नाशिक जिल्हा अनेक आश्चर्यांनी नटलेला आहे. यात समेधशिखर म्हणून प्रसिद्ध असलेले मांगीतुंगी हे क्षेत्र. मांगीतुंगी पहायचे म्हणजे एका दिवसाची अनोखी सहलच होते. जैन स्थापत्य अथवा जैन मूर्ती महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. अगदी वेरुळच्या ठिकाणी सुद्धा सुंदर जैन लेणी पाहायला मिळतात. परंतु उंच डोंगरावर वसलेली आणि अत्यंत सुंदर अशी जैन लेणी पहायची असतील तर नाशिक जिल्ह्यातील सेलबारी रांगांकडे जावे लागे. साल्हेर–सालोटा हे देखणे दुर्ग याच सेलबारी-डोलबारी रांगेमध्ये वसले आहेत. आणि त्यांच्याच समोर आहेत हे मांगी तुंगीचे जुळे डोंगर. लांबून पाहताना सुद्धा हे अत्यंत आकर्षक असे दोन सुळके दिसतात. या मांगी तुंगीच्या जुळ्या डोंगरामध्ये जैन लेणी खोदलेली आहेत. मध्ययुगीन जैन स्थापत्याचा हा एक अजोड नमुना म्हणावा लागेल. सटाणा तालुक्याच्या पश्चिम सीमेवर लागून असलेला हा परिसर आहे.हे क्षेत्र म्हणजे जैन धर्मीयांची प्राचीन लेणी असुन त्यांचे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तीर्थक्षेत्र आहे. बागलाण मधील किल्ल्यांची भटकंती या सुळक्यांना भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नसल्याने या सुळक्याना भेट देणे क्रमप्राप्त आहे.
मांगी-तुंगी सुळके
सेलबारी डोंगररांग
महाराष्ट्रात सह्याद्रीची रांग उत्तर- दक्षिण धावते. याची सुरवात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात होते. मात्र खर्या अर्थाने सह्याद्रीचे राकट रुप बघायला मिळते ते नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात म्हणजे बागलाणात ! इथे एक दुहेरी डोंगरधार मुख्य सह्याद्रीला लागून आडवी पुर्व-पश्चिम पसरली आहे.या रांगांना सेलबारी, डोलबारी रांग म्हणतात. यातील सेलबारी रांगेत एखाद्या पहारेकर्यासारखे मांगी,तुंगी हे सुळके व रतनगड उर्फ न्हावीगड हे किल्ले तर तांबोळ्या हे शिखर वसले आहे. तर दुसर्या डोलबारी रांगेत मोरा,मुल्हेर, हरगड ,सालोटा आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च दुर्ग साल्हेर वसला आहे. यातील मांगी,तुंगीची आज भटकंती करायची आहे.
येथूनच मांगी-तुंगी सुळक्यांचे प्रथम दर्शन झाले.
आता मंदिरात जाऊन फ्रेश होऊन आदिनाथाचे मंदिर पाहायला लागलो. तेथे फोटो काढायला बंदी होती.
मांगी,तुंगीच्या पायथ्याच्या गावाचे नाव भिलवाड. इथे अनेक मंदिरे आणि रहायला धर्मशाळा आहेत. जेवणाचीही सोय होते. भिलवाड गावातील ट्रस्टच्या धर्मशाळा आहेत. राहायचे ५० रु. प्रतिदिवस इतके नाममात्र भाडे आहे. तसेच भिलवाड गावातील ट्रस्टच्या मंदिरात खाण्याची सोय आहे. जेवण केवळ रु. ४० प्रतिव्यक्ती इतके नाममात्र आहे. जेवण साडेपाच ते साडेसहा याच वेळात असते. सूर्यास्तानंतर जैन भोजन करत नाहीत, म्हणून असेल. इतकेच नव्हे, तर आवारात शिजवायलाही परवानगी नाही. इथून दोन किमीवर प्रत्यक्ष मांगी-तुंगीचा पायथा आहे. तिथून साडेतीन हजार पायऱ्या चढून सुळक्यांवर जावे लागते.पायथ्यापर्यंत जीपची सोय होऊ शकते पण चारनंतर जीप बंद असतात.
सुरत ते मांगी तुंगी रस्ता
इथे जायचे तर नाशिक–सटाणा- ताहराबाद मार्गे भिलवड गाव साधारण १५० कि.मी. अंतरावर आहे. मुंबई-आग्रा हायवेवरून सोग्रस फाट्यावरून देवळा व पुढे सटाणा तालुक्यात आपण पोहचतो. सटाण्यात गेल्यावर तेथून ३० किलोमीटरवर ताहाराबादच्या पुढे मांगीतुंगी फाटा लागतो. तेथून ६ किलोमीटरवर तुंगाडी नदीच्या कुशीत विसावलेले भिलवाड हे छोटेसे आदिवासी गाव लागते. ताहराबाद ते मांगी,तुंगी अशा अनेक् बस व जीप आहेत. ताहाराबाद पासून मांगी-तुंगी फाट्यापर्यंत आल्यास ( शेअर रिक्षा, १५ रु. प्रती सीट) येथून पुढे मंदिरापर्यंत ट्रस्ट च्या गाड्यांची विनामूल्य सेवा आहे. येथे कोणत्याही गोष्टीसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. आणि तरीही यासाखी सेवा- सुविधा आणि स्वच्छता इतर कोणत्याही मंदिरात व तीर्थक्षेत्री नसेल. जर उत्तर भारतातून किंवा उत्तर महाराष्ट्रतुन आपण येत असाल तर मालेगावला यावे मालेगाव आग्रा मुंबई महामार्गावर मोठे शहर आहे. तिथून नामपूर अथवा सटाणा मार्गे ताहाराबाद येऊन मांगी तुंगी ला येवू शकता. जर आपण दक्षिण भारतातून येतात तर नाशिक मार्गे सटाणा यथे येऊन ताहाराबाद वरून मांगी तुंगी येवू शकतात.
