Sunday, March 22, 2026

Satara Radio station final 400 words

1 ) अजिंक्यतारा किल्ला

अजिंक्यतार्याच्या इतिहासात डोकावल्यास  कोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. यानंतर या गडाच्या इतिहासातील महत्वाचा प्रसंग म्हणजे औरंगजेबाने स्वराज्यावर जे आक्रमण केले त्याकाळातील ! मोगलांनी गडाच्या मंगळाई बुरुजाच्या ख्गली दोन सुरुंग पेरले. पहिला सुरुंग उडाल्यावर मराठ्यांचे नुकसान झाले , मात्र दुसरा सुरुंग उडाल्यावर मोगली फौजांचाही नाश झाला.मूठभर मावळ्यांसह किल्ला लढवीतच असताना अखेर दाणागोटा संपला, दारूगोळा संपला तेव्हा किल्लेदार  प्रयागजी प्रभूना  शरणागती पत्करावी लागली. या किल्ल्यावर शाहजादा आझमने निशाण चढवले म्हणून त्याचे नामांतर झाले -'अझमतारा.' मात्र अण्णाजीपंत शाहीराने, ताराराणीच्या वेषांतर केलेल्या सैनिकांच्या मदतीने एक दिवस किल्लाच ताब्यात घेतला. अन् अझमताऱ्याचा झाला 'अजिंक्यतारा !'
         अश्या या इतिहास प्रसिध्द अजिंक्यतारा गडाला भेट द्यायची असेल तर सातारा शहरातून अजिंक्यतार्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत थेट डांबरी रस्ता आहे. वाटेत आपल्याला चार भिंती हे एतिहास्क ठिकाण लागते, त्याला भेट देउन पुढे जायचे. 
पहिला दरवाजा सुस्थितीत असून दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. प्रवेशद्वारावर अनेक देव देवतांची शिल्पे तसेच कमळ , दोन्ही बाजुला आपल्याला शरभ शिल्प दिसतात
महादरवाजाच्या देवड्यांच्या जोत्यावर कोरलेली वाली-सुग्रीव युद्घाची कथा , विघ्नहर्ता गणराय , मारुती आणि बुरुजावर तळवटी खोदलेले नागांचे शिल्पांकन पाहावयास मिळते.दुसरा . दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे.मोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. हे टॉवर्स म्हणजे दूरदर्शन (१९८६) आणि आकाशवाणी (१९९२) यांची प्रक्षेपण केंद्रे आहेत. पुढे गेल्यावर आपल्याला राजवाड्याच्या पाया आणि भिंतींचा काही भाग शिल्लक भाग दिसतो. याच ठिकाणी महाराणी ताराबाई आणि त्या नन्तर महाराज शाहूंचे वास्तव्य होते.या गडावर पुरातनकालचे मंगळाई देवीचे व हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. उर्वरित गडफेरी पूर्ण करताना अनेक टाक्या आणि तटबंदीचा भाग दिसतो. तसेच एक कोठार सदृश्य बांधकामहि दिसते.वाटेमध्ये , रत्नेश्वराचे मन्दिर दिसते.गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. मात्र नजरेत भरतो तो गडाचा पश्चिम दरवाजा. गोमुखी बांधणीचे एकामागे एक असे दोन मजबूत प्रवेशद्वार आणि बुलंद बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. याबाजुला समोर टेकडी दिसते तीला उंटाची टेकडी म्हणतात. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात.याशिवाय गडावर तेलातुपाचे रांजण, माचीवर डफळ्यांच्या घोड्यांची पागा, अक्कलकोटकरांचा वाडा, पिंगळ्यांचा वाडा व शेख मिराची घोड्यांची पागा हे शाहूकालीन अवशेष आहेत. 
       गडावरुन पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर, बंड्या पठार्,उत्तरेला मेरुलिंगाचा डोंगर आणि मागे पुसट वैराटगड दिसतो.ईशान्येला चंदन-वंदन हे जोड किल्ले,भुताची टेकडी,नांदगिरी उर्फ कल्याणगड्,जरंडेश्वर्,पुर्वेला जानाई-मळाई डोंगर्,पाटेश्वराचा डोंगर आग्नेयेला तर नैऋत्येला सज्जनगड दिसतो. गडाच्या उत्तर अंगाला पायथ्याशी सातारा शहराचे विहंगम दृष्य दिसते.

2)  सापचा एतिहासिक वाडा :-

    सापच्या एतिहासिक वाड्याबध्दल जाणून घेण्यापुर्वी गावाचं नाव साप कसं पडलं? हे माहिती करुन घेउया.तर ' पूर्वी चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होतं. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होतं. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. तिथे एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. म्हणुन त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी जी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळालं.
      या वाड्याचा  थोडक्यात इतिहास असा, पूर्वी शाहू महाराजांच्या काळी इंद्रोजी कदम म्हणून एक पराक्रमी आणि तालेवार असा सरदार होऊन गेले. तो गावातल्या कदम घराण्याचा प्रसिद्ध असा पूर्वज. लिखित नोंद अशी की इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीरावाने झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत "इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.". यावेळी इंद्रोजी कदम हे शिंद्यांच्या दळातील एक मातब्बर सरदार होते.  कदम सरदारांनी आपल्या गावी बांधलेला हा त्यांचा वाडा. सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे. सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. 
    पूर्वी वाड्यात कोणी रहात नसले तरी गावचा राबता असायचा. सध्या चित्रीकरण वगैरे मुळे वाड्याला चांगले दिवस आल्याने तशी पर्यटकांना प्रवेशबंदी आहे.
  साप गावात येण्यासाठी  रहिमतपूरपासून  अंभेरीमार्गे वडुजकडे जाणर्या रस्त्याने  अपशिंग फाट्यावर उजवीकडे वळायचे किंवा रहिमतपूरपासून औंधच्या दिशेने एक-दीड कि.मी. पुढे पिंपरी फाट्यापासून डावीकडे. पुर्वपरवानगी घेउन हा वाडा आतून पहाता येतो.
         सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. 
   महा-दरवाजावर हत्तीरोधक खिळे अजूनही व्यवस्थित आहेत. अर्थात दरवाजासोबतच त्यांना दिलेल्या रंगामुळे ते अगदी नव्यासारखे दिसतात. तिथेच असलेल्या छोट्याशा दिंडी-दरवाजातून  आत गेल्यावर मुख्य दरवाजावर असलेला नगारखाना दिसतो
     इथे मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजव्या हाताला पाग्याची पडझड झालेली जागा दिसते  डाव्या बाजूला हौद रंगाचा हौद म्हणून ओळखतात.. याच्या समोरच एक लाकडी, मोडकळलेली घोड्याची पागा आहे.वाडा दीड मीटर उंचीच्या जोत्यावर बांधला असून पायऱ्यांनी आत गेल्यावर समोर मोठा चौक आहे. मुख्य इमारतीत प्रवेश केल्यावर प्रथमतः समोर वाड्याची चौसोपी रचना दिसते. इथे चारी बाजूस दगडी चौरंग, बैठका या अजूनही आहेत. ओसर्‍यांच्या कोपर्‍यावर पुरुषभर उंचीचे दोन रांजण आहेत. जोत्याच्या मागे खोल्या बांधलेल्या आहेत. यांतील डावीकडच्या एका खोलीत देवघर आहे. सध्या त्यामध्ये देव नसले तरी त्यांचा चौथरा आणि जवळच एक मोठी समई पाहायला मिळते. याच्या बाजूच्या खोलीपलीकडून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
 वरती आल्यावर एक प्रचंड मोठा हॉल आहे. त्याच्या छतावर आणि खांबांमधील महिरपीवर नक्षीकाम केलेले आहे. वास्तविक या प्रासादाशिवाय वाड्यामधला कोणताही भाग फार चांगल्या अवस्थेत नाही.  हा वाडा साफ-सफाईच्या दृष्टीने प्रचंड मोठा असला तरी त्याची डागडुजी आणि काळजी ही कामे अगदी व्यवस्थित होतात हे देखील लगेच जाणवते.
        वाड्याच्या मागच्या दारी तुळशी वृंदावनाच्या चौकात बर्‍यापैकी जीर्णोध्दाराचे काम झालेले आहे..वाड्याच्या उजव्या बाजूला मोठी विहीर आहे. बाजूच्या शेताला पाणी देण्यासाठी आजही या विहिरीचा वापर केला जातो. विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्याही आहेत. वाड्याच्या भेटीत हि विहीर आवर्जुन पहावी.
वाडा पाहण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. साप गावामध्ये खाण्या-पिण्याची सोय नाही, पण रहिमतपूरमध्ये ती होऊ शकते.

