Friday, July 8, 2022

मोरोशीचा भैरवगड

   महाराष्ट्र ह्या शब्दामध्ये विस्तीर्ण संपन्न भूप्रदेश उभा ठाकतो. महाराष्ट्र म्हणजे संतसज्जन, शूरवीर, गडकिल्यांची भुमी, सह्याद्रीने उत्तुंग, सागराने गंभीर,  कृष्णा-भीमा-गोदा-तापी नद्यांच्या प्रवाहांनी सुजलाम-सुफलाम. आपले लाडके कवी गोविंदाग्रजांनी “राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा” म्हणुन वर्णलेले आहे. अश्या सह्याद्रीच्या कठिण आणि कठोर पाषाणांनी ठिकठिकाणी असलेलेल्या गडकिल्यांचा देश.याच महाराष्ट्रात गड्,किल्ल्यांनी संपन्न असलेला भाग म्हणजे माळशेज घाट.कल्याण -अहमदनगर यांना जोडणार्‍या रस्त्यावर सह्याद्रीची रांग आडवी येते.इथे सह्याद्रीचे रुप तर उग्र आहे.एका बाजुला हरिश्चंद्रगडाचा रौद्रभीषण कोकणकडा तर दुसरीकडे वर्षानुवर्षे वाटसरुंची सेवा करणारा नाणेघाट.शिवाय जीवधन्,ढाकोबा, कलाडगड्,सिंदोळा हे माळशेज घाटाचे रक्षक त्यावर नजर ठेवून आहेत.याच रुंडमाळेतील एक मोती म्हणजे किल्ले भैरवगड. 






















भैरवगडाची विवीध रुपे

       माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर एका डाईकवर भैरवगड किल्ला उभारलाआहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या ह्या अशा आकारांना शास्त्रीय भाषेत ‘डाईक’ म्हणतात. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकाने बाहेर आलेल्या लाव्हारसाने झाली आहे. या लाव्हारसाचे थंड होताना विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे बेसॉल्ट खडकाच्या विविध आकाराच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. लाव्हरसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लाव्हारसाचे थर एका वर एक थर जमत गेले. त्यानंतर उन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजे "प्रस्तर भिंती";भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत अशा रचनेला डाईक म्हणतात. 
     ही रचना आपल्याला भैरवगडावर पहायला मिळते. भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच एका डाईकवर म्हणजे बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच सरळसोट भिंतीवर बनवलेला आहे. बालेकिल्ल्याची रचना व त्यामागची कल्पकता पहातांना आपण थक्क होऊन जातो. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या अलीकडे मोरोशी गाव आहे. या गावामागे माळशेजच्या मुख्य डोंगर रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. या गडाच्या माचीपर्यंत सहजपणे जाता येते पण गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी मात्र गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. 
पोहोचण्याच्या वाटा :
मुंबई - कल्याण - मुरबाड मार्गे माळशेज घाटाच्या पायथ्याचे मोरोशी गाव गाठावे. (नाणेघाटला जाण्यासाठी आपण वैशाखरे या गावात उतरतो, या गावा पुढेच मोरोशी गाव आहे.) मोरोशी गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत.
भैरवगडाकडे जाणार्‍या वाटा

१) मोरोशी गावाहून माळशेजच्या दिशेने जातांना पोलिस चेकपोस्ट व जय मल्हार धाबा आहे. येथे उजव्या बाजूस ( जय मल्हार धाब्याच्या विरुध्द बाजूस) एक पायवाट जंगलात शिरते. या पायवाटेने १० मिनीटात आपण सुकलेल्या ओढ्यापाशी पोहोचतो. येथून डाव्या बाजूची वाट पकडून समोरची टेकडी चढायला सुरुवात करावी. वाटेत आपल्याला तीन ओढे लागतात.दोन टेकड्या पार केल्या की आपण एका छोट्या पठारावर पोहोचतो. येथे दुसरी वाट येऊन मिळते.वाटेच्या पुढील भागात डाईकच्या पायथ्यापर्यंत दाट जंगल आहेत. गडावर मुक्काम करायचा झाल्यास येथेच तंबू ठोकता येतात. गडावर असणारे इतर अवशेष व पाण्याचे स्त्रोत या झाडीत लुप्त झाले आहेत. 
1


