Monday, September 27, 2021

कोळधेर

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या सेलबारी-डोलबारी, त्र्यंबक-अंजनेरी, अजंठा-सातमाळा या उपरांगेवर ६५ पेक्षा जास्त किल्ले असल्याने आपल्यासारखे भटके मात्र हा जिल्हा दुर्गभुमी म्हणुन ओळखतातनाशिक परिसरांत "सातमाळा रांग" म्हणजे सह्याद्रीचं अनाेख कातळ ताेरणचं.प्रारंभीचं चांदवड किल्यापासुन गड-किल्यांचा बेल भंडार उधळत सुटलेली हि दिमाखदार रांग थेट सापुताराजवळच्या हातगडा पर्यंत येऊन थांबते.किल्ले चांदवड-इंद्राई-राजदेहेर -काेळधेर-कांचना-धाेडप-रवळ्या/जवळ्या-मार्कंड्या-कण्हेरगड-अहिवंत-अचला-हातगड असे १३ एकाहून एक सरळ गड किल्यांची मांदियाळी तर लाजवाबचं...!!!गेल्या काही वर्षापासुन कधी नव्हे ते या सर्व गड किल्यांवर ट्रेकर्स/इतिहासप्रेमी व भटके यांचा राबतां वाढतांना दिसताेय.विकएण्डला तर मुंबई-पुणे परिसरातील अनेक सह्यवेडे या सातमाळेत कुठेना कुठे भेटणारचं.त्यामुळे या गड किल्यांना उर्जा अवस्था प्राप्त झालीय हे निश्चित.
मात्र नाशिक-धुळे महामार्गालगत असलेल्या चांदवड किल्ल्यावर जाण्यासाठी प्रस्तरारोहणची गरज असल्याने भटक्यांची पाऊले या किल्ल्याकडे सहजपणे वळत नाहीत तर मेसणा,कात्रा,कोळधेर या किल्ल्यावर फारसे अवशेष नसल्याने कोणी इथे फारसे फिरकत नसल्याने हे किल्ले पुर्णपणे अपरीचीत आहेत. सोबत खाजगी वाहन असल्यास व वेळेचे काटेकोर नियोजन केल्यास तीन दिवसात हे सहा किल्ले सहजपणे पाहुन होतात. चांदवड तालुक्यात अजंठा-सातमाळ डोंगररांगेवर असलेला पहिला किल्ला म्हणजे कोळधेर किल्ला. किल्ले काेळधेर याकडे मात्र सर्व सामान्य वा सह्यवेड्या भटक्याचं दूर्लक्षचं झालंय.असं सारखं जाणवतय.ते शेजारच्या इंद्राई-राजदेहेर वा कांचना धाेडप पर्यंत मजल मारतील,पण काेळधेरकडे जाणुनबूजुन दुर्लक्ष करतील.खरं तर जेव्हा ते भाउड घाट चढून पलिकडे देवळा-सटाणा कडे जातील,तेव्हा त्या घाटातून उतरतांना पुर्वेला अगदी समाेर काेळधेरचं अंगावर येणार रुप बघितील,ताे गगनभेदी आकार अनुभवातील, तेव्हा मात्र ते हमखास काेळधेरची भेट घेतील.जेव्हा तुम्ही राजदेहेर/इंद्राई/चांदवड- किल्ले बघण्याचे नियाेजन करता,तेव्हा त्यांत काेळदेहेरला सहज सामावून घेतां येईल.
    ताे काही फार एैतिहासिक किल्ला नाही,अनाेखे असे तट बुरुजांचे बुलंद साज चढलेलाही नाही,किंवा चढाईचा थरार अनुभूती देणाराही नाही.फक्त एक माेठं कातळटाक व उनाड पडलेली एक हनुमानाची दाेन फुटी मुर्ती अस्तित्वात आहे.मात्र त्याचं नैसर्गिक रुपड तर वेड लावणारं आहे. माथ्यावरील पश्चिम काठावरील माचीवरुन पुढिल सातमाळेचं जे अलाैकिक विहंगम दिसतं ना..! तेव्हाचं पैसा वसुल कार्यक्रम झालेला असताे.भावड (बाहूड बारी )घाट तर काय भारी दिसताे राव.मग पुढे टप्या टप्यावरचे डाेंगरमाथे.अगदी उकडीचे माेदक ठेवल्या सारखे वाटतात.दाेनही बाजुंना अफाट सपाटी मुलूख,सुपासारखा पसरलेला.

