Tuesday, September 3, 2024

भूगोलाचा इतिहास

 https://maitri2012.wordpress.com/2024/08/


एल. के. कुलकर्णी

लेखांक १ 

इतिहास घडवायचाय….? भूगोल शिका !

भारताचे त्रिकोणमितीय सर्वेक्षण : भूगोलाच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना

 
शालेय जीवनात अनेकांचा नावडता असलेला भूगोल हा विषय प्रत्यक्षात मात्र इतिहास घडवत असतो. जीवनामधल्या अनेक पैलूंना कवेत घेणाऱ्या भूगोलाचे अनेक आयाम उलगडून दाखवणारी नवीन लेखमाला. ‘लोकसत्ता’ या प्रतिष्ठित दैनिकात प्रसिद्ध होतेय. आता ‘मैत्री’च्या वाचकांसाठी साभार पुनःप्रसिद्ध करत आहोत. – सं.    
 
‘भूगोलाच्या रंगमंचावर इतिहासाचे नाट्य सादर होत असते’ असे म्हटले जाते. ते खरेही आहे. परंतु भूगोल म्हणजे केवळ इतिहासातील घटना व साम्राज्यांचे उदयास्त यांची नेपथ्यरचना नव्हे. त्याचा अर्थ यापेक्षा कितीतरी व्यापक आहे. खडकांपासून  ढगांपर्यंत, भूगर्भापासून ते तारकाविश्वांपर्यंत, वनस्पतींपासून ते लोकजीवनापर्यंत, नदीपासून महासागरापर्यंत, उद्योग व्यापारापासून भूकंप ज्वालामुखीपर्यंत असा भूगोलाचा व्यापविस्तार आहे. जीवनाशी संबंधित असा तो सर्वव्यापी, सर्वस्पर्शी विषय आहे. मानव आणि त्याचे पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियेचा अभ्यास म्हणजे भूगोल. अर्थातच मानवी जीवन आणि एकूणच मानवी संस्कृतीला आकार देण्याचे व विकासाचे कार्य भूगोलातून घडते. यामुळे ‘जे लोक भूगोल समजावून घेतात तेच इतिहास घडवू शकतात’, असे म्हटले जाते.

दुर्दैवाने आपण मात्र प्राचीन काळापासून भूगोलाला योग्य तो न्याय व महत्त्व दिलेले नाही. भूभागांचे संशोधन, स्थळातील अंतरे व नकाशे, रस्ते, भूरचनेची वर्णने, हवामानविषयक नोंदी, उत्पाती घटनांचा अचूक काळ व कालावधी यांच्या नोंदी, हे सर्व आपल्याकडे अभावानेच आढळते.

‘आयुका’मधील आर्यभट्टाचा पुतळा

Jantar Mantar – New Delhi


१४०० वर्षांपूर्वी आर्यभट्टासारखा महान संशोधक आपल्याकडे होऊन गेला. पण त्याची पुरेशी दखल आपण घेतली नाही. अकराव्या शतकात अलबेरुनी या विद्वानाने आर्यभट्ट व वराहमिहिराच्या ग्रंथांचा फार्सी भाषेत अनुवाद केला. त्याच्याही पूर्वी आर्यभट्टाच्या ग्रंथाचा अरबीत अनुवाद झाल्याचा उल्लेख त्याने केला आहे. त्याच ग्रंथांचा मराठी अनुवाद उपलब्ध होण्यास विसावे शतक उजाडावे लागले. तीनशे वर्षांपूर्वी राजा सवाई जयसिंह यांनी भारतात दिल्ली, जयपूर, वाराणसी आणि उज्जैन आणि मथुरा इथे वेधशाळा उभारल्या. प्रात्यक्षिक भूगोलाचे जागतिक आश्चर्य ठराव्या अशा आणि आजही वेध घेता येतील अशा या वेधशाळा. पण ‘जंतर मंतर’ या नावाने आज त्या केवळ शोभेच्या आणि त्याही उपेक्षित वास्तू म्हणून उभ्या आहेत. एकूण पूर्वीपासूनच काही क्षेत्रात मोठी प्रगती करतांना आपण भूगोलाची उपेक्षा केली.

