ओदिशा : १ : पूर्वरंग
एकदा अचानक नव्या मुंबईतला आमचा मित्र बाळ्या टेलर ऊर्फ टकल्या आणि त्याची सौ. प्रियांका ऊर्फ जखीण पुण्याला आमच्या घरी आले. अर्थात आयत्या वेळी अगोदर दूरध्वनी करून आम्ही घरी आहोत की नाही याची खात्री करून. जखीण फार म्हणजे फारच रागावली होती. तिचा आणि आमच्या सौ. चा वाढदिवस दोनतीन दिवसांच्या अंतराने येतो. "२०१० मध्ये दोन्ही वाढदिवस कुठे तरी दूर, रम्य अशा पर्यटनस्थळी साजरे करावेत, तेव्हा ताबडतोब पर्यटनाचा आराखडा काढा, कुठेही दूर तुमच्या आवडत्या स्थळी; अशी तिने दीडेक वर्षापूर्वी सूचना केली होती." जखिणीचीच सूचना ती! पाळायलाच पाहिजे. आराखडा न बनवून मी सांगतो कोणाला? पण एक महिना अगोदरच माझा पाय दुखावला. ही किमया देखील जखिणीचीच असेल का? पण बहुधा तिच्या शत्रू जखिणीचीच असावी. हाड मोडले होते आणि मी चारपाच महिने घरात बसून राहिलो.
आता मात्र ट्रीप काढली नाही तर कोणाला तरी सुपारीच देणार अशी तिने धमकीच दिली. कोणाला सुपारी द्यायची जखिणीला तरी गरजच काय अशी शंकाही मी बोलून दाखवली. असे शुभकार्य सिद्धीस नेण्यास जखीण समर्थ होतीच. टकल्यालाही ते एकदम पटले. चांगला दहा दिवसाचा दक्षिण दौरा आखला. दूरध्वनीवर तपशील कळवला. काय सुधारणा हव्यात ते विचारले. दोनचार वेळा चर्चेनंतर आराखडा पक्का झाला. एकदा दोघे आमच्याकडे येऊन पण गेले. अगोदर कन्याकुमारी की शेवटी कन्याकुमारी अशी दिशा फक्त ठरवणे बाकी होते. अगोदर कन्याकुमारी असे ठरले. नाहीतर दुसरीकडे कुठेतरी जाणे होईल व कन्याकुमारी राहून जाईल अशी बाळ्याला भिती होती. खरे तर कोकण रेल्वेने त्रिवेंद्रम आणि तिथून कन्याकुमारी केले तर गाडीत एकच रात्र काढावी लागते. आणि थेट कन्याकुमाकुमारीला जाणारी रेलवे चांगली सालेम, तिरूपती करीत गाव फिरवून नेते त्यामुळे एक रात्र जास्त काढावी लागते. तरी तसेच थेट कन्याकुमारी असे ठरले. मुंबईहून निघणारी पुण्यावरून जाणारी रेलवे गाडी पकडून कन्याकुमारीला जाऊन तिथून कार, बस जसे वाहन मिळेल तसे फिरायचे ठरले. विमानप्रवास दोन कारणासाठी टाळला. पहिले म्हणजे पैसे वाचवणे. दुसरे म्हण्जे त्या निमित्ताने एकत्र गप्पा होतील. अजून चारेक महिने बाकी होते. नंतर अधूनमधून दूध्ववर बोलणे व्हायचे. एकदा दिवाळीनंतर निवांतपणे जालावर बसलो, रेलवे तिकिटांची उपलब्धता पाहून निघायचा दिवस पक्का करायला दूध्व केला आणि बाळ्याशी दूध्व वर बोलत उपलब्धता बघत तिकिटे काढून टाकली. टकल्याला कळवले.
आता दर दोनचार दिवसांनी दूध्ववर बोलणे होई. पर्यटनस्थळाबद्दल, सामानाबद्दल, वाहनाबद्दल, प्रवासाबद्दल चर्चा होई. आता निघायला दीडेक महिना बाकी होता. असाच एकदा दूध्व आला. टकल्या होता.
"अरे भाऊ आला तर चालेल का? दोघंही येतील." टकल्या.
"मला चालेल. भाऊ तर मस्त कंपनी आहे. पण प्रियांकाला चालेल का? त्यांचे जमते का? काही झाले तरी मोठा दीर आहे तो तिचा!" मी.
"थांब तिच्याशीच बोल." बाळ्या.
"मला चालेल हो. भाऊ आले की खाण्यापिण्याची चंगळ असते. बाळ्याची चिकूगिरी चालणार नाही." प्रियांका.
"ठीक आहे. पण सहलीच्या आपल्या आराखड्यात अनावश्यक ऊठसूठ फरक नको." मी.
नंतर काही वेळाने भाऊचाच दूध्व आला. आमची गाडी, सीट क्र., पी एन आर क्र. वगैरे विचारून घेतला आणि त्या उभयतांची आमच्याच गाडीची तिकिटे काढली.
नंतर दोनचार दिवसांनी सचीनचा, भाऊंच्या चिरंजिवांचा दूध्व. "काका इथूनच गाडीची सोय होऊं शकते. तवेरा मध्ये ड्रायव्हर अधिक सात बसू शकतात. तुम्ही सहाच आहात. चालेल का?" त्याला साहाजिकच पासष्टीच्या खवय्या तीर्थरूपांच्या आणि साठीच्या मातेच्या सोयीगैरसोयीची चिंता वाटत होती.
"मी आराखडा पाठवलेला आहे. दर वाजवी असेल तर हरकत नाही. आपले संपूर्ण अंदाजपत्रक देखील पाठवलेले आहे. फक्त अगोदर पैसे द्यायचे नाहीत. आराखड्यात जास्त फरक चालणार नाही. वाटेत एखादे ठिकाण आवडले तर आपण जास्त राहणार आहोत. एखादे आवडले नाही तर सोडून देणार आहोत. ड्रायव्हिंग धोकादायक वाटले किंवा गाडी बरोबर आरामदायक नसेल किंवा गाडी बरोबर चालत नसेल किंवा ड्रायव्हरचा स्वभाव आवडला नाही तर गाडी किंवा ड्रायव्हर किंवा दोन्ही आपल्या सोयीनुसार बदलायला पाहिजे. ते सर्व चालणार असेल तरच मान्य. नाही जमले तरी घाबरू नकोस मी चारपाच वेळा दक्षिणेला गेलेलो आहे. प्रवास, मुक्कामाचे हॉटेल, सगळी व्यवस्थित सोय होईल. गर्दी टाळूनच तर जात आहोत आम्ही." मी.
"हॉटेलचं बुकिंग तुम्ही केलं आहे का?" सचीन.
"नाही पण आयत्या वेळी बिनधास्त मिळेल. थेट गेलं की घासाघीस करता येते. इथून केलं तर दोनदोन एजंट मध्ये येतात, बरेच पैसे पडतात. बाळूकाका घासाघीस करण्यात एक्सपर्ट आहे बरं का. त्याला कामाला लावीन की." मी.
"मी अगदी चांगली हॉटेलं स्वस्तात देतो तुम्हाला." सचीन.
"मग अस कर कोडाई, टेकडी आणि मुन्नार इथलीच हॉटेल्स तू बुक कर. बाकीची आम्ही बघू आयत्या वेळी. कोडाईला फार गर्दी असते आणि मुन्नारला शनिवार रविवारी पोहोचणार." मी.
"तिरूअनंतपुरमला पोहोचल्यावर तुम्ही थकलेले असणार. तिथे पण करतो." सचीन.
"ठीक आहे." पण दर अगोदर माझ्याकडून मान्य करून घे. एका नॉन एसी डबल ऑक्युपन्सीचा दर पाचशेहजारपेक्षा जास्त असता नये. आणि चेक आऊट टाईम चोवीस तासाचा असला पाहिजे. सकाळी आठ किंवा दुपारी बारा वगैरे चालणार नाही." मी.
माझ्या सूचनेप्रमाणे सचीनने चार ठिकाणची हॉटेले ठरवून उरलीसुरली चिंता दूर केली.
अखेर बारा दिवसांच्या दूर अंतरासाठी व्हॉल्वो बस आणि जवळच्या अंतरासाठी रिक्षा टॅक्सी याच्या अंतरानुसारच्या माझ्या अंदाजपत्रकापेक्षा सहा जणांसाठी वातानुकूलित गाडीला केवळ तीन हजार जास्त पडत होते. वर एक ठिकाण जास्त. कन्याकुमारीऐवजी त्रिवेंद्रम ऊर्फ तिरूअनंतपुरमला उतरायचे. तो दिवस हवे तर तिथे जवळपास फिरायचे. एक रात्र तिरूअनंतपुरम आणि दुसरे दिवशी सकाळी कन्याकुमारीला प्रयाण. टॅक्सी ठरवून टाकली. फक्त भाऊंनी एक गाढवपणा केला. सगळे पैसे अगोदरच देऊन टाकले. मी विचारले होते की गाडी सोडावी लागली तर? पण त्यांनी ते पैसे संपूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर दिले. निघण्यापूर्वीचे शेवटचे आठदहा दिवस ध्वनाध्वनी चालू होतीच.
मध्ये आणखी एक बदल झाला. मूळ बेताप्रमाणे येतांनाची तिकिटे काढली होती बंगलोरहून. केरळमधून दक्षिणेकडे उतरून मग तमिळनाडूमधून मदुराईवरून बंगलोरला रस्त्याने जायचा जो मूळ बेत होता तो बदलून मदुराईवरून कोडाई, मुन्नार करून टेकडीवरून सरळ अलेप्पी, तिथून जमले तर गुरूवायूर. तिथून कोचीनला जाऊन मुंबईला कोकणातून जाणारी रेलवेगाडी पकडायची असे ठरले. नवी कोचीन मुंबई तिकिटे काढून बंगलोर मुंबई तिकिटे रद्द केली. तीन दिवसांचा खर्च वाढल्यामुळे विमानप्रवासाला काटकसरीच्या नावाने पूर्ण फाटा दिला.
अखेर २६ जानेवारीला दुपारी चार वाजता बाळ्याचा दूध्व आला.
"अरे गाडी चुकली. मला व्हीटीला पोहोचायला उशीर झाला. गाडी चुकली." बाळ्या.
"ताबडतोब टॅक्सी करून लोणावळ्याला पोहोच. गाडी लोणावळ्याला नक्की मिळेल. मी मात्र ठरल्याप्रमाणे सफर पुरी करणारच." मी थंडपणे उत्तर दिले. ही शक्यता गृहीतच धरून मार्ग तयार ठेवला होता.
"हॅ हॅ हॅ हॅ!" आता जखिणीने विकट हास्य केले. "आम्ही गाडीत बसलो आणि गाडी सुरू पण झाली. पण गाडीचं टाईमटेबल बदलल. आता गाडी पुण्याला थांबणार नाही."
"तू जखीण असलीस तर मीही आग्या वेताळ आहे. मी गाडी थांबवणारच! हा हा हा हा" मी.
"आम्ही पुण्यात तुम्हाला गाडीत घेणारच नाही!"
"मी तुला बाहेर फेकून गाडीत चढणार. हा हा हा हा" मी.
अशा तर्हेने झकास सुरूवात झाली आणि आम्ही जानेवारी फेब्रुवारी २०११ मध्ये मंदिरे आणि पर्यटनस्थळे पाहात दक्षिण दौरा मस्त अनुभवला. त्या दौर्याच्या मस्त आठवणी ताज्या असतांनाच एके दिवशी मंदीरस्थापत्याबद्द्ल आणि कोणार्कबद्द्ल थोडेफार वाचनात आले. त्याबद्दल आमचे बोलणे अधूनमधून दूरध्वनीवरून, कधी महाजालावर होत असे. पुढचा दौरा कुठे करायचा याचे मनसुबे रचले जात होतेच. मध्ये एप्रिल मे मध्ये मी एकटा मित्रांबरोबर श्रीलंकेला जाऊन आलो. माझ्या चटोर मित्रांबरोबर गुण उधळून आलो असे जखिणीचे मत. त्यामुळे जखिणीचा जळफळाट फारच वाढला. मग ओरिसाबद्दल जालावरून, इथून तिथून माहिती जमवली. बारा दिवसांचा दौरा आखला. दूरध्वनीवरून बोलत दौर्याला थोडी कात्री लावून शेवटी नोव्हेंबर २०११चा ९ दिवसांचा मध्यम लांबीचा दौरा आखला. यावेळी श्री. व सौ. भाऊ येणार नव्हते. मुंबईवरून छत्तीसगढची राजधानी रायपूरला जायचे. तिथून रस्त्याने १७२ किमी. आहे ओरिसामधले नृसिंहनाथ मंदीर. मिळालेल्या माहितीनुसार भुवनेश्वरवरून मात्र ते ४८८ किमी. आहे. म्हणून रायपूरवरून. तिथून स्थलदर्शन करीत भुवनेश्वरला यायचे आणि परत घरी. अखेर ऑगस्टमध्ये तिकीटे काढली आणि जखिणीच्या छळातून सुटलो.
क्रमश:
ओरिसा : २ : रेलवे, रायपूर आणि ओरिसा
१५-११-२०११.
आता वेध लागले होते ओरिसाचे. तिथल्या नागरी मंदीरस्थापत्यशैलीतल्या ‘रेखा देऊळ’चे. जालावरून, इथून तिथून सचित्र आणि चित्रविचित्र माहिती काढून सर्व सदस्यांना चित्रांसह वाचायला दिली होती. त्यमुळे सर्वांची उत्कंठा वाढली होती. गणपती, नवरात्रांचे धूमधडाक्याचे दिवस नेहमीप्रमाणे वाजतगाजत आले आणि गेले. दिवाळी पण नेहमीप्रमाणे वाजतगाजत आली आणि गेली. दिवाळीचे कवित्व केव्हाच संपले होते. सहलीबद्दल ज्याला ज्याला कळे तो पहिला मलाच उलट सुनवायचा. अरे मूर्खा, रायपूर ओरिसात नाही, छत्तीसगडमध्ये आहे. आणि ओरिसात आहे काय बघण्यासारखे? नेहमी आपले पूर नाहीतर दुष्काळ? खरे तर टकल्यानेही मला असेच म्हटले होते. त्यामुळे माझी बरीच करमणूक झाली. आपल्याला मूर्ख आणि स्वतःला शहाणा समजणार्या माणसाशी बोलतांना फार म्हणजे फारच मजा येते.
अखेर तो १५ नोव्हेंबर २०११चा नवलाचा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे आमची जोडी पुण्याहून कल्याणला सातच्या सुमारास उतरली. ८.३५ ला आमची गाडी कुर्ल्याच्या लोटिट अर्थात लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणार होती. श्री व सौ बाळ्या नवी मुंबईहून लोटिटला पोहोचून गाडीत बसले की नाही हे पाहायला दूध्व लावला. ते रस्त्यावर होते. गाडी कल्याणला कोणत्या फलाटावर येते ते पाहायला गेलो. दर्शकावर म्हणजे इंडिकेटरवर आमच्या गाडीचा क्रमांक वगैरे काहीही दिसेना. मग आकाशमार्गे चौकशी खिडकीत गेलो. आकाशमार्गे फक्त देवच आतात असे नाही. माझ्यासारखे दानवही जातात. पृथ्वीतलावर त्या मार्गांना स्कायवॉक म्हणतात. खिडकीतल्या गृहस्थाने बाजूच्या पाटीकडे निर्देश केला. अनेक गाड्यांचे बदललेले वेळापत्रक दिले होते. आमची ज्ञानेश्वरी एक्सप्रेस गाडी लोटिट वरून आज संध्याकाळ ८.३५ ऐवजी उद्या सकाळी ४.३० ला सुटणार होती. तसे मुंबईच्या वर्तमानपत्रात छापूनही आले होते. पुण्याच्या मात्र साहाजिकच नाही. नव्या मुंबईच्या बाळ्याच्या वाचनात आले नाही. मेलो. प्रथमपदे अग्निरथविलंब.
तेवढ्यात बाळ्याचा दूध्व आला. त्याला सांगितले, आता प्रथम लोटिट वर चौकशी करून तिथून गाडी केव्हा सुटणार ते बघ. थांबायचे की घरी जायचे ते ठरव म्हटले. पाच मिनिटात सौ. बाळीचा दूध्व. तुम्हाला हवे तर घरी जा आणि अंडी घाला. गेलात तेल लावत. आम्ही ओरिसा बघणार म्हणजे बघणार. गाडी लोटिटवरून सकाळी ४.३० ला निघणार. तिच्या निर्धाराला मी मनापासून दाद दिली. उगीच तेलाचा खर्च नको. - पी.जे. - मी म्हटले कल्याणला हॉटेल मिळते का पाहातो. मिळाले तर कल्याणलाच राहातो. मिळेलच तसे. आकाशमार्गाने एक बरे झाले आहे. दूरवर व्यवस्थित चालत जाता येते आणि चाके असलेले बोजे चाकावरून चालवत नेता येतात. सुदैवाने आकाशमार्ग कल्याणला पण पोहोचला आहे. स्थानकासमोरच बरेसे हॉटेल मिळाले आणि सकाळी ४.०० ला आंघोळ करून निघायची सोय झाली. रात्री खायला घेतलेली पोळीभाजी होतीच. बाळ्याला तसे कळवले. तो जवळच्याच बहिणीकडे राहायला जाणार होता. हवे तर आम्ही दोघे देखील येऊ शकतात म्हणाला. तिचा मुलगा पहाटे ४.०० ला स्टेशनात आणून सोडेल म्हणाला. म्हटले आता हॉटेल मिळाले आहे, कशाला पुन्हा सामान घेऊन जायची यातायात. ताण निवळला आणि पुन्हा हास्यविनोद सुरू झाले. ‘आता कशाला उद्याची बात’ हे गाणे त्याला भसाड्या आवाजात दूध्ववर ऐकवले.
१६-११-२०११.
ठरल्याप्रमाणे सकाळी त्यांनी गाडी पकडली. पाचसव्वापाचच्या सुमाराला गाडी कल्याणला आली. बहुतेक लोक बिचारे आदल्या रात्रीपासून फलाटावरच होते.
नाशिकला देखील न थांबणारी गाडी धडाडत वेगाने जात होती. ठरलेल्या वेळापत्रकानुसार दुपारी दोनला रायपूरला पोहोचणारी गाडी बराचसा वेळ भरून काढीत रात्री नऊला पोहोचली. सहलीच्या आराखड्यातला एकही दिवस वाया गेला नाही. उलट रेलवेगाडीत रात्र काढावी लागली नाही हेच मोठे. फक्त रायपूरसारख्या अनोळखी ठिकाणी दिवसा न पोहोचता रात्री पोहोचलो होतो. रायपूर स्थानकाबाहेर येतो न येतो तोच भोवती रिक्षावाले, सायकल रिक्षावाल्यांनी कोंडाळे केले. पायीच परिसरात फिरलो आणि दोनतीन हॉटेले पाहिली. राज्याची राजधानी असल्यामुळे हॉटेले तशी महागच असतील असे वाटले होते. माझ्या मागेमागे एक सायकल रिक्षावाला येत होता. अच्छा होटल दिखाता है म्हणून मागेच लागला. माणूस चालवत असलेल्या वाहनात बसणे मला माणुसकीला धरून वाटेना.
"साब सिर्फ दस रुपिया दो. मै होटलतक लेके जाके फिर इधर लाके छोडता हू." रिक्षावाला.
"होटल पसंत नही आया तो?" मी.
"पाचदस होटल दिखाता हूं. एक ना एक पसंत आयेगाही. पसंत नै आता है तो लेनेका नै जी. सिर्फ दस रुपिया दीजिए साहब." रिक्षावाला.
मी मनात म्हटले, पेट्रोलवरची रिक्षा उभी ठेवली तर पेट्रोल तर घालायला लागत नाही. पण रिक्षा चालो वा न चालो, याला बिचार्याला खायला तर हवे. समाजवादी विचाराने मात केली. अशाच समाजवादी विचारामुळे मी सप्टेंबरमध्ये विजापूरला गोलघुमट वगैरे फिरतांना पेट्रोलच्या रिक्षाऐवजी घोड्याचा टांगा केला होता.
सायकल रिक्षात बसलो. काल आकाशमार्गाने जाणारा दानव आज सायकल रिक्षात! कलीयुग बरे कलीयुग. चार हॉटेले पाहिली. तिसरेच बरे आणि वाजवी वाटले. स्थानकापासून पायी दहाएक मिनिटांचे अंतर असेल. सामान घेऊन येतो म्हटले आणि निघालो.
रिक्षावाला म्हणाला आणखी एक सायकल रिक्षा घेऊ म्हणजे सगळे सामान येईल. शाकाहारी जेवण मिळेल असे स्वच्छ हॉटेल कुठे आणि किती वाजेपर्यंत उघडे असते अशी चौकशी केली. मारवाड्याचे स्वच्छ हॉटेल जवळ पायी जाण्याच्या अंतरावर आहे म्हणाला. बॉंबेवाले सब उधर ही खाना खाते है म्हणाला. त्याला विचारले तुला कसे कळले मी कुठला? तर म्हणाला आप आये वो गाडी बम्बईसेही तो आयी. इथले हिंदी मुंबईच्या रोखठोक बंबैया हिंदीपेक्षा जरा वेगळ्या वळणाचे पण आर्जव असल्यामुळे जास्त चांगले वाटले. मारवाड्याचे हॉटेल दहा वाजेपर्यंत उघडे असते. आता ९.२० झाले होते. सामान हॉटेलवर आणून आम्हाला खाण्याच्या हॉटेलवर नेऊन जेवण झाल्यावर पुन्हा सोडावे लागेल सांगितले.
हॉटेलमध्ये सामान ठेवले आणि ताजेतवाने होऊन भोजनास निघालो. भोजनाचे हॉटेल बरे होते. चालत जेमतेम पाच मिनिटावर होते. पण रिक्षावला कटकट करायला लागला. घरी जायला उशीर होतो, भूक लागली, कृपा करून जेवल्यावर तुम्ही चालत जा, वगैरे वगैरे. बाळ्या त्याच्याशी वाद घालायला लागला. मी म्हटले जाऊ दे ना. जेवल्यावर थोडे चालणे पण होईल. आपण दिवसभर बसून तर आहोत. दोन्ही रिक्षांचे किती पैसे झाले म्हणून विचारले. खूप सांगायचे म्हणून त्याने शंभर रुपये सांगितले. बाळ्या आणि आमची सौ वैतागले. त्यांच्या मते एका रिक्षाचे जायचे यायचे वीस आणखी दुसर्या रिक्षाचे दहा मिळून तीस. जेवणाच्या हॉटेलपर्यंत आणखी दहादहा मिळून पन्नास होत होते. मी शंभर देऊन टाकून मोकळे केले. सामानाचे भाडे त्यातच आले. आमचे मोठे सामान त्यांनीच उचलून नेले होते. तसे स्वस्तच होते. दहावीस रुपयांनी आपल्याला फरक पडत नाही. पण त्याला ते मोठे आहेत, शिवाय त्यांनी फुकटची हमाली देखील केलीच होती म्हणून त्यांना समजावले. मागच्या वेळी केरळमध्ये फक्त हमालीचे दीडशे मोजले होते याचीही त्याला आठवण करून दिली.
भोजनाचे हॉटेल छान निघाले. साधे पण रुचकर, शाकाहारी जेवण मिळाले आणि सगळे खूष झालो. हॉटेलतल्या सेवकांचा गणवेष वैशिष्ट्यपूर्ण होता. नवरदेव शोभेल असा वेष. अगदी मुंडावळ्यासकट.
भोजनाच्या हॉटेलमधला सेवक. प्रतिमाग्राहकातले - प्रग्रा मधले (शब्दयोजना - श्री. विनायक रानडे) म्हणजे कॅमेर्यातले घड्याळ चुकीची वेळ दाखवत होते. मला लावताही येईना. म्हणून तारीखवेळ टाकली नाही.
जेवून झोपलो.
१७-११-२०११.
शुचिर्भूत होऊन तयर झालो. न्याहारीची चौकशी केली. श्री व सौ बाळूच्या आदल्या रात्रीच्या झोपेचे खोबरे झाले होते. म्हणून त्यांना उठवले नाही. साडेतीनला उठून चारसव्वाचारला लोटिटला येऊन गाडी पकडली होती. गाडीतही ते झोपले नव्हते. मी मात्र गाडीत मस्त झोप काढली होती. आमच्या हॉटेलच्या समोरच जरा पुढे बाजार होता. ताज्या हिरव्यागार, रसरशीत, टवटवीत भाज्या होत्या. बटाटे तांबडमाती लागल्यासारखे लालसर दिसत होते. फळे वगैरे खास नव्हती. कोरडी थंड नसली तरी आल्हाददायक हवा. ऊन तसे चकचकीत आणि नोव्हेंबरच्या मानाने कडकच. पंधरावीस मिनिटे फिरून बरे वाटले. हिरव्यागार भाज्या, लालबुंद टोमॅटो वगैरे बघून सौ. पण खूष झाली. परत खोलीवर गेलो. बाळ्या तयार होत होता. न्याहारी वरच्या जेवणघरात मिळू शकेल असे कळले. गेलो. तिथे एका हसतमुख सेवकाने तोंड भरून स्वागत केले. कुठून आलात वगैरे चौकशी केली. मुंबईहून म्हटल्यावर त्याच्या चेहर्यावर कौतुक उगवले. मस्तपैकी एक कडक चहा मारला. नाश्त्याला कायकाय आहे विचारले. गरमागरम आलू पराठा मिळेल म्हणाला. तेल कोणते वापरता म्हणून विचारले. देसी घी. रोटीतरकारी, पुरीभाजी वगैरे पण मिळू शकेल. पुरी पामोलीनमध्ये आणि भाजी रिफाईन्ड तेलात. कोणत्या ते सांगू शकला नाही. राईचे पण असू शकेल. तेव्हा आलू पराठा हाच खात्रीलायक पर्याय दिसत होता. पण सगळे आत्ता बनवायला सुरुवात करणार आणि अर्ध्या तासात मिळणार. म्हणजे ताजे गरमागरम पदार्थ आणि देसी घी. म्हणजे राईचे तेल नक्की नाही याची गॅरंटी. मग दुसरीकडे कशाला खा? खोलीवर जाऊन सगळ्यांची ऑर्डर घेऊन आलो. एकेक पराठा येईपर्यंत योगासने करून (योगासनांमुळे चरबी हटली तरी टक्कल मात्र कमी होत नाही बरे का) सर्वात शेवटी येणारा बाळ्या येईपर्यंत आमचे तिघांचे मस्त खाऊन झाले.
मस्त गरमागरम आणि रुचकर आलू पराठ्याने दिवसाची छान सुरुवात झाली. दाट दुधाचा थोडासा जास्तच मधुर चहा देखील आम्हा सगळ्यांना आवडला. रायपूर रेलवे स्थानकासमोरच्या मंदिरात मंडळी गेल्यावर मी प्रग्रावर बरेच अत्याचार केले.

