Wednesday, July 20, 2022

हिंदू लेणी –

लेणी म्हणजे डोंगरातील खडक खोदून तयार केलेली गुहा/गुंफा. भारतात खडकांतून कोरलेली सु. १,२०० लेणी आहेत. त्यांतील हजाराहून थोडी जास्त लेणी महाराष्ट्रात आढळतात. भारतामधील लेणी जैन, बौद्ध आणि वैदिक (हिंदू) अशा विविध धर्मपंथीयांनी कोरलेली आहेत. त्यांत बौद्ध धर्मीयांच्या लेण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ही लेणी कोणत्याही धर्मपंथाची असली, तरी लेण्यांचे ऐहिक व धार्मिक असे प्रमुख दोन प्रकार आहेत. ऐहिक लेणी फारच थोडी आहेत. धार्मिक प्रसार-प्रचार हाच प्रमुख हेतू सामान्यतः बहुतेक लेण्यांतून दिसून येतो. या लेण्यांचा सर्वसाधारण काळ इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. नववे शतक असा मानला जातो. गिरिशिल्पांची ही परंपरा आठव्या-नवव्या, कदाचित दहाव्या शतकापर्यंतही चालू होती.

Formerly, Udayagiri and Khandagiri

  भारतातील लेणी मिर्मितीचा एकंदरीत आढावा घेतला तर सुरवातीच्या काळात फक्त बौध्दांनीच लेण्यांची निर्मिती केली. त्यामुळे या लेण्यात रहाणार्‍या बौध्द भिक्षुंच्या निवासासाठी विहार तर धार्मिक कार्यासाठी चैत्यगृह असे स्वरुप होते.इ.स. दुसर्‍या शतकानंतर लेणी हि फक्त वर्षावासाची म्हणजे पावसाळ्यात रहाण्याची ठिकाणे न रहाता पुजेअर्चेची म्हणजे धार्मिक ठिकाण असे स्वरुप बनले.नेमके याच काळात ब्राम्हणी लेण्यांची निर्मिती सुरु झाली. ब्राम्हणी लेण्यातील बहुतेक लेणी शैव तर काही लेणी वैष्णव व देवीची आहेत. इ.स. सहाव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेली ब्राम्हणी लेण्यांची निर्मिती इ.स. दहाव्या शताकानंतर अचानक थंडावलेली दिसते.यानंतर बांधीव मंदीराची निर्मिती जोमाने सुरु झाली.ब्राम्हणी लेण्यांच्या निर्मितीकाळातील बांधकाम तंत्राचा याच काळात इतर कारणासाठी सुध्दा वापर झालेला दिसतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रसिध्द देवगिरी किल्ल्याच्या निर्मितीमध्ये लेण्यातील कातळकोरण्याचा तंत्राचा केलेला वापर, तसेच थोडे अप्रसिध्द उदाहरण म्हणजे धुळे जिल्ह्यातील भामेर किल्ल्यात असलेल्या लौकीक शैलगुंफा.देवगिरी दुर्गाची निर्मिती करताना गड अभेद्य करण्यासाठी टेकडीच्या तटबंदीखालील कातळ पुर्ण उभा तासून काढला आहे.या दुर्गात होणारा प्रवेश बिकट करण्यासाठी टेकडीच्या खालून वर जाताना कातळात दरवाजा आणि पायर्‍या कोरुन काढल्या आहेत.
   तसेच भामेरगडाच्या मुख्य दरवाज्याजवळ लौकीक कारणासाठी दालने खोदली आहेत.तसेच तटबंदीत पाण्याची टाकी कोरण्यात आली आहेत. तसेच यात पावसाचे पाणी साठण्याची व्यवस्था केलेली आहे. 
