कथा अजिंक्यतार्याची
भल्या-भल्या राजधुरंधर व्यक्तिंना आपल्या पोलादी कैदेत ठेवणारा अशा एक ना अनेक रूपांनी ‘अजिंक्यतारा’ किल्ल्याचे मराठ्यांच्या इतिहासात मोलाचे योगदान दिले आहे.छत्रपती शिवरायांना गंभीर आजारात मायेनं सावरणारा, छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलेला, औरंगजेबाशी तब्बल साडेचार महिने प्रखर झुंज देणारा, मोगली आक्रमणातून स्वराज्य वाचविणाऱ्या रणरागिणी ताराराणींना साथ देणारा, छत्रपती शाहूंच्या काळात अटकेपार पसरलेल्या मराठी राज्याची राजधानी म्हणून मिरविणारा, शतकानुशतके सातारा शहराची प्रेमाने पाठराखण करणारा इतिहास प्रसिद्ध किल्ला म्हणजे ‘अजिंक्यतारा’...
कोल्हापूरच्या शिलहार वंशीय दुसºया भोजराजाने इ. स. ११९० मध्ये हा किल्ला बांधला. भोजराजाची राजधानी पन्हाळगड येथे होती. या गडाचे ईशान्येस पूर्वीचे सातर हे गाव होते. सातर म्हणजे भरपूर देणारे. या सातरचे सातारा झाले. सातारच्या किल्ल्यावर सप्तर्षीचे देऊळ होते. सप्तर्षीपासून सप्तर्षीपूर हे सातारचे जुने नाव रुढ झाले. जुन्या संस्कृत ग्रंथात सप्तर्षीपूर असा या गावाचा उल्लेख आढळतो. ऐतिहासिक व राजकीय पत्रव्यवहारात सातारे असा उल्लेख आढळतो. सातारच्या किल्ल्याला तट, बुरुज आणि वेशी यांची संख्या सतरा आहे. सतरावरून सातारा, सातदरेपासून सातारा, सप्ततारापासून सातारा अशा साताराच्या इतिहासाशी छत्रपती शिवाजीमहाराजांचा ऋणानुबंध आहे.शिलाहार भोज राजाने किल्ला बांधला तेव्हा एका महाराचा मुलगा व मुलगी यांना ईथे बळी दिले असे सांगतात. मात्र फेरिस्ता हा इतिहासकार लिहीतो कि चौथा बहामनी राजा महंमदशहा( इ.स. १३५८-१३७५) याच्या कारकीर्दीत सातारचा किल्ला बांधला गेला.साताऱ्याचा प्रथम लिखित उल्लेख या पत्रव्यवहारात आढळतो. त्याने ह्या किल्ल्याची पुनर्बांधणी केली असावी.
शिलहाराकडून देवगिरीच्या यादववंशीय सिंधन राजाने हा किल्ला जिंकून घेतला. त्यांच्या ताब्यात इ. स. १२०० ते १३०० पर्यंत हा किल्ला होता. त्यानंतर दिल्लीच्या खिलजी सुलतानाने हा किल्ला जिंकला. त्याच्याकडून तुघलक घराण्याने हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर इ.स. १३४७ पासून १४९८ पर्यंत हा किल्ला बहामनी राजाकडे होता. विजापूरच्या अदिलशहाने हा किल्ला जिंकून घेतला. किश्वरखान ह्या सरदाराने पहिल्या आदिलशाहची (कार. १५५७–८०) विधवा बेगम चांदबीबी ही निजामशाहशी संगनमत करीत असल्याच्या संशयावरून तिला सातारा किल्ल्यात कैदेत ठेवले (१५८२); परंतु त्याच वर्षी किश्वरखानाचा पाडाव झाल्याने तिची सुटका झाली. पुढे आदिलशाहीत दिलावरखान याने कटकारस्थाने केली, म्हणून त्यास या किल्ल्यात ठेवण्यात आले होते (१५९२). या किल्ल्यातच तो मरण पावला..विजापूरकराने फलटणचे मुधोजी नाईक-निंबाळकर यांना १६४० पर्यंत याच किल्यावर सात वर्षे कैद करून ठेवले होते. शहाजी राजांकडे त्यावेळी कराडची देशमुखी होती.त्यांनी हातमिळवणी केली आणि निंबाळकर तुरुंगातून पळाले.त्या मदतीला जागून बजाजी निंबाळकरांची बहीण सईबाई शहाजी राजांची सुन झाली.तीच शिवाजी महाराजांची पहिली पत्नी.या किल्याचा उपयोग पूर्वी तुरुंगासारखाच केला जाई. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर मोगली अक्रमणांमुळे छत्रपती शिवाजीमहाराजांनी तह करून हा किल्ला मोगलांना दिला. १६६६ नंतर हा किल्ला विजापूरांकडे गेला. छत्रपती शिवाजीमहाराजांनी हा किल्ला जिंकून ताब्यात घेतला. शहाजीमहाराजांची विजाूपरांच्या कैदेतून सुटका झाल्यावर जेजुरी येथे व त्यानंतर या किल्लयावर शहाजी व शिवाजी राजे या दोघांची भेट घडली. पुन्हा किल्ला आदिलशहाकडे गेला. त्यांच्याकडून हा किल्ला इ. स. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी जिंकला. या घटनेसंदर्भात ईंग्रजांनी पत्र पाठविले आहे,त्यात ते म्हणतात, "नुकताच त्याने ( शिवाजी महाराजांनी ) आदिलशाहीतील महत्वाचा आणि मध्यवर्ती किल्ला घेउन तेथील अमर्यादित लुट बैलावरुन रायगडाला नेली आहे".
छत्रपती शिवाजीमहाराज १ डिसेंबर १६७६ पासून २५ जानेवारी १६७७ पर्यंत वास्तव्य करून होते.शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. कर्नाटक मोहिमेच्या आधी १६७५ मध्ये ते आजारी पडले असताना त्यांचा दोन महिने या किल्ल्यात मुक्काम होता. याच काळात रघुनाथ हणमंते त्यांना भेटले आणि कर्नाटक मोहिमेची योजना निश्चित झाली.
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बादशाहने स्वराज्यावर स्वारी केली. औरंगजेबाचा एक सेनानी सर्जाखान हा सातार्याचा किल्ला जिंकून घेण्यासाठी सातारा विभागात दाखल झाला. त्याच्या छावणीसोबत त्याचा जनानखाना ही होता. संताजी_घोरपडे, धनाजी_जाधव, रामचंद्रपंत_अमात्य, शंकराजी_नारायण या चार मराठा सरदारांच्या संयुक्त फौजांनी सर्जाखान वर हल्ला चढवण्यासाठी निघाले होते.
खानाची किल्ल्याच्या वेढ्याची तयारी चालू होती, एवढ्यात त्याच्यावर मराठ्यांशी लढण्याचा प्रसंग ओढावला. मराठा सैन्याचे नेतृत्व संताजी घोरपडे यांच्याकडे होते.
मराठे खानाच्या छावणी जवळ येताच त्याने आपल्या मुलाला गालिबखानाला ५००० सैन्य व ५ हत्ती देऊन आघाडीवर पाठवले. गालिबखान चालून येताच लढाईस तोंड फुटले. मराठ्यांच्याकडे अनुभवी बंदुकची होते. त्यांनी मोगलांवर बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव केला. मोगलांच्या आघाडीवर असलेले हत्ती या गोळ्यांच्या माराने बिथरले आणि आपल्याच सैन्याला पायाखाली तुडवीत त्यांनी माघारी पळ काढायला सुरुवात केली. मराठ्यांचा हा हल्ला अचानक व अनपेक्षित होता तरीही खान डगमगला नाही. त्याने आपल्या भोवती असलेल्या सैनिकांनिशी मराठ्यांशी तोंड दिले. खान यावेळी हत्तीवर स्वार झाला होता. पण मराठ्यांच्या बाणांनी व बंदुकीच्या गोळ्यांनी तो जखमी झाला. त्याच्या अंगावरील कपडे पेटले आणि सर्जाखान जखमी होऊन हत्ती वरुन खाली पडला. मराठ्यांनी त्याला व त्याच्या जनानखान्याला कैद करून सातार्याच्या किल्ल्यावर नेले.या लढाईत पंधराशे मोगल सैनिक ठार झाले. चार हजार घोडे, आठ हत्ती आणि खानाच्या छावणीतील सर्व सामान मराठ्यांनी ताब्यात घेतले. सर्जाखान याने एक लाख रूपये दंड कबूल करून स्वतः ची सुटका करून घेतली.लढाईच्या धामधुमीत सर्जाखानाचे दोन मुलगे व दोन बायका मराठ्यांच्या तावडीतून निसटल्या.मराठ्यांची रूस्तमखान बरोबर ही लढाई झाली ती तारीख होती - २५ मे १६९०. पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी २३ मे १६९८ रोजी सातारा ही राजधानी घोषित केली. २ मार्च १७०० रोजी त्यांचे निधन झाले.
औरंगझेबाच्या दरबारात रोज घडलेली हकीगत फारसीत लिहून ठेवली जात असे . जयपूर इथे त्या हकीगतीतले काही सारांश मिळाले आहेत. ते लंडन आणि बिकानेर इथे सध्या आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळात त्याची कॉपी आहे. त्यांना 'अखबारात-ए-दरबार-ए-मुअल्ला' म्हणजे 'श्रेष्ठ दरबारची बातमीपत्रे' असे म्हणतात. दिनांक १४ एप्रिल १७०० या दिवसाखाली आपल्याला खालील नोंद अखबारात सापडते.
काल बादशहा शेख हिदायतकेश याला म्हणाले, "तुम्ही तरबियतखानाला आज रात्री सुरुंग उडविण्यासाठी हुकुम लिहा." त्याप्रमाणे तरबियतखानाला हुकुम पाठविण्यात आला. बादशहांनी मुखलिसखान, हमीदुद्दीनखानबहादुर, सियादतखान वगैरेंना पुढीलप्रमाणे आज्ञा केली - रात्रीचा एक प्रहर राहिला असता तुम्ही स्वतःची पथके घेऊन हल्ला करण्यासाठी म्हणून तरबियतखानाच्या मोर्च्यात जा.
दिवसाच्या चार घटिका झाल्या असता बादशहांना कळविण्यात आले ते असे : आज्ञेप्रमाणे तरबियतखान याने दोन्ही सुरुंग उडविले. किल्ल्याची भिंत किल्ल्याच्या आत पडली. पण बुरुजाचा वरील भाग, वीस दरआ (?) लांबी रुंदीचा उडून दमदुम्यावर पडला. पुढील माणसे ठार झाली :-- खास चौकीची माणसे, मरहूम दिलावरखानाची मुले सखीखान, बुदीखान, असदुद्दीन, मरहूम लोधीखान याचा मुलगा अहमद, मुहंमद जमान वगैरे काकड जमातीचे लोक, सटवाजी डफळे याचा मुलगा बुदीखान, हजारी पथकातील माणसे, बंदुकची, दक्षिण सुभ्यातील तैनात सैनिक. अशी एकंदरीत जवळजवळ एक हजार माणसे दगडांच्या उडण्यामुळे त्या माराने मारली गेली आहेत. गनीम (मराठे) हे बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला ठाण मांडून उभे असून बाण आणि बंदुकी यांचा मारा करीत आहेत. मुखलिसखान, तरबियतखान, हमीदुद्दीनखानबहादुर, मतलबखान वगैरे सरदार हे लढत आहेत (हमला मी नुमायद, हल्ला करीत आहेत). पण वरून बाण व बंदुकी यांचा इतका वर्षाव होत आहे की त्यांना पुढे सरकण्यास वाट सापडत नाही.
अर्थातच औरंगझेबाच्या स्वतःच्या अखबारात त्याला कमीपणा येईल अशी गोष्ट सापडत नाही, किंवा ती अगदी सौम्य पद्धतीने लिहिली जाई, कारण बादशाह अखबार स्वतः पाहून त्याला मंजुरी देत असे. हे अखबार बऱ्याच महत्वपूर्ण आणि तपशीलवार माहितीने भरलेले आहेत. आपल्याला साताऱ्याच्या प्रसंगाचे साग्रसंगीत विवरण साकी मुस्तेदखान या समकालीन इतिहासकाराने आपल्या 'मासिर-ए-अलामगिरी' या ग्रंथात लिहून ठेवलेले सापडते.
"काही वेळाने किल्ल्यातील मराठे त्या जागी आले. आणि बंदुकी झाडून गोळ्यांचा वर्षाव करू लागले. मोगलांचा दमदुमा मोडून पडला होता. त्यांच्या तोफा ठिकठिकाणी पडल्या होत्या. मोगल सैनिकांनी लढण्याचे सोडून दिले होते. मराठ्यांशी लढू शकेल असा तेथे कोण होता? मोर्चे येथून तेथपर्यंत लाकडाचे होते. बहेलियांनी रात्रीच्या वेळी कुणाला न कळत मोर्च्यांना आगी लावल्या. ही आग सात रात्री सात दिवस सारखी जळत होती. त्या भयंकर आगीला विझवू शकेल इतके पाणी तेथे कोठून मिळणार? ढिगाऱ्यात सापडलेले सगळे हिंदू आणि ज्यांना काढण्यास अवधी मिळाला नाही असे काही मुसलमान हे सगळे जळून खाक झाले. धन्य आहे या विश्वरूप अग्निकुंडाची."
यानंतरची हकीगत आपल्याला अखबार आणि मराठी पत्रे (परशुरामपंत प्रतिनिधी यांनी चांदजी पाटणकर याना पाठवलेले पत्र - रेकॉर्डस् ऑफ शिवाजी पिरियड) यातून समजते. शाहजादा आझम याने साताऱ्याचा किल्लेदार सुभानजी याच्याबरोबर वाटाघाटी केल्या. मराठ्यांना बादशाहच्या नकळत एक मोठी रक्कम देणे कबुल केले आणि किल्ल्यातील सर्वाना सुरक्षित बाहेर जाऊ देण्याची हमी दिली. त्यानुसार मराठ्यांनी किल्ला रिकामा केला. बादशाहने मात्र शाहजादा आझम याने किल्ला 'घेतला' याचा आनंद मानून सातारा किल्ल्याचे नाव 'आझम तारा' असे ठेवले. आझम या फारसी शब्दाचा अर्थ अत्यंत श्रेष्ठ (Greater; greatest. Grand.). किल्ला मोगलांना फार काळ लाभला नाही. मराठ्यांनी तो लगेच पुन्हा ताब्यात घेतला. आझमताऱ्याचा आज अजिंक्यतारा असा (अपभ्रंश?) आपल्याला झालेला दिसतो.
नेमके झाले काय? मोगल सैन्याने नियोजन वाईट होते, त्यांनी फार सारासार विचार न करता सावधगिरी ना बाळगता, सैन्यतळ सुरक्षित ठिकाणी न पाठवता सुरुंग लावल्याने स्वतःचेच मोठे नुकसान करून घेतले. मराठ्यांनीहि किल्ल्याचा पडलेला भाग लावून धरला आणि मोगलांना काही आत शिरताच आले नाही. पण किल्ला कोणत्याची प्रकारे घ्यायचाच असल्याने आझमने पैसे देऊन किल्ला रिकामा करून घेतला. मुघल बादशहाने या विजयाचे स्मारक म्हणून गोलाकार विजय स्तंभ करंजे, ता. सातारा येथे उभारला.
सन १७०० ते १७०६ अजिंक्यतारा औरंगजेबाचे ताब्यात होता. पुढे ताराराणींनी तो परत मिळवला.अनाजीपंत यांनी अजिंक्यतारा मिळवून परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांना कसा दिला हि हकीकत मोठी रंजक आहे.हे अनाजीपंत राजाराम महाराजांच्या पदरी कारकून होते.ज्यावेळी राजाराम महाराज जिंजीवरुन निघून सातार्याला आले त्यावेळी हे अनाजीपंत मोंघलांच्या ताब्यात सापडले.तिथून मोठ्या युक्तीने सुटून इ.स. १७०६ सातार्याक्डे येण्यास निघाले.त्याचवेळी त्यांची अजिंक्यतार्यावर येणार्या मोघलांच्या तुकडीशी गाठ पडली.अनाजीपंतांनी त्या मोघल सैनिकांना काही चटकदार गोष्टी सांगून व गाणी गाउन खुष केले.तेव्हा मोघल सैनिक त्यांना अजिंक्यतारा किल्ल्याच्या आत घेउन गेले.तेव्हा किल्ला ताब्यात घेण्याचा बेत त्यांनी परशुराम त्रिंबक प्रतिनिधींना कळविला.व काही मराठी सैनिकांना किल्ल्यात घेउन गेले.त्यांनी सर्व मोघल सैनिकांना कापून किल्ल्यावर पुन्हा भगवा फडकविला.
माहुली
महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र.
सातारा शहराच्या पूर्वेला साधारण पाच कि.मी. :अंतरावरून कृष्णा नदी
वहाते. संगमाच्या पूर्वेकडील वस्तीला ‘क्षेत्र माहुली’ आणि पश्चिमेकडील
वस्तीला ‘संगम माहुली’ अशी नावे आहेत.या ठिकाणाला आपण तिथक्षेञ दक्षिण काशी
संगम माहुली या नावाने ओळखतो .खरतर प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये
माहुली या नावाचा एक हळवा कोपरा दडलेला आहे. कारण माहुली सारख नितांत सुंदर
ठिकाण चालू घडीला मृत्यूपश्चात होणार्या संस्कारासाठीच जास्त ओळखले जाते.
कृष्णेनदीचा उगम महाबळेश्वरच्या पर्वत रांगात होतो ,तर तीन राज्ये सुजलाम
सुफलाम करीत ती आंध्रप्रदेशात बंगालच्या उपासागरास जाऊन मिळते .या साधारण
आठशे मैलाच्या प्रवासात तीचा काही छोट्या मोठ्या नद्या बरोबर संगम
होतो.त्या त्या ठिकाणी मोठी तिर्थक्षेत्रे आहेत. त्यातील प्रमूख ठिकाण
म्हणजे सातार्यातील कृष्णा-वेण्णा संगम .अगदी प्राचीन काळापासून हे ठिकाण
सुप्रसिध्द असावे कारण वाल्मिकी रामायणातही या ठिकाणचा उल्लेख आहे
. क्षेत्रमाहुलीचा इतिहासही असाच मनाला भिडणारा आहे.याचा संदर्भ थेट
रामायणाशी गाठ घालून देतो. रामायणात युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडतो. त्याला
शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी आणण्याकरिता हिमालयाकडे रवाना होतो.
नेमकी संजीवनी ओळखता न आल्याने अख्खा द्रोणगिरी पर्वत उचलून लंकेकडे
प्रयाण करतो. लंकेकडे जाताना वाटेत द्रोणगिरीचा छोटा भाग सातारा येथे पडतो
यालाच जरंडेश्वरचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आणि
कृष्णा व वेण्णा नद्यांच्या संगमाने पवित्र झालेलं हे गाव श्री क्षेत्र
माहुली म्हणून प्रसिद्ध आहे. संगमाच्या एका काठाला विश्वेश्वर मंदिर हे
संगम माहुली म्हणून ओळखले जातं. दुसऱ्या काठाला रामेश्वर मंदिर हे
क्षेत्रमाहुली म्हणून प्रसिद्ध आहे. 

क्षेत्र माहुलीवर शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत आदिलशाहीचा अंमल होता
त्यानंतर मराठ्यांच्या अंमलाखाली ती गेली. छ. राजारामाने क्षेत्र माहुली
प्रभुणे कुटुंबियांना अग्रहार म्हणून दिली. छत्रपती शाहूंच्या वेळी (कार.
१७०७–४९) व उत्तर पेशवाईत त्याचे महत्त्व वाढले. छ. शांहूनी ग्रहणादिनी
श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांस संगम माहुलीचे दान केले (१७२०).
पंतप्रतिनिधी, मामा पेठे, ज्योतिपंत भागवत, परशुराम अनगळ, कृष्णा दीक्षित व
राजघराण्यातील राण्या यांनी तेथे सु. दहा मंदिरे, मुख्यतः अठराव्या शतकात
बांधली. त्यांपैकी विश्वेश्वर महादेव, बिल्वेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर,
कृष्णेश्वर महादेव, कृष्णाबाई इ. प्रसिद्ध असून विश्वेश्वर महादेव हे मंदिर
सर्वांत मोठे आहे. ही मंदिरे मराठा वास्तुशैलीतील असून चुनेगच्ची
सभास्तंभ, शिखर आणि कोनाड्यांतून मूर्तिकाम आढळते. क्वचित काही ठिकाणी
भित्तीचित्रे आहेत. त्यांतील लक्ष्मीचे चित्र सुरेख आहे. चुनेगच्चीतील
मूर्तीत प्रामुख्याने दशावतार, शंकरपार्वती आणि शैव परिवारातील देव-देवता,
प्राणी इ. आढळतात. बहुतेक मंदिरे नदीकाठावर असून येथील दोन दीपमाळा रेखीव व
वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंनी बांधीव घाट व पायऱ्या आहेत.
छ. शाहू पेशवे, पंतप्रतिनिधी, पंतसचिव हे स्नानासाठी प्रसंगोपात्त या
स्थळास भेटी देत. उत्तर पेशवाईतील इतिहासप्रसिद्ध रामशास्त्री प्रभुणे या
न्यायाधीशाची माहुली ही जन्मभूमी. निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्यांनी
येथेच व्यतीत केले. त्यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीने एक इमारत बांधली
असून रामशास्त्रीच्या वारसांनी त्यांच्या नावे सामाजिक न्यायासाठी एक
पुरस्कार १९८४ पासून सुरू केला आहे. दुसरा बाजीराव व जॉन मॅल्कम यांची भेट व
बोलणी तिसऱ्या निर्णायक इंग्रज-मराठे युद्धापूर्वी (खडकीचे युद्ध) येथेच
झाली. माहुलीला शेवटच्या श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीला मोठी यात्रा
भरते. कन्यागतात येथे अनेक लोक संगमावर स्नानांसाठी जमतात. छत्रपती
घराण्यातील छ.शाहू त्यांची राणी सकवरबाई, कुत्रा खंड्या यांच्या येथे
समाध्या आहेत.
छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई
यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत. त्याशिवाय, प्रतिनिधी
घराण्याने अठराव्या शतकात तेथे एकूण दहा मंदिरे बांधली. ती सर्व नदीच्या
काठावर आहेत. त्यातील विश्वेश्वराचे मंदिर वेण्णा नदीच्या दक्षिण काठावर,
कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमस्थानावर आहे. ते मंदिर सातारा
गॅझेटिअरनुसार १७३५ मध्ये श्रीपतराव पंत प्रतिनिधी यांनी बांधले. मंदिराचे
बांधकाम दगडी आहे. नदीच्या बाजूने प्रवेश असलेल्या मंदिराला प्रशस्त दगडी
पायऱ्या आहेत. तारकाकृती असणाऱ्या त्या मंदिराची गर्भगृह, अंतराळ आणि
सभामंडप अशी रचना आहे. गर्भगृहातील शिवपिंडीवर पितळेचे आवरण आहे.
गर्भगृहाच्या उंबरठ्यावर कीर्तिमुख कोरलेले आहे.
अंतराळ चार
स्तंभांवर आधारलेले असून दोन अर्धस्तंभ व दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप
तिन्ही बाजूंनी मोकळा आहे. देवकोष्टकात डाव्या बाजूस गणपती आणि उजव्या
बाजूस महिषासुरमर्दिनी यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात मोठी घंटा आहे.
मुख्य मंदिरावर विटांचे शिखर असून त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे.
शिखराला अनेक देवकोष्टके आहेत. मंदिरासमोर नंदीमंडप आहे, त्यावर अष्टकोनी
शिखर आहे.
मंदिराच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला ओवऱ्या आहेत. त्याचा
उपयोग यात्रेकरूंना राहण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी होतो. कृष्णा-वेण्णा
उत्सव दरवर्षी माघ महिन्यात होत असतो. ते मंदिर राज्य संरक्षित स्मारक आहे.
मंदिराच्यासमोर कृष्णा नदीच्या काठावर छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी
ताराराणी यांच्या समाधी आहेत. त्या समाधी पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्यावर
पाण्याखाली जातात. (या समाधी नक्की कोणाच्या याबद्दल दुमत आहे)
नदीच्या पूर्व तीरावर तिथक्षेञ दक्षिण काशी क्षेत्र माहूली आहे तर
पश्चिमेचा काठ संगम माहूली या नावाने ओळखला जातो . छ ऱाजाराम महाराजांच्या
काळात कोथा प्रभूणे यांनी क्षेत्र माहुली हे गाव वसवीले अशी एक नोंद
गॅझेटीअर मध्ये आहे. असे असले तरी त्याहूनही प्राचीन वसाहतीचे पुरावे या
गावात आहेत . संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली. शाहू
महाराज काही धार्मीक विधी करण्यासाठी माहुलीस आले असता त्यांना ब्राम्हण
उपलब्ध झाला नाही .मग ते विधी त्यांच्या बरोबर आलेले श्रीपतराव
पंतप्रतीनीधीनी केले .त्याबद्द्ल शाहू महाराजांनी त्यांना एक चाहुर म्हणजे
जवळ पास शंभर एकर इतकी जमीन दान दिली .पंतप्रतीनीधींनी देखिल या संधीचे सोन
केल .कृष्णा-वेण्णेच्या पश्चिम काठावर गाव वसवून संस्कृत वेद अध्ययनास
प्रोत्साहन दिले ,नदीच्या काठावर अतिशय देखणे घाट, मंदिरे बांधली .
माहूलीच्या दोन्ही काठावर मिळून दहा-बारा मंदिरे आहेत .यातील संगम माहुली
गावात आत शिरताना कमानीतून उजव्या बाजूस जे मंदिर व घाट दिसतो ते
सगुणेश्वराचे मंदिर .१८६५ च्या सुमारास सातारच्या राजघराण्यातील छ.
शहाजीराजे यांच्या पत्नी सगुणाबाई ऊर्फ़ आईसाहेब यांनी हा घाट व मंदिर
बांधले. १५० वर्षे नंतरही इथला घाट , ओवर्या आजही खुप चांगल्या स्थितीत आहे
.
मराठा स्थापत्य शैलीत संपूर्ण दगडात बांधलेले मंदिर त्यापूढचा
लाकडी मंडप सातारच्या राजघराण्याच्या उत्तम देखरेखीत असल्याने खुप चांगल्या
स्थितीत पहावयास मिळतो .या मंदिरापासून थोड पुढे गेल्यास रस्त्याच्या
डाव्या बाजूस काही जिर्ण समाध्या पहायला मिळतात .त्यावरील कोरीवकामातील
राजचिन्हे या समाध्या राजघराण्यातील व्यक्तींच्या असाव्यात याची साक्ष
देतात .यांच्या समोरच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक श्वानाचे शिल्प बसवलेली
चौथरा दिसते .उपलब्ध माहिती नुसार ही छ.शाहूमहाराजांचा “खंडया” नावाचा एक
श्वान होता त्यांची समाधी आहे .याच खंड्याने वाघापासून छ. शाहू महाराजांचे
प्राण वाचवले असा इतिहास आहे .
नदीकडे जाणार्या याच रस्त्यावर अतिशय
प्रशस्त अशी राजचिन्हांकीत समाधी आहे .ही समाधी छ. शहाजी ऊर्फ आप्पासाहेब
महाराजांची आहे . या समाधीच्या बाजूला रथखाना आहे . कृष्णा वेण्णामाईच्या
यात्रेच्या वेळी हाच रथ वापरला जातो .या रथोत्सवासही सुमारे ३०० वर्षाची
परंपरा आहे .याच परीसरात सन १७३० ते १७९० या काळात बांधलेली भैरवनाथ
मंदिर,कृष्णाबाई मंदिर, कृष्णेश्वर मंदिर अशी लहान मोठी मंदीरे आहे.
इथूनच
पुढे गेल्यास अतिशय सुंदर अशी दिपमाळ दृष्टिस पडते .या दिपमाळीकडे चालत
गेल्यास आपण पोहोचतो श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात .
माहूलीतील हे एकमेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे.अतिशय
देखणे असे हे मंदिर १७३४ साली श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी बांधले .मंदिर
हेमांडपंथी स्थापत्य शैलीतले आहे. या मंदिराची संरक्षक भिंत सात कोणी आहे.
सर्वसाधारण बांधकामात ती अष्टकोणी , षटकोणी आकाराची असते . मुख्य
मंदिराच्या समोरच शंकराचे वाहन नंदी चे दगडात कोरलेले सुंदर शिल्प आहे.
मंदिराच्या सभागृहात एक मोठी पितळी घंटा बांधली आहे. देव कोष्टकात गणेश आणि
महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. गाभाऱ्यातील दगडी शिवलिंगावर पितळी आवरण
चढवलेले आहे. मंदिरासमोरच भव्य दीपमाळा आहे जी अखंड दगडातून बनवलेली आहे.
महाशिवरात्र, दिवाळी यावेळी इथे दीपोत्सव असतो. मंदिराचे शिखर वीट
बांधकामात बनवलेल आहे . ऊन वारा पाऊस यांना तोंड देत आजही ते सुस्थितीत
असलं तरी त्याला संवर्धनाची गरज आहे. त्यावर वाढलेल्या वड, पिंपळ सारख्या
झाडांची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. मंदिराच्या प्रांगणात, येणाऱ्या
भाविकांसाठी किंवा वाटसरू साठी ओवऱ्या आहेत. एकूणच मंदिराचा थाट रुबाबदार
आहे.
मंदिराचा आवार साधारण पंचकोनी असून मंदिराच्या पश्चिमोत्तर
बाजूस ओवर्या आहेत तर लागूनच पूर्व बाजूला अष्टकोनी नगारखान्याची वास्तू
आहे . मुख्यमंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केले असून शिखर चूनेगच्ची
बांधकामाने सजवले आहे .मंदिराच्या गर्भगृहाचे बाह्यांग तारकाकृती असून
मंदिराचा मुखमंडप ,स्तंभ रचना पाहीली असता 12-13 व्या शतकातील यादव कालीन
मंदिराची आठवण होते .मंदिराच्या समोर स्वतंत्र नंदी मंडप आहे .यातील नंदी
सुध्दा अतीशय सुबक आहे. नंदी मंडपाच्या पुढे काही अंतरावर नदीकडे उतरत
जाणाऱ्या पायऱ्या व त्या पुढे वाळू खाली दडलेला घाट आहे . या घाटास राजघाट
असे म्हणतात .या घाटाला लागूनच उजव्या बाजूस नदीपात्रात दोन शिवलींग स्थापन
केलेली एक समाधी दिसते.ही समाधी आहे शाहू नगर म्हणजे आपला सातार्याच्या
निर्माते छ. संभाजी महाराजांचे पुत्र छ. शाहू महाराजांची . या समाधीची जागा
नदीपात्रात असल्याने वेळोवेळी डागडूजी करुनही तीचा फारसा उपयोग़ होत नाही .
इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे यांच्या मते याच परीसरात छ. संभाजी
महाराजांच्या पत्नी छञपती महाराणी येसूबाई साहेब यांची समाधी होती .परंतू
खुप प्रयत्न करूनही तीचा ठावठीकाणा लागला नाही .याच वाळवंटात राजघराण्यातील
आणखी काही समाध्या आहेत .पावसाळ्यात नदीला येणार्या पूरा मूळे बर्याचदा या
समाध्या वाळू खाली लुप्त होतात .२००५ च्या सुमारास सातारच्या जिज्ञासा मंच
या संस्थेने राजघराण्यातील जेष्ठ व्यक्ती माजी नगराध्यक्ष छ. शिवाजीराजे
भोसलेस यांच्या सहकार्याने व माजी संग्रहालय अभिरक्षक प.ना.पोतदार यांच्या
मार्गदर्शनाखाली अशाच लूप्त झालेल्या छञपती महाराणी ताराराणी व रामराजे
यांच्या समाध्याचा शोध घेतला होता. श्री आमुतेश्वर मंदिर हे स्वयंभू जागृत
देवस्थान आहे. श्री हरिनारायण मंदिर,श्री व्यंकटेश मंदिर,श्री राम
मंदिर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,श्री परशुराम मंदिर अशी अनेक जागृत
मंदिरे संगम माहुली आहेत.