3 ) धोमचे नृसिंह मंदिर : -

        वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम हे वृक्षदाटीत वसलेलं अतिसुंदर,निसर्गरम्य गाव.सह्याद्रीच्या रांगेने तीनही बाजूने गराडलेले.  स्वातंत्र्योत्तर काळात ईथे कृष्णा आणि वाळकी नदीच्या प्रवाहावर धरण बांधले गेले आणि धोम गावाचे नाव प्रकाशात आले.मात्र पेशवेकालीन मंदिराचा एतिहासिक ठेवा उराशी कवटाळलेले धोम अभ्यासकांना नेहमीच खुणावत राहीले.पुराणकाळातील ‘धौम्य ऋषीं’चे वास्तव्य त्या भागात होते, म्हणून त्या गावाला ‘धोम’ हे नाव पडले असे सांगतात. 
       दगडी तटबंदीने मंदिराचे आवार बंदिस्त केलेले आहे.दोन्ही बाजुला बुरुज्,नक्षीदार कमान आणि वर नगारखाना असलेले प्रवेशद्वार यातून आपण प्राकारात प्रवेश करतो.याठिकाणी शिवपंचायतन साधले आहे. मंदिर उभारणी पाषाणामध्ये केलेली आहे. अर्थात ईथे सर्वाधिक लक्षवेधी काय असेल तर तो मंदिरासमोरचा नंदी. नंदी एकाच पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव व देखणा तर आहेच पण ज्या वास्तुरचनेत या नंदीची उभारणी केली आहे ती कल्पकेतीची कमाल म्हणता येईल. शिवमंदीरआणि नृसिंह मंदिर यांच्या मधोमध, एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी अडीच मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे. त्याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्याच्या पाठीवर नंदीला घेऊन पाण्यावर तरंगत आहे असा भास होतो. ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर सुंदर नंदीमंडप उभारलेला आहे. तो नंदीमंडपही सुंदर बांधणी केलेला आहे. याचा मागचा विचार असा आहे की कासवी तिच्या पिल्लांना ज्या पद्धतीमध्ये वाढवते त्याप्रमाणे देव त्यांच्या भक्तांना वाढवत असतो!
हिंदु धर्मात निर्माण झालेले पंथ एकत्र रहावेत म्हणून शंकराचार्यांनी एकाच मंदिरात सर्व पंथीयांच्या देवांची मंदिर उभारण्याची संकल्पना आणली,तीच पंचायतन.या मंदिरात शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत. या सर्व मंदिरांवर रेखीव नक्षीकाम  केलेले दिसते.
   मुख्य मंदिर शंकराचे असले तरी एका बाजुला एक अनोख्या शैलीचे मंदिर दिसते.हे आहे नरसिंह मंदिर.गोलाकार वास्तु,दोन बाजुला कोनाड्यात असलेल्या मुर्ती आणि वर चढून जायला खडे जीने असा वेगळाच प्रकार ईथे पहायला मिळतो.
यांपैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी म्हणजे उग्र नरसिंह असून पश्चिमेकडे असलेल्या 'नरसिंह' मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी बसलेली आहे म्हणजे ;लक्ष्मी नरसिंह. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरील उजव्या हातामध्ये कमळ असून, डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आहे. वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरील आणि खालील जबड्यातील आठ दात; तसेच, दातांमधून बाहेर आलेली जीभ अशी ती मूर्ती आणि तिचे भाव जिवंत वाटतात.याचबरोबर ईथे लक्ष्मी नरसिंह यंत्राचा फोटो लावला आहे.
  धोमचे मंदीर पाहून झाले कि गावाच्या मागील बाजुला असलेल्या धोम धरणाच्या भिंतीच्या परिसरात जावे. धोम धरणाची भिंत एका डोंगररांगेच्या आधाराने उभी केली आहे. त्या टेकाडावर चढून जाताच धोमचं अथांग पाणी, डावीकडे पाचगणी, समोर कमळगड व त्याचे म्हातारीचे दात म्हणून ओळखले जाणारे सुळके, उजवीकडे केंजळगड आदी तालेवार ठिकाणे दिसतात.

4 ) आगाशिवची बौद्ध लेणी :-

         कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शहर आहे. कराड पासून १० कि.मी. अंतरावर आगाशिव डोंगरावर प्राचीन बौद्ध लेणी आहे. प्राचीन बौद्ध लेणी हा कराडचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. 
         जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २००० वर्षांपूर्वी हिनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण-पश्चिमेस असलेल्या आगाशीव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृह (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत.
श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक आगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात.बहुतांशी लोक या लेण्या पांडवानी कोरल्या आहेत असे मानतात.  या बौद्ध लेण्या बौद्ध भिक्खुंच्या अभ्यासासाठी व स्वाध्यायासाठी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु या लेण्या पांडवानी एका रात्रीत कोरल्या आणि त्याही केवळ नखांच्या साह्याने अशा प्रकारचे गैरसमज समाज लोकांच्यात पसरले आहेत. 
हि लेणी तीन गटात कोरलेली बघायला मिळतात..
(१) जखिणवाडीची लेणी : ही एकूण २३ लेणी येथील  
(२) अगाशिवची लेणी: डोंगराच्या एका कड्याच्या उत्तरेकडील बाजूला कोयनेच्या दरीकडे तोंड करून आहेत, ती १९ लेणी.
(३) चचेगाव लेणी, या गटातील लेणी आजूबाजूस विखुरलेली असून कोयना खो-याकडे तोंड करून आहेत. ती एकूण २२ आहेत.
        बरीचशी लहान आकाराची लेणी, स्तंभविरहित चेत्यगृहे व मंडप, सपाट छत, खोदलेल्या खोल्यातील कोरलेले मंचक, स्तूपांचे प्राथमिक स्वरूपाचे आकार, चोकोनी स्तंभयुक्त ओव-या आणि शिल्पविरहितता व अनलंकृतता या सगळ्यांचा संकेत या लेणी ख्रिस्ताब्दाच्या पहिल्या काही शतकातील असावीत असा होतो. या लेणींची समकालीन लेणी पश्चिम महाराष्ट्रात कुडे, जुन्नर, कान्हेरी, महाड इत्यादी ठिकाणीही आहेत. कराड येथील बहुतेक सर्व लेणी निकृष्ट दर्जाच्या अग्निजन्य खडकात कोरलेली असल्यामुळे व मानवी दुर्लक्षामुळे दयनीय अवस्थेत कशीबशी तग धरून उभी आहेत.ठिसूळ नि ओबडधोबड अशा खडकात लेणी कोरलेली असल्यामुळे त्यावर शिलालेख आढळत नाहीत. याला अपवाद म्हणजे क्र. ४७ च्या लेणीतील एक लेख दिसतो. या लेखातील अक्षरवाटिकेवरून तो कार्ले येथील लेखाच्या समाकालीन असावा.
           यातील लेणे क्रमांक १२ हे चैत्यगृहच आहे. त्याचे पुढे तेवढ्याच आकाराचे प्रांगण आहे. नाही. आतील स्तूपाची मोठ्या प्रमाणत पडझड झालेली आहे. गावक-यांनी डागडुजी करून ते पूजार्ह केलेले आहे.इथे दर्शनी बाजूस अर्वाचीन काळात कोरलेली श्री विठ्ठल मूर्ती आहे. लेणे क्र. ४७ मध्ये समोरच्या खोलीत डावीकडील भिंतीच्या वरच्या कोप-यात कराड लेणीतील  एकुलता एक शिलालेख आहे." "गोपाळपुतस संघमित्रस लेणं देवधम". म्हणजे गोपळाच्या संघमित्र नामक मुलाने हे पुण्यप्रद दान दिले आहे. चैत्यगृह (लेणे क्र. ४८) मध्ये स्तूपासमोरच्या बाजूस उजवीकडच्या भिंतीवर एक मनात भरेल अशी शिल्पाकृती आहे. कराड़ें येथे इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या लेणीत एकही शिल्प आढळत नसताना हे येथील शिल्प सहाजीकच उठून दिसते. या शिल्पपटात तीन व्यक्ती आहेत. त्या थोड्या निसर्गहत (झिजलेल्या) झालेल्या आहेत, त्यामुळे स्पष्टता कमी आहे. यातील डावीकडील पुरुष आकाराने सर्वात मोठा आहे, त्याच्या डोक्यावर समोर मोठी गाठ असलेला फेटा आहे. असे फेटे सातवाहन काळातील अन्य ठिकाणच्या शिल्पांतील तसेच भितीचित्रातील पुरुषांच्या डोक्यावर आढळतात. 
 एकंदरीत सातारा जिल्ह्यातील सातवाहनकालीन ठेवा आवर्जून बघायला हवा.

५ )  परळीचे शिवमंदिरे

सातारा शहराच्या नैऋत्येस ९ किमी. सज्जनगड च्या पायथ्याशी ' परळी ' या गावाच्या बाहेर काही अंतरावर हेमाडपंथी बांधणीची दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत अभ्यासकांच्या मते त्याची बांधणी यादव काळात १३ व्या शतकात झाली असावी .
शेजाशेजारी असणाऱ्या या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आहे. त्यातील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे .याला विरुपाक्ष मंदिर म्हणतात. हे मंदिर बहुधा आधी बांधलेले असावे. याची मोडतोड विजापुरच्या किंवा मोघलांच्या आक्रमणात झाली असावी. 
त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्यापैकी स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप , अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे . सभामंडप सोळा स्तंभांवर आधारलेला आहे. सभामंडपात दोन देवकोष्टके आहेत, पण ते रिकामे आहेत. याला केदारेश्वर मंदिर म्हणतात. सभामंडपात अत्यंत सुंदर आणि रेखीव नंदी आहे. मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या आणि उजव्या बाजूस ' मिथुनशिल्पे ' ( कामशिल्पे ) कोरलेली आहेत.
मंदिरासमोर एक कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी एक पंचमुखी शिवलिंग आहे. हे सदाशिवाचे अव्यक्त रूप आहे , सदाशिव म्हणजे सद्योजत , वामदेव , अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था दाखवणारी ही प्रतिमा आहे . या पंचावस्थिती म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, व आकाश. मंदिराच्या समोरील परिसरात एक मान तुटलेला नंदी आहे.एका चौथर्‍यावर शिवलिंग व शेजारी गणेशाची मुर्ती आहे. 
   शेजारी पुष्कळ वीरगळ शिल्पे आहेत त्यातील अनेक वीरगळ वर नक्षीदार काम केलेले आहे.याच परिसरात अनेक समाध्या आहेत. शेजारी एक सुंदरशी ' पुष्करणी' आहे पण देखभाली अभावी सध्या ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
 परिसरातील लोकांशिवाय इतरांना फारशी माहिती नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे.  ही कोरीव शिल्पे सध्या अनेक पर्यटकांनी केलेल्या विकृत कृत्यांमुळे रंगहिन बनत आहेत. अनेकांनी आपल्या प्रेमीकांची नांवे कोरून यातील अभिजात शिल्पसौंदर्य बिघडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
    पावसाळ्यात या मंदीरांना भेट दिल्यास या मंदीराबरोबरच उरमोडी धरणाचा जलाशय दिसतो. तसेच परळीमार्गे एक रस्ता पुनवड, नित्रळ मार्गे सांडवली आणि केळवली धबधब्याकडे जाणारी-(पाऊल) वाट आहे. निगुडमाळ गावातून पायवाटेने चालायला लागल्यावर डाव्या बाजूला सांडवलीचा पाच टप्प्यांत पडणारा धबधबा दिसतो. उजव्या बाजूला टेकडी आणि मोठी झाडं असल्यामुळे केळवलीचा धबधबा मात्र दिसत नाही. टेकडीला वळसा घातल्यावरच या धबधब्याचा काही भाग दिसू शकतो. सांडवलीला येणाऱ्या पर्यटकांना सांडवलीबरोबरच केळवली हा धबधबाही पाहता येऊ शकतो. इथे येण्यासाठी योग्य काळ आहे पावसाळा साधारण संपल्यावरच. कारण सांडवलीपेक्षा या ठिकाणी जंगलही अगदी दाट आहे की ज्यातून वाट काढतच जावं लागतं. शिवाय निगूडमाळपासून, सांडवलीपेक्षा, इथे चालावंही बरंच लागतं. या धबधब्याला आवश्यक नसलं तरी पाण्यातून पलीकडे जाण्याचा आनंदही घेता येऊ शकतो. हे थोर्ड धाडसाचं काम आहे खरं, पण पाणी ओलांडताना एक वेगळीच मजा येते. पण हे धाडस करताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहेच.

