Wednesday, August 5, 2026

भिवागड

 

भिवागड

गिरीदुर्ग नागपूर भिमसेन कुवारा

🏔️

श्रेणी नुसार स्तर

मध्यम

📏

समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)

1446

🏰

किल्ल्याचा प्रकार

गिरीदुर्ग

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

भिवागड किल्ला सध्या भिमसेन कुवारा या नावाने ओळखला जातो. भिमसेन कुवारा हे पेंच अभयारण्याच्या परिसरातील प्रसिद्ध देवस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी भक्त आणि पर्यटकांचा राबता कायम असतो. पेंच धरणाच्या बॅक वॉटरने किल्ल्याला तीन बाजूने विळखा घातलेला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या आजूबाजूला पसरलेले पाणी आणि दूरवर दिसणारे घनदाट जंगल यामुळे हा परिसर खूप सुंदर दिसतो .

महत्त्वाची ठिकाणे

भिवागडच्या पायथ्यापर्यंत खाजगी वहानाने जाता येते . वहानतळा जवळ जलाशयाला लागून भिमसेन कुवाराचे मंदिर आहे . आदिवासी दंतकथेनुसार भिमसेन गडा वरील त्याच्या स्थाना वरून ३ पावलात या ठिकाणी येउन बसला . मंदिराच्या थोडे पुढे एक पाण्याची चौकोनी विहीर आहे . या ठिकाणी भिमसेनने दुसरे पाऊल ठेवले होते . येथून मळलेल्या पायवाटेने भिवागड किल्ल्याच्या दिशेने जातांना एक ओढा ओलांडावा लागतो . या ओढ्या जवळ भिमसेनने पहिले पाउल ठेवले होते . ओढ्याच्या पुढे वाट चढत, वळसे घेत किल्ल्याच्या डोंगरा पर्यंत जाते . किल्ल्याच्या डोंगराला भिडलो की खडा चढ चालू होतो . साधारणपणे १५ मिनिटात आपण बुरुजाजवळ पोहोचतो. हा बुरुज दगड एकमेकावर रचून बनवलेला आहे . या किल्ल्यावरील सर्व बुरूज चौकोनी आहेत आणि तटबंदीही रचीव दगडांची आहे . या बुरुजापासून पाच मिनिटात गड माथ्यावर पोहोचतो . इथे एका अनघड दगडाला शेंदूर लावलेला आहे . त्याला भीमसेन कुवारा म्हणतात . इथे एक पिंड सुध्दा आहे . डाव्या बाजूला एका बुरुजाचे अवशेष आहेत . भिमसेनाचे दर्शन घेउन उजव्या बाजूला पुढे चालायला सुरुवात केल्यावर एक खड्डा दिसतो या ठिकाणी एकेकाळी बारमाही पाणी मिळत होते . पण आता तेथे पाणी नाही आहे . या ठिकाणावरून थोडे खाली उतरुन मळलेल्या पायवाटेने सरळ चालत जातांना या पायवाटेला समांतर खालच्या बाजूला चौकनी बुरूज आणि तटबंदी पाहायला मिळतात . या पायवाटेने राणी महालाच्या दिशेने खाली उतरल्यावर किल्ल्याच्या साधारण पाव उंचीवर एक दरवाजा आहे . किल्ल्याच्या खाली राणीमहाल नावाची वास्तू आहे . महालातून किल्ल्यावर जाण्यासाठी हे प्रवेशव्दार होते. ऱाणी महाल सध्या धरणाच्या जलाशयात बुडालेला आहे. तो पाहाण्यासाठी बोटीने जावे लागते . वहानतळा जवळून बोटी सूटतात. माणशी ५०/- रुपये शुक्ल घेतात.

किल्ल्याचे प्रवेशद्वार पाहून आल्या मार्गाने पुन्हा किल्ल्यावर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते . किल्ला पाहाण्यासाठी पाउण तास लागतो .

कसे पोहोचावे

नागपूर ते भिवागड (भिमसेन कुवारा) अंतर ४६ किलोमीटर आहे.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ पायथ्यापासून अर्धा तास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात राहाण्याची सोय होवू शकेल.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही .

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .
 