पुढील एक टप्पा पार केल्यावर आपण थेट किल्ल्याच्या माचीवर पोहोचतो. गडाकडे जाणारी हि वाट रुळलेली असुन न चुकता आपण थेट गडाच्या माचीवर पोहोचतो. पायथ्यापासुन माचीवर यायला १.५ ते २ तास लागतात. 
इथे पोहचल्यावर भैरवाचे ते भीषण रुप पाहून आपण थक्क होतो. एखादा पावाचा स्लाईस उभा ठेवावा अशी डाईक रचनेची हि कातळभिंत आपल्याला दिगमुढ करते.विशेष म्हणजे तळाशी हि भिंत निमुळती होत गेल्याने अधीक रौद्र वाटते. इतका वेळ खालून अंदाज न आल्याने हि रचना आपल्याला जागेवर खिळवून ठेवते.कधी एकदा गडाच्या माथ्यावर पोहचु असे आपल्याला होते.मात्र अजून गडमाथा गाठायला बरेच सायास करायचे असतात.अर्थात सब्र का फल मिठा होता है या उक्तीप्रमाणे भैरवाचे हे रुप मनात साठवून पुढे निघायचे.
1
माचीवर प्रवेश करताना आपल्याला गडाचा दरवाजा व तटबंदीसाठी कातळात खोदलेल्या खुणा दिसतात तसेच माचीच्या उजव्या बाजुला काही वास्तुंचे अवशेष दिसतात.या ठिकाणी खडकावर खांब पुरण्यासाठी केलेल खळगे दिसतात. 
माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत सिमेंटमध्ये बांधलेले घरांचे चौथरे दिसतात. गडाच्या माचीवर २००५ पर्यंत आठ-दहा घरांची वस्ती होती पण नंतरच्या काळात हि वस्ती गडाखाली आली. मी हा गड बघायला गेलो होतो तेव्हा श्री. हिरु वाख आपल्या कुटूंबासहीत रहायचे.आता मात्र इथली वस्ती उठली आहे, पायथा ते माची साधारणत: १.५ ते २ तास लागतात. माची वरुन डाईकच्या (बालेकिल्ल्याच्या) पायथ्याशी पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात. डाईकच्या पूर्व टोकाला वळसा घालून खिंडीत पोहोचण्यासाठी १५ मिनीटे व बालेकिल्ला दोरांच्या सहाय्याने सर करण्यास १ तास लागतो.
 
 या माचीवर पोहचलो कि भैरवगडाची पश्चिम बाजुला असलेली सरळसोट उभी भिंत आपल्यासमोर असते.इथून आपण नेमके कशी चढाई करणार ? असा प्रश्न नवख्या ट्रेकर्सना पडतो. पण आपली चढाईची वाट मागून म्हणजे पुर्व दिशेला असलेल्या टोकाकडून आहे. मात्र या बाजुने देखील कसलेले प्रस्तरारोहक चढाई करतात. त्यांचा मार्ग वरील फोटोत दिसत आहे.


bhairavgad entrance

२) मोरोशी गावाहून माळशेजच्या दिशेने जातांना पोलिस चेकपोस्टच्या पुढे उजव्या हाताला वनखात्याने " किल्ले भैरमगड गुंफा मार्ग , वनविभाग ,ठाणे " अशी पाटी रंगवलेली कमान उभारलेली आहे. त्या कमानीच्या बाजूने जाणारी वाट डोंगर उतारावरील शेतां मधून गडावर जाते. हि वाट पहिल्या वाटेला पठारावर मिळते. पुढील मार्ग वर दिल्या प्रमाणेच आहे. 
1
  भैरवगड ट्रेकमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. गडावर रहाण्याची सोय नाही, पण मोरोशी गावात किंवा धाब्यांवर रात्री पुरती रहाण्याची सोय होते. 

गडावर जेवणाची सोय नाही, मोरोशी गावातील धाब्यांवर ऑर्डर देऊन गड चढण्यासाठी जावे.भैरवगडावर आताशा दुर्गारोहींची वर्दळ वाढल्यामुळे तसेच माळशेज घाटातील वाहनांची संख्या व पर्यटनदृष्ट्या आलेले महत्व यामुळे या परिसरात आता बरेच धाबे निघाले आहेत.
भैरवगडाचा व परिसराचा नकाशा 



1

1

bhairavgad sideview

    माची वरुन डाईकच्या ( बाले किल्ल्याच्या) पायथ्याशी पोहोचण्यास १५ मिनीटे लागतात. इथून आपली वाट आता माचीवरुन भैरवगडाच्या पायथ्याशी असलेल्या टेकडीवरुन वर चढते.यासाठी चालताना आपली नजर उजवीकडे म्हणजे भैरवगडाच्या भिंतीपाशी ठेवावी.साधारण पुर्व टोकाच्या आपण खाली आलो कि आपल्या उजव्या हाताला वाट फुटते आणि भैरवगगडाच्या टेकडीवरुन वर चढते.या फाट्यापाशी दोन मोठे दगड व झाड आहे, हि खुण लक्षात ठेवावी.
1
 इथे पायवाटेच्या वर उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक आयताकृती गुहा दिसते परंतू या गुहेत जाण्यासाठी गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. 

