Wednesday, December 11, 2024

खंडोबा संपुर्ण माहिती

 खंडोबाचे नवरात्र

भाग १
नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने I
 म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः II
मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद् गुरुं I
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् II
 
श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.
 मुख्यत्वेकरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते.
खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेंत भंडारा फार महत्वाचा आहे.
भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो.
तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन "सदानंदाचा येळकोट" किंवा "एळकोट एळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.
खंडोबाची पांच प्रतिके
     १) लिंग: हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते. २) तांदळा: हि चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. ३) मुखवटे: हे कापडी किंवा पिटली असतात. ४) मूर्ति: ह्या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. ५) टांक: घरांत पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा.
खंडोबा हि देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे.
काही सौम्य नवस
     १) मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. २) दीपमाळा बांधणे. ३) मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे. ४) पायऱ्या बांधणे. ओवरी बांधणे. ५) देवावर चौरी ढाळणे. खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे. ६) पाण्याच्या कावडी घालणे. ७) उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणविणे. यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. ८) देवाची गदा म्हणजे वारी मागणे. (देवाच्या नावाने ठराविक काळांत भिक्षा मागणे.) ९) तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे. १०) पुरण-वरण व रोडग्याचा आठवा रीतिनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांस भोजन घालणे. ११) कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.
  दिन विशेष
       रविवार हा खंडोबाचा मानण्यांत आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने
      महाराष्ट्र: १) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी 2) निमगाव ३) पाली-पेंबर सातारा ४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद) ५) शेंगुड (अहमदनगर) ६) सातारे (औरंगाबाद) ७) माळेगाव कर्नाटक: १) मैलारपूर-पेंबर (बिदर) २) मंगसूल्ली (बेळगाव) ३) मैलारलिंग (धारवाड) ४) देवरगुडू (धारवाड) ५) मण्मैलार (बल्ळारी).
बरीचशी माहिती श्रीखंडोबा विशेषांक १९७८ "प्रसाद" या मासिकामधून साभार घेतली आहे.

 खंडोबाचे नवरात्र

भाग २
खंडोबाचे षड्रात्र उत्सव म्हणजे काय? घटस्थापना कशी करावी ?
॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥
॥ चंपाषष्ठी चा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥
        चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले.
      आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा ,आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत.
साहित्य
कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, पंचामृत इत्यादी पूजेचे साहित्य अमावस्येच्या दिवशीच जमवुन ठेवावे.
प्रतिपदेला प्रात:काली उठुन स्नानादि आटोपुन सर्व देव टाक पंचामृताने प्रक्षालित करुन देवघर स्वछ करुन घ्यावे. चंदन पाट किंवा चौरंगावर नवीन वस्त्र टाकुन कुळाचाराप्रमाने माती; अथवा भंडार पात्रामधे पाण्याचा कलश ठेऊन त्यावर नागवेलीची पाने नारळ ठेवुन विधीवत् घटस्थापना करावी.घटाच्या डाव्या बाजुस जोड पानावर म्हाळसा देवीच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवावी. व उजव्या बाजुस जोडपानावर बानु देवीच्या प्रित्यर्थ सुपारी पुजन करावे.
नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशीच षड्रात्र उत्सवातही देवासमोर अखंड ज्योती प्रज्वलीत करावी परंतु तत्पूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात -
१. षड्रात्र उत्सवात देव खंडेरायाच्या घटासमोर सहा दिवस अखंड ज्योत लावली जाते. देवासमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.
२. मंत्र महोदधि (मंत्राच्या शास्त्र पुस्तका) नुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की, *दीपम घृत युतम दक्षे, तेल युत: च वामत:।
अर्थ - तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा.
३. अखंड ज्योत संपूर्ण सहा दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे. यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा. अखंड दिव्यामध्ये तेल, तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा.
४. अखंड दिवा ज्योत ठीक करताना विझला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा.
सहा दिवस घटावरती वेगवेगळ्या फुलांच्या माळा टांगाव्यात. मंत्र जप जागरण , भजन , गायन करावे.चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला पुरणावरणाचा नैवेद्य तसेच वांग्याचे भरीत भाकरीचे रोडगे असा नैवेद्य दाखवावा. तळीभंडार करुन घटोत्थापन करावे.
या सहा दिवसात मार्तंड भैरव स्तोत्राचे , मल्हारी विजय ग्रंथांचे वाचन करावे.

  जय मल्हार (१ )

         येळकोट येळकोट जय मल्हार ! महाराष्ट्राचा हा कुलाचार- महाराष्ट्राचा हा कुलधर्म ! महाराष्ट्राची ही उज्वल परंपरा. खंडेरायाच्या जयजयकाराची येथे गेली हजारो वर्षे चालत आलेली ही रीत. परचक्र येवो, अथवा दुष्काळ पडो, तिच्यात ना पडला कधी खंड. अखंड राहीलेली ही भक्ती. सामर्थ्य देणारी शक्तीपूजा !
कुलदैवत खंडोबा.
               देवघर नाही, असे घर महाराष्ट्रात सहसा आढळायचे नाही. त्या देवघरात गणपती, विठ्ठल, महालक्ष्मी इत्यादी देव -देवतांबरोबरच खंडोबाचा टाक असतो. कुठे तो सोन्याचा, तर कुठे चांढीचा, तर कुठे तांब्या-पितळेचा असतो. तो कुठल्या धातूचा आहे, याला महत्त्व नसून त्यावर केलेल्या खंडोबाच्या प्रतिमेला भाविकांच्या मनात स्थान आहे. त्या प्रतिमेवर पूजेच्या वेळी रोज भंडारा उधळण्यात येतो. भंडारा ! साधी हळद..! खंडेरायाला प्रिय असणारा हा पदार्थ त्या टाकावर उधळतांना मनामनातून आवाज घुमत असतो, "येळकोट येळकोट जय मल्हार...!
          महाराष्ट्रातील अठरापगड जातीचे आणि पंथांचे, रावांचे आणि रंकांचे कुलदैवत खंडोबा ! आणि म्हणूनच तो खऱ्या अर्थाने आहे लोकदेव..!

मूळ कर्नाटकातला.
              'खंडोबा' हे मूळ दैवत कर्नाटकातले. नंतर तो महाराष्ट्रात आला. पण हा येळकोट येळकोट म्हणजे काय ? 'येळू' या कानडी शब्दाचा अर्थ 'सात' असा असून कोट म्हणजे' कोटी'. सात कोटी असा या शब्दाचा अर्थ. मल्हारी मार्तंडाचे सैन्य सात कोटी होते, यावरूध त्याला 'येळकोट मल्हार' संबोधिले जाऊ लागले.
         'इला' म्हणजे पृथ्वी, आणि 'कोट' म्हणजे'पूर्णपात्र'.  "खंडेराया, शेताय भरपूर धान्य पिकू दे ! मी तुला पूर्णपात्र भरुन ते अर्पण करीन" असाही येळकोट शब्दाचा अर्थ लावला जातो. (क्रमशः)

जय मल्हार (२)

दैत्यांचे निर्दालन करणारा मल्लहारी.
           'मैलार' हा मल्लारी' शब्दाचा अपभ्रंश असून 'मणि' आणि 'मल्ल' या दोन राक्षसांना मारणारा तो 'मल्लहारी', म्हणजे 'मल्लारी', किंवा 'मल्ल्यांना (दैत्यांना) मारणारा' असा त्याचा अर्थ आहे. 'चांगभले' हा शब्दही कानडी भाषेतून मराठीत आलेला आहे. 'चांगले', 'भले' अशा अर्थाचा हा शब्द आहे. कानडीत 'सांगूभलो' अशा प्रकारे हा घोष करतात. या दैवताची 'मल्लारी मार्तंड', 'खंडोबा', म्हाळसाकांत', मार्तंडभैरव' इतकेच नव्हे तर, 'मल्लुखान', 'अजमतखान' अशीही नांवे आहेत.
           'मणि' आणि 'मल्ल' या दैत्यांचा नायनाट भगवान शंकरांनी मार्तंडाचा अवतार घेऊन केला. त्या अवतारात शंकरांनी जे खडग वापरले होते, त्याचे नांव होते 'खांडा'. आणि म्हणूनच तो खांडा धारण करणारा तो 'खंडोबा'. म्हाळसेचा पती म्हणून 'म्हाळसाकांत' या नांवानेही तो विख्यात आहे. 'मल्हारी मार्तंड' किंवा 'मार्तंड भैरव' अशीही त्याची नांवे आहेत. 'मार्तंड' म्हणजे 'सूर्य'. दैत्यांचा संहार करण्याकरिता भगवान शंकरांनी जे रुप धारण केले होते ते 'भैरव' म्हणून ओळखले जाते. सूर्य, भैरव आणि शंकर यांचे एकत्रित रुप म्हणजे 'मार्तंड भैरव.' गोमंतकातील 'सप्तकोटीश्वर' हे याचेच एक रूप...!
         या देवतेचे 'रवळनाथ' हे नांव प्रामुख्याने कोकणपट्टीत रुढ आहे. 'जोतिबा' हेही त्याचेच एक रूप आहे.
       'अजमतखान' आणि 'मल्लुखान' ही नांवे या देवतेला पडण्यासंबंधीची आख्यायिका अशी सांगतात की, औरंगजेबाने जेजुरीवर स्वारी करून तेथील मंदिर फोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खंडोबाने लक्षावधी भुंगे तयार केले व त्यांनी सैनिकांना सळो की पळो करून सोडले. फक्त एकदाच नव्हे तर दोनदा. शेवटी औरंगजेबाने' सोन्याचा भुंगा' तयार करून तो खंडोबाला अर्पण केला व त्याचे नांव 'अजमतखान' उर्फ 'मल्लुखान' असे ठेवले.
        अशा या दैवताची मंदीरे भारतात विविध ठिकाणी विविध स्वरूपात आढळतात. आपल्या महाराष्ट्रात तर ती असंख्य आहेत. तेथे दरवर्षी खंडोबाची यात्रा भरते. अशी पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि महाराष्ट्रात तब्बल २४५ स्थाने आहेत. याशिवाय काही स्थाने सांगायची झाली तर त्यांची यादी दोनशेच्या घरात जाइल.
            या सर्वात महत्त्वाचे स्थान म्हणजे पुणे जिल्ह्यातील 'जेजुरी' समजले जाते. बाराही महिन्यातील कोणत्याही दिवशी तेथे जा, भक्तगण भंडारा उधळून येळकोट मल्हाराचा गजर करतांना दिसतातच. साहजिकच आपले कान आणि मन हा जयजयकार ऐकून अक्षरशः तृप्त होतात. (क्रमशः)

  जय मल्हार (३)      

           एस.टी. ने पुणे शहर सोडल्यावर हडपसर लागते. वाटेत जो घाट लागतो तो 'दिवे घाट', खाली 'मस्तानी' चा तलाव पसरलेला दिसतो. श्रीमंत बाजीराव (पहिले) पेशवे, या रमणीय परिसरात मस्तानीसह जलक्रीडा करत असत. घाट ओलांडला की, उजवीकडे दूर अंतरावर ऐतिहासिक 'जाधवांची गढी' दिसते. पाठोपाठ येते सासवड. पुरंदर तालुक्याचे हे मुख्य ठिकाण. सरदार पुरंदरे इथलेच. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचे काही काळ येथे वास्तव होते. आचार्य अत्र्यांची ही जन्मभूमी. संत ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानकाका यांची येथे समाधी आहे. येथेच क-हा नदीच्या काठावर वटेश्वर आणि संगमेश्वराची दोन अतिशय देखणी व दगडी बांधणीची प्राचीन मंदिरे आहेत.
सासवडपासून सुमारे बारा किलोमीटर अंतरावर पुरंदर किल्ला आहे. सासवड आणि पुरंदर किल्ल्याच्या दरम्यान नारायणेश्वराचे सुबक मंदिर आहे.
सासवड मागे टाकले की, जेजुरी...! ती पुण्यापासून तब्बल ४८ किलोमीटर अंतरावर असून जेजुरीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर अष्टविनायकातील श्रीक्षेत्र 'मोरगाव' आणि तिथून अवघ्या पाच किलोमीटरवर पांडवांची यज्ञभूमी 'पांडवेश्वर' आहे. याच आसमंतात पुढे १५ किलोमीटर वर भुलेश्वराचे अप्रतिम मंदिर आहे. पुरंदर, सासवड, जेजुरी आणि भुलेश्वर हा भाग विस्तृत पठाराचा असून तेथून क-हा नदी वाहते, म्हणून या भूभागाला 'क-हेचे पठार' असे नामाभिधान प्राप्त झाले. या परिसरातूनच स्वातंत्र्यवीर उमाजी नाईक याने जुलमी ब्रिटीश सत्तेविरुध्द रणशिंग फुंकले, परंतु पुढे तो ब्रिटीशांच्या तावडीत सापडला आणि त्यांनी क्षणाचीही उसंत न घेता त्याला फासावर लटकावले, पण त्या स्थितीतही उमाजी नाईक गर्जत होता, "येळकोट मल्हार ! येळकोट मल्हार...!"
पूर्वीची 'जेजेवाडी' आत्ताची 'जेजुरी' !
           असा हा जेजुरीचा आसमंत आणि क-हा नदीचा परिसर आहे. सध्या जिथे जेजुरी आहे, तिथून एक किलोमीटरवर जेजेवाडी नांवाचे एक खेडे होते. कालौघात ते नामशेष झाले. पण जेजेवाडीलाच पुढे 'जेजुरी' म्हणण्यात येऊ लागले. जेजेवाडीच्या बाजूनेही गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत; परंतु त्या बाजूचा गडाचा दरवाजा आता बंद केला असल्याने त्याचा वापर नाही.
         या जुन्या जेजुरीत मारुतीचे मंदिर असून त्याला 'रोकडोबा' म्हणतात. याच परिसरात ३५ एकरात पेशव्यांनी बांधलेला अष्टकोनी तलाव आहे; पण आज त्याचा बराचसा भाग बुजला आहे. त्याच्यापुढे 'मल्हारतीर्थ' नामक एक तलाव असून सातारच्या छत्रपतींनी तो बांधला आणि त्याच्या सभोवार नवसरीकरांनी सोपे बांधले होते.
        श्रीमंत होळकरांचे कुलदैवत खंडोबा होते. जेजुरीच्या उत्तरेला तुकोजीराव होळकरांनी एक तलाव बांधला व पुढे याच्या काठावर अहिल्यादेवींनी मल्हारराव होळकरांच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधले. त्यासाठी त्या काळी १८ लक्ष रुपये खर्च झाले होते, आणि तेच पुढे जेजुरीकरांचे पाणीपुरवठा केंद्र झाले. अशी ही जुन्या व नव्या जेजुरीतील काही महत्वाची ठिकाणे; परंतु येथील सर्वात महत्वाचे ठिकाण 'गड जेजुरी...! (क्रमशः)

    जय मल्हार (४)

