पुणे–अहमदनगर रस्त्यावरील शिरूर गाव ओलांडले की नदी पार केल्यानंतर आपण शिरूर, अर्थात पुणे हद्द संपवून पारनेर अर्थात अहमदनगर हद्दीत प्रवेश करतो. शिरूरहून साधारणपणे साडेसात-आठ कि.मी. वर डावीकडे पारनेर फाटा लागतो. या फाट्याने आत साधारण चार-साडेचार कि.मी.वर सुप्रसिद्ध 'राळेगण (सिद्धी) हे गाव व त्या पुढे साधारण तेरा कि.मी. वर 'पारनेर' हे तालुक्याचे गाव लागते.
पारनेरमधील ऐतिहासिक वास्तू
ऋषी पराशर यांच्या नावावरून पारनेर हे नाव या तालुक्याला लाभले, असे मानण्यात येते. पारनेर तालुक्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातील दोन नगरकोट - जामगावचा व पळशीचा नगरकोट याची थोडक्यात माहिती इथे देत आहे. नगरकोट म्हणजे चहुबाजूंच्या तटबंदीच्या आत वसलेले नगर अथवा गाव.
या गावची सीमा विस्तार-वाढीमुळे रुंदावली असून पूर्वी गावाभोवती असलेली तटबंदीही आज दिसत नाही; मात्र, गावच्या पूर्व व पश्चिम बाजुस वीस-पंचवीस फूट उंचीचे एकेक असे दोन दरवाजे व त्याच्या बाजूंस बुरुज तेवढे पहायला मिळतात. हे दोन्ही दरवाजे गावच्या बाजारपेठेतून जाणाऱ्या मुख्य रस्त्याने एकमेकांना जोडले गेलेले आहेत.
पश्चिम दरवाजाच्या बाजूस दोन बुरूज असून पैकी एक आज पुर्णपणे नामशेष झालेला आहे तर दुसरा कसाबसा तग धरून आहे. शेजारीच एक मारुती मंदीर असून या मंदिरआवारात चार वीरगळ अर्धवट गाडलेल्या अवस्थेत पहावयास मिळतात. एक 'पंजात हत्ती पकडलेले शरभशिल्प' व एक 'कोरीव मुर्ती' असे दोन अवशेष मात्र मारुती मंदिराशेजारी उघड्यावरच ऊन, पाऊस झेलत तशाच पडून असलेले पहावयास मिळते.
 |
| पारनेरचा पूर्व दरवाजा |
पूर्व दरवाजाच्या बाजूसही दोन बुरूज असून यातील एका बुरुजावर बाहेरील बाजुस तीन दगडावर देवनागरी लिपीत एक शिलालेख कोरलेला दिसुन येतो. दोन्ही बुरुजांना बाहेर, खालील बाजुस पाणी बाहेर सोडण्यासाठी व्याघ्रमुखही बसविलेले आहेत. बाहेरील बाजुस समोरच एक कोरीव दगडी खांब असलेले प्राचीन शनी मारुती मंदीर असून या मंदिराच्या आवारात देखील एक 'शरभशिल्प, दोन विरगळ व एक तोफगोळा' असे अवशेष पडून आहेत. उजव्या बाजूस काही अंतरावर एक दगडी बांधकामातील चौकोनी आकाराची, वापरात नसल्याने मोठया प्रमाणात गाळ व कचरा साचलेली, पायरी-बारव असून तीमध्ये एका दगडावर देवनागरी लिपीत 'शके १६८८' असे कोरलेले आहे. समोरच काही अंतरावर एक दर्गाही दिसुन येतो. दुसऱ्या दरवाजापासून साधारणपणे तीनेकशे फुटांवर अधिक सुरक्षिततेच्या हेतुतून परकोटसदृश बांधकाम केलेले दिसत असून त्याचा दरवाजा मात्र आज ढासळलेला आहे. बाजूंस असलेले दहा फुट उंचीचे दोन बुरूजही असून समोरच नव्याने बांधलेले गणेशमंदिरही आहे.
या गावात, आतल्या बाजूस, साधारणपणे दीड-दोन एकरात सरदार दाभाडे यांचा जुना वाडाही आहे, जो आज पूर्णपणे पडझड झालेला आहे. या ठिकाणी नगरपंचायतीची सुसज्ज प्रशासकीय इमारत बनवण्याचा पारनेरकरांचा मानस आहे.
साधारणतः अर्ध्या तासात हा परिसर पाहून होतो.
पारनेरच्या आसपासची आणखी काही ऐतिहासिक तथा धार्मिक स्थळे :
पारनेरच्या पश्चिमेस गणेशखिंडीमध्ये भालचंद्र गणपती नामक एक देवस्थान असून मूळ पारनेरमधीलच स्वातंत्र्यसेनानी सेनापती महादेव बापट हे ब्रिटिश काळात या ठिकाणी भूमिगत राहून गावठी बॉम्ब बनवायचे. या प्रकरणी त्यांना ब्रिटिशांकडून पकडण्यातही आले होते. आज पारनेरकरांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या राहत्या जागीच एक छानसे हुतात्मा स्मारक बनवले असून एक 'सांस्कृतिक सभागृह' म्हणून याचा वापर केला जातो. तसेच अगदी रास्त दरात येथे विविध सांस्कृतिक, धार्मिक, व राजकीय कार्यक्रमांस अनुमती दिली जाते व झालेल्या अर्थलाभातून या स्मारकाची देखभाल-दुरुस्ती केली जाते.
 |
| पारनेरजवळील श्री सिद्धेश्वर मंदिर |
पारनेरपासून जवळच साधारण चार कि.मी. वर एक छानसं पुरातन सिद्धेश्वर मंदिर असून ही पाराशर ऋषींची तपोभूमी होती, असं स्थानिक सांगतात. आत खोलवर असलेल्या गाभाऱ्यात शिवपिंड असलेल्या या मंदिराच्या आवारात गरम पाण्याचे कुंडही आहेत, असेही सांगितले जाते. या मंंदिराभोवतालचा परिसरहीी अगदी निसर्गरम्य असाच आहे.
छत्रपती शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून ख्याती पावलेले, महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून ज्यांचा सहभाग होता असे गुप्तचर प्रमुख बहिर्जी नाईक हे ही अहमदनगरचेच!
त्यांचं मूळ गाव नगर तालुक्यातील 'शिंगवे' (नाईक) तर जन्मगाव तथा मुळ गाव पारनेर जवळील हंगा हे होय, असं पारनेरकर अभिमानानं सांगतात. येथून जवळच नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथेही त्यांचं वास्तव्य असल्याचं सांगितलं जातं. हेरगिरीनिमित्ताने ते नेहमी फिरत असत. सांगली जिल्ह्यातील बाणूरगड तथा भूपाळगड येथे या महान गुप्तहेराची समाधी आहे.
पारनेरहून साधारण तीस कि.मी. असलेलं पिंपळगाव (रोठा) गावाजवळील कोरठण येथील खंडोबा मंदीर, टाकळी हाजी येथील जगप्रसिद्ध जलकुंड तथा रांजणखळगे, आदरणीय आण्णा हजारेंचं राळेगण (सिद्धी), श्री.संत निळोबाराय यांची समाधी असलेलं व पंचक्रोशीत प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेलं पिंपळनेर ही सर्व ठिकाणे अवश्य पहावीत, अशीच आहेत.
 |
| टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे व निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर या दोहोंची सीमाहद्द विभागणाऱ्या कुकडी नदीतील जगप्रसिद्ध रांजणखळगे व दोन्ही तीरावरील मातामंदिरे |
याशिवाय 'अळकुटी' येथील 'सरदार कृष्णाजी कदमबांडे' यांचा वाडा, 'कान्हूर (पठार)' येथील 'सुप्रसिद्ध पानिपत योद्धे 'नारो बाबजी अभ्यंकर' यांचा 'नगरकरवाडा' ही यात सामावून घेता येतील अशी काही ठिकाणं आहेत. अजून शोध घेतला तर आणखीही काही ठिकाणं नक्कीच सापडतील.
शिवाय, परतीचा प्रवास रांजणगाव (गणपती) मार्गे केल्यास अष्टवनायकांपैकी एक अशा महागणपतीचे मनस्वी दर्शनही घडू शकेल. मात्र, यासाठी स्वत:चे वाहन नि तीन दिवस जर उपलब्ध केले तर मित्रमंडळी तथा कुटुंबासह हे एक 'मुक्त नि सुखावह' असं ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन तर नक्कीच होईल यात शंका नाही!
सिद्धेश्वर मंदिर :-
पारनेरच्या पुढे ४ किमीवर दोन ओढ्यांच्या संगमावर सोमेश्वर मंदिर आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पराशर ऋषींची तपोभुमी होती असे स्थानिक लोक मानतात. या जागेत सध्या असलेल्या सोमेश्वर मंदिराचे बांधकाम मात्र मध्ययुगात झालेले असावे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी ओढ्यावर बांधलेला पुल ओलांडावा लागतो. येथे दोन्ही ओढ्यांवर बांधारे बांधून पाणी अडवलेले आहे. येथुन मंदिराचे होणारे प्रथम दर्शन आपल्याला या जागेच्या प्रेमात पाडते. सिद्धेश्वर वाडी मंदिर!उन्हातही चाफाच्या झाडांनी नटलेला परिसर दुरूनच मोहक दिसत होता.पावसाळ्यातल्या पाचुंनी तर कमाल होत असणार.मंदिरासाठी या जागेची योजना ज्याने केली तो खरच निसर्गप्रेमी रसिक माणूस असणार.
 |
| सोमेश्वर मंदिर, पारनेर |

मंदिर परिसरात शंकराची दोन मंदिर आहेत .एक भूमिगत आणि एक मुख्य मंदिर आहे.आधी भूमिगत पिंडीचे दर्शन घेतले.संगमरवरी पिंड आणि जवळच संगमरवरी पार्वतीची मूर्ती होती.

मंदिराबाहेर एक दगडी मंडप आहे .त्यामध्ये एक भली मोठी घंटा टांगलेली आहे.वसईतल्या विजयानंतर मराठ्यांनी चर्चसाठीच्या घंटा आणून आपल्या देवस्थानांना अर्पण केल्या त्यातील ही एक घंटा आहे,त्यावर क्रासही नीट पाहिल्यास दिसतो.पूर्वी ह्या मंडपाचा /चतुष्कीचा वापर यज्ञासाठी होत असावा.