रेल्वे : नवापूर रेल्वे स्टेशनला उतरून पिंपळनेर मार्गे ताहाराबाद पुढे मांगी तुंगी. मनमाड रेल्वे स्टेशनला उतरून मालेगाव मार्गे ताहाराबादला येता येईल.
गावात प्रवेश करताना समोर दोन्ही बाहू पसरून उभा असलेला मांगीतुंगी पर्वत आपले स्वागत करतो. गावात पांढरीशुभ्र जैन मंदिरे, परिसरात श्री १००८ विश्वहितंकर सातीशय चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर, सहस्रकूट कमल, मानस्तंभ, मुनीसुव्रतनाथ, आदिनाथ आदी मंदिरे पहायला मिळतात. जैन मंदिरातील मूर्तींचे वेगळेपण चिमुकल्यांना मोहात पाडते. अगदी तळहातापासून ३१ फूट उंचीची भगवान सुव्रतनाथ यांची शनिग्रह निवारक मूर्तीपर्यंत विविध जैन मूर्ती पहायला मिळतात. या श्री सिध्दक्षेत्रावर मुनी सुव्रतनाथांची काळ्या पाषाणातील सुंदर अशी ७ मीटर उंचीची प्रतिमा तयार करण्यात आली. पुज्य आर्थिका श्री ज्ञानमती माताजी यांनी हि मुर्ती बनवण्यासाठी अपार कष्ट घेतले. २३ मे १९९६ रोजी भगवान श्री सुव्रतनाथांच्या मुर्तीवर महामस्तकाभिषेक झाला. सहस्त्रकूट कमल मंदिर, मानस्तंभही आहेच. त्याशिवाय आदिवासी बांधवांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती अन् त्यांचे जीवनमानही अनुभवता येते.







हे एक जैन तीर्थस्थान असल्याने भाविकांची येथे कायम गर्दी असते. महावीर जयंती हा येथील महत्त्वाचा सण असतो. भिलवड गावातच असलेल्या मांगी-तुंगी ट्रस्ट द्वारे याची देखरेख ठेवली जाते. पायथ्याशीच मोठे आदिनाथ मंदिर असून मोठ्या आणि भव्य अश्या महावीराच्या पुतळा/प्रतिमा येथे आहेत. आदिनाथाचे मंदिरात फोटो काढायला बंदी आहे
बागलाण प्रांतांची भटकंती करत असताना सेलबारी-डोलबारी डोंगर रांगेवर असलेले दोन सुळके सतत आपले लक्ष वेधुन घेतात व त्या सुळक्याविषयी ओढ आपल्या मनात निर्माण होते. याच सुळक्यांच्या पायथ्याशी मांगी व तुंगी नावाची गावे देखील आहेत. म्हणजे देवस्थान मांगी,तुंगी, शिखरावरच्या सुळक्याची नावे मांगी,तुंगी तसेच पायथ्याची गावे देखील मांगी,तुंगी आहेत. मांगीतुंगीबाबत अनेक अख्यायिका आहेत. त्या तेथील ग्रामस्थांकडून समजून घेणे मजेशीर ठरते. डोंगरावर ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ असलेल्या अनेक गुहा असून त्या महावीर गुहा, शांतीनाथ, आदिनाथ, पार्श्व म्हणून ओळखतात. मांगी डोंगरावर कृष्णकुंड असून, ते कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजतात. येथे सात मंदिरे असून अनेक जातानाच्या मार्गात अनेक पादुका कोरलेल्या दिसतात. तुंगी डोंगरावर पाच मंदिरे आणि दोन गुहा आहेत. मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडी सदृश मार्गातही २ गुहा आणि एक मंदिर आहे.
मांगी-तुंगी डोंगर हे इ.स.च्या १२ व्या शतकापासून एक महत्वाचे आणि अत्यंत लोकप्रिय असे दिगंबर जैन तीर्थ आहे. मांगी-तुंगी हे एक जैन सिद्ध-क्षेत्र आहे. सिद्ध-क्षेत्र याचा अर्थ असा की सिद्धी/ मोक्ष मिळवण्याचा मार्ग (gateway to the state of enlightenment.). या ठिकाणाबाबतची दंतकथा अशी की या ठिकाणी जवळजवळ ९९ कोटी जैन मुनींना निर्वाण अवस्था प्राप्त झाली. या ठिकाणाचे उल्लेख अनेक मराठी आणि संस्कृत साहित्यामध्ये आलेले आढळतात. भारतातील गिरनार, शत्रुंजय, पावापुरी या जैन तीर्थक्षेत्रांसोबतच या ठिकाणाला सुद्धा अनेक यात्रेकरूंनी भेट दिलेली आहे. पायथ्याशी दोन जैन मंदिरे आणि एक मानस्तंभ पाहायला मिळतो.
