभी राहीली. जनानखान्या बरोबर त्याचा पीलखाना म्हणजे हत्तींचा भरणा ह्याबाबत अनेक आश्चर्यकारक कथा आहेत. अकबराच्या कारकिर्दिवरती शेकडो पुस्तके लिहीली गेली इतका हा विषय मोठा आहे. पण मला मुख्य भर द्यायचा आहे तो धार्मिक व राजकिय बाबतीत.
अकबर सत्तेवरती येणे हा हिंदूंसाठी "buffer Period" होता हे आपण लक्षात घ्यायला हवे. सत्ता स्थापून ती पक्की होईतो २-४ प्रसंग सोडले तर अकबराने सरसकट कत्तल केलेली नाही. उलट अकबर एक आदर्श "राजकारणी" होता. फायदा असेल तेव्हा जमेल तितके उपसून काढा व कठिण प्रसंग असताना कमीतकमी नुकसान होऊन टिकून रहाण्याचे कसब अकबराने दाखवले. त्यासाठी त्याने साम-दाम-दंड-भेद जमेल तिथे, जमेल तसे व जमेल तितके वापरले. अनुभवाने शहाणे होऊन त्याने रजपुतांशी संघर्ष होईतो टाळला. रजपुतांशी संघर्ष करुन आपण शक्तीहीन होत जाऊ व आज ना उद्या आपली सत्ता जाईल हे त्याने हेरले. मोठ्या धूर्तपणे रजपुतांना समजावून अथवा दमात घेऊन एकएकाला फोडून आपल्या भजनी लावले. रजपुतांची सत्ता कायम ठेवण्याच्या बदल्यात त्यांच्याशी रक्तसंबध जोडायची सुरुवात अकबराने केली व ती मुघलांच्या पुढील पिढ्यात सुरु राहीली. ह्यावेळी घाबरलेले अथवा आपला फायदा बघणारे रजपूत अकबराच्या ह्या जाळ्य़ात अडकले. एकच झेंडा शेवटपर्यंत वाकला नाही - "उदयपुर." अकबराच्या रजपुतांसाठी ३ अटी होत्या १) आपल्या घराण्यातील एक उपवर मुलगी अकबराला द्यावी, २) दरवर्षी एक ठराविक रक्कम खंडणी म्हणून अकबराला द्यावी व ३) अकबराला कुर्निसात करुन त्याच्या समोर गुढगे टेकावेत. राणा प्रतापांनी ह्यातले काहीच मान्य केले नाही. अखेर अकबराने राणा प्रतापांसाठी पहिल्या २ अटी देखिल काढून टाकल्या. आपल्या समोर आपला शत्रू गुढघे टेकतो आपल्याला कुर्निसात करतो हा अहं सुखावणारा भाग तसेच राजकिय दृष्ट्या इतरांसाठी ह्याचे निघणारे सुचक अर्थ एक बादशहा म्हणून अकबराला हवे असणे फार सहाजिक होते. पण इथे राणा प्रतापांचा स्वाभिमान अकबराच्या गर्वापेक्षा दृढ व मोठा ठरला. राणाप्रताप शेवटपर्यंत झुकले नाहीच. म्हणूनच पुढल्या पिढ्यांसाठी कायमचे ते "राणांचे" - "महाराणा" असे आदर्श बनले.
अकबराने जनान्यातील रजपूत स्त्रीयांना हिंदू सण साजरे करायची परवानगी दिली. तो स्वत: त्या सण-समारंभात सामिल होऊ लागला. हे त्याकाळच्या मुस्लिम धर्ममार्तंडांना न झेपणारं होतं. पुढे पुढे तर त्याने रजपुत स्त्रीयांच्या सहवासात येऊन मांसाहार बंद केला. जेवण्याच्या पध्दतीत हिंदुंच्या अन्नाप्रमाणे बदल होत गेले. त्याने हिंदु सण साजरे केले अथवा अन्नाच्या सवयी बदलल्या म्हणून अकबर महान वगैरे अजिबात होत नाही. मात्र ह्याचा तत्कालिन "राजकारणावरती" व समाजावरती प्रभाव पडला होता हे नक्की. कालांतराने लोकांना तो आपसूक आपल्यातला वाटू लागला. त्याच बरोबर त्याच्या अश्या वागण्याने मुल्ला-मौलवींचा जळफळाट सुरु झाला. अकबराचा धार्मिकतेचा प्रवास आणि संघर्ष सुरु होतो तो इथुन.
अजमेरला तापल्या वाळूत नागव्या पायाने चालत जाऊन मुलासाठी नवस करणारा अकबर नंतर नंतर खूप बदलत गेला. जनानखान्यामुळे रजपूत स्त्रीयांच्या सहवासात तो आलाच होता पण पुढे त्याने आपल्या दरबारातील लायक अश्या हिंदू लोकांना महत्वाची पदे देऊ केली. राजा तोरडमल, बिरबल, तानसेन वगैरे सर्वांच्या ओळखिची नावे आहेत. ह्या लोकांकडून त्याने समाजातील हिंदू लोकांच्या पध्दती समजावुन घेतल्या. हिंदुंवरील जिझिया हा अपमानकारक कर काढून टाकला. दुसरीकडे शिखांना जमीन दान केल्याचेही उल्लेख आहेत. अकबर समोर दिसेल तेच मानणारा व तर्काच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी तासून बघणारा होता. दरबारातील मुल्ला-मौलवींशी भाषा - माणसाचे संवाद करणे वगैरे बाबतीत त्याचे वाद झाले. मुल्ला-मौलवी नेहमीप्रमाणे फरीश्ते येऊन मानवाला भाषा शिकवून गेले वगैरे बरळू लागले तसे अकबराने हे चूकीचे आहे. मुल आजूबाजूच्यांकडे बघून शिकते हे ठासून सांगितले पण मुल्ला-मौलवी धर्मग्रंथाच्या बाहेर यायला तयार नव्हते. "विक्षिप्त" अकबर जागा झाला त्याने शहरा बाहेर दूर एका निर्जन ठिकाणी एक महाल बांधला व राज्यातील काही मोजकी तान्ही मुले तिथे ठेवली. त्यांना सांभाळणारे सगळे मुके बहिरे ठेवले. आणि ४-५ वर्षांनी त्या मुलांना सगळ्यां समोर आणल्यावर ते फक्त प्राण्यांसारखे आवाज तितके काढत होते. ही कथा जर खरी असेल तर त्याने मुल्ला-मौलवींची तोंडे बंद केली पण त्या मुलांच्या आयुष्याशी तो खेळला हे देखिल खरे.
त्याने उत्तर आयुष्यात अनेक
हिंदु - ख्रिश्चन - जैन - बौध्द तत्वज्ञांबरोबर त्या त्या धर्माबाबत सविस्तर व सखोल चर्चा केली. १५७६च्या सुमारास अकबराने फत्तेपुरसिक्री मध्ये एक खासबागेत "इबादतखाना" नामक एक मोठी वास्तू बांधून घेतली. त्याला चार मोठी दालने बांधून घेतली. भिन्न भिन्न दालनात वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना बसवत असे. त्यांना समोरासमोर बसवून तो वाद घडवूण आणि. ज्याची मते पटत त्याला बक्षिसी दिली जाई. गोवेकर पोर्तुगिझ ख्रिस्तींनी अकबराला ख्रिस्ती बनवण्यासाठी चर्चेचे हर एक प्रयत्न केले. एका पाद्रिने तर मी हातात बायबल घेऊन अग्निदिव्य करायला तयार आहे मुस्लिम धर्मगुरुने तेच करुन दाखवावे असे आवाहनही दिले. अकबर मधल्या काळात ख्रिस्ती धर्मात नको इतका रस घेऊ लागला. फादर अक्वाविया, मान्सेराट, हेन्रीक असे तीन धर्मगुरु जाऊन अकबराला भेटले. अनेक भेटवस्तू बायबलची प्रत अश्या हेटी त्यांनी अकबराला दिल्या. अकबराने ते बायबल मस्तकावर धारण केले. पाद्रिंना आपल्या राज्यात धर्मप्रसार करायची सुट दिली. चर्च ऊभारायला परवानगे दिली. त्यांच्या प्रार्थना स्थळांत जाऊन तो देखिल गुडघे टेकून येऊ लागला. मात्र अकबराने बाप्तिसमा घेतला नाही. ख्रिस्ती लोक फारच मागे लागल्यावर त्याने आपला बारा वर्षांचा मुलगा मुराद ह्याला काही महिन्यांकरता ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला लावला. मात्र घरातील लोकांनी अकबरावरती जणू अघोषित बहिष्कार टाकला. बायकांनी आम्ही असले प्रयोग करणार नाही असे निक्षून सांगितले. अखेर अकबराने आपले प्रयोग आपल्यापुरतेच ठेवले.मात्र दुसरीकडे त्याने उलेमांच्या मनमानीला चाप लावायला धार्मिक अधिकार आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली. "मला किती लग्न करायचा अधिकार आहे?" असा प्रश्न त्याने मौलवींना विचारला. अकबराची अनेक लग्ने झाली होतीच. कुराणानुसार चारच लग्न करु शकता अथवा पहीली चार लग्नच शरियानुसार अधिकृत आहेत असे सांगणार्यांना त्याने हाकलून दिले. पुढे पुढे तर हे मुल्ला-मौलवी एकमेकांत भांडू लागले व इबादतखान्याचा आखाडा होण्याची वेळ आली. म्हणून जिथे मौलवींना निर्णय देता येणार नाही तेथे कुराणाला अनुसरुन बादशहास गरजेपुरते बदल करण्याचा अधिकार आहे असा करारनामा शेख मुबारक नामक आपल्या विश्वासू माणसाला तयार करायला सांगितला व मौलवींना त्यावर सह्या करायला लावले. अकबराच्याच तुकड्यावरती त्यांची पोटे भरत असल्याने त्यावर निमुटपणे सह्या झाल्या. काही दिवसांनी अकबराने धार्मिक न्यायदान करणार्याला काढून टाकले. पण हे असंच चालू राहीलं तर आपली आणि ह्या भूमीत मुस्लिम धर्माची धडगत नाही हे ओळखून मुल्लामौलवींनी अकबराच्या विरोधात असंतोष पसरवायला सुरुवात केली. अकबराला हे प्रकरण खरंच जड गेलं. पण त्याने अत्यंत निष्ठूरणे हे बंड विझवले. आणि शेकडो मुल्ला-मौलवींना पकडून चौकशी केली व दोषी मौलवींना बाजारात गुलाम म्हणूण विकले व त्या बदल्यात चक्क बैल आणले. का? तर बैल जास्त उपयोगी आहेत. त्याने काही मशिदि पाडून चक्क घोड्यांचे तबेले ऊभे केले. अकबराने अनेक बाबी इस्लामच्या बाहेरीलच नव्हे तर इस्लामच्या पूर्ण विरुद्ध केल्या. आईकडून इराणी असल्याने तो सूर्य आणि अग्नि पूजक बनला. मोठा खर्च करुन त्याने आपले प्रतिनीधी इराणाला किर्मान येथे पाठवले आणि तिथल्या मंदिरातील पवित्र अग्नि आणविला. सूर्य हा सर्वांना उर्जा देतो त्याची उपासना करायला हवी हे तोच सांगु लागला. अकबर सूर्य नमस्कार घालत असे. "अकबरनामा" व "ऐन-इ-अकबरी" ह्या ग्रंथांचा कर्ता अबुल फजल ह्याला बिरबल आणि तोडरमल जबाबदार असून त्यांनी बादशहाला बिघडवले असे तो म्हणतो. अकबरने ह्याच अबुल फजल कडून महाभारताचा अनुवाद करवून घेतला वरुन त्यात जस्स दिलय तस्सच भाषांतर कर एकही शब्द तुझ्या मनातला लिहायचा नाही अशीही तंबी दिली. काफरांचे हे ग्रंथ वाचल्यामुळे मला जहन्नुममध्ये जावं लागेल अशी भीती वाटाल्याचेही अबुल फजल लिहीतो.
