Memorial Stone in Maharashtra
महाराष्ट्रभूमी म्हणजे समरभूमी ! देव देश धर्म रक्षणार्थ पेटलेले अग्निकुंड !!! स्वातंत्र्यदेवतेच्या या यज्ञात अनेकांनी प्राणाहुती दिल्या. या हुतात्मा वीरांची स्मृती चिरकाल जिंवंत रहावी म्हणून त्यांचे स्मारक ‘वीरगळ’ रुपात उभारण्यात येई. शूरवीरांच्या पराक्रमगाथा सांगत असलेले हे स्मारक आज मात्र काहीसे दुर्लक्षित आहे. चला त्यांच्या कथा व्यथा जाणून घेऊयात ...
वीरगळ म्हणजे काय ?
वीरगळ हा शब्द ‘वीरकल्लू-वीरकळ-वीरगळ’ याप्रकारे महाराष्ट्रात रूढ झाला. ‘कल्लू’ या कानडी शब्दाचा अर्थ ‘दगड’ असा होतो. दक्षिणेत वीरगळास ‘वीरकळ’ तर उत्तरेत ‘वीरब्रम्ह’ म्हणतात . इंग्रजीत वीरगळास ‘Herostone’ असे संबोधतात.
थोडक्यात वीरगळ म्हणजे वीराचा दगड, अर्थात वीराच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेला दगड.
वीरगळ हा शब्द पुल्लिंगी आहे.
वीरगळचा इतिहास :
अभ्यासकांच्या मते , महाराष्ट्रात आढळणारे वीरगळ साधारण आठव्या ते तेराव्या शतकातील आहेत. नंतरच्या काळात अगदी १८ व्या शतकापर्यंत वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या शिळांवर वीरशिल्प आढळते. कर्नाटकातील वीरगळांवर शिलालेख असल्याने त्या वीराबद्दल आणि वीरगळबद्दल माहिती समजते.
महाराष्ट्रातील वीरगळांवर मात्र शिलालेख आढळत नाही. त्यामुळे वीराचे नाव, त्याच्या मृत्यूची तिथी, युद्धप्रसंग याबाबत इतिहास मूक आहे.
वीरगळ अभ्यासताना त्यावर शिलालेख नसल्याची उणीव नेहमी भासते. बऱ्याच वीरांचा इतिहास अंधारात राहिला.
वीरगळ रचना :
छायाचित्रावरून वीरगळ रचना सहज लक्षात येईल.
तळातील चौकटीत तो युद्धप्रसंग कोरतात, ज्या युद्धात वीर धारातीर्थी पडला.
त्यावरच्या चौकटीत अप्सरा हुतात्मा वीराला स्वर्गात नेत आहेत असे दिसते. {वीराचे स्वर्गारोहण}
सर्वात वरच्या चौकटीत वीर स्वर्गवासी झालेला दाखवतात. तो शिवलिंग पूजताना दिसतो. सोबत शिवगण कोरलेले असतात.
त्यावर शिखर असते. तिथे कलश व इतर शिल्पे आढळतात.
चौकट प्रसंगात व शिखरात आढळणारी विविधता :
बहुतांश वीरगळांमध्ये चौकटप्रसंगातील क्रम सारखा असतो . खालपासून वरपर्यंत ‘युद्धप्रसंग- वीराचे स्वर्गारोहण – स्वर्गवासी वीर – शिखर याच क्रमाने शिल्पे कोरतात. यामध्ये आढळणारी विविधता....
१} युद्धप्रसंग :-
वीरगळ मध्ये तळातील चौकटीत तो युद्धप्रसंग कोरतात, त्यात वीरास वीरमरण येते. काहींमध्ये तळातील दोन चौकटीत दोन युद्धप्रसंग दिसतात. हे दोन्ही युद्धप्रसंग एकाच वीराचे असून एकाच किंवा लागोपाठच्या युद्धातील असतात. काही ठिकाणी तळातील चौकटीत धारातीर्थी पडलेला वीर दिसतो.
युद्धप्रसंगात वीर व त्याच्याविरूद्ध लढणारे शत्रू यांची शिल्पे दिसतात. वीरांची वेशभूषा, शत्रूसंख्या, सर्वांच्या हातातील शस्त्रे यांचे निरीक्षण करावे.
येथे- पायदळ, घोडदळ, गजदळ, नौकायुद्ध, द्वंद्वयुद्ध यांसारखे विविध युद्धप्रकार आढळतात.
छायाचित्रे –
(१.१) यामध्ये एक वीर ढाल तलवार घेऊन दोन शत्रूंपासून लढताना दिसतो. हे पायदळातील युद्ध आहे.
