श्री विमलेश्वर मंदिर जांभ्या दगडाच्या गुहेत असून असून गाभारा, सभागृह व
गॅलरी अशा तीन टप्प्यात ही गुहा कोरलेली आहे. गाभा-यामध्ये शिवलिंग असून
मंदिरासमोर भव्य अंगण आहे. अंगणापासून मंदिराची उंची सुमारे ५० ते ६० फूट
आहे. मंदिराच्या दर्शनी मध्यभागावर पाच मानवरूपी नग्न शिल्पे कोरलेली असून
ती शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात. गुहेच्या दोन्ही बाजूला
माहुतासह दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत.
मंदिराच्या वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा
कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे. कळसाचे बांधकाम सिमेंटने उंच
बांधून वाढवण्यात आले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला काळभैरव गुहा आहे.
मंदिराच्या दिशेने उतरत असताना मुख्य वाटेच्या डाव्या बाजूला काळ्या दगडात
कोरलेली देखणे वीरगळ शिल्पे रांगेत उभी करुन ठेवलेली आढळतात. अंगणातून
देवळात प्रवेश केल्यावर प्रथम गॅलरी लागते. तेथे एक मोठी घंटा टांगलेली
आहे. त्याच्यापुढे कातळावर ३५ फूट रूंद व १५ फूट उंच असे सभागृह आणि
त्याच्या बाजूने नक्षीकाम केलेले मोठेमोठे खांब आहेत. तेथून थोडया पाय-या
चढल्यानंतर साडेसहा फूट उंच १६ फूट रूंद, १६ फूट लांब असा गाभारा लागतो.
मंदिरात अंधार असल्याने तेथे वटवाघळांचा वावर बराच असतो. त्यांच्या
चित्काराने दचकायला होते. मध्यभागी सुबक आकारातील शंकराची पिंड व नंदीची
मूर्ती लक्ष वेधून गेते. अशा प्रकारचे उंचावर शिवलिंग असणारे हे एकमेव
मंदिर आहे. मंदिरातील शिवपिंडावर दररोज अभिषेक केला जातो. या शिवलिंगावर
कितीही जलाभिषेक केला तरी ते पाणी तेथेच मुरून जाते. परंतु त्यातील
पाण्याचा अंश अजिबात बाहेर जात नाही ही बाब आश्चर्यकारक आहे. मंदिरासमोर
सभामंडप व बसण्यासाठी कठडा आहे. दोन्ही बाजूंला प्रदक्षिणेसाठी चि-यांनी
घाट्या बांधून काढल्या आहेत. शेजारी मोठे तुळशीवृंदावन, काळभैरव मंदिर व
गणेश मंदिर आहे. मंदिराच्या समोरच धर्मशाळा व गावात पूर्वी होऊन गेलेल्या
नेने नामक सत्पुरुषाचे समाधिस्थळ आहे.महाशिवरात्री त्रिपुरा पौर्णिमा हे
उत्सव येथे होतात तर मंदिराची व्यवस्था गुरव मंडळी पाहतात. घनदाट वनराईमुळे
येथील पाणी उन्हाळयाच्या थंडगार तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात उबदार असते.
मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते. तेथे दोन झरे वाहताना
दिसतात. देवाची पूजा व पिण्यासाठी याचे पाणी वापरतात. बारमाही वाहणारे पाणी
इथली २१ घरे वापरतात हा सांगण्यासारखा भाग आहे. पावसाळ्यात ओढ्याचे पाणी
गढूळ होत असले, तरी झ-याचे पाणी मात्र स्वच्छ असते. त्यामुळे ते गंगेचे
पाणी मानले जाते. लेण्यांच्या दगडांतून सफेद गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास
स्थानिक बोलीभाषेत ‘पाषाण’ असे म्हणतात. त्या द्रवाचा उपयोग स्थानिकांकडून
दमा या आजारावर केला जातो. नयनरम्य परिसर आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना
असलेल्या या विमलेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मनात मंदिर
कायमचे कोरले जाते. अलिकडच्या काळात या परिसरात गोजिरी या मराठी
चित्रपटांचे चित्रिकरण झालेले आहे. इथून पुढे १५ कि. मी. अंतरावर
मराठ्यांचा ऐतिहासिक विजयदुर्ग हा जलदुर्ग व श्री रामेश्वर मंदिर असून काही
अंतरावर सुंदर पडवणे सागरकिनारा आहे.
संदर्भ :- १) सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीयर २) www.durgbharari.in हि वेबसाईट ३) http://devachagad.blogspot.com/2018/11/blog-post_6.html हि वेबसाईट
रत्नागिरी
जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजे दाभोळ होय.
"दालभ्य" ऋषींच्या वसतीस्थानाने पावित्र्य झालेले हे गाव. दापोली
तालुक्यातील आणखी एक महत्वाचे बंदर. दाभोळला ऐतिहासिक महत्व असून,
पूर्वापार व्यापार उदिमासाठी ते प्रसिध्द आहे.सध्या एनरॉन प्रकपामुळे गाजत असलेले हे दाभोळ बंदर प्राचीन असून त्याचा उल्लेख १५/१६व्या शतकात रशियन वर्णनात सापडतो.
इजिप्तवर
राज्य करणाऱ्या मॅसिडोनियन वंशातील टॉलेमी राजांच्या सर्वांत जुन्या
नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. यावरून दाभोळचा पौर्वात्य लोकांशी संबंध असावा,
असे दिसून येते. आदिलशाहीत या बंदराचे महत्त्व अधिक वाढले. मक्केचे द्वार
म्हणून ते ओळखले जाऊ लागले. एके काळी दक्षिण हिंदुस्तानातून मक्केला
(हाजला) जाणारे सर्व प्रवासी दाभोळ बंदरातून गलबतात बसून जात असत.
अरबस्तानातून अरबी घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा
राजमार्ग होता. आजही पंढरपूर-कराड-चिपळूण-गुहागर रस्त्याचे नाव
विजापूर-गुहागर असेच आहे.
जेकब पीटर यांनी १६९०मध्ये काढलेले दाभोळ बंदराचे चित्र
हे
गाव अनेक वेळा परदेशी लोकांच्या लढायांमध्ये उद्ध्वस्त झाले; पण त्याच्या
स्थानमहत्त्वामुळे सतत विकसितही झाले. जर्मन, इंग्लिश, रोमन, अरेबियन अशा
अनेक प्रवाशांनी दाभोळला भेट देऊन तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत.
या बंदरावर समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी आदींची सतत आक्रमणे होत
राहिली; मात्र तेराव्या शतकाच्या मध्यापासून सुमारे ३०० वर्षे आदिलशाहीचे
वर्चस्व राहिले. ते शिवाजी महाराजांनी संपविले. दाभोळला हामजाबाद, तसेच
मैमुनाबाद म्हणूनही ओळखले जायचे. येथे तलम वस्त्रांचा व्यापार चालत असे.
अत्यंत कसबी कारागीर येथे वस्त्रे विणत असत. दाभोळचा साळीवाडा १९व्या
शतकापर्यंत गजबजलेला होता. येथील भंडारी समाज शिवशाहीतील आरमारामध्ये होता.
येथील मुसलमान शासकांनी स्थानिक लोकांनाही कारभारात सामावून घेतले होते.
त्यामुळे हिंदूंची मंदिरे शाबूत राहिली. गावात व आसपासच्या भागात अनेक थडगी
व कबरी दिसून येतात.
भाग 1 – प्राचीन कालखंड ते बहामनी राजवट
भारतीय पश्चिम किनाऱ्याचा व्यापार ग्रीस, रोम, मिसर (इजिप्त) यांजबरोबर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. (भारत आणि बाबिलोन (इराक) चा व्यापार जुन्या करारांत नमूद आहे. ख्रिस्त पूर्व ६ व्या शतकापासून बाबिलोन व इतर पश्चिमेकडील राष्ट्र यांजबरोबर भारताचे दळणवळण होते, याचे उल्लेख बौद्ध जातकात (जातक – गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांचा ग्रंथसमूह ) आढळतात. भारतात रोमन नाणी सापडली, त्यावरून ‘ऑगस्टस’ { रोमन साम्राज्याचा पहिला सम्राट, जन्म २३ सप्टेंबर इ.स.पू. ६३ – मृत्यू १९ ऑगस्ट इ.स. १४ } ते ‘नेरो’ {रोमन साम्राज्याचा शेवटचा सम्राट, जन्म १५ डिसेंबर इ.स. ३७ – मृत्यू ९ जून इ.स. ६८ } पर्यंत ‘रोम व भारत’ यांजमध्ये मोठा व्यापार चालत असल्याचे सिद्ध होते.) यामुळेच भारतीय किनारपट्टीबरोबर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर अनेक व्यापारी बंदरे व नगरे उदयास आली.
या बंदराचा व नगरांचा उल्लेख इजिप्त, ग्रीस व रोमन प्रवाशांच्या वर्णनात मिळतो. स्ट्रॅबी, प्लीनी, टॉलेमी यांच्या लिखाणातून कोकणातील बऱ्याच बंदरांचा उल्लेख आलेला आहे. ‘पेरीप्लस ऑफ युरेथ्रियन सी’ या साधनात सातवाहन काळात कोकणात किनारपट्टीवर परदेशी व्यापार चालत असे, अशी माहिती मिळते. प्राचीन कालखंडात चेऊल, सोपारा, ठाणे ही कोकण किनारपट्टीवरची महत्त्वाचे ची बंदरे होती. याबरोबरचं कलिअन (कल्याण), बर्यागाझा (भडोच), सेमुल्ल, चेमुली (चौलरेवदंडा), मंदागोरा (बाणकोट), मेलिझिगारा (सुवर्णदुर्ग – राजापूर), सेसेक्रियनाय (वेंगुर्ले), मुसोपोले (म्हसळ), आगिडी (गोवा) इत्यादि बंदरांचा उल्लेख प्राचीन साधनांमध्ये आढळतो. इ. स. ४० मध्ये ‘हिपॅलस’ या ग्रीक संशोधकाने मान्सूनचे वारे ठराविक वेळेत, ठराविक दिशेने वाहतात त्यावेळेस भारतात गलबते हाकारली तर जलदगतीने जातील असे शोधून काढले. त्यामुळे रोमन, ग्रीक, इराणी व्यापार भारतात मोठ्या प्रमाणावर वाढला. भारतात आलेल्या व्यापाऱ्यांनी पश्चिम घाटातील बौद्धगुफांना भरघोस दाने दिली. सातवाहन काळात कोकण किनारपट्टीचा परदेशी व्यापार भरभराटीचा होता. सहाव्या- सातव्या शतकात उत्तर कोकणात मौर्यांनी राज्य केले. पुढे बदामीच्या चालुक्यांनी दक्षिण कोकणात राज्यविस्तार केला. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या काळात भारताचे परकियांशी मैत्रीचे संबंध होते. त्यावेळी घोड्यांची आयात मोठ्या प्रमाणात केली जात असे. राष्ट्रकूटांनीही व्यापारात अग्रेसर असलेल्या अरबांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. एकंदरीत कोकण किनारपट्टीवरचा व्यापार समृद्ध होता.
प्राचीन कालखंडात दाभोळ बंदराचा फारसा उल्लेख आढळत नाही. काही इतिहासकारांनी ‘पलियपटामय’ म्हणजे दाभोळ असे म्हटले आहे. परंतु डेक्कन कॉलेजचे डॉ.गोगटे यांच्या मते ‘पलियपटामय’ म्हणजे कोकणातील गुहागर जवळील पालशेत असावे. पण पन्हाळेकाझी येथील बौद्ध व नाथपंथीय लेणी पाहता दाभोळ हे प्राचीन बंदर असावे, असा अन्वयार्थ काढता येतो. कारण डॉ.म.ना.देशपांडे व इतर पुरातत्ववेत्यांच्या दृष्टिकोनातून येथील शैलगृहांची (लेण्यांची) सुरुवात साधरणतः दुसऱ्या-तिसऱ्या शतकात सातवहनांच्या काळात झाली. लेण्यांचे ठिकाण व नदीमार्गे किंवा खुश्कीच्या रस्त्याने दाभोळपर्यंतचे अंतर सुमारे २०/२२ किलोमीटर आहे. यावरून तत्कालीन वाहतुकीची सोय विचारात घेता अंतर्गत व बाह्य जगात प्रवासासाठी ‘दाभोळ’ हे महत्त्वाचे पूर्ण असल्याचे दिसून येते.
Source: https://en.wikipedia.org/wiki/Dabhol
मध्ययुगीन कालखंडात मात्र चौल व दाभोळ ही कोकण किनारपट्टीवरील प्रमुख बंदरे असल्याचे बरेच उल्लेख आढळतात. यावरून दाभोळ बंदराचे व्यापारी महत्त्व मध्ययुगात वाढलेले दिसते व त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दाभोळ बंदरात अरबस्थानातून होणारी घोड्यांची आयात हे म्हणता येईल.
Source: https://en.wikipedia.org/wiki/Dabhol
दाभोळ हे १७॰ ३५ उत्तर अक्षांश व ७०॰ १० पूर्व रेखांशावर कोकणातील दापोली तालुक्यात ( जिल्हा रत्नागिरी ) वसले आहे. अंजनवेल किंवा वशिष्ठी नदीच्या उत्तर काठावर टेकड्यांच्या पायथ्याशी दाभोळ शहर समुद्रापासून दोन मैल आत आहे. मुंबईच्या आग्नेय दिशेस सुमारे ८५ मैलावर ‘दाभोळ बंदर’ आहे. दाभोळचे नाव दाभिलेश्वराच्या म्हणजेच शिवाच्या (दाभोळात दाभिलेश्वराचे जुने मंदिर आहे ) किंवा वनदेवता दाभ्यावरून पडले असावे, असे मानले जाते. प्राचीन काळी दाभोळ हे दालभ्यवती नावाने ओळखले जात होते. दालभ्य ऋषींच्या वास्तव्यावरून पडलेल्या या नावाचा कालांतराने दाभोळ असा अपभ्रंश झाला, असेही म्हटले जाते.
दाभोळच्या इतिहासाचा मागोवा घेताना दाभोळमधील प्रसिद्ध भूमिगत चंडिकादेवीचे मंदिर मि. क्रॉफर्ड यांच्या म्हणण्यानुसार बदामी शैलगृहे मंदिराच्या काळातील (चालुक्य कालीन) इ. स. ५५० ते ५७८ मधील आहे. क्रॅकोर्डच्या मते आणि एका स्थानिक बखरी नुसार दाभोळ हे अकराव्या शतकात एका शक्तिशाली जैन राजाचे राज्य होते आणि त्यास पुरावा म्हणून इ. स. ११५६ (वैशाखाचा ३ रा दिवस, १०७८ शालीवाहन) चा शिलालेखही सापडला आहे. पुढे यादवांच्या काळात दाभोळ हे एक महत्त्वाचे बंदर होते. यादव काळात उद्योग-व्यापार उदित(भरभराटीचा) होता. गोवा, दाभोळ व चौल बंदरातून परदेशात पैठणी, देवगिरी व दख्खनी कापड निर्यात केले जात असे. परदेशातून सुवर्णाचा मोठा ओघ भारताकडे असल्याचे त्या काळात नमूद आहे. व्यापारामध्ये अरबांचे वर्चस्व होते. अल मसुदी, अल इताकरी, इब्न हौकल या अरब प्रवाशांच्या लिखाणातून, तसेच आलेखांमधील माहितीनुसार तुर्की आक्रमणापुर्वीच कोकण किनारपट्टीवर मलबार पासून ते उत्तरेस संजान पर्यंत अरबांनी आपले बस्तान बसविले होते. आलेखांमध्ये त्याचा ‘नवायत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. सिराफ, ओमान, बसरा व बगदाद इ. ठिकाणांहून अरब व्यापारासाठी येथे येत असत.
Chandika Devi Mandir Dabhol
इ. स. १३१२ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या तुर्की आक्रमणाला कोकण बळी पडले. यादवांचे राज्य नष्ट केल्यानंतर मलिक यकलाखी या सरदाराची दख्खनचा राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याच्या कक्षेत कोकण किनारपट्टीही होती. त्याच्याच कारकिर्दीत मलिक कफूर याने राज्यविस्तारासाठी दक्षिण भारतावर केलेल्या चौथ्या स्वारीत दाभोळ व चौलवर धडक मारली आणि मोठी लुट संपादन केली. दाभोळचे नाव एकदा ‘खिजराबाद’ असे पडले होते. अल्लाउद्दीनचा वडील मुलगा ‘खिजरखान’ होता. त्याच्या नावावरून हे नाव पडले असावे.
दाभोळ मध्ययुगात ‘मुस्तफाबाद’ म्हणून ओळखले जात होते. पण इथे ‘मुस्तफाबाद’ या नामकरणावरून बरीच गफलत आढळते. फेरीश्तानुसार तेराव्या शतकाच्या मध्यात समुद्रापलीकडून रत्नागिरीस आलेल्या नसरुद्दिन शाह उर्फ आझम खान याने दाभोळ जिंकून घेतले. तेव्हा दाभोळचा हिंदू प्रमुख नागोजीरावाने त्यास जमिनीवरून व समुद्रातून प्रतिकार केला; पण तो व्यर्थ ठरला आणि आझमखानाच्या एका मुलाच्या नावावरून दाभोळला मुस्तफाबाद व दुसऱ्या एका वसाहतीस दुसऱ्या मुलाच्या नावावरून हमजाबाद अशी नावे देण्यात आली. इ.स. १३४७ ते १५०० या बहामनिंच्या कालावधीत मुस्लिम सुभेदारांच्या नावावरून दाभोळ व इतर ठिकाणांना नावे देण्यात आली असावीत, असा एक अंदाज व्यक्त होतो. तर युसुफ आदिलशहाचा सरदार मुस्तफाखान याच्या नावावरून दाभोळास मुस्तफाबाद हे नाव पडले असे म्हटले जाते. मुस्तफाखान १४९७ मध्ये दाभोळास होता व दाभोळ सुभा पूर्वी विजयानगरच्या अमलाखाली होता. मग विजयानगरचे राज्य मोडल्यावर तो आदिलशाहीत आला. परंतु आदिलशाहीचा संस्थापक युसुफ आदिल खान समुद्रमार्गे पहिल्यांदा दाभोळला आला.( इथे कालावधी बाबतीत इ.स. १४३९ (हिजरी ८६४) व इ.स. १४६० अशी एक गफलत आढळते.) तेव्हा तो दाभोळचा उल्लेख मुस्तफाबाद किंवा खिजराबाद असा करून दाभोळचे वर्णन स्वर्गीय आनंद देणारे ठिकाण बहामनी सुलतान महुमूदशाह दुसरा (इ. स. १४८२ ते १५१८ ) याच्या राज्यातील मोठ्या शहरांमधील एक असे करतो.
बहामनी सत्तेचा अंमल दख्खनमध्ये इ.स.१३४७ साली सुरु झाला. बहामनी राज्याचा संस्थापक अल्लाउद्दीन बहामनशाहने दाभोळ काबीज केल्यानंतर दाभोळला बहामनी राज्याचे मुख्य बंदर बनवले. त्यामुळे अंतर्गत भागात सत्ता स्थानिकांचीच असली तरी, बंदर व व्यापार यावर मुस्लिमांचे वर्चस्व होते. जवळच असणारे गोवा हे विजयानगरच्या साम्राज्यात होते व स्थानिक राजे विजयानगरशी जवळीक साधून होते. पंधराव्या शतकात बहामनी सुलतानांनी दक्षिण कोकणवर पूर्ण वर्चस्व प्राप्त करण्याच्या उद्दिष्टाने तीन मोहिमा काढल्या. इ. स. १४२९ मध्ये मलिक–अल–तूज्जारने दक्षिण कोकणवर स्वारी करून तेथील शासकांना नमवले. परंतु प्रशासकीय व्यवस्था लावण्यात तो अपयशी ठरला. इ. स. १४३८ मध्ये दुसरी मोहीम उघडण्यात आली; परंतु त्या मोहिमेत फारसे यश आले नाही. इ. स. १४५३ मध्ये तिसरी मोहीम करताना खलप हसनच्या नेतृत्वाखाली बहामनी सैन्य पूर्ण तयारीनिशी कोकणात उतरले; पण शिर्क्यांनी या सैन्याचा दारूण पराभव केला. ७००० बहामनी सैन्य मारले गेले. खलप हसनचा पराभव बहामनी राजवटीला नामुष्की आणणारा ठरला. खेळण्याचे राजे व संगमेश्वरचा राजा बहामनी राजवटीचे विरोधक होते. त्यांच्याकडून खुश्कीच्या मार्गाने जाणारे तांडे व दाभोळ जवळील जहाजे लुटली जात असत. दाभोळ बंदराचा परिसर सोडल्यास दाक्षिण कोकणात बहामनी सत्ता अगदी नाममात्र होती.
https://wikibio.in/alauddin-khilji/
बहामनी वजीर ख्वाजा जहान महमूद गवाणने पुन्हा कोकणात बहामनी सत्तेचा जरब बसविण्याच्या उद्दिष्टाने पश्चिम किनारपट्टीवर मोहिमा उघडल्या. परंतु त्याच्या लवकरच लक्षात आले की, या डोंगराळ व उंचसखल भागात घोडदळाचा काही उपयोग नाही. त्याने लाच, कपटवृत्तीने तर कधी मुत्सद्देगिरीचा वापर करून या प्रदेशावर आपले वर्चस्व निर्माण केले. यानंतर त्याने आपले लक्ष विजयानगरच्या साम्राज्यात असणाऱ्या गोवा बंदराकडे वळविले व इ.स. १४७२ मध्ये गोवा काबीज केले.
