Wednesday, August 5, 2026

नगरधन

 
प्रकार : भुईकोट

जिल्हा : नागपुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुर जिल्ह्यात रामटेक व नगरधन हे दोन महत्वाचे किल्ले आहेत. यातील रामटेक हा गिरीदुर्ग विदर्भात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे पण नगरधन हा भुईकोट त्यामानाने अपरीचीत आहे. नागपुर- नगरधन हे अंतर ३७ कि.मी.असुन रामटेक या तालुक्याच्या ठिकाणापासून नगरधनचा किल्ला ६ कि.मी. अंतरावर आहे. नागपूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गावर मनसर गाव आहे. या मनसर गावातून रामटेककडे जाण्यासाठी फुटतो. या रस्त्याने रामटेकला आल्यावर तेथून सहा कि.मी.वर नगरधन गाव गाहे. नागपुर शहरापासुन जवळच असलेल्या या किल्ल्यांना जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय असल्याने एका दिवसात हे दोन्ही किल्ले सहजपणे पाहुन होतात. नगरधनचा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असुन त्यांनी २०१२ मध्ये तटबंदी व आतील भाग दुरुस्त करून किल्ल्याला पुर्वीचे सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. किल्ला पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत उघडा असतो. सोमवारी किल्ला बंद असतो. नगरधन किल्ला गावाबाहेर असुन गावातुन बाहेर पडल्यावर समोरच किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसुन येतात. किल्ल्याची तटबंदी व दरवाजा पिवळसर पण काळ्या रंगाची झाक असलेल्या दगडांनी बांधलेली असुन तटबंदीची उंची साधारण २० ते २२ फुट उंच आहे. तटबंदीवर चर्या असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा साधारण १२ फुट उंच असुन वरील बाजुस नगारखाना व टोकाला दोन मनोरे आहेत. दरवाजाच्या कमानीच्या मध्यावर गणेश प्रतिमा कोरलेली असुन चौकटीच्या कोनाड्यात कमळ,चषक,द्वारपाल अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत. मुख्य दरवाजाला समांतर आतील बाजुस काटकोनात दुसरा उत्तराभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजादेखील गणपती, हत्ती,शरभ अशी विविध शिल्पे कोरून सुशोभित करण्यात आला आहे. किल्ल्यात शिरलेल्या व्यक्तीला थेट आत जाता येऊ नये यासाठी हि रणमंडळाची रचना असुन हा संपुर्ण भाग तटबंदीवरून माराच्या टप्प्यात आहे. या भागात चौथऱ्यावर आठ ओवऱ्या असुन येथील जनतेच्या दिवाणी कामकाजाच्या या कचेऱ्या असाव्यात. दुसऱ्या दरवाजातून आत शिरल्यावर डाव्या बाजुस तटबंदीमध्ये एक लहान दरवाजा असुन त्यातुन तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटावर आल्यावर समोरच फांजीवर एक कबर आहे. इथुन पुर्ण किल्ल्याचा अंतर्भाग नजरेस पडतो. चौकोनी आकाराचा हा किल्ला दोन एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एकुण सात बुरुज आहेत. यातील एक बुरुज चौकोनी, दोन बुरुज षटकोनी तर उर्वरीत चार बुरुज गोलाकार आहेत. तटावर चढउतार करण्यासाठी अनेक ठिकाणी तटाला लागुन पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटबंदीची फांजी साधारण ४ फूट रुंद असून तटबंदी अखंड असल्याने त्यावरून संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. येथुन सर्वप्रथम किल्ल्याच्या दरवाजावरील नगारखाना व त्याशेजारील मुर्तीचे दर्शन घेऊन पुर्व दिशेने गडफेरीस सुरवात करावी व दक्षिणेकडील तटावरून खाली