१.२) या छायाचित्रात वीर एका शत्रूसोबत तलवारीने लढताना दिसेल. हे द्वंदयुद्ध आहे.
(१.३) येथे दोन युद्धप्रसंग आढळतात. प्रथम वीर चार पायदळ सैनिकांविरुद्ध लढत आहे. त्यावरच्या चौकटीत तो अश्वावर स्वार होऊन लढताना दिसेल.
हे दोन्ही युद्धप्रसंग एकाच किंवा लागोपाठच्या युद्धातील आहेत.
(१.४) यामध्येही दोन युद्धप्रसंग दाखवले आहेत. पहिल्या प्रसंगात वीर हत्तीवर स्वार होऊन लढत आहे. त्यावरच्या चौकटीत तो पायीच एका घोडेस्वार शत्रूविरुद्ध लढतोय.
(१.५) यामध्ये शेवटच्या चौकटीत धारातीर्थी पडलेला वीर दिसतो. त्यावरच्या चौकटीत तो दोन शत्रूंसोबत लढत आहे. असा प्रसंग कोरला आहे. त्याच्या हातात ‘फिरंगी’ तलवार आहे.
२} स्वर्गारोहण :-
युद्धप्रसंगाच्या वरच्या चौकटीत वीराचे स्वर्गारोहण दाखवतात. धारातीर्थी पडलेल्या विराला अप्सरा कैलासात नेत आहेत , या आशयाचे शिल्प असते. वीर नेहमी मध्यभागी असतो.
वीरासोबत जितक्या जास्त अप्सरा, तितका तो वीर मोठ्या पदावरचा समजावा. काही ठिकाणी विराला पालखीचा मान मिळतो.
छायाचित्रे :
(२.१)या वीरगळामध्ये वीरासोबत दोन अप्सरा दिसतात.
(२.२) यामध्ये वीरासोबत चार अप्सरा कोरलेल्या आहेत.
(२.३) वीर पालखीत बसून स्वर्गास गेलेला दिसतो.
(२.४)येथे वीर प्रथम पालखीतून व नंतर पायी चालत स्वर्गाकडे मार्गस्थ झालेला आहे.
३) स्वर्गवासी वीर:
सर्वात वरच्या चौकटीत वीर स्वर्गास गेलेला दाखवतात. वीर शिवलिंग पुजताना दिसतो. वीरासोबत शिवगणही आढळतील. वीर डाव्या बाजूस तर शिवगण उजव्या बाजूस असतात.
काही वीरगळांमध्ये वीर – फक्त शिवलिंग , काहींमध्ये नंदीवरील शिवलिंग पूजताना दाखवतात. काहींमध्ये तर वीराला प्रत्यक्ष भगवान शिव पूजनाचा मान मिळतो. वीराच्या अधिकारपदानुसार ही विविधता आढळते.काही दुर्मिळ वीरगळांमध्ये स्वर्गवासी झालेला वीर त्याची आराध्य देवता अथवा त्याच्या पंथाची देवता पूजताना दिसतो. मग ती विष्णू, सरस्वती, गणपती अशी कोणतीही असू शकते...
छायाचित्रे :
(३.१) यामध्ये वीर शिवलिंग पूजताना दाखवला आहे. सोबत एक शिवगणही दिसतो.
(३.२) यामध्ये वीर नंदीवरील शिवलिंग पुजत आहे. सोबत सहा-सात शिवगण सनई व इतर वाद्ये वाजवताना दिसतात.
(३.३)
यामध्ये वीराला प्रत्यक्ष भगवान शंकर पूजन्याचा मान मिळाला आहे.
४} शिखर :
वीरगळांचा सर्वात वरचा भाग म्हणजे शिखर. काही वीरगळांमध्ये शिखर आढळत नाही.
शिखारामध्ये विविध शिल्पे – शुभलक्षणी चिन्हे कोरलेली असतात. येथे कलशासोबत पक्षी कोरले असतील तर त्यास कलशवाहक व प्राणी असतील तर त्यांना कलशसंरक्षक म्हणतात. याशिवाय येथे चंद्र-सूर्य, किर्तीमुख, कमळपुष्प यांसारखी शिल्पे आढळतात.
छायाचित्रे :
(४.१) या वीरगळामधील शिखरावर कलश कोरला आहे. कलश स्वर्गारोहनाचे प्रतिक आहे.
(४.२) यामध्ये कलशासोबत चंद्र सूर्यही कोरलेले आहेत. वीरांची कीर्ती आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत राहो, हा त्यामागचा उद्देश !
(४.३) या छायाचित्रात शिखरावर मयुरशिल्पे दिसतात. ते सुंदरतेचे प्रतिक आहेत.