विसावे तीर्थंकर श्रीमुनी सुव्रतनाथ यांनी अयोध्येत जन्म घेतला. पुढे आयुष्यभर त्यांनी त्याग आणि सेवेचा साक्षात्कार घडवत आपले आदर्श जपले.याच तीर्थंकरांच्या काळात भगवान श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला अशी माहिती जैन ग्रंथात मिळते.या ग्रंथानुसार भगवान श्रीराम अयोध्येतून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी मांगी तुंगीवर तप केले आणि ते मोक्षधामास गेले, त्यांच्याबरोबर ह्या जैन समाजाच्या सिद्ध क्षेत्री, हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गव, गवाक्ष आणि इतर रामायणातील ९९ वानररूपी योद्ध्यांना जीवनातून मुक्त होऊन मोक्ष मिळाला असे मानले जाते. याबध्दलचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे.
राम हनु सुग्रीव सुडोल गव गवाक्ष नील महानील |
कोटी निनाल्ये मुक्तिपाधन तुंगी गिरीवंदाधर ध्यान
तसेच जैन महाभारतानुसार श्रीकृष्ण आणि बलराम यांचा संबंध मांगीतुंगीशी कसा आला याचे वर्णन आहे. यादव कुळाचा नाश झाल्यावर श्रीकृष्ण रानावनात भटकत असताना, पारध्याचा बाण लागून त्याचा अंत झाला. तेव्हा बलराम श्रीकृष्णाला जिंवत करण्यासाठी त्याचे मृत अवस्थेतील शरीर घेउन फिरत फिरत मांगी तुंगी शिखरावर आले.इंद्राच्या सांगण्यावरुन बलरामाने श्रीकृष्णाचा अंत्यविधी मांगी तुंगीच्या पठारावर केला. सध्या मांगी आणि तुंगी या दोन सुळक्यांना जोडणाऱ्या अरुंद भागावर दोन नवीन इमारतींची उभारणी केलेली आढळते. शेजारीच एक छोटे कुंड असून त्याला कृष्ण कुंड असे म्हणतात. प्रचलित दंतकथेनुसार इथेच भगवान श्रीकृष्णाचे दहन त्याचा भाऊ बलरामाने केल्याचे मानले जाते.
बिहारमधील प्रसिद्ध आणि पवित्र अशा संमेद शिखरावरून मांगी-तुंगी या स्थानाला दक्षिणेचे संमेद शिखर असे नाव जैन मंडळींनी दिलेले आहे. मांगी,तुंगी हे केवळ शिखर असून चुकीने लोक त्यांना किल्ले समजतात, पण हे गिरीदुर्ग नाहीत.ब्रिटीश लोक यांचा उल्लेख 'मांगी,तुंगी हिल्स' असा करत. बागलाण परिसरात बागुलवंशीय राठोडांनी राज्य केले. या घराण्यात एकुण ५४ राजे होउन गेले.यातील ११ वा राजा वीरमदेव राठोड याने हि लेणी खोदून घेतली. तसेच नामदेव राठोड या राजाने मोसम, पांझरा नदीवर इ.स.१३६० मध्ये बांधलेले बंधारे आजही पहाता येतात. याचे कौतुक सर विश्वेश्वरैय्यानींसुध्दा केले होते.हे राजे स्वतःची नाणी पाडत व त्यांची स्वतःची चलन व्यवस्था होती.हे राजे स्वतःला 'बहिर्जी' हि पदवी लावून घेत. मुल्हेर हि त्यांची राजधानी होती.
पुढे मांगी तुंगीचा इतिहासात उल्लेख ब्रिटीश काळात येतो. या सुळक्यांना इंग्रज 'मांगी तुंगी हिल्स' म्हणत.इंग्रज राजवटीत मांगी तुंगी सुळक्यांच्या पायथ्याच्या भिलवाडा गावात मोठा सत्याग्रह झाला, त्याला 'भिलवाडा सत्याग्रह' म्हणतात. या सत्याग्रहात सुमारे ५००० लोक सामील झाले होते. सत्याग्रहींना जैन देवालयाचे श्री. बाळा पुजारी यांनी खुप मदत केली. या सर्व सत्याग्रहींची बसण्याची सोय जैन देवालयामध्ये करण्यात आली होती. त्याकाळी या परिसरात मोठे जंगल होते. त्या जंगलातील गवत इंग्रज अधिकार्यांवर फेकण्यात आले होते. हा सत्याग्रह भिलवाडच्या जैन मंदीराच्या साक्षीने झाला म्हणून त्याला 'भिलवाडचा सत्याग्रह' असे म्हणतात.
जैन धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या या पहाडाला या परिसरातील लोक 'देव डोंगर' मानतात. इथे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. या परिसरात अहिराणी भाषा बोलली जाते. या भाषेत या शिखरासंदर्भात काही लोकगीते एकायला मिळतात.
मांग्यातुंग्या देवडोंगर | त्यांना खालता दावलपिर
अगदी या डोंगरांना स्थानिक लोक नवस देखील बोलतात.गाण्यामध्ये ते हेच सांगतात.
मांग्यातुंग्या ना डोंगर शेंडीपाशी वाही वनु | करदांडान बाळ मनी मनाले मांगि वनु |
या लोकगीतातील स्त्री मांगीतुंगीवर जाउन आली आहे आणि आपल्या मुलीला मुलगा व्हावा असा नवस ती या पर्वताला बोलली आहे.
तसेच
मांग्या न तुंग्या दोन्ही हजार बेजारी | भाउ मांगे पुतरु उभी व्हते मी शेजारी |
या काव्यात एक बहिणीने आपल्या भावाने मुलगा व्हावा यासाठी या डोंगराला कसा नवस बोलला याचे वर्णन केले आहे.
मांग्या तुंग्या अंगती दोन्ही भाउ | त्यासी जतराले हुंबडवाण्या बहु |
या लोकगीतात मांगी,तुंगी इथे भरणार्या जत्रेचे वर्णन आहे.