रायपूर स्थानकासमोरची वैशिष्ट्यपूर्ण पोलीसचौकी.

रायपूर स्थानकासमोरचे सुबक मंदीर.
इथे नृसिंहनाथ म्हटले तर कोणाला कळत नाही. नरसिंगनाथ म्हटले की कळते. तर प्रग्रा म्यान करून नरसिंगनाथसाठी काय वाहन मिळते पाहायला गेलो. बस तीन वाजता होती. चार तासांनी सातला पोहोचते. अनोळखी ठिकाणी पोहोचल्यावर अंधारात काय हॉटेल शोधणार? बस जास्त सुरक्षित असते म्हणून प्रथम बसची चौकशी केली. दुपारी तीन अगोदर बस नव्हती. म्हणजे पोहोचायला सात. पूर्वेला असल्यामुळे जास्तच रात्र होणार. खाजगी टॅक्सी कुठे मिळेल त्याची चौकशी केली. पंधरावीस मिनिटात मंडळी परतली. दोघीजण हॉटेलात खोलीवर गेल्या आणि आम्ही दोघे टॅक्सी शोधार्थ.
रायपूरला मोठ्ठा टॅक्सी तळ - चुकलो टॅक्सी अड्डा आहे. शेकडो खाजगी टॅक्स्यांचा महासागरच तो. आमच्याभोवती टॅक्सीवाल्यांचा घोळका जमला. तिथे दर पुण्यामुंबईपेक्षा कमी आहेत. डीझेल रु. ४५/- च्या आसपास होते. टॅक्सीवाले पण नडलेले, नम्र आणि गरीब वाटले. आपल्याकडच्यासारखे माजलेले नाहीत. निदान त्या वेळी पर्यटनमोसम भरात नसतांना तरी. विना वातानुकूलन इंडिकासाठी मुंबईपुण्याला आठदहा रु. प्रति किमी. असतांना इथे कोण सांगे साडेसहा रु. प्रति किमी. तर कोणी म्हणे सहा. गाडीच्या नव्याजुन्या स्थितीवर, मजबुतीवर अवलंबून. वातानुकूलन हवे असेल तर दोन रुपये जास्त. एकाची गाडी नवी आणि आतूनबाहेरून, खालूनही चांगली वाटली. पण कॅरियर नव्हते. कॅरियरवाल्या टॅक्स्या तेवढ्या चांगल्या नाही वाटल्या. जुनाटच होत्या. ती नवीच ठरवली. ड्रायव्हर कम मालकाचे नाव होते गजभिये. नागपूरचा निघाला. थोडेफार मोडतोड मराठी पण येत होते.
फारसे गरम होत नसल्यामुळे वातानुकूलन चालू केले नाही. रायपूर शहर पुण्यामुंबईच्या मानाने कमी गजबजलेले. इथले गाडी चालवणेही चांगले. पादचार्यांना, छोट्या वाहनांना, पादचार्यांना सांभाळून, अजिबात त्रास न देता व्यवस्थित सिग्नल देऊनच गाड्या पुढे जातात. मुंबईकरांनी, पुणेकरांनी रायपूरकरांपासून नक्कीच काहीतरी शिकायला पाहिजे. शहराबाहेर पाहावे तिथे शेतेच शेते. यंदा पावसाळा लांबल्यामुळे असेल, पण हिरवीगार. मध्येच शेदीडशे गाईगुरांचे मोठ्ठे कळप शेतात चरतांना दिसत. बाळ्या तुझे नातेवाईक बघ म्हणून सांगितले. त्यांच्यात मीच जास्त शोभून दिसेन असे बाळ्याचे म्हणणे पडले. संधी मिळाली तर तुला प्रथम शिंगाने उडवीन म्हणालो. एकदोन कळप रस्ता ओलांडत आडवे गेले. वस्ती फारच विरळ असावी.
एकेठिकाणी जेवलो. भाजी कमी मसाले कमी तेल असलेली, पाण्यातच शिजवलेली होती. फारशी चव नव्हती. वाईटही नव्हती. सपक डाळभाताबरोबर खाल्ली. दुपारचे जास्त खायचे नव्हतेच. पापड फारच सपक लागला. का ते कळेना. नंतर केव्हातरी बाळीने रहस्यस्फोट केला की तो राईच्या रिफाईन्ड तेलातला होता म्हणून तसा लागतो. गरमागरम गुलाबजाम मात्र बरे होते. माझ्या बारीक अंगकाठीचे मनातल्या मनातच कौतुक करून मी भूक भागवायला हळूच चांगले चार हादडले. त्यामुळे नंतर गाडीत चालकाशेजारी बसूनही पाचदहा मिनिटांची डुलकी काढावी लागली.
क्रमशः
नृसिंहनाथ आणि हरिशंकर
१७-११-२०११.
चारच्या सुमाराला नृसिंहनाथ मंदिराच्या आवारापाशी पोहोचलो. राहायला इथे ओरिसा पर्यटन खात्याचे यात्री निवास आहे. अगदी गलिच्छ निघाले. मंदिराचे अतिथी निवास मात्र कमी वाईट निघाले. सकाळी गरम पाणी नाही पण विजेवरचा हीटर मिळेल म्हणाला. खोलीचे भाडे नाममात्र. रु. ३५०/-. मंदिराला देणगी पण द्या म्हणाला. जेवणाला हॉटेले नाहीतच. फक्त टपर्या. त्याही ग्रामीण. पण अगदीच गलिच्छ. स्वच्छतेचे तसे वावडेच. त्यापेक्षा मंदिरातच ‘भोग’ चे जेवण मिळते ते जेवा म्हणून अतिथी गृहाचा सेवक म्हणाला. जेवणाची वेळ दुपारी १२.०० आणि रात्री ८.००. मंदिरातल्या आवारात फलकावरही ही वेळ लिहिलेली होती.
पवित्र अशा गंधमादन पर्वतराजीत वसलेले हे मदीर आहे आहे. इथे गंधमर्दन असे म्हणतात. इ.स. १३१३ साली पाटण्याचा गर्ग राजा बैजल सिंह देव याने या ऐतिहासिक मंदिराचा पाया घातला.
आता नृसिंहमंदीरमहात्म्य. सुमारे सहाशे वर्षांपूर्वी जमुना कंधुनी नावाच्या एका साध्वीने ‘नृसिंह चरित्र’ नावाचे स्तोत्र रचले. या स्तोत्रात मार्जार केसरीची थोरवी वर्णिली आहे. मूषकासूर नावाचा एक दैत्य फार मातला होता आणि तो जनतेचा फार छळ करीत असे. विष्णूने मग मार्जार केसरी म्हणजे नृसिंहावतार घेतला आणि तो मूषकाला खायला धावला. परंतु बिळात शिरलेला मूषकासूर काही बाहेर येईना. बिळाची आणि बिळाबाहेर वाट पाहाणार्या मार्जारकेसरीच्या प्रतिमा आजही दिसतात. या पुराणकथेसाठी हे मंदीर ख्यातकीर्त झालेले आहे.
या भूमीत गाडल्या गेलेल्या परंतु त्या काळापासून दुष्ट शक्तीपासून जनतेचे रक्षण करणार्या नृसिंहाचे प्रतीक म्हणून हे मंदीर आहे. मंदिराबद्दल इतरही अनेक आख्यायिका ज्ञात आहेत.
सुमारे ४५ फूट उंच असलेले हे मंदीर दोन भागात विभागलेले आहे. सिंहद्वारातून आपण मंदिराच्या आवारात शिरतो.
खाली स्वच्छ लाद्या. आत गेले की समोर मार्गिका. मार्गिकेच्या सुरुवातीलाच उजव्या हाताला जगमोहन म्हणजे सभामंडप. डाव्या हाताला एनॅमलने रंगवलेली शिल्पे, एक झाड त्याभोवती पार, पारालाही लाद्या बसवलेल्या.
सहज मागे वळून पाहिले
मार्गिकेमधून सरळ गेल्यावर पुढे आणखी एक प्रवेशद्वार दिसते
तर डाव्या बाजूला उतरायला घाटाच्या पायर्या. खाली उतरणार्या घाटाच्या पायर्या आपल्याला नेतात दोन गोमुखातून येणार्या सुंदर झर्याच्या काठी. असे हे निसर्गसुंदर स्थान. मला मंदिराचा विसरच पडला.
झर्याच्या किनारी काही छोटेखानी मंदिरे आणि शिल्पे
आणि काही पुरातन मंदिराचे जीर्ण भग्नावशेष.
डोंगर उतारावर असल्यामुळे मंदिरात आपोआप मजले निर्माण झालेले. एवढी सुंदर मंदिरे का बरे सोडून द्यावी लागली असावीत? सोडून दिल्यामुळे पडली असावीत की पडझड झाल्यामुळे सोडली असावीत? की लुटल्यावर बाटवल्यामुळे अगोदर सोडली आणि मग पडझड झाली? की आक्रमकांनी फोडली? मार्गदर्शक उपलब्ध नव्हते, त्यामुळे काही कळू शकले नाही. इतिहासाच्या मौनामुळे क्षणभर खिन्न झालो.
पायर्या चढून मार्गिकेमधून पुढे येऊन पुढील प्रवेशद्वारातून सरळ समोर पाहिले तर मंदिराच्या डाव्या बाजूने पुढे सरळ गेल्यावर डोंगराच्या कडेकडेने चढत चढत वळण घेत बर्याच पायर्या वरवर जातात.
डावीकडे लहानसा धबधबा. या धबधब्यातलेच पाणी झर्याच्या रूपाने खाली गोमुखातून जात होते. डोळ्यांचे पारणे फिटावे असे दृश्य. प्राचीनत्त्वाचे व्यक्तिमत्त्व ल्यालेला, काहीसा राकट पण अस्सल रांगडा निसर्ग.
तर मार्गिकेच्या उजव्या बाजूला गोलाकार पायर्या वर गेलेल्या. वर गर्भगृहावरचे वैशिष्ट्यपूर्ण रेखा देऊळ. या रेखा देऊळ ने आणि कोणार्क मंदिरानेच तर मला ओरिसाची भुरळ घातली होती.

