अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या पाली परिसरात अनेक एतिहासिक ठिकाणे आहेत.सुधागड्,सरसगड हे महत्वाचे किल्ले तर मृगगड्,अनघाइ हे दुय्यम किल्ले ,उंबरखिंडीसारखी शिवरायांच्या पराक्रमाच्या आठवणीत बुडून गेलेली घाटवाट्,तसेच सव घाट्,वाघजाई घाट्,सवाष्णी घाट्,भोरप्या,नाणदांड्,गाढवलोट या सह्याद्रीतून उतरणार्या वाटा किंवा प्राचीन व्यापारी मार्गाच्या खुणा मिरवणारी ठाणाळे,गोमाशी,खडसांबळे अशी लेणी यांनी पाली परिसराचे प्राचीनत्व अधोरेखित केले आहे. यातील खडसांबळे लेण्यांची आपण माहिती घेणार आहोत.
खड्सांबळे सुधागड्,घनगड परिसराचा नकाशा
लेण्यावर पोहोचण्याच्या वाटा :
खडसांबळे लेण्यांना जायचे तर दोन पर्याय आहेत.एकमार्ग घाटावरुन तर दुसरा मार्ग कोकणातून.
कोकणातून जायचे झाल्यास मुंबई मार्गे खोपोली रेल्वे स्थानकात येवून तेथून खाजगी वाहनाने नेणावली गावात पोहचता येते नेणावली गावात वाघमारे वाडी हि आदिवासी लोकांच्या वस्ती मधून लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता आहे . पालीहून ठाकुरवाडी नियमित बस आहेत, ठाकुरवाडीला उतरून दिड एक तासात जाता
येइल. तसेच नेणवली कोशींबळे बसने नेणवलीत उतरून तेवढाच वेळ लागेल.
लेण्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही लेण्या बघायला जाताना सोबत पाच लिटर पाणी प्रत्येकी घेवून जाणे लेणी वर जेवणाची व्यवस्था नाही खाली गावात व्यवस्था होईल.
देशाकडून हि लेणी पहायची तर घनगड बघून केवणी मार्गे नाणदांड घाट किंवा नाळेच्या वाटेने खाली उतरुन खडसांबळे गावातून लेण्यांकडे जाता येईल. प्राचीन बंदर चौलपासून सह्याद्री घाटमाथ्यावर चढणा-या जुन्या घाटवाटांपैकी तीन व्यापारी घाटवाटा - नाणदांड घाट, नाळेची वाट अन् घोणदांड घाट या खो-यात आहेत, तर त्यांचे संरक्षक दुर्ग कोकणात सुधागड तर माथ्यावर तेलबैला अन् घनगड असे दिग्गज.
नाणदांड घाटमार्गे :-
‘नाणदांड घाटा’ची सुरुवात सापडताना थोडी खटपट करावी लागली. वाटाड्याच्या असला तर सोयीचे . माथ्याकडून उतरलेल्या दांडावरचा मोठ्ठा कातळटप्पा हे ‘नाणदांड’ चढण्यासाठी अचूक दांड ओळखायची खूण.
नाळेची वाट :-
देशावरच्या केवणीतून खाली कोकणात खडसांबळाल्याला उतरायला नाळेची वाट हा आणखी एक पर्याय आहे. सर्वात जलद चढणारी अन् वापरातली असली, तरी ‘नाळेची वाट’ चिंचोळ्या झाडीभरल्या घळीतून चढताना घामटं काढतो. नळीची वाट ही घाटावर जायला अजूनही गावकरी वापरतात. ही तुलनेनी सगळ्यात झपाट्याने वर चढणारी आणि पावसाळा सोडला तर बऱ्या पैकी सोपी असलेली वाट. नाळ संपली कि वाट उजवीकडे वळून मळलेली वाट खडसांबळे गावात घेउन जाते.