उजव्या बाजुलाच महाभूनाव पंथाचे चक्रधर स्वामी यांचे स्थान आहे.भव्य नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात जावे.
मंदिराच्या प्रांगणात जमिनीवर बांधलेला एक घुमट आहे . घुमटाखाली उतरण्यासाठी पायर्या आहेत. पायर्या उतरुन गेल्यावर छोटासा काळोखी गाभारा आहे. त्यात पिंड आहे. गाभार्यात हवा खेळती राहावी यासाठी छ्ताला झरोके आहेत. हे मंदिर खास ध्यानधारणा करण्यासाठी बनवलेले असावे.
मूळ गाभाऱ्यात पिंडीजवळ. आवाजाचा प्रति ध्वनी ऐकू येतो. “ओम नम: शिवाय” हा जप सुरु केला तर खूपच सुंदर वाटत होते.
 |
| सोमेश्वर मंदिर, पारनेर |
मुख्य मंदिर दगडात बांधलेले आहे. मंदिराच्या भिंतींवर कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम किंवा मुर्ती नाहीत. मात्र मंदिराच्या परिसरात अनेक जीर्ण मुर्ती व्यवस्थीत ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्या जुन्या मंदिराच्या असाव्यात. आजूबाजूला असंख्य पिंडी आहेत,काही छोट्या काही मोठ्या आकाराच्या आहेत.जुन्या काळातल्या महिषासुर मर्दिनी,शंकर पार्वती,विष्णू लक्ष्मी,गणपती अशा अनेक मूर्ती दिसतात.तसेच मंदिराची रचना पाहून हे यादव कालीन मंदिर असावे आणि जीर्णोधार पेशवाईत झाला असावा हा अंदाज आहे.
 |
| पुष्कर्णी, सोमेश्वर मंदिर, पारनेर |
पुढेच मंदिराच्या वरच्या बाजूस पुष्करणी आहे.तिथे एक शिलालेखही दिसतो.
विठ्ठल रखुमाईची सोनेरी डोळ्यांची अखंड काळ्या पाषाणातली भरीव मूर्तीने हृदय चोरून घेते.अक्षरशः डोळ्यांचे पारणं फिटले.
मंदिर पाहून परत पुलापाशी येऊन मंदिराच्या विरुध्द दिशेला गेल्यास दगडात बांधलेली सुंदर पुष्कर्णी आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या कमानदार ओवर्या पाहायला मिळतात. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काही महिन्यात हा परिसर नितांत सुंदर दिसतो. एक गरगरीत दगडी गोल घुमट दिसतो. दरीच्या दिशेने खाली जाणाऱ्या पायऱ्या उतरल्यावर डावीकडेच पराशर ऋषींचे स्थान आहे.आणि समोर प्रचंड दरी.अनेक पक्ष्यांची साद ऐकू येते.
जाण्यासाठी :- कल्याण - नगर रस्त्यावर नगरच्या अलिकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याणपासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता (अंतर २५ किमी) अंतरावरील पळशी गावाकडे जातो. कल्याण ते पळशीचा किल्ला हे अंतर १९१ किमी आहे. (पुणे - शिरुर - पारनेर - टाकळी ढोकेश्वर - पळशीचा किल्ला हे अंतर १३३ किलोमीटर आहे.) पारनेरहून १२ किलोमीटरवर जामगावचा किल्ला आहे. कल्याण ते जामगावचा किल्ला हे अंतर २०३ किमी आहे. जामगावचा किल्ला पारनेर जामगाव रस्त्याला लागून आहे. पारनेर गावातून ४ किलोमीटरवर सोमेश्वर मंदिर आहे. (पुणे - शिरुर - जामगावचा किल्ला हे अंतर १०५ किलोमीटर आहे.)
जामगाव नगरकोट – महादजी शिंदे यांचा वाडा :-
पेशव्यांचे शूर सेनापती आणि इंग्रजांकडून ‘द ग्रेट मराठा’ अशी उपाधी मिळालेले महादजी शिंदे (१७३०-१७९४) यांनी जामगाव येथे हा नगरकोट निर्माण केला. एका टेकडीवर दगडी तटबंदी आणि चार वेशींमध्ये याचे बांधकाम आहे. सन १९५५ मध्ये हा व श्रीगोंदा येथील भुईकोट, असे दोन्ही भुईकोट महादजी शिंदे यांचे वंशज श्री. जिवाजीराजे शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेला दान स्वरूपात दिला असून आज या कोटात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षण पदविका महाविद्यालय चालविले जात आहे.
 |
| पूर्वाश्रमीचे जामगाव भुईकोटाचे तथा महादजी शिंदे यांच्या वाड्याचे प्रवेशद्वार अर्थात आजचे रयत शिक्षण संस्थेचे अद्यापक महाविद्यालय प्रवेशद्वार |
जामगावचा हा भुईकोट सुमारे शहाऐंशी एकरभर जागेत वसला असून त्याला कोट व परकोट अशी दुहेरी तटबंदी आहे आणि विशेष म्हणजे अजूनही ती बव्हंशी सुस्थितीत आहे.जामगावच्या भुईकोटाला एका टेकडीची पार्श्वभूमी आहे.पण टेकडीच्या संरक्षणाची काही व्यवस्था केलेली आढळत नाही. मागे असलेल्या टेकडीपर्यंत दोन्ही बाजूने ही तटबंदी वर चढवून हा कोट अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळेच कोटाचे आतले बाजूस, टेकडीवर, राजपरिवारासाठी असलेला वाडा, जणू बालेकिल्लाच आहे. या कोटास एकोणीस बुरुज नि चार दरवाजे आहेत; पैकी, यातील पूर्वाभिमुख प्रवेशद्वार सोडलं तर उर्वरित तीनही दरवाजे आजमितीला पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
जामगाव वाडा प्रवेशद्वार
जामगाव पारनेर रस्त्यावर मळगंगा मंदिराच्या समोर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. सध्या हा दरवाजा बंद केलेला आहे पण त्याच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज आणि तटबंदी आजही सुस्थितीत आहे. हा दरवाजा पाहून रस्त्याने पुढे गेल्यावर किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा दिसतो.
वाड्यासमोरील मारुतीराया
या दरवाजाच्या समोरच्या बाजूला रस्त्याच्या पलिकडे हनुमानाचे मंदिर आहे. हनुमानाचे दर्शन घेऊन किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर दुहेरी तटबंदी दिसते या तटबंदीत महादजी शिंदे यांचा वाडा आहे. या दरवाज्यातूनच पुढे परकोट (वाडा)कडे जाताना वाटेत अनेक जुनी मंदिरे, बांधकामे दिसतात.
जामगाव येथील जुनी मंदिरे
पूर्वाभिमुख दरवाजातून आतमध्ये प्रवेश करताच डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर आपल्याला दगडी बांधकाम असलेलं एक मंदिर दिसते; ते राममंदिर असून त्यात राम- लक्ष्मण- सीता यांच्या मुर्ती आहेत तर त्याच्यासमोर एक छोटे घुमटीवजा मंदिर असून तेथील हनुमानाची मूर्ती चांगलीच भव्य अशी पंधरा फुट उंचीची आहे. या राममंदिरासमोरच, दुसरे एक मंदिर असून ते विठ्ठल रखुमाईचे आहे. ही मंदिरे दुर्लक्षित असल्याने अस्वच्छही आहेत. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचे बंद केलेले दोन दरवाजे आहेत. दोन्ही मंदिरे पाहून परत वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. यात उजव्या बाजूला तीन कमानी असलेली एक मस्जिद दिसते तर डाव्या बाजूला एक वीटांनी बांधलेली पडकी इमारतही पाहायला मिळते. दोन्ही मंदिरे पाहून आल्या वाटेने परत वाड्या कडे जाणार्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. कारण पूर्वीच्या काळी या किल्ल्यातच जामगाव वसलेले होते. नंतरच्या काळात ते किल्ल्या बाहेर वसवण्यात आले. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला मजबूत तटबंदी पाहायला मिळते. वाड्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला पुढील बाजूने दुहेरी तटबंदी बांधलेली पाहायला मिळते. हि तटबंदी ओलांडल्यावर वाड्याच्या भोवतीची तटबंदी आणि त्यात असलेला छोटा दरवाजा दिसतो. वाड्यात प्रवेशासाठी पुन्हा दोन दरवाजे आहेत. त्यातील सध्याच्या मोठ्या दरवाजातून आत गेल्यावर समोरच चंद्राकृती विहीर नजरेत भरते. विहिरीची खोली १५० फूट असून पाणी काढण्यासाठी मोटेची व्यवस्था आहे.
 |
भुईकोटाची बुरुजरचना
|
या तटबंदीला एकूण सहा बुरुज आहेत. दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा दिसतात. समोरच्या बाजूला आठ पायर्या आहेत त्या चढून गेल्यावर आपण वाड्या समोर येतो.
 |
| मुख्य प्रवेशव्दार, जामगावचा भुईकोट |
वाडा दुमजली आहे. वाड्यात अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असल्याने त्यात काही बदल केलेले आहेत. वाडा पूर्ण फ़िरुन पाहाता येतो. शिंदे यांचा हा वाडा तीनमजली व दोनचौकी आहे. वाड्यासमोर उजव्या बाजूला दगडी बांधकामाची साधारण दिडेकशे फुट खोल अशी प्रशस्त विहिर असून विहीरीतील पाणी खेचण्यासाठी मोटेची व्यवस्थाही आहे. वाड्याच्या प्रवेशद्वारावर छान नक्षीकाम असून त्यावर शिंदे घराण्याचे राजचिन्हही कोरलेले दिसते. चौकाच्या रचनेत दोन भाग तथा टप्पे असून खालच्या आणि वरच्या अशा दोन्ही टप्प्यांत आज छानपैकी बाग फुलविण्यात आल्याचे दिसते. वरच्या रचनेत बव्हंशी शोभेची तर खालच्या टप्प्यातील रचनेत सगळीच झाडे ही औषधी वनस्पती आहेत. हे दोन्हीं टप्पे एकमेकांना, दोन टप्प्यातील पायरीमार्गाने जोडलेले आहेत. या बागेला कर्मवीर भाऊराव पाटील औषधी वनस्पती बाग असे नावही दिलेले आहे. किल्याच्या तटबंदीबाहेरही सुंदर अशी सागबागही महाविद्यालयाकडून बनवण्यात आलेली असून एका बुरुजाच्या बाह्यबाजूस तसे लिहिलेले आढळून येते. खालील टप्प्यावरुन वर चढून गेल्यावर मुख्य दरवाजातून आत जाण्यापूर्वी भिंतींवर आजमितीला आपल्याला कर्मवीरांच्या जीवन व कार्याचा पट आणि शिंदे राजघराण्याची वंशावळ व कार्य इ. नमूद केलेले दिसून येते. बाजूस, 'ही मालमत्ता खाजगी असून ती पाहण्यासाठी पूर्वपरवानगी व पाहण्यापूर्वी ओळखपत्र दाखवून तशी नोंदवहीत नोंद करणे आवश्यक असल्याचे तसेच झाडे, वनस्पती यांना हात न लावणे, पाणी जपून वापरणे, वाड्याच्या आतील व बाहेरील बाजूस, भिंती-बुरुजांवर काही लिहून विद्रुपीकरण न करणे नि विशेष म्हणजे वाड्याचे आतील व बाहेरील बाजूची छायाचित्रे काढू नयेत', असेही महाविद्यालयाच्या वतीने नमूद केलेले आहे.
 |
| शिंदेंचा वाडा, जामगाव किल्ला |