अकबराची केस दिवसेंदिवस मुल्ला-मौलविंच्या हाताबाहेर जाऊ लागली. आईकडून इराणी पध्दतीचा वारसा असल्याने तो "नवरोज" हा पारशी लोकांचा नववर्षाचा पहीला दिवस मोठ्या समारंभात साजरा करत असे. इस्लाममध्ये "दर्शन देणे" असा काही प्रकार नाही. अकबर मात्र सकाळ - संध्याकाळ लोकांना सज्जात उभं राहुन "दर्शन" देऊ लागला. हीच प्रथा पुढे मुघल घराण्यात कायम राहीली हे आपण लक्षात घ्यायला हवे. लोकांचाही तो अवतारी पुरुष किंवा धर्माची नव्याने स्थापना करणारा बारावा इमाम आहे ह्याची खात्री पटली. अकबर जी फळे वाटत असे ती लोकं प्रसाद म्हणून नेत. अकबर स्वत:च्या पायाचे तीर्थ आजारी लोकांत वाटत असे. अकबराने पैगंबराच्या अनेक कृतींना चूक ठरवले. पैगंबर स्वर्गात फिरुन आल्याची कथा ही खोटी असल्याने तो मौलवींना उघड बोलून दाखवू लागला. अकबराने १५८३च्या सुमारास गोवध बंदि केली. दाढी राखण्यावर त्याने चक्क बंदि आणली. बहुदा त्यामुळे हातभर वाढलेल्या दाढ्या गायब होऊन अकबराचा एकंदर दरबार "सटासट" दिसत असेल. ह्याच दरम्यान अकबर चक्क गंध लावून दरबारात येऊ लागला. कुत्रा व डुक्कर हे प्राणी साधे असून त्यांना अपवित्र वगैरे मानू नये असे जाहीर केले. त्याच्या आवडत्या कुत्र्याची त्याने चक्क कबर बांधली. अकबराने मुल्ला-मौलवींच्या डोक्यावरती फोडलेला बॉम्ब म्हणजे त्याने सर्व धर्मातील त्याला पटलेल्या व चांगल्या वाटणार्या गोष्टी एकत्र करुन १५८२ च्या सुमारास लाहोर मुक्कामी स्वत:चा "दिन-ए-इलाही" हा धर्म स्थापून स्वत:ला प्रेषित घोषित केले. तोवर जगभराच्या इस्लामच्या इतिहासात असला धार्मिक धरणीकंप झाला नव्हता. अर्थात त्याला हाताच्या बोटावरतीच मोजता येतील इतपतच अनुयायी मिळाले. अबुल फझलने अठरा लोकांची नावे नोंदवली आहेत. त्या धर्माची जबरदस्ती त्याने कुणावरही केली नाही. तो धर्म केवळ नोंदवला गेला व त्याच्या बरोबरच लुप्त झाला. अरे हो अजून एक! आयुष्याच्या एका टप्यावरती कधीतरी अकबराची गंगेवरती फार श्रद्धा बसली. त्याला पीण्यासाठी फक्त गंगेचंच पाणी लागे. अगदि स्वारीसाठी तो शेकडो किमी दूर असला तरी त्याच्यासाठी गंगेच्या पाण्याची खास सोय केली जात असे. तो हींदूप्रमाणे गंगेला पवित्र मानत असे. इस्लाममध्ये हा देखिल प्रकार नाही.
अकबर हा माणूस एकंदरच विचित्र होता. अकबरनामा नुसार त्याला लहानपणापासून अंधाराची भिती वाटत असे, तो आपल्या दोन मजली शाही तंबूच्या बाहेर पुरुषभर उंचीच्या मेणबत्या रात्रभर जाळत ठेवत असे. पहाटे फटफटलं की मग थोडावेळ झोपत असे. रात्रभर मशाली व शेकोट्यांच्या प्रकाशात विवीध खेळ, मल्लांच्या कुस्त्या, गायन, आणि अगदिच हटके म्हणाल तर रात्रीबेरात्री बैल, हत्ती, कोंबड्या-कबुतर्यांच्या झुंझी वगैरे बघत बसे. असाच एकदा उधळलेला बैल त्याच्या अंगावरती येऊन अकबर जखमी झाला होता. पण त्याला एकंदरच पशु-पक्षांचा शौक होता. तो शिकार वगैरे करत असे पण त्याच बरोबर पकडलेल्या प्राण्यांच्या, पक्षांच्या - किड्यांच्या झुंजी ला्वत असे. काचेच्या पेटीत २ कोळी कींवा नाकतोडे सोडून त्यांची मारामारी व दुसर्याला पकडून खाऊन टाकणे वगैरे फार रस घेऊन बघत असे. हत्तींप्रमाणे त्याला कबुतरांचाही फारच शौक होता. उत्तमोत्तम जातींची कबुतरे त्याने जमवली होती. महालाच्या गच्चीत जाऊन ती कबुतरे उडवायचा छंदच होता त्याला. त्याने त्या छंदाला नावही एकदम रोमॅंटिक दिले - "इश्कबाजी." पारव्या-कबुतर्यांच्या एकंदरच "गुट्टरग्गुम" आवाजामुळे आणि एकमेकांशी चावटपणे वागण्याची पध्दत बघून त्याला हे नाव सुचले का हे कळायला मार्ग नाही. हे असले प्रकार करणारा विक्षिप्त अकबर न्यायदानाचे नियम मात्र काटेकोर ठेवी. भूक लागली असताना, न्यायदानाच्या आधीच दुसर्या कारणाने चीडचीड होऊन मग न्यायासनावर बसले असल्यास किंवा आधीच्याला कडक शिक्षा दिली असताना पुढल्या प्रकरणात लगोलग शिक्षा अथवा निर्णय न द्यायचा नाही असा नियम त्याने बनवला होता. कारण अश्या मनस्थितीत गरजेपेक्षा जास्त कठोर शिक्षा अथवा अविचारी निर्णय दिला जाऊ शकतो असे त्याचे तर्काला धरुन असलेले मत होते.
तर असा हा अकबर. अनेक पैलू असलेला विचित्र, विक्षिप्त आणि कधी कधी दिलदार असलेला. अकबरच्या राजकिय, सामाजिक, आर्थिक बाबी. प्रशासन, लढाया, कौटुंबिक कलह, त्याचे हत्तींवरील प्रेम वगैरेंवर एक एक लेख होईल. पण ह्यात थोडीशी राजकिय बाजू व मुख्यत: धार्मिक बाजू दाखवण्याचा उद्देश हा आहे. की बहुदा अकबर हा इस्लाममधील आजवरचा एकमेव "चार्वाक" असावा. उत्तर आयुष्यात त्याने अनेक कृतीतून मुल्ला-मौलवींच्या नाका कांदे लावावे लागतील असे निर्णय घेउन ते राबवले. सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक धर्मात अधून मधून असले "चार्वाक" व्हायला हवेतच अन्यथा धर्ममार्तंड त्या-त्या धर्माचे डबके बनवतात.
