
सदरील ताम्रपटाचे दोन पत्रे असून त्यांची लांबी २३ सेंमी. व रुंदी १४.४ सेंमी. आहे. दोन्ही पत्रे कडीमध्ये घातलेले असून त्या कडीवर मुद्रा आहे. मुद्रेचा आकार लंबवर्तुळाकार असून त्याची लांबी ७.२ सेंमी. व रुंदी ५.६ सेंमी. आहे. मुद्रेवर वरच्या भागात सूर्य व चंद्र आहेत. त्यानंतर चार ओळींच्या खाली एक फूल कोरलेले आहे. दोन्ही पत्र्यांच्या केवळ आतील भागावरच मजकूर लिहिला असून पहिल्या पत्र्यावर दहा व दुसऱ्यावर बारा ओळी आहेत. पहिल्या पत्र्यावरील अक्षरे ही दुसऱ्या पत्र्यावरील अक्षरांपेक्षा काहीशी मोठी आहेत. तसेच प्रत्येक अक्षराचा आकार ०.६२ सेंमी. आहे. दुसऱ्या पत्र्यावरील अक्षरांचा आकार ०.४७ सेंमी. आहे. ताम्रपटाचे वजन १.११६ किग्रॅ. आहे.
ताम्रपटातील लिपी कीलकशीर्षक असून काही अक्षरे वाकाटकांच्या इतर अभिलेखांमध्ये दिल्याप्रमाणे पेटिकाशीर्षक लिपीत आहेत. उदाहरणार्थ ‘ब’ आणि ‘स’. मिराशींच्या मतानुसार हे दानपत्र सर्वप्रथम पेटिकाशीर्षकानुसार लिहावयाचे असावे, परंतु नंतर ते कीलकशीर्षक लिपीत लिहिले गेले. या वरून असे दिसते की, याचा कोरक्या उत्तर भारतातील रहिवासी असावा, जो कीलकशीर्षकात लिहिण्यात निपुण होता. ‘ग’ आणि ‘स’ या अक्षरांना डावीकडे किंचित बाक दिसत आहे. ‘ण’ या अक्षराच्या डोक्यावरील आडव्या दंडासही बाक दिसतो. ‘अ’, ‘क’ आणि ‘र’ या अक्षरांतील उभे दंड लांब असून ते डावीकडे वळले आहेत. लेखामध्ये जिव्हामूलीय १२ व्या आणि १५ व्या ओळीत आले असून सहाव्या ओळीमध्ये उपध्मानीयाची खूण आहे. लेखामध्ये ‘र्’ नंतर आलेल्या व्यंजनाचे द्वित्व झालेले आहे.
ताम्रपटाची भाषा संस्कृत असून पहिल्या २० ओळी आणि २२ वी ओळ गद्यरूपात, तर २१ वी ओळ पद्यरूपात आहे. मुद्रेवरील मजकूरही पद्यात लिहिलेला आहे.
युवराज दिवाकरसेन राज्य करीत असताना त्याच्या राज्यकालाच्या १३ व्या वर्षी कार्तिक शुक्ल द्वादशीस हे दानपत्र दिले, असा ताम्रपटात उल्लेख आहे. गुप्त राजांची वंशावळ, प्रभावतीगुप्ताचा वाकाटक युवराज द्वितीय रुद्रसेन याच्याशी विवाह, त्याच्या मृत्युनंतर राणीने केलेला राज्यकारभार या सर्व तत्कालीन ऐतिहासिक घटनांवरून या ताम्रपटाचा काळ सर्वसाधारणपणे इ. स. ४१५ ते ४२० हा येईल, असे अनुमान पुराभिलेखतज्ज्ञा शोभना गोखले यांनी काढले आहे.
मुद्रेवर चंद्र-सूर्य असून त्याखाली वाकाटकांचे भूषण असलेल्या वारसाहक्काने राज्यपद मिळालेल्या मातेचे आणि युवराजाचे हे शासन शत्रूंचे पारिपत्य करो, अशा आशयाचा मजकूर आहे.
ताम्रपटाच्या पहिल्या पत्र्यावर प्रभावतीगुप्ताने आपल्या माहेर व सासरकडील मंडळी व त्यांच्या वैशिष्ट्यांची महती कोरवून घेतली आहे. दुसऱ्या पत्र्यावर आचार्य चनालस्वामी यांना प्रभावतीगुप्तेने दिलेले ग्रामदान व तत्संबंधित गोष्टींचे वर्णन केले आहे. लेखाचा कोरक्या चक्रदास आहे.