राजदेहेर कोळदेहेर परिसराचा नकाशा.कोळदेहेरकडे जाणारी पिवळ्या रंगाची वाट तांगडीतून जाते तर केशरी रंगाची वाट राजदेहेरवाडीकडुन जाते.
 
    या दुर्गम किल्ल्यावर जायचे तर दोन मार्ग .एक आहे राजदेहेरवाडीकडून .या मार्गाने जायचे तर कोळदेहेर आणि राजदेहेर हे दोन्ही किल्ले एकाच दिवसात बघता येतात.मात्र यासाठी राजदेहेरवाडीतून वाटाड्या बरोबर घ्यावा लागेल.तसेच चालण्याची तयारी हवी.दुसरा मार्ग आहे तागंडी गावातून. या दोन्ही मार्गाकडून कोळदेहेर गडाची कशी चढाई करायची ते सविस्तर समाजावून घेउया.
 
 सर्व प्रथम राजदेहेरवाडीतून जाणार्‍या मार्गाची माहिती घेउया. राजधेरवाडीतुन जाणे जास्त सोयीचे आहे शिवाय राजधेरवाडी -कोळधेर-राजधेर अशी दोन गडांची दिवसभराची भटकंती देखील या वाटेने सहजपणे करता येते. राजदेहेरवाडीत मुक्काम करुन सकाळी लवकर वाटाड्या घेउन निघायचे.राजदेहेर किल्ल्याकडे जाणारी वाट पकडून आपली वाटचाल सुरु होते. राजधेरवाडीतुन पुढे धरणाकडे जाणाऱ्या दोन कि.मी. कच्च्या रस्त्याने चालत किवा गाडीने जाऊन नंतर समोरील पठारावर चढावे. गावाबाहेर पडताना या वाटेवर आपल्याला पाच फुट उंचीची मारुतीची सुंदर मुर्ती पहायला मिळते.
 
 राजदेहेरवाडीतील पाझर तलाव, मागे इंद्राई
 
 वाडीतून राजधेर किल्ला उजव्या हाताला ठेवत गावाच्या कडेकडेने बकऱ्या चारायला लोक नेतात त्या वाटेने समोरच्या पठाराकडे जात राहायचे.  पठारावर आल्यावर येथुन राजधेर किल्ला आपल्या उजव्या बाजुस ठेवत अर्धा तास वाटचाल केल्यावर आपण कोळधेर किल्ला व त्यासमोरील पठार यामध्ये असलेल्या दरीच्या काठावर पोहोचतो
राजधेरवाडीतून उजव्या हाताला आपल्याला राजधेर कायम दिसत असतो तर डाव्या हाताला बघितल्यावर इंद्राई दिसतो. जिथे जायचं तो कोळधेर मात्र कुठूनच दिसत नाही. तो एका डोंगराच्या मागे लपलेला आहे.
 
 या पठारावरून जाताना वाटेत एक हनुमानाचे मंदिर दिसते, तिथे एक झेंडा पण रोवलेला आहे. त्याच्या मागे आपल्याला एका डोंगराचं टोक दिसायला लागतं. पण हाही कोळधेर नाही. हा डोंगर म्हणजे कोल्ह्याचा डोंगर. मात्र त्याला समोर ठेवूनच जात राहिल्यावर, पठार संपल्यावर, उजवीकडे आपल्याला कोळधेर डोकावताना दिसतो.
 
 जसं पठार संपत जातं तसतसा त्याचा अजस्त्र अवतार आपल्याला दिसायला लागतो. पण ह्या कोळधेरकडे जाताना वाट सरळ नाहीये. येथुन संपुर्ण कोळधेर किल्ला नजरेस पडतो.
 
  येथुन उजवीकडे वळुन दरी डावीकडे व कडा उजवीकडे ठेवत दरीच्या काठाने सरळ गेल्यावर आपण कोळधेरच्या खिंडीत पोहोचतो. तांगडी गावातुन येणारी वाट खिंडीत या वाटेला मिळते. राजधेरवाडीतुन इथपर्यंत येण्यास साधारण दीड तास लागतो तर तांगडी गावातुन येथे येण्यास अडीच तास लागतात. खिंडीत असलेल्या कातळाला शेंदुर फासुन देवपण देण्यात आले आहे.
 