वाड्यात शिरताच सल्लामसलतीचा एक छोटेखानी दरबार दिसतो. तिथे असलेल्या लाकडी खांबांवर सुंदर कोरीव नक्षी पाहायला मिळते. कोपर्यात एक खोली आहे, जेथे महादजी शिंदे यांची तसबीर आहे. समोर वाड्याचा मोठा चौक आहे.
महादजी शिंदे यांची तसबीर
जामगाव वाड्याचा चौक
सोप्यातून असलेला जिना चढून वरच्या मजल्यावर जाता येते. वरील मजल्यावर आकर्षक नक्षी असलेल्या खिडक्यांचे झरोके आहेत. बांधकामातच बनवलेल्या कुंड्याही छान आहेत. शेवटच्या मजल्यावरून सभोवतालचा आकर्षक परिसर नजरेत भरतो.
जामगाव वाडा खिडकीची नक्षी
जामगाव वाडा बांधकामातील कुंडी
राजदरबाराच्या चौकामध्ये असणाऱ्या प्रत्येक खांबावर सुबक नक्षीकाम आहे. वाड्याच्या एका कोपऱ्यात महादेवाचे लहानसे मंदिर आहे. वाड्याच्या मजल्यावर जाण्यासाठी सोप्यांमध्ये दोन्ही बाजूला जिने काढलेले आहेत. वाड्यातील महालांना 'रंगमहाल', 'मछलीमहाल', 'आंबेमहाल' व 'मुदपाकखाना' अशी नावे दिलेली आहेत. वाड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याची पडझड झालेली असून तिसऱ्या मजल्यावर भिंतीमधे काही ठिकाणी कोठारे आढळतात. वाड्याच्या भिंतीतही जंग्या असुन वाड्याच्या गच्चीवरून कोटाचा संपूर्ण परिसर न्याहाळता येतो. संपुर्ण कोट पाहाण्यासाठी साधारण तीन ते चार तास लागतात.
 |
जामगाव भुईकोटातील अंतर्गत रचना .. वाड्याच्या चौकात महाविद्यालयाने फुलविलेली औषधी वनस्पती बाग
|
वाडा पाहून विहिरी जवळ वाड्याच्या तटबंदीत असलेल्या दुसर्या दरवाजाने बाहेर पडावे. तेथून वळसा घालून मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी शनिवार किंवा रविवार निवडावा कारण इतर दिवशी कॉलेज चालू असल्यामुळे वाडा पाहाता येत नाही. वाड्याची आता खुप पडझड झाली आहे आणि तो सांभाळणे रयत शिक्षण संस्थेला जड जात असल्याने वाड्याच्या बाजूलाच कॉलेजची नवी इमारत बांधण्यात येणार आहे असे स्थानिक लोक सांगतात.
वाड्यातून बाहेर पडून मुख्य रस्त्याच्या २०० मीटर पुढे पुरातन असे रामेश्वराचे मंदिर आहे. हेमाडपंथी व इतर दगडी बांधकाम असलेली गणपती व इतर देवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या कळसावरील मूर्ती विशेष घडवल्या आहेत. . जामगाव किल्ल्याबाहेर असलेले मध्ययुगीन चक्रधर मंदीर देखील पाहण्यासारखे आहे.
रामेश्वर मंदिर शिखर
मंदिरांच्या दाराखाली विविध कीर्तिमुख आहेत. चाफ्याच्या झाडाखाली निवांत दोन क्षण अद्भुत आनंद वाटला.
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख
रामेश्वर मंदिर कीर्तिमुख
मंदिर परिसरातील चाफ्याचे झाड
 |
महाविद्यालयाने आपल्या आवारात जोपासना केलेला व रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह असलेला वटवृक्ष..
|
कोरठण खंडोबा देवस्थान :-
पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेले कोरठण खंडोबा मंदिर राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. एकेकाळी बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण; पण सर्वोच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतींवर बंदी घातल्यानंतर त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी करणारेही हे गाव ठरले. घडीव मूर्ती नसल्याने दररोज देवाचे नवे रूप येथे पहायला मिळते. जुन्या अनिष्ट प्रथा बंद करून नव्या पद्धती स्वीकारणारे गाव म्हणून याकडे पाहावे लागेल. बाजारू स्वरूप न देता देवस्थानचा सुनियोजित विकास करून जुन्या-नव्याचा संगम साधणारे हे ठाणे तसे निराळेच म्हणावे लागले. मंदिराजवळ सापडलेल्या शिलालेखानुसार १४९१मध्ये त्याचे बांधकाम झाल्याचे आढळून येते. 'बिन टाक्याचा देव' म्हणून याला पूर्वी देवाचे 'कोरं ठाणं' आहे, असे म्हणत. त्यानुसार कोरठण खंडोबा नाव प्रसिद्धीला आले. स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांचे दर्शन होते. पुढे स्वयंभू बारा लिंगे आहेत. 'बिन टाक्याचा देव' हे येथील वैशिष्ट्य. त्यामुळे मूर्तीला दररोज स्थानानंतर वस्त्रे, अलंकार चढविले जातात. स्नानानंतर चंदनाचा लेप लावून त्यावर चांदीचे डोळे चिटकविले जातात. त्यामुळे देवाची मूर्ती दररोज नव्या स्वरूपात पहायला मिळते. पगडी, शाल, फुलांचा हार या पारंपरिक सजावटीत मूर्ती चित्ताकर्षक बनते. आपल्याकडे अनादी काळापासून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांमध्ये खंडोबा देवाला कुलदैवत मानले जाते. भगवान शंकराने मनी आणि मल्ल या दोघाचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाच अवतार धारण केला, तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी होता. खंडोबा अवतार दिवस म्हणूनही चंपाषष्ठीला महत्त्व आहे. पौष पौर्णिमेला खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न झाले हा दिवसही खंडोबाचे ठाणे असलेल्या ठिकाणी महत्त्वाचा. हे सर्व उत्सव कोरठणलाही होतात. समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंच विस्तीर्ण पठारावरील विलोभनीय मंदिर भक्ती आणि निसर्गाचाही प्रयत्य देते. माळशेजपासून ७० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. माळशेजसारखेच निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात या भागात पाहायला मिळते. जिल्ह्यातील उंच देवस्थानांपैकी हे एक आहे. तेथून पुणे व नगर जिल्ह्यातील बऱ्याच भागाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. १९९७ला ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला. त्या दिवशी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराला सुवर्ण कळस चढविण्यात आला. तो दिवस शुद्ध चंपाषष्ठीचा होता म्हणून दरवर्षी चंपाषष्ठीला मोठा आनंदोत्सव व धार्मिक पर्वणी साजरी होते. हा दिवस संतमेळा दिवस म्हणून साजरा केला जातो. आतापर्यंत अनेक मान्यवर संतांना या दिवशी देवस्थानतर्फे निमंत्रित करण्यात आले होते. संताची कीर्तने- प्रवचने आयोजित करून गावकऱ्यांसाठी धार्मिक विचारांची मेजवाणी दिली जाते. वार्षिक यात्रा, उत्सवासोबतच सोमवती अमावस्या, चंपाषष्ठी आणि दर महिन्याची पौर्णिमा या दिवशीही महाराष्ट्रसह, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांमधून लाखो भाविक येतात. मंदिर पुरातन असले, तरी मधल्या काळात उपेक्षित होते. १९८७ पर्यंत देवस्थान परिसरात मोठया प्रमाणात पशू बळीची प्रथा चालू होती. शेकडो बकऱ्या येथे कापल्या जात. स्थानिकांसोबतच बाहेरचे भाविकही येथे येऊन जत्रा साजरी करीत. त्यानंतर पिंपळगाव रोठा ग्रामस्थांनी त्याविरुद्ध मोहीम उघडून, हरिनाम संकीर्तन करून ती प्रथा बंद केली व देवस्थानची विकासकामे हाती घेतली. हा गावातील क्रांतिकारक निर्णय म्हणावा लागेल. तेव्हापासून बदलाची प्रक्रिया सुरू झाली आणि हे ठाणे नावारूपाला आले. एवढेच नव्हे, तर महिलांच्या पुढाकारातून पिंपळगावात दारूबंदी झाली. ग्रामस्थांच्या पुढाकारातून गावातील यात्रेतील तमाशा आणणे बंद झाले. यात्रेच्या दिवशी होणारा काठ्यांच्या मानाचा वादही मिटविण्यात यश आले. कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडी शर्यती बंद करून केवळ बैलगाड्यांचे देवदर्शन ही जुनी प्रथा सुरू ठेवण्यात आली. पूर्वी या ठिकाणच्या बैलांच्या शर्यतीसाठी मोठे बक्षीस नसतानाही चारशे ते साडेचारशे बैलगाड्या येत. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतर आता शर्यत बंद झाली असली, तरी दर्शनासाठी लोक बैलगाडीतून येतात. घरातील माणसेच नव्हे, तर बैलांसह इतरही पाळीव प्राणी खंडोबाच्या दर्शनाला आणण्याची ही प्रथा आहे. दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी भाविकांची कोरठण खंडोबाला गर्दी होते. वर्षभरात सुमारे १५ लाख भाविक येथे भेट देत असल्याचा अंदाज आहे. भाविकांच्या देणगीतून विकासकामे सुरू आहेत. मात्र, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता देवस्थान ट्रस्टमार्फत व्यवस्था करण्यात मर्यादा येत आहेत. सरकारने हे देवस्थान 'क'वर्गातून 'ब'वर्ग दर्जाचे केले, तर जास्त निधी मिळून मोठी कामे करता येऊ शकतील, असे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी सांगितले. पिंपळगाव रोठा गाव आणि मंदिर यामध्ये सुमारे चार किलोमीटरचे अंतर आहे. गावापासून दूर असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारणे तसे कठीणच. यावर मात करीत देवस्थान ट्रस्टने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यातून २० कोटींची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना झाली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पाच कोटींची कामे झाली. त्यामुळे तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या असून भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्थाही होऊ शकते. या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे येण्यासाठी आठ ते दहा रस्ते आहेत. त्यातील बहुतांश पुणे जिल्ह्यातून येणारे आहेत. पुरातन मंदिराचा केवळ जीर्णोद्धारच नव्हे, तर तेथील प्रथा-परंपरांनाही नवे आयाम देण्याचा प्रयत्न देवस्थान ट्रस्ट आणि गावकऱ्यांचे सुरू आहेत.

