आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गणेशोत्सव सध्या सर्वत्र सुरू आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळे सण साजरे केले जातात. तिथलं वैशिष्ट्यच ते सण मानले जातात. बंगालमध्ये दुर्गापूजा, उत्तरप्रदेशात रामनवमी व कृष्णजन्माष्टमी, गुजरातमध्ये नवरात्र, दक्षिण भारतात पोंगल, ओणम तसा आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक व काही प्रमाणात आंध्र-तेलंगणा व बंगालमध्ये देखील हा गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातसुद्धा कोकणात पारंपरिक घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या सणाची खरी मजा अनुभवायची असेल, तर ती कोकणातच.
कोकणात बऱ्याच घरांमधले गणपती हे सहसा अनंत चतुर्दशीपर्यंत असतात. बऱ्याच ठिकाणी गौरी गणपती असतात, म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशीच गणपतीचंही विसर्जन होतं. तर काही ठिकाणी प्रथेनुसार दीड, पाच, सात, नऊ दिवसही गणपती असतो. काहीजण तर चक्क एकवीस दिवसांचा गणेशोत्सवही करतात. एकूण काय, तर कोकणी माणूस आणि गणपती बाप्पा यांचं एक वेगळंच नातं आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी कोकणी माणूस गणेशोत्सवाच्या काळात हमखास आपल्या गावी येतोच.
एकूणच कोकणात गणेशोत्सव हा सर्व प्रथापरंपरा पाळून अगदी जोरात साजरा होत असला, तरी इथं काही वेगळ्या अशा प्रथाही आहेत. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना कोकणात फारशी रुजलेली दिसत नाही. त्याला कारण इथे पहिल्यापासूनच असलेला घरगुती गणेशोत्सवाचा प्रभाव.
मात्र प्रत्येक नियमाला अपवाद असतात, तसे या बाबतीतही आहेत. त्यातलं पाहिलं उदाहरण आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं सुप्रसिद्ध असं श्री क्षेत्र गणपतीपुळे. या क्षेत्राच्या पंचक्रोशीत कुठल्याही घरी गणेशोत्सवात गणपती बसवला जात नाही. त्या भागातले सर्व रहिवासी हे त्या मंदिरातील गणपतीचाच पाच दिवसांचा उत्सव साजरा करतात.
दुसरं उदाहरण आहे, तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. हे खरोखरच हटके असं उदाहरण आहे. तळकोकण भागात प्रामुख्याने घरगुती गणपतीच असतात. इथे तुम्हांला क्वचित असं घर मिळेल, जिथे गणपती बसवला जात नाही. इथे एक गंमत आहे, एखाद्याने नवीन घर बांधलं, की त्या घरात जर गणपती बसवला जात नसेल तर गणपतीच्या आदल्या रात्री कुणीतरी चोरून घरच्यांच्या नकळत बाहेर दारात गणपतीची मूर्ती ठेवून जातात. सकाळी जेव्हा घरचे दार उघडतात, तेव्हा दारात गणपती दिसला की, आता तो आपणहून आलाय तर त्याला परत पाठवायचं नाही, म्हणून मग ती मूर्ती घरात आणून त्याची पूजाअर्चा, आरती वगैरे करतात. तेव्हापासून त्या घरात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.
अशाप्रकारे तळकोकणात घरगुती गणेशोत्सव वाढत गेला आहे आणि वाढत जातो आहे. पण तरीसुद्धा इथे एक गाव असं आहे की, ते या सगळ्याला पूर्णपणे अपवाद आहे. ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील कोईळ. संपूर्ण तळकोकणात घरगुती गणेशोत्सवाचं प्रस्थ असताना या गावाचं वेगळेपण उठून दिसतं. गणपती हेच या गावाचं ग्रामदैवत आहे. हा गणपती अत्यंत कडक अन जागृत असा मानला जातो.
गेली सुमारे ३०० वर्षं या गावात गणेशोत्सव काळात कुणीही घरी गणपती बसवलेला नाही, तर सर्वजण मिळून ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरातच सात दिवस गणेशोत्सव साजरा करतात. या गावची गोष्टच न्यारी आहे. या गावात कोणाच्याही घरी गणपतीचा कसलाही फोटो अथवा मूर्ती आढळत नाहीत. अगदी ग्रामदैवत असलेल्या गणपतीचाही नाही. त्या मंदिरात मूर्तीचा फोटो काढायला मनाई आहे.
