Friday, February 24, 2023

कात्रा, गोरखगड, मेसना

   नाशिक जिल्ह्यातील किल्ले म्हणले कि बहुतेकांना आठवतात ते रामसेज, त्रिंबकगड्,अंजनेरी आणि बलदंड साल्हेर्,मुल्हेर. थोडे हौशी दुर्गभटके असतील तर कांचन्,धोडप्,चांदवड माहिती असतात. मात्र याच नाशिक जिल्ह्यात जवळपास साठ गड आहेत.अपवाद सोडले तर या उपेक्षित दुर्गांवर फारसे कोणी फिरकतही नाही. नाशिक जिल्ह्याच्या आग्नेय भाग म्हणजे मनमाड परिसर. पैठणीमुळे प्रसिध्द असलेले येवला गाव आणि मध्ये रेल्वेचे महत्वाचे जंक्शन मनमाड यांना जोडणार्या रस्त्यावर सातमाळा रांगेचे शेवटचे टोक आहे.येथून पुढे मराठवाडा परिसर सुरु होतो. याच परिसरात अंकाई-टंकाई हे जोड दुर्ग आहेत.महर्षी अगस्तींच्या वास्तव्यामुळे आणि जैन लेण्यामुळे या दुर्गांवर इतिहासप्रेमींची आणि हिंदु,जैन भाविकांची वर्दळ असते.मात्र याच डोंगररांगेत कात्रा आणि गोरक्षगड नावाचे आणखी दोन दुर्ग आहेत्,याचा बहुतेकांना पत्ता नसतो. 
  अजंठा-सातमाळ या डोंगररांगेतील अंकाई-टंकाई किल्ल्यापासुन काहीशी अलिप्त झालेली एक डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या सुरवातीला गोरखगड किल्ला त्यामागे शंभुमहादेव डोंगर तर टोकाला अपरीचीत असा कात्रा किल्ला आहे. तीन दिवसाचा अवधी व सोबत खाजगी वाहन असल्यास अजंठा-सातमाळ या रांगेवर असलेल्या अंकाई-टंकाई-गोरखगड-कात्रा-मेसणा-राजदेहेर-नस्तनपुर-माणिकपुंज अशा अनेक अपरिचित किल्ल्यांना भेट देता येते. यातील मनमाड परिसरात असलेले सुरवातीचे ५ किल्ले फिरताना आपण सतत एका सुळक्याभोवती घिरटया घालत रहातो. या भागात हा सुळका हडबीची शेंडी म्हणुन ओळखला जातो.
अंकाई टंकाई हे दोन किल्ले नीट पाहाण्यास पाच ते सहा तास लागतात. जर आदल्या दिवशी मुंबई किंवा पुण्याहुन निघुन पहाटे मनमाडला पोहोचल्यास दुपार पर्यंत अंकाई आणि टंकाई किल्ले पाहुन होतात. त्यानंतर त्याच्या पासुन ६ किमीवर असलेला गोरखगड पाहुन पायथ्याच्या मंदिरात मुक्काम करता येतो किंवा ७ किमीवरील कात्रा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातरवाडीतील हनुमान मंदिरात मुक्कामाला जाता येते. दुसर्‍या दिवशी कात्रा किल्ला पाहाता येतो. काटेकोरपणे कार्यक्रम आखल्यास ४ किल्ले दोन दिवसात पाहुन होतात. अर्थात त्यासाठी बरोबर खाजगी वाहान असणे आवश्यक आहे. कारण या आतल्या भागात एसटी आणि रिक्षांची सोय नाही. 
   नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नाशिककहुन निफाड –लासलगावमार्गे ७५ कि.मी. अंतरावर तर चांदवड-मनमाडमार्गे ९५ कि.मी.अंतरावर आहे. मनमाड शहरापासुन कातरवाडी गाव १३ कि.मी. अंतरावर असुन मनमाड- येवला मार्गावर अंकाई लोहमार्ग स्थानकाकडून कातरवाडी गावात जाणारा फाटा आहे. या फाटय़ावरून किल्ल्याचा पायथा पाच कि.मी. अंतरावर आहे. रेल्वेने अंकाई स्टेशनवर उतरुन पायी चालत कातरावाडी गाव गाठता येईल.
      जर एस.टी.बसने जायचे असेल तर   मनमाड - औरंगाबाद या राज्य महामार्गावर क्र. १० वर मनमाडपासून ८ किमीवर एक रस्ता उजवीकडे वळतो. या रस्त्याने २ किमी अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याचे कातरवाडी गाव आहे. कातरवाडी गाव गडाच्या पूर्वेस आहे. बसने कातरवाडी फाट्यावर उतरुन चालत कातरावाडी गाव गाठता येईल. 
     तिसरा पर्याय म्हणजे  मनमाडहुन एक रस्ता थेट कातरवाडीत येतो. हे अंतर ७ किमी आहे. मनमाडहुन रिक्षाने अथवा खाजगी वाहानाने किल्ल्याच्या पायथ्याच्या कपिलमुनी आश्रमा पर्यंत पोहोचता येते.
      कातरवाडी गावाच्या मागील बाजुस कात्रा किल्ल्याशेजारील शंभुमहादेव डोंगराच्या पायथ्याशी कपिलमुनींचा आश्रम आहे. गावातुन या आश्रमापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सोबत खाजगी वाहन असल्यास या वाहनाने कपिलमुनी आश्रमापर्यंत जाता येते. आश्रमाच्या अलीकडे काही अंतरावर मारुतीचे मंदीर आहे. मंदिराच्या आवारात अलीकडील काळातील काही स्मारकशिळा (विरगळ नाही) बसवल्या आहेत.
गडावर रहाण्याची सोय नाही. कातरवाडीतील मारुती मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते. कात्रा बरोबरच अंकाई , टंकाई, गोरखगड किल्लाही पाहाणार असल्यास; गोरखगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरा बाहेर राहाण्याची सोय होउ शकेल. कपिलमुनी आश्रमात पाणी नसल्यामुळे राहाण्यासाठी गैरसोईचा आहे. मंदिरापासुन काही अंतरावर असलेल्या दादासाहेब गांगुर्डे यांच्याकडे पाण्याची व आगाऊ सुचना दिल्यास जेवणाची सोय होऊ शकते.याशिवाय पाय्थ्याच्या कातरावाडीत एका शेतामध्ये ‘अंधारबाव’ नावाची शिवकालीन विहीर आहे.

