क्रमांक १४:
हे लेणे साधारण ७ व्या ते ८ व्या शतकात खोदले गेले असावे आणि ह्यांची निर्मिती राष्ट्रकूट कालखंडात झाली असावी पण येथील द्वारपालांच्या शैलीवर कलचुरी शैलीचा मोठा प्रभाव आहे. येथील रावणानुग्रहाच्या मूर्तीवरूनच ह्या लेणीला नंतरच्या काळात 'रावण की खाई' असे नाव पडले असावे.
चला तर आता हे लेणे बघायला सुरुवात करू.लेणीत प्रवेश करताच समोरच गर्भगृह दिसते तर डाव्या बाजूच्या भिंतीवर वैष्णव तर उजव्या बाजूस शैव शिल्पपट आहेत तर गर्भगृहाच्या उजव्या बाजूचे भिंतीवर सप्तमातृकांचा अतिशय भय शिल्पपट आहे आणि तेच इथले प्रमुख आकर्षण.
सुरुवातीला आधी गर्भगृह पाहूयात.
गर्भगृह
ह्या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंना स्तंभ असून सभामंडप आणि अंतराळ ह्या स्तंभांमुळेच विभागले गेले आहेत. गर्भगृहांच्या दोन्ही द्वारांवार मकरारूढ गंगा तर कूर्मारूढ यमुना असून त्यांच्या जोडीला स्त्री सेविका आणि द्वारपालही आहेत. वर म्हटल्याप्रमाणे गर्भगृहात आज फक्त पीठ अथवा वेदी शिल्लक राहिलेली असून येथे देवीची मोर्ती स्थापित असावी असा तर निश्चितच करता येतो.
लेणीचा दर्शनी भाग
मूर्तीविहिन गर्भगृह
डावीकडे यमुना, मध्यभागी द्वारपाल व उजवीकडे गंगा सेविकांसह
गर्भगृह पाहिल्यानंतर आता डाव्या बाजूचे शिल्पपट पाहण्यास सुरुवात करू.प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीतच हे उठावातील शिल्पपट कोरलेले आहेत.पहिलेच शिल्प आहे ते दुर्गेचे
दुर्गा
हातामध्ये त्रिशूळ धारण केलेली चतुर्भुज दुर्गा आपले वाहन सिंहाच्या पाठीवर एक पाय ठेवून मोठ्या डौलाने उभी आहे. एक हात गुडघ्यावर आधारासाठी ठेवला असून उरलेल्या दोन्ही भग्न हातांमध्ये चक्र आणि खङ्ग असावे. वरील दोन्ही बाजूस विद्याधर आहेत.
दुर्गा
ह्यानंतर येतो तो गजान्तलक्ष्मीचा शिल्पपट
गजान्तलक्ष्मी
हे शिल्प नेहमीपेक्षा किञ्चित वेगळे आहे. कमळवेलींनी भरलेल्या एका सरोवरातील कमळावर लक्ष्मी बसलेली असून दोन सेवक सरोवरातच उभे राहून वरील बाजूस लक्ष्मीच्या दोन्ही बाजूंना उभे असलेल्या सेवकांकडे पाण्याने भरलेले हंडे देत आहेत. हे सेवक हेच हंडे लक्ष्मीच्या वरचे बाजूस असणार्या दोन दोन हत्तींकडे देत आहेत व हे चार हत्ती लक्ष्मीच्या मस्तकी पाण्याचा अभिषेक करीत आहेत. अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे.
गजान्तलक्ष्मी
ह्यानंतर इथले एक देखणे शिल्प येते ते म्हणजे भूवराहाचे
भूवराह
भूवराह हा विष्णूचा तिसरा अवतार. हिरण्याक्षाचा वध करून समुद्रात बुडालेल्या पृथ्वीला हा पुन्हा योग्य जागी स्थिरस्थावर करतो.वराहाची भव्यता व आवेश आणि पृथ्वीदेवीची प्रमाणबद्ध मूर्ती यांमुळे हा शिल्पपट देखणा झालेला आहे. त्यानंतरच्या खणात भूदेवी व श्रीदेवी यांसह श्रीविष्णू वैकुंठात बसल्याचे शिल्प आहे. त्यानंतर मकरतोरणाखाली विष्णु-लक्ष्मीची मूर्ती आहे. शंख, चक्र धारण करणारा हा भूवराह नागाच्या वेटोळ्यावर एक पाय टेकवून व दुसरा पाय जमिनीवर टेकवून मोठ्या डौलाने उभा आहे. आपला केशसंभार त्याने पाठीवर सोडला असून त्याच्या मुखातून सुळा बाहेर आला आहे. तर वराहाच्या एका हातावर आपला एक पाय दुसर्या पायांत मुडपून भूदेवी अर्थात पृथ्वी अगदी निर्धास्त मनाने उभी आहे. आपला तोल सांभाळण्यासाठी तिने वराहाच्या मुखावरच कोपर टेकवून आधार घेतला आहे.
भूवराह
ह्यानंतरचे शिल्प आहे ते विष्णू आणि त्याच्या दोन स्त्रियांचे
भूदेवी आणि श्रीदेवीसह विष्णू
इथे विष्णूमूर्तीचे दोन पटांत विभाजन केलेले आहे. खालील बाजूचे शिल्पपटांत मुरलीधर कृष्णाची शिल्पे आहेत तर वरील बाजूचे शिल्पपटांत विष्णू हा दोन स्त्रीयांसह बसला आहे त्यातील एक आहे लक्ष्मी अर्थात श्रीदेवी तर दुसरी आहे पृथ्वी अर्थात भूदेवी. विष्णू हा पृथ्वीचे पालन करीत असल्याने पृथ्वीला पतीस्वरूपच मानला गेलाय. येथील शिल्पांत स्त्रीसुलभ मत्सर अगदी स्पष्टपणे दिसून येतो. एकीच्या गालावर विष्णूने आपला एक हात ठेवलाय त्यामुळे मत्सर वाटून दुसरीने रागाने आपली मान किञ्चित दुसरीकडे वळवली आहे त्यामुळे विष्णू आपला दुसरा हात तिच्या गुडघ्यावर ठेवून तिची समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहे.
भूदेवी आणि श्रीदेवीसह विष्णू
ह्यानंतरचे शिल्प आहे ते विष्णू-लक्ष्मीचे
विष्णू लक्ष्मी
विष्णू लक्ष्मी मकरतोरणात बसलेले असून दोन्ही बाजूस सेवक सेविका आहेत.
इथे डाव्या बाजूच्या भिंतीवरील शिल्पे संपतात. एका शिल्पपटात शिव-पार्वती विहार करीत असलेल्या डोंगरावरुन रावणाचे
पुष्पक विमान पुढे जाण्यास प्रतिबंध निर्माण झाला, त्या प्रसंगाचे
शिल्पांकन आहे. रावणाचा आवेश आणि जिद्द, शंकराची शांत मुद्रा आणि पार्वतीची
भयग्रस्तता व पतीचा आधार घेण्यासाठी त्याला बिलगण्याची कृती या सर्व
मुद्रा शिल्पकाराने अत्यंत वास्तव स्वरूपात दाखविल्या आहेत.
डाव्या बाजूच्या भिंतीवरील शिल्पपट
आता उजव्या बाजूचे शिल्पपट पाहण्यास सुरुवात करू अर्थात आपण येथे फेरी मारत असल्याने प्रवेशद्वारापासून सुरुवात न करता गर्भगृहाच्या उजवीकडून शिल्पे पाहण्यास सुरुवात करूयात.याच्या शिल्पपटातील कथा सारख्याच असल्याने फक्त फोटो बघुया.
अंधकासुरवध शिवमूर्ती
दक्षिणेकडील भिंतीतही शिल्पपट आहेत. प्रथम अंधकासुरवध कथेतील शिव दाखविला आहे. या शिल्पातील क्रोध-आवेश या भावांचे चित्रण अप्रतिम आहे. दुसऱ्या शिल्पपटात शिव-पार्वती विहार करीत असलेल्या डोंगरावरुन रावणाचे पुष्पक विमान पुढे जाण्यास प्रतिबंध निर्माण झाला, त्या प्रसंगाचे शिल्पांकन आहे. रावणाचा आवेश आणि जिद्द, शंकराची शांत मुद्रा आणि पार्वतीची भयग्रस्तता व पतीचा आधार घेण्यासाठी त्याला बिलगण्याची कृती या सर्व मुद्रा शिल्पकाराने अत्यंत वास्तव स्वरूपात दाखविल्या आहेत.
रावणानुग्रह शिवमूर्ती
नटराज शिव
या शिल्पपटात तांडवनृत्यातील शिवाचे नृत्य पाहण्यास गणे, पार्वती, ब्रह्मा, विष्णू, इंद्र आणि अग्नी उपस्थित आहेत, असा शिल्पपट पुढे आहे.शिवाच्या डाव्या बाजूस मृदंग वाजवणारे शिवगण तर उजवे बाजूस पार्वती आहे.
अक्षक्रीडारत शिव पार्वती
दुसऱ्या एका शिल्पात शिव-पार्वती पट खेळत असल्याचे दाखविले आहे. शिवाचे खेळण्यात लक्ष नसल्याने पार्वती रुसलेली आहे व तिने रुसून मुखकमल फिरविले आहे. शिव तिचा हात धरून आणखी एक खेळ खेळण्यासाठी अनुनय करीत आहे. पार्वतीच्या मुखावरील रुसवा आणि शंकराची अनुनयातली अजिजी शिल्पकाराने छान टिपली आहे. वरच्या पटांत अक्षक्रीडेत नाराज झालेल्या पार्वतीला समजावणारा शिव तर खालच्या बाजूस नंदीला उगा छळणारे शिवगण आहेत.