  याचा अर्थ धार्मिक कार्यासाठी असलेली लेणी कोरण्याचे तंत्र इतर कारणासाठी वापरले गेले.
    इसवी सन पूर्व ३ र्‍या शतकात मौर्य सम्राट अशोक याने डोंगर कोरुन लेणी (शैल्यगृह) बनविण्यास प्रारंभ केला. बौध्द धर्माच्या सुरुवातीच्या काळात बौध्द भिक्षू धर्मप्रसारासाठी देशभर संचार करीत असत. पावसाळ्यात त्यांचा संचार बंद असे त्यांना वर्षाकाळी रहाण्यासाठी गुहांची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीच्या काळात या गुंफा साध्याच होत्या. पुढील काळात त्यात शिल्पे कोरण्यात आली. इसवी सनाच्या आठव्या शतकात ही स्थापत्य कला परमोच्च बिंदूला पोहोचली होती, याच काळात अद्वितीय, अलौकिक कैलास लेणे (वेरुळ) ‘‘आधी कळस मग पाया’’, या पध्दतीने खोदण्यात आले. या स्थापत्य कलेची सांगता इसवीसनाच्या १३व्या शतकात झाली.
 भारतात मौर्यकालात प्रामुख्याने सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत (इ.स.पू. २७३-२३२) बौद्ध लेणी खोदण्यास प्रारंभ झाला असावा, असे त्या लेण्यांतील कोरी लेखांवरून ज्ञात झाले आहे. खुद्द अशोकाने प्राचीन मगध देशात (बिहार राज्य) बराबर टेकड्यांत व त्याचा नातू दशरथ याने नागार्जुनी टेकड्यांत आजीविक पंथाच्या भिक्षूंकरिता लेणी कोरविली होती. याच सुमारास भारताच्या इतर भागांत विशेषतः ओरिसात उदयगिरी आणि खंडगिरी येथे तमिळनाडूत महाबलीपूर व गुजरात-काठेवाडात जुनागढ, ढांक इ. ठिकाणी विशाल खडकांतून लेणी खोदलेली आढळतात. भारतात पूर्णतः हिंदू धर्माशी संबद्ध असा एखादाच लेणीसमूह आढळतो. वेरूळसारख्या ठिकाणी तर बौद्ध, जैन व हिंदू असे गुफांचे तीन स्वतंत्र समूह आढळतात. 
         भारतात एकूण सुमारे १२०० लेणी आहेत. त्यापैकी ९०० पेक्षा जास्त बौध्द, २०० पेक्षा अधिक ब्राम्हणी(हिंदू) व सुमारे १०० जैन लेणी आहेत. यापैकी सर्वाधिक लेणी महाराष्ट्रात आहेत. याची मुख्य कारणे तीन आहेत. पहीले नैसर्गिक कारण म्हणजे ‘‘सह्याद्री’’, अशा प्रकारच्या स्थापत्य कलेसाठी आवश्यक असणारा कठीण व एकसंध दगड सह्याद्रीत विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. दुसरे कारण म्हणजे राजकीय स्थैर्य. सम्राट अशोकानंतर उत्तरेतील त्याच्या साम्राज्यात फुट पडून छोटी छोटी राज्ये तयार झाली. त्याच वेळी महाराष्ट्रात सातवाहनांची सत्ता प्रस्थापित झाली. इ. स. पूर्व ३ रे शतक ते इ.सनाच्या २ र्‍या शतकापर्यंत अंदाजे ४०० वर्षे सातवाहनांनी राज्य केले. या राजकीय स्थैर्याच्या काळात महाराष्ट्रातील सुरुवातीची लेणी खोदली गेली. ती आन्ध्र नदीचे खोरे व नाशिक परिसरात आहेत. त्यानंतर आलेल्या वाकटाकांची राजधानी विदर्भात असल्यामुळे त्या काळात राजधानी नजीक लेणी खोदली गेली.
Udayagiri and Khandagiri Caves (Leni)

