|| दास डोंगरी राहतो,
यात्रा रामाची पाहतो |
देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे ||
महाराष्ट्रातील काही किल्ल्यांना इतिहासात एका विशिष्ठ कारणामुळे महत्व आलेले आहे. कालौघात त्या गडावर एतिहासिक अवशेष नसले, तरीही हे गड आजही सर्वसामान्य दुर्गभटक्यांना भुतकाळातील त्या त्या घटनांना उजाळा देउन जातात.शिवछत्रपतींच्या स्मृती बाळगणारा रायगड्,त्यांची पहिली राजधानी राजगड्,बाजीप्रभुंच्या स्मृती जपणारा विशाळगड्,मुरारबाजीच्या शौर्यत्वाचा साक्षीदार पुरंदर, कोंडाजी फर्जंदच्या युक्तीच्या आठवणी बाळगणारा पन्हाळा तसा समर्थ रामदासांच्या वास्तव्याच्या पाउलखुणा आणि त्यांच्या समाधीला कुडीत जपणारा सज्जनगड प्रत्येक दुर्गप्रेमी आणि सर्वसामान्य पर्यटकांसाठी महत्वाचा आहे. समर्थ रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात चर्चा असेल तर या सज्जनगडाचा नामोल्लेख येणारच, त्यामुळे शिवकालीन इतिहासात सज्जनगडाचे विशेष स्थान आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील शंभू महादेव या नावाने ओळखली जाणारी एक डोंगररांग सातारा जिल्ह्यात पुर्व दिशेस विस्तृतपणे वाढत जाते.या शंभू महादेव डोंगररांगेवरच सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या अगदी जवळ असलेल्या परळी गावाच्या हद्दीत हा किल्ला आहे. उत्तरेकडून वहाणार्या उरमोडी नदीच्या खोर्यात परळीचा किल्ला उभा आहे. सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या १० की.मी. अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३३५० फुट उंच आहे तर पठारापासून १००० फुट ऊंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी. हून अधिक आहे. पश्चिमेस खेड – चिपळूण , उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर, अजिंक्यतारा किल्ला आहे
सज्जनगडाचा इतिहास :
परळी गावाच्या शेजारी असलेल्या डोंगरावर पूर्वी आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते, असे म्हणतात. त्यामुळे या किल्ल्यास अपभ्रंश स्वरुपात ‘अस्वलगड’ असे म्हटले जात असे.अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड असेही सांगितले जाते.आश्वलायनगड हे नाव त्या भागात आढळणाऱ्या अस्वलांमुळे की आश्वलायन ऋषींनी ह्या डोंगरावर वास्तव केले म्हणून रूढ झाले हे नक्की सांगता येत नाही. साधारणपणे १०-११ व्या शतकात शिलाहारांनी सातारा किल्ल्याबरोबर ह्या परळीच्या किल्ल्याची बांधणी केले असे मानले जाते. चवथा बहमनी राजा महमद शहा (१३५८-१३७५) याच्या कारकिर्दीत परळीच्या किल्ल्याचा उल्लेख आढळतो. बहमनी राजांकडून हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. त्यांनी किल्ल्याला नवरसतारा हे नवीन नाव दिले. इब्राहिम आदिलशहाने या गडाचे नाव ‘नवरसतारा’ ठेवण्यामागील कारण सांगताना साकी मुस्तैदखान लिहितो की, ‘‘तो प्रत्येक नवीन गोष्टीला ‘नवरस’ हे नाव देत असे. उदाहरणार्थ नवरसनामा, नवरसपूर गाव आणि नवरस नाणे. त्यास अनुसरून किल्ल्याचे नाव ‘नवरसतारा’ ठेवण्यात आले.’’सज्जन गडाच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव असल्यामुळे, या किल्ल्यास परळीचा किल्ला असे देखील म्हणतात. शिवाजी महाराजांनी इ.स. १६७३ मध्ये सातारच्या किल्ल्याबरोबर परळीचा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. नंतर महाराजांनी समर्थांना एखाद्या किल्ल्यावर राहण्याची विनंती केली त्याप्रमाणे समर्थांनी महिपतगड आणि नंतर परळीचा किल्ला न्याहाळला. शेवटी समर्थांनी आटोपशीर परळीचा किल्ला निवडला. याच सुमारास परळीच्या किल्ल्याचे सज्जनगड असे नामकरण झाले. संतसज्जनांचे वास्तव्य म्हणून सज्जनगड हे नाव रूढ झालेले असले तरी श्री रामदासी संशोधन – पांधरी व चाफळ खोरे यातील ३२९ व्या बाडात समर्थांची १४ नावे दिली आहेत. त्या चौदा नावांपैकी एक नाव सज्जन. त्यामुळेच सज्जन म्हणजे रामदासस्वामी राहतात तो सज्जनगड अशी पण एक शक्यता सज्जनगड नावामागे असावी. महाराजांनी २,००० होन खर्च करून समर्थांसाठी मठ बांधून घेतला. तोपर्यंत समर्थांबरोबर आलेले संतसज्जन आणि शिष्यपरिवार यांचे वास्तव किल्ल्यांवरील ओवऱ्यातच होते. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर स्वराज्याचे पहिले छत्रपती या नात्याने छत्रपती शिवाजीराजे भोसले सज्जनगडावर समर्थ रामदासांच्या भेटीसाठी आले होते.शके १५७५ (सन १६७३) ते शके १६०३ (सन १६८१) पर्यंत म्हणजे समर्थ समाधी घेईपर्यंत ह्या किल्ल्यावर वास्तव्य करून होते. समर्थांच्या एवढ्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे हा किल्ला रामदासी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र बनला. समर्थांच्या वास्तव्यानंतर ह्या किल्ल्याचा इतिहास समर्थ रामदास आणि रामदास संप्रदाय यांच्याशीच निगडीत राहिला.संपूर्ण महाराष्ट्राला बलोपासनेची समर्थ रामदासस्वामी यांनी ओळख करून दिली. शक्तीची देवता हनुमान वेशीचा रक्षक म्हणून वेशीच्या बाहेर पुजला जात होता. परंतु समर्थांनी त्याला वेशीच्या आत आणून त्याची पूजा मोठ्या प्रमाणात सुरु केली. ३ नोव्हेंबर, इ.स. १६७८ रोजी शिवरायांनी संभाजी
