Wednesday, February 11, 2026

मंडपेश्वर शैव लेणी - हेरिटेज वॉक

https://www.maayboli.com/node/87769
मंडपेश्वर शैव लेणी

भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भागआरंभ हेरिटेज यांनी 'मंडपेश्वर शैव लेणी हेरिटेज वॉक' आयोजित केला आहे हे कळल्यावर, काहीही हि करून हा वॉक चुकवायचा नाही हे आधीच ठरवून झाले होते. या वॉक ची वेळ सकाळी आठ ते अकरा अशी असल्यामुळे अतिशय उत्साहात सकाळी साडेसहा वाजताच घरातून निघाले. रविवार त्यामुळे मेगाब्लॉक ठरलेला, उशिर होऊ नये म्हणून वेळेत निघाले.

बरोबर आठ वाजता मंडपेश्वर च्या आवारात पोहोचले. पूर्वी दहिसर ला राहत असल्यामुळे लहानपणी खूप वेळा तिथे जाणे झाले होते शक्यतो त्रिपुरी पौर्णिमेला दिव्यांची आरास बघायला. या मंदिरात लहानपणी जायला आवडायचे पण मग नंतर आवारात टायर दुरुस्तीचे काम वैगरे चाले, आवारात जुन्या गाड्या, दारुडे-रिकामटेकडे लोक दिसायचे प्रमाण वाढले तसे इकडे फिरकणारे सामान्य लोक कमी झाले.

आठ फेब्रुवारी ला या आवाराचे बदललेले रूप बघितले आणि खूप आनंद झाला. हे जर आधीच झाले असते तर असेही मनात आले पण म्हणतात ना देर आये दुरुस्त आये. त्यामुळे आपल्या आवडत्या मंडपेश्वर मंदिराचे बदललेले रूप पाहून उत्साह दुणावला. मंडपेश्वर येथील लेण्यांची माहिती, इतिहास अभ्यासक नवीन म्हात्रे यांच्याकडून घेत असताना या बदललेल्या रूपाच्या मागे भारतीय इतिहास संकलन समिती बोरिवली भाग व मंडपेश्वर गुंफा सेवा ट्रस्ट यांचा मोठा सहभाग आहे हे कळले आणि या संस्थांबद्दल चा आदर अजूनच दुणावला. वॉक सुरु करायच्या आधी गरमागरम चविष्ट उपमा आणि चहा सोबत सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या.

नवीन म्हात्रे यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीत लेण्यांचा इतिहास, मुंबईत आढळणाऱ्या लेण्या यांचा आढावा घेतला आणि आम्ही सगळेच त्यात गुंतून गेलो . मुंबईत कान्हेरी, मंडपेश्वर , मागाठाणे , महाकाली आणि जोगेश्वरी इथे लेण्या आहेत. कान्हेरी आणि महाकाली लेणी या बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध आहेत तर मंडपेश्वरची लेणी शिवलेणी म्हणून प्रसिद्ध आहे.

मंडपेश्वर मंदिरा च्या बाहेर मोठे पटांगण आहे. मंदिराच्या दिशेने चालत गेल्यास समोर दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि वर चढून गेल्यावर नंदी आहे. पूर्वी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सिंह किंवा तत्सम प्राण्याचे शिल्प होते कारण आता फक्त धारधार नखे असलेला पंजा शिल्ल्क आहे आणि वर भग्न अवस्थेतील शिल्प. प्रत्येक ठिकाणी भग्न अवशेष आहेत जे बघून वाईट वाटते. लेण्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत, मागे सभामंडप आणि दोन बाजूला वऱ्हांडे आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी शिवमंदिर आणि दोन बाजूस दोन लहान गुंफा आहेत. या गुफांना जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत. या खोल्यांचा वापर सामान ठेवण्यासाठी केला जात असे.