या काळात महमूद गवाणने आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या मित्रांना पाठविलेली पत्रे उपलब्ध आहेत. ही पत्रे अत्यंत बोलकी आहेत. मौलाना जामी या धार्मिक व्यक्तीला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, “आतापर्यंत कुठल्याही मुसलमान राज्यकर्त्याने या भागावर कायमस्वरूपी निश्चित असे प्रभुत्व मिळवलेले नाही. इथली उंचच उंच शिखरे, गडकिल्ले बांधून सुरक्षित करण्यात आलेली आहेत. खुश्कीच्या किंवा सागरी मार्गाने येणाऱ्या मुसलमानांना यामुळे सतत लुटण्यात येते. हा भाग आपल्या कब्जात आणणे व वर्चस्व बसविणे हेच आपले धोरण असले पाहीजे.” महमूद गवाणने दाभोळ व इथल्या सागरी महत्त्वाबद्दल अनेक पत्र लिहिलेली आहेत. त्यांचे संकलन ‘रियाझ उल इन्शा’ या पत्रसंग्रहात आहे. सन १४७२ नंतर दाभोळ व गोवा ही बहामनी राज्याची प्रमुख बंदरे होती.
बहामनी राजवटीच्या काळात अनेक अरब, तुर्की, येमेनी, हबशी तरुण नशीब उघडण्यासाठी सागरीमार्गाने भारतात येत असत. ख्वाजा जहान महमूद गवान, युसुफ आदिलशाह, कवी निशात पूरी व असंख्य विद्वान आणि संत बंदरात उतरले. महमूद गवाण हा गिलानचा रहिवासी स्वकर्तुत्वावर बहामनी राज्याचा वजीर बनला. त्याच्या कारकिर्दीत बहामनी राज्याची पर्शियन आखाताबरोबर व्यापार वृध्दी झाली. घोड्यांचा व्यापारी हलाफ–अल्–हासो हा देखील वजीर झाला. विजयानगरच्या राज्यातही गिलानी मोठ्या प्रमाणावर व्यापार करीत असत व सुमारे ३०० ते ५०० टक्के नफा मिळवत असत. वरील सर्व उल्लेखांवरून दाभोळ हे आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक महत्त्वाचे बंदर होते हे स्पष्ट होते. तसेच विविध वस्तूंची आयात-निर्यात होत असली तरी मोठा व्यापार अरबी घोड्यांचा होता. बहामनी, विजयानगर व पुढे आदिलशाही, कुतुबशाही इ. शाह्यांच्या काळात घोड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर होती. घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत असून तेथून ते विविध राज्यात पाठविले जात असत.
रशियन प्रवासी अथानासिएस निकितीनने इ.स. १४७० च्या दरम्यान दख्खनला भेट दिली होती. इजिप्त, अरबस्थान, खोरासान, तुर्कस्थान येथून मोठ्या प्रमाणात घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत असून ते एक मोठे सागरी बंदर आहे असे वर्णन निकितीन करतो. अरबी घोड्यांचा दर्जा चांगला असल्यामुळे एका घोड्याची किंमत साधारणतः ८०० पोर्तुगीज पारदोस होती. घोड्याच्या आयातीवरील कर हे पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांचे महत्त्वाचे उत्पन्न होते. असे असले तरी अश्वांचे आर्थिक महत्त्व लष्करी महत्त्वापेक्षा कमी नव्हते. दक्षिणेकडील सत्तासंघर्षात युद्धासाठी चांगल्या घोड्यांची गरज सर्वच राज्यांना भासत होती.
दाभोळच्या विकासाच्या दृष्टीने अजून एक महत्त्वाची बाब होती ती दाभोळच्या जवळ असलेले ‘संगमेश्वर’ जहाज बांधणीच्या उद्योगासाठी प्रसिद्ध होते. युद्धकाळासाठी व गस्त घालण्यासाठी जलद गती असणारी संगमेश्वरी जहाजे प्रसिद्ध होती. त्याकाळी व्यापाराची देवाणघेवाण सागरी मार्गाशिवाय घाटमार्गे देशावरून पुरी होत असे. या दोन प्रदेशांमध्ये उभ्या असलेल्या सह्याद्रीला छेद देणारे घाटमार्ग पंधराव्या शतकात कोकण व दख्खन मधील वाढत्या व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. गाढवांचे, बैलांचे तांडे व हमाल या घाटमार्गातून ये-जा करीत असत. दाभोळहून कऱ्हाडला जाण्यासाठी ‘कुंभार्ली’ घाटाचा उपयोग केला जात असे. डच प्रवाशी वॅन ट्विस्ट याने दाभोळ ते विजापूर पर्यंतच्या मार्गांचा उल्लेख केलेला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीहून अंबेघाट मार्गे व विजदुर्गहून फोंडाघाट मार्गे कोल्हापूला जात-येत असत. राजापूर व खारेपाटण अनासकुरा घाटमार्गे कोल्हापूरला जोडलेले होते. तर सावंतवाडी व वेंगुर्ला बंदरातून व्यापारी तांडे आंबोल घाटातून कोल्हापूर व पुढे बेळगांव आणि रायबागच्या बाजारपेठेकडे वळत असत. दाभोळ व गोवा बंदराकडून कर्नाटकाकडे जाणारे मार्गही काही विशिष्ट ठिकाणी जोडले गेले होते. काही मार्ग गुलबर्गा व हैदराबादकडे जात असत. बेजवाडा व मुसूलीपटनम महत्त्वाची बाजारपेठ होती. मुसूलीपटनम व वारंगळचे कापड तसेच गोवळकोंड्याहून हिरे दाभोळ मार्गे परदेशात जात असत. खुश्कीच्या मार्गावर वंजारी व लमाणी वाहतूक करत असत.
संदर्भ :
गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
लेख डॉ. दाऊद दळवी.
लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
भाग 2 – आदिलशाही व पोर्तुगीज संघर्ष (सोळावे शतक)
इ.स. १४७८ मध्ये गोव्याच्या बहामनी सुभेदारचा मुलगा बहादूरखान गिलानी याने दाभोळ ताब्यात घेतले व तेथे स्वतंत्र शासक म्हणून राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्याने गुजरात सुलतान महमूद बेगाडा (१४५९ ते १५११) याच्या व्यापाऱ्यांची जहाजे दाभोळ बंदरात लुटल्यामुळे बेगाडाने बहामनी सुलतान महमूद दुसरा याकडे तक्रार केल्यामुळे महमूदशा बहामनीने १४९४ मध्ये दाभोळ वर हल्ला करून बहादूरखान गिलानीचा पाडाव केला. काही ऐतिहासिक संदर्भानुसार बहादूर खान गिलानीचा दाभोळ मधील पाडाव महमूदशा बहामनीने न करता युसुफ आदिलशहाने केला. बहामनी राजवटीत कोतवाल बहादूर खान गिलानी हा अतिशय मुजोर झाला होता. परदेशातून येणारी व गुजरात किंवा मलबारहून मालवाहतूक करणारी जहाजे तो लुटत असे. मात्तबर व्यापाऱ्यांना तो डोईजड झाला होता. त्याचे पारिपत्य करणे आवश्यक होते. शेवटी युसुफ आदिलशहाने गिलानिविरुद्ध मोहीम उघडली व सर्व बाजूंनी त्याची कोंडी करून दाभोळच्या सागरीयुद्धात त्यास जेरीस आणले.
बहामनी राजवट अस्तास येत असताना विजापूरच्या आदिलशाहिचा अंमल वाढू लागला. दाभोळ बंदरात उतरलेल्या युसुफ आदिलखानने गुलबर्ग्याला जाऊन बहामनी राज्याच्या पदरी राहून बिजापूरला ( विजापूर ) स्वतंत्र राज्याची उभारणी केली. दाभोळ हे सागर किनाऱ्यावरील बिजापुरचे महाद्वार होते. दाभोळला तो ‘बाब उल हिंद’ (भारताचे महाद्वार) असे म्हणित असे. आदिलशाही काळात दाभोळ आर्थिकदृष्ट्या अतिशय समृद्ध होते. अंजनवेलची वहिवाट या हस्तलिखितानुसार १५ व्या शतकापूर्वी मौजे गुढे तर्फ वलंबे येथे पवार नावाचा मराठा सरदार गढी बांधून या भागावर अंमल करीत होता. इ.स. १५०२ च्या सुमारास मुस्तफाखान या आदिलशाही सरदाराने पवाराच्या गढ्या उध्वस्त करून दाभोळ येथे सुभा स्थापन केला. १५०२ मध्ये रत्नागिरी, राजापूर, कुडाळ व दाभोळचा समावेश करून दाभोळ तर्फची (इलाखा, जिल्हा) निर्मिती झाली. १५०२ मध्ये या प्रदेशात नवीन महसूलधारा पद्धती सुरु करण्यात आली. आदिलशाहीत दाभोळ शहर भरभरटीस आले. अनेक देशाचे व संस्कृतीचे लोक येथे स्थायिक झाले. मुस्लिम सत्ता असल्यामुळे जागोजागी सुंदर मशिदींचे बांधकाम करण्यात आले. १५०३ मध्ये दाभोळच्या धक्क्यावरील माँसाहेबांची मशीद विजापुरी स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. १५०३ मध्ये भारतात आलेला इटालिअन प्रवासी वारथेमा दाभोळचे वर्णन एक सुंदर व समृध्द शहर असे करतो.
दाभोळ संपन्नता आणि ऐन समृद्धीच्या काळात असताना व दक्षिणेत विजयानगर, बिजापूर, अहमदनगर व गोवळकोंडा येथे सत्तांतर होत असतानाच कालिकत–केरळमध्ये पोर्तुगिजांनी बाजी मारली. पश्चिम आशिया व युरोप मधील अतिशय सुसंपन्न व्यापार अरबांच्या हातात होता. त्यांना शह देण्याची संधी पोर्तुगिजांना मिळाली. केरळ नंतर त्यांची वक्रदृष्टी गुजरात व कोकण किनाऱ्याकडे वळली. सन १५०७ मध्ये पोर्तुगिजांनी गव्हर्नर फ्रान्सिस्को आल्मेडाचा मुलगा लोरेंझो याच्या अधिपत्त्याखाली पश्चिम किनारपट्टी व्यापारासाठी खुली करण्यास आरमार पाठवले. या आरमारविरुद्ध विजापूर, अहमदनगर, गुजरात वगैरेंच्या सुलतानांनी आघाड्या उघडल्या. इजिप्तचा सुलातनही त्यात सामील झाला. लोरेंझोची आरमारी तारवे दिवजवळ असताना तिथला सुभेदार मलिक अय्याझ याने अचानक हल्ला केला व पोर्तुगिजांना नामोहरम केले.
या नाविक चकमकीत पोर्तुगिजांचा पराभव झाला आणि लोरेंझो मारला गेला. मुलाच्या मृत्यूचे शल्य(पीडा,दु:ख) मनात ठेऊन आल्मेडाने पुढच्याच वर्षी दि. १२ नोव्हेंबर १५०८ रोजी दाभोळवर हल्ला चढवला. एकोणिस जहाजे, तेराशे सैनिक व नौसैनिक आणि चारशे मलबार खलाशींसह तो दाभोळवर चालून आला होता. या आक्रमणात त्याचा दुहेरी उद्देश होता. एक तर भारतीय सत्तांना धडा शिकवणे आणि बिजापूरच्या आर्थिक समृद्धीचा कणा मोडणे. आल्मेडाने हे दोन्ही उद्देश पूर्ण केले. सतत तीन दिवस पद्धतशीरपणे दाभोळची जाळपोळ व लुटमार करण्यात आली. घरे-दारे, इमारती, मशिदींचा विध्वंस करण्यात आला. पोर्तुगिजांनी अनेक स्त्री-पुरुष, वृद्ध-बालकांची निर्दयतेने कत्तल केली. स्वतःचा उद्दामपणा दाखविण्याकरता अल्मेडाने येथील जामा मशिदीत वास्तव्य केले होते. त्याच्या या भयंकर आक्रमणातून जे निसटले ते दाभोळ सोडून पळाले.
आदीलशाहीत वैभवशाली शहर असलेल्या दाभोळची त्याने राखरांगोळी करून टाकली. १५०८ मधील अल्मेडाच्या हल्ल्यापुर्वीच्या एका वर्णनात ‘दाभोळ हे मोठे दखल घेण्यासारखे किनाऱ्यावरील संपन्न शहर असून तेथून मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो, येथे भव्य चिरेबंदी वाड्यासारख्या इमारती आहेत. त्यांच्या भोवताली घरे आहेत. येथे भक्कम तटबंदिचा किल्ला (castle) असून किल्ल्यात ५०० तुर्की असलेली ६००० ची शिबंदी (सैनिकांची तुकडी) आहे’ असे वर्णन आढळते.
दाभोळ पाठोपाठ इ.स. १५१० मध्ये पोर्तुगिजांनी गोवा काबीज करून आदिलशाहीला दुसरा धक्का दिला. आदिलशहाने त्वरित तहाची बोलणी चालू केली. पोर्तुगीज जाणून होते की, आदिलशहाकडे दुसरा पर्याय नाही आणि दाभोळ गमावले तर घोड्यांचा पुरवठा होणार नाही. तसेच तो अफाकींच्या (परदेशी मुसलमान) सेवेला मुकेल. तरी शेवट आदिलशहा व पोर्तुगीज यांच्यात करार झाला व करारानुसार गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात राहील आणि आदिलशाहीच्या इतर बंदरांवर पोर्तुगीज हल्ले करणार नाहीत, असे ठरले.
१५०८ साली केलेल्या आल्मेडाच्या विध्वंसासातून दाभोळ शहर हळूहळू सावरले. इ. स. १५१४ मध्ये दाभोळ तटबंदी व तोफांनी संरक्षित शहर होते. आंतरराष्ट्रीय व्यापार पूर्वीसारखाच भरभराटीचा होता. इ. स. १५१८ साली पोर्तुगीज प्रवासी बारबोसा याने कोकण किनारपट्टीला भेट दिली होती. तो लिहितो, “मक्का, एडन, होर्मुझ इ. ठिकाणांहून मुस्लीम व्यापाऱ्यांची बरीच जहाजे मोठ्या संख्येने अश्व घेऊन येथे येतात. त्याचप्रमाणे खंबायत, दिव व मलबार किनारपट्टीवरून हरतर्हेच्या वस्तू घेऊन जहाजे येथे येतात. येथे बरेच व्यापारी असून काही व्यापारी अतिश्रीमंत आहेत. व्यापारी केवळ मुस्लिम नसून हिंदू धर्मीय देखील आहेत. दाभोळच्या अंतर्भागात मोठ्या प्रमाणावर तांबे, पारा आणि हिंगुल पाठविले जाते. अंतर्भागातून मोठ्या प्रमाणावर कापड नदीतून आणले जाते. निर्यातीमध्ये गहू, धान्य, तेलबिया व वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्न्यांचा समावेश होतो.” बार्बोसाने केलेल्या या वर्णनावरून दाभोळ बंदराचे महत्व लक्षात येते.
इ. स. १५२० मध्ये इस्माईल आदिलशहा ( १५१०-१५३४ ) याने पोर्तुगिजांना त्यांनी जर दाभोळला आयात होणाऱ्या घोड्यांना संरक्षण दिले तर मैत्रीचा तह करण्यात येईल असा प्रस्ताव धाडला. हा प्रस्ताव पोर्तुगिजांनी झिडकारला व त्यानंतर दोन वर्षांनी (१५२२ मध्ये) दाभोळ पुन्हा एकदा लुटले. परंतु या लुटीनंतरही दाभोळ लवकरच सावरले आणि १५४० मध्ये जगातील एक मोठी नगरी म्हणून उदयास आले. जिच्यात संपूर्ण हिंदी महासागरास लागून असलेल्या राष्ट्रांमधील व्यापाऱ्यांनी व जगाच्या सर्व खरीदारांनी फार मोठ्या प्रमाणावर गर्द्दी, वस्तिस्थाने केली होती. त्यानंतर सातच वर्षात या नगरीचे वैभव ओसरून फक्त ४००० रहिवासी, दोन किल्ले आणि काही खंदक तेवढे उरले. त्यावर्षी (१५४७ च्या सुमारास) पोर्तुगिजांनी दाभोळ पुन्हा उध्वस्त केले. इ.स. १५४८ मध्ये बिजापूर आणि पोर्तुगिजांमध्ये तह होऊन पोर्तुगिजांनी दाभोळला गुमास्ता (Factor) पाठवून समुद्राद्वारा प्रवास करणाऱ्या व्यापारी व इतरांना परवाना (Passport) देण्याची व्यवस्था करून दाभोळची भरभराट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोर्तुगिजांनी आदिलशहास सालीना सोन्याचे २००० परदाव (सोन्याची नाणी = १५४ ब्रिटिश पौंड) देण्याचे कबुल केले. १५५४ मध्ये पोर्तुगिजांनी हा करार मोडला आणि १५५४ व १५५७ मध्ये पुन्हा दाभोळ लुटले. या लुटीनंतर दाभोळला सावरण्यास थोडा वेळ लागला. गुजराती इतिहासकार असे नमूद करतात की, इ. स. १५७० मध्ये दाभोळ हे युरोपियन बंदाराप्रमाणे होते. १५७० मध्ये अली आदिलशाह व अहमदनगरचा सुलतान मुर्तझा निजामशहा यांनी पोर्तुगिजांविरुद्ध आघाडी उघडली. कालिकतचा राजा झामोरिन हा सुद्धा त्यांना सामील झाला. पण पोर्तुगिजांच्या लष्करी डावपेचांसमोर व तोफा दारूगोळ्यासमोर आघाडी टिकू शकली नाही. शेवटी नाईलाजाने पोर्तुगिजांबरोबर आदिलशहाला डिसेंबर १९७३ मध्ये तह करावा लागला. त्यानुसार पोर्तुगिजांची एक नाविक तुकडी दाभोळला तैनात करण्यात आली. काही दिवसानंतर या तुकडीतील सोजिरांना भोजनाचे आमिष दाखवून बिजापूरच्या सैन्याने आमंत्रण दिले व त्यांची भयानक कत्तल केली. गोव्याला हे वृत्त कळताच व्हाईसरॉय डॉम दियागो द मेनेझेसने (१५७६-१५७८ ) पुन्हा सूड म्हणून दाभोळचा पुरता विध्वंस केला.
संदर्भ :
गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
लेख डॉ. दाऊद दळवी.
लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
भाग 3 – सोळावे शतक ते सतराव्या शतकाच्या मध्ययुगापर्यंतचा व्यापार
बीजापुर आणि पोर्तुगिजांमधील या लढाया सतरावे शतक उजाडले तरी चालूच होत्या. दाभोळ बंदर व शहर या लढायांना वारंवार बळी पडत होते. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला दाभोळ मुसलमानी आमदनीत होते. इ.स. १६११ मध्ये इंग्रज अधिकारी मिडलटोनला येथे सीदी सुभेदार आढळला. त्याने त्याच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी दाभोळचा व्यापार मंदावलेला, निराशाजनक होता. विक्रेते उत्तम कापड, नीळ आणि काळी मिरी विक्रीसाठी गोंगाट करीत असत. परंतु ते खरेदी करायला कुणी पुढे येत नसे. येथील लोक फक्त जाडेभरडे कापड, चटया ( Kerseys) आणि शिसेच खरेदी करत. त्यानंतर पुढच्याच वर्षी इ.स. १६१२ मध्ये जॉन जॉर्डन या इंग्रजाने दाभोळला भेट दिली. तो लिहितो, “सोळाव्या शतकापासून महत्वाच्या बंदरात पोर्तुगिजांनी बाहेर जाणाऱ्या जहाजांना परवाने ( कार्टाझ ) देण्याची पद्धत सुरु केली होती. दाभोळ बंदरात देखील दुसरीकडे जाणाऱ्या जहाजांना दस्तके देण्यासाठी पोर्तुगिजांनी आपला एक प्रतिनिधी ठेवलेला होता. तांबडा समुद्र, पर्शियातील होर्मुझ आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या गलबताना परवाने देण्यासाठी गोव्याच्या व्हाईसरायकडून त्याची नेमणूक करण्यात आली होती. तोफेची दारू आणि इतर प्रकारचे युद्धसाहित्य गलबतातून नेण्यास मनाई होती. पण पोर्तुगीज प्रतिनिधीला लाच देऊन बंदी असणारे साहित्य नेण्यात येत असे. अरबस्थानातून घोडे आणून विकण्याचा मक्तादेखील त्याच्याकडेच होता. घोडेविक्रीप्रमाणेच दाभोळ शहरात मद्य विकण्याची मक्तेदारीदेखील पोर्तुगीज अधिकाऱ्याकडे होती. यासाठी तो दाभोळच्या आदिलशाही सुभेदाराला दरवर्षी २००० लाऱ्या देत असे. दाभोळात पोर्तुगिजांचा स्वतःचा व्यापार जास्त नव्हता. मात्र सागरी प्रवासाला जाणाऱ्या परदेशीय गलबताना परवाने देण्यासाठी तेथे पोर्तुगीज प्रतिनिधी होता.” (प्रतिनिधी बाबतचा असाच उल्लेख सुरतेहून लिहिलेल्या १० एप्रिल १६२१ च्या इंग्रजी पत्रात आहे.) याशिवाय जॉन जॉर्डन दाभोळच्या वर्णनात लिहितो, “हे बंदर प्रवेश मुखाजवळ अरुंद आहे. या ठिकाणी खडक दिसत असला तरी पाण्याची खोलीमात्र अधिक आहे. शहर दोन मैलावर असताना जहाज जेव्हा प्रवेश करते तेथे हे एक चांगले बंदर असल्याचे जाणवते.” त्याशिवाय दाभोळच्या व्यापाराविषयी तो म्हणतो, “दरवर्षी दोन किंवा तीन जहाजे दाभोळहून लाल समुद्राकडे जातात व त्यामध्येच सुरतेच्या जहाजपेक्षा अधिक व्यापारी माल भरलेला असतो. त्याचप्रमाणे पर्शियन आखातातील होर्मुझ या बंदराकडे देखील दोन जहाजे जातात.”
सोळाव्या शतकात व सतराव्या शतकाच्या आरंभी दाभोळ बंदरातून दक्षिण अरबस्थान, पर्शियन आखातीच्या प्रदेशात व मालदीवसाठी तांदूळ व इतर धान्य पाठविले जात असे. औरंगाबाद येथे तयार झालेले रेशीम व सुती कापड, कोरोमंडलचे कापड अर्मेनियन व पर्शियन व्यापारी पर्शिया, अरेबिया, तुर्कस्तानला घेऊन जात असत. बफता, बिराम, शशेस इ. प्रकारचे कापड दाभोळात निर्माण आणि दाभोळातून निर्यात होत असे. याशिवाय नारळ, सुके खोबरे, सुपारी, गरम मसाले, साखर इ. निर्यात केले जात असे. दाभोळ व सुरत दरम्यान नियमित व्यापार चालत असे. तांदूळ, गरम मसाले विशेषतः मिरी व सुपारी सुरतचे व्यापारी विकत घेत असत. देशभरातील वस्तू सुरतला विक्रीसाठी येत असत. राजपुताना, मांडू, मध्यप्रांतातील वस्तू सुरतहून दाभोळला पाठविल्या जात असत. दाभोळच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात दाभोळचे केवळ पर्शियाचे आखात व लाल समुद्रातील बंदराशी व्यापारी संबंध होते असे नव्हे, तर आग्नेय आशियातील देशानांही येथून जहाजे जात असत. सुमात्रा बेटाच्या अचिन या बंदराशी (इंडोनेशिया) दाभोळची जहाजे व्यापार करीत असत. डच कंपनीचा प्रतिनिधी पिटर वान डेन ब्रोकने हिंद महासागरातील घडामोडींचा बारकाईने उल्लेख केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर मध्ये भरपूर कापड घेऊन दाभोळची जहाजे सुमात्रातील अचिन बंदराकडे जात असत आणि परत त्यांना जावा व सुमात्रातील मिरी, डिंक, कापूर, लवंग, मसाल्याचे पदार्थ आणि रेशीम घेऊन फेब्रुवारी महिन्यात परतत असत. ही जहाजे पुढे गुजरातचे खंबायत व पर्शियन अखातातील मोखा या बंदराकडे जात असत. तसेच पर्शियातून आग्नेय आशियाकडे जाणारी जहाजे दाभोळ येथे थांबत असत.
दाभोळचे व्यापारी स्थान ओळखल्यामुळे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचे काही व्यापारी तेथे व्यापार करण्याचा प्रयत्न करत होते. (१६१० नंतरच्या दशकात) पण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगिजांनी सोळाव्या शतकात आपले सागरी वर्चस्व निर्माण केले होते व ते वर्चस्व ते अबाधित राखून होते. पोर्तुगिजांच्या दबावामुळेच आदिलशाही व निजामशाही राज्यकर्ते इंग्रज व्यापाऱ्यांना आपल्या बंदरात व्यापाराची परवानगी देण्यात फारसे राजी नव्हते. इ. स. १६१६ मध्ये मिडलटनच्या शिष्टाईने (सलगीच्या प्रत्नांनी) मोरवा जंक याने इंग्रजांना मुक्त व्यापाराची संधी दिली. त्यातच इंग्रजांची सुरतची वखार असुरक्षित झाल्याने त्यांनी आपली वखार दाभोळ येथे हलविण्याचा विचार केला. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. इ.स. १६१८ मध्ये इंग्रजांनी पुन्हा एकदा दाभोळातून व्यापाराचा प्रयत्न केला. पण तेव्हाही वखार हलविण्याचे जमले नाही. इ.स. १६२४ मध्ये पुन्हा सुरतची वखार दाभोळला हलविण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला इंग्रजांना दाभोळच्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण नंतर मात्र किरकोळ उद्भवलेल्या तंट्यात इंग्रजांनी आपल्या बंदुकांनी दाभोळवर गोळीबार केल्यामुळे लोक दाभोळ सोडून पळून गेले. परंतु पोर्तुगीज गुमास्त्याने त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे ते परत आले आणि इंग्रजांना त्यांच्या जहाजांवर त्यांनी पिटाळून लावले.
इ.स. १६३६ मध्ये निजामशाही बुडाल्यानंतर महाड ते चिपळूण कोकण व दाभोळ आदिलशहाकडे आले. इ.स. १६३९ मध्ये मंडेलस्लो हा इंग्रज लेखक दाभोळ हे तटबंदी उध्वस्त झालेले, प्रवेशद्वार जमीनदोस्त झालेले व संरक्षणासाठी व नदीच्या बाजूने दोन बुरुजांवर तोफखाने असलेले शहर आणि येथे उत्तर कोकणशी व्यापार करण्यासाठी निकृष्ट नौका दिसल्या असे वर्णन करतो.
इ.स.१६१७ मध्ये इंग्रज व्यापाऱ्यांनी पोर्तुगिजांचे एक जहाज कोमोरो बेटाजवळ पकडले होते. त्या जहाजावर सुरत, दीव व दाभोळचे व्यापारी होते. दाभोळचे व्यापारी संबंध पर्शियाचे आखात, लाल समुद्र, आग्नेय आशियाप्रमाणे आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीशीही होते. तसेच भारतात उत्तरेस सुरत, खंबायत, दक्षिणेस केरळच्या किनारपट्टीशी, पूर्व किनारपट्टी व बंगालची बंदरे यांच्याकडे दाभोळची जहाजे ये-जा करीत असत. त्याशिवाय अंतर्भागातील व्यापारोपयोगी माल गोळा करून साठविण्यात दाभोळ चांगले शहर होते. इंग्रज कंपनीचा एक प्रतिनिधी रॉबर्ट जेफरीज याने १६२१ मध्ये भेट दिली असता त्याला या प्रदेशात उपलब्ध होऊ शकणाऱ्या मालाविषयी माहिती देण्यात आली. प्रवाळ, शिसे, हस्तीदंत व कापड इ.प्रकारच्या मालाला या प्रदेशात चांगली मागणी होती व लाल समुद्र, पर्शिया, इंग्लंड मध्ये मागणी असणाऱ्या वस्तू या प्रदेशात मिळू शकतील, असे त्याला सांगण्यात आले. बाळाघाटाच्या प्रदेशात(देशभाग) कापड, लाख, इत्यादी प्रकारचा माल उपलब्ध होता. दाभोळलगतच्या प्रदेशात मिरीचे उत्पादन बऱ्यापैकी होत असे. सुरतचे व्यापारी दाभोळहून मोठ्या प्रमाणावर मिरी, वेलची व गरम मसाल्यांचा व्यापार करीत असत. सुरतेचा प्रसिध्द व्यापारी वीरजी वोहरा दाभोळहून मिरी गरममसाले खरेदी करत असे व बदल्यात गुजराती कापड व अफूची विक्री करत असे. हा माल नंतर परदेशात निर्यात केला जाई. इंग्रज वखारवले दाभोळ व आसपासच्या प्रदेशातून मिरी, विविध प्रकारचे कापड, सुंठ, लाख इ. वस्तू खरेदी करत असत. गोणी, दोरखंड माल बांधण्यासाठी लागणारा दोरा व व्यापारी मालाचे गठ्ठे बांधण्यासाठी धती (धोती )नावाचे कापड इ .वस्तूदेखील खरेदी करत असत. इंग्रज वखारवले विकण्यासाठी काही माल तेथे आणत असत.
त्यामध्ये शिसे ,बॉडक्लॉथ नावाचे इंग्लंड मध्ये तयार झालेले कापड, तंबाखू, लोकर, खजूर, मनुका आणि तलवारींची पाती इ.मालाचा समावेश असे. बेळगांव जवळील रायबाग ही सतराव्या शतकातील एक महत्वाची बाजारपेठ होती. बरेच व्यापारी रायबाग व अथणी इ.बाजारपेठांमध्ये व्यापारोपयोगी माल खरेदी करून तो दाभोळला आणत व तेथून त्याची इतर ठिकाणी निर्यात होत असे. रायबागचे व्यापारी पेठ म्हणून महत्व १७ व्या शतकात बराच काळ टिकून होते. दाभोळहून रायबागला पोहचण्यास तीन ते चार दिवसांचा प्रवास करावा लागे.
दाभोळ व रायबाग येथे सतराव्या शतकात अस्तित्वात असणाऱ्या वजन मापांची देखील माहिती तत्कालीन कागदपत्रांतून मिळते. मिरीचे वजन मापण्यासाठी प्रामुख्याने खंडी या वजनाचा उपयोग करण्यात येत असे. ४० शेरांचा एक मण व २० मणांची एक खंडी असे वजनाचे प्रमाण होते. मंडेलस्लो हा सतराव्या शतकातील प्रवासी याबद्दल माहिती देताना कोकणातील मन ४० शेरांचा होता असे म्हणतो. तत्कालीन इंग्रजी पत्रव्यवहारात दाभोळच्या मनाचे तुलनात्मक वजन जवळपास २५ इंग्रजी पौंडाएवढे होते असे सांगितले आहे. व्यापारी मालाच्या वजनासाठी शेर, मण, खंडी या वजनांचा उपयोग करण्यात येत असे.
त्यावेळी व्यापार सुलभ होण्यासाठी हुंडीपद्धत देखील प्रचलित होती. मध्ययुगीन काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फार मोठी रक्कम नेणे धोक्याचे असे. त्यामुळे हुंडीने व्यवहार करणे अधिक सोयीस्कर असे. हुंडी म्हणजे आधुनिक काळातील डिमांड ड्राफ्ट असे तिचे स्वरूप होते. दाभोळ किंवा रायबागच्या पेढेवाल्याकडे पैसे भरून त्या रकमेची हुंडी काढण्यात येत असे.
सोळाव्या शतकात पर्शियन आखाताशी असणाऱ्या व्यापारामुळे दाभोळ बंदराचा विकास झाल्यामुळे दाभोळ येथे आखाती चलनाची रेलचेल दिसून येत असे. केसाच्या पिनेसारखी लारी नावाचे नाणे मोठ्या प्रमाणावर वापरात होते. इराण जवळ असणाऱ्या लार प्रदेशावरून त्याचे नाव लारी पडले होते. कोकणात चौललारी, दाभोळलारी प्रचलित होत्या. दाभोळीलारीवर अली आदिलशहाचे नाव कोरलेले आढळते. साधारणपणे ३.५ लारीचे मूल्य एक रुपयाच्या समान होते. आदिलशहाने दाभोळ येथे टंकसाळ स्थापन केली होती. तत्कालीन कागदपत्रांमध्ये बसरी लारी आणि होर्मुझ लारीचाही उल्लेख सापडतो.
इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या जहाजातून दाभोळ,पर्शियाचे आखात व लाल समुद्र इ. ठिकाणी स्वतःचा व्यापार करीत असे. त्याचप्रमाणे इतर प्रवाशी, व्यापारी व त्यांच्या व्यापारी मालाची ते वाहतूक करीत असत. यासाठी ते भाडे आकारीत असत. १६३६ मध्ये दाभोळहून गोंबुनला जहाजातून मिरी नेण्यासाठी दरखंडीस ५० लाऱ्या याप्रमाणे भाडे आकारण्यात आले होते. मार्च १६३६ मध्ये मीर कमालदीन नावाच्या इसमाने आपल्या बरोबर इतर दहा व्यक्तीना नेण्यासाठी ‘फ्रान्सिल’ नावाचे जहाज घेतले व यासाठी ११,००० लाऱ्या असे भाडे ठरविण्यात आले. यावरून प्रत्येक व्यक्तीमागे १००० लाऱ्या एवढे भाडे आकारण्यात आले होते, हे लक्षात येते. १६३६ मध्ये सप्टेंबर महिन्यात दाभोळच्या सुभेदाराने त्याच्या मालकीची मिरी कंपनीच्या जहाजाने मोफत न्यावी अशी इच्छा व्यक्त केली. मात्र इंग्रज व्यापाऱ्यांनी त्याला नकार दिला व दरखंडीस १५ लाऱ्या भाडे द्यावे असा आग्रह धरला. २३ इंग्लिश कंपनीच्या ‘होपवेल’ जहाजाने एप्रिल–मे १६४३ मध्ये ९५ प्रवासी व व्यापारी माल घेऊन पर्शिया ते दाभोळ प्रवास केला. त्यावेळी जवळजवळ २१,७३८ लाऱ्या एवढे भाडे जमा झाले. अशा प्रकारे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने दाभोळला व्यापार करण्याचे काही प्रयत्न केले. त्याचप्रमाणे प्रवाशी व मालवाहतूक करून त्यांना रोख स्वरुपात भाडेही मिळत असे. काही वेळा ५१००० महमुधा पर्यंत भांडवल ते दाभोळच्या खरेदीमध्ये गुंतवत असत.
दाभोळहून वेगवेगळ्या देशातील बंदरांना पोहचण्यासाठी किती वेळ लागत असे, याची देखील थोडीफार माहिती तत्कालीन कागदपत्रांतून मिळते. लंडन ते दाभोळ या जलप्रवासास साधारण सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागत असे. २५ मार्च १६२० रोजी लंडनहून निघालेले जहाज निवडक ठिकाणी थांबून त्याचवर्षी २६ ऑक्टोबरला दाभोळला येऊन पोहचले. २६ मार्च १६२० रोजी दाभोळहून निघालेले जहाज सधारण एक महिन्यांनतर २५ एप्रिल १६२० सुमात्रातील अचिन येथे जाऊन पोहचले. गोंबून ते दाभोळ या प्रवासाला साधारण १७ ते १८ दिवसांचा अवधी लागत असे. ‘विल्यम’ नावाचे ईस्ट इंडिया कंपनीचे जहाज ३० मार्च १६३६ रोजी गोंबूनहून निघाले व दाभोळला १६ एप्रिल रोजी येऊन पोहचले. १३ एप्रिल १६४३ रोजी पर्शियाहून निघालेले ‘होपवेल’ नावाचे जहाज १ मे १६४३ रोजी दाभोळला येऊन पोहचले. यावरून पर्शिया ते दाभोळ हा सागरीप्रवास १७ ते १८ दिवसात करता येत असे हे स्पष्ट होते.
सतराव्या शतकाच्या आरंभापर्यंत दाभोळ,चौल इ. कोकणातील बंदरांचे महत्व टिकून होते. पण सतराव्या शतकात सुरतेचा एक प्रमुख आंतराष्ट्रीय व्यापारी बंदर म्हणून झपाट्याने विकास झाला आणि सतराव्या शतकाच्या मध्यापासून दाभोळ, चौल इ. बंदरांचे स्वरूप सहाय्यक बंदरे किंवा आंतर्भागातील माल गोळा करून सुरतेला पाठविणारी बंदरे असे बनले. तसेच गुजरात किंवा पूर्व किनारपट्टीच्या मानाने ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार दाभोळला वाढू शकला नाही. इ. स. १६३६ व१६३७ मध्ये इंग्रज व्यापाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले; पण त्यांना फारसे यश आले नाही. त्यानंतर दाभोळपेक्षा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी वखार घालून दख्खनमध्ये व्यापार सुरु करण्याचा प्रयत्न कंपनीने चालवला. या उद्देशाने फेब्रुवारी १६३७ मध्ये ‘हेन्री बोनफोर्ड’ या प्रतिनिधीला राजापूरला पाठविण्यात आले. हेन्री बोनफोर्डने राजापूरची पाहणी केल्यानंतर दाभोळ व राजापूर मध्ये त्याला फारसा फरक जाणवला नाही. पण राजापूरच्या आदिलशाही सुभेदाराने दरवर्षी ३००० खंडी मिरी उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आणि मोठ्या प्रमाणात इंग्रजांचा माल खरेदी करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. तेव्हा कंपनीने राजापूरला वखार सुरु करण्याकडे आपले लक्ष वळवले. इ. स. १६३७ च्या उत्तरार्धात राजापूर येथे ‘विल्यम पीट’ हा कंपनीचा व्यपारी राहत होता. तर दाभोळला ‘जोसेफ डॉउनहॅम’ हा व्यवहार सांभाळीत होता. दोघे मार्च १६३९ च्या मध्यावर सुरतला परतले. पुन्हा इस्ट इंडिया कंपनीने इ. स. १६३९ मध्ये राजापूरला व्यापार वाढविण्याचे आरंभिले. त्याचवर्षी “कोर्टीन्स असोशिएशन” या दुसऱ्या एका इंग्रजी व्यापाऱ्यांच्या संघटनेनेदेखील आदिलशहाकडून व्यापाराचा परवाना मिळवून राजापूरला व्यापार सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. अशाप्रकारे पुढे काही कालखंड या दोन्ही संघटनांमध्ये राजापूरला व्यापार करण्यावरून संघर्ष चालू होता. राजापूरला असे व्यापारी महत्व प्राप्त झाल्यामुळे दाभोळमधील परकीय व्यापाऱ्यांच्या उलाढाली हळूहळू कमी होऊ लागल्या.
संदर्भ :
गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
लेख डॉ. दाऊद दळवी.
लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
भाग 4 – शिवाजी महाराजांचा काळ ते इ.स.१८१८
अफजल खानाच्या वधानंतर म्हणजे इ.स. १६५९ डिसेंबर १६६० जानेवारीच्या सुमारास दाभोळ शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. पण ग्रँटडफच्या म्हणण्यानुसार इ.स. १६५१ -५२ मध्ये शिवाजी महाराज वरचेवर महाड मध्ये राहत असत. बाजी शामराज आपले सैन्य घेऊन चारघाटीस राहून महाराजांना पकडण्याची संधी शोधत होता. महाराजांनी त्याला शह देत घाटाच्या पायथ्याशी म्हणजे पोलादपूरच्या जवळ त्यावर हमला चढवला आणि उधळून लावले. याचा अर्थ असा होतो की, शिवाजी महाराज बऱ्याच सैन्यासह आदिलशाहाचे भागात शिरले होते. त्यावेळी त्यांनी दाभोळसुद्धा जिंकले असावे.