तिथेच पायवाटेच्या वरच्या बाजूला गुहेत कोरलेले दोन दरवाजे असलेले पाण्याच टाक आहे. गडावर पिण्याच्या पाण्याचा हा एकमेव स्त्रोत आहे.  न जाणो त्यावेळी किती साह्यवीरांना आणि आता  भटकंतीवर अपार प्रेम करणार्या भटक्यांना ह्या टाक्याने आपले अमृत पाजून तृप्त केले असेल.सध्या तरी भैरवगडावरचे पिण्याच्या पाण्याचे हे एकमेव ठिकाण.इथे मनसोक्त पाणी पिउन भरुनही घ्यायचे.या अश्या कातळात नेमके या ठिकाणी पाणी असेल हे दुर्ग बांधणार्‍या स्थपतींना कसे समजत असेल ? असा प्रश्न पडतो.
यानंतर साधारण शंभर पावले चालले कि हि दुसरी गुहा दिसते.हे सुध्दा बहुधा पाण्याचे टाके असावे.
 1
 बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाला वळसा घालुन आपण भैरवगड व बाजूच्या डोंगरामधील खिंडीत पोहोचतो. सुरवातीला वाट कारवीतून वर चढते आणि मग उतरुन गडाचा कातळाकडा उजवीकडे ठेवत पश्चिमेकडे असलेल्या खिंडीच्या दिशेन जाते. अरुंद आणि घसार्‍याच्या या वाटेवरुन जपून चालायचे.हि सर्व वाट चढाची व घसाऱ्याची असल्याने माचीपासून या खिंडीत यायला ४५ मिनीटे लागतात. 
 1


खर तर गडाची मुख्य बाजू हीच आहे. भैरवगड उजव्या बाजूला ठेवाला तर डाव्या बाजूच्या अवाढव्य डोंगराचा कडा. त्यामुळे प्रत्यक्ष खिंडीत आल्याशिवाय गड सर करण्यासाठी पायऱ्यांचा रस्ता आहे हे कळणे मुश्कीलच.
भैरवगडाच्या या खिंडीत पोहचल्यावर सह्याद्रीचे एक थरारक रुप दिसते.वर्हाड्या डोंगर व त्याचे लक्षवेधी सुळके, सह्याद्रीच्या रांगेचे उभे कडे,पश्चिमेला दिसणारे भोरांड्याच्या दाराची वाट व अंगठा,तसेच त्याच्यामागून डोकावणारा नानाचा अगंठा हा सर्व नजारा या खिंडीतून दिसतो. 
      खिंडीतील या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी दगडात पायऱ्या कोरलेला एकमेव मार्ग आहे परंतु बऱ्याच ठिकाणी या पायऱ्या तुटलेल्या आहेत. इथे उभे राहिले आणि पहिलं तर डाव्या हाताला पायरी उध्वस्त मार्ग आणि उजव्या हाताला गिर्यारोहण करणाऱ्यांचा मार्ग आहे. SCI संस्थेने गडाच्या दोन्ही बाजूला बोल्ट ठोकून आरोहण मार्ग सुरक्षित केला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच त्यांच्यामुळे आमच्यासारखे सर्वसामान्य भटके या गडाला भेट देऊ शकतात.पायरीच्या मार्गाने चढाई करायची असल्याने सरळसोट उभ्या चढणीच्या वाटेने वरती आलो ईथुन डावीकडे वळलो कि पुढे पायरीमार्ग लागतो.
1

Bhairavgad way

bhairavgad basecamp
जवळपास ८० अंशाची उभी चढाई आणि तुटलेल्या पायऱ्यांमुळे किल्ल्यावर जाणारी वाट धोकादायक झाली आहे. साधारण ४० पायऱ्या चढल्यावर आपण कातळात खोदलेल्या एका टाक्यापाशी पोहोचतो. 