वरती सांगितल्या प्रमाणे नदीच्या पलीकडे पूर्व काठावरील गावास क्षेत्र
माहुली असे म्हणतात ऩदीला पाणी कामी असल्यास त्याबाजूला नदी ओलांडून जाऊ
शकतो पण पाणी जास्त असल्यास बाहेरून सातारा कोरेगाव रस्त्याने ब्रिटीश
कालीन पूल ओलांडूनच जावे लागते .हेसुद्धा घडीव दगडांनी बांधलेले सुंदर
मंदिर आहे. मंदिराचे नाव रामेश्वर असलं तरी मुख्य मंदिर महादेवाच
आहे.मंदिराच्या समोरच महादेवाचे वाहन नंदी आहे पण या नंदीची मान
गर्भगृहकडे नसून थोडी बाजूला वळलेली आहे. याच्या पाठीमागे पण एक आख्यायिका
आहे. या नंदीची शिंगे सोन्याची होती . एक दिवस ती चोरांनी पळवली. लोकांनी
बराच शोध घेतला तरी चोर सापडले नाहीत. तेव्हा नंदीने चोर कोणत्या दिशेला
गेलेत ते आपली मान वळवून दाखवले. मंदिरा पाठीमागे राम- सीता- लक्ष्मण
यांच्या सुंदर आखीव रेखीव मूर्ती आहेत . दोन दीपमाळा आहेत त्यातील एक
सुस्थितीत आहे. दीप ठेवण्याची जागा सुद्धा चोचीत माळ धरलेल्या पक्षाचं
शिल्प कोरून अलंकृत केली आहे.
इथे पूर्व काठावर जो प्रशस्त घाट दिसतो तो पेशवेकालीन सावकार अनगळांचा घाट म्हणून प्रसिध्द आहे .हा घाट व त्यावरील रामेश्वराचे मंदीर परशुराम नारायण अनगळ यांनी सन १७०८ मध्ये बांधले . हे मंदिर छोटेखानी असले तरी अतिशय सूबक आणि मजबूत बांधणीचे आहे . मंदीराच्या समोर दोन्ही बाजूस दोन दिपमाळा होत्या सध्याला त्यातील एकच शिल्लक आहे .इथला नंदीमंडपही स्वतंत्र असून आतील नंदी अतिशय देखणा आहे. ऩंदीच्या अंगावरील साज ,घूंगूरमाळा अगदी खर्या वाटाव्यात इतक्या रेखिव आहेत .
नंदीवरील शिल्पकारी पहाता इतका देखणा नंदी सातारा जिल्ह्यात दुसरा नसावा
.मंदिराच्या मागील बाजूस पाच कमानींचा मठ असून आतमध्ये राम पंचायतनाच्या
काळ्या पाषाणातील सुंदर मुर्ती आहेत .या मंदिराचे निर्माते सावकार अनगळ हे
पेशवाईतील फार मोठे प्रस्त होते .त्यांना अचानक धनलाभ झाल्याने त्यांनी
त्या पैशातून अनेक मंदीरे बांधली, जिर्णोध्दार केले अशी मान्यता आहे.
अनगळाच्या घाटाशेजारीच नदीपात्रात पुढे पर्यंत आलेला एक अपूर्ण घाट दिसतो
.हा घाट दुसरे बाजीराव पेशव्यानी बांधला अशी माहीती मिळते .त्या वेळच्या
राजकीय धामधूमीत या घाटाचे बांधकाम पुर्ण होऊ शकले नसावे .या घाटाच्या
उजव्या बाजुस बिल्वेश्वराचे मंदिर आहे . हे मंदीर श्रीपतराव
पंतप्रतिनीधीनी १७४२ चा सुमारास म्हणजे पावणे तीनशे वर्षा पुर्वी बांधले
अशी माहीती मिळते .
इथून थोड्या अंतरावर नदीलगतच राधाशंकराचे अगदी छोटेखानी बांधणीचे मंदिर
आहे .हे मंदिर भोरच्या सचिव घराण्यातील ताईसाहेबांनी १८२५ च्या सुमारास
बांधले .याच्या समोरच कृष्णेच्या पश्चिम काठावर संगमेश्वराचे मंदिर आहे
.याच्या समोरच कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम होतो. या मंदिराचा
जिर्णोध्दार श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी १७४२ मध्ये केला अशी माहीती मिळते
.या मंदीराची रचना माहुलीतील इतर मंदिरांच्या मानाने थोडी वेगळी आहे
.विशेषत: नंदी मंडपाच्या पायास असलेला कुर्म पदाचा आकार व कळसाच्या आमलकास
आधार देणारी शृंग हे या मंदीराचे वेगळेपण आहे .या मंदिराच्या शिवलींगावर
दुर्मीळ अशी सुवर्ण शलाका असल्याने यास सुवर्णेश्वर असेही नाव आहे. या
मंदीराच्या घाटाजवळच बनशापूरी नावाच्या एका साधूची व त्याच्या शिष्याची
समाधी आहे .या समाध्या देखिल अतिशय प्रेक्षणीय आहेत . 
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी श्री नरसिंहदेवला डाळ आणि पन्हे हा प्रसाद करतात।
श्री शिरकाईदेवी
निसर्गरम्य मनोहरी दृश्य
श्री
नरसिंह आणी श्री दत्त या देवांचा निवास कृष्णातीरी असतो. श्री नरसिंहाची
बहुसंख्य मंदिरे कृष्णातीरी आहेत. कृष्णा नदीमुळे अनेक लोकांचे जीवन सुजलाम
सुफलाम झाले आहे. सजीवांना जीवन देणारी ही नदी महाराष्ट्रातून वाहत
आंध्रप्रदेश पर्यंत पसरली आहे.
न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या घराचे स्मारकात रुपांतर
क्षेत्रमाहुलीने फक्त हा सुंदर ठेवाच आपल्याला दिलाय असं नसून माणसांच्या रूपातील रत्न सुद्धा या भूमीने दिलेत.
१) रामशास्त्री प्रभुणे - पेशव्यांचे सरन्यायाधीश. आपल्या परखड न्यायासाठी प्रसिद्ध. कोणतीही तमा न बाळगता आपल्या दोषी राजाला त्यांनी देहांताची शिक्षा ठोठावली होती. क्षेत्रमाहुली त्यांचं जन्म गाव येथे त्यांचा घराचं स्मारक केलेले आहे. अवश्य भेट द्यावी.
२) श्रीरंग जाधव - जागतिक कीर्तीचे मल्ल
३) कै. गोविंदरावजी आफळे - राष्ट्रीय कीर्तनकार
४) डॉ. सदाशिव गजानन देव - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणित तज्ञ
पुराण काथांनूसार सूर्यवंशातील राजा भगीरथाने आपल्या पुर्वजांच्या उध्दारासाठी घोर तप करुन गंगेला स्वर्गलोकातून पृथ्वीवर आणले . तिच्या पाण्याच्या स्पर्शाने पुर्वजाना मुक्ती दिली .भगीरथाच्या या पापक्षालन किंवा गंगावतरण या मिथकाचा जनमानसावर पगडा होता की गंगेच्या बरोबरीने जेवढ्या म्हणून नद्या होत्या त्यांचे काठ समाध्या ,स्मृती मंदिरे वा चिरेबंदी घाटाच्या कशिदाकारीने सजून गेले. आदिम काळी मानवी जीवनाचा पाया रचणारे नदी काठ त्याच्या वैराग्य वृत्तीची घाटांनी ,सांस्कृतीक संमृध्दीच्या मंदिरांनी अन कला वैभवाच्या शिखरांनी बहरून गेले .पण आज मितीला मात्र हे सांस्कृतीक वैभव निस्तेज होऊ लागलय. आपल्याच अनास्थेने, प्रदुषणाने हा कला वारसा बकाल होऊ लागलाय . पण जमेची बाजू अशी की इतर ठिकाणांच्या मानाने आपली माहुलीची परिस्थीती अजून तरी चांगलीच आहे आणि तीचे संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या मंदिरात व परिसरात अनेक चित्रपटांचे शुटिंग झाले आहे. गावाजवळून पुणे-मिरज लोहमार्ग गेल्यामुळे माहुली हे सातारा शहराचे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक बनले आहे.
संदर्भ :
१. Govt. of Maharashtra, Maharashtra State Gazetteers: Satara District, Bombay, 1963.
२. Parasnis, D. B. Satara: Brief Notes, Bombay, 1909.
३ .वाडे गढी गडकोट ऐतिहासिक वास्तू इतिहासाचे मूक साक्षीदार
लिंब बारामोटेची विहिर
मानवी वसाहती ह्या जलसंस्कृतीच्या काठावर वसल्या आणि हजारो वर्ष विकसित होत राहिल्या. पाणी ही मानवाची प्रमुख गरज असल्याने पाण्यास "जीवन" हे नाव दिले असावे. नदी, तलाव, तळी, विहिरी ह्या मानवी जीवनातील पाण्याची महत्त्वाची गरज पूर्ण करणारी साधन आहेत, पण प्रत्येक ठिकाणी पाणी उपलब्ध होईलच हे शक्य नसल्यामुळे मानवाने डोंगराच्या उतारादरम्यान तळी निर्माण करणे, गावाशेजारील ओढ्यास बंधारा बांधणे, इत्यादी माध्यमातून पाण्याची उपलब्धता करून आपल्या दैनंदिन जीवनात वापरासाठी व शेतीसाठी नियोजन केल्याचे दिसून येते.
पाण्यासाठी योग्य ठिकाणी विहीर, बारव, आड खोदण्याची परंपरा फार प्राचीनकाळापासून अस्तित्वात आहे. शिवकाळात देखील प्रत्येक किल्ल्यावर पाण्याच्या सुविधेला जाणीवपूर्वक विशेष महत्त्व दिले होते. परकीय आक्रमाकांच्या प्रतिकारासाठी लढाऊ सैन्य, दारुगोळा, शस्त्रास्त्र जसे महत्त्वाचे होते, तसेच अन्नधान्य व पाणी हे आपल्या सैन्याची ताकद होती. शिवकाळात राजमाता जिजाऊ ह्या आपल्या द्वितीय पुत्र छ. शिवाजी महाराजांना घेऊन पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहात होत्या. बाल शिवबासह खेडे बारे येथे त्या वास्तव्यास असताना, शाहजी राजांच्या नावाची पेठ व आंब्याची बाग " शहाबाग" निर्माण केली होती. आब्याच्या बागेला व मानवी वसाहतीस मुबलक पाणी मिळावे म्हणून त्यांनी छोटेखानी धरण देखील बांधले होते. शिवकाळातील आंब्याच्या बागेमुळे आजही हे ठिकाण "शिवापूर बाग" याच नावाने ओळखले जाते. मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडातील आंब्याच्या बागेसाठी पाण्याची व्यवस्था करणारी पहिली कर्तबगार महिला ह्या जिजाऊसाहेब असू शकतात.
इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, याचीच प्रचिती सुमारे शंभर वर्षांनी झाल्याचे इतिहासाने पाहिले आहे. स्वराज्याच्या सातारा गादीचे छत्रपति शिवाजी उर्फ शाहू महाराजांच्या काळात श्रीमंत विरुबाई भोसले या कर्तबगार महिलेने लिंब (शेरी वस्ती.सातारा) येथे कृष्णा नदीच्या लगतच बारा मोटेच्या विहिरीची निर्मिती केली. छ. शाहू महाराज, महाराणी येसूबाईसाहेब व इतर कुटुंबातील सदस्य मोगल बादशहा औरंगजेबाच्या कैदेत असताना बादशहाने छ. शाहूला मुलगी दाखविण्यासाठी रूपवान अशा विरूबाईस पाठविले. पुढे शाहू महाराजांचे सगुणाबाई व सकवारबाई यांच्याशी विवाह झाले मात्र विरूबाई या उपस्त्री म्हणूनच त्यांच्याकडेच राहिल्या. २० फेब्रुवारी १७०७ मधे अहमदनगर जवळच असलेल्या भिंगार येथे औरंगजेबाचा नैराश्य व वृद्धापकाळाने मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे त्याच्या मुलांमधे दिल्लीच्या गादीसाठी यादवी सुरू झाली. शहाआलम उर्फ बहादुर शहा या औरंगजेबाच्या मुलाने मुघलांच्या गादीचा वारस म्हणून ५ मार्च १७०७ ला स्वतःस राज्यारोहन करून मुघल राजधानी दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. परतीच्या वाटेवर असताना दारोहा येथून शाहू महाराजांची काही अटी व शर्थीवर सुटका केली व महाराणी येसूबाईसाहेब, विरूबाई व इतरांना आपल्याबरोबर पुढे दिल्ली येथे नेले. पुढील काळात छ. शाहूंनी सातारा येथे मराठा राज्याची राजधानी निर्माण केली परंतु मातोश्री व इतर कुटुंब कबिला हा मोगलांच्याच ताब्यात दिल्ली येथे होता. या सर्वांना सोडविण्याची संधी दिल्लीच्या कारभारातील प्रमुख असलेल्या सय्यद बंधूंच्या निमित्ताने आली. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी येसूबाईसाहेब, रक्षा बिरूबाई व इतरांना इ. स. १७१९ मधे दिल्ली येथून मोगल कैदेतून मुक्त करून सातारा येथे आणले. अशा या बिरूबाई भोसले यांच्याकडे छ. शाहू महाराजांच्या दरूणी महालाची ( जनानखाना) व्यवस्था होती. सर्व तिच्या आज्ञेत वागत. फत्तेसिंह भोसले यांच्यावर तर तिचे पुत्रवत प्रेम होते. दरूणी महालात खोजा म्हणून असलेला वाणी जातीचा बसवंतराव कासुरडे व बिरूबाई एकाच जातीचे असल्याने त्यांना एकमेकांप्रती विशेष अभिमान होता. बिरूबाई भोसले यांनी लिंब येथे बांधलेल्या विहिरीच्या शेजारीच बसवंतराव कासुरडे याने एक टोलेजंग वाडा बांधला होता, मात्र आजमितीस तो अस्तित्वात नाही. बिरूबाई भोसले यांनी परळी ( सज्जनगड) येथे समर्थ रामदास स्वामींच्या समाधीसमोर आपल्या नावाने भव्य तुळशीवृंदावन व शंभू महादेवासमोर दगडी दीपमाळ स्वखर्चातून बांधल्याची नोंद आढळून येते. लिंब येथील बारा मोटेच्या विहीरीच्या परिसरात सुमारे ३०० आंब्याची बाग लावली होती. या बागेला बारमाही पाणी मिळावे म्हणून इ. स. १७१९ - १७४० च्या दरम्यानच्या कालखंडात ही विहीर तयार करण्यात आली असावी. अष्टाकोनी साठ फूट व्यासाच्या विहिरीस पाणी उपसा करण्यासाठी बारा मोट असल्यामुळे, या विहीरीला "बारा मोटेची विहीर" म्हणून संबोधण्यात येते. हिची खोली १०० फूट व व्यास ६० फूट असून संपूर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. आजही ती सुस्थितीत आहे. बारा महिने या विहिरीला पाणी असते. विहिरीचे बांधकाम कोरीव दगडात आहे. विहिरीचा आकार अष्टकोणी असून एखाद्या शिवलिंगा सारखा भासतो. विहिरीचे दोन भाग आहेत अष्टकोनी आकाराची मुख्य विहीर आणि तिला जोडणारी उप विहिर चौकोनी आकाराची आहे.
सातारा शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर लिंब हे गाव आहे. हे गाव सध्या
संग्रही असलेला ड्रोन द्वारे घेतलेला विहिरीचा फोटो. मुख्य विहिरीचा अष्टकोणी आकार तर उप विहिरीचा चौकोनी आकार
वीरुबाईसाहेबांचा शिलालेखमोटेखालती असलेले शरभ
विहिरीतील स्वच्छ पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊ शकता, परंतु विहीर अतिशय खोल असल्याने काळजी घ्यावी. ज्यांना पोहायला जमत नाही अशांनी पाण्यात उतरू नये.
पुण्यापासून NH4(पुणे-सातारा-बेंगलोर) हायवे वरुण साधारण १००किमी अंतरावर डावीकडे 'लिंब फाटा' लागतो.(हा फाटा अनेवाड़ी टोलनाक्या-पासून 3 किमी पुढे आहे ).हायवेपासुन आत २ किमी आत लिंब गाव असून येथून पुन्हा १ किमी अंतरावर उजविकड़ील बाजुस 'शेरी' नावाचा परीसर आहे. येथेच विहीर पहावयास मिळेल.
अलिकडे सोशल मेडीयाच्या कृपेने हि विहीर प्रसिध्द झालेली असली तरी लिंब गावात असलेला कृष्णा नदीवरचा घाट आणि पेशवेकालीन मंदिरे आवर्जून पहाण्यासारखी आहेत. लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे, ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत. गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम, अगस्त्य, परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात. रामेश्वर, कोटेश्वर, भार्गवरामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्य शैली पाहण्यासारखी आहे. साहित्यिकांच्या भाषेत सर्वसंपन्न आदर्श आणि कवी कल्पनेतलं गाव अशी याची ख्याती आहे.शिवाय लिंब गावात पेरुच्या बागा आहेत.पेरुच्या मोसमात गेल्यास आवर्जून पेरु खावेत.
देखभाल
रवी वर्णेकर हे गृहस्थ आपल्या कुटुंब-कबिल्या सह आज या विहिरिची देखभाल करतात.इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे म्हणजे महाराष्ट्राचे मर्दानी दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आणखी दुसरं काय.एकदा तरी या इतिहासाच्या साक्षीदाराला नक्कीच भेट दया.
माहिती साभार - रवी वर्णेकर ,राहुल धर्माजी बुलबुले आणि रोहित पवार.
धावडशी :-
श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे उपेक्षित कर्मयोगी होते. शाहू छत्रपती, पेशवे, कान्होजी आंग्रे आणि अगदी जंजिरेकर सिद्दीचेसुद्धा गुरू असलेले ब्रम्हेंद्रस्वामी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. सन १६४९ साली विदर्भातील राजूरजवळ असलेल्या दुधेवाडीला त्यांचा जन्म झाला. काशीचे श्री ज्ञानेंद्रसरस्वतीनायक यांनी त्यांना परमहंस दीक्षा दिली. तेव्हापासून ते ब्रह्मेंद्रद्रस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. इ.स. १६९८ साली ते कोकणातील परशुरामक्षेत्री वास्तव्याला आले. कान्होजी आंग्रे आणि बाळाजी विश्वनाथ हे त्यांचे निस्सीम भक्त होते. ताराबाई-शाहू कलहात शाहूंच्या पाठीशी या दोघांनाही उभे करण्यात ब्रह्मेंद्रस्वामींचे मोठेच योगदान होते. छत्रपती, पेशवे, त्यांचे सरदार अशा अनेक मातब्बर व्यक्तींचे गुरू असलेल्या ब्रह्मेंद्रस्वामींचे राजकारणातसुद्धा चांगलेच वजन होते. त्यांनी उच्चारलेले शब्द खरे होतात अशी त्यांची कीर्ती होती. त्यांचे प्रस्थ एवढे होते की एकदा जंजिरेकर सिद्दय़ाचा एक सरदार सिद्दी सात याने चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची नासधूस केली. स्वामींनी त्याचा लढाईत नायनाट होईल असा शाप दिला. जंजिरेकर सिद्दी स्वामींचा भक्त होता. आपल्या सरदाराची चूक त्याला समजली आणि त्याने लुटीची रक्कम तर परत केलीच शिवाय नुकसानभरपाई म्हणून चिपळूणचे परशुराम मंदिर पुन्हा बांधून दिले. पुढे चारच वर्षांनी मराठय़ांशी झालेल्या लढाईत सिद्दी सात मारला गेला. या प्रसंगाने उद्विग्न झालेले स्वामी सातारा या छत्रपतींच्या राजधानीच्या अगदी जवळ असलेल्या धावडशी गावी येऊन स्थायिक झाले. सन १७४५ मध्ये वीरमाडे या गावी ब्रह्मेंद्रस्वामींचे निधन झाले.श्रीब्रह्मेंद्रस्वामी हे छत्रपती शाहू महाराजांचे परम दैवत! त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख रुपये खर्चून धावडशी गावातील स्वामींच्या समाधिस्थानावर त्यांचे मंदिर उभारण्यात आले आहे.त्यालाच लागून चार बांधीव तलाव आहेत. त्यांचा काळही अडीचशे-तीनशे वर्षांचा असल्याचं सांगितलं जातं. तीन मोठ्या आकाराचे, तर चौथा लहान, हौदासारखा. हे चारही तलाव एका साखळीसारखे एकमेकांना जोडलेले आहेत. प्रत्येक तलावाचा पाण्याचा वापर ठरलेला. सर्वांत वरचा तलावाचं पाणी देवाशी संबंधित स्वयंपाकासाठी, पुढच्या तलावाचं पिण्यासाठी, मग अंघोळीसाठी, शेवटी कपडे धुण्यासाठी. त्यानंतर हे पाणी ओढ्यात जातं आणि शेतीसाठी वापरलं जातं.या तलावांची गंमत म्हणजे इथलं पाणी एकाच दिशेनं वाहतं- पहिल्या तलावाचं दुसऱ्यात, दुसऱ्याचं तिसऱ्यात.
परशुरामाचे निस्सीम भक्त असलेल्या या स्वामींनी धावडशीला दोन लाख
रुपये खर्चून भार्गवराम मंदिर उभारले आहे. खास मराठा स्थापत्यशैलीचे
धावडशीचे भार्गवराम मंदिर मोठे पाहण्यासारखे आहे. जनावरे आणि माणसांसाठी
पाण्याची स्वतंत्र केलेली सोय आवर्जून पाहावी अशी आहे. मंदिरावरील मूíतकाम
सुंदर आहेच, पण त्यातही विष्णूचे दशावतार खास पाहण्याजोगे आहेत. मंदिरात
परशुरामाची सुंदर मूर्ती असून एक शिलालेखही पाहायला मिळतो. 
मंदिराची रचना आणि बांधकाम सुरेख व रेखीव आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या शिरोभागी श्रीब्रह्मेंद्रस्वामींचे गुणगान गाणारा सतरा ओळींचा शिलालेख आहे. मंदिर उत्तराभिमुख असून, त्याचे प्रशस्त असे तीन गाभारे आहेत आणि पुढे, भव्य असा सभामंडप आहे. मुख्य मंदिर घडीव अशा दगडी उंच चौथऱ्यावर उभारलेले आहे. दगडांच्या सांध्यामध्ये शिशाचा वापर करण्यात आला आहे. मंदिरावर दोन गगनचुंबी शिखरे आहेत. त्यावर दोन उंच कळस आहेत. मंदिरावर सर्व बाजूंनी रेखीव पद्धतीने दशावतार कोरलेले असून, शिखरावर ठिकठिकाणी वेलपत्री नक्षिकाम व पौराणिक रंगीत चित्रे साकारलेली आहेत. त्या चित्रांवरील भावमुद्रा, वेचक प्रसंग व उत्कृष्ट रंगसंगती यांत शिल्पकारांचे व कलाकारांचे कौशल्य दिसून येते. मंदिराच्या पुढील शिखरावर चौकोनी आकाराचे आकर्षक मनोरे आहेत. त्यांच्या रचनेतील विविधता, कल्पकता व प्रमाणबद्धता -त्यांतील हस्तलाघव उल्लेखनीय आहे. मंदिराचा आधुनिक काळात जीर्णोद्धार करण्यात आला. त्यायोगे मंदिराच्या शोभेत भर पडली आहे.
स्वामींचे उपास्य दैवत - श्री परशुराम तथा भार्गवराम. त्यांची काळ्याभोर पाषाणाची रेखीव मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आहे. पेशवाईतील प्रख्यात कारागीर बखतराम यांनी ती मूर्ती घडवली असून तो शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. श्री भार्गवरामाच्या दोन्ही बाजूंस त्यांचे बंधू काळ व काम यांच्या साडेतीन फूट उंचीच्या पितळेच्या सुबक मूर्ती आहेत. त्या मूर्तींना उत्सवमूर्ती असे संबोधतात. मूर्तींसमोर श्रीब्रह्मेंद्रस्वामींची समाधी आहे. श्री भार्गवरामांजवळ दोन टांगत्या समया असून, समाधीजवळ उंच अशा पितळेच्या दोन घाटदार समया आहेत. परिमल, अखंड नंदादीप आणि पूजोपचार यांमुळे गाभारा शांत, निर्मळ, सुगंधी व शुचिर्भूत भासतो. मुख्य गाभारा प्रशस्त असून, त्याच्या प्रवेशद्वारावर उत्तम शिल्पाकृती दगडात कोरलेल्या आहेत. उजेडासाठी दोन्ही बाजूंला दगडात कोरलेल्या जाळ्या आहेत.
गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला उत्तराभिमुखी, पेशव्यांनी बसवलेली शेंदरी रंगाची सर्वांगसुंदर अशी गणेश मूर्ती आहे. डाव्या बाजूला उत्तराभिमुखी अष्टभुजादेवीची चित्तवेधक मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या मध्यभागी दगडात कोरलेले मोठे कासव आहे. ते धावडशीकरांचे न्यायपीठ आहे. खरेखोटे करण्यासाठी त्या कासवावर उभे राहून श्री स्वामींची शपथ घेण्याची प्रथा आहे. गुन्हेगार अशी शपथ घ्यायला धजावत नाही. दालनाच्या दक्षिण बाजूस औंध संस्थानाचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांनी भेट दिलेला संगमरवरी दगडातील कलात्मक शिल्प असलेला अडीच फूट उंचीचा आकर्षक पुतळा आहे. दालनाच्या वरभागी आरतीच्या वेळी वाजवले जाणारे दोन मोठे नगारे व मधुर नाद उत्पन्न करणाऱ्या घंटा आहेत. श्रींची आरती भक्तगणांना मंत्रमुग्ध करते तर सुरेल सनईचौघडा साक्षात नादब्रह्माचा आनंद देतो.
मुख्य मंदिराच्या पुढील बाजूस भव्य सभामंडप असून, त्याचे बांधकाम लाकडी कलाकुसरीचे आहे. शंभर वर्षांपूर्वी मंडपाचे बांधकाम झाले असून, ते उत्तम स्थितीत आहे. लाकडे गलथे आणि महिरपी यांनी सभामंडपास शोभा आलेली आहे. मंडपास कडीपाट असल्याने सभामंडप शांत व शीतल बनलेला आहे. उजेडासाठी ठिकठिकाणी जाळ्या व मोठमोठे दरवाजे आहेत. सभामंडपातच मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर श्रीब्रह्मेंद्रस्वामींचा मोठा फोटो आहे. शेजारी छत्रपती शाहू महाराज व राणी लक्ष्मीबाई यांची मनोवेधक सुंदर चित्रे आहेत. तसेच, सभामंडपात अनेक संत सत्पुरुषांच्या तसबिरी लावल्या आहेत. सभामंडप हंड्या व झुंबरे यांनी सुशोभित आहे.
मंडपाच्या पूर्व बाजूंस तळघरवजा दगडी भुयार असून, त्यात शिवलिंग व नंदी अशी दोन दैवते आहेत. शेजारीच, कोपऱ्यात लहानसे जलकुंड असून, भुयारात अतिशय थंड वाटते. सर्वत्र दगडी फरशी आहे. भुयाराची खोली एवढी आहे, की शेजारी खोल असलेल्या तळ्यातील पाणी जलकुंडात येते व त्यानेच शिवलिंगास स्नान घडते. ते भुयार म्हणजे स्वामींची स्नानसंध्या! ध्यानधारणा व पूजाअर्चा यांनी मंगलमय बनलेले पवित्र असे ते शिवमंदिर होय. भुयारात उजेड येण्यासाठी पूर्व बाजूंस मोठी जाळी असून, त्यातून तळ्यातील निळ्याभोर पाण्याचे दर्शन होते. भुयारात जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
भार्गव मंदिराचे सर्व आवार दगडी फरशीयुक्त असून, शेजारी पुष्पवाटिका, वृंदावने व सुबक दगडी बांधकामातील सुंदर अशी चार तळी आहेत. त्यांपैकी शिवमंदिरास लागून तीर्थाचे तळे आहे. तळ्यातील सुंदर निळेभोर पाणी व सुरेख, रेखीव तळ्याचे दगडी बांधकाम मनाला आनंद देते. तळ्यास लागून पूर्व बाजूस प्रशस्त उमाउद्यान आहे. तेथे विविधोपयोगी अशी सुंदर वास्तू उभी आहे. त्यास लागून ग्रामदैवत श्री वाघजाई देवीचे श्रीस्वामींनी बांधलेले नमुनेदार मंदिर आहे.
मंदिराच्या परिसरात जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांची व देवस्थानाची कचेरी आहे. त्या ठिकाणी जवळपास तीनशे वर्षांतील जुनी कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. कचेरीस लागून मोठे स्वयंपाकगृह असून, हजारोंच्या पंक्ती उठतील अशी मोठमोठी भांडीकुंडी व सर्व सोयी आहेत. समोर भलेमोठे बांधकाम असलेली धर्मशाळा व सुसज्ज असे अतिथिगृह आहे. त्याच धर्मशाळेत उत्सवातील प्रसादपंक्ती होत असत. गावभोजन, विविध कार्यक्रम, सभासंमेलने यांसाठीही धर्मशाळेचा उपयोग होत असे. स्वामींचे स्मारक व पुण्यस्मरण म्हणून त्या वास्तूत ‘श्री ब्रह्मेंद्रस्वामी हायस्कूल’ सुरू करण्यात आले आहे. जणू काही तो परिसर विद्येचे माहेरघर बनू पाहत आहे.
श्रीब्रह्मेंद्रस्वामी म्हणजे धावडशीकरांचे आराध्य दैवत. श्रावण शुद्ध नवमी ही स्वामींची पुण्यतिथी. श्रावण शुद्ध प्रतिपदा ते श्रावण शुद्ध नवमी असा नऊ दिवस स्वामींचा मोठा उत्सव साजरा होत असतो. कथाकीर्तने व टाळमृदुंग यांनी परिसर दुमदुमून जातो. गाव आनंदाने व उत्साहाने फुलून जातो. बाहेरून खूप लोक उत्सवासाठी येत असतात. गुळांमपोळी (गुळांबा पोळी) हे त्या भोजनातील वैशिष्ट्य आहे.
धावडशी हे एक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र, पाठीशी नयनरम्य मेरुलिंगाची पर्वतराजी, उदात्त असे भव्य भार्गवमंदिर आणि शांत, प्रसन्न, पवित्र असे वातावरण. श्रींचे दर्शन व प्रसाद यांमुळे तेथे येणारा प्रत्येक भाविक भरून पावतो. त्याचे मन आनंदाने फुलून जाते. तेथे सत्पुरुषांच्या व लोकोत्तर देवेश्वरांच्या मठातील अद्भुत आध्यात्मिक प्रचंड शक्तीचा साक्षात्कार होतो आणि स्वामी या तीर्थक्षेत्रात विशेष रुपाने वास करत असल्याचा प्रत्यय येतो.
स्वामी असती भगवंत | तयासी असे दंडवत ||
घेईल दर्शन जो जो | तोचि एक भाग्यवंत ||
झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे माहेरचे गाव म्हणजे हेच धावडशी होय. सातारा-वर्ये मार्गे धावडशी हे अंतर जेमतेम २५ कि.मी. इतके भरते. गावच्याच मागे मेरुलिंग नावाचा डोंगर असून त्यावर असलेले मंदिर, कोरीव खांब आणि मंदिरासमोरील कुंड बघण्यासारखे आहे. इथून सातारा, अजिंक्यतारा किल्ला, वेण्णा नदी, मेढा, यवतेश्वर, सज्जनगड, चंदन-वंदन किल्ले, जरंडेश्वर असा सारा परिसर अतिशय रमणीय दिसतो.श्रीब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर हे महाराष्ट्रायतील जनतेच्या विस्मृतीत गेलेले संत. पण त्यांचे कार्य आणि त्यांचे निस्सीम भक्त यांनी त्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवले आहे.
पाटेश्वर मंदिर व लेणी ( देगाव -सातारा)

सातारा शहराच्या जवळ असूनही येथे लोकांची फारशी वर्दळ नसते. त्यामुळे या डोंगरवरील निसर्ग अजूनही शाबूत आहे. त्यामुळे येथे अनेक पक्षीही पाहायला मिळतात. त्यामुळे सातार्याला जाणार्या प्रत्येक निसर्गप्रेमीने अजिंक्यतारा, कासचे पठार, बामणोली याबरोबर पाटेश्वरलाही आवर्जून भेट द्यावी.

वर चढत जाणार्या पायर्या , वाटेत दिवे ठेवण्यासाठी बाजूच्या भिंतीमध्ये खोदलेल्या खाचा आणि मधे मधे भिंतीच्या आतल्या बाजूच्या मूळच्या कातळात कोरलेल्या शिवपिंडी अशी या मार्गाची रचना.



शंकराची लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही स्वरूपातील मूर्ती ह्या मंदिरात दिसतात. पाटेश्वराचे मुख्य शिवलिंग हे लिंगरूपात तर बाजूच्याच एका लहान मंदिरात शंकर मूर्तरूपात कोरलेला आहे.




विशाल शिवलिंग
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८ व्या सूक्तातील तिसर्या श्लोकात याचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे आणि ही मूर्ती अगदी त्याबरहुकूम बनवण्यात आली आहे.
चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||
अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.
अग्नीवृष
हा
लेणीसमूह बघून थोडे अजून पुढे जाताच अजून एक लेणीसमूह दृष्टीस पडतो तटांनी
बंदिस्त केलेले प्रवेशद्वार, प्रवेशद्वारातच कोरलेला नंदी आणि आतल्या
बाजूला तीन गुहांचा समूह अशी याची रचना. हा नंदी पण वेगळ्याच तर्हेने
कोरलेला आहे. मूर्ती अतिशय देखणी आहे पण जणू काही हा नंदी कुठे पळून जाऊ
नये म्हणून त्याला साखळदंडाची अतिशय घट्टपणे वेसण घातलेली आहे. भक्तीपेक्षा
हा प्रकार भयाचाच जास्त वाटतो.
लेणीसमूहाच्या प्रवेशद्वारातील नंदी
शिवलिंगाची पट्टी कोरलेले प्रवेशद्वार
चतुर्मुख शिवलिंग
घट असलेले शिवलिंग
एका दगडावर दोन शिवलिंगा ऐवजी दोन कलश दिसतात, ती 'कुंभेश्वर' किंवा 'चतुर्मुख लिंग' या नावाने संबोधले जाते. 
लेणीसमूह एका वेगळ्याच कोनातून
यापुढील वर्हाडघर हा ३ लेण्यांचा समुह आहे. येथे शिवपार्वती विवाह समयी लग्नाला आलेले सर्व देवदेवता व-हाडी राहिले होते अशी दंतकथा सांगितली जाते. ह्या व-हाडघरच्या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला असलेली एकमेव दगडी दीपमाळ अखेरच्या घटका मोजत आहे कारण दिपमाळेचा वरपासून मध्यापर्यंचा अर्धा भाग जमीनदोस्त झाला आहे. व-हाड घरात प्रवेश करताना ' सवत्सकामधेनू'चे शिल्प प्रथम दृष्टीस येते. जमीनीवर सुंदर नंदी आहे असून त्याच्या गळ्यातील घंटेखाली लाडूने भरलेले भांडे दर्शविले आहे. आतील व्हरांड्यात गेल्यावर एका भल्या मोठ्या वाड्यात गेल्याचा भास होतो. मधील व्हरांड्यातून निरभ्र निळे आकाश दिसते तर तीनही बाजूला बांधकाम केलेले आहे तर एका बाजूला असलेल्या खडकातील लेण्या आहेत. समोरच्या खडकात खोदीव दालनातील शिवलिंग पाहून तत्कालीन शिवभक्तीची कल्पना मनाला सुखावते. मध्यभागी भव्य शिवलिंग आहे तर यावर लहान लहान शिवलिंग कोरलेल्या असून एकाच दर्शनात शेकडो वेळा शिवदर्शन घेतल्याचे पुण्य लाभते. आत प्रवेश केल्यावर डावीकडे विविध मूर्तीच्या पाठीमागे शेकडो शिवलिंग कोरलेल्या लेण्याच्या भिंतीचा भाग आहे.
पाटेश्वरातील सर्वात जास्त अद्भूत शिवलिंगे ह्याच लेणीसमूहात साकारली गेली आहेत. ह्या लेणीसमूहातील तीनही लेण्यांची वैशिष्ट्ये म्हणजे इतल्या गुहांच्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टीऐवजी शिवलिंगे कोरलेली आहेत. लिंगायतांच्या देवळांत हा प्रकार प्रामुख्याने पाहावयास मिळतो. गुहांच्या बाहेरील बाजूस दोन वेगळ्या प्रकारची शिवलिंगे कोरलेली दिसतात त्यातले एक म्हणजे चतुर्मुख शिवलिंग. शिवलिंगावर चार दिशांत कोरलेल्या चार मस्तकांनी हे शिवलिंग बनलेले आहे. ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य यांचे प्रतिक. तर याच्या बाजूलाच असलेले दुसरे शिवलिंग याहूनही अद्भूत. याच्या शाळूंकेवर लिंगाऐवजी चक्क दोन उपडे घटच कोरलेले दिसतात. तर त्याच्या बाजूने काही अयोनी स्वरूपातील लिंगे कोरलेली दिसतात.
ही शिवलिंगे बघून उजवीकडच्या गुहेत गेलो असता अजूनच काही वेगळ्या प्रकारची शिवलिंगे दृष्टीस पडतात. ही गुहा त्रिस्तरीय रचनेची जणू काही एकात एक तीन गुहा खोदलेल्या आहेत. हा भाग पूर्ण अंधारी आहे. सुरुवातीच्या भागात दोन चौकोनी शाळूंकांवर शिवपिंडीच्या जागी कमलफुलांची सुंदर रचना दिसते तर अंधारात जरा डॉळे सरावल्यावर ह्याच्याच बाजूच्या एका भिंतीत एक आगळी मूर्ती कोरलेली दिसते. बैलाच्या पाठीवर चक्क एक शिवलिंगच कोरलेले दिसते. जणू हा नंदी शंकराला आपल्या पाठीवर वाहून नेत आहे. ह्याच गुहेच्या आतल्या भागात एका शिवलिंगाच्या भोवती शाळूंकेवर अयोनी लिंगे कोरलेली आहेत तर दुसर्या एका शिवपिंडीचे लिंगच अयोनी लिंगानी भरून गेलेले दिसते. तर अजून एका बाजूला यज्ञवेदीसारखे एक सहस्त्र शिवलिंग दिसते त्यावरही हजार अयोनी लिंगे कोरलेली आहेत

कमलफुलाचे लिंग व शिवलिंगवाहू नंदी

अजून काही वेगळे प्रकार
सहस्त्र लिंग
त्या
गुहेतून बाहेर येऊन डावीकडच्या एका गुहेत तर अजून वेगळीच गंमत. ह्या गुहेत
विविध तर्हेची शिवलिंगे एकामागोमाग एक अशी रचलेली आहेत. काही शिवलिंगांवर
लिंगाऐवजी दोन खड्डे तर काहींवर पिंडी मात्र ह्या सगळ्या शिवपिंडीच्या
सभोवतीने असंख्य लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.त्याचप्रमाणे
दशवतार, अष्टमातृका, माहेश्वरी, नवग्रह, शेषशायी विष्णू, चामुंडा,
कार्तिकेय इत्यादी शिल्पे कोरलेली आहेत. या लेणी समुहास " बळीभद्र " लेणी
समुह म्हणतात. या दुसऱ्या लेणीसमूहापासून तिसऱ्या लेणीसमूहाकडे जाताना
दुसऱ्या लेणीसमूहाशेजारीच लहान वटेश्वर मंदिर आहे.
डावीकडच्या गुहेतील शिवलिंगे

तेथीलच एक शिवलिंग
ही गुहा बघून आता समोरच्या मुख्य गुहेत प्रवेश केला. ह्या गुहा अत्यंत रहस्यमय, सर्वात मोठी आणि शिवलिंगांचे विविध प्रकार असलेली. इथे मध्ये प्रमुख असलेले भलेमोठे शिवलिंग, त्यावर कोरलेली अयोनीज शिवलिंगे, आणि बाजूच्या तीन्ही भिंतीवर प्रत्येकी एक एक असे तीन शिल्पपट कोरलेले शिवाय बाजूला इतर शिवलिंगेही आहेतच. शिवलिंगाचे हे प्रकार मात्र अष्टोत्तरशत किंवा सहस्त्र लिंगाचे. यांमध्ये शाळूंकेवर असलेल्या शिवलिंगात १०८ किंवा १००० लहान लहान लिंगे कोरलेली आढळतात. येथेच बाजूला एक धारालिंगही दिसते. यामध्ये शिवलिंगावर उभ्या पन्हाळ्या पाडलेल्या असतात जेथे दोन नलिका मिळतात तेथे साहजिकच धार उत्पन्न होते म्हणून हे धारालिंग अथवा नलिकालिंग.
बाजूच्या भिंतीवरील एका शिल्पपटामध्ये देवीचे-पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे. तर त्याभोवती लहान लहान अयोनीज लिंगे कोरलेली आहेत. ती आहेत एकूण ९७२. देवीची १०८ सिद्धपीठे आणि प्रत्येकी पीठाची ९ वेळा पूजा करायचा असलेला प्रघात बघता हा आकडा बरोबर येतो तो ९७२ म्हणजे हे प्रतिक आहे पार्वतीपूजेचे. मुख्य शिवलिंगाच्या पाठीमागच्या शिल्पपटांत विष्णूमूर्ती कोरलेली असून त्याभोवती १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. विष्णूसहस्त्रनामाचे एक प्रतिक तर उजवीकडच्या भिंतीवरील शिवलिंगपटांत मध्यभागी सूर्याची मूर्ती कोरलेली असून त्याभोवतीने सुद्धा १००० शिवलिंगे कोरलेली आहेत. सूर्यसहस्त्रनामाचे हे प्रतिक. तर दोन कोनाड्यांमध्ये शंकर आणि ब्रह्मदेव मूर्तरूपात कोरलेले आहे. हे एक प्रकारे शिवपंचायतनच. याशिवाय मंदिरातल्या एका स्तंभावर शिवदंड तर दुसर्या एका स्तंभावर नाग कोरलेला असून त्याभोवतीही विविध प्रकारच्या अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे. एका स्तंभावर देवनागरीतील एक बराच अस्पष्ट झालेला एक शिलालेख आहे. तर मध्यभागी असलेल्या प्रमुख शिवलिंगावर एकूण १००५ लहान लहान लिंगे कोरलेली आहेत. हे आहे सहस्त्रलिंग. खूपच अद्भूत आणि दुर्मिळ प्रकार

मुख्य गुहा त्यामधील सहस्त्रलिंगासह, मागच्या बाजूला एक शिवलिंगपट

शिवलिंगपट

सूर्यमूर्ती असलेला शिवलिंगपट

शिवदंड

नागप्रतिमा
दगडी खांबावर शिवलिंगातून नाग प्रतिकृती कोरलेली आहे म्हणजेच 'कुंडलिन्' आहे.