6 ) नाना फडणवीस वाडा, मेणवली : -

        वाई परिसरातील आवर्जून पहावे असे आणखी एक ठिकाण म्हणजे नाना फडणवीसांनी २४५ वर्षांपुर्वी बांधलेला मेणवलीचा वाडा.वाईपासून सहा किलोमीटर अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
     या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून सुरवातीला आपल्याला वाड्याचे उत्तराभिमुख भव्य प्रवेशद्वार व नगारखाना दिसतो. शेजारी वाड्याची माहिती व नकाशा दाखवीणारा फलक आहे. या भव्य प्रवेशद्वाराच्या वर नगारखान्याची खोली आहे.त्याकाळी बसवलेल्या दरवाज्यातून आत आल्यावर समोर देवड्या दिसतात.वाडा बघण्यासाठी प्रवेशशुल्क आहे तसेच माहिती देण्यासाठी गाईडची व्यवस्था केलेली आहे,
 वाड्यामध्ये हळदी-कुंकू समारंभ, विहिरीचा, मधला, मुख्य, कांडणसाळीचा आणि स्वयंपाकाचा असे सहा चौक आहेत. प्रत्येक चौकाच्या मध्यभागी एक मिटर खोल कुंड आहेत. या कुंडात जमा होणारे पावसाचे पाणी बंदिस्त मार्गाने फिरविले आहे. त्याचबरोबर वरच्या मजल्यांमधून निचरा होणारे पाणी वाड्याच्या पाठीमागील भिंतीतून बंदीस्त पद्धतीने काढल्याचे दिसते. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.वाड्याच्या मुख्य चौकात.येथे डाव्या व उजव्या बाजुच्या खोल्या म्हणजे धान्याच्या कोठ्या आहेत.सारा रुपाने गोळा झालेले धान्य येथे ठेवले जाई. याच चौकात डाव्या बाजुला श्री गजाननाची छोटी कोरीव मुर्ती आहे, वाड्यात प्रवेश करण्यापुर्वी डाव्या हाताला कोपर्‍यात असणार्‍या बुरुजावरुन नजारा बघायचा. या बुरुजाला जंग्या आणि तोफे डागण्यासाठी खिडक्या कोरल्या आहेत.मात्र सध्या तोफा दिसत नाहीत. या वाड्याच्या चुना, विटांमध्ये बांधलेल्या भिंतीं आतील बाजूला जाड गिलावा दिलेला आहे. भाताचा पेंढा किंवा गवताचे कांडे चिकट लाल मातीच्या चिखलात मिसळून ते मिश्रण लिंपून हा गिलावा तयार केला आहे. भित्तीचित्रणासाठी भिंत सुकविताना पॉलिश करुन गुळगुळीत केली आहे.
येथील चित्रांची मांडणी व रेखाटन मराठी शैलीचे आहे. यामध्ये दशवताराचा, अष्टविनायकाचा समावेश आहे. याच दालनाच्या शेजारी नाना फडणवीस यांचे शेजघर आहे.उन्हाळ्यात वारा घालण्यासाठी हाताने चालवायचा पंखा आपण येथे पाहु शकतो.याच्याच शेजारी खलबतखान्याची छोटीशी खोली आहे.तिथे आता प्रोजेक्टरची व्यवस्था केली आहे. यानंतर आपण जीना उतरुन हळदी-कुंकू समारंभाच्या चौकात येतो. हळदी-कुंकू समारंभाच्या चौकातील भिंतीवर जय-विजय हे द्वारपाल रेखाटले आहेत. तेथे जिवती देवीचे चित्रही आहे. त्याचबरोबर गवळणींच्या खोड्या काढणारा कृष्णही येथे दिसतो. छतातील लाकडात कोरलेल्या सुंदर वेलबुट्टीसही लाल रंग दिला आहे. हा रंग उत्साहवर्धक वातावरण निर्मिती करतो. या ठिकाणी एकाच दगडात घडविलेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक कमळाच्या फुलाच्या अकारातील कारंजे आहे. हा कारंजा रहाट गाडग्यावर चालविला जात होता. त्याचबरोबर एकाच दगडामध्ये तयार केलेला पाण्याचा कुंडही येथे पहायला मिळतो
 या वाड्याच्या मागे अत्यंत प्रशस्त देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तूशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे.या घाटाच्य दिशेने निघाले कि सर्वप्रथम नजरेस पडतो तो भव्य विस्ताराचा दुर्मिळ असलेला डेरेदार गोरख चिंचेचा वृक्ष.यालाच बॅओबाब म्हणतात. या घाटावर नानांनी बांधलेली पूर्वाभिमुख असणारे लक्ष्मी-वासुदेव म्हणजे मेणेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या छतावर व गलथ्यावर भित्तीचित्रे शिल्लक आहेत. कृष्णेच्या घाटावरील त्या मंदिरांच्या परिसरात गेले, की सर्वप्रथम एक छोटेसे देऊळ दृष्टीस पडते. ते विष्णू व शंकर यांच्या देवळांच्या मानाने खूपच लहान असून घंटेचे देऊळ म्हणून ओळखले जाते. पंचधातूंपासून बनवलेल्या त्या घंटेचे वजन सहाशेपन्नास किलोग्रॅम एवढे असून, त्यावर लहानग्या जिझसला कडेवर घेतलेल्या मेरीचे चित्र व 1707 हे साल कोरलेले आहे. ती घंटा बघितल्यावर जिझस आणि मेरी यांचे चित्र कोरलेली घंटा देवळाच्या परिसरात का ठेवली, ती एखाद्या चर्चमधील घंटा आहे का, तिच्यासाठी वेगळे मंदिर का बांधले असे  प्रश्न पडतात.  घाटाच्या भिंतीवर कोनाडे आहेत.दिवाळी,त्रिपुरारी पौर्णिमा आणि इतर प्रसंगी ईथे दिवे लावून घाट पाजळले जातात. वाईला गेल्यावर आवर्जून हा वाडा बघावा.

७ ) कल्याणगड उर्फ नांदगिरी

 सातारा शहराच्या पूर्वेला नजर टाकली कि सपाट माथ्याचा,कातळकडे असलेला आणि माथ्यावर एका प्रचंड वृक्षाचा तुरा असलेला डोंगर लक्ष वेधून घेतो.हल्ली या परिसरात मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांची उभारणी झाली आहे. शिलाहारकालीन प्राचीन खुणा वागवणारा हा गड आहे कल्याणगड उर्फ नांदगिरी.
     शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. कल्याणगडावरील गुहेत असणाऱ्या पार्श्वनाथाच्या मूर्तीवरून ह गडा शिलाहारांनी बांधला असावा हे सिद्ध होते. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. 
साताऱ्यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला  पाहून येऊ शकतो. किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी गावातून वर येते. पवनचक्क्यांसाठी कच्चा रस्ता केल्यामुळे बाईक असेल तर थेट गडमाथ्यापर्यंत जाता येते. नांदगिरी गावातून जाणार्‍या पायवाटेने निघालो कि सुरवातीला काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. सुरवातीच्या पायऱ्या संपल्यानंतर वाट मुरवाड अशी आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही. या दांडावर आल्यानंतर अर्ध्याडोंगरात एक कोरलेली गुहा आहे. आत पाच सहा दगडी खांब आहेत. यात सध्या पाणी भरलेले आहे. डावीकडे हनुमानाची प्रतिमा कोरलेली. आतील खांबावर मनुष्यसदृश्य प्रतिमा कोरलेली दिसते. गडाचा खडा चढून माथ्याजवळ आलो कि किल्ल्याची तटबंदी जवळ आलेली दिसते. डाव्या बाजूला किल्ल्यावर जायला रेलिंगची जोड असलेल्या दगडी पायऱ्या दिसतात. किल्ल्यावर जाण्यासाठी उजवीकडच्या दगडी पायऱ्या चढायला सुरुवात करावी. पूर्व बाजूला असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा आहे   दरवाज्याला लोखंडी दार! एका बाजूला फिरता दरवाजा दिसतो. नांदगिरी उर्फ कल्याणगड तसा आडवाटेवरचा किल्ला! पण या किल्ल्याला भेट देणार्या किल्ले प्रेमी मंडळीपेक्षा भक्त मंडळीच मोठ्या संख्येने असतात.सहाजिकच या सोयी केलेल्या आहेत. दरवाज्यातून आत वळताना समोरच मंदिराकडे जाण्याची खुण दिसते. डावीकडे वळल्यावर एका खोली समोर लेणी अर्थात गुफामंदिराकडे जाण्याचा मार्ग दिसतो. 
        ईथे खरा थरार सुरु होतो. पादत्राणे आणि सॅॅक बाहेरच ठेवावीत.हातात  टॉर्च घ्यावा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्यायला सज्ज व्हावे.या गुहेत शिरण्या अगोदर काही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. या कड्यातील गुहेचे जे तोंड आहे. याच्यावर आठ दहा फूट ते वीस फूट उंची वर मधमाशांची एक दोन पासून पाच सात अशी पोळी लटकलेली असतात. कांदा – लसूण अथवा धुम्रपान याने मोहोळ उठण्याची शक्यता असते. गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमधे पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चप्पल बूट बाहेर काढूनच आपल्याला आत जावे लागते. ईथे पुरेसा प्रकाश देणारा टॉर्च सोबत बाळगावा.मोबाईलचा उजेड पुरेसा होत नाही. अगदी एन उन्हाळ्यात देखील ईथे गुढगाभर पाणी असते.तसेच गुहेचे छ्त मध्येच उंच आहे आणि बाजुला त्याची उंची कमी होते.गुहेचे शेवटच्या टोकाला उजवीकडे १००८ व्या पार्श्वनाथांची तपोवस्थेतील काळ्या पाषाणातील मूर्ती दिसते. हि मुर्ती इ.स नवव्या शतकात घडवलेली असून स्थानिक लोक तीलाच 'पारसनाथ' म्हणतात. याशिवाय लेण्यात दत्तात्रेयाची संगमरवरी मूर्ती आणि देवीची मूर्ती आहे. 
लेण्यातील हा थरारक अनुभव सोबत घेउन पुढील किल्ला पाहण्यासाठी निघायचे. गडमाथ्यावर काही पाणतळी दिसतात.या तळ्याच्या काठावर  मंदिर आहे.मंदिरात अनेक देवतांच्या मुर्ती पहण्यास मिळतात.गडमाथ्याच्या मध्यभागी वडाचे मोठे झाड आहे. हेच झाड आपल्याला खुप लांब अंतरावरुन दिसु शकते.
एक थरार अनुभवायला इथे नक्कीच जायला हवे.