 
 
 


प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नागपुर

उंची : १४२७ फुट

श्रेणी : मध्यम

नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातील उत्तर भागात असलेल्या घनदाट जंगलामधून पेंच नदी वाहते. घनदाट जंगलामुळे आधीच दुर्गम असलेला हा परिसर पेंच नदीवर बांधलेल्या धरणामुळे अधीकच दुर्गम आणि निसर्गरम्य झाला आहे. या धरणाच्या काठावर असलेल्या उंच टेकडीवर भिवगड हा किल्ला आहे. पण टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या भिवसेन कुआरा या देवस्थानामुळे हा किल्ला भिवगडापेक्षा भिवसेन कुआरा म्हणून या भागात जास्त प्रसिद्ध आहे. या देवस्थानामुळे तसेच हा भाग पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिद्ध असल्याने येथे लोकांची सतत वर्दळ असते पण या ठिकाणी येण्यासाठी सार्वजनीक वाहनांची सोय नसल्याने खाजगी वाहन सोयीचे पडते. नागपूरहुन भिवगडला जाण्यासाठी नागपूर-पारशिवनी-आमगाव-नव्हेगाव-चारगाव- भिवसेन हा एक मार्ग असून दुसरा मार्ग नागपूर-टाकळी-खापा-कोथुळाना-चारगावमार्गे भिवसेन गाठता येते. भिवगडाच्या पायथ्याशी असलेल्या भिवसेन कुआरा या मंदिराकडून गडावर जाण्यासाठी पायवाट आहे. किल्ल्याच्या पुर्व बाजूला पाणी तर पश्चिमेला घनदाट जंगल आहे. मंदिराजवळुन टेकडीच्या पायथ्याशी पाण्यात असलेली एक दुमजली वास्तु पहायला मिळते. स्थानिक लोक या वास्तुला राणीचा महाल म्हणुन ओळखतात. किल्ल्याच्या पायथ्याशी एक लहान उंचवट्यावर असलेला हा महाल धरणामुळे पाण्याने वेढला आहे. तेथे जाण्यासाठी होडीची सोय असुन पावसाळ्यात त्याचा पहिला मजला पाण्याखाली असतो तर उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर चालत तेथपर्यंत जाता येते. या महालाला दोन मजले असुन तळामजल्यात तीन खोल्या आहेत. यातील एका खोलीत वर जाण्यासाठी जिना आहे. येथुन गडावर जाण्यासाठी खडी चढाई असल्याने मंदिराकडून मळलेल्या वाटेने गडावर जाणे जास्त योग्य आहे. वाटेच्या सुरवातीला असलेले वनखात्यानी बांधलेले निवारे पार करत मळलेल्या पायवाटेने अर्ध्या तासात आपण गडावर प्रवेश करतो. गडाचा उत्तराभिमुख असलेला लहान दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे केवळ अवशेष व दरवाजा शेजारी असलेला बुरुज पहायला मिळतो. गडाची तटबंदी रचीव दगडांची असुन हा दगड सह्याद्रीतील काळ्या खडकापेक्षा वेगळाच आहे. गडाचा माथा दक्षिणोत्तर ३ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन १३४० फुट उंचावर आहे. गडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असुन मध्यभागी असलेल्या लहान टेकाडाला तटबंदी घालुन बालेकिल्ला बनवलेला आहे. बालेकिल्ल्याच्या तटबंदीत उत्तर व दक्षिण टोकाला रचीव दगडाचे दोन बुरुज असुन मध्यभागी पत्र्याच्या निवाऱ्याखाली भिवसेनाची तांदळा रूपातील शेंदुर फासलेली मुर्ती आहे. मंदीराबाहेर शेंदुर फासलेली एक सुंदर कोरीव मुर्ती असुन काही अंतरावर बुजत चाललेले एक पाण्याचे लहान टाके पहायला मिळते. बालेकिल्ल्याच्या उत्तर बुरुजावरून दूरवर पसरलेले पेंच धरणाचे पाणी तर दक्षिण बुरुजावरून घनदाट जंगलाने वेढलेला परीसर नजरेस पडतो. गडाच्या माचीवरून फेरी मारताना माचीच्या पुर्व भागात असलेला गडाचा पुर्णपणे उध्वस्त झालेला गडाचा मुख्य दरवाजा असुन या दरवाजाशेजारी आजही सुस्थितीत असलेले दोन बुरुज पहायला मिळतात. यातील एका बुरुजावर पहाऱ्याची चौकी असुन माचीच्या तटबंदीत एकुण ७ लहान बुरुज पहायला मिळतात. गडाचा माथा लहान असल्याने २० मिनीटात आपली गडफेरी पुर्ण होते. आज गडाचा इतिहास अज्ञात असला तरी गडाच्या पायथ्याशी असलेले कुवारा भिवसेन हे गोंड देवस्थान पहाता किल्ल्याची निर्मीती गोंड राजांच्या काळातच झाली असावी हे निश्चित. या शिवाय किल्ल्याचा कोणताही इतिहास कागदोपत्री दिसुन येत नाही.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...