कोरठण खंडोबा देवस्थान
सभामंडपातील स्तंभ जे हा मंडप खूप जुना आहे हे सूचित करतात.
खंडोबा
यात्रा
प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला येथे ३ दिवसांचा यात्रा उत्सव असतो. पहिल्या दिवशी श्री खंडोबाचे मंगलस्नान व पूजेचा विधी असतो. दुसऱ्या दिवशी पारंपारिक बैल गाड्यांचा देव-दर्शनाचा कार्यक्रम असतो.तिसऱ्या दिवशी काठ्यांचा देव-दर्शनाचा कार्यक्रम असतो. येथे मानाच्या काठ्यांची मिरवणूक होऊन यातेची सांगता होते.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील शिलालेख

स्वयंभू खंडोबा म्हाळसा बानू सह तांदळा

सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार!
नगर -पुणे सीमारेषेवरचे कोरठण खंडोबा,दरवेळी चकवा देत होतं.
मंदिर गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच एक शिलालेख आहे.
पुणे येथील पुरातन शिलालेखांचे अभ्यासक रचपूत यांनी अभ्यास करून या शिलालेखाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. त्यानुसार खंडोबाचे हे पुरातन देऊळ जावजी विश्वासरावांचा मुलगा कुमाजीराव यांनी माघ शुद्ध १५ शके १४९२, १० फेब्रुवारी १५७१ माघ पौर्णिमा प्रमोद संवस्तरे शुक्रवार मघा नक्षत्र व शोभल योग असताना हे बांधले.
श्री क्षेत्र कोरठण खंडोबा मंदिरातील गाभाऱ्याच्या प्रवेशदाराजवळ कोरलेला हा लेख अनेक वर्ष झाकला गेला होता. १९९४ मध्ये मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू असताना हा लेख उजेडात आला. अनेक वर्ष झाकला गेला असल्याने लेख चांगल्या स्थितीत असला तरी पहील्या पाच ओळी पूर्ण वाचता येत नाहीत. शेवटच्या चार ओळी मात्र व्यवस्थित वाचता येतात. संपूर्ण लेख नऊ ओळीचा व खोदीव अक्षरांचा आहे.
लेखाचा मुख्य उद्देश कुमाजीरावांनी शके १४९२ मधे हे मंदिर बांधल्याची माहीती देणे हा आहे.

या लेखाचे वाचन पुढील प्रमाणे ० म्हणजे काय लिहिलंय ते वाचता आले नाही.
१ श्री गणेशाय नमः ०००००००००० पा ह ००० मरन्नी सुत ००० मा सुत २० गौड नायक इति थि तो सदा संमुख भी की तिं ॥१॥ तस्या३ सा सुशीला ००० या ब्राह्मण पोळ ० स्य ना००० स्य निजाम पो वीरवास ० ४० दा ०० ता जना के ना दुर्जय किनीय०० चांदी ०००० बुची ० सीन ०० श्रीद्यानो १० या हि मु० सुमुस्तदीय सुरवात ००० के युगी क० मि ते प्रमेदिते माघे मासेसी तप ६ स्यां ०० दीने सीहगते शरीक ००० राज ००० ६ णा श्रीशके १४९२ प्रमोद स ७ वत्सरे माथ सुद्ध पौर्णमासी सुक्रवासरे मघा नक्षत्रे शोभन नाम योने ००० ८ र सुभदिने श्री जावजी विस्वासराव सुत कुमाजिराव खंडेरायाचे देए
९ तक केळे येणे सु०० श्री भवानि संकर सुप्रसनो भवतु ॥
जावजि विश्वासरावांचा मुलगा कुमाजिराव यांनी माघ शुद्ध १५ शके १४९२ प्रमोद संवत्सर शुक्रवार या दिवशी मघा नक्षत्र व शोभन योग असताना हे मंदिर बांधले.
लेखातील कालोल्लेख सुस्पष्ट व सविस्तर असून सहाव्या व सातव्या ओळीत शक संवत्सर महिना तिची वार नक्षत्र योग या कमाने दिलेला आहे.
माघ शुद्ध १५ शके १४९२ १० फेब्रुवारी १५७१, प्रमोद संवत्सर, शुक्रवार (१), मघा नक्षत्र, शोभन योग लेखात शुक्रवार असा उल्लेख येतो पण पिल्लेजंभीप्रमाणे या दिवशी शनिवार होता.
ओळ क. ३ चे निजामाचा उल्लेख आहे. हा आलेख पहिल्या मुर्तजा निजामशहा या काळात अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता व पहिला मुर्तजा निजामशहा गादीवर होता.
(संदर्भ -कोरठण खंडोबा माहिती फलक)

माझ्या कुळाचे आधीचे नाव 'पोळ' आहे (गाव पारनेर मधील जामगाव आहे )याचा या लेखात उल्लेख आहे.पण त्याच्या पुढील वाचता येत नसल्याने काय लिहिलंय ते नीट समजत नाही.
कोरठण खंडोबा मंदिर हे ४५१ वर्षापुर्वीचे असल याचे येथील शिलालेखाच्या मराठी अनुवादानंतर समोर आले आहे. हा अनुवाद सर्वांसाठी प्रकाशीत करण्यात आला आहे.
कोरठाण खंडोबा देवस्थान राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्र आणि लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. या पुरातन मंदिरात असलेल्या शिलालेखाचा मराठी अनुवाद पुणे येथील पुरातन शिलालेखांचे अभ्यासक अनिकेत रचपुत यांनी केला आहे. यातून हे मंदिर ४५१ वर्षापूर्वी बांधण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या शिलालेखांचा अनिकेत रजपूत यांनी केलेला मराठी अनुवाद असलेल्या फलक श्री कोरठण खंडोबा मंदिरात लावण्यात आला आहे.
या शिलालेखात एकूण ९ ओळी असुन पहिल्या पाच ओळी अस्पष्ट झालेल्या आहेत. कारण शिलालेख शेकडो वर्षे बांधकामात झाकून राहिलेला होता. सन १९९४-९७ दरम्यान श्री खंडोबा मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम चालू असताना हा शिलालेख मंदिर गाभार्याचे दरवाजाच्या वर आढळून आला. तेव्हापासून या शिलालेखाचा मराठी अनुवाद मिळवण्याचा प्रयत्न चालू होता त्यापैकी पुणे येथील पुरातन शिलालेखांचे अभ्यासक अनिकेत रचपूत यांनी अभ्यास करून या शिलालेखाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे.
१५७१ नंतर आज ४५१ वर्षांनी या शिलालेखाच्या मराठी अनुवादामुळे कोरठण खंडोबा मंदिराचे पुरातन बांधकाम कोणी व कधी केले. हा ऐतिहासिक पुरावा मिळाला आहे. या मंदिराचे पुरातन बांधकाम माघ पौर्णिमा शुभमुहूर्तावर झाले.
असा आहे शिलालेख
शिलालेखात एकुण ९ ओळी असून यामधील शेवटच्या चार ओळींचा मराठी अनुवाद स्पष्टपणे देण्यात आला आहे.त्यानुसार खंडोबाचे हे पुरातन देऊळ जावजी विश्वासरावांचा मुलगा कुमाजीराव यांनी माघ शुद्ध १५ शके १४९२ = १० फेब्रुवारी १५७१ माघ पौर्णिमा प्रमोद संवस्तरे शुक्रवार मघा नक्षत्र व शोभल योग असताना हे देऊळ बांधले. यात निजामाचा उल्लेख असून त्या काळात पहिला निजाम मुर्तेजा-निजामशहा गादीवर होता हा इतिहासही स्पष्ट होतो.
कोरठणला जाण्यासाठी पिंप़ळगाव रोठा इकडे यावे लागते. तिथून डावीकडे कोरठण खंडोबा ३ किमी तर उजवीकडे ६ किमी वर वडगाव दर्या.
वडगांव दर्या येथील लवण स्तंभ :-
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगांव दर्या या ठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही बहिणींचे देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. कान्हूर पठार जवळ हे गांव वसलेले आहे. नगर-कल्याण रोडवर टाकळी ढोकेश्वर जवळ वाफारेवाडी फाट्यापासुन या तीर्थाच्या ठिकाणी पोहचता येते. पारनेरपासून २० किलोमीटर अंतरावरील गावाला जाताना कानहूर पठार हे गाव लागते. कानहूर पठार हे खूप मोठे पठार आहे, माळरान आहे. हा कमी पावसाचा प्रदेश आहे. सर्व माळरान हे उभट नळी सारखा आकार, पांढुरक्या गुलाबी मोहक रंगाच्या फुलांनी बहरून आलेला आकर्षक दिसतो. ही रानफुले पठाराचे सौंदर्य खुलवतात. तसेच पुढे गेल्यावर वडगाव दर्या हे गाव लागते. तेथून अंदाजे एक किलोमीटर खाली खोल दरी आहे. दरीच्या बाजुला डोंगर आहेत. या भागात दुर्मिळ व औषधी वनस्पती आढळतात. वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक येथे येतात. अनेक प्रकारच्या वनराईमुळे परिसर अतिशय निसर्गरम्य, मनाला लुभवणारा आहे. लवण स्तंभ, अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी यामुळे प्रवाशांची सतत गर्दी असते.


श्रीक्षेत्र वडगांव दर्या हा एक रमणीय परिसर असुन तो वृक्ष वल्लरींनी वेढलेल्या निसर्ग रम्य एका दरीत वसलेला आहे. याचठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही देवीचे मंदिर आहे. वडगांव दर्या हे गांवच मुळी दरीत वसलेले आहे. देवीचे देवालय हे डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे. दोन्ही देवीच्या मुर्ती या प्राचीन व स्वयंभू आहेत असे तेथील स्थानिक लोक सांगतात.
दर्याबाई, वेल्हाबाई या दोन्ही देवींचे स्थान खाली दरीत आहे. दरीत उतरून जाण्यासाठी पायऱ्या आहेत. जाताना येताना रस्त्यावर माकडे दिसतात. ही माकडे म्हणजेच देवीचे सैन्य आहे अशी लोककथा आहे. आधी मोराचं सैन्य होते. दरीत आल्यावर माकडांचे सैन्य झाले, अशी आख्यायिका आहे.

दाट झाडीत खाली दरीत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी शंभर सव्वाशे पायरी उतरून जावे लागते. पायरी उतरतांना परिसरातील माकडांची टोळी भक्तांजवळ प्रसाद ग्रहण करण्याकरीता येतात. त्यांना फुटाणे शेंगादाणे केळी आदि घेऊन जावे. माकडांपासुन सावध रहावे कारण तुमच्या हातातील वस्तु ते लांबवतात. लहान मोठ्या माकडांच्या चित्कारांचा आवाज परिसरात घुमत असतो.