८ ) कुबडीतीर्थ रामघळ :-

      राममंदीरामुळे प्रसिध्द चाफळच्या पश्चिमेला एक कातळ टोपी घातलेल्या डोंगर दिसतो.याच डोंगरात रामघळ हि अफलातून जागा आहे. चाफळ राममंदिराला भेट देउन रामघळीला जाण्यासाठी चाफळ-उंब्रज मुख्य रस्त्यावर यावे आणि चाफळकडे न वळता डावीकडे पुढे पाटण-साताऱ्याकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर चाफळ पासून फक्त १.५ किलोमीटर अंतरावर गमेवाडी नावाचे गाव लागते. या गावात समोर जाणारा डांबरी रस्ता सोडायचा आणि डावीकडे वळायचे. मग पुढे डेरवण  मधलीवाडी   वाघजाईवाडी  दाढोली अशी छोटी छोटी गावे आणि घाटाचा वळणावळणाचा रस्ता ओलांडत दाढोली गावानंतर साधारण ५०० मीटर अंतरावर डांबरी रस्त्याला डावीकडे एक वळण घेतले. येथे वळणावर सुरवातीलाच "रामघळ कुबडीतीर्थ, सडादाढोली ३ कि.मी." असा बोर्ड लावलेला दिसतो आणि आपण बरोबर रस्त्यावर आहोत याची खात्री पटते. पण इथून पुढे मात्र ३ किलोमीटरचा रस्ता बराच खराब, लाल मातीचा आणि रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या कातळटोपीच्या बाजूबाजूने एका मोठ्या सड्यावर (पठारावर) जातो. ह्या रस्त्यावर गाडी अतिशय जपून चालवावी कारण अधेमधे मोठमोठ्या दगडांनी आपली डोकी वर काढलेली आहेत. थोडं सांभाळून गाडी चालवत हा रस्ता पार केला कि पठारावरच्या थंडगार वाऱ्याने आपले स्वागत होते. त्याच्या जवळच दिसते रामघळीची स्वागत कमान. डोंगरकड्याला लाकडी रेलिंग लाऊन आजूबाजूचा डोंगरदऱ्यांनी नटलेला सुंदर परिसर पाहण्यासाठी छान पॉइंट बनवला आहे. येथेच एका उंच दगडावर समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा केलेला आहे. साधारण ५० ते ६० पायऱ्या उतरून मुख्य डोंगर आणि त्याच्या शेजारी पडलेल्या एका विशाल शिळेमुळे तयार झालेल्या नैसर्गिक कमानीतून आपण रामघळी समोर येऊन पोहोचतो.ह्या घळीत काही काळ समर्थांचे वास्तव्य होते. घळीतून समोरच चाफळच्या राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच बहुदा "दास डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो' असे म्हटले असावे. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या घळीत अनुभवता येते ती म्हणजे फक्त आणि फक्त निरव शांतता. इतका पवित्र आणि शांत परिसर कि तोंड उघडून शांतता भंग करण्याची इच्छा देखील होत नाही. घळ दुमजली असून बाहेरूनही दोन मजले स्पष्ट दिसतात. घळीच्या डाव्या हाताला एक मोठे विवर आहे. येथे आत गेल्यावर वर्तुळाकार जागा आहे. हीच समर्थांची ध्यानस्थ बसण्याची जागा. 
       या रामघळी संदर्भात एक कथा सांगितली जाते. सदाशिवशास्त्री येवलेकर नावाचे विद्वान दिवसा मशाली लावून अन जानव्यास सुरी बांधून फिरत होते. आपल्या पांडित्याच्या जोरावर समोर आलेल्या विद्वानाचा पराभव करित त्यांचे भारतभ्रमण सुरु होते.जर वादविवादात पराभव झाला तर मशाल विझवून जानव्याला बांधलेली सुरीने जीभ कापून घ्यायची त्यांची तयारी होती. पण विद्वत्तेच्या अभिमानाचे रुपांतर घमेंडीत झाले. फिरत फिरत हे शास्त्रीबुवा शिंगणवाडीचा डोंगर चढून आले तो शिळा असलेल्या जागी त्यांची भेट समर्थांशी झाली.शास्त्रीबुवांनी तिथेच समर्थांना वादविवादाचे आवाहन दिले.समर्थांनी जवळून जाणार्‍या मोळीविक्याला हाक मारली.समर्थांनी त्याच्या वाटेत काठीने तीन रेघा आखल्या. त्या ओलांडून आलेल्या मोळीविक्याने वादविवादात सदाशिवशास्त्रींचा पराभव केला. पराभव मान्य केलेल्या सदाशिवशास्त्रींना समर्थांनी आपल्या संपद्रायात सामिल करुन घेतले.
  याच परिसरात कुबडीतीर्थ आहे. यासंदर्भात एक कथा अशी सांगितली जाते कि ईथे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली,तेव्हा ते दोघे बोलत पुढे गेले असता शिवरायांना तहान लागली. तेव्हा रामदास स्वामींनी हातातील कुबडीने एक दगड उलथवून येथील झर्‍याचे पाणी त्यांना प्यायला दिले.हा झरा अजूनही वाहताच आहे.याला कुबडीतिर्थ म्हणतात. ईथेच एक मारुतीची घुमटी आहे.
  या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांना एक विनम्र सूचना, रामघळीच्या या पवित्र वातावरणास इजा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये. हे पिकनिक अथवा मौजमजा करण्याचे ठिकाण अजिबात नाही. हा परिसर स्वच्छ व शांत ठेवण्यास मदत करावी. 

९ ) राजेमहाडीक वाडा, तारळे :-

 छ. शिवाजी महाराजांनी बारा मावळातील अनेक सामान्य माणसांना स्वराज्य स्थापनेच्या कामात सहभागी करून घेतले. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली सामान्य मावळ्यांनी असामान्य पराक्रम केला. अनेक घराणी परकीय आक्रमकांच्या सेवेतून स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेण्यात छत्रपति यशस्वी झाले. अनेकांनी शौर्य, पराक्रम करून आपली स्वराज्यनिष्ठा सिद्ध केली. तिकडे कर्नाटक मधे शाहजीराजांसोबत अनेक इमानी मराठा सरदार आपले योगदान देत होती. त्यातील एक घराणे म्हणजे राजेमहाडिक यांचे होय.
   हरजीराजे महाडिक हे शाहजीच्या सेवेत दाखल झाले होते. शाहजीराजांच्या मृत्यूनंतर हरजीराजे छ. शिवाजी महाराजांच्या मोहिमेत यशस्वी होऊ लागले. छत्रपतींना हरजीराजेंची गुणवत्ता ज्ञात होती. हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला.त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने १६६८ ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला. शाहजी राजांच्या मृत्यूनंतर कर्नाटकातील मराठा सरदारांपैकी निष्ठावान व्यक्तीमधे हरजीराजे हे अग्रभागी होते. कर्नाटकची संपूर्ण जबाबदारी हरजीराजेंच्या नेतृत्वाखाली छ. शिवाजी महाराजांनी सोपविली. हरजीराजेंनी आपल्या पराक्रमाने कर्नाटकातील मुलूख वाढविण्यासाठी फार मोठा पराक्रम करून ते यशस्वी झाले .हरजींनी कर्नाटकचा मुलूख चांगला संभाळला व त्यात वाढ देखील केली.छ. संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. मोगल महाराष्ट्रात जोर धरु लागल्यावर राजाराम महाराजांना जिंजी जावे लागले. मोगल सरदार झुल्फिकारखान याने जिंजी वेढा दिला होता. यावेळी झालेल्या युद्धात एक तोफेचा गोळा लागल्यामुळे २९ सप्टेंबर १६८९ रोजी वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी हरजीराजेंचा स्वराज्य रक्षण करताना मृत्यू झाला. स्वराज्याच्या तीन छत्रपतींची अत्यंत निष्ठापूर्वक सेवा हरजीच्या हातून झाली.
छ.संभाजी महाराजांची कन्या भवानीराणी म्हणजेच छ. शाहू महाराजांच्या भगिणी यांचा विवाह हरजीराजे महाडिकांचे पुत्र शंकराजी यांचाशी झाला. छ. शाहूंनी तारळे ता. पाटण जि. सातारा विभागातील २४ गावची जहागिरी त्यांना दिली. पाटण तालुक्यातील ऐतिहासिक तारळे (ता.पाटण जि. सातारा ) गावात राजेमहाडिकांचे सुमारे तीन एकर क्षेत्रफळावर एकूण आठ वाडे होते, त्यापैकी चार वाडे काळाच्या ओघात नष्ट झाले असून चार वाडे अजूनही उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत आपल्या पूर्वजांचा वैभवशाली पराक्रम मूकपणे सांगताना दिसतात. वाड्याजवळ असलेले राममंदिर, बारव  पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाड्यामधे आड,तलवार, दांडपट्टे, ढाल, भाले, पालखी अशा विविध गोष्टी पहायला मिळतात.गावाच्या बाहेर नदी संगमावर शंभूराजेंची मुलगी भवानीबाई महाडिक यांची समाधी आहे. प्रत्येक वाड्याचे प्रवेशद्वार आपल्या भव्यतेची जाणीव करून देते. वाड्यात भरपूर ऐतिहासिक सामुग्री आजही पाहण्यास मिळते. यात प्रामुख्याने तत्कालीन शस्त्र, महिलांसाठी असलेले लाकडी मेणे, व्यायामाचे साहित्य, कासवाच्या पाठीच्या ढाली, संदूक, इत्यादी राजेमहाडिकांच्या वंशजांनी फार कष्टाने सुरक्षित ठेवले आहे. भवानीराणीच्या समाधीचे सध्या नुतनीकरण सुरू झाले असून लवकरच तारळे या गावी एक भव्यदिव्य समाधी आपल्याला दिसून येईल.

