Friday, July 3, 2026

किल्ले रामदरणे

  सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात काळाच्या ओघात विस्मृतीच्या पडदयाआड गेलेले अनेक गडकिल्ले आहेत. इतिहासात या किल्ल्यांचा उल्लेख नसल्याने व यांचे निश्चित स्थानही माहित नसल्याने कुणीही या किल्ल्यांकडे फिरकत नाही. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ असलेला रामदरणे किल्ला. किल्ल्याचे स्थान व आकार पहाता याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा असे वाटते.
         अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण रस्त्याने सर्व गावांशी जोडलेले आहे. मुंबईहून समुद्रामार्गेही रेवस पर्यंत जाऊन तेथून अलिबागला जाता येते. रामदरणे किल्ल्याचा डोंगर लांबवर पसरलेला असून त्या डोंगरावर खालील दिलेल्या सर्व गावांमधून वाटा आहेत.
        १) वायशेत गावातून:- अलिबाग- किहीम - रेवस रस्त्यावर अलिबागपासुन अंदाजे ५ किमीवर वायशेत गाव आहे. वायशेत गावातून रामदरणे पाड्याकडे जाणारा रस्ता आहे. अलिबाग- रेवस मार्गावर जाणार्‍या एसटी बस किंवा रिक्षांनी वायशेत गाव गाठावे. वायशेत गावातील सायमन कॉलनी जवळील दगडाच्या खाणी पर्यंत यावे. पाड्याच्या खालच्या बाजूला ही दगडाची खाण असल्याने पाड्या पर्यंत कच्चा रस्ता बनवलेला आहे. तेथून कच्च्या रस्त्याने चालत अर्ध्या तासत आपण रामदरणे पाड्यात पोहोचता येते. हा रस्ता अनेक ठिकाणी खचलेला असल्याने केवळ जीप किंवा दुचाकीने पाड्या्पासून ५ मिनिटांच्या अंतरा पर्यंत जाता येते. पुढे रस्ता खचलेला असल्याने गाड्या तेथेच उभ्या करुन ५ मिनिटात पाड्यात पोहोचता येते. पाड्या पासून अर्ध्या तासात रामदरणेश्वर मंदिर आणि त्यापुढे अर्ध्या ते पाऊण तासात किल्ला गाठता येतो. या मार्गाने दिड तासात किल्ल्यावर जाता येते. (मध्ये खचलेला रस्ता दुरुस्त झाल्यास थेट रामदरणेश्वरच्या पायथ्या पर्यंत गाडीने जाता येईल. पाड्यापासून पुढे रस्ता बनवलेला आहे.) . रामदरणे किल्ल्यावर जाण्यासाठी हा सगळ्यात सोपा मार्ग आहे.
       २)चोरोंडे गावातून:- मुंबई अलिबाग मार्गावर पोयनाड गाव आहे. पोयनाड गावा बाहेर पेझारीला पोलिस चेक पोस्ट आहे. येथून एक रस्ता परहुरपाडा मार्गे चोरंडे गावापर्यंत जातो. चोरंडे गावापर्यंतचे अंतर ४ किमी आहे. या गावातील खेळाच्या मैदानावरुन पुढे गेल्यावर कनक मारुतीचं मंदीर आहे. त्याच्या बाजूने रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या मार्गाने दिड तासात किल्ल्यावर जाता येते.
        ३) परहुरपाडा गावातून:- मुंबई अलिबाग मार्गावर पोयनाड गाव आहे. पोयनाड गावा बाहेर पेझारीला पोलिस चेक पोस्ट आहे. येथून एक रस्ता परहुरपाडा मार्गे चोरंडे गावापर्यंत जातो. परहुरपाडा गावापर्यंतचे अंतर २ किमी आहे. या गावातील खेळाच्या मैदानावरुन पुढे गेल्यावर कनक मारुतीचं मंदीर आहे. त्याच्या बाजूने रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या मार्गाने दिड तासात किल्ल्यावर जाता येते.
       ४)भाल गावातून:- अलिबाग - किहीम - रेवस रस्त्यावर भाल नावाच गाव आहे. भाल गावातून रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे.या मार्गाने दोन तासात किल्ल्यावर जाता येते.
      ५)मुळे गावातून :- भाल गावाच्या अलिकडे मुळे नावाचं गाव आहे. मुळे गावातून रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. मार्गाने दोन तासात किल्ल्यावर जाता येते.
        ६) कार्ला गावातून :- रामदरणेश्वर डोंगराच्या दक्षिणेकडील बाजूला कार्ला गाव आहे. कार्ला गावातून रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे.
   आपण वायशेत गावातून रामदरणे गड कसा बघायचा याची माहिती घेउया.
रामदरणे किल्ल्यास भेट देण्यासाठी सर्वप्रथम अलीबाग-रेवसमार्गे ७ कि.मी. अंतरावरील वायशेत गाठावे. रामदरणे किल्ला गावकऱ्याना माहित नसुन किल्ल्याच्या अलीकडील डोंगरावर असलेले रामदरणेश्वर मंदिर मात्र सर्वानाच परिचित आहे त्यामुळे गावात किल्ल्याची चौकशी करण्याऐवजी या मंदिराची चौकशी करावी. किल्ला असलेल्या डोंगराखालील पठार अस्ताव्यस्त पसरलेले असुन या डोंगराखाली असलेल्या गावातुन पठारावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत पण वायशेत येथुन किल्ल्यावर जाणारी वाट सरळसोपी व जास्त रुळलेली आहे. वायशेत गावाच्या पुर्वेस दगडाची खुप मोठी खाण असुन या खाणीच्या वरील बाजुस टेकडीवर रामदरणेपाडा म्हणुन लहानशी आदिवासी वस्ती आहे. वायशेत गावातुन एमआयडीसी पाईपलाईन रोड ओलांडुन आपण या वस्तीवर येतो. या वस्तीच्या वरील बाजुस मातीचा बंधारा असलेला तलाव असुन तेथवर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे पण तो बऱ्याच ठिकाणी खचलेला असल्याने त्यावरून पायगाडी हाच उत्तम पर्याय आहे. वायशेत गावातुन रामदरणे पाड्यावर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. रामदरणेश्वर मंदिराकडे जाणारी वाट मळलेली असली तरी तेथुन पुढे किल्ल्यावर वावर नसल्याने शक्य झाल्यास या पाड्यावरुन वाटाड्या घ्यावा. पाड्याच्या वरील बाजुस एक प्रशस्त पठार असुन या पठारावर मातीचा बंधारा घालुन पाणी अडविलेला मोठा तलाव आहे. या तलावाच्या काठावर एक देवीमंदिर असुन या मंदिरात दहा-बारा जणांची राहण्याची सोय होते. या मंदिराच्या अलीकडून एक वाट समोरील डोंगरावर असलेल्या रामदरणेश्वर मंदिराकडे जाते. मंदिर असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आल्यावर एक वाट डाव्या बाजुने टेकडीवरील जिर्णोध्दारीत मंदिराकडे जाते तर एक वाट सरळ पुढे जाते.
 
पठारावर पोहोचताच समोर दिसणारे दोन डोंगर

   मंदिर न पहाता किल्ल्यावर जायचे असल्यास सरळ पुढे निघावे किंवा टेकडीवर चढुन मंदिर पाहुन दुसऱ्या बाजुने परत खाली उतरावे. पाड्यावरून या मंदिरापर्यंत येण्यास एक तास लागतो. 

रामदरणेश्वर मंदिराचा डोंगर

 

रामदरणेश्वर मंदिराचा नुकताच जिर्णोध्दार झालेला आहे. मंदिर ज्या डोंगरावर बांधलेले आहे त्याचा माथा खूपच छोटा आहे. हे रामदरणेश्वराचे मंदिर म्हणजे डोंगरमाथ्यावर बांधलेले दोन  खोल्या आणि अंगण असणारे एक छोटे कौलारू घरच.

रामदरणेश्वर मंदिर
मंदिराबाहेरील जुने नंदी

रामदरणेश्वराचे मंदिर




 फक्त मधे एक कळस बांधलेला असल्यामुळे ते मंदिर वाटते. इथे असणाऱ्या दोन खोल्यांपैकी गाभारा असणारी खोली थोडी छोटी तर सभामंडपाची खोली प्रशस्थ आहे.मंदिरातील मंडपाच्या दाराशी नंदी दिसतो. डाव्या बाजूला गणेशाची मूर्ती आणि मध्यभागी शंकरपिंडी व पार्वतीची मूर्ती आहे. या सर्व मूर्ती आणि शिवपिंडी ‘गंडकी पाषाण’ नावाच्या विशेष काळ्या पाषाणात कोरलेल्या आहेत. मंदिरासमोर एक छोटे ‘तुळशी वृंदावन’ असून, सतत जळणारी ‘धुनी’देखील दिसते.
     मंदिराच्या बाहेर, उजव्या बाजूला, काही प्राचीन मूर्ती दिसतात, ज्यात दगडात कोरलेले नंदी आणि हनुमानाची मूर्ती यांचा समावेश आहे. येथील विशेष आकर्षण म्हणजे तपकिरी लॅटेराइट दगडात कोरलेली शंकराची पिंडी. आतापर्यंत पाहिलेल्या सर्व प्राचीन मंदिरांमधील शंकराच्या पिंडी काळ्या दगडाच्या बनवलेल्या आहेत, परंतु येथे तपकिरी लॅटेराइट दगडात कोरलेली एक दुर्मिळ पिंडी आहे.
 मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि रमणीय आहे. मंदिर बंदिस्त असल्याने येथे १०/१५ लोकांच्या राहण्याची सोय होऊ शकते. मंदिराबाहेर जुन्या काळातील काही नंदी मांडून ठेवलेले आहेत.
मंदिर टेकडीच्या माथ्यावर असल्याने, चारही बाजूंनी दूरवरचा परिसर दिसतो. पश्चिमेला वारसोली बीच, अलिबाग, किहीम, सासवणे इत्यादी दिसतात. येथून रामधारणेश्वर तलाव दिसतो. पूर्वेला भवानी मंदिर आणि रामधारणे किल्ला दिसतो.
         रामदरणेश्वर  मंदीर व रामदरणे किल्ला यामध्ये एक उंच टेकाड असल्याने किल्ला मात्र दिसत नाही. मंदीर पाहुन खाली आल्यावर अथवा वाटेने सरळ पुढे आल्यास एक ओढा पार करताना त्यात पाण्याचे कुंड खोदलेले दिसते. या कुंडातील पाणी दुधी रंगाचे असुन गावकरी हे पाणी तीर्थ म्हणुन पिण्यास वापरतात. 
 
