आज 'महिला दिन' ! त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा ! महिला दिनानिमीत्ताने आज आपण माहिती करुन घेणार आहोत, इतिहासातील एका महत्वाच्या आणि महाराष्ट्रातील आद्य राजघराण्याच्या एका महिला राज स्त्रीची ! नागनिका !!
पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेला नाणेघाट येथील लेणे हे नागनिका हिनेच कोरलेले आहे.यासंदर्भात लेण्यामध्ये शिलालेख ही कोरुन घेतला आहे. त्यात कोरलेल्या लेखात नागनिका ही सातकर्णी राजाची भार्या असून, स्कंदश्री याची माता होती, अंगिकुलवर्धन वंशातील महारथी त्रणकयिरा याची कन्या होती, असे नमूद केले आहे. तिला 'नागवरदायिनी ', ' मासोपवासिनी’, ‘गृहतापसी’, ‘चरितब्रह्मचर्या’, अशी विशेषणे लावलेली आहेत. यावरून तिचा दिनक्रम हा वैराग्यपूर्ण होता असे दिसते. सम्राज्ञी नागनिकेने केलेले कृत्य डोळ्यासमोर रहावे म्हणून नाणेघाटासारख्या व्यापारी मार्गावर हा शिलालेख कोरला असावा.
नागनिका ही अत्यंत जिद्दीची व मानी स्त्री असल्याचे तिच्या नाणेघाटातील लेखावरून दिसते. फक्त शिलालेख नव्हे तर या लेण्यात सातवाहन घराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमाही कोरुन घेतल्या होत्या. या पुतळ्यांमध्ये सातकर्णीच्या प्रतिमेच्या आधी नागनिकेची प्रतिमा कोरण्यात आलेली दिसते. सातवाहन घराण्यातील तिचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट करण्यासाठी तिची प्रतिमा राजा सिमुक याच्या नंतर खोदलेली आहे. याच लेण्यात तिच्या दोन पुत्रांच्या प्रतीमांनंतर तिच्या पित्याची प्रतिमा कोरलेली आहे. सातवाहन कुळात आपल्या पित्याची प्रतिमा कोरणारी ही इतिहासातील बहुदा पहिलीच राणी असावी. पित्याच्या प्रतीमेखाली ‘अंगियकुलवर्धन सागरवलयांकित पृथ्वीवरील श्रेष्ठ वीर’ असे बिरूद ही कोरलेले आहे. यावरून तिचा दराराही स्पष्ट होण्यास मदत होते.
या सातवाहन कुलाचे कौतुक 'त्रिसमुद्रतोयपीत वाहन' असे केले आहे.याचा अर्थ तीन समुद्रांचे तोय म्हणजे पाणी पिणारे असा होतो.
सच्च भण गोदावरि पुव्वसमुद्देण सहिआसंती सालाहणकुलसरिसं जइ ते कुले कुल अत्थि ||'
गाथा सप्तशतीमधील हा कवी विचारतो, 'गोदामाई तु पश्चिम पर्वतात उगम पावून पुर्वसागरापर्यंत वाहत जातेस.पण खर सांग तुझ्या या दोन सागराच्या पल्ल्यात सातवाहनांसारखे एक तरी यशस्वी घराणे आहे का ?'
नाणेघाटाच्या गुहांमध्ये सातवाहनांचे वंशजांचे आठ पुतळे होते. प्रत्येक पुतळ्यावर त्यांची नावेही लिहिली होती. पण सध्या त्यांचे केवळ पायांचे भाग शिल्लक आहेत. ती नावे अशी
१)सिमुक सातवाहन – हा या कुळाचा आद्य संस्थापक नाही. सातवाहन नामक राजाच या घराण्याचा संस्थापक. सिमुक ह्या त्यानंतरच्या दोन तीन पिढ्यातील असावा.
२) राणी नयनिका – ही सिमुकाची सून आणि प्रथम सातकर्णीची पत्नी.
३) सातकर्णी – हा प्रथम सातकर्णी आणि सिमुकाचा पुत्र व पुढील तिघेही सातकर्णी आणि नयनिकेचे पुत्र
४)भायल- हा अल्पायुषी होता.
५) पाचव्या प्रतिमेवरील लेख नष्ट झाल्यामुळे ती कोणाची आहे हे समजत नाही.
६) महारठी त्रिनकयीर अथवा त्रिणकवीर- हा सातवाहनांचा अमात्य व नयनिकेचा पिता असल्याने याची मूर्ती येथे कोरण्यात आली. त्रिनकयीराचे सातवाहन साम्राज्यामध्ये फार मोठे योगदान होते असे दिसते.
७) हकुसिरी अथवा हकुश्री- हा अल्पकाळच राज्यपदावर होता.
८) कुमार सातवाहन अथवा वेदिश्री सातवाहन- हा पराक्रमी सातवाहन राजा झाला.
यांपैकी एका जोडपुतळ्याच्या वरच्या बाजूस देवी नागनिका आणि श्रीसातकर्णी असा लेख आहे. त्यावरून ती सातकर्णीची राणी असावी, तसेच महारठी त्रनकयिर हा नागनिकेचा पिता असावा, असे वा. वि. मिराशी म्हणतात. तर शेवटचे दोन अनुक्रमे कुमार हकुश्री आणि कुमार सातवाहन हे सातकर्णी व नागनिकाचे लहान पुत्र होते .
भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा अखिल भारतात सर्व जाती-जमातींचा पूज्य असा महादेव आहे. वैदिकांचा रुद्र, द्रविडांचा शिव आणि इतर अनेक जाती-जमातींचे तत्सदृश्य देव यांचा गुणधर्म समन्वय होऊन संप्रदायांचा पौराणिक शिव आकाराला आला आहे. रुद्र शिव असे त्याचे संयुक्त रूप आहे. शिवाचे स्वभावधर्म रुद्राला लागू होतात. रुद्र अग्नी तत्त्वातून उगम पावल्यामुळे अग्निज्वाला उर्ध्वगामी असतात. त्या वरून रुद्राच्या ऊर्ध्व लिंगाची कल्पना केली गेली असावी. शिवलिंगाला ज्योतिर्लिंग म्हणतात त्याचे रहस्य हेच आहे. अग्नि वेदीवर जळत आणि तापत राहतो; म्हणून शिवरूपात त्याला शांत करण्यासाठी त्याच्या मस्तकी अभिषेकाची संततधार धरावी लागते. शिव किंवा शिवभक्त आपल्या शरीरावर भस्मचर्चन करतात त्यातही रुद्राचे अग्नीशी तादात्म्य सूचित होते. रुद्राच्या घोर व अघोर अशा दोन तनु मांडलेल्या आहेत. यजुर्वेद आणि अथर्ववेदात रुद्राला मारक असे म्हटले आहे. तर यजुर्वेदात त्यास अघोर म्हणजे सौम्य रूप विशद केला आहे. भव आणि शर्व ही शिवाची दोन प्रसिद्ध नावे आहेत. या दोन्ही मुळात भिन्न देवता होत्या. शिवमहात्म्य वाढल्यावर या दोन्ही देवता शिवाच्या भूपती आणि पशुपती या स्वरूपात विलीन झाल्या. अशाप्रकारे अनेक देवतांना आपल्यात समाविष्ट करून शिव हा महादेव बनला.
शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात. लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे. पुढे वैदिक आर्यांनी ह्या दोन्ही पूजांना आपल्यात सामावून घेत शिव व शक्ती यांच्या उपासनेच्या प्रथा रूढ केल्या. या महादेवाची पुजा लिंगरूपात करावी असे पुराणांनी सांगितलेले आहे. ही लिंग पूजा फार प्राचीन असून तिचे अवशेष सर्व जगामध्ये आढळतात. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात ह्या गोष्टीचा पुरावा मिळालेला आहे. तिथे सापडलेल्या एका खापरावर एक त्रिमुख पूर्णाकृती उमटवलेली असून ती ऊर्ध्वमेंढर (उत्थित लिंग ) दाखवलेली आहे. सिंधू संस्कृतीतल्या लोकांचा हा उपास्यदेव असावा आणि त्याची पूजा लिंगरूपात करीत असावेत हे तिथल्या अवशेषावरून कळून येते. आताचे शिवाचे स्वरूप हे आर्यांचा रुद्र आणि द्रविडांचा लिंगरूप शिव यांचे एकत्रिकरण असावे असेच दिसते. त्यामुळेच शिवाची उपासना सर्वात व्यापक प्रदेशात होते. नेपाळातील पशुपतीनाथापासून ते थेट रामेश्वरपर्यंत.
शाळुंका आणि त्यावर ऊर्ध्व लिंग आकृती ही दोन्ही मिळून लिंग प्रतिक बनते. शाळुंका ही पार्वतीस्वरूप तर शिवलिंग हा महेश्वर. शाळुंकेसहित लिंगाची पूजा केल्याने दोन्हीची पूजा केल्यासारखे होते. शाळुंका कशी निर्माण करावी? शाळुंकेच्या घेराचे ३ प्रकारे आहेत. लिंगाच्या घेराच्या तिप्पट तो अधम, दीडपट तो मध्यम तर चौपट तो उत्तम. शाळुंकेची उंची विष्णुभागाइतकी असावी, तिचा आकार चतुष्कोण, द्वादशकोण, षोडषकोण किंवा गोल असावा. अभिषेक हा शिवलिंगाचा मुख्य उपचार असल्याने शाळुंकेला पन्हळ ठेवणे आवश्यक आहे. शिवलिंग शाळुंकेत स्थापन करताना त्याचे ब्रह्मभाग व विष्णुभाग हे भूमीत जायला हवेत. रुद्रभाग तेवढाच वर असावा." आणखी एका मतानुसार शाळुंका हे योनी प्रतीक आणि ऊर्ध्व पाषाण हे लिंगप्रतीक समजावे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत होणारी स्त्री-पुरुषांची ही जननेंद्रिय सिंधू संस्कृतीच्या लोकांनी तसेच इतरही अनेक आदिम जमातींनी शिवलिंग स्वरूपात उपास्य बनवली. लिंगा बद्दल लिंगपुराणात सयोनी लिंगाचे वर्णन दिलेले आहे. लिंग वेदी अर्थात शाळुंका म्हणजे पार्वती व लिंग म्हणजे साक्षात महेश्वर होय. त्या दोघांच्या पूजनाने शिवपार्वतीची पूजा केल्यासारखे होते. शिवलिंग निर्मिती कशी करावी याविषयी तपशील सुप्रभेदागम मध्ये दिलेला आहे. लिंगे ही आदिम काळापासून भारतात दिसून येतात, जी नंतर शिवलिंगा सोबत जोडली गेली. श्रीपरीपूर्णानंद वर्मा म्हणतात की, जगाच्या कानाकोपऱ्यात वासना आणि प्रजनन या दोन कारणांमुळे लिंग पूजेचा प्रसार झाला होता. कटनर असे म्हणतात की, लिंग पूजा सर्वप्रथम इजिप्त देशात सुरू झाली. जी चौथ्या शतकापर्यंत टिकून होती. आयसीस याने लिंग पूजेचा प्रारंभ केला होता. आयसीसीच्या मंदिरातही अग्नि पेटत ठेवत असत. या अग्नीचे पूजन "अक्षतयोनि" कुमारिकाच करीत असत. यातही शिव संकल्पनेचे आदिम रूप आम्ही पाहू शकतो. शिवाचा आणि अग्नीचा असलेला सहसंबंध, त्याचे शिखी हे नाव, त्याचा अग्नीमुळे तिसरा नेत्र, शाश्वत प्रजनन शक्ती दर्शविणारा त्याचे ऊर्ध्व लिंग, काम दहनाचा केलेला पराक्रम. तसेच शिव ज्ञानस्वरूप असून काम दहन केले म्हणजे पार्वतीचे लैंगिक सुख हिरावून घेतले असे मात्र नाही. आपल्या ज्ञानाग्नीने अविद्या आणि अज्ञानरूपी तमांचा नाश केला असे म्हणता येईल.
शिवाने वैदिक परंपरेला असंख्य कथा दिल्या. रुद्र आणि योगिनी हे शिवाशी संबंधित आहेत. शिव हा योगापासून भोगा पर्यंत, सर्व शाखांचा उद्गाता, विषा पासून गांजा पर्यंत, कामापासून वैराग्य पर्यंत पुरुषोत्तमाचे सर्व बिंदू शिवा मध्ये आहेत.
वात्सायनाने कामसूत्र लिहीत असताना त्याचे सर्व श्रेय शिवाला दिलेले आहे. पहिल्यांदा काम कलाही शिवाने पार्वतीला सांगितली, ती नंदीने ऐकली. त्यावर नंदीने अनेक खंडाचा ग्रंथ लिहिला तो सामान्यांना वाचणे शक्य नसल्यामुळे त्याचे लघुरूप मी मांडत आहे असे मुनी वात्सायन म्हणतात. कालिदासाच्या कुमारसंभवात शिवपार्वतीच्या समागमाचे सविस्तर वर्णन मांडलेले दिसून येते. शिव म्हणजे मंगल, रौद्र, सौम्य, संहारक, नवसर्जन, सुखनिधान, भयंकर, आशुतोष अशा रूपात आढळतो. सर्जक नसला तरी सर्जनाचे बीज धारण करणारा आहे. अमरकोशात शिवाची ४८ नावे आहेत. या नावात त्याच्या रूपाची, लंच्छनाची, कार्याची माहिती देणारी आहेत. ऋग्वेद मधील रुद्र पुढे शिव झाले. हे शिवरूप लिंग पूजेच्या माध्यमातून समाजात स्थापित झाले. पुढे यातूनच काळामुख, लकुलिश, कपालिक, वीरशैव असे पंथ निर्माण झाले. यास तत्वज्ञानाची जोड होतीच. शिव दर्शनिक आणि लोकप्रचलित अशी दोन रूपे ही पहावयास मिळतात. तो योग्याचा परमपुरुष असून स्वतः ही महायोगी आहे. शिवपुरानातील अद्भुत आणि अलौकिक कथा त्याच्या संहारक आणि उपकारक कामाची माहिती देतात. वेदांमध्ये शिवलिंगाचे वर्णन कुठे येत असल्याचे मला ठाऊक नाही पण रूद्राचे वर्णन मात्र येते. हा रूद्र मूळचा अनार्य. वैदिकांनी तो आपल्यात सामावून घेतला पण आजही कुठेतरी त्याचे मूळचे अनार्य स्वरूप आपल्याला भैरव, वीरभद्र आदी रूपांमध्ये दिसून येते. ह्या रूद्रालाच नंतर शिव समजले जाऊ लागले. ऋग्वेदात रूद्राचे वर्णन पुढीलप्रमाणे येते. ऋग्वेद मंडळ १, सूक्त ४३
सर्व स्तुतींचा नाथ, सर्व यागांचा स्वामी, व जलौषधींचा प्रभु असा जो रुद्र त्याचेजवळ स्वकल्याणेच्छु भक्त जे धन मागतो, त्याच धनाची आम्ही याचना करतो. हा देवांचे श्रेष्ठ वैभव असून, ह्याचें तेज देदीप्यमान सूर्याप्रमाणें व कांति सुवर्णाप्रमाणें आहे. हा आमचा अश्व, आमचा मेंढा, मेंढी, आमचे नोकर, दासी व धेनु ह्यांना उत्तम रीतीने आनंदांत राहतां येईल असे करतो
नानाप्रकारची रूपें धारण करणारा, उग्र व जगाचा आधार अशा भगवान् रुद्राची अंगयष्टि अत्यंत सुदृढ असून त्या आपल्या शुभ्रतेजस व सुवर्ण स्वरुपानेंच तो फार शोभिवंत दिसतो. सर्व भुवनांची समृद्धि, आणि सर्व भुवनांचा प्रभु अशा ह्या भगवान् रुद्रापासून त्याचे ईश्वरी सामर्थ्य दूर झालें असें कधींही होत नाहीं. तूं हातांत धनुष्यबाण घेतले आहेस ते तुलाच शोभतात, तर्हेतर्हेचे स्वच्छ आणि पवित्र पुष्पहार तू घातलेले आहेस तेही तुलाच शोभतात. हें विश्व येवढें अवाढव्य व भयंकर पण त्याच्यावरही तूं दया करतोस ही थोरवी तुझीच. कारण हे रुद्रा, तेजस्वीपणांत तुझ्यापेक्षां वरचढ असा कोणी आढळणारच नाही.
ऋग्वेद मंडळ ७ सूक्त ४६
मा नः वधीः रुद्र मा परा दाः मा ते भूम प्रऽसितौ हीळितस्य आ नः भज बर्हिषि जीव:शंसे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥
आम्हाला मारू नको आणि दूर टाकून किंवा परक्यांच्या हातांतही देऊन टाकू नकोस. अथवा आमचा पराभव करू नकोस. तुझ्या क्रोधरूपाच्या पापरूपी बंधनांत आम्ही बद्ध न होऊं. हविचा स्वीकार कर. तुम्ही सदा सुवचनांनी आमचा प्रतिपाळ करा. नमुन्यादाखल दिलेल्या वरील सूक्तांमध्ये रूद्राचे मूळचे अनार्य स्वरूप त्याच्या क्रोधरूपाने प्रकट होत्सेते दिसते. रूद्राचे जसे भयानक म्हणून वर्णन आले आहे त्याच प्रमाणे तो भयनाशक अथवा कल्याणकारक असल्याचेही वर्णन ऋग्वेदांत आलेले आहे. जलाषभेषज अथवा जलौषधींचा प्रभू असे रूद्राला मानले गेले आहे. रूद्राला शिवाचे स्वरूप कधी आले ते नेमके सांगता येत नाही मात्र हा बदल वेदोत्तर काळात घडला आणि गुप्तकाळापासून (इ.स.३५०-५००) शिवाला आजचे स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली असे म्हणावयास हरकत नाही. लिंगस्वरूप शिव. शिव-आराधनेत मूर्ती व लिंग या दोन्हींनाही महत्त्व आहे. त्यांसंबंधी अनेक कथा लोकमानसात प्रचलित आहेत. शिवमूर्तींचा अभ्यास हा लिंगस्वरूप शिवाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. लिंग पूजनांचे धागेदोरे एकीकडे सिंधुसभ्यतेपर्यंत पोचतात व दुसरीकडे आजपर्यंत ते आपल्या येथे अव्याहत चालू आहे. शिवाची लिंगपूजा सहजासहजी भारतीय समाजात प्रतिष्ठापित झालेली नाही, तिला येथें मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते. पौराणिक वाङ्मयात हा विरोधी सूर ऐकू येणारी ठळक आख्याने खालील आहेत- १) ब्रह्मदेवाच्या यज्ञांत भिक्षाटनांकरिता शंकरांचे जाणे व वैदीकांकडून त्याची निंदा.' २) उन्मत्त वेशांत शंकरांचे वैदीकाच्या वसतिस्थानांवर जाणें व त्यावर ब्राह्मणांचे लाथा, बुक्या, वगैरेंनी आक्रमण. ३) दारुवनांत शंकराची लिंगच्युती व त्याला पौरुषहीन होण्यांविषयीं शाप. हे आख्यान बरेच प्रचलित असावे, कारण अनेक पुराणांत तर त्याचा उल्लेख आहेच, पण मध्यकालीन कलेत देखील त्याचे अंकन झाले आहे.' ४) भृगूचा शंकराला शाप. पूर्व इतिहासांकडे बोट दाखविणाऱ्या या कथा बहुतेक आपल्या उत्तरभागांत लिंगपूजेच्या प्रतिष्ठेचे वर्णन करतात. महाविलयन पद्धतीचे हे प्रमाण होय. उदाहरणार्थ पद्मपुराणांत येणाऱ्या दारुवनांसंबंधी आख्यानांत एकीकडे सावित्रीच्या शापाने शंकराचे लिंग पडल्याचे सांगितले आहे, तर तेथेंच गायत्रीचा वर त्याच्या (पतित लिंगाच्या) पूजनाची प्रतिष्ठा ही करीत आहे." हे आख्यान कूर्मपुराणांत विस्ताराने दिले आहे तेथे लिंगोत्पाटनांविषयी सांगून झाल्यानंतर ब्रह्मदेवांकडून आग्रहपुरस्सर लिंग पूजेची स्थापना केली गेली आहे आणि भगवान् ईशाच्या लिंगाची पूजा वैदिक मंत्रानेही करावी असें सांगितले आहे.' याप्रमाणें जरी शैवमत आणि लिंगपुजेचे एक रूप वैदिक संप्रदायाने स्वीकारलें तरी शैवांच्या त्या उपशाखा शेवटपर्यंत वेदबाह्यच समजल्या गेल्या ज्यांचे रीतिरिवाज आर्य सभ्यतेच्या अगदीब प्रतिकूल होते. एवढेच नव्हें तर काही ठिकाणीं स्वतः शंकराच्या तोंडूनच त्यांना 'असेव्य' असे सांगितले गेले.' लिंगपूजनांच्या स्थापने बरोबरच लिंगोत्पत्ती संबंधी कथा ही रूढ झाल्या, त्यापैकी काहीं खाली देत आहे : क) लिंगोद्भवाची मार्गे दिलेली कथा व त्यामुळे लिंगाचे श्रेष्ठत्व आणि लिंगार्चेचा आरंभ." ख) सर्वांचा ज्याच्यांत लय होतो ते लिंग या परिभाषेस मान्यता मिळून लिंगवेदीच्या (शाळुंकच्या) रूपानें महादेवी (पार्वती किंवा चित्रशक्ती) व लिंगरूपानें महेश्वराच्या पूजनाची स्थापना." ग) सृष्टिकर्मांपासून विरक्त होऊन शिवाकडून स्वतःचे लिंग कापणे व पृथ्वीवर त्याला प्रतिष्ठित करून आपण मूंजवान पर्वतांकडे निघून जाणें. घ) शिवप्रतिमा व शिवलिंगाचे पूजन हे दोन्ही प्रकार जरी संपत्ति व ऐश्वर्य देणारे असले तरी लिंगपूजन हे श्रेष्ठतम होय या सिद्धांतांचे प्रतिपादन. लिंगाचें निर्माण व सामान्य स्वरूप : लिंगपूजा ही फार प्राचीन काळापासून जगाच्या अनेक भागांत अस्तित्वात आहे. मात्र वैदिक संस्कृतीने काही शतके उलटल्यानंतर ती स्वीकारली. शिवलिंगे दोन प्रकारची असतात : स्वयंभू (निसर्गनिर्मित) आणि कृत्रिम (मानवनिर्मित). जे लिंग स्वतः प्रकट झाले आहे, ते स्वयंभू लिंग म्हणून ओळखले जाते. ते काही कारणाने थोडे झिजले तरी त्याचे देवत्व नष्ट होत नाही, अर्थात त्याचा जीर्णोद्धारही होऊ शकत नाही. भारतात अशी सुमारे ७० स्वयंभू शिवलिंगे आहेत. स्वयंभू लिंगे ही अनियमित स्वरूप व आकाराची असतात. मानवनिर्मित लिंगे ही दगड, वाळू, लाकूड, धातू ,(सोने, रूपें, तांबे, पितळ, वगैरे आठ प्रकारच्या धातू), स्फटिक, रत्ने इत्यादींची घडविली जातात. याशिवाय अपराजितपृच्छेप्रमाणें तात्कालिक माध्यमें म्हणून कुंकु, कापूस, वगैरेचाही उपयोग करीत असत. याशिवाय नर्मदेंत मिळणारे मोठे गुळगुळीत दगड 'बाण लिंगें' म्हणून पूजले जातात. त्यांचे स्वरूप, आकार यात स्थान, साधनपरत्वे पुष्कळ फरक असू शकतो. भारतीय पुरातत्त्वज्ञ टी. ए. गोपीनाथ राव (१८७२-१९१९) यांनी शिवलिंगांचे चल व अचल असे वर्गीकरण केले आहे. ज्याची गाभाऱ्यात स्थापना केली जाते, ते अचल लिंग होय.
मानुष लिंगाचे तीन भाग असतात, खालचा चौकोनी म्हणजे ब्रह्मभाग, त्यांच्यावर अष्टकोनी म्हणजे विष्णू भाग व सर्वात वरचा गोल म्हणजे शिवभाग असा त्याचा क्रम असतो (रे.चि. अठ्ठावीस ३३,३४). या भागांच्या उंचीच्या भेदाने लिंगांचे निरनिराळे प्रकार कल्पिले आहेत. सर्वच शिवलिंगे अशा प्रकारे तीन भागांत विभाजित असतात असे मात्र नाही. बरीचशी केवळ गोल खांबासारखीच असतात. सध्या ज्यास शिवलिंग समजले जाते त्याचे साधारणतः शाळुंका आणि ऊर्ध्व पाषाण असे दोन भाग पडतात. येथेच शिवलिंगांवर दिसणाऱ्या आडव्या रेघेचा ही विचार करावयास हवा जिला 'ब्रह्मसूत्र' अशी संज्ञा आहे. खरे म्हणजे मुळात शिवाचे लिंग म्हणजे मानव लिंगाची प्रतिकृती आहे.
सुरुवातीला कित्येक ठिकाणी ती हुबेहूब घडविलेली आहे. पुढे मात्र तिच्यात सुधारणा करण्यात आल्या. मानव लिंगाचे टोक चेतनावस्थेत थोडे फुगलेले असते. या फुगीर भागाला सुपारी असे म्हणतात. लिंगाचे टोकांवर सुपारीची सुरुवात अंकित करणारी रेषा पुढील काळांत ब्रह्मसूत्र या नावाने ओळखली जाऊ लागली व 'सिद्धांतसारावलि' सारख्या ग्रंथांनी तिला भक्कम अशी शास्त्रीय चौकट दिली.
शिवलिंग ज्या दगडांत स्थापित करतात तो विशिष्ट आकाराचा घडविलेला असतो. त्याला 'पीठ' किंवा 'योनी' अशी संज्ञा आहे. नेहमीच्या भाषेत आपण तिला शंकराच्या पिंडीची 'शाळुंका' असे म्हणतो (रे.चि. अठ्ठावीस, ३५), लिंग स्थापन झाल्यावर पुरता ब्रह्मभाग व पुरता किंवा अर्घा किंवा एक चतुर्थांश विष्णुभाग त्याने लपतो. त्या पीठाला एकाधिक कंगोरे असतात व निरनिराळ्या अलंकरणाने ते सुशोभित केलेले असते. या अलंकाराणांच्या फरकाने पीठाचे प्रकार कल्पिले आहेत. पीठाच्या वरच्या भागांत पिंडीवर सांडणारे पाणी वाहून जाण्याकरिता 'जलनिर्गम' किंवा खोलाद नाली केलेली असते. ही पूजेला बसताना पूजकाच्या उजव्या व लिंगाच्या डाव्या बाजूला असावी असे विधान आहे. प्रारंभी घडीव शिवलिंग हे हुबेहूब पुरुषाचे शिस्न वाटावे अशा प्रकारे त्याच्या अग्रभागी ब्रह्मसूत्राच्या रेषा काढल्या जात. मात्र स्वयंभू लिंगावर अशा रेघा असतीलच असे नाही. कालांतराने हे ब्रह्मसूत्र आणि वरील मणिभाग नाहीसे होऊन सरळसोट शिवलिंगे अस्तित्वात आली. लिंगावर शिवमुख, प्रतिमा दिसू लागल्या. प्रारंभिक लिंगे ही स्तंभस्वरूप होती, हळूहळू त्यांत बदल होत एकमुख, द्विमुख, चतुर्मुख लिंगे प्रचलित झाली; अर्थात हे स्थित्यंतर शेकडो वर्षांच्या काळात झाले. मुखलिंगे इ. स. पू. पहिल्या शतकापासून प्रचलित आहेत. सध्या ज्ञात असलेल्या मुखलिंगांमध्ये भरतपूरच्या संग्रहालयात असलेले अघापूरचे एकमुखी शिवलिंग सर्वाधिक प्राचीन समजले जाते. त्यावर शंकराचे पागोटे घातलेले मुख आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात कुषाणकालीन शिवलिंगाखाली विटांचा ओटा किंवा लेण्यात कोरून काढलेले असल्यास त्याखाली चौथरा अशी रचना दिसते. अभिषेकाचे पाणी वाहून नेण्यासाठी त्यात प्रणालकाचीही व्यवस्था असते. कुषाण काळातील एकमुखलिंगे अनेकदा सापडतात, त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे आडवा त्रिनेत्र, कुरळे केस, जटाभार, क्वचित पागोटे, कपाळावर ललाटपट्ट ही होत.
ज्योतिर्लिंगें : - हळुहळू समाजात लिंगपूजा दृढमूल झाली. आज भारतातील सुप्रसिद्ध शैवतीर्थांचे ठिकाणी शिवाच्या प्रतिमेचे पूजन होत नसून लिंगपूजनच होत असतें. भारतात पसरलेल्या शिवलिंगांत ज्योतिर्लिङ्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारा लिंगांना फार मोठी मान्यता प्राप्त आहे. ही लिंगे खालील होत.": १) सोमनाथ (सौराष्ट्र, गुजराथ) २) मल्लिकार्जुन (श्री शैल, आंध्रप्रदेश) ३) विश्वेश्वर किंवा विश्वनाथ (वाराणसी, उत्तरप्रदेश) ४) केदारेश्वर (केदारनाथ, उत्तरप्रदेश) ५) घृष्णेश्वर किंवा घृष्णेश्वर (वेरूळपासून २ मैल, महाराष्ट्र) ६) नागनाथ किंवा औंढ्या नागनाथ (जिल्हा परभणी, महाराष्ट्र) ७) भीमाशंकर (खंडाळ्याहून २५ मैल उत्तरेस भीमानदीच्या काठी लोणावळ्याजवळ, महाराष्ट्र) ८) ओंकारेश्वर (ऑकारमांधाता, मध्यप्रदेश) ९) महाकालेश्वर (उज्जयिनी, मध्यप्रदेश) १०) त्रंबकेश्वर (नाशिक, महाराष्ट्र) ११) बैद्यनाथ किंवा वैजनाथ. हे दोन आहेत- एक महाराष्ट्रांतील परळी वैजनाथ, जिल्हा बीड व दुसरा बैजनाथधाम, देवघर, बिहार. १२) रामेश्वर (केरळ) स्वयंभूलिंगें : ज्योतिर्लिंगाप्रमाणेंच स्वयंभू किंवा स्वयंभूव लिंगांचे ही मोठे महत्त्व आहे." कामिकांगमांप्रमाणें जे लिंग स्वतः प्रगट झालेले आहे आणि अज्ञात काळांपासून अस्तित्वांत आहे ते स्वयंभूव म्हणून ओळखले जाते. अशाप्रकारचे लिंग जरी कारण परत्वे थोडे भंग झाले, शत्रूच्या ताब्यात गेले किंवा त्याला अन्य अपाय झाला तरी त्याचे देवत्व नष्ट होत नाही. त्याचा जीर्णोद्धार किंवा नव्याने स्थापना करावयाची नसते, फक्त थोडा संस्कार केला म्हणजे झाले. प्रचलित मान्यतेप्रमाणे व्यात्वांत ६८ स्वयंभू लिंगे पसरली आहेत. महाराष्ट्रात मुंबई येथील अमरेश्वर (अंबरनाथ) हे एक स्वयंभू लिंग समजतात. तांत भूलिगांप्रमाणेच गणप व आर्थ लिंग अर्थात् गणांनी किंवा त्रऋषींनी स्थापन करून पुजलेली लिग ही आदल्याच असतात. या लिंगाच्या बाबतीत त्यांचे मान, आकार, ब्रह्मसूत्रांदिकांचा अभाव वगैरे गोष्टीचा विचार करावयाचा नसतो. महाराष्ट्रांपुरते बोलावयाचे झाल्यास ग्रामीण महाराष्ट्र हा शिवोपासकांचा आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. येथे अनेक ज्योतिर्लिंगे तर आहेतच पण त्याशिवाय व्याप्रेश्वर, वाडेश्वर, कालेश्वर, सर्वेश्वर, वाळुकेश्वर, कपर्दिकेश्वर, नर्मदेश्वर, विश्वेश्वर, सोमेश्वर, वेळणेश्वर अशी अनेक महादेवाची मंदिरें उभी असलेली दिसतात. त्याचप्रमाणें लातूर व टोका येथील सिद्धेश्वर, अमरावती जिल्ह्यांतील सालबार्डी येथील महादेव, जालन्याचा पंचमुखी महादेव अशी अनेक जागृत शिवस्थानें महाराष्ट्रात आहेत. आर्ष व गणप लिंगाव्यतिरिक्त माणसाने स्थापन केलेली लिंगें 'मानुष लिंगें' म्हणून ओळखतात.
शिवलिंगाचें प्रकार (र.चि. अठ्ठावीस ३७-४५) : शिवलिंगाच्या बाहेरील अलंकराला आधार मानून मानुषलिंगाचे काही प्रकार ठरविले गेले आहेत. यापैकी मुखलिंग, नियात शिवलिंगाना लिगाला सोडून बाकी मध्यकाळांतच जास्त मिळतात. त्यातल्यात्यांत उत्तरेपेक्षा दक्षिणेत यांच्या प्रघात जास्त आहे. मयमतादि ग्रंथांत सांगितलेले हे प्रकार खालील होत : क) अष्टोत्तरशतलिंगें : यांत लिंगाच्या पूजाभागांवर म्हणजे शिवभागांवर १०८ छोटी लिंगे कोरलेली असतात. ख) सहस्रलिंगें (रे.चि. अठ्ठावीस, ३२) : वरील प्रमाणेंच येथें छोट्या लिंगाची संख्या १००० असते. असेच कोटिलिंग ही घडवितात. ग) धारालिंगें (रे.चि. अठ्ठावीस ४३) : येथें लिंगावर उभे पैलू किंवा धारा पाडलेल्या असतात. आगमग्रंथांत मतभेदाने यांची संख्या ५ पासून २८ पर्यंत दिलेली आहे. घ) मुखलिंगें (रे. चि. अठ्ठावीस ४२) : येथे पिंडीत शंकराचे मानव मुखही कोरलेले असते. हा प्रकार फार जुना आणि बहुप्रचलित आहे; म्हणून यावर थोडा विस्ताराने विचार करावयास हवा.
गुप्तकाळापर्यंतची उत्तर भारतीय मुख लिंगें : मुखलिंगांची प्राचीनता इसवीसनांपूर्वी पहिल्या शतकांपर्यंत पोचते. आज माहीत असलेल्या लिंगांत सर्वात जुने असे भरतपूरच्या संग्रहालयांत असलेले अघापूरचे एकमुखी शिवलिंग होय. या लिंगावर शंकराचे पागोटे घातलेले मुख आहे (चित्र ८२). मथुरेच्या एका कुषाणकालीन शिलापट्टांवर पिंपळाखाली विटांच्या चौथऱ्यावर एक मुखलिंग स्थापित केलेले दिसते (चित्र ८४ ल.सं.सं.बी. १४१). येथे लिंगाचा मुखभाग समोर असून मागचा भाग झाडाच्या बुंध्याकडे आहे. कधीकधी लिंगांचे एक दोन किंवा चार मुखांशी संयोजन करीत असत. यात दोनमुखी लिंग क्वचित मिळणारे असून त्याचा एक कुषाण कालीन नमूना मथुरेच्या संग्रहालयांत आहे. (म.सं.सं. १४.४६२). पंचमुखलिंगें नंतरची आहेत. कुषाणकालीन मुखलिंगां संबंधी खालील गोष्टी नोंद करण्यासारख्या आहेत (चित्र ८३) : क) मुख : भरतपूर संग्रहालयांतील लिंगाच्या मुखावर पागोटें दिसते, पण इतरत्र बहुतेक जटाभारच असतो. चतुर्मुख लिंगात पागोटें दिसते, त्याचा विचार पुढे येईलच. ख) मुख आणि लिंगाचे संयोजन : कुषाणपूर्व काळांत मुख लिंगांपासून स्वयं उद्भूत झाल्यासारखें दिसते पण कुषाण काळांत मात्र या दोघांचे संयोजन करणारे एक किंवा दोन असे फुलांचे जाड हार आहेत. या हारांवर फुलापानांची सजावट मिळते. हे अलंकरण कुषण काळाच्या साध्या शिवलिंगांवरही दिसते. वायुपुराणांतील वर्णनाप्रमाणें शंकराच्या डोक्यावर शोभणाऱ्या कमलमालेच्या पागोट्यांकडे (पद्ममालाकृतोष्णीष) हा संकेत असणें संभवतें, अथवा ही माला म्हणजे पुढें दिसणाऱ्या 'ब्रह्मसूत्रां'चे पूर्व रूप असू शकेल. मदतकाळांकडे मुख आणि लिंगांचे हे अनैसर्गिक संयोजन लुप्त होते व पुनः मुख लिंगातून सहज प्रगट होतांना ग) एक (र.वि. सत्तावीस २७) किंवा दोन मुखाची लिंगे : कुषाण काळांतील एक मुखलिंगें बरीच मिळतात. येथे आडवा त्रिनेत्र, कुरळ केस, जटामंडल, कचित पागोटे व कपाळांवर ललाटपट्ट" अशी वैशिष्ट्ये दिसतात. ही लिंगे साधारणपणे जाडीत कमी पण उंच मात्र त्या मानाने जास्त अशी असतात. काहीचा वरच्या भागांवर मानवलिंगाचा आकार दिसतो व त्याच्या थोडे खाली मालेने संयोजित मानव मुख दिसते (चित्र ८३). कुषाणकालीन लिंगांशी तुलना केल्यांस गुप्त काळांत मुखलिंगांची खालील वैशिष्ट्ये उघड दिसतात : अ) त्रिनेत्र आडवा नसून उभा दिसतो. आ) गोल बांधलेल्या (वृत्तबंध) जटांबरोबरच खांद्यांवर विखुरलेल्या जटा (उभय पार्श्वस्थ विकीर्ण जटालक) * दिसतात. ३) लिंगातून मुख स्वतः उद्भूत झालेले भासते. ई) आतां फक्त मुखच दाखविण्याऐवजी गळा आणि तेथें घातलेली एकावली ही दिसू लागते. (चित्र ८५) 3) भूमरा (जिल्हा सतना म.प्र.) येथून मिळालेल्या मुखलिंगांप्रमाणे काही नमून्यांत" रत्नखचित भालपट्ट दिसतो व याची सांगड महाभारतांतील 'मणिभूषित मूर्धा', नित्यमुद्वद्ध मुकुट", किरीटी, वगैरे पदांशी घालता येते. ऊ) आता मुखलिंगांची उंची कमी होऊन त्याचा घेर वाढला, त्याचप्रमाणें लिंगाग्र लहान झाले व मुखांच्या आकारांत वाढ झाली. परिणाम असा की लिंगाचा बराच भाग मुखानें झाकला जाऊं लागला." ए) मुखांवरील राकटपणा लुप्त होऊन तेथे 'शिवत्व' झळकू लागले. ऐ) काही नमुनें असेही मिळू लागले जेथें मुखांबरोबरच ब्रह्म, विष्णू आणि शिव भागही दाखविले आहेत. सारनाथ (वाराणसी) येथून मिळालेल्या व तूर्त कलकत्त्याच्या संग्रहालयात असलेल्या या प्रकारच्या मुखलिंगांत खालचा भाग चौकोन, मधला अष्टपैलू आणि वरचा गोल असून विष्णूभागाच्या ब्रह्मभाग दुप्पट आणि शिल भाग चौपट आहे." मुख शिवभागांत जवळ जवळ मधोमध आहे. एकमुखलिंगः
अकबरपुर, छाता (मथुरा) येथे मिळालेले कुषाण कालीन एकमुख लिंग (तूर्त मथुरा संग्रहालय) त्याच्या खालील भागावर असलेल्या बुढापा पण स्थूल काय गणांमुळे महत्त्वाचे आहे (रे.चि.शि. ३०) A.K.Srivastava, Siva Linga with Ganas, A New find from Mathure, ARAS., XLI 1981- 82, p. 236 गुप्तकाळातही मुखलिंगे निर्माण होत होती, मात्र त्यांत काही बदल झाले; त्रिनेत्र उभा झाला, मुखासोबत गळा व त्यात घातलेली ‘एकावली’ देखील दिसू लागली. डोक्यावर बांधलेल्या जटांसह खांद्यावर विखुरलेल्या जटाही दिसतात. मुखलिंगाची उंची कमी होऊन त्यांचा घेर वाढला, लिंगाचा बराच भाग मुखाने झाकला जाऊ लागला. मध्य प्रदेशातील खोह या गावी एक गुप्तकालीन सुरेख एकमुख लिंग आहे. ते लिंगाच्या खालच्या एकतृतीयांश भागात कोरलेले असून डोक्यावर जटामुकुट, चंद्रकोर तसेच कपाळावर त्रिनेत्र आहेत. गळ्यावरील वळ्या व त्याखाली एकावलीही दिसते. गुप्तोत्तर काळात एकमुख लिंगांची लोकप्रियता कमी झाली. गुप्तकाळांत देखील एकमुख लिंगें बऱ्याच मोठ्या प्रमाणांत घडवीत असत (चित्र ८५).
एकमुख शिवलिंग, खोह (मध्य प्रदेश).
पाटेश्वर येथे अशा प्रकारचे एक शिवलिंग आहे. ह्या एकमुखलिंगाभोवती लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.
पाटेश्वर येथील एकमुखलिंग
द्विमुखलिंग आतापर्यंत फक्त एकच माहीत आहे (म.सं.सं. १४.४६२). महाभारतांत एके ठिकाणी शिवास द्विवक्त्र म्हणून म्हटले आहे, त्याचा येथे संबंध लागू शकेल. द्विमुखलिंग दुर्मीळ असून मथुरा संग्रहालयात एक द्विमुखलिंग आहे. पहाडपूर (बांगला देश) येथील उत्खननात इ. स. आठव्या शतकातील मृत्तिकाफलकावर त्रिमुख शिवलिंग सापडले. योनीसह असलेल्या या लिंगावरील तिन्ही मुखांच्या कानात चक्रकुंडले व मस्तकावर जटाजूट आढळतात.
गुप्त मुखलिंगाची वैशिष्ट्यें : - गुप्तोत्तरकाळांत एकमुख लिंगांची लोकप्रियता त्या मानाने कमी झाली. मथुरा संग्रहालयांत असलेल्या एका मध्यकालीन द्वारशाखेच्या खालच्या भागांवर एक मुखलिंग कोरलेले दिसते (म.सं.सं. १३ २९४). एक उल्लेखनीय मध्यकालीन एकमुखलिंग जंगलमहाल, चुनार जिल्हा वाराणसी येथील मंदिरांत आहे. शिवलिंगावर फक्त शिवाचे मुख दाखविले असून कान मात्र गाईच्या कानांसारखें आहेत. गोकर्णेश्वर म्हणता येण्यासारखें हे लिंग बाराव्या-तेराव्या शतकाचे असावे. घ) त्रिमुखलिंग : पहाडपूर येथील उत्खननांत सुमारें ८व्या शतकांच्या मातीच्या एका फलकांवर योनीसह त्रिमुखलिंग मिळाले आहे. लिंगांच्या तिन्हीं मुखांवर जटाजूट असून कानांत चक्रकुंडलें आहेत. लिंग भागांका ब्रह्मसूत्राचाही काही भाग दिसतो.
ड) चतुर्मुखलिंग : शिवलिंगाच्या चारही बाजूस एक-एक मुख कोरलेले असते तेव्हा त्यास चतुर्मुख लिंग म्हणतात. ही शिवाची चार रूपे आहेत असे मानले जाते. ‘महाभारता’तील कथेप्रमाणे एकदा तिलोत्तमा नावाची स्वरूपसुंदर अप्सरा देवमंडळाला प्रदक्षिणा घालू लागली, तेव्हा तिला न्याहाळण्यासाठी शंकराची चार तोंडे उत्पन्न झाली. ही चार तोंडे म्हणजे अघोर, उष्णीषिन्, योगी आणि स्त्री ही होत. ही मुखे कोणकोणत्या दिशांना असावीत, हे कुषाणकालपर्यंत निश्चित नव्हते, ते गुप्तकाळात झाले. विष्णुधर्मोत्तर पुराणात त्यांची माहिती अशी येते की, पूर्वेकडील मुख हे इंद्रपदांचे शासन करणारे व पागोटे घातलेले ‘उष्णीषिन्’, पश्चिमेस योगीस्वरूप आणि मुंडन केलेले ‘योगी’, दक्षिणेकडील मुख हे संहार करणारे ‘अघोर’, तर उत्तरेकडे स्त्रीमुख असते. स्त्रीमुखाव्यतिरिक्त इतर मुखांवर त्रिनेत्र असतो. ‘रूपमंडन’ या ग्रंथात लिंगाच्या सभोवार घडवावयाची ही मुखे दिशानुक्रमे तत्पुरुष, अघोर, सद्योजात, वामदेव आणि ईशान या पंचब्रह्मांची असावीत असे वर्णन केले आहे. एकच मुख घडवल्यास, ते पूर्वेकडे असावे. दोन असल्यास ती पूर्व व पश्चिम या दिशांना, तीन मुखे असल्यास, ती पूर्व, दक्षिण आणि उत्तरेस असावीत. चार किंवा पाच मुखे असल्यास चार दिशांना चार तसेच एक ऊर्ध्व दिशेस घडवावे असे सांगितले आहे.
चतुर्मुख शिवलिंग, पाटेश्वर (महाराष्ट्र).
पाटेश्वर येतीलच चतुर्मुखलिंग.
याच ग्रंथात अन्यत्र आपल्या मुखाची व्याख्या करताना शिवाचे असे वाक्य आहे" कीं मी पूर्वमुखानें इंद्रपदांचे शासन करतो, माझे पश्चिममुख सौम्य आहे, दक्षिण मुख संहाराकरिता आहे आणि उत्तरमुखानें भी उमेशी बोलत असतो. याची संगती अशी लावता येईल कीं इंद्रपदांशी संबंध असलेले पूर्वमुख हे पागोटें घातलेले असून संहार करणारे; दक्षिणमुख हे अघोररूप, योगीरूप किंवा मुंडित असें असते. त्याचप्रमाणें पश्चिमेकडील सौम्य असून उत्तरें कडील स्त्रीमुख असतें. महाभारतांच्या वरील उल्लेखानें या चार प्रकारच्या मुखांची दिशास्थानें ही निश्चित झालेली दिसतात. विष्णुधर्मोत्तर पुराण या दिशास्थानांचे वर्णन करते." आपण विचारात घेतलेल्या लिंगांची मुखस्थिती खालील प्रमाणे आहे :
दिशा
भीटालिंग (इ.पू. ३-२रेंश.)
कौशाम्बोलिंग (इ.पू. १ल.श.)
दिल्लीलिंग (सु. २रें.श.)
मथुरालिंग (सु. ३रें.श.)
कौशांबीलिंग (सु. ५वें.श.)
पूर्व
मुंडित
(खंडित)
पागोटेंघातलेले
सौम्य
सौम्य
पश्चिम
स्त्री
पागोटेंघातलेले
सौम्य
स्त्री
सौम्य
उत्तर
पागोटेंघातलेले
स्त्री
मुंडित
(खंडित)
स्त्री
दक्षिण
अघोर
अघोर
अघोर
अघोर
अघोर
वरील तक्त्यांवरून एक गोष्ट उघड होते की कुषाणांचा काल संपेपर्यंत मुखस्थानांत एकरूपता आलेली नव्हती, पण गुप्तकालांत ती स्थिर झाली व विष्णुधर्मोत्तर पुराणाने तिला शास्त्रीय चौकट दिली. या ग्रंथांप्रमाणें अघोर (चित्र ८७) आणि स्त्री (चित्र ८६) ही दक्षिण व उत्तर अर्थात एकमेकांच्या पाठीकडे असावयास हवी. सुरुवातीच्या काही लिंगात हे दिसत नाही. दुसरें म्हणजें असें की गुप्तकालीन लिंगांत पागोटें घातलेल्या मुखांचा पूर्ण अभाव आहे, त्याचप्रमाणें मुण्डित तोंड ही आढळत नाही चौथा मुद्दा त्रिनेत्राविषयीं आहे. प्रथम तीन लिंगात कोणत्याच मुखांवर तो दिसत नाही, कुषाण काळांत तो असणें अनिवार्य नव्हतें, पण गुप्तकाळांत मात्र तो स्त्रीमुखां व्यतिरिक्त सर्वत्र दिसतो. बिरला अकादमीतील लिंगावर दिसणारे आडवे आणि उभे त्रिनेत्र त्यांना दाखविण्याच्या पद्धतीचा संक्रांतिकाल सुचवतात. अर्धचंद्रांविषयी देखील असाच प्रकार आहे. गुप्तकाळांपर्यंत शिवांचे बालेन्दुशेखर मुख फारसे दिसत नाही, पण पुढे सामान्य होते. गुप्तकाळांपर्यंत खालील चतुर्मुखलिंगें महत्त्वाची आहेत : १) भीटा (अलाहाबाद) येथून मिळालेल्या पंचास्य लिंगातील आजूबाजूला दिसणारी चारमुखें. २) कौशांबी (अलाहाबाद) चे चतुर्मुख लिंग (अलाहाबाद सं.सं. ६३६) ३) दिल्ली संग्रहालयातील लिंग (सं.सं. ६५ १७२) ४) मधुरेचे लिंग जे मुळांत पंचास्य होते (सं.सं. १५.५१६) ५) कौशांबीचे गुप्तकालीन लिंग (ल.सं.सं. एच्. ३, चित्र ८६-८७) ६) मध्यभारतांतील गुप्तकालीनलिंग (बिरला अकादमी संग्रहालय, कलकत्ता, सी. ९७) साधारणपणें एकाच लिंगाच्या चारी बाजूस ही मुखें कोरीत असत, पण मथुरेच्या लिंगात मात्र चार मुखलिंगें एकत्र संयुक्त झालेली दाखविली आहेत. मध्यकालीन चतुर्मुख लिंगें : गुप्तोत्तर काळांतील चतुर्मुख लिंगें विष्णुधर्मोत्तराच्या सामान्य आधारांवर घडविलेली दिसतात. पण त्यांत अलंकारांची बहुलता व साधारण अंकनांत रेखीवपणा जास्त दिसतो. अशा प्रकारची लिंगें उत्तरप्रदेश, राजस्थान, वगैरे भागांत आढळतात (चित्र ८८)
ङ) पंचमुख किंवा पंचास्य लिंगें : उत्तर भारतांत पंचमुख लिंगाची परंपरा बरीच जुनी दिसते. इकडील सर्वांत जुनें म्हणून प्रसिद्ध असलेलें भीटा लिंग (ल.सं.सं. एच् चित्रे ८९-९२) पंचास्य पद्धतींचेच आहे. याचा काळ ईसवी सनाच्या पूर्वी तिसऱ्या ते दुसऱ्या शतकांच्या जवळपासचा आहे. उत्खननाने हे सिद्ध झाले आहे कीं इ.पू. तिसऱ्या शतकांपासून सनाच्या सहाव्या शतकांपर्यंत भीटा येथे शैबांचे एक मोठे केंद्र होते व ते बुंदेलखंडातील कालिंजर केंद्राशी संबद्ध होतें. भीटालिंग लिंगभागांवर चतुर्मुख असून त्याच्या डोक्यावर शंकराची एक आनाभिप्रतिमा आहे (चित्र ९२). तिचा उजवा हात अभय मुद्रेत असून डाव्यांत घट आहे. तोंडाचा भाग आता तुटला आहे पण खांद्यावर झुलणारे केस, कानांतील कुंडलें व गळ्यातील दागिना अजून सुरक्षित आहेत. तसेंच शिवाचे जानवें, हातातील कंकणें आणि ऊर्ध्वलिंग ही स्पष्ट आहे. खालील मुखांत एक मुंडित व दुसरे स्त्रीमुख आहे (चित्र ९१). तिसरें पागोटें घातलेले असून (चित्र ९०). चौथे अघोर किंवा भयंकर आहे. चौथ्याची दाढी, मिशा, बाहेर डोकावणाऱ्या विकराळ दाढा आणि कपाळांवरील भालपट्ट नीट पाहतां येतो. शिवाची ही रूपें तत्पुरुष, वामदेव, अघोर व सद्योजात या नावांने व पांचवें ईशान या नावाने ओळखतात.
च) लिंग, अर्धनारीश्वर : मधुरेहून मिळालेल्या या कुषाण कालीन लिंगाच्या दर्शनी भागावर उभा ऊर्ध्वलिंगी द्विभुज अर्धनारीश्वर अंकित आहे. तूर्त हे शिल्प लंडन येथील व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्यूझियम मध्ये आहे. (रे.चि.शि. ३१). N.P. Joshi, Early forms of Siva, Discourses, fig. 27, 28, p.57
छ) पंचलिंग : एकाच योनिपीठावर पाच लिंगाचे एकत्र अंकन बऱ्याच ठिकाणी आढळते, पण विदिशा, मध्यप्रदेश येथे असल्या अशा शिल्पाची दोन वैशिष्ठ्यें आहेत. प्रथम म्हणजे मधोमध असलेल्या पाचव्या लिंगावर आकाशाकडे पहाणारे मानव मुख अर्थात् 'ईशान मुख' प्रत्यक्ष आहे. साधारणपणे शंकराचे हे मुख अदृश्य समजले जाते. (रे.चि. शि. ३२)
दुसरे म्हणजे चौकोनी शांळुकेच्या चारही टोकावर प्रत्येकी पांच लिंगाचा समूह दाखवला आहे. अर्थात् एकूण लिंगाची संख्या २५ होते. पंचवीस लिंगाचे अंकन 'वाराणसी पटावर' ही आढळते. ही संख्या सृष्टीला कारणीभूत असणाऱ्या २५ तत्त्वांची द्योतक होऊ शकते. दुसरे पञ्चास्य लिंग कुषाण काळांतील असून मथुरा संग्रहालयांत (सं.सं. १५.५१६) आहे, पण आतां त्याचे पांचवे व येथेही शिव प्रतिमा असणें अगदीच असंभव नाही पूर्णपणें खंडित झाले आहे. मध्यकाळांत पंचमुख लिंगें फारशी दिसत नाहीत. मात्र काशीकडे शंकरांच्या पिंडीवर घालण्यांची पितळी कवचें पंचमुखी दिसतात. विदिशा आणि खजुराहो येथे एकाच योनिपीठावर पाच लिंगांचा समूह असलेली पंचमुख लिंगे पाहावयास मिळतात. विदिशा येथे तर मधोमध असलेल्या पाचव्या लिंगावर आकाशाकडे तोंड करून शिवाचे ‘ईशान्’ हे मुख आहे.
झ) अष्टमुख लिंग : या प्रकाराचे हे एकमेव लिंग गुप्तकालीन असून मध्यभारतांत शिवना नदीच्या तटांवर मंदसोरला मिळाले व आज तेथेच पशुपतिनाथ या नांवाने पूजित होत आहे. हे लिंग सव्वा सहा फूट उंच असून याचा घेर अकरा फूट आहे. याला एकूण आठ तोंडे आहेत. चार मधोमध आणि चार त्यांच्या दीडफूट खाली. वरील चौकड्यांत एक रौद्र आणि तीन सौम्य आहेत. खालील चार थोडी अपूर्ण वाटतात.
शिवाच्या अष्टमूर्ती विषयी वाङ्मयीन पुरावे बरेच आहेत. कालिदासांने आपल्या शाकुंतलांच्या मंगल श्लोकांत अष्टमूर्तिशिवांचे स्मरण केले आहे. शैव तंत्रांप्रमाणें शिव, भैरव, श्रीकंठ, सदाशिव, ईश्वर, रुद्र, विष्णू आणि ब्रह्मा या शंकराच्या अष्टमूर्ती होत. कूर्मपुराणांत खालील प्रमाणें शिवाच्या अष्टमूर्तींची प्रतीकें व परिवार दिला आहे" : ‘कूर्मपुराण’ व ‘शिवतंत्र’ यांत त्यांची नावे सापडतात; पण त्यांत एकवाक्यता नाही. पेजेंग (इंडोनेशिया) येथेही एक अष्टमुखलिंग आहे.
अष्टोत्तरशत लिंग.
अष्टोत्तरशतलिंगामध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १०८ अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.
पाटेश्वर येथील अष्टोत्तरशत लिंग
सहस्त्रलिंग
सहत्रलिंगांमध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १००० अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.
पाटेश्वर येथीलच अजून एक सहस्त्रलिंग
कोटीलिंग
हा प्रकार पण सहस्त्रलिंगासारखाच पण यातील अयोनीज लिंगांची संख्या हजारापेक्षाही अधिक असते तेव्हा त्याला कोटीलिंग म्हणतात.
पाटेश्वर येथील कोटीलिंग
शिवलिंगांचे ढोबळमानाने काही प्रमुख प्रकार आपण बघितलेच. पाटेश्वरला यापेक्षाही अधिक प्रकारची लिंगे आहेत पण ती याधीही लेखात येऊन गेलेलीच आहेत आणि त्यातील बरीचशी तांत्रिक पंथाशी संबंधित आहेत
दिक्पालरूपी शिवलिंग.
हे ही शिवलिंग पाटेश्वर येथीलच आहे. यात शाळुंकेवरील शिवलिंगाभोवती चक्र, चांदणी, बदाम यांच्या आकृत्या आहेत. एकूण दहा चिन्हे यावर कोरलेली आहेत. यातील आठ चिन्हे म्हणजे अष्टदिक्पालांचे प्रतिक असावे तर उरलेली दोन सूर्य आणि विष्णूची प्रतिके असावीत.
मूर्तिलिंग किंवा विग्रहलिंग (रे. चि. सत्तावीस २५, २८, ३१)
मुखांचे ऐवजी लिंगावर किंवा लिंगाला चिकटलेली संपूर्ण शिवप्रतिमा कोरलेली असली तर तिला आपण विग्रहलिंग किंवा मूर्तिलिंग असे म्हणू, हा शब्द अर्थातच जुना नाही. या प्रकारचे मथुरेहून मिळालेले एक लिंग डॉ. कुमारस्वामी यांनी प्रकाशित केले आहे. येथे शिव चतुर्भुज असून त्याचे जवळ कोणतेही आयुध नाही. मधुरेहून मिळालेले कुषाणकाळचेच दुसरे मूर्तिलिंग सध्या अमेरिकेंत फिलाडेल्फिया येथे आहे. येथे पागोटें घातलेला शंकर द्विभुज आहे. त्याचा उजवा हात अभय मुद्रेत दिसतो, डाव्यांत घट आहे (चित्रे ९३-९४) जवळ जवळ अशाच प्रकारचे एक कुषाणकालीन लाल दगडाचे शिवलिंग भरतपूर (राजस्थान) पासून ८ मैलाचे अंतरावर असलेल्या गामरी गावांत आढळल्याची श्री. रत्नचंद्र अग्रवाल यांनी नोंद केली आहे. हे लिंग ४४ सें.मी. उंच व ४२ सें.मी. रुंद असून याच्या समोरच्या व मागच्या भागावर कुंभोदरगण किंवा यक्ष दिसतो. दोन्ही बाजूस अभयमुद्रेत उभा असलेला हा कोण असावा गण, यक्ष कीं स्वतः शिव? अग्रवालांनी यक्ष म्हटलेल्या मूर्तीत धोतर व उपरणें दिसतें. मुगुटाबद्दल कांहीच सांगवत नाही. भीटा येथील सर्वतोभद्रिका व फिलाडेल्फिया येथील शिवलिंगाला विचारात घेता हा शिव असण्याची शक्यता जास्त आहे. दक्षिण भारतांकडे लक्ष दिल्यास या प्रकारचे एक फार जुनें आणि विशाल विग्रहलिंग तेथें ही आढळते. ही प्राचीनतम प्रतिमा तामिळनाडूच्या रेणुगुंठा नामक स्थानाजवळ एका मंदिरांत विद्यमान आहे. परशु रामेश्वर या नांवाने प्रसिद्ध असलेले हे पांच फूट उंचीचे लिंग असून त्याच्या दर्शनी भागांवर शिवाची द्विभुज स्थानक प्रतिमा आहे (रे.चि. सत्तावीस २५). उजव्या हातांत शिवाने खाली तोंड करून लोंबणाऱ्या मेंढ्याच्या मागच्या तंगड्या धरल्या आहेत, व डाव्यात कलश असून याच हाताने त्याने आपला खांद्यावर असलेला भला मोठा परशु सावरला आहे. शिवाच्या मस्तकांवर विशिष्ट प्रकारचें पागोटें असून गळा, हात, वगैरे भागांवर निरनिराळे दागिने घातले आहेत. नेसूचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आहे, पण ऊर्ध्वलिंग व जानवें दोन्ही नदारत आहेत." शंकर एका राक्षसाच्या म्हणजे अपस्मार पुरुषाच्या खांद्यावर उभा आहे. श्री. गोपीनाथराव यांच्या मते ही प्रतिमा इसवीसनापूर्वी पहिल्या शतकांतील असावी
नांद व चौमा येथील शिवलिंगें : विग्रह लिंगाच्या प्रसंगाने मध्यकाळांकडे वळण्याच्या अगोदर उत्तर भारतातील दोन जुन्या शिवलिंगांचा धावता आढावा घेणे आवश्यक आहे. ही लिंगे वरच्यापेक्षा थोडी भिन्न आहेत कारण येथे एकटा शंकरच कोरलेला नसून अन्य प्रतिमा ही उत्कीर्ण आहेत. प्रथम म्हणजे राजस्थानाच्या नांद गावांत असलेले लिंग. पुष्कर क्षेत्रांजवळील हे र्तिमा श्री. रत्नचंद्र अग्रवाल यांनी शोधून काढले (रे.चि. सत्तावीस २६). त्यांच्या मताप्रमाणें याच्यात विष्णु, शिव आणि ब्रह्म भागा व्यतिरिक्त एक चौर शोधही आहे. त्यांनी खालच्या भागाला विष्णू असें म्हटले आहे ज्यावर विष्णू, एकानंशा बलदेव आणि वासुदेव अंकित आहेत. त्याच्च्यावर ब्रह्मभाग आहे जेथे चारी बाजूला अभय मुडेंत असलेल्या मुकुटधारी द्विभुजमूर्ती दिसतात, याच्यास अर्थात् तिसरा भाग त्यांच्या मते सौरभाग आहे. येथे पुनः दोन हाताच्या मूर्ती आहेत ज्याच्यात एक टोकदार टोचे घातलेली व कमळ घेतलेली आहे. सर्वाच्या वर शिवभाग आहे. येथे चारी बाजूला द्विभुज लकुलीशाचे दर्शन घडते. याप्रमाणें या लिंगावर लहान मोठ्या अशा एकूण वीस प्रतिमा आहेत. हे लिंग कुषाणकालीन आहे. दुसरे म्हणजे उत्तर प्रदेशातील आगरा जिल्ह्यात असलेल्या चौमा गावातील लिंग होय. चौमा हा चतुर्मुखाचा अपभ्रंश असू शकतो. या लिंगावर वरच्या बाजूला कुषाणकालीन माळा नसून एक कातडें गुंडाळल्यासारखें दिसत आहे व त्याला एका बाजूला गाठ मारली आहे (रे.चि. सत्ताविस ३०). विशेष म्हणजे लिंगाच्या पायथ्याकडे चार दिशांना चारपैकी प्रत्येकी एक पाण्याची सुरई किंवा उंचमानेचा कलश (चित्र ९५) एक यक्ष, एक बसलेला सिंह आणि एक स्त्रीचे मुख कोरलेले आहे. या चारी वस्तूंचा शंकराशी फार जवळचा संबंध आहे हे नव्याने सांगावयास नको.
