Saturday, October 16, 2021

ढाक-बहिरी

लोणावळा म्हणजे मुंबई-पुणे येथील पर्यटकांचे एका दिवसाच्या सहलीसाठी आवडीचे ठिकाण. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते.लोणावळ्याजवळचे गड जसे राजमाची, लोहगड, तुंग्,तिकोना,कोराईगड बघण्यासाठी तसेच पावसाळी विशेष म्हणून गड्,किल्ला नसला तरी नागफणी उर्फ डुक्स नोजला अनेकजण भेट देतात.अलिकडेच अनेक शिवप्रेमी उंबरखिंडीचा रस्ता उतरुन छत्रपती महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणार्‍या समरभुमीला वंदन करतात. पुरातत्व अभ्यासक लोणावळा परिसरातील कार्ले,भाजे,बेडसे लेण्यांना भेट देतात.
मात्र या सगळ्या आकर्षणात एक प्राचीन दुर्ग लोणावळ्याच्या डोंगररांगेत व राजमाचीच्या घनदाट जंगलात काहीसा लांब्,उपेक्षित अवस्थेत खंत करत बसून होता. या किल्ल्याची आपल्या सारख्या रानावनात हिंडणा-या मंडळीना ओळख करून दिली ती आपले सर्वांचे आवडते अप्पा म्हणजे 'गो. नी. दांडेकर' यांनी. आतापर्यंत केवळ तिथल्या ठाकरांमध्येच परिचीत असणार्‍या ढाकच्या बहिरीची सर्वसामान्यांना ओळख झाली ती गोनिदांच्या 'गडदेचा बहिरी' या कादंबरीवाटे.पुण्याहून मुंबईकडे जाताना खंडाळा स्थानक गेले की उजव्या हाताला राजमाचीनंतर हा किल्ला लगेच ओळखू येतो. तसेच रेल्वेने प्रवास करताना कर्जत स्थानक सोडले कि पुर्वेला कातळभिंतीची राकट छाती ताणून खडा असणारा दुर्ग चटकन नजरेत भरतो.मात्र याची ओळख असेल तर त्याच्या खांद्यावरचे ते दोन सुळके आणि ज्याचे आज सर्व दुर्गभटक्यांना प्रंचंड आकर्षण निर्माण झाले आहे ,ती गडद किंवा बहिरीची गुहासुध्दा दिसते.  तसा फारसा कोणाला परिचयाचा नाही. समुद्रसपाटीपासून या ढाकच्या किल्ल्याचा माथा साधारण २९३६ फुट उंचावर आहे. एक मोठा कळकराय नावाचा सुळका व गडावर दुसरा छोटा सुळका ह्याची नेमकी ओळख पटवतो. कळकरायच्या सुळक्यावर चढाई करण्यासाठी अनेक गिर्यारोहक इथे येतात. 
त्यातही बहिरीच्या गुहेपर्यंत जाणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. पण ढाकच्या किल्ल्यावर फ़ार थोडे जण जातात. किल्याचे स्थान व रचना पाहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.अर्थातच या गडाचा इतिहासात कोठेच उल्लेख नाही.मात्र याच्या पश्चिम कड्यावर असलेल्या कोरीव गुंफा उर्फ लेणी तसेच जवळच असलेला राजमाची गड्,कोंढाणे लेणी या खुणा लक्षात घेता ,गड निश्चितच प्राचीन असणार. मावळात असा अपरिचीत इतिहास खोर्‍यांत दडलेला आहे. त्याचा शोध मात्र घ्यायला हवा. ढाकच्या सरळसोट उंच कड्यात एवढ्या अवघड जागी लेणे कोरण्यामागचे कारण तरी काय?

     छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्वाचा प्रदेश असलेल्या बारा मावळातील हे अंदर मावळ. अर्थात आंध्रा नदीचे खोरे. मावळ परिसराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर आढळणार्‍या कातळात खोदलेल्या लेणी. भारतामध्ये खोदलेल्या लेणींच्या ८० टक्के लेणी या एकट्या महाराष्ट्रात आहेत. या परिसरातील कार्ला, बेडसा, भाजे, कोंढाणा या लेणी प्रसिद्द आहेत तशा कातळकोरीव काम नसलेल्या असंख्य लेणी आहेत. ढाकच्या बहिरीच्या लेणीचेही तसेच. तिथे कातळातले कोणतेच नक्षीकाम नाही. लेणीचे स्थान इतके भन्नाट की, सह्याद्रीतल्या सर्वात रोमांचक स्थानात याचा समावेश व्हावा!
   मावळात अपरिचीत, अप्रकाशित लेण्यांची संख्या कमी नाही. ज्या ज्ञात आहेत त्यातील कित्येक लेणींचा इतिहास अद्याप उजेडात आलेला नाही. शिल्पशैली, शिलालेख, मुर्तींची जडणघडण असे कुठलेच पुरावे मागे न ठेवणार्‍या अशा कित्येक लेणी आहेत. यांचे ऐतिहासिक दस्तावेजही सापडत नाहीत. काही लेणी तर इतक्या अवघड ठिकाणी आहेत की, तिथे मोठी जोखिम पत्कारून जावे लागते. बर्‍याच लेण्यात स्वच्छ, थंडगार पाणी वर्षभर उपलब्ध होते. त्यात देवी देवतांच्या मुर्तींची प्रतिके आहेत. अशा अपरिचीत लेण्या जिज्ञासुंच्या शोधक दृष्टीमुळे प्रकाशित येतात.
मावळातील काही लेण्यांतले मुर्ती, नक्षीकाम जगातल्या अनन्यसाधारण कातळकोरीव शिल्पकामात मोडणारे. मोठ्या प्रमाणावर खोदकाम हे सातवाहन काळाशी जोडणारे. म्हणजेच इसवीसनाच्या पहिल्या शतकापासूनचे. त्यानंतरच्या विविध राजवटीतले कातळातले खोदकाम या परिसरात नोंदविले गेले आहे. सातवाहन काळाच्या अगोदरच्या पाउलखुणांचा म्हणावा तितका अभ्यास झालेला नाही किंवा त्यावर विस्तृत प्रमाणावर संशोधन न झाल्याने त्या कालखंडाशी जोडणारा इतिहास उपलब्ध नाही. या अनूषांगाने प्राचीन भारतीय स्थळ वर्णनात उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेतली स्थानांबद्दल फारच तोड्या प्रमाणावर माहिती उपलब्ध आहे.
         आंदर मावळाला आंध्रा नदीवरून हे नामाभिधान मिळाले आहे. सातवाहनांचा उल्लेख, आंन्ध्रभृत्य असा करण्यात आला आहे. काही अभ्यासकांनी यावरून आंध्रा नदी आणि सातवाहनांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. २५-३० किलो मिटरचा विस्तार असलेल्या आंदर मावळात सात ते आठ डोंगरांवर कातळात खोदलेल्या लेण्या आढळल्या आहेत ज्यांची वहिवाट जीवघेणी अवघड आहे. या लेण्यांना दगडात ओबडधोबड पावट्या खोदलेल्या व आत स्वच्छ पाण्याची कातळात खोदलेली टाकी आढळली आहेत. तथापी सातवाहनांशी जोडणारा कुठलाही शिल्पाकृती पुरावा अद्याप प्रस्तापित होऊ शकलेला नाही,ज्या प्रमाणे एखादे लाकूड अथवा सजिवाच्या मृत अवशेषाचे कार्बन डेटिंगवरून ते किती वर्षांपूर्वीचे असावे याचे अनूमान काढला जाते तसे एखादे कातळकाम किती जुने आहे याचे अनूमान काढणारी परिक्षण पद्दती प्रचलित नाही. अत्यंत अवघड ठिकाणच्या लेण्या जिथे आम जनतेची ये जा नाही अशातील टाक्यांच्या तळाचे उत्खनन करून काही प्राचीन पुरावे गवसले जाऊ शकतात का? या टाक्यातला गाळ  वाहून जाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यांच्या तळात काही हत्यारे, एखादं नाणे, भांडे किंवा कौल, माठ, बांगड्यांच्या अवशेषावरून काही दुवे शोधण्याचा प्रयत्न केले तर या लेणींच्या कालमानावर आणि पर्यायाने त्या परिसरातील राजवटींवर महत्वाचा प्रकाश टाकण्यास वाव मिळू शकेल. विद्यापिठ, सरकार किंवा संशोधन कार्यास चालना देणार्‍या एखाद्या संस्थेच्या मदतीने या दिशेने शोध घेण्याची आवश्यकता आहे.
    ढाक किल्ल्याची निर्मीती ही कुसूर घाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली गेली असावी.राजमाचीसोबत ढाक दुर्ग मराठ्यांनी सन १६५६-५७ च्या सुमारास स्वराज्यात सामील करुन घेतला.शिवकाळात गड स्वराज्यात होता.कल्याण, चौल बंदरावरुन होणारा व्यापार प्रामुख्याने पिंप्रिघाट, तोरणघाट, चेंढ्याघाट, मेंढ्याघाट, माळशेज, नाणेघाट, वाघजाईघाट, तुम्हिणी, उंबरखिंड, कुसूर, भोरघाट मार्गे होत असे. एकट्या भोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाळा, प्रबळगड, माणिकगड, राजमाची, लोहगड, विसापूर या किल्ल्यांची निर्मीती केली केली. कुसूर आणि भोरघाटाच्या मधोमध असलेला ढाक किेल्ला विस्ताराने मोठा आहे. त्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या, पाण्याची कातळातली टाकी, तटबंदी, वाड्यांची जोती ही प्रामुख्याने पूर्व बाजूच्या भागात एकवटलेली दिसतात तर गडावरची जुन्या वस्त्या ही प्रामुख्याने पश्चिम भागात आढळते. त्यातही ढाक आणि कळकराय सोडले तर इतर वाड्या वस्त्या आता उठल्या आहेत. ढाकच्या पठारावरही दोन पाच घरांचीच लहानशी वस्ती उरली आहे.

       सांडशी, वदप, गौरकामत अशी पायथ्याची खेडी आता दुर्गम राहिली नाहीत, त्यामुळे वरच्या वस्त्या उठून लोक या पायथ्याच्या गावात स्थायीक झाले आहेत. गाळदेवीच्या घाटाने तुळशीच्या माळावर आता एकमात्र घर दृष्टीस पडते. प्रचंड पावसाच्या या प्रदेशावर निसर्ग मेहेरबान असला तरी बदलत्या वातावरणात, बदलेल्या जीवनशैलीत गडावरून प्रत्येक गरजेच्या गोष्टीसाठी चढाई उतराई हे जिकीरीचे काम असल्याने गडावरची प्राय: सगळीच वस्ती दोनपाच घरांचा अपवाद वगळता उठून पायथ्याच्या गावात स्थिरावली या मागचे एक प्रमुख कारण म्हणजे आजारपणात गडावर औषधोपचाराच्या सुविधांचा अभाव.
झाडांची घटलेली संख्या हे आणखी एक कारण त्या मागे असू शकते. पूर्वी येथे घनदाट जंगल असल्याने पावसाळी शेती सरल्यानंतर वर्षभर जंगलाच्या आश्रयाने फळे, कंद, साली, फुले यांच्या रूपाने औषध अन्न उपलब्ध होते. जंगलात शिकारही मुबलक प्रमाणावर असे. मोठ्या आकाराचे वृक्ष कमी झाल्यामुळे अन्नपाण्याची दादात. शिवाय राजेशाहीच्या काळात वरच्या वस्त्यांमध्ये हातांना काम मिळत असावे. तोही उत्पन्नाचा मार्ग. खरे तर घाटातल्या व्यापारासोबत गडांवर राबता असेल त्याकाळात गडांच्या वस्त्यांमध्ये भरभराट नांदत असणार. ब्रिटिशांनी भारतात सत्ता काबिज केल्यानंतर गडांच्या आश्रयाने सह्याद्रीत लढे उभे राहू नये याकरिता गडांच्या वहिवाटा, प्रवेशमार्ग आणि काही प्रमाणावर पाण्याचेस्त्रोत तोफा सुरूंग लावून नष्ट केले तशा गडांवरच्या वस्त्या ओस पडू लागल्या. त्यातल्या काही वस्त्या इंग्रज भारत सोडून गेल्यानंतरही तगून राहिल्या. ढाक, कळकराय वाडी अशा काही वस्त्या सह्याद्रीच्या डोंगरांवर आत्ता आत्ता पर्यंत होत्या.