 
 
 कोळधेरच्या खिंडीतला मारुती - मागे राजधेर आणि इंद्राई
 
 खिंडीतून पुढे किल्ल्याकडे जाणारी वाट मात्र उभ्या चढणीची आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या सुळक्याखाली असलेल्या पठारावर येतो. या पठारावर वाटेच्या डाव्या बाजुस मारुतीरायाची उघड्यावर स्थापना केलेली मुर्ती पहायला मिळते. हि मुर्ती बहुदा अलीकडील काळातील असावी. 
 
पुढे सुळक्याच्या दिशेने चढत जाताना वाटेत एक अर्धवट बुजलेले कातळात कोरलेले टाके पहायला मिळते. या टाक्याच्या वरील बाजुस पाण्याचे दुसरे कोरीव टाके असून या टाक्यातील पाणी मार्चपर्यंत पिण्यासाठी उपलब्ध असते. हि दोन्ही टाकी उतारावर कोरलेली असुन या दोन्ही टाक्यांच्या आसपास काही घरांच्या जोत्यांचे अवशेष आहेत.
 
 पहिली गुहा - मागे इंद्राईचा विस्तार
 
 येथुन पुढे सुळक्याकडे जाणारी वाट घसाऱ्याची असुन हि वाट चढत आपण सुळक्याच्या माचीखाली असलेल्या कातळ भिंतीजवळ पोहोचतो. इथे येण्यासाठी ठराविक अशी मळलेली पायवाट नाहीये. अंदाज काढत काढतच इथपर्यंत पोहोचला लागतं. इथून मागे बघितल्यावर आपल्याला राजधेर आणि पसरलेला इंद्राई दिसतो.
  
माचीवर जाण्यासाठी या कातळात पायऱ्या कोरलेल्या असुन पुढील वाट देखील काही प्रमाणात कातळात कोरलेली आहे. या ठिकाणी पुर्वी दरवाजा असण्याची शक्यता आहे पण आज मात्र त्याचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. कातळात कोरलेल्या वाटेने आपण सुळक्याच्या खालील भागात असलेल्या माचीवर येतो. 
 
 कोळदेहेर माची
 
कोळधेरची माची दक्षिणोत्तर १२ एकरवर पसरलेली असुन किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासुन ३९५० फुट उंचावर आहे. 
 
या माचीवर कोणतेच अवशेष नसल्याने उजवीकडील बाजूस असलेल्या सोंडेकडे जाऊन या सोंडेवरून सुळक्याच्या दिशेने चढण्यास सुरवात करावी.
 
 
या वाटेने दहा मिनिटात आपण सुळक्याच्या पोटात असलेल्या प्रशस्त गुहेत पोहोचतो. साधारण ३० x ३० फुट आकाराची हि गुहा नैसर्गिक असुन गुहेच्या आतील भागात व तोंडावर काही प्रमाणात घडीव दगडांनी बांधकाम केलेले आहे.
गुहेच्या छताला असलेले पोपयाच्या बियांसारखे दिसणारे किडे/अंडी
दुसरी गुहा - दुभागणारी भिंत आणि त्यात देवळी
 
गुहेच्या छताच्या भागाला बघितलं तर पपईच्या बिया दिसतात तशी कुठल्यातरी किड्यांची अंडी किंवा तसंच काहीतरी पूर्ण छताला आत मधून दिसलं.

 
 
 गुहेच्या डाव्या बाजुच्या कातळभिंतीवर एक शिल्प कोरलेले आहे. गुहेत ५०-६० माणसे सहज राहू शकतात मात्र पाण्याची कोणतीच सोय नाही.
किल्ल्याच्या सुळक्यावर जाता येत नसले तरी गुहेतून पुढे सुळक्याच्या कडेने चालत गेल्यास सुळक्याला प्रदक्षिणा मारता येते. बालेकिल्यावर पुर्व बाजुने चढाईचा मार्ग आहे.पण दाेर व इतर साहित्य आणि सराईत क्लाईंबर साेबत असणे जरुरीचे.आहे.
शंकराची पिंड, त्यावर नैसर्गिक अभिषेक  
 
या वाटेत दगडावर रचलेले एक शिवलिंग पहायला मिळते. या पिंडीवर कातळामध्ये एक कपार आहे तिथून कायम जलाभिषेक होत असतो. गावकर्‍यांनी इथे एक ध्वज आणि घंटा लावून ठेवलेली आहे. इथेच आजुबाजूला किल्ल्यावरच्या वाड्यांचे किंवा इतर असे घडवलेले दगड पडलेले आहेत. प्रदक्षिणा पुढे चालू ठेवताना असाच एक शेंदूर फासलेला अनगड देव लागतो. असे फिरत फिरत आपण परत राजधेरच्या बाजूला येऊन पोचतो. 
 