पायरी उतरून आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारीत दर्याबाई व वेल्हाबाई यांची कळस विरहित शेजारी शेजारी मंदिरे आहेत. ही दोन्ही मंदिरे आतूनच एकमेकांना जोडलेली आहेत. मंदिरे म्हणण्यापेक्षा गुहा सयुक्तिक ठरावे. गुहांमध्येच देवतांची स्थापना केलेली आहे. दोन्ही गुहांत वरच्या छतातून अखंड पाणी टपटपत असते. ह्या शेकडो हजारो वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने तयार होतात ते लवणस्तंभ.या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट आहे. पाण्यातील क्षारांपासून लवण स्तंभ तयार होतात. येथे अधोमुख म्हणजे खाली आणि उधोमुखी म्हणजे वर असे दोन्ही प्रकारचे लवण स्तंभ आहेत. म्हणजे वरून खाली येणारे खालून वर जाणारे. वरचे पाणी खालच्या पाण्याला खेचते. त्यामुळे खालीही वर झेपावणारे उभट लवण स्तंभ तयार होतात. ही अनेक वर्षांपासून मंदगतिने चालणारी क्रीया अजूनही सुरू आहे. चुनखडीच्या प्रदेशात गुहा निर्माण होतात. तिथले पाणी क्षारयुक्त असते. अशा सतत टपकणाऱ्या पाण्यापासून लवण स्तंभ तयार झालेले आहेत. खडकाला चिकटलेले हे स्तंभ आहेत.

इथल्या ठिसूळ खडकात चुनखडीचे प्रमाण फार. त्यांच्या संपर्कात कातळात झिरपलेले पाणी येते. हे पाणी हवेतील कर्बद्विप्रणील वायु मिसळल्यामुळे आम्लधर्मी बनते. अशा पाण्यात चुनखडी पटकन विरघळते त्यामुळे खडकात पोकळी तयार होते व हळूहळू चुनखडीयुक्त पाणी अर्थात क्षार किंवा लवण छतांवरील छिद्रांतून बाहेर यायला लागते. पाण्याच्या थेंबात क्षारांचे प्रमाण खूप जास्त असल्यास तेथे क्षार धरून ठेवण्याची पाण्याची क्षमता संपते व हे कण हळूहळू छताला चिकटायला लागतात व लोंंबकळल्यासारखे दिसतात त्याला अधोमुखी लवणस्तंभ अथवा स्टॅलाक्टाईट म्हणतात. हेच थेंब खाली जमिनीवर पडून तिथेही क्षारांचे स्तंभ तयार व्हायला लागतात हे खालून वर असे जाणारे असल्यामुळे त्यांना उर्ध्वमुखी लवणस्तंभ अर्थात स्टॅलाग्माईट असे म्हणतात. हे दोन्ही प्रकारचे स्तंभ वडगाव दर्या येथे आहेत.
या ठिकाणी काळ्या खडकापासून (बेसॉल्ट) काही चुनखडीचे खडक तयार झाले आहेत. त्या खडकांवर काही पानांचे ठसे आढळून आले असून तज्ज्ञांच्या मदतीने त्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यातून त्या काळातील हवामानाचाही उलगडा होण्यास मदत हेईल,’

दर्याबाई मंदिरातील दीड पुरुष उंचीचे अधोमुखी लवणस्तंभ

गुहांतील अधोमुखी लवणस्तंभ

लवणस्तंभ निर्मितीची आजही चालू असलेली प्रक्रिया

लवणस्तंभ निर्मिती

मंदिराजवळ डोंगर कपारीतुन वाहणारे झुळझुळ पाण्यात भाविक चिंब होतात. पावसाळ्यात डोंगर कपारीतुन अंखड पाणी झिरपत असते. मंदिरासमोर भले मोठे पटांगण व शेजारी प्रशस्त पडवी विश्रांती करीता देवस्थानने बांधली आहे. डाव्या बाजुला एक कुंड असुन ते शक्तीतीर्थ नावांने प्रसिद्ध आहे. स्नान कुंडात स्नान केल्याने खरुज नायटा सारखी त्वचेचे विकार दूर होतात अशी देवीची ख्याती आहे. देवीच्या मंदिरास दरवाजे नव्हते परंतु माकडांचा उपद्रव टाळण्याकरीता आता तेथे लाकडी दरवाजे लावले आहेत.
आत मंदिरात प्रवेश करताच दर्याबाई व वेल्हाबाई देवीच्या तांदळाकृती स्वयंभू मुर्ती आहेत. देवीच्या शेजारी महादेवाची पिंड आहे. मंदिरात सदैव पाणी झिरपत असते. तेथे पाणी साचवण्यासाठी मोठा ड्रम ठेवला आहे जो नेहमीच भरून वाहत असतो. दर्याबाईच्या शेजारी वेल्हाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे. तेथुन वाकुन जावे लागते. दोन्ही देवा बहिणी असुन मोठ्या बहिणीने दर्या बाईने कोपराने तो दरवाजा निर्माण केला आहे अशी ख्याती आहे. मंदिराच्या डावीकडे भैरवनाथाचे मंदिर आहे. तेथे लवणस्तंभाचे प्रचंड उभे रांजण निसर्गाने तयार केलेले आहे.
या देवस्थानाचे एक कतुहल व विशेष म्हणजे दरीच्या वरील भागात एक मोठे शेत दिसते. ही शेती गांवकरी सहभागाने व देवीच्या भक्तीने करतात. या शेतातील उत्पन्न देवीला व तेथील वास्तव्य करणाऱ्या वानर सेने करीता आहे. सर्व गांवकरी आनंदाने व भक्तीने या शेतीची मशागत करतात. 
या कामात कुचराई करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची नासाडी ही वानरसेना करते अशी ख्याती आहे. ही वानरसेना चांगलीच माणसाळलेली आहेत. गांवात लग्न व अन्य धार्मिक कार्यात या वानरसेनेतील प्रमुख वानराला मानाचा फेटा मुंडासे बांधण्याचा रिवाज आहे. वानरसेनेला पंगतीत जेवण्यासाठी आमंत्रित केले जाते. मानाचा फेटा नंतर हे वानर तुकडे तुकडे करून आपल्या वानर बांधवात वाटुन घेतात. या परिसरात सिताफळ, चिंच, जांभळ, करंजी, आंबा, बाभुळ, वड, पिंपळ आदि झाडांचा सामावेश आहे. हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. धबधब्याजवळ एक भुयार तयार झाले आहे. या भुयारात एक किलोमीटर पर्यंत सर्व प्राणी संचार करतात. 1958 मध्ये हे भुयार दगड मातीने बुजले गेले आहे. परंतु अद्याप 150 फुटापर्यंत गुहा आहे.
नवरात्रात दहा दिवसाचा उत्सव असतो. तसेच माघ शुद्ध पोर्णिमेस मोठी यात्रा भरते. वडगांव दर्या येथील शुक्ल यजुर्वेदीय शाखेचे ब्राह्णण मधुकर व दत्तात्रय कांबळे गुरुजी यांचेकडे देवीची पुजा अभिषेक आदि धार्मिक कार्य करण्याची जबाबदारी पुर्वपंरपरेने चालत आलेली आहे.
निघोजचे रांजणखळगे :-
भारताच्या भूमीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं, तर विविधता हीच बाब सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येते. वेगवेगळे प्रदेश, वेगवेगळे हवामान, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ, वेगवेगळ्या संस्कृती, हे सगळं आपल्या देशात सुखानं एकत्र नांदत असतं. पर्यटनाच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर महाराष्ट्रातसुद्धा जवळपास अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. इथे लांबच्या लांब, अप्रतिम समुद्रकिनारे आहेत, आभाळाशी स्पर्धा करणारे डोंगर आहेत, डोंगरांमध्ये कोरलेली अप्रतिम प्राचीन लेणी आहेत, उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे, असा विविधरंगी निसर्गखजिना आपल्या राज्याला मिळाला आहे.
प्रत्येक जिल्ह्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे आणि ते बघण्यासाठी रसिक आवर्जून वेळ काढतात. नदीचा रोरावता प्रवाह, पाण्याचा दाब आणि वातावरण यांचा परिणाम होऊन नदीपात्रात तयार झालेले रांजणखळगे हा असाच निसर्गाचा आणखी एक चमत्कार. तसे अनेक ठिकाणी रांजणखळगे आहेत; पण नगर जिल्ह्यातल्या निघोज येथील रांजणखळगे हे त्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणायला हवं.