गुहेच्या मध्यभागातील प्रमुख सहस्त्रलिंग
याशिवाय लेण्यात देवनागरी लिपीतील (संस्कृत मधील) शिलालेख आहेत, परंतू पुसट झाल्यामुळे शिलालेख वाचता येत नाहीत. बाजूलाच एक समाधीवजा बांधकाम दिसते. त्याच्या बाहेर गरुडाचे आणि मारुतीचे एक शिल्प ठेवलेले दिसते.
खरे पाहता पाटेश्वरचा हा परिसरच अशा गूढरम्य शिवलिंगांनी नटलेला आहे. काही शिवलिंगांचे अर्थ कळण्यासारखे तर बरेचसे अनाकलनीयच. पण एक मात्र आहे देवळांत नेहमीसारखी जाणवणारी प्रसन्नता इथे मात्र जाणवत नाही. एकाकी, निर्जन परिसर, घनदाट झाडी, दाट काळोख्या गुहा, वापरात नसल्याने येणारा कुबट वास, तंत्रपूजेसाठी बनवलेली शिवलिंगे यामुळे इथे फिरताना काहीसे दडपणच जाणवते.
परळीचे शिवमंदिरे
सातारा
शहराच्या नैऋत्येस ९ किमी. सज्जनगड च्या पायथ्याशी ' परळी ' हे प्राचीन
गाव आहे. या गावाच्या बाहेर काही अंतरावर हेमाडपंथी बांधणीची दोन प्राचीन
शिवमंदिरे आहेत अभ्यासकांच्या मते त्याची बांधणी यादव काळात १३ व्या शतकात
झाली असावी .
शेजाशेजारी
असणाऱ्या या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पूर्णपणे पडझड
झालेली आहे. त्यातील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे .याला विरुपाक्ष
मंदिर म्हणतात.
त्याच्या
शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्यापैकी स्थितीत आहे. त्याची रचना
सभामंडप , अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे .अंतराळ चार स्तंभांवर आधारलेले असून
त्यांतील दोन पूर्णस्तंभ आहेत. सभामंडप सोळा स्तंभांवर आधारलेला असून
त्यातील चार पूर्णस्तंभ आहेत. सभामंडपात दोन देवकोष्टके आहेत, पण ते रिकामे
आहेत. याला केदारेश्वर मंदिर म्हणतात.
सभामंडपात अत्यंत सुंदर आणि रेखीव नंदी आहे.
पैकी
दक्षिणेकडचे मंदिर बहुधा आधी बांधलेले असावे. आता याची खुप पडझड झाली आहे.
कदाचित याची मोडतोड विजापुरच्या किंवा मोघलांच्या आक्रमणात झाली असावी.
मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. त्यामधील काही आभासी
शिल्पे आहे..
मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या आणि उजव्या बाजूस ' मिथुनशिल्पे ' ( कामशिल्पे ) कोरलेली आहेत.
मंदिरासमोर
एक कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे.
त्याच्या शेजारी एक पंचमुखी शिवलिंग आहे. हे सदाशिवाचे अव्यक्त रूप आहे ,
सदाशिव म्हणजे सद्योजत , वामदेव , अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या
पाच अवस्था दाखवणारी ही प्रतिमा आहे . या पंचावस्थिती म्हणजे पृथ्वी, आग,
तेज, वायू, व आकाश.
शिवाच्या सदाशिव रूपातील अनेक मूर्ती उपलब्ध आहेत, त्या व्यक्त स्वरूपातील आहेत . येथे ही अव्यक्त रूपातील आहे.
मंदिराच्या समोरील परिसरात एक मान तुटलेला नंदी आहे.
एका
चौथर्यावर शिवलिंग व शेजारी गणेशाची मुर्ती आहे. आम्ही गेलो होतो तो दिवस
मंगळवार असल्याने कोणीतरी गजाननाला जास्वंदी वाहिली होती.
महादेव म्हणले कि नंदी आलाच. समोर हि नंदीची सुंदर मुर्ती.
शेजारी पुष्कळ वीरगळ शिल्पे आहेत त्यातील अनेक वीरगळ वर नक्षीदार काम केलेले आहे.
याच परिसरात अनेक समाध्या आहेत.बहुधा त्या लिगायत समाजातील असाव्यात.
शेजारी एक सुंदरशी ' पुष्करणी' आहे पण देखभाली अभावी सध्या ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
हे
प्राचीन मंदिर सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे . या मंदिराकडे सहसा कोणी येत
नाही. एके काळी समृद्धीच्या परमोच्च शिखरावर असणारे हे मंदिर सध्या '
एकांतवास ' भोगत आहे. गावापासून दूरवर असणारे हे मंदिर सध्या रिकाम टेकडे,
गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुलांचे विश्रांतीस्थान बनले आहे. काही वर्षांपूर्वी
या मंदिराला स्थानिकांनी लोखंडी फाटक बनवून काहीसा संरक्षणात्मक उपाय
अवलंबिला असला तरी आजही भरदिवसा येथे स्मशान शांतता अनुभवता येते.
परिसरातील लोकांशिवाय इतरांना फारशी माहिती नसल्याने येथे येणाऱ्या
पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे. ही कोरीव शिल्पे सध्या अनेक पर्यटकांनी
केलेल्या विकृत कृत्यांमुळे रंगहिन बनत आहेत. अनेकांनी आपल्या प्रेमीकांची
नांवे कोरून यातील अभिजात शिल्पसौंदर्य बिघडविण्याचा प्रयत्न सुरू केला
आहे.
किकलीचे श्री भैरवनाथ मंदिर
पुणे-सातारा या राष्ट्रीय हमरस्त्याने वाई-महाबळेश्वरकडे जाताना खंबाटकी घाट उतरल्यावर भुईंज हे गाव लागते. तिथेच डावीकडे चंदन-वंदन किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. या दोन किल्ल्यांच्या मध्ये एक रुंद खिंड आहे. दोन्ही गडमाथ्यांकडून उतरत आलेले तीन टप्पे पायर्यांसारखे दिसतात. हमरस्त्यावरच भुईंज गावातून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. किकली गावात देखण्या प्रवेशद्वाराचे, दीपमाळा असणारे, चिरेबंदी बांधणीचे एक शिवमंदिर आहे. त्याला श्री भैरवनाथ मंदिर म्हणतात. खूप कलाकुसर असणारे हे ठिकाण.
किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्या पायर्या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे.
चंदन- वंदन
मंदिर प्रवेशद्वार
प्रवेशद्वारातून दिसणारे मुख्य मंदिर
प्रवेशद्वारातून आत येताच मधे पटांगण आहे व दोहो बाजूंना ग्रामपंचायतीची शाळा आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे.
उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष
गणेशवंदना कोरलेला भग्नावस्थेतला स्तंभ
मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. आता प्रश्न येतो मंदिराचा कार्यकाळ नेमका कुठला? चंदन वंदन ही शिलाहारांची निर्मिती असल्याने साहजिकच ही शिलाहारांची निर्मिती वाटते पण तसे नसावे. शिलाहारांची इतर मंदिरे जसे कुकडेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर ह्यांपेक्षा ह्या मंदिराची शैली भिन्न आहे. तिचे साधर्म्य यादवकाळातील मंदिरांशी जास्त जाणवते. मला स्वतःला हे मंदिर आणि त्यांतील मूर्तींची शैली ही पिंपरी दुमाला, लोणी भापकर आणि पेडगाव येथील मंदिरांच्या शैलीशी जास्त मिळतीजुळती वाटली.
सिंघण यादवाने १३ व्या शतकात खिद्रापूरनजीक भोजराजा शिलाहाराचा पाडाव करुन कोल्हापूर शिलाहारांची राजवट नष्ट केली तत्पुर्वीच सिंघणाच्या आक्रमणात हा भाग यादवांच्या राज्यात सामील झाला व यादव राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी.
ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे.
मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत.
भैरवनाथ मंदिर, किकली
मुखमंडप
मुखमंडपाच्या
समोरील बाजूस विविध प्रकारचे व्याल कोरलेले आहेत. सर्वसाधारणपणे व्याल
म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य
मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र
व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी
विविध मुखे कोरलेली आहेत.
मेषव्याल --------------शुकव्याल -------------- अश्वव्याल --------------वृषभव्याल-
--
--
गर्दभव्याल --------------------- सिंहव्याल ------------------------ वराहव्याल---------व्याघ्रव्याल
--
--
--
मुखमंडपाच्या भिंतीवरील वादक
मुखमंडपावरील शिल्पे- गरुड, विष्णू, मैथुनशिल्प, ऋषी व त्याखालील व्यालपट्टीका
ह्या शिवाय येथे एक प्रसवेचेही (बाळाला जन्म देत असलेली स्त्री) शिल्प आहे.
प्रसवा
चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात.
सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. मला सर्वप्रथम ती मूर्ती महावीरांची वाटली. पण ते महावीर नसावेत कारण मंदिर पूर्णपणे शैव आहे.
सभामंडपाचे प्रवेशद्वार
प्रतिहारींच्या हाती नेहमीच एक लांबुळकी पिशवी दिसते ह्याचा अर्थ असा की मंदिराच्या बांधकामासाठी ह्या पिशवीतून ते धन, जल आदी आणत आहेत.
प्रवेशद्वारावरील भैरव द्वारपाल, प्रतिहारी
गज व शरभ
प्रवेशद्वाराच्या उंबर्यावरील नक्षीकाम
सभामंडप
अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही
पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव
आदि शिल्पे कोरलेली आहेत.
आता सभामंडपांतील स्तंभांवरची काही निवडक शिल्पे पाहूयात.
सभामंडपाची रचना
हे आहे तीन धडे व चारच पाय असणारे आभासी शिल्प. अशी शिल्पे पिंपरी दुमाला, भुलेश्वर, पेडगाव अशा मंदिरांतही आहेत.
आभासी शिल्प
याजनंतर येते ते त्रिविक्रमाचे शिल्प. स्तंभाच्या दोन बाजूस दोन प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूस वामन अवतार तर त्याच्या शेजारील बाजूस त्रिविक्रम अवतार.
छत्रीधारी वामन बळीराजाच्या दरबारात तीन पावले भूमीचे दान मागायला आलेला दिसतो आहे. ह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात बळी राजा कमंडलूतून वामनाच्या हातावर पाणी सोडून दान देतो आहे तर शेजारी शुक्राचार्य वामनाचे कपट ओळखून त्याला बळीला अटकाव करत आहे.
ह्याचाच शेजारी स्तंभाचे दुसरे बाजूस त्रिविक्रमाचे शिल्प आहे. दोन पावलांनी आकाश व जमीन वापून विष्णू प्रकट झाला आहे. तिसर्या पावलाने बळीचे मस्तक व्यापून त्याला पाताळात जागा दिलेली आहे तर बळीचे शेजारी गरुड आणि एक विष्णूगण दिसत आहे.
वामनावतार
त्रिविक्रम
रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत.
रामहस्ते सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या मायावी मारीच राक्षसाचा वध
राम हनुमानाची भेट
सुग्रीवाकडून रामाच्या शरकौशल्याची तालवृक्षांचा छेद करुन होणारी परिक्षा व शेजारी वाली सुग्रीव युद्ध
रामहस्ते वालीवध
हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस व राक्षसींचे सीतेला रामाचे तुटलेले मायावी मस्तक दाखवून धमकावणे
हा बहुधा कुंभकर्णवध अथवा रावणवध
रामायणाशिवायही इतरही काही प्रसंग येथे कोरलेले आहेत.
हे बहुधा महाभारतातील भीमाचे गजयुद्ध असावे
हा बहुधा शिव असावा कारण शेजारी नंदी आहे. पण सिंहामुळे प्रसंग कोणता आहे ते समजत नाही.
शिवतांडवाचे प्रसंगही स्तंभांवर कोरलेले आहेत.
शिवतांडव १
शिवतांडव २
कलशपूजन करणारे हंस
खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे.
पौराणिक शिल्प
स्तंभाच्या खालच्या बाजूसही काही सुरसुंदरी, हरिहर आदींच्या मूर्ती आहेत.
हरिहर
नर्तकी
अभिसारिका आणि तिला त्रास देणारे मर्कट
दर्पणसुंदरी
सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच.
छतावरील नक्षीकाम
ह्यानंतर तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
गर्भगृहे
गर्भगृहे
मंदिराचा अंतर्भाग
ह्यानंतर मंदिराच्या बाह्यभागाचा फेरफटका करुया.एकूण साधीच रचना विशेष असे काहीच नाही. एका ठिकाणी अशाच त्रिदल गाभार्याने युक्त असलेल्या मंदिराचा नुसता पायाच आढळतो. इथे मंदिर बांधावयाचे काम राहून गेलेले असावे.
मंदिराचा बाह्यभाग
दिपमाळा
निसर्गाच्या सानिध्यात इतिहासाच्या पाऊल खूणा जपणाऱ्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला असणारे हे पांडवकालीन भैरवानाथाचे मंदीर भारत सरकारने सुमारे ५ कोटी रूपये खर्च करून मंदिर नव्याने जिणोध्दारीत केले आहे. त्याचे मांगल्य पावित्र्य हे किकली देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ जपत आहेत. त्यातच वीरगळींचे गाव म्हणून इतिहास संशोधकांनी राज्यातील पहिले गाव म्हणून नामांकन केले आहे.
किकली गावातील वीरगळी : -
किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे धूमशान झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे.
काही वीरगळ
खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव. पूर्वजांच्या बलिदानाची ही स्मारके अशी भग्नावस्थेत आणि कशीही पडलेली दिसतात.
भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे
सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा
महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे
निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर पुढे
त्यांना दहा हजारी मनसबदारी, अठ्ठावीस महाल व बावन्न चावड्यांचे वतन
मिळाले. त्यामुळे त्यांना निजामशाहीत मोठे महत्त्व प्राप्त झाले. अकबराने
निजामशाहीवर आक्रमणे केली (१५९४ ते १६००), त्यावेळी चाँदबीबीने त्यास
यशस्वी तोंड दिले, ते जाधवरावांच्या सहकार्यामुळेच. चाँदबीबीचा खून
झाल्यावर, निजामशाही अस्तंगत होत असताना, ती वाचवण्यासाठी, मुर्तजा
नावाच्या वारसास परिंडा येथे तख्तावर बसवण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात
जाधवरावांचा हात होता. निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करणा-या जाधवरावांची
पुढे मुला-नातवांसह निजामशहाकडूनच हत्या झाली! त्यानंतर जाधव कुटुंबातील
काहीजण स्थलांतरित झाले. त्यांतील खंडोजीराव हे पुत्र भुईंज येथे
वास्तव्यास आले. जाधवांचे ते घराणे भुईंज येथे नांदत आहे.
जाधव घराण्याचे दोन वाडे भुईंज गावात होते. त्यापैकी एक वाडा पडला आहे.
एक सुस्थितीतील चौसोपी आहे. त्या वाड्याचे दोन बुरुज दिसतात. वाड्यात
जाण्यासाठी दोन बाजूंनी दहा-दहा रुंद पाय-या आहेत. वाड्याचा दरवाजा भक्कम
स्थितीत आहे. आत शिरताच दोन प्रशस्त ‘ढेलजा’ दृष्टीस पडतात. जाधवरावांची
कुटुंबे, वाटण्या झाल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. वाड्याचा दिवाणखाना
उत्तम स्थितीत असून तेथे प्रशस्त देवघर आहे. देवघरातील मूर्ती सुंदर असून
त्यातील गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. दिवाणखान्याच्या बाजूस असलेल्या
प्रशस्त दालनात प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत. ते दालन ‘राममंदिर’
असल्याचे मानले जाते. वाड्यात रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी, तो
मोठ्या प्रमाणावर होत असे. कालपरत्वे त्याचे स्वरूप लहान होत चालले आहे.
राममूर्तीसंबंधी आख्यायिका सांगितली जाते. ती अशी - एकदा एक घोडा गावात
फिरत होता. त्या घोड्यास पकडून जाधवरावांच्या वाड्यावर आणले गेले. त्या
घोड्याच्या गळ्यात वस्त्रात गुंडाळलेली प्रभू रामचंद्राची मूर्ती दिसून
आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना जाधवरावांनी त्यांच्या वाड्यात केली. जाधव
घराण्याचे वारस त्यांच्याकडे ती मूर्ती ‘समर्थ रामदास स्वामींकडून आली’
असे सांगतात.
जाधव घराण्यातील रायाजीराव नावाचे पुरुष २५
फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांची छत्री
(समाधी/घुमट) भुईंज गावात उभी आहे. दगडकाम भक्कम आहे. त्या समाधीवरील
शिल्पांमुळे तिला विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. ती शिल्पे म्हणजे
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. समाधीच्या जोत्यावर चारही बाजूंस
सिंहाच्या तोंडात हत्ती असल्याचे शिल्प आहे. ते शिल्प यादवकालीन शिल्पकलेत
पाहण्यास मिळते, त्यामुळे ते घराणे सिंदखेडकर जाधवराव या घराण्यातील आहे हे
सिद्ध होते.
त्यांच्याकडे महजराच्या नकलेशिवाय एकही कागद शिल्लक
नाही. त्या महजरात जमिनीच्या वाटणीचा व्यवहार नमूद केला आहे. त्यावर अठरा
लोकांच्या निशाण्या आहेत. त्यांत तीन शेट्टी यांच्या तराजूच्या, तर पंधरा
पाटलांच्या नांगरांच्या निशाण्या आहेत. त्याशिवाय गुरव-मृदंग, कुंभार-चाक,
चांभार-इंगो, माळी-खुरपे, मांग-चर्हाोट, न्हावी-आरसा, महार-विळा, दोरी,
जंगम-घंटा, परीट-मोगरी, सोनार-सांडशी, तेली-घाणा, भोई-पालखी, तराळ-काठी,
चौगुला-अधोली अशा निशाण्या आहेत.
त्या महजरात खंडो नारायण कुलकर्णी,
बाबाजी बानाजी चौगुले, सुभानजी चौगुले यांची नावे आहेत. कसबे वाई, कसबे
किकली, जांब, सुरुर, कवठे, केंजळ, कडेगाव, बावधन, ओझर्डे, गुळुंब,
शेंदुरजणे इत्यादी ठिकाणच्या पाटलांच्या निशाण्या आहेत. महादजी गणेश, भागवत
देशमुख, भगवंत सामराज, गिरजाजी सुंगो - देशकुलकर्णी, रामाजी अप्पाजी,
जनार्दन - सुभेदार प्रांत वाई, राजाजी बाळाजी – सभासद प्रांत वाई हे प्रमुख
अधिकारी असल्याचे त्या कागदपत्रांवरून समजते.
जाधवरावांच्या
जहागिरीसंबंधीची आकडेवारी त्यांच्या घराण्यातील ब्रिटिश आमदानीतील एका
कागदपत्रातून मिळते. त्यांना पंधरा लाखांपर्यंत जहागिरी होती.
जाधवराव
घराण्याने वंशाच्या कर्तबगारीचा वारसा स्वातंत्र्योत्तर काळातही भुईंज येथे
चालवला. तात्यासाहेब जाधवराव हे त्यांपैकी एक कर्तृत्ववान पुरुष होते.
त्यांनी काही सार्वजनिक कामे केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या
विनंतीवरून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक
विद्यालयाच्या इमारतीसाठी त्यांनी व त्यांचे बंधू नानासाहेब ऊर्फ माधवराव व
बाळासाहेब यांनी पाच एकर जमीन दिली. तात्यासाहेबांचे पुत्र विजयसिंह ऊर्फ
बाबासाहेब हे भुईंज गावचे काही काळ सरपंच होते व किसनवीर सहकारी साखर
कारखान्याचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या पत्नीदेखील काही काळ भुईंज गावच्या
सरपंच होत्या. नानासाहेब जाधवराव हे अश्वारोहणात प्रवीण होते. त्यांचे
साता-याच्या राजघराण्याशी निकटवर्ती संबंध होते. त्यांना शिकारीचा छंद
होता. त्यांनी वाघ, रानडुकरे यांच्या शिकारी केलेल्या आहेत. त्या
घराण्याचे सोयरसंबंध सातारकर छत्रपती, दत्तवाडीकर, राजेघोरपडे, म्हसवडकर
राजेमाने, माहूरकर, सासवडकर, जाधव, राजेशिर्के, खानविलकर, बडोदेकर, गायकवाड
इत्यादी राजघराण्यांशी आहेत.
जाधव वाडा- भुईंज
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज गावात छत्रपती शिवाजीमहाराज व राणी सईबाई यांची मुलगी राणूबाई जाधव यांच्या वंशजांचा वाडा आहे.साधारण ३०० वर्षापूर्वीचा हा वाडा आहे.वाडा एकदम सुस्थितीत आहे. वाड्याचे भव्य प्रवेशद्वार आतमधला भव्य चौक लक्ष वेधून घेतो.आतमध्ये दिवाणखाना आहे. मोठे देवघर आहे.अनेक चित्रपटांचे चित्रिकरण पण ह्या वाड्यात झाले.बाड्याबाहेर एक शिवकालीन बारव आहे. जवळच राणूबाई यांची समाधी आहे. सद्यस्थितीत वाड्यात जाधवरावांचे वंशज भैय्यासाहेब जाधवराव हे राहतात.
राणुआक्का या शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या द्वितीय कन्या.
राणूबाईंचा जन्म इ.स.१६५१ मधे राजगडावर झाला. राणुआक्का म्हणजे प्रेम,
त्याग ,समर्पण, ह्यांचा अखंडपणे वाहणारा झराच जणु..राणुआक्कांचे आपले छोटे
बंधु शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम होते. शंभूराजेंना आईची ऊणीव
राणुआक्कानी कधीच भासु दिली नाही. आपल्या बंधुच्यामागे कायम त्या ढाली
सारख्या ऊभ्या रहात. राणीसाहेब सईबाई यांच्या मृत्यूनंतर इ.स.१६६० मधे
जिजाऊ माँसाहेब व शिवाजी महाराज यांनी राणुबाई यांचा विवाह शिंदखेडचे लखुजी
जाधवराव यांचे पुत्र दत्ताजी,दत्ताजी यांचे पुत्र ठाकुरजी व ठाकुरजी यांचे
पुत्र अचलोजी जाधवराव यांच्याशी राजगडावर लावून दिला. जाधवरावांच्या घरी
राणुबाईंचा विवाह करून जिजाऊ आऊसाहेबांनी आपले माहेर व शिवाजी महाराजांनी
आपले आजोळ नव्या नात्याने जवळ केले.निजामशाहाने लखुजी जाधवरावांच्या मुला
-नातवांडासह सर्वांची हत्या केली. त्यानंतर सर्व जाधवराव महाराष्ट्रात
विखुरले गेले. यांची प्रमुख घरे भुईंज, माळेगाव, वाघोली , येथे स्थायिक
झाली.
या प्रमुख घरापैकी भुईंज हे घर .येथेच राणुआक्का यांचे वास्तव्य
होते.आजही भुईंज येथील वाडा इतिहासाच्या पाऊलखुणां जपत मोठ्या दिमाखात उभा
आहे.राणुआक्का यांचे वंशज महेंद्रसिंह ऊर्फ भैय्या साहेब जाधवराव तेथे
वास्तव्यास आहेत .
शिरवळची प्राचीन पाणपोयी :-
पुण्याहून सातार्याला येताना निरानदी ओलांडली की सातार्याची हद्द सुरू होते. तिथून पुढे उजव्या बाजूला नायगाव फाट्यावर मोडकळीस आलेल्या मंदिरासारखी वास्तू दिसते. दुर्दैवाने ते मंदिर नसून ती पाणपोई आहे. पाषाणात कोरेलेली ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी असून, संवर्धनाअभावी ढासळण्याच्या मार्गावर आली आहे.
सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून, आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे, शिल्प इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.
त्यापैकी एक असलेली शिरवळजवळील पाषाणात कोरलेली पाणपोई. ही पाणपोई सुमारे हजार ते बाराशे वर्षांपूर्वी ‘जकात पिव्हई’ म्हणजे जकात नाक्यावर केलेली असावी. अखंड पाषाणात कोरलेले दोन खांब, त्यामागे घडवलेले मोठे पाषाण एकमेकांवर रचून खोली तयार केली आहे. छतही एकमेकांवर दगडी रचून तयार करण्यात आले आहे. आतमध्ये जमिनीशी समतल दोन रांजण असून ते दगडी आहेत. हे सारे बांधकाम ‘शुषकसांधा’ पद्धतीचे म्हणजे कोणतेही चुना वा सिमेंट सारखे पदार्थ न वापरता करण्यात आले आहे.
अठराव्या शतकात खंबाटकीच्या खांबटाक्यापासून ते सिंहगडाच्या दरम्यान शिवपर्वानंतर मराठयांनी गनिमांशी बावीस वेळा लढाया केल्या. रावजी पंत चिटणीसांच्या बखरीत या लढायांचे बरेचसे वर्णन आले आहे. तंजावर आणि बेंगलोरच्या मराठी सदरे वर जाताना सैनिकांच्या मोहिमांसाठी शिरवळ गावाच्या हद्दीवर पाणपोई उभारण्याची सूचना दस्तुरखुद्ध श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी केली होती. या पाणपोईला सव्वादोनशे वर्षाचा इतिहास असून या पाणपोईची रचना ही हेमाडपंती देवळाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या पाणपोईसाठी पगारी सेवक ठेवले जात असत. या पाणपोईत चार हंड्यांची व्यवस्था होती. सातारा-नायगाव-सारोळा-धांगवडी-कामथडी येथे पाणपोयांची रचना अस्तित्वात होती. मात्र शिरवळ हद्दीतील हेमाडपंती शैलीची ही पाणपोई मात्र व विशेष रचनेमुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेई. मात्र हा ऐतिहासिक ठेवा आज देखभालीअभावी दुर्लक्षित आहे.
सदर पाणपोईची रचना व त्याच्या व्यवस्थेच्या आदेशाबाबतचे लेखी पत्र नानासाहेब पेशवे यांनी शिरवळच्या सरदारांना धाडले होते. ते पत्र प्राध्यापक सचिन जोशी यांच्या संग्रहात आहे. या पाणपोई च्या बांधकामासाठी दगड गूळ, चुना, हरभरे, इ. साहित्य पुण्यावरून शिरवळला रवाना करण्यात आल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. पुरातन पाणपोई कोणत्याही प्रकारचा चुना अथवा सिमेंटसारखे पदार्थ न वापरता केवळ गुरुत्वबल वापरून उभारण्यात आली आहे. त्यातील एखादा दगड जरी पडला तरी ही वास्तू पुन्हा आहे तशी उभारणे अवघड आहे. या पाणपोईच्या दगडी एकमेकांपासून वेगळ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणाला या पुरातन वास्तूचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करताना या पाणपोईच्या भोवतालीच खोदकाम करून रस्ता तयार करण्यात आला आहे. या खोदकामामुळे पाणपोईची दगडी ढासळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पुणे-सातारा महामार्ग सहापदरीकरणाचे काम झटपट उरकण्याच्या तयारीत रस्ते विकास महामंडळ असून ही पाणपोई अगदी रस्त्यातच आली आहे. महामार्गावर विनाकारण अपघात नको म्हणून ही पाणपोई हटवण्याची सुप्त गडबड कानांवर गेल्याने शिरवळ ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या वास्तूचे संवर्धन व्हावे या मागणीसाठी रायरेश्वर प्रतिष्ठान शिरवळ व गड किल्ले संवर्धन समितीने विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पुरातत्व खात्याच्या परवानगीनंतर या पाणपोईच्या रेखांकनाचे काम प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच पूर्ण करण्यात आले. डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक सचिन जोशी व वास्तूविशारद राहूल चेंबूनकर यांच्या सहकार्याने हे रेखांकन करण्यात आले असून याचा अहवाल राज्यसरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यानंतर या वास्तूची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
धर्मशाळा बांधणे, पाणपोया उभारणे या संकल्पना कालबाह्य होत चालल्या आहे; पण मानवतावादी, सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाºया वास्तू वाचविल्या पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीला किमान त्याची तोंडओळख तरी होईल.
नाना फडणवीस वाडा, मेणवली : -
वाई परिसरातील आवर्जून पहावे असे आणखी एक ठिकाण म्हणजे नाना फडणवीसांनी २४५ वर्षांपुर्वी बांधलेला मेणवलीचा वाडा.वाईपासून सहा किलोमीटर अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.औंधचे भवानराव त्रंबक पंतप्रतिनिधी आणि साताऱ्याचे रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नाना फडणवीसांना मेणवली गाव देणगी म्हणून देण्यात आले.
नाना फडवणीस यांना वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम मिळाला. तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडवणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि विष्णूचे व दुसरे मेणेश्वराचे म्हणजेच शंकराचे अशी दोन देवळेदेखील बांधली.‘धकाधकीच्या राजकारणातून एकांतवास मिळावा म्हणून हा वाडा बांधला, परंतू फार अल्पमुदतीच्या भेटी त्यांनी मेणवलीला दिल्या.
दीड एकर परिसरामध्ये बांधलेल्या या वाड्यात सहा चौक, दगडी फरशी, दगडी चौथऱ्यावर उत्तम प्रकारच्या सागवान लाकडाच्या सहायाने आणि भित्तीचित्राच्या अनोख्या शैलीने बांधल्या आहेत.
वाईवरुन येताना रस्त्याला डावीकडे फाटा फुटतो.या फाट्यावर नानांच्या
वाड्याची दिशा दाखवणारा फलक आहे.गावातुन पाचच मिनीटात आपण वाड्यासमोर उभे
रहातो. आजुबाजुला पार्किंगची सोय केली आहे. 
या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून सुरवातीला आपल्याला वाड्याचे उत्तराभिमुख भव्य प्रवेशद्वार व नगारखाना दिसतो.
शेजारी वाड्याची माहिती व नकाशा दाखवीणारा फलक आहे.
या भव्य प्रवेशद्वाराच्या वर नगारखान्याची खोली आहे.त्याकाळी बसवलेल्या दरवाज्यातून आत आल्यावर समोर देवड्या दिसतात.वाडा बघण्यासाठी प्रवेशशुल्क आहे तसेच माहिती देण्यासाठी गाईडची व्यवस्था केलेली आहे,
तिकीट काढून आत निघाले की उजव्या हाताला नगारखान्याकडे चढणारा भिंतीच्या आत असलेला जिना दिसतो.
इथून वर चढल्यावर नगारखान्याच्या खोलीत पोहचतो.मात्र आता तिथे नगारे नाहीत.
यानंतर आपला प्रवेश मुख्य वाड्यात होतो. वाड्यामध्ये हळदी-कुंकू समारंभ, विहिरीचा, मधला, मुख्य, कांडणसाळीचा आणि स्वयंपाकाचा असे सहा चौक आहेत. प्रत्येक चौकाच्या मध्यभागी एक मिटर खोल कुंड आहेत. या कुंडात जमा होणारे पावसाचे पाणी बंदिस्त मार्गाने फिरविले आहे. त्याचबरोबर वरच्या मजल्यांमधून निचरा होणारे पाणी वाड्याच्या पाठीमागील भिंतीतून बंदीस्त पद्धतीने काढल्याचे दिसते. चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते.
वाड्याच्या बाह्य तटभितींस खिडक्या नाहीत. तात्कालीन संरक्षण गरजानुसार त्या बांधल्या आहेत. या वाड्याला उत्तराभिमुख असणारा दरवाजा सुमारे १५ फूट आहे.
आतमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या हाताला ओसरी दिसते जिथे येणारे जाणार्या लोकांना बसण्याची व्यवस्था केली जाई.तर डाव्या बाजुला घोड्याच्या पागा आहेत.मात्र त्या बाजुला पर्यटकांना प्रवेश नाही.त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.
मग आपण पोहचतो मुख्य चौकात.येथे डाव्या व उजव्या बाजुच्या खोल्या म्हणजे धान्याच्या कोठ्या आहेत.सारा रुपाने गोळा झालेले धान्य येथे ठेवले जाई.
याच चौकात डाव्या बाजुला श्री गजाननाची छोटी कोरीव मुर्ती आहे,
जवळच नाना फडणवीस यांचे जीवनचरित्र लावले आहे.
वाड्यात प्रवेश करण्यापुर्वी डाव्या हाताला कोपर्यात असणार्या बुरुजावरुन नजारा बघायचा. या बुरुजाला जंग्या आणि तोफे डागण्यासाठी खिडक्या कोरल्या आहेत.मात्र सध्या तोफा दिसत नाहीत.
वाटेत वाड्याची देखणी प्रवेशद्वारे दिसतात.
या बुरुजावर चढणारी वाट अरुंद असली तरी वरुन मेणवली गावाचा नजारा दिसतो आणि पार्श्वभुमीवर पांडवगडाचा सुळका दिसतो.
हाच बुरुज मागच्या बाजुने असा दिसतो.
मुख्य वाडा आतून बघण्यासाठी पुन्हा मुख्य चौकात यायचे.ईथे उजव्या हाताला एक पाटी दिसते.
वाड्याचा काही भाग हा पर्यटकांसाठी बंदिस्त केला आहे.
भिंतीस असलेल्या खड्या जिन्याने वरच्या मजल्यावर जायचे.
काही दालन ओलांडून आपण पंगतीच्या चौकाच्या वरच्या सज्जात असतो.अर्थात वाड्याच्या या भागात प्रवेश नसल्यामुळे हा चौक वरुनच पहाता येतो.
याच चौकाच्या शेजारी दप्तराची खोली आहे.तिथे बैठक व लिखाणाचे टेबल ठेवलेले दिसते.यानंतर आपण एका महत्वाच्या दालनात येतो. 
या
वाड्याच्या चुना, विटांमध्ये बांधलेल्या भिंतीं आतील बाजूला जाड गिलावा
दिलेला आहे. भाताचा पेंढा किंवा गवताचे कांडे चिकट लाल मातीच्या चिखलात
मिसळून ते मिश्रण लिंपून हा गिलावा तयार केला आहे. भित्तीचित्रणासाठी भिंत
सुकविताना पॉलिश करुन गुळगुळीत केली आहे. 
येथील चित्रांची मांडणी व रेखाटन मराठी शैलीचे आहे. यामध्ये दशवताराचा, अष्टविनायकाचा समावेश आहे.
याच दालनाच्या शेजारी नाना फडणवीस यांचे शेजघर आहे.उन्हाळ्यात वारा घालण्यासाठी हाताने चालवायचा पंखा आपण येथे पाहु शकतो.याच्याच शेजारी खलबतखान्याची छोटीशी खोली आहे.तिथे आता प्रोजेक्टरची व्यवस्था केली आहे.
यानंतर आपण जीना उतरुन हळदी-कुंकू समारंभाच्या चौकात येतो.
हळदी-कुंकू समारंभाच्या चौकातील भिंतीवर जय-विजय हे द्वारपाल रेखाटले आहेत. तेथे जिवती देवीचे चित्रही आहे. त्याचबरोबर गवळणींच्या खोड्या काढणारा कृष्णही येथे दिसतो.
छतातील लाकडात कोरलेल्या सुंदर वेलबुट्टीसही लाल रंग दिला आहे. हा रंग उत्साहवर्धक वातावरण निर्मिती करतो.
या ठिकाणी एकाच दगडात घडविलेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक कमळाच्या फुलाच्या अकारातील कारंजे आहे. हा कारंजा रहाट गाडग्यावर चालविला जात होता. त्याचबरोबर एकाच दगडामध्ये तयार केलेला पाण्याचा कुंडही येथे पहायला मिळतो.याठिकाणी वाड्याचा जो भाग पर्यटकांसाठी उपलब्ध आहे,त्याची फेरी पुर्ण होते.
हा वाडा मराठा वास्तूशैलीत बांधला आहे. उंच तटबंदीने धूळविरहित केला आहे. त्यात हवा खेळती राहिल आणि पुरेशा प्रकाशाचाही व्यवस्था केली आहे नाना फडणवीसांनी मेणवली येथे बांधलेला वाडा आजही ऊन, वारा, पावसात दिमाखात उभा आहे. १७७० च्या दरम्यान बांधलेल्या या वाड्याची देखभाल त्यांचे खापर पणतू अशोक फडणीस आजही करीत आहेत.
या वाड्याच्या मागे अत्यंत प्रशस्त देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तूशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे.या घाटाच्य दिशेने निघाले कि सर्वप्रथम नजरेस पडतो तो भव्य विस्ताराचा दुर्मिळ असलेला डेरेदार गोरख चिंचेचा वृक्ष.यालाच बॅओबाब म्हणतात.मुळचे अफ्रीकेत उगवणारे हे झाड शेकडो कि.मी दुर मराठी मातीत रुजले आहे. एखाद्या हत्तीच्या पायासारखा दिसणारा याचा बुंधा पर्यटकांचे आकर्षण आहे.
या वाडय़ाच्या मागे प्रशस्त, देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे. पूर्वाभिमुख असणारे लक्ष्मी-वासुदेव म्हणजे मेणेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या छतावर व गलथ्यावर भित्तीचित्रे शिल्लक आहेत.
फिकट पिवळ्या रंगाने छत रंगविले आहे. त्याच्या मध्यभागी समभूज चौकनात सुंदर पानाफुलांच्या वेलबुट्टींची चित्रेकाढली आहेत. बेलबुट्टी लाल व हिरव्या रंगात आहेत. मराठा स्थापत्य शैलीचे छत सुशोभीकरणाची प्रचलित शैली होय.
कृष्णेच्या घाटावरील त्या मंदिरांच्या परिसरात गेले, की सर्वप्रथम एक छोटेसे देऊळ दृष्टीस पडते. ते विष्णू व शंकर यांच्या देवळांच्या मानाने खूपच लहान असून घंटेचे देऊळ म्हणून ओळखले जाते. त्या देवळाचे विशेष म्हणजे त्यात फक्त एक भलीमोठी घंटा टांगली आहे. पंचधातूंपासून बनवलेल्या त्या घंटेचे वजन सहाशेपन्नास किलोग्रॅम एवढे असून, त्यावर लहानग्या जिझसला कडेवर घेतलेल्या मेरीचे चित्र व 1707 हे साल कोरलेले आहे. ती घंटा बघितल्यावर जिझस आणि मेरी यांचे चित्र कोरलेली घंटा देवळाच्या परिसरात का ठेवली, ती एखाद्या चर्चमधील घंटा आहे का, तिच्यासाठी वेगळे मंदिर का बांधले असे प्रश्न पडतात.
बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठय़ांनी पोर्तुगीजांचा १७३९ मध्ये पराभव केला अर्नाळा, वसई असे काही किल्ले जिंकून ताब्यात घेतले. त्या किल्यांमध्ये व आसपासच्या परिसरात पोर्तुगीज कालीन चर्चेस असून, त्यामध्ये मोठमोठय़ा आकाराच्या खूप घंटा होत्या. चिमाजी अप्पांच्या सैन्याने वसईच्या किल्ल्यातील चर्चमधील घंटा काढल्या व पोर्तुगीजांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून त्या हत्तीवरून वाजतगाजत गावात मिरवल्या.
अशा घंटा नाशिकच्या शंकराच्या देवळात, मुरुडच्या दुर्गादेवी मंदिरात, भोरगिरी येथील भीमाशंकराच्या देवळात आढळतात. सुमारे चारशेपेक्षा जास्त वर्षे जुन्या अशा त्या घंटा सुस्थितीत आहेत. मेणवली येथे मात्र त्यातील घंटा देवळात न लावता त्या घंटेसाठी वेगळे मंदिर बांधले गेले आहे. तेच मेणवली गावचे वैशिष्टय़ ठरले आहे. घंटेच्या मंदिरामुळे कृष्णाकाठच्या देवळांच्या रम्य परिसराला एक प्रकारचे वेगळेपण लाभले आहे.

