Sunday, October 20, 2024

गण्याची धामीण

  "गण्या, उठ ! मुडद्या रामपार व्हायला आली, तरी लोळतोय घोडा". आक्का करवादून म्हणाली. गावाच्या एका टोकाला असलेल्या घरात हा माता-पुत्राचा सकाळीसकाळी चाललेला प्रेमळ संवाद. रामा थोराताचे हे घर, त्याला एकुलती एक बायको उर्फ आक्का आणि एकुलता एक पोरगा, अर्थात गण्या. आक्का म्हणजे मुळ नाव सीमा, पण आख्खा गाव तीला आक्का म्हणायचा, तर नवसासायासाने झालेला मुलगा म्हणजे गणेश अर्थातच गण्या !
       रामाची बागायती पाच एकर जमीन होती, अर्थातच गडी पैशाकडून भक्कम होता. मात्र एकुलत्या एक मुलाचे लहानपणापासून लाड केल्यामुळे गण्या बिघडला होता. हीच एक डोकेदुखी रामाला होती. लहानपणापासून पैसा हातात खेळत असल्यामुळे गण्याचे शाळेत अजिबात लक्ष नव्हते.कसाबसा चौथी पास झाल्यावर गण्याची गाडी पंक्चर झाली आणि तसेही शिकून शेतीच करायची असल्यामुळे त्याने शिक्षणाचा नाद सोडला आणि गावात उनाड टोळक्यात आणखी एका नगाची भर पडली. 
     गण्या तसा अंगाने धट्टाकट्टा होता. अभ्यासात नसले तरी व्यवहारात डोके सुपीक होते. पैशाची ददात नसल्यामुळे अंगावर भारी कापडं, डोळ्याला गॉगल आणि बुलेटवरुन फिरायचा.मात्र इतके सगळे असले तरी गण्याचे लग्न जमत नव्हते. बाकी सगळे ठाकठीक असले तरी गड्याची शिक्षणाकडून लंगडी बाजु होती. मुलींना कमी शिकलेला नवरा नको होता. लग्न जमत नसल्यामुळे गण्या वैतागला होता. 
       उस लावला आणि पिकाला पाणी सोडले कि गण्या रिकामा असायचा. खिसा कायम गरम, त्यामुळे सोबत मित्राचे टोळके गराडा घालून बसलेले. गाड्या काढायच्या आणि जवळच्या शहरात जाउन टिवल्याबावल्या करत फिरायचे हाच धंदा. त्यात लवकरच गण्याच्या हातात स्मार्ट फोन आला. मग अचानक शिक्षणाचे महत्व गण्याला जाणवू लागले. फोनवाल्याकडून मराठी कि बोर्ड टाकून घेतला तरी फोनमधील बरीच माहिती इंग्लिशमध्येच असायची. आता गण्याला ईंग्लिश शिकायची निकड जाणवायला लागली. संध्याकाळी सातनंतर इंग्लिश बाटली चालत असली तरी फोनमधील इंग्लिशमशील इंग्रजी मात्र झेपेना. शाळा चौथीत सोडल्यामुळे गण्याचा इंग्रजीशी तसा फार संबंध आला नव्हता. 
     फोनमध्ये मात्र बर्‍याच गमतीजमती होत्या. फोन तर करता यायचाच, पण व्हिडीओ कॉलने समोरचा माणुस प्रत्यक्ष बघता यायचा. यु ट्युब आणि इन्स्टावर तर लई भारी बायांचे रिल्स बघायला मिळायचे. बायका त्यांच्या गरगरीत बॉड्या लेटेस्ट गाण्यावर लचकवून नाचायच्या. शेतात गेले कि गड्यांना काम सांगून गण्या फार्महाउसवर जाउन रिल्समध्ये डोके घालु लागला. त्यात व्हॉटस अ‍ॅप घेतल्यावर गण्याला भारी भारी व्हिडीओ बघायला मिळू लागले. त्यात सनी लिओनीवर तर त्याचा लईच जीव बसला. रात्री स्वप्नातही त्याला सनीच दिसू लागली. हे सगळे छान चालले असले तरी गण्याला मुख्य अडचण होती ती इन्स्टावर पोरींची अकाउंट हुडकण्याची. कारण या आयटम पोरी त्यांची नाव इंग्लिशमध्येच लिहीत. गण्याला ते काय समजत नसे.बर, दरवेळी कोणत्या मित्राकडे जावे, तर तो टवाळ्याकरुन गण्याला खिजवायला कमी करत नसे. गण्या खजील होइ, पण पर्याय नसे. इंग्लिश येत नसल्यामुळे त्याला मित्राचे पाय धरावेच लागत. 