ही चूक सुधारण्याचा अंशतः प्रयत्न स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झाला. धरणे व सिंचन, रस्ते, उद्योनिर्मिती या सर्व क्षेत्रातील विकासयोजना हे भूगोलाच्याच उपयोजनाचे प्रयत्न होते. परंतु हे करतांना शिक्षणात मात्र आपण भूगोलाला योग्य ते स्थान दिले नाही. खरे तर स्वतंत्र भारतात तरी शिक्षणात स्वतंत्र विषय म्हणून भूगोलाला महत्वाचे स्थान देणे आवश्यक होते. पण गेली ७० वर्षे शालेय अभ्यासक्रमात ‘सामाजिक शास्त्र’ ( म्हणजे इ.भू. ना.शा.) या विषयाचा एक उपविषय – तोही १०० पैकी ४० गुणांचा – एवढेच स्थान भूगोलाला दिले गेले.

परिणामी विद्यार्थी, शिक्षक आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेकडून या जीवनस्पर्शी विषयाच्या वाट्याला केवळ उपेक्षाच आली. या विषयाच्या पदवी व पुढील शिक्षणाची सोय अगदी मोजक्या महाविद्यालयात आहे. त्यामुळे भूगोलात विशेष रस असणारे, उच्चशिक्षित, पारंगत अध्यापक अभावानेच उपलब्ध आहेत. त्याची व्यापक, सखोल माहिती एकत्रितपणे भारतीय भाषेतून देणारी पुस्तके व संदर्भग्रंथ फारच कमी आहेत.

खरे तर भारत हा कृषिप्रधान देश. शेती हवामानावर अवलंबून. हवामान व त्याची भाकिते हा भारतीयांच्या सर्वात जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे ढगांचे प्रकार, पर्जन्य, हवामानाचे आविष्कार, नैसर्गिक उत्पात, धरणे, सिंचन इ. ची माहिती इथे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना असणे अपेक्षित होते. या विषयावर शास्त्रीय माहिती व शिक्षण देणाऱ्या संस्था, शाळा सर्वत्र असायला हव्या. पण वास्तव विपरीत आहे. दुर्दैवाने ज्याची कमीतकमी शास्त्रीय माहिती व संशोधन संस्था उपलब्ध आहेत, असा हा विषय ठरला आहे.

पण असे दुर्लक्ष फार महाग पडते, हेच आजवरच्या इतिहासाकडे पाहिल्यावर दिसून येते. ज्यांनी भूगोल व भौगोलिक ज्ञानाचे महत्व जाणले व ते आत्मसात केले, तेच सर्व क्षेत्रात यशस्वी ठरले. सिकंदर, नेपोलियन ते हिटलरपर्यंत अनेकांच्या पराभवात भौगोलिक ज्ञानाकडे दुर्लक्ष महत्वाचे ठरले. उलट आपल्या साधन संपत्तीचा कौशल्याने वापर करणारे जपानसारखे देश विनाशानंतरही फिनिक्स ठरले. सोन्याच्या आणि हिऱ्याच्या खाणी असणारे आफ्रिकी देश गुलामीत खितपत राहिले. आणि स्वतःसाठी अन्नही पिकवू न शकणारे, साधनसंपत्तीचा तुटवडा असणारे युरोपीय देश राज्यकर्ते बनले. ही सर्व भौगोलिक ज्ञानाचीच लीला होती.

भारतातही भूगोलाच्या ज्ञानाअभावी शिकंदरापासून ते अब्दालीपर्यंत महत्वाच्या अनेक लढाया आपण हरलो. परकीय आक्रमणाच्या संदर्भात खैबर खिंड अतिशय महत्त्वाची. पण हजारो वर्षे रणजितसिंह वगळता एकाही राजाने या संदर्भात काही विशेष केले नाही. गंगा, यमुना, गोदावरी यासारख्या जलसमृद्ध नद्या आपल्याकडे आहेत. पण एकोणिसाव्या शतकापर्यंत याच नद्यांच्या खोऱ्यात एकेका दुष्काळात लक्षावधी भूकबळी जात राहिले. जगातील सर्वात उंच शिखर आपल्या हिमालयात आहे, पण हे आपल्याला १८५२ पर्यंत माहीत नव्हते. उलट ज्यांनी भूगोलाचे महत्व जाणले, त्या चोल राजांनी समुद्रात दुरपर्यंत पोहोचलेले व हजारो वर्षे टिकलेले भारतातील एकमेव साम्राज्य निर्मिले. राणा प्रतापसिंह, छ. शिवाजी महाराज, पाहिले बाजीराव पेशवे यांनी बलाढ्य शत्रूविरुद्धही यशस्वी लढा दिला. त्यामागेही त्यांचे भूगोलाचे अचूक आकलन व त्याचा योग्य वापर याचा मोठा वाटा होता.