१० ) शिवकालीन पुल, पार :-

      अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा आपण वाचल्या आहेत. महाराजांनी स्वराज्य स्थापना करताना काही सवंगड्यांना हाताशी घेतलं आणि स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांनी फक्त लढाया केल्या नाहीत तर त्यांना दूरदृष्टीसुद्धा होती. सातारा जिल्ह्यातील एक पूल छत्रपती शिवरायाच्या इतिहासाची साक्ष तर देतोच, पण या नव्या युगातील इंजिनीअर्सनाही बोध हि देतो.
  मुसळधार पावसाच्या सरी कोसळणारं सातारा जिल्ह्यातलं जावळीचं खोरं. याच पर्वतरागांमध्ये शिवरायांचा प्रताप सांगणारा प्रतापगड. मुसळधार पावसामुळे इथे कोयनेच्या उगमस्थानाच्या नदीला कायम महापूर. त्यामुळे पावसाळ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला येताना ही कोयना नदी ओसंडून वाहत असायची.
  या भागातून प्रवास करणं जिकीरीचं असल्यामुळे शिवाजी महाराजांनी या ठिकाणाची पाहणी करुन तत्कालीन पार्वतीपूर या गावात म्हणजे आताच्या पार या गावाजवळ पूल उभारला.  52 मीटर लांबीचा, 15 मीटर उंचीचा आणि आठ मीटर रुंदीचा हा पूल अवघ्या काही महिन्यांत उभारला गेला.
  या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह मावळ्यांचा प्रवास पावसातही सुकर झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाला ना कोणतं अत्याधुनिक तंत्रज्ञान ना कोणता इंजिनिअर लागला. असा आखीव रेखीव पूल की सध्याच्या टाय घातलेल्या इंजिनीयरांनाही विचार कारायला लावणारा.
  पुलाचा प्रत्येक दगड काटकोनात घडवलेला, तोही एकदम मापात. ज्या बाजूने पाणी या पुलाखाली जाते, त्या प्रत्येक खांबाला धारदार कुऱ्हाडीसारख्या दगडी भिंती. पुरातील पाण्यासोबत आलेलं कोणतंही लाकुड या पुलावर आदळलं तरी त्याचे दोन भाग व्हावेत अशी ही कल्पना. पुरामुळे कोणता ओंडका आदळला तरी पुलाला कोणताच धोका नाही.
  पाणी जाण्यासाठी बनवलेली कमानही मंदिराच्या गाभऱ्यासारखीच. कोरीव काम केलेल्या या पुलाला आज तब्बल साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली, पण हा पूल आजही त्याच दिमाखात इतिहासाची साक्ष सांगत लोकांसाठी उभा आहे. शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर कोकणात जाण्यासाठी होऊ लागला. कोकणातील सर्व दळणवळणाची कामं याच पुलावरुन होऊ लागली.
  एकीकडे ब्रिटीशांनी बांधलेल्या पुलाची मर्यादा शंभर वर्षांपेक्षा जास्त नाही हे ते स्वतः पत्र पाठवून राज्य शासनाला कळवतात. आपल्या राज्यात बनवलेले अनेक पुल हाताच्या बोटावर मोजण्या इतकी वर्ष झाल्यावर कोसळल्याच्या घटना आहेत. त्यामुळे या शिवरायांच्या काळात बांधलेल्या पुलाकडून सरकारनं बोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती याचं उत्तम उदाहरण म्हणून या पुलाचा आपण उल्लेख करू शकतो.अर्थात हा पूल छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे कि नाही यावरून इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. 
  अलिकडेच रत्नागिरी-पुणे हा प्रवास कमी वेळात होण्यासाठी खेड-आंबिवली-बिरमणि-हातलोट-पार असा रस्ता मंजुर झाला आहे. तेव्हा या परिसरातील दळणवळण वाढेल आणि मधुमकरंदगड अधिक पर्यटकांचे आकर्षण बनेल. प्रतापगड, महाबळेश्वरच्या भेटीत हा पुल आवर्जून पहावा असाच आहे.

११ ) कात्रेश्‍वर मंदीर, "कातरखटाव':-

       खटाव तालुक्‍यातील कातरखटाव या गावाचे पूर्वीचे नाव कवठे असे होती. कवठेश्‍वर हे या गावचे ग्रामदैवत. पुढे या गावाला कातरपट्टे असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा अपभ्रंश कातरखटाव असा झाला. आता हे गाव कातरखटाव या नावाने ओळखला जाते. या गावाच्या नावातील बदलाची दंतकथा सांगितली जाते. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी पुढे येरळा नदीस मिळते. या कवठे गावात शिवदास नावाचा गवळी हा शंभू महादेवाचा निस्सीम भक्‍त होता. दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम त्याने सोडला नव्हता. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला, पाण्याची कावड घेऊन नदीवर गेला, स्नानसंध्या उरकली, कावड पाण्याने भरली आणि हर हर महादेव म्हणत तो शिखर शिंगणापूरचा रस्ता जवळ करू लागला. कावडीतून आणलेल्या कवठाई नदीच्या पवित्र जलाने शंभू महादेवास अभिषेक केला आणि भक्‍तिभावाने हात जोडले. शिवदासाची भक्‍ती पाहून शंभू महादेव प्रसन्न झाले. ते शिवदासला म्हणाले, तुला काय हवं आहे, ते माग. तेव्हा शिवदास म्हणाला, मला काही नको. फक्‍त तूच मला हवा आहेस. त्यावर महादेव म्हणाले, आता तुला इतक्‍या लांब माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव, तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत मागे वळून बघायचे नाही.
शिवदासाने कावड घेतली आणि कवठेचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली की, देव माझ्या मागोमाग आले आहेत का? शंका आल्याने शिवदासाने मागे वळून पाहिले असता, कोणीच दिसलेच नाही. शिवदास निराश  होऊन घरी आला. विचार करतच झोपी गेला. झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी मागे वळून पहिलेस, त्या ठिकाणी मी गुप्त झालो. तेथे तुला शिवलिंग सापडेल. शिवदास खडबडून जागा झाला. तो आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन थांबला. शिवनामाचा जप करत त्याने जमीन नांगरायला सुरुवात केली. जमीन नांगरत असताना शिवदासाला मोठा आवाज ऐकू आला आणि जमिनीतून रक्‍ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्या क्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्‍ताचे रूपांतर पाण्यात झाले आणि शिवलिंग वर आले. मात्र, शिवलिंगाची साळुंखी नांगराच्या फाळाने कातरल्याचे दिसले. त्यामुळे शिवलिंगास 'कात्रेश्र' म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यामुळे कवठेचे नाव कातरपट्टे, असे झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे 'कातरखटाव' झाले. 
       या कातरखटाव गावात एक प्राचीन कात्रेश्वर मंदीर आहे. मुळात या मंदिराभोवती सीमा भिंत होती. मंदिरासमोर पुष्करणी आहे. मंदिराच्या आवारात अनेक वीरगळ आणि शिवलिंग आणून टाकलेले आहेत. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदीराच्या भिंतीवर असंणार्या कोनाड्यात सध्या असलेल्या मूर्ती चुन्याच्या आहेत. त्यामुळे ह्या मूर्ती नंतरच्या काळात म्हणजे जेव्हा मंदिराचे विटांनी बांधलेले मूळ छप्पर कोसळले आणि त्याची दुरुस्ती झाली तेव्हा बसविलेल्या असाव्यात हे उघड आहे.  या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा कन्नड शिलालेख. तो देखील भग्न आहे.
मंदिरासमोर चौरस आकाराची एक बारव बांधलेली आहे. ती पुर्णपणे ढासळलेली आहे. मंदिराच्या पुढे असलेल्या मूर्तीशिल्पांपैकी नंदीची मूर्ती उल्लेखनीय आहे. या नंदीवर हे एक बालक नैवेद्याची टोपली ठेवून असल्याचे दाखवले आहे. मंदिराच्या समोर काही वीरगळ आहेत. मंदिराची उत्तर भिंत पडण्याच्या अवस्थेत आहे, त्या बाजूस मातीचा ढिगारा टाकला होता.
  सध्या मात्र या मंदीराचा जीर्णोध्दार सुरु आहे. समोर असलेल्या पुष्करणीची दुरुस्ती केली जात आहे. तळातील गाळ काढून त्यात पुरेसे पाणी भरले जाईल असे पाहिले जात आहे. मात्र मंदीराची दुरुस्ती करताना काळजी घेतली जात नाही. मंदीराच्या शिखरावर असलेली शुकनास काढून टाकली आहे. त्यामुळे मंदीराचे महत्वाचे वास्तु वैशिष्ट्य नाहीसे झाले आहे. अर्थात मंदीर नवीन झाल्यावर कसे दिसेल ? याचे चित्र तिथे न लावल्याने अंदाज येत नाही. अपेक्षा करुया कि मंदीराची मुळ वैशिष्ट्य कायम ठेवून नुतनीकरण होईल.