ओढा पार केल्यावर काही अंतरावर अजुन एक नव्याने बांधलेले भवानी देवीचे मंदिर दिसुन येते. रामदरणेश्वर मंदिरापासून पूर्वेकडे खाली उतरून भवानी मातेच्या मंदिरात पोहोचता येते. हा मार्ग तीव्र उताराचा आणि निसरडा आहे. शक्य असल्यास, येणाऱ्या मार्गाने खाली जा आणि भवानी मंदिरात पोहोचण्यासाठी मंदिराच्या टेकडीवर वळसा घ्या. रामदरणेश्वर मंदिराकडे (पिंडीकडे) तोंडकरून उभे राहिल्यावर डाव्या बाजूने एक पायवाट खाली उतरताना दिसते. या पायवाटेने मंदिराचा डोंगर आणि मंदिराच्या डाव्याबाजूला उठवलेला डोंगर यामधे असणाऱ्या सपाटीवर उतरायला लागायचे.
    पुढे साधारण १० मिनिटात तीव्र उतार उतरत दोन डोंगराच्यामधे असणाऱ्या सपाटीवर पोहोचतो तसे समोरच एक पत्र्याचे नव्याने झालेले बांधकाम दिसते. हे बांधकाम म्हणजे अलीकडेच जीर्णोद्धारीत केलेले देवीचे मंदिर होय. पूर्वी या ठिकाणी दोन कौलारू झोपड्या होत्या. नव्याने बांधलेल्या या मंदिरात अलीकडच्या काळातील एक देवीची मुर्ती तर काही जुने तांदळे ठेवलेले आहेत. मंदिराच्या बाहेर देखील काही जुन्या दगडी मुर्त्या असून त्या ओळखण्यापलीकडे खराब झालेल्या आहेत.  भवानी मंदिराजवळील एका ओढ्याच्या पात्रात ४ ते ५ लहान आकाराचे खड्डेही आढळतात. 

      रामदरणे किल्ल्यावर जाण्यासाठी या देवीच्या मंदिरात पोहोचणे फार गरजेचे आहे. कारण या मंदिरासमोर असणाऱ्या झाडीभरल्या डोंगराच्या बरोबर पाठीमागे रामदरणे किल्ला आहे. 
 
देवीचे मंदिर

किल्ल्याच्या वाटेवर झाडाखाली ठेवलेल्या काही कोरीव मुर्त्या

    मंदीरासमोर एक डोंगर असुन या मंदिराकडून खऱ्या अर्थाने किल्ला चढायला सुरवात होते. त्या डोंगराकडे निघालो कि जवळच अजून काही मूर्ती डावीकडे ठेवलेल्या दिसतात. ह्यात महिषासुर मर्दिनी आणि खंडोबाच्या मूर्ती सहज ओळखता येतात. अजूनही काही मूर्ती इथे आहेत. मंदिराकडून या डोंगरावर जाण्यास ठळक अशी वाट नसुन डोंगराच्या उजव्या बाजुने डोंगर चढण्यास सुरवात करावी. येथुन १५ मिनिटांचा उभा चढ चढुन गेल्यावर आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. येथुन समोर दिसणारी टेकडी म्हणजेच रामदरणे किल्ला पण तेथे जाण्यासाठी आपण आलो तो डोंगर उतरत किल्ला व डोंगर यामधील घळीत जावे लागते. 

दाट झाडात लपलेले चार फुटी वारूळ

समोरचा किल्ला आणि उतरलेला डोंगर याच्या मधल्या घळीत एक खुण म्हणजे चार फुटी वारुळ आहे. हि घळ म्हणजे किल्ल्याला या डोंगरापासून वेगळे करण्यासाठी मानवनिर्मित खाच आहे. घळीच्या वर किल्ल्याकडील बाजुस चौकीचे अवशेष असुन घळीत उजवीकडे व डावीकडे जाणाऱ्या पायवाटा दिसतात. डावीकडील पायवाट किल्ल्यावर तर उजवीकडील पायवाट पाण्याच्या टाक्याकडे जाते.

पाण्याचे पहिले कोरडे टाके
दुसरे कोरडे टाके
दुसऱ्या टाक्यातील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी खोदलेले चर

गडावरील खांब टाके

 टाक्याकडे जाणारी पायवाट टाक्यापुढील भागात मोठया प्रमाणात कोसळली असल्याने टाक्यापर्यंत पोहोचता येत नाही पण किल्ल्यावरून कातळात कोरलेली हि ३ टाकी पहाता येतात. अरुंद. पूर्वी वाट चांगली असावी पण पावसाने दरड कोसळून खूप लहान लहान दगड वाटेवर आलेले आहेत. सांभाळून गेल्यावर 10 मिनिटात गडाच्या अवशेषांचे म्हणजे टाक्याचे दर्शन होते. पहिल्या टाके, नंतर दुसरे टाके. त्यातून जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी सुंदर दगडी पन्हळ खोदलेली आहे. लगेचच पुढे तिसरे मोठे आणि 2 खांबांवर तोललेले टाके आहे. ह्या टाक्यात एका भिंतीवर गणपतीआदी देवांची चित्रे असलेल्या 2 फारश्या लावलेल्या आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे. इथूनच एक वाट खाली वायशेत गावाकडे जात असावी.

गडमाथ्यावरून दिसणारा सुंदर परिसर

गडाची तटबंदी व गोलाकार बुरुज
डावीकडील वाटेने वर चढत आल्यावर आपला एका बुरूजावरून गडमाथ्यावर प्रवेश होतो. वायशेत गावातुन येथवर येण्यास दोन ते अडीच तास लागतात. या ठिकाणी असलेला गडाचा दरवाजा व त्याची कमान पुर्णपणे नष्ट झालेली असुन दरवाजाशेजारी असणारे दोन्ही बुरुज व त्याशेजारील तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. बुरुज व तटबंदीच्या या बांधकामात कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. दरवाजात उभे राहिले असता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या परहूररपाडा गावातून किल्ल्यावर येणारी एक वाट नजरेस पडते. किल्ल्याचा दरवाजा पश्चिमाभिमुख असुन किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ७४० फुट उंच आहे. साधारण त्रिकोणी आकाराचा गडमाथा दिड एकर परिसरावर पसरला असुन किल्ल्यावर एका मोठया उध्वस्त वास्तुचे तसेच काही घरांचे अवशेष दिसुन येतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील सोंडेवरून तटबंदीखाली असलेली कातळात कोरलेली ३ टाकी दिसतात. किल्ल्यावरुन कार्ले खिंड, सागरगड, उंदेरी,खांदेरी आणि कनकेश्वर डोंगर इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. गडाचा घेरा फारच लहान असल्याने १५ मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते.

गडाचे उध्वस्त प्रवेशद्वार
गडावरील एका मोठ्या बांधकामाचे जोते

      याशिवाय बामनोली/भूते गावातून.देखील मार्ग आहे. बामनोलीमार्गे गेल्यास गाडी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचते. पण त्यानंतर तुम्हाला चालत जावे लागते. १५ ते २० मिनिटे चढल्यावर डाव्या बाजूला एक लहान झिरपणारी विहीर आहे. विहिरीच्या पलीकडे रामधारणेश्वर झिरपणारे सरोवर आहे. या सरोवराचे पाणी या विहिरीत झिरपते. उन्हाळ्यात डोंगर चढून थकल्यावर ही थंड आणि स्वच्छ पाण्याची विहीर एक सुखद आश्चर्य ठरते. विहिरीच्या थंड पाण्याचे शिंपण चेहऱ्यावर घेत प्रवास पुढे चालू ठेवला जातो. अंदाजे १० मिनिटे आणखी चढल्यावर आपण डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो आणि एकवीरा देवीचे छोटे मंदिर दृष्टीस पडते. मंदिराच्या मागे रामधारणेश्वर झिरपणारे सरोवर आहे. पर्वतीय पठारावरील हे सरोवरदेखील पाहण्यासारखे आहे. पावसाळ्यात हे सरोवर दुथडी भरून वाहते आणि पलीकडे एक सुंदर धबधबा तयार होतो.
       वैशेत सायमन कॉलनीकडे जाणारा रस्ताही येथेच येतो. या ठिकाणाहून पूर्वेकडे पायवाटेने चालत जा, तेव्हा तुम्हाला सपाट खडकावर पाण्याचे प्रवाह दिसतील. उन्हाळ्यात हा प्रवाह कोरडा असतो, पण पावसाळ्यात येथील दृश्य खूप सुंदर असते. हा प्रवाह ओलांडल्यानंतर, उजवीकडे जाण्याऐवजी डाव्या बाजूच्या पायवाटेने चालत राहा आणि सुमारे २० ते ३० मिनिटांत तुम्ही रामधारणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोहोचाल. हे मंदिर एका उंच टेकडीवर आहे आणि जर आपण सरळ उजवीकडे चालत गेलो तर पुढे भवानी मंदिर आणि रामधारणे किल्ला लागतो. मंदिरात पोहोचण्यासाठी आपल्याला डावीकडे जाणारी पायवाट घ्यावी लागते, दहा मिनिटांच्या चढाईनंतर आपण मंदिरात पोहोचतो.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
durgwedh.blogspot.com

रामदरणे किल्ला

Vinit Date

भटकंती रायगड जिल्ह्यातील अल्पपरिचित "रामदरणे" किल्ल्याची! 

 

पावसाळ्यात गडभटकंती आणि तीही गर्दीची ठिकाण टाळून? सध्या किल्ल्यावर होणाऱ्या गर्दीचे (कुंभमेळ्याचे) फोटो पाहून हे थोडं अवघडच काम वाटायला लागलंय. पण बाहेर पडणारा संततधार पाऊस आणि निसर्गाने सगळीकडे पांघरलेली हिरवीगार चादर माझ्यासारख्या भटक्याला घरी बसू देईल तर शपथ. मग शोध सुरु झाला अल्पपरिचित आणि अनवट वाटांचा. पुण्यातून पहाटे निघून जवळपास आणि फक्त एका दिवसाची गडभटकंती करायची असं ठरवल्यावर मग पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या किल्ल्यांच्या नावाची उजळणी सुरु झाली. तसे या तिन्ही जिल्ह्यातले जवळपास सगळे परिचित आणि अल्पपरिचित किल्ले आधीच भटकून झालेले असल्याने किल्ला करायचा तर तो शक्यतो याआधी न बघितलेला करावा असे ठरवल्यामुळे मग घरात असलेली गडकिल्ल्यावरील पुस्तके धुंडाळणे सुरु झाले. शेवटी दुर्गअभ्यासक आणि लेखक श्री. सचिन जोशी यांच्या "रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव" ह्या पुस्तकात अलिबाग जवळचा "रामदरणे" नावाचा किल्ला सापडला. आता येथे किल्ला सापडला म्हणजे किल्ला "शोधला" किंवा "सापडला" असा अर्थ नाही बरं. तर माझ्या लिस्टीत बघायचा राहून गेलेला किल्ला सापडला. होय आधीच स्पष्ट केलेलं बरं, कारण आजकाल हे दोन शब्द फार जपून वापरावे लागतात. पूर्ण माहिती न वाचताच यातून कोण आणि कुठला अन्वयार्थ काढेल सांगता येत नाही. असो, थोडं विषयांतर झालं. 