मांग्या न तुंग्या शेंडीपासून पोकळ | झुगारीला लिंबु जाई गांगेश्वरी गोकुळ |
इथे मांगी, तुंगी डोंगराचे वर्णन केले आहे.
मांगी-तुंगी शिखराकडे :-
मांगी,तुंगीची उंची आणि एकंदरीत सर्व परिसर पहाण्यासाठी कमीतकमी पाच तास तरी हवेत.सहाजिकच वैराण आणि भाजून काढणार्या उन्हाचा त्रास नको असेल तर पहाटे शक्य तितक्या लवकर चढाई सुरु केलेली फायद्याची ठरते. अनेक जैन कुटुंबे अत्यंत भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात. आदल्या दिवशी भिलवडदर्शन आणि दुसर्या दिवशी पहाटे मांगीजी-तुंगीजी दर्शन असा बहुतेकांचा प्रोग्राम असतो. पहाटे चार वाजता उठून पाच वाजता तयार होउन बाहेर पडायचे.इथून दोन किमीवर प्रत्यक्ष मांगी-तुंगीचा पायथा आहे.पायथ्यापर्यंत येण्यासाठी ट्रस्टच्या गाड्यांची सोय असून केवळ १५ रुपये आकारले जातात. मांगीतुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातुन दोन मार्ग आहेत.
भिलवडी गावातील मुख्य रस्त्याने या शिखरांच्या दिशेने पुढे आल्यावर रस्त्याला दोन फ़ाटे फ़ुटतात. उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो तर डावीकडील रस्ता न्हावी गडाच्या दिशेने जातो. उजवीकडील रस्त्याने डोंगराच्या पायथ्याशी गेल्यास या दोन्ही सुळक्यांवर जाण्यासाठी सुमारे २५०० पायऱ्या चढाव्या लागतात.
पायथ्याशी एक विश्रामगृह आहे. येथे पाणी, खाद्यपदार्थ आणि प्रसाद मिळतो. येथूनच समोर पाहिले तर अतिशय नयनरम्य असे मांगी-तुंगीचे जुळे किल्ले नजरेस पडतात. नवख्या लोकांचा गोंधळ होतो, कि यातील नेमका कोणता मांगी आणि कोणता तुंगी.
उत्तर आहे डाव्या बाजूस मांगी आणि उजवीकडे तुंगी. मांगी उंचीने कमी असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १३२० मीटर ( ४३३० फुट ) तर तुंग म्हणजे उत्तुंग म्हणजेच उंच, अर्थात उंचीने जास्त असणार्या या सुळक्याची उंची १३३१ मीटर ( ४३६६ फुट )आहे. पायथ्याच्या विश्रामगृहापासून निघाले म्हणजे अत्यंत सुबक आणि सुस्थितीतील पायऱ्या चालू होतात. कोणीतरी अमेरिका निवासी जैन बांधवाने त्या तीन हजाराहून अधिक पायऱ्या बांधल्या असा तेथे बोर्ड आहे. 'अमेरिका निवासी' असे आवर्जून लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.
वृद्ध आणि अपंग माणसांना वरती नेण्यासाठी डोलीची हि व्यवस्था आहे. वरती लिंबू-सरबत विकणारे लोक असतात. पावसाळ्यात ह्या मांगीतुंगी पर्वतावरून १००१ धबधबे कोसळतात. आपण खालून ते मोजू शकतो. त्याससहस्त्रधारा म्हणतात .त्यामुळे हिरव्या शालूवरून दुधाच्या धारा कोसळाव्या असा हा परिसर विलोभनीय दिसतो.
गडावर पाणी नाही. त्यामुळे पायथ्यापासूनच पाणी घेऊन जावे. दोन्ही गड पाहून यायला पाच ते सहा तास लागतात.
तुंगी वर खूप माकडे आहेत. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन तुंगी वर जाऊ नये.
तळातून पायऱ्यांच्या वाटेने सुरवात केल्यास अर्धे अंतर पार केल्यावर डाव्या बाजुस कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. यातील एका गुहेत भगवान नैनीनाथांची मुर्ती असुन दुसऱ्या गुहेत भगवान सुव्रतनाथांची मुर्ती आहे.
पहिल्या गुहेला 'नैनिनाथांची गुंफा' म्हणतात. इथे नैनिनाथांची आसनस्थ मुर्ती असून ती स्मितहास्य करताना आहे.
![]() |
आश्चर्य म्हणजे या मुर्तीच्या दंतपंक्ती स्पष्ट दिसतात. त्यांच्या मुर्तीवर छत्र कोरले आहे व छताकडच्या बाजुला वादक कोरले आहेत. दर्शनी स्वागत कक्षात दोन्हीकडे द्वारपाल व अनेक जैन मुनींच्या मुर्ती सहजासनात कोरल्या आहेत.
इतर मुर्तीमध्ये क्षेत्रपाल, नृत्यांगना व नक्षी कोरली आहे. डावीकडील कातळभिंतीत सिंहावर स्वार झालेली राणी व हत्तीवर बसलेला राजा कोरलेला आहे.
काही तीर्थकरांच्या मुर्ती उभ्या असून त्यांच्या शिरावर पाच फण्याचा नाग दाखवला आहे. दुसर्या मोठ्या गुंफेत काळ्या तुकतुकीत पाषाणात भगवान सुव्रतनाथांची हसरी मुर्ती आहे.इथेहि अनेक जैनमुनींच्या मुर्ती कोरल्या आहेत. या गुंहेतही एकामागोमाग एक अशी दोन दालने आहेत. जवळच पाण्याची टाकी देखील आहेत पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही.


