महाराष्ट्रात जी काही प्राचीन गावे आहेत, त्यात कल्याणचा क्रमांक हा वरचा आहे. खास करून पश्चिम किनाऱ्याचे एक सुसज्ज बंदर आणि उत्तर-मध्य भारताला जोडणारे घाट रस्ते. सातवाहन काळापासून कल्याण, घारापुरी यासारख्या वसाहती समृद्ध झाल्या होत्या. सातवाहन काळात कल्याणला गांधारमधून आलेल्या यवनांच्या वसाहती असाव्यात, सोपार्याप्रमाणे सातवाहन काळापासून ज्ञात असलेले मुंबईच्या परिसरातील दुसरे शहर म्हणजे कल्याण. कल्याण (जि. ठाणे) प्रारंभिक ऐतिहासिक काळापासूनचे एक प्रसिद्ध बंदर. अरबी समुद्रास मिळणाऱ्या उल्हास नदीच्या काठावर, खाडीलगत असलेले एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून याला कुषाण–सातवाहन काळात महत्त्व होते. कल्याण (कलिअण), चोल, सोपारा, भडोच या सागरतरीय बंदरांच्या बरोबर दख्खन पठारावरील पैठण (प्रतिष्ठान), नेवासा (निधी निवास), तेर (तगर), भोकरदन (भोगवर्धन), नाशिक (नासिक्य) या तत्कालीन शहरांच्या बरोबर या स्थानाचा संपर्क होता. अगदी रोमपर्यंत सुरू असणाऱ्या व्यापारी मार्गाशी संबंधित असलेले हे स्थान एक संपन्न नगर होते.
बोर घाटाजवळ उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटाकडून वाहत येणारी काळ नदी येवून मिळते. त्यामुळे खाडीला पाणी भरपूर असते. उल्हास नदी साधारण कल्याणच्या उत्तरेकडून अनेक नागमोडी वळणे घेत दक्षिणेला वळते. अशाच एका अश्वनालाकृती वळणावर प्राचीन कल्याणचे अवशेष विखुरले होते. नदीच्या पूर्वेकडील काठावर, जिथे आजही आधुनिक कल्याण वसलेले आहे, तेथे प्राचीन पुरावशेषांचे पुरातत्त्वीय टेकाड होते. आधुनिक काळातील नागरिकीकरणाच्या प्रक्रि येत हे पुरावशेष नामशेष झाले. सातवाहन काळापासूनच सोपारा आणि कल्याण राजकीयदृष्ट्या दोन महत्त्वाची शहरे होती. एकूणच, या परिसरातील व्यापार, नैसर्गिक साधनसंपत्तीवर वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक राजवटींमध्ये या दोन शहरांवरून युद्धे झाली, राजकीय डावपेच खेळले गेले. हे कितीही सत्य असले, तरी इतिहासात कल्याण या शहराला सोपाऱ्यानंतरचेच स्थान मिळाले. सातवाहनांच्या काळापासूनचा, म्हणजे सुमारे इ.स. पूर्व २२० ते २४० पासूनचा या शहराला एक वैभवशाली इतिहास आहे. प्राचीन शिलालेखांत आणि अन्य जुन्या नोंदींमध्ये कलियान, कालियान असा त्याचा उल्लेख आहे. उल्हास नदीच्या खोलगट पात्राच्या वरच्या बाजूस असलेलं आणि एक उत्तम बंदर असल्याने हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं प्रसिद्ध केंद्र होतं.
कल्याण (कलिअण), चोल, सोपारा, भडोच या सागरतरीय बंदरांच्या बरोबर दख्खन पठारावरील पैठण (प्रतिष्ठान), नेवासा (निधी निवास), तेर (तगर), भोकरदन (भोगवर्धन), नाशिक (नासिक्य) या तत्कालीन शहरांच्या बरोबर या स्थानाचा संपर्क होता. अगदी रोमपर्यंत सुरू असणाऱ्या व्यापारी मार्गाशी संबंधित असलेले हे स्थान एक संपन्न नगर होते.
सातवाहन नृपती गौतमीपुत्र सातकर्णी याच्या शासन काळात कल्याणचा रहिवासी आनंदपुत्र उपासक अपरेणू याने कान्हेरी येथे लेणी व मंडप दान दिल्याचा शिलालेख उपलब्ध आहे. कान्हेरी व जुन्नर येथील शिलालेखातून हे स्पष्ट होते की, कल्याण येथील संपन्न व्यापारी मोठ्या प्रमाणात दानधर्म करत. वेणहुनंदि व विष्णूनंदी (पिता) यांच्या कुटुंबीयांनी अशीच एक देणगी दिली आहे. व्यापाऱ्यांच्या विविध श्रेणी असत. कल्याणचा सुवर्णकार ‘स्वामीदत्त’ (‘शिवमित्र’) हा श्रेष्ठी आपल्या कुटुंबीयांसह चतुःदिशेच्या भिक्षुसंघासाठी दान देतो. हे दान स्तुप, चैत्य या परिसरातील जलकुंड, बसण्यासाठीचे बाक, पथ (चकम-चकम) यांच्या निर्मितीसाठी दानं दिले आहे. शिवाय कल्याणलगत असलेल्या गंधारिका (गांधारी) भूमीतील निवास व भोजन चतुःशाला यांसाठीही दान दिल्याची नोंद मिळते. या नोंदीतून कल्याण शहराचे वैभव व परिसराची संपन्नता स्पष्ट होते. सातवाहन क्षत्रप काळात असलेला बौद्ध धर्माचा प्रभाव शीलाहार काळापर्यंत कायम होता. असे असले तरी सातवाहन काळातच वैदिक धर्मालाही मोठा राजश्रय प्राप्त झाला, हे नाणेघाट येथील अभिलेखातून स्पष्ट होते. जुन्नरशी तर संबंध इतके जवळचे, की जुन्नरच्या एका पेठेचं नावही कल्याण पेठ असंच आहे. मौल्यवान दगडांचे दागिने, कपडे, हस्तिदंती वस्तूंसह तूप, चंदन, लाख अशा भारतीय मालाची पाश्चिमात्य देशांत इथून निर्यात होत असे; तर चांदीची भांडी, सौंदर्य प्रसाधनं आदी वस्तू आयात होत होत्या.उत्तरेत कुषाण, शुंग आणि सातवाहनानंतर कल्चुरी व विशेषतः त्रैकुटक राजवंशातील ताम्रशासनातून तत्कालीन शासकांनी महाराज, देहसेन व व्याघ्रसेन यांनी स्वतःला ‘परमवैष्णव’ मानल्याचे दिसते.
कल्याण शहराभोवती असणार्या तटबंदीचा नकाशा
कल्याण या नावाचे मूळ शोधण्यासाठी आपल्याला महाभारत, पुराणांपर्यंत जावे लागेल. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये श्री विष्णूचा सहावा अवतार असलेल्या श्री परशुरामांची कथा आहे. परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यावर जिंकलेली सर्व भूमी ऋषी कश्यपांना दान केली. आणि स्वतः पश्चिम भारतात आले. पौराणिक कथेनुसार परशुरामांनी स्वत:च्या वास्तव्यासाठी नवीन भूमी तयार करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे सिंधु सागराला (अरबी सुमद्राला) मागे हटण्याचा आदेश दिला. सागराने परशुरामांच्या बाणाच्या टप्प्यापर्यंत मागे हटण्याचे मान्य केले. त्याप्रमाणे परशुरामांनी सह्याद्रीवरून शरसंधान केले व समुद्राच्या मागे हटण्यामुळे जी भूमी तयार झाली तिथे स्वतःचे राज्य निर्माण केले. या राज्याचे नाव 'अपरांत'. आणि या राज्याची राजधानी म्हणून शुर्पारका तयार केले. हा 'अपरांत' प्रदेश म्हणजे आजचा साधारण 'कोकण' (कोन-कण म्हणजे बाणापासून तयार झालेली भूमी). पुढे हाच प्रांत 'परशुराम क्षेत्र' म्हणूनही ओळखू जाऊ लागला. आणि 'शुर्पारका' पुढे जाऊन 'सोपारा' व आजच्या काळातील नालासोपारा बनले. या अपरांत प्रदेशाचा उल्लेख महाभारतात वनपर्व आणि शांतिपर्वात, तसेच मार्कडेय पुराणात देखील आहे. कान्हेरी आणि जुनागढ येथील शिलालेखांतून तसेच अन्य सध्य-उत्खनातून हाती आलेल्या पुराव्यावरून असे दिसते कि कल्याण हे 'अपरांत' प्रांताला उर्वरित देशाशी जोडण्याचा दुआ आणि प्रवेशद्वार होते. आणि म्हणूनच बहुदा जसे कोणत्याही पूजेची सुरवात शुभ स्वतिकाने होते तसेच नवीन राज्याच्या भरभराटीचा शुभसंकेत म्हणून कल्याण हे नाव वापरण्यास आले असावे.
पहिल्या, दुसर्या, पांचव्या व सहाव्या शतकांतील शिलालेखांत कल्याणचा उल्लेख सांपडतो. कान्हेरी येथील लेण्यात १२ शिलालेखात कल्याणचा उल्लेख आढळतो. जुन्नर येथील शिलालेखत कल्याणचा उल्लेख आढळतो.
टॉलेमी, पेरिप्लस या ग्रीक प्रवाशी लेखनात कल्याणचा उल्लेख आहे. पेरीप्लुसच्या म्हणण्याप्रमाणें कल्याण दुसर्या शतकाच्या अखेरीस महत्वास चढलें. सहाव्या शतकांत पश्चिम हिंदुस्थानांतील प्रसिद्ध पांच व्यापारी पेठांपैकीं कल्याण एक असून येथें एक बलिष्ठ राजा राज्य करीत होता; व पितळ, शिसवाचें लाकूड व कापड यांचा मोठा व्यापार चालत होता असें कॉस्मस इंडिकोप्लुस्ट्स म्हणतो.
६ व्या शतकात ग्रीक/इजिप्त व्यापारी कॉसमॉस इंडिकॉप्लुटसने कल्याणच्या बाजारपेठेची भरभरून वर्णन केले आहे. या कालखंडातील कल्याणच्या विषयी समान धागा म्हणजे कल्याण हे भारताचा जगाशी संबंध ठेवणारे महाद्वार होते. पाश्चिमात्य आणि भारत देशांमधील संस्कृती आणि ज्ञान देवाण-घेवाण करण्याचे माध्यम होते. भारत अंतर्गत आणि विदेशी व्यापाराचे केंद्र होते. आणि म्हणूनच जेव्हा ७ व्या शतकात चिनी प्रवाशी ह्युएन त्संग कल्याणचे वर्णन महाराष्ट्राची राजधानी करतो ते संयुक्तिक ठरते.
येथील कोळी लोकांची वसाहत सर्वांत प्राचीन असून, कल्याणची व्यापारी संघटना आणि उत्पादक संस्थांचे उल्लेख कान्हेरी आणि जुन्नर इथल्या शिलालेखांत आढळतात. जहाज बांधणीचं केंद्र म्हणूनही कल्याणची ओळख आहे. ह्यूएन त्संगच्या प्रवासवर्णनात तर इ.स. ६४० चा कल्याणचा उल्लेख राजधानी असा आहे.
सहाव्या-सातव्या शतकांपासूनच कल्याणला हिंदूंबरोबरच ख्रिश्चनांचीही वस्ती असल्याचे काही लिखित साधनांच्या आधारे ज्ञात आहे. इस्लामच्या उदयानंतर थोड्याच काळात कल्याण परिसरात मुसलमानांच्या वसाहती वाढीस लागल्या. यापूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे शिलाहार काळात अरब मुस्लिम, पारशी आणि हिंदू संपूर्ण उत्तर कोकणात गुण्यागोविंदाने राहत होते. अर्थात, कल्याणही याला अपवाद नसावे.
साधारण दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंत कल्याणच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात झाली. याच काळात मध्ययुगीन कल्याणचा पाया रचला गेला. सातवाहन काळापासूनच सोपारा आणि कल्याण राजकीयदृष्ट्या दोन महत्त्वाची शहरे होती. एकूणच, या परिसरातील व्यापार, नैसर्गिक साधनसंपत्तीवर वर्चस्व गाजवण्यासाठी अनेक राजवटींमध्ये या दोन शहरांवरून युद्धे झाली, राजकीय डावपेच खेळले गेले. हे कितीही सत्य असले, तरी इतिहासात कल्याण या शहराला सोपाऱ्यानंतरचेच स्थान मिळाले. इथं अरबांच्या स्वाऱ्या होऊ लागल्यानंतर ७ ते १३ व्या शतकात मग ठाणे बंदराची भरभराट झाली.
चवदाव्या शतकांत कल्याण हें एका जिल्ह्याचें मुख्य ठिकाण होतें. पुन्हा १४ व्या शतकात मुसलमानी सत्तेने कल्याण ताब्यात घेतलं. मुसुलमानांच्या ताब्यांत हा गांव आल्यावर त्यांनीं या गांवाचें नांव इस्लामाबाद असें ठेवलें. इ.स. १५३६ सालीं हें गांव पोर्तुगीजांनीं जिंकलें. त्यांनीं येथें लष्कर ठेवलें नाहीं. परंतु इ.स. १५७० सालीं त्यांनीं या गांवावर पुन्हां एकदां स्वारी केली. त्यावेळी जाळपोळ करून बरीच लूट त्यांनीं या गांवातून नेली. या वेळेपासून हें गांव अहमदनगरच्या पातशाहींत होतें असें दिसतें.
औरंगजेबाची स्वारी आपल्याला लुटणार या भीतीने कल्याणमधील खजिना विजापूरला पाठवण्याचा आदेश आदिलशहाने आपल्या सुभेदारास दिला होता; पण ही माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांना समजली.महाराजांचे सेनापती आबाजी सोनदेव यांनी तत्पूर्वीच ऑक्टोबर १६५६ मध्ये कल्याणवर छापा टाकून हा खजिना स्वराज्यासाठी लुटल्याच्या नोंदी आहेत. स्वतः महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराकडे लक्ष देऊन कल्याणमध्ये १६ गलबतं बांधण्याचं काम सुरू केलं होतं. सुरतेवरची दुसरी स्वारीही इथूनच केली गेली. या प्रांताची सरपाटिलकी (स्वराज्यांत) कुलाबेकर आंग्ऱ्यांची होती. (रा. खं. ६-३४६). या प्रांतांत शके १५९७ मध्यें चाद्रसेनीय प्रभूंचें ग्रामण्य झालें होतें, त्याचें निवारण रघुनाथपंत अमात्य यांनीं केलें (कित्ता. ५२३). शिवाजीमहाराजांची स. १५७१ च्या सुमारास जीं राज्यांतील अकरा खजिन्याचीं मुख्य ठिकाणें होतीं त्यांपैकीं हें एक होतें (खं. ८.१७). शाहुछत्रपतीच्या वेळीं कल्याण प्रांतांत वीस तर्फा होत्या (कित्ता. १०६). इंग्रज वर घाटीं येत असतां कल्याण ते परशिक या भागांत विसाजीपंत बिनीवाले हे फौजेसह त्यांचे पाठीवर होते (स. १७७४). चासकर जोशांपैकीं रामचंद्र महादेव व कृष्णराव महादेव हे कल्याणचे सुभेदार होते (रा. खं. ११.१४).
पुढे मुघलांच्या ताब्यात गेलेलं कल्याण पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे दिवाण रामचंद्र महादेव जोशी चासकर यांनी १७१९ मध्ये मुघलांकडून जिंकून घेतलं आणि पुढली शंभर वर्षं ते मराठ्यांच्या ताब्यात होतं. मुंबई अगर कोंकण यांतून वर घाटीं माल जावयाचा असल्यास जकात (मराठी राज्यांत) द्यावी लागे (खं. १२. १३३). सरकारी निरुपयोगी मालाचें लिलाव करण्याचें हें एक मोठें ठिकाण होतें (कित्ता १३७). सन १७८० च्या इंग्रज मराठ्यांच्या लढाईंत मराठ्यांचे सेनापति बाजीपंत होते. कल्याणच्या बागेंत इंग्रज (गाडरचीं २ पलटणें व मुंबईकरांचीं इतर पलटणें) होता. ता. ८ जून रोजीं रात्रीं जोराचीं लढाई होऊन मराठ्यांनीं ''बेतर्हा इंग्रजी लोकांस मार दिला... त्यांचे लोकांनां धीर धरवेना फौजा पाठीमागें गेल्या. कोंकणच्या दोन लढाईंत इंग्रज फारच नसीयत पावले.'' याच मोहिमेंत मराठ्यांकडील अंताजी नारायण ढवळे हे सरदार पडले, त्यामुळें पेशव्यांनीं त्यांच्या मुलास कल्याण प्रांतांत इनाम दिलें (खं. १०. १००, २१८; खं. १९. ९२). १८८७ त जें एकदा कल्याण इंग्रजांच्या ताब्यांत गेलें तें कयमचेंच (मुं. गॅ. इं. गॅ., राजवाडे खंड).