उतरावे. किल्ल्याच्या तटावरून रामटेक किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. किल्ल्यातील मुख्य अवशेष दक्षिण तटबंदीला लागुनच आहेत. दक्षिणेकडील तटबंदीत तीन कमानीचे दालन असुन या दालनाखाली किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दुसरा लहान दरवाजा आहे. किल्ल्याच्या दक्षिणपश्चिम तटबंदीला लागुन एक मोठा चौथरा असुन या चौथऱ्यावर कोरीवकाम केलेला मध्यम आकाराचा हौद आहे. या हौदाच्या चारही बाजुस आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या हौदाच्या मागे तटाकडील बाजुस दुसरा मोठा खोल हौद असुन या हौदाच्या तळात एक गोलाकार खोल विहीर आहे. या हौदात उतरण्यासाठी १५ पायऱ्या असुन या हौदातून व विहीरीतून पाणी उपसण्याची सोय केली आहे. या वास्तुची प्राकारभिंत पुर्णपणे नष्ट झाली असुन केवळ दरवाजाची कमान शिल्लक आहे. येथील एकंदरीत रचना, त्यातील कलात्मक हौद व आत येण्यासाठी असलेला स्वतंत्र दरवाजा पहाता हि दरबाराची जागा असावी. किल्ल्याच्या दक्षिणपूर्व तटबंदीला लागुन किल्ल्यातील सर्वात सुंदर वास्तु आहे. हि वास्तु म्हणजे या किल्ल्याचे वैभव आहे. येथे चौकोनी आकाराची तीन मजली विहीर असुन या विहीरीच्या तळमजल्यावर पाणी तर वरील दोन मजल्यावर राहाण्याची सोय व एक मंदीर आहे. हि वास्तु जरी एकच असली तरी विहीर व या कक्षात जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहे. विहिरीत उतरण्यासाठी साधारण ४० पायऱ्या असुन मंदिराच्या दालनात व कमानीयुक्त कक्षात जाण्यासाठी भुमीगत पायऱ्या आहेत. हि दालने जमिनीखाली व पाण्याजवळ असल्याने येथील वातावरण कमालीचे थंड आहे. या कक्षांचा वापर उन्हाळ्याच्या दिवसात विश्रांतीसाठी होत असावा. या वास्तूभोवती असलेली प्राकाराची भिंत आजही काही प्रमाणात शिल्लक असुन यातील दरवाजाची केवळ कमान शिल्लक आहे. येथुन मुख्य दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. नगरधन हा नंदीवर्धन नावाचा अपभ्रंश आहे. इ.स.२७० ते ५०० पर्यंत वाकाटकांची सत्ता विदर्भ भागावर होती. नंदीवर्धन, प्रवरपूर, वत्सगुल्म ही ठिकाणे त्याकाळी प्रसिद्ध होती. यातील नंदीवर्धन म्हणजे आजचे नगरधन ही वाकाटकांची राजधानी होती. विंध्यशक्ती (इ.स. २५० ते इ.स. २७०), प्रवरसेन पहिला (इ.स. २७० ते इ.स. ३३०), हरीसेन (इ.स. ४७५ ते इ.स. ५००) हे वाकाटकांचे महत्त्वाचे राजे होऊन गेले. विंध्यशक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता. विंध्यशक्तीचा पुत्र प्रथम प्रवरसेन हा सर्वात बलशाली राजा होता. प्रथम प्रवरसेन याचा पुत्र रुद्रसेन (व्दितीय) याची पट्टराणी प्रभावती होती. ही प्रभावती चंद्रगुप्त (व्दितीय) याची कन्या होती. रुद्रसेन (व्दितीय) याने आपली राजधानी नंदिवर्धन येथे आणली. राजा रुद्रसेन अल्पायुषी ठरल्याने राज्यकारभार राणी प्रभावतीच्या ताब्यात आला. या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी तिच्या सोबत महाकवी कालिदासांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळी त्यांचा मुक्काम नगरधन किल्ल्यातच होता. नंतरच्या काळात या दुर्गाच्या अवशेषावर गोंड राजाच्या राजवटीत किल्ला बांधण्यात आला. पेशव्यांच्या काळात नागपूरकर भोसल्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली म्हणजे इ.स.५ व्या शतकापासुन आजवर हा किल्ला नांदता आहे.
 
