सालाहण कुले कन्हे राजिनि नासिककेन
सातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा.
नासिक हे माझे आजोळ असल्याने पांडवलेणी तशी असंख्य वेळा बघितली होतीच, पण तिचे महत्व मात्र माहित नव्हते. यावेळी ३ दिवस सुट्टी घेउन नासिकला जायचा उद्देशच होता की पांडवलेण्याची निवांत भेट. मामेभावाला घेऊन सकाळी ७ वाजताच पांडवलेणी पायथ्याला पोहोचलो. पायथ्याला दादासाहेब फाळके स्मारक आणि स्तूप उभारला आहे. १५ मिनिटांची उत्तम पायर्या असणारी झाडीभरली चढण चढून पांडवलेण्यांपाशी पोहोचलो. मधून मधून मोरांची केकावली ऐकू येत होती.
१. पांडवलेणीकडे जाणारी झाडीभरली वाट
वास्तविक पांडवलेणीचा आणि पांडवांचा काहिही संबंध नाही. पांडवलेणी ही सातवाहन आणि क्षत्रप कालखंडात खोदली गेली. इथल्या कोरीव मूर्तींना पांडव समजले गेले तसेच हे अद्भूत काम पांडवांशिवाय कोणीही करू शकत नाही हा पूर्वापार समज यामुळेच या बौद्ध लेणींना पांडवलेणी हे नाव पडले.
२. अशा स्वरूपाच्या काही शिल्पांमुळेच या लेण्यांना पांडवलेणी असे संबोधले गेले.
पांडवलेणीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच प्रथम दर्शन होते ते १० व्या क्रमांकाच्या लेण्याचे. हे लेणे नहपानाचे लेणे अथवा नहपानाचा विहार म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्तंभ, ओसरी, कोरीव शिल्पेम विहार, आतल्या खोल्या अशी याची रचना. ओसरीतील सबंध भिंतीवर विदेशी क्षत्रपांचे शिलालेख आहेत. क्षत्रप हे शक, ग्रीस, इराण मधून आलेले.पण इथल्या संस्कृतीत विरघळून गेलेले. त्यांचे येथील शिलालेख हे ब्राह्मी संस्कृतात असून मुख्यत्वे त्यांनी दिलेल्या दानाचे आहेत. नहपान हा इराणी शब्द असून नह म्हणजे जनता व पन म्हणजे रक्षणकर्ता. नहपान हा गौतमीपुत्र सातकर्णीच्या समकालीन.
३. नहपान विहाराचे प्रथमदर्शन
४ व ५. गज, वृषभ, सिंहशिल्पे (पाठीमागील भिंतीवर क्षत्रपांचे शिलालेख दिसत आहेत)
इथे ओसरीतील स्तंभांवर पुढील बाजूस सिंह, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. पण खरी गंमत आहे ती स्तंभांच्या मागील बाजूस ओसरीतील भागात.
इथे वरच्या भागाकडे नीट निरखून पाहिले असता काहिशी वेगळी शिल्पे दिसतात. शिर गरूडाचे आणि शरीर सिंहाचे अशी ही प्रतिमा. हा आहे ग्रिफिन, एक ग्रीक उपदेवता.
६ व ७. ग्रिफिन
पुढच्या स्तंभावर तर अजून एक आश्चर्यचकित करणारे शिल्प सामोरे येते. हे शिल्प आहे मानवी शिर असणारे आणि शरीर मात्र सिंहाचे. तोच तो इजिप्तच्या पिरॅमिडजवळ असणारा चिरपरिचित स्फिंक्स.
स्फिंक्स आणि ग्रिफिन या दोन्ही प्राचीन ग्रीक दंतकथांमधील देवता. त्यांचा पांडवलेणीतील समावेश दाखवतो तो प्राचीन काळात चालत असलेल्या पाश्चिमात्यांबरोबर चालत असणार्या व्यापाराचा पुरावाच. व्यापार्यांबरोबरच संस्कृतींमधला प्रवास, आदानप्रदानही इथे अधोरेखीत होते.
८,९, व १० स्फिंक्स
हे सर्व पाहून विहारात प्रवेश केला, हा विहार प्रशस्त, बरेच कक्ष असलेला व कसलाही आधार नसलेला. सभांडपात समोरच्या भिंतीवर स्तूपाची रचना आणि त्याच्या आजूबाजूला काही मूर्ती कोरल्या आहेत. महाराष्ट्रातील, किंबहुना भारतातील हा लेण्याद्रीनंतरचा सर्वात मोठा विहार. विहारातून बाहेर आलो, ह्या नहपान विहाराच्या आजूबाजूला काही दुमजली विहार आहेत व जवळच चैत्यगृहही आहे.
११. नहपान विहाराचा अंतर्भाग.
आता पाहणार होतो ते गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाची यशोगाथा असलेले ३ र्या क्रमाकांचे महाराष्ट्रातील कदाचित सर्वात महत्वाचे असे देवीलेणे. हे लेणे खोदवले आहे ते गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री हिने आणि तिचा पौत्र वासिष्ठिपुत्र पुळुवामी याने. गौतमी बलश्री स्वतःला महादेवी म्हणवून घेत असे म्हणूनही हे देवीलेणे.
१२. देवीलेणीचे मुखदर्शन
इथल्याही स्तंभांवर ग्रिफिन, गज, वृषभ शिल्पे कोरलेली आहेत. या सर्व स्तंभांच्या दर्शनी बाजूवर चौथर्याच्या खाली भारवाहक यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर रथाचे ओढायचे आडवे खांब कोरलेले आहेत जणू हा लेणीरूपी रथच ते आपल्या खांद्यांवर वाहात आहेत.
१३. लेणीचा भार वाहणारे यक्ष
१४.
इथेही ओसरीतल्या भिंतीवर गौतमी बलश्रीने कोरलेले गौतमीपुत्र सातकर्णीची महती सांगणारे शिलालेख आहेत ज्यांचा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाच्या शिलालेखांमध्ये समावेश होतो.
गौतमीपुत्र सातकर्णी हा त्याकाळचा भारतातील सर्वात सामर्थ्यवान राजा. त्याच्या उदयाच्या वेळी सातवाहन साम्राज्य क्षीण झाले होते, जुन्नर, नासिक इ. बहुतांश भाग क्षत्रपांनी गिळंकृत केला होता. गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाच्या विरोधात जोरदार आघाडी उघडून नासिक जवळच्या सह्याद्री रांगांमध्ये त्याचा संपूर्ण पराभव केला त्याचे शिलालेख या लेणीमध्ये कोरले गेलेले आहेत.हे युद्ध अतिसंहारक झालेले दिसते कारण यात नहपानाचे संपूर्ण क्षहरात कूळ नष्ट झाले. म्हणूनच उएथील शिलालेखात त्याला 'क्षहरात वंस निर्वंस करस' असे म्हटले आहे. त्याने नहपानाकडून जिंकलेल्या भूप्रदेशाचे वर्णनही प्रस्तुत शिलालेखात देण्यात आलेले आहे. तो प्रदेश म्हणजे अपरांत (उ. कोकण), अश्मक(नांदेड), मूलक(औरंगाबाद, बीड), ऋषिक (खानदेश), विदर्भ, सेटगिरी (जुन्नर), कृष्णागिरी (कान्हेरी), सह्याद्री, कुकुर (आग्नेय राजस्थान), आकारवंती (माळवा), अनूप (मध्यप्रदेश), पारियात्र(अबू पर्वत), सौराष्ट्र, विंध्य, श्रीशैल, मलय, महेंद्र (ओरीसा) इ. या शिवाय कर्नाटक, आंध्र मधील जवळजवळ सर्वच प्रदेश त्याच्या ताब्यात होता.
त्याकाळी त्याच्या इतका सामर्थ्यवान राजा भारतात दुसरा नव्हता. सातवाहनांचा मूलप्रदेश नहपानाच्या हातून जिंकून घेऊन त्याने सातवाहनांची प्रतिष्ठा वाढवली म्हणून त्याचा 'सातवाहन यश प्रतिष्ठा करस'
असा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 'ती समुद्द तोय पीतवाहन' म्हणजे ज्याची घोडी तीन समुद्रांचे पाणी पितात असाही उल्लेख येथे केला गेला आहे. उत्तरेकडील मोहिमेत गौतमीपुत्राने शक, यवन, पल्हव राज्यकर्त्यांचा पराभव केला म्हणून त्याला 'शक यवन पल्हव निदुसनस' असा उल्लेखही येथील शिलालेखात केला गेला आहे. सातवाहन राजे ब्राह्मण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियदपमानदमन ' असेही येथे म्हटले आहे.
१५. गौतमी बलश्रीचा शिलालेख
गौतमीपुत्राची माता गौतमी बलश्री येथील शिलालेखात आपल्या पुत्राचे मोठे लोभस वर्णन करते-
गौतमीपुत्र हा धीर-गंभीर वृत्तीचा असून शरीराने भक्कम आहे. त्याचे मुखकमल पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे असून चाल हत्तीसारखी गंभीर आहे. त्याचे बाहू शेषाप्रमाणे पुष्ट आहेत. तो शूर तसेच नितीवानही आहे. पौरजनांच्या सुखदु:खात तो सदैव रममाण होत असून त्यांना संकटांमध्ये साहाय्य करत असे. त्याने प्रजेवर योग्य तेच कर लावले असून त्याने वर्णसंकर बंद केला आहे. स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे.
वरील शिलालेख गौतमीपुत्राच्या मृत्युंनतर गौतमी बलश्रीच्या वृद्धपणी गौतमीपुत्राचा मुलगा वासिष्ठीपुत्र पुळुवामीकडून तिने खोदवून घेतला आहे.
१६. गौतमीपुत्राने पाडलेले अस्सल चांदीचे नाणे जे त्याच्या स्वरूपावर प्रकाश टाकते. (विकिपेडीयावरून साभार)
याच शिलालेखांखाली गौतमीपुत्र सातकर्णीची पराक्रमगाथा शिल्पस्वरूपात कोरलेली आहे.
हा एक शिल्पपटच आहे.
या देखाव्यात डावीकडील पट्टीवर एक प्रेमी युगुल दाखवले असून ते गौतमीपुत्राचा पिता व सातवाहन राज्यलक्ष्मी यांचे रूपक आहे. यावरील पटात एक तरूण त्या स्त्रीचा अनुनय करताना व त्यापुढील शिल्पात तो तिला बळजबरीने उचलून नेताना दाखवला आहे. म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहन राज्याचे हरण केले आहे.यापुढील शिल्पांमध्ये दुसरा तरूण त्या तरूणाकडून स्त्रीला खेचून परत आणताना दाखवला आहे. म्हणजे गौतमीपुत्राने गेलेले सातवाहन राज्य नहपानाकडून परत मिळवले. हा पट पुढे असाच दाखवला असून गौतमीपुत्राच्या निधनानंतर पुळुमावीने सातवाहन राज्यश्रीचे कसे निष्ठेने पालन केले ते दाखवले आहे.
१७ व १८.
१९ व २०
२० व २१ . शिल्पपटाचे संपूर्ण दर्शन
हे सर्व डोळ्यांत भरून पाहातच विहाराच्या आतमध्ये गेलो. हाही एक प्रशस्त विहार. याच्या आत काही कक्ष असून समोरील भिंतीवर स्तूपाची प्रतिमा कोरलेली आहे. या स्तूपाच्या बाजूस स्त्री प्रतिमा. यातील डावीकडील नमस्कार करत आहे तर उजवीकडील या स्तूपावर चवरी ढाळत आहे. वर गंधर्व विहार करताना दाखवले आहेत.
२२. देवीलेणीचा अंतर्भाग
विहारातील स्तूपाची रचना
हे सर्व पाहातच बाहेर आलो व आजूबाजूची लेणी पाहायला लागलो.
क्रमशः
नासिक लेण्यांतील महत्वाची अशी सातवाहनांची देवीलेणी आणि क्षत्रपांचा नहपान विहार सुरुवातीला पाहून मग इथल्या चैत्यगृहाकडे निघालो.
महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणेच इथेही एकमेव चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी रचना. पिंपळपानाकृती कमान हे सर्वच चैत्यगृहांचे वैशिष्ट्य. गौतम बुद्धाला गयेत अश्वस्थ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक म्हणून ही रचना कोरली जाते.
इथल्या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर ही कमान एकावर एक अशी दुहेरी स्वरूपात कोरलेली आहे. फुलाफुलांचे अतिशय नाजूक असे नक्षिकाम, त्यावर बौद्धांचे त्रिरत्न चिन्ह व त्याभोवतीने हत्ती, घोडे इ. प्राणी मोठ्या खुबीने कोरलेले आहेत.
चैत्यगृहावर नेहमीप्रमाणेच कोरलेले यक्ष, गवाक्षांनी केलेला त्रिमितीय आभास, स्तूपांची रचना हे सर्व आहेतच.
चैत्यगृहापाशीच एक शिलालेख आहे.
रञोअमस अरहलयस चालिसलनकस दुहुतुया महाहकुसि-
रिया भतपालिकाया रञोअमस अगियतनकस भदकरिका-
यासा भारिया कपननकमातुय चेतियघरम पावते-
तिरुन्हुमी निठपपित
याचा अर्थ
राजअमात्य चालिसलनाकाची पुत्री, अग्नित्राण भदकरिकाची पत्नी आणि कपननकाची माता महाहकुश्री भट्टपालिकेने हे चैत्यगृह त्रिरश्मी पर्वतावर स्थापित केले आहे.
भट्टपालिका ही नाणेघाटात उल्लेख आलेल्या नागनिकेचा मुलगा महाहकुश्री याची नात असे मानले जाते. याचा अर्थ हे चैत्यगृह क्षत्रप व गौतमीपुत्राच्या आधीचे.
चैत्यगृहात १६ सालंकृत खांबावर तोलले गेलेले गजपृष्ठाकृती छत, मधोमध वाटोळा गुळगुळीत स्तूप, स्तूपाची हर्मिका. इथे छताला लाकडी फासळ्या शिल्लक नाहीत पण त्यांच्या खाचा त्यांचे पूर्वीचे अस्तित्व दाखवतात. खांबांवरही काही शिलालेख कोरलेले आहेत.
१. चैत्यगृहाचे मुखदर्शन
२. पिंपळपानाकृती कमान व वरील स्तूप-गवाक्षांची रचना
३. कमानीवरील सुरेख ऩक्षीकाम
४.स्तंभांसहीत असलेला स्तूप
यानंतरचा एक मोठा विहार यज्ञविहार म्हणून ओळखला जातो, इथे यज्ञश्री सातकर्णीचा शिलालेख आहे. हा विहार अतिशय प्रशस्त असून आतमध्ये गर्भगृह खोदलेले आहे तिथे भगवान बुद्धाची भव्य बैठी मूर्ती आहे. स्तंभांवर नाजूक नक्षीकाम.
५. यज्ञ विहार
६. यज्ञविहारातील सिंहासनारूढ बुद्धमूर्ती
७. यज्ञविहारातील सालंकृत स्तंभ
यांनतरचे जवळजवळ प्रत्येक दालन विविध शिल्पांनी भरलेले आहे. दुमजली विहार, कधी मधूनच जैन कला तीर्थंकरांच्या मूर्तींसह भेटीस येते तर कधी बुद्धाच्या विविध प्रतिमा त्यांच्या अनुयायांसह कोरलेल्या दिसतात. काही सिंहासनारूढ, पद्मपाणी, शयनआसनावर आरूढ झालेल्या ह्या बुद्धांच्या चेहर्यावरील भावही बदलणारे, कधी शांत, कधी ध्यानस्थ योग्याचा भाव, काही ठिकाणी अर्धोन्मिलित भाव तर काही ठिकाणी प्रसन्न मुद्रा. त्यांच्या भोवती नाग, अश्व, इ. प्रतिमा, बाजूला चामर ढाळणारे सेवक, अवकाशातून पुष्पमाला घेउन आलेले गंधर्व अशी विविध शिल्पे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.
८. दुमजली विहार
९. विहार
१०. विहार
११. लेणीमार्ग
१२. विविध भावमुद्रेतील बुद्धमूर्ती
१३.
१४.
१५.
१६.
या सर्व शिल्पांच्या बरोबरीने ब्राह्मी लिपीतले लेखही आपल्याला दिसत असतात.
त्यापैकी काही लेखांची थोडक्यात माहिती देतो.
सिधम सकस दमचिकस लेखकस वुधिकस
विण्हुदतपुतस दसपुरावथस लेणम पोढियो-
चा दो अतो एक पोढि या अपरा--सा मि माता
पितरो उदिसा
शक दमचिकाचा लेखक आणि दशपुराचा रहिवासी विष्णुदत्ताचा पुत्र वुधिकाने एक लेणे आणि दोन पाण्याची टाकी पैकी एक आपल्या माता पितरांसाठी (भेट)दिले आहे
लेणी शब्दाचे प्राचीनत्व इथे दिसून येते. पोढि म्हणजे पाण्याची टाकी त्याचाच अपभ्रंश होऊन (पाण)पोई असा आजचा शब्द रूढ झाला. लेखक ह्या शब्दाचा उल्लेखही येथे महत्वाचा आहे.
अजून एका शिलालेखात यवनांचा पण उल्लेख आला आहे.
सिधम उतरहासा दमतमितियकस योनकस धम्मदेवपुतस इदग्निदतस धम्मतमा
इमा लेणम पावते तिरण्हुमी खनितम अभमतरम च लेणस चेतियघरो पोढियो च मातापि-
तरो उदिस इमा लेणम सवबुधपुजय चतुदिसा भिक्खुसंघसा नियतितम
सह पुतेना धम्मरक्सिता
उत्तरेतील दंतमित्रीचा रहिवासी, धर्मदेवाचा पुत्र, यवन इंद्राग्निदत्त याने त्रिरश्मी पर्वतावरील एका चैत्यगृहानजीकच्या लेण्यात माता पितरांच्या स्मरणार्थ पाण्याची टाकी खोदलेली आहेत. आणि हे लेणे सर्व बौद्धांच्या पुजेसाठी चार दिशांनी आलेले बौद्धसंघां आणि त्याचा पुत्र धर्मरक्षित याने एकत्रितरित्या बांधले आहे.
यवन म्हणजे ग्रीक लोक. इथे येउन स्थायिक झालेल्या यवनांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता हे यावरून सिद्ध होते.
अजूनही असे दातृत्वाचे बरेच शिलालेख या ठिकाणी आहेत.