घाटाच्या भिंतीवर कोनाडे आहेत.दिवाळी,त्रिपुरारी पौर्णिमा आणि इतर प्रसंगी ईथे दिवे लावून घाट पाजळला जात असावा.
वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू, कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती. कृष्णाकाठी असलेला वाडा पूर्वाभिमुख असून त्याच्या पश्चिमेकडे म्हणजेच वाडय़ाच्या मागील बाजूने कृष्णेत उतरण्यासाठी घाट आहे.
येथे जाण्याचे मार्ग :
पुणे – खेड शिवापूर – शिरवळ – खंबाटकी घाट – सुरुर – वाई – मेणवली.
अथवा
पुणे – खेड शिवापूर – भोर – मांढरदेवी घाट – वाई – मेणवली.
धोमचे नृसिंह मंदिर : -
वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम हे वृक्षदाटीत वसलेलं अतिसुंदर,निसर्गरम्य गाव.सह्याद्रीच्या रांगेने तीनही बाजूने गराडलेले आणि केंजळगड,पांडवगड उत्तरेचे रखवालदार्,पश्चिमेला धोम जलाशयात जहाजासारखा दिसणारा कमळगड, तर दक्षिणेला पाचगणी, महाबळेश्वरची डोंगररांग. स्वातंत्र्योत्तर काळात ईथे कृष्णा आणि वाळकी नदीच्या प्रवाहावर धरण बांधले गेले आणि धोम गावाचे नाव प्रकाशात आले.मात्र पेशवेकालीन मंदिराचा एतिहासिक ठेवा उराशी कवटाळलेले धोम अभ्यासकांना नेहमीच खुणावत राहीले.पुराणकाळातील ‘धौम्य ऋषीं’चे वास्तव्य त्या भागात होते, म्हणून त्या गावाला ‘धोम’ हे नाव पडले असे सांगतात. त्याच ‘धोम’ गावामध्ये ‘श्री सिद्धेश्वर महादेवा’चे सुंदर शिवालय आहे. गावातून अरुंद डांबरी रस्त्याने मंदिराच्या परिसरात पोहचतो. गर्द वनराईने वेढलेला आणि कृष्णाकाठच्या रम्य प्रदेश अचुक हेरुन इथे मंदिर उभारणी केली आहे.
तिथल्या मंदिरातही वीरगळ दिसला
दगडी तटबंदीने मंदिराचे आवार बंदिस्त केलेले आहे.दोन्ही बाजुला बुरुज्,नक्षीदार कमान आणि वर नगारखाना असलेले प्रवेशद्वार यातून आपण प्राकारात प्रवेश करतो.याठिकाणी शिवपंचायतन साधले आहे. मंदिर उभारणी पाषाणामध्ये केलेली आहे.
अर्थात ईथे सर्वाधिक लक्षवेधी काय असेल तर तो मंदिरासमोरचा नंदी. नंदी एकाच पाषाणात कोरलेला सुबक आणि रेखीव व देखणा तर आहेच पण ज्या वास्तुरचनेत या नंदीची उभारणी केली आहे ती कल्पकेतीची कमाल म्हणता येईल. शिवमंदीरआणि नृसिंह मंदिर यांच्या मधोमध, एका कमळाच्या आकृतीच्या पुष्करणीची योजना करून त्यामध्ये बरोबर मध्यभागी अडीच मीटर लांबीच्या दगडी कासवाची निर्मिती करून त्याच्या पाठीवर नंदी उभारला आहे.
त्याचे अजून वैशिष्ट्य म्हणजे पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा कासव त्याच्या पाठीवर नंदीला घेऊन पाण्यावर तरंगत आहे असा भास होतो. ऊन आणि पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर सुंदर नंदीमंडप उभारलेला आहे. तो नंदीमंडपही सुंदर बांधणी केलेला आहे. याचा मागचा विचार असा आहे की कासवी तिच्या पिल्लांना ज्या पद्धतीमध्ये वाढवते त्याप्रमाणे देव त्यांच्या भक्तांना वाढवत असतो!
हिंदु धर्मात निर्माण झालेले पंथ एकत्र रहावेत म्हणून शंकराचार्यांनी एकाच मंदिरात सर्व पंथीयांच्या देवांची मंदिर उभारण्याची संकल्पना आणली,तीच पंचायतन.या मंदिरात शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत. या सर्व मंदिरांवर रेखीव नक्षीकाम केलेले दिसते.
मुख्य मंदिर शंकराचे असले तरी एका बाजुला एक अनोख्या शैलीचे मंदिर दिसते.हे आहे नरसिंह मंदिर.गोलाकार वास्तु,दोन बाजुला कोनाड्यात असलेल्या मुर्ती आणि वर चढून जायला खडे जीने असा वेगळाच प्रकार ईथे पहायला मिळतो.
यांपैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी असून पश्चिमेकडे असलेल्या 'नरसिंह' मूर्तीच्या मांडीवर साक्षात लक्ष्मी बसलेली आहे. त्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरील उजव्या हातामध्ये कमळ असून, डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आहे. वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरील आणि खालील जबड्यातील आठ दात; तसेच, दातांमधून बाहेर आलेली जीभ अशी ती मूर्ती आणि तिचे भाव जिवंत वाटतात.याचबरोबर ईथे लक्ष्मी नरसिंह यंत्राचा फोटो लावला आहे.
नृसिंह मंदिरामध्ये प्रल्हादाचीदेखील मूर्ती आढळून येते. नृसिंह जयंतीचा उत्सव वैशाख शुद्ध दशमीला मोठ्या प्रमाणात तेथे केला जातो. त्या उत्सवाचा रथदेखील मंदिराजवळ पाहण्यास मिळतो. पूर्वीच्या काळी, त्या देवस्थानामध्ये ठरावीक लोकांना ओलेत्याने जवळून दर्शन घेण्याची मुभा होती आणि बाकीच्या लोकांनी खाली असलेल्या चौथऱ्याच्याजवळ उभे राहून दर्शन घ्यायचे अशी व्यवस्था होती, परंतु आता सर्व मोकळेपणा व सर्वांना मुक्त वावर आहे.
मंदिर परिसरामध्ये उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ गणपतीचे मंदिर आहे. त्याच्या समोर एका संगमरवरी शिलास्तंभावरील पंचमुखी शिवलिंग लक्ष वेधून घेते. चार दिशांना चार मुख- त्यातील एक मुख हे वरच्या बाजूस आहे. त्या मुखांची नावे ही पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान अशी आहेत. ती सगळी पंचमुख शंकराची विविध रूपे आहेत.
शिवमंदिरासमोरचा नंदीमंडप. हा पुष्करिणीतल्या दगडी कासवावर उभारलेला आहे.
लक्ष्मी नृसिंह
शिवमंदिराचा टिपीकल पेशवेकालीन शैलीतला कळस
धोम गावाच्या पाठीमागेच धोम धरणाची भिंत एका डोंगररांगेच्या आधाराने उभी केलीय. त्या टेकाडावर चढून जाताच धोमचं अथांग पाणी, डावीकडे पाचगणी, समोर कमळगड, उजवीकडे केंजळगड आदी तालेवार ठिकाणे दिसतात.
ह्याच झाडीत धोम गाव आहे.
भिंतीवरुन दिसणारा आजूबाजूचा परिसर
समोर आहे तो कमळगड
कोरेगावच्या उत्तरेला ११ कि. मी. वर वसना नदीच्या उपनदीकाठी किन्हई वसले आहे.हे पंत प्रतिनिधींचे मूळ गाव असून ते या गावचे कुलकर्णी होते. त्यांनी पुढे औंध संस्थानाची स्थापना केली. औंध संस्थान विलीन झाल्यावर किन्हईचा कोरेगाव तालुक्यात समावेश करण्यात आला. गावात पंत प्रतिनिधींचा मोठा वाडा असून तो सुंदर व मजबूत आहे. वाड्याभोवती तटभिंत असून इमारतीचा खालील भाग दगडी व वरील विटांचा आहे.येथील स्वागत कक्ष भव्य आहे. वाड्यातील काही खोल्यांचे बांधकाम सुंदर आहे. या वाड्यात सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कार्यरत आहे. वाड्याच्या पाठीमागे ओढ्याच्या उजव्या तीरावर महादेवाचे मंदिर असून त्यास ओढ्याच्या पात्रापर्यंत पायर्या आहेत. मंदिरास सर्व बाजुने खुला मंडप आहे. त्यास गाभारा व शिखर आहे.
गावाच्या अग्नेयेस असलेल्या टेकड्यांपैकी पूवेकडील टेकडीवर साखरगड निवासिनी (पंत प्रतिनिधींची कुलदेवता) यमाई देवीचे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी गावातून सरळ रस्ता आहे. टेकडीच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत दगडी पायर्या आहेत. मंदिराभोवती तटभिंत असून तिला आतून मारा करण्यासाठी जंग्या आहेत.
मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला असून त्यास कमान आहे. कमानीवर नगारखाना आहे. पूर्वेकडे आणखी एक प्रवेशद्वार असून ते टेकडीच्या दक्षिणेकडून येणार्या भाविकांसाठी आहे.प्रवेशद्वारातून आत आल्यावर पायरीवर पण एक शिलालेख आहे.
मंदिराच्या डाव्या बाजुस छताजवळ लहान प्रवेशद्वाराच्या उत्तरेस दोन्ही बाजुला दीपमाळा आहेत. एका दीपमाळेवर दोनदा वीज पडून पडझड झाल्याने ती पुन्हा बांधण्यात आली. परंतु तीच्यावर तिसर्यांदा वीज पडली तेव्हा तो अपशकून समजण्यात आला. दीपमाळेचे नंतर केव्हातरी बांधकाम केले आहे. एका दीपमाळेवर शिलालेख कोरला आहे.
गाभारा चौकोनी असून त्यात पितळी मुखवटा असलेली देवीची मूती आहे. गाभाऱ्यात देवी अंबाबाई आहे तर मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी. हे या मंदिराच एक वैशिष्ट्य. मूर्ती दागिन्याने मढवलेली असून मूर्तीवर पडणारा प्रकाश परावर्तीत होण्यासाठी दागिन्यात काचेचा वापर केला आहे.या देवीची यात्रा कार्तिक पौर्णिमेपासून १५ दिवस असते.
मंदिरावर
असंख्य दगडी कोरीव शिल्प आहेत.देवादिकांच्या किती सुंदर, रेखीव , रंगीत
आणि सुबक प्रतिमा कोरल्या आहेत. नुकतेच त्यांचे नूतनीकरण झाले आहे.
सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे.
पूर्वी
वाड्यात कोणी रहात नसले तरी गावचा राबता असायचा. सध्या चित्रीकरण वगैरे
मुळे वाड्याला चांगले दिवस आल्याने तशी पर्यटकांना प्रवेशबंदी आहे.
सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. १७व्या शतकापासून कधी युद्धाचा प्रसंग तसाही आला नसावा त्यामुळेही तसेच थोडाफार वापर राहिल्यामुळे तो अजूनही शाबूत असावा.
महा-दरवाजावर हत्तीरोधक खिळे अजूनही व्यवस्थित आहेत. अर्थात दरवाजासोबतच त्यांना दिलेल्या रंगामुळे ते अगदी नव्यासारखे दिसतायत. तिथेच असलेल्या छोट्याशा दिंडी-दरवाजातून आत गेल्यावर मुख्य दरवाजावर असलेला नगारखाना दिसतो (ही ऐकीव माहिती).
इथे मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजव्या हाताला पाग्याची पडझड झालेली जागा दिसते ('शर्यत' चित्रपटात याच जागी बैल बांधलेले दिसतात.. :) ). डाव्या हाताला हत्तीच्या अंघोळीचा हौद आणि मोठी विहिर दिसते. हत्तींचा हौद आता बर्यापैकी दुरवस्थेत आहे. विहिर वापरात असून वाड्याच्या परिसरातली झाडं त्यावरच वाढली आहेत.
मुख्य
इमारतीत प्रवेश केल्यावर प्रथमतः समोर वाड्याची चौसोपी रचना दिसते. इथेच
आपण खुश होऊन जातो. वाडा बर्यापैकी ऐसपैस आणि चारी बाजून दगडी जोत्यासह
प्रशस्त ओसरी असलेला आहे.
इथे चारी बाजूस दगडी चौरंग, बैठका या अजूनही आहेत. ओसर्यांच्या कोपर्यावर पुरुषभर उंचीचे रांजण आहेत.
इथून आम्ही ओसरीच्या एका कोपर्यावर असलेल्या जिन्यावरुन पहिल्या मजल्यावरच्या दरबार सदरेच्या ठिकाणी गेलो.
ही
दरबाराची जागा. इथली दोन्ही बाजूची कवाडे आणि नक्षीदार खांबांची रचना खरंच
खूप सुंदर आहे. इथे पूर्वी शाळेची होण्यपूर्वी गावातली प्राथमिक शाळा
भरायची. आता चित्रीकरणाच्या निमित्ताने का होईना पण या जागेची डागडुजी आणि
निगा राखलेली दिसतेय. हे एक छानच.
पहिल्या मजल्यावर बाकी भाग मात्र तसाच रिकामा थोडासा अडगळीसारखा दिसला. वेगवेगळ्या हेतूने बांधलेल्या जागा अजून साफ होऊन समोर यायच्या आहेत असं दिसतं.
इथे या फोटोमध्ये कोपर्यातले रांजण आणि दगडी चौरंग दिसतायत बघा.
परत दुसर्या बाजूने ओसरीवर यावे. तिथून आतल्या बाजूस जाण्यासाठी नक्षीदार सागवानी दरवाजा होता.
आतल्या खोल्या रिकाम्या असल्याने (तिथेच आसपास माजघर वगैरे असावे बहुतेक) तिथे न थांबता मागच्या दारी तुळशी वृंदावनाच्या चौकात आलो. तिथे बर्यापैकी जीर्णोध्दाराचे काम चाललेले होते. तिथल्याच इमारतीचा काही भाग मात्र अगदी रहाण्यालायक असा नुतनीकरण केलेला आहे. चित्रीकरणादरम्यान लोकांची राहण्याची/थांबण्याची व्यवस्था इथे होते असं सांगण्यात आलं. खरं तर वाड्याचा हा भाग अगदी पर्यटकांसाठी रहायला उपलब्ध करुन द्यायला हरकत नसावी असं वाटलं. अशा एखाद्या ठिकाणी राहण्याची मजा भारीच असेल.
खरं तर बरेचशा बंद दरवाजांच्या भागात तसेच मागच्या नव्याने नीट केलेल्या बागेत वगैरे जाऊन यायची इच्छा होती पण वेळेअभावी शक्य नाही झाले.
पण जेवढे पहायला मिळाले त्यानेही खूप छान वाटलं. सध्या तरी चित्रीकरणातच वाडा व्यस्त आहे पण मराठी चित्रपटसृष्टीच्या निमित्ताने का होईना पण नजरेच्या समोरचाच तरीही दुर्लक्षित असा ऐतिहासिक वारसा जपला जातोय आणि पहायलाही मिळतोय हे ही नसे थोडके. आता तर कदम-इनामदारांच्या सध्याच्या वंशजांनी वाड्याचे पुरातन सौंदर्य जपून नुतनीकरण करायचे मनावर घेतलेले दिसतेय तेव्हा पुढे मागे ही सुंदर वास्तू पर्यटकांसाठीही खुली झाल्यास आश्चर्य वाटणार नाही.
राजेमहाडीक वाडा, तारळे
महाराष्ट्र ! म्हणजे असे राष्ट्र की, विश्ववंदनीय छ. शिवाजी महाराज याच भूमीतील सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आले. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र परकीय आक्रमकांच्या अमलाखाली होता. येथील रयत आक्रमकांच्या जुलमाने त्रासली होती, पण तिचे रक्षण करणारा कोणीही त्राता नव्हता. आया बहिणींची भरदिवसा ढवळ्या अब्रू लुटली जात होती तर देव व मंदिरे उद्ध्वस्त करून धर्म बुडवून टाकण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक हिंदूद्वेष्ठ्या आक्रमक सत्तेकडून होत होता. येथे अनेक कर्तृत्ववान, महापराक्रमी योद्धे होते पण ते आक्रमक सत्तेच्या पदरी नामजाद सरदार म्हणून नोकरीस होते. पराक्रम करायचा तो आपल्या बादशाहाच्या तिजोरीत जास्तीतजास्त नकद व मुलूख पडावा म्हणूनच. अशावेळी वेरुळच्या भोसले घराण्याचा एक धोरणी, पराक्रमी शूर योद्धा शाहजीराजे हे विजापूच्या अदिलशाहा बादशाहाच्या वतीने कर्नाटकातील बंगळूर येथे कारभार पाहत होते. त्यांना महाराष्ट्रातील स्वकियांची काळजी वाटत होती. स्वराज्य संकल्पक शाहजी राजांनी एकदा मराठी रयतेसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयोग केला होता. अशावेळी त्यांनी आपल्या पुण्याच्या जाहगिरीवर छ. शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊ सह मोकासदार म्हणून पाठविले. जे आदिलशाहाच्या सेवेत राहून त्यांना करता येणार नाही ते मुलाकडून व्हावे हीच अपेक्षा व तशी खात्री देखील होती.
छ. शिवाजी महाराजांनी बारा मावळातील अनेक सामान्य माणसांना स्वराज्य स्थापनेच्या कामात सहभागी करून घेतले. छत्रपतींच्या नेतृत्वाखाली सामान्य मावळ्यांनी असामान्य पराक्रम केला. अनेक घराणी परकीय आक्रमकांच्या सेवेतून स्वराज्याच्या कार्यात सहभागी करून घेण्यात छत्रपति यशस्वी झाले. अनेकांनी शौर्य, पराक्रम करून आपली स्वराज्यनिष्ठा सिद्ध केली. तिकडे कर्नाटक मधे शाहजीराजांसोबत अनेक इमानी मराठा सरदार आपले योगदान देत होती. त्यातील एक घराणे म्हणजे राजेमहाडिक यांचे होय. या घराण्याचा उल्लेख कविंद्र परमानंद नेवासकर यांच्या ' शिवभारत ' मधे येतो तो असा,
" महाडिक परशुराम दुजे सत्याकुली नव || "
महामानी महाडिके फत्ते खानास गांठू दे ||"
हे घराणे मूळचे कोकणातील होय. त्यांच्या पूर्वजांकडे महाड बंदराचे वतन व देशमुखी तसेच, खेड बंदराची मोकादमी मिळाल्यामुळे त्यांना ' महाडिक ' हे उपनाम मिळाले. त्यांचा महापुरूष कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशाच्या लुटालूटीत मरण पावले त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती.नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरूवात झाल्यावर कृष्णाजींचे बंधू कानोजी यांना मिळाले हे ही १६५० ला युध्दात मरण पावले.त्यांचा मुलगा परसोजी हे शहाजीराज्यांस कर्नाटकात मदत करीत होते. परसोजीराजें कर्तृत्व व निष्ठा शाहजीशी एकरुप झाली होती. कानोजीराजे महाडिकांचे शौर्य, मुत्सदीपणा परसोजींच्या रक्तात पित्याप्रमाणे होता. परसोजींच्या मृत्यूनंतर हरजीराजे हे शाहजीच्या सेवेत दाखल झाले. शहाजीराजेंनी हरजीराजेंवर चांगलेच लक्ष होते .विजापूरकरानी हरजीराजे यांना (राजे,प्रतापराव, रायातराव) या पदव्या दिल्या होत्या
शाहजीराजांच्या मृत्यूनंतर हरजीराजे छ. शिवाजी महाराजांच्या मोहिमेत यशस्वी होऊ लागले. छत्रपतींना हरजीराजेंची गुणवत्ता ज्ञात होती. हरजी राजेमहाडीक यांच्या कर्नाटकातील कामगीरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजींना राजेशाही हा किताब सन्मानार्थ देऊ केला.त्यांच्या शूरवीरतेच्या गुणांमुळेच छञपती शिवाजी महाराज यांनी आपली मुलगी अंबिकाराणी यांचा हात विश्वासाने १६६८ ला श्रीमंत सरदार हरजीराजेंच्या हाती दिला व विवाह संपन्न झाला. शाहजी राजांच्या मृत्यूनंतर कर्नाटकातील मराठा सरदारांपैकी निष्ठावान व्यक्तीमधे हरजीराजे हे अग्रभागी होते. कर्नाटकची संपूर्ण जबाबदारी हरजीराजेंच्या नेतृत्वाखाली छ. शिवाजी महाराजांनी सोपविली. हरजीराजेंनी आपल्या पराक्रमाने कर्नाटकातील मुलूख वाढविण्यासाठी फार मोठा पराक्रम करून ते यशस्वी झाले.
छ. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपति संभाजी महाराज गादीवर आले. छ. संभाजी महाराजांच्या आज्ञेवरून हरजीराजे, शामजी नाईक पुंडे, जैताजी काटकर, दादाजी काकडे हे सैन्यासह कर्नाटकात १६८१ गेले. स्वतः कर्नाटकात लक्ष घालावयास छ. संभाजी राजांना वेळ नसल्यामुळे त्यांनी हरजींना कर्नाटकाचे सर्वाधिकार आणि कर्नाटकातील सर्व गडकोटांचा अधिकार सोपविला होता. म्हैसूरचा सेनापति कुमारय्या याचा हरजींनी पराभव करून मदुरैच्या नायकाचा भरासाच भाग स्वराज्यात दाखल केला. पुढे मराठी सैन्याने त्रिचनापल्ली जिंकून घेतल्याने हरजींची सत्ता पूर्व कर्नाटकात इतकी वाढली की ते सर्वसत्ताधिश झाले. जिंजी, अर्काट आणि भोवतालचा प्रदेश मराठ्यांचा ताब्यात होता.इ.स.१६८१मध्ये हरजीराजे राजेमहाडीक कर्नातकातचे-जिंजीचे मुख्य कारभारी झाले.त्यावेळी त्यांनी जिंजी राखला म्हणुनच जिंजी नंतर उपयोगि आला मार्टिनच्या दैनंदिनीत म्हतले आहे की हरजीराजे यांना जिंजीचे प्रशासक नेमण्यामागे संभाजीराजांची दुरदुष्टी होती. एक उत्कृष्ट सेनापति म्हणून हरजीराजांचा गौरव भारतातील इतिहासात नोंदविला गेला.जिंजीचे राज्य त्यांनी औरंगजेबाचे आक्रमणापासून वाचवले .म्हैसूर आणि तमिळनाडूचंया उत्तर अर्काटपर्यंत मराठ्यांनी औरंगजबाशी निकराचा सामना दिला . हरजी राजे गोवळकोंड्याकडील प्रदेश स्वराज्यास जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इ.स.१६८८ च्या जानेवारी मध्ये ५००सैनिकांचे मदतीने कांचीवर गेले.व नंतर मार्च अखेरीस राजे त्रिचनापल्लि ते कांजीवरम या आघाडीवर गेले .त्यांची मुले प्रतापजी ,दुर्गोजी ,शंकराजी,जयसिंग ,सुभानजी,गुणाजी उदितसिंग,
मुघलांनी छ. संभाजी राजांना पकडल्याची बातमी ऐकताच ९ - ३ - १६८९ रोजी केशव त्रिमल यांस त्रिणामली येथे हरजींने कैद केले. हरजीराजे व केशव त्रिमल यांच्यामधे कर्नाटकातील प्रमुखपदासाठी संघर्ष असला तरी दोघेही छ. संभाजी महाराजांशी अतिशय प्रामाणिक होते. हरजींनी कर्नाटकचा मुलूख चांगला संभाळला व त्यात वाढ देखील केली.छ. संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर आले. मोगल महाराष्ट्रात जोर धरु लागल्यावर राजाराम महाराजांना जिंजी जावे लागले. मोगल सरदार झुल्फिकारखान याने जिंजी वेढा दिला होता. यावेळी झालेल्या युद्धात एक तोफेचा गोळा लागल्यामुळे २९ सप्टेंबर १६८९ रोजी वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी हरजीराजेंचा स्वराज्य रक्षण करताना मृत्यू झाला. स्वराज्याच्या तीन छत्रपतींची अत्यंत निष्ठापूर्वक सेवा हरजीच्या हातून झाली.
औरंगजेबाचा १७०७ मध्ये अहमदनगर जवळील भिंगार येथे मृत्यू झाल्यानंतर छ. संभाजी पुत्र शिवाजी उर्फ शाहू यांना काही अटीवर मोगलांनी मुक्त केले. छ. शाहू महाराजांनी सातारा येथे आपली राजधानी निर्माण केली. छ.संभाजी महाराजांची कन्या भवानीराणी म्हणजेच छ. शाहू महाराजांच्या भगिणी यांचा विवाह हरजीराजे महाडिकांचे पुत्र शंकराजी यांचाशी झाला.भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर इ. स. १६७८ रोजी पिलाजी राजेशिर्के यांच्या ‘शृंगारपूर’ येथील वाड्यात झाला. येसूबाई राणीसाहेब माँसाहेब झाल्या! छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले! राजकुळातील लाभाचे नातमुख जन्मास आले. भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसूबाई राणीसाहेब यांची ज्येष्ठ कन्या. छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहूमहाराज यांच्याबरोबर औरंगजेबाच्या कैदेत होत्या. त्यांचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी, म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते. अंबिकाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या सर्वांत धाकट्या कन्या. साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशा वेळी हरजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला. त्यामुळे छत्रपती शाहूमहाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेव्हणे यांना चार हजारी मनसबदार करून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली. तसेच ७२ वाड्यांची व पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली.शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी भवानीबाई यांच्यावर अतिशय प्रेम होते. भवानीबाई या अत्यंत हुशार व धाडशी होत्या.
१७०९ साली छ. शाहूंनी तारळे ता. पाटण जि. सातारा विभागातील २४ गावची जहागिरी त्यांना दिली. त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहात केली होती. अशा वेळी हनगोजी काटे- देशमुख, सिदोजी, विठोजी साळवे-देशमुख, देशपांडे, मुकादम, कुलकर्णी, शेटे, महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईंना साकडे घातले. त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजेंनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्थापित करून विस्कटलेली घडी बसविली.शंकराजीराजे महाडिक यांनी स्वराज्याची सेवा करीत असताना १७२८ मध्ये देह ठेवला. त्यावेळी तारळे गावच्या तारळी व काळगंगा नद्यांच्या संगमावर भवानीराणी सती गेल्या. भवानीराणी व शंकराजी यांना दुर्गोजी व अंबाजी असे दोन पुत्र होते. दुर्गोजी हे कोल्हापूर येथील स्वराज्याच्या दुसऱ्या गादीच्या संभाजींच्या चाकरीत होते तर, धाकटे अंबाजी हे सातारा छत्रपति यांच्या सेवेत होते. याच घराण्यातील भवानजी हे छत्रपति प्रतापसिंहांच्या काळात सातारा गादीच्या सेवेत होते.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ऐतिहासिक तारळे (ता.पाटण जि. सातारा ) गावात राजेमहाडिकांचे सुमारे तीन एकर क्षेत्रफळावर एकूण आठ वाडे होते, त्यापैकी चार वाडे काळाच्या ओघात नष्ट झाले असून चार वाडे अजूनही उन, वारा, पाऊस यांचा सामना करीत आपल्या पूर्वजांचा वैभवशाली पराक्रम मूकपणे सांगताना दिसतात. त्यातील ३-४ वाड्यात त्यांचे वंशज राहतात. एका वाड्यात शाळा आणि वसतीगृह आहे. वाड्याजवळ असलेले राममंदिर, बारव पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाड्यामधे आड,तलवार, दांडपट्टे, ढाल, भाले, पालखी अशा विविध गोष्टी पहायला मिळतात.गावाच्या बाहेर नदी संगमावर शंभूराजेंची मुलगी भवानीबाई महाडिक यांची समाधी आहे
तारळे गावाच्या नावाला प्राचीन इतिहास आहे. तारकासुर राक्षसाच्या संकटातून तारले म्हणून तारळे हे नाव मिळाले असावे. या गावामुळे आजूबाजूच्या इतर खेडेगावांचे मिळून तारळे खोरे हे संबोधन प्राप्त झाले आहे. परिसरातील कडवे येथे पांडव लेणी व रामघळ आहे, खवाळवाडीच्या डोंगरावर विंध्यवासिनीदेवीचे मंदिर आहे. तारळे गावाच्या पूर्वेला असलेल्या पाल येथे भक्तांचे दुःख हरण करणारा खंडोबा देवस्थान, दक्षिणेस चाफळ गावी प्रभू श्रीराम मंदिर तर उत्तरेस समर्थ रामदासस्वामींचे समाधीस्थळ सज्जनगड आहे. या आठ वाड्यांचे प्रवेशद्वार वेगवेगळ्या दिशेला असून मात्र या सर्व वाड्यांचे परसदार एकाच चौकात होते. प्रत्येक वाड्याचे प्रवेशद्वार आपल्या भव्यतेची जाणीव करून देते. वाड्यात भरपूर ऐतिहासिक सामुग्री आजही पाहण्यास मिळते. यात प्रामुख्याने तत्कालीन शस्त्र, महिलांसाठी असलेले लाकडी मेणे, व्यायामाचे साहित्य, कासवाच्या पाठीच्या ढाली, संदूक, इत्यादी राजेमहाडिकांच्या वंशजांनी फार कष्टाने सुरक्षित ठेवले आहे. काळ बदलला असला तरी आपला गौरवशाली इतिहास सांभाळणा-या श्री.विजयसिंह काकासाहेब राजेमहाडिक, धैर्यशिल राजेमहाडिक व इतर वंशजांनी खूप मेहनत घेतल्याचे प्रामुख्याने दिसून येते. भवानीराणीच्या समाधीचे सध्या नुतनीकरण सुरू झाले असून लवकरच तारळे या गावी एक भव्यदिव्य समाधी आपल्याला दिसून येईल.
हरजीराजे महाडिकांचे स्वराज्यासाठी दिलेले योगदान फार मोलाचे असून त्यांच्या वारसदारांचे छ. शाहू राजांच्या काळातील योगदान तितकेच मोलाचे आहे त्याचा गौरवशाली वारसा तारळे येथे दिसून येतो. हेच महाराष्ट्राचे वैभव आहे. ज्या राजेमहाडिकांशी छत्रपति घराण्याने दोन वेळा आपल्या मुलींचा विवाह केला ते त्या गुणवत्तेचे असल्याचे इतिहासाने पाहिले आहे. धन्य हरजीराजे, ज्यांनी सलग स्वराज्याच्या तीन छत्रपतींच्या सेवेत राहून आपल्या असामान्य कर्तृत्वाने स्नेह, प्रेम व विश्वास मिळविला.
कात्रेश्वरामुळे "कातरपट्टे'चं झालं "कातरखटाव'!

कातरखटाव - खटाव तालुक्यातील कातरखटाव या गावाचे पूर्वीचे नाव कवठे असे होती. कवठेश्वर हे या गावचे ग्रामदैवत. पुढे या गावाला कातरपट्टे असे म्हटले जाऊ लागले आणि त्याचा अपभ्रंश कातरखटाव असा झाला. आता हे गाव कातरखटाव या नावाने ओळखला जाते. या गावाच्या नावातील बदलाची दंतकथा सांगितली जाते. कवठेच्या उत्तर बाजूने कवठाई नदी वाहते. हीच नदी पुढे येरळा नदीस मिळते. या कवठे गावात शिवदास नावाचा गवळी हा शंभू महादेवाचा निस्सीम भक्त होता. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ होत आली होती. मात्र, दर सोमवारी शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या पायी वारीचा नियम त्याने सोडला नव्हता. अशाच एका सोमवारी भल्या पहाटे शिवदास उठला, पाण्याची कावड घेऊन नदीवर गेला, स्नानसंध्या उरकली, कावड पाण्याने भरली आणि हर हर महादेव म्हणत तो शिखर शिंगणापूरचा रस्ता जवळ करू लागला. त्यावेळी गावाच्या उत्तरेस अरण्य होते. त्यातून मार्गक्रमण करत शिवदासानी शंभू महादेवाच्या जपाच्या बळावर शिखर शिंगणापूर गाठले. कावडीतून आणलेल्या कवठाई नदीच्या पवित्र जलाने शंभू महादेवास अभिषेक केला आणि भक्तिभावाने हात जोडले. शिवदासाची भक्ती पाहून शंभू महादेव प्रसन्न झाले. ते शिवदासला म्हणाले, तुला काय हवं आहे, ते माग. तेव्हा शिवदास म्हणाला, मला काही नको. फक्त तूच मला हवा आहेस. त्यावर महादेव म्हणाले, आता तुला इतक्या लांब माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही. मीच तुझ्याकडे वास्तव्यास येतो; पण एक लक्षात ठेव, तुझ्या गावापर्यंत जाईपर्यंत मागे वळून बघायचे नाही.
शिवदासाने कावड घेतली आणि कवठेचा रस्ता धरला. शिवदास गावापासून हाकेच्या अंतरावर आला आणि त्याच्या मनात शंका आली की, देव माझ्या मागोमाग आले आहेत का? शंका आल्याने शिवदासाने मागे वळून पाहिले असता, कोणीच दिसलेच नाही. शिवदास निराश झाला. त्याला वाटले देवाने आपल्याला फसवले. तो निराश होऊन घरी आला. विचार करतच झोपी गेला. झोपेत शंभू महादेवांनी शिवदासास दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी मागे वळून पहिलेस, त्या ठिकाणी मी गुप्त झालो. तेथे तुला शिवलिंग सापडेल. शिवदास खडबडून जागा झाला. तो आपली बैलजोडी आणि नांगर घेऊन शंभू महादेवांनी दृष्टांत दिलेल्या ठिकाणी येऊन थांबला. शिवनामाचा जप करत त्याने जमीन नांगरायला सुरुवात केली. जमीन नांगरत असताना शिवदासाला मोठा आवाज ऐकू आला आणि जमिनीतून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. त्या क्षणी नांगर सोन्याचा झाला. रक्ताचे रूपांतर पाण्यात झाले आणि शिवलिंग वर आले. मात्र, शिवलिंगाची साळुंखी नांगराच्या फाळाने कातरल्याचे दिसले. त्यामुळे शिवलिंगास 'कात्रेश्र' म्हणून संबोधले जाऊ लागले. त्यामुळे कवठेचे नाव कातरपट्टे, असे झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत आजचे 'कातरखटाव' झाले.
कराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी
हायवेच्या पश्चिमेस प्रथम जखिणवाडी. गावात सुरुवातीलाच बाह्यांगानं सजलेली सुंदर शाळा दिसते. विमाग्रामचा फलक गावचं वैशिष्ट्यं नमूद करतो. गावच्या दुतर्फा असलेली शोभेची झाडं लक्ष वेधून घेतात. मग उसाच्या शिवारातल्या डांबरीवाटेनं आपण गावाबाहेर पडतो. काही वेळातच डोंगरपायथ्याला येतो.
लेण्यांकडं जाण्यासाठी पायऱ्या आहेत. अलीकडंच त्यांचं बांधकाम झाल्याचं लक्षात येतं. त्यांचा आकारही लक्षात राहतो. सुमारे पावणे चारशे पायऱ्या चढल्यानंतर आपण लेण्यांपर्यंत पोचतो. लेण्यांचं हे जग पाहताना थक्क होतो.
आगाशिवच्या डोंगरातली ही लेणी इसवी सनपूर्व 250 ते 200 या कालखंडात टप्प्याटप्प्यानं खोदली गेली असल्याचं सांगितलं जातं. या लेण्यांची संख्या जवळपास शंभराच्या घरात आहे. त्यातील 64 लेणी सुस्थितीत आहेत. त्यातही पुरातत्त्व विभागानं पंचवीसेक लेणी विकसित केली आहेत. दरवाजे, जाळ्या, दगडी पायऱ्या, सुशोभन आदी कामं केली आहेत. जवळपास प्रत्येक लेण्याच्या बाहेरील बाजूस पाण्याचे नैसर्गिक कुंड दिसतात.
ही प्राचीन लेणी बोैद्धकालीन आहेत.
प्राचीन काळात बौद्ध भिक्खूंच्या ध्यानधारणेसाठी अशा लेण्यांची निर्मिती झाली. अर्थात त्याला काहीजण पांडवकालाचाही संदर्भ देतात. शेवटी संदर्भ कोणताही असला तरी सध्याच्या आधुनिक काळातही त्यांची निर्मिती आपणांस स्तिमित करते. लेण्यांमध्ये चैत्यगृहं, विहार, मंदिर, स्तूप यांचा समावेश आहे. काही ठिकाणी एका अखंड, सलग दगडात कोरलेले स्तंभ आहेत.
श्रावणात हा परिसर मनोहारी ठरतो. लेण्यांपासून आणखी चढून वर गेलं, की महादेव मंदिर आहे. शंकरानंद महाराजांचा मठही या परिसरात आहे.
मलकापूरच्या
बाजूकडूनही वर येता येतं. कराड नगरीचं विहंगम दृश्य पाहता येतं. मुळात हा
सारा परिसर शांत, रमणीय आहे. पुरातत्त्व विभागाकडून त्याची छान डागडुजी
करण्यात आली आहे. प्रमोद सुतार हे कर्मचारी सध्या या परिसराची उत्तम देखभाल
करतात. त्यांच्याकडूनही लेण्यांविषयी आणखी विस्तृत माहिती मिळते.
पर्यटकांसह अनेक अभ्यासक या स्थळास आवर्जून भेट देतात.
साताऱ्यातून एका दिवसात होणारी ही भटकंती समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविते. हे डोंगर लेणे प्राचीन सोैंदर्यकलेचीही साक्ष देते. त्यामुळंच ते आवर्जून पहावे असेच आहे.
ऐतिहासिक राजाचे कुर्ले!
सुनील शेडगे। नागठाणे, जि. सातारा
राजाच्या कुर्लेची. खटाव तालुक्यातलं हे ऐतिहासिक गाव.
साताऱ्यापासून 55 किलोमीटरचं अंतर. त्यालाच जोडून काही अंतरावर डोंगरउंचावर गिरिजाशंकरवाडी हे प्राचीन मंदिरही विशेष प्रसिद्ध आहे.
खरं तर ही स्थळं श्रावणात करायचा बेत पक्का होता. मात्र ते घडलं नाही. त्यासाठी दिवाळी उजाडावी लागली.
साताऱ्यातून रहिमतपूर. मग वाठार किरोली, आर्वी, नागझरी, पुसेसावळी असा हा मार्ग. कराडातून श्यामगाव घाटातूनही कुर्लेत पोचता येतं.
राजाच्या
कुर्लेला ऐतिहासिक संदर्भ आहेत. गावाच्या तोंडावरच दोन दगडी चोैथऱ्याची
कमान आहे. ते गावचं प्रवेशद्वार. आता गावोगावी कमानी दिसतात खऱ्या. इथलं
वैशिष्ट्यं असं, की ती जुन्या काळातील आहे. अजूनही भक्कम आहे. मात्र गावात
शिरण्याचं अन् बाहेर पडण्याचं हे एकमेव ठिकाण.
कमानीला जोडूनच गावाभोवती तटबंदी आहे. कदाचित हेच इथलं निराळेपण ठरावं.
शाहू महाराजांच्या काळात प्रसिद्धी पावलेले फत्तेसिंह राजेभोसले हे इथले
सरदार. शाहू छत्रपतींनी त्यांना अक्कलकोट परगण्याची जहागिरी दिली होती.
इथला भुईकोट किल्ला (राजवाडा) ही इतिहासाची निशाणी.
सुमारे तीन ते चार
एकर परिसरात हा भुईकोट किल्ला बांधण्यात आला होता. चारी बाजूला सुमारे तीस
फूट उंचीचे भक्कम बुरुज अन् भव्य प्रवेशद्वार या राजवाड्यास होते. आजही या
भुईकोट किल्ल्याचे दोन बुरुज पाहावयास मिळतात. गावात जुनी घरं आजही दिसतात.
1951 मधली ग्रामपंचायतीची जुनी इमारतही दिसते.
कुर्लेपासून पाचेक किलोमीटरवर गिरिजाशंकरवाडी. सगळा घाटाचा वळणदार रस्ता. अवतीभवती भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या. डोंगरावर आलं, की मग स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल दादू थोरात यांच्या नावाची कमान लागते. सपाटीनं पुढं गेलं, की प्राचीन शिवमंदिर. त्याचं दगडी बांधकाम लक्षवेधक आहे. मंदिराची सारी घडणावळ दगडात एकसंघ दिसते. गर्भगृहात मोठी स्वयंभू पिंड आहे. प्रांगणात दगडी नंदी, दीपमाळ, पाण्यानं काठोकाठ तळं, पुढं आणखी एक तलाव दिसतो. इथलं दगडी प्रवेशद्वारही मजबूत आहे. डाव्या हाताला काही अंतर चालून गेलं, की आणखी एक मंदिर. त्याच्या शिखराच्या कलाकुसरीमुळं ते लक्षात राहातं. इथला महाकाय दगडी नंदीही असाच लक्षात राहतो.
राजाचे कुर्ले या ठिकाणी एक प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. हा शिलालेख कलचुरी घराण्यातील असून, तो सुमारे साडेआठशे वर्षे जुना असावा, असे मत इतिहास संशोधकांनी व्यक्त केले आहे. या प्राचीन शिलालेखातून साताºयाचा सुवर्णकाळ उलगडण्यास मदत मिळणार आहे.
जिज्ञासा इतिहास संशोधन गेल्या दोन दशकांपासून साताºयाच्या इतिहासाप्रती जनजागृतीचे कार्य करीत आहे. संस्थेच्या वतीने आजपर्यंत सातारा परिसरातील अनेक ऐतिहासिक वस्तू, वास्तू, शिलालेख प्रकाशात आणून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत. साधारण एक वर्षापूर्वी साताºयाच्या प्राचीन इतिहासाच्या संकलनासाठी जिज्ञासाने केलेल्या सर्वेक्षणात संस्थेचे प्राचीन लिपी अभ्यासक धैर्यशील पवार यांना हा शिलालेख आढळून आला आहे.
कर्हाडपासून २६ किलोमीटर अंतरावर गिरिजा शंकराच्या पायथ्याला राजाचे कुर्ले हे गाव वसलं आहे. या गावात इतिहास काळातील एक प्राचीन गढी आहे. ग्रामदैवत असणारे धाकूबाईचं मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिर अशी इतर मंदिरे आहेत. धाकूबाई मंदिराचे बांधकाम फारसे प्राचीन नाही; परंतु मंदिराजवळच प्राचीन जीर्ण स्थितीतील गजलक्ष्मी शिल्प अन् काही वीरगळी आणि भग्न शिल्पे या परिसराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात.
याच मंदिर आवारात सुमारे साडेआठशे वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळला आहे. हा शिलालेख भिंतीत बसवलेला आहे. शिलालेख खूपच जीर्ण झालेला असून, कालौघात त्याच्यावर सिमेंट-वाळूचा थर बसल्याने शिलालेखाचा बराचसा भाग अनाकलनीय झाला आहे. जिज्ञासाच्या सदस्यांनी गेल्या काळात वेळोवेळी भेट देऊन शिलालेख स्वच्छ केला आहे. वेगवेगळी तंत्रे वापरून त्याचे ठसे घेतले. त्याचबरोबर आधुनिक फोटोग्राफी तंत्राचा वापरही केला. शिलालेखाची लिपी देवनागरी आहे. तसेच अक्षरे खूपच खराब झाल्याने शिलालेखाचे वाचन करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत.
या शिलालेखाच्या संशोधनकामी राजाचे कुर्ले गावाचे इतिहासप्रेमी नागरिक सुहास राजेभोसले तसेच प्रशांत गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले. जिज्ञासाचे धैर्यशील पवार, विक्रांत मंडपे, योगेश चौकवाले, नीलेश पंडित, सागरनाथ गायकवाड, शीतल दीक्षित यावर अधिक संशोधन करीत असून, लवकरच त्याची माहिती लोकांसमोर ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे.
काय आहे शिलालेख?
या शिलालेखाची सुरुवात शके १०८५ सुभानु नाम संवत्सर याने झाली आहे. या शिलालेखावर ‘सुवर्ण वृषभ ध्वज, समस्त भुवन आश्रय, श्री पृथ्वी वल्लभ, कालांजरपुरवराधिश्वर या पदव्यांनी वर्णन केलेला कलचुरी चक्रवर्ती भुजबलमल्ल देव म्हणजेच बिज्जलदेव द्वितीय याचा मांडलिक, महामंडलेश्वर, पंचमहाशब्द प्राप्त, विष्णू वंशोद्भव, जादव नारायण, जादवकुलकमल, विकसित भास्कर या पदव्यांनी गौरविलेला जे सिंघदेव याने हे भूमिदान दिलेलं आहे. हे दान चंद्रग्रहणाच्या दिवशी दिलेले आहे, असा उल्लेख आढळतो.
कण्हेरखेड- महादजी शिंदे यांचा वाडा
शिंगणवाडीचा मारुती आणि शिवसमर्थ स्मारक. हि दोन्ही ठिकाणे चाफळ गावापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर आणि एकाच रस्त्यावर आहेत . त्यानुसार चाफळच्या नैऋत्येस असणाऱ्या टेकडीकडे म्हणजे शिंगणवाडी परिसरात काही ठिकाणे आहेत.. शिंगणवाडीच्या या डोंगराजवळ असणाऱ्या एका प्रशस्थ गुहेत (रामघळीत) समर्थ संध्या करावयास जात असत. म्हणून आपल्या दैवताची म्हणजेच मारुतीची मूर्ती त्यांनी येथे शके १५७१ (इ. स. १६४९) मध्ये स्थापन केली. या मारुतीस खडीचा मारुती किंवा बालमारुती असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब व रुंद असणा-या गाभा-यात साडेतीन फूट उंचीची छोटी मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. हे मंदिर अकरा मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. चाफळ राममंदिरातून बाहेर पडल्यानंतर अर्ध्याच किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याला डावीकडे एक फाटा फुटतो. याला शिंगणवाडी फाटा म्हणतात. या रस्त्यावर शिंगणवाडीकडे डावीकडे वळल्यानंतर पुन्हा अर्धा किलोमीटर पुढे जायचे की डाव्याबाजूला एक कच्चा गाडी रस्ता दिसतो. हा रस्ता थेट हनुमंतांच्या मंदिरा समीप घेऊन जातो. मात्र हा शेवटचा १ किलोमीटरचा रस्ता बराचसा खराब, कच्चा व थोड्या खड्या चढणीचा आहे. कारसारखे वाहन मंदिरापर्यंत नेता येत असले तरी गाडी अत्यंत जपून चालवावी लागते अन्यथा हे अंतर पायीच चढून गेलेले बरे.
![]() |
| समर्थ स्थापित "खडीचा मारुती" |
![]() |
| शिव-समर्थ स्मारक |
![]() |
| शिव-समर्थ स्मारकाचा सुंदर परिसर |
![]() |
| कुबडीतीर्थ रामघळ येथील पठार |
| रामघळीत उतरणार्या पायर्या |
घळीच्या समोर बरीच मोकळी जागा आहे. घळ दुमजली असून बाहेरूनही दोन मजले स्पष्ट दिसतात. घळीच्या डाव्या हाताला एक मोठे विवर आहे. येथे आत गेल्यावर वर्तुळाकार जागा आहे. हीच समर्थांची ध्यानस्थ बसण्याची जागा. हि घळ म्हणजे डोंगरात खोदलेलं एक भन्नाट लेणं. भर दुपारच्या उन्हात सुद्धा घळ इतकी थंड कि थोड्याच वेळात नाकातून पाणी यायला लागत. घळीमधे प्रवेश करण्याआधी चपला काढव्यात. तिथल्या खडकावर पाय ठेवताच थंडीमुळे सणक डोक्यात जाते. घळ खूप स्वच्छ ठेवलेली आहे त्यामुळे इथले वातावरण मन प्रसन्न करते. मुख्य घळीमधे आत दोन छोट्या गुहा आहेत. उजव्या बाजूच्या गुहेत सदगुरु जनार्दन महाराज (वसंतगडकर) यांची साधना गुंफा आहे. या गुहेत जनार्दन महाराज यांचा पुतळा आहे. तर डाव्या हाताच्या गुहेत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीची जागा म्हणून त्यांच्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. घळीच्या गवाक्षामधून समोर दूरवर पसरलेला डोंगरदर्यांनी व्यापलेला परिसर खूप सुंदर दिसतो.

याच घळीजवळ भैरववाडी लागते.एकदा समर्थांसाठी विड्याची पाने आणायला चाफळला गेलेल्या कल्याणस्वामीना सर्पदंश झाला. तेव्हा समर्थांनी भैरववाडीतील भैरवाला साकडे घातले.
याच परिसरात कुबडीतीर्थ आहे. यासंदर्भात एक कथा अशी सांगितली जाते कि ईथे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली,तेव्हा ते दोघे बोलत पुढे गेले असता शिवरायांना तहान लागली. तेव्हा रामदास स्वामींनी हातातील कुबडीने एक दगड उलथवून येथील झर्याचे पाणी त्यांना प्यायला दिले.हा झरा अजूनही वाहताच आहे.याला कुबडीतिर्थ म्हणतात. ईथेच एक मारुतीची घुमटी आहे.
मोरबागची मोरघळ : -
जशी चाफळजवळची हि रामघळ तशीच समर्थांच्या स्मृती बाळगणार्या सज्जनगड
उर्फ परळीच्या किल्ल्याच्या परिसरात आणखी एक घळ आहे, मोरघळ.मात्र रस्त्याची
अवस्था विचारात घेता या परिसरात पावसाळ्यात न येणच योग्य ठरेल. ईथे रस्ते
खचण्याचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे दिवाळी ते मे महिना हाच ईथे
येण्याचा योग्य कालावधी. आपण सज्जनगडाकडून ठोसेघरकडे येताना उजव्या हाताला
एक डांबरी सडक पांगारे गावाकडे जाते. डांबरी रस्ता पांगारे गावापर्यंतच
आहे. पुढे कच्चा रस्ता पळसवडे गावाकडे जातो. वाटेत पांगारे व पळसवडे अशी
दोन छोटी धरणे पहायला मिळतात.
वाटेत
उजव्या हाताला सज्जनगड व त्याच्या मागे अंजिक्यतारा दिसत असतो. पळसवडे
गावाच्या अलिकडे एक कच्चा गाडीरस्ता डाव्या हाताला जातो. हा रस्ता मोरबाग
या धनगरवस्तीकडे जातो. मात्र मोरबाग येण्याआधीच छोटी पायवाट डावीकडे जाते.
हि वाट शेताच्या कडेकडेने चढून एका तीन मुखांच्या गुहेकडे पोहचते.
हिच आहे समर्थांनी तप केलेली "रामघळ".गुहेच्या बाहेरच भगवा ध्वज फडकत असतो.
बाहेरुन
एकच मुख दिसत असले तरी आतुन या गुहेचे तीन भाग पडलेले आहेत. पैकी मधल्या
भागात थोडे वीट बांधकाम करुन काही देवांच्या मुर्त्या व नंदी ठेवले आहेत.
ईथे
मागे गेल्यास आणखी चिंचोळी झालेली गुहा दिसते. याच्या आत सरपटत जाण्याचा
मी प्रयत्न केला, तेव्हा पुढे बर्याच गुहाचे जाळे आहे असे लक्षात आले.
मात्र साप, विंचवासारख्या प्राण्यांचे भीती आणि पुरेशी तयारी नसल्याने ईथेच
थांबलो.
उजवीकडे असलेली गुहा चिंचोळी झाल्यामुळे फार पुढे जाता येत नाही.
डाव्या
बाजुला छोटी गुहा असुन आतमधे वटवाघळे आहेत. आमची चाहुल लागताच त्यांनी
बाहेर पोबारा केला. बहुतेक आम्हीच त्यांना वामकुक्षीतून ऊठविले असेल. एकुण
रामघळ पहाणे एक थरारक अनुभव आहे. सर्वांनाच कदाचित शक्य होणार नाही, पण
साहसी मंड्ळीनी त्याची जरुर अनुभुती घ्यावी.
रामघळीच्या
बाजुनेच एक रस्ता वर पठारावर चढतो. हे चाळकेवाडीचेच पठार आहे.प्रंचड
पसरलेल हे खडकाळ पठार प्रत्येक ऋतुत वेगळे सौंदर्य दाखविते. या पठारावर
भटकून पुन्हा खाली आलो तेव्हा त्या शेताडीच्या टोकाशी एकुलते एक घर दिसले.
शहरी सुखसोयीला चटावलेल्या आपणाला अश्या परिस्थितीत रहायची कल्पनाच करवत
नाही. मोरबाग या गावातुन पुढे सांडवली या गावी कच्चा रस्ता जातो, व
सांडवलीतुन आपण आणखी एक धबधबा पाहु शकतो, पण ईतकी गैरसोय सहन करुन
जाण्यापेक्षा केळवलीकडून हा धबधबा पहाणे सोयीचे.
हेळवाक धनगरवाड्याची रामघळ :-
कोयनानगर
हे महाराष्ट्राची वरदायिनी कोयनामाईवर बांधलेल्या नहाकाय धरणामुळे आणि
तिथे असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे प्रकाशझोतात आले. अलिकडे
सह्याद्रीच्या निसर्गरम्य परिसरामुळे हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत
आहे.दुर्गभटक्यांसाठी जंगली जयगड, भैरवगड यासाठी हे गाव महत्वाचे
.कोयनेच्या घनदाट जंगलात लपलेल्या भैरवगडावर जायचे तर एक मार्ग म्हणजे
हेळवाक गाठून तिथून चालत कोंढवळ धनगरवाडा गाठायचा.पुढची वाटचाल निर्मनुष्य
जंगलातून असल्यामुळे इथेव वाटाड्या घ्यायचा आणि भैरवगडाच्या दिशेन
निघाल्यावर सर्वप्रथम दिसते समर्थांच्या वास्तव्यामुळे पुनित झालेली
रामघळ.धनगरवाड्यापासून रामघळ अवघी दहा-पंधरा मिनीटाच्या अंतरावर आहे.

