https://indraneelb.blogspot.com/2021/03/blog-post_91.html
कृष्ण आणि पुतना
लेख - १५
कृष्ण हे भारतीय धार्मिक परंपरेमध्ये असलेले असे चरित्र आहे
ज्याने सर्वांना त्याच्या कथांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळकृष्ण, यशोदेला
प्रश्न विचारून भंडावून सोडणारा कृष्ण, गोपिकांबरोबर खेळणारा कान्हा, कंस
वध करणारा जबाबदार तरुण कृष्ण आणि महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन
आयुष्याचे आणि या सृष्टीचे तत्वज्ञान गीतेत संगणारा, विश्र्वरूप दर्शन
देणारा भगवान श्रीकृष्ण. अशा अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्याला
दिसतो. वेगवेगळ्या कलांमध्ये देखील कृष्णाची ही रूपं आपल्याला बघायला
मिळतात. कृष्ण चरित्रतला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने बाळ असताना केलेला
अनेक असुरांचा वध.
पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस
मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून
आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी
अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर
आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री
आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे
महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया
होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्री ने बाळाला स्तनपान देताना देखील आपले
दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.
एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब
किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव
प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे
आहे.
शिल्प - कृष्ण आणि पुटना
बिजा मण्डल, मध्य प्रदेश
९ वे शतक
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
रावणानुग्रह
लेख - १४
आपल्या देशात पुराणकथा या खूप समृद्ध आणि मुळापर्यंत
रुजलेल्या आहेत. याच कथा मंदिरांमध्ये कोरलेल्या बघायला मिळतात. आज आपण
ज्या बोधकथा वाचतो तसच काहीसं काम या शिल्पांमध्ये कोरलेल्या कथा मंदिरांना
भेट देणाऱ्या भक्तांसाठी करत असतात. अशीच एक सुप्रसिद्ध कथा म्हणजे
रावणानुग्रह. महाराष्ट्रात तर ही कथा दिसतेच पण ओडिसा, कर्नाटक, इत्यादी
राज्यात देखील ही कथा खूप लोकप्रिय आहे.
रावण हा अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी असा असुर गणांचा राजा,
लंका हे त्याचे राज्य. कुबेराला युद्धामध्ये हरवून परत येताना त्याला कैलास
पर्वत वाटेल लागला. शंकराचा भक्त असलेल्या रावणाने त्याला भेटायला जायचे
ठरवले पण द्वारपाल त्याला वर जाऊ देईनात. हा अपमान झाल्यावर तो अहंकारी
रावण चिडला आणि जिथे मला जाता येत नाही तीच जागा घेऊन लंकेत जातो म्हणून
त्याने कैलास पर्वत उचलण्याचा निर्णय घेतला. ही कथा थोड्याफार फरकाने
रामायण, ब्रह्म पुराण, इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये वाचायला मिळते.
शिल्पाचे निरीक्षण करत या कथेचा उत्तरार्ध पण बघुयात. सर्वात
खाली आपल्या विस हातांनी तो पर्वत उचलून धरायचा प्रयत्न करणारा रावण
कोरलेला आहे. त्याच्या बाजूला द्वारपाल बसलेले आहेत. ते बसलेले आहेत कारण
शिव हे कैलास पर्वताच्या वरच्या भागात आहे आणि द्वारपाल खाली. शिल्पामध्ये
पर्वताची भव्यता दाखवण्यासाठी ही रचना केलेली आहे. रावणाने पर्वत हलवल्यावर
जो हादरा बसला त्याने पार्वती शंकराच्या अंगावर कलंडली, तीची दासी मागे
पळून जाताना दिसते आहे. या सर्व कोलाहलात शंकर मात्र शांत आहेत. रावणाच्या
चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी आपल्या पायाच्या बोटाने तो पर्वत
खाली दाबला, ही ताकद एवढी प्रचंड होती की पर्वताचे सगळे वजन रावणाच्या
अंगावर आहे. शिल्पात बघितले तर दिसेल की त्याचा एक एक हात गळून पडतो आहे.
वजनाने त्याचा चेहरा रडवेला झाला आहे. आपली झालेली चूक लक्षात येताच त्याने
शंकराची स्तुती करणारे - शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि
शंकराने प्रसन्न होऊन रावणाला अभय दिले. रावणाला या प्रसंगात शंकराने तलवार
किंवा वीणा भेट दिली असे उल्लेख देखील अनेक ठिकाणी बघायला मिळतात.
एखाद्या अफाट शक्तिशाली माणसाचा अहंकार मोडण्यासाठी
परमेश्वराच्या पायाचे फक्त एक बोट पुरेसे ठरते. माणसाने आलेल्या
संकटांमध्ये असेच शंकरासारखे शांत आणि स्थिर राहून त्याचा सामना करावा हाच
विचार या शिल्पामधून व्यक्त करायचा असेल.
शिल्पं - रावणानुग्रह
वेरूळ - १६ नंबर कैलास लेणे
आठवे शतक
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
अभिषेक लक्ष्मी
लेख - १३
अनेक संकल्पना मागच्या काही हजार
वर्षांपासून आपल्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत आणि यातल्या
बहुतांशी संकल्पना निसर्गाच्या विविध घटकांपासून बनलेल्या आहेत. जीवनदायी
नद्या या देवी झाल्या, त्यांना मंदिरांमध्ये मूर्ती रुपात स्थान मिळाले,
आपल्याकडे डोंगर पुजले जातात, समुद्राची पूजा होते, सूर्य तर प्रमुख
देवतांपैकी एक आहे, निसर्गचक्र जसे घडते त्यावर आपले सण, समारंभ, उत्सव
साजरे होतात. अशीच एक सुंदर संकल्पना आज आपण इथे बघणार आहोत.
अगदी
सुरवातीच्या काळात "श्री" म्हणून ओळखली जाणारी ही देवता पुढे गजलक्ष्मी
म्हणून ओळखली जाऊ लागली. वैभव, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी म्हणून आपण हीचे
पूजन करतो. तिच्या अशा सर्वव्यापी स्वरूपामुळे सगळ्याच धर्मात हिचे पूजन
केले जाऊ लागले. रामायणात आलेल्या एका कथे प्रमाणे रावणाने आपल्या पुष्पक
विमानाच्या दारांवर गजलक्ष्मी काढलेली होती.
आपण
जे शिल्पं बघणार आहोत ते संभाजीनगर जवळ वेरूळ लेण्यांमध्ये असलेल्या १६
नंबरच्या कैलास लेण्यातील आहे. मुख्य द्वारातून आत गेल्यावर समोरच हे
प्रचंड शिल्पं दिसते. जीवनाचे एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे पाणी आणि
समृद्धीची लक्षण म्हणजे कमळ. या तलावात उमललेल्या कमळावर लक्ष्मी बसलेली
आहे. कमळाच्या शेजारी दोन हत्ती कुंभामध्ये पाणी भरत आहेत. पाणी भरण्यासाठी
गुडघ्याने लावलेला जोर देखील इथे कलाकाराने कोरला आहे. वरचे दोन हत्ती
त्या पाण्याने लक्ष्मीला अभिषेक करत आहेत. वरच्या बाजूला वेगवेगळे गंधर्व
आणि इतर आकृती कोरल्या आहेत.
इथे हत्ती म्हणजे ढग अशी कल्पना
करून, अभिषेकाला पावसाची उपमा दिली आहे. आणि यामुळे बहरून येणारी सृष्टी
म्हणजेच लक्ष्मी अशी संकल्पना या शिल्पात बघायला मिळते.
निसर्गाची
अत्यंत सुंदर मांडणी कलाकाराने पूर्ण जीव ओतून या शिल्पामध्ये केली आहे.
सतत सुरू असणारे चक्र आणि त्यातून बहरणारी सृष्टी यांची सांगड अत्यंत
अचूकपणे मांडलेली संकल्पना म्हणजेच - अभिषेक लक्ष्मी.
शिल्पं - अभिषेक लक्ष्मी,
वेरूळ - १६ नंबर कैलास लेणे,
संभाजीनगर
८ वे शतक.
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
Poste
चामुंडा
लेख - १२
मानवी जीवनात स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगामध्ये
अत्यंत प्राचीन अशा उपासनेत शक्ती उपासना येते. या उपासनेचे पुरावे
भारताबरोबरच इराण, मेसोपोटेमिया, सीरिया, पॅलेस्टाईन, इजिप्त, इत्यादी
प्राचीन संस्कृतींमध्ये देखील सापडतात. स्त्री ही मातेच्या रूपामध्ये
उत्पत्तीचे प्रमुख लक्षण म्हणून येते. नंतरच्या काळात अनेक संदर्भाने
शक्तीचे पूजन होऊ लागले पण उत्पत्ती, स्थिती आणि लय या सृष्टीच्या
अवस्थांमध्ये असलेले तिचे महत्व अजून तसूभरही कमी झालेले नाही.