महिषासुरमर्दिनी
हे शिल्प प्रवेशद्वाराच्या उजवे बाजूच्या भिंतीवर येते म्हणजे दुर्गेच्या बरोबर समोरील बाजूस.एका हाताने महिषाचे मुख दाबून धरत त्याजवर त्वेषाने आपला एक पाय रोवत दुर्गा महिषासुराचा वध करण्यास तयार झाली आहे तर सिंहाने महिषाचा पुठ्ठा आपल्या जबड्यात पकडला आहे.
उजवे बाजूचे शिल्पपट
इथल्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवरील शिल्पपट पाहून गर्भगृहाला फेरी मारत आपण येतो तो एका भव्य शिल्पपटासमोर अर्थात सप्तमातृकांसमोर.
प्रदक्षिणापथाच्या उत्तरेकडील भिंतीत सालंकृत व बालकांसहित सप्तमातृका असून त्या वीरभद्र आणि गणेश या दोहोंच्या मधे खदलेल्या आहेत.
गौरी पद्मा शची मेधा,सावित्री विजया जया।
देवसेना: स्वधा स्वाहा,मातरो लोकमातरः॥
धृती: पुष्टी: तथा तुष्टी,आत्मनः कुलदेवता।
ब्राम्ही माहेश्वरीचैव कौमारी वैष्णवी तथा।
वाराही च तथेंद्राणी चामुंडा: सप्तमतरः॥
गणपतिं..दुर्गां..क्षेत्रपालं..वास्तोष्पतीं।
--------------------------------
आता यांचा वाहनशोध... दुर्गा सप्तशती>>> पूर्वांग>>> देवी कवचः----
ऐन्द्री गज-समारूढ़ा, वैष्णवी गरूड़ासना।
माहेश्वरी वृषारूढ़ा, कौमारी शिखि-वाहना।
ब्राह्मी हंस-समारूढ़ा, सर्वाभरण-भूषिता।
हा शिल्पपट वेरूळमधील सप्तमातृकांपटांपैकी सर्वात भव्य आहे. वेरूळमधील इतर मातृकापटांसारखीच याची रचना. मातृकांच्या डावीकडे वीरभद्र तर उजवीकडे गणेश आणि गणेशाच्या बाजूला सर्वसंहारक काल-काली अर्थात असितांग भैरव.
सर्वसाधारणपणे नेहमीच्या सप्तमातृकापटांत वीरभद्र, मातृका अआणि गणेश आढळतात तर वेरूळच्या शिल्पपटांत ह्या सर्वांबरोबरच काल-काली पण आढळतात. मातृका ह्या मातृदेवता अर्थात प्रजननाचे प्रतिक तर काल-काली साक्षात मृत्युचे प्रतिक एका परीने जन्म मृत्युचे जीवनचक्र दर्शवणे हाच ह्या शिल्पांचा हेतू असावा.
सुरुवातीस आहे तो वीरभद्र अर्थात हा मातृकांच्या शेजारी नसून त्यांना काटकोनात आहे. इथे त्रिशूळ, डमरू नसून त्याऐवजी हातात परशु आहे. शंकराच्या अशा रूपाला चंडिकेश्वर म्हणतात व हे परशुधारी शिल्प दक्षिणेत जास्त प्रचलित आहे.
वीरभद्र
ह्यानंतर आहेत त्या सप्तमातृका आणि गणेश. मातृकांची वाहने त्यांच्या उच्चासनाखालच्या पट्टीवर कोरलेली असल्याने ह्या मातृका अगदी सहजी ओळखता येतात. प्रत्येकीच्या हाती त्यांची बाळे आहेत. कुणी मांडीवर खेळत आहे, कुणी स्तनपान करीत आहे, कुणी आईने दिलेला खाऊ खात आहे तर कुणाची आई त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करीत आहे.
ह्या मातृका आणि त्यांची येथे कोरलेली वाहने क्रमाने अशी
ब्राह्मणी अथवा ब्राह्मी - वाहन हंस
माहेश्वरी - वाहन नंदी
कौमारी - वाहन मयुर
वैष्णवी - वाहन गरूड
वाराही - वाहन वराह
ऐन्द्राणी अथवा ऐन्द्री - वाहन हत्ती
चामुंडा - वाहन घुबड
ह्यातील इतर मातृकांची वाहने नेहमीच कायम राहिलेली दिसून येतात तर काही चामुंडा बर्याचदा प्रेतावर तर काही वेळा कुत्रा, शृगाल (कोल्हा - पाहा कैलास लेणीतील यज्ञशाळा) तर वाराही महिषावर बसलेली आढळून येते.
तर गणेशाच्या खालच्या बाजूस लाडू अथवा मोदकपात्र आहे.
ब्राह्मणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही
माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐन्द्राणी, चामुंडा आणि गणेश
गणेशाच्या शेजारी आहेत त्या दोन भयप्रद मूर्ती अर्थात काल काली.
काल काली
मृत्युचे प्रतिक असलेल्या ह्या कालाला असितांग भैरव असेही म्हणतात. हाडाचा सापळाच असलेल्या कालाच्या पायाचा आधार एका प्रेतरूपी सांगाड्याने पकडला आहे तर ह्या असितांग भैरवाच्या शेजारीच कालीची भयप्रद मूर्ती आहे.
काल - काली
संपूर्ण सप्तमातृकापट- वीरभद्र, गणेश आणि काल-कालीसह
वेरूळला जर कधी गेलात तर हे लेणे आणि हा शिल्पपट तर अवश्य बघाच.
पाण्याचे टाके.
ह्या लेणीच्या खालचे बाजूलाच अंतर्भागात खोल खोदले गेलेले एक पाण्याचे टाके पण आहे. पाणी जरी असले तरी आज ते पिण्यायोग्य मात्र नाही. टाक्यात जाण्यासाठी पायर्या खोदलेल्या आहेत.येथे आपली 'रावण की खाई' ची सफर संपते
कैलास लेणीच्या उजवीकडे असलेले हे भव्य दुमजली लेणे. हे लेणे `दशावतार’ लेणे म्हणून प्रख्यात आहे. गतिमान शिल्पे, राष्ट्रकूट दंतिदुर्गाचा उत्कीर्ण लेख आणि पुराणातील कथा दाखविणारे शिल्पपट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत. हे मुळचे बौध्द लेणे असावे.नंतर इथे हिंदु लेण्याचे कोरीवकाम झाले असावे.सातव्या-आठव्या शतकात दोन ताल व तीन ताल, रावण की खाई, दशावतार या विशाल लेण्यांची निर्मिती कैलासच्या आधी झाली. मुळात सहाव्या-सातव्या शतकात बदामी चालुक्यांच्या प्रभावाखाली दशावतार लेणे खोदण्यास सुरुवात केली गेली. आठव्या शतकाच्या प्रारंभी बौद्ध धर्मियांनी या स्थानावर आपला प्रभाव जमवला व लेण्याच्या वरच्या मजल्यावर त्यांनी बुद्ध प्रतिमा खोदण्यास प्रारंभ केला. याची साक्ष येथील बुद्ध प्रतिमा व तत्संबंधी परिवार देवतांच्या मूर्तिशिल्पांवरून मिळते. नंतर राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने हे लेणे बौद्धानुयायांकडून काढून घेतले. (इ.स. ७३५ ते ७५५).
लेण्यांच्या प्रांगणात एकाश्म नंदीमंडपाच्या दर्शनी भागावर दंतिदुर्गाचा शिलालेख आहे. येथे त्याने काही काळ वास्तव्य केले होते असे दिसते. मंडपाचे जाळीदार वातायन हे चालुक्य स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य व्यक्त करते. किंबहुना, ते ऐहोळीच्या लाडखाण ते पट्दखल-विरूपाक्ष पापनाथ परंपरेतील आहे. द्वितीय विक्रमादित्याच्या काळात लेण्यांच्या उत्खननास सुरुवात झाली होती. नंदी मंडपासमोरील शिवालयाचे व शिवपिंडीचे काम रेंगाळले होते. हे काम शेवटचा चालुक्य राजा द्वितीय कीर्तिवर्मन याच्या कार्यपद्धतीमुळे रेंगाळले असावे. याचा फायदा बौद्ध धर्मियांना झाला. वरील मजल्यावर बुद्ध व बोधिसत्त्व परिवारकांची शिल्पे उत्कीर्ण केली गेली, तर राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने हे लेणे पुन्हा हिंदु धर्मियांकडे सोपविले. परिणामी, वरील मजल्यावर असलेल्या शिल्पपटात नव्याने मूर्तींचे रूपांतर केले गेले. जुन्या बौद्ध प्रतिमा नव्या शिल्पात थोड्या फरकाने सामावून घेतल्या गेल्या. उदा. शिवतांडव शिल्पातील पार्वती ही मुळातील सव्यललितासनात बसलेली तारेची मूर्ती आहे.
अंतराळात समोरा-समोर कोरलेले मूळ यक्ष-कुबेर व महामयूरी यांच्या मूर्ती थोड्याफार किंवा अर्धवट प्रयत्नांनी परिवर्तित केल्या गेल्या. येथील यक्ष-कुबेरांचे गणपतीमध्ये परिवर्तन झाले, तर महामयूरीचे मयूरवाहन कार्तिकेयास बहाल करण्यात आले. असे करताना मूळ स्त्री-देवतेचे पुरुष (कार्तिकेय) प्रतिमेत रूपांतर करण्यात आले.