एका
धबधब्याखाली खोल कपार तयार झालेली आहे. समर्थ रामदास या रम्य ठिकाणी शके
१५९६ च्या आषाढात राहिले होते. रामघळ राम ओढ्याच्या वहाळात पुर्वेस तोंड
करुन खोदली आहे. समोर दिसणारी अर्धगोलाकार दरी म्हणजे निसर्गनिर्मीत
कलोसियमच जणु. स्वच्छ हवेत इथे आल्यास अगदी समोर पाटण जवळचा मोरगिरी किल्ला
दिसतो.
आत
पाच वेगवेगळी दालने असल्याचे स्पष्ट जाणवते. मधोमध असलेल्या दालनाची
व्यवस्था देवघरासारखी भासते. इथे एक शिव पिंडी देखील आहे. घळीच्या माथ्यावर
काताळ खडक आहे आणि पाण्याचा धबधबा घळी वरून कोसळत असतो अगदी, शिवथर घळी
प्रमाणेच. इथे रात्री मुक्काम करता येऊ शकतो पण पाणवठा असल्याने वन्य
श्वापदांचा वावर खूप आहे.या रामघळीतूनच एक पाण्याच्या पाइपने धनगरवाड्याला पाणी पुरवठा केला आहे.
हा धबधबा जरी बारमाही असला तरी, पाउस संपता संपता इथे येणे चांगले. या परिसरात जळवांचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
रामघळीत
उभारल्यास आपण धबधब्याच्या मागे उभे असल्याने पाण्याची पातळ चादर समोर
पडते आहे असे वाटते. अर्थात हेळवाक, कोंढावळ धनगरवाडा हा विलक्षण कच्चा
रस्ता असल्याने पावसाळ्यात धबधबा एन भरात असताना येथे येणे सोयीचे नाही.
कल्याणगड उर्फ नांदगिरी
सातारा शहराच्या पूर्वेला नजर टाकली कि सह्याद्रीची शंभु महादेव
डोंगररांगेचे दृष्य दिसते. अगदी डावीकडे उत्तरेला चंदन-वंदन हि
दुर्गजोडी,भुताची टेकडी,जरंडेश्वराचा उत्तुंग पहाड, दुर क्षितीजावर
वर्धनगड, पाटेश्वराचा डोंगर परिसर्,जानाई-मळाई डोंगर अशी प्रचंड मोठी
पसरलेली रांग दिसते. याच रांगेत सपाट माथ्याचा,कातळकडे असलेला आणि माथ्यावर
एका प्रचंड वृक्षाचा तुरा असलेला डोंगर लक्ष वेधून घेतो.हल्ली या परिसरात
मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांची उभारणी झाली आहे. पवनचक्क्यांचा गराडा या
गडाला पडलेला आहे.शिलाहारकालीन प्राचीन खुणा वागवणारा हा गड आहे कल्याणगड
उर्फ नांदगिरी.
या किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास ,कल्याणगडाचेच दुसरे नाव म्हणजे ‘नांदगिरीचा किल्ला’ सातारा येथे सापडलेल्या ताम्रलेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला इ.स. ११७८ ते इ.स. १२०९ या कालावधीत बांधला गेला असावा. शिलाहाराच्या सापडलेल्या अनेक ताम्रपटावरून असे दिसते की शिलाहार राजांनी जैन लोकांना अनेक दानधर्मे केली, आणि कल्याणगडावरील गुहेत असणाऱ्या पार्श्वनाथाच्या मूर्तीवरून ह गडा शिलाहारांनी बांधला असावा हे सिद्ध होते. इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी सातारा व आजुबाजूचा प्रदेश जिंकून घेतला. त्यातच कल्याणगडाचा देखील समावेश होता. पुढे शिवकालानंतर याचा सर्व कारभार प्रतिनिधींकडे सोपवला गेला. इ.स. १७७३ मध्ये पहिले बाजीराव पेशवे व श्रीपतराव प्रतिनिधी यांच्यामध्ये शाहु महाराजांच्या दरबारी तंटा सुरु झाला.त्यानंतर त्याची व्यवस्था प्रतिनिधींकडून काढून पेशव्यांकडे दिली गेली.
इ.स. १७११ मध्ये मेजर प्राईस याने किल्ल्याचे वर्णन असे केले आहे,'दुरुन हा किल्ला एखाद्या मोठ्या गलबताप्रमाणे दिसतो.याच्यासमोर एक टेकडी आहे व माथ्यावर बरीच देवस्थाने आहेत'. इ.स. १८१८ मध्ये एप्रिल महिन्यात लढाई न करता हा गड जनरल प्रिझलरच्या हातात आला.पुढे १८६२ मध्ये इंग्रज सरकारने किल्ल्यांची यादी केली त्यात या किल्ल्यासंदर्भात असे लिहीले आहे कि या किल्ल्याची पडझड झाली आहे,परंतु किल्ल्यात पाणी व दुसरी काही सामग्री नाही'.पण आर.कुक असे लिहीतो कि 'या किल्ल्यासंदर्भात मुख्य चांगली गोष्ट अशी कि येथे पाण्याची सुबत्त्ता आहे.' मराठी राज्यांत हा किल्ला एका तालुक्याचें ठिकाण होतें व येथें खजीना आणि मामलतदार, फडणवीस, सबनीस, हवालदार, दफ्तरदार, २ कारकून, ३ नाईक आणि १६० शिपाई रहात असत. येथील दोन तोफा १८५७ सालच्या बंडांत हलविण्यांत आल्या.

कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. साताऱ्यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला पाहून येऊ शकतो. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहे. या किल्ल्याचे वैशिष्टय म्हणजे चढण्यास सर्वात सोपा. संपूर्ण प्रदेश ऊसामुळे सधन झालेल्या शेतकऱ्यांचा प्रदेश. त्यामुळे एस.टी.ची सोय देखील उत्तम प्रकारची आहे.सातारा शहरापासून सातारा रोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग, महामार्ग ओलांडून जातो. या मार्गावर एस.टी. बसेसची सोय आहे. किंवा पुणे-मुंबईहून रेल्वेनेही येऊन सातारा रोड रेल्वेस्थानकावर उतरता येते. येथून चालत नांदगिरी ऊर्फ कल्याणगडाचा पायथा गाठता येतो. सातारा रोड रेल्वे स्थानकापासून हे अंतर तीन किलोमीटर आहे. किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी (धुमाळवाडी) गावातून वर येते. सातारा एस.टी स्थानकावरून सातारा रोडला जाणारी गाडी पकडावी. सातारारोड ते नांदगिरी हे ३ कि.मी.चे अंतर आहे. येथून किन्हईकडे जाणारी बस पकडावी किंवा एकदम सातारा ते किन्हई बसने नांदगिरीला उतरावे. गावातून गडावर जाण्यास ४५ मिनिटे लागतात.
गडाशेजारच्या डोंगरावर आता पवनचक्क्या झाल्याने त्याची सामग्री नेण्यासाठी कच्चा गाडीरस्ता जवळपास माथ्यापर्यंत गेला आहे.नांदगिरी गावाच्या अलिकडे हा रस्ता गडाकडे जातो.

या रस्त्याने मोटारसायकल सारखे दुचाकी वाहन किंवा जीपसारखे चारचाकी वहान जाउ शकते.मात्र कारसारखे वहान रस्त्याची अवस्था बघता थेट वरपर्यंत न नेणेच योग्य. तसाही कोणत्याही गड पायी चढला तरच त्यात मजा.
गडावर बघण्यासारखी ठिकाणे :-
समुद्रसपाटीपासून ३५३७ फुट उंचीवर असणारा हा किल्ल्यावर नांदगिरी गावातून जाणार्या पायवाटेने निघालो कि सुरवातीला काही नव्याने बांधलेल्या पायऱ्या आहेत. गावात असलेल्या शाळेपासून अर्धा किमी सपाट अंतर चालून गेल्यावर किल्ल्याची चढाई सुरु होते.
सुरवातीच्या पायऱ्या संपल्यानंतर वाट मुरवाड अशी आहे. या वाटेने आपण चढून उजवीकडील डोंगरदांडावर येतो. या मार्गावर दिशा दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचे बाण जागोजाग रंगवलेले असल्यामुळे रस्त्यात भरकटण्याची शक्यता नाही.
या दांडावर आल्यानंतर अर्ध्याडोंगरात एक कोरलेली गुहा आहे. आत पाच सहा दगडी खांब आहेत. यात सध्या पाणी भरलेले आहे. डावीकडे हनुमानाची प्रतिमा कोरलेली. आतील खांबावर मनुष्यसदृश्य प्रतिमा कोरलेली.
येथून
पुढे गडावर जाणारे विजेचे खांब लागतात. या खांबांना धरुनच वाट गडावर
पोहोचते.
महाराष्ट्र माउंटनिअर्स रेस्क्यू कोऑर्डीनेशन सेंटर (MMRCC) चा गिरीप्रेमी संस्थेने लावलेला फलक दिसतो.
गडाचा खडा चढून माथ्याजवळ आलो कि किल्ल्याची तटबंदी जवळ आलेली दिसते.
डाव्या बाजूला किल्ल्यावर जायला रेलिंग ची जोड असलेल्या दगडी पायऱ्या.
गडमाथ्यावर जाण्याआधी उजवीकडे गेलो तर समोर कातळात खोदलेल्या एक विस्तीर्ण गुहा दिसते.कोणीतरी तिथे शंकराची मूर्ती ठेवलेली.
कल्याणगडाचा नकाशाधुमाळवाडीतून येणारा कच्चा गाडी रस्ता इथपर्यंत येतो. दुचाकीच नाही तर जीप इथपर्यंत येते. परिसरातील ग्रामस्थ असे सांगितात की कल्याणगडावर पवनचक्की उभारायची होती. ग्रामस्थांनी विरोध केला. समोरच्या डोंगरावर पवनचक्की उभारायला संमती दिली. धुमाळवाडी पासून कल्याणगडावर येणारा रस्ता करून घेतला.

इथून जैन मंदिराकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी खुण आहे.

किल्ल्यावर
जाण्यासाठी उजवीकडच्या दगडी पायऱ्या चढायला सुरुवात करावी. पूर्व बाजूला
असला तरी उत्तराभिमुख असा कल्याणगडाचा पहिला दरवाजा आहे. या दरवाजाच्या
खालच्या पायऱ्यांचा दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे. दरवाज्याला लोखंडी दार!
एका बाजूला फिरता दरवाजा (Revolving door). नक्षीदार दरवाजा आणि फिरते गेट
छान दिसते. नांदगिरी उर्फ कल्याणगड तसा आडवाटेवरचा किल्ला! पण या
किल्ल्याला भेट देणार्या किल्ले प्रेमी मंडळीपेक्षा भक्त मंडळीच मोठ्या
संख्येने असतात.सहाजिकच या सोयी केलेल्या आहेत.
दरवाज्यातून आत गेल्यावर बाहेरील सुंदर हरित निसर्ग

मार्गावर उजवीकडे नंदीशिल्प आणि छोट शिवमंदिर!
श्री. १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन गुफा मंदिर अर्थात लेणीत खाली जायला खाली काही पायऱ्या दिसतात.
ईथे खरा थरार सुरु होतो. पादत्राणे आणि सॅॅक बाहेरच ठेवावीत.हातात टॉर्च घ्यावा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्यायला सज्ज व्हावे.या गुहेत शिरण्या अगोदर काही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. या कड्यातील गुहेचे जे तोंड आहे. याच्यावर आठ दहा फूट ते वीस फूट उंची वर मधमाशांची एक दोन पासून पाच सात अशी पोळी लटकलेली असतात. कांदा – लसूण अथवा धुम्रपान याने मोहोळ उठण्याची शक्यता असते. गुहेमधे पूर्णपणे अंधार आहे. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच आत शिरावे लागते. गुहेमधे पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे चप्पल बूट बाहेर काढूनच आपल्याला आत जावे लागते.
पावसाळ्याच्या काळात गेले तर या लेण्यात पाणी भरलेले असते.कदाचित ते छाती किंवा त्याच्याही वर मानेपर्यंत असते.त्यामुळे जाण्याचे धाडस होईल असे नव्हे.तेव्हा या गडावर उन्हाळ्यात आल्यास पाणी पातळी कमी असल्यामुळे सहजगत्या आतपर्यंत जाउ शकतो. गुहेच्या मुखापाशी पोहचून समोर नजर टाकली तर फक्त अंधार, काहीच दिसत नाही.मात्र थोडे धैर्य एकवटून पुढे निघालो आणि टॉर्चा उजेड पुरेसा असेल तर पुढची मार्गक्रमणा अवघड नाही.मात्र ईथे पुरेसा प्रकाश देणारा टॉर्च सोबत बाळगावा.मोबाईलचा उजेड पुरेसा होत नाही.तेव्हा पुर्ण तयारीने ईथे गेलेले बरे.











