Thursday, November 5, 2020

मुंबईचा संपुर्ण इतिहास 3

 

मुंबईची श्री महालक्ष्मी..!!
© नितीन साळुंखे
('मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा' या नितीनजींच्या आगामी पुस्तकातून साभार.)
या देवी सर्वभूतेषु ‘महालक्ष्मी’रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
मुंबईची महालक्ष्मी. प्रमाणभाषेत तिला ‘महालक्ष्मी’ म्हणत असले तरी, बोलीभाषेत मात्र ती ‘महालक्षुमी’. मी या लेखात तिचा उल्लेख तसाच करणार आहे. मी मालवणी असल्याने मला ‘आई’पेक्षा ‘आवस’ हा शब्द अधिक जवळचा वाटतो, तसंच महालक्षुमी हे तिचं नांव मला अधिक भावतं.
तमाम मुंबईकरांचं हे आराध्य दैवत. नवरात्र हा तर साक्षात देवीचा सण, उत्सव. अखंड भारतात नवरात्राचे हे नऊ दिवस मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. देशाची लक्ष्मी मुंबई आणि मुंबईची लक्ष्मी महालक्षुमी, तिचं नवरात्रातलं स्वरुप तर याची डोळा पाहावं असं असतं. या नऊ दिवसांत महालक्ष्मीच्या परिसराचं स्वरुप स्वर्गापेक्षा जराही उणं नसतं. आपल्या आजुबाजूला देवीचा वावर आहे असा सततचा भास या नऊ दिवसांत सर्वच ठिकाणी होत असतो आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात तर श्रद्धेच्या दागिन्यांनी मढलेल्या, नटल्या- सजलेल्या, गरीब-श्रीमंत घरच्या असंख्य प्रसन्न वदना ‘गृहलक्ष्मीं’चे साक्षात दर्शन होत असते. देवळावर केलेली नयनरम्य रोषणाई, पाना फुलांची सजावट, भक्तीभावाने ओथंबलेले दर्शनाला आलेल्यांचे चेहेरे आणि याहीपेक्षा देवीच्या मुर्तीवर चढलेलं तेज हे स्वत: अनुभवण्यासारखं. हा जिवंत सोहळा अप्रतिम असतो आणि तो याची देह, याची डोळा बघण्यासाठी तमाम मुंबईकर, विशेषत: घरोघरच्या महालक्षुमी मोठ्या भक्तिभावाने वरळी नजिकच्या महालक्षुमीच्या देवळात आपली हजेरी लावतात..
मुंबईतील महालक्षुमीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे तो सारा परिसरच ‘लक्ष्मीपुत्रां’चा आणि ‘लक्ष्मीकन्यां’चाही. देवळाच्या समोरच पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’ मध्ये, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीच्या सारख्याच लाडक्या असलेल्या कन्या मंगेशकर भगिनी त्यांचे बंधू पंडित हृदयनाथांसोबत राहतात. देवळाला लागून असलेल्या ‘शिवतीर्थ’ इमारतीत मराठीची एकेकाळची आघाडीची नायिका ‘जयश्री गडकरां’चं वास्तव्य होत. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती श्री. मुकेश अंबानीही इथून हाकेच्या अंतरावर राहतात. मला माहित असलेली ही काही मोजकी उदाहरणं. शेजारचा ‘ब्रीच कँडी’, देवळापासून काही अंतरावर असलेला ‘कार मायकेल रोड’, ‘पेडर रोड’, ही ठिकाण म्हणजे देशाच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या मोठ-मोठ्या उद्योगपतींचा. या सर्वच परिसरावर महालक्षुमीचा वरदहस्त असून इथे सहज म्हणून फेरफटका मारला तरी 'महालक्षुमी’चं दर्शन उघड्या डोळ्यांनी अगदी सहजरित्या घडते..
अश्या या ठिकाणी आई महालक्षुमीचे वास्तव्य सध्याच्या ठिकाणी तिच्या दोन बहिणी, महाकाली आणि महासरस्वती, यांच्यासोबत साधारणतः १७८४-८५ पासून असलं तरी, त्यांना अतिशय मोठा इतिहास आहे. सदरचा लेख महालक्षुमी आणि तिच्या दोन बहिणीं सध्याच्या ठिकाणी कशा प्रकट झाल्या त्याची कहाणी सांगणारा आहे.
आताच्या महालक्षुमी मंदिराचा इतिहास साधारणत: अडीचशे वर्ष मागे जातो. मुंबई त्याकाळात सात बेटांची होती. दोन बेटांमधील उथळ खाडी भरून बेत जोडायचा कार्यक्रम ब्रिटीशनी आखला होता. मुंबईचे सन १७७१ ते १७८४ या काळात गव्हर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी यांनी मुंबई आणि वरळी ही दोन बेट समुद्रात भरणी करून बांधून काढण्याचा बेत आखला होता. व्यापारी असलेल्या इस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीचा हा खर्चिक पवित्रा बिलकुल मंजूर नव्हता. तरी हा पठ्ठ्या हिम्मत हरला नाही. मुंबई बेटाचं दक्षिण टोक, म्हणजे सध्या आपल्या महालक्षुमीचे देऊळ आहे ते आणि उत्तरेच्या दिशेला असणारं समोरचं वरळी बेट, म्हणजे सध्या मुंबई महानगरपालिकेचे ‘लव्ह-ग्रोव्ह उदंचन केंद्र’ किंवा ‘अत्रीया मॉल’ आहे ते, तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते. भरतीच्या वेळेस इथून आत घुसणारं समुद्राचं पाणी, पार आताच्या पायधुनी -भायखळ्या पर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबई बेटाच्या पूर्वेकडून पश्चिम दिशेला असलेल्या वरळी-महाल्क्ष्मीकडे जायचं तर होडीशिवाय पर्याय नसायचा. मोठी यातायात असायची ही सारी. समुद्राचे पाणी जिथून आत घुसायचं त्या भागाला ब्रिटिशानी ‘द ग्रेट ब्रीच’ असे नाव दिलं होतं. ब्रीच म्हणजे खिंडार. मुंबईच्या सात बेटांमधे असलेल्या समुद्राच्या खाड्यांमधे ही खाडी सर्वात मोठी होती, म्हणून ती ‘ग्रेट’..! ही यातायात बंद करण्याचे हॉर्नबीने ठरवले आणि त्याने ही खाडी भरून काढायचं आणि मुंबई बेटातून थेट वरळी बेटापर्यंत जाता येईल असा गाडी रस्ता बांधण्याचं काम इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी न घेता चालू केलं. ‘वरळीचा बांध’ बांधण्याचे काम असं या कामाला त्यावेळी म्हटलं गेलं होतं. हाच सध्याचा ‘लाला लजपतराय मार्ग’, पूर्वीचा ‘हॉर्नबी वेलॉर्ड’. कृतज्ञता म्हणून लॉर्ड हॉर्नबीचे नाव मुंबईकर जनतेने या रस्त्याला दिलं होतं.
या बांधाच्या बांधकामाचे कंत्राट रामजी शिवजी नावाच्या पाठारे प्रभू समाजातील तरुण इंजिनिअरकडे सोपवण्यात आलं होतं. बांध घालण्याचे काम सुरु झाले. दगडाच्या राशीच्या राशी भरून मोठ्या बोटी इथे येऊ लागल्या. दगडाच्या राशी खाडीत टाकून भरणी करण्याचे काम सुरु झाले. पण होई काय की, बांधकामात थोडी प्रगती झाली की समुद्राच्या पाण्याच्या रेट्याने बांधलेला बांध कोसळून जाई आणि पुन्हा सुरुवात करावी लागे. असं बरेच महिने चाललं. त्याकाळचं तंत्रज्ञान लक्षात घेता हे तसं कठीणच काम होतं. पण रामजी शिवजी आणि हॉर्नबी या दोघांनीही हिम्मत हारली नाही..ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले, परंतु पुन्हा पुन्हा तेच व्हायचं..!
अशा वेळी एका रात्री रामजी शिवजीला महालक्षुमीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं, ‘मी माझ्या बहिणींसोबत महासागराच्या तळाशी आहे. तू मला बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल..!”. त्याकाळात सर्वच जनता भाविक आणि श्रद्धाळू असायची आणि त्याला रामजी शिवजीही अपवाद नव्हता. साहजिकच रामजी शिवजीने त्याला मिळालेल्या दृष्टान्तावर विश्वास ठेवला आणि ही घटना हॉर्नबीच्या कानावर घालायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी रामजी शिवजीने त्याचे स्वप्न आणि त्यातील देवीच्या दृष्टांताची गोष्ट हॉर्नबीच्या कानावर घातली आणि समुद्रात देवीच्या मूर्तींचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितली. होर्नबी पक्का ब्रिटीश. या असल्या कथांवर त्याचा विश्वास असणंच शक्य नव्हतं, परंतु हाती घेतलेले काम पूर्ण होत नव्हतं हे ही खरं होतं. बांध पुन्हा पुन्हा कोसळत जोता. खर्च वाढत चालला होता. हॉर्नबीच्या डोक्यावर इंग्लंडची परवानगी नसताना कामाला सुरुवात केली म्हणून सस्पेन्शनची तलवार लटकत होती आणि म्हणून वरळीचा बांध बांधायला आणखी उशीर होऊन चालणार नव्हते. त्याला काहीही करून हा बांध पूर्ण करायचा होता आणि म्हणून त्याने काहीही न बोलता हा ही प्रयत्न करून बघू, म्हणून रामजी शिवजीला देवीच्या मूर्तींचा शोध घेण्याची परवानगी दिली.
झाले रामजी शिवजी कामाला लागला. लहान बोटी मागवण्यात आल्या. स्थानिक मच्छिमार बंधूंची मदत घेण्यात आली. समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि खरंच, एके दिवशी जाळी वर काढताना हाताला जड लागली. जाळी बाहेर काढल्यावर रामजी शिवजीच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्षुमी, महासरस्वती आणि महाकाली अशा तीन महादेवींच्या मूर्ती सापडल्या. रामजी शिवजीने हॉर्नबीला त्या मूर्ती दाखवून त्याचा दृष्टांत खरा झाल्याचे सांगितले आणि या देवींच्या स्थापनेसाठी जागा देण्याची विनंती केली. हॉर्नबीनेही उदारपणे सध्याच्या महालक्षुमी देवळाची जागा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दिली असं सांगून त्या जागी मूर्ती ठेवण्यास सांगितलं. हॉर्नबीने दिलेल्या आदेशानुसार त्या जागी मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात ठेवल्या आणि नंतर मात्र वरळीचा बांध कोणताही अडथळा न येता पूर्ण झाला. पुढे बांध पूर्ण होऊन हॉर्नबीच्या स्वाधीन केल्यानंतर रामजी शिवजीने आताच्या जागी महालक्षुमीचे देऊळ बांधून त्यात तिच्यासोबत महाकाली व महासरस्वती या तिच्या दोन बहिणींची मोठ्या भक्तिभावाने स्थापना केली. आताचे हे देऊळ सुमारे सन १७८४-८५ च्या सुमारास (काही ठिकाणी सन १७६१ते १७७१ असाही म्हटलं आहे) बांधलं गेलं आहे. महालक्षुमीच्या जन्माची ही आख्यायिका आहे.
या आख्यायिकेमागील श्रद्धेचं पांघरून थोडंसं बाजूला केलं, तर लक्षात येईल की, साधारण चौदाव्या शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकात मुसलमानांची आक्रमणं मुंबंईवर झाली, त्यात हिन्दूंची अनेक देवालयं उध्वस्त करण्यात आली होती. त्यात मुंबादेवी आणि महालक्षुमीच्या देवळांचाही समावेश होता. ‘Rise of Bombay’ या एडवर्ड यांच्या सन १९०४ साली लिहिलेल्या पुस्तकात तसा उल्लेख आहे. कदाचित प्रभादेवी, वाळकेश्वराचंही देऊळही याच दरम्यान उध्वस्त करण्यात आलं असावं. त्यानंतर १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पुन्हा सर्व पूर्ववत होतंय न होतंय तोवर पोर्तुगीजांचं आक्रमण आलं आणि त्यांनीही तोच कित्ता गिरवला. प्रभादेवीच्या मूर्ती परकीयांकडून विध्वंस होऊ नयेत म्हणून जश्या पाठारे प्रभु समाजाच्या लोकांनी विहिरीत लपवून ठेवल्या होत्या, तशाच महालक्षुमी आणि तिच्या सोबतच्या मूर्तीही तिच्या भाविकांनी समुद्राच्या उथळ पाण्यात सुरंक्षित दडवून ठेवल्या असाव्यात आणि मग ब्रिटीश काळात सर्व स्थीरस्थावर झालंय असं लक्षात आल्यावर पुन्हा पाण्यातून वर काढून त्यांची प्रतिष्ठापना केली असावी, असं म्हणता येतं..पुढे कधीतरी त्यावर कथेचं आवरण चढवलं असावं.
मुंबईतल्या इतर देवतांसारखीच महालक्षुमीही अतिशय प्राचीन दैवत. त्या देवतांप्रमाणे, ही देवीही मुळची कोळ्यांनी स्थापन केली असावी असं म्हटल तर चुकणार नाही. प्रथम मुसलमानी आणि नंतर पोर्तुगीज आक्रमणात महालक्षुमीचं पूर्वीचं जुनं देऊळ इतर देवळांप्रमाणे उध्वस्त करण्यात आलं, परंतु मूर्ती मात्र तिच्या भक्तांनी सुरक्षित ठेवल्या, असं वरच्या कथेवरून स्पष्ट होतं. याचा अर्थ महालक्षुमीचं सध्याचं मंदिर जरी १७८४-८५ च्या दरम्यान बांधलं गेलं असलं, तरी त्यातील प्रतीमा मात्र किमान सात-आठशे किंवा त्याहीपेक्षा अधिक वर्षाचा इतिहास लेवून उभ्या अाहेत असं म्हटल्यास चुकू नये. जुनं मंदिर एक किंवा दोन वेळेला उध्वस्त केलं गेलं असावं. मंदिराची मूळ जागा मात्र आता आहे तिच असावी..!!
श्री महालक्षुमीच्या मंदिरात चैत्र आणि अश्विनातली नवरात्री मोठ्या धामधुमीने साजरी होते. अलम मुंबई या वेळी महालक्षुमीच दर्शन घेण्यासाठी लोटते. दसऱ्याचा दिवसही मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. दिवाळीचे पाचही दिवस, विशेषत: लक्ष्मीपूजनाचा दिवस तर साक्षात लक्ष्मीचा..! लक्ष्मीची आपल्यावर सदा कृपा असावी म्हणून लहान थोर, गरीब-श्रीमंत आणि सर्व जातीचे लोक महालक्षुमीच्या मंदिरात तिच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. पूर्वी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी इथे जत्रा भरत असे, मात्र आता जागेच्या ही जत्रा बंद करण्यात आली आहे. तशीही या देवीला जत्रेची काही आवश्यकता नाही, कारण प्रत्येक दिवशी या मंदिरात जत्रेवढीच गर्दी असते. हल्ली मार्गशीर्ष महिन्यातही देवीच्या दर्शनाला स्त्रियांची प्रचंड गर्दी होते. नवीन लग्न झालेली जोडपी मुंबईची ग्राम देवता आई मुंबादेवीच्या दर्शानंतर आई महालक्षुमीच दर्शन घेतात. ही प्रथाच पडून गेली आहे. कारण त्याशिवाय लग्नाला पूर्णत्व आल्यासारखं वाटत नाही.
महालक्षुमी मंदिराच्या आवारात इतरही मंदिरं असली तरी, त्यातील केवळ धाकलेश्वर मंदिराची माहिती सांगतो. आहे. हे मंदिर धाकजी दादाजी प्रभू ह्या त्या काळातील नामांकित पठारे प्रभू समाजाच्या व्यापारी गृहस्थाने सन १८३२ साली बांधलेलं आहे. हे मंदिर मुख्यता: श्री महादेवाचं. देवालय स्थापन करणाराने देवाला स्वत:चे अथवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे नांव देण्याच्या त्या काळच्या प्रथेप्रमाणे, या महादेवाचे नांव ‘धाकलेश्वर’ असं ठेवण्यात आलं होत. शेजारीच मयुरेश्वर, म्हणजे जी गणपतीची मूर्ती आहे, त्या गणपतीच नांव धाकजींचा मुलगा ‘मोरेश्वर’ याच्या नांवावरून ठेवण्यात आलं आहे तर, तिसऱ्या स्त्री मूर्तीचं नांव धाकाजींची पत्नी रमाबाई वरून ‘रमेश्वरी’ असं नामकरण करण्यात आलं होत. चौथी मूर्ती हरीनारायणाची असून हे नांव धाकजींचा अन्य पुत्र ‘नारायण’ यांच्या नांवावरून ठेवण्यात अल होत. आणखी एक विनायाकादित्याची मूर्ती आहे. हे मंदिर बांधण्यास त्याकाळात ८०००० रुपयांचा खर्च आला होता अशी माहिती श्री. गोविंद नारायण माडगावकर यांच्या .मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात आहे.
श्री महालक्षुमी मंदिराच्या पूर्वेकडे, म्हणजे आताचा पेडर रोड जिथून सुरुवात होतो त्या कोपऱ्यावर पूर्वी शेठ तुलसीदास गोपालजी किंवा तुलसीदास गोपालदास नांवाच्या व्यापाऱ्याने बांधलेलं एक तळं होत, जे आता बुजवण्यात येऊन ती जागा मोठ्या समारंभासाठी भाड्याने देण्यात येते.
वरळीच्या बांधाने मुंबईच्या ‘महालक्षुमी’ला जन्म दिला हे तर खरंच, परंतू त्याने ‘मुंबई’च्या रूपाने देशाच्या पदरात खरीच ‘लक्ष्मी’ टाकली हे ही खरंच..! वरच्या आख्यायिकेचा एक असाही अर्थ लावता येतो. मुंबईवर ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाली ती या दिवसापासूनच. या बांधामुळे मुंबईत प्रचंड प्रमाणावर जमीन उपलब्ध झाली. देशभरातील अनेक ठिकाणाहून हुशार व्यापारी, तंत्रज्ञ, कलाकार, कारागीर मुंबईत येऊ लागले. व्यापार उदीम वाढला आणि मुंबई बघता बघता देशाची आर्थिक राजधानी बनली. मुंबईचे आर्थिक जगतातील हे स्थान आजवर देशातील इतर कोणतंही शहर हिसकावून घेऊ शकलेलं नाही. मुंबईवर महा’लक्ष्मी’चा वरदहस्त आहे, नव्हे, मुंबई हे ‘महालक्षुमी’चे साक्षात प्रतिक आहे. वरळीच्या बांधकामामुळे मुंबईला ‘महालक्षुमी’चं देऊळ आणि त्यातील दगडी मूर्ती तर मिळाल्याच, परंतु खऱ्या महा’लक्ष्मी’च्या रुपात साक्षात मुंबईच मिळाली. असं म्हटले तर वावगं ठरणार नाही.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांपैकी, 'लक्ष्मी' हे एक रत्न आपल्याला मिळालं, असं पुराणकथांमध्ये म्हटलेलं आहे. या पुराणकथेमध्ये आणि वरळीच्या समुद्रात केलेल्या समुद्रमन्थनाच्या घटनेत मला कमालीचं साम्य वाटतं. समुद्र मन्थनातून देवांना ‘लक्ष्मी’ मिळाली, आणि आपल्याला साक्षात ‘मुंबई’ मिळाली. दोन्हींचा काळ वेगळा असला तरी, अर्थ एकच..!
संदर्भ-
1. मुंबईचे वर्णन -ले. गोविंद मडगावकर – सन १८६२
2. मुंबईचा वृत्तांत – मोरो विनायक शिंगणे – सन १८९३
3. The Hindu Temples of Bombay – K. Raghunathji – सन १८९५
4. The Rise of Bombay: A Retrospect : Stephen Edwardes – सन 1902
5. मुंबईतील आद्य शक्तिपीठे – श्री. भालचंद्र आकलेकर
6. महालक्षुमी मंदीराच संकेतस्थळ.
आभार-
श्रीं हेमंत पवार, चंदन विचारे, मुसा शेख ह्या माझ्या मुंबई भटकंतीतील साथीदारांचे. हेमंत पवार, चंदन विचारे, मैदा शेख.
लेखक- नितीन साळुंखे
 
"दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे"
© नितीन साळुंखे
('मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा' या नितीनजींच्या आगामी पुस्तकातून साभार.)
१६ एप्रिल १८५३. हाच तो दिवस. बरोबर १६७ वर्षांपूर्वी या दिवशी बोरीबंदर ते ठाणेपर्यंत 'लोखंडी रस्त्या'वरून 'आगीची गाडी' गाडी धावली आणि मुंबई 'महा मुंबई' म्हणून भराभर वाढू लागली. चित्रपटात ज्याप्रमाणे 'हिराॅईन्स'चं आकर्षण अनेक जणांना असतं व त्या हिराॅईनला एक झलक पाहाण्यासाठी जशी थेटरात गर्दी होते, तशी गर्दी पुढे मुंबईत रेल्वे या हिराॅईननं खेचली. मुंबईच्या अशा दोन हिराॅइन्स आहेत की ज्यामुळे सर्व देशातून या मुंबई नगरीत लोकं सुरुवातीच्या काळात खेचली गेली, एक रेल्वे आणि दुसरी मिल..!!
मुंबईची, नव्हे देशाची ही पहिली हिराॅईन आता १६७ वर्षांची झाली. इतकं वय होऊनही जराही न थकता ही आपला करिश्मा अजून टिकवून आहे ती तिच्या कर्तबगारीमुळे. पण कर्तबगारी दाखवताना तिला तिच्या जन्माच्यावेळी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. अनेकांचा विरोध, अफवा यांना पुरून उरत हिचा जन्म शेवटी झालाच व पुढे सर्वांचे डोळे दिपण्याएवढा पराक्रम हिने गाजवला व अजुनही गाजवते आहे. 'रेल्वे' ही स्त्री लिंगी मानली गेली आहे आणि आपल्या देशात कोणत्याही स्त्रीचा जन्म आजही संघर्षातूनच होतो. स्त्री भ्रुणाची जगण्याची इच्छा पुरूष भ्रुणाहून जबर असते असं शास्त्र सांगते आणि ते 'ती' रेल्वेच्याबाबतीतही खरं ठरलं.
देशातील मुंबईत रेल्वे जरी १६ एप्रिल १८५३ रोजी धावली असली तरी लंडन-अमेरीकेत ती यापुर्वीच अवतरली होती व तिची उपयुक्तताही सिद्ध झाली होती. आपल्या देशाचे तत्कालीन राज्यक्रते असलेल्या ब्रिटीशांना आपल्या देशातील त्यांच्या वाढत्या प्रभाव क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक जलद व एकाच वेळेस जास्त वाहतूक करू शकणाऱ्या वाहनाची गरज भासू लागली होती व त्यासाठी त्यांच्यानजरेसमोर रेल्वेएवढं सोयीचं साधन त्याकाळी दुसरं नव्हतं.
इकडे मुंबईतही रेल्वे सुरू करण्याच्या हालचाली १८४३ सालीच सुरू झाल्या होत्या. मुंबईत रेल्वे सुरू करावी म्हणून याच साली 'दि ग्रेट इस्टर्न रेल्वे कंपनी' स्थापन केली व त्यात सार्वजनिक कार्यात नेहेमी पुढाकार घेणारे जगन्नाथ शंकरशेट व सर जमशेटजी जिजीभाई या दोघांनी पुढाकार घेतला होता. नाना शंकरशेट व सर जमशेटजी जिजीभाई यांच्या सहीने तसा अर्ज लंडनला रवाना झाला. दि. १९ एप्रिल १८४५ रोजी कंपनीच्या चालकांची सभा टाऊन हाॅलमधे (आताची एशियाटीक सोसायटी) भरली. या सभेत रेल्वेच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी 'दि इनलॅन्ड रेल्वे असोसिएशन' ही समिती नेमून या समितीच्या अध्यक्षस्थानी कर्नल जर्व्हीस या ब्रिटीश अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. समितीत नाना व जमशेटजींव्यतिरिक्त मिस्टर विलोधवी आणि मुंबईचे आणखी एक दानशूर व्यक्तीमत्व फ्रामजी कावसजी यांचाही समावेश करण्यात आला होता.
व्यापार रक्तात मुरलेले ब्रिटीशही तिकडे लंडनमधे काही गप्प बसलेले नव्हते. मुंबईच्या हालचालींवर त्यांची बारीक नजर होती. नामांच्या अर्जाला प्रतिसाद म्हणून सन १८४५ साली ब्रिटीशांनी कंपनीची सुत्रं आपल्या हाती ठेवण्यासाठी लंडनला 'दि ग्रेट इंडीयन पेनिनसुला रेल्वे' ही कंपनी स्थापन केली व मुंबईतील कंपनीच्या संचालकांना त्या कंपनीत घेतलं. त्या कंपनीच्या वतीने मिस्टर चॅपमन नावाचा एक अधिकारी मुंबईत प्रत्यक्ष पाहाणी करण्यासाठी पाठवला. चापमनने पाहाणी करून जुलै १८४८ मधे मुंबईत ३५ कि.मि.ची रेल्वे बांधण्याची परवानगी दिली. 
 
 
 
 ब्रिटीशांनी मुंबईत सार्वजनिक उपयोगाचं जे जे केलं, त्यासाठी त्यांनी त्याकाळच्या मुंबईकरांकडून वर्गणी जमवून केलं हे इतिहासात नमूद आहे. त्यालाच जागून त्यांनी मुंबईकरांना रेल्वेसाठी वर्गणी (कंपनीचे शेअर्स) घेण्याचं आवाहन केलं. त्यासाठी मोठमोठ्या जाहिराती लावण्यात आल्या. सुरूवातीला हा सरकारचा आपले पैसे लुबाडून लंडनला घेऊन जाण्याचा डाव आहे असं समजून लोकांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. दुसरं म्हणजे अशी काही गाडी असती तर आपच्या ज्ञानी ऋषी-मुनींमी ती अगोदरच सांगीतली असती अशी लोकांची भाबडी समजूत असल्यामुळे लोकांचा विश्वासही बसेना. शेवटी हे बघून कंपनीने स्वत:चं भांडवल म्हणून स्वत:चा काही हिस्सा टाकला. नाना, जमशेटजी, फ्रामजी यांनीही काही शेअर्स घेतले व मग मात्र पुढे लोकांनी कंपनीचे शेअर्स घेतले.
पुरेसे भांडवल जमल्यानंतर सन १८५० मधे कंपनीच्या कामास सुरूवात झाली. दि. ३१ आॅक्टोबर १८५० रोजी मिस्टर विलोधवी यांच्या हस्ते शिव (आताचं अपभ्रष्ट नांव सायन) येथे रुळ टाकण्याची सुरूवात झाली व पुढं सर्वच काम त्वेरेने होऊन पुढच्या तीन वर्षांनी त्या रुळांवरून दि. १६ एप्रिल १८५३ या दिवशी रेल्वे धावलीसुद्धा.
मुंबई ते ठाणे असा लोहमार्ग टाकण्यापूर्वी व टाकतांनाही कंपनीसमोर काही कमी अडचणी आल्या नाहीत. अनेक घटना, अफवा, अंधश्रद्धांवरर मात करून हे काम कंपनीनं पूर्ण केलं आणि मुंबईला आताचं स्वरूप मिळवून दिलं. या अडचणी, लोकांच्या अंधश्रद्धा, स्टेशन्सची बांधकामं, रेल्वेसाठीचे सुरूवातीचे मजेशीर नियम, त्याकाळी असलेली 'शिवाशिव' आणि प्रत्यक्ष प्रवासाचं वर्णन पुढच्या भागात सांगेन.. या ऐतिहासिक घटनेला १६७ वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने हा लेख.
संदर्भ-
1. मुंबईचा वृत्तांत -ले. मोरो विं शिंगणे व बापू आचार्य.
2. मुंबईचे वर्णन -ले. गोविंद मडगावकर
3. स्थल-काल-ले. डाॅ. अरूण टिकेकर
लेखक- नितीन साळुंखे
 