कायलिंग, परशु रामेश्वर मंदिर, गुडीमल्लम (आंध्र प्रदेश).
गुडीमल्लमच्या परशुरामेश्वर मंदिरात एक सुंदर कायलिंग आहे. इ. स. पूर्व तिसऱ्या शतकातील ही मूर्ती असून पुरुष लिंग अकरातील देशातील पहिली मूर्ती आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात ही मूर्ती आहे. स्थान महात्म्य नुसार परशु रामाने आई रेणुकेला मारल्या नंतर तो प्रायश्चित करण्यासाठी तिथे गेला होता. प्रायश्चित करीत असताना परशुराम रोज एक दैवी फुल शिवलिंगावर अर्पण करीत असे. या दैवी फुलाचे रक्षण करण्यासाठी चित्रसेन नावाचा यक्ष सोबत ठेवलेला होता. या यक्षास रोज एक प्राणी आणि भांडे भर ताडी द्यावयाचे कबूल करण्यात आले होते. कारण रोज एकच दैवी फुल उगवत असे. ते फूल परशुराम लिंगावर अर्पण करीत असे. एक दिवस यक्ष चित्रसेनलाही भक्ती करावीशी वाटली. ते दैवी फुल त्याने शिवाला अर्पण केल्याने दोघात घनघोर युद्ध झाले. शेवटी शिव प्रसन्न होऊन दोघांनाही आपल्यात सामावून घेतले. जवळपास पाच फूट उंचीच्या शिवलिंगाच्या तीन चतुर्थांश भागात अपस्मार पुरुषावर उभी द्विभुज शिवप्रतिमा आहे. तिच्या उजव्या हातात बकऱ्याचे (किंवा मेंढ्याचे) मागचे दोन पाय व डाव्या हातात कलश व परशू आहेत. डोक्यावर मोठे पागोटे आहे व हार, मेखला इ. अलंकार दिसतात. या शिवलिंगाच्या वरील भागास मानवी शिस्नमण्याचा आकार दिलेला स्पष्टपणे दिसतो. टी. गोपीनाथ राव यांच्या मते, हे कायलिंग इ. स. पहिल्या शतकातील असावे, मात्र इतर विद्वानांच्या मते त्याचा काळ आठवे-नववे शतक इतका पुढचा आहे. स्थानिक भाषेमध्ये पल्लव म्हणजे युद्धभूमी तर गुड्डी म्हणजे मंदिर होय. या प्रदेशावर पल्लव, गंगपल्लव, बना, चोल यांच्या राजवटी होत्या. मंदिराच्या बाह्य अंगावर यासंदर्भात शिलालेखही कोरलेले आहेत. अगदी असेच एक शिल्पपट कुशान काळातील इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असून ते मथुरा संग्रहालयात ठेवण्यात आलेले आहे. प्रस्तुत मूर्तीत शिवलिंग, परशुराम आणि यक्ष चित्र सेन दिसून येतात.
लेण्यातील शिवलिंग :-
हरवळे (साखळी, गोवा) येथील गुहांतील वैशिष्ट्यपूर्ण आकाराची शिवलिंगे. बघायला मिळतात. कदाचित ती तांत्रिक पूजेशी संबंधित असू शकतील असे वाटते. गुहेतील शिवलिंगे अगदी आदिम काळातील म्हणजे दिसतात. ह्यांचा काळ नक्की कोणता ते समजत नाही. पण काही अभासकांच्या मते ही लिंगे तांत्रिक पंथातील वाटत नाही. ही शिवलिंगांच्या प्राथमिक अवस्थेतील दिसतात. पुरुष शिश्नाचा आकार असलेली. बहुधा २००० वर्षे जुनी.
हरवाळ्याची लेणी ही जांभा दगडाच्या एका लहानशा टेकडीत कोरलेली आहेत. ह्या लेण्यांमध्ये तीन प्रार्थना कक्ष आहेत. तिन्ही कक्षांमध्ये शिवलिंग सदृश्य लिंग आढळून येते. लिंगांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर सहाव्या - सातव्या शतकातला शिलालेख आढळतो.
लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील पहिलं लिंग
लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील दुसरं लिंग
लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील तिसरं लिंग
लेण्यांमधील प्रार्थना कक्षातील चौथं लिंग
फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे लेण्यांमधील तिन्ही कक्षांमध्ये प्रार्थनेसाठी लिंग आहेत. मूर्ती पूजेमध्ये लिंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला आपल्या आराध्य देवतेची अचूक मूर्ती घडवता येत नसेल तर तिला लिंग स्वरूपात पूजलं जातं. मूर्तिशास्त्राचं हे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. प्राचीन काळी अनेक देवळांमध्ये तांदळा स्वरूपामध्ये बऱ्याचशा देवांचे पूजन केलं जातं.
ह्या लिंगांचं नीट निरीक्षण केल्यास असं आढळून येतं की ही लिंग तिथे आढळणाऱ्याच दगडांमध्ये घडवली गेली नाहीयेत. लिंगांसाठी लागणारा दगड हा दुसरीकडून आणून वैशिष्ट्यपूर्णरित्या घडवला आहे. चित्र क्रमांक चार मध्ये लिंगाच्या मध्यभागी पडणारा प्रकाश हा व्यवस्थित परावर्तित होताना दिसतो. यावरून लिंगाच्या दगडाची आणि त्याला घासून गुळगुळीत केलेल्या पोताची ( texture ) कल्पना यावी.
जावा (इंडोनेशिया) येथे सहाव्या-सातव्या शतकातील एक चतु:कायलिंग सापडले. मध्यभागी लिंग असून त्याच्या चारही बाजूंस ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य या चार देवता आहेत. या सर्व प्रतिमा चतुर्भुज आहेत. ब्रह्मदेव त्रिमुखी असून एका हातात कमंडलू आहे. विष्णूच्या हातात पृथ्वी आणि शंख आहेत. शंकर त्रिनेत्र, जटामुकुटधारी असून त्याचा हात वरदमुद्रेत आहे, तर सूर्याच्या मागच्या दोन हातात कमळे असून पायात बूट आहेत.
राजस्थानातील पुष्करजवळ नांद या गावी इ. स. सु. तिसऱ्या शतकातील एक कुषाणकालीन कायलिंग आहे. त्यावर वरपासून खालपर्यंत कोरलेल्या प्रतिमांमुळे ते वेगळे व अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यावर ब्रह्म, विष्णू व शिव भागासह एक सौर भागदेखील आहे. विष्णू भागावर विष्णू, एकानंशा बलदेव आणि वासुदेवाचे अंकन आहे. ब्रह्मभागाच्या चारही बाजूस मुकुटधारी द्विभुज प्रतिमा आहेत. त्याच्यावर सौरभाग असून तेथे टोपी घातलेली व हातात कमळ घेतलेली प्रतिमा दिसते. त्याच्यावर शिवभाग आहे तेथे द्विभुज लकुलिशाची प्रतिमा कोरली आहे. अशा एकूण वीस लहानमोठ्या प्रतिमा आहेत.
मथुरा (उत्तर प्रदेश), भरतपूर (राजस्थान), गुडीमल्लम (जि. तिरुपती, आंध्र प्रदेश), जावा (इंडोनेशिया) इ. ठिकाणी अशी कायलिंगे मिळाली आहेत. लखनौ वस्तुसंग्रहालयात इ. स. पू. सु. पहिल्या शतकातील एक मूर्तिलिंग आहे, मात्र ते बरेच भग्न झाले आहे. त्याच्या माथ्यावर मानवी ऊर्ध्वांग दिसते. त्याच्या डाव्या हातात घट असून उजवा हात अभयमुद्रेत आहे. खांद्यावर वस्त्र आणि कानात कुंडले आहेत. या प्रतिमेच्या खालच्या भागात, चार उपदिशांना चार मुखे आहेत. इतिहास संशोधक ग. ह. खरे (१९०१-१९८५) यांच्या मते ती स्त्रीमुखे असावीत. त्याखाली एक शिलालेख आहे.
सर्वतोभद्रलिंगें (चित्रं ९६, ९७, ९८) :
गुप्तोत्तर काळांपासून विग्रह लिंगाचा एक नवा प्रकारसमोर आला. हा म्हणजे वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य, शैव वगैरे निरनिराळ्या मतांच्या एकीकरणाच्या दिशेकडे टाकलेले महाविलयन पद्धतीचे पाऊल होते. या लिंगाच्या चारी बाजूला प्रतिमा असल्यामुळे यांना आपण 'सर्वतोभद्र लिंग' अशी संज्ञा देऊ.
अशी लिंगे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान वगैरे भागांत एकाधिक आढळतात. रामनगर (वाराणसी) येथील संग्रहालयांत असलेल्या लिंगावर चारी बाजूला क्रमाने सूर्य, गणपती, शिवपार्वती आणि वराह कोरलेले आहेत (चित्र ९६). म्वाल्हेरच्या संग्रहालयांतील एका सर्वतोभद्र लिंगावर विष्णू, शिव, ब्रह्मा, आणि सूर्य दिसतात आणि दुसऱ्यावर फक्त शिव, ब्रह्मा, आणि विष्णूच आढळतात."
यंत्रलिंगें :
मध्यकाळांत शिवलिंगाचा एक नवा प्रकार रूढ झालेला दिसतो. तो म्हणजे लिंगाच्या शीर्षभागांवर श्रीयंत्रासारखी यंत्र कोरणें, हा प्रकार वाराणसीकडे जास्तआढळतो. तेथे अन्नपूर्णेच्या मंदिरात व शिंद्यांच्या बालाजी मंदिरात अशो शिवलिंगे आहेत. (र.चि. २८, ३६)
याचाच अन्य प्रकार म्हणजे शीर्षभागांवरील यंत्रांबरोबरच लिंगाच्या चारी बाजूस शिव प्रतिमा ही कोरणें. लखनऊ संग्रहालयांत असलेल्या नेपाळी कलेच्या एक लिंगावर हा प्रकार आढळतो. येथे चारीकडे घट व माळा घेतलेल्या शंकराच्या आवक्ष प्रतिमा आहेत. (ल.सं.सं. ७०६ चित्र ९५)
स्थाणुलिंगें :
विशेष कोणतेही अलंकरण नसलेले साधेसुधे लिंग तयार करणें सर्वात सोपे असे. कुषाण काळातील विशाल खांबाच्या आकाराची लिंगे म्हणजे खर्या अर्थाने शिवाची स्थाणुरुपे होत. या प्रकारची बरीच लिंगे आपल्या माहितीत आहेत. (चित्र ९९). प्राचीन लिंगाचे एक उदाहरण म्हणून मथुरेहून मिळालेल्या एक शिलापट्टाकडे बोट दाखविता येईल. ज्यावर पंख असलेले पशू शिवलिंगाचे पूजन करताना दाखविले आहेत, कुषाणकालीन लिंगांची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे सांगता येतील :
मांतगेश्वर मंदीर
१) लिंगाग्रभागावर गुंडाळलेली दुहेरी किंवा एकेरी माळ. तिला आपण मार्गे संयोजन बंध किंवा ब्रह्मसूत्रांचे प्रारंभिक रूप असे म्हटले आहे. ही निरनिराळ्या अलंकाराने सुशोभित असते. काही नमुन्यांत हिला चार मोठाली फुलें व गोंडेदार टोकें ही आहेत. (चित्र ९९)
२) काही ठिकाणी माळेच्या ऐवजी फक्त कमळाच्या पाकळ्यांची ओळ दिसते.
३) एका शिवलिंगावर एका बाजूला अष्टदल कमळ कोरलेले आहे." याचा अभिप्राय नक्की सांगवत नाही. शिवाची अष्टमूर्ती किंवा त्याने घातलेली आठफुले याचा हा प्रतीकात्मक संकेत असू शकतो.
४) काही लिंगाचा अगदी खालचा भाग विशेष लक्ष पुरविण्यासारखा असतो. एकात (म.सं.सं. १५, ६५२) या जागी कदंबपुष्प आणि पानांचे अलंकरण आहे तर दुसऱ्यात पायथ्याचा एकीकडचा दगड वरून लोंबणाऱ्या माळेने दोन भागात विभक्त केला आहे. चौमा लिंगाच्या पायथ्यावर असलेली सिंहादि अलंकरणें आपण पाहिली आहेतच तसेच पायथ्याशी दोन गण असलेल्या मुखलिंगाचा उल्लेख मागे आला आहे.
५) काही शिवलिंगावर लेख ही कोरलेले असतात. उदाहरण म्हणून मथुरेच्या जटेश्वर लिंगाचे नांव घेता येईल. गुप्तकाळांत साधारण लिंगाच्या आकारात ही बदल झाला. त्यांचे मूळ अर्थात् 'शिश्न' रूप बाजूला जाऊन त्याला छान, गुळगुळीत व गोंडस अशा खांबाचे रूप मिळाले. या काळात त्रिभागात्मक लिंगें ही बरीच तयार झाली. त्यांचे आकार लहान मोठे आहेत. करमदंडा (जिल्हा फैजाबाद, उत्तर प्रदेश) येथें गुप्तकाळाचे (सन् ४३६ चे) एक त्रिभागात्मक अभिलिखित लिंग मिळाले आहे. (ल.सं.सं.ओ. ५)
मध्यकाळांत दिसून पडणारे धारालिंगादि प्रकारांचे विवेचन वर झालेच आहे. स्मृतिलिंगें, समाधिलिंगें, वगैरे प्रकारांचा मूर्तिविज्ञानांशी सरळ संबंध नसल्यामुळे आपणास तिकडे वळण्याचे कारण नाही.
लिंगपंचक : उमामहेश्वर मूर्तीच्या एका प्रकारांवर दिसणाऱ्या पांच शिवलिंगाची आपण मागें बघीतली आहे. काहीसा तशातलाच हा दुसरा प्रकार आहे. यांत एकामेकांना लागलेले चार गोळे व त्यांच्यावर ठेवल्या सारखा पांचवा गोळा असे हे लिंग पञ्चक एकाच पीठांवर स्थापन केलेले दिसते. विदिशेच्या (मध्यप्रदेश) संग्रहांलयांत याचे काही नमूने ठेवलेले आहेत. कदाचित पंचमुख लिंगाचे हे लघुसंस्करण असावे.
इथं पिंडीवर पिंडी आहेत, वेगळाच प्रकार
पाटेश्वर येथील तांत्रिक पंथाची शिवलिंगे
शिवलिंग असलेली काही शिल्पें : भारतीय कर्लेत अशी बरीच शिल्पें मिळतात ज्याचा शिवलिंगाशी प्रत्यक्ष संबंध असतो. कांही ठळक प्रकार खाली दिलेले आहेत. १) लिंगाला मस्तकांवर धारण करणारा भक्त. भारतकला भवन, वाराणसी (सं.सं. २२३) येथे असलेली ही जुनी मूर्ती कदाचित भारशिव वंशाशी संबंधित असेल. २) लिंगोद्भव व लिंगारूढ प्रतिमा. यांची विवेचनें मागें झाली आहेत. (रे.चि. एकोणतीस ४७) ३) लखनऊ संग्रहालयांतील एका शिलापट्टांवर (सं.सं. बी. १४१) पिंपळाच्या झाडांखाली स्थापन केलेले शिवलिंग दाखवून एक यक्षकथा चित्रित केली आहेत पण अद्यापि तिची ओळख पटलेली नाही. हा शिलापट्ट कुषाण काळातील आहे (चित्र ८४). ४) वैवाहिक मूर्तीतील एका प्रकारांत पार्वतीच्या हातांत शिवलिंग दिसते. २ ५) असेच लिंग तपस्विनी पार्वतीच्या हातांत व सद्योजात मूर्तीच्या जवळही आढळते. ६) विष्णूच्या पाठशिळेवर असलेल्या दश अवतारांत काही ठिकाणी कूर्मांच्या पाठीवर मंदराचल म्हणून ब्रह्मसूत्राने शोभित असलेले शिवलिंग दिसते (र.चि. एकोणतीस ५०). ७) वाराणसीला बऱ्याच ठिकाणी अलिकडच्या शिल्पात दोन नागांच्या मध्यें किंवा नंदीच्या पाठीवर ही लिंग आढळते (रे.चि. अठ्ठावीस ४०, ४६). असेच लिंग नागपूरला टेकडीवरच्या गणेशमंदिरांत आहे. ८) दक्षिण भारतांत मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शंकर शिवलिंगातून प्रगट झालेला दिसतो. ९) महाराष्ट्रांत विठ्ठल आणि लक्ष्मी यांच्या मस्तकावर शिवलिंग आढळते. १०) शिवलिंगाची पूजा दृश्यें ही कुषाण काळांपासून (चित्र १००) आधुनिक काळांपर्यंत मिळतात. ११) बसवेश्वरांसारख्या नंदीच्या गळ्यांतही ते दिसते. १२) विष्णूच्या पाठशिळेवर असलेल्या दशअवतारांत काही ठिकाणी मत्स्याच्या पाठीवर शिवलिंग दिसते (रे.चि. एकोणतीस ४९).
1) थिबा राजवाडा
ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचे वास्तव्य असलेला ‘थिबा पॅलेस’ हा भव्य ऐतिहासिक राजवाडा रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. इ.स. १८८५ सालापासून म्हणजे सुमारे १३२ वर्षांपासून रत्नागिरीची नाळ ब्रह्मदेशाशी म्हणजेच आताच्या ‘म्यानमारशी’ जोडलेली आहे.
थिबा राजाने ब्रह्मदेशावर सात वर्षे राज्य केले व असे राज्य करणारा तो शेवटचा राजा होता. त्या वेळच्या ब्रह्मदेशावर इंग्रजांनी कब्जा मिळवून तिथे सात वर्षे राज्य करणाऱ्या थिबा राजाचा सगळा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. ' थिबा ' हा ब्रह्मदेशाचा शेवटचा राजा. ब्रह्मदेशाचे राजे ' मिडॉन ' यांच्या ४६ पुत्रांपैकी हा एक . थिबा हा एक धार्मिक प्रवृत्तीचा बौद्ध धर्मीय , सरळमार्गी राजकुमार होता . त्यामुळे त्यास आर्थिक व्यवहार कधी जमलाच नाही.
मिडॉन राजाच्याअनेक राण्यांपैकी राणी 'अलनंदा ' ही अत्यंत महत्वाकांक्षी होती. संपूर्ण ब्रह्मदेशाची सत्ता फक्त आपल्याच हातात असावी, या साठी आपल्या तालावर चालणारा राजा असावा, म्हणून थिबा हाच राजा होणे तिला इष्ट वाटत होते.हे उद्दिष्ट समोर ठेवून, ते साध्य करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने कट रचून तिने इतर राजकुमारांची हत्या करविली. त्यातून जे राजकुमार वाचले, त्यांना तिने राज्याबाहेर पळवून लावले, आणि थिबास राज्याभिषेक करुन राज्यकारभार स्विकारण्यास भाग पाडले.
त्यानंतर तिने आपल्या दोन कन्या ' सुपायग्वी ' व ' सुपायलती ' , म्हणजेच थिबाच्या सावत्र बहिणी यांच्याशी त्याचा विवाह लावून दिला.एवढा आटापिटा करुनही ब्रह्मदेशाची सत्ता आपल्याच हातात ठेवण्याचा राणी अलनंदा हिचा हेतू तिचीच महत्वाकांक्षी कन्या सुपायलती हिने धुळीस मिळवला. तिने आपली आई अलनंदा हिस राज्याबाहेर हुसकावून लावून , स्वत:स ' महाराणी ' म्हणून घोषित केले. थिबावर तिची पकड पहिल्यापासूनच असल्यामुळे , थिबाच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णयही ती स्वत:च घेऊ लागली. थिबाच्या राज्यकारभारात नको तितकी ढवळाढवळ केल्याची शिक्षा तिला, थिबाला आणि पर्यायाने संपूर्ण ब्रह्मदेशालाच भोगावी लागली. सुपायलतीच्या कुटिल कारवायांमुळे राजा थिबा ब्रिटिशांच्या रोषाला कारणीभूत ठरला , आणि ब्रिटिशांनी ब्रह्मदेशावर आक्रमण करुन, थिबाचा पराभव करून त्यास अटक केली.२८ नोव्हेंबर, १८८५ ही रात्र ब्रह्मदेशाच्या इतिहासातील पहिली पारतंत्र्याची रात्र ठरली. ब्रिटिशांनी थिबा व त्याच्या कुटुंबियांना ' कॅलिन ' बोटीने १५ डिसेंबर,१८८५ रोजी मद्रास येथे आणले. आणि तेथून पुढे रत्नागिरी येथे आणले. थिबास प्रथम रत्नागिरीला अक्कलकोटचे दिवाण रावबहादूर सुर्वे व रावबहादूर विष्णू फडके यांचे बंगले भाड्याने घेऊन तेथे ठेवले. परंतु काही वर्षांनंतर त्यांना ती निवासस्थाने अपुरी पडु लागल्याने, थिबाच्या पसंतीने ब्रिटिशांनी या ' Palace ' चे बांधकाम १९०६ साली सुरु केले. सुमारे सत्तावीस एकर आणि साडेअकरा गुंठ्यांच्या विस्तीर्ण जागेवर त्याकाळात एक लाख सदतीस हजार रुपये खर्च करून हा प्रशस्त, ब्राह्मी पद्धतीचा, तीन मजली राजवाडा थिबा राजा व त्याच्या कुटुंबीयांच्या वास्तव्यासाठी रत्नागिरीतील सड्यावर म्हणजे सध्याच्या शिवाजीनगर भागांत बांधला गेला.१३नोव्हेंबर, १९१० रोजी थिबा या राजवाड्यात रहायला आला. रत्नागिरीत राजा आणि त्यांचे कुटुंब ३१ वर्ष ब्रिटिश शासनाच्या नजरकैदेत राहिले. नवीन बांधलेल्या राजवाड्यात नोव्हेंबर १९१० मध्ये गृहप्रवेश करताना म्यानमार वरून पाच बौद्ध भिक्खूंना बोलविण्यात आले होते. बौद्ध पद्धतीने विधी झाल्यावर थिबा राजे भावूक झाले. दुःख सहन करण्याची सहनशीलता कुटुंबाला प्राप्त व्हावी यासाठी भिक्खूंकडे त्यांनी आशीर्वाद मागितला.
याच राजवाड्यात ब्रिटिशांनी थिबाला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नजरकैदेत ठेवले. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत राजा थिबाला अशी आशा वाटत असे की, आपले एकनिष्ठ सैनिक आपला शोध घेत घेत एक ना एक दिवस रत्नागिरीस नक्की पोहचतील, आणि ब्रिटिशांच्या तावडीतून आपली निश्चित सुटका करतील. या वेड्या आशेपोटी आपल्या खोलीच्या खिडकीतून समुद्राच्या दिशेने , तासनतास आपली नजर लावून, आपलली सुटका करण्यासाठी येत असलेल्या सैनिकांनी भरलेल्या जहाजांची वाट पाहत बसत असे. याच ठिकाणी वयाच्या ५८व्या वर्षी, १६ डिसेंबर १९१६ रोजी थिबाने आपल्या आयुष्यातील अखेरचा श्वास घेतला.
थिबा राजाला एकूण चार मुली होत्या. भारतात आल्यावर त्या चारी मुलींचे शिक्षण काही योग्य झाले नाही. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी फिया ही राजवाड्यात सेवेत असलेल्या गोपाळ सावंत नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. तिला त्याच्यापासून २६ नोव्हेंबर १९०६ रोजी मुलगी झाली. तिचे नाव टुटू होते. पाहिले महायुद्ध चालू असतानाच थिबा राजे यांचे १९१६ मध्ये निधन झाले. त्यानंतर ब्रिटिशांनी ब्रम्हदेशाच्या या राजघराण्याला मायदेशी जाण्याची परवानगी दिली. सर्वजण म्यानमारला गेले. पण थोड्याच दिवसांनी फिया आपली मुलगी टुटूला घेऊन रत्नागिरीला परत आली. व तेथेच आयुष्यभर राहिली. ३ जून १९४७ रोजी तिचे निधन झाले. तिची मुलगी टुटूने शंकर पवार यांचेशी लग्न केले. तिला ४ मुली आणि ७ मुलगे झाले. २४ ऑक्टोबर २००० मध्ये टुटू सुद्धा गेली. १६ डिसेंबर २०१६ मध्ये थिबा राजांना जाऊन शंभर वर्षे झाली. त्या स्मृतिदिनी दिवशी म्यानमारचे उपराष्ट्रपती यु मंत स्यू आणि सैन्यदल प्रमुख यांनी रत्नागिरीला येवून थिबा राजाच्या समाधीला भेट दिली. त्यावेळी टुटूच्या सर्व मुलांची आणि म्यानमारवरून आलेल्या सर्व नातेवाईकांची गळाभेट झाली. थिबा राजाचे म्यानमारमधील वंशज आज उच्चशिक्षित आहेत. मात्र रत्नागिरीतील त्यांचे वंशज मोलमजुरी करीत आहेत.
अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या `थिबा पॅलेस` मधे तळमजल्यावर संगमरवरी नृत्यागृह आहे. पॅलेसच्या उंच गच्चीवरून समोरच्या सागराचे अथांग दर्शन घडते. राजवाड्याच्या छतावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेल्या पट्ट्या लावल्या असून, खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसवलेल्या आहेत. राजवाड्याच्या आतील भागात पुरातन वस्तू संग्रहालय आहे. तळमजल्यावर असलेल्या प्राचीन मूर्ती सुंदर असून अनेक कलारसिकांसाठी वरच्या मजल्यावरीलं चित्रप्रदर्शनाचं नेहेमीच आकर्षण राहिलं आहे. सोमवार सोडून इतर दिवशी ‘थिबा पॅलेस’ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो.
रत्नदुर्ग उर्फ भगवती किल्ला, रत्नागिरी रत्नागिरी शहरात रत्नागिरी बंदराजवळ रत्नदुर्ग किंवा भगवती किल्ला १२व्या शतकापासून उभा आहे. रत्नागिरीच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर सुमारे १२११ मीटर लांब व ९१७ मीटर रुंद असणारा हा अवाढव्य किल्ला १२० एकरांवर पसरला आहे. त्याच्या बालेकिल्ल्याला ९ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण २९ बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह असल्याने हा परिसर खूपच नयनरम्य दिसतो. पायथ्यापासून १०० मीटर उंचीवर असलेला रत्नदुर्ग चढायला सोपा असून वाहनमार्ग थेट भगवतीच्या मंदिरापर्यंत जातो. रत्नदुर्ग किल्ल्याचा दुसरा भाग म्हणे दीपगृह. किल्ल्याच्या उजवीकडचा उतार थेट कोळी वस्तीतून भगवती बंदराकडे जातो, तर डावीकडचा रस्ता थेट दीपगृहाकडे जातो. या रस्त्यावर डाव्या हाताला एका छोट्या घुमटीत रतनगिरी बाबांची समाधी आहे व त्यांच्यावरून या किल्ल्याला रत्नदुर्ग हे नाव पडले असावे असे स्थानिक सांगतात. दीपगृहावर जाण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. दीपगृहाशेजारील बुरुजावर चार तोफा ठेवल्या असून त्यापैकी दोन तोफा ४ फूट लांबीच्या तर दोन तोफा अंदाजे १२ फूट लांबीच्या आहेत.
हे दीपगृह बघायला रुपये १०/- ( दहा फक्त ) फि आहे तर कॅमेरा फि रुपये २५/- आहे.
गडाचा तिसरा भाग म्हणजे भगवती देवीचे मंदिर. गडाच्या या बालेकिल्ल्यात नूतनीकरण केलेली भक्कम तटबंदी असून त्यात अकरा बुरुज बांधलेले आहेत. गडाचा हा परिसर समुद्रापासून सुमारे २०० फूट उंचीवर आहे. मंदिरापर्यंत गाडीने जाता येते व तिथून पायऱ्या चढून दरवाजाजवळ पोहोचता येते. भगवती मंदिराचा परिसर ही गडावरील सगळ्यात मोठी वास्तू असून मंदिर परिसराचा दरवाजा सकाळी ८ ते संध्या.६ वाजेपर्यंत उघडा असतो.
रत्नदुर्ग हा बहमनी काळात बांधला गेला आहे. त्यानंतर पुढे इ.स.१६६० पर्यंत तो आदिलशाहीत होता. १६७० च्या सुमारास शिवाजीमहाराजांनी कोकणातील अनेक किल्ले स्वराज्यात आणले त्याचबरोबर हा किल्लादेखील स्वराज्यात सामील झाला. १७५५ मधे रत्नदुर्ग आंग्रें यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. १९५० मधे भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन १९८९ मधे या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. अनेक शतकं रत्नागिरी परिसराचा राखणदार व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याला भेट दिल्यावर एखाद्या जाणकार बुजुर्गाला भेटल्याची अनुभूती आपल्याला येते. हा किल्ला त्याच्या उंचीवरून दिसणाऱ्या मोहक परिसरासाठी तेवढाच प्रसिद्ध आहे.
लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी
भारतीय असंतोषाचे जनक अशी बिरुदावली धारण करणारे स्वातंत्र्यसंग्रामाचे अध्वर्यू लोकमान्य टिळक यांचा दीडशे वर्षांपूर्वी १८५६ मधे रत्नागिरीत जन्म झाला. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती भागात टिळक आळीत हे टुमदार कोकणी घर असून जन्मानंतर लो. टिळकांचे या घरांत सुमारे १० वर्षे वास्तव्य होते.
टिळकांचे मूळ गाव दापोलीतील चिखलगाव हे होते. त्यावेळी लोकमान्यांचे वडील रत्नागिरीत शिक्षक म्हणून कामाला होते. इंदिराबाई गोरे यांच्या मूळच्या घरांत टिळक कुटुंब भाड्याने राहात होते. रत्नागिरीतील टिळकजन्माची ही वास्तू महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याने जतन केली असून, तिला स्मारक म्हणून घोषित केले आहे.
बाल गंगाधर टिळकांचे काही वैयक्तिक सामान जसे की पगडी, उपर्णा आणि पेन येथे काही जुन्या फोटोंसह प्रदर्शन देखील आहेत. दुर्दैवाने, पर्यटक हे ठिकाण वगळतात परंतु अशा ठिकाणी जरुर भेट द्या.
सोमवार वगळता अन्य दिवशी हे स्मारक पर्यटकांसाठी खुले असते. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान आठवत या नरकेसरीच्या स्मृतीस्मारकातून केलेली भटकंती नक्कीच स्फूर्तिदायी ठरते.
बाहेरील आवारात लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. दरवर्षी या ठिकाणी टिळक जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक
प्रखर क्रांतिकारक, सेनानी, विचारवंत, प्रभावी लेखक व कवी अशा अनेक बिरुदावली मिरविणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रत्नागिरीचं एक अनमोल रत्न. रत्नागिरी शहरातील पतितपावन मंदिराच्या परिसरांत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे हे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आले आहे.
या स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर ‘गाथा बलिदानाची’ ही प्रदर्शनी असून १८५७ च्या स्वातंत्र्य समरापासून ते स्वातंत्र्याच्या काळापर्यंतचे देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा स्फूर्तिदायी, त्यागमय व तेजस्वी इतिहास दालनांमधून मांडण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या ज्या वस्तूंनी इतिहास घडवला ती सावरकरांनी लंडनहून पाठवलेली दोन पिस्तुले, त्यांची काठी, जंबिया, व्यायामाचे मुद्गल अशा अनेक गोष्टी पाहून बाहू स्फूरण पावतात.
मार्सेलीस बंदरावर ज्या बोटीतून सावरकरांनी मायभूमीच्या ओढीने समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली, त्या ‘मारिया’ बोटीची प्रतिकृती इथे ठेवली आहे. तळमजल्यावरील सभागृहात माहितीपटांद्वारे सर्वांना थोर नररत्ने व इतरही अनेक गोष्टींची माहिती देण्यात येते. या स्मारकाला स.१० ते १२ व सायं ४ ते ६ या वेळेत भेट देता येते.
रत्नागिरीतील प्रेरणादायी सावरकर स्मृतितीर्थ
सावरकरांना पन्नास वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांना १३ मार्च १९१० रोजी अटक झाली. त्यांना प्रारंभी अंदमानला ठेवण्यात आले. सावरकर पंधरा वर्षे दोन महिने दहा दिवस प्रत्यक्ष कारागृहात होते, तर तेरा वर्षे चार महिने स्थानबद्धतेत होते. त्यांची १० मे १९३७ रोजी स्थानबद्धतेतून विनाअट संपूर्ण मुक्तता करण्यात आली. सावरकरांना २४ डिसेंबर १९१० रोजी पंचवीस वर्षांची पहिली, तर ३१ जानेवारी १९११ रोजी पुन्हा पंचवीस वर्षांची दुसरी अशी एकूण ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर चार जुलै १९११ रोजी त्यांचा अंदमानमधील कारावास सुरू झाला. अंदमान येथील कारागृहात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्यांना प्रथम मद्रास आणि नंतर रत्नागिरीच्या विशेष कारागृहात १६ मे १९२१ रोजी हलविण्यात आले.
येथे सावरकरांना दोन वर्षे ठेवण्यात आले होते. पायात दंडा बेडी, अंगावर कुडता आणि ‘पन्नास वर्षे बंदीचा, १९६० साली सुटका’ असे लिहिलेला कथलाचा बिल्ला घालून सावरकर यांना येथे ठेवले होते.रत्नागिरीत त्यांना २३ सप्टेंबर १९२३पर्यंत ठेवण्यात आले होते. पुढे त्यांना पुणे येथील येरवडा कारागृहात पाठविण्यात आले, तर सहा जानेवारी १९२४पासून रत्नागिरीतच स्थानबद्धतेत ठेवण्यात आले. स्थानबद्धतेच्या संपूर्ण काळात ते रत्नागिरीतच होते.
रत्नागिरीतील कारावास आणि स्थानबद्धतेच्या प्रदीर्घ काळात सावरकरांनी केलेले कार्यच आता रत्नागिरीची ओळख झाली आहे.
सावरकरांच्या आठवणी सांगणाऱ्या अनेक वास्तू रत्नागिरीत आहेत; मात्र दोन स्मारके सर्वांत महत्त्वाची आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे स्मारक म्हणजे विशेष कारागृह आणि दुसरे म्हणजे त्यांनी सामाजिक समरसतेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून स्थापन केलेले पतितपावन मंदिर. पोर्तुगीजांनी दारूगोळा ठेवण्यासाठी १८३४ साली रत्नागिरीत एक इमारत बांधली. एका करारानुसार ही इमारत ब्रिटिशांकडे हस्तांतरित झाली. त्यानंतर ब्रिटिशांनी १८५३मध्ये कारागृहात रूपांतरित केली. सोळा एकर परिसरात कारागृहाच्या सर्व इमारती उभ्या आहेत. अंदमानप्रमाणेच त्या काळी रत्नागिरी हा अत्यंत दुर्गम भाग होता. पश्चि मेला विस्तीर्ण अरबी समुद्र, तर पूर्व आणि दक्षिणोत्तर भागातून रत्नागिरीला थेट येणाऱ्या रस्त्यांची वानवा तेव्हा होती. सहजपणे रत्नागिरीत येणे तेव्हा शक्य नव्हते. त्यामुळेच ब्रह्मदेशचा थिबा राजा किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या कैद्यांना ठेवण्यासाठी ब्रिटिशांच्या दृष्टीने ही अत्यंत उत्तम आणि सुरक्षित जागा होती. देशभरातील कुख्यात आणि खतरनाक गुन्हेगारांना या कारागृहात ठेवले जात असल्याने या कारागृहाला विशेष कारागृहाचा दर्जा देण्यात आला. या कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रशासकीय इमारतीच्या वरच्या मजल्यावर स्वतंत्रपणे ठेवण्यात आले होते. अन्य कैद्यांशी त्यांचा संपर्क येऊ नये, अशी खबरदारी घेण्यात आली होती. शिवाय कारागृहावर कोठूनही हल्ला झालाच, तरी ती प्रशासकीय इमारत असल्याने तेथे पुरेसा कडक बंदोबस्तही होता. त्यामुळे सावरकर पळून जाण्याची किंवा त्यांना कोणी सोडवून घेऊन जाण्याची शक्यता नव्हती. कारागृहातही त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी लागली, एवढा ब्रिटिशांना सावरकरांचा धसका होता.
अर्थातच ती खोली अत्यंत लहान म्हणजे ६.५ फूट बाय ८.५ फूट एवढ्याच आकाराची होती. तेथेच त्यांना कायम राहावे लागत होते. प्रातर्विधीही तेथेच उरकावे लागत असत. (मुळशी सत्याग्रहातील अग्रणी पांडुरंग महादेव ऊर्फ सेनापती बापट यांनाही याच कारागृहात २४ नोव्हेंबर १९३१ ते ३१ डिसेंबर १९३५ या काळात ठेवण्यात आले होते; मात्र त्यांना कारागृहात स्वतंत्रपणे ठेवण्यात आले नव्हते. अन्य कैद्यांसाठी असलेल्या विभागातच त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. कारण ते ब्रिटिशांच्या दृष्टीने खतरनाक गुन्हेगार नव्हते.) सध्या त्या खोलीत सावरकरांच्या गळ्यात अडकवण्यात आलेले साखळदंड, बेड्या, लोहगोळे इत्यादी वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत.
ती खोली आणि त्याच्या बाहेरचा भाग स्वातंत्र्यवीरांचे स्मारक म्हणून जतन करून ठेवण्यात आला आहे. स्मारक म्हणून या कक्षाची घोषणा झाल्यानंतर चरित्रकार धनंजय कीर यांच्या हस्ते १९८३ साली कोठडीत सावरकरांची स्मृती म्हणून ठेवलेल्या भव्य तैलचित्राचे अनावरण करण्यात आले.
डिसेंबर २०१७मध्ये तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या कारागृहाला आणि सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. या कोठडीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी कोठडीचे सुशोभीकरण करण्याची आणि कोठडीला लागूनच स्वातंत्र्यवीरांचे जाज्वल्य संघर्ष दाखविणारे चित्र प्रदर्शन उभारण्याची सूचना कारागृह अधीक्षक आर. आर. देशमुख यांना केली. श्री. देशमुख यांनीदेखील या सूचनेला केवळ वरिष्ठांचे आदेश न मानता डॉ. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत मनोभावे काम केले. तुरुंगाधिकारी वर्ग एक आणि दोनचे श्री. कांबळे आणि अमेय पोतदार यांनी कसून मेहनत घेतली. सावरकरांचा इतिहास जिवंत करणारी छायाचित्रे, चित्रे लावण्यासाठी अनेकांची मदत झाली. मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे संचालक आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी या कारागृहाला भेट दिली होती. त्यांनी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन तर दिलेच; पण प्रत्यक्ष मदतही केली. पुण्यातील इतिहास अभ्यासक नितीन शास्त्री यांचीही मोठी मदत झाली. त्यांच्या संग्रहातून सुमारे ७५० चित्रे मिळाली. त्यापैकी २०० चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. सावरकरांचा कुटुंबवृक्ष, त्यांच्या काळातील, तसेच भारतीय स्वातंत्र्यातील सशस्त्र क्रांतिकारकांची माहिती, चित्रे, तसेच प्रसिद्ध नसलेल्या अनेक क्रांतिकारांच्या चित्रांचाही त्यात समावेश आहे. २८ मे हा स्वातंत्र्यवीरांचा जन्मदिन! त्याचे औचित्य साधून २८ मे २०१८ रोजी रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. आज आपण कोठडीला भेट दिली, की आपले मन भक्तिभावाने, देशप्रेमाने आपसूकच भारून जाते. चित्रमय, आकर्षक, भव्य प्रदर्शन आपल्या डोळ्यांसमोर स्वातंत्र्यवीरांचा सर्व संघर्ष जिवंत उभा करते. याबरोबरच मोठा गट आल्यास भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनने स्वातंत्र्यवीरांच्या जीवनकार्यावर निर्माण केलेला सुमारे पाऊण तासाचा माहितीपट पाहण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या प्रेरणादायी स्मारकाला रत्नागिरीला येणाऱ्या नागरिकांनीच नव्हे, तर तर देश-विदेशातील देशप्रेमी नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मुद्दाम येऊन भेट दिली पाहिजे, असे हे स्मारक आहे.
साकारण्यात आलेल्या या नव्या व्यवस्थेची दखल कारागृह विभागाच्या विशेष पोलीस निरीक्षकांनीही घेतली. यापूर्वी केवळ वारसा म्हणून सावरकरांची कोठडी जतन करण्यात आली होती. तिचे सावरकरांची स्मृती वास्तू म्हणून रूपांतर करण्यासाठी कारागृहाचे वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा विशेष पोलीस निरीक्षक श्री. राजवर्धन यांनी केली. तसे प्रशंसापत्र त्यांनी गेल्या १६ जानेवारीला अधिकाऱ्यांना दिले आहे. हीसुद्धा कौतुकाची बाब आहे.
गोपनीय दस्तऐवज
जानेवारी २०१८मध्ये कारागृहात झालेल्या बैठकीत तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी क्रांतिकारकांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या कारागृहाबाबत विशेष आस्था दाखवून जुन्या कागदपत्रांची माहिती घेण्याची सूचना केली होती. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यासाठी कारागृहात चार ते पाच तास ठाण मांडून या कागदपत्रांची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. या वेळी १९०८पासूनची काही गोपनीय कागदपत्रे हाती लागली. वीर सावरकर आणि सेनापती बापट यांच्याबरोबरच कराचीचे क्रांतिकारक स्वामी गोविंदानंददेखील रत्नागिरीच्या कारागृहात होते. या तीन क्रांतिकारकांच्या कारागृहातील वास्तव्यादरम्यानच्या गोपनीय कागदपत्रांचा ऐतिहासिक खजिना कारागृह प्रशासनाच्या हाती लागला. शंभर वर्षांपूर्वीची ही ऐतिहासिक कागदपत्रे म्हणजे इतिहास महत्त्वाचा ठेवा ठरणार असून, त्यात महात्मा गांधींनी सेनापती बापट यांना पाठवलेली तार व अन्य पत्रांचाही समावेश आहे. ११० वर्षांपूर्वीची कागदपत्रे आजही सुस्थितीत आहेत. ही कागदपत्रे लोकांनाही पाहण्यासाठी खुली व्हावीत, यासाठी शासनाची विशेष परवानगी घेण्यात येणार आहे; मात्र सध्या तरी ही कागदपत्रे जनतेसाठी गोपनीयच राहणार आहेत. या कागदपत्रांची पाहणी व अभ्यास करता यावा यासाठीचा एक परिपूर्ण प्रस्ताव कारागृह प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. रत्नागिरी कारागृहातील शिक्षेदरम्यान सावरकरांनी कमला महाकाव्य, सन्यस्त खड्ग हे नाटक, तसेच अन्य साहित्यही लिहिले. तसेच अनेक कविता त्यांनी लिहिल्याचे समोर येत आहे. त्यांच्या कवितांची सर्व हस्तलिखिते अद्याप प्रशासनाच्या हाती लागलेली नसली, तरी त्याचा शोध सुरू आहे. अंदमान येथून दोन मे १९२१ रोजी प्रथम अलीपूरच्या तुरुंगात काही दिवस ठेवल्यानंतर सावरकरांना १६ मे १९२१ रोजी रात्री साडेनऊ वाजता गोपनीयरीत्या रत्नागिरीच्या विशेष कारागृहात आणले गेले होते. यासंबंधीची कागदपत्रेही यामध्ये आढळली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इतर कैद्यांना जेलमध्ये बाहेरचे अन्न, लेखन साहित्य, कपड्यांसाठी परवानगी दिली जात असताना सावरकर यांनाही तशी परवानगी नाकारण्यात आली नव्हती, ही बाबही या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. अंदमान कारागृहात सावरकरांना या सर्व सुविधा उपलब्ध होत्या. त्यामुळे रत्नागिरी कारागृहातही या गोष्टींना अनुमती मिळावी, यासाठी सावरकरांनी कारागृह महानिरीक्षकांना कारागृह अधीक्षकांमार्फत लिहिलेले पत्र या कागदपत्रांमध्ये सापडले आहे.
सावरकरांना दिवसभर हातमाग यंत्रावर काम करावे लागत होते. या कामाची नोंद असलेली व त्यांची वैयक्तिक माहिती असलेली कागदपत्रेही यामध्ये आढळली आहेत. सावरकरांचे बंधू त्यांना भेटण्यासाठी कारागृहात आले होते, याची नोंद असलेले कागदपत्रदेखील सापडलेली आहेत. सावरकरांना तीन सप्टेंबर १९२३ रोजी रत्नागिरी येथून येरवडा कारागृहात हलविण्यात आले. या वेळी सावरकरांना नेण्यासाठी एका कर्नलची नेमणूक करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्यांना ॲम्बेसॅडर कारने येरवड्याला रवाना करण्यात आले होते, अशी महत्त्वपूर्ण माहिती व त्या कारचा कममांक असलेली कागदपत्रेही आढळली आहेत.
पतितपावन मंदिर आणि सावरकर स्मारक
रत्नागिरीतील विठ्ठल मंदिर पुरातन आहे. राजस्थानातून आलेल्या गुजर कुटुंबीयांनी हे मंदिर बांधले. मुमय मंदिराभोवती इतर देवदेवतांची मंदिरे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारण्यापूर्वी जनसामान्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून लढा दिला होता. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता. विठ्ठल मंदिरातील सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेचा उद्घोष करण्यासाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याचा निश्चय सावरकरांनी केला. दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या मदतीने तेव्हा तीन लाख रुपये खर्चून हे मंदिर स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी बांधले. बहुजन समाजासाठी हे मंदिर खुले करण्यात आले आणि त्यांना पूजा-प्रार्थनेचा समान अधिकार देण्यात आला. सामाजिक समतेचा एक अध्याय सुरू करणाऱ्या या पतितपावन मंदिराचे उद्घाटन २२ फेब्रुवारी १९३१ रोजी करण्यात आले. हे मंदिर म्हणजे सावरकरांचे स्मारक आहेच; पण त्याच मंदिराच्या परिसरात सावरकरांचे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर गाथा बलिदानाची हे प्रदर्शन असून १८५७च्या स्वातंत्र्यसमरापासून ते स्वातंत्र्याच्या काळापर्यंतचे देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा स्फूर्तिदायी, त्यागमय व तेजस्वी इतिहास तेथे मांडण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या ज्या वस्तूंनी इतिहास घडवला ती सावरकरांनी लंडनहून पाठवलेली दोन पिस्तुले, त्यांची काठी, जंबिया, व्यायामाचे मुद्गल, सावरकारांची काठी, त्यांचा चष्मा, त्यांच्या जवळ असणारा जंबिया अशा अनेक गोष्टी तेथे प्रेरणा देत आहेत. मार्सेलिस बंदरावर ज्या बोटीतून सावरकरांनी मायभूमीच्या ओढीने समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली, त्या मोरिया बोटीची प्रतिकृती तेथे ठेवली आहे. तळमजल्यावरील सभागृहात माहितीपटांद्वारे सर्वांना थोर नररत्ने व इतरही अनेक गोष्टींची माहिती देण्यात येते. या स्मारकाला सकाळी साडेदहा ते दुपारी १२ आणि सायंकाळी साडेतीन ते साडेपाच या वेळेत भेट देता येते.
काजीरभाटी बीच
आरे-वारे मार्गानेच पुढे गेल्यावर काही अंतरावरच काजीरभाटी गावाचा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा बाकी समुद्रकिनाऱ्यासारखाच पण अजून तरी पर्यटकांच्या "वक्रदृष्टी" पासून थोडा दूर त्यामुळे अतिशय शांत आणि स्वच्छ. अश्या एखाद्या सुंदर आणि जवळ जवळ निर्मनुष्य बीचवर समुद्रकिनाऱ्यावरून चालत चालत, लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत दूरवर एक फेरफटका मारण्यात काही वेगळीच मजा असते. येथील निळ्याभोर समुद्रकिनारी असलेली सुरुची झाडे आणि त्यामधून वाहणारा समुद्रावरचा थंड वारा मन प्रसन्न करून टाकतो.
काजीरभाटी बीच
काजीरभाटी बीच
काजीरभाटी बीचवर स्कुबा डायव्हिग हे नवे आकर्षण आहे. डाईव्हचे ठिकाण समुद्रकिनार्यापासून फक्त 200-300 मीटर अंतरावर होते आणि एकूण खोली 4-5 मीटर असते.ईथले पाणी ईतके नितळ आहे कि आपल्याभोवती भरपूर कोरल, रॉक पॅचेस आणि रंगीबेरंगी लहान मासे फिरत असताना आरामात पाहू शकतो. हे अनोखे जग पाहणे डोळ्यांसाठी एक ट्रीट आहे. ज्याना शक्य आहे त्यानी स्कूबा डायव्हिंग जरुर करावे.
गणपतीपुळ्यापासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर असणारं कोकणातील एक शांत, सुंदर आणि आटोपशीर असं समुद्रकिनारी वसलेलं गाव. मालगुंडची खास ओळख म्हणजे “जुने जाऊ द्या मरणालागुनी” असे म्हणत मराठी कवितेच्या इतिहासात एक क्रांतिकारक पर्व उभे करणारे युगप्रवर्तक कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांचं जन्मगाव. दि. ७ ऑक्टोबर १८६६ साली ज्या घरात कवी केशवसुत यांचा जन्म झाला त्या घराचे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मदतीने स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते ८ मे १९९४ रोजी या स्मारकाचे उद्घाटन झाले. केशवसुतांच्या वापरातील अनेक वस्तूंच्या सहाय्याने, तसेच अनेक दुर्मिळ फ़ोटो वापरून या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळ घर अगदी जसे आहे तसेच ठेऊन बाहेर सुंदर वाटिका तयार केलेली आहे आणि त्यात संगमरवराच्या फरशीवर केशवसुतांच्या कविता शिल्पित करून जिवंत करण्यात आल्या आहेत.
कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांचे मालगुंड गावातील घर
केशवसुत यांच्या कविता
आम्ही कोण?, नवा शिपाई, एक तुतारी द्या मज आणुनि, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही केशवसुतांच्या उल्लेखनीय कविता येथे बघायला मिळतात. या वास्तूत ग्रंथालय, अभ्यासिका, वाचनालय असे विविध कक्ष आहेत. एका स्वतंत्र दालनात महाराष्ट्रातील काही प्रतिभावंत कवींची माहिती, सुंदर स्केचेस आणि प्रत्येकाची एक उत्कृष्ट कविता येथे पाहायला मिळते. स्मारक भवनाच्या मागील बाजूस खुला रंगमंच असून तेथे साहित्यिक कार्यक्रम होत असतात. एखाद्या कवीचे अशा तऱ्हेचे उभारलेले हे महाराष्ट्रातील सध्यातरी एकमेव स्मारक असावे असे वाटते. त्यामुळे गणपतीपुळ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारे हि ठिकाण नक्कीच चुकवू नये असे आहे. केशवसुत स्मारक पहाण्यासाठी प्रति व्यक्ती १०/- ( दहा रुपये) प्रवेश फि द्यावी लागते.
घरामागील शिळांवर लिहिलेल्या त्यांची प्रसिद्ध कविता तुम्ही वाचू शकता.मराठी साहित्यात रस असणार्या मराठी माणसांसाठी ही सोन्याची खाण आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी दुपारची वेळ ही सर्वात चांगली वेळ आहे.
याचबरोबर आपण एक हजार वर्ष जुन्या राममंदिरालाही भेट देउ शकता.मालगुंड येथील आणखी एक आवर्जून बघण्यासारखे ठिकाण म्हणजे ओंकारेश्वर मंदिर. हे हेमाडपंती शैलीतील मंदिर पेशव्यांचे पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेले सरदार मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ बांधले आहे. मालगुंड हे मेहेंदळ्यांचे गाव होते.
मालगुंड गावातील दुसरी बघण्यासारखी गोष्ट म्हणजे अलीकडेच सुरु झालेले छोटेखानी मत्स्यालय. कोण्या एका खाजगी कंपनीने "फिश वर्ल्ड" नावाने हे मत्स्यालय मालगुंड गावात सुरु केले आहे.
मोठ्या माणसांसाठी ३०, तर लहान मुलांसाठी १० रुपये एवढे तिकीट काढून या छोट्या फिश वर्ल्डला भेट देता येते. येथे समुद्री घोडा, स्टार फिश, समुद्री साप, टायगर फिश, कॅट फिश, गोबरा असे अनेक सागरी व गोड्या पाण्यातील मासे पाहता येतात.
लहान मुलांना अगदी जवळून हे रंगीबेरंगी समुद्री जीवन पाहता येत असल्याने येथेही नक्की भेट द्यावी.
मालगुंडला वर्षाअखेरीला जाणे शक्यतो टाळलेले बरे, कारण डिसेंबरचा शेवटचा आठवडा मालगुंडमधे योगमाता निर्मला देवीचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. योग आणि प्रार्थना आणि उत्सव यासाठी भारत आणि जगातील त्यांचे अनुयायी मालगुंडला येतात. 23 डिसेंबरपासून वर्ष संपेपर्यंत मालगुंडमध्ये खोली न मिळाण्याचे हेच कारण होते. जर आपण मालगुंडजवळ सुट्टी घालवणार असाल तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाळणे चांगले. अर्थात श्री निर्मला देवीचे अनुयायी मालगुंडबाहेर राहणे पसंत करत नाहीत म्हणून गणपतीपुळे ते रत्नागिरी परिसरातील हॉटेल आपण शोधू शकतो.
मालगुंडला गायवाडी बीचला आपटे यांच्या शुभन्कर होम स्टे रहायला चांगला आहे. बीचच्या अजून जवळ 'माडाच्या बनात' नावाचं भारी रिजॉर्ट दिसले. http://www.madachyabanat.com/ रेट्स ही भारी आहेत.
बीच अवघ्या १० मिनिटाच्या अंतरावर आहे. पण त्यामुळे गावापासून लांब. उल्लेखनीय म्हणजे तिथले 'स्वाद ' रेस्टोरंट. शाकाहारींसाठी पर्वणी. तिथली व्हेज थाळी खूप छान होती. नॉन व्हेजींसाठी असे काही खास रेस्टोरंट दिसले नाहीत. नॉनव्हेज बनवून देणारे घरगुती बोर्ड दिसले.
जयगड किल्ला
प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या जयगड या नैसर्गिक बंदराच्या काठी वसलेला तसेच शास्त्री नदीच्या खाडीच्या दक्षीण मुखाशी एका बाजूस समुद्र व दुसऱ्या बाजूस खाडी अशा बेचक्यात उभा असलेला डोंगरावर जयगडाची उभारणी झालेली आहे. आजही उत्तम सुस्थितीत असलेला हा देखणा किल्ला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढला असून किल्ल्याचा तटावरून फेरफटका मारताना समुद्र पाहणं म्हणजे सुखंच.
इतिहास -
जयगड किल्ल्याची बांधणी विजापूरच्या आदिलशहाने केली. पण गडाचा बालेकिल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असे १८८४ च्या गॅझेटमध्ये लिहले आहे. पुढे हा किल्ला संगमेश्वरच्या नाईकाने आदिलशहाकडून घेतला. या नाईकाकडे आरमार देखील होते. आदिलशहाने हा गड घेण्याचा दोनदा अयशस्वी प्रयत्न केला शेवटी तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश आले. शिवाजी महाराजांनी १६५७ ते १६६० च्या दरम्यान जयगड जिंकून स्वराज्यात सामील केला. पुढे याचा ताबा सिद्धीकडून आंग्रे घराण्याकडे आला. १७२४ मध्ये कान्होजी आंग्रे यांनी जयगडची दुरुस्ती केली. त्यानंतर पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने १७५६ मध्ये तुळोजी आंग्रेचा पराभव करून गड ताब्यात घेतला. शेवटी १८१८ मध्ये याचा ताबा सहज इंग्रजांकडे गेला.
गडफेरी-
१२ एकराच्या प्रशस्त जागेत बालेकिल्ला विस्तारला आहे. बालेकिल्ल्याच्या भोवती सपाट जागेवर खंदक असून उत्तरेस व पूर्वेस उतार सुरू होईपर्यंत हा खंदक खणलेला आहे. अर्थात खंदकाची खोली जेमतेम असल्याने बहुधा हा अग्नीखंदक असावा.
जयगडच्या बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार दोन भव्य बुरुजांच्या मध्ये उभे असून प्रवेशद्वारावर कोरलेली दोन सुंदर कमळे आपले लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराच्या बुरुजाच्या माथ्यावर एक भव्य शासकीय विश्रामधाम बांधले आहे. किल्ल्याच्या चहूबाजूंनी भक्कम तटबंदी असून तटबंदीला जिने आहेत. तटफेरी मारताना आपल्याला शत्रूवर मारा करण्यासाठी बांधलेल्या जंग्या, वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे गोलाकार बुरुज, गडाच्या एका बुरुजावर बांधलेली खोली आपणास पहावयास मिळते. गडावर थोडीशी पडझड झालेल्या दुमजली इमारतीचे अवशेष आहेत. त्याच्या शेजारी गणपती मंदिर असून मंदिरासमोर दीपमाळ आहे. येथे समोरच जयबाचे स्मारक नावाचे ठिकाण आहे. आदिलशाहने या गडाचे बांधकाम काढल्यानंतर गडाचा तट वारंवार कोसळत होता. त्या वेळी नरबळी देण्याची कल्पना पुढे आली. जयबा नावाच्या माणसाने स्वतःला गडाच्या पायात जिवंत गाडून घेतले व त्यावरच हा तट बांधण्यात आला. या घटनेची आठवण म्हणून या गडाचे नाव जयगड पडले अशी दंतकथा सांगितली जाते. (स्मारक संदर्भ - वेध जलदुर्गांचा लेखक - भगवान चिले )
गणेश मंदिराच्या मागे राजवाड्याची भग्न वास्तू आहे. तसेच गडावर एक चोरदरवाजा, पाण्याच्या तीन विहिरी, सदरेच्या इमारतीचा चौथरा, तटात जागोजागी सैनिकांना विश्रांतीसाठी बांधलेल्या देवड्या व भक्कम बांधणीची दारुकोठारे पाहावयास मिळतात.
किल्ल्याला पडकोट आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला खंदकात जाण्यासाठी केलेल्या प्रवेशद्वाराने आपण पडकोटात प्रवेश करतो. येथे दगडातील एक छोटी शिलागुंफा आहे. गुहेत मोहमाया देवीचे ठिकाण दिसते. गडाच्या समुद्राकडील दरवाजाकडे जाताना गर्द झाडीत ३ पाषाणस्तंभ पहावयास मिळतात.
तसेच किल्ल्याचा तटबंदी वरून आपल्याला एका बाजूला जिंदाल पावर प्लांट दिसतो . हा प्रकल्प म्हणजे कोंकणात आधुनिकीकरणाची नांदी पण त्याच्या इथल्या निसर्ग सृष्टीवर होणारा परिणाम, घटत जाणार आंबा बागांच उत्पादन विचार करायला लावत खरचं ही चांगली नांदी आहे की विनाशा कडे नेणारी. असो... किल्ल्यावरून एका बाजूला अथांग समुद्राचा व दुसऱ्या बाजूला खाडीचा रमणीय असा परिसर आपल्याला दिसतो.
नृसिंह मंदिर पोखर्णी – Narasimha Mandir
परभणी पासुन जवळजवळ 18 कि.मी. अंतरावर असलेले पोखर्णी हे गांव श्री नृसिंह संस्थानामुळे पंचक्रोशीत आणि जिल्हयात प्रसिध्द आहे. येथे महाराष्ट्रा व्यतिरीक्त आंध्र प्रदेशातुनही भाविक दर्शनाकरता येतात.
श्री नृसिंह भगवान याठिकाणी देवी लक्ष्मी सोबत विराजमान असुन हे जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द आहे.मंदिरासमोर आल्यावर लगेच प्रशस्त असे मुख्य पूर्व प्रवेशद्वार मन मोहून घेते. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप भक्तांच्या नजरेत भरतो. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर पूर्वमुखी असलेल्या आणखी एका प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. मंदिर परिसर अतिशय विस्तीर्ण असुन गाभारा मात्र लहान आहे आणि या गाभा.यात प्रवेश करण्याचे व्दार अडीच ते 3 फुट असल्याने भाविकाला दर्शनाकरता वाकुन जावे लागते.या द्वारामधून एकावेळी एकाच व्यक्तीला खाली बसून प्रवेश करावा लागतो. आतील गाभारा हेमाडपंथी शिलेवर बांधकाम केलेला आहे. या गाभाऱ्यात एका वेळेस केवळ १०-१२ व्यक्तीचे दर्शन घेऊ शकतात.
हे मंदिर अतिशय प्राचीन असुन जवळ जवळ 1000 वर्षांपुर्वी बनले असल्याचे सांगण्यात येते, वास्तुकला हेमाडपंथी असुन एका राजाने हे मंदिर बांधले आहे.
राजाच्या अंध मुलीला नृसिंह भगवानाच्या कृपेने दिसायला लागल्याने राजाची येथे अपार श्रध्दा बसली आणि त्याने नवीन मंदिर बनवुन मुर्तीला तेथे हलवण्याचा विचार व्यक्त केला पण गावक.यांनी त्याला विरोध केल्याने येथेच राजाने हे मंदिर बांधले.