 |
| पठारावरून नाळेच्या वाट |
 |
| नाळेची वाट |
घोडदांड घाट :-
याशिवाय घोडदांड घाटाने उतरुन देखील खडसांबळे लेण्यांना जाता येईल. यासाठी घनगडाच्या पठारावर असणार्या केवणी गावातून वाट आहे. केवणी हुन घोंडदांड घाटाने खडसांबळे गाव हा साधारण ६०० मीटरचा उत्तर आहे. सुरवातीला गवतातून सौम्य उतरत वाट एकदम जंगलात झाडीत शिरते. मात्र उतार चांगलाच तीव्र आहे, घसारा आणि तीव्र उतरंड अशी वाट आधी डावी कडे उतरत जाते आणि मग परत उजवीकडे अस डोंगराच्या दांडावरून खालच्या पदरात घेऊन जाते, थोड खाली आल्यावर वाट परत घनगड आणि मारताना डोंगराच्या कडे तोंड करून दरीच्या दिशेला वळते,इथे मात्र छान सावली आणि गार कातळाला बिलगून वाट उतरते. साधारण १.३० तास उतरल्यावर आपण खालच्या पदरात दाखल होतो. इथून समोरच खडसांबळे लेणी स्पष्ट पणे डोंगरात वरच्या अंगाला साधारण ३०० फुटावर दिसतात. इथून लेण्यांपर्यंत पोचायला अजून अर्धा तास लागतो.

वाटेत उजवी कडे नळीच्या वाटेची घळ खुणावते.

खडसांबळे लेणी हि तशी अपरिचित आहेत.अगदी आंतरजालावर लेण्यांविषयी शोध घेत गेलो तरी फार काही हातात लागत नाही. कुलाबा जिल्ह्याचे पहिले गॅझेटिअर इंग्रजांनी छापले तेव्हा ह्या लेण्यांचा शोध लागला नव्हता त्यामुळे तिथेही ह्या लेण्यांविषयी माहिती नव्हती (भारत स्वतंत्र झाल्यावर छापलेल्या गॅझेटिअरच्या सुधारीत आवृत्तीत ह्या लेण्यांचा उल्लेख आहे मात्र जायचे कसे ह्याचा नाही). आनंद पाळंदे सरांच्या एका पुस्तकात ह्या लेण्यांविषयी माहिती आहे.

खडसांबळे लेणी क्रमांक १३ येथील स्तूप.
इतिहास :
नेणवली लेण्यांना खडसांबळे लेणी असे हि म्हटले जाते हे दोन्ही गावाच्या जवळ असणारी लेणी असून सह्याद्रीच्या डोंगर रांगेत कोरलेली लेणी आहेत . हि लेणी प्राचीन बौद्ध व्यापारी मार्गावर आहेत चौल बंदरावरून नागोठणे खाडी मार्गे बोरघाटातून मावळात जाणाऱ्या व्यापारी मार्गावर हि लेणी कोरलेली आहे हा लेणी समुह चौल बंदरातून नागोठण खाडीमार्गे बोरघाटातून मावळाकडे जाणर्या प्राचीन मार्गावर आहे.दुसरा समुह पहिल्या समुहाच्या पश्चिमेस त्याच उंचीवर सुमारे अर्धा कि.मी.वर आहे.या समुहास स्थानिक लोक 'चांभार लेणी' असे म्हणतात. डोंगराचे कडे तुटल्यामुळे तिथे जाण्यास वाट नाही. सध्या तिथे हिंस्त्र श्वापदांचे वास्तव्य असते. डोंगराच्या खाली एक कि.मी.वर असलेल्या पठारावरुन हि लेणी दिसु शकतात. परंतु त्यांचे सर्वेक्षण न झाल्याने सविस्तर माहिती मिळत नाही.
खंडसांबळे लेणी समुहातील पुर्वेकडील लेणी सन १८८९ पर्यंत अज्ञातवासात होती. काळाच्या ओघात हरवलेली ही लेणी मुंबई मराठी मिशनचे रेव्हरंड अॅबेट यांनी १८८९ साली शोधून काढली. यांचा शोध रेव्हरंट ऍबटने १८८९ साली या लेण्यांचा शोध लावला . त्याआधी लेण्यांवर लिहिणाऱ्या फर्ग्युसन व बर्जेस याना याची माहिती नव्हती असे दिसते.त्यानंतर हेन्री कझेन्स याने यावर लिहले आहे.