bhairavgad rappelling view




    इथून खरा थरार सुरु होतो. पायर्‍या चढून आपण एका पाण्याच्या टाकीपाशी पोहचतो.इथून पुढचा मार्ग पायर्‍या तुटल्यामुळे कठीण झाला आहे.कारण अर्थातच इंग्रज ! वास्तविक नाशिक जिल्ह्यातील हर्षगड उर्फ हरिहर गडाच्या कातळकोरीव पायर्‍या बघून कॅप्टन ब्रिग्ज याने त्या तोडल्या नाहीत.ते भाग्य मात्र भैरवगडाच्या नशीबात नव्हते.जीवधनच्या पायर्‍या मेजर एल्ड्रीचने नष्ट केल्या.या पायर्‍याही बहुधा त्यानेच नष्ट केल्या असाव्यत.इंग्रजांनी या गडाच्या पायर्‍या सुरुंग लावुन  तोडताना या टाक्याच्या तळाशी भगदाड पडले आहे व त्यातून सरपटत आत जाता येते. ८ x ४ x ८ फुट लांबीरुंदीच्या या टाक्याच्या मागील भिंतीत लाकडी वासे अडकवण्यासाठी खोबण्या आहेत. हि टाकी कड्याच्या पोटात उघडयावर असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी या खोबणीत वाशे रोवुन त्यावर छप्पर घातले जात असे. या ठिकाणी पुर्वी साखळी लावली होती व शेवटच्या पायरीच्या फटीमध्ये पाचरही लावलेर्ली होती.पण हे सगळे कोणीतरी तोडले आहे.त्यामुळे गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे गरजेचे झाले. 


गुहेच्या पुढील भागातील पायऱ्या उध्वस्त झालेल्या असल्याने या पुढील भागात दोर लाऊन वर चढावे लागते.








 हा साधारणत: १०० फूटाचा भाग पार केल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत.

 या पायऱ्याच्या एका बाजूला कातळकडा व दुसऱ्या बाजूला खोल दरी असुन पायऱ्यावर मुरूमाची माती साठलेली असल्याने जीव मुठीत घेऊन जावे लागते. या पायऱ्या चढताना एका ठिकाणी दरवाजाचे तळाचे अवशेष दिसुन येतात. 
काही पायऱ्या चढुन गेल्यावर उजव्या बाजूला कड्याला लागून खडकात खोदलेले अजुन एक २० x १० x १५ फुट लांबीरुंदीचे अजुन एक कोरडे टाके दिसते. 

पायऱ्या संपल्यावर आपण एका छोट्या उंचवट्यावर पोहोचतो. हे डाईकचे म्हणजेच बालेकिल्ल्याचे गोलाकार पश्चिम टोक असुन येथे ढालकाठीची जागा व एका लहानशा चौकीचे अवशेष दिसतात. ते पाहून डाव्या बाजूच्या वाटेने वर चढायला लागावे. वाटेत अजून एक कोरडे पडलेले पाण्याचं टाकं लागत. या टाक्याच्या पुढे जाताना वळणावर अजुन एका वास्तूचे अवशेष दिसतात. यापुढील वाट निवडूंगाच्या जाळीतून गडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचते.गडाच्या माथ्यावर नावालाही झाड नाही, त्यामुळे दमून वर आलेल्या भटक्यांना विसाव्यासाठी सावलीचा आधार निवडुंगाचाच. कडक तापणार्या उन्हात निवडुंगाने आपली सावली धरतो. 

गडमाथ्यावर मोठया प्रमाणात सुकलेले निसरडे गवत असुन वावरताना काळजी घ्यावी. खिंडीतून इथवर येण्यास १ तास लागतो. गडमाथा अतिशय चिंचोळा ४५० x ६० फुट आकाराचा असून पूर्व-पश्चिम साधारण अर्धा एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्यावर पाण्याचे एक टाके व दोन चौथरे या व्यातिरिक्त कोणतेही अवशेष नाहीत.
 