    अश्या उनाडक्यात झकास दिवस चालले असताना, एके दिवशी गण्या श्रावणात नागपंचमीला बत्तीस शिराळ्याच्या यात्रेला गेला. तिथे नागाची पुजा करुन मिरवणुक काढलेली आणि बाकी साप प्रदर्शनात ठेवलेले बघायला मिळाले. गण्याला एकदम थ्रील वाटले. वास्तविक कधीतरी त्याच्या शेतात, सटीसहामाही एखादा साप निघायचा, गावात कोणी सर्पमित्र असला तर सापाला पकडून लांब सोडले जायचे, नसेल मात्र त्या सापाचे मरण ठरलेले. पण आता गण्याला अचानक सापात इंटरेस्ट निर्माण झाला. साप पकडायला शिकायचेच असे त्याने ठरवले. शिराळ्यावरुन परत आल्यावर त्याने गावातील सर्पमित्राला, म्हणजे संज्या पाटलाला गाठून त्याला साप पकडायला शिकवण्याची गळ घातली. संज्याबरोबर बराच भटकून त्याने अखेर हि कला साध्य केली. आता गण्या शेतात साप दिसला, तर त्याला न मारता पोत्यात घालून लांब सोडत असे. साप पकडल्यावर आजुबाजुची माणसे लांब पांगत. हे बघून गण्याल्या थ्रील आणि आपल्या धाडसाबद्दल अभिमान वाटे. मात्र आक्का यावरुन गण्यावर चिडत असे. 'मेल्या,गारुड्याच्या पोटाला जन्माला आलायस काय ? चांगल्या बागायीत शेतकर्याचा मुलगा तू, आणि या नाग,सापाच्या नादाला लागतोस ?' अर्थात आईचे बोलणे गण्या कानामागे टाके आणि पुन्हा साप पकडायची संधी मिळाली तर सोडत नसे. 
   हे सगळे असले तरी गण्या समाधानी नव्हता. इन्स्टावरच्या पोरी त्याला खुणावत. यांना गटवायचे तर इंग्लिश यायला पाहीजे, आपले सापाचे व्हिडीओ टाकले तर या पोरी पटवता येतील असे त्याला वाटायचे. शेवटी इंग्रजी शिकायचेच असे त्याने ठरवले. 
    आता यासाठी त्याला पुन्हा शाळेत जाणे भाग होते. गण्याने कित्येक वर्षांनी त्या इमारतीत पाउल टाकले. गण्याने शाळा सोडली तेव्हाची तीची स्थिती आणि आता झालेली सुधारणा यात जमीन अस्मानाचा फरक होता. गण्या मुख्याध्यापकांच्या खोलीत गेला. त्याने आपली अडचण मुख्याध्यापकांना सांगितली, त्यावर त्यांनी त्याला संध्याकाळच्या प्रौढ शिक्षणवर्गाची माहिती दिली. ज्यांना शिकायचे आहे, त्यांच्यासाठी शासनाने हि योजना सुरु केली होती. आता या प्रौढ शिक्षणाचे वर्ग नुकतेच सुरु होणार होते. गण्याने आपले नाव नोंदले आणि पुढील आठवड्यात सुरु होणार्या वर्गाची तो वाट पाहु लागला. 