महाराजांना समर्थांकडे पाठवले. पण ३ डिसेंबर, इ.स. १६७८ रोजी संभाजी महाराज
सज्जनगडावरून जाऊन दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्या निधनानंतर १८
जानेवारी, इ.स. १६८२ रोजी श्री राममूर्तींचे गडावर स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर इ.स. १६८२ मध्ये सज्जनगडावर श्रीरामाचे मंदिर बांधून तेथे राममूर्तींची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी १६८२ मध्ये समर्थ रामदासांचे निधन झाले. समर्थ रामदासांचे रामदासी, रामदासांच्या निधनानंतर देखील सज्जनगडावर श्रीराम मंदिरात रामदासांच्या समाधीजवळ राहत होते. यावेळी समर्थ रामदासांच्या शिष्या अक्कास्वामी यांनी मठाची व्यवस्था पाहिली होती. पुढे २१ एप्रिल १७०० रोजी साताऱ्याचा किल्ला प्रयागजी प्रभू यांच्याकडून जिंकून घेतल्यानंतर औरंगजेबाची नजर सज्जनगडाकडे वळली. साताऱ्याचा किल्ल्यावरील प्रयागजी प्रभू यांना सज्जनगडावरील परशुराम त्रिंबक प्रतिनिधींचे सहाय्य होत होते. औरंगजेब ३० एप्रिल १७०० रोजी सज्जनगडाच्या वेढ्यात सामील झाला. किल्ल्यावर होणाऱ्या हल्ल्यांचे गांभीर्य ओळखून परशुराम त्रिंबक प्रतिनिधी व उध्दवस्वामी यांनी गडावरील सर्व मूर्ती व अन्य पूजनीय वस्तू घेऊन गड सोडला आणि कोयनेच्या खोऱ्यातील दुर्गम वासोटा (व्याघ्रदुर्ग) किल्ला गाठला.ऐतिहासिक संदर्भात ७ मे १७०० मध्ये औरंगजेबाने गडाखालील मोर्चाची पाहणी केली. बाणदारांना बाण किल्ल्यात फेकण्यास सांगितले. दोन दारूचे बाण किल्ल्याच्या दिशेने सोडण्यात आले. ३१ मे फतेहुल्लेखानाने लिहून पाठवले की, ‘‘मी पगाराचे वाटप केले. उद्या मी हल्ला करणार आहे. त्यासाठी शिडय़ा तयार केल्या आहेत. मला धनुष्य व बाणांचे भाते देण्यात यावेत.’’ ९ जून १७०० रोजी औरंगजेबाच्या ताब्यात देण्यात आला. १३ जून १७०० रोजी गडावर विजय मिळवल्यानंतर औरंगजेब डोक्याला शिरपेच बांधून किल्ला पाहण्यास गेला व गडावरील सर्व नवी मंदिरे जमीनदोस्त करण्याचा त्याने हुकूम अमलात आणला गेला.किल्ल्याचे सज्जनगड हे नाव बदलून गडाच्या विशिष्ठ ठिकाणावरून त्याचे नवरसतारा असे करण्यात आले. औरंगजेब या भागातून निघून गेला आहे ह्या संधीचा फायदा घेऊन मुघलांकडून इ.स. १७०९ मध्ये परशुराम त्रिंबक प्रतिनिधींनी सज्जनगड पुन्हा मराठेशाहीच्या राजवटीखाली सहभागी करून घेतला.किल्ला ताब्यात आल्यानंतर वासोटा किल्ल्यावरील सर्व मूर्ती व अन्य पूजनीय वस्तू पुन्हा सज्जनगडावर आणून त्यांची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर येथील मंदिरांची पुनर्बाधणी व डागडुजी करण्यात आली.इ.स. १८१८ मध्ये सज्जनगड ब्रिटीशांच्या राजवटीत कंपनी सरकारच्या अधिपत्याखाली आला.
जावे कसे ? :-
सज्जन गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. कोणत्याही वाटेने गेल्यानंतर पायऱ्या चढून गडावर जावे लागते.
परळी गावामधून : सातारा गावामधून सज्जनगड किल्ल्याचे पायथ्याचे गांव परळी साधारणपणे १० किमी वर आणि इथपर्यंत येण्यासाठी चांगला डांबरी रस्ता आहे. परळी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अंदाजे ७५० पायऱ्या बांधलेल्या आहेत. ह्या वाटेने एका तासात आपण किल्ल्यावर जातो
गजवाडी पासून : त्याचबरोबर सातारा-परळी रस्त्यावर गजवडी गावातून किल्ल्यावर जाणारा डांबरी रस्ता आहे. तेथून गडावर जाता येते.ह्या मार्गाने गेल्यास जास्तीतजास्त ५० पायऱ्या चढाव्या लागतात. सातारा शहरातून थेट गडाच्या वाहनतळापर्यंत बस सेवा आहे.स्वत:चे वाहन असेल तर गजवडीमार्गे गडाच्या निम्म्या उंचीपर्यंत असणार्या वाहनतळावर पार्क करुन थोड्या पायर्या चढून गडमाथा गाठता येतो. या मार्गावर सातारा-सज्जनगड एसटी सेवा पण उपलब्ध आहे. स्वतःचे वाहन असलेल्यांनी आणि ज्यांना ७५० पायऱ्या चढायच्या नसतील त्यांनी ह्या मार्गाचा वापर करायला हरकत नाही. ज्यांना किल्ला मुख्य वाटेने चढायचे आहे त्यांनी परळीच्या वाटेने चढाई करावी.
