महाराष्ट्रात सर्वात जास्त दुर्गसंपदा नाशिक जिल्ह्याला लाभली आहे. नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्या अंकाईच्या पर्यंत जाते. याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात राजधेर, कोळधेर , इंद्राई आणि चांदवड हे ४ किल्ले येतात.या जिल्ह्यात सह्याद्रीच्या सेलबारी-डोलबारी, त्र्यंबक-अंजनेरी, अजंठा-सातमाळा या उपरांगेवर ६५ पेक्षा जास्त किल्ले असुन यातील चांदवड तालुक्यातून जाणाऱ्या अजंठा-सातमाळ डोंगररांगेवर कोळधेर,राजधेर, इंद्राई, चांदवड,मेसणा,कात्रा यासारखे किल्ले वसले आहेत.चांदवड तालुक्यात अजंठा-सातमाळ डोंगररांगेवर असलेला राजधेर हा एक महत्वाचा किल्ला.
राजदेहेरला जायचे तर नाशिक किंवा मुंबईवरुन जायचे असेल तर चांदवड हे सोयीचे ठिकाण. नाशिक -चांदवड हे अंतर ६५ कि.मी. आहे.तर चांदवडला रेल्वेने जायचे असेल तर मनमाड हे जवळचे रेल्वे स्टेशन.मनमाड -चांदवड हे अंतर २४ कि.मी. आहे.चांदवडवरुन राजदेहेर किल्ल्याच्या पायथ्याची राजदेहेरवाडी १० कि.मी. अंतरावर तर नाशिक शहरापासुन ७० कि.मी. अंतरावर आहे. इथे वडबारे मार्गे जाता येते.दिवसातून वेळा थेट चांदवडवरुन एस.टी.बस राजदेहेरवाडीला येते.
या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले राजधेरवाडी गाव राजधेर व इंद्राई किल्ल्याच्या कुशीत वसलेले असुन राजधेरवाडीत प्रवेश करताना उजव्या बाजुस राजधेर किल्ला व डाव्या बाजुस इंद्राई किल्ला नजरेस पडतो. राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. त्यामुळे येथे २ दिवस मुक्काम करून दोनही किल्ले पाहाता येतात. तसेच तिसर्या दिवशी राजधेर ते कोळधेर हा ट्रेक करता येतो. त्यासाठी गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. राजधेर - कोळधेर - राजधेरवाडी हा ट्रेक करण्यास साधारणतः १० ते १२ तास लागतात.
गावात काही स्मृतीशिळा ठेवलेल्या बघायला मिळतात.इतिहासाशी जोडणारा हा दुवा गावकर्यांनी व्यवस्थित राखला हे समाधान. गावाने २ वेळा चांदवड मधील आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार जिंकला आहे.शेतकऱ्यांनी मिळून तळी बनवली आहेत. उतारावर बांध घालून पाणी अडवले आणी साठवले आहे. शाळा, समाजमंदिर, मंदिरे घरे सगळे काही टापटीप न स्वच्छ आहे. ग्रामपंचायतीने घरटी शौचालायाची सोय केल्याने आपल्यासारख्या दुर्गभटक्यांची अडचण होत नाही. राजदेहेर किल्ल्यावर पर्यटक तसेच भाविकांची वर्दळ असल्यामुळे गावकऱ्यांनीच राजधेरवाडीत शाळेच्या समोर एक समाजमंदीर बांधले आहे. ते लिलावात एका ग्रामस्थाने घेऊन त्यात पर्यटकांची राहायची सोय केली जाते. ३०० रु कमीतकमी असून माणसांप्रमाणे भाडे आकारले जाते. अर्थात "फुकट ते पौष्टिक" वाल्या मंडळींसाठी राजधेर किल्ल्याच्या पायथ्याशी मारुतीचे प्रशस्त मंदिर आहे . अंथरूण पांघरूण आम्ही घेऊनच आल्यास येथे झोपायची मस्त सोय होते. एकंदरीत कोणालाही आवडावे असे हे गाव आहे.
