हर्षद सरपोतदार
आपल्याकडे पेशवाईचं पतन झालं त्याच सुमारास- म्हणजे १८१७ साली- इंग्लंडमधील अलमंड्सबरी परगण्यात ‘प्रिन्सेस कराबू’ नामक राजकन्या अवतीर्ण झाली आणि पुढली जवळपास सात वर्षं इंग्लंड – अमेरिकेत ती तिच्या जगावेगळ्या कहाणीने गाजत होती. ३ एप्रिल १८१७ या दिवशी एका स्थानिक चांभाराला चमत्कारिक वेशभूषेत असलेली पण गोंधळून गेलेली अशी एक देखणी तरुण स्त्री रस्त्यावर भटकताना आढळली. ती हावभाव करून अनाकलनीय भाषेत बोलत होती. त्यामुळे ती कोण, काय, कुठली याचा उलगडा झाला नाही. मात्र ती मोठ्या संकटात असल्यासारखी दिसत होती. म्हणून चांभाराची बायको तिला स्थानिक सरकारी अधिकाऱ्याकडे घेऊन गेली. मॅजिस्ट्रेट सॅम्युअल वॉरल याच्यापुढे तिला हजर करण्यात आलं. पण त्याचे प्रश्न तिला समजेनात आणि तिचं बोलणं त्याला कळेना. वॉरल आणि त्याच्या अमेरिकन बायकोने बराच प्रयत्न केल्यावर त्या स्त्रीचं नांव ‘कराबू’ असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पाइनऍपलचं चित्र तिने ओळखलं पण त्याला ती इंडोनेशियन भाषेत ‘अननस’ असं म्हणत होती. पलंगावर झोपायला तिने नकार दिला आणि ती जमिनीवर झोपली. तेव्हा ती कोण आहे याचा उलगडा होईपर्यंत तिची रवानगी ब्रिस्टॉलमधल्या अनाथालयात करावी असा निर्णय मॅजिस्ट्रेट वॉरलने घेतला.
हिंदी महासागरातील बेटाची राजकन्या
ब्रिस्टॉल इथल्या अनाथालयात ती स्त्री बंदिस्त अवस्थेत असतानाच तिथे
मॅन्युअल आयनेसो नामक एक पोर्तुगीज व्यापारी आला. त्याला तिची भाषा थोडीफार
समजली आणि तिच्याशी संभाषण करून त्याने तिची माहिती विचारून घेतली. तिच्या
सांगण्यानुसार हिंदी महासागरातील ‘जावासु’ नामक एका बेटातील राजाची ती
कराबू नामक कन्या होती. एक दिवस नजीकच्या समुद्रात ती जलपर्यटनाला गेलेली
असताना चाच्यांनी तिच्या गलबताला घेरलं आणि तिला पकडून (खंडणीसाठी?) ते
आपल्याबरोबर घेऊन गेले. त्यानंतर बराच मोठा समुद्रप्रवास करून चाच्यांचं
जहाज ब्रिस्टॉलच्या कालव्यात आलं असताना तिने त्यांचा डोळा चुकवून पाण्यात
उडी मारली आणि पोहत ती किनाऱ्यावर आली होती.
ही माहिती समजल्यावर वॉरल दांपत्य प्रिन्सेस कराबू हिला आपल्या घरी घेऊन गेलं. मग पुढले दहा महिने ही राजकन्या लोकांच्या कुतुहलाचा विषय बनून राहिली होती. डॉ. विल्किन्सन या भाषातज्ज्ञाने तिची भाषा इंडोनेशियन द्वीपसमूहातील असल्याचं भाषाकोशावरून शोधून काढलं. ही राजकन्या ‘अल्ला-ताला’ नामक देवाची प्रार्थना करायची. धनुष्यबाण आणि तलवार चालवून दाखवायची. पोहताना नग्नावस्थेत पोहायची. तिने आपल्या पद्धतीप्रमाणे चमत्कारिक दिसणारे पण भरजरी कपडे शिवून घेतले होते. ते परिधान केलेली तिची चित्रे आणि तिच्या धाडसाची कहाणी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली आणि तिला देशभर प्रसिद्धी मिळाली.
त्यानंतर १३ सप्टेंबर १८१७ रोजी ‘ब्रिस्टल जर्नल’ वृत्तपत्रात एक पत्र प्रकाशित झालं. हे पत्र ‘सेंट हेलेना’ या बेटाचा मुख्याधिकारी असणाऱ्या सर हडसन लोवे यांनी लिहिलं होतं. याच बेटावर त्या काळात फ्रेंच बादशहा नेपोलियन नजरकैदेत होता. सर हडसन यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रिन्सेस कराबू अमेरिकेकडे जात असताना वाटेत चक्रीवादळाने तिच्या जहाजाला गाठलं. त्यावेळेस ते सेंट हेलेना बेटाच्या जवळ आले होते. जहाज थांबून राहिल्यावर प्रिन्सेस कराबू जहाजातून उतरून एका लहानशा होडक्यात बसली व ते होडकं वल्हवत सेंट हेलेनाच्या किनाऱ्यापाशी आली. त्यावेळी किनाऱ्यावर उभ्या असलेल्या नेपोलियनशी तिची भेट झाली. तिचं सौंदर्य पाहून नेपोलियन तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी विवाह करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज त्याने पोपकडे पाठवून दिला होता. मात्र वादळ शांत झाल्यावर प्रिन्सेस अमेरिकेकडे रवाना झाली त्यामुळे हा विवाह प्रत्यक्षात येऊ शकला नाही. (ही घटना खरोखरच घडली असावी का याबद्दल अनेक संशोधकांनी शंका व्यक्त केली आहे.)
उत्तरायुष्य
फिलाडेल्फियामध्ये प्रिन्सेस कराबू तब्बल सात वर्षं राहिली. तिने काही
शहरांमध्ये दौरे काढून ‘स्टेज शो’ ही केले. मात्र तिला फारसं यश मिळू शकलं
नाही. कारण पुढल्या काळात ती बनावट राजकन्या असल्याच्या बातम्या इंग्लंडहून
अमेरिकेपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे अमेरिकन जनतेला तिच्याविषयी
प्रारंभी वाटणारं आकर्षण आणि प्रभाव कमी होत गेला. तेव्हा नाइलाज होऊन १८२४
साली ती पुन्हा इंग्लंडमध्ये आली. लंडनमध्ये ‘न्यू बॉण्ड स्ट्रीट’ वर
प्रिन्सेस कराबू याच नांवाने ती काही काळ राहिली. पण आता भाव उतरला होता.
तेव्हा ती सॉमरसेटमधील बेडमिनिस्टरमध्ये येऊन तिथे एक सामान्य स्त्री
म्हणून जीवन व्यतीत करू लागली. काही काळाने तिथल्या बेकर नांवाच्या माणसाशी
तिने लग्न केलं त्यामुळे मेरी बेकर हे नांव ती लावू लागली. तिला एक
मुलगीही झाली. उपजीविकेसाठी ती फळविक्री करत असे. २४ डिसेंबर १८६४ रोजी
तिचा मृत्यू झाला आणि तिच्याबरोबरच एका चमत्कारिक तोतयेगिरीचा अंत झाला.
मात्र अधूनमधून निघणाऱ्या कॉमिक्स, कादंबऱ्या आणि चित्रपटांमधून प्रिन्सेस
कराबू काही काळ ‘सक्रिय’ होत असते.
(क्रमशः)