रेखा देऊळ पाहून सार्थक झाले. मंडळीनी आत जाऊन दर्शन घेतले. रेखा देऊळच्या बाजूला डोंगरातल्या दगडात खोदलेली काही शिल्पे. पण काही खास नव्हती. शिल्पांच्या बाजूने पण काही पायर्या वर गेल्या होत्या.
प्रग्राचे घड्याळ चूक आहे हे अगोदर आलेले आहेच.
या स्थळाचा जालावर मिळालेला महिमा आणि आमचे निरीक्षण खालीलप्रमाणे:
१. मंदिराच्या परिसरात कावळा दृष्टीला पडत नाही. आम्हालाही दिसला नाही.
२. नृसिंहाच्या जन्मदिनी नृसिंह चतुर्दशीला जमुना कंधुनीने अर्पिलेल्या कंदाचा नैवेद्य दाखवतात. आम्ही वेगळ्या दिवशी गेलो होतो.
३. दुर्मिळ अशा आयुर्वेदिक दिव्यौषधी इथे बारमास मिळतात. खरेच इथे ज्येष्ठिमध, अश्वगंध, ब्राह्मी, जटामांसी, शिकेकाई, पिंपळी, वगैरे आणि माझ्या ओळखीच्या नसलेल्या अनेक औषधी वनस्पती रस्त्यावर विकायला होत्या.
४. दररोज तसेच यात्रांच्या दिवशी इथे दुर्मिळ वनौषधींचा बाजार भरतो. असायला हरकत नाही.
५. इथून हरिशंकर पहाडावर ट्रेकिंग करीत जाता येते. नक्कीच जाता येते.
६. सुंदर गुलाब असलेली बाग इथे आहे. फक्त गुलाबाची नाही तरी फुलबाग मात्र होती. पण गुलाबाची बाग थोडे आजूबाजूला दुसरीकडे असू शकेल.
७. मंदिराच्या उत्पन्नाचा ५ टक्के हिस्सा हा खून झालेल्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वापरला जातो. ही प्रथा तेव्हांचे सहाय्यक आयुक्त श्री प्रमोद कुमार राऊतराय यांनी सुरू केली. गंमतच आहे. पण आमच्यापैकी कोणाचा खून न झाल्याने पडताळणी करू शकलो नाही.
८. गोवध, मांजर मारणे वा सर्पहत्या अशा पापांबद्दल प्रायश्चित्त देऊन पापक्षालन केले जाते. नक्कीच असणार. अशी संधी कोणता पुजारी सोडेल?
९. पिंडदान इ. कार्यासाठी या पवित्र ठिकाणाला छत्तीसगडची गंगा असे म्हणतात. शक्य आहे. आम्ही चौकशी केली नाही.
१०. दुर्मिळ अशी लालतोंडी माकडे इथे आढळतात. आहेतच. आमच्याबरोबर रात्रीच्या प्रसादाच्या जेवणाला यांनीच आमच्या पंगतीची सोबत केली.
११. इथे अष्टभुज गणेश आहे. वेळ कमी असल्यामुळे पाहिले नाही.
१२. अप्रतिम निसर्गसौंदर्य. निर्विवाद सत्य.
१३. अकरा जिवंत झरे आहेत. हे देखील आहेत. दोन तर मी प्रकाशचित्रात पकडले.
१४. औषधी वनस्पतींच्या लागवडीचे केंद्र इथे आहे. असायला हरकत नाही.
१५. थंडगार छाया असलेले विस्तीर्ण आवार आहे. निर्विवाद.
प्रेक्षणीय स्थळांची अंतरे खालीलप्रमाणे:
१. पैकमल ते नृसिंहनाथ ४ किमी.
२. सिंहद्वार ते मंदिर ० किमी.
३. मंदीर ते चलधार धबधबा ४०० मी.
४. मंदीर ते भीमधार ४२५ मी.
५. मंदीर ते सीताकुंड ५०० मी.
६. मंदीर ते मन्हुपांडव १.५ किमी.
७. मंदीर ते कपिलधार ४ किमी.
८. मंदीर ते सप्तधार ७ किमी.
९. मंदीर ते सत्यांब ९ किमी.
१०. मंदीर ते भीममध्व ११ किमी.
११. मंदीर ते सुखस्थळ (हॅपी पॉईंट) घाटमाथा १२ किमी.
१२. मंदीर ते शिकारस्थळ हंटिंग प्लेस. १३ किमी.
१३ मंदीर ते हरीशंकर १८ किमी.
रामायणातील कथेनुसार युद्धात मूर्छित झालेल्या लक्ष्मणावर उपचार करण्यासाठी आवश्यक ती औषधी वनस्पती हनुमानाला ओळखता न आल्यामुळे हनुमानाने अख्खा गंधमादन पर्वतच आपल्या खांद्यावर उचलून आणला अशी कथा बहुतेक सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे या स्थानाला महत्त्व आलेले आहे. हे अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण आहे आणि जरी दुर्गम असले तरी इथे येतांनाचा प्रवास हा नयनरम्य आहे. आम्ही मात्र सीताकुंडदेखील पाहिले नाही. कुंड म्हटले की भाविक स्नान करून घाण करून ठेवतात. त्यामुळे तसे गिरीभ्रमण घडलेच नाही.
सध्याचे देवालय हे पापहारिणी या ओढ्याच्या उगमापाशी आहे. अतिशय प्राचीन अशा स्थळी हे मंदीर १४व्या शतकात बांधले. जगमोहनचे चार खांब साक्ष देतात की पूर्वीचे मंदीर ९व्या शतकात बांधले होते. हे चार खांब कुठले हे मला कळले नाही. तसा माहीतगार तिथे मिळाला नाही. प्रवेशद्वाराच्या सुरेख चौकटी ११व्या शतकातील आहेत.
दुपारी वाटेतल्या हॉटेलातले काहीतरी पोटात ढकलले होते. डाळभात आणि बटाटा आणि कोबीच्या बेचव भाज्या. पण मसाले कमीच असल्यामुळे चालले. पापड सपक लागत होते. का ते कळले नाही. बाळी म्हणाली की ते जेवण राईच्या रीफाईन्ड तेलातले आहे. (जखिणींना सर्व काही कळते बरे का.) म्हणून त्याला स्वाद कसा तो नाहीच. तेव्हा कळले की पापड पण एवढा सपक का.
असो.
समोर डोंगरात वर जाणार्या पायर्या चढून पुन्हा परत जातांना उतरायला एक तास लागतो. पवित्र अशा या यात्रास्थळी पादत्राणे घालायची परवानगी नसल्यामुळे नाजुक पावले असलेल्यांनी पावलांना इजा होऊं नये म्हणून पायात जाड मोजे घालावेत. अशा सूचना जालावर मिळाल्या होत्या. आम्ही मोज्यांच्या आत घालायला रबरी इनसोल घेतले होते. माझ्या तर बुटातच नेहमी असतात. पण आपल्या सभासदांनी चालणे तसे टाळलेच. त्यामुळे त्यांचा वापर करायची वेळ आली नाही. पायर्या चढून वर गेलो. दोनअडीचशे तरी पायर्या होत्या. मी जेमतेम एका दमात चढून गेलो. वीसेक मिनिटे सहज लागली असतील. मी पायरीवर बसून निसर्ग डोळ्यात साठवत होतो. बाकी मंडळी दर्शन आटपून मध्ये एक थांबा घेऊन जवळजवळ अर्ध्या तासाने हुश्श करीत पोहोचली. तिथे वर डोंगरमाथ्याजवळ दोनचार छोटीशी मंदिरे होती. वर डोंगरमाथ्यावर जाईपर्यंत कडूसे पडू लागले होते. त्यामुळे परत फिरलो. हवेतला गारवा देखील वाढत होता. पूर्वेला आलो होतो. त्यातून गर्द वनराई. सूर्य लौकरच मावळला होता.
उपलब्ध माहितीनुसार डोंगराच्या पलीकडच्या टोकाच्या उतारावर हरीशंकर मंदीर वसले आहे. दोन मंदिरांच्या मध्ये १६ किमी लांबीचे पठार आहे. पठार बौद्ध भग्नावशेषांमुळे भकास झालेले आहे. संशोधकांच्या मते हे भग्नावशेष हे परिमलगिरी या प्राचीन बौद्ध विद्यापीठाचे आहेत. चिनी प्रवासी युआन च्वांग किंवा ह्युएन त्सॅंग याने या विद्यापीठाचा पोलोमोलोकिली असा या विद्यापीठाचा उल्लेख केलेला आहे. या पठारावरचा प्रवास तसा दीर्घच आहे परंतु इतिहासाच्या अभ्यासकांसाठी अविस्मरणीय असा आहे. सोबतच्या तिघांनाही १६ किमी. दूरवर पायी जाण्यात अजिबात स्वारस्य नव्हते. त्यामुळे मोटारीनेच हरिशंकर पाहून संबळपूरला जायचे असे ठरले.
रात्री भोग जेवायला मंदिरात गेलो. खोलीबाहेर पाहातो तो हवेत खूपच गारठा, जोडीला जोरदार वारा. पारा नक्कीच दहाखाली घसरला असावा. खोलीत जाऊन सगळेजण गरम कपडे घालून आलो. इतर लोकही गरम कपडे घालून, डोक्याला मफलर नाहीतर मुंडासे गुंडाळून आले होते. नोव्हेंबरमध्ये एवढी थंडी तर डिसेंबर जानेवारीत काय असेल? फरशीवर एका स्वयंसेवकाने झाडू मारला. धूळ जवळजवळ नव्हतीच. अतिथीगृहातले इतर चार आठ यात्रेकरू (तेवढीच सोय आहे, फार मोठे नाही. पाचसहाच खोल्या) देखील त्याच जेवणाला आले होते. फरशीवरच भिंतीला टेकून पंगत बसली. आम्हीही बसलो. पत्रावळी आल्या. वार्याने उडून जाऊं नये म्हणून पत्रावळ घट्ट पकडून ठेवावी लागत होती. गरमागरम वाफाळता भात ऍल्यूमिनिअमच्या एका छोट्या कढईएवढ्या भल्या थोरल्या डावाने वाढत होते. पुण्यामुंबईच्या पाचसहा मुदी भात एका डावात सहज मावला असता. फिका तपकिरी असा मळकट पांढरट रंगाचा स्थानिक गावठी भात. चवीला बरा होता. मी हिंदीत ‘हाफ’ म्हणून जेमतेम अर्धा डाव भात घेतला. आता मला हिंदीतून हसू नका. स्थानिक लोक दीडेक डाव घेत होते. मागोमाग गरमागरम डाळ आणि मिश्र भाज्यांचा दाट वाफाळता रस्सा आला. बटाटा, सुरणासारखा कोणतातरी एक कंद, कांदा, टोमॅटो, फरजबी वगैरे भाज्या होत्या. पण बिनफोडणीचा रस्सा. मसाले कळेल न कळेल इतपत. जेवण ठीक झाले. पंक्तीला माकडे टपून बसलेली होतीच. ताटातले अन्न माकडांनी आपल्या अगोदरच खाऊ नये म्हणून दोनचार स्वयंसेवक दंडुके आपटत उभे. थंडीमुळे कडकडून भूक लागली तरी पानातले सगळे काही मी संपवू शकलो नाही. माकडे खूष. पूर्वजांना खूष केल्याबद्दल मला नक्कीच पुण्य लाभले असावे. न आवडलेली एक गोष्ट करावी लागली. वरच्या प्रकाशचित्रात दिसणार्या बाजूच्या स्वच्छसुंदर ओढ्यात सर्वांसमवेत हस्तप्रक्षाळण केले.
१८-११-२०११.
हरिशंकरला जायला रिक्षा, सहा आसनी रिक्षा नाहीतर खाजगी गाडी पद्मपूरवरूनच मिळणार असे कळले. दुसरे दिवशी पद्मपूरहून खाजगी गाडी करून निघालो. एका टॅक्सीवाल्याने नकार दिला. कारण रस्ता नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या विभागातून जातो म्हणाला. खरेखोटे कळायला मार्ग नाही. बाळ्याला मराठीतून म्हटले अरे याला काहीतरी अडचण असल्यामुळे हा आता गाडी देऊ शकत नसेल. किंवा उगीचच घाबरवत असणार. मग पैसे जास्त मागायला मोकळा. नशीब दोघेच गाडी ठरवायला गेलो होतो. दुसर्या टॅक्सीवाल्याकडे गेलो. चांगल्या अवस्थेतली इंडिका गाडी होती. आमच्याकडे सामान फारसे नसल्यामुळे प्रश्न नव्हता. सामान सहज मावले.
आठव्या शतकात शैव आणि वैष्णव यांच्यात वितुष्ट आले होते. प्रबळ परधर्मीय आक्रमकांनाविरुद्ध या दोन पंथांना एकत्र आणण्यासाठी हरि = विष्णूचा एक अवतार आणि शंकर मिळून हरिशंकर या देवतेची निर्मिती झाली आणि दोन्ही पंथ एकत्र आले. हरिशंकर मंदीर नृसिंहनाथ मंदिराएवढेच सुंदर, काकणभर सरसच निघाले.
नृसिंहनाथमध्ये जमिनीवर फरशी आणि कोबा होता. इथे खाली फरशी तर वर मुख्य मंदिराकडे काळा स्वच्छ ग्रॅनाईट. ठिकाण नृसिंहनाथसारखेच डोंगरावरचे आणि निसर्गरम्य, मन प्रसन्न, टवटवीत करणारे.
हरिशंकर मंदिरातला हनुमान
इथेही सुंदर झरा. छोट्या धबधब्यातून येणारा.
एक सुंदर पूल देखील
आणि देखणी शिल्पे
मंडळींचे दर्शन आटोपले. मंदिराबाहेर मिठाई, चिकी, खेळणी, सरबते, खाद्यपदार्थ वगैरेंच्या टपर्यांच्या ओळीत छोटी संत्री, आवळे, बोरे, भाजी, वनौऔषधी वगैरे गावरान मेवा विकायला होता. पेरू छान होते. प्रसाद म्हणून तेच घेतले आणि निघालो.
संबळपूरच्या रस्त्याला लागूनच एक अभयारण्य लागले. तिथली हरणे.
संबळपूरच्या रस्त्यावर संबळपूरनजीक बुर्ला नावाचे एक छोटेसे शहर लागते. हिराकूड धरणाचे दुसरे टोक बुर्लाला आहे. म्हणजे नदीच्या एका किनार्याला हिराकूड तर दुसर्या तीरावर बुर्ला. बुर्लाला पोहोचतांनाच दिवेलागण झाली होती. बुर्ला अगदी छोटेसे शहर आहे. हॉटेल मिळाले तर तिथेच राहावे या उद्देशाने हॉटेले पाहिली. दोन बरी होती पण गरम पाणी मिळणार नाही म्हणाले. तिथे स्नानासाठी गरम पाणी वापरायची पद्धतच नाही. मी सोडून इतर तिघांनाही उन्हाळ्यातही स्नानासाठी गरम पाणी लागते. जीव द्यायचा झाला तरी थंड पाण्यात जाणार नाहीत. संबळपूर तिथून दहापंधरा किमी.वर आहे. मग साडेसात आठच्या सुमाराला संबळपूरला पोहोचलो. पहिलेच हॉटेल महामार्गाला लागूनच, माफक दरात आणि समाधानकारक हॉटेल मिळाले. तिथे मुख्य शहरात बसस्टॅंडला जायला रिक्षा स्टॅंड होता. जेवणाचे हॉटेल देखील बाजूलाच होते. ते साडेदहापर्यंत उघडे असते. पद्मपूरपासून १७४ मी. किमी. अंतर झाले होते. हिशेब करून मालकाशी भ्रमणध्वनीवरून बोलून ड्रायव्हरकडे उरलेले पैसे देऊन गाडी सोडली. नशीब आज मी कधी नव्हे ते रोखपाल होतो. पैसे देऊन उतरल्यावर बाळ्या बोलला अरे हजार रुपये कमी दिलेस त्याला. देऊन टाक त्याला. ऍडव्हान्स दिलेला त्याच्या लक्षातच नव्हता. मग मी आणि बाळीने त्याची भरपूर टर उडवली. थोडा वेळ आराम करून मस्त अंघोळ केली. आता रात्रीचे भोजन. बाजूच्या हॉटेलातल्या पदार्थांपैकी, डाळभात, भाजी, पराठे, आलू पराठे आणि मसाला डोसा हे पदार्थ ठीक होते.
राहायच्या हॉटेलच्या स्वागतकक्षातली माणसे हसतमुख आणि मदतीला तत्पर होती. कटक/भुवनेश्वरला जाणार्या बसेस मुख्य शहरातून मिळतात. ते या महामार्गापासून साडेतीनचार किमी. आहे. तिथे लक्ष्मी टॉकीज या भागातून कटक/भुवनेश्वरला आणि इतर ठिकाणी जायला बसेस सुटतात. तिथे टेंपोने जावे लागते. एकेका शहराची परिभाषा वैशिष्ट्यपूर्ण असते. टेंपो म्हणजे किंचित मोठी ऑटोरिक्षा. पुण्यात सहा आसनी असते तेवढी नाही. पण किंचित मोठीच. तिथे जायला भाडे रु. ४०.०० आणि रात्री आठनंतर दीडपट म्हणजे रु. ६०.००. पण संबळपूर कटक अंतर जवळजवळ २५० किमी. पेक्षा जास्त असल्यामुळे शक्यतो बसनेच जा. मात्र बसेस रात्रीच असतात. संबळपूरहून कटक/भुवनेश्वरला जायला रेलवे पण आहे. पण सामान घेऊन आम्ही पटकन चढून जागा कशी काय पटकावणार हा प्रश्नच आहे. गर्दी असेल नसेल सांगता येत नाही. अशी तपशीलवार माहिती त्यांनी दिली. खोलीवर येऊन निवांत झोपून गेलो.
क्रमश:
झुकलेले शिवमंदीर आणि हिराकूड धरण
संबळपूरला काय पाहायचे ते ठरले होतेच. हिराकूड धरण आणि हुमा येथले झुकलेले शिवमंदीर. ते पाहून लौकरात लौकर कटक किंवा भुवनेश्वरला पोहोचायचे होते. त्या गाडीची किंवा बसची व्यवस्था देखील करायची होती. सकाळी न्याहारी मुख्य शहरातच करायची. मग फिरायला गाडी ठरवून बसेसची चौकशी करायची असे ठरले. ‘टेंपो’तून उतरलो तिथे ट्रॅव्हल कंपन्यांची कार्यालये हारीने लागलेली होती. शिवाय पदपथावर टेबले टाकून कार्यालये थाटलेली होती. जणु आठवड्याचा बाजारच. भाजीच्या टोपल्या आणि राशींऐवजी टेबले आणि टेबलावर तिकिटांची पुस्तके. रिक्षातून उतरल्याबरोबर बाजूलाच एक असेच टेबल टाकलेल होते. टेबलापाशीच्या त्या गृहस्थांनी लगेच आमच्यापाशी हिंदीतून चौकशी केली. कुठे जायचे आहे वगैरे वगैरे. महापात्रो नावाचा तो गृहस्थ विश्वासार्ह, आश्वासक वाटला. झकपक किंवा ऐटबाज वाटले नाही तरी किंचित गचाळच वाटणारे मध्यमवयीन, कनिष्ठ मध्यमवर्गीय पण भारदस्त व्यक्तिमत्त्व. कटक भुवनेश्वरच्या बसेसची फक्त सहा स्लीपर तिकीटे उपलब्ध होती. नव्याकोर्या वातानुकूलित व्हॉल्वोच्या तोडीच्या बसेस असतात असे म्हणाला. पण तिथे एकही बस दिसत नव्हती. फक्त ५००/- रु. आगाऊ द्या. बाकीचे बस बघून द्या. नाही आवडली तर पैसे परत. बस सुटेपर्यंत आम्ही थांबतोच. बस निघेपर्यंत उतारू मिळतात म्हणाला. कठीण परिस्थितीत बसमधले स्लीपर फारच धोकादायक असतात असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यापेक्षा सीट्स बर्या. मी हवे तर दोन तास थांबतो. तुम्ही कुठेही चौकशी करा. सीट नाही मिळाली तर माझ्याकडून स्लीपरची तिकिटे घ्या. रु. २५०/- फक्त. २८२ किमी. अंतराला २५०/- रु. काही वाईट नव्हते. दहा रुपये आणखी कमी करून २४०/- करतो म्हणाला. हे ठीक होते. संबळपूर फिरायला खाजगी टॅक्सी पण त्यानेच मिळवून दिली. समलेश्वरी देवीचे मंदीर देखील पाहाच म्हणाला, फार सुंदर आहे. या देवीवरूनच शहराला संबळपूर हे नाव पडले. ओरिसा तसे गरीब राज्य असल्यामुळे दर बर्यापैकी कमी आहेत. आणखी एक गोष्ट त्याने पुढे सांगितली की अख्ख्या ओरिसात कुठेही आम्हाला काहीही अडचण आली तर मला जरूर फोन करा. मी बरीच वर्षे या व्यवसायात आहे. मंत्रालय, पोलीस, उद्योग, सगळ्या खात्यात आपली वट आहे. कोणत्याही खात्यात काम असले तर मला कळवा. मी यथाशक्ती मदत नक्की करीन. आम्हाला ओरिसाचे पर्यटन भरभराटीला आणायचे आहे, त्यासाठी फक्त नाव कमवायचे आहे. आणि मुंबईपुण्यातून, महाराष्ट्रातून, कुठूनही तुमचे मित्र वगैरे येणार असले तर माझ्याकडेच पाठवा. मी कशी सेवा देतो ते तुम्ही पाहाच.
त्याने टॅक्सी पाहून द्यायसाठी त्याचा माणूस आमच्याबरोबर दिला. एक थोडीशी जुनीच इंडिका होती. किंचित जास्तच आवाज करणारी डिझेल इंडिका. पण त्वरित चालू होणारी इंडिका. चारपाच वेळा बंद करून चालू करायला सांगितली. स्टार्टिंग ट्रबल नव्हता. आणि अंतर फारसे नव्हतेच. हुमा ३२ + ३२ = ६४ आणि धरणासाठी १७ + १७ = ३४. जेमतेम शंभर किमी. चालक चांगला असणे आवश्यक. गचाळ कपड्यातल्या काहीशा जास्तच नम्र चालकाने प्रथम न्याहारीसाठी एका मिठाईच्या दुकानात नेले. आपल्याकडे ब्रिजवासीचे असते तसे. ओरिसातल्या आमच्या नऊ दिवसाच्या वास्तव्यातली सर्वात उत्कृष्ट न्याहारी इथे मिळाली. मुंबईतल्या बृजवासीसारखे दुकान. ताजे गरमागरम आणि स्वादिष्ट समोसे, बटाटेवडे, कचोरी तसेच खमण, काला जामुन आणि ओरिसाची वैशिष्ट्यपूर्ण मिठाई, समोसे वगैरेसोबत मिळणार्या तिखट, गोड, लालहिरव्या चटण्या सगळे पदार्थ उत्कृष्ट. चालकाला दुवा देत आणि पदार्थांची चव जिभेवर घोळवीत दुसर्या एका टपरीवर चहापान करून निघालो.
हुमा येथील झुकलेले मंदीर पहाण्याची मला खूप उत्सुकता लागून राहिली होती. पिसाचा मनोरा एवढा जगप्रसिद्ध आहे तर हे मंदीर का होऊ नये असे कुतूहल मनात दाटले होते. संबळपूरपासून ३२ किमी. तर भुवनेश्वरपासून सुमारे ३१४ किमी.वर हुमा इथे हे झुकलेले शिवमंदीर आहे. महानदीच्या काठावर हे निसर्गरम्य गाव वसलेले आहे. संबळपूरचा पाचवा राजा बलियारसिंग याने ते बांधले. इथे एक दूधवाला (स्थानिक भाषेत गौडा) होता. रोज महानदी पार करून तो पलीकडच्या तीरावरील खडकावर नेऊन ठेवीत असे. रोज तो रतीब घालत असे आणि खडक ते दूध त्वरित पिऊन टाकत असे. या चमत्काराची कीर्ती चौफेर पसरली आणि त्याची परिणती तिथें मंदीर बांधण्यात झाली. हे यात्रास्थान असले तरी इथे विविध जातीचे मासे पाहाण्यास पर्यटक येतात. दरवर्षी शिवरात्रीला इथे डोंगराच्या पायथ्याशी बिमलेश्वराची मोठी यात्रा भरते.
येथील खास जातीचे मासे आहेत कुडो मासे. कुडो मासे हे शिवाच्या मालकीचे समजले जातात म्हणून कोणी खात नाहीत. हे मासे खूपच माणसाळलेले आहेत. मंदीराजवळ स्नान करणार्या यात्रिकांच्या हातून खाऊ देखील घेतात. पवित्र दिवशी कांही माशांची नावे घेऊन त्यांना बोलावून प्रसाद दिला जातो.
आता मुख्य आकर्षणाबद्दल. झुकलेले मंदीर. ओरिसा पर्यटन खात्याने केलेल्या तपासानुसार मंदीर झुकण्याबाबतच्या त्यांच्या प्रश्नांना कोणीही समाधानकारक उत्तर देऊं शलेले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्य मंदीर एका बाजूला झुकले आहे तर इतर उपमंदिरे विरूद्ध बाजूला. मंदिराच्या आवारातील प्रत्येक वास्तू झुकलेली आहे. गेल्या ४०-५० वर्षात झुकण्याचा कोन बदललेला निदान नुसत्या डोळ्यांना तरी दिसत नाही असे म्हणतात. गावकर्यांकडून तसेच पुजार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खरे तर इटलीतील पिसाला आहे तशी अचूक कोन मोजण्याची यंत्रणाच इथे नाही. त्यामुळे कोन नक्की बदलला की नाही हे कळत नाही. परंतु याला काही तरी भूगर्भीय कारण असणारच. भूस्तर वेडावाकडा असू शकेल. ही सगळी होती मिळवलेली माहिती. कदाचित चमत्काराच्या प्रसिद्धीसाठी मंदीर मुद्दामच ओळंब्याशी कोन करून बांधले असेल.
पण मंदीर पाहिले आणि विरस झाला. भव्यता अजिबात नाही. जेमतेम चारपाच मजली इमारतीएवढी उंची. परिसर तसा उजाड, अनाकर्षक आणि थोडाफार बकालच. मंदिराचे रचनासौंदर्य कुठे जाणवले नाही. हिंदू धार्मिक यात्रास्थानी पूर्वी हमखास आढळणारा गचाळपणा अजूनही इथे आहे. आकर्षक रंगरंगोटी सोडा, साधी स्वच्छता देखील समाधानकारक नव्हती. पर्यटक इथे का आणि कशाला पुन्हा येतील? आमच्याखेरीज एकही पर्यटक आढळला नाही. होते ते फक्त बोटावर मोजण्याइतके स्थानिक दर्शनेच्छु. तेवढाच गर्दीचा ताप टळला. पण एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून तशी निराशाच पदरी आली.

हुमा येथील झुकलेले मंदीर.
जेमतेम एक महिन्यापूर्वी इथे पूर येऊन गेला होता हे खरेच वाटेना. नोव्हेंबर महिन्यात देखील नदीचे पाणी वाहाते नव्हते. कुडो मासे दिसले नाहीत. खडकाळ पात्रापलीकडे

झाडांचा एक आकर्षक पुंजका तेवढा दिसत होता. कुडो मासे दिसले नाहीत. पाहावेसे देखील वाटले नाही.
मत्स्यकन्येचे किंवा मत्स्यदेवतेचे एक शिल्प मात्र सुंदर होते. या शिल्पाबद्दल किंवा गेल्या लेखांकातील हरिशंकरच्या मगरीचा जबडा उघडणार्या स्त्रीशिल्पाबद्दल कुणी माहिती देऊ शकले नाही. पण त्यामागे एखादी आकर्षक दंतकथा नक्कीच असणार.
महापात्रोशेठनी शिफारस केलेले समलेश्वरी मंदीर मात्र स्वच्छ आणि सुरेख निघाले. शिफारस अगदी योग्य होती. नंतर रात्री ते बसवर भेटले तेव्हा त्यांचे आभार मानले.

या शिल्पात हत्तीच्या पाठीवर सिंह दिसतो आहे. हत्ती म्हणजे बौद्ध धर्मावर सिंहाने म्हणजे हिंदु धर्माने विजय मिळवला आहे असा या प्रतीकाचा अर्थ आहे. आद्य शंकराचार्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातून बौद्ध धर्माचे जवळजवळ उच्चाटन केल्यानंतरचे हे प्रतीक आहे. हे प्रतीक ओरिसात पुढे जागोजाग दिसले.
हुमाहून संबळपूरला परत येऊन भोजन केले. थाळी होती आणि पुरीभाजी, पुलाव देखील होता. आमच्या बाजूच्याच टेबलावर साडेचार पावणेपाच फुटी इवल्याशा पण उत्साही अशा तीन कॉलेजकन्यका आल्या. त्या हॉटेलच्या बकाल वातावरणात त्यांच्या हास्यविनोदाने रंग भरला. पण बंगालीसदृश त्या भाषेतले काही कळले नाही. त्यांनी थाळ्या मागवल्या. थाळी कशी असते ते पाहिले. दीडदोन फूट व्यासाच्या दोन अडीच इंच खोल थाळीत किंवा परातीत दीडदोन इंच उंचीचा स्थानिक बुटक्या भाताचा दोन वाट्या ठेवता येतील एवढी जागा सोडून चेपून भरलेला सपाट थर. त्यावर दिसेल न दिसेल इतपत वरण. मोकळ्या जागेत ताटातच जेमतेम वाटीभर दाट मिश्र रस्साभाजी. वरणभातावर एक तळलेला पापड. अन्न साधे, हलके असले तरी एवढा भात त्या किरकोळ देहयष्टीच्या मुली कशा संपवणार असा गहन प्रश्न मला पडला. पण जेमतेम आठदहा मिनिटात त्यांनी त्या थाळ्यांचा फन्ना उडवला. काय ते आम्हा मुंबईकरांचे नाजूक खाणे. प्रियांकाने पोटबीट बिघडू नये म्हणून पुरीभाजी आणि पुलावच पसंत केला. सौ. बाळीचे पदार्थांच्या चवीच्या बाबतीत अंदाज चुकत नाहीत याची पुन्हा एकदा प्रचीती आली. किंवा जखिणींना उपजत अंतर्ज्ञान तरी असावे.
आम्ही भर बाजारात होतो. वाटेत साड्यांची दुकाने लागली. ओरिसी रेशमी साड्या सर्वात महाग असतात अशी माहिती एके काळी शिंपी दुकानदार असलेल्या बाळ्याने दिली. सहज चौकशी केली. चांगल्या पण फारशा उंची नसलेल्या पण अप्रतिम रंगभूषेने आणि वेलबुट्टीने युक्त अशा साड्या दोन हजाराच्या वरच होत्या. कापडाच्या बाबतीत सेवानिवृत्त शिंपी बाळ्या कधीच चुकत नाही. बाकी सगळ्या वस्तू अतिशय स्वस्त असलेल्या या राज्यात साड्या मात्र फार महाग आहेत. व्यापारी लोक काय करतील त्याचा काही नेम नाही.
आता धरण पहायला तय्यार. इथे मात्र रंगीबेरंगी कपडे घातलेल्या पर्यटकांची माफक गर्दी. वातावरण उत्साहाने भारलेले. नोव्हेंबर महिन्यातले दुपारचे ऊन तापले तरी तसे सौम्यच होते. जलाशयामुळे हवेत सुखद गारवा. दिवस कारणी लागला.
हिराकूड धरजवळचा नेहरू मनोरा.
इथून पुढे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रकाशचित्रे काढायला मनाई आहे. तशी पाटी उडिया, हिंदी आणि इंग्रजीत लिहिलेली आहे. पण पर्यटक सर्रास आपापले भ्रमणध्वनी सरसावून एकमेकांचे फोटो घेत होते. घातपाताच्या धोक्याचे आणि सुरक्षितता नियमांचे गांभीर्य ना पर्यटकांना, ना पहारेकर्यांना. अशा सुपुत्रांना जन्म देणार्या भारतमातेचा विजय असो!
मीही मग पाहारेकर्यांचा डोळा चुकवून मनोर्यावरून हळूच एकदोन प्रकाशचित्रे टिपलीच. धरणाअलीकडे आणि पलीकडे असलेल्या पाण्याच्या पातळीत केवढा हा फरक.
त्या उत्फुल्ल वातावरणातून पाय निघत नव्हता. पण निघालो (पायांसह बरे का) आणि खोलीवर जाऊन आराम केला. मग सामान बांधून तयार ठेवले. रात्री साडेदहाची बस होती. स्नान करून सौ. बाळी ऊर्फ प्रियांकाच्या पसंतीचे भोजन केले. गेल्या वेळी भाऊ आग्रह करून खायला घालत होते. या वेळी ती भूमिका प्रेमळ आणि अगत्यशील जखिणीने आपल्या उलट्या शिरावर घेतली होती. भोजन करून टेंपोने लक्ष्मी टॉकीजला बस पकडायला गेलो. उत्साहाने भारलेले महापात्रोशेठ हजर होते. काही व्यक्ती आपला ठसा उमटवून कायम आपल्या स्मरणात राहातात. तसेच हे निघाले. जरी तो त्यंच्या व्यवसायाचा भाग असला तरी. पुन्हा केव्हा गेलो तर त्यांच्या मार्फतच फिरेन. खरेच सगळ्या बसेस भरलेल्या होत्या. मागच्या कुठल्यातरी दोनचार सीट्स शिल्लक होत्या. एअर कुशनची वातानुकूलित बस खरेच दणकट, स्वच्छ आणि कोरी करकरीत निघाली. व्हॉल्व्हो नाही हे सांगितले तरच कळत होते. तिकिटाचे उरलेले पैसे देऊन निघालो.
क्रमशः
भुवनेश्वर परिसरातील मंदिरे
२०-११-२०११
सकाळी जाग आली तेव्हा कळले की आपण बसमध्ये आहोत. बाहेर फटफटले होते. घड्याळात पाहिले. जेमतेम पाच वाजत होते. आणखी पूर्वेला आलो होतो. पुढचे येणारे शहर कटक होते. बसवाल्यांकडे हॉटेल, वाहन वगैरेंची चौकशी केली. कटकपेक्षा भुवनेश्वर बरे पडेल असे एक प्रवासी म्हणाला. हॉटेले जास्त चांगली आणि रेलवे स्टेशनशेजारीच असलेल्या बसस्टॅंडवरून पुरी, कोणार्कला जायला सतत सिटी बसेस उपलब्ध. एक निघायच्या आत दुसरी हजर असते. एक तासात पुरी आणि अडीच तासात कोणार्क. सकाळी जाऊन काय पाहायचे ते पाहून हवे तर संध्याकाळी भुवनेश्वरला येऊ शकता. खाजगी गाड्यापण तिथे भरपूर. जास्त पर्याय उपलब्ध.
कटक गाळल्यामुळे एक गोष्ट चुकणार होती. कटकमध्ये चांदीच्या तारेच्या अप्रतिम कलाकृती बनवतात. त्या कलेला फिलिग्री असे म्हणतात असे माझ्या वाचनात आले होते. ते पाहायचे आता राहून जाणार होते. परत आल्यावर गूगलवर filigree च्या थक्क करणार्या अप्रतिम देखण्या इमेजेस - प्रतिमा पाहिल्या आणि समाधान मानले.
सर्ररळ भुवनेश्वर गाठले. सेंट्रल बस स्टॅंडजवळ उतरलो. तिथे सगळीकडे जायला रिक्षा, बसेस उपलब्ध असतात. रिक्षा करून रेलवे स्थानकाजवळ गेलो आणि हॉटेल्सचा शोध सुरू केला. हवे तसे हॉटेल मिळेपर्यंत रिक्षा सोडायची नाही असे ठरले होते. आमची बस इथूनच पुढे गेली होती. पण ते बस पुढे गेल्यावर आम्हाला कळले होते. म्हणून रिक्षाची यातायात. असो. राज्याच्या राजधानीत ऐन रेलवे स्थानकाजवळ साताठशेपासून अडीच हजारापर्यंत बर्यापैकी डबल ऑक्युपन्सीज उपलब्ध. तशी स्वस्ताईच आहे इथे. हॉटेलमध्ये जाताजाताच एक खाजगी टॅक्सीवाला मागे लागला. भुवनेश्वरची मुख्य मंदिरे किती रुपयात दाखवणार म्हणून विचारले. साडेनऊशे रुपये, वातानुकूलन हवे असल्यास अकराशे. नंतर कळवतो म्हणून त्याचे कार्ड घेऊन ठेवले. माझ्या कपाळावर ‘पर्यटक’ असा शिक्का आहे की नाही कळत नाही. वर्षभर मालवणात कामानिमित्त धावपळ करीत फिरतो आहे. गिर्हाईक नको असलेले नंबरी दुकानदार पुण्याप्रमाणेच मालवणात देखील आहेत. बाजारातून चालतांना किल्ल्याच्या दिशेला गेलो तर कलावस्तू विकणारे फिरते विक्रेते अजूनही कधीकधी मला पर्यटक समजून मागे लागतात. असो.
हॉटेल हमरस्त्याला लागूनच असलेल्या इमारतींच्या मागच्या इमारतींच्या रांगेत होते. हमरस्ता आणि रेलवे स्थानकाच्या मधोमध. पायी पाच मिनिटावर रेलवे स्थानक. दोन्ही खोल्या दहा वाजता तयार होणार होत्या. तोपर्यंत पाच जणांची एक मोठी खोली स्नानाला वगैरे दिली. ती झकपक आणि उत्कृष्ट होती. स्नान करून खाली उतरलो. हॉटेलच्या स्वागतकक्षातल्या माणसाने टॅक्सी हवी का म्हणून विचारले. दर फलकावर लावलेले होते. भुवनेश्वर दर्शन साधी बाराशे आणि वातानुकूलित पंधराशे. आम्ही अगोदरच टॅक्सी ठरवली होती. मंदिरे स्थळे तीच. स्वागतकक्षातल्या माणसाने आम्हाला अनधिकृत टॅक्सी न घेण्याबद्दल धोक्याचा इशारा दिला. त्याच्या ओळखीनेच टॅक्सी घ्यायचा त्याचा आग्रह, नव्हे दुराग्रह होता. आम्ही ठरवलेल्या टॅक्सीवाल्याकडे ओरिसा पर्यटन खात्याचे अधिकृत ओळखपत्र होते असे थोडेसे उद्धटपणेच सांगितल्यावर गप्प बसला. तसे ते मी खरोखर पाहिलेले होतेच. खरे तर टॅक्सीवाले ते आपल्याला अगोदरच दाखवतात. या हॉटेलवाल्याला बहुधा पर्यटकांवर दादागिरी करायची सवय असावी. मी ठाम, थोडासा आक्रमकच होतो, आम्ही मुंबईवाले आहोत आम्हाला व्यवहार चांगलाच कळतो असे बजावल्यावर त्याने माघार घेतली. आम्ही न्याहारी पण त्यांच्याच रेस्तोरॉंमध्ये करावी असे देखील त्याचे म्हणणे होते. पण तिथे फक्त आम्लेट पाव वगैरे पदार्थ उपलब्ध होते. बाळ्या म्हणाला जिथे गर्दी असते तिथेच खावे. पदार्थ नक्की ताजेच मिळतात. आपण टॅक्सी बोलावली आहेच. तोच आपल्याला चांगल्या हॉटेलात नेईल. आम्हाला उडपी हवा होता. साडेनऊला टॅक्सी बोलावली आहे. आता दहा मिनिटात साडेनऊ होतील.
वेळेवर आलेल्या टॅक्सीवाल्याने अगदी जवळचाच पायी दहा मिनिटावरचा उडपी दाखवला. पदार्थ गरमागरम, बरे होते. गल्ल्यावरचा मालक गुजराथी होता. एक नवा गोड पदार्थ खाला. फूटभर व्यासाचा दोन इंच उंचीचा सपाट केकसारखा दिसणारा हलवा. त्याचे मध्यापासून कडेपर्यंत सुरीने त्रिकोणी तुकडे पाडून वजनावर देतात. दोनशे रु. किलो. एक तुकडा शंभर ग्रॅ. चा असतो. एक खाऊन पाहिला. आत मावा भरला होता. म्हणजे स्टफ्फ्ड मावा केक विथ मावा फिलिंग असे त्याचे वर्ण करता येईल. एक तासापूर्वीच बनवला होता. उत्कृष्ट निघाला. मग प्रत्येकाने एकेक तुकडा घेतला. दुसर्या दिवशी पण तोच राहिलेला हलवा तिथे होता. मग घेतला नाही. तिसरे दिवशी मात्र ताजा होता तेव्हा घेतला. असो. सव्वादहापर्यंत निघालो.
भुवनेश्वरला पाचशेच्या वर मंदिरे आहेत. बहुतेक सगळी प्राचीन असून त्या बहुतेक मंदिरात पूजापाठ अजूनही चालतात.
राजाराणी मंदीर
भुवनेश्वर. हे मंदीर ११व्या शतकातील आहे. या एका मंदिरातच भरपूर वैविध्य आढळते. पिवळसर वालुकाश्मामधील हे मंदीर १७.९८ मीटर उंच आहे. मंदीरस्थापत्याचा झालेला विकास इथे नाट्यपूर्ण रीतीने दिसून येतो. अमालकाभोवती आकाशाकडे जात असलेली चार टोके असलेल्या या मंदिराचे नाते खजुराहोच्या कंदारीय महादेव मंदिराशी जुळलेले दिसते. रेखा देऊळवरच्या नाजुक कंबरेच्या मानवी आकाराच्या बसलेल्या स्थितीतील आकृत्यातून कलावंताचे स्त्रीत्वाच्या सौंदर्याबद्दल असलेले वास्तव कौतुक दिसून येते तर आपल्या कलासक्त नजरेला एक संपन्न मेजवानीच मिळते. चार्लस फॅब्री म्हणतो इथे अनेक आश्चर्ये दडलेली आहेत.
राजा राणी मंदिराचे देखणे आवार.


