Monday, March 1, 2021

आवाडे कोट

     सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहासाचा मागोवा घ्यायला सुरवात केली कि बर्‍याच अश्या किल्ल्यांचा उल्लेख सापडतो ज्यांचा आज साधा मागोवा ही घेता येत नाही.यांची स्थाननिश्चिती होणे,स्पष्ट अवशेष सापडणे अवघड झाले आहे.जणु इतिहासाचे हे साक्षीदार आज फक्त त्या जीर्ण कागदपत्रावरील उल्लेखापुरते राहीले आहेत.तिफणकडा,नांदोस्,फुकेरी,आचरा असे काही किल्ले फक्त कागदोपत्री अस्तित्वात आहेत. 
    आवाडे कोट हा असाच विस्मृतीत गेलेला एक कोट. दोडामार्ग तालुक्यात असलेला आवाडे कोट आजही आपल्या अंगाखांद्यावर बऱ्यापैकी अवशेष बाळगून असला तरी केवळ हा किल्ला अस्तीत्वात नाही या गैरसमजुतीमुळे कोणीही या किल्ल्याकडे फिरकत नाही. आवाडे कोट उर्फ आवर किल्ला बांदा शहरापासुन ३५ कि.मी.अंतरावर तर दोडामार्गपासून १२ कि.मी. अंतरावर आहे. दोडामार्ग-भेडशी-चंदगड रस्त्यावर हे आवरा गाव आहे.आवाडे कोट आसपासच्या परिसरात कोणाला माहीत नसला तरी आवाडे गावातील लोक मात्र या किल्ल्याची अचूक जागा दाखवतात इतकेच नव्हे तर किल्ला दाखवायला देखील येतात. 
 
आवाडे किल्ला गावाबाहेरुन वाहणाऱ्या तिलारी नदीच्या काठावर असुन या नदीचे पाणी किल्ल्याभोवती असलेल्या खंदकात फिरवले आहे. आजही या नदीचे पाणी काही ठिकाणी खंदकात आलेले दिसते. 
 
किल्ल्याच्या आतील व बाहेरील बाजुस मोठया प्रमाणात बांबुची झाडे वाढलेली असुन आपला प्रवेश हा खंदकात उतरुन नंतर किल्ल्यात होतो. 
 
खंदकाची रुंदी साधारण १५ फुट असुन खंदकात साठलेल्या मातीमुळे खोलीचा अंदाज करता येतय नाही. 
 
किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झाला असुन त्याचे नक्की ठिकाण सांगता येत नाही. आपला किल्ल्यातील प्रवेश हा उध्वस्त तटातुन होतो. 
 
साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला एक एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज असावेत कारण तीन टोकाला तीन बुरुज असुन चौथ्या टोकाला मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने तिथपर्यंत जाता येत नाही. 
 
किल्ल्याचे बुरुज व तटबंदी घडीव चिऱ्यात बांधलेली असुन तटाची उंची केवळ चार ते पाच फुटापर्यंत शिल्लक आहे. बुरुजाची उंची थोडी जास्त असली तरी त्यावर मोठया प्रमाणात झाडे वाढली आहेत. 

किल्ल्यातील झुडुपातून वाट काढत फेरी मारताना १५ x २५ फुट आकाराची चारही बाजुच्या भिंती शिल्लक असलेली एक पडकी वास्तु पहायला मिळते. याशिवाय किल्ल्याच्या तटबंदीत एक शौचकुप व अंतर्गत भागात काही घरांचे चौथरे आहेत. 
 
किल्ल्यात पाणी पुरवठा करण्यासाठी एक चौकोनी आकाराची बांधीव विहीर असुन या विहिरीत आजही पाणी असते पण वापरात नसल्याने हे पाणी पिण्यायोग्य नाही. 
 
गावकरी तटाच्या आतील भागात असलेला एक भाग तालीम म्हणुन दाखवतात. या भागाकडे जाण्यासाठी एक लहान दरवाजा पहायला मिळतो. झाडीझुडपातुन वाट काढत संपुर्ण किल्ला पहाण्यास अर्धा तास लागतो पण अवशेष दाखवण्यासाठी स्थानिक माणूस सोबत असायला हवा. 
  या नष्टप्राय झालेल्या किल्ल्याचा थोडाफार इतिहासात उल्लेख आहेत. वाडीकर फोंड सावंत यांनी इ.स.१७३२ च्या सुमारास पोर्तुगीजाच्या गोवा हद्दीजवळ आवाडे कोट बांधला. पोर्तुगीज सरहद्दीजवळ असल्याने याला महत्व होते. एका पत्रात या किल्ल्याचा उल्लेख येतो, तो असा "विश्राम अनंत सबनीस फोंड यांचे कारकीर्द दिवाडी बारदेश येथे गेले काही वर्ष होते.नंतर वाडीस आले.उपर आवाडेचा कोट नाग सावंत ( दुसर्‍या खेमसावंतांचा मुलगा ) याकडे होता.ती मसलत राजश्री सुधा फौज गेलेवर विश्राम शेणवी आवाडेस पडले"
   इ.स.१७३८-५५ च्या दरम्यान वाडी संस्थानात वारसाहक्काची भांडणे चालू असताना नानासाहेब पेशवे यांनी रामचंद्र सावंत यांना लिहिलेल्या पत्रात या किल्ल्याचा उल्लेख आला आहे. "जिवाजी विश्राम यांस सांगून हुजुर पाठविणे येवेसी आज्ञा करणे ते विठ्ठल विश्रामास केली,असे हे तुम्हास लिहीतील त्यावरुन कळेल.आवाडियाचे ठाणे खालील ते किल्ल्याकडेच अस्सिले पाहिजे तर किल्ल्याकडे देणे जाणिजे"मात्र पुढे या घटनेत काय झाले याची माहिती मिळत नाही.
    त्यानंतर दुसऱ्या खेम सावंतांचा मुलगा नाग सावंत यांनी पंतअमात्य यांना आवाडे येथुन लिहिलेल्या पत्रात या कोटाचा उल्लेख येतो.ते पत्र असे "आपली व आमची भेट व्हावी त्यामुळे लक्ष मनसुबे घडतील.आम्हास कायावाचामने करुन आपली भेट व्हावी हेच बहु आवश्यक आहे.याउपरही आम्ही आम्ही आवाडेचे मुक्कामीहून बुधवारी कुच करुन मजल दरमजल येतो". 
      इ.स.१७४६ मधील ऑक्टोबर महिन्यात सांखळीकर राणे व इतर देसाई सावंतांचा पक्ष सोडुन पोर्तुगीजांना सामील झाल्यावर सत्रोजी राणे यांनी सावंतांचा आवाडो,मोर्ले व सातारे हे कोट पोर्तुगीजांच्या ताब्यात दिले.यात उल्लेख केलेला आवाडो कोट म्हणजेच आवर कोट होय. त्यानंतर हा कोट पुन्हा सावंतांच्या ताब्यात आल्याचे दिसते कारण इ.स.१८३२ मध्ये या किल्ल्यात असलेल्या लोकांची यादी व खर्चाची तरतुद सावंतवाडी दफ्तरात सापडते.सन १८३२ च्या उल्लेखाप्रमाणे किल्ल्यात किल्लेदार्,कारखानीस्,तासजी,३५ लोक्,कुणबीण हे लोक होते.किल्ल्यासाठी ९७३ रुपयाची तरतुद होती.
     दगडमातीने बांधलेल्या या किल्ल्याची सन १८४३ मध्ये अवस्था कशी होती याचे वर्णन त्यात आहे.किल्ल्याच्या सभोवताली खंदक आहे.त्यात काटेरी झाडेझुडपे व बांबुची दाट बेटे होती.किल्ल्याच्या उत्तर तटाबाहेर बुरुज बांधलेला होता.मुख्य किल्ला व हा बुरुज याच्यामध्ये रस्ता होता.या रस्त्याच्या एका बाजुला तटबंदी तर दुसर्‍या बाजुला वेळूची दाट बेटे होती. किल्ल्याचा दरवाजा अतिशय मजबुत असला तरी त्याला पुरेसे संरक्षण दिलेले नव्हते.
    इ.स.१८४४-४५ मध्ये करवीर प्रांतात ब्रिटीश सरकार विरुध्द उठाव झाल्याने या भागातील अनेक किल्ले पाडले गेले त्यात आवाडे कोट उध्वस्त केला गेला.
 