हि लेणी इसवी सणाच्या पूर्व दुसऱ्या शतकात कोरलेली आहेत. या लेण्यांचे निर्माता राजवंश सापडत नसला तरी महाराष्ट्रात इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात सातवाहन राज्यांचे साम्राज्य होते त्यामुळे साहजिकच ह्या लेण्यांची निर्मिती मध्ये सातवाहन राजांचा सहभाग असणार आपण असे म्हणू शकतो कि हि लेणी सातवाहन राजांच्या काळात कोरलेली आहेत शिवाय हा व्यापारी मार्ग असल्याने लेण्याना सातवाहन राजांचे सहकार्य आहे असे वाटते. व्यापारी मार्गावर असणारी हि लेणी महाराष्ट्रातील आद्य लेणी म्हणून स्वीकारले तरी चुकीचे वाटत नाही. या लेण्याची निर्मिती इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून झाली असून ती इसवी सन पाचव्या शतकापर्यंत तिचे काम चालू होते. त्यामुळे हा काळ सातवाहन राजांच्या साम्राज्यात होता विशेष कोकणवर सातवाहन राजांचे साम्राज्य होते आणि त्यामध्ये ह्या लेण्याची निर्मिती हि बरेच काही सांगून जाते
या लेण्यांच्या इतिहासात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे स्वातंत्र्य सेनानी ह्याच लेण्यात इंग्रजांपासून लपून राहिले होते. यांचा अर्थ हि लेणी या काळात इंग्रजांना सापडली नाहीच इतक्या आतमध्ये आहेत लेण्याच्या शिल्पकलेची नोंद घ्यावी अशी काही लेणी आहेत तश्या पद्धतीची माहिती ऍबट याने दिलेली आहे शिवाय हेन्री कझेन्स यांनी दिलेली आहे.
लाल मुरुमाच्या स्तरात कोरल्या असल्याने लेणी फारंच भग्नावस्थेत आहेत आणि कोरीवकामात सफाई जाणवत नाही. कातळाची योग्य प्रत नसल्याने अन् पाण्याच्या अभावाने या लेण्या किती वापरल्या गेल्या असतील यात शंका वाटते.म्हणून, कालांतराने कोरलेली भाजे - कार्ले अशी लेणी उंचावर कातळाची योग्य पत निवडून खोदली असावीत.
हि लेणी कोंढाणे, भाजे, कार्ले, बेडसे अगदी लगतची ठाणाळे या लेण्यांच्या तुलनेत फारच दुर्गम आणि जांभ्या मुरुमाच्या दगडाची छाप असलेला काहीसा अर्धवट अवस्थेत वाटतात.पुरातत्व खात्याचा नेहमीचा सूचना देणारा जुना बोर्ड सोडला तर दुसरं काही नाही. खुद्द लेणीत येण्याची वाट ही सहजा सापडेल अशी नाही. अर्थात काळाच्या ओघात झीज होऊन पडझड होणारच.
पालीपासून सुमारे ३३ कि.मी.पुर्वेकडे असलेल्या या गावाच्या पुर्वेकडील डोंगरात अतिशय अवघड ठिकाणी एक लेणी समुह आहे.याच लेण्यांना 'नेणवली लेणी' असेही संबोधतात. एका इंग्रजी सी आकाराच्या डोंगरात दोन भागात ह्या लेण्या आहेत. त्यापैकी मुख्य लेणी समूहात (पांडवलेणी) जाता येते व ह्यापासून ५०० मी. अंतरावरच्या चांभारलेणी ह्या छोट्या लेणी समूहावर वरच्या डोंगराचा फार मोठा कडा कोसळल्याने जाता येत नाही. तसा मुख्य लेणी समुहावर पण एक छोटा कडा कोसळून वरचे मोठे दगड पडले आहेत व मुरुमी दगडामुळे आणी पाणी झिरपून लेणी भग्न झाली आहेत पण आपण व्यवस्थीत फिरू शकतो. सध्या ह्या लेण्यांमध्ये पुरातत्व खात्याने नेणवलीतील दोघांना लेणी साफसफाईसाठी ठेवले आहे.