प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक कथा येतात, त्याप्रमाणे कौशिकी
देवीच्या भृकुटीपासून संहार करण्यासाठी जी देवी तयार झाली ती म्हणजे
चामुंडा. अग्निपुराणात चामुंडेचे विस्तृत वर्णन आले आहे. जसे शिवाचे उग्र
रूप म्हणजे भैरव तसेच देवीचे उग्र रूप म्हणजे चामुंडा. आपल्याकडे पुजली
जाणारी महाकाली, काली, भद्रकाली ही सगळी पार्वतीचीच उग्र रूपे आहेत.
आता हे शिल्प समजून घेऊयात. बघितल्यावर अंगावर काटा आणणारे हे
शिल्पं आहे. संहार आणि मृत्यू यांची देवता म्हणजे काय याचे प्रत्यक्ष
दर्शन या शिल्पातून होते. प्रथमदर्शनी दिसते ती प्रेतावर बसलेली भयंकर अशी
चामुंडा. अंगावर कतड्याच्या खाली फक्त सापळा, त्यावर दिसणाऱ्या अंगातल्या
रक्तवाहिन्या आणि धमण्या, आत गेलेलं पोट आणि भीषण असे खोल गेलेले डोळे.
चार हतांपैकी दोन हात तुटलेले, छातीजवळ असलेल्या हातात कपाल नावाचे भांडे
पकडले आहे. छातीवरच्या बरगड्या आणि गळ्यातल्या पेशी खूप बारकाईने कोरलेल्या
आहेत. डोक्यावर चक्क अग्निज्वाळांचा मुकुट आहे. गळ्यात नरमुंडमाळा कोरलेली
आहे. मांडिजवल हातात एका माणसाचे तुटलेले मुंडके पकडले आहे. सर्वात खाली
घोरपडी सारखा दिसणारा प्राणी चामुंडा बसलेल्या प्रेताचा लचका तोडायचा
प्रयत्न करतो आहे तर कुत्र्यासारखा प्राणी खाली तुटून पडलेला माणसाचा हात
खात आहे.
बीभत्स आणि भयंकर संकल्पना या शिल्पामध्ये चिन्हांकित केल्या आहेत.
कलाकाराने घडवलेले शिल्पं, त्यामध्ये कोरलेल्या भावना व्यक्त
करत असेल तर ते त्या कलाकाराचे खरे कसब. आपल्याकडचे सगळेच कलाकार हे
एकापेक्षा एक सरस कामगिरी करून दाखवणारे. थेट काळजाला भिडणाऱ्या संकल्पना,
नाट्य शास्त्रात आलेले रस हे सर्व त्या कलाकारांनी आपल्या कलेत ओतले. हे
शिल्पं बघितल्यावर समोर उभी राहते ती मूर्तिमंत भिती. या शिल्पात कोरलेली
भिती आपल्याला भावते म्हणून हे शिल्पं सुंदर ठरते आणि तो कलाकार महान!
शिल्पं - चामुंडा
८-९ वे शतक
भुबनेश्वर स्टेट म्युझियम, ओडिशा
इंद्रनील सदानंद बंकापुरे
9960936474
नटराज
लेख - ११
या सृष्टीची चक्र ही एका लयीवर चालत असतात. सूर्य - चंद्र,
इतर ग्रह - तारे यांच्या हालचाली त्या त्या प्रमाणबद्ध टप्प्याने होत
असतात. कुठलीही कला सादर करत असताना हीच लय सर्वात महत्त्वाची असते. ती जर
सांभाळता नाही आली तर स्टेजवर काय किंवा विश्र्वामध्ये काय - जो होतो तो
प्रलय!
हीच वैश्विक लय सांभाळण्याचे काम शंकर आपल्या नृत्यातून करत असतो. तंडू
ऋषींनी जे नृत्य शंकराला शिकवले तेच म्हणजे तांडव! या तांडवाचे १०८ प्रकार
चिदंबरम इथे असलेल्या मंदिरावर कोरलेले आहेत.
आपण जे शिल्पं बघणार आहोत ते वेरूळ येथील २१ नंबरच्या
रामेश्वर नावाच्या लेणी मधले आहे. याच लेणी मध्ये कार्तिकेय, मातृका,
दुर्गा अशी इतर सुंदर शिल्पं देखील कोरलेली आहेत.
या शिल्पमध्ये सर्वात खाली डावीकडे कोरलेले आहेत वादक, यांच्यापैकी एकाच्या
हातात बासरी दिसते आहे तर दुसरा समोर तबल्यासारखे वाद्य घेऊन बसलेला आहे.
सतराव्या शतकात अमीर खुसरो याने हे वाद्य आपल्याला दिले या चुकीच्या
समजुतीचा पुरावा भारतीय शिल्पांमध्ये दिसतो. वर गणपती आहे. सगळ्यात वर
डाव्या कोपऱ्यात तीन मुखांचे ब्रह्मदेव आहेत पण तिथला बाकीचा भाग हा खराब
झाला आहे. विष्णू, इंद्र आदी देवता उजव्या वरच्या कोपऱ्यात कोरलेल्या आहेत.
सर्वात खाली शंकराच्या नृत्याकडे मग्न होऊन बघणारी पार्वती आणि तिच्या
मागे मांडीवर कार्तिकेयाला घेऊन उभी असलेली दासी. शिवाचे शिल्पं खालून
बघताना दिसतो तो त्याच्या पायांमध्ये लुडबुड करणारा त्याचा अत्यंत जवळचा
भक्त - भृंगी. शिवाचा एका पाय दबलेला तर एक थोडा वर उचललेला - जे जे चांगले
आहे ते टिकून राहावे आणि जे जे वाईट आहे ते नष्ट व्हावे अशी या मागे
असलेली प्रेरणा आहे. कमरेवर शंकराने वाघाचे कातडे नसलेले आहे. डावीकडच्या
वरच्या हातात शिवाचे अत्यंत प्रिय वाद्य आणि नृत्याची लय सांभाळणारे डमरू,
पण दुर्दैवाने इतर हात तुटलेले आहेत. चेहऱ्यावर असलेली अत्यंत शांत मुद्रा,
अर्धे मिटलेले डोळे आणि कपाळावर कोरलेले तिसरे नेत्र. डोक्यावर असलेल्या
जटा या नृत्याच्या प्रचंड वेगाने मोकळ्या झाल्या आणि त्या शंकराच्या
खांद्यावर पसरल्या आहेत. स्थिर शिल्पांमध्ये वेग कोरायचे कलाकाराचे कौशल्य
हे आपल्याला समजण्याच्या पलीकडचे आहे.
आजचा दिवस आपण शंकर आणि पार्वतीच्या लग्नाचा दिवस म्हणजेच
पुरुष आणि प्रकृती यांचा दिवस, समुद्र मंथनातून बाहेर आलेले हलाहल आजच
शंकराने प्राशन केले, अशा अनेक कारणांसाठी महाशिवरात्र आपण साजरी करतो.
आपल्या अस्तित्वासाठी कारणीभूत असणाऱ्या या शक्तीला मनापासून वंदन!
शिल्पं - नटराज
रामेश्वर लेणे, वेरूळ
७-८ वे शतक
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
भैरव
लेख - १०
शंकराच्या अनेक रौद्र रुपांपैकी एक म्हणजेच भैरव, याचा अर्थच
भरण करणारा असा होतो. आपल्याकडे गावागावांमध्ये दिसणारा भैरोबा, काळभैरव,
भैरव, क्षेत्रपाल ही सगळी त्याचीच नावं आहेत. आपल्याला असलेले दुःख कमी
व्हावे, गावांच्या वेशी सुरक्षित राहाव्यात, इत्यादी कारणांसाठी भक्त
याच्याकडे धाव घेतात. वराह पुराण यासंबंधी कथा आपल्याला वाचायला मिळते.
भैरव या देवतेला काशीचा रक्षक सुद्धा म्हणतात. अगदी दोन हतांपासून ते अठरा
हातांपर्यंत या भैरवाच्या मूर्ती आपल्याला दिसतात. रानी की वाव - पाटण,
दिल्ली नॅशनल म्युझियम, कोल्हापूर कोपेश्वर मंदिर, इत्यादी ठिकाणी खूप
सुंदर भैरव शिल्पं कोरलेली आहेत.
आज आपण जे शिल्पं बघणार आहोत ते भुबनेश्वर येथील संग्रहालयात असलेला भैरव आहे. डावीकडून शिल्पाचे निरीक्षण करूयात.
भैरव हा बहुतांशी वेळेला नग्न दाखवला जातो. पायाशी त्याचे गण
किंवा सेवक कोरलेले आहेत. खडावा (हाय हिल्स) घालून तो उभा आहे. चतुरहस्त -
चार हातांचे शिल्पं आणि हातामध्ये खड्ग - तलवार, त्रिशूळ, डमरू आणि माणसाचे
तुटलेले मुंडके पकडले आहे. त्या मुंडक्यातून येणारे रक्त आणि मांस
खाण्यासाठी खाली असलेला कुत्रा वर बघतो आहे (इथे कुत्र्याचे तोंड तुटले
आहे). वरून पायाकडे जाताना मुकुटमध्ये मध्य भागी कोरलेला नागाचा फणा आणि
खाली नरमुंड, कपाळाच्या मधोमध तिसरा डोळा, भुवया वर खचलेल्या, डोळे
वटारलेले, ओठांमधून बाहेर आलेले सुळे, या उग्र रुपात कोरलेले सुंदर दागिने,
कमरेचा बाक अत्यंत सुंदर कोरला आहे, संपूर्ण नग्न शिल्पं, कमरेपासून खाली
नरमुंड माळा आणि गुडघ्यांवर वेटोळा मारून बसलेला नाग. उग्र रूप म्हणजे
नक्की काय हे या शिल्पावरून आपल्याला कळतं. अनेक रसांपैकी एक बीभत्स रस तो
या शिल्पात आपल्याला दिसतो.