(४.४) येथे शिखरावर रत्नशाखा व कमळपुष्प आढळते. ती समृद्धीची प्रतिके म्हणून कमळपुष्प कोरतात.
(४.५) या ठिकाणी काळाशासोबत सिंह दिसतो. येथे सिंह कलशसंरक्षक आहे.
(४.६) येथे कलश व त्याच्या बाजूला हत्ती, कीर्तिमुख आढळतात. ते कलशसंरक्षक म्हणून कोरले असावेत.
(४.७) या छायाचित्रात कलशासोबत मारुती दिसतो. हुतात्मा वीराचे इष्ट दैवत म्हणून मारुती कोरला असावा.
(४.८) या छायाचित्रात एक पादुका, ढाल व सतीचा हात कोरला आहे. या वीराची पत्नी सती गेली , त्यामुळे येथे सतीचा हात दिसतो.
(४.९) येथे शिखरावर कीर्तिमुख कोरलेले आढळते. कीर्तिमुख मनुष्याचे पाय खाते, अशी दंतकथा आहे.
गोधनगळ :
वीर जर त्याच्या गोधनाचे रक्षण करताना हुतात्मा झाला असेल तर त्याच्या स्मरणार्थ गोधनगळ उभारतात.
यामध्ये शेवटच्या चौकटीत धारातीर्थी वीर त्याच्या गोधनासोबत दाखवतात. त्यावर युद्धप्रसंग , स्वर्गारोहण प्रसंग, स्वर्गवासी वीर, शिखर असे अनुक्रमे कोरतात.
व्याघ्रशिल्प असलेला वीरगळ:
वाघाला मारताना वीर मुत्युमुखी पडला असेल तर त्याच्या स्मरणार्थ व्याघ्रगळ उभारला जाई.
यात तळातल्या चौकटीत वीर वाघासोबत लढताना दाखवला जात असत. त्यावर स्वर्गारोहण , स्वर्गवासी वीर, शिखर कोरलेले असत.
स्तंभ वीरगळ :
काही ठिकाणी एकाच दगडाच्या चारही बाजूला चार वीरगळ कोरलेले आढळतात. ते चार वेगवेगळ्या वीरांच्या स्मारके असतात.
या चारही वीरगळमधील चार वीर एकाच कुटुंबातील/गावातील असतात. ते सर्व एकाच युद्धात मारले गेले असतील, तर त्यांचे स्मारक अशा स्वरूपाचे आढळते.
वीरांगनागळ :
इतिहासातील काही वेळा पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही रणांगणात उतरावे लागले. या युद्धात योद्धा स्त्रियांना वीरमरण आले. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ वीरगळप्रमाणे वीरांगनागळ उभारली गेली.
आत्मबलिदानवीरगळ :
ही दुर्मिळ प्रकारची वीरगळ . युद्धदेवतेस बळी लागतोच अशी आपल्याकडे समजूत आहे. त्यामुळे युद्ध सुरु होण्याआधी एखादा धैर्यवान वीर आपली मान कापून शीर समरभूमीस अर्पण करी. त्याच्या स्मरणार्थ आत्मबलिदानवीरगळ उभारीत. फलटण शहरातील स्मशानभूमीजवळ आत्मबलिदानगळ पहायला मिळते.
वीराच्या अधिकारपदानुसार वीरगळात आढळणारे बदल
युद्धात गावकरी ,सामान्य शेतकरी यांच्यापासून ते सेनापती, राज्यापर्यंत कोणीही मृत्युमुखी पडे.
या वीरांच्या अधिकारपदानुसार वीरगळात काही फरक असतात.
१} मोठ्या वीरांच्या वीरगळ आकाराने मोठ्या असतात.
२} स्वर्गारोहण प्रसंगात वीरासोबत जितक्या जास्त अप्सरा तितका तो वीर मोठा समजावा. मोठ्या पदावरचे वीर पालखीतून स्वर्गारोहन करताना दाखवतात.
३} सामान्य वीराला शिवलिंग पूजनाचा मान मिळतो. मात्र वीर मोठ्या पदावरचा असेल तर त्यास नंदीवरील शिवलिंग किंवा भगवान शिवपूजनाचाही मान मिळतो. तसेच स्वर्गात त्याच्यासोबत जास्त शिवगण दाखवतात. शिवगण वाद्ये वाजवताना दिसतील.
४} मोठ्या पदावरील वीरांच्या वीरगळात शिखर कोरतात. तिथे शुभलक्षणी चिन्हेही दाखवतात.