 
 
 

प्रस्तावना

नागपूर पासून ५० किमी अंतरावर व रामटेक पासून ७ किमी अंतरावर "नगरधन" नावाचा सुंदर भुईकोट किल्ला आहे. नागपूर जवळील रामटेक पहायला येणारे पर्यटक मात्र या किल्ल्याकडे फिरकत नाहीत. इ.स. २०१२ मध्ये पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडूजी केलेली आहे. त्यामुळे हा किल्ला आता पुन्हा आपले पूर्वीचे वैभव दाखवत दिमाखात उभा आहे. किल्ल्यातील भूयारी मंदिर हे अजून एक आकर्षण आहे.

मध्यप्रदेशातील उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य याने आपली मुलगी प्रभावती हिला विदर्भाची जहागिरी दिली होती. या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी तिच्या सोबत महाकवी कालिदासांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळी त्यांचा मुक्काम नगरधन किल्ल्यातच होता. याच किल्ल्यातून दूर दिसणार्‍या रामटेकच्या डोंगरावर उतरलेल्या पावसाळ्याच्या पहिल्या मेघाला ( आषाढातल्या पहिल्या मेघाला) पाहून कालिदास उज्जैन नगरीच्या आठवणींनी व्याकुळ झाले व त्यांना मेघदूत हे अजरामर काव्य सुचले अशी आख्यायिका आहे.

नगरधन ही वाकाटक घराण्याची राजधानी होती. तेंव्हा पासून म्हणजेच इ.स. ५ ते १८ व्या शतकापर्यंत हा किल्ला नांदता होता. गडा व्यतिरीक्त गावातही अनेक पूरातन अवशेष विखुरलेले आहेत.

नगरधन किल्ला पुरातत्व खात्याच्या अख्यातरीत असल्याने किल्ल्याचे प्रवेशव्दार सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत उघडे असते. सोमवारी किल्ला पाहाण्यासाठी बंद असतो.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

स्थानिक आख्यायिके नुसार या किल्ल्याची निर्मिती नंद राजाने केली. इतिहासकारांच्या मते इ.सनाच्या ४ थ्या ५ व्या शतकात नंदिवर्धन राजाने या किल्ल्याची व नगराची उभारणी केली व ते भरभराटीस आणले. त्याच बरोबर राजप्रासाद, मंदिरे,जलाशय यांची निर्मिती केली. वाकटाकां नंतर नल व स्वामिराज (इ.स.५७३) यांच्या काळात हे स्थान राजकीय दृष्ट्या महत्वाचे होते. त्यानंतर आलेल्या राष्ट्रकुटांच्या काळात नगरधन हे केवळ एका जिल्ह्याचे मुख्यालय होते. पुढे गोंड राजाने वाकाटकांच्या जुन्या किल्ल्यांच्या अवशेषांवर नविन किल्ला बांधला, त्यात जून्या किल्ल्याचे साहीत्य वापरण्यात आले होते. पेशव्यांच्या काळात नागपूरकर भोसल्यांनी या किल्ल्याची डागडूजी करून नविन बांधकामे केली.

महत्त्वाची ठिकाणे

प्रथमदर्शनी दिसणारे नगरधन किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदीत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज. या तटबंदीत चौकोनी, गोल, अष्टकोनी आकाराचे बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याच्या तटबंदीची उंची ६ ते ८ मीटर असून त्यावर चर्या आहेत. तटबंदीत जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. फांजी ३ ते ४ फूट रुंद असून त्यावरून किल्ल्याला आतून प्रदक्षिणा घालता येते.

किल्ल्याचे उत्तराभिमूख प्रवेशव्दार १२ फूट उंच असून त्यावर नगारखाना आहे. प्रवेशव्दारातून आत आल्यावर समोरच देवड्यांची रांग आहे.(पुढील काळात या भागात कचेर्‍या असण्याचीही शक्यता आहे.) .नगरधन किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार उत्तराभिमूख असून त्यावर व्दारशिल्प कोरलेली आहेत. दरवाजावरील उजव्या कोपर्‍यात व मध्ये शरभ कोरलेले असून डाव्या कोपर्‍यात २ हत्ती कोरलेले आहेत. दरवाजाच्या मधोमध गणेशमूर्ती कोरलेली आहे. या प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रव्र्श केल्यावर डाव्या हाताला घोड्यांच्या पागा आहेत, तर उजव्या बाजूला तटबंदीवर जाण्यासाठी छोटा दरवाजा व जिना आहे. या जिन्याने वर गेल्यावर फांजीवर एक पीराचे थडगे आहे. येथून पहिल्या प्रवेशव्दारावर असलेल्या नगारखान्या पर्यंत जाता येते.

जिन्यावरून उतरून समोर दिसणार्‍या भुयारीदेवीच्या मंदिराकडे चालत जावे. याला भुयारी देवी न्हणत असले तरी येथे पाण्याच्या टाक्याजवळ देवीच्या मुर्तीची स्थापना करून पाण्याच्या स्त्रोताचे पावित्र जपले आहे. या मंदिरात जाण्यासाठी काळोख्या जिन्याने खाली उतरावे लागते. खालच्या भागात उन्हाळ्याच्या दिवसात विश्रांती घेण्यासाठी दालन बनविलेले आहे. जमिनीच्या पोटात व पाण्याच्या सानिध्यात हे दालन असल्यामुळे विदर्भाच्या उन्हाळ्यातही येथे गारवा जाणवतो.

