Tuesday, April 7, 2026

Satara Akashwani 2

 1 ) मधू-मकरंद गड  

पर्यटकांमधे प्रचंड लोकप्रिय असलेल्या महाबळेश्वरला प्रत्येक पाँईटवर दिवसभर हि गर्दी असते, मात्र संध्याकाळ होईल तशी या गर्दीची पावले वळतात, "मुंबई पॉंईट" किंवा आधीचा "बॉम्बे पॉईंट" कडे, अर्थातच सुर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी. महाबळेश्वरच्या पश्चिम टोकावर असलेल्या या पॉईंटवर उभारल्यास उजव्या हाताला शिवभारताची साक्ष देणारा प्रतापगड खुणावत असतो. मात्र बहुतेक वेळा सुर्य बुडतो, तो एका खोगीराच्या आकाराच्या डोंगरामागे. सुर्यास्ताचे फोटो तर काढले जातात, पण हा सुर्यास्त ज्या डोंगराच्या मागे होतो आहे तो एक प्राचीन गड आहे, हे कोणाच्या गावीही नसते. या गडाचे नाव मोठे गोड आहे, "मधु-मकरंदगड". ईंग्रजांनी त्याचा खोगीरासारखा आकार ध्यानी घेउन त्याला "सॅडलबॅक" असे यथार्थ नावही दिले आहे.
       सह्याद्रीची सरासरी उंची २००० ते ३५०० फुट आहे. काही ठिकाणी ती चार हजार आणि तीन ठिकाणी ( कळसुबाई, साल्हेर, घनचक्कर ) पाच हजाराच्या वर जाते. महाबळेश्वरच्या दक्षिणेला मात्र सह्याद्रीची सरासरी उंची फार तर ३५०० फुटापर्यंत पोहचते. सह्याद्रीतील बहुतेक उंच शिखरे त्याच्या पुर्वेला पसरलेल्या डोंगररांगात आहेत. मात्र सह्याद्रीच्या मुख्यरांगेत रतनगड, आजोबा,भागरीया, ढाकोबा आणि मधुमकरंदगड हि पाचच शिखरे चार हजार फुटापेक्षा उंच आहेत. जवळपास ४०६४ फुट उंची, ताशीव कडे असणारी दोन शिखरे आणि अभेद्य कवच्यासारखे आजुबाजुला पसरलेले जंगलाचे नैसर्गिक संरक्षण यामुळे या अचुक जागा पकडलेल्या या डोंगरावर दुर्ग उभारणी न झाल्यास नवल होते. हा गड नेमका कोणी उभारला ते अज्ञात असले तरी, गडावर असलेल्या खांब टाक्यावरुन गड प्राचीन नक्कीच आहे, बहुधा पन्हाळ्याचा दुसरा भोज याच्या हातचे स्थापत्य असावे. नंतरच्या ईतिहासाचे विशेष उल्लेख नसले तरी, बहुधा शिर्के आणि नंतर जावळीच्या मोर्‍यांच्या ताब्यात हा प्रदेश होता. ई.स. १६५६ मधे ( जानेवारी ते मे ) जावळी ताब्यात घेतल्यानंतर हा गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. सातारा जिल्हा गॅझेटिअरप्रमाणे हा गड शिवाजी महाराजांनी बांधला असा उल्लेख येतो ,परंतु सभासदाच्या बखरीत अशी नोंद सापडते, "हणमंतराव म्हणून चंदररायाचा भाउ चतुर्बेट म्हणून जागा जावलीचा होता, तेथे बल धरुन राहिला. त्यासही मारले". बहुधा आदिलशाहीत इतर गडाप्रमाणे या गडाकडेही दुर्लक्ष झाले असणार आणि ते बेवसाउ बनले असतील. शिवाजी महाराजांनी ते बांधून काढले असती किंवा दुरुस्ती केली असेल. एकूणच प्रतापगड ते वासोट्या या गडादरम्यानचा हा दुवा.  मकरंदगड मे १८१८ मधे ईंग्रजांनी घेईपर्यंत स्वराज्यात होता, इतके याचे महत्वाचे स्थान होते.
      या गडावर जायचे तर तीन पर्याय आहेत.
१) चतुरबेटमार्गे:-
   महाबळेश्वरवरुन कोयनेच्या खोर्‍यात दुधगाव या ठिकाणी थेट बस आहे. हि बस वाडा-कुंभरोशी पार फाटा- शिरपोली मार्गे दुधगावला पोहचते. दुधगाववरुन कोयना नदी ओलांडून चतुरबेट या गावी जायचे किंवा स्वताची गाडी असेल तर थेट चतुरबेटला जाता येते. गावातूनच एक पायवाट थेट गडावर जाते. जीपसारखे कच्चा रस्त्यावरुन जाणारे वहान किंवा बाईक असेल तर थेट मकरंदगडाच्या खांद्यावर वसलेल्या घोणसपुर या गावापर्यंत मातीचा कच्चा रस्ता झालेला आहे, त्याने थेट जाउन बरीच पायपीट टाळता येते.यासाठी चतुरबेटवरुन एक रस्ता दाभे-मोहन या गावी जातो, त्या रस्त्यावरच घोणसपुरकडे जाणारा कच्च्या रस्त्याचा फाटा उजव्या हाताला आहे.
२ ) हातलोट मार्गे:-
गडावर जाणारा मुळ मार्ग हातलोट गावातून होता.
या गावात उभारल्यास गडाची मधु आणि मकरंद हि दोन्ही शिखरे दिसतात आणि त्याचा खोगीरासारखा आकारही स्पष्ट जाणवतो.
हातलोट गावाच्या पहिल्या वाडीत मारुती मंदिर आहे. ईच्छा असल्यास इथे मुक्काम करता येईल.मंदिराच्या समोरच लोखंडी पुल आहे. तो पार करुन सव्वा तासाच्या खड्या चढाने गडाच्या डाव्या कड्यापाशी पोहचतो. तिथे उजवीकडे वळाल्यानंतर वीस मिनीटात मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पोहचतो. तिथून वीस-पंचवीस मिनीटात गडावर.
३ ) बॅबिंग्टन पॉईंटमार्गे:-
  हा तिसरा मार्ग म्हणजे "चरती चरतो भगः"वर विश्वास ठेवणार्‍यांसाठी, अर्थातच पदभ्रमंतीची हौस भागवणार्‍यांसाठी. यासाठी, महाबळेश्वरवरुन तापोळ्याला जाणारी बस पकडायची आणि बॅबिंग्टन पॉईंटला उतरायचे. महाबळेश्वरची बाजारपेठ ते बॅबिंग्टन पॉईंट हे २ ते २.५ कि.मी. आहे. इथून मागे सोळशी नदीचे खोरे आणि समोर पश्चिमेला कोयना नदीचे खोरे दिसते. या ठिकाणी दोन पर्याय आहेत. इथून रॉबर्टस केव्ह म्हणजे चोरांच्या गुहेशेजारून मालुसरे गावी जावे. तिथल्या गवळणी पॉईंटवरुन खाली उतरले कि झोलाई खिंडीतून खाली एक रस्ता थेट चतुरबेट गावाकडे जातो , पण जर हि वाट सापडली नाही तर मस्त मळलेल्या वाटेने उतरुन झांजवाडी, दुधगावमार्गे चतुरबेट गाठायचे आणि तिथून मकरंदगडावर चढाई करायची. ह्या मार्गे जवळपास तीन-साडे तीन तास लागतात.
    महाबळेश्वर भटकताना आणि सुर्यास्ताच्या वेळी हा मधुमकरंदगड पाहिला होता, मात्र एखादा ग्रुप असल्याशिवाय त्यावर जाणे योग्य नाही, कारण या जंगलात अस्वले मोठ्या प्रमाणात आहेत याची माहिती होती. एके दिवशी पुण्याच्या 'गिरीदर्शन ट्रेकिंग क्ल्बचा' मेसेज आला. त्यांनी एक दिवसाचा मधुमकरंदगडाचा ट्रेक आयोजित केला होता. वाईमधे मिनीबसमधे बसून मस्त पैकी झोप काढली.
   महाबळेश्वरकडून प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या वाडा-कुंभरोशी गावाच्या अलिकडे पार-चतुरबेट-हातलोट या गावाला जाणारा फाटा फुटतो. रात्री हा फाटा कदाचित लक्षात येत नाही, त्यासाठी या फाट्यावर "वरदायिनी माता" असे लिहीलेली सिमेंटची मोठी कमान आहे हि खुण लक्षात ठेवायची. आम्ही कुंभरोशीला चहा घेउन या मार्गे चतुरबेटला निघालो. वाटेत बस रस्ता चुकल्याने थोडा वेळ मोडला. त्यावेळी थोडा वेळ खाली उतरलो. मे महिन्याचे दिवस होते, काही झाडे काजव्यांनी अक्षरशः फुलून गेली होती. निसर्गाची हि रोषणाई आम्ही स्तब्ध होउन पहात होतो. तो क्षण न विसरण्याजोगा. रात्री तीन साडे तीनला चतुरबेट या गावी पोहचलो. एखाद्या महासागरातील बेटाचे असावे असे या गावाचे नाव, मात्र जवळ समुद्र सोडा, नदीही लांब आहे. या गावातल्या मल्लिकार्जुन मंदिरात उरलेली झोप पुर्ण केली. पहाटे घंटा नादाने उठलो. आवराआवर नाष्टा करुन एका वर्तुळात उभे राहिलो. ओळख परेड संपली आणि गडाकडे कुच केले. गंमत म्हणजे, चतुरबेट हे पायथ्याचे गाव असले तरी इथून मात्र मकरंदगड दिसत नाही.
घनदाट जंगलातून थोडावेळ चढल्यानंतर थोडक्या सपाटीनंतर वाट एका ओढ्यात उतरते. साधारण अर्ध्या तासात आपण ईथे पोहचतो.ओढा ओलांडून मात्र मस्त मळळेली वाट घनदाट झाडीतून चढायला सुरवात करते, ती जवळपास पाउण-एक तासानंतर उघड्यावर येते.
इथेच आपल्याला गड माथ्याचे म्हणजेच मकरंदगडाचे दर्शन घडते. आता थोडीच चढण बाकी असते. इथे थोडी लिंबु पाणी, सरबत, चिक्की अशा इंधनाची देवाण घेवाण झाली.
थोड्या वेळात आपल्याला मातीची कच्ची सडक आडवी जाते. वाटल्यास या सडकेवरुन पुढची वाटचाल करायची किंवा पाउलवाट शॉर्ट्कटने वर चढते, त्याने पटापट चढून सपाटीवर पोहचायचे. डाव्या हाताला वीजेच्या तारा आणि खांब सोबत करतात आणि समोर दिसते,
गडाच्या खांद्यावर वसलेले, बहुतेक जंगम लोकांच्या वस्तीचे "घोणसपुर". गडावर जेव्हा राबता होती तेव्हा हे मेट होते, इथे परवानगी घेतल्याशिवाय पुढे जाणे शक्य नाही. आपल्याजवळ शिधा असल्यास इथे दिला तर जेवण तयार करुन मिळते.
ग्रुप लिडर पुरुषोत्तमने आधीच फोनवर एका घरात जेवणाचे सांगून ठेवले होते. त्यामुळे फार वाट न पहाताच चपात्या आणि कांदा बटाट्याचा रस्सा ताटात आला.
  बर्‍याच दिवसानंतर पडवीत सहभोजनाचा आनंद घेतला. आणि वामकुक्षीच्या मोहात न पडता गडाकडे निघालो.
प्रशस्त मातीच्या रस्त्याने थोडे अंतर चालल्यानंतर समोर मल्लिकार्जुन मंदिर दिसु लागले.
गडाच्या या परिसरात घनदाट जंगल असल्याने या वाटेवर नीट लक्ष दिले तर वन्यप्राण्यांचे ठसे दिसु शकतात. बिबट्याने आपण इथून गेलो याचा माग मागे सोडला आहे.
दाट वनराईत लपलेले हे मंदिर म्हणजे सह्याद्रीत मुक्काम करण्याजोग्या आदर्श जागातील एक. एन मे महिन्यात थंडीचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे मुक्काम अगदी आवश्यकच आहे.
मंदिरात काही प्राचीन शिल्प आहेत.
एकुण मंदिराची बांधणी काहीशी अनगड आहे. देउळ निसंशय जुने आहे. शिवकालापुर्वी चंद्रराव मोर्‍यांनी ज्या सात शिवमंदिरांना ईनामे दिलेली होती, त्यातील हे एक. हि मंदिरे उभारणारे कलाकार नसतात, पण अत्यंत बिकट जागी भक्तिभावाने उभारलेली हि राउळे पाथंस्थाच्या वाटचालीत सुखागरे ठरतात.
   बरीच चाल झालेली होती. जेवणही हातापायत उतरले होते. मोठा ग्रुप असल्याने बरेच नवखे आणि शारीरीक क्षमता कमी असणारे गार्डाचे डबे होते. आम्ही देवळात पोहचलो तरी बहुधा हि पिछाडीची फळी अजून निघायची होती. साहजिकच वेळ होता म्हणून सभामंडपात अंग टाकले. जमीनीच्या थंडावा संपुर्ण शरीरार झिरपला आणि विलक्षण सुखाची अनुभूती झाली. पाचच मिनीटाची ती झोप ताजेतवाने करुन गेली.
मे महिना असल्याने जांभळे झाडाला लगडली होती. त्याचा आस्वाद घेत आणि बीया आजुबाजुला भिरकाउन देत पुढची वाटचाल सुरु झाली. मात्र थोड्यावेळात झाडांनी सोबत सोडली आणि वरुन कळकळते उन आणि खालून भट्टीप्रमाणे तापलेली जमीन यातून आमची वाटचाल सुरु झाली. त्यात खडी चढणारी वाट, परिणामी छातीचा भाता सुरु झाला. घामाच्या धारा टिपून एका वळणावर आलो, तो फार मोठा पॅनोरमा समोर आला. गडाची मधू आणि मकरंद हि दोन्ही शिखरे आणि त्यांना जोडणारी धार दिसु लागली.
पश्चिम क्षितीज्यावर महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड हे दुर्ग त्रिकूट असलेली रांग  दिसू लागली. उंचीशी सह्याद्रीशी स्पर्धा करणारी कोकणातील एकमेव रांग. सह्याद्री आणि हि रांग यांच्यामधे जगबुडी नदीचा उगम होतो. यातील सुमार त्याच्या कातळटोपीमुळे आणि आडवातिडवा पसरलेला महिपतगड सहज ओळखू येतात. मात्र रसाळ बराच लांब असल्यामुळे बारकाईने पाहिल्यावर ध्यानी आला. अगदी तळात एक त्रिकोणी आकाराची टेकडी दिसत होती, याच्या पायथ्यातून कोंड नाळेसारखी अवघड वाट खाली उतरते.
एका बाजुला सपाटीवर वसलेले घोणसपुर आणि गावकर्‍यांची शेत दिसत होती.
वाटेत एक मुर्ती दिसली कशाची आहे ते समजले नाही.
यानंतर एका नैसर्गिक दगडाचा बुरुजासारखा उपयोग करुन मधून वाट कोरुन काढली आहे. इथे निश्चितच पहार्‍याची चौकी असणार.
यानंतर एक सपाटी येते. इथे आपण जवळपास माथ्यावर पोहचलो असतो. इथे एक वैशिष्ट्यपुर्ण खडक आहे. एखाद्या नेढ्यासारखा तो खालून पोकळ आहे.
बहुधा खडकाचा हा भाग पाण्याच्या लोटामुळे वाहून जाउन हि अशी रचना तयार झाली असावी.
         इथून पुढचा रस्ता आपल्याला थेट माथ्यावर नेतो. यापुर्वी हि वाट थोडी अवघड होती. मात्र पर्यटन विकासांतर्गत मकरंदगडावर काही विकासकामे झाली, त्यात घोणसपुरला येणारा कच्चा गाडी रस्ता, गडावर चढणार्‍या वाट रुंद आणि सोप्या करण्यात आल्या.
गडमाथा त्रिकोणी आकाराचा आहे. सुरवातीला एक गदडी स्तंभ दिसतो. बहुधा हि एक प्रकारची दिपमाळ असावी.
याच्या समोर प्राचीन दगडी बांधणीचे कौलारू मल्लिकार्जुन मंदिर दिसते. शंकर हा पर्बताचा निवासी आणि सह्याद्रीत हि अशी मोक्याची जागा पाहून बांधलेली असंख्य शिवमंदिरे दिसतील.
आतमधे काहीसा एकांतवास भोगणारा शंभु महादेव नागराजाच्या सोबत बसला आहे.
भर्राट वारा गडमाथ्यावर आपले स्वागत करतो. प्रचंड मोठा परिसर नजरेत मावत नाही. एका बाजुला पुर्वेकडे महाबळेश्वरचे पठार आणि सह्याद्रीची रांग दुभागणारी कोयनामाई धरणाच्या पाण्याचे शिवसागर रुपात सोबतीला असते.
तर शिवछत्रपतीच्या पराक्रमाच्या सोनेरी क्षणात हरवून गेलेला प्रतापगड झाडीतून आपला माथा उंचावतो. या खेरीज हवा स्वच्छ असेल तर लांब उत्तरेला कांगोरी उर्फ मंगळगड नजरेला पडू शकतो. पश्चिमेला रसाळ, सुमार आणि महिपत हे त्रिकुट तर दक्षिणेला महिमंडणगड, चकदेव खुणावतात.
     समोर गडाचे दुसरे "मधूगड" हे शिखर दिसते.
गडमाथ्यावर थोडी विश्रांती घेतली आणि उत्तर बाजुला असलेल्या दुसर्‍या वाटेने खाली उतरु लागलो.
उभ्या उताराची हि दिड दोनशे फुटाची वाट जपूनच उतरायची. इथे पाय घसरल्यास क्षमा नाही.
इथून खाली उतरलो कि आपण एका उभ्या कड्यात खोदलेल्या प्रचंड मोठ्या खांब टाक्यापाशी येतो. गडाच्या प्राचिनत्वावर शिक्कामोर्तब करणारी हि खुण.
खांब सोडून कोरलेले टाके याचा अर्थ इथे किमान सातव्या शतकापासून इथे मानवाचा वावर आहे हे निश्चित.
टाक्याच्या वरच्या बाजुला चक्क मारुतीचे शिल्प आहे. 'पुच्छ ते मुरडीले माथा', या आवेशात मारुतीराया आहेत. पाण्यावर पिवळ्या शैवालाचा तरंग असला तरी तो बाजुला करुन पाणी पिता येते. बाटलीत भरुन मी ते पाणी तोंडाला लावले. अक्षरशः एकाच वेळी पोटात आणि मेंदुत विलक्षण थंडावा देणार्‍या पाण्याची जादू अनुभवायची असेल तर एन उन्हाळ्यात सह्याद्रीची भटकंती करायला पाहिजे.
     बहुतेक जण इथून माघारी फिरतात. पण गडाचे दुसरे म्हणजे मधु हे शिखर पहायचे असेल तर, या टाक्याजवळून एक पायवाट पश्चिमेकडे जाते, या वाटेने चालल्यास एक खडक चढून आणि पुढची गवताळ घसार्‍याची आणि निसरड्या वाटेने आणि एका डोकावणार्‍या खडकावरुन आपण मधुगडाच्या माथ्यावर पोहचतो. अर्थात हि वाट अवघड आहे आणि फारसा मानवी वावर इथे नाही, हे लक्षात घेउन एकटे दुकटे ईकडे येउ नये. गडमाथ्यावर तीन कोरड्या टाकी आणि एकदोन पड्क्या घरांच्या जोत्याशिवाय काहीच नाही. गवतातून सावधपणे पश्चिम टोकावर गेल्यानंतर मात्र डोळ्याचे पारणे फेडणारा नजारा सामोरा येतो. थेट कोकणात कोसळेला मधुगडाचा कडा, त्याच्या उत्तर बाजुने उतरणारा हातलोट घाट हि सोपी वाट आणि एखाद्या नरसाळ्यासारखी रचना असणारी आणि खड्या उतारची आणि विलक्षण घसार्‍याची कोंडनाळ.
        मधुमकरंदगडाच्या दोन बाजुने दोन वाटा खाली कोकणात उतरतात. यापैकी उत्तरेच्या हातलोट गावातून हातलोट घाट उतरतो. घाट हा बहुधा बैलांच्या सोयीच्या रस्त्याने केलेला असतो, सहाजिकच हि वाट उतरायला सोपी असते. मी काही या घाटाने खाली उतरलेलो नाही, पण या देशीचे काही जिद्दी तरुणांनी ते धाडस केले आहे. त्यांच्या या साहसाला मानाचा मुजरा म्हणून त्यांच्या ब्लॉगच्या लिंक देतो.
रसाळगड – सुमारगड – महीपतगड – हातलोट घाट
कोंडनाळ-मकरंदगड- हातलोट घाट
     हातलोट घाट सोपा असला तरी एक अतिशय कठीण अशी नाळ मकरंदगडाच्या दक्षिण अंगाने कोकणात उतरते. हि नाळ म्हनजे कोंड नाळ. या मार्गे ज्यांना जायचे आहे त्यांच्यासाठी खालील लिंक उपयोगी पडेल.
कोंडनाळ - हातलोट घाट
टाक्यापसून परतीची वाट आपल्याला पुन्हा एकदा माचीवरच्या मल्लिकार्जुन मंदिरापाशी आणते. वाटेत हि कातळात कोरलेली गुहा दिसली, मात्र हिचा उद्देश समजला नाही.

 2 ) गुरसाळेचे रामेश्वर मंदिर :- 

  मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. 
आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात तर हा ठेवा खेडोपाडी विखुरलेला आहे. त्यास सातारा देखील अपवाद नाही. सातारा जिल्ह्यातही अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, गड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील हजारो वर्षे जुनी असलेली मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत.
      वडूज-कराड मार्गापासून 5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.तिथलं मंदिर आणि त्याच्या समोरच भव्य पुष्करणी.
त्याची रचना पाहिली की पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळील लोणीभापकरच्या मंदिराची आठवण येते.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, ही वास्तू फार पूर्वीची, कदाचित शिवकालीन असावी. हा सारा परिसरच 'रामलिंग' या नावाने ओळखला जातो. त्याच ठिकाणी ही शिवकालीन पुष्करणी किंवा बारव आहे.
महाराष्ट्र शासनाने वर्षांपूर्वी हे मंदिर ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलं. बारवेची स्वच्छता करण्यात आली. त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांचा वंशज श्री. यश होळकर उपस्थित होते. 
या बारवेचं दगडी बांधकाम मोडकळीस आलंय. गुरसाळे गावामध्ये सोमलिंग, गुपितलिंग, रामलिंग, भावलिंग, शिवलिंग अशी एकूण पाच लिंग आहेत. ही पाच शिवलिंग पूजली जातात. तिथं महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात यात्रा भरवली जाते.
हा वारसा आणखी किती दिवस टिकणार हा प्रश्न आहेच..
       माणसाच्या जीवनात जल, अन्न आणि निवारा हे मूलभूत घटक आहेत. जल अर्थात पाणी या घटकाला तर विशेश महत्त्व आहे. माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली तीही जलसाठ्यांच्या किनार्‍यावरच केली. पृथ्वीवरील प्रार्थनास्थळांत असलेल्या देवदेवतांसाठीही माणसाने जलसाठे तयार केले. यावरून पाण्याला अतिशय महत्त्व आहे हे स्पष्ट होते.
जलसाठे करण्यासाठी माणसाने शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला आणि तळी, कुंड, विहिरी, बारव अशा विविध निर्मिती करून पाणी साठवण्यास सुरुवात केली. यापैकी बारवात जलसंवर्धन आणि स्थापत्य कलेची उत्कृष्ट सांगड दिसते. 8व्या आणि 9व्या शतकात बारवा बांधल्या जाऊ लागल्या. त्यानंतर 11व्या आणि 13व्या शतकात त्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार, जतन आणि पुर्नबांधणी झाली.
      बारव म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. बारव हा एक प्रकारचा जलसाठाच असतो. मात्र बारवांचे वैशिष्ट्य म्हणजे गोल, चौरस वा किल्लीच्या आकारात बांधलेल्या या जलसाठ्यांना पायर्‍या असतात. म्हणूनच इंग्रजीत बारवांना स्टेपवेल म्हणतात. एकात एक लहान होत जाणारे तीन ते सात टप्पे हे बारवाचे स्वरुप असते. या बारवांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बारवांत पाण्याचे अंतर्गत स्त्रोत असतात. आपण पावसाचे पाणी अडविणे, ते मातीत जिरवणे आणि साठवणे यासाठी अनेक योजना केल्या आहेत. पण पाऊसच पडला नाही तर काय होईल?
         पाऊस पडला नाही तरी बारवातील अंतर्गत स्त्रोतातून भूगर्भातील पाणी झिरपून बारवात पाणी भरते. दुष्काळात या पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच बारवातील पाण्याची स्वच्छता राखणे, बारवातील गाळ काढून अंतर्गत स्त्रोताचा मार्ग मोकळा करणे, बारवाच्या भिंतीतून होणारी गळती थांबवणे, झाडे, झुडपे, पाण्यातील वेली काढून टाकणे या सर्व प्रक्रिया करून बारवाची निगा राखली तर दुष्काळातही पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकते. एक वर्ष पाऊस पडतो तर दुसर्‍या वर्षी दुष्काळ असतो अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे. अशा स्थितीत बारवांसारखे जलसाठे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जलदान आणि जलसंरक्षण हे पुण्य कार्य आहे.
गेल्या अनेक दशकांपासून ज्या बारवांनी आपली तहान भागवली त्या बारवांकडेच आपण दुर्लक्ष केले. बारवांची निगा राखण्यासाठी आपण निधी नाही म्हणतो आणि दुष्काळात 20 रुपये लिटरने पाणी विकत घेण्यास मात्र आपण तयार होतो. आपण आजवर ज्या चुका केल्या त्या सुधारण्याची आता वेळ आली आहे. बारवांचे स्थापत्य सौंदर्य न्याहाळात त्यातील स्वच्छ पाणी औंजळीने पिण्याचे स्वप्न पूर्ण करूया. लोकसहभाग आणि जलसंवर्धनासाठी दान देत अखंड महाराष्ट्रात बारव संवर्धनाच्या उपक्रमाची सुरुवात करूया.
  खटाव तालुक्यात गुरसाळे येथील रामेश्वराचे मंदिर, कातरखटाव येथील कात्रेश्वराचे मंदिर व सातारा तालुक्यातील परळी येथील केदारेश्वराचे मंदिरही अशाच प्रकारच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.या मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांमुळेच ही मंदिरे महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून अल्प परिचित आहेत. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु ही मंदिरे तांत्रिक उपासना सांप्रदायाच्या प्रभाव असणाऱ्या काळात उभारली गेली, यावर बहुतांश संशोधकांचे एकमत आहे. मद्य, मांस, मस्य, मुद्रा व मैथुनी या पाच गोष्टींना मिळून पंचमकार अशी संज्ञा तयार होते. याच गोष्टीचे वा उपासनामार्गाचे शिल्पांकन साताºयातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते.
        जिल्ह्याला या मंदिरांच्या रुपाने ऐतिहासिक वारला लाभला आहे. अनेक दशकांपासून उभी असलेली ही मंदिरे साताºयातील खजुराहो म्हणून ओळखली जातात. सध्या काही मंदिरांची दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
गुरसाळेतील पुष्करणी वैशिष्ट्यपूर्ण
      गुरसाळे येथील रामेश्वर मंदिराचे छत मोठ्या दगडी शिळांचे बनलेले आहे. बाजूच्या भिंती आतून बाहेरून सपाट आहेत तर दर्शनी बाजू अलंकृत आहेत. मंदिराच्या बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सजवलेल्या आहेत. यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगूल शिल्पे, मैथून शिल्पे, वेगवेगळ्या कामक्रीडांचे चित्रण असलेली शिल्पे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड.