या गुंफा बघून पुन्हा मुळ पायर्यांच्या वाटेला यावे. मांगी सुळक्याखाली ४००० फुट उंचीवर जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फ़ूट उंच मुर्ती कातळात कोरण्यात आली असुन या मूर्तीचा प्राण-प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये करण्यात आला. या मुर्तीपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनविलेला आहे. या रस्त्याने वर भाविकांची ये-जा करण्यासाठी येथील संस्थेने खाजगी वाहनांची सोय केली असुन त्यासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये देणगी शुल्क आकारले जाते. हा मार्ग खूपच सोयीचा असुन रस्ता कच्चा व उभा चढ असल्याने त्यावर ४ x ४ वाहनाचा वापर केला जातो. आपले खाजगी वाहन या वाटेने वर नेणे धोक्याचे असल्याने त्यासाठी परवानगी दिली जात नाही. या वाटेने १५ मिनीटात आपण भगवान महावीरांच्या मुर्तीपर्यंत पोहोचतो.
असे झाले श्री भगवान ऋषभदेव यांच्या विश्वविक्रमी मूर्तीचे निर्माण
जैनधर्माच्या सर्वोच्च गणिनीप्रमुख आर्यिका ज्ञानमती माताजी १९९६साली चातुर्मासाच्या निमित्ताने मांगीतुंगी येथे आल्या होत्या. त्यावेळी तप, अंतर्ध्यानाने झालेल्या साक्षात्कारानुसार या पवित्र पर्वतावर प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान ऋषभदेव यांची १०८ फूटी अखंड पाषाणातील मूर्ती निर्माणाचे कार्य हाती घेण्यात आले होते. माताजी यांनी निश्चित केलेली मूर्तीची जागा पर्वताच्या मध्यावर जमिनीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर होती. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ता तर दूर मात्र पायवाटही अस्तित्वात नव्हती. जगाच्या पाठीवर अखंड पाषाणात १०८ फूटी मुर्ती कोठेही नसल्यामुळे या मूर्तीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. पर्वताच्या मध्यावर अखंड शिळा शोधून त्यात भगवान ऋषभदेव यांची १०८फूट उंच मूर्ती साकारणे हे एक दिव्यच होते. माताजी यांच्या नेतृत्वाखाली व समितीचे अध्यक्ष कर्मयोगी पीठाधीश स्वस्तीश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पार पडले. २०१६ साली या विश्वविक्रमी मूर्तीचा प्रथम महामस्तकाभिषेक सोहळा पार पडला.
ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम १२० फूट लांबीच्या कापडावर या प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले व त्याबरहुकूम ही मूर्ती घडविण्यात आली. मूर्तीची रचना निश्चित करण्यासाठी अनेक दिवस अभ्यास सुरू होता. त्यासाठी ग्रीक तत्त्वज्ञानासह पाली, संस्कृतसह दहा भाषांतील ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला. जैन परंपरेतील वसुनंदी ग्रंथातील उल्लेखांचाही अभ्यास करण्यात आला. संस्कृत, ताडपत्रांवरील ग्रंथ, तामिळ, कन्नड, तेलगू, वैष्णव ग्रंथ, द्रविड, हीडा, ग्रीक मायथॉलॉजी आदी ग्रंथांतील वर्णनांचा अभ्यास झाला. त्यात उल्लेख असलेले अंगुलीचे प्रमाण अभ्यासण्यात आले. त्याचे रूपांतर फुटांत करून मूर्तीचे परिमाण निश्चित करण्यात आल्याने ही विश्वातील सर्वांग सुंदर मूर्ती तयार झाली आहे. त्यामुळे मांगीतुंगी हे जैन धर्मीयांचे जागतिक तीर्थस्थळ होऊ घातले आहे.
मांगी डोंगराच्या पश्चिमेस अखंड असा कातळ खोदून १०८ फुटी भव्य आणि भारतातील सगळ्यात मोठी अशी हि आदिनाथाची मूर्ती उभारण्याचे अनेक अडचणी आल्या. यासाठी ट्रस्टने राज्य सरकारची परवानगी घेऊन, अखंड असा कातळ शोधण्यासाठी अनेक कष्ट आणि खर्च केलेला आहे. JCB, क्रेन आणि इतर साहित्य हे अगदी शिखराच्या वर नेऊन ठेवले आहे. JCB दिलेल्या कंपनी ने पायथ्याशी तो JCB सगळे पार्ट खोलून सुटा केला आणी वर नेऊन परत जोडला. यासाठी JCB कंपनीचे अभियंते जर्मनी वरून येथे आले होते.
अत्यंत टणक मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पर्वतराजीच्या काळ्या बॅसाल्ट पाषाणात डोंगर कापून तयार केलेली ही मूर्ती अन्य मूर्तीच्या तुलनेत अधिक टिकाऊ व सर्वांग सुंदर मानली जात आहे. जैन तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या या १०८ फुटी मूर्तीची नोंद लवकरच गिनीज बुकमध्ये केली जाणार आहे.
या मूतीची साधारण मापे अशी आहेत:
डोक्याचे केस - ५ फूट
मुख - १२ फूट
मान - ४ फूट
कान - १४ फूट
मान ते छाती - १२ फूट
छाती ते नाभी - १२ फूट
नाभी ते टोंगळे - ३६ फूट
टोंगळे - ४ फूट
टोंगळे ते पायाचा घोटा - २९ फूट
तळपाय - ४ फूट
कमळ - ५ फूट
चौथरा - ३ फूट
अशा भव्य आकाराची ही मूर्ती आहे.