१७. एक शिलालेख.
शेवटच्या २४ व्या क्रमांकाच्या लेण्यात एका घुबडाचे शिल्प कोरलेले आहे. घुबड आपल्याकडे अपवित्र मानले जाते पण ग्रीकांमधे घुबड देवस्वरूप. ग्रीक उपदेवता अथेनाचे हे शिल्प त्याकाळच्या संस्कृतीवर असलेल्या ग्रीक प्रभावाचेच हे द्योतक.
१८. पांडवलेणीतून होणारे नासिकचे विहंगम दर्शन
एकूण २४ लेण्यांची ही माळ शिलालेखांनी, शिल्पांनी, देखण्या ऩक्षीकामाने सालंकृत झालेली आहे. सातवाहन, क्षत्रप, परत सातवाहन परत क्षत्रप अशी विविध स्थित्यंतरे या लेणीने पाहिली आहेत पण एकानेही दुसर्याचे बांधकाम उद्धस्त केले नाही. सातवाहन वैदिक, नहपानाच्या काळातील धर्मविहिन क्षत्रप आणि लेणी मात्र बौद्ध, जैन. सुरुवातीची हिनयान आणि नंतरची महायान. अशा विविध संस्कृतींचा संगम असलेली पांडवलेणी त्यांच्या अद्भूत शिल्पकलेसाठी बघायलाच हवीत.
लिटररी अॅन्ड हिस्टॉरिकल स्टडीज इन इंडोलोजी -वा. वि. मिराशी'
सार्थवाह-मोतीचंद्र,
सातवाहनास अॅन्ड वेस्टर्न क्षत्रप्स् - अजय शास्त्री,
महाराष्ट्राची कुळकथा - मधुकर ढवळीकर,
विकिपेडीया,
थोडासा गूगल शोध.
आणि
सातवाहनकाळाविषयीची अपार उत्सुकता.
माझे थोडे विस्कळित विचार. नहापण आणि गौतमीपुत्र सातकर्णी हे समकालीन होते का याबद्दल थोडा संशय आहे. पण सातकर्णीने नाहपण किंवा त्याच्या जावयाकडून म्हणजे ऋषभदत्ताकडून बरेच राज्य मिळवले होते असे नक्की. मौर्यांनंतर उदयाला आलेल्या या घराण्याने मौर्यांच्या नाण्यांवरचे टेकड्यांसारखे चिन्ह स्विकारलेले दिसते.
गौतमीपुत्राचे नाव गौतमीपुत्र का असावे? तेच वसिष्ठीपुत्र श्री पुलुमावी या नावाचे. ही घराणी मातृसत्ताक असावी असे नाही. पण राण्यांची नावे नद्यांना दिली गेली असतील का? किंवा उलटेही असू शकते. गौतमी हे नाशिकच्या प्रसिद्ध गोदावरीचे नाव आहे (किंवा तिच्या एखाद्या उपनदीचे) आणि तसेच वसिष्ठी हे चिपळूणजवळील नदीचे नाव आहे. अर्थात ही नावे कधीपासून प्रचलित आहेत कल्पना नाही, पण सातवाहनांच्या राज्यामधील नद्यांची नावे त्यांच्या घराण्यातून आली असतील का असा एक प्रश्न पडला. ( ह्या ठिकाणाहून राज्य करणार्या राजांनी नद्यांची नावे मातेसमान स्विकारलेली असू शकतात का? )
सातवाहनांच्या राण्यांपैकी नागनिका आणि गौतमी या दोघींची नावे प्रसिद्ध आहेतच.
सातवाहनांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. पण आपल्याला फार थोडे माहिती असते एवढेच वाटते. जे धागेदोरे लागतात ते तत्कालिन समाजपद्धतीवर जेमतेमच प्रकाश टाकतात, एकसलग, एकसंध चित्र उभे करू शकत नाहीत असे वाटते. त्यासाठी तत्कालिन साहित्यही वाचावे लागेल असे वाटते.
नहापण आणि गौतमीपुत्र सातकर्णी हे समकालीन होते का याबद्दल थोडा संशय आहे.
नहपान हा गौतमीपुत्राचा समकालीन, पण गौतमीपुत्रापेक्षा वयाने मोठा होता. नहपानाचा जावई हा उज्जैनचा क्षत्रप रूद्रदामन आणि रूद्रदामनाचा जावई हा ऋषभदत्त (प्राकृत नाव-उषवदत्त)
रूद्रदामनाने आपल्या मुलीचा विवाह गौतमीपुत्राच्या मुलाशी म्हणजे वासिष्ठिपुत्र पुळुमावीशी करून दिला होता. वर्णसंकर न करणार्या सातवाहनांसाठी हा विवाह म्हणजे राजकारणाचाच एक भाग. गौतमीपुत्राच्या मृत्युनंतर बर्याच काळाने रूद्रदामनाने परत नासिक भाग जिंकून घेतला व पुळुमावीचा पराभव केला परंतु सोयरसंबंधांमुळे त्यांचे संपूर्ण उच्चाटन केले गेले नाही. यांनत्र मात्र सातवाहन पैठण, आंध्र आणि दक्षिणेकडे सरकत गेले. त्यामुळेच नंतर त्यांना आंध्रभृत्य हे नाव पडले.
गौतमीपुत्राचे नाव गौतमीपुत्र का असावे
गौतमीपुत्राच्या आधी सातवाहन राजे हे वैदिक नावे लावत. उदा. वेदिश्री, स्कंदश्री, हकुश्री. शक्तीश्री इ. गौतमीपुत्राच्या वेळी आईचे नाव लावण्याची प्रथा सुरु झाली असावी. गौतमीपुत्र महान मातृभक्त होता यात शंकाच नाही त्याच्या शिलालेखांवरूनही हे दिसते. तीच प्रथा त्याच्या पुढच्या पिढ्यांकडूनही पाळली गेली.
उदा. वासिष्ठिपुत्र, कौशिकिपुत्र, मढारीपुत्र.
नद्यांना नावे पण बहुधा ह्याच राजांवरून दिली गेली असावीत.
माझे विकीपांडित्य सांगते की नहापणाचा जावई ऋषभदत्त, आणि रुद्रदमनाने आपली मुलगी पुळुमावीला दिली.
http://en.wikipedia.org/wiki/Nahapana
http://en.wikipedia.org/wiki/Rudradaman_I
रुद्रदमन आणि ऋषभदत्ताचे नाते काय होते हे विकीवरून कळलेले नाही.
बरोबर आहे.
माझी समजण्यात काही चूक झाली.
नहपानाचा जावई हा ऋषभदत्त. आणि रूद्रदामनाचा पुळुमावी.
रूद्रदामन हा महाक्षत्रप होता आणि त्याचा महाअमात्य हा ऋषभदत्त.
चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. :)
१. आंध्रा नदी, आंध्र तलाव, आंदरमावळ असा उल्लेख असलेला एक प्रतिसाद इतरत्र वाचला आहे. त्यात उल्लेखित संशोधनावरून आंध्रभृत्य हे नाव मुळात पुण्याजवळील एका भूभागावरून आले आहे असे वाटते.सातवाहनांच्या इतिहासाची ती चर्चा महत्त्वाची आहे.
२.
सातवाहन राजे ब्राह्म
ण असून कट्टर वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. गौतमीपुत्र सातकर्णी स्वत:ला येथील शिलालेखात 'ब्राह्मणनस' म्हणवतो. क्षत्रियांचे निर्दालन केल्याने त्याला 'खतियनिर्दालक' असेही येथे म्हटले आहे.
-याचा काही संदर्भ मिळू शकेल काय?
तिकडची सविस्तर चर्चा वाचली, बरीच नविन माहितीही समजली.
आंध्रा नदी, आंध्र तलाव, आंदरमावळ असा उल्लेख असलेला एक प्रतिसाद इतरत्र वाचला आहे.
हे मत आहे ते सह्याद्रीकार स. आ. जोगळेकरांचे. अर्थात हा फक्त तर्कावर आधारीत पुरावा असून त्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा (नाणी, शिलालेख, उत्खनने) इ. स्वरूपात अजून मिळाला नाही.
पण सातवाहन हे महाराष्ट्रीय यात काहीच संशय नाही. ते आंध्राकडे सरकल्यानंतर (पुळुमावीनंतर) बर्याच कालावधींनी पुराणे तयार झाली (साधारण इ.स. ४/५ व्या शतकात) त्यामुळे आधीच्या घटनांचा धांडोळा पुराणांकडून न घेतला जाता सातवाहनांच्या शेवटच्या निवासावरून त्यांना आंध्रभृत्य ठरवले गेले.
-याचा काही संदर्भ मिळू शकेल काय?
खतियनिर्दालक हा शब्द माझ्याकडून चुकीचा लिहिला गेला. मूळ शिलालेखातील शब्द आहे 'खतियदपमानदमन' अर्थात क्षत्रियांचा गर्व हरण करणारा (निर्दालन करणारा/नष्ट करणारा अशा अर्थाने नव्हे)
ब्राह्मणनस, खतियदपमानदमन ही बिरुदे सातवाहन ब्राह्मण आहेत असे सिद्ध करतात. अर्थात यावरही बरीच मतमतांतरे आहेतच.
संदर्भः
१. शास्त्री के.एन.ए.-मौर्यास ऑफ सातवाहन इन हिस्टरी ऑफ साउथ इंडिया -ऑक्सफर्ड १९५८,
२. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख-मिराशी वा. वि. १९७८.
”ब्राह्मणनस’ उल्लेख असलेला शिलालेखाचा फोटो काढलाय का ? मला केवळ उत्सूकता म्हणून बघायचा आहे.
शिलालेखांचे काही फोटो तर काढलेले आहेतच पण दुर्दैवाने मला ब्राह्मी येत नसल्याने हाच तो शिलालेख असे नक्की सांगता येत नाही.
३ र्या क्रमाकांच्या देवीलेणीतील ओसरीवरच्या संबंध भिंतीवर गौतमीपुत्राची महती गाणारे शिलालेख लिहिले आहेत त्यातीलच एक तो असावा.
गौतमीच्याच शिलालेखात हा उल्लेख आहे.
http://www.preservearticles.com/2011092013668/short-notes-on-gautamiputr...
पण एकब्राह्मण याचा अर्थ भांडारकरांनी ब्राह्मणांचे रक्षण करणारा असा लावला आहे.
(उपक्रमावरील प्रियाली यांच्या लेखात सिमुकाआधी बरेच राजे होऊन गेले आहेत असा उल्लेख आढळला. कदाचित तसे असेलही, पण माझ्या वाचनाप्रमाणे) या कुळातला मुख्य आणि आद्य राजा सिमुक सातवाहन हा कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते. कण्व हे कुळ ब्राह्मण होते. तेही यापूर्वीच्या शुंग राजांचा घात करून सत्तेवर आले होते. शुंगही ब्राह्मणच कुळ असावे. ब्राह्मण राजांना मारून सत्तेवर आल्याने परत ब्राह्मणांना आश्वासित करणे गरजेचे वाटलेले असू शकते असा माझा एक कयास :) त्यामुळे या केवळ एका लेखात (तेही गौतमीच्या) तिच्या स्वतःच्या मुलाचा उल्लेख "एकब्राह्मण" असा एक उल्लेख केलेला असावा. ( इतर कुठेही असे लिखाण दिसत नाही). याचा अर्थ हे सातवाहनांचे कुळ ब्राह्मण असले पाहिजे असा असेलच असे वाटत नाही.
हा शिलालेख हा गौतमीपुत्र मरण पावल्यानंतर किंवा आजारपणाने सत्तेपासून दूर असताना त्याची आई गौतमीने कोरून घेतला आहे. कदाचित गौतमी ब्राह्मण कुळातली असावी आणि प्रतिष्ठित घरातली असावी. . याच कुळातली दुसरी एक राणी नयनिका/नागनिका ही 'नाग' कुळातली होती असे समजले जाते. या स्त्रीने श्रौत इ. वैदिक रितीभाती नवरा गेल्यानंतरही पाळलेल्या दिसतात (हे स्त्रीने करण्याची पद्धत नाही, पण तरी केले/करवून घेतले आहेत असा उल्लेख आढळतो).
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला असे म्हटले तरी बहुदा वर्णसंकर थांबवला गेला नसावा कारण लग्ने क्षत्रपांशी, नागांशी आणि कदाचित ब्राह्मणांशीही होत असावीत. तेव्हा हे राजे तोंडाने (एखाद्या शिलालेखात) काही बोलत असले तरी करताना राज्यविस्तारासाठी काही लागेल ते करत होते (म्हणजे वर्णसंकर!) असे दिसते.
दुसरे एक आपण असे तपासू शकतो की जैनांमध्ये, किंवा बौद्धांमध्ये राजांच्या मूर्ती करण्याची पद्धत होती तशी ब्राह्मण राजांमध्ये स्वतःच्या मूर्ती करून घेण्याची पद्धत होती का? कल्पना नाही. याआधी (ब्राह्मण) शुंगांनी स्वतःच्या अशा मूर्ती केल्या होत्या का हे बघावे लागेल. उदा. (ब्राह्मण नसलेल्या) कनिष्काचा पुतळा आढळतो. तसेच शुंगांनी जरी बरेच बांधकाम/शिल्पकाम करवून घेतले असले तरी मूर्ती तयार करून घेतल्या आहेत का हे पहावे लागेल. सातवाहनांनी (राणीसकट) सर्वांच्या मूर्ती दगडात तयार करून घेतलेल्या दिसतात. यावरूनही काही अंदाज बांधता येईल असे वाटते.
[ अन्य टीपः कदाचित याचा काळाप्रमाणे काही संबंध असेल असे नाही. पण कुळकर(णी) हे पद सोपारा इ. भागात ऋषभदेवाच्या काळापासून जैनांमध्ये माहिती होते अशी माहिती कळते. जैनांच्या आदिनाथाचा (किंवा ऋषभदेवांचा) पिता नाभि राजा हा कुळकर होता असे समजले जाते. (आज आपल्याला माहिती असलेली 'कर्णी' याने अंत असलेली आडनावे ब्राह्मण असणे सूचित करू शकतात असे वाटते, पण म्हणून केवळ ब्राह्मणच असतीलच असे नाही). ]
सातवाहन राजांच्या एकूण संखेबाबात वाद आहेत म्हणतात. कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करुन शुंगाची सत्ता नष्ट करुन सिमुख (क) सातवाहन हा सिंहासनावर आला. सिमुखाआधी किती राजे होऊन गेलेत काही माहिती मिळाली तर मला सांगा. सातवाहन साम्राज्यात भर घालण्याचे काम निनाद ने सुरु केले होते. थोडा हातभार आम्ही लावला आहे, अधिक भरीव काम करेन म्हणतो.
हे सांगणे थोडे कठीण आहे. काही आधीचे आणि काही नंतरचे असतील. :) मुळात सातवाहन कुळात सातवाहन नामक राजा होऊन गेला, हे देखील काही थोड्या (आणि बिरुदामुळे) सिद्ध केले आहे असे समजते. कोंडापुरम येथे असे एक नाणे आहे, मला वाटते वरंगळ येथे अजून एक आहे (चट्टोपाध्याय). अन्यथा पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख आंध्र म्हणून आहे. सातवाहन या नावाने नाही.
सिमुकाआधीचे राजे कोण होते ते माहिती करून घेण्यासाठी नाण्यांचे विश्लेषण करता आले पाहिजे. तूर्तास तुम्ही मिसळपावावरच्या आणि उपक्रमावरच्या चर्चा/लेखांची लिंक मराठी विकिपिडियावर देऊ शकता.
मूळ 'सातवाहन' असे नाव असलेले नाणे उत्खननात सिमुकाच्या आधीच्या थरांत सापडलेले आहे त्यामुळे सिमुकाच्या आधीही सातवाहन राजा होता हे मान्य करण्यास काहीच हरकत नाही.
राहिला मुद्दा आंध्रांचा, तर सातवाहनांचे सर्व शिलालेख हे पाकृतात आहे आणि तेलगूत एकही नाही.
वासिष्ठिपुत्र पुळुवामी नंतर सातवाहनांनी पश्चिम महाराष्ट्र गमावून दक्षिणेत स्थलांतर केले होते. त्यानंतर श्री यज्ञ सातकर्णीने परत गेलेला प्रदेश परत मिळवला. यज्ञ सातकर्णीनंतर मात्र सातवाहनांच्या र्हासाला सुरुवात होवून पैठणही गमावले गेले व त्यांना कायमस्वरूपी आंध्रात जावे लागले. पुराणांचा काळ त्यानंतरचा त्यामुळे सातवाहनांचा उल्लेख हा पुराणांत आंध्रभृत्य असाच येतो.
' सातवाहनकालीन महाराष्ट्र' हे डॉ.रा.श्री.मोरवंचीकरांचे एक पुस्तक हाती लागले आहे. चर्चेत आपली आणि चित्रा यांची माहिती अगदी बरोबरच आहे. अधिक माहितीसाठी आणि आपल्या प्रतिसादांना पुरक अशी माहिती डकवता आली तर डकवेन.
माझ्याकडेही हे पुस्तक आहेच. लेखातले काही संदर्भ तेथूनच घेतले आहेत. अर्थात त्या पुस्तकातली मोठी त्रुटी म्हणजे शिलालेखांचे प्राकृत भाषांतर त्यात फारसे नाही शिवाय सातवाहनकालीन किल्ल्यांचे वर्णनही त्यात नाही.
पण एकंदरीत त्याकाळचा महाराष्ट्र समजून घेण्यासाठी हे पुस्तक उत्तम आहेच.
शिलालेखांसाठी वा. वि. मिराशींचे 'सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप-इतिहास आणि कोरीव लेख' हे पुस्तक अतिशय उत्तम आहे पण सध्या कुठेच मिळत नाही.
या कुळातला मुख्य आणि आद्य राजा सिमुक सातवाहन हा कण्व कुळातील राजाला मारून करून सिंहासनावर आला असे समजले जाते.
सिमुख सातवाहन हा आद्य सातवाहन समजला जात असे, पण सातवाहन असे नाव असलेली तांब्याची आणि शिशाची नाणी नासिक आणि नेवासे येथील उत्खननात मिळाली असल्यामुळे सातवाहन हाच या घराण्याचा मूळ पुरुष होय असे अलीकडे मानले जाते. याच्याच नावावरून सातवाहन कुलाची सुरुवात झाली. सिमुखाचा हा पिता अथवा आजा असावा तथापि त्यांचे नक्की नाते तसेच आद्य सातवाहनाचा राज्यविस्तार याबद्दल नक्की सांगता नाही.
