Tuesday, September 3, 2024

तेव्हाचा भारत – चिनी प्रवाश्यांच्या नजरेतून

 https://maitri2012.wordpress.com/2024/09/03/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5/

स्वागत फुलांनी

 विलास सातपुते

भाग २ : प्रकरण १

फा हिएनचे वर्णन

बाहेरील प्रवाश्यांच्या नजरेतून पूर्वीचा भारत कसा दिसत होता याबद्दलच्या लेखमालिकेत आपण ( ‘मैत्री’मध्ये ४ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या ) पहिल्या लेखात मेगॅस्थेनिस या ग्रीक प्रवाशाने ‘ इंडिका’ या पुस्तकात लिहिलेले २५०० वर्षांपूर्वीचे काही वर्णन पाहिले. या नंतर महत्त्वाची प्रवासवर्णने चीनहून आलेल्या प्रवाशांची आहेत. ती सुमारे १८०० ते २००० वर्षांपूर्वीची आहेत.
मेगॅस्थेनिस ह्या ग्रीक राजदूताच्या इ.स. पू. ३०० मधील भारतभेटीनंतर सुमारे ७०० आणि ९५० वर्षांचा काळ लोटल्यावर काही चिनी प्रवाशांनी भारताला भेट देऊन प्रवासवर्णन लिहिले आहे. त्यांत प्रामुख्याने दोन चिनी प्रवासी आहेत.

. पहिला प्रवासी : नाव – फा हिएन ( इ.स. ३९९ मध्ये भारताला जमिनीमार्गे पायी प्रयाण. वयाच्या  ६३ व्या वर्षी! इ.स. ४१३ मध्ये म्हणजे १४ वर्षांनी समुद्रमार्गाने श्रीलंकेहून चीनमध्ये पुनरागमन – वयाच्या ७७ व्या वर्षी! )
. दुसरा प्रवासी : नाव – हाइ एन सां किंवा ह्यु एन त्संग. ( इ.स. ६२७ मध्ये भारताकरिता जमिनीमार्गाद्वारे प्रयाण, वयाच्या २७ व्या वर्षी, आणि इ.स. ६४५ मध्ये जमिनीमार्गाने चीनमध्ये पुनरागमन. वयाच्या ४५ व्या वर्षी.)

त्यांच्या भारतात येण्यामागचा हेतू, ‘बौद्ध धर्माचे मूळ साहित्य अणि भगवान बुद्धाशी संबंधित स्मृतिचिन्हे गोळा करणे’ हा होता. ( फा हिएन ‘विनयपिटक’ नावाच्या बौद्ध ग्रंथाच्या चीनमध्ये उपलब्ध असलेल्या आवृत्तिबद्दल साशंक होता. ‘विनयपिटक’ हा बौद्धांच्या ‘त्रिपिटक’ नावाच्या ३ ग्रंथसमूहातील एक ग्रंथ आहे आणि त्यात बौद्ध लोकांनी, विशेषतः भिक्षूंनी, राहण्या-वागण्यात काय नियम पाळायचे याबद्दल माहिती आहे. बाकी दोन ग्रंथ ‘सुत्तपिटक’ व ‘ अभिधर्मपिटक’ हे आहेत. हिंदू लोक जसे वेद आणि मनुस्मृति मानतात तसे बौद्ध लोक हे ग्रंथ मानतात.). कुशाणवंशीय राजा कनिष्क (कारकीर्द – इ.स.१३० ते १५०) याच्या प्रयत्नांमुळे चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश झाल्याला २५० वर्षांहून अधिक काळ लोटला होता. आणि धर्मातील काही काही नियम आणि तत्त्वे याबाबत तेथील विद्वानांमध्ये स्पष्टता व एकवाक्यता नव्हती. तेथील काही बौद्ध भिक्षुंमध्ये एक अस्वस्थता होती की आपण जो बौद्ध धर्म म्हणून म्हणत आहोत तो बहुतेक मूळ धर्मग्रंथातील आख्यानापासून (आदेशापासून/आज्ञेपासून) ढळलेला आहे. आपण त्याचे अपभ्रष्ट भाषांतर प्रमाण मानून चाललेलो आहोत. तसेच आपल्याकडे बुद्धाच्या काहीही पवित्र वस्तू नाहीत. त्या वस्तू आणि मूळ धर्मग्रंथ भारतातच मिळतील. ते मिळवण्याकरिता त्यांनी एवढे कष्ट घेऊन आणि एवढा धोका पत्करून भारताचा प्रवास केला. सत्यशोधनाकरता व श्रद्धासमाधानाकरता केव्हढे हे प्रयत्न !

फा हिएन हा पहिला असा प्रवासी होता, ज्याचे प्रवासवर्णन उपलब्ध आहे. त्याच्या आधी काही प्रवासी आले असल्याची माहिती मिळाली आहे. ते सुमारे इ.स. २९० च्या आसपास इथे होते आणि त्यांची नावे गयामध्ये सापडलेल्या शिलालेखांत चिनी भाषेत कोरली आहेत. फा हिएन भारतात आला तेव्हा त्याच्याबरोबर काही सहप्रवासी पण होते.  फा हिएनचा पूर्ण प्रवासमार्ग लेखाच्या शेवटी खाली एका नकाशात दिला आहे. फा हिएनच्या चिनी भाषेतील मूळ प्रवासवर्णनाचे भाषांतर श्री. सॅम्युएल बील या युनिवर्सिटी कॉलेज, लंडन मधील चिनी भाषेच्या प्राध्यापकाने सन १८८४ मध्ये दोन खंडात केले आहे. त्याचे नाव आहे “ बौद्धांनी केलेल्या पाश्चिमात्य देशाबद्दल नोंदी” असे आहे. त्या २ खंडांवर खालील वर्णन आधारित आहे. काही ठिकाणी मी टीपा दिल्या आहेत’; ते माझे विचार किंवा इतर स्रोतांतून गोळा केलेली माहिती आहे. काही ठिकाणी माझ्या लेखातील लेखनाची शैली वेगळीच वाटू शकते, त्याचे कारण थेट प्रवाशाच्या तोंडून आलेले वर्णन आहे, तेही भाषांतरित, म्हणून. या प्रवासवर्णनात फा हिएनचे स्वतःचे अनुभव, स्वतःचे निष्कर्ष, तसेच ऐकलेल्या आख्यायिका पण आहेत.

चीनमधील ‘लॉप’ नावाचे वाळवंट, द-याखोरी, नवनवीन व अनोळखी लोकांच्या वस्त्या पार करत हजारो मैल पायी चालल्यावर शेवटी फा हिएन याने उत्तर भारतात पाऊल ठेवले. त्या काळी ते अफगाणिस्थानातील कंदाहार, पाकिस्तानातील स्वाट प्रदेश, पेशावरच्या आसपासचा भाग या सर्वांना उत्तर भारत म्हणत. फा हिएनच्या भारतभ्रमणमार्गात त्याने भेट दिलेली स्थळे – उद्यान, गांधार, तक्षशीला, पुरुषपूर (पेशावर), नगरहार, बन्नु, मथुरा, संकस्य किंवा संकिसा, कन्नौज, कोसला प्रदेश व त्यातील श्रावस्ति नावाचे बुद्धांचे पवित्र शहर, जिथे जेतवनात बुद्धाने बरेच वास्तव्य करून अनेक सूत्रांचे ज्ञान दिले, कपिलवत्सु, वैशाली, पाटलिपुत्र, सारनाथ, बोधिगया, राजगिर.

फा हिएनने लिहिले आहे की १०,००० फूट उंचीच्या पर्वतात बनवलेल्या ७०० पायऱ्या चढून-उतरून मग दोरखंडाच्या पुलावरून एका नदी पार करून सर्वप्रथम आम्ही भारताच्या एका  प्रदेशात आलो. या प्रदेशात मैत्रेयी बुद्धाची ८० फुटी प्रतिमा आहे. येथील भिक्षूंनी विचारले की तुमच्याकडे चीनमध्ये बौद्ध धर्म कधी सुरू झाला? फा हिएन म्हणाला की आमच्या इथे असे म्हणतात की मैत्रेयी बुद्धाची प्रतिमा स्थापित झाली तेव्हा येथील श्रमण भिक्षूंनी  इथून धर्मग्रंथ नदीच्या पार नेले. ही प्रतिमा बुद्धाच्या निर्वाणानंतर ३००-४०० वर्षांनी बनली.  या नंतर आम्ही उद्यान नावाच्या एका प्रदेशात आलो. इथे भारतीय भाषा बोलली जाते.

टीप :- उद्यान हा स्वाट प्रदेशाचा उत्तर भाग आहे. स्वाटला पाकिस्तानमधील स्विट्झर्लंड म्हणतात.)

या प्रदेशातील लोक बाहेरील भिक्षुंना ३ दिवस ठेवून घेतात आणि मग स्वतःची व्यवस्था करायला सांगतात. इथली किंवदंती अशी आहे की बुद्धाने आपल्या पायाचा ठसा इथे उमटवून ठेवला आहे. यानंतर दक्षिणेकडे प्रवास केल्यावर स्वाट प्रदेश लागला. या स्वाट प्रदेशात बौद्ध धर्म खूपच प्रचलित आहे. इथे अशी किंवदंती आहे की या प्रदेशात बोधिसत्त्वाने आपले मांस एका ससाण्याला अर्पण केले आणि बदल्यात त्या ससाण्याने पकडलेल्या कबूतराला सोडविले. म्हणून या ठिकाणी एक स्तूप उभारला आहे आणि त्याला चांदीसोन्याने मढविले आहे. येथून दक्षिण-पूर्वेकडे ५ दिवस प्रवास केल्यावर गांधार प्रदेश लागला. या इथे बुद्धाने आपले नेत्रदान केले होते असे म्हणतात. म्हणून इथे एक स्तूप उभारला आहे. त्याला सोन्याचांदीने सुशोभित केले आहे. इथले लोक हीनयानपंथी आहेत.

टीप :- कुठल्या नगरातले लोक कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत हे सर्व चिनी प्रवाश्यांच्या वर्णनात आहे. बौद्ध धर्मात ३-४ पंथ निर्माण झाले. मुख्य ३ पंथ आहेत.
१) महायान – हे लोक बुद्धाला दैवी- अलौकिक- मानतात. मूर्तिपूजेचे अनुकरण करतात आणि लोकांना ज्ञानाचा प्रकाश देऊन त्यांची दुःखमुक्ती करण्याकरिता स्वतः ‘बुद्ध’ होणे लांबणीवर टाकतात आणि ‘बोधिसत्त्व’ म्हणून राहणे पसंत करतात. बुद्ध होणे म्हणजे ‘प्रबोधन होऊन निर्वाण’ या अंतिम ध्येयाला पोहोचणे; ‘बोधिसत्त्व’ म्हणजे त्या ध्येयाच्या मार्गावर जो असतो तो.
२) हीनयान (थेरावाद) – हे बुद्धाला सामान्य मनुष्य मानतात. मूर्तिपूजा करीत नाहीत. आणि भिक्षू बनून ‘अर्हत’ होणे हे ध्येय ठेवतात. अर्हत होणे म्हणजे ज्ञान होऊन मोक्ष मिळणे. हे बुद्धाच्या मूळ शिकवणुकीचे अनुकरण करतात.