 
 मुंबईचा संक्षिप्त राजकीय इतिहास..
शालेय पुस्तकात अभ्यासाला असल्याने व त्यामुळे आपल्याला मार्क्स मिळत असल्याने आपल्या सर्वाना माहित असतो तो ब्रिटीशकाळ ते भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या सालापर्यंतचा एकूण पावणेतीन-तीनशे वर्षांचा इतिहास..! परंतु आपल्या मुंबईला ब्रिटीशांच्या पूर्विचाही फार मोठा इतिहास आहे आणि तो रंजकही आहे हे माहित नसते. इतिहास असलेली मुंबई फोर्ट-भायखळा-माझगाव आणि फार तर परळ-दादर व पूर्वेसं सायन पर्यंत सापडते. पुढची उपनगरेही त्याकाळी होती परंतु इतिहास म्हणावे असे काही विशेष त्या भागाबाद्दलचे नोंदलेले माझ्याही वाचनात आले नाही.
तसा इतिहास हा सर्वच सजीव-निर्जीव वास्तुमात्राना असतो. मात्र आपण ज्या शहरात जन्मलो, वाढलो त्या शहराचा इतिहास वाचण्याची मजा काही औरच असते.. आपल्या मुंबईचा प्राचीन उल्लेख टॉलेमी नावाच्या प्राचीन इजिप्शियन भूगोलज्ञाच्या यादीत इ. स. १५० मध्ये नोंदलेले आढळते असा उल्लेख श्री. न.र. फाटकांनी आपल्या ‘मुंबई नगरी’ या पुस्तकात केलेली आढळते. म्हणजे आज २०१६ साली मुंबईला १८६५ वर्षाचा ज्ञात इतिहास आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या एकोणीस – वीस शतकात मुंबई घडली आणि बरीचशी बिघडली. इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात मुंबईवर सातवाहन साम्रज्याचे राज्य होते व त्यानंतर इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत क्षत्रप, मौर्य, चालुक्य, यादव आदि बलाढ्य साम्राज्य आली आणि गेलीही. या सर्वांच्या कारकिर्दीत मुंबई होती परंतु तीस तेवढे महत्व नव्हते. या प्रत्येकाच्या व सर्वांच्या कारकिर्दीतली मुंबई हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे आणि तो करण्यासारखाच आहे.
नंतर कुठेतरी इसवीसनाच्या तेराव्या शतकात राजा भीमदेवाचा अंमल मुंबईवर सुरु झाला आणि मुंबई थोडी प्रकाशझोतात यायला सुरुवात झाली. (हा बिंब कि भीम, यादव कि सोलंकी, हे एक होते, दोन होते की तीन या विषयी अजूनही संदिग्धता आहे. आपल्या सोयीसाठी आपण ‘भीमदेव’ किंवा ‘भिमराजा’ हेच नाव कायम ठेऊ.) राज भिमादेवाने मुंबईला तिची स्वतःची ओळख द्यायला सुरुवात केली असे म्हटले तरी हरकत नाही. हा भीमराजा पालघर-केळवे माहीम या सध्याच्या पालघर जिल्ह्यातून येथे आला होता हा निष्कर्ष मी माझ्यापुरता मान्य केला आहे. येथे येताना त्याने सोबत पाताणे, प्रभू, पाचकळशी-सूर्यवंशी व चंद्रवंशी, मराठे वगैरे सरदार मंडळी आणली होती. सध्याचे मुंबईतील माहीम हे या भिमराजाने वसवले होते असा उल्लेख मुंबईच्या इतिहासात अनेक ठिकाणी आलेला आहे. राजा भिमदेवाचा महाल सध्याच्या मध्य मुंबईतील परेल भागात असलेल्या नायगाव-भोईवाडा परिसरात होता. हे नायगाव राजा भिमदेवाने वसवलेले आहे असा उल्लेख अनेक पुस्तकांत आलेला आहे. या ठिकाणी त्याच्याबरोबर आलेल्या पाचकळशी, सुतार, सोमवंशी, चंद्रवंशी सरदारांनी वसती केली. आजही परेल-नायगाव-भोईवाडा भागात चुरी, ठाकूर, म्हात्रे आदि आडनावाची अनेक कुटुंबे पूर्वापार वास्तव्याला आहेत आणि या सर्वांचे संबंध कुठेतरी पालघर-केळवे-माहीम परिसरात आहेत. नायगाव हे राजा भीमदेवाच्या न्यायदानाचे ठिकाण होते. राजाची पालखी उचलणारे भोई ज्या गावात स्थायिक झाले तो ‘भोईवाडा’ हे आपण सहज समजू शकतो. राजा भीमदेवा पासून मुंबई नावारूपाला येऊ लागली.
पुढे चौदा ते सोळाव्या शतकापर्यंत मुंबईवर गुजरातच्या सुलतानांनी राज्य केले. यापूर्वी काही काळ चौलच्या नागरदेवांनी मुंबईवर राज्य करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न गुजरातेतील मुसलमानांनी हाणून पाडले आणि येथून पुढे कोकणपट्टीवरील (पक्षी मुंबईवरील) हिंदूंच्या स्वतंत्र ग्रहण लागले ते कायमचेच.
आता सोळाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईच्या इतिहासाच्या रंगमंचावर पोर्तुगीजांचा प्रवेश झाला आणि मुंबई खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर उगम पावायला लागली. शेवटचा गुजराथी सुलतान बहादूरशहा याने उत्तरेकडून मोगलांचे दडपण व दक्षिणेत वाढणारे पोर्तुगीजांचे आक्रमक सामर्थ्य या पेचातून अंशत: मोकळे होण्यासाठी सोळाव्या शतकाच्या मध्यावर मुंबई आणि वसई ही ठिकाणे पोर्तुगीजांच्या हवाली केली. सन १५३४ साली मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली ती त्यांच्या ताब्यात सन १६६१ साला पर्यंत होती. पोर्तुगीज जरी व्यापाराच्या निमित्ता आले असले, तरी त्यांचा मुख्य उद्देश येथील स्थानिकांना बाटवून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा होता. त्यामुळे मुंबईच्या नैसर्गिक बंदराच्या असण्याचा व्यापारासाठी म्हणावा तसा उपयोग पोर्तुगीजांनी केला नाही. माहीम –वसई परिसरातील स्थानिकांना येनकेनप्रकारेण बाटवून त्यांना ख्रिश्चन करणे हा त्यांचा मुख्य धंदा होता. येथील राज्यकारभारात पोर्तुगीज शासकांपेक्षा त्यांच्या धर्मगुरूंचा जास्त पगडा होता. मुंबई माहीम-वांद्रे किंवा वसई भागात जे बहुसंख्येने ख्रिश्चन दिसतात ते या तेंव्हाच्या पोर्तुगीज प्रभावामुळेच. पोर्तुगीज सत्तेचे आंधळे धार्मिक स्वरूप वजा केल्यास त्यांच्या कित्येक गोष्टी त्या कालच्या इथल्या लोकांनी स्वीकारल्या. मुंबईच्या दैनंदिन जीवनात ‘पावा’चा शिरकाव झाला तो यांच्यामुळेच. विहिरीत ‘पाव’ टाकून ते पाणी स्थानिकांना पिण्यास देऊन त्यांना सामुहिकपणे बाटवण्याचा उद्योग पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर केला. आणि म्हणून इथल्या ख्रिश्चनांना आजही आपण ‘पाववाले’ म्हणून ओळखतो. कोणीही परकीय धर्मप्रसारक सत्ता करते त्याप्रमाणे पोतुगीजनीही आक्रमकपणे धर्मप्रसार करताना येथील काही देवळे व मशिदी पडून त्या जागेवर चर्चेस उभारण्याचा पवित्र घेतला. माहीमचे सेंट मायकेल चर्च, अंधेरीचे सेंट. जॉन द बाप्टीस्ट चर्च (सध्या हे चर्च अंधेरी येथील सीप्झ संकुलाच्या आत आणि पडीक अवस्थेत आहे अशी माहिती इंटरनेट वर मिळते.), भायखळ्याचे ग्लोरिया चर्च ही आजही सुस्थितीत असलेली आणि सर्वाना माहित असलेली ठिकाणे ही पोर्तुगेजांची निर्मिती आहे. या व्यतिरिक्त आताच्या ताज लॅण्ड्स एंड (किंवा हॉटेल सी रॉक येथे) या ठिकाणी अजूनही असलेला वांद्र्याचा किल्ला, मालाडच्या मढ येथील आणि सध्या वायूदलाच्या ताब्यात असलेला वर्सोव्याचा किल्ला किंवा मुंबईचा प्रसिद्ध ‘फोर्ट’ (आता फक्त नाव. आपण ज्याला इंग्रजांचा ‘फोर्ट विभाग’ म्हणून ओळखतो, तो किल्ला मुळात पोर्तुगिजांचा होता.) या पोर्तुगेजांच्या खुणा अजूनही मुंबईत शिल्लक आहेत. सन १६६१ नंतर मुंबई पोतुगीज राजकन्येच्या लग्नात ब्रिटीशांच्या ताब्यात गेली आणि मुंबईला आपल्या सर्वाना माहित असलेला इतिहास प्राप्त होण्यास सुरुवात झाली.
पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ऑफ ब्रागांझा आणि इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यांच्या विवाहाचा तहनामा जून १६६१ मध्ये लिहिला गेला त्यानंतर मे १६६२ मध्ये लग्न संपन्न झाले. या लग्नात पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई हे बेत आंदन म्हणून दिले गेले हा शाळेत वाचलेला इतिहास आपल्या लक्षात आहे. जरी मुंबई इंग्रजांना आंदन म्हणून गेली असली तरी पोर्तुगीजांनी मुंबई ब्रिटीशांच्या प्रत्यक्ष हातात हातात देई पर्यंत अनेक कायदेशीर- बेकायदेशीर अडचणी काढून आपल्याच हातात ठेवली. मुंबई ब्रिटीशांच्या ताब्यात देण्यास पोतुगीज धर्मगुरूंचा मोठा विरोध होता. अखेर इंग्रजांनी बळाचा वापर करून सन १६६५ साली आपल्या ताब्यात घेतली.. पुढे १६६८ साली मुंबईचा कारभार ब्रिटीश राजाने इस्ट इंडिया कंपनीच्या हाती सोपवला आणि मुंबईला इतिहास लिहिण्याची संधी मिळाली.
आता आपल्या सर्वांच्या तोंडावर असलेल्या मुंबईच्या इतिहासाची सुरुवात झाली. मुंबईत येण्यापूर्वी इस्ट इंडिया कंपनीचे अस्तित्व सुरतेत होते. कंपनीच्या वाढत्या व्यापाराला सुरतचे बंदर अपुरे पडू लागले व तेवढ्यात ब्रिटीश शासकांनी कंपनीसमोर त्यांच्या व्यापार वृद्धीसाठी मुंबई किंवा कारवर असे दोन पर्याय ठेवले. शातिर दिमागाच्या इस्ट इंडिया कंपनीच्या जातिवंत ब्रिटीश व्यापाऱ्यांनी मुंबईचे नैसर्गिक बंदर असणे हेरले होते आणि मुंबईला आपली पसंती दिली आणि मुंबईच्या भरभराटीची सुरुवात झाली.
ब्रिटिशांना तत्कालीन उपखंडात आपले बंदर विकसित करायचे होते आणि मुंबईच नैसर्गिक सुरक्षित बंदर असण हे त्यासाठी योग्य वाटलं. ब्रिटिशांनी सूरतेहून आपले हेड ऑफिस मुंबईला हलविले आणि मुंबई वाढण्यास सुरुवात झाली. मुंबईमध्ये बाहेरचे लोक काम-धंद्यासाठी येण्यास सुरवात होऊन मुंबई अखिल भारतीय होण्यास सुरुवात झाली. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे हे मुख्यालय पुढे संपूर्ण देशाचा कारभार ब्रिटनच्या राणीच्या हातात गेल्यानंतरही ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी’ची राजधानी म्हणून कायम राहिले. ब्रिटिशांना मुंबईला पूर्वेकडचे लंडन बनवायचे होते व म्हणून त्यांच्या ताब्यात हे शहर गेल्यानंतर त्यांनी त्याची सुव्यवस्थित रचना केली. आजही सुस्थिती डौलाने उभ्या असलेल्या मुंबईच्या फोर्ट विभागातील इमारती ही त्याची जिवंत साक्ष आहे. सन १८५३ मध्ये ब्रिटिशानी मुंबई ते ठाणे दरम्यान त्यावेळी पहिली रेल्वे मार्ग सुरु केला. पोस्त खाते, तारायंत्र आणले. ब्रिटीशानी सुरु केलेल्या कापड गिरण्यांमुळे मुंबई जगातील कापड व्यवहाराचे एक प्रमुख केंद्र बनली होती. कापूस, अफूचा व्यापार तेजीत आला.
भारतीय जनतेला ब्रिटीशांच्या अन्यायाची जाणीव होऊन पुढे स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात भारतीय जनतेचा लढा सुरू झाला, त्यावेळी या सगळ्या चळवळीचे केंद्र मुंबईच होते. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या ‘गोवालिया टँक’ मैदानावर (आताचे ‘ऑगस्ट क्रांती’ मैदान) संपन्न झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात म. गांधीजींनी ब्रिटिश शासनाला ‘चले जाव- छोडो भारत’ हा इशारा दिला, आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एका निर्णायक टप्प्याला सुरुवात झाली आणि पुढे देशाची फाळणी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे अस्तित्वात येऊन भारत स्वतंत्र झाला हा पुढचा इतिहास आपल्या सर्वाना माहित आहे..
स्वातंत्रोत्तर भारतात केंद्र सरकारने भाषावार प्रांत रचना करण्यास प्राधान्य दिले. केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना सुलभ व्हावी यासाठी विविध वर्षात वेगवेगळी कामिशाने नेमली.. इतर राज्यांची निर्मिती होत असताना महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र उपेक्षाच येत होती.. मुंबई महाराष्ट्राला देण्याची केंद्र सरकारची मान्य मिळत नव्हती.. मुंबई केंद्राशासासित ठेवावी कि गुजरातला द्यावी यावर कारस्थान झाली होती. भाषावार प्रांतरचना करताना केंद्र सरकारकडून महाराष्ट्रावर सतत अन्यायच झाला होता. सुरुवातीस महाराष्ट्र-गुजरात व स्वतंत्र महाराष्ट्र अशी तरी राज्य योजना मांडण्यात अली. मुंबईवरचा महाराष्ट्राचा हक्क मान्य करण्यास केंद्र सरकार मुळीच तयार नव्हते. त्यात महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे बडे नेते महाराष्ट्रावर अन्याय होताना केंद्र सरकारचीच री ओढत होते. जनतेला हे मान्य नव्हते. ‘संयुक्त महार्ष्ट्राच्या मागणी साठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात अली होती.. निवेदने मोर्चे, सत्याग्रह तुरुंगवास हे सारे सारे मुंबईतील नागरिकांनी स्वतंत्र महाराष्ट्रासाठी सासोले.. मुंबईतील १०६ सर्व सामान्य नागरिकांनी बेळगाव-कारवर-मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी हौतात्म्य पत्करल आणि अशी सगळी भूतो न भविष्याती होऊन दी. १ मे १९६० रोजी गुजरात महाराष्ट्र पासून वेगळे होऊन मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात अशी दोन वेगळी राज्ये निर्माण झाली. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर जवळपास १३ वर्षांनी महाराष्ट्र हे देशातील १४वे राज्य म्हणून मान्यता मिळाली.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 मुंबई आपल्या ताब्यात असावी ही महत्वाकांक्षा ब्रिटीश सरकारपासून ते आता पर्यंत सर्वच सरकारची सुप्त इच्छा होती व आहे. देशाची राजधानी दिल्ली असली तरी आर्थिक राजधानी मुंबईच आहे. स्वातंत्र्यानंतर जवळपास ७० वर्ष होऊनही मुंबईचे हे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकलेल नाही. याला कारण मुंबईतील नागरिक. कष्टाळू, कोणत्याही संकटाने डगमगून जाता सतत कार्यरत राहणारे आणि तरीही माणुसकी जिवंत असलेलं.. मुंबईचा लौकिक वाढला किंबहुना इतकी वर्ष होऊनही टिकून राहिला तो त्यांच्यामुळेच.. मुंबई बहुरंगी, बहुढंगी आहे.. नवीन विचारांचं स्वागत करणारी आहे.. इथे बुरसटलेल्या विचाराना आणि माणसांनाही स्थान नाही आणि म्हणून ती देशात अव्वल आहे.. मुंबईत प्रांतवाद नाही.. देशाच्या कोणत्याही भागातून आलेल्या कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला ती सारख्याच प्रेमाने जवळ घेते, आश्रय देते आणि एवढे असूनही ती तिचे मराठीपण सोडत नाही..
संदर्भ –
१. मुंबई नगरी – न. र. फाटक
२. स्थल–काल – अरुण टिकेकर
३. गाथा संयुक्त महारष्ट्र आंदोलनाची –
विजय वैद्य
लेखक- नितीन साळुंखे
 