दुसरे एक अनुमान – इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांच्या पराभवानंतर हबशा खान हा जुना निजामशाही सरदार रोह ते महाड या कोकणचा सुभेदार झाला. या हबशा खानाने इ.स. १६२८ मध्ये दाभोळ जिंकण्याची मसलत केली होती. तेव्हा १६५१-५२ शिवाजी महाराजांनी या हबशा खानाच्या मदतीने व निजामशाहाचे नावाखाली दाभोळ भाग जिंकून घेतला. महाराजांचे राजकारण धुरंधर होते. ते निजामशाहीच्या नावाखाली अशा गोष्टी करत असत.
अंजनवेलची वहिवाट या यादिनाम्यात इ.स. १६५२ मध्ये शिवाजी महाराजांनी दाभोळ घेतले, असा उल्लेख दोनदा आला आहे. एक दाभोळ ज्यावेळी ताब्यात घेतला तो शक व मुसलमानी वर्ष दिले आहे. दुसरे महाराजांचा अंमल किती वर्षे झाला याची फोड राज्याभिषेकापुर्वी २२ वर्षे व राज्याभिषेकानंतर ६ वर्षे एकून २८ वर्षे अशी दिली आहे. यात शक व मुसलमानी वर्ष तंतोतंत जुळतात.
जरी इ. स. १६५२ पासून दाभोळ महाराजांच्या ताब्यात नव्हते, असे मानले तरी अफजलखान वधापुर्वी इ.स. १६५६ पासून दाभोळ महाराजांच्या ताब्यात होते असे मानण्यास भरपूर जागा आहे. कारण इ.स. १६५५ -५६ मध्ये महाराजांनी मोऱ्यांचे राज्य जिंकले. हे राज्य म्हणजे सावित्री व वाशिष्ठी नद्यांमधील म्हणजे महाड ते चिपळूण हे कोकण, कोयना खोरे म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर ते हेळवाक पर्यंत कोयना काठचा भाग आणि बिरवाडी, महाड, रायगड हा भाग. दाभोळ बंदर व वासोटा किल्ला या भागात येतात. त्यावरून दाभोळ बंदर व वासोटा किल्ला हे १६५६ पासून महाराजांच्या ताब्यात होते. (ग्रँटडफ सुद्धा मोऱ्यांचे कोकण व राज्य म्हणून हाच भाग देतो.) शिवाय ३ एप्रिल १६५७ तारखेचे औरंगजेबाचे महाराजांच्या नावाने फर्मान आहे. त्यात आदिलशहाचा जिंकलेला प्रदेश व दाभोळ बंदर व त्याखालचा मुलुख महाराजांकडे ठेवण्यास संमती दिली आहे. औरंगजेबाने फर्मान देण्यापूर्वी सर्व गोष्टींची शहानिशा केली असणार. त्यामुळे उशिरात उशीरा फर्मानाचे आधी एक वर्ष म्हणजे ५६ च्या उन्हाळ्यापर्यंत मोऱ्यांचे राज्य जिंकले, त्या काळातच दाभोळ पूर्णपणे महाराजांच्या ताब्यात होते असे ठरते.
किंवा, १६५७ साली महाराजांनी निजामशहाचे नावाखाली कल्याण वगैरे घेतले. हबशा खान मारला गेल्यानंतर निजामशाहीचा वारस महाराजांच्या ताब्यात आला व लगेचच महाराजांनी जंजिराच्या सिद्धीचे तळे, घोसाळे घेतले, अशा तऱ्हेने कल्याण भिवंडी ते दाभोळ चिपळूण सर्व कोकण महाराजांच्या ताब्यात होते.
इ. स. १६५९ मध्ये अफजलखान शिवाजी महाराजांवर चालून आला तेव्हा दाभोळ बंदरात त्याची ३ जहाजे भरलेली होती. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजल खानाचा वध केल्यानंतर महाराजांनी खानाची दाभोळ बंदरातील जहाजे लुटण्यासाठी दोरोजीस पाठविले. तो येत आहे, असे समजताच दाभोळचा सुभेदार महमूद शरीफ तिनही गलबतांसहित इंग्रजांच्या आश्रयास राजापूरला गेला. मराठ्यांनी दाभोळ लुटले. इ. स. १६६१ मध्ये महाराजांच्या मावळ्यांनी आदिलशाहीतील दाभोळची जाळपोळ केली. फेब्रुवारी १६६१ मध्ये महाराज, तानाजी मालुसरे, पिलाजी नीलकंठराव सरनाईक, त्र्यंबक भास्कर वगैरे सरदारांना घेऊन दाभोळला आले. त्यांनी दाल्भेश्वराचे दर्शन घेतले. शिवाजी महाराज आले, या भितीने सिद्धी जोहरला मदत करणारा आदिलशाही दाभोळचा जहागीरदार जसवंतराव दळवी आश्रयासाठी शृंगारपूरच्या सूर्यराव सुर्वेकडे पळाला. महाराजांनी दाभोळ ताब्यात घेऊन दोन हजार फौज व अधिकारी नेमून चिपळूणकडे मोर्चा वळविला. १६६१ मध्ये दाभोळ येथील शिर्के – देशमुख यांच्या मुलीशी ‘येसूबाईंशी’ संभाजी राजांचा विवाह झाला.
Dabhol History Taluka Dapoli Shivaji Maharaj From the time of Shivaji Maharaj to 1818
इ.स. १६६० मध्ये थेवेनॉट हा युरोपिअन प्रवासी दाभोळचे वर्णन जुने ठेंगण्या घरांचे व काही तटबंदी असलेले शहर असे करतो.इ.स. १६७० मध्ये फादर नवराईट म्हणतो की, शिवाजी महाराजांचा येथे भक्कम व सुंदर किल्ला आहे. तर इ.स. १६७० मध्येच ओगिल्बी असे म्हणतो की, “पूर्वी दाभोळ हे खूप प्रसिद्ध गांव होते, लढायांमुळे आता ते बरेच उध्वस्त झाले आहे आणि त्याचा व्यापारही कमी झाला आहे. त्याला प्रवेशासाठी फक्त दक्षिणेकडून नदीकडून मार्ग असून समोरचं दोन युद्ध–बुरुजांवर संरक्षणासाठी चार लोखंडी तोफा तैनात केलेल्या आहेत.” परंतु इ.स. १६६२ च्या दरम्यान दाभोळ बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात असताना महाराजांनी दाभोळच्या व्यापारावर लक्ष दिल्याचे दिसते. त्यांची काही जहाजे दाभोळ व मुंबई येथे व्यापार करीत असत, असे उल्लेख तात्कालीन कागदपत्रात सापडतात. मुंबई बेटावरून लंडनला पाठविण्यात आलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांच्या ताब्यातील राजापूर व दाभोळ ही बंदरे मुंबईच्या व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात दाभोळचा व्यापार बऱ्याच प्रमाणात कमी झाला. शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजे व राजाराम राजे यांनी या सुभ्यावर निरनिराळे सुभेदार पाठविले. १६९७ मध्ये दाभोळची जहागिरी शिर्के कुटुंबाकडे बहाल करण्यात आली. इ.स. १७०० ते १७४४ पर्यंतच्या हबशी आणि मराठ्यांच्या संघर्ष काळात इंग्रजांची वखार होती,असे वर्णन केले जात असे. याच काळात तुळाजी आंग्रे यांनी दाभोळ जिंकून घेतले व हबशांना हाकलून लावले. त्यानंतर १७५६ ला पेशवा व इंग्रज संयुक्त फौजेने विजयदुर्ग किल्ल्यावर तुळाजी आंगरेंचा पराभव केल्यानंतर दाभोळ शहर व बंदरावर पेशव्यांचे नियंत्रण आले. इ.स. १८१८ पर्यंत दाभोळ पुढे पेशव्यांच्याच ताब्यात होते. १८१८ मध्ये कसलाही प्रतिकार न करता ते पेशव्यांकडून ते ब्रिटीशांच्या स्वाधीन करण्यात आले.
संदर्भ :
गेट वे ऑफ दाभोळ – अण्णा शिरगावकर.
किल्ले महाराष्ट्र (कोकण विभाग )
मुसलमानपूर्व महाराष्ट्र, खंड १ – वासुदेव कृष्ण भावे
लेख डॉ. दाऊद दळवी.
लेख प्रा. विद्या प्रभू (इतिहास विभाग प्रमुख, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे.)
लेख डॉ. एम. ए. लोहार (इतिहास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
कॅम्प दापोलीची गोष्ट
१८१८ ते १८१९ च्या दरम्यान म्हणजे आजपासून जवळजवळ २०० वर्षांपूर्वी इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत कॅम्प दापोली वसवली. संपूर्ण कोकण पट्टयात दापोली कॅम्प हे तेव्हाच्या काळातले इंग्रजांचे एकमेव सुरक्षित व सोयीस्कर ठिकाण. हीच कॅम्प दापोली पुढे कोकणच्या व महाराष्ट्राच्या २०० वर्षाच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडींची साक्षिदार राहिली.
१६११ …
पण कॅम्प दापोलीची ही गोष्ट १६११ मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने दाभोळ बंदरात कोकणातला पहिला कारखाना टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरु होते. फेब्रुवारी १६११ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सर हेन्री मिडलटन ने ३ बोटींसह दाभोळ बंदरात तेव्हाच्या सिद्धी गव्हर्नरची भेट घेतली व थोडासा व्यापारही मिळवला. असा प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनीने पुन्हा १६१२ आणि १६१८ मध्ये पुन्हा केला पण दाभोळ आणि एकंदरीत कोकण किनाऱ्यांवर असलेल्या पोर्तुगीज आणि डच प्रभुत्वामुळे तोही अयशस्वी ठरला. शेवटी १६२४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला, सिद्धी बरोबर झालेल्या करारानुसार दाभोळ बंदरात कारखाना उघडण्यासाठी परवानगी मिळाली. दाभोळ बंदर व आसपासचा प्रांत, कंपनीच्या व्यापाराकरिता अधिक सुरक्षित आणि सोईस्कर ठरेल, म्हणून कंपनीने त्यांचे सुरतेचे सर्व कारखाने व धंधे दाभोळला हलवावे, अशी अट १६२४ च्या ह्या करारात होती. कारखाना चालू केल्यानंतर मात्र इंग्रज ह्या कराराला प्रामाणिक राहिले नाहीत आणि पुढील दहा वर्षातच त्यांना दाभोळचा कारभार आटोपता घ्यावा लागला. इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा कोकणात तळ जमविण्याचा हा पहिला प्रयत्न होता.
१६३९… कोकणात त्यानंतर १६३९ मध्ये सर विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशन ने कारखाना टाकण्यात यश मिळवले. लंडनच्या ह्या फ्रीट्रेडर अससोसिएशन ने दाभोळ आणि राजापूर प्रांतातून जवळजवळ दहा वर्षे व्यापार चालवला. राजापूर आणि दाभोळ ह्या दोन व्यापारी बंदरातून इंग्रज वर्षाला जवळजवळ ३००० खंडी मिरीची निर्यात करीत. मिरपुडीचा वापर हा मांस जास्त काळ टिकवण्यासाठी होत असे. युरोपातल्या “मीट प्रोसससिंग” इंडस्ट्रीचा हा सुरवातीचा काळ होता. विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशन बरोबर ईस्ट इंडिया कंपनीसाठीहि राजापूर हे सुरत व बॉम्बे नंतरचे महत्वाचे लक्ष्य बनले होते.
१६५०… १६५० च्या दरम्यान विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशनच्या हेळसांड कारभाराला आणि वाढत्या कर्जाला कंटाळून तिथल्या मुसलमान गव्हर्नर ने सुरतला ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रेसिडेंटची भेट घेतली. त्या भेटीत झालेल्या करारात राजापूर ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी मोकळा झाला, आणि इंग्रजाची ईस्ट इंडिया कंपनी अधिकृत रित्या कोकणात व्यापार करू लागली. गमतीची गोष्ट म्हणजे करारानंतर लगेचच, ईस्ट इंडिया कंपनीने, विल्यम कॉर्टेन च्या फ्रीट्रेडर अससोसिएशनचा ताबा मिळवून त्यांच्याकरवीच काम चालू ठेवली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरवातीच्या साम्राज्यातील मोक्याची असलेली राजापूरची हि फॅक्टरी शिवाजी महाराजांच्या काळात १६६४ मध्ये पुन्हा बंद पाडली गेली.
१७०८…. १६११ व १६३९ च्या दोन प्रयत्नानंतर, १७०८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला दाभोळ, राजापूर आणि वेंगुर्ल्यात व्यापाराला मार्ग मोकळे झाले होते, परंतु ह्याच काळात कंपनीचा बॉम्बे पोर्टचा कारभार बराच वाढल्याने पुढे १७५६ पर्यंत कंपनी कोकणात कुठेच असल्याचं नमूद नाही.
शिवाजी महाराज… शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत, सिद्दीच्या जंजिरासारखी एकदोन अपवाद वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भाग बनली होती. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सरखेल कान्होजी आंग्रे हा एकछत्री अंमल होता, कानोजी आंग्र्यांची जरब इंग्रजापासून, डच आणि पोर्तुगीजामध्ये संपूर्ण युरोपात होती. परंतु १७३९ नंतरच्या काळात आंग्रे कुटुंबातील अंतर्गत वाद व पेशवाईचा प्रभाव दोन्ही वाढतच गेले
१७५६… शेवटी मार्च १७५६ मध्ये, नानासाहेब पेशव्यानी इंग्रजांची मदत घेऊन हर्णेच्या सुवर्णदुर्गावर हल्ला चढविला. बॉम्बेच्या ईस्ट इंडिया कंपनीचा कोमोडोरे जेम्स ने ४ युध्दनौका घेऊन सुवर्णदुर्ग व समोरच्या भुईकोट किल्यांच्या ताबा मिळवला. आंग्र्यांबरोबरच्या लढाईत केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून बाणकोटचा किल्ला, हिम्मतगड व त्याच्या आसपासची ५ गाव पेशव्यानीं इंग्रजांना देऊन टाकली. पेशव्यानं कडून मिळालेला बाणकोट हि ईस्ट इंडिया कंपनीची कोकणातील पहिली भौगोलिक मिळकत होती. इंग्रजांनी बाणकोटचा किल्ल्याचे नंतर फोर्ट व्हिक्टोरिया असे नामकरण केले.
१७५६-१८१८… १७५६ नंतर १८१८ पर्यंत संपूर्ण कोकण ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरतेपासून खाली बेळगाव पर्यंत पसरलेल्या साम्राज्याचे भाग बनला होता ज्याला आपण “The Bombay Presidency” म्हणून ओळखतो. १८१८ पर्यंत पेशवाई पूर्णपणे नामशेष होऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या झेंड्याखाली इंग्रज़ी राजवटीची पायमुळं अगदी खोलवर पसरली होती. ह्या दरम्यान कोकणात इंग्रजांनी, मालवण, वेंगुर्ला, बाणकोट व हर्णे अश्या ४ ठिकाणी छोट्या सैनिकी तुकड्या ठेवल्या होत्या. त्यानंतर मात्र इंग्रजांना कोकणात एक नियमित सैनिकी ताफा ठेवण्याची गरज वाटू लागली व त्यासाठी दापोलीची निवड करण्यात आली. आणि कॅम्प दापोली अस्तित्वात आली.
१८१८ आणि पुढे …. १८१८ च्या नंतर च्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखाली इंग्रजांनी कायदा, चलन, दळणवळण, शिक्षण क्षेत्रातल्या पारंपरिक व्यवस्था मोडीत काढून नव्या इंग्रजी संकल्पना राबविल्या, ह्या कालावधीत संपूर्ण उत्तर कोकण आणि त्याची शेतीसंस्कृती जवळजवळ नष्ट झाली. ह्याच कालावधीत दापोलीत कचेरी, दिवाणकोर्ट, चर्च, ईस्ट इंडिया कंपनीची चलनातील नाणी, आर्मी बर्राक, गोळीबार क्षेत्र, फॅमिली माळ व जालगावची बाजार पेठ वरून खाली कॅम्पात आली.
१८१८ ते १८५७ ह्या कालावधीत ईस्ट इंडिया कंपनीने इंग्रजी साम्राज्याची भारतावरची पकड मजबूत केली, पण ह्यात उत्तर कोकण, कुलाबा, पनवेल, भिवंडी व वसई सारखे प्रांत पेशवाई पासून चालत आलेल्या करांमध्ये व नंतर त्यात इंग्रजी विकास ह्यात संपूर्णपणे नष्ट होत चालले होते. अगदी भिवंडी पर्यंत रेल्वे ट्रॅकस, महाड पर्यंत गाडी रास्ता देखील पूर्ण होत आला होता. पण त्यापुढे दापोली पासून खाली तळ कोकणात बैलगाडीच चालू होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या अश्या परिस्थितीत सुद्धा संपूर्ण कोकणातुन, हर्णेचं सुवर्णदुर्ग आणि गुहाघरच अंजनवेल अशी दोन प्रांत अगदी वेळेवर न चुकता कर भरीत असत त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचं दक्षिण कोकणात सगळं व्यवस्थित चाललं होतं. अगदी १८४० पर्यंत इंग्रजांनी दापोलीतील नियमित ताफा हलवून फक्त अनुभवी, आणि वरीष्ठ इंग्रज़ी अधिकाऱ्यांची तुकडी नियुक्त केली होती. ह्याला दापोलीतील थंड हवा व नैसर्गिक सौंदर्य ह्यापलीकडे दापोलीची भौगोलिक सरंचना कारणीभूत असावी. १८५७ नंतर मात्र इंग्रजांनी अधिकृत रित्या दापोलीत सैनिकी ताफा ठेवला नाही.
१८५७ च्या बंडानंतर इंग्रजानी ईस्ट इंडिया कंपनी कडून राज्यकारभाराची सूत्र स्वतःच्या हातात घेतली. १८५७ पासून पुढे इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी जाऊन ब्रिटिश राज चालू झाला आणि पुढे २१ वर्षांनी १८७८ मध्ये SPG मिशन चे आल्फ्रेड गॅडने दापोलीत आले. खुद्द राणीच्या शिफारसीतून आलेला हा एक तरुण स्कॉटिश मिशनरी होता. गॅडननेंनी दापोलीत आर्मी बर्राक च्या जागेवर AG high school ची स्थापना करून संपूर्ण अभ्यासक्रम रचला, आजु बाजूच्या गावातल्या मुलांना हे शिक्षण घेता यावं ह्याकरिता बोर्डिंग स्कूल्स बनवून घेतली. हर्णेत मुलींसाठी शाळा चालू केली. कोकणात रुढ असलेल्या पारंपरिक गुरुकुल शिक्षण पद्धती नंतर इंग्रज़ी शिक्षण प्रणालीत कोकणात एवढं यश मिळवणारे ग्याडने हे पहिलेच.
ब्रिटिश राजवटीत SPG मिशनची मुख्य कार्यपद्धती हि ख्रिस्ती धर्माचा प्रसार व धर्मांतर करण्यावर जोर देत असे. आल्फ्रेड गॅडने देखील ह्याच उद्देशाने दापोलीत आले पण त्यापुढे ते असखलीत मराठी व संस्कृत बोलणारे दापोलीकर कसे बनले हि गोष्ट स्वतंत्रपणे सांगायला हवी.
खरंतर गॅडननेंना दापोलीत एकही धर्मांतर करण्यात यश मिळाले नाही. त्यांनी SPG मिशनला केलेल्या पत्रव्यवहारात ते नमूद करतात कि “इथे वेगवेगळ्या धर्मांची व जातीची बरीच लोक आहेत. बरीच लोक गरीबही आहेत, त्यांच्यावर कर्जही आहेत, परंतु इथल्या लोकांना इतर गरजा किंवा इच्छा नाहीत व ते समाधानी आहेत आणि म्हणूनच माझे इथले काम कठीण झाले आहे.”
१९२८ पर्यंत व त्यानंतरच्या कालावधीत ग्याडने च्या AG high school ने पुढे दापोली आणि पूर्ण देशाला थोर विचारवंत व क्रांतिकारी दिले. इतकेच नव्हे तर, सैन्यदल, नौदल, रेल्वे व इतर सरकारी सेवेत हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी सुद्धा दिले. १९२२ ची असहकार चळवळ, १९३० चा मिठाचा सत्याग्रह, ४२ ची चले जावं ह्यासारख्या १९४७ पर्यंतच्या सर्व देशव्यापी चळवळीतून दापोलीने मोलाच योगदान केल. पुढे १९४७ नंतर, स्वातंत्र्याची घडी बसविण्यात सुध्दा दापोली अग्रेसर राहिली. ह्या प्रांताने देशाला धुरीचे राजकारणी दिले हि गोष्ट आजतायागत खरी होईल.