ब्रह्महत्यचे पाप मिटवण्यासाठी शिवाने १२ वर्ष कापालिक व्रत केले आणि हीच या भैरवाची उत्पत्ती.
भैरवाची संकल्पना महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पसरलेली आपल्याला दिसते.
शिल्प - भुबनेश्वर स्टेट म्युझियम,
ओडिशा
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
नरसिंह
लेख - ९
विष्णू या देवतेची अनेक वेगवेगळी
रूपं आहेत. हतांमधल्या आयुधांचा जो क्रम आहे त्यावरून तयार होणाऱ्या चोवीस
वेगवेगळ्या मूर्ती, विष्णूचे अवतार, संयुक्त आणि संकीर्ण मूर्ती असे अनेक
प्रकार आहेत. यापैकी सर्वात जास्त प्रसिद्ध असणाऱ्या म्हणजे विष्णूच्या
अवतार मूर्ती. पुराणांमधून या संदर्भातल्या अनेक कथा आपल्याला वाचायला
मिळतात. आज आपण विष्णूच्या नरसिंह या अवताराची माहिती घेणार आहोत. योग,
शांत, उग्र, लक्ष्मी सह अशा अनेक प्रकारांमध्ये नरसिंहअवतार शिल्पं बघायला
मिळतात.
हिरण्यकश्यपू नावाच्या असुर राजाला
वरदान मिळाले की त्याला घराच्या आत किंवा बाहेर मृत्यू येणार नाही, देव
मारू शकत नाही किंवा दानव, हत्यार, मनुष्य, जनावर या कशानेही मृत्यू येणार
नाही, तो सकाळी मारणार नाही किंवा रात्री. एवढे ताकदवान वरदान मिळाल्यावर
त्याने तीनही लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरवत आपला दरारा वाढवला. देवांनी
विष्णूकडे याचना केली की यातून आम्हाला वाचव. इथे गीतेमध्ये सांगितलेला
श्लोक आपल्याला आठवतो - जेंव्हा जेंव्हा या सृष्टीमध्ये अन्याय होईल, त्या
त्या वेळेला धर्मसंस्था परत मार्गावर आणण्यासाठी मी येईन.
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्|
धर्मसंस्था परार्थाय सम्भवामि युगे युगे||
यानंतर
विष्णूने नरसिंह म्हणजेच ना देव ना दानव, ना मनुष्य ना प्राणी असे रूप
घेऊन, घराच्या उबऱ्यावर संध्याकाळी हिरण्यकश्यपू असुराचा वध केला. त्याला
मांडीवर घेऊन पोट फाडणारा नरसिंह तुम्ही सर्वांनी बघितला असेल, पण हे युद्ध
एवढं सोप्पं होतं का?
नाही!
दोघांमध्ये
प्रचंड युद्ध झाले, त्यात शेवटी जेंव्हा नरसिंहाने त्याला पकडले आणि आता
तो त्याला मांडिरवर घेणार बरोबर हाच क्षण कलाकाराने या शिल्पामध्ये पकडला
आहे.
कर्नाटकात पटदक्कल नावाच्या प्राचीन वारसा
स्थळामध्ये असलेल्या मंदिरावर हे शिल्पं आहे. डावीकडून हे शिल्प बघायला
सुरू करूयात. हिरण्यकश्पूच्या हातामध्ये पकडलेली तलवार, त्यामधून नरसिंहाने
हात मध्ये घालून त्याला पकडले आहे, मागच्या भिंतीवर जुना रंग कसा असावा
याच्या छटा दिसतात, नरसिंहाची आयाळ, मुकुट, मोठे डोळे आणि उघडलेला जबडा
यातून दिसते ती जरब आणि राग, हिरण्यकश्यपूचे दोन्ही खांदे नरसिंहाने पकडले
आहेत, त्याच्या बोटांची नखे देखील कलाकाराने कोरलेली आहेत. आणि या
शिल्पामध्ये बघायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरण्यकश्यूच्या
चेहऱ्यावर कलाकाराने कोरलेली मूर्तिमंत भिती!
आपल्याकडे मंदिरांवर असलेला दगड देखील भावनेने ओतप्रोत भरलेला आहे. तो लाजतो, हसतो, चिडतो, रागावतो फक्त आपल्याला बघता आलं पाहिजे!
शिल्प - नरसिंह
पटदक्कल (जागतिक वारसा स्थळ - World Heritage site)
विरूपाक्ष मंदिर - आठवे शतक
इंद्रनील सदानंद बंकापुरे
सप्तमातृका
लेख - ८
चराचर सृष्टीच्या तीन अवस्था आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय.
या तीनही अवस्थांसाठी अनुक्रमे ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव हे कारणीभूत
ठरतात. यामध्ये उत्पत्ती आणि लय यांच्या मध्ये असणारी स्थिती म्हणजेच या
सृष्टीचा विकास. या विकासासाठी कारणीभूत ठरणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि
त्यापैकीच एक म्हणजे सप्तमातृका. वामन पुराणामध्ये जी कथा येते त्यामध्ये
या सप्तमातृकांची उत्पत्ती ही देवीने केलेल्या सिंहनादातून झाली. याच बरोबर
मत्स्य पुराण, अग्नी पुराण, देवी भागवत, इत्यादी ग्रंथांमध्ये आपल्याला या
कथा वाचायला मिळतात. या मातृकांची संख्या अगदी ६४ पर्यंत गेलेली बघायला
मिळते. सप्तमातृका ही संकल्पना बदलत्या काळात एवढी समृद्ध झाली की प्राचीन
भारतात असलेल्या अनेक राजांची अधिष्ठात्री देवता म्हणून यांचे पूजन होऊ
लागले. सात प्रमुख देवतांच्या शक्ती स्त्री रूपामध्ये संकल्पित केल्या
गेल्या त्याच या सप्तमातृका.
आता या शिल्पाच्या माध्यमातून हा शिल्पपट समजून घेऊयात. इथे आधी मातृका आणि प्रमुख देव अशा क्रमाने हा शिल्पपट बघुया.
सर्वात आधी डावीकडे आपल्याला दिसतो तो विणाधर शिव, शेजारी तीन मुख असलेली
ब्रह्माणी (ब्रह्मदेव), पायाशी नंदी आणि हातात त्रिशूळ घेतलेली माहेश्वरी
(शिव), हातात भाला आणि पायाशी मोर असलेली कौमारी (कार्तिकेय), हातात शंख
आणि पायाशी मनुष्य रुपातला गरुड असलेली वैष्णवी (विष्णू), वराह रूप शक्ती
वाराही, हातात वज्र आणि पायात ऐरावत असणारी एंद्री किंवा इंद्राणी (इंद्र)
आणि सर्वात शेवटी अंगाचा सापळा असलेली चामुंडा. या चामुंडेच्या पुढे
नंतरच्या काळात गणपती देखील आपल्याला दिसतो.
महाराष्ट्रात वेरूळ, कोपेश्वर - कोल्हापूर, इत्यादी ठिकाणी
खूप सुंदर सप्तमातृका पट आपल्याला बघायला मिळतात. मध्यप्रदेश मध्ये पठारी
नावाच्या गावाजवळ असलेल्या टेकडीवर पाचव्या शतकातला सप्तमातृका पट आहे.
यावर राजा जयत्सेन याने त्याच्या लेखात या देवींचा उल्लेख - "भगवते मातरः"
असा केला आहे.
अगदी ऋग्वेदाच्या आधीपासून सुरू असलेली ही मातृका पूजन परंपरा
आहे. यावरून देवीची पूजा आणि अनुषंगाने स्त्री या संकल्पनेशी जोडले गेलेले
दैवत्व भारतात किती प्राचीन आहे याची कल्पना इथे येते.
शेवटी काय, ती आहे म्हणून आपण आहोत. ती नाही, तर काहीच नाही!
शिल्प - सप्तमातृका पट,
६-७ वें शतक
दिल्ली नॅशनल म्युझियम
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474
हरिहर
लेख - ७
भारतामध्ये प्रमुख पाच पंथ प्राचीन काळापासून आहेत. शैव -
शंकर उपासक, वैष्णव - विष्णू उपासक, शाक्त - शक्ती उपासक, गाणपत्य - गणपती
उपासक आणि सौर्य - सूर्य उपासक. यांची यांची अत्यंत महत्त्वाची अशी धार्मिक
स्थळे भारतात आणि भारताबाहेर देखील तयार झाली. जसे उपासक वाढले तसं या
पंथांमध्ये वादावादी वाढत गेली आणि याचे पर्यावसन मोठ्या युद्धांमध्ये
देखील झालेले दिसते. समाजामध्ये वाढलेले हे अंतर आणि दरी कमी करण्याचे
पूर्ण श्रेय जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांना जाते. कठोर साधना आणि असामान्य
बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. त्यातलीच
एक म्हणजे संयुक्त मूर्ती - वेगवेगळ्या धार्मिक संकल्पना एकत्र करून तयार
केले शिल्पं.