संदर्भग्रंथ :-
१)  सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीयर
२) गड्,कोट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील - सतिश अक्कलकोट
३) महाराष्ट्र देशातील किल्ले - चिंतामण गोगटे
४) www.durgbharari.com  हि वेबसाईट

 

 



























© Suresh Nimbalkar

भरतगड, भगवंतगड

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भैरवगडाजवळ उगम पावणारी गड नदी म्हणजे सिंधुसागराला मिळणारी कालावल खाडी. या नदीच्या प्रवाहावर उगमापासून ते संगमापर्यंत अनेक लहानमोठे किल्ले बांधलेले आहेत. यात उगमाजवळ भैरवगड-सोनगड, पुढे रामगड, त्यानंतर कालावल खाडीच्या दोन्ही बाजुस लहान टेकडीवर भरतगड-भगवंतगड हि दुर्गजोडी तर संगमावर सर्जेकोट बांधलेला आहे. 
       मसुरे गावात कालावल खाडीकाठी असलेल्या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी १६७० मध्ये शिवरायांनी पहाणी केली होती. पण डोंगरावर पाण्याची सोय नसल्यामुळे येथे गड बांधण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. सावंतवाडीकर सावंत व कोल्हापूरकर छत्रपतींचा इतिहास वाचताना त्यांच्यात सतत चालत असलेली कुरबुर ठळकपणे ध्यानात येते. इ.स. १७०१ मध्ये फोंड सावंतांनी मसुरे गावाजवळील डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी प्रथम विहिर खोदली व या विहीरीला पाणी लागल्यावर भरतगडची बांधणी केली. हा गड सावंतांचे एक मजबुत स्थान बनले.  
  नानासाहेब पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात बिनसले, त्यात नानासाहेबांना तुळाजींचे आरमार हवे होते. दोघांच्यात सतत चकम्की सुरु होत्या.त्यातच सावंतवाडीच्या सावंतांचे आपल्याच धन्याविरुध्द म्हणजे करवीरकर छत्रपतींशी सख्य नव्हते.त्यासाठी सावंतांना पेशव्यांची मदत होत होती.शिवाय आंग्रे आणि सावंत यांच्यात विस्तव जात नव्हता. सहजिकच सावंतानी पेशव्यांची बाजु घेतली त्यामुळे इ.स. १७४८ साली तुळाजी आंग्रे यांनी भरतगडावर हल्ला केला.आंग्र्यांच्या सैन्यापुढे सावंत टिकाव धरु शकणार नाहीत याची नानासाहेब पेशव्यांना कल्पना होतीच.त्यांनी सावंताच्या मदतीला आपले सैन्य धाडले. तुळाजी आंग्र्यांनी कालावल खाडीत आपले आरमार घालून भरतगडावर हल्ला केला.सोबत घोडदळ व पायदळही होतेच.त्यास खुद्द तुळाजी आंग्रे युध्दात उतरले होते. भरतगडाला वेढा आवळला गेला.भरतगड तुळाजीच्या ताब्यात जाणार अशी स्थिती असतानाच पेशव्यांचे सैन्य भरतगडाच्या मदतीला आले. मोठे रण झाले व दोन्ही बाजुंचे बरेच नुकसानही झाले.
 या लढाईबध्दल जनार्दन गणेश भाउसाहेब पेशव्यांना २३ जानेवारी १७४८ च्या पत्रात लिहीतात "गोलवणची खेडीवर आंग्रे यांची चौकी होती.मानाजी पायगुडे पुरेसे लोक सोबत न घेता ओरड करुन शे-पनास स्वारानिशी खाली बारी उतरुन गाठ घातली.तेच बारीस आंगरे यांचे लोक ह्शमी होते.त्याणी मारामारी केली व राउतही तयार होउन त्यांचा मोड जाहला.नगारा निशाणा व पनास पाउणशे घोडी जिवंत धरुन नेली व लोकही धरुन नेले".
"आंगरेयानी मसुरेयाचे मोर्चा उठवून पलिकडे भगवंतगडास गेले.खाडीत आरमार होते ते झाडून माघारे गेले.याणी सारी फौज जमा होउ न देता पुढे आले.त्यामुळे नाश जाहला.मसुरेकरानी शर्त करुन किला रक्षिला.आंगरियांकडील माणुस तीनशे चारशे पावेतो नाश जाहले.स्वामीकडील फौजेस चार रोज विलंब लागला तरी किला गेला होता."
   सन १७४८ मध्ये विठ्ठल विश्रामनी पेशव्यांना लिहीले कि "तुळाजी आंग्रे खासा जाउन भरतगडास राहून किला हैराण केला.तोफांचे माराखाले किल्ला जेर झाला.गरनाळ्याचे ( तोफेचा एक प्रकार ) गोले तशाच फटाकड्याचे ( तोफे ) पाणी व दारु कमअवसान सोडीले यैसा विचार जाहला.सावंत व आम्ही निघालो.रात्र अडचणीचे एका पाठीमागे एक जावे लागते.झटापट झाली.माघारे कुडाळास आलो.त्यावरुन फीरोन जाउन मोर्चे उठवले".
   भरतगडास फेब्रुवारी १७४८ मध्ये आंग्रे यांचे मोर्चे कायम होते.तुळाजींनी विठ्ठल विश्राम यांना लिहीले "श्रीमंताचा ( पेशव्यांचा ) आपला स्नेह असोन कलह उचीत नाही भला माणुस पाठवून घ्यावा म्हणजे उभयपक्षी विचार होणे तो होइल" यावर विश्रामांनी उत्तर दिले "तुम्हास स्नेह रक्षणे असेल तर भरतगडाचे मोर्चे उठवणे,मग भला माणुस पाठवून बोलणे ते बोलो". त्यावर तुळाजींचे प्रत्युत्तर असे "मोर्चे उठवून आपल्या सरदेत ( सरहदीत ) जातो".
    आंग्रे मोर्चे उठवून नदीपलीकडे भगवंतगडास जाउन राहीले.पेशव्यांचे सैन्य पेडूरहून भरतगडाच्या नजीक येउन राहीले.दोघांच्या वरवरच्या गोष्टी झाल्या.यावेळी तुळाजीच्या सैन्याची माहिती पेशव्यांना देताना विठ्ठल विश्राम १५ फेब्रुवारी १७४८ रोजी लिहीतात कि "भरतगडास आले तेव्हा आंग्रेकडे दस हजार प्यादे,दीड हजार पर्यंत राउत खेरीज आरमार सामान जबरदस्त,रान अडचणीचे.सावंताचे प्यादे म्हणावे तर त्याणी धास्ती घेतली होती.गडाचे जीवन थोडके राहीले".परंतु तुळाजींचे सैन्य यावेळी दहा हजाराचे नव्हते..
   अखेर तुळाजी आंग्रेनी भरतगड जिंकलाच.पेशव्यांचे सहाय्य असल्याने सावंत गप्प बसणार नव्हते पुढच्याच वर्षी सावंतांनी भरतगडाच्या काही अधिकार्‍यास फितुर करुन अचानक किल्ल्यावर हल्ला चढविला.किल्ल्यावरील लोकांनी पाच दिव्सापर्यत शौर्याने किल्ला लढविला.पण तेथील पाणी संपल्यामुळे तहानेने व्याकुळ होउन त्यांना किल्ला खाली करावा लागला.मार्च १७४९ पुर्वी हि घटना घडली.तुळाजींना हि बातमी स्मजताच ते मदतीला निघाले.पण ते पोहचण्यापुर्वीच सावंतानी गडाचा कब्जा घेतल्याचे पाहून आंग्र्यांना परत फिरावे लागले.
जयराम सावंतांनी हा किल्ला आंग्र्यांकडून भेद करुन घेतला अशी माहिती पोवाड्यात आहे ती अशी "उफराटी बाजु करुनि मसुर्‍याला ( गड पायथ्याचे गाव ) गेला कुणासि नकळताना त्याचा ( किल्ल्याचा ) नायकावडी ( धामापुरचे महार नारनाक व येसनाक हे नायकवडी होते ) बोलाविला भरतगड एवढा भेदूनि दे मला कडी घालीन तुला मोहन माळ गळ्याला नवशे सिलेदार घेउनि जयराम किल्ल्यावर चढला कुणाच्या वहाणा कोण नेतो | कोणाचा पगडी कोण नेतो | कवलानशी लोक ( आंग्रे यांचे सैन्य ) तीन हजार खाली उतरले पळुन गेले विजयदुर्गला |"
    तुळाजींनी मार्च १७४९ मध्ये भरतगड परत घेण्यासाठी पोर्तुगीजांची मदत मिळावी म्हणून आपला वकील रुद्राजी धुळूप याला गोव्यास पाठविले.मदत न पोहचल्याने तुळाजींनी इस्माइल खान यास पाठवून कळविले कि "वाडीकर सावंत तुमचा आमचा दुश्मन हा वलवल बहुत करतो.तुमी आमी येक होउन लंबी त्यास दिलेला सर्व जेथचे तेथेच राहले".
   तुळाजींचे पत्र पाहून पोर्तुगीजांनी त्यास मदत केली पण हातचे राखून. कारण सावंत बरे पण आंग्रे नको असे पोर्तुगीजांचे मत होते. भरतगड सावंतांच्या ताब्यातच राहिला.मात्र आंग्रेनी गडाचा नाद सोडला नाही. गडास आंग्र्यांपासून धोका उत्पन्न झाल्याचे पाहून पेशव्यांनी आपला सरदार हरिराम यास गडाच्या सहय्याला पाठविले. 
हरी राम यांनी भाउसाहेब पेशव्यांना भरतगडाहून ७ जानेवारी १७५१ रोजी पत्र लिहील. ते असे "खडे स्वारीने त्रिवर्ग येउन मसुरेस दाखल होउन गनिमासी गाठ घालून येकास येक न मिळता होणे ते होउन गेले. माघारे लस्करास आले.शत्रुस ( तुळाजी आंग्रे ) वक्र होतो ते कमी जाहला.सावंताकडील प्यादेनी अवसान अगदीच टाकीले.