पृथ्वीतलावर सर्वात श्रेष्ठ शिल्पकार कोण असेल तर तो आहे निसर्ग. कारण या निसर्गाने आपल्या भोवताली इतक्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत की, पाहणाऱ्याचे डोळेच दीपून जावेत. निसर्गाकडून तयार झालेल्या साऱ्याच कलाकृती या अवाढव्य आणि डोळे विस्फारणाऱ्या आहेत. आपण सह्याद्रीच्या डोंगररांगांकडे गेलो की, या जास्त ठळकपणे समोर येतात. मग आपलीही बोटे आश्चर्याने तोंडात जातात. मानवाच्या शक्यतेपलीकडच्या या कलाकृती निसर्गाने तयार केलेल्या आहेत. त्या विशेष आयुधांनी. एखाद्या मानवी शिल्पकाराकडे जसे छन्नी, हातोडा अशी साधनसामुग्री असते, तसेच निसर्गाकडे पाणी, हवा, अग्नी अशी पंचमहाभूतांनी भरलेली वेगळी पण वैशिष्ट्यपूर्ण आयुधे आहेत. या आगळ्यावेगळ्या शस्त्रांनी निसर्गाने साऱ्या जगाला हेवा वाटावा अशा कलाकृती निर्माण केल्या आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर अहमदनगरमधील धडकी भरवणारी सुप्रसिद्ध सांधण व्हॅली, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असणारी ‘तैल-बैल’ या जोड डोंगराच्या भिंती, याशिवाय डोंगर-पर्वतांमध्ये तयार झालेल्या सुंदर घळी, कपारी, बुलडाण्यातील लोणार सरोवरसारख्या कैक कलाकृती निसर्गाचे अद्भूत लेणे म्हणून जगप्रसिद्ध आहेत.
अमेरिकेतल्या ॲरिझोना राज्यात निसर्गानं एक चमत्कार घडवलाय. या भौगोलिक चमत्काराला नाव देण्यात आलंय ग्रॅंड कॅनियन. ॲरिझोना राज्यातील कोलोरॅडो नदीच्या प्रवाहानं सुमारे ५० ते ६० लाख वर्षांपूर्वी हा नैसर्गिक आविष्कार घडवलाय. नदीचा वेगवान प्रवाह इथल्या खडकांना कापत पुढं जातो. प्रवाहाबरोबर दगड-गोटे आणि इतरही वस्तू वाहत असतात.
या खडकांशी लाखो वर्षं सातत्यानं घर्षण होत राहिल्यानं हा कॅनियन किंवा दरी निर्माण झाली. ही दरी तब्बल ४४६ किलोमीटर लांब आणि २९ किलोमीटर रुंद आहे. अशाच भौगोलिक चमत्काराचा छोटा आविष्कार, निघोज (जि. नगर) इथंही पाहायला मिळतो. या ठिकाणी ज्वालामुखीपासून तयार झालेला कॉम्पॅक्ट बेसॉल्ट आणि व्हेसिक्युलर बेसॉल्टचा एका आड एक थर आहे व त्यातून कुकडी नदीचा प्रवाह वाहतो. या खडकांमध्ये सुमारे २०० मीटर लांब आणि काही ठिकाणी ६० मीटर रुंद दरी तयार झाली आहे.
याच दरीत नदीनं कोरून काढलेली चित्तवेधक पाषाणशिल्पं दिसतात. अनेक ठिकाणी खडकांना रांजणासारखा आकार प्राप्त झाल्यानं त्याला सामान्यपणे रांजणखळगे असं म्हटलं जातं. प्रवाहातून वाहत आलेले लहान-मोठे दगड नदीपात्रात तयार होणाऱ्या भोवऱ्यांमुळे गोल फिरत राहतात. त्यामुळं वर्तुळाकृती खड्डे तयार होतात. हेच आहेत रांजणखळगे. लाखो वर्षांपासून ही क्रिया घडत असल्यानं, पात्रातील खडकांना खळग्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याला पॉट होल्स म्हणतात. या रांजणखळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.
अगदी असेच ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्रात , नगर जिल्ह्यात. शिरुर जवळ निघोज या ठिकाणी आपल्याला असेच रांजण खळगे बघायला मिळतात. कुकडीच्या प्रवाहामुळं कातळाला भेदून पाण्याने विविध अंगांनी चौखूर वाट शोधली आहे. प्रवाहासोबत आलेल्या दगडगोट्यांमुळं आणि खडकातल्या खोलगट जागेत भोवरे तयार होऊन रांजण आणि अन्य आकाराची खळगी तयार झाली. आजही त्यातून पाणी वाहत असते. काही खळगी अगदी पुरुष-दोन पुरुष खोलीची आहेत. त्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे नदीचं पात्र जमिनीपासून जवळपास पन्नास ते साठ फूट खोलवर कातळ कापून पोचलं आहे. कुकडी नदीच्या काठावर उभं राहिलं की रांजणखळगे आपल्याला खुणवायला लागतात. डोळे थकून जातील पण मन भरणार नाही, इतके रांजणखळगे येथे निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या आकारांचे, उंचीचे, खोलीचे, कमी जास्त जोडीचे, एकमेकांत मिसळलेले हे रांजणखळगे जणूकाही भूतलावरचं अनोखं शिल्पसमूहच. तसं पाहिलं तर या निर्मितीमागेही एक विज्ञान दडलेलं आहे, असे म्हणतात. नदीने वाहून आणलेले दगड हे या बेसॉल्ट खडकावरील छोट्या भेगांत अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड याच भेगांत जोराने फिरून गोलाकार खड्ड्यांमध्ये रूपांतर होत असतात. या प्रक्रियेला काही थोडकी वर्ष नव्हे तर हजारो वर्ष जावी लागतात. हजार वर्षांनंतर या छोट्या भेगा रांजणासारख्या खड्ड्यांचेच रूप घेऊन निर्माण होतात. नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब होते. भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे. कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत.





कुकडी नदीच्या पात्रातले काही रांजणखळगे खूप खोल आहेत. काही ठिकाणी छोटी गुहा आणि काही ठिकाणी पाषाणाला मधोमध कोरून त्यातून पाण्याचा प्रवाह वाहतो. नदीच्या या विशिष्ट ठिकाणच्या पात्रातले पाषाण, अंतरंगात कठीण आणि बाहेरच्या बाजूनं मृदू आहेत. नदीच्या प्रवाहानं मृदू भाग कोरून काढला आहे. लाखो वर्षांपासून घर्षणाची ही क्रिया घडत असल्यानं, पाषाणांची आकर्षक शिल्पं तयार झाली आहेत. या लहानशा दरीत एक छोटा धबधबाही आहे. इथल्या काही कुंडांमध्ये दीर्घकाळ पाणी साठून राहात असल्यानं, तिथं हायड्रिला किंवा वॉटर थाईम नावाची वनस्पती उगवते. खळग्यांच्या तळाशी उगवणाऱ्या या वनस्पतीच्या फांद्या प्रसंगी २५ फुटांपर्यंत वाढतात. अशा असंख्य फांद्यांमुळं तळ दिसेनासा होतो.
पाण्याच्या उपलब्धतेमुळं पशुपक्षी या ठिकाणी आकर्षित होतात. चिखलानं घरटं बांधणारे स्वॅलो पक्ष्यांची लगबगही इथं पाहता येते. काही वर्षांपूर्वी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. परिणामी पाण्याचा ओघ काहीसा कमी झाला आहे. पर्जन्यछायेत असलेल्या या प्रदेशात पाऊस तसा कमीच होतो. त्यामुळं पावसाळ्यातही हा चमत्कार कधीकधी पाहता येऊ शकतो. नदीच्या प्रवाहावर एक झुलता पूलही बांधण्यात आला आहे. त्यामुळं रांजणखळगे वेगवेगळ्या कोनातूनही पाहता येणं शक्य झालंय. किनाऱ्यावर श्री मळगंगा देवीची दोन सुंदर मंदिरं आहेत. शिवाय कपिलेश्वर मंदिर, वाघजाई माता मंदिर आणि राममंदिरही पाहण्यासारखं आहे.
कुकडी नदीच्या काठावर वसलेलं निघोज गाव पारनेर तालुक्यातलं एक टुमदार ठिकाण आहे. गावाचं ग्रामदैवत असलेलं देवस्थान म्हणजे मळगंगा देवीचं मंदिर. संपूर्ण मंदिराचं काम संगमरवरात करण्यात आलं आहे. देवळावरचं कोरीव काम अप्रतिम आहे. देवळातली मातेची मूर्तीही पाहण्यासारखी आहे.मातेची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिरासमोरची २५ फूट उंचीची दीपमाळ लक्ष वेधून घेते. जवळच भक्त निवास आहे.

मळगंगा आणि रांजणखळगे यांचा धार्मिक व सांस्कृतिक बाबतीत जवळचा संबंध आहे. चैत्र महिन्यात मळगंगेची यात्रा भरते दोन दिवस चालर्णाया या यात्रेस पंचक्रोशीतील भाविक एकत्र येऊन देवीचा उत्सव साजरा करतात. उत्सवात पालखीची मिरवणुक यात ढोल लेझीम ताशा व शोभिवंत दारूकाम आणि तन मन धनान एकरूप झालेले भक्तगण सर्व समुदायाला भाराऊन टाकतो या मिरवणुकीत देवीची प्रतिमा व घागरीच्या दर्शनासाठी भाविकांची धडपड चालु असते शेवटी मिरवणुकीनंतर ही घागर बारवेत विसर्जीत केली जाते. कुंडावर देवीचे एक मंदीर आहे मग यात्रा उत्सव तिकडे साजरा होतो. यात्रेच्या निमित्तानं निघोजची आर्थिक उलाढाल कोटीच्या घरात होते. यात्रेत पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्हयातील सर्वच लोकाच सहभाग असतो. त्यामुळेच निघोज मळगंगेच्या यात्रेचा नावलौकिक खुप दुरवर पोहचला आहे.देवासमोर नतमस्तक होऊन मन शांत व्हावं, काही क्षणांसाठी सगळ्या जगाचा विसर पडावा, असा हा परिसर आहे.
सध्या येथे दोन्ही तीरांना जोडणारा झुलता पूलदेखील बांधण्यात आला आहे. त्यामुळे हा पूलदेखील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण बनला आहे. या पुलावरून रांजणखळगे पाहणे म्हणजे भटकंतीचा उत्कर्षबिंदूच.
रांजणखळगे निर्मिती असल्यामुळे व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या ठिकाणाची नोंद घेतल्याने या ठिकाणाकडे अनेक पर्यटक आवर्जून येतात रांजणखळगे पाहून एक वेगळे समाधान मिळते. गावकरी मात्र कुंडमाऊली मळगंगा म्हणुनच या ठिकाणाकडे बघतात. भुगोल अभ्यासप्रेमी संशोधक महाविदयालयीन विदयार्थी यांच्या सहली येथे वारंवार येतात. शालेय अभ्यासक्रमाच्या भुगोल विषयात कुकडी नदीतील या खळग्यांचा खास उल्लेख असल्याने या ठिकाणाबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता दिसून येते. पुणे विदयापीठातील भुगर्भशास्त्र भुगोलशास्त्र व पर्यटनशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विदयार्थ्यी प्राध्यापक संशोधक येथे अनेकदा येऊन जातात खुप मोठया प्रमाणावर छायाचित्रण केले जाते. निघोजच्या धार्मिकबाबींचे वर्णन रेखाटणारा नुकताच प्रदर्शित झालेला कुंडमाऊली मळगंगा हा चित्रपट होय.
निघोज गावात असलेली पायर्याची विहीर अर्थात बारव
कुकडी नदीतील या रांजणखळग्याचं महत्त्व ओळखून अनेक पर्यावरणप्रेमींची, विज्ञान अभ्यासकांची पावले इकळे वळत असतात. आपणही भटकंतीला विज्ञानाच्या किमयेची जोड देऊन येथे वाट वाकडी करायला हरकत नाही. कारण नेहमीचीच, सरावाची भटकंतीची ठिकाणे पाहण्यापेक्षा अशी निसर्गाने तयार केलेली व उच्चनिर्मितीमूल्ये असलेली ठिकाणे पाहणे हे केव्हाही ज्ञानात भर घालणारीच असतात.
कसं जायचं?
पुण्याहून जाण्यासाठी :
अंतर सुमारे ९० किलोमीटर. पुण्यातून निघोजला जाण्यास दोन रस्ते. शिरूरच्या पुढं घोडनदीचा पूल ओलांडून गव्हाणवाडीच्या फाट्यावरून डावीकडं राळेगण थेरपाळ, जवळा असे छोटे छोटे पल्ले गाठून निघोज गावात पोचता येते. दुसरा मार्ग म्हणजे शिक्रापूर-गणेगाव खालसा-मलठण-टाकळी हाजी मार्गे निघोज. एका मार्गानं जाऊन दुसऱ्या मार्गाने परत आल्यास प्रवासाचा तोचतोचपणा टाळला जातो.
शिरूरहून गेलात, की आधी आपण निघोज गावात पोचतो. तिथं वेशीजवळून रस्ता कुंडाकडं जातो. स्थानिक भाषेत कदाचित रांजणखळगे कुणाला समजणार नाहीत, पण कुंड किंवा कुंडमाऊली म्हटलात की लगेच रस्ता दाखवतील.
विशेष सूचना :
अनुभवाशिवाय आणि चांगल्या प्रतीची पादत्राणे किंवा बूट असल्याशिवाय कुंडांच्या अंतराळात उतरू नये. शक्यतो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी भेट द्यावी, जेणेकरून उन्हात आसपासचा खडक तापून होणारा उष्णतेचा त्रास टाळता येईल. आसपास कवठे यमाईचं पुरातन मंदिर, मोराची चिंचोली, आदर्शग्राम राळेगण सिद्धी, पिंपळनेरला संत निळोबाराय समाधी मंदिर अशी ठिकाणंही आहेत.
निघोजची सहल करायची असेल आणि हाताशी थोडा जास्त वेळ असेल, तर जवळच असलेल्या मोराच्या चिंचोलीलाही जाऊन यायला हवं. मोराची चिंचोली हे खऱ्या अर्थानं मोरांचं गाव आहे. अंगणात चिमण्यांनी चिवचिवाट करावा, एवढ्या प्रमाणात आणि सहजपणे मोर इथे नांदत असतात. तसा दिवसभर त्यांचा वावर असतोच; पण सकाळी आणि संध्याकाळच्यावेळी ते जास्त प्रमाणात दिसतात आणि अधिक मोकळेपणानं वावरतात. मोरांना त्रास द्यायचा नाही, ही या गावाची संस्कृती आहे. म्हणूनच इथे मोरांनाही अभय वाटतं. कुणाच्याही दारात, अंगणात, छपरावर, बांधावर मोर दिसू शकतात. अलीकडच्या काळात या ठिकाणी अनेक कृषी पर्यटन केंद्रेही विकसित झाली आहेत. काही जणांनी घरगुती व्यवसाय सुरू केला असून, तिथेही मोर अगदी पाळीव असल्यासारखे वावरत असतात. सगळा परिसर आपुलकीचा झाल्यामुळे त्यांना पर्यटकांचीही भीती वाटत नाही आणि पर्यटकही त्यांच्या कलांचा, खेळांचा मनापासून आनंद घेऊ शकतात. अर्थात, मोराची चिंचोली हेसुद्धा पूर्ण दिवस काढून जाण्याचे ठिकाण आहे, त्यामुळे वेगळी सहल केलेली जास्त उत्तम.
पळशी विठ्ठल मंदीर
अहमदनगर म्हणजे बेलाग किल्ले, सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक गढ्या असणारा जिल्हा. या नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पळशी या गावी होळकरांचे दिवाण रामाजी कांबळे-पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याजवळच १७ व्या शतकातील विठ्ठल मंदिर अप्रतिम कोरीवकामाचा नमुना आहे. किल्ल्याचे आणि मंदिराचे बांधकाम एकाच वेळी झाली असण्याची शक्यता आहे. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की पारनेर हे तालुक्याचे गाव गाठायचे. पारनेरनंतर हाच रस्ता पुढे २० कि.मी.वर टाकळी ढोकेश्वर येथे नगर–कल्याण महामार्गला मिळतो व पुढे वासुंदे-खडकवाडी गावामार्गे २० कि.मी.वरील पळशी गावात पोहोचतो. पुणे ते पळशी हे अंतर १३० कि.मी.आहे. पळशी किल्ल्याच्या पूर्व दरवाजाबाहेर थोड्या अंतरावर पळशी नदीचे पात्र आहे. येथे नदीला बांध घातल्यामुळे तयार झालेल्या जलाशयाच्या एका बाजूला विठ्ठल मंदिर आणि दुसऱ्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे.
 |
| विठ्ठल मंदिर, पळशी |