मंदिरापासुन ५ मिनिटे चालल्यावर आपण कपीलमुनी आश्रमापाशी पोहोचतो. कपिलमुनी आश्रम म्हणजे कातळात कोरलेली मोठी गुहा असुन आतबाहेर भगव्या रंगाने रंगवलेल्या या गुहेत कपिलमुनीची मुर्ती स्थापन केलेली आहे. 

गुहेला बाहेरुन दिलेला केशरी रंग दुरुनही उठून दिसतो, गुहे समोरील जागा सारवुन स्वच्छ केलेली आहे. त्यात एक धुनी कायम पेटवलेली असते. गुहेच्या बाजुला एक पाण्याच टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या गुहेत राजुबाबा नावाचे साधु १५ वर्षापासुन वास्तव्यास आहेत. आश्रमाचा परीसर स्वच्छ व नीटनेटका ठेवलेला असुन परिसरात फुलझाडे लावलेली आहेत. 
आश्रम असलेल्या डोंगराच्या वरील बाजुस असलेल्या उतारावरून नळाने पाणी आश्रमाच्या आवारात असलेल्या टाक्यात आणले आहे. हे पाणी जंगली प्राणी पिण्यासाठी वापरतात. सध्या गुहेत रहात असलेले राजुबाबा पुर्वी गडावरील गुहेत रहात असल्याने त्यांना संपुर्ण गडाची माहिती आहे व विनंती केल्यास ते गड दाखविण्यास येतात. काही काळ मौन व्रतात असलेल्या राजुबाबा यांनी सध्या मौनव्रत सोडले आहे. कपिल मुनींचा आश्रम पाहुन गुहेच्या उजवीकडील टेकडावर चढुन गुहेचा शंभुमहादेव डोंगर व कात्रा किल्ल्याचा डोंगर यांमधील खिंडींच्या दिशेने निघायचे. 
सर्व ढोरवाटा आहेत. सर्वत्र घसारा (स्क्री) आहे. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल त्या वाटेने खिंडीच्या दिशेने चढायला सुरुवात करावी. साधारणपणे अर्ध्या तासात आपण खिंडीत पोहोचतो.  खिंडीतील झुडुपात एका दगडाला शेंदुर फासून देवपण दिलेले आहे. या खिंडीतुन उजवीकडे वळुन कात्रा किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजुला व दरी उजव्या बाजुला ठेवत वरील दिशेने तिरकस १० मिनिटे चढत गेल्यावर आपण किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या घळीच्या पायथ्याशी पोहोचतो. 
कात्रा गडाचा नकाशा

या वाटेवर मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने अंग ओरबडतच आपण घळीत पोहोचतो. या घळीत किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. या पायऱ्या चढताना उजव्या बाजुस कातळात कोरलेली तीन तोंडाची गुहा दिसते. यातील दोन तोंडे दगडी बांधकाम करून बंद करण्यात आली आहेत. गुहा पाहाण्यासाठी जेमतेम पाउल मावेल अशा धोकादायक कातळाच्या धारेवरुन जावे लागते पण पावसाळ्यात तेदेखील शक्य होत नाही. वाटेच्या पुढील भागात उजवीकडे माती भरून झुडपे वाढलेली दोन पाण्याची टाकी पहायला मिळतात. या टाक्यांच्या वरील बाजुस कातळात कोरलेल्या दोन लहान चौकोनी तोंडाच्या गुहा पहायला मिळतात. गुहा पाहुन डाव्या बाजुला वळत काही पायऱ्या चढल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. कपिलमुनी आश्रमाकडून इथवर येण्यास एक तास पुरेसा होतो.
गुहा पाहुन डाव्या बाजुला वळत काही पायऱ्या चढल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. कपिलमुनी आश्रमाकडून इथवर येण्यास एक तास पुरेसा होतो.त्रिकोणी आकाराचा गडमाथा पुर्वपश्चिम साधारण ९ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन २७७० फुट उंचावर आहे. 

गडमाथ्यावर समोरच एक टेकडी असुन या टेकडीकडे जाताना उजव्या बाजुस बुजलेला ५ टाक्यांचा समुह पहायला मिळतो. या टाकी समुहाच्या मागील बाजुस म्हणजे गडाच्या दक्षिण टोकावर गेले असता काही वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. या टोकावरून परत फिरल्यावर उजव्या बाजुस दरीच्या काठावर तटबंदी बुरुजाचे अवशेष दिसतात. टाक्याकडून पुढे टेकडीकडे जाताना डाव्या बाजुस किल्ल्यावरून खाली जाणारी घळ दिसते. 

या घळीत १५ फ़ुटाचा कातळटप्पा सावधतेने उतरुन गेल्यास कातळात कोरलेली लांबलचक ध्यान गुंफा पाहायला मिळते. या गुहेच्या तोंडावर झाडी वाढलेली असल्याने हि गुहा वरील बाजूने दिसत नाही. किल्ल्याखाली असलेले राजुबाबा पुर्वी याच गुहेत मुक्कामास होते. गुहा पाहुन वर आल्यावर टेकडीला वळसा घालत डाव्या बाजुने चालायला सुरुवात केल्यावर कातळात खोदलेल पाण्याच टाके पहायला मिळते.
या टाक्यावरुन सरळ पुढे आल्यावर वाटेत माती भरून बुजत चाललेले अजून एक टाके दिसते. या टाक्याच्या खालील बाजुस आल्यावर डोंगर उतारावर कातळाच्या पोटात खोदलेली २ खांबी गुहा नजरेस पडते. 
या गुहेसमोर देखील पाण्याचे एक टाके आहे. गुहा पाहुन सरळ पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावर पोहोचतो. या ठिकाणी झाडीत लपलेली गुहा अथवा पाण्याचे खांबटाके आहे पण त्याच्या तोंडावर मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने आत जाता येत नाही. 