१२ ) कराडची नकट्या रावळाची विहीर :-

     सातारा तालुक्यातील सर्वात प्राचीन असलेल्या कराड शहराजवळ कृष्णा आणि कोयना नद्यांचा एकमेव प्रीतिसंगम आहे. याच संगमाजवळ पंताचा कोट हे नाव असलेल्या किल्ल्यात एक पायविहीर असून स्थानिक लोक तिला नकट्या रावळाची विहीर या नावाने ओळखतात. विहीर किल्याच्या पश्चिम टोकास असून कोयना नदीच्या पात्रापासून सुमारे २४ मी उंचीवर आहे.विहीर म्हणजे जलस्त्रोताचे जिवंत झरे असतात, तसेच जलसंस्कृतीच्या ठिकाणी जलदेवता व इतर दैवतांचे कोरीव काम साधारणतः सर्व जल उगम व साठा या ठिकाणी हमखास दृष्टीपथास येते, मात्र येथील विहिरीत ना पाण्याचे झरे, ना जलदेवतांच्या कोरीव आकृती. या सर्व गोष्टींचा अभाव असलेल्याने नक्की ही विहीर पाण्याच्या वापरासाठी निर्माण केली होती की इतर उद्देशाने याचा मनात संम्रभ निर्माण होतो. काहींच्या मते शत्रूच्या सैन्यापासून लपून राहण्यासाठी या विहिरीचा वापर होत असावा. कोयनानदीच्या पात्रतातून चुनेगच्ची खापरी जलवाहिकेच्या माध्यमाने येथे पाणी आणले असावे ही शक्यता वाटते, पण इतक्या भल्यामोठ्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी ना रहाटाचे, ना मोटेचे हौदे असल्याचे पुरावे दिसत नाही.
         विहिरीचा ईशान्य बाजूकडील काही भाग गोलाकार आहे.मात्र उद्देश किंवा उपयोग कशासाठी होत असावा याबाबत अनभिज्ञता आहे. विहीरीच्या आत उतरण्यासाठी ८२ पायऱ्या आहेत. दर २० पायऱ्यानंतर एक मोठी पायरी आहे.  वीस पायऱ्या चढल्यावर किंवा उतरल्यावर विसावा घेण्यासाठी त्या केल्या असू शकतील.पहिल्या वीस पायऱ्या उतरून गेल्यावर विहिरीच्या अंतर्गत तटबंदी बांधकामातून दोन्ही बाजूने एक माणूस विहिरीरच्या हौद्याकडे जाऊ शकेल अशी रचना आहे. जेथे पायऱ्या संपतात तेथे दोन विशाल दगडी स्तंभावर एक मोठी कमान उभारण्यात आली आहे. या कामानीत दोन उपमार्ग आहेत. या विहिरीचे बांधकाम दगडी चिरे आणि चुन्यात केले आहे. नदीच्या बाजूने नंतरच्या काळात विटांनी एक धक्का बांधण्यात आला असावा. विहिरी बाबतची नोंद सन १७५० मध्ये उपलब्ध होती. या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठी होत नसावा. दगडी बांधकामात विशिष्ट अंतरावर सलगपणे खाचा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी त्यात मोठ्या लाकडी किंवा लोखंडी तुळया ठसवून या विहिरीचे सहा ते सात मजल्यामध्ये परिवर्तन करणे शक्य होत असावे. आजही काही खाचत लाकडी तुळया दिसून येतात. तसेच त्या त्या टप्प्यावर उतरण्यासाठी जिने ठेवलेले आहेत. याशिवाय विहिरीच्या प्रवेश मार्गांवर मजबूत अशी दगडी भिंत उभारण्यात आलेली आहे. केवळ पाणी साठवण्यासाठी तिचा उपयोग होत नसावा किंवा शेजारची परस्थिती पाहता शत्रूशी लढताना दबा धरून बसण्यासाठी ही जागा वाटत नाही. अनेक मजली असलेली ही विहीर कदाचित महत्वाच्या वस्तूंचा साठा करण्यासाठी कोठार म्हणून उपयोग येत असावी. ही वास्तू केंद्रीय विभागाने सुरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेली आहे.
कोयना व कृष्णा नदीचा संगम परिसर दर्शनीय आहे. संगमावरील स्व. यशवंतराव चव्हाणांची अष्टाकृती समाधी दर्शनाने समाज जीवनात लोकाभिमुख सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. घाटावर असलेल्या मंदिरांची भलीमोठी शृखंला आहे. कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर व इतर देवतांच्या दर्शनासाठी नक्कीच एकदा कराडला गेले पाहिजे!

१३ ) धावडशी :-

  श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे उपेक्षित कर्मयोगी होते. शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रम्‍हेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात स्वामी सातारा या छत्रपतींच्या राजधानीच्या अगदी जवळ असलेल्या धावडशी गावी येऊन स्थायिक झाले. सन १७४५ मध्ये वीरमाडे या गावी ब्रह्मेंद्रस्वामींचे निधन झाले.श्रीब्रह्मेंद्रस्वामी हे छत्रपती शाहू महाराजांचे परम दैवत! त्‍यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख रुपये खर्चून धावडशी गावातील स्वामींच्या समाधिस्थानावर त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.त्यालाच लागून चार बांधीव तलाव आहेत. त्यांचा काळही अडीचशे-तीनशे वर्षांचा असल्याचं सांगितलं जातं. 
परशुरामाचे निस्सीम भक्त असलेल्या या स्वामींनी धावडशीला दोन लाख रुपये खर्चून भार्गवराम मंदिर उभारले आहे. खास मराठा स्थापत्यशैलीचे धावडशीचे भार्गवराम मंदिर मोठे पाहण्यासारखे आहे.  जनावरे आणि माणसांसाठी पाण्याची स्वतंत्र केलेली सोय आवर्जून पाहावी अशी आहे. मंदिरावरील मूíतकाम सुंदर आहेच, पण त्यातही विष्णूचे दशावतार खास पाहण्याजोगे आहेत. मंदिरात परशुरामाची सुंदर मूर्ती असून एक शिलालेखही पाहायला मिळतो. मंदिर उत्तराभिमुख असून, त्याचे प्रशस्त असे तीन गाभारे आहेत आणि पुढे, भव्य असा सभामंडप आहे. मुख्य मंदिर घडीव अशा दगडी उंच चौथऱ्यावर उभारलेले आहे. दगडांच्या सांध्यामध्ये शिशाचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावर दोन गगनचुंबी शिखरे आहेत. त्यावर दोन उंच कळस आहेत. मंदिरावर सर्व बाजूंनी रेखीव पद्धतीने दशावतार कोरलेले असून, शिखरावर ठिकठिकाणी वेलपत्री नक्षिकाम व पौराणिक रंगीत चित्रे साकारलेली आहेत. त्या चित्रांवरील भावमुद्रा, वेचक प्रसंग व उत्कृष्ट रंगसंगती यांत शिल्पकारांचे व कलाकारांचे कौशल्य दिसून येते. मंदिराच्या पुढील शिखरावर चौकोनी आकाराचे आकर्षक मनोरे आहेत.
श्री परशुराम तथा भार्गवराम. त्यांची काळ्याभोर पाषाणाची रेखीव मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहे. पेशवाईतील प्रख्यात कारागीर बखतराम यांनी ती मूर्ती घडवली असून तो शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. श्री भार्गवरामाच्या दोन्ही बाजूंस त्यांचे बंधू काळ व काम यांच्या साडेतीन फूट उंचीच्या पितळेच्या सुबक मूर्ती आहेत. त्या मूर्तींना उत्सवमूर्ती असे संबोधतात. मूर्तींसमोर श्रीब्रह्मेंद्रस्वामींची समाधी आहे. श्री भार्गवरामांजवळ दोन टांगत्या समया असून, समाधीजवळ उंच अशा पितळेच्या दोन घाटदार समया आहेत. परिमल, अखंड नंदादीप आणि पूजोपचार यांमुळे गाभारा शांत, निर्मळ, सुगंधी व शुचिर्भूत भासतो. मुख्य गाभारा प्रशस्त असून, त्याच्या प्रवेशद्वारावर उत्तम शिल्पाकृती दगडात कोरलेल्या आहेत. उजेडासाठी दोन्ही बाजूंला दगडात कोरलेल्या जाळ्या आहेत. 
मुख्य मंदिराच्या पुढील बाजूस भव्य सभामंडप असून, त्याचे बांधकाम लाकडी कलाकुसरीचे आहे. शंभर वर्षांपूर्वी मंडपाचे बांधकाम झाले असून, ते उत्तम स्थितीत आहे.   मंडपाच्या पूर्व बाजूंस तळघरवजा दगडी भुयार असून, त्यात शिवलिंग व नंदी अशी दोन दैवते आहेत. शेजारीच, कोपऱ्यात लहानसे जलकुंड असून, भुयारात अतिशय थंड वाटते.
मंदिराच्या परिसरात जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांची व देवस्थानाची कचेरी आहे. त्या ठिकाणी जवळपास तीनशे वर्षांतील जुनी कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. कचेरीस लागून मोठे स्वयंपाकगृह असून, हजारोंच्या पंक्ती उठतील अशी मोठमोठी भांडीकुंडी व सर्व सोयी आहेत. समोर भलेमोठे बांधकाम असलेली धर्मशाळा व सुसज्ज असे अतिथिगृह आहे. त्याच धर्मशाळेत उत्सवातील प्रसादपंक्ती होत असत. 
श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे महाराष्ट्रायतील जनतेच्या विस्मृतीत गेलेले संत. पण त्यांचे कार्य आणि त्यांचे निस्सीम भक्त यांनी त्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवले आहे.