ढाक बहिरीला जाणार्‍या वाटा

अशा दुर्गम ठिकणी प्रशासनास वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा जीवनावश्यक नागरी सुविधा पुरविणे जिकिरीचे असल्याने, त्याच प्रमाणे दरडी कोसळण्याचा धोका असल्याने मोठ्या प्रमाणावर डोंगरावरच्या वस्त्या वाहने व मदत पोहोचू शकेल अशा खालच्या भागात हलविण्याचा सपाटा लावला. त्यात ढाकवरच्या वस्त्या उठल्या. भिंमाशंकर जवळ माळीन येथे साठवण तलाव फुटून संपूर्ण वस्ती मातीच्या ढिगाराखाली गाडली गेल्यानंतर सह्याद्रीच्या डोंगरांवरच्या वस्त्यांना घरघर लागली. अशीच एक वस्ती नाशिकच्या ब्रम्हगिरी किल्ल्याच्या विनायक खिंडीतून उठविण्यात आली. या वस्तीवर विनायक बुरूजाचे दगड कोसळून जिवीत हानी झाली होती. कुलंग किल्ल्याच्या पायथ्याला भाम येथील वस्ती अलिकडे उठवून घोटी मार्गालगत नव्याने वसविण्यात आली.  अर्थात ही वस्ती भाम धरणाच्या बुडितात येत असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले.
ढाकच्या किल्ल्याला जायचे तर पाच पर्याय आहेत.
१) राजमाचीमार्गे:-
  लोणावळ्याला उतरुन तुंगार्ली, पांगळोली मार्गे राजमाचीच्या वाटेवर लागलो कि पुढे राजमाची किल्ल्याकडे जाणारा फाटा डावीकडे ठेऊन ४ तासांची १६ किमीची प्रदीर्घ वाटचाल संपवून वळवंड गावात पोहोचतो.वळवंडपासून  १२/१५ किमीची ढाककडे जाणारी वाट पकडली कि सुरुवातीची एक दमछाक करणारी खडी चढण चढून आपण पुन्हा सह्यधारेवर येतो. पाठीमागे राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले दिसत राहतात, शेजारी मांजरसुंबा आभाळात घुसलेला दिसतो. अरूंद असा तो ट्रॅव्हर्स पार करता करताच दूरूनच ढाकचा महाकाय पहाड अचानक नजरेसमोर उभा राहतो. त्याचे भव्य दर्शन अगदी भयचकित करणारे असते.ट्रॅव्हर्स पार करताच एक  उतार लागतो, जवळपास घसरगुंडी करूनच  खालच्या पठारावर आलो कि इथे उजवीकडुन कोंडेश्वरवरून ढाकला येणारा वाट येउन मिळते. .याच मार्गाने अनेक दुर्गभटके राजमाची ते भीमाशंकर असा ट्रेक करतात.
२) कुंडेश्वर / जांभिवली मार्गे :-
   हि वाट सोयीचे असल्याने बहुतेक जण याच मार्गे ढाक बहिरीला जातात. यासाठी लोणावळा लोकलने कामशेत स्टेशनला उतरावे.कामशेतवरुन जांभिंवली गावी जाण्यासाठी एस.टी.बसची सोय आहे किंवा खाजगी जीप्,टेम्पो आपल्याला जांभिवलीला घेउन जातात.पण जांभिवली एसटी अगदी कमी आहेत. स्वतःच्या वाहनाने यायचे झाल्यास रस्ता खराब आहे याची नोंद घेणे.
कामशेत येथील टेंपोचा संपर्क क्रमांक श्री.राम शिंदे- ७३५०२३०८८४. जांभिवली येथील संपर्क क्रमांक श्री. रामभाउ पिरकट -७२६१९०८५९१
          आपले स्वतःचे वाहन असेल तर जास्त सोयीचे.कामशेत ते जांभिवली  हा मार्ग जवळजवळ अर्धा-पाउण तासांचा आहे.पुणे - कामशेत - जांभिवली यामार्गे जांभिवली गावात पोहोचावे. बरेच जण आदल्या रात्री जांभिवलीला येउन कोंडेश्वर मंदिरात मुक्काम करतात.


कोंडेश्वरचे शिवमंदिर



आधी मंदिर बरेच पडझड झालेले होते.


मंदिर परिसरात काही वीरगळ आणि कोरीव दगड पडले आहेत.


मात्र आता गावकर्‍यांनी त्याचा जीर्णोध्दा केलेला आहे.ट्रेकर्सना मुक्कामासाठी अतिशय सोयीचे असे हे मंदिर आहे. 

या मंदिराच्या मागेच कुंडली नदीचा उगम होतो.अर्थात नदी असली तरी इथे तीचे स्वरुप एखाद्या ओढ्यासारखेच आहे.या नदीच्या पात्रात वेगवान प्रवाहाने तयार झालेले रांजणखळगे पहायला मिळतात.


 कुंडेश्वर मंदिरातून ढाकच्या दिशेन निघाल्यास सुरवातील झाडीतून वाट बाहेर पडते आणि आपण एका प्रशस्त पठारावर दाखल होतो. इथे संपुर्ण सह्याद्रीची रांग आणि दरीत कोकण उलगडते. डावीकडे म्हणजे दक्षिणेला राजमाचीचे जुळे बालेकिल्ले आणि मांजरसुंब्याचा डोंगर दिसतो.
तर उत्तरेला म्हणजे उजवीकडे ढाकचा कातळकडा धडकी भरवत असतो.

साधारण पाउण तासाची वाटचाल या पठारावरुन केल्यावर एका ठिकाणवरुन ढाकचा कळकराय सुळका आणि ढाकच्या किल्ल्याचा डोंगर यामधील खिंड दिसते. इथून वाट पुन्हा झाडीत शिरते आणि थोड्यावेळात आपण एका वाटांच्या चौकात दाखल होतो.



















पुर्वी या वाटनाक्यावर गोंधळ व्हायचा कि कोणत्या वाटेने जायचे ? आता मात्र इथे बोर्ड लावल्याने आपआपल्या इच्छीत वाटेने पुढे जाता येते. इथून एक वाट ढाक गाव -कुसुर पठार मार्गे भीमाशंकरकडे जाते तर खाली उतरणारी वाट सांडशी गावाकडे जाते, तर सरळ वाट ढाक बहिरीच्या गुहेकडे जाते.
येथून ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत तासभरात पोहोचता येते. पुढिल मार्ग खाली दिल्या प्रमाणे आहे.

३) सांडशीमार्गे :-
     सांडशी हे गाव ढाकच्या पश्चिम पायथ्याला आहे. इथून चढायचे तर खडा चढ आहे,दाट झाडीतून वाट आहे.त्यात वाटेत कोठेही पाणी नाही.म्हणुन भरपुर पाणी सोबत बाळगावे लागते.त्यामुळे पुरेसा अनुभव आणि वाटांचे ज्ञान असेल तरच सांडशी किंवा कळकरायमार्गे चढण्याचा प्रयत्न करावा.तसेच शक्य झाल्यास सोबत स्थानिक वाटाड्या घेतलेला चांगला.कारण वाट चुकल्यास बरोबर रस्ता सांगण्यास कोणी भेटेल याची खात्री नाही. तसेच सांडशी हे गाव कोकणात येते,त्यामुळे दमट हवामानामुळे लगेच थकवा येतो.तेव्हा सांडशी गावातून चढाई न करता,ढाक बहिरी बघून सांडशी गाव व नंतर कर्जतला जाउन परत जाता येईल्,हे सोयीचे. 

