जुन्नर हे ( उत्तर अक्षांश १९* -१२ आणि पूर्व रेखांश ७३* – ५३ ) पुणे जिल्ह्याच्या ९० किलोमीटरवर सह्याद्रीच्या कडे कपारी पासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. प्राचीन व्यापारी राजमार्ग नाणेघाट ज्याच्या द्वारे सातवाहन काळात सोपारा, कल्याण, चौल, प्रतिष्ठानशी तसेच पाश्चिमात्य देशातील रोम सारख्या देशाशी व्यापार चालत असे . असा नाणेघाट जुन्नरच्या पश्चिमेला चाळीस किलोमीटर वर आहे. जुन्नर हे समुद्रसपाटीपासून सुमारे ७०० मीटर उंचीवर कुकडी नदीच्या उजव्या किनाऱ्यावरील दक्षिणेस वसलेले असून नदीच्या दोन्ही बाजूकडील खोऱ्यात सह्याद्री रांगेतील लहान – मोठ्या टेकड्यांच्या रांगेत जुन्नर परिसर सामावलेला आहे.(जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील प्राचीन अवशेष)
कुकडी नदीच्या आग्नेयस रुंद पठार असून संपूर्ण गाव आठ ते दहा किलोमीटरच्या परिघात अनेक लहान मोठ्या ‘ पांढरी ‘ मातीच्या टेकड्यांनी वेढलेले आहे. कुकडी, पुष्पावती, मीना नदीच्या काठावरील ‘ पांढरी’ माती असलेल्या टेकड्या सुमारे २०० ते ४०० मीटर उंचीच्या आहेत . सध्याचे जुन्नर गाव हे जुन्या प्राचीन सातवाहन काळातील गावावर वसलेले ऐतिहासिक गाव आहे. जुन्नर परिसरात ‘ पांढरी ‘ प्रकारची माती असलेल्या टेकड्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अगरगाव, माळीवाडा, पाडळी, गोळेगाव, उदापूर, डिंगोरे, कुसुर आदी परिसरात सातवाहनकालीन लोकवस्ती स्थळांचे भरपूर अवशेष आजही दिसून येतात.
१९६२ च्या अगोदर कुकडी, पुष्पावती , मिना , माडवी नदीला पावसाळ्यात सतत येणाऱ्या पुरात आज दिसत असलेल्या बऱ्याच टेकड्यांचा नाश झाल्याचे दिसून येत आहे. तरी काही पाढरीच्या टेकड्या आपल्या शेवटच्या घटीका मोजत आहे. काही सातवाहन काळातील लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने घराची बाधकामे झाली तसेच चालू असल्याची पाहायला मिळतात. तर काही पाढरीच्या टेकडी वरील सातवाहन लोकवस्ती स्थळाची जागा सपाटीकरण करुन आजमितीला तेथे बागायती शेती केली जात आहे. तरी गोळेगाव – लेण्याद्री परिसरात वरचेवर शेत नांगरटीच्या वेळी तसेच उन्हाळ्यात कुकडी नदीचे पात्र कोरडे पडल्यावर नदीत अनेक वेळा प्राचीन सातवाहन काळातील वस्तू आढळून येतात . सन १९७० ते १९७२ च्या दरम्यान कुकडी नदीचे पात्र पुर्ण उघडे पडले होते त्या वेळी झारेकरी मंडळींना काही प्रमाणात सिंह छाप नाणी ,नागणिका राणीची नाणी मिळाली होती. गोळेगाव – लेण्याद्री येथील बापूजी ताम्हाणे प्रस्तुत लेखकास जुन्नर परिसरातील कुकडी, पुष्पावती, मीना, माडवी नदी काठावरील सातवाहनकालीन लोकवस्ती स्थळांच्या अभ्यासासाठी तेथील परिसराचे निरीक्षण करीत असताना त्यांच्या या निरीक्षणातून अनेक प्राचीन सातवाहनकालीन अविशेष उजेडात आल्या व येत आहेत .
जुन्नर च्या उत्तरेस साधारणपणे १३ किलोमीटर अंतरावर पुष्पावती नदीच्या किनारी उदापूर येथे मोठे पांढरीचे प्राचीन अवशेषांची गंढी पाहिला मिळाली. जुन्नरच्या दक्षिणेस मीना नदीच्या काठावर कुसुर, निरगुडे या गावी तीन ते चार पाढरी मातीच्या टेकड्या आढळून आल्या . जुन्नर गावातून वाहणाऱ्या कुकडी नदीच्या किनारी माणिकडोह, पाडळी इत्यादी भागात काही अवशेष मिळाले आहेत . विशेषतः लेण्याद्री जवळील गोळेगाव, माळीवाडा , अगरगाव तसेच जुन्या एस् . टी. स्टँडच्या परिसरात भरपूर प्रमाणात सातवाहन कालीन वस्तूंचे अवशेष आजही दिसून येतात.