 
मुंबईचा आद्य राजा बिंब..
© नितीन साळुंखे
('मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा' या नितीनजींच्या आगामी पुस्तकातून साभार)
ज्यांना मुंबईच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते किंवा ज्यांना मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असतो, त्यांना मुंबईवर लिहिल्या गेलेल्या विविध पुस्तकांचं वाचन करताना, मुंबईचा ‘राजा बिंब’ भेटतोच भेटतो. मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी स्थापन करणारा हा पहिला राजा. परंतु या बिंबाच्या नावाचा आणि तो कधी होऊन गेला, याबद्दल खूप गोंधळ आहे. बिंब राजाचा उल्लेख बऱ्याचदा ‘बिंबराजा’, ‘भिम’, ‘भिमराजा’ असा वेगवेगळ्या पद्धतीने येतो आणि मनात अगोदरच झालेला गोंधळ आणखी वाढतो.
बिंब राजाचे नांव आणि त्याच्या कारकीर्दीचा समय यावर माझ्या वाचनात आलेली ‘महिकावातीची बखर’ उत्तम प्रकाश पाडते. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी विश्लेषण केलेली ही ‘महिकावतीची बखर’, ‘बिंब राजा’ अगदी स्पष्ट करून सांगते. वि. का.. राजवाडेंनी या बखरीतल्या नावांच्या आणि बिंब राजा आणि संबंधितांच्या होऊन गेलेल्या काळाच्या स्पष्टतेसाठी तर बखरीवर प्रचंड मेहेनत घेतलेली पुस्तकाच्या पानापानावर दिसून येते. इतिहासाचार्यांचा या क्षेत्रातील आदरयुक्त दबदबा पाहाता, त्यांनी या पुस्तकात नोंदलेल्या निरीक्षणाबद्दल माझ्या मनात तरी कोणतीही शंका नाही. माझ्या माहिती प्रमाणे त्याकाळची माहिती देणारा हा एकमेव दस्तऐवज आज उपलब्ध असल्याचं समजतं.
बखरीत नोंदल्याप्रमाणे मुंबईवर वेगवेगळ्या कालावधीत एकूण दोन वेगवेगळ्या बिंबानी राज्य केलं. माहीम मुंबई येथे राजधानी स्थापन करणारा पहिला राजा होता राजा ‘प्रताप बिंब’ आणि याच्या नंतर जवळपास १५५ वर्षांनी आलेला ‘बिंब यादव’..! या दोन राजांच्या नांवात असलेल्या साधर्म्यामुळे, माहीम येथे राजधानी स्थापन करणारा हा बिंब नेमका कोण आणि ते होऊन गेलेल्या काळात जवळपास १५५ वर्षांचं अंतर असल्याने, त्यातील नेमका कुठला बिंब कधी होऊन गेला यातही विविध लेखकांत मतभेद आढळून येतात. महिकावतीची बखर’ मात्र हे दोन्ही बिंब, पहिला बिंब आणि त्यानंतर १५५वर्षांनी आलेला दुसरा बिंब व त्या दोघांच्या दरम्यान होऊन गेलेले अन्य राजे यांचा पट अगदी व्यवस्थित उलगडून दाखवते.
मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंब -
मुंबईतील माहिम या ठिकाणी राजधानी स्थापन करणारा पहिला बिंब म्हणजे प्रताप बिंब राजा. ‘प्रताप’ हे त्याचं नांव आणि ‘बिंब’ हे आडनांव. हा गुजरातेतल्या अनहिलवाडच्या चालुक्याचा मंडलिक असलेल्या चांपानेरचा राजा गोवर्धन बिम्बाचा भाऊ. शके १०६०, म्हणजे इसवी सन ११३८ मध्ये गोवर्धन बिम्बाने आपला भाऊ प्रताप बिंबाला उत्तर कोकणवर स्वारी करण्याचे आदेश दिले. उत्तर कोकण म्हणजे साधारणत: गुजरातेतल्या दमण पासून ते मुंबईच्या मलबार हिलपर्यंतचा प्रदेश. आपल्या भावाची आज्ञा शिरसावंद्या मानून हा प्रताप बिंब जानेवारी सन ११३८ ला उत्तर कोकण प्रान्त सर करण्यास गुजरातेतून निघाला.
राजकीय व्युह रचनेचा भाग म्हणून प्रताप बिंब थेट उत्तर कोकणावर चालून न येता प्रथम पैठणला गेला. पैठणला त्या काळी राज्य करणारा भौम आडनांवाचा संस्थानिक होता, तो या प्रताप बिम्बाच्या नातेवांईकांपैकी होता. किंबहूना प्रताप बिम्बाचं ‘बिंब’ हे आडनांव देखील ‘भौम’ या आडनांवाचा अपभ्रंश आहे, असं राजवाडे म्हणतात. या भौमाकडे प्रताप बिंब तब्बल दोन वर्ष राहीला. ही दोन वर्ष प्रताप बिम्बाने चढाईसाठी लागणारं द्रव्य आणि साधन-सामग्रीचीजमवा-जमाविसाठी घालवली. सर्व तयारी पूर्ण होताच, इसवी सन ११४० मध्ये प्रताप बिंब त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी, एक ब्राह्मण पुरोहित हेमाडपंत आणि सात मराठा (सोमवंशी-सूर्यवंशी मराठा) सरदाराना घेऊन उत्तर कोकणच्या मोहिमेची सुरुवात दमणवर स्वारी करून करायची ठरवलं.
त्याच वर्षी, शके १०६२, म्हणजे इसवी सन ११४० मध्ये प्रताप बिंब दमणमध्ये दाखल झाला. कोकणावर त्याकाळी राज्य असणाऱ्या शिलाहारांचा मांडलिक असलेला दमणचा दुर्बळ राजा काळोजी सिरन्या प्रताप बिंबला शरण आला. विनासायास दमण हाती आल्यावर प्रताप बिंब आणखी दक्षिणेकडचा प्रदेश सर करण्यास निघाला. चिंचणी-तारापूर, पालघर, केळवे-माहिम, वसई पर्यंतचा प्रदेश प्रताप बिंबाने वेगाने काबिज केला. दमण ते वसईच्या खाडीच्या उत्तर किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश आता प्रताप बिंबाच्या अधिपत्याखाली आला.
दमण नंतर केळवे-माहिमचा राजा विनाजी घोडेलही प्रताप बिंबास शरण आला. दमण ते पालघर-वसईपर्यंतचा हा प्रदेश सुंदर असला तरी, या प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहारांचा हा पडता काळ होता आणि या प्रदेशातून त्यांच्या मांडलिक राजांवर शिलाहारांचा कोणताही वचक नसल्याने, या मांडलिकांचा निरंकूश राज्य कारभार चालल्याने, हा सर्व प्रदेश वैराण आणि उध्वस्त झालेला होता. मुळातच सुंदर असलेल्या या प्रदेशात आपल्या मुळ प्रदेशातून लोक आणून त्यांना इथे वसवण्याच प्रताप बिंबाने ठरवलं आणि त्याने आपला पुत्र मही बिंब यास चंपानेर-गुजरातहून वसाहत करण्यासाठी लोक आणण्यास सांगीतलं. मही बिंब गुजरातेहून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी असे सर्व मिळून ६६ कुळे घेऊन निघाला. मही बिंबाने पैठणहून काही ब्राह्मणांनाही बोलावलं. दमण-माहिमची व्यवस्था लावण्यासाठी प्रताप बिंब स्वत: केळवे- माहिम येथे राहीला. केळवे-माहिमला त्साने राजधानी स्थापण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा एक अधिकारी हरबाजी कुळकरणी याला दमणची व्यवस्था पाहाण्यासाठी धाडून दिलं. एवढं झाल्यावर प्रताप बिंबाने त्याचा प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी यास इसवी सन ११४२ मधे पुढच्या मोहिमेस, म्हणजे वालुकेश्वरापर्यंतचा प्रदेश सर करण्यास जाण्याची आज्ञा केली.
पुढच्या महिनाभरात बाळकृष्णराव सोमवंशी यांने वाळकेश्वरपर्यंतचा प्रदेश आपल्या अंमलाखाली आणला. वाळकेश्वाराच्या टेकडीवर, म्हणजे मलबार हिलवर जिथे आज राजभावन आहे तिथे, बाळकृष्णरावाने आपल्या सैन्याचा तळ ठेवला. वाळकेश्वराचं आणि तिथल्या मारुतरायाचं दर्शन घेतलं. माझ्या मते हा मारुती* म्हणजे सोबतच्या चित्रातला असावा. काही दिवस वाळकेश्वराला मुक्काम झाल्यावर त्यांने प्रताप बिंबाला वाळकेश्वरी येऊन आपला प्रदेश पाहाण्याची व तिथे वसाहत करण्याची विनंती केली.
एवढ्यात मही बिंब केळवे-माहिमात याऊन ठेपला होता. मही बिंबासोबत वसाहत करण्यासाठी आलेल्या कुळांची व्यवस्था केळवे-माहिम, पालघर परिसरात लावून, प्रताप बिंबाने मही बिंब आणि त्याने सोबत आलेल्या सोमवंशी क्षत्रिय मराठा - सूर्यवंशी क्षत्रिय मराठा आणि शेषवंशीय क्षत्रिय मराठा कुळांपैकी काही कुळं व पैठणहून आणलेले काही ब्राह्मण सोबत घेतले आणि तो वाळकेश्वराकडे निघाला. पुढच्या काही दिवसांत प्रताप बिंबाचा लवाजमा वाळकेश्वरी पोचला. तिथे काही दिवस राहून प्रताप बिंबाने वाळकेश्वराच्या साक्षीने स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला व तो दमण ते वाळकेश्वरापर्यंतच्या जवळपास ८४ मैल, म्हणजे १३५ किलो मिटर (आजच्या काळात हे अंतर ११५ किमि. भरतं) पसरलेल्या राज्याचा राजा म्हणून घोषित झाला. अगोदरच मुक्रर केल्याप्रमाणे या नविन राज्याची राजधानी म्हणून केळवे-माहिम ठरली. इथे त्याने बक्षिस म्हणून पैठणहून राज्याभिषेकासाठी आलेल्या माध्यंदिन ब्राह्मणांना काही जहागिरींचं वाटप केलं. पैकी गंगाधर नाईक सांवखेडकर यांना पसपवली, म्हणजे आताच्या पवंई नजिकचं पासपोली गांव इनाम दिलं, तर विश्वनाथपंत कांबळे (होय, कांबळेच..!) यांस गोरेगांव नजिकचं पहाडी गांव वंशपरंपरागत जहागिरी म्हणून दिलं. वाळकेश्वरास बसून त्याने वाळकेश्वरापासून एवढ्या लांबच्या गांवांचं वाटप का केलं, हे समजण्यास काही मार्ग नाही.
वाळकेश्वरी काही दिवस मुक्काम करुन राजा प्रताप बिंब पुन्हा केळवे-माहिमला येण्यास निघाला. वाळकेश्वराहून परत येताना राजा प्रताप बिंबाचा पहिला मुक्काम ‘वहिनळे-रांजणफर’ या गांवांत पडला. ही गांवं आताच्या मुंबंईच्या नकाशावर नक्की कुठली, ते सापडणं अवघड आहे, तरी ही गांवं वांद्रे-खार परिसरातली असावीत असं वाटतं. कारणं वांद्रे येथील मेहेबूब स्टुडीयोच्या नजीक एक ‘रनवर’ किंवा ‘रानवर’ नांवाचे गाव अजूनही आहे. आणखी एक ‘राजान’ नांवाचं गांव त्याच परिसरात आहे. ह्या दोन गांवांपैकी कुठलं तरी गांव पूर्वीचं रांजणफर असावं आणि ‘वहिनळे’चंच पुढे ‘वांद्रे’ झालं असावं की काय, अशी दाट शंका मला येते. असो. या मुक्कामात राजा प्रताप बिंबाने आणखी काही जहागिरींचं वाटप केलं. मरोळची जहागिरी रखमाजीराव सोमवंशी यांना तर मालाडची जहागिरी गंगाधररावांना दिली व त्यांच्या त्यांच्या वतनात त्यांना वसाहती करण्याचे हुकून दिले व राजा पुढच्या प्रवासासाठी निघाला.
राजा प्रताप बिंबाने त्याचा पुढचा मुक्काम नीट कळत नाही, पण तो जोगेश्वरी किंवा कान्हेरीच्या गुंफात केला असावा. या मुक्कामात त्याने मुंबई-माहिम आणि वरळीची जहागिरी गंभिरराव सूर्यवंशी यांना दिली. दमणच्या हरबाजी कुळकर्ण्यांना मालाडपासून घोडबंदरपर्यंतचा परिसर वतनात दिला आणि पुत्र मही बिंबाला त्याने कल्याणची भुमी सर करण्यास पाठवलं..
राजा प्रताप बिंब वाळकेश्वराला स्वत:ला राज्याभिषेक करायला केळवे-माहिमहून (महिकावती) निघाला, तो जिंकलेल्या सर्व प्रदेशाची घडी बसवत बसवत परतीच्या प्रवासाला निघाला, त्यास साधारणत: वर्षभराचा अवधी लागला असावा, असं बखरीत दिलेल्या काळावरून लक्षात येतं.
राजा प्रताप बिंबाची वर्षभराची मोहिम वसईच्या खाडीच्या दक्षिणेकडे सुरू असताना, त्याच्या महिकावतीच्या राज्यात, म्हणजे केळवे-माहिम परिसरात वेगळ्याच घटना घडत होत्या. बिंब राजा, राजपुत्र व बहुतेक सर्व महत्वाच्या सरदारांची त्या परिसरातली अनुपस्थिती पाहून, शिलाहारांनी राजा प्रताप बिंबाच्या वसई ते दमण परिसरावर हल्ला करुन राजधानी महिकावती, म्हणजे केळवे-माहिम आपल्या ताब्यात घेतली आणि राजा प्रताप बिंबाला वसईच्या खाडीच्या दक्षिणेस वाळकेश्वरापर्यंतच्या प्रदेशात कोंडून टाकलं.
प्रताप बिंबाने आपली राजधानी केळवे-माहिम शिलाहारांच्या ताब्यात गेल्याचे वर्तमान समजल्यानंतर, पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असावेत. त्यासाठी त्याने याच्या सैन्याचं आणि स्वत:च्या मुक्कामाचं स्थान म्हणून मुंबई-माहिम ठरवलं असावं. पुढचा काही काळ राजा प्रताप बिंबाने आपली जुनी राजधानी घेण्याचे प्रयत्न केले असावेत व त्या प्रयत्नांना यश येत नाही हे पाहून शेवटी आपली राजधानी म्हणून त्याने मुंबंई माहिम मुक्रर केली असावी. अर्थात, रादा बिंबाने ‘बिंबस्थान-माहिम’ येथे राजधानी स्थापन केली’ एवढाच उल्लेख बखरीत आहे. बखरीत दिलेल्या काळातील फरकाचा तपशील भरून काढण्यासाठी मी या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे कल्पनेने मांडणी केलेली आहें.
या माहिम बेटाला पूर्वी नांव नव्हतं. ओसाड, वेराण असलेल्या या बेटाला ‘बरड बेट’ किंवा बॅरन लॅन्ड असं म्हणत. शके १०६० च्या अखेरीस, म्हणजे इसवी सन ११३८, राजा प्रताप बिंबाने या ठिकाणाला आपली राजधानी बनवलं आणि आपल्या जुन्या राजधानीचंच ‘माहिम’ हे नांव दिलं आणि तेंव्हापासून या बेटाला माहिम हे नांव पडलं, असं म्हणता येतं. माहिमला ‘बिंबाच्या लष्कराचे ठाणे’ या अर्थाने ‘बिंबस्थान’ असंही एक नांव त्याने दिलं. केवळ माहिमच नव्हे, तर केळवे माहिम परिसरातल्या आणखीही काही ठिकाणची नांव त्यांने मुंबईतील काही ठिकाणांना दिली. उदा. नायगांव, धारावी इ. राजा प्रताप बिंबाने त्याची कुळदेवता ‘प्रभावती’ हिची स्थापना माहिम येथे केली असावी, असं मानण्यास जागा आहे, कारण कुळदेवतेचं देऊळ स्थापन करण्याची आजही प्रथा आहे. हिच प्रभावती पुढे ‘प्रभादेवी’ म्हणून प्रसिद्धीस पावली. आजही हिचं मंदिर (आणि आता रेल्वे स्टेशनही) मुंबईत आहे..!!
असा हा ‘राजा प्रताप बिंब’ सध्याच्या मुंबईतल्या माहिमला राजधानी स्थापन करणारा या अर्थाने मुंबईचा पहिला राजा. राजा प्रताप बिंबाने इसवी सन ११५९-६० पासून पुढची ९ वर्ष मुंबईवर राज्य केलं. राजा प्रताप बिंब आणि त्याच्यानंतर माहिमच्या गादीवर बसलेले राजे आणि त्यांची कारकिर्द खालील प्रमाणे होती..;
**राजा प्रताप बिंब -
शके १०६२-१०६९ या कालावधीतला वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या राज्याचा राजा म्हणून ७ वर्ष. मुंबई-माहिम ही राजधानी आणि वाळकेश्वर ते वसईपर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून ५ वर्ष.
प्रताप बिंबाचा पुत्र मही बिंब -
शके १०६९ ते ११३४- एकूण ६५ वर्ष
मही बिंबाचा पुत्र केशवदेव बिंब-
शके ११३४ ते ११५९ - एकूण २५ वर्ष
केशवदेवास पुत्र नसल्याने जनार्दन प्रधान दत्तक आला व पुढची शके ११५९ ते ११६३ अशी चार वर्ष.
जनार्दन प्रधानाचा पराभव चौलचा वैश्य राजा नागरशाने केला व त्या नंतर माहिम-मुंबईवर त्याने शके ११६३ ते शके १२१६ पर्यंत अशी ५३ वर्ष राज्य केलं.
शके १२१६ मधे या परिसरात अवतरला, तो देवगिरीच्या रामदेवराव जाधव(यादव) याच्या तीन पुत्रांपैकी एक ‘बिंब जाधव (यादव)’. हा माहिम-मुंबईवर राज्य केलेला दुसरा बिंब. याने शके १२२५ पर्यंत या प्रदेशावर राज्य केले. याच्यानंतरही शके १२६९-७०पर्यंत काही राजे इथे होऊन गेले व त्यानंतर इथे मुसलमानी अंमल सुरू झाला.
शके १०६२ मधे आलेल्या पहिल्या बिंबाचं नांव ‘प्रताप’ असून, आडनांव ‘बिंब’ होतं. तर त्याच्या नंतर जवळपास १५५ वर्षांनी झालेला दुसऱ्या बिंबाचं नांव ‘बिंब’, तर आडनांव ‘जाधव (यादव)’ होतं. सुमारे १५५ वर्षांच्या अंतराने झालेल्या दोन्ही बिंबांनी ९ वर्षच राज्य केलं, ही गोष्ट मला आश्चर्याची वाटते. या दुसऱ्या बिंबाची कथा पुन्हा कधीतरी सांगायचा प्रयत्न करेन. दोन्ही बिंबातल्या नावांच्या सारखेपणामुळे लेखाच्या सुरुवातीला म्हणालो तसा गोंधळ होतो व मग असा गोंधळ त्यांच्या होऊन गेलेल्या काळातही परावर्तित होतो.
लेखक- नितीन साळुंखे
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 टिप-
1. *मारुतीची फोटो. बाळकृष्णरावाने दर्शन घेतलेला वाळकेश्वराचा मारुती हाच असावा असा माझा अंदाज आहे, खात्री नव्हे.
2. **महिकावतीची बखर अनेकदा वाचून त्याचं सार वरील लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काही प्रमाणात गोंधळ उरतोच. सदर बखरीतल्या घटना प्रत्यक्ष घडल्यानंतर ‘काही शे’ वर्षांनी लिहिल्या गेल्या असल्यामुळे, तपशीलात तेवढासा सुसंगतपणा जाणवत नाही. इतिहासाचार्य राजवाडेंनी या बखरीचं विश्लेषण करताना त्यात बरीच सटीकता आणण्याचा प्रयत्न केला आहे हे जाणवलं तरी काही प्रमाणात अद्यापही त्यात सुसंगतता दिसते. उदा. प्रताप बिंब शके १०६० मधे दक्षिण कोकणावर स्वारी करण्यास निघाला, तो दोन वर्षांनी शके १०६२ मधे पैठण मार्गे कोकणतल्या दमण येथे आला, असं बखरीत नोंदलं आहे. पुढे त्याने मुंबई-माहिम येथे राजधानी स्थपन केल्याचा शके पुन्हा १०६० दिलं आहे व त्यानंतर त्याने ९ वर्ष इथून राज्य सांभाळल्याचा उल्लेख आहे. मुळात तो मुंबई प्रांतात आलाच शके १०६२ ला, तर मग तो ९ वर्ष इथे राज्य करेलच कसा, हा प्रश्न मला पडला व ती दुरुस्ती मी अंदाजाने ५ वर्ष असावीत अशी करुन घेतली आहे.
3. मुंबई-माहिमला राजधानी करणारा पहिला बिंब कोण, येवढेच स्पष्ट करण्यासाठी हा लेख आहे. त्यामुळे इतर तपशील मी यात लिहिलेला नाही. मुंबई-माहिम ही जरी प्रताप बिंबीने वसवलेली असली तरी, त्यावेळच्या राजकीय धामधुमीत या राज्याची भुमी वाळकेश्वर ते वसई व पुढे दमणपर्यंत कमी-जास्त होत राहीली होती, हे लक्षात ठेवावं.
4. प्रताप बिंब हा मुळचा गुजरातेतील अनहिलपाटण किंवा अहीनलवाडचा व येताना तो मुंबईत तिकडून सोमवंशी, सूर्यवंशी आणि शेषवंशी कुळं घेऊन आला असं म्हटलं आहे. शेषवंशी समाज म्हणजे आताचा भंडारी समाज, तर सोमवंशी व सूर्यवंशी म्हणजे साधारणत: पाटील, म्हात्रे, चौधरी, चुरी, वर्तक, सावे वैगेरे आडनांवांचा समाज. हा समाज आजही केळवे-माहिम व मुंबईत मोठ्यासंख्येने सापडतो व त्यांच्या गांवच्या बोलीत गुजराती-मारवाडी शब्द सापडतात. सोमवंशी-सूर्यवंशी आणि शेषवंशी समाजाचा किंवा त्यांच्या बोलीचा मी जाणकार नव्हे, तर मी एका माहितगार व्यक्तीकडून ही माहिती विचारून ही टिप लिहिली आहे. त्यात काही चुक असल्यास ती माझी समजावी व माझ्या लेखाचा मुख्य हेतू लक्षात घेऊन दुरुस्ती सुचवावी.
5. मुंबईचे मुळ रहिवासी असलेल्या कोळ्यांनतर सोमवंशी क्षत्रिय पाठारे, सूर्यवंशी क्षत्रिय व शेषवंशी क्षत्रिय हे मुंबईचे दुसरे मुळनिवासी ठरतात. सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाज व पाठारे प्रभू समाज हे पूर्णत: वेगळे. पाठारे प्रभु दुसऱ्या बिंबासोबत, म्हणजे शके १२१६ मधे मुंबईत आले. याचा अर्थ पाठारे प्रभू समाज कोळी, सोम.-सूर्य-शोष वंशीयांनंतरचे मुंबईला घडवणारा तिसरा महत्वाचा समाज होतो.
6. सोमवंशी क्षत्रिय, सूर्यवंशी क्षत्रिय व शेषवंशी क्षत्रिय या तिन्ही समाजांचा बखरीतला एकत्रित उल्लेख ‘मराठा’ असा आहे. याचा अर्थ त्या काळात ‘क्षत्रिय’चा समानार्थ ‘मराठा’ असा होत असावा, असं मला वाटतं.
7. हा लेख लिहिताना इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंचं ‘महिकावतीची बखर’ हे पुस्तक आधारभूत मानलेलं आहे. काही तपशिलांच्या पुष्टीकरता श्री. अशोक सावेंचं ‘महिकावतीची बखर’ याच नांवाचं पुस्तकही संदर्भासाठी घेतलेलं आहे. श्री. अशोक सावेंच्या मत आणखीही एक बिंब होता, परंतू शिलाहारांपैकी असून तो प्रताप बिंबाच्या पूर्वी होऊन गेला होता. काही शिलालेखांवर त्या बिंबाचा उल्लेख सापडतो असं श्री. सावेंनी लिहिलं आहे. हा बिंब मुंबईचा पहिला राजा बिंबाच्या पूर्वी होऊन गेला, असंही श्री. सावेंनी लिहिलं आहे, परंतू मुंबईच्या संदर्भात ज्या बिम्बाचा किंवा बिंब राजाचा उल्लेख वारंवार येतो, तो हा बिन्ब खचितच नव्हे. म्हणून याचा उल्लेख मात्र इथे केला आहे, ते केवळ तो माहिती असावा म्हणून..!!
8. सोमवंशी, सूर्यवंशी व शेषवंशी समाजाचे आणखीही अंतर्गत भेद आहेत, मात्र ते इथे देणं अपेक्षित नसल्याने, त्यांचं ढोबळ वैशिष्ट्य माझ्या विदुषी स्नेही डाॅ. सौ. सुनिता सुवेन पाटील यांच्याकडून माहित करून घेतलं आहे. त्यांनी बरोबरच सांगीतलं असेल, लिहिण्यात काही चूक असल्यास ते पाप माझे.
9. ‘शके’वरून इसवी सन काढताना ‘शके’त ७८ मिळवावेत. उदा शके १०६२+७८= इसवी सन ११४०.
10. केळवे-माहिम म्हणजे ‘महिकावती’ आणि मुंबई-माहिम म्हणजे ‘बिंबस्थान’.
© सदर लेखाचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन असून लेख नावासह शेअर केल्यास अावडेल.
छायाचित्रे : सर्व फोटो हे लेखात नमूद केलेल्या वास्तूंचे असून ते गुगल इमेजेस व फ्लिकर/इन्स्टाग्रामवरील वेगवेगळ्या प्रोफाईल्सवरून घेतले आहेत त्यामुळे कॉपीराइटच्या अधीन असू शकतील.
 