श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह मंदिर गाभाऱ्यात श्रीची रोद्ररूप धारण केलेली वालुकाष्म पाषाणाची असून सुमारे ४ फुट इंचीची मूर्ती आहे. मुर्ती चतुर्भूज असून एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात शंख असून उर्वरित दोन्ही हातांनी हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करतानाचे आहे. ही मुर्ती स्वर्णालंकृत व रत्नजडीत असून वस्त्र परिधान केलेली आहे. श्रीच्या गाभाऱ्यासमोर श्रीचे शयनकक्ष आहे. शयनकक्षात पुरातन लाकडी दिवाण असून त्यावर रेशमी वस्त्राची बिछायत आहे. त्यावर श्री लक्ष्मी नृसिंहाची प्रतिमा आहे तसेच मोरपीसांनी सुशोभित केलेले आहे. मुर्ती क्रोधीत मुखवटयाची असुन सुवर्ण अलंकारांनी तिला सुशोभीत करण्यात येते. शेजारीच परमेश्वराकरता विश्रामासाठी मोराच्या पिसांनी गादी तयार केली आहे.
मंदिर परिसरात शिवलिंगाव्यतिरीक्त भगवान गणेशाचे देखील मंदिर आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर अगदी समोर श्री महादेवतेचे मंदिर आहे. मनाला प्रसन्न करणारी महादेवाची शिवपींड आहे. तसेच तीन फुट उंचीची संगमरवर श्री गणेशाची मुर्ती आहे.मंदिराच्या सभामंडपात असलेला घंटा वाजवण्याचा मोह भक्तांना आवरणे कठीणच जाते. हा घंटा मांगल्याचे प्रतिक असून घंटानाद दूरवर पसरतो. पहाटे मंदिर उघडल्यावर अभिषेकापूर्वी व रात्रीच्या आरतीपूर्वी घंटानाद केला जातो. मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारा जवळ श्री गणेशाचे एक छोटे मंदिर आहे. त्यात गणेश वालुकाष्म मुर्ती आहे तसेच पाषाणाच्या गजलक्ष्मी, बालाजी व इतर देवतांच्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर पवित्र असे तीर्थकुंड आहे.याला पुष्करणी तिर्थ म्हणुन खोल विहीर असुन त्या विहीरीला चारी बाजुने सलग अखंड पाय.या आहेत. हे पुष्करणी तिर्थ 1200 वर्ष जुने असल्याचे बोलले जाते. या तीर्थाच्या पाण्याने श्री चा अभिषेक केला जातो. या तीर्थामध्ये काही पायऱ्या उतरल्यावर मध्ये मोठ्या देवळीच्या रुपात दोन्ही बाजूला दोन मंदिरे आहेत,ज्यांना देवकोष्ट म्हणतात.
नृसिंहाच्या नवरात्रात आणि नृसिंह जयंतीला भगवंताचा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होतो इतरवेळीही दर शनिवारी या ठिकाणी दर्शनाकरता गर्दी असते.
नृसिंहाच्या मुर्तीची दस.याला मिरवणुक निघते, ही मिरवणुक देवीची भेट घेतल्यानंतर परत माघारी येते. ही प्रथा देखील पुर्वापार चालत आल्याचे येथील भाविक सांगतात.
श्री नृसिंह संस्थान तीर्थक्षेत्र हे अल्प अवधित प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र शासन मार्फत ‘तीर्थक्षेत्र ब’ दर्जा तसेच धार्मिक पर्यटक ‘ब’ दर्जा मिळालेला आहे.
बासरची श्री महासरस्वती :-
नांदेड - निजामाबाद रेल्वे मार्गावर धर्माबादनंतर १० कि. मी . अंतरावर बासर हे रेल्वेस्टेशन आहे. स्वातंत्र्यपूर्वी मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हे गाव होतं, मात्र राज्य पुनर्रचनेच्या वेळी ते आंध्र प्रांतात गेले. या घटनेला ही जवळपास पंचेचाळीस वर्ष होताहेत. तरीही या गावावर मराठी संस्कृतीची जबरदस्त पकड आहे.
आज मध्यम लोकवस्तीचं जरी हे गाव असलं तरीही हजारो वर्षांची परंपरा या गावाला आहे, या परिसराचं प्राचीनत्व महाभारत पूर्वकालापर्यंत जातं , महर्षी व्यासांनी याच क्षेत्री गोदावरीच्या काठी पाच हजार वर्षांपूर्वी घोर तपश्चर्या केली होती. त्यांना महासरस्वती प्रसन्न झाली, त्यामुळे ते ' महाभारता' सारखा अजोड ग्रंथ लिहू शकले. आचार्य परंपरेत त्यांचं स्थान सर्वोच्च आहे.
ज्या परिसरात महर्षी व्यासांना श्री महासरस्वती प्रसन्न झाली त्याच परिसरात त्यांनी वाळूपासून श्री सरस्वतीची मूर्ती तयार करून तिची प्राणप्रतिष्ठा केली.
संपूर्ण भरत खंडात हे एकमेव श्री महासरस्वतीचं मंदिर आहे.
त्यामुळे देशभरातून लक्षावधी भाविक नित्यनेमाने इथे दर्शनासाठी येतात. अनेकजण अनुष्ठानं करतात.
श्री महासरस्वतीचं मंदिर हेमाडपंती असून देवीची मूर्ती जवळपास तीन फूट आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराचा सभामंडप फार मोठा नाही. अर्ध्या भागात देवघर, गाभारा तर अर्ध्या भागावर सभामंडप आहे. देवीच्या पवित्र पादुका देवीपासून थोड्या अंतरावर असून याच पादुकांवर मंदिराचं शिखर आहे. दिवसातून दोन वेळा मंत्रघोषात देवीची महापूजा होते. देवीला दही-दुधाचे स्नान घातल्यानंतर जे तीर्थ बाहेर येते त्याला सोमसूत्र असे म्हणतात. भक्त मोठ्या श्रद्धेने ते प्राशन करतात.
जीवसृष्टीमध्ये ज्ञानामुळेच माणूस श्रेष्ठ आहे.
मंदिरासमोरच्या टेकडीवर अगदी जवळच महर्षी व्यासांनी महालक्ष्मी आणि महाकालीची प्रतिष्ठापना केली आहे. म्हणजे या पवित्र क्षेत्री श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्री महालक्ष्मी या त्रिगुणात्मक महाशक्तीची महर्षी व्यासांनी प्रतिष्ठापना करून अखिल मानवजातीचं कल्याण केलं, या जगन्माऊलीच्या दर्शनानं आयुष्यातील दुःख, संकट संपून मनाला सात्विक समाधान लाभते. म्हणून शेकडो माणसं इथे अनुष्ठान करतात.
अन्य शक्तीपीठात भक्तगण प्रामुख्याने नवरात्रात घटी बसतात, अनुष्ठानं करतात पण बासर येथील सरस्वती मंदिरात अखंड सप्तशतीचं पाठ चालू असतात. अनेक सत्पुरुषांनी, संतमहंतांनी चा पवित्र क्षेत्री अनुष्ठानं केल्याची नोंद सापडते.
' दुर्गे दुर्गट भारी' या आरतीचा कर्ता नरहरी मालू यांनी श्री महासरस्वतीच्या मंदिरात किती तरी वर्षे अनुष्ठानं केली. ज्या गुहेत अनुष्ठानं केली ती गुहा आजही पहावयास मिळते. भक्तगण मोठा श्रद्धेनं या गुहेचं दर्शन घेतात, श्री शंकराचार्यांनी येथे अनुष्ठान केलं होतं तर अनेक योगी पुरुषांनी इथे यज्ञ केल्याची नोंद कागदपत्रात सापडते. धवलवस्त्र परिधान केलेली महासरस्वती भक्ताच्या कल्याणासाठी इथ उभी आहे. भगवती कल्यणदायी आहे.
देशभरात देवीची ५१ शक्तीपीठे आहेत. त्यात बासर येथील श्री महासरस्वतीचं स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे. ज्ञान हाच माणसाचा खरा अलंकार आहे. जीवसृष्टीमध्ये ज्ञानामुळेच माणूस श्रेष्ठ आहे. सरस्वतीच्या आशीर्वादाने माणसाच्या आयुष्याचं सोनं होतं, कविकुल गुरू कालिदास याचं उदाहरण आहे. नवरात्र महोत्सवात हा परिसर माणसांनी फुललेला असतो, देवीची महापूजा, मंत्रघोष, सप्तशतीचे पाठ, भजन, आरती आणि जयघोषांनी वातावरण नुसतं आनंदानं ओसंडत असतं, धूप-दीप गंधांनी मन प्रसन्न होतं, शेकडो भक्त घरी बसलेले असतात दसर्याच्या दिवशी श्री महासरस्वतीची पालखीतून गावभर मिरवणूक निघते, सारे रस्ते झाडून सडा शिंपडून सुंदर रांगोळ्यांनी रेखाटलेले असतात. तर माय माऊली दारासमोर जरीकाठी नेसून हातात पंचारती घेऊन मोठा प्रसन्न मनानं उभ्या असतात. औक्षण अन् फुलं उधळल्यानंतर पालखी हळूहळू पुढे सरकते. गावभर नुसता आनंदोत्सव असतो.
माघ वद्य १४ पासून फाल्गून शुद्ध प्रतिपदेपर्यंत येथे फार मोठी यात्रा भरते. अन्नदानही मोठ्या प्रमाणात होते. यावरून याच काळात महर्षी व्यासांनी श्री महासरस्वतीनं दर्शन दिलं असावं, किंवा महर्षी व्यासांनी प्राणप्रतिष्ठा केलेली असावी म्हणूनच हजारो वर्षांपासून या काळात आनंदोत्सव साजरा केला जातो.
दगडावर रचलेली दगडे या परिसरात आणखी एक आश्चर्य पहावयास मिळते. भल्या मोठे दगडावर दगडं इथे रचलेले आहेत, या संदर्भात कथा व लोककथा प्रचलित आहेत. लंकाधीश रावणाने सीता देवीला पळवून नेत्यानंतर प्रभू रामचंद्र अस्वस्थ झाले. वानर सेनेने शोध सुरू केला. शोध घेता घेता मारूतीराय या परिसरात आले व त्यांनी आपण आल्याची खूण म्हणून दगडाची उतरंड रचली अशी कथा लोकगीतातून, लोककथेतून आढळते, तरीही या प्रंचंड मोठा दगडाची उतरंड कुणी रचली? व का रचली? का हा निसर्गाचा चमत्कार आहे? या प्रश्नाचं नेमकं उत्तर आजपर्यंत कुणालाही गवसलं नाही, असाच चमत्कार कर्नाटक प्रांतातील हम्पीजवळ दिसतो. तिथेही अशाच लोककथा सांगितल्या जातात, सुग्रीव, वाली, हनुमान या महाबलीचा, वानरराजाचा हा परिसर आहे. बासरजवळील दगडाच्या उतरंडीतून पितळी भांड्यांसारखा आवाज येतो, हे एक फार मोठे आश्चर्य आहे.
श्री महासरस्वती मंदिरासमोर कांही अंतरावर एक भव्य सरोवर आहे. कधीकाळी हे उत्तम बांधलेलं होतं, पण आज मात्र ढासळलेला आहे. या तलावातील पाणी कधीच आटत नाही या तलावाला अष्टतीर्थ असेही म्हणतात. कारण या तलावाच्या काठी हजारों वर्षांपूर्वी इंद्र, वरूण, यम, कुबेर, वायू, चंद्र यांनी तपश्चर्या केल्यामुळे हा तलाव अमरतीर्थ म्हणून ओळखला जातो तर मंदिरासमोर पिंपळ-लिंब, औदुंबर वृक्ष श्री महासरस्वतीवर चवर्या ढाळीत आहेत. श्री महर्षी व्यासांनी स्थापन केलेली श्री महासरस्वतीची मूर्ती अत्यंत रेखीव अन् प्रसन्न आहे की, समोर कितीही वेळ बसलो तरी मन तृप्त होत नाही. एवढं देखणं रूप आहे. महर्षी व्यासांनी ते शब्दबद्ध केलं आहे.
या कुन्देंदुतुषार हार धवला या शुभ्र वस्त्राव्रता।
या वीणावरदण्डमंडित करा या श्वत पद्मासना॥
या ब्रम्हाच्युतशंकर प्रभूर्तिभिः देवैः सदा वंदिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा॥
शुभ्र वस्त्र परिधान केलेली, वीणाधारिणी, सुहास्यवदना श्री महासरस्वती पांढर्या कमलदलावर अत्यंत शोभून दिसते, दिव्यत्वाचा, मांगल्याचा साक्षात्कार होतो, अशा महासरस्वतीला सृष्टीनिर्मात्या ब्रह्मदेवापासून श्री शंकरापर्यंत सर्वच देव वंदन करतात, दर्शनानं आयुष्याचं कल्याण होतं, म्हणून देशभरातून लक्षावधी भाविक दर्शनास येतात.
विद्यां देहि सरस्वती बुद्धिं देहि सरस्वती।
ज्ञानं देहि सरस्वती मुक्ति देहि सरस्वती॥
माहिती सौजन्य- श्री.निखिल बागडे
माहूर किल्ला
इतिहास प्रेमींसाठी रामगड उर्फ माहूरचा किल्ला, माहूर संग्रहालय, सोनापीर दर्गा, पांडवलेणी आणि राजे उद्धवराव उर्फ उदाराम देशमुख यांचा वाडा अश्या अनेक ऐतिहासिक वास्तुसुद्धा माहूरमध्ये आहेत.शिवकाळात औरंगजेबाच्या आदेशावरून स्वराज्यावर चालून आलेली मुघलांची मनसबदार पंडिता रायबाघन (राजव्याघ्री) उर्फ सावित्रीबाई ही सुद्धा माहुरची. सावित्रीबाई माहूरचे राजे उदाराम देशमुख यांची पत्नी. राजे उदाराम यांच्या मृत्युनंतर वऱ्हाड प्रांतात हरचंदराय नावाच्या सरदाराने बंड केले. हे बंड सावित्रीबाईने मोडून काढले व वऱ्हाड प्रांतातील मोघली अंमल कायम राहिला. सावित्रीबाईच्या ह्या कामगिरीवर खुश होऊन औरंगजेबाने सावित्रीबाईला ‘पंडिता’ आणि ‘रायबाघन’ हे दोन किताब बहाल केले.माहूर येथे रेणुकादेवीचे मुख्य स्थान असल्यामुळे वर्षभर माहूर भक्तांनी गजबजलेले असते. येथे येणारे सर्व भाविक रेणुकादेवीचे, अनुसयामातेचे (दत्तात्रयांची आई) आणि दत्तशिखर येथे दत्तात्रयांचे दर्शन घेऊन निघून जातात. माहूर येथे येणाऱ्या भाविकांपैकी बोटावर मोजता येतील एवढे भाविक माहूरच्या किल्ल्याला किंवा रामगडला भेट देतात. माहूर गावापासून दक्षिणेस उंच अशा दोन टेकड्यांवर किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
12 व्या शतकात देवगिरीचे राजा रामदेव यांनी माहूरचा किल्ला जिंकून घेतला. नांदेड व उमरखेड मार्गे किल्ल्याकडे जाता येते. या किल्ल्यास राजगड असेही म्हणतात.
किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दक्षिण दरवाजा, उत्तरेकडील मुख्य दरवाजा व रेणुकादेवीकडील महाकाली बुरुज येथून जाण्यासाठी रस्ते आहेत. किल्ल्यात हत्ती दरवाजा, बारुदखाना, महाकाली बुरुज, धनबुरुज (दलबुरुज) यासह अनेक बुरुज आजही जसेच्या तसे आहेत. माहूर किल्ला हा गिरीदुर्ग आहे. किल्ल्याच्या स्थापत्यशैलीवरून या किल्ल्याचा विकास बहामनी व मोगलांच्या काळात झाला असावा.
या किल्ल्याला दोन तट आहेत. किल्ल्याचा विस्तार ९ कि.मी. असून या किल्ल्याला डोंगरी किल्ला, गिरी दुर्ग गोंड किल्ला असेही म्हटल्या जाते. किल्ल्याचा पहिला तट राष्ट्रकूट राजींनी तर दुसरा तट देवगिरी साम्राज्याचे राजा रामदेवराय यादव यांनी बांधला आहे. विशेष बाब अशी की, राष्ट्रकुटांनी देवगिरी किल्ला, कंधारचा किल्ला व माहूरचा रामगड किल्ला एकाच कालखंडात बांधला असल्याचे बांधकाम शैली व वास्तुच्या बाबीतील साम्यावरून स्पष्ट होते. प्रवेशद्वारावर संरक्षणासाठी अर्धवर्तुळाकार भिंत बांधलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे नागमोडी रस्त्याने दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे नागमोडी वाटेने दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. मुख्य प्रवेशद्वार १३ फूट उंच आणि १० फूट रुंद आहे. पहिल्या प्रवेशद्वारातून ७२५ फूट अंतरावर दुसरे प्रवेशद्वार आहे. रामगिरी किल्ल्यातील इंजाळा तलाव (फुलतीर्थ) जलाशय दुसरे मातृतीर्थ आहे.
चोहोबाजूंनी चिरेबंदी बांधकाम असून दोन दोन कठडे आहेत. हवामहलची उंची ५३ फूट व लांबी ५२ फूट आहे. हत्ती दरवाजातून पुढे गेल्यास उजवीकडे पश्चिमेस चिनी महल बांधलेला आहे. या ठिकाणीसुद्धा सैनिक तैनात असायचे. चिनी महलाच्या पश्चिमेस निशाण बुरूजाजवळ दोन मशीद आहेत. किल्ल्यामध्ये त्याकाळी जलव्यवस्थापनाची साधने म्हणजे बारव, तलाव, कटोरा बावडी, गौतम झरा आहेत. जवळपास ५० टक्के भाविक किल्ला पाहण्यासाठी व पर्यटनाचा व निसर्गसान्निध्याच्या सहवासाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी येतात. मात्र, कोट्यवधी रुपये डागडुजीसाठी खर्च केलेला हा किल्ला काम झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांतच पूर्वीसारख्याच बकाल अवस्थेत पोहोचला. पुरातत्त्व विभागाचे पण या किल्ल्याकडे लक्ष नसल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून किल्ल्याची राखण करून घेत केवळ राखणदारीची औपचारिकता करण्यात येत आहे. त्यामुळे किल्ल्याची संपूर्ण माहिती पर्यटकांना देणारी यंत्रणा व इतर कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक पर्यटकांनी या किल्ल्याकडे पाठ फिरविली आहे.
७० हेक्टर ४० आर क्षेत्र विस्तार
किल्ल्यात संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी चोरदरवाजाही बांधण्यात आलेला आहे.याचबरोबर सभामंडपाची दक्षिण उत्तर लांबी ४२ फूट व रुंदी २१ फूट आहे. सभामंडपात एकूण १८ स्तंभ आहेत. किल्ल्यात समान आकाराचे ४५ बुरुज आहेत. हा किल्ला ७० हेक्टर ४० आर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी ६ हजार २५४ तर रुंदी २४ फूट आहे. अशाप्रकारची लांबी क्वचितच आढळते. हा ऐतिहासिक रामगड किल्ला आज पडझडीच्या मार्गावर असून पुरातत्त्व विभागाने तीन वर्षांपूूर्वी १२ कोटी रुपये खर्चून किल्ल्याची डागडुजी व दुरुस्ती केली. मात्र करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले.
माहूरची पांडवलेणी
माहूरच्या जुन्या बसस्टँडजवळ असलेल्या टेकडीच्या एका भागात लेणी कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. एक प्रचंड सभागृह आणि त्यात गाभारा कोरण्यात आला आहे. ही लेणी राष्ट्रकूटकालीन असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असंख्य खांबांचे हे सभागृह मोठे आकर्षक आहे. खांबांची आणि एकूण रचनेची भव्यता नजरेत भरते. 15 मीटर उंचीचे हे सभागृह असल्याने व सभागृहाची लांबी रुंदी खूपच असल्याने सभागृह वैशिष्ट्यपूर्ण ठरते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेतात. अजिंठा-वेरूळची आठवण यावी एवढी भव्यता याही शिल्पात आहे. गाभाऱ्यात भव्य शिवलिंग प्रतिष्ठापित आहे. ही लेणी पांडवलेणी म्हणून संबोधिली जातात. पण माहुर येथे असलेली लेणी पर्यटकांची वाट बघत असतात. माहूर येथील लेण्यांना पांडवलेणी म्हणून ओळखले जाते. पांडवलेणी माहूर एसटी स्थानकापासून जास्तीत जास्त १५ मिनिटावर असूनसुद्धा येथे फारसे कोणीही येत नाही.माहूर येथील लेणी उत्तराभिमुखी असून एका टेकडीत कोरलेली आहेत. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणी साधारणपणे ६व्या ते ७व्या शतकात म्हणजे राष्ट्रकुट काळात कोरलेली आहेत. ही हिंदू लेणी असून लेणी संकुलात चार लेणी आहेत. संकुलाच्या मध्यभागी दगडी खांबांनी युक्त असे मोठे लेणे आहे. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन पूर्ण स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. वरांड्यातून मुख्य दालनात प्रवेश करताना सहा पूर्ण स्तंभ आणि २ अर्ध स्तंभ आपले लक्ष वेधून घेतात. या खांबांवर शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे कोरलेली आहेत. पण खांबाना पांढरा रंग मारलेला असल्यामुळे मूर्ती पटकन ओळखता येत नाहीत. या दालनाला जोडून गर्भगृह आहे. गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. गर्भगृहाच्या दरवाज्यावर दोन्ही बाजूला द्वारपालांची भव्य शिल्प कोरलेली आहेत. गर्भगृहाला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते.मुख्य लेण्याच्या डाव्या बाजूला दोन अर्धवट कोरलेली असून एका लेण्यात गणपतीची मूर्ती कोरलेली आहे, दुसरे लेणे रिकामे आहे. मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूला असलेल्या लेण्यांच्या दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ आहेत. स्तंभांच्या पलीकडे मोठा वरंडा असून वरांडाच्या दोन्ही बाजूना विहार कोरलेले आहेत. हे दोन्ही विहार दिसायला सारखे असून दोघांच्याही दर्शनी भागात दोन पूर्ण आणि दोन अर्ध स्तंभ कोरलेले आहेत. या लेण्याच्या अंतर्भागात आणखीन तीन लेणी कोरलेली असून यात देवतांच्या मूर्ती पण कोरलेल्या आहेत. पण लेण्यात असलेल्या अंधारामुळे या मूर्ती पटकन दिसून येत नाहीत. या तिन्ही लेण्यात दगडी बाकसुद्धा कोरलेले आहेत.पांडव वनवासात असताना भीमाचे आणि हिडिंब राक्षसाचे युद्ध, भीम आणि हिडिंबेचा विवाह आणि घटोत्कचाचा जन्म याच पांडवलेण्यांच्या परिसरात झाला, असा स्थानिक लोकांचा समज आहे. तीन क्रमांकाची लेणी कला आणि स्थापत्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय असून पूर्वाभिमुख असलेल्या या लेणीत सर्वाधिक शिल्प आहेत. यात द्वारपाल, कुबेर, गजलक्ष्मी, मुष्ठीयोद्धे, स्त्रीशिल्पे, सिंह, शिवपार्वती, गणेश या चित्राची रेलचेल आहे़ लेणी चार दक्षिणमुखी असून या लेणीत कोरीव गणेश शिल्प आहे. पाच क्रमांकाच्या लेणीचे दालन रिकामे आहे. या लेणीच्या पाठीमागील भिंतीत नागदेवतेचे पंचमुखी कोरीव शिल्प आहे़ अमेरिकेतील मिशीगण विद्यापीठातील कला आणि स्थापत्याचे अभ्यासक प्रो़ वॉल्टर स्पिक यांनी सर्वप्रथम माहूर येथील लेण्याचे सर्वेक्षण करून खोदकामाचा कालखंड राष्ट्रकुट इ़स़ ७५७ ते ९५४ काळातील असल्याचे नमूद केले. वेरूळ, कंधार, मान्यखेट या राष्ट्रकुटाच्या राजधान्या होत्या़ धाराशिव आणि माहूर येथील लेण्यांमध्ये साम्य आहे़ भगवान श्रीकृष्णांनी पाच पांडवांना माता कुंतीसह श्रीक्षेत्र माहूरला याच पांडव लेणीच्या भुयारी मार्गाने पाठविले. त्यामुळे या लेणीला पांडव लेणी नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. सदर लेणी १२ जानेवारी १९५३ रोजी औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. परंतु मागील ६५ वर्षाच्या काळात पुरातत्त्व विभागाकडून या पांडव लेण्याचा कसलाही विकास झालेला नाही. किंबहुना येथे रस्ता, विद्युत व्यवस्था नसल्याने ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असलेला हा ठेवा आज विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळेच पर्यटकही या लेण्यांकडे पाठ फिरवित असल्याचे विदारक चित्र आहे.
सहस्रकुंड धबधबा :-
हिमायतनगर तालुका ओलांडून किनवट तालुक्यात प्रवेश केल्यावर इस्लामपूरपासून अवघ्या चार किमी अंतरावर सहस्रकुंड धबधबा आहे. नांदेडहून रेल्वेमार्गानेदेखील येण्याची सुविधा आहे. पैनगंगा नदीवरील हा आकर्षक धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. प्राचीन आख्यायिकेनुसार याठिकाणास प्रभू परशुरामाचा पदस्पर्श झाल्याचे मानले जाते. 20 मीटर उंचीवरून कोसळणारा धबधबा पाहून 'नांदेडचा नायगरा' अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पर्यटक व्यक्त करतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून दिसणारे सहस्रकुंड धबधब्याचे सौंदर्य वेगळे तेवढेच मोहक असते. दोन मोठ्या धारांच्या मधला काळाशार खडक या सौंदर्यात भर घालतो. किनवटकडे जाताना रस्त्यात पिवळी, जांभळी, तांबडी, लाल फुले आणि हरणांचे कळप पाहण्याची मजा काही औरच असते. जुलै ते ऑक्टोबर हा सहस्रकुंडला भेट देण्यासाठी आदर्श कालावधी आहे. विशेषत: पडत्या पावसात याठिकाणी अनोखे सृष्टीसौंदर्य अनुभवायला मिळते.
सहस्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याच्या अलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यातील (मराठवाडा) किनवट या तालुक्यात मोडतो तर पलीकडचा भाग यवतमाळ जिल्ह्याच्या (विदर्भ) उमरखेड तालुक्यात येतो. हा धबधबा नांदेडपासून अवघ्या १०० किलोमीटरवर आहे. वरुणराजाच्या कृपेमुळे गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच हा धबधबा पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसते. ३० ते ४० फुटांवरून कोसळणारा धबधबा, उडणारे तुषार आणि कोसळणाऱ्या धबधब्याचा एकसुरी आवाजाने पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळतो.
सहस्रकुंड धबधब्याच्या काठावर पर्यटकांसाठी बगीचा तयार करण्यात आला आहे. बागेत विविध रंगाची फुलपाखरे पर्यटकांना मोहिनी घालतात. धबधब्यात मनसोक्त भिजल्यानंतर या बगीच्यात विश्रांती करत धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्याचा आनंद काही औरच. तेलंगणातील अदिलाबाद जिल्हा या धबधब्यालगत असल्याने या पर्यटन स्थळाला तेथील पर्यटकांची जास्त गर्दी दिसते. धबधब्याच्या काठावर असलेल्या पंचमुखी महादेव मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे.
दोन दिवसांच्या पावसाळी पर्यटनात सहस्रकुंड धबधब्यापाठोपाठ माहूर येथील रेणुका मातेचे मंदिर आदी सैर करता येईल. किनवट परिसरात पक्षी आणि वन्य प्राण्यांचे वैविध्य पहावयास मिळते. यामुळे पैनगंगेवर धोधो कोसळणाऱ्या या धबधब्यास भेट देऊन परिसरातील पर्यटनस्थळांना भेट दिल्यास पावसाळी पर्यटन समृद्ध होऊ शकेल.
तेर (TER)
तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या तेर उर्फ़ तगर येथे इसवीसन पूर्व चौथ्या शतकापासून वस्ती असल्याचे पुरावे सापडतात. इसवीसनाच्या दुसर्या शतकात सातवाहन काळात तेर हे महाराष्ट्रातील व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र म्हणुन उदयाला आले. येथुन भडोच या बंदरा मार्गे रोमन साम्राज्याशी व्यापार चालत असे. याप्रदेशात पिकणार्या कापसा पासून बनवलेले सुती तलम कापड, लाकूड, शंखाच्या बांगड्या, इत्यादी वस्तूंना रोमन साम्राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी होती. या व्यापारामुळे तगर नगराची भरभराट झाली. परदेशी प्रवासी टॉलेमी आणि ग्रीक खलाश्याने लिहिलेल्या "पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन सी" या प्रवास वर्णनात तगर नगराचा उल्लेख सापडतो. त्याच कलावधीत बौध्द धर्मियांनी तगर येथे धार्मिक केंद्र उभारले. सातवाहनांनंतर आलेल्या गुप्त चाकुक्यांपासून ते यादवांपर्यंत सर्व राजवटींनी या नगरात अनेक मंदिरे बांधली. मध्ययुगीन कालखंडात इतर व्यापारी केंद्रे उदयास आल्याने तगर विस्मृतीत गेले. इसवीसन १९०१ मध्ये हेन्री कझिन यांनी तेर येथे सविस्तर पाहाणी करून वृत्त्तांत प्रसिध्द केला. त्यानंतर तेर येथे वेगवेगळ्या कालखंडात पुरातत्वीय उत्खनन करण्यात आले.
तेर येथे कै. रामलिंगअप्पा लामतुरे वस्तू संग्रहालय आहे. उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर हे गाव आहे. कै. रामलिंगअप्पा लामतुरे यांनी चौकस बुद्धीने व ऐतिहासिक वस्तू जमवण्याचा छद या जोरावर वस्तू जमावल्या व हा लाखो रुपयांचा संग्रह त्यांनी २२ जानेवारी १९७१ रोजी शासनाकडे सुपूर्द केला. शासनाने तेथे भव्य वास्तू उभी केली असून अभ्यासक व पर्यटकांना हि वास्तू उपयुक्त ठरली आहे.
तेर गावात शिरल्यावर प्रथम लागते ते रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालय. आपल्या गावात परदेशी प्रवासी येतात आणि इथल्या पांढरीच्या टेकाडावरून जून्या पुराण्या वस्तू घेऊन जातात हे पाहून लहान रामलिंगप्पाच कुतुहल चाळवल. त्याने हेडमास्तरांना याबद्दल विचारल्यावर त्यांनी तेर गावच्या इतिहासाबद्दल आणि इथे मिळणार्या वस्तूंच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल रामलिंगप्पला माहिती सांगितली. त्यानंतर रामलिंगप्पांनी अशा वस्तू जमवायला सुरुवात केली. हळूहळू गावकर्यांनीही आपल्याला सापडलेल्या वस्तू त्यांना आणुन द्यायला सुरुवात केली. अशाप्रकारे रामलिंगप्पांचा संग्रह वाढत गेला. आयुष्यभर जमवलेला संग्रह त्यांनी १९७१ मध्ये शासनाच्या हवाली केला. तोच २२८९२ वस्तूंचा संग्रह आपल्याला रामलिंगप्पा खंडप्पा लामतुरे संग्रहालयात पाहायला मिळतो. यामध्ये सातवाहन, चालुक्य कालिन नाणी, मातीची भांडी, दगडात, मातीत बनलेल्या मुर्ती, प्राणी प्रतिमा, पदक, दगडात कोरलेले शिलालेख, गध्देगाळ, नक्षीकाम, शंखाच्या बांगड्या, वस्तू, हस्तीदंती वस्तू, पाण्यावर तरंगणारी वीट इत्यादी अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या संग्रहालयातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सहाव्या सातव्या शतकातील उत्तरेश्वर मंदिराची लाकडी चौकट. मंदिराच्या गर्भगृहाची ही चौकट चिखलात पडून राहील्याने इतक्या वर्षानंतरही तशीच्या तशी होती. पुरातत्व खात्याने त्यावर काम करुन ती संग्रहालयात ठेवलेली आहे. त्यावरील मुर्ती, नक्षीकाम, कोरीवकाम पाहाण्य़ासारखे आहे. (वस्तुसंग्रहालयात छायाचित्रण करण्यास मनाई आहे.)
काळेश्वर मंदिर
संत गोरोबा मंदिर आणि काळेश्वर मंदिर (Goroba Mandir & Kaleshwar Mandir)
वस्तू संग्रहालय पाहून त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपण गोरोबाकाकांच्या मंदिराजवळ पोहोचतो. या ठिकाणी वारकरी आणि भक्तांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. गोरोबा काकांच्या मंदिराच्या बाजूला चालुक्य काळातले काळेश्वर मंदिर आहे. या मंदिरात दोन सुंदर वीरगळ पाहायला मिळतात. मंदिराचा कळस आणि गर्भगॄह ढासळलेला आहे त्याची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. पण त्याभोवती सिमेंटचा विचित्र कट्टा बांधून सध्या कळसाला आधार दिलेला आहे. पण त्यामुळे कळसाची शोभा गेलेली आहे. मंदिर परीसरात अनेक पिंडी, सतीशिळा आणि समाधी पाहायला मिळतात.
उत्तरेश्वर मंदिर (Uttareshwar Mandir,Ter)
उत्तरेश्वर मंदिर
गोरोबाकाका मंदिर पाहून तेरणा नदी ओलांडून गेल्यावर दाट वस्तीत असलेल्या उत्तरेश्वर मंदिरापाशी पोहोचतो. ६-७ व्या शतकात कलचुरी राजवटीत संपूर्णपणे वींटांमध्ये बांधलेले हे एकमेव मंदिर आज महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. मंदिराच्या बांधकामात शोभा आणण्यासाठी विविध प्रकारच्या नक्षीकाम, मकरशिल्प असलेल्या वीटा खास बनवून वापरलेल्या आहेत. मंदिराच्या पाया व भिंतींसाठी भरीव आणि जड वीटा वापरलेल्या असून कळसासाठी मात्र हलक्या वीटा वापरलेल्या आहेत. जेणेकरून कळसाचे वजन कमी होईल. कळसासाठी ज्या वीटा बनवल्या आहेत त्या इतक्या हलक्या (त्याचवेळी शिखराचे वजन पेलण्या इतक्या मजबूत) आहेत की त्या पाण्यावर तरंगतात. वस्तूसंग्रहालयात आपल्याला अशाप्रकारची वीट पाण्यावर तरंगणारी वीट पाहायला मिळते. वजनाने हल्की आणि तरीही मजबूत अशी वीट बनवण्यासाठी मातीत मोठ्या प्रमाणावर तुस मिसळले जाते. ही वीट उच्च तापमानाला भाजल्यावर त्यातील तूस जळून जाते आणि सच्छिद्र पोकळ्या तयार होतात. अशाप्रकारे हलकी आणी मजबूत वीट बनवली जात असे. उत्तरेश्वर मंदिराच्या बाहेर काही वीरगळ पाहायला मिळतात.
उत्तरेश्वर मंदिर
त्रिविक्रम मंदिर
त्रिविक्रम मंदिर (Trivikram Mandir,Ter)
उत्तरेश्वर मंदिरापासून ५ मिनिटाच्या अंतरावर चैत्य गृहासारखी गजपृष्ठाकार रचना असलेले त्रिविक्रमाचे मंदिर पाहायला मिळते. हे मंदिरही पूर्ण वीटांध्ये बांधलेले असून मंदिरात श्री विष्णूची त्रिविक्रम मुर्ती आहे. मुर्तीच्या पायाशी बळी, शुक्राचार्य आणि बळीच्या पत्नीची मुर्ती असून बाजूला भैरवाची मुर्ती आहे. मंदिरातील कानडी शिलालेखानुसार शके १००० मध्ये कळचुर्य घराण्यातील महामंडळेश्वर जोगम्रस याचा उल्लेख आहे. मंदिरा समोर असलेल्या मंडपात गरुडाची मुर्ती आहे.
त्रिविक्रम मंदिर
जाण्यासाठी :- उस्मानाबाद रस्त्याने आणि रेल्वेने इतर शहरां जोडलेले आहे. उस्मानाबादहून २५ किमी आणि तुळजापूरहून ५० किमी अंतरावर तेर गाव आहे. गावात खाण्या पिण्याची सोय आहे.
तेर गावाची सफ़र करुन उस्मानाबादकडे मोर्चा वळवावा. उस्मानाबाद म्हणजेच पूर्वीचे धाराशिव. या नगराकडे येणार्या मार्गावर धाराशिव लेणी आहेत.
कनकालेश्वर मंदीर
कंकालेश्वर मंदिर बीडमधील एका ८४ मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आलेले शिव मंदिर आहे एक मोठ्या आकाराचा कट्टा आहे. या कट्ट्यावर १.५२ मीटर उंचीच्या जगतीवर बिंदुसरा नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे. बीड शहराच्या पूर्वेस असलेलं कनकालेश्वर हे शिवशंकराचे मंदिर आहे. शिल्पकलेचा आणि वास्तूकलेचा हा एक सुंदर नमुना.
मंदिराची रचना
कंकालेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख असून मुखपंडप, त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भगृहे असा तलविन्यास या मंदिराचा आहे. ही तीनही गर्भगृहे सारख्याच आकाराची असून त्यांचा तलविन्यास तारकाकृती आहे. या मंदिराचा मंडप अष्टकोनी आकाराचा आहे. मंडपाच्या चार मुख्य दिशांना आणि चार उपदिशांना दोन स्तंभ किंवा एक स्तंभजोडी आहे. या सोळा स्तंभांवर घुमटाकार छत पेललेले आहे. हे छत उत्तरोत्तर लहान होत गेलेल्या वर्तुळाकृती वलयांनी बनलेले आहे. छतावर फुलांची नक्षी आणि अलंकरण आहे. छताच्या मध्यभागी सर्वात वर कमळ आहे.
मंडप आणि गर्भगृहामधील स्तंभांची रचना चौरस तलविन्यासाची असून चौरस तळखड्याच्या वर काही अंतरावर अनुक्रमे अष्टकोनी, चौरस आणि वर्तुळाकार बनणारा चौरस खांब आणि खांबाच्या वर्तुळाकृती भागावर किचकहस्त असा या स्तंभांचा घटकक्रम आहे.
मंदिराच्या बाहेरील भागात विविध थर असून सगळ्यात खालचा थर चौकटच्या नक्षीने तर सगळ्यात वरचा थर कीर्तिमुखांनी अलंकृत केलेला आहे. मंदिराच्या बाहेरील अंगाच्या भद्रावरील देवकोष्ठांमध्ये शक्ती, ब्रह्मदेव आणि शिव संप्रदायातील देवदेवता आहेत. वर मंडोवरावरील जंघाभागात विष्णुचे दहा अवतार आणि अष्टदिक्पाल दाखविले आहेत.
कंकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहांची द्वारे पंचशाखा प्रकारची असून त्यावर कमळदल, पुष्प आणि व्याल यांचे अलंकरण आहे. या द्वरशाखांच्या खालच्या भागात कुंभ आणि चौरी धारण करणार्या दासी आणि निधी दाखविले आहेत. मुख्य गर्भगृहाच्या ललाटावर गणेशमूर्ती आहे.
मंदिराविषयी
दहाव्या ते 11 व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य (सहावा) याने हे मंदिर बांधले. हे दशावतारी मंदिर आहे. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. मंदिरावर लढणार्या स्त्रियांचे शिल्प आहे. त्यावर ग्रीक शिल्पकलेची छाप आढळते. जैन धर्मियातील आर्यनाथ, नेमिनाथ या दोन तीर्थंकरांचे शिल्पही मंदिरावर आहे. मंदिराचा आकार स्टार फिशप्रमाणे असून मंदिराच्या मंडपाखाली आणखी एक गर्भगृह आहे. ते पाचशे वर्षांपासून बंद आहे. कंकालेश्वर मंदिर अनेक वष्रे बंद होते. तिथे खनकाह होते. पुढे महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निझामाच्या मंत्रिमंडळाने घेतला. निझामाने सरकारी हुकूम काढून शामबुवा पाठक या पुजार्यास मंदिरात पूजेसाठी नियुक्त केले. ही कोंडी फुटायला 1915 उगवावे लागले. क्रांतिकारी तरुण पुरुषोत्तम गोडसे याने निझामाला भीक न घालता पोलिसांचे कडे तोडून कंकालेश्वर मंदिरातील पिंडीला अभिषेक केला. 17 सप्टेंबर 1948 अर्थात हैदराबाद स्वातंत्र्यदिनी दिवशी हे मंदिर खर्या अर्थाने मुक्त झाले.[१] या पुरातन मंदिराचा उल्लेख पुरण ग्रंथात ही आहे .अत्री ऋषी व अनुसया यांनी या ठिकाणी शिधेश्वराचा अभिषेक केला. ब्रम्ह-विष्णू -महेशाला प्रसन्न करून घेतल्याची दंतकथा सांगितली जाते . बीडचं ग्रामदैवत असल्यानं इथं दरवर्षी महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरते. याच मंदिराच्या पूर्वेस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं खंडेश्वरी देवीच मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे शहराचं भूषणच. आदिशक्ती माहूरवासिनी रेणूकादेवी सूर्यसुरी या भक्ताच्या विनंतीवरुन ही देवी इथं आली, अशी आख्यायिका आहे. दरवर्षी नवरात्रात येथे फार मोठी यात्रा भरते.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिर परीसर प्रदूषित होत आहे या कडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे
नायगाव मयूर अभयारण्य :-
बीड शहरापासून 25 कि.मी. अंतरावर पश्चिमेला असलेल्या नायगाव या गावाच्या परिसरात हे अभयारण्य आहे. 1994 साली शासनाने या अभयारण्यास मान्यता दिली. त्यामुळं महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिलं मयूर अभयारण्य म्हणून नायगावला महत्त्व प्राप्त झाले आहे. या मयूर अभयारण्यात 10 ते 12 हजारांच्या दरम्यान मोरांची संख्या आहे. त्याचबरोबर तरस, लांडगे, कोल्हे, सायाळ, खोकड, रानससे, रानमांजर, काळवीट, हरिण, मुंगूस इत्यादी प्राणी देखील आहेत. या अभयारण्यापासून साधारण 40 कि.मी. अंतरावर निसर्गरम्य असा सौताडा धबधबा आहे. समाधानकारक पाऊस झालेला असेल तर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मनमोहक धबधबा या ठिकाणी पहावयास मिळतो.
बस किंवा कार प्रवासात अचानक आपल्या गाडीसमोरून मोरांचे थवे उडत आडवे गेले तर? किंवा आपल्या दोन्ही बाजूंनी खिडकीबाहेर डोकावताच फुलवलेल्या पिसाऱ्यांनी नाचणारे, उडणारे मोर, मोरांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले तर? आनंदालाही पंख फुटतील ना? पहाटे पाच-साडेपाचला या रस्त्यावरून गेले तर नायगावच्या रस्त्यावर दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोडय़ाच जोडय़ा पहायला मिळतात. पाणवठय़ावर आलेले मोर, झाडाच्या फांद्यांवर आपला भला मोठा पिसारा लोंबकळत सोडून बसलेले मोर, डोंगराच्या पायथ्याशी बसलेले मोरांचे थवे, असे मोरच मोर आपल्याला पहायला भेटतात तरी मन शांत होत नाही. ‘‘दिल मांगे मोर’’ अशी आपली मन:स्थिती झालेली असतानाच एखादा मोर आपला देखणा फुलोरा नाचवत थुईथुई चालत आपल्यासमोर येतो आणि हे चित्र डोळ्यांत साठवतो.
बीड शहराच्या पश्चिमेस २० किमी अंतरावर बीड-पाटोदा-नगर व बीड लिंबादेवी-डोंगरकिन्ही-नगर या दोन रस्त्यांच्या बाजूला असलेल्या डोंगराळ भागात हे अभयारण्य वसले आहे. पावसाळ्यात हे डोंगर हिरवेगार झालेले असतात. हे अभयारण्य असून खुरटया झाडाझुडपांनी आणि खुरट्या गवताने आच्छादलेले आहे. हे अभयारण्य दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारातील आहे. या वनात राष्ट्रीय पक्षी मोर मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने शासनाने ८ डिसेंबर १९९४ ला हे क्षेत्र “नायगाव मयूर अभयारण्य” या नावाने संरक्षित केले. त्या वेळी त्याचे क्षेत्र २९.९० चौ. किमी होते. यात काही खाजगी वन क्षेत्र मिळून ते ५०.६० चौ.किमी. झाले आहे. १००–५०० मी.चा पट्टा याप्रमाणे एक पट्टा खुरट्या गवताचा, दुसरा पट्टा लागवडीखालील वनस्पतींचा, नंतर झाडाझुडपांचा मधेच उजाड माळरानाचा व पुन्हा नैसर्गिक वन अशा पद्धतीने हे वन विखुरलेले आहे. उपलब्ध माहितीनुसार २००४ या वर्षी येथील मोरांची संख्या ५,७०० होती. शासनाबरोबरच इथल्या गावकऱ्यांनीही मोरांना अभय दिले आहे. मोराबरोबरच इतर पक्ष्यांच्या शंभराहून अधिक जाती-प्रजाती या अभयारण्यात आढळतात. हे अभयारण्य डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य या नावानेही ओळखले जाते.
अभयारण्याचे क्षेत्र डोंगर उताराचे असल्यामुळे व कमी पावसाचे असल्यामुळे कुसळी (Heteropogon contortus), पवना (Sehima sulcatum), मारवेल (Dicanthium annulatum), शेडा (Sehima nervosum) अशाप्रकारची खुरटी गवते तसेच करवंद (Carissa congesta), घाणेरी (Lantana cammara) इत्यादी प्रकारची झुडुपे येथे आढळतात. चिंच (Tamarindus indica), जांभूळ (Syzigium cumini), लोखंडी (Ventilago madaraspatana), साग (Tectona grandis), चंदन (Santalum album), खैर (Senegalia catechu), बेहडा (Terminalia belirica), पळस (Butea monosperma), बिबा (Semecarpus anacardium), आवळा (Embilica officinalis), सीताफळ (Annona squamosa), बेल (Aeglemarmelos), सालई गुग्गुळ (Boswellia serrata), तेंदू (Diospyrosmelanoxylon) इत्यादी नैसर्गिक अवस्थेत आढळणारी झाडे आहेत. वनखात्याने या अभयरण्यात सु. १२०० हेक्टर क्षेत्रात सुबाभूळ (Leucaena leucocephala), कडूनिंब/लिंब (Azadirachta indica), गिरिपुष्प (Gliricidia sepium), शिरस (Pseudotsuga japonica) आणि बोर (Zizyphus mauritiana) या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. वड-पिंपळ प्रजातीतील काही जातीही इथे वाढतात. वनस्पतींप्रमाणेच येथील प्राणी जीवनही वैविध्यपूर्ण आहे. रानमांजर, तरस, काळवीट, लांडगा, कोल्हा आणि ससे हे प्राणी सापडतात. यांच्याबरोबरच काही सापांच्या जाती, मुंगूस, अजगर आणि सरडे या अभयारण्यात आहेत. येथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी., उन्हाळ्यातील कमाल तापमान ४५० से. आणि हिवाळ्यात कमीत कमी तापमान १०० से.पर्यंत खाली जाते. अशा विषम वातावरणातही जैववैविध्य आढळून येते. या अभयारण्याला भेट देण्याचा योग्य काळ ऑक्टोबर ते जून असा आहे.
या परिसरात मदरशा दर्गा, डोंगरीचे गुरुकूल, डोंगरकरकिन्हीचे नागेश्वर मंदिर ही पाहण्यासारखी स्थळे आहेत.
नायगावच्या मयूर अभयारण्याचे वन हे दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारात मोडते. प्रादेशिक वन विभागाने या क्षेत्रात अंदाजे १२०० हेक्टर क्षेत्रावर विविध झाडांची लागवड केली आहे. या अभयारण्यात मोराबरोबर तरस, लांडगा, कोल्हा, रानमांजर, काळवीट, ससे यांसारख्या वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. येथे १०० हून अधिक प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळतात. नायगाव अभयारण्याचे मुख्यालय बीड येथे असून बीडपासून या अभयारण्याचे क्षेत्र बीड-पाटोदा-अहमदनगर या मार्गावर २० कि.मी.च्या अंतरावर आहे.नायगाव येथे बांधकाम खात्याचे दोन विश्रामगृह आहेत. त्याचे आरक्षण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड यांच्या कार्यालयात होते. याशिवाय इतर निवास व्यवस्था येथे उपलब्ध नसली तरी बीड शहर जवळच असल्याने खासगी निवासव्यवस्था मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे.
सौताडा धबधबा
सौताडा हे पाटोदा तालुक्यातील तीर्थक्षेत्र असून, श्रीक्षेत्र रामेश्वराचे येथे मंदिर आहे. मंदिराजवळ ७०० फूट खोल दरीत धबधब्यातील पाणी पडते. पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य नयनरम्य असते.
बीड-अहमदनगर राज्यरस्त्यालगत सौताडा हे गाव वसलेले आहे. पाटोद्यापासून त्याचे अंतर १७ कि.मी. आहे. औरंगाबादहून बीड-पाटोदा मार्गे सौताड्याला जाता येईल. मुंबईवरून यायचे असेल तर अहमदनगर, जामखेडमार्गे सौताडा लागते. बीड व नगर जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव असल्याने दोन्ही जिल्ह्यातील पर्यटकांना सोयीचे ठरते. येथे मुक्कामी राहण्याची व्यवस्था नाही; परंतु नजिकच्या हॉटेल, लॉजिंगमध्ये राहून पर्यटनाचा आनंद घेता येऊ शकतो. खोल दरीत रामेश्वराचे मंदिर असून, चोहोबाजूंनी निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळ्यात हा परिसर हिरवा शालू पांघरून पर्यटकांचे मन मोहून घेतो. वन विभागाने चोहोबाजूला वृक्ष लागवड करून नैसर्गिक सौंदर्य जोपासले आहे. मंदिराजवळ वेदशिक्षण देणारी संस्था आहे. त्यात ४० मुले निवासी वैदिक शिक्षण घेत आहेत.
सीता व राम हे वनवासात असताना सौताड्याला आले होते. सीतेला तहान लागल्यानंतर रामाने बाण मारला. त्यानंतर धबधब्याची निर्मिती झाली, अशी पौराणिक आख्यायिका आहे. या ठिकाणी सीतेची न्हाणी असून, ती इतिहासाची साक्ष ठरली आहे.
सौताडा हे बीड व नगर जिल्ह्याच्या सीमेवरील गाव. निजामकाळात निजामाची चौकी म्हणून गाव ओळखले जात असले, तरी येथील सुप्रसिद्ध धबधबा व दरीतील रामेश्वराचे मंदिर यासाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. बालाघाट डोंगररांगांत असलेल्या खोल दरीत विंचरणा नदीची धार पडत असून, हा प्रसिद्ध धबधबा पाचशे फुटांपेक्षा अधिक उंचीवरून दरीत कोसळतो. दरीत घनदाट झाडी, विविध प्रकारची वृक्षवेली, हरीण, मोर, वन्यप्राण्यांबरोबरच विविध प्रकारच्या पशुपक्ष्यांच्या सान्निध्यात असलेले रामेश्वराचे सुंदर मंदिर यामुळे नैसर्गिकदृष्ट्या व आध्यात्मिक वारसा असलेले हे ठिकाण भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. दरवर्षी या ठिकाणी शैक्षणिक सहली, भाविक व पर्यटकांची गर्दी असते.महाशिवरात्रीला येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विशेषत: श्रावणात सुरू होणारा धबधबा व मोहरणारा निसर्ग यमुळे मोठी गर्दी असते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी मोठी गर्दी होत असली, तरी तिसऱ्या श्रावणी सोमवारी येथे यत्रा भरते. य यात्रेस लाखो पर्यटक व भाविक हजेरी लावतात.
नागमोडी वळणाचा सौताडा घाट, पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरलेले डोंगर, धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेला रामेश्वर साठवण तलाव, तर धबधब्याच्या खालच्या बाजूचा भुतवडा तलाव, पूर्वेकडून दरीत पडणारा छोटा धबधबा, तर उत्तरेकडून पडणारा विंचरणा नदीचा प्रसिद्ध धबधबा यामुळे य निसर्गरम्य परिसराची ओळख मिनी महाबळेश्वर म्हणून झाली आहे.
कपिलधार
वीरशैव पंथाचे पुनर्जिवन करणारे महात्मा बसवेश्वर तसेच शिवयोगी मन्मथ स्वामी यांनी कपिलधार याठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. नयनरम्य डोंगरदऱ्यांचा हा प्रदेश असून याच ठिकाणी संख्या शास्त्रकार कपिल महामुनींनी तपश्चर्या केली होती. म्हणून या भागास कपिलधार असे म्हणतात. येथील धबधबा मनमोहक आहे.
कपिलधार वीरशैव पंथाचे पुनर्जिवन करणारे महात्मा बसवेश्वर तसेच शिवयोगी मन्मथ स्वामी यांनी कपिलधार याठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली. नयनरम्य डोंगरदऱ्यांचा हा प्रदेश असून याच ठिकाणी संख्या शास्त्रकार कपिल महामुनींनी तपश्चर्या केली होती. म्हणून या भागास कपिलधार असे म्हणतात. येथील धबधबा मनमोहक आहे.
राज्यात प्रसिद्ध असलेला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. हिरवळीने नटलेल्या निसर्गरम्य परिसरातील हा धबधबा सर्वाच्याच आकर्षणाचा केंद्रिबदू ठरू लागला आहे. कपिलधार येथेही धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मन्मथ स्वामींचे समाधीस्थळ असलेल्या कपिलधारची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यात देखील आहे.
बीड जिल्ह्यातील सौताडा व कपिलधार हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, तसेच राज्याबाहेरूनही पावसाळ्यात येथे निसर्गप्रेमी सहलीसाठी येत असतात. सौताडा हे धबधब्यासाठी, तर कपिलधार हे मन्मथस्वामींचे समाधीस्थळ व उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेसाठी प्रसिद्ध आहे.
कपिलधारला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला असून, सौताडा येथील पर्यटनस्थळाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच बीड शहरापासून अवघ्या १३ कि.मी. अंतरावर कपिलधार हे तीर्थक्षेत्र आहे. कपिलमुनींनी ४७० वर्षांपूर्वी या ठिकाणी अनुष्ठान केले होते. तेथे त्यांची समाधी आहे. त्यानंतर मन्मथस्वामींनी येथे संजीवन समाधी घेतली होती. लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
सोलापूरहून येणाऱ्यांसाठी मांजरसुंबा घाटातून कपिलधारला जाता येते, तर बीडहून येणाऱ्यांसाठी घाटापासून स्वतंत्र रस्ता आहे. बीडमधून बसगाड्यांची व्यवस्था आहे. कपिलधारमध्ये येणाऱ्यांना निवासी व्यवस्थेसह जेवणाची सोयही देवस्थानात केली जाते. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा आनंद घेण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली येत असतात. चोहोबाजूंनी डोंगरदऱ्या असून, मध्ये मन्मथस्वामींची समाधी आहे. हेमांडपंथी मंदिरालगत उंचावरून पडणारे धबधबे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले आहे. येथे छायाचित्र घेण्यासाठी भाविकांबरोबरच पर्यटकांचीही गर्दी असते. येथे सहकुटुंब मुक्कामी राहता येते. थुईथुई नाचणारे मोर, पक्ष्यांच्या किलबिलाट व निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण अशा आकर्षक वातावरणाचा आनंद लुटण्याची पर्यटकांना सुवर्णसंधी आहे. कार्तिकी पौर्णिमा, श्रावण महिन्यात व माघ शु. पंचमीला येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात,
\
धारूर
बीड जिल्ह्यातील धारूर हे महत्त्वाचं ठिकाण आहे. राष्ट्रकुळांच्या काळात शहराचं संरक्षण करण्यासाठी धारूर किल्ला बांधण्यात आला होता.
बीड जिल्ह्यातील धारूर हे महत्त्वाचं ठिकाण आहे. घाटावर वसलेलं हे शहर असल्यामुळे गावाचं आरोग्य चांगलं आहे. खवा आणि सीताफळाची ही महत्त्वाची बाजारपेठ असून मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत या मालाची निर्यत केली जाते. या गावाच्या नावात त्याची भौगोलिक वैशिष्टे सामावली आहेत. धारेवरील स्थान म्हणून धारकर, धारौर, धारूर अशी नावे रूढ झाली असावीत. धार या शब्दाचे दोन अर्थ होतात. डोंगराच्या काठावर आणि अखंड वाहणार्या पाण्याच्या धारेवर हे गाव वसलेलं आहे. तसेच गावाजवळच धारेश्वराचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. मोगल राजवटीत अहमद नगरच्या निजामशाहीने या गावाचे नाव बदलून फतेहाबाद असे ठेवले. पण मध्ययुगीन कागदपत्रात किल्ले धारूर अशीच नोंद आढळते. मजबूत आणि प्रशस्त किल्ल्यामुळे मोगल काळात या शहराला विशेष महत्त्व होते. राजा धारसिंहामुळे या गावचे नाव धारूर पडले. अशी माहिती अनेक जण सांगतात. पण प्रत्यक्षात तशी नोंद कुठे सापडत नाही.
या स्थानाचा विकास काळाच्या ओघात होत गेला. आज मध्यम वाटणारे हे गाव मध्य युगामध्ये राजकीय दृष्टा स्वतःचे वेगळे अस्तित्त्व टिकवून होते. उत्तर मध्ययुगीन कालखंडात चंदीप्रसादजी मिश्रा, नगराध्यक्ष स्वरुपसिंह जहारी, रामचंद्र शंकर शेटे, प्रमोद माधवराव शेटे, सद्दिवाले यांचे पूर्वज इथे आले आणि त्यांनी स्वतंत्र वसाहती वसवल्या. धारूरच्या वाढत्या विस्ताराबरोबरच नगररचनेत आवश्यक त्या वास्तुंची निर्मिती होत होती. पाणी पुरवठ्यासाठी ज्या बारवाची निर्मिती करण्यात आली त्यात २ हरिणपीर बावडी, रंगारोनी बावडी यांचा उल्लेख करावा लागतो. यापैकी काही विहीरीवर शिलालेख कोरलेले आढळतात. उत्तर मध्ययुगामध्ये बांधण्यात आलेला एक महाल कलावंतिणीचा महाल म्हणून ओळखला जातो. गावाच्या बाहेर एक स्वतंत्र वास्तू चेकपोस्ट स्वरूपात उभारण्यात आली होती. आज गावात उभे असलेले प्रमुख प्रवेशद्वार आणि मशीद तत्कालिन कला वैभवाची साक्ष आहे. गावाला संपूर्ण दगडी तटबंदी होती. कधीकाळी हातमाग हा व्यवसाय इथे खूपच जोरात होता. धारूरचे शेले, साडा, धोतरजोडे प्रसिद्ध होते. पण आज हा व्यवसाय संपूष्टात आला आहे.
किश्वरखानने महादुर्गाची उभारणी केल्यानंतर त्यांनी धारूर शहराची अत्यंत योजनापूर्वक वसाहत केली. व्यापारी, उद्योगपती, विद्वान ब्राह्मण, सरदार आदींना निमंत्रित करून धारूर शहराचा नियोजनपूर्वक विकास केला. सन १६५८ साली सोनपेठ येथील प्रसिद्ध व्यापारी पापय्या शेटे यांना सन्मानाने निमंत्रित करून त्यांना रोअगिरी दिली. पापय्यांनी आपल्या बरोबर आणखी काही व्यापार्यांना बोलावून धारूरची बाजारपेठ वसवली, वाढवली. त्याकाळी या शहराचा लौकिक सर्वदूर पसरला होता. आजही मराठवाडातील एक महत्त्वाची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दूरवरून सोनं, चांदी खरेदीसाठी लोक इथे येतात. सुवर्णकारांची संख्याही इथे फार मोठी आहे. आज कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, औरंगाबाद, अंबाजोगाई इत्यादी शहरात सुवर्ण काम करणारे कारागिर धारूर शहरातीलच आहेत.
धारूर ही एक श्रीमंत बाजारपेठ असल्यामुळे दातृत्व हा या गावचा धर्म आहे. अनेक मंदिराच्या उभारणीसाठी तलाव, विहिरीच्या बांधकामासाठी सढळ हाताने देणगी दिल्याच्या नोंदी कागदपत्रातून सापडतात. यादवांच्या काळात धारूर हे एक देश विभागाचे केंद्र म्हणून उदयास आले. या विषयी नोंद करणारा शिलालेख अंबाजोगाई येथे आहे. सकलेश्वर देवस्थानच्या निर्मितीसाठी दिलेल्या दानपत्रात या स्थानाची नोंद सिंघन यादवाचा सेनापती खोलेश्वर (शके ११३२ ते ११६९) हा करतो. या दान लेखात प्रासादह्न सकलेश्वरस्य रचितो धारो देश अशी नोंद आहे.
किल्ल्यामुळे धारूर शहराचे वैभव वाढले. लोकांचा राबता वाढला. अदिलशाहीचा सिपाह सालार किश्वरखान याने मूळ राष्ट्रकूट कालीन महादूर्ग असलेल्या जागेवर नव्याने अत्यंत मजबूत असा दूर्ग बांधला. सन १५६७-६८ साली हा दूर्ग बांधून पूर्ण केला. किल्ल्यावर शस्त्रसाठा भरपूर गोळा केला. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी (खंदक) आणि चौथ्या बाजूला खोल दरी त्यामुळे शत्रूला किल्ला हस्तगत करणे सोपे नव्हते. धारूरच्या व्यवस्थित नियोजनाची नोंद जशी बुसा तीज-उस-सलातीन या ग्रंथात फकीर अहमद झुबेरी यांनी करून ठेवली आहे. तसेच अब्दुल हमीद लाहरी याने आपल्या बादशहानाम्यात केली आहे. हा किल्ला सहजा सहजी जिंकणे अशक्य असल्याचीही नोंद त्यांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी किल्ला बांधला तोच किश्वरखान फितुरीमुळे मारला गेला. किल्ला बांधत असताना अंकुश खान याने किश्वर खानला अंधारात ठेऊन किल्ल्याचा काही भाग जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात प्रवेश करून किश्वर खानचा वध केला.
मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली. हत्ती, घोडे, जड जवाहिर, राहुटाचे सामान, शस्त्रास्त्रे, बंदूका मिळाल्या. या किल्ल्यात काही काळ अहमदनगरच्या निजामशहचा मुक्काम होता. त्यानेच विजयाचे प्रतीक म्हणून या गावाचे नाव बदलून फतेहाबाद ठेवले. हे नाव बदलण्यासाठी स्वातंत्र्यानंतर धारूरच्या जनतेनी खूप प्रयत्न केला व अखेर ५ मे १९७२ रोजी पुन्हा फतेहाबादचे धारूर असे नामकरण झाले. त्यांनतर याच किल्ल्यात काही काळ विठोजी राजे भोसले थांबले होते.शहाजीराजांनी बिदरशहाला या भागातच पराभूत केलं होतं. तर राजे शिवबाचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा नेताजी पालकर याच किल्ल्यात मुक्कामास होता. शिवरायांबरोबर मतभेद झाल्यावर नेताजी पालकर आदिलशहीस जाऊन मिळाला. मोगलांनी नेताजीस आपल्याकडे वळवून घेतला. त्यास पाच हजाराची मनसब, पन्नास हजार रुपये रोख तसेच जहागिरी दिली. पण राजे शिवबा आग्रा किल्ल्यातून निसटताच औरंगजेबाने एका आदेशान्वये नेताजीस कैद करून दिल्लीस घेऊन या असा आदेश दिला.
त्यानुसार नेताजीस धारूर किल्ल्यात कैद करून दिल्लीस नेले. तिथे त्यांचे धर्मांतर करून अली कुलीखान हे नाव ठेवले. पुढे कालांतरणाने नेताजीस आपल चुक कळून आली. तो शिवरायांना शरण आला. त्याला पुन्हा त्यांना हिंदू धर्मात घेतले. यावेळी शिवराय जातीने हजर होते. कधीकाळी अत्यंत मजबूत असणारा हा किल्ला आता उद्ध्वस्त झाला आहे. शासनाचे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. पण आजही किल्ल्यात फेरफटका मारताच किल्ल्याची भव्यता आणि गत वैभव लक्षात येते. किल्ल्यात टाकसाळ होती. राजाने स्वतःचे असे स्वतंत्र असे नाणे काढले होते. सर्वच राज्यांचा हा किल्ला ताब्यात असावा असा जोरदार प्रयत्न होता.
सत्ता-संपत्ती बरोबरच नगरात फार मोठा संख्येत बुद्धीमान माणसं होती. ज्ञानी पंडित होते. तसेच संत महंतही होते, वेदोनारायण, कीर्तनकार होते. उद्धवचिद्पन असाच एक महान संत कीर्तनकार, चरित्रकार. उद्ध्वचिद्धनसचे चरित्र लेखन समोर ठेऊन अनेक संताचे चरित्र लेखन केले असे संत चरित्रकार महिपती निम्रपणे कबूल करतो. अशा महान संतांची समाधी धारूर शहरात आहे. पण आज ती दुर्लक्षीत अवस्थेत आहे. संत साहित्यात उद्धव चिद्धनाचे स्थान अत्यंत श्रेष्ठ आहे.
भक्ती मार्गाने संत पदापर्यंत गेलेले शेख महंमद बाबा यांची समाधी (कबर) जरी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथे असली तरी त्यांची जन्मभूमी धारूर होती. शेख महंमद बाबा जरी मुसलमान असले तरी त्यांचे शिष्य हिंदूही होते. आजही श्रीगोंदा इथे त्यांच्या समाधीची पूजा हिंदू-मुसलमान एकत्र येऊन करतात. शेख महंमदच्या जीवन कार्यावर मोरोपंत, महिपती, हनुमंत स्वामी या व अशा अनेकांनी ग्रंथात गौरवाने उल्लेख केला आहे. शेख महंमदबाबाद अभंग लेखनही भरपूर केलं.
साधुवर्य देशिकानंदन महाराजांचे मूळ वंशात त्यांचा जन्म झाला. कृष्णाजीपंत हे धारूर सोडून अंबाजोगाईस गेले. गदाधरपंत, साळूबाई यांच्यापोटी बाळकृष्ण जन्माला आले. शुकानंद महाराजांनी दीक्षा दिल्यानंतर बाळकृष्णाचे देशिकानंदन झाले. उमरी इथे त्यांची समाधी आहे. अंबादास बुवा, विठ्ठलशास्त्री धारूरकर, भगवान शास्त्री धारूरकर, लिंबादेव वारेकर यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर फार मोठा लौकिक होता. त्यांचा कघाशीपर्यंत शिष्यसंप्रदाय होता. वेदोनारायण म्हणून त्यांचा फार मोठा लौकिक होता. अनेक ग्रंथाचे या ज्ञानी पंडितांनी लेखन केले आहे. प्रभाकर शास्त्री पारेकर, बाबादेव पारेकर, दत्तात्रय पारेकर, नरहरी शास्त्री पारेकर हे उत्तम प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून ओळखले जात. प्रभाकर पारेकरांना तर कीर्तन केसरी हा बहुमान मिळाला.
हैदराबाद मुक्ती आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन यात धारूरकरांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. हा एक स्वातंत्र लेखाचाच विषय आहे. दक्षिण भारतातील दुसरा आर्य समाज व नहले गुरुकुल धारूर इथे होते. तसेच वैदिक अध्ययन-अध्यापनासाठी धारूरला फार मोठी वैदिक शाळा होती. अनेक विद्यार्थी पाठशाळेत अध्ययन करीत. वेदाबरोबरच संस्कृत साहित्याचा, ज्योतिषाचा अभ्यास करीत पुढे पुढे वैदिक शाळा बंद झाली. त्यामुळे धारूरच महत्त्व थोडं कमी झालं. पंढरपुरला आजही धारूरकर पाठशाळा सुरू आहे. ही एक जमेची बाब आहे.
एकंदरीत धारूर ही एक प्राचीन, ऐतिहासिक, वैभव संपन्न नगरी होती व आजही आहे. साहित्य, संगीत, नाट-कला या क्षेत्रातही धारूरकरांनी महाराष्ट्रभर आपलं अस्तित्त्व सिद्ध केलं आहे. एक व्यापारी पेठ म्हणून सोन्या-चांदीची विश्वसनिय पेठ म्हणून सारा महाराष्ट्र या नगरीकडे पाहतोय. धारूर ही एक ऐतिहासीक सूवर्ण नगरी आहे. बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर एक तालुक्याचे ठिकाण, एक प्राचीन ऐतिहासीक शहर. आजही गत वैभवाची साक्ष म्हणून प्रचंउ मोठे चिरेबंदी वाडे तग धरून उभे आहेत. सोन्या चांदीची पेठ म्हणून महाराश्ट्रभर या शहराचा लौकीक आहे. राष्ट्रकूट, यादव, चालुक्य, मोगल या सर्व राजवटीशी या शहरांचा संबंध होता.
राष्ट्रकुळांच्या काळात शहराचं संरक्षण करण्यासाठी धारूर किल्ला बांधण्यात आला होता. धारूर गावातून गाडीने थेट किल्ल्यापर्यंत जाता येतं. धारूर गाव आणि किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे त्याला भुईकोट असं म्हणतात. किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी ४.२ मीटर रुंद आणि ४.५ मीटर खोल खंदक खोदलेला आहे.
खंदकाच्या उत्तर भागात एक बांधीव तलाव असून त्याला ‘सोलापूर दिंडी’ किंवा ‘खारी दिंडी’ असं म्हणतात. धारूर किल्ल्यावर प्रवेश करताना दोन बुरूज लागतात. त्यातील डाव्या बुरुजाला ‘फतेह’ आणि उजव्या बुरुजाला ‘टाकसाळ’ बुरुज म्हणतात. शाही बुरुजावरून खाली उतरून डावीकडे गेल्यावर ‘गोडी दिंडी’ या तलावाजवळ जाता येतं. हा तलाव दगडात कोरून तयार करण्यात आला आहे. किल्ल्याच्या प्रमुख दरवाज्याकडे येताना दोन मजली वास्तू दिसते. तिला ‘रंगमहाल’ या नावाने ओळखलं जातं.सुमारे 30 ते 40 एकर क्षेत्रामध्ये तो बांधलेला आहे.
धर्मापूरी
धर्मापूरी हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे. हे ठिकाण अंबेजोगाई-अहमदपूर मार्गावरील मोठे गाव आहे. परळी, अंबाजोगाई, अहमदपूर, गंगाखेड आणि पानगाव शहरांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. इथे एक प्राचीन किल्ला असून एक तळे आहे. गावापासून जवळच मरळशीद मंदिर आहे.
गावामध्येच एक जुने राम मंदिर आहे. येथे बस स्थानक असून सर्वच बस इथे थांबतात. जवळील रेल्वे स्थानक परळी आहे. बीडला पांडवकालीन ‘दुर्गावतीनगर’ म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले ‘चंपावतीनगर’ हे या शहराचे दुसरे नाव आहे.
पूर्वी राणी चंपातवतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे. शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. उपरोत्त्क परिसर पुढे यादवांच्या अंमलाखाली होता.
अल्लाउदीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो (१२९६-१३१६). हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतल्याने ‘भीर’ म्हणून ओळखला जाऊ लागला (१३२५-५१). बहामनी साम्राज्याच्या उद्यानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली.
त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजाम आणि मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन आणि खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिध्द आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यंत.
बहामनी आणि निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता.
१ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनरचनेदरसम्यान बीड जिल्हासाहित्य मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन व्दैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही राज्ये वेगळी झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. निजाम आणि ब्रिटीश यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले गेले होते.
जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे प्राचीन गाव तेथील ब्राह्मणी (हिंदू) लेणी आणि योगेश्वरी देवीच मंदिर यामुळे प्रसिध्द आहे. आंबेजोगाई पासून २७ किमी अंतरावर धर्मापूरी नावाच एक प्राचीन धर्मक्षेत्र आहे. या गावात चालुक्य कालिन प्राचीन केदारेश्वर मंदिर याची साक्ष देत आजही उभ आहे.
या गावत मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. हा किल्ला धर्मापूरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले आहेत त्यात मंदिरांवरील अनेक शिल्प पहायला मिळतात.
या वरून या गावात अनेक मंदिरे होती आणि त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. धर्मापूरीचा किल्ला आणि अप्रतिम कोरीव शिल्पे असलेले केदारेश्वर मंदिर ही दोन्ही ठिकाण आवर्जून पाहण्यासारखी आहेत.
पहाण्याची ठिकाणे
धर्मापूरी गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत जाऊ शकतो. किल्ला हा गावा मागील छोट्याश्या उंचवट्यावर उभारलेला आहे. किल्ल्याची तटबंदी मात्र उंचवट्याच्या खालपासून बांधून काढलेली आहे.
किल्ल्याला ऐकेरी तटबंदी आहे. तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात ९ अष्टकोनी बुरूज बुरूज आहेत. चर्या, तटबंदी आणि बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनलेल्या आहेत.
किल्ल्याला एकामागोमाग एख असे २ दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी तेवढ्याच भागात परकोट बांधलेला आहे. या परकोटाच्या तटबंदीत छोटे पूर्वाभिमूख प्रवेशव्दार आहे. तेथून पायर्या चढून वर जाऊन काटकोनात वळल्यावर किल्ल्याचे मुख्य पूर्वभिमूख प्रवेशव्दार आहे.
हा १० फूटी दरवाजा सध्या दगडानी अर्धा बंद केलेला आहे. दरवाजा समोरील बुरूजावर आणि तटबंदीत फूले, नक्षी, व्याल यांची शिल्पे आढळतात. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. या देवड्यांवर व्यालमुखाच्या पट्टया बसवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरल्यावर उजव्या हाताला दोन तटबंदी लगत दोन खोल्या बांधलेल्या आहेत.
या खोल्यांवरून पुढे गेल्यावर तटबंदीला लागून एक अप्रतिम चौकोनी विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. दुसऱ्या पायरीवर कमलपुष्प कोरलेले आहे. २५ पायऱ्या उतरल्यावर मार्ग काटकोनात वळतो. इथे दगडात बांधलेल्या दोन कमानी आहेत. सर्वात खालच्या पायरीवर आणि भिंतीवर किर्तीमुख कोरलेले आहे.
उपास नसल्याने विहिरीचे पाणी खराब झालेले आहे. विहिर पाहून बाहेर आल्यावर समोरच्या तटबंदीवर जाणारा जिना दिसतो आणि बाजूला तटबंदी लगत काही कमानी दिसतात. या कमानी म्हणजे रहाण्यासाठीच्या खोल्या असून या खोल्यांमागे तटबंदीत २ संडास बनविलेले पहायला मिळतात.
यांची रचना सिंधुदुर्गावरील शौचालयासारखी आहे. या खोल्या पाहून बुरूजावर जाणाऱ्या जिन्याकडे जावे. येथे तटबंदीतील एका दगडावर उड्डाण करणाऱ्या मारूतीचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली चोर दरवाजा आहे. पण माती पडल्यामुळे हा मार्ग सध्या बंद झाला आहे. पण तटबंदीच्या बाहेरून चोर दरवाजा पहाचा येतो.
जिन्याने बुरुजावर गेल्यावर तिथे एका पीराचे थडगं पहायला मिळते. तटतबंदीवरून प्रवेशव्दाराकडे येतांना डाव्या बाजूला किल्ल्याच्या खाली असलेल्या रस्त्याच्या कडेला काही नागशिल्प दिसतात. तटबंदीला असलेल्या जिन्याने प्रवेशव्दाराजवळ उतरावे. किल्ल्यातून बाहेर पडून नागशिल्पांकडे जातांना तटबंदीत बाहेरच्या बाजूने एक भवानी देवीचे मंदिर आहे.
या मंदिराच्या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. त्यावर नक्षी आणि खालच्या बाजूस काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. ते पाहून परत रस्त्यावर येऊन नागशिल्पाच्या पुढे जाऊन तटबंदी पर्यंत चढून जावे. या ठिकाणी चोर दरवाजा आहे. या ठिकाणी चोर दरवाजा आहे. या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. महिरपीच्या वरच्या बाजूस दोन कोनाड्यात दोन व्यालमुख आहेत.
दरवाजा समोर व्यालाची पूर्णाकृती मूर्ती पडलेली आहे. हे पाहून झाल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. तटबंदी बाहेरील दोनही ठिकाणे झाडीत लपलेली असल्याने शोधणे कठीण जाते, त्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी. केदारेश्वर हे प्राचीन मंदिर गावा बाहेरील शेतात आहे. मंदिरावर अप्रतिम शिल्प कोरलेली आहेत. मंदिराच्या परीसरातही अनेक शिल्प पडलेली आहेत.
धर्मापुरीच्या किल्ल्याचा इतिहास :
या किल्ल्यास विशिष्ठ असे नाव नाही. हा किल्ला धर्मापुरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. धर्मापुरीचा हा किल्ला, या गावामध्ये निजामाच्या राजवटीमध्ये बांधण्यात आला होता. मराठवाड्यातील या परिसरामध्ये हैद्राबादच्या निजामाची सत्ता होती. आणि त्यावेळी अंबेजोगाई परिसरात त्याची काही सत्ता केंद्रे होती. अंबेजोगाई येथे निजामाच्या सत्ता केंद्राचे आज ही काही अवशेष दिसून येतात.
धर्मापुरीचा किल्ला ज्या दगडांपासून बांधण्यात आलेला आहे, त्या दगडांवर कोरीव काम केलेले आहे. परिसरात एक मोठा तलाव देखील आहे. धर्मापुरीच्या किल्ल्याचा आणि येथील मंदिरांचा इतिहास रझाकारांशी जोडलेला आहे. असे म्हणतात की, हैद्राबाद मुक्ती संग्रामावेळी रझाकारांनी या परिसरातील काही मंदिरे उध्वस्त केली होती.
धर्मापुरीच्या किल्ल्याच्या परिसरातील पहाण्यासारखी ठिकाणे :
अंबेजोगाईहून धर्मापुरीला आल्यानंतर वाटेवरूनच आपल्याला किल्ला दिसतो. धर्मापुरी गावामधून किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत वाहन घेवून जाता येते.
किल्ल्याचा उंचवटा आणि तटबंदी : हा किल्ला धर्मापुरी गावामधील एका उंच वट्यावर बांधलेला आहे. हा उंच वटा दुरूनच आपल्याला दिसतो. तसेच पडझड झालेली किल्ल्याची तटबंदी देखील दिसते. किल्ल्याला ऎकेरी तटबंदी आहे. तटबंदी उंचवट्याच्या खालपासून बांधलेली आहे. तटबंदीमध्ये उभारण्यात आलेले अष्टकोणी बुरुज आहेत.
अष्टकोनी बुरुज आणि तटबंदीवरील जंग्या : किल्ल्याच्या तटबंदीवर अष्टकोनी बुरूज आहेत, आणि तटबंदीवरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बांधण्यात आलेल्या आहेत. या जंग्या देखील किल्ल्याच्या बाहेरील बाजूने दिसतात.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा : किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याजवळ संरक्षक म्हणून कोट बांधलेले आहेत. या कोटाच्या तटबंदीमध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. यापुढे दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. तसेच याठिकाणी नक्षीकाम देखील केलेले आहे.
किल्ल्यातील चौकोनी विहिर : किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर अवशेषरूपातील खोल्या आहेत. या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर एक चौकोनी आकाराची विहिर आहे. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
हनुमानाचे मंदिर : विहिरीपासून पुढे गेल्यानंतर तटबंदीतील एका दगडावर कोरण्यात आलेले उड्डाण करणाऱ्या हनुमानाचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली एक चोर दरवाजा देखील आहे.
पीर : धर्मापुरीचा हा किल्ला निजामशाही सत्तेच्या कालखंडात बांधण्यात आलेला असल्यामुळे किल्ल्याच्या परिसरात एक पीर आहे. किल्ल्याच्या परिसरातील एका बुरुजावर पिराच हे थडगं आहे.
किल्ल्याच्या परिसरातील तलाव : किल्ल्याच्या बाहेरील बाजूस एक तलाव आहे. धर्मापुरी गावातील लोक या तलावाच्या पाण्याचा वापर करतात. जास्त प्रमाणात सांडपाण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो.
केदारेश्वर मंदिर : धर्मापुरी गावाच्या परिसरामध्ये केदारेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या परीसरात काही शिल्प पडलेली आहेत. तसेच मंदिराच्या भिंतींवर देखील शिल्प कोरलेली आहेत. या व्यतिरिक्त धर्मापुरीच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये काही नागशिल्प आहेत, भवानी देवीचे मंदिर आहे.
रायगडाच्या घेर्यात
६ एप्रिल १६५६ चा दिवस. एन आषाढ वणव्यात एका बलदंड आणि प्राचीन गडाच्या पायथ्याशी फौजा पोहचल्या आणि बघता बघाता त्यांनी गडाला मोर्चे लावले, मोक्याच्या जागा रोखल्या, गडाला वेढा पडला. अर्थात गडाचा फास हा असा आवळल्यानंतर गडावर कैद झालेला सरदार, त्याच्या दोन मुलांसह लगेचच शरण आला. हा जहागीरदार होता चंद्रराव मोरे आणि बरोबर होती त्याची दोन मुले कृष्णाजी व बाजी. अर्थात चंद्रराव हे याचे खरे नाव नव्हते, हि होती पदवी. जावळीच्या दुर्गम प्रदेशावर राज्य करणार्या मोरे घराण्याच्या राजपुरुषाला हि उपाधी लावली जात असे.याचे खरे नाव येसाजी मोरे. वास्तविक ज्याने या येसाजीला गादीवर बसण्यास ज्यांनी मदत केली त्याच्याशीच उलटल्याने हि वेळ आली होती. मोर्यांशी हा संघर्ष करणारे आणि अगदी पातशाही सैन्य ही ज्यांच्या प्रदेशात पाउल टाकायला धजावत नसे त्या जावळीला ताब्यात घेणारे होते, शिवछत्रपती. वास्तविक इ.स. १६४८ मध्ये याच शिवाजी महाराजांच्या मदतीने येसाजी हा जावळीचा उत्तराधीकारी म्हणजे चंद्रराव मोरे झाला. मात्र या दुर्गम प्रदेशात आपल्याला कोण विरोध करणार ? या घंमेडीने त्याचा घात केला आणि जावळी मुक्त करुन स्वराज्याची पश्चिम सीमा थेट समुद्रापर्यंत सुरक्षित करण्यासाठी शिवाजी राजांनी जावळीवर आक्रमण केले. १५ जानेवारी १६५६ ला जावळी शिवरायांकडे आली व ३० मार्च पर्यंत राजे तिथे राहिले . चंद्रराव मोरे जावळीतून निसटला व रायरीला, म्हणजे रायगडला गेला. जावळीमधे काही प्रतिकार झाला असावा ज्यामुळे शिवरायांना तिथे ३० मार्चपर्यंत राहावे लागले. राजे तिथे असताना त्याच्या लोकांनी रायरीलाही वेढा घातला असावा. शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजीराजे यांनी पौष चतुर्दशीस जाऊन जावली घेतली [१५ जानेवारी १६५६] चंद्रराव (येसाजी) पळून रायरीच्या (आत्ताचा रायगड) किल्यावर आश्रयास गेला. शिवाजीराजांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला. पुढे चंद्ररावाला आणि त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना शिवाजीराजांनी कैद केले.शरण आलेल्या चंद्ररावाने काही दिवसात पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजीराजांनी त्याला आणि कृष्णाजीला ठार केले. बाजी मात्र पळून गेला.जावळी घेतल्यावर लवकरच चंद्रगड,मकरंदगड,चांभारगड हे किल्ले स्वराज्यात सामिल झाले. मोर्यांकडून रायरीचा डोंगर जिंकल्यानंतर शिवाजी राजे स्वतः गडावर गेले. महाराजांनी या वेळी हा संपुर्ण गड बारकाईने नजरेखाली घातला. ईथली मोक्याची जागा त्यांनी अचुक हेरली असणार. हे ठिकाण एक बळकट लष्करी ठाणे म्हणून बांधता येईल याची नोंद महाराजांनी नक्कीच घेतली असली पाहीजे. अर्थात तो काळ स्वराज्य उभारणीचा होता. सतत मोहिमा आणि वारंवार होणारी सुलतानी आक्रमण, यामुळे ईथे फार दुर्ग बांधणी झाली नसावी.
वास्तविक रायगड हा अतिशय प्राचीन गड. याचे प्रमाण म्हणजे परिसरात असणारी गंधारपाले लेणी आणि महाड हे प्राचीन बंदर. त्याकाळी सावित्री नदीच्या पात्रामुळे आणि लगेचच असणार्या बाणकोटच्या खाडीमुळे या परिसरातून मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. सह्याद्रीच्या रांगेत असणार्या घाटातून बैलांवर सामान लादून माल देशावरील नाशीक, पैठण, तेर, कर्हाड, करवीर अश्या शहरात नेला जाई. या व्यापारी तांड्याना लष्करी संरक्षण आवश्यकच असे, यासाठीच महाडच्या परिसरात बरेच दुर्ग उभारले गेले. बाकीचे दुर्ग आकाराने छोटे आणि तुलनेने दुय्यम होते. पण ऊंचीचा विचार केला तर थेट गगनचुंबी म्हणावा आणि विस्ताराने प्रचंड अश्या महादुर्ग रायगडाची उभारणी याच काळात झाली. मात्र गडाचे पहिले उल्लेख मिळतात, ते बाराव्या शतकातील ! त्या काळात विजयनगरच्या हिंदु राजांच अकींत म्हणवल्या जाणार्या पाळेगारांकडे गडाचा ताबा होता. अर्थात त्याच्याही आधी गड अकराव्या ते तेराव्या शतकात यादवांकडे असावा. चौदाव्या शतकाच्या आरंभी रायगडाचा ताबा गेला निजामशाहीकडे, त्यावेळी शिर्के देशमुख येथील हवालदार होते. पुढे निजामशाही नष्ट झाल्यानंतर महाराष्ट्राचा प्रमुख भाग दोनच शाह्यांनी वाटून घेतला, आदिलशाही आणि मोघल. रायगडाचा ताबा आला आदिलशाहीकडे.पण प्रत्यक्षात ईथे कोणी आदिलशाही अंमलदार नव्हता. या प्रदेशाचा आणि गडाचा ताबा होता जावळीच्या मोर्यांकडे. त्यांच्याकडून गड प्राप्त केला शिवाजी महाराजांनी आणि रायगडाने जणु त्याच्या सोनेरी कालखंडात प्रवेश केला. रायगड हे काही या गडाचे मुळ नाव नाही. रायगडाचे प्राचीन नाव ’रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ’पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ’रासिवटा’ आणि ’तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास ’नंदादीप’ असेही नाव पडले. दुर्गदुर्गेश्वर रायगडाला 15 विविध नावांनी संबोधिले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड,नंदादीप, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर ही ती पंधरा नांवे आहेत. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. रायगड हा पुर्व बाजु, उत्तर बाजु आणि पश्चिम बाजुने अभेद्य अश्या सह्याद्रीच्या रांगानी गराडला आहे. तर दक्षीणेला गुयरीची डोंगररांग. हे सर्व पर्वत कडे अक्षरशः खडे आहेत. ईथे मानवी नजर देखील धड ठरत नाही, तेव्हा आक्रमण करुन या कड्यावरुन हल्ला करण्याची कल्पना हे फक्त दिवास्वप्न बघणारेच करु शकतात. रायगडाला दोन नद्याच्या खोर्यांनी घेरले आहे,काळ आणि गंधार. कोकणातील नद्यांचे एक वैशिष्ट्य आहे. पावसाळा संपला आणि दसरा झाला की या नद्यांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक रहाते, फारतर घोटा बुडावा ईतपतच पाणी नदीच्या पात्रात असते. कार्तिक ओलांड्ला कि ते ही नाहीसे होते आणि वैशाखापर्यंत या सरिता निपचीत पडतात. पण जेष्ठात पश्चिम वारा सुरु होते.समुद्राकडून काळे ढग ईशान्येकडे निघतात. पण ताठ मानेची सह्याद्रीची शिखरं या मेघांना अडवतात. ढगातून अखंड कोसळणारा जलौघ सह्याद्रीच्या राकट अंगावरुन खाली धावू लागते. उन्हाने पिवळेजर्द झालेले डोंगर आषाढ सरीनी हिरवेगर्द होतात. सह्याद्रीवरचे हे हिरवे आक्रमण मात्र सुखावह असते. मात्र श्रावण, भाद्रपदापर्यंत दाट ढगात लपेटलेली हि सह्यशिखरे दर्शनही देत नाहीत. दाट ढगांमध्ये माथा लपेटून बसलेली गिरीशिखरांच्या अंगावर चढलेल्या हिरव्या शेला एकाच रंगाचा वाटून निसर्ग भाद्रपदात फुलांची वेलबुट्टी सजवतो. सोनकीची पिवळा भंडारा, सीतेच्या आसवांचा नील नखरा, तेरड्याचा गुलमक्षी रंग आणि चिरायतीचा आणि गेंदाची श्वेत भुरभुर. हे सगळे रंग कमी म्हणून कि काय, कधी सात तर कधी पंधरा वर्षानी कारवीला जाग येते आणि जांभळ्या रंगाची उघळण भर घालते. पुन्हा एकदा कार्तिक उजाडतो आणि सह्यपर्वत आपले रुप पुन्हा पालटतो, हिरवा रंगाचे गवत पुन्हा पिवळे पडायला लागते आणि अग्निपुत्र सह्याद्रीचे एक ऋतुचक्र पुर्ण होते. अर्थात जेष्ठ ते भाद्रपद या परिसरात महामुर पाउस कोसळतो, नद्यांना पुन्हा नवीन उर्जा मिळते. प्रचंड प्रमाणात पाण्याचा ओघ घेउन त्या अक्षरशः फुफाटात धावायला लागतात. फक्त काठावरुनच हा नजारा बघायचा, पाण्यात साधा पाय बुडावयचीही छाती होत नाही. अश्या या कोकणकन्या काळ आणि गंधार वर्षाकाळात केवळ आपल्या रौद्र रुपाने शत्रुला रायगडाजवळ फिरकु देत नाहीत. सह्याद्री, पाउस आणि या नद्या म्हणजे रायगडाला निसर्गाने पुरवलेले कवच. खुद्द शिवाजी महाराज या पर्जन्य काळाचे मोठे मार्मिक वर्णन करतात," आमच्या या प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचवणे कठीण. उडत्या पाखराच्या पंखावर शेवाळ उगवेल इतका पाउस इथे पडतो". हाच पाउस उत्ताल सह्यकड्यांना स्नान घालता घालता, त्याच्या अंगाखांद्यावरुन धबधब्याच्या रुपात कोसळतो, तर माथ्यावरुन मिळेल त्या घळीतून पाषाण खंडाना फोडत ओढ्या, नाल्याच्या रुपात तळाकडे येतो. सह्याद्रीच्या वज्रासारख्या कठीण छातीला या जलधारा भेदतात आणि घळी तयार होतात. काहीवेळा या घळींचे उतार सौम्य असतात. द्विपाद मानव काय, पण चतुष्पाद गर्दभ आणि बैल या मार्गाने ये -जा करु शकतात. अश्या सोप्या वाटांना "घाट" अशी संज्ञा आहे. सह्याद्रीत असे असंख्य घाटवाटा आहेत. अगदी प्राचीन काळापासून मानवाने या घाटांचा मालाची ने-आण करण्यासाठी वापर केला. नाणेघाट, बोरघाट, थळघाट असे असंख्या घाट देशावरील शहरं आणि कोकणातील बंदरं जोडण्याचे काम अव्याहत करत आले आहेत. अर्थात काही वाटा मात्र विलक्षण कठीण. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाने पथ्थर फोडून केलेल्या या वाटांनी फक्त माणुसच जेमतेम पाय रोवत आणि कड्यात बोटे अडकवत, चढउतार करु शकतो. यांना म्हणायचे नाळ. खडतर असल्या तरी या वाटांनी पटकन देशावर जाता यायचे किंवा कोकणात उतरणे जमायचे. रायगडाच्या उत्तर दिशेला सह्याद्री रांगात असणारे घाट आणि नाळ
थेट रायगड परिसरात तीन घाटवाटा आहेत. एक आहे कावळ्या घाट. सांदोशीचे भुमीपुत्र गोदाजी जगताप आणि सर्कले नाईक यांनी केलेला प्रतिकाराचा क्षण जपणारी कावल्या-बावल्याची खिंड याच घाटाच्या सुरवातीला आहे. याशिवाय पुर्व बाजुला शेवत्या घाट आणि मढे घाट आहेत. या घाटांनी नेला जाणार्या मालावर रायगडाची करडी नजर असायची. जसे रायगडाच्या घेर्यात घाट आहेत तसेच नाळाही आहेत. थेट उत्तरेला बोचेघोळ नाळ. नावाप्रमाणे उभ्याने उतरता येणार नाही, अशी हि खडतर वाट.कसाबसा अधार घेउन एक पाउल ठेवायला जावे, तो वीसेक पावलं घसरुनच थांबावे अशी हि वाट.सर्वसामान्यांनी त्याच्या वाटेला न जाणेच चांगले. त्याच्या मागून गाय नाळ आणि निसणीची वाट. चढ उतराईची रग जिरवायची असेल तर या वाटा नक्कीच ती हौस पुरवतात. रायगडाच्या घेर्यातील महत्वाचा संरक्षक दुर्ग म्हणजे लिंगाणा. याला वळसा घालून येते बोराट्याची नाळ. देशावरील मोहरी गावापासून हा उतार सुरु होतो आणि लिंगाण्याला वळसा घालून पाणे गावात उतरतो. मात्र बोराट्याच्या नाळेतून लिंगाण्याकडे चढायचा फाटा नेमका सापडायला हवा आणी जेमतेम पाउल रोउन पार करावी लागणारी वाट रोमहर्षक आहे. अन्यथा सरळ खाली उतरणारी वाट थेट दापोलीत आणुन सोडते.मात्र हे दापोली म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिध्द दापोली नव्हे बरं का! हे आपलं रायगडाच्या घेर्यातील ईटुकले गाव. याच दापोली गावाच्या परिसरात एक निसर्गनवल आहे. काळ नदी वहाता वहाता एका पन्नास फुट कड्यावरुन झेप घेते. इथे एक पावसाळी धबधबा आहे. मात्र भिजायची सोय नाही, फक्त नेत्रसुख घ्यायचे.कारण धबधब्याच्या थेट खाली एक खोल डोह आहे.
या परिसराला ‘वाळणकोंड’ म्हणतात. निसर्गातल्या या चमत्काराला भोळ्या भाविकांनी श्रध्देची जोड दिली आणि एका देवस्थानाचा जन्म झाला. शहरी संस्कृतीच्या दृष्टीने या अंधश्रध्दा वाटू शकतात, मात्र याच अंधश्रध्दामुळे ईथले मुळ स्वरुप टिकून राहिले, इथल्या निसर्गाला मानवी हस्तक्षेपाचे नख लागले नाही, हे विसरुन चालणार नाही. या डोहात अक्षरशः दिड, दोन फुटी माझे दिसतात. वरदायिनी देवीचा हा डोह म्हणून इथल्या डोहामधल्या माशांना अभय आहे, त्यांना कोणी पागत नाही. डोहाच्या पुर्व किनार्यावर वरदायिनी देवीच्या राऊळ आहे. अलीकडच्या तीरावरुन पलीकडे मंदिराला जाण्यासाठी लोखंडी पूलावरुन उभा केलेला आहे. मंदिराचे पुजारी बुवांनी विशिष्ट पद्धतीनं आवाज काढत, डोहामध्ये अन्न टाकल्यावर मोठाल्या आकाराचे अक्षरश: शेकडो मासे गोळा होतात. आपणही हे दृष्य पाहू, अनुभवू शकतो. याच दापोलीत दुसर्या एका नाळेतील वाट उतरते.हि नाळ म्हणजे सिंगापुर नाळ. सिंगापुर नाळेची वाट रायगडपरिसरातील सर्वात सोपी नाळेची वाट म्हणता येईल. हे सिंगापुर गाव एन रायगडाच्या कण्यात वसले आहे.गावात अगदी शाळा आहे. आता अगदी गावापर्यंत रस्ता झाला आहे आणि पुण्याहून स्वारगेटवरुन थेट ईथंपर्यंत एस.टी. बस येते.
रायगडाच्या पुर्व बाजुला सह्याद्री रांगात असणारे घाट आणि नाळ
याच्यानंतर आणखी तीन जुन्या नाळा आहेत, आगी नाळा, फडताड नाळ आणि भीकनाळ. एकेकाळी या वाटेवरुन सह्यपुत्रांचा राबता होता. मात्र कालचक्र पुढे गेले. स्वयंपुर्ण असणारी गावे स्थानिकांना रोजगार देण्यात अक्षम ठरली. पोटापाण्यासाठी ईथला भुमीपुत्र पुण्या-मुंबईसारख्या शहरात स्थलांतरीत झाला. गावात तरुण औषधाला सापडत नाही, अशी परिस्थिती आली. कोणत्या वस्तीत प्रवेश करावा तो फक्त म्हातारी तोंडे सामोरी यावीत हे चित्र रायगडाच्या घेर्यातील काय, पुर्ण सह्याद्रीच्या रांगेत नवीन राहीले नाही. शिकारीनिमीत्ताने, औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी एखादा चुकला माकला सोडला तर या नाळेच्या वाटेवर कोणी फिरकेना झाले. राबता संपला आणि जुन्या वाटा मोडून गेल्या. आणखी काही वर्षांनी कदाचित कागदोपत्री या नाळांची नावे रहातील अशी परिस्थिती आहे. मात्र स्थानिकांनी या वाटांना वार्यावर सोडले असले तरी शहरी सह्यपुत्रांना घाटवाटा पालथे घालण्याचे नवे व्यसन लागले आहे. पुन्हा एकदा या वाटांवर मानवी वावर दिसु लागला आहे. थोडेफार आशादायक असे हे चित्र. यानंतर येतो शेवत्या घाट. मात्र सध्या ईथूनही फार वावर नाही. त्यानंतरच्या मढ्या घाट आणि उपांड्या नाळेची हिच परिस्थिती होती. वास्तविक सिंहगडावर सुभेदार तानाजी मालुसरेंचा देह पडल्यानंतर त्यांचे शव याच घाटाने त्यांच्या मुळगावी म्हणजे उमरठला नेले, म्हणून हा "मढे घाट" अशी याच्या नावाची उत्पत्ती सांगितली जाते. मात्र या दोन्ही वाटांच्या परिसरात असणारा "लक्ष्मी धबधबा" अचानक प्रसिध्दीच्या झोतात आला आणि केळद परिसरात गाड्यांची हि गर्दी सुट्टीच्या दिवशी दिसु लागली. फक्त धबधब्यात भिजून ज्यांची रग जिरत नाही, ते बहाद्दर उपांड्या नाळेतून उतरुन मढ्या घाटाने पुन्हा केळद असा ट्रेक करु लागले आणि या वाटांची वर्दळ पुन्हा सुरु झाली. याशीवाय पुढे गोप्या घाट, आंबेनळी घाट, सुपे नाळ वगैरे वाटा आहेत, मात्र त्या रायगडापेक्षा राजगडाला जास्त जवळ पडतात. घाटवाटा आणि नाळाच्या वाटेबरोबरच रायगडाच्या घेर्यातील अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या विविध कालखंडात या परिसरात उभारलेले दुर्ग.
एखाद्या सम्राटाच्या संरक्षणासाठी अंगरक्षकांची नेमणुक केली असते. महत्वाच्या व्यक्तीच्या जीवाला निर्माण झालेला धोका स्वतःच्या शिरावर घ्यायचा आणि त्यासाठी प्रसंगी प्राणाचे मोल द्यायचे, हि अंगरक्षकांची जबाबदारी. नेमके हेच काम रायगडासारख्या महादुर्गाच्या परिसरात उभारलेले किल्ले करत होते. चांभारगड, कोकणदिव्यासारखे प्राचीन दुर्ग आहेत. शिवाजी महाराजांनी उभारलेले लिंगाणा,सोनगड सारखे किल्ले सरंक्षकाची भुमिका पार पाडत आहेत. तोरणा, राजगडसारखे महाराजांचे जुने साथिदार पुर्वेला खडे आहेत. याशिवाय मानगड, पन्हाळघर्,दौलतगड्,मंगळगड उर्फ कांगोरी, कावळया किल्ला असे रायगडाभोवती किल्ल्यांची संरक्षक कडे आहे. या किल्ल्यांनी रायगडाभोवती सर्व बाजुने लष्करी फळी निर्माण केली आहे. थेट उत्तरेला कोकणदिवा, ईशान्येला लिंगाणा, पुर्वेला तोरणा उर्फ प्रचंडगड, महाराजांची पहिली राजधानी राजगड आहेत. आग्नेयेला वरंधा घाटाची वाट रोखून कावळ्या तीक्ष्ण नजर रोखून बसला आहे, त्याच्या जोडीला थोडे खाली दक्षीणेला कांगोरी उर्फ मंगळगड आहे. थेट दक्षीणेला महाडकडून येणार्या वाटेवर चांभारगड उर्फ महेंद्रगड आणि मुख्यतः कैदखाना म्हणुन वापरला गेलेला सोनगड आहे. नैऋत्येला सावित्री नदीच्या तीरावर नितांतसुंदर परिसरात वसलेला दौलतगड आहे. पुर्वेकडचे आक्रमण रोखण्यासाठी अलीकडेच उजेडात आलेला पन्हाळघर आणि वायव्येला मानगड हे दक्ष आहेत. रायगडाच्या घेर्यातील गडांनी उभारलेले संरक्षक कडे
शत्रुने कोठूनही हल्ला करायचा ठरविला तरी यातील किमान एखाद्या किल्ल्याशी झुंज दिल्याशिवाय रायगडाच्या आसपासही पोहचणे कठीण.
एकुणच जुना जिवाभावाचा सखा सह्याद्री, धोंधावत वहाणार्या काळ, गांधारी सारख्या नद्या आणि जवळपास अकरा किल्ल्यांचे बळकट कोंदण लाभलेल्या या रायगडाची महाराजांनी राजधानीचा दुर्ग म्हणून निवड करावी हे स्वाभाविक नव्हे काय ? वास्तविक तोरण्यावर मिळालेल्या धनाचा उपयोग करुन महाराजांनी मुरुंबदेवाच्या डोंगरावर गड उभारला आणि नेमके नाव दिले "राजगड". नावाप्रमाणेच राजस असणार्या या महादुर्गावर महाराज जवळपास वीस वर्ष राहीले. फत्तेखानाला तोंड देण्यासाठी पुरंदराची योजना, अफझलखानाचे संकंट निवारण्याचा खल, सलबतखान सिध्दी जोहरच्या वेढ्यातून सुटून आल्यानंतर स्वकीयांशी भेट, पुरंदरच्या शरणागतीची चार पावलांची माघार, औरंगजेबाच्या कराल कालमिठीतून आग्राहून सुटून आल्यानंतर झालेला पुर्नजन्म, तानाजीच्या पराक्रमाचा आणि त्याच्या कायमच्या दुराव्याचा अश्या महाराजांच्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या घटनांचा साक्षीदार म्हणजे दुर्गराज राजगड. मात्र एक महदभाग्याचा क्षण राजगडाएवजी रायगडाच्या नशीबी लिहीले होते, "राज्यभिषेक सोहळा". शिवाजी महाराजांनी राजधानी राजगडावरुन रायगडावरुन का हलवली ? याचा ईथे आढावा घेणे उचीत ठरेल. राजगड हा भक्कम बांधणीचा दुर्ग खरा, पण त्याच्या आजुबाजुला पठारी प्रदेश आहे. सुरवातीच्या संघर्ष काळात शिवाजी राजांचे सैन्यबळ मोघल आणि आदिलशहा या प्रमुख शत्रुंच्या तुलनेत कमी होते. सहाजिकच उघड्या मैदानातील थेट लढाई म्हणजे आत्मघात होता. त्यातच त्यावेळी स्वराज्यावर हल्ला करणारे दोन सत्ता आदिलशाही ज्यांचे आक्रमण नैऋत्य दिशेने व्हायचे, ते थोपवायचे तर थेट पुरंदरला तो ह्ल्ला थोपवायला लागायचा. तर दुसरा प्रबळ प्रतिस्पर्धी अर्थातच मोंघल. यांच्या हल्ल्याची दिशा एकतर उत्तर किंवा त्यांचे प्रमुख ठाणे आजचे औरंगाबाद किंवा त्यावेळचे खडकी. साहजिकच मोघंलांचा हल्ला होणार तर तो ईशान्य दिशेने. या बाजुने झालेला हल्ला थोपवायचा तर चाकणसारखे ठाणे स्वराज्यात होते. राजगडाच्या या दोन्ही बाजुला पठारी प्रदेश आहे. सहाजिकच शत्रु सैन्य थेट गडाच्या पायथ्याशी येण्याचा धोका सतत होता. शिवाजी राजांना शाहिस्तेखानच्या आणि पुढे मिर्झाराजांच्या आक्रमणाच्या वेळी याचा अनुभव आला. मिर्झाराजे जयसिंगानी तर थेट रोहिड्याच्या पायथ्याच्या हिरडस मावळात फौजा पाठविल्या. म्हणजे राजगडाला दक्षीण बाजुनेही धोका निर्माण झाला होता. शिवाजी महाराज आग्र्याहून जीवावरच्या प्रसंगातून सुटुन आले आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेउन त्यांनी मोघंलाकडून आणि पर्यायाने औरंगजेबाकडून ईतका विश्वासघात होउनही पुढचे दोन वर्ष पुरंदर तह कायम ठेवला आणि थोडा शांततेचा काळ अनुभवला. यामध्ये त्यांना एका गोष्टीची निश्चीत जाणीव झाली, कि आपला खरा लढा मोघलांबरोबर आहे. औरंगजेबाच्या भविष्यातील आक्रमणाला तोंड द्यायचे तर राजधानी अधिक सुरक्षित गडावर हवी. आणि त्यांनी रायगडाची पहाणी केली. त्याचे वर्णनही सभासदाच्या बखरीत विलक्षण केले आहे. “राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, दीड गाव उंच, पर्जन्याकाळी कुडीयांवर गवत उगवत नाही आणि धोंडा तर ताशीव एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरील चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका, दौलाताबाद्चे दशगुणी गड उंच असे देखोन (महाराज) संतुष्ट जाहले आणि बोलिले तख्तास गड हाच करावा”. रायगडावर ईशान्य किंवा नैऋत्य दिशेने यायचे तर सह्याद्रीची रांग उतरावी लागणार. ईथून उतरणार्या वाट्या कमालीच्या अवघड असल्याने थोडक्या सैन्यानिशी याच परिसरात शत्रुचा बीमोड करणे शक्य होई. शिवाय फारच आणिबाणीची स्थिती असलै तरी त्याचा माग या अवघड वाटांमुळे आधी आल्याने गरज असल्यास परिसरातील दुसर्या गडाचा आश्रय घेणे शक्य होई. स्वराज्याचा आणखी एक शत्रु म्हणजे जंजिर्याचा सिद्दी. याने रायगडावर पश्चिमेकडून हल्ला करायचा ठरविल्यास त्याबाजुला चांभारगड, सोनगड, दौलतगड अशी दुर्गसाखळी हजर होती. याशिवाय खुद्द रायगडाची उंची २९०० फुट इथे तोफगोळे थेट माथ्यावर पोहचणे कठीण. ( लक्षात घ्या, रायगडाची दुर्ग उभारणी १६६५ ते ७० च्या दरम्यान झाली तर त्यावर पुढे साधारण दीड्शे वर्षांनी म्हणजे १८१८ मध्ये ईंग्रजांनी तुलनेने प्रगत तोफांनी हल्ला करुनही सुरवातीला तोफगोळे गडाच्या माथ्यापर्यंत पोहचत नव्हते) शिवाय गडाचे बेलाग कडे, ज्यावरुन चढून जाउन आक्रमण करण्याचे मनात आणनेही कठींण. एकंदरीत संरक्षक वज्रमुठ असणारा रायगड हे आदर्श लष्करी ठाणे होते. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाला असता महाराजांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे.या सर्व बाबी हेरूनच महाराजांनी राजधानी म्हणुन रायगडाची निवड केली. याशिवाय रायगड परिसरातील इतर काही ठिकाणांची माहिती या लेखात घेतल्यास ते अवांतर होणार नाही. किल्ले रायगडच्या वैभवाचे सर्वानाच कुतूहल असते. महाराजांच्या काळामध्ये गडावर असलेली कोटय़वधी रुपयांची संपत्ती काळाच्या ओघात गायब झाली. इतिहास संशोधकांनी शिवकालातील असंख्य महत्त्वाच्या घटना जगासमोर आणल्या, परंतु किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी परिसरांतील अवशेष पूर्ण दुर्लक्षित राहिल्यामुळे शिवकालातील अनेक घटनांचा शोध अद्याप बाकी राहिलेला आहे. या परिसरातील भग्न अवशेषांचे संशोधन करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने भारतीय पुरातत्त्व विभाग आणि शासनाकडूनही वाडी परिसरांतील ऐतिहासिक पुराव्यांकडे पुर्ण दुर्लक्ष झाल्याने शिवकालांतील सुवर्णकाळातील पाऊलखुणा आज काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट वनश्रीमध्ये रायगडवाडी गाव वसलेले आहे. महाडपासूनचे अंतर तीस किलोमीटर असल्याने पाचाड मार्गाने चित्तदरवाज्यापासून गावाकडे जाणारा पक्का रस्ता आहे. सुमारे ८०० लोकवस्ती असलेल्या गावामध्ये कोळी आवाड, हिरकणीवाडी, परडी, टकमकवाडी, नेवाळी, खडकी, शिंदेआवाड अशा सात वाडय़ा आहेत. रायगडवाडी शिवकाळातील अत्यंत महत्त्वाचे गाव असल्यामुळे आजही गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या, वैभवाच्या जिवंत खुणा अस्तित्वात आहेत. या वाडीपासून गडाचा माथा २२५० फूट उंच असून समुद्रसपाटीपासून रायगडवाडी ६०० फूट उंचीवर आहे. त्या काळांतील व्यापारउदीम, जनजीवन, राहणीमान, सामाजिक परिस्थिती इत्यादी महत्त्वाच्या घटनांवर प्रकाशझोत टाकणारे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. शिवकाळांमध्ये किल्ले रायगडावर जाण्यासाठी या वाडीतूनच रस्ता होता. त्या काळातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याने मोठी बाजारपेठदेखील होती. महाराजांचे काही प्रमुख सरदार होते, त्यांचे वास्तव्य वाडींत होते. शिवकाळानंतर गडावर अनेक स्थित्यंतरे झाली. मोगलांनी उत्तरेकडे जाताना रायगड किल्ला सिद्दीकडे दिला होता. सिद्दीचे सरदारदेखील रायगडवाडीत राहत होते. त्यांच्या वाडय़ाचे अवशेष आजही भग्नावस्थेत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव जोडले जाई त्या गोदावरीची समाधी वाडीपासून काही अंतरावर आहे. धान्याची कोठारे, तटबंदी वाडे, तोफगोळे, भंगलेल्या तोफा यांचे असंख्य अवशेष सभोवतालच्या परिसरांमध्ये आहेत. परंतु अनेक वर्षांत अवशेषांकडे लक्ष देण्यात आलेले नाही. पुराणवस्तू विभागाकडून योग्य ती दखल घेण्यात येत नसल्याने भविष्यात हा ऐतिहासिक ठेवा काळाच्या पडद्याआड होण्याची शक्यता आहे. २५ एप्रिल ते ९ मे १८१८ साली इंग्रज सेनानी कर्नल प्रॉथरने गडाला वेढा घातला होता त्या वेळी गडावर अरब शिबंदीचा अधिकारी अबू होता. त्याने इंग्रजांशी तहाची बोलणी १० मे १८१८ रायगडवाडींमध्ये केली होती. महाराजांचा विश्वासू सहकारी मदरी मेहतर यांचे वंशज पाचाडमध्ये राहतात त्यांना इनाम म्हणून देण्यात आलेली जमीन या ठिकाणी आहे. सध्या हा परिसर जांभाची बाग म्हणून ओळखला जातो. त्याचे संशोधन केल्यास अनेक ऐतिहासिक पुरावे आढळून येतील असा विश्वास अनेकांना आहे. सध्या त्या ठिकाणच्या असंख्य कबरी उद्ध्वस्त झालेल्या आहेत. जुन्या तटबंदीचे अवशेष, घरांची जोती इत्यादी ऐतिहासिक खुणा असल्याने इतिहासाच्या अभ्यासकांनी या परिसराचे संशोधन केल्यास शिवकाळातील अनेक घटना प्रकाशामध्ये येतील. टाकीमखाना, टकमक टोकाच्या खालच्या ठिकाणी असलेले रायनाक स्मारक, गोदावरीची समाधी, ब्राह्मण वाडय़ाचे अवशेष, भग्न झालेले शिवमंदिर त्या ठिकाणी असलेली गणपतीच्या हनुमानाच्या मूर्ती असे एक ना अनेक पुरावे दुर्लक्षित अवस्थेमध्ये वाडीच्या परिसरांत वर्षांनुवर्षे माळरानामध्ये पडलेल्या आहेत. रायगडावर व्यापार करणारा नागराज शेट याचे निवासस्थानदेखील रायगडवाडींत आहे. नाग्याबाग म्हणून गावकरी ओळखतात. गावापासून अध्र्या किलोमीटर अंतरावर पडके जोते असून जवळच एक विहीरदेखील आहे. जोत्याचे बांधकाम शिवकालीन असून आजही काही अवशेष शिल्लक आहेत. नाग्याबागेमध्ये असलेल्या विहिरीचे पाणी ग्रामस्थ वापरीत होते. परंतु पावसाळय़ात विहिरीचा काही भाग कोसळल्यानंतर विहिरीचा वापर बंद झाल्याने दुरवस्था झाली आहे. अत्यंत सुबक आणि चिरेबंदी दगडामध्ये बांधलेल्या विहिरीत आजही पाणी उपलब्ध असून संपूर्ण गावाला पुरून उरेल एवढा पाण्याचा साठा विहिरींत उपलब्ध असल्याची माहिती गावातील वयोवृद्ध नागरिक गणपत महादेव साटम यांनी सांगितले. या परिसरात अनेक घराण्याचा संबंध महाराजांच्या सेवेशी जोडलेला असल्याने ऐतिहासिक शस्त्रसामग्री घराघरांत असल्याने आपल्या पूर्वजांच्या आठवणी मोठय़ा अभिमानाने सांगितल्या जात असल्याचे गणपत साटम, विजय खोपकर, मारुती जाधव, बबन सावंत यांच्याकडून ऐकण्यास मिळाले. एकंदरीत राजधानी रायगड जसा निवांत वेळ काढून अनुभवायला लागतो, तसाच हा रायगडाचा परिसरही महत्वाचा आहे. जसजसे शक्य होईल तसा हा घेरा थोडा थोडा का होइना अभ्यासायला पाहिजे. आपल्याच प्रतिक्षेत हा परिसर आहे, चला तर मग "रायगडाच्या घेर्यात".
संदर्भग्रंथः- १) श्री राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे २) शिवतीर्थ रायगड- गो.नि.दांडेकर ३) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे ४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर ५) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे ६) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर ७) रायगडाची जीवनकथा- शां.वि.आवळसकर ८) रायगड जिल्हा गॅझेटीयर ९) शोध शिवछत्रपतीच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
ढवळे गावाजवळ आणखी एक पावसाळी आकर्षण आहे, "मोरझोत धबधबा".
पोलादपूर तालुक्यात पावसाळ्यात असंख्य धबधबे निर्माण होतात. मात्र आकर्षणाचा मानबिंदू ठरतो तो उमरठ जवळील मोरझोत धबधबा. उमरठ जवळील चांदके व खोपड गावच्या मध्यभागी हा धबधबा जवळजवळ २०० ते २५० फुटावरुन कोसळतो. या कड्या कपाऱ्यात निर्माण झालेली नैसर्गिक गुहा व आजूबाजूचा हिरवागार परिसर एका वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जातो.
नागर मंदिर बाह्यांगे
अधिष्ठान :- मंदिर ज्या ओट्यावर उभे असते त्याला अधिष्ठान, पीठ किंवा जगती म्हणतात. मंदिरांचे अधिष्ठान हे चौकोनी, आयताकृती, वर्तुळाकार, लंबवर्तुळाकार किंवा अष्टकोनी असते. अधिष्ठानाचे महत्व फार असते. एक तर मंदिर त्यामुळे जमिनीपासून उंचावर दिसते, पावसाच्या पाण्यापासून बचाव होतो, प्रदक्षिणा मार्गासाठी जागा मिळते, तसेच हत्ती, घोडे वगैरेंचा शिल्पपट कोरून मंदिराची सुंदरता अजून वाढवता येते. इमारतीच्या मजबूतीसाठी जोते पाहिजेच. शिवाय ते जमीनीपासून उंचही पाहिजे. तेवढेही पुरेसे वाटले नाही तर त्याच्यावर उपपीठ किंवा चौथरा. उपपीठ पीठ ,जोते. उपपीठ ,दुय्यम जोते.म्हणजे जोत्यावरील उंचीने व आकाराने लहान असलेले जोते.पीठ/उपपीठ जर प्रशस्त असेल तर देवळाभोवती प्रदक्षीणेला जागा मिळते. पाया मजबूत असला की इमारतीला मजबूती मिळते हे झालेच पण पावसाळ्यात साचलेल्या पाण्यापासून बचाव व मंदिर लांबवरून दिसते हेही महत्वाचे फ़ायदे.. निरनिराळ्या कालखंडातील पीठाची छायाचित्रे देत आहे.
पीठ १ पीठ दिसते पण सजावट नाही. पीठ २
उपपीठ उपपीठ लहान आहे पण सजवले आहे. आपणास याहून उंच उपपीठे (छान सजवलेली) पहावयास मीळतील.
अर्धमंडप/अर्धस्तंभ अर्धमंडप हा आकाराने लहान (निम्मा) मंडपच. जमा झालेल्या माणसांना बसण्यास जागा पाहिजेच.मंडपाला भर (Suppliment) म्हणून अर्धमंडप. आजही देवळात लग्ने लागतात. दक्षिणेत त्याला "कल्याणमंडप" म्हणतात. अर्धस्तंभ हा हल्लीच्या भिंतीतील column प्रमाणे अर्धवट दिसणारा. तो मोकळा असेल तर पूर्ण दिसतो, भिंतीत गाडला गेला तर अर्धा.
रथ. सपाट भिंतीपेक्षा मागेपुढे झालेली भिंत सुशोभित दिसते. यातील पुढे आलेल्या भागाला रथ म्हणतात. उभी पट्टी म्हणा ना. चित्रात रथ व आमलक दाखविले आहेत.भिंतीतून पुढे आलेले खांब. काही वेळा यांत व मूर्तींमध्ये भिंतच सापडत नाही.
मंडोवर :- मंदिराची बाह्यभिंत. गाभारा तसेच बाहेरील विविध मंडप यांच्या बाह्य भिंतीला मंडोवर किंवा मसूरक म्हणतात. खोली बंदिस्त करणे ही महत्वाची गोष्ट. पण आणखी दोन उपयोग म्हणजे सुशोभन आणि छपराला आधार देणे. या भिंती इतक्या मजबूत असतात कि त्या प्रचंड मोठ्या छताला आधार देऊ शकतील त्याच सोबत त्या इतक्या अलंकृत असू शकतात कि पाहणाऱ्याला भिंतीचा मूळ उद्देश छताला आधार देण्याचा आहे हेच विसरायला होईल. या भिंतींवर देव दैवतांची अनेक रूपांतील शिल्पे तसेच मानवाकृती शिल्पांच्या पट्टीका असतात, त्यांना जंघा म्हणतात. या जंघांवर मंदिराच्या मूळ देवतेची रूपे तसेच देवतेच्या परिवारातील इतर देवतांची शिल्पे, विचिध विभ्रमांतील नर तसेच स्त्री प्रतिमा असतात. काही मंदिरांच्या मंडोवरावर इतक्या मूर्ती असतात कि भिंतीचा इंचभरचा भागही दिसत नाही. एक जंघा पट्टीका कमी पडते कि काय म्हणून काही मंदिरांचे स्थपती दोन किंवा तीन तीनही जंघा मंडोवरावर वसवतात. जसे अंबरनाथच्या मंदिराचे मंडोवर हे एकजंघा मंडोवर आहे कारण मंदिरावर एकाच जंघा पट्टीका आहे, मात्र खिद्रापूरच्या मंदिरात तसेच औंढा नागनाथ मंदिरात द्विजंघा मंडोवर आढळते आणि मार्कंडी येथील मार्कंडेश्वर मंदिरात तसेच खजुराहोच्या मंदिरांचे मंडोवर तर त्रिजंघा युक्त आहेत. तिगवाच्या देवळाच्या भिंती साध्या आहेत. छपराला आधार देणे हे महत्वाचे काम. पण पुढे सुशोभन एवढे महत्वाचे झाले की हळेबिड-बेलूर येथील देवळांच्या भिंती दिसतच नाहित. दिसतात मूर्ती, मूर्ती आणि परत मूर्तीच. हां,भिंती छपराला आधार देतात, पण जणू नाइलाजाने. अंगभर दागिने घालून,रेशमी शालू नेसून, सुहास्य वदनाने पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या वधूमातेने थोडा वेळ नवर्याबरोबर कन्यादानाला बसावे तसे! लक्षात राहते ती पहिली प्रतिमा, दुसरी नव्हे. खरे म्हणजे या भिंती चांगल्या जाडजूड असतात. मोठे वजन पेलण्याकरताच त्यांची योजना असते. शिवाय सुरवातीच्या गिरिशिल्पात, थोडक्यात गुहेत, गेल्यावर जसे गार व काळोखलेले वाटेल तसे वाटावे हीही एक मनोकामना होती.( प्राग-ऐतिहासिक काळात उघड्यापेक्षा गुहेत माणसाला जास्त सुरक्षित वाटत असावे. त्याचा तर हा परिणाम नाही ना?) . माणूस नवे निर्माण करतांना " जूने जाऊ द्या मरणालागूनी" असे फ़ार वेळी म्हणत नाही. मागच्यातले चांगले घेऊन त्यात भर घातली जाते. मग ते शास्त्र असो, कला असो, सामाजिक नीतीनियम असोत. अजूनही घरातील देवघर भगभगित उजेडात नसते व तेथे विजेच्या दिव्यापेक्षा समई-पणती जास्त बरी वाटते. असो. या भिंतीना आतील व विशेषत: बाहेरच्या बाजूंनी नटवतांना निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. रथ, थर, देवादिकांच्या मूर्ती, रामायण-महाभारतातील कथा, रुपके, फ़ुले-वेली, मिथूने, जे जे कलाकाराला योग्य वाटेल, त्याचा उपयोग केला गेला आहे. नंतरच्या काळात या भिंती शक्यतो एका सरळ रेषेत येत नाहीत ना इकडे लक्ष दिले गेले. बघणाऱ्याची नजर सावकाशपणे फ़िरेल, त्याला छायाप्रकाशाचा खेळ बघावयाला वेळ मिळेल याची काळजी घेतली गेली. काही छायाचित्रे पहा.
छप्पर : हा इमारतीचा भाग केवळ शिल्पीच्या आवाक्यातला नव्हता. आता गरज होती वास्तूशास्त्रज्ञाची. (Architect & Engineer). खऱ्या अडचणींना इथे सुरवात झाली. हा महत्वाचा भाग अनेक शैलींमुळेही जास्त जागा घेणारा आहे.
वेदिबंध :-
अधिष्ठान आणि मंडोवरच्या मधील भागाला वेदिबंध म्हणतात. हे वेदिबंध अनेक आडव्या थरांनी बनलेले असते जसे सर्वांत खाली तळात खूर, कीर्तिमुखथर, गजथर, अश्वथर, पुष्पथर इत्यादी.