समर्थ दर्शन : सज्जनगडाच्या पायथ्यापर्यंत पोचत असताना, वाटेवर उजव्या बाजूस हनुमानाची उंच मुर्ती नजरेस पडते. गजवडीमधुन घाट चढुन आपण सज्जन्गडकडे जाताना उजव्या हाताला "ज्ञानश्री ईन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी" या नव्याने झालेल्या शैक्षणिक संस्थेच्या आवारातच हि समर्थ सृष्टी उभारलेली आहे. समर्थ वाड:मयाचे अभ्यासक अरुण गोड्बोले याांची हि संकल्पना.
समर्थांच्या आयुष्यातील दहा-पंधरा महत्त्वाचे प्रसंग निवडून ते साकार करणारा सहा हजार चौरस फूटांचा एक हॉल, समर्थस्थापित अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचा तीन हजार चौरस फुटांचा दुसरा हॉल व लघुपट दाखवण्यासाठी दीडशे सीट्सचे मिनी थिएटर असे ‘थीम पार्क’चे स्वरूप आहे. त्याला जोडून बुक स्टॉल, उपहारगृह व चार-पाच दुकाने आणि प्रसाधनगृहे ही सारी योजना आहेच. बाबासाहेब पुरंदरे, मारूतीबुवा रामदासी, मोहनबुवा रामदासी, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे सहकार्य मिळत गेले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यटन तज्ज्ञ राजीव जालनापूरकर यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्याचे एकूण बजेट दीड कोटींवर गेले. भाई वांगडे आणि त्यांचे सहकारी व पुण्याच्या ‘गार्डियन ग्रूप’चे सर्वेसर्वा मनीष साबडे या दोघांनी त्यासाठी आनंदाने सहकार्य देऊ केले आणि ‘समर्थ दर्शन टुरिझम व्हेंचर’ या नावाने प्रकल्पाची उभारणी केली गेली.
ऐतिहासिक भासावे म्हणून सर्व बांधकाम जांभा दगडात केले आहे. तो कोकणातून आणण्यात आला. कोल्हापुरच्या विजय डाकवे यांनी सिव्हिल वर्क केले. कलादिग्दर्शक अभय एकवडेकर यांनी समर्थ जीवनातील प्रसंगांच्या उभारणीची धुरा सांभाळली. त्यासाठी फायबरचे पुतळे, अन्य साहित्य यांचे काम सुरू झाले. कट-आऊटसाठी वेशभूषा करून, कलाकार निवडून फोटोग्राफी करण्यात आली. अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचे काम बंगाली कलाकार चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. लायटिंगची जबाबदारी राहुल दीक्षितने तर फोटोग्राफी विजयेंद्र पाटील यांनी सांभाळली. पाटील यांनीच समर्थांच्या तीर्थस्थानांच्या लघुपटाचे शुटिंग जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ आणि सज्जनगड येथे जाऊन केले.
समर्थांचे घर, जन्म, बालपण, उपासना, विवाहमंडपातून पलायन, टाकळीतील वास्तव्य - तेथील तपस्या, गोमय मारुतीची स्थापना, मोगली अत्याचार, बद्रिनाथला हनुमंत स्थापना, महाराष्ट्रात आगमन, चाफळ, दासबोध लेखन व आनंद भुवन हे प्रसंग उत्कट रीत्या हुबेहूब साकार झाले आहेत. मारुती दर्शन हॉलमध्ये अकरा मारुतींच्या प्रतिकृती, त्याच्या पार्श्वभूमीवर तेथे जाण्याचा नकाशा व तेथील नवी मंदिरे असे दाखविले आहे. प्रत्येक मारुतीची माहिती देणारे फलकही आहेत. दीडशे क्षमतेचे चित्रपटगृह, प्रोजेक्टर, साऊंड व तेथे समर्थांवर डॉक्युमेंटरी दाखवीली जाते. भाई वांगडे यांच्या हस्ते शास्त्रोक्त उदकशांत करून प्रकल्प मार्च २०१२ मध्ये पूर्णत्वाला आला.
प्रवेश शुल्क मोठ्या व्यक्तीस चाळीस व मुलास तीस रूपये असे आहे.
ईथे प्रवेश करतानाच बजरंग बलीचा भव्य पुतळा आपले स्वागत करतो. अत्यल्प तिकीट काढून आपण आत प्रवेश करतो. डाव्या बाजुला संग्रहालयाची ईमारत आहे.
आत प्रवेश केल्यानंतर समर्थांचा जन्म , बालपण, विवाह वेदीवरुन पलायन, तपस्या हे जीवनातील महत्वाचे ट्प्पे मुर्तींच्या माध्यमातुन दाखविले आहेत.
या शिवाय समर्थ स्थापित अकरा मारुतींच्या मुर्तींचे दर्शन घडविणरे वेगळे दालन आहे.
सुदैवाने ईथे फोटोग्राफीला बंदी नाही.समर्थांच्या जीवनावर एकूण पंधरा दालने आहेत. एका कुटीत समर्थांच्या हस्ताक्षरातील काही पत्रे आहेत, त्यात त्यांचे गद्य स्वरुपातील एकमेव पत्र आहे. या शिवाय समर्थांनी बालवयात टाकळी ईथे लिहीलेल्या वाल्मिकी रामायणातील काही कागद, त्यात रेखाटलेली चित्रे, समर्थांचे व कल्याणस्वामींचे अस्सल चित्र हे सर्व आपल्याला त्या काळात नेउन आणतात. हे सर्व मान जांभ्या दगडात केल्यामुळे एक वेगळे सौंदर्य आलेले आहे. उगाच जाउन मुर्तींच्या पाया पडण्यापेक्षा हे सर्व डोळसपणे पाहिले पाहिजे. हे प्रदर्शन पाहून आल्यानंतर डाव्या हाताला एक प्रेक्षागॄह आहे, जिथे समर्थांचा जीवनपट दाखविला जातो. ईथे छोटे उपहारगॄहही आहे जिथे चहा, नाष्ट्याची सोय होउ शकते.
सज्जनगडचा नकाशा
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :-
या टप्प्यावरून आपल्याला समोरच किल्ला आणि किल्ल्यावर जाणारी पायऱ्यांची वाट नजरेस पडते. ह्या वाटेवर समर्थ रामदासस्थापित मारुतींच्या मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे.