![]() |
राजदेहेरवाडीचा पाहुणचार घेउन गडावर चढाईला सज्ज होउया.राजधेर किल्ल्याची एक सोंड राजधेरवाडी गावात उतरते. सोंड असली तरी ती आपल्याला उचलून घेणार नाही, तेव्हा आपल्याच तंगड्या तोडत चढाई करायची आहे. राजधेरवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढे एक पाण्याची टाकी आहे तेथून गडावर जाण्यासाठी वाट आहे.
राजधेरवाडी गावातुन शाळेच्या थोडे पुढे जाउन उजवीकडून किल्ल्याखाली असलेल्या पठारावर जाण्यासाठी कच्चा रस्ता असुन तेथुन पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक पायवाट आहे. याशिवाय कोळधेर-राजधेर भटकंती करताना खाली राजधेरवाडी गावात न उतरता पठारावरून थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते.
राजधेरवाडी गावातुन शाळेच्या थोडे पुढे जाउन उजवीकडून किल्ल्याखाली असलेल्या पठारावर जाण्यासाठी कच्चा रस्ता असुन तेथुन पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक पायवाट आहे. याशिवाय कोळधेर-राजधेर भटकंती करताना खाली राजधेरवाडी गावात न उतरता पठारावरून थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते.
राजधेरवाडी गावातुन कोळधेर-राजधेर अशी दोन गडांची भटकंती एका दिवसात सहजपणे करता येते. राजधेरवाडीतुन किल्ल्याच्या पायथ्याशी जाईपर्यंत सावलीसाठी कोणतेही झाड नसल्याने शक्यतो सकाळी लवकरच चढाई सुरु करावी. राजदेहेर किल्ल्याच्या पठारावर गावातील मुले गुरे चरायला येतात्,त्यामुळे मानवी सोबत असते.पावसाळ्यात हे पठार गवताने अच्छादले असते आणि काही पाण्याची डबकी दिसतात.
वाट पूर्णपणे मळलेली असुन काही ठिकाणी वाट समजण्यासाठी दिशादर्शक चुना फासलेला आहे. किल्ल्याच्या वाटेवर झाडी नसल्याने चुकण्याची शक्यता नाही. या वाटेने जाताना किल्ल्याखाली असलेल्या पठाराचे दोन टप्पे पार करून जावे लागते. यातील पहिल्या टप्प्यावरील पठारावर आपल्यला चारही बाजूस कोरलेली स्तंभाच्या आकाराची एक विरगळ पहायला मिळते.
पायथ्याचंं टाकं आणि गडाचा कातळकडा
पठाराच्या दुसऱ्या टप्प्यात किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर काही ठिकाणी पायऱ्या बांधलेल्या आहेत. यात एका ठिकाणी उध्वस्त बुरुजाचा खालील गोलाकार भाग व एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. हे ठिकाण म्हणजे किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवरील मेट असावे.
येथुन किल्ल्याच्या कातळकड्यालगत किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली शिडी नजरेस पडते. या शिडीच्या दिशेने वाटचाल करताना काही ठिकाणी खडकात खोदलेल्या पायऱ्या पार करत आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. राजधेरवाडीतुन इथवर येण्यास साधारण दीड तास लागतो.
या सोंडेवरुन साधारणपणे एक तास चढल्यावर आपण किल्ल्याच्या कातळकड्याच्या खाली पोहोचतो. येथून डावीकडे वळून कातळकड्याला समांतर चालत गेल्यावर अर्धा तासात लोखंडी शिडीजवळ पोहोचतो. या ठिकाणी किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या ब्रिटीशांनी सुरुंग लावुन तोडल्याने गावकऱ्यांनी किल्ल्यावर जाण्यासाठी साधी लोखंडी शिडी बसवली होती. त्याचे कारण म्हणजे आपल्यासारख्या दुर्गभटक्यांची सोय हे नसून गडावर पुर्वी एक साधुबाबा रहात होते,त्यांनी त्यांच्या सोयीसाठी हि शिडी बसवून घेतली.अर्थात त्यामुळेच सामान्य दुर्गारोहींची चांगली सोय झाली हे ही तितकेच खरे.कारण हि शिडी नसताना हा कडा चढायचा म्हणजे प्रस्तरारोहणाशिवाय पर्याय नसायचा.