साने गुरुजी, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यासारखी युगप्रवर्तक नेतृत्व. डॉ. पा. वा. काणे, रँग्लर परांजपे, असे थोर विचारवंत. बाबा पाठक, सुडकोजीं खेडेकर, शिवराम मुरकर ,चंदुभाई मेहता, पुरुषोत्तम मराठे,मालू शेट, विठ्ठलराव बेलोसे, ह्यांच्यासारखी सामान्य पण नीतिमूल्यं जपणारी आदर्श स्वातंत्र्यसेनानी असुदेत किंवा त्यांना आडोसा देणारी नुसतीच बुटलांच्या दुकानाची ओसरी असुदे,त्यांच्या बोथट पण निरपराध विचारांना धार चढवणारी गोखले लायब्ररी असुदे, कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धनानी मिठाचा सत्याग्रह घडवला तो हर्णेचा समुद्र किनारा असुदे, वा स्वातंत्रउत्तोर काळात पूर्ण कोकणची राजकीय भाषणे ज्याने गिळून टाकली ते आझाद मैदान असुदे कोकणच्या व त्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जडणघडणीत दापोली कधी गोंगाट करीत तर कधी नकळत आपल स्थान टिकवून राहिली आहे.
कॅम्प दापोलीची गोष्ट कधी संपते किंवा संपली यासाठी अजून थोडं किंवा बरच खोदावं लागेल. मात्र १६११ पासून परकीय आक्रमणापासून इथल्या श्रीमंत संस्कृतीला व निसर्गाला जपून ठेवणारा हा प्रांत ज्याला आपण सर्व दापोली म्हणतो, तिची गोष्ट नक्कीच संपणार नाही.
भग्नावस्थेतील चर्च :-
दापोलीच्या
कॅॅम्प परिसरातील चर्च ब्रिटिशकालीन इतिहासाची साक्ष देते. १८१८-१८५७ या
कालावधीत येथे असलेला इंग्रज अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हे चर्च
बांधले गेले. चर्चची ही इमारत गॉथिक शैलीत होती. दगडी चिऱ्यांनी बांधलेली
ही इमारत अतिशय देखणी होती. चर्चच्या उंच मनोऱ्यावर एक सहा फुटांची मोठी
घंटा होती. ती चोरीला गेली, असे सांगितले जाते. चर्चच्या खिडक्या दोन्ही
बाजूने लांब आणि वरच्या दिशेने निमुळत्या होत जातात. १८१८ पासून ब्रिटिश
राजवटीत सैन्य दलातले सर्व, म्हणजे जवळजवळ दोन हजार कोकणवासी इथं पेन्शन
करिता वर्षांतून चार वेळा जमायचे. त्या काळात या चर्चच्या आवारात एसपीजी
मिशनची ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराची व्याख्याने चालायची. चर्चसमोरील आवार
आणि इमारत अजूनही स्कॉटिश मिशनच्या हक्काची आहे असे सांगितले जाते. अशाच
रचनेचे चर्च पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर किल्ल्याजवळ आहे.
आता सध्याच्या दाभोळ परिसराची माहिती घेउया.
दाभोळ खाडीतील फेरी सर्व्हीस
एका बाजुला वाशिष्टी नदीमुळे तयार झालेली समुद्रीकिनार आणि इतिहासाची साक्ष देणारा गोपाळगड, बाजुला दाभोळ बंदर तर दुसर्या बाजुला असणार्या टेकडीवर असलेले श्री स्वयंभू चंडिका देवीचे गुहेतील प्राचीन व जागृत मंदिर. या ठिकाणी दिपगृह, दाभोळचा धक्का, दाभोळची चणकाई आदी ठिकाणी पाहण्यासारखी आहेत.
दाभोळची एक नविन ओळख झाली आहे. भारतातली पहिली प्रायव्हेट ऑइल रिग येथे बांधली जातेय. तसेच थोड्याच दिवसात वॉर शिप्स (भारतातल्या तसेच विदेशातल्या)च्या बांधणीची देखील येथे सुरू झालेली आहे. (भारती शिप यार्ड).
स्वयंभू श्री चंडिका देवी (दाभोळ):-
दापोली शहरापासुन साधारण एक तासाच्या (२८ किमी) अंतरावर एका टेकडीवर वसले आहे श्री स्वयंभू चंडिका देवीचे स्थान.
टेकडीच्या डावीकडील भागातून खाली उतरल्यावर एकसंघ दगडामध्ये कोरलेल्या भुयारवजा गुहेमध्ये असलेल्या श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिराकडे आपण येतो.
चंडिका देवीची गुहा
गुहेमध्ये प्रवेश करताना एका छोट्या दरवाजातून वाकून जावे लागते. आत आल्यावर आपल्याला दिसते ती काळ्या कभिन्न पाषाणाच्या गुहेत कोरलेली नंदादिपाच्या प्रकाशात उजळलेली मंगलमय आणि सोज्वळ शेंदुरचर्चित श्री चंडिका देवीची मूर्ती. अशी ही प्रसन्न मूर्ती पाहताक्षणी आपले भान हरपते.
(मंदिरात देवीचा फोटो काढण्यास परवानगी नसल्याने हा फोटो नेटवरून साभार)मूळ मूर्तीची प्रतिकृती
श्री स्वयंभू चंडिका देवीचे रुप जेव्हढे सुंदर तेव्हढेच रौद्रही भासते. देवीच्या भुवया मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असल्याचे सांगतात. देवीला चार हात असून तीच्या उजव्या हातात तलवार आहे.
श्री चंडीकेचे मुख नैऋत्य दिशेला असून ती पूर्णपणे शाकाहारी आहे. दाभोळ गावात असलेल्या ईंगळाइ-भैरीदेवी या श्री चंडीकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर, नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तीने आपल्या छत्रछायेखाली घेतले आहे असे स्थानिकांचे मत आहे. अशा या जागृत देवीचे दर्शन घेऊन त्या अंधाऱ्या गुहेतून पणत्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो.
बाहेरील रचनेवरून आत असलेल्या गुहेची अजिबातच कल्पना येत नाहि. फार पूर्वी दालभ्य ऋषींनी या गुहेत तपसाधना केल्याचे सांगितले जाते. मंदिर परीसर :- नवरात्रीत देवीचा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. मंदिराच्या मुख्य द्वाराजवळच घटस्थापना केली जाते. पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास काकड आरतीला सुरुवात होते. दसर्याच्या दिवशी सोने लुटून मंदिरावर निशाण चढविले जाते. देवीचे स्वरूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावणारी जागृत देवी आहे. उत्सवाच्या काळात विविध भागातून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात. चंडिकेवर जेंव्हा मुघलांचे राज्य आले तेंव्हा शिवरायांनी येथे स्वारी केल्याची नोंद आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव सध्या एनरॉन प्रकल्पामुळे गाजत आहे. तरीसुद्धा आपली एक परंपरा व खास कोकणी ठसा अजुनही या गावात जाणवतो
.दाभोळ बंदर हे सतत नौकांनी गजबजलेले असते. या बंदराच्या पलिकडे असलेल्या अंजनवेल, वेलदुर परिसरापर्यंत लाँचसेवा उपलब्ध आहे. येथील समुद्रकिनाराही सुरुंच्या झाडामुळे अधिकच आकर्षक वाटतो. खास कोकणी निसर्ग सौंदर्याबरोबर स्वयंभू दालभ्येश्वर मंदिर, नवसाला पावणारा सय्यद अमिरूद्दिन बालापीर,
कोकणामध्ये दाभोळ बंदरात आदिलशाहीच्या काळापासूनची प्रचंड शाही मशीद आहे. तिचा अंडा मशीद किंवा मासाहेबा मशीद असा उल्लेख केला जातो. ही मशीद विजापूर येथील शाही जामा मशिदीची प्रतिकृती मानली जाते.अंडा मशिद हा प्राचीन वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना मानला जातो. या वास्तूत प्रवेश करण्यासाठी प्रशस्त, सुंदर काळ्या दगडाच्या पायऱ्या आहेत.
तेथेच हौद व कारंज्याची मांडणी केलेली आहे. मशिदीच्या दर्शनी भागात तीन भव्य कमानी आहेत. चारही कोपऱ्यांवर अतिशय प्रमाणबद्ध मनोरे आहेत. मनोऱ्यावर दगडात कोरलेले साधे पण मनोवेधक नक्षीकाम आहे. छज्जाच्या मध्यभागावर छोटे छत्रीवजा घुमट व त्याच्या पाठीमागे मशिदीचा भव्य घुमट आहे. घुमटावर पूर्वी सोनेरी पत्रा होता असे सांगितले जाते. या मशिदीच्या निर्मितीच्या कथा वेगवेगळ्या सांगितल्या जातात. त्यातील एक कथा अशी की, इ. स. १६५९ मध्ये विजापूरची राजकन्या आयेषाबीबी मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. पण हवामान ठीक नसल्याने ती जाऊ शकली नाही. मौलवीने सोबत आणलेले धन धार्मिक कार्यासाठी वापरावे, असा तिला सल्ला दिला. त्यानुसार तिने कामीलखान या शिल्पकाराकडून ही मशीद बांधून घेतली. त्यासाठी त्या वेळेस त्यासाठी १५ लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे. दाभोळ बंदरात अरबी घोडय़ांची आवक केली जात होती. मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार होता. सध्या बंदरात मोठय़ा होडय़ांमधून चारचाकी, तीनचाकी वाहने पलीकडच्या किनाऱ्यावर सोडली जातात. येथे माशांची विक्री मोठय़ा प्रमाणात केली जाते.
दाभोळ आणि परकीय प्रवासी
‘दाभोळ’ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या
दापोली तालुक्यातील महत्त्वाचे बंदर. त्याचा उत्कर्ष चौदाव्या ते सतराव्या
शतकांत झालेला होता. दाभोळ बंदराचा सर्वात प्राचीन उल्लेख सातवाहन काळात
एका अनभिज्ञ परकीय प्रवाशाने लिहिलेल्या ‘पेरीप्लस ऑफ इथिरियन सी’ या
ग्रंथात सापडतो. दाभोळचा तो उल्लेख ‘पालीपाटमे’ असा आहे. त्याच प्रमाणे
जुन्या लिखाणात कोकणातील बंदरांचे संदर्भ सापडतात. त्यात सोपारा, कल्याण,
चौल, मंदागौर (बाणकोट), मेलीझीगारा (सुवर्णदुर्ग-राजापूर), सेसेक्रियनाय
(वेंगुर्ले) या बंदरांचे नामोल्लेख येतात.
सातवाहन राजवट मौर्य साम्राज्यानंतर
महाराष्ट्रात अस्तित्वात आली. त्या काळात ही बंदरे भरभराटीस आली होती. त्या
बद्दलचे उल्लेख स्ट्रॅबो, टॉलेमी, प्लिनी, व पेरिप्लस या
भूगोलवेत्त्यांप्रमाणे तर हुएनस्तंग, इब्नबतुता, अल्बेरुनी या प्रवाशांनी
त्यांच्या लिखाणात करून ठेवलेले आहेत. दाभोळ बंदरातून रोम, इजिप्त,
अरेबिया, इराण, आफ्रिका या पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. दाभोळचा
संदर्भ पेरिप्लसमधील एक उल्लेख वगळता प्राचीन लिखाणात सापडत नाहीत. दाभोळ
मध्ययुगीन इतिहासात भरभराटीला आले असणार. अफसानी निकीतीन हा प्रवासी
रशियातून 1740 मध्ये भारतात आला होता. त्याच्या लिखाणात इजिप्त, अरबस्तान,
खोरासन, तुर्कस्तान येथून मोठ्या प्रमाणात घोड्यांची आयात दाभोळ बंदरात होत
असून, दाभोळ हे एक मोठे बंदर असल्याचे वर्णन आहे. अरबी घोड्यांचा दर्जा
फार चांगला असल्याने त्या घोड्यांना विजयनगर, निजामशाही, आदिलशाही,
कुतुबशाही या राजवटींत मागणी असे. परदेशांतून आलेले घोडे दाभोळ बंदरात
उतरून विविध राज्यकर्त्यांकडे पाठवले जात.
दुआर्तेबार्बोसा या पोर्तुगीज
प्रवाशाने 1518 मध्ये कोकण किनारपट्टीला भेट दिली. तो लिहितो, “मक्का, एडन,
होर्मुझ येथून व्यापारी मोठ्या संख्येने घोडे घेऊन येथे येतात. तसेच
खंबायत, दीव, मलबार किनाऱ्यांवरून जहाजे अनेक वस्तू घेऊन येथे येतात. येथील
मुस्लिम व हिंदू धर्मीय व्यापारी खूप श्रीमंत आहेत. दाभोळच्या आतील भागात
मोठ्या प्रमाणात तांबे, पारा, हिंगुल (पारा आणि गंधकाचे मिश्रण अथवा
पाऱ्याचा अशोधीत धातू) सापडते. अंतर्गत भागातून आणलेले कापड दाभोळ बंदरात
जहाजांवर मोठ्या प्रमाणात चढवले जाते. येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंत
विविध प्रकारचे कापड, मसाल्याचे पदार्थ, गहू, तेलबिया, कडधान्ये यांसारख्या
वस्तू असतात.”
जॉन जॉर्डन आणि हेन्री मिडल्टन या
प्रवाशांनी सतराव्या शतकात दाभोळला भेट दिली. त्यांच्या लेखनात दाभोळ
बंदराचे वर्णन आहे. जॉन जॉर्डन लिहितो, “दाभोळ हे बंदर मुखापाशी अरुंद
असून, त्या ठिकाणी खडक दिसत असला तरी बंदरात खोली मात्र अधिक आहे. त्या
बंदरावरून दरवर्षी पाच-सहा जहाजे होर्मुझ बंदर व लाल समुद्र यांच्याकडे
जातात. हेन्री मिडल्टनने लिहिले आहे, “आग्नेय आशियातील सुमात्रा बेटावरील
‘अचिन’ या बंदराकडे दोन-तीन जहाजे जातात. त्या जहाजांमध्ये सुरतेच्या
जहाजांपेक्षा जास्त माल भरलेला असतो.” डच इस्ट इंडिया कंपनीतील ब्रोक
त्याच्या लिखाणात म्हणतो, की “दाभोळची जहाजे सप्टेंबर महिन्यात
सुमात्रामधील ‘अचिन’ बंदराकडे जातात आणि परतताना जावा, सुमात्रा यांमधून
मिरी, डिंक, कापूर, लवंग आणि रेशमी कापड घेऊन येतात. तसेच, तेथील जहाजे
विविध वस्तू घेऊन खांबात आणि पर्शियन आखातातील मोखा बंदराकडेही जातात.”
दाभोळ हे सोळा-सतराव्या शतकात
महत्त्वाचे असे आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर झाले. स्वाभाविकच, दाभोळ
मध्यकाळात व्यापारयोग्य माल साठवणुकीचे महत्त्वाचे केंद्र बनले.
पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावरील व्यापार त्यांच्या ताब्यात घेऊन बाहेर
जाणाऱ्या जहाजांना परवाने (कार्टाझ) देण्यास सुरुवात केली. जॉन जॉर्डनने
दाभोळमध्ये दस्तक देण्यासाठी गोव्याच्या गव्हर्नरने त्यांचा प्रतिनिधी
ठेवल्याचा उल्लेख केला आहे. तोफेची दारू यासारखे युद्ध साहित्य जहाजांवरून
नेण्यास बंदी असे. मध्य आशियातून आलेल्या घोड्यांच्या व्यापाराचा मक्ता;
तसेच, विदेशी मद्य विकण्याचा मक्ता पोर्तुगीजांकडे होता. त्यासाठी
गोव्यातील पोर्तुगीज सत्ताधीश आदिलशहाला वार्षिक पद्धतीने मोठी रक्कम देत
असत. तसे उल्लेख सुरतेहून इंग्लंडला पाठवलेल्या पत्रांतून सापडतात. ब्रिटिश
इस्ट इंडिया कंपनीने दाभोळमधून व्यापार करण्याचा प्रयत्न सतराव्या
शतकाच्या आरंभी केला. परंतु पोर्तुगीजांचे पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्व आणि
निजामशाही व आदिलशाही राज्यकर्त्यांशी सख्य असल्यामुळे ते प्रयत्न सफल होऊ
शकले नाहीत. इंग्रजांनी पोर्तुगीजांचे एक गलबत आफ्रिकेच्या कोमोरी बेटाजवळ
1617 मध्ये पकडले. त्यात सुरत, दीव आणि दाभोळ येथील व्यापारी होते. यावरून
दाभोळचा आफ्रिकेशी व्यापार चालत असल्याचे निदर्शनास येते. पूर्वेकडील
व्यापारासंदर्भात, दाभोळची गलबते बंगालच्या किनाऱ्यावरून मालाक्काकडे
(मलेशियाच्या दक्षिण भागात वसलेले राज्य) जात असत. गलबते दाभोळ येथून सुरत,
खंबात व केरळ यांच्या किनाऱ्यावरील बंदरे, पूर्व किनारपट्टीवरील
महत्त्वाची बंदरे येथे जात असत. दाभोळ, चौल बंदरांचे महत्त्व नंतरच्या मोगल
आणि ब्रिटिश कालखंडात कमी झाले. सुरत व मुंबई नावारूपाला आले आणि पश्चिम
किनाऱ्यावरील दाभोळसह इतर बंदरे बिनमहत्त्वाची झाली.
परकीय प्रवाशांच्या वृत्तांतात
दाभोळमधील वजने-मापे याबद्दल माहिती मिळते. येथून परदेशात जाणाऱ्या मालात
प्रामुख्याने मिरी, कापड, सुंठ, लाख, तांदूळ, दोरखंड असे; तर शिसे,
बॉडक्लॉथ नावाचे कापड, तंबाखू, लोकर, खजूर, मनुका, तलवारीची पाती येथे आणली
जात. मिरीचे वजन करण्यासाठी खंडी हे माप वापरले जाई. जॉन अल्बर्ट
मँडेलस्लो हा प्रवासी 1638 मध्ये जर्मनीमधून आला होता. त्याच्या लिखाणात
दाभोळमधील एक मण हा चाळीस शेरांचा असल्याचे म्हटले आहे. दाभोळचा एक मण
म्हणजे पंचवीस इंग्रजी पौंड असल्याचे; तसेच, व्यापारी मालाचे वजन
करण्यासाठी प्रामुख्याने शेर, मण, खंडी ही वजने वापरली जात. सतराव्या शतकात
दाभोळ येथून गोंबून येथे जाणाऱ्या मालासाठी दरखंडीस पन्नास लारी मोजाव्या
लागत. तर माणशी अकराशे लाऱ्या भाडे आकारले जात असे. लारी हे आदिलशाहीतील
चांदीचे नाणे होय. ते पश्चिम किनाऱ्यावर चलन म्हणून वापरले जात असे.
तत्कालीन प्रवास वर्णनातून प्रवासास
लागणाऱ्या वेळेसंबधी माहिती मिळते. लंडन येथून दाभोळला पोचण्यास सात-आठ
महिन्यांचा कालावधी लागत असे. तसेच, दाभोळ येथून सुमात्रातील अचीन बंदरात
पोचण्यास साधारण एक महिना लागत असे. गोंबून (पर्शिया) येथून निघालेले गलबत
दाभोळला सतरा-अठरा दिवसांत पोचत असे. दाभोळच्या बंदरावर बाराशे टन माल
वाहून नेणारी गलबते लागत.
ओगिलबी हा प्रवासी (1670) म्हणतो, की
“सध्या युद्धामुळे दाभोळच्या प्राचीन बंदराचे मोठे नुकसान झाले असून, तेथील
व्यापार घटला आहे.” तर सतराव्या शतकाच्या अखेरीस आलेल्या अलेक्झांडर
हॅमिल्टन याने दाभोळचे व्यापारी महत्त्व नष्ट झाल्याचे मत नोंदवले आहे.
यामागे मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर असलेल्या सुरतेला आलेले व्यापारी
महत्त्व, पोर्तुगीजांचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील वर्चस्व,
इंग्रजांनी राजापूरला, तर डचांनी वेंगुर्ल्याला उघडलेल्या वखारी, सिद्दीचे
दाभोळवर वरचेवर होणारे हल्ले, मोगल, मराठा आणि विजापूरकर यांच्यातील संघर्ष
ही कारणीभूत ठरतात.