         एस.टी. स्टॅंड पासून अर्ध्या फर्लांगावर जेजुरी गडाच्या पायऱ्या आहेत. या मार्गावर भंडारा, खोबरे, पान, फुले यांची दुकाने प्रामुख्याने आहेत. सुक्या खोबऱ्याच्या वाटीत भंडारा घालून तो कापडाच्या पिशवीतून देण्याची इथे प्रथा आहे. हा भंडारा गडावरील मंदिरात नेऊन म्हाळसाकांतावर "येळकोट येळकोट" असा गजर करत उधळायचा असतो. खोबऱ्याची वाटी हाताने दाबून फोडायची असते. त्यातील काही भाग पुजारी आपणाला घरी प्रसाद म्हणून नेण्यासाठी देतो. स्त्री वा पुरुष दोघांच्याही भाळी (कपाळावर) तो भंडारा लावतो.
        थोड्याच वेळात आपण गडाच्या पायऱ्यांपाशी येतो, आणि नजरेपुढे येतात असंख्य दीपमाळांची चिरेबंदी बांधकामे, नगारखाने, पार आणि वेशी यांनी उभारलेला बळकट गडकोट, आपला ऐतिहासिक ठेवा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण...!
         बोलता बोलता आपण गावाच्या वेशीपाशी येतो. ती ओलांडली, की गावाची हद्द संपते आणि गडाच्या पायऱ्या सुरू होतात. वाटेत एक चौखांबी देवळी आहे. त्यात एक मोठा दगडी नंदी आहे. त्याच्यापुढे असलेल्या दोन खांबांना टेकून दोन लहानखुरे हत्ती आहेत. जवळच एक जेजुरी गडाचे दगडी प्रवेशद्वार आहे. तिथेच एक गणपतीची मूर्ती आहे. गडावर जाण्यापूर्वी त्याचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे. वाटेत एक दगडी कासव असून ते सदैव भंडाऱ्याने माखलेले असते. येथून सात-आठ पायऱ्या चढून गेलो की, दुतर्फा दगडी बांधकामे, समोर एक देवळी असून तीत वीरभद्राची एक दगडी मूर्ती आहे. आता सर्वत्र दीपमाळा दिसू लागतात. त्यापैकी काही ज्यांच्या नवसाला मल्हारी पावला अशांनी बांधलेल्या आहेत.
          येथून पुढे डाव्या व उजव्या बाजूला दोन वाटा फुटतात. डाव्या हाताच्या वाटेवर बाणाईचे देऊळ आहे. "माझ्या दर्शनाला आलेल्यांनी प्रथम तुझे दर्शन घेणे आवश्यक आहे." असा वर खंडोबाने तिला दिला आहे. त्यामुळे तिचे दर्शन सर्वप्रथम घेतात. थोडे वर गेले की, एका मोठ्या देवळीत सिध्दासनावर पिळदार मिशांचा प्रधान व हेगडी यांच्या मूर्ती आहेत. हेगडी हा बाणाईचा भाऊ असून या मूर्तीवरही भाविक भंडारा उधळतात.
        आणखी थोडे वर गेल्यावर सहावी वेस लागते. हा गडाचा अखेरचा टप्पा. येथे जवळच 'साक्षी विनायका' चे देऊळ आहे. या नांवामागे एक आख्यायिका दडलेली आहे, ती अशी,
      भगवान शंकरांच्या दोन बायका. 'पार्वती' आणि 'गंगा, एकमेकांच्या सवती होत्या. त्या सदैव भांडत असत. 'जया' नांवाची दासी त्यांची भांडणे सोडवी. प्रसंगी दोघांची समजून घाली.
        त्यामुळे पार्वती व गंगा दोघीही तिच्यावर खूष असत. एकदा प्रसन्न होऊन त्या दोघींनी जयाला वय दिला, की पुढे भगवान शंकर मार्तंड भैरवांचा अवतार घेणार आहेत, तेव्हा तू त्यांची पत्नी होशील. त्यावर जया त्या दोघींना म्हणाली, "त्यावेळी माझी जागा कुठे असेल ?" त्यावर त्या दोघी तात्काळ उत्तरल्या, "उजव्या हाताला."
         सहाजिकच जया आनंदी झाली, परंतु याला कुणीतरी पुरुष साक्षीदार असावा असे तिला वाटले व तिने तसे त्या दोघींजवळ बोलून दाखवले, तेव्हा पार्वतीने आपल्या पुत्राला, गणेशाला हाक मारली, तेव्हा जयेने त्याला हे लिहून ठेवायला सांगितले. त्याप्रमाणे लिहून गणेशाने ते शंकरांना दाखविले. त्यांनी जयेला हाक मारली आणि तिला वर दिला, की "अर्जुनाने लढाईत हा बाण मला मारला, तो माझ्या डोक्याला लागला. तो हा बाण मी तुला देत आहे. आता आपला पाणिग्रहण संस्कार या बाणाच्या देखत झाला आहे. कालांतराने तू या बाणासह जन्म घेशील व तुला लोक "बाणा" म्हणून ओळखतील.
             या सर्व प्रकाराला गणेश साक्षीदार होता. यथावकाश मार्तंड अवतारात येथे बाणाईचे देऊळ स्थापन झाले, आणि या घटणेचा साक्षीदार गणेश, त्याचे मंदिरही स्थापन झाले. भाविक त्याला म्हणू लागले, "साक्षी विनायक...! आपण जेजुरीला आलो होतो, याचा साक्षीदार म्हणून येथे येणारे भाविक त्याचेही दर्शन आवर्जून घेतात...! (क्रमशः)

      जय मल्हार (५)

यशवंतराव रखवालदाराचे स्मारक.
           आता आणखी थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर तटाच्या भिंतीत एक दोनखांबी कमान दिसते. त्यात शेंदूर माखलेली यशवंतराव रखवालदाराची प्रतिमा आहे. कोण हा यशवंतराव? तो होता, या जेजुरी गडाचा पहारेकरी. त्याने सर्व सामर्थ्यानिशी औरंगजेबाच्या सैन्याचा प्रतिकार केला. अखेर तो धारातीर्थी पडला. त्याचे हे स्मारक. हातापायाचे रोग झालेले, येथे येऊन "आपले हात-पाय नीट कर...!" असा नवस बोलतात, आणि गुण आल्यावर लाकडाचे हात-पाय आणून वाहतात व आपला नवस फेडतात. म्हणून येथे असंख्य लाकडी हात-पाय पडलेले दिसतात.
सव्वा लाखाचा भुंगा...!
           या स्मारकावर तटाला एक भोक आहे. ते शेंदराने माखलेले असते. याच भोकात औरंगजेबाच्या सैनिकांनी सुरुंगाची वात ठासून भरली व तिची वात पेटवणार, इतक्यांत त्यातून लक्षावधी भुंगे बाहेर पडले व त्या सैनिकांवर तुटून पडले. परिणामी ते वाट फुटेल तिकडे पळू लागले.
         शेवटी जेरीस आलेला औरंगजेब खंडेरायापुढे नतमस्तक झाला व "खंडेराया, भुंग्यांना आवर, सव्वा लाखाचा सुवर्णाचा भुंगा तुला वाहीन." असा नवस बोलला, आणि काय आश्चर्य..! भुंगे दिसेनासें झाले. औरंगजेबाने खंडोबाला 'अजमतखान' संबोधून सव्वा लाखाचा भुंगा वाहिला, म्हणून या जागेला 'सव्वा लाखाचा भुंगा' असे नांव कालांतराने पडले.
         आता आणखी पंचवीस पायऱ्या चढून गेल्यावर प्रशस्त महाद्वार लागते. येथे श्रीगणेश, नंदी आणि वाघ यांच्या देखण्या मूर्ती असून समर्थ रामदासांनी स्थापन केलेला वीर मारुतीही येथे विराजमान झालेला आहे.
नवलाख पायरी...!
       लाकडी महाद्वार उत्तराभिमुखी असून त्यावर नगारखाना आहे. तब्बल ३९० पायऱ्या चढून आपण गडावर आलो; पण या गडाला "नवलाख पायरी" असल्याचा ऊल्लेख आपण भाविकांकडून ऐकतो, ती केवळ अतिशयोक्ती म्हणावी लागेल इतकेच.
          महाद्वारातून आत गेल्यावर देवडी आहे. त्याच्या पुढचा भाग म्हणजे मुख्य मंदिराचे आवार किंवा प्राकार. सभोवती उंच आणि भक्कम तटबंदी आहे. हाच तो जेजुरीचा गडकोट. याला तीन दरवाजे आहेत. तटबंदीच्या आत वर्तुळाकार ६३ ओवऱ्या आहेत. प्राकाराच्या मध्यभागी सभामंडप आहे.
नंदी आणि मणि राक्षसाची प्रतिमा.
         'दीपमाळा' हे जेजुरी चे वैशिष्ट्य आहे. त्या जशा पायऱ्यांच्या दुतर्फा दिसतात, तशा मंदिराच्या प्राकारातही चार भव्य व सुंदर दीपमाळा आहेत. त्यांच्या मध्यभागी एका छोट्या मंडपात नंदी असून जवळच नऊ फुट उंचीची दगडाची मणि राक्षसाची मूर्ती असून तो सदैव हात जोडून उभा आहे. (क्रमशः)

 जय मल्हार (६)

खंडोबाचा खांडा.
        इथून पुढे खंडेरायाचे मुख्य मंदिर. ते पूर्वाभिमुख असून दगडी बांधणीचे आहे. गाभारा, मंडप आणि देवड्या असे त्याचे तीन भाग आहेत आणि समोर वीस फूट व्यासाचे दगडी कासव असून ते पितळी पत्र्याने मढवलेले आहे. मंदिरात प्रवेश करताना दोन पितळी घंटा आहेत. त्यापैकी एक एतद्देशीय, तर दुसरी पोर्तुगीज बनावटीची आहे. डाव्या बाजूच्या देवळीत एक अजस्त्र तलवार दिसते. हाच तो "खंडोबाचा खांडा." ती चार फूट लांब व ३२ किलो वजनाची असून तिच्या पात्याची रुंदी चार इंच असून मणि-मल्लांशी लढाई करतांना मार्तंड भैरवाने ती हातात धारण केली होती.
         समोरच्या देवडीत तळी भरण्याचा कार्यक्रम होतो. मध्यभागी एक दार असून त्याचे आत अंदाजे २१ फूट लांब व २९ फूट रुंदीचा मंडप आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना दगडी घोडे आहेत. पैकी उजव्या बाजूचे घोड्यावर मल्लारी मार्तंड आरूढ झाला असून डाव्या बाजूचा घोडा मात्र रिकामाच आहे. हा मंडप चौखांबी असून तेथील दरवाजा चांदीने मढविलेला आहे. या मंडपालगतचा गाभारा १५ फूट उंची रुंदीचा आहे. याच्या मध्यभागी चारखांबी मखर आहे. त्याचे मागील दोन खांब चांदीने व पुढील दोन खाब पितळी पत्र्याने मढविलेले आहेत. तेथे एक चौकोन असून त्यात 'खंडोबा' व "'म्हाळसा' यांची दोन स्वयंभू लिंगे आहेत. स्नानाचे किंवा अभिषेकाचे वेळी त्यांचे दर्शन होते. इतर वेळी त्यावर रुप्याचे अच्छादन व मुखवटे घालण्यात येतात. या चौकोनाजवळच बाणाईचे स्वयंभू लिंग असून त्यावरही मुखवटा घातलेला असतो. याच्या मागील बाजूला म्हाळसा आणि खंडोबा यांचे तीन जोड आहेत. यापैकी दोन जोड चांदीचे तर तिसरा पंचधातूचा आहे.
        मूर्तीमधील खंडोबाच्या एकेका हातात खडग, त्रिशूल, डमरु आणि परळ आहे. तो जवळ जवळ मूर्तीच्याच अंगचा आहे. बाकीच्या गोष्टी वेगळ्या करता येतात. तीन्ही म्हाळसांच्या मूर्तीतील उजव्या हातात कमळ, आणि डावा हात गजहस्त मुद्रेत आहे. आणि विशेष म्हणजे म्हाळसांच्या मूर्तीला दोनच हात आहेत.
जेजुरीचा मार्तंड भैरव.
          खंडोबा हा भगवान शंकरांचा अवतार असल्यामुळे त्याच्या कानात सर्पकुंडले नसून मकरकुंडलेच असली तरी म्हाळसाने कर्णफुले ल्याली आहेत. तिथे बाणाई आहे. यातील पहिला चांदीचा जोड सवाई माधवराव पेशव्यांनी, तर दुसरा सातारचे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला असून तिसरा तंजावरच्या व्यंकोजी भोसल्यांनी दिलेला आहे.
        या तिन्ही जोडांच्या पाठीमागे एक मोठा कोनाडा असून त्यात खंडोबाची दगडी मूर्ती आहे. तिच्या चार हातापैकी एका हातात त्रिशूल, दुसऱ्यात डमरु, तिसऱ्यात परळ आहे, पण चौथ्यात पूर्वी खडग होते. शिंदेशाही पगडी आणि बाराबंदी असा खंडोबाचा पोषाख असून त्याने आसन-मांडी घातली आहे. हाच तो जेजुरीचा मार्तंड भैरव. त्याच्या दोन्ही बाजूंना दोन दगडी पुतळ्या असून त्यांना 'जोगेश्वरी' असे म्हणतात. (क्रमशः)

 जय मल्हार (७)

गुप्त मल्लेश्वराचे ठिकाण.
         येथे एका भिंतीच्या कोपऱ्यात गुप्त मल्लेश्वराचे स्थान असून त्याचे दार फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी उघडतात व त्याच दिवशी भाविकांना आतील दोन्ही लिंगांचे दर्शन घेता येते. ही दोन लिंगे म्हणजे शिव आणि पार्वतीची प्रतिके आहेत. एका बाजूला शेजघर आहे. तेथील मखरही चांदीने मढविलेले आहे. मुख्य मंदिराच्या पिछाडीला पंचलिंगेश्वराचे देऊळ आहे. पाचपिंडी येथे एकत्र आहेत. याशिवाय गणपती आणि तुळजाभवानी यांचीही देवळे आहेत.*
धृतमारीची शिळा.
         थोड्या अंतरावर जी तालीम आहे, ती वीर उमाजी नाईक यांची होय ! तेथे एकमेव जी खिडकी आहे, तेथून कठेपठारावरील खंडेरायाच्या मूळ मंदिराचे दर्शन होते. येथेच धृतमारीची शिळा आहे. मणि-मल्ल दैत्यांचा पाडाव करून त्यांना वठणीवर आणण्याकरता शिवशंकरांनी मार्तंड अवतार धारण केला; परंतु हे दैत्य ऋषिजनांना देत असलेला त्रास ऐकून शंकर क्रोधायमान झाले व त्यांनी रागाने आपल्या जटा आपटल्या. त्यातून महामारी उत्पन्न झाली. तिने युध्दात मार्तंड भैरवाला खूप सहाय्य केले. पुढे तिला पोटभर तूप पाजून शांत केले. ती जिथे शांत झाली ती ही जागा आणि ती ही शिळा...!
खंडेरायाचा दिनक्रम. :-
         खंडेरायाची रोज पहाटे साडेचार, दुपारी साडेबारा आणि तीन वाजता व रात्रौ साडेआठ वाजता पंचामृताने स्नान घालून पूजा होते. शाहीर सगनभाऊ हे जेजुरीचे. पहाटेच्या पूजेच्या वेळी त्यांची 'भूपाळी' म्हणण्यात येते. या पूजेचे वेळी लिंगावरील मुखवटे व कवच काढण्यात येते. पूजा झाली की, ते पुन्हा घालण्यात येते. बेल, फुले, दवणा वाहून, भंडारा उधळून, येळकोट मल्हारचा जयघोष करण्यात येतो. तीन्ही वेळेला खंडेरायाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. या पूजाविधींमध्ये भाविकांनाही सहभागी होता येते. रात्रीची पूजा झाली की, गडाचे दरवाजे बंद करण्यात येतात. ते पुन्हा पहाटे पूजेच्या वेळी उघडण्यात येतात.
         शनिवारी व रविवारी रात्री मुख्य देवतेची पूजा झाल्यावर ती धुपारती बाणाई व हेगडी-प्रधान यांच्या मंदिरात नेण्याची प्रथा आहे. गडावर ईशान्य दिशेला एका कोपऱ्यात 'फिरंगाई' आणि 'पिंगळा' यांची ठाणी आहेत. नवरात्रात 'मंगळवारी' व 'शुक्रवारी' तेथेही ही धुपारती नेण्यात येते.
रविवार खंडेरायाचा वार.
        वेगवेगळ्या देवतांचे वेगवेगळे वार आहेत. त्यात रविवार हा "खंडोबाचा" वार आहे. सहाजिकच इतर दिवसांचे तुलनेत या दिवशी भाविकांची जेजुरीला जास्त गर्दी होते. खंडोबा हा शंकराचा अवतार असल्याने सोमवती अमावास्येला येथे मोठी यात्रा भरते. याशिवाय चैत्री पौर्णिमेला शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला म्हणून, श्रावणी पौर्णिमेला मल्लारी आणि बाणा यांचा विवाह संपन्न झाला म्हणून, माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस म्हणून, सज्जनांना पीडा देणाऱ्या मणि-मल्लांना मार्तंड भैरवाने मार्गशीर्ष षष्ठीला यमसदनी पाठविले व तो लिंग रुपात प्रकट झाला, तो "चंपाषष्ठीचा"दिवस म्हणून...  या सर्व दिवशी मोठी यात्रा भरते.
        याशिवाय दसरा आणि महाशिवरात्रीला ही येथे मोठी यात्रा भरते. यापैकी सोमवती अमावास्या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे. तत्संबंधीची कथा अशी-, समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने निघाली, त्यात रंभाही होती. शंकराने आपला स्विकार करावा अशी तिची मनोकामना होती. परंतु ती इंद्राच्या वाट्याला आल्यामुळे तिची इच्छा अतृप्त राहिली. निदान आपण शंकराची दासी व्हावे, असे तिला वाटू लागले. महर्षी नारदाने ते जाणले, आणि तिला शिवमंत्राचा जप करण्यास सांगितले. परिणामी भोलेनाथ संतुष्ट झाला. त्याने तिला "मार्तंड अवतारात मी तुझी इच्छा पूर्ण करेन" असा वर दिला, व त्याप्रमाणे यथावकाश मार्तंड अवतारात त्याने 'गुप्तमल्लेश्वर' होऊन तिची मनोकामना पूर्ण केली. त्या रंभेचे ठाणे क-हा नदीच्या तीरावर असून सोमवती अमावास्येला मार्तंड भैरव तेथे स्नानाला जातात व तिला भेटतात. (क्रमशः)

 जय मल्हार (८)