दक्षिणेकडील चालुक्य राजांचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे
ऐहोळे, मंदिर स्थापत्यकलेमध्ये झालेले प्रयोग, शिल्पं आणि टेकडीवर असलेल्या
मेगुती नावाच्या मंदिरात असलेला महत्त्वाचा शिलालेख यासाठी हे एहोळे
प्रसिद्ध आहे. इथेच असलेल्या दुर्गा (या नावाचा संबंध देवीशी नसून दुर्ग या
शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे) मंदिरात हे शिल्प बघायला मिळते.
डावीकडून उजवीकडे बघताना गण (शंकराच्या सेवक वृंदांपैकी एक)
दिसतो, वरचे सर्व हात तुटलेले, अप्सरा, उजवीकडच्या हातामध्ये चक्र, एक हात
खाली असलेल्या पार्वतीच्या गालाला लावताना, समोर पकडलेला शंख दिसतो आहे.
शंकर आणि विष्णू यांचे एकत्र रूप असलेला हा हरिहर आहे. डोक्यावर असलेल्या
मुकुटाकडे नीट लक्ष देऊन बघितले तर लक्षात येईल की मुकुटाचा अर्धा भाग हा
शंकराच्या जटा मुकुटाचा आहे आणि अर्धा भाग विष्णूच्या किरीट मुकुटाचा.
शिल्प आपण जेवढ्या बारकाईने बघू तेवढ्या जास्त गोष्टी
आपल्याला कळत जातात. शंकर आणि विष्णू भक्तांच्या भांडणातून आद्य
शंकराचार्यांनी काढलेला मार्ग हा कलेच्या रूपातून इथे अभ्यासता येतो. अशा
संयुक्त मूर्तींची अजून अनेक उदाहरणे आहेत. ती आपण यथावकाश बघणाराच आहोत.
आपली कला ही आपली ओळख आहे, आणि कलेमध्ये दिसणारी सर्वांना सामावून घ्यायची
वृत्ती हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य!
शिल्प - हरिहर
दुर्गा मंदिर, ऐहोळे, कर्नाटक
६-७ वे शतक
अर्धनारीनटेश
लेख - ६
मुंबई पासून समुद्रात काही
किलोमीटर आत प्राचीन भारतीय इतिहासाचा एक मोठा ठेवा लपून बसला आहे. आज जरी
आपण या जागेला एलिफंटा लेणी म्हणून ओळखत असलो तरीही याचे प्राचीन नाव
घारापुरी लेण्या असे होते, यापुढे आपण या वारसा स्थळाचा उल्लेख घारापुरी या
प्राचीन नावानेच करणार आहोत. एलिफंटा हे नाव पोर्तुगीजांनी तिथे असलेल्या
मोठ्या दगडी हत्तींकडे पाहून दिले असावे असे मत अनेक अभ्यासकांचे आहे.
१९८७ साली घारापुरी लेणी या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केल्या
गेल्या. इथेच असलेल्या एका अत्यंत सुंदर अशा शिल्पाचा परिचय आज आपण करून
घेणार आहोत.
घारापुरी मध्ये असलेल्या लेणी ह्या
मुख्यत्वे शैव म्हणजे शंकराची आराधना करणारे यांच्या आहेत त्यामुळे शंकराशी
निगडित अनेक शिल्पं तिथे आपल्याला बघायला मिळतात. आकाराने खूप मोठी असणारी
ही कलाकृती स्वतःच एक आशर्याची गोष्ट आहे. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज
यांनी या जागेचा ताबा घेतला आणि या कलाकृती नष्ट करायची एक मोठी आघाडी उभी
राहिली, भिंतीवरून आवाज चांगला येतो म्हणून शिल्पांवर बंदुकीच्या गोळ्या
मारून इथे तोडफोड केली गेली. आज आपण तिथे गेलो तर हे सगळे पुरावे आणि नष्ट
होत असणाऱ्या कलाकृती आपल्या काळजाचा ठेका चुकवतात.
शंकराच्या
सुप्रसिद्ध शिल्पंपैकी एक म्हणजेच शंकर आणि पार्वती याचे एकत्र असलेले
अर्धनारीनटेश हे शिल्प. या संदर्भातल्या अनेक कथा आपल्याला पौराणिक
ग्रंथांमध्ये बघायला मिळतात पण आज आपण त्यात न जाता या प्रचंड मोठ्या
शिल्पाचा आवाका समजून घेणार आहोत. नेहमीच्या पद्धतीने हे शिल्पं बघायला
सुरू करूयात.
कमरेखालचा भाग हा नष्ट झालेला,
नंदीच्या पाठीवर हात ठेऊन उभे असलेले शिव, नंदीच्या शेजारी कमळावर बसलेले
ब्रह्मदेव आणि शेजारी हत्तीवर बसलेला पूर्व दिशेचा अधिपती इंद्र, वरच्या
बाजूला अनेक देवदेवता आणि गंधर्व, मूळ शिल्पाच्या शरीराचा आर्धा भाग हा
पुरुषाचा म्हणजेच शिव आणि अर्धा भाग, ज्यामध्ये स्तन स्पष्ट दिसते आहे तो
स्त्रीचा म्हणजेच पार्वती, दोघांच्या डोक्यावर असणाऱ्या मुकुटात देखील फरक
तुम्हाला दिसेल. बाकी हात तुटले असले तरीही पार्वतीच्या हातामध्ये आरसा
दिसतो आहे आणि त्या शेजारी मनुष्यरुपी गरुडावर चक्रधर विष्णू पण कोरलेले
आहेत.
आपल्याकडे असलेल्या सांख्य तत्वज्ञानात
सृष्टीच्या उत्पत्तीचे श्रेय हे पुरुष आणि प्रकृती यांना दिले आहे, त्याच
अवघड तत्वज्ञानाला कलाकारांनी या सुंदर आणि सोप्या अशा रचनेमध्ये
प्रमाणबद्ध केले.
ही शिल्पं आपल्याशी संवाद साधात असतात. आपले कान, डोळे आणि मन उघडे ठेऊन तो संवाद ऐकायचा प्रयत्न करूयात.
शिल्पं - अर्धनारीनटेश
घारापुरी लेण्या - साधारण ६ वे शतक
मुंबई
महिषासुरमर्दिनी
लेख ५
आपण काही देवतांचा परिचय या आधी
करून घेतला, आता भारतातल्या काही निराळ्या शिल्पांची माहिती यापुढे घेणार
आहोत. महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि अमरत्व
मागितले, ते नाही मिळाले पण फक्त स्त्री कडूनच मृत्यू येईल अशी एक पळवाट
मिळाली. स्त्री ही अबलाच असते असं गृहीत धरून त्याने सगळीकडे उच्छाद
मांडयला सुरुवात केली. स्त्री ही अबलाच असते हे गृहीत धरणे हीच त्याची
सर्वात मोठी चूक.
महिषासुर राक्षसाचा त्रास
मोठ्या प्रमाणत वाढला आणि मग विष्णू, शंकर, ब्रम्हदेव आणि इतर देवगण यांनी
आपापल्या शक्तीचा वापर करून एकत्रित ताकद घडवली - हीच शक्ती म्हणजे दुर्गा.
दुर्गेला हिमालयाकडून सिंह मिळाला जो अनेक शिल्पांमध्ये तिच्या बरोबर
दिसतो. त्याच प्रमाणे दुर्गेला इतर देवतांकडून देखील अनेक आयुधे मिळाली.
या
लेखामध्ये उल्लेख केलेले शिल्पं हे गुजरात मध्ये पाटण जवळ राणी की वाव
नावाची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेली हेरिटेज साईट आहे
तिथे आहे. मुळात राणी की वाव, हे वेगळ्या पद्धतीचे विष्णू मंदिर शिल्पांचा
अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी नंदनवन आहे.
शिल्पनिरिक्षण
- सर्वात खाली महिष (रेडा), त्याची पाठ जबड्याने पकडलेला दुर्गेचा सिंह,
देवीने आपल्या पायाने दाबलेली त्या रेड्याची पाठ आणि असुराचे केस धरून
रेड्याच्या मानेतून त्याला खेचून बाहेर काढलेले आहे. एका बाजूला त्रिशूळ,
वज्र, बाण, भाला, डमरू, आणि मानेच्या पाठीमागे पकडलेली तलवार. तर दुसऱ्या
हातात ढाल, नाग, पाश, घंटा, इत्यादी आयुधे. दुर्गेच्या डोक्यावर असलेल्या
मुकुटापासून ते गळ्यातल्या माळा, मेखला, पायातील पैंजण या आणि अशा सर्वच
गोष्टी परिपूर्ण असाव्यात अशाच इच्छेने कोरलेल्या आहेत. एवढे प्रचंड युद्ध
होईन देखील देवीच्या चेहऱ्यावर असणारे स्मितहास्य तिच्या ताकदीची आणि
पराक्रमाची चुणूक दाखवून जाते.