दापोली; प्रवीण शिंदे
: कोकण (historical konkan) हा अनेक गोष्टींनी समृद्ध असलेला प्रांत आहे.
याच कोकणात भारतीय संस्कृतीच्या इतिहासाची अनेक पाऊलखुणा दडलेली आहेत. याच
कोकणात दापोली तालुक्यात प्राचीन संस्कृतीचा अनमोल ठेवा दडलेला आहे. येथील
प्रत्येक गावात असे काही प्राचीन संदर्भ आहेत, जे सामाजिक किंवा सांस्कृतिक
अनास्थेमुळे अजुनही सर्वांसमोर आलेले नाहीत.
दापोली
तालुक्यातील टाळसुरे (historical konkan) नावाचे असेच एक गाव आहे. या
गावात देखील इतिहासाच्या पाऊल खुणा आहेत. श्रीमंत बाजीराव पेशवे यांची
पत्नी काशिबाई यांचे हे टाळसुरे माहेर आहे. मात्र हा इतिहास दापोली
तालुक्यातील अनेकांना माहीत नसावा. दापोली शहरापासून अगदी जवळच, दापोली खेड
या मुख्य मार्गावर हे गाव आहे. या गावात इतिहासाच्या पाऊल खुणा असूनही हे
गाव पर्यटनाच्या पटलावर आले नाही. या गावात व आजुबाजूच्या परिसरात अनेक
ठिकाणी काही ऐतिहासिक खुणा दडलेल्या आहेत. या बाबत गावातील वयोवृद्ध नागरिक
या ऐतिहासिक ठेव्याची माहिती देतात. हा पुरातन ठेवा अनेक वर्षे दुर्लक्षित
राहिल्याने त्याचे म्हणावे तसे जतन झाले नाही. यासाठी टाळसुरे गावचे सरपंच
प्रभाकर लाले आणि ग्रामस्थ यांनी मिळून या पुरातन ठेव्याचे जतन व्हावे
म्हणून पुढाकार घेतला आहे. यासाठी टाळसुरे माध्यमिक विद्यालयाचे
मुख्याध्यापक संदेश राऊत व त्यांचे काही विद्यार्थी याचे या कामी सहकार्य
करत आहेत.
स्थानिक
इतिहासप्रेमी (historical konkan) ग्रामस्थ यांच्या एकत्रित श्रमदानातून व
सरपंच श्री प्रभाकर लाले आणि यांच्या सहकार्यातून हे पुरातन भग्नावशेष
अगदी बऱ्यापैकी दिसू लागले आहेत. खेर्डी जवळील जोगटेंबा येथे एक विशाल
गुहासदृश लेणी येथे सापडली आहेत. या गुहेच्या वरील बाजूस कातळावर छत्तीस
कोरीव खड्डे (मंडप घालण्यासाठी लागतात तशी नेमं) आहेत. या गुहेत आता वीस
फुटांपर्यंत आत सहज जाता येते. ही गुहा खूप पुढेपर्यंत गेली असावी. मात्र
कालौघात ही गुहा माती, दगडधोंडे व गाळाने पूर्णपणे भरून गेली आहे.
पुरातत्त्व खात्याकडून अशा ऐतिहासिक व पुरातन अवशेषांची योग्य दखल घेतली
गेली आणि या ठिकाणी आवश्यक खोदकाम व साफसफाई झाली तर या गुहेमध्ये गडप
झालेल्या अनेक पुरातन संदर्भांचा अभ्यास व संशोधन करणे शक्य होणार आहे.
टाळसुरे
या गावातून इतिहासप्रसिद्ध (historical konkan) कोडजाई नदी आजही वाहते. ही
नदी अतिप्राचीन व पुरातन आहे. आजही दापोली शहरास याच नदीच्या पाण्याचा
मुख्य आधार आहे. याच कोडजाई नदीच्या प्रदेशात पुरातन नागरी संस्कृती अतिशय
समृद्ध स्वरुपात अस्तित्वात होती असा अंदाज आहे. या कोडजाई नदीच्या
प्रदेशात सापडलेली लेणी, गुहा, पाण्याचे दगडी पाट, वाघबीळे पाहिली की या
अंदाजास वास्तविक पुष्टी मिळते.
पांडव त्यांच्या वनवासाच्या काळात
याच कोडजाई नदीच्या प्रदेशात सर्वाधिक काळपर्यंत वस्ती करून होते असे
उल्लेख सापडले आहेत. याच उल्लेखांवरुन असे दिसते की, त्याच काळात या
प्रदेशात अशी नागरी संस्कृती विकसित झाली असावी. येथील बोरघर परिसरात अशाच
प्रकारचे छोटे पांडव मंदिर आढळून येतात तर वयस्कर ग्रामस्थांच्या
सांगण्यानुसार येथे पूर्वी अस्तित्वात असणाऱ्या कातळ शिल्पा बद्दल अधिक
अभ्यास व संशोधन करणे शक्य होईल.
टाळसुरे
येथील कातळात अशी अर्धवट खोदकाम केलेली अपूर्ण अवस्थेत दिसणारी लेणी
सापडली आहेत. यांपैकी अनेक लेणी मातीने भरून गेल्याने लेण्यांपर्यंत पोचता
येत नाही. येथीलच एका लेण्यामध्ये साफसफाई करताना एक किंचित भग्नावस्थेतील
पण खूप रेखीव दगडी मुर्ती आढळून येते. चार भूजा असलेल्या या मूर्तीच्या
भुजांमध्ये तलवार व ढाल यांसारखी शस्त्रे आहेत. येथून काही अंतरावर अशाच
प्रकारची भग्नावस्थेतील लेणी आढळली आहेत. या लेण्यांपर्यंत पोहचता यावे
यासाठी अधिक व आवश्यक खोदकामाची गरज आहे.
या
लेण्यांचा आतील भाग मोकळा झाल्यास या लेण्यांध्ये तत्कालीन नागरी संस्कृती
अधोरेखित करणारे अनेक संदर्भ आढळतील. आपटी परिसरातील वाघबीळ परिसरात अशीच
लेणी आढळली आहेत. येथे वाघबीळ या नावाने परिचित असलेली एक लांबलचक गुहा
आहे. पुर्वीच्या काळात वाघासारख्या हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी
कातळात व जंगलात अशी वाघबीळे खोदलेली असत. संकटकाळात गुप्त व सुरक्षित
मार्ग म्हणूनही अशा बाघबीळांचा वापर होत असे. आपटी येथील अशा प्रकारच्या
वाघबीळवजा गुहेत साधारण १५-२० फुटापर्यंत सहज वावर करता येतो. मात्र, हे
वाघबीळ मातीने भरलेले असल्याने या गुहेत जास्त दूरपर्यंत जाणे शक्य होत
नाही.
येथून
जवळच असलेल्या भोमेश्वर मंदिर परिसरातही अशाच प्रकारचे पुरातन संदर्भ व
भग्नावशेष आढळले आहेत. या परिसरात भग्नावस्थेतील अनेक दगडी मूर्त्या,
ऐतिहासिक ठेवीं बाबतच्या अनास्थेमुळे अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. या सर्व
मुर्त्या आज भग्नावस्थेत असल्या तरी त्यांची घडणावळ पाहता पुरातन काळात या
प्रदेशात अतिशय समृद्ध नागरी वस्ती व मंदिरे असावीत याची खात्री
पटते. सिंधुसंस्कृतीसारखी नागरी संस्कृती टाळसुरे परिसरात आढळलेली ही सर्व
लेणी कोडजाई नदीच्या प्रदेशात आहेत. टाळसुरे येथील लेणी व भग्नावशेष, दगडी
कालवे, पुढे पन्हाळेकाझी येथील लेणी यांमध्ये खूप साधर्म्य आहे. लेण्यांची
रचना, प्रवेशद्वार, प्रवेशद्वारावरील दगडी कोरीवकाम, लेण्यांमधील खोल्यांची
रचना, दिवाणखाने, दगडी मूर्त्या, शयनगृहे दाभोळ येथील चंडीका मंदिरातील
अंतर्गत गृहरचना, भुयारे यांमध्ये खुपच साधर्म्य आहे.
शासनाच्या
पुरातत्त्व खात्याने टाळसुरे, आपटी, बोरघर परिसरात आढळलेल्या अशा ऐतिहासिक
पुरातन भग्नावस्थेतील गुहा, लेणी, कालवे व वाघबीळांचे अधिक संशोधन करुन या
भग्नावस्थेतील लेण्यांना पुन्हा एकदा अजेडात आणणे गरजेचे आहेत.
सुवर्णदुर्ग
कोकणच्या ७२० कि.मी.लांबीच्या किनारपट्टीवर महाराष्ट्राचे वैभव म्हणून अनेक जलदुर्ग उभे आहेत. त्या जलदुर्गांपैकी एक प्रमुख जलदुर्ग म्हणजे हर्णैचा ”सुवर्णदुर्ग”. या किल्ल्याचा इतिहास थेट शिलाहारांपासून सुरु होतो, असे म्हटले जाते. परंतु या म्हणण्याला पुष्टी देणारे निश्चित असे पुरावे उपलब्ध नाहीत. ज्ञात माहितीनुसार हा किल्ला सोळाव्या शतकात आदिलशाही राजवटीत बांधला गेला असावा, असा अंदाज वर्तविला जातो. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्या अली आदिलशहाचा पराभव करून हा किल्ला स्वराज्यास जोडला, तेव्हा या किल्ल्याची फेरबांधणी केली व किल्ला अतिशय बळकट बनवला.
हा किल्ला साधारणतः आठ एकर जागेत पसरलेला आहे. समुद्रसपाटीच्या पातळीवर अगदी सपाट अशा खडकावर मधल्या उंचवट्याचा खडक तासून, त्याच्या माथ्यावर दगडी चिरे बसवून हा किल्ला बांधलेला आहे. अखंड तटबंदी बांधलेल्या या किल्ल्यास खूप बुरुज व फक्त दोन दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा पूर्व दिशेस आहे; परंतु पूर्व दिशेस असला तरी तो उत्तराभिमुख आहे. या दरवाजाचे दर्शन किल्ल्याच्या अगदी जवळ गेल्याशिवाय होत नाही. दरवाज्याकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या जिथे सुरू होतात तिथे वाळूची पुळण आहे. या पुळणमध्ये मोडून पडलेल्या जुन्या तोफा आहेत. द्वाराच्या उजव्या तटावर डोक्यावर शेपटी घेतलेल्या युद्ध मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे. उंबऱ्याच्या अलीकडच्या पायरीवर कासव कोरलेले आणि दारावर गोमुख आहे. दरवाजाच्या आतील बाजूस दोन्ही बाजूला रक्षक खोल्या आहेत. डाव्या बाजूच्या तटाजवळ विहीर आहे. तेथून पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष व दोन कोठारे आहेत.
किल्ल्यावर झाडेझुडपे व गवत फार वाढलेले असल्यामुळे किल्ल्याचे बरेचसे अवशेष झाकून गेले आहेत. किल्ल्याच्या नैऋत्य बाजूस अरुंद होत गेलेला एक भाग आहे. तेथून कनकदुर्ग अतिशय उत्तम दिसतो. कनकदुर्ग,फत्तेगड व गोवा किल्ला हे तीन किल्ले सुवर्णदुर्गाच्या रक्षणार्थ बांधले गेलेले. पश्चिमेस गडाचा दुसरा दरवाजा आहे. खरंतर तो वायव्य दिशेस आहे. हा गडाचा चोर दरवाजा आहे. तेथे उतरण्यासाठी तटामध्ये उत्तम अशा पायर्या बांधलेल्या आहेत. गडाच्या काही बुरुजांमध्ये व बुरुजालगत खोल्यांचे बांधकाम दिसते. बहुदा ती शस्त्रागृहे किंवा धान्य कोठारे असावीत. याशिवाय पडके चौधरे, पाण्याचे हौद व इतर काही अवशेष आढळतात. मात्र मंदिर किंवा मंदिराचे अवशेष किल्ल्यावर आढळत नाहीत. या मागचा संदर्भ इतिहासात शोधल्यावर असे समोर येते की, सरखेल कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता कालंबिका देवी सुवर्णदुर्गवरून हलवून अलिबागच्या हिराकोट मध्ये प्रस्थापित केली होती.
सुवर्णदुर्गाचा इतिहास पाहिल्यास त्यातील मोठा काळ आंग्रे घराण्याशी जोडलेला आहे, असे दिसून येते. सरखेल कान्होजी आंग्रेंचे आजोबा सेखोजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाची तटबंदी बांधण्याचे काम केले, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांत आढळतो. कान्होजी आंग्रेंचे वडील तुकोजी आंग्रे शिवरायांच्या काळात सुवर्णदुर्ग किल्ल्यात सरनोबत म्हणजे उपसेनापती होते. कान्होजींचा जन्म सुवर्णदुर्ग किल्ल्यावर झाला. सागरी युद्धकलेचे व युद्धनीतीचे धडे त्यांनी सुवर्णदुर्गाच्या परिसरातच गिरवले. १६८८ साली मोगल सरदार सिद्दी कासीमने सुवर्णदुर्गास वेढा घातला होता. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते किल्ल्यावरची रसद व दारूगोळा संपत आल्यामुळे मोगलांना फितूर झाला. किल्लेदार पैसे घेऊन सुवर्णदुर्ग सिद्धयाच्या ताब्यात देणार अशी हमखास खबर बाळाजी विश्वनाथांना लागली. त्यांनी ती कोळ्यांच्या मार्फत कान्होजींना कळवली. त्यावेळेस कान्होजी अवघे वीस-बावीस वर्षांचे होते. त्यांनी त्याच रात्री गडावरील सहकाऱ्यांना एकत्र केले व अचलोजी मोहितेला कैदेत टाकले, इतर फितुरांनाही वेचून मारले आणि किल्ल्याबाहेर पडून सरळ मोगलांवर हल्ला चढवला. परंतु हल्ला फसला व ते आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले. मोगलांच्या कैदेतून शिताफिने निसटून ते पुन्हा सुवर्णदुर्गावर आले. गड पुन्हा बऱ्याच कालावधीपर्यंत त्यांनी झुंजत ठेवला.
अखेर मराठ्यांचा हा चिवटपणा पाहून सिद्याने वेढा उचलला. या घटनेमुळे त्यावेळचे मराठे राजे राजाराम महाराज यांनी कान्होजींना “ सरखेल” पदवी देऊन आरमाराअधिपती केले. पुढे त्यांच्या मृत्युपर्यंत म्हणजे १७२९ पर्यंत किल्ला कान्होजींच्याच ताब्यात होता.(अर्थात मराठा राजांच्यावतीने कान्होजी ही जबाबदारी सांभाळीत होते. शिवाजी महाराजांनानंतर राजाराम महारांजाकडे इ.स.१७०० पर्यंत व नंतर ताराराणीकडे 1714 पर्यंत सुवर्णदुर्ग होता. कान्होजींनी ताराराणीचा पक्ष सोडल्यामुळे १७१४ पासून तो शाहू महाराजांकडे गेला.) कान्होजींच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा “ संभाजी आंग्रे” यांनी गड सांभाळला. संभाजींच्या पश्चात त्यांचा सावत्र भाऊ “ तुळाजी आंग्रे” यांनी सुवर्णदुर्गाचा ताबा घेतला. तुळाजी आंग्रे हे पराक्रमी व स्वतंत्र वृत्तीचे होते. छत्रपतींच्या वतीने राज्य कारभार पाहणाऱ्या पेशव्यांनाही ते जुमेनासे झाले. त्यांचा वाढता प्रभाव दडपून टाकण्यासाठी पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने सुवर्णदुर्गावर हल्ला करायचे ठरवले. २२ मार्च १७५५ रोजी पेशवे – इंग्रज तहानुसार तुळाजींवर स्वारी करण्यासाठी प्रोटेक्टर जहाजावरच्या ४४ तोफा,१६ तोफांचे दुसरे जहाज, दोन युद्धनौका, चौलच्या खाडीशी ७ गुराब, ६० गलबत आणि दहा हजारांच नौदल घेऊन बाहेर पडले. पहिला मुक्काम कुंभाऱ्याला आणि दुसरा मुक्काम सुवर्णदुर्गाच्या उत्तरेला २०-२२ की.मी. वर पडला. तिथून रामाजीपंत हे मराठा सरदार जमिनीवरून सुवर्णदुर्गाच्या दिशेने सरकू लागले.
सुवर्णदुर्गाच्या आश्रयानं हर्णैच्या बंदरात नांगरून ठेवलेल्या तुळाजींच्या आरमारावर कमोडर जेम्सने हल्ला चढवला’( कमोडर जेम्स म्हणजेच ब्रिटिश कमांडर विल्यम जेम्स. हा इंग्रजी सैन्याचा प्रमुख होता.) पण ही बातमी आंग्रेंना आधीच कळल्याने त्यांचे आरमार दक्षिणेस पळाले. आंगऱ्यांच्या आरमारामागे “प्रोटेक्टर” नेच काय तो पाठलाग केला; पण शेवटी तोही परत आला. पण लगेचच सुवर्णदुर्गावर हल्ला करायचे इंग्रजांनी ठरवले आणि तोफांद्वारे किल्ल्यावर अग्निगोलकांचा मारा सुरू केला. पश्चिमेकडून मारा अचूक ठरेना, तेव्हा ईशान्येकडून हल्ला चढविला. तिथला बुरुज ढासळला. पडलेल्या खिंडारातून आज घुसलेल्या अग्निगोलकांमुळे किल्ल्यावरच्या झोपड्या, कोठारांनी पेट घेतला. त्याच वेळेस प्रोटेक्टर जहाजावरून गोवा किल्ल्यावर चढवलेला तोफगोळ्यांचाही हल्ला यशस्वी ठरला. गोवा किल्ला ताब्यात आल्यामुळे तोफांच्या छत्राखाली काही सैनिक सुवर्णदुर्गाच्या खालच्या सपाट कातळावर उतरवणेही जमून गेले.
तिथे उतरलेल्या सैनिकांनी अक्षरशः कुऱ्हाडी घालून सुवर्णदुर्गाचा दरवाजा फोडला. ६ एप्रिल १७५५ रोजी फत्तेगड, कनकदुर्ग किल्लाही पेशव्यांच्या फौजेने जिंकला. यशस्वी झालेला कमोडर जेम्स ८ एप्रिल रोजी बाणकोटकडे मार्गस्थ झाला. ११ एप्रिल रोजी ब्रिटिशांनी तहानुसार इंग्रजांनी किल्ला पेशव्यांकडे सोपविला. ब्रिटिश संमतीने रामजी महादेव यांस सुवर्णदुर्गाचे अधिकारी म्हणून नेमण्यात आले. पण लढाई जिंकण्याचे श्रेय ब्रिटिश कमांडर जेम्सला जाते. ब्रिटिश राजवटीच्या दृष्टीने या विजयाचे भविष्यात फार चांगले परिणाम झाले. रामजी महादेव यांच्या मृत्यूनंतर हरिपंत फडके सुवर्णदुर्गाचा किल्लेदार होते.
पुढे १८०२ साली यशवंतराव होळकरांच्या भयाने दुसरा बाजीराव कुटुंबकबिल्यासहीत पुण्याहून सुवर्णदुर्गाच्या आश्रयाला आला आणि काही दिवसांनी कुटुंब सोडून एकटाच वसईला इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेला. १८०४ साली एक मराठा सरदाराने कब्जात आणलेला सुवर्णदुर्ग इंग्रजांनी परत जिंकून पेशव्यांच्या स्वाधीन केला. त्यावेळी ८०० अरब व मुसलमानांची शिबंदी मराठा सरदाराच्या हाताखाली होती.
नोव्हेंबर १८१८ मध्ये कर्नल केनेडी सुवर्णदुर्ग घेण्यासाठी आला होता. त्यावेळेस कॅप्टन कॅम्बेल व लेफ्टनंट डॉमिनिसेटी यांनी अवघ्या ५० शिपाई व ३० खलाशांसह या किल्ल्यावर हल्ला चढवला. तोफांच्या भडीमाराला तोंड देऊन ही मंडळी शिड्या लावून तटावर चढली व त्यांनी शिबंदीकडून किल्ल्याचा ताबा घेतला. सन १८१८ पासून स्वातंत्र्यापर्यंत किल्ला ब्रिटिशांच्याच ताब्यात होता.