राजदेहेरगडावर चढाई करण्यासाठी एकेकाळी असे प्रस्तरारोहण करायला लागायचे.
![]() |
| आधी होती ती डुगडुगणारी शिडी आणि सध्या असलेला नवीन जिना |
हि
शिडी चढताना काही वाटत नाही पण उतरताना वाट लागते. उतरताना तुम्हाला
एकदातरी देवाची अन कुटुंबाची आठवण येईल अशी सोय केली या शिडीने केली होती.
मात्र २०१९ मध्ये वन खात्याने इथे एखाद्या घराच्या गच्चीवर जायला असतो तसल्या प्रकारची मजबूत शिडी बसवलेली आहे. आता मात्र
राजदेहेरवर जायचे तर ना प्रस्तरारोहणाचा थरार उरला आहे ना डुगडुगणारी शिडी
चढायचा.विशेष म्हणजे याच शिडीवरुन गावातील गुराखी डोक्यावर एक एक शेळी घेऊन
शिडीने वरती चरायला आणतात आणी इथेच सोडून देतात. पिल्लू झाले की विकायला
खाली घेऊन जातात.
शिडीच्या
थोडे अलीकडे उजव्या बाजूस कातळात दोन दालन असलेली एक भली मोठी गुहा आहे.
या गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन आतील भागात कमानीवजा दगडी
बांधकाम केले आहे. सध्या या गुहेत पाणी साठलेले असुन स्थानीक लोक या गुहेला
घोडयांची पागा म्हणुन ओळखतात. इथे एका दगडाला शेंदूर फासलेला आहे आणि
शेजारी त्रिशूळ व घंटा असं लावून पद्धतशीर मंदिर तयार केलेले आहे. हा झाला
राजधेरचा पायथा. शिडीने चढुन गेल्यावर आपण थेट किल्ल्याच्या ढासळलेल्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या बाहेरील बाजुस डावीकडे असलेल्या बांधकामात पर्शियन भाषेतील शिलालेख कोरलेला दगड बसवलेला आहे.
या शिलालेखात अलावर्दीखानाने चांदवड, इंद्राई किल्ल्यासोबत राजदेहेर किल्ला जिंकल्याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे या शिलालेखाचा दगड तांबुस रंगाचा आहे.पूर्वी गावकऱ्यांमध्ये अशी समजूत होती कि ह्या किल्ल्यावर प्रचंड धन दडवलेले असून ह्या गूढ अक्षरातील लेखात त्याची माहिती दिलेली आहे.

येथुन किल्ल्यावर जाणारा प्रवेशमार्ग पुर्णपणे कातळात कोरलेला असुन दरवाजाचा आतील भाग देखील कातळात कोरलेला आहे. येथुन कातळात तिरकी खाच मारत कोरलेल्या पायऱ्यांनी सावधपणे वर जाताना डाव्या बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्यासाठी कातळात कोरलेल्या दोन गुहा पहायला मिळतात.
येथुन किल्ल्यावर जाणारा प्रवेशमार्ग पुर्णपणे कातळात कोरलेला असुन दरवाजाचा आतील भाग देखील कातळात कोरलेला आहे. येथुन कातळात तिरकी खाच मारत कोरलेल्या पायऱ्यांनी सावधपणे वर जाताना डाव्या बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्यासाठी कातळात कोरलेल्या दोन गुहा पहायला मिळतात.
यातील एक गुहा अर्धवट कोरलेली आहे. या गुहेत भिंतीत चक्क बसायला आणि टेकायला बाकडं असावं असं काहीतरी स्ट्रक्चर बनवलेलं आहे.
भग्न दरवाजाचे कसेबसे तग धरून असलेले अवशेष
![]() |
इथेच एका विहीरीसारख्या रचनेचे अवशेष दिसतात.