लेण्याद्री येथे कोरलेल्या विहारात ‘ कपिचीत’ नावाचा एक भिक्खू संघ निवास (वर्षावास ) करीत होता. त्यांच्या भिक्षेसाठी , निर्वाहासाठी आश्रय देणाऱ्या लोकांच्या काही वस्त्या सध्या गोळेगाव येथील पांढरीच्या टेकडीच्या ठिकाणी भंग्न सुरुवात आजही पाहायला मिळतात . त्या ठिकाणातून भाजलेल्या मातीचे भिक्षुपात्राचे अवशेष अभ्यासकांना आढळून आलेले आहेत. त्यापैकी प्रस्तुत लेखात त्या वस्तूंची माहिती प्रकाशित करीत आहे.
१) जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील भांडी–
जुन्नर परिसरात सातवाहनकालीन लोक वस्ती स्थळांच्या भागात भाजलेल्या
मातीच्या भांड्यांची खापरे पुष्कळ आढळून येतात. ह्या भाड्याचे महत्त्व
पुरातत्त्वीय संशोधनात इतके अनन्यसाधारण आहे की, त्यांना ” पुरातत्त्वीय
मूळाक्षरे” असे संबोधिले जाते. सातवाहन कालीन थरात काही अखंड भाजलेल्या
मातीची भांडी मिळाली आहेत. तसेच रोमन बनवाटीची खापरे , भांडी सापडली असून
त्या भांड्यांना लाल रंगाची झिलाई लावलेली आढळून आलेली आहे. लहान आकाराच्या
थाळ्या, वाडगे, डिश, लहान आकाराची बुरकूळी , माठ,मातीचे दिवे ह्या सारखे
अवशेष उपलब्ध झालेले आहे. ही भाजलेल्या मातीची भाडी हजारो, शेकडो वर्षे
मातीत गाडून राहिली तरी त्याचा आकार बदलत नाही. त्यामुळे भांड्याचा पुरावा व
त्याचा अभ्यास फार महत्वपूर्ण ठरतो.
२) प्राचीन पदके व मणी —
भाजलेल्या मातीची गोल आकाराची वेगवेगळ्या प्रकारची पदके मिळाली असून लंबगोल
आकाराची स्त्रीच्या कानात घालावयाची चंद्रकोर आकाराची कर्णभूषणे उपलब्ध
झालेली आहेत. त्यावर फुलाफुलांची बारीक नक्षी आहे. सुपारीच्या आकाराचे
भाजलेल्या मातीचे मणी मिळालेले आहेत. त्या मातीच्या मण्यापैकी १० सें मी.
गोलाई आणि २ सें मी. उंचीचे तर काही ७ सें मी. गोलाई आणि २ सें. मी. उंचीचे
सुपारीच्या आकाराचे मणी लेण्याद्री जवळील गोळेगाव मधील पाढरीच्या टेकडीवर
मोठ्या संख्येने आढळून आलेले आहे. काही मणी मौल्यवान दगडाचे , हाडांचे ,
धातूचे, विविध रंगाच्या काचेचे आहे. या सर्व मण्यांचा बारकाईने अभ्यास
केल्यावर समजते की, सातवाहनकालीन जुन्नरची कला आणि सामाजिक जीवनाची अंगे
याचे ज्ञान किती प्रगत होते हे सिद्ध होते .
३) शुभ चिन्ह असलेला दंगडी पाटा —
जुन्नर परिसरातील सातवाहनकालीन लोकवस्ती स्थळाच्या भागात आढळणारी मुख्य
वस्तू म्हणजे चार पाय असले दगडी पाटे – वरंवटे सुस्थितीत प्रस्तुत लेखकाला
आढळले आहेत. हे पाटे एकसंघ दगडातून खोदून काढलेले असून त्यावर दोन प्रकारचे
स्वस्तिक, त्रिरत्न अशा प्रकारची काही धार्मिक चिन्हे प्रामुख्याने दिसून
आली आहेत. ज्याच्या भुजांची अग्रे डावीकडे वळविली जातात .ते ” डावे
स्वस्तिक” आणि ज्याच्या भुजांची अग्रे उजवीकडे वळविली जातात. ते ” उजवे
स्वस्तिक ” अशाप्रकारे डावे आणि उजवे असे दोन प्रकार स्वस्तिक चे आहेत.
जुन्नर परीसरातून स्वस्तिक चिन्हाचे पुरावे मिळालेले आहेत. त्याच प्रमाणे
मोहेजोदडो मध्ये तसेच जौगड येथील सम्राट अशोकाच्या शिलालेखात जुन्नर
परिसरात आढळलेल्या चार पायाच्या दंगडी पाट्यावर जशी दोन प्रकरची स्वस्तिक
चिन्ह आहेत तशीच चिन्ह शिलालेखात आहे. इतर काही ठिकाणी झालेल्या उत्खननात
स्वस्तिक चिन्हाचे पुरावे मिळालेले आहे.स्वस्तिक हे अतिप्राचीन मानवाने
निर्माण केलेले सर्वात पहिले ‘ धर्मप्रतीक’ असल्याच समजल जात पण ते कुठल्या
एका धर्माच प्रतीक नाही. स्वस्तिक चिन्हाच मूळ जुन्नर परिसरातून पाहायला
मिळते. वरील स्वस्तिक चिन्हांचा विचार करता आपल्या असे लक्षात येते की,
जुन्नर परिसरातील लेणी , शिलालेख, गवाक्ष कोरण्याचे काम चालू असतानाच अशा
प्रकार ची प्रमुख शुभचिन्ह असलेले पाटे , लांबट गोल वरंवटे निर्माण करण्यात
आले असावे. अत्यंत लहान आकाराचे ( मिनीऐचर) पाटे जुन्नर परिसरात मिळाले
आहे. हे सर्व अवशेष इ. स पूर्व १ ल्या शतकातील आहे .