१. किल्ले, वाडे व शिवपुऱ्या ...
२. मंदिरे
महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यांत आणि लहान-मोठ्या गावांमधून भटकंती करताना प्रत्येक गावामध्ये एखादं तरी सुंदर मंदिर नक्कीच पाहायला मिळतं. या नवीन-जुन्या मंदिरांपैकी अनेक मंदिरं आज प्रसिद्धीच्या झोतात आहेत. यांतील काही मंदिरं प्रसिद्धीमुळे आकर्षणाची पर्यायानं वाटेवरची झालेली आहेत. पण थोडं आडवाटेवर गेलं तर तेवढीच सुंदर पण उपेक्षित मंदिरं पाहायला मिळतात. सातारा परिसरात तर अशाच मंदिरांची संख्या अधिक आहे. यामध्ये किन्हई, किकली, खटाव अशा गावांमधील मंदिरांबरोबरच, नागनाथवाडी, देऊर मधील वैशिष्ट्यपूर्ण बांधणीची मंदिरेही आवर्जून पाहण्यासारखी आहेत. ही मंदिरं फिरताना यांमधील समृद्ध कलेचा प्रत्यय येतो, हे नक्की.सातारा परिसरातील अशीच काही परिचयाची आणि बरीचशी अपरिचयाची मंदिर दाखविण्याचा हा एक छोटा प्रयत्न
आसले - पाचवड-वाई रस्त्यावर पाचवडपासून सहा कि.मी. वर आसले गाव आहे. गावाच्या मागच्या, लहान टेकडीवर भवानीचे, हेमाडपंती मंदिर आहे. मंदिरात येण्यासाठी गावाच्या डाव्या बाजूने, मंदिरापर्यंत पक्की डांबरी सडक आहे. तर गावामधून ७०-७२ पायऱ्यांची दुसरी वाट आहे.
भवानीमातेचे मंदिर तटबंदीमध्ये असून त्याच्या चारही कोपऱ्यांत एक-एक बुरूज आहे. गाडीरस्त्याने आल्यास तटबंदीमध्येच, अलीकडच्या काळात बसविलेले एक मोठे गेट आहे. इथपर्यंत गाडी येते. पण हे गेट बहुदा बंदच असतेः त्यामुळे त्याच्या डाव्या बाजूने तटबंदीला वळसा घालून, पायऱ्यांकडून येणाऱ्या वाटेवर दुसरा दरवाजा आहे तिथे यावे लागते. इथे, तटबंदीच्या बाहेर झाडाच्या खाली
काही बाकडी टाकलेली आहेत. जवळच पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधलेली आहे. या बाजूने तटबंदीकडे पाहिल्यावर जाणवतं की, जीर्णोद्धाराच्या वेळी मंदिरालाच नव्हे, तर तटबंदीलाही वेगळं रूप देण्यात आलं आहे. पडझड झालेल्या भागाची दुरुस्ती करून त्याचा सुशोभनाकरिता आता वापर केला जात आहे.
मंदिराच्या आवारात आल्यावर समोरच एक मोठा बांधीव मंडप आहे. तो १९६४ साली जीर्णोद्धाराच्या वेळी बांधला गेला. या मंडपाच्या अलीकडे दोन दीपमाळा आहेत. मंडप आकाराने बराच मोठा असून मुख्य मंदिराला जोडून बांधलेला आहे. मुख्य मंदिर मात्र दगडाचं, हेमाडपंती शैलीतील आहे. याच्या मंडपातील खांब अगदी साध्या पद्धतीचे आहेत. मंदिराचा गाभारा थोडा लहान असला तरी त्यातील देवीची मूर्ती लक्षवेधक आहे. मीटरभर उंचीच्या चौथऱ्यावर बसविलेली काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती, प्रतापगडावरील भवानीच्या मूर्तीची आठवण करून देणारी आहे. या मूर्तीच्या खालच्या बाजूस एक शिवलिंग आहे, पण बाहेर कुठेही नंदी नाही. शिवलिंगाजवळ दीड मीटर उंचीची एक समई आहे. अशा जुन्या काळातील समया फार कमी ठिकाणी पाहावयास मिळतात.
हे मंदिर पाहताना ऑईलपेंटचा केलेला वापर मात्र जाणवतो. मंदिर, त्याचे आवार, तटबंदी यांना आतून बाहेरून, सगळीकडे रंग लावलेला आहे. मंदिर-आवारामध्ये मुक्कामासाठी काही खोल्या बांधलेल्या आहेत. शिवाय या ठिकाणी सहलीचा किंवा देवदर्शनाबरोबर संध्याकाळचा वेळ घालविण्याचा बेत नक्की होऊ शकेल. सातारा-आसले अंतर २८ कि.मी. आहे. या ठिकाणी खाण्यापिण्याची मात्र काही सोय नाही
दांडेघर - वाई-पाचगणी रस्त्यावर पाचगणीपासून तीन कि.मी. अलीकडे, डाव्या बाजूला दांडेघर गाव आहे. या गावामध्ये १३व्या शतकाच्या सुमारास बांधलेलं केदारेश्वराचं मंदिर पाहण्यासारखं आहे.
गावाच्या मध्यभागी पण जमिनीपेक्षा खाली बांधलेलं, हेमाडपंती मंदिर पाहताना काहीतरी वेगळं पाहिल्याचा आनंद मिळतो. रस्त्यावरून १५-२० पायऱ्या उतरल्यावर मंदिराचे आवार आहे. याच्या दर्शनी भागावर, वरच्या बाजूने पत्रे घालून, त्याखाली पूजेच्या साहित्याची काही दुकाने मांडलेली आहेत. मागच्या बाजूला, मंदिरापासून वेगळा, नंदीमंडप आहे. यामध्ये पितळी पत्र्याने मढविलेल्या नंदीची, मीटरभर उंचीची मूर्ती आहे. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला, यात्रेकरूंना उतरण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मंदिराच्या बाजूने फिरताना काही ठिकाणी जमिनीवर मूर्ती कोरलेल्या आहेत. कालौघात नष्ट झालेल्या या मूर्तीचं आज फक्त अस्तित्व जाणवतं. मंदिरामागे एक कुंड आहे. त्यात मंदिरातून येणाऱ्या पाण्याची संततधार गोमुखातून पडते. या कुंडाच्या डाव्या-उजव्या बाजूला छोटेखानी एक-एक मंदिर आहे. त्यात काही वीरगळ शिल्पं ठेवलेली दिसतात.
केदारेश्वराचं मंदिर आवाराच्या मध्यभागी असून त्याला मोठा सभामंडप आहे. त्यातील खांबावर फारसे कोरीवकाम नाही. मंडपात डाव्या बाजूला शिवलिंगावर ठेवले जाणारे शाळुंका आणि नाग यांचे, तांब्यांचे मुखवटे आहेत. हा मंडप आवारातील जमिनीपासून एक पायरी खाली आहे. गाभाराही मंडपापेक्षा थोडा खाली आहे. यामध्ये मोठं शिवलिंग असून त्यावरील शाळुंका ओबड-धोबड आहे. त्यामधून सतत पाणी येत असतं. हेच पाणी, वाट काढून बाहेर कुंडामध्ये सोडलेलं आहे.
या ठिकाणीही इतर मंदिरांप्रमाणे आतून बाहेरून रंग चढविलेला आहे. अर्धा-पाऊणतास हाताशी असल्यास महाबळेश्वर-पाचगणीपासून जवळ असणारं हे ठिकाण निश्चित पाहता येईल.
दांडेघर गाव पाचगणीपासून तीन कि.मी. अलीकडे असल्यामुळे मुक्काम, खाण्या-पिण्याची सोय पाचगणीत होऊ शकते. पण खुद्द दांडेघर गावात कोणतीच सोय नाही.
सातारा-दांडेघर अंतर ४२ कि.मी. आहे.
नागेवाडी - साताऱ्याहून महामार्गाने पुण्याला जाताना लिंबखिंड ओलांडली की पहिलं गाव लागतं नागेवाडी. या गावामध्ये शाकंबरी देवीचं मंदिर आवर्जून थांबून, पाहण्यासारखं आहे. नागेवाडी गाव, महामार्गाच्या उजवीकडे आहे; तर देवीचं मंदिर डावीकडे. हायवेपासून अगदी अर्ध्या कि.मी. अंतरावर झाडांमध्ये आणि शेतांच्या बाजूला हे मंदिर आहे. मंदिराचा परिसर नेहमी शांत आणि स्वच्छ असतो. काळ्या पाषाणात आणि हेमाडपंती शैलीत बांधलेलं हे मंदिर पाहताच तिथं जाण्याचा मोह न आवरणारा असतो. मंदिराच्या प्रचंड आवारामध्ये त्याला साजेसंच शाकंबरीचं मंदिर आहे. मंदिरासमोर एक मोठी, बांधीव विहीर आहे. थोडंसं दुरून पाहिल्यास त्याचा शिवलिंगाचा आकार व्यवस्थित समजू शकतो. विहिरीच्या तळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या विहिरीतील
पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. देवीचं मंदिर, एक मीटर उंचीच्या चौथऱ्यावर बांधलं असून त्याची बांधणी अत्यंत साध्या प्रकारची पण आकर्षक आहे. मंदिराचा मंडप गाभाऱ्यापेक्षा आकाराने थोडा मोठा आहे. त्यामध्ये सहाणीशिवाय अन्य कोणतीही मूर्ती वगैरे नाही. काही देवतांचे फोटो मात्र लावलेले दिसतात.
गाभाऱ्यातील देवीची मूर्ती काळ्या पाषाणाची आणि मीटरभर उंचीची आहे. या मूर्तीला आठ हात असून त्यामध्ये आयुधं धरलेली आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूला चवरी ढाळणाऱ्या दासीशिवाय, एक-एक वादिका आहेत. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे देवीची ही मूर्ती शरभारूढ आहे. वास्तविक शाकंबरी म्हणजे बनशंकरी (भुवनेश्वरी) देवीचं रूप; आणि तिचं वाहन आहे वाघ. पण या ठिकाणी मात्र शरभ हे वाहन आहे. शिवाय, या देवीला दाखविला जाणारा नैवेद्यही वेगळ्या प्रकारचा आहे. या देवीला भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो. या प्रकारची एक सुंदर कथा इथे ऐकायला मिळते. ती म्हणजे पुराणकाळात, काही काळ प्रचंड दुष्काळ पडला. इतका की लोकं होम-हवन, जप-तप करायचे विसरू लागले. सगळीकडे अन्नाची मारामार पसरली. त्या वेळी सर्व लोक भुवनेश्वरी देवीला शरण आले. त्या वेळेस देवीने आपल्या हजारो नेत्रांनी सृष्टी पाहिली आणि त्या नेत्रांपासून भाज्या तयार केल्या आणि अभय देऊन सांगितले की, जोवर जमिनीवरील हा दुष्काळ संपत नाही तोवर तुम्ही माझ्या नेत्रांतून तयार होणाऱ्या भाज्या खाल. हजारो नेत्रांनी पाहणाऱ्या या देवीला त्यामुळेच शाकंबरी हे नाव पडले आणि तिला भाज्यांचा नैवेद्य दाखविला जाऊ लागला. हा नैवैद्यही प्रत्येक भक्त आपल्या ऐपतीप्रमाणे करतो. पण देवीला चौसष्ट आणि त्यापेक्षा जास्त भाज्यांचा नैवेद्य या ठिकाणी दाखविला जात असल्याचं सांगतात.
मंदिरासमोरील विहिरीच्या मागे चौंडेश्वरी देवी आणि मरीमाई देवींची छोटेखानी मंदिरं आहेत. शिवाय आवाराच्या सुरुवातीस लहान समाधीमंदिर आहे.
सातारा - नागेवाडी - ९कि.मी. आहे. इथे खाण्या-पिण्याची मात्र कोणतीही सोय नाही
वडूथ - लोणंदमार्गे सातारा-पुणे प्रवास करताना, साताऱ्यापासून ११ कि.मी. वर वडूथ गाव आहे. या गावाच्या अलीकडील पुलावरून जाताना डाव्या बाजूला काही घाट आणि त्यावरील मंदिरं लक्ष वेधून घेतात. एखादा तास हाताशी असल्यास जरूर पाहावीत अशी ही मंदिरं आहेत. इथे एक वेगळ्या प्रकारचे मंदिरही आहे ते म्हणजे शकुंतलेश्वराचे. घाटाच्या थोडंसं पुढे, दोनमजली बांधलेल्या
या मंदिराबद्दल स्थानिक लोक एक कथा सांगतात पुराणकाळामध्ये इंद्राने, निचूल नावाच्या ऋषींची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यामुळे तो गिधाडाचे रूप घेऊन या कृष्णाकाठी आला; आणि त्याने निचूल ऋषींकडे नरमांसाची मागणी केली. ऋषींनी ही गोष्ट आपल्या मुलांना सांगितली असता, हा देह देवानेच दिलेला असल्यामुळे त्यांनी मांस देण्यास नकार दिला. तेव्हा ऋषींनी मुलांना शाप दिला की, तुम्ही पक्षीयोनीत जन्म घ्याल. आणि त्यांनी गिधाडास स्वतःचे मांस देण्याची तयारी दाखविली. त्या वेळी इंद्र प्रकट झाला आणि त्याने आपण परीक्षा घेतली असल्याचे सांगितले. तेव्हा ऋषींना राग आला आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की, तूही शकुंत (पक्षी) होऊन या ठिकाणी राहशील. मग इंद्राला पश्चात्ताप झाला आणि त्याने उःशाप मागितला. तेव्हा ऋषी म्हणाले की ज्या वेळेस तुला अगस्ती ऋषी भेटतील त्या वेळेसच तू मुक्त होशील. त्यानंतर अनेक वर्षांनी या ठिकाणी अगस्ती ऋषी आले. त्यांनी शकुंतरूप इंद्रास कृष्णातीर्थ पिऊन शिवाच्या नामाचा जप करावयास सांगितला. त्याप्रमाणे इंद्राने शिवाच्या नामाचा जप केला. तेव्हा शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी इंद्रास आशीर्वाद दिला की हे तीर्थ शकुंतेश नावाने प्रख्यात होईल आणि तुझा, माझ्यासमवेत इथे वास असेल, तेव्हापासून या ठिकाणाला शकुंतलेश्वर म्हटले जाऊ लागले.
वडूथ गावाच्या मागच्या बाजूला, कृष्णेच्या तीरावर हे मंदिर आहे. सामान्यतः पाहायला मिळणाऱ्या मंदिरापेक्षा याची बांधणी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर तटबंदीमध्ये आणि दोनमजली आहे. याच्या चारही कोपऱ्यांत एक-एक बुरूज आहे. मंदिरासमोर, काठालगत एक मोठा चौथरा आहे. त्यावर शिवलिंग, देवी आणि पिंपळाचे झाड आहे. या चौथऱ्यावर पूर्वेकडे एक लेख लिहिलेला दगड, चौथऱ्यापासून वेगळा होऊन पुरात वाहून गेला असल्याचे समजते. चौथऱ्याच्यामागे १४-१५ पायऱ्या चढून गेल्यावर मंदिराकडे जाणारा मोठा दरवाजा आहे. एखाद्या वाड्याच्या दरवाज्यासारख्या असणाऱ्या या दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच हनुमानाची मीटरभर उंचीची मूर्ती आहे. इथूनच डाव्या-उजव्या बाजूला मंदिर आवारात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. यावरूनच मंदिराच्या मुख्य आवारात जाता येते. आवारामध्ये हनुमान मूर्तीच्या वरच्या बाजूसच नंदी मंडप आहे. याच्यासमोर शकुंतलेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे. या मंदिराची उभारणी शाहूंच्या काळात म्हणजे इ.स. १७५८ साली २४ ते ३० मे च्या सुमारास केली असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला विष्णूचे छोटेसे मंदिर आहे. शकुंतलेश्वराच्या मंदिरातही मंडपामध्ये डाव्या बाजूला गणपती आणि उजव्या बाजूला देवीची मूर्ती आहे. मंडप आकाराने मोठा असून त्याला आतून-बाहेरून रंगविलेले आहे. गाभाऱ्यात मध्यभागी शिवलिंग आहे. त्याचा रेखीवपणा नजरेत भरण्यासारखा आहे. त्याच्या शाळुंकेवर तांब्याचा नाग बसविलेला आहे.
मंदिर आवारात प्रदक्षिणामार्गावर कोनाळ्यामध्ये काही मूर्ती आहेत. त्यांमध्ये तोंड तुटलेल्या घोड्यावरील मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे. शिवाय विष्णू-लक्ष्मी-गंगा यांच्या मातीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या कळसावर काही शिल्पं आहेत. कालौघात नामशेष होत चाललेल्या या मूर्ती पाहताना आजही त्यांचा रेखीवपणा जाणवतो. काही ठिकाणी जुन्या काळातील नक्षीला केलेल्या रंगकामाचा एखादा भाग दिसतो.
मंदिराच्या मागच्या बाजूला पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे. माझ्या वडूथ भटकंतीमध्ये मला इथे एक वेगळी गोष्ट ऐकायला मिळाली, आणि पाहायलाही. मंदिराजवळ, कृष्णानदीमध्ये, साधारण कमरेएवढ्या पाण्यात एक लहान वृंदावन आहे. मंदिराच्या तटबंदीवरून ते पाहता येते. या मंदिराकडे जाणारी दगडी वाटही व्यवस्थित दिसते. या वृंदावनात एक शिवलिंग असून ते वृंदावनाबाहेर काढता येते. पण कितीही मोठा पूर आला तरी ते शिवलिंग वाहून जात नाही.
शकुंतलेश्वराच्या मंदिराशिवाय या गावात आणखी काही मंदिरं पाहण्यासारखी आहेत. त्यांपैकी वडूथ गावातील विष्णू-लक्ष्मीचे मंदिर आहे.
सातारा-वडूथ अंतर ११ कि.मी. आहे. या रस्त्याने सतत वर्दळ चालू असते त्यामुळे इथे मुक्कामाची नाही, पण चहा-भजीची सोय होऊ शकते.
किन्हई - सगळ्या महाराष्ट्राची कुलदेवता आहे तुळजापूरची तुळजाभवानी. या भवानी मातेचं एक रूप आहे साताऱ्याजवळ, किन्हईत, साखरगडवासिनी नावाने. एका टेकडीवर ही औंधच्या यमाई देवीची बहीण असल्याचं सांगतात.
औंधच्या पंतप्रतिनिधींची ही कुलदेवता. पंतप्रतिनिधी मूळचे याच गावचे कुलकर्णी. गावामध्ये त्यांचा एकेकाळचा राहता वाडा आहे. सध्या त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय असले तरी त्याची अंतर्गत रचना पाहण्यासारखी आहे.
गावाच्या एका बाजूला, दोन कि.मी. वरील टेकडीवर या देवीचे मंदिर आहे. इथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला टेकडीच्या पायथ्यापासून जवळपास २५० पायऱ्यांचा; आणि दुसरा गडाच्या उजव्या बाजूकडून घाटाने जाणारा डांबरी पक्का रस्ता. या मार्गाने आल्यास, घाटाच्या सुरुवातीला, घाटाई देवीचे मंदिर आहे. त्यावर लिहिलेल्या लेखानुसार, हे मंदिर रामचंद्र पंतप्रतिनिधी यांनी बांधलेलं आहे. घाटाने वर आल्यावर १४-१५ पायऱ्याच चढाव्या लागतात. या तटबंदीमधील पायऱ्यांनी वर गेल्यावर, मंदिरआवारात, मागून प्रवेश करावा लागतो. आवारात डाव्या बाजूला काळ्या पाषाणामध्ये देवीची मीटरभर उंचीची मूर्ती रंगविलेली आहे. तटबंदीमधील दरवाज्यावर नगारखानाही आहे. पायऱ्यांनी आल्यास मंदिराच्या उजव्या बाजूच्या दरवाज्यातून आत यावे लागते. कोणत्याही बाजूने आलं तरी आवारात आल्यावर प्रथम लक्ष वेधून घेते ती मंदिरासमोरील दीपमाळ. या दीपमाळेशिवाय मंदिर आवारात आणखी तीन दीपमाळा आहेत. त्यांपैकी मंदिरासमोरील दोन दीपमाळांवर लेख कोरलेले आहेत. या दीपमाळांपैकी एकीवर तीन वेळा वीज पडली असल्याचं सांगतात. मंदिराच्या डाव्या बाजूला काही ओवऱ्या आहेत. मंदिर हेमांडपंती पद्धतीचे असून एक मीटर उंचीच्या जोत्यावर बांधलेले आहे. मंदिराचा मंडप मात्र लाकडाचा आहे. यामध्ये १९३३-३४ साली काढलेली काही चित्रे (पेंटिंग्ज्) लावलेली आहेत. ती औंध गावात असणाऱ्या मंदिरामधील चित्रांची आठवण करून देतात. शिवाय इथे काही देवदेवतांची चित्रेही लावलेली आहेत. मूळ मंदिरामध्ये या मंडपाला जोडलेला आणखी एक (पहिला) मंडप आहे. याला तीनही बाजूला दरवाजे आहेत. गाभारा मात्र पूर्णपणे बंदिस्त असून, देवीच्या दर्शनासाठी गाभाऱ्याला एक काचेची फ्रेम बसविलेली आहे. गाभाऱ्याच्या चौकटीवर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. याच्या दोन्ही बाजूला व्यालांचे शिल्प आहे. गाभाऱ्यातील देवीच्या मूर्तीला पितळी मुखवटा असून तिला अनेक दाग-दागिने घातलेले आहेत.
मंदिराच्या कळसावर भरपूर शिल्पं कोरलेली आहेत. यांमध्ये विष्णू दशावतार, राम-भरत भेट, देवी-देवता यांची शिल्पं असून त्यावर काही ठिकाणी जुन्या काळातील रंगही शिल्लक आहे. कळस वगळता मंदिराची रंगरंगोटी केलेली आहे. शिवाय काही भागांची वेळोवेळी योग्य प्रकारे डागडुजीही केलेली आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे.
सातारा-पुणे (लोणंद मार्गे) प्रवास करताना दोन-तीन तास हाताशी असल्यास हे ठिकाण जवळ करता येईल.
सातारा-किन्हई अंतर २१ कि.मी. आहे. किन्हई गावामध्ये खाण्या-पिण्याची कोणतीही सोय नाही पण सातारा-पुणे मुख्य रस्त्यावर लहान हॉटेल्समध्ये ती होऊ शकते.
देऊर - सातारा - फलटण (लोणंदमार्गे) रस्त्यावर, वसना नदीच्या काठी देऊर गाव वसलेलं आहे. या गावामध्ये असणाऱ्या विठ्ठलमंदिरामुळे हे परिचयाचे ठिकाण. पण इथले मुधाई देवीचे मंदिरही पाहण्यासारखे आहे. देऊरची मुधाई देवी ही काही लोकांची कुलदैवता, तर या गावची ग्रामदेवता आहे. या मंदिराबद्दल सांगितली जाणारी स्थानिक कथा मात्र खूप वेगळी आहे. अनेक वर्षांपूर्वी वसना नदीच्या पलीकडच्या तीरावर, दहिवडगावामध्ये, चव्हाण आडनावाचे एक गृहस्थ राहत होते. ते तुळजाभवानीचे निस्सीम भक्त. त्यामुळे ते दरवर्षी तुळजापूरला जात. पण वृद्धापकाळामुळे त्यांना एकेवर्षी जाणे शक्य होईना तेव्हा त्यांनी देवीला सांगितले की पुढील वर्षापासून मी तुझ्या दर्शनास येऊ शकणार नाही, तरी मला तुझे दर्शन व्हावे ही इच्छा आहे. मग त्या रात्री देवी त्यांच्या स्वप्नामध्ये आली आणि तिने सांगितले की, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि मी, उद्या तुझ्यामागे, तुझ्या गावात येईन. पण एक अट आहे. तू कोणत्याही कारणास्तव मागे वळून पाहू नकोस. जर पाहिलेस तर मी त्याच ठिकाणी लुप्त होईन. मग दुसऱ्या दिवशी ते चालत, गावाच्या अगदी जवळ, देऊर गावात आले. आणि त्यांना वाटलं की-काल रात्री झलेला दृष्टांत हा कदाचित भास असावा म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले. त्याच क्षणी देवी जमिनीत लुप्त झाली. ही गोष्ट त्यांनी गावातील लोकांना सांगितली. गावकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्या ठिकाणी खणण्यास सुरुवात केली. सहा-सात मीटर खणल्यावर, त्यांना जमिनीत देवीची स्वयंभू मूर्ती दिसली. त्यामुळे बाजूचा काही भाग साफ करून दहिवड आणि देऊर गावातील लोकांनी त्या ठिकाणी मंदिर बांधले.
मुधाई देवीचे हे मंदिर गावाच्या थोडं बाजूला, वसना नदीच्या काठावर, जमिनीपेक्षा खाली आहे. हेमाडपंती शैलीतील या मंदिराचे आवार वरच्या बाजूने पाहता येते. मंदिरआवारात जाण्यासाठी नऊ-दहा पायऱ्या उतराव्या लागतात. आवारामध्ये यात्रेकरूंना उतरण्यासाठी मंदिराभोवती ३१ पायऱ्या आहेत. मंदिराचे आवार आणि मंदिरालाही सगळीकडे रंग लावलेला आहे. मंदिराची बांधणी अगदी साध्या पद्धतीची आहे. याचा गाभारा, एका लहान भुयारासारखा असून मंडपातून गाभाऱ्यात जाण्यासाठी "१२०१८” (४५ सेंमी. ४५ सेंमी.) एवढीच वाट आहे. त्यामुळे यात रांगतच जावं लागतं. आतमध्येही सहा-सात माणसं बसू शकतील एवढीच (३० सेंमी. ४५ सेंमी.) जागा आहे. याची उंचीही कमी असल्यामुळे आतमध्ये गुडघ्यावरच बसावे लागते. गाभाऱ्यात देवीची शेंदूर लावलेली मीटरभर उंचीची स्वयंभू मूर्ती आहे. विशेष गोष्ट म्हणजे याच दगडामध्ये मंदिराचा पूर्ण गाभारा खोदलेला आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की सामान्यतः अशी भुयारातील मंदिरं ही साधू-संतांच्या समाध्या अगर शिवाच्या मंदिराची ठिकाणं असतात, पण इथे मात्र देवीचे मंदिर आहे.
देऊर गावामध्ये १३ व्या शतकात बांधलेले विठ्ठलाचे मंदिरही आवर्जुन पाहण्यासारखे आहे. गावालगतच्या एका उंचवट्यावर, तटबंदीमध्ये याचे बांधकाम केलेले आहे. अकरा-बारा पायऱ्या चढल्यावर मंदिरआवाराचे प्रवेशद्वार आहे. आत गेल्यावर काळ्या पाषाणातील हेमाडपंती शैलीतील हे मंदिर, मंदिरांधणीचा एक उत्कृष्ट नमुना आहे हे जाणवतं.
विठ्ठलमंदिराच्या समोर आणखी एक लहान मंदिर आहे. याची थोडी पडझड झालेली आहे. विठ्ठलमंदिरातील सभामंडपाच्या द्वारावर अत्यंत सुंदर शिल्पं कोरलेली आहेत. उंबऱ्याजवळचे नक्षीकामही लक्ष वेधून घेणारे आहे. मंडपातील खांबावरही बारीक नक्षीकाम केलेले आहे. शिवाय काही पौराणिक प्रसंगदेखील कोरलेले आहेत. गाभाऱ्यात एका चौथऱ्यावर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती स्थापन केलेल्या दिसतात. मंदिराच्या उजव्या बाजूला, मंदिराचाच एक पडलेला दगड आहे. त्यावरचे कोरीवकामही पाहण्यासारखे आहे.
सातारा-देऊर अंतर २१ कि.मी. आहे. देऊर गावामध्ये खाण्या-पिण्याची कोणतीही सोय नाही.
असणारी तीन शिवलिंगे शिल्लक आहेत. या मंदिराचे खांब अगर सर्व दगड अफजलखानाने, ज्या वेळेस वाईला तळ ठोकला होता त्या वेळेस वाडा बांधण्यासाठी घेऊन गेला असल्याचे समजते. या मंदिराच्या बाजूला, छत नसलेले आणखी एक लहान शिवमंदिर आहे. यावर मात्र बरेचसे कोरीवकाम केलेले आहे.
प्रवेशद्वारातून मंदिराकडे जाताना दोन्ही बाजूला बसण्यासाठी ओटे बांधलेले आहेत. त्यांतील डाव्या बाजूच्या ओट्यावर एक दीपमाळ आणि एक स्तंभ आहे. शिवाय दोन्ही बाजूला एक बसलेला आणि एक उभा दगडी हत्ती आहे. मंदिर-आवाराच्या डाव्या बाजूला जिल्हा परिषदेची शाळा आहे. जवळच आणखी एक लहान मंदिर आहे.
भैरवनाथाचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे असून त्याला दोन मंडप आणि तीनही बाजूला एक-एक गाभारे आहेत. त्यातील उजव्या गाभाऱ्यामध्ये भैरवनाथांची काळ्या पाषाणाची मूर्ती महिरपीमध्ये स्थापन केलेली आहे. बाकीच्या दोन गाभाऱ्यांमध्ये शिवलिंग आहेत. मंदिराच्या पहिल्या मंडपामध्ये थोडेसेच नक्षीकाम केलेले आहे. पण त्याच्या बाहेरच्या बाजूने मात्र भरपूर कोरीव काम केलेले आहे. यावरची शिल्पं संगमेश्वर (रत्नागिरी) च्या मंदिराची आठवण करून देतात. यामध्ये नृसिंह, नर्तिका, आलिंगन मूर्ती अशी काही शिल्पं आहेत. या मंडपातून दुसऱ्या मंडपात जाणाऱ्या दरवाज्यावरही सुंदर आणि नाजूक कोरीवकाम केलेले आहे. इथेच उंबऱ्यावर अस्पष्ट झालेले पण वाचता येण्यासारखे 'सिंघणराजा' हे शब्द कोरलेले आहेत. त्यामुळे हे मंदिर सिंघणराजाने बांधले असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या मंडपामध्ये प्रत्येक खांबावर, तळाशी चारही बाजूला एक-एक मूर्ती कोरलेल्या आहेत. शिवाय खांबांच्या मध्यभागी रामायणातील सुवर्णमृगाची शिकार, राम-रावण युद्ध, अशोकवनातील सीता, वाली सुग्रीव युद्धामध्ये झाडाआडून बाण मारणाऱ्या रामाचे शिल्प, बुद्धांची काही शिल्पं, नजर खिळवून ठेवणारी आहेत. आणखी एक, शेषशायी विष्णूचे शिल्प पाहण्यासारखे आहे.
या मंदिराबद्दल एक विचित्र घटना मला इथे ऐकायला मिळाली. इथे अश्विन महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी जत्रा असते. जत्रेच्या दिवशी गावातील एका परिट घराण्यामध्ये एका व्यक्तीच्या अंगात येते. त्या दिवशी मंदिरात तीनशे पासष्ट दिवे लावले जातात. आणि ती व्यक्ती, त्या दिव्यावरून उडी मारून, भैरवनाथाच्या गाभाऱ्यासमोर असलेल्या, मंडपातील खांबाला डोक्याने धडक मारते. आणि ते सुद्धा एकदा नव्हे, तर तीन वेळा. तरी त्याला काही होत नाही, हा आश्चर्याचा भाग आहे. या प्रकारानंतर जत्रा सुरू होते.
सातारा-किकली अंतर ३७ कि.मी. आहे. या गावामध्ये खाण्या-पिण्याची मात्र काही सोय नाही.
म्हावशी - निसर्गातील असे अनेक चमत्कार आहेत की जे माणसाला कधी उमगलेच नाहीत. मात्र या चमत्काराला एक वेगळं रूप मानून, त्यापासून काहीतरी वेगळी निर्मिती करण्याची कला ही अगदी जुनी आहे. लोणंदपासून सोळा कि.मी. तर पारगाव (खंडाळा) पासून तेरा कि.मी. वर म्हावशी गावाच्या अलीकडे, निसर्गाच्या वेगळ्या रूपाचा आणि मानवाच्या नवनिर्मितीचा प्रकार पाहायला मिळतो, तो एका मंदिराच्या रूपात.
या गावाजवळील शाळेच्या आवारामध्ये हिंगळाईदेवीचे मंदिर आहे. जुन्या काळातील बहुतांशी मंदिरं हेमाडपंती शैलीतील, काळ्या पाषाणाची असतात. पण हे मंदिर पांढऱ्या रंगाच्या दगड-मातीमध्ये बांधलेले आहे. शिवाय, मंदिर जमिनीवर नसून भुयारामध्ये बांधलेलं आहे. अशा प्रकारची पांढरी माती फक्त याच भागामध्ये आहे. बाकीच्या सर्व ठिकाणी काळी माती पाहायला मिळते.
हिंगळादेवी मंदिर परिसरामध्ये बालसिद्धेश्वराचं मंदिर आहे. हे मात्र काळ्या पाषाणात, जमिनीवर बांधलेलं आहे. मंदिराला मंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत. त्यातील गाभारा एक मीटर उंचीच्या जोत्यावर आहे. मंडपात सहाण वगळता अन्य कोणतीही गोष्ट नाही. गाभाऱ्यात मात्र बऱ्याच मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्यांची रोज पूजा होत असल्यामुळे त्या आता इतक्या जीर्ण झाल्या आहेत की त्या नक्की कोणाच्या आहेत हे समजणं अवघड झालेलं आहे. बालसिद्धेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला एक लहान, हनुमानाचे मंदिर आहे.
हिंगळाईदेवीचे मंदिर जमिनीपेक्षा मीटरभर खाली असून आतमध्ये जाताना वाकून जावे लागते. समोरच पाच-सहा मीटरवर देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागच्या भिंतीत कोरलेली ही मूर्ती, चौथऱ्यावर असून बहुदा काळ्या पाषाणाची असावी. त्यावर लावलेल्या रंगामुळे ती नक्की कशाची आहे हे सांगणं अवघड असलं तरी स्थानिक लोक ती स्वयंभू असल्याचं सांगतात. मंदिरात डाव्या बाजूला वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. उजव्या बाजूस असणारी वाट मात्र काही कारणांनी बंद केलेली आहे. इथे सर्व बाजूंना, पायऱ्यांच्या अथवा दरवाज्यांच्या वरच्या बाजूला कमानी बांधलेल्या आहेत. मंदिराच्या कळसाची रचना काही वेगळीच आहे. पुयारातील, मंदिराच्या पूर्ण११ शिखर तेली आहेत. आजमितीला त्यांतील पाच शिखर पक तग धरून उभी आहेत. आपल्या पुरातत्त्व खात्यानं त्याकडे लक्ष दिल्यास ते चांगल्या प्रकारे जतन करता येईल.
सातारा-म्हावशी अंतर पारगावमार्गे ६९ कि.मी. आहे. तर लोणंदमार्गे -५७ कि.मी. आहे. म्हावशी गावांमध्ये खाण्या-पिण्याची सोय नाही, पण पारगाव किंवा लोणंदमध्ये ती होऊ शकते.
मारुल हवेली - उंब्रजकडून पाटणला जाताना उरुल नावाचा घाट उतरल्यावर एक टोलनाका आहे. कराडकडून येणारा रस्ताही याच ठिकाणी मिळतो. या टोलनाक्याकडे न जाता कराडच्या दिशेने जायला लागल्यावर लगेचच एक फाटा उजवीकडे गेलेला आहे. या फाट्याला निसरे फाटा म्हणतात. निसरे फाट्यापासून आठ कि.मी. वर मारुल हवेली गाव आहे.
मारुल हवेली गावामध्ये, एका बाजूला, सिद्धनाथ महादेव मंदिर आहे. महाराष्ट्रात कुठेही न आढळणारी परंपरा या ठिकाणी पाहायला मिळते. पण ती फक्त श्रावण महिन्यातच. खरं तर हे सिद्धनाथचं मंदिर १३व्या शतकातील आहे. १९३६ पर्यंत या मंदिराकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. अगदी ग्रामस्थांचं सुद्धा. पण १९३६ साली रंगनाथ नागेश कुलकर्णी यांनी एक प्रथा चालू केली आणि या ठिकाणाबद्दल अनेक लोकांचं आकर्षण वाढलं. ती प्रथा म्हणजे श्रावण महिन्यात सिद्धेश्वराच्या मंदिरात अखंड समया तेवण्याची प्रथा. २००८च्या श्रावण महिन्यात इथे सहाशे सव्वीस समया होत्या. सुरुवातीच्या काळात कै. कृष्णा, भैरू पाटील, कै. कृष्णा मुकादम, कै. किसन लक्ष्मण सुतार, कै. सौदागर हिरवे आणि जिवाजी जाधव यांनी समया देण्यास सुरुवात केली. आणि आता या समयांची संख्या वाढत आहे.
सिद्धनाथाचे हे मंदिर आता जरी नव्या रूपात पाहायला मिळत असले तरी, पूर्वीची त्याची बांधणी हेमाडपंती पद्धतीची होती. त्या वेळेस, मंदिराला मंडप आणि गाभारा असे दोनच भाग होते. पण, साधारण १० वर्षांपूर्वी हवेली गावातील ग्रामस्थांनी त्याचा जीणोंद्धार केलां आणि गाभारा तसाच ठेवून, त्याच्यासमोर दोन मोठे मंडप बांधले. त्याला पुढच्या बाजूस पत्र्याची शेड घालून त्यामध्ये मंदिरातील सर्वात जुन्या नंदीला ठेवले. त्याच्यामागे काळभैरवी देवीचे छोटेखानी मंदिरही आहे. यातील मूर्तीही नवीनच स्थापन करण्यात आली आहे. मंदिराच्या
सुरुवातीलाच, डाव्या बाजूस एक कार्यालय आहे. त्याच्यासमोर काही वीरगळ शिल्पं, रस्त्याच्या कडेला लावलेली दिसतात. मंदिरासमोर असणाऱ्या दीपमाळेचा चौथराच फक्त आज शिल्लक आहे. त्यावरची शिल्पं मात्र लक्षवेधक आहेत. मंदिर आवारात आणखी काही शिल्पं पाहायला मिळतात.
मंदिराच्या दुसऱ्या म्हणजे बाहेरील मंडपामध्ये, शिवलिंगावर बसविला जाणारा पितळी मुखवटा ठेवलेला आहे. शिवाय, या ठिकाणी समया देणाऱ्या व्यक्तींची नावं घालून त्यांचा समई क्रमांकही लिहिलेला आहे. हा मंडप मंदिराचा सर्वांत मोठा भाग आहे. या मंडपात आल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे बाहेरच्यापेक्षा, मंडपातील वाढलेलं तापमान. समयांमुळे या मंडपात गरम होण्यास सुरुवात होते. खरं तर मंदिराच्या पहिल्या मंडपात या समस्या ठेवण्यात आल्या आहेत. पण त्यांची झळ या मंडपामध्येही लागते. पहिल्या मंडपामध्ये, गाभाऱ्याचा आणि दुसऱ्या मंडपाचा दरवाज्याचा भाग वगळता सर्व भिंतीवर स्टँड बांधून, त्यावर समया ठेवलेल्या दिसतात. दरवाज्याच्या समोरच छोटेखानी नवीन नंदीची स्थापना केलेली आहे. या मंडपामध्ये ३० सें.मी. उंचीच्या समईपासून दीड मीटर उंचीच्या समयांपर्यंत सर्व उंचीच्या समया पाहायला मिळतात. खुद्द गाभाऱ्यात देखील शिवलिंगाव्यतिरिक्त सर्व बाजूंनी समया ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी मात्र घामाच्या धारा लागतात. हवेली गावामध्ये काहीवेळा सलग दोन-दोन दिवस दिवे नसतात. पण या मंदिरातील समयांची रोषणाई पाहून, साध्या दिव्यापेक्षा समयांच्या उजेडात दिसणारं शिवलिंग आकर्षक वाटतं. हे शिवलिंग स्वयंभू आहे. जीर्णोद्धाराच्या वेळेस त्याच्या भोवतीचा भाग साफ करण्यात आला त्या वेळी त्यावरील शाळुंकेचा तळ सापडला नसल्याचंही इथले पुजारी सांगतात. त्यामुळे शाळुंका तशीच ठेवून त्याच्या बाजूने नवीन शिवलिंग बसविण्यात आले. हा गाभारा मंडपापेक्षा मीटरभर खाली आहे. शिवाय श्रावणात सोमवारी या ठिकाणी भाविकांची सर्वांत जास्त गर्दी असते. मारुल हवेली गावामध्ये खाण्या-पिण्याची मात्र कोणतीही सोय नाही. उंब्रज, पाटण किंवा या दरम्यान रस्त्यावर ती होऊ शकते.
सातारा-हवेली अंतर ६१ कि.मी. आहे.
बहुले - निसरे फाट्यावरून सहा कि.मी. वर बहुले गाव आहे. कराड-चिपळूण रस्त्यावर एखादा तास हाताशी असल्यास मारुल हवेली आणि बहुले ही गावं जवळ करता येतील. वास्तविक मुद्दाम जाऊन पाहावीत अशी ही ठिकाणं आहेत.
हवेली गावाच्या दोन कि.मी. अलीकडे बहुले गावाचा फाटा आहे. इथपासून रस्ता थोडासा खराब आहे. बहुले गावाच्या मागच्या बाजूला, एका ओढ्याच्या काठावर बहुलेश्वराचे हेमाडपंती मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर जमिनीपेक्षा खाली, खड्ड्यामध्ये बांधलेले आहे. याच्या उभारणीवरून हे मंदिर १३ व्या शतकातील असावं असं वाटतं, पण इथे मात्र हे मंदिर एका रात्रीत बांधलं असल्याचं सांगितलं जातं. मंदिरआवारात जाण्यासाठी, मंदिराच्या मागे दोन बाजूंनी पायऱ्या आणि मंदिरासमोर एक दरवाजा आहे. दरवाज्यातून आत आल्यावर समोरच एक दीपमाळ आणि त्याच्यामागे एक पुष्करणी बांधलेली दिसते. त्यावर एक नंदी स्थापन केलेला आहे. याच्या डाव्या बाजूला एक तुळशी वृंदावन आणि उजव्या बाजूला दशकोनी वृंदावन आहे. याचं बांधकाम मात्र थोडं अलीकडच्या काळात केलं असल्याचं जाणवतं. मंदिराच्या डाव्या-उजव्या बाजूला, तटबंदीसदृश भिंतीमध्ये, कोनाड्यात, लहान-लहान शिवलिंगांची स्थापना केलेली आहे. शिवाय डाव्या बाजूच्या पायऱ्यांजवळ, लहान आकाराची, दोन कुंडं आहेत. त्यामध्ये नेहमी पाणी असतं. मंदिराच्या कळसाचा मात्र जीर्णोद्धार केलेला आहे. १८ व्या शतकाच्या सुमारास निगडीचे सावकार परशराम नारायण अनगळ यांनी हा कळस बांधला असल्याचं सांगितलं जातं. मंदिराची बांधणी मात्र परळी (जि. सातारा) मंदिरासारखी केलेली आहे. पण या ठिकाणी कोणतीही शिल्पं कोरलेली आहेत. शिवाय मंडपातील खांबही अगदी साध्या प्रकारचे आहेत.
मंडपामध्ये, दरवाज्याच्या दोन्ही बाजूला ओटे बांधलेले आहेत. मध्यभागी नंदीची, मीटरभर उंचीची मूर्ती स्थापन केलेली आहे. मंडप आणि गाभारा यांना जोडणाऱ्या भिंतीवर, डाव्या-उजव्या बाजूला दोन-दोन कोनाडे आहेत. त्यामध्ये हनुमान, गणपती, देवी, विठ्ठल यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. गाभाऱ्यात, मध्यभागी शिवलिंग स्थापन केलेले आहे. इथे कायम अंधार असल्याने बॅटरी जवळ बाळगणे आवश्यक आहे.
मंदिरआवाराच्या बाहेर, ओढ्याच्या बाजूला एक मोडकळलेला दगडी तलाव आणि त्याच्या बाजूलाच एक विहीर आहे. या भागामध्ये वडाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. या वडाच्या झाडांमुळे तयार झालेले वेगवेगळे आकारही इथे पाहायला मिळतात. एखादी संध्याकाळ शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी घालवायची असल्यास हे ठिकाण योग्य आहे. इथे खाण्या-पिण्याची मात्र कोणतीही सोय नाही.
सातारा-बहुले अंतर ६४ कि.मी. आहे.
असवली - पारगाव-खंडाळ्यापासून सहा कि.मी. अंतरावर असवली गाव आहे. हे गाव आज जरी परिचयाचं नसलं तरी पुराणातील काही घटनांचा संबंध या ठिकाणाशी जोडतात.
श्रीरामचरित्र हे त्यांपैकीच एक. यातील काही गोष्टी लहानपणी कधीतरी ऐकलेल्या - वाचलेल्या असतात. पुढे त्याचा योग फक्त प्रवचनात वगैरेच येतो. यामधील किष्किंधा कांडामध्ये, सीता शोधण्यासाठी, समुद्र पार करण्याची पहिली जबाबदारी हनुमानावर येते. पण लहानपणी, त्याने अनेक ऋषींना दिलेल्या त्रासामुळे, ते हनुमानास शाप देतात की, ज्यामुळे तो आपल्याकडील शंक्ती विसरतो. आणि समुद्र उल्लंघनाच्या वेळी त्या शक्तींची आठवण जांबुवंत त्यास करून देतो. हे सगळ्यांना माहिती आहे. पण रामायणातील आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट मात्र सर्वांना माहीत नाही. ती म्हणजे रावणवधानंतर जांबुवंतास, रामाशी युद्ध करण्याची इच्छा होते. पण राम जांबुवंतास स्वतःचे अवतारकार्य संपले असल्यामुळे पुढील जन्मी त्याची ही इच्छा पूर्ण करण्याचं आश्वासन देतो. पुढील जन्मी झालेल्या श्रीकृष्ण-जांबुवान यांच्या युद्धाचं सुंदर वर्णन भागवतात दिलेलं आहे. त्यामध्येच श्रीकृष्ण आणि जांबुवानाची मुलगी जांबुवती यांच्या विवाहाची कथाही दिलेली आहे. त्या संदर्भातील भागवतामध्ये एक ओवी दिलेली आहे. ती म्हणजे
इत्युक्तः स्वां दुहितरं कन्यां जाम्बवतीं मुदा ।। अर्हणार्थ समणिना कृष्णायोपजहार ।।३२।।
ही कथा खरंच वाचण्यासारखी आहे. यातील एक-एक प्रसंग वाचताना जांबुवंताचं रूप डोळ्यासमोर उभं राहतं. अशा या जाबुवंताचं एक मंदिर असवली गावामध्ये आहे. हे मंदिर असवली गावामध्येच जानुबाई मंदिराशेजारी आहे.
जानुबाई देवी ही या गावची ग्रामदेवता. मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला, तटबंदीमध्ये या देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या आवारात मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. त्याच्यामागे तटबंदीत लोखंडी दरवाजा आहे. दीपमाळेच्या डाव्या बाजूला एक खोली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर २००७ साली त्याला आतून-बाहेरून रंगरंगोटी केलेली आहे. मंदिराला मंडप आणि गाभारा असे दोन भाग असून गाभारा मंडपापेक्षा थोडा उंचीवर आहे. मंडपामध्ये जांबुवंताच्या मंदिरातील मूळ मूर्ती डाव्या बाजूला चौथऱ्यावर ठेवलेल्या आहेत. काळ्या पाषाणातील या मूर्तीमध्ये एक मूर्ती अस्वलाची (मूळ जांबुवंताची) आहे. गाभाऱ्यामध्ये देवीची शेदरी रंग लावलेली मूर्ती चांदीच्या प्रभावळीत स्थापन केलेली आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून उजव्या बाजूच्या खालच्या हातात तिने दैत्याच्या जटा धरलेल्या आहेत. एका हातात त्रिशुळ आहे. मूर्ती पाहताक्षणी नजर खिळवून ठेवणारी आहे. मंदिराच्या कळसाला वेगवेगळे रंग लावले असले तरी मंदिराच्या सौंदर्याला बाधा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे.
या मंदिराच्या उजव्या बाजूला तटबंदीबाहेर जांबुवंताचे मंदिर आहे. या मंदिराचाही नुकताच म्हणजे २१ जाने. २००८ रोजी जीर्णोद्धार केलेला असून मंदिरामध्ये नवीन मूर्तीची स्थापना केलेली आहे. आत्ताच्या या मूर्ती सिमेंटच्या मोठ्या चौथऱ्यावर, संगमरवरी मंदिरामध्ये स्थापन केलेल्या आहेत. या मूर्ती पाषाणाच्या, मीटरभर उंचीच्या आहेत. यातील मधली मूर्ती जांबुवंतीची आहे आणि डावी-उजवीकडे श्रीकृष्ण-जांबुवंती यांच्या, हातात माला घेतलेल्या मूर्ती आहेत. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार याच ठिकाणी श्रीकृष्ण-जांबुवंती यांचं लग्न झालं. या ठिकाणाविषयीचा हा भाग बाजूला ठेवला तर, काहीतरी वेगळं पाहिल्याचं समाधान या ठिकाणी निश्चितच मिळेल.
असवली गावाच्या मागच्या बाजूला जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेच्या डाव्या बाजूला दोन मंदिरं लक्ष वेधून घेणारी आहेत. ती आहेत महादेव आणि विठ्ठल-रुक्मिणीची. साधारणपणे १८व्या शतकाच्या सुमारास बांधलेली ही मंदिरं तटबंदीमध्ये आहेत. आवाराला एकच प्रवेशद्वार असून, आतमध्ये डाव्या बाजूला चार समाध्या आहेत. शिवमंदिरासमोर एक दीपमाळ आहे. गाभाऱ्यात शिवलिंगाबरोबरच शंकर-पार्वतीची एक मूर्ती आहे. ही मूर्ती मात्र खूप जुनी असल्याचं जाणवतं. यातील पार्वतीची मूर्ती त्रिभंगावस्थेतील आहे. मंदिराबाहेर नंदी स्थापन केलेला आहे. आणखी एक नंदी प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस जमिनीवर आहे. शिवमंदिराच्या उजव्या बाजूस विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. या दोन मंदिरांच्यामध्ये गाभाऱ्यात विठ्ठल-रुक्मिणीच्या काळ्या पाषाणाच्या मीटरभर उंचीच्या मूर्ती आहेत. या दोन्ही मंदिरांची शिखरांची रचना पाहण्यासारखी आहे. पूर्वीच्या काळी केलेले नक्षीकाम जवळपास सर्व ठिकाणी शिल्लक आहे. त्यावरचा रंग मात्र आजमितीला शिल्लक राहिलेला नाही. जांबुवंताच्या मंदिराबरोबरच ही मंदिरं आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
सातारा-असवली अंतर ६२ कि.मी. आहे. असवली गावामध्ये खाण्या-पिण्याची कोणतीही सोय नाही.