खंडोबाचे नवरात्र.
      आश्विनात येथे नवरात्र बसते. त्यातील दसऱ्याच्या दिवशी क-हेपठार आणि जेजुरी गडाहून खंडेराय पालख्यात बसून एकमेकांना भेटण्यास निघतात. या पालख्या जिथे भेटतात त्या जागेला 'विसावा' असे म्हणतात. दोन्ही देवांची भेट प्रथम आरशात प्रतिबिंब पाहून होते. नंतर 'रमणा' येथे दोन्ही पालख्या एकत्र येतात. मग शोभेची दारू उडविण्यात येते. भंडारा उधळला जातो. त्यानंतर दोन्ही पालख्या आपापल्या मंदिराकडे परत जातात. गडावर उत्तरेच्या ओवरीत दरऱ्याच्या दिवशी दरबार भरतो. वाघ्या-मुरळींची नृत्ये व जागर होतो.
         खंडोबाचे महत्त्वाचे नवरात्र मार्गशीर्षातले. 'चंपाषष्ठी' चे किंवा "वांगीसटीचे नवरात्र" असे याला म्हणतात. हे नवरात्र असते फक्त पांच दिवसांचे. मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला त्याचा प्रारंभ होतो. पंचमीला रात्री तेलाचा हंडा मिरवणुकीने देवळातून चावडीवर नेण्यात येतो. तेथे गावकरी त्यात तेल आणून घालतात. नंतर तो हंडा पुन्हा मिरवणुकीनेच गडावर नेण्यात येतो. मग त्यातील तेल खंडेरायाला अर्पण करण्यात येते. या उत्सवाला "तिळवणाचा हंडा" असे म्हणतात.
        षष्ठी हा या नवरात्राचा शेवटचा दिवस. मार्तंडाने पाच दिवस घनघोर संग्राम करून केलेल्या मणि-मल्लाच्या वधाचा दिवस. म्हणून 'ढोंबर' या पदार्थाचा नैवेद्य त्याला अर्पण करतात. जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालून हा ढोंबरा तयार करतात. याशिवाय रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा आणि लसूण हे पदार्थ नैवेद्याचे पानात असतात; परंतु गडाखाली बाणाईच्या ठाण्यात मांसाचा नैवेद्य दाखवितात.
        वांगीसटीच्या उत्सवात येथील सर्व दीपमाळा प्रज्वलित करण्यात येतात. पूर्वी षष्ठीच्या दिवशी तेथे भक्त 'बगाड' होत असे. म्हणजे पाठीत किंवा हातापायात खिळा खुपसून घेऊन प्रदक्षिणा घालत. किंवा आपल्या शरीरात तलवार खुपसून त्या रक्ताचा टिळा खंडेरायाला लावत. विस्तवावरून चालण्याचीही येथे प्रथा होती; परंतु या सर्व प्रथा आता कायद्याने बंद केल्या आहेत.
        पौष-पौर्णिमेला मल्लारी- म्हाळसा यांच्या विवाहाच्या वाढदिवसाचे निमित्ताने मोठी यात्रा भरते. याच दिवशी जेजुरीत गाढवांचा मोठा बाजार भरतो. माघी पौर्णिमा म्हणजे म्हाळसेचा जन्मदिन. या दिवशी येथे काठ्यांची यात्रा भरते. उंच बांबूला तांबडे पागोटे बांधून आणतात. त्यात होळकर, खैरे आणि होलम यांच्या काठ्या मानाच्या समजल्या जातात. वद्य द्वितियेला गावात आलेल्या सर्व काठ्या मिरवणुकीने गडावर येतात आणि कळसाला स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. (क्रमशः)

जय मल्हार (९)

        जेजुरी पासून १५ किलोमीटरवर अष्टविनायकातील प्रमुख मोरगाव हे आहे. मोरया गोसावी यांना क-हा नदीत 'तांदळा गणपती' मिळाला. तो घेऊन ते पुढे चिंचवडला आले. तेथून दरवर्षी भाद्रपदात व माघात ते मोरगावला जात. तांदळा गणपती भाद्रपदात पालखीतून व माघात घोड्यावरून ते नेत असत. याला 'भादवी' व 'माघी' यात्रा म्हणतात. या वारीचे वेळी जेजुरीला श्रींचा मुक्काम होतो. त्यांची पालखी गडावर येते. मंदिरात त्यांची व मार्तंडभैरवाची भेट होते. दोघांवरही भंडारा उधळला जातो. 'मंगलमूर्ती मोरया- खंडेरायाचा येळकोट' म्हणत यात्रेकरू एक दिवस गडाच्या पायथ्याशी मुक्काम करून मार्गस्थ होतात. सहाजिकच या दोन्ही दिवशी जेजुरीला अक्षरशः यात्रेचे स्वरुप असते.
       अशी ही जेजुरी..! येथे सतत यात्रा, उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात. लाखो भाविक येथे येतात. "येळकोट येळकोट मैल्लार" असा जयजयकार करतात. एका ताम्हानात पाने, सुपारी, भंडारा, आणि खोबरे ठेवून ते येळकोट मैल्लार म्हणत देवापुढे तीन वेळा उचलतात आणि नंतर दिवटी- बुधलीने आरती करतात. भंडारा व खोबरे उधळतात. या धार्मिक विधीला "तळी भरणे" असे म्हणतात. मंदिरात जाताना तळी भरण्यासाठी खास देवडी आहे.
        लग्न झाल्यावर नवदांपत्याने जेजुरीला येऊन तशी तळी भरण्याची प्रथा काही घराण्यात आहे. त्याला "आहेर यात्रा" असे म्हणतात. येणारे सर्व भाविक भंडारा उधळून "देवा खंडेराया, आमच्या आयुष्याचे सोने कर, देशात धनधान्य भरपूर पिकूदे, वीरवृत्ती वाढूदे" असा मनापासून आशीर्वाद मागतात.
      अशा वेळी हर्षभराने ते उधळत असलेल्या भंडाऱ्याचे लक्षावधी कण हवेत पसरतात आणि जेजुरीत सर्वत्र सुवर्णाची पखरण होते. मग भक्त म्हणू लागतात, "देवा तुझी सोन्याची जेजुरी..! सोन्याची जेजुरी..! (क्रमशः)

  जय मल्हार (१०)

  कडेपठार.
       मार्तंड भैरवाच्या मूळ ठिकाणाला "कडेपठार" असे म्हणतात. ते जेजुरी गडापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे. गडाच्या मागील बाजूस जो दरवाजा आहे, तेथून कडेपठारावर जाता येते. छोट्या पाऊलवाटेने भाविक तेथे जातात. हे ठिकाण सुमारे आठशे फूट उंचीवर आहे.
घोडे उड्डाण.
         वाटेत "घोडे उड्डाण" नांवाची एक जागा आहे. हे नाव पडण्याला मार्तंड भैरव जेजुरी गडावर येण्याशी जी कथा निगडित आहे, ती अशी,
        सुपे गावचा आबा खैरे नांवाचा पाटील खंडोबाचा महान भक्त होता. दर रविवारी तो कडेपठारावर खंडेरायाच्या दर्शनाला येत असे. अनेक वर्षे त्याची ही साप्ताहिक वारी चालू होती. कालांतराने तो म्हातारा झाला; पण त्याचा वारीत कधी खंड पडला नाही. एकदा चालता चालता तो खूप थकला, आणि धाडकन जमिनीवर पडला, आणि आपण आता खंडेरायाच्या दर्शनाला अंतरणार, याची जाणीव होताच तो फार दुःखी झाला. आपल्या या निस्सीम भक्ताची ही अवस्था जाणून मार्तंड भैरव स्वतः तेथे पांढऱ्या शुभ्र अबलख वारुवर बसून आले आणि आबा खैरेच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, "तुझ्यासाठी मी गावाजवळच्या टेकडीवर येऊन राहतो, तेथे तू येत जा. इथून पुढे तुला कडेपठारावर येण्याची गरज नाही." पाठोपाठ खंडेरायाने घोड्याला टाच मारून उड्डाण केले व गावाजवळच्या टेकडीवर येऊन तेथेच गुप्त झाला. त्याच्या मागोमाग आबा खैरे त्या टेकडीवर आले. तिथे त्यांना मल्लारी मार्तंड आणि म्हाळसा यांची दोन स्वयंभू लिंगे दिसली. (तीच आजमितीला गाभाऱ्यात आहेत.) ही वार्ता हा हा म्हणता सर्वत्र पसरली. पुढे भक्तांनी तेथे मंदिर उभारले. ओवऱ्या बाधल्या, तटबंदी घातली, पायऱ्या तयार केल्या, दीपमाळा उभारल्या. पुढे खैरे पाटील नित्यनेमाने दर्शनाला येऊ लागले. त्यांना मल्लारी मार्तंड घोड्यावरून येऊन भेटले, त्या जागेला "घोडे उड्डाण" असे नांव पडले.
विसावा.
      येथून थोडे पुढे गेल्यावर एक चौथरा लागतो. त्याला "विसावा" असे म्हणतात. कारण कडेपठारावरून खंडेरायाची पालखी निघाली की, येथे विसावा घेते. आणखी पुढे गेल्यावर विस्तीर्ण पठारावरील मंदिराचे शिखर नजरेच्या टप्प्यात येते.
मार्तंड भैरवाची मूर्ती.

          कडेपठारावरील मंदिरही पूर्वाभिमुख असून तेथे देवडी, मंडप व गाभारा आहे. कडेने कमानी असलेले हे बांधकाम असून येथेही मंदिराच्या समोर दगडी कासव आहे. ते पितळी पत्र्याने अच्छादिलेले आहे. गाभाऱ्याच्या दर्शनी भिंतीत कोनाडा असून त्यात दगडाची मार्तंड भैरवाची मूर्ती आहे. तीही मांडी घालून बसलेली असून तिच्या हातात खडग, त्रिशूल, डमरु आणि परळ (पाणी पिण्याचे भांडे) आहे. मूर्तीला पांढरी बाराबंदी व मस्तकावर शिंदेशाही पगडी आहे. मूर्तीच्या दोन्ही अंगांना मुखवटे घातलेल्या "बाणाई" व "जोगेश्वरी" यांच्या दगडी मूर्ती आहेत. येथेही खंडोबा, म्हाळसा व बाणाईचे मुखवटा घातलेले स्वयंभू लिंग आहे. मागच्या बाजूला खंडोबा आणि म्हाळसेची मूर्ती व पितळी कुत्रा व नाग असून जवळच स्फटिकाची गणेश मूर्ती आहे.
भवानगीर गोसाव्याचा मठ.
         मंदिरासमोर कासव असून त्यामागील कोनाड्यात दोन नंदी आणि तीन मारुतीच्या मूर्ती आहेत. जवळच दत्तात्रेय महाराजांचा मठ आहे. यालाच भवानगीर गोसाव्याचा मठ असेही म्हणतात. गोविंद बाबा नांवाच्या दत्त भक्ताने हा मठ १७४२ मध्ये बांधला, व दत्तात्रेयांच्या मूर्तीची स्थापना केली. स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटिश राजवटीविरूध्द उठाव करणाऱ्या वीर उमाजी नाईकने आपल्या मूठभर साथीदारांसह या मठाचा आश्रय घेतला होता. या परिसरातही हेगडी प्रधान, पंचलिंगेश्वर, लक्ष्मी, श्रीराम इत्यादींची देवळे आहेत.
       जेजुरीला अशा प्रकारे मार्तंड भैरवाची एकून दोन मंदिरे आहेत. एक गडावरचे आणि दुसरे हे कडेपठारावरचे...! (क्रमशः)

 जय मल्हार (११)

अवतार.
  कडेपठार हे मार्तंड भैरवाचे जेजुरीतील मूळ ठिकाण;  परंतु तो तेथेच का अवतरला, या संदर्भातील पौराणिक कथा अशी, मणिचूर्ण नांवाच्या पर्वतावर मणिपूर नामक एक नगरी होती. इंद्राची अमरावती जेवढी सुंदर, तशीच ही मणिपूर नगरीही होती. मल्ल नांवाच्या महाबलाढ्य राजाचे ते निवास स्थान होते. तो धार्मिक वृत्तीचा होता. इतकेच नव्हे, तर घोर तपश्चर्येने त्याने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतले. मग त्याला अचाट शक्ती प्राप्त झाली. सहाजिकच मल्ल मदोन्मत्त बनला. त्याने सर्व देव-देवतांना सळो की पळो करून सोडले.
        याच मणिचूर्ण पर्वतावर युधिष्ठीराचे सात पुत्र तपश्चर्या व यज्ञयाग करत होते. एकदा मल्लाची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली. त्याने सप्तर्षींची यज्ञकुंडे आणि आश्रम उध्वस्त करून टाकले. अचानक तेथे महर्षी नारद उपस्थित झाले. त्यांनी सप्तर्षींचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला व इंद्राला शरण जाण्याचा सल्ला दिला. इंद्राने असमर्थता प्रकट केली व "विष्णूंकडे जा" असे सांगितले. सप्तर्षी धावतच वैकुंठात आले; पण विष्णूने त्यांना "शंकरांकडे जा" असा सल्ला दिला.
        शंकरांनी सप्तर्षींची करूण कहाणी ऐकली. परिणामी ते क्रोधायमान झाले. त्यांनी एका खडकावर आपल्या जटा त्वेषाने आपटताच शिवशक्ती महामारीच्या रुपाने प्रकट झाली. पाठोपाठ शंकरांनी मार्तंडभैरवाचे रुप धारण केले, आणि गळ्यात रुंडमाला घातली व त्यांनी मल्लाविरुध्द सर्वंकष युध्दाची घोषणा केली.
        लढाईला तोंड फुटले. दोन्ही बाजूचे वीर धारातीर्थी पडू लागले. शंकरांनी प्रथम मल्लाच्या भावाशी, मणीशी युध्द केले. त्यांनी मणीला आपल्या पायाखाली दाबून ठेवले, पण त्याने शंकराचे पाय घट्ट धरले. "हे महादेवा, मला माझ्या घोडा व कुत्र्यासह तुझ्या पायाशी नित्य जागा द्या" असा वर मागितला. मार्तंडांनीही तसा तो दिला.
        मणी यमसदनी गेला म्हणून मल्ल काही शरण आला नाही. प्रचंड सैन्यासह तो मार्तंडावर चालून आला. तुंबळ युध्द सुरू झाले. शेवटी मार्तंडाचे त्रिशूळ मल्ल्या चे छातीत शिरताच तो जमिनीवर कोसळला. मार्तंड भैरवाने त्याच्या मस्तकावर पाय ठेवला. मल्लाने ते शिवपद घट्ट धरून ठेवले, व म्हणाला, "हे देवाधिदेव, तुझे नांव उच्चारण्यापूर्वी सर्व जण माझे नांव घेतील, असा वर मला दे." मग काय..., मार्तंडाने "तथास्तु" म्हटले.
      त्या दिवशी वार रविवार, तिथी मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी होती आणि नक्षत्र शततारा होते. सर्व देव-देवता मार्तंड भैरवाचा जयजयकार करत होते, तर भक्त भंडारा व खोबरे उधळत होते. येळकोट मल्लार चा जयघोष सुरू झाला. क्षणार्धात तेथे दोन स्वयंभू लिंगे दिसू लागली.
        कठेपठारावर मार्तंड भैरवाचे ठाणे निर्माण झाले. त्याने निर्मिलेली महामारी याच परिसरातील टेकडीवर फुत्कार टाकत बसली होती. तिला सप्तर्षींनी तूप पाजून शांत केले. मग ती येथे शिळा होऊन पडली.
        हे ठिकाण कालांतराने मार्तंड भैरवाचे भारतातील प्रमुख ठिकाण म्हणून गणले जाऊ लागले. मग भाविक या देवाला म्हणू लागले, "जय मल्हारी मार्तंड...!" (क्रमशः)

  जय मल्हार (१२)