चार पाय असलेल्या
दंगडी पाट्याचा पुढील एक शिरोभाग थोडा पुढे असून त्या खाली मृदचक्रातील
थाळी ठेवत असत. त्या पाट्यावरील वाटलेला पदार्थ हा जमिनीवर न पडता थाळीत
पडतो अशा प्रकारे पाटे जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील लोकवस्तीच्या
ठिकाणी मिळालेले आहेत. जुन्नर परिसरात इसवी सनाच्या सुरुवातीच्या एक दोन
शतकात धान्य दळण्याची जाती प्रचलित झाली. त्यापूर्वी कदाचित रात्रभर धान्य
भिजवत ठेवून सकाळी ते चार पाय असलेल्या दंगडी पाट्यावर लांबट गोल वरवट्याने
जाडसर रवाळ वाटून त्या पासून जाडी भरडी भाकरी ( रोट) बनविले जात असत.
४) आडव्या दांड्याचे जाते –
सातवाहन काळातील महिलाचे जीवन सुखकर करणारे प्राचीन काळातील आडव्या
दाड्याचे दगडी जाते जुन्नर जवळील लेण्याद्री परिसरातील सातवाहन कालीन
लोकवस्ती स्थळाच्या गोळेगाव मधून उपलब्ध झाले आहे. हे जाते रोमन पद्धतीचे
असून प्राचीन जुन्नर आणि प्राचीन रोम यांच्या २००० वर्षे जुन्या संबंधाचा
पुरावा म्हणून ओळखला जातो.
इ. स. पहिल्या शतकाच्या अगोदर जुन्नर
परिसरात धान्य दळण्यासाठी जाती नव्हती या काळात महिला रात्रभर धान्य भिजत
ठेवून सकाळी दगडी पाट्यावर वरवंट्याच्या सहाय्याने वाटून त्याची जाडी भरडी
भाकरी बनवून ती विस्तावर भाजून खात असत. मानव संस्कृतीच्या इतिहासात प्रथम
पाटा – वरवंटा आणि उखळ निर्माण झाल्या नंतर जात्याचा शोध लागला असावा. कारण
जाते हे पाटा – वरवंट्याची सुधारित यंत्रिक आवृत्ती आहे . जुन्नर चा रोमन
साम्राज्याशी नाणेघाट मार्गे व्यापार सुरू झाल्यानंतर आडव्या दांड्याचे गोल
फिरणारे जाते आले. या जात्यामुळे जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील
महिलांचे धान्य दळण्याचे काम सोपे होऊन ताज्या भाकरी, पोळ्या होऊ लागल्या. ”
जाते” हा शब्द यंत्रकम् या यंत्रवाचक शब्दापासून बनलेला आहे . यंत्रकम् –
यंतम् – जतम् – जत व पुढे ‘जाते’ हा शब्द मराठीत आला.
यज्ञ विधीत
कांडणे आणि वाटणे या दोन क्रियांचा उल्लेख आहे . मात्र दळणे या क्रियेचा
नाही म्हणून वेदकाळात जाते जास्त प्रचलित नसावे मानवी समाजाच्या पाकक्रियेत
झालेल्या सुधारणाचा भाग म्हणून जाते निर्माण झाले असावे. हंड्यासारखा आकार
असलेल्या या जात्याचा खालील भाग पातळ पण वरचा भाग खूप उंच वजनदार अशा
दगडाचा आहे. जात्याचे हे दोन्ही भाग जात्याची तळी म्हणून ओळखले जातात.
खालची तळी स्थिर असून त्या तळीच्या मध्यभागातील छिद्रामध्ये बसवलेल्या
लाकडी खुट्या भोवती वरची तळी फिरण्याची व्यवस्था केलेली आहे. वरच्या तळीला
जाते फिरवण्यासाठी लाकडी दांडा बसवण्यासाठी समोरा – समोर दोन भोके (
छिद्रे) पाडलेली असतात. वरील बाजूने धान्य टाकण्याची सोय केलेली आहे. दोन
महिला समोरा – समोर बसून आडवा दांडा हातात धरून वरती तळी फिरवत असताना
मध्यभागी असणाऱ्या पेल्याच्या आकाराच्या छिद्र्यातून धान्य टाकीत.
तळ्याच्या घोषणामुळे धान्याचे पीठ होऊन ते दोन तळ्याच्या कडेला असणाऱ्या
फुटीतून बाहेर पडत.