 3 ) फलटणची  मंदीरे :-

 जबरेश्वर मंदिर :-
    फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जबरेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.   
  फलटण शहरात यादव काळात (इ.स.पू. १००० ते १४००) अनेक मंदिरे बांधली गेली. त्यापैकी एक प्राचीन "जरबेश्वर मंदिर" आजही राजवाडा व श्रीराम मंदिरा यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे. हे मंदिर हेमांडपंथी शैलीतील आहे.   
    जबरेश्वर हे मूळचे जैन मंदिर असावे. तेथील चोवीस तीर्थकरांच्या मूर्ती व ललाटबिंबातील (गणेशपट्टीतील)  जिनाची मूर्ती हे स्पष्ट दर्शवितात. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात  महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. या उत्तराभिमुख मंदिरास गर्भगृह व प्रवेशमंडप असून तळ्याचे विधान 
चतुरस्त्र आहे. बाहेरील भिंतीवर शिल्पांकन आढळते. गर्भगृहात छताखाली पादपृष्ठावर चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत. गर्भगृहाचे द्वार कलाकुसरयुक्त असून मंदिरातील मूर्तीत अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती लक्षणीय आहेत. गाभार्‍यच्या प्रवेश व्दाराशेजारी पाच फण्यांची नागीण व तिचे दोन पिल्ले यांची मुर्ती आहे, 
तर उजव्या बाजूला कोनाडयात विठ्ठल-रुक्मीणी, नंदी, कासव, गणपती अशा मुर्ती आहेत. गाभार्‍यातील पिंड चौकोनी आकाराची असून तिचे तोंड पूर्वेकडे आहे. पिडीवर दोन शाळुंका आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या मैथून शिल्पांची बरीच मोडतोड करण्यात आलेली आहे. श्रीराम मंदिराजवळ काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध जबरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे हेमांडपंती शैलीतील  मंदिर असून, त्यावरील शिल्पाकृती व दगडावरील बारीक कलाकुसर आकर्षक आहे. हे मंदिर एकाच प्रचंड 
आकाराच्या शिळेमधून कोरून काढल्यासारखे वाटते. गाभाऱ्यातील पिंडी चौकोनी आकाराची असून, तिचे तोंड  पूर्वेकडे आहे. चौथे मुधोजीराव निंबाळकर (१८५३ - १९१६) यांनी जबरेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीची स्थापना  केली. गर्भागृहात छताखाली २४ तीर्थंकरांच्या मूर्ती दिसून येतात. पिंडीवर दोन शाळुंका असून, त्यांचा आकारही  वेगळा आहे. अशा प्रकारची पिंडी सहसा कोठे आढळत नाही. गर्भागृहाचे द्वार अनेक शिल्पांनी मढविलेले असून, मंदिरातील मूर्तीमध्ये अष्टदिक्पाल व सुरसुंदरी यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराशेजारी पाच  फण्यांची नागीण व तिची दोन पिल्ले यांची मूर्ती आहे. उजव्या बाजूला कोनाड्यात विठ्ठल-रुक्मिणी, नंदी,
 कासव, गणपती अशा मूर्ती आहेत. येथील गोलाकार आकारातील सभागृह बंदिस्त आहे.
  फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव साहित्यात याचा ‘पालेठाण’ असा उल्लेख आढळतो. येथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे असून फलटणला, महानुभाव पंथीयांची "दक्षिणकाशी" म्हणून ओळखले  जात असे. 
श्रीराम मंदिर : 
फलटणमधील श्रीराम मंदिर हे शहराचे भूषण आहे. हे मंदिर २२५ वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला राजवाडा, तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरासमोर तीन दीपमाळा आहेत. गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या नयनमनोहर मूर्ती आहेत. हे मंदिर हेमाडपंती शैलीतील असून, याचा शिखर व कळस अत्यंत प्रेक्षणीय आहे. श्रीराम मंदिराला लागूनच राधाकृष्ण, एकमुखी दत्त व गरुड यांची मंदिरे आहेत. त्याच्या उत्तरेला श्रीमंत मुधोजीराव नाईक-निंबाळकर यांनी बांधलेले दत्तात्रयाचे मंदिर आहे. फलटणमध्ये जैनधर्मीयांची वस्ती मोठी आहे. व्यापार-उदिमासोबत त्यांचा स्थानिक सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असतो. त्यांची अनेक मंदिरे या गावाची शोभा वाढवीत आहेत.
श्री चक्रपाणि प्रभूंचे "श्री आबासाहेब मंदिर", फलटण)
    फलटण शहरातील हे मंदिर श्री अप्पासाहेब मंदिर या नावाने ओळखले जाते.या आशी हे रंभाइसा याचे मंदिर म्हणून ओळखले जात होते.रंभइसा हि श्री चक्रपाणी प्रभु यांची सावत्र आई आणि मावशी होती. चक्रपाणी प्रभु यांची आई जनकाइसा होत्या. चक्रपाणी एक वर्षाचे असताना रंभइसाने त्यांना आपल्या घरी आणले.चक्रपाणी प्रभु फलटणमध्ये दहा वर्ष राहीले.
   जुन्या मंदिराचे पुढे नुतनीकरण झाले.महानुभाव पंथाची जी सुंदर देवस्थान आहेत त्यापैकी एक हे फलटणचे मंदिर.हे मंदिर चक्रपाणी महाराजांचे चरणांकित स्थान मानले जाते.   
मुधोजी मनमोहन राजवाडा : 
    आज हा वाडा फलटणच्या वैभवाचा इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. सुमारे साडेतेरा एकर क्षेत्रफळाची (जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट) ही भव्य वास्तू उत्तम स्थितीत उभी आहे. १६-१७व्या शतकातील मराठा शैलीतील जुनी व १८-१९व्या शतकातील ब्रिटिश शैलीतील नवी रचना अशी जोडवास्तू हे याचे वैशिष्ट्य आहे.
मुधोजी मनमोहन राजवाडा महात्मा गांधी स्मारक निधीला त्यांनी दानपत्र करून दिला; मात्र देखभालीचा खर्च झेपत नाही या सबबीवर महात्मा गांधी स्मारक निधीने मुधोजी मनमोहन राजवाडा परत केला. हा वसा त्यांनी नंतरही सुरू ठेवला. महाराजसाहेबांनी विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञास एक हजार एकर जमीन दिली होती. त्यांच्या दातृत्वाची महती सांगणारी अशी अनेक उदाहरणे आहेत. एकदा कर्मवीर भाऊराव पाटील राजेसाहेबांना म्हणाले होते, ‘मी आज एक मुलगा तुमच्या ताब्यात देत आहे.’ हा मुलगा म्हणजे आपल्या अभ्यासपूर्ण ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले. त्यांची ही कर्मभूमी. अखेरपर्यंत ते मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य होते. त्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. रविकिरण मंडळाचे सदस्य कवी गिरीश हेही काही काळ फलटण येथे मुधोजी विद्यालयात अध्यापन करीत होते. फलटण मुक्कामात त्यांनी काही कवितांची रचना केली होती.
मुधोजी मनमोहन राजवाडा : आज हा वाडा फलटणच्या वैभवाचा इतिहासाचा मानबिंदू ठरला आहे. सुमारे साडेतेरा एकर क्षेत्रफळाची (जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट) ही भव्य वास्तू उत्तम स्थितीत उभी आहे. १६-१७व्या शतकातील मराठा शैलीतील जुनी व १८-१९व्या शतकातील ब्रिटिश शैलीतील नवी रचना अशी जोडवास्तू हे याचे वैशिष्ट्य आहे. जुना भाग भारतीय वास्तुकलेचा व त्यातील लाकडी कलाकुसरीचा सुंदर नमुना आहे. सुंदर कडीपाट, नक्षीदार भक्कम दरवाजे, लाकडी तुळया व आधाराचे खांब अशा पद्धतीच्या वास्तू आता यापुढे निर्माण होणार नाहीत. राजवाड्यात निवासी, कार्यालयीन अशा प्रकारची वास्तुरचना यामध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार जुन्या व नवीन आकर्षक फर्निचरने सजविलेले दिवाणखाने येथे आहेत. त्यांना ‘गुलाबी हॉल’, ‘हिरवा हॉल’, ‘बदामी हॉल’, ‘दरबार हॉल’, ‘सुरुच हॉल’, ‘हमखासे हॉल’ अशी सुंदर नावेही दिली आहेत. पॅलेस बांधताना खासगी वापराच्या खोल्या, त्यामध्ये, कोठी, मुदपाकखाना (किचन), देवघर, माजघर, व २४ शयनगृहे अशी रचना असून, संस्थानाच्या कामकाजासाठी कार्यालये, दरबार इत्यादी सर्व गोष्टी विचारात घेतल्या आहेत. उजेडासाठी व वारा खेळण्यासाठी अनेक चौकांची खुबीने रचना केलेली आहे. त्यामधे ‘रामाचा चौक’, समारंभासाठी ‘दसऱ्याचा चौक’, ‘देवीचा चौक’, ‘तुळशीचा चौक’, ‘मुदपाक चौक’, ‘पागा चौक’ व ‘नजरबाग’ असे चौक आहेत. त्याच्या बाजूने ओवऱ्या आहेत. सात खणी, चार खणी, गोल खणी असे खोल्यांचे विविध आकारही आहेत. वाड्याचा दर्शनी भागही खूप आकर्षक आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे व चालूही असते; मात्र हा वाडा इतर राजवाड्यांसारखा खुलेआम बघता येत नाही. फलटणच्या राजघराण्याच्या संग्रहात अनेक दुर्मीळ व्हिंटेज कार आहेत.
गिरवी ग्राम अर्थात दक्षिण वृन्दावन
    पुण्यातून फलटण साधारण ११० किमी. आणि फलटण पासून साधारण ८,१० किमी अंतरावर असलेले हे गिरवी गाव.गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या हाताला असलेले हे मंदिर.निरव शांतता, बाहेर मोठा वृक्ष,त्या वृक्षाखाली एक छोटे खोलीवजा मंदिर, ज्यामध्ये देवाकडे पाहत असलेली हनुमंत, नंदी आणि गरुडाची मूर्ती.
 मंदिराच्या मागे विहिर असून तिथे पादुका आहेत त्याचे प्रथम दर्शन घेतले जाते.इथे एक विशाल चिंचेचा वृक्ष आणि त्याच्या पायथ्याशी भरपूर पाणी असलेली विहीर.
त्या विहिरीपाशीच एक छोटेखानी मंडप घालून गिरिधराची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकाराच्या पादुका स्थापित आहेत. 
      समोरच, सकृतदर्शनी एखादा चौसोपी, ऐसपैस वाडा वाटावा अश्या धाटणीचे, चिरेबंदी मंदिर. थोरल्या दरवाजाने आत शिरल्याशिरल्या डाव्या बाजूला एक छोटासा आड, समोर देवळाचे सभागृह आणि थेट गर्भगृह. श्रीकृष्णाची काळ्या शाळीग्रामात साकारलेली मूर्ती. हरि आणि हर, दोहोंना एकात पाहण्याची.खाली चौकोनी पिंड आणि त्यावर साकारलेली हरीची, बासरीवादन करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णाची मूर्ती,त्याच्या बाजूला दोन गायी, श्रीकृष्णाचे बासरीवादनान ऐकण्यात मुग्ध झालेल्या. बघताक्षणी मनाला भावणारी.
ह्यामागची संक्षिप्त कथा अशी. 
      साधारण ७०० वर्षांपूर्वी गिरवी ह्या गावात श्रीकृष्णभक्त श्रीयुत. बाबुराव देशपांडे राहत होते. त्यांना कृष्णभेटीचा ध्यास लागून राहिला आणि त्याच ध्यासातून त्यांना समाधिस्थ अवस्थेत गोपालकृष्णाने अमुक अमुक ठिकाणी शाळीग्राम मिळेल असा  दृष्टांत दिला. श्रीयुत बाबुराव देशपान्डे यांनी दृष्टांत मिळाल्याप्रमाणे त्या ठिकाणी उत्खनन केले असता, ज्यावर श्रीविष्णूची चिन्हे होती असा हा, भलाथोरला शाळीग्राम प्राप्त तर झाला.
    पण पुढचा प्रश्न उद्भवला. त्यांना त्यांच्या मनातील मूर्ती साक्षात साकार करू शकेल असा मूर्तिकार मिळेना. त्यांनी परत गोपाळकृष्णाचा धावा केला.काही दिवसांनी जय-विजय नावाचे दोन मूर्तिकार श्रीयुत देशपांडे यांना येऊन भेटले आणि तुमच्या मनातील मूर्ती बनवून देतो असा दावा केला.पण देवच तो, भक्ताची परीक्षा घ्यायची म्हणून का काय माहित नाही पण ह्या दोन्ही मूर्तिकारापैकी एक थोटा आणि दुसरा आंधळा.दैवी संकेत होताच, होकार देणे हा फक्त उपचार. त्यांना मदत म्हणून श्रीयुत देशपांडे यांनी त्यांच्या दिमतीला म्हणून काही मदतनीस देऊ केले, पण त्या दोघांनी एकांतात काम करण्याची अट कबुल करवून घेतले. पुढील काही दिवस अविश्रांत मेहनत करून साकारलेली मूर्ती बाबुराव महाराजांसमोर ठेवली. देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणतात ना?मनातील मूर्ती मूर्त स्वरूपात समोर पाहून श्रीयुत बाबुराव याना अतिव आनंद झाला.
      मूर्ती ४ फुटाची, गोपालकृष्ण एका पायावर उभा, दुसऱ्या पायाची आढी घालून तो केवळ अंगठ्यावर टेकविलेला. मूर्तीला कुठेही जोड नाही.मूर्ती सालंकृत, सगळे अलंकार ठसठशीत.दोन्ही हातांची बोटे कोरलेली, त्यामध्ये फक्त लाकडी मुरली ठेवायची. इतके बारीक काम कि तळहातावरील रेषाही स्पष्ट दिसाव्यात.पायाशी दोन्ही गायी तल्लीन होऊन श्रीमुखावलोकन करताना.दर्शनी पट्टीवर चार मानवी आकृती आहेत, त्यामधील दोन ह्या मूर्तिकारांच्या आणि उर्वरित दोन भगवंताचे द्वारपाल जय-विजय यांच्या ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे खुद्द ईश्वरालाही अभिप्रेत असलेला हरी-हर, हा एकात्मतेचा अविष्कार- हा गोपालकृष्ण चौकोनी शिवलिंगाकारावर- शाळुंका स्वरूपावर- साकारलेला आहे. इतका लोभस बारकाव्यासहित कि थेट श्रीमद भागवतात उल्लेखलेल्या युगंधराची हुबेहूब प्रतिमा दगडावर चितारल्याचा भास व्हावा.
त्यासाठीच बाहेर हनुमंत, गरुड आणि नंदीही विराजमान आहेत.
     मूर्ती पूर्ण झाल्यावर श्रीयुत बाबुराव यांनी मूर्तिकाराला सन्मानाने जेवणाचे आमंत्रण दिले. तेव्हा दोन्ही मूर्तिकार पाय धुवून येतो म्हणून मागील विहिरीवर गेले ते तिथेच अंतर्धान पावले.भक्ताचे लाड पुरवायचे, भाविकांना दर्शन द्यायची अनंताची इच्छा म्हणून आलेलेअनंताचे दूत, अनंताला घडविणारे अनंत,कार्य झाल्यावर अनंतात अंतर्धान पावले.त्यांची खूण म्हणून त्या विहिरीवर घडवून घेतलेल्या पादुका ह्या नजीकच्या काळातील आहेत. ह्या पादुका स्थापित करण्यामागे श्री जयंतकाका यांना दृष्टांतरुपी प्रेरणा आहे. जणूकाही तो युगंधर त्याला गीतेत अभिप्रेत असलेला ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या प्रसंगातून साकारलेल्या मूर्त रूपाने पुनःश्च सांगायला इथे उभा ठाकला आहे, प्रश्न आहे तो फक्त आपण अंत:र्मुख होऊन जाणून घेण्याचा.जे कोणी सत्पुरुष येथे येऊन गेले, त्यांच्या अनुभूतीप्रमाणे भगवंत त्यांच्या एका जिवलग भक्त- श्री. बाबुराव- यांच्यासाठी - इथे गहाण रुपी राहिला आहे, म्हणून या स्थानाचे नाव गिरवी, जणू नामाघरी पाणी वाहणारा श्रीखंड्या
    मोह आवरत नाही म्हणून एक दाखला द्यावासा वाटतो तो महाभारतातील दुर्योधनाच्या आणि अर्जुनाच्या मानसिकतेतील स्पष्ट फरकाचा,साक्षात ईश्वर सामोपचाराच्या गोष्टी करायला आलेला पाहूनही दुर्योधनाचा अहंभाव त्याच्या मुखी वदतो,
जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति: 
जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति:
आणि दुसरीकडे पराक्रमी तरीही गोंधळलेल्या अवस्थेतील अर्जुन अनन्यभावाने श्रीकृष्णाला शरण जातो.दुर्योधना त्याच्या समस्येचे फक्त प्रतिपादन करूनच थांबला नाही तर त्याच्या समस्येचे समर्थनही करता झाला. समस्या तर किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला पण होती. पण तो त्याच्या मनातील समस्या भगवंताला फक्त सांगून थांबला नाही तर त्या समस्येचे निराकरण करण्याचे साकडे हि भगवंताला घालून रिकामा झाला.आपण कोण ते आपण ठरवायचे आहे. तो भगवंत सगळ्यांनाच द्यायला उभा ठाकलाय, प्रश्न एवढाच कि आपला वाडगा सरळ आहे का पालथा?
   श्रीयुत बाबुराव यांनी मूर्तीची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करून मंदिराची सेवा योग्य त्या माणसाला सोपवून ह्या गोपाळकृष्णाच्या पायी समाधी घेऊन आपले जीवितकार्य संपविले. हि समाधी गर्भगृहाच्या खालील तळघरात आहे. ह्या तळघरात काही वेळ विसावलो, एका अनामिक शांततेचा लाभ घेतला. मंदिराच्या उत्तरेस असलेल्या गणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पुजार्यांनी सांगितल्याप्रमाणे हे स्थानही जागृत आहे.
    मंदिरात साधारण ७५ एक साधकांची सत्संग/साधना होऊ शकेल असा आटोपशीर हॉल आहे, मागेच स्वच्छतागृह आणि पाणी गरम करण्याची सोयही आहे.
 

4 ) वसंतगड

      ज्वाजल्य संघर्षाचा इतिहास असणार्‍या महाराष्ट्रात अनेक गड शुर योध्यांनी केलेल्या बलिदानामुळे किंवा पराक्रमामुळे ओळखले जातात.उदा. सिंहगड हे नाव डोळ्यासमोर आले कि तानाजीची वीरगाथा आठवणारच, पुरंदर म्हणाले कि आपसुक मुरारबाजीचे नाव पुढे येणार्,अवघ्या साठ मावळ्यानिशी प्रचंड मोठा गड घेतलेला कोंडाजी फर्जंद आणि पन्हाळा हे अद्वैत्,विशाळगड आणि बाजीप्रभुंचे बलिदान हे न विसरण्याजोगे,नाशिक जिल्ह्यातील कण्हेरागड एरवी दुर्लक्षित राहिला असता,पण रामजी पांगेरामुळे तो इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदला गेला.पण एक गड कदाचित पायथ्याच्या गावात जन्म घेतलेल्या वीरामुळे प्रकाशझोतात आला.ते शुर योध्दे म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि तो गड म्हणजे अर्थातच वसंतगड.
इतिहास
 या गडाला प्रत्येक कालखंडात इतिहासाचे संदर्भ आहेत.वसंतगडाचे मुळ नाव चंद्रगिरी पर्वत असून त्याचा संदर्भ थेट रामायणाशी जोडला जातो. यासंदर्भात एक कथा सांगितली जाते, ती अशी.शुर्पणखेचा मुलगा शांभरी.आई शुर्पणखेचे नाक लक्ष्मणाने कापले, म्हणून त्याचा सुड उगवण्यासाठी त्याने या पर्वतावर ईंद्राची उपासना सुरु केली.ईंद्र प्रसन्न झाला कि त्याचे वज्र हे अस्त्र मागून त्याने राम-लक्ष्मण यांच्यावर वापर करुन शुर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्याची त्याची इच्छा होती.त्याने एका जागी बसून तप आरंभल्यावर त्याच्या भोवती वेळूचे दाट बन तयार झाले.झाडीझुडुपात शांभरी लुप्त झाला.एके दिवशी ईंद्र प्रसन्न होउन त्याने आपले अस्त्र शांभरीसाठी या पर्वतावर सोडले.योगायोगाने त्याच वेळी लक्ष्मण फिरत फिरत या पर्वतावर आले.नेमके त्यांनी वज्र या वेळूच्या बनात पडताना बघीतले. त्यांनी वज्र उचलून सहज म्हणून वेळूच्या बनावर चालवले,त्यामुळे आत तपश्चर्या करणार्‍या शांभरीचे हातपाय कापले गेले.त्या अवस्थेत शांभरी बाहेर आल्यावर लक्ष्मणांना पश्चाताप झाला आणि त्यांनी शांभरीला वर दिला कि 'लोक तुला चंद्रसेन म्हणून ओळखतील इथे येणारे भाविक देव म्हणून तुझी पुजा करतील आणि हा पर्वत तुझ्या नाबाने म्हणजे चंद्रगिरी डोंगर म्हणून ओळखला जाईल.' आजही या डोंगरला चंद्रगिरी म्हणतात आणि गडावर आपण चंद्रसेनाचे मंदिर आपण बघु शकतो. 
      वसंतगडाची निर्मिती भोज शिलाहार राजाने केली.  शिवपूर्वकाळात अनेक शतके यवनसत्तेच्या अमलाखाली होता. मसूर परगण्याचे पूर्वांपार जहागीरदार महादजी जगदाळे हे विजापूरच्या आदिलशाहीच्या सेवेत होते. हा किल्ला आदिलशाहीत असलेल्या सरदार जगदाळे यांच्या ताब्यात होता. या भागाचा सर्व कारभार याच किल्ल्यावरून होत होता. अशावेळी ह्या भल्यामोठ्या वाड्याचे अवशेष बहुधा जगदाळे यांच्याच वाड्याचे असावेत मात्र सबळ असा कोणताही पुरावा मिळत नाही.
      हा किल्ला अफजलखान मोहिमेपर्यंत आदिलशाहीच्या सेवेत असलेल्या मसूरच्या सरदार जगदाळे यांच्या ताब्यात होता, कारण अफजलखानाच्या बाजूने जगदाळे हे छत्रपतींच्या विरोधातील लढाईत सामील झाले होते. १० नोव्हेंबर १६५९ ला अफजलखान मारला गेला आणि विजापूरच्या सैन्याची दाणादाण उडाली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. छत्रपतींनी प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा कोथळा बाहेर काढून आदिलशाहीस मोठा दणका दिला होता. अनपेक्षित  पराभवाने गांगरलेल्या आदिलशाहीतील कोल्हापूरपर्यंतचा सर्व मुलूख व किल्ले घेण्यासाठी छत्रपतींनी लगेचच मोहिम आखली. खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले आणि वसंतगड स्वराज्यात घेतला.शत्रूच्या गोटात सामील होऊन स्वराज्य द्रोह करणाऱ्या जगदाळेला मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली.याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला.
  पुढे शिवाजी महाराजांचा मिर्झाराजे जयसिंगांशी संघर्ष झाला आणि पुरंदरचा तह झाला,त्यामध्ये शिवाजी राजांना मोघलांना तेवीस किल्ले देणे भाग पडले,त्यात या वसंतगडाचा समावेश होता.वास्तविक सिद्दी जोहरच्या वेढयातून महाराजांची सुटका झाल्यावर त्यांनी जिंकलेला आदिलशाही मुलुख परत दिला, तरीही हा वसंतगड शिवाजी महाराजांकडे कसा राहिला हे समजत नाही. त्यानंतर इ. स. १६७० मधे स्वराज्याच्या मावळ्यांनी हा परत घेतला. छ. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी अंतानंतर काहीशी अनागोंदी झाल्याने स्वराज्यातील बहुतेक किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले त्यात वसंतगड देखील होता.  छ. राजाराम महाराज जिंजीला असताना मराठी सरदारांनी पुन्हा त्याला स्वराज्यात सामील केले असणार कारण जुलै १६९९ ला दातेगड जिंकून सेनापति धनाजी जाधव व शंकराजी नारायण सचिव हे राजाराम महाराज व ताराबाईसाहेब यांच्या भेटीसाठी वसंतगडला गेले होते.  पुढे जिंजीहून परत आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते. इथच वर्हाडातील राजा बुलंदबख्त याच्या वकीलाशी त्यांची भेट होउन वर्‍हाड्,खानदेशातील संयुक्त मोहीमेचा बेत ठरला.त्याच वर्षी लुत्फुल्लाखानाने वसंतगडला वेढा घालण्याचा असफल प्रयत्न केला होता. मात्र मोगल बादशाह औरंगजेब कराड मुक्कामी राहून वसंतगडा वेढा घालून किल्ल्याची रसद तोडण्यासाठी परिसरातील वाड्या जाळून टाकल्या होत्या. अखेर रसद तुटलेल्या किल्लेदाराने किल्ला मोगलांच्या हवाली केले व मराठ्यांची होणारी कत्तल थांबवली. हा जिंकलेला किल्ला पाहण्यासाठी स्वतः औरंगजेब किल्ल्याच्या दरवाजात जेव्हा पोहोचला तेव्हा तेथील लोकांची गर्दी पाहून त्याने स्वतःच्या हातातील तरवारीने अनेकांना मारले. छ. राजाराम महाराज जिंजीहून परत येताना येथे काही दिवस वास्तव्यास असल्याची नोंद आढळून येते तर मोगल बादशाह औरंगजेबाच्या ताब्यात हा किल्ला गेला असताना वसंतगडाचे त्याने केले "किली - द - फतह" असे नामकरण केले होते. मात्र फार दिवस तो मोगलांच्या ताब्यात राहिला नाही.
इ. स. १७०७ मधे महाराणी ताराराणीच्या वतीने परशुराम त्र्यबंक प्रतिनिधींनी मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला जिंकून घेतला. छ. शाहू महाराजांच्या सुटकेनंतर रामचंद्रपंत अमात्य यांनी शाहूला पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व त्याच्या स्वराज्याचा कारभारास शुभेच्छा दिल्या होत्या आणि हीच गोष्ट ताराराणीस न आवडल्याने तिने अमात्यांच्या पायात रूप्याच्या बेड्या घालून वसंतगड येथे कैदेत ठेवले होते. इ.स. १८०७ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे व प्रतिनिधी यांच्यात तंटा निर्माण झाला तेव्हा पेशव्यांचा सेनापती बापु गोखले ( ) यांनी वसंतगडाजवळ प्रतिनिधींचा पराभव करुन त्यांना कैद करुन पुण्याला पाठवून दिले. यावेळी प्रतिनिधींची आश्रीत ताई तेलीन हिने बापु गोखले यांना बरीच टक्कर दिली. इ.स. १८१५ मध्ये गंगाधरशास्त्रीच्या खून केल्याप्रकरणी त्रिंबकजी डेंगळे यांस पेशव्यांनी कैद करुन येथे ठेवले होते मात्र या कैदेतून पसार होण्यात डेंगळे यशस्वी झाला होता. १३ मे १८१८ मधे ब्रिटिश मन्रोच्या नेतृत्वाखाली हा किल्ला इंग्राजांनी जिंकून पहिल्यांदा मुख्यदरवाजा पाडून टाकला.
गडावर पोहोचण्याच्या वाटा
  या इतिहासप्रसिध्द गडावर जायला दोन वाटा आहेत.
१) तळबीड वरुन :-
    वसंतगडाचे पायथ्याचे गाव म्हणजे इतिहास गाजवणार्‍य़ा सरसेनापती हंबींरराव मोहीते आणि महाराणी ताराबाई यांचे ‘तळबीड’ गाव. तळबीड हे वसंतगड या किल्ल्याच्या(पूर्वेस) पायथ्याचे गाव.कराडवरुन अर्ध्या तासाच्या अंतरावर तळबीड गाव आहे. कराड - सातारा रस्त्यावर कराड पासून ८ किमीवर तळबीडला जाणारा फाटा आहे. एसटी स्थानकावरुन तळबीडला जाण्यास दर अर्ध्या तासाला एसटी आहे. गावातच हंबीररावांचे स्मारक आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्याची चढण सुरु होते. वाट मळलेली आहे. पुढे वाट गडाला उजव्या हाताला ठेवत एका झाडाजवळ येते. तेथून सहजपणे गडमाथा गाठता येतो. गावातून किल्ल्यावर जाण्यास ४५ मिनीटे लागतात.
 कराड-चिपळून रस्त्यावरुन दिसणारा वसंतगड
२) वसंतगड गावातून :-
    याशिवाय कराड - चिपळूण रस्त्यावर , कराड पासून ९ किमी अंतरावर वसंतगड गावात जाणारा रस्ता आहे. गाव संपल्यावर वसंतगडला जाण्यासाठी मळलेली वाट आहे. तेथून उत्तरेला साडेतीन किलोमीटर वर वसंतगड हा किल्ला आहे.
हा किल्ला पुणे - बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराच्या अलिकडेच असलेल्या तळबीड गावाशेजारी आहे. अर्थात तळबीड गाव पुणे-बेंगळुरूअशियाई महामार्गापासून जवळ पडत असल्यामुळे तळबीडला जाणे तुलनेने सोयीचे आहे.सहाजिकच बहुतेक दुर्गभटके तळबीड गावातूनच वसंतगडाला जातात.शिवाय या मार्गे गेल्यावर तळबीड गावातील हंबीरराव मोहितेंच्या समाधीचे दर्शनही घेणे शक्य होते.  तळबीड गावात आल्यावर समोरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्मारक दिसते.राष्ट्रीय महामार्गावरून कराडकडे जाताना टोल नाक्यापासूनच उजव्या बाजूला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर तळबीड हे गाव आहे. 
गावात प्रवेश करतानाच समोर अतिशय देखणे असे सरसेनापति हंबीरराव मोहितेंचे स्मारक आहे. एकेकाळी दुर्लक्षित असणारी हि समाधी आज नवा साज घेउन डौलाने उभारली आहे. आपल्या या पराक्रमी भुमीपुत्राचा गावाला वाटणारा अभिमान या स्मारकातून दिसून येतो. बाहेर एतिहासिक तोफा ठेवल्या आहेत.आतमध्ये स्मारकाची आणि हंबीरराव मोहितेंची माहिती लावली आहे
 