मराठी साहित्यातील खंडोबा दर्शन.
        मराठी साहित्याची परंपरा फार जुनी व थोर आहे. संत एकनाथ, ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई, तुकाराम, रामदास इत्यादींचे लोकसाहित्य वाचून लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. इतकेच नव्हे, तर आपल्या काळजात त्यांची स्मृतीघरे कोरून ठेवली.
         या संतांच्या साहित्यात गणपती, सरस्वती, लक्ष्मी, शंकर, पार्वती, विठ्ठल, दत्त अशी नानाविध दैवते अनेक ठिकाणी आढळतात. तसाच खंडोबाही खूप ठिकाणी आढळतो
          संत जनाबाईंनी एका भारुडात "खंडेराया तुज करिते नवसु" असे लिहिले आहे. कवी अमृतराय म्हणतात, "जय जय मल्हारी, तू आमुचा कैवारी...!"
         खंडेराय देखिला देव । जनयात्रा मिळाले सर्व । काय सांगू । नाना भैरवा ।।" असे जेजुरीच्या यात्रा वर्णनाची सुरुवात समर्थांनी केली आहे. संत तुकारामांनी पंढरपूर आणि जेजुरी यांची तुलना केली आहे. पंढरीसी राहे रखुमाई । येथे म्हाळसा बाणाई । तेथे विटेवरी उभा । येथे घोड्यावरी शोभा ।।"
       संत एकनाथांनी आपल्या एका भारुडात म्हटले आहे, "निःसंग मुरळी झाले । या मालूचे घर निघाले ।।" मुरळ्या धनिकांच्या वासनेला बळी पडतात. असे सौम्य शब्दात एकनाथांनी लिहून ठेवले असले तरी त्यांचा समकालीन कवी शेख महंमद श्रीगोंदेकरने मात्र अत्यंत कडक शब्दात या किळसवाण्या प्रकारावर कोरडे ओढले आहेत. तो म्हणतो, "मुरळी म्हणजे हे कल्पना । श्रीहरि न ये तिच्या अगुणा । जन विषय लंपट जाणा । तिच्या गुणासंगे ।।"
        शाहीर होनाजी बाळा यांनी म्हटले आहे, "होनाजी बाळा म्हणे आश्रय घटिला अंतरी । तुजविण त्राता आम्हाला त्रैलोक्या भीतरी । त्रिशूळधारी श्रीमल्हारी उभा पर्वतावरी ।।
विविध नवस.
          खंडोबा ही सकाम भक्तीची देवता असल्याने कामनापूर्तीसाठी विविध नवस बोलले जातात, त्यापैकी काही असे,
         पूर्वी मुलासाठी नवस करणारे, दोन मुले होताच पहिले मूल, मग ते पुरुष असो अथवा स्त्री असो... देवाला अर्पण करत. ही मुले पुढे वाघ्या- मुरळी बनत. आता असा नवस सहसा कुणी करत नाही.
     कामनापूर्तीसाठी खेटे: (विशिष्ट कालमर्यादेत नियमित कालाने देवदर्शनास येणे) घालतात. आणि कामनापूर्ती झाल्यावर पुढील आचारापैकी एक किंवा अधिक प्रकारांनी नवस फेडतात...!
कावडी घालणे : विशिष्ट संख्येच्या पाण्याच्या कावडी देवास वाहणे.
जागरण : पाच ऊसाच्या मखरात प्रतिकात्मक देवस्थापना करून वाघ्या- मुरळीकडून देवाची गाणी म्हणविणे.
तळी भरणे- उचलणे : दही-भाताची पूजा देवास बांधणे, भरीत, रोडगा व पुरणावरणाचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव, वाघ्या, मुरळींना भोजन घालणे.
बगाड: मानेला किंवा कमरेला गळ टोचून तशा स्थितीत उंच सोटावर बसविलेल्या लाकडास टांगून घेऊन देवाला प्रदक्षिणा घालणे.
         याशिवाय मुलाची कानटोचणी, जावळ, शेंडी इत्यादी कृत्ये करणे, लंगर (लोखंडी साखळदंड) तोडणे, वारी (देवाच्या नांवाने भीक मागणे), वास्तु (दीपमाळ, पायरी, देवळी, ओवरी उभारणे), हाळावरून (विस्तवाने भरलेल्या चरातून) चालणे इत्यादी.*
         यापैकी लंगर तोडणे, जागरण इत्यादी आचार वाघ्या- मुरळीकडून तर, वारी, बगाड इत्यादी स्वतःच करावयाचे असतात. बगाडास सद्या फार सौम्य रुप आले आहे.
          गळ-इंगळांच्या प्रकारांप्रमाणे वीरांचे पवाड ही भयंकर असतात. खंडोबाच्या उपासनेत वाघ्या-मुरळ्यांप्रमाणेच उपासकांचा 'वीर' नामक एक वर्ग असतो. शेखमहंमद वीरांचा उल्लेख "वीर भूतांचे पुजारी हो ।" या शब्दात करतो.
         "आम्ही दरवर्षी तलवारीने मांडीचे रक्त काढून देवाला त्याचा टिळा लावतो" असे जेजुरीच्या वीरांच्या कैफियतीत लिहिले आहे. देवरगुड्ड येथे दरऱ्याच्या दिवशी कंचवीर नामक उपासक अर्धा ते पाऊण इंच व्यासाची पहार पिंढरीच्या खालच्या भागात आरपार मारून घेतात आणि नंतर ही पहार काढून मग त्यातून तेवढ्याच घेराची चामड्याची दोरी ओवतात व काढतात. तसेच, त्याच छेदातून बाभळीची काटेरी फांदी ओवून काढतात. गळ- इंगळ आणि पवाड यांतील जखमा भंडाऱ्याचे बऱ्या बोतात, असा अनुभव आहे.
          वीरांच्या पवाडाप्रमाणेच काही ठिकाणी वारू (ज्यांच्या अंगात वारे आलेले असते) स्वतःच्या अंगावर चाबूक मारून घेऊन अंगाची कातडी लोंबायला लावतात. त्यांच्याही जखमा भंडाऱ्यानेच बऱ्या होतात. याशिवाय बुतफरोसी करणे (देवाच्या मूर्ती विकणे), देवावर चवरी ढाळणे इत्यादी सौम्य नवसही करतात. (क्रमशः)

   जय मल्हार (१३)

 वारी खंडोबाची.
         खंडोबाचे भक्त नेहमी जेजुरीची वारी करतात. लग्न झाल्यावर नव्या दांपत्याने जेजुरीस 'वर पाया पडावयास' जाण्याची प्रथा काही घराण्यातून आढळते. कित्येक लोक गावाबाहेर जाऊन ज्या दिशेला जेजुरी असेल त्या दिशेला तोंड करून देवाची पूजा करतात.
          चंपाषष्ठीच्या दिवशी काही घराण्यातून अशी चाल आहे की, सायंकाळी घरातील प्रमुखाने "चला जेजुरीला" असा पुकार करावयाचा. तो होताच घरातील सर्व लहान-थोर स्त्री-पुरुष मंडळी अंगावर चांगले कपडे चढवितात. सुवासिनी हातात पंचारती घेतात. कोणीतरी एक जण मशाल पाजळतो. दुसरा हातात तेलाची बुदली घेतो. असा सर्व जामानिमा झालाकी, सर्वजण घराबाहेर पडून ज्या दिशेला जेजुरी असेल, त्या दिशेला तोंड करून खंडोबाचे पूजन करतात.
          खंडोबाचे भक्त रविवार हा दिवस पवित्र मानतात. काही घराण्यातून या दिवशी "वारी" मागण्याची पध्दत आहे. घरातील एखाद्या व्यक्तीने हातात ताम्हण घेऊन पाच घरी जाऊन "खंडोबास वारी" असे मोठ्याने म्हणावयाचे. अशा रीतीने जमा करून आणलेल्या पिठाची भाकरी करून ती जेवताना घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खावयाची. वारी मिळाल्यावर अन्नाची कधी तूट पडत नाही अशी समजूत आहे.
        या वारीचा दुसराही एक घरच्या घरी प्रकार आहे. कुळधर्माच्या किंवा चंपाषष्ठीच्या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक होतो. त्यादिवशी सवाष्ण- ब्राह्मण जेवायला असतात. पूजा, नैवेद्य, तळी आरती व वैश्वदेव होऊन सर्वांची पाने वाढली, की घरातील एखाद्या व्यक्तीने एक ताटली घेऊन पाटावर बसलेल्या सवाष्ण- ब्राह्मणांपुढे जाऊन "वारी खंडोबाची" असे म्हणायचे. त्यांनी आपल्या ताटातल्या पुरणपोळीचा तुकडा तुपात भिजवून तो व थोडासा भात ताटलीत टाकायचा. ही वारी घरातील सर्व मंडळींना वाढावयाची, व मग पंगत सुरू करावयाची.
          कुळधर्माच्या दिवशी कित्येक घराण्यातून वाघ्या- मुरळी जेवावयास घालण्याचाही प्रघात आहे. कुत्र्यालाही या दिवशी पोळी घालतात.
          खंडोबा कुलदैवत असलेल्या घराण्यातून देव्हाऱ्यात ऐपतीप्रमाणे सोने, चांदी, पितळ यांचे टाक असतात. देवळात खंडोबा, म्हाळसा व बाणाई यांच्या पाषाणाच्या मूर्ती असतात. पुरणपोळी खंडोबाला प्रिय म्हणून कुळधर्माच्या किंवा चंपाषष्ठीच्या दिवशी पुरणाच्या पोळीचाच नैवेद्य असतो.
       लग्नकार्यात खंडोबाचे टाक करून घेतात. एरवी कधीही करत नाहीत. सटीचे दिवशी वेशीवरील खंडोबाचे देवळात पोतासाठी तेल व नैवेद्य सोवळ्याने घेऊन जातात व तेथे नैवेद्य अर्पण करून, पोत पेटता ठेवून घरी येतात. लग्नकार्यानंतर खंडोबालाच पाचारण केले जाते व त्याचाच गोंधळ घातला जातो. (क्रमशः)

  जय मल्हार (१४)

 सटीचे नवरात्राविषयी.
         आपल्या हिंदु धर्मात अठरापगड जाती व नाना पंथ, उपपंथ आहेत. ज्याला आपण कुळधर्म किंवा कुळाचार म्हणतो, तो प्रत्येक जातीत किंवा प्रत्येक पोटजातीत वेगवेगळा असल्याचे आढळून येते. याच कुळाचारापैकी "सटीचे नवरात्र" हा एक कुळधर्म आहे. विशेषतः देशस्त ब्राम्हण व मराठा जातीत रूढ असलेला हा कुळाचार आहे.
      खंडोबाची उपासना करणारे लोक मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेपासून षष्ठी पर्यंत "सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला देवाची स्वच्छता, घासपूस करून त्याची भक्तिभावाने पूजा करतात. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात; नाहीतर शेवंतीची माळ बांधतात. सहा दिवस देवाजवळ तेलाचा अखंड नंदादीप तेवत ठेवतात. ज्याने नवरात्रीची पूजा करायची त्याने अभ्यंगस्नान करणे आवश्यक समजले जाते. नंतरच पूजा करायची असा रिवाज आहे.
       देवाला रोज माळ, पूजा, आरती असा कार्यक्रम असतो. याला नवरात्र असे जरी म्हणत असले तरी, हा सोहळा फक्त सहा दिवसांचाच असतो. घरातील कर्ता पुरुष अगर स्त्री सहा दिवस उपवास करते. ज्या दिवशी "सट" असेल, तेव्हा पुरणपोळीचा नैवेद्य करून उपवासाची सांगता केली जाते. सटीचे दिवशी ब्राम्हणाला भोजनाला बोलावून त्याला दक्षिणा दिली जाते. सर्व स्वयंपाक तयार झाला की, देवाची पूजा करून, माळ वाहून नैवेद्य अर्पण करतात.
     पुरणाच्या पाच पोळ्या व इतर पदार्थ पानात वाढून खंडोबाची आरती करतात. नंतर एका ताम्हानात खोबऱ्याचे तुकडे व हळदीची पूड घालून एकत्र करतात. मग त्यातच दिवा, हळदी-कुंकू व अक्षता ठेवून घरातील सर्व मंडळी एकत्र जमून ती तळी उचलतात. यालाच "तळी भरणे" असे म्हणतात. या वेळी तीनवेळा ही तळी उचलून खाली ठेवतात व तोंडाने "येळकोट येळकोट" असे म्हणतात. नंतर खंडोबाची आरती करतात.
         काही घरातून "सटीचे नवरात्र" मागून घेतलेले असते. काही घराण्यात ब्राम्हणाकडून "मल्हारी माहात्म्य" पोथीचा दररोज एक पाठ करविला जातो.
         पंचमीला "नागदिवाळी" असते. त्या दिवशी काही घराण्यात सर्व अबालवृध्दांनी उपवास करण्याची प्रथा आहे. या दिवशी देवावर सटोऱ्याचा फुलोराही बांधण्यात येतो. नागदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच चंपाषष्ठीला देवाची अभिषेकयुक्त पूजा झाल्यावर दिवटी बुदली सह पुरणाची पंचारती करण्यात येते. (क्रमशः)
 
 
 

  जय मल्हार (१६)

खंडोबाची प्रतिके.
            खंडोबाची प्रतिके विविध असून मूर्ती, तांदळा, टांक, लिंग इत्यादी आज रूढ आहेत; परंतु कापडी मुखवट्याचे प्रतिक हल्ली आढळत नाही.
           मूर्ती : मूर्तीच्या स्वरूपात मैलार- खंडोबाची पूजा केव्हा सुरू झाली, हे जरी ठामपणे सांगता येत नसले, तरी मल्लारि माहात्म्या" च्या रचनेपूर्वी म्हणजे चौदाव्या शतकापूर्वी खंडोबाच्या मूर्ती अस्थित्वात असाव्यात. "मल्लारि माहात्म्या" त " महीमयी मूर्ती" चा (मण्मैलाराचा) उल्लेख आहे. मैलाराला मार्तंड भैरव रूप प्राप्त होण्यापूर्वी मैलाराच्या मूर्तीचे स्वरूप कसे असेल, हे कळायला काही मार्ग नाही. सांप्रतच्या खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा विविध आहेत.
           बैठी मूर्ती सिंहासनस्थ असते. मांडी घालून बसलेल्या या मूर्तीच्या दोन गुडघ्यांखाली आसनावर मणि- मल्लांची मुंडकी असावीत. या मूर्ती चतुर्भुज असून त्यांच्या हातात खडग, त्रिशूल, डमरु व पानपात्र या वस्तू असतात. सोबत कुत्रा असतो. त्याचे वाहन घोडा हाही असतो.
            अनेक ठिकाणी त्याच्या शिवस्वरूपाचे द्योतक म्हणून नंदीही आढळतो. अश्वारूढ मूर्तीत कधी खंडोबा एकटा असतो, तर कधी त्याच्यामागे म्हाळसा असते, तर कधी म्हाळसा व बाणाई या दोघीही असतात. शेख महंमदाने म्हाळसेसह अश्वारूढ झालेल्या खंडोबाच्या सोन्याच्या मूर्तीचा उल्लेख केला आहे.
           तांदळा: तांदळा म्हणजे न घडविलेली चल शिळा. ही बहुतेक वर निमुळती होत गेलेली आढळते.
           टाक: टाक हे घरातील देव्हाऱ्यात पूजण्यासाठी असतात. हे बहुधा सोन्याचे व क्वचित चांदीचेही असतात. खंडोबाचा टाक सोन्याचाच असला पाहिजे, असा संकेत रुढ आहे. सोन्याच्या पत्र्यावर उठावाच्या छापाने बनविलेली ही प्रतिमा अश्वारुढ असते. मागे म्हाळसा बसलेली असून सोबत कुत्रा व सैनिक असतात.
            लिंग: "मल्लारि माहात्म्या" त मार्तंड भैरव लिंगद्वय रुपाने प्रकट झाल्याचे वर्णन येते. ही लिंगे प्रायः स्वयंभू असतात. स्वयंभू म्हणजे न घडविलेली अचल लिंगे. "मैलारलिंग" हे खंडोबाचे नांव त्याच्या लिंगप्रतिकाच्या प्रसिध्दीचे द्योतक असून मैलाराचे प्राचीन प्रतीक लिंगच असावे, असे वाटते. स्वयंभू लिंगाऐवजी क्वचित् घडीव लिंगेही आढळतात. कुठे कुठे लिंगद्वया ऐवजी बाणाईचा समावेश असलेले लिंगत्रयही आढळते.
          मुखवटा: "योगसंग्रामा" तील उल्लेखावरून हे मुखवटे कापडाचे असत, असे वाटते. मुखवटा हा मुखाकारापुरताच असतो, असे नाही. हल्ली भाद्रपदात गौरीचे जे कापडी मुखवटे करतात, ते कंबरेपर्यंतचे असतात आणि तरीही त्या पाय नसलेल्या मूर्तीला "मुखवटा" असेच आपण म्हणतो. खंडोबाचे कापडी मुखवटे याच प्रकारचे असले पाहिजेत. नाहीतर त्यांना वस्त्रालंकारांनी वरपांगी सजविता कसे येणार ? (क्रमशः)

 जय मल्हार (१८) 