मुस्लिम धर्मातला चार्वाक -" अकबर" ..... अकबराची ही बाजू जास्त उजळून दाखवणे सध्या गरजेचे आहे.
- सौरभ वैशंपायन.
Geography Dictates strategy
जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या "Military History of India" पुस्तकातील एका प्रकरणाचे शिर्षक - "Geography Dictates strategy" असं फार बोलकं दिलं आहे. १६७४ साली भारतात आलेला फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे चौलला उतरला, तिथुन गोवा मार्गे तो विजापुरला जाणार होता. प्रवासाच परवाना काढण्यासाठी तो मराठ्यांच्या कचेरीत गेला. बोलण्या्च्या ओघात तिथल्या अधिकार्याने शिवाजी महाराजांबाबत त्याला २ महत्वाच्या गोष्टि सांगितल्या ज्या त्याने टिपून ठेवल्या - १) महाराज सर्वात जास्त खर्च हेरखात्यावर करतात व त्या माहितीच्या जोरावरती मोहीम आखतात, २) महाराजांनी स्वत:च्या व शत्रूच्या प्रदेशातील भूगोलाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला असून गरज वाटेल त्या प्रदेशाचे ते नकाशे तयार करुन घेतात. ...... Geography Dictates strategy.
..... पण म्हणून दिसला उंच डोंगर की बांध दुर्ग, दिसली बरी जमिन की बांध गढी असं नसतं. त्या मागे प्रचंड अभ्यास असतो. शतकानुशकतं झिरपत आलेलं ज्ञान व तत्कालिन गरज यांचा विचार करुन दुर्ग बांधावे लागतात. दुर्गांच मुख्य काम म्हणजे संरक्षण. गावांना, बाजार पेठांना, मंदिरांना, बंदरांना, खाड्यांना, व्यापारी मार्गांना, राजधानीच्या संरक्षणासाठी तिच्या भोवती, राज्याच्या सीमांवरती अश्या ठिकाणी दुर्ग उभारावे लागतात. अनेकदा गावांभोवती अथवा बाजारपेठांभोवतीच भक्कम तट उभारले जातात. गावांभोवती असलेली संरक्षक तटबंदि अथवा खंदक अनेक ठिकाणी आजही दिसतात. मराठ्यांच्या भितीमुळे त्यावेळी कोलकत्याच्या व्यापार्यांनी इंग्रजांच्या मदतीने हजारो रुपये खर्चून कोलकत्याच्या बाजारपेठी भोवती भला मोठा खंदक खणायला घेतला, आजही त्याचा बराचसा भाग शिल्लक आहे त्याला - "Maratha Ditch" म्हणूनच ओळखतात.
रायगड सारखा बेलाग बुलंद दुर्ग राजधानी म्हणून निवडला तरी रायगडचे दुर्गमत्व जसे स्वत:च्या स्थानात व बांधणीत आहे तसेच त्याचे दुर्गमत्व त्याच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या गिरीशिखरांवरती अवलंबून आहे. रायगडच्या चारही बाजूंना नजर फिरवली की - महेंद्रगड, पन्हाळगड (रायगड जवळचा), माणगड, लिंगाणा, कोकणदिवा व पसरलेला सरळसोट उभा सह्याद्री अशी ती अभेद्य जागा असल्याचे लक्षात येते. अनेकदा घाटांमध्ये अनेक चौक्या असत.
गिरीदुर्ग बांधताना अनेकदा एखादि मोक्याची जागा मिळे पण गोची अशी असे की त्या महत्वाच्या जागेला तोफेच्या टप्यात ठेवू शकेल, किंवा निदान मुख्य गडाची महत्वाची रसद मधल्या मध्ये बंद पाडू शकेल अशी दुसरी जागा आसपास असे. मग नाईलाजाने तिलाही तटबंदी बांधून तिथे लहान शिबंदी ठेवावी लागे. अनेकदा मुख्य गड जिंकायचा अथवा वाचवायचा तर ती तुलनेने दुय्यम जागाच युध्दाचे केंद्र बनत असे. अश्यामुळे महाराष्ट्रात व इतर अनेक ठिकाणी गडकोटांच्या जोड्या दिसतात -> पुरंदर - वज्रगड, पन्हाळा - पावनगड, अंकाई - टंकाई, साल्हेर - सालोटा, हि प्रातिनिधिक उदाहरणे. वास्तविक नाशिककडची एक डोंगररांगच रांगच दुर्गांनी सजल्याचे कारण हेच आहे - अचल, अहिवंत, वणी, रावळा, जावळा, कण्हेरा, धोडप, कुणदेव, हदगड, चांदवड, वेताळगड वगैरे वगैरे. नावे मोजताना धाप लागेल इतके दुर्ग तिथल्या गिरी शिखरांवरती आहेत. नाशिककडून त्या भागातून येणारी - जाणारी प्रत्येक वाट किमान २ दुर्गांच्या नजरेखाली असे.
मात्र अनेकदा आधीच बांधलेल्या जागा अडचणीच्या बनत, त्या हेरुन ते गड पाडणेच शहाणपणाचे असे. महाराजांनी जसे अनेक दुर्ग बांधले तसे काही दुर्ग याच कारणाने जमिनदोस्त देखिल केले. १६४९ साली शिरवळचा कोट असाच पाडला. कारण जो कोणी शिरवळमार्गे पुढे सरके तो हमखास हा लहानसा कोट जिंकत असे व त्यात स्थान भक्कम केले की त्याचा धोका पुरंदरला होत असे. भवनगिरी पट्टण, सावशी हि अजून काही उदाहरणे, हे गड पाडण्याची आज्ञा करणारी पत्रेच उपलब्ध झाली आहेत. हे सर्व करायला अर्थात बराच खर्च येत असे, पण पुढची सुरक्षा लक्षात घेऊन तो खर्च करुन गड पाडत. दक्षिणेत देखिल महाराजांनी असेच -२/३ दुर्ग बेवसाऊ करुन पाडले. ऐन कानडि मुलखात उभारलेल्या साजरा - गोजरा जवळचा एक कोट असाच त्यांनी पाडला.
अनेकदा बेवसाऊ झालेले दुय्यम दुर्ग पुन्हा अनेक कारणांसाठी पुन्हा वसवावे लागत. १३ मे १६५९ मध्ये बांदलांना लिहिलेल्या एका पत्रात बांदलांचा देशमुख "रायाजी" वयाने लहान असल्याने मुख्य सरदार असलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांना उद्देशुन त्यांनी लिहिले आहे कि "तुमच्या रहाळात (हिरडस मावळ) जासलोडगड (हा सध्याचा कावळ्या कि दुर्गाडि याबाबत शंका आहेत.) सध्या ओस आहे, त्याला पुन्हा भक्कम करुन त्याचे नाव "मोहनगड" ठेवा. मी इथून २५-३० असामी पाठवतो आहे त्यांना तिथे आळंदा (पहारेकर्यांसाठीच्या इमारती) बांधून द्या." हा गड तसा छोटासाच पण अफझखान येणार त्याच्या पार्श्वभूमीवरती महाराज हे सांगत आहेत. प्रतापगड परीसरात लढाई झाली तर जीव वाचवायला विजापूरी सेना वरंधा, चिकना वगैरे घाटांकडे सरकली तर इथून त्यांवर लक्ष ठेवता येईल हा विचार त्या मागे आहे. अफझलखानाचा वध १० नोव्हेंबर १६५९ रोजी केला महाराज हि आज्ञा मे मध्ये देत आहेत हे लक्षात घ्या.
शत्रुची प्रगत शस्त्रात्रे व आजूबाजूला फायदेशीर ठरेल अशी परीस्थिती लक्षात घेऊन दुर्ग वसवावे लागतात. तोफा आल्या आणि दुर्ग बांधणीचे तंत्रच बदलले. महाराजांनी जे दुर्ग बांधले अथवा दुरुस्त करुन घेतले त्यात मोठा बदल म्हणजे गडाचा दरवाजा नेहली दोन बुरुजांच्या आड लपवला - त्यालाच गोमुखी रचना म्हणतात. अर्थात त्याने तोफेचा गोळा कधीच दरवाज्यावरती थेट बसत नसे. अनेकदा तटांची उंची मुदामहुन लहान ठेवत कारण तोफेतुन सुटलेला गोळा परस्पर तटबंदिवरुन पलीकडे निघून जात असे. काहिवेळा तटबंदि देखिल फारशी भक्कम नसे चार - सहा गोळ्यात ती ढासळेल अशी असे मात्र त्याच्या आजूबाजूचा प्रदेशच असा असे कि तोफा त्या भागात आणणे जवळपास अशक्य सोपे उदाहरण म्हणजे वाळवंटातील गडकोट .... आजूबाजूला नजर जाईल तिथवर रेतीचा समुद्र, तोफा वाळूत फसायची १००% हमी, त्यामुळे आजूबाजूचा प्रदेश अश्यांचे दुर्गमत्व आपोआप वाढवत असे.