सातवाहन काळातील हे आडव्या दांड्याचे जाते रोमन
पद्धतीचे असून प्राचीन जुन्नर आणि प्राचीन रोम यांच्या दोन हजार वर्षे
जुन्या संबंधाचा पुरावा आहे. अशी जाती तेर , पैठण, कोल्हापूर, नालासोपारा ,
नेवासे, लोथड, इटलीतील पाँम्पे येथील उत्खननात सापडलेली आहे . प्रचालीत
जात्यापेक्षा हे आडव्या दांड्याचे जाते वेगळे असून आपण वापरत असलेली जाती
ही मूळ रोमन जात्याच्या प्रभावातून बनविलेली आहे. असे जुन्नर परिसराचे
प्राचीन इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे म्हणतात.
५) भाजलेल्या मातीची मूर्ती —-
जुन्नर परिसरात सातवाहन कालीन
लोकवस्ती स्थळाच्या भागातून पक्क्या भाजलेल्या मातीच्या काही मूर्ती सापडले
आहेत. येथील सापडलेल्या मूर्तीत पुरुषांचे चेहरे तसेच लहान मुलांची
बनवलेल्या खेळण्यातील घोडा, हत्ती, बैल या जनावरांच्या मूर्ती सापडलेल्या
आहेत. प्राण्यांच्या मूर्तीना गोल आकाराची चाके लावली जायची ति खेळण्याची
चाके अगरगांव, दिल्ली पेठ, गोळेगाव परिसरातून आढळलेली आहेत.
६) हाडांच्या वस्तू —
जुन्नर परिसरातून हाडांपासून बनवलेल्या डोळ्यात काजळ घालण्यासाठी
बनवलेल्या काड्या ( कज्जल शलाका ) मिळाल्या आहेत. कज्जल शलाका ह्या तेर ,
पैठण, नेवासा, भोकरदन येथे मिळालेल्या प्रमाणे सातवाहन कालीन आहेत. काही
काड्या ह्या शलाका नसून बहुतेक सुया असल्यासारख्या वाटतात.
७) समुद्र शंखाचे अवशेष —
जुन्नर परिसरात आढळलेल्या वस्तू मध्ये शंखा पासून बनवलेल्या अनेक
व्यासाच्या बांगड्यांचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत. शंखापासून
बांगड्या तयार करण्यासाठी जाड कवचाचा शंख लागत असे. बागड्या बनविल्या
जाणाऱ्या शंखास शास्त्रीय भाषेत ” टर्बोनीला पायरम” असे नाव असून हे शंख
समुद्रात मोठ्या आकाराचे असल्याने ते भंडोज, कल्याण सारख्या मोठ्या
तत्कालीन बंदरातून जुन्नर च्या बाजारपेठत येत असत.
सातवाहन काळात जुन्नर भागातून शंखाच्या बांगड्यांना त्याकाळी मोठी मागणी होती. या बांगड्या बनवण्यासाठी लागणारे ” टर्बोनीला पायरम” जातीचे शंख केवळ तामिळनाडू किंवा सौराष्ट्रातील कच्छ पाल्क / खंबातच्या आखातातील समुद्रात सापडत असत. हे शंख कल्याण – नाणेघाट मार्गाने जुन्नरच्या बाजारपेठेत आणले जात असे. सातवाहन काळात जुन्नर मधील महिला शंखापासून बनवलेल्या बांगड्या, मणी वापरत असत. सातवाहनकालीन लोकसंस्कृतीशी संबंधित म्हणून बांगड्या वापरत नव्हते तर शंखाच्या बांगड्या बनवण्याचा कारखाना सातवाहन काळात जुन्नर येथे होता असे सिद्ध होते. समुद्रातील शंखामुळे नाणेघाट मार्गाने जुन्नरशी इतर बाजारपेठेचा व्यापार संपर्क जुळला गेला. जुन्नर परिसरातील अगरगांव, दिल्ली पेठ, सुसरबाग, खालचा माळीवाडा, गोळेगांव, निरगुडे, कुसूर, पाडळी, उदापूर अशा सातवाहन काळातील लोकवस्तीच्या स्थळा मध्ये आढळलेल्या शंखाच्या काही नाभी भागा वरील तुकड्यांवर तीक्ष्ण हत्यारांनी खाचा पाडलेल्या आढळून आलेल्या आहेत. बांगड्या बनविताना शंखाचे विशिष्ट अवजारांच्या साह्याने तिरपे काप घेऊन त्यांच्या चकत्या काढल्या जात असत. शंखाचा बाह्यभाग बांगड्या बनविण्यासाठी वापरला जात असत.
शंखाच्या बांगड्या तयार करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या करवती त्याकाळी जुन्नर मध्ये तयार करण्यात आल्या असणार. त्याचप्रमाणे बांगड्याच्या कातरलेल्या कडा गुळगुळीत घासून करण्यात येणाऱ्या सहानी जुन्नर परिसरातून पुढे उजेडात येऊ शकतील . शंखापासून बागड्या तयार झाल्यावर त्यावर काही वेळा लाखेची व सोनेरी वर्खाची नक्षी किव्हा लेपन करीत असत. अंखड बांगडी बनवताना काही वेळा बांगड्याचे तुकडे होत असत ते तुटलेले तुकडे ऐकमेकाना विशिष्ट पध्दतीने जोडून बांगड्या बनवित असत. ‘मेसोपोटेमिया’ भागातून शंखाच्या बांगड्याना मोठी मागणी असल्याने जुन्नर मध्ये तयाय होणाऱ्या शंखाच्या बांगड्या नाणेघाट मार्गाने समुद्र बदरातून तिकडे जात असाव्यात. सातवाहन काळातील महिला ,नर्तकीच्या शिल्पामध्ये दंडापर्यत शंखाच्या बांगड्या घातलेल्या दिसून येतात.