ताम्रपटात उल्लेखिलेल्या स्थलनामांपैकी ‘नंदिवर्धन’ हे गाव रामटेकजवळील नगरधन असावे, असे पुरातत्त्वज्ञ रावबहादूर हिरालाल यांनी सांगितले. त्यानंतर मिराशी यांनी ताम्रपटातील उर्वरित गावे वर्धा जिल्ह्यात शोधली. ‘सुप्रतिष्ठ आहार’ म्हणजे सामान्यतः सध्याचा हिंगणघाट तालुका, तर ‘दंगुण’ म्हणजेच सध्याचे हिंगणघाट असावे. ‘विलवणक’ ग्रामाचा संदर्भ हिंगणघाटाच्या पश्चिमेस ४ किमी अंतरावरील ‘वणी’ या स्थानाशी लावला जातो. कदापिंजन हे आग्नेय दिशेस सुमारे ४.८ किमी. अंतरावरील कधाजन असावे, असे मिराशींचे मत आहे. या ताम्रपटात शीर्षग्राम व सिदिविवरक या स्थलनामांचाही उल्लेख आलेला आहे.
प्रभावतीगुप्ता ही गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त आणि महाराणी कुबेरनागा यांची कन्या. या ताम्रपटात राणीने आपल्या माहेरच्या घराण्याची वंशावळ दिली आहे. शके ३८० मधील देवसेनाचा हिस्सेबोराळा प्रस्तरलेख वाकाटकांचा कालक्रम ठरविणारा महत्त्वाचा दुवा आहे, परंतु हा प्रस्तरलेख उजेडात येण्यापूर्वी पुणे ताम्रपट हा त्यातील गुप्त सम्राटांच्या उल्लेखांमुळे वाकाटक राजांचा कालक्रम ठरविणारा एकमेव ऐतिहासिक आधार होता.
या ताम्रपटामुळे हे स्पष्ट होते की, गुप्त सम्राट तसेच प्रभावतीगुप्ता विष्णूची उपासना करीत असत. राणीने स्वतःस ‘भगवदभक्ता’ म्हटले असून कार्तिक शुद्ध द्वादशीस दान केले आहे. वैष्णव-पंथामध्ये एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी अतिशय पुण्यकारक मानल्या आहेत. प्रभावतीगुप्ता रुद्रसेनाची अग्रमहिषी होती आणि युवराज दिवाकरसेनची माता होती, असे म्हटले आहे. रुद्रसेनाच्या मृत्यूनंतर तिने सु. १५ वर्षे राज्यकारभार पाहिला. तिने स्वतंत्रपणे ताम्रपट दान दिले. या सर्व गोष्टींवरून तिचे राजकारणातील श्रेष्ठत्व सिद्ध होते.
संदर्भ :
- Pathak, K. B. & Dikshit, K. N. ‘Poona Plates of the Vakataka Queen Prabhavati- Gupta: The 13th Yearʼ, Epigraphia Indica, 15 (1919-20), 39-44, New Delhi, 1982.
- Mirashi, Vasudev Vishnu, Corpus inscriptionum Indicarum, Vol. 5, Inscriptions of the Vakatakas, Ootacmund, 1963.
- गोखले, शोभना, पुराभिलेखविद्या, पुणे, २००७.
पवनार (Pawnar)
राष्ट्रीय महत्त्व असलेले भारतातील एक संरक्षित पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात, वर्धा-नागपूर मार्गावर, वर्धा या शहरापासून सु. नऊ किमी. अंतरावर, धाम नदीकाठी पवनार वसले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी पवनार ही वाकाटक या राजघराण्याच्या मुख्य शाखेची राजधानी प्रवरपूर असावी, असे मत सर्वप्रथम व्यक्त केले. त्यानंतर प्राच्यविद्या संशोधक ⇨ वासुदेव विष्णु मिराशी व रावबहादूर हिरालाल यांनीही या मतास दुजोरा दिला व वाकाटकनृपती प्रवरसेन-दुसरा याची दुसरी राजधानी प्रवरपूर म्हणजेच सध्याचे पवनार असल्याचे प्रतिपादले. मात्र हरिहर ठोसर यांच्या मते, पवनार हे स्थलनाम पद्मनगरपासून उद्भवते; आणि म्हणून पवनारचे प्रवरपूर या प्राचीन नगरनामाशी साधर्म्य दर्शविता येत नाही. असे असले, तरी ठोसर यांनी राष्ट्रकूटनृपती नन्नराज युद्धासुर याच्या संगलूद दानपत्रात आढळणारे पद्मपूर सध्याचे पवनार असावे, असे अनुमान केले आहे.