 

तर मग किल्ला ठरला आणि मोड ऑफ ट्रान्सपोर्टसाठी माझी "सह्याद्री एक्सप्रेस" दारात उभी होतीच. सोबतीला हक्काचा ट्रेकर मित्र प्रसाद परदेशी येणार म्हणल्यावर माझ्या गाडीतल्या पाच पैकी दोन जागा आधीच फिक्स झाल्या. मग ट्रेकिंगसंबंधी व्हॉट्सॲप ग्रुपवर हाक देताच ओंकार केळकर, कौस्तुभ पालेकर आणि निसर्गमित्र सातपुते काका बरोबर यायला तयार झाले आणि काही वेळातच उरलेल्या तीन जागा पण फुल्ल झाल्या. तसंही एखाद्या पूर्वी न पाहिलेल्या किल्ल्यावर जात असलो की सोबतीला शक्यतो समविचारी आणि नेहमीचे भटके मित्र सोबत असलेले बरे असतात. कारण होत काय की एकतर या किल्ल्यांच्या वाटा मळलेल्या नसतात त्यामुळे मग वाटा शोधणे आणि किल्ल्यावरील अवशेष शोधणे यात बराच वेळ जातो. आम्ही आपलं पुस्तकातली माहिती वाचत आणि संदर्भ जोडत किल्ला भटकतो. यासाठी मग बरोबर असलेल्या सवंगड्यामधे पेशन्स असणे गरजेचे असते. काही अवशेष दिसलेच तर चांगलं, नाहीच दिसले तर शेवटी एखादी डोंगर भटकंती पदरात पडल्याचं समाधान मानून घरी परततो. पण कुणा नवीन ट्रेकरला बरोबर नेऊन दीड-दोन तास एखादा डोंगर चढवायचा आणि वर जाऊन दाखवायचं काय तर थोडीफार शिल्लक राहिलेली तटबंदी आणि एक-दोन पाण्याची कोरडी ठाक पडलेली टाकी. त्यामुळे मग राजगड, तोरणा, लोहगड, सिंहगड आणि असे भरपूर दुर्गावशेष असणारे किल्ले पाहिलेल्या ट्रेकरच्या चेहऱ्यावर तो सांगत नसला तरी काहीच पहायला न मिळाल्याची निराशा दिसत असते. 

 
ट्रेकर मंडळ: विनीत दाते, कौस्तुभ पालेकर, प्रसाद परदेशी, ओंकार केळकर आणि विजय सातपुते (काका)


तर यावेळी देखील नेहमीचे सवंगडी एकत्र जमले आणि सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी ६ वाजता चिंचवड येथे माझ्या घरी जमून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. घरातून निघाल्यापासून पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे आज हा पाऊस दिवसभर आपली सोबत करणार याची खात्री झाली. आम्ही कामशेत ओलांडले तसे पावसाने चांगलाच जोर धरला. जातानाचा प्रवास लोणावळामार्गे जुन्या मुंबई-पुणे रस्त्यानेच करू असे ठरवले कारण पुर्वानुभवानुसार विकेंड आणि रविवार असला तरी सकाळी ७ वाजता काही सो कॉल्ड पिकनिक पब्लिक अजून लोणावळ्यात येत नाही हे ठाऊक होते. अगदी झालेही तसेच लोणावळा, खंडाळा दोन्हीकडे ट्राफिकमधे न अडकता अमृतांजन पूल ओलांडला आणि खंडाळा-खोपोली दरम्यान सर्वांना चकटफू (फ्री-वे) असणाऱ्या एक्सप्रेस हायवेला लागलो. पण थोडे अंतर जातोय न जातोय तोच लांबपर्यंत वाहनांच्या रांगा दिसायला लागल्या. पुणे-मुंबई प्रवास विना ट्राफिकचा घडणे यासाठी बहुदा फार पुण्य गाठीशी असावे लागते. आमच्या गाठीशी ते नाही हे समोरच्या ट्राफिक जॅम वरून दिसतच होते. पुढे जवळ जवळ अर्धा तास गाडी एकाच जागी थांबलेली होती. आजूबाजूच्या डोंगरावरून असंख्य पाण्याचे ओहोळ दुथडी भरून वाहत होते. काही पब्लिक तर तेवढ्या ट्राफिकमधे सुद्धा गाडीतून उतरून त्या छोट्या पाण्याच्या ओहोळांमधे भिजण्याचा आणि सेल्फी काढण्याचा आनंद घेत होती. आता यांना कोण सांगणार की बाबांनो तुम्ही एक्सप्रेस हायवेवर आहात. म्हणलं चालुदे, आम्ही आपले शांत गाडीत बसून मराठी भावगीतांचा आस्वाद घेत तो पोरकटपणा पहात होतो. शेवटी हळूहळू ट्राफिक सुटले आणि गाड्यांच्या गराड्यातून बाहेर पडलो. संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगराच्या बाजूचा अर्धा हायवे बंद केला होता आणि त्यामुळेच हे ट्राफिक जॅम झाले हे थोडे पुढे आल्यावर  लक्षात आले. 

 

एक्सप्रेस हायवेला खोपोली एक्झिट घेतला आणि शिळफाटा येथे खोपोली-पेण रस्त्याला लागलो तोपर्यंत घड्याळात ८ वाजले होते. मग पाली फाट्यावर असणाऱ्या "हॉटेल मयुरी स्नॅक्स" येथे गरमागरम वडापाव, पोहे आणि इडली सांबर अशी यथेच्छ खादाडी केली आणि ९ वाजता पुढच्या प्रवासाला निघालो. पेण गावाच्या अलिकडे असणारा पेण-खोपोली बायपास घेऊन तरणखोप येथे मुंबई-गोवा हायवेला लागलो तसे पुन्हा एकदा ट्राफिक जॅम आमच्या स्वागताला हजर होतेच. आता पेण ते वडखळ दरम्यान होणारी वाहतूकीची कोंडी म्हणजे तर अनेक वर्षापासूनचा वनवास. हे अंतर किती तर फक्त ७ किमी पण पेणवरून वडखळ नाक्याला पोहोचण्यासाठी वेळ लागतो किती तर तब्बल ४५ मिनिटे. अलिबाग परिसरात जायचे म्हणले की या वाहतूक कोंडीच्या दिव्यातून जाण्याशिवाय पर्याय नसतो. भरीस भर म्हणून पेण ते वडखळ दरम्यान असणारा भयंकर रस्ता. अहो रस्ता कसला खड्ड्यांची चाळणीच म्हणा की. येथे खड्डे चुकवायला चान्सच नाही. एक खड्डा चुकवायला गेलो की गेली गाडी दुसऱ्या खड्ड्यात. त्यामुळे "खा दणके, चालव गाडी" असं करत करत कसेबसे त्या ट्राफिकमधून बाहेर पडलो आणि १०.१५ च्या सुमारास कार्ले खिंडीत पोहोचलो.

 

अलिबाग शहरापासून फक्त ८ किलोमीटरवर अंतरावर असणारी कार्ले खिंड ही तशी पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. चौल, रेवदंडा या परिसरातून पेण, पनवेल, कल्याण परिसरात जाण्यासाठी कार्ले खिंडीचा वापर होत असे. अलिबाग तालुक्यात फक्त दोनच गिरिदुर्ग आहेत आणि हे दोन्ही गिरीदुर्ग या कार्ले खिंडीच्या आसपासच आहेत. यातील एक किल्ला म्हणजे इतिहासप्रसिद्ध सागरगड उर्फ खेडदुर्ग तर दुसरा म्हणजे कार्ले खिंडीला अगदी लागून असणारा रामदरणे किल्ला. यापैकी सागरगड हा किल्ला त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या "धोंदाणे" धबधब्यामुळे पावसाळी भटकंतीसाठी ट्रेकर्समधे बराच प्रसिद्ध आहे तर त्याच्या अगदी समोर असणारा रामदरणे किल्ला मात्र थोडक्या अवशेषांमुळे ट्रेकर्सपासून अल्पपरिचित राहिलेला आहे. 

 

रामदरणे किल्ल्याची जी माहिती वाचली होती त्यामधे श्री. सचिन जोशी यांच्या पुस्तकानुसार किल्ल्यावर जाणारी वाट ही कार्ले खिंडीतून थळ या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील परहूर गावातून होती तर ट्रेकक्षितीज संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे किल्ल्याची वाट कार्ले खिंडीच्या थोडे आणखी पुढे किहीम-रेवसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वायशेत गावातून होती. त्यामुळे आता आमच्यासमोर प्रश्न उभा ठाकला कि किल्ल्यावर नेमके जावे कुठून. मग कार्ले खिंडीतच भेटलेल्या काही स्थानिकांकडे आम्ही रामदरणे किल्ल्याविषयी चौकशी केली तसे सगळ्यांनीच आम्हाला सागरगडाची माहिती सांगायला सुरवात केली. यावरून असे लक्षात आले की रामदरणे किल्ला हा या परिसरातील लोकांना देखील फारसा माहित नाही. पण जेव्हा रामदरणेश्वर मंदिराचा उल्लेख निघाला तेव्हा तेथे बसलेल्या एका वृद्ध काकांनी रामदरणेश्वर मंदिराच्या समोर असणाऱ्या एका डोंगरावर पाण्याची काही टाकी आहेत असे सांगितले. पण त्यांनी देखील ती टाकी प्रत्यक्ष पाहिली नव्हती तर त्या टाक्यांच्याबद्दल फक्त ऐकून होते. त्या काकांनी आम्हाला एक पर्याय सुचवला. त्यांनी सांगितले की कार्ले खिंडीतून थळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सोगाव नावाच्या गावापाठीमागे डोंगरउतारावर एक आदिवासी पाडा आहे. त्या पाडयावरून रामदरणेश्वर मंदिर सगळ्यात जवळ आहे. तेव्हा त्या पाडयावरून एखादा माणूस बरोबर घ्या आणि आधी रामदरणेश्वर मंदिर गाठा. मग त्या स्थानिक माणसाच्या सोबतीनेच तुमची पाण्याची टाकी का किल्ला काय तो हुडका. पर्याय उत्तमच होता कारण संततधार पडणारा पाऊस आणि त्या परिसरातील डोंगरावर जमा झालेले धुके यामुळे दिशाभूल होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे त्या परिसराची माहिती असणारा एखादा स्थानीक आमच्या बरोबर असणे अत्यंत गरजेचे होते. काकांचे आभार मानले आणि कार्ले खिंडीपासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर असणारे सोगाव गाठले.