साधारणपणे अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यानंतर गायीचे व मारुतीचे मंदिर आहे. ह्या मंदिराजवळच परळी गावातून येणारी वाट आपल्या वाटेला येऊन मिळते. कड्यावरून पडलेल्या गायीच्या स्मरणार्थ १९२२ साली ह्या मंदिराची उभारणी झालेली आहे. मंदिरात सवत्सधेनूची मूर्ती आहे. ह्या मंदिरासमोरच मारुतीचे छोटेसे मंदिर आहे.
मंदिराच्या थोडे पुढे गेल्यानंतर मुख्यवाटेपासून उजवीकडे जाणारी छोटी पायवाट. ही पायवाट आपल्याला रामघळीकडे घेऊन जाते. ही समर्थांच्या साधनेची जागा आहे.

गोवत्स मंदिर

गोवत्समूर्ती

वीरमारुती

वीरमारुती मंदिर
रामघळ बघून पुन्हा पायऱ्यांच्या मुख्य वाटेला आल्यानंतर गडाच्या पहिल्या प्रवेशद्वारासमोर येतो.

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार
या प्रवेशद्वाराचे नाव छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार असे नामकरण करण्यात आलेले आहे. महाद्वाराच्या डावीकडे कातळ आणि उजवीकडे बुरूज आहे.हे द्वार आग्नेय दिशेस आहे.

श्री समर्थ महाद्वार
महाद्वारानंतर असलेल्या पायऱ्या चढून गेल्यानंतर किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. या दरवाज्याला श्री समर्थ प्रवेशद्वार असे नाव देण्यात आलेले आहे. हा दरवाजा पहिल्या दरवाज्यापेक्षा प्रशस्त आहे.आजही हे दरवाजे रात्री दहा नंतर बंद होतात.

पर्शियन शिलालेख
प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात असलेल्या तीन कमानी आणि कमानींच्या वर असलेल्या फार्सी भाषेतील शिलालेख यांच्यावरून या दरवाज्याची बांधणी शिवपूर्वकाळात झाली असावी असे वाटते. या दरवाज्यात असलेल्या देवड्यांचे (पहारेकरांच्या खोल्या) छत घुमटाकार आहे. घुमटाकार छत हे मुस्लीम स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.