सहाव्या शतकात चालुक्यांनी बदामी येथे राज्य स्थापन केले. बदामीची लेणी याच काळात खोदली गेली. ब्राम्हणी लेणी खोदण्याची प्रथा इ. सनाच्या ६ व्या शतकाच्या शेवटी चालुक्यांनी सुरु केली. चालुक्या नंतर आलेल्या राष्ट्रकुटांच्या काळात वेरुळचे कैलास लेणे खोदण्यात आले. तसेच जैन लेणी खोदण्याची प्रथाही याच काळात सुरु झाली. चालुक्य, राष्ट्रकुट, यादव यांची राज्ये मैदानी होती. चालुक्य राजवटीच्या उत्तरार्धात त्यांनी मंदिरे बांधण्यास सुरुवात केली. मंदिर कोठेही बांधता येत असे व त्यासाठी लेण्यांच्या तुलनेत कमी वेळ व पैसा लागत असे. या कारणांमुळे १० व्या शतकानंतर लेणी खोदण्याची प्रथा मागे पडली.


महाराष्ट्रात सर्वाधिक लेणी असण्याचे ३ रे कारण आर्थिक आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातून जाणारे संपन्न व्यापारीमार्ग. महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यावरील कल्याण, शुर्पारक(सोपारा), चौल, पालशेत इत्यादी बंदरात उतरणारा माल व्यापारी मार्गाने नाशिक, पैठण, उज्जैन या शहरां मधील बाजारपेठांमध्ये जात असे. पश्चिम किनार्‍यावरील बंदरामार्फत परदेशाशी होणार्‍या या व्यापारामुळे व्यापार्‍यांची भरभराट होत होती. त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून व राजाश्रयामुळे ही लेणी खोदली गेली. त्यामुळे संपन्न बंदरे, व्यापारी मार्ग, बाजारपेठा, राजधान्या यांच्या आसमंतात ही लेणी मुख्यत्वे करुन आढळतात.
             बौद्ध लेण्यांत चैत्य आणि विहार असे दोन प्रकार आढळतात. जैन लेण्यांमध्ये चैत्यगृह नाही आणि वैदिक लेण्यांत चैत्यगृह आणि विहार ही दोन्ही नाहीत. त्यामुळे वैदिक लेणी बहुतांशी उत्कीर्ण देवालय-प्रासादाच्या स्वरूपाचीच आहेत.बौध्द लेण्यांचा कालखंड सरल्यानंतर ब्राम्हणी लेण्यांची निर्मिती झाली. हि ब्राम्हण शैलगृहे बौध्द शैलगृहापेक्षा आकाराने मोठी आणि अधिक कोरीवकाम असणारी असली तरी या लेण्यांच्या निर्मितीचा हेतु बौध्द लेण्यांपेक्षा वेगळा होता. अर्थात सुरवातीच्या काळात बौध्द लेण्यांचा प्रभाव असल्यामुळे ब्राम्हणी लेणी बौध्द लेण्यांची नक्कल असली तरी बौध्द भिख्खु संघ आणि ब्राम्हणी मठ यांचे स्वरुप वेगळे असल्यामुळे वास्तुशैलीत फरक पडत गेला. शैब आणि वैष्णव पंथीयांची लेणी हि पुजे अर्चेची ठिकाणे होती. सहाजिकच छोट्या खोल्यांचा अभाव, दर्शनी भिंतीवर उठावातील कथात्मक दृष्ये, प्रदक्षिणा पथ हे बदल स्वच्छपणे दिसून येतात. 
     बौध्द लेण्यांच्या तुलनेत ब्राम्हणी शैलगृहात फारच कमी शिलालेख आढळतात. हे शिलालेख नसल्यामुळे शैव आणि वैष्णव लेण्यांच्या कालखंड ठरवण्यात मोठी अडचण होते. लेणी संशोधक बर्जेसच्या मते या लेण्यांचा कालखंड इ.स.५०० ते ८०० असा आहे.कर्नाटकातील आयहोळ येथील शैलगृह सर्वत आधीचे असून महाराष्ट्रातील वेरूळ हे लेणे सर्वात शेवट्चे आहे. 
   महाराष्ट्रातील शैलगृहांचा कालखंड पुढील प्रमाणे आहे.
    शैलगृह                                     ठिकाण               जिल्हा                    काळ
१) शैव आणि जैन लेणी                   खरोसा              लातुर                          इ.स. ५००-७००
२)शैव लेणी                               अंबाजोगाई               बीड                          इ.स. ५५०-६००
३) ढोकेश्वर                               टाकळी ढोकेश्वर    अहमदनगर                  इ.स.५६०- ६००
४) रामेश्वर                                      वेरुळ                 संभाजीनगर               इ.स. ६००-६५०
५) रावण कि खाई ,दशावतार             वेरुळ                 संभाजीनगर              इ.स.६००-७००
६) घुमार लेणे आणि
   रामेश्वरच्या उत्तरेकडील लेणे          वेरुळ                औरंगाबाद                  इ.स.६५०- ७२५
७) एलिफंटा किंवा घारापुरी              घारापुरी वेट           रायगड                      इ.स.७२५-७७५
८) जोगेश्वरी व मंडपेश्वर          जोगेश्वरी व बोरीवली     मुंबई उपनगर
९) पातुर लेणी                                   पातुर                      अकोला
१०) रुद्रेश्वर                                    वेताळवाडी              संभाजीनगर                 इ.स. ७००-८००
११) शृंगार चावडी                                 पाटणे               जळागाव      
१२) सातारा जिल्ह्यातील विखुरलेली शैलगृहे
१३) कैलास                                         वेरूळ            संभाजीनगर                        इ.स. ७२५-८००
    
