Wednesday, January 5, 2022

पंदेरी बौद्ध लेणी

   समुद्रकिनारे ,देवस्थान आणि गड्,किल्ले याच्यासाठी रत्नागिरी जिल्हा पर्यटक आणि दुर्गप्रेमीत प्रसिध्द आहे.मात्र बौध्द काळाच्या प्राचीन खुणा सांगणारी लेणी इथे काही अस्तित्वात आहेत हेच बहुतेकांच्या गावी नसते. हिच उपेक्षा वाट्याला आली आहे, मंडणगड तालुक्यातील पंदेरी गावात हद्दीत असणार्‍या लेण्यांच्य नशीबी.पंदेरी गावाच्या बौद्ध वाडीच्या वरच्या डोंगरात एक शैलगृह असणारे लेणे आहे.

    हि लेणी हीनयान पंथाची लेणी असून इथे शिल्प नसून केवळ कोरीव काम आहे. या लेण्यामध्ये मुख्य विहारामध्ये मध्ये दोन्ही बाजूस भिक्षुना बसण्यास आसनाची व्यवस्था केलेली असून मध्य भागी एक मुख्य स्तूप असावा परंतु या ठिकाणी सध्या शिवपिंड आहे.भिक्षु लोकांच्या राहण्यासाठी व उपासकांना धम्मदेसना देण्यासाठी या लेण्यांची निर्मिती केली असावी परंतु सध्या दिसणार्‍या गुंफा हा लेणीसमुहाचा एक भाग असावा अशी तेथील काही अवशेषावरून कळते. कारण मध्यभागी काही पायऱ्यांचे अवशेष आहेत जे मुख्य लेणीमार्गाकडे जाणारे असावेत.
त्यांनतर या लेण्यात डाव्या व उजव्या बाजूला छोटे विहार आहेत. सर्वाची रचना एकसारखी आहे काहीच फरक आपणास दिसत नाहीत यावरून हि लेणी भिक्षूंच्या निवासासाठी कोरलेली आहेत यात शंका नाही
   सुरुवातीच्या कमानीवर कोरीव नक्षीकाम आहे तसेच आतील कमानीवर हि कोरीव नक्षीकाम असून आतील भागातील कमानीवर चक्रासारखे दिसणारे चिन्ह असून मध्यभागात असणरी मूर्ती स्वरूप नष्ट झालेले आहे या लेण्याला लोकांनी पांडव लेणी म्हणून उल्लेख केला गेला परंतु पांडवांचे या जागी वास्तव्य असण्याचा काही एक सबंध नाही किंवा तसा लिखित पुरावा नाही किंवा ऐतिहासिक हि सापडत नाही
ज्या शिवाय या लेण्यांचा निश्चित कालावधी सांगता येण्यासारखा नसला तरी बांधकाम शैली हि इसवी सनापुर्वीची वाटते. कारण याच लेण्यांचे साम्य साधणारी लेणी आपणास मुंबई मधील कान्हेरीची जी छोटी छोटी लेणी आहेत त्यांच्याशी साम्य साधणारी आहेत त्यामुळे याचा कालावधी ठरवण्यासाठी पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली या लेण्यांचे उत्खनन होणे आवश्यक आहे.

तसेच या लेण्याचे बरेच अवशेष गावात इतरत्र विखुरलेले आपणस पाहायला मिळतात त्यात शिल्पकला पाहायला मिळते काही शिल्पामध्ये तेथील लोकांचे व राजांचे शिल्प तयार केलेलं आहेत लेण्यांचे ते शिल्प असणरी खांब लोकांच्या अज्ञानामुळे इतरत्र पडलेले आहेत आणि काहीचा भाग गावात इतर बांधकामासाठी वापरला गेला आहे एकूण त्या शिल्पाचे स्तंभ पाहता येथील लेणी हि मोठया आकारमानाची असायला पाहिजेत व या याठिकाणी उत्खनन होणे आवश्यक आहे.