दरम्यानच्या काळातील एका ब्रिटिश ठाणेदाराने कल्याणबाबत लिहिलेली ५७ पानी डायरीदेखील उपलब्ध आहे. कल्याणच्या प्रख्यात सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शताब्दी ग्रंथात या महत्त्वपूर्ण नोंदी आहेत. १८२८ सालची ब्रिटिश राजपत्रामधील कल्याणसंदर्भातील एक नोंद पुरेशी बोलकी आहे.
"स्थळ कालियानी : मराठा-मुघलामध्ये दीर्घ काळ चाललेल्या लढाईच्या जखमा येथे सर्वत्र दिसत आहेत पण तरीही इथली लोक आपल्या मातीत पाय घट्ट रुतवून उभे आहेत. बाह्य स्वरूपावरून येथे इतिहासात एक भरभराटीला आलेले नगर असल्याचे जाणवते, व इथली लोक व्यापार करून लढा देऊन पुन्हा आपल्या इतिहासातील जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत."
ब्रिटिशकाळात मुंबईपाठोपाठ १८५४ मध्ये रेल्वे कल्याणपर्यंत पोचल्याने या शहराचं महत्त्व आणखी वाढलं, पुणे-नगरची अनेक घराणी इथं येऊन स्थायिक झाली. १८५५ मध्ये नगरपालिकेची, तर १८७८ मध्ये सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली. कल्याण नगरपालिकेच्या एका सदस्याने इंग्लंडच्या पार्लमेंटशी सतत पत्रव्यवहार करून नगरपालिकेला स्थानिक नगराध्यक्ष मिळावा या मागणीला अनुकूलता मिळवली. याच दरम्यान शिळाप्रेसवर छपाई करणारा लक्ष्मी-व्यंकटेश छापखानाही इथं सुरू करण्यात आला.
लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाचा प्रभाव साऱ्या देशभर होताच, त्यामुळे भारताचार्य चिंतामणराव वैद्य, प्रभाकरनाना ओक, लखूनाना फडके यांच्यासह अनेक टिळकभक्तांनी पुण्याप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यासाठी सर्व जाती-जमातींच्या बांधवांची एक बैठक १८९५ मध्ये प्रख्यात सुभेदार वाड्यात बोलावली. श्रीमंत रामजी महादेव बिवलकर यांचा हा वाडा, १७६९ मध्ये बांधलेला. वाड्यासमोर उभं राहून पाचशे स्वार सलामी देत इतका तो प्रशस्त होता. अंबारीसह हत्ती आत येईल असा भव्य दिंडीदरवाजा होता. सार्वजनिक गणेशोत्सव, इंग्रजी शाळा, दसऱ्यासह अनेक सण-समारंभ, व्याख्यानं, कुस्त्यांच्या दंगली, चित्रपट व नाटकं, अनेक अधिवेशनं, परिषदा या वाड्यात झाल्या. वाड्याचे तत्कालीन मालक बापूसाहेब सुभेदार यांचा वरील समाजोपयोगी कार्यास वाडा देऊन मदत केल्याबद्दल १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. खुद्द लो. टिळक १९०६ मध्ये इथं भाषणासाठी येऊन गेले होते. १९१९ पासून जॉली सोशल क्लबमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला.
या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कल्याणकरांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत मोठी कामगिरी बजावली आहे. महापराक्रमी, दिग्विजयी पहिल्या बाजीराव पेशव्यांची पत्नी काशीबाईसाहेब या इथल्याच. त्याअर्थाने पेशवे हे कल्याणचे जावई. त्यांना विवाहाच्या वेळी देण्यात आलेला अष्टकोनी संगमरवरी चौरंग आजही जपून ठेवण्यात आला आहे. पेशवेकाळात अनेक दिग्गज घराणी कल्याणमध्ये स्थायिक झाली. सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी दीडशे-दोनशे वाडे इथं होते. काळच्या ओघात ते लुप्त झाले. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी या इथल्याच. याशिवाय शंकरराव झुंजारराव, गणपतराव फडके, विधानसभेतील विरोधी पक्षनेते शे.का.प.चे कृष्णराव धुळप, माजी राज्यपाल प्रा. राम कापसे, इतिहास संशोधक स. म. दिवेकर, समीक्षक माधव आचवल, गोवा मुक्ती संग्रामातील माधवराव काणे, प्रख्यात शिल्पकार भाऊसाहेब साठे, आर्किटेक्ट मुकुंद सोनपाटकी, प्रसिद्ध अभिनेत्री नूतन, लक्ष्मीबाई टिळक, कॉ. गोदावरी परुळेकर, जुन्या काळातील अभिनेत्री लक्ष्मीछाया, सध्या गाजणारी अभिनेत्री आदिती सारंगधर या सर्वांचा कल्याणशी निकटचा संबंध होता.
मॅजिक लॅंटन हा जो करमणुकीचा (चित्रपट प्रदर्शन) खेळ आहे, तो इथल्या पटवर्धन बंधूंनी १८८५ च्या दरम्यान लोकप्रिय केला होता. पाचशे स्लाइड्स तयार करून कंदिलाच्या प्रकाशात त्या पडद्यावर दाखवायच्या आणि त्याचवेळी त्याला पेटी-तबल्यासह प्रत्यक्ष संगीताची साथ द्यायची, अशा प्रचंड कष्टाने लोकप्रिय केलेल्या या खेळाचा उल्लेख प्रबोधनकारांनी मराठीत ‘शांबरिक खरोलिका’ असा केला होता. कलकत्ता इथं त्याकाळी झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पटवर्धन बंधूंना निमंत्रित करण्यात आलं होतं.
उल्हास नदीच्या पूर्वेला जसे कल्याण आहे तसेच पश्चिमेला भिवंडी आहे. आजही कल्याण-भिवंडी ही दोन्ही जुळी शहरे म्हणून ओळखली जातात. मध्ययुगीन इतिहासात या दोन्ही शहरांनी मोलाचे योगदान दिले आहे. भिवंडी परिसरात पूर्वी काही सातवाहनकालीन वसाहती असाव्यात, असे पुरावशेषांवरून वाटत असले, तरी येथे एक नागरी वसाहत असण्याची शक्यता फारच धूसर आहे. शिलाहार काळात या परिसरात मोठ्या प्रमाणात वसाहती झाल्या असाव्यात. गेल्या दोन अडीच हजार वर्षांचा समृध्द इतिहास लाभलेले कल्याण स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत टुमदार गाव होते. प्राचीन, मध्ययुगीन व मराठा कालखंडाच्या खुणा शहराच्या मध्यावर, सीमेवर आणि परिसरात जिवंत होत्या. त्या ठिकाणी तटबंदी, भटाळे, डावजे, लेंडाळे तलाव, पारशी विहिर व सुंदर खाडी काठ होता. शहराच्या मध्यावर शंभर दोनशे कौलारु, दूसोपी, चौसोपी आखीव, रेखीव वाडे मराठा काळाची आठवण देत होते. मलीक अम्बर कालीन चौरस पोखरणी काठावरचा ‘टेम्पल कॉम्प्लेक्स’ कर्नाटक, केरळ व गोव्याची आठवण देई. सुभेदार वाडा, काळेवाडा, सरकार वाडा, पारनाका एखाद्या संस्थानाची झलक देई.
ब्रिटीश काळात सुधारणा झाल्या. साधारण १८५४ मध्ये रेल्वे सुरु झाल्यावर गावात आलेले टांगे ही तेव्हा एक शान होती. पहिल्या पावसानंतर कौलारु लाल छप्परांचा गाव आणि लांब हिरवे निळे डोंगर, हाजीमलंग ते भिमाशंकर पर्यंतचा परिसर पाहून निसर्गाचा व या गावाचा हेवा वाटे. दक्षिणेला रेल्वेची गाडी आणि मुंब्रा डोंगर आपण मुंबईच्या जवळ आहे, याचे भान येई. पण संयुक्त महाराष्ट्र झाला आणि सर्व संदर्भच बदलले. राजकीय पक्षांचे पेव फुटले. गावाचा कळत नकळत एकोपा गेला. असुरी चढाओढ आली. सत्तेचा बाजार झाला आणि गावाची आत्मियता लोप पावू लागली. गावाच्या इतिहासाचा नावापुरता अभिमान राहून बाकी भौतिक सर्वत्र ‘अकल्याण’ होत गेले, असेच नाईलाजाने म्हणावे लागेल.
अशा सुंदर ‘स्वप्नातील कल्याणचे’ वर्तमान आज उद्धस्त झाले आहे. आज जे हरवलं आहे ते पुन्हा येणे शक्य नाही. तरीही, टिळक चौक, अन्सारी चौक ते दुर्गाडी किल्ला हा भाग आजही इतिहासाच्या खुणा जागवतो.
कल्याणबरोबरच भिवंडी परिसरातील कामणदुर्गापासून गुमतारादुर्गाच्या पायथ्यापर्यंत काही मंदिरांचे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात. उल्हास नदीच्या पूर्वेला, कल्याणच्या पलीकडील तीरावर धूळखाडी, सोनाळे, भिनार आणि लोणार परिसरात मोठ्या प्रमाणात शिलाहारकालीन स्थापत्य व शिल्पांचे भग्नावशेष सापडले आहेत. अर्थातच, आधुनिक वसाहतींनी या पुरातन ठेव्याचे मोठे नुकसान केले असले, तरी शिलाहारकालीन वसाहतींची साक्ष देणारे थोडेफार अवशेष आजही शिल्लक आहेत. लोणार येथील मंदिर व मीठ यांचे शिलाहारकालीन संदर्भ यापूर्वी आपण पाहिले आहेत. कालक्र मदृष्ट्या या साºया अवशेषांचा काळ दहाव्या ते तेराव्या शतकापर्यंत जातो. पंधराव्या शतकापर्यंत कोणतेही महत्त्वाचे पुरावशेष या परिसरात पाहायला मिळत नाहीत.
कल्याणची मुघलकालीन तटबंदी :-
अगदी प्राचीन काळापासून कल्याण हे एक बंदर आणि भरभराटीला आलेले व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. परंतु प्राचीन काळात अनेक राज्यांतरे होऊन देखील कल्याणने युद्धाच्या झळा सोसल्या नाहीत. प्रत्येक राज्यकर्त्याने कल्याणचे महत्व ओळखून एका 'फ्री पोर्ट' प्रमाणे त्याला वाढू दिले. परंतु मध्ययुगात कल्याणची सुवर्णभूमी लुटण्याचे अनेक प्रयत्न झाले. मुघल कालखंडात कल्याणने अनेक युद्ध अनुभवली.आणि यामुळेच सततच्या युद्धापासून कल्याणचे संरक्षण करण्यास्तव मुघल कालखंडात कल्याणला चारही बाजूने तटबंदी बांधण्यात आली होती. कल्याणचे स्वरूप एखाद्या किल्ल्यासदृश झाले होते. तटबंदीचे बांधकाम शहाजहान(१६२८-५८) यांच्या काळात त्यांचे मंत्री नवाब महातबरखान यांनी सुरू केले आणि ते औरंगजेबाच्या काळात १६९४ मध्ये पूर्ण झाले. तटबंदी दगडी(बेसाल्ट) बांधकामातील होती. असेच बांधकाम कल्याणच्या काळा तलाव भोवती होते. तसेच दूध नाक्यावरील शाही बावडी(विहीर) देखील याच प्रकारच्या बांधकामातून तयार करण्यात आली होती.
तटबंदी २१२३ यार्ड लांबीची व चार ते सहा फूट रुंदीची होती. तसेच ती तेहतीस फूट रुंद व वीस फूट खोलीच्या खंदकाने संरक्षित होती. तटबंदीच्या तटाला अकरा बुरुज होते. त्यापैकी मोठे बुरुज चार तर सात लहान होते. मुख्य बुरुजांपैकी उत्तर पूर्वेस एक, पूर्वेला मध्यावर दुसरा, तिसरा दक्षिण पूर्वेला तर चौथा किल्ल्याच्या उतारावर होता.
सुरुवातीस तटबंदीला आधार, बंदर, पनवेल आणि दिल्ली असे चार दरवाजे होते. आधार दरवाजा हा आजच्या आधारवाडीच्या दिशेने लाल चौकीच्या आसपास होता. दिल्ली दरवाजा हा टिळक चौकात काळा तलाव दिशेने होता. बंदर दरवाजा हा खाडी शेजारी तर पनवेल दरवाजा हा दक्षिण-पश्चिमेकडे मागच्या बाजूला होता.
तटाच्या आत सुमारे सत्तर एकराचा गावाचा परिसर होता. कल्याण गावाचे स्वरूप साधारण किल्ला, तटावरील गाव व किल्ल्याबाहेरील पेठ इतकेच होते.
पुढे शिवाजी महाराजांच्या काळात दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी गणेश दरवाजाची निर्मिती करण्यात आली. गावातून गणेश दरवाज्याकडे जाण्यासाठी दुर्गाडी किल्लाच्या पायथ्याशी असणाऱ्या भटाळे तलावावर दगडी पूल बांधला. हा पूल आता आतापर्यंत राम मारुतीच्या मागे उर्दू हायस्कूल पर्यंत दिसत असे. तो आज अस्तित्वात नाही. ह्याच कोटाला पुढे सुभेदार रामजी बिवलकर यांनी १७७० साली एका दरवाज्याची निर्मिती केली, तो साधारण कासारहाट भागात होता.
गणेश दरवाजा १७८० साली इंग्रज युद्धादरम्यान जाळला गेला, त्यामुळे काही काळ हा दरवाजा जळलेला दरवाजा म्हणूनही ओळखला जाई. आज हा दरवाजा अस्तित्वात नाही. आज आपण जो दुर्गाडी किल्ल्याचा गणेश दरवाजा म्हणून ओळखतो तो नव्याने बांधण्यात आला आहे. तटबंदीची पूर्व आणि दक्षिण बाजू इंग्रजांच्या काळात, १८६५ मध्ये पाडली आणि रस्ता बनवला. तसेच पश्चिमेकडील तटबंदी पडल्यावर तिचे दगड कल्याण आणि ठाणे शहरांमधील घरांचा पाया व घर बांधण्यासाठी कस्टम अधिकाऱ्यांनी नेले.
आज या तटबंदीच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या शेवटच्या खुणा कल्याणच्या लालचौकी परिसरात आहेत. शेवटचा दरवाजा आणि बुरुजाचा थोडासा भाग अजून शाबूत असून जंग्या असलेली तटबंदीची भिंत स्पष्ट दिसते .
तटबंदी बघण्यास कसे जाल :
१) कल्याण स्टेशन वरून रिक्षाने लाल चौकीला उतरायचं.
२) तिथून पारनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे जायचं.
३) लाल चौकीला असणाऱ्या शारदा विद्यामंदिर शाळेचे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला उजव्या हाताला राम-मारुती महाराजांच्या समाधीकडे जाणाऱ्या मार्गने आत गेला की, डाव्या हाताला माताका देवीच्या मंदिरासमो म्हशींचा तबेला आणि विहीर आहे. तिथून आत गेलं की, डाव्या हाताला तटबंदी दिसून येते.
चौधरपाडा : शिलाहार कालीन पुरातन शिलालेख
समाज एकसंध राहण्यासाठी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात अनेक पुरावशेष कोरलेले पहायला मिळतात . हिंदू-जैन-बुध्द धर्माशी संबंधित शिल्पकला, वीरगळ, गध्देगाळ, शिलालेख, शस्त्रास्त्रे, विविध राजवंशाची नाणी, लघुचित्रे, सिंधूसंस्कृतीशी निगडीत पुरावशेष, प्रसिध्द चित्रकारांची चित्रे इ. अनेक पूर्वेस यात बघायला मिळतात.