१४ )  दातेगड उर्फ सुंदरगड :-

 पाटण या सातारा जिल्ह्यातील गावाच्या नावाबरोबरच आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते कोयना नदीचे विस्तीर्ण व हिरव्यागार विविध निसर्गसंपत्तीचा खजिना असलेले खोरे. या कोयनेच्या खो-यातील सरदार पाटणकर घराण्याचे शिवकाळातील योगदान, कर्तृत्व, पराक्रम, एकनिष्ठता किती महत्त्वाची होती हे इतिहासाने पाहिले आहे.याच पाटण तालुक्याच्या रक्षणासाठी टेहळणी करणारा टोळेवाडीचा 'घेरा दातेगड' किंवा 'सुंदरगड' आहे. 
स्थानिक लोकांच्या मते हा गड शिवाजी महाराजांनी उभारला असे असले तरी हा गड बहुधा शिलाहारांच्या राजवटीत उभारला गेला असावा.अफ़जलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला.शिवकालात गडावर कचेरी व कायम शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी दातेगड पाहताच त्यांच्या मुखातून पहिला शब्द निघाला तो म्हणजे "सुंदर".त्यामुळे दातेगडास सुंदरगड म्हणून देखील ओळखले जाते, अशी समजुत आहे. याचवेळी आदिलशाहीच्या चाकरीत असलेले सरदार चालुक्यवंशीय घराण्यातील पंचसहस्त्री सरदार चांदजीराव पाटणकर हे छत्रपतींचे झाले, स्वराज्याचे झाले. छत्रपति शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, राजाराम महाराज व पुढील काळात देखील या पाटणकर घराण्याने स्वराज्याची एकनिष्ठ सेवा केली. छ. संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर अनेक मातब्बर घराणी सैरभैर होऊन वतनाच्या लालसेने मोगलांच्या बाजूला गेल्याचे इतिहास पुरूषाने पाहिले आहे, मात्र अशा कठीण प्रसंगी सरदार पाटणकर घराण्याच्या वारसदारांनी स्वराज्याची भक्कम साथ सोडली नाही.
या गडावर जायचे तर दोन मार्ग आहेत.  स्वताचे वाहन असेल तर- पाटण शहरातून एक रस्ता चाळकेवाडी पठाराकडे जातो. या डांबरी रस्त्याने प्रवास करताना जवळपास सर्व डोंगर चढून आलो कि भैरवनाथ पोल्ट्री फार्मजवळून एक रस्ता दक्षिणेकडे दातेगडकडे जातो 
 दुसरा मार्ग अर्थातच डोंगरभटक्यांसाठी. पाटण शहरातून ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कुल जवळून एक पाउलवाट समोर दिसणार्‍या टेकडीवरील दर्ग्याकडे जाते. टेकडीच्या  माथ्यावर दिसणार्‍या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने चढते.इथून थोड्या अंतरावर दातेगड आहे.
       गडाच्या पश्चिमेस असलेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या खडकात खोदलेल्या पायऱ्या दिसून येतात. दरवाजाची कमान जांभ्या दगडातील आहे. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूला सैनिकांसाठी खडकात कोरलेल्या देवड्या आहेत. इथेच गणेशमूर्तीच्या काटकोनात असलेल्या कातळावर दक्षिणाभिमुखी आठ फूट उंचीचे हनुमानाचे रेखीव शिल्प कोरलेले आहे. दातेगडावर खडकात खोदलेली विहीर हेच एक बघण्यासारखे विशेष आहे  तलवार विहीर ५० मिटर लांब, ३ मिटर रुंद तर ३० मीटर खोल असून आत जाण्यासाठी विहिरीस एकूण ४४ पायऱ्या आहेत. यातील काही पायऱ्या तुटलेल्या आहेत.शेवटच्या चार पाच पायऱ्यांच्या डाव्याबाजूस खडक खोदून तयार केलेले शंभू महादेवाचे मंदिर असून आतमधे महादेवाची पिंडी तर बाहेरील बाजूस सुरेख नंदीशिल्प आहे. तेथून वर आकाशाकडे पाहिल्यास आपणांस तलवारीचा आकार सहज दिसून येतो. विहीर बघून गडमाथ्यावर भर्राट वारा खात उभारलो कि समोरच पुर्वेला सडा वाघापुरचे पठार दिसते. या किल्ल्याहून दक्षिणेकडे असलेला मोरगिरी (गुणवंत गड) व कोयनेचा प्रवाह दिसून येतो.
 पावसाळा सरताना या गडावर आल्यास एक अनोखा नजारा दिसतो.गवताची हिरवीगार चादर पांघरलेला गडावर सोनकीच्या पिवळ्या फुलांचा जणु भंडारा उधळलेला असतो. अशा या दातेगडला नक्कीच एकदा भेट द्या, तो तुमच्याशी हितगुज करण्यासाठी कायमच उत्साही आहे.

१५ ) शिरवळची प्राचीन पाणपोयी :-    

   पुण्याहून सातार्‍याला येताना निरानदी ओलांडली की सातार्‍याची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते. दुर्दैवाने ते मंदिर नसून ती पाणपोई आहे. पाषाणात कोरेलेली ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी असून, संवर्धनाअभावी ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.
     सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे, शिल्प इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
त्यापैकी एक असलेली शिरवळजवळील पाषाणात कोरलेली पाणपोई. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.
   अठराव्या शतकात खंबाटकीच्या खांबटाक्यापासून ते सिंहगडाच्या दरम्यान शिवपर्वानंतर मराठयांनी गनिमांशी बावीस वेळा लढाया केल्या. रावजी पंत चिटणीसांच्या बखरीत या लढायांचे बरेचसे वर्णन आले आहे. तंजावर आणि बेंगलोरच्या मराठी सदरे वर जाताना सैनिकांच्या मोहिमांसाठी शिरवळ गावाच्या हद्दीवर पाणपोई उभारण्याची सूचना दस्तुरखुद्ध श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली होती. या पाणपोईला सव्वादोनशे वर्षाचा इतिहास असून या पाणपोईची रचना ही हेमाडपंती देवळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या पाणपोईसाठी पगारी सेवक ठेवले जात असत. या पाणपोईत चार हंड्यांची व्यवस्था होती. सातारा-नायगाव-सारोळा-धांगवडी-कामथडी येथे पाणपोयांची रचना अस्तित्वात होती. मात्र शिरवळ हद्दीतील हेमाडपंती शैलीची ही पाणपोई मात्र व विशेष रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आज देखभालीअभावी दुर्लक्षित आहे.
     सदर पाणपोईची रचना व त्याच्या व्यवस्थेच्या आदेशाबाबतचे लेखी पत्र नानासाहेब पेशवे यांनी शिरवळच्या सरदारांना धाडले होते. या पाणपोई च्या बांधकामासाठी दगड गूळ, चुना, हरभरे, इ. साहित्य पुण्यावरून शिरवळला रवाना करण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. पुरातन पाणपोई कोणत्याही प्रकारचा चुना अथवा सिमेंटसारखे पदार्थ न वापरता केवळ गुरुत्वबल वापरून उभारण्यात आली आहे. त्यातील एखादा दगड जरी पडला तरी ही वास्तू पुन्हा आहे तशी उभारणे अवघड आहे. या पाणपोईच्या दगडी एकमेकांपासून वेगळ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
       पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाला या पुरातन वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना या पाणपोईच्या भोवतालीच खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला आहे. या खोदकामामुळे पाणपोईची दगडी ढासळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 
      धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाºया वास्तू वाचविल्या पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला किमान त्याची तोंडओळख तरी होईल.

१६ ) अंभेरीचे कार्तिकेय मंदिर

 कार्तिकेय या देवतेबद्दल आपल्याकडे महाराष्ट्रात काहीशी नकारात्मक भावनाच दिसते. अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत म्हणा. एक तर आपल्याकडे प्रचलित असलेल्या दंतकथा आणि कार्तिकेय या देवतेविषयी फारशी माहिती नसणे, अशी ती दोन कारणे दिसतात. स्त्रियांनी कार्तिकेयाचे दर्शन घेतले तर त्यांना वैधव्य येते ही भावना तर एवढी खोलवर रुजली आहे की, कार्तिकेय या नावाचा उच्चारसुद्धा टाळला जातो. त्याचबरोबर कार्तिकेयाला पार्वतीने दिलेला शाप आणि त्याबद्दलची अजून एक दंतकथासुद्धा जनमानसात रुजलेली दिसते. त्यामुळे फक्त कार्तिकी पौर्णिमा सोडली तर स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन अजिबात घेत नाहीत आणि एकूणच या देवतेविषयी उदासीनताच सर्वत्र जाणवते.   
 परंतु वस्तुस्थिती तशी नाही. कार्तिकेयाचे महत्त्व भारतभर जोपासलं गेलं आहे. त्याबद्दल अनेक महत्त्वाच्या कथा पुराणांमध्येही सापडतात. तो देवांचा सेनापती होता, योद्धा होता त्यामुळे विविध ग्रंथांमधून त्याच्याबद्दल आदरयुक्त उल्लेखही पुष्कळ मिळतात. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा कार्तिकेयाच्या मूर्ती खूपच प्राचीन काळापासून आढळून येतात आणि त्यात वैविध्यसुद्धा आढळते. कदाचित स्त्रियांना दर्शन निषिद्ध या दृढ झालेल्या कल्पनेमुळेसुद्धा असेल, पण काíतकेयाची उपासना महाराष्ट्रात फारशी आढळत नाही.
      या सर्व पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्यतील वडुज तालुक्यातले अंभेरी गावचे कार्तिकेय मंदिर आणि तेथील प्रतिमा ही विशेषच म्हणायला हवी. रहिमतपूर-वडुज रस्त्यावर अंभेरी या गावी कार्तिकेय देवस्थान आहे. वडुजकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्याचे नावसुद्धा कार्तिकेय घाट असेच आहे. घाटाखाली दरी आहे. त्या दरीत देवाचे वास्तव्य म्हणून त्या दरीला देवदरी असे सुंदर नाव आहे. वेशीतून आत गेले की अंदाजे एक कि.मी. वर रस्ता संपतो आणि समोरच जीर्णोद्धारित मंदिर दिसते. मंदिराच्या अलीकडे देवदरीवर एक लोखंडी पूल बांधला आहे. त्या पुलावरून पलीकडे वटवृक्षांच्या जवळच पाण्याचे कुंड आहे. जवळच काही समाधी दिसतात. तिथे हातपाय धुऊन मंदिराकडे जाता येते. पावसाळ्यात याच पुलावरून समोर कोसळणारा धबधबा फारच प्रेक्षणीय दिसतो. मंदिरात समोरासमोर दोन गर्भगृहे आहेत. जुन्या गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली गेले की आत एक शिविपडी दिसते आणि त्याच्या मागे मीटरभर उंचीची (अंदाजे चार फूट) काळ्या पाषाणातील काíतकेयाची अप्रतिम मूर्ती आहे. कार्तिकेयाला इथे एकच मुख असून त्रिभंग अवस्थेतील या मूर्तीला अंदाजे बारा हात आहेत. देवाच्या उजव्या बाजूला खाली मोर असून त्याचा लांबसडक पिसारा डाव्या पायाच्याही पुढेपर्यंत आला आहे. पायापासून ते त्याच्या उजव्या खांद्यापर्यंत असलेला भाला (शक्ती) इथे फारच सुबकतेने अंकित केलेला आहे. डोक्यावर जटामुकुट असलेली ही डौलदार अशी प्रतिमा आवर्जून पाहण्यासारखी आहे. इतकी सुंदर प्रतिमा इथे कशी आली याबाबत मात्र काहीच माहिती मिळत नाही. स्थानिकांच्या मते वर्षांनुर्वष ही मूर्ती इथेच असल्याचे सांगितले जाते. याच मूर्तीशेजारी एक सहा तोंडांची अंदाजे पाऊण मीटर उंचीची अजून एक कार्तिकेयाची छोटी मूर्ती ठेवली आहे. ती मात्र बरीच अलीकडच्या काळातली वाटते. बारा हात असलेल्या या मूर्तीच्या हातात विविध आयुधं दिसतात; पकी उजव्या खालच्या हातातली गदा आणि डाव्या हातात धरलेले धनुष्य ही आयुधं प्रकर्षांने ठसठशीत आहेत. कमरेला धोतर नेसलेली ही प्रतिमा आहे. याच देवळातील दुसऱ्या गर्भगृहात अगदी नवीन संगमरवराची एकाच तोंडाची कार्तिकेयाची मूर्ती आहे. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आणि कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. हा सबंध परिसर वटवृक्षांनी आणि झाडीने वेढलेला आहे. अर्थात महाराष्ट्रातील ठाम समजुतीनुसार इथे सुद्धा स्त्रियांना प्रवेश नाही. जिथपर्यंत गाडी जाते तिथून पुढे हा प्रवेशबंदीचा नियम आहे. परिसरात काही वीरगळसुद्धा ठेवलेले आढळतात.
कार्तिकेय महाराष्ट्रात एका अनगड जागी वसला आहे. ते ठिकाण नितांत रमणीय आहे आणि त्याहीपेक्षा त्या कार्तिकेयाची मूर्ती फारच देखणी आहे. या ठिकाणी मुद्दाम भेट देण्यायोग्य हे स्थान अल्पपरिचित असले तरी तिथे जाऊन त्याचा परिचय करून घेतला पाहिजे, तसेच तिथल्या शांततेचा अनुभव आवर्जून घेतला पाहिजे.