 
     मोठया मोठ्या नैसर्गिक दगडी पायऱ्या चढत आपण तळबीड प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. हे प्रवेशद्वार गोमुखी बांधणीचे ( शत्रूला लक्षात येऊ नये म्हणून प्रवेशद्वार आतल्या बाजूला करतात , त्याला गोमुखी प्रवेशद्वार म्हणतात ) 
दरवाजा म्हणजे दगडात कोरलेल्या पायऱ्या सोडून इतर कोणतेही अवशेष नाहीत, आणि याचे कारण आहे ब्रिटिशांची हिंदुस्थानावर असलेली सुमारे दिडशे वर्षांची सत्ता. आमच्या पूर्वजांच्या ऐतिहासिक वारसास्थळांची तोफा लावून नासधूस केली या गो-यां राक्षसांनी.
दरवाजाच्या अलिकडे डाव्या बाजूला एका घुमटीत श्री गणेशाची चार साडेचार फूट उंच सुंदर मूर्ती पाहून आपले दोन्ही हात नकळतच जोडले जातात. गणेश दर्शनाने किल्ला चढणीचा आलेला शारीरिक थकवा एका क्षणात नाहिसा होतो. हिंदू धर्म संस्कृतीत देवदेवतांना अनन्यसाधारण महत्त्व का दिले जाते याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. नव्या दमाने किल्ला पाहण्याची उत्सुकता निर्माण होते.
 त्यानंतर खडकात खोदलेल्या पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. तटबंदीच्या आतील भागात शेजारीच श्री हनुमानाचे इवलेसे मंदिर व तिचे समोर असलेली भगवी पताका वा-यामुळे सतत फडकत असते.हनुमानाची मूर्ती उग्र स्वरूपातील दिसते. जवळ जवळ सर्व शिवकालीन गडावर, हनुमान उग्रस्वरूपात दर्शन देतात.(स्थानिक लोक याला' चपट्या / चापट्या मारुती' असं संबोधतात.या मूर्तीचा उजवा हात जणू काही, शत्रूला मारण्यासाठी उगारलेला असतो. डाव्या बाजूला गोलाकार पाण्याने भरलेली लहान विहीर आहे. एकंदरीत स्वरुप पहाता ईथे पहारेकर्‍यांच्या देवड्या असाव्यात हे निश्चित.
 गडावर प्रवेश करताच समोर एक झोपडीवजा हाॅटेल/दुकानआहे.( चहा नाश्त्याची सोय होवू शकते). इथून आपल्याला वसंतगडाचा विसृत पसरलेला माथा बघायला मिळतो. वसंतगडावरील जमीन सपाट आहे. गडाच्या माथ्यावर आपणास एक प्रचंड गोलाकार मैदान दिसते. अधून मधून झाडी दिसतात. मध्यभागी भरपूर झाडी व थोडासा उंचवटा आहे. तिथं चंद्रसेन महाराज यांचे जुन्या बांधणीचे मंदिर आहे. . वसंतगड किल्ला सर्वसाधारणपणे 120 एकर परिसरात पसरलेला आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर आपण गडाच्या मध्यभागी असलेल्या श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिराशेजारी येऊन पोहोचतो.  
मंदिराच्या भोवती पुर्वी तटबंदी असणार.सध्या त्या भिंतीचे थोडे अवशेष आणि दरवाजा दिसतो. अर्थात हे ही आता मोडकळीस आले आहे. या मंदिराकडे जाणर्‍या पायर्‍यापैकी एका पायरीवर काही अक्षरे कोरलेली दिसतात.अर्थात अस्पष्ट असल्यामुळे वाचता येत नाहीत.
   चंद्रसेन महाराजांचे मंदिर दक्षिणाभिमुख  आहे. मंदिर सुरेख असून आत गाभार्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे.चंद्रसेन महाराज हे अनेक मराठे घराण्यांचे कुलदैवत आहे. दगडी मंदिर असून प्रशस्त सभामंडप आहे. 
मंदिरासमोर एकाच दगडी चौथ-यावर दोन दीपमाळा असून दीपमाळेच्या पायथ्याशी अनेक भंग झालेल्या मूर्ती ओळीत मांडून ठेवलेल्या आहेत.पूर्वी एकच प्रचंड मोठी दीपमाळ होती. ती पडली, सध्या तिचे दोन भाग उभे आहेत. तसेच ईथे काही दगडी तोफगोळे ही आहेत. 
चंद्रसेन मंदिरातील मूर्ती अतिशय सुंदर असून तिच्या उजव्या बाजूला जोगेश्वरी तर डाव्या बाजूला जानाईदेवीची सुंदर मूर्ती आहेत. ही जानाईदेवी चंद्रसेन देवाची बहीण आहे, असे काहींचे मत आहे.चंद्रसेन हा शूर्पणखेचा मुलगा. महादेवाची खूप तपश्चर्या करून खड्ग प्राप्त करून घेतले. शेवटी लक्ष्मणाने त्याचे दोन्ही हात तोडले. सध्याच्या मूर्तीचे दोन्ही हात अर्धेच आहेत. मात्र उत्सवमूर्ती पूर्ण हातांची आहे.इकडे याला चंद्रोबा / चांदोबा असेही म्हणतात.शुर्पणखेचे नाक कापून कोयनेच्या डोहात टाकले म्हणुन तिथे अजूनही नकटे मासे सापडतात.सुपने गावातील दैत्य मंडळी,जोमलिंग या गोष्टी या कथेला पुरावा म्हणुन स्थानिक लोक दाखवितात.
     या चंद्रसेन महाराजांना  अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात. जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. भक्तांनी चंद्रसेन देवाची मंदिरे आपआपल्या गावी बांधली आहेत. त्यात निमसोडचे घाडगे यानी निमसोडला तीन मंदिरे बांधली आहेत , रायगाव, धोडवाडी, पलसगाव, कोळ, पुसेसावळी, विटा अशा अनेक गावात चंद्रसेन मंदिरे आहेत. या चंद्रसेनाचा वध लक्ष्मणाने चैत्र वद्य एकादशीला केला म्हणुन या चंदोबाची यात्रा त्याच दिवशी असते. 
     मंदिर प्रदक्षिणा करीत असताना उजवीकडे असलेल्या भिंतीवर एक शिलालेख असून इ. स. १७०० साली मंदिर जीर्णोद्धारासाठी मदत केलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी कोरलेली आहे. चंद्रसेन महाराजांची यात्रा चैत्रातील दुसऱ्या पंधरावड्यात या किल्ल्यावर दरवर्षी भरते तर दस-याला पूर्वीचे बारा बलुतेदार चंद्रसेन महाराजांच्या पालखी घेऊन गड पठारावर प्रदक्षिणा करतात. चंद्रसेन महाराजांचा संबंध पुराणातील रामायणाशी असल्याच्या विविध आख्यायिका भक्तजनांच्या मनात रूजलेल्या आहेत. 
याच चंद्रसेन मंदिराच्या बाहेर पडल्यावर मागेच गर्द झाडीत असलेल्या श्री.सूर्यदेवता आणि श्री. नरसिंह देवता यांच्या मूर्ती नुकत्याच टिम वसंतगडला सापडल्या. टिमच्या सदस्यांनी श्रमदान करुन श्री नरसिंह व श्री सुर्यदेवता मंदिर परिसरातील झाडी काढून मंदिराकडे जाणारा रस्ता घनदाट झाडीने बंद होता तो पुर्णपणे मोकळा करण्यात आला.या ठिकाणी खूप झाडी असल्यामुळे पुर्वी हे मंदिर दुर्लक्षित होते पण आता ते प्रकाशात आणण्याचे काम 'टीम_वसंतगड 'च्या सदस्यांनी केले.
मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला एका भल्यामोठ्या वाड्याचे अवशेष दिसून येतात. हा वाडा या किल्ल्याच्या किल्लेदाराचा  असावा.
 इथून पुढे डाव्या बाजूला लक्ष्मी मंदिर आहे त्यामध्ये शिवलिंग व गजांतलक्ष्मी पहावयास मिळते. या मंदिराच्या डाव्या बाजूलाच वाड्याचे अवशेष आहेत. व उजवीकडे विठ्ठल मंदिर आहे . याची थोडी पडझड झालेली दिसते.
या मंदिराच्या अलिकडे श्रीराम व मारुती मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे पाहताना श्रीराम, माता सीता, लक्ष्मण यांच्या संगमरवरी सुंदर मूर्ती पाहून एक जाणीव होते की, मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचा वनवास अजूनही संपलेला नाही.  या मूर्ती दोन वेळा बसवल्याचे लक्षात येते. जुन्या(भंगलेल्या ) खाली आणि नवीन चौथऱ्यावर आहेत.
याशिवाय याच परिसरात दगडी जाते हि दिसते.
   मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे उत्तर दिशेने गेल्यास वाटेत आपणास चुन्याच्या घाण्याचे अवशेष दिसतात.
  गडाच्या मध्यभागी असलेली मंदिरे आणि इतर अवशेष पाहून पुन्हा गडाच्या पुर्व दरवाज्याक्डे यावे.ईथून तटबंदीवर चढून गडाच्या माथ्याचा फेरफटका करुया.  गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत.गडाभोवती तटबंदी आहे व चार बुरुज आहेत. त्यातील दोन पूर्वेकडील व पश्चिमेकडील बुरुज चांगल्या स्थितीत आहेत.
बारकाईने बघीतले तर बुरुजांच्या बांधणीचे एक वेगळे वैशिष्ट्य ईथे दिसून येते.बहुतेकदा तटबंदीच्या बाहेर बुरुज आलेले असतात.ईथे मात्र तटबंदी पुढे आणि बुरुज मागे अशी वेगळीच रचना पहावयाला मिळते. दोन बुरुज तर तटबंदीपासून आत सुटे बांधले आहेत. याच प्रकारचे बुरुज संकेश्वरजबळील वल्लभगडावर बघायला मिळतात. बुरुज मागे असल्यामुळे पहारेकर्‍यांना वावरण्यासाठी असलेली शेरहाजी बुरुजाच्या तळाशी बाहेरुन बांधलेली आहे. वास्तविक शिलाहार भोज राजा ( दुसरा ) याने या परिसरातील बाकीचे गड उभारुन सुध्दा तटबंदी आणि बुरुजांचे हे वैशिष्ट्य इतर गडावर बघायला मिळत नाही.तेव्हा हि तटबंदी भोज राजाच्या कारकीर्दीत उभारली कि नंतर ? असा प्रश्न पडतो. 
गडाच्या आग्नेय टोकाच्या बुरुजाची बांधणी आवर्जून पहावी अशीच आहे.ईथेच एक तटबंदीत लपविलेला शौचकुप आहे.  
गडाच्या या बाजुला खाली वसंतगड गाव दिसते.या बुरुजाखालील डोंगर सोंडेवर एक चौकोनी आकाराची गुहा आहे. हा बहुतेक गुप्त मार्ग गडावर निघाला असावा. कारण गुहेचा शेवट कुठपर्यंत आहे , हे शोधता आलेले नाही. या गुहेची उंची पावणे दोन फ़ुटांपर्यंत असुन रुंदी फ़ारच कमी आहे.एकावेळी गुहेत एकच व्यक्ती यागुहेची लांबी वीस फ़ुटांपर्यंत असुन शेवटच्या टॊकाला विहीरसादृश्य रचना बाहेरुन दिसली. इथे वटवाघुळांचा रहिवास असल्याने दुर्गधींमुळे शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकत नाही. कदाचित ही गडावर जाण्याची चोरवाट किंवा चकवा असण्याची शक्यता असावी. 
गडाच्या तटबंदीवरुन वाट्चाल सुरु ठेवायची. या दक्षिण बाजुला आडवा तिडवा पसरलेला बौध्द लेण्यांनी पोखरलेला आगाशिवाचा डोंगर दिसतो. फिरत फिरत आपण गडाच्या पश्चिम बाजुला आलो कि आपल्याला कोयना नदी आणि तिचे अफाट पसरलेले खोरे दिसते.या बाजुला सह्याद्रीच्या निळसर रांगाचे मनमोहक दर्शन होते. वातावरण स्वच्छ असल्यास गुणवंतगड उर्फ मोरगिरी आणि काळगाव परिसरातील गुढे पाचगणीच्या पठारावरील पवनचक्क्या दिसतात.  
याच बाजुला कमळ फुलांनी लगडलेले कोयना तळे आहेत. गडाच्या विस्तृत पसरलेल्या माथ्यावर बरेच पावसाळी तलाव आहेत. यातील कोणत्याच तळ्याचे पाणी पिण्यायोग्य नाही.अर्थात त्यातील कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत.कोयना तळे गडाच्या पश्चिम बाजुला आहे .या तळ्यात असलेले पांढऱ्या रंगाची कमळपुष्प पाहताना मनाला आनंद होतो. आज जर हे वैभव दिसत आहे तर मराठ्यांचा सुवर्णकाळात काय असेल याची कल्पनाच केलेली बरी.  यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत.इतिहासात उल्लेख केल्याप्रमाणे, गडावर बारा बुरुज आणि तीन विहिरी होत्या.गडावर या तीन विहिरीतील गाळ काढूनही, त्या किती खोल आहेत याचा अंदाज येत नाही. इंग्रजांनी या विहिरीत गडावरील तोफा टाकून दिल्या, असं काही म्हणतात तर काहीजणांच्या मते इंग्रजांनी तोफा गडाखाली ढकलुन दिल्या.गडमाथ्याची भटकंती करताना हे सर्व तलाव आपल्याला दिसतात.
तसेच पुढे गेल्यास गडाच्या वायव्य बाजुला एक बुरुज दिसतो .या बुरुजावर जिना असून आपल्याला वर जाता येते. वर टेहळणी करण्यासाठी तीन फूट उंचीचा मोठा झरोका आहे,त्यातून आजूबाजूचा परिसर स्पष्ट दिसतो.तिथून खाली साकुर्डी गाव आणि ' भवानी मातेचे मंदिर' दिसते.
यानंतर आपण येतो गडाच्या उत्तर टोकाकडे. पश्चिम बुरुजाजवळ किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे.  किल्ल्यावरील पश्चिमेस असणारा एकमेव दरवाजा सुस्थितीत असून याचे बांधकाम गोमुखी पद्धतीचे आहेत. हा किल्ला जरी भोज राजाने बांधला असला तरी संरक्षणाच्यादृष्टीने त्या त्या काळानुसार त्याचे रचनेत बदल केले गेले त्यानुसार या दरवाजाच्या बाजुचे बुरुज बाहेरील बाजुस दरवाजा सहज दृष्टीक्षेपात येणार नाही असे बांधले आहे
 हे काम शिवकालिन असल्याचे त्याचे रचनेवरुन दिसते. या दरवाजाच्या डाव्या बाजूला तटबंदीच्या आतील भव्य गोलाकार बुरूज असून तो अखेरच्या घटका मोजत आहे, तर उत्तरेच्या बाजूचा बुरूज देखील त्याच अवस्थेत आहे. या दोन्ही बुरूजावर जाण्यासाठी वर्तुळाकार सुमारे २५ ते ३० पायऱ्या आहेत. पूर्वेला असलेला बुरूज, तटबंदी व दरवाजा जवळजवळ नष्ट होत आला आहे.   वसंतगडावरील तटबंदी, दरवाजा व वाड्यांचे अवशेष हे सर्व जांभ्या दगडातील असल्याने ऊन, वारा व पावसाने भग्न होण्याच्या स्थितीत आहेत.
या दरवाजाचे चौकटीचे बाहेरील बाजुस डोक्यावर शेपुट असणारी लढाऊ वीर हनुमानाची मुर्ती आहे. याही बुरुजाशेजारी देवडीचे अवशेष असुन त्याच्या समोर भिंतीचे अवशेष आहेत त्याच्या रचनेवरुन ती सदर असावी. याच पूर्वेकडील तटबंदीत एक सुस्थितीतील तत्कालीन शौचकूप आहे.गडाच्या उत्तरेकडील बुरूजाशेजारी श्री हनुमानाची भग्न मुर्ती सापडली आहे. या दरवाज्यातून बाहेर पडणारी वाट खाली बेलदरे गावाच्या हद्दीतील नाईकबा देवस्थानाकडे जात असल्याने याला 'नाईकबा दरवाजा' म्हणतात.समर्थ रामदासांच्या ११ घळींपैकी चंद्रगिरी घळ वसंतगडापासून दिड ते दोन तासांच्या अंतरावर आहे. वसंतगडावरील पश्चिमेच्या प्रवेशव्दारातून म्हणजेच नाईकबा दरवाज्यातून बाहेर पडून खिंडीत उतरावे.गडाच्या पश्चिमेला, गडावरून उतार सुरु होतो, आणि पुन्हा डोंगर सुरू होतो.तिथून चरेगाव बेलदरे गावातून चंद्रगिरी घळ गाठावी. परत येतांना वसंतगडा पर्यंत न येता चरेगावात उतरावे. तिथून कराडला येण्यासाठी वडाप व बसची चांगली सोय आहे.
गडाचे उत्तर टोक बघीतले कि आपला परतीचा प्रवास सुरु होउन पुन्हा तळबीडकडे असणार्‍या पुर्व बाजुच्या दरवाज्याकडे येण्यासाठी आपण निघतो. तेथुन पुढे आपण शेवटच्या बुरुजाकडे निघूया.वसंतगडाच्या डोंगराला नैसर्गिक कातळकडा पुरेसा उंच नसल्याने पुर्ण गडमाथा वेढणारी तटबंदी बांधलेली दिसते. तटबंदी वरुन जाताना ठिकठिकाणी मशाल ठेवण्याच्या खोबण्या आहेत.गडावर नजरेत मावणार नाही एव्हडं विस्तीर्ण पठार आहे.  तटबंदीला अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी छोटे छोटे आऊटलेटस आहेत.
या बाजुला आणखी एक बुरुज असून त्यावर चढण्यासाठी बाहेरुन गोलाकार पायर्‍या आहेत. त्यावर चढल्यास पुर्व बाजुचा पसरलेला नजारा दिसतो.  या बुरुजाच्या शेजारी एका कोठीचे अवशेष दिसतात. हि पहारेकर्‍यांसाठी असावी. 
यामध्ये ईशान्येला मसुर भागातील डोंगर, गडाच्या खालच्या बाजुला तासवडे एम.आय.डी.सी. आणि तासवडे टोलनाका, जमीनीवर काळी रेघ ओढल्यासारखा दिसणारा पुणे-बेंगळूरु महामार्ग आणि त्यावरुन अखंडीत धावणारी वहाने, हिरव्यागार शेतींने झाकलेली सुपिक जमीन चिरत धावणारी कृष्णा नदी, आग्नेयेला सदाशिवगड आणि लांबवर कराड शहर. निवांत बसून अनुभवावा असा हा नजारा.
 ईथून पाय निघत नाहीत्,मात्र कर्तव्याची जाणीव होउन नाईलाजाने आपण उठतो. थोडे अंतर गेले कि आणखी एक प्रशस्त तलाव दिसत्प. हे आहे कृष्णा तळे. याला गर्द झाडीचा वेढा पडलेला आहे.
या तळ्याच्या काठावर अनेक अज्ञात समाध्या व सतीशिळा आहेत. या अवशेषांवरुन एक निश्चित होते की वसंतगड रक्षणासाठी अनेक पराक्रमी योद्ध्यंनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.वसंतगडावर सैनिक संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे अनेक वाड्यांच्या जोत्याचे पुरावे दिसून येतात. गडावर लहानमोठी सहा तळी असल्याने पाणीसाठा विपुल असावा.
  पुढे गेले कि जमीनीतच पडलेला वेडावाकडा रुंद चर बघायला मिळतो. हे नैसर्गिक टाके असावे. ईथे पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे याचा उपयोग पाण्याच्या टाक्यासारखा होत असणार. टिम वसंतगडने याची नुकतीच स्वच्छता केली. गडावरचे  प्रचंड पठार आणि पावसाळ्यात त्यावर उगवणार्‍या गवतामुळे परिसरातील गावातील जनावरांची मोठ्या प्रमाणात वर्दळ ईथे असते. या तालावातील पाणी त्यांना उपयोगी पडते.
  यानंतर परतीची वाट पकडली कि आपण उन्हा दरवाज्या पाशी येतो आणि आपली गडाफेरी संपते.
गडमाथ्यावर काळी माती आहे, भर पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी भरपूर प्रमाणात गुडघाभर चिखल असतो. त्यामुळे फिरणे सोयीचे होत नाही.शक्यतो सरता पावसाळा ते अगदी मे महिन्यात सुध्द्दा वसंतगडाला भेट देता येईल.

5 ) साखरगड निवासिनी: देवी यमाई अर्थात अंबाबाई:

    कोरेगावच्या उत्तरेला ११ कि. मी. वर वसना नदीच्या उपनदीकाठी किन्हई वसले आहे.हे पंत प्रतिनिधींचे मूळ गाव असून ते या गावचे कुलकर्णी होते. त्यांनी पुढे औंध संस्थानाची स्थापना केली. औंध संस्थान विलीन झाल्यावर किन्हईचा कोरेगाव तालुक्यात समावेश करण्यात आला. गावात पंत प्रतिनिधींचा मोठा वाडा असून तो सुंदर व मजबूत आहे. वाड्याभोवती तटभिंत असून इमारतीचा खालील भाग दगडी व वरील विटांचा आहे.येथील स्वागत कक्ष भव्य आहे. वाड्यातील काही खोल्यांचे बांधकाम सुंदर आहे. या वाड्यात सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कार्यरत आहे. वाड्याच्या पाठीमागे ओढ्याच्या उजव्या तीरावर महादेवाचे मंदिर असून त्यास ओढ्याच्या पात्रापर्यंत पायर्‍या आहेत. मंदिरास सर्व बाजुने खुला मंडप आहे. त्यास गाभारा व शिखर आहे.
गावाच्या अग्नेयेस असलेल्या टेकड्यांपैकी पूवेकडील टेकडीवर साखरगड निवासिनी (पंत प्रतिनिधींची कुलदेवता) यमाई  देवीचे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी गावातून सरळ रस्ता आहे. टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत दगडी पायर्या आहेत. मंदिराभोवती तटभिंत असून तिला आतून मारा करण्यासाठी जंग्या आहेत. 
मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला असून त्यास कमान आहे. कमानीवर नगारखाना आहे. पूर्वेकडे आणखी एक प्रवेशद्वार असून ते टेकडीच्या दक्षिणेकडून येणार्‍या भाविकांसाठी आहे.प्रवेशद्वारातून आत आल्यावर पायरीवर पण एक शिलालेख आहे. 
 मंदिराच्या डाव्या बाजुस छताजवळ लहान प्रवेशद्वाराच्या उत्तरेस दोन्ही बाजुला दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर दोनदा वीज पडून पडझड झाल्याने ती पुन्हा बांधण्यात आली. परंतु तीच्यावर तिसर्‍यांदा वीज पडली तेव्हा तो अपशकून समजण्यात आला. दीपमाळेचे नंतर केव्हातरी बांधकाम केले आहे. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे. 
गाभारा चौकोनी असून त्यात पितळी मुखवटा असलेली देवीची मूती आहे. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मूर्ती दागिन्याने मढवलेली असून मूर्तीवर पडणारा प्रकाश परावर्तीत होण्यासाठी दागिन्यात काचेचा वापर केला आहे.या देवीची यात्रा कार्तिक पौर्णिमेपासून १५ दिवस असते.
मंदिरावर असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत आणि सुबक प्रतिमा कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे.
जावे कसे ? 
    सातार्‍यावरुन सातारा रोड-नांदगिरीमार्गे किन्हईला जाता येते.

किन्हई - सगळ्या महाराष्ट्राची कुलदेवता आहे तुळजापूरची तुळजाभवानी. या भवानी मातेचं एक रूप आहे साताऱ्याजवळ, किन्हईत, साखरगडवासिनी नावाने. एका टेकडीवर ही औंधच्या यमाई देवीची बहीण असल्याचं सांगतात.
औंधच्या पंतप्रतिनिधींची ही कुलदेवता. पंतप्रतिनिधी मूळचे याच गावचे कुलकर्णी. गावामध्ये त्यांचा एकेकाळचा राहता वाडा आहे. सध्या त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय असले तरी त्याची अंतर्गत रचना पाहण्यासारखी आहे.
गावाच्या एका बाजूला, दोन कि.मी. वरील टेकडीवर या देवीचे मंदिर आहे. इथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला टेकडीच्या पायथ्यापासून जवळपास २५० पायऱ्यांचा; आणि दुसरा गडाच्या उजव्या बाजूकडून घाटाने जाणारा डांबरी पक्का रस्ता. या मार्गाने आल्यास, घाटाच्या सुरुवातीला, घाटाई देवीचे मंदिर आहे. त्यावर लिहिलेल्या लेखानुसार, हे मंदिर रामचंद्र पंतप्रतिनिधी यांनी बांधलेलं आहे. घाटाने वर आल्यावर १४-१५ पायऱ्याच चढाव्या लागतात. या तटबंदीमधील पायऱ्यांनी वर गेल्यावर, मंदिरआवारात, मागून प्रवेश करावा लागतो. आवारात डाव्या बाजूला काळ्या पाषाणामध्ये देवीची मीटरभर उंचीची मूर्ती रंगविलेली आहे. तटबंदीमधील दरवाज्यावर नगारखानाही आहे. पायऱ्यांनी आल्यास मंदिराच्या उजव्या बाजूच्या दरवाज्यातून आत यावे लागते. कोणत्याही बाजूने आलं तरी आवारात आल्यावर प्रथम लक्ष वेधून घेते ती मंदिरासमोरील दीपमाळ. या दीपमाळेशिवाय मंदिर आवारात आणखी तीन दीपमाळा आहेत. त्यांपैकी मंदिरासमोरील दोन दीपमाळांवर लेख कोरलेले आहेत. या दीपमाळांपैकी एकीवर तीन वेळा वीज पडली असल्याचं सांगतात. मंदिराच्या डाव्या बाजूला काही ओवऱ्या आहेत. मंदिर हेमांडपंती पद्धतीचे असून एक मीटर उंचीच्या जोत्यावर बांधलेले आहे. मंदिराचा मंडप मात्र लाकडाचा आहे. यामध्ये १९३३-३४ साली काढलेली काही चित्रे (पेंटिंग्ज्) लावलेली आहेत. ती औंध गावात असणाऱ्या मंदिरामधील चित्रांची आठवण करून देतात. शिवाय इथे काही देवदेवतांची चित्रेही लावलेली आहेत. मूळ मंदिरामध्ये या मंडपाला जोडलेला आणखी एक (पहिला) मंडप आहे. याला तीनही बाजूला दरवाजे आहेत. गाभारा मात्र पूर्णपणे बंदिस्त असून, देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्याला एक काचेची फ्रेम बसविलेली आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. याच्या दोन्ही बाजूला व्यालांचे शिल्प आहे. गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीला पितळी मुखवटा असून तिला अनेक दाग-दागिने घातलेले आहेत.
मंदिराच्या कळसावर भरपूर शिल्पं कोरलेली आहेत. यांमध्ये विष्णू दशावतार, राम-भरत भेट, देवी-देवता यांची शिल्पं असून त्यावर काही ठिकाणी जुन्या काळातील रंगही शिल्लक आहे. कळस वगळता मंदिराची रंगरंगोटी केलेली आहे. शिवाय काही भागांची वेळोवेळी योग्य प्रकारे डागडुजीही केलेली आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे.

6 ) किकलीचे श्री भैरवनाथ मंदिर

           पुणे-सातारा या राष्ट्रीय हमरस्त्याने वाई-महाबळेश्वरकडे जाताना खंबाटकी घाट उतरल्यावर भुईंज हे गाव लागते. तिथेच डावीकडे चंदन-वंदन किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. या दोन किल्ल्यांच्या मध्ये एक रुंद खिंड आहे. दोन्ही गडमाथ्यांकडून उतरत आलेले तीन टप्पे पायर्‍यांसारखे दिसतात. हमरस्त्यावरच भुईंज गावातून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. किकली गावात देखण्या प्रवेशद्वाराचे, दीपमाळा असणारे, चिरेबंदी बांधणीचे एक शिवमंदिर आहे. त्याला श्री भैरवनाथ मंदिर म्हणतात. खूप कलाकुसर असणारे हे ठिकाण.
       किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्‍या पायर्‍या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्‍या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे.
चंदन- वंदन
मंदिर प्रवेशद्वार
प्रवेशद्वारातून दिसणारे मुख्य मंदिर
प्रवेशद्वारातून आत येताच मधे पटांगण आहे व दोहो बाजूंना ग्रामपंचायतीची शाळा आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्‍यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे.
उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष
गणेशवंदना कोरलेला भग्नावस्थेतला स्तंभ
मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. आता प्रश्न येतो मंदिराचा कार्यकाळ नेमका कुठला? चंदन वंदन ही शिलाहारांची निर्मिती असल्याने साहजिकच ही शिलाहारांची निर्मिती वाटते पण तसे नसावे. शिलाहारांची इतर मंदिरे जसे कुकडेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर ह्यांपेक्षा ह्या मंदिराची शैली भिन्न आहे. तिचे साधर्म्य यादवकाळातील मंदिरांशी जास्त जाणवते. मला स्वतःला हे मंदिर आणि त्यांतील मूर्तींची शैली ही पिंपरी दुमाला, लोणी भापकर आणि पेडगाव येथील मंदिरांच्या शैलीशी जास्त मिळतीजुळती वाटली.
सिंघण यादवाने १३ व्या शतकात खिद्रापूरनजीक भोजराजा शिलाहाराचा पाडाव करुन कोल्हापूर शिलाहारांची राजवट नष्ट केली तत्पुर्वीच सिंघणाच्या आक्रमणात हा भाग यादवांच्या राज्यात सामील झाला व यादव राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी.
ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे.
मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत.
भैरवनाथ मंदिर, किकली
मुखमंडप
मुखमंडपाच्या समोरील बाजूस विविध प्रकारचे व्याल कोरलेले आहेत. सर्वसाधारणपणे व्याल म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी विविध मुखे कोरलेली आहेत.

मेषव्याल --------------शुकव्याल -------------- अश्वव्याल --------------वृषभव्याल
a-a--a--a

गर्दभव्याल --------------------- सिंहव्याल ------------------------ वराहव्याल---------व्याघ्रव्याल
मुखमंडपाच्या भिंतीवरील वादक
मुखमंडपावरील शिल्पे- गरुड, विष्णू, मैथुनशिल्प, ऋषी व त्याखालील व्यालपट्टीका
ह्या शिवाय येथे एक प्रसवेचेही (बाळाला जन्म देत असलेली स्त्री) शिल्प आहे.
प्रसवा
चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात.
सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. मला सर्वप्रथम ती मूर्ती महावीरांची वाटली. पण ते महावीर नसावेत कारण मंदिर पूर्णपणे शैव आहे.
सभामंडपाचे प्रवेशद्वार
प्रतिहारींच्या हाती नेहमीच एक लांबुळकी पिशवी दिसते ह्याचा अर्थ असा की मंदिराच्या बांधकामासाठी ह्या पिशवीतून ते धन, जल आदी आणत आहेत.
प्रवेशद्वारावरील भैरव द्वारपाल, प्रतिहारी
गज व शरभ
प्रवेशद्वाराच्या उंबर्‍यावरील नक्षीकाम
सभामंडप अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव आदि शिल्पे कोरलेली आहेत.
आता सभामंडपांतील स्तंभांवरची काही निवडक शिल्पे पाहूयात.

सभामंडपाची रचना
हे आहे तीन धडे व चारच पाय असणारे आभासी शिल्प. अशी शिल्पे पिंपरी दुमाला, भुलेश्वर, पेडगाव अशा मंदिरांतही आहेत.
आभासी शिल्प
याजनंतर येते ते त्रिविक्रमाचे शिल्प. स्तंभाच्या दोन बाजूस दोन प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूस वामन अवतार तर त्याच्या शेजारील बाजूस त्रिविक्रम अवतार.
छत्रीधारी वामन बळीराजाच्या दरबारात तीन पावले भूमीचे दान मागायला आलेला दिसतो आहे. ह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात बळी राजा कमंडलूतून वामनाच्या हातावर पाणी सोडून दान देतो आहे तर शेजारी शुक्राचार्य वामनाचे कपट ओळखून त्याला बळीला अटकाव करत आहे.
ह्याचाच शेजारी स्तंभाचे दुसरे बाजूस त्रिविक्रमाचे शिल्प आहे. दोन पावलांनी आकाश व जमीन वापून विष्णू प्रकट झाला आहे. तिसर्‍या पावलाने बळीचे मस्तक व्यापून त्याला पाताळात जागा दिलेली आहे तर बळीचे शेजारी गरुड आणि एक विष्णूगण दिसत आहे.
वामनावतार
त्रिविक्रम
रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत.
रामहस्ते सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या मायावी मारीच राक्षसाचा वध
राम हनुमानाची भेट
सुग्रीवाकडून रामाच्या शरकौशल्याची तालवृक्षांचा छेद करुन होणारी परिक्षा व शेजारी वाली सुग्रीव युद्ध
रामहस्ते वालीवध
हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस व राक्षसींचे सीतेला रामाचे तुटलेले मायावी मस्तक दाखवून धमकावणे
हा बहुधा कुंभकर्णवध अथवा रावणवध
रामायणाशिवायही इतरही काही प्रसंग येथे कोरलेले आहेत.
हे बहुधा महाभारतातील भीमाचे गजयुद्ध असावे
हा बहुधा शिव असावा कारण शेजारी नंदी आहे. पण सिंहामुळे प्रसंग कोणता आहे ते समजत नाही.
शिवतांडवाचे प्रसंगही स्तंभांवर कोरलेले आहेत.
शिवतांडव १
शिवतांडव
कलशपूजन करणारे हंस

खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे.
पौराणिक शिल्प
स्तंभाच्या खालच्या बाजूसही काही सुरसुंदरी, हरिहर आदींच्या मूर्ती आहेत.
हरिहर
नर्तकी
अभिसारिका आणि तिला त्रास देणारे मर्कट
दर्पणसुंदरी
सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच.
छतावरील नक्षीकाम
ह्यानंतर तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
ह्यानंतर मंदिराच्या बाह्यभागाचा फेरफटका करुया.एकूण साधीच रचना विशेष असे काहीच नाही. एका ठिकाणी अशाच त्रिदल गाभार्‍याने युक्त असलेल्या मंदिराचा नुसता पायाच आढळतो. इथे मंदिर बांधावयाचे काम राहून गेलेले असावे.
निसर्गाच्या सानिध्यात इतिहासाच्या पाऊल खूणा जपणाऱ्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला असणारे हे पांडवकालीन भैरवानाथाचे मंदीर भारत सरकारने सुमारे ५ कोटी रूपये खर्च करून मंदिर नव्याने जिणोध्दारीत केले आहे. त्याचे मांगल्य पावित्र्य हे किकली देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ जपत आहेत. त्यातच वीरगळींचे गाव म्हणून इतिहास संशोधकांनी राज्यातील पहिले गाव म्हणून नामांकन केले आहे.
किकली गावातील वीरगळी : -
       किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे धूमशान झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे.
खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव. पूर्वजांच्या बलिदानाची ही स्मारके अशी भग्नावस्थेत आणि कशीही पडलेली दिसतात.

 7 )  जाधव वाडा- भुईंज

     सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावात छत्रपती शिवाजीमहाराज व राणी सईबाई यांची मुलगी राणूबाई जाधव यांच्या वंशजांचा वाडा आहे.साधारण ३०० वर्षापूर्वीचा हा वाडा आहे.वाडा एकदम सुस्थितीत आहे. वाड्याचे भव्य प्रवेशद्वार आतमधला भव्य चौक लक्ष वेधून घेतो.आतमध्ये दिवाणखाना आहे. मोठे देवघर आहे.अनेक चित्रपटांचे चित्रिकरण पण ह्या वाड्यात झाले.बाड्याबाहेर एक शिवकालीन बारव आहे. जवळच राणूबाई यांची समाधी आहे. सद्यस्थितीत वाड्यात जाधवरावांचे वंशज भैय्यासाहेब जाधवराव हे राहतात.
  राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या. राणूबाईंचा जन्म इ.स.१६५१ मधे राजगडावर झाला. राणुआक्का म्हणजे प्रेम, त्याग ,समर्पण, ह्यांचा अखंडपणे वाहणारा झराच जणु..राणुआक्कांचे आपले छोटे बंधु शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते. शंभूराजेंना आईची ऊणीव राणुआक्कानी कधीच भासु दिली नाही. आपल्या बंधुच्यामागे कायम त्या ढाली सारख्या ऊभ्या रहात.  राणीसाहेब सईबाई यांच्या मृत्यूनंतर इ.स.१६६० मधे जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुबाई यांचा विवाह शिंदखेडचे लखुजी जाधवराव यांचे पुत्र दत्ताजी,दत्ताजी यांचे पुत्र ठाकुरजी व ठाकुरजी यांचे पुत्र अचलोजी जाधवराव यांच्याशी राजगडावर लावून दिला. जाधवरावांच्या घरी राणुबाईंचा विवाह करून जिजाऊ आऊसाहेबांनी आपले माहेर व शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.निजामशाहाने लखुजी जाधवरावांच्या मुला -नातवांडासह सर्वांची हत्या केली. त्यानंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात विखुरले गेले. यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली , येथे स्थायिक झाली.
या प्रमुख घरापैकी भुईंज हे घर .येथेच राणुआक्का यांचे वास्तव्य होते.आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुणां जपत मोठ्या दिमाखात उभा आहे.राणुआक्का यांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भैय्या साहेब जाधवराव तेथे वास्तव्यास आहेत .
 