गुहा पाहुन किल्ल्याच्या मधे असणाऱ्या टेकडीवर चढायला सुरुवात केल्यावर ५ मिनिटांचा उभा चढ चढुन आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागात पोहोचतो. येथे ध्वज स्तंभाशेजारी राजुबाबाने किल्ल्यावर रहात असताना जमिनीलगत सिमेंटने बांधलेली ध्यान गुंफा आहे. 
येथुन किल्ल्याभोवतीचा संपुर्ण परीसर तसेच अंकाई-टंकाई, गोरखगड, मेसणा हे किल्ले व हडबीची शेंडी सुळका दिसतो. टेकडीवरून विरुद्ध दिशेने पाण्याच्या पाच टाक्याकडे उतरल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. गड पूर्ण पहाण्यास एक तास पुरेसा होतो. किल्ल्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणीसाठी होत असावा. नाशिक जिल्हा ग्याझेटीयरमधील उध्वस्त किल्ला हा उल्लेख वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्याचे उल्लेख दिसुन येत नाही.

गोरखगड उर्फ गोरक्षगड :-

कात्रा गडानंतर अंकाई-टंकाईच्या रांगेतील आणखी एका गडावर आपण सफर करणार आहोत, तो म्हणजे गोरखगड उर्फ गोरक्षगड ! अजंठा-सातमाळ डोंगररांगेतील अंकाई-टंकाई हा एक महत्वाचा किल्ला. सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली व युध्दशास्त्राच्या दृष्टीने त्याला बळकट करण्यासाठी चोहोबाजूंनी कात्रा मेसणा,गोरक्षगड,माणिकपुंज यासारख्या उपदुर्गांची साखळी तयार केली गेली. या उपदुर्गांचा वापर प्रामुख्याने मुख्य किल्ल्याचे रक्षण व टेहळणीसाठी करण्यात आल्याने त्यांचा वेगळा असा इतिहास दिसुन येत नाही. किल्ल्यांच्या या साखळीमुळे अंकाई-टंकाईवर सहज हल्ला करणे कठीण झाले होते. यातील गोरक्षगडचा गॅझेटीयर अथवा इतर कोणत्याही कागदपत्रात किल्ला म्हणुन उल्लेख येत नसला तरी स्थानिक याचा गड म्हणुन करत असलेला उल्लेख व डोंगरावर असलेल्या गुहा व पाण्याची टाकी पहाता याचा किल्ला म्हणुन उल्लेख करावा का? यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकते. गोरक्षगड डोंगरावर तटाबुरुजाचे कोणतेही अवशेष आढळत नसल्याने हा प्रश्न अनुत्तरीतच रहातो. गडावर असलेल्या खोदिव गुहा, पाण्याची टाक इत्यादी अवशेष पाहाता हा एकेकाळी टेहळणीचा किल्ला असावा. अंकाई आणि टंकाई वरील ब्राम्हणी लेण्यांचा आणि या किल्ल्याचा निर्मितीचा काळही एकच असण्याची शक्यता आहे. पुढील काळात अंकाई टंकाई किल्ल्याचे महत्व वाढल्यावर या किल्ल्याचा वापर कमी झाला असावा आणि त्याचा त्याचा ताबा नाथसंप्रदायाकडे गेला असण्याची शक्यता आहे. आपण या शक्यतांच्या जंगलात न शिरताही या प्राचीन डोंगर चढाईचा त्यावरील अवशेषांचा आनंद घेउ शकतो.


 
 
अजंठा-सातमाळ डोंगररांगेतील अंकाई-टंकाई किल्ल्यापासुन काहीशी अलिप्त झालेल्या डोंगररांगेच्या सुरवातीला गोरक्षगड त्यामागे शंभुमहादेव डोंगर तर टोकाला कात्रा किल्ला आहे. गोरक्षगड नाशिककहुन निफाड –लासलगावमार्गे ८५ कि.मी. अंतरावर तर मनमाडहुन १० कि.मी. अंतरावर आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील विसापुर हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. मनमाड-येवला मार्गावर अंकाई लोहमार्ग स्थानकाकडून विसापुर गावात जाणारा फाटा आहे. या फ़ाट्यावर श्री क्षेत्र गोरखनाथ (विसापूर गाव) अशी कमान लावलेली आहे. या फाटय़ावरून १ कि.मी. आत आल्यावर एक कच्चा रस्ता उजवीकडे किल्ल्याच्या पायथ्याशी जाताना दिसतो. ओळखण्याची खुण म्हणजे या रस्त्याच्या टोकाला डोंगराच्या पायथ्याशी एक मोठे वडाचे झाड दिसते. सोबत वाहन असल्यास वाहनाने त्या वडापर्यंत जाता येते. 
गडाच्या पायथ्याचे गाव आंबेवाडी आहे.किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत खाजगी वाहानाने जाता येते. मनमाडहुन येवला, औरंगाबाद दिशेकडे जाणार्‍या एसटीने विसापूर गावाच्या फाट्यावर उतरुन १.५ किमी चालत किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. अंकाई किल्ला हे रेल्वे स्टेशन आहे. पण इथे केवळ पॅसेंजर थांबतात. हे स्टेशन किल्ल्यापासुन २ किमीवर असल्याने गैरसोईच आहे.

या वडाखाली नाथपंथीयांच्या काही समाध्या आहेत. येथुनच गडावर जाण्यासाठी बांधीव पायऱ्या आहेत. साधारण १५-२० पायऱ्या चढुन गेल्यावर उजवीकडे दगडी बांधकामातील तीन नक्षीदार समाध्या आहेत. 
साधारण १५ मिनिटे पायऱ्या चढुन गेल्यावर पायऱ्या संपुन पायवाटेला सुरवात होते. या वाटेने अर्धा तास चढल्यावर सरळ वर जाणाऱ्या या वाटेला उजवीकडे जाणारी दुसरी पायवाट दिसते. 
या दुसऱ्या पायवाटेने आपण गोरखनाथांच्या गुहेपाशी जाते. ही गुहा नैसर्गिक असुन त्यात काही प्रमाणात खोदकाम केले आहे. 
या गुहेत नवनाथांपैकी पाच नाथांच्या मुर्ती आहेत. गुहेच्या पुढील मार्ग बंद असल्याने गुहा पाहुन मुळ पायवाटेवर परत येउन कातळात कोरलेल्या ८-१० पायऱ्या चढत आपण डोंगराच्या कातळकड्याखाली पोहोचतो. 