महिपतगड

 अलंग –मदन- कुलंग या दुर्गत्रयीप्रमाणे भटकंतीसाठी प्रसिद्ध असलेली अजुन एक दुर्गत्रयी म्हणजे महिपतगड-सुमारगड-रसाळगड. एकाच डोंगररांगेवर उभे राहुन एकमेकांशी जवळीक साधणारे हे दुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील खेड या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण २५ कि.मी. अंतरावर आहेत. यातील उत्तरेकडे असलेला महिपतगड हा सर्वात उंच असुन पुर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने सुद्धा प्रचंड आहे. सह्यद्रीला संमातर असणार्‍या या रांगेची उंची रसाळगडाकडून महिपतगडाकडे वाढत जाते. या किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर असल्याचे सांगीतले जात असले तरी वनखात्याच्या दफ्तरी याचे क्षेत्रफळ २०० एकर २९ गुंठे आहे. हे तीन किल्ले एकमेकांच्या जवळजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड - सुमारगड - रसाळगड असा ट्रेक देखील करतात.

    महिपतगडाचा आपल्याला इतिहासातही उल्लेख सापडतात.हा परिसर जावळीचा असल्यामुळे सुरवातीला हा गड कदाचित जावळीकर मोर्‍यांच्या ताब्यात असला पाहिजे.
शिवकाळात १६६०-६१ च्या दरम्यान महिपतगड स्वराज्यात सामील झाला. इ.स.१६७१सालच्या एका पत्रातील नोंदीनुसार महिपतगडच्या दुरुस्तीसाठी शिवरायांनी ५००० होनांची तरतूद केली होती. महिपतगडचा उल्लेख रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधाने येतो. या किल्ल्याशी संबंधित एक पत्र उपलब्ध असुन त्यात इ.स.१६७६ मध्ये महिपतगड स्वराज्यात असताना दसमाजी नरसाळा हा गडाचा हवालदार होता. महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी महिपतगडाच्या हवालदाराला ८ ऑगस्ट १६७६ रोजी एक पत्र लिहिले होते. यात श्री रामदास स्वामी हे गडावर रहावयास येतील तेव्हा त्यांची व्यवस्था करण्याविषयी बजावले आहे. समर्थ रामदास स्वामी यांना कायमच्या निवासासाठी एक गड हवा होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना महिपतगड व सातारा जिल्ह्यातील परळीचा किल्ला उर्फ अस्वलगड हे दोन गड सुचवले.यातील महिपतगडाची पहाणी रामदास स्वामींनी केली,मात्र हा गड त्यांच्या मनास न आल्याने त्यांनी परळीच्या किल्ल्याची निवड केली,ज्याचा आज 'सज्जनगड' म्हणून उल्लेख होतो. जुलै १७०४ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी याकुतखान याने हा गड मराठ्याकडून जिंकून घेतला. औरंगजेबने गडाचे नामकरण याकुतगड करत गडावर त्यावर १००० सैनिकांची शिबंदी नेमली. त्यानंतर गड मराठ्यांच्या ताब्यात नेमका केव्हा आला हे कळत नसले तरी गडाचे सुभेदार म्हणुन रामचंद्र बल्लाळ हे भगवंतराव त्रिंबक प्रतिनिधी यांच्या वतीने कामकाज पहात होते. इ.स. १८६२ मध्ये किल्ल्यावर चार तोफा असल्याची नोंद मिळते.  
   या गडासंदर्भात आणखी एक दुर्गकथा सांगितली जाते.जेव्हा हा परिसर शिवाजी महाराजांनी नजरेखालून घातला तेव्हा या परिसरात किल्ला उभारला तर याचा उपयोग शत्रुविरुध्द उत्तम होईल असे वाटल्याने, त्यांनी महिपतगडाच्या डोंगरावर दुर्ग उभारणी करण्याचा निर्णय घेतला. सहाजिकच किल्ल्याच्या उभारण्यासाठी मजुर बोलावले गेले.हे सर्व बेलदार रोज बांधकाम करुन मुक्कामासाठी खाली वाडीत जात.मात्र या प्रकारात खुप वेळ वाया जात असल्यामुळे किल्ला बांधायला उशीर होउ लागला.म्हणून शिवाजी महाराजांनी महिपतगडाच्या डोंगराखालीच पाण्याची व्यवस्था व सपाटी बघून बांधकामावरच्या बेलदार लोकांसाठी वस्ती उभारुन दिली.त्यामुळे मजुरांचा वेळ वाचला व गडाचे बांधकाम देखील लवकर संपले.या दुर्गकथेला कोणत्याही एतिहासिक कागदपत्रातून पुरावा नसला तरी महिपतगडाच्या पायथ्याशी आपल्याला आजही वाडी बेलदार नावाची वस्ती दिसते.यावरुन या कथेत थोडा सत्यांश असावा. 
 आडव्यातिडव्या पसरलेल्या महिपतगडावर जायचे तर बरेच पर्याय आहेत.
१ खेड वरून :-
खेड वरून पहाटेच दहिवली गावाला जाणारी बस पकडावी. खेड ते दहिवली १ तासाचे अंतर आहे. दहिवली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. ही वाट लांबची असल्याने गडमाथा गाठण्यास ४ तास लागतात. या वाटेने जातांना आपल्याला दोन खिंडी पार कराव्या लागतात.
खेड ते दहिवली ( घोगरा )
९.३०,१२.२०,२.३०
२ वाडीजैतापूर मार्गे
खेडवरून वाडीजैतापूरला जाणारी गाडी पकडावी. वाडीजैतापूरास उतरल्यावर मळलेल्या वाटेने वाडी बेलदार गावात यावे. वाडीजैतापूर ते वाडीबेलदार हे अंतर दोन ते अडीच तासांचे आहे. वाडीबेलदारहून गडमाथा गाठण्यास १ तास पुरतो. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही.२०१९ मध्ये वाडी जैतापुर ते वाडी-बेलदारपर्यंत कच्चा रस्ता झाल्यामुळे जीपसारख्या वाहनाने महिपतगडच्या पायथ्याशी असलेल्या वाडी बेलदार पर्यंत सहजतेने जाता येते अन्यथा ७ कि.मी. चढ असलेला हा रस्ता पायगाडीने पार करण्यास दोन तास लागतात. हि वाट कमी श्रमाची व जास्त सोयीस्कर आहे. जीप किंवा मोटारसायकलसारखे वाहन असेल तर आपण थेट वाडी बेलदारला जाउ शकतो. 