 बर्जेसच्या मते बदामीचे चालुक्य आणि वेरुळचे राष्ट्रकुट यांच्या कारकिर्दीतही लयननिर्मिती चालुच राहिली. भांदक जिल्हा-चंद्रपुर येथे सापडलेल्या शैलगृहावरुन वाकाटक काळातही शैव व वैष्णव लेणी कोरली गेली. तसेच कोल्हापुर जिल्ह्यातील गगनबावड्याजवळील असलेली पळसंब्याची एक पाषाणी शैवमंदीर चालुक्यपुर्व कालखंडातील आहेत.
   यामु़ळे या लेण्यांचे वर्गीकरण राजघराण्यावरुन न करता कालपरत्वे केले गेले आहे. पाच गटात हि लेणी मोडतात.हे गट असे.
गट १-
चंद्रपुर जिल्ह्यातील भटाळा आणि भांदक वैश्णव लेणे -वाकाटक काळ -इ.स ४०० ते ५००
अकोला जिल्ह्यातील पातुर येथील शैव लेणे
धारशीव जिल्ह्यातील वैष्णव लेणे
नांदेड जिल्ह्यातील शिउर येथील लेणे
  गट २
    या गटातील लेण्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे हि सर्व शैवपंथीय आहेत आणि त्यांचा काळ इ.स. ५०० ते ६०० आहे. हि लेणी बर्‍याच मोठ्या भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुंबईपासून ते दक्षिणेकडे कोल्हापुर तसेच पुर्वेकडे नांदेड, मराठवाड्यापर्यंत पसरली आहेत.या लेण्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हि शैबपंथातील पाशुपत सांप्रदायाची आहेत. इसवी सनाच्या सुरवातीला लकुलीशाने स्थापन केलेला हा पाशुपत संप्रदाय दुसर्‍या चंद्रगुप्ताच्या काळात मथुरा भागात चांगलाच लोकप्रिय झाला होता. लिखित एतिहासिक पुराव्यावरुन लकुलीश हे एतिहासिक व्यक्तिमत्व असण्याची शक्यता वाटते.इ,स. पाचव्या शतकात लकुकीश संप्रदायाचे प्राबल्य पश्चिम भारतात चांगलेच वाढले. लकुलीश हा सध्याच्या गुजरातमधील बडोद्याजवळील कारवण ज्याचे प्राचीन नाव कायावरोहण असावे, याठीकाणी प्रगटला असे मानले जाते.याठिकाणी त्याचे वीटांनी बांधलेले मंदीर आहे.मात्र बौध्द धर्माच्या प्रभावाला मागे टाकून पाशुपत संप्रदायाने महाराष्ट्रात कसा काय प्रभाव वाढवला समजत नाही. बौध्द मठांच्या जवळच पाशुपत संप्रदायाची स्थान दिसतात.याची उदाहारण म्हणजे मुंबई परिसरातील जोगेश्वरी, घारापुरी, मंडपेश्वर आणी वेरुळची काही लेणी.या संप्रदायाच्या लेण्यांना कोणत्या राजाचा राजाश्रय लाभला याबाबत आजही मतभेद आहेत. 
जोगेश्वरीचे शैव लेणे इ.स. ५०० ते ६००
मंडपेश्वर बोरीवली येथील मौर्य क्लचुरी ( त्रैकुटक ) कालीन लेणे
घारापुरी बेटावरील शैव लेणे
संभाजीनगर जिल्ह्यातील कलचुरी कालीन वेरूळ लेण्यातील घुमार लेणे ( लेणे क्र. २९)
नाशिक जिल्ह्यातील अंकाई-टंकाई किल्ल्यावरील शैव लेणे
नांदेड जिल्ह्यातील माहुरचे लेणे
अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वरचे लेणे
कोल्हापुर जिल्ह्यातील पळसंब्याची लेणी
गट ३
या तिसर्‍या गटातील लेण्यांचा काळ इ.स.६०० ते ७०० असा आहे.या गटातील सर्व लेणी संभाजीनगर जिल्ह्यातील घाटनांद्राच्या एका लेण्याचा अपवाद वगळता सर्व लेणी  वेरुळ येथे आहेत.या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महाकाय द्वारपाल, कथा सांगणारे शिल्पपट, सेवक देवता आहेत.या लेण्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चालुक्य राजांचा राजाश्रय लाभला होता. 
   वेरुळ येथे राष्ट्रकुट काळाच्या आधीच्या लेण्यांचे दोन प्रकार आहेत.
१) गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ असलेली लेणी ( सांधार लेणी) :- यामध्ये लेणी क्र. १४, १७,१९ ते २१ आणि २६ हि लेणी येतात. 
२) गर्भगृहाभोवती प्रदक्षिणापथ नसलेली लेणी ( निरंधार लेणी ):- यामध्ये लेणी क्र. १८,२२,२७,२८ हि लेणी येतात.