गर्भगृहआणित्याचेप्रवेशद्वार:-
वरती म्हटल्याप्रमाणेच मंदिरांचे निर्माणच मुळी देवतेच्या स्थापनेसाठी झाले, त्यामुळे, सर्वात आधीच्या मंदिरापासून ते आजच्या मंदिरांपर्यंत सगळ्याच मंदिरांत जी एक सामायिक गोष्ट सापडते ती म्हणजे गाभारा किंवा गर्भगृह. तेव्हापासून आतापर्यंत आणि कोणत्याही प्रकारच्या मंदिरात गाभारा असतोही लहानसाच. मंदिराचे स्थपती सहाव्या शतकातल्या मंदिरांतही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराला सालंकृत करत होते. जसा जसा काळ पुढे सरकत गेला गर्भगृहाच्या द्वारपट्टीका अजून अजून सुंदर बनत गेल्या. द्वारशाखा म्हणजे प्रवेश करावयाची जागा.कडी-कोयंडा-कुलुप लावून बंद करावयाचा घराचा दरवाजा नव्हे. बऱ्याच ठिकाणी बंद करावयाचा दरवाजा नसतोच. द्वारशाखा समोरून तसेच बाजूंनीही असातात. चौकट एक असते किंवा अनेक. काही वेळा चौकट नसतेही. दोन बाजूंच्या भिंतीच ते काम करतात. चौकट (किंवा चौकटी) करावयास व सुशोभनास सोप्या. दोनही बाजूला गंगा-यमुना किंवा द्वारपाल उभे केले की एकदम उठाव येतो. रुंदी व उंची आटोपशीर असल्याने नाजूक कोरीव कामास आदर्श. नीट निरीक्षण केल्यास गाभाऱ्याच्या दरवाजात लहान लहान द्वारशाखा बनवून त्यावर फुले पाने, व्याल, गज, स्तंभ, गंधर्व तसेच मिथुन शिल्पे कोरलेली आढळतात. काही मंदिरामध्ये तर या द्वारशाखेचे नऊ नऊ थरही आहेत. तसेच या द्वारशाखांच्या तळाशी दोन्ही बाजूला द्वारपाल आणि गंगा तसेच यमुना यांची शिल्पे असतात. गर्भगृह प्रवेशद्वाराच्यावरच्या पट्टिकेला ललाटपट्टी आणि त्याच्या मध्यभागाला ललाटबिंदू म्हणतात. या ललाटबिंदूंमधे मंदिराच्या मुख्य देवतेचे शिल्प असते मात्र ११व्या शतकानंतर ललाटबिंदूंमधे गणेशाला स्थान मिळाले मग मंदिर कोणत्याही देवतेचे असले तरीही. देवळात प्रवेश करण्या आधीच तुमचे मन उल्हसित होऊन जाते. या पुढे जेंव्हा कुठल्याही देवळाला भेट द्याल तेंव्हा दारापाशी थांबा.दोन्ही बाजूचे द्वारपाल बघा. चौकट एक आहे की अनेक आहेत, त्यांवर वेल-पताकांचे न्क्षीकाम आहे की लहान मूर्ती आहेत, वरपर्यंत एकच थर आहे की अनेक, अनेक असतील तर त्यांत काही योजना दिसते का, वरची गणेशपट्टी दरवाजाच्या किती बाहेर गेली आहे, त्यावरील कोरीव काम कसे आहे, वर कीर्तिमुख वगैरे काय काय आहे हे सर्व बघून मगच आत पाऊल टाका.
.
गर्भगृह प्रवेशद्वार येथे काही द्वारशाखांची छायाचित्रे देत आहे. ती एका कालखंडातील नसली तरी सुरवातीपासून दरवाजे कसे नटवले जात याची कल्पना येईल.
मकरतोरणांकित, पण फार सजावट नाही. पापनाथ मंदिर
सजावट वाढली.
कडेला मूर्ती आल्या. वरची पट्टीही प्रेक्षणीय
अंतराळ :-
गाभारा आणि मंडप यांना जोडणारे दालन म्हणजे अंतराळ . हा लहानगाच भाग असतो आणि पूर्णपणे उघडा म्हणजे ना छत ना भिंती असा असू शकतो (जसा सुरवातीच्या काही मंदिरांत आढळतो) किंवा पूर्णपणे बंदिस्त असतो. अंतराळात साधारणपणे मंदिराच्या मुख्यदेवतेची किंवा परिवारातील इतर देवतांची शिल्प किंवा मूर्ती देवकोष्ठकांत असतात. काही मंदिरांत मात्र अंतराळ पूर्णपणे रिकामे असते.
आमलक :- मंदिराच्या शिखरावरती गोलाकार आकाराचे दगडी चाक म्हणजे आमलक. याचे बाह्य अंग फुगीर असून परिघावर खाचा असतात. याचा आकार राय आवळ्यासारखा दिसत असल्यामुळे या आमलक म्हणतात. काही तज्ज्ञांच्या मतानुसार आमलक हा कमळाच्या आकाराचा म्हणजे मंदीरातील देवतेचे आसन म्हणून असतो, तर काही मतानुसार आमलक हा सुर्यदेवतेचे प्रतिनिधीत्व करतो, म्हणजे एक प्रकारे हे स्वर्गाचे द्वार आहे. बहुतेकवेळा आमलक मंदीराच्या शिखराच्या सर्वोच्च स्थानी असतो. पण काही मंदीराबाबत तो थोडा खाली आणि संख्येने एकापेक्षा जास्त असु शकतो. उदा, सिरपुर येथील लक्ष्मण मंदीर या विटांनी बांधलेल्या मंदीराच्या शिखराच्या चार कोपर्यात चार आमलक आहेत.
मकरप्रणाल :-
मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या मूर्तीवर पाण्याच्या आणि दुधादि द्रव्यांचा अभिषेक केला जातो, या पाण्याचा निचरा करण्यासाठी गाभाऱ्यातून एका वारिमार्गाची योजना केलेली असते. या वारिमार्गाचे मुख गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने असते. बाहेरच्या बाजूने मार्गाच्या तोंडाशी मगरीचे मुख किंवा गाईचे मुख असते. प्राचीन काळातल्या मंदिरांमध्ये आपल्याला येथे मकरमुख (मगरीचे मुख) दिसते कारण हे बाहेर येणारं अभिषेकाच पाणी तीर्थ म्हणून प्राशन केलं जातं आणि मगर म्हणजे गंगेचं वाहन. त्यामुळे तिथून पडणारे ते गंगाजल. मराठेकालीन मंदिरांमध्ये मात्र मगरीचे महत्व कमी झाले आणि तिथे गोमुख दिसू लागले कारण गायही पवित्र मानली जाते.
संगमेश्वर जवळील कर्णेश्वर मंदिर
गोमुख "गो" म्हणजे गाय, तर गोमुख म्हणजे गाईचे मुख. गाईला हिंदुधर्मात महत्वाच स्थान आहे..तिला माता मानले आहे.. गोमातेचे दूध, शेण, मूत्र इत्यादी सासारेच कमालीच आरोग्यप्रद आहे.. त्यामुळे पूजाविधी करतांना पिंडीवर ओतलेले पाणी बाहेर काढतांना गोमुखातून सोडले जाते. याच्या मागची संकल्पना अशी की मुळातच देवावरून सोडलेले पाणी गोमुखातून बाहेर सोडल्यामुळे आणखीनच पवित्र आणि आरोग्यवर्धक होत. अनेक ठिकाणी गोमुखातून बाहेर सोडलेले पाणी एका छोट्याश्या कुंडामध्ये साठेवले जाते.अनेक मंदिरांमध्ये देवावरून सोडलेले पाणी वाहून जाण्यासाठी गोमुखा ऎवजी मकरशिल्प कोरलेले असते. अशा प्रकारची शिल्पे सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत. यांनाच "मकरप्रणाल' असेही म्हणतात.
गोमुख
मकर तोरण :-
मंदिराच्या प्रवेशाच्या किंवा मंदिराच्या अंतराळाच्या प्रवेशाच्या वरच्या बाजूला एक मकरतोरण असते. दोन्हीबाजूच्या मगरीच्या तोंडातून ते तोरण बाहेर पडत असते. नक्षी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते कधी तिथे गंधर्व उडत जात असतानाची नक्षी असते तर कधी मोराच्या पिसाऱ्यासारखी.
मकर तोरण
मंडप :-
ज्या कारणांसाठी आधुनिक काळात मानव मंडप बांधतो त्याच कारणांसाठी मंदिरांतही मंडपाची योजना केलेली असते, काही काळ सानिध्यात बसण्यासाठी, मंदिरात अर्थातच देवाच्या सानिध्यासाठी, मंदिरात होणाऱ्या नृत्य, गायन, भजन, प्रवचनादी कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी. मंदिर कोणत्याही प्रकारचं असलं तरीही मंडप हा असतोच. नागर शैली मंदिरांमध्ये लहानच पण २ ते ३ एका मागे एक असे मंडप असू शकतात. द्राविड शैली मंदिरांत मात्र साधारणपणे एकच आणि मोठासा मंडप असतो. मंडपही दोन प्रकारचे असतात, जर मंडपाच्या दोन्ही बाजूंना भिंती नसतील किंवा फक्त कठडे असतील म्हणजेच भिंती पूर्णपणे खालपासून वरपर्यंत जाणाऱ्या नसतील तर अश्या मंडपाला रंगमंडप म्हणतात. या रंगमंडपात मध्यभागी होत असणाऱ्या नृत्य, भजन, प्रवचन वगैरे सारख्या देवाच्या सेवेला पाहण्यासाठी भक्तांना येथे संधी असते. पण जर मंडप बंदिस्त असेल तर त्याला गुढमंडप म्हणतात. जसा माणकेश्वर मंदिराचा आहे.
रंगमंडप, पाटणादेवी, चाळीसगाव महादेव मंदिर
मंदिरातील मुर्ती जसजशी मंदिराची आंतर बाह्य रचना बदलत गेली तसतसे मुर्तीच्या बांधणीत नवनवे बदल होत गेले. मंदिरातील मुर्तीच्या स्थापनेसाठी अनेक प्रकारच्या देवतांची निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने ब्रम्हा, विष्णू, महेश, गणेश, कर्तिकेय, हनुमान या प्रमुख देवतांचा तर सूर्य, दिकपाल, नवग्रह या दुय्यम देवतांचा समावेश करण्यात आला. ब्रम्हा हा जगताचा निर्माता, उत्पतीचा जनक , ब्रम्हदेवाच्या मुर्ती फारच थोड्या मंदिरात आढळतात. त्याची चार शीरे ही चार वेदांची प्रतिके समजली जातात. याच वाहन हंस, सरस्वती ही देवी. मंदिरावर ब्रम्हदेव यज्ञ करीत असतांना सोबत मोरावर सरस्वती उभी असलेली बर्याच ठिकाणी दाखवण्यात येते. गणेश शिव पार्वती यांचे पुत्र. मानवी शरीर व हत्तीच शीर, चतुर्हस्त हातात अंकुश, हस्तिदंत, कमळ व परशु. गजानन हे मुर्तीचे नाव वर्णन करते. तर गणपती हे नाव यक्षगणांचा अधिपती ही पार्श्वभूमी दाखवते.
विष्णूमुर्ती :-
विष्णू हा "नारायण' नावानेही प्रसिध्द आहे.विष्णूचे मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण,बुध्द, कल्की हे विष्णूच दशावतार प्रसिध्द आहेत.हे दशावतार मंदिरात, मंदिरांवरील शिल्पांमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय विष्णूची मुर्ती २ प्रकारात पाहायला मिळते. "केवळ विष्णू" आणि "शेषशायी विष्णू". केवळ विष्णूच्या मुर्तीमध्ये चार हातात शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेले असतात. मुर्ती साधारण पणे उभी दाखवलेली असहे. वाहन म्हणून गरुड व पायाशी श्रीदेवी व भूदेवी, उजव्या/ डाव्या हाताला लक्षी अशा मुर्ती कोरलेल्या आढळतात. शेषशायी विष्णूच्या मुर्तीत शेषावर पहुडलेल्या विष्णूच्या नाभीतून बाहेर आलेल्या कमळावर ब्रम्हदेव, पायाशी लक्ष्मी कोरलेल्या आढळतात.
शिव-महेश :-
"शिव', "शंकर', "महेश' या नावान ओळखला जाणारा हा देव त्रिमुर्ती पैकी एक, त्याच्याकडे लयाला नेण्याचे काम आहे.शिव हाच सृष्टीचा निर्माता असून त्याच्या नृत्यातून सृष्टीचा अविर्भाव झाला असे ही काही पंथीय लोक मानतात. शिव हा स्मशानात राहणारा देव. अंगाला राख फासून राहणारा "योगी' हिमलयाची कन्या पार्वती हिचा पती अहे. नंदी हे त्याचे वाहन आहे. त्याशिवाय अनेक गण त्याचे सहचर आहेत. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष त्याने प्राशन केले होते म्हणून निळकंठ अशा अनेक प्रकारे मुर्तीकारांनी त्याच्या मुर्ती निर्माण केल्या आहेत. याशिवाय गजलक्ष्मीची मुर्ती सुध्दा काही मंदिरात आढळते. यात पद्मासनात विराजमान झालेल्या लक्ष्मीवर हत्ती पुष्पवृष्टी करतांना दाखविलेले असतात..याशिवाय काही मंदिरात हनुमंताच्या, इंद्राच्या मुर्ती सुध्दा आढळतात. कासव :- मंदिरात प्रवेशद्वाराशी कासवाचे शिल्प देवतामुर्तीकडे तोंड करुन कोरलेले असेत. यामागचे कारण असे की, कासवाचा स्वत:च्या इंद्रियांवर ताबा असतो. सर्व इंद्रियांवर ताबा असणार्या योग्याचे प्रतीक म्हणजे "कासव'.
नंदी नंदी हा शिलाद ऋषींचा मुलगा होता. शेत नांगरत असत्तंना त्यांना हा मिळाला. नंदीने शंकराची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करुन घेतले. शंकरांनी त्याला आपले वाहान आणि त्याला आपल्या गणांचे नायकही बनविले. नंदी हा शंकराचा निस्सीम भक्त ही आहे.. तो शंकराच सर्व काम करणारा सेवकही आहे..विष्णूच्या बाबतीत गरुडाचे किंवा गणपतीच्या बाबतीत उंदराचे स्थान इतके महत्वाचे नाही पण, शंकराच्या नंदीचे स्थान अधिक महत्वाचे आहे म्हणूनच की काय शिवसहस्त्र नामांमध्ये नंदी हे शंकराचे नाव सांगितले आहे.. नंदीची, नंदीश, नंदीश्वर, नंदीकेश्वर अशी अनेक नावे आहेत. काही ठिकाणी विष्णूपुत्राचा उपद्रव नाहीसा करण्यासाठी शिवाने बैलाच रुप धारण केले आणि त्याचेच पुढे नंदी नाव रुढ झाले. त्यामुळे सहाजिकच शिवा आधी नंदीचे दर्शन व पूजन करणे भक्तांना बंधनकारक असेत.
काही ठिकाणी तर नंदीच्या दोन शिंगांमधून शिवाच दर्शन घेण्याची पध्दत आहे.. त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात शिवाच्या गाभार्यात शिरण्या आगोदर नंदी स्थापन कलेला असतो. काही मंदिरात सभामंडपाच्या अगोदर नंदीसाठी स्वतंत्र मंडप बनविलेले असतात. त्यालाच नंदीमंडप असेही म्हणतात. खूप ठिकाणी नंदीची मुर्ती पूर्णाकार स्वरुपाची असते, त्याची शिंगे आखूड टोकदार, शिंड आकारान मोठे असून पुढचा पाय जरी पायाखाली मुडपलेला असला तरी क्वचित पुढे टाकलेले असतो. त्यामुळे हा वृषभ कधीही उठून उभा राहील असे वाटते. शोके जरी एका बाजूला कललेले असले तरी दृष्टी मात्र गाभार्यातील पिंडीकडे लावलेली असते.गळ्यात किंवा पाठीवर घुंगराच्या आणि घंटांच्या माळा, पायात घुंगराच चाळ अशा अनेक अलंकारांनी नंदमुर्ती नटवलेली असते. या सार्या अलंकारापेक्षा बघणार्यावर जी छाप पडते ती त्याच्या भरदार शरीरयष्टीची. याशिवाय अनेक नंदींच्या पाठीवर शिवपिंड कोरलेली असते. उदा. नाशिकच्या सटाणा जवळ असणार्या देवळाणे या मंदिरातील मुर्ती. शिवमंदिरात नंदी नसणारी सुध्दा काही मंदिर आहेत. यात कोल्हापूरच्या खिद्रापूर मधील कोपेश्वर मंदिराचा समावेश होतो. यामागच कारण असे की प्रजापति दक्षाच्या १६ कन्यांपैकी सतीने प्रजापतिला न जुमानता शंकराशी लग्न केले. त्यामुळे दक्षाच्या मनात शंकराला स्थान नव्हते म्हणून दक्षाने केलेल्या वाजपेय यज्ञात त्याने शंकराला आणि आपल्या कन्येलाही बोलावले नाही. शंकर मानी असेल्याने न बोलविता तो गेलाही नाही पण सतीने माहेरी जाण्याचा आग्रह धरला. म्हणून शंकराने तिला नंदीसोबत दक्षाच्या घरी पाठविले यामुळे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात नंदी नाही.
घंटा - एक मंगलमय नाद आपण जेव्हा जेंव्हा मंदिरात जातो तेंव्हा तेंव्हा आपण देवासमोर हात जोडण्यापूर्वी घंटा वाजवतो. घंटेतून येणार्या नादामुळे आपल्या मनातील ऎहिक विचारांची साखळी तुटते आणि निर्विचार मनाने आपण देवाला नमस्कार करतो. या घंटेच्या बाबतीत योगशास्त्रात बरेच उल्लेख आहेत.याबद्दलचा एक श्लोक असा आहे की, आगमनार्थ तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम्। कुर्वे घण्टारवं तत्र देवताव्हानलक्षणम् ।। म्हणजेच "देवाच्या आगमनार्थ आणि राक्षसांच्या गमनार्थ तू घंटे तुझा मधुर मंगलमय असा नाद कर''. अर्थात घंटा ही मंगलतेची सूचक आहे..पृथ्वी आणि आकाश यामधील पोकळीचे प्रतिक घंटा आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सर्व मंदिरात या घंटा आढळतात. मात्र महाराष्ट्रातील काही काही घंटा एवढ्या मोठ्या आहेत की, त्या तेथे कशा आणून लावल्या असतील याबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते. भिमाशंकरच्या मंदिरातील घंटचे वजन ५ मण आहे.. त्यावर १७२९ असा रोमन लीपीतील आकडा सुध्दा कोरलेली आहे. कदाचित त्या साली ती घंटा ओतली असावी. १७३९ च्या सुमारास चिमाजी आप्पांनी वसई जिंकल्यावर ठाणे जिल्ह्यातील वाशिंद गावातून ती आणली असावी असा अंदाज आहे.पंचवटीच्या परिसरात असणार्या नारोशंकर मंदिराच्या समोर सुध्दा अशीच घंटा आहे.. त्या घंटेला सुध्दा "नारोशंकराची घंटा' असे म्हणतात. या घंटेवर सुध्दा १७२१ असा आकडा आहे.. या घंटेचे सुध्दा एका पोर्तुगीज चर्चवरुन स्थलातर झालेले आहे. मंदिराच्या समोरच्या तटावर चढून सुध्दा ही घंटा वाजवता येत म्हणजे त्याची उंची आणि आकार केवढा असेल याची कल्पनाच केलेली बरी. खरेतर या मोठ्या प्रकारच्या घंटा म्हणजे मराठ्यांची विजयचिन्हे आहेत. पण सध्या मात्र ऊन, वारा, पाऊस यांचा मारा खात त्या उभ्या आहेत. या सर्व घंटा साधारणपणे पितळेच्या किंवा पंचधातूच्या बनविलेल्या असतात..
किर्तीमुख अनेक मंदिरांच्या प्रवेशव्दापाशी एक राक्षसाच्या मुखासारख एक शिल्प कोरलेले दिसते. या शिल्पाच नाव आहे "किर्तीमुख". ही किर्तीमुख मंदिराच्या प्रवेशव्दापाशी ठेवण्या मागची सुध्दा एक कथा आहे.. किर्तीमुख नावाचा असूर होता. तो शंकराचा भक्त होता त्याने तहान भूक विसरून घोर तपश्चर्या केली. कालांतरान शंकर त्याला प्रसन्न झाले. शंकराने त्याला वर मागण्याची आज्ञा दिली. तेंव्हा प्रचंड भूकेची जाणीव झालेल्या त्या असूराने महादेवांना खायला देण्यास सांगितले. महादेवाने त्याला स्वत:च शरीर पायापासून खायला सांगितले. त्या असुराने तसे केल. तरीही त्याची भूक भागली नाही. त्यावर उपाय म्हणून शंकराने त्याला सांगित्ले, की तू माझ्या दारात येऊन बस आणि येणार्या जाणार्या सर्व भाविकांची पाप खा. तुला ती कधीच कमी पडणार नाही. तेव्हा पासून या किर्तीमुखाच शिल्प शिवमंदिराच्या दारात कोरण्याची प्रथा रुढ झाली. हरीश्चंद्रगडावरील मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी ही किर्तीमुख आहेत. अनेक ठिकाणी लहान लहान किर्तीमुखांतून फुलाच्या माळांची तोरण विणलेली दाखेवलेली आहेत.
किर्तीमुख
मंदिरांवर किर्तीमुखाची विविध स्वरुपातील शिल्पे आढळतात. खिद्रापुरच्या कोपेश्वर मंदिराच्या प्राकारात १६ प्रकारात सादर केलेली किर्तीमुख त्यातील कलाकुसर यास तोड नाही. या प्रत्येक किर्तीमुखाची ठेवण वेगळी आहे. नक्षीकाम करणार्याने शिवापार्वतीलाही किर्तीमुखात बद्ध केलेले आहे. अनेक ठिकाणी किर्तीमुखातील नक्षीकामातून मोर आणि हंस साकारलेले दिसतात, याशिवाय फळफुले सुध्दा बहरलेली दिसतात. काही ठिकाणी व्याघ्र ही साकारलेले दिसतात. वानर सुद्धा किर्तीमुखाच्या शिल्पात दाखवितात. काही मंदिरात सभामंडपातही खांबांवर किर्तीमुख कोरलेली आहेत.
शिलालेख :- काळ्या पाषाणात कोरलेली किंवा बांधलेली ही मंदिरे आपल्या सारख्या सामान्य माणसांचे नेहमीच लक्ष वेधून घेतात. ती पहात असतांना सहाजिकपणे मनात प्रश्न येतो की, कोणी बरे ही मंदिरे बांधली असतील? तर याच उत्तर मिळते ते शिलालेखांवरून आणि ताम्रपटांवरुन. शिलालेखांमध्ये मंदिराचा स्थापनकर्ता, काळ, त्याचे प्रारंभीचे स्वरुप, पुढे त्यात काय बदल झाले, त्यासाठी कोणी दान दिले या सर्व गोष्टींची माहीती मिळते.दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक मंदिरावर असे शिलालेख आढळतात. अशा प्रकारचे शिलालेख ही मंदिरासमोरच्या दिपमाळेवर, पुष्कर्णीवर, पायर्यावर, द्वारांवर, रंगेशिळे, उंबरठ्यावर, तुळवटांवर, खांबांवर तर कधी घंटांवर सुध्दा कोरलेले आढळतात.काही ठिकाणी मुर्तीच्या पायथ्याशी सुध्दा शिलालेख कोरलेले आढळतात.
यक्ष-यक्षी
भारतीय शिल्पकारांनी यक्षांची आणि यक्षींची योजना वास्तुकामात निरनिराळ्या ठिकाणी आणि निरनिराळ्या कामांसाठी केलेली पाहायला मिळते.पौराणिक कथांमधून यक्ष आणि यक्षी ही अतिमानवी परंतु देवांपेक्षा कनिष्ठ प्रकारची योनी असून यक्षीयोनी ही शांत, उपकारक अशा स्वभावाची रंगवण्यात आलेली आहे. कुबेर हा त्यांचा नायक किंवा राजा, हा धनाचा, संपत्तीचा अधिपती. यामुळे स्वाभविकपणे त्यांची शिल्पे मंदिरावर कोरण्यात आली. प्राचीन काळापासून लोकश्रध्देत स्थान मिळवून बसलेल्या स्थानिक व मर्यादीत शक्तीच्या देवतांचाही समावेश याच यक्षयोनीत होतो. असे करीतकरीत निसर्गातील वादळवारे,पूर, वृक्षवल्ली या सगळ्यांना मानवी म्हणजे यक्ष-यक्षीचे रुप देण्यात आले. मानवाने जे आपल्या आकलना पलिकडचे आहे आणि आपल्यापेक्षा सामर्थ्यवान अशा सर्व गोष्टींना यक्षरुप देऊन, त्याची पूजाअर्चा, उपासना करण्यात येऊ लागली. स्थलदेवता, जलदेवता, वृक्षदेवता यांना यक्षरुप देऊन त्यांची शिल्पे मंदिरात कोरण्यात आली. पूरात एखादा माणूस वाहून जाणे, अपघातात दगावणे या गाष्टी नैसर्गिक न समजता मानवाने त्याला जलदेवतेचा, वृक्षदेवतेचा कोप असे स्वरुप दिले आणि सर्व देवता यक्ष योनीत जमा झाल्या आणि माणूस या अतितमानवी शक्तीपुढे नतमस्तक झाला. अशा प्रकार या यक्ष यक्षींचा संभार वाढत गेला.
मंदिर शिल्पात यक्षांना थोडी अवघड कामे दिली आहेत. ती म्हणजे भारवाहनाची! मंदिराच्या खांबाना आपल्या खांद्यावर तोलून धरण्याची. या भारवाहकांना "किचक' असेही म्हणतात. रतनगडच्या पायथ्याशी असणार्या "अमृतेश्वर' मंदिरात अशा प्रकारचे यक्ष आहेत. वेरूळच्या कैलास मंदिरात तीन तीनच्या समूहांत पट्टावरील हसतमुख,बावळट चेहर्याच्या यक्षांना पाहून मन प्रसन्न होत. याच मंदिरावर काही यक्षगण वीणा वादन करतांना दिसतात तर काही यक्षगण आपल्याच धुंदीत नाचतांना दिसतात. तात्पर्य काय तर शिल्पकारांनी निर्माण केलेल्या प्रत्येक शिल्पाच्या मागे काहीतरी निश्चित असा अर्थ आहे
व्याल :- मध्ययुगीन मंदिरांच्या भिंतीवर जे शिल्पकाम आहे त्यात अनेक ठिकाणी पुढचे पाय वर उचलून, मागच्या पायावर उभा असलेल्या सिंहासारखे, हत्तीसारखे डोके असलेला एक प्राणी दिसतो. त्याला "व्याल' असे म्हणतात.नागपूर पासून २१६ कि.मी. अंतरावर असणार्या मार्कंडी नावाच्या मंदिरावर विवध प्रकारच्या व्यालांच्या मुर्ती आढळतात. मंदिरावर भिंतींना जेथे जोड येतो तेथे हा कोरलेला असतो. या व्यालांचे अनेक प्रकार आहेत. सिंहव्याल, व्याघ्रव्याल, गजव्याल, वृकव्याल हे त्यापैकीच काही. बहुतेक मंदिर शिल्पात या व्यालांच्या पाठीवर स्वार असतो. तर पायाखाली एखादा बैठा यक्ष असतो. या व्यालांची निर्मिती पश्चिम आशियात झाली . इराणमध्ये मौर्यकाळात अनेक शिल्पांमध्ये याचा वापर करण्यात आला. शिल्पकारांच्या कौशल्यामुळ हा परका, काल्पनिक प्राणी मंदिर स्थापत्याचा एक हवाहवासा वाटणारा, आकर्षक आणि आवश्यक भाग झाला. सर्वच व्यालमुर्ती मागच्या पायावर उभ्या, पुढचे पाय वर उचललेल्या अशा अवस्थेत आहेत असे असूनही या व्यालमुर्ती कधी देवता, सुरसुंदरी या मूर्तींच्या आड येत नाहीत किंवा त्यांच्याशी स्पर्धा सुध्दा करत नाहीत.
नाग
नाग :-
काही मंदिरांवर किंवा मंदिरा बाहेर नागाचे शिल्प कोरलेली आढळतात. नाग हे वास्तविक "काळाचे प्रतीक' आहे.. नाग हा अतिशय वेगाने सरपटत जातो. काळही तसाच, तो अतिशय वेगाने पुढे सरकतो. तो केंव्हा सुरु झाला आणि कोठवर जाणार हे सांगता येत नाही. काळाचा दुसरा अर्थ म्हणजे "अनंत' म्हणूनच नागालाही "अनंत' म्हणतात. काळ ज्याच्या हातात आहे तो देव, देखिल याच नागाचे एक रुप आहे.
दिपमाळ :- दिपमाळ हा एक महाराष्ट्रीयन शिल्प प्रकार आहे. देवाच्या मुर्ती समोर अखंड नंदादिप तेवत ठेवण्याची एक जुनी पध्दत आहे.. देवाच्या आरतीच्या वेळी दिप लावतात. उत्सव प्रसंगी शहरात दिपवृक्ष पाजळत असल्याचे उल्लेख रामायण ग्रंथामध्ये आलेले आहेत. दक्षिण भारतातील मंदिरांत दगडाच्या व पंचधातूच्या दिपलक्ष्मी आणि दिव्यांची झाडे लावण्याची प्रथा आहे. याशिवाय देवालयासमोर दिपदंड किंवा दिपस्तंभही असतात. पण दिपमाळ हे महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील खास वैशिष्ट्य आहे.विटांचा किंवा दगडांचा निमुळता होणारा स्तंभ उभारुन त्याच्यात ओळीने हात बसविलेले असतात. उत्सवाच्या प्रसंगी, दिवाळीच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला या दिपमाळा उजवळण्यात येत असत. म्हणूनच म्हटले आहे. "दिपमाळ उजळे। मंदिरी परमप्रकाश पडे।।". याचा आणखी एक फायदा म्हणजे उंचीमुळे सर्वांना सणांची एक सार्वत्रिक घोषणा होत असे. नवस फेडण्यासाठी देवळासमोर दिपमाळ उभारण्याची प्रथा मराठेशाहीत रुढ होती. विषेशत:जेजुरीच्या मंदिराच्या बाहेर असलेल्या शेकडो दिपमाळा याचीच साक्ष देत आजही उभ्या आहेत.
सतीगळ
गध्देगाळ
वीरगळ :- अनेकवेळा मंदिराच्या प्राकारामध्ये एक उभट आकाराची उंच आयताकृती अशी शिळा पडलेली दिसते. या शिळेलाच "स्मारक शिळा' असेही म्हणतात. धारातिर्थी पडलेल्या वीरांची स्मारकशिळा म्हणजेच "वीरगळ'. तसेच व्यक्तीच्या निधनानंतर अशा प्रकारची स्मारके उभारण्याची प्रथा होती आणि त्यातही एखादा वीर किंवा राजा किंवा थोर व्यक्ती असेल तर त्यासाठी अशाप्रकारची वीरगळ उभारण्यात येत असे. अर्थातच ही थोर व्यक्ती किंवा हा वीर पूजनीय असल्याने त्या वीरगळीला मंदिरात स्थान मिळाले. कर्नाटक मध्ये या वीरगळींना "कांदळ" म्हणतात. या वीरगळीवरील कोरीव कामाची योजना सर्वसाधारणपणे एकाच स्वरुपाची असते. या शिळांचे तीन भाग किंवा चौकटी पाडलेल्या असतात.. तळाच्या चौकटीत वर्ण्य म्हणजे विषय म्हणजेच वीराचे युध्द त्याचा मृत्यू, मधील चौकटी मध्ये त्याचे स्वर्गारोहण व वरील चौकटीमध्ये तो वीर स्वर्गात करीत असलेली ईशपूजा याप्रमाणे दृश्ये चित्रीत केलेली असतात. तात्पर्य, वीरगळ म्हणजे वीपुरुषाचा एक संक्षिप्त चरित्रपटच होय
कुंड/ पुष्करणी :- पंचोपचार पूजा, अष्ट्भोग यासाठी म्हणून मंदिराच्या परिसरात अनेक आकाराच्यार बारवा निर्माण करण्यात आल्या. लहान आड ही मंदिर वास्तूच्या पावित्र्याची संकल्पना जपण्यासाठी निर्माण करण्यात आली. याच बरोबर मंदिरात विशेषत: शिवमंदिरात अखंड चालणार्या जलाभिषेकासाठी म्हणून गर्भगृहाच्या मंदिर परीसरातील एखादे "कळ्ळाल' पुष्करणी किंवा कुंडातील व्यवस्था कलेली होती. देवालयात जाण्यापूर्वी स्नान करुन शुचिर्भूत होऊन जाता यावे यासाठी ही व्यवस्था आवश्यक मंदिरासाठी लागणारा दगड विहिरीचा आकार मोठा करुन त्यातून निघत असे तोच वापरला जाई. अनेक ठिकाणी कुंडाना किंवा पुष्करणीला चारही बाजूंनी पायर्या असतात.
मंदीराचे शिखर :- देवळांचा पहिल्यांदा नजरेत भरणारा भाग म्हणजे त्याचे शिखर किंवा छप्पर.सर्वसाधारणपणे हे कोनाकृती असते. आपण पाहिले आहे की सुरवातीच्या देवळांची छप्परे सपाट होती. त्या ऐवजी हा त्रिकोणी आकार कसा आला ? एक विचार असा की सुरवातीला देवळे ही गिरिशिल्पे होती. म्हणजे नैसर्गिक गुहा मोठी करून त्यात देऊळ तयार केले वा डोंगर खोदून, गुहा निर्माण करून,त्यात देऊळ निर्माण केले. कसेही असले तरी लांबून हे देऊळ पहातांना, तुम्हाला त्याचे छप्पर म्हणून डोंगरच दिसतो; बरेचदा निमुळता होत गेलेला त्रिकोणी डोंगर. आता तुम्ही मैदानात देऊळ बांधले तर हा डोंगराचा भास निर्माण करावयाला डोंगर कोठून आणणार? तर त्या ऐवजी छप्परच निमुळते केले गेले. पण हे एकदम झाले नाही. सपाट छप्पर करणे तसे सोपे. भिंती उभ्या करा, त्यांवर वासे टाका, वाश्यांवर फ़रशा टाका. काम खलास. जो पर्यंत आकार लहान होता तो पर्यंत हे लिहण्यासारखेच सोपे होते. ३०-४० फ़ूट लांबीच्या, इमारती लाकडाच्या तुळया आसेतूहिमालय सर्वत्र मिळत होत्या. देवळाचा आकार वाढल्यावर दगडी छप्परांचे वजन इतके वाढले की त्यांचा भार लाकडी तुळयांना झेपणे अशक्य झाले. दगडी तुळयांना भार झेपला असता पण एवढ्या लांब दगडी तुळया मिळणे शक्यच नव्हते.या करिता काय उपाय शोधले गेले ते पहाण्या आधी सपाट छपारातील एक बदल (Veriation) पाहू. या प्रकारच्या छप्पराला नाव आहे "गजपृष्ट". नाव मजेदार वाटते पण आहे मात्र एकदम चपखल. सपाट छपराचा एक मोठा तोटा म्हणजे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यास जागा नसे. उपाय सोपा असल्याने लगेच अमलात आणला गेला. आयताकृती छप्पराच्या समोरासमोरच्या दोन बाजू उतरत्या केल्या म्हणजे पाणी साचत नाही. आणि असे छ्प्पर हुबेहुब हत्तीला मागून पाहिले तर त्याच्या दिसणाऱ्या पाठीसारखे दिसते. द्राविड शैलीच्या देवळांची बरीच छप्परे अशी असतात.महाबलीपुरम येतील मंदिराच्या चित्रावरून एकदम पटेल आता उपाय बघू. पहिला उपाय म्हणजे मधे खांब उभे करणे. हे "कॉलम" म्हणून काम करतात आणि "बीम"ची लांबी एकदम कमी होते. ४० फ़ूट X ४० फ़ूट च्या मोठ्या दालनात दहा दहा फ़ूटावर नऊ खांब उभे केलेत तर तुळईची लांबी दहा फ़ूटावर येते. आणि जर हे खांब सुशोभित केले तर ते कशाकरिता बांधले हे ही लक्षात येत नाही. उलट " या देवळाचे खांब मोजता येत नाहीत " अशीच प्रशंसा केली जाते!".अबब म्हणावयाचे आहे? श्रीरंगमच्या विष्णुमंदिरातील एका मंडपाचे नाव आहे "हजारीमंडप" लांबी १७५ मी. व रुंदी ५० मी. यात फक्त ९५३ खांब आहेत ! बाजूचे स्तंभ साडे तीन मीटर उंच आहेत, आतले त्याच्या दुप्पट.सगळे दगडी आणि बारकाईने कोरलेले ! पण स्थपतींना पूर्ण कल्पना होती की हे खांब अडचण आहेत. नृत्यमंडपात, कल्याणमंडपात त्यांना जागा नाही. त्यांनी कमानीची कल्पना छप्पर बांधण्याकरिता वापरली.छोटे दगड किंवा वीटा कमानी व तत्जन्य घुमट उभारण्याकरिता वापरले गेले. वापर वीटांचा आहे व उदाहरणेही फ़ार नाहीत. पण घुमट आहे म्हणून त्यांना Indo-sarsenik म्हणावयाचे कारण नाही. आणि एक मार्ग म्हणजे दगडांचे एकावर एक असे थर बसावयाचे की मधल्या उघड्या भागाचा आकार कमी कमी होत जाईल व शेवटी सर्वात वर एवढाच आकार राहील की तो एकाच दगडाने झाकता येईल. तंजावूर येथील बृहडेश्वर मंदिरातील हा शेवटचा दगड ८३ टन वजनाचा आहे ! पिरॅमिड्सची आठवण झाली की नाही ? बांधणीमुळे छपराला "पायऱ्या" किंवा "मजले" निर्माण होतात. अर्थातच अशा छप्परांचा भार प्रचंड असल्याने भिंती भक्कम, जाडजूड लागतात. वरच्या पायरीचा प्रत्येक दगड खालच्या पायरी़च्या थोडासा पुढे झुकलेला दिसतो. हे काम फ़रशा भिंतीला समांतर मांडून करता येईल वा चौकानाचे कोन छेदले जातील अशा प्रकारे फ़रशा मांडून करता येईल.उतरंडीच्या छप्पराच्या या पायऱ्या सलग एका रेषेत असतील तर ती नागरी शैली; मजले स्पष्ट दिसत असतील तर द्राविड शैली. पण हे मजले वेगळे आहेत याची जाणीव ठेवण्याकरिता त्यांना "भूमि" म्हणतात. मंदिरांच्या शैलींची माहिती आपण पुढे घेणार आहोतच; पण इथे नमुद करून ठेवावयास हरकत नाही की नागर व द्राविड शैलींमध्ये " भूमी"चे सुशोभन वेगवेगळ्या पद्धतीने करतात व हा दोहोंमधील एक महत्वाचा फरक आहे. भिंतींचे सुशोभन करण्यासाठी वापरावयाचे सर्व साधने येथेही वापरण्यात आली आहेत.कलष, मूर्ती, स्तंभ, कोनाडे, पाने-फ़ुले, मिथुने, रत्नहार इत्यादी सर्वांचा उपयोग केला गेला. सगळ्यात जास्त गमतीचा भाग म्हणजे ही शिखरे गाभारा-मंडप यांच्यावरून खाली उतरून देवळासमोर गोपुरे म्हणूनही आली. काही फ़ोटो बघू. (आणि देवळांच्या प्रयेक फ़ोटोत छप्परे दिसतातच की.)
मजले कसे तयार करत याचे एक चित्र पहा. खालचा मोठा चौरस भाग फरश्या आत आत आणत वर लहान झाला आहे.
(१) महाबलीपुरम ...गजपृष्ट छप्पर. शेजारी हत्ती असल्याने लगेच साम्य कळते. (२) पट्टडकलु-१ ... द्राविडी शैली. भूमीचे स्थर वेगवेगळे दिसतात. (३) पट्टडकलु-२ ... नागरी शैली. भूमींचे कोन एका रेघेत. (४) सोमनाथपूर . भूमी एकदम निरनिराळ्या बघता येतात.
कोरीव लेणी
भगवान बुद्धांच्या आदेशा- नुसार अनेक भिक्षु देशभर धर्म प्रचारासाठी बाहेर पडले. त्यांना धर्माच्या नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करावे लागत असे. त्यामध्ये नियम होता की एका घरात दोन पेक्षा अधिक वेळेला भिक्षा न घेणे आणि एकाच गावात दोन पेक्षा अधिक दिवस मुक्काम न करणे. हे भिक्षु महाराष्ट्रात आले तेव्हा पावसाळ्यात त्यांच्याकडून या नियमाचा भंग होऊ लागला. अचानक दुथडी वाहणाऱ्या नद्या आणि नाल्यांमुळे हे भिक्षु दिवसेंदिवस एकाच गावात अडकून पडत. भगवान बुद्धाने त्यांना एक मार्ग सुचवला. या सर्व भिक्षूनी पावसाळ्याचे चार महिने एकत्रित राहावे आणि पाऊस संपल्यावर पुन्हा प्रचाराला बाहेर पडावे. या एकत्रित राहण्याला 'वर्षावास' असे म्हणत.
महाराष्ट्रामध्ये म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या प्रचंड रांगांनी व्यापलेला आहे. हा यातील खडक हा 'कृष्णपाषाण' ज्याला इंग्रजीत 'ब्लॅक बेसॉल्ट' असे म्हणतात. त्याचे वैशिष्ट्य असे की या दगडापासून तयार झालेला संपूर्ण डोंगर हा एकच आणि एकसंध खडक असतो. त्यामुळे त्यातील अंतर्गत कणांची संरचना ही पण समान असते. तसेच अनेक ठिकाणी बारीकशा भेगांमधून पाझरलेले पावसाचे पाणी हे त्या खडकात असणाऱ्या पोकळ्यांमध्ये साठवले जाते.
बारबारची लेणी झाल्यावर भिक्षूना असे वाटले की महाराष्ट्रामध्ये वर्षावासासाठी जर अशा लेण्या कोरल्या तर निवासाची समस्या कायमची सुटेल. त्याचा पहिला प्रयोग हा लोणावळ्याच्या अलीकडे, आजच्या मळवली स्थानकाच्या मागे, भाजे गावालगत असणाऱ्या डोंगरात झाला. महाराष्ट्रात कोरली गेलेली ही पहिली लेणी. या उपक्रमासाठी अनेकांनी दाने दिली होती. त्या काळी महाराष्ट्रामध्ये बौद्धपंथाचा प्रभाव मोठा होता. त्यामुळे या कामासाठी अनेकांकडून दानाचा ओघ सतत सुरू राहिला. लेणी कोरणे ही त्या काळची एक धार्मिक स्पर्धात्मक चढाओढच सुरू झाली. हे लेणी कोरण्याचे लोण पुढील १०००-१२०० वर्ष सुरू होते. देशातल्या अनेक भागात लेणी कोरली गेली. आज भारतात अशा कोरलेल्या लेण्यांची संख्या सुमारे १२०० एवढी असली तरी त्यातली १००० हून अधिक लेणी पश्चिम महाराष्ट्रातच आहेत.
लेणी कोरल्यामुळे भिक्षूची चार महिने निवासाची व्यवस्था झाली. परंतु उरलेले आठ महिनेही या वास्तूंचा उपयोग होऊ लागला. वैश्य किंवा व्यापारी समाजातील बहुसंख्य लोक बौद्ध पंथीय होते. त्यांच्या मालाची वाहतूक ही उंट, घोडे, बैल यांच्या तांड्यांच्या मार्फत होत असे. हे व्यापारी तांडे या लेण्यांमध्ये निवासाला थांबत. तेथील भिक्षु त्यांच व्यवस्था पाहत असत. यामुळे असे दिसते की ही बहुतांश लेणी त्या वेळच्या प्रचलित व्यापारी मार्गाव आहेत. त्यातले अनेक व्यापारी मार्ग हे आजही वापरात आहेत. ह्याच पद्धतीच्या लेणी ओरिसामध्ये खारवेल या जैन पंथीय राजाने कोरल्या होत्या. भुवनेश्वर जवळील दोन डोंगरांमध्ये उदयगिरी आणि खंडगिरी या नावाने हे लेणी समूह आहेत. महाराष्ट्रातील अनेक लेण्यांमध्ये काही शिल्पांबरोबरच अनेक चित्रेही त्यात काढलेली आढळतात. अजिंठ्याच्या लेणींच्या प्रवेशद्वारांवर माती ढासळल्यामुळे त्या लेणी झाकल्या गेल्यामुळे सुस्थितीत राहिल्या. अन्य लेण्यांमधल्या चित्रित भिंतींवरचे रंग उडून गेले इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत या लेण्यातील कोरीव कामात गौतम बुद्धाची शारीर रूपातील प्रतिम दिसत नाही.
चित्र क्र. १२: भाजे लेणी, महाराष्ट्र
चित्र क्र. १६: दशावतार मंदिर, देवगड
बांधलेली मंदिरे (इ.स. ४ थे ते ८ वे शतक)
या लेणी मंदिरे कोरण्याच्या कालखंडात दगडावर दगड रचून मंदिरे करण्याचाही प्रयोग सुरू झाला. देवगड, नचना, भुमराह या गावी ही सुरुवातीच्या काळात बांधलेली मंदिरे आढळतात. एका चौथऱ्यावर ज्याचे माप साधारण २०-२० फूट आणि ज्याच्यावर साधारण १०-१० फूट उंचीचे चौकोनी बांधकाम. ज्यामध्ये एक गर्भागृह आहे असे यांचे स्थापत्य आहे. संपूर्ण देशभर अशा पद्धतीची दगडी मंदिरे बांधण्याचे किंवा लेणी मंदिरे कोरण्याचे काम या काळानंतर सुरू झालेले दिसते. बांधलेल्या मंदिरामध्ये सातव्या शतकापर्यंत लहान आकाराचीच मंदिरे प्रामुख्याने बांधली गेली. यांची सर्वात मोठी प्रयोग शाळा कर्नाटकमधील पट्टदकल आणि ऐहोळे या गावी आढळते. येथे विविध प्रकारच्या आणि आकारांच्या मंदिरांचे प्रयोग केलेले दिसतात. नागर, द्राविड इ. शैलींची मंदिरे इथे दिसतात. नागर म्हणजे वर निमुळते होत जाणारे शिखर. तर द्राविड म्हणजे आडव्या थरांमध्ये विभागून निमुळते होणारे शिखर. अशी या शैलींची नावे आणि प्रकार आहेत. या समूहातील सर्वात मोठे मंदिर (विरुपाक्ष मंदिर) हे साधारणतः ३० फूट उंचीचे आहे. चित्र क्र. १७: पार्वती मंदिर, नचना
मोठी मंदिरे (इ.स. ८ वे ते १३ वे शतक)
या संपूर्ण कालखंडामध्ये म्हणजे वेदकाळापासून सातव्या शतकापर्यंत या वैचारिक आणि धार्मिक प्रगती बरोबरच वैज्ञानिक प्रगतीही समांतर आणि तितक्याच गतिमानतेने धावत होती. किंबहुना अनेक वेदांमधल्या कथांपासून पुराणकथांमध्ये वैज्ञानिक सिद्धान्ताचे संदर्भ दिसतात. वेदकाळापासून भारक वैज्ञानिकांची एक अक्षय्य परंपराही सातत्याने दिसते. याच परंपरेमध्ये सातव्या शतकामध्ये २० प्रदेशामध्ये कायथा या गावी वराहमिहीर नावाच्या एका थोर शास्त्रज्ञाचा जन्म झाला. त्याच्य 'बृहद्ङ्कथा' या ग्रंथामध्ये स्थापत्यशास्त्रावर एक स्वतंत्र अध्यायच आहे. त्यात त्याने स्थपतिर ब्रह्मांडाची प्रतिकृती ज्यात दिसेल अशी वास्तू साकारण्याचे आवाहन केले आहे. यानंतरच्या काळात मंदिर स्थापत्यांमध्ये केवळ देवदेवतांच्या मूर्तीना ठेवण्याचे स्थान असा हेतू न राहता, त्याचबरोबर प्रचंड आकारमानाच्या वास्तूंचीही निर्मिती करण्याचे चिंतन आणि प्रयोग सुरू झाले. विशाल मंदिर निर्मितीच्या परंपरेला या देशातील शास्त्रज्ञ कारणीभूत ठरले आहेत. चित्र क्र. १८: रथमंदिर, महाबलीपुरम
महाबलीपुरम् येथे अखंड दगडातून कोरून मंदिर करण्याचेही प्रयोग सातव्या शतकात सुरू झाले होते. यामध्ये पाच पांडवांचे रथ हा त्यापैकीच एक प्रयोग. इथे समुद्रकिनाऱ्यावर असलेले दगडात बांधलेले एक मोठे मंदिर आहे. ज्याला 'शोर टेम्पल' असे म्हणतात. महाबलीपुरम्ची मंदिरे नरसिंहवर्मन पहिला (इ.स. ६३० ते ६७०) या राजाच्या काळात बांधली गेली. आठव्या शतकात सुरुवातीला कांचीपुरम येथे कैलासनाथान मंदिराचे बांधकाम झाले. राजा नरसिंहवर्मन दुसरा (इ.स. ६९० ते ७१५) व त्याची राणी रंगपताका यांच्या प्रयत्नांनी हे कैलास मंदिर उभारण्यात आले. मोठ्या आणि भव्य मंदिराची सुरुवात इथून आली. याच्यानंतर राजा नंदिवर्मन (इ.स. ७१७ ते ७७९) याच्या कालखंडात कांचीपुरमचे प्रसिध्द वैकुंठ-पेरूमाळ मंदिराचे बांधकाम झाले. आजही हे भव्य मंदिर तेथे आहे. परंतु जीर्णोद्धारामध्ये त्या मूळ स्वरूप गेले आहे. मंदिरे बांधायचे कार्य सुरू झाले आणि या कालखंडानंतर हजारो मंदिरांचे निर्मिती देशभरात झाली असली तरी त्यातली विकसित आणि भव्य मंदिरांची संख्या मात्र खूपच कमी आहे. या पुढील काळात विकसित अवस्थेतील मंदिराचे स्थापत्य प्रस्थापित होऊ लागले होते. मुखमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी साधारणतः या मंदिरांची रचना होती आणि गर्भगृहावरती उत्तुंग असे शिखर ज्याची उंची ५० फुटापेक्षाही अधिक होती. ही झाली मोठी मंदिरे बांधण्याची सुरुवात. यानंतर देशातील अन्य भागातही अशी मंदिरे बांधण्याचे प्रयोग सुरू झाले. चित्र क्र. १९: कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम
राष्ट्रकूट वंशाचा राजा कृष्ण पहिला (इ.स. ७५६ ते ७७३) याच्या काळात महाराष्ट्रामध्ये वेरुळ मधल्या कैलास मंदिराचे काम सुरू झाले. असे म्हणतात की त्याची राणी माणिकावती हिने कांचीपुरम येथील कैलासनाथाच्या मंदिरासारख्या पण त्याहूनही भव्य अशा महाराष्ट्रात बांधल्या गेलेल्या मंदिराचा कळस पाहिल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करणार नाही अशी विचित्र प्रतिज्ञा केली. एका व्यक्तीच्या उपोषण काळात पन्नास फुटाहून अधिक उंचीचे आणि भव्य मंदिर बांधून काढणे अशक्यच होते. या समस्येवर मात करण्यासाठी पैठणचा एक अज्ञात शिल्पी पुढे सरसावला. त्याने डोंगरावर जाऊन दोन दिवसांमध्ये एका देवळाचा केवळ कळस कोरला व तो त्या राणीला दाखवून तिची प्रतिज्ञा पूर्ण केली असे म्हणतात. इथून एका डोंगरातून संपूर्ण आणि एकसंध मंदिर कोरण्याच्या अचाट प्रयोगाची सुरुवात झाली. हे मंदिर कोरण्याचे काम जे इसवी सनाच्या आठव्या शतकात (सुमारे इ.स. ७७० पासून) सुरू झाले ते दहाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत (इ.स. ९१३) म्हणजे कृष्ण राजाच्या पतवंडांपर्यंत सुरू होते. शंभर फूट उंच, १७० फूट रुंद आणि जवळ जवळ १७५ फूट लांब असे विराट मंदिर साकार झाले. कांचीपुरमच्या मंदिराशी स्पर्धा असल्यामुळे पूर्णपणे दक्षिण भारतीय धाटणी (द्राविड शैलीचे) असूनही परंतु महाराष्ट्रात प्रकटलेले, तसेच महाराष्ट्रातले हे सर्वात मोठे मंदिर आहे. चित्र क्र. २०: कैलास मंदिर, वेरूळ
दहाव्या शतकामध्ये उत्तर भारतात खजुराहो येथे चंदेल घराण्याच्या महासत्तेचा उदय झाला.या कालखंडात येथे मंदिर बांधण्याच्या कामाला विलक्षण गती आलेली दिसते. याच वंशातील यशोवर्मन (लक्ष्मण वर्मा) (इ. स. ९२५ ते ९५०) याने खजुराहो येथील लक्ष्मण मंदिर हे पहिले भव्य मंदीर बांधले. याचा मुलगा धंगदेव (इ.स. ९५० ते १००२) याने विश्वनाथ आणि पार्श्वनाथ ही दोन देखणी बांधली. त्यानंतर राज्यावर आलेल्या गंडदेवाच्या कारकिर्दीत जगदंबी आणि चित्रगुप्त ही मंदिरे बांधली गेली. ह्यानंतर याचा मुलगा विद्याधर (इ.स. १००४ ते १०२९) हा गादीवर बसला. त्याने इ.स. १०१९ ते १०२२ या काळामध्ये महंमद गजनीचा दोनदा युद्धात पराजय केला. यानेच खजुराहो मधल्या खंडारिया महादेव या मंदिराची निर्मिती केली. इ.स. ११०० पर्यंत खजुराहोमध्ये एकूण ८५ मंदिरे बांधली गेली. त्यातील आज १० ते १२ शिल्लक आहेत. एकाच परिसरात भव्य मंदिरांची निर्मिती असणारे हे भारतातील एकमेव स्थान आहे. चित्र क्र. २१ : लक्ष्मण मंदिर, खजुराहो
१०० फूट उंचीची लक्ष्मण, विश्वनाथ आणि खंडारिया महादेव अशी तीन मंदिरे खजुराहो येथील पश्चिम समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैदानात आहेत. या नंतरच्या काळातील भव्य मंदिराची निर्मिती तामिळनाडू प्रांतातील तंजावर येथे झाली. चोल घराण्याचा राजराजा चोल (इ.स. ९८५ ते १०१२) आणि त्याचा मुलगा राजेंद्र चोल (इ.स. १०१२३ १०४४) याच्या कारकिर्दीत भारतातील अतिभव्य अशा दोन मंदिरांची निर्मिती झाली. यातील तंजावर येथील बृहदीश्वराच्या मंदिराचे बांधकाम राजराजाच्या कारकिर्दीत सुरू झाले परंतु ते संपूर्ण होण्याला आतच त्याचा मृत्यू झाला, त्याचा मुलगा राजेंद्र चोल याने ते बांधकाम पूर्ण करून घेतले. परंतु त्याचबरोबर तिथून जवळच गंगाईकोंडचोलापुरम येथे दुसरे बृहदीश्वर गंगाईकोंडचोलेश्वराचे मंदिर बांधले. दोन्ही मंदिराचे वैशिष्ट्य असे की तत्कालीन मध्यम आकारांच्या मंदिरापेक्षा जवळजवळ ४० पटीने हैं मंदिरे मोठी आहेत. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराला 'दक्षिण मेरू' असे संबोधले आहे आणि भगवान शिव म्हणजे अवकाश या कल्पनेचे हे परमाकाश असे रूप आहे. (वात्स्यायन १९९६, नागास्वामीः ३०१ - ३०८). ह्या दोन्ही मंदिरांची उंची अनुक्रमे २०० फूट आणि १८० फूट एवढी आहे. चित्र क्र. २२: बृहदीश्वर मंदिर, तंजावर
तेराव्या शतकामध्ये ओरिसामध्ये राजा नरसिंह देव दुसरा (इ.स. १२३४ ते १२६८) याने इ.स. १२५८ मध्ये कोणार्कचे सूर्य मंदिर बांधले. या मंदिराच्या गर्भगृहावरील शिखराची उंची २२० फूट एवढी होती. भारतातील हे सर्वात मोठे मंदिर होते. सतराव्या शतकात हा भाग ढासळला आणि आज त्याचे १८० फूट उंचीचे जगमोहनावरील शिखर उभे आहे. इ.स. १२४४ मध्ये राजा नरसिंह देव याने बंगालवर स्वारी केली आणि तेथील सुलतान तुघ्रील तुघान याचा दारुण पराभव करून तो प्रदेश मुक्त केला. त्याच्यात त्याला प्रचंड मोठी संपत्ती मिळाली. ही मिळालेली संपत्ती त्याने सर्व सैनिकांमध्ये वाटून टाकण्याची योजना केली. हे त्याच्या आईला कळताच तिने त्याला विचारले की या संपत्तीवर फक्त सैनिकांचाच अधिकार कसा? तुम्ही रणांगणावर लढत असताना येथील सर्व समाजही तुमच्या लढ्यात सामील असतोच. तेव्हा या संपत्तीवर सर्व समाजाचा अधिकार आहे, म्हणूनच या धनाचा विनियोग समाजहितासाठीच झाला पाहिजे. हे ऐकल्यावर राजाने आपला निर्णय बदलला आणि या भव्य मंदिराच्या निर्मितीसाठी तो पैसा वापरला. या मंदिर निर्मितीचा सर्व तपशील बय चकडा या १३ व्या शतकात सापडलेल्या हस्तलिखितात आढळतो. मंदिराचे स्थापत्य अभ्यासताना असे लक्षात येते की भारतामध्ये १०० फूट किंवा अधिक उंचीची फारच थोडी मंदिरे शिल्लक आहेत. खजुराहो येथील वैद्यनाथ मंदिर आणि त्यासारखी तिथली अन्य मोठी मंदिरे ही १५ व्या शतकात आलेल्या सिकंदर लोधी याने तर विदिशा येथील बीजमंडल हे भव्य सूर्य मंदिर १७ व्या शतकात औरंगजेब याने उद्ध्वस्त केले. तसेच चंदेल घराण्याने बांधलेली सिंहोनिया येथील भव्य मंदिरेही अत्यंत भग्न अवस्थेत उभी आहेत. चित्र क्र. २३ : सूर्यमंदिर, कोणार्क
कोर्जुएम फोर्ट / Corjuem Fort /खोर्जुवे किल्ला
हळदोणे गावानजीक म्हापसा नदीच्या किनाऱ्यावर एका छोट्या बेटावर खोर्जुवे नावाचा किल्ला आहे. इ.स १५५० मधे बांधलेला हा किल्ला मूळतः सावंतवाडीकर भोसले यांच्याकडे होता. पण पोर्तुगीज व्हाईसरॉय कॅटानो डेमेलो ई कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला पोर्तुगीज प्रशासनाच्या ताब्यात आला. त्यानंतर पोर्तुगीजांनी आपली राजधानी असलेल्या पणजीला संरक्षण देण्यासाठी इ.स. १७०७ च्या सुमारास हा किल्ला पुन्हा बांधून अधिक बळकट केला. १८ व्या शतकात, राणे राजपूत आणि सावंतवाडीकर भोसले यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी व त्यांचे वारंवार होणारे आक्रमण थोपवण्यासाठी पोर्तुगीजांना या किल्ल्याचा खूप उपयोग झाला. चार तोफांसह सज्ज अशी एक सशस्त्र बटालियन कायम या किल्ल्यावर पहारा देण्यासाठी ठेवलेली असायची. पुढे १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात, हा किल्ला एक मिलिटरी स्कूल म्हणून वापरला गेला. या किल्ल्याच्या बाबतीत एक मनोरंजक कथा सांगितली जाते. उर्सुला इ लांकास्त्रे (Ursula e Lancastre ) नावाची एक पोर्तुगीज महिला पुरुषांच्या जगात यशस्वी बनू पहात होती. त्या काळातील पोर्तुगीज महिलांवर घालण्यात येणाऱ्या निर्बंधांवर ती नाखूष होती. त्यामुळे तिने पुरुषांसारखा वेष धारण करून जगाची मुक्त सैर केली. ती इथे खोर्जुवे किल्ल्याच्या परिसरात एक सैनीक म्हणून उतरली व किल्ल्याची रक्षक म्हणून नियुक्ती झाली. पण काही दिवसांनी एक संशयीत व्यक्ती म्हणून तिला अटक करून तिचे कपडे उतरवण्यात आल्यावर तिचं रहस्य उघड झालं. तिला कारागृहात कैदेत ठेवलेले असताना त्या कारागृहाच्या पहारेकऱ्यांचा कॅप्टन तिच्या धिटाई आणि शौर्याने प्रभावित झाला आणि तिच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्याने तिच्याशी विवाह केला. किल्ल्यासमोर चहुबाजूस बऱ्यापैकी मोकळी जागा आहे. या शेताडातून किल्ल्याच्या जवळ जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. गोव्यातील इतर बहुसंख्य किल्ल्यांप्रमाणेच खोर्जुवे किल्ला सुद्धा कोकणात मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या लेटरेइट स्टोनपासून (जांभ्या दगडात) बनवलेला आहे. साधारण चौरस आकाराच्या या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तटबंदीमधेच मध्यभागी एक छोटे प्रवेशद्वार असून त्यावर पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह आणि पोर्तुगीज भाषेतील मजकूर लिहलेला एक छोटा शिलालेख आहे. याला "कोट ऑफ आर्म" म्हणतात. किल्ल्यात प्रवेश करताच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस तटबंदीमधे एका कोनाड्यात कमानीत मदर मेरीचा पुतळा ( Mae de Deus ) आणि सेंट अँथनी यास समर्पित केलेले एक छोटे ख्रिस्ती देऊळ आहे. या मेरीचा उत्सव ईस्टर संडेनंतर येणार्या पहिल्या रविवारी असतो. हे चॅपेल दिवार बेटावरील जोआ फेलीप फेरेरा (Joao Felipe Ferreira ) याने सन १८५४ मध्ये स्वखर्चाने बांधले. दरवाजाच्या समांतर तटबंदी मधील कोनाड्यात एक क्रूस कोरल्याचे दिसून येते. या छोटेखानी किल्ल्याला चारी कोपऱ्यात चार बुरुज असून बुरुजांवर पोर्तुगीज धाटणीच्या छोट्या आकाराच्या गोल खोल्या केलेल्या आहेत. या गोल बुरुजवजा खोल्यात एकावेळी जेमतेम एकच सैनिक उभा राहू शकेल एवढीच जागा असते. तसेच खोलीच्या तटबंदीआडून स्वत: सुरक्षित राहून शत्रूवर बंदुकीचा भडीमार करता यावा यासाठी चौकोनी खाचा केलेल्या असतात. प्रत्येक बुरुजाचा आकार हा पाकळीसारखा असून त्यांना जोडणार्या तटबंदीमुळे आकाशातून पाहताना हा किल्ला एखाद्या रांगोळीसारखा दिसतो. वास्तविक भुईकोट असल्याने आपण हा गड जमीनीवरुनच पाहु शकलो तरी पक्ष्याप्रमाणे पंख लावून आकाशातून बघावे असेच याचे दृष्य आहे. अर्थात तंत्रज्ञानाने प्रगती करुन ड्रोन कॅमेर्याची सोय झाल्याने या देखण्या किल्ल्याचे आपण हवाई दर्शन घेउ शकतो. शिवाय किल्ल्याच्या बुरुजावर आणि तटबंदीच्या फांजीवर जाण्यासाठी पायऱ्यांच्या दगडी जिन्या एवजी तिरपे उतार बांधलेले आहेत. हे ही पोर्तुगीज दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य.किल्ल्याची तटबंदी रुंद असून त्यातही अनेक ठिकाणी ठराविक अंतरावर तोफा डागण्यासाठी चौकोनी खाचा केलेल्या आहेत. किल्ल्यात मध्यभागी एक विहीर असून पुरातत्व विभागाने सध्या ती लोखंडी जाळी टाकून बंद केली आहे. एकंदरीत दुर्ग उभारणीची शैली बघता आग्वाद, कायसुवचा किल्ला किंवा शापोरा आणि तेरेखोल यांची आणि खोर्जुवेच्या किल्ल्याची बांधकाम शैली एकच वाटते. तेव्हा अद्याप आपण या किल्ल्याला भेट दिली नसल्यास पुढच्या गोवा भेटीत याच्यासाठी आवर्जून वेळ राखून ठेवा.