महाराजांनी असे ३६० हुन अधिक दुर्ग राखले होते. "उद्या खासा आलमगिर दख्खनेत उतरेल, माझा येक येक कोट त्याविरुध्द येक येक वरुस लढला तरी त्याला दख्खन काबिज करावयास ३६० वरुसांचे आयुष्य लागेल!" हा दांडगा आत्मविश्वास त्या महामानवाच्या मनात होता. त्याचा इतिहासही आपल्याला माहित आहे. त्यानंतर मराठा साम्राज्य वाढले, अटक ते कटक या पट्यात क्वचितच असा गड असेल ज्यावर भगवा फडकला नसेल. अटक, पेशावर, लाहोर, मुल्तान, आग्रा, अगदि लाल किल्यावरती तब्बल १४ वर्ष भगवा फुरफुरला होता.
ज्या गडकोटांनी आपले स्वातंत्र्य मिळवून दिले, ते अबाधित राखले त्यांचे मोजकेच पैलू, व इतिहास आज आपल्याला माहित आहेत. मराठ्यांनी किमान एकदा पाय ठेवलेल्या ठिकाणी भेट देऊ असे ठरवले तरी ओरीसातील कटक पासून ते आजच्या पाकिस्तानातील अटकपावेतो जावे लागेल. या दुर्गांचा इतिहास बोलका केला पाहिजे. त्यांचे दुर्गमत्व प्रकाशात आणायला हवे. कदाचित तरच आपण इतिहासाच्या ऋणातुन अंशात्मक मुक्त होऊ शकू.
- सौरभ वैशंपायन.
दुर्ग भांडार
सहा - सात महिन्यांपूर्वी माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या अल्बममध्ये मी दुर्ग भांडारचे फोटो बघितले होते. त्यादिवशीपासून दुर्ग भांडारला जायची संधी शोधत होतो. माझ्या ओळखीचे जे काही २-३ ट्रेकिंग ग्रुप आहेत त्यातल्या सगळ्यांची डोकी या प्लानवरुन खाऊन झाली होती. अखेर परवा २६ जानेवारीच्या मुहुर्तावरती पोदार कॉलेजच्या ग्रुप बरोबर जायची संधी मिळाली.
दुर्ग भांडार हा नाशिक जवळील ब्रह्मगिरीच्या डोंगराचाच एक भाग आहे. दररोज शेकडो व शनिवार - रविवारी हजारो लोकं ब्रह्मगिरी व जटा मंदिरात दर्शनासाठी येतात पण फारच कमी लोकांना पुढे एखादा दुर्ग आहे ह्याची कल्पना असते. माझ्या आजवरच्या अविस्मरणिय ट्रेक्सपैकी दुर्ग भांडार पहिल्या पाचांत ठेवायला हरकत नाही. जटामंदिरवरुनच पुढे अक्षरश: १५-२० मिनिटांच्या अंतरावरती हा दुर्ग सह्याद्रिच्या काळ्याकभिन्न कातळात "खोदून" काढलेला आहे. अर्थात जटामंदिर ते गड मधली वाट ही रेताड, भुसभुशीत, ढिसाळ, वगैरे शब्दांना आपल्यात सामावणारी व जेमतेम ’एक पाय नाचू रे गोविंदा’ करत पार करावी लागत असल्याने त्या दिशेला कोणी फिरकत नाही. चूक झाली तर डाव्या बाजूला २०-२५ फुटांचा अतिशय तीव्र उतार व मग थेट दरी आहे. ज्यांना ट्रेकची फार सवय नाही त्यांच्यासाठी कींवा आयुष्यातल्या पहिल्याच ट्रेकसाठी हा गड नक्किच नाही.
मी वर म्हणालो तसा कातळात "खोदून" काढलेला हा माझ्या पाहण्यातला पहिलाच गड आहे. मुळात तिथे गडाची मुख्य डोंगराहुन वेगळी अशी बांधणी दिसतच नसल्याने गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्या शिवाय खात्रीच होत नाही की इथे कुठलाही दुर्ग असेल. जवळ गेल्यावर ५-६० फुटांवरुनही प्रथमदर्शनी त्याचे प्रवेशद्वार हे सुरुवातीला पाण्याचे खोदलेले टाकेच असावे असे वाटते. कारण या वाटेच्या आधीच्या ट्प्यावर खरंच एक पाण्याचे टाके आहे. वापरात नसल्याने पाणी अस्वच्छ आहे. मात्र एकदा का त्या चिंचोळ्या वाटेपाशी पोहोचलो की मती गुंग करणारे, अफाट मेहनत व सुरक्षिततेच्या दृष्टिने जबर शक्कल लढवलेले बांधकाम ..... नपेक्षा "खोदकाम" दिसते. उजव्या हाताच्या भिंतीत इतर गडांप्रमाणेच शिवकालिन असणारे हनुमानाचे शिल्प दिसते. आणि मग थोड्या सरळसोट उतरणार्या साधारण फुटभर उंचीच्या ५०-५५ पायर्या एखाद्या गुढ भुयारात उतराव्यात तश्या खाली घेऊन जातात. एका वेळि एकच माणूस जाऊ शकेल इतपतच जागा. हा कातळ पहारींनी, छिन्नी-हातोड्याने तब्बल ६० फूट तरी सरळसोट खोदला आहे. वरती बघितलं की आकाशाची भगभगीत पट्टी तेव्हढी दिसत रहाते.
खाली पोहोचलो की अजुन एक अनपेक्षित गोष्ट आपली वाट बघत असते. ते म्हणजे गडाचे केवळ दोन - अडिच फुटि उंचीचे व फक्त तीन फुट लांबीचे पहिले प्रवेशद्वार. गडात शिरणार्या माणसाला आधी इथेच गुडघे टेकावे लागतात. लहान मुलाप्रमाणे रांगतच तिथून बाहेर पडावे लागते. हे तंत्र इतके जबरदस्त आहे की आतल्या बाजूला एक - दोन पहारेकरी जरी तलवार घेऊन बसले तरी ह्या गडाचे अगदी आरामात रक्षण करु शकतात. दरवाज्यातून प्रवेश करताना आधी डोके आत घालावे लागते दोन्ही हात जमीनीवरती टेकले असतात, गुडघे टेकल्याने कुठल्याही दिशेला सरकायचा वेग उरला नसतो आणि त्यातून चिंचोळी जागा. आत शिरु पाहणार्याचे डोके धडापासून विनासायास वेगळे होण्याची संपूर्ण खात्री.
हा पहिला रांगता प्रवेश झाला की उजवीकडे वळायचं, दुसरी गंमत वाट बघत असते - दोन्ही बाजूला दरी आणि मध्ये जेमतेम ८-१० फुटाचा कातळ ज्यावरुन चालत दुसर्या टोकाला जायचं असतं. भणाण वारा असला तर दरीत फेकले जाण्याचे शक्यता असतेच. सुदैवाने वारा नव्हता पण इथे दुसरा त्रास वानरांचा होतो. आम्ही आत प्रवेश करताच उजव्या हाताच्या एका शिळेवरती अतिशय स्वस्थ चित्ताने तो बसला होता. यांना माणसांची इतकी सवय झाली आहे की अगदि एकट्या वानरालाही हाकलवून लावायचे प्रयत्न जवळपास निष्फळ असतात. फार फार तर आपल्यावरती उपकार केल्यागत फुटभर जागा बदलतात. हा टप्पा पार करुन पलिकडच्या कातळकड्याकडे पोहोचलं की डाव्या हाताला पुन्हा नवीन "लोटांगण" असतच. गडाचे दुसरे प्रवेशद्वारही अगदी तसेच. शिवाय यातुन आत गेलं की आधीच्या प्रवेशद्वारासारखं थेट वरपर्यंत पायर्या दिसत नाहित जवळपास ९० अंशात वळत जाणार्या फुटभर उंचीच्या पायर्या आहेत.
वरती कुठलंलही इमारतीचं बांधकाम दिसत नाही, कींवा तसे कुठलेही पुरावे दिसत नाहित. सरळ नाकासमोर चालत गेलं की उजव्या बाजूला थोडं खाली पाण्याची दोन टाकी खोदली आहेत. पैकी एक टाकं त्यातल्या त्यात स्वच्छ आहे असं मानता येतं, दुसरं टाकं मात्र हिरवट पाण्याने भरलेलं आहे. तिथुनच पुढे दोन मिनिटांवरती कातळ फोडून तयार केलेला बुरुज आहे. वास्तविक बुरुजापेक्षाही तो एखादा सज्जा असल्यागत फोडून काढला आहे तोफा अथवा बंदूंकांचा मारा करायला कुठलीही सोय, जंग्या नहियेत. मला पाणी वाहून जायलाही काही व्यवस्था दिसली नाही, पण ती असावी अन्यथा पावसाळ्याच्या दिवसात इथे छातीभर पाणी साठेल. या बुरुजात उतरताना काळजी घ्यावी लागते डाव्या बाजूला दरी आहे, अजिबात चूक न करता इथून बुरुजात उतरावं लागतं. बुरुजात उतरलं की खाली त्र्यंबकेश्वर दिसतं. अजून उजवीकडे बघितलं की खाली गंगाद्वारकडे जाणारा रस्ता व समोर ब्रह्मगिरीचा डोंगर दिसतो. परत संपूर्ण मागे वळलं व बुरुजात जिथून उतरलं तिथे जाऊन उभं राहीलं की समोर थोडंस डाव्या हाताला हरीहर गड व बसगड दिसतो. बास संपला गड. या गडात पहाण्यासारखं म्हणाल तर जवळपास काही नाही पण अनुभवण्यासारखं खूप काही आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे व आधीच्या प्रवेशद्वाराजवळ जे मारुतीचे शिल्प कोरलेले दिसते त्यावरुन हा शिवकालीन गड असावा. जो नावाप्रमाणेच खजिना अथवा परचक्र आल्यास महत्वाच्या व्यक्तींना लपायला देखिल वापरता येऊ शकेल असा असावा, मात्र परत सांगतो वरती कुणाला रहता येईल, अन्न, दारुगोळा, खजिना साठवता येईल असं काही बांधकाम अथवा अवशेष दिसत नाहीत. त्यामूळे हा नक्कि कधी व का बांधला हे समजायला काही मार्ग नाहिये. मी आजवर वाचलेल्या इतिहासातही याचा उल्लेख मला मिळालेला नाही.