प्रवेशद्वाराच्या दोन दगडी खांबांना कोरीव नागांनी विळखा घातला आहे. तस्सेच आणखी दोन खांब याच सभामंडपाच्या समोरून पाहातांना डाव्या बाजूला दिसताहेत. रेखा देऊळ च्या वरील जे चपट्या भोपळ्यासारखे आडवे चक्र आहे त्याला अमालक म्हणतात. त्याच्या भोवती जी वर आलेली टोके आहेत ते या मंदिराचे वैशिष्ट्य. चारपैकी दोन टोके पहिल्या प्रकाशचित्रात दिसताहेत, दोन पलीकडच्या बाजूला आहेत.
केदारेश्वर मंदीर, परशुरामेश्वर मंदीर आणि मुक्तेश्वर मंदीर ही बाजूबाजूलाच आहेत.
केदारेश्वर
केदारेश्वर शिव आणि गौरी यांचे हे मंदीर मुक्तेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. या मंदिराला हर्षविमोचन मंदीर असेही म्हणतात. केदार आणि गौरी यांच्या शोककारक प्रेमकथेवर आधारित असे हे मंदीर राजा ललतेंदू केसरी याने हे मंदीर त्यांच्या स्मरणार्थ बांधले अशी दंतकथा आहे.
केदार आणि गौरी या प्रेमी युगुलाच्या प्रेमाला गांवकर्यांचा विरोध होता. म्हणून ते युगुल गांव सोडून निघाले. जंगलातून जातांना वाटेत गौरीला भूक लागली म्हणून केदार खायला काहीतरी आणायला म्हणून गेला. पण त्याला वाघाने मारून टाकले अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे. लुईस रोडने पूर्वेकडून किंवा हारामंदीर छाकातून पश्चिमेक्डून इथे जाता येते. मदिराची स्थापत्याची वैशिष्ट्ये तसेच शिल्पशैली यावरून ते इसवी सनाच्या ११व्या शतकातील सोमवंशी राजांच्या शासनकाळातले आहे हे समजते. याचा आराखडा पंचरथी आहे. यात ‘रेखा देऊळ’ आणि ‘पीढ जगमोहन’ आहे. मंदीर दक्षिणमुखी आहे आणि गाभार्याची उंची १३.७ मीटर आहे.
परशुरामेश्वर मंदीर
मंदीरस्थापत्य बाल्यावस्थेत. मुख्य मंदीर आणि जगमोहन कसेतरी जोडले आहेत. नंतरच्या मुक्तेश्वर मंदिरात हा जोड इतका कलात्मक आहे की जोड कळतही नाही.
मुक्तेश्वर मंदीर
भुवनेश्वर. ओदिशातील वालुकाश्मापासून बनवलेला मंदीरस्थापत्यातला एक सुंदर हिरा म्हणजे मुक्तेश्वर मंदीर असे एम एम गांगुली म्हणतात. मंदीर पाहिल्यावर यात अजिबात अतिशयोक्ती नाही हे लक्षात येते. खरे तर देखण्या मंदीरवास्तूंचा हा एक समूहच. हे मंदिर आहे इसवी सनाच्या १० व्या शतकातील. परंतु उत्तम रीतीने सांभाळून राखलेले आहे. १०.५१ मीटर उंच असलेल्या या मदिरावरील प्रत्येक इंच अप्रतिम कलाकारीने नटलेला आहे. ओदिशी मंदीरस्थापत्यशैलीला आपल्या खास वैशिष्ट्यांमुळे वळण देणारे हे मंदीर कलेच्या अभ्यासकांना आणि रसिकांना खाद्य पुरवते. या मदिराबद्दल लिहावे तेवढे थोडेच. बाजूलाच छोटेसे तळे देखील. यात मुले माणसे डुबक्या मारीत होती.

सभामंडपावरील मेघडंबरीच्या छतावर आतून अप्रतिम कोरीवकाम केलेले आठ पाकळ्यांचे दगडी कमळ आहे. प्रत्येक पाकळीवर एका देवतेची प्रतिमा आहे. खरे तर मंदिरातली प्रत्येक वास्तू अप्रतिम अशा कोरीवकामाच्या नाजूक, रेखीव कलाकुसरीने नटलेली आहे.
हे शिवमंदीर असूनही मंदिरात नंदी नाही. गर्भगृहात मात्र शिवलिंग आहे. जगमोहनच्या पश्चिमेला प्रवेशद्वार आहे. मंदिराचे तोरण म्हणजे प्रवेशकमान हा पाषाणशिल्पाचा इथे असलेला एक अजोड नमुना आहे.
असे तोरण अन्यत्र कोठेही नाही असे जालावर दिलेले आहे. परंतु मला वैतल मंदिरातही असे तोरण दिसले. त्याचे प्रकाशचित्र पुढे येईल. रेखा देऊळ आणि जगमोहन यांचा विकसित जोड देखील प्रकाशचित्रांकित करायचे राहून गेले. यावरील आसनस्थ स्त्रीआकृत्या आणि माकडांच्या तसेच मोरांच्या आकृत्या आपली दृष्टी खिळवून ठेवतात. स्वतंत्र भारतात हल्ली बांधलेल्या अनेक मंदिरात किंवा अन्यत्र असे तोरण बांधलेले दिसते. उदा. शेगाव येथील आनंदसागर. दहा शतकाहून जास्त काळ मुक्तेश्वराने पर्यटकांना सतत आकर्षित करून बराच काळ खिळवून ठेवण्याचे कार्य केले आहे.
या मंदिराची स्थापत्यशैली ओदिशात पुढे अनुसरली गेली आणि विकसित देखील झाली. कळस जास्त रेखीव, उठावदार बनले आणि उभ्या आधारस्तंभांवरील शिल्पांचा साजशृंगार वाढला. जगमोहनच्या छतावर देखील आणखी सजावट वाढली, त्यांना त्रिकोणी आकार मिळाला तसेच मुख्य मंदीर आणि जगमोहन यांचा जोड विकसित होऊन जास्त सौंदर्यपूर्ण झाला.
- X - X - X -
इथून गेलो धौलीला. धौलीकडे जातांना उजवीकडे एक डोंगर आणि थोडासा सपाट प्रदेश दिसतो. या भूभागात कलिंगची लढाई अशोकाने केली. अपरिमित हानी झाली आणि तो नरसंहार पाहून अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. काही इतिहासकारांचे असे मत आहे की बौद्ध धर्मीय प्रजेची संख्या तेव्हा सर्वात जास्त प्रमाणात होती म्हणून परधर्मी राजा त्या प्रजेला चालणार नाही तेव्हा लोकांचा धार्मिक उठाव टाळायला त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. हेच कारण जास्त तार्किक वाटते.
धौलीचा स्तूप
तिथून परत येऊन लिंगराज मंदीर. लिंगराज मंदीर तिठ्यावर आहे. भ्रमणध्वनी, कॅमेरे वगैरे आत नेण्यास मनाई आहे. मंदिराभोवती फिरून प्रतिमाग्राहकात काही सापडते का हे पाहात काही वेळ हिंडलो
आणि मंदिरासमोरून डाव्या हाताने जरा पुढे गेल्यावर डावीकडेच सायबर कॅफे आहे तिथे जाऊन बसलो.
लिंगराज मंदिराचे प्रवेशद्वार
लिंगराज मंदिराच्या तिठ्यावरून उजवीकडे जरा पुढे गेले की डाव्या हाताला बिंदुसागर सरोवर आहे.
बिंदुसागर सरोवर

बिंदुसागर सरोवरातील मंदीर
सरोवराचा किनारा म्हणजे एक उकिरडाच आहे. बिंदुसागर सरोवराशेजारच्या उकिरड्यासमोरच आहे अनंत वासुदेव मंदीर
जरा पुढे गेले की वैतल मंदीर.
वैतल मंदीर

वैतल मंदीर: भुवनेश्वर. मंदीरस्थापत्य शैलीच्या दृष्टीने हे मंदीर वेगळे आहे. मंदीराचा पाया चौरसाऐवजी आयताकृती आहे. त्यामुळे रुंदीपेक्षा लांबी जास्त आहे. घुमटावर एकाऐवजी तीन शिखरे आहेत. उजव्या हाताला जे पडके शिखर दिसते ते एका भग्न मंदिराचे आहे. कालापहाड नावाच्या एका धर्मवेड्या सुलतानाने ती फोडली. कोणार्कचे मंदीरही त्यानेच पाडले अशी आख्यायिका आहे. ती नंतरच्या लेखांकात येईलच.
परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर मंदिरावरून आपल्याला कलिंग मंदीरस्थापत्याच्या विकासाचे टप्पे जाणवतात. इसवी सन ८०० साली बांधलेल्या वैतल मंदिरातून अगदी भिन्न शैली आढळते. कलिंग शैलीतील खाखरा पद्धत यातून दिसते. तांत्रिक पंथाच्या मंदिरातून ही पद्धत दिसते. मंदिराचा कळस पाहिल्यावरच चट्कन फरक ध्यानात येतो. कळस आयताकृती आहे. जगमोहनशी काटकोन करणारा. तत्कालीन घरांच्या शाकारून बनवलेल्या किंवा लाकडी छपरासारखा याच्या छपराचा आकार आहे. चैत्य कमानीचा नालाकार एक मोहक प्रतीक आहे. आता पंचाईत आली. मुक्तेश्वराच्या तोरणासारखेच तर हे दिसते आहे. फक्त शेंदूर किंवा शेंदरी रंग फासलेला. मग या प्रतीकात व त्या तोरणात काय फरक आहे बरे? हा प्रश्न ते पाहाण्याअगोदर पडला होता. तिथे जाऊनच पाहिले तरी कळले नाही. मंदीरात पूजापाठ वगैरे काही चालत नाही. बकाल परिसरातले मंदीर पूर्णपणे निर्जन होते. त्यामुळे कोणाला काही विचारायचा प्रश्नच आला नाही.
हे प्रतीक फक्त बांधकामात नव्हे तर सजावटीच्या शिल्पातही सर्वत्र आढळते. इथे छपराचा आतील भाग साधासरळ आहे तर इतर मंदिरात त्यावर शिल्पकलेची भरपूर कलाकुसर आढळते. मंदिराच्या आकारात फारसा फरक नाही परंतु इथल्या जगमोहनच्या चार कोपर्यालगत मंदिराच्या छोट्या प्रतिकृती व्यवस्थित ठेवलेल्या आढळतात. एका धावत्या दृष्टिक्षेपात विकसित झालेली शिल्पसजावटीची शैली आढळून येते. बारीक निरीक्षण केल्यावर मात्र शिल्पसजावटीतली काळी बाजू आणि मंदिराचे व्यक्तिमत्व ध्यानात येते. हिंदू आणि बौद्ध धर्मातील काही तांत्रिक तत्त्वे एकत्र करून इथे शक्तीची उपासना केली जात असे. या उपासनेत तपशीलवार मंत्रविधी, गुप्तविधी आणि पवित्र बळीची प्रथा विकसित केली होती. वैतल मंदिराच्या गर्भगृहाचा अंतर्भाग जवळजवळ पूर्ण अंधारलेला आहे. मोजक्या तज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीतच इथले विधि उरकले जात होते असे मानतात. आदिशक्ती दुर्गेचेच एक तांत्रिक रूप चामुंडा ही इथली प्रमुख देवता आहे. अतिशय अंधुक प्रकाशात गळ्यात रुंडमाळा (मानवी मुंडक्यांची माळ) घातलेली, प्रेतावर बसलेली, एका बाजूला घुबड आणि दुसर्या बाजूला कोल्हा असलेली चामुंडेची प्रतिमा रंगवलेली दिसते. तिची अतिशय कृश अशी शरीरयष्टी, खोल गेलेले डोळे आणि खपाटीला गेलेले पोट डोळ्याना खुपते. नेहमी चाकोरीबद्ध वागणारे आदरणीय असे पुरातत्वखाते त्यांच्या भुवनेश्वरच्या मार्गदर्शिकेत म्हणते की सहन होणार नाही एवढे भयंकर असे तिचे रूप आहे पण त्याला आपण काही करू शकत नाही. माझ्या मते युद्धात असे भयंकर दृश्य, बली देतांना बलीने केलेला आक्रोश वगैरे भयंकर दृश्ये लहानपणापासून सतत पाहिल्यामुळे लढवय्या जातींचे मन कठोर, निबर व्हावे आणि मग युद्धात होणार्या अमर्याद हिंसेमुळे मानसिक धक्का किंवा दहशत बसू नये असा हेतू या शक्तीपूजेत असावा. आज जे सोशल इंजिनीयरिंग किंवा समाजाचे मनोरेखन करतात तसाच हा प्रकार असावा.
आंतील भिंती १५ वळचणींनी सजलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक प्रतिमा विचित्र आहे. गर्भगृहाच्या दरवाजातच आतील बाजूस चतुर्मुखी लिंग आहे. त्यावरही चित्रविचित्र प्रतिमा आहेत. त्यापुढे एक वधस्तंभ आहे. विशेषज्ञांच्या शब्दात येथील वातावरण ‘मनःशांती घालवणारे’, भंग करणारे आहे. पुरातत्व खात्याच्या थेट शब्दात सांगायचे झाले तर ‘विचित्र’ आहे. पूर्वेकडील बाहेरच्या बाजूला (सुदैवाने जिथे उजेड असतो त्या मागच्या बाजूला) सूर्यदेवाची सुंदर मूर्ती आहे. संवेदनाक्षम आणि सुंदर चेहरा असलेली. त्याच्या दोन्ही बाजूला उषा आणि प्रत्युषा आहेत. पहाटेच्या जुळ्या भगिनी. अरूण त्याचा रथ चालवतो आहे. हे प्रतीक मनावर ठसते. कोणार्कच्या मंदिरात हेच प्रतीक विकसित केले आहे. ओदिशी कलेतील पहिली कामुक शिल्पे इथे आढळतात. मुख्य इमारतीवरील आत घुसलेल्या पटावर. असे सांगतात की या विशिष्ट मंदिरात चालणार्या खर्या तांत्रिक विधींचा हा तक्ता आहे. इथे सादर झाल्यानंतर त्यांना अधिकृत दर्जाची ताकद मिळाली. नंतरच्या शतकांत या शिल्पांना मंदिरावरील सजावटीचे शिल्पप्रकार म्हणून स्वीकारले गेले.
खोलीवर परत जातांना रस्त्याच्या उजव्या बाजूला रामकृष्ण मिशनचे मंदीर दिसले. आवार भरपूर झाडांची गर्दी वगैरे असून शांत आणि सुंदर होते. गेलो. आत मस्त गारवा होता.

शांत चित्ताने हॉटेलवर गेलो. आम्हाला दोन वेगळ्या खोल्या मिळाल्या होत्या. पण त्या सकाळच्या खोलीएवढ्या चांगल्या नव्हत्या. त्यामुळे उद्या हॉटेल बदलायचे ठरवले. फक्त पुरीला राहायचे की भुवनेश्वरला हा प्रश्न होता. उद्यासाठी गाडी पण ठरवायची होती. संध्याकाळी आराम करून राहायची हॉटेले पाहात आणि बसच्या चौकशा करीत फिरलो. बस रेलवेपलीकडच्या बसस्टँडवरून सुटतात. फलाटाचे - प्लॅटफॉर्म तिकीट काढून पलीकडे गेलो. सिटी बसेस खरोखरच सतत सुटत होत्या. पण फारसे नसले तरी सामान हलवायचे म्हणजे व्यापच. परत येतांना आश्चर्याचा गोड धक्का. फलाटावरच ओरिसा पर्यटनखात्याचे कार्यालय दिसले. पुरी, कोणार्क वगैरे सफरींचे दरफलकच लावले होते. वातानुकूलित व्हॉल्व्हो बसचे मार्गदर्शकासह सफरींचे भाडे पुरीला माणशी २२५/-, कोणार्क पुरी दोन्हीला मिळून २५०/- आणि चिल्काला ३५०/- त्वरित दुसरे दिवशींची कोणार्क पुरीची तिकिटे घेतली. तिसरे दिवशी चिल्काला जायचे ठरले. तिकीट उद्या मिळेल म्हणाला. खिडकीतला कृष्णा नावाचा आंध्रचा आतिथ्यशील गृहस्थ दाक्षिणात्य ढंगाने बर्यापैकी इंग्रजी आणि हिंदी बोलत होता. सकाळी साडेआठला रेलवेचे फलाट तिकीट न घेता या म्हणाला.
रेलवे स्थानकाकडून निघालेला रस्ता एका मोठ्या चौकात गोलापाशी हमरस्त्याला मिळतो. तिथे एका हॉटेलात अप्रतिम जेवण मिळाले. राहायचे हॉटेल पण होते. तसे बरे असावे. दर ठीक होते. पण ते दुसरे दिवशीपर्यंत भरले होते. दुसरीकडे कुठे मिळेल म्हणून आमच्या वेटरला विचारले. त्याने आमच्या हॉटेलच्या मागील बाजूच्या एका हॉटेलचा पत्ता दिला. बरे आणि माफक दरातले होते. फक्त गरम पाणी २४ तास नव्हते. सकाळी साडेसहा सातला येणार. पुढच्या दिवशीसाठी ऍडव्हान्स देऊन दोन खोल्या राखून ठेवल्या. या हॉटेलच्या समाईक गॅलरीतून रेलवे स्टेशन दिसत होते.
क्रमश:
मुक्तेश्वर कमानीचे प्रकाशचित्र सोबत जोडत आहे. टॅक्सीवाल्याला अगोदरच सांगून ठेवायचे की आम्ही कुठेही कितीही वेळ थांबू. संध्याकाळी सहा ते सातपर्यंत सारे आटपू. त्यांचे कामच आहे ते. त्याने कुठेही घाई केल्यास संधी मिळताच टॅक्सी बदलावी.
फोटोबद्दल धन्यवाद .एखाद्याला आपण थट्टेने नाव ठेवतो ती व्यक्ति तशी नसतेच .(टिव्हिवरील चित्रफित पाहून)खजूराहो आणि भूवनेशवर ,कोणार्कच्या शिल्पांची तुलना केली .इकडच्या मूर्ती अधिक भावपूर्ण जाणवतात तर खजूराहोच्या मूर्तींचे चेहरे यांत्रिक आणि कोरिव एकसारखे वाटतात .
ऑइलपेंट थापण्यातुन काही मंदिरे सुटली आणि ती आपणास पहावयास मिळाली हे आपले सुदैव समजावयास हवे !
ऑइलपेंट लावलेली मंदिरे पाहिली की मला फार राग येतो आणि दु:ख सुद्धा वाटते.
तैलरंग नेहमीच थापलेला असतो असे नाही. महाराष्ट्रात एकदर काळा दगड मिळतो नाहीतर कोकणातला लालसर सच्छिद्र दगड. काळा कठीण दगड कोरायला कठीण तर कोकणातला अति सच्छिद्र आणि ठिसूळ. म्हणून आपल्याकडे शिल्पकला विकसित झाली नाही. नुसते सिमेंट ठेवण्यापेक्षा तैलरंग बरा दिसतो. अर्थात कलात्मकतेने दिला तरच. खालील चित्र पाहा. आमच्या कांदळगांवचे रामेश्वर मंदीर. किती सुरेख आहे पाहा, तुमचा तैलरंगावरचा राग पळून जाईल.
@अपर्णा अक्षयः मंदिराच्या निमुळता होत गेलेला भाग थरांनी बनलेला आहे. प्रत्येक थर त्याच्या खालच्या थरापेक्षा लहान होत जातो. त्याची कडा जरी दंतुर असली तरी ती रेषेप्रमाणे म्हणजे रेखेप्रमाणे सलग दिसते म्हणून रेखा देऊळ. जालावरून उतरवलेली एक आकृती जास्त तपशिलासाठी खाली देतो. मिपावर एकदोन वर्षापूर्वी मंदीरस्थापत्यावर एक लेखमालिका आली होती. ती मालिका माझ्या ओदिशा सहलीच्या प्रेरणास्रोतांपैकी एक आहे
महाराष्ट्रात एकदर काळा दगड मिळतो नाहीतर कोकणातला लालसर सच्छिद्र दगड. काळा कठीण दगड कोरायला कठीण तर कोकणातला अति सच्छिद्र आणि ठिसूळ. म्हणून आपल्याकडे शिल्पकला विकसित झाली नाही.
कांदळकर साहेब, या वाक्याशी एक जोरदार असहमती. महाराष्ट्रातल्या दगडी शिल्पकलेचे नमुने सातवाहन काळापासून अगदी पेशवाई काळापर्यंत ठायीठायी विखुरलेले आहेत. विशेषतः चालुक्य व यादव काळातली देवळे पाहिली तर असे विधान तुम्ही करूच शकणार नाही. अजिंठा-वेरूळ, कार्ले-भाजे, कान्हेरी, एलिफंटा, पितळखोरे इ. ठिकाणची नितांतसुंदर लेणी, खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, तसेच विदर्भ-मराठवाड्यातील दुर्लक्षित परंतु एक नंबर शिल्पकला असलेली अनेक देवळे पाहिली की आनंदाश्चर्याने आ वासल्याशिवाय राहत नाही.