  स्वामींचे फौजेत व सावंतांकडील फौजेत दम बराच होता.परंतु झाडीचे व बारी ( वाट ) बहुत अडचण, राउतांचा उपाय नाही.या करिता बहुतांप्रकारे दिलासा करुन तयार करविले आणि निघालो तो तीन हजार प्यादे होते. त्यापैकी मुकामास आलो तो दिड हजार राहिले.तोंडास गेल्यावर एकाचे दर्शन न होय येसा विचार दिसोन आला. दिवसगत लागलिया जागा जातो याकरिता दोन कोस चार कोस मुकाम करित नजीक आलो. इतक्यात आंगरे यांचे पत्र आम्हास आले.विचारे करुन दाब जवाब दखवुन गडाचे मोर्चे उठवावे तरी उत्तम आहे.नाही तर मोर्चे उठवने आम्हास जरुर आहे.येसे आंगोन पाठविल्या उपरी मोर्चे उठवून भगवंतगडास गेले.आम्ही फौजसुध्दा गडानजीक येउन मुक्काम केला आहे. याउपरी बोलाचालीचा विचार जाहला तरी उत्तम.स्वामीनी बेगमी केली ते उरकली.याउपरी कर्जावरी इमारत आली.कर्जही येथे एक रुपया मिलत नाही".
  भरतगड घेण्याचा तुळाजींनी खुप प्रयत्न केला असला तरी यश येत नाही हे पाहून अखेर त्यांनी सुलुख केला. यासंबधी आनंदराव गिरीधर यांनी १२ जानेवारी १७५१ रोजी पत्र लिहीले कि "आंगर्‍या मसुरेस वेढा देउन बसला आहे.लढाई झाली.आंगर्‍याचा मोड झाला.मानाजी पायगोडेने पंचवीस घोडी पडाव घेउन आले.आंगर्‍यांचे पन्नास साठ माणुस लढाईत मारले गेले.जखमीही जाले.त्यावर आंगर्‍यानी यासी सुलुख करोन श्रीमंतांचे ( पेशव्यांचे ) निशान चढवले."
   पेशव्यांनी सन १७५६ मध्ये तुळाजी आंग्र्यांचा विजयदुर्गाच्या साक्षीने पराभव करुन त्यांचे आरमार ( खरतर मराठ्यांचे ) जाळून त्यांना कैद केल्याने भरतगडाचा धोका आंग्र्यांपासून टळला असला तरी सावंत व करवीरकर छत्रपती यांच्यात वितुष्ट कायम होते. त्यामुळे त्या बाजूने धोका कायम होता.
   सन १७६५ मध्ये विश्राम नरहर किल्लेदार असताना इंग्रजांनी सिंधुदुर्ग घेउन सावंतांचे इतर किल्ले घेत १३ मार्च १७६५ रोजी भरतगडावर स्वारी करण्यास निघाले.हे पाहून सावंत तहास तयार झाले.७ एप्रिल १७६५  रोजी झालेल्या तहानुसार सावंताकडून इंग्रजांनी बराच मोठा मुलुख घेतला.त्यात भरतगडासंदर्भात एक कलम असे होते "किल्ला सामाननाळी गाड्या गोळे वगैरे सामान हाली आहे.त्यासुध्द सरकार कंपनी यांचे हवाली करावा".मात्र हा तह सावंतांनी पाळला नाही.तेव्हा इंग्रंजांनी पुढच्या वर्षी सावंतांना तह करण्यास भाग पाडले.रेडी येथे २४ ऑक्टोबर १७६६ रोजी तह झाला.तहानुसार भरतगड इंग्रजांनी सावंताकडे ठेवला.
पुढे सन १७७२ मध्ये करवीरकरांनी भरतगडाचा ताबा घेतला.मात्र पुढे तो पुन्हा सावंताकडे दिला.सन १७८५ सावंतवाडीवरुन दोनशे लोक पाठवून सावंतांनी भरतगडाचा बंदोबस्त केल्याची नोंद आहे.मोघल बादशहाकडून सावंतांनी मोरचेल आणल्यामुळे करवीरकर छत्रपतींनी सन १७८७ मध्ये इतर दुर्गांसोबत भरतगड सावंतांकडून जिंकुन घेतला.स्वतः करवीरकर छत्रपती या लढाईत होते.या लढाई संबधी १५ फेब्रुवारी १७८८ रोजी गंगाधर हे भरतगडावरुन लिहीतात कि "भरतगड खालचा मुलुख उजाड जाला, तेव्हा आज फौजेस भक्षावयास काही नाही असे जाले.महागाई जाली.चार दिवस लुटरु मुलाले लुट जाली.गाव वस्ती राहीली नाही"
करवीरकरांनी भरतगड १७९३ मध्ये परत सावंतांना दिला.सन १८०४ मध्ये सावंतांच्या अतंगर्त कलहात फोंड सावंत याने करवीरकरांना मदतीस बोलाविले.करवीरकरांनी मदतीस रत्नाकरपंत राजाज्ञा यांना पाठविले.त्यांनी लक्ष्मीबाईचे भरतगड व इतर किल्ले घेतले.तेव्हा नाईलाजाने लक्ष्मीबाईंनी फोंडसावंत यांना गादीवर बसविले.हे पाहून करवीरकरांची फौज माघारी गेली.
   सन १८०५ मध्ये सावंतांचा सरदार चंद्रोबा सैन्य घेउन भरतगडावर चालून आला.गडाला वेढा घालण्यात आला,मात्र गड दाद देईना.बराच मारा करुन देखील गड दाद देत नसल्याने खुप दिवस वेढा चालुच राहीला.अखेर सिंधुदुर्गावरुन एक व कोल्हापुरवरुन दुसरी १००० सैन्याची दुसरी तुकडी चालून आल्याने चंद्रोबांनी वेढा उठविला. सावंतांनी पुन्हा एकदा १८०७ च्या सुरवातीला माधवराव, धोंडो गोविंद इत्यादी सरदार व चार हजार सैन्यानिशी स्वारी केली.मात्र चकमकीत धोंडो यास पोटास गोळी लागली.त्यामुळे सावंतांच्या सैन्याने दोन कोस मागे जाउन तळ दिला,मात्र धोंडो मरण पावले.
  करवीरकरांनी घेतलेला भरतगड परत घेण्यास दुर्गाबाई सावंत यांनी आपले सरदार चंद्रोबा आणि संभाजी सावंत यांना पाठविले.
   सावंताच्या सैन्याने गडाला लगट करत तो हस्तगत केला.भरतगड सावंतांनी घेतल्याचे पाहून करवीरकरांनी ईंग्रजांकडे तक्रार केली.इंग्रजांनी १८१३ साली केलेल्या करारानुसार करवीर राज्याच्या रक्षणाची हमी घेतली होती.त्यामुळे इंग्रजांनी दुर्गाबाई सावंताना भरतगड करवीरकरांना परत देण्याची आज्ञा केली.सावंताना ते अर्थातच मान्य नव्ह्ते.तेव्हा इंग्रज सेनानी कर्नल डाउसी १८ मार्च १८१३ रोजी सैन्याची तुकडी घेउन भरतगडाच्या पायथ्याशी पोहचला.इंग्रज आलेले पाहून सावंताचे सैन्य न लढताच गड सोडून निघून गेले.इंग्रजांनी एप्रिल महिन्यात पुन्हा करवीरकरांच्या हवाली केला. पण बहुधा हा गड सन १८१३ ते १८१७ दरम्यान कधीतरी पुन्हा सावंतांच्या ताब्यात आला असावा.
  सन १८१८ ला मराठे-इंग्रज यांच्यातील अंतिम युध्दात इंग्रजांच्या फौजा सावंतवाडी संस्थानातील किल्ले घेण्यासाठी या परिसरात दाखल झाल्या.मात्र करवीरकरांनी इंग्रजांचे अधिपत्य मान्य केले असल्यामुळे आणि त्यांच्याशी करार केला असल्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या किल्ल्याला तोषिश दिली नाही.कॅप्टन हचीन्सनच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी गडाला मोर्चे लावले.तोफांचा मारा सुरु केला.त्यावेळी गडावर झालेल्या तोफांच्या माऱ्यामुळे विहीरीच्या तळाला तडे जाऊन विहीरीतील झरे बंद झाल्याने गडावर पाण्याचा तुटवडा भासत होता. एकदा पाण्याचाच तुटवडा झाल्याने गडाच्या शिबंदीने अखेर शरणागती पत्करली.गड इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यानंतर त्यांनी गडावर येउन पहाणी केली असता पाणी साठवण्यासाठी लाकडाच्या धोणी वापरल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
       विशेष म्हणजे १८१८ ला सह्याद्रीतील इतर किल्ले ताब्यात आल्यावर त्यांना नष्ट करणार्‍या इंग्रजांनी भरतगड ताब्यात आल्यावर तो पुन्हा करवीरकरांना दिला.जुलै, ऑगस्ट १८४० मध्ये इंग्रजांनी करवीरकरांना भरतगडावरची व्यवस्था बदलण्यास सांगितले.सन १८४२ च्या नोंदीनुसार भरतगडावर करवीर संस्थानाच्या वतीने दिनकरराव गायकवाड हे अधिकारी होते.यावेळचा उल्लेख समस्त गडकरी लोक व नामजद लोक किल्ले भरतगड असा उल्लेख आहे,याचा अर्थ हा गड किमान १८४२ पर्यंत तरी राबता असलेला व गडपण शाबुत असलेला होता.मात्र सन १८४४ साली पन्हाळा,सामानगड्,कोकणातील मनोहरगड या किल्ल्यावरच्या लोकांनी बंड उभारले.इंग्रज सरकारने हे बंड तर चिरडलेच ,पण पुन्हा असा प्रयत्न होउ नये म्हणून किल्ल्यांची पाडापाड केली.या वरवंट्यात भरतगड देखील चिरडला आणि बेवसाउ झाला.
 