३) वज्रयान – हा पंथ बऱ्याच नंतर अस्तित्वात आला. थोडा वैदिक कर्मकांडाकडे झुकलेला पंथ आहे. मंत्रतंत्र याच्या साहाय्याने मोक्ष चटकन मिळू शकतो असा या पंथाचा विश्वास आहे.)गांधारातून पूर्वेला गेल्यावर तक्षशीला नावाचा प्रदेश लागला. अशी आख्यायिका आहे की, या प्रदेशात बुद्धाने आदल्या जन्मात  तो बोधिसत्त्व अवस्थेत असतांना आपले मस्तक कापून अर्पण केले होते म्हणून याचे नाव तक्षशीला झाले (असे फा हिएन ने लिहिले आहे). त्या आठवणीत इथे एक मोठा  स्तूप बाधला आहे.तक्षशीलेकरिता हाइ एन सां या २०० वर्षांनंतरच्या प्रवाश्याने काय लिहिले आहे ते पाहू.
तक्षशीला हा प्रदेश आता काश्मिर राज्याच्या आधिपत्याखाली आहे. इथले हवामान सुसह्य आहे.जमीन फार सुपीक आहे. इथे पिके खूप येतात. ओढे, झरे इत्यादी खूप आहेत. फळे, फुले खूप आहेत. इथले लोक तरतरीत आहेत, साहसी आहेत. इथे संघाराम (बौद्ध मठ, विहार) बरेच आहेत, पण बहुतांशी पडक्या अवस्थेत आहेत. आणि भिक्षू, धर्मगुरू अगदीच कमी आहेत. इथे एक मोठा स्तूप आहे. बुद्धाने आधीच्या जन्मात बोधिसत्त्व असतांना बुद्ध होण्यासाठी या ठिकाणी आपले मस्तक कापून अर्पण केले होते त्याचे स्मारक म्हणून हा स्तूप  बांधला आहे. याजवळ शहराबाहेर अशोक राजाने बांधलेला एक स्तूप आहे. इथे प्रार्थना केल्यास अंध लोकांना आपली दृष्टी परत मिळाली आहे असे म्हणतात. कारण इथेच अशोक राजाच्या मुलाचे – कुणालचे – गेलेले डोळे परत आले होते म्हणून.

टीप: आपल्याला माहीत असलेल्या तक्षशीला विद्यापीठाबद्दल परिचित वर्णन या चिनी प्रवाश्यांच्या वर्णनात आढळत नाही. आढळते ते चमत्कारांनी भरलेल्या कथा व बौद्ध धर्माशी संबंधित असलेली माहिती. आणि सर्व प्रवाशांची सर्व ठिकाणांबद्दलची वर्णने अशीच कथांनी भरलेली आहेत. खूप वाचल्यावर थोडी वेगळी माहिती पदरी पडते. तक्षशीला या नावाची व्युत्पत्ति पाहिली तर तक्ष्‌ म्हणजे कापणे आणि शीला म्हणजे शिळा यातून समास होऊन ‘कापलेल्या शिळांचे नगर’ असा काहीतरी अर्थ हवा. रामायणात सांगितले आहे की भरताने ही नगरी वसवलेली. त्याच्या तक्ष नावाच्या मुलाने राज्य केले ती नगरी तक्षशीला. तर बौद्धांच्या कथांमध्ये बुद्धासंबंधीच्या वरील कथेचा उल्लेख मिळतो. इथल्या प्रसिद्ध शैक्षणिक केंद्राचा उल्लेख नाही. आपल्याला शिकवलेल्या इतिहासाप्रमाणे तक्षशीला खूप मोठे व जुने शैक्षणिक केंद्र होते. चरक, कौटिल्य असे विद्वान तिथे आयुर्वेद, अर्थशास्त्र इत्यादीचे शिक्षण देत. शिवाय वेद इत्यादीचेही शिक्षण तिथे दिले जायचे. (याचा संदर्भ आणि याचा पुरावा इतर कुठे नीटसा मिळत नाही. फक्त बौद्धांच्या ‘जातक’ कथांमध्ये मिळतो. हा ग्रंथ अनेक चमत्कारपूर्ण कथांनी युक्त आहे त्यामुळे सत्यता ठरवायला जड जाते.)  इ.स. पू. ६०० पासून इ.स. ५०० पर्यंत म्हणजे १००० वर्षे, तक्षशीला नगरी भरभराटीत होती त्याअर्थी हे केंद्र पण भरभराटीत असावे. पर्शियन राजे, अलेक्झांडर, सेल्युकस, गुप्त राजे, सम्राट अशोक, इतर ग्रीक राजे, कनिष्क रजा यांच्या कारकीर्दी वरील काळात होत्या.  मग हूण लोकांनी इ.स. ४५० पासून या प्रदेशात चढाया केल्या. त्यात तक्षशीला या प्रादेशिक राजधानीवर झालेल्या हल्ल्यांमुळे येथील शैक्षणिक केंद्र बंद पडले असावे. म्हणजे फा हिएन तिथे असतांना इ.स. ४१५ च्या जवळपास हे केंद्र किंवा विद्यापीठ तिथे कार्यरत असले पाहिजे. पण ‘त्याचा उल्लेख कसा नाही?’ ही आश्चर्याची गोष्ट आहे.  हाइ एन सां ने लिहिले आहे की इथले संघाराम (मठ, विहार ) पडक्या अवस्थेत आहेत. तेव्हा तक्षशीला विद्यापीठ नष्टावस्थेत होते. पण इतक्या कहाण्यांबरोबर तक्षशीलेमध्ये  विश्वविद्यालय होते ह्याचा उल्लेख त्याने पण केलेला नाही. पण बौद्धांच्या जातक-कथांमध्ये तक्षशीला विश्वविद्यालयाचा  उल्लेख आहे असे म्हणतात. तक्षशीलेजवळ तीन ठिकाणी उत्खनन केले त्यात नगराचे अवशेष मिळतात, पण आपल्या कल्पनेनुसार जशी विद्यापीठाची रचना हवी तसे विद्यापीठाचे अवशेष मिळाले नाहीत.)इथून पुढील लागलेल्या स्थळांचे वर्णन पण फा हिएन ने क्रमवार केले आहे.

पुरुषपूर (पेशावर) – इथे एक मोठा स्तूप आहे, ४०० फूट उंचीचा. उत्कृष्ट बांधकाम, सौष्ठव आणि उंची या बाबतीत याच्या तोडीचा दुसरा स्तूप नाही या जम्बुद्वीपात. बुद्धाने भाकित केले होते की माझ्या निर्वाणानंतर ४०० वर्षांनी कनिष्क नावाचा राजा इथे स्तूप बांधेल. बुद्धाचे भिक्षापात्र सुद्धा या शहरात आहे. आणि इथले सुमारे ७०० भिक्षू दुपारी ते बाहेर आणून त्याला नैवेद्य अर्पण करतात आणि मग जेवतात.

टीप: पेशावर हे शहर म्हणजे कुशाणवंशीय सम्राट कनिष्क याची एक राजधानी होती. दुसरी राजधानी मथुरा होती. त्याचे साम्राज्य उझबेकिस्तान पासून इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, काश्मिर आणि बिहार पर्यंत पसरले होते. यानेही सम्राट अशोक प्रमाणे बौद्ध धर्माकरिता बरेच काही केले आणि स्वतः पण बौद्ध धर्म स्वीकारला. दयाळू राजा म्हणून प्रसिद्ध झाला. आजही या स्तूपाचे अवशेष पेशावरजवळ सापडले आहेत. असे म्हणतात की स्तूप तांब्याने मढवलेला असल्याने आणि फार उंच असल्याने वीज पडून त्याची पडझड व्हायची.  पेशावरजवळील त्या अवशेषांत एक तांब्यात घडविलेले कनिष्कपात्र पण आहे. ते सध्या पेशावर संग्रहालयात आहे.त्या पात्राची प्रतिमा खाली आहे.)

कनिष्क पात्र
नगरहार – या शहरात बुद्धाच्या मस्तकाची अस्थि आहे. त्याची पूजा करतात. थोड्या अंतरावर एका शहरात एक स्तूप आहे त्यात बुद्धाचा दात आहे. त्याची पूजा करतात.
टीप: हे शहर नक्की कोणते ते कळत नाही. पण बुद्धाच्या अवशेषांची पूजा करण्याची पद्धत फारच प्रचलित होती असे दिसते.)
मथुरा – या देशात २० मठ आणि ३००० भिक्षू आहेत. यातून यमुना नदी वाहते.यानंतर फ़ा हिएन याने संकिसा, श्रवस्ति, कपिलवत्सु, वैशाली या शहरांना भेट देत पाटलीपुत्रात प्रवेश केला. या प्रत्येक शहरात तीन गोष्टींचे वर्णन आहे – तिथल्या मठांची आणि भिक्षूंची संख्या, आणि त्या स्थानाशी व बुद्धाशी संबंधित आख्यायिका.  मथुरेच्या दक्षिणेच्या भागाला मध्यदेश असे संबोधून त्याविषयी मात्र त्याने काही माहिती लिहिली आहे ती अशी :

या देशातील लोक संपन्न आहेत आणि त्यांच्यावर कसलेही राजकीय बंधन नाही. ह्या लोकांना काही कर द्यायला लागत नाही. फक्त जे राज्याच्या  जमिनीवर शेती करतात ते पिकाचा काही भाग कर म्हणून देतात.  येथील राज्यात शारीरिक इजेच्या रूपात शिक्षा शक्यतो देत नाहीत. आर्थिक दंडाच्या रूपात शिक्षा करतात. बंडखोरीची पुनरावृत्ती झाल्यास उजवा हात कापतात. इथले लोक पशुपक्षांना मारत नाहीत, मादक द्रव्यांचे सेवन करीत नाहीत आणि कांदा लसूण खात नाहीत. फक्त चांडाळ जातीचे लोक हे सर्व करतात. इतरांपेक्षा वेगळे राहतात. बाजारात आल्यास घंटा वाजवून इतरांना दूर जाण्याची सूचना देतात.

कपिलवत्सु या बुद्धाच्या जन्मस्थान शहराबद्दल लिहिले आहे की इथे कोणी राहत नाही. युवराज सिद्धार्थचे पिता राजा शुद्धोदन यांच्या राजवाड्याचे काही अवशेष बाकी आहेत. जिथे सिद्धार्थने रोगग्रस्त माणूस पाहिला होता तिथे आणि ज्या दरवाजाने त्याने शहर सोडले तिथे मनोरे उभारले आहेत.

पाटलिपुत्र – मगधाची राजधानी पाटलिपुत्र या शहराविषयी फा हिएन लिहितो की इथून सम्राट अशोकने राज्य केले. त्याच्या राजवाड्याचे बांधकाम हे मानवी हातांचे काम नाही. इथले दरवाजे, वाटा, कॉरिडॉर, नक्षीकाम हे सर्व जादुची शक्ती असलेल्या राक्षसांकडून  करून घेतलेले आहे. याचे अवशेष अजून दिसताहेत. (टीप:- सम्राट अशोकाचा काळ लोटल्याला सुमारे ६०० वर्षे लोटलेली आहेत, राजवाडा अवशेषरूपात आलेला आहे आणि इजिप्तच्या पिरॅमिड प्रमाणे एव्हढ्या मोठ्या दगडांचे बांधकाम व नक्षीकाम मानवी नाही हे म्हटले जात होते). असे म्हणतात की अशोक राजाचा भाऊ ‘अर्हत’ पदाला पोहोचलेला होता आणि तो गृध्रकूट पर्वतावत एकटा राहायचा. अशोकाने त्याला निमंत्रण दिले की मी या नगरीतच तुझ्याकरिता पर्वताप्रमाणे वास्तव्यस्थान निर्माण करतो. त्याने त्या जादूची शक्ती असलेल्या राक्षसांना मेजवानीचे निमंत्रण दिले आणि स्वतःचे आसन म्हणून एक एक दगड घेऊन यायला सांगितले. जेवण झाल्यावर त्याने त्यांना ते दगड रचून डोंगर बनवाययला सांगितला. एक एक दगड ४ पावले रुंद आणि ५ पावले लांब होता. आणि या डोंगराच्या तळाशी ३५ फूट लांब, २२ फूट रुंद आणि ११ फूट उंच असे एक दालन बनवले.मगध आणि पाटलिपुत्र यांबद्दल फा हिएन पुढे लिहितो.

या मध्य भारतातील शहरे आकाराने विशेष मोठी आहेत आणि येथील लोक श्रीमंत आहेत. ते सद्गुणी आणि न्यायी बुद्धीचे आचरण करतात. पाटलिपुत्रातल्या लोकांनी शहरात इस्पितळे बांधलेली आहेत आणि त्यात देशातील कोणत्याही गरीब, अनाथ, पंगु, रोगग्रस्त व्यक्तीचा निःशुल्क इलाज होतो.