    गावच्या पाटलांच्या हस्ते एकदा या वर्गाचे उदघाटन झाले आणि दुसर्या दिवशी संध्याकाळपासून शाळेच्या एका खोलीत तास सुरु होणार होते. इंग्लिश आणि गणिताचे तास घेतले जाणार होते. जवळच्या शहरातून एक शिक्षीका शिकवण्यासाठी गावात येणार होती. गण्या शाळेच्या पहिल्या तासाला एक वही आणि पेन घेउन जाउन बसला, गावातील बरेच रिकामटेकडे आणि थोडे शिकण्याची आस्था असलेले लोक बसले होते. काहींंना बँकेचे व्यवहार तर काहीना कागदपत्रात अडचणी आल्यामुळे शिकण्याची निकड झाली होती.
    आणि अचानक तीने वर्गात प्रवेश केला. स्नेहा मॅम ! एखादी परी अवतरावी अशी स्नेहा दारातून आत आली. साडे पाच फुट उंच, डोक्यामागे केसाची पोनी बांधलेली, भरगच्च अंगाची, गव्हाळ वर्णाची, पिवळ्या रंगाचा चुडीदार घातलेली स्नेहा वर्गात आली तेव्हा एखादी सुंगधी वार्याची झुळूक आल्याचा भास गण्याला झाला. पहिल्याच नजरेत तो कामातून गेला. काहीसे बदामी डोळे असलेली आणि फारसा मेकप न केलेल्या स्नेहाने हसून सर्वांना नमस्कार केला आणि स्वतःची ओळख करुन दिली. लांब विदर्भातील एका गावातील हि मुलगी डि.एड. होउन शासकीय नोकरीत रुजू झाली आणि तीची पहिली बदली या भागात झाली होती. जवळच्या शहरात खोली घेउन सकाळी एका शाळेत जाउन शिकवणार्या स्नेहाला प्रौढ शिक्षणांतर्गत आता या गावात येउन वर्ग घ्यायचे होते. 
            गण्या तर बघतच राहीला. अर्थात स्नेहाने इंग्लिश शिकवण्यास सुरवात केली आणि फळ्यावर काढून अक्षर ओळख करण्यास सुरवात केली तशी गण्या भानावर आला आणि त्याने वहीत अक्षर लिहायला सुरवात केली. मात्र त्या दिवसापासून गण्याचा नित्यक्रम बदलला. शेतीचे काम आटोपून टिंगलटवाळ्या करायला पारावर जाणारा गण्या बुलेटवरुन तातडीने शाळेकडे जाउ लागला. अचानक त्याला शिक्षणाचे महत्व समजले. अर्थात वहीतील प्रगती यथातथाच असली तरी गण्याचे डोळे सदैव स्नेहावर खिळलेले असत. आज तीने कोणते कपडे घातले आहेत, पावडरचा वास, तीचे बोलणे यातच गण्या बुडून जाई. भानावर येई तेव्हा थोडा अभ्यास होइ. पण आता गण्याला बर्याच शंका येउ लागल्या. त्याला प्रश्न पडायला लागले, जे वर्ग संपल्यावर स्नेहाला विचारायचे असत. सारखे सारखे संपर्कात आल्यावर आग आणि लोणी यांचे जे होइल, तेच स्नेहा आणि गण्या यांच्यात झाले.
          स्नेहालाही नकळत गण्या आवडू लागला. गण्याने हळुहळू विषय इंग्रजीकडून स्नेहाच्या खाजगी आयुष्याकडे वळवला. तीचा मोबाइल नंबर शंका विचारण्यासाठी घेतला, मात्र मेसेज वेगळेच फिरु लागले. एकदा गण्या शहरात गेल्यावर काम आटोपल्यानंतर वेळ मिळाल्यावर त्याने स्नेहाला फोन केला. ती मोकळीच होती, तेव्हा हा भेटायला तीच्या रुमवर गेला. स्नेहाची रुम पार्टनर देखील विदर्भातील लांबच्या गावची होती आणि घरात आलेल्या काही इमर्जन्सीमुळे घरी परत गेली होती. त्यादिवशी गण्या आणि स्नेहाच्या गप्पा झाल्या. गण्याला स्नेहा आपल्याला पटणार याची खात्री पटली. त्याने स्नेहाला प्रपोज मारण्याचे ठरवले.