  मागे दिसणारा राजदेहेर
 
इथून राजधेरचे किती फोटो काढू आणि किती नको असं होतं. आपली हि सुळक्याची प्रदक्षिणा पूर्ण झाली कि इथून खाली उतरायला सुरुवात करायची.थोडी वाट वाकडी करून थोडं उजव्या बाजूला गेलो तर एक टाकं बघायला मिळते. याच्यात मात्र पाणी शिल्लक असते. इथून कोळधेरचा कातळ कडा फारच चांगला दिसतो.
 
 

      पुढ्यात भावड घाट अन् पाठीमागे सातमाळेचे शिलेदार ...

      भाउडबारीचे विहंगम दृष्य
कांचन-मांचन गड
 
या टोकावरून जे दृश्य दिसतं ते म्हणजे अहाहा ! समोरच पहिला कोल्ह्याचा डोंगर, त्याच्या धारेवरून पलीकडे उतरणारा एक मार्ग. तो दुभागून त्याच्या जणू पोटातून उजव्या बाजूला आलेला गाड्यांचा महामार्ग. पलीकडे कांचन-मंचन, इखारा सुळका, हंड्या-बंड्या, धोडप असं अप्रतिम दृश्य ह्या टोकावरुन दिसते.तसेच उत्तरेकडे देवळा-सटाण्यापर्यंतचा मुलुख नजरेस पडतो. 



आता तांगडीकडून कोळदेहेरवर कसे जायचे ते पाहु.हे गाव नाशिक -मालेगाव रस्त्यावर थोडे आतल्या बाजुला आहे.  नाशिक वरून देवळ्याकडे जाताना सोग्रस फाट्यावरून पुढे आल्यावर चांदवड मार्गावर तांगडी-शिरूर गाव आहे.मुंबई-आग्रा रस्त्यावरुन देवळा,मालेगावकडे जाणारा रस्ता फुटतो.या रस्त्याला सातमाळा रांग आडवी जाते.या ठिकाणी छोटा घाट तसेच खिंड आहे.हिच आहे, भाउड बारी.नाशिक परिसरात खिंडीला बारी म्हणतात.याच रांगेत पुर्वेक्डच्या बाजुला कोळदेहेर किल्ला खडा आहे.मात्र तो सर्वसामान्य पर्यटक राहु देत्,पण दुर्गभटक्यांनाही फारसा माहीती नसतो.या खिंडीच्या अलिकडे एक टोलनाका आहे.इथे काही ढाबे आणि हॉटेल आहेत.याच्या अलिकडे तांगडी गाव आहे.गावाच्या पुर्वेकडे म्हणजे जर आपले तोंड मालेगावच्या दिशेने म्हणजे उत्तरेकडे असेल तर उजव्या हाताला कोळदेहेर किल्ला आणि त्याला सामावून घेणारी रौद्र डोंगररांग बघायला मिळते.
  इथूनच एक वाट समोर दिसत असलेल्या कोळदेहेर व उजवीकडील डोंगरपठार यांच्या मध्ये असलेल्या खिंडीकडे जाते,या दिशेने थोडे पुढे एक पाझर तलाव लागतो.तलावाच्या काठाने सरळ पुढे जायचे.जरी खिंडीकडे जाणार्‍या दाेन चार वाटा असल्या तरी त्यातील एक वाट आपली म्हणायची आणि निघायचे. प्रथम समाेर खिंड गाठायची मग डावीकडे किल्यावर चढाई करायची.असा सर्व मामला.उभा चढ चढुन खिंडीत पोहचायचे.चाल तशी सहज साेपी.चढाई तर बेताचीचं पण फार घसरडी.सुटलेल्या मुरमाची वाट.अर्धा तासांत खिंडीत पोहचतो.हवेच्या गार झुळूकने अंग हलके होते.