कण्वाला पराभूत मूळ सातवाहनानेच केलेले असावे किंवा त्यानंतर सातवाहनांचा राज्यविस्तार कण्वांना पराभूत करून सिमुकाने केलेला असावा. पण कालमापनाने पाहिल्यास हेही जुळत नाही. कण्व सत्ता ही साधारण इ.स.पूर्व७५ ते इ.स.पूर्व २६ अशी आहे तर सातवाहनांचा काळ त्याही आधीचा म्हणजे साधारण इ.स.पूर्व २३० असा येतो. पुराणे आणि काही शिलालेखांवरून हा काळ निश्चित केला आहे. म्हणजे कण्वांचा पराभव हा सातवाहनांच्या नंतरच्या पिढीच्या काळात झाला असावा. अशोकाच्या मृत्युनंतरच्या दशकभरातच सातवाहन मौर्यांचे मांडलिकत्व झुगारून देउन सत्तेवर आले.
कण्व-सातवाहन यांत संघर्ष झाल्याचे कधी कुठल्याही शिलालेखात आलेले नाही हेही विशेष.
पण एकब्राह्मण याचा अर्थ भांडारकरांनी ब्राह्मणांचे रक्षण करणारा असा लावला आहे.
याबद्दल बरेचसे वाद आहेतच. सातवाहन ब्राह्मणच होते असा सबळ पुरावा त्या शिलालेखाशिवाय दुसरा मिळालेला नाही हेही खरे. पण त्यावेळी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. पांडवलेणीतल्या त्याच लेखात गौतमीपुत्राचे खतियदपमानदमन हे बिरुदही कोरलेले आहे. स्वतः क्षत्रिय असताना तो असे बिरुद धारण करेल हे तसे असंभवनीयच वाटते.
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला असे म्हटले तरी बहुदा वर्णसंकर थांबवला गेला नसावा
परंतु गौतमीपुत्राने वर्णसंकर थांबवला म्हणजे त्याच्या काळात वर्णसंकर होत नसे. त्याच्या आधी वर्णसंकर होताच. उदा. नागनिका. वाशिष्ठिपुत्र सातकर्णीचा विवाह राजकारणाचाच भाग हे निश्चितच पण हा विवाह कदाचित गौतमीपुत्राच्या मृत्युनंतर झाला असावा. नक्की काळ माहित नाही. (कान्हेरी लेण्यामध्ये वाशिष्ठिपुत्राच्या पत्नीचा शिलालेख आहे त्यात तिच्या पित्याचा-रूद्रदामन क्षत्रपाचा उल्लेख आहे.)
जैनांमध्ये, किंवा बौद्धांमध्ये राजांच्या मूर्ती करण्याची पद्धत होती
जैनांबद्दल माहित नाही पण बौद्धांमध्ये मूर्ती कोरण्याची पद्धत कनिष्काने सुरु केली असे मानण्यात येते. बहुधा चौथ्या धम्मपरिषदेमध्ये हा प्रस्ताव संमत करून घेतला गेला. सातवाहनांच्या प्रतिमाही फक्त नाणेघाटातच आढळतात, इतरत्र कुठेही नाही तेव्हा नाणेघाटाचे हे महान कार्य लोकांवर ठसवण्यासाठीच या मूर्ती कोरण्यात आलेल्या असाव्यात. पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत.
सिमुकाबद्दल सहमत आहे, तो या कुळातील मुख्य राजा असे म्हटले तरी चालेल. अर्थात त्याचे आधी सत्ताकेंद्राजवळ असणे (म्हणजे मांडलिकत्व) अध्याहृत आहे. (पण आद्य म्हणजे अनेकदा आपण म्हणतो आमच्या घराण्याचा मूळ पुरुष अमूक. त्याआधी घराणे होतेच, पण नावारुपाला आले ते या काळापासून, म्हणून आद्य).
नेवाशाला नाणी मिळाली हा संदर्भ कुठचा आहे, ते सांगता येईल का?
>पांडवलेण्यातील मूर्ती या केवळ रूपकार्थानेच कोरलेल्या आहेत. ते त्यांचे पुतळे नव्हेत.
मी ते पाहिलेले नाहीत. फोटो असले तर जरूर लावा असे सुचवेन. धन्यवाद.
तो या कुळातील मुख्य राजा असे म्हटले तरी चालेल
सिमुक या कुळातील मुख्य राजा होताच हे मान्य. पण आद्य सातवाहन हाही मुख्य राजा असावा.ज्याअर्थी त्याची स्वतंत्र नाणी आहेत त्याअर्थी त्याने स्वतंत्र राज्य स्थापन केले होते हे निर्विवाद. अर्थात सिमुकापासूनच सातवाहन घराणे नावारूपाला आले यात काहीच संशय नाही.
नेवाशाला नाणी मिळाली हा संदर्भ कुठचा आहे, ते सांगता येईल का?
नेवाशाचा संदर्भ वा.वि. मिराशींच्याच पुस्तकात आला आहे. बहुधा सांखलियांच्या पुस्तकातही तो आहे.
.फोटो असले तर जरूर लावा असे सुचवेन
फोटो वर दिलेलेच आहेत. फोटो क्र. १७,१८,१९,२० यात गौतमीपुत्राचा जीवनपट रूपकार्थाने कोरलेला आहे.
मी जे फोटो म्हणते आहे ते नाणेघाटातले नागनिका राणी आणि सिमुकापासून भयाळ, कुमार सातवाहन आणि महारथी त्रयणकुर्या (किंवा असेच काही) अशी नावे आहेत त्यांचे.
माझ्या अजून थोड्या वाचनातून लक्षात आले की - त्रिपिटकामध्ये बुद्धाचे म्हणणे I call "a brahmana" (एकब्राह्मण), who is free from moral corruption and from attachment. (बाकीचे भोवडी ब्राह्मण! ) ह्याच्याशी गौतमीच्या शिलालेखातील एकब्राह्मण म्हणण्याचा संबंध असावा. गौतमीला बुद्धाचे त्रिपीटक माहिती होते किंवा महत्त्वाचे वाटत होते असे दिसते. ( आपण सध्या ज्या अर्थाने हे ब्राह्मण आणि क्षत्रिय धरतो तसेच अर्थ सातवाहनांच्या काळी धरले जात नसावेत असे वाटते, ब्राह्मण आणि क्षत्रिय वेगवेगळे असले तरी "जाती" तयार झालेल्या नव्हत्या असे दिसते. ).
मी जे फोटो म्हणते आहे ते नाणेघाटातले नागनिका राणी आणि सिमुकापासून भयाळ, कुमार सातवाहन आणि महारथी त्रयणकुर्या (किंवा असेच काही) अशी नावे आहेत त्यांचे.
नाणेघाटातल्या गुहेत ही सर्व शिल्पे आहेत/होती पण दुर्दैवाने त्यांचे आज फक्त पायच शिल्लक आहेत. वर लिहिलेल्या शिलालेखांतील नावावरूनच ही शिल्पे नेमकी कोणाची हे ओळखता येते.
हा पहा मी काढलेला नाणेघाटातल्या गुहेतील शिल्पाचा पाय शिल्लक असलेला फोटो
गौतमीच्या शिलालेखातील एकब्राह्मण म्हणण्याचा संबंध असावा.
सातवाहन ब्राह्मण नसतीलही. ते ब्राह्मण असण्याचा किंवा नसण्याचा कोणताही सबळ पुरावा उपलब्ध नाही. पण ते वैदिक धर्माचे पुरस्कर्ते मात्र होते पण बौद्ध धर्मालाही तितकाच उदार राजाश्रय दिला होता.
त्याकाळी जाती नव्हत्याच. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही व्यवस्थाच सर्वसामान्यपणे प्रचलित होती. बरेचसे वैश्य मात्र बौद्ध झाले असावेत असे विविध दातृत्वाच्या शिलालेखांवरून दिसते.
फोटोसाठी धन्यवाद. हा फोटो थोडा मोठा लावला असता तर बरे झाले असते की साहेब. असो.
गौतमीने म्हटलेल्या एकब्राह्मणाचा उगम त्रिपिटकांत असावा ही माझ्या स्वतःच्या विचारांची निष्पत्ती आहे. कुठच्याही पुस्तकात मी आतापर्यंत हे वाचलेले नाही (मिराशींचे पुस्तक मला उपलब्ध नाही). मिराशी यावर काही म्हणतात का हे जाणून घ्यायला आवडेल.
उद्देश ते ब्राह्मण नव्हतेच हे सिद्ध करण्याचा नाही. माझे म्हणणे खरे असले तर आता गौतमीचे लिहीणे असे दर्शवते की -
१. तिला बौद्ध साहित्य आणि विचार माहिती होते.
२. आपला मुलगा स्वच्छ मनाचा आणि मोहजालापासून दूर आहे (म्हणून बौद्ध विचारांजवळ आहे) असे सिद्ध करायचे असावे. पण म्हणजेच बौद्धांना जवळ ठेवणेही ती महत्त्वाचे समजत असावी. म्हणजे तो बौद्ध नसावा, ब्राह्मणही असावा. :)
अजून काही
तुमच्या लेखात आले आहे की - "स्वजातीची तो निष्ठेने जपणूक करत आहे, त्याने शत्रुलाही क्षमा केली आहे. " मला हे वाक्य असेच्या असे भांडारकरांच्या भाषांतरात दिसलेले नाही. वरील वाक्यावरून तेव्हा जाती होत्या आणि तो केवळ ब्राह्मणांचे रक्षण करत होता असे वाटण्याचा संभव आहे.
भांडारकरांनी दिलेल्या भाषांतरात
he protected all who sought asylum with him and regarded the happiness and misery of his subjects as his own
स्वजाती म्हटलेले नाही.
गौतमीच्या लेखाचे इतर कोणी केलेले भाषांतर (मिराशी?) वाचायला आवडेल.
पण माझ्या मते (आणि इतर काही अभ्यासकांच्या मते) आपण ज्याला आता ब्राह्मण म्हणतो तशा त्या जाती गौतमीपुत्राच्या काळी नव्हत्या, शिवाय ब्राह्मण हे वैदिक धर्माचे (म्हणजे यज्ञ वगैरे) आचरण करत असा अर्थ असल्याचे दिसते, बाकी मुख्य बेटीबंदी नव्हती, समुद्रबंदी नव्हती, हे तर सर्व दिसतेच आहे.
>ते वैदिक धर्माचे पुरस्कर्ते मात्र होते पण बौद्ध धर्मालाही तितकाच उदार राजाश्रय दिला होता.
वर लेखात सातवाहनांनी बौद्ध धर्मियांना दूर लोटलेले नाही, हे तुमचे मत वर लेखातही यावे असे वाटते.
गौतमीला त्रिपीटकांचे ज्ञान असावे. पण त्याविषयी नक्की माहित नाही शिवाय कुठला संदर्भही मिळत नाही.
पांडवलेण्यातील गौतमी बलश्रीच्या मूळ ब्राह्मी लेखाचे देवनागरीतील प्राकृत लिप्यंतर तसेच मराठीतील मिराशींचे पुस्तक सध्या तरी माझ्याजवळ नाही. ते लवकरच मिळवण्याचा प्रयत्न करेन. त्याआधारेच मग नेमके शब्द त्या लेखात काय आहेत ते सांगता येईल. मूळ शिलालेख हा थोडासा खंडित असल्याने वाचणे अवघड आहे. माझ्याजवळच्या संदर्भात अशीच वाक्ये दिलेली आहेत. (मोरवंचीकर रा. श्री.)
जातीव्यवस्था त्याकाळात नव्हतीच. अशोकानंतरच्या काळात काहिश्या खंडित झालेल्या वैदिक प्रथांचे पुनरुज्जीवन सातवाहनांनी केले होते. नाणेघाटावरील शिलालेखाविषयीच्या जयंत कुलकर्णीच्या या लेखात सातवाहनांच्या यज्ञयागाचे उल्लेख विस्ताराने मांडलेले आहेत.
समुद्रबंदी तर नव्हतीच नव्हती. सातवाहन-क्षत्रप संघर्षाचे मूळ कारणच मुळात समुद्रावरून चालत असलेल्या व्यापारावर अधिकार गाजवण्यावरून आहे.
लेखात सातवाहनांनी बौद्ध धर्मियांना दूर लोटलेले नाही, हे तुमचे मत वर लेखातही यावे असे वाटते.
ते पुढच्या भागात येणारच आहे. या पहिल्या भागाचा उद्देश फक्त नासिक लेण्यांतील ३ व १० क्रमांकाच्या सर्वात महत्वाच्या अनुक्रमे नहपान आणि गौतमी बलश्रीच्या लेण्यांची माहिती करून देणे हाच होता.
दुसर्या भागात इतरही काही शिलालेखांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
मस्त पाय-यांनी चढत रमत गमत लेणीला पोहोचलो. गेल्याबरोबर आपल्याला दहा क्रमांकाची लेणीचं दर्शन होतं. अर्रर्र...लेणीत तर काहीच नाही, असं इथे पाहिल्याबरोबर वाटायला लागतं. पांडव लेणी बघायला जाण्यापूर्वी वल्लीशेठचा हा लेख मोबाईलवर उघडून मग लेणी बघायला पाहिजे. आमच्या दुर्दैवाने मिपा त्या दिवशी बंद होतं. मला वल्ली सारखं निरखून बघता आलं नाही. मला ना शिलालेख दिसले ना ते ग्रीफिन दिसले. मला गौतमबुद्धांच्या मुर्त्या, धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा, चैत्य, महापरिनिर्वाणाचे शिल्प असे ठळक ठळक ओळखू आले. वल्लीशेठचा लेख वाचल्यावर मग एकेक शिल्पाची ओळख व्हायला लागते. बाकी, ते अवलोकितेश्वर, उषवदत्ता, चक्र, त्रिरत्न, वेगवेगळी प्रतिके, शिलालेख हे फक्त वल्लीला दिसतं. आपण पाहिलं ते नहापान विहार वगैरे हेही वल्लीशेठच्या कृपेने कळतं. बाकी, फोटो टाकतो. माहिती वल्लीशेठच देतील.












पांडव लेणी पाहुन फाळकेस्मारकालाही भेट दिली.सायंकाळी फाळके स्मारकाला प्रचंड गर्दी होते. उद्यान आणि प्रदर्शन पाहण्यासारखं. रात्रीच्या वेळी रंगेबिरंगी संगीत कारंजे. अनेक कुटुंबाच्या चाललेल्या डबापार्टी. एक हायफाय क्लासवाल्यांचं हॉटेलिंग, बाळगोपाळ खेळात रमलेले आणि आपल्याच दुनियेत मशगुल असलेले हातात हात घेऊन आणाभाका घेत असलेले, रुसलेले, तो आणि ती. :)
हा जो पांडवलेणीत प्रवेश करताना समोरच येतो तो नहपान विहार. ह्याच्या स्तंभांच्या मागचे बाजूस (ओसरीचे बाजूस) स्तंभशीर्षांवर स्फिन्क्स आणि ग्रिफिन आहेत. आणि ह्याचे ओसरीच्या भिंतींवर नहपानाचा जावई ऋषभदत्त याचे दानधर्माचे शिलालेख आहेत. तर ३ क्र. चा विहार हा देवीलेणी किंवा गौतमीपुत्र विहार म्हणून ओळखला जातो. याचे स्तंभशीर्षांवर स्फिन्क्स नाहीत, ग्रिफिन मात्र आहेत. याचे ओसरीतील भिंतींवर गौतमीपुत्राच्या पराक्रमाचे लेख त्याची आई गौतमी बलश्री आणि पुत्र वाशिष्ठिपुत्र पुळुवामी यांनी कोरवून घेतलेले आहेत.
बुद्धाच्या मूर्ती असलेल्या लेण्या ह्या नहपान विहाराच्या डाव्या बाजूने सुरु होतात. यातच काही लेण्यांमध्ये १० व्या/ ११ व्या शतकात जैन मूर्ती सुद्धा कोरलेल्या आहेत. बौद्ध मूर्तींमध्ये मानुशी बुद्ध, ध्यानी बुद्ध, अवलोकितेश्वर इत्यादी मूर्ती आहेत. ह्या सर्व महायान कालखंडात४ थ्या शतकापासून खोदल्या गेल्या आहेत. बर्याचशा मूर्ती ओबडधोबड आहेत. अपवाद यज्ञ विहारातल्या प्रचंड बुद्धमूर्तीचा.
फाळके स्मारकाचा पूर्वीचा डौल आता राहिला नाही. बरेच खराब झालेय.
बाकी तुम्ही टाकलेला खालून तिसरा फोटो हा पांडवलेणीमधला नसून वेरूळच्या कैलास लेणीच्या डावे बाजूस असलेल्या एका लहानश्या लेण्यातील सप्तमातृकांचा आहे. ;)
ऋषभदत्ताचा आहे. ब्राह्मी संस्कृतात.
फोटोमधील शिलालेख काहीसा असा:
वरून पहिली ओळः "(प/ह)-ञ-(ब/भ)-(?)य-न-(बा/भा)-(ब/भ)-न"..
दुसरी ओळः "ड-यि अ-()-ट-()-या-()-न"
तिसरी ओळः "च-ने-()-ऐ-णी-"...बरीच अक्षरे स्पष्ट असूनही लागत नाहीयेत. ब्राह्मी जोडाक्षरांचा तक्ता मिळाल्यास अजून सोपे होईल.
सातवाहन वैदिक धर्माचे कट्टर अनुयायी असल्याने यज्ञयागादी क्रियांना प्राधान्य असे. नाणेघाटातील शिलालेखांत सातवाहनांनी केलेल्या अनेक यज्ञांचे व त्यातील दानांचे वर्णन आहे. सर्वात महत्वाच्या असा दोन अश्वमेध व एका राजसूय यज्ञाचा उल्लेख त्यात आलेला आहे.
गौतमीपुत्राच्या काळात यज्ञप्रथा चालू होती की नाही याचे पुरावे मिळत नाहीत पण तो वैदिक धर्माचा कट्टर अनुयायी असल्याने त्याच्या काळातही यज्ञ चालूच असावेत.
सातवाहनांची यज्ञश्री, वेदिश्री, स्कंदश्री आदी नावे त्यांची यज्ञसंस्कृतीच दर्शवतात.