कुंडेश्वर नाका: येथे भेटतात लोभी भटके...

धन्य पावलो कळकराया...बहिरीचे छान दर्शन घडवलेस!

भला थोरला ढाक किल्ला: ठाकुरवाडीवरून दिसणारी बहिरीच्या लेणीकडची बाजू...

कोंडेश्वरमार्गे ढाककडे जाताना वाटांचा एक चौक लागतो.यातील सरळ उतरणारी वाट सांडशीकडे जाते.या वाटेने कमीत कमी चार तास लागतात. उतरताना 'एका आंब्यापासून खाली उतरायला एक शॉर्टकट आहे,मात्र तो सापडणे आवश्यक आहे. त्या आंब्याजवळच एक पाण्याचा साठाही आहे. पण तो आंबा आणि ते पाणी नक्की कुठे आहे, हे शोधावेच लागते. सांडशी इथून दोन पठारांखाली दोन तास दूर आहे. ही वाट खरंच शॉर्टकटची आहे. पहिल्या टप्प्यात सत्तर एक अंशांच्या कोनात झाडीतून ही वाट खाली उतरते. मग सांडशीच्या दिशेने समांतर ट्रॅवर्स मारून अखेरच्या टप्प्यात पुन्हा खडा उतार उतरून एका नदीपाशी ट्रेकर्सचा अक्षरशः कस पाहत ही वाट सांडशी गावात येते. 
४) कळकराय / साळपे गावातून :-
    सांडशीच्या जवळच हि दोन्ही गाव असली तरी इथून वर चढणारी वाट ढाकच्या कड्याखालून थेट वर चढते,मात्र या वाटेने खुप वेळ लागत असल्यामुळे व दमणुक बरीच होत असल्यामुळे सहसा कोणी जात नाही.
५) भिवगड/ ढाक मार्गे :- 
    कर्जतजवळ वदप तसेच गौरकामत गावाजवळ भिवगड हा चिमुकला किल्ला आहे.इथून एक घाटवाट थेट वर चढते ती जाते ढाक किल्ल्याकडे आणि त्याला वळसा घालून ढाकच्या बहिरीच्या गुहेकडे.ज्यांना सह्याद्रीच्या चढाईचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी या वाटेने हा ट्रेक जरुर करावा.मात्र या परिसरातील गावे उठल्यामुळे वाटेत रस्ता चुकल्यास अडचण होण्याची शक्यता आहे.
हि वाट म्हणजे गाळदेव घाटाची वाट.सुरवातीला मध्यम चढाने वाट वर चढते.साधारण तासाभरात एक धनगरवाडा लागतो.इथून तास-दिड तासाची वाटचाल केली कि आपण एका मंदिरापाशी येउन पोहचतो.हेच  हेच ते पठारावरचे खेतोबाचे मंदिर.मंदिराच्या बाहेर लाल रंगाचा चौथरा आणि त्यावर काही देव मांडल्याचे दिसतात.हेच गारुबाईचे ठाणं. आत शेंदूर फसलेली एक ओबड-धोबड मूर्ती आहे हि खेतोबाची मूर्ती.
सगळा थकवा पळवून लावणारे गारू आई देवीचे गर्द झाडीतले ठाणे

ढाक पठारावर गारू आई देवीच्या जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार अशा पद्धतीने केलायं.

गारू आई मंदिराच्या मागे मातीतले टाके नैसर्गिक झर्‍याने भरलेले असते

जुन्या खाणाखुणा पुसून टाकणारा गारू आई मंदिराचा जिर्णोद्धार...

 जुन्या देवळाचा आजच्या पद्दतीने जिर्णोद्धार करण्यात आला आहे. खाली लादी फरशी बसविण्यात आली तर बाहेर स्वागत कमान म्हणून फ्लेक्सचे फलक लावलेत. देवळाच्या मागे मातीच्या लहान गोलाकार खड्ड्यात मुबलक स्वच्छ पाणी. हे पाणी वर्षभर असते, याचा काही तरी जिवंत स्त्रोत असावा. आसपाद दाट झाडी व गवत असल्यामुळे भटकी मंडळी किंवा बहिरी, गारू आईचे भक्त नसतील तेव्हा इथली वन्य श्वापदे येथे पाणी पिण्यासाठी येत असावीत
    इथून पुन्हा दिड तासाची वाटचाल केली कि ढाक गडाकडे जाणार्‍या रस्त्याचा फाटा येतो.मात्र ढाक गड करायचा नसल्यास सरळ वाटेने बहिरीच्या गुहेकडे जाणार्‍या फाट्याकडे जाता येईल.मात्र या पुर्ण मार्गात वाट चुकण्याची शक्यता बरीच आहे.या वाटेने वदप गाव ते ढाक गाव हे अंतर कापण्यासाठी साधारणतः दिड ते २ तास लागतात. पुढे ढाक गाव ते किल्ल्यावर जाण्यासाठी दिड तास लागतो. किल्ल्यावरुन बहिरीच्या गुहेत जाण्यासाठी ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचायला अर्धा तास लागतो.
    या झाल्या ढाक बहिरीकडे जाणार्‍या विवीध वाटा. 
ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. १) बहिरीची गुहा / ३ लेण्यांचा समुह , २) ढाकचा किल्ला.
आपण आधी ढाकचा किल्ला बघणार आहोत आणि मग बहिरीच्या गुहेत जाण्याचा थरार अनुभवणार आहोत.
ढाकचा किल्ला :- 
ढाक गावातून थेट किल्ल्यावर जाता येते किंवा ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीतून किल्ल्याला डावीकडे ठेवत वळसा मारुन आपण किल्ल्याच्या पूर्व भागातून माथ्यावर प्रवेश करतो. या वाटेने ३० मिनीटात गड माथ्यावर पोहोचता येते.तेथून किल्ल्याच्या दक्षिण भागाकडे गेलो असता आपल्याला गडमाथ्यावरून कळकराय सुळक्याचे दर्शन होते.
        आपण ढाक गाव मार्गे गडावर चढाई करणार आहोत तर कळकराय सुळका आणि गड यांच्यामधील खिंडीत उतरणार्‍या वाटेने बहिरीच्या गुहेकडे जाणार आहोत. ढाक किल्ल्याची चढाई सुरू केली कि डाव्या हाताला कुसूर घाट परिसराचे दर्शन घडते. 
ढाक किल्ल्यावरून दिसणारा कुसूरचा परिसर