 
   सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर पुढे त्यांना दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन मिळाले. त्यामुळे त्यांना निजामशाहीत मोठे महत्त्व प्राप्त झाले. अकबराने निजामशाहीवर आक्रमणे केली (१५९४ ते १६००), त्यावेळी चाँदबीबीने त्यास यशस्वी तोंड दिले, ते जाधवरावांच्या सहकार्यामुळेच. चाँदबीबीचा खून झाल्यावर, निजामशाही अस्तंगत होत असताना, ती वाचवण्यासाठी, मुर्तजा नावाच्या वारसास परिंडा येथे तख्तावर बसवण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात जाधवरावांचा हात होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करणा-या जाधवरावांची पुढे मुला-नातवांसह निजामशहाकडूनच हत्या झाली! त्यानंतर जाधव कुटुंबातील काहीजण स्थलांतरित झाले. त्यांतील खंडोजीराव हे पुत्र भुईंज येथे वास्तव्यास आले. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे नांदत आहे.
   जाधव घराण्‍याचे दोन वाडे भुईंज गावात होते. त्‍यापैकी एक वाडा पडला आहे. एक सुस्थितीतील चौसोपी आहे. त्‍या वाड्याचे दोन बुरुज दिसतात. वाड्यात जाण्यासाठी दोन बाजूंनी दहा-दहा रुंद पाय-या आहेत. वाड्याचा दरवाजा भक्कम स्थितीत आहे. आत शिरताच दोन प्रशस्त ‘ढेलजा’ दृष्टीस पडतात. जाधवरावांची कुटुंबे, वाटण्या झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. वाड्याचा दिवाणखाना उत्तम स्थितीत असून तेथे प्रशस्त देवघर आहे. देवघरातील मूर्ती सुंदर असून त्यातील गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. दिवाणखान्याच्या बाजूस असलेल्या प्रशस्त दालनात प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत. ते दालन ‘राममंदिर’ असल्याचे मानले जाते. वाड्यात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी, तो मोठ्या प्रमाणावर होत असे. कालपरत्वे त्याचे स्वरूप लहान होत चालले आहे. राममूर्तीसंबंधी आख्यायिका सांगितली जाते. ती अशी - एकदा एक घोडा गावात फिरत होता. त्या घोड्यास पकडून जाधवरावांच्या वाड्यावर आणले गेले. त्या घोड्याच्या गळ्यात वस्त्रात गुंडाळलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती दिसून आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जाधवरावांनी त्यांच्या वाड्यात केली. जाधव घराण्‍याचे वारस त्यांच्याकडे ती मूर्ती ‘समर्थ रामदास स्वामींकडून आली’ असे सांगतात.
     जाधव घराण्यातील रायाजीराव नावाचे पुरुष २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांची छत्री (समाधी/घुमट) भुईंज गावात उभी आहे. दगडकाम भक्कम आहे. त्या समाधीवरील शिल्पांमुळे तिला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. ती शिल्पे म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. समाधीच्या जोत्यावर चारही बाजूंस सिंहाच्या तोंडात हत्ती असल्याचे शिल्प आहे. ते शिल्प यादवकालीन शिल्पकलेत पाहण्यास मिळते, त्यामुळे ते घराणे सिंदखेडकर जाधवराव या घराण्यातील आहे हे सिद्ध होते.
   त्यांच्याकडे महजराच्या नकलेशिवाय एकही कागद शिल्लक नाही. त्या महजरात जमिनीच्या वाटणीचा व्यवहार नमूद केला आहे. त्यावर अठरा लोकांच्या निशाण्या आहेत. त्यांत तीन शेट्टी यांच्या तराजूच्या, तर पंधरा पाटलांच्या नांगरांच्या निशाण्या आहेत. त्याशिवाय गुरव-मृदंग, कुंभार-चाक, चांभार-इंगो, माळी-खुरपे, मांग-चर्हाोट, न्हावी-आरसा, महार-विळा, दोरी, जंगम-घंटा, परीट-मोगरी, सोनार-सांडशी, तेली-घाणा, भोई-पालखी, तराळ-काठी, चौगुला-अधोली अशा निशाण्या आहेत.
त्या महजरात खंडो नारायण कुलकर्णी, बाबाजी बानाजी चौगुले, सुभानजी चौगुले यांची नावे आहेत. कसबे वाई, कसबे किकली, जांब, सुरुर, कवठे, केंजळ, कडेगाव, बावधन, ओझर्डे, गुळुंब, शेंदुरजणे इत्यादी ठिकाणच्या पाटलांच्या निशाण्या आहेत. महादजी गणेश, भागवत देशमुख, भगवंत सामराज, गिरजाजी सुंगो - देशकुलकर्णी, रामाजी अप्पाजी, जनार्दन - सुभेदार प्रांत वाई, राजाजी बाळाजी – सभासद प्रांत वाई हे प्रमुख अधिकारी असल्याचे त्या कागदपत्रांवरून समजते.

जाधवरावांच्या जहागिरीसंबंधीची आकडेवारी त्यांच्या घराण्यातील ब्रिटिश आमदानीतील एका कागदपत्रातून मिळते. त्यांना पंधरा लाखांपर्यंत जहागिरी होती.
 जाधवराव घराण्याने वंशाच्या कर्तबगारीचा वारसा स्वातंत्र्योत्तर काळातही भुईंज येथे चालवला. तात्यासाहेब जाधवराव हे त्यांपैकी एक कर्तृत्ववान पुरुष होते. त्यांनी काही सार्वजनिक कामे केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विनंतीवरून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीसाठी त्यांनी व त्यांचे बंधू नानासाहेब ऊर्फ माधवराव व बाळासाहेब यांनी पाच एकर जमीन दिली. तात्यासाहेबांचे पुत्र विजयसिंह ऊर्फ बाबासाहेब हे भुईंज गावचे काही काळ सरपंच होते व किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पत्नीदेखील काही काळ भुईंज गावच्या सरपंच होत्या. नानासाहेब जाधवराव हे अश्वारोहणात प्रवीण होते. त्यांचे साता-याच्या राजघराण्याशी निकटवर्ती संबंध होते. त्यांना शिकारीचा छंद होता. त्यांनी वाघ, रानडुकरे यांच्या शिकारी केलेल्या आहेत.   त्या घराण्याचे सोयरसंबंध सातारकर छत्रपती, दत्तवाडीकर, राजेघोरपडे, म्हसवडकर राजेमाने, माहूरकर, सासवडकर, जाधव, राजेशिर्के, खानविलकर, बडोदेकर, गायकवाड इत्यादी राजघराण्यांशी आहेत.
 जाधव वाडा- भुईंज
     सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावात छत्रपती शिवाजीमहाराज व राणी सईबाई यांची मुलगी राणूबाई जाधव यांच्या वंशजांचा वाडा आहे.साधारण ३०० वर्षापूर्वीचा हा वाडा आहे.वाडा एकदम सुस्थितीत आहे. वाड्याचे भव्य प्रवेशद्वार आतमधला भव्य चौक लक्ष वेधून घेतो.आतमध्ये दिवाणखाना आहे. मोठे देवघर आहे.अनेक चित्रपटांचे चित्रिकरण पण ह्या वाड्यात झाले.बाड्याबाहेर एक शिवकालीन बारव आहे. जवळच राणूबाई यांची समाधी आहे. सद्यस्थितीत वाड्यात जाधवरावांचे वंशज भैय्यासाहेब जाधवराव हे राहतात.
  राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या. राणूबाईंचा जन्म इ.स.१६५१ मधे राजगडावर झाला. राणुआक्का म्हणजे प्रेम, त्याग ,समर्पण, ह्यांचा अखंडपणे वाहणारा झराच जणु..राणुआक्कांचे आपले छोटे बंधु शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते. शंभूराजेंना आईची ऊणीव राणुआक्कानी कधीच भासु दिली नाही. आपल्या बंधुच्यामागे कायम त्या ढाली सारख्या ऊभ्या रहात.  राणीसाहेब सईबाई यांच्या मृत्यूनंतर इ.स.१६६० मधे जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुबाई यांचा विवाह शिंदखेडचे लखुजी जाधवराव यांचे पुत्र दत्ताजी,दत्ताजी यांचे पुत्र ठाकुरजी व ठाकुरजी यांचे पुत्र अचलोजी जाधवराव यांच्याशी राजगडावर लावून दिला. जाधवरावांच्या घरी राणुबाईंचा विवाह करून जिजाऊ आऊसाहेबांनी आपले माहेर व शिवाजी महाराजांनी आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.निजामशाहाने लखुजी जाधवरावांच्या मुला -नातवांडासह सर्वांची हत्या केली. त्यानंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात विखुरले गेले. यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली , येथे स्थायिक झाली.
या प्रमुख घरापैकी भुईंज हे घर .येथेच राणुआक्का यांचे वास्तव्य होते.आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुणां जपत मोठ्या दिमाखात उभा आहे.राणुआक्का यांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भैय्या साहेब जाधवराव तेथे वास्तव्यास आहेत .
 
 
 
 

8 ) संतोषगड -

सीतामाईच्या डोंगररांगेमध्ये, एका, पुढे आलेल्या डोंगराच्या सोंडेवर संतोषगड किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल फार नोंदी नसल्या तरी हा किल्ला शिवाजीराजांनी, वारुगडाबरोबरच बांधला असल्याचं समजतं. पायथ्याशी असणाऱ्या ताथवडा गावामुळे याला ताथवडा किल्ला हे-देखील नाव आहे.
ताथवडा गावामध्ये बालसिद्ध महादेव, राम, विठ्ठल-रुक्मिणी आणि शिवमंदिर अशी काही मंदिरं आहेत. यांतील बालसिद्ध महादेव मंदिर आकाराने त्रिकोणी असून मंडपाच्या पायरीवरील शिलालेखानुसार १७६२ साली, विसाजी शामराव देशपांडे याने, या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. पण अलीकडेच याचा पुन्हा जीर्णोद्धार करून, त्याला अनेक वेगवेगळे रंग लावलेले आहेत. मंदिराची मूळ वास्तू रंगविलेली असून पाहण्यासारखी आहे. तटबंदीमध्ये असणाऱ्या मंदिरासमोर पितळी पत्र्याने मढविलेला नंदी आहे. आवारात दोन दीपमाळाही आहेत.
पण या ठिकाणी मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे संतोषगड आणि त्यावरील तातोबा महादेव मंदिर, ताथवडा गावापासून २५-३० मिनिटांत तटबंदीच्या पायथ्याशी असणाऱ्या गुहेतील मठाजवळ जाता येतं. या ठिकाणी काही साधूमहाराज मुक्कामास आहेत. पूर्वी इथे एक स्वामी साधनेसाठी राहत असल्याचं त्यांच्याकडून समजतं. मठामध्ये महिषासुरमर्दिनीची अत्यंत सुंदर मूर्ती आहे. या कड्यालगत, मठाजवळ, थोडं खालच्या बाजूस, डावी-उजवीकडे तीन गुहा आहेत. त्यांतील एका गुहेमध्ये एक ओबड-धोबड मूर्ती आहे. ती वाल्मीकी ऋषींची असल्याचं सांगतात. मठाच्या उजवीकडच्या गुहेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. पण त्यामध्ये साप, खेकडे असल्यामुळे स्थानिक पुजारी तेथे कोणास जाऊ देत नाहीत. या गुहेत जायला मिळाल्यास, छतावर पिवळ्या रंगाच्या कुल्पीसारख्या कांड्या लटकलेल्या दिसतात. छतामध्ये असणाऱ्या चुनखडीच्या दगडातून पावसाळ्यात पाणी पाझरल्यामुळे या तयार होतात. यांना अधोमुखी लवणस्तंभ म्हणतात. या ठिकाणी बॅटरी घेऊन
जाणे मात्र आवश्यक आहे. बॅटरी असल्यास गुहेत उजव्या बाजूला काही अंतरावर एक शिवलिंग आहे ते पाहता येते.
याच वाटेने परत किल्ला डावीकडे ठेवून एक वाट, वरती, किल्ल्याच्या माथ्याकडे जाते. काही अंतर गेल्यावर समोर एक मोठी भिंत आणि उजवीकडे एक दरवाज्याची गोल कमान आहे. काही अंतरावर पुढे एके ठिकाणी दगडाची रास पडलेली दिसते. ही, महादरवाज्याची आणि त्याजवळील बुरुजाची आहे. या ठिकाणी फक्त महादरवाज्यातील डाव्या बाजूची देवडी शिल्लक आहे. समोरच छत नसलेले हनुमान मंदिर आहे. स्थानिक लोक त्याला दासानुदास हनुमान म्हण्तात. इथून गडाच्या उजव्या बाजूने फिरायला सुरुवात केल्यास समोर, एकावर एक ठेवलेले तीन मोठे दगड दिसतात. बाजूला, खाली मोठे दोन बुरूज आणि त्यामधील तटबंदी लक्ष वेधून घेते. डाव्या बाजूला एक मोठे टाके बांधलेले आहे. या बाजूस झाड असल्यामुळे, टाक्यास निम्मा वळसा घालून धान्य कोठाराच्या बाजूने जावे लागते. त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याचं केलेले बांधकाम आश्चर्यचकित करायला लावणारं आहे. साधारण सात मीटर लांब आणि नऊ मीटर रुंद असणाऱ्या टाक्यामध्ये एका बाजूला, अखंड बांधलेला पूल आहे. त्याच दगडामध्ये एका टोकाला तातोबा मंदिर आहे. हे अशा प्रकारचं बांधकाम कशासाठी केलेलं आहे ते मात्र समजत नाही. पावसाळ्यात ही वाट निसरडी असते. त्यामुळे पावसाळा संपल्यावर काही काळाने आल्यास मंदिरापर्यंत जाता येऊ शकते. मंदिरामध्ये शिवलिंग आणि नंदी आहेत. पायऱ्यांच्या बाजूने, पुलाच्या डावीकडून टाक्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. त्या, उजवीकडे वळसा घालून, मंदिराच्या खालील कमानीतून तळापर्यंत जातात. यांना पाहण्यासाठी मात्र उन्हाळ्यात येणं आवश्यक आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या भटकंतीमध्ये, मला अशा प्रकारचं बांधकाम कोठेही पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे हे, या गडाचे वैशिष्ट्य आहे असं मी म्हणेन.
या वास्तूंशिवाय गडावर अन्य कोणत्याही वास्तू पाहण्यासारख्या नाहीत. इथे गवत उंच वाढलेले असल्यामुळे गड फिरताना काळजी घेणे आवश्यक आहे.
संतोषगडाच्या प्रवासामध्ये फलटण, दहिवडी ही गावे सोडल्यास खाण्या-पिण्याची सोय नाही. शिवाय गडावर पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते तरी पाणी बरोबर घेऊन जाणे सोयीचे ठरेल.
सातारा - संतोषगड अंतर (ललगुणमार्गे) ५६कि.मी. आहे.
 संतोषगड
महाराष्ट्राचे देश व कोकण असे दोन भौगोलीक भाग करण्यात दक्षीणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीचा मोठा  वाटा आहे. या सह्याद्रीला पश्चिमेला कोकाणात आणि पुर्वेला देशावर डोंगररांगाचे फाटे फुटलेत. अजंठा-सातमाळा, हरिश्चंद्र-बालाघाट, सेलबारी-डोलबारी अशा काही यातील प्रमुख रांगा. अशीच आणखी एक रांग दक्षीण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आहे. या रांगेच्या शेवटी शिखरांच्या राजाचे शंभु महादेवाचे "शिखर शिंगणापुर" हे देवस्थान आहे. यामुळे या रांगेला "शंभु महादेव डोंगररांग" म्हणतात. प्रतापगडापासून उगम होउन महाबळेश्वराला वंदन करुन हि रांग पुर्वेकडे शंभु महादेवाचे दर्शन घेण्यासाठी धावते.पुढे या रांगेला तीन उपरांगा फुटतात,  शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग. यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. आपल्याला या पावसाळी भटकंतीत यांचीच ओळख करुन घ्यायची आहे.
        अत्यंत कमी पाउस आणि दुष्काळी प्रदेश अशी अपकिर्ती पसरलेला हा प्रदेश आताशी कात टाकतो आहे. उरमोडीच्या व धोम बलकवडीच्या पाण्यामुळे आता हळूहळू समॄध्दी येते आहे. आधी केवळ डांळीबांच्या मळ्यावर जगणारा शेतकरी इथल्या कसदार जमीनीत ऊसाच्या शेती करु लागला, त्यामुळे सर्व परिसर सधन झालेला आहे. माणदेशी मातीची आणि इथल्या माणसांची खरी ओळख करुन द्यायचे श्रेय सुप्रसिध्द लेखक व्यंकटेश माडगुळकर उर्फ तात्यांना जाते. अर्थात बनगरवाडीत वर्णन केलेली स्थिती आता राहिली नसली, तरी "माणदेशी माणसे" मात्र तुम्हाला अजून भेटतील हे नक्की.
   ( संतोषगड उर्फ ताथवड्याचे हवाई प्रकाशचित्र )
 इथली भटकंती शक्यतो पावसाळ्यात केलेली उत्तम. इथल्या एन उन्हाचा कडाका बाहेरच्या लोकांना सहन होण्यासारखा नाही. पाउस तसा जेमतेम भिजवून जातो. एन आषाढात रिमझिंम पाउस असतो तर परतीचा पाउस इथल्या जमीनीची तहान पुढच्या जेष्ठापर्यंत भागवून जातो. म्हणजेच एन आषाढात पाउस नसला तरी ढगांची सावली इथली वणवण सुसह्य करते. सातार्‍या जिल्ह्याचा पुर्व भाग म्हणजे खटाव व दहिवडी तालुका हे दोन्ही तालुके १०० मीटर उंच पठारावर वसलेत. त्यामुळे सहाजिकच दक्षिणेकडे कराडला जायचे असो, पुर्वेकडे पंढरपुर असो, पश्चिमेला कोरेगाव, सातार्‍याला जायचे असो वा उत्तरेला फलटण तालुक्यात उतरायचे असो, घाट चढण्याशिवाय किंवा उतरण्याशिवाय पर्याय नाही. या पठाराच्या उत्तर बाजुच्या कडेला असलेल्या डोंगररांगेत माणदेशी दुर्गचौकडी खडी आहे. यातील मोळ घाटावर पहारा करणार्‍या "संतोषगड उर्फ ताथवडा" या गडापासून या भ्रमंतीला सुरवात करुया.
एका अशाच सवडीच्या दिवशी मी या संतोषगडाचा प्लॅन केला. इथे जायचे तर दोन पर्याय होते.
१ )  ताथवडे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. ताथवडेला अनेक मार्गांनी पोहोचता येते. फलटण ते ताथवडे अशी एस टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे. फलटण ते ताथवडे हे साधारण १९ किमी चे अंतर आहे. पुणे-मुंबईवरुन यावयाचे झाल्यास आधी पुणे-सासवड-जेजुरी-नीरा-लोणंद-फलटण यामार्गे किंवा पुणे-बेंगळुरू हायवेने शिरवळाला जाउन तेथून लोणंदमार्गे फलटण गाठता येते. फलटणला येउन नंतर ताथवडे गाठणे सोयीचे आहे.
२ ) सातार्‍याहून  सेवागिरी महाराजांमुळे प्रसिध्द झालेल्या पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणार्‍या बसने ताथवडे गावाच्या फाट्याला उतरता येते. पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३ किमी चे अंतर आहे. सातारा- पंढरपुर रस्त्यावर पुसेगाव असल्याने पुसेगावला भरपुर बस आहेत.
   मी मात्र बाईकवरुन पुसेगाव गाठले आणि बुध, ललगुण अशी गावे मागे टाकीत अखेरीस मोळ घाट उतरायला सुरवात केली. मोळ घाटातून एका वळणावर महादेव डोंगररांगेतून बाहेर आलेल्या संतोषगडाचे दर्शन झाले. पायथ्याचे ताथवडा गाव मात्र पुसेगाव-फलटण रस्त्यावरुन  साधारण १ कि.मी. आत आहे. रस्त्यावरुन साधारण समुद्रसपाटीपासून २९६५ फुट उंचीचा (  ९०६ मी ) पण पायथ्यापासून जेमतेम २०० मीटर उंचीचा गड समोर दिसु लागला.
   एन जुलै असल्याने आजुबाजुला थोडी हिरवळ होती, त्याने परिसर थोडाफार तरी सुसह्य वाटत होता, नाहीतर तसा हा भाग वैराणच.
एखादे टिपीकल माणदेशी गाव असावे तसेच हे ताथवडे आहे. गावाच्या मध्यभागी बालसिध्द शंकराचे प्रशस्त मंदिर दिसते.
 हे प्राचिन महादेवचे मंदिर प्रेक्षणीय असुन याचा नगारखाना अंदाजे १५ मीटर उंच आहे. मंदिराचे प्राकार प्रशस्त असून मंदिराच्या गाभार्‍यावर असलेल्या कळसामधे तालीम आहे. ( म्हणजे कळस आतून पोकळ असून त्यात तळाशी माती असते. हा प्रकार मी अनेक देवस्थानात पाहिला आहे, मात्र याचे कारण समजत नाही )
 मंदिराच्या गाभार्‍याच्या पायथ्याला एक शिलालेख आहे. त्याचे वाचन पुढीलप्रमाणे आहे. "चरणी सादर विसाजी शामराव देशपांडे मो | फलटण देहे सांवधरा शिव कसबे ताथवडा शके १६४८ चैत्र भानु संवत्सर जेष्ठ शुध्द पंचमी" याचा अर्थ "ताथवडे गावातील प्रमुख देउळ बालसिध्दाचे. इ.स. १७६२ मध्ये विसाजी शामराव देशपांडे नामक कोणा सदगृहस्थाने या प्राचीन देवस्थानाचा जीर्णोध्दार केला.
मंदिराजवळ एक दगडी दिपमाळ असुन या मुख्य मंदिराबरोबरच याच्या शेजारी रामाचे, विठ्ठल-रखुमाईचे व शिव मंदिर आहे.
शिव मंदिरातील पिंडीवर शाळुंखेत चौमुखी शिव कोरलेले आहेत.बालसिध्द म्हणजे शंकर अर्थात अष्टभैरवापैकी एक. त्याची मुर्ती शैवपंथीयांच्या संकेतानुसार आहे. दर चैत्र वद्य अष्टमीला येथे यात्रा भरते.
    बालसिध्दाचे दर्शन घेउन मी गडाकडे निघालो. ताथवडा गावातून सोपी पायवाट गडावर घेऊन जाते. सध्या या वाटेवर सह्याद्रीत आढळणार्‍या वेगवेगळ्या पक्ष्यांचे फलक लावले आहेत. तसा संतोषगड हा "बेलाग, बुलंद, राकट, कणखर" वैगेरे "टिपिकल" सह्याद्रीच्या विशेषणांच्या खात्यात जमा न होणारा होता. त्रिकोणी आकाराचा हा गड तीन टप्प्यांचा बनलेला आहे.  पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसया टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्लाचा भाग आहे.
 सह्याद्रीचे उंचच उंच किल्ले चढल्यानंतर या गडाची चढण तशी मॉर्निंग वॉकला दमायला होईल तितपतच आहे. खरेतर ह्या गडाच्या पायथ्याशी गाव असूनही गावकर्‍यांच्या अनास्थेमुळे गडाची दुर्दशा झाली होती. पण हळूहळू आपल्या या अबोल मानकर्‍यांचे महत्व समजल्याने बर्‍याच गडावर दुर्गसंवर्धन सुरु झाले आणि याही गडावर पुण्याच्या शिव सह्याद्री संस्थेची पावले वळाली आणि ईथले रुपडे पालटून गेले आहे. या धाग्यात त्यांच्या कार्याविषयी लिहीणारच आहे.
गडावर चढाई करताना वाटेत हि मंदिर व काही घुमट्या नजरेला पडतात. वर चढणार्‍या वाटेवर वनखात्याने परिसरात दिसणार्‍या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे फोटो लावले आहेत.
      पंधरा वीस मिनिटांच्या चढाई नंतर एक पायवाट उजवीकडे वाळलेली दिसली. मठाच्या पुढे तीन गुंफा आहेत.  वाटेवरून चालत गेलो असता मी एका मानवनिर्मित गुहे जवळ जाऊन पोचलो.
ही गुहा म्हणजे एक खांबटाकं आहे. सुरुवातीच्या दोन खांबांवर द्वारपाल कोरलेलेआहेत. आत गेल्यावर खोली वाढत गेली. खाली जायला कोरलेल्या पायऱ्या आढळून आल्या. सध्या गुहेमध्ये गणपतीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवलेले आहे. पाणी मात्र नाही.
     गुहा बाजूला ठेऊन पुन्हा मुख्य पायवाटेला आलो आणि दोन मिनिटात एका आश्रमापाशी पोचलो. येथील माताजी दत्ताच्या भक्त असून सुमारे चाळीस वर्षांपासून येथे राहत आहेत अशी माहिती मिळाली. आश्रमामधे महिषासुरमर्दिनीची सुंदर मुर्ती आहे. आश्रमाजवळ एक छोटे मंदिर आहे, जेथे दत्त व लक्ष्मी मातेच्या प्रतिमा ठेवल्या आहेत.
 मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. मात्र येथपर्यंत पोहोचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते.
पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. देवळातील या मुर्तीला वाल्मिकीची मुर्ती समजतात. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाजातच घेऊन जाते.
आश्रमाकडून पुन्हा काही पावले मागे आलो आणि  डावीकडे वर जाणारी पायवाट पकडली. इथे किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराचे दर्शन झाले. येथील बुरुज ढासळले आहेत. अलीकडेपर्यंत दरवाज्याचा बराचसा भाग हा मातीखाली गडाला गेलेला होता. परंतु पुण्यातील शिव सह्याद्री संस्थेच्या कामातून हा दरवाजा पुन्हा आणला गेला आहे.
या दरवाज्याच्या आधी उजव्या बाजुला तटबंदीत हि कमान दिसते.
दरवाज्यातून पुढे चालत गेल्यावर माझा  प्रवेश किल्ल्याच्या माचीवर झाला. येथील बालेकिल्ल्याची तटबंदी आणि ताशीव कडे दृष्टीस पडतात.
माचीला सुद्धा तटबंदी आहे. ह्याची उंची अंदाजे वीस फूट आणि रुंदी पंधरा फुटाहून अधिक आहे. किल्ल्याची भौगोलिक रचना पाहता इतकी भव्य तटबंदी बांधायचा हेतू लक्षात येतो. किल्ल्याचा डोंगर चढायला अतिशय सोपा आहे. त्यामुळे शत्रू अगदी सहजपणे वर चढून येऊ शकतो. माचीवरील ही अभेद्य तटबंदी त्याला आत येण्यापासून रोखून ठेवू शकते.
माचीवरून पायवाटेने पुढे गेल्यावर आपल्याला अजून एक दरवाजा लागला. ह्या दरवाज्याची पडझड झाली आहे.
येथून आत गेल्यावर बालेकिल्ल्याचा दरवाजा मुख्य दरवाजा लागला.
हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. हा दरवाजा निश्चित्तच शिवकालात बांधला गेला असेल. दरवाज्याचा बराचसा भाग अनेक वर्षे जमिनीखाली गाडला गेला होता. शिव सह्याद्री संस्थे मार्फत मुरूम माती बाजूला करून दरवाजा बाहेर काढण्यात आला आहे. दरवाज्याचे चौकोनी दगड, ते एकमेकांवर चिकटवण्यासाठी वापरलेल्या चुन्याच्या रेषा स्पष्ट दिसतात.
दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर सुस्थितीत असलेल्या पहारेकर्यांच्या देवड्या दृष्टीस पडल्या.
बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला मारुती आणि गणपतीचे भग्न अवस्थेतील मंदिर आहे.दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनूमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत.
त्याच्या पुढे प्रशस्त सदर आहे. ती पाहता राजगडाच्या सदरीची आठवण आल्यावाचून राहात नाही.
सदरीच्या मागच्या बाजूला तीन खोल्यांत विभागून बांधलेले धान्यकोठार आहे. त्याच्या भिंती शाबूत आहेत, परंतु छप्पर उडाले आहे. त्यात धान्य, दारुगोळा साठवित असत.
 गडमाथ्यावर हा चुन्याचा घाणा दिसला.
इथून मी निघालो ते गडावरचे मुख्य आकर्षण पहाण्यासाठी, "प्रचंड मोठी विहीर आणि तातोबा महादेवाचे मंदिर" पहाण्यासाठी. धान्यकोठाराच्या मागच्या बाजूस प्रचंड मोठं विहीर वजा टाकं आहे. टाक्यात खाली वाकून बघताना भीती वाटते. ह्या चौरसाकृती टाक्याची लांबी-रुंदी साधारण तीस फूट, तर खोली जवळपास पन्नास ते पंचावन्न फूट आहे. इतकं मोठं खोदीव टाकं यापुर्वी धुळ्याजवळचा सोनगिर आणि संकेश्वर जवळच्या वल्लभगडावर पाहिले होते.  टाक्यात पाणी नाही. माती आणि मुरूम ह्यामुळे ह्या टाक्याच्या बराच भाग बुजलेल्या अवस्थेत होता. शिव सह्याद्री संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला, त्यामुळे टाक्यांची खोली आठ ते दहा फूट वाढली. टाक्याची मूळ खोली अजूनही जास्ती असण्याची शक्यता आहे.
एकुणच या परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेउन इतकी खोल विहीर खोदलेली असावी. हि विहीर पाण्याने पुर्ण भरत असल्यावर गडावरच्या लोकांना काळजीचे कारण उरत नसणार. याच विहीरीचे पाणी नळाद्वारे ताथवडा गावात आणले जात होते. १९९३ पर्यंत त्याचा वापर होत होता , नंतर तो बंद झाला.

टाक्यात उतरण्यासाठी खोदीव पायऱ्या काढल्या आहेत.
 
खाली उतरताना वाटेत शंकराचे छोटे देऊळ आहे. यालाच "तातोबा महादेव" म्हणतात. याची एक कथा रहाळात सांगितली जाते. तातोबा नावाचा एक साधू या डोंगरावर राहत असे. त्याच्या ख्यातीमुळे रोजच भक्तांची गर्दी व्हायची. त्यामुळे त्याला साधनेला वेळ मिळत नसायचा. शेवटी कंटाळून त्याने या डोंगरावर एक विहीर बांधली आणि त्या विहिरीत तो राहू लागला. जेणेकरून लोकांना आपण कुठे आहोत याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना साधूबाबा अचानक कुठे गेले हेच कळेना. एक दिवस या डोंगरावर आलेल्या एका गुराख्याला प्रचंड तहान लागली. पण त्याला पाणी कुठे आहे हे माहीत नव्हतं. अचानक त्याच्यासमोर हे तातोबा प्रकट झाले आणि आपल्या कमंडलूमधलं पाणी त्याला प्यायला दिलं आणि अचानक ते अंतर्धान पावले. चकित झालेल्या गुराख्याने आजूबाजूला शोध घेतल्यानंतर त्याला त्या विहिरीत एक शिवमंदिर आणि हे तातोबा दिसले. पुढे त्यांच्या भक्तांनी त्यांचं मंदिर गडावर बांधलं आणि त्यांचंच नाव पायथ्याच्या गावाला दिलं. तेव्हापासून या डोंगराला आणि त्याच्या पायथ्याच्या गावाला ‘ताथवडा’ असं म्हणू लागले. अर्थात ही एक दंतकथा असून याचा कोणताही पुरावा नाही. पण घटकाभर मनोरंजनाची गंमत मात्र यात आहे हे नक्की!!
 बालेकिल्ला त्रिकोणी आकाराचा असून तिन्ही टोकाशी बुरुज आहेत. पैकी दक्षिण बाजुचा बुरुजाला चिलखती तटबंदी आहे. ह्या बुरुजावरून खाली पाहिल्यावर ह्या बुरुजाची चिलखती तटबंदी दृष्टीस पडली.
इथे जाण्यासाठी बुरुजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूने भुयारी मार्ग केलेले आहेत. दोन्ही बाजूला तटबंदी आणि मधून वाट. राजगडाच्या आळु दरवाज्याची आठवण आली. पूर्वीच्या लोकांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेऊन इतकं भव्य बांधकाम केलंय हे कदाचित आपल्या कल्पनेच्या पलीकडे असू शकते.