 सर्वसाधारणपणे असे मानले जाते कि सुरवातीच्या काळामध्ये गर्भगृहामध्ये प्रदक्षिणापथ नसायचा. कारण पुजेची मुर्ती गर्भगृहाच्या भिंतीला चिकटून असायची.मात्र हिंदु पुजनाच्या पध्दतीत कालौघात बदल होउन मंदिरामध्ये प्रदक्षिणापथ आला.हाच बदल बौध्दानी स्विकारल्याने बौध्द लेण्यात अगदी स्तुपाभोवती प्रदक्षिणापथ कोरला जाउ लागला. याचा अर्थ ज्या लेण्यात प्रदक्षिणापथ आहे ती लेणी आधीच्या काळातील तर जिथे प्रदक्षीणापथ आहे ती लेणी नंतरच्या काळातील असा निष्कर्श काढता येउ शकतो.
    संभाजीनगर जिल्ह्यातीळ वेरुळ येथील लेणे क्र. १४,१७,१८,१९,२०,२१,२२,२६,२७,२८ तसेच घाटनांद्रा येथील देवी लेणे
गट ४
     या गटातील वेरुळची लेणी क्र. २३,२४ तसेच गणेश लेणी ,जोगेश्वरी लेणीसमुह यांचा अभ्यास लेण्यांच्या आत गाळ साचल्यामुळे झाला नव्हता, सहाजिकच या लेण्यांचा काळ अजुनही नक्की केलेला नाही.या लेण्यांचा मुर्तीशास्त्रदृष्ट्या, वास्तुशास्त्रदृष्ट्या आणि शिल्पशास्त्रदृष्ट्या या लेण्यांचा अभ्यास करण आवश्यक आहे.याच गटातील कैलास लेणे आणी दशावतारी लेण्यांच्या तुलनेत बा़कीची लेणी दुय्यम असल्यामुळे त्यांचा सखोल अभ्यास झाला नाही.
संभाजीनगर जिल्ह्यातीळ वेरुळ येथील लेणे क्र. २३,२४,२५ तसेच गणेश लेणी व जोगेश्वरी समुहातील लेणी
संभाजीनगर जिल्ह्यातीळ वेरुळ येथील लेणे क्र. १५ हे राष्ट्रकुट कलचुरी कालीन दशावतार लेणे
जालना जिल्ह्यातील भोकरधन येथील लेणे
पुण्यातील पाताळेश्वर लेणी
संभाजीनगर जिल्ह्यातील रुद्रेश्वर लेणी
खरोसा येथील शैव लेणी
 भांदक येथील लेणी
आंबेजोगाई येथील शैव् लेणी   
गट ५
जळगाव जिल्ह्यातील पाटणे येथील शृंगारचावडी लेणी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळ्ची यादव्,शिलाहार कालीन पन्हाळेकाजी लेणी, यात नाथपंथी आणि इतर लेणी
हरिश्चंद्रगडावरील नाथपंथीय लेणी
धुळे जिल्ह्यातील भामेर किल्ल्यावरील लौकीक शैलगृहे
    भारतात खोदलेल्या लेण्यांमध्ये बौद्ध लेण्यांइतकी वैदिक वा हिंदू लेणी प्राचीन नाहीत. हिंदू ब्राम्हणी लेणी खोदण्याची सुरुवात इ. सनाच्या ५ व्या शतकापासून झाली. मध्यप्रदेशातील भोपाळ जवळ (विदीशा जवळ) असलेल्या उदयगिरीची लेणी सर्वात प्राचीन हिंदू (ब्राम्हणी) लेणी असावीत. त्यानंतरच्या काळात कर्नाटकातील बदामी, ऐहोळे येथील लेणी खोदण्यात आली.महाराष्ट्रातही चालुक्यांच्या काळात हिंदू (ब्राम्हणी) लेणी खोदण्याची सुरुवात झाली. वेरुळ, घारापुरी, मंडपेश्वर, आंबेजोगाई, खरोसा, ढोकेश्वर येथे हिंदू लेणी खोदण्यात आली. हिंदू शिल्पींनी प्रथम बौध्दांचे अनुकरण केले; परंतु पुढील काळात खोदलेली लेणी पाषाण मंदिरांप्रमाणे होती. त्यात गोपुरे, चौकटी, कपाटे, देवळ्या यांची योजना करण्यात आली. लेण्यांमध्ये पुराणातल्या कथांवर रामायण, महाभारतावर आधारीत शिल्पपट कोरण्यात आले. या शिल्पांमध्ये आवेश, वेग दिसून येत असल्यामुळे ही शिल्पे        अधिक आकर्षक व परिणामकारक दिसू लागली. विषयाच्या व आशयाच्या वैविध्यतेमुळे शिल्पकारांना अनेक नविन प्रयोग करता आले. हे करताना मूर्तीच्या सौंदर्य व आध्यात्मिक वलयाला धक्का न लावता एकाच मूर्तीतून अनेक रुपके व आख्यायिका सामान्य प्रेक्षकाला समजतील अशा मांडण्यात आल्या. देवतांच्या मूर्तीबरोबर त्यांची वाहाने, प्राणी, पक्षी, झाडे, फळे, वेली, फुले यांनी लेणी सजविण्यात आली. हिंदू धर्मात शैव व वैष्णव हे प्रमुख पंथ होते. लेण्यांवरही यांचा प्रभाव दिसून येतो. सुरुवातीच्या काळातील लेणी एकतर पूर्णपणे शैव किंवा वैष्णव असत. उत्तरकाळात हा भेद मिटून एकाच लेण्यात दोन्ही पंथांची शिल्पे दिसू लागली.
Caves in Maharashtra ,Hindu (Bramhin) Leni , Verul