हा शिलालेख देवनागरी लिपीत आणि संस्कृत भाषेत कोरलेला असून इ. स. ८ व्या शतकातील आहे. ॐ नमः | शिवाय ह्या वाक्याने लेखाची सुरुवात झालेली असून ह्या लेखांत दंतिवर्मन, इंद्रराज, गोविंद, कर्क, इंद्र, शर्व ह्या राष्ट्रकूट नृपतींची नावे आलेली आहेत. राजा दंतिदुर्ग हा महापराक्रमी असून त्याने येथे सैन्याचा तळ उभारला होता, शत्रूंचा पराभव केला आणि श्रीवल्लभ ही उपाधी धारण केली असे उल्लेख आले आहेत. मंडपावर सिंह, यक्ष, गर्भगृहांच्या प्रतिकृती, गंगा, यमुना इ. मूर्ती आणि जाळीदार खिडक्या आहेत.
दंतिदुर्गाचा देवनागरी शिलालेख
चला तर आता आपण मुख्य लेणीत प्रवेश करूयात.
हे लेणे दुमजली असून खालच्या मजल्यावर मोकळ्या सभामंडपाखेरीज काहिही
नाही. मंडपाच्या प्रवेशद्वारच्या बाजूस हत्ती कोरलेले असून शेजारीच मकरारूढ
गंगा व कूर्मारूढ यमुना आहेत. ह्याचे जे काही सौंदर्य सामावले आहे ते आहे
वरच्या मजल्यावर. सभामंडपाच्याच डाव्या अंगाला भिंतीत वरचे मजल्यावर
जाण्यासाठी दगडातच जीना खोदून काढण्यात आलेला आहे.याच्या उत्तरेकडील
कोपऱ्यात जिन्याच्या पायऱ्या असून, मधल्या कट्ट्याच्या भिंतीत कोनाडे आहेत.
त्यांत गणेश, शिव – पार्वतीची आलिंगन-मूर्ती, सूर्य, शिव- पार्वती,
गजानन-गण, महिषादुरमर्दिनी, अर्धनारीनटेश्वर, दुर्गा, तपस्वी उमा, गणेश,
काली इ. मूर्ती आहेत. अंतराळाच्या आत गाभारा आहे. त्याच्या दर्शनी खांबावर
आमलक, पूर्णघट, प्रणालिका, यक्ष इ. घटक आहेत.
या लेण्यात
शिल्पपटांची रेलचेल आहे. उत्तरेकडे शैव आणि दक्षिण भिंतीवर वैष्णव शिल्पे
आहेत. उत्तरेकडील पहिल्या खणात अंधकासुरवधमूर्ती असून ती रौद्रभीषण आहे.
शिव अष्टभुज असून हातांत तलवार, डमरू, नीलासुराचे कातडे इ. आयुधे आहेत.
शेजारी स्तिमित झालेली पार्वती व नरकपाल धरलेली काली असून, शिवाच्या
पायाखाली अपस्मार पुरुष आहे. शिवाच्या गळ्यात रुंडमाला असून त्याने
अंधकासुराला त्रिशूलाने विद्ध केलेले आहे. योगेश्वरीच्या जवळ घुबड, तर
अंधकासुराच्या पायाजवळ राहूचे मस्तक दाखविलेले आहे. दुसऱ्या खणात
तांडवनृत्यातील शिवप्रतिमा आहे. तिसऱ्या खणात शिवलिंग असून छतावर
वेलबुट्टीच्या अलंकरणाचे अस्पष्ट अवशेष दिसून येतात. चौथ्या खणात
शिव-पार्वती पट खेळतानाचे दृश्य आढळते. दुसऱ्या एका खणात `कल्याणसुंदर’
मूर्ती असून शिवाचा पार्वतीशी झालेला विवाह शिल्पित केलेला आहे. यापुढील
शिल्प `रावणानुग्रह’ (रावण कैलास पर्वत हलविण्याचा प्रयत्न करीत आहे व या
प्रयत्नात फसल्यावर शिवाने त्याच्यावर अनुग्रह केल्याची कथा) आहे.
गर्भगृहासमोर सुटा नंदी आहे. प्रांगणाच्या उत्तरेतील भिंतीत एक लेणे असून त्याच्या गर्भगृहात शिवलिंग आणि त्याच्यामागे त्रिमूर्तीचे (अघोर, तत्पुरुष, कामदेव) शिल्प आहे.
या लेण्यातील शिल्पपटांची शैली आणि दर्जा दोन्ही अनियमित आहेत. जणू विविध कलापरंपरांमधून आलेले वेगवेगळ्या वकूबांचे शिल्पकार तेथे काम करून गेले असावेत. त्यावरून कैलास लेण्यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला हात घालण्याआधी भारताच्या विविध भागांतून आलेल्या शिल्पीसंघांचे कसब इथे अजमावून त्यातून त्यांची निवड झाली असावी, असा अंदाज बांधता येईल. येथे काम करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका शिल्पीसंघाने नंतर पुण्याचे पाताळेश्वर लेणे कोरले असावे, असे समजण्यास वाव आहे.
दशावतार लेणीचा दर्शनी दुमजली भाग
वरच्या मजल्यावर जातात भव्य दिव्य असा कोरीव स्तंभांनी भरलेला एक सभामंडप नजरेस पडतो. डावी उजवीकडे आणि समोर अशा तिन्ही बाजूंच्या भिंतीत बरेच शिल्पपट कोरलेले दिसतात. सभामंडपाच्या मध्याभागी नंदी असून समोरील गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना झालेली दिसते.
सभामंडपाची रचना
सभामंडपातील नंदी
चला तर आता डावीकडच्या बाजूने चालत चालत एकेक शिल्पपट बघत बघत आपण ह्या मजल्याचा एक फेरफटका मारू. पहिलाच शिल्पपट येतो तो म्हणजे अंधकासुरवध !
अंधकासुरवध
अंधकासुराची नेहमीची शिल्पे बघता येथील शिल्पात मात्र किंचित वेगळेपणा आहे. गजासुराला फाडून शिवाने त्याचे चर्म धारण केले आहे. चंद्रकोर मस्तकी असलेल्या शिवाचा चेहरा फारसा भयानक नाही. आणि शिवाच्या हातात ह्यावेळी कपाल नसून ते कपाल अंधकाच्या खालचे बाजूस सरसावून बसलेल्या भयानक चेहर्याच्या चामुंडेच्या हाती आहे. ती अंधकाच्या शरीरातून पडणारे रक्ताचे थेंब गोळा करीत आहे. चामुंडेच्या शेजारी उजवीकडे पार्वती आहे.
अंधकासुरवधमूर्तीच्याच बाजूला आहे तो नटराज शिवाची मूर्ती
नटराज शिव
अष्टभुज शिव विलक्षण उन्मादाने नाचत असून त्याच्या हातात त्रिशूळ, डमरू, अग्नी आहेत तर पार्वती व इतर शिवगण शिवाचे हे नृत्य मोठ्या तन्मयतेने पाहात आहेत.
ह्यानंतरची तीन शिल्पे अनुक्रमे अक्षक्रीडारत शिव पार्वती, कल्याणसुंदर शिव व रावणानुग्रह शिवमूर्तीची आहेत. ही शिल्पे इतकी खास वाटत नाहीत. लेण्यांत असलेला प्रचंड अंधार, शिल्पमूर्तींना दिलेले चुन्याचे लेप ह्यामुळे ह्या मूर्ती दिसायला तशा विद्रूपच वाटतात.
अक्षक्रीडारत शिव पार्वती
कल्याणसुंदर शिव अर्थात शिवपार्वती विवाह
इथे तर शिल्पीचे मूर्ती कोरण्याचे गणित फसलेले स्पष्टपणे दिसते. पार्वतीला कोरण्यात उंचीची गडबड झाल्यामुळे तिला एका चौथर्यावर उभे करून ही कमतरता दूर करण्याचा काहीसा अयशस्वी प्रयत्न येथे केल्याचे दिसून येतो. खालचे बाजूस ब्रह्मा पौरिहित्य करत असून इंद्र, विष्णू विवाहसोहळ्याचे आल्याचे दाखवले आहेत.
रावणानुग्रह शिवमूर्ती
ह्यानंतर मात्र एक प्रभावी शिल्प कोरलेले आहे. ते आहे मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती अर्थात कालारी शिव
मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती
पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव अथवा कालांतक शिव असेही म्हटले जाते.
येथे पिंडीला कवटाळून बसलेल्या मार्कंडेयाला यम घेऊन आल्याचे पाहून शिव हा पिंडीतून प्रकट झालेला आहे. त्याने अतिशय क्रोधाने यमाच्या पेकाटात आपली लाथ घातली असून आपला त्रिशूळ त्याच्या पोटात खुपसलेला आहे. शिवाचा त्वेष इतका आहे की त्याने घातलेल्या लाथे यमाचे कंबरडे पार मोडून गेले आहे इतका की तो मोडकळीस येऊन आपला गुडघा वाकवून खालीच बसला तर तर शिवाच्या हातातील त्रिशूळाचा दांडाही वाकडा झालेला आहे. त्याही अवस्थेत यम त्याची विनवणी करीत आहे.
कालारी शिव
आता येथे मंडपाची डावीकडची भिंत संपते. गर्भगृहाच्या एका बाजूस गंगावतरणाचा प्रसंग कोरलेला आहे तर दुसरे बाजूस लिंगोद्भव शिव मूर्ती कोरलेली आहे.