सुवर्णदुर्ग जिंकल्यानंतर कमोडर जेम्सने त्याच्याबरोबरचे सर्व सैन्य कलकत्त्याला कर्नल रॉबर्ट क्लाइव्ह यांच्याकडे पाठविले. त्यावेळेस क्लाइव्ह प्लासीच्या लढाईची तयारी करत होता. प्लासीची लढाई कलकत्त्यापासून सुमारे १५० कि.मी दूर भागीरथी नदीच्या तीरावरील “ पलाशी” या ठिकाणी झाली. पलाशी त्यावेळी बंगालचा नवाब सिराजउद्दौला याची राजधानी होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजउद्दौला यांच्यात पलाशी येथे घमासान लढाई झाली. सिराजउद्दौलाला फ्रेंचांनी मदत केली. परंतु रॉबर्ट क्लाइव्हच्या धूर्त चालीने ही लढाई इंग्रजांनी जिंकली. लढाई जिंकण्याची तारीख होती २३ जून १७५७. इंग्रजांनी भारतात जिंकलेली ही पहिली मोठी लढाई होती. त्यामुळे पूर्ण बंगाल प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात आला. या क्षणापासून ब्रिटिशांनी भारतात अधिकृतरित्या राज्य सुरू केले.
१७२० साली अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जेम्स या युवकाने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी घर सोडले आणि समुद्राच्या आश्रयाला गेला. तेथेच तो नाविक दलात सामील झाला. वयाच्या १८ व्या वर्षी जेम्स एक जहाज घेऊन इंग्लंडला जात असताना सागरी मोहिमेत स्पॅनिश लोकांनी त्याला पकडले आणि शिक्षा म्हणून पुन्हा समुद्रात सोडले. त्यानंतर जेम्सने १७४७ साली ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी धरली. त्याला व्यापारी जहाजांच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली होती. त्याकाळी समुद्रात असणारे चाचे या मालवाहू बोटींची लूट करीत असत. या चाच्यांना रोखण्याचे प्रयत्न अनेकांनी करून पाहिले; पण त्यात कोणीच यशस्वी झाले नव्हते. हीच महत्त्वाची जबाबदारी जेम्सने स्वीकारली आणि त्याने बॉम्बे प्लीट नावाची तुकडी भारताच्या किनारपट्टीवर उभी केली.
त्यामध्ये तब्बल ४४ तोफा असलेले ‘प्रोटेक्टर’ नावाचे जहाज सोबत घेतले व समुद्री चाच्यांचा पाडाव करायला जेम्स सज्ज झाला. या चाच्यांमध्ये कोकण किनारपट्टीवर तुळाजी आंग्रे यांच्या एका तुकडीचा समावेश होता. हर्णैजवळ असणाऱ्या सुवर्णदुर्गाच्या आश्रयाने मराठ्यांची ही तुकडी ईस्ट इंडिया कंपनीच्या मालवाहू जहाजांना लक्ष करून लूट करत असे. या गोष्टीचा बीमोड करण्यासाठी जेम्सने थेट सुवर्णदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला व आपले नाविक दल, तोफखाना यांचा पुरेपूर वापर करत १७५५ साली जेम्सने सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला.
सुवर्णदुर्गाच्या विजयामुळे त्याला भरपूर मानसन्मान आणि संपत्ती मिळाली. सन १७५९ मध्ये जेम्स इंग्लंडला परतला. तेव्हा तो आपली पत्नी अँन गोगार्ड आणि दोन मुलांसह सोहा परागण्यातल्या गेराड स्ट्रीटवर राहत असे. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळात सामील झाला. कॉर्नवॉलमधून ब्रिटिश संसदेवरही निवडून आला. १७७८ साली ब्रिटीश सरकारची सर ही बहुमानाची पदवी त्याला प्राप्त झाली. पण लंडनमधील वास्तव्यात जेम्स सुवर्णदुर्गाला मात्र विसरला नाही. त्याला या किल्ल्यात राहायचे होते. त्याचे हे स्वप्न अधूरे राहिले कारण १७८३ मध्ये जेम्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पण आपल्या पतीची स्मृती जतन करण्यासाठी व सुवर्णदुर्गाची आठवण कायमस्वरुपी रहावी यासाठी जेम्सच्या पत्नीने लंडन शहराच्या अग्नेय दिशेला असलेल्या शुटर्स हिलवर सुवर्णदुर्गाची प्रतिकृती असलेल्या एका इमारतीचे बांधकाम करून घेतले. २ एप्रिल १७८४ सदर बांधकामाला सुरुवात झाली. सुवर्णदुर्ग किल्ल्याचा ज्याप्रकारे त्रिकोणी आकार, तब्बल ६३ फुट उंचीची तटबंदी व बांधकाम आहे तसेच बांधकाम करण्यात आले; पण गॉर्थिक शैलीमध्ये. आणि या इमारतीला सुवर्णदुर्गाच्या आठवणींसाठी सेव्हर्नद्रुग कॅसल असे नावही देण्यात आले. २०१६ मध्ये सेव्हर्नद्रुग कॅसलने इंग्लंडमधील वारसाहक्क श्रेणीत मिळवल्या जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या २१ इमारतींमध्ये स्थान मिळवले आहे.
संदर्भ :
परिचित अपरिचित दापोली – प्रा.डॉ.विजय अनंत तोरो
दै,रत्नागिरी टाइम्स (बुधवार दि.१७ फेब्रुवारी २०१६)
जलदुर्गांच्या सहवासात – प्र.के.घाणेकर
दुर्गकथा – निनाद बेडेकर
milindjamdar.blogspot.com/p/blog-page_18.html?m=1
पालगड किल्ला – दापोली
दापोली तालुक्यातील ‘पालगड’ हे ‘परमपूज्य साने गुरुजी’ यांचे गाव. या गावाच्या पूर्वेला, दापोली-खेड तालुक्याच्या सीमारेषेवर, सह्याद्रीच्या कुशीत, समुद्रसपाटीपासून साधारण १२००-१५०० मीटर उंचावर असलेला एक छोटेखानी किल्ला आहे. तो म्हणजे ‘पालगड किल्ला.’
ह्या किल्ल्याची प्रथम पायाभरणी कोणाच्या काळात झाली, याबद्दल निश्चित असा ऐतिहासिक पुरावा नाही. पण शिवकाळात हा किल्ला स्वराज्याशी जोडलेला होता, अशी शाश्वत माहिती मिळते. शिवाजी महाराजांनी समुद्री आरमार उभारताना हर्णे येथील सुवर्णदुर्गाची पुनर्बांधणी केली, तेव्हा किल्ल्याच्या बांधणीसाठी व रसद पुरवण्यासाठी पालगड आणि मंडणगड किल्ल्याचा उपयोग केला असावा, असा अंदाज वर्तविला जातो. (हर्णे ते पालगड अंतर सरळ रस्त्याने जाता सुमारे ४०- ४५ कि.मी. तर आडमार्गे जाता ३०- ३५ कि.मी. आहे.) मंडणगड किल्ल्याचे गडकरी ‘दळवी’ (पालवणीचे) हे किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार होते. त्यांनी आपल्या मुलींची लग्ने ‘बेलोसे व पवार’ कुटुंबात करून त्यांच्याशी सोयरीक जोडली आणि किल्ल्याची व्यवस्था ‘बेलोसे व पवार’ यांजवळ दिली. किल्ल्याचा वापर रसद, शस्त्रसाठा आणि दारूगोळा साठविण्यासाठी होत असावा. कारण किल्ला अतिशय लहान म्हणजे एक ते दीड एकरमध्ये आहे. किल्ल्यावर लढाईच्या फारश्या खाणाखुणा नाहीत. किल्ल्यावर पाच तोफा आढळल्या, त्यातील २ किल्ल्यावर आणि २ किल्ले माचीत आहेत. (माची म्हणजे किल्ल्याभोवतालची जमीन, शत्रूला थोपविण्याची जागा. माची सर झाल्यास शत्रूला किल्ला आरामात ताब्यात घेता येतो.) पालगड किल्ल्याला चार माची आहेत: जांभूळ माची, पवार माची, राणे माची आणि किल्ले माची. या किल्ल्याच्या चारही बाजूला मोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. यातील किल्ले माची फक्त खेडच्या बाजूस आहे. इतर तीन दापोलीच्या दिशेने. किल्ल्याकडे जाणारा सोयीचा मार्ग किल्ले माची व राणे माचीतून आहे. किल्ल्यावरील एक तोफ श्री. क्षेत्र परशुराम, चिपळूण येथे आहे, असे सांगण्यात येते. किल्ल्याच्या पायथ्याला जुनी बाजारपेठ आहे. त्यात बारा बलुतेदारांची वस्ती आहे. किल्ल्याखाली हिरवी गर्द देवराई आहे. या देवराईत पालगडची देवी ‘श्री. झोलाई’ हिचे मंदिर आहे.
मंदिराकडून जी किल्ल्याकडे पायवाट जाते, ती अतिशय उंच, निमुळती आणि दोहो बाजूस जंगल व खोल दरी अशाप्रकारची आहे. वर किल्ल्यावर जाण्यासाठी दोनशेच्या आसपास पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर समोर दोन बुरुज दिसतात. बुरुजाच्या मधून केवळ दोन माणसे प्रवेश करू शकतील एवढा निमुळता दरवाजा आहे. साधारण ८ फूट उंच व ३ फूट रुंद असा दरवाजा दगडी बांधकामात आहे. किल्ल्याला हे एकच प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार उत्तर दिशेस आहे. किल्ल्याची तटबंदी नैसर्गिक डोंगरकडा कापून तयार झाली आहे. नैसर्गिक कड्याच्या वर सुमारे १०-१५ मीटर उंचीची भिंत उभारून तटबंदी तयार केली आहे. ही तटबंदी आज बऱ्याच ठिकाणी तुटलेली आहे. त्यात किल्ल्याची भिंत काही ठिकाणी निसर्गत: डोंगरकडा सरळसोट कापून तयार केलेली असल्यामुळे त्यावर तटबंदी भिंत उभारण्याची गरज भासली नसावी. किल्ल्याच्या आतील सर्वच इमारती आज कोसळलेल्या आहेत. त्यांच्या पायाचा भागच जुन्या खुणा म्हणून शिल्लक आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस दगड खोदून बांधलेल्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. किल्ल्यावर एकही विहीर नाही. एक भूयारी वाट आहे. ती सध्या भुजलेली असून मंडणगड किल्ल्याकडे जाते, असे म्हटले जाते. नैसर्गिक तटबंदीमुळे किल्ला अतिशय मजबूत आणि सुरक्षित असल्याचे आढळून येते. सरळसोट कापलेला डोंगरकडा शत्रूला चढून वर येण्यास अगदीच अशक्य असल्याचे दिसते. किल्ल्याच्या सुरक्षिततेचा विचार किल्ला बांधतानाच केलेला दिसतो. दोन डोंगरांच्या मधल्या छोट्या डोंगरावर किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मुख्य किल्ला दुरून दिसत नाही. (खेड व दापोली दोन्ही बाजूने) किल्ल्याच्या एका बाजूला टकमक टोकासारखा डोंगर आहे तर दुसऱ्या बाजूला आयताकार डोंगर आहे. किल्ल्याचा डोंगराचा आकार पालीसारखा म्हणून किल्ल्याला ‘पालगड’ हे नाव देण्यात आले. (पूर्वी पालील किंवा पालगडात जाताना ‘पालनात जातो’ असे म्हटले जायचे.) एक आख्यायिका अशी की, किल्ल्याचे बांधकाम प्रथम मधल्या डोंगरावर न होता आयताकार डोंगरावर होणार होते, ज्याला रामगड म्हणतात. पण डोंगरावर खोदकाम करताना काचा आढळल्या आणि त्यावेळच्या समजुतीनुसार आपण शत्रूपासून भविष्यात कच खाऊ या भावनेला अनुसरून किल्ला बांधण्याची जागा बदलण्यात आली. हा किल्ला खेडचा रसाळगड व मंडणगड किल्ला या दोहोंमधील थांबा किंवा मुख्य किल्ल्यांना रसद, दारूगोळा, तोफखाना व टेहळणीसाठी बांधण्यात आला असावा, असे वाटते. किल्ल्याचा मध्ययुगीन ते ब्रिटीश कालखंडापर्यंतचा पूर्ण इतिहास आढळत नाही. अतिशय त्रोटक असे काही उल्लेख आढळतात. त्यात पहिला बाजीराव आणि जंजिऱ्याचा सिद्धी यांच्यात या किल्ल्यावर लढाई झाली होती, असा एक उल्लेख सापडतो.
संदर्भ
रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले – श्री. रघुनाथ रामकृष्णाजी बोरकर
गणेश मुंगशे – शिक्षक जि.प.शाळा, पालगड
लेणे पन्हाळेकाजी By तालुका दापोली - August 2, 2019 4 5747 १९७०-७१ च्या दरम्यान पन्हाळे गावातील ‘केशवराव पांडुरंग जाधव’ नामक शेतकऱ्याला शेत नांगरताना एक दगडी पेटी फाळाला अडकली व त्या पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे आढळले. त्याने ते पत्रे गावातील लोकांना दाखवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतिहास संशोधनाची आवड असणाऱ्या दाभोळच्या अण्णा शिरगावकरांशी संपर्क केला. अण्णांनी हे पत्रे म्हणजे ताम्रपट असावे असे सांगितले. आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राध्यापिका ‘शोभनाताई गोखले’ यांच्या समोर सादर केले. शोभनाताईंनी हे पत्रे ताम्रपट असल्याचे निश्चित केले आणि त्या ताम्रपटांचा अभ्यास केला. अभ्यासातून ताम्रपट शिलाहार कालीन असल्याचे आढळले. १९७२ साली भारतीय पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले आणि कोटजाई नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेला २८ लेण्यांचा समूह समोर आला. ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ म.न.देशपांडे (मधुसूदन नरहर देशपांडे) यांनी या लेण्यांचा अभ्यास करून The caves of Panhale-kaji हा प्रबंध लिहिला. या प्रबंधाकरिता त्यांना १९८६ चे ‘एशियाटिक सोसायटी ऑफ वेस्ट बंगाल’ सर्वोत्कृष्ट कार्यपदक मिळाले. पन्हाळेकाजीचा विषय घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने केली. छापिल माध्यमांमधून त्यांच्या मुलाखती झाल्या. हायडेलबर्ग (प.जर्मनी) येथे झालेल्या ‘महाराष्ट्र संस्कृती व समाज’ या अंतरराष्ट्रीय सम्मेलनात देखील म.न.नी पन्हाळेकाजीचा उल्लेख केला होता. म.न.देशपांडे पन्हाळेकाजी संदर्भात म्हणतात की…. सातवाहन राजवंशात कोकणामध्ये ‘हीनयान’ बौद्ध पंथाचा प्रसार झाला. कोकणामध्ये अनेक विहार-संघाराम, चैत्यगृहे स्थापली गेली. पन्हाळे येथील संघाराम खेडमधील भिक्षूंच्या मार्गदर्शनाखाली स्थापले गेले असावे आणि याची प्राथमिक सुरुवात लहान प्रमाणात झाली असावी असे वाटते. कारण खेडमध्ये स्तूपयुक्त विहार व काही पूर्णअपूर्ण लेणी आहेत. आणि खेड या व्यापारी स्थळमार्गापासून पन्हाळेकाजी जवळच्या टप्प्यात येते. कोटजाई आणि दाभोळ बंदरामार्फत येथे व्यापारी मचव्यांची ये-जा असावी. २८ लेण्यांपैकी ४,५,६ व ७,८,९ क्रमांकाच्या लेण्या मिळून जो गट तयार होतो. तो या समूहातील सर्वात जुना गाभा आहे. ७,८,९ हा वेगळा गट असला तरी तो काळाच्या दृष्टीने ४,५,६ च्या जवळचा आहे. ४,५,६ या गटात ४ व ५ क्रमांकाच्या गुहा लहान भिक्षुगृहाप्रमाणे आहेत. ५ क्रमांकाच्या लेणीमध्ये स्तूप संस्थापना दिसते. हा स्तूप अर्धोत्कीर्ण असून पाठीमागचे भिंतीत, तेथे नंतर खोदल्या गेलेल्या गर्भगृहाच्या द्वाराच्या उजव्या बाजूस आहे. अश्याच तऱ्हेचा स्तूप चौल येथील हिंगळाजदेवी लेणीसमूहात आहे. या दोन्ही स्तूपांचा काळ साधारणतः दुसरे-तिसरे शतक आहे. यावरून असे अनुमान करता येते की पन्हाळेकाजी येथील बौद्ध संघारामाची सुरुवात २–३ शतकात झाली. सहा क्रमांकाचे लेणे विहार असल्याचे दिसते. या लेणीच्या पडवीत पश्चिम बाजूच्या भिंतीवर एक ब्राह्मी लेख होता. पण उत्तर कालात तो छिन्नीने इतका खरडून टाकला आहे की, त्यामधील दोनचार अक्षरेच संदर्भाशिवाय दिसतात. त्या अक्षरांवरून (विशेषतः म च्या अक्षर वाटिकेवरून) हा लेख दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील असावा, असा अंदाज करता येतो. सहाव्या – सातव्या शतकात महाराष्ट्रात चालुक्यांचा प्रभाव वाढू लागला आणि महाराष्ट्रातील बौद्ध संघारामाचे महत्व कमी होऊ लागले. वेरूळ व कान्हेरी अशा काही स्थानांव्यतिरीक्त नवीन बौद्ध धर्मीय गुहा, स्मारके खोदल्याचे दिसत नाही. चालुक्य हे शैवपंथी होते. आठव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांचा प्रभाव कमी झाला आणि बौद्ध धर्मातील तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. हे वर्चस्व साधारणतः ११ व्या शतकापर्यंत होते. त्यामुळे हीनयान पंथीय लेण्यांच्या स्थापत्य वैशिष्ट्यात वज्रयान पंथीयांकडून फेरबदल झाले. सहाव्या लेणीतील गर्भगृह वाढून भिक्षुगृहाचे रुपांतर अक्षोभ्य मंदिरात केलेले आढळते. गट १,२,३ या गटातील २ क्रमांकाची लेणी विहार म्हणून खोदली गेली होती व जवळपास तिची योजना क्र. सहाच्या लेण्याप्रमाणेच आहे. या लेणीतील मंडपाचे छतावर मध्यभागी अर्धोत्कीर्ण व एकमेकास काटकोनाने छेदणाऱ्या उन्नत लगींनी १६ चौकोन केले आहेत, अशा तऱ्हेने छतावर लाकडी तुळया व लगी यांचा वापर दाखविण्याची प्रथा ही जुनीच आहे. या स्तंभ विरहीत मंडपात भिंतीलगत कठडा (Rock Bench) आहे. या सर्व लक्षणांवरून ती लेणी मुळात दुसऱ्या-तिसऱ्या शतकातील आहे; पण १० व्या शतकात तिच्यात बदल झाले आहेत, हे कळून येते. १० व्या शतकातील बदलानुसार दर्शनी स्तंभ शिर्षात नागबंध आला. मंडपाच्या मागील भिंतीत गर्भगृहाच्या दक्षिण बाजूस सात उभे मानुषी बुद्ध कोरले गेले. या लेणीच्या मंडपाचे प्रवेशद्वार थोडेफार अलंकृत शाखायुक्त होते. पण नंतर ते अलंकरण खोडून काढून साधे केले. यावरून असे लक्षात येते की, तांत्रिक वज्रयान पंथीयांनी ही लेणी आपलीशी केली होती. गट ७, ८, ९ ७,८,९ हा गट ६ क्रमांकाला जोडूनच आहे. व येथेही वज्रयान पंथीयांनी केलेले बदल दिसून येतात. ७,८,९ क्रमांकाची लेणी ही मुळातच भिक्षुगृहे होती. पण पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तीची स्थापना झाली. ७ क्रमांकाच्या लेण्याखाली खालच्या थरात एक क्षतिग्रस्त व अपूर्ण लेणे आहे. ७ क्रमांकाच्या उमऱ्यावर मधील पुढे आलेला भाग सोडून दोन्ही बाजूस पुष्पयुक्त हिराकृति आहेत. लेणी क्र. आठ मध्ये गर्भगृहात शिरविरहित अक्षोभ्याची