या ठिकाणी कड्याखाली असलेल्या कपारीत दगडी बांधकाम करून दोन गुहा बनविल्या आहेत. या दोन्ही गुहा अलीकडील काळातील असुन त्यातील एका गुहेत कानिफनाथांची मुर्ती स्थापन केली आहे. या गुहेसमोर असलेल्या उंचवट्यावर चढुन उजव्या बाजूने कड्याला वळसा घालताना या वळणावर कड्यात असलेली अजून एक गुहा पहायला मिळते. 
गोरक्षगडावरुन दिसणारा अंकाई गड

हि गुहा अंकाई किल्ल्याच्या बरोबर समोर आहे. कड्याला वळसा घालुन आपण गुहेच्या मागील बाजुस येतो. या ठिकाणी काही प्रमाणात सपाटी आहे पण पुढे जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे मागे फिरून परत कानिफनाथांच्या गुहेकडे यावे. 

आता कड्याखालुन डाव्या बाजुने पुढे निघाल्यावर चौकोनी आकाराचे गुहेतील कातळात कोरलेल हिरव्यागार पाण्याच टाक पाहायला मिळत. 
या टाक्याच्या पुढे एक मोठी गुहा असुन या गुहेत देखील पाण्याचे टाके कोरले आहे. या टाक्याच्या काठावर चौरंगीनाथांची मुर्ती स्थापन केली आहे. इथुन पुढे जाणारी वाट काहीशी अवघड असुन पुढे डोंगराच्या पश्चिम टोकावर असणार्‍या नेढ्या पर्य़ण्त जाण्यासाठी कातळकडा उजव्या बाजुला आणि दरी डाव्या बाजुला ठेवत १० मिनिटे चालल्यावर आपण कातळकड्याच्या टोकाला येतो.
 इथुन १०-१२ फुटाचा कातळटप्पा चढल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते. इथे कुठलेही अवशेष नाहीत. इथे एक भगवा झेंडा लावलेला आहे. तो दर गुरुपौर्णिमेला बदलला जातो. किल्ल्याच्या गुहे पुढचा मार्ग मळलेला नाही आहे. त्यामुळे तो चिंचोळा टप्पा फार जपून पार करावा लागतो. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी असलेला कातळटप्पा चढण्यासाठी रोप आणि गिर्यारोहणासाठी वापरले जाणारे साहित्य असणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
किल्ल्याच्या माथ्यावरुन अंकाई - टंकाई ,कात्रा आणि मेसणा हे किल्ले दिसतात.आल्या वाटेने परत कातळकडा उतरून गुहेकडे न येता पश्चिम कडय़ाच्या धारेवरून खाली उतरलं की, आपल्याला कडय़ामध्ये असलेलं तीन फुटाचं नेढं (नैसर्गिकरीत्या कातळामध्ये झालेलं मोठं भोक) दिसतं.समोरच्या पठारावर दिसणार्‍या नेढ्या पर्यंत चालत जाण्यास १५ मिनिटे लागतात. 
   नेढ जवळुन पाहुन आल्या मार्गाने परत येउन किल्ला उतरावा. गडाचा डोंगर पुर्वपश्चिम पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन २७३० फुट उंचावर आहे. गडावरील सर्व वास्तु कड्यात कोरलेल्या असुन कोठेही फारशी सपाटी नाही. पावसाळ्यात गुहेच्या पुढील भागात जाणे धोकादायक आहे. पायथ्यापासुन किल्ला चढुन फिरून परत येण्यासाठी दोन तास पुरेसे होतात. 