गंगावतरण
आपल्या शापित पूर्वजांना गंगेच्या तर्पणाने मुक्ती मिळावी म्हणून भगीरथ प्रयत्न करून स्वर्गातून आणलेल्या गंगेला शिव आपली जटा हळूच सोडवून गंगेला पृथ्वीवर जाण्यास जागा मोकळी करून देत आहे. उजव्या बाजूस पार्वती उभी असून डाव्या बाजूस एका पायावर तप करीत आहे. तर शिवाच्या पायांच्या खालचे बाजूस मस्तके दाखवून ती पाताळात भस्मीभूत होऊन पडलेले सगरपुत्र मुक्तीची याचना करीत आहेत हे सूचित करत आहेत.
लिंगोद्भव शिवमूर्ती
प्रकट झालेल्या दैदिप्यमान स्तंभाचा आदी व अंत शोधून काढण्यात अयशस्वी ठरलेले हंसरूपी ब्रह्मा व वराहरूपी विष्णू यांचे गर्वहरण होऊन अनन्य भावनेने ते शिवाला शरण गेले असून शिवा त्या स्तंभातून प्रकट होऊन त्यांना अनुग्रहित करीत आहे.
यानंतर आपण गर्भगृहाच्या उजव्या बाजूने तिकडील भिंतीतले शिल्पपट पाहण्यास सुरुवात करूयात. दशावतार लेणीमधील काही अप्रतिम शिल्पपट येथे कोरलेले आहेत. येथेच सुरुवातीचे बाजूस गजांतलक्ष्मीचे शिल्प आहे. अर्थात ते फारसे आकर्षक नाही.यानंतर येते ते त्रिपुरांतक शिवाचे.
त्रिपुरांतक शिव
तारकासुराचे तीन मुले विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून आकाशगामी असलेली अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि लोहमय अशी तीन फिरती पुरे प्राप्त करून घेतली. ही तिन्ही पुरे एकाच रेषेत असतांनाच एकाच बाणाने ह्यांचा विध्वंस करू शकणाराच त्रिपुराचा वध करू शकेल असा वर त्यांनी मिळविला. तीन फिरत्या पुरांमुळे अतिशय बलवान झाएल्या ह्या तीन्ही असुरांचा शंकराने विष्णूरूपी बाण करून त्यांचा नाश केला अशी ही थोडक्यात कथा.
येथील शिल्पपटात चंद्र-सूर्याची चाके करून शिवाने पृथ्वी हाच रथ केला आहे. ब्रह्मदेव सारथ्य करीत असून विष्णू हाच बाण म्हणून जोडून शिव आपल्या पिनाक धनुष्याने त्रिपुरासुरांचा संहार करणेस सज्ज झाला आहे.
आता यानंतर मात्र विष्णू ह्या दैवताची निगडित असलेली शिल्पे सुरु होतात. ह्याच शिल्पांमुळे ह्या लेणीला दशावतार असे नाव पडले. अर्थात नाव जरी दशावतार लेणे असे असले तरी येथे विष्णूचे अवतार वराह, नृसिंह, वामन आणि कृष्ण असे फक्त चारच दाखवलेले असून अनंतशयनी विष्णूची एक मूर्ती आहे. येथली सर्वात सुंदर शिल्पे ह्याच भागात आहेत. चला तर हि शिल्पे आता आपण पाहण्यास सुरुवात करूयात.
यात (उजवीकडून) पहिले येते ते गोवर्धन गिरिधारी कृष्णाचे.
गोवर्धन गिरीधारी.
कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार. गोकुळात इंद्रपूजेपासून गोकुळवासीयांना
परावृत्त केल्यामुळे इंद्र क्रोधवश होऊन जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु करतो.
कृष्ण सर्वांना घेऊन गोवर्धन पर्वतच्या आश्रयाला जातो व गोवर्धन पर्वताला
आपल्या हातांवर तोलून धरत गोकुळवासीयांचे धुव्वाधार पावसापासून संरक्षण
करतो.
ह्या शिल्पपटात कृष्ण हा विष्णूरूपात दाखवला असून त्याला ६ हात दाखवले
आहेत. दोन हात मानुषरूपातील असून उरलेले चार हात दैवी आहेत. शंख, चक्र अशी
आयुधे धारण केलेल्या कृष्णाने एक हात कमरेवर ठेवला असून चार हातांवर
गोवर्धन तोलून धरलेला आहे तर उरएल्या हाताने तो गोकुळवासीयांना अभय देत
आहे. गोकुळजनांसह गायीगुरे आदी खिल्लारे पर्वताच्या खाली आश्रयाला आली
आहेत.
गोवर्धन गिरीधारी
गोवर्धन गिरीधारीच्या उजव्या बाजूला शिल्पपट आहे तो अनंतशयनी विष्णूचा.
अनंतशयनी विष्णू
शेषावर एका हातावर मस्तक तोलून पहुडलेल्या विष्णूचे पाय लक्ष्मी चुरत आहे. विष्णूच्या नाभीतून प्रकट झालेल्या कमळावर चतुर्मुखी ब्रह्मदेव स्थानापन्न आहे. तर विष्णूच्या खालच्या बाजूस ज्या सात मूर्ती आहेत त्यापैकी दोन मधु कैटभ राक्षस आहेत तर उरलेल्या चार हे आयुधपुरुष आहेत म्हणजे शंखपुरुष, गदापुरुष, चक्रपुरुष आणि पद्मपुरुष. उरलेली सातवी मूर्ती कोणाची हे मात्र कळत नाही.
ह्यानंतर येते ती विष्णूची वराहमूर्ती
वराहावतार
वराह हा विष्णूचा तिसरा अवतार. रसातळात बुडालेल्या पृथ्वीला वराह आपल्या
दाढांवर खेचून तिला बाहेर काढत असतानाच ब्रह्मदेवाच्या वरप्रदानामुळे
उन्मत्त झालेला हिरण्याक्षाचा वध करतो अशी ही संक्षिप्त कथा.
शंख, चक्र धारण केलेल्या वराहाने भूदेवीला आपल्या बाहूंवर तोलून धरले असून आपला एक पाय नागराजावर ठेवला आहे.
वराहावताराच्याच पुढे उजव्या अंगाला संबंध वेरूळ लेणीसमूहातील दोन सर्वांगसुंदर शिल्पे आहेत. ह्या दोन शिल्पांसाठी तरी ही लेणी अवश्य पाहिलीच पाहिजे. ती आहेत त्रिविक्रम आणि नृसिंहअवताराची.
त्रिविक्रम विष्णू.
त्रिविक्रम विष्णू म्हणजे विष्णूचा पाचवा अवतार अर्थात वामनावतार.
बलीराजाच्या न्यायप्रियतेमुळे, दानप्रियतेमुळे त्याचा पुण्यसंचय वाढत जाऊन
साक्षात इंद्राच्या पदाला धोका निर्माण होतो तेव्हा तो विष्णूला शरण जातो.
विष्णू वामनाचे रूप धारण करून बळीच्या यज्ञात जाऊन त्याला तीन पावले भूमिचे
दान मागतो. वामनरूपी विष्णूचा कावा लक्षात यऊन शुक्राचार्य बळीला
दानापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात पण बळी आपल्या दानप्रियतेपासून न
ढळता दानाचे अर्ध्य वामनाच्या हातावर सोडतो. तत्क्षणी वामनापासून विष्णू
प्रकट होऊन एका पावलाने जमीन तर दुसर्या पावलाने आकाश व्यापून टाकतो तर
तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे बळी राजालाच विचारतो. बळी आपले मस्तक त्याच्यापुढे
करून तिसरे पाऊल त्याच्यावर ठेवण्यास विनंती करतो. प्रसन्न झालेला विष्णू
बळीला पाताळाचा राजा करतो. त्रैलोक्य व्यापणार्या विष्णूच्या ह्या रूपालाच
त्रिविक्रम विष्णू असे म्हणतात.
उपरोक्त शिल्पपटाच्या खालच्या उजव्या बाजूस वामनाला अर्ध्य देणारा बळीराजा दाखवलेला आहे तर शुक्राचार्य त्याला दानापासून परावृत्त करताना दिसतो आहे. त्याच्या बाजूस एक स्त्री आकृती आहे ती बहुधा बळीची पत्नी किंवा एखादी सेविका असावी. तर डाव्या बाजूस वामनावर हल्ला करण्याच्या तयारीत असणार्या नमुची नामक दैत्याचे हात पाठीशी बांधून गरूड त्याचे केश पकडून खेचत असून एका हाताने त्याला थप्पड मारत आहे. ह्या गरूड-नमुची दृश्यामुळे ह्या शिल्पपटाचे सौंदर्य कमालीचे वाढलेले आहे. तर मध्यभागी त्रिविक्रम स्वरूपातील विष्णूची भव्य मूर्ती स्वर्ग व पृथ्वी आपल्या हातापायांनी व्यापून उभी आहेत. अष्टभुज त्रिविक्रमाने शंख, चक्रा, गदा, पद्म, धनुष्य, ढाल, तलवार अशी आयुधे धारण केलेली आहेत. निव्वळ अद्भूत असेच हे शिल्प आहे.
त्रिविक्रम विष्णू
ह्याच्याशेजारीच आहे इथले एक अतिसुंदर शिल्प अर्थात स्थौण नृसिंहाचे.
स्थौण नृसिंह
स्थूण म्हणजे स्तंभ. स्थौण नरसिंह म्हणजे खांबातून प्रकट होणारा नरसिंह.
केवल, योग, विदारण अशा अनेक प्रकारच्या नृसिंह मूर्तींपैकी स्थौण हा एक
प्रकार. नृसिंहाच्या मी पाहिलेल्या असंख्य शिल्पांपैकी हे शिल्प माझ्या मते
निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ होय.