  ३ रसाळगडवरून सुमारगड मार्गे
रसाळगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा महिपतगड गाठता येतो. हे अंतर साधारणत…: ७ तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा फार संभव आहे.
बहुतांशी दुर्गप्रेमी महिपतगड - सुमारगड - रसाळगड अशी भटकंती करतात. वडगाव,दहिवली, वाडी जैतापुर हि महिपतगडच्या घेऱ्यातील गावे असुन दहिवली व वाडी जैतापुर येथुन गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. दहिवली गावातून वाडी-बेलदार गावामार्गे पायवाटेने वाटेने गडावर जाण्यासाठी ४ तास लागतात. माहितगार व्यक्ती सोबत नसताना रसाळ-सुमार-महीपत अशी वाट शोधणं अशक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. डोंगररचना क्लिष्ट आहे अन् पल्ला खूप लांबचा आहे. वाट समजा चुकली तर दुप्पट वेळ जाणार.

४) वडगाव मार्गे:-
    जर कोणाला मधुमकरंदगड बघून हातलोट घाट किंवा कोंडनाळेमार्गे उतरुन महिपतगड करायचा असेल तर वडगावमार्गे फणशी खिंडीतून महिपतगडावर येता येईल.या मार्गे जवळपास पाच ते सहा तासाची चढाई आहे.
५) कोतवालमार्गे:-
    रायगड जिल्ह्यातील कोतवाल या गावी पोलादपुररुन बस येते.कोतवाल गावातून जंगलातील रस्त्याने आपण महिपतगडावर येउ शकतो.पण हि खुप लांबची वाट आहे.
 
  महिपतगडाच्या पायथ्याची बेलदार वाडी हि दहा-बारा घरांची लहानशी वस्ती असुन येथे चहापाण्याची तसेच जेवणाची चांगली सोय होते. वाडीत मुक्काम करावयाचा असल्यास मारुतीचे मंदिर आहे. गडाची एक सोंड बेलदार वाडीत उतरलेली असुन या सोंडेवरूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. या वाटेवर एक लहानशी विहीर असुन उन्हाळ्यात याच विहीरीचे पाणी वाडी बेलदारचे गावकरी वापरतात. गडावरील पारेश्वर मंदीरात वीज गेली असल्याने या विजेच्या तारांखालुन मंदीरापर्यंत सहजतेने जाता येते. तसेच मंदिरामुळे या वाटेवर स्थानिकांचा वावर असल्याने वाट चांगली मळलेली आहे.एकेकाळी वाडी बेलदार चांगलेच गजबजलेले गाव होते.आता मात्र  रोज संघर्ष करण्यापेक्षा जरा इतरांसारखं जगता यावं म्हणून इथली नवीन पिढी शहरात किंवा पायथ्याच्या गावी स्थलांतरित झालेली आणि मागे उरलेली फक्त जुनी पिढी.कालाय तस्मै नमःअसो.
महिपतगड आडवातिडवा पसरलेला असल्याने शक्यतो वाटाड्या ठरवलेला चांगला.यासाठी वाटाड्याचा संपर्क क्रमांक असा.
 श्री. अनंत जाधव  7709964406
 