 इ.स.१८१८ मध्ये झालेल्या एका पहाणीत गडावर अठरा तोफा असल्याची नोंद आढळते.याचा अर्थ या तोफा गड परिसरातच बुजलेल्या अवस्थेत असल्या पाहीजेत किंवा गडाच्या घेर्‍यात असलेल्या झाडीत लपल्या असल्या पाहीजेत. नुकतेच नोव्हेंबर २०२० ला भरतगड किल्ल्याच्या पायथ्याशी उत्खनन करताना तोफ आढळून आली आहे. भरतगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या पुरातन वाडयाजवळ साफसफाईसाठी उत्खनन करताना ही तोफ आढळून आली आहे  ही तोफ सुमारे तीन फूट लांबीची असून तिचा मागील भाग काहीसा तुटलेला आहे. सुमारे 70 किलो वजनाची ही तोफ आहे. काही वर्षांपूर्वी भरतगड किल्ला येथे पुरातत्व विभागातर्फे साफसफाईसाठी उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळीही या ठिकाणी एक तोफ आणि तोफेचे गोळे आढळले होते.     
    निसर्गाचे भरभरून वरदान या परिसराला लाभलेले असुन मंत्रमुग्ध करणारा हा परीसर कोकण भटकंतीत आवर्जुन पहायलाच हवा !!! कोकणात फिरताना सोबत खाजगी वाहन असल्यास सकाळी लवकर सुरवात केल्यास सर्जेकोट, भरतगड-भगवंतगड,रामगड हे चार किल्ले एका दिवसात सहजपणे पाहुन होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या भरतगडावर जाण्यासाठी मसुरे हे पायथ्याचे गाव असुन मालवण हे जवळचे शहर आहे. मुंबईहुन मालवण शहर ४६० कि.मी. अंतरावर असुन मालवणच्या २० कि.मी.अलीकडे मसुरे गाव आहे. कणकवलीहुन आंगणेवाडी मार्गे मसुरे गाव ३५ कि.मी.अंतरावर आहे.
 बसचे वेळापत्रक
मालवणवरुन मसुरेला जाण्यासाठी बसच्या वेळा अश्या आहेत :- सकाळी  ७.३०,९.००,११.३०,१२.३०, दुपारी १.३०, संध्याकाळी ४.३०
मसुरेवरुन मालवणला जाण्यासाठी -सकाळी ६.००,८.३०, १०.२०,१२.३०,१.३०,२.३०संध्याकाळी ५.३० आणि ६.००
कालावल खाडीच्या दक्षिण व उत्तर काठावर भरतगड व भगवंतगड हे दोन किल्ले उभे आहेत. दक्षिण काठावर असलेल्या मसुरे गावामागे पुर्वपश्चिम पसरलेल्या २१५ फुट उंचीच्या लहानशा टेकडीवर भरतगड वसलेला आहे.  भरतगड  ५ ते ६ एकरवर पसरलेला आहे. गडावर जाण्यासाठी चिरेबंदी पायर्‍या बांधून काढलेल्या आहेत. भरतगडावर खाजगी मालकीची आमराइ असल्यामुळे गड साफ ठेवला गेला आहे. भरतगडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग असून दोनही भागातील अवशेष सुस्थितीत आहेत. गडावर रहाण्याची सोय नाही , पण मालवणमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.किंवा मसुरे गावात विनंती करुन रहाता येईल.गडावर जेवणाची सोय नाही, जेवणाची सोयही मसूरे गावात व मालवणमध्ये होऊ शकते.