"कुठे आहे तुझा देव, ह्या खांबात आहे का" असे प्रल्हादाला म्हणून दैत्य
हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारताच त्यातून अर्धा मानव, अर्धा पशू असा
नरसिंह प्रकट होतो. ना आकाही ना भूमीवर अशा प्रकारे हिरण्यकश्यपूला आपल्या
मांडीवर घेऊन शस्त्रांना अवध्य असलेल्या हिरण्यकश्यपूचे नृसिंह आपल्या
नख्यांनी विदारण करतो.
ह्या शिल्पपटात स्थौण नरसिंह अर्थात विदारण अवस्थेतील आधीचा प्रसंग कोरलेला आहे.
नृसिंह खांबातून प्रकट झालाय आणि त्याची हिरण्यकश्यपूबरोबर झटापट सुरु
झालीय. शंख, चक्र, तलवार धारण करणार्या नृसिंहाने एक हात हिरण्यकश्यपूच्या
खांद्यावर ठेवून तसेच आपल्या पायाचा विळखा हिरण्यकश्यपूच्या पायास घालून
त्यास पकडले आहे आणि एका हाताने त्याला थप्पड देण्याच्या तयारीत आहे.
हिरण्यकश्यपू तशाही अवस्थेत हसत असून त्याने आपली तलवार बाहेर काढली असून
संरक्षणासाठी ढालही हाती घेतली आहे. जणू त्याला वाटते आहे की आपल्यासारख्या
वरप्रदानाने अवध्य झालेल्या दैत्यास असा विचित्रसा दिसणार्या पशूपासून
काय हानी पोहोचणार. एकाच क्षणी किंचित हसरे भाव असलेल्या हिण्यकश्यपूच्या
चेहर्यावर त्याच क्षणी अविश्वासाचे भाव पण दिसताहेत जणू आपला शेवट आला
असल्याचे त्याने ओळखलेले आहे.
इकडे नृसिंहाच्या चेहर्यावर मूर्तिमंत क्रोध दिसत असून त्याचे डोळे
विस्फारले गेले आहेत व त्यामुळे त्याच्या भ्रुकुटी कमालीच्या तआणल्या
गेल्या आहेत. आपल्या कराल दाढा बाहेर काढून तो हिरण्यकश्यपूच्या संहारात
मग्न झालेला आहे.शिल्पकाराने जबरदस्त ताकदीने हे शिल्प कोरवले आहे.माझ्या मते शेजारचे त्रिविक्रम आणि हे स्थौण नृसिंहाचे शिल्प एकाच
शिल्पकाराने कोरलेले आहे इतका कमालीचा सारखेपणा ह्या दोन शिल्पांमध्ये आहे.
स्थौण नृसिंह
नृसिंहाचा क्रोधवश चेहरा
हिरण्यकश्यपूच्या चेहर्यावरील भावमुद्रा
हे अप्रतिम शिल्प बघून होताच आपली दशावतार लेण्याची सफर संपते.
लेणी क्र. १७.
हे एक अत्यंत सुंदर लेणे आहे पण अपूर्णावस्थेत आहे कदाचित इथला खडक
हे लेणे खोदण्यासाठी पुरेसा योग्य नसावा.हे लेणे आखणी, स्तंभ आणि शिल्पपट
या दृष्टींनी प्रेक्षणीय आहे. यातील गण, शालभंजिका व त्यांच्या बाजूस
असलेल्या सेविका व गंधर्व यांच्या कमनीय मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.या
लेण्याचे खोदकाम इ.स. ६०० ते ८७० च्या दरम्यान झाले असावे. या लेण्यात
प्रामुख्याने स्त्री शिल्प दिसतात. हे लेणे वेरुळ लेणीसमुहाच्या मध्यभागी
आहे आणि सुप्रसिध्द कैलास लेण्याला लागून आहे. सहाजिकच इथेही मोठ्या
प्रमाणात पर्यटक येतात.
या लेण्याला भिंती असलेले प्रांगण असून
त्याच्या मागे मंडप व गर्भगृह आहे. मुखमंडपला चार स्तंभ व दोन अर्ध स्तंभ
आहेत. मंडप १९.५० मीटर रुंद आणि ११.२७ मीटर खोल आहे. इथले स्तंभ अतिशय
आकर्षक आहेत आणि स्तंभांवर शालभंजिकांच्या सुरेख प्रतिमा आहेत तसेच
ठिकठिकाणी भारवाहक यक्षसुद्धा कोरलेले आहेत. दरवाजाजवळच भिंतीत गणेशाची
अभंग प्रतिमा असून एका हातात परशु, दुसर्या हातात कमळ, तिसर्या हातात माळ
तर चौथ्या हातात लाडवांचे पात्र आहे त्यातले लाडू तो आपल्या सोंडेने खात
आहे. तर गणेशाच्या समोरच्या भिंतीवर महिषासुरमर्दिनीची प्रतिमा कोरलेली
आहे. एका ठिकाणी भिंतीत ब्रह्मदेवाची विद्याधर आणि सेवकांसह प्रतिमा
कोरलेली आहे.
लेणीच्या अंतर्भागात नक्षीदार स्तंभ असून त्याजवर सुरेख शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभांवरच्या कमानीचा आकार बुद्धविहारातील चैत्यकमानींशी विलक्षण साधर्म्य दाखवतो. गर्भगृहाच्या मध्यभागी पीठावर शिवलिंग आहे. मंडपाच्या आणि मुखमंडपच्या खांबाच्या वरच्या बाजुला सुरसुंदरी आणि देवतांच्या मुर्ती कोरल्या आहेत. हे स्तंभ चौरसाकृती असून त्यांच्या रचनेवरुन ते राष्ट्रकुट काळाच्या आधीचे वाटतात. मंडपाच्या उत्तरेच्या भिंतीत गणेश आणि महिषासुर मर्दीनी दाखवली आहे. प्रांगणाच्या बाजुच्या भिंतीत देवकोष्टात ब्रम्हा, विष्णुच्या मुर्ती आहेत. मुखमंडपावर कोरलेल्या भिंतीवर नृत्य करणारे गण दाखवले आहेत, जे वाकाटक शैलीची आठवण करुन देतात. एकंदरीत या लेण्यांची रचना हि बौध्द विहारांची नक्कल नसून परिपुर्ण शैव मंदीर आहेत असे म्हणावे लागेल. कदाचित अशी पाषाण मंदीर कोरताना तात्कालीन विटा,लाकुड किंवा दगडात बांधलेल्या शैव, वैष्णव किंवा शाक्त मंदीराची हि नक्कल असावी, अशी शक्यता आहे.
स्तंभांवरील शालभंजिका
कोपर्यातल्या भिंतीतील ब्रह्मदेवाची प्रतिमा
लाडू खात असलेला गणपती
स्तंभांवरील देखणी स्त्री प्रतिमा
गुहेतील कोरीव स्तंभ
महिषासुरमर्दिनी
लेणी क्र. १८:-
या लेणीत विशेष कोरीवकाम नाही. हे निरंधार म्हणजे प्रदक्षिणा पथ नसलेले लेणे आहे. समोर प्रांगण, पुढील भागात स्तंभ असलेला स्तंभमुखी मंडप आहे.या देवडीला पुढे दोन स्तंभ आहेत. या खांबावर देवनागरी लिपीत काहीतरी कोरलेले दिसते.याच्यामागे दोन बाजुला दोन उपगर्भगृहे असलेला मंडप, मंडपाच्या मागे मोठे असलेले अंतराळ आणि त्याच्यामागे गर्भगृह अशी याची रचना आहे. याशिवाय प्रांगणात नंदीमंडप आहे. प्रांगणात दोन उपमंदीरे दिसतात.इष्ट देवतांसाठी ती असावीत. मंडपाची पातळी प्रांगणापेक्षा उंच असल्याने पायर्या दिसतात.त्यानंतर मंडप त्याच्यापेक्षा उंच आणि मंडपापेक्षा गर्भगृह उंच अशी एकंदरीत रचना दिसते. आतमध्ये एक गोलाकार वेदी असून त्याचा मधील भाग अष्टकोनी आहे. इथेही भेट देणार्या अभ्यासकांना येण्यास भाग पाडतील अशा काही गोष्टी निश्चितच आहेत.
लेणी क्र. १९:-
या लेण्याची बरीचशी रचना लेणे क्र. १४ सारखीच आहे. मंडप आणि
त्याच्यामागे प्रदक्षिणापथ असलेले गर्भगृह असे त्याचे स्वरुप आहे. हा मंड्प
१२ एवजी १६ स्तंभाचा असला तरी हा मंडप लेणे क्र. १४ सारखा चिंचोळा
नाही.मात्र गर्भगृह व प्रांगण बर्यापैकी लहान आहे. या लेण्याचा सभामंडप
चौकोनी आकाराचा असून यातील स्तंभाची रचना तळाशी चौकोनी तर शीर्षभागी
गोलाकार आहे. छ्ताच्या बर्याच भागाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी केली आहे.
प्रांगणाच्या पुढील आणि बाजुच्या भिंती चांगल्या अवस्थेत आहेत. लेण्यात
असलेले गर्भगृहाच्या दरवाज्याशी असलेले द्वारपाल उंच आहेत. लेण्याच्या
मुखभागाशी असलेल्या तुलापट्टीवर लकुलीश दाखवला आहे. लकुलीश हा बसलेला असून
त्याच्या हातात जपमाळ व दंड आहे. या लेण्याचे मुर्तीशास्त्रदृष्ट्या लेणे
क्र. २१ ( रामेश्वर लेणे ) व लेणे क्र. २९ ( घुमार लेणे ) यांच्याशी साम्य
आहे. थोडेफार अभ्यासकच या लेण्यांना भेट देतात. 
लेणी क्र. २०.