   गारू आई देवळाच्या उजव्या बाजूला ढाकची उत्तर बाजू चौफेर पसरलेली आहे. तिथे दूरवर एक पावसाळी धबधबा आहे.ढाकच्या उत्तर बाजूने मार्गाक्रमणा करीत आपली चढाई माथ्यापाशी आली कि वायव्य दिशेला ढाक किल्ल्याची लांबवर पसरलेली तटबंदी दृष्टीस पडते. चिरांवर चिरा रचून केलेल्या या तटबंदीच्या बाजूने वहिवाटीचा मार्ग नसल्याने त्यावर मोठ्याप्रमाणावर झाडी व गवत उगवलेले दिसते. आणखी थोडे पुढे चालत असताना गवतात बुजलेली वाट  ढासळलेल्या जुन्या दरवाजाच्या अवशेषांवरून खाली उतरते.
गवत, झुडपा साज पांघरलेली किल्ले ढाकची भली मोठी तटबंदी...

   किल्ल्याच्या पठाराचा विस्तार हा खूप मोठा आहे. त्यावर अनेक वाटा फुटलेल्या आहेत.

   दरवाजापासून आणखी थोडे पुढे गेल्यावर कड्याला लागून तीन कातळात खोदलेली पाण्याने भरलेली टाकी दृष्टीस पडतात. ढाक किल्ल्यावर थोड्या प्रमाणावर असले तरी बर्‍यापैकी असलेले अवशेष समाधान देतात. गवत, झाडीत बुजलेली ही अस्पष्ट वाट अशीच पुढे जाते. ती सोडून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी उजव्या बाजूच्या गवतातून शिखर माथ्याच्या दिशेने चढाई सुरू करावी. अनेक प्रकारची गवत फुले आणि दाट झाडींचे हे जंगल. 
वास्तूच्या पुढे डावीकडे ओढ्यातून चालत गेल्यावर उजवीकडे थोडा वळसा मारून पुढे गेल्यानंतर गच्च झाडीत भलामोठा तलाव दृष्टीस पडतो. तलावात किल्ल्याच्या बांधकामाच्या चिरा पडलेल्या आहेत. तलावाच्या बाजूने वर चढल्यावर एक कोरड पाण्याचं टाकं लागत. इथून थोडे पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजुला जोत्याचे अवशेष दृष्टीस पडलतात. आणखी दहा मिनीटात आपण गडाच्या सर्वोच्च शिखरमाथ्यावर पोहोचतो. 
ढाकच्या बालेकिल्ल्याकडे जाताना लागणारा मोठा तलाव
ढाकच्या बालेकिल्ल्यावरचे जोते

तिरंगा...ढाक बालेकिल्ल्यावरून...

 बोर घाटातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्याकरता ढाक गड ही उत्तम जागा आहे. शेजारीच राजमाचीसारखा मोठा व बलदंड किल्ला असल्याने ढाकचे महत्व कमी असावे. गडावर आज काही मोजकेच अवशेष शिल्लक आहेत. ज्या अर्थी या भागात वाड्याची भली मोठी जोती दिसतात, त्या अर्थी इतिहास काळात येथे पाण्याची काही ना काही व्यवस्था नक्कीच असावी. मात्र त्यांचा काही मागमूस लागत नाही. किल्ल्याच्या माथ्यावर पाण्याची दोन- तीन टाकी आणि एक शिवलिंग असलेले मंदिर आहे. इतर गोष्टी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत किंवा दाट झाडाझुडपात लपल्या आहेत. पुढे सरळ चाल धरून उत्तरेकडे जाताना आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच किल्ल्याच्या पूर्व भागाकडे लक्ष ठेवत जायचं. इथे दुरूनच आपल्याला चार टाक्यांच्या समूह नजरेस पडतो. या टाक्यांत पिण्यायोग्य पाणी तसेच बाजूला सावलीसाठी एक झाड देखील आहे. इथेच सलग तटबंदी देखील पहावयास मिळते. इथून आल्यामार्गे परत मागे फिरावे किंवा एक-दीड तासाची चाल करून ढाक गाव गाठू शकतो. गडफेरीसाठी दीड ते 2 तास लागतात.
    किल्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. माथ्यावरुन पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे व राजमाची, कोरीगड, माणिकगड, कर्नाळा, प्रबळगड, माथेरान, भिमाशंकर, सिद्धगड हे किल्ले दिसुन येतात. 
   ढाकवरुन खाली उतरायचे तर आल्यावाटेने पुन्हा टाक्याकडे परत जाता येईल्,मात्र त्यात बराच वेळ जातो, त्यापेक्षा बालेकिल्ल्याच्या पूर्व टोकाच्या डाव्या बाजूने गचपनातून उतराईची वाट वापरता येईल. भरपूर वाळके गवत आणि निसरड्या उतारावरून खालच्या टप्प्यात डाव्या किनार्‍या लगतच्या वाटेला लागावे.

ढाकचा बालेकिल्ला सोडताना...

गवतात बुजलेल्या, निसरड्या, उताराच्या डोंगरकड्याच्या वाटा...

एकही चुक ना घडो...नजर ना हटो...

एकही चुक ना घडो...नजर ना हटो...

 डोंगरकड्याला चिकटून जेमतेम पाऊल ठेवता येईल इतकीच, पण व्यवस्थित मळेलली ही वाट बर्‍याच ठिकाणी सरळसोट उभ्या, शेकडो फुट खोल दरीचे दृष्टीभय निर्माण करणारी. काही ठिकाणी हातांना पकडण्याचे आधारच नाही. काही ठिकाणी पाय ठेवण्यासाठी जेमतेम पकड घेता येईल असे अगदी पुसटसे आधार तर काही ठिकाणी सरळ गोट्याच्या आकाराचे कातळ, ज्यावर पाय ठेवणे महामुश्कील. काही ठिकाणी मातीचे घरसडे उतार. थोडीशी चुक करण्यालाही वाव नाही, असे हा थरारक प्रवास तब्बल तासभर चालतो. अंतर थोडेच असले तरी प्रत्येक टप्पा हा काळजीपूर्वक पार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.कळकरायच्या खिंडीतली शेवटची कातळ उतराई तितकीच थरारक आहे. येथे दृष्टीभयाची स्थिती नसली तरी कातळारोहणाचा कस लावणारा हा टप्पा सहीसलामत पार करायचा. आता या भटकंतीतील सर्वात आव्हानात्मक चढाई अर्थात- बहिरीच्या गुहेत.
शेवटचा कातळटप्पा कळकराय खिंडीत उतरवताना...