इथे दुसऱ्या महिन्यातील ८ व्या दिवशी एक मिरवणूक काढायची पद्धत आहे. त्यात अनेक गाड्यांना रेशमे वस्त्रे, किनखापी यांनी सजविले जाते. त्यात देवांच्या मूर्ती स्थापित असतात, त्यांना सोन्याचांदीने सुशोभित केले जाते. आणि गाडीच्या चार कोपऱ्यांत बुद्धाची बसलेली मूर्ति ठेवतात आणि त्यांच्याबरोबर बोधिसत्त्व उभे असतात. फुले, धूप इ. वाहिले जाते. संगीत आणि खेळ होतात. ब्रह्मचारी आणि बुद्ध असे सगळे उपस्थित राहतात. हे रात्रभर चालते.

टीप:– आपल्याकडे सध्या गणेश उत्सव व विसर्जन, बंगालमधील दुर्गा उत्सव व विसर्जन यांच्या मिरवणुका इत्यादीची येथे आठवण येते. ही इतकी जुनी परंपरा आहे.)शहराच्या दक्षिणेला राजा अशोक याने एक पॅगोडा उभारलेला आहे. तो खूप उंच आहे. त्याने ७ पॅगोडे नष्ट केले होते म्हणून आता त्याने ८४,००० पॅगोडे बांधले आहेत. या पॅगोड्याच्या उत्तरेला एक पाषाणाचा स्तंभ उभारला आहे. या ३५ फूट उंच स्तंभाच्या सर्वोच्च ठिकाणी सिंहाची मूर्ति/आकृति स्थापित आहे. या पॅगोड्यापासून काही यार्डांवरच राजा अशोकचे जन्मस्थान आहे.फ़ा हिएन इथून गयेला गेला. गया या स्थानाबद्दल तो लिहितो की इथे बोधिसत्त्व अवस्थेत असतांना सिद्धार्थ गौतमाने ६ वर्षे कठोर तप केले, शरीराला यातना दिल्या, पण त्याला प्रबोधन झाले नाही, त्याच्यात ज्ञानोदय झाला नाही. पण या ठिकाणी सगळीकडे त्या स्मृतिनिमित्त मनोरे उभारले आहेत आणि त्यांत बुद्धाची मूर्ति स्थापित केली आहे.

(टीप:- बुद्धाने प्रखर तप व शारीरिक यातनांचा मार्ग अवलंबला, तो त्या काळच्या श्रमण योग्यांना अनुसरून. पण शेवटी त्याला कळले की असा ‘टोकाचा मार्ग’ पत्करून ज्ञानोदय होत नाही. त्यामुळे त्याने ‘मध्यम मार्ग’ अवलंबण्याचा उपदेश केला.) शेवटी एका पिंपळाच्या झाडाखाली (टीप:- या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हणतात.) त्याने ७ दिवस चिंतन  केले व त्याला प्रबोधन झाले. नंतर तो ७ दिवस एका झाडाखाली फिरत होता, चिंतन करीत होता. या दोन्ही ठिकाणी विहार निर्माण केले आहेत आणि त्यात भिक्षू राहतात.गयेहून पाटलिपुत्राला परततांना फा हिएन ने बनारस आणि कोसंबी यांना भेट दिली. बनारस इथे गौतम बुधाने कौंडिण्य आणि त्याचे ४ सहाध्यायी यांना त्याचे पहिले उपदेशाख्यान केले, आणि त्यांनी तो उपदेश स्वीकारला. फा हिएनने या शहरांबद्दल जास्त काही लिहिले नाही. नंतर तो पाटलिपुत्राला परतला. या इथे त्याला ‘विनयपिटक’ या ग्रंथाची मूळ प्रत मिळाली. आत्तापर्यंतच्या सर्व प्रवासात त्याला ती मिळाली नव्हती. सगळीकडे मौखिकी परंपरेने ह्या पिटकाचे ज्ञान दिले जात होते. म्हणून फा हिएनला इथपर्यंत यावे लागले. याशिवाय त्याने अभिधर्मपिटकाची प्रत मिळवली आणि १३,५०० श्लोक असलेली विविध सूत्रे – निर्वाण सूत्रे, परिनिर्वाण सूत्रे इत्यादी – मिळवली. पाटलिपुत्रात त्याने ३ वर्षे वास्तव्य केले, संस्कृत शिकला आणि या ग्रंथांच्या चिनी भाषेत प्रती बनवण्यास सुरुवात केली. त्याचा सहप्रवासी येथील भिक्षूंचे अष्टांगमार्गी वर्तन पाहून इतका भारावून गेला की, तो म्हणाला इतर दुसऱ्या देशात मी असायला नको आणि म्हणून त्याने तिथेच वास्तव्य करायचे ठरवले. फा हिएन ने पुढचा प्रवास एकट्याने केला.पाटलिपुत्रहून फा हिएन ताम्रलिप्ति या सागर किनारी असलेल्या नगरी गेला. तिथे दोन वर्षे राहिला. या काळात त्याने मूळ ग्रंथांच्या हस्तलिखित प्रति केल्या, भाषांतरे केली. ताम्रलिप्ति हे त्या काळात समुद्राद्वारे व्यापार करण्याचे केंद्र होते. सध्या पश्चिम बंगाल येथील तमलुक शहर म्हणजे पूर्वीचे ताम्रलिप्ति. येथून बोटीद्वारे फा हिएन श्रीलंकेला गेला आणि तेथे राहून चीनला परत गेला. त्याचा सर्व प्रवास पाहिला तर त्याच्या चीनमधील शहरातून मध्य भारतात यायला त्याला ५ वर्षे लागली, ५ वर्षे तो भारत आणि श्रीलंका इथे राहिला आणि परतीच्या प्रवासाला तीन वर्षे लागली.

फा हिएनचा प्रवासमार्ग नकाशा आणि फा हिएनचा सिंगापुरमधील संग्रहालयातील पुतळा :

फा हिएनचा वृत्तांत वाचल्यावर प्रकर्षाने जाणवणाऱ्या काही गोष्टी :–
. अफगणिस्तानपासून ते बिहारपर्यंत बौद्ध धर्माचे खूप प्रचलन होते. हिंदु धर्माच्या बरोबरीने. प्रत्येक गावातील देवळे आणि बुद्धविहार यांच्या संख्येवरून ते लक्षात येते. आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या प्रदेशांत तर बौद्धांचे आधिक्य होते.
. बुद्धाचे दात, बुद्धाच्या पायाचा ठसा, बुद्धाची नखे, बुद्धाचे भिक्षापात्र, बुद्धाची जन्मभूमि, बुद्धाने शहर सोडले ते द्वार  इत्यादी गोष्टींच्या नावाने प्रत्येक ठिकाणी बुद्धाची पूजा करण्याकरिता पॅगोडा, विहार, मठ, स्तूप बांधले आहेत हे फा हिएनच्या आणि हाएन सां यांच्या वृत्तांतातून कळून येते. हे काय दर्शवते तर अनेक स्मारके उभारण्याची व मूर्तिपूजेची वा व्यक्तिपूजेची उपजत मानवी वृत्ती. खरं म्हणजे बुद्धाचे तत्त्वज्ञान असे आहे की त्यात मूर्तिपूजा बसत नाही. बुद्ध नास्तिक म्हणजे वेदांना, त्यातील देवांना न मानणारा होता. त्याने मूर्तिपूजेचा, व्यक्तिपूजेचा उपदेश केला नव्हता, पण आपल्या आतल्या भावनांचे समाधान पूजा केल्याशिवाय होत नाही.
. पूज्य व्यक्तींना अलौकिक लेखण्याची आणि त्यांबद्दल आख्यायिकांच्या रूपात अचंबित करणाऱ्या कथा विणण्याची वृत्ती पण या इतिहासातून दिसून येते. फा हिएन आणि हाएन सां यांचे वृत्तांत प्रत्येक राज्यातील प्रचलित आख्यायिकांनी भरलेले आहेत. ज्याप्रमाणे हिंदूंमध्ये पुराणे उपदेशाबरोबर अनेक कथा सांगतात, त्याप्रमाणे बौद्धांमध्ये “जातक कथा” ह्या नावाने  पुराणकथांचा संग्रह आहे.
. उत्सवप्रियता हा एक मानवी गुण त्या काळात वर्णिलेल्या काही उत्सवांच्या वर्णनावरून दिसून येतो. मिरवणुका, आदर-सत्कार, संगीतकार्यक्रम  इत्यादीद्वारे हे दिसून येते.
. त्या काळात परिषदा भरवून, वादविवाद-चर्चा करून ऋत आणि सत्य यांना समजण्याची प्रथा होती. बुद्धाच्या मृत्यूनंतर भरलेल्या ३ धर्मपरिषदा, कनिष्क राजाने बोलाविलेली ५०० भिक्षू विद्वानांची परिषद आणि या परिषदांत चर्विचर्वण करून  सारासार तत्त्वे निश्चित करणे, त्यांचे पुस्तकीकरण करणे हे त्या काळच्या सुसंस्कृत समाजाचे मोठे लक्षण दिसून येते.  उपनिषदांच्या काळापासून ते शंकराचार्यांच्या काळापर्यंत ह्या अशा चर्चा सनातनधर्मीयांत होत्याच; तसेच बौद्ध-धर्मीयांत पण होत्या असे दिसते.
. कोणताही धर्म स्थापन झाल्यावर त्याच्या मूळ शिकवणुकीबद्दल मतभेद निर्माण होऊन अनेक पंथ निर्माण होणे, हे बौद्ध धर्मात घडले. असे सर्व धर्मांत दिसून येते.
हिंदूंमध्ये ज्ञानमार्गात द्वैत, अद्वैत, विशिष्ट-अद्वैत, केवल-अद्वैत इत्यादी शाखा दिसून येतात; तर भक्तिमार्गात शैव, वैष्णव, नाथसंप्रदाय इत्यादी पंथ दिसून येतात.
ख्रिस्ती लोकांत – कॅथॉलिक, प्रॉटेस्टंट, ऑर्थोडॉक्स चर्च हे मुख्य पंथ दिसून येतात.
इस्लाममध्ये सुन्नी, शिया, सूफी ह्या मुख्य शाखा दिसून येतात.
. धर्मविषयक ज्ञान जतन करण्याचे प्रकार – बौद्धांमध्ये धर्मविषयक ज्ञान कसे जतन केले आहे हे या प्रवाश्यांच्या वर्णनातून कळून येते. बौद्धांमध्ये विनयपिटक, सुत्तपिटक, अभिधर्मपिटक हे तीन ग्रंथ अनुक्रमे ‘राहणे-वागणे यांचे नियम’, ‘बुद्धाच्या मुखातून निघालेले उपदेश, आख्याने इ.’, आणि ‘तत्त्वज्ञान, न्यायशास्त्र’ हे सांगतात. हे मिळून सर्व धर्मज्ञान होते. इतर धर्मातही थोडेफार असेच दिसून येते. याला समांतर इस्लाममध्ये हडिथ(हादिथ), तजवीद, फिघ, कुराण हे चार ग्रंथ अनुक्रमे पैगम्बराचे बोल, उच्चारशास्त्र, न्यायशास्त्र आणि अल्लाने पैगम्बराला प्रकट केलेले धर्मशास्त्र सांगतात.  हिंदूंमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आदि.
. त्या काळात भारतामध्ये राजे आपापले राज्य वाढवण्याकरिता युद्ध करायचे असे दिसते. अशोक, कनिष्क, चंद्रगुप्त हे राजे भौगोलिक प्रदेशवाढीकरिता युद्ध करीत. धर्माच्या मतभेदावरून क्वचित लढाया व्हायच्या. प्रवासवर्णनानुसार एक मिहिरकुल हा हूण राजा याला अपवाद दिसतो.
. या प्रवासवृत्तांतात अनेक आख्यायिका दिल्या गेल्या आहेत. या बौद्ध आख्यायिकांमध्ये इंद्रादि देव बुद्धापुढे नत असायचे, त्याचे स्वागत करायचे असेही उल्लेख आहेत. म्हणजे धर्म वेगळा, पण जुन्या धर्माचे देव नवीन धर्मात सामील केलेले !
१०. एकूण भारतवासीयांचे वर्णन पाहिले तर लोक सरळ, न्यायप्रिय, शांततेने राहणारी आणि परोपकारी आहेत असे कळते. बाहेरच्या भिक्षूंची व्यवस्था करणे, निःशुल्क रुग्णालये बांधून चालवणे, अनेक विहार बांधून धर्मशाळेप्रमाणे व्यवस्था करणे इत्यादी गोष्टी लोकांची परोपकार वृत्ती दाखवतात तर शारीरिक शिक्षा कमी असणे, गुलाम प्रथा नसणे, लोकांवर फारशी बंधने नसणे, जाचक करव्यवस्था  नसणे हे राज्यकर्त्यांचे दयाळूपण दाखवते. आजही बरेचसे तसे आहोत का हा जरा थांबून विचार करण्यायोग्य मुद्दा आहे.पुढील दुसरे प्रवासवर्णन हे सर्वप्रसिद्ध प्रवासी हाइ एन सां ( ह्यु एनत्संग ) याचे आहे. तेही जवळपास फा हिएनच्या वर्णनाच्या धर्तीचे आहे, पण हाइ एन सां याने जास्त ठिकाणांना भेटी दिल्या व जास्त तपशीलवार वर्णन केले आहे. त्याचे वर्णन ऐतिहासिक प्रमाण म्हणून पाहिले जाते. ते पुढील लेखात पाहू.