कल्याणस्वामी स्थापित मारुती
या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन देवड्या आहेत. त्यापैकी एका देवडीत श्रीधरस्वामींनी हनुमानाची स्थापना केली आहे.
किल्ल्याच्या दोन्ही दरवाज्यांच्या बाहेर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांसाठी व्यवस्था केलेली आहे. तसेच किल्ल्याचा पहिला दरवाजा दुसऱ्या दरवाज्यातून माऱ्याच्या टप्प्यात आहे. किल्ल्याच्या इतर भागात तुटलेले कडे असल्यामुळे फक्त ह्याच भागातून शत्रू शिड्या किंवा माळांच्या सहाय्याने किल्ल्यात प्रवेश करू शकतो आणि त्यामुळे किल्ल्याच्या याच भागात तटबंदी जास्त मजबूत आहे.
शिलालेख
समर्थ प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर भिंतीवरील पर्शियन शिलालेख आपले लक्ष वेधून घेतो. शिलालेख ५६ सेंमी x ४१ सेंमी आकाराचा असून उठावाच्या पद्धतीने कोरलेला आहे. हा शिलालेख पुढीलप्रमाणे आहे:
फार्सी वाचन
दौलत झ दरत हमहरा रूए नुमायद
हिम्मत झ कार ऊ हमह नुव्वार कुशायद
तू कब्लह व मर हाजतमन्द हाजती
हाजत हमह अझ दर कब्लह बर आयद
बिनाए दरवाज इमारत किलआ परेली आमिर शुद बतारीख ३
दर जमादी उल आखिर कार कर्द रेहान आदिलशाही
मराठी अर्थ
ऐश्वर्य तुझ्या दारातून सर्वांना तोंड दाखवत आहे
हिम्मत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे
तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचनामुक्त आहेस
तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात
परळी किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने याचे काम केले. बांधकाम करणारा आदिलशाही रेहान कोण हे कळून येत नाही. कारण इतिहासात दुसऱ्या इब्राहीम आदिलशहापर्यंत कोणत्याही रेहानचा संदर्भ मिळत नाही.
शिलालेखाच्या जवळच पण तटाच्या वरील बाजूस सिंह हत्तीवर मागील बाजूने हल्ला करीत आहे असे शिल्प आहे. हे शिल्प किल्ल्यावरील एखाद्या मंदिराचे असावे. 
शिल्प पाहून पुढे गेल्यानंतर लोकमान्य टिळकांची स्मृती जतन व्हावी म्हणून बांधलेली लोकमान्य स्मृती कमान दृष्टीस पडते. कमानीच्या थोडे अलीकडे डाव्या बाजूला घोडाळे तळे आहे. या तळ्यातील पाण्याचा वापर जनावरांना पाणी पाजण्यासाठी केला जात असे. तळ्याच्या काठावर वीराचे स्थान आहे. तळ्याच्या काठावर चुना मळण्यासाठी तयार केलेला चुन्याचा घाणा आहे.

मशिद
तळ्यावरून पुढे घेल्यानंतर भग्नावस्थेत असलेली मशीद आपल्याला दिसते. मशिदीच्या स्थापत्यकलेवरून ही मशीद बहामनी काळात बांधली असावे वाटते. भिंतीच्या बांधकामासाठी दगडी चिऱ्यांचा, तर छताच्या बांधकामासाठी विटांचा वापर करण्यात आलेला आहे.
गडावरील मशिदीच्या समोरच्या बाजूस आंग्लाई देवीचे मंदिर आहे. समर्थाना अंगापूर डोहात दोन मूर्ती सापडल्या. यांपैकी सूर्यनारायणाच्या मूर्तीची त्यांनी चाफळ येथे श्रीराम मूर्ती म्हणून स्थापना केली व श्री आंग्लाई देवीच्या मूर्तीचीही स्थापना केली. शिवकाल व पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा जपणारी आंग्लाई देवीचं स्थान हे अनेक घडामोडींचे साक्षीदार आहे.

आंग्लाईदेवी
मशीदीच्या पूर्वेला आंग्लाईदेवीचे मंदिर आहे. आंग्लाईदेवीची मूर्ती समर्थांना अंगापूर गावातील डोहात सापडली. आंग्लाईदेवीच्या मूर्तीबरोबरच सापडलेल्या रामाच्या (मूर्तिशास्त्रानुसार सूर्य) मूर्तीची स्थापना चाफळ येथे करण्यात आली. देवीची मूर्ती चतुर्भुजा असून महिषासुरमर्दिनीरुपात आहे. मूर्तीच्या मागे पितळी महिरप असून कीर्तिमुख कोरलेले आहे. या मंदिराबाबत एक गोष्ट सांगितली जाते. समर्थांना आपल्या आईचा अंतकाळ जवळ आल्याचे त्यांच्या अंतर्ज्ञानाने कळल्यानंतर त्यांनी स्वतःला या मंदिरात कोंडून घेतले. तसेच विशिष्ट दिवशाच्या आधी हे मंदिर उघडू नये अशी सक्त ताकीद समर्थांनी शिष्यांना दिली. समर्थांच्या आज्ञेनुसार शिष्यांनी विशिष्ट दिवशी मंदिराचे दार उघडल्यानंतर समर्थ बाहेर आले, तेव्हा शिष्यांना समर्थांनी क्षौर केलेले दिसून आले. क्षौराचे स्पष्टीकरण देताना त्यांनी आईचा जांब येथे देहांत झाला व अंत्यविधी आटोपून येत असल्याचे सांगितले.

आंग्लाईदेवी मंदिर

आंग्लाईदेवी मंदिर परिसारातील शिल्प
मंदिरासमोर ध्वजस्तंभाचा बुरुज आहे. ह्या बुरुजावरून आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दर्शन घडते. मंदिर परिसरातच तटबंदीचे अवशेष दिसून येतात. बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळली आहे. मंदिराजवळ असलेल्या तटबंदीत एक बंदिस्त गुहा आहे. ह्या गुहेत मारुतीची मूर्ती आहे.

तटबंदीतील बंदिस्त गुहा

बंदिस्त गुहेतील मारुती
आंग्लाईदेवीचे दर्शन घेऊन पुन्हा घोडाळे तळ्याजवळ असलेली फरसबंदी वाट ओलांडल्यानंतर समोरच उजव्या हातास चिरेबंदीने बांधलेले मुक्काम तळे दृष्टीक्षेपात पडते. या तळ्याच्याजवळ समर्थांच्या दोन मुसलमान शिष्यांच्या कबरी आहेत. कबरीच्या जवळून जाणारी वाट कल्याण स्वामींनी छाटीसाठी उडी मारली त्या ठिकाणी घेऊन जाते. ह्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली आहे. ह्या ठिकाणाबद्दल अशी कथी सांगितली जाते की एकदा रामदासस्वामी व कल्याण स्वामी फिरावयास गेलेले असताना समर्थांची छाटी वाऱ्याने उडून कड्याखाली गेली. तेव्हा समर्थ म्हणाले, “कल्याणा छाटी उडाली बघ.” समर्थांचे बोल ऐकताच कल्याण स्वामींनी आपल्या जीवाची पर्वा न करता कड्यावरून उडी मारली आणि ती छाटी जमिनीवर पडण्यापूर्वीच हातात धरली. तसेच जिथे कल्याण स्वामींची खाली उडी पडली तेथे कल्याणस्वामी मंदिर आहे.