सोगाव गावात पोहोचताच गावाच्या नावाची पाटी रस्त्याच्या डाव्याबाजूला लावलेली आहे. त्या पाटीच्या बरोबर मागे एक सिमेंटचा रस्ता गावापाठीमागे डोंगरपायथ्याशी वसलेल्या एका आदिवासी पाडयावर जातो. या रस्त्याने थोडा चढ चढून गाडी आदिवासी पाड्यासमोर उभी केली. पाडयावर पुन्हा एकदा किल्ल्यांच्या अवशेषांबद्दल काही माहिती आहे का याची चौकशी केली. पण पाडयावरील लोकांनासुद्धा फक्त रामदरणेश्वराचे मंदिर आणि त्याच्या पायथ्याला असणारे एक देवीचे मंदिर एवढीच काय ती माहिती होती. मी वाचलेल्या किल्ल्याच्या माहितीप्रमाणे एका देवीच्या मंदिरापासूनच किल्ल्यावर जाणारी वाट होती त्यामुळे इथल्या माणसांना थोडी जास्तीची माहिती आहे हे ऐकून आनंद झाला. मग पाडयावरच्या नितीन नावाच्या एका तरुण पोराला बरोबर घेऊन त्याच वस्तीच्या मागे असणाऱ्या डोंगर चढाईला भिडलो. 

 

ट्रेकला सुरवात केली तेव्हा घड्याळात सकाळचे ११ वाजले होते. पुढे साधारण १५ मिनिटांचा खडा चढ चढून आदिवासी पाडयामागे असणाऱ्या टेकडीवर पोहोचलो तसे एका अस्ताव्यस्त पसरलेल्या पठाराने आमचे स्वागत केले. या पठारावर सर्वत्र पडलेला काळ्या दगडांचा सडा, त्यामधून उगवलेले हिरवेगार गवत आणि या सगळ्यातून वाट काढत वाहणारे छोटे मोठे पाण्याचे प्रवाह हे सर्व वातावरण टिपिकल पावसाळी भटकंतीचा फील देत होते. पठारावर पोहोचलो तसे समोरच दोन डोंगर उठलेले दिसत होते. त्यातील उजव्याबाजूचा डोंगर थोडा उंच आणि झाडीभरल्या माथ्याचा होता तर डावीकडचा डोंगर तुलनेने बराच छोटा व फक्त हिरव्यागार गवताने आछादलेला होता. रामदरणेश्वराचे मंदिर असणारा डोंगर मात्र या दोन्ही डोंगरांच्या मागे असल्याने दिसला नाही. मग समोर असणाऱ्या दोन्ही डोंगरांच्यामधे तयार झालेल्या थोडक्या सपाटीवर पोहोचणे हे पाहिले टार्गेट मानून समोरच्या डोंगराचा चढ चढण्यास सुरवात केली. 

 

पठारावर पोहोचताच समोर दिसणारे दोन डोंगर

 

पाडयापासून साधारण अर्ध्या तासात आम्ही दोन डोंगरांमधे असणाऱ्या सपाटीवर पोहोचलो तसे समोर आणखी एक झाडीभरला डोंगर दिसायला लागला. याच झाडीभरल्या डोंगरावर रामदरणेश्वराचे मंदिर आहे असे वाटाडयाकडून कळाले. मग समोर दिसणाऱ्या डोंगराच्या माथ्यावरील मंदिर गाठणे हे पुढचे टार्गेट ठरवून त्यादिशेने चालायला सुरवात केली. पुढे दाट झाडीतून जाणाऱ्या पायवाटेने खडा चढ चढत १५ मिनिटात रामदरणेश्वर मंदिराच्या पुढ्यात दाखल झालो तेव्हा घड्याळात दुपारचे १२ वाजले होते. म्हणजे पायथ्याच्या आदिवासी पाड्यापासून या मंदिरापर्यंत पोहोचायला १ तास लागला होता.


रामदरणेश्वर मंदिराचा डोंगर
रामदरणेश्वर मंदिर असलेल्या डोंगराच्या आजूबाजूचे सुंदर जंगल

रामदरणेश्वर मंदिराचा नुकताच जिर्णोध्दार झालेला आहे. मंदिर ज्या डोंगरावर बांधलेले आहे त्याचा माथा खूपच छोटा आहे. हे रामदरणेश्वराचे मंदिर म्हणजे डोंगरमाथ्यावर बांधलेले दोन  खोल्या आणि अंगण असणारे एक छोटे कौलारू घरच. फक्त मधे एक कळस बांधलेला असल्यामुळे ते मंदिर वाटते. इथे असणाऱ्या दोन खोल्यांपैकी गाभारा असणारी खोली थोडी छोटी तर सभामंडपाची खोली प्रशस्थ आहे. गाभाऱ्यात शिवपिंड असून बाहेरील खोलीत अलीकडच्या काळातील नंदी, गणपती आणि अजून एका देवतेची मूर्ती ठेवलेली आहे. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि रमणीय आहे. मंदिर बंदिस्त असल्याने येथे १०/१५ लोकांच्या राहण्याची सोय होऊ शकते. मंदिराबाहेर जुन्या काळातील काही नंदी मांडून ठेवलेले आहेत. 

रामदरणेश्वर मंदिर
मंदिराबाहेरील जुने नंदी

रामदरणेश्वराचे मंदिर हे या डोंगररांगेतल्या सर्वोच्च डोंगरावर असल्यामुळे येथून खूप लांबवरचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. मंदिर जरी सर्वोच्च स्थानी असले तरी येथून रामदरणे किल्ला मात्र दिसत नाही. मंदिराचा जो उंच डोंगर आहे त्याच्या डावीकडे आणखी एक झाडीभरला डोंगर उठवलेला आहे. या डोंगरापलिकडे रामदरणे किल्ला लपला आहे. हो लपला आहे असच म्हणावं लागेल कारण रामदरणेश्वराचे मंदिर असणारा डोंगर आणि किल्ल्याचा डोंगर यांच्यामध्ये आलेल्या डोंगराची उंची किल्ल्याच्या डोंगरापेक्षा थोडी जास्त आहे. आम्ही मंदिरात पोहोचलो तसे पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली आणि मंदिर व आजूबाजूचा सर्व परिसर दाट धुक्याने व्यापून गेला. पावसाचा जोर थांबेल अशी आशा बाळगून थोडा वेळ मंदिरात वाट पहात बसलो. तोपर्यंत बरोबर आणलेल्या चिवडा, मसाला पुरी आणि इतर कोरड्या खाऊ वर ताव मारला. पण बराच वेळ वाट पाहून सुद्धा जेव्हा पाऊस थांबायचं नाव घेईना तेव्हा मग बरोबर असणाऱ्या वाटाड्याच्या मदतीने तसेच भर पावसात पुढचा मार्ग शोधण्याचा विचार पक्का झाला. 

 

रामदरणेश्वर मंदिराकडे (पिंडीकडे) तोंडकरून उभे राहिल्यावर डाव्या बाजूने एक पायवाट खाली उतरताना दिसते. या पायवाटेने मंदिराचा डोंगर आणि मंदिराच्या डाव्याबाजूला उठवलेला डोंगर यामधे असणाऱ्या सपाटीवर उतरायला लागलो. पुढे साधारण १० मिनिटात तीव्र उतार उतरत दोन डोंगराच्यामधे असणाऱ्या सपाटीवर पोहोचलो तसे समोरच एक पत्र्याचे नव्याने झालेले बांधकाम दिसले. हे बांधकाम म्हणजे अलीकडेच जीर्णोद्धारीत केलेले देवीचे मंदिर होय. पूर्वी या ठिकाणी दोन कौलारू झोपड्या होत्या असे वाटाड्याकडून कळाले. नव्याने बांधलेल्या या मंदिरात अलीकडच्या काळातील एक देवीची मुर्ती तर काही जुने तांदळे ठेवलेले आहेत. मंदिराच्या बाहेर देखील काही जुन्या दगडी मुर्त्या असून त्या ओळखण्यापलीकडे खराब झालेल्या आहेत. मी परिसराचा अंदाज घेण्यासाठी गुगल मॅपवर झूम करून पाहिले तर एका डोंगरावर पांढऱ्या रंगातले रामदरणेश्वराचे मंदिर तर त्याच डोंगराच्या पायथ्याशी निळ्या पत्र्याच्या शेडने बांधलेले देवीचे मंदिर स्पष्टपणे दिसत होते (GPS लोकेशन खाली देत आहे). रामदरणे किल्ल्यावर जाण्यासाठी या देवीच्या मंदिरात पोहोचणे फार गरजेचे आहे. कारण या मंदिरासमोर असणाऱ्या झाडीभरल्या डोंगराच्या बरोबर पाठीमागे रामदरणे किल्ला आहे. 

 

 

देवीच्या मंदिरापासून खऱ्या अर्थाने किल्ला चढायला सुरवात होते. त्यासाठी देवीच्या मंदिरासमोर असणाऱ्या डोंगरावर एक पुसटशी पायवाट गेलेली दिसते. या पायवाटेने डोंगर चढण्यास सुरवात करायची. मंदिरापासून साधारण १० मिनिटांचा चढ चढून गेलो की पायवाटेच्या डाव्याबाजूला झाडीत काही मुर्त्या उघड्यावर ठेवलेल्या दिसतात. महिषासुर मर्दीनी, खंडोबा आणि इतर काही देवतांच्या खूप सुंदर कोरीव मुर्त्या येथे ठेवलेल्या आहेत. या देवतांचे दर्शन घ्यायचे आणि आता उरलेला डोंगर चढून जायचा. पुढील पाचच मिनिटात आपण या डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो तशी पायवाट पुन्हा खाली समोर एका डोंगराकडे उतरताना दिसते. हा समोर दिसणारा डोंगर म्हणजेच रामदरणे किल्ला होय. 

किल्ल्याच्या वाटेवर झाडाखाली ठेवलेल्या काही कोरीव मुर्त्या

किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेने उतरायला सुरवात करताच किल्ल्याचा डोंगर आणि आत्ता आपण चढून आलेला डोंगर यामधे एक छोटी घळ आहे. हि घळ म्हणजे किल्ल्याला या डोंगरापासून वेगळे करण्यासाठी बनवलेली मानवनिर्मित खाच. या घळीत उतरताच पायवाटेच्या उजव्या हाताला झाडाखाली एक ४ फ़ुटी वारुळ दिसते. किल्ला व्यवस्थित फिरण्यासाठी आणि आल्यावाटेने परत जाण्यासाठी या वारुळाची खुण खूप महत्वाची आहे. या वारूळापासून उजव्या बाजूला खाली उतरणारी एक पाऊलवाट गडावरील तीन कातळकोरीव टाक्यांकडे जाते तर डाव्या बाजूला वर जाणारी पायवाट किल्ल्यावर घेऊन जाते. आपण प्रथम वारुळच्या मागे उजवीकडे जाणारी पायवाट पकडायची आणि पाण्याच्या टाक्यांकडे जाण्यास निघायचे. पाण्याच्या टाक्यांकडे जाणारी वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालत किल्ल्याच्या पिछाडीला जाते. ही वाट अनेक ठिकाणी ढासळलेली असल्याने खूप जपून आणि काळजीपूर्वक पार करावी लागते. वारुळापासून साधारण १० मिनिटात आपण पाण्याच्या टाक्यांपाशी पोहोचतो.