सूर्य
लेख ४
मित्र, रवी, भानू, हिरण्यगर्भ अशा
अनेक नावांनी ओळखला जाणारा सूर्य हा या सृष्टीच्या जीवनाचा गाभा आहे.
प्रकाश देणारा, बळ देणारा आणि या अवकाशात अखंड भ्रमण करणाऱ्या या सूर्याची
अनेक वेगवेगळी रूपं आहेत. अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये याला अत्यंत महत्त्व
दिले गेले आहे. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये जे प्रमुख पाच पंथ आहेत
त्यापैकी सौर्य म्हणजेच सूर्याची उपासना करणारे हा देखील आहे. इतर चार
म्हणजे - वैष्णव, शैव, शाक्त आणि गाणपत्य. या सूर्याचे जे रूप आज आपल्याला
शिल्पांमध्ये दिसते त्यावर भारतातल्या आणि भारताबाहेरील अनेक संस्कृतींचा
प्रभाव आहे. सूर्याचे महत्त्व एवढे जास्त आहे की अगदी सुरवातीच्या
जनपदांपासून ते नंतरच्या काळातील राजांच्या नाण्यांवर देखील आपल्याला
चिन्हांकित सूर्य प्रतिमा बघायला मिळतात. सूर्याची शिव, वराह (विष्णू
अवतार) आणि ब्रह्मदेव यांच्या बरोबर एकत्रित अंकन केलेली शिल्पं काश्मीर,
वाराणसी आणि मध्य प्रदेश अशा ठिकाणी बघायला मिळतात.
या
फोटो मधील शिल्पाच्या आधाराने आपण आता सूर्याची प्रतिमा समजून घेऊयात.
सर्वात खाली सूर्य सतत फिरत असतो ही संकल्पना अधोरेखित करून त्याचा रथ आणि
घोडे दिसतात, यांची नावं देखील गायत्री, अनुष्टुप,पंक्ती, इत्यादी सात
छंदांवर आधारलेली आहेत. सूर्याचा सारथी अरुण हातामध्ये लगाम घेऊन बसला आहे.
सूर्याच्या पायात असणारे बूट हे त्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.
प्रदक्षिणा मार्गाने निरीक्षण केल्यास आधी पिंगल (सूर्याचा सेवक - याने
हातामध्ये दौत आणि लेखणी धरलेली असते), वरच्या हातात कमळ, माळा घेतलेले
गंधर्व, डोक्यामध्ये प्रभावळ, परत हातामध्ये कमळ, आणि शेवटी शिल्पाच्या
डावीकडे खाली दंड नावाचा अजून एक सेवक आपल्याला दिसतो. हातामध्ये असणारी
कमळ ही सूर्य मूर्ती ओळखण्यासाठी खूप मदत करतात. सूर्याच्या पत्नी आणि मुलं
यांची माहिती विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये वाचायला मिळते. याच बरोबर कूर्म
आणि अग्नी या पुराणांमध्ये देखील सूर्य वर्णने लिहिलेली आहेत.
सर्वांना
प्रकाश देणाऱ्या सूर्याला थोडा उजेड आमच्याकडे देखील पाड आणि या
उन्हाळ्यात दाहकता कमी कर एवढीच आम्हा सर्वांची त्या आदित्यचरणी
प्रार्थना!
शिल्प - भुबनेश्वर राज्य संग्रहालय, ओडिसा
इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
Pos
विष्णू
लेख ३
भारतीय संस्कृतीचे अनेक पैलू आणि वैशिष्ठ्य आहेत, त्यापैकी एक
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मूर्तींची पूजा. परकीय आक्रमणे सुरू झाली आणि
आपल्याकडे होणारी वैचारिक प्रगती थांबली, यामुळेच शिल्पकला याकडे दुर्लक्ष
झाले. नंतरच्या काळात परकीय अभ्यासकांनी भारतीय शिल्पांची वर्णने ही बीभत्स
किंवा भयंकर शिल्पं असतात आणि यापलीकडे याला काही महत्त्व नाही अशी केली.
आपले साहित्य शब्दशः भाषांतर करून मूळ मुद्द्यापासून लांब नेले.
आपल्याकडच्या अनेक साहित्यिकांनी आणि अभ्यासकांनी हीच री पुढे ओढली. पण
डेक्कन कॉलेज चे सांकलिया सर, डॉ. नि. पु. जोशी, डॉ. देगलूरकर, डॉ.
जामखेडकर, डॉ. ढवळीकर, किरीट मंकोडी अशा अनेक अभ्यासकांनी या कलेच्या
मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कै. उदयन इंदूरकर सारख्या माणसांनी
जनमानसात हा विषय रुजवला.
शिल्प किंवा मूर्ती हे आपल्याकडे साध्य नसून साधन आहे त्या पाठीमागे
लपलेल्या संकल्पनेला समजून घेण्यासाठीचे. तीन महत्त्वाच्या देवांपैकि एक
म्हणजे विष्णू. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील याचे अनेक उपासक आहेत.
जगातले सगळ्यात मोठे विष्णू मंदिर हे भारतात नसून बँकॉक पासून जवळ असलेल्या
कंबोडिया नावाच्या देशात आहे. मूर्तीच्या मागे लपलेल्या संकल्पना समजून
घ्यायच्या असतील तर आधी ती मूर्ती समजून घेणे गरजेचे आहे. या फोटो मध्ये
असलेला विष्णू आता बघुयात. डावीकडून बघताना हातामध्ये कौमोदकी नावाची गदा
दिसते, पांचजन्य शंख, डोक्यावर प्रभावळ आणि किरीट मुकुट, पद्म किंवा कमळ
आणि सुदर्शन चक्र अशी आयुधे आहेत. छातीवर श्रीवत्स नावाचे चिन्ह दिसते आहे.
'अहिर्बुध्न्य संहिता ' नावाच्या उपनिषद ग्रंथात विष्णूच्या हातांचा आणि
आयुधांचा नक्की अर्थ काय आहे याचे वर्णन आले आहे. विष्णू हा मत्स, कुर्म,
वराह, वामन, इत्यादी अनेक अवतरांमध्ये दिसतो. भक्तीचे महत्त्व समाजात
पसरवण्याचे खूप मोठे श्रेय हे या वैष्णव संकल्पनेला जाते.
मूर्ती - संकर्षण (विष्णू)
दिल्ली नॅशनल मुझियम
शिव
लेख - २
शंकर किंवा शिव हा भारतात पुजल्या जाणाऱ्या महत्वाच्या
देवतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा देव. या शंकराचे मूळ काही हजार वर्ष मागे
जाते. अतिप्राचीन कालखंडात लिंग रूपाने पूजन होणारा देव, जनन आणि
पुनर्निर्मिती दाखवणारा देव, वेदांमध्ये दिसणारा रुद्र, महायोगी शिव, सगळं
काही आपल्या क्रोधाने नष्ट करणारा प्रलय आणि त्याच वेळेला परम भक्ताच्या
मागण्या पूर्ण करणारा शिव, अशा शेकडो छटा या महादेवाच्या आहेत. स्मशानात
अंगाला राख फासून राहणाऱ्या साधुंपासून ते तलम वस्त्र घालून राजवाड्यात
राहणाऱ्या राजापर्यंत सगळ्यांना याने आपल्यात सामावून घेतले आहे.
मंदिराच्या गर्भ गृहात प्रामुख्याने लिंग स्वरूपात याचे पूजन होत असेल
तरीही शिल्पशास्त्रात शंकर या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रयोग झाले
आहेत.
शंकराच्या शिल्पामध्ये काही प्रमुख गोष्टी आपल्याला बघायला
मिळतात. डोक्यावर असलेल्या जटा किंवा जटा मुकुट, कपाळावर कोरलेला तिसरा
डोळा, हातात पकडलेला त्रिशूळ, शिवाला अत्यंत प्रिय असलेले वाद्य म्हणजेच
डमरू, इत्यादी लांच्छने बघून शिवाचे शिल्प ओळखता येते.
आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी
सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती
स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली
वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड
दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे
त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात.
लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला
मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात
प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.
मूर्ती - केवल शिव, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई
गणपती
आपल्याकडे कुणीही एखादे चांगले काम सुरू केले की आपण कामाचा
श्रीगणेशा झाला असं म्हणतो, शुभकार्यात गणपतीला विशेष मान आहे,
माझ्यासारख्या पोटासाठी जगणाऱ्या लोकांसाठी गणपतीचे मोदक हे त्याच्यावर
प्रेम करण्यासाठी मिळालेले अजून एक कारण! 😊
या
मालिकेची सुरुवात देखील आपण श्रीगणेशाने करणार आहोत. मंदिरांवर मोठ्या
प्रमाणात कोरल्या गेलेल्या देवांपैकी हा एक देव आहे. समृद्धी आणि ज्ञान
यांचे लक्षण असलेली ही देवता ओळखण्यासाठी सोपी आहे. कुठलाही देव किंवा
शिल्पं ओळखण्यासाठी काही प्रमाणे आहेत,
१. हातामध्ये असलेली आयुधे
२. शरीराची ठेवण, रचना
३. वाहन
४. मुकुट, केश आणि इतर दागिने
गणपतीच्या
हातामध्ये खालील आयुधे प्रामुख्याने दिसतात - अक्षमाला, पाश, दंड,
मोदकपात्र, भग्न - दंत, अंकुश आणि परशू. गणपतीला प्रामुख्याने ४ हात
दाखवलेले असतात पण अनेक ठिकाणी २ किंवा ८ हातांचा गणेश देखील बघायला मिळतो.