 
"मुंबैच्या टॅक्सीला लागलेल्या हळदीची गोष्ट.."
© नितीन साळुंखे
('मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा' या नितीनजींच्या आगामी पुस्तकातून साभार.)
मुंबयची काली-पिली म्हंजे, मुंबयची काळी-पिवळी टॅक्सी. मी पाहिली ती देखणी, आटोपशीर, बांधेसूद फ्याट (‘फियाट’) गाडी. ॲंबेसिडर टॅक्सी मुबईत क्वचितच दिसायची आणि तिच्यावर ‘मोठी टॅक्सी’ असं ठसठशीतपणे लिहिलेलं असायचं. टॅक्सी असो कोणतीही, पण त्या काळात ड्रायव्हर असायचा तो सरदारजीच..! त्या काळात टॅक्सी म्हणजे काय तरी अप्रुपच वाटायचं. खाजगी गाड्या तर अगदी दुर्मिळ. टॅक्सीत बसणं म्हणजे स्वर्गप्राप्ती झाल्यासारखंच वाटायचं.
सुरुवातील टॅक्सी हे वाहन होतं मुंबईत बाहेरून येणाऱ्या राजे-रजवाड्यांसाठी. ‘हे वाहन आपल्यासाठी नव्हेच’अशी सर्वसामान्य नागरीकांचा समज होता. तो रास्तही होता कारण हिचं महागडं भाडं. नंतर हिच्या वेगाच्या बरोबर मुंबईतला व्यापार उदीम वाढला आणि ही संस्थानिकांसोबत मुंबयतल्या शेठ लोकांनाही परवडू लागली. तरीही ही सामान्यांच्या आवाक्याबाहरचीच होती. मी लहान असताना, म्हणजे १९७०-७५ च्या दरम्यान हिच्यात बसणं अप्रुपाचं होतं. पुढे मोठेपणी हिला वश करून घ्यावं अशी परिस्थिती आली, तर ही कोणत्याही सौंदर्यवतीसारखी ‘नय आना तुमारे साथ’ म्हणत भर्रकन निघून जायची. हिला आपल्यासाठी एंगेज होताना पाहून, आवडणारी पोरगी पटण्यासारखं वाटायचं..
हां हां म्हणता काळ बदलला. आकडण्यात आणि फणकरे दाखवण्यात आपलं वय चाललंय, हेच अनेक लावण्यखणींच्या लक्षात येत नाही, तसं हिचं काहीसं झालं. ‘तू नही तो और सही’ ह्या ब्रिदाला जागून जन्मजात आशिक दुसरीकडे प्रयत्नाला लागले आणि मग हिच्याच तरुण, देखण्या, शिडशिडीत बांध्याच्या ‘कूल’ बहीणी रस्त्यावर अवतरल्या आणि मुंबईकर त्या पहिलीला विसरले. आता वय गेलेल्या ‘त्या’ फ्याट बाया आशाळभुतपणे आपल्या या एकेकाळच्या आशिकाकडे पाहात बसतात आणि ह्यांचा त्या काळचा मुॅबैकर आशिक मात्र यांच्या तरूण, कूल बहिणीच्या कुशीत बसून यांच्याच समोरून निघूनही जातो. इश्काचे वय निघून गेलेल्या या सुंदरींना आता कोण विचारणार.. नंतर बसावं म्हटलं तर ती कुणालाही ‘नाही’ म्हणून आपल्याच तोऱ्यात, मागे मुंबईकर, आणि आता ही त्यांच्या दारात सर्व सेवेला, हे म्हणतील तिथे हजर एवढा अप साईड डाऊन ट्रेंड पाहिलेल्या मुंबईच्या या सुप्रसिद्ध मोटराईज्ड टॅक्सी सेवेला १०० वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन गेलीत.
टॅक्सी सेवेची सुरुवात मुंबंईत १९११-१२ च्या सुमारास झाली. सन १९०१ साली मुंबईच्या रस्त्यावर जमशेदजी टाटा या अचाट कर्तुत्वाच्या भारतीय माणसाची पहिली मोटरकार धावली आणि मुंबईच्या समाजजीवनाने हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली. मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या मोटरगाड्यांची संख्या आस्ते आस्ते वाढू लागली आणि त्यावेळच्या मुंबईकरांच्या जगण्यालाही वेग येऊ लागला. सार्वजनिक वाहतुकीसाठी टांगा आणि ट्रामपेक्षा वेगवान वाहन हवंस वाटू लागलं. लोकांची इच्छा आणि गरज ओळखून सन १९११ च्या आसपास ब्रिटीश सरकारने सार्वजनिक वापरासाठी टॅक्सी परवाने द्यायला सुरुवात केली आणि मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी धावू लागल्या.
सुरुवातीला मुंबईतल्या मोटार गाड्या म्हणजे टांग्याच्या केबिनची थोडी सुधारित आवृत्ती होती. या गाड्यांना वरून पक्का टप नसायचा, तर दुमडता येण्यासारखे मेण कापडाचे अथवा कॅनव्हासचे छत असायचे. तेंव्हा पक्के टप (हार्ड टॉप) असलेल्या गाड्या अगदी दुर्मिळ आणि किंमतीलाही महाग असायच्या. अश्या टप असलेल्या गाड्यांना तेंव्हा ‘लॅन्डो बॉडी’ गाडी म्हणायचे. १९११-१२च्या सुमारास सुरु झालेल्या टॅक्सी सेवेमधेही याच गाड्या आल्या. फोर्ड, शेवरले, ब्युक आदी देखण्या माॅडेलच्या प्रशस्त गाड्या वाटायच्यीच राजेशाही. एखादी मर्सिडीजही टॅक्सीत होती. गाड्या मोठ्या असल्यामुळे कितीही माणसं कोंबायची त्या काळी परवानगी होती.
मुळात राजे-रजवाड्यांसाठीच सुर झालेल्या या सेवेत एक गडबड हमखास व्हायची, ती टॅक्सीच्या काळ्या कुळकुळीत रंगामुळे. त्या काळातल्या सर्वच कंपन्यांच्या, खाजगी उपयोगासाठी असो की टॅक्सीसाठी असो, गाड्यांचा रंग काळाच असायचा. दुसऱ्या रंगाच्या गाड्या बनायच्याच नाहीत. इथे मुंबयकरांचा गोंधळ व्हायला लागला. टॅक्सी म्हणून एखाद्या गाडीला हात दाखवायचा, तर ती नेमकी कुठल्याचरी संस्थानच्या राजाची गाडी निघायची आणि मग ‘बेवकूफ, तुम क्या हमको ट्याक्सीवाला समजता क्या’ या टाईपचं इगोसंबंधीत भांडणंही व्हायची. आता हे काही कुठं लिहिलेलं नाही, पण मनाने क्षणभर त्या काळात जाऊन हे प्रसंग कसे साग्रसंगीत साजरे होत असतील त्याची कल्पना आजच्या काळावरून करु शकतो करु शकतो. आता ज्या अनेक माॅडेलच्या गाड्या टॅक्सी सेवेत आल्यात, त्या जर एकाच रंगाच्या असत्या, तर जे काही झालं असतं, तेच नेमकं त्या काळात होत असावं..!
 