 |
| या डोंगराच्या उजवीकडे खडसांबळे च्या लेणी आहेत |
खडसांबळे गावातून लेण्यांकडे जाताना एक छोटा डोंगर चढणे सोडले तर लेण्यापर्यंत रस्ता सपाट आहे. तरी शक्यतो गावातील वाटाड्या बरोबर घेतलेला चांगला. डोंगर कधी चढून सपाटीला आलो कि थोड्याच वेळात जंगल सुरु होते आणि लेण्यांच्या डोंगरापाशी आपण पोहचतो.जसजसे लेण्यांच्या जवळ पोहोचलो, तसा चढ उभा होत जातो अन शेवटी पायऱ्या लागतात. सभोवताली बऱ्यापैकी झाडांचे आच्छादन आहे. एक छोटा चढ चढून आपण लेण्यांपाशी पोहचतो.
पावसाळ्यात या लेण्यांना भेट दिल्यास नजारा काही और असतो. गावापासून लेण्यांपर्यंत पोहोचायला तासाभराची सोपी चढाई थोडे कष्ट घेऊन केली कि पठारावर पोहोचताच येथील हिरवाईने नटलेला निसर्ग पाहून घेतलेल्या श्रमाचे चीज होते. दूर दूरवर पसरलेले हिरवे गवताच्छादीत पठार, त्यापलीकडे गुटख्यापासून ते थेट हिरडीपर्यंत (गुटखा-हिरडी ही घाटमाथ्यावरील गावे आहेत) आडवी पसरलेली सह्य़धार आणि त्यावरून मुसंडी मारून वाहणारे अनेक धबधबे असा नयनरम्य देखावा निरखत पुन्हा जंगलात शिरायचे आणि थेट लेणी गाठायची.
आता आपण प्रत्यक्ष लेण्याची सैर करुया. या ठिकाणी जवळपास ३० ते ४८ लेणी समूह असल्याचे काही लेणी अभ्यासकांचे म्हणणे आहे तर गॅझेटीयर २१ च लेण्यांचा उल्लेख करतात.प्रत्यक्ष त्या लेण्या किती हे आता सांगणे कठीण झालेले आहे, कारण बरीच लेणी हि गाडली गेली आहेत डोंगराचा कडा कोसळल्याने बहुतांश लेणी नष्ट झालेली आहेत. आजच्या घडीला असणारा स्तूप , डोंगरातून पाण्याचा प्रवाह स्तूपाच्या मागून काढून तो पाण्याच्या टाक्यात घेऊन जाणारे तंत्र अश्या बऱ्याच गोष्टी आपणास बघता येतील.
सध्या या लेण्यांची अवस्था बिकट आहे. लेण्यांच्या तोंडापाशी दगडांचा खच पडलेला.दरड कोसळून काही लेणी बुजली गेली आहेत तर जी आहेत त्यातील खांब व भिंती तुटल्या आहेत. दोन लेण्यांमध्ये अक्षरशः सरपटत जावे लागले. गुहांच्या तोंडावरच दोन-तीन हत्तींच्या आकारा एव्हडा भलामोठा प्रस्तर कोसळला आहे. आणखी दोन लेण्यांचे तोंड तर पूर्णपणे बंद झालेले. काही लेण्यांमध्ये भिंतींवर (काळा, पांढरा आणि लाल रंगाने) रंगरंगोटी केल्याच्या खुणा दिसल्या त्यामुळे प्राचीन काळी नक्कीच त्या सुंदर व वैभवात नांदत असणार ह्यात शंका नाही. पण सध्याची त्यांची अवस्था खूप वाईट आहे.
लेण्याच्या
दर्शनी भागाची पडझड झाली आहे.त्यामुळे सध्या तरी इथे कोणता शिलालेख दिसत
नाही.शिवाय स्तंभही दिसत नाही.मात्र कदाचित या गोष्टी अस्तित्वात असाव्यात.
या लेण्यांना क्रमांक दक्षिणेकडून उत्तरेकडे दिलेले आहेत.