तात्पर्य कितीही मोठा व बलाढ्य राजा असला तरी कुठे, कधी, केव्हा काय करायचे हे तो ठरवू शकत नाही. तर पर्वत, नद्या, हवामान, पर्जन्य, पूर, वादळे, दुष्काळ यांचा परिणाम फार निर्णायक ठरतो. म्हणजे भूगोल हा समान्यांपासून त्यांच्या नायकांपर्यंत सर्वांना खेळावणारा खेळीया आहे. हे जाणून जो भौगोलिक ज्ञानाचा अचूक उपयोग करतो तोच महानायक ठरतो.

या सर्व पार्श्वभूमीवर भूगोलाचे महत्व स्पष्ट करून त्याकडे सर्वांचे लक्ष वेधणे ही या लेखमालेमागील भूमिका आहे. भूतकाळ व वर्तमानाच्या संदर्भात भूगोलाचे सामर्थ्य जनमानसात ठसवण्याचा हा एक प्रयत्न आहे. जगाच्या व भारताच्या इतिहासातील काही निर्णायक घटना, जग बदलणारे भौगोलिक शोध व मोहीमा, क्रांतिकारक संशोधन प्रकल्प हे सर्व म्हणजे भूगोलाच्या रंगमंचावर सादर होत असलेल्या महानाट्याचे अंकच होत. आणि शोधमोहिमांचे प्रणेते, जग बदलून टाकणारे संशोधक हे अशा नाट्याचे महानायक आहेत. असे काही प्रसिद्ध – अप्रसिद्ध भौगोलिक शोध, क्रांतिकारक संशोधने, मोहिमा, ऐतिहासिक घटनामागील भूगोल, भूगोलातील महानायक व  त्यांचे असामान्य कार्य, हेही या लेखमालेचे विषय आहेत. त्यांचे काही ज्ञात व अज्ञात पदर या निमित्ताने या लेखमालेत येणार आहेत.

भूतकाळात आपण भूगोलाकडे केलेले दुर्लक्ष पाहता आपण भूगोलाचे फार मोठे देणे लागतो. या लेखमालेद्वारे भूगोलाचे महत्व अधोरेखित होईल व वाचकांपैकी काही जण तरी भूगोलाच्या अधिक अभ्यासाकडे आकर्षित होतील अशी आशा आहे.

प्रकाशचित्रे : आंतरजाल आणि विकिपीडियावरून साभार ]

[ पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता : ६ जानेवारी २०२४ ]
–  ©️ एल. के. कुलकर्णी

 

भूगोलाचा इतिहास : लेखांक २

एल. के. कुलकर्णी

भूगोलऋषी विलियम लॅम्ब्टन

ले. क.विलियम लॅम्ब्टन 

    जे लोक महान कार्य करतात ते स्वतः आणि त्यांचे कार्य अजरामर होऊन जाते. पण कधी कधी असे महान कार्य शिल्लक राहते आणि ते करणारे मात्र इतिहासाच्या काळोखात हरवून जातात. लेफ्टनंट कर्नल विलियम लॅम्ब्टन हे अशा विस्मृत महान संशोधकांपैकी एक होते. ‘ ग्रेट इंडियन आर्क’ नावाच्या जगातील सर्वात महान व प्रदीर्घ काळ चाललेल्या संशोधन प्रकल्पाचे ते जनक. फारच कमी लोकांना माहित आहे की महाराष्ट्रात हिंगणघाट गावातील एका कोपऱ्यात ते चिरविश्रांती घेत आहेत.

लॅम्ब्टन यांचा जन्म १७५३ मध्ये इंग्लंडमधील यॉर्कशायर परगण्यात झाला. बालपणापासून त्यांना गणितात विशेष गती होती. दुर्बिणीतून सूर्यग्रहण पाहण्याच्या प्रयत्नात त्यांचा एक डोळा कामातून गेला होता. ईस्ट इंडिया कंपनीत ते सैनिक म्हणून रुजू झाले. १७९९ मध्ये श्रीरंगपटणमच्या लढाईत टिपू सुलतानचा पाडाव करून इंग्रजांनी मैसूर राज्य जिंकले. त्यानंतर लॉर्ड वेलस्ली यांनी जिंकलेल्या भूप्रदेशाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फ्रान्सिस बुकमन यांनी मैसूर राज्याचे कृषी सर्वेक्षण आणि मॅकेन्झि यांनी भूरचनेच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. इंग्रजांचा उद्देश जिंकलेल्या भागाचे चांगले नकाशे तयार करणे हा होता. पण अचूक नकाशे तयार करण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाची वक्रता विचारात घ्यावी लागते. लॅम्ब्टन यांनी १७९९ मध्ये एक योजना मांडली. त्यानुसार ते भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील मद्रास ते पश्चिम किनाऱ्यावरील मंगलोर यामध्ये त्रिकोणमितीय ( Trigonometric survey) सर्वेक्षण करणार होते. त्यामुळे दक्षिण भारतीय द्वीपकल्पाच्या त्या दोन बिंदूंच्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाची (बाक) वक्रता कशी आहे, हे कळणार होती. बऱ्याच विचारांती लॅम्ब्टनची योजना मान्य झाली.