मेसना गड :-

नाशिक जिल्ह्याची दुर्गभटकंती करताना आपल्याला अनेक परिचित अपरीचीत किल्ले पहायला मिळतात. यात परिचित किल्ल्यापेक्षा अपरीचीत किल्ल्यांचीच संख्या जास्त आहे. सतत उपेक्षित राहिलेल्या या किल्ल्यांकडे दुर्गभटक्यांची पाऊले देखील अभावानेच वळतात. मनमाड परिसरातील अंकाई-टंकाई हे दुर्ग अगस्ती ऋषींची तपोभुमी याकारणामुळे प्रसिद्ध असल्यामुळे तसेच जैन लेण्यांमुळे भाविकांच्या व पर्यटकांच्या वर्दळीचा आहे.मात्र याच अंकाई-टंकाईच्या प्रभावळीत असलेला मेसना गड अगदी अस्सल दुर्गभटक्यांनाही माहिती नसतो.फार क्वचितच कोणी या गडाला भेट दिल्याचे आढळते. 
     अजंठा-सातमाळ या डोंगररांगेवर मेसणा किल्ला विराजमान झाला आहे. तसे बघीतले तर चांदवडचे डोंगर जिथे संपतात, तिथेच मेसना गडाची रांग सुरु होते.सह्याद्री परिसरातील  गड म्हणले कि एक विशिष्ट आकार आपल्या डोळ्यासमोर येतो.पण मेसना त्याला अपवाद आहे.याला विशीष्ट असा आकार नाही, हा डोंगर आडवातिडवा पसरला आहे. किल्ल्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणीसाठी होत असावा. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेले मेसणखेडे हे या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नाशीकहुन ८१ कि.मी. अंतरावर तर चांदवड या तालुक्याच्या ठिकाणाहुन १८ कि.मी. अंतरावर आहे. चांदवड- मनमाड मार्गावर १६ कि.मी.अंतरावर मेसणखेडे गावात जाणारा फाटा असुन या फाटय़ावरून किल्ल्याचा पायथा चार कि.मी. अंतरावर आहे. मेसणखेडे गाव तसे आडवाटेवरचं गाव. चांदवडवरून मनमाडकडे जाताना, वाटेत डाव्या हाताला शिंगवे गावाकडे जाणारा रस्ता लागतो, तिथूनच शिंगवे गाव ओलांडून मेसणखेड्यात जायचे. शिंगवे गावात शिरताना मात्र उजव्या हाताला डोंगरावर एक मंदिर दिसते. जीर्णोद्धार केलेले, वर छान लाईट वगैरे असलेले दत्ताचे मंदिर आहे. 
    मेसणा किल्ला या भागात अपरीचीत असल्याने मेसणा किल्ला न विचारता प्रथम मेसणखेडे गावाची विचारणा करावी व गावात आल्यावर मेसणा डोंगर म्हणुन चौकशी करावी.मेसणखेडा गावात मुक्काम करायची वेळ आल्यास हनुमानाचे मंदीर उत्तम आहे. मंदीर परिसरात अनेक शिल्प ठेवलेली आढळतात, त्यात एका कठड्यावर एक दगडी घोडा आणि त्यावर एक बसलेले जोडपे असे शिल्प आहे. मूळ काळ्या दगडातल्या शिल्पाला नंतर रंग दिलेला आहे. दुसऱ्या कठड्यावर दगडी वाघ आणि त्यावर देवी, असेही एक शिल्प आहे. आसपास दोन-चार वीरगळीही ठेवलेल्या आहेत.
मेसणा किल्ला गावापासुन दुर असुन किल्ल्यावर फारसा वावर नसल्याने वाटा फारशा मळलेल्या नाहीत व असलेल्या वाटा ढोरवाटा असुन फसव्या आहेत त्यामुळे किल्ल्यावर जाण्यापुर्वी वाटेची नीट माहिती करून घ्यावी. अन्यथा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकामगारांच्या वस्तीमधुन माहितगाराला वाटाड्या म्हणुन सोबत घ्यावे. मेसनखेडा गावच्या बर्याच वस्त्या आहेत. त्यातीले एक वळणावळणाचा रस्ता गडाच्या पायथ्याला जातो.मेसणखेडा फाट्यापासून गडाचा पायथा ३ कि.मी. आहे. 
मेसणा किल्ला गावापासुन दुर असुन किल्ल्यावर फारसा वावर नसल्याने वाटा फारशा मळलेल्या नाहीत व असलेल्या वाटा ढोरवाटा असुन फसव्या आहेत त्यामुळे किल्ल्यावर जाण्यापुर्वी वाटेची नीट माहिती करून घ्यावी. अन्यथा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शेतकामगारांच्या वस्तीमधुन माहितगाराला वाटाड्या म्हणुन सोबत घ्यावे. या वस्तीमधुन एक वाट सुरवातीला डावीकडे जाते व नंतर किल्ल्याच्या मध्यातून वर चढत नंतर डावीकडे वळते. या वाटेने आपण डोंगराचा कडा डावीकडे व दरी उजवीकडे ठेवत डोंगर सोंडेच्या अलीकडे असलेल्या किल्ल्याखालील पठारावर पोहोचतो. वरवर पाहता नुसताच डोंगर वाटावा असा हा किल्ला आहे.
इथुन किल्ल्याकडे पहिले असता एक लहानशी घळ व तिच्या वरील टोकास झाडाची आडवी वाढलेले फांदी दिसते. हि खुण लक्षात ठेवुन थेट वर घळीच्या दिशेने चालण्यास सुरवात करावी.  किल्ल्याचा डोंगर समोर ठेवून उजवीकडच्या बाजूला जाण्यासाठी चढाई सुरु करायची. ह्या भागात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली आहे पण येथुन गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नाही. या वाटेवर कातळात कोरलेल्या ८-१० पायऱ्या असुन एका वळणावर खडकांना शेंदुर फासलेली लहानशी नैसर्गिक गुहा आहे. पूर्वी त्यात जाता येत असं स्थानिक लोक सांगतात. पण सध्या तिथे खूपच गाळ दिसला. ते बहुतांशी बुजलेल्या अवस्थेत असून, अशा रीतीने ते बंद होऊन जाणार आहे.पुढे दरीच्या काठावरील लहानशी पाऊलवाट पार करत उभा कडा वर चढत आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. पुढे तटबंदीचे अवशेष दिसतात. सगळीकडे खुपच झाडी वाढल्याने हे अवशेष त्यात लपून गेले आहेत. दगडांच्या लांब घडीव तुकड्यांनी ही तटबंदी बांधलेली आहे.
किल्ल्याचा माथा दक्षिणोत्तर साधारण १८ एकरवर पसरलेला असून समुद्रसपाटीपासुन ३०६० फुट उंचावर आहे. पठारावर आल्यावर समोरच दिसणाऱ्या लहान आकाराच्या टेकडीची वाटचाल करावी. या टेकडीवर ध्वजस्तंभाची जागा असुन तिथे सध्या पिराची स्थापना करण्यात आली आहे. गडावरील हे सर्वात उंच ठिकाण आहे. इथे एका पीराचे थडगे आहे. खरंतर नविनच एका दगडाचाच पांढरा रंग आणि शेजारी हिरवा झेंडा लावून हे स्थान बनवलेले दिसत आहे. टेकडीवरून खाली उतरुन डाव्या बाजुने पुढे गेल्यावर खाली पठारावर उतरावे. गडाच्या पठारावर यायला फार वेळ लागत नाही. इकडे गावातले लोक त्यांचे पशुधन घेऊन येतात आणि काही दिवसासाठी चरण्यासाठी इथेच सोडतात.या वाटेने डावीकडे वळल्यावर एका रांगेत काही अंतर ठेऊन खडकात खोदलेली चार पाण्याची टाकी दिसतात. यातील पहिले व शेवटचे टाके वेगळे असुन मधील टाके जोडटाके आहे. हि टाकी बुजलेल्या अवस्थेत असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी खोदताना निघालेले अखंड दगडाचे चिरे टाक्याच्या पुढील बाजुस इतर बांधकामासाठी ओळीने मांडुन ठेवलेले आहेत. एके ठिकाणी मात्र पाण्याची टाकी खोदण्याची सुरुवात करून अर्धवट सोडलेले दिसले. कदाचित तो कातळ मनासारखा मिळाला नसावा.