     या सर्वांत कलात्मकतेच्या दृष्टीने वेरूळ येथील लेणी विशेष लक्षणीय आहेत. त्यांतील काही लेणी बौद्ध विहाराच्या धर्तीवर कोरलेली असल्याचे दिसते. यांत शैव, वैष्णव पंथांशी संबंधित अनेक शिल्पे आहेत. रावणकी खाई, रामेश्वर, दशावतार, सीतेची नहाणी ही वेरूळ येथील उल्लेखनीय हिंदू लेणी होत. वेरूळ येथील कैलास लेण्याचा अद्वितीय सुरेख शैलमंदिर म्हणून उल्लेख करतात. हे शिवमंदिर अखंड खडकातून सभोवतालच्या ओवऱ्यांसह खोदून काढलेले आहे. शैलमंदिर या शिल्पप्रकाराचे हे लेणे ही सर्वांत परिणत अवस्था होय. मध्य प्रदेशातील भिलसा शहराजवळ उदयगिरी येथे एकूण वीस लेणी आहेत. त्यांपैकी दोन जैन गुंफा ओत. उर्वरित लेणी हिंदू धर्माशी संबद्ध असून गुहा क्रमांक पाच तेथील वराहावताराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहे. वराहाची मूर्ती सु. तीन मी. उंच असून त्याच्या दंताग्रावर स्त्रीरूपधारिणी पृथ्वी आहे. वराहाचे शरीर भक्कम असून त्याच्या अंगप्रत्यंगातून सामर्थ्य व चैतन्य ओसंडत आहे, असे वाटते. त्याच्याजवळच ब्रम्हा, शिव, यक्ष, किन्नर इत्यादींच्या सुबक मूर्ती असून त्या पृथ्वी-उद्धाराबद्दल आनंद व्यक्त करताना दर्शविलेल्या आहेत. हे गुप्तकालीन कलेचे एक अप्रतिम शिल्प आहे. गुहा क्रमांक सहात विष्णूच्या उभ्या दोन मूर्ती आहेत. त्यांत त्याची आयुधे स्पष्ट दर्शविलेली असून विष्णूने कौस्तुभमणिहार, वैजयंती इ. माला घातलेल्या असून अन्य अलंकारही मूर्तिकाराने सूक्ष्म रीत्या कोरलेले आहेत. यांशिवाय या गुहेत दोन ओबडधोबड गणेश-मूर्ती आहेत. अशाच गणेशाच्या सुबक मूर्ती गुहा क्रमांक तीन व सतरा यांत आढळतात. गणपतीच्या मूर्तिशिल्पास गुप्तकाळात येथूनच प्रारंभ झाला असावा, असे बहुतेक कलासमीक्षक मानतात. सहाव्या गुहेच्या प्रवेशद्वारातील द्वारपालही आकर्षक वाटतात.
     कर्नाटकातील बादामी (विजापूर जिल्हा) जवळच्या डोंगरात चार लेणी आहेत. त्यांपैकी प्रत्येकी एक शैव व जैन आहे. उर्वरित दोन लेणी वैष्णव आहेत. चालुक्यांनी ती इ. स. सहाव्या शतकात खोदली आहे. येथील वैष्णव लेणी मंगलेश चालुक्य राजाच्या काळी इ. स. ५७८ च्या सुमारास खोदली, असे तेथील शिलालेखावरून ज्ञात होते. त्यात शैव संप्रदायाच्या मूर्ती आढळतात.
    दक्षिण भारतात सातव्या-आठव्या शतकांत प्रस्तरातून मंदिरे, मंडप व रथ खोदून काढण्याची वास्तुपद्धती प्रचलित होती. गुंतूर व त्रिचनापल्ली या जिल्ह्यांत काही मंडप आढळतात. मंडप म्हणजे डोंगराच्या दर्शनी भागात कोरलेली वास्तू आणि रथ म्हणजे स्वतंत्र पाषाणात कोरलेले एक पाषाणी मंदिर.
    तमिळनाडूतील महाबलीपुर येथील वराह, महिषा सुरमर्दिनी, धर्मराजमंडप, कृष्णमंडप, पंचपांडवमंडप या पाच गुहांत पल्लवांच्या अभिजात व परिणत शिल्पशैलीचा आविष्कार आढळतो. यात मंडप-रथ ही संकल्पना पूर्ण अवस्थेत पोहोचलेली दिसते. येथील शैलोत्कीर्ण रथ प्रख्यात आहेत. त्यांपैकी काही दोन वा तीन मजलीही भासतात. महिषासुरमर्दिनी लेण्यातील स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण असून या गुहेतील हंसांच्या रांगांचे अलंकरण लक्षणीय आहे. या लेण्यातील शेषशायी विष्णू व महिषासुरमर्दिनी ही शिल्पे कलात्मक आहेत. या शिल्पांचे रथ हे नाव सार्थ वाटते, कारण पाहणाऱ्याला त्यांची गतिमानता प्रत्ययाला येते. तेथूनच जवळ २९.२६ मी. लांब व सु. १३.१० मी. रुंद असा विस्तीर्ण शिल्पपट्ट असून तो विशेष उल्लेखनीय आहे. त्याच्या फटीत नाग-नागीण यांची अपोत्थित शिल्पे कोरलेली असून, एका बाजूला एक जटाधारी पुरुष तप करीत असलेला दाखविलेला आहे. ती अर्जुनाची प्रतिमा आहे, असे काही तज्ञ मानतात, तर गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथाने केलेल्या तपश्चर्येची ती मूर्ती (गंगावतरण) आहे, असे इतरांचे म्हणणे आहे. त्या खडकावर हत्ती, वाघ, सिंह, यक्ष, सूर्य, गंधर्व, चंद्र, अप्सरा इत्यादींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या गुहांतून पल्लवांच्या इ. स. सहाव्या-सातव्या शतकांतील द्राविड शिल्पशैलीचे सुंदर मिश्रण या रथशिल्पात झालेले आढळते.
Caves in Maharashtra ,Hindu (Bramhin) Leni , Verul
      लेण्यांमधून शिवाचे दर्शन रावणानुग्रह, शिवपार्वती विवाह, अंधकासुर वध, त्रिपुरांतक, अर्धनारीनटेश्वर, नटराज, लकुलीश, लिंगोभ्दव, गंगावतरण, शिव - पार्वती सारीपाट खेळताना  शंकराबरोबर त्याचे गण, नंदी, गणपती, कार्तिकेय हा शिवपरिवार शिल्पांकीत केलेला असतो.
Caves in Maharashtra ,Hindu (Bramhin) Leni , Verul