दाट झाडात लपलेले चार फुटी वारूळ

 

येथे कातळात कोरलेली ३ टाकी दिसतात. त्यापैकी पहिली दोन टाकी बुजलेली असून दुसऱ्या टाक्यातील जास्तीचे पाणी बाहेर जाण्यासाठी कातळात चर खोदलेला आहे. तिसरे टाके मात्र प्रशस्त खांब टाके असून या टाक्याचे छत दोन खांबांवर तोललेले आहे. या टाक्याच्या एका कोपऱ्यातील भिंतींवर काही देवतांची चित्र असलेल्या टाईल्स लावलेल्या आहेत. या खांब टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असून गडपायथ्याच्या आदिवासी पाड्यापासून या ठिकाणी पोहोचेपर्यंत फक्त याच ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. येथे आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या आणि उर्वरित गडभटकंती करण्यासाठी पुन्हा आलेल्या पायवाटेने वारुळाजवळ पोहोचायचे.

 
पाण्याचे पहिले कोरडे टाके
दुसरे कोरडे टाके
दुसऱ्या टाक्यातील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी खोदलेले चर

गडावरील खांब टाके

 

आता वारुळासमोर असणाऱ्या डाव्याहाताच्या पायवाटेने गडमाथ्याकडे निघायचे. या वाटेने वर चढत असताना घडीव दगड एकमेकांवर रचून तयार केलेल्या एका गोलाकार बांधीव बुरूजावरून आपला गडावर प्रवेश होतो. मात्र ही गडाची मूळ वाट नसावी. इतिहासकाळात हा गोलाकार बुरुज आणि त्याच्या जवळच असणाऱ्या एकसलग तटबंदीमधून गडावर प्रवेश होत असावा किंवा त्यामधे किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे असे वाटते. पण या गोलाकार बुरुजावर व तटबंदीच्या आजूबाजूला प्रचंड झाडी वाढलेली असल्याने त्या वाटेने खाली उतरून हे अवशेष पाहणे शक्य होत नाही.

 
गडमाथ्यावरून दिसणारा सुंदर परिसर

गडाची तटबंदी व गोलाकार बुरुज

बुरुजापासून वर चढणाऱ्या पायवाटेने उध्वस्त दरवाज्यातून आपला गडप्रवेश होतो आणि पुढच्या पाचच मिनिटात आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. किल्ल्याचा माथा म्हणजे एक छोटेसे पठार असून त्यावर एका मोठया उध्वस्त वास्तुचे अवशेष फक्त दिसून येतात. किल्ल्यावरून सभोवार नजर फिरवताच दक्षिणेला सागरगड किल्ला, उत्तरेला भगवान महादेवाचे जागृत स्थान असणारा कनकेश्वराचा डोंगर तर पश्चिमेला अथांग पसरलेला सागरकिनारा आणि त्यातील कुलाबा, सर्जेकोट, खांदेरी व उंदेरी असे जलदुर्ग दिसतात. रामदरणे किल्ल्याचा इतिहास ज्ञात नसला तरी किल्ल्याचे भौगोलिक स्थान आणि याचा थोडका आकार पाहाता या किल्ल्याचा उपयोग मुख्यता टेहळणीसाठी व मोजकी शिबंदी ठेवण्यासाठी केला जात असावा.

 
गडाचे उध्वस्त प्रवेशद्वार
गडावरील एका मोठ्या बांधकामाचे जोते















किल्ल्यावरील थोडके अवशेष पाहून दुपारी २ वाजता आम्ही किल्ला उतरण्यास सुरवात केली. समोरील डोंगर उतरून पुन्हा देवीच्या मंदिरापाशी परतलो. आता रामदारणेश्वराचे मंदिर असणारा डोंगर न चढता त्या डोंगराला बगल देत तसेच पठारावरून चालत पुढील ४५ मिनिटात आदिवासी पाड्यात परत आलो. वाटाड्या उर्फ नितीनला त्याची योग्य ती बिदागी देऊन त्याचा निरोप घेतला आणि दोन छत्र्यांच्या आडोशात पटापट ओले कपडे बदलले. सकाळी ८ ला केलेल्या नाष्ट्यानंतर पोटभर काही खाल्ले नसल्याने आणि त्यात दिवसभर पावसात भिजल्यामुळे सपाटून भूक लागली होती. पण दुपारी ४ वाजता एखादे हॉटेल उघडे असण्याची आणि गरमागरम जेवण मिळण्याची शक्यता कमीच होती. मिळेल ते खाऊ आणि लवकर पुण्याला परत जाऊ असे ठरवून सोगाव गावातून बाहेर पडलो. कार्ले खिंडीच्या रस्त्याला लागलो तसे परहूर गावाजवळ एक बरे हॉटेल दिसले. सहज म्हणून त्यांना जेवण मिळेल का असे विचारले असता त्यांनी गरमागरम चपात्या, दाल तडका आणि व्हेज कोल्हापुरी बनवून दिली. मग काय येथेच्छ जेवण करून ५ वाजता पुण्याच्या दिशेने निघालो. पुन्हा वडखळ नाका ते पेण-खोपोली बायपास या ७ किलोमीटरच्या अंतरात भयंकर ट्राफिकमधे अडकलो. रात्री १० पर्यंत लोणावळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता दोन पैसे जास्त गेले तरी हरकत नाही पण परतीचा प्रवास एक्सप्रेस हायवेनेच करायचा असे ठरवून पेण-खोपोली रस्त्यावरून एक्सप्रेस हायवेकडे वळालो. चांगला १७३ रुपयांचा टोल फाडला पण सुदैवाने एक्सप्रेस हायवेला कोठेही ट्राफिक न लागल्याने भरलेले पैसे वसूल झाल्यासारखे वाटले. चिंचवडला घरी पोहोचलो तेव्हा घड्याळात रात्रीचे ९ वाजले होते. 






alibagonline-com.translate.goog

RamDharaneshwar

पत्ता : रामधरेश्वर, बामणोली जवळ, अलिबाग

हे अलिबागजवळच्या डोंगराळ भागात वसलेले आणखी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अप्रतिम असते. हिरव्यागार पर्वतांनी वेढलेले “रामधारणेश्वर मंदिर” हे ट्रेकर्स तसेच पावसाळ्यातील छोट्या सहलींसाठी एक आवडते ठिकाण आहे.

कसे पोहोचावे-

रामधरनेश्वरला पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक वायशेत गावातून सायमन कॉलनीमार्गे आणि दुसरा बामनोली/भूते गावातून. हे दोन्ही सोयीचे मार्ग आहेत. बामनोलीमार्गे गेल्यास गाडी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचते. पण त्यानंतर तुम्हाला चालत जावे लागते.

१५ ते २० मिनिटे चढल्यावर डाव्या बाजूला एक लहान झिरपणारी विहीर आहे. विहिरीच्या पलीकडे रामधारणेश्वर झिरपणारे सरोवर आहे. या सरोवराचे पाणी या विहिरीत झिरपते. उन्हाळ्यात डोंगर चढून थकल्यावर ही थंड आणि स्वच्छ पाण्याची विहीर एक सुखद आश्चर्य ठरते. विहिरीच्या थंड पाण्याचे शिंपण चेहऱ्यावर घेत प्रवास पुढे चालू ठेवला जातो. अंदाजे १० मिनिटे आणखी चढल्यावर आपण डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो आणि एकवीरा देवीचे छोटे मंदिर दृष्टीस पडते. मंदिराच्या मागे रामधारणेश्वर झिरपणारे सरोवर आहे. पर्वतीय पठारावरील हे सरोवरदेखील पाहण्यासारखे आहे. पावसाळ्यात हे सरोवर दुथडी भरून वाहते आणि पलीकडे एक सुंदर धबधबा तयार होतो.

वैशेत सायमन कॉलनीकडे जाणारा रस्ताही येथेच येतो. या ठिकाणाहून पूर्वेकडे पायवाटेने चालत जा, तेव्हा तुम्हाला सपाट खडकावर पाण्याचे प्रवाह दिसतील. उन्हाळ्यात हा प्रवाह कोरडा असतो, पण पावसाळ्यात येथील दृश्य खूप सुंदर असते. हा प्रवाह ओलांडल्यानंतर, उजवीकडे जाण्याऐवजी डाव्या बाजूच्या पायवाटेने चालत राहा आणि सुमारे २० ते ३० मिनिटांत तुम्ही रामधारणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोहोचाल. हे मंदिर एका उंच टेकडीवर आहे आणि जर आपण सरळ उजवीकडे चालत गेलो तर पुढे भवानी मंदिर आणि रामधारणे किल्ला लागतो. मंदिरात पोहोचण्यासाठी आपल्याला डावीकडे जाणारी पायवाट घ्यावी लागते, दहा मिनिटांच्या चढाईनंतर आपण मंदिरात पोहोचतो.

रामधारनेश्वर मंदिर-

मंदिरातील मंडपाच्या दाराशी नंदी दिसतो. डाव्या बाजूला गणेशाची मूर्ती आणि मध्यभागी शंकरपिंडी व पार्वतीची मूर्ती आहे. या सर्व मूर्ती आणि शिवपिंडी ‘गंडकी पाषाण’ नावाच्या विशेष काळ्या पाषाणात कोरलेल्या आहेत. मंदिरासमोर एक छोटे ‘तुळशी वृंदावन’ असून, सतत जळणारी ‘धुनी’देखील दिसते.

मंदिराच्या बाहेर, उजव्या बाजूला, काही प्राचीन मूर्ती दिसतात, ज्यात दगडात कोरलेले नंदी आणि हनुमानाची मूर्ती यांचा समावेश आहे. येथील विशेष आकर्षण म्हणजे तपकिरी लॅटेराइट दगडात कोरलेली शंकराची पिंडी. आतापर्यंत पाहिलेल्या सर्व प्राचीन मंदिरांमधील शंकराच्या पिंडी काळ्या दगडाच्या बनवलेल्या आहेत, परंतु येथे तपकिरी लॅटेराइट दगडात कोरलेली एक दुर्मिळ पिंडी आहे.