बुरुजातच फतकल मांडून आम्ही पोटपूजा सुरु केली. तासभर आराम - गप्पा झाल्यावरती परत निघालो. तोच रस्ता, तीच लोटांगणं मग त्या लोटांगणासहित फेसबुकच्या प्रोफाईलला डकवता येईल असा फोटो काढण्याची प्रत्येकाची धडपड सुरु झाली. आम्हा ६ जणांचा ग्रुप थोडा मागे पडला. आम्ही कातळकड्याच्या ८ फुटी चिंचोळ्या पट्टिवरती आलो आणि समोरुन ५-७ वानरांचं टोळकं उभं राहीलं, डाव्या दरीतून अजून दोघं वर आली, मागे वळलो तर एक जण आधीच येऊन उभा होता. त्यांनी फार हुशारीने जागा निवडली होती. पुढे - मागे माकडं डावी-उजवीकडे दरी. धीट तर इतके होते कि घाबरवायला पाण्याची रिकामी बाटली वाजवली तर ३ लहान पिल्लं पुढे येऊन तीच बाटली धरायचा प्रयत्न करु लागली. एक जण पुढे झाला व त्याने सरळ एका मुलीच्या ट्रॅकपॅन्टचा कोपरा चिमटीत पकडला. आता कुठलीही आक्रस्ताळी हालचाल जीवावरती बेतू शकत होती किंवा त्यांचा हल्ला ओढावून घ्यायला कारणीभूत ठरु शकत होती. गपगुमान एकमेकांची बॅग पकडून झुकझुक गाडि बनवली. त्यांच्याशी नजर न मिळवता मधला ५० फुटांचा पट्टा शब्दश: जीव मुठीत धरुन पार केला. त्यांच्या सरावल्या नजरांनाही आमच्या हातात खाण्यासारखं काही दिसलं नाही त्यामू्ळे त्यांनीही मग काही आडकाठी केली नाही. हे दिव्य पार करुन पुन्हा त्याच ढेकळांच्या घसरड्या वाटेवरुन तोल सावरत अखेर जटा मंदिर गाठलं. दुर्ग भांडारचा ट्रेक पूर्ण झाला होता. सगळे जण या अनुभवाने "cloud 9" वरती पोहोचले होते.
परत येताना डोक्यात एकच विचार आला - ताजमहाल किंवा राजस्थानातले सुंदर राजवाडे बांधणे हे अर्थात फार मोठे व कलेच्या दृष्टिने अजोड आहे. मात्र त्याचवेळी सह्याद्रिच्या कातळकड्यातून अशी सर्वथा अजिंक्य वाटावी अशी जागा कोरुन काढणं जास्त कठीण आहे. त्या दोन्ही दरवाज्यांत घालावी लागणारी लोटांगणं हि त्या कारागिरांना, मजूरांना व ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली त्यालाच घातली असं मी अजूनही समजतोय. थोडक्यात किमान एकदा घ्यावा असा हा अनुभव आहे.
- सौरभ वैशंपायन.
राजगडच्या सदरेवरुन
२०११ च्या पहील्याच पंधरवड्यात अनायसे राजगडची वारी झाली. आदल्याच दिवशी - १४ जानेवारीला पानिपताच्या घटनेला २५० वर्ष पूर्ण झाली होती. पानिपतावर किमान लाखभर बांगड्या फुटल्या. राष्ट्रावरचं संकट स्वत:च्या छातीवर घ्यायची संथा मराठ्यांना ज्या महामानवाकडून मिळाली होती त्याच्या पहील्या राजधानीला भेट देणं ही अर्थात समाधानाची बाब होती.
बालकाच्या जन्मानंतर त्याची कुंडली मांडली जाते, त्यात पुढे त्या बालकाच्या आयुष्यातल्या चढ - उतारांचे आखाडे मांडले असतात. तसेच महाराष्ट्र आणि अफगाणिस्थान पानिपतावर समोरासमोर उभे ठाकण्याचे भविष्य जिथे लिहिले होते त्या किल्यावर उभं राहून इतिहासाकडे नव्या दृष्टिने पहाणं बरच काही शिकवणारं होतं. पानिपताचा इतिहास बघता आपल्याला औरंगजेबाच्या मृत्युपर्यंत मागे जावं लागतं. कारण मराठ्यांची ताकद त्या दिवसांनंतर कशी दिसामासाने वाढत गेली हा मोठा रंजक इतिहास आहे. पण औरंगजेबाचा मृत्यु म्हणताना आपल्याला एक समांतर विचार करावा लागतो - असं काय होतं या मातीत कि देशभर जुलमी वरवंटे फिरवणारे सुलतान - बुतशिकन गाजी इथे कायमचे गाडले गेले? त्याचे कारण स्वातंत्र्याची ओढ, स्वातंत्रप्रियता ही महाराष्ट्राची आंगिक प्रवृत्ती आहे. शहाजीराजांनी ३ वेळा स्वराज्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पुढे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यातल्या पहिल्याच प्रयत्नात मिळालेले गड म्हणजे तोरणा व राजगड.
राजगडचा इतिहास किमान इसवीसन १२०० सालपर्यंत नक्किच मागे जातो. १२१३ मध्ये देवगीरीस सिंहण यादव राज्य करित होता. त्याने कोल्हापूर जवळिल पर्णालपर्वतावर म्हणजे पन्हाळ्यावर राजधानी असलेल्या राजा भोज शिलाहारांचा मोड केला. यादवांच्या शिलालेखात "पर्णालपर्वतावरील भोजरुपी सर्पाला हाकलून लावणारा गरुड" अशी पदवी सिंहणराजाला दिलेली आढळते. अर्थात पन्हाळ्याकडे जाताना तो मधला प्रदेश जिंकत गेला. त्यावेळि आपल्या सैन्याची पिछाडि सांभाळायचे काम त्याने मावळांतील चोरघे घराण्याला सोपवले. चोरघे याचा अर्थ पिछाडि राखणारा असा होतो (या खेरीज सैन्याच्या पिछाडिला "चंदावर" असाही शब्द आहे, बहुदा त्यावरुनच "चंदावरकर" हे आडनाव आले असावे). त्यांच्या जमावाला "गुंज" म्हणतात. तसेच "वणी" म्हणजे मारा करणारा. जमावाने मारा करतात त्यांचे वसतीस्थळ म्हणजे गुंजवणी. याच नावाची नदी राजगडच्या जवळुन वहाते. पुढे चोरघ्यांनी आपले ठाणे बिरमगीरीवरती हलवले. म्हणजेच राजगडवर. या डोंगराचे मुळ नाव - ब्रह्मदेवाचा डोंगर. पुढे अपभ्रंश होत होत त्याचे बिरमदेवाचा डोंगर, मुरुमदेवाचा डोंगर, मुरुंबदेवाचा डोंगर अशी नावे बदलत गेली. गडावरती पद्मावती देवीचे मंदीर आहे, ती ब्रह्मदेवाची पत्नी. राजगडाला अनेक नावे मिळत गेली - बिरमदेवगड, मुरबदेव, मुरुमदेव, मुरुंबदेव, राजगड, मुसलदेव, मूरबगर, मुरंबाद, राजगिरी, नबीशाहगड, शहामृग पर्वत, दुरजादेवीचा डोंगर, मुर्हारजगड, राजनग, मुद्रोदेव.
चोरघे घराणे इथला महसूल गोळा करुन देवगीरीस पाठवत, पण दरवर्षी इतक्या दूर महसूल पोहोचवणे कठिण होते, म्हणुन ५ - १० वर्षातून एकदा तो महसूल पाठवत. तोवर जमलेल्या पैश्यांचे (पद्मटंक नामक नाणी) हंडे, अथवा सोन्याच्या लडिंचे हंडे गुप्तपणे सुरक्षित ठिकाणी लपवुन ठेवत. अशी भांडि चोरघ्यांनी गुंजवण दरवाज्याचा उंबरठ्यात पुरली होती. किल्ले बिरमदेवाचा गुंजण महादरवाजा त्याने बांधला तेव्हा महाद्वारावरील "गजलक्ष्मीचे" शिल्प त्यानेच बसवले. या दरम्यान जर एखादे परचक्र आले व त्या घराण्यातील कर्ती व्यक्ती मारली गेली अथवा परागंदा झाली तर त्या गुप्तधनाची माहिती नाहीशी होई. असंच काहीसं झालं १२९५ मध्ये.(पुढे महाराजांना राजगडाच्या तटबंदिची नव्याने बांधणी करताना जे धन मिळाले किंवा तोरण्यावर जे हंडे मिळाले ते असेच काहीसे असावे.) दिल्लीहून अल्लाउद्दिन खिलजी देवगिरीवर चालून आला. पुढे १३१८ पर्यंत यादव - खिलजी युध्दे होत राहिली. त्यात चोरघे कुल यादवांकडुन लढले. या खेरीज मुरंजन, तोरणा इथल्या परीसरातले देशमुख देखिल तेथे लढले. यादवांच्या पराभवाबरोबर यांचे दिवस फिरले. काही युध्दात संपले काहि देशोधडिला लागले.