शंखा
मध्ये असणारे प्राणी अपृष्ठवंशीय प्रकारचे म्हणजेच पाठीचा कणा नसणारे असून
त्यांचा समावेश मृदूकाय कवची या वर्गात होतो. या प्राण्याच्या शरीरात हाडे
नसली तरी त्यावर बाहेरच्या बाजूस भक्कम कठीण कवच असते ते कवच “कॅल्शियम
कार्बोनेट “चे बनलेले असते. अशा प्रकारच्या शंखाचे कवच निरनिराळ्या आकाराचे
व रंगाचे असते. शंखामध्ये हे कवच सलग तसेच एक संघ असते. अशा प्रकारच्या
शंखाच्या कवचात “कॅल्शियम कार्बोनेट” आणि “काँन्कोलीन” हे प्रथिने
असल्यामुळे शंखाचा वापर
किरणोत्सर्गी कार्बन कालमापनासाठी करता येते .
प्राचीन सातवाहन कालीन जुन्नरच्या लोकसंस्कृती वस्तीस्थळाच्या भागातून मिळणाऱ्या शंखाचे वेस्टेज अवशेषावरून जुन्नरच्या नागरी व्यापारी विषयावर अभ्यास करता येतो. पूर्वी जुन्नर परिसरात शंखकारी या समाजाचे लोक परंपरागत पद्धतीने शंखा च्या बांगड्या बनवण्याचा व्यवसाय करीत होते. “टर्बोनीला पायरम , प्युगिलिन बुचिफेला, चिकोरिस रामोसस” ह्या जातीच्या शंखापासून बांगड्या जुन्नर च्या सातवाहन काळात तयार होत असत. जुन्नर परिसरातील प्राचीन काळातील शंखाच्या अवशेषा वरुन त्या काळातील पर्यावरण संबंधी अत्यंत उपयुक्त माहिती , त्या काळातील प्राचीन सागरी तापमान समुद्रकिनाऱ्या संबंधी माहिती मिळू शकते. शंखाच्या अवशेषा वरुन कोणती वसाहत कोणत्या ऋतूमध्ये वसवली गेलेली आहे. त्याचे अनुमान शंखाच्या अवशेषावरुन संशोधक काढत असतात.
८) सातवाहन कालीन घराच्या छप्परावरील कौल –
जुन्नर परिसरातील सातवाहन कालीन घराची छपरे ही भिंतीत आणि जमिनीत लाकडी
वासे पुरून त्यावर आडव्या लंगी टाकून तयार करीत आणि त्यावर एका विशिष्ट
प्रकारच्या मातीची भट्टीत भाजून काढलेली कौले ठेवीत असत . या कौलांच्या
वरील भागास पन्हाळ्या केलेल्या असंच पावसाचे पाणी झटकन निघून जाता यावे
म्हणून ही व्यवस्था केलेली असायची. शिवाय कौलाच्या खालच्या भागास एक खाच
असून ती शेजारच्या कौलाच्या कडेत अडकविली जात असत. या कौलांना वरच्या अंगास
दोन छिद्रे असत त्यातून ती खिळ्यानी लाकडी वाशांना ठोकून किंवा झाडा –
झुडूपाच्या वेलांनी लाकडी वाशाना बांधली जात असावीत. त्यामुळे ति कौले
छप्परावरील लाकडी वाशांना घट्ट धरुन राहात असे.
अशा प्रकारची भाजलेल्या मातीची पक्की कौले जुन्नर, गोळेगाव, अगरगांव परिसर, उदापूर त्याच प्रमाणे नाशिक, कोल्हापूर, तेर, पैठण, भोकरदन आदी सातवाहन कालीन लोकवस्ती स्थळाच्या ठिकाणी केल्या गेलेल्या उत्खनना मधील थरामध्ये सापडली आहेत. कौलांना दिलेला उतार व त्यांच्यावर काढलेली पन्हाळी यावरून महाराष्ट्रात सध्या विद्यमान असलेल्या पावसाच्या मानापेक्षा जास्त पाऊस सातवाहन काळात जुन्नर परिसरात पडत असावा असे कौलाच्या रचनेवरून कळते.
जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील घरे आकाराने लहान – मोठ्या विटांच्या भिंतीची व योजनापूर्वक पाया भरणी केलेली असत. ही छप्परे लाकडी खांबांच्या आधारावर होती. सर्व साधारण घर पडवी, बैठक खोली व स्वयंपाक घर अशा तीन भागात विभागलेली होती. जुन्नर परिसरातील लेण्याद्री, शिवनेरी, अंबा – अंबिका, भूतलेणी, भिमाशंकर लेणी, तुळजा अशा प्रकारच्या असंख्य लेण्यात जे शेकडो भिक्षु निवास ( वर्षावास) करीत असतील त्यांच्या भिक्षेसाठी, निर्वाहासाठी आश्रय देणाऱ्या लोकांच्या वस्त्या या जुन्नर परिसरात ठिकठिकाणी दिसून येतात.
९) सातवाहनकालीन जुन्नरची नाणी —
सातवाहन राजवंशाचा
इतिहास समजून घेण्यासाठी जुन्नरची नाणी अत्यंत उपयोगी पडतात . जुन्नर येथील
सातवाहन कालीन विशेष करून सिंह छापाची नाणी प्रसिद्ध आहे . या नाण्याच्या
एका बाजूस सिंहाची आकृती दाखवली असून सिंहाच्या मानेभोवती बिंदूयुक्त आयाळ
असून शेपटी वर उचललेली आहे .हा सिंह लढाईच्या तयारीत नाण्यावर दाखविण्यात
आलेला आहे. सिंहाच्या पोटात कमानीचा चैत्य आहे. सिंह डावीकडे तोंड करून उभा
दाखविला असून त्याच्या तोंडा पुढे ध्वज चिन्ह दाखवले आहे.
नाण्याच्या
दुसऱ्या बाजूस उज्जैन चिन्ह व नंदीपाद चिन्ह आहेत . दोन डंबेल्स एकमेकांवर
एक उभा आणि एक आडवा ठेवलेला असून त्यांच्या चारी टोकांना चार पोकळ वर्तुळे
आहेत.जुन्नर परिसरातून श्री सातवाहन, श्री सातकर्णी, वासिष्ठीपुत्र, नहपान,
नागनिका, सिव सातकर्णी, पुलमावली ही नाणी अभ्यासकांना उपलब्ध झालेली आहे.
सिंह छाप नाणी हे सातवाहन काळातील जुन्नर टांकसाळीचे वैशिष्ट्य आहे. ही
नाणी तांबे,पोटीन, शिसे, चांदी या धातुची आढळली आहेत. जुन्नर परिसरातून
उपलब्ध झालेल्या नाण्यावर सिंह,घोडा, हत्ती इत्यादी राजपददर्शक प्राणी
,कुपणातील झाड, नंदिपद, स्वस्तिक वगैरे सारखी चिन्हे आढळून आली आहे.
नाण्यावरील लेखाची सुरुवात राजपद दर्शक ” राज्ञौ ” शब्दाने झालेली दिसते.
सातवाहन राजा सातकर्णी यांची पत्नी आणि एक शूर महिला राज्य करणारी राणी नागणिका ही भारतातील पहिली राणी होती. तिने आपले स्वतःचे नाणे टांकसाळीत केले. नाण्यावर पुढील बाजूने मध्यभागी ” नागणिकाय” असे लिहीलेले असून त्या बाजूने ” राज्ञौ सिरी सातकनिस” असे पतीचे नाव ब्राह्मी लिपीमध्ये अंकित आहे. तसेच नाण्यावर घोडा असून मागील बाजूस उज्जैन चिन्ह अंकित आहे. जुन्नर मधील काही नाण्यावर हत्ती आणि त्याच्या पुढे कुंभ असलेली नाणी सापडली असून ह्या नाण्यावरुन असे समजते की, रोमन लोकांच्या अँम्फोरा या विशिष्ट प्रकारच्या कुंभावरुन भारतीय लोकांनी स्फूर्ती घेतली असावी.
जुन्नर मधील नहपान नाण्यावर तेथील सातवाहन कालीन नाण्यावरील नेहमीचा सिंह असून सिंहाच्या समोर विजयध्वज असून सिंहाच्या पोटात कमानीचा चैत्य दाखविला आहे. सिंहाच्या पाठीवर ” राज्ञौ महाखतपस नहपानस” अशा लेखाचा मजकूर आहे. पाठी मागच्या बाजूस ‘ वर्ज’ आणि ‘ धनुष्यबाण’ ही चिन्ह आहेत महाखतपस हे बिरुद नहपानाने सातवाहनांच्या विजया नंतर घेतले असावे. जुन्नर येथील सिंह छाप नाण्याचे वजन १५ ग्रँम, १६.२२ ग्रँम, ४.६ ग्रँम , १.५० ग्रँम अशा वजनाची आहे. वरील नाणी प्रस्तुत लेखकाच्या नाणी संग्रहात आहे. जुन्नर येथील सर्व वरील प्राचीन अवशेष , वस्तू , नाणी यावरून असे सिद्ध होते की, जुन्नर ही सातवाहन काळात एक व्यापारी व कला केंद्र होते हे आपल्याला माहित होते.अशा प्रकारे जे अल्पसे संशोधन माझ्या हातून गेल्या काही वर्षात जुन्नर परिसरात केले गेले त्यावरून जुन्नरची तुलना भरभराटीस आलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण, तत्कालीन पैठण , तेर, भोकरदन, नेवासा अशा सातवाहन काळातील आदी प्राचीन नगराशी करता येईल असे मला वाटते.