पण प्रपोज करायचे तर काहीतरी भन्नाट करायला हवे, स्नेहाने पटकन हो म्हणले पाहीजे. काय करावे ? गण्या नेहमीप्रमाणे शेतावर गेला. नुकतीच काढणी झाली होती आणि गडी रानातील तण काढत होती. दुपारची वेळ होती ,अचानक गलबला उडाला. कामाला आलेल्या बायका किंचाळू लागलया. गण्या काय झाले म्हणून धावत गेला तर एक लांब पिवळी धमक धामण निघाली होती, तीला बघूनच बायका कालवा करीत होत्या. हुश्श ! गण्याने निश्वास सोडला आणि पोते आणायला तो फार्महाउस्कडे धावला. पोत्यात त्या धामीणीला घालून दुसर्या दिवशी म्हसोबाच्या डोंगरात सोडायची ठरवून तो आडवा होउन मोबाईल बघू लागला, तोच त्याच्या डोक्यात एक जबरी आयडीया आली. हीच धामीण नेउन स्नेहाला दाखवली तर ? आपल्याकडे डिग्री नसली तरी आपले धाडस बघून तरी स्नेहा नक्कीच खुष होइल. आपल्याला घट्ट मिठी मारेल, तीचा तो गच्च अंग आपल्या अंगाला भिडेल, तीच्या अंगाला येणारा वास आपल्याला लईच आवडतो, तीचे केस आपण मोकळे करु, तीच्या मुखडा जवळ घेउन मस्त किस करायचा आणि .......
     त्याच्या कल्पनाशक्तीचा घोडा चौखुर उधळत होता. अंगावर रोमांच उभे राहीले. स्नेहाच्या जागी त्याला सनी दिसू लागली. गड्याचे अंग गरम झाले. थोडावेळ तो त्याच धुंदीत होता.आणखीही काही वेळ राहीला असता.मात्र कामावरचे गडी परत निघाले होते, त्यांच्या हाकेने तो स्वप्नातून वास्तवात आला. 
  ठरले तर मग! त्याने धामण असलेले पोते उचलले आणि धामणीला एका सॅकमध्ये भरुन घरी नेउन ठेवले. दुसर्या दिवशी शहरात काम होते, म्हणून धामीण असलेली सॅक घेउन निघाला. आज स्नेहाला प्रपोज करायचे होते म्हणून त्याने विशेष जामानिमा केला. नवीनच घेतलेला शर्ट्, जीन्स, बूट घालून भरपुर परफ्युम मारुनच तो निघाला. शहरात जाउन त्याने बँकेतील कामे संपवली आणि लगेच किक मारुन स्नेहाच्या रुमकडे निघाला, पाठीवरच्या सॅकमधील धामीण अजून तरी शांत होती. काल शेतात बहुतेक उंदरांचा फराळ केल्यामुळे ती निवांत असावी. गण्या एकदाचा रुमवर पोहचला. 
 दारावरची बेल वाजवली, गण्याला एकेक सेंकद एका एका युगासारखे वाटत होते. कधी एकदा स्नेहाला प्रपोज करतोय असे त्याला झाले होते. स्नेहाने दार उघडले. आज बहुधा सकाळचे क्लास नसल्यामुळे ती थोडी निवांत उठली होती. नुकतीच आंघोळ आटोपून, केस पुसून डोक्याला टॉवेल गुंडाळून , घरातील साधेच कपडे घालून स्नेहा दार उघडायला आलेली होती. इतक्या सकाळी गण्याला बघून तीला थोडे आश्चर्य वाटले. मात्र तीने त्याला आत घेतले आणि दार बंद करुन घेतले. दार बंद झाल्यावर प्रपोज करायच्या कल्पनेने गण्याला घाम फुटला. काल त्याने प्रपोजवरचे बरेच रील्स बघून काय करायचे , ते ठरवले होते. मात्र प्रत्यक्षात पोटात गोळा आला. पण कसाबसा धीर एकवटून गण्याने बाहेर विकत घेतलेला लाल गुलाब स्नेहासमोर धरला आणि त्याने मोठ्या अपेक्षेने स्नेहाकडे बघीतले. लाल