या मूर्तीपर्यंत पोहोचण्यास तीन प्रकारचे मार्ग तयार करण्यात येत आहेत. या पुतळ्याच्या जागी पोहोचण्यास ४ लिफ्टही तयार करण्यात येत आहेत.
अर्थात या पुतळा उभारणीसाठीही काही घटकांचा विरोध होता. अनेकांना या पुतळा उभारणीसाठी असा डोंगर पोखरणे म्हणजे निसर्गाच्या वैभवाच्या या लचका तोडणे अशी भावना झाली. पुढे या पुतळ्याच्या निमित्ताने तिथे उत्सव भरवला जाईल, त्यासाठी रस्त्यांचं रूंदीकरण केलं जाईल.आणखी थोडी निसर्गाची हानी याशिवाय यातून काय मिळणार ? आणखी एक आक्षेप असा कि मुळात मांगी तुंगी हे जैन तीर्थ आहे, मग हा जैन देवतेचा पुतळा बांधण्याचं प्रयोजन काय? त्यासाठी डोंगर पोखरलेला कसा चालला? यात भक्तीचा भाग कमी आणि इतर सूप्त हेतूचा भाग जास्त आहे,असो.
तुंगी सुळका
मांगी सुळका
भगवान ऋषभदेवाचे दर्शन घेऊन १० मिनीटात आपण खालुन वर येणाऱ्या पायऱ्यांवर पोहोचतो. पुढे पिण्याचे पाणी नसल्याने पुरेसे पाणी महावीरांच्या मुर्ती कडूनच भरून घ्यावे. दुसऱ्या वाटेने आल्यास आपले साधारण १८०० पायऱ्या चढण्याचे श्रम कमी होतात. येथुन साधारण २०० पायऱ्या चढुन गेल्यावर आपण सुरवातीला उल्लेख केलेल्या दगडी कमानीजवळ पोहोचतो. या वाटेने वर चढताना अनेक ठिकाणी कातळात कोरलेला जुना पायरीमार्ग दिसुन येतो.
जवळ जवळ दीड तासात आपण वर पोहचतो. आता येथून पश्चिमेकडे साल्हेर- सालोटा दिसतात.

खाली बघितले तर आता या पायऱ्या चीनच्या भिंती सारख्या दिसू लागतात. खरे तर पायर्यामुळे आपल्याला जास्त दम लागतो , पण इथे नाईलाज आहे. शेवटी एकदाचे आपण माथ्यावर असलेल्या जंकशन पॉइंटपाशी असलेल्या कमानीपाशी पोहचतो.
इथून आपल्याला आधी तुंगी सुळक्याकडे जायचे कि मांगी हे ठरवावे लागते.या कमानीतून आत आल्यावर उजवीकडील वाट तुंगी सुळक्याकडे जाते तर डावीकडील वाट मांगी सुळक्याकडे जाते. सर्वप्रथम तुंगी सुळका पाहुन नंतर मांगी सुळक्याकडे यावे. या कमानीपाशी एक विश्रांती थांबा आणि लिंबू सरबताचे काही स्टॉल आहेत. येथे एक पायपोई पण आहे, पण त्यात पाणी नसते.
मांगी सुळक्याकडे चढणारी वाट
या कमानीतून आत आल्यावर उजवीकडील वाट तुंगी सुळक्याकडे जाते तर डावीकडील वाट मांगी सुळक्याकडे जाते. कमानीपासून मांगी सुळक्यापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. मांगी सुळक्याच्या खालच्या अंगाला असलेल्या गुहेला स्थानिक भाषेमध्ये श्री शुद्धबुद्धमुनिराज गुहा असे म्हटले जाते.. इथे एक छोटीशी मार्गिका आणि एक लहान सभागृह एवढेच कोरलेले दिसते. या गुहांमध्ये अनेक जैन प्रतिमांची अगदी रेलचेल आढळते. गुहेच्या भिंतींवर तीर्थंकर, सर्वानुभूती-अंबिका या यक्ष-यक्षी, चक्रेश्वरी, ऋषभनाथ आणि सरस्वती या सर्व प्रतिमा अंकित केलेल्या दिसतात.सुळक्याच्या सुरवातीला एका कपारीत २४ तीर्थंकर कोरलेले शिल्प असुन या शिल्पाच्या तळाशी शिलालेख कोरलेला आहे. या शिल्पाशेजारी एका तीर्थंकरांची मुर्ती असुन या मूर्तीवर देखील शिलालेख कोरलेला आहे. या ठिकाणी मांगी सुळक्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३८९५ फुट आहे.
तुंगी सुळक्याप्रमाणे मांगी सुळक्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रदक्षिणा मार्ग असुन या मार्गावर काही ठिकाणी पादुका कोरलेल्या आहेत. मांगी शिखरावर एकूण ७ गुहा असून त्यात ६५० जैनशिल्पे कोरलरली आहेत. पैकी एका गुहेत बागुल राजा विरामशाह देव राठोड ह्याची प्रतिमा कोरली आहे व त्या बाजूला त्याने ह्या जैन लेण्या खोदवल्या या संदर्भातला शिलालेख आहे.
मांगी वर पाण्याचे एक टाके दिसले. बाकी येथे पाण्याची काही सोय नाही.
सुळक्याच्या पोटात पाण्याची चार टाकी असुन यातील एक टाके गुहाटाके आहे. यातील कोणत्याही टाक्याचे पाणी पिण्यायोग्य नाही. मांगी सुळक्याच्या पोटात लहानमोठ्या पाच गुहा असुन यातील काही गुहेत थोड्याफार प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे.