धारेवरची कसरत...




कळकराय सुळका :-

    किल्ले ,लेणी बघणे याबरोबरच हल्ली तरुणाईत सह्याद्रीतील घाटवाटांची भ्रमंती करणे आणि जणु सह्यगिरीच्या कराल दाढा असणार्‍या सुळक्यावर चढाई करणे याची क्रेझ आली आहे.ढाकच्या गडाकडे बहुतेक भटक्यांची पावले वळत होती ती गडदच्या बहिरीच्या दर्शनासाठी ! मात्र आता अनेक जण ढाकच्या किल्ल्याला चिकटून असलेल्या  कळकराय व सुन या सुळक्यावर चढाई करतात.
   हा सुळका मुलत अवघड श्रेणीचा मानला जातो. यातील पहिला टप्पा सोपा आहे.हा टप्पा सत्तर फुट भिंतीचा असून वरील भेगेत मोठा चोक अडकवुन दोर बांधता येइल.   दुसरा टप्पा ३५ फुटाचा असून हा प्रस्तरभिंतीचा टप्पा आहे.दोर लावण्यासाठी यावर खिळाही मारला आहे.तिसरा टप्पा ५० फुटाचा असून हा टप्पा अवघड आहे.उजवीकडील कड्याला वळसा घेत आरोहण मार्गात दोर ओवण्यासाठी पाचर लावली आहे.ट्प्प्याचा वर कोपरा असून तिथेही दोर बांधण्याकरीता पाचर आहे.इथे असलेल्या भेगेत मेखही लावता येईल.
अंतिम टप्पा ४० फुटाचा असून हा सुध्दा अवघड आहे. या मार्गावरील पाचरीत दोर ओवून माथा गाठता येतो. माथ्याजवळचा भाग निसरड्या मातीचा असून इथे मेख ठोकून दोर ओवता येईल.सुमारे चार ते पाच तासाची हि चढाइ आहे. कळकराय सुळक्यावर चढाई करायची तर ढाकच्या बहिरीकडे जाणार्‍या खिंडीच्या डावीकडील झाडीतून थोडे वर चढले कि कळकराय सुळक्याच्या आरोहण मार्गाच्या तळाशी आपण पोहचतो. 

बहिरीची गुहा- 

 आता आपण जाणार आहोत ढाक गडाच्या मुख्य आकर्षणाकडे अर्थात 'बहिरीच्या गुहेत'.या गुहेत असलेले भैरवाचे स्थान पंचक्रोशीत ढाकचा बहिरी वा गडदचा बहिरी म्हणुन ओळखला जातो. ढाकला जाणार्‍यां बहुतेकांचे लक्ष्य असते ते तिथल्या कड्यातल्या अनवट गुहेत-गडदेत जाउन बसलेल्या बहिरीकडे.
 
 
ढाकच्या खिंडीतून वाट पुन्हा चढणीला लागते. तीव्र अशी चढण चढून ढाकच्या भेदक असा कळकराय सुळका आणि ढाकच्या डोंगराला जोडून असलेल्या खिंडीपाशी आपण पोहचतो. पहाडाच्या जवळजवळ २/३ उंचीवर ही खिंड आहे.
 
दोन्ही बाजूना उंच डोंगर आणि त्यामधुन ही चिंचोळी पट्टी खाली उतरत गेली आहे.हिला खिंडीपेक्षा नाळ म्हणणेच जास्त बरोबर. जेमतेम एक माणूस कसाबसा जाईल इतकीच अरूंद ही खिंड, अत्यंत तीव्र उतार, घसार्‍याची वाट यामुळे उतरणे अत्यंत जिकीरीचे आहे. 
 
 


 
 
चार पाच फूट रुंदीच्या ह्या घळीतून सुटी माती असलेल्या वाटेने आपल्याला ८-१० मीटर खाली उतरावे लागते. उतरताना समोरील दरीचे भीषण दर्शन होत असते. 

बहिरीच्या गुहेकडे जाणारी कातळकड्याची वाट
 
 
खिंड संपताना शेवटी एक छोटासा रॉकपॅच आहे. पुढे खाली ३५०० फूट गेलेली पाताळवेरी खोल दरीतून होणारे कोकण दर्शन व शेजारी उंचच उंच ढाकचा कातळ असे अनोखे दृश्य दिसते.
 
 
 
 खिंड उतरल्यावर ढाकच्या कड्याला समांतर (म्हणजेच १००० फूट खोल दरीलाही समांतर) उजवीकडे सरकते.इथेही जेमतेम फूटभर वाट कड्याला लगटूनच जाते. ही वाट पूर्णपणे कातळावरून आहे. अधेमधे खाचा आहेत आणि आता रोप्सही लावता येतात.
 
 
 वाटेत काही कोरीव गुंफा दिसतात. पुर्वी इथे कडयाला लगटून जावे लागे.आता मात्र शक्यतो दोर लावूनच हा टप्पा सुरक्षेची काळजी घेउन पार केला जातो. साधारण दोनशे फुटाचे अंतर पार केले कि आपण बहिरीच्या गुहेच्या खाली आलेले असतो.


 उभ्याच्या उभ्या कड्यात डोक्यावरची टोपी मागे पडेल इतकी मान वळवल्यावर जेमतेम फटीसारखी दिसणारी ती गुंफा बघूनच छातीत धस्स होते.तिथे जायचे या कल्पनेने बरेच जण गळाठतात.काहीजण इथेच थांबायचा निर्णय घेतात.कारण स्पष्ट असते.ढाक बहिरीच्या गुंफेत जाण्याचा थरारक मार्ग आता अगदी समोर आलेला असतो. 


 शंभर एक फूट ट्रॅवर्स मारल्यानंतर वर चढायला कातळात कोरलेल्या १०-१२ पायर्‍या आहेत.जणू स्वर्गारोहण मार्गच.लेणीच्या खालच्या बाजूला आल्यानंतर कातळातला सरळसोट उभा चढाई मार्ग बघून छातीत धस्स होते. अर्धामुर्दा पाय मावेल अशा पावट्या कातळात खोदलेल्या. वरून कातळात ठोकलेले गज, साखळ्या. त्या पकडत वर चढायचे म्हणजे जास्त जोखिमेचे वाटते. त्यापेक्षा कातळात मस्त आधार घेऊन चढणे जास्त सुरक्षित वाटते. ही सगळी चढाई हजार ते बाराशे फुट उंच कड्यावर. 
 