इतकंच नव्हे, तर जेव्हा या गावात कुणाचं लग्न ठरतं, तेव्हा त्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेवरसुद्धा गणपती छापलेला नसतो. आसपासच्या गावांमध्ये लग्नपत्रिकेवरती गणपती छापलेला नसेल, तर ती पत्रिका कोईळ गावातूनच आलेली आहे, हे लोक सहजपणे ओळखतात. कोकणात दर गावात गणपतीची एक तरी चित्रशाळा असतेच, मात्र कोईळ गावात अशी एकही चित्रशाळा नाही. गणेशोत्सव काळात इतर गावचे लोक या गावाच्या हद्दीतून आपल्या घरी गणपती नेत नाहीत.
दशावतार ही तळकोकणातली प्रसिद्ध लोककला. प्रत्येक जत्रेत दशावतारी नाटक हे इथं असतंच. त्याची सुरुवातच होते ती गणेशवंदनाने. गणपतीचा मुखवटा घेऊन एकजण मंचावर येऊन बसतो आणि गणेशवंदन झाल्यानंतर निघून जातो. इथं कोईळ गावच्या जत्रेत दशावतारी नाटक सादर होतंच, मात्र तेदेखील गणपतीशिवायच. गणपतीचा मुखवटा हा नदीपलीकडे दुसऱ्या गावी ठेवला जातो व इकडे नाटक सादर केलं जातं.
तर असं हे आगळंवेगळं गाव. पण एवढंच नाहीय, तर याच जिल्ह्यात एक गाव असंही आहे की, तिथल्या गणपतीच्या मंदिरात देव वर्षातून फक्त साडेचार महिन्यांपुरताच असतो. कसा काय? चला जाणून घेऊया.
या गावाचं नाव थोडं मजेशीर आहे, उभादांडा. हे गाव आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात. या गावात असलेलं हे गणपती मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण इथं गणपतीची स्थापना भाद्रपदातल्या गणेशचतुर्थीला न होता दिवाळीतील लक्ष्मीपूजनादिवशी केली जाते. तर त्याचं विसर्जन होतं ते, होळीच्या आदल्या दिवशी. या दरम्यानचे साडेचार महिने हा गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या नवसाला पावतो. भक्त आपले नवस फेडायला या मंदिरात येतात. गणपती इथं या मंदिरात नसताना त्याचा फोटो त्याजागी ठेवलेला असतो.
हा गणपती एका गुराख्याने स्थापन केला, म्हणून आजही गुराख्याचा गणपती अशी त्याची ओळख आहे. साधारण अडीचशे वर्षांची जुनी परंपरा या मंदिराला आहे. इथली मूर्ती ही पूर्ण शाडू मातीची बनवलेली असते. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एकही दरवाजा नाही. हे मंदिर कायम भक्तांना खुलं असतं.
माघ महिन्यात संकष्टीला या गणपतीचा उत्सव असतो. तसंच विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाप्रसाद असतो, त्याचा भरपूर भाविक लाभ घेत असतात. होळीची बोंब या गणपतीच्या कानांवर पडता नये, म्हणून त्याचं विसर्जन हे त्याआधीच केलं जातं.
आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सगळीकडेच गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाववर निर्बंध असले तरी उत्साहात मात्र कोठेही कमीपणा दिसत नाही. पण तरी पूर्वीसारख्या गणेशोत्सवाचा ‘पुनःश्च हरी ओम’ होण्याच्या प्रतीक्षेत आपण सर्वच आहोत. गणेशोत्सवात महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या मंदिरांमध्येही उत्साहाचं वातावरण असतं. फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक गणेश मंदिरांमध्ये भाद्रपदी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
जगभरात बाप्पाची अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. यामध्ये इंडोनेशिया मधील प्राचीन मंदिरांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. त्याशिवाय भारतातही काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून ते कोहिमापर्यंत गणपतीची शेकडो मंदिरे आहेत. परंतु एका घनदाट जंगलाच्या मध्यभागी एका टेकडीवर असलेल्या एका छोट्या, गूढ मंदिराबद्दल क्वचितच काहींना माहिती असेल.
छत्तीसगड राज्यातील रायपूरपासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर दांतेवाडा जिल्ह्यातील ढोलकल नावाच्या डोंगरावर असे मंदिर आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचीवर स्थित असून तिथे पोहोचण्यासाठी अत्यंत अवघड प्रवास करावा लागतो.