प्रकाशचित्रे दिसताहेत. त्यामुळे पुढील लेखांकात टाकायची गरज दिसत नाही.
जालावरून विषयातील तज्ञांचे जालावरून उचललेले आहे. मी त्या क्षेत्रातला तज्ञ नसल्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. आपण कौतुकाने वाचताहात हेच माझ्यासाठी खूप आहे. आतून बाहेरून जवळजवळ इंचन इंच व्यापणारी आहे असे वाटणारी एवढी भरगच्च कलाकुसर आपल्याकडच्या काळ्या दगडात केलेली आहे? मी तुम्हाला आव्हान देत नाही तर आश्चर्याने विचारत आहे. तसे असेल तर वस्तुस्थिती त्या विधानाला छेद देणारी आहे असे म्हणावे लागेल. अजिंठ्यात तरी मला एवढी भरगच्च कोरीव कलाकुसर आढळली नाही.
एवढी बारीक कलाकुसर वालुकाश्म, संगमरवर अशा मृदु दगडातच होऊ शकते असे वाचल्याचे मला आठवते आहे.
वेरूळ मंदिर वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. एकाच दगडातून कोरलेले आणि आधी कळस मग पाया या रीतीने बनल्यामुळे.
आणि दुसरे म्हणजे काळ्या दगडातली कलाकुसर एवढी बारीक आणि भरगच्च आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळते? भुवनेश्वरमध्येच पाचशेपेक्षा जास्त मंदिरे आहेत. ओदिशात इतर ठिकाणी देखील बरीच मंदिरे आहेत. कृपया हे आव्हान समजू नये. मी वस्तुस्थिती जाणून घेतोय आणि ते विधान पडताळून पाहातोय.
पुढील दोन प्रकाशचित्रे पाहा. नृसिंहमंदिरातली आहेत. अर्धवट सोडलेली वाटतात. अगोदरची आहेत, समकालीन आहेत की नंतरची आहेत हे ठाऊक नाही. पण फरक स्पष्ट आहे.
कंकणावर कलाकुसर नाही. नागाच्या शरीरावर खवले काढलेले नाहीत. अर्थात शिल्प अपुरे आहेच. पण हे तपशील अपुरे आहेत की कोरता येत नाहीत?
पिपली आणि कोणार्क
२१-११-२०१२.
सकाळी पाचच्या आधीच फटफटले होते. मी घरून येतांना विजेवरची चहाची किटली सोबत घेतली होती. एक चहा करून प्यालो. हवामान मुंबईसारखेच. त्यामुळे गार पाण्याने अंघोळ केली. पण माझ्या बरोबरच्या तिघांनाही अशा हवेतही गरम पाणी हवे असते असा मागील अनुभव होता. बाळू आणि जखीण उठायची वेळ झाली नव्हती त्यामुळे त्यांचे दार ठोठावले नाही. मग गरम पाण्यासाठी वाट पाहाणे आले. ते थोडे उशिराच आले. म्हणून मग सर्वांसाठी किटलीतच चहा बनवला. ओरिसातला आम्ही घेतलेला सर्वोत्कृष्ट चहा माझ्या किटलीतलाच. बाळ्याने तर तिथे असेपर्यंत किटलीतलाच चहा घेणार म्हणून जाहीर केले. आता न्याहारीसाठी वेळ कमी उरला. मग रेलवेजवळच्या टपरीवरच खायचे ठरले. एका टेंपोला खिडक्या पाडून एक टपरी केली होती. ती कमी गलिच्छ वाटली. म्हटले गरमागरम पुर्या खाऊयात म्हणजे कमीत कमी संसर्ग होईल. पुरी पाहाण्यापूर्वी पुरी खायला नको? दुसरे काही खाऊ नका. पण त्या अगत्यशील विक्रेत्याने बरोबर पांढर्या वाटाण्याची उसळ देखील दिली. आमच्या चमूच्या इतर सदस्यांनी उसळीचा अवमान केला नाही. मी आपल्या चहात बुडवून पुर्या खाल्ल्या. आम्ही खाता खाता एक निकामी पाय असलेला पाच पायांचा बैल तिथे आला. पाचवा पाय पाठीवर, वशिंडाच्या जरासा मागे बैलाच्या शरीरातून उगवलेला. तो प्रत्येक फेरीवाल्यासमोर थांबे. मग फेरीवाले त्याला नमस्कार करून खाऊ देत. कोणी गंधफुले वाहून तर कोणी असेच. खाऊ मिळाल्यावर मग तो बैल पुढच्या फेरीवाल्याकडे. शिकवल्यासारखा. बैलाच्या निमित्ताने खाऊच्या टपर्यांचा बराच धंदा झाला. खास बैलाला खाऊ देण्यासाठी. भूतदया म्हणून ठीक आहे. पण गंधफुलांचे काय? असो. प्रत्येक व्यक्तीला विचारस्वातंत्र्य आहे. आपल्या धार्मिक जखिणीने पण बैलाला नमस्कार करून खाऊ दिला बरे का. टेंपो रोज सकाळी बरोब्बर ५.२० ला येतो आणि ५.३० ला उघडतो असे त्या विक्रेत्याने सांगितले. पूर्व किनार्यावर मुंबईपेक्षा एकदीड तास अगोदरच उजाडते.
सतत दोन दिवस भुवनेश्वर स्थानकाच्या त्या परिसरातला गलिच्छ बकालपणा सतत पाहूनही माझी नजर मेली नव्हती. भूकदेखील किळस मारू शकत नाही. पण दर वेळी स्वच्छ हॉटेल शोधत खायलाप्यायला दूरवर कसे जाणार. ओरिसात जातांना गलिच्छ बकालपणा पाहावा लागणारच याची मानसिक तयारी केली होती. त्या तयारीच्या जिवावरच तगून होतो. खायला स्वच्छ हॉटेल हवे असेल तर थोडे दूरच्या हॉटेलात खायला जावे लागेल. उष्ण दमट हवेत रोज एखादा किमी. घामाघूम होऊन चालावे लागेल. तिथेच जाऊन राहायचे म्हटले तर त्या परिसरात राहायचे हॉटेल हवे. दूरवरच्या ठिकाणची टॅक्सीरिक्शाची उपलब्धता पण ठाऊक नव्हती. माझा चालण्याचा वेग तसा सर्वसाधारण आहे. ४ ते ५ किमी. प्रति तास. आणि माझे तिन्ही सोबती माझ्या निम्म्या वेगाने देखील चालू शकत नाहीत. हा वैताग टाळायला बकालपणा पत्करला होता. सहकुटुंब गेल्यावर अशा तडजोडी कराव्या लागतात. टॅक्सीवाले पण मग अडवून दाखवून पैसे उकळण्याची शक्यता असते. फक्त पुरुषपुरुष असतो तर कितीही दूर राहिलो असतो. असो. परिसर बकाल असला तरी रेलवे स्थानक हॉटेलपासून जेमतेम शंभरदोनशे पावलावर होते आणि सज्जातून दिसतही होते हे किती सोयीचे होते! रेलवे फलाटावर तिकीट न घेता गेलो. पर्यटन खात्याचे त्याच दिवसाचे तिकीट फलाटावर वाट पाहायला चालते. कृष्णा हजर होता. आमच्यासारखेच आणखी आठदहा प्रवासी आमच्याच बसची वाट पाहात होते. पावणेनऊला त्याने बस आल्याची वर्दी दिली आणि बस क्रमांक दिला.
वातानुकूलित बस एकदम चकाचक होती.
मार्गदर्शक वाटाड्या - गाईडही नीटनेटका, प्रसन्न व्यक्तिमत्वाचा, बरे इंग्रजी बोलणारा.
पहिले ठिकाण होते भुवनेश्वर पुरी मार्गावरचे पिपली. भुवनेश्वरपासून १५- २० किमी. वर आहे. वाटाड्या माहिती देत होता. वाटेत धौलीची कलिंग युद्धाची रणभूमी लागली. वाटाड्याने इंग्रजी आणि हिंदीतून व्यवस्थित माहिती दिली. पिपली हे अगदी छोटेसे गाव. रस्त्याच्या दुतर्फा दुकानेच दुकाने. ओदिशी कलावस्तूंची. सर्वजण उतरले. इथली आठवण म्हणून बहुतेकांनी ओदिशी वस्तूंची खरेदी केली. हे गरीब राज्य असल्यामुळे तशी स्वस्ताई होती. त्यामुळे खरेदीनंतर बसमधला समस्त महिलावर्ग खूष होता. श्रीकृष्ण-बलराम-सुभद्रा या तिघांची एकत्र चित्रे, मूर्त्या बहुतेक वस्तूत. शैली वैशिष्ट्यपूर्ण ओदिशी शैली. उभ्या लंबगोलाकार चेहर्यावर वटारलेले टप्पोरे डोळे. एक खास वस्तू म्हणजे अख्ख्या नारळाच्या गुळगुळीत केलेल्या छतात टांगायच्या गोट्यावरील या त्रिमूर्तीची चित्रे. नारलाला प्रथम तैलरंगाचा एक थर देऊन त्यावर तैलरंगातच आकर्षक छटांमध्ये रंगविलेली. तीनधारी नारळाच्या १२० अंशाच्या तीन पृष्ठभागावर प्रत्येकी एक चित्र अशी एकूण तीन चित्रे. नारळ भोवर्यासारखा गोल फिरून थांबला तरी एक चित्र आपल्याकडे पाहतेच. नारळ आणि कापडी चित्रे घेतली. काही घरात लावायला तर काही भेट म्हणून द्यायला. ज्यांना ज्यांना दिली त्यांना आवडली. कापडाच्या पॅचवर्कची उभी चित्रे साडॆचार फूट उंच आणि सहा इंच रुंद पण दोन घेतली. पण वेगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण शैलीतली.
बस थेट कोणार्कच्या मंदिराकडे गेली. आमच्या बसमधील वाटाड्याने इथे आम्हाला कोणार्क मंदीर दाखवायला पांडे नावाच्या सदगृहस्थाची सरकारमान्य मार्गदर्शक म्हणून पाहून दिले. सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते.
त्यांनी इतिहासातले तसेच पुराणातले दाखले देत अधूनमधून संस्कृत वचने, सुभाषिते देत मंदिराचे दर्शन घडवले आणि नंतर आमची आमचा प्रग्रा वापरून कोणार्क मंदिराच्या पार्श्वभूमीवर छान प्रकाशचित्रे देखील काढून दिली. कोणार्क हे ओदिशातील पुरी जिल्ह्यातले एक लहानसे शहर. कोन्यातील म्हणजे कोपर्यातील सूर्य (अर्क = सूर्य) असा कोणार्क याचा अर्थ आहे. १३व्या शतकात इथले सूर्यमंदीर बांधलेले आहे. यालाच ब्लॅक पॅगोडा असेही म्हणतात. पूर्व किनार्यावरील अनंतवर्मन चोडगंगदेव याने आपल्या गंग वंशाची सत्ता भारताच्या या पूर्व किनार्यावर स्थापन केली. या गंग वंशाच्या नरसिंहदेव (इ.स. १२३६ ते १२६४) या राजाने हे वालुकाश्मातले मंदीर बांधले. जालावर काही ठिकाणी याला लंगूल नरसिंह देव असे देखील म्हटलेले आहे. असो. जगातील सर्वांत आश्चर्यकारक अशा धार्मिक पुराणवास्तूंपैकी एक असलेले हे मंदीर हा ओदिशामधील मंदीरस्थापत्यातील शिरपेच आहे.
ऋग्वेदकालापासून सूर्य ही भारतीयांची लोकप्रिय देवता आहे. कोणार्क इथे धर्म आणि विज्ञान यांची अप्रतिम सांगड शिल्पकलेशी घातलेली आहे आणि त्यामुळे ही एक अजोड अशी शिल्पवास्तू ठरली आहे. किंवा असं देखील म्हणता येईल की विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी हिंदु धर्मातील अप्रतिम अशी लोकप्रिय प्रतीके इथे शिल्पाकृतीतून वापरलेली आहेत. सूर्याची ही प्रतिमा आर्यांबरोबर भारतात आली. प्राचीन बाबिलोनियन आणि इराणी संस्कृतीतून ही सूर्यप्रतिमा भारतीय संस्कृतीत रुजली असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. परंतु रथाच्या आकाराचे मंदीर बांधण्याची विलक्षण कल्पना मात्र पूर्णपणे अभिनव आणि अलौकिक सृजनाचा स्पर्श असलेली अशी आहे. आणि म्हणूनच हा जागतिक सांस्कृतिक ठेवा आहे असे युनेस्कोने जाहीर केलेले आहे. त्याचबरोबर मंदीरस्थापत्य हा देखील एक मनोरंजक आणि आनंददायी विषय आहे. त्याबद्दल लेख बोजड न करतां जमेल तशी वेळोवेळी जास्तीत जास्त सोप्या भाषेत माहिती येईलच. प्रथम रचनेची कल्पना यायला मंदिराचे एक जोडचित्र देतो. फारसे चांगले नाही तरी देतो.
प्रवेशद्वारापाशीच एक नटमंदीर आहे. वर म्हटलेले पहारा देणारे, हत्तीवरचे सिंह नटमंदिराच्या दरवाजाबाहेर आहेत. सूर्याच्या उपासनेचा एक भाग म्हणून नर्तक इथे नृत्य करीत असत. त्याच रेषेत मुख्य मंदिराला जोडून ३० फूट चौरस आणि ३० फूट उंच असे जगमोहन म्हणतात ते सभागृह आहे. ओदिशात तशी इतरही अनेक मंदिरे आहेत. परंतु हे मंदीर ओदिशातील इतर मंदिरांच्या तुलनेत जास्त स्थापत्यसंतुलित वाटते असे स्थापत्यकारांचे मत महाजालावर नोंदलेले आढळले.
नटमंदिरामागे मंदिराची रथाकार वास्तू आहे. ओदिशाचा विजयी राजा नरसिंह देव याने युद्धरथाच्या स्वरूपात विजयाचे प्रतीक उभारले. मंदिरांचे नगर असलेल्या पुरीपासून जवळच्या ठिकाणी बांधलेले हे एक सूर्यमंदीर आहे. या स्थानाला त्याने कोणार्क असे नाव दिले. वास्तू जरी त्याच्या मुस्लीमांवरील विजयाचे प्रतीक असले तरी मंदिराचे नाव मात्र खगोलशास्त्राचेच प्रतीक आहे. खगोलशास्त्राची त्या राजाला अतीव ओढ होती. मंदिराचा प्रचंड आकार सूर्यदेवाच्या रथाचा आहे. रथ सात स्वर्गीय घोड्यांनी ओढलेला आहे आणि रथाला चाकांच्या बारा जोड्या आहेत. यापैकी आता सहाच घोडे शिल्लक आहेत. मोजून पाहायला सुचले नाही.
सूर्यदेवाच्या रथाचे घोडे आणि एक चाक.
गाभार्यावरचे आणि नटमंदिरावरचे छत पडलेले आहे.
"गाभार्याला तीन बाजूंनी पुढे आलेल्या सूर्यदेवाच्या तीन सुंदर मूर्तींमुळे शोभा आली आहे. पूर्वाभिमुख मंदिरात सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट या मूर्तीपर्यंत पोहोचतात. दररोज या तीन सूर्यमूर्तींपैकी किमान एका तरी सूर्यमूर्तीवर सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडावीत अशी योजना स्थापत्यकारांनी केलेली आहे." असे वर्णन महाजालावर मिळते. परंतु या सूर्यमूर्ती आता गायब आहेत असे वाचले होते. पण सर्वात शेवटी पाहायचे ठरवले. दुर्दैवाने शेवटी पाहायला विसरूनच गेलो. गाभारा आणि जगमोहन एकाच चौथर्यावर आहेत. मुख्य मंदिरावर सर्व बाजूंनी नक्षीदार वेलबुट्ट्या आणि भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत तसेच नर्तकांच्या, यक्षांच्या तसेच देवदेवतांचा भावविभोर नृत्याकृती आहेत.
काही नृत्याकृतीत कामसूत्रातून घेतलेली कामुक हावभाव करणारी जोडपी आहेत. कालौघात वातावरणामुळे शिल्पे झिजली आहेत परंतु मूळ शिल्पातल्या कोरीवकामाचे सौंदर्य लपत नाही.
इतिहासात मानवाने मह्त्वाच्या विविध घटनांची नोंद करणे, भविष्यातील लोकांसाठी संदेश देणे, आपल्या भावना, आपले तत्वज्ञान याची नोंद करणे यासाठी वाङ्मयातून, दस्तावेजामधून आणि चित्रे, शिल्पे आदि कलाकृतीमधून जागोजाग प्रतीकांचा वापर केलेला आहे. रामायण, महाभारत, ओडिसी इलियड इ. प्राचीन महाकाव्यापासून आधुनिक काळातील साहित्यिकांपर्यंत कित्येकांनी नी आपापल्या साहित्यात विविध प्रतीकांचा अप्रतिम असा सौंदर्यपूर्ण वापर केलेला आहे तर काही अभिनव प्रतीके स्वतःच निर्मिलेली आहेत. विविध वास्तूत, शिल्पात देखील अशाच विविध प्रतीकांचा वापर केलेला आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वाराशी दोन सिंह पहारा देतात. दोन्ही सिंह युद्धातील एकेका हत्तीचा संहार करतांना दाखवले आहेत. सिंह हे हिंदु धर्माचे तर हत्ती हे बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. म्हणजे हिंदु धर्माने बौद्ध धर्मावर विजय मिळवला. हे दोन्ही हत्ती योद्ध्यांच्या एकेका शरीरावर उभे आहेत. सिंह हे शौर्याचे तर हत्ती हे संपत्तीचे देखील प्रतीक आहे. गजांत लक्ष्मी हा शब्दप्रयोग आपण ऐकलेला, वाचलेला आहे. म्हणजे संपत्तीने अगोदर मानवता धुळीला मिळवली नंतर शौर्याने संपत्तीवर विजय मिळवला असा देखील यातून अर्थ काढता येतो.
राजा नरसिंह देव याला खगोलशास्त्रावर अतीव स्वारस्य होते. सात घोडे हे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आणि बारा चाके हे बारा महिन्यांचे प्रतीक समजले जाते. चाके अप्रतिम कोरीव कामाने नटलेली आहेत. प्रत्येक चाकाला आठ अर्या आहेत. दिवसाला आठ प्रहर असतात म्हणजे आठ अर्या हे आठ प्रहरांचे प्रतीक आहे.
मला धर्म, तत्वज्ञान यात अजिबात गती नाही. यातील प्रतीकांचे काही अर्थ महाजालावरून उचलले आहेत तर कोणार्कला भेटलेले ‘सरकारमान्य मार्गदर्शक’ श्री. पांडे यांनी काही अर्थ सांगितले आहेत. सूर्यमंदीर दाखवतांना पांडेजी जागोजाग वेदातली, गीतेतली संस्कृत वचने देत होते. संस्कृत ढोबळमानाने मला कळते पण त्यांनी दिलेल्या संदर्भातली अचूकता जाणण्याचे ज्ञान मात्र माझ्याकडे नाही. रविंद्रनाथ टागोर म्हणतात, "इथे पाषाणांच्या भाषेने मानवी भाषांना मागे टाकले आहे." सूर्यमंदीर पाहतांना संवेदनाशील मनाला आलेला विस्मित करणारा अनुभव शब्दांकित करणे माझ्यासारख्या सर्वसामान्यांना तरी कठीणच आहे.
विज्ञानाच्या दृष्टीतून मात्र हे मंदीर हे सूर्याच्या सार्वभौम अशा वैश्विक साम्राज्याचे पर्यायाने सूर्यकेंद्री विश्वाचेच प्रतीक आहे तसेच हे आठ प्रहर, बारा महिने वगैरे कालमापनाचे देखील प्रतीक आहे. म्हणजे गॅलीलिओच्याही पूर्वी तेराव्या शतकात पाश्चिमात्य जगतात जेव्हा चर्चच्या प्रभावाखाली पृथ्वीकेंद्री खगोलशास्त्राचा पगडा होता तेव्हा भारतात मात्र आर्यभट, भास्कराचार्य यांच्यासारख्या प्रतिभावंत वैज्ञानिकांनी, गणितज्ञांनी मांडलेली सूर्यकेंद्री विश्वाची संकल्पना प्रागतिक विचारांच्या हिंदू राजांनी स्वीकारली होती. कोणार्कखेरीज जयपूरमधील आणि दिल्लीतील जंतरमंतर हे याचे आणखी पुरावे आहेत. जयपूरमधील जंतरमंतर हे प्रथम रजपूत राजे जयसिंह-२ यांनी नमुना म्हणून जयपूरला बांधले आणि त्यानंतर त्याचीच प्रतिकृती असलेले दिल्लीतील हे जंतरमंतर त्यांनीच नंतर मोहम्मद शाह यांच्या कालात इ.स. १७२७ ते १७३४ या काळात उभारले. प्रतिगामी धर्ममार्तंडानी विज्ञानात ढवळाढवळ केली नाही तर अशा अद्वितीय कलाकृती उभ्या राहतात. नाहीतर मागे राहाते वैज्ञानिकांच्या छळाच्या इतिहासाची भुतावळ.
असो. कोणार्कचा समुद्रकिनारा लोकप्रिय आहे असे महाजालावर म्हटलेले आहे. आज हा किनारा मंदिरापासून २ किमी. दूरवर गेला आहे. परंतु त्या काळी समुद्र मंदिराच्या पायापाशी होता. समुद्रकिनार्यावर जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा दमट वाळूत उगवलेली तिवरसदृश झाडे आहेत. मुंबईच्या किनार्यावर दलदलीत वाढणारी झाडे आहेत तशी. यावरून अंदाज बांधता येतो की कधीकाळी इथे नक्कीच समुद्रकिनारा होता असणार. खार पाणथळीत झाडामध्ये वाळू आणि गाळ साचून इथे जमीन तयार झाली असावी आणि त्यामुळे समुद्र मागे हटला असावा. इथल्या समुद्राची शांतता मात्र फसवी आहे. तरी मुख्य आकर्षण मात्र कोणार्क मंदीरच आहे. प्रखर राष्ट्राभिमानाचे हे भव्य असे प्रतीक आहे. गोलाकार कळसांनी युक्त अशा कलिंग स्थापत्यशैलीतले हे मंदीर आहे. मुख्य कळस, रेखा देऊळ वगैरे आता जरी नाहीसे झाले असले तरी ते लिंगराज आणि जगन्नाथ मंदिरांच्या कळसांशी, रेखा देवळांसारखेच होते. कळसाची जमिनीपासूनची उंची मात्र या दोन्ही मंदिरांवर मात करणारी अशी २२९ फुटांची होती. अस्तित्वात नसलेल्या कळसाची उंची जालावर कशी आली कळत नाही. गणिताने काढली असावी आणि क्लिष्टता टाळण्यासाठी दिली नसावी. पण विश्वास न ठेवण्यासारखे त्यात मला तरी काही दिसत नाही. तुलनेसाठी देतो, पुरीचे जगन्नाथमंदीर आहे २१४ फूट तर भुवनेश्वरचे लिंगराजमंदीर १८० फूट. गाभार्यातील मूळ देवतेची मूर्ती नाहीशी झालेली आहे. सभागृह मात्र सुरक्षित आहे. आवार ८५७ फूट X ६१३ फूट आहे. सभागृह १२८ फूट उंच आहे. पूर्वमुखी मंदीर पूर्वपश्चिम आहे. सुरू आणि वालुकामय जमिनीत वाढणार्या इतर अनेक वृक्षांच्या छायेने इथला नैसर्गिक परिसर व्यापलेला आहे. बहुतांशी निसर्ग अजून तरी अबाधित आहे. मदिराचे दगड सांधायला कोणताही चुना किंवा सिमेंट वापरलेले नाही. या मंदिराचे दगड स्वतःच्या वजनानेच एकमेकांना नुसतेच घट्ट चिकटून आहेत. हे इथले प्रमुख वैशिष्ट्य मानावे लागेल. आवश्यक तिथे दगडांना छिद्रे पाडून लोखंडी पिनांनी सांधे पक्के केलेले आहेत. काही ठिकाणी पाषाणाची उन्हावार्याने झीज झाल्यामुळे उघड्या पडून दमट हवेमुळे गंजलेल्या लोखंडी पिना आजही स्पष्ट दिसतात.
दरवर्षी डिसेंबरमध्ये इथे अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्याचा समारोह होतो. यात ओडिसी शैलीचीही नृत्ये असतात. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे एका खग्रास सूर्यग्रहणाचा मार्ग कोणार्कवरून गेला होता.
काळाच्या ओघात कोणार्क, तिथली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांभोवती असलेले कीर्ती आणि समृद्धीचे वलय लोपले. या वास्तूची समृद्धी आणि हे वलय किती काळ होते आणि नक्की केव्हा ते लयाला गेले याबद्दल नक्की काहीही सांगता येत नाही. मंदिराची अशी दुर्दशा कशी काय झाली याला १०० टक्के विश्वासार्ह असा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. याबाबत इतिहास मूक आहे. काळाच्या गडद धुक्यात हे गूढ दडलेले आहे. परतु या अप्रतिम मंदिराच्या पतनाबद्दल इतिहासकारांनी विविध तर्काधिष्ठित मते मांडलेली आहेत. सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह वाटेल अशी दंतकथा आहे धर्मपादाची.
गंग वंशाचा राजा नरसिंह देव - १ याने आपल्या राजवंशाच्या राजकीय सर्वश्रेष्ठतेचे प्रतीक म्हणून हे मंदीर बांधायला आदेश दिला. बाराशे स्थापत्यशास्त्रज्ञ आणि कुशल कारागीर यांनी आपल्या आयुष्यभराची प्रतिभा, आपले अविश्रांत श्रम आणि पूर्ण कसब तब्बल बारा वर्षे पणाला लावले. तेवढाच काल राजाने जमा झालेली करसंपत्ती खर्च केली. तरीही पूर्णत्वाचे चिन्हही कुठे दिसेना. मग ठरलेल्या दिवशी काम पूर्ण झालेच पाहिजे, अन्यथा सर्व शिल्पकारांना देहदंड होईल असा अंतिम आदेश त्याने काढला. सिबेई सामंतराय या प्रमुख सूत्रधाराने म्हणजे स्थापत्यकाराने असमर्थता दर्शवली. तेव्हां बिशू महाराणा या स्थापत्यशास्त्रज्ञाने ते पूर्ण केले. परंतु मर्मशिला आणि कळस बसवायचे काम मात्र अजून जमले नव्हते. सगळ्या स्थापत्यचमूने आता हात टेकले होते. ही मर्मशिला योग्य रीतीने बसवली की वास्तूच्या वरील भागाचा भार पेलणार्या खांब, तुळया वगैरे घटकांवर पडणारा भार योग्य दिशेने, भारपेलक घटकांना पेलता येईल अशा योग्य प्रमाणात विभागला जातो आणि मगच वास्तू दीर्घकाल टिकू शकते. नाहीतर ती कोसळण्याचा धोका वाढतो असा माझा अंदाज. मर्मशिला म्हणजे काय याचा अचूक तांत्रिक, शास्त्रीय तपशील ठाऊक नाही. असो.
प्रथम एका आकर्षक आणि लोकप्रिय दंतकथेचा आस्वाद घेऊ. बिशू महाराणाचा बारा वर्षांचा मुलगा धर्मपाद हा तिथे सहज मंदीर बांधायचे काम कसे काय चालते ते बघायला आला. स्थापत्यशास्त्रज्ञांना भेडसावणारी चिंता त्याला जाणवली. मंदीर बांधण्याचा तसा त्याला अनुभव नव्हता. तरीही मंदीर बांधण्याच्या स्थापत्यशास्त्राचे सखोल ज्ञान मात्र त्याला होते. मंदिराच्या शिरोभागी स्थापन करायची मर्मशिला बसवायचे कठीण असे गणिती सूत्र सोडवायचे आव्हान त्याने स्वीकारले आणि ते काम स्वतःच करून त्याने सर्वांना चकित केले. परंतु ही कामगिरी केल्यानंतर थोड्या दिवसातच त्या बालबृहस्पतीचे कलेवर समुद्रकिनारी मंदिरापाशीच आढळून आले. (तेव्हा समुद्रकिनारा मंदिराला लागूनच होता. आता तो २ किमी दूरवर गेला आहे.) आत्महत्त्या किंवा खून! बारा वर्षाच्या धर्मपादाने आपल्या वास्तु रचनाकार समाजासाठी स्वतःचे प्राण वेचले असेच ही दंतकथा सांगते. एकापेक्षा एक असे श्रेष्ठ स्थापत्यशास्त्रज्ञ असतांना एक बारा वशांचा मुलगा हे काम करून दाखवतो हे त्या ढुढ्ढाचार्यांना सहन झाले नसावे. त्यामुळे त्यांनी कामात त्रुटी ठेवली असावी आणि नंतर धर्मपादाचाही काटा काढला. याच त्रुटीमुळे नंतर मंदीर पडले. हे सत्य जर मानले तरी याला स्वीकारार्ह असा ऐतिहासिक पुरावा मात्र नाही. सत्य आणि कल्पिताची एकजिनसी सरमिसळ, दुसरे काय?
दुसर्या एका मतानुसार धर्मांध मुस्लिम सेनापती काळापहाड याने इतर अनेक मंदिरांबरोबरच हे कोणार्कचे मंदीर देखील पाडले. भुवनेश्वरमध्ये त्याने पाडलेल्या अनेक मंदिरांचे भग्नावशेष अजूनही आहेत. मागील लेखांक क्र. ५ मधील वैतल मंदिराच्या प्रकाशचित्रात असे एक शिखराचा काही भाग उडवलेले मंदीर दिसते आहे. हिंदु इतिहासात बाटवले जाणे हा एक प्रकार आहे. मंदीर बाटल्यामुळे अपवित्र झाले म्हणून देखील सोडून दिले असू शकते. आणि सोडून दिल्यामुळे नंतर ओसाड होऊन पडझड झाली असावी. ऐतिहासिक पुरावा नसला तरी यात मात्र विश्वास न ठेवण्यासारखे काही दिसत नाही.
ही सर्व मीमांसा पं. सदाशिव राथशर्मा यांच्या ‘सन टेंपल ऑफ कोणार्क’ या ग्रंथात केलेली आहे. त्यामुळे त्यांना पद्मश्री - बहुधा ओदिशामधील पहिलीच - तर मिळालीच परंतु कोणार्कवरील संशोधनाला पुढे चालना मिळाली. यानंतरचे कोणार्क मंदिरावरील सर्व ग्रंथ या ग्रंथातील विवेचनावरच आधारित आहेत आणि त्यानंतर (कोणार्कच्या र्हासाची) कोणतीही नवीन कारणमीमांसा पुढे आलेली नाही. तरीही पुरीच्या मदाल पानजीचा लिखित इतिहास विश्वासार्ह आहे किंवा नाही, नसल्यास का नाही याबद्दलचे एखाद्या इतिहासकाराचे ठोस मत मला कोठे आढळले नाही. इतिहासकार बहुधा एकाच पुराव्यावर अवलंबून राहात नसावेत. या निष्कर्षाप्रत नेणार्या अशाच आणखी एका ठोस पुराव्याची त्यांना गरज वाटत असावी.
असो. पांडेजींनी वरची दंतकथाच सांगितल्याने माझ्या डोळ्यासमोरून बिशू महाराणाच्या त्या कथानकाचा एक चित्रपटच सरकला आणि माझा कोणार्क पाहायचा आनंद द्विगुणित झाला. पण बाळ्याने मूर्खाने पुराणात जरा जास्तच स्वारस्य दाखवले आणि पांडेजी त्या उभयतांना असे चिकटले की सुटता सुटेना. आम्ही दोघे मात्र कंटाळून संधी साधून हळूच सटकलो. काही पर्यटनस्थळे अतिशय आकर्षक आणि चकाचक राखलेली असतात. आजूबाजूच्या सर्वसाधारण परिसरात एखादे दिव्य बेट उगवावे अशी वाटतात. काळाचा एक तुकडा चुकून मागे राहिल्यासारखी. पर्यटकांच्या उत्साहाने तिथले वातावरणच भारले जाते आणि तो परिसर उत्फुल्ल, जादुई होऊन जातो. काळ थबकून ते दिव्य, आनंददायी क्षण संपूच नयेत असे वाटते. तस्सेच हे ठिकाण आहे. विजापूरसारख्या बकाल शहरातला गोलघुमट पाहातांना देखील मला असाच अनुभव आला होता. पांडेजींच्या पिळण्यामुळे मुख्य तीन सूर्यमूर्ती आहेत की नाही हे पाहायचे राहून गेले. नसाव्यातच बहुधा. नीच धर्मवेड्यांच्या आक्रमणाच्या भीतीने तत्कालीन पुजार्यांनी त्या पळवून नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवल्या असे कुठेतरी वाचले होते. त्यापैकी एक बहुधा दिल्लीच्या वस्तुसंग्रहालयात आहे असेही त्यात म्हटले होते.
नवग्रहदेवता कोरलेल्या एका प्रचंड आडव्या तुळईसारख्या शिळेला नवग्रहशिळा म्हणतात. ही नवग्रहशिळा मंदिराचे रक्षण करते असे मध्ययुगीन स्थापत्यात मानले जात होते ओदिशातील बहुतेक मंदिरात प्रवेशद्वारापाशीच अशी नवग्रहशिळा दिसून येते. मुख्यशाळेच्या म्हणजेच जगमोहनच्या समोरील दरवाज्यावर सुमारे १८ फुटांवर एक सजलेली नवग्रहशिळा बसवलेली होती. क्लोराईटची ही शिळा १९ फूट १० इंच लांब, ४ फूट ९ इंच रुंद आणि ३ फूट ९ इंच उंच आहे आणि हिचे मूळ वजन २६.२७ टन होते. इ. स. १६२८ मध्ये खुर्दाच्या तत्कालीन मांडलिक राजाने (याचे नाव देखील नरसिंह देव असे होते) ती दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला होता.
"नवग्रहशिळेवरील प्रतिमा कोरण्याचे काम मात्र नीट केलेलं नाही. बर्याच प्रतिमा समूहाने एकाच आकारात बनवलेल्या वाटतात. बहुतेक मूर्तींच्या हातात जपमाळ आणि कमंडलू असून उंच टोकदार मुकुट घालून कमळावर बसलेल्या दिसतात. पुराणात याचे स्पष्टीकरण सापडते.
असो. कठोर काळाच्या फेर्यातून मात्र नवग्रहशिळा देखील काही सुटली नाही आणि फार काळ ती आपल्या जागी स्थिर राहू शकली नाही. १९व्या शतकाच्या शेवटी बंगाल एशियाटिक सोसायटीच्या सभेच्या वेळी समुद्रतीरापर्यंत ट्रामगाडीची सेवा सुरू करताना बंगाल सरकारने शिळा कलकत्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेमतेम २०० फूट ती वाहून नेल्यावर त्यांच्याकडील निधी संपून गेला. नंतर पुन्हा काही वर्षांनी तसाच प्रयत्न झाला. वाहून नेणे सोपे जावे म्हणून शिळेचे दोन भाग करण्यात आले. तरीही प्रचंड वजनामुळे आणि वालुकामय मार्गामुळे ती काही हालवता आली नाही. शेवटी दोन फर्लांगावर ती सोडावी लागली. इथे ती साठ वर्षांपेक्षा जास्त काळ पडून होती. अगदी अलीकडे भारत सरकारने कोणार्क मंदिराच्या आवाराजवळच एका मंडपात तिची स्थापना केली. सध्या शिळेचा मोठा भाग आवाराबाहेर आग्नेय दिशेला आहे. आतां दर शनिवारी तसेच मकरसंक्रातीला अनेक लोक या शिळेची म्हणजे नवग्रहांची होमहवनादी पूजा करून नैवेद्य अर्पण करायला कोणार्कला जमतात. " अशी माहिती मिळाली. मंदिराच्या मागच्या बाजूला रचून मांडून ठेवलेल्या भग्नावशेषांच्या ढिगात काही ती दिसली नाही.
नंतर समुद्रकिनारा पाहून जेवणाची सुटी. समुद्रकिनारा खास रम्य वगैरे मला तरी वाटला नव्हता. गोवा कोकणच्या मानाने वैराणच वाटला. झाडेही नाहीत, माणसेही नाहीत. मुख्य म्हणजे सर्वसाधारणपणे समुद्रकिनारी असणारा वारा देखील पडला होता.