1
सर्व यातायात करुन एकदाचा गडमाथा गाठला कि डोळ्यांचे पारणे फिटते. गडमाथ्याला गेल्यावर जो नजारा समोर सादर होत होता त्याला कशाचीच सर नव्हती. डावीकडून दिसणारी सदाबहार नाणेघाट घाटघरची बाजू.. समोरून दिसणारी देवदांडय़ाची जणू अंगावर येणारी रांग.. अंजनावळ्याचे वऱ्हाडी उत्तरेला हरीश्चंद्र गड आपली भव्यता सिद्ध करत असतो. कोकणकडा त्याचा रुबाब बाळगून दिसतो. तारामती आणि हरिदास शिखर गगनाला गवसणी घालताना दिसतात. सह्याद्रीतील वारा किती बेफाम असतो ते या माथ्यावर आल्यावर लगेच जाणवते.भगव्याची जोरात होणारी फडफड आणि समोर दिसणारे सह्याद्रीचे उंचच उंच ताशीव कातळकडे डावीकडे दिसणारा भव्य नाणेघाट घाटघर परिसर,नानाचा अंगठा व डावीकडे हरिश्चंद्र, कलाडगड,रोहिदास,कळसुबाई शिखर परिसरडोळ्यांचे पारणे फिटावे आणि कित्येक वेळ तेच दृश्य डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न करायचा. ह्याच साठी केला होता हट्टाहास.  हे निसर्ग सौंदर्य पाहून  आलेला थकवा केव्हांच निघुन जातो.
bhairavgad rappelling



 आता खाली उतरताना आता रॅपलिंग करत एकेकाला उतरायचं असते.जो कडा चढताना वेळ लागला तरी उतरताना रॅपलींगमुळे कमी वेळ लागतो.असा हा राकट रांगड्या भैरवगडाचा ट्रेक सुफळ संपूर्ण झाला आणि आपण समाधानाने पुन्हा परतीची वाट धरतो ती पुन्हा इथे येण्यासाठीच….
      किल्ल्याचा आकार व रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग या परिसरावर लक्ष ठेवण्यास व टेहळणीसाठी होत असावा. भैरवगडचा इतिहासात उल्लेख असला तरी भैरवगड हे नाव अनेक गडांना असल्याने इतिहासात त्याचा नेमका संदर्भ लावणे कठीण जाते. इ.स.१६७२ मध्ये मराठयांच्या ताब्यात असलेला हा किल्ला अठराव्या शतकात मात्र जव्हारकरांच्या ताब्यात होता. इ.स.१८१८ मध्ये इंग्रज अधिकारी क्याप्टन डिकिन्सन याने ६ जानेवारी १८१८ला लिहिलेल्या एका पत्रात भैरवगडच्या पायऱ्यांचे नुकसान केल्याबाबत कळविले आहे. भैरवगडाचं हे थरारक सौंदर्य व आव्हान एकदा तरी अनुभवायला हव असंच आहे. 
     तळटीप : मोरोशीचा भैरवगड हा सह्याद्रीतील एक अवघड गिरिदुर्ग असून पुरेशा अनुभवाशिवाय,गाईडशिवाय व टेक्नीकल साहित्याशिवाय इथे जाणे धोक्याचे आहे तसा कोणीही प्रयत्न करू नये. व अशा कोणत्याही कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही.
सूचना :
जून ते ऑक्टोबर गडावर जाणे टाळावे.
१) भैरावगड (मोरोशी) किल्ला सर करण्यासाठी गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे व साहित्य बरोबर असणे असणे आवश्यक आहे.
२) सोबत ३०० फूटी दोर घेतल्यास कातळटप्पे चढता उतरताना खोळंबा होत नाही.
३) किल्ला उतरतांना रॅपलिंग तंत्राचा वापर करावा.
४) सुळके व भिंती चढणारे गिर्यारोहक हा कातळटप्पा फ्रि क्लाईंबींगने चढू शकतात.

संदर्भ :-
१) ठाणे जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) शोध शिवछत्रपतीच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५) www.durgbharari.in हि वेबसाईट
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७)  Bhalekar117.Blogspot.com, https://treklikevaibhavsachin.blogspot.com/2018/03/trek-to-bhairavgad-moroshi_6.html, https://www.durgpremi.com,http://unadbhatkantee.blogspot.com/2015/06/blog-post_20.html यांचे लिखाण











आकाशी भिडलेला भैरवगड

मिलिंद देशपांडे

महाराष्ट्रात एकूण पाच भैरवगड आहेत. कोयनेच्या खोऱ्यातील वनराजीत वसलेला, कणकवलीच्या जवळ वसलेला नरडव्याचा, हरिश्चंद्रच्या कुशीत वसलेला कोथळ्याचा, घनचक्करच्या रांगेतला शिरपुंजे गावचा आणि माळशेज घाटाच्या पोटात व नाणेघाटाच्या समीप असलेला आणि गिर्यारोहकांचे आव्हान असलेला मोरोशीचा भैरवगड असे हे पाच भैरवगड आपल्या सौंदर्याने मोठ्या दिमाखात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर वसलेले आहेत.