गुलाबाचा अर्थ स्नेहाला समजला आणि तीच्या चेहर्यावर हसु आले. गेल्या काही दिवसातील गण्याचे वागणे बघून स्नेहाला अंदाज आलेलाच होता. स्नेहाच्या चेहर्यावरचे हसु बघून गण्याला हायसे वाटले आणि त्याने थरथरत्या हाताने स्नेहाचा हात हातात घेतला. स्नेहाकडून कोणताही प्रतिकार न झाल्याने त्याने तीला जवळ ओढले. स्नेहा अलगद मिठीत आलेली बघून त्याचा धीर आणखीणच चेपला आणि तीच्या पाठीवर हात फिरवायला सुरवात केली. स्नेहाचे दोन्ही हात गण्याच्या छातीवर आले. हळूच हात वर नेउन तीने डोक्यावर गुंडाळलेला टॉवेल काढून बाजुला फेकला. तीच्या अजून ओल्या केसातून पाण्याचे थेंब ओघळत होते. गण्याला तीचे रुप बघून रहावलेच नाही. त्याने दोन्ही हातात तीचा चेहरा घेतला आणि आता किस करावा म्हणून ओठ जवळ केले तोच सॅकमध्ये जोरदार हालचाल झाली. त्यामुळे धुंद झालेल्या स्नेहाचे लक्ष तिकडे वेधले. अचानक गण्याला थांबवून तीने त्याला सॅकमध्ये काय आहे ते विचारले. गण्याही या जिवंत नागीणीच्या नादाने सॅकमधल्या धामीणीला विसरला होता. धामणीला बाहेर काढून आपल्या डेरींगबाजपणाचे कौतुक स्नेहाकडून करावे म्हणून त्याने स्नेहाला सांगितले. " एक गंमत आहे". "कोणती ?" स्नेहाने कुतुहलाने विचारले. 
  "थांब"
  असे म्हणून गण्या सॅककडे गेला आणि त्याने चेन उघडून झपकन धामीण बाहेर काढली. कालपासून बंद पोत्यात आणि नंतर सॅ़कमध्ये बसून धामीण वैतागली होती.  जरा मोकळी हवा मिळताच, गण्याच्या हातातच तीने जोरदार वळवळ केली. स्वप्नातही कल्पना केली नसणारी गोष्ट गण्याला हातात घेउन बघीतल्याने स्नेहा हादरलीच. तीला सापाची लहानपणापासून भयंकर भिती वाटत होती. त्यात अवघ्या काही फुटावर गण्या लांबलचक पिवळ्या रंगाची धामीण घेउन उभा होता. एक क्षणभर स्नेहा जमीनीला खिळून राहीली आणि दुसर्या क्षणी भयंकर भितीने तीने किंकाळी फोडली. भितीने तीचे अंग घामाने चिंब झाले. गण्याला एक क्षणभर काही कळेचना. त्याला वाटले होते तसे स्नेहा खुष न होता, घाबरुन थरथरत होती. तीची किंकाळी एकून तो दचकलाच. अगदी ती धामीणही दचकली असावी, कारण ती सुटायची म्हणून वळवळ करत होती. स्नेहाची किंकाळी एकून आजुबाजुची माणसे जमायच्या आत गण्याने घाइघाईने धामीणीला सॅकमध्ये घातले आणि गडबडीने तो दार उघडून बाहेर पडला. काय अपेक्षेने तो इथे आला आणि काय झाले होते. 
 कसबसा तो घरी पोहचला आणि रागाने त्याने धामीण सॅकबाहेर काढून लांब नेउन फेकून दिली.
    यानंतर स्नेहाने गण्याच्या गावातील प्रौढ शिक्षण वर्गाला जाण्यास नकार कळविला. गण्याचे इंग्लिश अजूनही अर्धवटच आहे. त्यादिवशीपासून त्याचे अखिल सर्प जमातीशी वैर सुरु झाले. आता गण्याच्या शेतावर साप निघाल्यास त्याला गण्या न चुकता ठेचून जाळतो. त्या आगीत त्याला स्नेहाचा चेहार दिसतो.





No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...