टाकी पाहुन पुढे आल्यावर डोंगर उतारावर असलेला साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. सध्या या तलावात मोठया प्रमाणात माती जमा झाली आहे. टाकी पाहुन पुढे आल्यावर आपण कडयाच्या काठावर गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो व आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्यावर फारसे अवशेष नसल्याने संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. किल्ल्यावर असलेल्या टेकाडावरून अंकाई-टंकाई,कात्रागड,गोरखगड हे किल्ले नजरेस पडतात.

 हडबीची शेंडी :-

    मनमाड जवळ अंकाई-टंकाई ही दुर्गजोडगोळी आहे. भरपूर वास्तू, इतिहास असलेल्या या किल्ल्यांच्या शेजारीच एक उत्तुंग सुळका आहे, ज्याचे नाव ‘हडबीची शेंडी’! काही लोक याला ‘थम्स अप’ असेही म्हणतात. हा सुळका अंगठ्याच्या प्रतिकृतीसारखा असल्यामुळे याला अंगठ्याचा डोंगर सुद्धा म्हंटले जाते. पण ‘हडबीची शेंडी’ हेच त्याचे मूळ नाव! लांबच लाब मोकळय़ा पसरलेल्या या भागात १२० फुटांचा हा सरळसोट सुळका दुरूनच लक्ष वेधून घेतो. हजारो वर्षांपूर्वी उफाळून आलेल्या ज्वालामुखीतून घडलेली ही कलाकृती. ऊन, वारा, पाऊस याचा मारा सोसत गेली हजारो वर्षे अवकाशाकडे लक्ष ठेवून उभी आहे. मनमाड- येवला रस्त्यावरुन किंवा मनमाडकडे मुंबई व पुण्याकडून तसेच संभाजीनगरकडे जाणार्या रेल्वेमार्गावरुन हा सुळका प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो.अर्थात खिडकीतून सुळका बघीतला कि सर्वसामान्य व्यक्तीचे कुतुहल शमते.मात्र सह्यपुत्राला वेध लागतात, ते शेंडीच्या माथ्यावर आरोहण करण्याचे. 




 या हडबीच्या शेंडीच्या पायथ्याशी पोहचायचे म्हणजे कात्रा गडाच्या पायथ्याचे कातरावाडी हे सोयीचे गाव. सुळका मधोमध आणि सभोवताली टेकडी अशी रचना असलेल्या या शेंडीच्या माथ्यावर जायचे तर मनमाडच्या दिशेने म्हणजे टेकडीच्या वायव्य दिशेने चढून सुळक्याचा पायथा गाठता येतो.चढाईचा मार्ग मात्र दक्षिणेकडे आहे.





सुळक्याची उंची १२० फूट असून गिर्यारोहणाच्या श्रेणीनुसार या सुळक्याचे आरोहण मध्यम ते कठीण प्रकारात मोडते.सुळका तीन टप्प्यात सर करावा लागतो. त्यात पहिला आणि दुसरा टप्पा मध्यम आणि शेवटचा टप्पा अवघड श्रेणीत मोडतो.
 हडबीची शेंडी तसा कमी उंचीचा सुळका. पण या मार्गातील सगळय़ात मोठा अडथळा हा निखळणारे दगड हा आहे. कोणत्याच पकडीवर पूर्णपणे विसंबून राहता येत नाही. कधी कोणता दगड धोका देईल याचा नेम नाही. गेल्या अनेक वर्षांच्या पाऊस-पाण्याच्या सततच्या माऱ्यामुळे या सुळक्याची मोठी झीज झालेली आहे. काही गिर्यारोहकांच्या मते पूर्वी माथ्यावर तंबू लावता यायचा, पण आज इथे जेमतेम चार-पाच लोक उभी राहण्याइतपतच जागा आहे. 





चढाई सुरू केली कि पहिला टप्प्या १५ फुटावर आहे. इथे समोरच्या दगडाच्या एका भेगेत मारलेला खिळा आहे. मात्र त्यावर विसंबणे धोक्याचे आहे.ठिसूळ खडकामुळे दोरावर पूर्णपणे विसंबून राहता येत नाही. 



दुसरा टप्पा वीस फुटाचा आहे.इथेही दोर बांधता येतो. 
 




तिसरा टप्पा देखील पाचर मारुन त्यात दोर अडकवून पार करता येतो. 










आता अंतिम टप्पा अवघ्या ३० फुटांचा असला तरी या टप्प्यावर चढाईसाठी आधार मिळत नाही. मात्र हा अवघड टप्पा प्रस्तरारोहणाचे सर्व कौशल्य वापरुन पार केला कि माथ्यावर आरुढ होण्याचा आनंद मिळतो. माथ्यावरून दिसणारा मनमाडचा परिसर. समोर उभी ठाकलेली अंकाई-टंकाई किल्ल्यांची जोडगोळी, रेल्वे रुळांचे पसरलेले जाळे, मनमाड शहर हे सारे दृश्य मनात आणि कॅमेऱ्यात साठवायचे आणि उतरायला लागायचे.
   अर्थात चढाई जेवढी जपून केली तेवढीच काळजी उतरताना घेणे आवश्यक आहे. कारण २ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या वतीने हडबीची शेंडी  या सुळक्यावर गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत १८ जण सहभागी झाले होते. त्यात काही मुलींचाही सहभाग होता.