वाघ्या- मुरळी
          वाघ्यामुरळीचा ऊल्लेख झाला की, नजरेपुढे खंडोबा दैवत उभे राहते. देवीचे जसे गोंधळी आणि भुत्ये हे उपासक, तसेच वाघ्या- मुरळी हे खंडोबाचे उपासक होत. खांद्यावर घोंगडी टाकलेली, गळ्यात व्याघ्रचर्माची भंडाऱ्याने भरलेली पिशवी, आणि हातात घोळ (लहान घाट्यांचा जोड) असलेला वाघ्या खंडोबाची गाणी म्हणत व "मल्हारीची वारी" मागत हिंडताना अनेकदा दिसतो. खंडोबाच्या यात्रेत तर जागोजाग वाघ्या आणि मुरळी यांचे कार्यक्रम चाललेले दिसतात.
        अशा कार्यक्रमात "घोळ" मुरळीच्या हाती असतो. तिने ओचे न सोडता नऊ वारी लुगडे नेसलेले असते. तिच्या कपाळी भंडारा फासलेला असतो, आणि एका हाताने घोळ वाजवत ती नृत्य करते. एक वाघ्या तुणतुण्याची साथ देत असतो, तर दुसरा खंजिरी वाजवून गाणी म्हणत असतो. वाघ्या-मुरळ्यांचे हे जागरणाचे कार्यक्रम अंमळ गोंधळ्यांच्या गोंधळा सारखेच असतात. अनेकांच्या घरी या जागरणाचा कुळाचार साजरा केला जातो.
         अपत्यप्राप्ती साठी देवाला नवस करणारे लोक दोन मुले होताच पहिले मूल खंडोबाला अर्पण करत असत. त्यातील मुलगे "वाघे" बनत, तर मुली "मुरळ्या" बनत. वाघ्या बनण्याचा एक विवक्षित विधी असतो. प्रथम चैत्र महिन्यात पालकाने देवाला मूल वाहण्याचा संकल्प गुरवाकडे कळवावा लागतो. मग ठरलेल्या दिवशी मुलाला मिरवणुकीने खंडोबाच्या मंदिरात नेतात. तेथे गुरव त्या मुलाला भंडारा लावतो, व वाघाच्या कातड्याच्या पिशवीत भंडारा भरून ती त्याच्या गळ्यात बांधतो. मग देवावर भंडारा उधळून तो देवाला मुलाचा स्विकार करण्याची विनंती करतो.
          महाराष्ट्रात वाघ्याचा विवक्षित वेष नाही; परंतु कर्नाटकात वाघ्या घोंगडीची कफनी वापरतो. भंडारा ठेवण्यासाठी वाघाच्या कातड्याची पिशवी गळ्यात अडकविलेली, कोटंबा किंवा दोणी (धातूचे किंवा लाकडी भिक्षापात्र), गाठा (रूप्याचा गोफ किंवा कातड्याची वा वाखाची कवड्या गुंफलेली दोरी), घोळ (घंटावाद्य), शंख किंवा डमरु, शूलत्रिशूल इत्यादी वस्तू प्रादेशिक भेदानुसार कमी-अधिक प्रमाणात वाघ्याजवळ असतात. अर्थात या सर्व वस्तू तो नेहमीच बरोबर वागवतो असे नाही. वाघे बनण्याची पध्दती अजूनही रुढ आहे; परंतु मुरळी बनायला कायद्याने बंदी आहे. पूर्वी विवाहित स्त्रियाही नवसाने अथवा "आपणास खंडोबाची स्त्री होण्याविषयी स्वप्न पडले" असे सांगून आपणास अर्पण करत असत. मग अशा स्त्रियांचे लग्न खंडोबा बरोबर लावत असत.
         पूर्वी मुरळ्या वेश्यावृत्तीने व भिक्षा मागून उदरनिर्वाह करत. त्या कपाळाला हळद माखत व गळ्यात कवड्यांच्या माळा घालत. काही मुरळ्या जेजुरीला रहात, तर काही वाघ्यांबरोबर गाणी गात व भिक्षा मागत गावोगाव भटकत.
          वाघे दोन प्रकारचे असतात. "घरवाघे" व "दारवाघे." घरवाघे म्हणजे नवसाच्या फेडीसाठी काही वेळ वाघ्याचा वेष परिधान करून "वारी" (भिक्षा) मागणारे. केवळ  खंडोबा विषयी श्रध्दा व्यक्त करणारे वाघे. तर दारवाघे म्हणजे कायमची वाघ्याची दीक्षा घेतलेले, भिक्षेवर जगणारे व भक्तांची क्षेत्रातील धार्मिक कृत्ये पार पाडणारे वाघे. भक्तांच्या वतीने "जागरण" करणे, लंगर (लोखंडी साखळी) तोडणे ही त्यांची विशेष कामे होत. (क्रमशः)

 जय मल्हार (१९) 

कुळधर्म आणि कुळाचार.
         खंडोबा हा सर्व स्तरातील असंख्य भाविकांचे कुलदैवत असल्यामुळे अनेक कुटुंबात देव्हाऱ्यात त्याचा "टाक" असतोच असतो, आणि त्याच्यासाठी कुलधर्म साजरा करावा लागतो.
       चंपाषष्ठीच्या निमित्ताने मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेपासून देवाच्या नवरात्राप्रमाणे खंडोबाचे नवरात्र (पंचरात्र- षडरात्र) सुरू होते आणि षष्ठीच्या दिवशी कुळधर्म होतो. हा कुळधर्म पौषी, माघी, चैत्री, श्रावणी या पौर्णिमांनाही असतो.
          खंडोबाच्या कुळधर्मासाठी ठोंबरा (जोंधळे शिजवून त्यात दही, मीठ घालून केलेला पदार्थ), कणकेचा रोडगा (जाड भाकरी), वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. तसेच, गव्हाच्या ओंब्या, हुरडा, तीळ व गुळ असे एकत्र कांडून त्याचा दिवा करून त्यात फुलवात लावतात. त्या दिव्याला "उंडी" असे म्हणतात. चातुर्मासात कांदा, लसूण वर्ज्य मानणारे लोक चंपाषष्ठीच्या कुळधर्मानंतर त्याच दिवशी देवाच्या नैवेद्यात कांदा- लसणेचा समावेश करून कादा- लसूण खावयास प्रारंभ करतात.
        कुळधर्माच्या वेळी नैवेद्य समर्पणापूर्वी "तळी भरण्याचा" विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका ताम्हणात पाने, पैसा, सुपारी, भंडारा, खोबरे इत्यादी पदार्थ ठेवून ते ताम्हण "येळकोट येळकोट" ची गर्जना करून तीन वेळा उचलायचे असते. या तळी भरण्यानंतर हाती दिवटी- बुधली घेऊन आरती करायची असते आणि आरती नंतर "लाक्षणिक जेजुरी" ला जाऊन यावयाचे. याचा अर्थ असा की, जेजुरी (किंवा अन्य खंडोबाचे स्थान) ज्या दिशेला असेल, त्या दिशेला चार पावले जाऊन देवाला ओवाळायचे, जयघोष करायचा आणि भंडारा उधळून परत यायचे. यालाच "मारग मळणे" असे म्हणतात. "जेजुरीला जाऊन आल्यावर "दिवटी दुधाने विझवायची असते. ही घरातील दिवटी- बुधली दर पिढीत ओहरयात्रेच्या वेळी बदलतात. काहींच्या घरी कुळधर्मात आहाळावरून (एका चरात अंगार म्हणजे विस्तव पेटवून व त्यावर भंडारा उधळून त्यावरून चालत जाणे) पाच पावले मुलाबाळांसह चालण्याचा विधी रुढ आहे. (क्रमशः)

 जय मल्हार (२०)

वाघ्यामुरळी विषयी आणखी काही.
         मुरळी ही देवदासीच्या वर्गातील उपासिका. देवदासी, भाविणी, जोगिणी यांच्याप्रमाणेच मुरळींना देवसेवेत राहून अविवाहित जीवन व्यतीत करावे लागते. त्यांचे लग्न देवाशीच लागते. त्या देवाची सेवा करतात आणि जागरणासारख्या कार्यक्रमात वाघ्यांना सर्वार्थाने साथ देतात.*
        महाराष्ट्र- शब्दकोशात "मुरळी" या शब्दाची व्युत्पत्ती दोन प्रकारांनी केली आहे. १) मैलाराची पत्नी- मैराली- मुराळी व २) मरळी (कानडी शब्द)- मुरळी. कानडीत "मरळी" म्हणजे बुध्दिशून्य किंवा बुध्दिशून्याप्रमाणे बतावणी करणारी. श्वानासारखे वागणाऱ्या वाघ्याचे स्त्रीपात्र म्हणजे ही मुरळी. म्हणून तिचे मूळ "मरळी" हे कन्नड नांवही अन्वर्थक वाटते.
        वाघ्यामुरळी ही जोडी शाक्तांच्या पठडीतील शक्तियोगाच्या असंस्कृत व अधःपतित दीक्षितांचा अवशेष आहे. बहुधा मल्लारीचा उदय शाक्तपंथाच्या आवरणात झाला असावा.
        ज्यांना संतती होते, पण ती जगत नाही किंवा ज्यांना अजिबातच होत नाही, अशी दांपत्ये मार्तंडभैरवाला नवस करतात व पहिले अपत्य त्याला वाहतात. मुलगा असेल तर वाघ्या व मुलगी असेल तर, तिला "मुरळी" असे म्हणतात. त्यासाठी विशिष्ट धार्मिक विधी केले जातात. नंतर मुलाच्या गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी घालून त्यात भंडारा भरण्यात येतो. त्याच्या कपाळीही भंडारा लावण्यात येतो. तसाच मुरळीच्या कपाळीही भंडारा लावण्यात येतो. असे वाघ्यामुरळी गावोगावी फिरत खंडोबाच्या नांवाने भिक्षा मागत जगतात. तसेच, खंडोबाची गाणी गात नृत्यही करतात. त्यांना जागराची निमंत्रणे येतात. अधूनमधून ते जेजुरीची वारीही करतात, तर काही वाघ्यामुरळी कायमचे जेजुरीला वास्तव्य करतात. मुरळीला बहुतेक वेश्येसारखे जीवन जगावे लागते. ब्रिटिश काळापासून या प्रथेला कायद्याने बंदी घातली असली तरी आजही गुप्तपणे मार्तंड- भैरवाला मुली वाहण्यात येत आहेत, यासारखा दैवदुर्विलास तो कोणता ? असो.
         इंद्राची "तिलोत्तमा" नांवाची दासी होती. तिच्या उध्दटपणाने चिडून इंद्राने तिला शाप दिला व ती "मुरळी" झाली अशीही एक कथा रुढ आहे. (क्रमशः)

  जय मल्हार (२१)

म्हाळसा आणि बाणा.
           कुलदैवत म्हणून महाराष्ट्रात खंडोबाला मान असला तरी, त्याची पूजा कर्नाटकात व तेलंगणातही श्रध्देने केली जाते. किंबहुना श्रीविठ्ठलाप्रमाणे तो महाराष्ट्रात कर्नाटकातून आलेला आहे. तेथे तो "मण्मैलार" या नांवाने विख्यात आहे. महाराष्ट्रात तो पूजला जाऊ लागल्यानंतर त्याचे कानडी नांवावरून मराठीत त्याला "मल्यार" असे नामाभिधान प्राप्त झाले.
          वास्तविक शंकराचे वाहन नंदी असल्यामुळे मार्तंड भैरव नंदीवर आरुढ होऊनच युध्दभूमीवर अवतीर्ण झाले होते; परंतु पुढे त्याचे वाहन घोडा झाले. याचे कारण असे की, त्याने मणीला ठार करतांना त्याच्या अश्वाचा स्विकार केला. कालांतराने मणीच्या इच्छेनुसार मार्तंडभैरवाने आपले वाहन घोडा केले.
           मार्तंडभैरवाला चंपाषष्ठीला कांद्याप्रमाणेच वांग्याचे भरीत आणि रोडगेही नैवेद्याला लागतात. त्यामागे एक पौराणिक कथा आहे. ती अशी,
           मार्तंडभैरवाने मणिमल्लाला ठार केल्यामुळे पृथ्वीतलावरील लोकांना विलक्षण आनंद झाला. सहाजिकच मार्तंडभैरवाला पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला; परंतु एका गरीबाला घरी गोडधोडाचा नैवेद्य करणे शक्य नव्हते. तो वांग्याचे भरीत, कांदेपात, लसूण व रोडग्याचेच ताट तयार करून नैवेद्य अर्पण करू लागला आणि आश्चर्य म्हणजे मार्तंडभैरवाने त्याचा आनंदाने स्विकार केला. तो दिवस होता, "चंपाषष्ठी" चा. तेव्हापासून या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्याचा प्रघात पडला. तसेच तळी भरणे, दोऱ्याला हळद लावून त्याचे पोवते गंड्याप्रमाणे हातात बांधणे वगैरे कुलाचार देशस्थ ब्राम्हणांत कालांतराने रूढ झाले.
येळकोट गर्जना.
           खंडोबाच्या यात्रेत आणि सर्व उपासनाविधीत "येळकोट" ही गर्जना आवर्जून होते. "खंडेरायाचा येळकोट", सदानंदाचा येळकोट", "शिवामल्लारीचा येळकोट" असे उद्घोष सतत कानावर येत असतात. "येळकोट" हा शब्द "येळू" (सात) आणि "कोटि" (प्रकार किंवा कोटी ही संख्या) असे दोन शब्द मिळून तयार झाला आहे. "एळ्कोटि महादेव" आणि  "एळ्कोटि तपोधन" असे याचे प्राचीन लौकिक उल्लेख आढळतात. मार्तंडभैरवाचे सैन्य सप्तकोटी गणांचे होते, त्यावरून ही घोषणा वापरली जात असावी. यावरून "सात" ही संख्या कुठल्यातरी सांकेतिक अर्थाने पावित्र्य पावून मार्तंडभैरवाच्या उपासनेत समाविष्ट झाली असावी.
           "येळकोट" प्रमाणेच "चांगभले" ही गर्जनाही रुढ आहे. ही गर्जना भैरव व ज्योतिबाच्या उपासनेतही आहे. कानडीत "सांगु भलो" (स -च  यांचा भेद) अशा स्वरूपात ही गर्जना वापरतात. "चांग" आणि "भला" हे दोन्ही एकार्थी शब्द आहेत. काही संशोधक या घोषणेच्या मागे "चंद्रभद्र" या लुप्त देवतेचे मूळ दडले आहे, असे मानतात.
           सिंधी भाषेत "चांग भलो" हा स्वस्तिवाचक उद्गार असून त्याचा उपयोग नमस्काराच्या वेळी करतात. ज्योती ही देवता सिंध प्रांतात रुढ असून, ज्योतिबा हे त्याच देवतेचे स्थान आहे. या ज्योतिदेवतेबरोबर "चांग भले" ही गर्जना इकडे आली. (क्रमशः)

  जय मल्हार (२२)

खंडोबाचा परिवार.
           खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई, हेगडे, प्रधान, घोडा आणि कुत्रा इत्यादींचा थेट समावेश होतो.
      म्हाळसा : म्हाळसा ही कर्नाटकात "माळव्व" या नांवाने ओळखली जाते. तिकडे तिला "गंगी माळव्व" आणि "तुप्पद माळव्व" अशी नांवे आहेत. कदाचित गंगी माळव्व आणि तुप्पद माळव्व या वेगळ्या असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण देगुडु येथे गंगीमाळव्व व तुप्पदमाळव्व यांची स्वतंत्र मंदिरे आहेत.
         "तुप्पद" याचा अर्थ"तुपाची" असा होतो. "गंगी" हा "गंगा" शब्दाचा अपभ्रंश असावा. "मल्लारी माहात्म्या" त गंगीमाळव्व व तुप्पदमाळव्व या कानडी नावांची संस्कृत रूपांतरे "गंगाम्हालसिका" व धृतमारी" अशी झालेली आढळतात. पैकी पहिले ध्वनी रूपांतर असून दुसरे अर्थरूपांतर आहे.
          गंगीमाळव्व पासून "गंगाम्हालसिका" हे नांव बनविल्यावर गंगा आणि पार्वती यांच्या भांडणाची व नंतरच्या ऐक्याची लोककथा निर्माण झाली असावी.
          म्हाळसेच्या लोककथेत तिचा पिता नेवाशाचा तिम्मशेट वाणी हा होय, असे सांगितले आहे. तिम्मशेट हे नांवही कानडी आहे. कानडी शिलालेखात "तिम्मण" तिम्मराज" अशी व्यक्तिनामे येतात. कर्नाटकात मैलार या गावाजवळ तिम्मापूर या नांवाचे एक गांव आहे.
     बाणाई : मुरुग, अय्यप्पा, आणि मैलार हे एकाच श्रेणीतील तिन्ही देव दोन दोन बायकांचे दादले आहेत. मुरुगाची एक बायको जशी किरात कन्या आहे, तशी मैलाराची बाणा धनगर कन्या आहे. दोघांनीही आपली द्वितीय भार्या प्रितीबळाने मिळवल्याची कथा आहे. महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या लोककथेप्रमाणे, बाणाई ही मुळात इंद्राच्या सप्तकन्यांपैकी एक. तिने पित्यासमोर आत्मकर्तुत्वाचा अभिमान मिरवल्यामुळे इंद्राने तिला लहान बालकाचे रूप देऊन चंदनपुरीच्या जंगलात बंद पेटीत घालून सोडून दिले. ती पेटी मेंढरे राखणाऱ्या धनगरांना मिळाली. त्यांनी तिचे संगोपन केले व तिचे नांव बाणू असे ठेवले.
          वयात आल्यावर तिने शंकराची उपासना केली. त्यांनी बानूला अद्भुत खडावा दिल्या, त्या पायात घालताच तिला ईप्सित वराचे दर्शन घडेल, असा संकेत होता. त्या खडावा पायात घालून बानू निघाली, ते थेट जेजुरीला खंडोबाच्या महालात आली. तिथे म्हाळसेसह बसलेल्या खंडोबाला पाहताच ती त्याच्यावर मोहित झाली. तिने डोळ्यातले काजळ काढून प्रेमपत्र लिहिले आणि तिथेच टाकले. ते प्रेमपत्र हाती पडताच खंडोबाही अस्वस्थ झाला. तो मुद्दामच सारीपाटातला डाव हारला आणि अटीप्रमाणे बारा वर्षांच्या वनवासाला निघाला. म्हाळसेला वाईट वाटले; पण तिला खंडोबाचा अंतस्थ हेतू माहित नव्हता. खंडोबा जेजुरीतून निघाला तो थेट भुलेश्वरला आला. त्याच्या आदेशाप्रमाणे खंडोबाने धनगराचे रूप घेतले आणि तो चंदनपुरी येथील बानूच्या कळपात अवतरला. त्याने तिथे बानूच्या आई- वडिलांची मेंढरे राखण्याचे काम पत्करले.
           एकदा खंडोबाने त्या मेंढ्या नदीवर नेऊन चक्क सोलल्या. बानू ते दृष्य पाहून हबकलीच, तेव्हा खंडोबा तिचा हात धरून म्हणाला, "बानू तू माझ्याशी लग्न करायला तयार होशील, तर मी मेंढ्या जिवंत करतो." नाईलाजाने ती तयार झाली. मग खंडोबाने तिला आपल्याबरोबर घोड्यावर घेतले आणि आपले मूळ रूप धारण केले. बानूने तत्क्षणीच आपण ज्याला प्रेमपत्र लिहिले, तो हाच खंडोबा हे ताडले. नंतर ती दोघे विवाहबध्द झाली व जेजुरीला येऊन थडकली. खंडोबाला पाहून म्हाळसेला आनंद झाला. ती आरती घेऊन आली; पण बानूला त्याच्यासोबत पाहून चिडली आणि दुःखाने शिळा होऊन खाली पडली. खंडोबाने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला; पण व्यर्थ..! अखेर त्याने नाईलाजाने वरचा अर्धा डोंगर म्हाळसेला दिला आणि खालच्या डोंगरावर बानूला ठेवले.
           कर्नाटकात ती केवळ धनगर स्त्री म्हणून ओळखली जात असताना महाराष्ट्रात तिला बाणाई- बानू हे नांव कसे मिळाले ? "जयाद्रि- माहात्म्या" त ती बाण या शस्त्रासह जन्मलेली बाणदैत्याची कन्या होय. असे तिच्या बाणा या नांवाचे स्पष्टीकरण दिले आहे.
           उलट एके ठिकाणी खंडोबाच्या रूपकाला सूर्यकथेचे प्रतिक ठरवताना, चंपाषष्ठीच्या खगोलीय स्थितीचे जे वर्णन दिले आहे, त्यात शततारा नक्षत्राचे प्रतिक म्हणजे बाणाई असे म्हटले असून "बाणाई" म्हणजे "शंभर बाण असलेला भाता" होय..! असे त्या नांवाचे स्पष्टीकरण दिले आहे.