किल्ल्याच्या दक्षिणेकडील (मागच्या) भिंतीत तीन कमानी असलेले दालन आहे . या दालनाच्या खाली जमिनीच्या खालच्या पातळीवर चोर दरवाजा आहे. तेथून पुढे चालत गेल्यावर एक चौकोनी हौद आहे. या हौदात जमिनीच्या खाली १० फूटावर एक विहिर खोदलेली आहे. हौदात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. विदर्भातील कडक उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे. विहिरीच्या पुढच्या बाजूस राजवाडा किंवा महालाचा चौथरा आहे. या महालात ४ बाजूंनी पायर्‍या असलेला एक उथळ हौद आहे.( पूर्वीच्या काळी या हौदात कारंजा व कमळाची फूल ठेवून महालाची शोभा वाढवली जात असावी) महालात येण्यासाठी असलेल प्रवेशव्दार सध्या उध्वस्त अवस्थेत आहे. त्यावर नक्षीकामाचा उत्तम नमुना आहे. या महाला पासून मुख्य प्रवेशव्दारा कडे आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते.

कसे पोहोचावे

नागपूर ते रामटेक अंतर ५0 किमी आहे. नागपूर ते रामटेक एसटीची बससेवा आहे. रामटेक गावातून उजव्या हाताचा रस्ता ७ किमीवरील नगरधन गावात जातो. रामटेकहून नगरधनला जाण्यासाठी रामटेक मध्ये ६ आसनी रिक्षा मिळतात. नगरधन गावा बाहेर नगरधन किल्ला आहे.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ गावातून ५ मिनिटे लागतात.

 
 
 नगरधन किल्ला (Nagardhan Fort)

ता.रामटेक जि.नागपूर

हा किल्ला भुईकोट किल्ला या प्रकारात मोडतो.विस्ताराने आणि आकाराने हा किल्ला जरी लहान असला तरी विदर्भातील महत्त्वाच्या किल्ल्यात याची गणना होते.इ.स. पाचव्या शतकातील वाकाटक कालीन दुर्गाच्या अवशेषावर गोंड राजाच्या राजवटीत किल्ला बांधण्यात आला असल्याने जुन्या बांधकामातील विटांचा उपयोग आलेला आहे.नागपूर भोसल्यांच्या काळात या किल्याची वेळोवेळी डागडुजी काही नवीन बांधकामाची जोडणी यात करण्यात आली.

Nagardhan Fort_Nagpur_039

या किल्ल्याची लांबी १०२ मीटर व रुंदी ८८ मीटर असून तटबंदी आणि प्रवेशद्वार याची उंची ६ ते ८ मीटर पर्यंत आहे.किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य त्याच्या तटबंदीत आहे.ते असे कि चौकोनी, गोल, अष्टकोनी आकाराचे बुरुज पहायला मिळतात.

Nagardhan-Fort_Nagpur_007

किल्ल्याच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वारावर श्री गणेशाचे शिल्पांकन असून कलश पूर्णविकसित कमळ,गजशार्दुल प्रवेशद्वार सुशोभीत आहे.प्रवेशद्वारावरच नगारखाना आहे.

Nagardhan-Fort_Nagpur_037

दरवाजावर कोरलेली शरभशिल्पे

Nagardhan-Fort_Nagpur_027

किल्ल्यात एक उथळ हौद आहे.यात उतरण्यासाठी चारही बाजूला पायऱ्या आहेत.पूर्वीच्याकाळी कदाचित यात उगवत असलेली कमळाची फुले महालाची शोभा वाढवत असावी.

Nagardhan-Fort_Nagpur_002

किल्यातील “भुयारी मंदिर” हे एक अजून कवतिक आहे.

Nagardhan-Fort_Nagpur_014

भूमिगत पाण्याचा हौद.

Nagardhan-Fort_Nagpur_009

किल्ल्यात असलेल्या महालात येण्यासाठी असणारा दरवाजा जो सध्या उध्वस्त झालेला आहे.