 |
| व्याल आणि हत्ती, विठ्ठल मंदिर, पळशी |
जलाशयाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंदिरे सुंदर दिसतात.नदीकिनारी असल्याने ते अधिक मनोहारी अन रमणीय बनलं आहे. बाहेरचं ते प्रशस्त आवार, तेथील वृक्षराजी, विहीर आणि तेथील स्वच्छता पाहून आकर्षक प्रवेशद्वारातुन आत शिरताना मनी आपोआप भक्तिभाव निर्माण होतो.
गाडीरस्त्याने नदीचे पात्र ओलांडून गेल्यावर आपण विठ्ठल मंदिरापाशी येतो. मंदिराच्या सभोवती चार टोकाला चार बुरूज असलेला प्राकार म्हणजेच तटबंदी असुन दरवाजाच्या उजव्या बाजूस नदीला लागून एक चौरस दगडी पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या काही कोनाड्यात मुर्ती ठेवलेल्या दिसतात. नागर शैलीतील या मंदिराच्या प्रवेशव्दारावर गणपती, जय विजय ही दैवते कोरलेली असुन नक्षीकाम केलेले आहे. दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना असुन ज्यावर जाण्यासाठी आतील बाजूने जिन्याची सोय आहे. या सर्व बांधकामावर इस्लामी स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच उंच कळस असलेले रेखीव मंदिर नजरेस पडते. मंदिराचे शिखर दोन भागांत आहे. समोरील मंडपाचे घुमटाकार आणि गर्भगृहाचे उंच शिखर आहे.
मंदिराच्या गाभाऱ्याला जोडून प्रशस्त सभामंडप असून या मंडपाच्या तीन बाजूंनी असलेल्या नऊ पायऱ्या या नवविद्या भक्तीची प्रतिके तर मंडपाचे नउ फुट उंचीचे १८ खांब हे १८ पुराणाचे प्रतिक मानले जातात. मंडपाच्या खांबावर सुरेख नक्षीकाम केले असून पुराणातील काही कथा त्यावर कोरलेल्या आहेत.
मंदिराच्या सभामंडपात मध्यमागी दगडी कासव असुन हे कासव थेट किल्ल्यातील महादेव मंदिरातील कासवाची प्रतिकृती आहे. सभामंडपाच्या छता़ची आतील बाजूची रचना महादेव मंदिराच्या छतासारखीच आहे.
गर्भगृहाच्या व्दारपट्टीवर कोरीवकाम केलेले आहे. यात दरवाजाच्या दोन्ही बाजुंना रिध्दी-सिध्दी सहित गणपती व भैरवमुर्ती असुन ६४ योगिनी आहेत. उंबऱ्यावर चंद्रशीळा असुन दोन किर्तीमुखे आहेत. सभामंडपाच्या छतावर उत्तर हिंदुस्थानी शैलीतील श्रीकृष्ण व गोपिकाच्या रासविहाराच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. यात उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला श्रीकृष्णाची मुर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या संगमरवरी पाषाणात घडवलेली विठ्ठलाची मुर्ती आहे. मंदिरामध्ये गोपाळ विठ्ठलरूपातील मूर्ती आहे, कारण विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाशी धेनू, गोवत्सल आहेत.


विठ्ठलमूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले असुन सिहासनावर नारद तुंबर, गंधर्व, यक्ष, किन्नराच्या मूर्ती कोरल्या आहेत. विठ्ठल मुर्तीच्या दोन्ही बाजुना राही-रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली अन तुकोबाराय यांच्या संगमरवरी मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. बाजूला काही नव्या जुन्या मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या खांबांवर फ़ारसे नक्षीकाम नाही पण त्यावर मोर आणि हत्ती कोरलेले आहेत.
मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा मारताना तीन दिशांना तीन देव कोष्टक दिसतात त्यात विष्णू आणि महिषासूर मर्दिनीची मुर्ती आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर नक्षीकाम आणि नेहमी आढळणार्या सुरसुंदरी दिसत नाहीत. पण मंदिराच्या बाहेरील भिंतींवर दोन फ़ुलांच्या पट्ट्या आणि कळसाच्या खालील बाजूस किर्तीमुखाची पट्टी पाहायला मिळते. गर्भगृहातील पाणी बाहेर पडण्याच्या ठिकाणी मकरमुख बसवलेले आहे. मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा मारताना मंदिराच्या बाह्यांगावर नक्षीदार मोर, हत्तीमुख, झुंजणारे हत्ती, लढाईस निघालेले सैन्य आणि सांडणीस्वार कोरलेले असुन तीन दिशांना तीन देव कोष्टक दिसतात त्यात विष्णू आणि महिषासूरमर्दिनीची मुर्ती आहे. मंदिराच्या मागील ओवऱ्याच्या छतावर दोन काळविटाचे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प वेगवेगळ्या दिशेने पाहिल्यास खाली मुंड्या घातलेली दोन काळविटे आणि दोन धावणारी काळविटे अशी एकूण चार काळविटे दिसतात. मंदिराच्या तटबंदीवर चढण्यासाठी दोन ठिकाणी जिने असुन या जिन्याने फ़ांजीवर चढून कळस जवळून पहाता येतो. मंदिराच्या शिखरावर आतील बाजुस कोरीव कलाकसुरीची कामे आहेत. कळसात चार देवकोष्टक असून त्यात विष्णूच्या मुर्ती आहेत. छोटे छोटे कळस एकमेकात गुंफ़ून मुख्य कळसाची रचना करण्यात आली आहे. तटबंदीवरुन संपुर्ण परिसराचे सुंदर दृश्य दिसते. समोरील पळशीचा भुईकोट व त्याची तटबंदी आपले लक्ष वेधून घेते.