हेगडे- प्रधान
             "हेगडे" या कानडी नांवाचा अर्थ"प्रधान". कर्नाटकात याला हेगप्प, हेग्गडे, हेग्गडी, हेग्गण्णू अशीही नांवे आहेत. हा बाणाईचा भाऊ आणि खंडोबाचा प्रधान असल्याची समजूत आहे. जेजुरीला याची मिशाळ मूर्ती (बैठी) आहे. हे विष्णुचे रूप आहे, अशी समजूत असल्यामुळे देवरगुड्डु येथील मूर्ती चतुर्भुज असून तिच्या हातात अनुक्रमे खडग, गदा, शंख व पुस्तक या वस्तू दाखविल्या आहेत. पाली येथे त्याची द्विभूज अश्वारूढ पितळी मूर्ती असून, डावीकडे तिची बायको आहे. मैलार येथे त्याची बैठी मूर्ती चतुर्भुज असून ती दाढीमिश्यांनी युक्त आहे. त्याचे खालचे दोन हात भग्न झाल्यामुळे त्यातील आयुधे कोणती, ते समजत नाही. वरच्या दोन हातात पाश व अंकुश आहेत.

घोडा.
            हे मैलारचे मूळ वाहन. मार्तंड भैरवाशी एकरुप होण्यापूर्वीचे हे वाहन असावे. "मल्लारि माहात्म्या" त असे वर्णन आहे की, शिवाने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला, तेव्हा तो नंदीवर बसून आला. पुढे मणिदैत्याचा वध केल्यावर त्याने मणीच्या विनंतीवरून मणीच्या अश्वासहित रुपाची जोड मिळविली. त्यानंतर सप्तर्षींनी व देवांनी जी "महिमयी मूर्ती" बनविली, ती अश्वारूढ होती.
      कुत्रा : हा खंडोबाचे भैरवरुप सुचविणारा आहे. भैरवमूर्तीत भैरवाच्या हातातील मुंडातून गळणारे रक्त पिणारा उर्ध्वमुखी कुत्रा असतो. मार्तंड भैरवाच्या हातात रक्तस्त्रावी मुंड नसते; परंतु त्याच्याजवळ भैरवाची खूण असलेला कुत्रा राहिला आहे, हे स्वाभाविक आहे. (क्रमशः)

  जय मल्हार (२३)

खंडोबाला हळद प्रिय का ?
            खंडोबाला भंडारा म्हणजे हळद प्रिय असण्यामागे एक पौराणिक कथा दडलेली आहे. ती अशी,
              शंकराच्या दरबारातील सर्व जण गौरवर्णी आणि सुंदर होते. याला अपवाद फक्त"रजनी" म्हणजे "रात्र" होती.  आपण काळे असल्याचा तिला मोठा विषाद वाटे। परंतु ती भगवान शंकरांची महान भक्त होती. एकदा शंकर प्रसन्न झाल्यावर रजनीने त्यांना आपणांस गौरवर्णापेक्षाही आकर्षक सुवर्णासारखी पिवळी करा, अशी प्रार्थना केली. त्यावर शंकरांनी तिला "स्कंद पर्वतावर जाऊन औषधी वनस्पतीचे रूप घे; मार्तंड अवतारात मी तुझा उध्दार करीन." असे सांगितले. त्याप्रमाणे रजनी स्कंद पर्वतावर गेली. पुढे मार्तंड अवतारात शंकराने तिला स्वतःचे भाळी फासले. तिची उधळण केली. भक्त त्या हळद पुडीला कालांतराने भंडारा म्हणू लागले. वाग्दत्त वधूला हळद लावण्याची प्रथा आहे. हळद दाबून धरल्यास जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबतो. जखम अल्पावधीतच भरून येते. खाद्यपदार्थात टाकताच त्याला आकर्षक रंग आणि चव येते.
 क-हा नदीची उत्पत्ती.
           या परिसरातून वाहणाऱ्या नदीचे नांव "क-हा" असे आहे. त्याचे कारण असे की, ब्रम्हदेवाने आपल्या कराने (हाताने) कमंडलूतील पाणी तेथे ओतले व त्यापासून पुढे नदी निर्माण झाली, ती क-हा नदी. पुढे महाभारत काळात पांडवांनी या परिसराचे रूपांतर आपल्या यज्ञभूमीत केले, त्या जागेला "पांडवेश्वर" असे म्हणतात. जेजुरीपासून ते ९ किलोमीटर अंतरावर आहे. (क्रमशः)

  जय मल्हार (२४)

खंडोबाची सार्थ आरती.
जेजुरगड पर्वत शिवलिंगकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।
नानापरिंची रचना रचिली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ।।१।।
जयदेव जयदेव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ।।धृ।।
       (जेजुरीच्या डोंगराचा आकार शिवलिंगासारखा आहे. हा डोंगर म्हणजे मृत्युलोकातील दुसरा कैलासपर्वत आहे. येथील निसर्गरचना विविध प्रकारची आहे आणि ती सर्व समजून घेणे कठीण आहे. अशा या स्थानी जगाचा स्वामी असणारा भगवान शंकर वास्तव करतो. हे मार्तंडा, (सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी असणाऱ्या) हे शंकरा, 'मल्ल' शत्रूचा नाश करणाऱ्या, तुझे सामर्थ्य अफाट आहे. तुझा जयजयकार असो.)
मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
त्रिभुवनीं त्याने प्रलय मांडिला ।
नाटोपे कोणास वरें मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ।।२।।
(मणि आणि मल्ल दैत्य प्रबळ झाले. त्यांनी स्वर्ग, मृत्यू, पाताळात अत्याचार सुरू केले. वर मिळाल्याने ते उन्मत्त झाले. त्यांना कोणी अडवू शकेना. सर्व देव, गंधर्व त्यांच्या भयामुळे थरथर कापू लागले.)
चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणीं पृष्ठी खडगे वर्मी स्थापीसी ।
अंती वर देवूनि त्या मुक्तिनें देसी ।।३।.
(हे मार्तंडा, तू अवतार रूपात चंपाषष्ठीचे दिवशी जन्म घेतलास. मणी आणि मल्ल दैत्यांचा युध्द करून वध केलास. तलवारीच्या आघातांच्या खुणा त्यांच्या पायावर, पाठीवर आणि 'अन्य' मर्मस्थानांवर उठविलीस आणि शेवटी वर देऊन मुक्ती दिलीस.)
  मणिमल्ल दैत्य मर्दुनि मल्लारी ।
देवा संकट पडतां राहे जेजुरी ।
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाव मागे दास नरहरी ।।४।।
('मणिमल्ल राक्षसांमुळे देवांवर संकट कोसळले असताना त्यांचा नाश केल्यामुळे 'मल्लारी' असे नामाभिधान ज्याला प्राप्त झाले तो (शंकर) जेजुरीला वास्तव्य करून असतो. त्याच्यासह त्याची पत्नी म्हाळसाही आहे. ती आपल्या सौंदर्यामुळे शोभून दिसत आहे. हे देवा, तुझा सेवक असणारा नरहरी तुझ्याजवळ जागा दे अशी प्रार्थना करतो.)
(समाप्त.)

 मल्लारी माहात्म्य १
कल्पारंभी ब्रम्हदेव तपात आणि नारायण योग निद्रेत निमग्न असताना ब्रम्हदेवाच्या कर्णमलातून मधू आणि कैटभ जन्माला आले. त्यांचा वध  नारायणानी केला त्यावेळी त्यांच्या रक्ताचे थेंब शेषाच्या मस्तकावर पडले त्यातून दोन जीव जन्माला आले त्या जीवानी ब्रम्हाची उपासना केली त्यानी  मागितल की आम्हाला शिवाच्या हातून मरण याव पण शिवाच रूप एरव्ही पेक्षा भिन्न असाव. शक्ती संपन्न होऊन ते जीव  दैत्य झाले . आता त्यांना मणी आणि मल्ल या नावाने ओळखले जाऊ लागले त्यांनी  सह्याद्री पर्वतावर मणीचूल पर्वतावर आपली राजधानी वसवली. त्यानी उन्मत्त होऊन इंद्रादी देवांचे अधिकार काढून घेतले एक दिवस त्यानी मणीचूल पर्वताजवळ तप करणाऱ्या धर्मांगवीत धर्मपालक धार्मिक धर्ममील धर्मज्ञ धर्मबाहू धर्मकौतुक अशा सात धर्मपुत्रांच्या आश्रमावर हल्ला केला यज्ञ विध्वंसला .त्रस्त ऋषी स्वर्गात इंद्राकडे गेले पण त्यानी असमर्थता दाखवताच ते वैकुंठात नारायणा कडे गेले.नारायणानी वरदान लक्षात घेऊन ऋषींसह कैलासाला गमन केले प्रारंभी ऋषींना वाईट वाटले की साक्षात नारायण देखील आपल्याला सहाय्य करेनात पण विष्णूंनी त्यांना धीर दिला आणि सांगितले की घाबरू नका तुम्हाला झालेला हा त्रास  समस्त विश्र्वाचे कल्याण करणारी गोष्ट घडवणार आहे. नारायणांसह ऋषींना बघून भगवान शंकराना प्रथम आनंद झाला पण त्यांच्या येण्याच कारण ऐकून पंचमुख भगवान सदाशिव प्रचंड रागावले रागाच्या भरात त्यांनी स्वत:ची जटा तोडून आपटली त्या क्षणी एक उग्र अशी मारी शक्ती प्रगटली  तीला शांत करण्यासाठी ऋषींनी तुप म्हणजे घृत शिंपडले म्हणून तिला घृतमारी असे नाव मिळाले.अनेक शस्त्रास्त्रे धारण करून प्रचंड निनाद करणारी ही विनाशक शक्ती मार्तंड भैरवाच्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी सज्ज असते.  ॐ ह्रीं श्रीं क्लीं घृतमार्यै हुंफट् स्वाहा  हा तीचा मंत्र आहे ‌
मल्लारी माहात्म्य २
ऋषीगण  देवगण शंकराचा हा विक्राळ क्रोध बघून क्षणभर अवाक् झाले. हर हर शब्दाचा घोष झाला आणि  क्षणात जणू  सोन्याचा तेजःपुंज डोंगर डोळ्यासमोर उभा राहिला आणि दुसऱ्याच क्षणी  शंकरांच्या आसनाकडे पाहील  तर हातात सुंदर खडग् डमरू त्रिशूल आणि पानपात्र ही चार शस्त्र व्याघ्राजीना बरोबरच पितांबर डोक्याला किरीट गळ्यात कवडी हार रूद्राक्ष माळा कानात अही कुंडल सहस्त्रसूर्याची प्रभा फिकी पडावी अशा त्या मार्तंड भैरवाच्या किरीटावर चंद्रकोर शोभत होती.तो दिवस होता स्वारोचिष मन्वंतरातील  ३१ व्या  द्वापार युगात कलीयुगाला २४४ वर्षे पाच  महीने १० दिवस बाकी असताना  चैत्र पौर्णिमेला भर दुपारी  हा अवतार झाला रजनीचूर्ण म्हणजे भंडार्याच्या उधळणीत चंद्राचा अवतार असणार्या शुभ्र अश्वावर देव स्वार झाले. यळकोट म्हणजे सात कोटी मंत्राचा उद्गाता सात कोटी गणाचा अधिपती युध्दाला निघाला. स्कंदानी सेनेची ओळख करून दिली.
 मोरावर आरूढ भाल्याच शस्त्र धारण करणारी सेना माझी
हत्तीवर विराजमान वज्रधारी ती सेना इंद्राची
 उज्वल अशी  शस्त्रे घेऊन मेंढ्याचे वाहन असणारी ती सेना अग्नीची
 रेड्यावर आरुढ  दंड धारी ती सेना यमाची
भयानक नरवाहन खड्गधारी राक्षसांची सेना ती निऋती ची
पाश धारी सेना वरुणाची
ध्वज धारी सेना वायूची
गदा धर सेना कुबेराची
त्रिशुळ धारी वृषभ वाहन सेना तुमची
गरुड वाहन  शंख चक्र धर सेना ती विष्णूची
हंस वाहन माला कमंडलू धारण करणारी सेना ब्रम्हाची
मूषकाचा झेंडा घेऊन हाती अंकुश घेणारी सेना गणेशाची
प्रसन्न होऊन देव नंदीवर विराजमान झाले एक पाय निकुंभ नावाच्या सिंहावर ठेऊन  मार्तंड भैरवाने युद्धाला हाक दिली त्याबरोबर  सात कोटी भूत प्रेत डाकीनी शाकीनी वेताळ जयजयकार करत युद्धाला आले. सगळे सैन्य कडे पठार अर्थात धवलगिरी वर एकत्र झाले
 गणेश कार्तिक इंद्र नंदी वीरभद्र यानी पराक्रम गाजवला उल्कामुख खड्गदंष्ट्र कुंतलोमा इ.दैत्याचा वध केला.

मल्लारी माहात्म्य ३

एकापेक्षा एक असे आपले महान सेनानी धारातीर्थी पडले हे बघून मल्लासूर चिंतीत झाला.  आपल्या  भावाची अवस्था बघून मणी त्वेषाने उसळला. त्यानं मल्लासूराकडे युद्धाला जाण्याची अनुमती मागितली मल्लासूराचा प्रधान त्याला म्हणाला महाराज असे चिंतीत होऊ नका आपण आणखी मोठा दैत्य सेनापती पाठवू हे ऐकून मणी म्हणाला का उगाच आशा दाखवता? आपलं दैव आता आपल्या सोबत नाही हे खरं नाही तर एकापेक्षा एक असे देवांना जिंकणारे आपले वीर  धारातीर्थी पडले असताना मी कोणत्या आशेवर इतर वीरांचा बळी देऊ? त्याच मत ऐकून मल्लासूराने त्याला युद्धाला जायची अनुमती दिली पण त्याच बरोबर सगळ्या सैन्या सोबत भोजन घेण्याची विनंती केली. ही रात्र समस्त दैत्य सैन्यान आनंदात भोजन केले. दुसऱ्या दिवशी मणी युद्धाला आला.  मणीला बघून वीरभद्र धावला तेव्हा त्याला अडवून भगवान मार्तंडभैरव स्वत: समोर आले.नानापरी युद्ध झाले  एकाक्षणी तर मणीच्या बाणाने देवाला व्यापून टाकलं  भोळा शंकर खूष झाला. पण भंडाऱ्याची उधळण करत देवांनी सगळे बाण निष्प्रभ केले. दुसऱ्या क्षणी देवांनी मणीच्या छाती वर त्रिशुलाचा घाव घातला. मणी चे प्राण कंठाशी आले. देवाने मणीच्या मस्तकावर लाथ मारुन पाय बाजूला घेण्याचा प्रयत्न करताच मणीने देवाचे पाय धरले आणि डोळ्यात पाणी भरून  म्हणाला देवा  क्षमा करा असं बोलून देवाची स्तुती सुरु केली. देवाने वर माग म्हणताच त्याने वर मागितला मी केलेली तुझी स्तुती जो कुणी गाईल त्याला समस्त संपदा दे आणि तुझे चरण अखंड माझ्या मस्तकी ठेव !
 मणी शिवसायुज्य पावला पण शिवाला मल्लासुराची दया आली त्यानी विष्णू देवाना शांती संदेश देऊन सामोपचार करायची विनंती केली .मार्तंडा चे प्रधान म्हणून विष्णूनी हे काम केले. त्यांच्या याच रूपाला आपण हेगडी प्रधान म्हणतो.प्रधानजींचा शिष्टाईचा प्रयत्न असफल झाला.मल्लासूराने  आपल्या उलूक नावाच्या पुतण्या बरोबर सर्व परिवाराला प्रेमाचा निरोप देऊन नगरात पाठवले स्वत: घोर संग्राम केला आणि देवाला नऊ दिवस  झुंजवल.अखेरीला तोही ईश चरणाला पडला. देवाचा स्पर्श होताच मल्लासूराचे अष्ट सात्त्विक भाव जागे झाले नारद मुनींनी सांगितलेल्या मानसपूजा विधीने त्यान देवांची चौसष्ट उपचारांनी मार्तंड भैरवाची पूजा केली. मल्लासुरान युद्ध केल म्हणजे आपली पूजाच केली अस मानून भोळा खंडेराया मल्लासूराने केलेल्या स्तुतीला भाळला. त्यान वरदान दिल आज पासून माझ्या नावाला तूझ नाव जोडल जाईल.जो तामसी प्रकारान पूजा करेल तोही मला प्रिय होईल.मार्तंड भैरव देव मल्लहर ;मल्लारी झाला. देवादिकांनी जयघोष केला. मल्लारी च्या विजयासाठी मांडलेले घट उचलून माथ्याला लावले. दिप उजळले.भंडारा उधळला. आनंदोत्सव साजरा झाला .तो दिवस होता चंपाषष्ठी अर्थात मार्गशीर्ष शु षष्ठीचा एकडे देवाला वेध लागले ते शक्ती युत होण्याचे. पूर्वी सागर मंथनावेळी मोहीनीने शिवाला त्यांच्याशी विवाह करण्याचे वचन दिले होते ते आठवून त्यानी मोहीनीला आवाहन केले. मोहीनी प्रकट झाली. तिच्या शरीरात पार्वतीचे तेज सामावले.त्या महालया शक्तीने नेवासे गावच्या तिमशेट वाण्याची कन्या म्हणून अयोनीज अवतार घेतला होता. तिला निरोप पाठवून देवानी तिला पाली क्षेत्री बोलावले तारळी नदीच्या तिरी पौष मासी मृग नक्षत्री गोरज मुहूर्ती त्यांचा विवाह झाला आणि देव मल्लारी म्हाळसाकांत झाला....