सातवाहन, वाकाटक, कलचुरी, राष्ट्रकुट, अभीर इ. महाराष्ट्रात होऊन गेलेल्या राजवंशांपैकी अजून एक महत्त्वाचा राजवंश म्हणजे शिलाहार. उपलब्ध शिलालेखांवरून महाराष्ट्रात आणि कर्नाटकात शिलाहारांच्या दहा शाखांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतावर राज्य केले असे दिसून येते. त्यापैकी उत्तर कोकणचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कोल्हापूरचे शिलाहार ह्या तीन प्रमुख शाखा होत्या.हेमाडपंती कलाकृतीची मंदिरे बांधण्याचा प्रभाव यादव, शिलाहार काळापासून आहे.
उत्तर कोकणच्या शिलाहारांचे ठाणे आणि रायगड प्रांतावर राज्य होते आणि त्यांची राजधानी श्रीस्थानक (आताचे ठाणे) होती. ठाणे, कल्याण शहरांच्या आसपास शिलाहारांचा इतिहास उलगडून सांगणारी अनेक दानपत्रे, मंदिरे पहायला मिळतात. भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.
इस ८०० ते १२६५ अशा साडे चार शतकांच्या प्रदीर्घ कालावधीत शिलाहार राजघराण्याने उत्तर कोकण प्रांतावर राज्य केले. या राजघराण्याचा इतिहास समजण्याकरिता या राजांनी दिलेली ताम्रपट आणि शिलालेख स्वरूपातील दानपत्रे अतिशय मूल्यवान आहेत. शिलाहार राजे शिवभक् होते. त्यांनी अप्रतिम भूमिज शैलीतील( पूर्व हेमाडपंती शैली) अनेक शिव मंदिरे बांधली. कल्याण परिसरातच खिडकाळी, लोनाड मधील रामेश्वर/लोणादित्य आणि बापगाव येथील सुम्पेश्वर हि मंदिरे शिलाहार राजांच्या काळातील. विहार येथील अनंतदेव यांची गध्देगळ, भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील शिलालेख असाच ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण आहे.
बापगाव येथे माळरानात अनेक वर्षे एक प्राचीन शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडलेला होता. शिलाहार राजा दुसरा केशिदेव याने कोरविलेला हा शिलालेख आता नष्ट झालेल्या सुम्पेश्वर मंदिराबद्दल काही माहिती देतो. इतिहासात इस १८८२ मध्ये ही शीला सापडल्याची नोंद आहे. त्यावरील लेखाचे वाचन पं. भगवानलाल इंद्राजी यांनी केले होते. लेखाची भाषा संस्कृत आणि लिपी नागरी आहे. या लेखात २२ ओळी आहेत.
सिद्धम । अर्थ : (सिध्दी असो) ॐनमो विनायकाय ॥ अर्थ : (विनायकास नमस्कार असो) नमामि भुवनोत्पत्तिस्थितीसंहारकारीणं(णम्) ॥ अर्थ : (विश्वाची उत्पत्ती, संंधारण व लय यास कारणीभूत असलेला व) श्रीमत्षुंपेश्वरंभक्तजनसर्वार्त्तिहारीणं ॥१ ॥ अर्थ : (भक्तजनांचे दुःख हरण करणा-या श्रीमत् षुपेंश्वरास नमन असो) श्रीविद्याधरवंशमंडनमणिर्ज्जीमूतकेतो: कुलेविख्यातोस्त्यपरार्क्कराजतनय (य:) श्रीकेशिपृथ्वीपति: । अर्थ : (श्रीविद्याधर वंशाचा भूषणभूत जीमूतकेतूच्या कुळात प्रसिद्ध असलेल्या राजा अपरार्काचा पुत्र पृथ्वीपती केशीदेव) यस्यापारपवित्रपौरुषनिधेरालोक्य राज्यस्थितिं श्रीरामादिमहिभुजां भगवती धत्तेधरा न स्मृतिं ॥२॥ अर्थ : (ज्याचे पावित्र्य अपार व अवर्णनीय आहे, व ज्याच्या पौरूषत्वाचा संचय अवलोकन करण्यासारखा आहे व ज्याच्या राज्याची समृद्धी श्रीराम आदी पराक्रमी राजांची पृथ्वीदेवतेला स्मरण करून देणारे आहे. स(श)क संवत् ११६१ विकारीसंवत्सरांतर्गत माघ वदि १४ चतुर्द्द्श्यां भौमे शिवरात्रौ पर्व्वणीअद्येह समस्तराजावलीसमलंकृत महाराजाधिराजकोकणचक्रवर्त्ति श्रीकेशिदेवकल्याणविजयराज्ये तथैतत्प्रसात्समस्तराज्यमंडलचिंताभारं समुद्वहति । अर्थ : (शक संवत ११६१ विकारी संवत्सर माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री मंगळवार या दिवशी संपूर्ण राजमंडळाने सुशोभित असलेला महाराजाधिराज कोकणचक्रवर्ती श्रीकेशीदेव ज्यांचे राज्य पराक्रमी व कल्याणदायी आहे, अत्यंत प्रसन्न होऊन जो चिंता वहातो) महामात्ये श्रीझंपडप्रभु महासांधिविग्र(हि)क राजदेवे पंडित श्रीकरणभांडागारे अनंतप्रभुप्रमुखे(षु) सत्सु एतस्मिन्काले प्रवर्तमाने सतिब्रह्मपुरीग्रामदानसा(शा)सनं समधिलिक्ष(ख्य)ते यथा ॥ अर्थ : (महामंत्री श्रीझंडप्रभू महासंधीविग्रहक रामदेव पंडित व कोषाध्यक्ष अनंतप्रभू हे ज्याचे प्रमुख मंत्री आहेत त्या ब्रम्हपूरी या गावात हे आज्ञापत्र या काळात लिहिले गेले ते असे) श्रीषोंपेश्वरदेव पूजनसदाव्यासक्तसर्वा(न्तरः) । अर्थ : (श्री षूपेंश्वर देवाच्या पूजाअर्चेत सतत रममाण असलेला) सत्पात्रद्विज सोमनायकव (ब)टोःसंतानयो(भो)ग्यस्थितिं (तिम्)। अर्थ : (योग्य सत्पात्र ब्राम्हण सोमनायक यास त्याच्या मुलाबाळांच्या देखभालीसाठी) श्रीब्र्ह्मपुरीपुरारिभवनक्ष्माभृन्मनोहारिणीं। अर्थ : (पुरातन काळात शिवाच्या वास्तव्यास योग्य असलेल्या मनोधारिणी ब्रम्हपूरी) वीर: कारयति स्म विस्मयमयीं श्रीकेशिपृथ्वीपति: ॥३॥ अर्थ : (जेथे शूर केशीदेव पृथ्वीपती विस्मयकारक गोष्टी करण्यात अग्रेसर असे.) बटुकनामानि कथ्यंन्ते। सोमनायक: सुर्य्यनायक: । गोविंदनायक: । नाऊ नायक:। इति चत्वारो बटुका: ॥ अर्थ : सोमनायक, सूर्यनायक, गोविंदनायक व नावनायक अशी या चार भटांची नावे सांगितली आहेत.) निर्व्वाहाय पुरारिपूजकबटुश्रेणी द्विजानां सदावो(बो)पग्रामगता स्वसीमसहिता मां(जे/ज)सपल्लीपुरा दत्ता श्रीशिवरात्रि पर्व्वणी विभोषोंपेश्वरस्याग्रत: श्रीमत्केशिनरेश्वरेण विमला चंद्रार्क्कतारावधि॥४॥ अर्थ : (त्या शिवाची पूजा करणा-या बटूक थोर श्रेणी ब्राम्हण बापगावातील त्याच्या निर्वाहासाठी सर्वसीमांतर्गत मांजसपल्ली (वाडी) श्रीकेशीनरेश्वर षुंपेश्वरासमोर यावत् चंद्र दिवाकरौ स्वच्छ चांदण्या रात्री शिवरात्री दान दिला. (राज्य)स्य मंत्रीणान्यैर्व्वा कर्तव्यं धर्म्मपालनं । धर्मध्वंशे … नरकस्थितिं ॥५॥ अर्थ : (राजमंत्र्यांना या राजपत्राचे पालन करणे हे धर्मपालन करण्यासारखे आहे असे मानले पाहिजे तसे न केल्यास ती नरकस्थिती ठरेल) तथा चोक्तं पूर्वाचार्य्यमुनिभि: । सुवर्णमेकं गामेकां भुमेरप्येकमंगुलं । हरन्नरकमाप्नोति या(वदाभूत) संप्लवं ॥६॥ अर्थ : एखादे सोन्याचे नाणे, एक गाय, पृथ्वीवरील भूमीचे दान केले असता ते जो परत हरण करतो किंवा ते घेण्याची इच्छा करतो त्याला निरंतर नरक प्राप्त होतो असे मुनी आचार्यांनी सांगून ठेवले आहे. मंगलं महाश्री । (शुभं भ) वतु ॥ ले(ख)कपाठयोः ॥ अर्थ : श्रेष्ठांचे (वडीलधा-यांचे) कल्याण असो, सर्व शुभ होवो, लेखक व वाचक यांचे ही शुभ होवो.
याच्या वाचनांती काही गोष्टी ठळकपणे निदर्शनास येतात १. हा शिलालेख म्हणजे राजाज्ञा होती. २. राजा केशीदेव याने ब्राम्हणांना भूदान केल्याचा उल्लेख आहे. ३. शक संवत ११६१ विकारी संवत्सर माघ कृष्ण चतुर्दशी शिवरात्री मंगळवार या दिवशी दानपत्र दिले. ४. या आज्ञेचा अथवा नियमांचा भंग करणाऱ्यांसाठी नरकप्राप्ती शापवाणीचा धाक घालण्यात आला आहे. ५. ब्रम्हपूरी, बापगाव या गावांचा उल्लेख ६. सूंपेश्वर मंदिर या प्राचीन मंदिराचा उल्लेख ७. राजा केशीदेव याचे वंश व कूळ व पित्याचे नाव ८. राजा केशीदेव याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे ९. सदर शिलालेख संस्कृत भाषेत असून, लिपी नागरी आहे १०. या शिलालेखात ६ श्लोक व २२ ओळी आहेत याचा नेमका अर्थ स्थानिक ग्रामस्थांना माहीत नसल्यामुळे या शिळेला स्पर्श झाल्यास गावावर संकट येईल, अशी त्यांना भीती वाटत होती. गावकऱ्यांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. इतिहासकार, जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभाग, पोलिस, लोणाडचे सरपंच, पोलिस आणि स्थानिक नेते यांनी संयुंक्तपणे अनेक वर्षे काम करून जनजागृती घडवून आणली. आणि २०१४ रोजी महाशिवरात्रीला सुमेश्वर/सुम्पेश्वर मंदिराजवळ शिलालेखाची साग्रसंगीत पूजा करून लोकांना दिसेलअसा लोखंडी जाळीआड सुरक्षित स्थापना केली. सुमेश्वर मंदिरातील शिवलिंग व शिवपार्वतीची मूर्ती पाहण्यासारखी आहे
जवळच लोणादित्य मंदिर (लोणाड) व खांडेश्वरी माता मंदिर (जानवळे) भेट देता येईल
कसे जाल? : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरून पडघे गावासाठी निघून सावद नाक्यावर उतरावे. येथून डावीकडे लोणाडला जाणारा फाटा आहे. जानवळे गावाच्या कमानीतून सरळ आत गेल्यावर १.५ ते २ किमी वर चौधरपाडा गाव आहे स्वतःचे वाहन असेल तर प्रवास सुलभ होईल
नवा विष्णू’ उर्फ द्वारकाधीश :-
कल्याण येथे सातवाहन काळात व नंतरच्या काळात झालेल्या वसाहतीचे अभिलेखीय पुरावे कान्हेरी लेण्यात मिळतात. तर पुरातत्वीयदृष्ट्या तत्कालीन मृद-भांडी गांधारी परिसरात मिळाल्याची नोंद एम. एन. देशपांडे यांनी केली आहे. असे असले तरी, अन्य कुठलाही ठळक पुरावा उपलब्ध झालेला नव्हता.
प्राचीन बंदर म्हणून अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून कलियान या नावाने सध्याच्या कल्याणचे उल्लेख असले तरी आता शहरात तितके प्राचीन अवशेष फारसे आढळत नाहीत. मात्र शहरातील नव्या विष्णू मंदिरात द्वारकाधीश नावाने पूजल्या जाणाऱ्या मूर्तीच्या रूपाने कल्याणमध्ये पाचव्या शतकात नांदत असलेल्या संस्कृतीची एक ठळक खूण सापडली आहे. इतिहासतज्ज्ञांनी निरीक्षण करून ही मूर्ती पाचव्या शतकातील असल्याचा निर्वाळा दिला आहे.
शेणाळे तलाव
येथील वसाहतीकरणाचे वैशिष्ट्य म्हणून येथे असलेल्या विविध जलाशयांची नोंद करावी लागते. यापैकी काळाच्या ओघात काळा तलाव वगळता शेणाळे तलाव, दुर्गाडी किल्ल्यालगतचा जलाशय व सुभाष मैदानाच्या जागी असलेला जलाशय पूर्ण नष्ट झाला आहे. सुभाष मैदानाच्या ठिकाणी पूर्वी लेंडी तलाव नावाचा जलाशय होता. याच जलाशयात विष्णूमूर्ती उपलब्ध झाली. कल्याण या ठिकाणाला खूप मोठा असा इतिहास आहे. कल्याण मध्ये आपल्याला खूप सारी जुनी मंदिरे पाहायला मिळतात.
पुष्क्रणी उर्फ पोखरण
कल्याणच्या लेंडी तलावात १२० वर्षांपूर्वी ही विष्णू मूर्ती सापडली. शहरात पेशवेकालीन विष्णू मंदिर आहे. त्यामुळे नव्याने सापडलेली मूर्ती म्हणून याला ‘नवा विष्णू’ हे नाव पडले. कल्याणमधील ही मूर्ती पाचव्या शतकातील आहे. पनवेल तसेच घारापुरी येथे पाचव्या शतकातील अशा प्रकारच्या मूर्ती मिळाल्या आहेत. मात्र त्या खंडित स्वरूपाच्या आहेत. कल्याणमधील मूर्ती मात्र अखंड आहे. महाराष्ट्रात पूजली जाणारी ही सर्वात प्राचीन विष्णू मूर्ती आहे. पुरातत्त्व संशोधक डॉ. अरविंद जामखेडकर आणि ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ सदाशिव गोरक्षकर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.
विष्णूची स्थानक मूर्ती
साधारण १२० वर्षांपूर्वी जलाशयातून ही मूर्ती बाहेर काढण्यात आली व येथील प्रतिष्ठित गुजराती समूहाने (पुष्ठीपंथी लोहाणा समाज) जलाशयाच्या परिसरात नवाविष्णू मंदिराची निर्मिती करून विष्णूमूर्तीची प्रतिष्ठापना केली. आज नित्य पूजेत असलेली ही मूर्ती ज्या स्थानात मिळाली तेथे मूळ स्थानाची स्मृती म्हणून एक पादुका असलेला चौथरा व लहानशी खोली बांधली आहे. या ठिकाणी पूर्वीपासून असलेला वटवृक्ष श्रद्धेय मानला जातो. या मंदिरातील प्रभुश्री द्वारिकाधिशाचा शताब्दी महोत्सव संवत २०५३ वैशाख वद्य ८ गुरुवार दिनांक २९ मे १९९७ रोजी साजरा करण्यात आला.शहरातील लोहाणा समाजातील रहिवाशांनी द्वारकाधीश म्हणून या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आजवर द्वारकाधीश म्हणून पूजली जाणारी ही मूर्ती प्रत्यक्षात महाराष्ट्रातील पूजेत असलेली एकमेव प्राचीन विष्णूमूर्ती आहे.द्वारकाधिश्वराचे मुख्य मंदिर द्वारकेला आहे. या मंदिर व मूर्तीचे विशेष महत्त्व आहे. तर डाकोरा (गुजरात) व काकरोळी (राजस्थान) येथेही द्वारकाधिश्वराचे मंदिर आहे. अत्रे नाटय़गृहापासून हाकेच्या अंतरावर दूधनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे नवे विष्णू मंदिर आहे. पुढे नागरीकरणाच्या रेटय़ात लेंडी तलावही बुजविला गेला. त्या ठिकाणी आता सुभाष मैदान आहे.