यांतील एक मंदिर गावामध्येच आहे ते म्हणजे नारायणाचं. १२व्या शतकाच्या सुमारास बांधलेल्या या मंदिराची बांधणी वेगळ्या प्रकारची आहे. हेमाडपंती शैलीतील या मंदिरासमोर १८व्या शतकात केव्हातरी दुसरा मंडप बांधला गेला असल्याचे स्थानिक लोक सांगतात. पण तो मोडकळीला आल्यामुळे १९९२ साली त्याच ठिकाणी विटा-सिमेंटचा मंडप बांधण्यात आला. त्यामुळे आता, प्रथमदर्शनी हे मंदिर आहे यावर विश्वासच बसत नाही, कारण याच्या बाहेरच्या बाजूला एका घरासारखे रूप मिळालेले आहे. हा मंडप चांगलाच प्रशस्त आणि मंदिराचा सगळ्यात मोठा भाग आहे. याला लागूनच नारायण मंदिराचा दगडी मंडप आहे. याचे खांब मात्र फारसे कोरीव नाहीत. मंडपात डाव्या आणि उजव्या कोनाड्यात शेंदूर लावलेल्या गणपती आणि गरुडाच्या मूर्ती आहेत. पण या ठिकाणी पाहताक्षणी लक्ष वेधून घेणारी मूर्ती आहे गाभाऱ्यातील नारायणाची. अत्यंत सुबक, रेखीव आणि प्रमाणबद्ध असणारी ही मूर्ती शाळीग्रामपासून बनविलेली आहे. दीड मीटर उंचीची ही मूर्ती लहान चौथऱ्यावर, चांदीच्या प्रभावळीत स्थापन केलेली आहे. विष्णूच्या हातात पद्म, शंख, चक्र आणि गदा ही आयुधे आहेत. शिवाय उजव्या पायाजवळ गरुड आणि डाव्या पायाजवळ लक्ष्मी आहे. यांच्या मागे-बाजूला चवरी धरलेल्या दोन दासी आहेत. मूर्तीच्या वरच्या बाजूला माला घरलेल्या गंधर्वांची शिल्पं आहेत. आणि त्याच्याही वरती विष्णूच्या दशावतारांची शिल्पं दगडाच्या प्रभावळीमध्ये कोरलेली आहेत. रोजच्या पूजेमुळे मूर्तीचे पाय मात्र जीर्ण झालेले आहेत.
या भूतींबद्दल इथले पुजारी एक कथा सांगतात. इ.स. १६५९ साली अफजलखान विजापूरहून नाईकडे घेत होता त्या वेळी माटेतील अनेक मंदिरांना त्याने त्रास दिला त्यांपैकी हे एक मंदिर आहे. पण अफजलखान या मंदिरात बेण्याअगोदरच येथील पुजाच्यांनी गाभाऱ्यातील मूर्ती मागच्या विहिरीत लपवून ठेवली. पुढे काही वर्षांनंतर रहिमतपूर गावचे राधाकृष्णस्वामी या ठिकाणी आल्यावर त्यांना दृष्टांत झाला, आणि त्यांनी ही मूर्ती विहिरीतून बाहेर काढून त्याची प्रतिष्ठापना केली.
गावातील या नारायण मंदिराबरोबरच आणखी काही मंदिरं पाहण्यासारखी आहेत. खटाव गाव वसलेलं आहे येरळा नदीच्या तीरावर आणि याच्या तीरावर काही मंदिरं असणे हे साहजिकच आहे. इथे येण्यासाठी नारायण मंदिरापासून पुढे थोड्या अंतरावर उजवीकडे पिंपळेश्वर मार्ग आहे. हा सगळा कच्चा गाडी-रस्ता आहे की जो नदीच्या तीरावर येतो. पावसाळ्याव्यतिरिक्त बहुतेक वेळा नदीचं पात्र कोरडंच असतं. पण घाटावरील नागनाथ मंदिर, गणेश मंदिर आणि पिंपळेश्वर मंदिर ही मात्र बघण्यासारखी आहेत.
यांतील गणेश मंदिर लहान असून त्याचा मंडप पूर्णपणे कोसळलेला आहे. उरलेला भागही जेमतेम उभा आहे. पण आत्ताच हे मंदिर पाहताना सातारा-पुणे महामार्गावरील नायगावजवळ असणाऱ्या जकातनाक्याची / पाणपोईची आठवण होते. या मंदिराच्या गाभाऱ्यात गणपतीची लहान मूर्ती आहे. गणेश मंदिराच्या बाजूलाच नागनाथ मंदिर आहे. मंदिरासमोर मोठा नंदी बसविलेला आहे. कालौघात त्याचा चेहरा, आभूषणं अस्पष्ट झालेली आहेत. मंदिर तीनही बाजूने बंदिस्त असून दर्शनी बाजूनेच फक्त दरवाजा आणि झरोका आहे. काळ्या पाषाणातील या मंदिराला आतून-बाहेरून पिवळा रंग लावलेला आहे. मंदिरातील खांबावर फार कोरीवकाम नसले तरी छतावर चांगले कोरीवकाम आहे. मंडपात डाव्या बाजूच्या कोनाड्यात सप्तमातृकांचा शिल्पपट आहे. मंडपाच्या मध्यभागी मोठी रंगशिळा आहे. दरवाज्याजवळ दोन्ही बाजूला, बसण्यासाठी ओटे बांधलेले आहेत. गाभाऱ्यातील शिवलिंग मोठं असून ते पूजेनंतर फुलांनी सजविलेलं असतं.
नागनाथ आणि गणेश मंदिराच्या मागच्या बाजूस काही अंतरावर पिंपळेश्वर मंदिर आहे. जमिनीपासून दीड मीटर खाली, तटबंदीमध्ये याची बांधणी केलेली आहे. मंदिराला दोन मंडप आणि गाभारा असे भाग असून बाहेरच्या मंडपामध्ये यज्ञकुंड, नंदी आणि आणखी एक मूर्ती आहे. दुसरा मंडप मात्र आकाराने खूपच लहान आहे. गाभाऱ्यात शिवलिंग असून, त्याच्यावरील चौथऱ्यावर विष्णूची मूर्ती आहे. त्याच्या पायाजवळचे गरुडाचे शिल्प समजण्यासारखे आहे. या मंदिरालाही आतून-बाहेरून अनेक रंगांनी रंगविलेले आहे. मंदिर आवारात काही वीरगळ शिल्पं ठेवलेली आहेत. शिवाय एक भैरवनाथाची मूर्तीही आहे. पण स्थानिक लोक तिला कार्तिकस्वामी समजतात.
सातारा-खटाव अंतर ४६ कि.मी. आहे.
खटावगावामध्ये मुक्कामाची नाही, तरी चहा-भज्यांची सोय होऊ शकते.
नागनाथवाडी - कोरेगावपासून अकरा कि.मी., तर नेर तलावापासून चार कि.मी.वर नागनाथवाडी गाव आहे. या गावाच्या नावावरूनच इथे शिवमंदिर असणार हे समजतं. आणि ते खरं देखील आहे. या मंदिराची बांधणी मात्र वेगळ्या प्रकारची आहे. नेर तलावापासून तीन कि.मी. पुढे आल्यावर उजव्या बाजूस 'श्री क्षेत्र नागनाथवाडी' अशी लिहिलेली मोठी कमान आहे. इथून आतमध्ये, मंदिराच्या दरवाज्यापर्यंत एक कि.मी. पक्की डांबरी सडक आहे. मंदिर तटबंदीमध्ये बांधलेलं असून प्रवेशद्वाराजवळ काही वीरगळ शिल्पं ठेवलेली आहेत. शिवाय दरवाज्यावरील नगारखाना अजून चांगल्या अवस्थेत आहे. तटबंदीला लागून डाव्या बाजूला आणखी दोन मंदिरे आहेत, तर उजव्या बाजूला ओढ्याचं मोकळं पात्र. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर लहान आवारामध्ये समोर नंदीमंडप आहे. इतर अनेक मंदिरांप्रमाणे या मंदिरांचीही वेगवेगळ्या रंगांनी रंगरंगोटी केलेली आहे. त्यावर लावलेले रंग पाहून हा भक्तीचा अतिरेकच आहे हे प्रकर्षाने जाणवतं. मंदिरांचा कोणताही भाग रंगवायचा सोडलेला नाही. असो ! नंदीमंडपामध्ये लहान-मोठ्या आकाराचे पाच नंदी आहेत. त्यांतील तीन नंदींना पितळी पत्र्याने मढविलेले आहे. या मंडपाच्या उजव्या बाजूला मोठी पडवी आहे. प्रवचनासाठी वगैरे बहुदा याचा वापर केला जात असावा. मंदिराशेजारीचच एक मोठी विहीर आहे. शिवाय मागच्या बाजूस एक लहान मंदिरही आहे. शंकराचे मंदिर हे खूप मोठे पण जमिनीच्या आत पंधरा-सोळा मीटर खाली आहे. म्हणजे जमिनीवरील मंदिराचे बांधकाम मोठे असले तरी मंदिर मात्र कोळे- नृसिंहाच्या मंदिरासारखं खाली आहे. हे जमिनीमधील मंदिर दोन टप्प्यांत बांधलेलं आहे. मंदिर आवारातून पहिल्यांदा, पहिल्या मंडपात आल्यावर तिथे एक सहाण ठेवलेली आहे. मंडपाच्या मधोमध खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. इथे नेहमी अंधार असतो त्यामुळे बॅटरी घेऊन जाणे आवश्यक आहे. शिवाय या पायऱ्याही लहान आहेत. त्यावर जेमतेम टाच व तळव्याचा थोडा भाग बसतो. त्या थोड्या ओल्याही असतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. पायऱ्या उतरल्यावर खाली (मधल्या) मंडपामध्ये डाव्या-उजव्या कोनाड्यात विष्णूच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. इथून परत २०-२५ पायऱ्या उतरल्यावर गाभाऱ्यामध्ये शिवलिंग स्थापन केलेले आहे. इथल्या पाण्याची पातळी काही वेळा बरीच वाढते त्या वेळी पाणी गुडघ्यापर्यंत येतं. त्या वेळेस मात्र शिवलिंगाचं दर्शन होत नाही. हा अनुभव घेण्यासाठी तरी या मंदिराला अवश्य भेट दिली पाहिजे. या मंदिराची बांधणी साधारणपणे १३व्या शतकात झाली असावी असे
रोजच्या धावपळीतून, एखादी संध्याकाळ नेर तलावाजवळ घालविण्याचा बेत असल्यास हे ठिकाण नक्की जवळ करता येईल. खाण्या-पिण्याची मात्र या ठिकाणी कोणतीही सोय नाही. सातारा-नागनाथवाडी अंतर २८ कि.मी. आहे.
कातरखटाव - वडूजपासून सात कि.मी.वर कातरखटाव गाव आहे. पण खटाव गावाचा आणि याचा मात्र काही संबंध नाही. खटाव गावापासून कातरखटाव १५कि.मी. आहे. कातरखटाव गावालगत, दहीवडी-सांगली मार्गावर, कातरेश्वराचे १३व्या शतकात बांधलेले मंदिर आहे. या मंदिराबद्दल इथे एक आख्यायिका सांगतात. अनेक वर्षांपूर्वी गावातील एका शेतकऱ्यास शेत नांगरताना जमिनीत काहीतरी घासल्याचा आवाज आला. धनाचा हंडा असेल या अंदाजाने त्याने त्या ठिकाणी जमीन साफ केली. त्या वेळी तेथे एक शिवलिंग असलेले त्याला दिसले. शिवलिंग बाहेर काढल्यावर नांगराने त्यावर ओरखडे (कातर) पडलेले त्याला दिसले. हा दैवी चमत्कार झाला असे मानून त्याने त्या शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यावर मंदिर बांधले. त्यावरूनच या गावाला कातरेश्वर नाव पडले. पुढे याचे कातरखटाव या नावामधे रूपांतर झाले. या गावामध्ये आजही या मंदिराला कातरेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखतात.
नेहमीच्या वर्दळीच्या रस्त्यांपासून हे मंदिर थोडं आडवाटेवर आहे खरं, पण इथे आल्यावर काही वेगळं पाहिल्याचा आनंद नक्की मिळेल. अत्यंत शांत आणि विस्तीर्ण आवारामध्ये हे मंदिर बांधलेले आहे. हेमाडपंती शैलीतील मंदिरांचं बांधकाम परळीच्या (सातारा) मंदिरांची आठवण करून देणारं आहे. या मंदिरासमोर मात्र एक बांधीव टाकं असल्याचं सांगतात. आजमितीला त्याचा फक्त खड्डाच शिल्लक राहिलेला आहे. मंदिरआवारात येण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक गावातून मागे, पायऱ्यांचा; आणि दुसरा म्हसवड-कराड रस्त्यावरून, कातरखटावच्या चौकातून, गाडीचा. या मार्गे आल्यास मंदिरापर्यंत गाडी येते, आणि पायऱ्यांकडून आल्यास जुन्या काळातील एका कमानीपर्यंत पायऱ्यांनी वर आल्यावर डाव्या बाजूला मोठा हॉल बांधला आहे. या हॉलचा वापर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी करतात. याच्या बाजूलाच कातरेश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर बसविलेला नंदी लक्षवेधक आहे. नंदीच्या अंगावरील आभूषणं, त्याचा डौलदारपणा शिल्पकारानं अत्यंत सुंदर कोरलेला आहे. नंदीच्या पुढे, डोक्यावर दोन्ही हातात टोपली धरलेल्या लहान मुलाचं शिल्पही लगेच नजरेत भरण्यासारखं आहे. कातरेश्वराचं मंदिर पाहताक्षणीच त्याबद्दल आकर्षण निर्माण होतं. मंदिराला सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत. त्यातील सभामंडपाच्या दरवाज्याजवळ दोन्ही बाजूला ओटे बांधलेले आहेत. मंडपातील सर्व खांब अत्यंत सुंदर नक्षीकामांनी सजलेले आहेत. यांतील कोणताही खांब पाहताना शिल्पकाराचं कौशल्य जाणवतं. खांबाप्रमाणेच छतावरही सुबक कोरीवकाम आहे. हे शिल्पकाम अगदी खिद्रापूर-(कोल्हापूर) मधील, कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपातील शिल्पांसारखे आहे. मंडपातून गाभाऱ्यात जाताना डाव्या बाजूच्या एका कोनाड्यामध्ये सप्तमातृकांचा शिल्पपट आहे. गाभाऱ्याच्या द्वारावरही नाजूक कोरीवकाम केलेले आहे. गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली आहे.
मंदिराच्या सभामंडपातील बाहेरच्या, दर्शनी बाजूस मैथुन शिल्पं कोरलेली आहेत. अनेक ठिकाणी तोडफोड झालेली ही शिल्पं परळी आणि गुरसाळ्याच्या रामेश्वर मंदिरावरील शिल्पांसारखी आहेत. पण या मंदिरातील शिल्पांची वेगळी गोष्ट म्हणजे, इथे मंडप दरवाज्याच्या डाव्या बाजूच्या शिल्पांवर दोन ओळींचा लेख कोरलेला आहे. त्याचीही अनेक ठिकाणी मोडतोड झालेली आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर, डाव्या बाजूच्या पहिल्या कोनाड्यात उमा-महेश्वराची मूर्ती आहे. मंदिराच्या कळसाचा भाग मात्र ढासळलेला आहे.
सातारा-कातरखटाव अंतर ६१ कि.मी. आहे. या गावात खाण्या-पिण्याची सोय होऊ शकते. मुक्कामास मात्र पुसेगाव किंवा साताऱ्यात यावे लागेल.
म्हसवड - सातारा-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील, सातारा जिल्ह्यातील शेवटचं गाव आहे म्हसवड, गोंदवल्यापासून अगदी सत्तावीस कि.मी. वर. पण या गावाची ओळख एवढीच सांगता येणार नाही. इथे १२व्या शतकाच्या सुमारास बांधलेलं सिद्धनाथ महादेवाचं मंदिर पाहण्यासारखं आहे.
म्हसवड गावामध्ये एका भक्कम तटबंदीत सिद्धनाथ महादेवाचं मंदिर बधिलेलं आहे. रस्त्यालगतच असणाऱ्या तटबंदीच्या बाहेर आणि आतही पूजेच्या साहित्यांची दुकानं आहेत. तटबंदीच्या मोठ्या दरवाज्यातून आत आल्यावर डाव्या बाजूला ही दुकानं आहेत, तर समोर मोठा दगडी मंडप, उजव्या बाजूला एक-दोन छोटी मंदिरं आहेत आणि यात्रेच्या वेळी रंगितून दर्शन घेण्यासाठीचा दरवाजा. समोरच्या दगडी मंडपामध्ये एका चौथऱ्यावर, मंदिराकडे तोंड करून एक दगडी हत्ती बसविलेला आहे. त्यावरील कोरलेली आभूषणं पाहण्यासारखी आहेत. सिद्धनाथांनी गंगेतून ज्या हत्तीला वाचवलं त्याचं हे स्मारक असल्याचं स्थानिक लोक सांगतात. हा नवसाला पावतो अशीही इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. या मंडपाच्या पुढे, मंदिराला जोडून ओवऱ्या बांधलेल्या आहेत. याही जुन्याच असाव्यात असं वाटतं. यांच्या मधल्या चौकामध्ये एक वृंदावन आहे. त्यावर एक मूर्ती कोरलेली असून तिच्या हातामध्ये नांगर आहे. डोक्याजवळ सूर्य आणि चंद्र आहेत. इथून मंदिराची मूळ वास्तू सुरू होते. मंदिर इतर भागपिक्षा थोडे वरती; चौथऱ्यावर बांधलेले आहे. याला पडवी, मंडप आणि गाभारा असे भाग आहेत. यातील पडवीमध्ये, डावीकडे, कानडी भाषेत पंचवीस ओळींचा एक शिलालेख लिहिलेला आहे. याची लिपी कन्नड जरी असली तरी भाषा संस्कृत आणि कन्नड अशी आहे. यामध्ये काही ठिकाणी म्हसवड नावाचा उल्लेख, महिसवड हनेरड आणि मसवड असा केलेला आहे. म्हणजे म्हसवड त्या वेळी १२ गावांचे प्रमुख ठिकाण होते. (हनेरड म्हणजे बारा) आणि आत्ताचे म्हसवड हे नाव यांचे सुधारित नाव आहे. शिलालेखाशेजारी ओवरीमध्ये सप्तमातृका शिल्पपट आहे. शिवाय आणखी तीन ओवऱ्यांमध्ये गणपती, भैरव आणि विष्णू यांच्याही मूर्ती आहेत. यांच्यामध्ये असणारे मंडपाचे द्वार अत्यंत सुंदर कोरीवकामांनी सजविलेले असून त्याचे प्रवेशद्वार चार शाखी म्हणजे पदम्पत्र, व्याल आणि अश्व, स्तंभ आणि नर पंच शाखांचे आहे. त्यांच्या खाली स्तंभांच्या पायर्याजवळ चवरीधारिणी, नमस्कारी शिल्प, द्वारपाल यांच्या मूर्ती आहेत. मंडपात गेल्यावर आतील खांबही उत्तमप्रकारे कोरलेले आहेत. गाभाऱ्याकडे जात असताना त्यामधील भागात (अंतरालामध्ये)
गरुड आणि भैरवाची मूर्ती आहे. यांच्या अलीकडे दोन स्तंभांना गोलाकार पत्र्याने मढविलेले आहे. मंदिराच्या मंडपाप्रमाणेच, गाभाऱ्याच्या दरवाज्यावरही नाजूक कोरीवकाम आहे. फक्त मंडपाचे प्रवेशद्वार चार शाखांचे आहे तर गाभाऱ्याचे पंचशाखी आहे. हे चालुक्यकालीन असून पहिली नक्षीकाम, दुसरी पदम्शाखा, तिसरी स्तंभशाखा, चौथी नर शाखा आणि पाचवी पुन्हा पदम्शाखा युक्त आहे इथेही स्तंभाखाली शैव द्वारपाल, चवरीधारिणी, कुबेर यांच्या मूर्ती आहेत.
गाभाऱ्यामध्ये लाकडी महिरपीमागे सिद्धनाथ व त्याची पत्नी जोगाबाई यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्या मागे पितळेची प्रभावळ आहे. सिद्धनाथांची मूळ मूर्ती भैरवाची आणि जोगाईची मूळ मूर्ती पार्वतीची आहे. या मूर्तीखाली एक भुयार असून त्यामध्ये एक शिवलिंग आहे असंही इथे ऐकायला मिळतं. हे ठिकाण मुळात पाताळलिंगी असून १७व्या शतकाच्या सुमारास त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि गाभाऱ्याची आतील बाजूने पुन्हा बांधणी केली गेली. त्यावरच आज दिसणाऱ्या या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत.
म्हसवड गावाचा आणखी एक उल्लेख सापडतो तो म्हणजे १८८५ मध्ये माणदेशातील हे एक मुख्य व्यापारी केंद्र होते. याला मान्यांचे म्हसवड या नावानेही ओळखले जात होते (किंबहुना आजही ओळखतात.) हे माने विजापूरला दरबारात मोठे मानकरी होते. त्यांच्या देशमुखीचा पडझड झालेला वाडाही आज म्हसवडमध्ये पाहायला मिळतो.
सातारा म्हसवड - ९८ कि.मी. आहे.
म्हसवड हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे खाण्या-पिण्याची सोय होऊ
निगडी - समर्थ पंचायतनातील दोन व्यक्तींच्या (समर्थांशिवाय) समाध्या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी जयरामस्वामींची समाधी औंध गावानजीकच्या वडगाव गावी आहे आणि रंगनाथस्वामी यांची समाधी कोरेगावजवळील निगडी या गावी.
कोरेगावपासून पाच कि.मी. वर, कृष्णानदीच्या काठी निगडी गाव वसलेलं आहे. गावाजवळील कृष्णेच्या तीरावर रंगनाथस्वामींची समाधी आहे. गावामध्ये या मंदिराला रंगनाथस्वामी समाधी मंदिर म्हणतात. मंदिराचे आवार अलीकडेच, बाजूने बंदिस्त केलेले आहे. त्याच्या मध्यभागी हेमाडपंती पद्धतीचे मोठे आणि सुंदर मंदिर बांधलेले आहे. अर्धामीटर उंचीच्या जोत्यावर बांधलेल्या या मंदिराला दोन मंडप आणि गाभारा असे भाग आहेत. दोनही मंडप एकमेकांना जोडलेले असून बाजूने उघडे आहेत. त्यांना सर्व बाजूंनी प्रवेश करण्यासाठी कमानी बांधलेल्या आहेत. पहिला मंडप आकाराने फारच लहान आहे, शिवाय तो दुसऱ्या मंडपाला अशा प्रकारानं जोडलेला आहे की त्यांचा स्वतंत्र भागच जाणवत नाही. दुसऱ्या मंडपामध्ये गाभाऱ्याच्या बाजूला, डावीकडे कोनाड्यात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. त्याच्यासमोरच मंडपामध्ये छोटासा नंदी बसविलेला आहे, तर उजवीकडच्या कोनाड्यात गणपती पाहायला मिळतो. यांच्यामध्ये असलेल्या दरवाज्याच्या उंबऱ्यावर कीर्तिमुख आहे. इथूनच गाभाऱ्यातील समाधीचे दर्शन होते.
रंगनाथस्वामींची ही समाधी पीठावर आहे. समाधीच्या मागे चौथऱ्यावर विठ्ठल-रुक्मिणीच्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. डावीकडे एक लहान आणि एक अर्धामीटर उंचीची, तांब्याची पार्वतीची मूर्ती आहे. त्रिभंगावस्थेतील ती मूर्तीवरील कोरलेली आभूषणं, त्यांचा रेखीवपणा नजर खिळवून ठेवणारा आहे. समाधीच्या समोरही एक शिव-पार्वतीची, पितळेची मूर्ती आहे. रंगनाथस्वामींची समाधी आणि शिवलिंग पूजेनंतर वस्त्रांनी आच्छादलेलं असतं, पण तेही बरंच मोठं आणि काळ्या पाषाणामध्ये आहे.
मंदिराच्या आवारात डावीकडे राम मंदिर आहे. त्यामध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्या पितळी, तर त्यांच्यासमोर हनुमान व समर्थाच्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. या मंदिरासमोर एक समाधी आहे. ती म्हणजे रंगनाथस्वामींचे धाकटे बंधू विठ्ठलस्वामी ऊर्फ आत्मास्वामी यांची. यांच्यानंतर प्रदक्षिणा मार्गावर (रंगनाथ स्वामी मंदिराच्या उजवीकडे कोपऱ्यात) आणखी एक मंदिर आहे. ते म्हणजे दत्ताचे. पण या ठिकाणी दत्ताची मूर्ती पाषाणाची आणि एकमुखी आहे. या मंदिरासमोरही रंगनाथस्वामींचे पट्टशिष्य जनार्दनस्वामींची समाधी आहे. मंदिराच्या (रंगनाथस्वामी समाधी) समोर रंगस्वामींचे थोरले भाऊ योगीराज स्वामी यांची समाधी आहे. प्रवेशद्वाराजवळ डाव्या कोपऱ्यात मनोहर मंदिर आहे. मनोहर हा रंगनाथ स्वामींचा घोडा. या घोड्याचा पाय ज्या दगडात अडकला तो दगड या मंदिरात ठेवण्यात आला आहे.
रंगनाथस्वामींची एक विशेष गोष्ट ऐकायला मिळते ती म्हणजे झिडकारले तरी वैभव (संपत्ती) त्यांच्या मागे लागे. त्यांच्या चरित्रात तशा अनेक कथा लिहिलेल्या आहेत. त्यांच्या घराण्यामध्ये, त्यांचे वडील बोपाजीपंत आणि बयाबाई
यांना दोन पुत्र, रंगनाथ आणि विठ्ठलराव. बोपाजीपंत हे माण नदीच्या काठावरील नाझरे गावचे कुलकर्णी. पण त्यांनीही काही काळानंतर सहजानंदांचे शिष्य पूर्णानंद (कल्याणीचे) यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली तेव्हा बोपाजीपंतांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथस्वामींनी त्यांचाच अनुग्रह घेतला. त्यांना घोडेस्वारीची प्रचंड आवड होती. प्रवासात एके दिवशी निगडी गावामध्ये त्यांच्या घोड्याचे खूर दगडात अडकले. ही परमेश्वराची सूचना आहे असे समजून त्यांनी समाधी घेईस्तोवर याच गावात वास्तव्य केले. पण त्यांनी पूर्वीची योगसाधना मात्र बद्रिकाश्रमी केली.
रंगनाथस्वामींची पदे आणि रचना या अत्यंत ठसठशीत पण मर्मभेदक आहेत. शिवाय ते समर्थांना आपलं सर्वस्व मानीत हे त्यांच्या एका पदावरून समजते. ते पद म्हणजे
रामदास चतुराक्षरी मंत्र जप वारंवार ।
दुस्तरतर भक्तसागरतारक सच्चित्सुखसार ।।धृ.।।
रामदास द्वय अभिन्न नामे गोडी शर्करा ।।
राहाटे परिमळ भुवनि हाती घेता कर्पूरा ।
राजाति वर्तुळशा त्यावरी ते जीवन की गारा ।
राजाधिराज अवतरला हा या जगदोद्धारा ॥१॥
मनुष्यरूपे विलसे परि हा परिपूर्ण काम । मकराकृती कुंडले पहाता स्वयंसिद्ध हेम । मंडण संत सभेचे साधक जनासि विश्राम । मस्तक याविहा शतकोटीचे बीज श्रीराम ॥२॥
दास तो उदास सेवूनि परमामृतकंदा ।
दाता स्वात्मसुखाचा निरसुनि विषयाचा धंदा ।
दानवकुळ षड्वैरी मर्दुनि तारिता मतिमंदा ।
दारा द्रव्य त्यजुनी सत्वर सद्भावे वंदा ॥३॥
सद्गुरुराज विराजत करुनी सज्जनगिरीवास । सर्वस्वेशी शरण रिघावे धरुनिया कास ।
सत्य सनातन श्रीगुरु समर्थ मुनिमानसहंस ।
सहजपूर्ण निज रंग रंगला तारक विश्वास ।।४।।
सातारा - निगडी अंतर - २३कि.मी. आहे.
अकराव्या शतकात बांधलेल्या या मंदिर-आवाराला दोन पुढे आणि एक मागे अशी तीन प्रवेशद्वारं आहेत. मंदिरासमोरील प्रवेशद्वाराजवळ दोन दीपमाळा आहेत. या दरवाज्याला लोखंडी दार बसविलेले असून ते कायम बंद असते. याच्याजवळच दुसरा दरवाजा आहे. आजही याच दरवाज्याचा वापर केला जातो. याच्या आतील बाजूस देवड्या आहेत. प्रवेशद्वारातून आत आल्यावरच मंदिराचे संपूर्ण आवार दिसते. हे आवार अत्यंत साफ ठेवलेले आहे. पण मंदिराच्या कळसापासून अगदी पायथ्यापर्यंत केलेल्या रंगकामामुळे याच्या सौंदर्याला गालबोट लागल्याचंही जाणवतं. मंदिरासमोर नंदी स्थापन केलेला आहे. बाजूला एक तुळशी वृंदावनही आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करतेवेळी आवारात सगळीकडे फरशा बसविलेल्या आहेत. कळसाची डागडुजी करून त्यावरील जुन्या रंगाच्या ठिकाणी सर्व कळसावर वेगवेगळे ऑईलपेंटचे थर चढविलेले आहेत.
मंदिराला मंडप आणि गाभारा असे दोन भाग असून, त्यांना आतील बाजूने रंग लावलेला आहे. मंडपातील खांबावर वरील निम्म्या भागापर्यंत कोरीवकाम केलेले आहे. त्यावर प्रामुख्याने पानं, फुलं, वेली यांचा जास्त वापर केलेला दिसतो. गाभाऱ्याच्या द्वारावरही अत्यंत बारीक कोरीवकाम केलेले आहे. गाभाऱ्यात शिवलिंग असून ते बेला-फुलांनी सजविलेलं असतं.
या गावाच्या इतिहासात १८०७ साली बापू गोखल्याने पंतप्रतिनिधींना वसंतगडाखाली कैद केले. कारवाईनंतर पुण्यास परत जाताना बापू गोखल्याने वर्धनगडावर हल्ला केला. त्या वेळी त्याचा मुक्काम या गावात होता.
गावामध्ये समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अनेक मारुतींपैकी एका मारुतीचे मंदिर आहे.
सातारा-चिमणगाव अंतर २४ कि.मी. आहे.
गावामध्ये खाण्या-पिण्याची सोय नाही; पण कोरेगाव, पुसेगावमध्ये ही सोय होऊ शकते.
भोगाव वाई पर्यटनामध्ये वाई, पसरणी, मेणवली, धोम यांच्याबरोबरच मेणवली, धोममध्ये असणारं भोगाव देखील पाहण्यासारखं आहे. या मार्गावरून प्रवास करताना या गावाबद्दल नेहमीच काहीतरी वेगळं वाटायचं. एके दिवशी गावात चौकशी केल्यावर समजलं की इथे वामन पंडितांची समाधी आहे. वामन पंडित हे नाव कधीतरी ऐकलेलं वाचलेलं होतं; पण कधी ते आठवेना. आणि एकदम लक्षात आलं की, इयत्ता सातवीच्या वर्गात वामन पंडितांची एक आर्या आम्हांला अभ्यासाला होती.
सुश्लोक वामनाचा अभंगवाणी तुकयाची ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंताची हा श्लोक आठवल्यावर या ठिकाणाबद्दल कुतुहल निर्माण झालं आणि आश्चर्य वाटायला लागलं की एवढ्या मोठ्या कवीची आणि टीकाकाराची समाधी आपल्या जिल्ह्यामध्ये, सातारा, वाईच्या जवळ आहे, पण मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या आणि आमच्यासारख्या गावोगाव भटकणाऱ्या मंडळींना देखील याची माहिती नाही. मग आम्ही गाडी गावाच्या दिशेने वळवून ही समाधी पाहायचा निर्णय घेतला.
भोगाव गावाच्या बाजूला, कृष्णा नदीच्या तीरावर वामनपंडितांची समाधी आहे. समाधीच्या अलीकडे १६व्या शतकाच्या सुमारास बांधलेलं शंकर मंदिर आहे. हेमाडपंती पद्धतीतील हे मंदिर वाई गावातील मंदिरांची आठवण करून देणारं आहे. मोकळ्या आवारामध्ये रस्त्याच्या बाजूलाच शिवमंदिर आहे. मंदिराचा शिखराचा भाग थोडा पडझड झालेला आहे, बाकी सर्व मंदिर सुस्थितीत आहे. इथून लगेचच घाटावरती, पत्र्याच्या मोठ्या शेडमध्ये वामन पंडितांची समाधी शिळा आहे. अलीकडच्या काळातच त्याच्या भोवताली फरशा वगैरे बसविलेल्या आहेत. समाधी शिळेला शेंदूरी रंग लावला असून त्यावर एके ठिकाणी संगमरवरावर लेख लिहिलेला आहे. तो म्हणजे -
श्री वामन पंडितांची समाधी असे तरी ।
पुढे आर्या प्रबंधाने शिळा सर्वांस सूचवी ।।
ज्याने यथार्थदीपिका नामसुधा निगमसार समश्लोकी ।।
रचिली श्रुतीकल्पकता इत्यादिका नमुनिशेष पर्यकी ।।
जन्म शके १५.. समाधी शके १६१७, जीर्णोद्धार शके १८४३ पुण्यतिथी वैशाख शुद्ध ६.
या लेखामध्ये उल्लेख केलेला यथार्थदीपिका हा ग्रंथ बावीस हजार श्लोकांचा आहे. यामध्ये त्यांनी गीतेवर टीका केलेली आहे. त्यांचा निगमसार हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.
अशा या वामनपंडितांची समाधी आणि त्याच्या बाजूचा परिसर नक्कीच पाहण्यासारखा आहे.
सातारा - भोगाव अंतर ३९ कि.मी. आहे. गावात खाण्या-पिण्याची सोय
कोळे - कराड-ढेबेवाडी रस्त्यावर कराडपासून तेरा कि.मी. अंतरावर कोळे गाव आहे. वांग नदीच्या तीरावर वसलेल्या या गावाच्या एका बाजूला विठ्ठल मंदिर आहे. या ठिकाणी मंदिराला घाडगेमहाराजांचा मठ नावाने ओळखतात. नदीच्या तीरावर नरसोबा, राम आणि अंबाबाई यांची मंदिरंही पाहण्यासारखी आहेत.
कोळेगावातील विठ्ठलाचं हे मंदिर तटबंदीमध्ये बांधलेलं असून अलीकडच्या सुमारासच त्याची डागडुजी आणि रंगरंगोटी केलेली आहे. मंदिरआवाराच्या कमानीतून आत गेल्यावर समोर पाण्याची टाकी आहे. तिच्या उजव्या बाजूला घाडगेमहाराजांच्या घोड्याचे छोटेखानी स्मारक आहे. या स्मारकमंदिराला लागूनच मंदिराची मूळ तटबंदी आहे. यातील मुख्य दरवाज्यावर नगारखान्याची इमारत आहे. आजमितीला त्यामधील दरवाजे विटांनी बंद केले असले तरी त्यांच्या सौंदर्यामध्ये बाधा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला देवड्या आहेत. शिवाय डावी-उजवीकडे काही ओवऱ्याही बांधलेल्या आहेत. मंदिर प्रांगणात एखाद-दुसरे घरही आहे. देवड्या ओलांडून आत आल्यावर पूर्ण मंदिर दृष्टीस पडते. मंदिर मीटरभर उंचीच्या जोत्यावर बांधलेले आहे. त्याच्या पायऱ्यांनी वर गेल्यावर प्रथम आहे तो मंडप. हा लाकडाचा बांधलेला असून त्याचे खांब बारीक
कोरीवकामांनी सजविलेले आहेत. दोन खांबांमधील कमानीवर अनेक फोटो लावलेले आहेत. त्यामध्ये राम, शंकर, सरस्वती, लक्ष्मी यांच्यापासून ज्ञानेश्वर, तुकाराम यांचेही फोटो आहेत. हा मंडप दोनमजली आणि मंदिर बांधून झाल्यानंतर लगेचच बांधलेला असावा असे वाटते, मंडपाला चिकटूनच मंदिराची हेमाडपंती वास्तू आहे. याच्या अंतराल भागात घाडगे महाराजांच्या शिष्यांच्या समाध्या आहेत. यातील डावीकडे कृष्णनाथ महाराजांची आणि उजवीकडे शिवलिंग समाधी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी मेघडंबरी असून त्यामध्ये प्रत्यक्ष घाडगे महाराजांची समाधीशिळा आहे. या समाधीशिळेच्या मागे दोन मीटर उंचीच्या चौथऱ्यावर, अर्धा मीटर उंचीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. हे मंदिर आतील बाजूनी पूर्णपणे रंगविलेलं आहे, तरी इथे त्यांचा भडकपणा किंवा रंगांचा अतिरेक जाणवत नाही. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर दोन ठिकाणी भिंती घालून तो बंद केलेला आहे. पण त्यावर फिरताना मंदिरबांधणीची सुबकता नक्कीच जाणवते. साधारणपणे १७व्या शतकाच्या सुमारास बांधलेल्या या मंदिराची आजही चांगल्या प्रकारे देखरेख केली जाते.
या कोळे गावाचा आणि याच्या बाजूच्या कोळेवाडी गावाचा एका जुन्या ताम्रपटामध्ये उल्लेख केलेला आढळतो. हा ताम्रपट सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे सापडलेल्या विष्णुकुंडीनवंशीय राजा माधववर्मन याच्या कारकीर्दीतील असून त्यामध्ये कोळे, काळेवाडी याचबरोबर रेठरे बु. (ता. कराड. जि. सातारा) आणि शेणोली (ता. कराडा, जि. सातारा) या गावांचाही उल्लेख आहे. शिवाय देशावरून कोकणात जाणाऱ्या घाटमार्गापैकी माळा (?) नावाच्या प्राचीन घाटमार्गाचे हे सुरुवातीचे ठिकाण आहे.
इतिहासामध्येही साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांना सन १८३९ साली पदच्युत केल्यानंतर इंग्रज सरकारविरुद्ध संपूर्ण भारतात असंतोष पसरला. साहजिकच सातारा परिसरात तो सर्वांत मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे इंग्रजांच्या प्रत्येक ठिकाणावर त्याचा परिणाम दिसू लागला. कोळे गावचे धारराव पोवार यांनी या बंडासाठी सर्वांना एकत्र केले त्यामुळे या बंडाला 'धाररावांची बंडे' या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी त्यांच्या कारवाया अगदी कराडपासून प्रचीतगडापर्यंत पसरवल्या, पण काही काळातच इंग्रजांनी त्यांचा बीमोड केला.
सातारा-कोळे अंतर ६७ कि.मी. आहे.
कराड गाव सोडल्यानंतर पुढच्या प्रवासामध्ये खाण्या-पिण्याची फारशी सोय नाही.
बावधन -पाचवडहून वार्डला जाताना वाटेवरील उंच झाडांमधून धावणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करणं हा नेहमी आनंददायी भाग असतो. या मार्गावर आसले वैराटगड, बावधन अशी काही कमी-अधिक परिचयाची स्थळं आहेत. यांपैकी बावधन गावात आणि गावाजवळ पाहण्यासारखं बरंच काही आहे. वाई, महाबळेश्वर सातारा या गावांमधील मंडळींना एखादी संध्याकाळ शांत, निसर्गरम्य आणि धार्मिक ठिकाणी घालविण्याची इच्छा असेल तर यांसारखी ठिकाणं क्वचितच सापडतील. पण याच गावातील नाही, तर हमखास येऊन पाहावीत अशीही गावं आहेत हे नक्की.
पाचवडपासून बावधन साधारण बारा कि.मी. बावधन फाट्यापासूनही दोन्ही बाजूच्या शेतांतून जाणारी मस्त डांबरी सडक आहे. फाट्यापासून बावधनगाव फक्त तीन कि.मी. आहे. गावाच्या एका बाजूला, कृष्णेच्या काठावर भैरवनाथाचं मंदिर आहे. तटबंदीमध्ये बांधलेल्या या मंदिराला पूर्वेला आणि दक्षिणेला दरवाजे आहेत. इतर काही मंदिरांप्रमाणे या दोन्ही दरवाज्यांच्या मागे देवड्या आजही चांगल्या प्रकारे शिल्लक आहेत. कोणत्याही दरवाज्यातून आत आल्यावर लक्ष वेधून घेतात त्या मंदिरासमोरील दोन दीपमाळा. यांतील एका दीपमाळेजवळ तीन जाती टेकवून ठेवलेली आहेत. याच्याजवळील मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला गणेशमंदिर आणि एका खोलीसारख्या भागामध्ये काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. त्या काळाच्या ओघात बऱ्याचशा जीर्ण झालेल्या असल्यातरी त्यांच्या हातातील शस्त्रास्त्रे समजू शकतात. इथेही काही दगडी जाती ठेवलेली आहेत. या मंदिरांच्या जवळच एका उंच चौथऱ्यावर शिवमंदिर आहे. त्यातील शिवलिंग लहान आणि सुबक आहे. बाजूला एक-दोन घरंही पाहायला मिळतात. भैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूलाही दोन लहान मंदिरं आहेत. त्यांतील एकामध्ये देवीची आणि दुसऱ्यामध्ये पाषाणरूपी देवतेची स्थापना केलेली आहे. मुख्य मंदिरासमोर, दोन दीपमाळांमध्ये, एक नंदीमंडप आहे. त्यामध्ये होमाकरिता वापरतात तसा खड्डा आहे. शिवाय दोन नंदी आणि एक शिवलिंगही पाहायला मिळतं.
भैरवनाथमंदिरही अगदी प्रशस्त आणि सुंदर बांधलेलं आहे. अनेक रंगांनी रंगविलेल्या या मंदिराला पाहताना कुठेही रंगाचा भडकपणा जाणवत नाही. मंदिर हेमाडपंती शैलीचे आणि काळ्या पाषाणाचे बांधलेले आहे. त्याचा दुसरा मंडप मात्र चौथऱ्यावर पण लाकडाचा बांधलेला आहे. त्यामध्ये जत्रेच्या वेळी वापरण्यात येणारी पालखी आणि बगाडाचा काही भाग ठेवलेला आहे. या मंडपाला जोड्नच मंदिराचा मंडप आहे. त्यामध्ये मात्र कोणतीही वस्तू नाही. गाभाऱ्यात, एक मीटरच्या चौथऱ्यावर भैरवनाथ यांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. पण हे भैरवनाथाचं मंदिर अलीकडेच बांधलेलं असून भैरवनाथाचं मूळ ठाणं बावधनजवळच्या डोंगरावर असल्याचं इथे ऐकायला मिळतं.
त्या ठिकाणी जाण्यासाठी वाई-बावधन रस्त्यावर बावधन गावाची कमान उभारलेली आहे तेथून वाट आहे. पूर्वीच्या काळी (अगदी अलीकडेही) या लेण्यांमधील मंदिरांपर्यंत जायचं झाल्यास थोड्या अवघड वाटेने जावे लागे, पण आता तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांचा आणि गाडीचाही मार्ग तयार केलेला आहे. कमानीपासून थोडी कच्ची वाट डोंगरावर गेलेली आहे. ती पुढे जाऊन नंतर पक्क्या डांबरी रस्त्याला मिळते. या मार्गानं लेण्यांच्या अगदी जवळ जाता येतं, तर पायथ्याच्या कमानीपासून वाईच्या बाजूला रस्त्यालगतच असणाऱ्या साधारण चारशे पायऱ्यांनीही लेण्यांपर्यंत जाता येतं. ही लेणी अगदी प्राचीन असून संख्येने फक्त चारच आहेत. त्यांतील दुसऱ्या भागामध्ये भैरवनाथांची लहान मूर्ती आहे, शिवाय बाजूला आणखी काही मूर्तीही ठेवलेल्या दिसतात. बाकीच्या लेण्यांमध्येही काही शिल्पं ठेवलेली आहेत. इथून भोवतालचा अप्रतिम परिसर पाहता येतो.
बावधन गावाच्या मागच्या बाजूला पांढऱ्याची वाडी नावाची छोटीशी वाडी आहे. याच्याजवळ, एका लहान टेकडीसारख्या भागावर अगस्तेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिरही तटबंदीमध्ये असून त्याला समोरासमोर दोन प्रवेशद्वारं आहेत. तटबंदीबाहेर समोरच्या बाजूला, झाडांमध्ये एका मोठा नंदी पाहण्यासारखा आहे. साधारण दीड मीटर लांब आणि मीटरभर उंचीच्या या नंदीवरील आभूषणं आणि त्याच्यासमोर टोपली डोक्यावर घेऊन उभ्या असलेल्या स्त्रीचं चित्र लक्षवेधक आहे. पण हा नंदी आज अडगळीत पडलेला आहे. त्याच्यामागे असणाऱ्या दीपमाळेची देखील तीच अवस्था आहे. त्यांच्याजवळच चौथऱ्यावर एक मोडकळलेले आणि दुसरे शिवलिंग किंवा मूतीं नसलेले मंदिर आहे. या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अगस्तेश्वराच्या मंदिराला बाहेरून रंगरंगोटी केलेली आहे, आतील भागही अगदी व्यवस्थित स्वच्छ ठेवलेला, मग या मंदिराबाहेरील शिल्पांची आणि मंदिरांची अशी अवस्था का ?
बावधनमधून चालत येणाऱ्या वाटेवरही (अगस्तेश्वर मंदिर तटबंदीच्या उजवीकडे) असेच पडायला आलेले आणखी एक मंदिर आहे. तटबंदीतील दुसऱ्या दरवाज्याबाहेर काही वीरगळ आणि इतर मूर्ती ठेवलेल्या आहेत. दरवाज्यातून आत आल्यावर मंदिराचा पूर्ण परिसर दिसतो. आवारामध्ये एक तुळशी वृंदावन आणि मंदिरासमोरच नंदी मंडप आहे. मंदिराची बांधणी साधारण १८व्या शतकाच्या सुमारास झाली असल्याचं समजतं. मंदिर एक मीटरच्या चौथऱ्यावर बांधलेले आहे. त्याच्या मंडपामध्ये ऑईलपेंटने काही चित्रं रंगविलेली आहेत. शिवाय गाभाऱ्याजवळच्या एका कोनाड्यात गणपतीची मूर्ती आहे. गाभारा मंडपापेक्षा खाली आहे. त्यामध्ये शिवलिंगाबरोबरच गणपती आणि देवी यांच्याही मूतों आहेत. शिवलिंग काळ्या पाषाणाचे तर त्यावरील शाळुंका तांबूस रंगाची आहे. इथे नेहमी अंधार असल्यामुळे बॅटरी आणणे आवश्यक आहे.
बावधन गावाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जत्रेच्या वेळी इथे असणारे बगाड. बावधनची जत्रा पाच दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांनी भरलेली असते. त्यामध्ये नवस पूर्ण झालेल्या व्यक्तींचे कौल लावण्यापासूनचे अनेक विधी, छबिना, देवाचा पोशाख ते शेवटच्या दिवशीचे बगाड सर्व काही पाहण्यासारखं असतं. भैरवनाथाची ही जत्रा असते फाल्गुन कृष्ण १५ या दिवशी.
या जत्रेच्या वेळी एका कार्यक्रम असतो तो म्हणजे बगड्याने (ज्याचा कौल लागला आहे अशा व्यक्तीने) पाचही दिवस भैरवनाथाचे मंदिर, मूळ ठिकाण (डोंगरावरील), गावातील मंदिरं, ओझर्डे गावातील सोमेश्वर मंदिर यांची सूर्योदयाच्या आधी पूजा करायची असते. हे सर्व मला समजल्यावर जत्रेच्या दरम्यान नाही, पण नंतर मी ही सर्व ठिकाणं पाहायचं ठरविलेलं होतं. त्याप्रमाणे एक दिवस बावधनमधील मंदिरं पाहून ओझर्डे गावाला गेलो. बावधनपासून ओझर्डे सहा कि.मी. पण बरोबर विरुद्ध दिशेला; म्हणजे बावधनमधून पुन्हा पाचवड-वाई फाट्याला यायचं आणि इथूनच सरळ ओझर्डे फाटा पकडायचा. फाट्यापासून ओझर्डे तीन कि.मी. इथे गावाच्या आणि मंदिराच्या मधून कृष्णा नदी वाहते. त्यावर बांधलेल्या पुलावरून पलीकडं गेलं की उजव्या बाजूला पाणी खात्याच्या इमारतींमध्ये सोमेश्वराचं मंदिर आहे. हे मंदिर बऱ्यापैकी मोठं असून त्याच्यासमोर एक मोठा हॉल बांधलेला आहे. त्याच्यासमोर नंदी स्थापन केलेला आहे. मंदिरामध्ये गाभाऱ्यात शिवलिंग आहे. या मंदिरालाही आतून-बाहेरून रंग लावलेला आहे. पण या भागामध्ये आणखी एक मंदिर आवर्जून पाहण्यासारखं आहे. खरं तर कृष्णेच्या पुलावरून प्रवास करताना हेच मंदिर आधी लक्ष वेधून घेतं. पुलाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी पूलाजवळूनच पायवाट आहे. खाली उतरल्यावर दोन समाधी मंदिरं, नंदी मंडप आणि मंदिरं यांची कृष्णेच्या काठावर असलेली प्रमाणबद्धता अवाक करायला लावणारी आहे. या प्रत्येक वास्तूवरती जुन्या काळातील काही रंग चांगल्या प्रकारे शिल्लक आहेत. आणखी एक विशेष गोष्ट या भागाची मला समजली ती म्हणजे कृष्णेचं पाणी इथे थोडं कमी झालं की कृष्णेच्या पात्रातील रांजणखळगे या भागात व्यवस्थित दिसतात. पुण्याजवळील निघोज आणि साताऱ्याजवळील वळसे गावातील रांजणखळग्यांच्या तुलनेने हे थोडे कमी आहेत, पण ते पाहण्यात वेगळाच आनंद मिळतो हे नक्की.
सातारा-बावधन अंतर ३३ कि.मी. आहे. गावात खाण्या-पिण्याची नाही, पण चहाची सोय होऊ शकते.
***
४. पर्यटन स्थळ ...
सातारा-येराडवाडी अंतर ६६ कि.मी. आहे. या मार्गावर पाटण, उंब्रज, कराड या ठिकाणी खाण्या-पिण्याची सोय होऊ शकते.म्हसवे - पाश्चात्त्य देशात असणाऱ्या अनेक गोष्टींचं आपल्याला भारी कौतुक असतं त्यांच्याकडील सण, रीति-रिवाज, वास्तू, घर इथपासून अगदी एखाद्या बागेतील (गार्डनमधील) फुलांचंही आपल्याला आकर्षण वाटतं. पण आपल्या घरा-अंगणात असणारी एखादी गोष्ट त्यांच्या तुलनेत तसूभरही कमी नाही. पण मुख्य अडचण आहे ती, ती आपल्याला माहिती नसते याची. याचं एक उदाहरण आहे म्हसवे गाव.
या गावामध्ये भारतातील अतिपुरातन वडाचं झाड आहे. याची नोंद फ्लोरा ऑफ प्रेसिडेन्सी ऑफ बॉम्बे या पुस्तकात पहिल्या क्रमांकाचा वटवृक्ष म्हणून केली गेली आहे. तर १८८२ मध्ये 'ली वॉर्नर' या पुस्तकामध्ये याचा विस्तार दिला आहे. या पुस्तकानुसार याची पूर्व-पश्चिम लांबी १३३मी. आहे, तर दक्षिणोत्तर लांबी १७९ मी. आहे. १९०३ साली, थोओडोरकुक यांनी याची २.५ एकर म्हणून नोंद केलेली आहे.
असं हे प्राचीन वडाचं झाड सातारा जिल्ह्यामध्येच, मुख्य रस्त्यापासून थोडं आतल्या बाजूस आहे. म्हसणे गावाला येण्यासाठी पाचवड आणि मेढा या दोन गावांमधून रस्ते आहेत. सातारा-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना हे ठिकाण कमी वेळात जवळ करता येईल. पाचवड-मेढा रस्त्यावर, पाचवडपासून चार कि.मी. वर म्हसवे फाटा आहे, तर फाट्यापासून दोन कि.मी. वर म्हसवे गाव. पण गावाच्या अलीकडेच, उजव्या बाजूस हे वडाचं झाड आहे. हा भाग आता वनखात्यानं संरक्षित जाहीर करून, या झाडाबद्दलची सर्व माहिती येथील फलकावर लिहिलेली आहे. पण या संरक्षित जागेकडे आणखी थोडं लक्ष देण्याची गरज आहे. कारण या वडाच्या झाडाभोवती बाभूळ आणि अनेक प्रकारच्या वेलींचं रान माजलेलं आहे, की ज्यामुळे झाडाचा काही भाग दिसतही नाही. त्यामुळे या भागाची वेळोवेळी साफसफाई करणं गरजेचं झालं आहे.
आजही या झाडाची भारतातील सर्वांत प्राचीन वृक्ष म्हणून नोंद झाली असली, तरी आता मूळ झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकून, त्याचे दहा-अकरा वेगळ्या वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे. या झाडांवर वेली चढल्यामुळे ते दिसताना अत्यंत सुंदर दिसतं, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सातारा-म्हसवे पाचवडमार्गे ३० कि.मी. आहे, आणि मेढा मार्गे ४० कि.मी. आहे. या गावामध्ये फक्त चहा-भज्यांची सोय होऊ शकते.