 महिपतगडाचा नकाशा

 महिपतगड किल्ला तसा आकाराने फार मोठा आहे. चहुबाजूंचे कडे तुटलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. काही ठिकाणी जिथे कडा चढण्यास सोपा आहे तिथे तटबंदी उभारली आहे. सध्या मात्र ही तटबंदी पडून गेलेली आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्नेयेस यशवंत दरवाजा आहे. सद्यस्थितीला हे सर्व दरवाजे होते, याच्या खुणा फक्त उरलेल्या आहेत. शिवगंगा दरवाजा जवळ एक शिवाची पिंड आहे. पुसाटी दरवाजा जवळ एक शिडी आहे. कोतवाल दरवाजा जवळ मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पारेश्वराचे एक मोठे मंदिर किल्ल्यावर आहे. या मंदिरात राहण्याची सोय होते. मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास होणे फार आवश्यक आहे. या किल्ल्यावर एक आगळावेगळा प्रकार दिसतो, तो म्हणजे न वापरलेल्या चुन्याचे अवशेष येथे पडलेले दिसतात.
      बेलदार वाडीतून जाणाऱ्या वाटेने डावीकडे जायचं.. मग अंदाजे शंभर पावलावर वाट उजवीकडे वळते.. खुरट्या झाडीतून दहा-पंधरा मिनिटे चालून आपण त्या विहिरीपाशी येतो.. इथे डावीकडे डोंगराच्या नाकाडावर/सोंडेवर नेणारी वाट आहे.. या नाकावर चढून आपण डोंगराच्या खाली येतो.. इथे डावीकडे.. एका जोड-डोंगरावर लांब नाकासमोर महीपतगडाचा बुरुज दिसू लागतो.. पायवाट उजवीकडे वळणे घेत महीपतगडाच्या दिशेने जावू लागते.. इथे उजवीकडे एक वाट वर जाताना दिसते आणि एक डावीकडच्या बुरुजाकडे जाणारी.

     गडाची सोंड चढुन थोडे वर आल्यावर डाव्या बाजुस एक बुरुज दिसतो. वाडीत प्रवेश करताना हा बुरुज सतत आपल्यावर नजर ठेऊन असतो. कधीकाळी या वाटेवर असलेला खेड दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झालेला असुन आज त्याचा कोणताही अवशेष दिसत नाही. वाटेने थोडे पुढे आल्यावर आपण एका लहानसा घळीत पोहोचतो. 
 
येथे वरील बाजूस गोलाकार बुरुजासारखी भिंत असुन एक लहानशी पायवाट आपण वर येताना पाहीलेल्या डावीकडील बुरुजाकडे जाताना दिसते. या पायवाटेने आपण थेट बुरुजावर पोहोचतो. 

या बुरुजावरून वाडी बेलदार गाव तसेच आपण गडावर आलो तो मार्ग पुर्णपणे नजरेस पडतो. पुढे दरीकाठाने बुरुजाच्या उजवीकडे गेल्यास आपण पाण्याच्या प्रवाहमार्गावर येतो.



गडाची हि पश्चिम बाजु असुन येथे झाडीत एका चौथऱ्यावर लहान शिवलिंग व नंदी ठेवलेला आहे. कधीकाळी या प्रवाहाच्या ठिकाणी गडाचा दरवाजा होता व येथे असलेला पाण्याचा उगम व शिवमंदिर यामुळे हा दरवाजा शिवगंगा म्हणुन ओळखला जात होता. हा परीसर पाहुन झाल्यावर परत वाटेवर येऊन आपली पुढील वाटचाल सुरु ठेवावी. 