तुर्कस्तानातील लिशीया Lycia ( येथील शवे ठेवण्याच्या पेट्या/कबरी (sarcophagus) या साधारण अशाच दिसतात. वरील पिंपळपानाच्या उल्लेखाबद्दल अधिक शोध घेत असताना ही माहिती हाती लागली.
http://en.wikipedia.org/wiki/File:Tomb_of_Payava_1.jpg
किंवा
हा दुवा
जरूर पहावा.
यावरून थोडी रोचक माहिती इथे मिळाली. http://www.kamit.jp/07_lycia/liki_eng.htm
हे स्तूप बरेचदा अशा प्रकारे डोंगरातच का असतात? याचा शोध घेतला असता पर्शियातील राजांच्या कबरी अशा प्रकारे दगडातच आहेत. त्याचप्रमाणे लिशियातही असेच दिसून येते.
महत्त्वाचा प्रश्नः
केवळ बौद्ध स्तूपांबाबतीत असा पगडा आहे का? (यवन म्हणजे नक्की कोण होते?)
पिंपळपानाकृती कमान म्हणजे बुद्धाला गयेमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक आहे.
महाराष्ट्रातील स्तूप हे बहुतांशी़ डोंगरात आहेत. त्यांना शैलगृह असेही म्हटले जाते. सांची, सारनाथ, अमरावती(आंध्र) इ. स्तूप हे जमिनीवर आहेत व बांधीव आहेत.
महाराष्ट्रात जमिनीहीवरही स्तूपांचे अवशेष सापडले आहेत. नालासोपारा येथे आजही विटांनी बांधलेल्या स्तूपाचे अवशेष आहेत. पैठण, तेर येथेही बांधीव स्तूप उत्खननात सापडले आहेत.
बौद्ध भिक्खूंनी शांतपणे ध्यानधारणा करता यावी म्हणूनही खोदीव स्तूप डोंगरांमध्ये करण्यात आले.
यवन म्हणजे ग्रीक. तिथल्या आयोनिया प्रांतातून ते आले. त्यांना आयोनियन म्हणायचे, पुढे त्याचे योनिय, योन, यवन अशी रूपे प्रचलित झाली. इथे स्थायिक झालेल्या यवनांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारल्याचे शिलालेखांमुळे दिसून येते.
पिंपळपानाकृती कमान म्हणजे बुद्धाला गयेमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक आहे.
असे मला वाटत नाही, असे मी सांगत आहे! मला (वर दिलेल्या उदाहरणांवरून असे) वाटते की हे आकार पूर्वीपासून प्रचलित होते - ते लिशियातही तसेच होते आणि भारतातही तसेच आले. वरील शैलगृहाचे मुखदर्शन आणि लिशियातील त्या दगडी कबरीच्या मुखदर्शन यात खूप साम्य आहे असे मला वाटते. (हेच एका दुव्यातही दिसते आहे).
आपल्याकडे अमूक गोष्ट हे याचे प्रतिक आहे, तमूक त्याचे असे भरपूर सांगितले जाते. (तुम्हाला म्हणत नाही, पुस्तकांतूनही सांगितलेले दिसते). परंतु नीट पाहिल्यास हे आकार पूर्वीपासून प्रचलित होते असे वाटते.
यावरून मी जालीय अर्धवट संशोधन केले आहे! त्यातून जे काही मिळाले ते लेखस्वरूपात इथे टाकते.
बौद्ध भिक्खूंनी शांतपणे ध्यानधारणा करता यावी म्हणूनही खोदीव स्तूप डोंगरांमध्ये करण्यात आले.
हेही तितकेसे खरे नाही. स्तूप हे बौद्ध अवशेषांवर केले आहेत. त्यांच्याबाजूचे विहार यासाठी नक्कीच आहेत (ध्यान, भिक्खूंची राहण्याची व्यवस्था), पण मूळ स्तूप म्हणजे अवशेषांवर तयार केलेले दगडांचे ढीग होते. ह्यांची काळजी घेण्यासाठी भिक्खूंना विहार केले होते, नंतर अर्थात ती तीर्थस्थाने झाली असावीत (जसे कार्ले).
स्तूपाचे अर्थ असे सर्व दिले आहेतः संदर्भः http://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/cgi-bin/tamil/recherche
a knot or tuft of hair , the upper part of the head , crest , top , summit any relic-shrine or relic-casket (made of various materials , such as terra cotta , clay , elaborately formed brick or carved stone ; often very small and portable , and enclosing a fragment of bone or a hair of some saint or deceased relative , or inscribed with a sacred formula ; these are carried long distances and deposited in hallowed spots such as Buddha-Gaya1) ; any heap , pile , mound , tope. ; the main beam (of a house)
बाकी यवन म्हणजे आयोनिया प्रांतातील हे बरोबर, सध्याचे तुर्कस्तान, लिशिया आणि आयोनिया हे सर्व सारखेच. त्यावरूनही ही पिंपळपानाची रचना नसून यवनी शवपेटिकांवर आधारित रचना आहे असे म्हणणे योग्य ठरेल असे वाटते.
पांडवलेणी ही सुमारे इ.स. १२०० च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. सातवाहन राजांनी या गुहा खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
सालाहण कुले कन्हे राजिनि नासिककेनसातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा.
यात अनेक गुहा असून काही गुहा अतिशय कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. यातील स्त्रीयांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आढळतात. या गुहांमध्ये एक प्रमुख चैत्यगृह आढळते जे संपुर्ण सुस्थितीत आहे. पुर्व दिशेचे प्रवेशद्वार सुस्थितीत आहे.
तसेच काही पश्चिमेकडील लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहीलेले दिसून येते.
या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. तसेच या टेकडीवर पाण्याची टाके आहेत परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते. मात्र टेकडीवर प्राचीन काळी केलेले पाण्याचे टाके दिसून येते. या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे
पांडवलेण्यावरून नाशिक शहराचे विहंगम दृष्य दिसते. टेकडीखाली दादासाहेब फाळके स्मारक आहे. पांडवलेणे, नाशिक येथे वर जाण्यासाठी पायर्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.
स्थळ: बुद्ध स्मारक नाशिक.ठिकाण: पांडवलेणी पायथ्यापाशी (नाशिकपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर, मुंबई रस्ता)जाण्यासाठी नाशिकच्या निमाणी बस-स्थानकावरून दर २० मिनिटांनी ’पांडवलेणी’ बस जाते
नासिक लेण्यांतील महत्वाची अशी सातवाहनांची देवीलेणी आणि क्षत्रपांचा नहपान विहार सुरुवातीला पाहून मग इथल्या चैत्यगृहाकडे निघालो.
महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणेच इथेही एकमेव चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी रचना. पिंपळपानाकृती कमान हे सर्वच चैत्यगृहांचे वैशिष्ट्य. गौतम बुद्धाला गयेत अश्वस्थ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक म्हणून ही रचना कोरली जाते.
इथल्या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर ही कमान एकावर एक अशी दुहेरी स्वरूपात कोरलेली आहे. फुलाफुलांचे अतिशय नाजूक असे नक्षिकाम, त्यावर बौद्धांचे त्रिरत्न चिन्ह व त्याभोवतीने हत्ती, घोडे इ. प्राणी मोठ्या खुबीने कोरलेले आहेत.
चैत्यगृहावर नेहमीप्रमाणेच कोरलेले यक्ष, गवाक्षांनी केलेला त्रिमितीय आभास, स्तूपांची रचना हे सर्व आहेतच.
चैत्यगृहापाशीच एक शिलालेख आहे.
रञोअमस अरहलयस चालिसलनकस दुहुतुया महाहकुसि-
रिया भतपालिकाया रञोअमस अगियतनकस भदकरिका-
यासा भारिया कपननकमातुय चेतियघरम पावते-
तिरुन्हुमी निठपपित
याचा अर्थ
राजअमात्य चालिसलनाकाची पुत्री, अग्नित्राण भदकरिकाची पत्नी आणि कपननकाची माता महाहकुश्री भट्टपालिकेने हे चैत्यगृह त्रिरश्मी पर्वतावर स्थापित केले आहे.
भट्टपालिका ही नाणेघाटात उल्लेख आलेल्या नागनिकेचा मुलगा महाहकुश्री याची नात असे मानले जाते. याचा अर्थ हे चैत्यगृह क्षत्रप व गौतमीपुत्राच्या आधीचे.
चैत्यगृहात १६ सालंकृत खांबावर तोलले गेलेले गजपृष्ठाकृती छत, मधोमध वाटोळा गुळगुळीत स्तूप, स्तूपाची हर्मिका. इथे छताला लाकडी फासळ्या शिल्लक नाहीत पण त्यांच्या खाचा त्यांचे पूर्वीचे अस्तित्व दाखवतात. खांबांवरही काही शिलालेख कोरलेले आहेत.
या सर्व शिल्पांच्या बरोबरीने ब्राह्मी लिपीतले लेखही आपल्याला दिसत असतात.
त्यापैकी काही लेखांची थोडक्यात माहिती देतो.
सिधम सकस दमचिकस लेखकस वुधिकस
विण्हुदतपुतस दसपुरावथस लेणम पोढियो-
चा दो अतो एक पोढि या अपरा--सा मि माता
पितरो उदिसा
शक दमचिकाचा लेखक आणि दशपुराचा रहिवासी विष्णुदत्ताचा पुत्र वुधिकाने एक लेणे आणि दोन पाण्याची टाकी पैकी एक आपल्या माता पितरांसाठी (भेट)दिले आहे
लेणी शब्दाचे प्राचीनत्व इथे दिसून येते. पोढि म्हणजे पाण्याची टाकी त्याचाच अपभ्रंश होऊन (पाण)पोई असा आजचा शब्द रूढ झाला. लेखक ह्या शब्दाचा उल्लेखही येथे महत्वाचा आहे.
अजून एका शिलालेखात यवनांचा पण उल्लेख आला आहे.
सिधम उतरहासा दमतमितियकस योनकस धम्मदेवपुतस इदग्निदतस धम्मतमा
इमा लेणम पावते तिरण्हुमी खनितम अभमतरम च लेणस चेतियघरो पोढियो च मातापि-
तरो उदिस इमा लेणम सवबुधपुजय चतुदिसा भिक्खुसंघसा नियतितम
सह पुतेना धम्मरक्सिता
उत्तरेतील दंतमित्रीचा रहिवासी, धर्मदेवाचा पुत्र, यवन इंद्राग्निदत्त याने त्रिरश्मी पर्वतावरील एका चैत्यगृहानजीकच्या लेण्यात माता पितरांच्या स्मरणार्थ पाण्याची टाकी खोदलेली आहेत. आणि हे लेणे सर्व बौद्धांच्या पुजेसाठी चार दिशांनी आलेले बौद्धसंघां आणि त्याचा पुत्र धर्मरक्षित याने एकत्रितरित्या बांधले आहे.
यवन म्हणजे ग्रीक लोक. इथे येउन स्थायिक झालेल्या यवनांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता हे यावरून सिद्ध होते.
अजूनही असे दातृत्वाचे बरेच शिलालेख या ठिकाणी आहेत.
यज्ञविहारातील सिंहासनारूढ बुद्धमूर्ती
Pandav Leni Nasik
प्राचीन वसाहतींच्या बाबतीत बरेचदा असे लक्षात येते की, अतिप्राचीन स्थळे ही बरेचदा पुढे जाऊन तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येतात. आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी जो काळ व्यतीत केलेला असतो त्याची स्मृती वंशज जपतात आणि त्या स्थळाची प्राचीनता पुढे त्याला पावित्र्य बहाल करते. या सर्व गोष्टी काळाच्या ओघात लोकांच्या नकळत घडतात, फक्त काळच त्याला साक्षीदार असतो. म्हणूनच म्हणतात ना ‘कालाय तस्मैः नमः’!
प्राचीन नासिक्यनगरीचा उत्कर्ष ज्यांच्या काळात झाला ते सातवाहन राजे किती बलाढय़ होते हे त्यांच्याबद्दलच्या बृहत्कल्पसूत्रभाष्य (6246-47) या ग्रंथातील प्राकृत गाथांमधून स्पष्ट होते. जरी या गाथा थोडय़ा प्रौढी मिरवल्यासारख्या जरी भासल्या तरी त्यातून सातवाहनांचे महत्त्वाचे स्थान लक्षात येते. नाशिकच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचा अध्याय सातवाहनांच्या काळापासून सुरू झालेला दिसतो. कृष्ण या राजाच्या काळात नाशिकमधील श्रमणांच्या अमात्याने आज पांडवलेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्रिरश्मी पर्वतात सर्वप्रथम लेणे कोरलेले दिसते. यापाठोपाठ अनेक लेणी इथे कोरल्या गेल्या. हिंदुस्थानी पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या नोंदीनुसार इथे 24 लेणी आणि त्यात एकूण 27 शिलालेख आहेत. परंतु नुकतेच हिंदुस्थानी पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे डोंगरात उंचावर पावसाळ्यापूर्वीचे लेणी संवर्धनाचे काम चालू असताना श्री. सलीम पटेल, श्री. राकेश शेंडे इ. अधिकाऱयांना तीन नवीन लेणी सापडली. त्यांनी आणि नाशिक येथील ट्रिबिल्स संस्थेचे अतुल भोसेकर, सुनील खरे आणि पुरातत्त्वविद मैत्रेयी भोसेकर यांनी या लेण्यांची सविस्तर नोंदणी केली आणि त्यांची माहिती प्रथम उजेडात आणली. या नवीन लेण्यांच्या शोधामुळे आता येथील लेण्यांच्या संख्येत भर पडली आहे. काळाच्या ओघात त्यांचा सखोल अभ्यास होईलच.
त्रिरश्मी पर्वतावरील लेणी कोरण्यासाठी इ.स. पूर्व 1ल्या शतकापासून ते इ.स.च्या 5व्या-6व्या शतकापर्यंत अनेक भक्तांनी देणग्या दिल्या हे तिथे असलेल्या निरनिराळ्या शिलालेखातून स्पष्ट होते. यात काही वैयक्तिक देणग्या आहेत तर काही समूहांनी दिलेल्या दिसतात. महाराष्ट्राच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक इतिहासाची पुनर्रचना करण्यासाठी येथील शिलालेखांचा मोठा उपयोग झाला आहे. बौद्ध धर्माच्या विकासातले विविध टप्पे समजण्यासाठीसुद्धा या लेखांचा उपयोग झाला आहे. इ.स.च्या 1ल्या शतकात गुजरातमधल्या नहपान नावाच्या क्षहारात क्षत्रप घराण्यातल्या शक राजाने सातवाहनांच्या राज्यावर आक्रमण करून त्यांना पश्चिम हिंदुस्थानातून पूर्व हिंदुस्थानात स्थलांतर करण्यास भाग पडले. या काळात त्या शक राजाचा जावई उषवदात याने या पर्वतावर एक सुरेख विहार (भिक्षूंचा निवास) कोरला. या काळात अनेक परकीय व्यापारी या स्थळाला भेट देऊन नवीन लेणी तयार करण्यासाठी दान देत होते, असे या लेखांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. त्यात उत्तरेतून आलेला यवन इंद्राग्निदत्त, शक दामचिक यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. या लोकांनी दानांबरोबर त्यांच्या काही संकल्पना, काही चिन्हे (त्यांच्यासाठी शुभ असलेली) यांची ओळख स्थानिक लोकांना आणि कारागीरांना करून दिली. त्याचा परिणाम असा झाला की मूळची हिंदुस्थानी नसलेली अनेक चिन्हे, प्रतीके या लेण्यांमध्ये आज पाहायला मिळतात.
प्राचीन हिंदुस्थानी धर्मात लोकदेवतांचे स्थान खूप महत्त्वाचे होते. बौद्ध, हिंदू आणि जैन या सर्व धर्मियांचे आपापले स्थानिक देव किंवा यक्ष-यक्षी या स्वरूपातल्या रक्षक देवता होत्या. महाराष्ट्रातील अनेक बौद्ध लेण्यांमध्ये चैत्यगृहांच्या प्रवेशद्वारापाशी त्यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. पण त्या यक्ष-यक्षी किंवा देवांच्या मूर्ती आहेत असे आपण समजतो. त्यासंबंधीचा कोणताही अभिलेखीय पुरावा तिथे नसतो. पण याला अपवाद म्हणजे नाशिक येथील चैत्यगृह. इथे चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारापाशी एका व्यक्तीचे शिल्प कोरले आहे. पण त्याच्या मागच्या भिंतीवरील शिलालेखात त्याचा यक्ष असा उल्लेख केला आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा अभिलेखीय पुरावा आहे. इ.स.च्या 7व्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘महामायुरी’ नावाच्या बौद्ध ग्रंथात सतत प्रवास करणाऱया बौद्ध भिक्षूंना सर्पदंशापासून वाचण्यासाठी काही रक्षामंत्र किंवा कवचमंत्र दिले आहेत. तसेच ते ज्या प्रदेशात असतील तिथल्या स्थानिक देवता किंवा यक्षांनाही आवाहन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हिंदुस्थानातील तत्कालीन सर्व महत्त्वाच्या व्यापारी आणि धार्मिक केंद्रांची यादी तसेच तिथल्या स्थानिक रक्षक देवता आणि यक्ष यांच्या नावांची यादी या ग्रंथात दिली आहे. त्यात नाशिक येथे ‘सुंदर’ नावाचा यक्ष होता असा उल्लेख आढळतो. वर उल्लेखिलेला चैत्यागृहाच्या बाहेरचा यक्ष हा तो ‘सुंदर’ नावाचा यक्ष होता का हे सांगता येणे अवघड आहे. पण हा नाशिकचा प्राचीन रक्षक यक्ष आता पूर्णपणे विस्मृतीत गेला आहे हे नक्की.