पहिल्या गुहेत प्रभु रामचंद्रांची कृतांतवक्र सेनापती रूपातील मानवी मुर्ती असुन या मुर्तीच्या एका हातात गदा तर दुसऱ्या हातात जपमाळ आहे. यात एकिकडे क्षात्रतेज तर एकीकडे अध्यात्म असा समासम संयोग घडवलेला दिसतो.दुसऱ्या प्रशस्त गुहेत महावीरांची मोठी मुर्ती कोरलेली असुन मुर्तीच्या डावीकडील बाजुस वरील कोपऱ्यात तीन तीर्थंकर कोरलेले आहेत. महावीरांची मुर्ती आसनस्थ असून गुहेच्या जमीनीवर रंगबिरंगी टाईल्स लावलेल्या आहेत.यापुढील गुहा आदिनाथांची असुन या गुहेत तिन्ही बाजुस जैन तीर्थंकर व इतर मुनींच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या गुहा पाहताना दोन गुहामंदिरात आपल्याला देवनागरी लिपीतील दोन शिलालेख वाचायला मिळतात.

प्रदक्षिणा मार्गावर जागोजागी २४ तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या असुन या मुर्ती कातळात उघडयावर असल्याने उन-वारा-पाऊस याने त्यांची झिज झालेली आहे. आता लेप देऊन या मुर्तींचे जतन करण्याचे काम सुरु केले आहे.

या सर्व मुर्तीतील वैशिष्ट्यपूर्ण मुर्ती म्हणजे बलभद्राची मुर्ती. श्रीकृष्णाचा भाऊ बलराम याचा जैन पुराणात बलभद्र म्हणुन उल्लेख येतो. बलभद्राची मुर्ती पाठमोरी कोरलेली आहे. डोंगराकडे तोंड करुन तपाला बसल्यामुळे आपल्याला त्याची केवळ पाठच पाहाता येते. सहसा कोणत्याही देवाची अशी पाठमोरी मुर्ती कोठेही दिसून येत नाही.बलरामांची मुर्ती अशी पाठमोरी का, यासंदर्भात जैन महाभारतामध्ये एक कथा सांगितली जाते. ती अशी, बलराम आपल्या उत्तर आयुष्यात मुनी झाले आणि तप करण्यासाठी ते मांगीतुंगीवर आले.बलराम आपल्या नावाप्रमाणे बलवान व रुपसुंदर देखील होते. त्यामुळे परिसरातील स्त्रियांमध्ये विकार उत्पन्न होउ लागला. आपल्या रुपामुळे असे घडत असेल तर आपले मुख इतरांना न दिसलेलेच बरे या विचाराने बलरामाने आपले तोंड जंगलाच्या दिशेने केले व लोकवस्तीच्या दिशेने पाठ केली. अश्या अवस्थेत बलरामांनी मुक्ती मिळवून स्वर्गारोहण केले. त्यामुळे त्यांची मुर्ती अशी कोरली आहे. यापुढील गुहा आदिनाथांची .इथे तिन्ही बाजुने जैन तीर्थंकर आणि जैन मुनींच्या मुर्ती कोरलेल्या दिसतात. मधोमध एका शिलाखंडाबर पंचबलायती यांचे शिल्प कोरलेले दिसते.
या गुहा मागे टाकून पुढे गेले की तिथे नव्याने केलेल्या पायऱ्यांच्या मार्गाने आपल्याला त्या सुळक्याच्या शिखरावर पोहोचता येते. हा मार्ग काहीसा खडतर आणि खूप चढाईचा आहे
परंतु त्यावरून वर गेल्यावर डोळ्याचे पारणे फिटते. मांगी सुळक्यावरील दोन गुहा तर निसर्गनिर्मित असून त्यामध्ये काही डागडुजी केलेली दिसते. या गुहांना सध्या महावीर गुफा, शांतीनाथ गुफा, श्री आदिनाथ गुफा, पार्श्वनाथ गुफा, आणि बलभद्रस्वामी गुफा अशा नावांनी ओळखल्या जातात. गुहेमधील प्रतिमा तसेच गुहेच्या बाहेरील खडकाच्या पृष्ठभागावरील प्रतिमा म्हणजे जैन ऋषी आणि भक्तांच्या रांगाच्या रांगाच दिसतात.
कोरीवकाम करायला कोणते कामगार व स्थापत्यअभियंते छिन्नी हातोडा घेऊन आले असतील देव जाणे.
पूर्ण वाटेत रेलिंग लावलेले आहे
खडकाच्या पृष्ठभागावरील प्रतिमा पाहण्यासाठी तिथे उपलब्ध असलेल्या एका अरुंद अशा मार्गाचाच अवलंब करावा लागतो. सध्या या मार्गाच्या बाजूला संरक्षक कठडे बसवलेले आहेत. दोन्ही सुळक्यांवरील जवळजवळ सर्व गुहा आणि त्यांच्या बाह्यांगावर कोरलेल्या प्रतिमा या उत्तराभिमुख अथवा पूर्वाभिमुख कोरलेल्या दिसतात.
जवळ दिसणारे तांबोळ्या शिखर तर थोडा लांब दिसणारा रतनगड उर्फ न्हावी गड
सह्याद्रीच्या अजस्त्र रांगा आणि मोसम व पांजरा नद्या आणि त्यांच्यामुळे सुपीक झालेली जमीन या डोंगरावरून पाहताना भान हरपून जाते.कमानीपासूण मांगी सुळक्याला वळसा मारून परत येण्यासाठी एक तास पुरेसा होतो.