क्रमशः ]

– ©️ विलास सातपुते,
भोपाळ
vilas.satpute54@gmail.com




भाग २ : प्रकरण ३
हाइएन सां चे वर्णन [ उत्तरार्ध ]

मागच्या लेखात आपण हाइएन सां याने लिहिलेले भारताचे सामान्य वर्णन पाहिले. या लेखात त्याने निरनिराळ्या राज्यांबद्दल काय तपशील दिले आहेत आणि ते आजही किती प्रमाणात खरे आहेत ते पाहू. याशिवाय लेखाच्या शेवटी हाइ एन सां, भास्करवर्मन, हर्षवर्धन हे खरोखर कोणत्या काळात होऊन गेले याबाद्दल काही निष्कर्ष पाहू.

• तक्षशीला –  हे आधीच्या काळातील मोठे राज्य होते आणि राजधानी पण तक्षशीला होती. याबद्दल हाइएन सां फक्त एवढेच लिहितो की इथले विहार, मठ इत्यादि भग्न अवस्थेत आहेत. याबद्दल तपशीलवार चर्चा आधीच्या फा हिएन च्या प्रवासवर्णनात मी केली आहे, म्हणून या लेखात पुनरावृत्ती करीत नाही.

• काश्मिर – या राज्याकरिता हाएन सां याने काय लिहून ठेवले आहे ते पाहू. इथले हवामान थंड आणि त्रासदायक आहे. लोकं पांढरे सुती कपडे आणि चामड्याचे जाड अंगरखे घालतात. यांच्या स्वभावात गांभीर्य कमी आहे, थोडे उथळ वृत्तीचे, तसेच घाबरट पण आहेत. दिसायला फार सुंदर आहेत. थोडे धूर्त आहेत. त्यांच्यात विद्वत्तेला मान आहे आणि ते बरेच सुशिक्षित आहेत. दोन्ही धर्माचे लोक इथे आहेत – देवांना मानणारे आणि बुद्धाला मानणारे. अशोक राजाने बांधलेले ४ स्तूप इथे आहेत. या स्तूपात बुद्धाचे थोडे थोडे अवशेष आहेत. १०० संघाराम ( बुद्धविहार, मठ )  आहेत आणि त्यात ५००० धर्मवेत्ते आहेत. अशोक राजाने बुद्धाच्या निर्वाणानंतर १०० वर्षांनी या प्रदेशात सगळीकडे राज्य केले. बुद्धनिर्वाणानंतर ४०० वर्षांनी राजा कनिष्क याने बौद्ध धर्मांतील वेगवेगळे पंथ आणि विचार यांच्यातील सत्य शोधण्याकरिता इथे बौद्ध भिक्षूंची एक धर्मपरिषद बोलावली. त्या परिषदेत खालील अटी पालन करणार्‌या भिक्षूंना वाद्विवाद करण्याची परवानगी दिली – अ) ५ प्रापंचिक बंधदोषांपासून ( अज्ञान, अस्मिता, राग, द्वेष, आणि विधर्मिता) ते मुक्त हवेत.     ब) त्यांचा ३ पिटके व ५ विद्या यांचा अभ्यास पूर्ण झालेला हवा.
• याप्रकारे निवड केल्यावर ४९९ धर्मवेत्ते राहिले आणि त्यांनी वादविवाद करून बौद्ध धर्माची तत्त्वे एकूण ३६,००० श्लोकांत रचनाबद्ध केली. कनिष्क राजाने धर्मपरिषदेत एकवाक्यता झालेल्या या व्याख्यानांना ताम्रपत्रावर कोरण्याची आज्ञा दिली व एक स्तूप उभारून त्यात ही ताम्रपत्रे ठेवली. यानंतर त्या धर्मवेत्त्यांची  काश्मिरमध्येच राहण्याची व्यवस्था करून तो गांधारात परत गेला.
(अशा अनेक घटनांची, तसेच प्रादेशिक आख्यायिकांची वर्णने या प्रवासवर्णनात वाचायला मिळतात.)
• टक्कदेश – हाएन सां काश्मिरनंतर टक्कदेशात येतो. ( टीप – हा प्रदेश बिआस आणि सिंधु नदीच्या मधील प्रदेश आहे. संभवतः जम्मू, पंजाब याचा काही भाग यात मोडतो. ) हाएन सां लिहितो की इथली जमीन  तांदूळ आणि मका या पिकांकरिता योग्य आहे. या प्रदेशात सोने, चांदी, तांबे आणि लोखंड खूप  बनते. इथले हवामान थंड नाही, वादळे खूप येतात. इथले लोक तेज आहेत आणि भांडखोर व हिंसक आहेत. त्यांची भाषा न मृदू आहे ना फारशी प्रतिष्ठित वा सुसंस्कृत आहे. हे लोक चमकदार रेशमी आणि लाल वस्त्रे नेसतात. हे लोक बौद्ध धर्माला मानत नाहीत, वैदिक धर्माचे यज्ञयाग करीत असतात. इथे फक्त १० संघाराम आहेत आणि शेकडो देवळे आहेत. (टीप – १. वारंवार देवळे बांधण्याची भारतीयांची वृत्ती तेव्हापासून आहे की काय ? आज काल पण अनेक गृहसंस्था आपल्या आवारात एक देऊळ बांधतात. गुजरात आणि उत्तर भारतात काही काही लहान शहरांत  दर १००-२००  मीटर वर मंदिर असते. प्रवृत्तिधर्म पाळण्याकरता केल्या जाणार्‌या अशा गोष्टी कधी कधी अतर्क्य वाटतात हे खरे.   २. या प्रदेशात लोहखनिज आणि ताम्रखनिज तर आज नाही. तेव्हा कुठून आले ? का फक्त या धातूंच्या वस्तू तिथे बनत म्हणून हे धातू  तिथे बनतात असे विधान केले आहे ?  ).
इथे पूर्वी अनेक धर्मशाळा होत्या आणि त्यांत प्रवाशांकरिता अन्न, निवारा, औषधे यांची व्यवस्था असते.

टक्क देशातल्याच साकल नावाच्या शहरात हाएन सां लाही इतिहासाला जवळ अशी कथा ऐकायला मिळाली. इथे पूर्वी मिहिरकुल नावाचा  हूण राजा होऊन गेला. तो शूर, हुशार व क्रूर होता. त्याने सर्वांकडून कर वसुली चालू केली. त्यास मगधाच्या बालादित्य राजाने नकार दिला म्हणून मिहिरकुल मगधावर चालून आला. बालादित्य एका द्वीपावर पळाला. पण मिहिरकुलाने त्याचा पाठलाग केला. झालेल्या लढाईत मिहिरकुलचाच पराभव होऊन त्याला कैद केले गेले. पण बालादित्य राजाने  त्याच्या आईच्या सल्ल्याप्रमाणे त्याला सोडून दिले. मिहिरकुलाने काश्मिरमध्ये आश्रय घेतला. पण ज्या राजाने आश्रय दिला त्याच्याविरुद्ध नंतर बंड पेटवून त्याला मारून स्वतः राजा झाला. मग गांधारावर चालून गेला. गांधाराच्या राजाला मारून गांधार जिंकल्यावर त्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जाणार्‌या बौद्ध धर्माची तत्त्वे जाणण्याकरता अनेक बौद्ध धर्मवेत्त्यांना आमंत्रण दिले. पण त्याच्या क्रूरतेची कीर्ति ऐकून कोणी त्याच्याकडे आले नाही. फक्त राजवाड्यातील एक नोकर पाठवला गेला. तोही जाणकार होता, पण नाकारलेल्या निमंत्रणाचा राग येऊन मिहिरकुलाने म्हटले की माझा बौद्ध धर्माविषयीचा आदर नष्ट झाला आहे. आणि मग त्याने हजारो बौद्धांना मारून टाकले. तो बौद्धद्वेष्टा झाला.      (टीप: अलेक्झांडरने ही असेच निमंत्रण दंडमी नावाच्या योगी विद्वानाला दिले होते आणि ते त्याने नाकारलेले होते; पण अलेक्झांडरने त्याला बंदी केले नव्हते. दोन राजांतील हा फरक नोंदण्यायोग्य आहे ! बालादित्य राजा म्हणजे गुप्तवंशीय राजा नरसिंह गुप्त होय. कारकीर्द इ.स. ४९५ ते ५३०.)

• कान्यकुब्ज – ह्या प्रदेशाची राजधानी प्रदेशाच्या पश्चिमेकडे गंगाकिनारी आहे. त्याभोवती एक कोरडा खंदक आहे, तसेच एकमेकांकडे तोंड करून काही मनोरे आहेत. इथे बरेच किंमती सामान गोळा होते. येथील लोक संपन्न आणि समाधानी आहेत. हवामान सुसह्य आहे आणि वेळच्या वेळी पिके काढली जातात. लोकं प्रामाणिक आहेत. दिसायला सभ्य व चांगले आहेत. आहेत. यांचा पेहराव चमकदार वस्त्रांचा आहे. यांचा कल शिक्षण आणि विद्वत्ता याकडे आहे आणि हे लोक धर्मविषयक चर्चा बरीच करतात. यांच्या शुद्ध भाषेची कीर्ती आसपास पसरली आहे. इथे बुद्धधर्मीय आणि इतरधर्मीय यांची संख्या बरोबरीने आहे. १०० बौद्धविहार आहेत आणि त्यात १०,०००  बौद्धभिक्षू आहेत. जवळपास १०० इतरधर्मीय देवांची देवळे आहेत आणि हजारो भक्त आहेत. या शहराची जुनी राजधानी ‘कुसुमपूर’ होती आणि त्याचा राजा ब्रह्मदत्त होता.