Caves in Maharashtra ,Hindu (Bramhin) Leni , Verul

Caves in Maharashtra ,Hindu (Bramhin) Leni , Verul
ब्राम्हणी लेण्यात विष्णुचे अवतार शिल्पांकीत केलेले असतात. त्यात वराह, नरसिंह, त्रिविक्रम, कृष्णवतार यांची शिल्पे बर्‍याच ठिकाणी दिसतात. याशिवाय गरुडावर बसलेला विष्णू, शेषशायी विष्णू, कालियामर्दन, गोवर्धनधारी कृष्ण, लक्ष्मी व सरस्वती बरोबरचा विष्णू ही विष्णूची रुपे लेण्यांतून दिसतात. विश्वाचा निर्माता ब्रम्हा, आदीशक्ती महिषासुरमर्दिनी, आठ दिशांचे पालक अष्टदिक्‌पाल, सप्तमातृका, गजलक्ष्मी यांची शिल्पे हिंदू (ब्राम्हणी) लेण्यांतून दिसतात.
शैव लेण्यांतील गणेशमूर्ती
    गुप्तकाळानंतर इ. स. सहाव्या शतकात वराहमिहीर याने लिहिलेल्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात गणपतीची मूर्ती कशी असावी याची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे.
प्रथमाधिपो गजमुखः प्रलंबजठरः कुठारधारी स्यात् ।
एकविषाणो बिभ्रन्मूलककंदं सुनीलदलकंदम् ।।
     म्हणजे शिवाचा गणाधिपती हा गजमुख, एकदंत, विशाल उदराचा, हातात कुऱ्हाड आणि मुळा घेतलेला, असा दाखवावा. या वर्णनाशी जुळणाऱ्या म्हणजे हातात परशु आणि मुळा घेतलेल्या गणेशाच्या मूर्ती सुरुवातीच्या काळात मिळतात. या गणेशाच्या हातात मोदकपात्र दाखवावे असा उल्लेख मात्र बृहत्संहितेत येत नाही. याशिवाय नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे विष्णू, शिव, ब्रह्मा, सूर्य, दुर्गा, बुद्ध, जिन, वरुण, कुबेर इ. देवतांच्या मूर्तीलक्षणानंतर सर्वांत शेवटी गणेशाचे मूर्तीलक्षण दिले आहे. त्यामुळे या काळात गणेश या इतर देवतांइतका लोकप्रिय झालेला नसावा; परंतु त्याला या मूर्तीलक्षणांमधून वगळण्यातही आलेले नाही.
   गुप्त-वाकाटक काळानंतर इ. स. सहाव्या शतकात मध्य प्रदेश, महाराष्ट्रात उदयास आलेल्या कलचुरी राजांच्या काळात शैव लेण्यांची निर्मिती झाली. महाराष्ट्रात घारापुरी, ढोकेश्वर, औरंगाबाद, वेरूळ येथे आपल्याला ही इ. स. सहाव्या, सातव्या शतकात निर्माण झालेली शैव लेणी पाहायला मिळतात. यातील अनेक लेणी ही विशेषतः शैवपंथात इ. स. दुसऱ्या शतकात उदयाला आलेल्या पाशुपत पंथाशी संबंधित आहेत. या पाशुपत पंथाचा उद्‍गाता लकुलीश याचे शिल्प आपल्याला घारापुरी, मंडपेश्वर तसेच वेरूळ येथील लेण्यांत पाहावयास मिळते. या लेण्यांत कोरलेल्या शिल्पांचा विषय जरी शिवाशी संबंधित असला तरी शिवपरिवारातील देवता म्हणून अथवा स्वतंत्र पूज्य देवता म्हणून गणेशाला या लेण्यांतून स्थान मिळालेले आपल्याला दिसते.
    घारापुरी येथील मुख्य लेण्याच्या पूर्वेकडे असलेल्या एका लेण्यात मातृकांच्या मूर्ती आहेत. या मातृकांसोबत गणेश आणि वीरभद्र यांचीही पूजा केली जात असल्यामुळे घारापुरी येथे गणेश आणि वीरभद्र यांच्याही मूर्ती कोरल्या आहेत. याशिवाय याच लेण्याच्या दक्षिणेकडील भिंतीत गणेशाची विशाल मूर्ती कोरलेली होती, परंतु आता ती बऱ्याच प्रमाणात खंडित झालेली आहे. याच गणेशमूर्तीच्या समोरच्या बाजूच्या भिंतीवर कार्तिकेयाची मूर्ती कोरलेली आहे. शिवाचे हे दोन पुत्र असल्यामुळे त्यांची पूजा करण्यासाठी या दोन्ही मूर्तींची योजना योजना येथे केलेली आहे.
       याशिवाय घारापुरी येथील मुख्य लेण्यातील नटराज शिवाच्या मूर्तीसमूहात देखील इतर देवीदेवता गंधर्व यांच्या सोबत बालगणेशाची भासावी अशी एक छोटी गणेशमूर्ती कोरलेली आहे. गुप्तोत्तर काळातील ही गणेशमूर्ती असल्यामुळे ही मूर्ती अलंकारविहीन आहे. परंतु मूर्तीच्या उजव्या हातात परशु दाखविला आहे. या बालगणेशाचे गजमुख हे गुप्तकाळातील भितरगाव (मध्य प्रदेश) येथील मातीच्या गणेशमूर्तीची आठवण करून देणारे आहे.
       वेरूळ येथील लेणे क्रमांक २२ या शैव लेण्यातील मंडपात गणपती, सरस्वती, पार्वती आणि कार्तिकेय एकत्र दाखवले आहेत. याशिवाय या लेण्यातील मुख्य चौकाजवळ असणाऱ्या एका छोट्या लेण्यात सप्तमातृका आणि गणेश, वीरभद्र एकत्र दाखवले आहेत. औरंगाबाद येथील इ. स. सहाव्या शतकातील शैव लेण्यातदेखील विशाल गणेशप्रतिमा आढळते. येथीलच एका चौरसाकृती लेण्यात सप्तमातृका, गणेश आणि बुद्ध यांच्या एकत्र प्रतिमा कोरून केलेली वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीयोजना बघायला मिळते.
         कुषाण काळात देवाचा सेनापती असलेल्या कार्तिकेयासोबत आणि कुबेरासोबत दाखवल्या जाणाऱ्या सप्तमातृका गुप्तकाळापासून गणेश आणि वीरभद्रासोबत दाखवल्या जाऊ लागल्या. यात कुबेर आणि गणेश या दोघांतील यक्ष म्हणून असलेले साम्य लक्षात घेतले पाहिजे.
     ‘पाशुपत सूत्र’ या ग्रंथाच्या टीकेमध्ये ‘जो साधक अष्टसिद्धी प्राप्त करतो, तो गणपती होतो’, असा उल्लेख आढळतो. गणेश हा शिवाच्या गणांचा अधिपती असल्यामुळे ते ‘गणपती’ पद मिळवण्यासाठी पाशुपत पंथातील साधक ह्या अष्टसिद्धी प्राप्त करू पाहतो. यामुळेच कार्तिकेयापेक्षा गणेशाला शैवपंथात महत्वाचे स्थान मिळाले असावे आणि त्याच्या मूर्ती शैव लेणी व मंदिरांमध्ये दिसू लागल्या असाव्यात.
संदर्भ :-
१) मराठी विश्वकोष
२) श्री.अमित सामंत ,आनंद कानिटकर यांचे लिखाण