लेणी क्र. १ ते ७ :-
लेणे क्रमांक १ हे एकतर अर्धवट सोडलेले लेणे असावे किंवा नैसर्गिक गुहा
असावी. लेणे क्रमांक २ ची मागची भिंत व छत तेवढे शाबुत आहे.मात्र पुढची व
उजव्या बाजुची भिंत कोसळली असल्याने हे लेणे कोणत्या प्रकारचे हे समजत
नाही. लेणे क्रमांक ३ च्या अवशेषावरुन या लेण्यात व्हरांडा, अंगण्,आत दालन व
दालनामागे खोली अशी रचना असावी. या लेण्याचीही दर्शनी भिंत व बाजुची भिंत
कोसळली आहे.मात्र छत सुस्थितीत आहे. छताचा बराचसा भाग व्हरांडा व आंगण
यांच्यावर आल्याने हा भाग झाकला जातो.
 |
| मुख्य लेणी - चैत्यगृह |
लेणी
क्रमांक ४ चे छत तेवढे शिल्लक आहे.भिंतीचे थोडे अवशेष शिल्लक
आहेत्,त्यावरुन या लेण्याची रचना पुढे व्हरांडा मग दालन मागे खोली अशी
असावी. लेणे क्रमांक पाचची रचनाही अशीच आहे.इथे खोलीच्या मागच्या भिंतीला
लागून झोपण्यासाठी ओटा आहे. लेणे क्रमांक सहाचेही फक्त छत शिल्लक आहे.याला
एक खोलीही असून त्यात मागच्या भिंतीत एक कोनाडा पहायला मिळतो.लेणे क्रमांक
सातचीही हिच अवस्था आहे.फक्त छत शिल्लक असून दोन्ही बाजुच्या भिंती तुटल्या
आहेत.
लेणे क्रमांक ८:-
पहिल्या सात लेण्याच्या तुलनेत हे लेण दखलपात्र आहे. प्रागंणातील तीन
पायर्या चढून आपण ३ ३ मी.च्या व्हरांड्यात प्रवेश करतो. याच्या मागे लांब
दालन्,त्याच्या उजव्या बाजुला उपदालन व मागे खोली आहे. दालन ९ मी लांब व ४
मीटर रुंद आहे. आतमध्ये तीन शयन ओटे आहेत.तसेच चौरसाकृती मोठी खिडकी आहे.
एकंदरीत रचनेवरुन मान्यवर भिक्षुकांसाठी हे दालन असावे असे वाटते. पाच
ओट्यावरुन इथे पाच भिक्षुकांची व्यवस्था असावी.
लेणे क्रमांक ९:-
या लेण्याचीही दुरावस्था झालेली आहे.फक्त छत शिल्लक असून मागच्या व उजव्या भिंतीत ओटे शिल्लक आहेत.
 |
| चैत्यगृह व स्तूप |
लेणी क्रमांक १०:-
या लेणी समुहातील हा एकमेव चैत्य असून या चैत्यगृहात खोल्या आहेत हे याचे
विशेष म्हणता येईल. हे खडसांबळे लेणी समुहातीळ सर्वात महत्वाचे लेणे आहे.
या लेण्याचा दर्शनी भाग नष्ट झाला असला तरी छत मात्र शाबुत
आहे.महाराष्ट्रातील अतिविशाल चैत्यगृहात याचा समावेश होतो. याचा आकार
आयताकार असून लांबी, रुंदी २०.६८ मी X १५.८७ मी आहे. याशिवाय दोन्ही बाजुला
व मागे असलेल्या खोल्या व चैत्यगाभारा वेगळाच.
त्याकाळातील शैलीप्रमाणे
गाभारा मधोमध नसून मागील भिंतीत उजव्या बाजुला आहे. चैत्यगृहाच्या डाव्या
भिंतीत सहा, उजव्या भिंतीत चार आणि मागील भिंतीत सात असे एकुण सतरा विहार
आहेत. प्रत्येक खोलीत ओटा आणि खिडकी आहे. हि शैली हीनयान काळाच्या शेवटाला
वापरली गेली. स्तुपाचा गाभारा आयताकृती असून स्तुपाचा परिघ ३.५६ मीटर तर
उंची ३.३१ मीटर आहे. स्तुपावर वेदीका नाही.स्तुपाच्या अंडावर म्हणजे
घुमटाकार भागावर चौकोनी छिद्र आहे,ज्यात बहुधा लाकडी छत्र ( हर्मिका,
यष्टी, छत्र ) बसविले असावे.स्तूपावर कुणीतरी 'ओम' चितारला आहे.