( टीप – कान्यकुब्ज या प्रदेशाची सर्वात जुनी राजधानी कुसुमपूर होती. त्यानंतर ती कान्यकुब्ज झाली. कान्यकुब्ज म्हणजे ‘कन्यांचे कुबड’. हे नाव कसे आले त्याची आख्यायिका पुढे दिली आहे. ही कान्यकुब्ज राजधानी सध्याच्या कनौज शहराजवळ आहे. सध्याचे कनौज शहर जुन्या कान्यकुब्ज शहराच्या उत्तरेला आहे. जुन्या शहराला लागून आहे. कान्यकुब्ज ही जुन्या काळात उत्तर भारताची राजधानी होती. पण आताचे सापडलेले अवशेष विशेष काही माहिती देत नाहीत. उत्खननात सामान्यतः सर्व नवीन शहरे जुन्या शहरापासून थोडीच दूर आढळलेली आहेत. शहराचा पसारा वाढण्याची पद्धत एकच. जवळचे नवनवीन क्षेत्र व्यापीत जायचे. मला कधी वाटतं की आजपासून सातआठशे वर्षांनी गिरगाव- भायखळा हे अवशेषांत मोडतील आणि दहिसर-विरार हे मुंबई झालेले असेल! )
कान्यकुब्ज नावामागची आख्यायिका – या ब्रह्मदत्त राजाच्या धर्मपालनाची आणि सुज्ञपणाची कीर्ती सगळीकडे पसरली होती. त्याला १०० कन्या होत्या. एकदा “महावृक्ष’ नावाचे ऋषि त्याच्याकडे आले. त्यांचे नाव महावृक्ष पडले कारण अनेक वर्षे  समाधीत राहिल्यामुळे ते न्यग्रोध वृक्षाने आच्छादले गेले होते. समाधीतून जागे झाल्यावर अरण्यातून हिंडतांना त्यांना राज्याच्या मुली दिसल्या आणि त्यांची प्रपंचेच्छा आणि कामवासना जागृत झाली.
(टीप : खरं म्हणजे इतकी वर्षे समाधित राह्तो तेव्हा ती निरोधसमाधी असते आणि त्यात जुने संस्कार, वासना इ.पुसले जायला हवे होते.)
म्हणून ते राजाकडे आले आणि त्याच्या मुलींना मागणी घातली. राजाने म्हटले मला जरा वेळ द्या, मी सांगतो. त्याने मुलींना विचारले, पण कोणी तयार झाल्या नाहीत. राजा आता ऋषींच्या कोपाच्या भीतीत होता. तेव्हा त्याच्या सगळ्यात लहान मुलीने त्याच्या चिंतेचे कारण विचारले. राजा म्हणाला की ‘नकारामुळे हे ऋषी जर रागावले तर शाप देतील आणि माझ्या प्रजेचे व धर्मपालनाचे नुकसान होईल.’ तेव्हा मुलगी म्हणाली “ आपल्या राज्याच्या व प्रजेच्या भल्याकरिता मी हा विवाह करण्यास तयार आहे.”  राजाने ऋषिंना ही मुलगी देऊ केली पण ते म्हणाले की ही अशी विद्रूप मुलगी मला का दिली जात आहे? राजा म्हणाला की बाकी ९९ मुली तयार नाहीत, हीच एक आहे. तेव्हा ऋषींनी क्रोधित होऊन शाप दिला की बाकी ९९ मुलींना कुबड येईल आणि त्यांचा विवाह होणार नाही. तो शाप खरा झाला आणि म्हणून ह्या शहराचे नाव कान्यकुब्ज पडले.

सध्या इथे हर्षवर्धन या राजाचे राज्य आहे. याची पदवी ‘ शिलादित्य’ आहे. आधीचा राजा आणि याचा मोठा भाऊ राज्यवर्धन याला शेजारच्या राजाने कपटाने मारल्यावर याला गादीवर बसवले आहे. याने राज्यावर आल्यावर ६ वर्षात पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत स्वा-या करून सर्व राज्ये आपल्या आधिपत्याखाली आणलेली आहेत. याने गंगा नदीच्या किनारी शेकडो स्तूप बांधले आहेत, १०० फूट उंचीचे. तसेच राजमार्ग, शहरे, खेडी यात अनेक धर्मशाळा आणि बुद्धविहार बांधले आहेत. दर ५ वर्षांनी मोक्षसभा – महामोक्षपरिषद-  बोलावतो तेव्हा हा शाही खजिना परोपकाराची कामे करण्यात रिकामा करतो. दरवर्षी श्रमण भिक्षूंची सभा बोलावतो, त्यांना धार्मिक चर्चा करावयास सांगतो आनि स्वतः उपस्थित राहून वाद्विवाद समजतो आणि त्याचे मूल्यमापन करतो. इतर धर्मीयांचा पण आदर सत्कार करतो. मला कामरूप देशाच्या कुमारराजाने भेटीचे आमंत्रण दिले होते. पण मधेच हर्षवर्धनाने कुमारराजाला सांगितले की बाहेरील देशातून आलेल्या श्रमण भिक्षूला घेऊन माझ्या भेटीकरिता नालंदा मठामध्ये आण.

माझी आणि हर्षवर्धन राजाची भेट झाली तेव्हा घडलेले संभाषण :-
हर्षवर्धन- आपण कुठल्या देशाहून आला आणि आपल्या या प्रवासाचे उद्दिष्ट काय ?
हा एन सां – मी थॅंग नावाच्या देशातून आलो आहे. बौद्ध धर्माचे मूळ साहित्य गोळा करण्याच्या उद्देशाने.
हर्षवर्धन   – हा देश कुठे आहे आणि आपण कसा प्रवास केला ?
हा एन सां – हा देश उत्तरपूर्वेला हजारो मैल दूर आहे. याला भारतात महाचीन म्हणतात.
हर्षवर्धन   –  मी ऐकले आहे की या देशाचा राजा ‘त्सिन’ आहे. तरुणपणी आध्यात्मिक वळणाचा आणि मोठा झाल्यावर दैवी योद्धा म्हणून ओळखला जातो. त्यावर स्तुतीपर कविता आहेत ज्या मी ऐकलेल्या आहेत. काय ते सगळे खरे आहे का ?
हा एन सां – हो खरे आहे. पूर्वी आमचा देश चीन म्हणवायचा, आता ‘ महा थॅंग ‘ म्हणवला जातो. या राजाने राज्यावर येताच अराजकता दूर केली, दयाळूपणे राज्य केले, दुष्टांचा नाश केला आणि आता लोकं याच्या राज्यात सुखशांतिपूर्वक नांदत आहेत.
हर्षवर्धन  – फारच छान. अशा पवित्र राजाची प्रजा सुखी आहे.
यानंतर शिलादित्य राजाने (हर्षवर्धनाने) आणि कुमारराजाने ( भास्करवर्मन याने ) आपआपल्या पथकासह कान्यकुब्जकरिता प्रयाण केले. तेथे एक धर्मपरिषद बोलावली होती. शिलादित्याच्या आमंत्रणावरून २० देशांहून तेथे श्रमणभिक्षू, ब्राह्मण, सैनिक आणि दंडाधिकारी अशा लोकांची पथके आलेली होती. दोन्ही राजे नालंदाहून निघून ९० दिवसांनी कान्यकुब्जला पोहोचले.

कान्यकुब्जमध्ये त्याने आधीच नदीकिनारी एक बुद्धविहार आणि त्यासमोर १०० फूट उंचीचा मनोरा उभारलेला होता. त्या दोघांच्या मध्यभागी गौतम बुद्धाची सोनेरी मूर्ती स्थापित केली होती. समोर एक वेदी होती. शिवाय जरा दूर विश्रामगृहे व मंडप होते. मूर्तीला हत्तीवर बसवून स्वतः राजा त्यावर छत्रचामरे ढाळीत व फुले, मोती यांचा वर्षाव करीत, मूर्तीला वेदीपाशी घेऊन गेला. त्यात मूर्तीला सुगंधित स्नान घालून मग स्वतः राजा हर्षवर्धनने  बुद्धाची मूर्ती खांद्यावर घेऊन मनोर्‌यात मूर्ती स्थापित केली. नंतर मेजवानी झाली आणि मग धर्मशास्त्रावर चर्चा. असा कार्यक्रम काही दिवस झाल्यावर एक दिवस अचानक आग लागली आणि त्यात विहार, मंडप इत्यादी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. नंतर चौकशी केल्यावर कळले की १००० भिक्षूंचा मानसन्मान केला पण ५०० ब्राह्मणांची विचारपूस न केल्यामुळे रागावून ही आग लावली गेली होती. त्या ५०० जणांना हद्दपारीची शिक्षा दिली.

या ठिकणापासून थोडे दूर ३ विहार आहेत आणि त्यात बुद्धाच्या रत्नविभूषित मूर्त्या आहेत. त्याशिवाय बुद्धाचा एक दात आहे. ह्या दाताच्या दर्शनाकरिता दुरून शेकडो लोक दर्शनाला येतात. गर्दी आणि गोंधळ टाळण्याकरता येथील व्यवस्थापकांनी दर्शनाकरिता एक मोठे सोन्याचे नाणे एवढे दर्शनशुल्क ठेवले आहे. पण तरीही अनेक लोक येतात.

( टीप:-  अर्थशास्त्रीय नियम किती कायम स्वरूपाचे आहेत ! “मागणी वाढल्यास किंमती वाढतात.” हा मुख्य नियम. यावरून ‘मागणी कमी करण्यासाठी किंमत वाढवा’ हा त्यापासून परिणामी उपनियम ! पण श्रद्धा, भक्तिभाव हे या नियमाला जुमानत नाहीत काय ! त्या काळात सोन्याची नाणी वापरात होती असेही यावरून कळते.)
थोड्या दूर दोन मंदिरे आहेत. एक सूर्यदेवाचे आणि दुसरे महेश्वराचे. यांचे बांधकाम निळ्या दगडांत आहे आणि यावर बरेच कोरीव काम आहे. यांचा आकार पण बुद्धविहाराएवढा आहे. परिसर झाडायला आणि सडा घालायला १००० माणसे नेमली आहेत. इथे ढोल आणि भजने हे दिवसरात्र चालू असते.
( टीप: या बाबतीत आपण अजूनही तसेच आहोत. सतत भजने, आरत्या चालू ठेवायला आवडते. आता त्यांत लाऊड स्पीकर आले ! पण दिवस रात्र आवाज म्हणजे जवळ जवळ सतत गणेशोत्सव की ! )

• घटनांच्या कालनिश्चितीबद्दल काही – ऐतिहासिक लिखाणात सनावळी द्यायची पद्धत नव्हती. कुठल्याशा घटनेचा ( उदा. बुद्धाचे निर्वाण ) संदर्भ  घेऊन नंतरच्या  घटना वर्णन करायची पद्धत होती. त्यामुळे अचूक कालनिर्णय हे अवघड काम होऊन बसते. अवशेषांत सापडलेल्या किरणोत्सर्गी कार्बन वरून, वा भाषेच्या बदलावरून, तसेच प्रगतीची सामान्य दिशा पाहून कालनिष्कर्ष काढावा लागते. आणि मग वेगवेगळ्या मतांनुसार वेगवेगळे काल निष्कर्षित केले जातात.

या दोन्ही प्रवाशांच्या वर्णनांत मिळून ३ संदर्भ मिळतात. ते असे:–
अ) उद्यान या प्रदेशांत (पाकिस्तानातील दरिल नदीच्या खोर्‌यात) पाऊल ठेवल्यावर तेथे एक मैत्रेयी बुद्धाची ( भावी बुद्धाची म्हणजे गौतम बुद्धानंतर भविष्यकाळात येणार्‌या बुद्धाची) शंभर फुटी लाकडी प्रतिमा आढळली. तेथील विद्वानांनी विचारले की बौद्ध धर्म पूर्वेला म्हणजे तुमच्याकडे कधी प्रविष्ट झाला ?” फा हिएन म्हणाला की “ आमच्याकडे असे म्हणतात की या प्रतिमेच्या स्थापनेनंतर. ही प्रतिमा बुद्धाच्या निर्वाणानंतर ३०० वर्षांनी म्हणजे पिंग वॉंन्ग चौ या राजाची कारकीर्द चालू असतांना स्थापिली गेली. पिंग वॉंन्ग चौ हा राजा इ.स. पू. ७२० ते ७७० च्या दरम्यान होऊन गेला. म्हणून निष्कर्ष : गौतम बुद्धाचे निर्वाण त्याआधी ३०० वर्षे म्हणजे सुमारे इ.स.पू. १०२० ते १०७० मध्ये झाले असावे. आपल्याला माहीत करून दिलेल्या प्रचलित सनावळीशी याचा मेळ बसत नाही. आपल्याला माहिती असलेल्या प्रचलित सनावळी प्रमाणे बुद्ध इ.स.पू. ५०० वर्षांच्या आसपास होऊन गेला. आणि फा हिएनच्या उद्गारांप्रमाणे इ.स.पू. १०५० वर्षांपूर्वी होऊन गेला.
ब) फा हिएन श्रीलंकेला गेला असतांना त्याने हे ऐकले की तिसर्‌या महिन्याच्या मधल्या दिवशी बुद्धाचा दात दर्शनाकरिता बाहेर आणतात. त्या आधी १० दिवस राजा बुद्धाच्या त्यागपूर्ण आयुष्याबद्दल दवंडी पिटवतो आणि त्यात हे सांगतो की “ बुद्धाने निर्वाण केल्याला आता १४९७ वर्षे लोटली आहेत. “ ( हे वर्णन लोकांकडून ऐकून केले असावे. फा हिएन ने स्वतः ही दवंडी ऐकली नसावी असे वर्णनावरून वाटते.) फा हिएनचा श्रीलंकेतील वास्तव्याचा  काळ अंदाजे इ.स. ४११ आहे. याचा अर्थ इ.स. ४११ मधून १४९७ वजा केल्यावर काळ येतो इ.स.पू. १०८५.
क) फा हिएन चा काळ – त्याच्या स्वतःच्या प्रवासवर्णनात त्याचा काळ स्वतंत्रपणे निश्चित करण्यासारखे काही मिळत नाही.