दुपारपर्यंत सर्व सहभागींचे यशस्वी आरोहण झाल्यानंतर सर्व सहभागींना खालच्या टप्प्यावर उतरवण्यात आले. शेवटचे तिघे जण उतरण्याच्या बेतात असताना त्यातील दोघे थेट ११० फूट खाली कोसळले. 
यात त्यांचा मृत्यू  झाला. मृतांमध्ये तांत्रिक पथकाचे प्रमुख अनिल वाघ व मयुर म्हस्के यांचा समावेश आहे. तेव्हा असे अपघात टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

संदर्भ :-
१) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
३)  www.trekshitiz.com हि वेबसाईट
४ )  www.durgbharari.in  हि वेबसाईट
५ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा -सतिश अक्कलकोट
६) http://omkarkelkar.blogspot.com/2020/01/blog-post_12.html,  https://www.loksatta.com/trekit/hadbi-mountain-trek-1038398, http://pkothavade.blogspot.com    या वेबसाईट



 
 बऱ्याच दिवसांपासून मिस होत असलेल्या ट्रेकची आज शेवटी भट्टी जमुनच आली🙏🏻

सातमाळेच्या उपरांगेतील मनमाड रेंज मधील असलेले काहीसे अपरिचित व अडवळणी असलेले किल्ले म्हणजे कात्रा व मेसणा

मागे जुलै मध्ये त्याच रांगेतील  गोरखगड,अंकाई-टंकाई एका दिवसात भरपूर तंगडतोड करून केले होते,त्याच वेळेस ठरवले की कात्रा व मेसणाची भटकंती सुद्धा अशीच एका दिवसात करून टाकू!

पण जुलै(२०२१)पासून तसा तिकडे भटकंती करण्याचा योग काही जुळून येतच नव्हता,शेवटी आज १६जानेवारी२०२२ला कात्रा व मेसणाची भटकंतीचा ताळमेळ बसलाच 😍

सकाळी ६वाजेच्या दरम्यान मी व अंशुमनने सर्व आवरसावर करून  कडाक्याच्या थंडीत मुंबई-आग्रा रोड मार्गे चांदवड  गाठले.

 चांदवड-मनमाड रोडने चांदवडच्या पुढे दुगांव पासून उजव्या बाजूला एक फाटा फुटतो त्या मार्गे गंगावे,निंबाळे,रायपूर,वडगांव पंगू वरून कात्रा किल्ल्याचे पायथ्याला असलेले गांव कातरवाडी सकाळी ८.३०च्या दरम्यान गाठले🙏🏻

(कारण आधी आम्ही कात्रा किल्ल्याची भटकंती करून नन्तर मेसणा किल्ल्याची भटकंती करू असे ठरवले होते)

योगायोगाने किल्ल्याच्या पायथ्याला जिथे गाडी लावली ते नातेवाईकच निघाले,त्यांच्याशी गप्पा मारता मारता गडावर जाण्याचा रस्ता विचारून घेतला व सोबतच पाठीवरील सॅक काढून त्यातील वस्तूंची परत एकदा काळजीपूर्वक उजळणी केली, व त्यांचा निरोप घेऊन ९ वाजेच्या सुमारास मी व अंशुमनने गड चढाईस सुरवात केली,थोडेसे चालल्यावर समोरच कपिलमुनींचा आश्रम लागतो.आश्रमाच्या परिसरात साफसफाई बऱ्यापैकी दिसून आली व परिसरात भरपूर झाडे लावलेली आहे,

आश्रमाच्या डाव्या बाजूच्या एका गाय वाटेवरून आम्ही किल्ल्याच्या दिशेने चढाईस सुरवात केली,कारण इकडे डोंगरभटक्यांचे पाय क्वचितच वळतात म्हणून रुळलेली अशी वाट नाही,ज्या पण वाटा आहेत त्या सर्व गायवाटा आहेत,किल्ला नजरे समोर ठेवून मी व अंशुमनने कपिल मुनींच्या आश्रमा मागील डोंगराच्या पोटापोटाने किल्ल्याकडे मार्गक्रमण केले बऱ्याच ठिकाणी काही वाटा मधेच गवतात गायब होत होत्या😀पण लगेचच दुसरी एखादी पायवाट दिसली की तिच्यावरून आम्ही पुढे चालत राहिलो,बऱ्याच ठिकाणी घसारा खूप आहे व सगळीकडे गवत खूप वाढलेले आहे व सोबतच गुलतुऱ्याचे जंगल भरपूर आहे,बराच वेळ चालल्यावर आम्ही एका घळी जवळ येऊन पोहोचलो तिथे थोडे पाणी पिऊन व आजूबाजूचा आढावा घेऊन नेमके कुठल्या बाजूने वर चढाई करायची याचा अंदाज घेतला व लगेचच घळीतून पुढे वरच्या बाजूस चालायला सुरुवात केली, घळ थोडी चढून आल्यावर घळेच्या उजव्या बाजूस झाडोऱ्यात लपलेल्या गुहांचा समूह नजरेस पडला, गुहेत थोडे थांबून व आजूबाजूचा नजारा पाहून लगेच आम्ही घळ चढून वर आलो व किल्ल्याच्या माथ्याच्या रोखाने पुढे चालत आलो पहिल्या टप्प्याच्या पठारावर दोन ते तीन अर्धवट बुजलेले टाके आहेत अजून थोडे पुढे आल्यावर खालच्या बाजूस ३ते४ गुहांचा एकत्रित समूह आढळतो व आपणास येथे एका गुहेतून दुसऱ्या गुहेत सहजपणे जाता येते.व गुहे समोरच खाली एक खोदीव टाके आहे,

तिथून आम्ही पुढे उजव्या बाजूने बरेच पुढे गेलो व गडमाथ्यावर जाण्यासाठी मागील बाजूने चढाई केली तिकडे भरपूर घसारा आहे, शक्यतो नवख्यानी ह्या बाजूने बाजूने चढाई करायचे टाळलेले बरे,