मंदिरामागे पाण्याचा प्रवाह आहे. त्यापलीकडे शंकराचे आणि गणपतीचे मंदिर आहे. मंदिराला आधुनिक रंगरंगोटी केली आहे तीही उठून दिसत आहे.पळशी शंकर मंदिर

पळशीचा गणपती
या मंदिराशेजारी नदीकाठी असणारे रामेश्वर मंदिर व घाट तसेच घाटावर असलेले सतीमंदिर येथे पहावयास मिळते. मंदीर व परीसर पहाण्यासाठी दीड तास लागतो. या विठठल मंदिर स्थापनेच्या संदर्भात शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या लुटीतील काही रक्कम वापरली असल्याची माहिती पळशी गावचे वतनदार रामराव पळशीकर यांचे कागदपत्रावरुन मिळते.सुरतेची लूट जात असताना पळशी मुक्कामी या लुटीतील काही द्रव्य पळशीच्या विकासासाठी वापरण्याच्या बेत केला. त्यानुसार पळशी गावांभोवती चोहोबाजुंनी भरभक्कम तटबंदी व गावाबाहेर नदीकाठी विठठल मंदिर बांधले. विठठल मंदिर बांधण्यासाठी उत्तर हिंदूस्थानातील कारागीरांना बोलावून त्यांचेकडून अप्रतिम अशी दगडी मंदिराची उभारणी करण्यात आली. रामराव पळशीकर यांचे चिरंजीव आनंदराव रामराव पळशीकर हे पेशव्यांकडे सुभेदार होते. पानिपतच्या तिसऱ्या युध्दात (१७६१) त्यांनी विशेष पराक्रम गाजविला व आनंदराव पळशीकर सरसेनापती झाले.
पळशीचे भुईकोट आणि पळशीकर यांचा वाडा
पळशी हे गावदेखील दगडी तटबंदी असलेल्या नगरकोटात वसलेले आहे. याला प्रवेशासाठी चार वेशी (दोन छोट्या व दोन मोठ्या) असून सुस्थितीत आहेत. पळशीच्या भुईकोटाला १६ बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील २ दरवाजे मोठे असून दोन दरवाजे लहान आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला असलेल्या मोठ्या दरवाजातून थेट गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात गाव वसलेले असल्याने किल्ल्याच्या उत्तर भागात पक्के रस्ते बनवलेले आहेत. किल्ल्याचा उत्तर दरवाजा आणि त्याच्या बाजूचे भक्कम बुरुज आजही दिमाखाने उभे आहेत, गावकर्यांनी याला रंग लावून शोभा घालवलेली आहे. दरवाच्या दोन्ही बाजूला दोन शिलालेख कोरलेले आहेत. दरवाजातून गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते.
 |
पळशीच्या भुईकोट
 | | दुरूनच लक्ष वेधून घेणारी पळशी भुईकोटाची तटबंदी |
 | | भुईकोटाचे प्रवेशद्वार |
|
किल्ल्याच्या आत तीन जुने वाडे आहेत, त्यातील एक वाडा चांगल्या स्थितीत आहे आणि एक वाडा - पळशीकरांचा वाडा काष्ठशिल्पासाठी परिचित आहे. होळकरांचे दिवाण असलेल्या कांबळे-कुलकर्णी यांनी वाड्याची निर्मिती केली. मूळ मालक सध्या इंदूरला वास्तव्यास आहेत. एक कुटुंब सध्या वाड्याची देखभाल करते. या वाड्याचा दरवाजा आणि त्याची चौकट यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर एक बोळ लागतो. तो पार केल्यावर डाव्या बाजूला वाड्याचे दुसरे दार आहे. त्यातून आत गेल्यावर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो. वाड्यात सध्या दोन भाडेकरु राहातात. वाडा बांधला तेंव्हा दुमजली होता पण आज केवळ एकच मजला शिल्लक आहे.
 |
पळशीकरांचा वाडा
 | पळशीकरांचा वाडा
 | पळशीकरांचा वाडा
|
|
|
चौकात शिरल्यावर वाड्याच्या खांबांवर, हस्तांवर केलेले अप्रतिम नक्षीकाम पाहायला मिळते. वाड्याला तळघर आहे पण ते सध्या बंद केलेले आहे. चौकात मोरी असून त्यात एक दगडी पाट आहे. वाड्यात शिरल्यावर उजव्या बाजूला देवघर आहे. त्यात जुने टाक आणि मुर्ती आहेत. देवघरच्या बाजूला असलेल्या खोलीच्या चौकटीवर कोरीवकाम केलेले आहे. याच खोलीत वाड्यातील आड आहे.
पळशी वाड्यातील काष्ठशिल्पे व कोरीव कामे
हा वाडा म्हणजे काष्ठशिल्पाचा अतिशय सुंदर अन मनमोहक असा नजारा! सुबक अन ठेंगण्या दरवाजातुन आत प्रवेश करताच मध्यभागी चौक आणि सभोवतीची चौसोपी रचना आपलं लक्ष वेधून घेते. लगोलग तिथला प्रत्येक खांब, त्यावरील मनोहारी नक्षीकामाने आपले मन मोहवतो तर वरील मजल्याचा संपुर्ण पट आपली नजर तिथंच खिळवून ठेवतो. प्रवेश करतानाच लाकडी कोरीव काम असलेल्या दरवाजा दिसतो. वाड्यात आत गेल्यावर डोळ्यांचे पारणे फेडणारे अप्रतिम लाकडी कोरीव काम असणारे खांब आहेत. अंबारीसह हत्ती, मर्कट, ड्रॅगनसम शिल्प, लाकडी कोरीव मनुष्य मूर्ती, फुलांच्या परड्या अशा केवळ असंख्य अप्रतिम कलाकुसरी आनंद देतात. समोरच्या चौकात जुने भुयारी मार्ग बुजवण्यासाठी दगडी परात, जाते बसवलेले आहेत.
दगडी परात
कोपर्यातच जुने पारंपरिक मंदिर आहे. मंदिराचे दार आणि पुढील आतील कोरीव छत त्या काळातील लाकडी फॉल्स सीलिंगच म्हणावे लागेल. दुसर्या मजल्यावर राण्यांच्या महाल, रंगमहालसदृश महाल होता. तो आता ढासळला आहे.
वर्णन काय करता वा छायाचित्रे काय पाहता.. ते प्रत्यक्ष पाहण्यातच अतीव सुख आहे, हे मात्र निश्चित! पुन्हा जावं आणि आणखी निरखुन पाहावं, इतकी सुंदर अशी कलाकुसर असलेलं हे नक्षीकाम पाहून ईथवर आल्याचं सार्थक होतं.
पळशी हे गाव तसं बऱ्यापैकी आत जरी असलं तरी आपली गाडी असेल तर पळशी बरोबरच जामगावचा भुईकोट, टाकळी ढोकेश्वरची लेणी आणि थोडा अधिक वेळ हाती ठेवल्यास पेमगिरीचा किल्ला, तेथील बारव आणि विशाल वटवृक्ष असंही नियोजन, एकदिवसीय, थोडंसं धावाधावीचं, पण, नक्कीच छान होईल. नाहीतर फक्त पळशीसाठी पुण्याहुन थेट बस आहेच की!
संदर्भ :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) https://nagarparnerexpress.com/5053/
३) लवण स्तंभ’ची सहल -सावित्री जगदाळे, औरंगाबाद
४) https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/korthan-khandoba-temple-parner
५) http://vijaygagare55.blogspot.com/2014/11/blog-post.html
६)
http://www.chincholimorachi.com७) https://www.esakal.com/tourism/ranjankhalge-nighoj-251129
८) https://nighoj.wordpress.com/
९)http://www.savitakanade.com/2019/08/blog-post_6.html
१०) https://www.lokmat.com/maharashtra/natural-made-ranchers/
११) अरविंद तेलकर, अभिजित पेंढारकर, पुरंदरे शशांक यांचे लिखाण
मुख्य मंदिराशिवाय भूगर्भातील दोन शिवमंदिराने थक्क करणारे डोंगराच्या कुशीतील सिद्धेश्वर मंदिर......
अहमदनगर जिल्यातील पारनेर तालुक्यात सिद्धेश्वरवाडी नावाचे एक गाव! गावात आहे विलोभनीय असे सिद्धेश्वर मंदिर!
गाडी पार्क करून मंदिराकडे जाताना दिसतो मंदिराचा नयनमनोहर परिसर....
डोंगराच्या कुशीत विसावलेले एक सुरेख मंदिर...

मुख्य मंदिराच्या बाहेर आहे चतुष्की....चतुष्की साधारणत: दीक्षा देण्यासाठी
किंवा यज्ञ करण्यासाठी असते...ह्या चतुष्की मधे आहे एक पोर्तुगीज घंटा...

मुख्य मंदिर सिद्धेश्वराचे! मंदिराच्या पायरी दोन कीर्तिमुख आहे...

मंदिराच्या अंतराळात आहे कासव प्रतिमा..

कासव प्रतिमे तोंडासमोर आहे मंदिराचे गर्भगृह

गर्भगृहात फुलांनी सजवलेली शिवपिंड..

गर्भगृहाच्या दरवाज्यातून बाहेरचा सभामंडप

कासवाच्या शेपटाकडे आणि गर्भगृहाच्या समोर आहे नंदीमंडप

सुरेख नंदीमंडप...

मंदिराला एकूण तीन दरवाजे...चतुष्कीच्या बाजूला आहे भुयारातील शिवमंदिर..
शिवमंदिराला भुयारात जाणाऱ्या पायऱ्या..

भुयारातील मंदिरात आहे शिवपिंड, शिवपिंडी समोर पार्वती आणि नंदी

भुयार मंदिरातून वर आल्यावर दिसते ते पाण्याचे कुंड..

मुख्य मंदिराच्या मागील बाजूस भूगर्भात आहे अजून एक शिव मंदिर...
मंदिराला जायला कुंडाच्या बाजूने पायऱ्या आहेत...

तसेच मुख्य मंदिराच्या मागील बाजूनेही...

ह्या मार्गावर नंदिशिल्प आणि अन्य देवतांची शिल्पे पाह्यला मिळतात.
भूगर्भातील मंदिराचा कळस वरून असा घुमटाकृती दिसतो...

अशा प्रकारचे बांधकाम हे तेराव्या शतकातील असावे असा अंदाज आहे...

घुमटाकार कळसाजवळ देवतांच्या प्रतिमामध्ये शिवपार्वतीच्या प्रतिमा असून डावीकडून दुसरी प्रतिमा गदाधारी विष्णु ची आहे.
पायऱ्या उतरताना मंदिरावर असलेली गणेशपट्टी इथे बसवलेली दिसते..

पायऱ्या उतरून दिसणारी मंदिराची कमान..

मंदिराचे द्वार..

गर्भगृहात आहे नंदीसहित शिवपिंडी

मंदिरासमोरील सुंदर अशा वृक्षा लगतच्या पायऱ्यांनी कुंडाच्या बाजूने वर येता येते..

परतीच्या मागार्वर पुलाच्या पलीकडे आहे धर्मशाळा ..

आणि समोर पुष्करिणी..

पुष्करिणी मधे आहे शिलालेख..(नारंगी चौकटीत)

पूर्ण शिलालेख जवळून..

असे हे आगळेवेगळे मंदिर....
🔺मुख्य मंदिरासहित इथे आहेत अजून दोन भूगर्भातील शिवमंदिरे!
🔺सुरेख दगडी पायऱ्या!
🔺पाण्याचे कुंड
🔺चतुष्की आणि त्यात बसवलेली पोर्तुगीज घंटा
🔺धर्मशाळा
🔺धर्मशाळेसमोर पुष्करिणी
🔺 पुष्करिणीत शिलालेख
इतक्या साऱ्या प्राचीन गोष्टींनी समृद्ध हे मंदिर तसे अपरिचितच!
तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या पारनेर शहरापासून फक्त चार किमी अंतरावर..
वेळ असल्यास एकदा नक्की भेट द्या...भेट देण्याआधी हा ब्लॉग वाचून जा...
परत भेटूच...
No comments:
Post a Comment