कल्याणमधील श्री नाकोडा पार्श्व भैरव जैन मंदिरात असलेली ही विष्णू मूर्ती समपाद उभी आहे. ही पूर्णाकार मूर्ती (१५५ X ७० X २५ सेमी) आहे. मूर्ती चतुर्भुज असून दक्षिणकरक्रमाने चक्र, शंख, अभयहस्त व गदाधारी आहे. मुळात ती उर्ध्वबाहू आहे. मूर्ती चतुर्भुज असून उजव्या पुढचा हात अभय मुद्रेत आहे, मागच्या हातात गदा आणि चक्र, तर पुढचा डावा हात जो कमरेजवळ आहे त्या हातात शंख आहे.मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूस खाली अनुक्रमे गदा व शंखातून प्रगट झालेली गदादेवी व शंखपुरुष दाखविले आहे. सदर मूर्तीचा गोलाईयुक्त चेहरा, स्मितहास्य (लहान जिव्हणी), सरळ नासिका, अर्धोन्मीलित नेत्र, डोक्यावर उंच टोपीच्या आकाराचा मुकुट ही वैशिष्ट्यं आहेत. या शिरोभूषणावर एकावर एक कोरलेली तीन पदके आहेत. मुख्य पदकावर त्रिरत्नचिन्ह अलंकृत असून माणिक-मोती व रत्नजडावाचे काम आहे व शेवटी लोलकाची झालर आहे. याला रत्नमुकुटही म्हणतात. चेहऱ्याभोवती प्रभावळ आहे. गळ्यात एकावली, हाती मनगटी व बाजूबंद, पायात तोडे असे किमान अलंकार धारण केले आहेत.डोक्यावर किरीट मुकुट असून चेहऱ्याभोवती प्रभावळ आहे. गळ्यात एकावली आणि हातात बाजूबंद अलंकार आहेत. गदादेवी त्रिभंगात उभी आहे. उजवा हात लोलकहस्ता मुद्रेत असून डाव्या खांद्यावरील वस्त्र सावरणारा हात करतरी मुद्रेत आहे. केसांचा अंबाडा असून त्यावर शिरोभूषण धारण केले आहे. कानात मोठाल्या बाळ्या असून गळ्यात कंठी, मनगटी व बाजूबंद, पायात पैंजण आहेत. अधोवस्त्राचा सोगा दोन्ही पायात रुळतो आहे. तर शंखपुरुषाचा गोलाईयुक्त चेहरा, ठेंगणा बांधा, खांद्याखाली रुळणारे कुरळे केस व शिरोभूषण, दंडास स्पर्श करणारी हाताची घडी, गुडघ्यापर्यंत घसरलेल्या नेसूच्या वस्त्राचा दोन्ही पायात रुळणारा सोगा ही वैशिष्ट्यं आहेत. यावरून ही मूर्ती कुषाण काळानंतरची व गुप्त काळानंतर विकसित होत जाणाऱ्या मूर्तीपूर्वीची आहे. गदादेवी व हाती असलेली गदा या संदर्भात सांगायचे तर, विष्णूमूर्तीच्या हाती असलेली गदा ‘कौमोदकी’ या नावाने ओळखली जाते व दुसऱ्या हातात सुदर्शन चक्र असून विष्णूचा शंख हा ‘पांचजन्य’ शंख असतो. या मूर्तीच्या हाती असलेली गदा कुषाणकालीन गदेसारखी - मुदगलासारखी दिसत नाही, तर ती विकसित झालेल्या गदेसारखी आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे मूर्तीच्या विकासक्रमातील एक महत्त्वपूर्ण अशी ही विष्णूमूर्ती ५-६व्या शतकातील विशेषतः ५५०च्या सुमारातील आहे. या संदर्भात डॉ. अ. प्र. जामखेडकर यांच्या मते ही कल्चुरी-कला शैलीचे प्रतिनिधित्व करणारी मूर्ती आहे.
तुम्हाला मूळ मूर्ती जर पहायची असेल तर तुम्हाला सकाळी लवकर या मंदिरात जा कारण जेव्हा मंदिरातील पुजारी जेव्हा मूर्ती वरील सोवळे काढतात तेव्हा मूळ मूर्ती पाहायला मिळते. सहा फुटी या पूर्णाकृती मूर्तीचा एक हात विठ्ठलासारखा कंबरेवर आहे.
दरम्यान कल्याणमधील पारनाका येथे राहणाऱ्या चिंतामणी फडके यांच्या घरात पिढीजात पूजेच्या साधनांमध्ये असलेला शंख प्राचीन असल्याचे आढळून आले. तो शंख पाहून परिसरात प्राचीन विष्णू मूर्ती असावी, असा अंदाज याच परिसरात राहणारे ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी वर्तविला. त्या दृष्टीने त्यांनी शोधही सुरू केला. त्यातूनच नवा विष्णू म्हणून पूजल्या जाणाऱ्या द्वारकाधीशाच्या मूर्तीचे निरीक्षण करण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण शंख
कल्याण येथील साईधाम मंदिरात गेल्या चार पिढ्या असलेला हा शंख प्रथम पांडुरंग बलकवडे यांच्या लक्षात मार्च २०१३ मध्ये आला व त्यावर श्रीकांत प्रधान यांनी काम केले. हा शंख १७ सेमी लांब व १० सेमी उंचीचा आहे. या शंखावरील शिल्पकामाचा व्यवस्थित परिचय व्हावा यासाठी आरेखन व छायाचित्रण केले आहेत. त्यावर असलेला अनुक्रम (Alphabet) पुढे दर्शवला आहे. शंखावर कोरीव कामाचे प्रमुख चार पट आहेत. प्रारंभी (F), मगरमुखाच्या तोंडातून सुरू होणारा नक्षीचा पट आहे (E). मगरमुखातून विद्याधर बाहेर पडताना दाखविला आहे. त्यापुढे सुखासनात असलेले एक युगल आहे. यातील स्त्री एक हात जमिनीवर टेकून ती आपल्या स्वामीकडून काही ऐकत आहे. दुसरे एक जोडपे आहे व ह्या दोन जोडप्यांच्या मध्ये एक सेवक प्रथम प्रमुख प्रतिष्ठितांकडे लक्ष देत आहे (हा शिल्पपट २४ X ३ सेमी आकारात आहे). त्यानंतर (B) भौमितिक नक्षी असलेले दोन नक्षीपट आहे. (A) व त्याखाली अकरा हत्तींची रांग आहे. नंतर (C) एक युद्धप्रसंग दाखवला असून धावणारी व्यक्ती, त्यामागे धावणारे दोन वाघ, मध्ये हाती तलवार असलेला योद्धा व वाघांच्या विरुद्ध दिशेने धावणारा घोडेस्वार, त्यानंतर दोन हत्ती दाखवले आहेत. येथे एक मशाल व त्वेषाने भाला फेकणारा योद्धा दिसतो व त्यानंतर पुन्हा एक घोडेस्वार आहे (ह्या शिल्पपटाचा आकार ३३ X ३ सेमी आहे). या युद्धप्रसंगात असलेले चित्रण हे अजिंठा व कान्हेरी लेण्यातील शिल्पशैलीला जवळचे असून ५व्या शतकातील असावे. युद्ध प्रसंगातील मधले दृश्य फारसे स्पष्ट होत नसले तरी हत्तीच्या लगत भाला फेकणाऱ्या योद्ध्यासारखे दिसणारे शिल्प आहे. ते कदाचित शिकारीचे दृश्य असू शकते. या शिल्पामधून एक कथानक उलगडत जाते. यानंतर एक वर्तुळाकार नक्षीपट असून (D) त्याखाली पूर्ण विकसित कमळ व विद्याधर आहे. त्यानंतर तीन लहान वर्तुळात शंखाची शेवटची नक्षी पूर्ण होते. डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या मते शंखावरील शिल्पपट; विशेषतः मगर, विद्याधर, भौमितिक नक्षी यावरून या शंखाचा काळ ५व्या शतकाच्या अंतिम टप्प्यातील इ.स. ४७५चा असावा. अजिंठा लेणी क्र. एकमधील चित्र-शिल्पशैलीशी याचे साम्य आहे.
त्रिविक्रम मंदिर, पारनाका, कल्याण
संपूर्ण महाराष्ट्रात भगवान श्री त्रिविक्रमाची मंदिरे अगदी मोजकीच आहेत. कल्याण पारनाक्यावरचे त्रिविक्रम मंदिर हे सुद्धा अशाच दुर्मिळ स्थानांपैकी एक.
पेशव्यांचे कारभारी श्रीमंत बळवंतराव मेहेंदळे १८ व्या शतकाच्या मध्यात गुजरात मोहिमेवरून परतत होते. त्यांनी येताना ही रेखीवमूर्ती सोबत आणली. ही मूर्ती १४-१५ व्या शतकातील असावी. ही गंडकी पाषाणाची मूर्ती असून तिच्याभोवती प्रभावळ आहे. या प्रभावळीवर दोन्ही बाजूंना दशावतार कोरले असून जय-विजय, राई-रखुमाई आहेत. ही मूर्ती चतुर्भुज असून पद्म, चक्र, शंख धारण केलेली आहे. येताना रात्र झाली म्हणून कल्याणमध्ये थांबले असताना आताच्या जागेसमोर फडणवीसांच्या आवारात मूर्ती ठेवली होती. या मूर्तीबाबतआख्यायिका सांगतात की तिने दृष्टांत देऊन असे सांगितले की मी जेथे थांबेल तेथेच माझे मंदिर उभारावे. त्याप्रमाणे मूर्ती दुसऱ्या दिवशी उठेचना. तेव्हा सर्वांनी मग तिला समोरच्या (आताच्या) जागेवर स्थापना करून मंदिर बांधले.
बाजीराव पेशवे यांच्या विवाहात त्यांना मधुपर्काच्या समारंभामध्ये जोशी कुटुंबीयांकडून संगमरवरी एकसंध अष्टकोनी चौरंग भेट देण्यात आला होता. हा चौरंग त्रिविक्रम मंदिरात काचेच्या कपाटात ठेवण्यात आला आहे,
कल्याण-पारनाका - बाजीराव आणि काशीबाई विवाहसोहळा
श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ. एक उत्कृष्ट शासक, कि ज्यांनी भूगोलाचे भान व कुशाग्र बुद्धीच्या बळावर भारताच्या इतिहासाची दिशा बदलवली, त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचे पान कल्याणमध्ये लिहिले गेले. एक अजेय योद्धा, ज्यांचे नाव अलेक्झांडर दि ग्रेट, ज्युलिअस सीझर सारख्या महान सेनानींच्या पंक्तीत घेतले जाते, त्यांच्या गृहस्थाश्रमाच्या प्रवेशसोहळ्याचे सौभाग्य कल्याणभूमीला लाभले. एक युद्धनीती आणि शस्त्रविद्या निपुण लढवय्या कि ज्यांच्या पराक्रमाच्या सीमा कोणतेही राज्य, कोणतेही सैन्य ठरवू शकले नाही, असे हे महान शासक कल्याणमधील पारनाका येथे जोशीवाड्यात विवाहबंधनात अडकले. साताऱ्याचे शाहू महाराज यांच्या दरबारातील पेशवा म्हणजे पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ यांचे ज्येष्ठ पुत्र बाजीराव. लहान वयातच ते एक उत्तम लष्करी नेता व मुत्सद्दी म्हणून तयार झाले. विसाव्या वर्षांतच त्यांच्याकडे ‘पेशवे’पद सोपविण्यात आले. बाजीरावांनी अल्पावधीतच चोख कामगिरी बजावत स्वराज्याचा विस्तार आणि विकास केला. निष्ठावंत सैनिकांतून मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गोविंदपंत बुंदेला ह्यांसारख्या शूर धाडसी सरदारांची फौज निर्माण केली बाजीरावांचा जन्म इ. स. १७०० सालचा. बाळाजी विश्वनाथ यांची कृष्णाजी नाईक जोशींबरोबर ओळख पालीमधील मुक्कामादरम्यान झाली. कृष्णाजी व त्यांचा मुलगा महादजीं हे पिढीजात सावकार तसेच छत्रपतींच्या दरबारात पोतदार पदावर काम करत होते. महादजी पंतांकडे खानदेश, जुन्नर कल्याणपर्यंतचा सर्व भाग होता. राधाबाई म्हणजे बाळाजी विश्वनाथांच्या पत्नी यांनी महादजी नाईक यांची मुलगी काशीबाई बाजीरावांसाठी सुयोग्य स्थळ आहे हे ओळखले. व याचेच पुढे रूपांतर १७१३-१४ मध्ये कल्याणच्या जोशीवाडा येथे विवाहात झाले. त्याकाळी ४ दिवस लग्नकार्य चाले. असा हा ऐतिहासिक जोशीवाडा आता-आतापर्यंत म्हणजे १९९५-९६ पर्यंत होता. आज या बुद्धिमान नेत्याच्या विवाहसोहळ्याच्या स्थळी 'अभिनव विद्यामंदिर' उभे आहे. आणि या कर्तृत्वाचा वारसा घेऊन अनेक बुद्धिमान मुले विद्यानिपुण होऊन भारताचा पताका जगभर मानाने फडकावत आहेत.
बाजीराव पेशवे यांच्या विवाहात त्यांना मधुपर्काच्या समारंभामध्ये जोशी कुटुंबीयांकडून संगमरवरी एकसंध अष्टकोनी चौरंग भेट देण्यात आला. कालांतराने जोशी कुटुंबीयांनी हा चौरंग पारनाका परिसरातील श्री त्रिविक्रम देवस्थानाला दिला. त्रिविक्रम मंदिरात काचेच्या बंद कपाटात हा चौरंग ठेवण्यात आला आहे.
अक्षत मंदिर - कल्याण
कल्याणमधील अक्षत गणपती मंदिर हे जुना कापड बाजार येथे आहे. हा सर्व रस्ता परिसर बाजारपेठ म्हणूनच ओळखला जातो. हे मंदिर गलबतावर काम करणारे सरदार लेले यांनी बांधले. हे मंदिर पेशवेकालीन असून जवळजवळ ३०० वर्षे जुने आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचा विवाह कल्याणमध्ये झाला. पार नाक्यावर छत्रपती शिक्षण मंडळाचे अभिनव विद्यामंदिर आहे, त्या पूर्वी तिथे जो वाडा होता त्या वाडय़ात हा लग्नसोहळा झाला. प्रथेप्रमाणे लग्नकार्याची पहिली अक्षता गणपतीस द्यायची होती. पण या परिसरात जवळपास कोठेही गणपतीचे मंदिर नव्हते. लग्नाची अक्षत कोठे ठेवावी हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी या गणपतीची स्थापना झाली व बाजीराव पेशवे यांच्या लग्नाची अक्षत गणपतीपुढे ठेवण्यात आली. तेव्हापासून या गणपतीला अक्षत गणपती असे नाव पडले. तेव्हापासून या गणपतीला मंगल कार्याची अक्षत ठेवली जाते.
कल्याणचे पेशवेकालीन महालक्ष्मी मंदिर
गेली
अनेक वर्षे नवरात्रोत्सवादरम्यान कल्याणच्या टिळक चौैकमधील महालक्ष्मी
देवीचे मंदिर कल्याणकरांसाठी आकर्षण बिंदू ठरला आहे. नवसाला पावणारी देवी
म्हणून कल्याणच्या महालक्ष्मी देवीला ओळखले जाते
महालक्ष्मी देवीचे हे
मंदिर पेशवकालीन आहे, असे जाणकार सांगतात. कर्जत, कसारा ते थेट मुंबईपासून
भाविक या देवीच्या दर्शनाला येत असतात. ठाण्याच्या कलेक्टरेट गॅझेटमध्ये हे
मंदिर १८०१मध्ये उभारल्याची नोंद आहे. काहींच्या मते मुघल साम्राज्याच्या
दरम्यान मंदिराला नुकसान पोहोचू नये, यासाठी मंदिर कौलारू बांधण्यात आले.
मोहन
पिंपळखरे आणि माधव पिंपळखरे यांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधले असून
सध्या या मंदिराची देखरेख ट्रस्ट करत आहे. नवरात्रात भारुड, किर्तन असे
विविध कार्यक्रम केले जातात. तसेच अष्टमीला घागर फुंकण्याचा कार्यक्रम केला
जातो. नवारात्रात रंगानुसार मंदिरात फुलांची सजावट केली जात असते. तसेच,
दिवसातून तीनदा आरती केली जाते.
अतिशय साध्या आणि शांततेने
नवरात्रोत्सव साजरा करण्याचा या मंदिराचा प्रयत्न असतो. देवीला वाहण्यात
येणारे तांदूळ आणि साडी वनवासी कल्याण आश्रमात दिले जाते. तसेच, वर्षभरात
मंदिरात जमा होणाऱ्या निधीतील ठराविक रक्कम जव्हार, मोखाडा आदिवासी भागातील
जनतेसाठी दिली जाते.