अर्थात यादवांच्या र्हासाबरोबर त्यांच्या अधिपत्याखालील जमीन - किल्ले खिलजींकडे आले. पुढे दिल्लीतील व दख्खनेतील सत्तापालटांच्या क्रमात तुघलक, बहामनी अश्या सुलतानांच्याकडे तो हस्तांतरीत होत गेला. पुढे १४९० नंतर बहमनी वजीर अहमद याने शिवनेरी, जोंड, लोहगड, तुंग, तिकोना, कोंडाणा, पुरंदर, भोरप, जुधान, खाज, खेरदुर्ग, तुंगी, तरोणी, महोली, पालीचा किल्ला,राजापुरी यांच्या बरोबरच मराबदेव उर्फ मुरुंबदेवाचा किल्ला जिंकला. चोरघ्यांची उरली सुरली मालमत्ता खंडणी म्हणून जप्त झाली. व किल्ले मुरुंबदेव बेवसाऊ झाला. पुढे बहामनी सत्तेची पाच छकले झाली. त्यातल्या निजामशाही व आदिलशाहीकडे हा किल्ला नाममात्र का होईना पण आलटुन पालटुन जिंकला जात होता. चित्रे शकावलीत रागडाचा उल्लेख "शहामृग पर्वत" असा केला आहे. त्याच्या मागचा इतिहास असा कि विजयनगरच्या सम्राटाचा चार पातशाह्यांनी राक्षस - तागडि अथवा तालिकोट येथील युध्दात पराभव केला त्याची आठवण म्हणून हुसेन निजामशहाने त्याच्या व आदिलशाहिच्या हद्दिवरती असलेल्या मुरुंबदेवावर एक शिल्प बसवले - एका हरीणाच्या अंगावर दोन वाघ आपले पंजे गाडुन उभे आहेत असे ते चित्र आहे. यातल्या मृग म्हणाजे विजयनगर सत्ता व त्यावरील ते दोन वाघ म्हणजे "शहा" म्हणून तो "शहा-मृग" पर्वत.
१६१६ नंतर निजामशहाने इथली जहागिरी शिलिंबकरांना दिली. हे मुळचे वाई जवळचे घराणे होते. दुसरी गोष्ट म्हणजे हे शिलिमकर (मुळचे शिळिंबकर) चंद्रराव मोर्याचे मातुल घराणे. निजामशाहीच्या पडत्या काळात नाईलाज झाल्याने त्यांनी मुरुमदेव किल्ला खाली केला असल्याचा उल्लेख मिळतो. मात्र त्याच्याच थोडे आधी शहाजीराजांचे सेवक सोनजी म्हणजेच सोनोपंत डबीर मुरुमदेव येथे आश्रय करत असता आदिलशाही आक्रमण आले त्यात ते जखमी झाले. म्हणजेच शहाजीराजांनी बेवसाऊ असलेल्या मुरुंबदेवाला आपल्या ताब्यात घेतले होते.
गुंजवण्याशी संबधीत गोष्ट दादोजी कोंडदेवांच्या २ निवाड्याशी संबधीत आहे. गुंजण मावळाच्या देशमुखीवर शिंदे, शिलिमकर, चोरघे, कोंडे अशी घराणी हक्क सांगु लागली. यातले चोरघे शिरजोर होते ते इतरांना दडपत. एका कागदपत्रात "तो दादाजी कोंडदेव यांनी रामजी चोरघा जीवे मारीला" असा उल्लेख आहे. तो याच कारणाने. पुढे याच गुंजाण्याच्या देशमुखीशी संबधित निवाड्यात देशमुखी अर्धी अर्धी देतो असे सांगुन दादोजींनी प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला होता मात्र फुलाजी (शिंदे घराणे) ऐकायला तयार नव्हता त्याने गडबड करणे चालूच ठेवले, अखेर "त्यावरुन दादोजीपंतांनी सिलीमकर याचे अगत्य धरुन फुलाजीस नेऊन बासाचा मार देऊन जीवे मारीले ..."
८ एप्रिल १६३३ पर्यंत शहाजीराजांकडे मुरुंबदेवाचा अंमल निजामशाही कडून होता. मात्र १६३४ च्या दरम्यान तो आदिशहाकडे गेला असावा. या शिवाय २० फेब्रुवारी १६३५ मधल्या एका कागदावरुन खेळोजी भोसले हे देखिल आदिलशाही कडून इथे अंमल राखुन होते. बहुदा याच सालात बाजी घोरपडे याने इथे एक छोटि स्वारी करुन दहशत वसवली आणि शिलिमकरांच्या गुंजवण देशमुखीचे चार हिस्से करुन ते ३ भावांत वाटले. तसे बघता १६२५ ते १६३६ हा कालखंड शहाजीराजांसाठी धावपळिचा व निजामशाही - आदिलशाही - मोंगल यांच्याकडे आलटून पालटून येण्याजाण्यात गेला. अखेरीस ते आदिलशहाकडे गेले व त्यांना पुण्याची जहागिरी मिळाली. इंदापूर, सुपे, चाकण ही जहागिरी नंतर मिळाली.
राजगड गुंजवण मावळांत वसलेला आहे. गुंजवणी नदिच्या खोर्यातील भाग उत्तरेस कानद खोरे, इशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, अग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैऋत्य व पश्चिमेस कोकण, वायव्येस मोसे खोरे असा वेढलेला आहे. त्यावेळि गुंजवण मावळांत ८१ गावे होती. पुण्याच्या आजुबाजूला एकुण १२ मावळ होती. पैकि गुंजवणची माहिती घेतलीच आहे उरलेली अकरा - अंदर, नाणे, पवन, घोटण, मोसे, मुठे, वेळवंड, कर्यात, हिरडस, शिवरळ व जुने मावळ अशी होती. दादोजींनी साम - दाम - दंड - भेद वापरुन यातील बहुतेक वतनदारांना, देशमुखांना शरण आणले. त्यातील कान्होजी जेधे हे मातब्बर होत. ते आणि बाजी पासलकर दादोजींबरोबर स्वराज्याच्या बांधणीला उभे राहीले. पुंडावा करणार्यांना या तिघांनी वचक बसवला. वारंवार नीट अथवा धाकाने न ऐकणार्या देशमुखाचा चौरंग करण्यात येई - कृष्णाजी बांदल हे मुख्य उदाहरण. ही घटना घडल्यावर हळु हळू आजूबाजूच्या मावळातील - झुंजारराव, शिळमकर, कोंडे देशमुख, पायगुडे देशमुख हे दादोजींना आपणहुन येऊन मिळाले.
पुंडावा मोडुन शांतता निर्माण झाल्यावर आता किल्ले ताब्यात असणे महत्वाचे होते. शिवरायांच्या नावे दादोजींनी शहामृग म्हणजेच राजगड हा किल्ला १६४० - ४१ मध्ये घेतला असावा. चित्रे शकावली म्हणते - शके १५६४ चित्रभानू नाम संवत्सरे सन सलास आर्बैन आलफ सन १०५२ मावळाचे सरदेत (सरहद्दित) शाहमृग पर्वत होता तेथे शिवाजी महाराजे याणी ठाणे घालोन इमारत केली, आणि राजगड नाव ठेविले." म्हणजे तोरण्याच्याही आधी राजगड स्वराज्यात आला होता असे म्हणता येते. १६४० -४१ म्हणजे शिवाजीराजे ११ वर्षांचे असावेत. शिवाय बंगरुळात जाण्या आधी हा बेवसाऊ गड दादोजींनी शिवबाराजांच्या ताब्यात आणला असावा. याच्याच आसपास दादोजींनी ढमाले देशमुखांकडुन कुवारीगड देखिल घेतला असावा.
एकदम उघड स्वराज्याची घोषणा अथवा हालचाल शक्य नसल्याने शिवाजी राजे व दादोजींची पाऊले जपून पडत होती. बंगरुळाहुन येताना शहाजीराजांशी जिजाऊसाहेब - शिवबाराजे व दादोजींनी मंत्रणा केलीच असणार. त्याबरहुकुम परत आल्यावर २५ मे १६४२ च्या एका फर्मानावरुन रोहीरेश्वराचा पुजारी बदलण्याचा आदेश शिवबाराजांनी दिलेला होता. आदिलशहाला हे समजताच त्याचे उत्तर देण्यासाठी बाबाजे नरसप्रभूंना त्यांनी विजापुरास बोलावले, पण ते गेले नसावेत. कार्य पुढे चालून राहिले.