मूर्तिकलेतील आसने :-
मुर्तीच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे यथार्थ दर्शन होण्यासाठी तिची बैठक विशिष्ठपणे ठेवणे म्हणजे आसन होय. मूर्ती घडविताना तिच्या पायांची विशिष्ठ ठेवण मनात ठरवून, तशा प्रकारची घडण करून ती बसविलेली दाखवणे म्हणजे तिचे आसन होय. यामधून त्यादेवतेची अवस्था मानवाच्या अवस्थेहून भिन्न आहे हे सूचित करावयाचे असते. आसने ही मूर्तीचे भाव आणि दैवी गुण प्रकट करतात.
• अर्धपर्यंक पद्मासन घालून व एक मांडी कोणतेतरी उशीसारखे आसन देऊन थोडी वर उचलणे.
• आलीढ डावा पाय गुढघ्यात वाकवून पुढे घ्यावयाचा आणि उजवा पाय ताठ पण तिरका मागे ठेवायचा.
• उत्कटित पाय सरळ उभे ठेवून किंवा त्याना तिढा घालून उकिडवे बसणे.
• कूर्म - दोन्ही पायाच्या टाचा मागे चिकटलेल्या रहतील अशा प्रकारे मांडी घालणे.
• पद्म - दोन्ही पायांच्या टाचा उलट बाजूला जांघात बसतील अशा प्रकारे मांडी घालणे
• पर्यक साधी मांडी घालून बसणे.
• प्रत्यालीढ आलीढच्या उलटे करणे.
भद्र - दोन्ही पाय लोंबते सोडून उंच पीठावर बसणे.
• योग - पद्मसनामध्ये ध्यान मुद्रा लावणे.
• ललित - उंच जागी एका पायाची मांडी घालून दुसरा पाय लोंबता खाली सोडणे.
• वज्र - पायांचे तळवे उलट बाजूच्या मांड्यावर येतील असे करून तळहात गुडघ्यावर पालथे ठेवणे.
• प्रलंबपादासन - दोन्ही पाय खाली सोडून उंच पीठावर बसणे.
• सोपाश्रय सैलसर मांडी घालून तळपायाची तिढी पुढे ठेवलेल्या कोणत्यातरी आधारावर बसविणे.
मूर्तिकलेतील मुद्रा :-
हाताचा तळवा व बोटे अनेक भिन्न प्रकारच्या अवस्था दर्शवू शकतात. या अवस्थांना मुर्तिकलेच्या परिभाषेत मुद्रा असे म्हाणतात ज्या अवस्थेत दंडापासुन संपूर्ण हाताचा उपयोग केलेला असतो तिला हस्त असे म्हणतात. हस्तही मुद्रांच्याच प्रकारात येतात. मुद्रा किंवा हस्त भिन्न भिन्न दाखवून त्या त्या देवतेच्या भिन्न भिन्न कृर्तीचा बोध करून देणे हे भारतीय मूर्तीशिल्पाचे वैशिष्ट्य आहे.
• अंजली दोन्ही हातांचे तळवे एकमेकाना जोडून डाव्या हाताच्या बोटावर उजव्या हाताची बोटे व डाव्या हाताच्या अंगठ्यावर उजव्या हाताचा अंगठा टेकविणे. दोन्ही तळव्यात थोडा फुगवटा ठेवून मनगटापासून पुढील हात जमिनीशी समांतर ठेवणे.तिला नमस्कार मुद्रा असेही म्हणतात.
अभय हाताचा तळवा समोरच्या व्यक्तीकडे वळवून कोपरापासून पुढचा हात उभा धरणे, बोटे ताठ ठेवणे. या मुद्रेने मनाची निर्भयता, सुरक्षितता व स्वस्थता हे भाव प्रकट होतात .
• कटकसिंहकर्ण- चारही बोटांची टोके अंगठ्याच्या टोकाला मिळवून कडे तयार करणे.
• कट्यवलंबित कमरेवर हात ठेवणे.
• कर्णसिंहमुख - तर्जनी व करंगळी सरळ ठेवून मध्यमा व अनामिका तळहातावर दाबून हात लांब करणे.
• कर्तरिहस्त - तळहात जुळवून व विमुख करून खांद्याच्या रेषेत आणणे.
• अर्धचंद्रहस्त- अंगठा व तर्जनी दूर पसरून अर्धचंद्राकृती बनविणे.
• तर्जनी तर्जनी उभी करून बाकीच्या बोटांची मूठ दाबणे .
• तर्पण - दोन्ही हातांची ओंजळ खांद्याच्या पातळीत आणणे .
• धर्मचक्र - उजव्या हाताने ज्ञानमुद्रा व डाव्या हाताने व्याख्यान मुद्रा केली असता ही मुद्रा होते.
ध्यान किंवा समाधी पद्मासनात ताठ बसून दोन्ही तळहात मांडीवर उताणे ठेवून डोळे मिटणे.
नमस्कार - दोन्ही हात जोडून जमोनीशी लंबरूपात धरणे.
• भूस्पर्श डव्या हाताचा तळवा वर करून तो मांडीवर ठेवणे उजवा हात गुडघ्याखाली अणून तो जमिनीवर टेकविणे.
• वरद- उजवा हात पालथा करुन व बोटे परस्परांस जुळवून तो खाली वळविणे.
• व्याख्यान उजव्या हाताचा अंगठा तर्जनी यांचे कडे करून बाकीची बोटे सुटी ठेवणे. तळहात पाहणारा समोर धरणे.
• ज्ञान अंगठा व तर्जनी यांची अग्रे जुळवून आणि बाकीची बोटे मोकळी सोडून तळहात हृदयाशी धरणे.
मुर्तिकलेतील आयुधे :-
देवतांच्या मानवाकृतीत आयुधांचा संयोग दाखविलेला आहे हा संयोग प्रतीकरूपाने कल्पित आहे. माणसाला आपली जीवनगाथा चालविणे आणि शत्रूपासून संरक्षण करणे यांसाठी जशी गरज असते तशी ती देवतांनाही असते देवताही आपली विशिष्ट आयुधे घेऊन दैत्य दानवांशी युद्ध करतात. पुष्कळदा आयुधांवरून मूर्तीची ओळख पटते.
• शंख प्राचीन काळी रणक्षेत्रावर वीरांना स्फुरण देण्यासाठी शंख वाजविण्याची प्रथा होती. मूर्तिकलेत शंख हे ज्ञानाचे प्रतीक मानले आहे. वामावर्त आणि दक्षिणावर्त असे दोन प्रकार आहेत. आयुधमूर्तीत शंखाची पुरुषमुर्ती दिसते. त्याचा उजवा हात व्याख्यान मुद्रा दर्शवित असून डावा हात कमलधारी आहे. वैष्णव संप्रदायात शंखाला विशेष महत्व आहे.
■ चक्र हे वैष्णव आयुध आहे ते पूर्णतेचे प्रतिक आहे. चक्राचीही मूर्ती घडविली गेली आहे. सुदर्शन चक्राच्या परीघाला चिकटून त्याची मूर्ती बनवितात.
• गदा हे प्राचीन आयुध आहे. वैदिक आर्य गदा वापरीत होते गदा आयुधदेवीच्या रूपात दाखवितात.
खड्ग लांब किंवा आखुड तलवार य रूपांना मुर्तिकलेमध्ये खड्ग म्हटले आहे. बहुतेक बहुभुज मूर्ती खड्गधारी असतात.
धनुष्य - बाण - हे अतिप्राचीन आयुध आहे. वेदकाळपूर्वीही भारतात त्याचा वापर होता. शिंगाचे व वेळुचे असे त्याचे प्रकार आहेत.
• खट्वांग हा गदेचाच एक प्रकार आहे चौपाइच्या खुरासारखा दांडा असून त्याच्या एका टोकावर माणसाची कवटी, असे त्यचे स्वरुप असते.
• अग्नी हे युद्धप्रतीक आहे.
• पाश फाससदृष्य आयुध
• वज्र इंद्राचे मधे मूठ व दोन्ही बाजूंस त्रिशूल असलेले आयुध.
• शूल शक्ती भाल्याचे प्रकार. १९ याशिवाय इतरही अनेक आयुधांचे प्रकार आढळतात.
केवलमूर्ती :-
एकट्या शिवाची मूर्ती असल्यास तिला केवल शिव म्हणतात. केवलमूर्तींचे स्थानक व आसन असे दोन प्रकार पडतात. यामध्ये एकटा शिव समभंग अवस्थेत (दोन्ही पायावर सरळ) उभा असतो. या मूर्तिप्रकारात फारसे लालित्य नसते. प्रसंगी त्याच्या मागे नंदीही काडलेला असतो. शिवासह नंदी असतोच असे नाही. साधारणत: अशी मूर्ती चतुर्भुज असून हातात त्रिशूळ, सर्प व घट हे प्रामुख्याने दिसतात. नाणी व मुद्रा यांवर केवल शिवाचे अंकन मोठ्या प्रमाणात आढळते. मात्र पाषाणमूर्तींची संख्या तुलनेने कमी आहे.
दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयातील पाश्चात्त्य छाप असलेले एक उत्तर कुषाणकालीन शिवशीर्ष विशेष उल्लेखनीय आहे. या शिवाच्या डोक्यावर जटाजूट वा जटामुकुटाऐवजी कुरळे केस दर्शविलेले आहेत; तसेच डावीकडे चंद्रकोर आहे. कपाळावर ग्रीक शासकांप्रमाणे ‘डायडेम’ बांधलेला दिसतो. त्याला शिल्परत्नात ‘ललाटपट्ट’ असे नाव आहे. कपाळावर तिसरा नेत्र उभा अंकित केला आहे; वास्तविक हे वैशिष्ट्य गुप्तकालीन मूर्तींचे आहे; पण त्याचा प्रारंभ कुषाणकाळाच्या शेवटी झाला असावा. वेरुळच्या कैलास मंदिरामध्ये अनेक ठिकाणी याचे शिल्पांकन दिसते.
केवल शिव, कैलास मंदिर, वेरूळ
कुर्डुगड
ताम्हिणी घाटाच्या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड (विश्रामगड) हा किल्ला बांधण्यात आला होता. कुर्डुगड ऊर्फ विश्रामगड किल्ला रायगड व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर पुण्याहून कोकणात उतरणाऱ्या ताम्हणी घाटाच्या वेशीवर आहे. सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डुगड किल्ला किंवा विश्रामगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेत नसुन सह्याद्रीधारेपासून वेगळा सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यात माणगावच्या ईशान्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावरील सह्याद्रीच्या एका अलग झालेल्या समुद्रसपाटीपासून सुमारे ६१० मी. उंच सुळक्यावर हा किल्ला आहे. तो पंत सचिवांच्या भोर संस्थानात जाणा-या देव खिंडी वर नजर रोखून बसला आहे. जवळील कुर्डाई नामक देवीच्या मंदिरामुळे याला कुर्डू असेही म्हणतात.
जिते गावाच्या वाटेवरुन दिसणारा कुर्डुगड
कुर्डूगडाचा इतिहास पाहिल्यास कुर्डुगडाची बांधणी अंदाजे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याच्या कालावधीत झाली असावी. फारसा परिचित नसलेला कुर्डुगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवाजीराजांच्या समकालीन आणि सहकारी घराण्याच्या अखत्यारीत होता. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात. मराठा काळात शिबंदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होई. शिवाजीराजांचा धडाडीचा सरदार येसाजी कंक याचं कुर्डूपेठ हे जन्मस्थान.
इतिहासात या किल्ल्याविषयी एक महत्त्वपूर्ण आख्यायिका आहे. कुर्डुगडाच्या दक्षिण भागात खूप उंचावर एक घळ आहे. सध्या या घळीतील वर जाण्याचा मार्ग तुटला आहे. या घळीत एक तपस्वी साधू राहात होते. त्यांचेकडे एक शिवलिंग बाण होता. त्याची बारा वर्षे अखंड पूजा करणा-यास राज्यप्राप्ती होईल असे समजल्याने बाजी पासलकराने तो बाण मिळविला व शिवरायांना नजर केला. पुढे शिवरायांना राज्यप्राप्ती झाली. शिवरायांच्या निधनानंतर हा बाण राजाराम महाराजांच्या बरोबर सिंहगडावर आणला गेला व त्यांच्या मृत्यूनंतर तो राजाराम महाराजांच्या सिंहगडावरील समाधी मंदिरात तब्बल २५० वर्षे होता. इतिहासात चंद्रशेखर बाण या नावाने प्रसिद्ध असलेले हे शिवलिंग साता-याच्या जलमंदिरात पूजेसाठी ठेवले आहे. पुरंदर तहानुसार मुघलांना द्यावे लागलेले किल्ले स्वराज्यात दाखल करून घेण्याची मोहीम शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये आखल्यावर जूनमध्ये माहुलीगड जिंकल्यावर कर्नाळा, कोहोज व कुर्डुगड स्वराज्यात दाखल झाले. या गडाशी वीर बाजी पासलकर, येसाजी कंक, बाजीचा विश्वासू सेवक येल्या मांग, बाजीचा आश्रित अनंता खुरसुले, जंजि-याचा सिद्दी, थोरले बाजीराव, खंडोजी माणकर, अमृता पासलकर, नाना फडणीस, रामाजी कारखानीस यांचा संबंध काही ना काही कारणांनी आला आहे. १८१८च्या मराठा युद्धात पुण्याच्या ९व्या रेजिमेंटमधील कॅप्टन सॉपीटने एका तुकडीसह देव खिंडीतून येऊन अचानक हल्ला करून हा किल्ला काबीज केला. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार व ४० जणांची शिबंदी होती. त्यावेळी सॉपीटला किल्ल्यावर मोठा धान्यसाठा सापडला.
कुर्डुगडावरची कोकण विंडो :-
किल्ल्यातच दोन सुळके असुन यातील मोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. या सुळक्यावर जायला वाट नाही. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे.
किल्ल्याच्या मुख्य सुळक्याला एक अजून छोटा सुळका बिलगला आहे. या दोघांच्या मध्ये एक घसाऱ्याची वाट असून ती पार केल्यावर आपण एका नैसर्गिक खिडकीशी पोहोचतो.
ही घळीतली वाट तशी अवघड आणि निसरडी असुन इथे मधमाशांची पोळी असल्यामुळे खबरदारी घ्यावी लागते.
येथुन कोकणातील दुरपर्यंतचा मुलुख सहज नजरेस पडतो. सुळक्याच्या पायथ्याशी बुरुज तसेच तटबंदी असे दूर्गावशेष पहायला मिळतात.
सुळका पाहुन वळसा घालून पुढे गेल्यावर एक दरड कोसळलेली दिसते. येथुन पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्यामधे असलेल्या छोट्याश्या अरुंद खाचेतून सरपटत पलिकडे जावे लागते. यापेक्षा आल्या मार्गाने परत फिरून हनुमानाच्या मुर्तीपाशी याव. तेथुन सुळका डाव्या हाताला ठेवत सुळक्याला वळसा घालुन पुढे यावे. या भागात एक बुरुज व बांधकामाचे बरेचसे अवशेष पहायला मिळतात.
येथुन पुढे गेल्यावर एक पाण्याच टाक दिसत. पाण्याच्या टाक्यापुढेच त्या बाजुने पाहिलेली कोसळलेली दरड या बाजुने पहायला मिळते.
सुळक्यावर दक्षिण बाजुला कोप-यावर किल्ल्यापेक्षा ९० फुट उंचीवर लहानशी चौकोनी गुहा दिसते पण तेथे जाणारी वाट कोसळलेली आहे. गिर्यारोहणाच्या सामानाशिवाय तेथे जाणे शक्य नाही.
कुर्डुगडाची हि गुहा तेथे जाण्याचा मार्ग ढासळ्याने कित्येक शतके मानवी वावरापासून अस्पर्श होती. मात्र महाडचे दुर्गअभ्यासक डॉ. राहुल वारंगे यांनी पुरातत्व संशोधक श्री. अजय धनावडे यांच्याबरोबर ह्या गुहेत दोर लावून मे २०१५ मध्ये यशस्वी आरोहण केले आणि बरीच नवीन माहिती उजेडात आली. हि गुहा म्हणजे व्यवस्थित कोरलेली दोन खोल्यांची लेणी आहेत. आतले दालन पाण्याने पुर्ण भरलेले आहे. या गुहेच्या पुढे उत्तरेला ६ फुट लांब, सात फुट उंच आणखी एक लेणे आहे. जेव्हा या बाजुचा कातळ काही कारणाने तुटला तेव्हा या लेण्यांकडे जाण्याची वाट नष्ट झाली असणार. अर्थात सध्यातरी आपण हि गुहा खालूनच बघु शकतो.
हे पाहुन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याचा घेर लहान असुन सपाटी फारशी नाही. या किल्ल्याच्या तीन बाजू नैसर्गिक उभ्या कडय़ाच्या असल्याने त्यास नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले आहे.
तेरेखोल किल्ला
या टेकडीवर उभारलेल्या भुईकोटासारख्या चिमुकल्या किल्ल्याचा इतिहास समजून घेउया. १७ व्या शतकात सावंतवाडीच्या खेमसावंतांनी या किल्ल्याची उभारणी पोर्तुगिजांवर लक्ष ठेवण्यासाठी केली. पोर्तुगिजांना हे सहन न झाल्याने १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडा या चव्वेचाळीसाव्या व्हॉइसरॉयच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नुतनीकरण केले. किल्ल्यावरील सेंट अन्थोनी चर्च या व्हाईसरॉय अल्मेडा याने बांधल्याचे इतिहासकार सांगतात. पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेले कॅप्सुल बुरुज त्यावेळी बांधण्यात आले. १७९४ मध्ये थोड्या काळासाठी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पण पोर्तुगिजांनी तो परत जिंकून घेतला. किल्ल्याच्या ताब्याचा हा रस्सीखेचीचा खेळ सुरु असतानाच मध्येच अचानक पोर्तुगीजांना हुक्की आली कि गोव्यात जन्मलेल्या कोण्या सक्षम व्यक्तीला गव्हर्नर करावे. आणि त्यांनी डॉ बरनादी पेरेस डिसिल्वा यांना सन १८२५ मध्ये गर्व्हनर केले. पण मुळच्या या भुमीपुत्राने मातृभुमीचे ऋण जाणुन तेरेखोलच्या किल्ल्यातून पोर्तुगिजांविरुध्द उठाव केला, तो उठाव पोर्तुगिजांनी मोडून काढला. १९२५ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध डॉ. बर्नाडो पेरेझ डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या वहिल्या गोवन बंडाची आखणी याच किल्ल्यावरुन केली गेली. १५ ऑगस्ट १९५४ रोजी अल्फ्रेड आल्फांसो यांच्या नेत्वृत्वाखाली गोवा मुक्ती संग्रामच्या कार्यकर्त्यांनी किल्ला १ दिवसासाठी ताब्यात घेतला होता. १५ ऑगस्ट १९५५ रोजी पनवेल येथील हिरवे गुरुजी (तुळशीदास बाळकृष्ण हिरवे) व शेषनाथ वाडेकर यांच्यासह १२७ निशस्त्र कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर सत्याग्रह केला.
त्यावेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर शहीद झाले.
त्यांचे स्मारक किल्ल्यासमोर डाव्या हाताला आहे. १९६१ मध्येही पोर्तुगीजांविरुद्धच्या गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळी या किल्ल्याचा एक तळ म्हणून मुक्तिसैनिकांनी वापर केला. १९६१ ला गोवा मुक्त झाला आणि ९ डिसेंबर १९७६ ला किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले.
अश्याप्रकारे गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतीकारकांना निवारा देण्याचे मोठे काम तेरेखोल किल्ल्याने केले. त्यामुळे तेरेखोलचा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे.
बेतुल/बैतुल/Betul Fort
गोव्यातील जुलमी पोर्तुगीज राजवट उलथायची तर तशी लष्करी तयारी करायला हवी हे शिवछत्रपतींनी ओळखले आणि त्यासाठी आवश्यक ते प्रबळ नौदल उभारण्याचा प्रारंभ केला. त्याला जमीनीवरुन जोड द्यायची तर समुद्राच्या किनार्यावर बळकट दुर्ग हवेत. यासाठी दक्षीण गोव्यात शिवाजी राजांनी उभारलेल्या अश्याच एका महत्वाच्या पण ईतिहासाच्या पानातच हरवलेल्या आणि वर्तमानकाळात उपेक्षेचा धनी असलेल्या बैतुल किल्ल्याची ओळख करुन घ्यायची आहे. सन १६७९ मधे दक्षिण गोव्याच्या केपे तालुक्यात साळ नदीच्या तीरावर बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्या बाळ्ळीच्या हवालदाराने हा किल्ला बांधला. बेतुल येथे साळ नदीजवळ मराठे व पोर्तुगीज यांच्या राज्यांच्या सीमारेषा एकमेकाला भिडलेल्या होत्या. उत्तर काठावर पोर्तुगीज राज्य, तर दक्षिण काठावर शिवाजी महाराजांचे राज्य अशी सीमा होती. मडगावजवळ वेर्णा येथे उगम पावणारी साळ नदी पुढे मडगाव, चिचोणे, असोळणा असा प्रवास करत बेतुल येथे समुद्रास जाऊन मिळते. या साळ नदीतून पोर्तुगीजांचे व्यापारी पडाव, छोटी गलबते भरतीच्या वेळी मडगाव या मुख्य बाजारपेठेच्या खारेबांध भागापर्यंत जलवाहतूक करीत असत. या पोर्तुगीजांच्या सागरी व्यापाराला चाप देण्यासाठी बेतुल येथे साळ नदीच्या मुखावर एका मोक्याच्या जागी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला सुरवात केली. सन १६६४ पूर्वी गोव्याचा पेडणे, डिचोली, सांखळी, सत्तरी, अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे फोंडा, सांगे, केपे, काणकोण हा प्रदेश विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता तर बारदेश, तिसवाडी व सालसेत (साष्टी) हे पोर्तुगीजांकडे होते. १६६४ साली खवासखान या आदिलशाही सरदाराविरुद्ध काढलेल्या कुडाळच्या स्वारीत पेडणे, डिचोली, सांखळी, सत्तरी हे आदिलशाही मुलखातील तालुके शिवाजी राज्यांच्या ताब्यात आले. त्यावेळी अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, फोंडा, सांगे, केपे, काणकोण हा गोव्याचा प्रदेश सोंधे संस्थानच्या ताब्यात होता. पण सोंधे संस्थानचा राजाने आदिलशाहचे मांडलिकत्व स्विकारले असल्याने हा प्रदेश एकप्रकारे आदिलशाहाकडेच होता. राज्याभिषेकानंतर म्हणजे १६७५ नंतर शिवाजी महाराजांनी परत एकदा गोव्याकडे लक्ष दिले व फोंड्यावर चालून गेले. त्यावेळी महाराजांनी फोंडा प्रांत घेतला व उरलेला आदिलशाही प्रदेश स्वराज्यात आणला. याच महिन्यात कारवार, अंकोला हे किल्ले जिंकत महाराजांनी स्वराज्य सीमा गंगावल्ली नदीपर्यंत नेली. आता सोंधे संस्थानच्या राज्याला मराठ्यांचे मांडलिकत्व स्विकारावे लागले. अश्याप्रकारे मराठ्यांचे बाळ्ळी व चंद्रवाडी हे दोन महाल पोर्तुगीजांच्या अमलाखाली असणाऱ्या साष्टी प्रांताला भिडले. अशा योग्यवेळी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांची साळ नदीमार्गे चालणारी साष्टीतील जलवाहतूक संकटात आणण्यासाठी बेतुल येथे किल्ला बांधण्याची आज्ञा केली. बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या बाळ्ळीच्या हवालदाराच्या देखरेखीखाली किल्ला बांधला जात आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांचा लष्करी अधिकारी म्हणजे राशोल किल्ल्याचा किल्लेदार याने गव्हर्नरकडे सविस्तर वृतांत कळविला, तो असा – "असोळणे (साळ) नदीच्या पैलतीरावर शिवाजी राजे यांनी एक किल्ला बांधण्यास घेतला आहे. तो जर बांधून झाला तर आमच्या राज्याच्या सुरक्षिततेला त्यांच्यापासून धोका आहे. असा किल्ला बांधण्याचा विचार आदिलशहाने कधी केला नव्हता, परंतु शिवाजी राजे यांनी त्याचे राज्य घेतल्यावर हा प्रयत्न सांप्रत सुरु केला आहे. तेव्हा रासईच्या कॅप्टनला गव्हर्नरने उत्तर धाडले की, शिवाजी राजे यांनी अशा किल्ल्याचे बांधकाम केल्याने आमच्यात मैत्रीचा जो तह झाला आहे, त्यास बाधा येणार आहे. तेव्हा बाळ्ळीच्या हवालदाराने किल्ल्याचे बांधकाम थांबवावे. तेव्हा बाळ्ळीच्या शिवाजी महाराजांच्या हवालदाराने त्यास उत्तर पाठविले की, मी किल्ला शिवाजी राजे यांच्या आज्ञेवरून बांधीत आहे, परंतु या किल्ल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुख्यत्यार आहोत. त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण?" इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांनी मराठ्यांचे राज्य सांभाळले. पुढे राजाराम महाराजांनी कारवार, सिवेश्वर, काणकोण, खोलगड, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी व काकोडे हा सर्व प्रदेश सालाना बावीस हजार दोनशे होनास सोंधेचा राज्यास भोगवटयाने दिला. तेव्हा हा सर्व प्रदेश सोंधे राज्याच्या अंमलाखाली आला. नंतर इ.स. १७६३ मधे हैदरअली सोंधे संस्थानवर चालून गेला. पण सोंधेच्या राज्याची हैदरअलीसारख्या सरदाराशी झुंज देण्याची ताकद नसल्यामुळे सोंधेच्या राज्याने आपल्या मुलखातील अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला व त्यांच्या आश्रयाला गेला. पोर्तुगीजांनी सोंधेकर राजा आणि त्याचे कुटुंब यांना आश्रय दिला आणि उपरोक्त क्षेत्र आपल्या नियंत्रणाखाली आणून काबो-दी-राम (खोलगड) व बेतुल या किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अशाप्रकारे १७६३-६४ च्या सुमारास बेतुल किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला आणि अगदी १९६१ पर्यंत या परिसरावर त्यांचे नियंत्रण राहिले.
आहे. थोडं पुढे गेल्यास साळ नदीच्या मुखावर एक बुरूज आणि त्यावर साळ नदीकडे मोहरा करून ठेवलेली एक तोफ एवढेच दिसते. हेच काय ते या किल्ल्याची सध्या राहीलेले अवशेष. टेकडावर पाया घालून त्यावर हा बुरुज उभारला आहे, पण हा एकमेव बुरुज वगळता किल्ल्यावर आणखी काही अवशेष नाहीत. या बुरुजावर उभे राहिले असता समोर गोव्यातील प्रसिद्ध मोबॉर बीच व समुद्राला मिळणारी साळ नदी यांचा खूप सुंदर देखावा दिसतो. ईच्छा असेल तर एखाद्या मच्छीमारकाकांना विनंती करून तिकडे तरीने जाता येते. बुरुजाच्या डाव्या बाजूने खाली उतरण्यासाठी जागा आहे.
शापोरा किल्ला/चापोरा किल्ला
गोव्याच्या दक्षीण आणि उत्तर बाजुला अनेक देखणे किनारे आहेत. बहुतेक किनार्यांना पार्श्वभुमी लाभली आहे ती निळ्या अथांग सागराची, मउशार सोनेरी वाळू, किनार्यावरच्या नारळी, पोफळीची गर्द झाडी यांची.पण यासगळ्यात एका किनार्याला खास पार्श्वभुमी मिळाली आहे, तो बीच म्हणजे "व्हॅगॅतोर बीच ( Vagator Beach )"थोडा खडकाळ असलेला आणि हेच वेगळेपण जपणार्या या बीचच्या मागे छोट्या टेकडीवर लवलवणार्या सोनसळी गवत पांघरुन मस्तकावर जांभ्या दगडाची तटबंदीचा शिरपेच असणारा "शापोरा किल्ला". ईतक्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागी किल्ला बांधण्याची ईच्छा झालेला तो सरदार नुसता कोरडा लष्करी अधिकारी नसून, जणू ईथला निसर्गपट पुर्ण करणारा चित्रकार असला पाहिजे.पेर्णे तालुक्यात मोर्जी येथे उगम पावणारी शापोरा नदी बारदेश तालुक्यात, या किल्ल्याजवळ समुद्राजवळ मिळते. म्हापसा शहरापासून केवळ १० कि.मी. वर हा किल्ला आहे.शापोरा नदी ते मांडवी नदी यांच्या दुआबात बारदेश प्रांत (तालुका) पसरला आहे. बारदेशच्या पूर्वेला आहे डिचोली, तर पश्चिमेला आहे अरबी समुद्र. बारदेश हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात जाण्यापूर्वी येथे विजापूरच्या अली आदिलशाहची सत्ता होती व त्याच्या अधिकाऱ्याने येथे किल्ला बांधला. ह्या भागाचे मुल नाव शाहपुरा. पोर्तुगीजांनी त्या नावाचा अपभ्रंश शापोरा करून टाकलं. याच गडाचे "कायसुव" हे दुसरे कागदोपत्री नाव सापडते.
आज किल्ला अवशेष रुपात शिल्लक असला तरी या किल्ल्याला असणारे पोर्तुगीज धाटणीचे कॅप्सुल बुरुज, एक सुस्थितीत असलेला दरवाजा आणि किल्ल्याला सर्वबाजूने असणारी भक्कम तटबंदी असे अवशेष आवर्जून पाहण्यासारखे आहेत. एकेकाळी या किल्ल्यात सेंट अंथोनी चर्च होती असे म्हणतात.पण पर्यटक मात्र या किल्ल्याला भेट देतात ते या किल्ल्यावरून दिसणाऱ्या समुद्राच्या पॅनोरमिक व्ह्यूसाठी. हे सुंदर विहंगम दृश्य पाहण्यासाठी एकदा तरी या किल्ल्याला भेट दयायला हवी.
एक पायवाट अगदी वॅगॅतोर बीचवरुन थेट किल्ल्यावर जाते आपण त्याने रमतगमत जाउ शकतो किंवा एक डांबरी रस्ता थेट किल्ल्याच्या जवळ जातो. शापोरा किल्ला म्हापसापासून अंदाजे १० किमी तर प्रसिद्ध कलंगुट बीचपासून फक्त १५ किमी अंतरावर आहे. तसेच व्हॅगेटर/वागातोर व अंजुना हे गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे किल्ल्यापासून अगदीच जवळ आहेत. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५,३० पर्यंत किल्ला पर्यटकांसाठी खुला असतो.
बॉलिवुडमधील एक गाजलेला चित्रपट म्हणजे "दिल चाहता है". या चित्रपटातील एका दृश्यामध्ये समुद्रकिनारी असलेल्या एका किल्ल्याच्या तटबंदीवर बसलेले तिघे मित्र दाखविले आहेत. हाच तो गोव्यातला शापोरा किल्ला होय. "दिल चाहता है" चित्रपटात येथील दृश्य दाखवण्यापूर्वी या किल्ल्यावर इतिहासप्रेमी लोकांशिवाय इतर कोणी भटकत नसे पण "दिल चाहता है" चित्रपटात या किल्ल्याचे व परिसरातील निसर्गाचे सौंदर्य दाखवल्यापासून हा किल्ला गोव्यातील एक must visit डेस्टिनेशन बनला आहे. तांबूस पिवळ्या रंगाची आभा पश्चिम समुद्रावर पसरत असताना, पाण्यात बुडत जाणारा दिनकर इथल्या तटबंदीवरून निरखणे आणि भुतकाळात हरवणे म्हणजे एक विलक्षण योग आहे.
श्री अमृतेश्वर मंदिर.. मोहरी
पुण्यापसून सुमारे ४५ कि.मी. असलेल्या गुंजण मावळच्या खो-यात आणि छत्रपती श्री. शिवरायांच्या चरणस्पर्शाने ज्या गावाचे सोने झाले ते गाव ‘मोहरी’ म्हणजेच महुरी बुद्रुक.हेमाडपंथी शैलीच्या बांधकामाचा उत्तम नमूना असलेले श्री अमृतेश्वराचे यादव कालीन मंदिरा करिता प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे मोहरी. सूमारे ४०० ते ५०० ऊंबरा असलेले छोटेखानी, शहराच्या अगदीच जवळ पण आधुनिकतेच्या रेट्यात आजदेखील आपल गावपण जपून मोठ्या थाटात वसलेले आहे. पूर्वी “महुरी बुद्रुक” अशी नोंद असलेल्या नावाचा पुढे अपभ्रंश होत आज ‘मोहरी’ या नावाने ते ओळखले जाते.गुंजवणी व शिवगंगा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेला हा गाव म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान.
पुणे-सातारा महामार्गावरून कात्रज-शिवापूर-चेलाडी-कापूरहोळ ओलांडल्यावर उजव्या हाताला भोर फ़ाटा लागतो.त्याला वळून भोरकडे जाताना शहरी जीवनातून बाहेर पडत, ग्रामीण शैलीच्या, हिरव्याकच्च रानात आपल प्रवेश होतो. दोन्ही बाजूला लांबवर पसरलेली हिरवीगार शेते, वृक्षराई आपल्या मनाला एकदम प्रसंन्न करतात. समोर आडव्या पसरलेल्या सह्याद्रीच्या शृंखलेत राजगड, तोरणा, रोहिडा, केंजळगड असे अनेक किल्ले इतिहासाची साक्ष देत उभे असतात. तर पाठिमागे पुरंदर, वज्रगड आपल ठाण मांडून बसलेले दिसतात.
नागमोडी रस्त्याने आपला प्रवास सुरू होतो आणि आपण गुंजवणी नदीवर बांधलेल्या पुलावर पोहचतो. तो ओलांडला की कासुर्डी गावाच्या बस थांब्याला उजवीकडे वळण घेताच आपण निसर्गाच्या आणि सह्याद्रीच्या आणखीनच कुशीत घुसल्याचे जाणवू लागते.याच रस्त्याने सुमारे २ कि. मी. पुढे गेल्यावर आपण मोहरीत दाखल होतो. व्यसनमुक्त गावाचा सन्मान लाभलेले हे गाव खूप मोठे नसले तरी स्वत:चे वेगळेपण जपत आज अभिमानाने उभे आहे.
याच गावातील ‘अमृतेश्वराच्या’ नावाने प्रसिद्ध स्वयंभू असे देखणे शंकराचे अतीप्राचीन मंदिर आजदेखील भक्तांच्या अलोट गर्दीने वाहत आहे. पुरातन असलेल्या येथील अमृतेश्वर मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार झालेला आहे. तसेच शिवकाळातील या गावाचे व मंदिराचे महत्व देखील नक्कीच ‘दखल’ घेण्याजोगे आहे. हे देवस्थान म्हणजे शिळीमकर देशमुखांचं कुलदैवत. हैबतराव शिळिमकर (मुळचे शिंदे) हे महाराजांचे सरदार यांच्याकडे १२ मावळापैकी ‘गुंजण मावळाची’ सुभेदारी होती त्याकाळी त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याच्या काही नोंदी आढळतात. पुढे इनामदारांपैकी श्रीमंत नारायण बाबूराव वैद्य हे पेशव्यांतर्फ़े नागपूरकर भोसल्यांकडे वकील होते त्यावेळी १७६३ च्या श्रावण महिन्याच्या सुमारास देवाल्याच्या शिखराच्या अस्तगिरीचे काम पूर्णत्वास नेल्याचा उल्लेख एका पत्रात मिळतो. तसेच मंदिरासाठी सहा सेवेकरी नेमण्यात आले होते त्या ब्राम्हणांपैकी ‘कै. श्री. शिवराम बल्लाळ वाळिंबे’ व ‘कै. श्री. हरभट पुरोहित’ यांनी गावोगाव भटकून वर्गणी गोळा करून सन १९०५ साली मंदिरापुढे लाकडी सभामंडप उभारला व उत्सव मंडळाने भक्तगणांसाठी १९३५ साली धर्मशाळा बांधली असे देखील दाखले आहेत. सध्या आपण पाहतो तो सन २००० साली गावकीने लोकवर्गणीमधून लाकडी मंडप उतरवून त्या ठिकाणी सिमेंटचा मंडप घातलेला आहे. इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत इथे एक दिव्य झालं होतं, मोहरीचे गावखंडेराव आणि पानसे यांच्यातील वादाचा निर्णय त्यामधे झाला. या मंदिरात खुद्द शिवाजीराजे आले असल्याचे स्मरण केल्यावर वेगळीच अनुभुती मिळते.याचा उल्लेख देखील पानसे घराण्याचा इतिहास आवृत्ती पहिली सन १९२९ या पुस्तकात आढळतो. तसेच “सुभेदार सर्जेराव मांग” यांना मावळातून रायगडावर एक महाप्रचंड तोफ़ घेवून जाण्याची जबाबदारी देखील याच मंदिरात सोपविण्यात आली.
आंबवडे:-
पुण्याजवळ असलेल्या भोरच्या परीसरात एक दिवसाच्या भटकंतीसाठी आंबवडे नावाचे निसर्गरम्य गाव आहे. दीड हजार लोकवस्तीच्या या गावाला केवळ निसर्गाचे वरदान लाभलेले नसुन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गावात कान्होजी जेधे, जिवा महाला व भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. याशिवाय आंबवडे गावातील ओढ्याच्या काठावर दाट झाडीत नागेश्वराचे पुरातन मंदिर असुन तेथे जाण्यासाठी ओढयावर झुलता पुल बांधला आहे. आंबवडे गाव पुण्याहुन कापुरहोळमार्गे ६० कि.मी. तर भोर या तालुक्याच्या ठिकाणावरून १२ कि.मी.अंतरावर आहे. भोरवरून आंबवडे गावात येण्यासाठी एसटीची चांगली सोय आहे. आंबवडे गावातुन वाहणारा हा ओढा म्हणजे एक लहान नदीच आहे.
हि नदी पार करण्यासाठी १९३६ साली या नदीपात्रावर झुलता पुल बांधला गेला.
याची रुंदी ४ फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट आहे.
१९३७ साली बांधलेल्या या पुलाला त्या काळात १०,००० रूपये खर्चझाला होता.
झुलता पुल पार केल्यावर पलीकडील बाजुस असलेल्या एका इमारतीत भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. या इमारतीच्या मागील आवारात झाडाखाली काही कोरीव मुर्ती व विरगळ तसेच सतीशिळा पहायला मिळतात.
येथील गर्द झाडीतून पायऱ्यांच्या वाटेने खाली उतरत गेल्यावर खोलगट भागात नागेश्वर मंदिराचे आवार येते. शिवकाळातील या मंदिराभोवती फरसबंदी अंगण असून एका उंच चौथऱ्यावर पश्चिमाभिमुख मंदीर बांधलेले आहे.
मंदिराच्या दर्शनी भागावर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख आहे. मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी केलेली असून मंदिराच्या आतबाहेर मोठया प्रमाणात शिल्पकाम केलेले आहे. संपुर्ण मंदिर घडीव दगडात बांधलेले असून शिखर मात्र विटांनी बांधुन त्यावर चुन्याचा गिलावा केलेला आहे. मंदिराच्या आवारात दिपमाळ असून काही लहान घुमटी आहेत.
या घुमटीत काही प्राचीन मुर्ती आहेत. मंदिराच्या आवारात मोठया प्रमाणात झीज झालेल्या प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. मंदिरासमोर ओवऱ्या बांधलेल्या असुन त्याच्या समोर बारमाही वहाणारा झरा आहे.
या झऱ्याचे पाणी गोमुखातून एका कुंडात पडते. हे कुंड पंचगंगा कुंड म्हणुन ओळखले जाते. हे मंदिर म्हणजे क्षेत्र महाबळेश्वरचीप्रतिकृतीच आहे. मंदिराचा परीसर अतिशय रमणीय आहे.
कान्होजी जेध्यांची कारी :-
अंबवड्यापासून कारी गावाकडे जाणारा वेडीवाकडी वळणे, रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडी असलेला निसर्गरम्य आहे.कारीमध्ये सध्या जेध्यांची १४ वी पिढी रहाते.
सध्या कान्होजींच्या वाड्याचे पुनर्वसन चालु आहे.
ईथे आपण कान्होजी जेधेंची तलवार आणि चिलखत पाहु शकतो.
तसेच वाड्यामध्ये असलेले कुलदैवतही,कान्होजींच्या पुजेतल्या मुर्ती बघता येते. आता कारीत जेध्यांच्या वाड्यापर्यंत डांबरी रस्ता झाला आहे. हा वाडा हल्लीच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने बांधून काढला आहे. वाड्याची देखभाल श्रीयुत धैर्यशील जेधे पाहतात आणि वाड्याबद्दल माहीतीही सांगतात.
शिरव़ळचा सुभानमंगळ :-
आता इतिहासकाळाचा वारसा किंवा शिरवळ गावची ओळख असणाऱ्या सुभानमंगळ किल्ल्याच्या भेटीला जायचे. निरानदीच्या तिरावर असलेल्या सुभानमंगळ भुईकोटाचे अवशेष म्हणजे एका ढासळणा-या बुरूजाशिवाय काहीही नाही. भुईकोट किल्ला आजमितिस भुईसपाट झालेला आहे. सुभानमंगळचा तो जीर्ण बुरूज आपल्याला शिवकाळात घेऊन जातो. आदिलशाही सत्तेचा अमल असताना किल्ले सिंहगड, तोरणा, राजगड व रोहीडा यांच्यावर नियंत्रण ठेऊन परिसरात असलेल्या बारा मावळातील महसूल जमा करण्याचे शिरवळ हे ठाणे होते. सुभानमंगळ किल्ल्याच्या वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळ्या आदिलशाही अधिका-यांनी आपल्या सुलतानाच्या वतीने किल्ल्यावरील किल्लेदारास आदेश काढल्याची अनेक पत्र उपलब्ध आहेत. निरानदी तीरावर मातीच्या भेंड्याची तटबंदीला बाहेरील बाजूने दगडी बांधकाम असलेला सुभानमंगळचा निर्मितीकाळ व निर्माता इतिहासास ज्ञात. छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या सुरूवातीस म्हणजेच इ.स.१६४८ मधे आदिलशाही सरदार फतहखानाची फौज पुरंदर जवळील बेलसर या गावी सैनिकी तळ ठोकला होता व आदिशाहच्या वतीने बाळाजी हैबतराव शिरवळचा सुभानमंगळ किल्ला ताब्यात घेतला होता. अशावेळी महाराजांनी सुभानमंगळवर मावळी सेनेला कावजीच्या नेतृत्वाखाली शिरवळला पाठविले होते, त्यात गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर इ. शूरवीर होते. यातील कावजी म्हणजे कावजी कोंढाळकर असण्याचा संभव जास्त आहे. मावळी सेनेने सुभानमंगळवर जोरदार हल्ला चढवून बाळाजी हैबतरावच्या तुकडीचा पराभव केला. सुभानमंगळच्या विजयाने मावळ्यांचा उत्साह वाढला होता. सुभानमंगळची ही लढाई इतिहास प्रसिध्द असल्याने ती प्रत्येकाच्या मनात आहे. थोरले छत्रपति शाहू महाराजांच्या काळात देखील शिरवळ हे प्रमुख ठाणे होते. याच शिरवळ मधे भोर संस्थानचे अधिपतिंचा राहता वाडा असून आजमितिस तेथे एक शैक्षणिक संकुल आहे. भोर संस्थान काळात रोहीडा नामक तालुका होता, अशा या तालुक्याचा सर्व सरकारी कारभार शिरवळ येथून चालत असे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या शिरवळच्या भेटीने इतिहासाची पाने मनात उलगडली जातात. दुपार झाली होती, आता पोटपूजा करण्यासाठी भोरकडे निघालो पण डोक्यात किल्ले सुभानमंगळ व केदारेश्वर मंदिरच होते
ठाणाळे लेणी
महाराष्ट्रात विविध ठिकाणी कोरीव लेणी तसेच चैत्यगृह, विहार व स्तूप आहेत. त्याप्रमाणे सुधागड तालुक्यातदेखील खडसांबळे, गोमाशी आणि ठाणाळे अश्या तीन ठिकाणी लेणी पहायला मिळतात. मात्र बहुतेक पर्यटक भेट देतात ते पालीच्या बल्लाळेश्वराला आणि उन्हवर्याच्या गरम पाण्याच्या कुंडाना. हौशी दुर्गभटके सरसगड आणि सुधागडाची दुर्गयात्रा करतात.हल्ली दोन्हीकडे सर्वसामान्य पर्यटकांचाही राबता वाढला आहे.मात्र फार क्वचित कोणी हि लेणी किंवा शैलकृत्य बघायला जातात.आज आपण ठाणाळे लेण्याची माहिती अभ्यासणार आहोत. २००० वर्षांपूर्वीच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर (चौल बंदर ते देशावरची गावे) - दुर्ग (सरसगड, सुधागड, तेलबैल, घनगड), घाटवाटा (सवाष्णी, वाघजाई) आणि पावसाळ्यात वर्षावासासाठी खोदलेली लेणी (खडसांबळे, ठाणाळे) अशी नक्षी या परिसरात विखुरलेली आहे.काळाच्या झंझावातासोबत बरंच काही हरवून गेलं असलं, तरी अजूनही जाणवताहेत या दुर्ग-लेणे-घाटवाटांनी अनुभवलेल्या या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची आणि संस्कृतीची स्पंदनं जाणवता आणि त्यासाठी तरी लेण्यांना भेट द्यायलाच हवी!!!
ठाणाळे गावालगत प्राचीन लेणी आढळतात. त्यांनाच ‘ठाणाळे लेणी’ असे म्हणतात. पालीपासून १२ किमी अंतरावर नाडसूर गाव आहे. या गावाच्या उत्तरेकडे दोन किमीवर ठाणाळे हे गाव. तिथून साधारण एक-दीड तास पायी डोंगरावर चालत जाऊन ठाणाळे लेण्यांपर्यंत पोहोचता येते. साधारणतः या लेण्यांचा कालखंड इ. स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते पाचव्या शतकापर्यंतचा आहे.
हा तेवीस लेण्याचा समूह सर्वप्रथम रेव्हरंड जे.ई. अॅबोट मराठी मिशन मुंबई यांनी जानेवारी इ.स.१८८९ मध्ये पाहिला. तत्कालीन सुप्रसिद्ध पुरातत्त्व तज्ज्ञ हेन्री कझिन्स या संशोधकाच्या नजरेसमोर आणल्यामुळे कझिन्सने त्याच वर्षी ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.स.१९११ मध्ये त्याने "नाडसूर आणि खडसामला लेणी Caves at Nadasur and Kharasamla हे पुस्तक प्रकाशित केले. खडसामला किंवा खडसांबळे लेणी नेणावली लेणी समूह ठाणाळे लेणीच्या दक्षिणेस नऊ किमी अंतरावर आहे. ठाणाळ या शब्दामधील ठाण म्हणजे स्थान अर्थात पूजास्थान असा केला जातो. इ.स.पू. दुसऱ्या शतकात ठाणाळे लेण्याची निर्मिती झाली असावी.
यानंतर ग. ह. खरे (१९४५), ल्यूडर (१९१२), मो. ग. दीक्षित (१९४२), विद्या दहेजिया (१९७२), म. न. देशपांडे (१९८१), म. के. ढवळीकर (१९८४) इ. संशोधकांनी या लेणींवर कमी-अधिक प्रकाश टाकला.
म. न. देशपांडे यांनी, नाशिकच्या पांडू लेणीतील एका शिलालेखात उल्लेखिलेला ‘सिरिटन’ पर्वत म्हणजेच आजचे ठाणाळे असावे, असा तर्क लावला आहे. यासाठी त्यांनी ठाणाळे लेणीत असणाऱ्या ‘श्री’ म्हणजे लक्ष्मीच्या चार शिल्पांचा दाखला दिला आहे. या परिसरात ‘खडसांबले’ व ‘गोमाशी’ या नावाची इतर लेणीही आहेत. अॅबट यांच्या मतानुसार चौल बंदराकडून देशाकडे जाणार्या प्राचीन मार्गावर हि लेणी आहेत. संशोधक श्री.म.न.देशपांडे यांच्या मते चौल बंदरापासून वाघजाई घाटातून मावळात जाणारा प्राचीन मार्ग या लेण्यांजवळून जातो. ठाणाळे,खडसांबाळे व गोमाशी हे लेणीसमुह चौल बंदराच्या आश्रयाने खोदले गेले असावेत.काही संशोधकांच्या मते चौल बंदरातून नागोठणे खाडीमार्गे बोरघाटातून मावळात जाणार्या प्राचीन मार्गावर या लेणी आहेत.
इ.स. पाचव्या शतकानंतर मात्र बौध्द भिक्षुंनी या लेण्यातील वास्तव्य बंद केले.अलीकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.
पेठचा किल्ला / कोथळीगड (Peth /Kothaligad)
कोकणातील प्राचीन बंदरातून म्हणजे डहाणु, नालासोपारा, चौल, महाड, दाभोळ इथून माल देशावरच्या पैठण, जुन्नर, तेर, करहाटक ( कर्हाड) , कोल्हापुर या शहरात व्यापारासाठी नेला जाई. हा माल बैल आणि गाढवावर लादून नेला जात असे. सहाजिकच हि जनावरे जिथे दमतील त्या चालीवर विश्रांतीस्थळे म्हणजेच, लयनस्थळे अर्थात लेणी कोरली गेली. या लेण्यांना आणि व्यापारी तांड्यना सरंक्षणाची गरज निर्माण झाली.
तेव्हा योग्य असे डोंगर पाहून या मरहट्ट देशात दुर्ग उभारणी झाली. असाच एक देश आणि कोकण यांच्या सीमेवरचा गड म्हणजे "कोथळीगड". पेठ गावाच्या सानिध्याने याला "पेठचा किल्ला" असेही नाव आहे. अतिशय प्राचीन कालखंडापासून साक्षिदार असणार्या या गडाची आपल्याला आज सहल करायची आहे.
कोथळीगड नावाची आणखी एक कथा सांगितली जाते. फार पुर्वी या डोंगराळ मुलुखात अभीर जातीचे कातकरी लोक रहात, त्यांना "कोथडी" नावाने संबोधले जाई. सोपी टाक, म्हणजे सोपवून टाक, उडवी टाक म्हणजे उडवून टाक अशी भाषा बोलणार्या कोथडी ( याचाच अपभ्रंश पुढे कातोडी झाला असावा का? ) लोकांची पेठ गावात मोठी वस्ती होती. शत्रुंपासून स्वताचे संरक्षण करण्यासाठी जवळच असलेल्या आणि घनदाट जंगलाने वेढलेल्या डोंगरावर एक किल्ला बांधला होता आणि त्याला नाव दिले , "कोथडीगड". पुढे कोथडी नावाचा अपभ्रंश होउन कोथळा किंवा कोथळी असे नाव रुढ झाले. त्यावरुन या डोंगराला 'कोथळा' किंवा कोथळीगड असे नाव पडले जे आजही रुढ आहे. अर्थात हि फक्त दंतकथा आहे आणि त्यात तथ्य नसावे.
परिसरातील लेणी, गडाच्या पोटातील लेणे, कातळकोरीव पायर्या आणि दरवाजा आणि शरभ शिल्प या सगळ्याचा विचार केला तर हा गड प्राचीन आहे हे नक्की , पण आज तरी याचा ईतिहास अज्ञात आहे. लहानशा दिसणार्या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. संभाजीमहाराजांच्या काळात त्याला विशेष महत्त्वही प्राप्त झाले होते. शिवाजी महाराजांनी १६५७ मधे हा गड ताब्यात घेतला. विशेष म्हणजे कृष्णाजी अनंत लिखीत सभासद बखरीतील 'नवे गड राजियांनी वसवले, त्यांची नावानिशीवार सुमारी सुमार १११, या दुर्गनामांच्या यादीत 'कोथळागड' हे एक नाव असून यावरून शिवकाळात तरी हा गड 'कोथळागड' म्हणूनच प्रसिध्द होता हे समजते. अर्थात हा गड शिवाजी महाराजांनी नक्कीच वसवला नसावा, फक्त त्याची डागडूजी केली असावी. पुढे औरंगजेबाच्या स्वारीपर्यंत तो स्वराज्यात होता. औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर व अलईबिरादरकानी यांना संभाजींच्या ताब्यातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. ’कोथळागड’ हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणार्या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची नेआण करतात, हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. मराठ्यांनी त्यांना मागे हटवले, पण तरीही काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाज्याजवळ पोहोचले आणि त्यांनी ‘दरवाजा उघडा‘ अशी आरडाओरड सुरू केली. किल्ल्यावरील मराठा सैन्याला वाटले की आपलेच लोक हत्यारे नेण्यासाठी आले आहेत, म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मोगल सैनिक आत शिरले मराठे व मोगल यांच्यात लढाई झाली. अब्दुल कादरच्या मदतीसाठी माणकोजी पांढरेही आले, झालेल्या लढाईत मोगलांना यश आले. दुसर्याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक र्यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला. इहमतखानाने नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुलखानाला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला ‘मिफ्ताहुलफतह‘ (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फंदफितुरीमुळे मराठ्यांच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला. गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणार्या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले, पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. सन १७१३ मधे शाहु- कान्होजी आंग्रे यांच्यामधील तहानुसार कोथळीगडाची मालकी कान्होजी आंग्रे यांना मिळाली. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसर्या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. पण ३० डिसेंबर १८१७ ला कॅप्टन ब्रुकने फारसा प्रतिकार न झाल्याने हा गड पुन्हा ईंग्रजांच्या अधिपत्याखाली आणला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.
कोंडाणे लेणी
महाराष्ट्र !!! सह्यन्द्रीच्या अंगावर असणाऱ्या अजस्त्र किल्ले आणि लेणी 'शिल्पांनी नटलेला ...रायगड जिल्यातील कर्जत तालुका हा सह्यन्द्रीच्या डोंगररांगेच्या निसर्गाने नटलेला परिसर ,मुंबईपासून अगदीच जवळ असल्याने येथे भटक्यांची नेहमीच वर्दळ असते . राजमाची,सोंडाई,कोथळीगड यासारख्या किल्यांनी नटलेल्या कर्जत तालुक्यात एक अतिप्राचीन लेणी वसलेली आहेत. कर्जत मधल्या कोंडिवडे गावात या बोध्दकालीन अतिप्राचीन लेणी कोरलेल्या आहेत . राजमाची ट्रेकला जाणाऱ्या वाटेवरच आपणाला या लेणी लागतात.हि लेणी म्हणजेच सह्याद्रीतील आद्य लेणी "कोंडाणे लेणी".
लेण्यांच्या परिसरात गड व गडाच्या परिसरात लेण्या” हे सूत्र इथे सुद्धा आहे. हा लेणीसमुह उल्हास नदीच्या उत्तर किनार्यावर व राजमाची किल्ल्याच्या खालील बाजुस डोंगराच्या पोटात आहे.प्राचीन काळी कल्याण व सोपारा बंदरापासून निघून बोरघाट मार्गे भाजे,कार्ले व पुढे तेरपर्यंत जाणार्या प्राचीन व्यापारी मार्गावर हि लेणी आहेत.कोंडाणे लेण्याच्या स्थानावरुन हा मार्ग उल्हास नदीच्या किनार्यावरुन जात असावा असा आपण अंदाज करु शकतो.कोंडाणे लेणी पुर्व बौध्दकालीन मालिकेतील ( इ.स.पुर्व २५० ते इ.स. १०० ) आहेत.नंतरच्या महायानकाळातही त्या अबाधीत राहील्या. या सर्व गुंफा दुर्लक्षित राहील्या असल्या त री येथील दोन लेणी आपल्याला भव्यतेची साक्ष देतात.कोंडाणे लेण्याचे वैशिष्ट्य असे कि चैत्यगुंफेच्या बाजुस यक्ष कोरणारा कान्हा याचा शिष्य बलुक या कलावंताचा स्पष्ट उल्लेख आहे.परंतु हा शिलालेख पुसट झाला आहे.शिल्पी म्हणून कान्हा याचा उल्लेख पितळखोर्याच्या यक्षावरील शिलालेखात देखील आहे.पितळखोर्याचा हा यक्ष आता दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आहे.स्वत निर्माण केलेल्या शिल्पाकृतीवर स्वताचा नामोल्लेख कोरून ठेवण्याचा हा प्रकार अंत्यत दुर्मिळ आहे.कोंडाणे लेण्यातील यक्ष कोरून ठेवणार्या बलुकाचा गुरु कान्हा व पितळखोर्यातील यक्ष कोरणारा कान्हा एकच व्यक्ती असल्यास असे अनुमान काढता येईल कि एकाच शिल्पी संघातील किंवा घराण्यातील कलाकार दुरदुर पसरलेल्या भागात कार्यरत होते.
कोंडाणे लेणी सह्याद्रीतील पहिली लेणी असल्यामुळे दगड खराब असल्याचे ज्ञान बहुतेक त्यावेळी झाले नसेल व प्रचंड पावसाच्या माऱ्याने झीज होऊन सरते शेवटी हि लेणी अर्धवट सोडलेली काही ठिकाणी दिसून येते. तरी सुद्धा शंकेची पाल चुकचुकते आणि मनांत विचार येतो की, आक्रमकांकडून स्तूप भग्न केला गेला कि पावसाने झिजला ? ह्याचा अंदाज येत नाही परंतु जे आज शिल्लक आहे ते मात्र अद्भुत आहे. खालील फोटोत पाहू शकता. ह्याच व्यापारी मार्गावरील घाटावर असलेली कार्ला लेणी प्रसिद्ध आहेच व ह्या लेणीत एका शिलालेखात नहपानचा जावई उषवदत ह्याने भिक्षुसंघाला मामल विषयातील “करजिक” नावाच्या गावाचे दान दिले असा उल्लेख आहे. ह्यातील करजिक म्हणजे कर्जत आहे आणि म्हणूनच पुरातन मार्गावरील हे कर्जत नक्कीच ऐतिहासिक ठरत आहे.
लेणे क्रमांक १:- कोंडाणे समुहातील हे प्रसिध्द लेणे कोरीव कामाने नटलेले असून ते चापाकार आणि गजपृष्टाकृती आकाराचे आहे.
सभागृहातील अष्टकोनी स्तंभामुळे दोन्ही बाजुला दालने तयार झालेली आहेत.एकुण ३२ स्तंभ असून ते आतल्या बाजुला झुकलेले आहेत.ह्या लेणीतील चैत्यगृहाची कमान पिंपळाकृती कोरलेली असून दोन्ही बाजूला शिल्पपट आहेत. हि लेणी हीनयानपंथीय आहे.
चैत्यगृहातील स्तूप काही प्रमाणात भग्न झाला असून त्या काळातील खांबसुद्धा पूर्णतः पडून गेले आहेत. पुरातत्वाने आता नवीन खांब लावलेले आहेत. अष्टकोनी स्तंभ म्हणजे साधारण इ.स.पुर्व शिल्पाचे निदर्शक मानतात.गजपृष्ठाकार छत आपले लक्ष वेधून घेते. संपूर्ण चैत्यगृहात अगदी स्तूपाभोवती चापाकार असे त्या काळातील अष्ठकोनी खांबांच्या खुणा इथे आजही पाहता येतात.चैत्यगृहाच्या मध्यभागी दहा फूट व्यासाचा स्तूप आहे. या स्तूपाचा विध्वंस झालेला दिसतो. या सभागृहाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे येथील उंची रुंदीपेक्षा अधीक आहे.अशीच सभागृह भाजे,अजिंठा,कार्ले येथेही दिसतात.येथील स्तुपाला हार्मिका व यष्टी असून ते अजिंठा आणि भाजेपेक्षा अधिक कोरीवकामाने घडवलेले दिसते.
चैत्यगृहाचा दर्शनी भाग भव्य असला तरी त्याची पडझड झाली आहे.मात्र तरी देखील त्याची भव्यता मनावर ठसते.दोन्ही बाजुच्या भिंतीचा भाग खाली कोसळ्याने तिथे भगदाडे पडली आहेत.एकेकाळी लाकडी कोरीव कामाने ह्या भिंती झाकल्या असतील, त्याला जवनिका म्हणतात कारण त्याची साक्ष द्यायला भिंतीत एक रांगेत खोबण्या केलेल्या आढळतात.