चिलखती तटबंदी मधून एक चोरवाट डावीकडे उतरते. सध्या ही वाट काही प्रमाणात बुजलेल्या अवस्थेत आहे.
याच बाजुला एका प्रचंड प्रस्तरावर दुसरा प्रस्तर ठेवलेला पहायला मिळतो. असाच पाषाणस्तंभ चंदन किल्ल्यावरसुध्दा आहे. मात्र हि रचना कशासाठी याचा उलगडा होत नाही.
गडाच्या दक्षिणेला महादेव डोंगररांग पसरलेली दिसते. पुर्वेला लांबवर वारुगडाचा बालेकिल्ला दिसतो तर पश्चिमेला नांदगिरी उर्फ कल्याणगड त्याच्या माथ्यावरच्या वृक्षामुळे ओळखता येतो. यानंतर मी किल्ल्याच्या पूर्व दिशेकडे असणाऱ्या बुरुजावर आलो.
याच बाजुचे कातळ खडे आहेत आणि त्यावरचे होल्ड आणि एकुणच रचना विचारात घेता हे प्रस्तरारोहणाचा सराव करण्यासाठी आदर्श आहेत.  
येथून खाली पाहता भक्कम  तटबंदी दृष्टीस पडली. खाली जाण्यासाठी उभ्या असलेल्या बालेकिल्ल्याच्या बुरुजावरून दगडी जिना खाली काढला आहे. परंतु त्याची बरीच पडझड झालेली आहे. हा किल्ल्याच्या माचीचाच भाग असावा. माचीचा विस्तार फार नाही.
 ह्या तटबंदी मधून सुद्धा एक चोरवाट काढलेली दिसली. पण ती वाट तटबंदीच्या आत निघते याचे कारण समजले नाही. पण अशीच बरीच न उकल होणारी दुर्ग वैशिष्ट्ये या संतोषगडावर आहेत.
    किल्ल्यावरील विस्तीर्ण धान्यकोठार, बालेकिल्ल्यावरील सदर, बालेकिल्ल्याचे चिलखती बुरुज, त्यातील चोरवाटा, प्रचंड मोठं पाण्याचं टाकं, गोमुखी बांधणीचे दरवाजे लक्षात घेता हा किल्ला मोठ्या प्रमाणावर राबता असावा. याचा ईतिहास पहायला गेलो तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असल्याचे मानले जाते. पण ते सत्य नाही. फलटण हे आदिलशाहीतील संस्थान, त्यामुळे त्याच्या रक्षणासाठी ह्या मोक्याच्या जागी किल्ला उभारला असावा. किल्ला नेमका कोणी उभारला हे ज्ञात नसले तरी हा गड आदिलशहाकडे असल्याचे पुरावे आहेत. मोगल व आदिलशाही पत्रव्यवहारात ( २२ सप्टेंबर १६५७ च्या खुर्दखतमधे ) या गडाचा उल्लेख "तात्तोरा" तर मोडी पत्रव्यवहारात "ताथवडा, तानवटा, ताथोडे, ताथोडा" असा येतो. याचा अर्थ ती तातोबा महादेवाची दंतकथा थोडीफार खरी असावी. सन १६६५ मधे हा गड फलटणच्या बजाजी नाईक निंबाळकरांच्या ताब्यात होता. याच वर्षी शिवाजी महाराज व मिर्झाराजे जयसिंहाच्या पुरंदर तहानंतर मोगल-मराठे संयुक्त फौजांनी ७ डिसंबर १६६५ रोजी जिंकला. ताथवडा घेतल्याबध्दल औरंगजेबाने महाराजांना पोषाख व जडावाची कट्यार पाठवली. त्यानंतर आदिलशहाने तो तह करुन मोगलांकडून परत मिळवला. सन १६७३ मधे शिवाजी राजांनी तो जिंकून घेतला तसेच १६७५ व १६७६ मधे आजुबाजुचा प्रदेश जिंकून घेतला. महाराजांनी संतोषगडाची डागडुजी बहुधा याच काळात केली असावी. गडावरचे गोमुखी प्रवेशद्वार याच काळात बांधले असावे असा माझा अंदाज आहे. असे सांगतात कि हा किल्ला घेतल्यानंतर एकापाठोपाठ एक असे अनेक गड स्वराज्यात आले म्हणून महाराज संतोष पावले म्हणून या गडाचे नाव बदलून संतोषगड ठेवले.  मात्र १६७९ मधे आलमगिरी वावटळीत हा गड मोगलांनी जिंकून घेतला. पुढे १७२० मधे शाहुला नजराना म्हणून दिला. सन १७९० च्या महसुल अहवालावरुन हा गड नहिसदुर्ग सरकारमधे उपविभागाचे मुख्य ठाणे होता. सन १८१८ पर्यंत हा मराठ्यांच्या ताब्यात होता.  मात्र जनरल प्रिझलरने कमजोर असलेल्या दक्षीण व पश्चिमेकडून तोफांचा मारा करुन हा गड ताब्यात घेतला. पुढे १८२७ मधे ब्रिटीशांविरुध्द बंड करणारे स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांनी या गडाचा आश्रय घेतल्याची नोंद सापडते.
    साधारण दोन तासात हि गडफेरी उरकून गावात उतरलो. इथून थेट फलटण गाठले. वाटेमधे वाठार निंबाळकर नावाचे गाव आहे, त्याठिकाणी एक छोटासा भुईकोट बघण्यासारखा आहे, पण मला हे माहिती नसल्याने त्यावेळी पहायचे राहून गेले. संबध प्रवासात पावसाचे अजिबात शिंपण झाले नाही तरी ताथवडा बघण्याचा "संतोष" मात्र मिळाला.

9 ) शिखर शिंगणापूर :-

     शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील सिंधण राजाने वसवली आहेत, असे म्हणतात. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले.त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे. 
शिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्‍या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी  इ.स. १६०० साली येथे एक मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.
         पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले.वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली (हवालदार म्हणून नियुक्ती होती)बांधकाम पूर्णत्वास आले, पुढे १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्‍ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्‍या आहेत.
   या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते.  
    पुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.
     मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत.या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत.या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे.मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. 
मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.
या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.
असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!
  शिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्‍यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला नगारखाना आहे. 
काळ्या पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे. खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्‍या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. मंदिराच्या गाभार्‍या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्‍याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे.  
मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग आहेत. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे.
जाण्यासाठी :- 
सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये, सातारा - पंढरपूर रस्त्यावर, सातार्‍या पासून ६४ कि.मी. अंतरावर दहिवडी गाव आहे. दहिवडी गावापासून २२ कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर आहे.  
पुण्याहून फलटण गाठावे. फलटण - दहीवडी रस्त्यावर मोरोची येथे शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी फाटा आहे. फलटण - शिखर शिंगणापूर अंतर ६४ कि.मी. आहे.  
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
१) वारूगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले शिखर शिंगणापूर मंदिरा बरोबर एका दिवसात पाहाता येतात. 
२) गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ.
३) फलटण येथील महादेवाचे मंदिर, राम मंदिर, राजवाडा.
४) अकलूजचा किल्ला ४५ किमी.

 10 )  जंगली जयगड 

 महाबळेश्वर येथे उगम पावलेली कोयना नदी सुरवातीला पश्चिमवाहीनी होते, मात्र सह्याद्रीच्या रांगेमुळे ती सुरवातीला दक्षिणवाहिनी आणि नंतर पुर्वेकडे वळते. प्रतापगड, मधुमकरंदगड यांना सामावणारी सह्याद्रीची मुख्य रांग आणि वनकुसवडे पठार यांच्या मधल्या अनुकुल भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेउन १९६२ मधे कोयना धरणाची उभारणी झाली. कठीण बेसाल्टच दगडापासून बनलेल्या सह्याद्रीला आतून पोखरून वीजनिर्मितीसाठी टप्पा १ व २ उभारले गेले. या सगळ्या विकासकामाचा एक प्राचीन दुर्गराज साक्षी होता, तो म्हणजे "जंगली जयगड".
 ( कुंभार्ली घाटातून होणारे जंगली जयगडाचे दर्शन )
          कोयना नदी म्हणजे सुजलाम, सुफलाम महाराष्ट्राच्या संपन्नतेत भर घालणारी एक भाग्यदायी नदी. महाबळेश्वरास उगम पावून कराडजवळ कृष्णेत समर्पित होणाऱ्या कोयना नदीने एक देखणे खोरे निर्माण केले आहे. या नदीवर जेव्हा हेळवाक जवळ कोयना धरण उभारले गेले तेव्हापासून कोयनानगर पर्यटनाच्या नकाशावर आले. या कोयनानगरजवळील रामघळ व भैरवगड तसे डोंगरयात्रींना परिचयाचे, पण समुद्रसपाटीपासून १०२९ मीटर (३१६४ फुट )उंचीवर उभा असणारा जंगली जयगड मात्र डोंगर भटक्यांना फारसा माहिती नाही.
(जंगली जयगड परिसराचा नकाशा )
    उन्हामुळे बरेच दिवस कुठे भटकंती न झाल्याने खुप मोठा उपवास घडला होता. आता एखादा कस पहाणारा ट्रेक करुनच समाधान मिळणार होते. कोयनेच्या आसपासचे बरेच काही पाहून झाले असले तरी जंगली जयगड अद्याप पाहिला नव्हता, त्यामुळे मे महिन्याचे रणरणीत उन विचारात घेउन जंगली जयगडावर एकमत झाले. एका भल्या पहाटे बाईकवरून मी व माझा मित्र प्रशांत निघालो. कोयनानगरला बटाटेवड्यांना पोटात ढकलून मुक्ती दिली आणि नेहरु गार्डन मागे टाकून नवजाच्या दिशेने निघालो. ओझर्डेचा तीन धारात कोसळणारा धबधबा आणि लेक टेपिंगच्या यशस्वी प्रयोगानंतर नवजा एकदम प्रकाशझोतात आले. कराडवरुन चिपळूणला जाण्यासाठी कोयनानगर-हेळवाकमार्गे कुंभार्ली घाट आहे तसेच दुसरा घाटमार्ग नवजामार्गे पंचधारा बोगद्यामार्गे वीजनिर्मितीच्या तिसर्‍या टप्प्याजवळून उतरतो. मात्र सुरक्षेच्या कारणाने हा घाटमार्ग सध्या खाजगी गाड्यांना बंद आहे. याच रस्त्यावर जंगली जयगडावर जाणारी वाट आहे एवढीच आम्हाला माहिती होती.
मस्त वळणदार रस्त्याने उजव्या हाताला कोयनाधरणाचे निळेशार पाणी ठेवत आमचा प्रवास चालु होता.
मधेमधे डोंगराच्या नैसर्गिक रचनेमुळे धरणाच्या पाण्याच्या जीभा रस्त्याला येउन भिडत होत्या. अखेरीस नवजाला पोहचलो. इथे सरपंचांच्या घरी गाडी लावली आणि पायीच बोगद्याच्या दिशेने तंगड्या तोडू लागलो. पावसात एन भरात वहाणारा धबधबा कोरडा ठाक पडला होता.
इथे पाचवा टप्पा करण्याची शासनाची योजना आहे म्हणे, कदाचित त्यानंतर हा धबधबा वर्षभर वहाता राहिलही. दिवस चढायला लागला तसे चालणे अवघड वाटु लागले. अखेरीस बोगद्याजवळ येउन पोहचलो, पण तिथे विचारावे कोणाला? थोड्यावेळात एक ट्रक धुळ उडवित आला, त्याला हात केला आणि गडाविषयी विचारले. त्याने रस्त्याजवळून चढणारी वाट दाखवली आणि एकदाची चढाई आम्ही सुरु केली. वाटेत झाडावर कोणीतरी बाण काढले होते, त्यामुळे चांगलीच मदत होत होती.  मुळात भटक्यांची हौस सह्याद्री पुरी करतोच, पण ईथे तर जंगलसफारीचा बोनस मिळाला होता.
    आम्ही जरी बाईकने आलो असलो तरी एरवी जंगली जयगडाला जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोयनानगरपासून १० कि.मी. अंतरावर नवजा हे गाव लागते. या गावातूनच ५-६ कि.मी. किल्ल्यावर जाण्यास फाटा आहे. यासाठी कोयनानगरहून नवजाला जाण्यासाठी  ८.००, ९.००, १०.१५, १२.१५, २.१५ ( दु), ४.१५, ५.३० अश्या बस आहेत तर नवजावरुन  ८.३०, ९.३०, १०.४५, १२.४५, २.४५, ४.४५, ६.०० अश्या परतीच्या बस आहेत. याशिवाय कोयनानगरवरुन खाजगी जीपसुध्दा नवजाला जातात. मुळात जंगली जयगड आणि आसपासची गावे हा सर्व भाग कोयनाप्रकल्प आणि वनखात्याअंतर्गत संरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे पर्यटकांना मुक्तपणे फिरता येत नाही. यासाठी आधीच कोयनानगरच्या वनखात्याकडून इथे येण्याची परवानगी काढावी. कोयना वनखात्याच्या ऑफिसचा दुरध्वनी क्रमांक-(०2372) 284091,
            सध्याच्या माहितीनुसार आता या परिसरात प्रवेश पुर्णपणे बंद केला आहे.
जर परवानगी मिळाली तर किल्ल्याच्या अलीकडेच असणा-या नवजा गावातूनच एखादा वाटाडय़ा घेतल्यास या गडावर जाण्याचा मार्ग स्थानिक माणसामुळे निर्धोक होऊ शकतो. रस्त्यावर या गडाची वाट दर्शवणारा एकही फलक अस्तित्वात नाही. त्यामुळे पहिल्यांदाच येणारा दुर्गप्रेमीसुद्धा वाट हमखास चुकतोच. सध्या किल्ल्यावर पाणी नसल्यामुळे गावातूनच आपल्याकडील बाटल्या भरून घ्यायच्या व टॉवर कॉलनीमार्गे पंचधारा बोगद्याकडे चालू लागायचे. या रस्त्यावर ५०० मीटरवर एक चौकी आहे, ती ओलांडल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता डोंगरात गेलेला दिसतो. येथेपर्यंत खाजगी वहानाने जाता येते. येथून डोंगर चढण्यास सुरुवात करावी.वाट मळलेली असून गर्द झाडीतून जाते.
     स्थानिक वाटाडय़ा बरोबर घेऊन रस्त्यापासून साधारण तासाभराचं अंतर हे घनदाट जंगलातून पार करावं लागतं. जंगली जयगडावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, कोकणातून थेट कडा असल्याने त्याबाजुने गडावर जाता येत नाही. हा ट्रेक करताना गडावर रहाण्याची सोय नाही, तसेच कॅम्पिंगची परवानगी नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोयनानगर गावात रहाण्याची सोय होईल किंवा नवजा गावतील शाळेत मुक्काम करता येईल. तसेच गडावर जेवणाची सोय नाही, कोयनानगर गावात हॉटेल्स आहेत .गडावर जातांना वाटेत असलेल्या झर्‍यात जानेवारी – फेब्रूवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. नंतर नवजा गावातून पाणी घेउन जाणे योग्य. शक्यतो गडावर जाण्यासाठी नोव्हेंबर ते मे हा काळ उत्तम.
खरेतर घनदाट जंगलामुळे आपण वाट चढतोय याची जाणीवसुध्दा होत नाही.
फक्त थोडी माहिती आणि नजर असेल तर अस्वलाने नख्याने झाडावर काढलेली नक्षी, पायवाटेच्या बाजुला असणारे जनावरांच्या खुराच्या खुणा या सर्व जगंलाच्या जिवंतपणाची लक्षणे. आपण चालत असताना कदाचित अनेक डोळे सावधपणे आपल्याला न्याहाळताहेत याची जाणीव होते. पार्श्वभुमीला सतत पक्षांचा किलबिलाट एकू येत असतो, क्वचित कर्णकटू असे एखाद्या प्राण्याचे किंचाळणे एकु येते आणि अंगावर सर्ररकन काटा येतो. नशीबात असेल तर एखाद्या वन्यप्राण्याचे दर्शनसुध्दा होउ शकते. भर उन्हाळ्यात सूर्याचा किरणही जमिनीला स्पर्शू न देणारं हे जंगल म्हणजे या किल्ल्याची खरीखुरी संपत्ती आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरेच ज्याने कोणी जंगली जयगड हे नाव ठेवले, ते अगदी यथार्थ आहे.
     पायवाट थोडय़ा वेळेतच सपाटीवर घेऊन आली. येथून सरळ डोंगर चढाईच्या वाटेने चढल्यानंतर आपण घोडेतळ या निसर्गरम्य ठिकाणी येऊन पोहोचतो. या ठिकाणी पाण्याचा एक जिवंत झरा असून, विश्रांतीसाठी वन विभागाने एक दगडी कट्टासुद्धा बांधलेला आहे. गड पाहून परत आल्यावर पोटपूजा उरकण्यासाठी हे ठिकाण उत्तम! इंग्रजांच्या काळात जंगली जयगडला येणारे अधिकारी या ठिकाणी आपली घोडी उभी करून पुढे पायी गडाकडे जात असत. त्यामुळे या ठिकाणास घोडेतळ म्हटले जाते. नीट निरखुन पाहिल्यास या पाणवठ्यावर येणार्‍या प्राण्यांचे ठसे आपणाला दिसू शकतात. नवजा गाव सोडल्यानंतर इथपर्यंत येण्यास साधारण दीड ते दोन तास लागतात. येथून आपण सरळ दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने चालू लागायचे. अध्र्या तासात मूळ पायवाटेला डावीकडे एक फाटा फुटतो. जंगली जयगडकडे जाणारी ही वाट सरळ डिचोली गावाकडे जाते. या डाव्या हाताच्या पायवाटेने निघालो की भोवतीचे जंगल घट्ट होते.सदाहरित प्रकारातील या जंगलात बांबूचे प्रमाण अधिक आहे. या शिवाय ऐन, अंजन, वेत, कुंभा, जांभूळ, आंबा अशी नाना प्रकारची वृक्षराजी येथे आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांचे अस्तित्व मोठे आहे. जंगलातून वर चढणाऱ्या पायवाटेने लता-वेलींचे अडथळे पार करत आपण दरी काठाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. दरीच्या या माथ्यावर छोटेखानी झेंडय़ाचा गोलाकार बुरूज असून, त्यावर चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. आपण जंगली जयगडसमीप आलो याची ही खूण. घोडेतळापासून इथपर्यंत येण्यास अर्धा तास लागतो. या दरीच्या माथ्यावरून खाली उतरणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यावर समोरच खोल दऱ्यांच्या मधोमध वसलेला जंगली जयगड दिसतो.
 हा गड सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या डोंगरावर उभा असून, त्याची एक चिंचोळी धार सह्य़ाद्रीशी जोडली गेली आहे.
 हा आकार पाहून लोहगडाच्या विंचुकाटा माचीची आठवण होते. येथेच गडाचे उध्वस्त प्रवेशव्दार आहे. झाडीत विखुरलेल्या घडीव दगडांवरून ते ओळखता येते.
 दाट झाडीतून खाली उतरणाऱ्या पायवाटेने उघडय़ा-बोडक्या गडाकडे नेणाऱ्या चिंचोळ्या धारेवर काळजीपूर्वक उतरायचे.
पुढे एक-दोन टेकडय़ांना बाजूला ठेवत गडाच्या मुख्य डोंगरासमोर आपण येऊन पोहोचतो.  
गडाच्या टोकाकडे जातांना आपल्याला दोन छोट्या कातळ सुळक्यांना वळसा घालून जावे लागते, या सुळक्यांना स्थानिक लोक "दिपमाळ" या नावाने ओळखतात. इथे जांभ्या दगडातील तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. गडाचे प्रवेशद्वार भूकंपात ढासळलेले आहे. पुढे काही इमारतींच्या जोत्यांमधून आपण आत प्रवेश करतो. जयगडाच्या मुख्य सपाटीवर पोहोचताच किल्ल्याचा चिंचोळा आकार पटकन आपल्या नजरेत भरतो. तसेच किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी सरळ दरी असल्यामुळे जंगली जयगडाच्या निर्मात्यास याच्या रक्षणासाठी तटबंदी बांधण्याची फारशी गरज उरलेली नाही. इथेच एक दगडी चौथरा दिसतो.
तो पाहून पुढे जाताच भग्न मंदिर दिसते.
हे छोटेखानी मंदिर, त्याच्यासमोर भूकंपाचा धक्का पचवून ताठ मानेने उभी असलेली दगडी दीपमाळ व तेथे असणारे एक दगडी भांडे आदी दुर्गअवशेष गडाचे वातावरण जिवंत करतात.
 हे ठिकाण म्हणजे गडदेवता ठाणाईचे मूळ ठिकाण असून, सध्या मात्र येथील छोटी घुमटी मूर्तीविरहित आहे.
यापुढे पुन्हा एका उंच टप्प्यावर चढायचे. इथे चौकोनी दगडी बांधकाम असलेला एक बुरुज असून, त्याचा उपयोग इतिहासात टेहळणीसाठी होत असे. त्या चौथऱ्यासमोरच आपणास  किल्लेदाराच्या वाडय़ाचा चौथरा पाहायला मिळतो. वाडय़ाच्या मागे डाव्या हातास दरीच्या माथ्यावर मातीने भरलेली जांभ्या दगडातील एक बांधिव विहीर पूर्णपणे मातीने भरून गेलेली आहे.
ही विहीर पाहून आपण गडाच्या पिछाडीच्या पश्चिम टोकावर यायचे.
येथून खाली दरीत पोफळी लाईट हाऊस, समोर सर्ज वेल,
तर उजव्या हातास कोळकेवाडी जलाशय, त्याच्या काठावरचा अपरिचित कोळकेवाडी दुर्ग आणि या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेला नागमोडी पोफळी घाटही व्यवस्थित न्याहाळता येतो.
( सर्ज वेल अर्थात उल्लोळक विहीरीजवळून जंगली जयगडाचा मी घेतलेला फोटो )
सभोवार तळकोकणचे रम्य दृश्य दिसते. उत्तरेस नजर फेकताच वासोटा ऊर्फ व्याघ्रगड, महिमंडणगड व मकरंदगड तर त्याच्या डावीकडे रसाळ, सुमार व महिपत ही इतिहासप्रसिद्ध दुर्गत्रयी आपणास साद घालतात.
दक्षिणेला कुंभार्ली घाट आणि त्यातून ये-जा करणार्‍या वहानांचे स्पष्ट आवाज येत असतो. त्याच्यापलीकडे भैरवगड, तर तळात पार वशिष्ठीच्या काठावर निवांत पहुडलेले चिपळूण शहर आपले लक्ष वेधून घेते.खाली कोकणात उतरलेल्या सह्याद्रीच्या रांगा विलोभनीय दिसतात.
       कुंभार्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी इतिहास काळात जंगली जयगडची निर्मिती करण्यात आली. शिवकाळात हा गड शिवाजी महाराजांच्या अमलाखाली होता.याच्या शेजारील हेळवाक हे गाव बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जंगली जयगडचा समावेश हेळवाक महालात होत असे. पुढे १७५८-५९ मध्ये पंतप्रतिनिधींकडील हा किल्ला पेशव्यांचे सरदार खंडोजी मानकर यांनी घेतला, पण पेशव्यांनी याचा ताबा परत पंतप्रतिनिधींकडे देण्यास सांगितले. पुढे १८१० मध्ये प्रतिनिधींची आश्रित ताई तेलीण हिच्या ताब्यातून पेशव्यांचा सेनापती बापू गोखले यांनी हा किल्ला जिंकून घेतला. शेवटी १८१८ च्या इंग्रज-मराठे युद्धात कर्नल हिवेट याच्या नेतृत्वाखालील फौजेने हा किल्ला जिंकून घेतला.
     असा हा किल्ला त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत पार कराव्या लागणाऱ्या जंगलच्या तटबंदीमुळे जंगली जयगड हे नाव सार्थ करतो. प्रसिद्धीच्या फारसा झोतात नसलेला आणि संरक्षित जागेमुळे विस्मृतीत गेलेल्या या किल्ल्यास फारच कमी दुर्गयात्री भेट देतात. म्हणूनच या गडाकडे येणारी पावले ही अस्सल दुर्गवेडय़ांचीच असतात हे वेगळे सांगायला नको. माणसांच्या आणि सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून या अनोख्या जंगली जयगडाचा अनुभव हा अविस्मरणीय ठरतो.

10 )पसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा :-

       वाई सह्याद्रीच्या कुशीत घनदाट वनराईत अनेक छोटी-छोटी गावं वसली आहेत. पूर्वी डोंगररांगांच्या पायथ्याला असलेल्या जंगलात मोकळ्या जागेत शेती करून लोक शेताजवळ वस्ती करून राहू लागले. जागा मिळेल तिथे चार-दोन घरांची वस्ती निर्माण झाली. पसरून पसरून असणाऱ्या लोकवस्तीमुळं ‘पसरणी’ गावाची निर्मिती झाली. लोकवस्तीच्या आजूबाजूला असलेल्या जंगलात गायरानं होती. गुराखी गुरं चरायला नेत. दगडी बारवातलं पाणी पिऊन जनावरं वनराईत विश्रांतीसाठी पसरत. यावरूनही लोकवस्तीला ‘पसरणी’ नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा परिसर. वाईहून पांचगणी-महाबळेश्वरला जाताना सह्याद्रीच्या डोंगररांगेत नागमोडी वळणाच्या घाटाला ‘पसरणी घाट’ असे नाव आहे. डोंगराच्या पायथ्याला व कृष्णा नदीच्या तीरावर येथील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतात वस्ती करून राहिल्याने व ही वस्ती पसरून असल्याने गावचे नाव पसरणी पडले आहे.
       गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा. संभाजीराजांचे पुत्र शाहुराजे हे औरंगजेब बादशहाच्या कैदेतून १७०७ मध्ये सुटले. त्यांनी परतीच्या प्रवासात नर्मदा नदी ओलांडल्यावर लगेच मराठा सरदारांना पत्रे पाठवून स्वत:कडे आकृष्ट केले. ‘तुम्ही स्वामींचे पुरातन सेवक, या प्रसंगी स्वामींचे दर्शनास येऊन सेवा करावी, स्वामी तुमचे अर्जीत विशेष प्रकारे करतील. पुढे कूच दरकूच येत आहोत,’ असे पत्रात म्हटले होते. त्यांचा आणि ताराराणींचा संघर्ष झाला. खेड येथे लढाई होऊन शाहूराजांचा विजय झाला. ते पुणे, सुपे, शिरवळ, रोहिडा, राजगड, प्रचंडगड, चंदनवंदन ही ठिकाणे ताब्यात घेऊन साताऱ्यास आले. साताऱ्याच्या अजिंक्‍यतारा किल्ल्यावर परशुरामपंत प्रतिनिधी होते. शाहूराजांनी त्यांना शरण येण्यासंबंधी निरोप दिला. मात्र ते शरण येण्यास तयार नव्हते.
      शाहुराजांच्या सैन्याने अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा नोव्हेंबर १७०७ मध्ये घातला. त्या वेळी शेख मीरा किल्ल्याचा हवालदार होता. त्याचा कुटुंबकबिला पसरणी येथील वाड्यात होता. शाहुराजांच्या सैन्याने त्यांना पकडून साताऱ्यात आणले. शाहूराजांनी शेख मीरास आठ दिवसांत किल्ला ताब्यात दिला नाही तर त्या सर्वांना तोफेच्या तोंडी देऊ असे कळवले. शेख मीरा घाबरला. त्याने परशुरामपंतांची भेट घेतली. मात्र पंतप्रतिनिधींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी त्यास ‘तुझी नुकसान भरपाई करून दिली जाईल, काळजी करू नकोस’ असे सांगितले. तेव्हा शेख मीराने प्रतिनिधीसच कैद केले आणि साताऱ्याच्या किल्ल्याचा दिंडी दरवाजा शाहुराजांना मोकळा करून दिला. अशा त-हेने ताराराणीची सातारा ही राजधानी शाहूराजांच्या ताब्यात डिसेंबर १७०७ मध्ये गेली. शाहुराजांचा संकल्प आठ दिवसांत किल्ला ताब्यात घेण्याचा होता, तो पूर्ण झाला. तो दिवस शनिवारचा होता. तेव्हापासून शनिवारी ‘फत्तेची नौबत’ वाजवण्याची प्रथा पडली.
    त्यानंतर शेख मीरा शाहूराजांच्या सैन्यात अखेरपर्यंत असल्याचे दिसते. मराठे अकरा-बारा हजार सैन्य घेऊन दिल्लीत नोव्हेंबर १७१८-१७१९ मध्ये गेले. त्या सैन्यात अंबाजीपंत पुरंदरे, खंडेराव दाभाडे, संताजी, राणोजी घोरपडे, सटवाजी जाधव, कृष्णाजी जाधव, कृष्णाजी दाभाडे, तुकोजी पवार, शंकराजी मल्हार, मोहकमसिंग, नारो गंगाधर, बाळाजी फडणीस, नारो शंकर, चिमणाजी दामोदर, आवजी नीळकंठ, महादेव हिंगणे आणि शेख मीरा हे सरदार होते. शाहूराजांनी जंजिऱ्याचा सिद्दीसात यावर केलेल्या मोहिमेसाठी उदाजी पवार, देवराम, मेघश्याम, हरी मोरेश्वर, राजाज्ञ आणि शेख मीरा यांना आज्ञा केली होती.
    महाबळेश्वरला जाताना पाचगणी घाटातून आजही आपणास पसरणी गाव व शेख मीराचा वाडा दिसतो. शेख मीराचा वाडा पसरणी येथील कोराळा ओढ्याच्या जवळ उभा आहे. तो वाडा शेख मीराच्या तत्कालीन सरदारी थाटाची साक्ष देतो. तो वाडा सहा एकरांच्या परिसरात पसरला असल्याचे त्याची उभी असलेली तटबंदी सांगते. वाड्याचे प्रवेशद्वार त्याच्या भव्यतेची ग्वाही देते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच चार मोठ्या कमानी असलेली इमारत नजरेत भरते. बाहेरचे दालन खुले असून, त्याला जोडूनच चार-पाच खोल्या आहेत. एका खोलीत शेकोटीची कमान आहे. त्यावर चुन्यात बांधलेले धुरांडे आहे. एक खोली नमाजाची आहे. मुख्य दालनातून खोल्यांमध्ये प्रवेश करण्यास जिना आहे. मागच्या बाजूस कमानी असलेले दालन आहे. वाड्यास जोडूनच एक उंच टेहळणी बुरूज (मनोरा) उभा असल्याचे दिसते. एका बाजूस घोड्याची पागा असून, जवळच मोटेची घट्ट बांधणीची विहीर आहे.
     ब्रिटिश आमदनीत त्या वाड्यात वैभव नांदत होते. नोकर-चाकर यांची वर्दळ होती. शेख मीरा याला पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जात असे. सध्या त्या वाड्यास नवाब बंगला असे म्हटले जाते. तेथून जाणारा एक कच्चा रस्ता आहे. तो पाचगणीला जातो. तो नवाबाच्या खासगी मालकीचा होता. त्याच्या परवानगीशिवाय त्या रस्त्याने जाता येत नसे अशी आठवण सांगितली जाते.
धोम धरण झाल्यावर त्या भागातील आजगावच्या काही विस्थापित लोकांनी तो वाडा खरेदी केला होता, त्यातील काही मंडळी तेथे वास्तव्य करून आहेत.
पसरणी गावात रघुनाथस्वामी नावाच्या संतांची समाधी असून, तेथे राममंदिर आहे. कालभैरवनाथ हे गावाचे मुख्य दैवत आहे. त्याचे मंदिर हेमाडपंथी आहे.
शेख मीरा यास बरीच गावे इनाम म्हणून मिळाली होती. पाचगणी येथील मालमत्ता त्याच्या उत्तराधिकाऱ्यारकडे होती. शेख मीराचा वंशज सैदुद्दीन हैदर विजली खान हा पाचगणी येथील जमीन खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहारामुळे दिल्ली येथे कैदेत आहे असे समजते.
    येथील यात्रेसाठी राज्यभरातून भाविक येतात.येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणी कृष्णा नदीचे पात्र दक्षिणेकडे वाहते. गावात जुन्या काळातील बारव आहे. या गावी शाहीर साबळे, क्रांतिवीर नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी, सेनापती बापट यांच्या उपस्थितीत अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दसऱ्याला भैरवनाथाची पालखी निघते. यावेळी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी असे साहसी खेळ खेळले जातात.
       कीर्तिवंतांचं गाव :-
        पसरणी गावात महराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के, बँकिंग क्षेत्रातील अर्थतज्ज्ञ गजानन दाहोत्रे, साहित्यिक, स्वातंत्र्यसेनानी जन्माला आले. त्यांनी गावची कीर्ती सर्वदूर पोहोचविली आहे. गावचे सुपुत्र पद्मश्री बी.जी. शिर्के यांनी उद्योगपती म्हणून देशात आणि देशाबाहेर मोठी कीर्ती संपादली. त्यांनी गावात माध्यमिक विद्यालयाची इमारत बांधली असून, गावाच्या मंदिराचा जीर्णोद्धारही केला आहे. त्यांनी गावासाठी अनेक सार्वजनिक कामे केली. त्यांना गावात मानाचे स्थान आहे.
     शाहीर साबळे पसरणी गावचे. त्या गावातील शिवाजीराव तथा मामासाहेब शिर्के यांनी दशकाहून अधिक काळ ‘पवनेचा प्रवाह’ हे साप्ताहिक चालवले आहे. त्या गावाचे रहिवासी न्यायमूर्ती पानसे हे हायकोर्ट जज्ज म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
        शाहीर साबळे, बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात ‘पद्मश्रीं’चे गाव म्हणूनही पसरणीची ओळख निर्माण झाली आहे.पसरणीच्या चामडी बुटांची ब्रिटिशांना भुरळ. पसरणीची रेशमी ‘साळवी लुगडी’ प्रसिद्ध होती. इंग्रज राजवटीत गव्हर्नर साहेबांना येथील चर्मकारांनी बनविलेल्या बुटांनी भुरळ पाडलेली. म्हणून ते येथील चामडी बूट इंग्लंडला घेऊन जायचे. आजही महाबळेश्वरमध्ये काही चर्मकार बांधव कातडी चपला, बूट बनविण्याचा व्यवसाय करतात.