बापूजी ताम्हाणे, गोळेगाव – लेण्याद्री
ता. जुन्नर, जिल्हा. पुणे ( महाराष्ट्र )
संदर्भ :
१) सुरेश वसंत जाधव – जुन्नर परिसरातील संशोधन , पुणे त्रैमासिक ६२: १-४,जुलै १९८३ ते एप्रिल १९८४ पृ. ७२
२) संजय गोडबोले – जुन्नर येथील काही प्राचीन अवशेष, पुणे त्रैमासिक ६९: १-४,जुलै १९९० ते एप्रिल १९९१ पृ. २५
३) शांताराम भालचंद्र देव – पुरातत्वविद्या , पुणे १९७६ पृ. १२९
४) डॉ. सौ. दीपा सावळे – मराठे कालीन दागदागिने आणि अलंकार, प्रकरण पहिले – प्रथमावृत्ती जून २००७
फरिश्ता ते फिरस्ता – परकियांच्या नगर विषयीच्या नोंदी
फरिश्ता ते फिरस्ता – परकियांच्या नगर विषयीच्या नोंदी
आताचं अहिल्यानगर म्हणजे पूर्वीच अहमदनगर २८ मे हा या शहराचा स्थापना दिवस. स्थानिक लोक या शहराला फक्त नगर म्हणूनच संबोधतात. इथल्या बोलीभाषेलाही नगरी म्हटलं जातं . या शहराविषयी आणि इथल्या लोक जीवनाविषयी परकियांनी सुद्धा भरभरून लिहिल तर काहींनी चित्रातून आपल्या भावना प्रकट केल्या.परकियांच्या नगर विषयीच्या नोंदी.
फार भटकंती करणाऱ्या व्यक्तीला आजही फिरीस्ता म्हणतात. हा फिरीस्ता शब्द ज्याच्या नावावरून आला तो नगरचा इतिहास लिहिणारा पहिला इतिहासकार म्हणजे फरिश्ता. हा लहान होता तेव्हा मिरान हुसेन निजामशहाला फारसी शिकवण्यासाठी आलेल्या त्याच्या वडिलांबरोबर नगरला आला. इसवी सन १५८७ मध्ये तो मुर्तझा निजामशहाच्या अंगरक्षकांचा प्रमुख बनला. पुढे मिरान हुसेन निजाम शहाच्या बंडाळीत त्याला विजापूरला पलायन करावे लागले. त्याने तारीख इ फरिश्ता नावाने दख्खनचा इतिहास लिहिला.
इथल्या निजामशहाचे गोव्यातील पोर्तुगीजांशी चांगले संबंध होते. इसवी सन १५८३ ते १५८९ दरम्यान पोर्तुगीजांच्या राज्याची माहिती मिळवण्यासाठी आलेला डच प्रवासी आणि गुप्तहेर जॉन व्हॅन ह्युजेन लिंसशोटेन मूर्तझा निजामशहाच्या काळात या परिसरात येऊन गेला त्याने इथल्या फळ झाडांविषयी लिहिलं. त्यात त्याने आंबा फळाविषयी लिहिताना अहमदनगर, चाकण आणि चांदवड या बालाघाटाच्या रांगेतील आंबे चवीला उत्तम असल्याचं म्हटलंय.
बाँबे प्रसिडेंसी मध्ये प्रवासी म्हणून आलेला लुईस रुझेलेट या शहराविषयी लिहितो- किल्ल्याच्या भिंती आणि बुरुजांनी वेढलेले हे एक व्यावसायिक शहर आहे. ब्रिटीश छावणीतील बागा आणि झाडांमुळे हे शहर वाळवंटातील हिरवळी प्रमाणे भासते. इथली घरे अर्धी हिंदू आणि अर्धी पठाण शैलीतील आहेत. विजापूरची अजस्त्र तोफ इथंच ओतण्यात आली होती. असं म्हणतात की या तोफेने तीस किलोमीटर पर्यंत गोळा डागला होता.
मिशनरी हेराल्ड नावाच्या अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकात नगर शहरातील नगर कॉलेज नावाने प्रसिद्ध असणाऱ्या महाविद्यालया विषयीची नोंद आढळते. यातील रेखा चित्राचे वर्णन करताना म्हटलंय – डाव्या बाजूला दाखवलेली जुनी इमारत कोलंबसने अमेरिका शोधण्यापूर्वी बांधली गेली होती आणि अनेक वर्षे अहमदनगर स्वतंत्र राज्य असताना ती निजामशहाचे निवासस्थान होते.वरचा मजला पन्नास वर्षे मिशन हाऊस म्हणून वापरला गेला. खालच्या मजल्यावर सहा खोल्या आहेत, पण त्यापैकी तीन मोठ्या वर्गांसाठी खूपच लहान आहेत. १८५५ मध्ये जुन्या इमारतीप्रमाणे दगडातून आणि सभागृहासह नवीन इमारत बांधली गेली. नवीन इमारतीत मेसर्स. ए.एच. अँड्र्यूज अँड कंपनीच्या फोल्डिंग-डेस्क आणि सेटी आहेत. सभागृहात सुमारे चारशे लोक बसू शकतात. जुन्या इमारतीच्या मागे, त्याच्याशी समकोनात, १८६६ मध्ये बांधलेली इमारत आहे ज्यात दोन मोठे वर्ग आहेत. इमारतीची एकूण लांबी १६६ फूट आहे; रुंदी ५४ फूट. मागचा भाग २८ फूट बाय ५० फूट आहे.