मोरोशीचा भैरवगड हा नाणेघाटाच्या पठारावरून एखाद्या देवळाच्या कळसासारखा भासतो, तर माळशेज घाट उतरून पुढे कल्याणकडे जाण्याच्या महामार्गावरून मोठ्या प्रस्तर भिंतीसारखा दिसतो. त्याच्या मागे असणाऱ्‍या उत्तुंग पर्वत रांगेमुळे तो बऱ्याचदा मिसळल्यासारखा किंवा लपल्यासारखा भासतो. पण नजर चाणाक्ष असेल तर मात्र या महाकाय प्रस्तर भिंतीवरील ताशीव कड्याच्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांमुळे तो लगेच नजरेत भरतो आणि खालून ती अजस्त्र भिंत नवख्यांना दाखवायला तर फारच आनंद होतो. त्याचे हे भीतीदायक रूप पाहून त्यावर जायचे कसे? हा प्रश्न मनाला भिडला नाही तरच नवल.

१९८०च्या दशकात हरिश्चंद्र- नाणेघाट हा परिसर मी कायमच भटकायचो आणि तेही सख्यासोबतींना घेऊन. पण भैरवगडावर जायचा तुटलेला पायरी मार्ग आणि पाण्याची अपुरी व्यवस्था म्हणून बरेच दिवस त्याच्या माथ्यावर पोहोचण्याचा योग आला नव्हता. त्या काळात गिर्यारोहणाच्या साधनांची वानवा असल्याने या साहसी दुर्गाची भ्रमंती अशीच पुढे ढकलली जात होती. १९९०मध्ये मात्र आम्ही चार मित्रांनी मिळून अवघड श्रेणीत मोडणाऱ्‍याया  दुर्गाची वारी यशस्वीरित्या पूर्ण केली.

ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या सह्याद्रीचा लाव्हा रस जेव्हा शांत झाला आणि त्याचे थर निर्माण झाले, त्यातूनच सह्याद्रीत अनेक प्रस्तर भिंती आणि सुळक्यांची निर्मिती झाली. सातमाळ रांगेतील धोडप किल्ला, लोणावळ्याच्या परिसरातील तेलबैला भिंती, त्रंबकेश्वरजवळ असलेला दुर्गभांडार आणि माळशेज घाटातील मोरोशीचा आकाशाला गवसणी घालू पाहणारा भैरवगड ही याची मूर्तीमंत उदाहरणे. अशा प्रस्तर भिंती गिर्यारोहकांना आणि आमच्यासारख्या साहस प्रेमींना साद न घालतील तरच नवल.

अशा प्रकारच्या प्रस्तर भिंतींना डाईकची रचना असे म्हटले जाते आणि याच डाईकच्या रचनेतून तयार झालेला हा उत्तुंग भैरवगड मला बरेच दिवस खुणावत होता. 

पूर्वीची ही सगळी भ्रमंती ‘लाल डब्या’तून, म्हणजेच राज्य परिवहन मंडळाच्या साध्या बसमधून केली जायची. माळशेज घाट हा तेथे कायम पडणाऱ्या दरडींमुळे कायमच धोकादायक समजला जातो आणि त्या काळी तर तेथील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट अशीच होती. त्यातून रात्री तर वाहतूक जवळ जवळ बंदच असायची. पुण्याहून निघून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मोरोशी गावापर्यंत पोहोचायचे म्हणजे द्राविडी प्राणायमच असायचा. पुणे ते ओतुर ही बस पकडायची मग ओतूरमार्गे पुढे कल्याण मुरबाडकडे जाणारी बस धरायची. पण त्यांची उपलब्धता इतकी कमी की मोरोशी गावात पोहोचेपर्यंत अख्खा दिवस कारणी लागायचा. त्यामुळे योग्य नियोजन असेले तर या एका किल्ल्यासाठी दोन किंवा तीन दिवस खर्ची पडायचे, पण आता मात्र रस्ता उत्तम असल्याने आणि शासनाच्या तसेच स्वतःच्या गाड्यांची रेलचेल असल्याने अगदी भल्या पहाटे उठून भैरवगडाचा माथा गाठून रात्री पुण्यात परत येणे अवघड राहिलेले नाही. असा मुख्य डोंगररांगेपासून सुटावलेला आणि चारशे फूट सरळसोट ताठ मानेने उभा असलेल्या या भन्नाट आणि साहसी दुर्गावर जायची मजा न्यारीच आहे.