11 ) कोयनानगरजवळचा भैरवगड  

महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर सपाट असणारा देश आणि समुद्रसपाटीला असणारे कोकण यांच्या मधोमध एखाद्या द्वारपालासारखा सह्याद्री खडा आहे. उंच सुळके, बेलाग शिखरे, अडचणीच्या खिंडी, नाळेच्या वाटा आणि जणु बोट धरुन उतरायला लावणारे घाट वाटा इथे आहेत. यावर नजर ठेवायला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत अनेक गड, किल्ले फार प्राचीन काळापासून उभारले आहेत. अश्यापैकी एक गर्द जंगलाने वेढलेला वनदुर्ग म्हणजे कोयनेजवळचा "भैरवगड". महाराष्ट्रात चार भैरवगड आहेत, त्यापैकी कोयनेच्या म्हणजेच सध्याच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात , सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा पुढे कोकणात झुकलेला हा गड तसा दुर्लक्षित आहे. या परिसराचे मुख्य संरक्षण म्हणजे दिवसाही सुर्यप्रकाश जमीनीवर पडू न देणारे गर्द जंगल. यातच वासोटा, प्रचितगड यासारख्या महत्वाच्या किल्ल्यामधे पालीचा किल्ला, जुंगटीचा किल्ला, जंगली जयगड आणि भैरवगड अशी दुर्गसाखळी या परिसरात आहे. पैकी पालीचा किल्ला आणि जुंगटीचा किल्ला या परिसरात आता कोणालाही सोडले जात नाही, त्यामुळे तिथे आता मानवी वावर नाही. आत्ताच जंगली जयगडाचा राबताही बंद केला आहे. तेव्हा रहात राहिला भैरवगड. आज आपण तिथेच जाणार आहोत.
      भैरवगड हा कोयनानगर विभागात मोडणारा किल्ला आहे. येथील किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व किल्ले घाटमाथ्याच्या (सह्याद्रीच्या) सलग रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगराच्या फाट्यावर वसलेले आहेत. त्यामुळे दुरून हे किल्ले दिसत नाहीत. घनदाट जंगल हे येथील मुख्य आकर्षण आहे. हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल्याने येथील सर्व गावांचे स्थलांतर करून ती अरण्याबाहेर वसवण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात माणसांचा वावर तसा कमीच आहे. २०१२ साली भैरवगडाच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे हेळवाकहून भैरवगड, पाथरपुंज (व प्रचितगड) कडे जाणार्‍या कच्च्या रस्त्यावर जंगल खात्याने चौकी बसवलेली आहे व वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या रस्त्याने जाता येत नाही.मुळात भैरवगड आणि आसपासची गावे हा सर्व भाग कोयनाप्रकल्प आणि वनखात्याअंतर्गत संरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे पर्यटकांना मुक्तपणे फिरता येत नाही. यासाठी आधीच कोयनानगरच्या वनखात्याकडून इथे येण्याची परवानगी काढावी. कोयना वनखात्याच्या ऑफिसचा दुरध्वनी क्रमांक-(०2372) 284091, तरीही अभयारण्य क्षेत्रात चोरून प्रवेश केल्यास रुपये ५०,०००/- दंड / ३ वर्षाची सजा होऊ शकते.
       भैरवगडावर जाण्यासाठी ६ वाटा आहेत.
१) हेळवाकची रामघळ मार्गे :-
हेळवाकच्या रामघळीत जाण्यासाठी चिपळूण किंवा कराड गाठावे. चिपळूण कराड रस्त्यावर कुभांर्ली घाट पार केल्यावर, कोयनानगरच्या अलिकडे 5 ते 6 कि.मी वर हेळवाक गाव आहे. तिथे ऊतरुन मेंढेघरमार्गे कोंढावळे धनगरवाड्याला जावे. येथून डोंगर उजवीकडे व ओढा डावीकडे ठेवून १ तासांत रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली "रामघळ" गाठावी. याच रामघळीत रामदास स्वामींना "आनंदवन भुवनी " हे काव्य सुचले अशी दंतकथा आहे.. ही रामघळ पाहून , रामघळीतूनच वर जाणारा रस्ता पकडावा. पाथरपुंज जुना वाघोना मार्गावरून आपण भैरवगडावर जाऊ शकतो. मात्र हा पल्ला फारच लांबचा असल्याने गड गाठण्यास ६ तास लागतात. वाटेत खूप घनदाट जंगल लागते. वाट तशी मळलेली नसल्याने हरवण्याचा संभव खूपच आहे. या वाटेने जायचे असल्यास वाटाडया घेऊन जाणे आवश्यक आहे.
         वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्यास पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरुन हेळवाक मार्गे भैरवगडापर्यंत जाता येते. (हेळवाक ते भैरवगड अंतर साधारणपणे २० किमी आहे.) सध्या भैरवगडावर किंवा जवळच्या भैरवनाथ मंदिरात मुक्काम करण्याची परवानगी नाही, त्यामुळे हा पर्याय बाद झाला असे म्हणले तरी चालेल. या रस्त्याने जायचे झाले तर चाफ्याचा खडक या धनगरवाड्यातील वाटाडे वाट दाखविण्यासाठी अडवून मोठी रक्कम मागतात असा अनुभव आहे.
२) दुर्गवाडी मार्गे :-
या मार्गे भैरवगडावर येण्यासाठी प्रथम चिपळूण गाठावे. चिपळूण वरून डेरवण मार्गे दुर्गवाडी हे पायथ्याचे गाव गाठावे. चिपळूण ते दुर्गवाडी अशी ८:०० वाजताची बस आहे. दुर्गवाडी पर्यंत येण्यास साधारणत: १ तास लागतो. दुर्गवाडी गावाच्या वर असणार्‍या जंगलातून वाट थेट गडावर जाते. या वाटेने गड गाठण्यास ३ तास लागतात. वाट तशी सरळच असली तरी दमछाक करणारी आहे. गव्हारे - गोवळ पाती गावातून येणारी वाटसुद्धा या वाटेलाच येऊन मिळते. वाटेत कुठेही पाणी नाही. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
दुर्गवाडीमार्गे भैरवगडाला जावयाचे झाल्यास एस्.टी. बसचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे-चिपळूणवरुन पहाटे ४.००, ७.५०,११.००, २.१५, ४.४५ ( मुक्कामी) तर दुर्गवाडीवरुन ७.३०,८.००,९.३० आणि संध्याकाळी ४.०० अशी बसची सोय आहे.
          ३) गोवळ पाती मार्गे :-
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूण पासून गोव्याच्या दिशेला जातांना "आसूर्डे फाटा" २१ किमीवर आहे. तिथून डावीकडील रस्ता २२ किमीवरील गोवळ पाती गावापर्यंत जातो.(यातील शेवटचे ५ किमी कच्चा रस्ता आहे.) गोवळ पाती गावातून गडावर जाण्यासाठी गावकर्‍यांनी पायर्‍या बांधलेल्य़ा आहेत. गावाच्या वर असलेल्या पठारापर्यंत या पायर्‍यांनी जाता येते.(येथे येण्यासाठी गावातून १.३० तास लागतो). पुढे खड्या चढणीच्या वाटेने २ तासात आपण भैरवगडावरील मंदिरात पोहोचतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
४) गव्हारे मार्गे :-
गडावर जाण्यासाठी गव्हारे (गोवारे) गावातूनही वाट आहे. हेळवाक किंवा संगमनगर पुलमार्गे गव्हारे (गोवारे) गावाकडे जाणारा गाडीरस्ता लागतो. या गाडीरस्त्याने गव्हारे गावात पोहचावे. गावातून गडावर जाण्यास तीन तास पुरतात. ही वाट मध्येच दुर्गवाडी गावातून येणार्‍या वाटेस मिळते. पावसाळा सोडून इतर ऋतुत जीपने, कच्च्या रस्त्यावरुन कोयनानगर - गव्हारे (गोवारे) - पाथरपुंज मार्गे भैरवमंदिरा पर्यंत जाता येते. तेथून भैरवगडापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. पायथ्यापासून भैरवगडावर पोहोचण्यास ३.३० तास लागतात.
५ ) कोयनानगरच्या अलिकडे संगमनगर ( धक्का ) नावाचा कोयना नदीवर पुल आहे, तो ओलांडून चिरंबे-नाव-कोळणे मार्गे पाथरपुंज गाव गाठता येते. वाटेत एका ठिकाणी वनखात्याचे कंपाउंड लागते. हा कच्चा जीप रस्ता आहे. पाथरपुंज गावातून असाच कच्चा जीप जाण्याजोगा रस्ता थेट भैरवगडाजवळच्या भैरवनाथ मंदिरापर्यंत जातो.
 ६) या परिसरात उभ्या रहात असलेल्या पवनचक्क्यामुळे पाटण- मोरगिरी- धावडे-गोकुळ- गोठणे-मळे-पाथरपुंज असा ट्रक जाण्यायोग्य कच्चा रस्ता आहे. यामार्गेही स्वताची मोटारसायकल किंवा जीप यासारखे वाहन असेल तर येणे शक्य आहे. सकाळी लवकर पाटणपासून किंवा कोयनानगरवरुन सुरवात केल्यास एका दिवसात भैरवगड पाहु शकतो.
       भैरवगड कोणत्याही ऋतुत जाण्यायोग्य असला तरी तेथे जाण्याचा रस्ता सध्या वनखात्याच्या हद्दीत येत असल्याने पावसाळ्यात जाण्यास परवानगी मिळत नाही, तसेच ३१ डिसेंबर, १ जानेवारी, बुध्दपौर्णिमेचा दिवस आणि त्याच्या आदला दिवस ( प्राणीगणनेमुळे ) परवानगी मिळत नाही. तरीही भैरवगडावर पावसाळ्यात जाण्याची परवानगी मिळाल्यास जळवांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात होतो, हि गोष्ट लक्षात ठेवावी आणि यापासून बचाव करण्यासाठी मीठ व हळद सोबत घेऊन जावे.
        या पुर्वी "चाफ्याचा खडक" या हेळवाकजवळच्या धनगरवाड्यामार्गे मी व माझा मित्र प्रशांत याने जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वाटाड्यांनी वाट दाखविण्यासाठी खुपच मोठी रक्कम मागितली. ती देणे परवडणारे नव्हते. तसेच हा रस्ता खुप लांबचा आहे. नुसत्या भैरवनाथाच्या मंदिरात पोहचण्यासाठीच जवळपास संपुर्ण दिवस जातो.
 धनगरवाड्यातून थेट भैरवगडाला जाण्यासाठी एक वाट आहे, तर दुसरी वाट रामघळ पाहून तिथून थेट वर चढून या पहिल्या वाटेला मिळते. या ओढ्यात पाणी भरुन चालायला सुरवात केली कि दहा मिनीटात एका पठारावर पोहचतो. तिथे उजवीकडची गुरांची वाट सोडून देउन डावीकडची मळळेली वाट पकडायची. हि वाट एका दरीच्या काठाकाठाने गर्द झाडीतून डोंगराच्या उघड्या टोकावर येते. रामघळीपासून ईथेवर येण्यासाठी साधारण दिड तास लागतो. इथून खाली नदीचे पात्र दिसते. त्या दिशेने उतरुन नदी पार करायची. यानंतर समोर जुन्या वाघेना या गावाचे अवशेष दिसतात. आज इथे एखादे झोपडे आहे. १९६७ च्या कोयनेच्या प्रलयांकारी भुकंपानंतर हे गाव येथून उठले.
 पुढे नदीच्या उजव्या काठाने परंतु टेकडीजवळच्या रस्त्याने निघायचे. पंधरा मिनीटात रस्ता पुन्हा दाट झाडीत शिरतो. त्या झाडीतुन वाट एका ओढ्याजवळ वाट उतरते.
हा ओढा ओलांडला कि वाट खड्या चढावरुन वर एका गवताळ पठारावर पोहचते. हि वाट नंतर पाथरपुंज ते भैरवगड या रस्त्याला मिळते. या वाटेच्या शेवटी आपल्याला भैरवनाथाचे मंदिर दिसू लागते. हि सर्व वाटचाल म्हणजे अनोखी जंगल भ्रमंती आहे. हिचा अवश्य अनुभव घ्यावा अशीच हि भ्रंमती आहे, मात्र वनखात्याने भैरवनाथ मंदिरात आणि या परिसरात मुक्कामाला बंदी केल्याने एका दिवसात हि वाटचाल शक्य असल्यासच हा पर्याय निवडावा. तेव्हा या मार्गे जायचे तर आम्हाला मुक्कामाची तयारी करुन जाणे भाग पडले असते. अखेरीस रामघळ पाहून परतण्याचा निर्णय घेतला.
    धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे
 एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु.  स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे. रामघळीच्या माथ्यावरुन पावसाळी धबधबा पडतो.
हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
   धनगरवाड्याचा पर्याय बाद झाल्यानंतर आम्हाला चिरंबेमार्गे नाव ते पाथरपुंज ह्या गाडीरस्त्याविषयी समजले. या सगळ्या अडचणीचा विचार करुन आम्ही चौघा मित्रांनी भैरवगड मोहिम आखली आणि एका सुप्रभाती पुरेशी तयारी करुन बाईकवरून संगमनगर ( धक्का ) पुल ओलांडून चिरंबे मार्गे नाव या गावाकडे निघालो.त्यावेळी हा संगमनगर पुल जेमतेम ऊंचीचा होता. पावसाळ्यात बहुतेक आठवडा- दहा दिवस हा कोयनामाईच्या पोटात गुडूप व्हायचा आणि पैलतीरावरच्या गावकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागायचे, 'पाउस उघडीप केव्हा देतोय'. आता मात्र उंच पुल झाला आहे.असो.
    पुल ओलांडून चिरंबे गावात पोहचलो, तो शाळकरी मुले भेटली, त्यांनी ' पाथरपुंज डोंगरात लई लांब हाये आणि ततंपासून बैरामगड पुढ हाये, रस्ता बी लयी खराब हाय' हि शुभवार्ता दिली. अर्थात कोणत्याही परिस्थितीत भैरवगड बघायचाच हा निश्चय केलेल्या आमच्या चमुच्या मनोधैर्यावर कोणताही परिणाम झाला नाही, "अभी नही तो कभी नही".
     चिरंब्यावरुन एक रस्ता नाव या गावाकडे वर चढत होता, आम्ही या रस्त्याने जाणार आहे हि खबर पसरल्यामुळे कि काय, सार्वजनिक बांधकाम खात्याने नेमका तोच मुहुर्त काढून रस्त्याच्या पिचिंगचे काम हाती घेतले होते. रस्त्यावर टोकदार खडी पसरुन त्यावरुन रोडरोलर फिरवून रस्त्याचे काम सुरु होते. त्यावरुन बाईक नेताना प्रचंड कसरत करावी लागली. रस्त्याच्या मधून गाडी न्यावी, तो टोकदार दगडामुळे चाक पंक्चर होण्याचा धोका, कडेने न्यावी, तर त्याबाजुला दरी. शेवटचा चढ तर माती भरला होता, त्या मातीत चाक रुतून जागेवर फिरु लागले आणि मातीत रुतायला लागले.अखेरीस कसेबसे नाव गावाच्या सपाटीवर आलो आणि लांबवर कोयना धरणाच्या भिंतीचे आणि निळ्याशार शिवसागराचे दर्शन झाले. मात्र फार वेळ घालवून चालणार नव्हते, अजून बराच पल्ला गाठायचा होता. या सपाटी नंतर वाट थोडी खाली उतरली आणि एक अवघड वळण घेउन वर चढू लागली. हि वाट मस्त, दाट झाडीतून जात होती. मात्र दगडाच्या टेंगळावरुन गाडी चढवताना तोंडाला फेस आला. इथेच वनखात्याची हद्द दर्शविणारे कंपाउंड आणि गेट लागले. अर्थातच चौकीदाराचा पत्ता नव्हता. यानंतर पुन्हा मातीचा रस्त्याने एक खडे वळण घेउन वरच्या सपाटीवर पोहचलो. वाटेत नजर जावी तिकडे हिरव्या रंगाचा दाट वनसागर पसरला होता. जंगल विलक्षण बोलके होते, पार्श्वभुमीला निरनिराळ्या पक्षांचे आवाज आणि वन्यप्राण्यांचे साद चालु होते. या रस्त्याने दर रविवारी कोयनानगरवरुन खाजगी वहातुक करणारी जीप येते असे आम्हाला समजले. हे असे जीप ड्रायव्हर शोधून त्यांना फॉर्म्यला वनचे ट्रेनिंग द्यायला हरकत नाही.
     सपाटीवरुन पुढे जातो, तो कुत्र्यांनी भुंकून आमचे स्वागत केले. या गर्द अरण्यात अजून काही गावे चिकाटीने वस्ती करुन राहिली आहेत, त्यापैकी एक, "कोळणे". काही गुंठा जमीन, त्यात येणारी भात, नाचणी अशी पिके, जंगलाच्या कृपेने मिळणारा आंबा, फणस, करवंदे, जांभुळ हा रानमेवा कराड, पाटण, कोयनानगर, चिपळूण येथे विकायचा हेच काय ते उत्पन्नाचे साधन असणारे हे वनवासी काय चिकाटीने बापजाद्याने वसवलेल्या जमीनीवर तगून राहिलेत.
   यानंतर एक ओढा ओलांडून आमचा प्रवेश पाथरपुंज या शेवटच्या मानवी वस्ती असलेल्या गावात झाला. इथून पुढे थेट कोल्हापुर-रत्नागिरी मार्गावरच्या उदगिरी या गावापर्यंत मानवी पाउलखुणा सापडत नाहीत. फक्त आणि फक्त जंगल. पाथरपुंज अड्यानिड्या जागी असले तरी इथे प्राथमिक शाळा आहे, गावात वीज आली आहे आणि घरांवर चक्क डिशअँटेना आहेत. मागे आम्ही यामार्गे प्रचितगडाला जाण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा गावातील परशुराम नावाच्या वाटाड्याला बरोबर घेतले होते. तो रस्ता दट जंगलात इतका हरविला होता कि वाट न सापड्लयाने आम्ही एका सड्यावर मुक्काम केला आणि परत आलो. आम्ही पाथरपुंजात प्रवेश करायला आणि हा परशुराम समोर यायला एकच गाठ पडली. एकदाची ओळख पटल्यानंतर त्याने आम्हाला पुन्हा येण्याचे आवतान दिले आणि भैरवगडाकडे जाणारी वाट दाखवली.
        भैरवगड ते प्रचितगड असा 2 दिवसांचा ट्रेक करता येतो. या ट्रेकमध्ये रात्रीचा मुक्काम जंगलात करावा लागतो. त्यासाठी तंबू बरोबर घेऊन जावा. जंगलात वन्य पशुंचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. प्रचितगडच्या आजूबाजूचे अभयारण्य "टायगर रिझर्व" घोषित केल्यामुळे वनखात्याची लिखित स्वरूपातील पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गडावर जाता येत नाही, तसेच जंगल खात्याच्या कारवाईच्या भितीने सध्या मात्र वाटाडेही प्रचितगडावर यायला तयार होत नाहीत.
हा रस्ता एखादी जीप जाईल ईतका प्रशस्त पण कच्चा आहे. याच रस्त्याला एके ठिकाणी हेळवाक-कोंढावळ धनगरवाडामार्गे येणारी वाट मिळते.
  अर्ध्या- पाउण तासातच आम्ही एक मस्त उतार ओलांडून भैरवनाथ मंदिरासमोर दाखल झालो.
मंदिरा समोरच्या प्राकारात तुळशीवृंदावन, शंकराच्या पिंडीचा चबुतरा दिसतो.
 पुर्वी हे मंदिर प्रशस्त आणि कौलारु होते. आता मात्र या राहाळातील मुंबईला रहाणार्‍या गावकर्‍यांनी एकत्र येउन मंदिराचे नवनिर्माण केलेले आहे.
आता मंदिर तर प्रशस्त झालेले आहेच, पण पुढे पत्राचा मांडव केल्याने मंदिरात सध्या किमान शंभरजण आरामात झोपु शकतात.
पण आम्ही नेमक्या कोणत्या वाईट मुहुर्तावर बाहेर पडलो होतो याची कल्पना नाही, कारण इथेही मंदिराचे बांधकाम सुरु होते. बांधकाम करणारर्‍या गंवड्यांची लगभग सुरु होती. मात्र बांधकामामुळे मंदिराचे दरवाजे बसवले नव्हते, सहाजिकच बंदिस्त मंदिरात सुरक्षित मुक्काम आम्हाला करता येणार नव्हता.
वन्यप्राणी विशेषतः अस्वल, गवे आणि बिबटे असणार्‍या जंगलात उघड्यावर मुक्काम म्हणजे आत्मघात ठरला असता, सहाजिकच मंदिराच्या स्लॅबवर चढून आम्ही वर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.
बरोबर आणलेल्या कॅरीमॅट, शेकोटी पेटविण्यासाठी आणलेले रबरी टायर, सॅक या सर्व वस्तुंची स्लॅबवर व्यवस्था लाउन आधी भैरवनाथाच्या दर्शनासाठी गाभार्‍यात गेलो.

दरीच्या काठाशी या मंदिराने अचुक जागा पकडली आहे. आत अरण्याचा राजा भैरोबा डोळे वटारुन बसला आहे.
 मंदिरात भैरी देवी, श्री तुळाई देवी, श्री वाघजाई देवी यांच्या २ ते ३ फुट ऊंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र वद्य प्रतिपदेला इथे यात्रा असते, तीच ईथेली वर्दळ, एरवी सुट्टीदिवशी येणारे गडभटके आणि हौशी पर्यटक सोडले तर या भैरवनाथाला सक्तीचा एकांतवासच नशीबी लिहीला आहे.
मंदिराच्या समोरच एक धातुचा शिवपुतळा पाटणच्या दुर्गप्रेमी शिवभक्तांनी एका चौथर्‍यावर  बसविलेला आहे,
तिथेच शेजारी माहितीफलक देखील लावण्याचा स्त्युत्य उपक्रम केला आहे.
मुक्काम करायचा तर पाण्याची व्यवस्था महत्वाची. मंदिराच्या मागच्या बाजुला मंदिराच्या कोकणातील गोवळ पाती गावात उतरणारी वाट आहे या वाटेने ५ मिनिटे खाली उतरल्यावर एक चौकोनी विहिर आहे. या विहिरीला बारमाही पाणी असते. आम्ही एन मे महिन्यात गेल्याने पाणी खुपच कमी होते, मात्र थोड्या थोड्या वेळाने पाणी झिरपून विहीर भरत होती. आमच्याकडच्या बाटल्या भरुन एका सॅकमधे घेतल्या आणि गडदर्शन करण्यासाठी निघालो.
बहुतेक किल्ल्याप्रमाणे भैरवगडसुध्दा एका चिंचोळ्या धारेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जोडला गेला आहे.
उजव्या बाजुला दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील, चिपळूण तालुक्यातील दुर्गवाडी, पाथ, मंजुत्री, फुरुस हि गावे उत्तरेला दिसत होती, पैकी दुर्गवाडी गावातून एक वाट पुर्ण सह्याद्रिची धार चढून भैरवनाथ मंदिराच्या मागे येते.
तर वाटेच्या दक्षिणे बाजुला म्हणजे डाव्या हाताला एक वाट गोवळपाती गावात उतरते. या वाटेने थोडे उतरुन गेलो, तो हादरलोच. एका गव्याचा शेणाचा परातभर पो पडला होता. म्हणजे गवे या वाटेने ये जा करत होते.
गव्यांना आज तरी या वाटेने येण्याची बुध्दी होउ नये अशी प्रार्थना करुन आम्ही गडाच्या दिशेने निघालो. वाटेत दगडाच्या कपारींचा खच पडला आहे. वर कड्यात एक नैसर्गिक गुहा आहे. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर एक बांधीव बुरुज लागला. या बाजुने होणार्‍या सैन्याच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी हा बुरुज उभारला असावा.

या बाजुला सह्याद्रीची कातळधार उतरत्या उन्हात मोठी मनमोहक दिसत होती.
गडाचे कोकणात कोसळणारे कडे आणि त्याला चिकटलेला सुळका मोठा थरारक दिसत होता.
गडाला तीन प्रवेशद्वारे असली तरी त्यातल्या त्यात पहिला दक्षिणमुखी दरवाजा थोडाफार तग धरुन आहे, बाकीचे दरवाजे नामशेष झालेले आहेत. या दरवाजातून पुढे गेल्यावर समोरच्या टेकाडाच्या चढावावर दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. हा दरवाजाही ढासळलेला आहे.
भैरवगड दोन टेकड्यांनी मिळून बनला आहे. दोघांच्या खिंडीमधुन पलीकडे जाउन पश्चिमेच्या टेकडीवर जाता येते. इथून खाली गोवळपात या गावाकडे उतरणारी कड्याची धार दिसते.
 याच बाजुला पुन्हा पुर्वे बाजुच्या टेकडीवर आले कि एक कातळकोरीव पाण्याची दोन टाकी आहेत. यातील पाणी पिण्यास उपयुक्त असून ते बारमाही असते. इथे थोडी सपाटी आहे. तिथे एक चुल आणि जळालेली लाकडे दिसली. याचा अर्थ आम्ही येण्याच्या आधी कोणीतरी गडावर मुक्काम केला असणार.
पाण्याच्या टाक्यातील पाणी मनसोक्त पिउन आणि बाटल्यात भरुन आम्ही दाट झाडीतून माथ्याकडे निघालो.
माथा तसा चिंचोळा आणि फारचे अवशेष नाहीत, बहुधा झाडीने गिळून टाकले असावेत. मात्र सगळ्या बाजुने खोल दर्‍या आहेत.
माथ्यावरुन समोर भैरवनाथ मंदिर आणि तिथे काम करणार्‍या गवंड्याचा कोलाहल एकु येत होता. मे महिना असल्याने माथ्यावरची जंगली जांभळांची झाडे भरली होती, अर्थातच त्याचा मनसोक्त आस्वाद घेउन खाली उतरलो.
गडावरून लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल दिसते. गडमाथा तसा अरुंदच आहे, त्यामुळे २ तासात गड फिरून होतो. हवा स्वच्छ असेल तर दक्षिणेला प्रचितगडाची धार तर उत्तरेला जंगली जयगडाची सोंड दिसते. ह्या माथ्यावर उभारलो तर गडाची उंची ३००४ फुट चांगलीच जाणवते. गडावर मानवी वावर फार नसला तरी जनावरांचा बर्‍यापैकी राबता असल्याचे ठश्यावरुन जाणवते.
    मंदिराकडे येणार्‍या कच्च्या रस्त्याने चालत जाऊन डावीकडे दरीत उतरणार्‍या वाटेने ५ मिनिटे खाली उतरावे, येथे सुद्धा पाण्याचं एक टाकं आहे. मात्र हे पाणी मार्चपर्यंतच असते.
  खाली उतरुन मंदिरात परत येउन टेकतोय, तोच गवंड्यानी आवराआवर सुरु केली. फार उशीर होण्याच्या आतच त्यांना पाथरपुंज गाठायचे होते. एकदा त्यांचे आवाज यायचे बंद झाले आणि आम्हाला जाणिव झाली, आपण या अटंग्या वनात एकटे आहोत. जवळची मानवी वस्ती अगदी गाडीने गेलो तरी अर्ध्या-पाअण तासावर होती. सुर्यास्त झाला तसे जंगलातून निरनिराळे आवाज भिती घालू लागले. जंगलातील मुक्कामाचा एक थरारक अनुभव आम्ही घेत होतो. रात्री पाणवठ्यावर जायला लागु नये म्हणून पुरेसे पाणी आणून ठेवले होते. जरी देवळाच्या स्लॅबवर आम्ही सुरक्षित असलो, तरी नेमेके एक झाड थेट स्लॅबवर आलेले होते, त्या झाडावर चढून एखादा बिबटा आमच्यापर्यंत पोहचू शकत होता. अखेरीस चौघांपैकी दोघा दोघांनी तासतासभर जागे रहायचे ठरविले आणि खिचडी शिजायला ठेवली. खाली कोकणातील रेंज असल्याने घरच्यांना फोन करुन झाले आणि इतरही फोन येत होते. केलेला फोन कोठे घेतला जातोय हे बघायची सोय असती तर आम्ही कोयनेच्या जंगलात कशाला कडमडलोय? हा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला असता.
   खिचडी शिजता शिजता गप्पा सुरु झाल्या. विषय वळाला या गडाच्या ईतिहासाकडे. या गडाच्या जवळून उतरणार्‍या घाटवाटा तश्या दुय्यम असल्याने आणि गडावर जागा बेताची असल्याने या गडाला ईतिहासात फार महत्व नाही.या गडाचा वापर केवळ टेहळणीसाठी असावा असे येथील बांधकामावरून दिसते. ग्रँट डफच्या मते, पन्हाळ्याच्या दुसरा शिलाहार भोजाने या गडाची उभारणी केलेली असावी. यानंतर बहामनी कालखंडापासून शिर्के घराण्याच्या राजधानीचे ठिकाण म्हणून भैरवगड प्रसिध्द होता.इ.स. १४५३ मधे मलिक उत्तेजारने हा गड घेतला.  मराठी कागदपत्रामधे गडाचा उल्लेख सारंगगड आणि भैरवगड अश्या दोन्ही नावानी येतो. गडावर असलेल्या काळभैरव मंदिरामुळे याला भैरवगड किंवा बहिरवगड म्हणतात. शिवकाळात आदिलशाहीचे या प्रदेशावर नाममात्र वर्चस्व होते. शिवाजी महाराजांनी सन १६६१ च्या सुमारास दक्षिण कोकण जिंकण्यासाठी स्वारी केली, त्यात शृंगारपुरवगैरे ठिकाणे घेतली, त्यात भैरवगड त्यांच्या ताब्यात आला. तो अखेरपर्यंत मराठ्यांच्या अंमलाखाली राहिला. मराठ्यांबरोबर झालेल्या शेवटच्या युध्दात २३ मे १८१८ रोजी हा गड कर्नल केपनने ताब्यात घेतला.
   
    राहिलेल्या खिचडीचा नाष्टा उरकून बाईकवर स्वार होउन गडाचा निरोप घेतला आणि त्याच प्रशस्त रस्त्याने निघालो, तो एका भल्या मोठ्या शेकरूने झाडावर दर्शन दिले. कॅमेरा काढेपर्यंत ती उड्या मारत अदृष्य झाली सुध्दा. पुन्हा एकदा रस्त्याची कसरत करुन संगमनगर पुलाजवळ जेवणासाठी थांबलो. मागच्या बाजुला पसरलेला गर्द जंगलाच्या वनराईचे घोंगडे पांघरलेला सह्याद्रीचा निरोप घेतला. एक अनगड दुर्ग बघण्याचे स्वप्न पुरे झाले होते.