गडमाथ्यावर एका भल्यामोठ्या दगडाला शेंदूर फासलेला आहे व हौदा सारखे काहीतरी वीट बांधकाम केलेले आहे ते बघून आम्ही समोरील टोकाकडे आलो तिथून आम्हाला पूर्वेकडे डाव्या बाजूस हडबीची शेंडी,व समोर कपिल मुनींचा आश्रम असलेला डोंगर व त्यामागे अजून एकदोन डोंगर दिसत होते,तर उजव्या बाजूस गोरखगड व त्याच्या मागच्या बाजूस अंकाई व टंणकाई हे जोडकिल्ले दिसत होते,तर मागील बाजूस चांदवड रांग धूसर दिसत होती कारण आज वातावरण थोडे ढगाळ होते, तिथेच किल्ल्याच्या पठारावर बसून गूळ,शेंगदाणे व खाऱ्या फुटण्यावर ताव मारला व लगेचच खाली उतरण्यास सुरवात केली पण परत मागे न जाता सरळ समोरच्या बाजूने उतरण्यास सुरवात केली,सुरवातीलाच एक १४ते१५ फुटांचा अवघड असा कातळ टप्पा लागला, आता तर पंचाईतच झाली परत मागे फिरून खाली यायचे तर किमान एक तास लागणार होता.शेवटी थोडी हिम्मत करून तो कातळटप्पा  सर्व काळजी घेऊन रॅपल केला! व सरते शेवटी घळेच्या तोंडावर आलो व झटपट घळ उतरून पायथ्याच्या दिशेला निघालो,

पायथ्याला आल्यावर परत एकदा पाठीवरील सॅकची उजळणी केली व गाडी जिथे लावली होती त्यांना रामराम ठोकून मेसणा किल्ल्याकडे जाण्यासाठी गाडीला किक मारली!

आता मेसणखेडी कडे जाण्यासाठी पुढे वडगांव पंगू मध्ये एका टपरीवजा दुकानावर थांबून सविस्तर मार्ग विचारून घेतला व तिथून पुढे रेपलेगांवावरून वाघदर्डी गांव मार्गे वाघदर्डी धरणाच्या भिंती समोरून दत्ताचे शिंगवे गावाचा रस्ता धरला व सरळ शिंगवे गावातून पुढे मेसणखेडी गावांत पोहोचलो,गावाच्या थोडे पुढे आलो(जेजुरे वस्ती) व तिथेच रस्त्याच्या कडेला शेळ्या-बकऱ्या वळणाऱ्याला विचारले की मेसण्याच्या डोंगरावर जाण्यासाठी कुठल्या बाजूने जावे?

तर तो म्हंटला तुम्ही बरेच पुढे आला आहात!

मागे फिरून जा, गावाच्या बाजूने रस्ता आहे तिकडून जा!

त्याला म्हंटलो अरे हा काय समोरच दिसतोय रे मेसण्याच्या डोंगर,तर तो म्हंटला तुमची तयारी असेल तर इकडून सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण चढाई सरळ अंगावर येणारी आहे,पहा जमत असेल तर?😍

आता दुपारचा एक वाजत आला होता,

मग काय आम्ही तिथेच एका कोरड्या पडलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या काठावर गाडी लावली व दोन ते तीन कांद्याचे शेत पार करून डोंगर पायथ्याला येऊन पोहोचलो. व सरळ गायवाटेवरून चढाई सुरू केली,जवळजवळ २५ते३०मिनिटांची चढाई केल्यावर आम्ही एका पठारवजा जागेवर पोहोचलो,तिथून आजूबाजूचा परिसर न्याहळत परत  चढाईला सुरवात केली.

१५ते२०मिनिटांच्या चालींनतर आम्ही एका सरळ उभ्या डोंगर कड्याच्या खाली पोहोचलो तिथे थोडे आजूबाजूला पाहून वरती जाण्याचा रस्ता शोधला व एके ठिकाणी थोडी पाऊलवाट दिसली त्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर आम्हाला कड्याच्या वरती जाण्यासाठी एका कपारीवजा भागातून वरती जाण्याचा रस्ता सापडला,कपारीच्या बाजूला एक भुयारा सारखे गोल खड्डे पडलेले आहे तिथे स्थानिकांनी भगवा झेंडा लावलेला आहे,व काही दगडांना शेंदूर फासलेला आहे ते बघून आम्ही पुढे गेलो व वरती चढाई करून विस्तीर्ण अश्या पठारावर आलो,

आता पठारावरून डाव्याबाजूस गडमाथा खुणावत होता,आम्ही लगेच गडमाथ्याच्या दिशेने चालण्यास सुरवात केली.

गडमाथ्यावर अलीकडेच कुणीतरी पिराचा हिरवा झेंडा व दगड रचून थडग्यासारखी रचना करून वरती हिरव्या कपड्याची चादर अंथरून ठेवलेली दिसली,त्याच्या पुढे डाव्या बाजूस डोंगर कड्यावर परत एक भगवा झेंडा लावलेला दिसला.गडमाथ्यावरून आपल्याला कात्रा, हडबीची शेंडी,गोरखगड, अंकाई-टणकाई किल्ला व चांदवड रेंज मधील काही किल्ल्यांचे दर्शन होते.गडमाथा तसा एकदम आटोपशीर आहे,

आम्ही गडमाथ्यावरून चोहोबाजूला कुठे काही अवशेष आहेत का गडमाथ्याच्या डाव्या बाजूस काही घरांचे अवशेष व काही टाके नजरेस पडले आम्ही गडमाथा उतरून त्या आवशेषांकडे गेलो तिथे एकत्र तीन टाके व त्याच्या थोडे पुढे परत दोन टाके आहेत दोन ते तीन टाक्यांमध्ये पाणी आहे व बाकीचे अर्धवट बुजलेले आहेत.तिथून सरळ पुढे आल्यावर एक कोरडे पडलेले छोटेसे तळे दिसले.तळ्याच्या बाजूने सरळ पुढे येऊन आम्ही उतरणीच्या रस्त्याला लागलो,कुठेही न थांबता आम्ही ३०ते३५ मिनिटात गडपायथा जवळ केला  आता दुपारचे २.४५ वाजत आले होते, तिथेच खाली कोरड्या पडलेल्या बंधाऱ्यात एका झाडाखाली बसून आम्ही जेवण केले व सरासरी  ३वाजेच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला सुरवात केली🙏🏻

इति कात्रा व मेसणा भ्रमंतीय न


https://firastya.blogspot.com/2022/01/of-sahyadri.html

 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...