मंदिर टेकडीच्या माथ्यावर असल्याने, चारही बाजूंनी दूरवरचा परिसर दिसतो. पश्चिमेला वारसोली बीच, अलिबाग, किहीम, सासवणे इत्यादी दिसतात. येथून रामधारणेश्वर तलाव दिसतो. पूर्वेला भवानी मंदिर आणि रामधारणे किल्ला दिसतो.

भवानी मंदिर आणि खड्डे –

मंदिरापासून पूर्वेकडे खाली उतरून भवानी मातेच्या मंदिरात पोहोचता येते. हा मार्ग तीव्र उताराचा आणि निसरडा आहे. शक्य असल्यास, येणाऱ्या मार्गाने खाली जा आणि भवानी मंदिरात पोहोचण्यासाठी मंदिराच्या टेकडीवर वळसा घ्या. आम्हाला भवानी मंदिराजवळील एका ओढ्याच्या पात्रात ४ ते ५ लहान आकाराचे खड्डेही आढळले. अलिबागच्या परिसरात असे खड्डे कुठे आढळू शकतात, हे ऐकलेले नाही.

रामधारनेश्वर किल्ला –

पूर्वेकडील भवानी मंदिराच्या दिशेने २० मिनिटांत रामधारनेश्वर किल्ल्यावर पोहोचता येते, किल्ल्याचे फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर शांत असल्यामुळे, येथे विविध प्रकारचे पक्षी आणि त्यांचा किलबिलाट सतत ऐकू येतो. परत येताना आम्हाला काही दुर्मिळ पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला.

लावा बॉम्ब –

पर्वताच्या पायथ्याशी अनेक गोलाकार दगड आहेत, पर्वताच्या निर्मितीदरम्यान लाव्हा हवेत वाहून थंड झाल्यावर हे वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार दगड तयार झाले असावेत.

तिथे कसे पोहोचायचे?

रामधरनेश्वरला पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक वायशेत गावातून सायमन कॉलनीमार्गे आणि दुसरा बामनोली/भूते गावातून. हे दोन्ही सोयीचे मार्ग आहेत. बामनोलीमार्गे गेल्यास गाडी डोंगराच्या पायथ्याशी पोहोचते. पण त्यानंतर तुम्हाला चालत जावे लागते.

  • बामनोली अलिबाग – ०४ किमी
  • वायशेत अलिबाग – ०६ किमी
  • पुणे अलिबाग:- १४५ किमी
  • मुंबई अलिबाग :- १२० किमी
  •  
  •  

रविवारचा ट्रेक(9-3-25)
रामदरणे गड 🚩
जि. रायगड
पायथाचे गाव-भुते.
(पुणे-पेण-पोयनाड-भुते)
एक अपरिचित टेहाळणीचा किल्ला.
भटकंतीसाठी चांगला ए किल्ला. असंख्य ढोरवाटा. त्यातून अंदाज घेत गड सर करावा लागतो.
गडाचा मुख्य डोंगर येतो तेंव्हा खिंडीत मुख्य वाटेला एक पुसटशी वाट उजवी कडे फुटते तीच टाक्यांकडे जाते. अत्यंत निमुळती व निसरडी वाट असल्यामुळे सांभाळून जावे लागते. टाक्या बघुन पुन्हा परत येऊन मळलेल्या मुख्य वाटेने गडावर जावे.
रामदरणेश्वर मंदिराचे दर्शन घ्यायचे असल्यास गडाकडे जातांना डाव्या हाताला असलेल्या टेकडीवर saperate चढुन परत ऊतरावे लागते.










 "Trek Alert" नावाचा एक प्रकार आहे. पत्र आल्यावर जसा आनंद होतो, ना तसाच आनंद असला alert आल्यावर होतो. आत्ताचा alert होता "रामदरणे" किल्ल्याचा.

"सह्याद्रीचे ट्रेकर" वगैरे म्हणवून घेणाऱ्या बहुतांशी लोकांना सुद्धा हा किल्ला माहित नसेल, तर माझ्यासारख्या भटक्याची गोष्टच सोडा. पण असलं नांव वाचून मला प्रचंड आनंद होतो. जत्रा नक्की नसणार या ठिकाणी, निवांत किल्ला पाहता येणार आणि मनसोक्त फोटो पण काढायला मिळणार. फक्त एकच मानसिक तयारी हवी. "किल्ला" म्हणून त्यावर काय बघायला मिळेल हे सांगता येत नाही. पण किल्ला नेमका कुठे दडलाय ते शोधणे आणि त्यावरचे अवशेष शोधून एकमेकांना दाखवणे ह्यात प्रचंड आनंद असतो हे अल्पपरिचित किल्ल्यांची भटकंती करणाऱ्यांना कळेल. अश्या किल्ल्यांची जागा आणि त्यावरचे अवशेष हे अश्याच प्रचंड भटकंती करणाऱ्या लोकांनी लिहून ठेवलेले असतात पण तरीही दुर्लक्षित ठिकाण म्हणून त्यावर लोकांचा राबता नसतो किंवा उलटं म्हणा, लोकांचा राबता नसतो म्हणून दुर्लक्षित! पण कोणीतरी काढलेला ढोबळ नकाशा, कोणीतरी लिहिलेली त्रोटक माहिती तर कोणी लिहिलेल्या दिशा आणि खुणा अश्या गोष्टी जमवून असले किल्ले आणि त्यावरचे अवशेष बघायला मजा येते. नाहीतर रसाळगड सारखा पायऱ्या, बुरुज, वाडा, मंदिर, पाण्याची टाकी आणि 15-16 तोफा बघून सुद्धा त्यावर फार काही नाही बघायला असं म्हणणारेही असतात.

तर असाच एक अल्पपरिचित किल्ला बघायला जाणारा trek alert आला होता. घरून परवानगीही मिळाली, पण... जागाच भरल्या होत्या!!

एक तर संपूर्ण मे आणि जून महिना संपून गेला तरी घरात "ट्रेक" शब्द उच्चारायला मी धजावत नव्हतो. एप्रिलमध्ये काही अनपेक्षित घटना घडल्याने ते धाडस मला करताच येत नव्हते. नशीब! त्यामुळे मग रविवारी बाकीची बारीक सारीक कामं ठरवली, शनिवारी दुचाकीवरून सहकुटुंब जवळच भटकून आलो आणि संध्याकाळी विनीतचा फोन, येणारेस ना उद्या? भरलेल्या जागांपैकी कोणीतरी गळाला होता. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. रविवारची कामं कारणं शोधून बाजूला ठेवली गेली. उशिरा घरी आलो तरी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली. पहाटे पावणे 5 च्या आधीच घरातून आपल्या दुचाकीवरून निघालो.

पावणे 6 म्हणजे पावणे 6. प्रसाद, कौस्तुभ वेळेवर पोचले विनीतच्या घरी आणि त्याच्या Tiagoने 6 च्या आधीच निघालो. सातपुते काकांना घेऊन अलिबागकडे प्रस्थान केले. पालीकडे जाणाऱ्या फाट्यावर उडुपीच्या "मयुरी" मध्ये तुडुंब न्याहारी करून "मेली ठेचेवर ठेच" करत  वाटेला लागलो. पावसाळ्यात गाडीतून फिरणे ह्यात काहीच मजा नाही म्हणून गाडीत बसूनही होडीत बसल्याचा आनंद मिळवा ह्यासाठी भारत सरकारने ठिकठिकाणी रस्ता तसा बनवून ठेवलेला आहे. (मुंबईत तर पाणबुडीचा ही आनंद घेता येतो म्हणतात बा!)

तर आता भरल्या पोटी ट्रेकचे नेमके ठिकाण, रस्ता, पायथ्याचे ठिकाण अश्या प्रश्नांवर विचार करण्याइतपत शक्ती आली होती. विनीत अर्थात तयारीनिशी असणार ह्यात काहीच शंका नव्हती. पण एकाला दोन बरे म्हणून उपलब्ध माहिती वाचून काढली. रामदरणे हा किल्ला अगदीच दुर्लक्षित. त्याची माहिती फक्त Trekshitij आणि सचिन जोशी यांच्या लिखाणातून मिळाली. ह्या गडावर जाण्यासाठी खूप वाटा आहेत. वायशेत, चोरोंडे, परहूरपाडा, भाल, मूळे आणि कार्ला अश्या गावातून वाटा ह्या किल्ल्यावर जातात. हा किल्ला गावातल्या लोकांनाही तेवढा परिचित नाही, जेवढे इथल्या डोंगरावरचे "रामदरणेश्वर मंदिर" आहे. त्यामुळे ह्या मंदिराची चौकशी करावी. आम्ही परहूरपाडा गावातून जायचा निर्णय घेतला होता. तिकडे चौकशी करत करत एका दुकानात "कृष्णा" नावाचा इसम आम्हाला नेऊ शकतो आणि तो "सोगांव" इथल्या आदिवासी पाड्यात राहतो हे एका आजोबांकडून कळले. परहूरपाडा पासून तसा फार लांब नाही हे सोगांव, आणि जरासा पुढे आदिवासीपाडा. पण ह्या पाड्यापर्यंत गाडी काही जात नाही. थोडी आधीच गाडी थांबवून त्या पाड्यात शिरलो. स्वागत कुत्र्यांनी केले. तिथली माणसं आमच्याकडे ढुंकूनही बघत नव्हती आणि हाकेला ओ पण देत नव्हती. बऱ्याच प्रयत्नांनंतर कृष्णा कामावर गेलेला असून आमच्या बरोबर यायला कोणीही तयार नाही असं कळलं. सोमा कि काहीसं नांव असलेल्या दादांनी जरा दया येऊन घराच्या बाहेर येऊन आमच्याशी बोलायची कृपा केली. मगाशी जिथे चौकशी केली होती त्या दुकानात बसलेला नितीन नावाचा मुलगा हा ह्या सोमाचाच मुलगा निघाला. बऱ्याच विनवण्या केल्यानंतर सोमा येतो म्हणाला पण त्याची गावात गरज आहे म्हणून नितीन आमच्याबरोबर निघाला. पाण्याची टाकी, जुन्या वाड्याचे अवशेष ह्यातले काहीही त्यांना कोणाला माहिती आहे असे दिसत नव्हते पण रामदरणेश्वर मंदिर मात्र पक्के ठाऊक होते. जवळजवळ 11 वाजले होते. Something is better than अजिबात nothing.