मल्लारी माहात्म्य ४

देव म्हाळसाकांत झाला पण आता वेळ होती ती गंगा देवीच्या चरित्र प्रवेशाची. गंगा  आणि गौरी दोघी हिमालयाच्या लेकी सख्ख्या बहीणी.दोघी नित्य शिवा बरोबर पण एका क्षणी दोघीना एकमेकीचा हेवा वाटला. गंगेला वाटल काय गौरीच भाग्य शिवासोबत सभेत बसायच उमामहेश्वर म्हणवून घ्यायच पण आपण जटेत कायम लपून असून नसल्या सारखे! तर गौरी ला वाटल आपण चरणाची दासी पण गंगा जटेत अखंड देव समाधीत असले तरी तिला त्यांचा नित्य सहवास अशा वेळी  दोघींची नजरानजर झाली. दोघीनी एकमेकीच्या भावना जाणल्या.पार्वतीन शिवाला साकड घातल आणि सांगितल की आम्हाला एका वेळी दोघीना तुमच सौभाग्य मिळू दे.देव हसले मार्तंड अवतारी ही गोष्ट पूर्ण करण्याच वचन गणेशाच्या साक्षीन दिल. गंगेन इंद्राच्या घरी जन्म घेतला.तिच्या बोलण्यान इंद्राचा अहंकार दुखावला गेला त्यांनी तिला पुन्हा बालरूप दिल सोबत एक बाणलिंग पेटीत घालून ती पेटी अरण्यात टाकली. ती पेटी चंदनपूरीच्या अजापाल नावाच्या धनगराला सापडली. बरोबरच्या बाणा मुळ तिला नाव मिळाल बाणाई! तिन शिवाची उपासना करून एक सिद्ध पादूका मिळवल्या.
     एके दिवशी पौष मासी  देव म्हाळसेच्या शेजेवर झोपले होते. बाणेच तप पूर्ण झाल तस तिला मल्हारीच दर्शन झाल. आणि मल्लारीनी वचन पूर्ण करायच ठरवल. पण म्हाळसे च्या उपस्थितीत बाणा आणावी कशी? .....

 मल्लारी माहात्म्य ५

आज पंचमी देवाचा जागर
देवाला उपाय सुचला प्रधानजीना घेऊन शिकारीला जायच पण म्हाळसा बाई परवानगी देईनात शेवटी सारीपाट खेळायचा.डावाचा पण ठरला हरेल त्यान बारा वर्ष वनात जायच. देव आणि म्हाळसा खेळायला बसले.देव हरले वनात निघाले. चंदनपूरीच्या बनी आले म्हाळसेला देवाचा हेतू उमजला.तिने देवाला वृद्ध होण्याचा शाप दिला. देव  वृद्ध रुपात चंदनपुरी च्या  बनात आले. वृक्षाखाली चार वाघ अजापालाच्या मेंढ्या खायला आले देवानी भंडार उधळून त्या वाघांचे पुरूष केले. त्या पुरुषांना आपले सेवक म्हणून जागा दिली हेच खंडेरायाचे वाघे.( तर तिलोत्तमा नावाच्या अप्सरेला  मुरली म्हणजे बासरीच्या रूपातून पुन्हा स्त्री रुपात आणले तिच मुरली अर्थात मुरळी) हा उपकार जाणून अजापालने त्या म्हाताऱ्याला घरी आश्रय दिला नवखंडाचा राजा बानूचा चाकर झाला. एकदा त्यान बाणाईची सगळी मेंढर मारली आणि जिवंत करण्यासाठी लग्नाची अट घातली . बाणा रडत रडत तयार झाली. देवाच्या बरोबर निघाली नळदूर्गावर त्यांचा विवाह झाला आणि बाणाईला देवाच खर रूप समजल तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा. अचानक जेजुरी गडावर दिपमाळा उजळल्या .देव आणि बाणाई गडावर आले आणि गडावर गुप्तरूपात राहीले . सहा महीन्यांनी देवाच्या वनवासाचा काळ पूर्ण झाला. आणि देव बाणाई सह प्रगट झाले पण नवा कलह सुरू झाला . शेवटी दोघीना गणेशाच्या साक्षीन एकमेकीच रूप समजल.दोघीनी सौभाग्य आणि गड अर्धा अर्धा वाटून घेतला. आजही देव आणि
म्हाळसा दर रवीवारी बाणाईला भेटायला जातात. हा भोळा मल्लारी त्याच्या दोघी सखींसह असाच आपणा सर्वाना आनंद देवो!
श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीक

 खंडोबा सन्मान.

१)पिवळे धोतर, सव्वा मीटर पिवळा कपडा व फेटा.
२) १०८ बेलपत्र व भंडारा
३) ५ खोबरे वाट्या व भंडारा
४) पिवळया फुलांचा हार व दवना
५)नैवेद्य: बाजरीची भाकरी, वांगे भरीत, लसुन चटणी, पातीचा कांदा, लिंबू.
यासोबतच पुराणाचा नैवैद्य असला तरी चालेल.
टिप:- जातांना देवघरातील खंडोबा टाक सोबत घ्यावा, व देवाची भेट घडवून परत आणावा.
मल्हारी षड:रात्रोत्सव.

मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव प्रारंभ...
     देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो, त्याप्रमाणे षडःरात्रोत्सवामध्ये कलश स्थापन केला जातो... घटस्थापना विधीची आणि षडःरात्रोत्सवातील कुलाचाराची सविस्तर माहिती खास मल्हार भक्तांसाठी येथे देत आहोत.....
घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे... सर्व देवतांच्या मूर्तींची स्वच्छ पाकाळणी (प्रक्षालन) करून पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी. देवघरातील सर्व टांक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानांचे आसन द्यावे.....
        नंदादीप घासून पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा... ताम्हणामध्ये तांदुळ किंवा धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे, श्रीफळ कलशाची विधीवत पूजा करावी, त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधावी. अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अड्कवावी. गोड नैवेद्य दाखवून आरती करावी.....
       रोज सकाळी नियमितपणे देवाची पूजा करावी... देवाला गोड नैवेद्य अर्पण करावा. फुलांची माळ तयार करून घटावर लावावी. शक्य असेल तर दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ लावावी, आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावावी. उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे. मल्हारी महात्म्य, मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण, मल्हारी नामस्मरण करावे.....
       मार्गशीर्ष शुद्ध पंचमी या दिवशी श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये श्रींना तैलस्नान घातले जाते, त्याला श्रीखंडोबा आणि म्हाळसा विवाहातील तेलवण विधी असे म्हणतात... या दिवशी तिन्हीसांजेला आपल्या घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि दोन मुटके तयार करावेत त्यासोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे.....
 
 

 चंपाषष्ठी-१

       चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी... मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.....
        मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते... जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही खंडोबाचा उत्सव असतो. घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे(एकभुक्त), शिवलिंगाचे दर्शन घेणे, ब्राह्मण-सुवासिनी तसेच वाघ्या आणी मुरळी यांना भोजन देणे असे सहा दिवस केले जाते.....
चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात... तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. खंडोबाची तळी भरून आरती करतात.....
        मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी... मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.....

चंपाषष्ठी- २      

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठिस चंपाषष्ठी म्हणतात... मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या उत्सवास प्रारंभ होतो. जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो.....
उत्सवकालास खंडोबाचे नवरात्रही म्हणतात... चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंडभैरवाचे उत्थापन होते. कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये कुंभ अथवा टाक ठेवतात.....
पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे वाढवीत सहाव्या दिवशी सहा फुलांच्या माळा त्याला घालतात... षष्ठीला तळई व आरती करतात व हे नवरात्र उठवितात. महानैवेद्यात वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांद्याची पात यांचा अंतर्भाव आवश्यक असतो.....
खंडोबावरून नारळ ओवाळून फोडतात व त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात... तळी भरताना व आरतीच्या वेळी ‘खंडोबाचा येळकोट’ असे म्हणतात. चातुर्मास्यात निषिद्ध मानलेले कांदे, वांगी इ. पदार्थ या दिवसापासून खाणे विहित मानले जाते.....
भाद्रपद शुद्ध षष्ठीस मंगळवार, विशाखा नक्षत्र व वैधृतियोग येत असेल, तर तिलाही चंपाषष्ठी म्हणतात. सुमारे तीस वर्षांनी एकदा अशी चंपाषष्ठी येते... या दिवशी उपवास, सुर्यपूजा व शिवलिंगदर्शन करावे असे सांगितले आहे.....

 आज_चंपाषष्ठी

सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार
       मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. भाद्रपद शुद्ध षष्ठीलाही चंपाषष्ठी म्हणण्याचा प्रघात आहे.
       मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे. या दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव होत असतो. मणि-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले.
        या घटनेचे स्मारक म्हणून हा उत्सव करतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून हा उत्सव सुरु होतो. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात.  खंडोबा हे ज्यांचे कुलदैवत असते. अशांच्या घरी हे नवरात्र असते. यात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना, नंदादीप, खंडोबाची पूजा, मल्लारी माहात्म्याचा पाठ, एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन, ब्राह्मण, सुवासिनी व वाघ्या मुरळी यांना भोजन,  भंडार (हळद) उधळणे, इ. गोष्टी करतात. कुत्रा हे खंडोबाचे वाहन असल्याने त्यालाही खाऊ घालतात.  षष्ठीच्या दिवशी खंडोबाला महानैवेद्य करतात. या महानैवेद्यात कांदे व वांगी आवश्यक असतात. भरीत-रोडगाही करावा लागतो. मग खंडोबाची तळी भरतात. आरती करतात व ब्राह्मण भोजन घालून नवरात्र उठवतात.
        ग्रामीण संस्कृतीमध्ये अनेक चालीरीती, कुलाचार दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये विशेषतः जोतीबा आणि मल्ल्हारी म्हाळसाकांत या दोन देवतांचा सर्व अभीजनांवर मोठा प्रभाव दिसतो. यातूनच कुलाचार परंपरा निर्माण झाल्या. हजारो वर्षांचा कालवधी उलटून गेला तरीसुद्धा या परंपरा समाजात दृढ असल्याचे दिसून येते. भाषिक विकासामध्ये दैवताचा प्रभाव अत्यंत स्थिरपणे झालेला दिसतो. मल्ल्हारी म्हाळसाकांताच्या पूजेचा आणि चंपाषष्ठीचा असणारा संबध येणाऱ्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. यात शंका नाही.
 
जेजुरी गडावर खरचं नऊ लाख पायरी आहे का?
==========================
अनेक लोकगीतां-तून खंडेरायाचे महात्म्य सांगताना म्हटले जाते, देवा तुझी सोन्याची जेजुरी। गडाला नऊ लाख पायरी।।
      गडाची नऊ लाख पायरी ही संकल्पना अजब आहे. 'नऊ लाख पायरी' म्हणजे नेमके काय असा प्रश्न मला नेहमी पडे. काहीजण म्हणायचे जिथे खंडोबाचे मुख्य ठिकाण आहे, तो जेजुरी गड पूर्वी खूप मोठा होता. त्याला त्यावेळी नऊ लाख पायऱ्या असतील. नंतर पडझड झाली. गड लहान झाला. तर काही सांगायचे, की नऊ लाख पायऱ्या म्हणजे नऊ लाख दगड असतील. आता नऊ लाख दगड असणाऱ्या पायऱ्या किंवा प्रत्यक्षात तेवढ्या पायऱ्या असणारा गड किती उंच असायला हवा, याची कल्पनाच करवत नाही.
संत एकनाथ महाराजांच्या एका भारुडात मला याचे उत्तर मिळाले. नाथांनी खंडोबावर लिहिलेल्या भारुडात म्हटले आहे,
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी।
     मीच 'अहं' वाघ्या आणि परमात्म स्वरूपाची जाणीव करून देणारा सोहं वाघ्या आहे. भक्तीच्या जागरणात आत्मनिवेदनाच्या अवस्थेला जाण्यासाठी मी मल्हारीची वारी करतो आहे. भागवतात, 'श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं। अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं', अशा नवविद्या भक्तीच्या नऊ पायऱ्या सांगितल्या आहेत. त्यात श्रवण, कीर्तन, स्मरण यांबरोबर आत्म-निवेदन ही शेवटची नववी पायरी आहे. प्रत्येक पायरीवर, म्हणजे भक्तीच्या अवस्थेवर लक्ष देत देत या आत्मनिवेदनाच्या नवव्या पायरीवर गेल्याशिवाय त्या खंडेरायाचे खरे दर्शन घडणार नाही. नवविद्या भक्तीच्या प्रत्येक पायरीवर लक्ष देत देत आत्म-निवेदनापर्यंत जाणे म्हणजे नऊ पायऱ्यांचे 'नऊ लक्ष' होते. लक्ष म्हणजे लाख. पुढे त्या 'नऊ लक्ष'चे नऊ लाख होते आणि गडाला नऊ लाख पायऱ्या जडतात.
       मग अशा नऊ लाख पायरीचा गड चढल्यावर आत्मनिवेदनाच्या अवस्थेला गेलेला खंडेराय समजतो. त्याचे दर्शन घडते. संस्कृती, लोकसंस्कृती काही प्रतीके निर्माण करते. रूपके उभी करते. फळात जसा वृक्षाचा विस्तार साठविलेला असतो, त्याप्रमाणे रूपकात अनंत अर्थ भरलेला असतो. ही रूपके शोधल्यानंतर त्यातील खरा अर्थ कळतो आणि आनंदही मिळतो. लोकवाणीतील अनेक अनाकलनीय संकल्पना जाणण्यासाठी आणि त्यातील रूपके समजण्यासाठी संतवाणीचा उपयोग होतो. केवळ शाब्दिक स्वरूपात अर्थ न लावता त्यातील रूपके उलगडली की खरे तत्त्वदर्शनही उमगते आणि लोकवाणीतील भावदर्शनही तत्त्वदर्शनानेच जोडले जाते.
     मणी मल्ल युद्ध  
खूप वर्षांपूर्वी मणी आणि मल्ल हे दोन महा पराक्रमी राक्षस होऊन गेले.
त्यांनी घोरक्षतपश्चर्या करून महाशक्ती प्राप्त करून घेतली होती. त्यांनी उन्मत्त होऊन राक्षसांची मोठी सेना जमा केली आणि सर्व राजांना जिंकून सैतानी साम्राज्याचे अधिपती बनले होते.
त्यांनी सर्व प्रजाजन आणि देवांना त्रास देऊन नकोसे केले होते. यामुळे सर्वजण श्री विष्णूंना शरण गेले आणि त्यांना हे संकट निवारण करण्यास सांगितले.
श्री विष्णू म्हणाले की हे श्री शंकराचे काम आहे. म्हणून त्यांनी कैलास पर्वतावर जाऊन शंकरांना सांगितले की, तुम्ही मणी आणि मल्ल या दोन राक्षस भावंडांना ओळखता. त्यांनी तपश्चर्या करून तुमचा आशिर्वाद घेतला होता. आता ते उन्मत्त होऊन सर्वांना जगणे नकोसे करीत आहेत. आता फक्त तुम्हीच त्यांचा नायनाट करू शकता. शंकर हे दयाळू असल्याने त्यांनी सर्वांना त्या दैत्यांचा नाश करुन धर्माची पुनःश्च स्थापना करण्याची आश्वस्त केले. शंकरांनी जटांवर प्रहार करून घृतमारी नावाची राक्षसीण उत्पन्न केली आणि तिच्यावर मणी मल्लांचा नाश करण्याची जबाबदारी सोपवली. महादेवांनी भैरवाचे रूप धारण केले आणि पार्वतीने म्हाळसेचे. चंद्र शुभ्र पांढऱ्या रंगाचा घोडा बनला. महादेवांनी हातात त्रिशूळ, डमरू आणि एक मोठी दुधारी तलवार  खंड घेतली.  मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला शंकरांनी मणी मल्लांच्या विशाल सेने बरोबर युद्धास सुरुवात केली. अखंड सहा दिवस हे युद्ध चालले. शेवटी मणी घायाळ होऊन बेशुध्द पडला. शुद्धीवर आल्यावर त्याने भैरवाची स्तुती करण्यास सुरुवात करून जीवदान मागितले.  भैरवाने त्याला जिवदान देऊन वर मागण्यास सांगितले. मणीने भैरवांचे चरण आपल्या डोक्यावर असावेत आणि सदैव तुमच्या सहवासात असावे असे सांगितले. शंकरांनी तथास्तु म्हणल्यावर त्याचा मृत्यू झाला. सर्व देवांनी मल्लाला मैत्री करण्यास सांगितले पण त्याने त्यास नकार दिला आणि पुन्हा युद्धास सुरुवात केली. पण लवकरच तो ही पराभूत झाला. त्यानेही आपल्या भावा प्रमाणे मुक्तीसाठी याचना केली. यानंतर त्याच्या पाच मुलांनी कुंभ  सुचिल  देवगंधर्व  लोहरगला आणि महाबाहु यांनी युद्ध पुढे सुरू ठेवले. पण लगेचच ते ही पराभूत झाले. आणि युद्ध समाप्त झाले. तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध शष्ठी.जी नंतर चंपाषष्ठी नावाने ओळखली जाऊ लागली. मणी मल्लाचा वध करून मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन जेजुरी येथे लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.

येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा उदोउदो
           खंडोबा सन्मान.

१)पिवळे धोतर, सव्वा मीटर पिवळा कपडा व फेटा.
२) १०८ बेलपत्र व भंडारा
३) ५ खोबरे वाट्या व भंडारा
४) पिवळया फुलांचा हार व दवना
५)नैवेद्य: बाजरीची भाकरी, वांगे भरीत, लसुन चटणी, पातीचा कांदा, लिंबू.
यासोबतच पुराणाचा नैवैद्य असला तरी चालेल.
टिप:- जातांना देवघरातील खंडोबा टाक सोबत घ्यावा, व देवाची भेट घडवून परत आणावा.

  तळीभरणे.

    चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरतात... तळीभरणे हा एक कुळाचार आहे. ताम्हणामध्ये विड्याची (नागवेलीची) पाने, सुपारी, देवाचा टाक, खोब-याचे तुकडे , भंडारा इ. साहित्य घेऊन तीन, पाच, सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण वर खाली तीन वेळा उचलले जाते. तद्नंतर पान ठेवून त्यावर ताम्हण ठेवले जाते.....
    देवाला भंडार वाहून उपस्थित सर्वांच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा "सदानंदाचा येळकोट" च्या गजरात ताम्हण उचलले जाते. सरते शेवटी तळीचे ताम्हण सर्वांच्या मस्तकी लावले जाते.....
तीन वेळा ताम्हण उचलून वरखाली करताना "सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार" असा जयजयकार करतात.....
मराठी मध्ये एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार 'तळी उचलणे' हा या आचारा वरूनच आला असावा.....
मणीसुर आणि मल्लासुर या दैत्यांना मार्तंडदेवाने युध्दात हरवले... त्यामुळे त्या देवतेला मल्लहारी (मल्हारी) म्हणतात. या देवाने त्यांचा संहार केल्यानंतर ऋषीमुनींना आणि सर्व नगरवासियांना जो आनंद झाला, त्यांनी त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. त्याचेच हे प्रतिक म्हणजे तळी भरणे आहे.....
 श्री खंडोबा महाराज तळी आरती
॥ जय मल्हार ।।
बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार॥
हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥
सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥
शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥
आरती करी॥ देवा ओवाळी ॥
नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥
कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥
भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार॥
आगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी ।
निळा घोडा, पाव में तोडा ।
मस्तकी तुरा, बेंबी हिरा ।
अंगावर शाल, सदाही लाल ।
म्हाळसा सुंदरी, आरती करी ।
ही आरती श्री खंडोबा महाराजांची तळी भरतांना संपुर्ण महाराष्ट्रात बोलली जाते.....
स्रोत: आंतरजाल...*
 

  नाथसंप्रदायाची पवित्र स्थाने.

उत्तरेस नेपाळ – काश्मिरपासून दक्षिणेस रामेश्वरापर्यंत ही स्थाने व मठ मंदिरे विखुरलेलीआहेत.....
त्यातील त्र्यंबक मठ (नाशिक), पांडुधूनी (मुंबई), बत्तीसशिराळे (सांगली), पैठण(औरंगाबाद), गंभीर मठ (पुणे), वृध्देश्वर (नगर), आळंदीजवळील डुडूळगाव येथील अडबंगनाथमंदिर (पुणे), केंन्दूर (पुणे) व सासवड जवळील दिवे घाट (पुणे) इ. ठिकाणे या अस्तित्वाच्या खुणा दर्शविणारी आहेत.....
अशा रीतीने उत्तर हिंदुस्थानात उगम पावून दक्षिणेकडे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणादिभागात संचार करुन पुन:श्च उत्तर हिंदुस्थानात स्थिरावलेला हा नाथसंप्रदाय दक्षिणेत का रुजूशकला नाही.... ?
याची प्रमुख एकदोन कारणे सांगता येतील... पहिले म्हणजे या नाथसंप्रदायात बाह्यचारांवर पुढे पुढे भर दिला गेल्यामुळे मूळ शुध्द योगाभ्यासाचा अनुभव व बोध मागे पडून सांप्रदायिकांमध्ये विकृती उत्पन्न झाली आणि दुसरे या पंथाचा प्रवाह दक्षिणेत झुळू झुळू वाहूलागतो तोच त्यास ‘‘वारकरी पंथा’’च्या प्रवाहात श्री संत ज्ञानेश्वरांच्यामुळे विलीन व्हावे लागले.....

 जोतिबा-१.

     दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रख्यात दैवत. कोल्हापूरपासून वायव्येस सुमारे १४ किमी. वर पन्हाळा तालुक्यात पायथ्यापासून सु. ३०५ मी. उंचीचा जोतिबाचा डोंगर असून त्यावर जोतिबाचे ठाणे आहे. या डोंगराला ‘रत्नागिरी’ असेही नाव आहे.....
      जोतिबाच्या मंदिराजवळ गुरवांची वस्ती असून ते जोतिबाचे पुजारी आहेत... ही गुरवांची वस्ती ‘वाडी-रत्नागिरी’ म्हणून ओळखली जाते. प्राचीन काळापासून हा डोंगर एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. वाडी-रत्नागिरी ह्या खेड्यात काही प्राचीन मंदिरांचा समूह असून त्यांतील केदारलिंग, केदारेश्वर, रामलिंग आणि चर्पटांबा किंवा चोपडाई ह्या देवतांची मंदिरे विशेष महत्त्वपू्र्ण आहेत. यांतील केदारलिंगाचे किंवा जोतिबाचे मंदिर प्रमुख असून मध्यभागी आहे.....
     जोतिबा हा मूळचा ज्योतिर्लिंग केदरनाथ मानला जातो... कोल्हापूरच्या अंबाबाईला किंवा महालक्ष्मीला कोल्हासुर, रत्नासुर इ. दैत्यांच्या संहारकार्यात मदत करण्यासाठी प्रत्यक्ष केदारनाथच हिमालयातून जोतिबा डोंगरावर येऊन राहिला आणि त्याने दैत्यसंहार करून तेथे आपल्या केदारलिंगाची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे.....
     अंगापूरकरविरचित मराठी केदार विजयात (सु. १७७९) ही कथा आलेली आहे... केदारेश्वर, केदारलिंगे, केदारनाथ, खळेश्वर इ. जोतिबाचीच नावे आहेत. जोतिबा हे उच्चारसुलभ लौकिक रूप ज्योतिर्लिंग ह्या शब्दापासूनच बनले असावे.....

ज्योतिबाची मुर्ती...
    केदारलिंगाचे मूळ मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम किवळ या गावचा पाटील नावजी ससे (रावजी साया असाही उल्लेख आढळतो) याने केल्याचे सांगतात. नंतर १७०३ मध्ये राणोजीराव शिंदे यांनी त्याचा पुन्हा जीर्णोद्धार करून सध्याचे मंदिर बांधले. सध्याची केदारेश्वर व रामलिंग ही मंदिरे अनुक्रमे दौलतराव शिंदे आणि मालजी निकम पन्हाळकर यांनी अनुक्रमे १८०८ व १७८० मध्ये बांधली. चोपडाईचे मंदिर प्रीतिराव चव्हाण हिंमतबहाद्दर यांनी १७५० मध्ये बांधले. केदारेश्वर मंदिरापुढे काळ्या पाषणाचे दोन नंदी आहेत. वाडीच्या बाहेर उत्तरेकडे थोड्या अंतरावर यमाईचे मंदिर असून तेही राणोजीराव शिद्यांनी बांधले.....
     यमाईच्या मंदिरासमोरच दोन कुंडे वा तीर्थे असून त्यांतील एक तीर्थ जिजाबाईसाहेब यांनी १७४३ मध्ये बांधले असून दुसरे ‘जमदग्न्य तीर्थ’ राणोजीराव शिंद्यांनी बांधले आहे... डोंगरावर आणखीही काही तीर्थे व दोन पवित्र झरे आहेत. एका झरा कुशावर्त कुडांतून निघतो, तो ‘गोडा’ म्हणून आणि दुसरा उत्तरेकडून येणारा व वारणेला मिळणारा झरा ‘हैमवती’ नावाने ओळखला जातो. जोतिबा डोंगरावरील मंदिरे डोंगरावरच सापडणाऱ्या निळसर रंगाच्या उत्तम दगडांनी बांधली असून त्यांची रचना हिंदू पद्धतीची आहे.....
        येथील प्रमुख देव जोतिबा असून तो पौगंडद ऋषीचा मुलगा म्हटला जातो... परंपरेनुसार रत्नासुर नावाच्या दैत्याचा त्याने या ठिकाणी वध केल्यामुळे हे स्थान रत्नागिरी म्हणून ओळखले जाते. जोतिबामंदिरातील गाभारा पितळी पत्र्याने मढविलेला असून जोतिबाच्या मागील कमान व त्याचे आसन चांदीचे आहे. जोतिबाची मूर्ती चतुर्भुज व काळ्या पाषाणाची असून ती १·०६ मी. उंच आहे. हातात खड्‌ग, पानपात्र, त्रिशूळ व डमरू आहे. मस्तकावर गंगा असून वाहन अश्व आणि उपवाहन सर्प आहे. भैरव, खंडोबा व कोकणातील रवळनाथ यांच्याशी जोतिबाचे बरेच साम्य आहे.....
       मंदिराच्या परिसरात अनेक दीपमाळा आहेत... जोतिबाची भार्या यमाई. तिची मूर्ती ओबडधोबड, दगडी व शेंदूर फासलेली आहे. चैत्री पौर्णिमेला जोतिबाची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी जोतिबाची पितळी उत्सव मूर्ती पालखीत बसवून समारंभपूर्वक लग्नासाठी यमाईच्या मंदिराकडे नेतात. जोतिबा व यमाई यांच्या विवाहसमारंभाचा एक भाग म्हणून त्यांच्यामध्ये शिक्काकट्यार ठेवतात. ‘ज्योतिबाचा चांग भले’ अशा भाविकांच्या गजराने डोंगर दुमदुमून जातो. रा. चिं. ढेरे यांनी जोतिबा हे खंडोबाप्रमाणेच क्षेत्रपाळ दैवत असल्याने मत मांडले आहे.....
        चैत्री पौर्णिमेला हा जोतिबाच्या वार्षिक यात्रेचा प्रमुख दिवस असला, तरी दर रविवारी, दर पौर्णिमेस तसेच श्रावण शुद्ध षष्टीसही तेथे लहान स्वरूपाच्या यात्रा भरतात... या दिवशी जोतिबाची मूर्ती पालखीत घालून तिची मोठ्या समारंभपूर्वक मंदिराभोवती प्रदक्षिणा करवितात.....
          चैत्री पौर्णिमेच्या यात्रेची सुरुवात चैत्र शु. अष्टमीपासूनच होते... उत्तर भारतातून (ग्वाल्हेर परिसर) तसेच सर्व महाराष्ट्रातून दीड-पावणेदोन लाखांवर लोक यात्रेसाठी जमतात. जोतिबा हे जागृत आणि शक्तिशाली दैवत मानले जाते. जोतिबा हा नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुत्रप्राप्ती, रोगनिवारण, धनप्राप्ती संकटनिवारण इ. हेतूंनी जोतिबाला भक्त नवस बोलतात व फलप्राप्तीनंतर मोठ्या श्रद्धेने ते फेडतात. बगाडाचीही प्रथा येथे पूर्वी होती. सोन्या-चांदीचे दागिने, सोन्या-चांदीच्या लहान अश्वप्रतिमा, सोन्या-चांदीचे हात, मिठाई, नारळ इ. ते जोतिबाला वाहतात. चैत्र शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत दररोज जोतिबाची पालखी निघते. पालखी निघाली म्हणजे भाविक लोक नारळ वाहतात व गुलाल-खोबरे उधळतात.....
      महाराष्ट्रातील सर्व जातिजमातींचे लोक जोतिबाचे उपासक असून अनेक कुटुंबांचे जोतिबा हे कुलदैवत आहे... ग्वाल्हेरच्या शिंद्यांचेही ते कुलदैवत आहे.....
 पालीचा खंडोबा.
        संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत ( खंडोबा ) पाली हे ठिकाण महाराष्ट्रारातील सातारा या जिल्यात आहे... शंकराचे अवतार असणारा पाली खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे .पुणे- कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर पाली हे गाव आहे.....
     या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखतात... हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात .जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते खंडोबा देवाचे मंदिर हे तारळी नदीच्या तीरावर आहे .पुण्यापासून १३५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तेथे जाण्यासाठी २ तासाचा वेळ लागतो....
सदरच्या देवस्थानात दररोज ४ वेळा पूजा अर्चा केली जाते. देवस्थान हेमाडपंथी असून ते सुमारे १ हजार वर्षांपूर्वीचे आहे... मंदिरात नारळ वाढवीत नाहीत. बकरीचा पशुबळी दिला जातो. येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबाचे व म्हाळसाचे लग्न लागते, त्याची पौराणिक कथा खालीलप्रमाणे,*
ज्यावेळी समुद्र मंथन झाले, त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीचे रूपावर शंकर भाळले, त्यावेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन.....
त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालयाशक्ती असे ठेवले, तीच म्हाळसा.....
      तिने तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्येचे रूप धारण केले व तिचा विवाह सदर वाण्याने मार्तंड भैरवाशी पौष शु. पौर्णिमा या दिवशी करून दिला... म्हाळसा व महाळसाकांत येथूण गुप्त झाले आणि ते शिवलिंगरूपाने प्रकट झाले. त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी म्हाळसाकांत हे नाव पडले. पालाई गवळण यांच्या भक्तीप्रीत्यर्थ येथे देव निर्माण झाला म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले.....
    सदर देवाचा पुजारी दरवर्षी बदलतो... त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिनी बदलतो... तेथील महादेवांस उमा-महेश्वर या नावाने संबोधले जाते. देवास फुलाचा कौल लावला जातो. कौल उजवा दिल्यास देवाचे करणे काही राहिले नाही व कौल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील भाविक लोक मानतात. सदरच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यास अंदाजे रु १२ लक्ष खर्च अपेक्षित आहे. सदरचा खर्च हा भाक्तांच्या देणगीतूनच करण्यात येतो. सदरच्या जीर्णोद्धाराचे काम श्री. चंद्रशेखर स्वामीनाथन शेखाई (तामिळनाडू) हे करीत आहे. सदा देवस्थानचे व्यवस्थापक म्हणून श्री. लक्ष्मण दिगंबर वेदपाठक हे आहेत.....
खंडोबाच्या लग्नकथा...
        एक वाघ्या – खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात... खंडोबा हे दैवत बहुपत्‍नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्‍नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्‍नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्‍नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्यातिमशेट नावाच्या व्यापार्‍याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.....
         दुसरी पत्‍नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते... ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्‍नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणार्‍यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला.....
         एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले... खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्‍त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.....
       पालीचा खंडोबा यात्रा...
श्री खंडोबा व म्हाळसा यांची विवाह यात्रा प्रसिद्ध असून, यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात... भाविकांनी दिलेल्या देगणीतून ४ लाख ५१ हजार रुपये किंमतीची ११ किलो चांदी, १ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे ६६ किलो पितळ आणि जवळपास ७७ हजार रुपये किंमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे सात लाख रुपये किंमतीचे आकर्षक सिंहासन तयार करण्यात आले आहे.....
         खंडोबारायाचे संबंधित विशेष...
        रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो... सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी- मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे.....
 
 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...