 
 
 दोराचे  किंवा कड्याचा आधार घेऊन पावठ्या चढून वर गेलो कि आता जेमतेम एक पाउल मावेल इतकीच निरुंद वाट परत उजवीकडे वळून हळूहळू वर चढत जाते. कड्याला बिलगून, दोरांचा आधार घेउन हा चाळीस एक फूटांचा दरीला समांतर ट्रॅवर्सचा टप्पा कसाबसा पार करायचा. आधारासाठी लोखंडी तारा लावलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात खरा थरार आहे.आता ऐन कड्यातली गुहा खुणावयाला लगलेली दिसते.खोबण्या दिसेनाश्या होतात, 

 
  
 

 "रॉकपॅचवर स्वत:चेच ठोके स्वतःला ऐकू येतील इतके घाबरलेलो असतो आपण", "पाय नीट ठेवला नाही तर खाली दरी 'आ' करून तयारच असते, सो, ओन्ली वरी अबाऊट दॅट!" इ. इ. इ.

 
 
 
तिथे नव्वद अंशातला चढ सोपा व्हावा म्हणून साधारण १५ फूट उंचीचा एक बांबू बांधलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरांवर खुट्ट्या बाहेर आल्या आहेत.त्यावर पाय देऊन वर चढायचे.या बांबुची वरची बाजू मोकळी असल्याने आपल्या वजनाने ते सहजपणे झुलते. हा बांबू म्हणजे खरोखर एक कौतुकाची गोष्ट आहे! दोर किंवा गज पकडून वर जायचे तर पायाला काही आधारच नाही.आता इथे दोन सागाच्या बल्ल्या ठेवल्या आहेत. त्याच्या इंच दोन इंच जाणीच्या लहानशा फांद्यांवर पाय देऊनच वर चढता येऊ शकते. अक्षरश:  त्या मोडणार नाहीत अशा विश्वासावरच हा टप्पा सर करावा लागतो. जुन्या बल्लीचा वरचा भाग अलिकडे मोडल्यामुळे दुसरी बल्ली ठेवल्याचे ऐकण्यात आले.
   माझ्या मते, कोरड्या ऋतूमध्ये ढाक अजिबात अवघड नाही. थोडीशी एकाग्रता आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने रोप्स, तारांचा आधार न घेताही बांबूपर्यंत पोहोचता येते. बांबू पार करताना मात्र अधिक काळजी घ्यायला हवी. खाली उतरल्यावर ढाक-बहिरीमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातांच्या ज्या कहाण्या ऐकल्या त्यापैकी बर्‍याचशा त्या बांबूच्या शेवटच्या टप्प्यातच झालेल्या आहेत. तात्पर्य, स्वत:ची काळजी सर्वात महत्त्वाची! स्वत:च्या हातापायाच्या ताकदीवरच हा लेणी मार्ग चढला जाऊ शकतो. दृष्टीभय जाणवणार्‍यांसाठी हे ठिकाण नाही. 
 
       यात भरीला भर म्हणून या परिसरात माकडांचा उपद्रव सुरु झाला आहे.कातळावरची हि थरारक चढाई सुरु असतानाच हि माकडे हातातील वस्तु हिसकावायला बघतात.तेव्हा पुर्ण सावधपणाने हा सर्व मार्ग आक्रमकायचा.ढाकची लेणी वेडे साहस करण्याचे ठिकाण नाही. मात्र अलिकडेच केवळ थरार अनुभवायच्या हेतुने इथे मोठ्या प्रमाणात हौसे,गवसे येतात.हे लोक बहुतेकवेळा  गिर्यारोहणाशी संबंधित नसल्याने त्यांच्याकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्राथमिक साधनेही नसतात. हेल्मेट तर बहुतेकवेळा कोणीच आणत नाही. कातळ आरोहण नसेल तर ट्रेकवर कोणी सुरक्षेसाठी गिर्यारोहणाचे शिरस्त्राण घालत नाही. ढाकसारख्या ठिकाणी हेल्मेट घालून येणे अत्यंत आवश्यक आहे. वरून लिंबा ऐवढा दगड डोक्यात पडला तरी त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
      बांबू संपला की, वर जरासा बाहेर झुकलेला कातळ आहे. एका आरोहकाने वर जाऊन खालच्या आरोहकांना सुरक्षा दोर पुरविणे व एकएकाला खेचून घेणे हे केव्हाही सुरक्षित. डगमगणारे ते खोड चढून जाताच आपण अजून एक छोटासा कातळटप्पा ओलांडून या बहिरीच्या गडदेत प्रवेश करतो.हा संपुर्ण चढलो की स्वतःला खरेखुरे, अनुभवी ट्रेकर्स मानण्याचे सार्थक वगैरे होते.






इतक्या अडथळ्यांना पार केल्यावर आपण बहिरीच्या गुहेत पोहोचतो.इथे शेजारीशेजारी दोन गुहा असून एका गुहेत ठाकरांचा अनवट देव बहिरी वसलेला आहे. अर्थात देव म्हणजे बहिरोबाची घुमटी असुन त्यातील मुर्ती म्हणजे शेंदुर फासलेला तांदळा आहे.
बहिरीच्या गुहेतले शीतल जल: अविट...अविश्वसनीय...
या गुहेत पाण्याची २ मोठी टाक आहेत. ढाकच्या बहिरीला इथली ठाकरं, आदिवासी लोक बरेचदा कोंबडं, बकरं बळी देतात. इतक्या वर खांद्यांवर प्राणी वाहून आणणार्‍या त्यांच्या हिंमत जबरी. ती तर या रानचीच लेकरं. 
 
 
 
बहिरीच्या गडदेतल्या पाण्याच्या एका टाक्यात ताटे, वाटी, भांडी असा सर्व संरंजाम आहे. बळी देऊन तिथेच शिजवायचे आणि टाक्यातली भांडी वापरून परत विसळून टाक्यातच ठेऊन द्यायची ही तिथली पद्धत. जीवापेक्षा भांडी जड नसल्याने आणि बहिरीच्या कोपापायी ती कधी चोरीसही जात नाहीत. अर्थात या प्रकारांमुळे गुहेत तशी अस्वच्छताच आहे. पाणी पिण्यासाठी एक स्वछ टाके बाजूचस आहे.शेजारीच पाण्याची २ टाकी खोदलेली आहेत. 





 
दुसरी गुहा मोठी असून ४०/५० माणसे बसू शकतील इतकी प्रशस्त आहे. दुसर्या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे. 
 

 
 
खोदीव अशी ही गुहा कदाचित सातवाहनकालीन असावी मोक्याच्या घाटवाटेवर लक्ष्य ठेवता यावे म्हणूनही खोदली गेली असावी. इतक्या अवघड जागी गुहा खोदणार्‍या त्या अज्ञात शिल्पकारांचे खरोखर कौतुक आहे.
 