काळा तलाव - कल्याणच्या इतिहासाचा साक्षीदार
कल्याणच्या इतिहासाने अनेक राजवटी पाहिल्या. अनेक राजकीय चढ उतार पहिले. पण प्रत्येक वेळी अंधाऱ कालखंडातून बाहेर पडून नावलौकिक वाढविले व 'कल्याण' हे नाम सार्थक केले. कल्याणच्या या इतिहासाचा साक्षीदार आणि सहप्रवासी म्हणून शेनाले वा काळा तलाव याचे नाव घेऊ शकतो. कल्याणचा शेनाले / काळा तलाव हा जुन्या काळापासून कल्याण परिसरातील प्राशनयोग्य पाणीदाता होता. आणि म्हणूनच शेनाले तलावाला प्रवित्र मानले जात असे. ब्रिटिश गॅझेटरच्या नोंदीप्रमाणे कल्याणमध्ये ८ तलाव होते, त्यापैकी ३ तलावांना १२ महिने पाणी असे. या तीन तलावांपैकी फक्त शेनाले तलाव हा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत म्हणून वापरण्यात येत असे. 'शेनाले' हे नाव 'शेन' या पक्ष्यांवरून पडले. हे पक्षी तलावात बागडताना त्यांचे सोनेरी पंख चमकत असत. साधारण २४ एकरवर पसरलेल्या काळा तलावाभोवती इ. स. १५०६ साली आदीलशहाने चारही अंगांनी दगडी बांधकाम केले. जे आज अस्तिस्त्वात नाही. पुढे १७६०-७० च्या सुमारास कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी शेनाले तलावाचा जीर्णोद्धार केला. व खापरी नळ्याद्वारे गावातील चार गंजाशी जोडणी करून पाणीपुरवठा प्रणाली स्थापन केली.
काळाप्रमाणे शेनाले/काळा तलावाचे सांस्कृतिक महत्व अधिकच वाढले असून गणेशोत्सवापासून अनेक सणांमध्ये, विधींमध्ये काळा तलाव हा कल्याणकरांचा अविभाज्य घटक बनला आहे. पण काही अंशी दुर्लक्षामुळे पाण्यातील प्रदूषणाची पातळी वाढली आहे तसेच पेशवेकालीन पाणी पुरवठा यंत्रणा निकामी झाली आहे. परंतु अलीकडेच पार पाडलेल्या सुशोभिकरण कार्यक्रमातंर्गत काळा तलाव हा लखाखून उभारला असून अजून अनेक शतके कल्याणची शान वाढवत राहील आणि कल्याणच्या इतिहासाची साक्ष मिरवत राहील.
दुर्गाडीचा किल्ला :-
कल्याण शहर उल्हास नदी, खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंद खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणार्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच प्रतिष्ठाण (पैठण) या राजधानीकडे रवाना होत असे.बोर घाटाजवळ उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटाकडून वाहत येणारी काळ नदी येवून मिळते. त्यामुळे खाडीला पाणी भरपूर असते. ठाणे-उल्हास खाडी हा प्राचीन जलमार्ग म्हणजे समृद्ध व्यापारी मार्ग. याच मार्गावर अंतरा-अंतरावर खाडीकिनारी ठाणे, कल्याण, भिवंडी, चेंदणी, महागिरी, कोलशेत, नागला, गायमुख, घोडबंदर इत्यादी बंदरे व्यापारी बंदर म्हणून उदयास आली होती. अरब व्यापाऱ्यासमवेत या मार्गाद्वारे होणाऱ्या व्यापारामुळे हि बंदरे व तसेच तेथील राज्यकर्ते आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले होते.
यादवांच्या पाडावानंतर हा मुलुख मुसलमानांच्या ताब्यात गेला. बहामनी राज्याच्या स्थापनेनंतर कल्याण शहर प्रथम बहामनी राज्यात होते. पहिल्या अहमदशहाने उत्तर कोकणावर स्वारी करुन इतर मुलुखाबरोबर कल्याणही जिंकले व पुढे आपल्या स्वतंत्र शाहीची (निजामशाहीची) घोषणा केली. याप्रमाणे कल्याण निजामशाहीत आले.पुढे विजापूरचा आदिलशहा व दिल्लीचे मोगल यांनी संयुक्त चढाई करुन निजामशाही संपवली व परिणामत: कल्याण आदिलशाही साम्राज्याचा भाग बनला.
इ.स. १४९८ साली वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला आणि येथूनच पोर्तुगीजांच्या आरमारी वर्चस्वाची आणि अरबांच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या दर्यावर्दी पोर्तुगीजांनि खाडीकिनारी वखारी स्थापन केल्या. संपूर्ण अरब व्यापाऱ्यांना संपविण्याचे पोर्तुगीजांचे धोरण होते, त्या दृष्टीने वखारीच्या आडोशाने खाडीकिनारी जागोजागी लहानसहान चौकीवजा कोटकिल्ले बांधण्यात आले. ठाणे, हिराकोट, पारसिक, पिंपळास कोट, कांबे किल्ला, खारबावची गढी, नागला कोट, गायमुख गढी, मालजगढी, घोडबंदर किल्ला, धारावी किल्ला आणि वसई किल्ला असे किल्ले यातूनच उभे राहिले.
सन १५३३-३४ मध्ये हुमायून बादशहाने गुजरातवर चाल केली तेव्हा घाबरून गुजरातच्या शहाने पोर्तुगीजांची मदत घेतली आणि त्या बदल्यात मुंबईच्या सात बेटांसह ठाणे, वसई प्रांत-पोर्तुगीजांना बहाल केला. पुढे पोर्तुगीजांनी त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या जहाजांवर जबर कर बसविला. त्यामुळेच प्राचीन काळापासून देशोदेशी चालत आलेला अरब व्यापाऱ्यांचा व्यापार-उदीम बंद पडला. कल्याण शहराच्या संरक्षणार्थ चहुबाजूने तटबंदी, एकूण ११ बुरुज आणि अनेक लहान-मोठे दरवाजे बांधले होते.शिवाजी महाराजांचा जन्म पुढे १०० वर्षांनी म्हणजे १६३० साली झाला परंतु महारांजांनी पोर्तुगीज लोकांचा अंतस्थ धूर्त हेतू दूरदर्शीपणे लवकरच हेरला. सन १८५६ साली महाराजांनी चंद्ररावाचा पराभव करून जावळी खोरे ताब्यात घेतले. आणि या खोऱ्यालगत कोकणात महाराजांचा प्रवेश झाला. साहजिकच परकीय आरमारी सत्तांशी संघर्षाची सुरुवात झाली.
सन १६५७ मध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी उत्तर कोकण मोहीम काढली. म्हणजे त्याकाळी आदिलशहाचा अंमळ असलेल्या कल्याण भिवंडी हे प्रदेश स्वराज्यास जोडण्याचे ठरवले. आदिलशहाने आपली उत्तर कोंकणातील संपत्ती गुप्तपणे पुरंदर आणि तेथून विजापूरला नेण्याचे ठरवले होते. परंतु खजिना हलविण्याचा आधीच मोहिमेच्या अंतर्गत दादाजी बापुजी रांझेकर यांनी २४ ऑक्टोबर १६५७ या दिवशी म्हणजे दिवाळी वसुबारसच्या दिवशी कल्याण ताब्यात घेतले. संपूर्ण खजिना, बंदरातील उभी असलेली देशी विदेशी जहाजे महाराजांच्या ताब्यात आली. कल्याण ताब्यात घेतल्या नंतर महाराज स्वतः कल्याणमध्ये दाखल झाले. यावेळी कल्याण शहराला संरक्षणासाठी भक्कम तटबंदी, ११ बुरुज व अनेक दरवाजे होते. ज्याचा गड त्याची जमीन’ आणि ज्याचे प्रबळ आरमार त्याचा समुद्र हा मंत्र महाराजांनी जाणला होता. कल्याणसारखे महत्त्वाचे बंदर ताब्यात आल्याबरोबर जमिनीप्रमाणे समुद्रमार्गेही शत्रु आपल्यावर चाल करुन येऊ शकतो या जाणिवेतुन शिवाजी महाराजांनी आबाजी महादेवांना कल्याणच्या भुईकोटा शेजारी खाडीकिनारी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. कल्याण खाडी किनारी असलेला दुर्गाडी किल्ला तेव्हा एक टेहळणी चौकी होती. दुर्गाडी किल्ल्याचे स्थान आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याची डागडुजी करून किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर उभारून व आई जगदंबेचे नाव किल्ल्याला देऊन उत्तर कोंकणातील प्रवेश द्वारच बनविले. येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खणत असताना अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाले ही दुर्गादेवीची कृपा समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले.
“ज्याचे गडकोट त्याचे स्वराज्य आणि ज्याचे आरमार त्याचा समुद्र. . .” हे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच पक्के ओळखले होते. इंग्रज, सिद्दी, डच, पोर्तुगीज ह्या परकीय शत्रूंपासून स्वराज्याला निर्धोक ठेवायचे असेल तर हिंदवी स्वराज्यासाठी स्वतंत्र आरमाराची बांधणी करणे हि काळाची गरज होती. किल्ल्याचे खाडीकिनारी स्थान, बंदराचे आणि व्यापारमार्गाचे महत्व, नौकाबांधणीचा उद्योग या सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराजांनी कल्याण बंदरातून हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार उभारण्याचे ठरविले. अर्वाचीन इतिहासामध्ये समुद्राचे आणि आरमाराचे महत्व जाणणारे शिवाजी हे पहिले राजे होते. राजांच्या या दूरदृष्टी धोरणामुळे कल्याणच्या व स्वराजाच्या सोनेरी इतिहासामधील हा वारसा आपल्याला प्राप्त झाला.
या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती सुरु केली. या कामाकरीता दुप्पट मोबदला देऊन पोर्तुगीजांचे सहाय्य घेण्यात आले. गलबते बांधण्यासाठी ३४० पोर्तुगिज कारागीर येथे काम करत होते. पोर्तुगीज दुर्गाडीस गोद्रेलस म्हणत. महाराजांच्या या आरमाराची दखल फ्रेंच आरमाराने घेतली व डोंगरातील राजा आता समुद्रात उतरतोय तेव्हा तुमचे बस्तान कुठे ठेवायचे ते तुम्हीच ठरवा अशा आशयाचे पत्र वसईतील पोर्तुगीजांना लिहिले. त्यामुळे येथील कारागीर एका रात्री काम अर्धवट टाकुन पळुन गेले व उर्वरीत काम स्थानिक कारागिरांनी पुर्ण केले. या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना , वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिऱ्याच्या सिद्धीलाही दहशत बसविली.
या गोदीतून तरांडी, तारवे, शिबाडे, गुराबा, पगारा, तीरकाठी, मचवा, पाल, संगमिऱ्या आणि फत्तेमाऱ्या अशा निरनिराळ्या आकाराची लढाऊ जहाजे तयार होऊ लागली. हि आरमारी जहाजे ठाणे खाडीतूनच दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत जात-येत होती. शिवकालात मराठयांचे आरमार लहान नौकांचे व वेगवान होते. हि आरमारी जहाजे अरुंद व नालेचा भाग लांबलचक निमुळता असल्यामुळे पाणी सहजपणे कापीत चपलतेने पुढे जात. आरमार उभारताना कान्होजी आंग्रे, मायनाक भंडारी, दौलत खान असे हिरे उभरून चकाकत बाहेर आले.
महाराजांच्या अल्पावधीत केलेल्या प्रगतीची साक्ष ठाणे-वसईच्या गव्हर्नरांनी आरमार स्थापनेच्या दोनच वर्षांनी लिहिलेले पत्र देते. १६ ऑगस्ट १६५९ रोजी फ्रॅन्सिस्को-द-मेलो-ए-कस्ट्रो आणि अँटोनिया-डी-सोझा कुतिन्हो आपल्या राजाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'आदिलशहाचा सरदार शहाजी याच्या मुलाने वसई, चौलजवळचा प्रदेश जिंकला असून कल्याण, भिवंडी, पनवेल येथे आरमार व सैन्य सजविले आहे. म्हणून आम्ही आमच्या कप्तानांना हुकूम देऊन ठेवला आहे की त्यांच्या गलबतांना अटकाव करा.'
महाराजांच्या वाटचालीचे दुसरी साक्ष म्हणजे सुरुवातीला स्वराज्य आरमार सामर्थ्याला खिजगणितही न धरणारे इंग्रज राज्यकर्ते यांचे पत्र . १ नोव्हेंबर १६७९ रोजी इंग्रज कप्तान मुंबईच्या गव्हर्नरला लिहितो, 'शत्रूची (शिवाजी महाराजांची) गॅलव्हेटस आमच्या समोरून सहज निघून जातात. आमच्या शक्ती त्यांच्यापुढे चालत नाही, कारण या लहानशा होड्या आम्हाला सहज व आश्चर्यकारकपणे चकवतात. आता आम्हाला असे वाटू लागले आहे की,आमच्याकडे तसल्या होड्या असतील तर आम्हालाही मदत होऊ शकेल'
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाडीकिनारी दुर्गाडी किल्ला बांधून स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. महाराजांच्या दूरदृष्टीने साकारलेल्या स्वराज्याच्या आरमाराने शिवोत्तर कालात पश्चिम सागरात प्रबळ सत्ता निर्माण केली. एक काळ पोर्तुगीजांचा परवानगीशिवाय भारतीय उपखंडाच्या सागरात संचार करणे अवघड होते. परंतु कालांतराने समुद्रसंचारासाठी स्वराज्याच्या मराठा आरमाराची परवानगी काढणे आवश्यक ठरू लागले. 'ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र.' हे महाराजांचे स्वप्न सत्यात उतरले होते.
इ.स. १६८२ साली मोगल सरदार हसनअली खान याने कल्याण जिंकले पण संभाजीराजांनी हल्ला करुन कल्याण परत ताब्यात घेतले. नंतर १६८९ मध्ये मोगलांनी परत कल्याण जिंकले. इ.स १७२८ मध्ये पोर्तुगिजांनी दुर्गाडी किल्ल्यावर हल्ला केला पण पेशव्यांचे किल्लेदार शंकरजी केशव,गंगाजी नाईक व त्याच्या साथीदारांनी हा हल्ला यशस्वीपणे परतवुन लावला. सतराव्या
शतकाच्या सुरुवातीस पेशवाईमध्ये शामिल झाला. पेशवाईच्या काळात कल्याणचे
सुभेदार रामजी बिवलकर यांनी किल्ल्यातील दुर्गादेवीच्या मंदिराचा
जीर्णोद्धार केला.
दुर्गाडी किल्ल्यास भेट देण्यासाठी मुंबई शहरापासून केवळ ४० किमी अंतरावर असलेले कल्याण शहर गाठावे. शहराच्या मध्यभागीच दुर्गाडी किल्ला वसलेला आहे. खाडीच्या किनाऱ्यावर एका टेकाडावर दुर्गाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी दुर्गादेवीचे सुंदर मंदिर आहे. नव्याने उभारलेल्या कमानीतून प्रवेश करताच समोर एक छोटीशी गणपतीची मूर्ती दिसते. म्हणून ह्या प्रवेशद्वाराला गणेश दरवाजा असेही म्हणतात. किल्ल्याच्या चारही बाजू उपदिशांना म्हणजेच आग्नेय, नैऋत्य, वायव्य व ईशान्य या दिशांना अभिमुख आहेत. चार कोपऱ्यात चार बुरुज व पूर्व कोपऱ्यातील बुरुजालगत असलेला आणखी एक बुरुज, या दोन बुरुजांमध्ये असलेले महाद्वार व काहीसा आयताकार तलविन्यास असलेला बाह्यकोट असे या किल्ल्याचे स्वरुप आहे. थोडी तटबंदी आणि बुरुजांचे बांधकाम पार करून देवीच्या मंदिराकडे जाता येते. उल्हास नदीकडील भागाकडे देखील किल्ल्याची थोडीशी तटबंदी आणि दोन बुरुजांचे बांधकाम दिसते. आतील भागात चौकोनी तलविन्यासाचे एक पीठ असून त्यावर देवीचे मंदिर आहे. हे देवीचे मंदिर आग्नेयाभिमुख आहे. (आजच्या अत्याधुनिक चुंबकीय सुईने जरी आग्नेय दिशा सूचित केली असली तरी किल्ला व मंदिर बांधले गेले त्यावेळी दिशासाधन सूर्याच्या दिशेवरुन केले जात असे. त्यामुळेच उत्तरायण व दक्षिणायनाच्या काळात सूर्योदयाची दिशा सतत बदलती असल्यामुळे चुंबकीय सुईने दाखवलेली आग्नेय दिशा किल्ला व मंदिर बांधले गेले त्या काळात पूर्व मानली गेली असण्याची दाट शक्यता आहे.) या मंदिराच्यामागे मंदिराच्या पीठाच्या साधारणपणे निम्म्या उंचीचे आणखी एक लंबआयताकार पीठ असून त्यावर इदगाह आहे.