याच दरम्यान तिथे रणदुल्लाखान मरण पावला. व शहाजीराजांचा पक्ष दुर्बळ झाला. आदिलशहा बरोबर खटके उडु लागले व अफझलखान, घोरपडे यांनी आगीत तेल ओतायला सुरुवात केली. आदिलशहाने दुषितमनाने शहाजीराजांना आपली जमात हजर करण्याचे हूकूम केले. पण शहाजीराजांनी त्याला टाळाटाळ केली व ते कर्नाटकातुन निघोन गेले (बहुदा ते पुण्यास आले असावेत) त्यांनी एक वकिल आदिलशहाकडे पाठविला त्याचा हात आदिलशहाने कलम केला. प्रकरण पेटले. आता संघर्ष उघड होता. शरण वा लढुन मरण .... स्वाभिमानी शहाजीराजांनी दुसरा मार्ग स्वीकारला.शहाजीराजां बरोबरच, सय्यद रेहान व सैय्यद याकूत यांनीहि आदिलशाहीला सोडले असे दिसते. आदिलशहा चिडला ७ जमादिलावर हि.१०५४ म्हणजे १ ऑगस्ट १६४४ रोजी एक फर्मान पाठवले - "ज्याअर्थी शहाजी भोसले दरबारातून निर्वासित व अपमानित झाला आहे व त्याचा मुतालिक दादाजि कोंडदेव कोम्डाण्याचे बाजूस आह, दफे करण्यासाठी व ती विलायत ताब्यात आणण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपडे (कापशीकर)यांस तुमच्यासह नेमले आहे. तरी तुम्हि आपल्य हशमांसह मशारनिल्हेजवळ जाऊन त्यांच्या संमतीने दादाजी कोंडदेव व त्या हरामखोराचे संबधी शिक्षा देऊन नोस्तनाबुद करा व ती विलायत ताब्यात आणा. ते तुमच्या उत्कर्षाचे कारण आहे.
हे फर्मान मिळताच खंडोजी व बाजी घोरपडे पुण्याकडे निघाले. महाराजांचे व १४ असावे. एकदम संघर्ष उडुन नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी बहुदा पुणे परगणा सोडून दिला. घोरपड्यांनी त्याचा कारभार त्रिंबकजी राजेंना दिला. दादोजी व शिवराय रोहिरेश्वर डोंगराच्या आश्रयाला आले. हाच तो प्रसंग जेव्हा त्यांनी रायरे्श्वरासमोर स्वराज्य निर्मी्तीची शपथ घेतली. त्याला दैवी अनुष्ठान होते.
नरसप्रभुंनी महसुलाचा भरणा विजापूरला न करता शिवाजी महाराजांना करायला सुरुवात केली हे बघुन विजापूरहुन त्यांना एक दमदाटिचे फर्मान आले - "तुझे खोरीयात रोहिरेश्वराचे डोंगराचे असराण पुडावियाने (शिवराय) मावळे वगैरे लोक जमा केला आणि तेथुन जाऊन पेशजी किल्यावरील ठाणे उडवुन आपण किल्यात शिरला. हाली राजगड किल्ला नाव करुन बळकाविला ..... तरी ठाणे मजकुरी आमीनासी रुजु रहाणे आणि तनखा साहकरोन देणे हे न जालीयास खुदावंत तुला विजापुरी नेऊन गरदन मारतील." नरसप्रभू अर्थात घाबरले मात्र शिवरायांनी त्यांची अमजूत घालुन अभय दिले.
अखेर शेवटचा उपाय म्हणुन आदिलशहाने सगळ्या प्रकरणाची चौकशी केली व त्यात त्याला आढळून आले कि शहाजी राजांनी फितुरी केल्याचा आरोप खोटा आहे, व मुस्तफाखान त्यास जबाबदार आहे. त्याने मुस्तफाखानाला कैद करुन सातार्याच्या किल्यावर महिनाभर ठेवले. शहाजीराजांना बंगरुळची जहागि्री व ५ लाखांची जहागिरी परत मिळाली. १६४५ च्या आसपास हि दिलजमाई झाली असावी. नरसप्रभूंनाही "दिवाणातून हरगीज इजा होणार नाही" असे अभय असणारे दुसरे पत्र आले.
आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटक मोहिमेवर पाठवले महाराजांनी ९ किल्ले जिंकुन दिल्याने आता तर आदिलशहाचे मन परत साफ झाले. व त्याच्यामुळे दादोजी कोंडदेवांना पुन्हा पुण्याचा कारभार सोपवला गेला. महाराजांच्या ताब्यातील रोहिडा, राजगड, तोरणा हे देखिल तसे राहु दिले.
इथुन शेवटपर्यंत राजगड महाराजांकडेच राहीला. राजगड महाराजांच्या राजधानीचा गड झाला एक दोन नव्हे चांगली उमेदिची चोविस वर्ष महाराजांनी राजगडावरुन सुत्रे हलवली. बर्याचदा राजगड - गुंजवण्याशी संबधीत हा सुरुवातीचा इतिहास आपल्याला माहित नसतो. या प्रकरणानंतर दोन वर्षातच दादोजी निवर्तले. दादोजी निवर्तले म्हणजे कोंडाण्यावर नविन किल्लेदार नियुक्त होणार होता. इतकी वर्ष कोंडाण्याचा जो आधार होता तोच मोडला, पण महाराजांनी स्वस्थ बसणे पसंत केले कारण अजून स्वराज्याला बळकटी आली नव्हती. किल्ले मजबुत करणे भाग होते. शिवदिग्विजय बखर या कालाबाबत म्हणते - "मनुष्यांचा बचाव होऊन राज्यसाधन कोणत्याप्रकारे करावे? मनुष्ये आपल्यास कशी मिळतील? हा विचार पाहता किल्ले - कोट प्रथम घ्यावेत. मग प्रांत घ्यावा. किल्ल्याचे आश्रय करुन प्रांत घेण्यास आयास लागणार नाहित ..... हे सर्वतोपरी उत्तम विचार ठरवुन राजगडाचे राजकारण करुन आपण खासाजातीने सरंजाम मावळे लोक घेऊन जाऊन किल्ल सर केला. ती जागा पुण्याचे लगत्यास, बिलंद बाकि, चांगली जाणून किल्याचे पहाडास तीन सोंडा होत्या. त्या नव्या बांधल्या त्यांचे नावे पद्मवती, सुवेळा व संजिवनी अश ठेवली. इमारतीचे कामावर मोरो त्रिंबक पिंगळे ठेविले."
राजगडाचे बांधकाम बघितले कि छाती दडपते. शिवाय दुर्ग बांधणीत महाराज व त्यांचे सहकारी किती दुरदर्शी होते हे समजते. राजगडसारखा किल्ला नाही. राजगडासारखा बालेकिल्ला नाही. राजगडाच्या डोंगराच्या सोंडा फार दूरवर पसरल्या आहेत पण सुरक्षेच्या दृष्टिने जितक्या महत्वाच्या तितक्या बांधून घेतल्या आहेत. राजगड बांधताना अतिशय बारीक सारीक गोष्टिंचा विचार केला आहे. पुढे लिहिल्या गेलेल्या आज्ञापत्रातील विचार स्वराज्याच्या सुरुवातीपासूनच केला असल्याचे लक्षात येते. आज्ञापत्रातील काही वाक्ये याचे प्रमाण देतात. मुळात दुर्गांना किती महत्व होते ह्यावर आज्ञापत्रात म्हंटले आहे - "ज्यांस राज्य पाहिजे त्यांणी गडकोट हेंच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचें मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपलीं वसतिस्थळें, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपलें प्राणसंरक्षण." जिथे जिथे तटांवर तोफांचा जास्त मारा होऊ शकतो तिथे तिथे दुहेरी तटबंदि बांधून घेतली आहे. हे बांधकाम दृष्ट लागण्यागत आहे. एकदा तटबंदिला नजर लगटली कि तटबंदिच्या वळाणांबरहूकुम ती शेवटपर्यंत सरकत जाते. राजगडाच्या तटाबंदिला कित्येक हजार टन दगड लागला आहे, तो कुठुन उत्पन्न केला हे कळायला सध्या मार्ग नाही. कारण पद्मावती तलावातुन किंवा इतर टाक्यांना फोडुन/खणून इतका दगड नक्किच निघाला नसेल. तो दगड गडाखालून दूरुन आणत असावेत असे मानायला २ पत्रे उपयोगाची आहेत एक खुद्द शिवरायांचे पत्र १६६१ मधील आहे व दुसरे जेधे नामक सरदारांचे कोकणातील एका पाटलाला लिहिलेले आहे. दोन्हीचा आशय एकच आहे कि आज्ञा मानली नाहि तर राजगडाच्या कामात धोंडे वहायचे काम करावे लागेल. म्हणजे एकतर हा दगड खालून वरती आणत असावेत व शिक्षा म्हणुन गुन्हेगाराला राजगडावरील बांधकामात धोंडे वहावे लागत. तिसरी गोष्ट - १६६१ पर्यंत कदाचित राजगडाचे काम पूर्ण तरी झाले नव्हते किंवा वार्षिक डागडुजीचे काम असावे.
राजगडचा
बालेकिल्ला दुसरी महत्वाची बाब. दोन्हि हात समोरच्या खोबण्यात आधाराला
लावल्या खेरीज राजगडच्या बालेकिल्ल्यावर जाणे स्वप्नातही शक्य नाही. एक चूक
मागच्या दरीत घेऊन जाऊ शकते. सध्या लोखंडि कठडे लावुन हा मार्ग तुलनेने
खूपच सोप्पा केलाय पण त्याकाळि वरती पुरेसा धान्यसाठा, पाणी व शस्त्रे असली
तर एकटा बालेकिल्ला सहज अनेक महिने लढवता येऊ शकेल असा आहे.