परंतु आता लेखांकासाठी नव्याने जालावर काही प्रकाशचित्रे चढवतांना प्रकाशचित्रात तरी बरा वाटतो आहे. बाळ्याच्या प्रतिमाग्राहकातली जास्त मोठी जवळजवळ ४ मेगाबाईट्सची चित्रे जास्त बरी वाटताहेत.
भर दुपारी उन्हाचे चटके खात आम्हा पर्यटकांशिवाय कोण मरायला जाणार म्हणा समुद्रकिनार्यावर! त्यापेक्षा बसमधली वातानुकूलित हवाच बरी होती म्हणायची पाळी आली. किनारा पाहून झाल्यावर बस ओरिसा पर्यटन महामंडळाच्या सुरेख खाद्यगृहात गेली. ओरिसात आल्यावर पहिल्यांदा उत्कृष्ट भोजन मिळाले. संबळपूरच्या न्याहारीला तोडीस तोड असे. मी असे उद्गार काढताच बाजूच्या टेबलावरील मराठी कुटुंबाने तात्काळ दुजोरा दिला. बसमधील सर्व मराठी पर्यटकांचे याबाबतीत एकमत झाले. मिठाई सोडली तर नऊ दिवसात एकही ओदिशी शाकाहारी पदार्थ नाव घेण्यासारखा वाटला नाही. तळलेले पापड देखील सपक आणि अळणी. चारआठ मराठी पर्यटक बसमध्ये मौजूद होते. एक वयस्कर जोडपे तिथून कलकत्त्याला जाणार होते. भोजनानंतर बसने जगन्नाथपुरीसाठी प्रस्थान ठेवले.
क्रमशः
रथाच्या चाकात स्पोकस मधे जे गोल आहेत . त्यात नायिकेची पूर्ण दिनचर्या दाखविणार्या मुद्रा आहेत.चित्र मोठे करून पाहिल्यास थोडी कल्पना येते. आपले वर्णन पूर्ण लेखमालेत उत्तम आलेय. भारतातील सर्वात मोठे सरोवर चिलका एकदा जरूर जाण्यासारखे आहे. कोनार्क च्या परिसरात " आपल्या" सारखे जेवण मिळाल्याचे आठवत आहे. स्नान, स्नानोत्तर शृंगार , शिकार, वा रात्री अभिसार असे काही स्वरूप आहे.
जगन्नाथपुरी
प्रथम महाजालावरून पुरी मंदिराबद्दल उचललेली माहिती. त्यात वैचित्र्यपूर्ण अशा मनोरंजक धार्मिक कथा देखील दिलेल्या आहेत. त्यात सत्याचा भाग किती ते आपणच ठरवायचे.
प्रवेशासाठी वेळ: फक्त हिंदूंना प्रवेश: पहाटे ०५.३० ते १५.०० आणि १६.०० ते २२.०० जाण्यासाठी सुयोग्य वेळ आहे सकाळी ०६.०० ते ०७.००
कॅमेरा, मोबाईल, टोप्या, कमरपट्टा, चामड्याची कोणतीही वस्तु निषिद्ध आहे.
अहिंदूंसाठी बाजूच्या इमारतीतील रघुनंदन ग्रंथालयाच्या गच्चीतून सोय केली जाते.
दूरध्वनी: ०६७५२-२२२००१-०२
मुख्य द्वाराचे नाव स्वर्गद्वार असे अर्थपूर्ण आहे. गर्दी होऊं नये म्हणून सावधगिरी म्हणून भक्तांना पटापट दर्शन देऊन ढकलून दूर केले जाते.
हे भारतातील एक महत्वाचे यात्रास्थान आहे. चारधाम यात्रेपैकी एक यात्रास्थान. गंगवंशीय राजा चोडगंगदेव याने दहाव्या शतकातील वास्तू पाडून तिथे बाराव्या शतकात हे मंदीर बांधले.
पुरी नगरीत जातांना अगोदरच आपल्याला २१४ फूट उंचावरचा कळस उठून दिसतो. कळसाचे डोळ्यात भरणारे ठळक दृश्य हे पुरीच्या जनजीवनातील प्रत्येक बाबीवर पडणार्या या मदिराच्या प्रभावाचे प्रतीकच आहे. मंदिराभोवतालची २० फूट उंच भिंत ६५० फूट लांब आणि तेवढीच रुंद आहे. भिंतीच्या आत अख्खे शहरच, नव्हे विश्वच वसले आहे. देवळात थेट काम करणार्या कर्मचार्यांची संख्या ६,००० वर भरते. इथल्या मुदपाकखान्यात रोज १०,००० जणांचे जेवण शिजते. उत्सवाच्या दिवशी तर भोजन करणार्यांची ही संख्या २५,००० वर जाते. अखिल ओदिशातील धार्मिक जीवन या मुख्य देवतेकडे केंद्रित झाले आहे. संपूर्ण जगात असे हे एकमेव उदाहरण आहे.
अगदी अलीकडच्या काळापर्यंत संपूर्ण देवालय पांढर्या चुन्याने आच्छादित होते. युरोपियन दर्यावर्दी जसे कोणार्कला ब्लॅक पॅगोडा म्हणत तसे पुरीच्या देवालयाला व्हाईट पॅगोडा म्हणत. पवित्रातील पवित्र अशा या देवालयाला कोठलेच कोरीव काम वा चित्रे नसल्यामुळे उदिशातील कोरीवकामाच्या समृद्ध परंपरेचा स्पर्शही न झालेला साधा पृष्ठभाग पाहून दीर्घकाळपर्यंत संशोधक कोड्यात पडत असत. अखेर हे कोडे १९७५ मध्ये सुटले. जेव्हा पुराणवस्तु शास्त्रज्ञांनी पृष्ठभागावरचा पांढरा चुना काढून टाकायला सुरुवात केली तसतसे त्यांना उदिशातील कोरीवकामाच्या समृद्ध परंपरेतील सर्वोत्कृष्ट शिल्पकलेच्या मंदीरस्थापत्याला आव्हान देणारे कोरीवकाम केलेली कलाकृती दिसून आली.
१८व्या शतकातील शासकानीं असे चुनालेपन करण्यामागे तर्काला अनुसरून एकच कारण दिसते ते म्हणजे समुद्राच्या खार्या हवेपासून मंदिराच्या कोरीवकामाचे रक्षण करणे. त्यानंतरच्या शासकांनी तीच प्रथा चालू ठेवली असावी. जुना चुन्याचा लेप काढण्याचे काम चालू असतांनाच पुराणवस्तूशास्त्रज्ञ बांधकामातील गंजलेल्या लोखंडी सळया देखील बदलत आहेत आणि तुटकेफुटके दगडी भागही बदलत आहेत. शेवटी हे मंदीर यानंतर शतकानुशतके टिकावे यासाठी एक पातळ पारदर्शक थर चढवण्यात येत आहे.
प्रतिमाग्राहक नेण्यास मनाई असल्यामुळे जालावरून उचललेल्या प्रकाशचित्रांवर समाधान मानावे लागते आहे.