दरवाजाजवळ कुबेराची हातात पैशाची थैली घेतलेली प्रतिमा आहे. लेण्याच्या दरवाज्याच्या एका बाजुला गंगा तर दुसर्या बाजुला यमुना आहे.या शिल्पाची उंची मानवाच्या उंचीपेक्षा जास्त आहे. लेण्याच्या आतमध्ये गर्भगृहात चौरस पिठ असून त्यावर शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल कोरलेले आहेत.
या लेण्याचे दोन भाग केलेले आहेत, २० अ आणि २० ब. सुरवातीला इथे दोन स्तंभ होते ,मात्र ते आता नष्ट झाले आहेत.
अंलकारीत शिल्प आणि देखण्या मुर्तीची शिल्पकला यामुळे रामेश्वर लेणे परिपुर्ण वाटते. या लेण्यात गंगा, यमुनेच्या मुर्ती दरवाज्याच्या दोन्ही बाजुला असण्याच्या एवजी प्रांगणाच्या भिंतीच्या एका टोकाशी असून या मुर्तींची उंची खुप उंच न असता प्रत्यक्ष मानवाइतकीच आहे. वामनाचे शिल्प असलेल्या स्तंभावर सुरसुंदरी आहेत. तसेच भिंतीवर शैव कथानकाचे शिल्पपट आहेत. बाजुच्या उपगर्भगृहामध्ये सप्तमातृका आणि शिवपार्वती विवाह सोहळा दाखवला आहे. रावणानुग्रह, नृत्य करणारा शिव, शिवपार्वतीची द्युतक्रीडा, यासारखे कथानात्मक पट आणि कार्तिकेय,गणेशा समवेत असलेल्या सप्तमातृकांचा पट घारापुरी येथे आढळणार्या पाशुपत संप्रदायाशी साधर्म्य आणि सलगता दाखवतो. लेण्याच्या मुखभागातील तुलापट्टीवर कोरलेला लकुलीश हि गोष्ट ठळकपणे दर्शवीतो.
शिवपार्वती विवाह
ही कथा तीन टप्यांत कोरलेली आहे. उजवीकडच्या कोपर्यात पार्वती तप
करताना दाखवलेली असून तिच्याशेजारी बटूवेषधारी शिव हाती कमंडलू घेऊन
लग्नाची मागणी घालताना दाखवलेला आहे. तर याच शिल्पपटाच्या डाव्या कोपर्यात
साक्षात ब्रह्मदेव पार्वतीचा पिता हिमवान पर्वताकडे शिवाचे स्थळ घेऊन
आलेला दाखवलेला आहे. ब्रह्माकडून शिवासाठी पार्वतीची मागणी आल्याने झालेला
आनंद हिमवानाच्या चेहर्यावर स्पष्ट दिसतो आहे.
तर ह्या दोन्ही शिल्पांच्या मधल्या भागात शिवपार्वतीचा विवाहविधी
प्रत्यक्ष कोरलेला आहे. शिवाच्या बाजूस लक्ष्मी-विष्णू, शची-इंद्र अस देव
आलेले आहेत पर शिव पार्वतीच्या मध्ये कन्यादान करण्यासाठी हाती कमंडलू घेऊन
हिमवान पर्वत उभा आहे तर पौरिहित्य ब्रह्मदेव करत आहे. या शिल्पपटाच्या
खालच्या बाजूस शिवगण दाखवलेले आहेत.
शिवपार्वती विवाह (उजवीकडे ब्राह्मणवेषधारी शिव तपःशालिनी पार्वतीकडे मागणी करताना) तर डावीकडे शिवपार्वती पाणीग्रहण
या शिल्पपटाच्या उजव्या कोपर्यात उभ्या अवस्थेतील कार्तिकेयाची सुरेख मूर्ती कोरलेली आहे. त्याचे वाहन मोर शेजारी उभे असून कार्तिकेयाने डाव्या हाती कोंबडा पकडलेला आहे. कार्तिकेयाच्या दोन्ही बाजूला मेंढी आणि बोकड यांची तोंडे असलेले त्याचे नैगमेष आणि छगवक्त्र नावाचे दोन सेवक त्याची आज्ञा झेलण्यासाठी तत्पर उभे आहेत.
कार्तिकेय
कार्तिकेयाच्या समोरच महिषासुरमर्दिनीची सुरेख मूर्ती कोरलेली आहे. देवीच्या एका हाती विष्णूने दिलेले चक्र तर दुसर्या हाती शंकराने दिलेला त्रिशूळ आहे. महिषासुराह्च्या पाठीवर उजवा पाय रोवून तर त्याच्या तोंडावर डावा हात दाबून धरून ती त्याचा वध करते आहे. बाजूलाच देवीचे सेवक हत्यारे घेऊन उभे आहात तर आकाशातून विद्याधर हा सोहळा बघत आहेत.
महिषासुरमर्दिनी
शिवपार्वती अक्षक्रिडा पट
गर्भगृहाच्या दुसर्या बाजूच्या खणाच्या सुरुवातीला शिव पार्वतीच्या अक्षक्रिडेचा दोन पातळ्यांत देखावा कोरलेला आहे. खालच्या बाजूला मध्यभागी नंदी दाखवलेला असून इतर शिवगण त्याची उगाच पाय धरणे, शेपटी ओढणे अशा नाना प्रकारांनी खोड्या काढताना कोरलेले आहेत तर वरच्या पातळीत शिवपार्वतीचा सारीपाट खेळ मांडलेला आहे. शंकराच्या खेळातील लबाडीमुळे वा चातुर्यामुळे चिडलेली पार्वती निघून जायचा प्रयत्न करते आहे तर शंकर तिचा पदर धरून तिला आग्रहाने बसवून ठेवत आहे आणि फक्त आता फक्त एकच डाव खेळ असे एक बोट उंचावून तिची मनधरणी करत आहे. तर आजूबाजूला सेवक मोठ्या कौतुकाने ही क्रिडा बघत आहेत.
शिवपार्वती अक्षक्रिडा
शिव पार्वती जवळून
कटीसममुद्रानृत्य
इथल्या शेजारच्या दालनात शंकराचे कटीसममुद्रानृत्य दाखवलेले आहे. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे. दोन्ही पाय गुढघ्यात मुडपून डावा पाय किंचीत वर उचलून शंकर मोठे विलोभनीय नृत्य करतोय. त्याचे दोन्ही हात कंबरेभोवती आलेले आहेत. शिवाच्या बाजूला पार्वती एक लहान मूल कडेवर घेऊन उभी आहे तर आजूबाजूला गणेश आणि वादकांच्या मूर्ती आहेत.
कटीसममुद्रानृत्य
कटीसममुद्रानृत्य शिल्पाच्या शेजारच्या भिंतीवर सप्तमातृकापट कोरलेला आहे.
सप्तमातृकापट
या शिल्पपटाच्या सुरुवातीला सप्तमातृकांच्या बाजूला वीरभद्राची मूर्ती असून वाराही, ऐंद्री, वामनी, नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या पूर्णपणे अनार्य अशा सप्तमातृका कोरलेल्या आहेत व शेवटी गणेशाची मूर्ती आहे. शाक्तपंथाचे प्रतिकच जणू हा पट. सप्तमातृका मूळाच्या अनार्य देवता. कोकणात ह्यांनाच साती आसरा अथवा जलदेवता म्हणत असावेत. आ प्रत्येक मातृका अतिशय देखणी आणि सालंकृत असून प्रत्येकीजवळ तिचे बाळ आहे तर खालच्या बाजूला वराह, हंस, मोर घुबड असे प्रत्येकीचे वाहन तिच्या मूर्तीखाली कोरलेले आहे. सप्तमातृका म्हणजे मातेचे म्हणजे जीवनशक्तीचे प्रतिकच. तर याच जीवनमरणाच्या फेर्याला दर्शवण्यासाठी या शिल्पपटाच्या बाजूला असितांग भैरव-काल कालीचे शिल्प कोरलेले आहे.
सप्तमातृका पट (सर्वात डावीकडचा वीरभद्र)
सप्तमातृका पट (सर्वात उजवीकडे गणेश)
काल-काली
सप्तमातृका
म्हणजे मातेचे म्हणजे जीवनशक्तीचे प्रतिकच. तर याच जीवनमरणाच्या फेर्याला
दर्शवण्यासाठी या शिल्पपटाच्या बाजूला असितांग भैरव-काल कालीचे म्हणजे
प्रत्यक्ष मृत्युचे शिल्प कोरलेले आहे.
भयानक
डोळे असलेल्या पूर्णपणे अस्थिपंजर असलेल्या कालाच्या हाती रूंद व टोकदार
कट्यार आहे. एक सापळा त्याच्या पायाला मिठी मारून बसलेला आहे आणि त्याच्या
मागे असलेली काली त्या सापळ्याला खेचून काढत आहे. तर तिच्याच बाजूला एक
सापळा उभा आहे.
जन्ममृत्युची जणू ही दोन प्रतिकेच असे हे सप्तमातृका आणि असितांग काल काली शिल्पपट आहेत.
काल काली
क्रमांक २२ :-



लेणी क्र, २४:-
क्रमांक चोवीसच्या लेण्यात चार शिवमंदिरे असून त्यांत योनिपीठे आहेत. याला `तेली की घाणी’ असेही म्हणतात. इथे पाच कक्ष आहेत. इथे बरीच छोट्या आकाराची शिल्प दिसतात. परंतु गुंफेचा दर्शनी भागातील खडक कोसळल्यामुळे ठिसुळ दगडामुळे इथे पुढचे कोरीवकाम केले गेले नाही.