 वर आल्यावर आपण आपण खालुन पाहीलेली गोलाकार भिंत म्हणजे पाणी अडविण्यासाठी बांधलेला बंधारा असल्याचे दिसुन येते. बंधारा पुर्ण क्षमतेने भरल्यावर त्यातील पाणी वाहुन जाण्यासाठी वरील दगडी ठरत गोलाकार नाळी कोरलेली आहे. सध्या या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात माती साठलेली आहे.
 
 बंधार्‍याच्या भिंतीच्या डावीकडून वर येताच पायवाटेने पुढे सरकायचं. पुढे उजवीकडे एक मोठी विहीर दिसते. विहिरीच्या अलीकडे थोडी मोकळी जागा  आणि मागे दाट झाडी-जंगल आहे.या विहिरीचे पाणी वर्षभर उपलब्ध असुन नळाने खाली बेलदार वाडीत नेलेले आहे. बंधाऱ्याच्या डावीकडून दाट झाडीतुन जाणारी वाट आपल्याला पारेश्वर मंदिरात घेऊन जाते.

विहिरीला खेटून गवतातून जाणाऱ्या बारक्या वाटेने पुढे आडवी झाडी दिसते. हि पार करताच एक प्रशस्त मळलेली पायवाट दिसते.हि आपल्याला पारेश्वर मंदिराकडे घेवून जाते. 
 
 
या वाटेने जाताना आसपासच्या झाडीत मोठ्या प्रमाणात वास्तुंचे अवशेष व एका ठिकाणी मळलेल्या चुन्याचा ढीग पहायला मिळतो.या वाटेने झाडीतून जाताच दहा-पंधरा मिनिटात मंदिर दिसू लागले.. मंदिरासमोर एक विहीर आणि बरीच मोकळी जागा. बाकी अथ:पासून इतिपर्यंत जंगलच-जंगल. इथे अस्वल, कोल्हे, बिबटे आणि जंगली प्राण्यांचा मुक्त वावर आहे.त्यामुळे इथल्या गडावरच्या जंगलात मुक्काम करीत असाल तर सावधान! 

 
 
 

 वाडीबेलदारहून गडदर्शन करत पारेश्वर मंदिर गाठण्यास १ तास पुरेसा होतो. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासून उंची २९६० फुट आहे. गडावर मुक्काम करण्यास हे अतिशय सुंदर ठिकाण असुन यात २० ते २५ जणांची राहण्याची सोय होते.३८ फुट लांब आणि २० फुट रुंद अश्या या मंदीराला पुर्वी सरकारातून सालिना १५ रुपयाची नेमणूक असे.


 
 
 

 
  
 
 


 

 

 

 

घनदाट रानातलं गडावरचं रोज पूजा होणारं शिवमंदिर – पत्र्याची शेड अन् फरश्या घातलेल्या - आसपासची मोकळी जागा - विजेची सोय – समोर पाण्याची विहीर अशी ही मुक्कामास झ्याक जागा!!!
पारेश्वर मंदिरा समोरची विहीर

 मंदिरासमोर एक लहानशी विहीर असुन उजव्या बाजूस कोरडे पडलेले तळे आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस सदरेचा चौथरा असुन सध्या तेथे काही अनघड देव विराजमान झालेले आहेत. पारेश्वर मंदिर गडाच्या मध्यवर्ती भागात असल्याने आपले सामान या मंदीरात ठेऊन उर्वरीत भटकंतीस सुरवात करावी. ह्या मंदिरात वाडी बेलदार मधील लोक महाशिवरात्री खुप उत्साहाने साजरी करतात.पारेश्वराच्या मंदिरा समोर एक गोड्या पाण्याची बाराही महीने तुडूंब भरलेली विहीर आहे. ह्या मंदिरात एक वेळस २० ते २५ जण आरामात निवास करू शकतात. मंदिराच्या आजूबाजूला अनेक अवशेष सापडतात. किल्ल्याचा संपुर्ण भाग म्हणजे घनदाट जंगलाच एक पठारच आहे. ज्या ठिकाणी कडे चढण्यास सोप्पे आहे तेथेच तटबंदी उभारण्यात आली आहे. ह्या किल्ल्यावर उत्खनन केल्यास अनेक ऐतिहासिक खुणा सापडू शकतात.  
 
 
 
मंदिराच्या उजवीकडे काहीशा अंतरावर घडीव दगडात बांधलेल्या दोन नक्षीदार समाध्या नजरेस पडतात. या समाधीकडून उत्तरेकडे सरळ जाणारी वाट आपल्याला कोतवाल दरवाजाकडे घेऊन जाते. 
 