गावात आल्यावर गावामागील टेकडीवर असलेल्या भरतगडची तटबंदी व बुरुज दिसुन येतात. गावातील पावणाई मंदिराजवळ गडावर जाणारी वाट असुन या वाटेवर जांभ्या दगडात पायऱ्या बांधल्या आहेत.  
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.तेव्हा पुरेसे पाणी सोबत घेउन या वाटेने १० मिनिटात आपण गडाच्या नष्ट झालेल्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. याशिवाय एक कच्चा गाडी रस्ता डोंगराला वळसा घालत या दरवाजापर्यंत येतो. सोबत वाहन असल्यास वाहनाने थेट दरवाजापर्यंत जाता येते. 

गडाचा दरवाजा नष्ट झाला असला तरी त्याशेजारी असलेले बुरुज व तटबंदी मात्र शिल्लक आहे. 
 
गडाच्या तटबंदी बाहेर २० फुट खोल व १० फुट रुंद खंदक खोदलेला असुन या खंदकातील दगड गडाच्या बांधकामात वापरलेले आहेत. सध्या या खंदकात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे. 
 
या दरवाजातुन काही पायऱ्या चढुन आल्यावर वाट उजवीकडे वळते. गडाच्या तटबंदी खालुन जाणारी हि वाट बाहेरील बाजुस तटबंदी बांधुन बंदीस्त करण्यात आली आहे. बाहेरील बाजुस असलेल्या या तटबंदीत एक बुरुज बांधलेला असुन त्याखाली खंदक खोदलेला आहे. गडाच्या उत्तरेकडील दरवाजात जाणारी हि वाट तटावरून पुर्णपणे माराच्या टप्प्यात आहे.
 
 या वाटेने केवळ चौकट शिल्लक असलेल्या उत्तराभिमुख दरवाजाने आपण गडाचा उत्तर टोकावरील मोठया बुरुजाजवळ प्रवेश करतो. मध्यभागी गोलाकार असलेला हा गड उत्तर व दक्षिण टोकावर निमुळता होत गेलेला असुन संपुर्ण गडाचा परीसर साधारण ७ एकरवर सामावलेला आहे. गडाची हि दोन्ही टोके मोठया बुरुजांनी बंदीस्त केलेली आहेत. 
 
गडाचे माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असून मध्यभागी ३ बुरुज असलेला बालेकिल्ला व उर्वरीत बाजुस माची अशी याची रचना आहे. 
 
पुरातत्व खात्याने अलीकडेच या किल्ल्याची दुरुस्ती केली असुन त्याला मुळ स्वरुपात आणण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. यामुळे आपल्याला किल्ल्याच्या तटावर असलेल्या फांजीवरून संपुर्ण किल्ल्यास फेरी मारता येते. 
 
गडात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम डावीकडे फांजीवर चढून पुर्व बाजुने तटावरून फेरी मारून घ्यावी. 

तटावरून दक्षिणेकडे निघाल्यावर दुसऱ्या बुरुजाच्या पुढील भागात एक वास्तु चौथरा पहायला मिळतो.
 
 येथुन उजवीकडे बालेकिल्ल्याची तटबंदी त्यात असलेला लहान दरवाजा व त्या शेजारील बुरुज पहायला मिळतो. येथुन पुढे जाताना तिसऱ्या बुरुजाशेजारी खडकात कोरलेला कोरडा साचपाण्याचा तलाव दिसतो. हा बुरुज पार करून आपण गडाच्या दक्षिण टोकावर असलेल्या सोंडा बुरुजावर येतो.  २१० फुट उंचीच्या या गडावरुन मोठा निसर्गरम्य परिसर सभोवताली दिसतो. 
येथुन दुरवर वाहत जाणारी कालावल खाडी व खाडी पलिकडे गर्द झाडीत लपलेला भंगवतगड दिसतो. येथुन गडाच्या पश्चिमेकडील तटबंदी वरून उत्तरेकडे जाताना अजुन ४ बुरुज पहायला मिळतात. 
 या तटबंदीत आपल्याला गोलाकार अर्धगोलाकार आकाराचे लहानमोठे असे एकुण ९ बुरुज पहायला मिळतात. 
 