त्याच्या भरावशावर निघालो. किल्लाच काय, मंदिरही नक्की कुठेसे आहे ते कळत नव्हते त्या टेकड्या आणि डोंगरांमध्ये. लहान लहान पाण्याचे ओहोळ आणि मधूनच डोकावत असेलेले हिरवे गवत त्या चढाईची जाणीव होऊ देत नव्हते. एक साधारण 15 एक मिनिटांत एक पठार लागले. उजवीकडे लांबवर समुद्रात खांदेरी, उंदेरी दिसत होते. एका बाजूला वर लांबवर असलेले डोंगराचे टोक "कनकेश्वर" अशी ओळख सांगत होतं. पण ज्याच्या शोधात होतो तो किल्ला किंवा मंदिरही नेमके कुठे दडलेय त्याचा नुसताच अंदाज मनात बांधत होतो. समोरच्या डोंगरावर सरळ न जाता नितीनने मोर्चा डावीकडे वळवलान आणि एका बेचक्यात येऊन पोचलो. वाटेत उजवीकडे एक पाण्याचे टाके आहे असे नितीन हलकेच बोलला, पण किल्ल्याशी संबंधित 3 टाक्यांपैकी ते काही असावे असे त्याच्या आवाजात जाणवत नव्हते. सारखे, पाण्याची 3 टाकी, उंच वारूळ, पडक्या वाड्याचे अवशेष असे शब्द मध्ये मध्ये टाकून नितीनच्या माहितीचा अंदाज घेत होतो पण काही आशा दिसत नव्हती. त्या बेचक्याजवळ एक ब्रेक झाला आणि परत दिशांचा अंदाज घेतला. टेकड्या, वाटा अश्या खुणा बांधल्या. बेचक्यातून समोर आलेले उंच टोक, तिथेच मंदिर आहे रामदरणेश्वराचे असे नितीनने सांगितलेन. तिथे पोचल्यावर पुढचे बघता येईल म्हणून मोर्चा मंदिराकडे वळवला.

पठार
खांदेरी-उंदेरी

जंगल आणि मंदिराकडे जाणारा रस्ता

छत्री वाऱ्यापुढे टिकत नव्हती, ती घट्ट पकडली. तिच्याच आडोश्याने कॅमेरा धरून फोटो काढत होतो. निलगिरी सारख्या जातीच्या झाडांच्या बनातून वाट काढत बेडं ओलांडून मंदिरात पोचलो. मंदिराच्या बाहेरच नंदीच्या 2 जुन्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिर प्रशस्त आहे, आतमध्ये समोरच एक नंदी असून गाभाऱ्याच्या बाहेर डावीकडे एक गणपती आहे. पिंडीशेजारी 2 शंख ठेवलेले आहेत तर पिंडीवर अभिषेक पात्रही आहे. दररोज पूजा होत असावी.

12 वाजले होते, म्हणजे तासाभरात इथे तर पोचलो होतो. दर्शन घेऊन बाहेर पायऱ्यांवर बसून आणलेल्या खाऊवर ताव मारला. पावसाने आता चांगलाच जोर धरला होता. पुन्हा माहिती वाचन आणि अंदाज घेणे चालू झाले. मागे एक डोंगर, त्यावर न जाता वळसा घालून आलो तिथेच किल्ला असावा असं मला वाटत होतं. नितीनला देवीचे मंदिर माहिती होते, ते ह्या रामदरणेश्वराला नमस्कार करताना बरोब्बर पाठीकडे खालच्या बाजूला येते. 5 मिनिटातच खाली उतरून त्या मंदिरात पोचलो. वाटेत एक लहानसा ओढाही लागला.

रामदरणेश्वराचे मंदिर

देवीचे हे मंदिर मात्र जीर्णोद्धार झालेले आहे. परहूरपाडा मधून एक वाट इथे येते असं नितीन म्हणाला. जुन्या मंदिरातल्या मूर्ती इथे आणून ठेवलेल्या आहेत. बाहेर ठेवलेल्या 4 मूर्ती ओळखू न येणाऱ्या आहेत तर आतमध्ये देवीची नवीन मूर्ती आहे. मंदिराचे नवीन बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. आता खुणा जमत होत्या पण दिशा लक्षात येत नव्हती. नितीनच्या तर अजूनही गडाचे काहीही अवशेष लक्षात येत नव्हते.

मंदिराच्या बरोबर समोरचा डोंगर (देवीकडे तोंड करून उभं राहिल्यावर मागचा डोंगर) चढून गेल्यावर खरं तर किल्ला दिसतो. त्या डोंगराकडे निघालो तर जवळच अजून काही मूर्ती डावीकडे ठेवलेल्या नितीनने दाखवल्यान. ह्या मूर्ती मस्त आहेत, रेखीव. ह्यात महिषासुर मर्दिनी आणि खंडोबाच्या मूर्ती सहज ओळखता येतात. अजूनही काही मूर्ती इथे आहेत. परत वाटेला लागलो आणि माथ्यावर आलो तर पलीकडे एक डोंगर दिसला. जिकडे जायचे त्या वाटेवरून काही आवाज पण ऐकू आले. किल्ला शंभर टक्के तिकडेच असणार असा अंदाज बांधला तर काही लोकं भेटलेच. हे trekshitij वालेच लोक होते जे काही ट्रेकर ना घेऊन आलेले होते.

देवीचे मंदिर
महिषासुर मर्दिनी, खंडोबा आणि इतर मूर्ती

समोरचा किल्ला आणि उतरलेला डोंगर याच्या मधल्या घळीत हे लोक भेटले आणि खुणेचे 4 फुटी वारुळही दिसले. ही घळ मानवनिर्मित असून किल्ला आणि डोंगर वेगळा करण्यासाठी निर्माण केलेली आहे असे उल्लेख आहेत. ते वारूळ दिसल्यावर वाचलेली माहिती डोळ्यासमोर आली आणि आता आम्ही नितीनला वाट आणि खुणा दाखवू लागलो. वारूळ उजवीकडे आहे. उजवीकडून त्याच्याच बाजूने जाणारी वाट 3 टाक्यांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट बुरुज आणि अवशेषांकडे जाते. आधी उजवीकडे टाकी बघायला जावे. वाट मळलेली आहे, चुकत नाही. पण वाट खचलेली आहे आणि अरुंद. पूर्वी वाट चांगली असावी पण पावसाने दरड कोसळून खूप लहान लहान दगड वाटेवर आलेले आहेत. सांभाळून गेल्यावर 10 मिनिटात गडाच्या अवशेषांचे म्हणजे टाक्याचे दर्शन होते. पहिल्या टाके, नंतर दुसरे टाके. त्यातून जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी सुंदर दगडी पन्हळ खोदलेली आहे. लगेचच पुढे तिसरे मोठे आणि 2 खांबांवर तोललेले टाके आहे. ह्या टाक्यात एका भिंतीवर गणपतीआदी देवांची चित्रे असलेल्या 2 फारश्या लावलेल्या आहेत. पाणी पिण्यायोग्य आहे. इथूनच एक वाट खाली वायशेत गावाकडे जात असावी.

पाण्याचे टाके १
पाण्याचे टाके २ आणि पन्हळ
पाण्याचे टाके ३

बुरुज आणि उर्वरित अवशेष बघण्यासाठी वारुळाकडे परत यायचे आणि सरळ उजवीकडे वरच्या बाजूला जायचे. (आता डावीकडे असलेली वाट म्हणजे जिकडून आलो तिकडे परत जाणारी वाट.) झाडी दाट आहे, झाडांच्या फांद्यापासून झालेल्या कमानीतूनही जावे लागते. इकडे चावऱ्या उपद्रवी माशा आणि डास खूप आहेत. कदाचित पावसामुळे असाव्यात. ही वाट गोलाकार बुरुजावर घेऊन जाते. वाट बुरुजवरच जाते तर पलीकडे दगडाने बांधीव भिंत दिसते. हा आणखी एक बुरुज असावा. आणि ह्या 2 बुरुजांच्या मधून मूळ वाट वर येत असावी. इथे पायऱ्यासदृश काही दगडही दिसतात. बुरुज डावीकडे ठेवत वाट सरळ वरती माथ्यावर घेऊन जाते. इथे डावीकडे एक टोक जाते त्या बाजूला वाटेवरच काही अवशेष दिसतात, हे वाड्याचे जोते असावे. पुढच्या टोकावर काही नाही. इथे गडाचे अवशेष बघून पूर्ण होतात. इथून कनकेश्वर, सागरगड दिसतात तर पाऊस आणि धुके ह्यामुळे आणखी काही स्पष्ट दिसू शकले नाही.

आता 2 वाजून गेले होते, म्हणजे पायथ्या पासून निघून 3 तास झाले होते. पण गड आणि अवशेष सापडल्याचे समाधान होते. पाऊस जराचीही उसंत घेत नव्हता.

बुरुज आणि अवशेष

परत फिरलो. नितीनला आता पुढे येणाऱ्यांना इथे घेऊन हेच अवशेष दाखव म्हणून सांगितले. परत वारूळ, मुर्त्या आणि देवीचे मंदिर इथे येऊन पोचलो. वाटेत काही खाऊ आणि चिवड्याचे बकाणे भरले. आता मात्र रामदरणेश्वराला खालूनच नमस्कार करून वर न चढता तो डोंगर डाव्या बाजूला ठेवत उजवीकडच्या वाटेने त्याला वळसा मारून परत पठारावर आलो. वाटा मात्र भरपूर असल्याने नेमकी वाट सापडणे कठीण जाते. माहितगार किंवा गावातला माणूस बरोबर असणे उत्तम. ससे पकडण्यासाठी लावलेले सापळेही दिसत होते. हिरवागार गालिचा अमच्यासाठीच पसरलेला होता. फोटो काढायचा मोह काही आवरला नाही. पटापट खाली आलो. पाऊसही तसा कमी झाला होता. साडे 3 झाले होते. ओले कपडे बदलून परतीच्या प्रवासाला लागलो. आमचं जेवण तसं झालेलं नव्हतंच. वाटेत गरम पोळ्या, भाजी पुलाव वगैरेंवर ताव मारला आणि परत एकदा ठेचेवर ठेच करत express highwayला लागलो आणि 10-10:15 ला घरी पोचलो.

परतीच्या वाटेवर - हिरवागार गालीचा
लहानगे ओहोळ

घरातून निघून पूर्ण किल्ला बघून परत घरी येईपर्यंत पावसाने काही पाठ सोडलीन नव्हती. 4 दिवसांपूर्वी ज्या किल्ल्याचे नावंही माहिती नव्हते तो किल्ला पूर्ण बघून झाला होता.