या वाटेवर आपल्याला अजुन एक समाधी चौथरा पहायला मिळतो. स्थानीक ग्रामस्थ याला होळीचा माळ म्हणुन ओळखतात. पुढे गचपण वाढू लागते अगदी ऊन दिसेनासे होइळ इतकी झाडी आहे.
या वाटेने वीस मिनिटे चालत आपण कोतवाल दरवाजाजवळ पोहोचतो.
 
 येथे एका चौथऱ्यावर भग्न झालेली मारुतीची मूर्ती ठेवलेली खाली उतरत जाणारी वाट आपल्याला कोतवाल गावात घेऊन जाते पण आता हि वाट वापरात नसल्याने पुर्णपणे मोडलेली आहे. या ठिकाणी दरवाजाचे अवशेष दिसत नसले तरी दरीकाठावर असलेली रचीव दगडाची तटबंदी व चौकीचे अवशेष दिसुन येतात.
 
 या दरवाजाच्या खालील भागात घडीव दगडात बांधलेले दोन बुरुज असुन ते येथुन नजरेस पडत नसल्याने दरवाजाच्या उजवीकडील टेकडावर चढुन जावे लागते. 
 
 महिपत ते सुमार डोंगररांग
 
 महाबळेश्वरचे पठार-महिपतगडावरुन
 चकदेव परिसर आणि खाली जगबुडी नदीचे खोरे
 
 
 
 मधुमकरंदगड परिसर-महिपतगडावरुन
 
येथुन खाली जगबुडी नदीचे खोरे, दूरवर कोतवाल गाव, ईशान्येला प्रतापगड व महाबळेश्वरची डोंगररांग तर पूर्वेला असलेला हातलोट घाट मधु-मकरंदगड, चकदेव, परबत अशी सह्याद्रीची डोंगररांग नजरेस पडते. सह्याद्रीचे विश्वरूप दर्शन दाखवणाऱ्या काही अद्भुत जागांपैकी हि एक दिव्य जागा आहे हे नक्की
 
 
 येथे समोरच पुसाटी कडा असुन या कड्याखालुन एक वाट गडावर येते. या ठिकाणी वर येण्यासाठी शिडी लावलेली आहे. या दरवाजाच्या पुढील भागात लालदेवडी दरवाजा आहे. कोतवाल दरवाजाचा हा परिसर पाहुन झाल्यावर पुन्हा पारेश्वर मंदीराकडे यावे. आता मंदिरासमोरून जाणऱ्या वाटेने पुढील गडफेरीस सुरवात करावी. हि वाट आपल्याला यशवंत दरवाजाकडे घेऊन जाते. या वाटेने जाताना एका ठिकाणी उजवीकडे कोरडा पडलेला तलाव पहायला मिळतो. साधारण अर्धा तास वाटचाल केल्यावर आपण यशवंत दरवाजाजवळ पोहोचतो.

 यशवंती बुरुजापाशी चुन्याचे ५-६ बुरुज/ संरक्षक आडोसे वैशिष्ट्यपूर्ण होते.
 
 या भागातील तटबंदी घडीव दगडात तसेच चुन्यामध्ये बांधलेली आहे. कोतवाल दरवाजा प्रमाणे हे बुरुज देखील एकमेकांपासुन काही अंतरावर असुन या दोन बुरुजांच्या बेचक्यामधुनच यशवंत दरवाजाची वाट वर चढते.

 

 या भागात झाडी नसल्याने दोन्ही बुरुजावर तसेच बुरुजाच्या खालील भागात जाता येते. येथे देखील दरवाजाचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. या भागात खुप मोठ्या प्रमाणात चुन्याचे ढीग दिसुन येतात. यशवंत दरवाजा पाहुन झाल्यावर पुन्हा आपला मोर्चा पारेश्वर मंदीराकडे वळवावा व मंदीरात ठेवलेल्या पाठपिशव्या घेऊन गडावर आलेल्या वाटेने आपला परतीचा प्रवास सुरु करावा. परत जाताना वाटेच्या डाव्या बाजुस आपल्याला चुन्याचा ढिगारा पहायला मिळतो. येथे डाव्या बाजुस एक वाट जंगलात शिरताना दिसते. 