या लेण्याला कुंभारवाडा म्हणतात. या लेण्याच्या दर्शनी भागात पुर्वी मोठे स्तंभ आधारासाठी होते.पण आता ते कोसळले आहेत. हे लेणे आकाराने विस्तृत असून मंडपात कुबेर, स्तंभावर शालभंजिका, छतावर गजलक्ष्मी व आतील छतावर सूर्य यांची शिल्पे आहेत. गर्भगृहासमोर दोन द्वारपाल असून सूर्याचे शिल्प कलात्मक आहे.यासाठी इथे बरेच जण भेट देतात.
या लेण्याच्या आवारात प्रथम प्रांगण, दर्शनी भागात एकुण चार स्तंभ आहेत. दर्शनी भागात घटपल्लवयुक्त स्तंभ, दोन अर्धस्तंभ व प्रवेशद्वारात गजमुखे कोरलेली आहेत. या मंडपाच्या मागे प्रदक्षिणापथ असलेले गर्भगृह आहे.आयताकृती मंडपाच्या बाजुच्या दोन उपगर्भगृहासह लांबी ३४.१३ मीटर असुन मंडपाच्या पुढील भागापासून प्रदक्षिणापथाच्या मागील भिंतीपर्यंत खोली २०.४२ मीटर आहे. या उपगर्भगृहामधेय आज कोणतीही मुर्ती अस्तित्वात नाही. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापाशी आयुधपुरुषांसमवेत द्वारपालांची दोन भव्य शिल्पे आहेत. या आयुधपुरुषांपैकी एकजण शुलपुरुष आहे.दोन स्तंभाच्या मागील बाजुला असलेल्या अर्धस्तंभावर स्त्री चवरीधारक खुज्या सेविकांसहीत दाखविले आहेत. गर्भगृहाच्या मधोमध असलेल्या चौरस पीठावर शिवलिंग आहे.
क्रमांक २७ :-
विश्रांतीकक्ष असल्याने हे लेणे मूळचे बौद्ध लेणे असल्याचे वाटते. कालांतराने याचे वैष्णव लेणीत रूपांतर झालेले आहे. शैव लेणींचे प्राबल्य असलेल्या वेरूळ मधले हे एक वैष्णव लेणे. वेरुळ लेणीसमुहात सर्व ब्राम्हणी लेणी शैव आहेत.याला अपवाद फक्त दोनच लेण्यांचा, लेणे क्रमांक २७ हे वैष्णव लेणे आहे तर लेणे क्रमांक १४ हे देवीचे लेणे आहे. याची निर्मिती राष्ट्रकूटांच्या काळात न होता यादवकाळात झालेली असावी असा अंदाज आहे. या लेणीच्या वरच जलप्रपात कोसळत असल्याने तसेच येथला दगड ठिसूळ असल्याने इथल्या मूर्ती बर्याच ओबडधोबड झालेल्या आहेत. इथे असलेल्या पावसाळी धबधब्यामुळे पर्यटकांची इथे वर्दळ असते.

लेणी क्र. २७ आणि २६ चे मुखदर्शन (सीतेची नहाणी लेणीवरून)
बलराम, सुभद्रा आणि कृष्ण
ब्रह्मा, विष्णू आणि महेश
वराहावतार
त्रिमुखी शिव

हे लेणे या लेणीसमुहातील सर्वात प्राचीन लेणे नसेल पण याचा तलविन्यास अगदी साधा आहे. अर्धस्फुट व्हरांडा , मंडप आणि गर्भगृह असे या लेण्याचे स्वरुप आहे.मंडपाच्या आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दुतर्फा महाकाय प्रतिहार किंवा द्वारपाल त्यांच्या सेवकांसह दाखविले आहेत. लेण्याच्या दरवाजाच्या बाजूस गंगा, यमुना यांची भग्न शिल्पे असून सभामंडपात योगासनातील अष्टभुजा शाक्त देवी, गर्भगृहाशी संलग्न द्वारपाल आणि गर्भगृहात योनिपट आहेत. देवीच्या हातांत खड्ग, भुजंग, त्रिशूल, नरमुंड इ. आहेत.हे लेणे आटोपशीर असून त्याचा मंडप ४ मीटर X ६ मीटर आणि गर्भगॄहाचा आकार २ मीटर X २ मीटर आहे.गर्भगॄहाच्या मध्यभागी एक पीठ असून त्यावर शिवलिंग आहे.
हे लेणे पावसाळ्यातील जवळच्या धबधब्यामुळे रम्य वाटते.
हिंदू धर्मीय लेण्यांमध्ये `सीता की नहाणी’ या नावाने हे लेणे (४५·११ X ४५·४१ मी.) प्रसिद्ध आहे. यालाच धुमार लेणेही म्हणतात.हे लेणे अतिशय भव्य आहे. वेरूळ लेण्यांच्या भटकंतीत हे लेणे आवर्जून पाहायलाच पाहिजे असे आहे.हे लेणे ब्राम्हणी लेण्यांच्या मालिकेत सगळ्यात शेवटी असले तरी ते सर्वात जुने असले पाहिजे. या लेण्याचे मुंबईतील जोगेश्वरी आणि घारापुरी लेण्याशी साम्य आहे.जोगेश्वरी लेणे हे पाशुपत संप्रदायाचे लेणे निर्मितीचा पहिला अविष्कार तर घारापुरी हा त्याचा पुढील टप्पा मानता येईल.या दोन्ही ठिकाणांपासून भौगोलिक दृष्ट्या दुर असले तरी हे लेणे म्हणजे पाशुपत पंताचा नवा अविष्कार मानता येईल. घारापुरी आणि जोगेश्वरी लेण्याप्रमाणे या लेण्याचीही एक बाजु बंद आणि इतर तिन्ही बाजुने प्रवेशमार्ग आहेत.
प्रवेशद्वारावरील सिंहशिल्प
प्रवेशद्वार
प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडच्या बाजूस कोरलेले शिल्प आहे ते अंधकासुर वधाचे
अंधकासुर वध
हे शिल्प अतिशय प्रत्यककारी आहे.खवळलेल्या, क्रोधाने दग्ध झालेल्या आठ हात असलेल्या शंकराने एक पाय मुडपून आपल्या हातातली तलवार जोराने अंधकासुराच्या छातीतून आरपार खुपसलेली आहे. शिवाचे खोबणीतून बाहेर आलेले डोळे, कपाळावरचा उमलू पाहणारा तिसरा डोळा व भयानकपणे विचकलेले दात त्याला आलेला भयानक क्रोध दर्शवत आहेत. तर आपला अंतःकाळ आता जवळ आलेला आहे हे ओळखून अंधकासुर दोन्ही हात जोडून त्याची क्षमा मागतोय. शिवाच्या उजवीकडे खालच्या बाजूला पार्वती बसली असून पतीचा हा पराक्रम पाहून तिला वाटत असलेले कौतुक तिच्या चेहर्यावर विलसत आहे. शिवाने एका हातात वाडगा धरलेला असून अंधकासुराचे पडत असलेले रक्त तो त्यात गोळा करतो आहे. अंधकासुराचे पापी रक्त पार्वतीच्या अंगाला लागू न देणे म्हणूनच ही योजना. शिवाच्या दुसर्या हातांमधली तलवार, डोक्यावर धरलेले चाबूकरूपी गजचर्म ही आयुधेपण अतिशय प्रेक्षणीय अशी आहेत.
अंधकासुर वध
क्रोधित शिव
अंधकासुरवधशिल्पाच्या बरोबर समोर आहे ती रावणानुग्रह किंवा कैलासउत्थापन शिल्प
रावणानुग्रह शिल्प
कैलासपर्वतावर
शंकर पार्वती शांतपणे बसलेले असून उन्मत्त झालेला रावण कैलास पर्वतापाशी
पाठमोरा होऊन आपल्या २० हातांनी कैलास पर्वत हलवण्याच्या प्रयत्न करत आहे.
रावणाच्या डावी उजवीकडे असलेले शिवगण भयचकित झालेले असून काही रावणावर
हल्ला करायचा प्रयत्न करत आहेत तर काही शंकराची हात जोडून प्रार्थना करत
आहेत.
दुसर्या पातळीवर शंकर
पार्वतीच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल कोरलेले असून चामरधारी सेविका शांतपणे
चवरी ढाळत उभी आहे. तर एकदम वरच्या पातळीत दोन्ही बाजूस सप्तमातृका, काल व
विद्याधर दाखवले असून त्यापैकी हाडाचा सापळा असलेली चामुंडा व कालची मूर्ती
सहजी ओळखू येतेय.
शंकराने आपल्या
उजव्या पायाने पायाने कैलासाला दाबून धरलेले असून डाव्या हाताने पार्वतीला
घट्ट धरून ठेवलेले आहे. चेहर्यावरील भाव अत्यंत निराकार किंवा अतिशय शांत
असेच कोरलेले आहेत. तर पार्वतीही पतीने सावरून घेतल्यामुळे आश्वस्त झालेली
आहे.
ही रावणानुग्रहमूर्ती वेरूळ लेणीसमूहाच्या इतरही बर्याच लेणीत कोरलेली असून दिसायली जरी सारखीच वाटली तरी प्रत्येकीत काही वेगळे बारकावे आहेतच.
रावणानुग्रह शिल्प
इथून
पुढे देखण्या स्तंभांवर सभामंडप तोलून धरलेला दिसून येतो. त्यापैकी एका
बाजूला नटराजाची भव्य मूर्ती कोरलेली असून ती अपूर्णावस्थेत असल्याने इतकी
आकर्षक वाटत नाही तर याच्या समोरील भिंतीवर लकुलीश शिवाची मूर्ती आहे.