प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ६२५ फुट

श्रेणी : सोपी

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात काळाच्या ओघात विस्मृतीच्या पडदयाआड गेलेले अनेक गडकिल्ले आहेत. इतिहासात या किल्ल्यांचा उल्लेख नसल्याने व यांचे निश्चित स्थानही माहित नसल्याने कुणीही या किल्ल्यांकडे फिरकत नाही. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ असलेला रामदरणे किल्ला. किल्ल्याचे स्थान व आकार पहाता याचा उपयोग केवळ टेहळणीसाठी होत असावा असे वाटते. रामदरणे किल्ल्यास भेट देण्यासाठी सर्वप्रथम अलीबाग-रेवसमार्गे ७ कि.मी. अंतरावरील वायशेत गाठावे. रामदरणे किल्ला गावकऱ्याना माहित नसुन किल्ल्याच्या अलीकडील डोंगरावर असलेले रामदरणेश्वर मंदिर मात्र सर्वानाच परिचित आहे त्यामुळे गावात किल्ल्याची चौकशी करण्याऐवजी या मंदिराची चौकशी करावी. किल्ला असलेल्या डोंगराखालील पठार अस्ताव्यस्त पसरलेले असुन या डोंगराखाली असलेल्या गावातुन पठारावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत पण वायशेत येथुन किल्ल्यावर जाणारी वाट सरळसोपी व जास्त रुळलेली आहे. वायशेत गावाच्या पुर्वेस दगडाची खुप मोठी खाण असुन या खाणीच्या वरील बाजुस टेकडीवर रामदरणेपाडा म्हणुन लहानशी आदिवासी वस्ती आहे. वायशेत गावातुन एमआयडीसी पाईपलाईन रोड ओलांडुन आपण या वस्तीवर येतो. या वस्तीच्या वरील बाजुस मातीचा बंधारा असलेला तलाव असुन तेथवर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे पण तो बऱ्याच ठिकाणी खचलेला असल्याने त्यावरून पायगाडी हाच उत्तम पर्याय आहे. वायशेत गावातुन रामदरणे पाड्यावर येण्यास अर्धा तास पुरेसा होतो. रामदरणेश्वर मंदिराकडे जाणारी वाट मळलेली असली तरी तेथुन पुढे किल्ल्यावर वावर नसल्याने शक्य झाल्यास या पाड्यावरुन वाटाड्या घ्यावा. पाड्याच्या वरील बाजुस एक प्रशस्त पठार असुन या पठारावर मातीचा बंधारा घालुन पाणी अडविलेला मोठा तलाव आहे. या तलावाच्या काठावर एक देवीमंदिर असुन या मंदिरात दहा-बारा जणांची राहण्याची सोय होते. या मंदिराच्या अलीकडून एक वाट समोरील डोंगरावर असलेल्या रामदरणेश्वर मंदिराकडे जाते. मंदिर असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आल्यावर एक वाट डाव्या बाजुने टेकडीवरील जिर्णोध्दारीत मंदिराकडे जाते तर एक वाट सरळ पुढे जाते. मंदिर न पहाता किल्ल्यावर जायचे असल्यास सरळ पुढे निघावे किंवा टेकडीवर चढुन मंदिर पाहुन दुसऱ्या बाजुने परत खाली उतरावे. पाड्यावरून या मंदिरापर्यंत येण्यास एक तास लागतो. रामदरणेश्वर मंदिर पठारावरील सर्वात उंच टेकडावर असल्याने येथुन थळचा खतप्रकल्प, सागरगड, खांदेरी, उंदेरी आणि कनकेश्वर डोंगर इतका दूरवरचा प्रदेश दिसुन येतो. मंदीर व रामदरणे किल्ला यामध्ये एक उंच टेकाड असल्याने किल्ला मात्र दिसत नाही. मंदीर पाहुन खाली आल्यावर अथवा वाटेने सरळ पुढे आल्यास एक ओढा पार करताना त्यात पाण्याचे कुंड खोदलेले दिसते. या कुंडातील पाणी दुधी रंगाचे असुन गावकरी हे पाणी तीर्थ म्हणुन पिण्यास वापरतात. ओढा पार केल्यावर काही अंतरावर अजुन एक नव्याने बांधलेले देवीचे मंदिर दिसुन येते. मंदिराबाहेर काही झिजलेल्या मुर्ती ठेवलेल्या असुन मंदिरात नव्याने स्थापित देवीची मुर्ती व काही तांदळे ठेवलेले आहेत. मंदीरासमोर एक डोंगर असुन या मंदिराकडून खऱ्या अर्थाने किल्ला चढायला सुरवात होते. मंदिराकडून या डोंगरावर जाण्यास ठळक अशी वाट नसुन डोंगराच्या उजव्या बाजुने डोंगर चढण्यास सुरवात करावी. येथुन १५ मिनिटांचा उभा चढ चढुन गेल्यावर आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. येथुन समोर दिसणारी टेकडी म्हणजेच रामदरणे किल्ला पण तेथे जाण्यासाठी आपण आलो तो डोंगर उतरत किल्ला व डोंगर यामधील घळीत जावे लागते. हि घळ म्हणजे किल्ल्याला या डोंगरापासून वेगळे करण्यासाठी मानवनिर्मित खाच आहे. घळीच्या वर किल्ल्याकडील बाजुस चौकीचे अवशेष असुन घळीत उजवीकडे व डावीकडे जाणाऱ्या पायवाटा दिसतात. डावीकडील पायवाट किल्ल्यावर तर उजवीकडील पायवाट पाण्याच्या टाक्याकडे जाते. टाक्याकडे जाणारी पायवाट टाक्यापुढील भागात मोठया प्रमाणात कोसळली असल्याने टाक्यापर्यंत पोहोचता येत नाही पण किल्ल्यावरून कातळात कोरलेली हि ३ टाकी पहाता येतात. डावीकडील वाटेने वर चढत आल्यावर आपला एका बुरूजावरून गडमाथ्यावर प्रवेश होतो. वायशेत गावातुन येथवर येण्यास दोन ते अडीच तास लागतात. या ठिकाणी असलेला गडाचा दरवाजा व त्याची कमान पुर्णपणे नष्ट झालेली असुन दरवाजाशेजारी असणारे दोन्ही बुरुज व त्याशेजारील तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. बुरुज व तटबंदीच्या या बांधकामात कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. दरवाजात उभे राहिले असता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या परहूररपाडा गावातून किल्ल्यावर येणारी एक वाट नजरेस पडते. किल्ल्याचा दरवाजा पश्चिमाभिमुख असुन किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ७४० फुट उंच आहे. साधारण त्रिकोणी आकाराचा गडमाथा दिड एकर परिसरावर पसरला असुन किल्ल्यावर एका मोठया उध्वस्त वास्तुचे तसेच काही घरांचे अवशेष दिसुन येतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील सोंडेवरून तटबंदीखाली असलेली कातळात कोरलेली ३ टाकी दिसतात. किल्ल्यावरुन कार्ले खिंड, सागरगड, उंदेरी,खांदेरी आणि कनकेश्वर डोंगर इतका दूरवरचा प्रदेश दिसतो. गडाचा घेरा फारच लहान असल्याने १५ मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते.









अलिबाग हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण रस्त्याने सर्व गावांशी जोडलेले आहे. मुंबईहून समुद्रामार्गेही रेवस पर्यंत जाऊन तेथून अलिबागला जाता येते. रामदरणे किल्ल्याचा डोंगर लांबवर पसरलेला असून त्या डोंगरावर खालील दिलेल्या सर्व गावांमधून वाटा आहेत.

१) वायशेत गावातून:- अलिबाग- किहीम - रेवस रस्त्यावर अलिबागपासुन अंदाजे ५ किमीवर वायशेत गाव आहे. वायशेत गावातून रामदरणे पाड्याकडे जाणारा रस्ता आहे. अलिबाग- रेवस मार्गावर जाणार्‍या एसटी बस किंवा रिक्षांनी वायशेत गाव गाठावे. वायशेत गावातील सायमन कॉलनी जवळील दगडाच्या खाणी पर्यंत यावे. पाड्याच्या खालच्या बाजूला ही दगडाची खाण असल्याने पाड्या पर्यंत कच्चा रस्ता बनवलेला आहे. तेथून कच्च्या रस्त्याने चालत अर्ध्या तासत आपण रामदरणे पाड्यात पोहोचता येते. हा रस्ता अनेक ठिकाणी खचलेला असल्याने केवळ जीप किंवा दुचाकीने पाड्या्पासून ५ मिनिटांच्या अंतरा पर्यंत जाता येते. पुढे रस्ता खचलेला असल्याने गाड्या तेथेच उभ्या करुन ५ मिनिटात पाड्यात पोहोचता येते. पाड्या पासून अर्ध्या तासात रामदरणेश्वर मंदिर आणि त्यापुढे अर्ध्या ते पाऊण तासात किल्ला गाठता येतो. या मार्गाने दिड तासात किल्ल्यावर जाता येते. (मध्ये खचलेला रस्ता दुरुस्त झाल्यास थेट रामदरणेश्वरच्या पायथ्या पर्यंत गाडीने जाता येईल. पाड्यापासून पुढे रस्ता बनवलेला आहे.) . रामदरणे किल्ल्यावर जाण्यासाठी हा सगळ्यात सोपा मार्ग आहे.

२)चोरोंडे गावातून:- मुंबई अलिबाग मार्गावर पोयनाड गाव आहे. पोयनाड गावा बाहेर पेझारीला पोलिस चेक पोस्ट आहे. येथून एक रस्ता परहुरपाडा मार्गे चोरंडे गावापर्यंत जातो. चोरंडे गावापर्यंतचे अंतर ४ किमी आहे. या गावातील खेळाच्या मैदानावरुन पुढे गेल्यावर कनक मारुतीचं मंदीर आहे. त्याच्या बाजूने रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या मार्गाने दिड तासात किल्ल्यावर जाता येते.

३) परहुरपाडा गावातून:- मुंबई अलिबाग मार्गावर पोयनाड गाव आहे. पोयनाड गावा बाहेर पेझारीला पोलिस चेक पोस्ट आहे. येथून एक रस्ता परहुरपाडा मार्गे चोरंडे गावापर्यंत जातो. परहुरपाडा गावापर्यंतचे अंतर २ किमी आहे. या गावातील खेळाच्या मैदानावरुन पुढे गेल्यावर कनक मारुतीचं मंदीर आहे. त्याच्या बाजूने रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. या मार्गाने दिड तासात किल्ल्यावर जाता येते.

४)भाल गावातून:- अलिबाग - किहीम - रेवस रस्त्यावर भाल नावाच गाव आहे. भाल गावातून रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे.या मार्गाने दोन तासात किल्ल्यावर जाता येते.

५)मुळे गावातून :- भाल गावाच्या अलिकडे मुळे नावाचं गाव आहे. मुळे गावातून रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. मार्गाने दोन तासात किल्ल्यावर जाता येते.

६) कार्ला गावातून :- रामदरणेश्वर डोंगराच्या दक्षिणेकडील बाजूला कार्ला गाव आहे. कार्ला गावातून रामदरणेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे.

रामदरणेश्वर मंदिरापासून किल्ल्याकडे कसे जावे हे वर सविस्तर लिहीलेले आहे.
















No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...