पुण्याहून दुपारी निघावे आणि आळेफाटा येथून नाशिक महामार्ग सोडून डावीकडे ओतूर गावाकडे वळावे. डिंगोरे, ओतूर, बनकर फाटा, मुंजाबाचा डोंगर, डावीकडे दिसणारी हटकेश्वर रांग, हडसर किल्ला, पिंपळगाव -जोगा धरणाचा जलाशय आणि त्यामागे अजगरासारखा पसरलेला हरिश्चंद्रगड, माळशेज घाटाच्या ऐन माथ्यावर वसलेले महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे अप्रतिम रिसॉर्ट, माळशेज उतरताना लक्ष वेधून घेणारा काळूचा धबधबा आणि संपूर्ण घाटातून दिसणारी निसर्गमाया पाहत भैरवगडाच्या कुशीत वसलेल्या मोरोशी गावात मुक्कामाला जावे. गावातील स्थानिक तुमची राहायची व्यवस्था करतात किंवा हायवेवरील काही हॉटेलदेखील आता पर्यटकांच्या स्वागताला तयार असल्याने मुक्कामाची व्यवस्था तेथेदेखील होऊ शकते.

मोरोशीतून भल्या पहाटे उठून हायवे क्रॉस करून वनखात्याने निर्माण केलेल्या ‘किल्ले भैरवगड’ या कमानीतून सरळ थोडेसे शेतातून आणि मग जंगलातून चढण चढत आपण साधारण दीड ते दोन तासाच्या चालीने किल्ल्याच्या पदरात किंवा माचीवर पोहोचतो. पूर्वी इथे छोटेखानी वस्ती होती पण अपुऱ्या सुविधांमुळे ती आता मोरोशीला येऊन मिळाली. माचीवर सुंदरसे पठार आहे आणि तेथून पूर्ण आणि स्पष्टपणे भैरव गडाचा जो रुद्रावतार दिसतो तो पाहून काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. ही अख्खी भिंत आपल्या अंगावर येईल का काय असे भासते. तेथूनच दिसणारा देवदांड्याचा डोंगर, नाणेघाटाच्या पठारावर आणि अजनावळे गावालगत असलेले वऱ्हाडचे डोंगर, कोकणात उतरणाऱ्या भोरांडे नाळेची बाजू, नाणेघाटात आपले टोक घेऊन आकाशाशी सलगी करणारा नानाचा अंगठा हे सह्याद्रीचे रौद्र सौंदर्य पाहून आपण बेभान तर होतोच आणि आपला थकवादेखील पळून गेलेला असतो. आम्हीदेखील थोडी पोटपूजा आणि तहान भागवत पुन्हा पायातले बळ एकवटून या अजस्र भिंतीच्या माथ्यावर जाण्यास मार्गस्थ झालो. या पठारावरून पुढे अगदी भिंतीच्या तळातून चढ चढत थोड्याशा घसाऱ्यावरून ही वाट गडाच्या भिंतीला वळसा मारून चालू होणाऱ्या पायरी मार्गाच्या खिंडीकडे आपल्याला घेऊन जाते. वाटेत आपली तृषा भागविण्यासाठी एक अप्रतिम कोरलेले टाके आहे. पाण्याची हीच काय ती एकमेव व्यवस्था आहे. अगदी गडाच्या माथ्यावरसुद्धा आणि वाटेतल्या टाक्यांमध्येदेखील पाणी अटलेले असते, त्यामुळे पाणी पिऊन आणि सोबत साठा घेऊनच पुढे मार्गस्थ होणे उचित ठरते.