मंडपातील
स्तंभांवरही काही कोरीव शिल्पे आहेत. एका स्तंभावर नटराजाची मूर्ती आहे तर
दुसर्या स्तंभांवर कल्याणसुंदर शिवाची मूर्ती कोरलेली आहे.
सभामंडप
सभामंडप
नटराज
स्तंभांवरील नटराज व कल्याणसुंदर शिवमूर्ती
लकुलीश शिव
लकुलीश
हा शिवाचा एक अवतार समजला जातो. हा कमळावर बसलेला असून नागसेवकांनी कमळाचा
देठ घट्ट धरून ठेवला आहे. शिवाला दोनच हात दाखवले असून त्याचा उजवा हात
व्याख्यान मुद्रेत आहे तर दुसर्या हातात त्याने लगूड अथवा लाकडी सोटा
उचलून धरला आहे. गळ्यात नागरूपी हार असून कपाळी अस्पष्टसा असा तिसरा डोळा
दिसतो आहे. हे शिवाचे योगी स्वरूप.
लकुलीश
शिव प्रतिमा ही बुद्धासारखीच दिसते. किंबहुना बुद्धप्रतिमेवरूनच शिवाचे हे
रूप तयार झाले असावे. कित्येक महायानकालीन बौद्ध लेण्यांत पद्मपाणी
बुद्धाची अगदी अशीच प्रतिमा कोरलेली आढळते.
लकुलीश शिव
सभामंडपाच्या डाव्या बाजूला भिंतीवर कासवावर उभी राहिलेली यमुनेची प्रतिमा कोरलेली आहे. एका हातात तिने शंख का फूल असे कायसे धरीले आहे तर दुसरा हात सैलसर असा कमरेच्या बाजूला मुक्त सोडलेला आहे. तिने अगदी तलम वस्त्र नेसलेले नसून यात तिच्या प्रवाहीपणा प्रकट होतो तर बाजूला एक सेविका दाखवलेली असून वर आकाशगामी गंधर्व कोरलेले आहेत.
यमुना
या बाजूलाचा यमुनेच्या पुढ्यातच परत दोन्ही बाजूंना सिंह कोरलेले आहेत तर चार पायर्या खाली उतरून जाताच अजून एक लेणे आहे पण यात कसलीही मूर्ती कोरलेली नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे हे कसलेतरी कोठार म्हणून उपयोगात आणले जात असावे.
यमुना व तिच्या पुढ्यातील सिंह
मध्यभागी गर्भगृह असून ते छताला भिडलेले आहे. व आतमध्ये शिवाची पिंडी अधिष्ठित आहे. गर्भगृहाच्या चारही बाजूंनी अतिशय भव्य असे द्वारपाल कोरलेले आहेत. द्वारपालांबरोबरच सेविकांची चित्रे पण कोरलेली आहेत तर त्यांच्या डोक्यावर गंधर्व विहरतांना दाखवलेले आहेत. इतके भव्य द्वारपाल मी अद्यापपावेतो इतरत्र कुठेही पाहिलेले नाहीत किंबहुना वेरूळच्या जगप्रसिद्ध कैलास एकाश्ममंदिरातही इतके भव्य द्वारपाल नाहीत.

गर्भगृह व भव्य द्वारपाल

या
लेण्यातील शिवलिंग हेच दर्शविते कि हे पुर्णपणे हिंदु लेणे असून हि गुंफा
साधारण आठव्या ते नवव्या शतकात कोरली असावी. शिवलिंग हे भिंतीतूनच कोरुन
काढलेले दिसते.
शिवपार्वती विवाहपट
गर्भगृहाच्या पाठीमागच्या बाजूस उजव्या बाजूच्या भिंतीत शिवपार्वती विवाहाचा एक देखणा शिल्पपट कोरलेला आहे. मध्यभागी पार्वतीचा हात हाती घेऊन शिव उभा असून पार्वती शिवाच्या बाजूने वळली आहे. पार्वतीच्या डाव्या बाजूले तिचे पिता हिमालय पर्वत व आई मेना उभी आहे तर शंकराच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेव विवाहाचे पौरोहित्य करत बसलेला आहे तर त्याच्या शेजारी विष्णू उभा आहे. विष्णूच्या डोक्यावर स्वर्गातून आलेला ऐरावतारूढ इंद्र तर त्याच्या शेजारी मकरवाहन गंगा आलेली आहे तर त्यांच्याहीवर अप्सरा, गंधर्व आलेले आहेत तर डाव्याबाजूला वरच्या बाजूस यम,वायु,अग्नी, निऋती, कुबेर, वरूण इत्यादी अष्टदिक्पाल त्यांच्या रेडा, बैल, बोकड, नर आदी वाहनांवर आरूढ होऊन विवाहसोहळ्यात आप्तेष्ट म्हणून आलेले दाखवलेले आहेत.
शिवपार्वती विवाह
याच शिल्पपटाच्या बाहेरील बाजूस सरस्वतीची उभ्या अवस्थेतील मूर्ती कोरलेली आहे.
सरस्वती
याच्या समोरच अजून एक शिल्पपट आहे. यात शिवपार्वती विवाहानंतरचा प्रसंग दोन पातळ्यांत कोरलेला आहे.
खालच्या
पातळीत मंगलघटांची मांडणी केलेली आहे तर डावी उजवीकडे विष्णू आणि
ब्रह्मदेव आहेत तर मध्यभागी नंदी असून शिवगण त्याची थट्टा करतांना दाखवलेले
आहेत. तर वरच्या पातळीत शिवपार्वती मजेने गप्पा मारत बसलेले असून शिवाने
पार्वतीचा हात थट्टापूर्वक घट्ट पकडून ठेवला आहे आणि त्याच्या चेहर्यावर
मिष्किल हास्य विलसत आहे तर पार्वतीची मुद्रा लाजरी दाखवलेली आहे. शिवगण
आणि पार्वतीच्या सख्या मोठ्या कौतुकभरल्या नजरेने ह्या दोघांकडेही पाहात
आहेत. तर आकाशातून अप्सरा, गंधर्वसुद्धा हा सोहळा मोठ्या कौतुकाने पाहात
आहेत.
शिवपार्वती शिल्पपट
लेणी क्र. २९ वरून उतरणारा चिंचोळा रस्ता (हा रस्ता मध्येच बंद केला आहे)
या बाजूनेच एक जिना दरीच्या कडेने बारीक वाटेने उतरून पुढील लेणीकडे जातो. या मार्गात उंच कडा, खोल दरी आणि दरडी कोसळण्याचे भय असल्यामुळे हा मार्ग सध्या पुरातत्व खात्याने बंद केला आहे.
इतर लहानसहान लेणी : वर वर्णन केलेल्या मुख्य लेणीसमूहाव्यतिरिक्त वेरूळला याच लेण्यांच्या परिसरात इतरही छोटीछोटी लेणी आहेत. उदा., `तेली की घाणी’ (क्र. २४) जवळ दोन लेणी असून त्यांत गर्भगृहात त्रिमूर्ती, तर मंडपात पंचाग्निसाधन करणारी उमा कोरलेली आहे. याशिवाय गणेशमूर्तीही आहे.
तेली कि घाणी लेण्यातील त्रिमुर्ती शिल्प
लेणे क्रमांक २९ (सीता की नहाणी) च्या वरच्या बाजूस डोंगर-पठारावर `गणेश लेणी’ या नावाने संबोधल्या जाणाऱ्या लेण्यांचा समूह आहे. यांतील एकात गर्भगृहात शिवलिंग असून या लेण्याचे वैशिष्ट्य असे, की याच्या मंडपाच्या छतावर लिंगोद्भव शिव, समुद्रमंथन यांची भित्तिचित्रे आहेत. दुसऱ्या एका लेण्यात गर्भगृहात गणेशाची मूर्ती आहे, तर इतर काहींमध्ये महेशमूर्ती उत्कर्णी केलेल्या आहेत. तेली की घाणी (क्र.२४) जवळ दोन लेणी असून त्यांत गर्भगृहात त्रिमूर्ती, तर मंडपात पंचाग्निसाधन करणारी उमा कोरलेली आहे. आणखी काही अंतरावर `योगेश्वरी’ नावाच्या लेण्यांचा समूह आहे. ही लेणी आकाराने लहान असून त्यांत शिवलिंग आणि महेशमूर्ती आढळून येतात. ही सर्व लेणी, त्याचप्रमाणे यांतील चित्रकारी अकराव्या-बाराव्या शतकांतील असावी. स्थापत्य आणि शिल्प यांच्यातील जोम नष्ट झाल्याचा हा काळ होता.
सीता न्हाणी धबधबा
वेरूळ लेणी परिसरात पावसाळ्यात सैर करणे एक रोमॅँटिक अनुभव असतो. पावसाची भुरभुर. कधी मोठा सडाका. लेणी परिसर गर्दीने फुललेला. अशा वेळी सीता न्हानी धबधब्याला उत्साहाचे भरते येते. तो मनसोक्त कोसळतो. मग आपसुकच पर्यटकांची पावले या विलोभनीय दृश्याकडे वळतात. धबधब्याकडे जाणारी वाट तशी बिकट आहे. तरीही धबधब्याचे रूप आपल्याला खेचून घेते. हा धबधबा मनोहारी असला तरी पाणी कोसळणारे पात्र खोल आहे. त्यामुळे हे नेत्रसुख दूरनच घ्यावे लागते. याची हुरहुर आत लागून राहते.
बहुतेक जण हि लेणी साधारण़ तीन, चार
तासात बघतात.पण हि लेणी बारकाईने आणि अभ्यासपुर्ण नजरेने बघायची तर किमान
तीन ते चार दिवस इथे वेरूळला मुक्काम ठोकावा लागेल.