गर्भगृहातील शिवलिंग अलीकडच्या काळात स्थापन केलेले आहे. डावीकडच्या गुंफेत शिवतांडवाचे भव्य शिल्प आहे, भग्न अवस्थेतील शिल्प पाहून वाईट वाटले. नवीन म्हात्रे यांनी बारकाईने आम्हाला ते शिल्प दाखवले. या शिल्पातील शिवाला आठ भुजा आहेत. शिवतांडव पहाण्यासाठी आकाशात यक्ष, गंधर्व आलेले आहेत तसेच ब्रह्मदेव , विष्णू आणि गणेश हे हि आपल्याला दिसतात. बाजूच्या भिंतीवर लकुलीश चे शिल्प आहे.

लकुलीश बद्दल मला काहीच माहिती न्हवती. असे म्हटले जाते कि शिवाच्या अठरा अवतारांपैकी लकुलीश हा पहिला अवतार आहे. शिल्पात त्यांच्या हातात दंड (लकुल) धारण केलेले दिसते . पोर्तुगीजांनी या मंदिराचे रूपांतर चॅपल मध्ये करताना नटेश्वराची मूर्ती पूर्णपणे भग्न न करता आल्यामुळे त्यावर लाकडाच्या फळ्या ठोकल्या होत्या त्यामुळे वरच्या भागात चौकोनी खोबण्या दिसतात. उंबरठ्याचे दोन खांब तोडण्यात आले आहेत त्यामुळे त्या भागाचे स्वरूप एका स्टेज सारखे करण्यात आले. बाहेरच्या डाव्या भागातल्या एका मूर्तीचे रूपांतर क्रॉस मध्ये करण्यात आले आहे. पण उजव्या बाजूची मूर्ती तशीच आहे. काही शिल्पांपुढे भिंती बांधण्यात आल्यामुळे ती शिल्पे सुरक्षित राहिली आहेत.

सभामंडपात नंदीच्या वर छतावर एक वर्तुळ कोरलेले आहे . काही खांबांवरही सुरेख नक्षीकाम दिसते जे बघून पूर्वीच्या काळात किती सुरेख नक्षीकाम केले असेल याची प्रचिती येते. पेशव्यांनी पोर्तुगिजांकडून वसई ताब्यात घेतल्यावर मंडपेश्वर हि ताब्यात घेतले. या लेण्यांमध्ये शिवलिंग असल्यामुळे अनेक भाविक दर्शनाला येतात तरीही काही प्रमाणात हि लेणी दुर्लक्षित राहिली आहेत. गुंफांच्या वरच्या भागात पोर्तुगीज कालखंडातील चर्च चे अवशेष अजूनही आहेत. लेण्यांच्या आवारातून हे अवशेष पाहण्यासाठी वर चढून जाता येते .

या लेण्या रस्त्याला लागूनच आहेत तरी फारसे तिकडे कुणी जात नसे. पण मंदिराचे आवार संरक्षित केल्यामुळे आता वर्दळ वाढली आहे. इतिहास अभ्यासक नवीन म्हात्रे यांची माहिती सांगण्याची पद्धत खूप छान आहे. त्यांच्या सोबत या शिल्पांमधील बारकावे पाहण्याची नवीन दृष्टी मिळाली.

बोरिवली रेल्वे स्थानकावरून रिक्षाने येथे सहज पोहोचता येते. शक्य असल्यास या लेण्या बघून या कारण या प्राचीन ऐतिहासिक लेण्यांपैकी एक असून, मुंबईच्या इतिहासातील महत्वाच्या साक्षीदार आहेत .

काही फोटो
mandapeshwar00.jpeg

खांबावरचे नक्षीकाम
mandapeshwar02.jpegmandapeshwar03.jpegmandapeshwar04_0.jpeg

गुंफांच्याच मागच्याच बाजूला आय सी चर्च आहे. त्याचाही इतिहास इंटरेस्टिंग आहे.
https://icchurchborivali.org/about-history.html
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...