२०१२ मध्ये एका संशोधक-पत्रकाराने हे मंदिर शोधून काढले. सन १९४३ मध्ये ब्रिटिश भूवैज्ञानिक क्रुकशॅन्कला या जागेबद्दल सर्वप्रथम समजले होते. बैलादीला या खाणीसाठी सर्वेक्षण करताना त्याला ही जागा सापडली होती. क्रुकशॅन्कने तयार केलेल्या दक्षिण बस्तारच्या भूवैज्ञानिक अहवालाचा अभ्यास करून संशोधक-पत्रकार राजीव रंजन प्रसाद यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या साहाय्याने ही मूर्ती प्रकाशात आणली.
स्थानिक आख्यायिकेनुसार अनेक वर्षांपूर्वी ढोलकल टेकडीवर भगवान गणेश आणि परशुराम यांच्यात युद्ध झाले. या लढाईत परशुरामाने आपल्या परशुच्या साहाय्याने गणेशावर भीषण वार केला आणि त्या आघाताने गणेशाचा एक दात तुटला. यामुळेच या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या गावाला ‘फरसापाल’ हे नाव पडले. परशुला स्थानिक भाषेत फरसा म्हणतात, हा परशुचाच अपभ्रंश आहे. दोन मोठ्या देवतांमधील लढाई कोणी जिंकली हे अद्याप एक गूढ आहे.
परशुराम आणि गणेश यांच्यातील लढाईच्या स्मरणार्थ चिंदक नागवंशी राजाने ११व्या शतकात डोंगरमाथ्यावर गणपतीची दगडी मूर्ती स्थापन केली. नागवंशी राजाने स्थापना केली असल्याने या मूर्तीच्या गळ्यात आपल्याला नाग असल्याचे दिसून येईल. या मूर्तीची उंची साधारणतः अडीच ते तीन फूट आहे. ढोलाच्या आकाराची टेकडी असल्याने या टेकडीला ढोलकल असे नाव देण्यात आले आहे. ढोलकलमधील ‘कल’ म्हणजे डोंगरमाथा.
मूर्तीमध्ये बाप्पाला त्याच्या ठराविक ललितासनात सहजतेने बसलेल्या स्थितीत चित्रित केले आहे. गणेशाच्या एका हातात परशु आणि एका हातात तुटलेला दात आहे. स्थानिक रहिवासी वर्षभर गणेशमूर्तीची पूजा करतात आणि माघ महिन्यात माघी गणेशोत्सवादरम्यान, जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात याठिकाणी जत्रा भरते. मंदिर, गर्भगृह, सभामंडप, कळस अशी कोणतीही इमारत याठिकाणी नाही. जगामध्ये अशा प्रकारे स्थापन केलेली बहुधा ही एकमेव गणेशमूर्ती असावी.
पण दगडी गणेशमूर्तीची स्थापना इतक्या उंचीवर करणे म्हणजे मोठे दिव्यच! हे दिव्य कसे पार पडले याबद्दल कोणालाही माहिती नाही. स्थानिक आदिवासी या गणेशाची आपला रक्षक म्हणून पूजा करतात. आदिवासींच्या मते, ढोलकर टेकडीजवळच एका टेकडीवर सूर्यदेवाची मूर्ती स्थापित होती, पण सुमारे १५ वर्षांपूर्वी ती चोरीला गेली.
छत्तीसगडमधील माओवाद्यांनी या गणेशाच्या मूर्तीची चोरी केली होती. ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने शोध घेतला. थोड्याच वेळात, अनेक तुकड्यांमध्ये विखुरलेली मूर्ती डोंगराच्या खाली सापडली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ८४ वर्षीय अरुण कुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ६२ तुकड्यांमध्ये विखुरलेल्या मूर्तीला जोडून जीर्णोद्धार केला आणि पुन्हा गणेशमूर्तीची ढोलकल टेकडीवर स्थापना करण्यात आली.
काहींच्या मते ही गणेशमूर्ती उंचीवरून पाडली गेली आणि माओवाद्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या घनदाट जंगलात त्याचे तुकडे झाले.
जवळच्याच लहानशा जगदलपूर शहरापासून फरसपाल गावात पोहोचण्यासाठी २ तास लागतात. फरसपाल हे गाव ढोलकर टेकडीवरील गणपतीपर्यंत पोहोचण्यासाठी बेस कॅम्प म्हणूनही वापरण्यात येते. १६ तासांत चढण पूर्ण होते. घनदाट जंगलातून प्रवास करण्यासाठी स्थानिक गाईडची मदत घेता येईल. डोंगरमाथ्यावरून दिसणाऱ्या संपूर्ण जंगलाच्या विहंगम दृश्याने शरीराचा थकवा आपसूकच कमी होईल. मग, या अदभुद बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चालू गणेशोत्सवापेक्षा चांगली वेळ आणखी कोणती असू शकेल!


No comments:
Post a Comment