12 ) लिंब बारामोटेची विहिर   

     मानवी वसाहती ह्या जलसंस्कृतीच्या काठावर वसल्या आणि हजारो वर्ष विकसित होत राहिल्या. पाणी ही मानवाची प्रमुख गरज असल्याने पाण्यास "जीवन" हे नाव दिले असावे. नदी, तलाव, तळी, विहिरी ह्या मानवी जीवनातील पाण्याची महत्त्वाची गरज पूर्ण करणारी साधन आहेत, पण प्रत्येक ठिकाणी पाणी उपलब्ध होईलच हे शक्य नसल्यामुळे मानवाने डोंगराच्या उतारादरम्यान तळी निर्माण करणे, गावाशेजारील ओढ्यास बंधारा बांधणे, इत्यादी माध्यमातून पाण्याची उपलब्धता करून आपल्या दैनंदिन जीवनात वापरासाठी व शेतीसाठी नियोजन केल्याचे दिसून येते.
    पाण्यासाठी योग्य ठिकाणी विहीर, बारव, आड खोदण्याची परंपरा फार प्राचीनकाळापासून अस्तित्वात आहे. शिवकाळात देखील प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या सुविधेला जाणीवपूर्वक विशेष महत्त्व दिले होते. परकीय आक्रमाकांच्या प्रतिकारासाठी लढाऊ सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्र जसे महत्त्वाचे होते, तसेच अन्नधान्य व पाणी हे आपल्या सैन्याची ताकद होती. शिवकाळात राजमाता जिजाऊ ह्या आपल्या द्वितीय पुत्र छ. शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहात होत्या. बाल शिवबासह खेडे बारे येथे त्या वास्तव्यास असताना, शाहजी राजांच्या नावाची पेठ व आंब्याची बाग " शहाबाग" निर्माण केली होती. आब्याच्या बागेला व मानवी वसाहतीस मुबलक पाणी मिळावे म्हणून त्यांनी छोटेखानी धरण देखील बांधले होते. शिवकाळातील आंब्याच्या बागेमुळे आजही हे ठिकाण "शिवापूर बाग" याच नावाने ओळखले जाते. मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडातील आंब्याच्या बागेसाठी पाण्याची व्यवस्था करणारी पहिली कर्तबगार महिला ह्या जिजाऊसाहेब असू शकतात.
     इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, याचीच प्रचिती सुमारे शंभर वर्षांनी झाल्याचे इतिहासाने पाहिले आहे. स्वराज्याच्या सातारा गादीचे छत्रपति शिवाजी उर्फ शाहू महाराजांच्या काळात श्रीमंत विरुबाई भोसले या कर्तबगार महिलेने लिंब (शेरी वस्ती.सातारा) येथे कृष्णा नदीच्या लगतच बारा मोटेच्या विहिरीची निर्मिती केली. छ. शाहू महाराज, महाराणी येसूबाईसाहेब व इतर कुटुंबातील सदस्य मोगल बादशहा औरंगजेबाच्या कैदेत असताना बादशहाने छ. शाहूला मुलगी दाखविण्यासाठी रूपवान अशा विरूबाईस पाठविले. पुढे शाहू महाराजांचे सगुणाबाई व सकवारबाई यांच्याशी विवाह झाले मात्र विरूबाई या उपस्त्री म्हणूनच त्यांच्याकडेच राहिल्या. २० फेब्रुवारी १७०७ मधे अहमदनगर जवळच असलेल्या भिंगार येथे औरंगजेबाचा नैराश्य व वृद्धापकाळाने मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे त्याच्या मुलांमधे दिल्लीच्या गादीसाठी यादवी सुरू झाली. शहाआलम उर्फ बहादुर शहा या औरंगजेबाच्या मुलाने मुघलांच्या गादीचा वारस म्हणून ५ मार्च १७०७ ला स्वतःस  राज्यारोहन करून मुघल राजधानी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. परतीच्या वाटेवर असताना दारोहा येथून शाहू महाराजांची काही अटी व शर्थीवर सुटका केली व महाराणी येसूबाईसाहेब, विरूबाई व इतरांना आपल्याबरोबर पुढे दिल्ली येथे नेले. पुढील काळात छ. शाहूंनी सातारा येथे मराठा राज्याची राजधानी निर्माण केली परंतु मातोश्री व इतर कुटुंब कबिला हा मोगलांच्याच ताब्यात दिल्ली येथे होता. या सर्वांना सोडविण्याची संधी दिल्लीच्या कारभारातील प्रमुख असलेल्या सय्यद बंधूंच्या निमित्ताने आली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी येसूबाईसाहेब, रक्षा बिरूबाई व इतरांना इ. स. १७१९ मधे दिल्ली येथून मोगल कैदेतून मुक्त करून सातारा येथे आणले. अशा या बिरूबाई भोसले यांच्याकडे छ. शाहू महाराजांच्या दरूणी महालाची ( जनानखाना) व्यवस्था होती. सर्व तिच्या आज्ञेत वागत. फत्तेसिंह भोसले यांच्यावर तर तिचे पुत्रवत प्रेम होते. दरूणी महालात खोजा म्हणून असलेला वाणी जातीचा बसवंतराव कासुरडे व बिरूबाई एकाच जातीचे असल्याने त्यांना एकमेकांप्रती विशेष अभिमान होता.  बिरूबाई भोसले यांनी लिंब येथे बांधलेल्या विहिरीच्या शेजारीच बसवंतराव कासुरडे याने एक टोलेजंग वाडा बांधला होता, मात्र आजमितीस तो अस्तित्वात नाही. बिरूबाई भोसले यांनी परळी ( सज्जनगड) येथे समर्थ रामदास स्वामींच्या समाधीसमोर आपल्या नावाने भव्य तुळशीवृंदावन व शंभू महादेवासमोर दगडी दीपमाळ स्वखर्चातून बांधल्याची नोंद आढळून येते. लिंब येथील बारा मोटेच्या विहीरीच्या परिसरात सुमारे  ३०० आंब्याची बाग लावली होती. या बागेला बारमाही पाणी मिळावे म्हणून इ. स. १७१९ - १७४० च्या दरम्यानच्या कालखंडात ही विहीर तयार करण्यात आली असावी. अष्टाकोनी साठ फूट व्यासाच्या विहिरीस पाणी उपसा करण्यासाठी बारा मोट असल्यामुळे, या विहीरीला "बारा मोटेची विहीर" म्हणून संबोधण्यात येते. हिची खोली १०० फूट व व्यास ६० फूट असून संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे.  आजही ती सुस्थितीत आहे. बारा महिने या विहिरीला पाणी असते. विहिरीचे बांधकाम कोरीव दगडात आहे. विहिरीचा आकार अष्टकोणी असून एखाद्या शिवलिंगा सारखा भासतो.  विहिरीचे दोन भाग आहेत अष्टकोनी आकाराची मुख्य विहीर आणि तिला जोडणारी उप विहिर चौकोनी  आकाराची आहे. 
    सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर लिंब हे गाव आहे. हे गाव सध्या 
             संग्रही असलेला ड्रोन द्वारे घेतलेला विहिरीचा फोटो. मुख्य विहिरीचा अष्टकोणी आकार तर उप विहिरीचा चौकोनी आकार                      
           विहिरीत उतरण्यासाठी दगडी फरसबंदी पायऱ्या आहेत तर आत उतरण्या अगोदर विहीरीच्या आकारमानाकडे पाहिल्यास भगवान शंकराच्या पिंडीच्या आकाराची ही विहीर असल्याचे सहजच लक्षात येते. काही पायऱ्या उतरुन गेल्यावर चौकोनी आकाराच्या तटबंदीत आल्याचे जाणवते. शेवटच्या पायरीपासून दगडी साकव लागतो. साकवाच्या दोन्हीही बाजूला रूंद दगडी बांधकामातील आयताकृती भलेमोठे हौद असावे असा देखावा दिसतो, तर त्या हौदात उतरणा-या लहान पायऱ्या आपले लक्ष वेधून घेतात. आपण ज्या दगडी साकवावर उभे असतो त्याच्या खाली कमानीचा भाग दोन्ही हौदांना जोडणारा पाहून तत्कालीन स्थपत्तीच्या (बांधकाम अभियंता) ज्ञानाचा आवाका किती असेल याचा अंदाज येतो. याच कमानीवर वीरूबाईंनी ही विहीर बांधली असल्याचा शिलालेख कोरलेला आहे.  शेवटच्या पायरी वरुन सपाट दगडी फरसबंदीवर पाय ठेवल्या बरोबर समोर दिसणारे दृश्य अचंबित करणारे आहे. मुख्य विहिरीला जोडणारा दगडी कमानी भाग, तर त्याच्यावर दगडी खांबाचा नक्षीदार सज्जा
    मुख्यविहिरीत उतरण्यासाठी दोन्ही बाजूला जिने आहेत ते एका महाल वजा हॉलमध्ये निघतात. येथे खांबावर गणेश , मारुती , अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पे कोरलेली आहेत. 
विविध पक्षी, चित्रे ही दगडी भिंतीतून बाहेर डोकावताना पाहून आपल्या पूर्वजांच्या कलासक्त जीवनशैलीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. कमानीच्या दोन्ही बाजूची गजशिल्प वैभवशाली अभिरुचीची साक्ष देते. पुढे चालत गेल्यावर कमानीतून विहिरीचे पाणी पाहून आनंद वाटतो, तर कमानीच्या भिंतीच्या दोन्ही बाजूला लहान दगडी दादर असून त्याद्वारे आपण नक्षीदार दगडी खांबावर आधारलेल्या आयताकृती महालात प्रवेश करतो. भर उन्हाळ्यात देखील येथील वातावरण शितल असते. आता एका सज्जातून विहिरीतील पाणी दिसते, तर दुसऱ्या सज्जातून पायऱ्या उतरुण आलेली कमान व ती चौकोनी  दगडी भिंतीतील साकव दिसतो. विहिरीतील एकच पाणी मात्र खालच्या कमानी, दगडी महल व मोटेच्या ठिकाणाहून वेगवेगळे भासते.
  आता दगडी महलातील सौंदर्य पाहिल्यावर पूर्वेस एक दगडी दादर आहे, त्यातून वर आल्यावर आपण विहिरीच्या भूपृष्ठावर असतो. विहीर बांधकामात वरच्या अंतर्गत भागात चार दिशेला चार शिल्प दिसून येतात. गजावर आरुढ झालेला शरभ आहे. हे शिल्प शक्तीवर विजय मिळविल्याचे बुद्धी चापल्य दर्शविते.

वीरुबाईसाहेबांचा शिलालेखमोटेखालती असलेले शरभ
पेशव्यांच्या, शाहुंच्या अनेक खासगी बैठकी, निवांत क्षण यांना साक्ष असलेली ही विहीर प्रसिद्ध झाली, ती तिच्या भिंतीवर कोरलेल्या व्याल आणि शलभ शिल्पांमुळे! व्याल म्हणजे वाघाचे तोंड आणि सिंहाचं शरीर. ही शिल्पं राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक ठरतात. विहीरीच्या दक्षिण दिशेला ४ हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प दक्षिणेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रदर्शित करते आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्पं पुढच्या उत्तरेकडील मोहिमेचा संकेत देतात. अष्टकोनी विहीरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहीरीतील खासे बैठकीत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभ चिन्हं चितारली आहेत. घुमटाकार चौकटींना पडदे अडकवण्यासाठीच्या  खुंट्या पण आहेत. महाराजांची गोपनीय खलबतं करण्याची ही जागा असावी असा समज आहे. विहिरीच्या वरच्या बाजूस पत्थरात  घडवलेले आसन आहे  ज्याच्यावर बसून शाहूमहाराज रयतेशी  हितगुज करत. हे कातळ  पत्थरातील  शिल्प पाहून, शिवकालीन आपली स्थापत्यकला किती प्रगत होती याचा अभिमान वाटतो.विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे.     
या विहिरीचे संपूर्ण बांधकाम चुण्यामध्ये केले असल्याने ते इतक्या वर्षानंतरही भक्कम आहे. हिच्या निर्मितीसाठी चांगल्या प्रतीचा दगड वापरण्यात आला आहे. यासाठी डोंगरातून खाण लावून दगड घडविले असतील. दगडी खाणीपासून विहिरस्थळापर्यत अवजड घडीव दगड आणण्याचे कठीण काम करावे लागले असेल. मनात प्रश्न येतो की, कशी केली असेल दगडांची वाहतूक ? मला ही हा प्रश्न पडला. मग मी विचार करु लागलो आणि काहीतरी शोधू लागलो. तर विहिरीच्या पायऱ्या उतरण्यासाठी सुरवात करतो, तेथे उजव्या हाताला काही अंतरावर दोन दगडी चाके असल्याचे दिसून आले. प्रश्ना शेजारीच उत्तर ! गाडबगाडेच्या गाड्यास देखील असेच दगडी चाक असते. बैठ्या लाकडी बैलगाड्यास दगड वाहतूक करण्यासाठी अशी भक्कम दगडी चाके पूर्वी वापरात होती. अशा या कर्तबगार रक्षा बिरूबाई भोसले यांचे सातारा दरबारी कामकाजात विशेष महत्त्व असल्याचे काही प्रसंगात दिसून येत होते, कारण पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर दुसरे पेशवे म्हणून त्यांचेच पुत्र बाजीराव बाळाजी यांना छ. शाहू महाराजांनी पेशवाईचे वस्त्रे दिल्यावर, रक्षा बिरूबाईने पेशवा बाजीराव पंडित यांस ११० रुपये किंमची व चिमाजी अप्पा पंडित यांस १०० रुपयेची वस्त्रे भेट म्हणून दिली होती. अशी ही कर्तबगार रक्षा बिरूबाई भोसले २४ डिसेंबर १७४० रोजी निधन पावली आणि त्याचवर्षी म्हणजे इ. स. १७४० मधे पेशवे बाजीराव व त्यांचे बंधू चिमाजी अप्पा देखील परलोकवासी झाले. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव मंदिराच्या ओव-यात वीरूबाईंचा मानसपुत्र फत्तेसिंह भोसले यांनी त्यांच्या स्मरणार्थ शिवलिंग स्थापन केल्याचा उल्लेख ' श्रीमंत महाराज भोसले बखर' मधे येतो. 
लिंब हे गाव बारा मोटेच्या विहिरीमुळे इतिहासात प्रसिद्ध असले तरी काही कटू आठवणी देखील आहेत. इंग्रज राजवटीच्या सुरूवातीच्या काळात सातारा गादीवर छत्रपति प्रतापसिंह महाराज होते. इंग्रज प्रतिनिधी म्हणून सातारच्या दरबारात ग्रॅड डफ हा अधिकारी होता. इंग्रज सरकारला छत्रपतींची अडचण होत होती, म्हणून काहीतरी खोटे आरोप करुन ४ सप्टेंबर १८३९ ला मध्यरात्रीस सातारच्या छत्रपतींना मुंबई इलाख्याचे गव्हर्नर कारन्याक याच्या हुकूमाने व क्रिस्टाल याच्या मार्गदर्शनाखाली ओवान्स या अधिकाऱ्याने अर्ध्या रात्री छत्रपतींना अटक केली. छत्रपतींना सातार जवळच्या लिंब येथील एका पाटलाच्या गाई गुरांच्या गोठ्यात ठेवले. इंग्रजी कैदेत छत्रपति ९३ दिवस या लिंब गावी गोठ्यात मुक्कामाला होते. ज्या इंग्रजांच्या प्रतिनिधीने  छ. शिवाजी महाराजांना कमरेत वाकून मुजरा करुन नजराना भेट केला, त्यांच्याच वंशाजांच्या हातांनी स्वराज्याच्या छत्रपतींना अटक करून लिंब येथे ठेवले. बारा मोटेची विहीर आठवताना, न कळतच आमच्या स्वराज्याच्या अपमान करणाऱ्या कपटी, धूर्त इंग्रजांची काळी कृत्य मनाला वेदना देतात.
    विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.
पुण्यापासून NH4(पुणे-सातारा-बेंगलोर) हायवे वरुण  साधारण १००किमी अंतरावर डावीकडे 'लिंब फाटा' लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून 3 किमी पुढे आहे ).हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.
अलिकडे सोशल मेडीयाच्या कृपेने हि विहीर प्रसिध्द झालेली असली तरी लिंब गावात असलेला कृष्णा नदीवरचा घाट आणि पेशवेकालीन मंदिरे आवर्जून पहाण्यासारखी आहेत.   लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे, ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत. गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम, अगस्त्य, परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात. रामेश्वर, कोटेश्वर, भार्गवरामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्य शैली पाहण्यासारखी आहे. साहित्यिकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्श आणि कवी कल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे.शिवाय लिंब गावात पेरुच्या बागा आहेत.पेरुच्या मोसमात गेल्यास आवर्जून पेरु खावेत.
 देखभाल                                                       
            रवी वर्णेकर हे गृहस्थ आपल्या कुटुंब-कबिल्या सह आज या विहिरिची देखभाल करतात.इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे  म्हणजे महाराष्ट्राचे मर्दानी दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आणखी दुसरं काय.एकदा तरी या इतिहासाच्या साक्षीदाराला नक्कीच भेट दया.
माहिती साभार - रवी वर्णेकर ,राहुल धर्माजी बुलबुले आणि  रोहित पवार.

13 ) राजपुरी लेणी :-

   पाचगणी या गिरिस्थानाच्या सभोवार विखुरलेली पांडवकालीन, शिवकालीन स्थळे पर्यटकांना खुणावतात. राजपुरीच्या लेण्या ( ज्याला स्थानिक पांडवकालीन गुहा म्हणतात ) या परिसराचा इतिहास सांगतात. कार्तिकस्वामीच्या गुहा म्हणून या प्रसिद्ध आहेत. या पुरातन शैव गुंफा आहेत. येथे एकूण सात गुंफा आहेत. त्यापैकी चार पूर्ण व तीन अर्धवट आहेत. तेथे पाण्याची कुंडे आहेत. प्रत्येक गुंफेतून झोपून दुसऱ्या गुंफेत जाता येईल अशी व्यवस्था आहे. गुंफांमध्ये काही भित्तिशिल्पे पूजेसाठी ठेवलेली दिसतात. पावसाळ्यात पाझरून येणारे पाणी गुंफेच्या तोंडावर पडत असते.  स्थानिक ग्रामपंचायतीने एकदम व्यवस्थित बांधकाम केलेल्या दगडी पायऱ्या आपल्याला लेण्याकडे घेउन जातात.
    वरून पडणाऱ्या पाण्यामुळे व टपकत असलेल्या पहाडी झऱ्यामुळे सर्व जागा एकदम निसरडी झालेली आहे. तुम्ही एक ५०-६० पायऱ्या उतरलात की तुम्हाला समोर अप्रतिम सृष्टी-सौंदर्य नजरेस पडते ते खाली दरी कडे पाहताना. ह्या गुंफाबद्दल माहिती देणारा एखादा ही फलक तेथे नाही आहे ना गावातील लोकांना ह्या बद्दल काही माहिती. कुठल्याश्यातरी साधूने ह्यावर कब्जा करून ठेवला होता ते निर्वाण प्राप्त झाले आता तेथे गावातील एक पुजारी सोडला तर कोणी येत जात नाही. खाली उतरल्यावर उजवीकडे गुंफा आहेत ऐकून सात गुंफा आहेत चार पूर्णं गुंफा तीन अर्धवट पूर्णं. तेथे तीन पाण्याचे कुंड आहेत, गुंफा मानव निर्मित आहेत व पुरातन आहेत ह्या बद्दल काही शंकाच नाही. प्रत्येक गुफेतून दुसऱ्या गुंफेत झोपून प्रवेश करता येईल अशी निमुळता खंदक वजा रस्ता आहे. शेवटची जी गुंफा आहे ती सर्वात मोठी असून त्यात पाण्याचे दोन कुंड आहेत तसेच गोमुख व विष्णू मंदिर देखील आहे. हे मंदिर इत्यादी आताच म्हणजे मागील शतकामध्ये अस्तित्वात आले असावे. पाण्याचे झरे, पुरातन काळातील मंदिराच्या स्तंभाचे, गोपुरांचे अवशेष इकडे तिकडे अस्तावस्त पडलेले आहेत. गुंफामध्ये काही भिंती शिल्पे पुजेसाठी ठेवलेली आहेत, त्याना निरखून पाहताना लक्ष्यात येते की ते भिंती शिल्पे खूप जूनी असून व्यवस्थित निगा न राखल्या गेल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुंफाच्या बाहेर एका छोट्या पुरातन मंडपामध्ये नंदी ची तीन फुट उंच मुर्ती आहे, गुंफामधील भींती शिल्पे व बाहेर असलेली भींती शिल्पे, नंदीची मुर्ती ह्या एकाच प्रकारच्या खडकातून निर्माण केलेले आहेत. बाकीच्या लेण्यात लक्षवेधी काही नसले तरी शैलगॄहात दहाव्या किंवा अकराव्या शतकातील सोमनाथदेवाचा मराठी देवनागरी लिपीतील शिलालेख आहे.हा शिलालेख प्रजापती सवंत्सरातील असला तरी संवत्सर व शक याचा उल्लेख नाही.त्यात राजवंशाचाही उल्लेख नाही.या शिलालेखात श्रीपतीनायक्,ददनायक ( श्रीपतीनायकाचा पिता ) विनायक आणि इदोप्य नामक व्यक्तिनामांचा आणि वणगृह ( राजपुरी गावाच्या उत्तरेला असलेल्या चार्,पाच कि.मी.वरच्या वणघर गावाचा ) व बावधन ( वाईच्या दक्षिणेला पाच कि.मी. असलेल्या गावाचा ) या गावांच्या नावाचा उल्लेख आहे.लेखात राजपुरी येथील सोमनाथच्या देवळाचा इतिहासही आलेला आहे.या दैवताचा प्रथम अवतार जलसंपात ( किंवा जलसंपत्ती ) देवाने जेव्हा सोमभुविनीस ( सोमनाथ ) उपदेश केला तेव्हा झाला होता. पुढे सोमनाथास श्रीपती नायकाच्या वंशातील कोणा विनायकाने उंच नेले व त्याच्याच वंशातील कोण्या इदोप्य नामक व्यक्तीने सोमनाथाचे देउळ बांधले.सध्या मात्र राजपुरीच्या लेणीपेक्षा इथे असलेली कार्तिकस्वामीची मुर्ती हे भाविकांचे खरे आकर्षण आहे.कार्तिक पौर्णिमेला इथे भाविकांची थोडीफार गर्दी होते.एरवी इथे कोणी फार फिरकत नाहीत.मात्र हि मुर्ती बरीच अलिकडची असावी.
    गुंफा पांडवकालीन असाव्यात असा एक कयास असे मानतात.अर्थातच त्यात तथ्य नाही.इथे विष्णु मुर्ती व इतर कातळकोरीव शिल्प दिसतात.तिन्ही कुंडातील पाणी एकदम स्वच्छ आहे व पिण्यात अतीशय मधूर. वरील डोंगरातून पाझरत पाझरत आलेले पाणी देखील गुंफाच्या समोर पडत असते व गुंफाच्या समोर एक नैसर्गिंक पाण्याचा अस्पष्टसा पडदा निर्माण होतो हे दृष्य पाहण्या योग्य आहे. समोर दरी मध्ये प्रचंड झाडी आहे व पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहवयास मिळतात जाण्यासाठी हा डिसेंबर-जानेवारी महिना योग्य आहे . अंतर – पाचगणीपासून ६.७ किलोमीटर अंतरावर.
कसे जाल, कोठे राहाल महाबळेश्वर, पाचगणीला?
महाबळेश्वर व पाचगणीला मुंबईहून महाड, पोलादपूरमार्गे, तसेच पुण्याहून वाईमार्गे जाता येते. तसेच कोल्हापूरकडून सातारा, मेढामार्गे जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन सातारा व वाठार - ६० किलोमीटर. जवळचा विमानतळ पुणे - १३० किलोमीटर. जास्त पावसाचा जुलै महिना सोडून येथे जाता येते. दोन्ही ठिकाणी राहण्यासाठी मध्यम आणि उत्तम दर्जाची हॉटेल्स आहेत.
 सातारकर छत्रपतींच्या वास्तव्यामुळे सातारा शहर आणि परिसराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यासंदर्भातील अनेक ऐतिहासिक स्थळे सातारा आणि परिसरामध्ये विखुरलेली दिसतात. सातारा परिसराचे वैशिष्टय़ म्हणजे पश्चिमेचा प्रदेश हा सह्य़ाद्रीच्या निकट सान्निध्याचा, भरपूर पावसाचा आणि याच सातारा जिल्ह्य़ाच्या पूर्वेचा प्रदेश पर्जन्यछायेमधला, दुष्काळी. कृष्णा, कोयना अशा नद्यांचा हा प्रदेश, पण या नद्यांपासून अंतर असलेल्या प्रदेशात आजही पाण्यासाठीची वणवण चालूच आहे. महाबळेश्वरसारखे उत्तुंग गिरिशिखर लाभलेला हा प्रदेश. शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा प्रदेश. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला हा प्रदेश. वाई, मेणवली, धोम ही तीर्थक्षेत्रे याच प्रदेशात आहेत, तसेच निरनिराळी मंदिरे, देवस्थाने, किल्ले यांनीसुद्धा हा प्रदेश संपन्न आहे. सध्याच्या विकासाच्या युगात पवनचक्क्यांचा प्रदेश अशीसुद्धा आता ओळख सांगता येईल इतक्या पवनचक्क्या सातारा आणि आसपासच्या डोंगरांवर दिमाखात फिरताना दिसतात. कोकणात जाणारे अनेक प्राचीन घाटमार्ग सातारा परिसरातून खाली उतरतात. प्रतापगड, अजिंक्यतारा, वासोटा, मकरंदगडसारखे बेलाग किल्लेसुद्धा याच प्रदेशात पाहायला मिळतात.
 
 13 )माहुली

  महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. सातारा शहराच्या पूर्वेला साधारण पाच कि.मी.   :अंतरावरून कृष्णा नदी वहाते. संगमाच्या पूर्वेकडील वस्तीला ‘क्षेत्र माहुली’ आणि पश्चिमेकडील वस्तीला ‘संगम माहुली’ अशी नावे आहेत.या ठिकाणाला आपण तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली या नावाने ओळखतो .खरतर प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये माहुली या नावाचा एक हळवा कोपरा दडलेला आहे. कारण माहुली सारख नितांत सुंदर ठिकाण चालू घडीला मृत्यूपश्चात होणार्या संस्कारासाठीच जास्त ओळखले जाते. कृष्णेनदीचा उगम महाबळेश्वरच्या पर्वत रांगात होतो ,तर तीन राज्ये सुजलाम सुफलाम करीत ती आंध्रप्रदेशात बंगालच्या उपासागरास जाऊन मिळते .या साधारण आठशे मैलाच्या प्रवासात तीचा काही छोट्या मोठ्या नद्या बरोबर संगम होतो.त्या त्या ठिकाणी मोठी तिर्थक्षेत्रे आहेत. त्यातील प्रमूख ठिकाण म्हणजे सातार्यातील कृष्णा-वेण्णा संगम .अगदी प्राचीन काळापासून हे ठिकाण सुप्रसिध्द असावे कारण वाल्मिकी रामायणातही या ठिकाणचा उल्लेख आहे . क्षेत्रमाहुलीचा इतिहासही असाच मनाला भिडणारा आहे.याचा संदर्भ थेट रामायणाशी गाठ घालून देतो. रामायणात युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडतो. त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी आणण्याकरिता हिमालयाकडे रवाना होतो. नेमकी संजीवनी  ओळखता न आल्याने अख्खा द्रोणगिरी पर्वत उचलून लंकेकडे प्रयाण करतो. लंकेकडे जाताना वाटेत द्रोणगिरीचा छोटा भाग सातारा येथे पडतो यालाच जरंडेश्वरचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आणि कृष्णा व वेण्णा नद्यांच्या संगमाने पवित्र झालेलं हे गाव  श्री क्षेत्र माहुली म्हणून प्रसिद्ध आहे. संगमाच्या एका काठाला विश्वेश्वर मंदिर हे संगम माहुली म्हणून ओळखले जातं. दुसऱ्या काठाला रामेश्वर मंदिर हे क्षेत्रमाहुली म्हणून प्रसिद्ध आहे.

   क्षेत्र माहुलीवर शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत आदिलशाहीचा अंमल होता त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली ती गेली. छ. राजारामाने क्षेत्र माहुली प्रभुणे कुटुंबियांना अग्रहार म्हणून दिली. छत्रपती शाहूंच्या वेळी (कार. १७०७–४९) व उत्तर पेशवाईत त्याचे महत्त्व वाढले. छ. शांहूनी ग्रहणादिनी श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांस संगम माहुलीचे दान केले (१७२०). पंतप्रतिनिधी, मामा पेठे, ज्योतिपंत भागवत, परशुराम अनगळ, कृष्णा दीक्षित व राजघराण्यातील राण्या यांनी तेथे सु. दहा मंदिरे, मुख्यतः अठराव्या शतकात बांधली. त्यांपैकी विश्वेश्वर महादेव, बिल्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर, कृष्णेश्वर महादेव, कृष्णाबाई इ. प्रसिद्ध असून विश्वेश्वर महादेव हे मंदिर सर्वांत मोठे आहे. ही मंदिरे मराठा वास्तुशैलीतील असून चुनेगच्ची सभास्तंभ, शिखर आणि कोनाड्यांतून मूर्तिकाम आढळते. क्वचित काही ठिकाणी भित्तीचित्रे आहेत. त्यांतील लक्ष्मीचे चित्र सुरेख आहे. चुनेगच्चीतील मूर्तीत प्रामुख्याने दशावतार, शंकरपार्वती आणि शैव परिवारातील देव-देवता, प्राणी इ. आढळतात. बहुतेक मंदिरे नदीकाठावर असून येथील दोन दीपमाळा रेखीव व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंनी बांधीव घाट व पायऱ्या आहेत. छ. शाहू पेशवे, पंतप्रतिनिधी, पंतसचिव हे स्नानासाठी प्रसंगोपात्त या स्थळास भेटी देत. उत्तर पेशवाईतील इतिहासप्रसिद्ध रामशास्त्री प्रभुणे या न्यायाधीशाची माहुली ही जन्मभूमी. निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्यांनी येथेच व्यतीत केले. त्यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीने एक इमारत बांधली असून रामशास्त्रीच्या वारसांनी त्यांच्या नावे सामाजिक न्यायासाठी एक पुरस्कार १९८४ पासून सुरू केला आहे. दुसरा बाजीराव व जॉन मॅल्कम यांची भेट व बोलणी तिसऱ्या निर्णायक इंग्रज-मराठे युद्धापूर्वी (खडकीचे युद्ध) येथेच झाली. माहुलीला शेवटच्या श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. कन्यागतात येथे अनेक लोक संगमावर स्नानांसाठी जमतात. छत्रपती घराण्यातील छ.शाहू त्यांची राणी सकवरबाई, कुत्रा खंड्या यांच्या येथे समाध्या आहेत.
      छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. त्याशिवाय, प्रतिनिधी घराण्याने अठराव्या शतकात तेथे एकूण दहा मंदिरे बांधली. ती सर्व नदीच्या काठावर आहेत. त्यातील विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर, कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर आहे. ते मंदिर सातारा गॅझेटिअरनुसार १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम दगडी आहे. नदीच्या बाजूने प्रवेश असलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. तारकाकृती असणाऱ्या त्या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. गर्भगृहातील शिवपिंडीवर पितळेचे आवरण आहे. गर्भगृहाच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे.
     अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ व दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप तिन्ही बाजूंनी मोकळा आहे. देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे. मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. शिखराला अनेक देवकोष्टके आहेत. मंदिरासमोर नंदीमंडप आहे, त्यावर अष्टकोनी शिखर आहे.
    मंदिराच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला ओवऱ्या आहेत. त्याचा उपयोग यात्रेकरूंना राहण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी होतो. कृष्णा-वेण्णा उत्सव दरवर्षी माघ महिन्यात होत असतो. ते मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे.
    मंदिराच्यासमोर कृष्णा नदीच्या काठावर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या समाधी आहेत. त्या समाधी पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यावर पाण्याखाली जातात. (या समाधी नक्की कोणाच्या याबद्दल दुमत आहे)
     नदीच्या पूर्व तीरावर तिथक्षेञ दक्षिण काशी क्षेत्र माहूली आहे तर पश्चिमेचा काठ संगम माहूली या नावाने ओळखला जातो . छ ऱाजाराम महाराजांच्या काळात कोथा प्रभूणे यांनी क्षेत्र माहुली हे गाव वसवीले अशी एक नोंद गॅझेटीअर मध्ये आहे. असे असले तरी त्याहूनही प्राचीन वसाहतीचे पुरावे या गावात आहेत . संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली. शाहू महाराज काही धार्मीक विधी करण्यासाठी माहुलीस आले असता त्यांना ब्राम्हण उपलब्ध झाला नाही .मग ते विधी त्यांच्या बरोबर आलेले श्रीपतराव पंतप्रतीनीधीनी केले .त्याबद्द्ल शाहू महाराजांनी त्यांना एक चाहुर म्हणजे जवळ पास शंभर एकर इतकी जमीन दान दिली .पंतप्रतीनीधींनी देखिल या संधीचे सोन केल .कृष्णा-वेण्णेच्या पश्चिम काठावर गाव वसवून संस्कृत वेद अध्ययनास प्रोत्साहन दिले ,नदीच्या काठावर अतिशय देखणे घाट, मंदिरे बांधली .
   माहूलीच्या दोन्ही काठावर मिळून दहा-बारा मंदिरे आहेत .यातील संगम माहुली गावात आत शिरताना कमानीतून उजव्या बाजूस जे मंदिर व घाट दिसतो ते सगुणेश्वराचे मंदिर .१८६५ च्या सुमारास सातारच्या राजघराण्यातील छ. शहाजीराजे यांच्या पत्नी सगुणाबाई ऊर्फ़ आईसाहेब यांनी हा घाट व मंदिर बांधले. १५० वर्षे नंतरही इथला घाट , ओवर्या आजही खुप चांगल्या स्थितीत आहे .
    मराठा स्थापत्य शैलीत संपूर्ण दगडात बांधलेले मंदिर त्यापूढचा लाकडी मंडप सातारच्या राजघराण्याच्या उत्तम देखरेखीत असल्याने खुप चांगल्या स्थितीत पहावयास मिळतो .या मंदिरापासून थोड पुढे गेल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूस काही जिर्ण समाध्या पहायला मिळतात .त्यावरील कोरीवकामातील राजचिन्हे या समाध्या राजघराण्यातील व्यक्तींच्या असाव्यात याची साक्ष देतात .यांच्या समोरच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक श्वानाचे शिल्प बसवलेली चौथरा दिसते .उपलब्ध माहिती नुसार ही छ.शाहूमहाराजांचा “खंडया” नावाचा एक श्वान होता त्यांची समाधी आहे .याच खंड्याने वाघापासून छ. शाहू महाराजांचे प्राण वाचवले असा इतिहास आहे .
    नदीकडे जाणार्या याच रस्त्यावर अतिशय प्रशस्त अशी राजचिन्हांकीत समाधी आहे .ही समाधी छ. शहाजी ऊर्फ आप्पासाहेब महाराजांची आहे . या समाधीच्या बाजूला रथखाना आहे . कृष्णा वेण्णामाईच्या यात्रेच्या वेळी हाच रथ वापरला जातो .या रथोत्सवासही सुमारे ३०० वर्षाची परंपरा आहे .याच परीसरात सन १७३० ते १७९० या काळात बांधलेली भैरवनाथ मंदिर,कृष्णाबाई मंदिर, कृष्णेश्वर मंदिर अशी लहान मोठी मंदीरे आहे.