१७ ) वाठार निंबाळकर

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एकाच गावातील १० भव्य वाडे असलेले गावं म्हणजे "वाठार निंबाळकर". इतिहास, जूने वाडे व त्याची वास्तूरचना यामधे ज्यांना रस आहे त्यांनी एकदा तरी या गावाला भेट द्यायलाच हवी. महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणचे निंबाळकर घराणे फार जुनें असून सुमारे साडेसातशें वर्षापासुन हे घराणे महाराष्ट्रात आहे. वाठार गाव छत्रपती शिवरायांच्या काळापासून अस्तित्वात असुन छत्रपती शाहूराजे यांनी या गावची निमपाटीलकी भोईटे घराण्याला दिली होती. आदर्की खुर्द हे निंबाळकर घराण्याची पाटीलकी असणारे गाव होते.सन १७७१ नंतर कुशाजी निंबाळकर यांच्या काळात ही बांधकामे झाली आहेत.
वाठार निंबाळकर येथील राजे नाईक निंबाळकर यांची किल्लेवजा गढी महाराष्ट्रात असलेल्या इतर सर्व गढीपेक्षा खूपच वेगळी आहे. येथे केवळ एक स्वतंत्र गढी नसुन तटाबुरुजांनी सजलेल्या सहा स्वतंत्र गढ्या व दोन मंदिरे असुन हि सर्व ठिकाणे एका मुख्य तटबंदीच्या आत साधारणपणे २७ एकर परीसरात सामावली आहेत. गढीच्या पश्चिम भागात असलेल्या नदीवर बंधारा घालुन नदीचे पाणी अडविल्याने पश्चिमेकडून गढीला नैसर्गीक खंदक लाभला आहे. यामुळे गढीची अर्ध्यापेक्षा जास्त तटबंदी सुरक्षित झाली आहे.गढीचे तटबंदी बुरुजाचे बांधकाम व भव्य दरवाजा आजही या वास्तुच्या भव्यतेची साक्ष देतात.  गढीचा दगडी बांधणीतील उत्तराभिमुख कमानीदार दरवाजा २०-२२ फुट उंच असुन याच्या लाकडी दारावर अणकुचीदार खिळे ठोकले आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर सर्वप्रथम उजवीकडील तटबंदीत असलेले राममंदिर पाहुन घ्यावे. हे मंदिर म्हणजे मध्ययुगीन मंदिर स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या आतील भागात दोन शिलालेख असुन सभामंडपातील लाकडावरील कोरीवकाम व चित्रकला अतिशय सुंदर आहे. कडे निघावे. कोटात असलेल्या ६ गढीपैकी मुख्य गढी हि आकाराने सर्वात मोठी असुन इतर गढीच्या मानाने आजही सुस्थितीत आहे. चौकोनी आकाराच्या या गढीत चार टोकाला चार तटबंदीच्या मध्यभागी प्रत्येकी एक व दरवाजा शेजारी दोन असे एकुण ९ बुरुज असुन हि गढी नऊ बुरुजांचा वाडा म्हणुन ओळखली जाते. बाकीच्या गढ्या चांगल्या स्थितीत नसल्या तरी पाचवी गढी पहायला मिळते. हि गढी आजही तिच्या मूळ स्वरुपात जतन केलेली असुन एक निंबाळकर परीवार तेथे वास्तव्यास आहे. गढीत राहत असल्याने आत मर्यादित प्रवेश दिला जातो. या गढीच्या आवारात दोन लहान मंदिरे असुन त्यावरील कळस मात्र चुन्यात बांधले आहेत.  या वाड्याचे  मूळ पाया व रचना कायम ठेवून अतिशय सुंदर नुतनीकरण केलेय! तेही पाहण्यासाठी सकाळी काही वेळासाठी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत त्यांनी उपलब्ध केलेय. तेही ज्यांना वास्तू रचनेत रस आहे त्यांनी पहायला हवी अशी बाब आहे. 
संपुर्ण कोट व सहा गढी पहाण्यास तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागतो पण गढी या प्रकारात वेगळे काही पाहिल्याचे समाधान मनाला मिळुन जाते.
एकंदरीत दुर्गप्रेमींबरोबर ज्यांना पुरातन वास्तुशास्त्रात रस आहे त्यांनी किंवा मराठेशाही कालातील बांधकाम शैलीच्या अभ्यासकांनी आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण आहे.गड्,किल्ले म्हणले कि बहुतेकांना डोंगरी गड बघण्यात रस असतो.तरीही हे असे भुईकोट आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेउन जातात.वेळ काढून अश्या ठिकाणी भेट द्यावी आणि इतिहासात हरवून जावे.

१८ ) मोरबागची मोरघळ : -

   जशी चाफळजवळची हि रामघळ तशीच समर्थांच्या स्मृती बाळगणार्‍या सज्जनगड उर्फ परळीच्या किल्ल्याच्या परिसरात आणखी एक घळ आहे, मोरघळ.मात्र रस्त्याची अवस्था विचारात घेता या परिसरात पावसाळ्यात न येणच योग्य ठरेल. ईथे रस्ते खचण्याचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे दिवाळी ते मे महिना हाच ईथे येण्याचा योग्य कालावधी. आपण सज्जनगडाकडून ठोसेघरकडे येताना उजव्या हाताला एक डांबरी सडक पांगारे गावाकडे जाते. डांबरी रस्ता पांगारे गावापर्यंतच आहे. पुढे कच्चा रस्ता पळसवडे गावाकडे जातो. पळसवडे गावाच्या अलिकडे एक कच्चा गाडीरस्ता डाव्या हाताला जातो. हा रस्ता मोरबाग या धनगरवस्तीकडे जातो. मात्र मोरबाग येण्याआधीच छोटी पायवाट डावीकडे जाते. हि वाट शेताच्या कडेकडेने चढून एका तीन मुखांच्या गुहेकडे पोहचते. हिच आहे समर्थांनी तप केलेली "रामघळ".गुहेच्या बाहेरच भगवा ध्वज फडकत असतो. बाहेरुन एकच मुख दिसत असले तरी आतुन या गुहेचे तीन भाग पडलेले आहेत. पैकी मधल्या भागात थोडे वीट बांधकाम करुन काही देवांच्या मुर्ती व नंदी ठेवले आहेत. ईथे मागे गेल्यास आणखी चिंचोळी झालेली गुहा दिसते. याच्या आत सरपटत जाण्याचा प्रयत्न केला, तर पुढे बर्‍याच गुहाचे जाळे आहे असे लक्षात येते. मात्र साप, विंचवासारख्या प्राण्यांचे भीती आणि पुरेशी तयारी नसल्याने ईथेच थांबणे योग्य. उजवीकडे असलेली गुहा चिंचोळी झाल्यामुळे फार पुढे जाता येत नाही.डाव्या बाजुला छोटी गुहा असुन आतमधे वटवाघळे आहेत.  एकुण रामघळ पहाणे एक थरारक अनुभव आहे. सर्वांनाच कदाचित शक्य होणार नाही, पण साहसी मंड्ळीनी त्याची जरुर अनुभुती घ्यावी.मोरबाग या गावातुन पुढे सांडवली या गावी कच्चा रस्ता जातो, व सांडवलीतुन आपण आणखी एक धबधबा पाहु शकतो, पण ईतकी गैरसोय सहन करुन जाण्यापेक्षा केळवलीकडून हा धबधबा पहाणे सोयीचे.


































No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...