सतीशीळा :
पूर्वी पती मरण पावला की त्याच्या पत्नी सती जात. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सतीशिळा उभारत. सतीशिळेत सतीचा हात चुडेमंडीत कोरत असत तसेच ती स्वर्गात तिच्या पतीसोबत शिवलिंग उजळताना दाखवत. काही वेळा सती स्त्रीची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढली जाई. त्यामुळे क्वचित सतीशिळांवर सती घोड्यावर बसलेली दाखवतात. बऱ्याचदा वीरांच्या एकापेक्षा अनेक सती जात. तेव्हा जितक्या पत्नी सती गेल्या तितके हात सतीशिळेवर कोरले जात.
गद्देगळ:
एखाद्या मंदिरात दान दिले, वर्षासन दिले की त्याचा भंग होऊ नये म्हणून गद्देगळ उभारत. यात गाढव व स्त्रीचे संकर करतानाचे शिल्प असते. त्यावर चंद्र सूर्य असतात.
मंदिरात दिलेले वर्षासन / दान आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहो असा त्याचा अर्थ. या शिल्पांच्या वर-खाली मोकळ्या जागेत शिलालेख असतो.
यात मंदिरास दिलेल्या इनामाबाबत व शापवाणीबद्दल {शिवीचा} उल्लेख आढळतो.
गद्देगळ एक प्रकारची शापवाणीच आहे. मंदिरास दिलेले वर्षासन जो मोडेल किंवा मंदिराचे इनाम चोरेल/ त्याचा गैरवापर करेल त्याला हा शाप लागतो, हा गद्देगळ कोरण्यामागचा उद्देश.
वीरगळांच्या व्यथा :
युद्धात धारातीर्थी पडलेल्या किंवा परकीय आक्रमणापासून गावचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्यांचे स्मारक म्हणजे वीरगळ. पण आज त्यांची ओळख हरवली आहे. ते कुठेतरी महादेवाचे मंदिर , ग्रामदैवत किंवा गावकुसाबाहेरील दुर्लक्षित व भग्न अवस्थेत दिसतात. काही ठिकाणी तर देवाचे दगड म्हणून पूजले जातात. बहुतांश वीरगळांना शेंदूर फासल्याने त्याची झीज होते. सतीशिळा आणि गद्देगळ यांचीही तीच अवस्था. अज्ञात वीरांच्या स्मारकांची ही अवस्था म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अपमान !
वीरगळांची अशी उपेक्षा थांबली पाहिजे. त्यांना त्यांची हरवलेली ओळख मिळवून देणे, त्याबाबत जनजागृती करणे ही आपली जबाबदारी आहे. इतिहासप्रेमी म्हणून वीरगळ संवर्धनासाठी नेहमी प्रयत्नशील असावे.
वीरगळ संवर्धन
वीरगळांची अवस्था खूप वाईट आहे. आपण त्यांचे संवर्धन केले पाहिजे. वीरगळांना शेंदूर किंवा रंग थापू नये, यासाठी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. अस्ताव्यस्त पडलेल्या वीरगळ त्यांना ऊन वारा पाऊस लागणार नाही , अशा ठिकाणी ठेवाव्यात . त्यामुळे त्यांची झीज थांबेल. जमल्यास वीरगळबाबत माहिती देणारा बोर्ड तिथे लावावा. पुरातत्व खात्याकडे वीरगळ नोंदणीचे फॉर्म मिळतात. त्यामार्फत वीरगळ नोंदणी करावी.
आपली संस्कृती राखणाऱ्या वीरांना मानवंदना म्हणून एवढेतरी आपण करूच शकतो !!!
बा रायगड परिवाराने दुर्ग श्रीसुधागड वर केलेले वीरगळ संवर्धन.
कोल्हापूर जिल्ह्यात कसबा बीड येथे शिवशक्ती प्रतिष्ठान ने वीरगळींचे खूप सुंदर स्मारक बनवले आहे .
लेख लिहिताना ....
वरील लेख लिहिताना श्री. सदाशिव टेटवीकर यांच्या ‘महाराष्ट्रातील वीरगळ’ या पुस्तकाची खूप मदत झाली.
तसेच सतीश शिंदे {सह्याद्रीवेडा} , सागर सुर्वे, संतोष तुपे, अमित निंबाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्वप्नील खलाटे, संतोष तुपे, श्रीराम कुलकर्णी, बा रायगड परिवार यांनी छायाचित्रे पुरवली. हा लेख निखील आघाडे यांच्यामुळे pdf स्वरुपात आला.
लेख बनवण्यास मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचे मनपूर्वक आभार....
संकलन/लेखन – सुजय खलाटे
(ब्लॉग मध्ये काही त्रुटी असल्यास कमेंटबॉक्स मध्ये नक्की कमेंट करा .)
No comments:
Post a Comment