ड) हाइ एन सां चा काळ त्याच्या प्रवासवर्णनातील संदर्भांवरून:-
–हाइ एन सां याची जेव्हा हर्षवर्धनाशी भेट झाली तेव्हाच्या संभाषणात तो हे म्हणतो की मी थॅंग (तुंग ?) देशातून आलो आहे. तेथील राजा फार प्रसिद्ध आहे. थॅंग (किंवा तुंग) वंशाची कारकीर्द इ.स. ६१८ ते इ.स. ९०७ पर्यंत होती असे चिनी इतिहासकारांच्या लिखाणातून कळते. म्हणजे हिएन सां चा भारतातील काळ जो दिला आहे – इ.स. ६२७ ते इ.स. ६४५ – तो बरोबर असावा.
यामुळे राजा हर्षवर्धन याची कारकीर्द पण आपोआप निश्चित झाल्यासारखी होते. ती इ.स. ६०६ ते इ.स. ६४७ अशी मानली जाते. ती बरोबर दिसत आहे.
— कुमारराजा म्हणजे कामरूपचा राजा भास्करवर्मन आणि हर्षवर्धन हे समकालीन होते हे हाइएन सांच्या भास्करवर्मनला केलेल्या ‘कुमारराजा’ या निर्देशनावरून आणि त्याच्या बरोबर प्रवास केल्याचे सांगितल्यावरून सिद्ध होते. भास्करवर्मनचा काळ सातवे शतक होता हे ब्रिटिश आणि भारतीय इतिहासकारांतर्फे नमूद आहे.
यापुढील लेखात हाइएन सां ने भेटी दिलेल्या अन्य प्रदेशांचे वर्णन पाहू. त्यात अयोध्या, मथुरा, आंध्र, महाराष्ट्र, भरुच, आसाम इत्यादींबद्दल त्याची निरीक्षणे व हकीकती पाहू. शेवटी हाइ एन सांच्या पूर्ण प्रवासाचा सारांश पाहू. चिनी प्रवाशांचे वर्णन त्यांत समाप्त होईल.

अधिक माहिती करिता हाइ एन सांचा प्रवासमार्ग व हर्षवर्धनाचे साम्राज्य यांचा नकाशा खाली देत आहे.

हाइ एन सांचा प्रवासमार्ग Travel Map To India

हर्षवर्धनाचे साम्राज्य  Harshvardhan’s  empire

 

Hsuan Tsang

 [ क्रमशः – या लेखाचा अंतिम भाग पुढील अंकात येत आहे.  ]
– ©️ विलास सातपुते,

भाग २, प्रकरण ४
हाइएन सां चे वर्णन : ३ – अंतिम 

हाइएन सां हा बौद्ध चिनी प्रवासी आपल्या बुद्धधर्मीय साहित्य गोळा करण्याच्या मोहिमेकरिता भारतातल्या  इ.स. ६२७ ते इ.स. ६४५ या कालावधीतल्या वास्तव्यात  इतर अनेक राज्यांना भेटी देतो व प्रत्येक ठिकाणी बौद्ध धर्मीयांचे मठ-विहार, देवांची देवळे, लोक, पीक, हवामान, चालीरीति इत्यादीबद्दल नोंदी करीत जातो. त्याच्या या वर्णनातून अनेक रोचक अणि माहितीपर गोष्टी कळतात. तसेच काही विरोधाभासी गोष्टीही नजरेला येतात.

प्रकरण २ मध्ये आपण उत्तरेकडील काही राज्यांचे वर्णन जाणले आणि त्याच्या प्रवासाची कालनिश्चिती करायचा प्रयत्न केला, काही निष्कर्ष काढले. या शेवटच्या लेखात उरलेल्या प्रवासाचे वर्णन पाहू आणि काही चर्चा करू. या वर्णनात बरेचसे प्रदेश आपल्या चांगल्या ओळखीचे असल्याने त्यांच्याविषयी वाचताना उत्सुकता बरीच वाढू शकते.
हाइएन सां आपल्या भारतवर्णनात काश्मिर, पाकिस्तान इत्यादि प्रदेशांच्या दक्षिणेकडील इतर  काही देशांचे/राज्यांचे वर्णन देतो. ते खालीलप्रमाणे.

• जालंधर – ४०० कि.मी. लांब आणि ३०० कि. मी. रुंद अशा या राज्याची जमीन धान्य पिकवण्याकरता फार चांगली आहे आणि या राज्यात तांदुळाचे पीक जास्त आहे. इथली अरण्ये घनदाट आहेत आणि फळे-फुले यांनी समृद्ध आहेत.आहेत. येथील लोक शूर आणि गरम स्वभावाचे आहेत. पण दिसायला साधे आणि खेडवळ आहेत. घरे धनधान्याने भरलेली आहेत. ५० मठ आहेत आणि त्यात २००० भिक्षू राहतात. इथे 3 देवळे आहेत आणि त्यात ५०० दुसर्‌या धर्माचे लोक आहेत. ते मुख्यतः पाशुपत पंथाचे, राख फासणारे आहेत.

( टीप : जालंधर म्हणजे आजचा पंजाब प्रदेश. सध्या भारतात सर्वात जास्त तांदूळ पिकवणार्‌या प्रदेशात याचा क्रमांक पहिल्या तिनांत आहे. ह्यू एन त्सॅंगच्या नोंदीवरून हे दिसत आहे की तेव्हापासूनच हा तांदूळ पिकवणारा प्रदेश आहे. पिके ही जमीन आणि वातावरण यांवर अवलंबून असल्यामुळे, आणि ह्या दोन गोष्टी वर्षानुवर्षे तशाच राहत असल्यामुळे पिकात सहसा बदल होत नाही. पण घनदाट अरण्ये हे काही पंजाबचे लक्षण नाही. पंजाबात अरण्ये केवळ ३-४ % जमीन व्यापतात. भारत देशात अरण्यव्याप्ती सरासरी २०-२५ % आहे. या अर्थी पंजाबखेरीज अजून कुठल्यातरी प्रदेशाबद्दल हे निरीक्षण असावे. जवळच उत्तराखंड मध्ये ४५ % जमीन अरण्याने व्यापलेली आहे. पण इथे तांदूळ तेवढे पिकत नाहीत.)

• कुलुटा ( कुलू खोरे)  – जालंधरहून ईशान्येकडे जाऊन दुर्गम द-या खोरी पार केल्यावर कुलुटा हा मोठा प्रदेश लागतो. इथले मुख्य शहर सुमारे ६ कि.मी.व्यासाचे आहे. या प्रदेशात पण फळेफुले खूप आहेत. आहेत. जमीन सुपीक आहे आणि ब-याच वन्यौषधी इथे उगवतात. हवा फारच थंड आहे आणि बर्फ पडत असते. या प्रदेशात सोने, रुपे आणि तांबे बरेच मिळते. येथील लोक दिसायला असभ्य वाटतात, स्वभावाने कडक आणि भयंकर वाटतात. न्याय आणि शौर्य यांची किमत करतात. या ठिकाणी २० मठ आणि १००० भिक्षू आहेत. बहुतेक महायानपंथी आहेत. सुमारे १५ देवळे पण आहेत. इथे पर्वतावर काही दगडी गुहा आहेत तिथे अर्हत (बौद्ध योगी) किंवा दुसरे योगी राहतात.

( टीप: रुपे आणि तांबे हे आजही राजस्थान, हरियाना या भागात मिळते. तेव्हापासून हे धातू गाळण्याची पद्धत होती. अर्थात तेव्हा ती लहान प्रमाणात असेल. आता मोठ्या प्रमाणावर आहे. पिकांप्रमाणेच खनिजेही एखाद्या भूभागाचे अविभाज्य अंग असतात. निसर्गाने गोळा करून ठेवलेले ठेवे आपण शोधतो आणि वापरतो. पंजाब, उत्तराखंड, हरियाना हे सगळे लगतचे प्रदेश आहेत आणि ह्यू एन त्सॅंगचे निरीक्षण आजच्या आपल्या माहितीशी जुळत आहे. भिक्षू वा योगी अगदी पूर्वी नैसर्गिक गुहांमध्ये राहायचे. पण या काळात त्यांची संख्या व धर्माला दिलेला राजाश्रय हे पाहता दगडी गुहा बांधायची गरज निर्माण झाली असावी.)

• मथुरा ( पान १८१) – हे राज्य मोठे आहे. येथील जमीन पण सुपीक आहे. इथे आवळ्याचे पीक खूप येते. इथे सुती धागा होतो तसेच सोने पण मिळते. इथले लोक मृदु स्वभावाचे आणि समाधानी आहेत. ते सद्गुण आणि विद्वत्ता यांना महत्त्व देतात.
( टीप: कुलूच्या डोंगराळ प्रदेशातील लोक आणि मथुरेच्या सपाट सुपीक प्रदेशातील लोक या दोन लोकांतील फरक नोंदण्याजोगा आहे. एक शौर्याला किमत देतात तर दुसरे विद्वत्तेला, एक न्यायाला किंमत देतात तर दुसरे सद्गुणाला – सर्वांत सद्गुण असतील तर बव्हंशी न्याय साध्य होईलच. ग्रीक तत्त्ववेत्ते सॉक्रेटिस आणि प्लेटो हे पण सद्‌गुणाला महत्त्व द्यायचे आणि सत्य ज्ञानातून सद्गुणी वर्तन होईल असे प्रतिपादित करायचे. परिस्थितीप्रमाणे गुणांना महत्त्व प्राप्त होते. जिथे आक्रमणांना सारखे तोंड द्यावे लागत असेल तिथे अर्थातच शौर्य जास्त महत्त्वाचे ठरते.) इथे २० मठ आणि २००० भिक्षू आहेत. ते महायान अथवा हीनयानाचे पंथी आहेत.  ५ देवळे आहेत आणि त्यात निरनिराळे देव आहेत. याशिवाय अशोक राजाने बांधलेले तीन स्तूप तसेच बुद्धाच्या शिष्यांच्या नावाने  ४ स्तूप आहेत. आणि दर महिन्यात जेव्हा ६ दिवसांचा उपास असतो तेव्हा इथे स्तूपांना सजवणे, संगीत लावणे, फुले उधळून त्यांचा पाऊस पाडणे, नैवेद्य दाखवणे  इत्यादि प्रकारांनी उत्सव साजरा केला जातो. येथील राजा आणि मंत्री पण उत्सवात भाग घेतात, मदत करतात.
( टीप : बुद्धाच्या शिष्यांनाही पूज्य मानले जाते. कारण त्रिपिटक हे ३ ग्रंथ लिहिण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. अ) ‘विनयपिटक’ हा ग्रंथ ‘उपाली’ या शिष्याने म्हणून दाखवलेल्या श्लोकांचे संकलन आहे. या ग्रंथात बौद्ध भिक्षूंनी वागण्याचे नियम आहेत. आ) सुत्तपिटक हा ग्रंथ बुद्धाच्या दूरच्या भावाने –‘आनंद’ याने – म्हणून दाखवलेल्या सूत्रांवर आधारित आहे. या ग्रंथात बुद्धाची व्याख्याने व शिकवणूक सूत्रबद्ध आहे. इ) ‘अभिधर्मपिटक’ हा ग्रंथ कुणा एका शिष्याने सांगितलेला नाही. पण बुद्धाचा एक शिष्य ‘सारिपुत्र’ याचा या ग्रंथात बराच हातभार असावा. या ग्रंथात बुद्धाचे सिद्धांत, तत्त्वज्ञान इत्यादि विशद केले आहे. हे तीन ग्रंथ बुद्धाच्या महानिर्वाणानंतर शंभर एक वर्षांनी रचले गेले. हिंदुंना जसे वेद-मनुस्मृति तसे बौद्धधर्मियांना हे तीन ग्रंथ. हे मिळवण्याकरिताच चिनी प्रवासी भारतात आले.)