मुक्काम तळे

समर्थशिष्यांच्या कबरी

छाटीसाठी कल्याणस्वामींनी उडी मारलेली जागा

कल्याणस्वामींनी उडी मारलेल्या जागी स्थापन केलेला मारुती
कल्याणस्वामींच्या उडी मारलेल्या ठिकाणाला भेट दिल्यानंतर मुख्य वाटेने श्रीराम मंदिराकडे जाताना पेठेतील मारुती मंदिर आहे. हे मंदिर समर्थांच्या आधीपासून होते. या मारुती मंदिराच्या मागील बाजूस आहे सोनाळे तळे. या तळ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. तळ्यात सातीआसरा ठिकाण आहे. या तळ्याच्या एका कोपऱ्यात प्राचीन लेणी आहेत. या लेणी तळ्याची साफसफाई करताना सन १९५२ मध्ये आढळल्या. तळ्यातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर या लेणी नजरेस पडतात. शेंदूर लावलेला वीरगळ तळ्याच्या काठावर उभा करून ठेवलेला आहे. वीरगळावर पायदळ व घोडदळ यांच्यातील युध्दप्रसंग कोरून ठेवला आहे. पेठेतील मारुती मंदिरासमोर श्रीधरकुटी आहे. सन १९१५ मध्ये श्रीधर स्वामींच्या शिष्यांनी या वास्तूची उभारणी केली आहे. या वास्तूत श्रीधर स्वामींनी अनेकदा वास्तव केलेले होते.

सातीआसरा

सोनाळे तळ्याजवळ असलेला वीरगळ

पेठेतील मारुती

पेठेतील मारुती मंदिर
श्रीधरकुटी बघून मुख्य फरसबंदीवाटेने पुढे गेल्यानंतर उंच जोत्यावर बांधलेला समर्थांचा मठ नजरेस पडतो. मठासमोरील फरसबंदीच्या कामासाठी श्री शंकर कृष्ण देव यांनी आर्थिक सहाय्य केले. समर्थांचा मुक्काम शिवकाळात याच मठात होता. हा मठ छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधला असून बांधकामासाठी २००० होन खर्च आला असे सांगितले जाते.
या मठात असलेल्या शेजघराचे रुपांतर संग्रहालयात करण्यात आले आहे. या शेजघरात पितळी खुरांचा पलंग आहे. या पलंगावर तंजावर मठाचे मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले हस्तरेखांकित चित्र ठेवलेले आहे. पलंगाशेजारी असलेल्या स्टॅंडमध्ये एक कुबडी, गुप्ती, वेताची काठी व सोटा ठेवलेला आहे. कुबडी श्रीदत्तात्रयांनी दिलेली समर्थांना दिली आणि गुप्तीत फिरंगी तलवार असून ही तलवार छत्रपती शिवाजीमहाराजांनी ३६० होनांना विकत घेतलेली आहे असे सांगितले जाते. लाकडी सोटा हिमालय परिभ्रमणाच्या वेळी एका सिद्धी पुरुषाने (बहुधा मच्छिंद्रनाथ) समर्थांना दिला अशी आख्यायिका आहे. स्टॅंडच्या शेजारी दोन मोठे तांब्याचे हंडे आहेत. या हंड्यांच्या कावडीतून कल्याणस्वामी उरमोडी नदीचे पाणी समर्थांना आणून देत असत असे सांगितले जाते. येथेच समर्थांच्या नित्य वापरातील पाणी पिण्याचा लोटा, पीकदानी आणि विड्याच्या पानांचा डबा ठेवलेला आहे. मारुतीने समर्थांना प्रसाद म्हणून दिलेला हुर्मुजी रंगाचा फेटा व हिमालयातील थंडीचा त्रास होऊ नये म्हणून मारुतीने दिलेली वल्कलेही येथे ठेवलेली आहेत. शेजघरात अग्निकुंड व प्रतापमारुतीची पितळी मूर्तीसुध्दा आहे. येथे असलेल्या मातीच्या सिंहासनावर मुख्य मंदिरातील श्रीराम मूर्ती सुरुवातीला त्यावर ठेवल्या होत्या. समर्थांचे देहावसनही याच मठात झाले.