पायाशी त्याचे वाहन - मूषक (उंदीर) देखील कोरलेला असतो.
शिल्पाचे
वर्णन किंवा निरीक्षण करताना ते क्लॉकवाइज केल्यास मूर्ती समजणे सोपे
जाते. या फोटो मधल्या गणपतीचे निरीक्षण करूयात. पाय दुमडून बसलेला गणपती,
लेखणी सारखा पकडलेला भग्न दंत, हात तुटलेला, पद्म, मोदकपात्र, पायात उंदीर
(उंदराचे कान दिसतात). अंगात सर्प यज्ञोपवित परिधान केले आहे.
कपाळावर
असलेल्या आठ्या, वर गेलेल्या भुवया आणि बारीक झालेले डोळे हे एकाग्रता
दर्शवतात, का बरं एवढं एकाग्र होऊन बसावे लागले असेल गणपतीला?
व्यासांनी
महाभारत लिहिण्याचा घाट घातला आणि गणपतीला लेखनिक होण्याची विनंती केली,
देवच तो.. रागावला. म्हणाला ठीक आहे, पण एका अटीवर, मी एकदा लिहायला सुरू
केले की थांबणार नाही. समोर व्यास होते, म्हणाले अट मान्य, पण माझी पण एक
अट आहे. प्रत्येक श्लोक समजून घेऊन मगच लिहायचा. लिखाण सुरू झालं, मध्येच
व्यास एखादा कुट श्लोक (कोडं) सांगायचे आणि ते सोडवायला गणपतीला बराच वेळ
लागायचा आणि त्या वेळात ते पुढचे श्लोक रचायचे, ना गणपती थांबले ना
व्यास... आणि महाभारत तयार झालं. हे शिल्प त्या कलाकाराने तो महाभारत
लिहिणारा गणपती डोळ्यासमोर ठेऊन कोरले असावे.
या कथा कायम काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत असतात. काही मिळतंय का बघा!
शिल्पाचे ठिकाण - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई
रानी की वाव - पाटण - गुजरात
रानी की वाव
दक्षिण भारतात समुद्राच्या सीमा ओलांडून चोल राजे आपला पराक्रम गाजवत होते, महाराष्ट्रात यादवांचं राज्यं अत्यंत बळकट होतं त्याचवेळेला गुजरात मध्ये सोळंकी घराण्याचा विस्तार वाढत होता. या घराण्यानी केलेल्या सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीमुळे, सोळंकी साम्राज्याच्या सीमा सर्वदूर पसरण्यासाठी खूप मोठी मदत झाली. याच काळात भारतभरात विविध राजघराणी अनेक सुंदर सुंदर स्थापत्य उभी करत होती. स्टेप-वेल (पायऱ्या असलेली विहीर) अशी साधी वाटणारी संकल्पना काळाच्या ओघात अत्यंत अवघड पण खूप सुंदर अशा स्थापत्य शैलीमध्ये परावर्तित झालेली दिसते. धोलावीरा इथे झालेल्या उत्खननात अशा प्रकारचं स्थापत्य आपल्याला बघायला मिळतं. पाण्याच्या साठ्यापर्यंत जाण्यासाठी केलेली मानवनिर्मित सोय या सुरवातीच्या कल्पनेपासून या स्थापत्याचा मंदिरापर्यंतचा प्रवास आपल्याला गुजरात मध्ये बघायला मिळतो.
राणी उदयनमती हिने सोळंकी राजा आणि पती भीमदेव (पहिला) याच्या स्मरणार्थ पाटण येथे, सरस्वती नदीच्या काठी हे स्थापत्य घडवायचा निर्णय घेतला. अकराव्या शतकात तयार झालेली हि रानी की वाव १९६० सालापर्यंत संपूर्णपणे नदीच्या पाण्याने आणि गाळाने भरलेली होती आणि कदाचित म्हणूनच परकीय आक्रमकांच्या नजरेतून हे स्थापत्य वाचले. भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन करून हे सांस्कृतिक वैभव आपल्या सर्वांसाठी मोकळे केले. युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांमध्ये या जागेचा समावेश होतो.
पूर्वाभिमुख रचना असलेले हे स्थापत्य ६० मीटर लांब, २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल आहे. चार भागांमध्ये विभागले गेलेले हे स्थापत्य अत्यंत सुंदर अशा शिल्पांची अलंकृत आहे. खांबांच्या आधाराने बाल्कनी करून, वेगवेगळ्या उंचीवर आणि वेगवेगळ्या आकारात हे विभाजन केले आहे. यापैकी सर्वात खालचे दोन भाग हे नैसर्गिक कारणांमुळे झालेले नुकसान आणि अतिउत्साही पर्यटक यामुळे बंद केले आहेत. पूर्वेकडून या विहिरीत उतरायला पायऱ्या बांधल्या आहेत तर पश्चिमेची बाजू ही डोंगराच्या कड्यासारखी सरळ असून त्यावर शेषशायी विष्णू मूर्ती कोरल्या आहेत.
रानी की वाव मध्ये विष्णू आणि विष्णूचे अवतार, शिव, दुर्गा, भैरव, सुरसुंदरी, योगिनी अशी अनेक शिल्पं कोरली आहेत. यापैकी काहींचा परिचय इथे करून घेऊयात.
भैरव
शंकराच्या रौद्र रूपांपैकी एक म्हणून भैरव समजला जातो. अनेक पुराणांमध्ये या संदर्भातल्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. या ठिकाणी असलेला भैरव हा १८ हातांचा आहे. वरच्या दोन हातांमध्ये पकडलेला साप, उजवीकडच्या हातांमध्ये असलेलं खङग, डमरू आणि तिथेच खाली प्रेताचा हात खाणारा एक गण दिसतो. डावीकडे खालच्या हातात केसांना धरलेलं डोकं आणि ते चाटणारं कुत्रं कोरलं आहे. बीभत्स तरीही सुंदर. अत्यंत बारकाईने कोरलेली केशरचना, गळ्यातले दागिने आणि कमरेच्या वस्त्रावर कोरलेली नक्षी लक्ष वेधून घेते.
वराह
विष्णूच्या दशावतारांपैकी हा तिसरा अवतार मानला जातो. या मूर्तीच्या स्थापनेमुळे राज्यप्राप्ती होते असे संदर्भ आपल्याला अग्नीपुराणात बघायला मिळतात. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला समुद्रात लपवले आणि विष्णू वराहाच्या रूपाने प्रकट झाले, त्या राक्षसाचा संहार केला आणि पृथ्वीला वाचवले अशी ही कथा आहे. इथे असलेली मूर्ती ही शिल्पशास्त्राचे खूप सुंदर उदाहरण म्हणून बघता येईल. कमळावर पाय ठेऊन उभा असलेला, शंख, चक्र आणि गदा धारण केलेला, त्यानं जीला वाचवलं ती पृथ्वी कोपऱ्यातून दुमडलेल्या त्याच्या हातावर बसलेली आहे, असा ताठ उभा असलेला हा वराह अत्यंत रुबाबदार दिसतो. कमरेत खोचलेलं खंजीर आणि वस्त्रांवरचं नक्षीकाम कलाकारांनी खूप सुंदर केलं आहे. या मूर्तीच्या बाजूला छोट्या छोट्या देवकोष्ठांमध्ये विष्णूची इतर रूपे कोरली आहेत.
ओडिसा : परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर
लोककला,
संस्कृती, नृत्य, कापडावराची कलाकुसर यांनी ओळखला जाणारा, भारताच्या
पूर्वेला आणि बंगाल उपसागराच्या किनारी वसलेला सुंदर प्रदेश म्हणजे ओरिसा!
पण या प्रदेशाची ओळख एवढ्यापुरती मर्यादित नक्कीच नाही. अगदी २२००-२३००
वर्षांपूर्वीचे कला, स्थापत्य आणि मूर्तींचे पुरावे आपल्याला या भागात
सापडतात. मौर्य सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धात रक्तबंबाळ झालेला हा
प्रदेश, इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून जैन आणि बौद्ध गुहांनी नटलेला हा
प्रदेश आणि सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अत्यंत सुंदर आणि
प्रचंड मोठी मंदिरे बांधली गेलेला हा प्रदेश.
ढोबळमानाने
उत्तरेकडे असलेल्या मंदिरांना नागर प्रकारची मंदिरे म्हणतात. ओडीसा मधली
मंदिरे नागर शैलीची म्हणता येतील, पण सुरवातीपासूनच तिथे एक प्रादेशिक
शैलीचा विकास होत होता, आणि हि उपशैली “कलिंग शैली” म्हणून ओळखली जाऊ
लागली. जसं जसं आपण एकेका मंदिराबद्दल जाणून घेऊ तेंव्हा या शैलीचा नीट
विचार करू.