वर उल्लेखिलेल्या पश्चिमी क्षत्रप राजा नहपान याच्याशी सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने नाशिकजवळच्या गोवर्धन नावाच्या गावाजवळ घनघोर युद्ध केले. त्या युद्धात नहपान याचा दारुण पराभव झाला आणि त्यांचा वंश ‘निरवशेष’ झाला. सातवाहनांचे गेलेले राज्य परत मिळाले. या सर्व घटनांचा उल्लेख त्रिरश्मी बौद्ध लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखांमध्ये आढळतो. एवढेच नव्हे तर या विजयाचे प्रतीक म्हणून नहपानाच्या चलनात असलेल्या चांदीच्या नाण्यांवर गौतमीपुत्राने स्वतःचे चिन्ह पुनर्मुद्रांकित केले. नशिकजवळच्या जोगळटेम्बी नावाच्या गावाला 1904मध्ये नहपानाच्या 13230 नाण्यांचा संग्रह अचानक सापडला. त्यामधील 9270 नाण्यांवर गौतमीपुत्राने स्वतःचे चिन्ह पुनर्मुद्रांकित केले होते. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, या ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ (म्हणजे ज्याचे घोडे तीनही समुद्रांचे पाणी पितात म्हणजे तिथे पोचलेले आहेत) असे विशेषण मिळालेल्या गौतमीपुत्र सातकर्णीने शकांवर जो मोठा विजय मिळवला त्याप्रीत्यर्थ त्याने ‘शालिवाहन शक’ हा संवत्सर सुरू केला. परंतु हा शक सातवाहनांनी कधीही वापरला नाही, याचे खरे कारण त्यांनी तो सुरूच केला नाही. नहपानाचे गुजरातमधले राज्य कार्दमक क्षत्रप या दुसऱया शक घराण्यातला राजा चष्टन याने ताब्यात घेऊन एक संवत्सर इ.स. 78मध्ये सुरू केला. तोच पुढे शक संवत्सर नावाने प्रसिद्ध झाला. शालिवाहन म्हणजे सातवाहन यांनी एका शक राजाला हरवल्यानंतर जो दुसरा शक राजा गादीवर आला त्याने हा सुरू केला, ही वस्तुस्थिती आपण काही प्रमाणात स्मरणात ठेवली आणि काही प्रमाणात विसरलो.
काळाच्या ओघात सातवाहनांच्या साम्राज्याचा ऱहास झाला आणि या परिसरात आभीर राजांचे राज्य आले. त्रिरश्मी बौद्ध लेणी समूहात त्यांचा शिलालेख आढळतो. याच आभीर राजांचे वंशज म्हणजे आजचे आहेर आणि त्यांची भाषा ती अहिराणी. काही अभ्यासकांच्या मते त्यांच्या कान्हाचा देश खानदेश. पुढे बौद्ध भिक्षूंनी या लेणी सोडल्यावर तिथे इ.स.च्या 11व्या–12व्या शतकात जैन धर्मियांचा प्रभाव वाढलेला दिसतो. म्हसरूळजवळ चामरलेणी तयार झाल्या तर त्रिरश्मी बौद्ध लेणी समूहात काही लेण्यांमध्ये जैन तीर्थंकरांच्या मूर्ती कोरण्यात आल्या असे दिसते. तसेच अंजनेरी येथे जैन मंदिरांचेही बांधकाम झाले. अंजनेरी पर्वत, अंकाई-टंकाई, मांगी तुंगी या ठिकाणी जैन लेणी कोरली गेली. अशा प्रकारे मुळातच अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या या परिसरात सर्व धर्मियांनी आपापल्या धार्मिक स्थापत्याची उभारणी केली. मांगी तुंगी येथे उभ्या केलेल्या 108 फूट उंचीच्या तीर्थंकरांच्या मूर्तीची 2016 साली गिनीस बुकात नोंद झाली आहे. एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले एक प्राचीन काळापासून समृद्ध व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले नगर सर्व प्रकारच्या लोकांना आपला आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी इथे आकर्षित न करेल तरच नवल होते. त्यातून गोदावरी नदीचे माहात्म्य सर्वश्रुत होतेच. सिंहस्थाच्या वेळेस भरणाऱया कुंभमेळ्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात या परिसराची ख्याती पसरली होती. नाशिक आणि त्र्यंबक या अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या नगरांमध्ये विविध प्रकारचे धार्मिक, पितरांसाठीचे विधी करण्यासाठी हिंदुस्थानभरातून लोक येऊ लागले. काळाच्या ओघात अनेक राजवटींनी या प्रदेशात राज्य केले, व्यापार उदीम वाढायला मदत केली, अनेक मंदिरे बांधली, किल्ले बांधले आणि येथील भरभराटीस हातभार लावला. जरी मध्ययुगात नाशिकचे नाव गुलशनाबाद झाले तरी या गावाच्या धार्मिक महत्त्वात, नावलौकिकात काहीही फरक पडला नाही. काही काळाने ते परत नाशिक या नावाने ओळखले जाऊ लागले.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे असोसिएट प्रोफेसर ऑफ इन्डोलॉजी आहेत)
manjirib24@gmail.com
एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी गुंफा, भाग 1
नाशिक मधील त्रिरश्मी पर्वतामध्ये असलेल्या प्रसिद्ध बौद्ध गुंफा बघण्यासाठी मी आता निघालो आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून जरी आजमितीला नाशिक प्रसिद्ध असले तरी ऐतिहासिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा नाशिकचे स्थानमाहात्म्य कोणत्याही प्रकारे कमी लेखता येत नाही. नाशिक शहराचे भौगोलिक स्थानच मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहे. दक्षिणेकडे पसरत जाणार्या सह्याद्री पर्वताच्या रांगा व पूर्वेकडे पसरणारी सातमाला पर्वतराजी यांच्या कुशीत नाशिक पहुडले आहे असे म्हणता येते. शहराच्या कोणत्याही भागातून आजूबाजूला एक नजर जरी टाकली तरी सभोवती दिसणारा आसमंत काही आगळाच भासतो. कोणत्याही दिशेला बघितले तरी त्या परिसरात दिसणारे अनेक मध्यम उंचीचे डोंगर सुळके एकदम जमिनीतून मधूनच बाहेर आल्यासारखे दिसतात. अशा दिसणार्या दोन सुळक्यांमधली जमीन मात्र एकदम सपाट आहे हेही लक्षात येते. या अशा अनेक डोंगर सुळक्यांच्या परिसरात सुद्धा, अगदी विरुद्ध दिशेला असलेले परंतु जुळे भाऊ शोभतील असे दिसणारे व जमिनीतून अचानकच उगवलेले दोन उंच डोंगर सुळके मात्र माझे खास लक्ष वेधून घेतात. यापैकी उत्तरेला असलेला डोंगर सुळका "चांभार टेकडी" या नावाने ओळखला जातो. या टेकडीच्या एका कड्यावर जैन लेणी आहेत तर दक्षिणेकडे असलेला डोंगर सुळका "त्रिरश्मी पर्वत" या नावाने परिचित आहे. तीन सूर्यकिरण असे मोठे आकर्षक नाव धारण करणार्या या पर्वताच्या एका बाजूच्या साधारण मध्यावर मी ज्या गुंफा बघण्यासाठी म्हणून निघालो आहे त्या गुंफा आहेत.
16 लाख लोकवस्ती असलेले नाशिक हे आज महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. मुंबई-आग्रा या महत्त्वाच्या राजरस्त्यावर असलेले नाशिकचे स्थान व मुंबई-नाशिक या प्रवासासाठी लागणारा फक्त दोन अडीच तासांचा कालावधी या कारणांमुळे उत्पादन उद्योगाबरोबरच नाशिक मध्ये सेवा उद्योग मोठ्या प्रमाणात आलेला दिसतो आहे. त्याचप्रमाणे इथल्या प्रसिद्ध द्राक्षांपासून वाईन बनवणारे उद्योगही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. या किंवा इतर काही कारणांमुळे नाशिकची गणना मात्र आता श्रीमंत शहरांत केली पाहिजे असे दिसते आहे. रस्त्यांवर मधून मधून दिसणारे व ओळीने लावलेल्या असंख्य विद्युतदीपांमुळे लखलखणार्या समोरील काचेच्या भिंती दिमाखाने दर्शवणारे बडे बडे मॉल बघून माझी या बाबतीत खात्री पटते आहे. माझ्या आजूबाजूने जाणारा मोटारींचा प्रवाह मेट्रो शहरांइतका दाटी वाटीचा नसला तरी बर्यापैकी दाट आहे आणि रस्त्यावर दिसणार्या मोटारींमध्ये आलिशान लिमुझिन गाड्याही मोठ्या प्रमाण दिसत आहेत, रस्त्यावरून जात असताना अशा बर्याच आलिशान गाड्यांच्या शो रूम्सही मला दिसत आहेत. या सर्व दृष्यांमुळे नाशिकच्या नवश्रीमंतीबद्दल माझी खात्री पटत चालली आहे. असे जरी असले तरी नाशिकची खरी व पूर्वापार चालत आलेली ओळख ही असंख्य धार्मिक स्थळे व देवळे असलेले एक ऐतिहासिक शहर म्हणूनच केली पाहिजे. नाशिक एवढ्या धर्मादाय संस्था बहुदा काशी सोडल्यास दुसरीकडे कोठेही नसाव्यात. हे शहर कमीत कमी दोन हजारांपेक्षा जास्त वर्षे अस्तित्वात असल्याचा स्पष्ट पुरावा आहे. भारतातील एक अत्यंत महत्त्वाची नदी 'गोदावरी' नाशिक जवळच उगम पावते. मात्र नाशिक शहरामध्ये मध्ये असलेले या नदीचे स्वरूप उन्हाळ्यात जवळ जवळ कोरडा ठणठणीत पडणारा एक ओढा असेच करावे लागेल.
नाशिकची दोन औद्योगिक उपनगरे आहेत. यापैकी एक उपनगर सातपूर या नावाने ओळखले जाते तर दुसर्याला अंबड असे नाव आहे. मी आता या अंबड उपनगरात आलो आहे. मला भेट द्यायची आहे तो 'त्रिरश्मी' पर्वत, या अंबड उपनगराच्या अगदी कडेला उभा आहे. नाशिक कडून मुंबई कडे जाणारा मुंबई-आग्रा रस्ता हा नाशिक शहराची दक्षिण हद्द असे पूर्वी समजले जात असे. मात्र आता नाशिक बरेच आणखी दक्षिणेकडे वाढलेले दिसते आहे. 'त्रिरश्मी' पर्वत या मुंबई-आग्रा रस्त्याला लागूनच दक्षिणेकडे आहे.
या पर्वताच्या पायथ्याजवळचा संपूर्ण भाग नाशिक महानगरपालिकेने मोठ्या विचारपूर्वक विकसित केला असावा असे वाटते आहे. नेहरू उद्यान म्हणून हा भाग आता ओळखला जातो आहे. पर्वतांच्या तळापासून ते मध्य भागापर्यंत गर्द हिरवीगार अशी दाट झाडी दिसते आहे. पर्वताच्या तळाशी एखाद्या बौद्ध स्तूपाचा आकार दिलेले फाळके स्मारक या परिसरात मोठे खुलून दिसते आहे. फाळके स्मारकाशेजारूनच पर्वताकडे जाणारा रस्ता जातो आहे. या रस्त्याच्या कडेला आम्ही गाडी ठेवतो व समोरच दिसणार्या पायर्या चढण्यास प्रारंभ करतो. पायर्या वर चढणे सोपे जावे या विचाराने बनवल्या गेल्या आहेत हे लगेचच लक्षात येते आहे.
घडीव दगडांनी बसलेल्या इथल्या प्रत्येक पायरीची उंची फारशी जास्त नाहीये आणि ती अरुंद न बनवता चांगली पसरट अशी बनवली आहे. या दोन्ही कारणांनी पर्वत चढणे हे एकदम सोपे काम वाटते आहे. पायर्या अतिशय घनदाट अशा झाडी खालून जात असल्याने वर तळपणार्या सूर्याचा प्रकाश खाली पोहोचतच नाहीये त्यामुळे ही सर्व चढण फारसा थकवा न जाणवता मी पार करू शकतो आहे. एकूण 230 पायर्या येथे आहेत. आणि पायर्यांचा रस्ता वळणावळणांचा असल्याने थोडा गूढरम्यही भासतो आहे. पायर्यांच्या शेवटाला एक लोखंडी गेट व तिकीट ऑफिस दिसते आहे. आत जाण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून तिकीट घ्यावे लागते. परंतु त्याची किंमत अगदीच माफक म्हणजे फक्त 5 रुपये आहे.
गेट मधून आत शिरल्याबरोबर दोन्ही बाजूंना म्हणजे माझ्या डाव्या व उजव्या हातांना, या गुंफाचा विस्तार पसरलेला मला दिसतो आहे.
नाशिकच्या त्रिरश्मी पर्वतमधील या एकूण 24 बौद्ध गुंफा साधारणपणे उत्तर किंवा ईशान्येकडे मुख असलेल्या आहेत. क्रमांक 1 ते 20 या गुंफांसमोर एकाच पातळीत असलेले व पूर्व- पश्चिम पसरलेले असे एक प्रांगण आहे व त्या प्रांगणातच मी आता उभा आहे. पहिल्या नजरेतच माझ्या लक्षात येते आहे की पुरातत्त्व विभागाकडून इथल्या गुंफांची देखभाल अतिशय योग्य रितीने केली जात असल्याने जवळपास सर्व गुंफांना भेट देणे शक्य आहे. कार्ले येथील गुंफांशी तुलना केली तर तेथील बर्याचशा गुंफांना कुलुपे लावून टाकलेली आहेत व आत जाण्यासाठी योग्य परिस्थितीत असलेले मार्गही राखलेले दिसत नाहीत. अजंठ्याला सुद्धा काहीं गुंफा कुलूप लावलेल्या दिसतात.
इ.स. 629-645 या कालखंडात भारतवर्षाला भेट देणारा चिनी प्रवासी शुएन त्झांग याने आपल्या परतीच्या प्रवासात महाराष्ट्राच्या राजधानी जवळ असलेल्या एका बौद्ध मठाचा उल्लेख आपल्या प्रवास वर्णनात केलेला आहे. त्याने आपल्या प्रवास वर्णनात महाराष्ट्राच्या राजधानीच्या नावाचा उल्लेख केलेला नसला तरी आजूबाजूचा प्रदेश व इतर स्थळे यांच्या वर्णनावरून तो वर्णन करत असलेली ही राजधानी नाशिकच असली पाहिजे याबाबत माझ्या मनात तरी शंका नाही. त्याचप्रमाणे तो वर्णन करत असलेला बौद्ध मठ म्हणजे मी आता उभा आहे तो त्रिरश्मी पर्वतातील बौद्ध मठच असला पाहिजे याची मला खात्री वाटते आहे. महाराष्ट्राच्या राजधानीचे वर्णन करताना शुएन त्झांग म्हणतो:
"(या शहरात) शंभराहून जास्त बौद्ध मठ असून त्यात पाच सहस्त्राहून जास्त भिक्षू रहात असतात. महायान व हिनयान या दोन्ही पंथांचे येथे पालन होते. येथे देवांची शंभर मंदिरे असून त्यात अनेक पंथांचे साधू वास्तव्य करून असतात."
नाशिकला हे वर्णन चपखलपणे लागू होते असे मला वाटते. शुएन त्झांग राजधानीजवळ असलेल्या बौद्ध मठाचे वर्णन या शब्दात करतो:
"(राजधानीच्या) अगदी जवळच, दक्षिणेला, एक बौद्ध मठ असून त्यात बोधिसत्त्वाची एक पाषाण मूर्ती आहे. या मूर्तीच्या दैवी सामर्थ्याची कीर्ती दूरवर पसरलेली असून या मूर्तीपाशी गुप्तपणे प्रार्थना केलेल्या अनेकांची मनोकामना पूर्ण झालेली आहे."
शुएन त्झांग या ठिकाणी त्रिरश्मी गुंफांमधील 20 क्रमांकाच्या गुंफेतील 10 फूट उंच बुद्ध मूर्तीकडे निर्देश करतो आहे या बाबत माझ्या मनात तरी शंका नाही.
त्रिरश्मी गुंफांमधील 19 क्रमांकाची गुंफा ही सर्वात प्रथम खोदलेली गुंफा आहे असे मानले जात असल्याने त्या गुंफेला प्रथम भेट द्यावी असे मी ठरवतो. साधारणपणे अशा गुंफा समुहाच्या मध्यवर्ती भागात खोदलेल्या आढळतात. त्याचप्रमाणे ही गुंफा साधारण इतर गुंफांच्या मध्यावरच आहे. ही गुंफा 18 क्रमांकाच्या गुंफेच्या उजव्या बाजूला लागूनच आहे व 20 क्रमांकाच्या गुंफेच्या खाली आहे. मी उभा असलेल्या प्रांगणाच्या साधारण समपातळीतच ही गुंफा आहे. ही गुंफा म्हणजे भिख्खूंसाठी बांधलेला व सर्वात जुना असा एक छोटा विहार आहे. गुंफेचे 3 भाग आहेत. पुढे व्हरांडा त्याच्या मागे हॉल आणि हॉलच्या तीन बाजूंना असलेल्या भिख्खूंच्या सहा कोठड्या असे या विहाराचे स्वरूप आहे. मधला हॉल 14 फूट रूंद, 14 फूट खोल व 8 फूट उंच आहे. हॉलच्या मागे आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी 2 कोठड्या खोदलेल्या आहेत.
प्रत्येक कोठडीच्या प्रवेशद्वारावर घोड्याच्या नालाच्या आकाराची कमान कोरलेली आहे व दोन कमानींच्या मधील भागात 1 फूट रूंद असलेले सांची स्तूप पद्धतीचे बौद्ध रेलिंग कोरलेले आहे. हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे व या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस, पाषाणातच जाळी कोरून दोन गवाक्षे बनवलेली आहेत. व्हरांड्याच्या समोरील बाजूस दोन साधे स्तंभ खोदलेले आहेत. या स्तंभांचा आकार मध्यात अष्टकोनी असून खालच्या व वरच्या बाजूस तो चौरस ठेवलेला आहे. एका स्तंभावर अर्धकमल कोरलेले आहे.
वरील वर्णनावरून हे लगेच लक्षात येऊ शकते की ही गुंफा अगदी साधी व कोणतेही कोरीव काम न केलेले एक भिक्षू निवासस्थान किंवा विहार आहे. तरीसुद्धा ही गुंफा नाशिकच्या गुंफांपैकी एक महत्त्वाची गुंफा म्हणून गणले जाते. याचे कारण म्हणजे उजव्या बाजूला असलेल्या व जाळीचे डिझाईन कोरलेल्या गवाक्षाच्या व्हरांड्याच्या बाजूच्या वरच्या सिलवर असलेला 2 ओळींचा शिलालेख हे आहे.
हा शिलालेख सांगतो की,
"सातवाहन कुलातील कृष्ण राजा असताना नाशिक येथील श्रमण महामात्र याने (हे) लेणे कोरविले."