 
 
 
 
  अशा गोंधळाच्या वेळी कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून शक्कल निघाली, की जी टॅक्सी असेल त्या टॅक्सी मिटरच्या दांडीवर ‘पिवळा कपडा’ लटकावून ठेवायचा आणि जर ती टॅक्सी एंगेज असेल, तर त्याच कपड्याने मिटर गुंडाळून टाकायचा. त्याकाळात टॅक्सीचा मिटर मधल्या काळातल्या फियाट टॅक्सीसारखा टॅक्सीच्या बाहेर बाॅनेटच्या डाव्या कोपऱ्यात लावलेला असायचा, त्या मुळे, टॅक्सी उपलब्ध असेल तर मिटरला लटकणारं आणि एंगेज्ड असेल तर मिटरला गंडाळलेलं ‘पिवळं फडकं’ लांबूनही दिसायचं आणि लोकांना टॅक्सी लांबूनही ओळखता येऊ लागली. या एवढ्या एका आयडीयेने लोकांमधला गोंधळ संपुष्टात आला आणि सर्व सुरळीत होऊन गेलं..! ही कल्पना नक्कीच एखाद्या देशी डोक्यातून आली असावी यात शंका नाही, कारण भल्या भल्या शास्त्रज्ञांच्या डोक्यातही न येऊ शकणारा लोकोपयोगी सोपा जुगाड करण्यात आपण हुशार आहोत..!!
या पिवळ्या रंगाच्या कपड्यावरून लोकांना टॅक्सी ओळखणे सोपं झालं आणि पुढे हाच पिवळा रंग टॅक्सीच्या टपावर जाऊन बसला आणि टॅक्सीला हळद लागली, ती आजपर्यंत उतरलेलीच नाही..खालची काळी चंद्रकळा मात्र सुरुवातीपासून ची तिच आहे..! टॅक्सीला लागलेल्या हळदीची कथा ही अशी आहे..!
आताही काली-पिली आहेच, पण मागाहून आलेल्या तिच्या कूल बहिणी किंवा मेरू, ओला, उबर इत्यादी भगिनी विविध रंगाच्या मिड्या-साड्या ल्यायलेल्या असल्या तरी, हळदीच्या रंगाच्या नंबर प्लेटच्या रुपाने त्या जुन्या हळदीचं बोट लावल्याखेरीज रस्त्यावर येऊ शकत नाहीत..!!
संदर्भ –
‘स्थल-काल’ – श्री. अरुण टिकेकर २००४
‘माय मुंबाई’ – वा.वा.गोखले- १९९१
लेखक- नितीन साळुंखे
 
मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवणारा एक रस्ता..
© नितीन साळुंखे
('मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा' या नितीनजींच्या आगामी पुस्तकातून साभार.)
मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे..मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे..या रस्त्यांच्या निर्मितीची एक स्वतंत्र कथा आहे तश्याच याच्या शेजारी असलेल्या वास्तुंच्याही कथा-कहाण्या आहेत..
आपल्याला व्यवसाय-धंद्यानिमित्त अनेक ठिकाणी फिरावं लागत..आपण ज्या रस्त्यावरून रोज ये-जा करतो त्या रस्त्याचे ऐतिहासिक महत्व आपल्या लक्षात येत नाही..हे दुर्लक्ष नव्हे कारण आपल्याला त्याची माहिती नसते..असाच एक आद्य रस्ता मुंबईला बृहन्मुंबई बनवण्यास कारणीभूत आहे..तो आता निवृत्त झालेल्या वयोवृद्ध माणसासारखा शांत होऊन एका बाजूला पहुडलेला आहे..या रस्त्याला फारशी वर्दळ नसते..पिक अवर्सला, शाळांच्या वेळात काय वर्दळ असेल तेवढीच..बाकी सर्व शांत, शांत..!
दादर टी.टी. वरून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने ठाण्याच्या दिशेने निघालो की प्रथम आपण पोहोचतो तो सायन हॉस्पिटलच्या समोर..आता फ्लाय ओव्हर सोडून आपण खालच्या रस्त्याने निघालो की आपण थेट पोहोचतो ते इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या तोंडाशी. इस्टर्न एक्सप्रेस हायवे सायनला जिथून सुरू होतो, त्याच्या वीस-पंचवीस पावलं अलिकडे आपल्या डाव्या हाताला हायवेपासून फुटून एक रस्ता जाताना दिसतो..हा रस्ता चुनाभट्टीला, म्हणजे आताच्या हार्बर रेल्वेच्या ‘चुनाभट्टी’ या स्टेशनाकडे, जातो व पुढे कुर्ल्याला मिळतो..हाच तो मुंबईला 'बृहत' बनवून तीला उपनगरांची जोड देण्यास कारणीभूत ठरलेला मुंबईचा ऐतिहासीक रस्ता, 'सायन काॅजवे'..! याचं आताचं नांव ‘एन.एस.मंकीकर मार्ग’..
आता थोडसं मागच्या काळात जाऊ.. १६६१ मध्ये पोर्तुगीजाकडून मुंबई बेट ब्रिटीशांच्या ताब्यात आली. मुंबईची हद्द तेंव्हा माहीम-सायनपर्यंतच मर्यादित असून त्यापुढच्या मिठी नदी (माहीमची खाडी) पलीकडील ठाणे-वसई व पुढचा भूभाग ‘साष्टी’म्हणून ओळखला जायचा व या विस्तृत भूभागावर पोर्तुगीजांच राज्य होतं. एका अर्थाने मिठी नदी म्हणजे ब्रिटीश व पोर्तुगीज यांच्या राज्यामधील नैसर्गिक हद्द होती..आपल्या हद्दीच्या रक्षणाकरिता ब्रिटीशानी मिठीच्या दक्षिण तीरावर सायन, धारावी व पश्चिमेस माहीम असे तीन किल्ले राखले होते ते त्यासाठीच..सन १७३९ मध्ये चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांकडून साष्टी हस्तगत केली आणि या बेटांवरचा पोर्तुगीज अंमल संपून मराठ्यांचं राज्य आलं...पुढे काही वर्षांनी सन १७७५ मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेट व्यापाराकरिता म्हणून ब्रिटीशांच्या ताब्यात देण्यात आली..हा संपूर्ण इतिहास हा स्वतंत्र विषय असल्याने त्याचा इथे विचार केलेला नाही..
साष्टीचा भूभाग ब्रिटीशांच्या ताब्यात तर आला परंतु मधल्या मिठी नदीच्या विस्तृत पात्रामुळे साष्टीमधील वांद्रे-कुर्ला व त्यापलीकडील परिसराशी संपर्क साधनं तेवढ सोप्प नव्हत..साष्टीशी त्वरित संपर्कासाठी मधली खाडी बोटीने पार करून पलीकडे जाण शक्य असलं तरी प्रॅक्टीकल नव्हतं..आता ब्रिटीशांना या खाडीवर कायमस्वरूपी रस्त्याची किंवा पुलाची निकड भासू लागली आणि बऱ्याच विचारानंतर कंपनी सरकाने खाडीत (नदीत) भरणी करून रस्ता -काॅजवे- बनवायचा निर्णय घेतला..ब्रिटीशशासीत मुंबईच्या मुळ सात बेटांमध्ये भरणी घालून बेटं जोडण्याचं काम याच सुमारास बऱ्यापैकी पुर्ण होत आलं होतं..
सायन काॅजवे बांधण्याचा निर्णय झाला तेंव्हा मुंबईचा गव्हर्नर होता जोनाथन डंकन. जोनाथन डंकनने हा रस्ता सन १७९६ मध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आणि कामास सुरुवात केली..आर्थिक अडचणी, प्रशासकीय दिरंगाई तेंव्हाही होती..नेमका त्याच दरम्यान, म्हणजे १८०२-१८०३ च्या दरम्यान देशात मोठा दुष्काळ पडला होता. लोकांचे तांडेच्या तांडे देशभरात अन्नाच्या शोधात निघाले होते. त्यातलेच काही लोक मुंबईच्या हद्दीत येऊन थडकले..इथे पैशांच्या अभावी रस्ता बांधायला विलंब होत होता..मोठ्या प्रमाणावर दुष्काळी भागातून आलेले लोक पाहिल्यावर जोनाथन डंकनच्या डोक्यात या लोकांकडून अन्नाच्या मोबदल्यात रस्त्याचे काम करून घेण्याची कल्पना अली आणि बघता बघता पुढच्या दोन-तीन वर्षात, सन १८०५ साली हा रस्ता बांधून तयार झाला आणि मुंबई बृहन्मुंबई होण्याच्या दिशेने सुसाट सुटली..पुढच्या काळात साष्टीतील ठिकाणं मुंबईची उपनगर म्हणून ओळखली जाऊ लागली त्याची सुरुवात या रस्त्याने केली..हा रस्ता मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवण्यास कारणीभूत ठरला..जोनाथन डंकनचा सन्मान म्हणून या रस्त्याला 'डंकन-सायन काॅजवे' असं सार्थ नांव देण्यात आलं..आज नांव जरी बदललं असलं तरी हा रस्ता अजुनही 'डंकन काॅजवे' म्हणूनच ओळखला जातो..
या रस्त्यच्या सायन बाजूकडे काही वर्षांपूर्वीपर्यंत एक संगमरवरी कोनशीला होती व त्यावर या रस्त्याच्या निर्मितीची व निर्मात्याची थोडक्यात माहिती होती..ही पाटी सध्या गायब आहे..आपल्या महानगरपालिकेने रस्ता दुरुस्तीच्या वेळेस ती काढून टाकली असावी बहुदा..त्या पाटीचा माझा शोध सुरूच राहाणार आहे.
‘रोजगार हमी’तून बांधला गेलेला देशातील हा पहिला रस्ता असावा..अर्थात तेंव्हा शब्द जन्माला आला नव्हता..दुष्काळी भागातून आलेल्या मजुरांकडून हा रस्ता बांधण्यासाठी तेंव्हा ५०,५७५ रुपये खर्च आला. हाच रस्ता सरकारी पैशाने बांधला गेला असता तर किमान दीड-दोन लाख रुपये खर्च आला असता असा उल्लेख बहुतेक सर्व जुन्या पुस्तकांतून आढळतो..
हा रस्ता बांधण्यासाठी सरकारला आलेला खर्च वसूल करण्यासाठी ‘टोल’ आकारला गेलेलाही हा देशातील पहिला रस्ता म्हणायलाही हरकत नाही..या रस्त्यावरून वरून येणाऱ्या बैल किंवा घोडागाडीला जोडलेल्या बैल किंवा घोड्यांच्या संख्येवर टोल आकारला जायचा..पुढे सन १८३१ सालात सरकारच्या लक्षात आले की या रस्त्याला आलेला खर्च कधीचाच भरून निघाला आहे, तेंव्हा सरकारने ताबडतोब यावरील टोल बंद करून टाकला..टोल बंद करण्याची सूचना या टोल नाक्यावर वसुलीचे काम करणाऱ्या एका साधारण ब्रिटीश कामगाराने केली होती हे विशेष..! आजच्या पार्श्वभूमीवर हे चित्र जरा विपरीत वाटते ना?
आणखी एक..सायनच्या मुख्य रस्त्यावरून आपण जेंव्हा या रस्त्यावर जायला डावीकडे वळतो, त्याच कॉर्नरवर आपल्याला एक जुनाट, पडीक अवस्थेत असलेलं सरकारी पिवळट रंगच घर दिसत. हे बहुतेक जूनं टोल वसुलीचं ऑफिस असावं किंवा मग सायन स्टेशन जवळची आयुर्वेदिक कोलेजची रस्त्यालगतची इमारत टोलचं कार्यालय असाव अशी दाट शंका येते..काही पुस्तकांत हे कार्यालय सायन पोलिस स्थानकाच्या शेजारी असल्याचाही उल्लेख आहे..याचीही नीट माहिती मिळत नाही..
हा रस्ता बांधला गेला आणि मुंबईमध्ये पार ठाणे, कल्याण व त्याही पुढेपासून लोकांची व मालाची आवक व्हायला सुरुवात झाली..मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व्हायला खरी सुरुवात झाली ती या रस्त्यामुळे.. माहिमचा कॉजवे त्याच्या खूप नंतर म्हणजे सन १८४३ ला बांधला गेला व रेल्वे त्याच्याही नंतर म्हणजे १८५३ साली सुरु झाली..इस्टर्न एक्सप्रेस हायवे व पश्चिमेचा सीएसटी रोडही नंतरच बांधला गेला.
असा हा एके काळचा मुंबई-साष्टी जोडणारा, वर्दळीचा महामार्ग आता मात्र निवृत्त होऊन शांतपणे एका बाजूला पहुडला आहे..अतिवर्दळीचं, गोंगाटाचं, ट्राफिक जामचं सायन अगदी लगटून असूनही त्या वर्दळीचा याच्याशी काहीच संबंध राहिलेला नाही..कधी जमल्यास, कृतज्ञता म्हणून, थोडीशी वाकडी वाट करून या रस्त्यावरून एक फेरफटका जरूर मारून या, त्यालाही बरं वाटेल..!!
 
 
 
 
 
 
 
 
 जाता जाता –
याच रस्त्यावर सायन पासून पुढे आलो की काही अंतरावर आपल्या उजव्या हाताला एक पुरातन शिवमंदिर दिसतं..या मंदिराला लागून एक तळंही आहे..हे शिवमंदीर अतीप्राचीन असल्याचं सांगितलं जातं..सायनच मूळ नांव ‘शिव’ असून इंग्रजांनी त्यांच्या स्पेलिंग मध्ये “SION” असं केलं हे आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे..(उदा. ‘गांवकर” ची स्पेलिंग सरळ ‘Gavkar’ अशी न करता ‘Gaonkar’ केली, तसं झालाय हे बहुतेक. कदाचित अनुनासिक उच्चारामुळे असाव..पण मग ‘शिव’मध्ये अनुस्वार कुठेच नसताना असं का झालं असाव? ). माझ्या मते सायनच मुळ नांव ‘शिव’ म्हणजे भगवान शंकरावरून आल असावं व त्याला कारणीभूत हे प्राचीन मंदिर असावं..कारण आपण ‘शीव’ हे मूळ नांव समजतो ते ‘हद्द’ या अर्थाने परंतु ‘हद्द’ असण्यासाठी मुळात कोणाचे तरी राज्य असावे लागते..मुंबईचा राजकीय इतिहास पाहता मुंबईवर व शेजारील साष्टीवर अनेक घराण्यांनी, शाह्यानी, युरोपियनानी वेळोवेळी राज्य केलेलं लक्षात येत..त्या सर्वांची हद्द वेळोवेळी बदलत होती. राज्य कोणाचंही असलं तरी ह्या भागात त्या काळात कोळी समाजाची व ती ही तुरळक वस्ती असावी आणि त्यांची बोली लक्षात घेता ते हद्दीला 'शीव' न म्हणता 'वेस' म्हणत असण्याचीच शक्यता जास्तं वाटते..याचाच अर्थ ब्रिटिशानी केलेली Sion अशी स्पेलिंग ‘शीव’ची म्हणजे हद्दीची नसून ‘शिव’ची म्हणजे शंकराची असावी..मसजिद व सांताक्रुझ ही अशीच आणखी दोन उदाहरणं.।!!
ज्या जोनाथन डंकनने हा रस्ता बांधला तो डंकन हा ‘हिंदू डंकन’म्हणून प्रसिद्ध होता. ह्याची आपल्या हिंदू धर्मशास्त्रावर अमाप श्रद्धा होती..ह्याच डंकनन वाराणसी येथील संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता..देशात होणाऱ्या भ्रुणहत्या थाबवण्यासाठी कायदा करण्यास प्रथम सुरूवात करणारा जोनाथन डंकनच होता..असा हा जोनाथन डॅकन मुंबईतील फोर्ट विभागात असलेल्या 'गव्हर्नर हाऊस'मध्ये १८ आॅगस्ट १८११ रोजी मरण पावला..आपल्या मृत्यू पश्चात आपल्या समाधीवर एखाद्या ‘हिंदू’चा पुतळा कोरण्यात यावा अशी इच्छा डंकनने प्रदर्शित केली होती व त्यानुसार त्याच्या समाधीवर एका ‘हिंदू’ पंडीताची प्रतिमा संगपरवरी म्युरल रुपात कोरली गेलीय आणि ती आपल्याला चर्चगेटच्या सेंट थोमस चर्चमध्ये आजही बघायला मिळते....हिंदू माणसाचं म्युरल एका ख्रिस्ती माणसाच्या समाधीवर धारण करणारं सेंट थॉमस हे जगातील बहुदा एकमेव चर्च असावं आणि असं करणारा डंकनही पहिला व शेवटचा ख्रिश्चन असावा ..! आपणही एकदा या चर्चमध्ये जाऊन हे सर्व प्रत्यक्ष बघून यावं..
सोबत डंकनच्या चर्चमधील समाधीवर असलेलं 'हिन्दू' म्युरलचा मी काढलेला फोटो देत आहे..
संदर्भ –
१. ‘मुंबईचे वर्णन’, ले. गोविन्द माडगावकर -१८६२
२. ‘मुंबईचा वृत्तांत’, ले. शिंगणे – आचार्य १८९३
३. ‘स्थल-काल’, ले. अरुण टिकेकर -२००४
टिप-
1. ब्रिटीशांच मुंबईवर राज्य होत म्हणजे फक्त पश्चिमेस माहीम व पूर्वेस सायन एवढ्याच भूभागावर त्याचं राज्य होत..तेंव्हा मुंबई एवढीच होती आणि आजही महानगर पालिकेच्या रेकॉर्डवर मुंबई एवढीच आहे..पश्चिम रेल्वेवरील वांद्रेपासून पुढे व मध्य रेल्वेवरच्या कुर्ल्यापासुनची पुढची सर्व ठिकाण उपनगर म्हणून अधिकृतरीत्या ओळखली जातात..
2. मुंबई हे सर्वांचं आश्रयस्थान आहे असं सर्वच म्हणतात परंतु मुंबई हे माझे घर आहे असं म्हणताना सहसा कोणी आढळणार नाही..आपल्या घराची जशी आपण आपुलकीने देखभाल करतो, त्याला जपतो, घराचा इतिहास जपला जातो, अभिमानाने मिरवला जातो.. धर्मशाळेबाबत अशी कोणतीच भावना कोणाच्या मनात नसते..आपल्या मुंबईचं नेमकं हेच झालंय.।
3. चिमाजीआप्पा ते रघुनाथराव या काळातला इतिहास प्रदीर्घ मोठ्या सखोल अभ्यासाचा विषय आहे. परंतु तो आपला विषय नसल्याने इथे त्याचा केवळ संदर्भासाठी उल्लेख केलेला आहे..
लेखक- नितीन साळुंखे
 