इसवीसनाच्या सातव्या शतकात बांधलं गेलेलं ओरिसा मधलं पहिलं मंदिर – परशुरामेश्वर !
आपण
मंदिराच्या ज्या भागाला मंडप असं म्हणतो त्यालाच तिकडे ‘जगमोहन’ असं
म्हणतात, गाभाऱ्याच्या वर असलेल्या शिखराला रेखा देऊळ तर मंडपाच्या (जगमोहनाच्या) वर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात.
या
मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी त्याच्याभोती आयताकृती भिंत बांधली आहे
आणि अशी रचना ओरिसा मधल्या अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळते.
या
मंदिरातली शिल्पं खूप सुंदर आहेत. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर
समोरच गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर सुंदर गणपती कोरला आहे. आकाराने जरी
हे मंदिर थोडं लहान असलं तरीही यावर शिल्पं मोठ्या प्रमाणात कोरली गेली
आहेत. जगमोहनात (मंडपात) प्रवेश
करताना प्रवेशद्वाराच्या वर शंकराची उपासना करणारे साधक कोरले आहेत आणि
दुसऱ्या दाराच्या वरच्या भागात अभिषेकलक्ष्मी कोरली आहे.
जैन,
बौद्ध यांनी सुद्धा ‘अभिषेकलक्ष्मी’ या शिल्पाचा मोठ्या प्रमाणात
त्यांच्या स्थापत्यामध्ये वापर केलेला आढळून येतो. कमळावर बसलेल्या
लक्ष्मीला दोन सुशोभित हत्ती दोन्ही बाजूनी अभिषेक करत आहेत असे हे शिल्प
आहे.
जगमोहनाच्या भिंतीवर एका बाजूला गणपती आणि एका बाजूला वीरभद्र यांच्यामध्ये कोरलेल्या अष्टमातृका सुद्धा बघण्यासारख्या आहेत.
अष्टमातृका : अष्टमातृका
किंवा सप्तमातृका या देवांच्या सिद्धी किंवा त्यांची शक्ती होत. प्राचीन
काळापासून मातृका पूजनाचे पुरावे आपल्याला मिळतात. ब्रम्हाणी/ब्राम्ही
(ब्रह्म), माहेश्वरी (शिव), कौमारी (कार्तिकेय), वैष्णवी (विष्णू),
वाराही (वराह अवतार), इंद्राणी (इंद्र), चामुंडा आणि आठवी लक्ष्मी म्हणून
सांगितली आहे.
याचबरोबर महिषासुरमर्दिनी, उमा-महेश्वर, कार्तिकेय यांची शिल्पं सुद्धा अत्यंत सुंदर कोरलेली आहेत.
परशुरामेश्वर मंदिराच्याच जवळ त्यानंतर बांधलं गेलेलं मुक्तेश्वर मंदिर आहे.

काही
अभ्यासकांच्या मताप्रमाणे सोमवंशी घराण्यातील पहिल्या काही राजांपैकी एक
म्हणजे ययाती (पहिला) त्याने हे मंदिर बांधले. ओरिसा मंदिर स्थापत्य आणि
मुर्तीशास्त्र या दोन्हीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आणि तेवढेच सुंदर
असे हे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताना एका मोठ्या तोरणातून प्रवेश
करावा लागतो जे अखंड कोरीव काम केलेल्या दोन खांबांवर स्थिरावलेले आहे. या
मंदिराच्या भोवती कोरीवकाम केलेला सरंक्षण कठडा बांधला आहे.
मुक्तेश्वर मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे याच्या जगमोहानात खांब नाहीत आणि आतून व बाहेरून या भिंती कोरीव कामाने सजवलेल्या आहेत.
वरच्या
दोन हातात पकडलेला नाग, एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात त्रिशूळ,
चेहऱ्यावर शांत भाव आणि एका हाताने पार्वतीच्या गालाला केलेला स्पर्श असं
हे नटराजाचं शिल्पं तिथल्या कलाकारांच्या प्रतिभेचा पुरावा म्हणून पुरेसं
आहे.
या
मंदिरावर माकड आणि मगर यांच्या पंचतंत्रातल्या कथा सुद्धा कलाकारांनी
कोरून ठेवल्या आहेत. जगामोहानाच्या आतल्या बाजूला छतावर कोरलेल नृत्य गणेश,
शेजारी मोर असलेला कार्तिकेय नीट बघितल्याशिवाय दिसत नाहीत.
मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने परिपूर्ण असं हे मुक्तेश्वर मंदिर, कलिंग मंदिर स्थापत्य शैलीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे.
वारसा स्थळे का बघावीत?
संस्कृती, परंपरा, इतिहास, भाषा, लिपी,साहित्य, कला, शिक्षण, तत्वज्ञान,
राजकारण, व्यापार या आणि अशा अनेक गोष्टी आपल्या समाजाला आकार देत असतात.
यात सगळ्यात महत्वाचा असतो तो आपला इतिहास. भविष्याची जडणघडण नीट
होण्यासाठी भूतकाळाची माहिती असणे आवश्यक ठरते.
जगात इजिप्शियन, रोमन, ई. सारख्या अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लोप
पावल्या. अनेक संस्कृती अशा आहेत ज्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा या
निव्वळ काही लेखी उल्लेख आलेत तिथे जाणवतात. पण हे सगळं आमचं आहे, हे
आमच्या पूर्वजांनी केलंय असं म्हणणारे लोक आज तिथे भेटत नाहीत.
भारतीय उपखंडात तयार झालेली, टिकलेली वैशिष्ट्य पूर्ण संस्कृती ही आमची आहे
हे आज आपण अभिमानाने सांगतो. आपल्या घरी काढली जाणारी रांगोळी, साजरा केले
जाणारे वेगवेगळे सण, घरी म्हणतो त्या आरत्या इथपासून ते गुहांमधली चित्रे,
लेण्या, मंदिरे, विहार, संस्कृत - पाली साहित्य, दाक्षिणात्य साहित्य,
कला, संगीत हे सगळं आपलं आहे, याची साक्ष देतात. आपल्यावर अनेक संकटं आली,
परकीय आक्रमणे झाली, पण त्या सगळ्यांना आपलं करून, इथलेच एक बनवून
संस्कृतीचा पाया घट्ट ठेवला.
या अशा हजारो वर्षे आपली ओळख नं गमावता, आपल्या मुळांना नीट सांभाळून
ठेवलेल्या संस्कृतीची माहिती आपल्या सगळ्यांना असणं ही आजची गरज आहे. जो
पाया आपल्याला आज उभ्या असलेल्या समाजाला आधार देतो तो समजून घेणे हे खूप
महत्त्वाचे आहे.
आपल्या संकल्पना, तत्वज्ञान, साहित्य हे खूप काळ साठवून ठेवायचं असेल तर ते
सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. हाच विचार लक्षात घेऊन
भारतीय इतिहासाचा एक अत्यंत महत्वाचा, सुंदर आणि भन्नाट प्रयोग सुरू
झाला.... भारतीय मंदिरे!
अगदी छोट्या मंदिरापासून ते शेकडो फूट उंच कळस असलेल्या मंदिरांची निर्मिती
केली गेली, एकाच पाषाणात प्रचंड मंदिरे कोरली गेली ज्याला मोनोलिथ
म्हणतात, ईशान्य भारताच्या दऱ्याखोऱ्यात, हिमालाच्या कुशीत, समुद्राच्या
किनाऱ्यावर आणि राजस्थान - गुजरात यांच्या वाळवंटात असे संपूर्ण भारतभर
ह्या यशस्वी प्रयोगाची रचना झाली. भारताच्या बाहेर सुवर्ण द्वीसमूह म्हणजे
आजचे इंडोनेशिया, बाली, सुमात्रा, कंबोडिया अशा देशांमध्ये आपल्या
संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार झाला.
भारतीय कलेच्या आधाराने भारतीय संस्कृती समजून घेण्याचा हा प्रयोग आहे.
मंदिरे ही फक्त नमस्कार करण्यासाठी नसून ती ज्ञानाची केंद्र आहेत हे
समजावून देण्याचा हा प्रयत्न आहे.
धन्यवाद!
सप्तमातृका

प्रागैतिहासकालापासून मानवाने मातृदेवतांचे पूजन केले आहे आणि त्याचे
पुरावे उत्खननात मूर्त्यांच्या रुपात सापडले आहेत. साधारणपणे २५०००
वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगीन मानव स्त्रीदेवतेची पूजा करत होता हे
बागोर (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या उत्खननात आढळून आले. येथे केलेल्या
उत्खननात गोलाकार कट्ट्यावर त्रिकोणी आकाराचा दगड आढळून आला. या दगडावरील
त्रिकोणी चिन्ह कोरलेले नसून नैसर्गिक आहे. तेथील बैगा आणि कोल जमातीच्या
स्त्रिया अशा प्रकारच्या दगडांची पूजा कढाई-की-देवी या नावाने करतात. ही
देवी आरोग्याचे आणि सुफलनाचे प्रतिक मानली जाते. सिंधू संस्कृतीच्या अनेक
स्थळांवर केलेल्या उत्खननात मातृदेवतांच्या स्त्री-मूर्ती सापडलेल्या आहेत.