एकंदरीत खोदकामाची शैली बघता हा मुळचा विहार
असावा, नंतर स्तुप आणि गाभारा कोरून त्याचे रुपांतर चैत्यगृहात केले असावे
असे वाटते. मात्र हे सिध्द करण्यासाठी याठिकाणी कोणताही शिलालेख किंवा
पुरातत्वीय अवशेष नाही. दर्शनी भागात लाकडाचे काम असावे कारण तश्या पद्धतीच्या खोबण्या आपणास पाहायला मिळतात स्तूपाच्या पाठीमागून पाणी वाहून नेण्याची व व्यवस्था केलेली आहे शिवाय ते पाण्याच्या टाक्यात नेलेली असावी पण पुढे असणारे पाण्याचे टाके नष्ट झालेले आहे असे एकूणच रचना पाहता म्हणावे लागेल
कदाचित
मागच्या किंवा डाव्या भिंतीचे कोरीवकाम हाती घेतल्यावर शिल्पकारांना हा
गाभारा कोरावा असे वाटले असावे.खेड लेण्यातही हाच प्रकार बघायला मिळतो. या
लेण्याच्या डाव्या भिंतीवर स्तुपाचे उठावाचे शिल्प कोरले असावे असे
वाटते.कारण सध्या स्तुपाचा परिघ तेथे दिसतो. कदाचित लेण्याचा आकार वाढवताना
स्तुप नष्ट झाला असावा. ढवळीकरांच्या मते ठाणाळे आणि खडसांबळे हे दोन्ही
लेणीसमुह पहिल्या शतकाच्या शेवटच्या दशकात कोरण्यात आले असावेत. मात्र
हेन्री कझेन्सच्या मते हा लेणी समुह दुसर्या शतकात कोरण्यात आला असावा.
यासाठी कझेन्सने ठाणाळे लेणीत सापडलेल्या ठोक्याच्या खुणा असलेल्या
नाण्यांचा आधार घेतला आहे.मात्र अशी नाणी पहिल्या शतकात देखील वापरात होती.

एकूणच दर्शनी भाग नष्ट झाल्याने इथे शिलालेख असावा असे म्हणता येऊ शकते कारण एवढा मोठा लेण्यांचा समूह आणि शिलालेख नाही असे होत नाही. छोट्या छोट्या लेण्यांवर शिलालेख पाहायला मिळतात .मग एवढ्या मोठा लेणी समूह असून तिथे शिलालेख नसेल ? सर्वच लेण्यांचे दर्शनी भाग नष्ट झालेले आहेत आणि शिलालेख शक्यतो दर्शनी भागावर कोरलेला असतो. खाली पडलेल्या दगडांच्या अवशेषात कदाचित तो सापडू शकतो.
लेणी क्रमांक १० याचे खोदकाम सुरु असतानाच त्याचा विस्तार केला
गेला असे मानल्यास लेणे क्रमांक ११ हे त्या नंतर कोरण्यात आले असावे असा
निष्कर्ष निघतो.
 |
खडसांबळे लेणी
|
लेणे क्रमांक ११ व १२ :-
दोन्ही लेण्यांचे छत शाबुत असून दर्शनी भाग कोसळला आहे. अकराव्या लेण्यात
एक ओटा व तुटलेल्या पायर्यांचे अवशेष आहेत. तर बाराव्या लेण्यात एक ओटा व
शेजारी पाण्याचे बंदीस्त टाके आहे.