भिलार महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर पर्यटकांचं सर्वांत आवडतं ठिकाण म्हणजे मॅप्रो गार्डन. इथे मिळणाऱ्या रसबेरी, मलबेरी, जाम, आइस्क्रीम यांच्या चवी महाराष्ट्रातील खवय्यांना इथे घेऊन येण्यासाठी समर्थ आहेत. पण याच मार्गावर पर्यटक हमखास थांबतात ते भिलार फॉल पॉईंटवरही. पावसाळ्यामध्ये या ठिकाणाहून पडणारा धबधबा पाहणं हा एक सुंदर अनुभव असतो. या धबधब्याबरोबर डोंगरधारेवरून पडणारे बरेच धबधबे इथून पाहता येतात. पण यामध्ये सर्वांत मोठा आवाज आणि प्रपात असतो तो भिलार धबधब्याचा. बऱ्याच दूर पडणाऱ्या या धबधब्याचा आवाज अगदी सहज इथे ऐकू येतो. पण फार कमी पर्यटक असे आहेत की, जे या भिलार धबधब्याच्या अगदी जवळ म्हणजे ज्या ठिकाणाहून हा पडतो त्या ठिकाणी जातात.
भिलारचा हा धबधबा जवळून पाहण्यासाठी भिलारफॉल पॉईंटनंतर दीड कि.मी.वर भोसे गाव आहे. या गावाजवळून एक रस्ता भिलार गावाकडे जातो. याच्या आधी दोन डोंगरांमधील एक खिंड ओलांडावी लागते. स्थानिक लोक त्याला भोसे खिंड म्हणतात. खिंडीच्या वरूनच भिलारमध्ये जाण्यासाठी गाडीवाट आहे. खिंडीपासून भिलारगाव दोन कि.मी. गावातील कृष्णामाई चौकातून एक फाटा राम मंदिराकडे जातो. या ठिकाणी गाडी लावून पाऊलवाटेने चालत जावे लागते. पाऊलवाटही अगदी घसरडीची असल्यामुळे काळजी घ्यावी लागते. वाटेत, उजव्या बाजूला राममंदिर आहे. मंदिराच्यानंतर मात्र गवतांच्या मधून जाणारी वाट आहे. कृष्णामाई चौकातून इथपर्यंत येण्यासाठी अगदी पाचच मिनिटं लागतात. पण यानंतरची पाऊलवाट मात्र थोडी त्रासदायक आहे. कारण इथे घसरड्याच्या बरोबर जळवांचाही त्रास होण्याची शक्यता आहे. शिवाय पावसामुळे जमीन खचल्याचे प्रकारही इथे पाहायला मिळतात. याच ठिकाणाहून धबधब्याचं पाणी दिसायला लागतं. त्या वेळी प्रचंड आवाज आणि वेगानं दरीत कोसळणारा धबधबा पाहण्यासारखा असतो. इथून डाव्या बाजूला, धबधबा ज्या ठिकाणाहून खाली पडतो तिथंपर्यंत जाता येतं. इथलं दृश्य हे केवळ अवर्णनीय असतं. साधारण पाचशे मीटर खोल दरीत सरळ पडणारा हा धबधबा इथून पाहण्यातच खरी मजा आहे. पण इथे काळजी घेणंही आवश्यक आहे. कारण इथे कुठेही कठडे नाहीत. आणि वाराही बऱ्यापैकी असतो. योग्य ती दक्षता घेऊन या ठिकाणी आल्यास काहीतरी वेगळं पाहिल्याचा आणि अनुभवल्याचा आनंद इथे नक्कीच मिळू शकेल.
सातारा-भिलार (पाचगणीमार्गे) ६० कि.मी. आहे.
या मार्गावर खाण्या-पिण्यासाठी भरपूर हॉटेल्स उपलब्ध आहेत. पण एस.टीच्या वेळा माहीत करूनच इथे यावे. अन्यथा स्वतःची गाडी असेल तर उत्तमच.
उमरठ - शिवचरित्रातील बाळ-गोपाळांना सुद्धा माहीत असणारी एक कथा म्हणजे तानाजी मालुसरेची. आपल्या निवडक साथीदारांच्या सहाय्यानं एका रात्रीत सिंहगड राजांना मिळवून देणारा तानाजी उदयभानशी लढता लढता सिंहगडावरच मृत्यू पावला आणि इतिहासामध्ये अजरामर झाला. याच तानाजी मालुसऱ्याचं उमरठ हे गाव. पसरणी घाटातलं गोडोळी हे जन्मगाव. उमरठ हे वास्तव्यस्थान व तानाजी स्मारक स्थान.
महाबळेश्वरहून पोलादपूरला जाताना कापडे बु. गावातून उमरठला जाण्यासाठी फाटा आहे. या फाट्यापासून उमरठ साधारण १५कि.मी. हा रस्ता मात्र अगदी खराब आहे. पण अशा रस्त्यावरून जातानाच निसर्गाशी खऱ्या अर्थानं जवळीक करता येते, हेही विसरून चालणार नाही. त्यामुळे हा प्रवास संपूच नये असं वाटतं. आजूबाजूची दाट झाडी, नागमोडी वळणं घेत, चढ-उताराने जाणारी गाडीवाट, क्वचित प्रसंगी रस्त्यावरून उडी मारून झाडीत घुसणारी हरणं, डाव्या बाजूला, दरीत ऐकू येणारा ढवळ नदीच्या पाण्याचा आवाज, आणखीन कितीतरी अवर्णनीय गोष्टी या ठिकाणी अनुभवायास मिळतात. माझ्या या ठिकाणचा अनुभव मला इथे द्यावासा वाटतो. मी एकटाच मोटरसायकलने या ठिकाणी येण्यास निघालो. कापडे बु. गावाला आल्यानंतर एका माणसाला रस्ता विचारल्यावर तो गडी माझ्याबरोबर येण्यास तयार झाला. आयताच गाईड मिळतोय म्हटल्यावर मी त्याला गाडीवर घेतलं आणि त्याच्याशी गप्पा मारत पुढे निघालो. साधारण सहा-एक कि.मी. गेल्यावर एका छोट्या वस्तीत आम्ही थांबलो. तिथं हा उतरला आणि मला पुढची वाट कशी आहे ते सांगून मोकळा झाला. मग इथून पुढे मी एकटाच काही अंतर गेल्यावर एका फाट्यापाशी आणखी एका व्यक्तीनं 'लिफ्ट'साठी विचारलं. उमरठला येणार असाल तरच बसा, या अटीवर त्याला गाडीवर घेऊन पुढे निघालो. काही अंतर गेल्यावर अचानकपणे १५-२० हरणाचा कळप आम्हांला आडवा गेला. नंतर मागे बसलेल्या त्या व्यक्तीशी बोलताना, त्यानं या जंगलात अनेकवेळा बिबट्या, गवे यांसारखे प्राणी पाहिलेले आहेत हे समजलं. शिवाय त्यानं, त्याला आलेले या जंगलातील काही चांगले-वाईट अनुभवही सांगितले. त्याच्या त्या गोष्टी ऐकत आम्ही उमरठ गावी येऊन पोहोचलो.
डोंगराच्यामध्ये वसलेलं हे गाव म्हणजे एक अजब विश्वच आहे. गावाच्या मागे आणि बाजूला असणाऱ्या डोंगररांगा, त्यावरील दाट झाडी, त्यातून प्राण्यांचे, पक्ष्यांचे येणारे आवाज आणि अशातही आपल्या गाई-गुरांना चरण्यासाठी जंगलात नेणारा गुराखी हे असं आगळं चित्र पाहायला मिळतं. याच गावातून चंद्रगडच्या पायथ्याशी जाणाऱ्या ढवळे गावाला जाण्यासाठी वाट आहे.
उमरठ गावामध्ये थोड्याशा मागच्या बाजूला तानाजीचा पुतळा उभारला आहे. हातात ढाल-तलवार घेतलेल्या या तानाजीच्या चेहऱ्यावर वीरश्रीचा भाव आहे. जवळच एका भव्य वास्तूमध्ये तानाजी आणि शेलारमामा यांच्या स्मारक-शिळा ठेवलेल्या आहेत. ही वास्तू अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे. इथं आल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं हे नक्की. याच गावामध्ये रामाचं एक मंदिर आहे. जुन्या बांधणीतील हे मंदिर पाहण्यासारखं तर आहेच, पण त्यामध्ये जुन्या काळातील काही तलवारी, दांडपट्टे, ढाली ठेवलेल्या आहेत त्यासुद्धा पाहायला मिळतील.
थोडंसं आडवाटेवर जरी असलं तरी उमरठ गाव पाहण्यासारखं आहे. महाबळेश्वर-प्रतापगडावरील गर्दीपासून थोडं दूर जाण्याची इच्छा असल्यास हे ठिकाण योग्य आहे. शिवाय ट्रेकर्स मंडळींना महाबळेश्वरमध्ये मुक्काम केल्यास उमरठजवळचा चंद्रगडही पाहता येईल. पण त्यासाठी आवश्यक साहित्य बरोबर आणावे लागेल. कारण चंद्रगडावर जाण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते.
सातारा-उमरठ अंतर. १०९ कि.मी. आहे. उमरठ गावामध्ये खाण्या-पिण्याची कोणतीही सोय नाही.
उमरठ हे गाव रायगड जिल्ह्यात आहे. तालुका पोलादपूर !
धारेश्वर (दिवशी) - पावसाळ्यात सातारा परिसरात कुठे जायचं हा प्रश्न आता नेहमी पडायला लागला आहे. कारण ठोसेघर, लिंगमाळा, ओझर्डे यांच्याबरोबरच सांडवलीचा धबधबा सुद्धा आता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी पाहायला मिळते. पावसाळ्यात तर ही ठिकाणं पाहण्यासाठी पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असते. पण इथलं निसर्गसौंदर्यही या गर्दीला पुरणारं आहे. या गर्दीपासून दूर आणि थोडंसं आडवाटेवर जाण्याची इच्छा असेल तर धारेश्वर हे ठिकाण योग्य आहे. काहीतरी वेगळं पाहिल्याचा आनंद इथे नक्की मिळू शकेल.
पाटणपासून अकरा कि.मी. वर धारेश्वर मंदिर आहे. पाटण एस.टी.स्टँडपासून उजवीकडचा दुसरा रस्ता दातेगडाकडे जातो. या रस्त्यावर दोन कि.मी. नंतर, एक मंदिर अगदी रस्त्यावरच आहे. मंदिराच्या डावीकडचा रस्ता दातेगडाकडे जातो, तर उजवीकडचा धारेश्वराकडे. या फाट्यापासून धारेश्वर नऊ कि.मी. आहे. हा रस्ता काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी पूर्णपणे खराब आहे. पाटणपासून धारेश्वरपर्यंत जेमतेम तीन-चार गावंच आहेत. त्यांपैकी घाणव हे त्यातल्या-त्यात मोठं गाव. या रस्त्यावर डोंगराळ भागात वसलेल्या लहान-लहान गावांना जाणारे अनेक फाटे आहेत. त्यामुळे धारेश्वरचा फाटा लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे - धारेश्वर फाट्यापासून दोन ठिकाणी पुलावरून जावं लागतं. या पुलांची उंची कमी असल्यामुळे, ओढ्याचं वाहणारं पाणी अगदी रस्त्यालगतच वाहतं. यातील दुसऱ्या पुलानंतर बऱ्यापैकी चढ आहे. याच चढावरून डावीकडे धारेश्वरला जाणारा फाटा आहे. या ठिकाणी धारेश्वर अडीच कि.मी. हा फलक लावलेला आहे. इथंपासून धारेश्वरपर्यंत पूर्णपणे दगड-मातीचा कच्चा आणि घाटरस्ता आहे. घाटातून गाडी सहज जाऊ शकते, पण योग्य काळजी घेणे आवश्यक आहेच. घाटातून, मागच्या बाजूला सडावाघापूरचा घाट; उजवीकडे चाळकेवाडीवरील पवनचक्क्या; डोंगरावरून खाली झेपावणाऱ्या धबधब्यांचे पांढरे पड्डे यांचे सुंदर दृष्य दिसतं. या घाटातून गाडीने जाण्यापेक्षा चालत जाण्यात एक वेगळीच मजा
आहे. इथे एके ठिकाणी अगदी समोरच्या डोंगरावरच मोठा धबधबा पडताना दिसतो. या दोन डोंगरांमधल अंतर बरंच असूनही, या धबधब्याचा आवाज आणि प्रवाह घाटामधून व्यवस्थित समजू शकतो. एक दिवसात धारेश्वरवरोवर हा धबधबाही पाहता येऊ शकेल. घाटातून डोंगराला वळसा घातल्यानंतर एक तीव्र चढ आहे. याच्या वरच्या बाजूला डावीकडे एकच झाड आणि त्याच्या शेजारी नंदीची मूर्ती आहे. इथून धारेश्वराचे मंदिर आणि त्यावरून पडणारा धबधबा दिसायला लागतो. त्या वेळी या ठिकाणाचं दिसणारं दृष्य अवर्णनीय असतं. या ठिकाणी गाडी न लावता अगदी मंदिरापर्यंत गाडीने जाता येऊ शकेल. पावसाळ्यात मात्र रस्त्याचा अंदाज घेऊनच गाडी चालवावी.
धारेश्वर मंदिराच्या अलीकडे काही खोल्या बांधलेल्या आहेत. आणि धारेश्वराचे मंदिर, मंदिरासारखे नसून, एका अखंड कातळामध्ये लेण्यासारखे खोदकाम करून, त्याला बाहेरच्या बाजूने सिमेंटची भिंत बांधलेली आहे. कातळावरून एक मोठा धबधबा पडतो. या गुहेमध्ये काही ठिकाणी आडव्या भिंती घालून खोल्या तयार केल्या आहेत. यांतील तीन नंबरची खोली म्हणजे इथल्या पुजाऱ्यांचं निवासस्थान आहे. याच्या डाव्या बाजूचं सर्वांत मोठं दार धारेश्वर मंदिराचं आहे. बाहेरून या गुहेची लांबी आणि रुंदी कळत नाही, पण आत गेल्यावर या गुहेचा आतला भाग आश्चर्य करायला लावणारा आहे. जवळजवळ सत्तर मी. लांब आणि तेरा मी. ही गुहा अखंड खोदलेली आहे. गुहेत खाली पूर्णपणे सिमेंटचा गिलावा केलेला आहे. अलीकडच्या बाजूला, उंचभागी धारेश्वराचे मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला सात-सात पायऱ्या बांधल्या आहेत. पायऱ्यांच्या खालच्या बाजूच्या कोनाड्यात एक शिवलिंग आहे. त्यावर पितळी शेष बसविलेला आहे. आणि धारेश्वराचे मंदिर म्हणजे या गुहेतील एक लहान, दुसऱ्या गुहेमध्ये असलेले शिवलिंग. यामध्ये, साधारण वीस वर्षांपूर्वी काही मूर्तीची स्थापनाही करण्यात आली. या सर्व मूर्ती लक्षवेधक आहेत. पण इथे विजेचा खेळ-खंडोबा असल्यामुळे बॅटरीशिवाय त्या पाहता येत नाहीत. धारेश्वराच्या मंदिरातून गुहेच्या डाव्या बाजूला आल्यावर समोर आणखी काही मूर्ती आणि शिवलिंग आहेत. यामध्ये दोन नंदी आणि त्याच्या बाजूला पंचब्रह्म (शिवलिंगाचा एक प्रकार) आहे. त्याच्याजवळ एक चौथरा आहे. त्याला गुरुगादी म्हणतात. या गुरुगादीबरोबरच येथील पुजाऱ्यांचे लग्न लावले जाते. हे पुजारी अविवाहित असतात. याच्या समोरच एका मोठ्या कोरीव चौथऱ्यावर काही महिरपी तयार केलेल्या आहेत.
त्यामध्ये डाव्या बाजूच्या महिरपीत द्रौपदीसह पांडवांचे मुखवटे आहेत. दुसऱ्यात रामाचा मोठा मुखवटा आहे. तिसऱ्यात लक्ष्मणाचा. तिसऱ्या आणि चौथ्या महिरपीमध्ये शंकराचा पितळी मुखवटा आहे. चवथ्या महिरपीत वीरभद्राची मूर्ती आहे. पाचव्यात आदिनाथ स्वामींची मूर्ती आहे. आणि शेवटच्या महिरपीत केदारनाथांची मूर्ती आहे. यांच्यापैकी, पांडवांचे व रामाचे मुखवटे असलेल्या चौथऱ्यावर धारबाराव बिन हिरोजीराव आणि यशवंतराव बिन हिरोजीराव ही अक्षरे देवनागरीत कोरलेली आहेत. या चौथऱ्याच्या उजव्या बाजूला, पाण्याचे चौकोनी आकाराचे, लहान कुंड आहे. त्याच्यामागे सात जलदेवतांच्या मूर्तीबरोबर सीतेची संगमरवरी मूर्ती स्थापन केलेली आहे. यातील नंदी व त्याच्याजवळील शिवलिंग वगळता बाकीच्या सर्व मूर्ती नवीन घडवून मूळ मूर्तीच्या जागी स्थापन केल्या असल्याचं समजतं. मूळ मूर्तीही त्याच ठिकाणी पण जमिनीत किंवा सध्याच्या मूर्तीच्या मागे ठेवलेल्या आहेत.
या ठिकाणी, पुराणामध्ये, श्रीराम, विभीषण, हनुमान आणि पांडवांनीही शिवलिंगपूजा करून अनुष्ठान केले असल्याचं सांगितलं जातं. कपिलाषष्ठीच्या दिवशी येथील रामाच्या मुखवट्यातून दुधासारखे पाणी येते. शिवाय राजापूरला गंगा येते तेव्हा येथील ही धारही कमी होते असं सांगतात. देवदिवाळीच्या दिवशी इथे लक्ष दिव्यांचा उत्सव केला जातो आणि मानाची 'काटे पालखी' मिरवली जाते. ही फक्त येथील मानकऱ्यांसाठीच असते. काटे पालखी म्हणजे एका लहान फळीवर (झोपाळ्यासारख्या) खिळे ठोकलेले असतात. जत्रेच्या दिवशी त्या मानकऱ्यास, या फळीवर झोपवून जवळच्या दोन नंदी असलेल्या ठिकाणापर्यंत नेऊन, परत आणतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. आणि हे येथील एक वैशिष्ट्य आहे.
धारेश्वराच्या गुहेवरून बाराही महिने पडणाऱ्या धबधब्यामुळे वातावरण नेहमी थंड असते. एखादा दिवस शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी घालविण्याचा विचार असेल तर धारेश्वर हे ठिकाण चांगले आहे. पण पाटणनंतर या भागामध्ये खाण्या-पिण्याची मात्र सोय नाही.
सातारा-धारेश्वर अंतर - ८१ कि.मी. आहे.
धारेश्वर हे पाटणकरांचे कुलदैवत आहे. हे ठिकाण थोडंसं आडवाटेवर असल्यामुळे इथे खाजगी गाडीने येणे सोयीचे ठरेल.
धारेश्वरच्या गुहेअलीकडे आणखी एक लहान गुहा आहे. त्यामध्ये काही देव-देवतांची शिल्पं ठेवलेली आहेत. त्यावर लावलेल्या काळ्या रंगामुळे ती अगदी नवीन वाटतात. (नकाशा पान क्रमांक ९४ वर पाहावा.)
मढ़ें - सातारा-पुणे महामार्गावर आनेवाडी गावानजीक एक टोलनाका आहे. या टोलनाक्याच्या अलीकडे उजव्या बाजूला मर्दे गावाला जाणारा रस्ता आहे. या गावाची कमान थोडीशी आतल्या बाजूला असल्यामुळे सहज दिसू शकत नाही. गावाच्या कमानीसारखीच थोडीशी या गावातील वास्तूंची आणि व्यक्तींची गोष्ट आहे.
हे मर्दे गाव आहे, बा. सी. मर्डेकर यांचं मूळगाव. त्यांच्या 'पितात सारे गोड हिवाळा' या कविता अगदी शाळेत असल्यापासून शिकविल्या जातात. शिवाय त्यांची, 'नटश्रेष्ठ आणि चार संगीतीका', 'मर्डेकरांच्या कविता', अशी काव्यपुस्तकंही प्रसिद्ध आहेत. पु. ल. देशपांड्यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' पुस्तकामधील दामले मास्तरांच्या तोंडी दिलेली 'देवाजीने करुणा केली' ही कविताही बा. सी. मर्डेकरांचीच आहे. त्यांच्या, 'अजूनी वास येतो फुलांना', 'होते आभाळ पेंगत' आणि 'मृगाचा पाऊस आला' या कविताही वाचण्यासारख्या आहेत. मढ़ें गावामध्ये त्यांचं पूर्वीचं राहतं घर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.
मढें फाट्यापासून तीन कि.मी. अंतरावर मर्डे गावभाग आहे. त्याच्या अलीकडे दोन कि.मी. वर, कृष्णा नदीवर एक लहान पूल बांधलेला आहे. याच्या डाव्या बाजूची कच्ची गाडीवाट कृष्णाकाठावरीलच एका मंदिरापर्यंत जाते. याला भालगुराम मंदिर म्हणतात. पण त्यामध्ये राममूर्ती मात्र नाही. यामध्ये गणेशाची मूर्ती, शिवलिंग, आणि ब्रह्मेद्रस्वामींचे समाधी स्मारक बांधलेले आहे. मुख्य रस्त्यावरून दिसणारी ही वास्तू अनेक रंगांनी रंगविली असली तरी आकर्षक आहे. मंदिराच्या मंडपातील डाव्या बाजूला ब्रहोंद्रस्वामींची समाधी आहे, तर गाभाऱ्यामध्ये मोठ्या चौथऱ्यावर वाईच्या महागणपतीची स्थापना केलेली आहे. उजव्या बाजूच्या भिंतीलगत शंकर-पार्वती यांच्या मूर्ती आहेत. त्यांच्यासमोरच गाभाऱ्याच्या मध्यभागी शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. मंदिरासमोर पितळी नंदी बसविलेला आहे. त्याच्यामागून अगदी नदीच्या पात्रापर्यंत पायऱ्याबांधून सुंदर घाट तयार केला आहे. या घाटावर उजव्या बाजूला नदीच्या पात्रात एक शिवलिंग आणि त्यासमोर नंदी स्थापन केलेला दिसतो. शिवाय याच्याजवळच काही वृंदावनंही आहेत. विस्तृत नदीचं पात्र, त्यामध्ये मधेच डोकावणारे काळ्या दगडांचे काही भाग, नदीवरचा पूल याचं नितांतसुंदर दृष्य या ठिकाणाहून दिसतं.
मर्ने गावामध्ये एका गढीवजा वास्तूत सिद्धामृत मठ नावाची एक इमारत आहे. यामध्ये गाभाऱ्यात अत्यंत सुंदर अशा राम, लक्ष्मण, चीता, हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. यांच्या उजव्या बाजूला श्रीकृष्ण, राम, पार्वती आणि आणखी काही पितळेच्या मूर्ती आहेत. कोनाड्यात ठेवलेली एक फूट उंचीची आणि शाळीग्रामपासून बनविलेली देवीची मूर्ती मात्र काही वेगळीच आहे. अष्टभुजा असणारी ही देवी व्याघ्रारूढ असून तिची केशरचना निराळीच आहे. गाभाऱ्यातून एक वाट तळघराकडे जाते. या ठिकाणी पूर्णपणे अंधार असून बैटरी बाळगणे आवश्यकच आहे. इथे एका चौथऱ्यावर लाकडी पादुका, काही दैवतांच्या चांदीच्या, पितळेच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. ही विदेहास्वामींची समाधी असल्याचं समजतं. हे विदेहास्वामी म्हणजे समर्थशिष्य, वासुदेवशास्त्री येवलेकरांनी इथे स्थापन केलेल्या सिद्धामृत मठाचे दुसरे मठाधिपती. या समाधीमंदिरात, समाधीमागे राम, लक्ष्मण, सीता यांच्या मीटरभर उंचीच्या, काळ्या पाषाणाच्या मूर्ती आहेत. डाव्या बाजूच्या कोनाड्यामध्ये हनुमानाचीही तेवढीच मोठी मूर्ती आहे. तर उजव्या बाजूच्या, पायऱ्यांजवळील कोनाडयात विदेहास्वामी ध्यानासाठी बसत असल्याचं सांगतात. समाधीमंदिरात येण्यासाठी मंडपातूनही एक वाट आहे. मात्र बॅटरी बाळगणे इथे आवश्यक आहेच.
मठाच्या मागच्या बाजूने नदीपर्यंत जाण्यासाठी घाट बांधलेला आहे. प्रशस्त असणारा हा घाट अगदी माहुलीच्या घाटाची आठवण करून देतो. इथे येणारी दुसरी वाट मात्र आजमितीला बंद आहे. मठाच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या या वाटेवर रान माजलेलं आहे. याच्या शेजारीच बा. सी. मर्देकरांचं घर आहे. आणि त्याला लागूनच मठाच्या जीर्णोद्धारासाठी खर्च करणाऱ्या व्यक्तीचे घर आहे. मठाच्या समोरील बाजूस एक विहीरही आहे.
सातारा-पुणे महामार्गावर एखादा तास हाताशी असल्यास हे ठिकाण नक्कीच जवळ करता येईल.
सातारा - महें अंतर १६ कि.मी. आहे. गावात खाण्यापिण्याची मात्र काही सीय नाही. (नकाशा पान क्रमांक ३४ वर पाहावा.)
वळसे - सातारा-कराड महामार्गावर साताऱ्यापासून अकरा कि.मी. अंतरावर शेंद्रे गाव आहे. या गावापासून चार कि.मी. वर वळसे गाव आहे. निसर्गान केलेला एक अद्वितीय चमत्कार या ठिकाणी पाहायला मिळतो. तो म्हणजे पाषाण विवरे. याला इंग्रजीमध्ये पॉट होल्स म्हणतात, तर मराठीमध्ये रांजणखळगे.
अशा प्रकारची पाषाणविवरे तयार होण्यासाठी शेकडो हजारो वर्षांचा काळ जावा लागतो. नदीच्या पात्रामध्ये पाण्यातून वाहत येणाऱ्या झाडा-झुडपांबरोबर काही दगडही येतात. ते एखाद्या ठिसूळ दगडामध्ये अडकतात. आणि त्यावर आपटून एक लहान विवर तयार करतात. अनेक वर्षे लहान-मोठ्या आकाराचे दगड त्यामध्ये अडकून त्या दगडाची झीज होते आणि वेगवेगळ्या आकाराचे खळगे तयार होतात. हे खळगे आतील बाजूने अत्यंत गुळगुळीत असतात, तर कडेच्या बाजूने बरेचसे धारदार. त्यामुळे या रांजणखळग्यांना पाहताना अगर त्यावरून चालताना काळजी घेणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरजवळ असे रांजणखळगे कुकडी नदीच्या पात्रात निघोज गावाजवळ आहेत.
वळसे गावाच्या मागच्या बाजूस वाहणाऱ्या, उरमोडी नदीच्या पात्रात एके ठिकाणी बांध बांधला आहे. इथपर्यंत कच्चा गाडीरस्ता आहे. या ठिकाणी बांधालगत काही लहान आकाराचे रांजणखळगे आहेत. पाणी नसल्यास याच पात्रातून साधारण दोन कि.मी.वर बरेच मोठे आणि उंच रांजणखळगे आहेत. उंच म्हणजे एखादा माणूस त्यात सहज उभा राहू शकेल इतके मोठे. एके ठिकाणी या नदीचे दोन पात्रांमध्ये दोन वेगळे भाग झालेले दिसतात. याच ठिकाणी सर्वांत मोठे रांजणखळगे आहेत. इथे येण्यासाठी नदीतील वाटेव्यतिरिक्त पात्राच्या बाजूने, शेतालगत कच्चा गाडीरस्ता आहे. या वाटेने आल्यास, एके ठिकाणी ओढा आणि त्याच्या बाजूलाच एक दगडी भिंत दिसते. इथे गाडी सोडून ओढ्याच्या वाटेने नदीच्या पात्रात जाता येते. आणि पात्रातून डावीकडे लगेचच या कुंडापर्यंत.
सातारा-वळसे अंतर १४ कि.मी. आहे.
साताऱ्यातील राजवाडा बसस्थानकावरून इथे येण्यास नियमित नसली तरी बस मिळू शकते. शिवाय खाजगी गाड्याही साताऱ्यातून मिळू शकतात. पण इथे येताना स्वतःचे वाहन घेऊन येणे सोयीचे आहे. स्वतःचे वाहन असल्यास वळसे गावाबरोबरच डोळेगावातील हनुमान मंदिरही जवळ करता येईल.
केळवली - साताऱ्यातून परळीमार्गे एक रस्ता पुनवड, निजळ गावांना जातो. या रस्त्यावर कुस बु. गावाजवळून निगूडमाळ गावाला जाण्यासाठी उजवीकडे फाटा आहे. या गावातून सांडवली आणि केळवली धबधब्याकडे जाणारी-(पाऊल) वाट आहे.
सांडवलीला येणाऱ्या पर्यटकांना सांडवलीबरोबरच हा धबधबाही पाहता येऊ शकतो. इथे येण्यासाठी योग्य काळ आहे पावसाळा साधारण संपल्यावरच. कारण सांडवलीपेक्षा या ठिकाणी जंगलही अगदी दाट आहे की ज्यातून वाट काढतच जावं लागतं. शिवाय निगूडमाळपासून, सांडवलीपेक्षा, इथे चालावंही बरंच लागतं. या धबधब्याला आवश्यक नसलं तरी पाण्यातून पलीकडे जाण्याचा आनंदही घेता येऊ शकतो. हे थोर्ड धाडसाचं काम आहे खरं, पण पाणी ओलांडताना एक वेगळीच मजा येते. पण हे धाडस करताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहेच.
निगुडमाळ गावातून पायवाटेने चालायला लागल्यावर डाव्या बाजूला सांडवलीचा पाच टप्प्यांत पडणारा धबधबा दिसतो. उजव्या बाजूला टेकडी आणि मोठी झाडं असल्यामुळे केळवलीचा धबधबा मात्र दिसत नाही. टेकडीला वळसा घातल्यावरच या धबधब्याचा काही भाग दिसू शकतो. धबधब्याकडे जाण्यासाठी त्याच्या वाहणाऱ्या पाण्याच्या काठाने वाट काढत जावं लागतं. सांडवलीप्रमाणे इथेही भरपूर साप, जळू, खेकडे आहेत. शिवाय फुलपाखरांचे अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. हा धबधबा सांडवलीइतका उंच नसला तरी मोठा आहे. कोसळणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊनच त्याच्या पायथ्यापर्यंत आणि बाजूने माथ्यावर जाता येते. इथे पठारावर केळवली नावाचं छोटंसं गाव आहे. पठारावरून भोवतालचा प्रदेश पाहता येतो. धबधब्याजवळचं वाट काढत पोहोचलो ते जंगल, पाणी कोसळण्याचा आवाज, क्वचित प्रसंगी दिसणारा गवा, भेकर, तरस यांसारखा प्राणी, वाहणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेली नागमोडी वाट आणि भोवतालचा हिरवागार निसर्ग अगदी मंतरून टाकणारे असतात. या अनुभवासाठी एकदा तरी हा धबधबा पाहायला यायला हवं. ट्रेकर्स मंडळींना माथ्यावरून कास पठारावर जाता येऊ शकेल.
एका दिवसाची थोडीशी साहसी सहल करण्यासाठी हा धबधबा मस्त आहे. या ठिकाणी खाण्या-पिण्याची मात्र कोणतीही सोय नाही.
सातारा-निगुडमाळ अंतर २६ कि.मी. आहे.
कृष्णाधाम - कृष्णा ही दक्षिण भारतातील तीन प्रमुख आणि पवित्र नद्यांपैकी एक नदी आहे. महाबळेश्वरमध्ये उगम पावणारी ही कृष्णा पुढे बंगालच्या उपसागरास
जाऊन मिळते. सातारा जिल्ह्यातील तिची लांबी जवळजवळ १७४ कि.मी. आहे. या नदीवर सातारा जिल्ह्यात अनेक घाट आणि मंदिरं बांधली गेली. यातील मेणवली, वाई, माहुली अशी काही ठिकाणं सांगता येतील की, जी पाहण्यासाठी पर्यटक नेहमी येतात. पण कृष्णेच्या काठावर आणखी काही स्थानं पाहण्यासारखी आहेत. त्यांतील एक वेगळं ठिकाण म्हणजे कृष्णधाम.
सातारा-औध रस्त्यावर (रहिमतपूरमार्गे) कोडोली गावानंतर लगेचच, एका कॅनॉलजवळून, कृष्णधामला येण्यासाठी गाडीरस्ता आहे. या फाट्यापासून रस्ता थोडा कच्चा आहे. साधारण तीन कि. मी. वर श्रीसद्गुरू कृष्णमहाराजांचे समाधीस्थान आहे. इथपर्यंत गाडी येते.
समाधी मंदिराच्या आवारात सुरुवातीला उजव्या बाजूस पुजाऱ्यांचे निवासस्थान आणि परमार्थावरील अनेक पुस्तकांचे भांडार आहे. बाजूलाच कृष्णमहाराजांच्या समाधीस्थानाची भव्य वास्तू बांधलेली आहे. याला मंडप आणि गाभारा असे दोन भाग असून, गाभाऱ्यामध्ये कृष्णमहाराजांची संगमरवरी समाधी आहे. शिवाय येथील अन्य शिष्यांचे (होऊन गेलेल्या), देवतांचे फोटोही लावलेले आहेत. समाधीमंदिरांच्या मागे ध्यान-धारणेसाठी ध्यान-कुटी बांधलेली आहे. या पूर्ण आवारामध्ये अनेक प्रकारची फुलझाडे लावून याला एक निसर्गरम्य ठिकाण बनविलेले आहे. शिवाय इथे आंबा, फणस, वड यांसारखी मोठी झाडं देखील आहेतच, समाधीमंदिरासमोर, पायऱ्यांची एक वाट खाली कृष्णा नदीकडे जाते. नागमोडी प्रकारात बांधलेल्या या पायऱ्या संख्येने थोड्या जास्त असल्या तरी बाजूच्या दाट झाडींमधून येणाऱ्या पक्ष्यांच्या गोड आवाजामुळे नदीचं पात्र केव्हा येतं ते देखील समजत नाही. अलीकडच्या काळातच बांधलेला हा छोटासा घाट पाहण्यासारखा आहे. या ठिकाणी पहाटेच्या वेळेस आल्यास अनेक मोर मुक्तपणे वावरताना पाहायला मिळतात. पण पहाटेच्याच वेळी नव्हे, तर दिवसभरात कधीही या ठिकाणी आल्यास मोर, ससे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, फुलपाखरं पाहायला मिळतात. त्यामुळेच इथे एकदा येणाऱ्या प्रत्येक माणसाला दुसऱ्यांदा येण्याचा मोह होतोच. हे ठिकाण देखील प्रसन्न आणि शांत आहे.
या कृष्णधाममधील समाधीमंदिर असणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या टेकडीवर, एक शिवमंदिर आहे. प्रथमदर्शनी हे मंदिर सहज दिसत नाही. पाऊलवाटेने चालत गेल्यावर टेकडीच्या एका बाजूला अनेक रंग लावलेले हेमाडपंती मंदिर दिसते. मंदिर आवारात उजव्या बाजूला नदीपर्यंत उतरणाऱ्या पायऱ्या आहेत. घाटसदृश या पायऱ्या आजमितीला थोड्या मोडकळल्या आहेत. मंदिरआवारात एका घुमटीमध्ये ब्रह्मदेवाची मूर्ती स्थापन केलेली आहे. मंदिरगाभाऱ्यामध्ये शिवलिंग असून ते अगदी माहुलीमधील विश्वेश्वर मंदिरातील शिवलिंगाची आठवण करून देणारं आहे. कृष्णधामला भेट देणाऱ्यांनी आवर्जून पाहावं असं हे मंदिर आहे.
कृष्णधामचं एक वैशिष्ट्य म्हणून येथील 'नक्षत्र वृक्ष बागे'चा उल्लेख हमखास करावा लागेल. कृष्णधाममधील मठाची पहिली बाग म्हणजे ही नक्षत्र वृक्ष बाग. मठाच्या अलीकडेच याची उभारणी केली आहे.
भारतीय परंपरेप्रमाणे, वराहमिहीराच्या गणितानुसार जन्मनक्षत्रांना अधिक महत्त्व असतं. या जन्मनक्षत्रावरूनच त्या त्या माणसाच्या प्रकृतीचं विश्लेषण आणि रोगांची शक्यता सांगितली जाते. या २७ नक्षत्रांचे एक-एक आराध्य झाड आहे. या आराध्य वृक्षाचे गुणधर्म त्या-त्या जन्मनक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीच्या
१) अश्विनी - कुचला १४) चित्रा - बेल
२) भरणी - आवळा १५) स्वाती - अर्जुन
३) कृत्तिका - उंबर १६) विशाखा - देवबाभूळ
४) रोहिणी - जांभूळ १७) अनुराधा बकुळ
५) मृग - खैर १८) ज्येष्ठा देवदार, लोध्र
६) आर्द्रा - कृष्ण अगरु १९) मूळ राळ / साल
७) पुनर्वसू - बांबू २०) पूर्वाषाढा - वेत तंजुल (रॅटन केन)
८) पुष्य - पिंपळ २१) उत्तराषाढा फणस
९) आश्लेषा नागकेशर २२) श्रवण रुई ?
१०) मघा वड २३) धनिष्ठा- शमी
११) पूर्वा फाल्गुनी पळस २४) शततारका कदंब
१२) उत्तरा फाल्गुनी प्लक्ष/पायरी/पिंपरी २५) पूर्वा भाद्रपदा आंबा
१३) हस्त - जाई २६) उत्तरा भाद्रपदा कडुलिंब
२७) रेवती - मोह
प्रकृतीला आणि त्याला होणाऱ्या रोगांवर गुणकारी असतात. हे नक्षत्र उद्यान या ठिकाणी तयार केलेले आहे. ही नक्षत्रं आणि त्यांच्या आराध्यवृक्षांची नावं पुढीलप्रमाणे आहेत :
सातारा - कृष्णधाम अंतर - १३ कि.मी. आहे. (नकाशा पान क्र. १४वर पहावा)
इथे खाण्या-पिण्याची मात्र सोय नाही. पण पूर्वकल्पना दिल्यास इथल्या मठामध्ये ती होऊ शकते
लिंगमळा - महाबळेश्वरचं नाव घेतलं की आठवतात ते दाट झाडांमधून, नागमोडी वळण घेत जाणारे डांबरी रस्ते आणि कोणत्याही पॉईंटवरून दिसणाऱ्या सह्याद्रीच्या लांबच लाब पसरलेल्या डोंगररांगा. पण महाबळेश्वर पर्यटन एवढ्यापुरतं मर्यादित नाही. इथे क्षेत्र महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरासारखी धार्मिक स्थळं आणि खवय्यांसाठी मॅप्रो गार्डनसारखी प्रसिद्ध ठिकाणंही आहेत. त्यामुळे इथे काहीतरी वेगळं पाहिल्याचा आनंद मिळतोच. या सगळ्यांबरोबर पावसाळ्याच्या सरतेशेवटी पर्यटकांची अधिकाधिक गर्दी होते ती लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी. महाबळेश्वर भटकंतीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. पावसाळ्यानंतर, लिंगमळा धवधवा न पाहता परत जाणं झालं तर महाबळेश्वर भटकंती पूर्णच झाली नाही असं मी म्हणेन.
लिंगमळा धबधब्याला येण्यासाठी मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर मेटगुताड गावाच्या फाट्याकडून उजवीकडे गाडीवाट आहे. या मार्गावरही दोन्ही बाजूला दाट झाडी आहे. फाट्यापासून लिंगमळा बंगला (पार्किंग) साधारण चार कि.मी. आहे. विल्सन पॉईंटवरून येणारी पाऊलवाट ही याच ठिकाणी येऊन मिळते. इथून लाल मातीत बांधलेली पायऱ्यांची आणि नंतरची पाऊलवाटही उजव्या बाजूला ज्या ठिकाणाहून धबधबा पूर्ण दिसतो त्या ठिकाणी घेऊन जाते, तर डाव्या बाजूची पाऊलवाट धबधब्याअलीकडील पाण्यात जाते. या ठिकाणी अनेक पर्यटक पाण्यामध्ये खेळताना दिसतात. त्या वेळी हे दृष्य लोणावळ्याच्या बुशी डॅमची आठवण करून देणारं असतं. इथून परत, उजव्या बाजूला गेलेल्या वाटेने जाताना थोडं दाट जंगल आहे, यामध्ये स्वर्गीय नर्तकी, कोतवाल, खंड्या आणि बरेच पक्षी सहज दिसतात. पण पक्षी पाहत असताना थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे कारण यावर नेहमी घसरडं असतं आणि शेवटीतर, धबधबा दिसतो त्या ठिकाणी रेलिंग्जही नाहीत. उद्यान शिवाय खोल दरीही आहे.
हा धबधबा पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. अर्धवर्तुळाकार दरीमध्ये प्रचंड आवाज आणि फेसाळत पडणारं पाणी पाहताना ते एका दुधाच्या थारसारखं दिसतं. एकशे ऐशी मीटर खोल आणि तीन टण्यात पडणारा हा धबधबा म्हणाजे वेण्णा नदीच आहे. केळघर घाटामध्ये सातारा तालुक्याच्या सीमेवरूनही हा धबधबा सहज ओळखता येतो.
वेडं धाडस न करता हा धबधबा पाहायला आल्यास सहजच अर्स जाणवतं की या धबधब्यासारखा सुंदर धबधबा क्वचितच दुसरीकडे कुठे असेल.
सातारा-लिंगमळा अंतर (केळघरमार्गे) ५५ कि.मी. आहे.
या भागामध्ये मेढा आणि महाबळेश्वर सोडल्यास कोठेही खाण्यापिण्याची सोय नाही. (नकाशा पान क्रमांक २४ वर पहावा) कासमहाबळेश्वर : एक अनुभव पाऊस सुरू झाला की मला आणि माझ्या मित्रमंडळींना नवीन-नवीन कल्पना सुचायला लागतात. दर पावसाळ्यात आमची ठरलेली ठिकाणं म्हणजे ठोसेघर, सांडवली, धारेश्वर वगैरे, पण गेल्या वर्षी काहीतरी वेगळं पाहायचं असं ठरवून प्लॅनिंग करू लागली. साताऱ्याच्या बाजूच्या बऱ्याचशा जागा पाहून झाल्या होत्या. मग अचानक कास-महाबळेश्वर प्रवास करू असं ठरलं. आणि तो देखील मोटरसायकलनं. खरं तर आमच्यापैकी बहुतेकजणांनी हा रस्ता पाहिलेला होता. त्यावरून रात्रीच्या वेळी चालत आणि एखाद-दुसन्या वेळेला मुक्कामही केला होता. शिवाय पावसाळ्यामध्ये खेडेगावामधील रस्त्यांची काय अवस्था असते तेही अनुभवलेलं होतं. पण पावसाळ्यात या मागानि मोटरसायकलवरून जाणं तितकं सोपं नव्हतं. इतर वेळेस इथून चालत जायला पाच तास आणि गाडीवरून साडेतीन तास लागतात. या रस्त्यावर कधी वर्दळही नसते, मग इतर सोयी तर लांबचीच गोष्ट आहे. शेवटी दिवस ठरवून आम्ही दोन मोटरसायकली या रस्त्यावरून नेण्याचं निश्चित केलं.
एका रविवारी सकाळी पावसाची थोडी उघडीप पाहून निघालो आणि कास पठारावर येऊन पोहोचलो. या ठिकाणी त्या वेळेस पाऊस होताच. शिवाय आमची उत्कंठाही शिगेला पोहोचली होती. त्यामुळे आम्ही लगेचच कच्चा रस्ता धरला आणि पुढे जाऊ लागलो. कास पठारावरच्या पहिल्याच तळ्यापाशी आमचं जोरदार स्वागत झालं. माझी मोटारसायकल रस्त्यावरून घसरली आणि मी आणि माझ्या मार्ग बसलेला मित्र खाली पडलो. पण या गोष्टी अपेक्षित धरलेल्या होत्या आणि त्यासाठी योग्य ती काळजीही अगोदरच घेतलेली होती. त्यामुळे आम्हांला लागलं नाही, पण पुढे रस्त्याची काय वाट लागली असेल याची कल्पना करू लागलो. या तळ्यासारखी वाटेवर आणखी चार-पाच तळी आहेत. कास पठारावरून महाबळेश्वर साधारण ४० कि.मी. हा पूर्ण रस्ता खराब आहे. त्यापैकी काही भाग दगडा-धोंड्यांचा, तर काही भाग मातीचा (चिखलाचा) आहे. पण या भागातील निसर्गसौंदर्यही अप्रतिम आहे. दोन्ही बाजूला वाढलेल्या गवतांमधून जाणारी गाडीवाट, वेगवेगळ्या फुलांच्या रंगामुळे, वेगळ्याच रंगाच्या भासणाऱ्या टेकड्या, धबधब्यांचा आवाज, जोराने अंगावर येणारा गार वारा, अशामध्ये पावसाळ्यात रस्त्यावरचे दोन ओढे ओलांडावे लागतात. तेव्हा येणारा मजेशीर अनुभव, या सगळ्याचा आनंद फक्त याच ठिकाणी मिळू शकतो हे नक्की. शिवाय या भागामध्ये गवे, भेकर, हरीण, कोल्हे हे प्राणी देखील दिसतात. पण या सगळ्या वातावरणात आम्हाला मुख्य भीती होती ती पंक्चरची. सुदैवाने कोणतीही गाडी पंक्चर झाली नाही. पण आम्हाला ड्रायव्हिंगची कसरतच करावी लागत होती. दगडांवरून जाताना गाडी घसरत होती, तर चिखलामध्ये अडकून बसत होती. एका चढावर तर गाडीचं पुढचं अर्धं चाक चिखलात अडकून बसलं. आम्ही चौघांनी अक्षरशः ते उचलून बाहेर काढलं. त्या वेळेस मात्र हे धाडस आपल्याला महागात पडणार आहे असं जाणवायला लागलं. कारण कास पठारावरून आम्ही बऱ्यापैकी पुढे आलो होतो. आणि याच्या पुढचा प्रवास हा घाटाचा होता. आणि तो देखील खड्या उताराचा. आता कासपेक्षा महाबळेश्वरच जवळ होतं. त्यामुळे आम्ही पुढे निघालो. एका मोठ्या वळणानंतर आम्ही धारदेव मंदिराच्या दृष्टिटप्यात आलो आणि समोरचं दृष्य पाहून आपण एक मोठं पेंटिंग पाहत आहोत असा भास झाला. त्याचं वर्णन करणं हे केवळ अशक्य आहे आणि हा अनुभव प्रत्यक्ष त्याच ठिकाणी जाऊन घ्यायला हवा. हा घाट उतरल्यानंतर आमच्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू झाला. झालेल्या त्रासाचा विसर पडला; आणि आम्ही नव्या जोमानं पण सांभाळून धारेश्वर गावात आलो. याच घाटात उन्हाळ्याच्या दिवसात मला हरणांचा कळप रस्त्यावरून आडवा गेला होता. कास पठार सोडल्यापासून इथपर्यंत येण्यासाठी आम्हाला जवळपास चार तास लागले होते. या चार तासांत आम्ही एक मिनीट देखील सीटवर स्थिरपणे बसलेलो नव्हतो. धारेश्वर गावातून एक डांबरी रस्ता केळघर घाटात जातो. तर पाऊण एक कि.मी.चा सर्वांत खराब रस्ता महाबळेश्वरच्या अलीकडे मोळेश्वर गावामध्ये, शेवटी कास-महाबळेश्वर हाच प्रवास करायचा असल्यामुळे कच्च्या रस्त्यावरूनच जायचं ठरलं. हा प्रवास एका दिव्यातून करायला लागणार होता. कारण इथे दगडाधोंड्याच्या बरोबरीने चिखलही भरपूर होता. एकतर हा पूर्ण चढाचा आहे. इतर वेळीही गाडी पहिल्या गिअरशिवाय इथून चढत नाही आणि आता तर इथल्या रस्त्याची काहीतरी मजेशीर गोष्ट झाली होती. त्यामुळे आम्ही चौघांनी या वाटेने गाड्या ढकलत नेल्या, ढकलत असतानाही गाड्या घसरत होत्या. हे पाऊण कि.मी. अंतर जायला आम्हाला अर्धा तास वेळ लागला आणि शेवटी आम्ही डांबरी रस्त्यावर पोहोचलो. त्या साडेचार तासांत मिळालेला अनुभव कधीही न विसरणारा आहे. हा रस्ता पुढे मोळेश्वर गावामधून बगदाद पाईंटजवळ निघतो. इथून महाबळेश्वर फक्त १० कि.मी. पण आमच्या गाड्या आणि कपड्यांची अवस्था इतकी वाईट झाली होती की महाबळेश्वरमध्ये जांण्याचं आमचं धाडस झालं नाही. त्यामुळे केळघर घाटातून आम्ही पुन्हा साताऱ्याच्या दिशेने निघालो. या प्रवासातील एक गोष्ट आजही मनाला लागून राहिली आहे ती म्हणजे या भागात अशी अनेक ठिकाणं आहेत की पावसाळ्यात त्यांचे फोटो काढणं हे एक वेगळाच आनंद देणारं ठरलं असतं, पण पाऊस आणि खराब रस्ता यामुळे ते जमलं नाही. तरीही कॅमेऱ्यात नाही, पण डोळ्यांनी मी ती पाहिलेली ठिकाणं आजही अनुभवू शकतो.
नायगाव - सातारा-पुणे महामार्गावर पारगाव-खंडाळ्यानंतर एक जुनी वास्तू. हमखास लक्ष वेधून घेते. आता ती पाणपोई आहे की जकातनाक्याची हा संशोधनाचा विषय आहे. पण या वास्तूच्या मागे नायगाव हे गाव पाहण्यासारखं आहे हे नक्की. या मार्गावर एखाद-दुसरा तास हाताशी असल्यास नायगावबरोबरच वडगाव आणि शिरवळची लेणीही जवळ करता येतील.
नायगाव म्हणजे सावित्रीबाई फुल्यांचं जन्मगाव. इथे त्यांच्या राहत्या घराला महाराष्ट्र शासनाने आता संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केलेलं आहे. गावाच्या अगदी मध्यवर्ती भागातच हे घर आहे. घरासमोर छोटीशी बाग केलेली आहे. त्यामध्ये झाडांचे वेगवेगळे आकार तयार करून ती थोडी सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बागेत डाव्या बाजूला सावित्रीबाईंचा अर्धपुतळा असून त्याच्यामागे त्यांनी केलेल्या समाजसेवेची काही शिल्पं कोरलेली आहेत. त्यामधील एक-एक शिल्प पाहताना त्यांनी केलेल्या समाजसेवेचा प्रत्येक भाग समजून येतो. त्याच्या उजव्या बाजूला सावित्रीबाईंचं घर आहे. घरामध्ये, समोरच एका बांधीव चौथऱ्यावर ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई यांचे मोठे फोटो लावलेले आहेत. डाव्या बाजूच्या भिंतीवर सावित्रीबाईंचा जीवनपट लिहिलेला फलक लावलेला आहे. हे घरही अगदी जुन्या पद्धतीचं पण व्यवस्थित ठेवलेलं आहे. नूतनीकरण करताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेऊन आतील जमिनीचा भागही अगदी साधाच ठेवलेला आहे. त्यावर फरशी घालायचा मोह झाला नाही हे पाहून खूपच बरं वाटतं. घराचे दरवाजे आणि छताला मात्र थोर्ड नवीन पण योग्य रूप दिलेलं आहे.
या घरामध्ये सावित्रीबाईंचा जीवनपट लिहिलेला आहेच, पण त्यांच्या आयुष्यातील काही घटनांचा उल्लेख इथेही करायला हवाच. नायगावमध्येच सन १८३१ जाने. ९ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील लक्ष्मीबाई आणि खंडोजी नेवासे पाटील यांना सदुजी, सखाराम, सावित्रीबाई आणि श्रीपती अशी चार मुले होती. सावित्रीबाईंचा, १८४० साली ज्योतीराव फुल्यांबरोबर विवाह झाला. लगेचच १८४१ साली त्यांनी स्वतःच्या शिक्षणास प्रारंभ केला. पुढे १ जाने. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेत भिडेवाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. २८ जाने. १८५३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. शिवाय शेतकरी, मजूर यांच्यासाठी रात्रीची शाळाही चालू केली. अशा कामांमुळेच सावित्रीबाई आणि ज्योतीराव फुल्यांना इंग्रज सरकारकडून पुरस्कारही मिळाला. ज्योतीराव फुल्यांच्या नंतर सत्यशोधक समाजाच्या अधिवेशन अध्यक्षस्थानी सावित्रीबाईंची नेमणूक करण्यात आली. मात्र १० मार्च १८९७रोजी प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा करतानाच त्यांचे निधन झाले.
नायगावमधील ही वास्तू पाहताना व त्यामधील काही चित्रं पाहताना त्याची जाणीव झाल्याशिवाय मात्र राहत नाही.
सातारा-नायगाव ४८ कि.मी. आहे.
नायगावमध्ये खाण्या-पिण्याची मात्र फारशी चांगली सोय नाही; पण महामार्गावर ती सहज होऊ शकते.
***





























































































































































































































No comments:
Post a Comment