 

   एकेकाळी या बहिरीला स्त्रीयांनी दर्शनाला जायचे नाही अशी समजुत होती.कदाचित या ठिकाणी जाण्याच्या अवघड वाटेमुळे अशी समजुत करुन दिली असावी.स्त्रीया आल्या म्हणजे बरोबर मुल असणार. कदाचित अपघात होउन अधिक बळी जाउ नयेत याच हेतुने हि बंदी घातली असावी.आता मात्र या गुहेत मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरुष जातात. ढाक-बहिरी अवघड मानला जाण्याचे कारण फक्त आणि फक्त वर वर्णन केलेले चढाई मार्गाचे रौद्रभीषण सौंदर्य! बाकी हा खूपच सोप्पा ट्रेक आहे.




       गुहेच्या वर साधारण हजार फुट उंचीची कातळभिंत आहे. इथून आजूबाजूच्या निसर्गाचे घडणारे दर्शनही फार विलोभनीय आहे.
 
 
 
गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो.
पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे ,कोरीगड, माणिकगड, भिमाशंकर, सिद्धगड हे किल्ले दिसुन येतात. गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे. 

     बहिरीची पश्चिमाभिमुख गुहा आहे. त्यामुळे सकाळी लवकर ट्रेक सुरु करुन माध्यान्हीच्या आत उतरून खाली उतरुन येणे सोयीचे. साधारण अकरानंतर कातळांवर सूर्य येतो आणि मग हाताला चटके बसतात. बहुतेक जण कोंडेश्वरला मुक्काम करुन ट्रेक करतात.मात्र जर ढाकच्या गुहेत मुक्काम करायचा असेल तर येथील राहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बहिरीची गुहा हेच होय.इथे अर्थात जेवणाची सोय आपण स्वत:च करावी लागते.गुहेत आणि गडावर पिण्याच्या पाण्याचे एक मोठे टाके आहे. वाटेत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा भरपूर साठा असणे आवश्यक आहे. 



संदर्भ :-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिं.ग.गोगटे
३) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के.घाणेकर
५) श्री. गो.नि. दांडेकर यांचे लिखाण
६) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
७) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८) www.durgbharari.in  हि वेबसाईट
९)   http://treknowlodgy.blogspot.com/2014/05/blog-post_15.html, https://bhunga.blogspot.com/2009/10/blog-post_04.html ,
https://www.maayboli.com/node/26506,
https://marathi.pratilipi.com/read/, https://safarsahyadri.com/2020/07/05/
हे ब्लॉग




Add caption
 

the deep valley below

ढाक बहिरी गडावर दुर्दैवी घटना, 200 फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

ट्रेकर्ससाठी दोरी बांधून ठेवल्याने त्यांनी आपल्याकडे असलेला दोर वापरला नाही. प्रतिकेत काळे 20 किलो वजनी बॅकपॅक घेऊन खाली येत होते

पुणे, 03 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील (Pune) कामशेतजवळील  (Kamshet) ढाक बहिरी गडावर ((Dhak Bahiri caves) ट्रेकिंगसाठी  गेलेल्या पिंपरीतील संत तुकारामनगर येथील एका 32 वर्षीय तरुणाचा 200 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी सकाळीही घटना घडली होती.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रचिकेत काळे (Prachiket Kale) असं मृत तरुणाचं नाव आहे. प्रचिकेत हे पिंपरी चिंचवड महापालिकेत पाणी पुरवठा विभागात काम करत होते. प्रचिकेत आणि त्याचे काही मित्र सुट्टीच्या दिवशी ढाक बहिरी शिखरावर फिरायला गेले होते. ढाक बहिरी देवाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वजण गडाच्या गुहेतच मुक्कामी थांबले होते.

हा अपघात घडला तेव्हा प्रतिकेत काळे यांच्यासोबत असलेले ट्रेकर सचिन शाह यांनी सांगितले की, 'शनिवारी संध्याकाळी मृत प्रतिकेत, अमृत धनगर, ओंकार जाधव आणि हेमंत फिनले या तिघांसह ढाक बहिरी येथे गेलो होतो. त्यानंतर रात्री गुहेत थांबलो. रविवारी इतर ट्रेकर्स लेण्यांकडे चढण्यापूर्वी आम्ही सकाळी लवकर खाली येण्याचे नियोजन केले होते'.

ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी सातच्या सुमारास सर्व जण खाली येत होते. दोरीच्या साहाय्याने सचिन शाह खाली उतरले. स्थानिकांनी ट्रेकर्ससाठी दोरी बांधून ठेवल्याने त्यांनी आपल्याकडे असलेला दोर वापरला नाही. प्रतिकेत काळे 20 किलो बॅकपॅक घेऊन खाली येत होते. तेव्हा अचानक दोर तुटला आणि प्रतिकेत 200 फूट खोल दरीत कोसळले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती स्थानिक ट्रेकर्सना मिळाली. जवळच शिवदुर्ग मित्र प्रतिष्ठानचे दोन ट्रेकर्स अनिकेत बोकील आणि दीपक पवार हे शिखरावर चढण्यासाठी सराव करत होते. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. नव्याने दोर बांधून अमृत धनगर, जाधव आणि फिनले यांना खाली आणले. त्यानंतर घाटात उतरून मृत प्रतिकेत काळे यांचा मृतदेह दुपारी 3 वाजेच्या सुमारास वर आणण्यात आला.  ट्रेकर प्रतिकेत काळे यांना ट्रेकिंगची प्रचंड आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. प्रतिकेत यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ‘ढाक-बहिरी’ किल्ल्याबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?

महाराष्ट्रातले गिरिदुर्गांची उंची बघून आजही अनेकांना घाम फुटतो. नाशिकचा हरिहरगड, माळशेज जवळचा हरिश्चंद्रगड, अलंगगड, कलावंतीण दुर्ग अशी कित्येक नावं घेता येतील. आज आम्ही ज्या किल्ल्याची ओळख करून देणार आहोत तो मात्र या सगळ्यांचा कळस म्हणावा लागेल. हा किल्ला म्हणजे ‘ढाक बहिरी’.

ढाक बहिरी तब्बल २७०० फुट उंच आहे. किल्ल्याच्या वरच्या भागात गुहा आहे. किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी केला जायचा.किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो रस्ता आहे तो या किल्ल्याला सगळ्यात अवघड बनवतो.







At climbing point an awesome stair case was created by cutting hill rock properly and for support ropes are there. Everyone needs to be very careful here. At last phase of climbing beautiful ladder was there created using Sogiri Tree.







No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...