समर्थ मठाच्या उत्तरेला श्रीराम मंदिर आहे. ज्या खड्ड्यात समर्थांवर अग्निसंस्कार झाले त्यावरच हे मंदिर उभारले आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्वाभिमुख गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात वर्णन केल्याप्रमाणे आहे. गणपतीच्या मागे श्रीरामाकडे तोंड असणारी पश्चिमाभिमुखी दासमारुतीची मूर्ती आहे. सभामंडप ओलांडून गाभाऱ्यात गेल्यानंतर तेथे असलेल्या श्रीराम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती डोळ्याचे पारणे फेडतात. व्यंकोजीराजे यांच्या निमंत्रणावरून समर्थ रामदास तंजावरला गेलेले असताना तेथे अरणीकर आडनावाच्या अंध कारागिराला दृष्टि देऊन त्याच्याकडून पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि मारुती यांच्या सुंदर मूर्ती करवून घेतल्या. या मूर्ती शके १६०३ माघ वद्य ६ म्हणजे समर्थनिर्वाणाच्या चार दिवस आधी गडावर आल्या. शेजघरात असलेल्या मातीच्या सिंहासनावर या मूर्तींची स्थापना झाली. श्रीरामाच्या मूर्तीजवळ स्वतंत्र प्रभावळीत दासमारुतीची मूर्ती आहे. या मुर्तीजवळ रामदास स्वामींची छोटी प्रतिमा ठेवलेली आहे. श्रीराममूर्तीच्या समोर पितळी कलमदान असून ते समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर यांचे आहे असे सांगितले जाते. मंदिराचा सागवानी सभामंडप श्री गोवर्धनदास गुजर यांनी बांधलेला आहे. मंदिराचे सर्व मुख्य कार्यक्रम या सभामंडपातच होतात.
श्रीराम व श्रीसमर्थ समाधी मंदिर
राममंदिराच्या खाली असलेल्या तळघरात समर्थांची समाधी आहे. ही समाधी कोणीही तयार केलेली नसून स्वयंभू समाधी आहे अशी मान्यता आहे. ज्या ठिकाणी समर्थांच्या देहावर अग्निसंस्कार केले, त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ही समाधी निर्माण झाली आहे. समाधी काळ्या पाषाणाची असून आयताकार आहे. समर्थांचे निर्वाण झाले तेव्हा कल्याणस्वामी डोमगावी होते. गडावर आल्यानंतर त्यांना समर्थांच्या निर्वाणाची बातमी समजताच शोक केला आणि समाधीपाशी जाऊन एकवार दर्शनाचा आग्रह धरला. त्यावेळी समाधी दुभंगून समर्थांनी कल्याणस्वामींना दर्शन दिले. ती चीर आजही समाधीवर दिसून येते. समाधीच्या मागील बाजूस असलेल्या कोनाड्यात पितळी पेटीत चंदनाच्या पादुका आहेत. या पादुका समर्थांना दत्तगुरुनी करवीर क्षेत्री दिल्याचे सांगितले जाते. समाधी फक्त पूजेच्या वेळी (सकाळी ७.३० ते ८.४५) विनाआच्छादित असते. इतर वेळी वस्त्र आणि फुले यांनी आच्छादलेली असते. समाधी स्थानावर पितळी मेघडंबरी आहे.

गणपती

श्रीराम व श्रीसमर्थ समाधी मंदिर
समर्थमठ व श्रीराममंदिर यांच्या सभोवती दगडी फरसबंदी पटांगण आहे. प्रदक्षिणा मार्गावर मंदिराच्या मागे असलेल्या ओवऱ्यांपैकी एका ओवरीत वेणाबाईंचे वृंदावन आहे. वेणाबाई यांनी शके १६०० चैत्र वद्य १४ रोजी समर्थ रामदास स्वामींच्या समोर देहत्याग केला.

वेणास्वामी वृंदावन

वेणास्वामी वृंदावन

ओवरीतील कोनाड्यात स्थापन केलेला मारुती आणि इतर देवता
या वृंदावनावर मारुतीची मूर्ती आहे. समर्थांच्या स्त्रीशिष्यांपैकी फक्त वेणाबाई यांनाच उभ्याने कीर्तन करण्याची परवानगी होती. समर्थांनी मिरजेच्या मठाची व्यवस्था वेणाबाईंकडे सोपवली होती. वेणाबाईंनी उत्तम दर्जाच्या वाड्मयाची निर्मिती केली. तसेच एका ओवरीत मारुती आणि देवतांची स्थापना केली आहे. या वृंदावनाच्या जवळच असलेल्या भिंतीच्या कामासाठी एक वीरगळाचा वापर करण्यात आलेला आहे.
समर्थ मठासमोर असलेल्या अशोकवनाच्या जागी पूर्वी एक तळे होते. याच अशोकवनात आक्काबाईंचा मठ आहे. या मठात अक्काबाई यांचे वृंदावन आहे. समर्थांच्या मृत्यूनंतर चाफळ व सज्जनगड येथील दोन्ही मठांची आणि मंदिरांची व्यवस्था अक्काबाई यांनी उत्तमरीत्या सांभाळली. या अशोकवनात अजून एक तुळशीवृंदावन आहे.

अक्काबाई वृंदावन


अशोकवन

तुळशी वृंदावन
मंदिर आणि मठ यांच्यामध्ये असलेल्या पश्चिम दिशेच्या दरवाज्याने बाहेर पडल्यावर दूरवर असलेले मारुती मंदिर नजरेस पडते. किल्ल्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या बुरूजाजवळ हे मंदिर आहे. या मारुतीला धाब्याचा मारुती असे म्हणतात. या मारुतीची स्थापना रामदास स्वामी यांनी तटाच्या रक्षणार्थ केलेली आहे. मूळ छोटेखानी मंदिराच्या सभोवती नवीन सुंदर व प्रशस्त मंदिर, फरसबंदी आणि मंदिराच्या बाहेर विसाव्यासाठी कट्टे बांधलेले आहेत. एकांत आणि रामनामात वेळ घालवण्यासाठी ह्या मंदिरासारखी दुसरी जागा संपूर्ण गडावर नाही.