राजदेहेर गडाचा नकाशा ( साभार ट्रेकक्षितीझ संस्था )
या दरवाजातुन आपला गडाच्या माचीवर प्रवेश होतो. राजधेर किल्ला माची व बालेकिल्ला असा दोन भागात विभागलेला असुन गडाचा परीसर दक्षिणोत्तर १२ एकरवर पसरलेला आहे. बालेकिल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासुन ३५७९ फुट आहे. माचीवर आल्यावर तीन वाटा फुटतात. एक वाट सरळ बालेकिल्ल्याच्या कातळ टेकडीच्या दिशेने तर उरलेल्या दोन वाटा डावीकडे व उजवीकडे माचीवर जातात. आपल्याला प्रथम किल्ल्याची माची फिरायची असल्याने उजवीकडची वाट पकडायची.
आपल्याला प्रथम किल्ल्याची माची फिरायची असल्याने उजवीकडची वाट पकडायची. या भागात मोठया प्रमाणात असलेले वास्तु अवशेष पहाता येथे किल्ल्याची मुख्य वस्ती असावी.
आधीपासूनच वरून दिसत होती. हि सदर म्हणजे एक मोगल स्थापत्यकलेचा सुंदर नमुनाच आहे.
गडाच्या माचीवर हा एकमेव अवशेष शिल्लक आहे. गावातले लोक याला किल्लेदाराचा वाडा असे म्हणतात. या वास्तूच्या दर्शनी बाजूस तीन कमानी आहेत ज्या कमानी उत्तम प्रकारच्या नक्षीदारीसह घडवलेल्या आहेत. कमानीच्या मधले दोन्ही आणि बाजूच्या भिंतीतले दोन असे खांब उत्तम प्रकारे घडवलेले आहेत, तर मधल्या कमानीच्या वरती एक कमळ कोरलेलं आहे. मधल्या कमानीच्या बरोबर मागे आत मध्ये भिंतीत अजून एक कमान कोरलेली आहे, ही कमानही नक्षीदार आहे तर बाजूस असलेल्या कमानी मात्र सुबक असल्या तरी नक्षीदार नाहीत. मुघल शैलीतील बांधकाम असलेली हि वास्तु आजही सुस्थितीत आहे. या इमारतीच्या परिसरात खुप मोठया प्रमाणात घरांचे चौथरे आहेत. माचीच्या शेवटी किल्ल्याचे उत्तर टोक असुन या टोकाला बुरुज बांधलेला आहे. या बुरुजावर ढालकाठीची म्हणजेच ध्वजस्तंभाची जागा आहे. माची पाहुन सुरवातीच्या ठिकाणी येऊन डावीकडची वाट पकडायची. ![]() |
| गडाची अप्रतिम कलाकुसरयुक्त सदर |
माची पाहुन सुरवातीच्या ठिकाणी येऊन डावीकडची वाट पकडायची. या ठिकाणी
मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन अनेक अवशेष या झाडीत लपलेले आहेत.
वाटेच्या सुरवातीच्या भागात हमामखाना असुन या हमामखान्याच्या वरील बाजुस
असलेल्या गोलाकार झरोक्यातून एक मोठे पिंपळाचे झाड उगवलेले आहे. त्याच्या
पुढील बाजुस वाडयाच्या भिंती असुन आत एक थडगे आहे. हे पाहुन मागे फिरावे व
सरळ जाणाऱ्या वाटेने कातळावर चढावे.
या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर कातळात जमिनीखालील पातळीत खोदलेली दोन दालने असलेली मोठी गुहा आहे. हि गुहा जमिनीच्या पातळीत खोदलेली असल्याने जवळ जाईपर्यंत दिसत नाही. पुर्वी येथे एका बाबांचे वास्तव्य होते. त्यांनी हि गुहा साफसफाई करुन नीटनेटकी ठेवली आहे. गुहेत उतरण्यासाठी लाकडी शिडी लावलेली आहे.
गुहेच्या डाव्या बाजुस काही अंतरावर कातळात खोदलेले लहान चौकोनी टाके असुन या टाक्याचा वरील भाग दगडी भिंत व त्यावर घुमट बांधुन बंदीस्त करण्यात आला आहे. या वास्तुत शिरण्यासाठी एक लहान दरवाजा ठेवलेला आहे. हि वास्तु नेमकी काय असावी याचा बोध होत नाही.
येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते. या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते.