अयोध्या – अयोध्या राज्य जवळ जवळ २००० कि.मी. परिघाचे आहे. त्याच्या राजधानीपासून २० कि. मी. दूर गंगा नदी आहे. इथे १०० बौद्ध मठ आहेत, ३००० भिक्षू आहेत. देवळे १० आहेत. फळेफुले आणि धान्य खूप होते.

( टीप : अयोध्येचे कान्यकुब्जपासून वर्णिलेले अंतर व दिशा इत्यादीवरून हे अयोध्येऐवजी वेगळे शहर असावे का काय अशी शंका येते. शरयू नदीचा उल्लेख नाही. गंगेचा आहे. नेहमीप्रमाणे अनेक मठ, स्तूप व भिक्षूंची संख्या हे आहे. तसेच बुद्धाच्या शिष्यांविषयीच्या आख्यायिका आहेत. अयोध्येच्या रामजन्मभूमिवरील राम मंदिराचा उल्लेख नाही. पण राम मंदिर तेव्हा नसावे. नक्की कधी ते निर्माण झाले याचा नीट उल्लेख मिळत नाही. कुठल्याच ऐतिहासिक लिखाणात त्याचा उल्लेख नाही. एक सामान्य मंदिर बाबरच्या सैनिकांनी नष्ट करून मशिद बांधल्यामुळे प्रसिद्धीस आले असावे का काय ?)

यानंतर बनारस – येथील लोक दिसायला चांगले आहेत. श्रीमंत आहेत. विद्याभ्यासाकडे जास्त लक्ष देतात. स्वभावाने मृदू आणि मानवतापूर्ण आहेत. बव्हंशी लोक देवांना मानतात, बुद्ध धर्माला नाही. येथे ३० बौद्धविहार आहेत आणि ३००० भिक्षू आहेत. या तुलनेत देवांची मंदिरे १०० आहेत आणि त्यात १०००० देवभक्त आहेत. हे लोक मुख्यतः महेश्वराला पूजतात. राजधानीत जे देऊळ आहे त्यात महेश्वराची तांब्याची मूर्ती आहे, ती फार चांगली आणि भव्य आहे. धर्मभक्त लोक खडतर तपस्येने जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्यामागे आहेत.

( टीप :- हे देऊळ अर्थातच सध्याच्या काशी विश्वेश्वराच्या देवळापेक्षा वेगळे असणार. सध्याच्या देवळात मूर्ती नाही; ज्योतिर्लिंग आहे. सध्याचे देऊळ नजीकच्या इतिहासात निर्माण झालेले आहे. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे. पण या जागेत भगवान शंकराची उपासना अनेक वर्षांपासून प्रचलित दिसते.)

• कामरूप : ( पान १९५-९६. आजचा आसाम, मणिपूर इत्यादी प्रदेश.) येथे अननस आणि नारळ हे पिकतात. येथील लोक काळसर-पिवळसर कांतीचे, प्रामाणिक, उतावळ्या आणि रानटी स्वभावाचे आहेत. भाषा मध्य भारतापेक्षा वेगळी आहे. पूर्वेला मोठे पर्वत आहेत आणि हा देश तेथे महाचीन देशाच्या प्रदेशाला संलग्न आहे. या प्रदेशात बरेच हत्ती आहेत आणि त्यांचा युद्धात मोठा वापर होतो. मुख्य म्हणजे इथले लोक बुद्धाला मानत नाहीत, देवांना मानतात. त्यामुळे इथे एकही विहार, मठ नाही. येथील राजाचे नाव भास्करवर्मन आहे. तो ब्राह्मण जातीचा आहे. तो नारायणपंथी आहे. इथे बरेच पंथ आहेत. भास्करवर्मन राजा विद्वत्ता, ज्ञान यांचा पुजारी आहे. दुरून लोक त्याच्या राज्यात त्याच्या दरबारी जागा मिळावी म्हणून येतात. तो जरी बुद्धाला मानत नसला तरी बुद्ध भिक्षूंच्या विद्वत्तेचा आदर करतो. त्यानेच चीनहून आलेल्या प्रवाशांना निमंत्रण दिले होते. माझी त्याच्याशी भेट झाली तेव्हा असे संभाषण झाले:

राजा – जरी माझ्यात विद्वत्ता नसली तरी मला ज्ञानाची आवड आहे. तुम्ही एवढ्या लांबून त्रास, धोका यांची तमा न बाळगता इथे धर्माभ्यासाकरिता आलात, यात तुमच्या त्सॅंग ( थॅंग वा तुंग)  राजाची लोकांमध्ये बदल घडवण्याची शक्ति दिसून येते. अशा राजाला मला भेटणे आवडेल, पण पर्वत आणि नद्या मधे येतात. सध्या शिलादित्य राजाने सर्व ब्राह्मण व श्रमण भिक्षू यांना चर्चेकरिता आणि दान घेण्याकरिता बोलावले आहे. आपण माझ्याबरोबर तेथे चलावे. ( हाइएन सां ने भास्करवर्मन्‌ याला कुमारराजा या नावानेही निर्देशित केले आहे. कुमारराजाबरोबर कान्यकुब्जला गेलो असे नमूद केले आहे)
• नालंदा:  नालंदाच्या विद्यापीठस्थापनेविषयी हाएन सां लिहितो की – शक्रादित्य नावाच्या राजाने ह्या जागेची निवड केली आणि विहाराचे बांधकाम चालू केले. तेव्हा एका निर्ग्रंथ पंथाच्या भविष्यवेत्त्याने भविष्यवाणी केली की ही जागा फार शुभ आहे. इथे संघराम – मठ/ विहार- बांधला गेला तर तो फार प्रसिद्ध होईल. इथे पाचही भारतातून ( मध्य भारत, पूर्व भारत इत्यादि) विद्यार्थी येतील. हजार वर्षांपर्यंत हे केंद्र भरभराटीत राहील. त्याचा मुलग़ा बुद्धादित्य राजा याने जवळच अजून एका विहाराची बांधणी केली, त्यानंतरचा  राजा ‘तथागतगुप्त’ याने अजून एक विहार बांधला आणि त्यानंतर बालादित्य राजाने. नंतर त्याच्या मुलाने आणि नंतर मध्य देशातील काही राजांनी त्यात विहार जोडले. अशा रीतिने नालंदा विद्यापीठ वाढत गेले. हे प्रामुख्याने बौद्ध विद्यापीठ होते. इथे चर्चेद्वारे शिक्षण ही पद्धती आहे. अनेक विद्वान विद्यार्थी आपल्या शंकानिरसनाकरिता इथे येतात. येणार्‌या भिक्षूला काही मूळ ज्ञान आवश्यक असते आणि त्याची परीक्षा प्रवेशद्वारापाशी अवघड प्रश्नाद्वारे होते. साधारण १०% विद्यार्थीच ही कठीण परीक्षा उत्तीर्ण होतात. आणि प्रवेश मिळाल्यावरही ३% विद्यार्थी नीट चर्चा न करता आल्यामुळे वा न कळल्यामुळे अनुत्तीर्ण व्हायचे प्रमाण आहे.
(टीप : नालंदा विद्यापीठ हे मुख्यतः बौद्धांचे विद्यापीठ होते. एथे चार विद्या – हेतुविद्या वगैरे – यांचे अध्ययन व चर्चा होत असत. स्वतः हाएन सां तेथे राहून शिकला असे म्हणतात,  पण हे त्याने त्याच्या प्रवासवर्णनात कसे लिहिलेले नाही ? सापडलेल्या अवशेषांनुसार या विहारात सुमारे ३००० विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय होती. ब-याच राज्यांनी देणगी म्हणून गावे विद्यापीठाच्या नावावर केली होती. सुमात्रा देशाच्या राजाने सुद्धा काही गावे दिली होती.  हिंदू राजे सुद्धा देणग्या देत. इ.स १२०० च्या सुमारास बख्तियार खिलजीच्या सैनिकांनी लुटालूट केली त्यात नालंदा विद्यापीठास आग लावली असे काही इतिहासकार लिहितात. तर काही तसे लिहीत नाहीत. आगीचे अवशेष दिसतात हे नक्की. या हल्ल्यातून जीव वाचवून अनेक भिक्षू ग्रंथ इत्यादि घेऊन  पळाले. बरेचसे तिबेटमध्ये गेले म्हणतात. तिथे त्यांनी नवीन विद्यापीठ थाटले. नालंदा विद्यापीठाला या नाशातून वर आणण्याकरिता जयदेव नावाच्या हिंदू ब्राह्मणाने बरीच मदत केली म्हणतात. पण ते विद्यापीठ नंतर फार वर्षे टिकले नाही.).

नालंदा विहाराचे अवशेष

हाइएन सां यानंतर कोसल. उद्रि आणि कलिंग (दोन्ही आजच्या ओरिसा-आंध्रचे भाग), आंध्र (आंध्रचा भाग ), धनकटक (आंध्र प्रदेशाचा अजून एक भाग), द्रविड ( याची कांचिपुरम्‌ राजधानी) येथे प्रवास करत महाराष्ट्रात पोहोचला.
• महाराष्ट्र – हा देश हर्षवर्धन जिंकू न शकलेला देश आहे. . पुलकेशी राज्याच्या अंमलाखाली आहे. लोकांचे विशेष वर्णन असे आहे. येथील लोक उंच, काळसर, कडक स्वभावाचे, सूडबुद्धीचे, प्रामाणिक व सरळ, शत्रूला सूचना देऊन युद्ध करणारे, वाटेल तशी मदत करणारे, युद्धाआधी मद्यप्राशन करणारे असे आहेत. या देशाच्या पूर्व सीमेवर खदकांमध्ये एक मोठा विहार आहे, १०० फूट उंचीचा. याच्या भिंती रंगीत आहेत आणि त्यावर बुद्धाच्या जीवनातील प्रसंग कोरून काढलेले आहेत. इथे मोठे प्रार्थनागृह आहे.

( टीप: ज्याला हा महाराष्ट्र संबोधत आहे तो  महाराष्ट्राचा नगर, औरंगाबाद, व खानदेश हा भाग असावा.  पूर्वेला अजंठा येथील गुहा व बौद्ध मंदिरे. हीच अजंठाची प्रसिद्ध लेणी असावीत. यांत बुद्धाच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत. )


अजंठा येथील विहार. मध्ये चौकोनी आंगण आणि चार बाजूंना भिक्षूंची वास्तव्य करण्याच्या खोल्या.

पूजा-प्रार्थना यांकरिता सभामंडप


• भरुच प्रदेश : यानंतर नर्मदेपलीकडे जो .देश आहे तो भरुकच्च आहे. येथील जमीन क्षारयुक्त आहे, समुद्राच्या पाण्यातून मीठ काढतात. सर्व नफा समुद्रापासून कमवतात. लोकं सज्जन नाहीत. हवा गरम आहे. बाकी तेच वर्णन ( हे वर्णन सध्याच्या गुजरातेशी जुळत आहे)
 माळवा : हे राज्य माही नदीने वेढले आहे – पूर्वेला आणि दक्षिणेला. इथली हवा गव्हाकरिता उपयुक्त आहे.

( टीप : माळव्याचा गहू आजही प्रसिद्ध आहे. विशेषतः सीहोर सरबती, चंदोसी या नावांचे. तसेच लोकवन अशा नावाचा गहू पण प्रसिद्ध आहे.)
लोक  सद्गुणी, सौम्य आणि विद्वान अहेत. यांची विद्वत्ता खूपच गहन आहे. भाषा मोहक आहे. मगध आणि मालवा ही दोन राज्ये येथील लोकांच्या विद्वत्तेमुळे विशेष म्हणता येतील. लोकं अभ्यासू आहेत. पण येथील जास्ती लोक बुद्धाला मानत नाहीत. दुसर्‌या धर्माला ( देवांच्या धर्माला ) मानतात. बहुतेक लोक पाशुपत पंथाचे आहेत. सुमारे १०० विहार आहेत, त्यांत २००० भिक्षू आहेत. देवांची देवळे पण १०० आहेत.