त्याचबरोबर एका सिंधू मुद्रेवर कोरलेल्या सात स्त्रियांचे शिल्पांकन
महत्त्वाचे ठरते, कारण सप्तमातृकांचा तो सर्वात जुना पुरावा असावा.
सप्तमातृकांच्या उत्पत्तीबद्दल पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या
आहेत. महाभारतातील कथेनुसार प्रल्हादानंतर सत्तेवर आलेल्या अंधकासुराला
मारण्यासाठी प्रमुख देवतांनी आपली शक्ती निर्माण करून त्यांना युध्दात
पाठवले. कुर्मपुराणानुसार अंधकासुर मारला गेल्यानंतर भैरवाने ह्या
मातृकांना पाताळात पाठवले. परंतु ह्या मातृकांनी स्वतःची भूक भागवण्यासाठी
सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्यासाठी भैरवाने
नरसिंहाची प्रार्थना केली आणि नंतर नरसिंहाने पाताळात जाऊन मातृकांना शांत
केले. सुप्रभेदागम ग्रंथानुसार निर्रिता राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रम्हाने
सप्तमातृकांची निर्मिती केली. देवीने केलेल्या सिंहनादापासून
सप्तमातृकांची उत्त्पती झाली अशी कथा वामनपुराणामध्ये सांगिलते आहे.
मार्कंडेयपुराणानुसार अंबिका व चामुंडा यांनी रक्तविज राक्षसाला युध्दात
मारून टाकले. या युध्दात इतर मातृकांनी अंबिका व चामुंडा यांना मदत केली
होती. सप्तमातृकांचा उल्लेख ऋग्वेद, गोभिलस्मृती, मत्सपुराण, वराहपुराण इ.
धार्मिक ग्रंथात वाचायला मिळतो.

सप्तमातृका ह्या प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृकांची
संख्या सुरुवातीच्या काळात ७ किंवा ८ होती. पण पुढील काळात त्यांची संख्या
१६, ३२ आणि ६४ अशी बघायला मिळते. देवी भागवतांत ३२ मातृकांची यादी दिलेली
आहे. ब्रह्माची ब्राह्मी/ब्रह्माणी, इंद्राचीइंद्राणी/ऐन्द्री,
महेशाचीमाहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही,
यमाची चामुंडा या प्रमुख देवतांच्या शक्ती. त्याशिवाय शिवदूती, नारसिंही,
योगेश्वरी, काली, वारुणी आणि वैनायकी या मातृकांचे संदर्भसुध्दा विविध
पुराणांमध्ये वाचायला मिळतात.
भारतातील सर्वात जुना सप्तमातृकापट मथुरेजवळील धनगाव येथे सापडला. हा
शिल्पपट कुषाणकालीन असून सद्यस्थितीत मथुरा संग्रहालयात जतन करून ठेवण्यात
आलेला आहे. यातील मातृकांचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमंडलु
धरलेला आहे. ह्या सर्व मातृका कोणत्याही आयुधाशिवाय आणि वाहनाशिवाय आहेत.
कुमारगुप्त पहिला याचा मांडलिक विश्ववर्मन याच्या गंगाधर शिलालेखानुसार (सन
४२३-४२४) विश्ववर्मन याने मातृदेवतेचे मंदिर उभारले होते. बदामी येथील
चालुक्य राजवंश सप्तमातृकांची पूजा करत होते आणि त्यांचे शिलालेख ह्या
गोष्टीची साक्ष देतात.
सुरुवातीच्या काळात कोणत्याही वाहन आणि आयुधाशिवाय असलेल्या मातृकांच्या
मूर्तिशास्त्रात हळूहळू बदल होत गेले. मातृका ह्या प्रमुख पुरुष
देवतांच्या शक्ती असल्यामुळे आणि शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे,
त्यांच्या मूर्तीस्त्रीरुपात घडवल्या जातात. प्रमुख देवतेची मातृका प्रमुख
देवतेसारखीच असली पाहिजे, तसेच मातृका बसलेल्या असाव्यात, त्यांना चार हात
असावेत, त्यापैकी उजवा हात अभयमुद्रेत, डावा हात वरदमुद्रेत आणि उरलेल्या
दोन हातात प्रमुख देवतेची आयुधे असावीत असे तसेच सुप्रभेदागम या ग्रंथात
सांगितले आहे. सप्तमातृकांच्या मुर्त्या दिसायला एक सारख्याच असतील, तर
अशावेळी त्यांच्या वाहनांवरून आणि आयुधांवरून मातृकांची ओळख ठरवता येते.
काही शिल्पपटांमध्ये मातृकांच्या मांडीवर किंवा त्यांच्या शेजारी
मातृत्वाचे प्रतिक म्हणून लहान मुले दाखवली आहेत. गुप्तकाळापासून
सप्तमातृका शिल्पपटात सुरुवातीला वीरभद्र (शिव) आणि सर्वात शेवटी गणपतीचे
अंकन करण्यास सुरुवात झाली. अनेकदा वीरभद्र वीणावादन करताना दाखवलेला असतो.
सप्तमातृका पटाशिवाय वैष्णवी, इंद्रायणी, माहेश्वरी, वाराही, चामुंडा,
वैनायकी इ. मातृकांच्या स्वतंत्र प्रतिमासुध्दा बघायला मिळतात. शिवाशी
निगडीत असल्यामुळे शैवमंदिरात किंवा शैवलेण्यात सप्तमातृकांचे शिल्पांकन
अनेकदा बघावयास मिळते.
ब्रह्माणी: हिला चार मुखे असून अंग सुवर्णासारखे तेजस्वी असते. उजवा हात
अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात अक्षयसूत्र
आणि दुसऱ्या हातात कमंडलु असते. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले
असते. तसेच तिच्या डोक्यावर करंडमुकुट असतो. ब्रह्माणी लाल रंगाच्या
कमळावर बसलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: हंस
वैष्णवी: उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका
हातात चक्र आणि दुसऱ्या हातात शंख असतो. हिने पिवळे वस्त्र (पितांबर)
परिधान केलेले असते. तसेच डोक्यावर किरीटमुकुट असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह:
गरुड
इंद्राणी: इंद्राणीला चार डोळे आणि चार हात असतात. उजवा हात आणि डावा
हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असून इतर दोन हातात वज्र आणि शक्ती
धारण केलेली असते. हिचा रंग लाल असून डोक्यावर किरीट असते. वाहन आणि
ध्वजचिन्ह: ऐरावत/हत्ती
माहेश्वरी: हिला चार हात असून उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय
मुद्रेत व वरद मुद्रेत असतो. इतर दोन हातात शूल आणि अक्षमाला धारण केलेली
असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: वृष/बैल
कौमारी: चार हातांपैकी उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा हात वरद मुद्रेत
असतो, तर इतर दोन हातात शक्ती आणि कोंबडा असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: मोर
वाराही: हिचे मुख वराहासारखे असून डोक्यावर करंडमुकुट असतो. तिच्या
हातात हल आणि शक्ती असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. वाहन आणि
ध्वजचिन्ह: महिष
चामुंडा: इतर मातृकांपेक्षा हिचे शिल्पांकन भयावह असते. केस विस्कटलेले
असतात. डोळ्यांचा रंग लाल असतो. हातात कपाल आणि शूल असून इतर दोन हात अभय व
वरद मुद्रेत असतात. यज्ञोपवीत म्हणून मुंडक्यांची माला आणि मुंडक्यांचा
मुकुट धारण केलेला असतो. छातीच्या बरगड्या दिसत असतात, स्तन ओघळलेले असून
सुळे बाहेर आलेले असतात. कधीकधी हिच्या पोटावर विंचूचे शिल्प असते. वाहन
आणि ध्वजचिन्ह: गिधाड/कावळा/शव
वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांच्या उत्त्पतीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत
असताना वराहपुराण त्यांचा संबंध आठ मानवी दोषांशी जोडतो. वराहपुराणानुसार
योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, चामुंडा आणि
वाराही या मातृका अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर,
पैशून्य(पशुत्व) आणि असूया या दोषांची प्रतिके आहेत.
- घारापुरी लेणी
- वेरूळ लेणी (भव्य आकारातील मातृका)
- वाडेश्वर मंदिर, अंभई (ललाटबिंबावर सप्तमातृका)
- भुलेश्वर मंदिर, यवत (वैनायकी मातृका)
- पाटेश्वर मंदिर व लेणी परिसर (अष्टमातृका)
- धर्मापुरीचा किल्ला, धर्मापुरी
- औंढ्या नागनाथ मंदिर, औंढ्या नागनाथ
- दाशरथेस्वर मंदिर, मुखेड (नृत्य करण्याऱ्या सप्तमातृका)
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
- जोगेश्वरी लेणी, जोगेश्वरी-मुंबई
- राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
- टाकळी ढोकेश्वरची लेणी
संदर्भ:
- भारताची कुळकथा, डॉ. मधुकर केशव ढवळीकर
- भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी
– स्नेहल आपटे