१० एप्रिल १८०२ मध्ये लॅम्ब्टननी मद्रास (आताचे चेन्नई ) येथील सेंट थॉमस माऊंट येथे पहिली मूळ रेषा (Base line) रेखण्यास सुरवात केली. त्यावेळी महाराष्ट्रात अमृतराव हे पेशवेपदावर येत होते आणि काही महिन्यातच दुसरे बाजीराव व इंग्रज यांच्यात वसईचा तह होणार होता. एकंदर भारतातील राजे, संस्थानिक व ईस्ट इंडिया कंपनी हे जहागिरी, राजवटी व संपत्ती यात व्यस्त होते. आणि त्याच वेळी लॅम्ब्टन मात्र पृथ्वीची वक्रता आणि भारतभूमीची रचना व आकार शोधण्याच्या आपल्या महान स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत होते.

मद्रास येथून सर्वेक्षण करीत ते द्वीपकल्पाच्या दुसऱ्या टोकाशी मंगलोरला पोहोचले. दरम्यान भारताच्या दक्षिणोत्तर सर्वेक्षणाची त्यांची योजना मान्य झाली होती. त्यातून कन्याकुमारी ते हिमालय या सुमारे ३००० किलोमीटर अंतरातील भूगोलाच्या कंसाची वक्रता निश्चित होणार होती. हे कार्य एवढे प्रचंड व कठीण होते की त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. हे काम एवढे प्रचंड होते की त्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. शिवाय या शास्त्रीय प्रकल्पातून प्रत्यक्ष व दृश्य असा कोणताही आर्थिक लाभ नव्हता. पण अखेर याही प्रकल्पाला मान्यता मिळाली. १८०६ मध्ये बेंगलोरच्या उत्तरेपासून सर्वेक्षण करीत ते दक्षिणेला केप कामोरीन (कन्याकुमारीचे भूशीर) पर्यंत पोहोचले. इथून पुढे कन्याकुमारी ते हिमालय या सर्वेक्षणाचे कार्य त्यांनी सुरू केले. या कामात कल्पनातीत अडचणी आल्या.

लॅम्ब्टन यांनी वापरलेला थिओडोलाईट 

सर्वेक्षणासाठीचे थिओडोलाईट (Theodolite) हे उपकरण पुरुषभर उंचीचे व अर्धा टन वजनाचे होते. ते वाहून नेण्यासाठी बारा माणसे लागत. सोबत अंतरे मोजवयाच्या धातूंच्या जड साखळ्या होत्या. त्या भुसा भरलेल्या पेटीत ठेवलेल्या असत. सामान वाहून नेण्यासाठी घोडे, उंट, खेचरे किंवा हत्ती असत. त्यामुळे या ताफ्यामध्ये संशोधक, अधिकारी यांच्यासोबत सिग्नलमेन, रनर, पोर्टर माहूत हेही होते. शिवाय जंगलातील वन्य प्राणी, दरोडेखोर, स्थानिक बंडखोर इ. पासून रक्षणासाठी सैनिकांची तुकडी असे. त्यात पुन्हा पाऊस, ऊन, बर्फवृष्टी, धुळीची वादळे हेही होते. सर्व्हे करतांना दुर्बिणीतून बघायचे टार्गेट १०० किंवा अधिक कि.मी.वर असे. म्हणून हे काम पावसाळ्यात किंवा पावसाळा संपताच करावे लागे. कारण पावसामुळे धूळ खाली बसून हवेची दृश्यता चांगली होई. पण पावसाळ्यात तुफान पाऊस, घनदाट जंगले, रोरावत्या नद्या, प्रचंड पूर, साप, अजगर, वाघ इ. वन्य प्राणी, डास, साथीचे आजार व अकल्पित प्रसंग यांच्याशी सामना करावा लागे. ताफ्यातील लोक पळून जात, आजारी पडत, बंड करीत. एकदा कृष्णा-गोदावरी खोऱ्यात भयानक पावसाळा, जंगल व आजारपण यामुळे आख्खी टोळी जायबंदी झाली. अखेर विशेष पथक पाठवून उपाशी, आजारी मरणोन्मुख अशा १५० लोकांना हैद्राबादला नेण्यात आले. त्यातही १५ जण मरण पावले. “जे जिवंत आले, ते माणसासारखे दिसत नसून जणू कबरीतून उठून चालू लागलेल्या प्रेतांचा तो थवा होता,” असे त्या प्रसंगाचे वर्णन जॉर्ज एव्हरेस्ट यांनी केले आहे. असे प्रसंग नेहमीच येत.