गणेश दरवाजा
गणेश दरवाजा जवळच गणपति मंदिर
किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी जाड असून बांधकाम मजबूत होते असे दिसते. तथापि बुरुजावरील व तटांवरील मूळ कठडे आज शिल्लक नाहीत. त्यामुळे तोफांच्या खाचा व गोळीबार गवाक्षे होती की नव्हती, अथवा असल्यास कोणत्या ठिकाणी होती ते कळण्यास मार्ग नाही. किल्ल्याच्या अंतर्भागातील जमिनीची पातळी तटाइतकीच उंच आहे. किल्ल्याच्या अंतर्भागाच्या जमिनीची पातळी वायव्येकडून आग्नेयेकडे कललेली, म्हणजेच उताराची आहे.
किल्यावरचे बुरुज
किल्याची पुरातन विभागाने केलेली डागडुजी
किल्ल्याचे बुरुज सर्वसाधारणपणे वर्तुळाकृती तलविन्यासाचे आहेत. यातील एका बुरुजाचे काही प्रमाणात नुतनीकरण झाले असून त्यावर रंगरंगोटी व कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराचे कठडे उभारण्यात आले आहेत. एका बाजूचा बुरुज मधूनच ढासळला आहे. बाकीचे दोन बुरुज कठडे नसलेल्या स्थितीत पण बऱ्यापैकी टिकून आहेत.
किल्ल्याच्या आग्नेय तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे. या प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते कळण्यास मार्ग नाही. याच तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे. या प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते कळण्यास मार्ग नाही.
किल्ल्याच्या अंतर्भागात मंदिराचे एक व इदगाहाचे एक अशी दोन पीठे असली तरी या पीठांनी बालेकिल्ला बनला नव्हता; म्हणजेच निराळ्या शब्दात या किल्ल्याला आत बालेकिल्ला नव्हता हे निश्चित. किल्ल्यामध्ये एक इदगाह व एक देवीचे मंदिर एवढ्या दोनच जुन्या वास्तू आहेत. मंदिराचे अलिकडेच नुतनीकरण झाले आहे. हे नुतनीकरण मूळ मंदिरानुसारच करण्यात आले (म्हणजे निदान त्याचा तलविन्यास तरी मूळ मंदिरानुसारच ठेवण्यात आला) असे सांगण्यात येते. या मंदिरात आजही पूजाअर्चा होते. दर नवरात्रीत येथे मोठा उत्सव होतो व देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे. किल्ल्याच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरूजाचे अवशेष आहेत. किल्ल्यावरील बरेचशे अवशेष काळाच्या ओघात लुप्त झालेले आहे. हा परिसर संवेदनशील असल्याने किल्ल्यावर नेहमीच पोलिसांचा पहारा असतो. त्यामुळे किल्ल्यावरील बराचसा भाग पाहता येत नाही. किल्ल्याच्या बाजूलाच खाडीकिनारी गणेश घाट हे रमणीय ठिकाण आहे. गणेशोत्सवाच्या काळात येथे गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते, त्यामुळे या भागाला गणेश घाट हे नाव पडले. महापालिकेने येथे सुंदर बाग फुलविली होती, मात्र दुर्लक्ष केल्याने या बागेची दुरवस्था झाली. परंतु संध्याकाळच्या वेळेत फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे बोटिंगचीही व्यवस्था असून, सायंकाळच्या वेळेत खाडीचा झोंबरा वारा खात तरुणाई येथे जमलेली असते. दुर्गाडी किल्ल्यावरून गणेश घाटाचे आणि कल्याणच्या खाडीचे नयनरम्य दृष्य दिसते. ते पाहताना छायाचित्रण करण्याचा मोह आवरता येत नाही. दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूला अनेक इतिहासकालीन ठिकाणे आहेत. जवळच सुभेदार वाडा आहे, जिथे कल्याणच्या सुभेदाराचे निवासस्थान होते.
दुर्गाडी किल्ला जलदुर्ग असला तरी वसईच्या किल्ल्याप्रमाणे खाडीतून थेट किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मार्ग नाही. निराळ्या शब्दात नौदलाच्या सहाय्याने या किल्ल्याची कुमक करता येईल अशी परिस्थिती नव्हती. हा किल्ला मराठ्यांनी बांधला असल्यामुळे आणि किल्ल्याच्या निर्मितीच्यावेळी लगतचा प्रांत मराठ्यांच्याच ताब्यात असल्यामुळे तशी सोय असण्याची फारशी गरजही नव्हती.
दुर्गाडी शेजारी असलेला दर्गा
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे नौदल स्थापन करायचे होते. आपले नौदल कसे असावे याबाबतचे शिवछत्रपतीचे विचार अगदी स्पष्ट होते. स्वराज्याचे शेजारी म्हणून पोर्तुगीज, इंग्रज यांच्यासारखे दर्यावर्दी लोक होते. त्यांचा दर्यावर्दी अनुभव व तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे याची महाराजांना कल्पना होती. म्हणून आपले आरमार त्यांच्या बरोबरीचे किंवा तोडीचे नसले तरी अधिक वेगवान असावे, शत्रूचे मोठे आरमार चालून आले तर त्यांची जहाजे आत शिरु शकणार नाहीत अशा खाड्यांमध्ये आपल्या जहाजांना लपता आले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्या दृष्टीकोनातून दुर्गाडीचा किल्ला लष्करीदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी होता असेच म्हणावे लागेल.
किल्ल्याची नैऋत्यकडील तटबंदी पडून गेली असून तिचा पायाच फक्त शिल्लक आहे. तटबंदीचे व बुरुजांचे कठडे आणि महाद्वार पडून गेले आहे. तथापि सर्वसाधारणपणे किल्ल्याची कल्पना येईल इतपत अवशेष आजही टिकून आहेत. हा किल्ला तसा छोटेखानी असला तरी स्वराज्याचा पहिला आरमारी तळ म्हणून या किल्ल्याचे महत्व अपरंपार आहे. आजमितीस किल्ल्याची आधुनिक पद्धतीने डागडुजी झाली आहे. किल्ल्यामध्ये असलेल्या दुगादेवीच्या दर्शनासाठी बरेच भाविक येत असतात. त्यामुळे आधुनिक पद्धतीने बांधलेले देवीचे मंदिर, रंगकाम केलेले किल्ल्याचे बुरुज-तटबंदी, किल्ल्याच्या अंतर्गत भागात बांधलेला सिमेंट-फरशी चा पादचारी मार्ग, बसण्यासाठी असलेले लोखण्डी बाक तसेच किल्ल्याच्या बाहेरील बाजूस असलेली हार-फुलांची दुकाने ह्या सर्वांमुळे किल्ल्याला एका देवस्थानाचे स्वरूप आल्यासारखे वाटते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी तर अवश्य यावेच मात्र त्या सोबत दुर्गाडी किल्ल्याचे इतिहास महत्व देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. दुर्गादेवीच्या मंदिरासोबतच आपण अशा एका ऐतिहासिक स्मारकास भेट देतआहोत कि ज्याच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व परकीय सागरी शत्रूंना पुरून उरेल असे बलाढ्य आरमार उभारले होते याची आठवण देखील मनात असायला हवी.
दुर्गा माता ची सुन्दर मूर्ति
दुर्गामाता मंदिर :-
हजारो वर्षांच्या इतिहासाचा अखंड प्रवाह लाभलेले आपले कल्याण अनेक सुवर्णांकित घटना आणि वास्तूंचा वारसा जतन करून आहे.दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामातेचे मंदिर हे या इतिहासातील सोनेरी पान. दुर्गामातेच्या मंदिराचा सर्व कल्याणकरांच्या हृदयात एक विशिष्ठ स्थान आहे. स्त्रीशक्तीच्या उपासनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले भवानी मातेचे मंदिर, दुर्गाडी किल्ल्यावरून भवानी मातेच्या आशीर्वादाने पहिल्या हिंदवी आरमाराची स्थापना या सर्व घटना कल्याणच्या इतिहासाची पूर्व आणि पश्चात विभागणी करतात. पुढे १७३९ मध्ये मराठ्यांनी वसईचा किल्ला सर केला. या युद्धात पराक्रम गाजविलेल्या शंकराजी फडकेंना वसईचा सुभेदार नेमण्यात आले. या इतिहासकाळात वसई, कल्याण आणि साष्टी यांची विशिष्ठ नोंद आहे. १७४४ मध्ये दुर्गादेवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवे मंदिर बांधल्याची नोंद पेशवे दफ्तरात सापडते.
दुर्गा मातेचे मंदिर
तसेच त्याठिकाणी वेदमूर्ती महादेवभट गोडबोले यांची श्री दुर्गाभवानी किल्ले दुर्गाडी, कोट कल्याण येथे पूजाअर्चा करण्यासाठी नेमणूक केली. तेव्हापासून आजपर्यंत तेथे नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा होत आलेला आहे. किल्यावर
जाण्यासाठी कल्याण स्थानकातून बस किंवा रिक्षाने अगदी १० ते १५ मिनटात जाऊ
शकतो .भिवंडी कडे जाणारी रिक्षा पकडावी किल्याकडे जाताना काही जुने
बांधकाम असलेल्या इमारती लागतात . किल्याचा पायथ्याशी भारतीय आरमाराचे जनक
श्री छत्रपती महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारला आहे . मराठा आरमाराचा मुहुर्त करणारा अनेक लढायांचा व रोमहर्षक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला एकदा तरी पहायला हवा.
कल्याणच्या सुभेदाराची सून
शिवचरित्र वाचत असताना किंवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य अभ्यास करताना. बऱ्याचदा आपल्याला कल्याण च्या सुभेदाराच्या सुनेच्या पात्रा विषयी वाचायला मिळतं अनेकदा अनेक भाषणांत ऐकाला देखील मिळतं. त्या पत्राविषयी शिवकालीन इतिहास अभ्यासकांमध्ये दोन गट पडलेले आपल्याला दिसतात.
एक जे हे पात्र(कल्याणचा सुभेदाराची सून) नाकारतात आणि दुसरे जे या पात्राचं पात्राचं म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे धोरण स्वीकारलं त्या बद्दल जे धोरण स्वीकारलं त्या धोरणाचं समर्थन करतात.
सर्वात अगोदर हे प्रकरण नक्की काय आहे इतिहासात नेमकं कुठं सापडलं आणि कधी घडलं याचा अभ्यास करूयात. कल्याणच्या सुभेदारच्या सुनेच्या कथेची माहिती आपल्याला समकालीन नसली तरी ऐतिहासिक बखरींत सापडते. पहिली बखर आहे शककर्ते शिव छत्रपती महाराज आणि दुसरी बखर आहे शिवदिग्विजय.
आबाजी सोनदेव यांजकडे कल्याण प्रांताचा सुभा होता. त्या प्रांतामधील गडकोट यांच्या तटा बुरुजांच्या निगराणी ची जबाबदारी महाराजांनी त्यांजवर सोपविली. ज्या वेळी कल्याण प्रांत महाराजांनी घेतला त्यावेळी ‘मुल्ला अहमद’ नावाचा विजापूरकरांचा सुभेदार त्या प्रांतावर होता.
स्वराज्य वृद्धीसाठी कल्याणच्या सुभ्यावर मराठ्यांनी हल्ला करून अमाप संपत्ती हस्तगत केली. त्याकाळचे आक्रमक यवन स्वराज्याच्या लेकी बाळी बाटवण्यासाठी उचलून नेत असे. म्हणून की काय कोण जाणे कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून आबाजी पंतांनी उचलून आणली. व सुंदर “भेट” शिवरायांना उपहार म्हणुन पाठविली. या “उपहारावर” कडवी प्रतिक्रिया व्यक्त करीत शिवरायांनी आबाजीपंतांना खडे बोल सुनावले.
यापुढे असे कोणत्याही स्त्रीच्या बाबतीत असे वर्तन होता कामा नये असा सज्जड दम भरला. इतकेच नव्हे तर त्या सुभेदाराच्या सुनेची खणानारळाची ओटी भरून पालखीत बसवून मुघल छावणी मधे तिची सुखरूप रवानगी केली. या सुनेच्या विषयी शिवराय म्हणाले की जर आम्ही या सुंदर माऊलीच्या पोटी जन्मलो असतो तर आम्ही ही असेच सुंदर असतो.
ही ढोबळ कथा कमी अधिक फरकाने दोन्ही बखरीमध्ये उपलब्ध आहे. बखर ऐतिहासिक असल्यातरी त्या समकालीन नक्की नव्हत्या. कारण पहिली बखर आहे ‘शककर्ते श्री शिव छत्रपती महाराज’ जी लिहिली मल्हार रामराव चिटणीस यांनी, १८१० साली सातारा छत्रपती दुसरे शाहू उर्फ प्रतापराव ह्यांच्या आज्ञेवरून त्यावेळच्या गादीचे चिटणीस मल्हार रामराव यांनी हि बखर लिहिली. बाळाजी आवजी चित्रे यांच्या नातवाने ही बखर ऐकीव माहिती नुसार आणि वडिलोपार्जित जी कागदपत्रे त्यांच्या संग्रही होती त्या नुसार ही बखर लिहिली.
दुसरा उल्लेख आढळतो ती बखर आहे शिवदिग्विजय. ही बखर कोणी लिहिली याचा उल्लेख कुठे आढळत नाही, परंतु बडोद्याच्या पांडुरंग रामचंद्र नंदुरबारकर व लक्ष्मण काशिनाथ दांडेकर यांनी १८९५ साली हा दस्त प्रकाशित केला. हि बखर प्रकाशित झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्वाण झाल्यावर लगेचच लिहिली असं प्रकाशकांच मत होतं. समकालीन एकही पुरावा नसल्याने ही एक दंतकथा आहे असं म्हणायला वाव आहे.
परंतु शिवकालीन इतिहासाचा अभ्यासपूर्ण लेखन करणारे वा सि बेंद्रे यांनी अश्याच आशयाची कथा सांगितली आहे. वाई जवळच्या गोळेवाडीच्या सुभेदाराची सून भेट म्हणून महाराजांच्या समोर पेश केली त्यावर महाराजांनी ब्राम्हण सरदाराला शिवाजी महाराजांनी तिखट प्रतिक्रिया देऊन काशीस जाण्यास सुनावले. ही कथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिकित्सक चरित्र खंड एक पान क्रमांक ११४ वर उपलब्ध आहे, तसेच ९१ कलमी बखरीत वाचायला मिळते.
जर ही घटना घडली आहे अशी मानले तर कल्याणच्या छाप्या दरम्यान कल्याणच्या सुभेदाराची सून कदाचित घाबरून पेटाऱ्यात लपली असू शकते. तो पेटारा तसाच मराठयांनी आणला आणि हा प्रसंग घडला असू शकतो असा तर्क आपण लावू शकतो. पण आबाजी सोनदेव हे प्रतिष्ठित आणि विश्वासू सेवक असल्याने ते असं जाणीवपूर्वक करतील असं वाटतच नाही.
‘परस्त्री ही मातेसमान’ मानणाऱ्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उदात्त विचार किती गंगे समान निर्मळ आहे याचा एक ऐतिहासिक पुरावा म्हणून ‘कल्याणच्या सुभेदाराची सून’ ह्या प्रकरणाकडे आपण नक्की बघू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘परस्त्री विषयी असलेले आदरयुक्त धोरण’ एवढाच शुद्ध हेतू ला लेख लिहिण्या मागे आहे.