या शिलालेखाचा अर्थ कसा लावायचा या बाबत तज्ञांत मतभेद असले तरी सेनार्टने लावलेला अर्थ मला तरी जास्त सयुक्तिक वाटतो. या अर्थाप्रमाणे सातवाहन कुलातील कृष्ण राजाच्या कालात श्रमणांसाठी (बौद्ध भिख्खूंसाठी) नाशिक येथे नेमलेल्या ज्येष्ठ धर्माधिकार्याने हे लेणे कोरविले असे हा शिलालेख सांगतो.
पुराणांतील वर्णनाप्रमाणे कृष्ण राजा हा सिमुक राजानंतर झालेला दुसरा सातवाहन राजा मानला जातो. या राजाने बौद्ध भिख्खूंसाठी नाशिकमध्ये एका ज्येष्ठ धर्माधिकार्याची केलेली नेमणूक ही सम्राट अशोकाच्या राज्यकारभाराच्या पद्धतीतील अशाच प्रकारच्या नेमणूकींसारखी असल्याने असे अनुमान काढता येते की सम्राट अशोकाचा काल व कृष्ण राजाचा काल यामध्ये फारसे अंतर नसावे. यामुळे कृष्ण राजा इ.स.पूर्व 200 च्या सुमारास होऊन गेला असावा असे म्हणता येते.
क्रमश:
हा 'कृष्ण' राजा म्हणजे सिमुक सातकर्णीचा धाकटा भाऊ. सिमुकाच्या मृत्युनंतर सिमुखाचा पुत्र पहिला सातकर्णी हा अल्पवयीन असल्याने हा गादीवर आला. याचे आणि प्रथम सातकर्णीचे संबंध ठिक नसावेत कारण नाणेघाटातल्या प्रतिमालेखात प्रथम सातकर्णीची पत्नी नागनिका हिने कृष्ण सातवाहनाची प्रतिमा कोरलेली नाही अथवा त्याचा उल्लेखही केलेला नाही याचा अर्थ पहिल्या सातकर्णीला आपले राज्य कृष्णाशी झगडूनच मिळवावे लागले असले पाहिजे.
पुराणांनी जरी सिमुकाला आद्य सातवाहन म्हटलेले असले तरी हल्लीच उपलब्ध झालेल्या पुराव्यांनुसार तो आद्य सातवाहन नाही. सातवाहन कुळाचा प्रमुख 'सातवाहन' नावाचाच राजा होता. 'सातवाहन' असे त्याचे नाव कोरलेली नाणी औरंगाबाद, हैदराबाद, अकोला येथे जमिनीवर आणि नेवासे, कोंडापूर येथे उत्खननात सापडली आहेत. या नाण्यांवर 'रञो सिरी सादवाहनस' असे कोरलेले असून मागील बाजूस उज्जैन चिन्ह कोरलेले आहे. या आद्य सातवाहनापासूनच त्याच्या कुळाला सातवाहनकुल असे म्हटले गेले.
सातवाहन राजांचा थोडाफार इतिहास या मालिकेच्या पुढील भागात देण्याचा मी प्रयत्न करणार आहेच.
अवांतर: वि.वा.मिराशी यांच्या मताने सिमुख व कृष्ण हे राजे अशोकाचा मांडलिक असलेल्या मूळ सातवाहन राजाचे पुत्र नसून त्यांच्यात कही पिढ्यांचे अंतर असावे. तज्ञात मतभिन्नता असल्याने मी या गोष्टीचा उल्लेख माझ्या लेखात केलेला नाही.
वि.वा.मिराशी यांच्या मताने सिमुख व कृष्ण हे राजे अशोकाचा मांडलिक असलेल्या मूळ सातवाहन राजाचे पुत्र नसून त्यांच्यात कही पिढ्यांचे अंतर असावे.
सहमत आहे. सिमुख अतिशय सामर्थ्यवान होता. केवळ सातवाहनाच्या एकाच पिढीत सातवाहन राज्य इतक्या उत्कर्षाला पोचेल आणि त्याचा इतका विस्तार होईल असे वाटत नाही. तेव्हा किमान एक ते दोन पिढ्यांचे अंतर असलेच पाहिजे. अर्थात सातवाहन आणि सिमुख यादरम्यान असलेल्या सातवाहनांच्या पिढ्यांचा कुठलाही उल्लेख पुरातत्विय किंवा पौराणिक पुराव्यांत नाही हे ही खरे.
पुढच्या भागाची वाट पाहातो आहेच.
बाकी ते वि. वा. मिराशी नसून वा. वि. मिराशी -वासुदेव विष्णू मिराशी.
एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी गुंफा, भाग 2
सातवाहन कुलातील कृष्ण राजाच्या कालात खोदलेल्या 19 क्रमांकाच्या गुंफेला भेट दिल्यानंतर त्या गुंफेच्या बाजूलाच असलेल्या 18 क्रमांकाच्या गुंफेकडे मी आता निघालो आहे. नाशिक येथे असलेल्या या त्रिरश्मी पर्वतातील गुंफांमध्ये, ही 18 क्रमांकाची गुंफा म्हणजे येथे असलेले एकुलते एक उपासना गृह किंवा चैत्य गृह आहे. या गुंफेची वैशिष्ट्ये अभ्यासण्यापूर्वी, सातवाहन इतिहासातील या गुंफेच्या संबंधित काही संदर्भांची उजळणी करणे योग्य ठरेल.
इ.स.पूर्व 200 या कालात राज्यावर असणारा सातवाहन राजा कृष्ण हा या राजघराण्याचा संस्थापक म्हणून मानल्या जाणार्या सिमुक (सिमुख, श्रीमुख) या राजाचा बहुदा सख्खा भाऊ असावा असे मानले जाते. मात्र ज्या राजाच्या नावावरून सातवाहन कुल असे नाव या राजघराण्यातील राजांनी धारण केले होते तो सातवाहन राजा, सिमुख व कृष्ण यांचा पिता होता की नाही याबाबत मतभिन्नता आहे. वा.वि. मिराशी यांच्या मताने सातवाहन राजा व सिमुक यांच्यामध्ये 7 किंवा 8 पिढ्या होऊन गेलेल्या असाव्यात. सातवाहन राजाचा काल व त्याचे कृष्ण राजाशी नाते यांचा सध्याच्या विषयाच्या दृष्टीने काहीच संबंध नसल्याने त्याचा विचार न करता कृष्ण राजाच्या पुढील काळाकडे मी वळतो.
पुराणांतील माहितीप्रमाणे, कृष्ण राजानंतर गादीवर आलेला पुढचा सातवाहन राजा म्हणजे पहिला सातकर्णी हा राजा. सुदैवाने या राजाबद्दल विपुल माहिती, मुख्यत्वे, मागच्या वर्षी मी भेट दिलेल्या व जुन्नर जवळ असलेल्या, नाणेघाट येथील गुंफेमधील विस्तृत शिलालेखातून प्राप्त झालेली आहे. मात्र हा सातकर्णी राजा, पुराणे म्हणतात तसा कृष्ण राजाचा पुत्र होता का सिमुक राजाचा पुत्र होता हे सांगणे कठीण आहे. नाणेघाटातील गुंफेच्या मागच्या भिंतीजवळ सातकर्णी राजाच्या कोरलेल्या पुतळ्याच्या उजव्या अंगाला, सिमुकाचा पुतळा कोरलेला होता व कृष्ण राजाच्या नावाची नाणेघाटातील गुंफेत कोठेही नामोनिशाणीही नाही या निरिक्षणांमुळे सातकर्णी राजा, सिमुकाचा पुत्र असण्याची शक्यता मला जास्त योग्य वाटते आहे. तरीही आपण हा नातेसंबंधांचा गोंधळ तूर्त बाजूस ठेवून या गुंफेमधील इतर कोरीव पुतळ्यांकडे प्रथम वळूया. गुंफेच्या मागील भिंतीजवळ एका रांगेत असलेले असे 8 पुतळे येथे कोरलेले होते. यापैकी उजवीकडचे पहिले 4 पुतळे, राजा सिमुक, राजा सातकर्णी, राणी नयनिका व एक सरदार महारथी त्रिनक यारो यांचे होते. वा.वि. मिराशी यांच्या मताने डावीकडचे 4 पुतळे या राजा-राणीच्या भय, वेदिश्री, हकुश्री व सातवाहन या 4 पुत्रांचे किंवा राजकुमारांचे असले पाहिजेत. या पुत्रांपैकी भय व सातवाहन यांचे अकाली निधन झाल्याने प्रथम वेदिश्री ( इतिहास तज्ञ शोभना गोखले याचे नाव स्कंदश्री असे वाचतात.) व नंतर हकुश्री हे दोन राजकुमार, सातवाहनांच्या राजसिंहासनावर आले असले पाहिजेत. मिराशी यांच्या मताने यांच गुंफेत असलेल्या दुसर्या एका शिलालेखात या राजा हकुश्रीचा, श्री सती (शक्ती) असा उल्लेख आढळतो. श्री सतस अशी अक्षरे कोरलेली नाणीही सापडलेली आहेत. मिराशी यांच्या मते ही नाणी या हकुश्री राजाने पाडवून घेतलेली असावीत.
नाशिक गुंफांचा विषय सोडून हे नाणेघाटचे वळण मी अचानक घेतले याच्या मागे एक कारण आहे. मी आता भेट देत असलेल्या 18 क्रमांकाच्या चैत्य गृहामधील एका शिलालेखात या हकुश्री राजाचा महाहकुश्री असा उल्लेख केलेला दिसतो. मात्र नाशिक आणि नाणेघाट येथे उल्लेख असलेले हे दोन्ही हकुश्री एकच का निरनिराळे याबाबत इतिहाससंशोधकांमध्ये एकमत दिसत नाही. वा. वि. मिराशी या दोन्ही ठिकाणी उल्लेखलेल्या व्यक्तींना एकच मानतात तर ए.एस.आळतेकर यांच्या मताने या दोन निराळ्या व्यक्ती असल्या पाहिजेत. हा विषय सध्या बाजूला ठेवून आपण चैत्य गृहाकडे वळूया.
अजंठा येथील 10 क्रमांकाचे चैत्य गृह किंवा पितळखोरे येथील चैत्य गृह यांच्याशी असलेले या चैत्य गृहाचे साम्य लगेचच नजरेत भरते व त्यामुळे या तिन्ही गुंफा साधारण एकाच कालात खोदवून घेतलेल्या असाव्यात हे लक्षात येते. नाशिक गुंफाच्या पूर्व-पश्चिम विस्ताराच्या साधारण मध्यावर असलेली ही 18 क्रमांकाची गुंफा, 40 फूट खोल व 21 फूट-6 इंच रूंद आहे. वर छताला खण कोरलेले आहेत आणि अगदी आतील बाजूची खोदाई गोलाकार आहे. मध्यवर्ती उपासनेच्या जागेच्या सभोवती अष्टकोनी स्तंभांच्या सलग ओळी आहेत. दोन्ही बाजूंना 5 व आतील गोलाकार खोदाईसमोर 5 असे एकूण 15 स्तंभ येथे आहेत. दोन्ही बाजूंचे स्तंभ व कडेच्या भिंती यामध्ये साधारण 4 फूट रूंदीचे पॅसेजेस ठेवलेले आहेत. दोन्ही बाजूंचे स्तंभ कसलेही कोरीव काम न केलेले व अष्टकोनी आकाराचे आहेत. स्तंभांच्या पायाच्या बाजूला, पायर्या असलेल्या चौरस प्लॅटफॉर्मवर एखादा मातीचा घट ठेवल्यावर जसा आकार दिसेल तसा आकार दिलेला आहे. मात्र आतल्या गोलाईजवळ असणारे 5 स्तंभ अगदी साधे सरळ आहेत. एका बाजूच्या स्तंभांच्या डोक्यावर चौरस आकाराचे कॅपिटल खोदलेले दिसत आहेत. दुसर्या बाजूस मात्र कॅपिटल्स दिसत नाहीत. या चैत्य गृहाच्या आतील भागातील अगदी साध्या रचनेमुळे हे चैत्य गृह, कार्ले येथील चैत्य गृहाच्या बर्याच आधी व साधारणपणे 19 क्रमांकाच्या व कृष्ण राजाच्या कालातील गुंफेच्या खोदाईच्या काळाच्या जवळपासच खोदले गेले असावे असा अंदाज केला तरी फारसा अयोग्य ठरू नये. गुंफेच्या आतील भागात असलेले स्तंभ अर्थातच मागील बाजूच्या वक्रतेला समांतर अशा वक्रतेवर खोदलेले आहेत. या वक्रतेच्या साधारण मध्यावर व प्रवेशद्वारापासून 26 फूट अंतरावर एक साधा सरळ दिसणारा स्तूप दिसतो आहे. स्तूपाच्या मध्यावर, सांची येथील प्रसिद्ध बौद्ध रेलिंगचे डिझाईन, स्तूपाच्या परिघावर कोरलेले दिसते आहे. स्तूपाच्या माथ्यावर एक चौरस पेटी व त्यावर उलटा ठेवलेला पायर्यांचा एक पिरॅमिड खोदलेला/ठेवलेला दिसतो आहे.
उजव्या बाजूला असलेल्या 5 आणि 6 क्रमांकाच्या स्तंभांवर मी वर निर्देश केलेला शिलालेख मला स्पष्ट दिसू शकतो आहे. या शिलालेखातील मजकूर या प्रमाणे आहे. ( मिराशी भाषांतर)
वा.वि. मिराशी यांच्या मताने या गुंफेचा अंतर्भाग इ.स.पूर्व प्रथम शतकाच्या सुरूवातीस खोदला गेला असला पाहिजे. या चैत्य गृहाच्या अंतर्भागातील वास्तूशास्त्रीय रचना या काळास अनुसरूनच वाटते आहे. गुंफेचा अंतर्भाग बघून झाल्याने मी बाहेर येतो. प्रवेशद्वाराच्या आजूबाजूचा भाग अतिशय बारकाईने केलेल्या हिनायन पद्धतीच्या कोरीव कामाने संपूर्णपणे भरून टाकलेला दिसतो आहे. गुंफेच्या मुखाचा हा भाग बघून कार्ले येथील चैत्यगृहाच्या प्रवेशद्वार भिंतीवरील कोरीव काम आठवते आहे. मागच्या शतकातील प्रसिद्ध पुरातत्त्व तज्ञ जॉन मार्शल याच्या मताने या गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळील कोरीव काम नंतर म्हणजे इ.स.पूर्व प्रथम शतकाच्या अखेरीस केलेले असावे. कदाचित या कारणामुळे या गुंफेतील साधा अंतर्भाग व बारीक कोरीव कामाने भरलेला मुखाजवळचा भाग हे एवढे निराळे दिसत असावेत.
प्रवेशद्वाराच्या अगदी वर, घोड्याच्या नालाच्या आकाराची व आधारासाठी 11 तुळया असलेली एक कमान कोरलेली आहे. ही कमान व प्रवेशद्वार या मधील जागेत 4 कमानीदार रेलिंग कोरलेली आहेत. कमान व 4 रेलिंग्ज या मधील जागांच्यात अनेक प्राणी, फुले, मोर व मानवी आकृती कोरलेले आहेत. प्रवेश्द्वाराच्या बाजूचे दोन्ही स्तंभ याच प्रमाणे बारीक नक्षीकामाने सजवलेले आहेत. प्रवेश्द्वाराच्या उजव्या बाजूस एक बास रिलिफ पद्धतीने कोरलेली यक्षाची आकृती आहे. यक्षाने आपल्या उजव्या हातात देठासकट असलेले एक कमल पुष्प धरलेले आहे तर डाव्या हाताने कंबरेला असलेल्या शेल्याचे टोक पकडले आहे. कदाचित या हातात त्याने एखादा खंजिर घेतला असण्याचीही शक्यता वाटते. यक्षाची केशरचना सातवाहन कालातील दिसते आहे. त्याने कानात मोठी जाड कर्णभूषणे व मनगटावर कंगण घातलेले आहेत. त्याने कंबरेला झोकदार गाठ मरलेला शेला बांधलेला दिसतो आहे. या यक्ष आकृतीकडे बघताना मला पितळखोरे गुंफेमधील द्वारपाल असलेल्या यक्ष आकृतीची आठवण होते आहे कारण या दोन्ही लेण्यांमधील यक्ष आकृत्यात मला विलक्षण साम्य भासते आहे. द्वाराच्या दाव्या बाजूकडील स्तंभ व त्यापलीकडे असलेली यक्षाची आकृती या दोन्ही नष्ट झालेल्या आहेत.
प्रवेशद्वारावरील कमानीच्या वरच्या बाजूस अंदाजे 9 फूट ऊंच, 10 फूट रूंद व 4 फूट खोल असलेली एक घोड्याच्या नालाच्या आकाराची भव्य कमान खोदलेली आहे. या कमानीच्या दोन्ही अंगांना असलेला गुंफेच्या मुखपृष्ठाचा भाग याच प्रकारच्या छोट्या कमानी, बास रिलिफ पद्धतीने कोरलेले स्तंभ, स्तूप, बेर्म कमानी व बौद्ध रेलिंग डिझाईन हे सर्व कोरून भरून टाकलेला आहे. कोरलेल्या स्तंभांवर कॅपिटल्स दाखवलेले असून त्यावर प्राण्यांची चित्रेही कोरलेली आहेत. या सर्व कोरीव कामाने गुंफेचे प्रवेशद्वार अतिशय प्रभावी व उठावदार दिसते आहे.
गुंफेच्या या समोरील भागावर दोन शिलालेख आहेत. या शिलालेखातील मजकूरामुळे जॉन मार्शल यांच्या मताला मोठा आधार मिळतो. यापैकी पहिला शिलालेख प्रवेशद्वारावरील कमानीला लागून खालच्या बाजूस आहे. या शिलालेखात असलेला मजकूर या प्रमाणे आहे.
या शिलालेखाचा अर्थ बहुदा नाशिक येथील रहिवाशांनी ही गुंफा पूर्ण करून तिच्या देखभालीसाठी दंभक नावाचे ग्राम या मठातील भिख्खूंना दिले असा असावा. दुसरा शिलालेख अर्धवट वाचता येतो आहे व तो यक्ष आकृतीच्या साधारण 6 फूट उजवीकडे असलेल्या मोल्डिंगवर आहे.