 
लालबाग; कुतूहल ह्या नावाचं..
© नितीन साळुंखे
(गिरणगांवचं मुख्य ठाणं असणारं लालबाग आणि त्याचं ‘लालबाग’ हे नांव आणि सर्वच सण-समारंभात, विशेषत: गणेशोत्सवात ओसंडून वाहाणारा लालबागकरांचा (पक्षी: गिरणगांवकरांचा) उत्साह हा माझ्या कुतुहलाचा विषय. गणेशोत्सवानिनित्त माझ्या मनात लालबागविषयी असलेल्या माझ्या लहानपणापासूनच्या ह्या दोन कुतूहलांचा शोध घेणारा माझा हा लेख दोन भागात..)
भाग पहिला:
लालबाग. मुंबईतल्या ह्या भागाचं मला लहानपणापासूनच कुतूहल आहे. मुख्य मुंबई शहराच्या हृदयस्थानी असलेला हा भाग हृदयासारखाच धडधडणारा असलेला मी पाहिलेला आहे. त्यात हृदयाचा संबंध रक्ताभिसरणाशी. एकेकाळच्या म्हणजे गिरणी संपाच्या पूर्वीच्या लालबागच्या, मुंबईच्या हृदयस्थानी असलेल्या लालबागच्या सांस्कृतिक आणि सामाजिक अभिसरणाशी असलेला, हृदयाच्या रक्ताभिसरणाशी दाखवणारा थेट संबंध माझं हे कुतूहल आणखी गडद करायचा. लाल रंग हे दृष्टीस पडणारं रक्ताचं मुख्य वैशिष्ट्य, मग ते रक्त कुणाही जाती-धर्माच्या व्यक्तीच असो. हा लाल रंग आपल्या नांवाच्या सुरुवातीच्या अक्षरात धारण करणाऱ्या ह्या विभागाच्या 'लाल'बाग ह्या नांवांपासूनच माझं कुतूहल सुरु होतं.
पुढे थोडासा जाणता झाल्यावर मुंबईच्या एकूणच इतिहासाबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि त्यातून वाचन सुरु झालं. ह्या वाचनात मला भायखळा सांपडलं, परेल सापडलं, माझगांव सापडलं. ह्या त्याकाळच्या मुख्य शहरांचा इतिहास सापडला. परंतु लालबाग काही सापडलं नाही. बर, लालबागला जवळ असलेलं रेल्वेचं स्टेशन म्हणजे चिंचपोकळी. स्टेशन चिंचपोकळी आणि प्रत्यक्षात त्या गावांचं नांव मात्र लालबाग, हे समीकरण मला लहानपणापासूनच पटत नव्हतं. पुढे ह्या नावांचा शोध घेताना, चिंचपोकळी आणि लालबाग ही दोनही नांव, त्या परिसरात कोणे एके काळी असलेल्या दोन बंगल्यांच्या नांवावरून पडलेली आहेत, असं लक्षात आलं.
ब्रिटिश नेव्ही मधले एक अधिकारी बुखानन यांचा 'चिंट्झ पुगली' नांवाचा एक बंगला स्टेशन परिसरातच कुठेतरी होता, त्यावरून 'चिंचपोकळी' हे येथील स्टेशनाचं नांव आलंय, असं डॉक्टर अरुण टिकेकरांनी त्यांच्या 'स्थल-काल' ह्या पुस्तकात लिहून ठेवलेलं मला आढळलं. ह्यातील 'चिंट्झ' ह्या शब्दाचा अर्थ 'रंगीत छापाचं कापड' असा होतो. त्याकाळी प्रचलित असलेलं 'चिटा'चं कापड अनेकांना आठवत असेल, ते चिट हे कापडाचं नांव ह्या चिंट्झचा अपभ्रंश आहे. 'पुगली' ह्या शब्दाचा अर्थ मात्र मला लागत नाहीय.
चिंचपोकळी हे नांव जर तिथे असलेल्या बंगल्यावरून पडलं असेल, तर तो बांगला निश्चितच ह्या परिसरात कापड गिरण्या सुरु झाल्यानंतरच्या काळात तिथे बांधलेला असलेला पाहिजे, असं तर्काने म्हणता येत. ते खरंही असावं. कारण मुंबईतली पहिली कापड गिरणी १८५४ ला सुरु झाली आणि नंतर हां हां म्हणता, ह्या परिसरात मोठ्या संख्येने कापड गिरण्या सुरु झाल्या होत्या. चिंचपोकळी स्टेशन बांधण्यात आलं ते, ह्या परिसरात कापड गिरण्या सुरु होऊन स्थिरावल्यानंतर १८७७ सालात. त्यामुळे डॉक्टर टिकेकरांच्या म्हणण्यात मला तथ्यांश वाटतो. बाकी इथे विपुल संख्येने असलेल्या चिंचेच्या आणि पोफळीच्या झाडांवरून चिंचपोकळी हे नांव पडलंय, असं बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतं, परंतु ते काही मला पटत नाही.
तसंच, 'लालबाग' ह्या नावाचं आहे. ह्याच नावाचा एक महल सदृश बांगला ह्या परिसरात असलेला मी काही ठिकाणी वाचलेलं होत. नुकतंच मी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांचं श्री. बाबा भांड ह्यांनी लिहिलेलं जीवन चरित्र वाचत होतो. त्यात इंग्लंडचा राजा जेंव्हा मुंबई भेटीवर आला होता, तेंव्हा त्याकाळच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सर्व संस्थानिकांचा दरबार मुंबईत भरवला होता असा उल्लेख आहे. देशभरातले सर्व संस्थानिक त्यावेळी मुंबईत आले होते. त्यांच्या त्यांच्या इतमामाप्रमाणे ब्रिटिशांनी त्यांची मुंबईत राहायची व्यवस्था केली होती. बडोदा संस्थान हे देशातलं एक अग्रगण्य संस्थान होतं. बडोद्याच्या वरती अग्रक्रमाने केवळ एकच संस्थान होत आणि ते म्हणजे हैदराबादच्या निजामाचा. साहजिकच देशात दुसऱ्या क्रमांकाचा मान असलेल्या बडोदा संस्थानाच्या अधिपतींची मुंबईतल्या निवासाची सोय, त्यांच्या इतमामाला शोभेल अशा घरात केली गेली होती आणि त्या घराचं नांव होत 'लालबाग', ह्या अर्थाचा उल्लेख सयाजीराव गायकवाडांच्या ह्या चरित्रात आहे. साहजिकच हे घर म्हणजे त्याकाळच्या एखाद्या पारशाचा अथवा यहुद्याचा महाल असावा ह्याच अनुमान बंधन काही अवघड नाही आणि पुढे ह्याच महालाच्या नांवावरून ह्या परिसराला 'लालबाग' हे नांव पडलं असावं, असं म्हणता येतं. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
  भायखळा, परेल, माझगांव हे भाग तेंव्हा तुरळक निवासी वस्तीचे. या भागातील वस्ती मुख्यत: बड्या इंग्लिश अंमलदारांची किंवा मग पारसी-गुजराती व्यापाऱ्यांची. या भागात अजुनही पारशी वस्तीच्या किंवा ब्रिटिशकालीन घरांच्या खुणा दिसून येतात, त्याकाही उगाच नव्हे. तेंव्हा तिथे ही दोन्ही घरं असणं सहज शक्य आहे.
घराच्या, एखाद्या बंगल्याच्या किंवा आधुनिक काळात एखाद्या सोसायटीच्या दारात असलेला बस थांबा त्या घराच्या, त्या बंगल्याच्या किंवा त्या सोसायटीच्या नांवाने ओळखला जातो व हळूहळू तो परिसरचं त्या नांवाने मशहूर होतो, हे आपल्याला माहित आहे. तसाच काहीस त्याकाळात लालबाग किंवा चिंचपोकळीच झालं असावं. आता हे दोन्ही बंगले नक्की कुठे होते हे शोधणं जरा अवघड आहे, परंतु अशक्य नाही. ते यथावकाश शोधूच. तूर्तास चिंचपोकळी आणि लालबाग ही दोन्ही नांवं, त्या परिसरात असलेल्या घरानावरून पडली आहेत, एवढं कुतूहल तरी शमलं.
दुसऱ्या भागाची ओळख :
(संध्याकाळी नक्की वाचा)
लालबागकरांनी एवढा उत्साह आणला कुठून?
माझं आजोळ लालबागचं. त्यामुळे सणासुदीला आणि एरवीही लालबागचं वेगळेपण माझ्या तेंव्हापासूनच लक्षात यायचं. सणासुदीच्या दिवसात तर लालबाग अधिक सुरेख दिसायचं. वाहत असणं हा रक्ताचा गुणधर्म, तसाच वाहत, अक्षरक्ष: रक्तासारखं सळसळणं काय असत, ते तेंव्हाच्या लालबागच्या लोकांकडे पाहून समजायचं. मुंबईतला हा भाग, सणासुदीच्या दिवसांत उर्वरित मुंबईपेक्षा काही वेगळाच भासायचा. इतका उत्साह हे लोक आणतात तरी कुठून, असा प्रश्न माझ्या तेंव्हाच्या बालमनाला पडायचा. आज ही परिस्थिती बदलत चालली आहे. लालबागच्या जमिनीला घट्ट चिकटून असलेल्या चाळी जमीनदोस्त होऊ लागल्या आणि विकासाचे भ्रष्ट प्रतीक असलेले टॉवर त्याजागी उभे राहू लागले. ह्या टॉवरात अस्सल मुंबईकर मराठी माणूस फक्त धनदांडग्यांची धुणी -भांडी करताना दिसतात आणि जे कोणी मराठी तिथे राहणारे आहेत, त्यांचं आणि ह्या मातीचा काही संबंध उरलेला असेल असं वाटत नाही. असं असूनही लालबागचा सणांमधला उत्साह, असे उत्साही लोक आणि लोकांतील उत्साह कमी झालेला असला तरी, तो पार आटलेला नाही असं अनुभवावरून म्हणता येत. ह्याच उत्साहाचं मूर्त स्वरूप म्हणजे लालबागचा गणेशोत्सव..!
लेखक- नितीन साळुंखे
 
 
"२९, एस्प्लनेड हाऊस,
हजारीमल सोमाणी मार्ग, फोर्ट, मुंबई -१..."
© नितीन साळुंखे
('मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा' या नितीनजींच्या आगामी पुस्तकातून साभार.)
वरील पत्त्यावरून आपणापैकी अनेकांनी अनेक वेळा प्रवास केला असेल..विशेषत: नरिमन पाॅईंटला कामाला जाणारे आणि मध्य रेल्वेवर राहाणारे हजारो मुंबईकर या पत्त्यावरून दररोज प्रवास करत असतातच..त्यापैकी क्वचित कोणाचं या राजमहालासारख्या दिसणाऱ्या खानदानी वास्तूकडे लक्षही गेलं असेल परंतू या वास्तूचा मालक कोण याची चा़ैकशी त्यांनी केली असेल का याची मात्र मला शंकाच येते..मालक कोण याबाबतीत कदाचीत कुणाचं कुतूहल चाळवलंही गेलं असेल मात्र आपणं मुंबईकरांच्या ट्रेनच्या टाईम टेबलशी घट्ट जखडलेल्या रोजमर्राच्या आयुष्यात ते शमवणं शक्यही होत नसावं हे ही खरंच..!
असो, हे घर आहे हिन्दूस्थानच्या उद्योग विश्वाचे पितामह व 'टाटा उद्योग समुहा'चे संस्थापक जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांचं..! जमशेटजी टाटांनी १८८५ मध्ये हे तीन मजली राजेशाही घार बांधायला सुरूवात करून १८८७ मध्ये या घरात ते राहायला गेले.. म्हणजे आत्ता घराचं १३०वं वर्ष सुरू आहे..तत्कालीन व्हि.टी. स्टेशन या नंतर एक वर्षाने म्हणजे १८८८ मध्ये पूर्ण झालं..गम्मत म्हणजे व्हि.टी. स्टेशन बांधतांना जे दगड स्टेशनच्या बांधकामास योग्य वाटले नाहीत त्या बाजूला काढलेल्या दगडातून जमशेटजींचे आर्किटेक्ट मि. माॅरीस यांनी टाटांची 'एस्प्लनेड हाऊस' ही वास्तू उभारली..! १९३० सालापर्यंत ही वास्तू टाटांकडे होती व त्यानंतर ती 'आरडी सेठना स्काॅलरशीप फंड' व्यवस्थपनाकडे ट्रान्सफर करण्यात आली..
हायकोर्ट-फ्लोरा फाऊंटनवरून आपण सिएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो की हमरस्त्याला दोन फाटे फुटतात..एक फाटा किंचित उजवीकडे वळून समोर थेट सिएसटी स्टेशनच्या दिशेने जातो तो 'डॅा. डि.एन. रोड'..तर दुसरा फाटा अगदी आपल्या नाकासमोर जातो तो 'एम.जी. (महात्मा गांधी) रोड'..या एम.जी.रोडवरून सरळ चालत गेलं की पहिल्याच क्राॅसिंगला उजव्या हाताला 'अलेक्झांड्रा हायस्कूल' लागतं..इथूनच एम.जी रोडला किंचीत उजवी टांग मारून समोर जाणारा एक रस्ता दिसतो हा 'हजारीमल सोमाणी मार्ग..'. हा रस्ता पुढे 'बाॅम्बे जिमखान्या'वरून सिएसटी स्टेशनच्या दिशेने जातो..या हजारीमल सोमाणी मार्गावर उजव्या हाताच्या अलेक्झांड्रा हायस्कूलला अगदी लागून आपलं '२९, एस्प्लनेड हाऊस' आपली भारदस्त छाप पाहणाऱ्याच्या मनावर सोडत उभं असलेलं आपल्याला अगदी सहज दिसेल..
या वास्तूचं वैशिष्ट्यवर्णन मी इथं करणार नाही..त्याची अनेकानेक वर्णनं इंटरनेटवर उपलब्ध आहेत ती आपण जरूर वाचावीत..परंतू आपल्यापैकी जर कोणी काम-धंद्यानिमित्ताने या रस्त्यावरून नेहमी किंवा काही वेळ जात-येत असाल, तर इथं किंचित काळ थांबून या पवित्र वास्तूचे दर्शन घेतल्याशिवाय पुढं जाऊ नका अशी विनंती मात्र आग्रहाने करेन..
खरंतर टाटांचं हे 'एस्प्लनेड हाऊस' बघाव ते सायंकाळी दिवेलागणीच्या सुमारास..मला तरी दिव्यांच्या सोनेरी मंद प्रकाशात उजळलेलं 'एस्प्लनेड हाऊस'चं संप्रकाशात घेतलेलं दर्शन नेहमी एखाद्या पुरातन, पावन, मंदीरासारखं वाटत आलं आहे..

 
 
 
 
 
 
 
 
 
जाता जाता-
याच हजारीमल सोमाणी मार्गावरून सिएसटी स्टेशनच्या दिशेने जाताना पुढे 'डाॅईश बॅंके'ची युरोपियन शैलीत बांधलेली आणि पांढऱ्या शुभ्र रंगात नटलेली एक इमारत दिसेल..ही इमारत जमशेटजी टांटांचे द्वितीय पुत्र सर रतन टाटा यांचे निवासस्थान..या वास्तूचंही दर्शन अवश्य घ्यावं..या वास्तूची भव्यता अनुभवायची असेल तर ही वास्तू थोडं दूर जाऊन आझाद मैदानातून बघावी..
आणखी एक, टांटांच्या 'एस्प्लनेड हाऊस' समोरील रस्त्यानेच मुंबईतली दुसरी व 'एका भारतीया'च्या मालकीची देशातील पहिली मोटर कार धावली..साल होतं १९०१ आणि त्या गाडीचे मालक होते, अर्थातच जमशेटजी टाटा..!!
मोटरकार संदर्भ - पुस्तक 'स्थल-काल', लेखक श्री. अरूण टिकेकर, सन २००४.
लेखक- नितीन साळुंखे
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...