नवसाला पावणारी ‘तिसाई देवी’ म्हणजेच ‘जरीमरी माता’
आदिशक्ती आदिमायेचं एक रूप म्हणजे कल्याण येथील तिसाई देवी. याच देवीला जरीमरी माता म्हणून संबोधले जाते. अनेक भक्तांचे गाऱ्हाणे आपल्या पदरी घेऊन भक्तांच्या पाठीशी उभी राहून काट्याकुट्यातून चालणाऱ्या भक्तांच्या मार्गात गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालणारी आणि योग्य मार्ग दाखवणारी ही तिसाई देवी. मुंबईपासून ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्हयात तिसगाव नावाचे लहानसे खेडे आहे. त्या गावात तिसाई जरीमरी आईचे मंदिर असून त्यास सुमारे २०० वर्षांचा इतिहास आहे. कल्याणमधील तिसगाव येथील प्राचीन मंदिरातील जरी आणि मरी या स्वयंभू देवी आगरी–कोळी बांधवांच्या आराध्यदेवता आहेत. जरी आणि मरी या मूळच्या उग्र प्रवृत्तीच्या देवता आहेत. गावावरील रोगराईचे अरिष्ट दूर करणाऱ्या देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. येथील जरीमरी मंदिराला तिसाई मंदिर असेही म्हटले जाते. भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या देवी अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे चैत्र पोर्णिमेला भरणाऱ्या जत्रेदरम्यान ठाणे जिल्ह्याबरोबरच रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, धुळे आदी भागांतून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून जातो. मराठी विश्वकोशातील नोंदीनुसार, मरीआई आणि जरीआई या देवी रोगांशी निगडित आहेत. पूर्वी प्राणघातक असलेल्या साथीच्या रोगांच्या देवी कल्पून त्यांची पूजा केली जात असे. यातील मरी ही पटकी व देवी यांसारख्या रोगांच्या साथीची देवी आहे, तर जरी ही तापाच्या साथीची देवी आहे. या जरीमरीचे स्थान गावामध्ये एका कोपऱ्यात किंवा गावाबाहेरील झाडाखाली असते. तिच्या पुजाऱ्यास पोतराज वा पोतुराजा असे संबोधतात. ते मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन गावोगाव फिरताना दिसतात. लोकसमजुतीनुसार, पोतराज या मरीआईच्या भगताच्या मार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते. या पोतराजास काही ठिकाणी कडकलक्ष्मी असेही म्हणतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की जरी–मरीआईच्या कोपामुळे या रोगांच्या साथी येतात. त्यांना संतुष्ट केल्यास रोगराईचे संकट टळते. या देवीच्या मुर्तीचा शोध कसा लागला याची एक हकीकत सांगितली जाते. तिसगावातील गणा गायकवाड नावाचा एक सज्जन ग्रामस्थ आपल्या सवंगडयांसह नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गावाजवळील टेकडीवर गेला होता. यावेळी अचानक वादळ सुटले. सर्व गुरे व गुराखी एकत्र जमा झाले. सोसाटयाच्या वा-याबरोबर गणाच्या कानावर ध्वनीचा निनाद झाला. "गणा मी देवी आदिमाया शक्ती तुझ्याशी बोलत आहे, मी गावाजवळील तळयाच्या मध्यभागी पाषाण स्वरुपात आहे. मला वर काढ व माझी स्थापना कर. साधाभोळा गणा, त्यास काही समजेना, त्याने आपल्या सवंगडयांना ही गोष्ट सांगितली. सर्वांनी मिळून गावात जाऊन ही घटना गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सांगितली. या विषयावर गावक-यांची बैठक होऊन गणा म्हणतोय तर शोध घेण्यास काहीच हरकत नाही, असे ठरले. मोठया उत्साहाने दुस-या दिवशी सर्व ग्रामस्थ गावाजवळील तळयात देवीचा शोध घेण्यासाठी उतरले. वादळांत ऐकलेले शब्द पुन्हा पुन्हा गणाच्या कानावर आदळत होते. झोपेत चालणा-या माणसांप्रमाणे गणा चालत होता. व तळयाच्या मध्यभागी जाऊन त्याने तलावात बुडी मारली, गणा पाण्यातून वर आला तो पाषाण स्वरुपातील देवीची मूर्ती घेऊनच. मूर्ती पाहून सर्वच गावक-यांना आश्चर्य वाटले. व आनंद झाला. त्यांच्या तोंडातून उस्फूर्तपणे देवीच्या नावाचा जयजयकार झाला. आजूबाजूस सर्व खारे पाणी असताना ज्या ठिकाणी देवीची मूर्ती सापडली. त्या ठिकाणचे पाणी मात्र गोड आहे. व ही परिस्थिती आजही तशीच आहे. सर्व गावकऱ्यांनी विचार करुन एका शुभदिनी देवीची स्थापना केली. व एक लहानसे कौलारु मंदिर उभारले. त्या दिवसांपासून गणा गायकवाड गणा भगत म्हणून प्रसिध्दीस आला. देवीचा महिमा सर्वदूर पसरला हळूहळू जरीमरी देवस्थानाचा महिमा सर्वदूर पसरु लागला. मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, पुणे एवढेच काय इतर राज्यातूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी तिसगावात येऊ लागले. भक्तिभावाने आपली गा-हाणी देवीला सांगू लागले. देवीही नवसाला पावू लागली. तिसाची आई जरीमरी माता नवसाला पावणारी व संकटकाळी धावून येणारी भक्तांचे श्रध्दास्थान बनली. निसर्ग नियमाप्रमाणे गणा भगत यांचा मृत्यू झाला. व गावक-यांपुढे देवीचा नवीन पुजारी कोणाला ठेवावा, हे ठरविणे अवघड होऊन गेले. एकाएकी चमत्कार झाला. राघो गायकवाड नावाचा तिसगाव पाडयावर राहणारा तिसगावचा रहिवाशी ग्रामस्थांकडे आला. त्याने सांगितले की "माझ्या शरीरामध्ये देवीचा संचार झाला असून मला देवीने भगत म्हणून राहण्याची आज्ञा केली आहे". यावर ग्रामस्थांनी अविश्वास व्यक्त करुन त्याची परीक्षा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी पंच मंडळींची नियुक्ती करण्यात आली. पंचांनी एक योजना तयार केली. गावांतील सर्व मंडळी रात्री ७ वाजता तिसगाव येथील बाळाराम अर्जुन गायकवाड यांच्या घरासमोरील तुळशी वृंदावनाजवळ एकत्र जमली. त्या ठिकाणी राघो गायकवाड याला बोलविण्यात आले. पंच मंडळींनी अगोदरच पाच रंगाची फुले त्याठिकाणी आणून ठेवली होती. ती फुले सर्वासमोर पंच मंडळींनी बाजूला नेली. व आपआपसांमध्ये ठरवून त्यातील एक फूल कोणासही न सांगता निश्चित केले. ही पाचही फुले राघो गायकवाड याचे समोर ठेवून त्यास सांगितले की, "आम्ही या पाच फुलांपैकी एक फूल तू भगत असल्याची निशाणी म्हणून ठेवले आहे. जर तू ते फूल अचूक उचललेस. तर आम्ही तुझा भगत म्हणून स्वीकार करु'. त्यानंतर राघो गायकवाड याने डोळे मिटून देवीचे स्मरण केले. अंगात एखादया अद्भुत शक्तीचा संचार झाल्याप्रमाणे तो थरथरु लागला. व जरीमरी मातेचा जयजयकार करीत त्याने एक फूल उचलून पंच मंडळींच्या हातात दिले. पंच मंडळींनी निश्चित केलेले तेच फूल होते. राघो भगतबरोबरच रामा भगत नंतर पांडू भगत व धर्मा भगत बेंमट्या भगत हे देवीचे भगत झाले. आता वसंत भगत ही सेवा करत आहेत. या मंदिराच्या साक्षीने कल्याण आणि वसईच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडल्याची नोंद आहे. ‘सुभे कल्याण’ (विवेकानंद गोडबोले, इतिहास संशोधन मंडळ कल्याण, १९७४) या पुस्तकानुसार, पेशवाईतील सरदार गंगाजी नाईक अणजूरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे पेशव्यांनी पोर्तुगिजांविरोधातील वसईची मोहीम आखली. श्रीमंत चिमाजी अप्पा हे या मोहिमेवर निघाले. त्याची नांदी या मंदिराच्या पटांगणात झाली. त्यावेळी सरदार अणजूरकर यांनी कल्याणला येऊन भवानीचा गोंधळ घालण्याच्या निमित्ताने नामाजी देशमुख, भिकाजी हैबतराव आदी मंडळींना येथे पाचारण केले व त्यांना मोहिमेची कामे नेमून दिली.
कल्याणमधील तिसगाव नाक्यावर असलेल्या मंदिराच्या कमानीपासून चालत काही अंतरावर आल्यानंतर डाव्या हाताला हे मंदिर लागते. मंदिराच्या शिखरांवर आकर्षक नक्षीकाम आहे.
देवींच्या मूर्ती सापडलेला तलाव मंदिराच्या समोरच आहे. या तलावाचे २००६ मध्ये नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आले. या तलावाच्या मध्यभागी कमळावर बसलेल्या देवींच्या मूर्ती आहेत. या कमळाभोवती सोंड उंचावलेल्या तलावासमोरील पिंपळाजवळ सात आसरा देवींचे तांदळे आहेत. आसरा हा अप्सरा या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्या जलदेवता असतात. त्या नेहमी सातच्या संख्येने एकत्र असतात म्हणून त्यांना सात वा साती आसरा असे म्हणतात. मत्स्यी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा व मकरी अशी त्यांची नावे होत. ‘द फोकलोअर ऑफ बॉम्बे’ आर. ई. एन्थोव्हेन यांच्या १९२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनपर ग्रंथात अशी माहिती देण्यात आली आहे की आसरांना काही भागात मावलाया असेही म्हणतात. ठाणे जिल्ह्यातील लोकसमजुतीनुसार सर्व जलसाठ्यांनजीक सात आसरांचे वास्तव्य असते. काहींच्या मते, ज्या तलावात कमळे असतात तेथेच त्या राहतात. या आसरा मुले आणि आणि तरूणींना त्रास देतात. साती आसरांच्या तांदळ्यांच्या जवळच छोटी गणेशमूर्ती आहे. येथे पुष्पहार व प्रसादाची दुकाने आहेत. समोरच आकर्षक बांधकाम असलेले संगमरवरी जरीमरी अर्थात तिसाई मंदिर आहे. मंदिरासमोर मोकळे प्रांगण आहे. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात मंदिराच्या समोर खांमदेवाचे (खांबदेवाचे) स्थान आहे. येथे या देवाचा खांब आहे व त्याला सोन्याचा गिलावा असलेला पत्रा चढवण्यात आला आहे. यात्रेदरम्यान येथे कोंबड्या–बकऱ्यांच्या बळीच्या रूपात देवींचा मान दिला जातो. दर्शनमंडप, सभामंडप, गर्भगृह व प्रदक्षिणा मार्ग असे तिसाई मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपात भाविकांना बसण्यासाठी लोखंडी बाकडे आहेत. सभामंडपाच्या भिंतींच्या दोन्ही बाजूंना देवळ्या आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात मध्यभागी कीर्तीमुख कोरलेले आहे. सभामंडपात जाळ्या असलेल्या खिडक्यांमुळे येथे पुरेसा प्रकाश व खेळती हवा असते. सभामंडपाच्या मध्यभागी गर्भगृह आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या खाली मध्यभागी कीर्तिमुख आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशमूर्ती आहे. त्यावरच्या भागात कलश आहे. प्रवेशद्वाराच्या खांबांच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल आहेत. गर्भगृहात मूळच्या चांदीच्या नक्षीदार मखरास सोनेरी रंगाचा मुलामा चढवण्यात आला आहे. त्यावर वेलबुट्ट्यांची नक्षी व मध्यभागी कीर्तीमुख आहे. मखरातील नक्षीदार प्रभावळीवर कळस कोरण्यात आलेला आहे. मखराच्या वरच्या कोपऱ्यांवर सूर्य–चंद्र आहेत. मखरात मध्यभागी जरी–मरी यांच्या शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहेत. मूळच्या पाषाणी मूर्तींवर मुखवटा चढवण्यात आला आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गर्भगृहाला लागून असलेल्या उजवीकडील भिंतीत कोरलेल्या हत्तीच्या सोंडेतून मूर्तींवरील अभिषेकजल सोडण्यात येते. गर्भगृहालगतच डाव्या बाजूला राम मंदिर आहे. मंदिरात श्रीराम–सीता–लक्ष्मणाच्या मूर्ती आहेत.
त्यासमोर नमस्कारमुद्रेत बसलेल्या हनुमानाची मूर्ती आहे. या मूर्तींच्या डावीकडे एका चौथऱ्यावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. तिसाई मंदिरात जानेवारी महिन्यात चंडियाग तेजोत्पत्ती तसेच पुनःप्रतिष्ठापन यांचा वर्धापन दिन सोहळा होतो. याच महिन्यात उरणनजीकच्या करंजे येथून येथे तिसाई देवीची पालखी येते. येथे माघी गणेशोत्सव, महाशिवरात्री, रामनवमी, गुरुपोर्णिमा, नारळी पोर्णिमा, नवरात्रोत्सव, दीपावली आदी सण–उत्सव साजरे होतात. जून महिन्यात होणाऱ्या गावच्या ‘साथ’ या कार्यक्रमात देवींना गोड नैवद्य दाखवला जातो. यावेळी देवींचा मानपान तसेच प्रसाद वाटपही होते. नवरात्रोत्सवात घटस्थापना, कीर्तन, होम–हवन, घट उत्थापन तसेच विजयादशमी सोहळा होतो. चैत्र पोर्णिमेला परिसरात देवीची दोन दिवसांची मोठी जत्रा भरते. पोर्णिमेला पहाटे देवींना अभिषेक–पूजा केली जाते. त्यानंतर देवींचा शृंगार केला जातो. गर्भगृहात फुलांची आरास केली जाते. देवीची पालखी सायंकाळी गावातून फिरते. या पालखीचा मान भोई समाजाकडे आहे. वाटेत पालखी एका शिळेजवळ विश्रांतीसाठी थांबवण्यात येते. या ठिकाणी आता तुळशीवृंदावन बांधण्यात आले आहे. पालखी मंदिराजवळ आल्यावर मंदिर परिसराला पालखीच्या पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी विसर्जित होते. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा मिरवणूक सोहळा सुरू असतो. यात्रेदरम्यान देवींचे मानपान करण्यात येते. येथे पूर्वी देवींना कोंबड्या–बकऱ्यांचे नैवद्य दिले जात असत. मात्र काही वर्षांपासून देवींना वालाचे बिरडे किंवा उसळ तसेच गोडधोड पदार्थांचा शाकाहारी नैवद्य दाखवण्यात येतो. भाजलेल्या तांदळाच्या पीठाच्या (भुज्याचे पीठ) लाडूंचा नैवद्यही दाखवला जातो. मात्र मंदिराच्या पूर्वेस असलेल्या खांमदेवाच्या स्थानी नवस केलेले कोंबड्या, बकरे, मेंढे यांचे बळी दिले जातात. यात्रेदरम्यान परिसरात पाऊल ठेवायलाही जागा नसते. तिसगाव नाका ते मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा खेळणी, प्रसाद, मिठाई, विविध वस्तूंची विविध दुकाने, आकाशपाळणे वगैरे लागलेले असतात. यात्रेदरम्यान परिसरात कुस्त्यांचे जंगी सामनेही होतात. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणचे मल्ल त्यात भाग घेतात. या यात्रेसाठी लांबून येणाऱ्या भाविकांसाठी कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या परिहवन उपक्रमातर्फे विशेष बसेसही सोडण्यात येतात.