या सर्व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या असुन तोफा डागण्यासाठी झरोके आहेत. 
 
काही बुरुजांच्या मध्यभागी दगडी खांब असुन पावसाळ्यात यावर वासे ठेऊन बुरुजांची शाकारणी करण्यासाठी हि रचना केलेली आहे. दोन बुरुजावर असलेली कौले पहाता या ठिकाणी कायम स्वरूपी बंदीस्त चौकी असावी. शेवटच्या बुरुजावरून समोरच दुसऱ्या बाजुस असलेली बालेकिल्ल्याची तटबंदी त्यातील मुख्य दरवाजा व शेजारील बुरुज पहायला मिळतो. या बुरुजाच्या माथ्यावर छप्पर असलेल्या खुणा दिसुन येतात. बालेकिल्ल्याची तटबंदी साधारण १०-१२ फुट उंच असुन ३५०X१८० फुट लांबीरुंदीचा बालेकिल्ला १.५ एकरवर पसरलेला आहे. 
 
 
 
दरवाजाने आत प्रवेश केल्यावर उजवीकडे पहाऱ्याची देवडी असुन त्याशेजारी तटावर तसेच बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. 
 
दरवाजाच्या डावीकडे चौथऱ्यावर महापुरुषाचे जिर्णोद्धार केलेले मंदीर असुन मंदिराच्या आवारात तुळशी वृंदावन आहे. कोकणात पिंपळाची महापुरुष म्हणुन पुजा केली जाते पण येथे पिंपळाचे झाड दिसत नाही. 

मंदिरामागे डावीकडील भागात कातळात खोदलेली पायऱ्यांची विहीर असुन काळाच्या ओघात या विहिरीच्या काही पायऱ्या नष्ट झाल्या आहेत. 
हि विहीर २०० फुट खोल असल्याचे सांगीतले जाते. अलीकडेच या विहीरीची साफसफाई करताना एक भुयार सापडले.त्याचा शोध सुरु आहे.विहिरीकडे असलेल्या बालेकिल्ल्याच्या टोकाला बुरुज बांधलेला नसुन या ठिकाणी कोठारासारखी बंदीस्त वास्तु आहे.  
विहिरीच्या उजवीकडे ५-६ फुट उंचीचा एक चौथरा असुन हा चौथरा आपल्याला भगवंतगड वर असलेल्या मंदिराच्या चौथऱ्याची आठवण करून देतो. चौथऱ्याच्या उजवीकडे तटाला लागुन एक वास्तु आहे पण या वास्तुचे बांधकाम अगदी अलीकडील काळातील वाटते. हे पाहुन झाल्यावर बालेकिल्ल्याच्या मागील बाजुस जावे. 
 बालेकिल्ल्याच्या मागील बाजुस उजवीकडील असलेला बुरुज पुर्णपणे ढासळला आहे तर डावीकडे अर्धवट ढासळलेला बुरुज नव्याने बांधुन काढलेला आहे. हा बुरुज तटावर बांधलेला नसुन तळातून बांधुन काढलेला आहे. तीन मजली असलेल्या या बुरुजात रहाण्याची सोय आहे.  
या बुरूजा शेजारील तटात बाहेर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. बालेकिल्ल्याच्या तटालगत असलेले बांधीव दगडी खांब पहाता पुर्वी तटाला लागुन मोठया प्रमाणात रहाण्याची सोय असावी.  
या शिवाय तटबंदीत दोन शौचकुप देखील पहायला मिळतात. बालेकिल्ला पाहुन उत्तर बुरुजावर आल्यावर आपली तासाभराची गडफेरी पुर्ण होते.
    मालवणहून परिसरात आल्यावर सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात.
संदर्भग्रंथ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील -सतिश अक्कलकोट
४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची -प्र.के .घाणेकर
५) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
६) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
७) मसुरे येथील तोफा सापडलेली बातमी https://www.tv9marathi.com/photo-gallery/sindhudurg-district-malvan-bharatgad-fort-cannon-found-332116.html
८ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
९ ) www.durgbharari.com हि वेबसाईट





 





 

 

 










 


























 






  भगवंतगड 

   भरतगड पाहीला आहे तर भगवंत का नको ? चला निघुया निराकार्,निर्गुण भगवंतगडाच्या दर्शनाला. कालावल खाडीच्या म्हणजेच गड नदीकिनारी दोन्ही बाजुस लहान टेकडीवर दक्षिण बाजुला भरतगड तर उत्तर बाजुला भगवंतगड हि दुर्गजोडी वसलेली आहे. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेला अगदी चित्रमय असलेला हा परीसर आपल्या कोकण भटकंतीत आवर्जून पाहण्यासारखा आहे. 
यातील भरतगडाचा वनवास संपला असला आहे आणि सध्या पुरातत्व खात्याचे काम चालु असुन त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे पण भगवंतगडला मात्र पुर्णपणे निसर्गाच्या हवाली केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या भगवंतगडावर जाण्यासाठी आचरा मसुरे हि जवळची गावे असुन मालवण हे जवळचे शहर आहे. मुंबईहुन मालवण शहर ४६० कि.मी.अंतरावर असुन मालवणच्या २० कि.मी.अलीकडे आचरा-मसुरे हि गावे आहेत. आचरे येथुन ५ कि.मी. अंतरावर भगवंतगडवाडी हे गडपायथ्याचे गाव असुन मसुरे येथुन गेल्यास नव्याने बांधलेल्या एका लहान पुलावरून आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. या पुलावरून केवळ दुचाकी अथवा लहान चारचाकी जाऊ शकते. भरतगड पाहून झाल्यावर, भगवंतगड पहाण्यासाठी मसुरे गावातील मुख्य चौकातून १ किमी अंतरावर कावावाडी किंवा कावामसुरे नावाची वाडी लागते. तेथे खाडीपलिकडील भगवंतगड गावात जाण्यासाठी होडी मिळते. भगवंतगड गावात उतरल्यावर डाव्या हाताच्या रस्त्याने ५ मिनीटे चालल्यावर आपण शाळेजवळ पोहचतो. तेथून मळलेली वाट गडावर जाते.
कोकणातील खाडीकाठी असलेल्या बहुतांशी किल्ल्यांची रचना एकसमान दिसुन येते ती म्हणजे टेकडीवर असलेला मुख्य किल्ला व तेथुन थेट खाडीच्या काठापर्यंत आलेली तटबंदी. गोपाळगड,जयगड-विजयगड,यशवंतगड, रामगड, देवगड या किल्ल्यात हि रचना दिसुन येते. अर्थात पुर्णगड,आंबोळगड सारखे काही किल्ले याला अपवाद देखील आहेत. भगवंतगड हा किल्ला असाच दोन भागात विभागलेला असुन टेकडीवर बालेकिल्ला व खाडीकाठी परकोट अशी याची रचना आहे. भगवंतगड गावातील शाळेमागुन मळलेली वाट १० मिनीटात आपल्याला गडावर घेऊन जाते. या वाटेने जाताना डाव्या बाजुस झाडीत लपलेली तटबंदी दिसुन येते. या वाटेवर असलेला गडाचा पाश्चिमाभिमुख दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याशेजारी असलेला बुरुज व तटबंदी काही प्रमाणात शिल्लक आहे. हा गडात प्रवेश करणारा मुख्य दरवाजा नसुन परकोटातुन गडात शिरणारा दरवाजा आहे. 
गडावर शिल्लक असलेली एकमेव वास्तु म्हणजे येथे उंच चौथऱ्यावर असलेले भगवंतेश्वरचे कौलारू मंदीर. 
अथवा सिध्देश्वराचे मंदिर. चिरेबंदी बांधणीच्या या मंदिरात ओबडधोबड दगड आहे. या अमूर्त दगडालाच ‘‘सिध्देश्वर‘‘ म्हणतात. 
साधारण ६ फुट उंच चौथऱ्यावर घडीव दगडात बांधलेल्या या मंदिरात एका मोठया खडकाचीच तांदळा स्वरूपात पुजा केली जाते. 
 