मांगीजीचे दर्शन करुन आता आपण तुंगी सुळकयावर जाणार आहोत.यासाठी पायर्या उतरुन पुन्हा कमानीपाशी यावे. तुंगी सुळक्याचे अंतर व उंची मांगी सुळक्यापेक्षा जास्त असल्याने सर्वप्रथम तो भाग पाहुन घ्यावा. दरवाजातुन उजवीकडे वळल्यावर आपण आपण मांगी-तुंगी सुळक्यामध्ये असलेल्या डोंगरसोंडेवर येतो. या सोंडेवरून १५ मिनिटे चालल्यावर आपण तुंगी सुळक्याच्या पायथ्याशी येतो. थोडे अंतर चालून खिंड पार केल्यावर पुढे तुंगीवर जायच्या पायऱ्या दिसतात. कोणी आणि कश्या बधल्या असतील या पायऱ्या? या विचाराने डोके चक्रावते.मांगी शिखरावर गेल्यास टोकावर पुन्हा २ गुहा व एक पाण्याचे टाके आहे. व टेहळणी बुरुज आहे. तसेच मांगीगिरीच्या प्रदक्षिणामार्गात मागील बाजूस मंगल चंडिका देवीची प्राचीन शिल्प आहे हीच मांगीदेवी म्हणून भक्तांची काळजी घेते. या बाजुच्या डोंगरावर आदिवासी देवाचि एक गुंफा असून त्यासंबंधी अनेक कथा या भागात प्रचलित आहेत.
मंदिर आणि मागे मांगी गिरी.
या वाटेवर आपल्याला एका संगमरवरी मंदीरात श्रीराम व बलभद्र यांच्या पादुका तसेच कृष्णकुंड नावाचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके पहायला मिळते. कृष्णकुंड कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजले जाते. या डोंगर सोंडेवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केले व त्यानंतर त्याने जैन धर्माची दिक्षा घेतली अशी आख्यायिका आहे.
येथुन साधारण ३०० पायर्या चढून अर्ध्या तासात आपण तुंगी सुळक्याच्या पोटात असलेल्या जैन लेण्यांकडे येतो. या ठिकाणी तुंगी सुळक्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३६१२ फुट आहे. तुंगी सुळक्याला प्रदक्षिणा मार्ग असुन या मार्गाने संपुर्ण सुळक्याला प्रदक्षिणा मारता येते.
या प्रदक्षिणा मार्गावर पाण्याचे एक टाके व तीन गुहा असुन या तीनही गुहेत जैन तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या मुर्तीना लेप देऊन त्यांचा टिकाऊपणा वाढवलेला आहे. पहिली गुहा रामचंद्र भगवान यांची असुन या गुहेत तीन ध्यानस्थ जैन मुनी कोरलेले आहेत. दुसरी गुहा चंद्रप्रभू भगवान यांची असुन त्यांच्या मुर्तीच्या दोन्ही बाजुस तीन-तीन जैन मुनी कोरलेले आहेत.जैन मान्यतेनुसार बलभद्रजी म्हणजेच श्रीकृष्णाचे बंधु बलराम होत. श्रीकृष्णाचा मृतदेह घेउन बलराम या पर्वतावर आले असताना कोणी देवता इथे वा़ळु रगडून तेल काढताना दिसली.त्यामुळे त्यांचा मोह नष्ट झाला आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या देहाचे अंतिम क्रियाकर्म केले असे मानले जाते. तेव्हापासून या पर्वताला घाण्यागड किंवा घाण्या पहाड म्हणू लागले.यापुढील गुहा म्हणजे पंचबालायती गुहा. या गुहेत महावीरांच्या विविध रूपातील पाच मुर्ती कोरलेल्या आहेत. सुळक्याच्या पोटात पाण्याचे एकमेव टाके असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गुहेत कोरलेल्या या मुर्ती व्यतिरिक्त बाहेर कातळावर देखील काही देवतांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत.
इथूनही मोठा परिसर दृष्टीपथात येतो. तांबोळ्या, न्हावीगड, धामण्या-वघाई, गवळण, नांद्या, जिभ्या, शेंदोड , हनुमान ही गड -दुर्गपर्वत शृंखला येते थेट गुजरात राज्यातील पूर्णा अभयारण्यातील डोंगर रांगेत संपते. मुल्हेर तख्ताच्या संरक्षणार्थ हि पर्वत शृंखला असणे हेच मुल्हेर राजधानीच्या दृष्टीने भौगोलीक कवच आहे.
तुंगी शिखराला वळसा मारून झाल्यावर मांगी सुळक्याच्या दिशेने आपला प्रवास सुरु करावा. तुंगी शिखर पाहुन कमानीपर्यंत यायला एक तास पुरेसा होतो. पायथ्यापासून दोन्ही सुळके पाहुन परत येण्यासाठी ६ तास लागतात.
संदर्भ :-
१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
४) दुर्गभ्रमंती नाशिक जिल्ह्याची - अमित बोरोले
५) साद चाकोरीबाहेरील किल्ल्याची -पांडूरंग पाटणकर
६) http://www.maayboli.com, या वेबसाईट
७) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८) www.durgbharari.in हि वेबसाईट
९) https://hi.encyclopediaofjainism.com, http://www.safarbaglanchi.com, या वेबसाईट
.
ही.
मांगी आणि तुंगी यांना जोडणाऱ्या खिंडीतच एक संगमरवरी मंदिर होते. बहुतेक ते कृष्णाचे होते.










.jpg)

















































No comments:
Post a Comment