लेफ्ट. कर्नल नेवेल नावाचा एक इंग्रज अधिकारी भारतभर फिरला. त्याच्या पुण्या पासून नगर पर्यंत मोटार प्रवासाचा वृत्तान्त त्याने ‘ टोपी अँड टर्बन’ नावाच्या पुस्तकात लिहून ठेवलाय. त्यात त्याने या रस्त्याला व्हाया सॅक्राची ( Via sacra) म्हणजे पवित्र रस्त्याची उपमा दिली. मध्ये आलेल्या गावांची नोंदही त्याने करून ठेवलीय. सुप्याच्या डाक बंगल्यावर थांबला असता तिथल्या आचाऱ्याने ‘च्या ‘साठी पाणी गरम करून दिल्याची गमतीशीर नोंद तो करतो.
‘ रिलीजन अँड फोकलोर ऑफ नॉर्थर्न इंडिया ‘ नावाच्या पुस्तकात विल्यम क्रूक ने इथल्या बैल पोळ्या विषयी लिहिलंय. यात साप चावल्यास लोक त्या व्यक्तीला भैरोबाच्या देवळात घेऊन जातात अशीही एक नोंद आढळते. यात पाऊस पडावा म्हणून एकमेकांना दगड मारून खेळल्या जाणाऱ्या गोफण गुंड्याच्या लढाईचेही वर्णन आढळते
कॅप्टन सेसिल कावली याने ‘टेल्स ऑफ अहमदनगर’ नावाने इथला इतिहास लिहिला. यात तो या शहराचा इतिहास दोन हजार वर्षे मागे नेतो. यात तो म्हणतो नगरच्या पोस्ट ऑफिस बाहेरचा उतरकेडे तोंड करून असणारा फलक पैठण चा रस्ता दाखवतो नगर जवळचे भिंगार हे शहर पैठण इतकेच प्राचीन असल्याची नोंद यात आढळते. दोन्ही शहरे व्यापारी मार्गावर असल्याचा दाखला तो देतो. पैठण पासून भिंगार हे दोन दिवसांच्या अंतरावर आहे.अहमदनगर शहर याच भिंगार शहराच्या परिसरात वसविले गेले. यातील एक वेगळीच नोंद म्हणजे देवगिरीच्या यादवांचा सेनापती हेमाद्री हा मूळचा इराणी होता असं तो लिहितो.
धर्म प्रसारासाठी आलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी इथल्या लोक जीवनाविषयी बरंच लिहून ठेवलं. इथल्या लोकांना ते नेटिव म्हणत. त्यांच्या ‘ज्ञानोदय ‘ नावाच्या मराठी वृत्त पत्रात १६ मार्च १८६३ रोजी या शहराविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली होती ती अशी – अहमदनगर हे जिल्ह्याचे गाव आहे. त्याच्या वैभवाच्या खुणा या गावामध्ये दिसतात, येथील भुईकोट किल्ल्याभोवती खंदक आहे. त्यात हरिणे हिंडत असतात. पश्चिमेस सीना नदी आहे. पण ती पावसाळी नदी असल्यामुळे एरव्ही जोडेही भिजवू शकत नाही. मग पक्ष्याची चोच कुठून भिजणार ! शहरास ९ गावकुसूचे दरवाजे आहेत. त्यांस वेस असे नांव आहे, रस्ते स्वच्छ व सुंदर आहेत. कारण म्युनिसीपालिटी फार काळजी घेते. निजामशाहीत बसवलेल्या नळांनी पाणी येते. गंजबाजारात भाज्या मिळतात, तर कापडबाजारात सुशोभित अशी कापड-दुकाने आहेत. पूर्वेस लष्कराची छावणी असून युरोपियन भजनालय आहे. उडकाकच्या बागेजवळ मंगळवारी बाजार भरतो. सर्जेपुरा वेशीजवळ मोठी धर्मशाळा आहे. गावाजवळ ‘ फऱ्याबाग’ म्हणून तीन मजली इमारत आहे. चांदबिवीच्या महालात सलाबतजंगाची कबर आहे. सरकारी इंग्लिश शाळा असून तीन मराठी शाळा आहेत, व पोलिसांकरिता एक शाळा आहे. एक पुस्तकालय आहे. परंतु आश्रय कमी असल्यामुळे त्याची स्थिती भिक्षुकी आहे, एक छापखाना असून तेथे वृत्तवेभव पत्र निघते.
याच ज्ञानोदयात’ फिरस्ता ‘ या टोपण नावाने एक युरोपियन साहेब स्थानिक सावकारांविषयी लिहित असे.
© सतीश भि. सोनवणे
No comments:
Post a Comment