लेणे क्रमांक १३:-
हे लेणे सुस्थितीत असून याची रचना दखल घेण्यासारखी आहे. इथेही लेण्यासमोर
व्हरांडा आहे तर आयताकृती ९ मीटर लांबीचे दालन आहे. दालनाच्या उजव्या व
मागच्या बाजुस प्रत्येकी एक खोली आहे. या खोलीतील ओटे आठव्या लेण्याप्रमाणे
उंच आहेत.एकंदरीत रचना बघता हे लेणेही मान्यवर भिक्षुकांसाठी असावे.
 |
| लेण्यांची दैनावस्था |
लेणे क्रमांक १४ ते २१ :-
या सर्व लेण्यांचे पुढचे अर्धे छत कोसळले आहे. चौदाव्या,पंधराव्या आणि
सोळाव्या लेण्यात प्रत्येकी एक ओटा शिल्लक आहे. सतराव्या लेण्यात दोन ओटे
आहेत.अठराव्या लेण्यात व्हरांडा,सभागृह व मागे खोली आहे. व्हरांड्याचे
निम्मे छत कोसळले आहे.तर सभागृहात ओटा आहे. एकोणीसाव्या व विसाव्या
लेण्यातही प्रत्येकी एक ओटा आहे. एकविसाव्या लेण्याचे अवशेष शिल्लक नाहीत.
या
संपुर्ण लेणीसमुहात पाण्याची किती टाकी होती, हे आज छत कोसळल्यामुळे नेमके
सांगता येत नाही.मात्र बाराव्या लेण्याशेजारी पाण्याचे एक टाके दिसते.
सर्व विहारात मिळून असलेल्या खोल्यात ४२ ओटे दिसतात. यावरुन इथे किमान ४२
किंवा त्यापेक्षा जास्त भिक्षुकांची व्यवस्था होत असावी असे अनुमान निघते.
इतक्या मोठ्या विहार, लेण्यात भोजनव्यवस्थेसाठी मतपा असणारच.मात्र
लेण्यांची भग्नावस्था झाल्यामुळे आज तो ओळखता येत नाही.

कड्याच्या पलीकडे हि अनेक लेणीचा समूह आहे जो एकच आहे परंतु कडा तुटल्यामुळे त्याचे विभाजन झालेले आहे तिकडे हि विहार संघाराम तसेच शून्यगृह आहेत ऐसपैस अशी जागा असणारी कातळात कोरलेली लेणी आहेत तिकडे जाणे थोडेसे अवघड आहे कारण डोंगराचा कडा कोसळल्यामुळे तिकडे जाणे शक्य नसते पण एवढे हि कठीण नाही कि तिकडे जाता येत नाही. या ठिकाणी एकूण ४२ ओटे पाहायला मिळतात जे भिक्खुंच्या झोपण्यासाठी कोरलेले असतात या ठिकाणी जवळपास ७० भिक्खुंच्या झोपण्याची व्यवस्था केलेली असावी शिवाय इथे ७० पेक्षा जास्त भिक्खुंच्या निवासाची व्यवस्था केलेली असावी.
अप्रतिम अश्या निवांत जागी खोदलेल्या या बौद्ध लेण्या आज शेवटच्या घटका मोजत कसेबसे तग धरून आहेत. कधीतरी कोणी एखादा ट्रेकर त्यांची विचारपूस करायला येतो तेव्हडाच काय तो दिलासा. बाकी गावकरी तेथे फिरकत देखील नाहीत. नावाला ASI चा गंजलेला फलक मात्र आहे. एकूणच नेणवली लेणी आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आपण आपला ऐतिहासिक वारसा जतन करणे आवश्यक आहे
या लेण्यांचे वैशिष्ट्य असे कि याच्या एका बाजूला ठाणाळे म्हणजे नाडसूर
ची लेणी आहेत तर एका बाजूला गोमाशी लेणी आहेत दोन्ही हि बौद्ध लेणी आहेत
गोमाशी लेण्यात भूमी स्पर्श मुद्रेत असणारी बुद्धाची मूर्ती असून हे एक
छोटेसे लेणे आहे
संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) कझेन्स- आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ वेस्टर्न इंडीया
४) http://samontreks.blogspot.com/, http://amitudaymarathe.blogspot.com, https://www.discoversahyadri.in/2017/09/, https://www.prasannawagh.com/2018/06/ghondand-khadsamble-derya-ghat.html, हे ब्लॉग