Nagardhan-Fort_Nagpur_020

 Nagardhan-Fort_Nagpur_024

नागपूर ते नगरधन अंतर ५० किलोमीटर आहे.नगरधन किल्ल्यासाठी रामटेकला यावे आणि तेथून ६ आसनी रिक्षाने जाता येते.हा किल्ला नगरधन गावाच्या जवळच आहे.

 
 


















 नगरधन भुईकोट, नागपूर (किल्ला संवर्धनाचे उत्कृष्ट उदाहरण)
नगरधन भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यात रामटेकपासून वायव्येस सुमारे ७ कि. मी. अंतरावर असलेला हा 'भुईकोट' प्रकारातील एक किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. हा किल्ला आहे. इसवी सनाच्या ४ थ्या शतकात ही जागा 'नंदीवर्धन' म्हणून ओळखली जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधाणचा किल्ला हा इसवी सनाच्या साधारण चवथ्या शतकातील किल्ला असावा. जुन्या आणि नव्याचा संगम असलेला नगरधनचा हा भुईकोट आहे.
नगरधन गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. नगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अंलकृत केलेली आहेत. शिरोभागी गणेशाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूंना चषक कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला द्वारपाल कोरलेले असून त्यांच्या खांद्यावर कबुतर दाखवले आहे. पुर्वी निरोपानिरोपी करण्यासाठी कबुतरांचा वापर करीत असत. दाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. पूर्वी आत येणाऱ्यांची चौकशी व झाडाझडती येथेच घेतली जायची. उमलती कमलपुष्पे हे यादवांचे चिन्ह प्रवेशाच्या दोन्ही बाजूंस आहे. प्रवेशदारातून आत गेल्यावर एक आयताकृती कक्ष लागतो. येथे आत हा भुईकोट आहे. तो गोंड राजाच्या वेळचा असावा. येथे एक पायऱ्याची विहीरही आहे..
विदर्भातील रामटेक हे धार्मिक स्थळ म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील भाविकांबरोबर इतर राज्यांमधूनही अनेक भाविकांचा ओघ रामटेकला असतो. रामटेकच्या प्रसिद्ध अशा धार्मिक व पर्यटन स्थळाच्या जवळ असूनही नगरधनचा किल्ला मात्र अनेकांना अपरिचित आहे. रामटेकच्या डोंगरावरुन नगरधनचा किल्ला ओळखू येतो. नगरधाणचा किल्ला रामटेक तालुक्यात असून नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर ते जबलपूर असा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग क्र. ७ आहे. या महामार्गावर मनसर हे गाव आहे. या मनसर गावातून पश्चिमेकडे रामटेककडे जाण्यासाठी किंवा भंडारा जिल्ह्यातील तुमसरकडे जाण्यासाठी रस्ता फुटतो. या रस्त्याने रामटेक गाठल्यावर तेथून सहा-सात किलोमीटर दक्षिणेकडे नगरधन गाव गाहे.
नगरधन गावाच्या बाहेर (गाव ओलांडल्यावर) नगरधनचा किल्ला आहे. नागपूरपासून वाहनाने दीड तासात नगरधनपर्यंत पोहोचता येते.
नगरधनचा भुईकोट हा प्रथमदर्शनी आपल्याला मोहवून टाकतो. नगरधन किल्ल्याने कात टाकून नवे रूप धारण केले आहे. याची तटबंदी व आतील भाग नव्याने दुरुस्त केलेला आहे. लालसर पण काळ्यारंगाची झाक असलेल्या चिऱ्यांनी किल्ल्याची तटबंदी व दरवाजा बांधून काढल्यामुळे त्याचे सौंदर्य कैकपटींनी वाढलेले आहे. दारातून आत शिरल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवर चढल्यावर तटबंदीवरुन फेरी मारता येते. या रुंद तटबंदीवर निरीक्षणासाठी मनोरे केलेले आहेत. येथून रामटेक किल्ल्याचे उत्तम दर्शन होते. किल्ल्याच्या आत वाड्याचे तसेच इतर निवासस्थानांचे अवशेष आहेत. किल्ल्यामध्ये तीन मजली खोल विहीर आहे. या मजल्यावर कमानीयुक्त खोल्या असून पायऱ्या उतरून तिथपर्यंत पोहोचता येते. किल्ल्यामध्ये मंदिर, तसेच काही ठिकाणी प्राचीन अवशेषही पहायला मिळतात.
(साभार - Anup Lambat Patil)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...