![]() |
| पाण्याची टाकी |
![]() |
| T-Shaped टाकं - ज्याचा पूर्ण फोटोही घेता येत नाही |

वाटेच्या उजवीकडे खालील बाजुस
माचीवर किल्ल्याची साधारण १०० फुट लांब एकसंध तटबंदी व या तटबंदीत असलेल्या
टेहळणीच्या जागा पहायला मिळतात. या तटबंदीतुन खाली उतरण्यासाठी एक लहान
दरवाजा आहे. या दरवाजाबाहेर जाता येते पण पुढील वाट नष्ट झाल्याने खाली
उतरता येत नाही. येथुन बालेकिल्ल्याचा खडा चढ चढुन आपण किल्ल्याच्या
सर्वोच्च भागात पोहोचतो.
बालेकिल्ल्याच्या या भागात पाण्याने भरलेली दोन मोठी टाकी व दोन अर्धवट बुजलेली टाकी दिसतात.त्यापैकी एक टाकं लागलं जे खूप सुंदर आहे. एकदम अचुक आयताकृती टाक पाण्याने ओतप्रोत भरलेलं दिसतं.त्यापुढे वाड्याचे अवशेष असणारी एक भिंत व चौथरा दिसतात. ज्याच्या डावीकडे अजून एक टाकं होतं ते पाण्याने भरलेलं होतं आणि आतमध्ये एक खांब होता.
राजदेहेरवरुन दिसणारा इंद्राई गड
शिडीपासुन सुरवात केल्यानंतर संपुर्ण गडमाथा फिरण्यास २ तास लागतात. गडमाथ्यावरुन सटाणा,मालेगाव हि शहर उत्तरेला तर आग्नेयेला चांदवड हि शहरे तसेच आग्नेयेला चांदवड तर पुर्वेकडील सातमाळा रांगेत कांचन मांचन,कोळधेर,इंद्राई, धोडप तर हवा स्वच्छ असेल तर वायव्येला मांगीतुंगी, न्हावीगड, साल्हेर,चौल्हेर हे किल्ले दिसतात.
राजदेहेरवरुन दिसणारा चांदवड गड
बालेकिल्ल्याच्या पुर्व बाजुने
खाली उतरताना कातळात कोरलेले अजून एक टाके पहायला मिळते. प्राचीन काळापासुन
उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना चांदवड हा एक महत्वाचा घाटमार्ग होता.
त्यामुळे या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी चांदवडचा किल्ला बांधला गेला व
त्याच्या सरंक्षकफळीत राजधेर, इंद्राई, कोळधेर व मेसणा या किल्ल्यांची
निर्मिती केली गेली. चांदोर पर्वतरांगेत असलेले राजधेर किल्ल्याचे स्थान
पहाता त्याचे महत्व लक्षात येते. गडाचा कातळात कोरलेला मार्ग व गडावरील
खांबटाकी,गुहा गडाच्या प्राचीनतेची साक्ष देतात. किल्ल्यावरील पाण्याची
टाकी व इतर अवशेष पहाता या किल्ल्यावर मोठया प्रमाणात वस्ती असावी.
दरवाजाजवळ असलेल्या शिलालेखानुसार निजामशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला
इ.स. १६३६ च्या जुन महीन्यात शहाजहान बादशहाचा सरदार अलावर्दीखान याने लढाई
करून जिंकला. ९ जुन १६३६ रोजी झालेल्या या लढाईत मोघलांनी निजामाच्या नातेवाईकांना कैद केले.शिवकाळात मात्र हा किल्ला मोघलांकडे राहीला.१५ एप्रिल १८१८ रोजी चांदवड किल्ला जिंकल्यावर कॅप्टन
म्याकडॉवेल याने तोफांचा मारा करत राजधेर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उध्वस्त
केला व किल्ला ताब्यात घेतला.
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) दुर्गभ्रमंती नाशिकची -अमित बोरोले
३) www.trekshitiz.com हि वेबसाईट
४) www.durgbharari.in हि वेबसाईट
५) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
६) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
७) श्री. ओमकार केळकर, विनित दाते, यश गायकवाड यांचे लिखाण व फोटो
८) शोध शिवछत्रपतीच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट





















No comments:
Post a Comment