प्रथमदर्शनी हे लेणे अजिंठ्याच्या लेणे क्रमांक १० व भाजे लेणे क्रमांक १२ सारखे समोरची बाजु उघडी असलेल्या चैत्यगृहासारखे वाटले तरी बारकाईने निरीक्षण केल्यास इथे दगडाचे व लाकडाचे प्रवेशद्वार होते असा निष्कर्ष काढता येईल.बर्जेस व फर्ग्युसन या लेणी संशोधकाच्या मते दर्शनी भागात लाकडी प्रवेशद्वारे होती. मात्र हा संपुर्ण भाग म्हणजे प्रवेशद्वार असावे असा त्यांचा दावा योग्य वाटत नाही.बहुतेक लेण्यांमध्ये मधोमध प्रवेशद्वार व दोन्ही बाजुला भव्य खिडक्या अशी रचना आढळते. इथेही त्याला अपवाद नसावा. ब्राउन या संशोधकाच्या मते मधोमध प्रवेशद्वार व दोन्ही बाजुला सध्या तुटलेल्या खिडक्या आहेत.सध्या प्रवेशद्वारावर लाकडी तुळ्या पहायला मिळतात.
लेण्याच्या दर्शनी बाजुला सुंदर वेदीका आणि कमानी कोरलेल्या असल्यामुळे हा भाग एखाद्या तीन मजली वास्तुसारखा वाटतो. या कमानीभोवती दर्शनी भिंतीवर मोठे कोरीव काम केलेले आहे. चैत्याकार गवाक्ष, वेदिकापट्टी, नक्षीदार जाळी, नृत्य कलाकार आदींचे शिल्पपट हे कोरलेले दिसते. यापटातील काही नृत्यकलाकारांच्या हाती धनुष्य-बाण आदी आयुधे आहेत. या शिल्पांवर वस्त्रप्रावरणे, अलंकारही आणि तत्कालीन वेगळी केशभूषाही उठून दिसते. इथे असलेल्या शिल्पपटावर आळीपाळीने पुरुष व महिलांच्या जोड्या चौकटीत कोरल्या आहेत.कदाचित एखादी कथा कोरली असावी. प्रवेशद्वार कमानीच्या दोन्ही बाजूला असलेल्या शिल्पपटातील युगुले त्यांची वस्त्रप्रावरणे व आयुधे पाहताना नजर खिळून राहते. ह्या शिल्पपटातील स्त्रिया नर्तकी असून त्या योद्धाबरोबर नृत्य करताना दाखवलेल्या आहेत. त्यांची केशभूषा, अलंकार आणि शस्त्र पाहताना त्या काळातील बऱ्याच गोष्टींचा अभ्यास इथे करता येतो तसेच चैत्यकमानीत सागवानी लाकूड आजही सुस्थितीत असून ते सुद्धा किमान दोन हजार वर्षे जुने आहे, भन्नाट आहे हे सर्व !
कोंडाणे लेण्यांचा दर्शनी भाग कोठे आहे?
इतका सुंदर चैत्याचा दर्शनी भाग असलेले लेणे पूर्ण अवस्थेत असतेतर भारतातील उत्कृष्ट लेण्यांमध्ये त्याची गणना झाली असती. असे काय झाले असेल की या लेण्यातील चैत्याचा खालील दर्शनी भाग तुटून गेला असेल. येथे पूर्वी लढाई झाल्याची सुद्धा नोंद नाही. त्यामुळे तोफांच्या माऱ्यात लेण्यांचा खालील दर्शनी भाग तुटण्याची शक्यता कमी वाटते. ऊन-पाऊस यांच्या माऱ्याने देखील खडकांना भेगा पडतात. पण तसे कोंडाणे येथे झाले असेल असे वाटत नाही. एकेकाळी तुटून खाली गडगडत गेलेले भाग आज जमिनीत गाडले गेलेले आहेत. वेदीकापट्टीची कलाकुसर केलेले चैत्याच्या पाषाणाचे भाग आजही तेथील जमिनीत घुसलेले दृष्टीस पडतात. लेण्यांचा दर्शनी भाग कोणत्या काळात तुटून पडला याबाबत काहीच माहिती ज्ञात होत नाही.
याबाबत संशोधन केले असता आश्चर्यकारक माहिती प्राप्त झाली. आपल्या महाराष्ट्राला भूकंपाची परंपरा आहे. आजच्या पिढीला फक्त १९६७ सालचा कोयनेचा भूकंप व १९९३ सालचा लातूरचा भूकंप माहित आहे. त्या अगोदरच्या भूकंपाच्या नोंदी अठराव्या शतकापासून नियमित घेतलेल्या आढळतात. पण अठराव्या शतकापूर्वी झालेल्या भूकंपाच्या काही थोड्याच ठराविक नोंदी उपलब्ध आहेत. प्राप्त झालेल्या भूकंपाच्या डेटानुसार खालील प्रमाणे भूकंपाच्या नोंदी आढळतात. १) इ.स.१५२४ मध्ये दाभोळला सुनामी आली होती. २) इ.स.१५९४ मध्ये माथेरान परिसरात भूकंप झाला होता. ३) त्यानंतर २६ मे १६१८ मध्ये मुंबई इलाख्यात प्रचंड मोठा भूकंप झाल्याची नोंद आहे. मुंबई किल्ला ते पुणे पर्यंतचा भाग या भूकंपाने हादरला होता. दोन हजार माणसे दगावली होती. याचा अर्थ त्या भूकंपाची तीव्रता खूपच होती. सह्याद्री पर्वत रांगेतील अनेक भूभाग वरखाली झाले असावेत. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या. या भूकंपात कोंडाणे लेण्यांचा खालील दर्शनी भाग तुटून खाली पडला असावा अशी शक्यता वाटते. ४) इ.स.१६७८ मध्ये माथेरान-कर्जत भागात मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी सुद्धा लेण्यांची, डोंगरकड्यांची पडझड झाली असावी. ५) पुढे ९ डिसेंबर १७५१ मध्ये पुन्हा वांगणी-माथेरान भागात भूकंप झाल्याची नोंद आहे. त्यावेळी देखील लेण्यांची व किल्ल्यावर बांधलेल्या अनेक बुरुजांची हानी झाली असावी. ६) पुन्हा ५ जानेवारी १७५२ मध्ये बदलापूर- नेरळ भागात भूकंपाचा हादरा बसला. ७) एक महिन्यांनी म्हणजे ५ फेब्रुवारी १७५२ मध्ये परत लोहगड-लोणावळा परिसरात मोठा भूकंप झाल्याची नोंद आहे. त्यामुळे हे क्षेत्र भूकंपप्रवण क्षेत्र आहे असे दिसून येते. व भूमंडळ अनेकदा येथे डळमळले होते हे कळते. इ.स.१६१८ मधील भूकंपाने निर्माण झालेली चिपळूण भेग ही मुंबई बेट पासून संगमेश्वर पर्यंत आहे. पश्चिम किनारपट्टी भेग ही ठाणे खाडी ते पारसिक हिल (बेलापूर-वाशी भूभाग ) पर्यंत आहे. घोड नदी भेग ही जवाहर पासून पुणे जिल्ह्यातील भिगवण पर्यंत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा हे झोन चारमध्ये मोडतात. थोडक्यात भूकंपाने अनेक लेण्यांची आणि किल्ल्यांची हानी झालेली आहे.
यास्तव १७-१८ व्या शतकात बदलापूर कर्जत, माथेरान, लोणावळा, वांगणी येथे वारंवार झालेल्या या चार भूकंपामुळे लेण्यांची व पुरातन ऐतिहासिक वास्तूंची अपरिमित हानी झाली असावी असे स्पष्ट दिसते. तसेच कोंडाणे लेण्यांचा दर्शनी भाग याच दरम्यान तुटून खाली पडला असावा यास पुष्टी मिळते. त्याचमुळे आज आपल्याला कोंडाणे लेण्यांतील चैत्य व इतर विहारांचा कलाकुसर केलेला दर्शनी भाग आढळून येत नाही. तिथला यक्ष दिसत नाही. जेव्हा कधी तेथील जागेत उत्खनन होईल आणि जमिनीत गाडले गेलेले कलाकुसर केलेले तुटलेले भाग बाहेर काढले जातील, तसेच घरंगळत गेलेले अवशेष मिळतील तेंव्हाच कोंडाणे लेण्याचे खरे सौंदर्य जगापुढे येईल.
घटोत्कच लेणी
घटोत्कच लेण्या ह्या महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात जंजाळा गावी वसलेल्या बौद्ध लेण्या आहेत. अजिंठा लेण्यांकडे जाताना गोळेगावापासून डावीकडे पंधरा कि.मी.वर असलेल्या अंभई गावापासून पुढे बोरगावजवळ घटोत्कच लेणी आहेत. प्राचीन काळी येथे असणाऱ्या घटोत्कच गावामुळे या लेण्याला घटोत्कच हे नाव पडले असावे.
जंजाळा गाव हे पठारावर वसलेले असुन गावाच्या उजव्या बाजूला घटत्कोच लेणी तर डाव्या बाजूच्या पठारावर जंजाळा किल्ला आहे. स्थानिक लोक या लेण्याना घटुजाईची लेणी किंवा घटुरधस म्हणतात.
लेण्यांजवळ असतांना मध्येच एक पाण्याचा प्रवाह आपली वाट आडवतो. इतर वेळी त्याला कमी पाणी असले तरी पावसाळ्यात काळजी घेऊनच गेलेले बरे. कारण याच पाण्याच्या प्रवाहाचा खाली दगडांमध्ये धबधबा बनतो. पलीकडून अजून एक ओढा वेगाने येऊन त्याच्याही पाण्याचा धबधबा पावसाळ्यात नक्कीच सुंदर दिसत असेल. अजंठा लेणीची आठवण या ठिकाणी नक्की येते. गडाच्या पूर्वेकडील दरीत ह्या लेण्या कोरलेल्या असुन लेणीत जाण्यासाठी पुरात्तत्व खात्याने पायऱ्या बांधल्या आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांपासून २८ किमी अंतरावर असूनही घटोत्कच लेणी दुर्लक्षित वाटतात पण सिमेंटच्या पायऱ्या आणि विहारांना लाकडी कवाड बांधली असल्यामुळे पुरातत्त्व खात्यानुसार लेणी अगदीच दुर्लक्षित नाही. मधोमध एक भव्य आणि प्रशस्त असं विहार, विहारात मोठमोठे खांब आणि त्याच्या दोन्ही बाजुला छोट्या छोट्या खोल्या असा घटोत्कच लेण्यांचा थाट आहे.ही लेणी लहान असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील महायान पंथीय लेण्यातील ही पहिली व अत्यंत महत्वाची लेणी आहे. पूर्वी येथे असणार्या घटोत्कच गावमुळे या लेण्यांना तेच नाव पडले आहे.
घटोत्कच लेण्यांचे विहार अजिंठा लेणीसमुहापासून दुर असले तरी ते अजिंठा लेणी समुहाचे भाग मानले जातात.याची दोन कारणे म्हणजे इथला विहार आकाराने मोठा असला तरी त्याचा तलविन्यास अजिंठ्या लेण्याच्या लेणे क्रमांक २१ सारखाच आहे.त्याच्या व्हरांड्याच्या दोन टोकाशी असलेल्या जोडखोल्यांची उपगर्भगृह ,मंडपाच्या मागील भिंतीत असलेले जोडखोल्यांचे गर्भगृह तसेच मंडपाच्या बाजुच्या भिंतीत असलेली जोडखोल्यांची उपगर्भगृह यासारखे महत्वाचे वास्तुशास्त्रीय घटक सारखेच आहेत.दुसरे कारण म्हणजे अजिंठा येथील लेणे क्रमांक १६ व घटोत्कच लेणे याचा आश्रयदाता वाकाटक राजा हरिषेण याचा प्रधान वराहदेव हाच होता. पायऱ्या उतरल्यावर सर्वप्रथम उजव्या बाजुला सात नागफणा धारण केलेली एक मुर्ती पहायला मिळते. ह्या मुर्तीचे साम्य अजिंठा लेणीत असलेल्या नागफणा धारण केलेल्या मुर्तीशी दिसते.या मुर्तीच्या पुढे अजुन एक शिल्प आहे पण प्रचंड झिज झाल्याने ते ओळखू येत नाही.
अंभईचे वाडेश्वर मंदिर
शिल्पकलेचा अजोड नमुना असलेली अशी मंदिरे औरंगाबाद परिसरात मोठया प्रमाणात आहेत. आडमार्गांवरील गावांमध्ये आजही काही शिवमंदिरे आहेत.सिल्लोड-सोयगाव परिसरात आडमार्गांवर नागेश्वर, वडेश्वर, मुर्डेश्वर हि महादेवाची प्राचीन शिवमंदिरे असुन त्यांचे महत्त्व पंचक्रोशीपुरता मर्यादित राहिले आहे. या मंदिरांतील सिल्लोड तालुक्यात असणारे अंभईचे वडेश्वर मंदिर प्राचीन वास्तूकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवरील कोरीव कामाप्रमाणेच प्रवेशद्वारही कोरीव आहे. बाह्य भागावर काही मिथुन शिल्पे आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भगृहे असणारे मंदिर आज कळस वगळता चांगल्या स्थितीत आहेत. हा कळस नव्याने बांधल्याचे आढळते. १२ व्या शतकात अजिंठ्याच्या डोंगररांगांत अंभईशिवाय हट्टी आणि मुर्डेश्वर या दोन ठिकाणी शिवमंदिरे आहेत.
नागरिकांची अनास्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मंदिराचा बराचसा भाग कोसळला असुन मंदिरांला रंगरंगोटी करुन विद्रूप केले गेले आहे. मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाने नुकतेच पाऊल उचलले आहे. औरंगाबाद – अंभई हे अंतर ९० कि.मी. असुन औरंगाबादहून अंभई येथे जाण्यासाठी सिल्लोड गाठावे. सिल्लोडच्या पुढे मंगरूळ फाट्याने साधारण २२ कि.मी.अंतर पार करून अंभई गावात जाता येते. अंभई हे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा डोगररांगांमध्ये वसलेले छोटेसे गाव. या गावात १२व्या शतकातील तीन गर्भगृहे असणारे शिवमंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवरील कोरीव कामाप्रमाणेच याचे प्रवेशद्वारही कोरीवकामाने सजलेले असुन बाह्य भागावर काही मैथुन शिल्पे आहेत.प्रथमदर्शनी गर्भगृहाच्या शिखराला केलेला सिमेंटचा गिलावा नजरेस खटकतो. या देखण्या शिल्पमंदिराची रचना समोर एक व दोन्ही बाजुला दोन गर्भगृह, सभामंडप आणि मुखमंडप अशा स्वरूपाची आहे.मंदिर डोळसपणे पहायला हाताशी कमीतकमी दोन तासाचा अवधी असायला हवा. अजिंठ्याच्या या डोंगररांगांत अंभई शिवाय हट्टी आणि मुर्डेश्वर या दोन ठिकाणी प्राचीन शिवमंदिरे आहेत.
रुद्रेश्वर लेणी औरंगाबाद
अवघ्या विश्वाला अजिंठ्याच्या चित्र शिल्पांनी मोहिनी घातलेल्या या लेणीच्या मागील बाजूस तीन हजार वर्षांचे पुरातन गणेश (रुद्रेश्वर) लेणी आहे. सोयगावच्या दक्षिणेस पाच किलोमीटर अंतरावर अजिंठा पर्वतरांगेत हे महादेव मंदिर व गणेश लेणी आहे.
खानदेशाची शिवथर घळ म्हणता येईल अशा या लेण्यांना भेट द्यायची तर दोन मार्ग आहेत.औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर फर्दापुर आहे.फर्दापुरच्या नैऋत्येला पाच कि.मी.वर अजिंठा लेणी आहेत.फर्दापुरपासून सोयगावमार्गे वेताळवाडी गाव सुमारे २० कि.मी.अंतरावर आहे.वेताळवाडी गावाच्या मागे सुकलेला ओढा आहे.त्यावर पुल आहे.तेथून पायी डोंगर चढत सुमारे अर्ध्या तासात रुद्रेश्वर लेणी गाठता येतात.पायथ्यापासून पाचशे मीटर अंतर डोंगरावर चढून गेल्यानंतर थोड्या उतारानंतर खोल दरीवजा परिसरात गणेशलेणी आहेत. रुद्रेश्वर मंदिर म्हणूनही या स्थळाची ओळख आहे.
औरंगाबाद शहरापासून जळगाव रस्त्यावरील सिल्लोडपासून डाव्या हाताला वळून अंभईमार्गे हळदा घाट, वेताळवाडी मार्गाने गणेश लेणीच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
हि लेणी अजिंठा व घटोत्कच लेणी यांच्या मधोमध आहेत.हि ब्राम्हणी लेणी असून आठव्या शतकातील असावी असे मानले जाते.थेट हळद्या घाटातून एक पाउलवाट लेण्यांच्या दिशेने येते.गावाकडून जाताना अगदी जवळ जाईपर्यंत आपल्याला लेण्यांचे दर्शन होत नाही.मात्र एकदा परिसर नजरेला पडला कि आश्चर्याचा सुखद धक्का बसतो.उंचावरुन पडणार्या धबधब्याचे पाणी कुंडात पडते.कुंडातील जास्तीचे पाणी वाहुन जाण्यासाठी पन्हाळी कोरल्या आहेत.
स्थापत्य आणि निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असल्यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो.अर्थात लेण्यांपेक्षा इथला धबधबा हेच खरे आकर्षण आहे. धबधबा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील पर्यटक-भाविकांची गर्दी मोठी गर्दी होते.वर्षा काळात लेण्यांच्या वरच्या भागापासून दुधासारखी शुभ्र पाण्याची धार खाली पडते. या लेण्याच्या तळाशी एक छोटेसे तीर्थकुंड आहे. या तीर्थकुंडात धबधब्याचे पाणी पडते. हे पाणी पुढे सोना नदीस जाऊन मिळते. हे सोनानदीचे उगमस्थान आहे.उजवीकडच्या लेण्यात जाण्यासाठी कातळात पायर्यांचा जीना कोरला आहे.तो चढून गेला कि इंग्रजी एल आकाराची गुहा दिसते. तसेच लेण्यातील सिद्धिविनायकाचे हे जागृत देवस्थान समजले.
गणेश लेणीत प्रवेश करताच मोठा ४० ते ५० फूट लांब व १२ फूट उंचीचा सभामंडप आहे. भिंतीत ४ फूट उंचीवर भव्य व प्रसन्न मुद्रेतील मंगलमूर्ती आहे. मूर्ती डाव्या सोंडेची व पाच बाय पाच फुटांची आहे. या मूर्तीच्या मागील भुयार अजिंठा लेणीपर्यंत असल्याचे सांगण्यात येते. गणेशमूर्तीच्या बाजूस दगडी बैठकीवर महादेवाचे शिवलिंग आहे आणि नंदीही आहे, त्यास रुद्रेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिरातच गणेशमूर्ती शेजारी कोरलेल्या दगडात नृसिंहाची मूर्ती व, सप्तमातृक शिल्पे दिसतात. उजव्या खांबावर नरसिंहाचे व डाव्या खांबावर नटराजाचे शिल्प तीन फूट उंचीच्या आकारात कोरलेले आहे. अंगारकी व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दर्शनाकरिता भाविक गर्दी करतात. शेजारीच प्रचंड असा पाण्याचा धबधबा कोसळत असतो.
गंधारपाले लेणी
रायगड जिल्ह्यातील महाड शहराला सातव्या शतकापासूनचा वैभवसंपन्न इतिहास आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. महाहट्ट म्हणजेच मोठी पेठ या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले अशी महाडची ओळख आहे. मुंबई गोवा मार्गावरील प्राचीन काळापासून एक महत्वाचे व्यापारी ठिकाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह केलेल्या चवदार तळ्यामुळे प्रसिद्ध असलेले महाड. महाड परिसरात येताच बाजूच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात लांबून दिसणारी लेणी आपल्याला खुणावत असते तीच गांधारपाले बौद्ध लेणी.गांधारपाले बौद्ध लेणी इतिहास :महाड मध्ये पाले हे गाव महाड पासून अगदी ३ ते ४ किलोमीटर अंतरावर हि लेणी असून मुंबई गोवा महामार्गावरच आहेत या लेण्यांना पाले लेणी किंवा गांधारपाले लेणी म्हणतात किंवा महाड बौद्ध लेणी म्हणुन हि म्हटली जातात.लेण्यांचे मुळ नाव पाले लेण्या असे आहे पण डोंगरापलीकडून वाहणार्या गांधारी नदीकाठच्या गांधार गावावरुन याला गांधारपाले लेण्या असे नाव पडले.
ही बौद्ध लेणी असून महाडनजीक रायगड किल्ल्याजवळच दिसतात. मुंबई-गोवा महामार्गाने महाड शहरात जाताना ३ कि.मी. आधी डावीकडील डोंगरात कोरलेली गांधारपाले लेणी आपले लक्ष वेधून घेतात. दक्षिणोत्तर पसरलेल्या टेकडीवर पायथ्यापासून साधारण २०० फुट उंचीवर ही पूर्वाभिमुख लेणी आहे. पायथ्याजवळ पुरातत्व विभागाने फलक लावलेला असुन येथुन अर्ध्या तासात पायऱ्या चढून आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढून गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला २८ क्रमांकाचे लेणे दिसते. पुरातत्व खात्याने या लेण्यांना १-२८ असे क्रमांक दिले असुन १ क्रमांकाच्या लेण्यापासून सुरवात केल्यास सर्व लेणी व्यवस्थितपणे पहाता येतात. तीन स्तरात कोरलेल्या या लेणी समूहात २८ लेणी असुन त्यात ३ चैत्यगृह,१९ विहार व अनेक पाण्याची टाकी कोरलेली आहेत. अभ्यासकांच्या मते ही लेणी कंभोग वंशातील विष्णू पुलित या राजाने खोदलेली असुन पाले हा पुलित नावाचा अपभ्रंश आहे. लेण्यांसमोरून महाड शहर, चांभारगड, सावित्री नदी, मुंबई-गोवा महामार्ग असा सुंदर देखावा बघावयास मिळतो.
पहिल्या वरच्या स्तरात वीस आणि दुसर्या स्तरात उर्वरित अशी लेणी आहेत. लेणी एकमध्ये भव्य सभागृह आहे. एका शीळेवर प्रलंबपदासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे. सिंहासनावर भगवान बुद्धाच्या पाया जवळ धम्मचक्र व हरिणाची प्रतिमा आहे. ध्यानधारणेसाठी खोल्या व प्रार्थना घरे. पाली भाषेतील शिलालेख, खोल्या, सभागृह, दालन, वाळूच्या घडयाळासारखी नक्षी, चैत्यगृह, ओटे, नक्षीकाम. लहान मोठी प्रवेशद्वारे, भोजनगृह, स्तूप, दगडी पाण्याची टाके, प्रतीमा, दिर्घिका, स्तंभ. अर्धस्तंभ ,खांबावरती असे सुंदर कोरीवकाम या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.
वास्तविक लेणी एखाद्या बळकट राजाश्रयाच्या आधारे कोरली जात कारण लेणी खोदण्यासाठी धनाची अवश्यकता असे.ते धन पुरवण्याचे काम राजसत्ता किंवा व्यापारी करत असत. पाले लेण्यापुरते बोलायचे तर या लेण्यांना नेमक्या कोणत्या बंदराचा आश्रय लाभला हे समजत नाही. हे एक नैसर्गिक बदंर असून जलवाहतुकीस सोयीस्कर अशी जागा होती टॉलमेंनी नुसार इसवी सन १५० च्या काळात पालेला बाली पाटण म्हटले जायचे आणि पेरिप्लस च्या काळात इसवी सन २४७ च्या काळात पालैपट मई म्हटले जायचे वा तसे नाव असावे त्या नंतर पाले चा उल्लेख चौदावा नृपती अनंतदेव इसवी सन १०९४ याच्या ताम्रपट मध्ये बलीवपन किंवा पालीपट्टण असा उल्लेख आहे त्यांनतर पाले चा उल्लेख इसवी सन १७७४ ला फोर्बस च्या नोंदीत सापडतो त्याने आपल्या नोंद वहीत लिहून ठेवले आहे कि चढण्यास कठीण असलेले ठिकाण या ठिकाणी एलिफंटा व साष्टी सारखी विहार चैत्यगृह कोरलेली आहेत हि लेणी चौल व राजपुरी खाडीतील बंदरे व महाड वरध घाट तेर या प्राचीन मार्गावर आहेत इथे बहुमुल्य अशी ऐतिहासिक २८ ते ३० लेण्यांचा समूह आहे हि लेणी तीन स्थरावर आपल्याला पाहायला मिळतात दुरून पाहिल्यावर हि लेणी तीन मजली इमारती सारखी भासतात गांधारपाले लेणी गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत. पुरातत्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी २०-२५ मिनीटे लागतात.
कोल बौद्ध लेणी
रायगड जिल्ह्यातील महाड हे शिवतिर्थ रायगड तसेच रायगडाच्या घेर्यातील सोनगड्,चांभारगड्,लिंगाणा,मानगड या किल्ल्यांमुळे प्रसिध्द आहे.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याकाठी केलेल्या सत्याग्रहामुळे महाडचे महत्व आहे. पण या महाडला प्राचीन इतिहासही आहे.आज महाड सावित्री नदीच्या काठावरील छोटे शहर असले तरी ते एकेकाळी बंदर होते.देशावरुन आणला जाणारा माल इथे आणला जाई आणि निर्यात केला जाई.तर महाड बंदरातून उतरलेला माल गाढव आणि बैल यावर लादून देशावरच्या महत्वाच्या शहराकडे म्हणजे नाशीक्,पैठंण, जुन्नर्,कराड ,कोल्हापुर या शहराकडे नेला जाई. या घाटमार्गांवर लक्ष ठेवायला या परिसरात दुर्ग उभारणी झाली.तशीच इथल्या राजसत्तांचा आणि व्यापारांचा आश्रय घेउन बौध्द भिक्षुकांची वर्दळ असायची. या भिक्षुकांचा पावसाळ्यातील आसरा म्हणजे वर्षावास म्हणजे अर्थातच लेणी उभारली गेली.महाडजवळ दोन लेणी समुह आहेत.एक शहराच्या उत्तरेला असलेली मुंबई-गोवा महामार्गाला खेटून उभी असणारी गंधारपाले लेणी तर महाडच्या आग्नेय दिशेला ३ कि.मी. वर सावित्री नदीकाठी उभी असणारी कोल गावाच्या हद्दीतील कोल लेणी.एन वर्दळीच्या महामार्गावर असल्यामुळे गंधारपाले लेणी पर्यटकांना आकर्षीत करतात.थोडेफार दुर्गभटके इथे पायधुळ झाडतात.कोल लेणी मात्र खुपच दुर्लक्षित आहेत.फार क्वचित कोणी अभ्यासक इकडे फिरकतो.तर आज आपण माहिती घेणार आहोत 'कोल लेण्याची'.
महाड शहरापासून काही अंतरावर असलेल्या कोल येथील लेणी समूह(kol caves) अद्यापही उपेक्षेचा ऊन-पाऊस झेलत असल्याचे पहावयास मिळते. पूर्वी गंधारपाले लेणी समूहात जाण्यासाठी खडतर अशी पायवाट होती. मात्र अलीकडच्या काळात भारतीय पुरातत्व विभागाने महामार्गापासून थेट लेण्यांपर्यंत पायरी मार्ग तयार केल्याने या लेणी समूहात भेट देणे सहज साध्य झाले आहे. हा लेणीसमूह देखील भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात घेतला आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पर्यटकांसाठी अद्यापही हा लेणीसमूह दुर्गमच राहिला आहे.
लेण्यावर जाण्याचे ठिकाण :
सावित्री नदीच्या काठावर महाडच्या आग्नेयेस कोल हे खेडेगाव असून महाड-भोर मार्गावर आहे.हि लेणी दोन समुहात विभागली आहेत.एक समुह गावाच्या आग्नेयेस तर दुसरा ईशान्येस आहे.पहिल्या समुहात एका घळीच्या काठाशी पश्चिमाभिमुख पाच लेणी आहेत.त्यांचा समोरचा भाग पडला आहे.
रायगड मधील महाड या बस स्थानका बाहेरून कोल गावात जाण्यासाठी खाजगी वाहने असतात त्याचा वापर करून आपण कोल या गावी बौद्धवाडी मध्ये उतरावे तिथून सरळ वरती चालत आल्यास बुद्ध विहार आहे तिथून लेण्यावर जाता येते अन्यथा लोकेशन सर्च करून जाऊ शकता.
लेणीचा इतिहास : -
या लेण्यांचा इतिहास पाहता हि सातवाहन कालीन लेणी आहेत गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या अधिपत्याखाली अपरांत संघराज्य होते. नहपान राजाकडून अपरांत गौतमी पुत्र सातकर्णीने आपल्या अधिपत्याखाली घेतले होते. याच वेळी भारतात बौद्ध धम्म हि जोमाने वाटचाल करीत होता सम्राट अशोकाचे मांडलिक राजे म्हणून सातवाहन राजांचा उल्लेख सापडतो आणि अशोकाच्या काळात महाराष्ट्रात बौद्ध धम्म प्रगतीच्या उंच शिखरावर होता. कोल लेण्याची बांधणी सातवाहन काळात असून ती भिक्षु ना निवास करण्यासाठी बांधलेली लेणी असावीत असे काही अभ्यासकांचे मत आहे तर काहींच्या मते महाड परिसरावर विष्णूपुलीत या बौद्ध राजाचे राज्य होते. त्याकाळात गांधारपाले आणि कोल येथे दुसऱ्या शतकात लेण्या खोदण्यात आल्या, असा अभ्यासकांचा दावा आहे.
शिवाय हा एक व्यापारी मार्ग देखील असल्याने या ठिकाणी व्यापाऱ्यांना विसावा घेण्यासाठी देखील या लेण्यांचा वापर केला जात असावा कारण यासाठी जवळपास सहा भिक्खू निवास आहेत. या लेण्या बांधण्यामागाचे कारण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे भिक्खू प्रवास करीत असतात त्याच्या राहण्याची व्यवस्था म्हणून हि लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांवर असणाऱ्या लेखात लेणी कोरण्यासाठी दान देणाऱ्या लोकांची नाव देण्यात आली आहेत. या लेण्यांची नोंद जेम्स बर्जेस यांच्या एपिग्राफिया इंडिका , तसेच ब्यूलर यांचा इंडियन पॅलिओग्राफी यामध्ये तर ल्युडर यांच्या एपिग्राफिया इंडिका (भाग १०) यामध्ये कोल लेण्यांच्या शिलालेखांचे अर्थ सांगितले आहेत .
पन्हाळे-काजी लेणी-समूह (Rock-cut caves at Panhale-Kaji)
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ.दापोलीतून सुमारे २८ किलोमीटर तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी. अंतरावर थोरली-धाकटी कोटजाई नदी आहे. या नदीजवळ ‘पन्हाळेकाजी’ हे गाव आहे. नदीला उत्तराभिमुख असलेल्या डोंगरांत हा प्राचीन लेणी समूह आहे. डोंगरकपारीत वसलेले हे गाव, बाजूला फणसांनी लगडलेली झाडे, नदीवरचा छोटासा पूल, नदीतील स्वच्छ आणि नितळ पाणी पाहत-पाहत आपण लेणींच्या दिशेने प्रवास करतो. पन्हाळे गावाच्या दक्षिणेकडील डोंगर-माथ्यावर ‘पन्हाळे’ नावाचा एक दुर्ग आहे. जवळच झोलाई देवी या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. शिलाहारांच्या बाराव्या शतकातील दोन ताम्रपटांत या ठिकाणाला ‘प्रणालक’ म्हणून संबोधित केल्याचे दिसते. सतराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात येथे नियुक्त केलेल्या एका काजीमुळे पन्हाळे नावाबरोबर ‘काजी’ हा शब्द जोडला गेला. पन्हाळे हे गाव दापोलीपासून २८ किमी वर आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावरून नानटे किंवा तेरे-वायंगणी गावातून पन्हाळे गावासाठी मार्ग आहे. तसेच दापोली-खेड रस्त्यावर असलेल्या वाकवली गावातूनसुद्धा पन्हाळे गावात येता येते. पण ह्या मार्गाने दापोली ते पन्हाळे अंतर आहे ३० किमी.
पन्हाळे-काजी येथील लेणीसमूह.
अत्यंत निसर्गरम्य अशा सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी कोटजाई व धाकटी नदीच्या खोऱ्यात हे स्थळ असून साधारणतः इ. स. तिसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत समृद्ध अशा इतिहासाची साक्ष असणाऱ्या एकूण २९ लेणी येथे खोदण्यात आल्या आहेत. लेण्यांच्या समोरून वाहणारे नदीचे पाणी, काठावर असलेली आमराई आणि पूर्व-पश्चिम अशी २९ लेणी कोणालाही प्रथम दर्शनी भुरळ घालतात. येथील लेणी बौध्द आणि हिंदू प्रकारची आहेत. येथील लेण्यांमध्ये हीनयान, महायान, वज्रयान, शैव आणि नाथपंथीयांच्या स्थापत्यकला दिसून येतात. पहिली २८ लेणी एक ओळीत असून २९वे लेणे जे “गौर लेणे” नावाने ओळखले जाते ते थोडेसे दूर बागवाडीजवळ आहे. इसवी सनाच्या ३ शतकात चालू झालेले काम इसवी सनाच्या १४व्या शतकापर्यंत चालू होते. हीनयान पंथीयांनी हि लेणी खोदायचे काम सुरु केले आणि त्यानंतर महायान, वज्रयान हे बौध्द पंथ आणि त्यांच्यानंतर हिंदू धर्मातील शैव आणि नाथपंथीय येथे लेणी कोरायचे काम करीत होते. प्रत्येक पंथाने खोदकाम करीत असताना पूर्वीच्या लेण्यांमध्ये बदल थोडे घडवून आणले, तर काही लेणी नवीं खोदली. येथी लेण्यांमध्ये गौतम बुध्दाच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौध्द स्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचे कोरीव मंदिर, महाभारत आणि रामायणातील प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान आदी शिल्प ह्या लेण्यांमध्ये कोरलेली आहेत. २९व्या लेण्यात नाथपंथीयांचे ८५ शिल्पपट कोरलेले आहेत. या लेण्यात आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ इ. शिल्प सुध्दा कोरलेली आहेत. हीनयान (थेरवाद), वज्रयान, शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायाचा ठसा या लेण्यांवर पडलेला दिसून येतो.
१९७०-७१ च्या दरम्यान पन्हाळे गावातील ‘केशवराव पांडुरंग जाधव’ नामक शेतकऱ्याला शेत नांगरताना एक दगडी पेटी फाळाला अडकली व त्या पेटीत मजकूर लिहिलेले धातूचे पत्रे आढळले. त्याने ते पत्रे गावातील लोकांना दाखवले आणि गावकऱ्यांच्या मदतीने इतिहास संशोधनाची आवड असणाऱ्या दाभोळच्या अण्णा शिरगावकरांशी संपर्क केला. अण्णांनी हे पत्रे म्हणजे ताम्रपट असावे असे सांगितले. आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या तत्कालीन प्राध्यापिका ‘शोभनाताई गोखले’ यांच्या समोर सादर केले. शोभनाताईंनी हे पत्रे ताम्रपट असल्याचे निश्चित केले आणि त्या ताम्रपटांचा अभ्यास केला. अभ्यासातून ताम्रपट शिलाहार कालीन असल्याचे आढळले. वा. वि. मिराशी यांनी कॉर्पस इन्स्क्रिप्शन इंडिकॅरमच्या सहाव्या भागात हा ताम्रपट सांगोपांग चर्चेसह संपादित केला. या लेखावरून असे दिसून येते की, शिलाहार राजा प्रथम अपरादित्य (११२७–११४८) याने कदंबांना कोकणातून हुसकावून लावल्यावर आपल्या विक्रमादित्य या प्रिय पुत्रास प्रणालक या राजधानीच्या शहरी दक्षिण कोकणचा अधिपती बनवले.
१९७२ साली भारतीय पुरातत्व खात्याने ताम्रपट मिळालेल्या जागी उत्खनन केले आणि कोटजाई नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लपून गेलेला २८ लेण्यांचा समूह समोर आला. ख्यातनाम पुरातत्वशास्त्रज्ञ म.न.देशपांडे (मधुसूदन नरहर देशपांडे) यांनी या लेण्यांचा अभ्यास करून The caves of Panhale-kaji हा प्रबंध लिहिला. या प्रबंधाकरिता त्यांना १९८६ चे ‘एशियाटिक सोसायटी ऑफ वेस्ट बंगाल’ सर्वोत्कृष्ट कार्यपदक मिळाले. पन्हाळेकाजीचा विषय घेऊन त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने केली. छापिल माध्यमांमधून त्यांच्या मुलाखती झाल्या. हायडेलबर्ग (प.जर्मनी) येथे झालेल्या ‘महाराष्ट्र संस्कृती व समाज’ या अंतरराष्ट्रीय सम्मेलनात देखील म.न.नी पन्हाळेकाजीचा उल्लेख केला होता.
शिलाहार काळातील दोन शिलालेखांमध्ये या स्थानाचा उल्लेख आहे (इ.स. १२ वे शतक ).यावरुन हे ठिकाण शिलाहार काळात महत्वाचे असावे असे दिसते. या लेण्यांना लयनस्थापत्याच्या इतिहासात महत्व आहे.याचे कारण म्हणजे या लेण्यात एकेकाळी वज्रयान संप्रदाय प्रचलित होता.यापुर्वी उपलब्ध पुराव्यानुसार वेरुळ व कान्हेरी येथे वज्रयान संप्रदाय प्रचलित होता हे संशोधकाना माहिती होते. एका शिलालेखामध्ये शिलाहार कपर्दिच्या राजवटीत आणि राष्ट्रकुट नृपती पहिला अमोघवर्ष याच्या काळात इ.स.च्या नवव्या शतकाच्या मध्यात ( शके ७७५) गौडदेशीय गोमिन अविघ्नाकराने कृष्णगिरी येथे ध्यानधारणेसाठी लेणे खोदवले असे म्हणले आहे. या शिलालेखावरुन कोकणातील बौध्दांचा बंगालमधील बौध्दांशी निकटतम संपर्क होता.त्यामुळेच पुर्व भारतातील वज्रयान संप्रदाय महाराष्ट्रात विशेषतः कोकणात पोहचला असे मानले जाते.पन्हाळेकाजी इथे उत्खनन करताना अक्षोभ्याच्या पाच सुट्या मुर्ती, दोन काम्य किंवा अर्पित मुर्ती, महाचंडरोषण व सिध्दैकवीर यांची प्रत्येकी एकेक मुर्ती सापडली.यावरुन याठिकाणी वज्रयान पंथाची उपासना होत असावी या निष्कर्षाप्रत श्री.म.न.देशपांडे आले.मुळ बौध्द धर्मातून इ.स. चौथ्या शतकात असंग याने मैत्रेय याच्या कृपेने काहीजणांना वज्रयान पंथाची दीक्षा दिली.
वज्रयान पंथाविषयी:
पन्हाळेकाजी लेण्यांची माहिती घेण्यापुर्वी थोडे वज्रयान पंथीयांविषयी जाणून घेउया.भगवान बुध्दानी आपले तत्वज्ञान सोप्या शब्दात आपल्या अनुयांयापर्यंत पोहचवले.त्यांनी पुढे संघाची स्थापना केली.यानंतर बौध्द धर्माची सुरवात झाली.सुरवातीच्या काळात स्तुप स्थापन करुन बुध्दांची आराधना सुरु झाली.यात मुळ तत्वज्ञानाला महत्व होते.या पंथाला थेरवादी असे म्हणले जाउ लागले.पुढे मात्र दगोबाएवजी बुध्दांची मुर्ती कोरली जाउन त्याची पुजा करण्याची कल्पना पुढे आले.या पंथीयाना महायान पंथीय म्हणले जाउ लागले.आपण महायान त्यामुळे दगोबाला पुजणारे हीनयान म्हणून थेरवादींना हीनयान म्हणले जाउ लागले.याशिवाय तिसरा पंथ वज्रयान.हा मात्र महाराष्ट्रात फार रुजला नाही.
बंगाल मधील पाल राजांच्या राजवटीत (इ.स. ८ ते १२ वे शतक ) हा संप्रदाय चांगला फोफावला. या संप्रदायाच्या आचरणामध्ये काही धर्ममतांचा,विधीचा,यंत्रपुजेचा म्हणजे काही तांत्रिक आकृत्यांच्या पुजेचा आणि काही मंत्रांचा समावेश होतो. या बाबींनी महायान पंथीयांच्या आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरुपात बदल घडवून आणला. या पंथीयांचा देव म्हणजे अक्षोभ्य.हा अक्षोभ्य ज्या आसनावर बसला असतो त्यावर वज्र कोरले असते.त्याच्यावरुनच या पंथाला वज्रयान हे नाव पडले. वज्रयान पंथीयांसाठी अक्षोभ्याच्या कुलातील आणखी दोन दैवते म्हणजे महाचंडरोषण आणि सिध्दैकवीर. विशेष म्हणजे या मुर्ती पन्हाळेकाजी सोडल्यास महाराष्ट्रातील अन्य लेण्यात आढळत नाहीत.यावरुन हा पंथ फक्त इथेच अस्तित्वात होता असे दिसते.या ठिकाणी असलेल्या महचंडरोषणाची अशीच मुर्ती ओरिसातील काम्य स्तुपावर असलेल्या मुर्तीशी साधर्म्य आहे.
इ. स. सु. तिसऱ्या शतकात हीनयान पंथाच्या भिक्षूंसाठी पन्हाळे-काजी येथे लेणी तयार केली गेली. या लेणी-समूहातील लेणी क्र. ४, ५, ६, ७, ८ व ९ मूलतः सु. तिसऱ्या शतकात खोदल्या गेल्या. लेणी क्र. २, १०, ११, १२, १३ व १८ या साधारणतः चौथ्या-पाचव्या शतकात खोदल्या गेल्या. त्यानंतर साधारणतः दहाव्या शतकात वरील सर्व लेण्यांमध्ये वज्रयानी पंथीयांनी बरेचसे फेरफार केले.
वज्रयानी पंथीयांनी दहाव्या शतकात लेणी क्र. १, ३, १४, १५, १६, १७, १९, २१ व २७ या नव्याने खोदल्या असल्याचे दिसते. पुढे तेराव्या शतकात यातील लेणी क्र. १४, १५, १७, १९ व २१ ब्राह्मण (हिंदू) धर्माच्या प्रभावाखाली आल्या. यातील लेणे क्र. १४ नाथ संप्रदायाच्या ताब्यात आले. ब्राह्मण धर्मीयांसाठी बाराव्या-तेराव्या शतकात लेणी क्र. २०, २२, २३, २४, २५, २६ व २८ या नव्याने खोदल्याचे दिसून येते. यांपैकी लेणे क्र. २२ नंतर चौदाव्या शतकात नाथ संप्रदायाच्या प्रभावाखाली आले, तर लेणे क्र. २९ नाथ-संप्रदायासाठी चौदाव्या शतकात खोदण्यात आले.
लेणी क्र. ४, ५ व ६ मध्ये स्तूप स्थापन केल्याचे आढळून येते. लेणे क्र. ५ मधील पाठीमागच्या भिंतीत अर्धोत्कीर्ण स्तूप आहे. लेणी क्र. ७, ८ व ९ ही मुळात भिक्षुगृहे (विहार) होती. यांतील काही लेण्यांसमोर नंतर वृत्तचितीच्या आकारातील स्तूपही स्थापिले गेले.
महायान पंथीयांसाठी काही बदल केलेले दिसत नाहीत. परंतु आठव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत वज्रयान पंथीयांचे वास्तव्य येथे असावे, असे दिसते. याच काळात विशेषतः दहाव्या शतकात येथील लेण्यांत गुप्त तांत्रिक पुजाविधीस उपयुक्त असे फेरफार करून नवीन तांत्रिक देवतांच्या मूर्तींची स्थापना केल्याचे दिसून येते. मुळातील भिक्षुगृहांच्या पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तींची स्थापना केली होती. लेणीत दिसणाऱ्या अष्टकोनी स्तंभात बदल करण्यात आले व दर्शनी स्तंभांच्या स्तंभशीर्षात नागबंध जोडले गेले. मंडपात प्रवेश करण्यासाठी असलेल्या द्वारांवर अलंकृत ललाटबिंब कोरण्यात आली. काही वाढीव खोल्याही नव्याने खोदण्यात आल्या. ईशान्य भारतात लोकप्रिय असणाऱ्या अक्षोभ्य, सिद्धैकवीर या तांत्रिक देवतांची पूजा पन्हाळे-काजी येथे केली जाऊ लागली.
लेणे क्र. १० वज्रयान पंथाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे आहे. येथून मिळालेल्या ‘महाचंडरोषण’ या वज्रयानी देवतेच्या दुर्मीळ मूर्तीमुळे येथील भिक्षूंचा संबंध बंगाल व ओडिशा येथील तांत्रिक केंद्रांशी आला असावा, असे दिसते.
लेणे क्र. १४ मध्ये नाथ संप्रदायाशी संबंधित शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस मिळून एकूण १२ शिल्पे आहेत. यातील चौरंगीनाथ तसेच कानिफनाथ व बहुडी योगिनी यांची शिल्पे लगेच ओळखू येतात. गर्भगृहातील शिल्पांपैकी आदिनाथ व मत्स्येंद्रनाथांची शिल्पे ओळखायला सोपी आहेत. या लेण्यात गोरक्षनाथांचे एक खंडित व सुटे शिल्पही मिळालेले आहे. लेणे क्र. १५ मध्ये गणपतीची सुटी मूर्ती स्थापून हे लेणे गाणपत्य संप्रदायाशी जोडले गेले. लेणे क्र. १६ च्या समोर शिलाहारकालीन छोटेसे देवालय असल्याचे दिसते.
लेणी क्र. १८ ते २३ हा लेण्यांचा समूह आहे. यातील १८ वे लेणे वज्रयान पंथी आहे. लेणी क्र. १९ ते २३ मध्ये साधारणतः बाराव्या शतकात भरपूर कामे झाली. अकराव्या शतकात शिलाहार शैलीचे एकाश्म देवालय म्हणून १९ क्रमांकाचे लेणे साकारले गेले. या मंदिराच्या छतावर रामायण, महाभारत व कृष्ण-लीलेशी संबंधित शिल्पपट कोरण्यात आले. लेणे क्र. २१ मध्ये असलेल्या गणपतीच्या शिल्पावरून या लेण्याला ‘गणेश लेणे’ म्हणून ओळखले जाते. लेणे क्र. २२ चौदाव्या शतकात नाथ-योग्यांनी वापरायला सुरुवात केले. या लेण्याच्या गर्भगृहात पद्मासनात बसलेली नाथ-योग्याची मूर्ती कोरण्यात आली आहे. लेणी क्र. २४ ते २८ समूहातील २४ व्या लेण्यात कोणतीही मूर्ती नाही. २५ क्रमांकाचे लेणे अपूर्ण आहे. लेणी क्र. २६, २७ व २८ आकाराने लहान असून यांत वैशिष्ट्यपूर्ण असे काही नाही.
लेणे क्र. २९ हे मुख्य लेणी समूहापासून साधारणतः दीड किमी. अंतरावर आहे. हे लेणे संपूर्णतः नाथ संप्रदायाशी निगडित असून याची रचना इतर लेण्यांपेक्षा निराळी आहे. येथील मुख्य गर्भगृहातील शिल्पांमध्ये आदिनाथ-मत्स्येंद्र-गिरीजा, त्रिपुरसुंदरी व ८४ सिद्ध, तसेच प्रांगणात समोर लक्ष्मी, गणेश व सरस्वती यांची शिल्पे आहेत.
एकंदरीत पन्हाळे-काजी हे ठिकाण वज्रयान पंथाचे प्रमुख ठाणे होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाच्या दृष्टीनेही याचे अत्यंत महत्त्व आहे. येथील लेणी कला व स्थापत्य या व्यतिरिक्त धार्मिक परंपरेत झालेल्या बदलांच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. पन्हाळे-काजी येथील लेण्यांच्या अभ्यासातून हीनयान बौद्ध पंथाचे तांत्रिक वज्रयान पंथात कसे रूपांतरण झाले व पुढे हे ठिकाण शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायापर्यंत कसे विकसित होत गेले, हेही समजते.
चिपळूण बौध्द लेणी
चिपळूण :
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण हे महत्त्वाचे ठिकाण आहे. चिपळूण शहराचा इतिहास किमान दोन हजार वर्षे जुना आहे. त्याचा पुरावा सांगणारी बौद्धलेणी (दगोबा), शहरानजीक कोल्हेखाजण परिसरात बायपास गुहागर हायवेवर पाहाता येतात. इ.स. ७४१-४२ दरम्यानच्या पश्चिमी चालुक्य नृपती विक्रमादित्य याच्या ताम्रपटावर चिपळूणचा उल्लेख 'चिप्ररुलन' असा आहे. शिलाहार नृपति मल्लिकार्जुन याच्या इ.स. ११५१ च्या ताम्रपटात'चित्पुलुण' असा या शहराचा उल्लेख आहे. शहराची स्थापना श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी झाली आहे. चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन, कदंब, क्षत्रप, कलचुरिस व राष्ट्रकूट यांनी राज्य केले. त्यानंतर दिल्ली सल्तनत, आदिलशहा, मराठा यांचे येथे वर्चस्व होते.शहराच्या चारही बाजूंना डोंगर, पूर्वेस सह्याद्री, शहरामधून वाहणारी शिवनदी आणि वाशिष्ठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इतिहास समजून घेण्याची आवड असलेल्या पर्यटकांनी इथला 'दळवटणे'परिसर पाहायला हवा. शहरात हायवेला लागून पाग नावाचा भाग आहे. तेथे पागा असाव्यात. आदिलशाहीमध्ये मक्केकडून विजापूरला येण्यासाठी जी बंदरे विकसित केली गेली, त्यापैकी गोवळकोट हे चिपळूणला लागून असलेले महत्त्वाचे बंदर होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची छावणी येथे होती. राज्याभिषेकापूर्वी महिनाभर राजांचा मुक्काम येथे होता. ८ एप्रिल १६७४ ला महाराजांनी या भागाची सर्वप्रथम पाहणी केली, ९ मे १६७४ ला महाराजांनी या लष्करी छावणीला उद्देशून 'काटकसर आणि दक्षता' याबाबतचे आज्ञापत्र दिले होते,इतिहासात ते पत्र प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तीनदा भेट दिलेली, त्यांच्या स्मृती जोपासणारी 'राजगृह' इमारत शहरात वडनाका-गुरवआळी भागात आहे. तालुक्यात परशुराम आणि वैजी-शिरळला जोडणाऱ्या अशा दोन प्राचीन पाखाड्या आहेत,येथील नेचरट्रेल वेगळा अनुभव ठरावा. गुहागर तालुका व चिपळूण तालुक्यातील ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. निसर्गसंपन्न चिपळूण हे अनेक घाटांनी वेढलेले आहे.
चिपळूण परिसराचा नकाशा
चिपळूणात गौतमेश्वर, वीरेश्वर, गांधारेश्वर, कृष्णेश्वर, रामेश्वर ही पंचलिंगे असून पैकी गौतमेश्वर गाभाऱ्यात शिवपिंडीवर जलाभिषेक केल्यास प्रसिद्ध 'सिंहनाद' याची दुर्मीळ अनुभूती घेता येते. तालुक्यातील मोरवणे या निसर्गरम्य गावातील खालच्या वाडीत असलेल्या पूर्वाभिमुख श्रीहनुमान मंदिरातील प्रताप मारुतीची तळ हातावर सहज मावेल एवढी अंदाजे ३ इंच रुंद, ४ इंच लांब आणि १ इंच जाडीची छोटीशी काळ्या नरम दगडातील लहान मूर्ती ही किमान चारशे वर्षपूर्व समर्थ काळातील असावी. समर्थ काळात एका श्रीरामदास सांप्रदायिक ‘स्वामी’ अवलियाने आपल्या झोळीतून आणून ही प्रताप मारुतीची मूर्ती मोरवणेतील सध्याच्या जागेत आणून ठेवल्याचे सांगितले जाते. एवढ्याश्या छोट्याश्या मूर्तीबाबत स्थानिक आपल्या भावना चार शतके जपतात, हे एक आश्चर्य आहे. वाशिष्ठीची उपनदी असलेल्या तांबी (ताम्रपर्णी) नदीच्या तीरावर गोंधळे गावी पेशवेकालीन श्रीहरिहरेश्वर मंदिर असून मंदिराशेजारी असलेली चाळीस पायऱ्यांची, विशाल आकारमानाची चिरेबंद बांधकामाची विहीर आवर्जून पाहावी अशी आहे. गुढेतील श्रीदेव वामनेश्वर या हेमाडपंथी बांधणीच्या, सातशे वर्ष जुन्या मंदिरातील एक शिंग दुसऱ्यापेक्षा थोडे खाली वाकलेला ‘नंदी’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुंभार्लीतील श्रीदेवी सुकाई-वरदायिनी-महाकाली हे बाराव्या शतकातील देवस्थान आहे. मंदिरातील लाकडी कोरीव पाहाण्यासारखे आहे. किमान ५०० वर्ष जुनी, कल्पकतेने कोरलेली वीरच्या निसर्गरम्य परिसरात ‘श्रीलक्ष्मी मल्लमर्दन’ची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जमिनीपासून तीन फूट खोल गाभाऱ्यात आहे. मूर्तीच्या तळाला १०८ विष्णू लिंगे कोरलेली आहेत. वीर पासून जवळच संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावी चौदाशे वर्षांपूर्वीचे, पाण्याने चारही बाजूंनी वेढलेल्या तळ्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थान आहे. कोकणात अगदी मोजक्याच ठिकाणी अशी मंदिरे आहेत. विद्येची देवता असलेल्या श्रीशारदादेवीचे संपूर्ण कोकणपट्टीतील एकमेव देवस्थान तुरंबव गावी आहे. बिवली गावी भगवान विष्णूची शाळीग्राम पाषाणात कोरलेली,एकसंघ, सव्वा दोन फूट उंच, ‘श्रीलक्ष्मीकेशव’ स्वरूप प्राचीन मूर्ती आहे. दादरचे संगमरवरी बांधकाम असलेले श्रीरामवरदायिनी मंदिर आणि दाक्षिणात्य,राजस्थानी कलेचा संगम असेलेले टेरवचे श्रीभवानीमाता मंदिर हे आधुनिक वास्तूशिल्पशास्त्राचा अप्रतिम अविष्कार आहे. नंदिवसेतील देवराईत, वैतरणा नदीच्या काठावर असलेले श्रीभैरवाचे प्राचीन देवस्थान नेचरट्रेल साठी अत्यंत उपयुक्त आहे.
लेणीचा इतिहास :- चिपळूण बौध्द लेणी इसवी सन पहिल्या शतकात कोरलेली लेणी असून हि व्यापारी मार्गावर असणारी लेणी आहेत.चिपळूणजवळ असलेले खेड हे व्यापारी मार्गावर असलेले ठिकाण होते.या ठिकाणी लेण्या असून त्या हि हीनयान काळातील असून त्या चिपळूण लेण्यांशी साम्य साधणाऱ्या लेण्या आहेत. त्याच काळात चिपळूण लेण्यांची हि निर्मिती झाली असावी. चिपळूण हा प्रांत सातवाहन साम्राज्याचा एक भाग होता.नंतर क्षत्रप, राष्ट्राकृट यांचे साम्राज्य, मग मुघल,मराठे,पेशव्यांचे राज्य आले. सातवाहन काळात या ठिकाणी लेण्या कोरण्यात आल्या असाव्यत. या लेण्यांच्या बरोबरच चिपळूण-कराडमार्गावर कुंभार्ली घाटाच्या अलिकडे कोळकेवाडी इथे डोंगरावर लेण्या आहेत. तसेच अजून काही भागात लेण्या आहेत परंतु त्यांचे अद्याप संशोधन व्हायचे आहे.
लोहगडवाडी लेणीचा इतिहास :
प्राचीन काळात महाराष्ट्रात सातवाहन सम्राटांचे आधिपत्य आपणास पाहायला मिळते. जवळच असलेल्या विसापूर किल्ल्यावर वाशिष्टीपुत्र पुळूमावी यांच्या राज्यवर्षात कोसिकीपुत्र वेन्हूदत्त याने पाण्याचे टाके दान दिल्याचा उल्लेख सापडतो. हा कोसिकी पुत्र वेन्हुदत्त वाशिष्टीपुत्र पुळूमावी याचा महारठी म्हणून काम करत असल्याचे समजून येते. तसेच भाजे लेणी मध्ये देखील त्याचा उल्लेख सापडतो त्याच बरोबर कार्ला बुद्ध लेणी मध्ये हि वाशिष्टीपुत्र पुळूमावी याचा शिलालेख आढळून येतो तर गौतमीपुत्र सातकर्णी याचा शिलालेख देखील कार्ला बुद्ध लेणी मध्ये सापडतो एकूणच मावळ प्रांताचे प्राचीन नावाचा उल्लेख हि याच ठिकाणी आपणास पाहायला मिळतो प्राचीन काळातील मामाडे आहार म्हणजे आजचे मावळ आणि याचा अधिकारी अमात्य असतो प्राचीन काळी जनपद हे राजा राहत असलेले ठिकाण असे तर राष्ट हा नंतरचा विभाग आहे ज्यामध्ये अधिकारी हा राष्ट्रीक असे हा प्रदेश मोठा असल्याने भौगोलिकदृष्ट्या या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नियुक्त केले जात असत यामध्ये राष्ट्रीक हा अधिकारी असे अशी रचना हि सातवाहन कालीन विभागीय प्रशासन मध्ये पाहायला मिळते( सातवाहन कालीन महाराष्ट्र, मोरवंचीकर ) सातवाहन यांचा कालखंड इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० असा एकूण ४६० वर्षाचा कालखंड आहे. यामध्ये सातवाहनांचे ३० सम्राट होवून गेले आहेत. सातवाहन यांच्या प्रशासनातून महाराष्ट्राचा एक नवा इतिहास शिलालेखांच्या माध्यमातून उजेडात येतो. मावळ प्रांतात सातवाहन काळात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाल्याचे स्पष्ट दिसून येते मावळ प्रांतात असलेल्या लेण्या आणि अनेक प्राचीन अवशेष आपणास सहज माहिती होवून जातील असे आहेत. मावळचे आज तीन भाग आहेत आंदर मावळ नाणे मावळ आणि पवन मावळ यामध्ये आपणास जवळपास ३० पेक्षा जास्त लेणीचे समूह सापडतात काही समूह मोठे आहेत तर काही अगदीच छोटे समूह आहेत परंतु मावळातील या खोऱ्यात बौद्ध धम्माचा प्रभाव किती मोठा होता याचे हे उत्तम उदाहरणे आहेत. भाजे लेणी च्या जवळ असलेला हा लोहगड या किल्ल्यावर लेणी व पाण्याची टाकी निर्माण केल्याचे सर्वप्रथम आपणास पाहायला मिळते. लोहगड वाडी येथील हि लेणी बौद्ध काळात निर्माण झाल्याचे उदाहरण आहे. सातवाहन सम्राटांनी या महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध भिक्खुना एक सुविधा निर्माण करून दिल्या वर्षावासासाठी बौद्ध भिक्खुंच्या राहण्याची व्यवस्था म्हणजे या लेण्या आहेत. पुढे लेण्यांचा वापर व्यापारी मार्गावर असल्याने व्यापारी लोकांच्या निवासासाठी देखील केला जावू लागला व बौद्ध अध्ययनाचे केद्र देखील तयार झाले. लोहगड येथील लेणी हि याच काळातील लेणी आहेत.
लोहगडाच्या पोटात असणार्या या लोहगडवाडीच्या लेण्याचा शोध तसा अलीकडेच लागला.मात्र लोहगडाला भेट देणारे दुर्गप्रेमी आणि पर्यटक इकडे क्वचितच फिरकतात.कधीतरी एखाद्या अभ्यासकाचे पाउल इकडे वळते.मात्र हि लेणी सापडली यावरुन अजुनही काही प्राचीन ठेवा उजेडात यायचा राहीला आहे हे नक्की. वस्तुत लोहगड हा निश्चितच प्राचीन गड आहे,हे त्याच्या नजीक असलेल्या साधारण २२०० वर्ष जुन्या भाजे लेण्यावरुन सहज समजते. खुद्द लोहगडाच्या कड्यात कोरलेली हि लेणी शोधली ती १८८५ मध्ये जेम्स बर्जेसने. त्याने त्याचा उल्लेख Lists of the Antiquarian Remains in the Bombay Presidency या ग्रंथात केला. जेव्हा यासंदर्भात आणखी संशोधन झाले तेव्हा या लेण्यांचे दोन गट असल्याचे लक्षात आले.
एक गट लोहगडाच्या पुर्व कड्यात आहे तर एक लेणी समुह लोहगडाच्या विंचुकाटा माचीच्या खालच्या बाजुस उत्तर कड्यात आहे. अर्थात लोहगडाच्या माथ्यावरही लक्ष्मी कोठी आणि खजिनदाराची कोठी म्हणून ओळखली जाणारी ठिकाणे हि लेणीच आहेत.
लोहगडवाडी लेण्यांचे स्थान दाखविणरा नकाशा.
लोहगडवाडी लेण्यांपैकी पुर्व बाजुच्या लेण्यांना सहज पोहचता येते. लोहगडवाडीकडुन पायरी मार्गाने गडाकडे जाताना गणेश दरवाज्याच्या आधी मुख्य वाट उजवीकडे वळते तर डावीकडे जाणारी वाट एका कातळकड्याला लगटून साधारण ५० मीटर गेले कि हा लेणी समुह नजरेला पडतो.
या लेणी समुहात सात गुंफा असून त्या कड्यात विवीध उंचीवर कोरलेल्या आहेत.या लेण्यांच्या आत भिक्षुच्या निवासासाठी खोल्या म्हणजेच विहार खोदण्यात आले असून काही पाण्याची टाकी म्हणजेच पोढी पहायला मिळतात. सद्या आपण कड्याच्या पायथ्याशी असणार्या लेण्यांतच जाउ शकतो.