लांजात शैव लेण्यांचा खजिना

महेश चेमटे,

मुंबई- कोकणचे वर्णन केळीचे वन, आमराई, निळाशार समुद्र असे करतात. मात्र कोकणच्या इतिहासात डोकावले असता नवाश्मयुगाच्या पाऊल खुणा सहज सापडतात. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जावडे-कातळगावात लेणीसमूह आणि एकदगडी मंदिरे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळे इतिहास आणि पुरातत्व विषयात आवड असणाऱ्यांसाठी कोकणात ‘खजिना’ असल्याचे मत लेणी संशोधक आणि अभ्यासक डॉ.अनिता राणे-कोठारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले.
रत्नागिरीतून गोव्याकडे जाताना राष्ट्रीय महामार्ग १७ च्या शेजारी इंदावटी मार्गावर वनगुळे गावात एकाच (जांभा) दगडात कोरलेली चार मंदिरे सापडलेली आहेत. त्यातील तीन मंदिरे ही ब्राम्हणवाडीत आणि एक बौद्धवाडी पाहायला मिळते. लांजापासून पश्चिमेस ७ किमी अंतरावर हे आहेत. ही मंदिरे साधारण ६ ते ७ फूट उंचीची आहेत.
त्यात एक गर्भगृह, नागाचा फणा धारण केलेली गणेशमूर्ती, शिवलिंग दिसून येतात. शिलाहारकालीन ही वास्तू असून मंदिरे पाहता गोवा कूसगाव येथे अस्तित्वात असणाऱ्या एकदगडी देवळांची आठवण येत असल्याचे लेणी अभ्यासकार सांगतात.
जावडे-भोईर गावात सात शैव लेण्यांचा समूह दिसतो.जांभ्या दगडात असल्याने शिल्पात कोरीव काम करणे जरी अवघड असले तरी महत्त्वाची शिल्पे दिसून येतात. यात प्रामुख्याने नागदेवता, शिवलिंग, गणपती, विष्णू, लाकूलिश किरीटार्जुन, ब्रम्ह आणि हत्तीवर बसलेल्या दोन व्यक्ति या शिल्पांचा समावेश आहे. लेण्यांच्या शेजारील कुंडात वेरुळ येथील गणेशलेणींशी साधर्म्य असलेल्या लेणी अपूर्णावस्थेत असल्याचे कोठारेयांनी सांगितले.
लांजा येथील मानवरुपी शिल्पे, २ मीटर लांबीच्या माशाचे शिल्प देखील पाहायला मिळतात. कोकण किनाऱ्याहून दख्खनकडे जाणारा व्यापारी मार्गाचे नकाशे येथे कोरलेले दिसतात. शिल्पांपासून २ किमी अंतरावर कुंडाभोवती शैव लेणी आढळतात.
साधूंना राहण्यासाठी नसून पूजेसाठी या लेण्यांचे कोरीव काम केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे लेण्यांमुळे कुंडाचे पाणी दूषित होऊ नये, यासाठी पाणी जाण्यासाठी ओढा निर्माण करण्यात आल्याच्या खुणा येथे असल्याची माहिती कोठारे यांनी दिली. (क्रमश:)
> सात लेण्यांची वैशिष्ट्ये
शैव लेण्यांपैकी पहिली लेणी ८ फुटी नैसर्गिक गुफेंत आहे. येथे पोहचण्यासाठी दगडी पायऱ्या सध्या तरी अस्तित्वात आहेत. दुसऱ्या लेण्यांमध्ये दोन फुटी सुखासन यक्ष (एक पाय दुमडलेला) आणि नरसिंहाशी मिळते-जुळते शिल्पे आहेत. तिसऱ्या लेण्यांमध्ये ५.४ फुट उंच असलेली विष्णूची चर्तुभूज मुर्ती कोरल्याचे दिसून येते. विष्णूच्या शिरावरील टोपी विठ्ठलाच्या मुर्तीची आठवण करुन देते. वाकाटक काळ सदृश्य मुर्तीची कोरीव काम असून त्यात शंख, चक्र,गदा, पद्म ही आभुषणे साज चढवतात. कुडांशेजारील लेण्यांमध्ये लाकुलिश (पशुपथ पंथ स्वामी) दिसून येतो. शिवाय अन्य लेण्यामंध्ये ४.७ फुट उंचीची उभी ब्रम्हमूर्ती आहे. त्याचबरोबर हत्तीवरील स्त्री, पुरुषांची स्वारी करणारे स्त्री-पुरुष, तपश्चर्या करणारा अर्जुन (किरीटाअर्जुन ) त्याच्या शेजारी बसलेला भक्त अशी शिल्पे लेण्यांमध्ये दिसून येतात. 


https://www.lokmat.com/maharashtra/treasures-lanyat-shaiva-caves/?

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...