या वाटेवर साधारण ५ मिनिटे चालल्यावर दाट झाडीत साधारण १० फुट उंचीच्या चौथऱ्यावर सरळ रेषेत घडीव दगडात बांधलेल्या ७०-८० फुट लांबीच्या चार भिंती नजरेस पडतात. या वास्तुचे नेमके प्रयोजन लक्षात येत नाही. 
 
 
 
 
 
 पश्चिमाभिमुख मारुती आणि गणपती
 
येथुन थोडे पुढे आल्यावर एका चौथऱ्यावर ठेवलेली मारुतीची व गणपतीची मुर्ती नजरेस पडते. कधीकाळी दोन स्वतंत्र राउळात असणाऱ्या या मुर्ती आज एका झाडाखाली विराजमान झाल्या आहेत. या मंदिराकडून पायऱ्यांची एक प्रशस्त पायवाट खाली उतरताना दिसते. 
 
गडाचा खेड दरवाजा या पायऱ्यांच्या खालील बाजूस असल्याचे स्थानिक सांगतात पण येथील कडा पहाता ते शक्य वाटत नाही. महिपतगडच्या चहुबाजूंनी तुटलेले कडे असल्याने फारशी तटबंदी उभारलेली दिसत नाही पण जिथे कडा चढण्यास सोपा होता तिथे तटबंदी उभारली आहे. सध्या मात्र ही तटबंदी पडलेली आहे. 
 
 पीराचे ठिकाण - सुंदर बांधकाम
 
 शिवलिंग आणि तोफगोळे
 
 
किल्ल्याचे एकुण बांधकाम, त्यावरील चुन्याचे ढीग तसेच एकही न दिसणारा दरवाजा व किल्ल्याखाली असलेली बेलदार वाडी पहाता हा किल्ला व त्याचे दरवाजे पुर्णपणे बांधुन झाले नसावेत असे वाटते. इतक्या मोठ्या किल्ल्यासाठी अपुरी असणारी पाण्याची सोय हे त्याचे मुख्य कारण असावे. किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. 

बांधकामाची अनेक जोती दाट झाडीमध्ये झाकलेली असून तेथपर्यंत सहज पोहोचता येत नाही. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास होणे फार आवश्यक आहे. किल्ल्यावर असलेल्या दाट जंगलामुळे चुकू नये यासाठी स्थानिक वाटाड्या सोबत घ्यावा पण तो पुर्ण किल्ला दाखवेल अशी अपेक्षा ठेऊ नये. गावातील वाटाडे पुसाटी दरवाजा व त्याच्या अलीकडे असलेल्या लालदेवडी दरवाजाकडे जाण्यासाठी नकार देतात व त्यांच्या सोयीसाठी गडाला चारच दरवाजे असल्याचे तुणतुणे वाजवत रहातात. आपल्या सोबत आलेल्या वाटाड्याला आपली भटकंती व दुर्गप्रेम याच्याविषयी काही देणेघेणे नसते तर त्याचे नाते फक्त मिळणाऱ्या मानधनाशी होते. वाटाडे पुर्ण किल्ला दाखवण्याएवजी शक्य तितक्या कमी वेळात किल्ला फिरवण्याचा प्रयत्न करतात. पुरी गावातुन एक पुजारी शनिवार-रविवार गडावर पुजेसाठी येतात. त्यांना संपुर्ण गड माहीत असुन शक्य झाल्यास त्यांनाच वाटाड्या म्हणुन सोबत घेणे. संपुर्ण गड फिरण्यासाठी एक पुर्ण दिवस हाताशी हवा. थोडक्यात गड फिरण्यास दोन ते तीन तास पुरेसे होतात. 
     एकंदरीत फार वावर नसलेल्या आणि घनदाट जंगलभ्रमंतीचा आनंद देणारा हा महिपतगड प्रत्येक दुर्गप्रेमींनी एकदा का होईना आवर्जून पाहीलाच पाहिजे.अर्थात फक्त महिपत बघण्यासाठी वाट वाकडी करण्यापेक्षा रसाळ,सुमार आणि महिपत अशी या दुर्गत्रयीची डोंगरयात्रा आपल्याला एक आगळी अनुभुती देउन जाते.त्याचा जरुर अनुभव घ्या.
 संदर्भग्रंथ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
४) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा-सतिश अक्कलकोट
५)  https://www.discoversahyadri.in/ हे ब्लॉग
६) www.durgbharari.in हि वेबसाईट
७) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
 
 









मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...