विजासन लेणी :-
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यातीलच एक महत्वपूर्ण स्थळ. वरोरा मार्गावर २७ किमी अंतरावर हे स्थान आहे. वरदविनायक, देऊळवाडा, विजासन, भद्रमंदिर, भव्य गुंफा मंदिर, भांदक किल्ला, गवराळा ही लक्षवेधी स्थाने येथे आहेत. हिंदू, बौद्ध, जैन या तिन्ही वैभवशाली खुणा भद्रावतीत आढळतात. भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडवितात.भद्रावती हे ठिकाण वर्धा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. ते तालुक्याचे शहर आहे. ते चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणावरून सव्वीस किलोमीटर अंतरावर येते. त्या ठिकाणाला तेथील अनेक पुरातन वास्तूंमुळे प्रसिद्धी मिळाली. शिवाय, ऑर्डनन्स फॅक्टरी या शस्त्रास्त्रनिर्मितीच्या कारखान्यामुळे वेगळी नवी ओळख निर्माण झाली. या गावाच्या चतु:सीमेला पूर्वेला ताडोबा जंगल, पश्चिमेला देऊरवाडा, उत्तरेला बरांज, वरोरा आणि दक्षिणेकडे लोणारा, चंद्रपूर ही गावे आहेत. भद्रावती हे ठिकाण ‘भांदक’ ह्या नावानेही ओळखले जाते. ते मध्यरेल्वे मार्गावर आहे. रेल्वेस्टेशन ‘भांदक’ या नावाने जास्त परिचयाचे आहे. भद्रावती नागपूर-चंद्रपूर या राज्य महामार्गावर (264) आहे. त्यामुळे दळणवळण दोन्ही मार्गांनी सुलभ आहे. भद्रावतीचे प्राचीन नाव 'भद्रक'. या शब्दाचा अपभ्रंश होऊन भांदक असे झाल्याची आख्यायिका आहे. भद्रावती येथे उत्खननादरम्यान सापडल्या गेलेल्या हिंदू, बौद्ध व जैन या काळांतील मूर्ती व मंदिरांचे अवशेष यांवरून तेथील समृद्ध ऐतिहासिक वारसा लक्षात येतो. गावातील नागमंदिर हे फार प्राचीन असून चवथ्या शतकातील असावे. याबाबत विशेष संशोधन होणे आवश्यक असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. भद्रनाग मंदिर:-
भांदकचे मूळ नाव भद्रक. ते ज्या मंदिरावरून पडले ते म्हणजे भद्रेश्वराचे मंदिर.रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आहे. याचे नाव भद्रेश्वर होते. यावरून हे मंदिर महादेवाचे असल्याचे सांगण्यात येते. कालांतराने, ते मंदिर पडून त्यातील शिवलिंग वगैरे नष्ट झाले. त्या ठिकाणी भद्रनाग मंदिराची वास्तू दिसते. पायऱ्यांची खोल विहीर मंदिराच्या बाजूला आहे. मंदिराला आता भद्रनाग मंदिर असे म्हणतात. त्याची स्थापना कोसल येथील पांडुवंशीय राजा उदयन याने इसवी सन ४८० ते ५०० च्या दरम्यान केली. (जनरल कनिंगहॅम यांचा आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, व्हॉल्यूम 9, पृष्ठ 135).
याच गावापासून केवळ दोन किलोमीटरवर गवराळा आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या वरदविनायक मंदिर येथे आहे.भद्रावतीच्या गणेशाला वरदविनायक असे म्हटले जाते. तो भांदक रेल्वेस्टेशनवरून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे, गवराळा टेकडीवर आहे. म्हणजे भद्रावती शहरापासून दक्षिणेकडे एक किलोमीटर अंतरावर. गवराळा टेकडीवरील वरदविनायक शिल्प उत्तरमुखी असून देवालय उत्तरमुखी आहे. मंदिराची इमारत हेमाडपंथी स्वरूपाची आहे. मंदिराच्या चार-पाच पायऱ्या उतरून खोलगट भागात गेल्यावर सुमारे सहा फूट उंचीची गणेशमूर्ती दिसते. तळघर खोलगट असल्याने मंदिर चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य (इ.स. १०८७ ते ११२६) यांच्या काळात ११०४ मध्ये बांधले गेले असावे. विजासन लेणी :- विजासन गुंफा अर्थात आवासालय भद्रावतीपासून पश्चिमेस सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे.तेथे बौद्ध लेणी आहेत. त्याला गुहा असेही म्हणतात. प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम यांनी त्या लेण्यांचा उल्लेख प्रथम केलेला आहे. हि लेणी हीनयान पंथाच्या काळात कोरलेली असुन नंतरच्या काळात महायान पंथीयांनी त्या लेणीत बुद्धांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या लेण्यामुळे भद्रावती शहराचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. या विंझासन लेण्याचा विचार केल्याखेरीज महायान पंथीय लेण्याचे विवरण पुर्ण होणार नाही.या परिसरात मौर्य, सातवाहन, पश्चिमी क्षत्रप, मुंदराज वंश, वाकाटक, नळ वंश, विष्णुकूंदी, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकुट, मान, यादव यांच्या सत्ता नांदल्या.प्रसिद्ध चिनी यात्रेकरू ह्यूएन त्सांग तेथे इसवी सनाच्या सातव्या शतकात येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो.
या लेण्यात जाण्यासाठी टेकडीवरिल एका अरुंद खिंडीतून जावे लागते. या लेण्याचा तलविन्यास ख्रिश्चन क्रुसासारखा आहे.
त्या लेण्यांत तीन दिशांना तीन बोगदे असून पूर्वमुखी बोगदा पासष्ट फूट लांबीचा असावा. तेथे दोन्ही बाजूंस मध्यम स्वरूपाचे कोनाडे आहेत. बौद्ध भिक्षूक त्यात बसून ध्यान करत असावेत (रिपोर्ट ऑफ टूर इन दी सेंट्रल प्राव्हिन्सेस इन 1873, पृ-74, 75).
मधले भव्य लेणे अंदाजे ६४ फुट बोगद्यासारखे लांब असून या लेण्याच्या दोन्ही बाजूस दोन लेण्या आहेत. पुर्व-पश्चिम मार्गिकेची रुंदी ढोबळमानाने ७.६२ मीटर आहे.
त्याच्या उत्तरेकडील भागात ( म्हणजे क्रुसाच्या आकाराच्या उत्तरेकडील भागात ) प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात उठावाचे स्तुप कोरले आहेत.या लेण्याचा दर्शनी भागावर असणार्या भिंतीवर जे तीन उठावाचे स्तुप कोरले आहेत, हे या लेण्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल. या स्तुपांना कोरताना त्यंची सर्व वैशिष्ट्य जसे मेढी, हार्मिका, छत्रावली हे दाखवले आहेत.
गर्भगृहाच्या उजव्या खांबावर शिलालेख असून त्यात कोण्या रुद्राचे नाव वाचायला मिळते. या शिलालेखातील पहिले आणि सहावे अक्षर अस्पष्ट आहे. मात्र अक्षराच्या धाटणीवरुन या शिलालेखाचा आधीचा काळ गुप्त काळातील म्हणजे ५ व्या शतकातील तर उर्वरीत भाग ७ व्या किंवा ८ व्या शतकातील असावा. हा रुद्र बहुधा यात्रेकरु असून त्याने या लेण्यांना भेट दिली असावी.
प्रवेशद्वाराने आत गेल्यावर सपाट छताचे दालन लागते. या दालनाच्या मागे टोकदार कमानीच्या आकाराचे छत असलेले दालन लागते. या दालनाच्या डावीकडे एक आणि उजवीकडे दोन खोल्या आहेत. या खोल्यामध्ये शयनकट्टे आहेत सहाजिकच या खोल्या बौध्द भिक्षुंच्या निवासासाठी वापरल्या जात असणार. इथल्या शयनकट्ट्यावर उशीचा उंचवटाही दिसतो. काही अंतर पुढे गेल्यावर गर्भगृह लागते. गर्भगृहाचे छत सपाट असून आतमध्ये आसनारुढ गौतम बुध्दांची मुर्ती दिसते.
टेकडीच्या माथ्यावर गौतम बुध्दाची मुर्ती उभी केली आहे. याशिवाय टेकडीच्या मागच्या बाजुला खडकात कोरलेली बोधीसत्वांची मुर्ती आहे.
भांदक लेणी :-
भद्रावती परिसरातच विजासन लेण्याप्रमाणेच भांदक लेणी देखील आहेत.आपण त्यांचीच माहिती घेणार आहोत. ब्रिटीश काळात संशोधक कनिंगहॅमने मध्य प्रांतातील संशोधन अहवालात भांदक येथील लेण्यांचा समावेश केला आहे. कनिंगहॅमला इथे चार लेणी आढळली. त्यापैकी विजासन लेणे वाकाटककालीन आहेत. त्याच बरोबर याठिकाणी काही ब्राम्हण शैलशिल्पे देखील आहेत. दोन शैलशिल्पे राष्ट्रकुट / कलचुरी काळातील असून ती खुद्द गावातच आहेत. इतर काही लेणी भांदकच्या दक्षिणेला दोन कि.मी. असलेल्या गौराळा या ठिकाणी आहेत. गावात असलेली दोन लेणी 'मोठा खुराडा आणि 'लहान खुराडा' या नावाने ओळखली जातात.सध्या हि दोन्ही लेणी रिकामी आहेत.पण मोठा खुराडा या नावाने ओळखली जात असलेल्या लेण्याच्या भिंतीवर शेषशायी विष्णु आणि इतर मुर्ती खोदल्या आहेत. या मुळ मुर्ती सुरवातीच्या काळात जेव्हा लेणी खोदली गेली तेव्हा नसावीत, नंतर राष्ट्रकुट काळात या मुर्ती कोरल्या असाव्यात. मोठा खुराडा हे लेणे १.०९ मीटर रुंद, १.५७ मीटर खोल आणि २.१२ मीटर उंचीचे अगदीच लहान लेणे आहे. या लेण्याला १.०९ मीटर रुंदीचा खुजा दरवाजा आहे. याच्यापुढे अर्धमंडप असावा. लेण्याच्या अंतर्भागात तिन्ही भिंतीना लागून सलग कट्टा असल्यामुळे जेमतेम दोन किंवा तीनच व्यक्ती उभ्या राहु शकतील एवढी जागा आहे. या कट्त्याला किंवा पीठाला तळाशी खुर किंवा कुंभ आणि वर वर्तुळाकार थर आहे. हे पीठ रामटेक येथे आढळलेल्या बांधीव मंदीराशी खुपच मिळतेजुळते आहे. या पीठावर मुर्ती बसवण्यासाठी एकुण आठ खाचा आहेत. त्यापैकी चार खाचा शैलगृहातील मागील भिंतीत असून बाजुच्या दोन भिंतीलगत पीठामध्ये प्रत्येकी दोन खाचा आहेत. जेव्हा कनिंगहॅमने या ठिकाणाची पहाणी केली तेव्हा याठिकाणी पाच मुर्ती होत्या. त्यात एका शिवलिंगाचाही समावेश होता.आज या सर्व खाचा रिकाम्या आहेत. या शैलगृहाच्या बाह्यांगावर दोन मुर्ती आहेत. यात एक मुर्ती हात वर केलेल्या यक्षाची तर दुसरी मुर्ती केवलनरसिंहाची आहे. या दोन्ही मुर्तींच्या शैलीचा विचार करता या दोन्ही मुर्ती वाकाटककालातील असाव्यात असे अनुमान निघते. टेकडीच्या पायथ्यापासून टेकडीच्या माथ्यावरच्या गणेश मंदीराकडे जाताना मध्येच लेणे लागते. या नवीन पायर्या लगत एक पुरुषाची मुर्ती आहे.या मुर्तीची शैलीही वाकाटककालीन वाटते. या मुर्ती तळभागात घट्ट बसवता याव्यात यासाठी खुंटा असतो. मात्र मुर्ती सिंमेटच्या पायात बसवल्याने हा खुंटा दिसत नाही. त्यामुळे या मुर्ती याच लेण्यातील आहेत कि नाही हे सांगता येत नाही. पीठाचे थर आणि देवकोष्टामध्ये असलेल्या यक्ष आणि नरसिंहाच्या मुर्तीवरुन हे लेणे इ.स. पाचव्या शतकात खोदले असावे असा अंदाज करता येतो. 'छोटा किंवा लहान खुराडा' नावाने ओळखले जाणारे लेणे आकाराने अत्यंत लहान असून त्याची लांबी १.६५ मीटर आणि रुंदी ०.९९ मीटर आहे.
भांदक येथील शैव लेणे :- भांदक गावात बदरीनाग मंदीराच्या परिसरात एक लेणे आहे. या लेण्यात प्रवेश केल्यावर १०.६७ मीटर रुंद आणि ५.५३ मीटर लांब प्रांगण लागते. हे प्रांगण पश्चिमाभिमुख असून या प्रांगणातून दोन लेण्यात जाता येते.यातीले एक लेणे प्रांगणाच्या दक्षिण बाजुला असून त्याचा आकार ४.८९ मीटर लांब व ४.७६ मीटर रुंद आहे. या लेण्याच्या मध्यभागी असलेल्या पीठाचा आकार ०.९० चौरस मीटर आहे. यावर एकेकाळी शिवलिंग असावे. प्रांगणाच्या मागील भिंतीत म्हणजे पुर्वेकडे असलेल्या लेण्याचा आकार १०.०६ मीटर रुंद आणि ३.१६ मीटर लांब आहे. या मंडपातून प्रांगणात जाण्यासाठी दोन दारे आहेत. मंडपातील देवकोष्टात लक्ष्मी आहे.मंडपाच्या मागील भिंतीत दोन खोल्या आहेत. डावीकडील खोलीत दशभुजा महिषासुरमर्दीनी आहे. तर उजवीकडील खोलीत चर्तुभुज शिव आहे. या लेण्याच्या भिंतीवर आणखी काही शिल्प आहेत.मात्र ती इतकी झीजली आहेत कि ओळखता येत नाहीत. शिल्पशैलीवरुन हि लेणी दहाव्या शतकातील आहेत असे मानले जाते.मात्र लेणी अभ्यासक बेगलरच्या मते हि लेणी इ.स. ११-१२ व्या शतकातील आहेत.
गणपती गडद
भारतातील एक हजार लेण्यापैकी जवळपास आठशे लेणी महाराष्ट्रात आहे, त्यातील सर्वाधिक लेणी जुन्नर परिसरात आहेत. शिवनेरी लेणी, तुळजा, लेण्याद्री, अंबा-अंबिका, भुतलिंग आणि नाणेघाट या लेण्यांना बरेच जण भेट देतात.याच जुन्नर परिसरात असलेल्या मात्र कल्याण -अहमदनगर मार्गावरील मुरबाड जवळील गणेश लेणी उर्फ गणपती गडद फार कमी जणांना माहिती आहे.आज आपण या लेण्यांची माहिती घेणार आहोत.
गडद म्हणजे कातळातली गुहा किंवा गुफा. गणरायाच्या नावानेच 'गणपती गडद' हे ठाणे दुर्गम जागी भटकंती करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. प्राचीन काळी कल्याण - मुरबाड - वैशाखरे - नाणेघाट असा व्यापारी मार्ग होता. छोट्या गलबतातून कल्याण बंदरात उतरणारा माल या व्यापारी मार्गाने घाटावरील बाजारपेठात जात असे. या व्यापारी मार्गावर माळशेजच्या डोंगररांगेत पळु सोनावळे गावाजवळील डोंगरात हिंदु लेणी कोरलेली आहेत.या लेण्यांच्या संकुलात १२ लेणी आहेत. यातील मुख्य लेणे दुमजली असुन त्याच्या व्दारपट्टीवर गणेश प्रतिमा कोरलेली आहे. यावरुन या लेण्यांना गणपती गडद अस नाव पडल आहे.नि:संशय ह्या ब्राम्हणी लेण्या आहेत आणि साधारणतः सातव्या शतकात खोदल्या गेल्या असाव्यात.लेण्यांमध्ये काही विशेष शिल्पकारीता नसली तरी एका लेण्यातील (जे एकमेव दुमजली लेणे आहे) महीषासुरमर्दिनीच्या मूर्तीशिवाय इतर कुठल्याही विशेष मूर्ती नाहीत. ईथे अजुन कालभैरव, गजलक्ष्मी, मातृका यांच्या पण मूर्ती होत्या. ह्या एकूण ११ लेण्या आहेत आणि पायथ्याला सोनावळे गावातून कनकवीरा नदी वाहते. अत्यंत प्राचीन आणि पुर्वापार वाहत्या असलेल्या नाणेघाट, दार्या (आंबोली घाट), अहूपे घाट ह्या व्यापारी मार्गांशी भौगोलीक जवळीक बघता पुर्वी ह्या लेण्यांचे बरेच महत्व असू शकते.. सातव्या शतकात खोदलेल्या गडद इथल्या भव्य लेण्यांद्वारे तात्कालिन संस्कृतीची ओळख होण्यासाठी मोठी मदत होते. इ.स. १८७० मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी या गडदच्या लेण्यांची नोंद घेतली.
टाहाकारीचे मंदिर
महाराष्ट्रात शैव, वैष्णव पंथांच्या खालोखाल शाक्त पंथाचा प्रसारही प्राचीन काळापासून झालेला आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी तर माहूरगडची रेणुका ही प्राचीन शक्तिस्थाने याची साक्ष देतात. याच प्राचीन मंदीरातील एक मंदीर म्हणजे टाहाकारीचे जगदंबा मंदीर. अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून ओळखला जाणा-या अकोले तालुक्यात प्राचीन व कलाकुसरयुक्त अनेक मंदिरे आहेत. अगदी प्राचीन काळापासून येथे राज्य करणाऱ्या विविध राजसत्तांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लेण्या, दुर्ग व मंदिरे यांची साखळी निर्माण केली. एकेकाळच्या व्यापारी मार्गावर बांधलेली ही मंदिरे आज आडबाजूला पडली आहेत. प्राचीन काळी व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे किल्ले बांधले गेले त्याप्रमाणे या मार्गावर मंदिरांचीही निर्मिती केली. यातील अप्रतिम कलाकुसरीची अनेक मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत. असेच एक सुंदर कातळशिल्प म्हणजे टाहाकारीचं जगदंबा मंदिर.
सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ (कसारा) घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला “कळसूबाई रांग” म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पूरातन अवंध व पट्टा किल्ल्य़ांच्या परीसराचा उल्लेख आढळतो.
रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिध्द !!
या पट्टा किल्ल्याच्या डोंगरात उगम पावणार्या आढळा नदीच्या काठावर किल्ल्यापासून २५ किमी अंतरावर ‘टाहाकारी’ हे लहानसे गाव आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुका अगदी निसर्गसमृद्ध आहे. घाटमाथ्याला लागून असल्यामुळे भरपूर पाऊस, घनदाट झाडी, दिग्गज गडकोट, भंडारदरा धरण, विविध सुंदर मंदिरे यांनी हा प्रदेश नटलेला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावातील सिद्धेश्वर मंदिर असो. ही शिल्पजडीत मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील पाषाणात केलेली कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे. याच देखण्या मंदिराच्या पंक्तीमध्ये येते टाहाकारी इथले जगदंबामाता मंदिर ! अहमदनगर जिल्हयातील, अकोले तालुक्यात येणार्या टाहाकारी गावात "जगदंबेचे " प्राचिन मंदिर आहे. मंदिर म्हटल की दंतकथा आलीच. टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे.नाशिक परीसर रामायणाशी संबंधित आहे. त्यामुळे या मंदिराची दंतकथाही रामाशी निगडीत आहे. गावकऱ्यांकडून टाहाकारी या नावाच्या उत्पत्तीबाबत दोन कथा सांगितल्या जातात. हा परिसर रामायणातील दंडकारण्याशी संबंधीत असल्याने येथील कथाही रामायणाशी संबंधित आहे. पहिली कथा म्हणजे रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामासाठी जिथे टाहो फोडला ते ठिकाण म्हणजे टाहोकरी नंतर टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले व दुसरी कथा अशी प्रभू राम सीतेचा शोध घेत या परिसरातून जात असता शिव-पार्वती आकाशातून विहार करीत होते. रामाला पत्नीसाठी विलाप करताना पाहून पार्वतीने प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचे ठरविले. कुणाचा टाहो कानावर पडली की माणसाचे मन हेलावते. ती तर आदीशक्ती, कुणा लढवैय्या पुरूषांला असे रडताना बघून ती देखिल हेलावली. 'हा कुण्या असामान्य व्यक्तीचा विलाप नाही, खुद्द राम सीतेच्या आठवणीने व्याकुळ झालेत', शिवानी समजावले तर पार्वतीला रामाची परिक्षा पाहण्याची हुक्की आली. सीतेचे रूप घेऊन पार्वती रामाला सामोरी गेली पण प्रभू रामचंद्रांनी पार्वतीला ओळखले आणि वंदन केले.
आपल्या हातून रामाची कुचेष्टा होतेय हे लक्षात येताच आदी माता खजिल झाली. मग ती आंबेच्या रूपाने गावात विराजमान झाली. तिच्या आगमनाने गावाला वैभव मिळाले. टाहोकरी, टाहाकारी जुन्या व्यापार मार्गावरचे वैभवशाली केंद्र बनले. तेथे हे जगदंबा मंदिर बांधले गेले.
जाण्यासाठी:-
१) मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्याला जाणार्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहुन टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
२) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :- मुंबई - नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर - घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदर्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदर्याला जाणार्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटी पासून टाकेद पर्यंत पोहचण्यास पाऊण तास लागतो. टाकेद गावा बाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायुने रावणाशी युध्द करुन इथेच प्राण सोडला अशी येथिल लोकांची श्रध्दा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायुचे मंदिर सुध्दा आहे. जवळच रामाने जटायुला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारुन तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणार्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अर्ध्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडी पासुन ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.
५) पुण्यातून इथे यायचे असल्यास पुणे-नाशिक रस्त्यावर संगमनेर शहर आहे.इथून अकोले या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या बस तसेच खाजगी वहातुक करणारी वाहने असतात.अकोलेच्या वायव्येला २६ कि.मी. अंतरावर टाहाकारी आहे. पुणे संगमनेर १४७ कि.मी. आहे तर संगमनेर -अकोले २४ कि.मी. आहे.
चामुंडा :
सप्तमातृकां पैकी चामुंडा एक मानली जाते. हे देवीचे क्रूर रूप आहे, व भारतभर मान्य आहे. ह्या रूपांत एक प्रकारे सर्व अमंगल, बीभत्स व भयानक वस्तूंचे सम्मेलन आहे, कारण या देवीची उत्पत्ति कौशिकी देवीच्या भृकुटीपासून संहारकार्य करण्यांकरितांच झालेली आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक कथा येतात, त्याप्रमाणे कौशिकी देवीच्या भृकुटीपासून संहार करण्यासाठी जी देवी तयार झाली ती म्हणजे चामुंडा. अग्निपुराणात चामुंडेचे विस्तृत वर्णन आले आहे. जसे शिवाचे उग्र रूप म्हणजे भैरव तसेच देवीचे उग्र रूप म्हणजे चामुंडा. आपल्याकडे पुजली जाणारी महाकाली, काली, भद्रकाली ही सगळी पार्वतीचीच उग्र रूपे आहेत.
देवीविषयीच्या श्रद्धा-परंपरांवर ‘मरकडेय पुराणा’तील ‘देवीमाहात्म्या’चा प्रभाव सर्वाधिक दिसतो. देवीच्या सध्या उपलब्ध असलेल्या अनेक चित्र-शिल्पांतून याच माहात्म्यातील कथा कथन केलेल्या दिसतात. सृष्टीच्या तीन अवस्थांचे वर्णन करणाऱ्या देवीमाहात्म्याच्या पहिल्या भागात सृष्टीचा रचनाकार ब्रह्माचा वध करण्यासाठी मधु आणि कैतभ हे दोन दैत्य निघालेले असतात. ब्रह्मा विष्णूला रक्षणाची विनंती करतो. मात्र महामायेच्या प्रभावामुळे विष्णू निद्रिस्त असतो. महामायेने आपला प्रभाव दूर करावा, यासाठी ब्रह्मा तिची आराधना करतो. विष्णू निद्रेतून जागा होतो आणि दैत्यांना पराभूत करतो. दुसऱ्या भागात पाशवी शक्तींच्या रूपात महिषासुर दाखवण्यात आला आहे. त्याचा अडथळा दूर करण्यासाठी देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात अवतीर्ण होते. तिच्या विकट हास्याने धरणी हादरते. त्यामुळे चिडलेला महिषासुर वाघ, हत्ती आणि म्हशीचे रूप घेऊन देवीवर आक्रमण करतो. तरीही देवी त्याचा वध करते. तिसरा भाग आहे शुंभ निशुंभाच्या पराभवाचा. यात असुरांनी सर्व रत्नांवर ताबा मिळवलेला असतो, मात्र सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे देवी, हे त्यांच्या लक्षात येते. असुरांना देवी मिळावी, म्हणून ते प्रयत्न सुरू करतात. युद्धात जो माझा पराभव करील, त्याला मी प्राप्त होईन, असे आवाहन देवी करते. तिला आणण्यासाठी चंड आणि मुंड या दैत्यांना पाठवण्यात येते. मात्र देवी कालीचे उग्र रूप धारण करते. तिच्या हाती छाटलेले मुंडके आणि तलवार असते. गळ्यात मानवी मुंडक्यांची माळ असते. तिची त्वचा काळसर झालेली असते. देवी त्यांना पराभूत करून अजिंक्य राहते. चंड-मुंडाला पराभूत केल्यामुळे ती चामुंडा म्हणूनही ओळखली जाते.
खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील चामुंडा
जुन्या नाण्यांवर विष्णू :
सुरुवातीपासून कुषाणकाळापर्यंतच्या सोने, चांदी व तांब्याच्या नाण्यावर शिव, सूर्य, कार्तिकेय, वगैरे तर दिसतात, पण विष्णूचे मात्र क्वचितच दर्शन घडतें पांचाल शासक विष्णुमित्र याच्या (इ.पू. १ले शतक) नाण्यांवर विष्णू आहे पण छोट्या आकाराच्या नाण्यावरील प्रतिमेचा आयुधादिकाच्या दृष्टीनें खोल अभ्यास करणें शक्य नाही. पण या उलट ऐखनूम येथे मिळालेल्या भारतीय ग्रीक राजा अँगथोक्लियस (सु. १८०-६५ ई.पू.) यांच्या नाण्यावर कृष्णबलराम स्पष्टपणे आढळतात. त्याचा विचार आपण पुढे करू. कुषाण राजा हुविष्क यांच्या एका नाण्यावर विष्णू आहे असें दिनेशचंद्र सरकारचे मत आहे, पण ते सर्वसामान्य नाही. पण याच काळातील एका दुसऱ्या तांब्याच्या शिक्यावर स्पष्टपणें एक सुंदर विष्णू आहे. त्यांच्या खालच्या उजव्या हातांत गदा, वरील हातांत एक गोल वस्तू, वर डावीकडे शंख (?) आणि खालच्या हातांत चक्र आहे. विष्णूचें शरीर चांगले गुटगुटीत असून त्याच्या समोर मुकुट घातलेला एक पुरुष हात जोडून उभा आहे. कुषाण राज्याच्या नाण्यांवर विष्णू नाही. गुप्तांच्या नाण्यांवर गरुड, गरुडध्वज हे तर दिसतात पण प्रत्यक्ष विष्णु फक्त 'चक्रविक्रम' प्रकारच्या नाण्यांवर आहे.
कुषाणकाळातील नाण्यावर असलेला विष्णु
भारतीय ग्रीक राजा अँगथोक्लियस (सु. १८०-६५ ई.पू.) यांच्या नाण्यावर कृष्णबलराम
वैकुण्ठ : -
वर उल्लेखिलेल्या 'एकव्यूहश्चतुर्वक्त्रः' मूर्तीचा दुसरा प्रकार म्हणजे चतुर्भुज विष्णूंच्या तीन किंवा प्रसंगी चार तोंडे असलेल्या प्रतिमा होत. यांत मुख्य मुख मानवाचे अर्थात वासुदेवाचे असून डावीकडील तोंड सिंहाचे व उजवीकडील वराहाचे असते . कचित या दोन्ही मुखांचा क्रम उलटतो. चौथे मुख गुप्तकाळांत दिसत नाही, मात्र कधी कधी वासुदेवाच्या मुखांवर अश्वमुख असलेली आवक्षमूर्ती दिसते. वाङ्मयाचा आधार घेऊन असे सिद्ध करतां येते की सिंह हा संकर्षणांचे वराह प्रद्युम्नाचे व अश्वमुख पुरुष अनिरूद्धाचे प्रतीक मानले जात असे." सिंह, मानव व वराह मुखें असलेल्या अशा प्रतिमा 'वैकुण्ठ' या नांवाने ओळखल्या जातात. यांचा प्रचार कुषाण काळांत असावा असे दिसत नाही. मथुरेच्या गुप्तकर्लेत त्याचा उदय झाला व पुढे त्यांनी संपूर्ण उत्तर हिंदुस्थान व्यापिले. हे कथासूत्र पुढे येईलच. गुप्तकाळांत वैकुण्ठ मूर्तीच्या हातांची संख्या साधारणपणे फारच कमी होती. मात्र ती पुढे वाढली.
वैकुंठ विष्णु
गुप्तकाळांतही 'वैकुंठा'चा बराच प्रचार असला पाहिजे. विष्णुधर्मोत्तर पुराणांत त्याचे विस्तृत वर्णन मिळते.** त्याप्रमाणें वैकुण्ठाला मनुष्य, वराह, कपिल किंवा स्त्री अशी चार तोंडे असून हात मात्र आठ असतात. ही मुखें क्रमानें ज्ञान, शक्ती, ऐश्वर्य व बल या गुणांचे प्रतिनिधित्व करतात.
मत्स्यावतार :-
मत्स्यावतार हा पहिला अवतार मानला जातो.। अवताराची मंदिरे मात्र आढळत नाहीत. याची पहिली कथा शतपथ ब्राह्मण ग्रंथात येते. हस्त प्रक्षालन काळ मनूच्या हातात एक छोटा मासा पडतो. तो त्य वाचवण्याची विनंती मनूला करतो. त्याच्या बदल्यात प्रलयकाळी वाचवायचे वचनही देतो. जसजसा तो मासा मोठा होऊ लागतो तसा मनू त्याला मोठ्या भांड्यात ठेवत जसे मग तो टाक्यातही मावेनासा होतो तेव्हा त्याला तो समुद्र नेऊन सोडतो. तो देवमाशाएवढा मोठा होतो. त्याचे नाव झ्द. तो महाकाय मासा मनूला एक मोठे जहाज बांधायला सांग आणि पुढे होणाऱ्या प्रलयाची अचूक वेळही सांगून ठेवतो. त्याच वेळेस नंतर प्रलय होतो आणि सर्व पृथ्वी जलमय होते. मनू सर्व मानवांना आणि प्राणिमात्रांना बरोबर घेऊन त्यात चढतो आणि ते जहाज माशाला दोराने बांधतो. तो मासा ते जहाज ओढत नेऊन उत्तर दिशेला असणाऱ्या ऊंच डोंगरामा सुरक्षित स्थळी सोडतो. अशा त-हेने विष्णूने मत्स्य रूप धारण करून प्रलयात बुडालेल्या पृथ्वीवरील जीवांना वाचवले.
कूर्मावतार :-
अथर्व बेद, शतपथ ब्राह्मण, वाजसेनीय संहिता इत्यादी ग्रंथांमध्ये कश्यप किंवा कूर्म या नावांचे त्याचा उल्लेख येतो. परंतु इथे विष्णूचा अवतार म्हणून नाही तर ब्रह्मांड, सूर्य किंवा काल असा संदर्भ दिसतो, रामायण आणि महाभारतात समुद्रमंथनाची कथा येते. भागवत पुराणात हीच कथा तपशिलासह दिली आहे. सागराचे मंथन केल्यास त्यातून अमृत मिळू शकेल असे ब्रह्मदेवाने सांगितले हे एकट्या देवांना शक्य नव्हते म्हणून त्यांनी दैत्यराज बळीला मदतीचे आवाहन केले. अमृतप्राप्तीसा तोही तयार झाला. मंदर पर्वताची रवी केली त्याभोवती बासुकी नागाची दोरी गुंडाळली. मंदार पर्वत व जड असल्यामुळे तो बुडू लागला तेव्हा श्रीविष्णूने कूर्माचे रूप घेऊन समुद्रात बुडी मारली आणि महाकाय रवीला आधार दिला. त्या मंथनातून अनेक रत्ने निघाली आणि शेवटी अमृतकलश प्रकटला. देवांनी त्यातील अमृतं दानवांना द्यायला नकार दिला. तेव्हा दानवांनी तो पळवला. मग विष्णूने मोहिनी रूप घेऊन तो परत मिळवला. पूर्ण कूर्म, अर्ध कूर्म आणि कमरेपासून बर पुरुष रूपातील विष्णू, किंवा समुद्रमंथनात मध्यभागी असे या अवताराचे दर्शन मंदिरांमधील शिल्पात किंवा शिल्पपटात होते. तसेच मोहिनीराज रूपातील विष्णूचे मंदिरही आहे.
कुर्मवतार शिल्प
मंदीर पहावे कसे ?
एखादं मंदिर बघताना, त्यावर कोरलेली अद्भुत शिल्पं समजून घेताना आपली दृष्टी तर दिपून जातेच; पण मंदिर भाविकाना एक आत्मिक समाधानही देतं. ‘भारतीय कलेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे रसनिष्पत्ती. ही रसनिष्पत्ती दोन्ही बाजूंनी असावी लागते, म्हणजे एखादी कलाकृती निर्माण करताना त्या कलाकाराला स्वतःला रसानुभूती व्हावी लागते आणि त्या कलाकृतीचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजे रसिकालाही त्याच रसाची अनुभूती व्हावी लागते तरच त्या कलाकृतीमागचं प्रयोजन सिद्ध होतं,’ असं भारतीय सौंदर्यशास्त्राचे थोर अभ्यासक आनंद कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्थापत्यशास्त्राचंही हेच वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कलेचा आस्वाद घेणं ही अत्यंत एकाग्र होऊन करायची क्रिया आहे, मग मंदिरस्थापत्य तरी त्याला अपवाद कसं असेल? पण या निरामय आस्वादासाठी रसिकाचं मन भाविक तर असलं पाहिजेच; पण त्याचबरोबर संस्कारितही असलं पाहिजे. भारतात दगड, विटा, लाकूड, चुना, इत्यादींच्या सहाय्याने मंदिरनिर्मिती केलेली आढळून येते. अनेकदा मंदिराचा मुख्य भाग दगडात तर शिखर विटांमध्ये बांधल्याचे दिसून येते. संपूर्णपणे विटांनी बांधलेले भितरगाव (उत्तर प्रदेश) येथील गुप्तकाळातील मंदिर अजूनही पंधराशे वर्षे उभे आहे. तर महाराष्ट्रात तेर या गावातील उत्तरेश्वर आणि कालेश्वर ही प्राचीन मंदिरे संपूर्णपणे विटांनी बांधलेली आहे. या दगड–विटांनी बांधलेल्या मंदिरांवर शंखपूड, चुना इत्यादींच्या मिश्रणाने तयार केलेला लेप दिला जात असे. तसेच विटांच्या मंदिरांवर याच मिश्रणातून तयार केलेल्या मूर्तीदेखील बाह्यभिंतींवर लावल्या जात असत. गुप्तकाळातील मंदिरांचे स्वरूप अगदी साधे म्हणजे चौकोनी गर्भगृह (गाभारा) आणि असल्यास त्यापुढे छोटासा दोन खांबांचा मंडप असे होते. मंदिरस्थापत्यातली प्रत्येक बारीकसारीक गोष्ट आपल्याला काहीतरी संदेश देण्यासाठी किंवा काहीतरी शिकवण्यासाठी विचारपूर्वक घडवलेली असते. उदाहरणच द्यायचं झालं तर, मंदिराची जगती किंवा जोतं हे सहसा आजूबाजूच्या जमिनीच्या समतलापासून चांगलंच वर धरलं जातं. काही पायऱ्या चढूनच आपल्याला मंदिरात प्रवेश करता येतो. आपल्या मर्त्य जीवनाच्या पातळीपेक्षा देवाची पातळी वरची आणि म्हणूनच देवदर्शनाला जाताना आपणही स्वतःची आध्यात्मिक पातळी वाढवून स्वतःला त्यायोग्य करावं हा त्यामागचा विचार. खजुराहोमधल्या लक्ष्मणमंदिराचं जोतं प्रचंड उंच आहे. बऱ्याच मंदिरांमध्ये बाह्य भिंतीवर आकर्षक विभ्रम असणाऱ्या सुंदर स्त्रियांची शिल्पं असतात. त्यांना ‘सुरसुंदरी’ किंवा ‘शालभंजिका’ असं म्हटलं जातं. काही मंदिरांच्या बाह्य भिंतींवर मैथुनशिल्पं असतात. ही सर्व शिल्पं म्हणजे मानवाच्या भौतिक आयुष्याचं प्रतीक आहेत. मानवी आयुष्यातले काम, लोभ आदी विकार हे अशा प्रतीकांच्या रूपानं मंदिराच्या बाहेरच्या भागावर दाखवले जातात. ते सर्व विकार बाहेर ठेवून भक्तानं ईश्वराच्या ठाई चित्त ठेवून मंदिरात प्रवेश करावा असा धर्मविचार यामागं होता, म्हणूनच गर्भगृहाच्या द्वारशाखेवर दोन्ही बाजूंना गंगा-यमुना असतात. गंगा ही पावित्र्याचं प्रतीक आणि यमुना ही भक्तीचं. मनातले सर्व क्षुद्र विकार मंदिराबाहेर सोडून भक्तानं पवित्र मनानं देवाच्या दर्शनाला भक्तिपूर्वक यावं हेच जणू त्या गंगा-यमुना भक्तांना सांगत असतात. साधारणतः पूर्ण विकसित मंदिरस्थापत्यामध्ये मंदिराचे चार भाग असतात, मुख्य आराध्यदेवतेची प्रतिष्ठापना असलेलं गर्भगृह आणि त्यावरचं शिखर हे दोन्ही मिळून मंदिराचं विमान बनतं. अंतराळ म्हणजे मंदिराचा मुख्य मंडप आणि गर्भगृह या दोहोंमधली चिंचोळी जागा. भाविकानं मुख्य मंडपात संगीत, नृत्य आदी कलांचा आस्वाद घेतल्यानंतर गर्भगृहाकडे वळताना या अंतराळात घटकाभर थांबून चित्त एकाग्र करायचं असतं. मंडप म्हणजे गर्भगृहापुढं असलेलं मंदिराचं मुख्य दालन. हे बहुधा अनेक स्तंभांवर तोलून धरलेलं असतं आणि प्रदक्षिणापथ हा बहुधा जुन्या मंदिरांमध्ये मुख्य मंदिराच्या बाहेर असतो. मंदिरात दर्शनाला आलेल्या भक्तानं आधी मंदिराचं चोहोअंगानी बाह्य दर्शन घ्यावं, मंदिराचं प्रयोजन समजून घ्यावं आणि मगच आत प्रवेश करावा हा त्यामागचा विचार. कुठल्याही परिपूर्ण मंदिराची - मग ते मोठं असो वा छोटं - सहसा गर्भगृह, त्यापुढं अनेक स्तंभांवर तोलून धरलेला सभामंडप, गर्भगृह आणि सभामंडप यांना जोडणाऱ्या छोट्या जागेत अंतराळ आणि मुख्य मंडपाबाहेर छोटा मुखमंडप अशी आडवी रचना असते. उभ्या रचनेचा विचार केला तर गर्भगृहाच्या वर मंदिराचं निमुळतं होत जाणारं उंच शिखर असतं. गर्भगृहासमोरील मंडपांवर एक तर सपाट छत असतं किंवा शिखर असलंच तर ते मुख्य शिखरापेक्षा साधारण निम्म्या उंचीचं असतं. त्यामुळे मंदिर आणि त्याचं उंच शिखर हे भाविकांना हिमालयाच्या एखाद्या उंच पर्वताप्रमाणे भासतं. मंदिर हा पृथ्वीतलावरील देवांचा प्रासाद असल्यामुळे मंदिराची वास्तू बघताना भाविकांना त्यात देवांचा निवास असलेल्या मेरूपर्वताचा किंवा भगवान शिवांचा वास असलेल्या कैलासपर्वताची प्रतिकृती दिसावी हा त्यामागचा धर्मविचार आहे.
मंदिर स्थापत्याचा विकास काळाप्रमाणे होत गेला. पूर्वी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मुर्तीची स्थापना केली जात असे, यालाच गुहा मंदिर म्हणतात. मुर्ती ही पुजनीय असल्यामुळे त्यासाठी पवित्र वास्तूची निर्मिती झाली पाहिजे अशी भावना हळुहळू समाजामध्ये विकसित होत गेली. तेव्हांची मंदिरांची रचना ही एखाद्या सर्वसामान्य घरासारखी होती. गुप्तकालिन मंदिर ही एक खोली व तिच्या पुढिल लहानसा सोपा म्हणजे व्हरांडा अशी होती. यथावकाश भक्तीचा प्रभाव वाढत गेला त्यातच "तत्वज्ञान नि अध्यात्म" यांचा विचारही महत्वाचा ठरला. त्यामुळे स्थापतींना अशी जाणीव झाली की, सामान्य घरांपेक्षा मंदिर ही वेगळी असली पाहिजेत आणि हळुहळू मंदिरांच्या रचनेत बदल होत गेला. खोलीवजा घराच रुपांतर कळस, सभामंडप, मुखमंडप, इत्यादी घटकांनी युक्त स्थापत्यात झाले. मंदिरांच्या वास्तू्चे स्वरुपही बदलायला लागले, त्याचे एक कारण म्हणजे त्याच्यातून प्रतिष्ठापित केल्या जाणार्या मुर्तीचे शास्त्र ही काळानुसार प्रगत होत गेले. भारतीय तत्वज्ञान आणि धर्मशास्त्र यांचे साकार रुप म्हणजे "मुर्ती'. जसा या सकल्पनेचा विस्तार वाढत गेला तसा मंदिरांच्या वास्तूत आमुलाग्र बदल होत गेला. "देवघर' व्यक्ती वा कुटुंबासाठी तर 'मंदिर' समूहासाठीच झाले. त्यामुळे सहाजिकपणे सभामंडापाचा आकार वाढला. भक्तांची संख्या वाढली तशी प्रवेशद्वारांची संख्या सुध्दा वाढली. एका ऎवजी मंडपाच्या तीन बाजूंना तीन दरवाजे तयार करण्यात येऊ लागले. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण १८ विभाग कार्यरत असत. तेथे पाठशाळा चालत, त्यांच्या प्रांगणात व आजुबाजूला बाजार भरे, गाभार्यातीला देवदेवतांच्या सन्मुख राहून मंडपाच्या मध्यभागी प्रवचन, किर्तन, भजन, गायन वादन, नर्तन केले जावे अशी योजना केली गेली. या प्रकारच्या सेवेला "रंगभोग" म्हणतात. मंडपाच्या मध्यभागी असणार्या शिळेला "रंगशिळा" त्यामुळेच म्हणतात. मंदिरातील १८ विभाग खालील प्रमाणे आहेत. 1)वास्तुकला 2) चित्रकला 3) शिल्पकला 4) किर्तन 5) नृत्यकला 6) धर्मसभा 7) धर्मविवेचन 8) संगीत 9) आयुर्वेदीक वनस्पती 10) गोशाळा 11) अतिथीगृह 12) धर्मकार्ये 13) प्राणिसंग्रह 14) ध्यानमंदिर 15) खलबत खाना 16) ग्रंथालय 17) अनाथ बालसंगोपन 18) पाठशाळा. मंदिराचा मुख्य भाग म्हणजे गर्भगृह (गाभारा). हा जाड भिंतींचा, चौकोनी असतो जिथे शिविलग किंवा मुख्य देवतेची मूर्ती स्थापन केलेली असते. प्रासाद किंवा मंदिर हे या गर्भगृहाचे कवच असते त्यामुळे अनेकदा प्राचीन मंदिरांची पुनर्बाधणी झाली तरी गाभारा हा मूळचाच ठेवलेला असतो. या गर्भगृहाच्या वरील बाजूला प्रमाणबद्ध शिखर असते. मंदिरात गर्भगृह, त्यापुढील छोटय़ाशा जागेत अंतराळ, पुढे मंडप अशी आडवी रचना असते तर गर्भगृहाच्या वरच्या बाजूला शिखर असते. गर्भगृहाच्या पुढे असणाऱ्या मंडपांवर शिखरे असली तरी ती गर्भगृहावरील शिखरापेक्षा कमी उंचीची असतात. मंदिर आणि मंदिराचे शिखर हे लांबून बघितल्यावर एखाद्या पर्वताप्रमाणे भासते अशी कल्पना केलेली आहे. इ. स. सहाव्या शतकात वराहमिहिराने लिहिलेल्या बृहत्संहिता या ग्रंथात तसेच मत्स्यपुराणात विविध प्रासादांचे प्रकार सांगताना त्यासाठी मेरू, मंदार आणि कैलास अशी पर्वतांची नावेही वापरली आहेत. मेरू पर्वत हा पृथ्वीचे नाभिस्थान आहे, मंदार पर्वत हा सागरमंथनात सागर घुसळण्यासाठी कूर्माच्या पाठीवर ठेवला होता, तर कैलास पर्वतावर शंकराचा निवास असतो अशा प्राचीन भारतीय संकल्पना आहेत. त्यामुळे भारतीय मंदिर हे अनेकदा पर्वताप्रमाणे विशेषत: मेरू पर्वताप्रमाणे पृथ्वीचा मध्य असल्याचे दाखले दिले जातात. गर्भगृहात जिथे शिविलग किंवा मूर्ती स्थापन केलेली असते त्यावरच मुख्य शिखर असते. ही मूर्ती अथवा शिविलग ज्या पीठावर स्थापन केलेले असते त्या पीठाच्या केंद्रिबदूपासून ते शिखराच्या अखेरच्या टोकापर्यंतच्या बिंदूपर्यंतची अदृश्य रेखा त्या मंदिराचा अक्ष मानला जातो. मंदिराच्या शिखराच्या केंद्रिबदूपासून ती रेषा अनंतात एका बिंदूपर्यंत जाऊन भिडते. ही गर्भगृहातील मूर्तीखालील केंद्रिबदूपासून निघणारी आणि अनंतातील एका बिंदूला जाऊन भिडणारा हा अक्ष हाच जगाचा किंवा विश्वाचा मध्य आहे असे त्या मंदिरापुरते मानले जाते. याच संकल्पनेने ते मंदिर मेरू पर्वताची प्रतिकृती बनते. ही संकल्पना भारतात वापरली गेलीच; पण भारताबाहेर भारतीय संस्कृतीचा प्रसार झाल्यावर आग्नेय आशियात निर्माण झालेल्या मंदिरांमध्येदेखील वापरली गेली. त्यामुळेच कंबोडियातील मंदिरांमध्ये विशेषत: अंकोरवट या मंदिरामध्ये ती विशेषकरून पाहायला मिळते. तंजावर येथील बृहदीश्वर या शिव मंदिराला ‘दक्षिणमेरू’ असे का म्हटले आहे ते या स्पष्टीकरणावरून लक्षात येते.
मंडोवर :- मंदिराची बाह्यभिंत. गाभारा तसेच बाहेरील विविध मंडप यांच्या बाह्य भिंतीला मंडोवर किंवा मसूरक म्हणतात. खोली बंदिस्त करणे ही महत्वाची गोष्ट. पण आणखी दोन उपयोग म्हणजे सुशोभन आणि छपराला आधार देणे. या भिंती इतक्या मजबूत असतात कि त्या प्रचंड मोठ्या छताला आधार देऊ शकतील त्याच सोबत त्या इतक्या अलंकृत असू शकतात कि पाहणाऱ्याला भिंतीचा मूळ उद्देश छताला आधार देण्याचा आहे हेच विसरायला होईल. या भिंतींवर देव दैवतांची अनेक रूपांतील शिल्पे तसेच मानवाकृती शिल्पांच्या पट्टीका असतात, त्यांना जंघा म्हणतात. या जंघांवर मंदिराच्या मूळ देवतेची रूपे तसेच देवतेच्या परिवारातील इतर देवतांची शिल्पे, विचिध विभ्रमांतील नर तसेच स्त्री प्रतिमा असतात. काही मंदिरांच्या मंडोवरावर इतक्या मूर्ती असतात कि भिंतीचा इंचभरचा भागही दिसत नाही. एक जंघा पट्टीका कमी पडते कि काय म्हणून काही मंदिरांचे स्थपती दोन किंवा तीन तीनही जंघा मंडोवरावर वसवतात. जसे अंबरनाथच्या मंदिराचे मंडोवर हे एकजंघा मंडोवर आहे कारण मंदिरावर एकाच जंघा पट्टीका आहे, मात्र खिद्रापूरच्या मंदिरात तसेच औंढा नागनाथ मंदिरात द्विजंघा मंडोवर आढळते आणि मार्कंडी येथील मार्कंडेश्वर मंदिरात तसेच खजुराहोच्या मंदिरांचे मंडोवर तर त्रिजंघा युक्त आहेत. तिगवाच्या देवळाच्या भिंती साध्या आहेत. छपराला आधार देणे हे महत्वाचे काम. पण पुढे सुशोभन एवढे महत्वाचे झाले की हळेबिड-बेलूर येथील देवळांच्या भिंती दिसतच नाहित. दिसतात मूर्ती, मूर्ती आणि परत मूर्तीच. हां,भिंती छपराला आधार देतात, पण जणू नाइलाजाने. अंगभर दागिने घालून,रेशमी शालू नेसून, सुहास्य वदनाने पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या वधूमातेने थोडा वेळ नवर्याबरोबर कन्यादानाला बसावे तसे! लक्षात राहते ती पहिली प्रतिमा, दुसरी नव्हे. खरे म्हणजे या भिंती चांगल्या जाडजूड असतात. मोठे वजन पेलण्याकरताच त्यांची योजना असते. शिवाय सुरवातीच्या गिरिशिल्पात, थोडक्यात गुहेत, गेल्यावर जसे गार व काळोखलेले वाटेल तसे वाटावे हीही एक मनोकामना होती.( प्राग-ऐतिहासिक काळात उघड्यापेक्षा गुहेत माणसाला जास्त सुरक्षित वाटत असावे. त्याचा तर हा परिणाम नाही ना?) . माणूस नवे निर्माण करतांना " जूने जाऊ द्या मरणालागूनी" असे फ़ार वेळी म्हणत नाही. मागच्यातले चांगले घेऊन त्यात भर घातली जाते. मग ते शास्त्र असो, कला असो, सामाजिक नीतीनियम असोत. अजूनही घरातील देवघर भगभगित उजेडात नसते व तेथे विजेच्या दिव्यापेक्षा समई-पणती जास्त बरी वाटते. असो. या भिंतीना आतील व विशेषत: बाहेरच्या बाजूंनी नटवतांना निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. रथ, थर, देवादिकांच्या मूर्ती, रामायण-महाभारतातील कथा, रुपके, फ़ुले-वेली, मिथूने, जे जे कलाकाराला योग्य वाटेल, त्याचा उपयोग केला गेला आहे. नंतरच्या काळात या भिंती शक्यतो एका सरळ रेषेत येत नाहीत ना इकडे लक्ष दिले गेले. बघणाऱ्याची नजर सावकाशपणे फ़िरेल,
गर्भगृहआणित्याचेप्रवेशद्वार:-
वरती म्हटल्याप्रमाणेच मंदिरांचे निर्माणच मुळी देवतेच्या स्थापनेसाठी झाले, त्यामुळे, सर्वात आधीच्या मंदिरापासून ते आजच्या मंदिरांपर्यंत सगळ्याच मंदिरांत जी एक सामायिक गोष्ट सापडते ती म्हणजे गाभारा किंवा गर्भगृह. तेव्हापासून आतापर्यंत आणि कोणत्याही प्रकारच्या मंदिरात गाभारा असतोही लहानसाच. मंदिराचे स्थपती सहाव्या शतकातल्या मंदिरांतही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराला सालंकृत करत होते. जसा जसा काळ पुढे सरकत गेला गर्भगृहाच्या द्वारपट्टीका अजून अजून सुंदर बनत गेल्या. द्वारशाखा म्हणजे प्रवेश करावयाची जागा.कडी-कोयंडा-कुलुप लावून बंद करावयाचा घराचा दरवाजा नव्हे. बऱ्याच ठिकाणी बंद करावयाचा दरवाजा नसतोच. द्वारशाखा समोरून तसेच बाजूंनीही असातात. चौकट एक असते किंवा अनेक. काही वेळा चौकट नसतेही. दोन बाजूंच्या भिंतीच ते काम करतात. चौकट (किंवा चौकटी) करावयास व सुशोभनास सोप्या. दोनही बाजूला गंगा-यमुना किंवा द्वारपाल उभे केले की एकदम उठाव येतो. रुंदी व उंची आटोपशीर असल्याने नाजूक कोरीव कामास आदर्श. नीट निरीक्षण केल्यास गाभाऱ्याच्या दरवाजात लहान लहान द्वारशाखा बनवून त्यावर फुले पाने, व्याल, गज, स्तंभ, गंधर्व तसेच मिथुन शिल्पे कोरलेली आढळतात. काही मंदिरामध्ये तर या द्वारशाखेचे नऊ नऊ थरही आहेत. तसेच या द्वारशाखांच्या तळाशी दोन्ही बाजूला द्वारपाल आणि गंगा तसेच यमुना यांची शिल्पे असतात. गर्भगृह प्रवेशद्वाराच्यावरच्या पट्टिकेला ललाटपट्टी आणि त्याच्या मध्यभागाला ललाटबिंदू म्हणतात. या ललाटबिंदूंमधे मंदिराच्या मुख्य देवतेचे शिल्प असते मात्र ११व्या शतकानंतर ललाटबिंदूंमधे गणेशाला स्थान मिळाले मग मंदिर कोणत्याही देवतेचे असले तरीही. देवळात प्रवेश करण्या आधीच तुमचे मन उल्हसित होऊन जाते. या पुढे जेंव्हा कुठल्याही देवळाला भेट द्याल तेंव्हा दारापाशी थांबा.दोन्ही बाजूचे द्वारपाल बघा. चौकट एक आहे की अनेक आहेत, त्यांवर वेल-पताकांचे न्क्षीकाम आहे की लहान मूर्ती आहेत, वरपर्यंत एकच थर आहे की अनेक, अनेक असतील तर त्यांत काही योजना दिसते का, वरची गणेशपट्टी दरवाजाच्या किती बाहेर गेली आहे, त्यावरील कोरीव काम कसे आहे, वर कीर्तिमुख वगैरे काय काय आहे हे सर्व बघून मगच आत पाऊल टाका.
.
गर्भगृह प्रवेशद्वार
म्यानातून उसळे तलवारीची पात
ई.स. १६७४. राजधानी रायगडावर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची तयारी चाललेली, सगळीकडे निमंत्रणे गेलेली. अगदी कट्टर शत्रु ईंग्रजानही निमंत्रण पोहचले होते, पण खुद्द स्वराज्याच्या एका मानकर्याला मात्र या सोहळ्याला यावयाची परवानगी नव्हती, कोण हा शिलेदार ? हे होते स्वराज्याचे सरनौबत कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर. स्वराज्याच्या एका डुख धरलेल्या नागाला, बहलोलखानाला त्यांनी हाती गवसलेला, असताना, जतजवळील उमराणीजवळ धर्मवाट दिली. हाती आलेला शत्रु, गवसलेला नाग आणि न विझलेली आग या तीनही गोष्टी अर्धवट दुर्लक्षित करायच्या नाहीत, हे शिवाजी महारांजांचे धोरण विसरण्याची चुक या मानकर्याकडून झाली होती. उंबरखिंडीतील कारतलबखान आणि रायबाघनचा अपवाद सोडला तर, स्वता महाराजानी शत्रुला कधीही जिवंत परत जाउ दिले नाही. आता बहलोलखान स्वराज्यावर चालून येणार हि अटकळ महाराजांनी बांधली व त्याचे पारिपत्य होत नाही तोपर्यंत रायगडावर तोंडही न दाखविण्याचे प्रतापरावांना सांगितले. अपेक्षेप्रमाणे बहलोलखान गडहिंग्लजमार्गे कोल्हापूर प्रांतात शिरायची तयारी करु लागला. त्याची छावणी नेसरीजवळ आहे हि खबर प्रतापरावाना लागली आणि लगोलग ते उठले आणि त्यांना डोळ्यासमोर फक्त बहलोल खान दिसू लागला, घोड्यावर मांड ठोकून ते वार्याच्या वेगाने बहलोलखानावर निघाले. आपला सरदार निघालाय हे पाहून त्यांच्या बरोबर विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर, विठोजी आणि सिध्दी हिलाल हे सरदार पाठोपाठ निघाले. यावेळी त्यांच्याकडे १२०० ची फौज होती, पण केवळ सुड डोक्यात थैमान घालत असल्याने योग्य संधीची वाट पहावी व खानाला कापून काढावे ईतकेही भान प्रतावरावांना राहिले नाही. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त महाराज असावेत. तुफान वेगाने सात घोडेस्वार १५००० हशमांच्या गर्दीत शिरले आणि बघता बघता नाहीसे झाले. पंतगाने ज्योतीवर झेप घ्यावी असे झाले. एन महाशिवरात्रीला ( २४ फेब्रुवारी १६७४) अजून एक खिंड रक्ताने न्हावून निघाली आणि पवित्र झाली.
किल्ले म्हणले कि बहुतेकदा ईतिहासाचा आणि एतिहासिक गोष्टींचा संदर्भ येतो. पण काही किल्ल्यांचा संदर्भ वर्तमानातल्याच वेगळ्याच गोष्टीशी येतो आणि आपल्याही थक्क करणारी माहिती सामोरी येते. असाच एक किल्ला म्हणजे चंदगडजवळचा कलानिधीगड. थोडेसे काव्यात्मक नाव असलेल्या ह्या किल्ल्याला साहित्यिक संदर्भ आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्टीकर या नावाने ओळखले जाई, म्हणूनच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत. गणगोत या पु.लं.च्या पुस्तकात तुम्ही हा संदर्भ पाहु शकता.
सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.
माथ्यावर असलेला टॉवर व एकून आकार पाहून आपल्याला सिंहगडाची आठवण होते. जणु त्याची छोटी प्रतिकॄतीच. ज्याने कोणी "कलानिधीगड" हे कलात्मक नाव दिलय त्याच्या रसिकतेला खरच मुजरा !
पेमगिरी उर्फ शहागड
पेमगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमगड किंवा शाहगड इ.स.१२ व्या शतकात यादव राजांनी बांधला. मुर्तजा निजामशहा म्हणजेच बादशहा या किल्ल्यावर वास्तव्यास असल्याने या गडाला शहागड असे नाव पडले तर बखरीमध्ये पेमगिरीचा उल्लेख भीमगड या नावाने येतो पण पेमगिरी किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला तो शहाजीराजांच्या पराक्रमामुळे. गडाचा इतिहास पाहिला असता निजामशाही बुडविण्यासाठी खुद्द शहाजहान दक्षिणेत उतरला होता. त्यासाठी महाबतखान आणि त्याचा मुलगा खानजमान दौलताबाद किल्यावर चालून आले. शहाजहान या मोहिमेवर असताना मुमताजमहलचा बुऱ्हाणपूरला मृत्यू झाल्याने तो तिकडे गेला. १ मार्च १६३३ रोजी महाबतखानाने निजामशहाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा दिला आणि १७ जून १६३३ रोजी दौलताबाद मोगलांनी जिंकले. निजाम हुसेनशहा आणि त्याचा वजीर फत्तेखान दोघेही कैदेत पडले. त्यावेळी शहाजीराजे निजामशहाकडे सरदार होते. या लढाईत शहाजीराजांनी व निजामशाहीच्या सर्व सरदारांनी दौलताबाद लढवण्याची शिकस्त केली पण पराभव झाला. मराठा सत्ता स्थापण्याची ही संधी साधुन शहाजीराजांनी आदिलशाहीतील मुरार जगदेव या सरदाराच्या मदतीने जुन्नर जवळील जीवधन किल्यामधून कैदेत असलेला निजामशाहीचा तीन वर्षांचा दुसरा वारस मुर्तजा निजाम याची सुटका करून पेमगिरी किल्यावर आणले आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी महाराज निजामशहाचे वजीर झाले. शहाजीराजांनी मुर्तजा निजामशहाला स्वतःच्या मांडीवर बसवून पेमगिरीच्या गडावरून ३ वर्ष राज्यकारभार केला. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य असावे ही यामागे भावना होती. पुढे मोगलांनी आदिलशाही बरोबर तह करून निजामशाहीवर चाल केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैन्याशी शहाजीराजानी ६ मे १६३६ ला तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली. त्यामुळे शहाजी राजांचा हा स्वराज्याचा प्रयत्न असफल ठरला. फुतुहाते आलमगिरीत दिलेल्या माहितीप्रमाणे "मोगल सरदार बहरामंदखान याने पेमगडास वेढा घातला. वेढा दोन महिने वीस दिवस चालला होता. वेढा उठविण्यासाठी मराठ्यांची फौज मोगलावर बाहेरुन हल्ला करीत होते. किल्लेदार अंबोजी याने मोगलांवर हल्ला केला. तोफांच्या मार्यामुळे किल्ल्याचे बुरुज ढासळले. किल्लेदार शरण आला. किल्ला मोगलांनी घेतला. त्यावर मीर नेमत याची नेमणुक करण्यात आली." ,मराठ्यांच्या ताब्यातील हा पेमगड म्हणजे पेमगिरी असेल असे वाटते, कारण मराठ्यांच्या ताब्यात दुसरा कोणता पेमगड महाराष्ट्रात नव्हता. शिवाजी महाराजांच्या काळात पेमगिरी मराठ्यांच्या ताब्यात असावा, कारण आजुबाजुला असणारे सर्व गड मराठ्यांच्या ताब्यात होते. इ.स.१७३८ ते १७४० दरम्यान पहिले बाजीराव पेशवे व मस्तानी काही काळ या गडावर वास्तव्यास होते. संपूर्ण गड पायी भटकंती करायला दोन तास पुरेसे होतात तर गाडीने वरपर्यंत आल्यास अर्ध्या तासात गड पाहुन होतो.
No comments:
Post a Comment