हाइ एन सां च्या या तपशीलवार वर्णनावरून सारांशाने असे दिसते :-
१. त्या काळात धार्मिक भावनांना अत्यंत महत्त्व देत होते –  बौद्धधर्मीय आणि सनातन धर्मीय दोघेही. मठ, स्तूप, विहार, देवळे इत्यादि बांधण्यात आणि उत्सव करण्यात बराच खर्च केलेला नजरेला येतो. पण हे बहुतेक इतिहासाच्या सर्व काळात दिसते. प्रत्येक राजा प्रजेच्या धार्मिक भावनांची कदर करत तसेच त्याचा फायदा घेत राज्य करीत असतो. त्याकरिता मंदिरे, मशिदी, चर्च इ.बांधणे अशा कामगि-या केल्या जात होत्या आणि आजही केल्या जातात. आजही  देवळे, पुतळे यांची उभारणी केली जातेच की. प्रत्येक राजा आपल्यामागे आपली  स्मृती अशा बांधकामांच्या रूपाने ठेवण्याच्या खटपटीत असतो.

राजा आणि प्रजा दोघेही धार्मिक वृत्तीचे म्हणून वर्णनात आले आहे. राजे विद्वत्तेचा, धर्मगुरूंचा आदर करणारे आणि भक्तिचे प्रदर्शन करणारे होते.  आजही राज्यकर्ते धार्मिक वृत्तीचे आहेत असे वाटेल. पण लोकशाहीत ते लोकांच्या धार्मिक भक्तिभावाचा राजकारणाकरिता वापर करतात की काय असेही वाटते. लोकांची मने संतुष्ट राखण्याकरिता राज्यकर्त्याला हे करावेच लागत असावे.
२. बनारस, माळवा, काश्मीर, आसाम  इत्यादी देशात सनातन धर्माचे प्रामुख्य तर आजचा उत्तर पाकिस्तान, बिहार इत्यादि ठिकाणी बौद्ध धर्माचे प्राबल्य होते. पण दोन्ही धर्मीय सलोख्याने वागत. दोन्ही धर्मात ज्ञान, विद्वत्ता, बौद्धिक चर्चा यांस विशेष महत्त्व होते. बहुतेक राज्यात बौद्ध आणि हिंदु बरोबरीच्या संख्येने होते आणि बरेच सलोख्याने राहत होते. खरी सहिष्णुता दिसते.
३. बहुतेक सर्व ठिकाणी मंदिरे आणि बौद्ध मठ बरोबरीने होते. बौद्ध मठात राहण्याची व्यवस्था होती. भिक्षू तिथे राहून धर्माचा अभ्यास, चर्चा इत्यादि करीत असत.
४. नालंदा विद्यापीठाची बांधणी कशी होत गेली त्याचा तपशील खालीलप्रमाणे:
) कुमारगुप्त१ उर्फ शक्रादित्य – नालंदा विहार बांधण्यास सुरुवात याने केली. (इ.स. ४१५ ते ४५५)
) बुद्धगुप्त – इ.स ४७६ ते ४९५. कुमारगुप्त१ चा नातू, कुमारगुप्त२ चा भाऊ. याने दक्षिणेला एक विहार बांधला.
) तथागतगुप्त – बुद्धगुप्ताचा मुलगा. त्याने पूर्वेला एक विहार बांधला.
) बालादित्य राजा – नरसिंह गुप्त ह्या नावाने परिचित. ( कारकीर्द  इ.स. ४९५ ते इ.स. ५३० ). याने ईशान्येला अजून एक विहार बांधला.
) वज्र – नरसिंह गुप्तचा मुलगा. याने पण अजून एक विहार अजून पश्चिमेला बांधला.
 ) यानंतर अजून एका मध्य भारतातील राजाने अजून एक विहार बांधला.
अशा रीतीने नालंदा विहाराचे व विद्यापीठाचे  बांधकाम ५-६ पिढ्या किंवा सुमारे १५० वर्षे चालले.

आपण हाइ एन सां आणि फा हिएन या दोन प्रवाशांची वर्णने वाचली. यातील बरीचशी माहिती ऐकीव आहे, पण त्या काळातील ऐकीव आहे. सामान्यतः काळाच्या ओघात माहिती व वस्तुस्थिती यात विसंगत्या हळू हळू वाढत जातात, पण अधिक कालावधी लोटायच्या आधी जी माहिती कानावर येते ती ऐकीव असली तरी त्यात विसंगती कमी असते. म्हणून या वर्णनाची विश्वासार्हता थोडी अधिक. हे सर्व काही या प्रवाशांनी प्रत्यक्ष अनुभवले नाही. काही काहीच अनुभविले व पाहिले. पण प्रवासात लोकांकडून जे कानावर आले तेही ते लिहीत गेले. त्यामुळे यांची माहिती पण आपण पडताळून मगच स्वीकारली पाहिजे.

येथे आपले चिनी प्रवाशांनी केलेले भारताचे वर्णन संपते. यानंतर अल बिरुनी या पर्शियन विद्वानाने केलेले भारताचे वर्णन पुढील लेखात पाहू.

ह्यू एन त्सॅंगचा भारत प्रवासाचा मार्ग

नकाशा

लेखमाला समाप्त ]

 – ©️ विलास सातपुते,
भोपाळ
vilas.satpute54@gmail.com


सातपुतेजींना वंदन..खूपच विलक्षण माहिती होती तीन ही भागात.. ही जी शहरांची नावे आहेत ती त्याच्या वर्णनात ही तशीच्या तशीच आहेत का ? इतकी विस्तृत माहिती आहे त्याच्या पुस्तकात ..लोक, पीक, हवामान, देवळे, वगैरे..थक्क झाले आहे मी . माझे चुलत सासरे शेती विषयक तज्ज्ञ होते. ते माळव्यात गहू छान पिकतो..सांगायचे…आजचा प्रसिद्ध सिहोर गहू हा त्यांचाच शोध. ते हाईएन सां च्या वर्णनात वाचून आश्चर्य वाटतेच. धन्यवाद

ऐतिहासिक वाचनाकरिता लागणारा मूलभूत प्रश्न आहे. प्रश्न आहे “ या वर्णनात हा एन सां ने शहरांची नावे जशी इंग्रजी भाषांतरात आहेत तशीच वापरली आहेत का ? “. उत्तर आहे ”नाही. शहरांची नावे चिनी भाषेत आहेत.” मग त्या नावावरून तो ह्याच शहराबद्दल बोलतोय हे कशावरून ? ‘ हा पुढील उत्स्फूर्त प्रश्न येतो. त्याचे उत्तर : “ उच्चारसाम्यावरून शहराच्या वर्णनावरून, आणि आधीच्य शहरापासून त्याने दिलेल्या अंतरावरून इतिहासकार ठरवतात की हेच ते शहर आहे”.

उदा. : 1) हा एन सां ने एका शहराकरिता “kie jo kio she kwo” या नावाचा वापर केला आहे. पुढे तो म्हणतो की या शहराचे मूळ नाव “ Kieu su mo pu lo “ होते व इथे ब्रह्मदत्त राज होता. आ उच्चार कुसुमपूर या उच्चाराला मिळता जुळता आहे आणि कान्यकुब्जचे मूळ नाव “ कुसुम्पूर” होते म्हणून हे कान्यकुब्ज. तसेच हे शहर गंगेच्या पश्चिम किनार्‌याला आहे व आधीच्या संकिसा शहरापासून दिलेल्या अंतरावरून ह्या शहराची ओळख नक्की केली गेली. शिवाय कुबड असलेल्या मुलींची आख्यायिका पण दिली आहे. आणि कुब्जा म्हणजे बुटकी किंवा कुबड असलेली.

2) पुढे एका शहराकरिता त्याने लिहिले आहे की अजंठा पासून पश्चिमेला 500 किमी. गेल्यावर ‘नइमोतो’ नदी ( नर्मदा नदी)  ओलांडल्यावर “ Po lu kie che po” हे राज्य लागते. इथे जमीन खारी आहे. या दोन वर्णनांवरून हे भरुकच्छ आहे असे कळते. वराहमिहिरच्या बृहद्संहितेत याचा ” भरुकच्छ ” नावाने संदर्भ आहे तर भागवत पुराणात ” भृगुकच्छ” या नावाने. हाच आजचा भरुच जवळचा प्रदेश.

3. एका राज्याला/ शहराला तो “ Po lo ni sse” नावाने निर्देशित करतो. कुशिनगरापासून 250 किमी दूर हे राज्य आहे आणि त्याच्या राजधानीच्या पश्चिमेला गंगाकिनारा आहे. पुढे एका स्तूपाचे ठिकाण देतांना तो म्हणतो की ” हा स्तूप राजधानीच्या उत्तरेपूर्वेला वरणा नदीजवळ आहे. आता आपल्याला हे माहेत आहे की वाराणसी हे असि आणि वरुणा या गंगेच्या दोन उपनद्यांजवळ आहे. अशा रीतिने पोलोनस्सी हे चिनी भाषेतील शहर म्हणजे वाराणसी ठरते.

4. अशाच रीतिने मथुरा हे ” मोतुला” या नावावरून आणि सिंध प्रदेश हा ” शिंतु” या नावावरून आणि इतर वर्णनांवरून निष्कर्षित होतो.

काही काही शहरांचा चिनी उच्चार शोधायचा मी प्रयत्न केला पण अनायासे मिळाला नाही.  








श्रीयुत विलास सातपुते यांनी लिहिलेला ह्यूं एन संग या चिनी प्रवाशावरील लेखाचा तिसरा भाग वाचून खूपच बरं वाटलं. याविषयी मला थोडं काही सांगावसं वाटतं ते असं…

इसवी सन 1197 या वर्षी बक्तियार खिलजी या आक्रमकानं नालंदा विश्व विद्यापीठ संपूर्णपणे जाळून नष्ट केलं . नालंदा विद्यापीठामध्ये जे वाचनालय होतं त्या वाचनालयामध्ये एकूण एक लाख पुस्तक / ग्रंथ उपलब्ध होते आणि एकूण नऊ मजली इमारतीमध्ये ते व्यवस्थित ठेवलेले होते. या खिलजी नामक आक्रमकानं हे संपूर्ण वाचनालय सुद्धा जाळून नष्ट केलं आणि इथले ग्रंथ पुढील सहा महिन्यापर्यंत जळत राहिले असं सांगितलं जातं. आपल्याकडे असलेली अमोल ग्रंथसंपदा या जळीत कांडामध्ये संपूर्णपणे नष्ट झाली. बरेचदा लोक म्हणतात की जर आपल्याकडे पूर्वी हे होतं,ते होतं ,अशा बऱ्याच गोष्टी सांगतात, तर मग ते पुढे का राहिलं नाही याचं कारण बहुधा हेच असावं की सगळे ग्रंथ असे आपल्यावर झालेल्या असंख्य आक्रमणाच्या वेळेस झालेल्या जळीत कांडा मध्ये नष्ट झाले.

एक नशिबाचा भाग म्हणजे हा hyu एन संग जेव्हा चीनला परत गेला तेव्हा त्याने स्वतःबरोबर बैल आणि उंटावर लादून एकूण सहाशे ग्रंथ चीनमध्ये नेले आणि पुढे त्याचे चिनी भाषेत भाषांतर त्याने केले. त्यामुळे तत्कालीन भारताची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा काही शोधांची वगैरे माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला या चिनी भाषेत भाषांतरित झालेल्या पण आज चीन मध्ये असलेल्या भारतीय ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. मला इथे सांगायला अतिशय अभिमान वाटतो की पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूट या प्रसिद्ध संस्थेमार्फत ह्या hyu एन संग याने नेलेल्या ग्रंथांचं परत इंग्रजीमध्ये भाषांतर करायला सुरुवात काही वर्षांपूर्वी केली होती आणि माझे आजोबा (आईचे वडील) डॉक्टर पु वि बापट ( प्रसिध्द प्राच्यविद्या पंडित )यांनी शान चीयेन पिपोशा ( Shan chien pi po sha ) ह्या नावाच्या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले. परंतु माझ्या आजोबांच्या नंतर भांडारकर संस्थेतर्फे पुढे फारसे काही काम झालेलं नाही. माझ्या आजोबांचा हा ग्रंथ आजही ॲमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. असो.

एका अतिशय चांगल्या विषयाला हात घालून त्याला योग्य न्याय दिल्याबद्दल लेखक श्री विलास सातपुते यांचे हार्दिक अभिनंदन.





मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...