उपयुक्त माहिती
कल्याण रेल्वे स्थानकापासून सुमारे ४ किमी,
तर ठाणे शहरापासून ३३ किमी अंतरावर
कल्याणपासून महापालिका परिवहन बस व खासगी वाहनांची सुविधा
खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
१ मे १८५४:- रेल्वेचा कल्याण स्पर्श
जॉर्ज स्टीफनसन याने २५ जुलै १८१४ साली वाफेच्या इंजिनाचा प्रयोग सिद्ध करून दाखवला. त्यानेच २७ सप्टेंबर १८२५ ला ताशी १२ मैल वेगाने धावणारी पहिली रेल्वेगाडी जगाला धावून दाखवून दिली. पुढे १५ सप्टेंबर १८३० साली जगात पहिल्यांदा सर्वसामान्य जनतेसाठी रेल्वेगाडी धावली ती मँचेस्टर ते लिव्हरपूल मध्ये. १८४० पर्यंत संपूर्ण युरोप मध्ये रेल्वेचे जाळे विणले गेले होते. त्याचा परिणाम वाढते औद्योगिकीकरण, वाढते उत्पादन, वाढणारे ग्राहकत्व या स्वरूपात दिसत होता. त्याच धरतीवर आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबई येथे आणण्याचा विचार मुंबईचा मुख्य अभियंता जॉर्ज क्लार्क याच्या डोक्यात आला. १३ जुलै १८४४ ला मुंबईत सभा होऊन 'बॉम्बे ग्रेट ईस्टर्न रेल्वे' हि कंपनी स्थापन होऊन मुंबई ते बोरघाट ठाणामार्गे रेल्वे जाईल असे घोषित करण्यात आले. हे सर्व होत असताना इंग्लंड मधील श्रीमंत उद्योजक काही स्वस्थ बसणारे नव्हते. त्यांनी 'GIPR /ग्रेट इंडिया पेनिन्सुला रेल्वे' या कंपनीची स्थापना करून आपल्या प्रतिनिधीला भारतात पाठवले व आपले राजकीय वजन वापरून दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे काम करावे अशा सूचना दिल्या. मुंबई ते बोरघाट हा मार्ग सोपा निश्चितच नव्हता. सायन जवळील भागात दलदल होती, मुंब्राजवळ खाडीवर पूल बांधावा लागणार होता, पारसिक डोंगरामध्ये बोगदा काढावा लागणार होता. परंतु सर्व अडचणींवर मत करत हा प्रकल्प आधी ठरवलेल्या खर्चाच्या २०% कमी पैश्यात झाला. जगात पहिली रेल्वे सुरु झाल्यावर केवळ २४ वर्षातच आशिया खंडातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे मार्गावर धावली. भारतातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला मुंबई – ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यांनतर एका वर्षातच १ मे १८५४ रोजी रेल्वेने आपल्या कल्याणनगरीत प्रवेश केला. मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० युरोपिअन आणि स्थानिक नागरिकांसमवेत हा कल्याणचा आगगाडी दौरा पूर्ण केला.. सायंकाळी ४ वाजून ५० मिनीटांनी बोरीबंदर स्थानकावरुन सुटलेली ही गाडी १ तास १० मिनीटांचा प्रवास करुन सायंकाळी ६ वाजता कल्याणला पोहोचली. कल्याण स्टेशनपर्यंत ही गाडी नेण्यात आली नाही तर स्टेशनच्या आधी खाडीकिनार्यालगत गाडी थांबवण्यात आली. येथेच सैनिकी बॅन्डपथकाने बॅन्डची सलामी दिली. मेजवानी देखील येथेच देण्यात आली. कल्याणपर्यंत रेल्वे धावली या आनंदाप्रित्यर्थ फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. तीन तासाच्या मनोरंजनानंतर जेवण झाल्यानंतर रात्री नऊ वाजता परतीच्या प्रवासाला निघालेली गाडी रात्री अकरा वाजता बोरीबंदरला परत पोहोचली. हि भारतीय रेल्वे हा फक्त वाहतूक क्षेत्रातील घटना नसून भारताच्या सर्वांगीण इतिहासावर याची चांगली-वाईट छाप आहे. रेल्वेचा विकास आणि बाजूला मुंबईची पहिली कापडगिरणी किव्वा गिरणगावाचा पाया, तेथील मराठी संस्कृती यांनी मुंबईच्या आणि भारताच्या इतिहासाला एक वळण दिले.कल्याणचे म्हणायचे तर रेल्वे आल्यानंतर दुसऱ्याच वर्षी १ नोव्हेंबर १८५५ रोजी कल्याणमध्ये नगर पालिकेची स्थापना करण्यात आली.
लोकमान्य टिळकांची कल्याण भेट
लोकमान्य टिळकांची कल्याण भेट - २३-ऑगस्ट-१९०६
कल्याण
शहराला जी सामाजिक, सांस्कृतिक आणि संस्थात्मक परंपरा लाभलेली आहे, त्या
परंपरेचाच एक भाग म्हणजे कल्याणमध्ये साजरे होणारे सार्वजनिक गणेशोत्सव.
लोकमान्यांनी पुण्यात १८९३ या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रथम सुरुवात
केली. जाती-जातींमध्ये विखुरला गेलेला हिंदू समाज एकत्र यावा,
गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजप्रबोधन व्हावे, त्याकाळी देश पारतंत्र्यात
असल्याने नागरिकांच्या मनात देश, धर्म, स्वातंत्र्य याबद्दल अभिमान व प्रेम
निर्माण व्हावे, गणेशोत्सवाच्या निमित्याने समाजाने एकत्र येऊन
स्वराज्याच्या लढ्यासाठी त्याचा प्रभावी शस्त्र म्हणून वापर करता यावा, या
उदात्त हेतूंनी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.
यानंतर लगेचच पुढील दोन वर्षांनी म्हणजे १८९५ या वर्षी लोकमान्यांच्याच
प्रेरणेने कल्याणमधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. सुभेदार वाडा
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९५ या वर्षी सुभेदार वाडा या ऐतिहासिक
वास्तूत झाली. गेल्याच वर्षी या गणेशोत्सवाने शतकोत्तर रौप्य महोत्सव
दिमाखदाररित्या साजरा केला. या गणेशोत्सवास १८९५ या वर्षी प्रारंभ
झाल्यापासून उत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कल्याणात येऊन
उत्सव पाहून त्यांस आशीर्वाद द्यावा, अशी सर्वांची फार इच्छा होती. हा योग
१९०६ या वर्षी जुळून आला. त्या वर्षी मात्र लोकमान्यांनी कल्याणकरांचे
आमंत्रण स्वीकारून व उत्सवप्रसंगी हजर राहून कल्याणकरांना धन्य केले. २३-ऑगस्ट-१९०६
रोजी गणेशोत्सवाकरिता लोकमान्य कल्याण येथे आले तेव्हा त्यांचे उचित असे
स्वागत कल्याणकरांनी केले. राजेरजवाड्यांच्या मिरवणुकीचे वर्णन आपण वाचतो,
पण या मिरवणुकींचे वर्णन फिक्के पडेल असा अपूर्व थाट लोकमान्यांच्या आगमन
मिरवणुकीचा होता. दिवाळीतदेखील होणार नाही, असा दीपोत्सव कल्याणकरांनी
लोकमान्यांच्या सन्मानार्थ मोठ्या आनंदाने केला. या प्रसंगाचे वर्णन
‘अरुणोदय परशुराम’च्या अंकात नमूद केलेले आहे. लोकमान्यांचे कल्याणच्या
रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यासाठी सुमारे दीड हजारांनी जनसमुदाय जमला
होता. ठाणे जिल्ह्यातल्या विविध गावांमधून नागरिक आणि वर्तमानपत्रांचे
प्रतिनिधी आले होते. रेल्वे गाडी स्थानकात येताच, शिवाजी महाराज आणि
लोकमान्य टिळकांच्या नावांचा जयजयकार झाला. लोकमान्यांच्या मिरवणुकीला
स्थानकावरून प्रारंभ झाला. मिरवणुकीत प्रचंड जनसमुदाय सामील झाला. काही
अंतर गेल्यावर काही जणांनी मिरवणुकीच्या गाडीचा घोडा सोडून गाडी भारताचार्य
चिंतामण राव वैद्य यांच्या घरापर्यंत स्वतः ओढून नेली. सुभेदार
वाड्यात लोकमान्यांचे आगमन होताना नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी
ठिकठिकाणी कमानी उभारल्या होत्या. रांगोळ्या काढल्या होत्या, तसेच दीपोत्सव
केला होता. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, समर्थ रामदास
स्वामी, वंदे मातरम्, स्वातंत्र्यदेवी यांच्या नावांचा जयघोष चालला होता.
लोकमान्यांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. गणेशोत्सवातील लोकमान्यांच्या
सभेचे अध्यक्षस्थान भारताचार्य चिंतामण राव वैद्य यांनी स्वीकारले होते.
भारताचार्य वैद्य यांनी प्रास्ताविक भाषण करून लोकमान्यांना भाषण करण्याची
विनंती केली. टाळ्यांच्या कडकडाटात लोकमान्यांनी आपल्या भाषणास प्रारंभ
केला. लोकमान्य म्हणाले, “राष्ट्र कितीही गरीब वा श्रीमंत असो, कितीही
दरिद्री असो, कितीही परतंत्र असो, पण त्याला उत्सव माहिती नसेल तर ते
राष्ट्र पशूच होय. वर्षातून एक दिवस तरी असा पाहिजे की त्या दिवशी संसाराची
दगदग बाजूला ठेऊन माणसाने आपली सर्व तर्हेने
स्थिती कशी आहे याचा विचार करावा. राष्ट्रात जागृती होणे फार महत्त्वाचे
आहे. आपणामध्ये एकराष्ट्रीयतवाची कल्पना नव्हती, त्यामुळे आमची अशी दशा
झाली आहे, मनुष्य नराचा नारायण होईल हे तत्त्व आमच्या धर्माइतके स्पष्ट
कोणत्याच धर्मात सांगितले नाही. इतके सामर्थ्यवान आपण असताना हे सामर्थ्य
आपणांस समजत नाही, हा आपला दोष आहे. काळ हा व्यापक आहे. त्याचा फायदा घेऊन
आपण पुढे जाऊ लागलो, तर पाऊल लवकरच पुढे पडेल. शरीराप्रमाणे आपली मनेही
स्वदेशी झाली पाहिजेत. आपण स्वदेशीच आहोत. त्यामुळे स्वदेशी विचारांची
दृष्टी सदैव आपल्या अंतःकरणात झाली पाहिजे. ”राष्ट्रभक्तीने ओतप्रोत
भरलेल्या लोकमान्यांच्या या भाषणाने उपस्थित जनसमुदाय कृतकृत्य झाला.
सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १९९४ साली झालेल्या शतक महोत्सवी
वर्षाच्या, तसेच २०१९ साली झालेल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या आगमन
मिरवणुकीत लोकमान्यांचा देखावा आयोजित करण्यात आला होता.
चले जाव आंदोलन आणि कल्याण
८
ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेस अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी भारतभर
नागरी असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला. महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा
देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले. कल्याणकरांनी
कधी वैयक्तिक सत्याग्रह किव्वा कधी सामूहिक आंदोलनात सहभागी होऊन
भारताच्या स्वातंत्रलढ्यात प्रत्येक पावलावर ब्रिटिशांविरुद्ध लढा
उभारण्यात मदत केली. कांजी गोविंद करसन यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात
२००० कल्याणकारांसह सत्याग्रह आणि युद्धविरोधी घोषणा या स्वरूपाचे आंदोलन
केले. रामभाऊ पटवर्धन यांनी जपानच्या युद्धरुपी जाळ्यात अडकलेला
ब्रिटिशरूपी सिंह आणि त्याची भारतीयांकडून मुक्तता असे उपहासात्मक
व्यंगचित्र काढून निषेध नोंदवला. प्रभातफेर्या, बुलेटिन वाटप, खादी प्रसार,
स्वातंत्रदिन साजरा करणे असे अनेक कार्यक्रम करून ब्रिटीशराज विरुद्ध एक
असे चैतन्यपूर् वातावरण कल्याणमध्ये होते. वंदे मातरम घोषणांनी अनेक परिसर
दुमदुमायचे. टिळक चौक येथील पोलीस चौकी जाळण्याचा देखील प्रयत्न झाला. अनेक
कार्यकर्त्यांना यामुळे अटक होऊन अनेक वर्ष तुरुंगवासदेखील झाला. लष्कराला
देखील कल्याणमध्ये काही काळ पाचारण करण्यात आले होते. एकंदरीत
कल्याणकरांनी स्वातंत्रलढ्यात झोकून देऊन पुढच्या अनेक पिढींसाठी आदर्श
निर्माण केला. आजचा दिवस हा कल्याणकरांच्या अशा कामगिरीच्या आणि एकंदरीत
वाटचालीच्या स्मरणार्थ साजरा करण्याचा.
ब्रिटिशकाळात
मुंबईपाठोपाठ १८५४ मध्ये रेल्वे कल्याणपर्यंत पोचल्याने या शहराचं महत्त्व
आणखी वाढलं, पुणे-नगरची अनेक घराणी इथं येऊन स्थायिक झाली. १८५५ मध्ये
नगरपालिकेची, तर १८७८ मध्ये सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली. कल्याण
नगरपालिकेच्या एका सदस्याने इंग्लंडच्या पार्लमेंटशी सतत पत्रव्यवहार करून
नगरपालिकेला स्थानिक नगराध्यक्ष मिळावा या मागणीला अनुकूलता मिळवली. याच
दरम्यान शिळाप्रेसवर छपाई करणारा लक्ष्मी-व्यंकटेश छापखानाही इथं सुरू
करण्यात आला.
लोकमान्य
टिळकांच्या नेतृत्वाचा प्रभाव साऱ्या देशभर होताच, त्यामुळे भारताचार्य
चिंतामणराव वैद्य, प्रभाकरनाना ओक, लखूनाना फडके यांच्यासह अनेक
टिळकभक्तांनी पुण्याप्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यासाठी सर्व
जाती-जमातींच्या बांधवांची एक बैठक १८९५ मध्ये प्रख्यात सुभेदार वाड्यात
बोलावली. श्रीमंत रामजी महादेव बिवलकर यांचा हा वाडा, १७६९ मध्ये बांधलेला.
वाड्यासमोर उभं राहून पाचशे स्वार सलामी देत इतका तो प्रशस्त होता.
अंबारीसह हत्ती आत येईल असा भव्य दिंडीदरवाजा होता. सार्वजनिक गणेशोत्सव,
इंग्रजी शाळा, दसऱ्यासह अनेक सण-समारंभ, व्याख्यानं, कुस्त्यांच्या दंगली,
चित्रपट व नाटकं, अनेक अधिवेशनं, परिषदा या वाड्यात झाल्या. वाड्याचे
तत्कालीन मालक बापूसाहेब सुभेदार यांचा वरील समाजोपयोगी कार्यास वाडा देऊन
मदत केल्याबद्दल १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हस्ते सत्कारही
करण्यात आला. खुद्द लो. टिळक १९०६ मध्ये इथं भाषणासाठी येऊन गेले होते.
१९१९ पासून जॉली सोशल क्लबमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला.
या
ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कल्याणकरांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत मोठी
कामगिरी बजावली आहे. महापराक्रमी, दिग्विजयी पहिल्या बाजीराव पेशव्यांची
पत्नी काशीबाईसाहेब या इथल्याच. त्याअर्थाने पेशवे हे कल्याणचे जावई.
त्यांना विवाहाच्या वेळी देण्यात आलेला अष्टकोनी संगमरवरी चौरंग आजही जपून
ठेवण्यात आला आहे. पेशवेकाळात अनेक दिग्गज घराणी कल्याणमध्ये स्थायिक झाली.
सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी दीडशे-दोनशे वाडे इथं होते. काळच्या ओघात ते
लुप्त झाले. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भारतातील पहिल्या महिला
डॉक्टर आनंदीबाई जोशी या इथल्याच. याशिवाय शंकरराव झुंजारराव, गणपतराव
फडके, विधानसभेतील विरोधी पक्षनेते शे.का.प.चे कृष्णराव धुळप, माजी
राज्यपाल प्रा. राम कापसे, इतिहास संशोधक स. म. दिवेकर, समीक्षक माधव आचवल,
गोवा मुक्ती संग्रामातील माधवराव काणे, प्रख्यात शिल्पकार भाऊसाहेब साठे,
आर्किटेक्ट मुकुंद सोनपाटकी, प्रसिद्ध अभिनेत्री नूतन, लक्ष्मीबाई टिळक,
कॉ. गोदावरी परुळेकर, जुन्या काळातील अभिनेत्री लक्ष्मीछाया, सध्या गाजणारी
अभिनेत्री आदिती सारंगधर या सर्वांचा कल्याणशी निकटचा संबंध असल्याचे
अभ्यासक श्रीनिवास साठे आवर्जून सांगतात.
मॅजिक
लॅंटन हा जो करमणुकीचा (चित्रपट प्रदर्शन) खेळ आहे, तो इथल्या पटवर्धन
बंधूंनी १८८५ च्या दरम्यान लोकप्रिय केला होता. पाचशे स्लाइड्स तयार करून
कंदिलाच्या प्रकाशात त्या पडद्यावर दाखवायच्या आणि त्याचवेळी त्याला
पेटी-तबल्यासह प्रत्यक्ष संगीताची साथ द्यायची, अशा प्रचंड कष्टाने
लोकप्रिय केलेल्या या खेळाचा उल्लेख प्रबोधनकारांनी मराठीत ‘शांबरिक
खरोलिका’ असा केला होता. कलकत्ता इथं त्याकाळी झालेल्या काँग्रेसच्या
राष्ट्रीय अधिवेशनात पटवर्धन बंधूंना निमंत्रित करण्यात आलं होतं.
No comments:
Post a Comment