पुन्हा महाजालावरची माहिती: मंदिराचे पावित्र्य राखण्य़ासाठी तसेच पवित्र परंपरा जपण्यासाठी अहिंदूंना मंदिरात प्रवेश नाही. मंदीर आणि आवार नीट पाहाता यावे म्हणून इतर पर्यटकांसाठी रस्त्यासमोरील रघुनंदन ग्रंथालयाच्या छपरावरून पाहाण्याची सोय केलेली आहे.
मदिराभोवतालच्या बाजार विभागातील शेकडो दुकानातून जगन्नाथाचा बंधू बलभद्र म्हणजे बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्या समवेत जगन्नाथ असलेल्या त्रिमूर्ती विकत मिळतात. वैशिष्ट्यपूर्ण ओदिशी शैलीतले टप्पोरे डोळे असलेल्या त्रिमूर्ती. जगन्नाथ संप्रदायाचे प्राबल्य ओदिशातील इतर भागातून पर्यटन करतांना देखील जाणवते. पाहावे तिथे जगन्नाथाची मूर्ती दिसते. मोहक आकार आणि दृष्टी खिळवणारे सामर्थ्य यांच्या संयोगामुळे असेल कदाचित पण अगदी धार्मिक नसणार्या नजरेला देखील जगन्नाथाची मूर्ती आकर्षक वाटते.
अगदी हिंदू नसणार्या पर्यटकाला देखील या अलोट गर्दीच्या यात्रास्थानाचे सामर्थ्य जाणवते. मंदिराभोवतालची दुकाने गर्दीने फुलून गेलेली असतात. पण या अलोट गर्दीतही जाणवते ते सौजन्य आणि पावित्र्य. दिवेलागण होताहोताच बाजारात एक फेरफटका मारा. घाबरू नका, तुमच्या टॅक्सीच्या किंवा रिक्षाच्या चालकाची नजर तुमच्यावर असेल आणि तुम्ही निघतांना तो जादू केल्यासारखा बरोब्बर अवतीर्ण होईल. विष्णुदेवतेचा ध्वज वार्यावर फडकत असलेल्या भव्य आणि सुंदर कळसाकडे एक नजर टाका. मंदिरात प्रवेश करणार्या आणि मंदिरातून बाहेर येणार्या भाविकांचे चेहरे जरा न्याहाळून पाहा. तळल्या जाणार्या खाऊचा, मिठाईचा, अगरबत्त्यांचा, फुलांचा आणि धुपाचा संमिश्र गंध श्वासात भरून घ्या आणि पावले वळतील तिथे जा. अगदी निधर्मी व्यक्तीला पण वाटेल की आपण वैशिष्ट्यपूर्ण अशा एकमेवाद्वितीय यात्रास्थानी आलेलो आहोत.
पुरीची पंचतीर्थे
१. रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच आहे. पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. बनारसप्रमाणे पुरीला देखील पंचतीर्थे आहेत. रोहिणी कुंड हे मंदिराच्या आवारातच विमला मंदिरासमोर आहे. पुरीच्या पंचतीर्थांपैकी हे एक तीर्थ आहे. श्वेतगंगा, नरेंद्र सरोवर, इंद्रद्युम्न सरोवर, मार्कंडेय सरोवर आणि तीर्थराज महानदी म्हणजे पुरीचा समुद्रकिनारा यापैकी इतर चार तीर्थे आहेत. या पंचतीर्थांत स्नान केल्यामुळे पापक्षालन होते असे भाविक मानतात. साहाजिकच इथे येण्यापूर्वी मनसोक्त पापे करण्यास हरकत नाही. या सरोवरांची प्रकाशचित्रे महाजालावर आहेत. त्यापैकी नरेंद्र सरोवर प्रकाशचित्रात अतिशय देखणे दिसते.
रोहिणी कुंडातील जल हे करण जल म्हणजे पापक्षालन करून आपल्याला पावन करणारे आहे असे मानतात.
पवित्र अशा शंख क्षेत्रात हे कुंड वसलेले आहे. या पवित्र अशा रोहिणी कुंडात एकदा एक देवदाराचा लाकडी ओंडका तरंगतांना मिळाला. या ओंडक्यातूनच मूळची जगन्नाथाची मूर्ती कोरून तिची प्रतिष्ठापना पुरीच्या मुख्य मंदिरात केली होती. त्या मूळ मूर्तीबरहुकूमच सध्याची मूर्ती कोरली आहे.
विमला, कमला सर्वमंगला आणि उत्तराई अशा चार देवींनी प्रणितोदक कुंड, दोन वृक्ष स्थळे गरुड आणि निलगिरी पर्वताचे शिखर या ठिकाणांबरोबरच रोहिणी कुंडापाशी वास्तव्य केले.
मूळचे रोहिणी कुंड विमलादेवी मंदिराच्या प्रवेशापाशी आहे. त्या कुंडात निर्माणजल आहे असे म्हणतात. कैक वर्षापूर्वी ते कुंड जराजर्जर झाले. परंतु सन २००७ मध्ये दीन बंधु दास या श्री प्रभुपादस्वामींच्या शिष्याने एक लेख सन या नियतकालिकामध्ये लिहिला आणि कुंडाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
सध्या जगन्नाथ मंदिरात रोहिणी कुंड म्हणून एका छोट्याशा पात्रात पवित्र जल ठेवलेले आहे. पात्राच्या तळाशी भुशुंडी काक याची मूर्ती ठेवलेली आहे. एका पुराणकथेनुसार एक कावळा रोहिणी कुंडात पडला आणि अचानक त्याचे रूपांतर विष्णूनारायणाच्या शंखचक्रगदापद्मधारी अशा चतुर्भुज भक्तात झाले. तो हा भुशुंडी काक = कावळा.
स्कंदपुराणात देखील ‘भुशुंडी काक’ची कथा सांगितली आहे. मोमस ऋषींनी भुशुंडीला एक शाप दिला. मरणासन्न अवस्थेत उडत उडत तो कावळा शंखक्षेत्री पोहोचला. रोहिणी कुंडातील पवित्र जलाने स्नान करून तो जगन्नाथाचे दर्शन घ्यायला मंदिराजवळ आला. योगायोगाने तो एका कल्पवटवृक्षाच्या शाखेवर बसला. आपल्याला ठाऊकच आहे की कल्पवृक्षाखाली मनांत धरलेली इच्छा पूर्ण होते. त्या कावळ्याच्या मनांत शापमुक्त व्हावे अशी इच्छा सतत तेवत होतीच. अचानक कावळ्याच्या रूपातील भुशुंडी मरून रोहिणी कुंडात पडला आणि त्याचे रूपांतर चतुर्भुज अशा दिव्य रूपात झाले. तेव्हापासून त्याची वटनारायण म्हणून पूजा करतात.
रोहिणीकुंडाच्या जरा पुढे गेले की सुदर्शनक्राच्या आकाराचे नाभिचक्र आहे. त्याच्या बाजूला चार फूट उंचीची कावळ्याची मूर्ती आहे. हा कावळा इंद्रद्युम्नाच्या काळी अस्तित्वात होता. जगन्नाथाचे मंदीर बांधून पूर्ण झाल्यावर त्याला त्याच्या पवित्र अशा गतकाळाचे फळ मिळाले. राजा गलमाधवाने दावा केला की मंदीर त्याचे आहे. मग ब्रह्माने तिथे येऊन तोडगा काढला. राजा इंद्रद्युम्नाशेजारी कावळा आणि चक्र हे साक्षीला ठेवले. गलमाधवाचा आत्मा अजूनही रोहिणी कुंडात वास्तव्य करतो आणि रोज जगन्नाथाची प्रार्थना करतो असे मानतात.
मूळ रोहिणी कुंड विशाल जलाशय होता. त्याच्या किनार्यावरून पाण्यात उतरायला स्फटिकाच्या पायर्या होत्या असा वेदांत उल्लेख आहे. स्कंदपुराणात विद्यापति नीलशैलहून परत आल्यानंतरचे संभाषण आहे. त्यात तो इंद्रद्युम्नाला म्हणतो,
नीलगिरीच्या शिखरावर एक सदाहरित असा वटवृक्ष आहे. त्या वृक्षाच्या पश्चिमेला रोहिणी कुंड आहे आणि कुंडाभोवती स्फटिक मणिमाला आहे. शंखचक्रगदापद्मधारी, नीलवर्णी इंद्रनीलमणिमाया, नीलमाधव हे वटवृक्षाच्या शीतल छायेखाली या वेदीवरील सोनेरी कमलावर आसनस्थ आहेत, नीलमाधव वेणुवादन करताहेत आणि अनंतनागाने त्यांच्या मागून आपल्या शरीराने छत्र धरले आहे. समोर सुदर्शन दृश्यमान आहे आणि त्यांच्या समोर गरूड हात जोडून बसलेला आहे.
नीलमाधव आणि इंद्रद्युम्न यांना या पवित्र जागी आलेले विद्यापतीने पाहिल्यानंतरच्या काळात नीलमाधवाची आणि रोहिणी कुंडाची ही प्रतिमा एका भयंकर अशा वादळात वाळूमध्ये आता नष्ट झाल्याचे मानतात. तथापि श्री नरसिंहाने एका अगुरू वृक्षाखाली या पवित्र स्थळी नीलशैलाचे मंदीर उभारले. नीलमाधव अंतर्धान पावल्यानंतर आता एवढेच राहिले आहे.
रोहिणीकुंडाच्या पूर्वेला आपल्याला थोर ऋषी मार्कंड यांच्या पावलाचे ठसे दिसतात. त्यावरून दुसर्या पंचतीर्थाचे नाव ठेवले, मार्कंडेय सरोवर.
जालावरच्या प्रकाशचित्रात अतिशय देखणे दिसणारे
नरेंद्र सरोवर. तर पुन्हा आपल्या सफरीवर जाऊयात.
पुरीच्या वाटेवर आपल्या मार्गदर्शकाने बर्याच सूचना देऊन बसमधल्या सर्व पर्यटकांना सतर्क केले. कोणार्क मंदिराला दर्यावर्दी लोक ब्लॅक पॅगोडा म्हणत तर पुरीच्या मंदिराला म्हणत व्हाईट पॅगोडा. म्हणजे दोन्ही मंदिरे समुद्रातून आता दिसतात की नाही ठाऊक नाही. नसल्यास शेदोनशे वर्षापूर्वी निदान शिखरे तरी दिसत असावीत आणि परिसरातल्या दर्यावर्दींना त्यांचा दिशादर्शनासाठी उपयोग होत असावा.
१. कोणत्याही पुजार्याला जवळ येऊ देऊ नका. काही पुजारी देखील चोर आणि खिसेकापू आहेत तर काही चोर - खिसेकापू पुजार्यांच्या वेषात उपस्थित असतात. फक्त मंदीर-अधिकृत पुजार्यांशी व्यवहार करा. आपल्या वस्तूंची चोरीपासून काळजी घ्या.
२. प्रतिमाग्राहक,भ्रमणध्वनी आत न्यायला परवानगी नाही. तेव्हा ते बरोबर घेऊ नका.
३. फक्त हिंदूंना प्रवेश. इतर धर्मीयांना बाजूच्या इमारतीतून अवलोकन करायची सोय आहे.
४. दोन तासात बसमध्ये परत या.
पुरीच्या मंदिरातील कोरीवकाम निवांतपणे पाहणे अशक्यच दिसत होते. प्रकाशचित्रे देखील काढायची नाहीत तर आत कशाला जायचे. बरोबरच्या तिघांच्या वस्तू सांभाळायला घेतल्या आणि आजूबाजूला फेरफटका मारायचे ठरवले. नरेंद्र सरोवर पाहाणे हुकल्याची रुखरुख राहून गेलीच. तिन्ही सोबत्यांचे भ्रमणध्वनी संच माझ्याकडे असल्यामुळे एकटा जाऊन पाहून देखील येऊ शकत नव्हतो. असो.
मंदिरापासून बस तशी बरीच दूर, किमान साताठशे मीटर तरी, उभी होती. जवळजवळ बकाल शहर. रस्तारुंदीकरण वगैरे कामे चालू असल्यामुळे बकालपणात भर पडलेली. अर्धा तास फिरलो. मंदिराबाहेर पेढ्यांची, मिठाईची, शोभेच्या विविध वस्तूंच्या दुकानांची जत्रा होतीच. कृष्ण सुभद्रा बलराम यांच्या तीन मूर्तींचा संच, चित्रे सर्वत्र होती. घाईघाईने खिसापाकीट सांभाळत गर्दीपासून दूर बसकडे गेलो. उन्हात फिरून कंटाळा आला. एक चहा घेतला आणि बससमोरच रस्त्याकडेला एका बंद दुकानाच्या पायरीवर सावलीत बसलो. तेवढ्यात आमच्या बसमधले एक जोडपे बाजूला येऊन बसले. सौ. मुस्लीम व श्री. हिंदू होते म्हणून ते दोघंही आत गेले नव्हते. सौं.च्या कपाळाला कुंकू नव्हते. नवराबायको दोघंही तसे फाटकेच दिसत होते. कर्तृत्ववान मुलाने त्यांना पर्यटनाला पाठवले होते. खोलीला अडीच हजार दिवशी असलेले चकचकीत हॉटेल पण आरक्षित केले होते. हे सांगतांना मुलाबद्दलचे कौतुक दोघांच्याही चेहर्यावरून ओसंडत होते. सौं.ची हिंदू देवदेवतांवर श्रद्धा पण होती. मग टिकली कुंकू लावून मंदिरात का गेला नाहीत असे मी भोचकपणे विचारलेच. पकडले गेलो तर काय या भितीने गेले नाहीत म्हणाले. मला काही ते पटले नाही. पोकळ सबब वाटली. बोललो नाही पण चेहर्यावरचे भाव मी लपवले नाहीत. त्यांना नातवासाठी खेळणे घ्यायचे होते. मी फेरफटका मारतांना त्याच रस्त्यावर समोरच्या पदपथाशी जवळजवळ दहा मिनिटांवर एक दुकान पाहिले होते. त्यांना बसल्या जागेवरूनच दाखवले. ते खरेदीसाठी गेले. नातू देवळात जातो की नाही ते विचारावेसे वाटले पण विचारले नाही.
अनोळखी रस्त्यावर मला तसा कधी कंटाळा येत नाही. वाहनांचे, वाहने कशी चालवतात त्याचे, पादचार्यांचे, दुकानदारांचे, टपर्यांवरच्या गिर्हाईकांचे निरीक्षण करीत बसलो. तासभर कसा गेला कळले नाही. उन्हे उतरायला सुरूवात झाली. नंतर तासदीडतास बसमध्ये बसायचे म्हणून पाय मोकळे करायला उठलो. काही पावले चालतो न चालतो तोच आमच्या बसमधले मार्गदर्शक, चालक आले. तेवढ्यात मंदिरात गेलेले बसमधले इतर लोक पण परत येऊ लागले. मंदिराता पूर्वी असायची ती घाण दुर्गंधी आता नाही असे कळले.
तिथून पुरीचा सोनेरी समुद्रकिनारा अर्थात गोल्डन बीच. भल्यामोठ्या फेसाळणार्या लाटांनी वातावरण जिवंत केलेले.

किनारा तसा बर्यापैकी प्रशस्त रुंद. पण तुलना केली तर तसा अनाकर्षकच. असे दिसते की समुद्र जमिनीत घुसून किनारा चंद्राकृती झाला की दोन्ही बाजूंना जमिनीची माडांची भरगच्च गर्दी असलेली टोके आत घुसलेली असली, थोडेफार खडक समुद्रात दिसत असले तरच तो सुंदर दिसत असावा. तसे दृश्य पाहायची मला कोकण्याला सवय. इथे विविध कोनातून पाहिले तरी किनार्याचे सौंदर्य काही दृष्टीस पडेना. कोकण, गोवा, केरळ वगैरे किनार्यापुढे हा अगदीच फिका वाटला. मग उन्हे उतरल्यावर मावळतीच्या गहिरंगात हा किनारा कसा दिसेल त्याची कल्पना करू लागलो. विक्रेत्यांची गर्दी, कोलाहल अजिबात नसल्यामुळे स्वप्नरंजन मस्त झाले. एका चित्रवाणी वाहिनीवरचा एक कार्यक्रम आठवला. या किनार्यावर एक कलाकार असतो. बहुधा नाईक आडनाव त्याचे. पहिले नाव विसरलो. तो वाळूत मस्त शिल्पे बनवतो. मोठ्ठी मोठ्ठी प्रचंड आकाराची. लार्जर दॅन लाईफ. रंगसंगती साधून बसवलेल्या देखण्या, विविधरंगी शंखशिंपल्यांनी सालंकृत. शंकराचे एक शिल्प त्या कार्यक्रमात दाखवले होते. वेगवेगळ्या छटांच्या शंखशिंपल्यांनी सजलेले ते शिल्प डोळ्यासमोर उभे राहिले. शंकराच्या गळ्यातील सर्पाच्या अंगावरचे खवले शिंपल्यांनी बनवले होते. त्या सर्पाच्या शरीराची वळणे, तो जिवंतपणा, असे वाटावे की आत्ता शंकर पापण्यांची हालचाल करेल आणि तो सर्प वळवळ करेल. चित्रवाणीच्या त्या कुशल, सराईत कॅमेर्याने सफाईदारपणे सारे काही अचूक मनसोक्त टिपून दाखवले होते. तो कार्यक्रमच नजरेसमोरून सरकला. मलिष्का नावाची संचालिका होती त्या कार्यक्रमाची. स्वतःची शिल्पकला विकसित करायला, कसबात अधिकाधिक सफाई आणायला, विविधरंगी विविध आकारांचे आकर्षक शंखशिंपले गोळा करायला त्या शिल्पकाराने किती कष्ट घेतले असतील. त्याची शिल्पकलेची आसक्ती किती तीव्र असेल! केरळ्कोकणगोव्याशी तुलना न करता निर्लेप मनाने असेल त्या वेगळ्या निसर्गसौंदर्याची नजरलूट करावी हे खरे. ते शिल्प, तो शिल्पकार किनार्यावर कुठे दिसतो का ते पाहायला थोडा इकडेतिकडे भटकलो. पण काहीच दिसले नाही. सुदैवाने सहपर्यटक आपसात गप्पा मारत होते. त्यामुळे माझी तंद्री मोडायला कोणी आले नाही. स्वप्नरंजनात मश्गुल असतांनाच बसकडून बोलावणे आले. एकदोन अनुत्साही वीरांचे तर सागरतीरी न येता बसमधेच निद्रादेवीशी प्रणयाराधन सुरू होते. त्या अपरिचितांचे प्रकाशचित्र काढावेसे वाटले पण शिष्टाचार आडवे आले.
पोहोचेपर्यंत अंधार पडला. अर्धा तास आराम करून ताजेतवाने होऊन भोजनार्थ बाहेर पडलो. पण त्याआधी चिल्काचे आरक्षण करायचे होते. स्थानकाकडे गेलो. फलाटाच्या तिकीटाला बरीच गर्दी. तिकीट न घेताच रेलवे स्थानकावर गेलो. उत्साही कार्यतत्पर कृष्णाने हसतमुखाने स्वागत केले. चिल्कासाठी आलेले आम्ही पहिलेच होतो. पर्यटक जमले नाहीत तर महामंडळाची फेरी रद्द होईल. पण आरक्षणाचे पैसे ताबडतोब रोख परत मिळतील. मी योग्य दरात टॅक्सी वगैरे पाहून देईन, काळजी करू नका म्हणाला. चौघांचेही जीव भांड्यात पडले. भांडे बरेच मोठे असणार नाहीतर जीवतरी चिंटे असणार. पैसे घेऊन पावती दिली. पण भरपूर खाऊन जा म्हणाला. चिल्काला काही मिळेल न मिळेल. मोतीबिती अजिबात घेऊ नका. हमखास फसवणूक होते म्हणाला.
आता भोजन. काल संध्याकाळच्या हॉटेलात मला जायचे होते. तसे मी बोललो पण. पण तिथे गर्दी नसल्यामुळे आजही अन्न ताजे मिळेल याची खात्री नाही असे मत बाळ्याने व्यक्त केले आणि काल दुपारच्या गुजराती मालक असलेल्या उडुप्याकडे नेले. बाळीने पण त्या दिशेने निघतांना नाक मुरडले. इडलीडोसे वगैरे पदार्थच खाल्ले. गोड गाभ्याचा केकसदृश पदार्थ कालचाच दिसत होता. कापून विकला गेल्यामुळे आकार थोडा कमी झालेला. कालचा असल्यामुळे मागवला नाही. रस्त्यात आईसक्रीम खायचे ठरले. पाण्याच्या बाटल्या घेतल्या पण दोघे पुढे दोघे मागे असे झाल्यामुळे आईसक्रीम राहूनच गेले. आईसक्रीमची दुकाने मागे पडली खरी पण आता चौघे एकत्र आल्यावर चेष्टामस्करीला ऊत आला होता. पाच मिनिटांचे अंतर रमतगमत अर्ध्या तासात चालून खोलीवर येऊन चिल्काच्या जालावरून साभार उचललेल्या माहितीची उजळणी केली आणि झोपी गेलो.
क्रमशः
खरं म्हणजे तुम्ही देवळात जायला हवे होते .त्याचे वर्णन हुकले ना !पुजा न होणारी देवळे (बदामि ,ऐहोळे )असली की मला बरे वाटते शांतपणे पाहाता येते .पौराणिक कथा इथे लिहिल्यात ते फारच छान .मलिष्काच्या It happens only in India ,Discovery channel कार्यक्रमात ती छेनाची मिठाई दाखवली होती तोच तुमचा गोड केक असावा .
चिल्का सरोवर
चिल्काच्या पश्चिम किनार्यावरील भुवनेश्वरपासून १२० किमीवरील रंभा, भुवनेश्वरहून ९७ किमी वरील बरकूल ही भुवनेश्वरपासून सोयीची आहेत. भुवनेश्वरहून ११० किमीवरील सतपाडा मात्र चिल्काच्या पूर्व किनार्यावर असून पुरीहून जवळ म्हणजे ६२ किमी आहे. तिथून जलपर्यटनाची सोय आहे तसेच तिथे राहण्यासाठी देखणे यात्री निवास देखील आहे. त्यामुळे पुरीवरूनच सतपाडाला जावे.
चिल्का सरोवर हे एक निमखार्या पाण्याचे brackish water - प्रचंड सरोवर आहे. दया नदीच्या मुखाशी समुद्रकिनार्याला लागूनच पुरी, खुर्दा आणि गंजम अशा तीन जिल्ह्यात याचा विस्तार आहे. भारतातील हे पहिल्या क्रमांकाचे आणि जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे असे समुद्रकिनारी सरोवर आहे.
स्थलांतर करणार्या पक्ष्यांचे हे सरोवर म्हणजे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे असे हिवाळी आश्रयस्थान आहे. पक्ष्यांच्या तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ तसेच धोक्यात आलेल्या प्रजाती इथे आढळतात. मासे देणारा हा एक प्रचंड असा स्रोत आहे. सरोवराकाठच्या तसेच सरोवरातील बेटांवरच्या १३२ गावात दीड लाखापेक्षा जास्त कोळी आपला उदरनिर्वाह फक्त या सरोवरातील मासेमारीवर करतात.
स्थलांतर करणार्या पक्ष्यांच्या १६० पेक्षा जास्त प्रजाती इथे हंगामात स्थलांतर करतात. कॅस्पियन समुद्र, बैकल सरोवर, अरल समुद्र, तसेच रशिया, किरगिजस्तानमधील गवताळ प्रदेश, मध्य आणि आग्नेय आशिया, लडाख आणि हिमालयासारख्या अतिदूरच्या आणि दुर्गम प्रदेशातील पक्षी इथे आश्रय घेतात. स्थलांतर करणारे पक्षी सर्वात जवळचा असा सरळ रेषेतील मार्ग न निवडता जरा दूरच्या मार्गाने येतात याचा विचार केला तर असे लक्षात येते की ते जवळजवळ १२,००० किमी.चा प्रवास करून चिल्का सरोवरात येतात.
१९८१ मध्ये चिल्का सरोवराची आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे पहिले भारतीय जलस्थान म्हणून रमसर परिषदेत निवड झाली. एका पाहणीनुसार ४५ टक्के पक्षी हे जमिनीवर राहाणारे, ३२ टक्के पक्षी पाण्यात राहाणारे आणि २३ टक्के पक्षी हे बगळ्यासारखे लांब पायांचे, पाणथळ जागी राहाणारे असतात. चिल्का सरोवर १४ जातींच्या शिकारी पक्ष्यांचे निवासस्थान आहे. १३५ दुर्मिळ आणि धोक्यात आलेल्या इरावद्दी प्रजातीचे डॉल्फीन इथे आढळले आहेत. त्याशिवाय इथे सरपटणार्या प्राण्यांच्या आणि उभयचरांच्या ३७ प्रजाती आढळतात. सूक्ष्मशैवाल, समुद्री लव्हाळी, समुद्री गवत, मासे, खेकडे चिल्काच्या निमखार्या पाण्यात फोफावतात. त्यामुळे चिल्काला पर्यावरणाच्या दृष्टीने असामान्य महत्त्व प्राप्त झाले आहे. चिल्का हे पक्षी अभयारण्य म्हणूनही घोषित केले गेले आहे.
भरभरून देणार्या चिल्का सरोवरातील संपन्न निसर्ग आणि मासेमारीचा प्रचंड स्रोत सरोवरातील आणि सरोवरतीरावरील कोळ्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा देतो. उन्हाळ्यात जवळजवळ ९०० चौरस किमी एवढे अवाढव्य असलेले चिल्काचे पाणक्षेत्र पावसाळ्यात जवळजवळ ११६५ चौरस किमी पर्यंत वाढते. सरोवरातून निघालेला ३२ किमी लांबीचा एक लांबलचक पण अरुंद कालवा मोटो या गावी बंगालच्या उपसमुद्राला मिळतो. अलीकडेच सीडीए ने सरोवरातून बंगालच्या उपसागराला मिळणारा आणखी एक कालवा निर्माण केला आहे आणि चिल्काच्या बर्याच मोठ्या विभागाला संजीवनी दिली.
नयनरम्य असे सरोवर, अतिशय निसर्गरम्य अशी सृष्टी, शांत, आल्हाददायक वातावरण, पक्षीनिरीक्षणासाठी भरपूर संधि, यामुळे पर्यटनासाठी सुरेख ठिकाण. मंद वार्यावर मधुर ध्वनि करणारी इथली सतपाडा, नलबन, कालीजल, सोमोलो, हनीमून आयलंड वगैरे जमतील तेवढी वेळूची बेटे जरूर पाहावीत. सतपाडा हे तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले नयनरम्य पक्षी अभयारण्य आहे.रे. सतपाडाला तर वर म्हटलेल्या इरावदी डॉल्फीन या दुर्मिळ जातीच्या डॉल्फीनचे दर्शन देखील घडते. कंथापंथा, कृष्णप्रसादराह (जुने नाव परीकुडा), नवापारा आणि सनाकुडा ही चिल्कामधील इतर बेटे आहेत. एखादा दिवस राहून नौकाविहार करावा, पक्षीनिरीक्षण करावे, आवडत असल्यास ताज्या मासळीचा आस्वाद घ्यावा आणि ताजेतवाने होऊन परतावे.
२२-११-२०११.
शुचिर्भूत होऊन बाहेर पडलो. आता भरपूर खायला म्हणून पुन्हा उडुपी. वेळ वाचवायला स्थानकावर रिक्षाने आलो. स्थानक तिकीट न घेताच आत गेलो. फक्त एक तेलुगू जोडपे आमच्याबरोबर होते. कृष्णा भ्रमणध्वनीवरून काहीतरी बोलला. बस क्रमांक लिहून घेतला आणि आम्हाला दिला. थोडा वेळ बसा, दहा मिनिटात बस आली की फोन येईल म्हणाला. खरेच दहा मिनिटात तशीच चकाचक बस आली. अख्ख्या बसमध्ये केवळ सहा प्रवासी. कालच्यासारखा मार्गदर्शक नव्हता. बस शहरातूनच एका प्रशस्त आवारात घुसली. ते ओरिसा पर्यटन महामंडळाचे कार्यालय होते. चालकाने सांगितले की फक्त सहाजण असल्यामुळे वातानुकूलित जीपने जायचे आहे. भाडे तेवढेच, तीच पावती. मार्गदर्शक वाटाड्या नाही. मोती घेऊ नका. महामंडळाचे विश्रामधाम चिल्काला आहे, तिथेच चांगले जेवण मिळेल. सरकारी महामंडळाने तोटा सोसून आमची सोय केली होती. खाजगी कंपनी असती तर आम्हाला लुटलेच असते.
जीप नवी आणि बर्यापैकी होती. पहा कशी काय दिसते प्रकाशचित्रात.
जीपवर जरी श्री गणेष लिहिले असले तरी त्याचा उच्चार स्री गनेस असा आहे बरे का.
हे प्रकाशचित्र पुढे चिल्काच्या यात्री निवासातले आहे. असो. पुन्हा मागे भुवनेश्वरला येऊयात. आमच्याबरोबरचे तेलुगू जोडपे विशाखापट्टणमचे होते. लग्नाला दोन वर्षे झाली होती. मूल अजून नव्हते. पण दोघांचेही स्वभाव मोकळे नव्हते. आपसातच गुलूगुलू - चुकलो - गुडूगुडू चालले होते. कदाचित भाषेचा प्रश्न असू शकेल. पण मुंबईला आमच्या इमारतीत भाड्याने केवळ वर्षभर राहणारे तमिळ शेजारी धड हिंदीमराठी येत नसूनही मोडतोड भाषेत संवाद साधीत असत. आमच्याकडचा मोठ्ठा दगडी रगडा वर्षभर वापरून नंतर घर सोडतांना परत दिला. घेऊन जा म्हटले तरी नेला नाही. जातांना मायलेकी भरपूर रडल्या. दुसरीकडे राहायला गेल्या तरी अधूनमधून इडल्या डोसे, सांबार नेहमी आणू देत असत. असो.
वाटेतले पिपलीचे सुंदरसे मारूती मंदीर काल बसमधून पाहिले होते. ते पाहूया म्हटले. सहापैकी आम्हीच चौघे असल्यामुळे बहुमतात होतो. पण तेलुगू जोडप्यानेही होच म्हटले.