पाठीमागे वस्तीचा परिघ व दाेन बाजुंचे कातळकडे तर फारचं लक्षवेधी आहेत.उत्तर बाजुने एक अस्पष्ट वाट कापशी गावांकडे उतरते.दूरवर मकरंदवाडी व देवळा हि गांव स्पष्ट दिसतात.पुर्वेला राजदेहेर/इंद्राईचे कातळकडे तर पश्चिमेला काेळधेरची माची व बालेकिल्ला दिसतो.मग कोळदेहेरच्या पुर्वेकडील धारेकडील डोंगरधारेवर चढायचे.पश्चिमेला मळलेल्या वाटेने किल्यावर निघायचे.खरं हि वाट गुरंढाेरांची.गांव/वाडीकडच्या जमिनीवरचा चारा संपला कि गुराखी आपली जनावरं किल्याच्या वरच्या माची चरण्यासाठी दिवसभरासाठी साेडतात मग सायंकाळी पुन्हा घरट्यात परततात.त्या ये-जा मुळे ही वाट झक्कास मोडलेली आहे.इथून उत्तरेला सटाण्याचा परिसर छान दिसतो.तिथून कोळदेहेरला उजवीकडे ठेवत त्याच्या पलिकडच्या टोकाकडे निघायचे,थोड्यावेळाने तिरप्या रेषेत चढ चढून वरची सपाटी गाठायची.तिथून पुन्हा तिरप्या रेषेत चढायचे आणि पलीकडची म्हणजे तांगडीकडील बाजु गाठायची.तिथच कपारीत पिंड तिच्यावर थेंब थेंब पाण्याचा अभिषेक होत असतो.किल्ल्याची बाकी माहिती वर आलीच आहे. खिंडीतुन गडावर येण्यास व गडफेरी करून परत खिंडीत जाण्यास दोन तास लागतात. 
           कोळधेर किल्ल्याचे स्थान व त्यावरील एकुण अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणीसाठी होत असावा तसेच हा किल्ला बांधकाम करतानाच अर्धवट सोडुन दिला असावा. प्राचीन काळापासुन उत्तरेकडून दक्षिणेकडे जाता येता चांदवड हा या मार्गावरील एक महत्वाचा घाटमार्ग होता. त्यामुळे या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी चांदवडचा किल्ला बांधला गेला व त्याच्या सरंक्षकफळीत राजधेर, इंद्राई.कोळधेर व मेसणा या किल्ल्यांची निर्मिती केली गेली.रवळ्या-जवळ्या सोबत जुन-जुलै १६६३ मध्ये हा निजामाचा गड मोगलाईत सामील झाला.याचा उल्लेख धोडपवरील शिलालेखात आहे.या गडाचा उल्लेख कोल असा येतो आणि इंद्राईवरील शिलालेखात कोलेर असा येतो.शिवकाळात कोळदेहेर मोघलांच्या अंमलाखालीच राहीला."आग्र्याहून सुटका" या पुस्तकाचे लेखक श्री.अजित जोशी यांच्या मते कोळदेहेर म्हणजे मनोहरगड असा उल्लेख आहे. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी मनोहरगडावर दोन महिने विश्रांती घेतली.वास्तविक मनोहरगड म्हणजे सावंतवाडीजवळचा असे बहुतेक अभ्यासक मानतात.मात्र श्री.अजित जोशी यांच्यामते कोळदेहेर म्हणजे मनोहरगड.वास्तविक हा उल्लेख कोणत्याही कागदपत्रात येत नाही.तसेच हा परिसर मोघलांच्या ताब्यात असताना शिवाजी महाराज इथे विश्रांतीसाठी येतील हे पटत नाही.शिवाय कोळदेहेर अतिशय छोटा किल्ला आहे.इथे फार जागा नाही.तेव्हा या निष्कर्षात काही तथ्य नाही.
असो.दुर्लक्षित असलेल्या आणि सातमाळा रांगेचे रौद्र दर्शन घडविणार्‍या या गडाला एकदा तरी भेट द्यायला हवी.
 संदर्भः-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
४)  श्री.अजित जोशी,संजय अमृतकर, यश गायकवाड यांचे लिखाण
५) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
६) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स
७) शोध शिवछत्रपतीच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...