 

इथूनच पुढे गेल्यास अतिशय सुंदर अशी दिपमाळ दृष्टिस पडते .या दिपमाळीकडे चालत गेल्यास आपण पोहोचतो श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात . माहूलीतील हे एकमेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे.अतिशय देखणे असे हे मंदिर १७३४ साली श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी बांधले .मंदिर हेमांडपंथी स्थापत्य शैलीतले आहे. या मंदिराची  संरक्षक भिंत सात कोणी आहे. सर्वसाधारण बांधकामात ती अष्टकोणी , षटकोणी  आकाराची असते . मुख्य मंदिराच्या समोरच शंकराचे वाहन नंदी चे दगडात कोरलेले सुंदर शिल्प आहे. मंदिराच्या सभागृहात एक मोठी पितळी घंटा बांधली आहे. देव कोष्टकात गणेश आणि महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे.  गाभाऱ्यातील दगडी शिवलिंगावर पितळी आवरण चढवलेले आहे. मंदिरासमोरच भव्य दीपमाळा आहे जी अखंड दगडातून बनवलेली आहे. महाशिवरात्र, दिवाळी यावेळी इथे दीपोत्सव असतो.  मंदिराचे शिखर वीट  बांधकामात बनवलेल आहे . ऊन वारा पाऊस यांना तोंड देत आजही ते सुस्थितीत असलं तरी त्याला संवर्धनाची गरज आहे. त्यावर वाढलेल्या वड, पिंपळ सारख्या झाडांची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. मंदिराच्या प्रांगणात, येणाऱ्या भाविकांसाठी किंवा वाटसरू साठी ओवऱ्या आहेत. एकूणच मंदिराचा थाट रुबाबदार आहे.
     मंदिराचा आवार साधारण पंचकोनी असून मंदिराच्या पश्चिमोत्तर बाजूस ओवर्या आहेत तर लागूनच पूर्व बाजूला अष्टकोनी नगारखान्याची वास्तू आहे . मुख्यमंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केले असून शिखर चूनेगच्ची बांधकामाने सजवले आहे .मंदिराच्या गर्भगृहाचे बाह्यांग तारकाकृती असून मंदिराचा मुखमंडप ,स्तंभ रचना पाहीली असता 12-13 व्या शतकातील यादव कालीन मंदिराची आठवण होते .मंदिराच्या समोर स्वतंत्र नंदी मंडप आहे .यातील नंदी सुध्दा अतीशय सुबक आहे. नंदी मंडपाच्या पुढे काही अंतरावर नदीकडे उतरत जाणाऱ्या पायऱ्या व त्या पुढे वाळू खाली दडलेला घाट आहे . या घाटास राजघाट असे म्हणतात .या घाटाला लागूनच उजव्या बाजूस नदीपात्रात दोन शिवलींग स्थापन केलेली एक समाधी दिसते.ही समाधी आहे शाहू नगर म्हणजे आपला सातार्याच्या निर्माते छ. संभाजी महाराजांचे पुत्र छ. शाहू महाराजांची . या समाधीची जागा नदीपात्रात असल्याने वेळोवेळी डागडूजी करुनही तीचा फारसा उपयोग़ होत नाही ._Sangam_Mahuli_1.png
    इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे यांच्या मते याच परीसरात छ. संभाजी महाराजांच्या पत्नी छञपती महाराणी येसूबाई साहेब यांची समाधी होती .परंतू खुप प्रयत्न करूनही तीचा ठावठीकाणा लागला नाही .याच वाळवंटात राजघराण्यातील आणखी काही समाध्या आहेत .पावसाळ्यात नदीला येणार्या पूरा मूळे बर्याचदा या समाध्या वाळू खाली लुप्त होतात .२००५ च्या सुमारास सातारच्या जिज्ञासा मंच या संस्थेने राजघराण्यातील जेष्ठ व्यक्ती माजी नगराध्यक्ष छ. शिवाजीराजे भोसलेस यांच्या सहकार्याने व माजी संग्रहालय अभिरक्षक प.ना.पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच लूप्त झालेल्या छञपती महाराणी ताराराणी व रामराजे यांच्या समाध्याचा शोध घेतला होता. श्री आमुतेश्वर मंदिर हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. श्री हरिनारायण मंदिर,श्री व्यंकटेश मंदिर,श्री राम मंदिर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,श्री परशुराम मंदिर  अशी अनेक जागृत मंदिरे संगम माहुली आहेत.


   वरती सांगितल्या प्रमाणे नदीच्या पलीकडे पूर्व काठावरील गावास क्षेत्र माहुली असे म्हणतात ऩदीला पाणी कामी असल्यास त्याबाजूला नदी ओलांडून जाऊ शकतो पण पाणी जास्त असल्यास बाहेरून सातारा कोरेगाव रस्त्याने ब्रिटीश कालीन पूल ओलांडूनच जावे लागते .हेसुद्धा घडीव दगडांनी बांधलेले सुंदर मंदिर आहे.   मंदिराचे नाव रामेश्वर असलं तरी मुख्य मंदिर महादेवाच आहे.मंदिराच्या समोरच महादेवाचे वाहन नंदी आहे पण या नंदीची मान गर्भगृहकडे  नसून थोडी बाजूला वळलेली आहे. याच्या पाठीमागे पण एक आख्यायिका आहे. या नंदीची  शिंगे सोन्याची होती . एक दिवस ती चोरांनी पळवली. लोकांनी बराच शोध घेतला तरी चोर सापडले नाहीत.  तेव्हा नंदीने चोर कोणत्या दिशेला गेलेत  ते आपली मान वळवून दाखवले.   मंदिरा पाठीमागे राम- सीता- लक्ष्मण यांच्या सुंदर आखीव रेखीव मूर्ती आहेत . दोन दीपमाळा आहेत त्यातील एक सुस्थितीत आहे. दीप ठेवण्याची जागा सुद्धा चोचीत माळ धरलेल्या पक्षाचं शिल्प   कोरून अलंकृत केली आहे.

    इथे पूर्व काठावर जो प्रशस्त घाट दिसतो तो पेशवेकालीन सावकार अनगळांचा घाट म्हणून प्रसिध्द आहे .हा घाट व त्यावरील रामेश्वराचे मंदीर परशुराम नारायण अनगळ यांनी सन १७०८ मध्ये बांधले . हे मंदिर छोटेखानी असले तरी अतिशय सूबक आणि मजबूत बांधणीचे आहे . मंदीराच्या समोर दोन्ही बाजूस दोन दिपमाळा होत्या सध्याला त्यातील एकच शिल्लक आहे .इथला नंदीमंडपही स्वतंत्र असून आतील नंदी अतिशय देखणा आहे. ऩंदीच्या अंगावरील साज ,घूंगूरमाळा अगदी खर्या वाटाव्यात इतक्या रेखिव आहेत .

    नंदीवरील शिल्पकारी पहाता इतका देखणा नंदी सातारा जिल्ह्यात दुसरा नसावा .मंदिराच्या मागील बाजूस पाच कमानींचा मठ असून आतमध्ये राम पंचायतनाच्या काळ्या पाषाणातील सुंदर मुर्ती आहेत .या मंदिराचे निर्माते सावकार अनगळ हे पेशवाईतील फार मोठे प्रस्त होते .त्यांना अचानक धनलाभ झाल्याने त्यांनी त्या पैशातून अनेक मंदीरे बांधली, जिर्णोध्दार केले अशी मान्यता आहे. अनगळाच्या घाटाशेजारीच नदीपात्रात पुढे पर्यंत आलेला एक अपूर्ण घाट दिसतो .हा घाट दुसरे बाजीराव पेशव्यानी बांधला अशी माहीती मिळते .त्या वेळच्या राजकीय धामधूमीत या घाटाचे बांधकाम पुर्ण होऊ शकले नसावे .या घाटाच्या उजव्या बाजुस  बिल्वेश्वराचे मंदिर आहे . हे मंदीर श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी १७४२ चा सुमारास म्हणजे पावणे तीनशे वर्षा पुर्वी बांधले अशी माहीती मिळते .

     इथून थोड्या अंतरावर नदीलगतच राधाशंकराचे अगदी छोटेखानी बांधणीचे मंदिर आहे .हे मंदिर भोरच्या सचिव घराण्यातील ताईसाहेबांनी १८२५ च्या सुमारास बांधले .याच्या समोरच कृष्णेच्या पश्चिम काठावर संगमेश्वराचे मंदिर आहे .याच्या समोरच कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम होतो. या मंदिराचा जिर्णोध्दार श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी १७४२ मध्ये केला अशी माहीती मिळते .या मंदीराची रचना माहुलीतील इतर मंदिरांच्या मानाने थोडी वेगळी आहे .विशेषत: नंदी मंडपाच्या पायास असलेला कुर्म पदाचा आकार व कळसाच्या आमलकास आधार देणारी शृंग हे या मंदीराचे वेगळेपण आहे .या मंदिराच्या शिवलींगावर दुर्मीळ अशी सुवर्ण शलाका असल्याने यास सुवर्णेश्वर असेही नाव आहे. या मंदीराच्या घाटाजवळच बनशापूरी नावाच्या एका साधूची व त्याच्या शिष्याची समाधी आहे .या समाध्या देखिल अतिशय प्रेक्षणीय आहेत .

 नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी श्री नरसिंहदेवला डाळ आणि पन्हे हा प्रसाद करतात।

श्री शिरकाईदेवी

निसर्गरम्य मनोहरी दृश्य

श्री नरसिंह आणी श्री दत्त या देवांचा निवास कृष्णातीरी असतो. श्री नरसिंहाची बहुसंख्य मंदिरे कृष्णातीरी आहेत. कृष्णा नदीमुळे अनेक लोकांचे जीवन सुजलाम सुफलाम झाले आहे. सजीवांना जीवन देणारी ही नदी महाराष्ट्रातून वाहत आंध्रप्रदेश पर्यंत पसरली आहे.

  न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या घराचे स्मारकात रुपांतर

     क्षेत्रमाहुलीने फक्त हा सुंदर ठेवाच आपल्याला दिलाय असं नसून माणसांच्या रूपातील रत्न सुद्धा या भूमीने दिलेत.

१) रामशास्त्री प्रभुणे -  पेशव्यांचे सरन्यायाधीश. आपल्या परखड न्यायासाठी प्रसिद्ध.  कोणतीही तमा न बाळगता आपल्या दोषी राजाला त्यांनी देहांताची शिक्षा ठोठावली  होती.  क्षेत्रमाहुली त्यांचं जन्म गाव येथे त्यांचा घराचं स्मारक केलेले आहे. अवश्य भेट द्यावी.

२) श्रीरंग जाधव - जागतिक कीर्तीचे मल्ल

३) कै. गोविंदरावजी आफळे - राष्ट्रीय कीर्तनकार

४)  डॉ. सदाशिव गजानन देव - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणित तज्ञ

   पुराण काथांनूसार सूर्यवंशातील राजा भगीरथाने आपल्या पुर्वजांच्या उध्दारासाठी घोर तप करुन गंगेला स्वर्गलोकातून पृथ्वीवर आणले . तिच्या पाण्याच्या स्पर्शाने पुर्वजाना मुक्ती दिली .भगीरथाच्या या पापक्षालन किंवा गंगावतरण या मिथकाचा जनमानसावर पगडा होता की गंगेच्या बरोबरीने जेवढ्या म्हणून नद्या होत्या त्यांचे काठ समाध्या ,स्मृती मंदिरे वा चिरेबंदी घाटाच्या कशिदाकारीने सजून गेले. आदिम काळी मानवी जीवनाचा पाया रचणारे नदी काठ त्याच्या वैराग्य वृत्तीची घाटांनी ,सांस्कृतीक संमृध्दीच्या मंदिरांनी अन कला वैभवाच्या शिखरांनी बहरून गेले .पण आज मितीला मात्र हे सांस्कृतीक वैभव निस्तेज होऊ लागलय. आपल्याच अनास्थेने, प्रदुषणाने हा कला वारसा बकाल होऊ लागलाय . पण जमेची बाजू अशी की इतर ठिकाणांच्या मानाने आपली माहुलीची परिस्थीती अजून तरी चांगलीच आहे आणि तीचे संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या मंदिरात व परिसरात अनेक चित्रपटांचे शुटिंग झाले आहे. गावाजवळून पुणे-मिरज लोहमार्ग गेल्यामुळे माहुली हे सातारा शहराचे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक बनले आहे.

 

14 )  वामन पंडीत समाधी भोगाव : -


वामन नरहरी शेष (वामन पंडित) (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले मराठी कवी होते.वामन पंडितांबद्दल खात्रीची माहिती मिळत नाही. कोणी वामन पाच आहेत असे समजतात. ठिकठिकाणच्या दोन भिन्न गोत्रांच्या उल्लेखामुळे कोणी वामन दोन होते असेही मानतात. वामन पंडित हे रामदासकालीन कवी होते. त्यांच्याविषयी थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे काव्य विविध आणि विपुल आहे. वामन पंडितांचा जन्म नांदेडचा समजला जातो. मूळ विजापूरचे रहिवासी. यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा त्यांनी विजापूर सोडले. उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ मध्ये लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे.
  वामन पंडित यांच्या नावावर निगमसार, समश्लोकी, यथार्थदीपिका, चित्सुधा, तत्त्वमाला, श्रुतीसार कर्मतत्त्व, राजयोग, गीतार्णव सुधा इत्यादी ग्रंथ, काही छोटी प्रकरणे असे लेखन आहे. वामन यांनी रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रासंवाद, कृष्णजन्म, बालक्रीडा, वनसुधा, वेणुसुधा, मृतिकाभक्षण, कंसवध, भामाविलास, राधाविलास, कात्यायनीवृत्त, गजेंद्रमोक्ष अशी आख्याने रचली आहेत. त्यांच्या आख्यानात नाट्यपूर्णता, रूपकात्मकता, आकर्षकता, कल्पकता, रचनेचा सफाईदारपणा, शब्दरेखाटन कौशल्य आढळते.
      वामन पंडित यांचा मराठी व संस्कृत या दोन्ही भाषांवर समान अधिकार होता. त्यांची श्लोकाबद्दल विशेष ख्याती आहे. ‘सुश्लोक वामनाचा’ अशी त्यांची प्रसिद्धी आहे. यमक, अनुप्रास, स्वभावोक्ती हे त्यांचे आवडते अलंकार होते. त्यांनी त्यांचा हव्यास अधिक केल्याने त्यांना ‘वामक्या-वामन’ असेही म्हणत. वामन यांनी समश्लोकी टीका लिहिल्यानंतर ‘जगदुपयोगी’ अशी टीका लिहावी अशा आशयाची सूचना वामन यांना त्यांचे अनेक शिष्य, संत, भक्तयोगी यांनी केली. त्या सूचनेतून ‘यथार्थदीपिके’चा जन्म झाला. वामन यांनी इतर टीकाकारांचा उपहास केला आहे. वामन यांनी त्यांच्या टीकेला भावार्थदीपिकेच्या पार्श्वभूमीवर ‘यथार्थदीपिका’ असे नाव दिले आहे. धोमच्या अलीकडे भोगाव. तिथे कृष्णाकाठावर वामनपण्डिताची समाधी त्याच्या कुण्या एका भक्ताने बांधलेली आहे.
समाधीच्या अलीकडेच एक दुर्लक्षित शिवमंदिर बघायला मिळालं. मूळ स्तंभ खूप जुने, यादवकालीन आहेत तर वरचा अर्धा भाग पेशवेकाळात बांधला गेलाय असे त्याच्या मिश्र शैलीवरुन सहजच दिसते.
थेच झाडोर्‍यांत एक दुर्ल़क्षित वीरगळ आहे. तो जरुर बघावा.

 १५ )  ऐतिहासिक राजाचे कुर्ले!

   राजाच्या कुर्लेची. खटाव तालुक्यातलं हे ऐतिहासिक गाव.
साताऱ्यापासून 55 किलोमीटरचं अंतर. त्यालाच जोडून काही अंतरावर डोंगरउंचावर गिरिजाशंकरवाडी हे प्राचीन मंदिरही विशेष प्रसिद्ध आहे.
खरं तर ही स्थळं श्रावणात करायचा बेत पक्का होता. मात्र ते घडलं नाही. त्यासाठी दिवाळी उजाडावी लागली.
साताऱ्यातून रहिमतपूर. मग वाठार किरोली, आर्वी, नागझरी, पुसेसावळी असा हा मार्ग. कराडातून श्यामगाव घाटातूनही कुर्लेत पोचता येतं.
           राजाच्या कुर्लेला ऐतिहासिक संदर्भ आहेत. गावाच्या तोंडावरच दोन दगडी चोैथऱ्याची कमान आहे. ते गावचं प्रवेशद्वार. आता गावोगावी कमानी दिसतात खऱ्या. इथलं वैशिष्ट्यं असं, की ती जुन्या काळातील आहे. अजूनही भक्कम आहे. मात्र गावात शिरण्याचं अन् बाहेर पडण्याचं हे एकमेव ठिकाण.
कमानीला जोडूनच गावाभोवती तटबंदी आहे. कदाचित हेच इथलं निराळेपण ठरावं.
    शाहू महाराजांच्या काळात प्रसिद्धी पावलेले फत्तेसिंह राजेभोसले हे इथले सरदार. शाहू छत्रपतींनी त्यांना अक्कलकोट परगण्याची जहागिरी दिली होती. इथला भुईकोट किल्ला (राजवाडा) ही इतिहासाची निशाणी.
सुमारे तीन ते चार एकर परिसरात हा भुईकोट किल्ला बांधण्यात आला होता. चारी बाजूला सुमारे तीस फूट उंचीचे भक्कम बुरुज अन् भव्य प्रवेशद्वार या राजवाड्यास होते. आजही या भुईकोट किल्ल्याचे दोन बुरुज पाहावयास मिळतात. गावात जुनी घरं आजही दिसतात. 1951 मधली ग्रामपंचायतीची जुनी इमारतही दिसते.
कुर्लेपासून पाचेक किलोमीटरवर गिरिजाशंकरवाडी. सगळा घाटाचा वळणदार रस्ता. अवतीभवती भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या. डोंगरावर आलं, की मग स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल दादू थोरात यांच्या नावाची कमान लागते. सपाटीनं पुढं गेलं, की प्राचीन शिवमंदिर. त्याचं दगडी बांधकाम लक्षवेधक आहे. मंदिराची सारी घडणावळ दगडात एकसंघ दिसते. गर्भगृहात मोठी स्वयंभू पिंड आहे. प्रांगणात दगडी नंदी, दीपमाळ, पाण्यानं काठोकाठ तळं, पुढं आणखी एक तलाव दिसतो. इथलं दगडी प्रवेशद्वारही मजबूत आहे. डाव्या हाताला काही अंतर चालून गेलं, की आणखी एक मंदिर. त्याच्या शिखराच्या कलाकुसरीमुळं ते लक्षात राहातं. इथला महाकाय दगडी नंदीही असाच लक्षात राहतो.
        डोंगरमाथ्यावरुन मसूर, किवळ, आर्वी, नागझरी, पुसेसावळी गावांचा परिसर खोलवर दिसतो. ओैंधचा डोंगरही पटकन नजरेत उतरतो. पारगावच्या तलावाचं पसरलेलं निळंशार पाणी उठून दिसतं. साताऱ्यातून एका दिवसात पुरी होणारी, इतिहास अन् प्राचीनतेची सफर घडविणारी ही भटकंती मनात निसर्गाचा फुलोरा निर्माण करते, हे नक्की!

 १६ )  कण्हेरखेडचे स्मारक :-

           सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड गावात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचा भव्य वाडा आहे आणि पानिपतच्या तिसऱ्या युद्धात वीरमरण पत्करलेल्या सोळा शिंदे वीरांच्या स्मरणार्थ उभारलेले सोळा खांबी स्मारक आहे. गावात सरदार दौलतराव शिंदेंच्या पत्नी बायजाबाई यांची समाधी म्हणजे छत्री आहे, कन्हेश्वराचे सुंदर मंदिर आहे. महादजींनी वाड्याचे बांधकाम सुरू केले पण पानिपतचे युद्ध सुरू झाले आणि ते अर्धवट राहिले. त्यांना वाडा असा बांधायचा होता की त्यावर फडकणारा भगवा थेट सातारच्या राजवाड्यातून दिसला पाहिजे. कण्हेरखेड रहिमतपूरजवळ आहे. सातारापासून साधारण ३० कि.मी अंतरावर आहे.
नेसरीच्या रणमैदानात सरनौबत प्रतापराव गुजरांसोबत , असामान्य शौर्य गाजवणारे सरदार विठोजी शिंदे यांचे सुपुत्र जनकोजी शिंदे. जनकोजींचे सुपुत्र राणोजी यांनी कण्हेरखेड येथे शिंदे घराण्याची स्थापना केली. पानिपतच्या युद्धात फक्त राणोजींचे पुत्र महादजी शिंदे जिवंत राहिले पुढे त्यांनी पुन्हा मराठा साम्राज्याला उभारी दिली व साम्राज्य वाढविले. त्यांनी ग्वाल्हेरला शिंदे घराण्याची स्थापना केली.
सरदार महादजी शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. इ.स. १७४० च्या निजामाविरुद्धच्या लढाईत त्यांनी सरदार दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. इ.स.१७४२ मध्ये बेळूरच्या लढाईत महादजींनी भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
इ.स.१७४५ ते इ.स.१७६१ च्या दरम्यान जो मराठ्यांचा स्वराज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो. त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला होता. महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज इ.स.१७४६, फतेहाबाद इ.स.१७४६. मल्हाराव होळकरांच्या साथीने सरदार महादजी शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठासाम्राज्याखाली आणली. रतनगढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. इ.स जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
पानिपतच्या युद्धात शिंदेंचे बलिदान म्हणजे न विसरण्यासारखी घटना १४ जानेवारी दिवशी पानिपतावर अनेक मराठा वीर देशरक्षणार्थ धारातीर्थी पडले.एकमेव महादजी शिंदे तेवढे वाचले.जख्मी अवस्थेतील महादजी उजैनला परतले ते सुड उगवायचे ध्येय डोळ्यासमोर ठेवुनच! आणि महादजींनी पुन्हा शिंद्यांची नव्या  दमाची पलटण उभा करुन दिल्लीची सत्ता काबिज केली.नजीबाची कबर फोडुन त्याची हाडे इतस्ततः फेकून दिली. दत्ताजी शिंदेंसहीत १६ मृतात्म्यांचा आत्मा मुक्त झाला! अमर झाला  !त्यातील १६ वीरांची नावे पुढीलप्रमाणे
०१.जय्यापाराव शिंदे ०२.दत्ताजी शिंदे ०३.तुकोजी शिंदे ०४.ज्योतिबा शिंदे ०५.जनकोजी शिंदे ०६.साबाजी शिंदे ०७.बयाजी शिंदे ०८.धारराव शिंदे ०९.येसाजी शिंदे १०.जीवाजी शिंदे ११.संभाजी शिंदे १२.हणमंतराव शिंदे १३.फिरंगोजी शिंदे १४.मानाजी शिंदे १५.रवलोजी शिंदे १६.आनंदराव शिंदे

आजही कण्हेरखेडमध्ये गेलात तर या सोळा योध्यांची सोळा खांबी स्मृतीस्थळ आपणास पहावयास मिळेल.
 हेच 16 स्तंभी पवित्र स्मृतीस्थळ.
कण्हेरखेड- महादजी शिंदे यांचा वाडा
 सुभेदार म्हणून उदयास आलेले राणोजी शिंदे यांचा पानिपत मोहिमेवर गेल्यामुळे अर्धवट बांधकाम राहिलेला भव्य असा राजवाडा या गावच्या वैभवात आजही भर टाकत आहे. मागील काळात या राजवाड्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र सरकारने काही निधी दिल्याने राजवाड्याचे प्रवेशद्वार आणि आतील काही बांधकाम करण्यात आले आहे. गावात अटकेपार झेंडे लावणाऱ्या साबाजी शिंदे यांचे नातू सरदार मानाजी शिंदे-फाकडे यांच्या वाड्यासह चार ते पाच मोठे वाडे पडीक प्रवेशद्वार आणि भिंतीसह आजही तग धरून उभे आहेत.
प्रथम शाहू छत्रपतींची सासुरवाडी याच गावातील शिंदे सरकार घराण्यातील असल्याने आजही या गावातील शिंदे बंधूंना याचा अभिमान आहे. गावचे ग्रामदैवत जानाईदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्वार ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आदेशावरून सरदार आंग्रे यांनी केला असल्याचे ग्रामस्थ आवर्जून सांगतात. गावामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी रेल्वेमंत्री (कै.) माधवराव शिंदे यांचा पुतळा बसवण्यात आला असून, याचे अनावरण खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. कण्हेरखेड या छोट्या खेडेगावातील भूमीच्या पुत्रांचा हिंदुस्थानच्या इतिहासात अतुलनीय पराक्रम असून, राणोजी जयाप्पा, दत्ताजी तुकोजी, साबाजी बयाजी, मानाजी ज्योत्याजी, जनकोजी यांनी उत्तर हिंदुस्थानमध्ये मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. याच घराण्यातील महाराजा महादजी शिंदे यांनी तर दिल्लीपर्यंत मजल मारत एकेकाळी समस्त हिंदुस्थान आपल्या ताब्यात घेतला. वकील ए मुत्तल्लक म्हणजेच दिल्लीच्या बादशहाचे सर्वाधिकार प्राप्त असणाऱ्या महादजींनी १७७३ पासून १७९४ पर्यंत दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून अखंड हिंदुस्थानचा कारभार पाहिला. असे महादजी शिंदे हे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत.
     कोरेगाव या तालुक्‍याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव आपल्या पराक्रमाने व कार्यकर्तृत्वाने हिंदुस्थानच्या नकाशावर आजही ठळकपणे आपली कीर्ती गाजवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी, असे हे ऐतिहासिक ठिकाण आहे.

 
 १७ ) हेळवाक धनगरवाड्याची रामघळ :-

कोयनानगर हे महाराष्ट्राची वरदायिनी कोयनामाईवर बांधलेल्या नहाकाय धरणामुळे आणि तिथे असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे प्रकाशझोतात आले. अलिकडे सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामुळे हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे.दुर्गभटक्यांसाठी जंगली जयगड, भैरवगड यासाठी हे गाव महत्वाचे .कोयनेच्या घनदाट जंगलात लपलेल्या भैरवगडावर जायचे तर एक मार्ग म्हणजे हेळवाक गाठून तिथून चालत कोंढवळ धनगरवाडा गाठायचा.पुढची वाटचाल निर्मनुष्य जंगलातून असल्यामुळे इथेव वाटाड्या घ्यायचा आणि भैरवगडाच्या दिशेन निघाल्यावर सर्वप्रथम दिसते समर्थांच्या वास्तव्यामुळे पुनित झालेली रामघळ.धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.
एका धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके १५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला दिसतो.
आत पाच वेगवेगळी दालने असल्याचे स्पष्ट जाणवते. मधोमध असलेल्या दालनाची व्यवस्था देवघरासारखी भासते. इथे एक शिव पिंडी देखील आहे. घळीच्या माथ्यावर काताळ खडक आहे आणि पाण्याचा धबधबा घळी वरून कोसळत असतो अगदी, शिवथर घळी  प्रमाणेच. इथे रात्री मुक्काम करता येऊ शकतो पण पाणवठा असल्याने वन्य श्वापदांचा वावर खूप आहे.या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे.
हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
रामघळीत उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
 

18 ) अजिंक्यतारा किल्ला

अजिंक्यतार्याच्या इतिहासात डोकावल्यास  कोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. यानंतर या गडाच्या इतिहासातील महत्वाचा प्रसंग म्हणजे औरंगजेबाने स्वराज्यावर जे आक्रमण केले त्याकाळातील ! मोगलांनी गडाच्या मंगळाई बुरुजाच्या ख्गली दोन सुरुंग पेरले. पहिला सुरुंग उडाल्यावर मराठ्यांचे नुकसान झाले , मात्र दुसरा सुरुंग उडाल्यावर मोगली फौजांचाही नाश झाला.मूठभर मावळ्यांसह किल्ला लढवीतच असताना अखेर दाणागोटा संपला, दारूगोळा संपला तेव्हा किल्लेदार  प्रयागजी प्रभूना  शरणागती पत्करावी लागली. या किल्ल्यावर शाहजादा आझमने निशाण चढवले म्हणून त्याचे नामांतर झाले -'अझमतारा.' मात्र अण्णाजीपंत शाहीराने, ताराराणीच्या वेषांतर केलेल्या सैनिकांच्या मदतीने एक दिवस किल्लाच ताब्यात घेतला. अन् अझमताऱ्याचा झाला 'अजिंक्यतारा !'
         अश्या या इतिहास प्रसिध्द अजिंक्यतारा गडाला भेट द्यायची असेल तर सातारा शहरातून अजिंक्यतार्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत थेट डांबरी रस्ता आहे. वाटेत आपल्याला चार भिंती हे एतिहास्क ठिकाण लागते, त्याला भेट देउन पुढे जायचे. 
पहिला दरवाजा सुस्थितीत असून दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. प्रवेशद्वारावर अनेक देव देवतांची शिल्पे तसेच कमळ , दोन्ही बाजुला आपल्याला शरभ शिल्प दिसतात
महादरवाजाच्या देवड्यांच्या जोत्यावर कोरलेली वाली-सुग्रीव युद्घाची कथा , विघ्नहर्ता गणराय , मारुती आणि बुरुजावर तळवटी खोदलेले नागांचे शिल्पांकन पाहावयास मिळते.दुसरा . दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे.मोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. हे टॉवर्स म्हणजे दूरदर्शन (१९८६) आणि आकाशवाणी (१९९२) यांची प्रक्षेपण केंद्रे आहेत. पुढे गेल्यावर आपल्याला राजवाड्याच्या पाया आणि भिंतींचा काही भाग शिल्लक भाग दिसतो. याच ठिकाणी महाराणी ताराबाई आणि त्या नन्तर महाराज शाहूंचे वास्तव्य होते.या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. उर्वरित गडफेरी पूर्ण करताना अनेक टाक्या आणि तटबंदीचा भाग दिसतो. तसेच एक कोठार सदृश्य बांधकामहि दिसते.वाटेमध्ये , रत्नेश्वराचे मन्दिर दिसते.गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. मात्र नजरेत भरतो तो गडाचा पश्चिम दरवाजा. गोमुखी बांधणीचे एकामागे एक असे दोन मजबूत प्रवेशद्वार आणि बुलंद बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. याबाजुला समोर टेकडी दिसते तीला उंटाची टेकडी म्हणतात. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात.याशिवाय गडावर तेलातुपाचे रांजण, माचीवर डफळ्यांच्या घोड्यांची पागा, अक्कलकोटकरांचा वाडा, पिंगळ्यांचा वाडा व शेख मिराची घोड्यांची पागा हे शाहूकालीन अवशेष आहेत. 
       गडावरुन पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर, बंड्या पठार्,उत्तरेला मेरुलिंगाचा डोंगर आणि मागे पुसट वैराटगड दिसतो.ईशान्येला चंदन-वंदन हे जोड किल्ले,भुताची टेकडी,नांदगिरी उर्फ कल्याणगड्,जरंडेश्वर्,पुर्वेला जानाई-मळाई डोंगर्,पाटेश्वराचा डोंगर आग्नेयेला तर नैऋत्येला सज्जनगड दिसतो. गडाच्या उत्तर अंगाला पायथ्याशी सातारा शहराचे विहंगम दृष्य दिसते.
 
 
 
 

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...