या दोन्ही शिलालेखावरून गुंफेचा मुखाजवळील भाग नंतरच्या कालात पूर्ण केला गेला असावा हे स्पष्ट होते आहे.
पुढच्या गुंफेकडे मी जाणार तेवढ्यात समोर दिसत असलेल्या कमानीच्या अवतीभवती असलेल्या आणखी काही बास रिलिफ शिल्पांकडे माझे लक्ष जते. कमानीच्या दोन्ही बाजूंना फणा काढून उभे असलेल्या नागांची चित्रे कोरलेली दिसत आहेत. त्याचप्रमाणे कमानीच्या अगदी वरच्या टोकाजवळ दोन्ही अंगांना घोड्याच्या नालाच्या आकाराच्याच पण छोट्या आकाराच्या दोन दोन कमानी कोरलेल्या मला दिसत आहेत. जरा निरखून बघितल्यावर मधल्या विशाल कमानीच्या दोन्ही बाजूंना उड्डाण करत असलेल्या परंतु जरा विचित्र दिसणार्या यक्षिणी किंवा किन्नरांच्या आकृत्या मला दिसत आहेत. कमानीच्या उजव्या बाजूला असलेल्या आकृतीचा वरचा भाग हातात एक तबक घेतलेली मानवी आकृती असली तरी त्या आकृतीच्या शरीराचा खालचा भाग मोराचा आहे. डाव्या बाजूच्या आकृतीचा वरचा भाग तसाच हातात तबक घेतलेल्या मानवी शरीराचा आहे पण खालचा भाग मात्र एखाद्या माशाच्या शरीराचा दाखवलेला आहे. या अर्धवट मानवी आकृतींच्या पलीकडे मला आणखी काही मानवी आकृती दिसत आहेत. उजव्या बाजूस एक पुरुष व त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या दोन स्त्रिया असे बास रिलिफ पद्धतीचे शिल्प दिसते आहे. सातवाहन काळातील केशरचना असलेल्या मधल्या पुरुषाच्या बाजूच्या स्त्रिया बहुदा त्याच्या बायका असाव्यात व त्यांचे भांडण तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. उजव्या बाजूच्या स्त्रीने बहुदा साडीसारखे वस्त्र परिधान केले आहे तर डावीकडील स्त्रीने घागरा किंवा तत्सम वस्त्र परिधान केलेले असावे. पुरुष धोतर नेसलेला आहे. आणखी उजव्या बाजूला खांद्यावर घट घेतलेली आणखी एक स्त्री अस्पष्ट दिसते आहे. मधल्या कमानीच्या डाव्या बाजूस मात्र घट घेतलेल्या स्त्रीच्या शिल्पाशेजारी फक्त एका स्त्री पुरुष जोडपे कोरलेले आहे. ते सुद्धा एकमेकाशी भांडताना बहुदा दाखवलेले आहेत.
या एवढ्या वर व नीट दिसू शकणार्या जागी ही छोटी बास रिलिफ शिल्पे कोरण्याचे प्रयोजन काय असावे? असा विचार करूनही मला ते समजू शकत नाहीये. स्त्रिया असल्या की भांडणे होणारच! मग ती एक असो वा दोन! असे शिल्पकाराला सुचवायचे आहे की काय, कोणास ठाऊक!
क्रमश:
नाशिकमधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा; भाग 3
18 क्रमांकाच्या चैत्यगृहाला भेट दिल्यानंतर मी या चैत्यगृहाच्या पश्चिम दिशेला साधारण 50 ते 60 मीटर अंतरावर असलेल्या त्रिरश्मी पर्वतावरील आणखी एका महत्त्वाच्या गुंफेकडे चालत जातो आहे. 10 क्रमांकाची ही गुंफा नहापान राजाची गुंफा या नावानेही ओळखली जाते. इ.स.पूर्व 26च्या सुमारास उत्तर हिंदुस्थानमध्ये राज्य करत असलेल्या शुंग व कण्व राजवटींचा अस्त झाल्यानंतर अफगाणिस्तानातून आलेल्या शक (Scythians) टोळ्यांनी राज्य बळकावले होते. नहापान हा राजा स्वताला राजा न म्हणवून घेता प्रथम या शक राजांचा व त्यांना पदच्युत करून नंतर गादीवर आलेल्या कुशाण राजांचा क्षत्रप (Satrap) म्हणवून घेत असे. पुणे व नाशिक हे महाराष्ट्रातील जिल्हे या नहापान राजाच्या अंमलाखाली इ.स.नंतरच्या पहिल्या व दुसर्या शतकात (55 CE to 102CE) होते. या कारणामुळे मी टाकत असलेल्या या साठ किंवा सत्तर पावलांत मी अंदाजे 100 ते 150 वर्षांचा कालावधी ओलांडतो आहे असे म्हणता येईल.
मी मागे भेट दिलेल्या आणि वर्णन केलेल्या कार्ले येथील गुंफांमधील एका शिलालेखात या नहापान राजाचे नाव असल्याचा मी उल्लेख केला होता हे काही वाचकांना कदाचित स्मरत असेल. नहापान राजाने सातवाहन राजांचा युद्धात पराभव करून त्यांचे माळवा, दक्षिण गुजरात, कोकण व उत्तर महाराष्ट्र हे भाग युद्धात जिंकून घेतले होते. या नहापान राजाच्या दक्षमित्रा या कन्येचा, भारतीय नाव असलेल्या परंतु शक जमातीचाच असलेल्या, ऋषभदत्त याचे बरोबर विवाह झालेला होता. या ऋषभदत्ताला नहापान राजाने दक्षिण गुजरात, सोपारा ते भडोच हा उत्तर कोकणाचा भाग व नाशिक व पुणे या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा सुभेदार (viceroy) म्हणून नेमलेले होते. कार्ले, नाशिक व कान्हेरी येथील लेण्यांमध्ये या ऋषभदत्ताने आपण कसा दानधर्म केला आहे व आपण कसे उदार आहोत हे सांगणारे बरेच शिलालेख खोदून घेतलेले सापडतात. आपण कसे कृपाळू व दयावंत राज्यकर्ते आहोत हे येथील प्रजेला नीट समजावे व त्यांची खात्री पटावी म्हणून त्याने हेतूपूर्वक केलेले बरेच प्रयत्न या गुंफात लक्षात येतात. नाशिक मधील या 10 क्रमांकाच्या गुंफेमध्ये सुद्धा त्याने व त्याच्या कुटुंबियांनी खोदवून घेतलेले असेच काही शिलालेख आहेत.
10 क्रमांकाची गुंफा भिख्खूंच्या वास्तव्यासाठी म्हणून खोदलेला असाच एक भव्य विहार आहे. ही गुंफा 3 कक्षांची मिळून खोदलेली आहे. बाहेरील प्रांगणातून प्रवेश घेता येणारा एक व्हरांडा, त्याच्या मागे हॉल आणि हॉलच्या बाजूंना भिख्खूंसाठी 16 कोठड्या अशी या गुंफेतील रचना आहे. या हॉलमध्ये मी आता प्रवेश करतो आहे. हा हॉल 45-1/2 फूट खोल, 40 फूट रूंद आणि 10 फूट उंचीला आहे. हॉलच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींमध्ये भिख्खूंसाठी खोदलेल्या प्रत्येकी 5 कोठड्या आहेत तर मागच्या भिंतीत 6 कोठड्या आहेत. मागच्या भिंतीत खोदलेल्या या कोठड्यांच्या प्रवेशद्वारापैकी क्रमांक 3 चे प्रवेशद्वार व क्रमांक 4 चे प्रवेशद्वार यामध्ये जरा विचित्र दिसणारे एक लो रिलिफ प्रकारचे शिल्प कोरलेले आहे. या शिल्पाच्या वरच्या भागात हिनयान पंथाच्या शिल्पांमध्ये दाखवतात त्या पद्धतीच्या स्तूपाचा वरचा भाग कोरलेला आहे. त्याच्या डोक्यावर अस्थी-अवशेष कोश व त्यावर उलटा ठेवलेला पायर्या पायर्यांचा एक पिरॅमिड दाखवलेला आहे. या पिरॅमिडच्या वरच्या अंगाला असलेल्या सर्वात मोठ्या पायरीच्या कडांवर हिनयान कालातील घोड्याच्या नालाच्या आकाराच्या कमानी कोरलेल्या दाखवलेल्या आहेत. यावर एक छत्री कोरलेली आहे तसेच स्तूपाच्या दोन्ही बाजूंना आणखी दोन छत्र्या व दोन बौद्ध पद्धतीची निशाणे कोरलेली आहेत.
मात्र स्तूपाच्या खालच्या अंगाचे सर्व शिल्पकाम तोडून टाकून त्या जागी एक मानवी आकृती कोरलेली दिसते आहे. या मानवी आकृतीकडे बघत असताना मला स्मरण होते की गुंफेत प्रवेश करताना गुंफेच्या उजव्या बाजूस समोरील प्रांगणाकडे तोंड करून उभी असलेली मूर्ती व ही मूर्ती यात काहितरी साम्य दिसते आहे. आत असलेल्या या आकृतीचा चेहरा नष्ट झालेला असला तरी तिच्या डाव्या हातात असलेला सोटा किंवा गदा व उजव्या हातात असलेला खंजीर मात्र स्पष्टपणे दिसू शकतो आहे. या मूर्तीच्या मागेची 5 फणा असलेला नाग बहुदा कोरलेला असावा असे भिंतीवरील खुणांवरून वाटते आहे. या सर्पाच्या शरीराचा मागचा भाग या आकृतीच्या घोट्यांजवळ स्पष्टपणे दाखवलेला दिसतो आहे.
मात्र बाहेरील बाजूस असलेली आकृती व ही आकृती यात एक मोठा फरक लक्षात येण्यासारखा आहे. बाहेरील आकृती सरळ व ताठ उभ्या असलेल्या एखाद्या रक्षकाची वाटते आहे तर ही आकृती उजव्या बाजूला थोडीफार कललेली वाटते आहे. बर्याच पुढच्या कालात कोणीतरी स्तूपाचे शिल्प नष्ट करून तेथे ही मानवी आकृती खोदण्याचा प्रयास केलेला आहे हे स्पष्टपणे कळते आहे. ही मानवी आकृती नंतरच्या कालातील आहे हे लक्षात आल्याने मी दोन्ही बाजूंना असलेल्या व मूळ स्तूप शिल्पाबरोबरच म्हणजे इ.स. पहिल्या शताब्दीच्या उत्तरार्धात कोरलेल्या दोन स्त्रियांच्या शिल्पांकडे लक्ष केंद्रीत करतो.
शिल्पातील दोन्ही बाजूंच्या स्त्रिया मोठ्या सुदृढ अंगकाठीच्या दाखवलेल्या आहेत. उजव्या बाजूकडील स्त्रीने आपले हात डोक्यावर ऊंच करून जोडलेले आहेत व ती स्त्री आपले मस्तक थोडे डावीकडे कलवून शेजारील स्तूपाला नमस्कार करताना दाखवली आहे. तिच्या मस्तकावरील केश खांद्यापर्यंत येतील एवढ्या लांबीचे कापलेले आहेत आणि मस्तक डावीकडे कलल्यामुळे केसांच्या बटा डावीकडून पुढे आलेल्या आहेत. तिने घागर्यासारखे एक वस्त्र परिधान केलेले असून त्याच्या पुढच्या बाजूस बरेच भरतकाम केलेला व छोटे गोंडे लावलेला एक शेला कंबरेस बांधलेला आहे. अंगात तिने चोळी समान वस्त्र परिधान केलेले असून हातात बांगड्या व पायात कडी आहेत. उजव्या बाजूची स्त्री बहुदा चवरी धारक असावी मात्र आता ती चवरी दिसू शकत नाहीये. तिने ऊंच दिसणारी केशरचना तरी केलेली आहे किंवा तिने डोक्यावर एक घट धारण केलेला आहे. चेहर्याच्या दोन्ही बाजूंना खांद्यापर्यंत येणार्या केसांच्या बटा दिसत आहेत. तिच्या अंगातही घागरा-चोळी व कंबरेला शेला अशीच वस्त्रे आहेत. तिचा डावा हात मात्र तसाच लोंबकळत खाली सोडलेला दर्शवलेला आहे. या दोन्ही शिल्पांवरून त्या कालातील व या भागातील सर्वसाधारण स्त्रिया कशा दिसत असतील? काय प्रकारची वस्त्रे व आभूषणे परिधान करत असतील? याची एक सर्वसाधारण कल्पना येऊ शकते.
हॉलमधून बाहेर पडून मी आता बाहेरच्या व्हरांड्यात आलो आहे. व्हरांड्यातून हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेशद्वारे आहेत. मध्यभागी असलेले प्रवेशद्वार अंदाजे 6 फूट रूंद व 10 फूट तरी ऊंच आहे. बाजूची दोन्ही दारे 3 फूट रूंद व 8 फूट ऊंच आहेत. मधले द्वार व बाजूची द्वारे यात दोन गवाक्षे आहेत. द्वारे व गवाक्षे यांच्या सील्सवर किंवा बाजूंना काहीच नक्षीकाम वगैरे कोरलेले नसून ती सर्व अगदी साधी आहेत. व्हरांडा अंदाजे 35 फूट रूंद व 9 फूट खोल असा आहे. मात्र त्याचे छत हॉलपेक्षा जास्त ऊंच दिसते आहे. व्हरांड्याच्या दोन्ही टोकांना भिख्खूंच्या कोठड्या आहेत. व्हरांड्याच्या पुढच्या बाजूस 6 स्तंभ आहेत. त्यापैकी 2 कडेचे खांब बाजूच्या भिंतींना जोडलेले असल्याने पिलॅस्टर सारखेच वाटत आहेत. सर्व स्तंभांचे डिझाइन, 18 क्रमांकाच्या गुंफेत असलेल्या सातवाहन कालातील, म्हणजे तळाच्या बाजूस पायर्या-पायर्यांच्या एका चौकोनी पिरॅमिड्वर ठेवलेला घट अशा आकाराचे आहे. स्तंभ अष्टकोनी असून वर परत उलटा ठेवलेल्या घटाचा आकार दिलेला आहे.
या उलट्या ठेवलेल्या घटाच्या वरच्या बाजूस असलेले डिझाइन फारच सुंदर व रोचक दिसते आहे व कार्ले चैत्य गृहामधील स्तंभांची आठवण करून देणारे आहे. उलट्या घटावर, प्रत्येक बाजूला एक आयताकृती गवाक्ष असलेली एक चौरस आकाराची पेटी ठेवलेली आहे. या पेटीच्या बाजूंना बौद्ध रेलिंगचे कोरीव काम आहे. या पेटीच्या आत एखाद्या कंगणासारखी दिसणारी एक गोल बांगडी कोरलेली आहे. या कंगणाच्या परिघावर खाचा-खाचांचे डिझाइन आहे. या चौकोनी पेटीच्या वरच्या बाजूस एक उलटा ठेवलेला पायर्या पायर्यांचा चौकोनी पिरॅमिड कोरलेला असून या पिरॅमिदचा वरचा भाग व छत या मधील जागेत एकामेकाकडे पाठ करून बसलेल्या प्राण्यांच्या 2 जोड्या कोरलेल्या आहेत. या पैकी काही प्राणी कल्पनेतील दिसत आहेत. एक जोडी व्हरांड्याच्या बाजूने तर एक बाहेरील प्रांगणातून दिसू शकते. व्हरांड्याच्या बाजूने दिसणारे व खर्या प्राण्यांसारखे असणारे प्राणी म्हणजे वाघ व बोकड हे आहेत. एका स्तंभावर स्फिंक्सची जोडी आहे तर दुसर्या खांबावर वाघाचे शरीर, हरिणासारखे कान व पोपटाची चोच असलेला एक काल्पनिक प्राणी आहे. प्रांगणातून दिसणार्या प्राण्यांच्या जोड्यात सिंह, वृषभ व हत्ती आहेत. या सर्व प्राण्यांच्यावर एक किंवा दोन स्वार बसलेले दाखवलेले आहेत. व्हरांड्याच्या उजव्या बाजूस आधी निर्देश केल्याप्रमाणे एका रक्षकाची मानवी आकृती कोरलेली आहे. या आकृतीचे हॉलमधील लो रिलिफ आकृतीशी बरेच साम्य दिसते आहे. मात्र ही आकृती आतील आकृतीप्रमाणेच बर्याच नंतरच्या काळात कोरलेली वाटते आहे.
या गुंफेत सर्व मिळून 6 शिलालेख आहेत. यापैकी 3 शिलालेख हे क्षत्रप नहापान राजाचा जावई ऋषभदत्त याने मठाला दिलेल्या देणगी संबंधी असून यात ऋषभदत्त याने कोणकोणत्या धार्मिक स्थळांना देणग्या दिल्या आणि कोणती धर्मिक कृत्ये पार पाडली याचे विस्तृत विवरण दिलेले आहे. लघू स्वरूपातील 2 शिलालेखात ऋषभदत्त याची पत्नी दक्षमित्रा हिने मठाला दिलेल्या देणग्यांचा उल्लेख केलेला आहे. ऋषभदत्त याचे शिलालेख तोच तोच मजकूर सांगणारे असल्याने एका शिलालेखाचा मिराशी यांनी केलेला अनुवाद मी खाली देत आहे.
हा शिलालेख वाचल्यावर ऋषभदत्त आपली उदारता व क्षमता या बाबत लोकांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करतो आहे असे माझे तरी मत झाले. त्याच्या पत्नीचे शिलालेख याच्या अगदी उलट म्हणजे मुद्यास धरून व संक्षिप्त आहेत. कदाचित प्रत्यक्ष क्षत्रपाची कन्या असल्याने आपले महत्त्व कोणाला सांगण्याची गरज तिला भासली नसावी. तिचा शिलालेख सांगतो.
10 क्रमांकाच्या गुंफेला भेट दिल्यावर माझी पावले आता नाशिक गुंफांमधील सर्वात महत्त्वाची गुंफा म्हणून मानल्या जाणार्या 3 क्रमांकाच्या गुंफेकडे वळली आहेत. ही गुंफा बघण्यासाठी मी मुख्यत्वे नाशिकला आलो आहे.
क्रमश:
बाकी तो नहपान विहारातला पक्ष्याची चोच असलेला प्राणी म्हणजे ग्रीक दंतकथांमधला 'ग्रिफिन' हा होय. तर सिंहाची जी शिल्पे आहेत ती म्हणजे ग्रीक दंतकथांमधलीच 'नेमियन लायन' यांची असावी.