धाब्याचा मारुती मंदिर
धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन समाधीमंदिरावर परत येत असताना साधारणपणे मध्यावर तटाच्या कडेजवळ ब्रह्मपिसा स्थान आहे. येथे असलेल्या ओट्यावर हनुमानमूर्ती आहे. हे ठिकाण कल्याण स्वामींशी निगडीत आहे. कल्याण स्वामी हे समर्थांचे आवडते शिष्य आहेत ही गोष्ट काहीजणांना खटकत होती. त्यामुळे कल्याणस्वामींची योग्यता इतरांना पटवून देण्याचे समर्थांनी ठरवले. एकदा समर्थांनी सर्वांगाला शेंदूर फासला, मळवट भरून हातात तलवार घेऊन वेड लागल्याप्रमाणे शिष्यांच्या मागे धावत होते. कल्याण स्वामींना ही बातमी समजल्यावर लगोलग तिथे पोहोचले. कल्याण स्वामी येत आहेत हे बघून समर्थांनी तटावरून खाली उडी मारली आणि अवघड जागी बसले. समर्थांच्या पाठोपाठ कल्याण स्वामी देखील त्या अवघड जागी पोहोचले. तेव्हा समर्थ पळत जाऊन पायथ्याशी असलेल्या देवीच्या मंदिरात लपून बसले. तेथेही कल्याण स्वामी जाऊन पोहोचले. हे बघून समर्थ कल्याण स्वामींच्या धावून गेले. “महाराज ! खुशाल मारा. अशा मरणाने मोक्षच मिळेल. आपल्या या लीलेवरून आपणास वेडे म्हणणारे लोकच वेडे आहेत. ” असे उद्गार कल्याण स्वामींनी काढले. कल्याण स्वामींचे उद्गार ऐकताच समर्थांची परीक्षा संपली आणि कल्याण स्वामींचे श्रेष्ठत्व सिध्द झाले. ज्या जागेवरून समर्थांनी उडी मारली तेथे एक कट्टा तयार करून त्याच्यावर मारुतीची स्थापना करण्यात आली.असे सांगण्यात येते की, गडाच्या या पश्चिम बाजूस छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांची भेट होत असे.
ब्रम्हपिसा
धाब्याच्या मारुतीपासून ठोसेघर धबधब्याकडे जाणारा रस्ता दिसतो.सध्यस्थितीत सज्जनगडावर पडलेल्या अवस्थेतील तटबंदी आहेत आणि गड म्हणून काही भग्न अवस्थेतील अवशेष आहेत. परंतु समर्थ रामदास स्वामींच्या समाधी स्थळामुळे सज्जनगडास विशेष श्रद्धास्थान प्राप्त झाले आहे. रामदासी आणि समर्थ रामदासांना श्रद्धास्थान मानणारे भाविक गडावर नियमित येत असतात. तसेच राम नवमीला गडावर उत्सव असतो. त्यामुळे समर्थांच्या या भूमीवर आपण पर्यटक म्हणून अथवा भाविक म्हणून गेल्यानंतर गडाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे.गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फे खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्जनगड सेवा मंडळाच्या खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.
किल्ल्यावरून दिसणारे उरमोडी धरण आणि आजूबाजूचा परिसर
किल्ल्यावर दासनवमी, रामनवमी, हनुमानजयंती, गुरुपोर्णिमा, श्रीवेणाबाई पुण्यतिथी, अक्काबाई पुण्यतिथी, गणेशोत्सव, विजयादशमी, श्रीधरस्वामी पुण्यतिथी इ. दिवस गडावर साजरे केले जातात. किल्ल्यावर संस्थानाची निवासव्यवस्था आणि प्रसाद-भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचबरोबर अनेक उपहारगृहेसुध्दा उपलब्ध आहेत. किल्ल्याचे दरवाजे रात्री बंद करून पहाटे पुन्हा उघडले जातात.

समर्थ रामदास आणि त्यांचे कार्य अनुभवायचे असेल तर तर सज्जनगडला भेट दिलीच पाहिजे.आजही गडावर समर्थकार्य अविरत सुरू आहे. पहाटेची काकडारती आणि त्यानंतर मिळणारा अमृततुल्य लोण्याचा प्रसाद, दुपारचे सहभोजन, सायंकाळची आरती, दासबोधाची पारायणं आणि त्यानंतर गडाच्या मागच्या बाजूला फक्त घोंघावणारा वारा आणि त्या एकांतात समाधानाने फिरणारे आपण ! खरंच पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच जायला पाहिजे असं नाहीच हे इथे आल्यानंतर क्षणोक्षणी जाणवतं. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्हीही सज्जनगड पाहून याच ! याव्यतिरिक्त गडावर राहण्याची व जेवणाची उत्तम सोय होते. त्यामुळे अगदी खिशाला परवडेल अशा किंमतीत आणि समाधानात तुमची ही सफर पूर्ण होते व पुन्हा पुढच्या उन्हाळ्यात सज्जनगडला येणारच असं ठरवून आपण माघारी फिरतो.
सज्जनगड परिसरात आल्यानंतर साताऱ्याहून ठोसेघर धबधबा, अजिंक्यतारा किल्ला आणि कास पठार ही ठिकाणे देखील जवळ आहेत. पर्यटक सज्जनगडावर आल्यानंतर यासर्व ठिकाणी जावून येवू शकतात.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
संदर्भ -
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामणी गंगाधर गोगटे
३) मराठ्यांचा इतिहास - ( खंड पहिला )- अ.रा,कुलकर्णी, ग,ह,खरे
४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! -प्र.के.घाणेकर
५) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
६) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
७)