बालेकिल्ल्याच्या वाटेचे रक्षण करायला धनुष्यबाण अथवा भाला घेऊन बसलेली एक -
दोन माणसे देखिल पुरे पडू शकतील. एकावेळि एकच माणूस बालेकिल्याची वाट चढू
अथवा उतरु शकतो. शिवाय हि वाट २ ठिकाणी नागमोडि वळते. दोन्हि वळाणे वरच्या
महादरवाजाच्या टप्प्यात आहेत. हि दोन्हि वळणे पार केली कि येतो तो
बालेकिल्याचा महादरवाजा. समोरच जननी देवीचे मंदिर आहे. बाजूला कोनांमधले
भक्कम बुरुज आहेत. पायर्या चढून माग वळलो कि दूरवर नागिणीसारखी पसरलेली
सुरेख सुवेळा माची दिसते. बालेकिल्यावरुन पूर्वेला सिंहगड, पुरंदर तर
पश्चिमेला तोरणा व वातावरण साफ असेल अगदि रायगड सुध्दा दिसतो. दक्षिणेला
रोहीडा, रायरेश्वर, महाबळेश्वर दिसू शकतात. इथुन लोहगड, तुंग, तिकोना देखिल
दिसतात म्हणे पण त्यासाठी सह्याद्रि वेड्यागत भटकून किल्यांच्या
स्कायलाईनची दिसताक्षणी ओळखणारी सरावलेली नजर हवी.
महाराजांनी स्वराज्यावर आलेल्या पहिल्या संकटापासून ते
आग्रास्वारीपर्यंतच्या हालचाली या राजगडावरुन केल्या. सगळ्यात ते
जीवावरच्या संकटातुन सुदैवाने सहिसलामत वाचले. एखादी वास्तू लाभते असे
म्हणतात ते कदाचित असे काहीसे असावे. तरीही मग महाराजांनी राजधानी रायगडला
का हलवली? हा प्रश्न स्वाभाविक रित्या पडतो. त्याबाबत शिवदिग्विजय प्रकश
टाकते. शिवराय आग्र्याहुन सुटुन आले, काही महिन्यांनी मथुरेत गुप्तपणे
राहणारे शंभूराजे देखिल सुखरुप राजगडि पोहोचले. या आनंदाच्या
घटनेप्रित्यर्थ जिजाऊ साहेबांनी मेजवानी देण्याचे ठरविले काही महिन्यांनी
राजकारणातून फुरसत मिळताच त्यांनी मेजवानीचा बेत केला. बारा मावळातल्या
तालेवार देशमुखांना राजगडावर बोलावले शिवदिग्विजयबखर सांगते - "ते समयी
कारभारी यांणी मोठा चवरंग होता, त्याजवरी कचेरीत गादी ठेवुन जागा उंच
करविली. नंतर दुतर्फा मंडळी बसली त्यांत मोहीते, महाडिक, शिर्के, निंबाळकर,
घाटगे, जाधव आदीकरुन जमा झाले होते. त्याणी महाराजांची जागा उंच करुन गादि
घातली हे पाहून इर्षा वाटली की, आता आंम्हा मराठ्यांस सभ्य थोर, मोठेपणा
शिवाजीराजे यांजकडे आला. आम्ही कदिम तालेवार, राजे, मोर्चेलाचे अधिकारी
असतां ...... असें असता अमर्यादपणानी उंच स्थळी बसणार. आम्हि सेवकभाव
दाखविणार. त्यास आम्हांस कचेरीत बसावयाची गरज काय? म्हणोन बोलोन उठोन
चालिले ...... नंतर बाळाजी आवजीस महाराजांनी विचारले. पुढे योजना कोणते
प्रकारे करावयाची, ती सांगा. त्यावरुन विनंती करते जाले कीं "महाराज या
नावांस छत्रसिंहासन पाहीजे. त्याशिवाय राजे म्हणविणे अश्लाघ्य,
लाजिरवाणे,खुशामती बोलणे. स्वयंभू पदवी असली म्हणजे खुशामत जसे ईश्वर
शोभेप्रत पावतात, तशीच पदवी जो छत्रसिंहासनाशिश राजा असतो .....
छत्रसिंहासन असलें म्हणजे, या लोकांची बोलणी शिशुपालवत् सभेचे ठायी होतील.
समयावच्छेदे नाशही पावतील" ...... कशी योजना सांगा म्हणता; काशीस
गागाभट्ट, महासमर्थ ब्राह्मण, तेजोराशी, तपोराशी, अपरसूर्य, साक्षात
वेदोनारायण, महाविद्वान, त्याजकडे कोण पाठवून तेथे गोष्टिचा उपक्रम करुन
त्यांचे आज्ञेने जे करणे ते केले असतां राजमान्य निर्बाध होते." या
घटनेनंतर महाराजांनी राजधानी हलविण्याचे कारणे -
१) शास्ताखानाच्या स्वारीच्यावेळि त्याच्या स्वारांनी अगदि गडाखालपर्यंत
येऊन जाळापोळ केली होती. शिवाय मावळांतील सगळे देशमुख राजांना शरण आले
नव्हते.
२) रायगड कोकणात दुर्घट जागी होता. त्यावर शत्रूला आक्रमण करायचे झाल्यास
सह्याद्रिची हजार-बाराशे मीटरची भिंत ओलांडणे क्रमप्राप्त होते. शिवाय
रायगडच्या आसपासचे शिर्के, मोरे, दळवी हे महाराजांना संपूर्ण शरण आले होते.
३) आरमार स्थापन झाल्याने समुद्रावरच्या हालचालीवर अणि व्यापारावर नियंत्रण
ठेवायला समुद्राला तुलनेनी जवळ असलेली राजधानी गरजेची होती. कोकण- घाट
दोहोंवर जास्त भक्कम पकड बसवता येणे शक्य होते.
महाराजांनी बेलाग बुलंद असलेल्या रायगडची निवड केली ती पारखूनच सभासद बखर म्हणते - "राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्या प्रमाणे दिड गाव उंच. पर्जन्यकाळि कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासिव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु उंचीने तो थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच देखोन संतुष्ट जाले आणि बोलिले - तख्तास जागा हाच गड करावा." इथुन पुढे निर्वाणापर्यंत महाराजांचे वसतीस्थान रायगडच होते. पण राजगड हा महाराजांचा लाडका किल्ला असणे स्वाभाविक होते. म्हणूनच बहुदा रायगडच्या सिंहासनावर बसून देखिल नगारखान्याच्या दरवाज्यातून पूर्वेला नजरेसमोर तोरणा - राजगड दिसावेत असेच स्थान महाराजांनी निवडले असावे.
राजगड ऐतिहासिक कारणांशिवाय अजून एका कारणासाठी आवडला - भरपूर पक्षी आहेत. खरतर मला त्यातले काहीच कळत नाही. पण बरोबर ४ - ४ जण उत्तम कॅमेरा - दुर्बिण बरोबर वागवुन होते. त्यांच्या निमित्ताने - Little egret, Great egret, Tree pipit, Grey wagtail, Greenish warbler, eurasian craig martin, Pied bush-chat, Jungle babbler, Red-breasted flycatcher, Red-throated flycatcher, Brahminy starling,Purple sunbird हे आणि असे बरेच माहित नसलेले ढिगभर पक्षी बघायला मिळाले. त्यांच्या पोटजाती कश्या ओळखायच्या, त्यांचे रंग - आवाज वगैरे घडाघडा ते सांगत होते. मी बापडा मुक्याने मान हलवुन त्याला होकार भरत होतो. पण एक खरंय एरवी दुपारी फार पक्षी दिसत नाहीत पण पहिल्या दिवशी दुपारी २ वाजता राजगड चढत असताना टळटळित दुपारी अनेक वेगवेगळे पक्षी दिसले. कदाचित थंडिचे दिवस आहेत म्हणूनहि असेल. पण पक्षीमित्रांना या काळात राजगड ट्रेक खेरीज पक्षी निरिक्षणासाठी तिथे जायला नक्कि सुचविन. सुवेळा माचीच्या नेढ्यात बसून दरीत उडणारी पाखर बघता येतात. बालेकिल्यावरुन तर नजरेच्या उंचीवर उडणारे ससाणे दिसतात काहि क्षण एकाच जागी स्थिर राहुन मग खाली दरीत एखाद्या बाणाप्रमाणे सूर मारताना बघणे रोमांचक असते. झालच तर भरपूर प्रकाश देणारी व उत्तम फोकस असलेली बॅटरी असल्यास रात्री निवांत पायवाटांच्या आजुबाजूला साप - सरडे - पाली शोधत फिरणे देखिल होऊ शकेल.
एकंदर राजगडची भेट म्हणजे सुख आहे. पुढल्या वर्षी परत एकदा त्याच्या भेटिचा योग येईल अशी अपेक्षा.
- सौरभ वैशंपायन.
======
संदर्भ -
१) किल्ले राजगड बखर - श्री अप्पा परब
२) हुजूरबाजार - श्री अप्पा परब
३) शककर्ते शिवराय - श्री विजयराव देशमुख
४) राजाशिवछत्रपती - श्री बाबासाहेब पुरंदरे
५) महाराष्ट्राची धारातिर्थे - पं महादेवशास्त्री जोशी
६) सांगाती सह्याद्रीचा - सह्याद्री पुस्तक समिती.

No comments:
Post a Comment