ग्रीक मिथकांतील ह्या शिल्पांवरून ह्या विहाराच्या बांधकामात ग्रीक शिल्पकारांचा मोठा सहभाग असावा असे वाटते.
नाशिक लेण्यांतच लेणी क्र. २३ (किंवा २४) मध्ये बुद्धमूर्तीच्या पायाजवळ एक लहानसे घुबडाचे शिल्प कोरलेले आहे.
ग्रीक उपदेवता अथेनाचे ते शिल्प.
एका साम्राज्याच्या शोधात: नाशिक मधील त्रिरश्मी किंवा पांडव गुंफा; भाग 4
नहापनाच्या गुंफेला भेट दिल्यानंतर मी नाशिक मधील या त्रिरश्मी पर्वतावरील सर्वात महत्त्वाची गुंफा म्हणून समजल्या जाणार्या 3 क्रमांकाच्या गुंफेकडे निघालो आहे. ही गुंफा, गौतमीपुत्र सातकर्णी राजाची गुंफा या नावानेही ओळखली जाते. संपूर्ण सातवाहन राजघराण्यातील राजांमध्ये, गौतमीपुत्र हा राजा, सर्वश्रेष्ठ म्हणून मानला जातो. याच्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत सातवाहन साम्राज्य उत्कर्षाच्या टोकाला जाऊन पोचले होते असे म्हणता येते. शक (Scythian) क्षत्रप नहापन याने आधीच्या काळात सातवाहनांकडून जिंकून घेतलेला सर्व प्रदेश गौतमीपुत्राने परत जिंकून तर घेतलाच परंतु याशिवाय त्याने आपले साम्राज्य उत्तरेला असलेल्या माळवा प्रांताच्या पलीकडेही वाढवले होते. महाराष्ट्रात गौतमीपुत्र हा राजा शालिवाहन या नावाने ओळखला जातो व महाराष्ट्रावर राज्य करणारा प्राचीन काळातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानला जातो. कोणा एका शक (Scythian) राजाच्या नावाने इ.स.78 मध्ये चालू झालेल्या सनाला, इ.स. 1300 च्या आसपास, शालिवाहन शके असे नाव कोणीतरी व कोणत्यातरी कारणासाठी दिले गेले व आजतागायत हा सन याच नावाने आपल्याला परिचित आहे. मात्र या सनाशी गौतमीपुत्र किंवा शालिवाहन राजाचा संबंध नाही असे इतिहासकार डॉ. ए.एस.आळतेकर म्हणतात व ते योग्य वाटते.
गौतमीपुत्र इ.स.86 मध्ये सिंहासनावर आरूढ झाला. त्या वेळेस त्याचे राज्य अपकर्षाच्या न्यूनतम पातळीवर पोचले होते. क्षत्रप नहापनने सातवाहन साम्राज्याचे अनेक प्रांत जिंकून तेथे आपले स्थान मजबूत केलेले होते. पूर्वेकडून कुषाण राजा कनिष्क सातवाहन साम्राज्याचे लचके तोडण्याच्या प्रयत्नात होता. इ.स. 101 किंवा त्याच्या कारकिर्दीच्या काळात गौतमीपुत्राने आधी गमावलेले आपल्या राज्याचे सर्व प्रांत तर परत मिळवलेच पण त्या शिवाय नहापनाच्या मालकीच्या प्रांतात मोहिमा काढून त्याने काठेवाड व कुकुरा ( आग्नेय राजस्थान) हे प्रांतही जिंकून आपल्या साम्राज्याला जोडले. गौतमीपुत्राच्या कारकिर्दीतच सातवाहन साम्राज्याची कीर्ती संपूर्ण भारतवर्षात प्रथम पसरली.
या प्राचीन काळातील ऐतिहासिक बारकाव्यांवरून हे स्पष्ट होते की त्रिरश्मी पर्वतावरील गुंफा क्रमांक 3 ही साधारण, कार्ले येथील लेण्यामधील मुख्य चैत्यगृह खोदले गेले, त्याच सुमारास खोदली गेली असली पाहिजे. या दोन्ही गुंफामधील मुलभूत स्थापत्यामध्ये बरेच साम्य असल्यासारखे मला वाटते आहे. या गुंफेचा व्हरांडा व समोरचे प्रांगण हा समोरील भाग मात्र अतिशय उठावदार व बराचसा मी आधी वर्णन केलेल्या नहापनाच्या गुंफेसारखाच आहे. ही गुंफा, हॉल, त्याच्या तिन्ही बाजूस असलेल्या भिख्खूंच्या 18 कोठड्या व समोरील व्हरांडा अशा 3 भागात आहे. हॉल 45 फूट खोल, 41 फूट रूंद व साडेदहा फूट ऊंच आहे. या हॉलच्या मागील भिंतीच्या मागे 6 कोठड्या खोदलेल्या आहेत तर उजव्या भिंतीत 7 व डाव्या भिंतीत 6 कोठड्या खोदलेल्या आहेत. मागील भिंतीत असलेल्या तिसर्या आणि चौथ्या क्रमांकांच्या कोठड्यांच्या दारांमध्ये असलेल्या भिंतीवर एक स्तूपाचे बास रिलिफ कोरलेले आहे. आतापर्यंत मी बघितलेल्या इतर सर्व गुंफांच्या मानाने ही गुंफा कोरीवकाम करून बरीच सजवलेली दिसते आहे. या कोरीवकामामुळे सुद्धा, ही गुंफा आधी बघितलेल्या गुंफांच्या मानाने नंतरच्या कालातील असल्याची खात्री पटू शकते.
हॉलच्या मागील भिंतीवर कोरलेला स्तूप हा 10 क्रमांकाच्या गुंफेतील हॉलच्या मागील भिंतीवर असलेल्या परंतु नंतर बर्याच अंशी नष्ट केला गेलेल्या स्तूपाप्रमाणेच दिसतो आहे. या स्तूपाच्या डोक्यावर दुहेरी छत्री कोरलेली आहे तर बाजूच्या दोन छत्र्या कमल पुष्पांच्या देठाच्या आधारावर उभ्या आहेत. या बाजूंच्या छत्र्यांच्या जरा खाली 2 गंधर्व आकाशात विहार करताना दाखवलेले आहेत.
उजव्या बाजूचा गंधर्व दोन्ही हातात पुष्पमाला घेतलेला दाखवला आहे तर डाव्या बाजूचा गंधर्व डाव्या हातात फुलांची परडी घेऊन उजव्या हाताने स्तूपावर पुष्पवृष्टी करताना दर्शवलेला आहे. उजव्या बाजूच्या गंधर्वाने सातवाहन कालातील सर्वसामान्य केशरचनेप्रमाणे कपाळाच्या जरा वर असा केसाचा बुचडा बांधलेला आहे तर डाव्या बाजूच्या गंधर्वाच्या डोक्यावर, ग्रीक शिल्पात दिसतात तसे कुरळे केस दाखवलेले आहेत. दोन्ही गंधवांच्या कानात लांब कर्णभूषणे व मनगटावर कडी आहेत. उजव्या बाजूच्या गंधर्वाच्या खाली एक सिंहमूर्ती कोरलेली असून डाव्या गंधर्वाच्या खाली धर्मचक्र कोरलेले आहे. सिंह मूर्तीच्या खाली सुदृढ अंगकाठीची एक स्त्री आपले डावे पाऊल उजवीकडे व उजवे डावीकडे अशा मोठ्या विचित्र पोझमध्ये उभी असून स्तूपाला नमस्कार करताना कोरलेली आहे. तिच्या घोट्याजवळ पायात 2 कडी आहेत व कानात लांब कर्णभूषणे आहेत. कंबरेला तिने समोर गाठ मारलेला शेला बांधलेला आहे. या शिवाय तिच्या अंगावर काय वस्त्रे किंवा आभूषणे असल्याचे दाखवले आहे हे नीटसे कळू शकत नाहीये. धर्मचक्राच्या खाली उजव्या हातातील चवरी, स्तूपावर ढाळणारी एक स्त्री शिल्पात कोरलेली आहे. या स्त्रीने आपला हात गुढघ्याच्या थोड्या वर आपल्या मांडीवर ठेवलेला दिसतो आहे. आतल्या हॉलमध्ये या शिवाय दुसरे काहीच बघण्यासारखे नसल्याने मी बाहेरच्या व्हरांड्यात येतो.
व्हरांड्याच्या आतील भिंतीच्या मध्यभागात हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. हे द्वार अंदाजे 6 फूट रूंद आणि 10 फूट ऊंच आहे. या द्वाराच्या दोन्ही बाजूस आणखी दोन, 4 फूट रूंद व 8 फूट ऊंच असलेली प्रवेशद्वारे आहेत. मधले द्वार व बाजूची द्वारे या मध्ये 6 फूट रूंद व 3 फूट ऊंच असलेली 2 गवाक्षे आहेत. व्हरांड्याची पुढील बाजू म्हणजे बसता येईल असा एक दगडी ओटा असून त्या मधूनच 6 स्तंभ व कडांना असलेले 2 पिलॅस्टर वर काढलेले आहेत. हे सर्व स्तंभ अष्टकोनी असून वरच्या बाजूस उलटा ठेवलेल्या घटाचा आकार दिलेला आहे. या उलट्या ठेवलेल्या घटाच्या वरच्या बाजूस, क्रमांक 10च्या गुंफेप्रमाणेच प्रत्येक बाजूला एक आयताकृती गवाक्ष असलेली एक चौरस आकाराची पेटी ठेवलेली आहे. या पेटीच्या बाजूंना बौद्ध रेलिंगचे कोरीव काम आहे. या पेटीच्या आत एखाद्या कंगणासारखी दिसणारी एक गोल बांगडी कोरलेली आहे. या कंगणाच्या परिघावर खाचा-खाचांचे डिझाइन आहे. मधल्या 4 स्तंभांवर असलेल्या या चौकोनी पेट्यांच्या चारी कोपर्यांवर पक्षी प्राणी व मुले यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. यापैकी काही वाघाचा चेहरा, सशाचे कान व पंख असलेल्या कल्पनेतील प्राण्याच्या आहेत तर काही वाघाचा चेहरा व हरणाची शिंगे असलेल्या आहेत. या प्राण्यांच्यावर स्वार आरूढ झालेले दाखवलेले आहेत. मधल्या दोन स्तंभावर असलेल्या आकृत्या मानवी असून बाजूच्या स्तंभावर हे कल्पनेतले प्राणी आहेत. या चौकोनी पेट्यांच्या वरच्या बाजूस एक उलटा ठेवलेला पायर्या पायर्यांचा चौकोनी पिरॅमिड कोरलेला असून या पिरॅमिडचा वरचा भाग व छत या मधील जागेत एकमेकाकडे पाठ करून बसलेल्या प्राण्यांच्या 2 जोड्या कोरलेल्या आहेत. यापैकी एक जोडी व्हरांड्याच्या बाजूने तर एक बाहेरील प्रांगणातून दिसू शकते. या प्राण्यांच्यात मला स्वार आरूढ झालेले हत्ती, बोकड व ग्रीक पुराणांतील सिंहाच्या शरीरावर चोच असलेल्या पक्षाचे तोंड असलेला ग्रिफिन हा प्राणी ओळखता येतो आहे. या प्राण्यांवर आरूढ झालेल्या स्वारांत स्त्री पुरुष असे दोन्ही आहेत.
या गुंफेमधील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूंना, सांची येथील प्रसिद्ध तोरणासारखे दिसणारे संपूर्ण तोरण कोरलेले दिसते आहे. या तोरणावर प्रत्येकी 1 फूट चौरस आकाराची 19 पॅनेल्स कोरलेली आहेत. यापैकी 7 पॅनेल्स द्वाराच्या वरच्या बाजूस असून प्रत्येकी 6 पॅनेल्स द्वाराच्या बाजूंना आहेत. वरच्या 7 पॅनेल्समध्ये स्तूप, ज्याच्या खाली शाक्यमुनी गौतम सिद्धार्थ यांना दैवी ज्ञान प्राप्त झाले तो बोधि वृक्ष, धर्मचक्र, आणि काही उपासक कोरलेले आहेत. द्वाराच्या बाजूला असलेल्या पॅनेल्सवर, पतीशी प्रामाणिक व अप्रामाणिक असणार्या दोन स्त्रियांच्या कहाण्या कोरलेल्या आहेत. या पैकी एक पत्नी अनेक प्रलोभने असताना सुद्धा पतीशी प्रामाणिक राहते वा त्यामुळे तिला शेवटी पतीचा आधार मिळतो अशी गोष्ट आहे तर अप्रामाणिक पत्नी, तिचा पती प्रेमळ असूनही दुसर्या पुरुषाचा हात धरून पळून जाते व त्यामुळे तिला पती जबरदस्तीने ओढत परत घरी आणतो अशी कथा आहे. अतिशय कडक नियम व ब्रम्हचर्य पाळणार्या भिख्खूंचे वसतीस्थान असलेल्या या विहाराच्या प्रवेशद्वारावर प्रामाणिक, अप्रामाणिक भार्यांची पॅनेल्स कोरण्याचे काय प्रयोजन असावे हे खरे तर मला कळत नाहीये. कदाचित जातककथांप्रमाणे या कथांतून काहीतरी बोध या भिख्खूंना दिला जात असावा. प्रवेशद्वाराभोवती असलेल्या या पॅनेल्सच्या बाजूंना 6 फूट उंचीचे दोन यक्ष द्वारपाल कोरलेले आहेत. दोघेही धोतर नेसलेले असून त्यावर शेला पुढच्या बाजूस गाठ मारून बांधलेला आहे. व या शेल्याची दोन्ही टोके पुढे लोंबत आहेत. डाव्या बाजूच्या यक्षाच्या हातात 2 ब्रेसलेट आहेत. दोन्ही यक्षांची केशरचना सातवाहनकालीय म्हनजे पुढे बुचडा बांधलेली अशी आहे. उजव्या बाजूच्या यक्षाच्या मनगटावर एकच ब्रेसलेट व दंडावर पोची आणि कानात लांब कर्णभूषणे आहेत. दोन्ही यक्षांच्या उजव्या हातात देठासह असलेले कमलपुष्प आहे. व्हरांड्याच्या जोत्यापर्यंत येणार्या पुढच्या भिंतीवर, मध्यभागी असलेल्या पायर्यांच्या दोन्ही बाजूंना, प्रत्येकी तीन अशा एकूण 6 यक्ष मूर्ती कोरलेल्या आहेत. पृथ्वी व स्वर्ग या मध्ये असणारे हे यक्ष या विहाराला आधार देत आहेत.
व्हरांड्याच्या मागील व बाजूच्या भिंतींवर अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे प्रसिद्ध शिलालेख कोरलेले आहेत. असे म्हणता येते की गौतमीपुत्र राजा व त्याच्यावेळचे सातवाहन साम्राज्य यांची जी काय माहिती आपल्याला आहे त्यापैकी बहुतांशी माहिती याच शिलालेखामुळे आपल्याला प्राप्त झालेली आहे.
क्रमशः
बारकावे टिपत केले वर्णन खूपच सुरेख होत आहे.
मात्र या सनाशी गौतमीपुत्र किंवा शालिवाहन राजाचा संबंध नाही असे इतिहासकार डॉ. ए.एस.आळतेकर म्हणतात व ते योग्य वाटते.
शक संवत् हे कनिष्काने सुरु केले आणि पुढे शक क्षत्रपांनी ते प्रचलित केले असे मिराशी म्हणतात. गौतमीपुत्राने तो सुरु केला नाही हे निश्चित कारण नहपानाचा पराभव इ.स. १२५ च्या सुमारास झाला.
गौतमीपुत्राच्या उदयाच्या वेळी कुषाण सम्राट कनिष्काच्या मृत्युनंतर कुषाण साम्राज्य कमजोर झाले होते व शकांचे वर्चस्व वाढले होते. नहपान हा क्षत्रप पदावरून महाक्षत्रप झाला होता व जवळपास स्वतंत्रपणेच राज्य करत होता.
अतिशय कडक नियम व ब्रम्हचर्य पाळणार्या भिख्खूंचे वसतीस्थान असलेल्या या विहाराच्या प्रवेशद्वारावर प्रामाणिक, अप्रामाणिक भार्यांची पॅनेल्स कोरण्याचे काय प्रयोजन असावे हे खरे तर मला कळत नाहीये.
ही पॅनल्स गौतमीपुत्र सातकर्णी आणि त्याचा मुलगा वाशिष्ठीपुत्र पुळुवामी यांच्या राज्यसत्तेचे, पराक्रमाचे प्रतिक मानले जाते.
डावीकडच्या खालच्या शिल्पचौकटीमधे एक तरूण एका तरूणीबरोबर अनुनय करताना दाखवला आहे हे म्हणजे गौतमीप्पुत्राचा पिता शिवस्वाती आणि सातवाहन राज्यलक्ष्मी एकत्र नांदतांनाचे प्रतिक आहे. तर त्यावरच्या पटांमध्ये एक तरूण त्या तरूणीला जबरदस्तीने हरण करून नेतांना दाखवला आहे. हे म्हणजे नहपान क्षत्रपाने सातवाहनांच्या राज्यावर ताबा मिळवला याचे प्रतिक तर त्यापुढील पटांमध्ये त्या तरूणीला एक तरूण दुसर्या तरूणाकडून खेचून घेतांना दाखवला आहे. हे म्हणजे नहपानाने बळकावलेले सातवाहनांचे राज्य गौतमीपुत्राने कसे परत मिळवले याची कहाणी. नंतरच्या पटांमध्ये त्या तरूणीचे म्हणजेच सातवाहनांच्या राज्यलक्ष्मीचे पालन गौतमीपुत्र आणि त्याच्या पुत्र पुळुवामीने निष्ठापूर्वक कसे केले हे दाखवले आहे.
नाशिक मधील बुद्ध लेणी/Buddhist caves in nashik, which are built in third century before Christ.
नाशिक मधील बुद्ध लेणी ज्याला लोकल भाषेतपांडव पांडव लेणी का म्हणतात हे काळत नाही. येथे २४ गुहा आहेत आणि या इसविसन पूर्व तिसर्या शतकात कोरल्या असाव्यात. ह्या लेणी हीनयान पंथाच्या असाव्यात.
https://vikasgodage.blogspot.com/2013/12/buddhist-caves-in-nashik-which-are.html














.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)







No comments:
Post a Comment