पण सर्व अडचणी व संकटे यावर मात करीत लॅम्ब्टननी आपले कार्य सुरू ठेवले. रात्री जागून ते ताऱ्यांचे वेध घेऊन त्या ठिकाणाचे अक्षांश, रेखांश निश्चित करीत. अंतर मोजावयाच्या साखळ्यांचे उष्णतेने प्रसरण व हवेतून होणारे प्रकाशाचे वक्रीभवन हेही त्यांनी मोजमाप करताना विचारात घेतले होते. म्हणूनच आज दोनशे वर्षानंतर जी.पी.एस.च्या आकडेवारीवरूनही लॅम्ब्टन यांचे काम अचूक असल्याचे सिद्ध झाले.

असे सर्वेक्षण करीत १८२३ मध्ये लॅम्ब्टन भारताच्या मध्याजवळ हिंगणघाट येथे पोहोचले. तेव्हा सर्वेक्षण सुरू करून २१ वर्षे झाली होती आणि त्यांचे वय ७० वर्षे झाले होते. कन्याकुमारीपासून १६८० किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण केलेले होते. तोपर्यंत बढती होऊन ते लेफ्टनंट कर्नल झाले होते व १८१८ मध्ये या प्रकल्पाचे अधिकृत नामकरण ‘ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक  सर्वे ऑफ इंडिया’ असे करण्यात आले होते. हिंगणघाट येथे असतानाच जानेवारी १८२३ मध्ये लॅम्ब्टन आजारी पडले आणि थोडया आजारपणानंतर जानेवारी १८२३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. नागपूरचे रेसिडेंट रिचर्ड जेंकिन्स यांनी त्यांचे एक साधेसे स्मारक उभारले. त्यांचे सहकारी जॉर्ज एव्हरेस्ट, अँड्र्यू व्हॉग, जेम्स वॉकर यांनी पुढे १८७१ पर्यंत काम करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.

या प्रकल्पाचे फलित म्हणूनच भारताचे अचूक नकाशे तयार होऊ शकले, संपूर्ण हिमालयाचे अचूक मोजमाप करण्यात आले व सर्वात उंच एव्हरेस्ट शिखराचा शोध लागून ते शिखर जगप्रसिद्ध झाले. पण स्वतः लॅम्ब्टन मात्र भारतात दुर्लक्षित राहिले. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचा फेलो व फ्रेंच अकॅडमीचा सदस्य असणारा, जगातला एक थोर संशोधक आपल्या गावात काही दिवस राहून मरण पावला, हे तेव्हाही गावात कुणाला माहीत नव्हते आणि नंतरही. ‘ग्रेट आर्क’ प्रकल्पाचे इतिहासकार जॉन के यांनी शोध घेऊन हिंगणघाटच्या बस स्टँड जवळील त्यांचे पडझडीला आलेले स्मारक शोधून काढले. मग त्या दुर्लक्षित स्मारकाकडे काही लोकांचे लक्ष गेले. पुढे त्यांचे वंशजही हिंगणघाट येथे येऊन गेले.

हिंगणघाट येथील लॅम्ब्टन यांचे स्मारक ( सौजन्य कार्तिक लोखंडे ) 

त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे. त्यांचा विलीयम याच नावाचा एक मुलगा देखील पुढे या सर्वेक्षणात पुढे सहभागी होता. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या या संशोधकाने भारताच्या सर्व्हेक्षणासाठी निरपेक्षपणे आयुष्य वाहून घेतले. जन्माने ब्रिटिश असले तरी स्वार्थ व अभिनिवेशरहित साधना हेच ज्याचे तप होते, असे लॅम्ब्टन हे एक ‘भूगोलऋषी’च  होते.

प्रकाशचित्रे : आंतरजाल आणि विकिपीडियावरून साभार ]

[ पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता : १३ जानेवारी २०२४ ]

–  ©️ एल. के. कुलकर्णी

lkkulkarni.nanded@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...