मूर्ती आहे. ५ आणि ६ क्रमांकाच्या लेणीच्या छतावर स्तूप बसविलेला होता. अशा काही खुणा आढळतात. व तेथेच पडलेले काही स्तूप दिसून येतात. त्यावरून ५, ६ बरोबर ७ क्रमांक लेणीवर देखील स्तूप असावा, असे वाटते. गट १०, ११, १२ व १३ या गटातील १२ क्रमांकाच्या लेण्याचे योजनाचित्र जवळपास २ व ६ प्रमाणेच आहे. मुळतः विहार म्हणून खोदल्या गेलेल्या या स्तंभांना चौकोनी अधिष्ठान दिले आहे. पण तरीसुद्धा ते पँरापेट (कठडा) पासून अभिन्न आहेत. मंडपाचे पाठीमागचे भिंतीत मुळात असलेल्या तीन भिक्षूगृहांपैकी मधल्या भिक्षुगृहाचा उपयोग अक्षोभ्याच्या मूर्ती स्थापनेसाठी झाला असावा. तांत्रिक वज्रयान पंथाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची लेणी म्हणजे क्रमांक दहाची लेणी. कारण या लेणीत हत्ती व सिंह असलेल्या सप्तरत अधिष्ठानावर स्थित असलेली महाचंडरोषणाची मूर्ती आढळते. आणि तिच्या दगडात कोरलेल्या प्रतिमा अगदीच विरळ्या असून १९८१ पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात दोनच मूर्ती आढळल्या. एक पन्हाळेकाजी येथे व दुसरी रत्नागिरी येथे. रत्नागिरी येथे डॉ. देवला मित्रांना ही मूर्ती एका स्तूपावर कोरलेली आढळली. पन्हाळेकाजी येथील महाचंडरोषणाची प्रतिमा सुमारे दहाव्या शतकातील असावी व ती उत्तरकालीन चालुक्य कलेशी मेळ खाते. अक्षोभ्याच्या मूर्तीही नवव्या-दहाव्या शतकातील असाव्यात असे त्यांच्या शैलीवरून वाटते व अशा चालुक्य उत्तर काळामध्ये वज्रयांनी बौद्ध धर्माच्या शाखा दक्षिण महाराष्ट्रात व कर्नाटकात होत्या याचा थोडाफार पुरावा मिळतो. गट १५, १६,१७,१८ १५ चे लेणे मूळ वज्र यान पंथी होते. पण मागाहून इथे गणपतीची सुटी मूर्ती दर्शनी भागातील कोनाड्यात ठेवून हे लेणे गाणपत्य पूजेसाठी वापरले जावू लागले. लेण्याच्या ललाट बिंबावर देखील गणेशमूर्ती कोरलेली आहे. १६ क्र. चे लेणेही मूळ वज्रयान पंथी. या लेण्याच्या जवळ एक बांधीव चौथरा दिसतो व शिलाहार काळ निदर्शक एक देवकोष्ठचा भाग सापडतो. यावरून असा अंदाज बांधता येतो की, येथे शिलाहार काळात एक छोटेसे देवालय असावे. १७ वे व १८ वे लेणे वज्रयान पंथीच आहे. गट १९, २०, २१, २२ व २३ १९ ते २३ हा गट शिलाहारांशी निगडीत आहे. शिलाहार काळात पन्हाळेकाजीत जे विशेष लक्षणीय काम झाले; ते केवळ या गटामधून दिसून येते. यातील १९ क्रमांकाच्या लेण्याची सुरुवात आधी झाली असली तरी ११ व्या शतकात शिलाहारशैलीचे एकाश्म देवालय म्हणून हे लेणे साकारले गेले. या देवळातील स्तंभ शिलाहारकालीन आणि गर्भगृह एकाश्म असून त्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली होती. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ आणि त्याच्या पाठीमागच्या भिंतीत दोन्ही बाजूस उत्तरामुख व अंतराळात समोरासमोर देवकोष्ठे आहेत. यावरून हे मंदिर पंचायतन म्हणून योजिले होते, असे दिसते. सभामंडपाच्या अंतराळाच्या व एकाश्म मंदिराच्या छतावर शिल्पे व उलट्या कमळाचे अलंकरण मध्यभागी असून बाजूच्या खणात रामायण व महाभारतातील प्रसंगाचे शिल्पपट कोरलेले आहेत. पूर्वेकडील खणात रामायण, पश्चिमेकडील खणात बाळकृष्णलीला व मधल्या खणात ( कमळाचे बाहेर ) पुन्हा कृष्णकथा कोरलेल्या आहेत. अंतराळाच्या बाजूस पहिला खण व व अंतराळ यामध्ये अधिष्ठान स्थापलेल्या शिवलिंगाची एक दंपती पूजा करीत असल्याचे एक दृश्य आहे. हे दृश्य मंदिर निर्माण करविणाऱ्या दानी दंपतीचे असावे. अंतराळाच्या पश्चिमेस छतावर आणखी ९ शिल्पे आहेत. २१ क्रमांकाच्या लेण्यात मुख मंडपाच्या बाजूच्या भिंतीत एक विशाल शिलाहारकालीन गणेशमूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीमुळे या लेण्यास गणेशलेणे म्हणतात. हे लेणे मुळात विहार म्हणून बांधले असावे आणि त्याचा वापर वज्रयान पंथीयांनी केला असावा. २२ क्रमांकाच्या लेण्यात मुखमंडपात बाजूच्या भिंतीत समोरासमोर गणेश व सरस्वतीच्या प्रतिमा आहेत तर गर्भगृहात सुमारे १४ व्या शतकामध्ये पद्मासनस्थ नाथयोग्याची मूर्ती कोरली आहे. २३ क्रमांकाचे लेणे मुळात विहार म्हणून खोदले गेले होते. १२ व्या शतकात त्याचे शिलाहार मंदिरात रुपांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात मूर्ती संस्थापना करण्याअगोदरच येथील शैवपंथाच्या वर्चस्वास ओहोटी लागली असावी. या लेण्यात विध्वंसाची चिन्हे दिसतात. पण हा विध्वंस बराच नंतर झालेला असावा. कदाचित दाभोळ येथे विजापूरच्या इब्राहिम आदिलखानाच्या कारकिर्दीत मशिदी बांधल्या गेल्या; तेव्हा झाला असावा. १४ व २९ गट १४ वे लेणे मुळात हीनयान बौद्ध धर्मियांनी भिक्षुगृह म्हणून खोदले असावे. पण मागाहून त्याचा वापर वज्रयान प्राबल्य संपल्यावर नाथ पंथीयांनी केला असे स्पष्ट दिसते. नाथ पंथीयांचे पन्हाळेकाजी येथे केंद्र साधारणतः तेराव्या चौदाव्या शतकात तयार झाले असावे. या लेण्याच्या प्रांगणात एका घडीव चौकोनी दगडावर सिद्ध पादुका कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वाराचे बाजूस सहा-सहा अशी एकूण बारा शिल्पे आहेत. त्यातील पहिल्या चौकोनात योग पट्टसहित अर्धमत्सेंद्रासनात छताचे खाली एक सिद्ध आहेत. त्यांचा उजवा हाथ समोरील चौकोनातील स्त्री काही वस्तू देत आहे; ती घेण्यासाठी उंच केलेला असून डावा हाथ त्यांनी कुबडीवर ठेवलेला आहे. हा प्रसंग कदलीवनात मत्सेन्द्रनाथांनी काही काळ तंत्रमार्गी योगिनींचे जाळ्यात शाक्त साधनेत घालवला त्यासंबंधीचा असावा, असा अंदाज व्यक्त करता येतो. आणि इतर कुठल्याही सिद्धाचे डोक्यावर छत नसताना फक्त याच सिधाच्या डोक्यावर आहे. याचा अर्थ ते नाथ पंथीयांचे प्रथम सिद्ध असावेत. उजव्या बाजूच्या वरच्या दोन प्रसंगात एकामध्ये एक स्त्री व दुसऱ्यात एक सिद्ध यांच्यातील संवाद चित्रित केला आहे. हा प्रसंग देखील मत्सेंद्रनाथांच्या जीवनावरील असावा, असा अंदाज दर्शवता येतो. डाव्या बाजूच्या दुसऱ्या पटात (मधल्या चौकोनात) ध्यानस्थ चौरंगी नाथांची मूर्ती असून त्यांचे तुटलेले हाथ पाय खांद्याजवळ आणि पाया जवळ वेगळे दाखवले आहेत. त्याच्या जवळची मूर्ती त्यांचे गुरुबंधू गोरखनाथ यांची असावी. उजव्या बाजूच्या दुसऱ्या पटात द्वाराजवळील चौकोनात एक योगी चिमट्याने एका तीन पाटाच्या आसावर ठेवलेल्या कुंडामधील वस्तू उचलीत आहे. नाथपंथीय साधू रसविदयेत प्रवीण होते, हे दर्शविण्यासाठी ही प्रतिमा कोरली असावी. तर त्या शेजारच्या चौकोनात कोणी एक व्यक्ती हातामध्ये काही सामग्री घेऊन रसप्रक्रियेत मग्न असलेल्या सिद्धाकडे जात आहे असे दर्शवले आहे. डाव्या बाजूच्या खालच्या दोन चौकोनात एका बसलेल्या सिद्धाची मूर्ती असून ते एक पेटी उघडीत अथवा बंद करीत आहेत. तर त्याच्या शेजारच्या कोनात डाव्या हातात पात्र व उजव्या हातात दंड किंवा पळी घेतलेला सिद्ध पुरुष धावण्याच्या किंवा चालण्याच्या क्रियेत आहे.तर उजव्या बाजूच्या दोन चौकोनात एक लगुड घेतलेले सिद्ध व दुसरे व्याख्यान मुद्रेतील सिद्ध दाखविले आहेत. या लेण्याच्या द्वारशाखेवर गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. आणि उंबरठ्याच्या मध्यभागी एक गोलाकार भाग आहे. २९ वे लेणे हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत. यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे. या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे. इतर चार भिंतींवर छोट्या छोट्या चौकोनात अनेक सिद्धांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. उजवीकडील व डावीकडून भिंतीत दोन मोठ्या कोनाड्यात दोन प्रमुख देवतांची स्थापना केली आहे. त्यापैकी उजवीकडून भिंतीत शरभ तंत्रामध्ये वर्णिलेल्या त्रिपूरसुंदरीचे ध्यान कोरलेले आहे. तिच्या चार हातांपैकी एका हातात बाण, दुसऱ्यात अंकुश, तिसऱ्यात इक्षुचाप, चौथ्यात पाश आहे. समोरच्या भिंतीत जटाधारी कानफाट्या नाथसिद्धाची व्याख्यान मुद्रेत बसलेली मूर्ती आहे. या लेण्यात दक्षिणेकडील भिंतीचे मागील बाजूस दरवाजाच्या पूर्वस छोट्या चौकोनात ९, पूर्वेकडील भिंतीत १९ व उत्तरेकडील भिंतीत २९ ,पश्चिमेकडील भिंतीत १९, व पुन्हा व दक्षिणेकडील भिंतीत दरवाजाच्या पश्चिमेस ९ अशी एकूण ८५ शिल्पे आहेत. ही सर्व शिल्पे बहुतेक नाथ योग्यांची आहेत. या शिल्पांतील बहुतेक सर्व सिद्ध व्याख्यान मुद्रेमध्ये, पद्मासनात, अर्धमत्सेंद्रासनात, तर क्वचित चालताना आहेत. लेण्यांच्या बाहेर उघड्या प्रांगणावर लाकडी मंडप घालण्याची योजना होती, असे भिंतीतील खाचांमुळे स्पष्ट होते. दाराबाहेर एक छोटासा कट्टा आहे. तर थोडे उत्तरेकडे वळल्यावर डाव्या बाजूस भैरव, हनुमान यांची कोनाड्यात कोरलेली शिल्पे आहेत.हे लेणे मुख्य लेणीसमूहापासून दूर आहे. नाथपंथीयांनी खोदलेल्या या लेण्याला परंपरागत ‘गौर लेणे’ असे म्हणतात. या लेण्याची योजना इतर लेण्यांपेक्षा काहीशी वेगळी आहे. मध्यभागी काहीसे खोल प्रांगण असून त्याच्या पश्चिमेस दोन्ही बाजूच्या कठड्यामधून प्रांगणाच्या प्रवेश बाजूसमोर तीन छोटी लेणी आहेत. यापैकी मधल्या लेण्यात शिवलिंग आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारशाखेच्या खालच्या बाजूस गंगा-यमुना शिल्पे आहेत. उत्तरेकडील व दक्षिणेकडील म्हणजेच शेजारील दोन्ही लेण्यांवर कोणतीही शिल्पे नाहीत. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीत उत्तरेच्या बाजूस एक चौकोनी कोनाडा आहे व त्याच्याच बाजूस मोठ्या कोनाड्यात लक्ष्मी, गणेश व सरस्वती अशा तीन मूर्ती आहेत. लक्ष्मी, गणेश, सरस्वती मूर्ती समोरील भिंतीत या लेण्यातील मुख्य गर्भगृह कोरलेले आहे. या गर्भगृहाच्या द्वाराच्या द्वारशाखेखाली देवकोष्ठामध्ये गंगा व यमुना पूर्ण घटासह दाखविल्या असून त्यांची दृष्टी द्वाराकडे आहे. दरवाजालगत उजव्या बाजूस एका सवत्स धेनूचे छोटे शिल्प आहे. लेण्यात प्रकाश यावा म्हणून उजव्या बाजूच्या भिंतीत चार छिद्रे केलेली आहेत. पाठीमागच्या भिंतीत जमिनीपासून थोड्या उंचावर एक चौकोनी कोनाडा असून यामध्ये तीन मूर्ती कोरल्या आहेत. या मूर्तीतून आदिनाथाच्या योगोपदेशाने मत्स्याचे मत्स्येद्रनाथात रूपांतर झाले. हा प्रसंग चित्रित केला आहे. २४ ते २८ गट या गटातील लेणी आकाराने लहान असून यात वैशिष्टपूर्ण असे काहीच आढळत नाही. फक्त २५ क्रमांकाच्या लेण्याच्या प्रांगणात एक एकाश्म लिंगयुक्त मंदिर कोरले आहे. म.न.देशपांडे यांच्या अभ्यासानंतर २००४ साली पन्हाळेकाजीत आणखीन एक ताम्रपट सापडला. हा ताम्रपट त्याच गावातील ग.रा.जाधव यांच्या देवघरात पूजेला लावलेला होता. ठाण्याचे नाणे शास्त्राचे अभ्यासक आणि दक्षिण भारतीय परिषदेचे उपाध्यक्ष श्री. शशिकांत धोपाटे यांनी तो अभ्यासला व त्याचे वाचन करून भारतीय पुराभिलेख संस्थेला सादर केला. हा ताम्रपट शिलाहार राजवंशातील मल्लिकार्जुन राजा पन्हाळेदुर्ग येथे राज्य करीत होता; त्यावेळचा आहे. या ताम्रपटात शिलाहारांनी जैन मंदिराला ग्रामदान केल्याचा उल्लेख प्रथमच आढळला. त्याआधी सापडलेल्या ताम्रपटातून शिलाहारांनी शिवमंदिरे, देवी मंदिरे आणि बुद्ध विहारांना ग्रामदान केल्याचे उल्लेख आहेत. या ताम्रपटामुळे शिलाहारांच्या इतिहासात नवीन भर पडली. शिलाहार राजवंशातील सोळावा राजा अपरादित्य याचा मल्लिकार्जुन हा चौथा मुलगा होता. ( पहिला केशिदेव, दुसरा विक्रमादित्य, तिसरा हरिपालदेव व चौथा मल्लिकार्जुन ) हे चारही राजे सख्खे भाऊ होते. हे या ताम्रपटाद्वारे प्रथमच ज्ञात झाले. शिलाहारांची राजवट कोकणात दीर्घकाळ होती व या राजवंशाची राजधानी प्रणालक दुर्ग येथे होती. (प्रणालकदुर्ग-पन्हाळेदुर्ग- पन्हाळेकाजी काळानुसार झालेला अपभ्रंश.) शिलाहार हा महाराष्ट्रात राज्य करणारा एक प्रमुख राजवंश होता. पन्हाळेकाजीचे लेणे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, याकरता अनेकांकडून अथक प्रयत्न झाले. पण धार्मिक स्थित्यंतरे पाहणाऱ्या या लेण्यांना आजही म्हणावी तितकी प्रसिद्धी लाभलेली नाही. सध्या पर्यटन संख्या वाढते आहे, पण तरीही ती संख्या सुमार म्हणण्या इतपतच आहे. फक्त एक सुदैवाची बाब म्हणजे भारतीय पुरातत्त्व खात्याकडून या लेण्यांची उचित देखभाल होत आहे. संदर्भ: व्याख्यान दुसरे-तिसरे : म.न.देशपांडे शोध पन्हाळेदुर्ग परिसराचा : शशिकांत शेलार लेख – पन्हाळेकाजीची लेणी, शिलालेख : भालचंद्र दिवाडकर दै.सागर ( रत्नागिरी आवृत्ती )
Read more at: https://talukadapoli.com/places/panhale-kazi-caves-research/
कनकदुर्ग, हर्णे
दापोलीतील हर्णे येथील ‘सुवर्णदुर्ग’ या जलदुर्गाचे सहाय्यक दुर्ग म्हणून कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला, असे तीन उपदुर्ग आहेत. त्यातील हर्णे बंदराला लागूनच असलेला किल्ला म्हणजे कनकदुर्ग. हा किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेढलेला आहे. याचे क्षेत्रफळ साधारणत: पाव हेक्टर आहे. किल्लाचा आकार लाबंट आणि किल्लावर जाण्यास पायऱ्या आहेत. त्या जेथे संपतात तेथे उजव्या हातास खालच्या सपाटीवर पाण्याची टाकी दिसते. किल्लाच्या आत उंच जागी दक्षिण दिशेस दिपग्रह आहे. तेथेच हवामान खात्याचे कार्यालय आहे. किल्लाच्या आत एक बाजूस सलग नऊ छोटे छोटे पाण्याचे हौद दिसतात. किल्लाच्या पश्चिम व दक्षिण बाजूस समुद्रसपाटीच्या पातळीवर खडक दिसतो. या खडकावर समुद्राच्या लाटा जोरजोराने आदळत असतात. सायंकाळच्या वेळेस अनेक पर्यटक व ग्रामस्थ या किल्ल्यावर येतात. किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे आणि समुद्राचे अगदी नयनरम्य सुंदर असे दर्शन होते. हर्णे बंदरातील कोळ्यांच्या होड्या, बंदरावरचा मासळी बाजार अगदी उत्तम प्रकारे येथून पाहता येतो. त्यामुळे हर्णे बंदरावर आलेला पर्यटक कनकदुर्गावर गेल्याशिवाय राहत नाही.
गोवा किल्ला, हर्णे
दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ 3 किल्ल्यांचा समूह आहे. कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला. हे किल्ले नेमके कोणी बांधले व केव्हा बांधले याची माहिती उपलब्ध नाही; पण हे किल्ले हर्णे समुद्रातील ‘सुवर्णदुर्ग’ किल्ल्याच्या रक्षणार्थ बांधले गेलेले, हे खात्रीशीर रित्या सांगितले जाते. त्यातील गोवा किल्ला हा सुमारे सव्वातीन हेक्टर जागेत पसरलेला आहे. हर्णे बंदराकडे जाताना रस्त्याला लागूनच किल्ल्याचे एक प्रवेशद्वार आहे; परंतु ते मुख्य प्रवेशद्वार नाही. मुख्य प्रवेश द्वार मागल्या बाजूने समुद्राकडे आहे. त्या समुद्राभिमुख दरवाजाच्या दोन्ही बाजूस आणि चौथऱ्याच्या तळाशी काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कोरलेली आहेत. महाद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आणि तटबंदी आहे. या तटबंदीवर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याचा पश्चिम आणि उत्तर भाग समुद्राने वेढलेला आहे.
दक्षिणेकडच्या भागात किल्ल्याला नैसर्गिक उंचवटा आहे. या उंचवटाच्या भागावर काही मोडकळीस आलेल्या इमारतीचे अवशेष आढळतात. खालच्या भागात मोठा पाण्याचा हौद व युरोपियन मांडणीची इमारत आहे. सध्या किल्ल्याच्या तटबंदीची थोडीशी पडझड झालेली आढळते; परंतु १८६२ च्या पाहणीत हा किल्ला व्यवस्थित होता व किल्ल्यावर जुन्या ६९ तोफा होत्या आणि त्या तोफांची संरक्षणव्यवस्था पाण्यासाठी 19 शिपाई होते, अशी नोंद मिळते. या किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. या किल्ल्यावरून सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हा तर एक नयनरम्य विलक्षण अनुभव असतो.