नंतर मात्र थेट चिल्काला. रेलवेच्या बाजूने जातांना वाटेत एकदोन रेलवे स्थानके पण लागली. दोनेक तासांनी सतपाडाला पोहोचलो. जलयानाच्या धक्क्याचा परिसर तसा रम्य आहे. जलाशयात घुसलेल्या धक्क्याकडे जाणार्या रस्त्याच्या मुखाशी गाडीतून उतरून जलसफरीची तिकिटे काढली. उजवीकडे तिकीटाची खिडकी दिसत आहे.


डावीकडून उजवीकडे जाणारा रस्ता सरळ धक्क्यावर जातो. तिथून धक्का किती छान दिसतो आहे

तिकीटे काढल्यावर चालकाने आम्हाला पुन्हा जीपमध्ये बसवून जीप या रस्त्यावरून थेट पाण्यापाशी नेली.
तिथे ओदिशी भाषेत हाका मारून गप्पा मारीत बसलेल्या दर्यावर्दींना बोलावले आणि होडी ठरवून दिली. फायबरच्या होड्या तशा जुनाटच होत्या. निष्काळजीपणे कसातरी रंग फासून नूतनीकरण केलेल्या. इतक्या बेढब, कुरूप होड्या मी कुठेच पाहिल्या नाहीत. पर्यटक का म्हणून पुन्हा इथे येतील? हेच रंगकाम थोड्याफार कलात्मकतेने आणि सफाईने करून होड्या तेवढ्याच खर्चात सुंदर बनवता आल्या असत्या. इथे कौशल्य, कसब नाहीतर किमान सौंदर्यदृष्टी, कलासक्ती नक्कीच कमी पडलेले आढळले. मंदिरे बांधतांनाचे सगळे पारंपारिक कुशल, कसबी कामगार कुठे नाहीसे झाले बरे? परकीय आक्रमकांनी सगळे लुटून नेल्यावर आणखी काय होणार? कलावंत कामाच्या भाकरीच्या शोधात विस्थापित झाले असावेत. उरलेल्यात व्यावसायिकतेचा अभाव असावा.
इथल्या होड्यांची चालन व्यवस्था - मोटरायझेशन वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुकाणूच्या फूट दोनफूट वर एक इंजिन बसवलेले असते. याच्या खालच्या टोकाला लांब दांडी असते. वर खाली करता येण्याजोगी. वर केली की दांडीचे खालचे टोक पाण्याबाहेर. या पाण्यात बुडू शकणार्या टोकाला पंखा. दांडी खाली करून पाण्यात बुडवला की तो होडीला पुढे ढकलतो. वळवला की बोट वळते. आणखी वेगळे सुकाणू काही दिसत नाही. उसाच्या चरकाचे इंजिन जसे हाताने थोडेसे फिरवून - क्रॅंकिंग करून - सुरू करतात तस्सेच हे देखील सुरू करतात.
मुख्य विषय निसर्ग पाहाणे. त्यातच रममाण झालो.
वाटेत डॉल्फीन दर्शन ठिकाण दिसले. काही मासे सागरपृष्ठाशी येऊन खळबळ करून क्षणार्धात खोल पाण्यात निघून जात होते. पण त्या पहिल्या अवताराने दर्शन काही दिले नाही. सागरपृष्ठाशी होणार्या जोरदार खळबळीवरून ते चांगले पंधरावीस फूट लांबीचे मासे असावेत असा अंदाज बांधता येऊ शकतो. पण डॉल्फीन का कोणता ते मात्र कळायला मार्ग नाही. मालवणला देवबाग इथे पण डॉल्फीन दर्शन होते. तेही अस्सेच असते. कॅमेरा पाण्याखाली बुडवून फोटो काढावेसे वाटले. चिल्का सरोवर महाप्रचंडच आहे. वाटेत काही बेटे लागली. एका बेटावर शिडाची होडी उलटी करून तंबू तयार केला होता.
एका मोठ्या बेटावर होडी उभी केली. बेटाचे नाव विचारायला विसरलो. उतरल्याबरोबर पंधरावीस माणसांनी आम्हाला गराडा घातला. मोतीविके होते. बाळ्याने आणि मी एकमेकांकडे अर्थपूर्ण पाहिले. मोती विकत न घेण्याच्या स्पष्ट सूचनेची जाणीव करून देणारी नेत्रपल्लवी. तेलुगू जोडपे मात्र मोती बघण्यात रमले. दोघेतिघे शिंपले टोपलीतून काढून फोडून दाखवत होते. दर दोनचार शिंपल्यामागे एकाद्यात मोती निघत होते. भरपूर बघून घ्या. घेऊ मात्र काहीच नका. बाळ्याने दोघींना मराठीत बजावले. मी चौघांच्याही चीजवस्तूवर नजर ठेवायला सुरुवात केली. काही सांगता येत नाही. मोती पाहाण्यात गुंगवून पाकीटबिकीट मारायचे. कोणी घेत नाही म्हटल्यावर हातात पाहायला द्यायला लागले. तरी घेत नाही म्हटल्यावर तीनशेचा पांढरा मोती सत्तर ऐशीवर आला. तेलुगू जोडप्याने दीडदोन हजारांचे मोती घेतले. आम्ही घेत नाही म्हटल्यावर आता दर पाचसात मोत्यामागे एखादा काळा मोती निघू लागला. काळे मोती दुर्मिळ असतात. नशिबानेच मिळतात वगैरे आख्यान बंगाली वळणाच्या उडियामिश्रित गोल हिंदीत सुरू झाले. माजी दुकानदार बाळ्याचा घासाघीस करायची हौस आणि संयम औरच आहे. घ्यायचे नसतांना उगाच किंमतीवर डोकेफोड करायची म्हणजे ..... एकेकाचा विरंगुळा कशात असेल काही सांगता येत नाही.
जवळच आणखी एकदोन होड्या लागल्या त्यातल्या काहींनी खाद्यपदार्थांची मागणी नोंदवली. घासाघीस पाहून कंटाळून मी सगळ्या चीजवस्तू सांभाळत त्या गर्दीकडे गेलो. पंचविशीच्या आतबाहेरचे गुलहौशी ओदिशी तरूण ओदिशी भाषेतच गलका करत होते. गावठी हॉटेलात मासे साफ करीत होते. कसे कापतात, कसे साफ करतात, मसाला कसा लावतात ते पाहिले. लाकडाच्या चुलीवर मासे तळायला सुरुवात झाले. कालवणाची पातेली पण चुलीवर चढली. तेवढ्यात त्या तरुणांनी बीअरच्या बाटल्या काढल्या. मी परत जायला वळलो. अंकल आप भी आजाओ म्हणून त्यांनी आमंत्रण दिले. ते सौजन्याने नाकारून मी परत फिरलो. तळलेला मासा खाऊन जा म्हणाले. मी शाकाहारी आहे म्हणून सांगितले. बाय करत निरोप घेऊन सटकलो.
बाळ्याने दहा काळे मोती घेतले होते. प्रत्येकी तीस रुपये. मी कुत्सिततेने हसलो. अरे गरिबांना पैसे मिळू देकी म्हणून त्याने मखलाशी केली. आपण पण आठवण म्हणून घेऊ यात का म्हणून सौ ने विचारले. खरेखोटे कसेही असले तर तीनशेला दहा काही वाईट नव्हते. आठवण म्हणून घेतले. नंतर अर्थातच ते प्लॅस्टीकचे असल्याचे आढळले.
ऊन वाढत होते. होडीकडे परत फिरलो. पिशवीतल्या पाण्याच्या बाटल्या गरम झाल्या होत्या. थंड सरबत प्यायचा मोह झाला होता. पण पोट बिघडू नये म्हणून टाळले. कोक पेप्सी वगैरे कोणालाच नको होते. तेवढ्यात दुसर्या एका टपरीवर पंचवीस रुपयांना ५०० मिली मॅंगोला मिळाला. थंड पेय प्याल्यावर बरे वाटले. प्रतिमाग्राहक सरसावून प्रकाशचित्रे काढली. धक्क्याजवळची बहुतेक प्रकाशचित्रे होडीतून उतरल्यावर उतरत्या उन्हात काढलेली आहेत.
थट्टामस्करीत होडीचा परतीचा प्रवास जलद झाला असे वाटले. वाटेत एक सुरेख बेट लागले.
इथले यात्री निवास आकर्षक सुरेख आहे. परत कधी ओरिसात आलो तर इथेच राहीन.
त्यांचा दूरध्वनी क्रमांक प्रकाशचित्रात दिसतो आहेच.
जीपच्या चालकाने भुवनेश्वरमधली दोन्ही वस्तुसंग्रहालये न चुकता पाहायला सांगितले. भुवनेश्वरची मंदिरे दाखवण्यार्या पहिल्या टॅक्सीचालकानेही ते सांगितले होते ते आठवले. त्या वस्तुसंग्रहालयांचे आता मला वेध लागले होते.
क्रमशः
आम्ही या सरोवरात बरकुळ येथून प्रवेश केला होता. तिथे मधेच एका बेटावर लक्ष्मी मंदिर आहे. बाकी आपण चिल्का बद्द्ल दिलेली माहिती फार महत्वाची आहे. भारतातील पहिल्या पाचेक मोठ्या सरोबरात मी नौकानयन केले आहे. गंजम ते खुर्दा रोड या दरम्यान माझ्या अंदाजाने जवळ जवळ ४० किम्मी अंतरात रेल्वे या सरोवराच्या बाजूने धावत असते.
मी जाणार ते पुरी, नियालीचे माधव मंदीर, भुवनेश्वरजवळच्या हिरापूरचे ६४ योगिनी मंदीर, खीचक मंदीर (कीचकमंदीर) पाहून जमले तर पश्चिमेकडे वळून खजुराहो, मध्यप्रदेशातले झाशी, ग्वाल्हेर करून दक्षिणेकडे येत जबलपूर, धर, इंदौर, मांडू करीत परत फिरायचा विचार आहे. त्यातच एखादा दिवस चिल्काला.
http://www.misalpav.com/node/25890
२३-११-२०११.
आता पाहायचे होते राज्य वस्तुसंग्रहालय अर्थात स्टेट म्यूझियम. जातांना
रिक्षाने जाऊन येतांना बसने यायचे असे ठरले. रिक्षा भुवनेश्वरच्या अतिशय
देखण्या राखलेल्या भागातून जायला लागली. मुंबईतल्या म्यूझियमसभोवतालच्या
प्रदेशातले रस्ते किंचित अरुंद केले तर कसे वाटेल तसे. पण मुंबईच्या मानाने
झाडे भरपूर. ती देखील चांगली निगा राखलेली.
संग्रहालयाला प्रशस्त, विस्तीर्ण आवार. राजभवन, टी आय एफ आर वगैरे मोजकी
स्थळे वगळता मुंबईत एवढे विस्तीर्ण आवार कुठेच नाही. आवारात विविध
आकारांच्या चौकटीत सीमित केलेली, सुरेख राखलेली हिरवळ आणि व्यवस्थित
कातरलेली झाडे.
भुवनेश्वरमध्ये आतापर्यंत दिसलेली घाण बकालपणा याचा मागमूस कुठे नाही. वाटले नंदनवनातच आलो.
ख्रिसमस ट्री हा फर असतो असा माझा समज आहे तो बहुधा चुकीचा नसावा.
नसल्यास क्षमस्व. हा कधी देखणा दिसत नाही? काही व्यक्तींकडे उपजत
नीटनेटकेपणा असतो, शिस्त असते. काही झाडे पण तशीच असतात. फरचे मला तस्सेच
वाटते. पाहावे तेव्हा हा आपला व्यवस्थित आणि नीटनेटका. जिथे जातो तिथला
परिसर मोहमयी करून टाकतो. आणि मस्त गोलाईने कातरलेले बहुधा स्प्रूस; मन
प्रसन्न झाले तरच नवल. व्यवस्थित राखल्यामुळे आवाराचा प्रचंड विस्तार
अंगावर येत नाही. मुख्य बाब म्हणजे जमीन उगीचच सपाट करून त्यावर हिरवळ
वाढवली नव्हती. जमिनीतले मूळचे नैसर्गिक उंचवटे तस्सेच ठेवून हिरवळीचा साज
त्यावर चढवला होता.
अधूनमधून आकर्षक शिल्पे आणि पुतळे.


संग्रहालयाचे प्रथमदर्शन जोरदार होते. संग्रहालयाच्या आतली सजावट
कलापूर्ण होती. स्वागत दालनात उत्सवी भडकपणाचा चमकदार स्पर्श असलेली सजावट.
ही सर्वव्यापी श्रीकृष्ण, बालभद्र आणि सुभद्रा यांची त्रिमूर्ती आणि त्यांचे ते ओदिशी शैलीतले वैशिष्ट्यपूर्ण टप्पोरे डोळे.
आतली मांडणीही सुबक. जमीन, भिंती, काचा, खिडक्यांची स्वच्छता चकाचक.
रंगसफेती नीटस आणि आकर्षक. काचखिडक्यात वस्तू टापटीपीने व्यवस्थित
मांडलेल्या. उडिया, देवनागरी आणि इंग्रजीत पाट्या लिहिलेल्या.
प्रकाशचित्रणाला प्रतिबंध नसल्यामुळे चंगळच झाली
संग्रहालयाच्या आतल्या खिडकीतून दिसणारी संग्रहालयाची नीटनेटकी इमारत



एके ठिकाणी उडिया लिपी प्राचीन लिपीवरून कसकशी विकसित झाली ते दाखवले
आहे. सहज आठवले म्हणून लिहितो. वर्षभरापूर्वी आंग सान ची वरचे मराठी पुस्तक
वाचले होते. मीना गवाणकरांचे. त्यात ब्रह्मी लिपीतल्या पाट्यांची
प्रकाशचित्रे आहेत. ब्रह्मी, उडिया दोन्ही लिप्या मला वाचता येत नाहीत. पण
तरीही ब्रह्मी लिपी उडियाशी फारच मिळतीजुळती वाटली. यांगूनच्या एखाद्या
दुकानाची पाटी भुवनेश्वरच्या बाजारात लावली तर आपल्याला कळणार देखील नाही.
ओदिशातील विविध आदिवासी जमातींच्या जीवनशैलीचे दर्शन घडवून माहिती देणारी काचघरे होती.




कारंज्याने सजीव केलेले वातावरण
आता दुसरे संग्रहालय. रीजनल म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी. पहिले संग्रहालय जास्त चांगले की आताचे असा प्रश्न पडावा.


थोडाफार सोनटक्क्यासारखा दिसणारा पण जास्त मोठा आणि जास्त मोहक
हेलिकोनिया.हिरवळ, सुंदर झाडे, शिल्पे वगैरेंच्या जोडीला टेनिस चेंडूएवढ्या
मोठ्या आकाराचे मोठ्ठे झेंडू ठिकठिकाणी फुललेले. झुळझुळणार्या वार्याने
त्या सजीव वातावरण उत्साह भरला.



प्रवेश केल्याबरोबर समोर हत्तीचा हाडांचा सापळा ठेवला आहे.

पुढील ्युगुलातला मी कोणता ते ओळखा पाहू



टिप्पणीची गरज आहे?


पुन्हा देखण्या आवारात


दिवस मस्त गेला. परत येणे तसे सोपेच होते. पण बसला गर्दी असल्यामुळे रिक्शा केली. थोडा वेळ आराम करून, स्नान करून जेवायला निघालो. दुपारी न जेवल्यामुळे जोरदार भूक लागली होती. आज ताजी मिठाई मिळाली. तीच मावा स्टफ्ड मावा केक म्हणावी अशी. ती डिस्कव्हरीवर दाखवलेली बहुधा छेना की मिठाई म्हणतात ती हीच असावी.
आता परतीचे वेध लागले होते. मनाशी गोळाबेरीज होऊ लागली. हुमा वगळता सारी ठिकाणे सुंदर होती. सुरुवात परीक्षा घेणारी झाली तरी दौरा सार्थकी लागला होता. आठवडा कसा गेला हे कळलेही नव्हते. राहायच्या हॉटेलसमोरच भुवनेश्वर स्थानक होते. त्यामुळे कोणार्क मुंबई गाडी फलाटावर लागल्याशिवाय सामान बाहेर काढायचे नाही असे ठरले. बहुतेक खरेदी पिपलीलाच झाली होती. आता उद्या २४ तारखेला दुपारी निघेपर्यंत आरामच आराम.
२४-११-२०११.
बाळीला पुन्हा एकदा लिंगराज मंदीर पाहायचे होते. तेही तिने पाहून घेतले.
फार थकायला झाले असल्यास रेलवेची तिकिटे रद्द करून विमानाने मुंबईला यायचे
ठरले होते. पण तसा थकवा आलाच नव्हता. त्यामुळे रेलवेच पसंत करून पैसे
वाचवले. ओरिसा तसे मुंबईपुण्याच्या मानाने बरेच स्वस्त आहे. त्यातून आम्ही
स्थाकनजीकत्त्व साधायला बकाल परिसरात साधारण हॉटेलात राहिलो. त्यामुळे
नियोजित अंदाजपत्रकाच्या ४० टक्केच खर्च आला. दौर्याच्या मधुर आठवणी
जागवीत गप्पा हाणत मजामस्ती करीत पुणे कधी आले ते कळलेही नाही. ओदिशातली
भटकंती अशा तर्हेने सुफळ अंपूर्ण झाली.
माझी लिखित वटवट खपवून घेतल्याबद्दल सर्व वाचकांचे अगोदरच आभार मानतो.
संपूर्ण.
चौघांचे मिळून ३०,०००/- झाले म्हणजे प्रत्येकी फक्त रु. ७,५००.०० तेव्हा ३ टायर स्लीपरचे भाडे रु. १,४००+ आणि २ टायर स्लीपरचे १९००+ होते. सुमार हॉटेल्स डबल ऑक्युपन्सी रु. ६००/- प्रतिदिन घासाघीस केल्यानंतर होती. छापील दर ११०० - १२०० होते. साधारण बरी हॉटेल्स रु. २२०० होती. त्या दर्जाला हा दर महागच म्हणून सुमार हॉटेलात अटॅच्ड बाथरूम्सची स्वच्छता पाहून खोल्या घेतल्या. बाळ्याची घासाघीस करायची क्षमता असाधारण आहे. स्टॅशनपासून दूर बहुधा दर कमी असावेत. खाण्याची मात्र फार आबाळ झाली. पाणी ५ लिटरचे बुधलेच वापरले. तेव्हा रु. ३५/- ला होते. अर्थात २ लिटरच्या रिकाम्या केलेल्या उचलायची कडीवाल्या बाटल्यात ओतून भरून घेऊन.
तरीच मागच्या डब्यातून आमच्यावर शिव्या आणि दगडांचा वर्षाव होत होता.
खंडगिरी उदयगिरी प्रथम आराखड्यात होते. ६४ योगिनी मंदीर, खीचकेश्वर मंदीर
होते. कालावधी कापऊन कमी केला त्यात गेले. तरी भुवनेश्वरचा टॅक्सीवला त्याच
मोबदल्यात दाखवतो म्हणाला होता. पण माझ्या सोबत्यांकडे शक्ती कमी पडली.
लौकर थकली मंडळी. लेण्यांच्या दहापण पायर्या चढणार नाही म्हणाले. त्यामुळे
केले नाही. असो. धन्यवाद.
@ वल्ली: कबूल केलेल्या फोटोबाबद पदरी निराशा आली. लेखात उल्लेख न केलेली
मंदिरे आम्ही काही पाहिली नव्हतीच. राजाराणी मंदिराचा इथे न टाकलेला एक
फोटो मिळाला. आणि मुक्तेश्वरमध्ये कोरीव कामाचे काही फोटो मिळाले. बाकीच्या
फोटोत आम्हीच आहोत. मागचे फारसे काही दिसत नाही. तेवढे मोजून दहा फोटो
टाकतो. बाकीबद्दल क्षमस्व.
राजाराणी मंदीर पाठीमागून
मुक्तेश्वर मंदिरातले कोरीव काम:
खालील चित्रात डाव्या बाजूला तिरप्या उताराच्या मध्यभागी बाहेर
डोकावणारे टोक आहे ते भो चिन्ह असावे. जावा सुमात्रा इथून आलेले. अंगकोरला
पण आहे म्हणतात. मंदिराच्या शिखराच्या चार बाजूंना चार असतात.
खालील चित्रात पण एक भो चिन्ह दिसते आहे.
जसे सभामंडपाला तिथे जगमोहन म्हणतात. त्यावर एकावर एक सपाट मजले ठेवल्यासारखे छप्पर असेल तर ते पीढ जगमोहन तसे तिथे अर्धचंद्राकृतीला चंद्रशाला म्हणतात. मगरींनी केलेल्या कमानीला आपल्यासारखेच मकरतोरण म्हणतात.
हरीशंकरमधील एका उपमंदिरातील खास ओदिशी शैलीतली त्रिमूर्ती अगोदर टाकायची राहून गेली होती.
हुमा शिवमंदिरातील एक शिल्प
ही त्रिमूर्ती आता आठवत नाही. बहुधा समलेश्वरी मंदिरातली.
शिल्पकला अप्रतिमच आहे.
त्या 'भो' चिन्हाला बहुधा डेन्टिल्स म्हणतात. रोमनांकडून आलेला हा प्रकार.
हा बघा टोका -प्रवरासंगम इथल्या मंदिराचा हा फोटो
वस्तुसंग्रहालये आहेत तो विभाग सुंदरच आहे. या भागाच्या पहिल्याच
परिच्छेदात तसे मी म्हटलेच आहे. दोन्ही संग्रहालयाची आवारे किती सुंदर आहेत
ते तर दिसतेच आहे. सिंहली लिपी जास्त तमिळसारखी आहे. मी २०११ मध्ये जाऊन
आलो. हा घ्या सिंहलीचा नमुना.
No comments:
Post a Comment