मंदीराच्या डाव्या बाजुला घडीव दगडात बांधलेले ८ फुट उंच तुळशी वृंदावन आहे. हि बहुदा समाधी असावी. या समाधी शेजारी एक लहान चौथरा आहे. मंदिरापुढे नव्याने पत्र्याचा मंडप बांधलेला आहे. गडावर लोकांची वर्दळ नसल्याने काटेरी झुडपांचे रान माजले आहे. या झाडीमुळे गडाचे अवशेष ठळकपणे दिसुन येत नाही. झाडीतुन वाट काढत या सर्व अवशेषांची शोधाशोध करावी लागते. मंदिरामागे या झाडीतुन वाट काढत थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजुच्या तटबंदीत गडाचा पुर्वाभिमुख महादरवाजा आहे.
 दरवाजाची चौकट व आतील दोन्ही बाजुस असलेल्या देवड्या आजही शिल्लक असुन कमान मात्र नष्ट झाली आहे. दरवाजा बाहेर पडुन काही अंतरावर गेल्यावर दरवाजा शेजारी असलेले दोन्ही बुरुज पाहता येतात. हा गडाचा मुख्य म्हणजे महादरवाजा आहे. 
गडाची तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन झाडीतुन वाट काढत या तटावर फिरताना अजूनही तग धरून असलेले ३ बुरुज पहायला मिळतात. गडावरील सर्वात उंच ठिकाण म्हणजे गडाचे उत्तर टोक. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासून उंची १९२ फुट आहे. या टोकावर १५ फुट व्यासाचा एक मोठा बुरुज बांधलेला असुन बाहेरील बाजुने या बुरुजाची उंची २५ फुटापेक्षा जास्त आहे. या बुरुजावर तोफांचा मारा करण्यासाठी झरोके ठेवलेले आहेत. या बुरुजावरून खुप दूरवरचा परीसर दिसत असावा पण आज वाढलेल्या जंगलामुळे ५ फुटावर असलेला माणुस दिसत नाही. झाडीतुन वाट काढत फिरल्यास तुरळक चौथरे पहायला मिळतात. गडावरुन आसपासचा परिसर पहायचा असल्यास मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडामागे जावे.  १८० फुट उंचीच्या भगवंतगडावरुन तसा फार मोठा परिसर दिसत नसला तरी जो दिसतो तो अगदी चित्रात काढावा असाच आहे.