इंग्रजांनी अनेक किल्ले उद्ध्वस्थ केले, त्यातून या किल्ल्याचादेखील दर्जेदार असा पायरी मार्ग सुटला नाही. खिंडीत पोहोचल्यावर पायरी मार्ग आणि एकूणच तो कातळ कडा मान वर करून पाहताना, आपल्या डोक्यावरची टोपी कधी गळून पडते ते कळत नाही. सुरुवातीचा पन्नास-साठ फुटांचा टप्पा बऱ्‍यापैकी चांगल्या स्थितीत असल्याने तिथपर्यंत सुरक्षा दोराची फारशी गरज भासत नाही. पण त्यावर असलेल्या एका गुहेपाशी पोहोचल्यावर मात्र त्याला असलेल्या छीद्रातून त्या गुहेत प्रवेश करावा लागतो आणि येथून मात्र पुढील पायऱ्या उद्ध्वस्त असल्याने गिर्यारोहणाचे कसब तंत्र आणि योग्य ती साधने यांचा योग्य वापर करूनच गडाच्या माथ्यावर पोहोचता येते. अवघड टप्पा आणि नंतरच्या सर्व पायऱ्या बऱ्याच ठिकाणी ओपन असल्याने या संपूर्ण मार्गावर सुरक्षा दोर लावणे अत्यंत गरजेचे आहे. अंदाजे दीडशेहून अधिक उंचीचा हा टप्पा वळणे घेत, एका बाजूला आ वासलेली दरी तर दुसऱ्‍या बाजूला खडा कातळटप्पा अशा अरुंद मार्गाने घोरपडीच्या तंत्राचा वापर करतच आपण माथ्यावर पोहोचतो. वाटेतील दोन-तीन टाकी बुजलेली आणि सुकलेली आहेत. शेवटचा टप्पा पार करताच आपण निवडुंगाच्या जाळीतून अंग चोरत सर्वोच्च टप्प्यावर किंवा माथ्यावर येतो. गडाचा माथा म्हणजे एक अरुंद धार आहे. दोन्ही बाजूला खोलवर पसरलेल्या दरीचे सौंदर्य न्याहाळत पूर्वपश्चिम पसरलेल्या या अंतिम टप्प्यावर असलेल्या भगव्यापाशी पोहोचताच आपला ऊर आनंदाने भरून येतो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून येणारा भन्नाट वारा पीत, नाणेघाटाचे टोक ते हरिश्चंद्रगडाचा परिसर आणि नटलेल्या डोंगररांगा यांचे विहंगम दृश्य मनाला फारच मोहून टाकते.

त्या दिवशी आम्हा चौघांना गड माथ्यावर पोहोचेपर्यंत सकाळचे दहा वाजून गेले होते. डिसेंबर महिना असला तरी उन्हाचा चटका या उजाड भैरवगडाच्या माथ्यावर चांगलाच जाणवत होता. गडावर बघण्याजोगे काहीच नसल्याने आणि आजूबाजूचा ३६० अंशात पसरलेला परिसर बघून, फारसा वेळ वाया न घालवता येताना केलेली प्रस्तरारोहणाची कसरत आणि जाताना करावा लागणारा रॅपलिंगचा थरार याची चर्चा करत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.

त्याकाळी म्हणजे आम्ही गेलो तेव्हा, हा किल्ला अजिबात सुरक्षित नव्हता पण. पुण्यातील सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह (SCI) या संस्थेने तेथे मारलेल्या केमिकल बोल्ट्समुळे तो खूपच सुरक्षित झाला आहे. असे असले तरीही योग्य मार्गदर्शक, गिर्यारोहणाचे पूर्ण ज्ञान असलेला नेता आणि गिर्यारोहणाची सर्व साधने बरोबर घेऊनच हे धाडस केलेले बरे, हे मी माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवाने सांगतो.

जून ते ऑक्टोबर हा पर्जन्यकाळ सोडता आडवाटेवरचा आणि आपल्यामध्ये असलेल्या साहस शक्तीला आव्हान देणारा हा मोरोशीचा भैरवगड एकदा तरी जाऊन पाहायला काहीच हरकत नाही. या किल्ल्यावरील अनेक व्हिडिओ बघताना एका गोष्टीची खंत वाटते, की अनेक अतिउत्साही मंडळी गिर्यारोहणाच्या तंत्राची पायमल्ली करत विनारोप आरोहण करत असतात. इतकेच काय तर फाजील आत्मविश्वास बाळगत सेल्फी स्टिकने शूटिंग करत करत वर चढतात. पण त्यांना हे भान नसते की आपण आपल्या आणि आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांच्या जिवाशी खेळतोय. साहस असावे पण ते अतिरेकी नसावे, कारण अनुकरणप्रिय आणि अपुरा अनुभव असलेली मंडळी हेच बघून साहस करतात आणि ते साहस त्यांच्या जिवाशी बेतण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे एकूणच ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंगचे क्षेत्र आणि त्यात अनेक वर्षे कार्य करणारी मंडळी नाहक बदनाम होतात. जे करायचे ते निसर्गाचे भान ठेवून आणि जरा जपूनच, म्हणजे अशा अनेक साहसी सौंदर्य स्थळांना आणि सह्यगिरीच्या गिरी शिखरांना आपण पूर्ण आत्मविश्वासाने न्याहाळू शकू, तसेच आपल्याबरोबर हा आनंद इतरांनादेखील वाटू शकू!


https://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sahyagiri-story-milind-deshpande-marathi-article-5880
























No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...