येथुन कालावल खाडी व भरतगडाचे विहंगम दृश्य दिसते. गडाचा एकुण परिसर साधारण ३.५ एकर असुन गडमाथा दिड एकरवर तर खाडीकडील भाग २ एकरवर पसरलेला आहे. गडमाथा फिरून झाल्यावर गडाचा उर्वरीत भाग पहाण्यासाठी शाळेकडे यावे व सरळ जाणाऱ्या रस्त्याने खाडीकडे जावे. काही अंतरावर कच्चा रस्ता सुरु होतो. हा रस्ता खाडीपात्राला लागुन जातो. या वाटेने गेल्यावर खाडीच्या काठावर असलेले गडाचे दोन बुरुज पहायला मिळतात. भगवंतगडची तटबंदी टेकडीवरून या बुरुजापर्यंत उतरत आली आहे. या तटबंदीत असलेला गडाचा पहिला दरवाजा पुर्णपणे नामशेष झाला असुन त्याच्या केवळ पायऱ्या शिल्लक आहेत तर दुसऱ्या तटबंदीत बुरुजाशेजारी असलेल्या दरवाजाचे केवळ अवशेष शिल्लक आहेर. दोन बाजूनी उतरत आलेल्या या तटबंदीत एकुण आठ बुरुज असुन मध्यभागी एक विहीर आहे. गडावर या विहिरीतुनच पाणी पुरवठा केला जात असावा. येथे आपली दुर्गफेरी पूर्ण होते. गडाच्या माथ्यावरील अवशेष शोधण्यासाठी व खाडीकिनारी असलेला भाग फिरण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. गडाच्या खाडीकिनारी असलेल्या भागाचा कोठेही उल्लेख येत नसल्याने येथे आलेले दुर्गप्रेमी केवळ टेकडीवरील भाग पाहुन आपली दुर्गफेरी पुर्ण करतात पण खाडी किनारी असलेला हा भाग पाहील्याशिवाय आपली दुर्गफेरी पूर्ण होत नाही. 
    कालवल खाडीच्या दोन तीरावर उभारलेल्या या दोन गडांचा जवळपास सारखा आहे.सावंतांनी भरतगड उभारल्याने प्रतिनिधींनी त्याला उत्तर म्हणून दुसर्‍या उत्तर तीरावर भगवंतगड उभारला. मात्र सावंतांनी १७४७ मध्ये या गडाचा ताबा घेतला. त्याचवेळी सावंत विरुध्द करवीरकर छत्रपती, सावंत विरुध्द आंग्रे या संघर्षात सावंतांना आधार होता तो नानासाहेब पेशवे यांचा. कारण अर्थातच तुळाजी आंग्रे हे वरचढ झालेले नानासाहेबांना सहन होत नव्हते.त्यातच तुळाजींनी सावंतावर हल्ला चढविल्याने नानासाहेबांनी आपली फौज सावंतांच्या मदतीला रवाना केली.
    सन १७४८ साली तुळाजी आंग्र्यांनी कालावल खाडीत आपले आरमार घालून भरतगडावर हल्ला केला.सोबत घोडदळ व पायदळही होतेच.त्यास खुद्द तुळाजी आंग्रे युध्दात उतरले होते.मात्र पेशव्यांचे फौज एनवेळी सावंत आणि भरतगड यांच्या मदतीला पोहचल्याने तुळाजी आंग्रेनी भरतगडाचा वेढा उथवून फौज खाडीपलीकडे भगवंतगडावर नेली.१५ फेब्रुवारी १७४८ च्या पत्रात विठ्ठल विश्राम पेशव्यांना लिहीतात "आंगरेयानी मसुरेयाचे मोर्चा उठवून पलिकडे भगवंतगडास गेले.खाडीत आरमार होते ते झाडून माघारे गेले". याचा अर्थ भगवंतगड आंग्र्याच्या अधिपत्याखाली असला पाहीजे.मात्र आंग्र्यांना भगवंतगडाचा ताबा कधी आणि कसा मिळाला याचा उल्लेख सापडत नाही.
  अर्थात एकदा भरतगड सुरक्षित झाल्यावर पेशव्यांची फौज मदतीला घेउन सावंतांनी भगवंतगड मिळविण्यासाठी तुळाजी आंग्र्यांच्या सेनेवर हल्ला केला. मात्र आंग्र्यांच्या फौजेने कडवा प्रतिकार केल्याने सावंतांना लगेच गड घेणे शक्य झाले नाही.यासंदर्भात १७४८ च्या पत्रात खेमसावंत लिहीतात "भगवंतगड आज सोळा महिने सिबंदी ठेवून राखला आहे. त्याची सिबंदी द्यावी.कर्जाखाली आलो आहोत.गड सरकारात द्यावा किंवा मोडून पडावा".यातून सावंताची हालाखीची स्थिती आणि आंग्रे यांचा दाहक प्रतिकार दिसून येतो.
       तुळाजींनी पोर्तुगीजांचे सहाय्य घेउन भगवंतगडावर हल्ला चढविला.सावंत,पेशवे यांच्या संयुक्त फौजा एका बाजुला तर आंग्रे,पोर्तुगीज यांचे सैन्य दुसर्‍या बाजुला हि लढाई खुप वर्ष चालली.याचे वर्णन विठ्ठल विश्रामनी जाने १७५२ च्या सावंतवाडीवरुन पेशव्यांना लिहीलेल्या पत्रात केले आहे "फिरंगी व हबशी व आंगरे एकत्र होउन येलगार केला,त्यास मारुन काढीले.स्वामीचे पुण्येकरुन येश आले.मागुती तयार होउन येलगार करणार त्यास स्वामीच्या फौजा रवाना केल्या,त्या आजवेर न पावल्या तरतुद सत्वर करावी नाहीतर त्रिवर्ग येक होउन खामखा भगवंतगड घेतात. पुढे गनीम शेर होतो".
     भगवंतगड तुळाजीच्या ताब्यात जाउ नये यासाठी पेशवे निकराचा पर्यत्न करित होते.यावेळी सुरु असलेल्या संघर्षाची माहीती २८ नोव्हेंबर १७५५ च्या पत्रात जिवाजी खंडेराव पेशव्यांना देतो "रघुनाथ दळवी व आम्ही व वरकड सरदार भगवंतगडास आलो, चार आठ रोज जमाव जुडे पर्यंत आंगरे कडील आवई आली कि फिरंगी व आंगरा येक होउन आरमार व खुष्कीने ( जमीनमार्गे ) भगवंतगडास येतात.तो मागलेकडून गनिम येउन भगवंतगडास लागला. युध्दप्रसंग होणे तो जाहला. गनीम पराभुत पावून आला.पुन्हा आंगरा व फिरंग येक होउन भगवंतगडास येतात गनीमाची नेटबाजी भारी एसा समजोन राजश्री मल्हार ( नेमके कोण ?) येउन राहिले आहेत"
     पुढे पेशव्यांनी विजयदुर्गाला साक्ष ठेवून परकीय इंग्रजांची हातमिळवणी करीत स्वकीत आंग्र्याचे आरमार जाळले आणि तुळाजींना कैद केले.सहाजिकच सावंतांना आता आंग्र्यांपासून भिती राहीली नाही.तसेच भरतगड व भगवंतगड यांना असलेली दहशत नाहीशी झाली.मात्र पुढे भगवंतगड करवीरकरांनी सावंतांकडून घेतला ,हि घटना केव्हाची याचा मात्र पत्ता लागत नाही.
     यानंतर भगवंतगडावर नाव घ्यावे अशी लढाई झाली ती १८१८ मध्ये इंग्रज-मराठे अंतिम युध्दात.कर्नल इम्लाकच्या नेतृत्वाखाली सिध्दगड घेउन ब्रिटिश सैन्य २८ मार्च १८१८ रोजी भगवंतगडाच्या दिशेने निघाले.२९ मार्च १८१८ ला रात्री सैन्य भगवंतगडाच्या पायथ्याशी येउन पोहचले व रात्रीच मेढेकोट ( लाकडी ओंडक्यांंचा बुरुज ) तयार करुन एन सकाळी किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला.परंतु ईंग्रज सैन्य खाडीपलीकडे असल्याने तोफांचा मारा योग्य जागी होत नव्हता.म्हणून किल्ल्याच्या तटाला शिड्या लावून हल्ला करावा म्हणून कॅप्टन ग्रे व पिअरसन यांच्या हाताखाली दोन तुकड्या देउन त्यांना खाडीपलीकडे पाठविले.इंग्रज सैन्य खाडीपार करते आहे हे पाहून प्रतिकार करायचे सोडून गडावरचे सैन्य चक्क पळून गेले.हि घटना घडली ३० मार्च १८१८.वास्तविक हेच मराठे वासोटा,सिंहगड्,पुरंदर ईथे शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रज सैन्याशी लढत असताना देखील असा प्रकार नामुष्कीचा आहे.
    गॅझेटीयरच्या उल्लेखाप्रमाणे या गडावर अलीकडेपर्यत १४-१५ तोफा होत्या.त्यांचे आज काय झाले ,हे समजत नाही.तसेच आज गडावर पाण्याची व्यवस्था दिसत नाही.कदाचित गडावर आज जी झाडी माजली आहे,त्यात हे सर्व हरवून गेले असण्याची शक्यता आहे.गडसंवर्धन करणार्‍या एखाद्या संस्थेने मनावर घेतले तर इथल्या झाडीत दडलेले अवशेष पुन्हा मोकळा श्वास घेतील.
   कोकणात फिरताना सोबत खाजगी वाहन असल्यास सकाळी लवकर सुरवात केल्यास सर्जेकोट, भरतगड-भगवंतगड,रामगड हे चारही किल्ले एका दिवसात सहजपणे पाहुन होतात. मालवणहून भरतगड/भरवंतगडला जाताना रस्त्यात आंगणेवाडी, आचर्‍याचे रामेश्वर ही मंदिरे पाहता येतात.
संदर्भग्रंथ :-
१) रत्नागिरी जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) गड्,किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील -सतिश अक्कलकोट
४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची -प्र.के .घाणेकर
५) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
६) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८ ) www.durgbharari.com हि वेबसाईट


 


















 

 

 

 

 

 


इतिहास :
सावंतवाडीकर सावंत व कोल्हापूरकर छत्रपती यांच्यात वरचेवर लढाया होत असत. १७०१मध्ये सावंतांनी कालावल खाडीच्या दक्षिण काठावरील मसुरे गावात भरतगड किल्ला बांधला. त्याला शह देण्यासाठी पंतप्रतिनिधींनी कालावल खाडीच्या उत्तर काठावरील बांदीवडे गावा नजिकच्या टेकडीवर भगवंतगड किल्ला बांधला. पुढे हा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात गेला. १७४८ साली तुळाजी आंग्रे यांनी भगवंतगडावर हल्ला केला, परंतु किल्लेदाराने तो दिडवर्ष चिकाटीने लढवला. २९ मार्च १८१८ रोजी कॅप्टन ग्रे आणि पिअरसन यांच्या नेतृत्वाखालील ४ थ्या रायफलने किल्ल्यावर हल्ला करुन जिंकला.

 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...