१९३८ साली येथे आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम या आश्रमासाठीचे खोदकाम करीत असताना बरेच पूर्णाकृती शिल्पपट सापडले. यांत रामायण-कथानक कोरलेले शिल्पपट तसेच गंगाभगवती आदी शिल्पांचा समावेश आहे. ही सर्व शिल्पसंपदा आश्रमात प्रदर्शित केली आहे. या शिल्पांची शैली तसेच इतर अवशेषांवरून येथे वाकाटककाळातील ‘राम संप्रदाय’ तसेच कमीतकमी एक मोठे विष्णूचे देऊळ असावे असे एक मत आहे, तर काही विद्वानांच्या मते, ही शिल्पसंपदा विष्णुकुंडीन काळातील अथवा राष्ट्रकूटकाळातील शिल्पांचा प्रभाव असलेली आहे.

वरील पार्श्वभूमीवर १९६७ साली धाम नदीच्या उजव्या तीरावरील पांढरीच्या टेकाडावर नागपूर विद्यापीठाने पुरातत्त्वज्ञ शांताराम भालचंद्र देव आणि मधुकर केशव ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले. येथे एकूण चार कालखंडांचे सांस्कृतिक अवशेष उजेडात आले. पहिल्या कालखंडातील वस्ती इ.स.पू. पहिल्या सहस्रकाइतकी प्राचीन असून ही वस्ती कुडाच्या घरांच्या स्वरूपांत उपलब्ध झाली. काळी-आणि-तांबडी या वर्गातील मृद्भांडी ही या वस्तीची वैशिष्ट्ये. हे लोक लोखंडाची उत्कृष्ट शस्त्रे बनवीत. त्यांची कलात्मकता ते वापरीत असलेल्या रंगीत मृद्भांड्यांत दिसून येते. मासेमारी, शेती व शिकार यांवर ते गुजराण करीत. विदर्भातील हे पहिले लोहयुगीन रहिवासी होते.
दुसरी वस्ती इ.स.पू. दुसऱ्या/तिसऱ्या शतकांत झाली. पहिल्या कालखंडातील काळी-आणि-तांबडी या वर्गातील मडक्यांपेक्षा या कालखंडातील मडकी जाड असून प्रामुख्याने थाळ्या व वाडग्यांच्या स्वरूपात वापरात कायम राहिली; मात्र रंगविलेली मडकी वापरात आढळत नाहीत. घरांच्या बांधणीत आमूलाग्र सुधारणा होऊन पवनारवासी पक्क्या घरांत राहू लागले. आर्थिक व्यवहारात नाण्यांचा वापर सुरू झाला. सातवाहन राजांची नाणी प्रचारात आली आणि पवनारला काहीसे नागरी स्वरूप आले. सांडपाण्याची शोषणकुंडे, अर्चनाकुंडे आदी अवशेष त्याची साक्ष आहेत. सातवाहनांच्या उत्तर काळात, इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांत, येथे व्यापारी भरभराट झाली. याची परिणती उत्कृष्ट बनावटीची तांबडी चकचकीत मृद्भांडी, रोमन काचेच्या वस्तू, रोमन मद्य व मद्यकुंभ पवनार येथे आयात करण्यामध्ये झालेली दिसून येते.
तिसरी वसाहत गुप्त-वाकाटक काळातील (इ.स. तिसरे ते पाचवे शतक). पवनार येथील सातवाहन काळातील आर्थिक सुबत्ता इसवी सनाच्या पाचव्या/सहाव्या शतकापर्यंत टिकली. दानधर्म वाढला आणि तत्कालीन प्रवरसेन-दुसरा यांसारख्या राजांनी अनेक ताम्रपटांद्वारे ब्राह्मणांना देणग्या दिल्या.
चौथा कालखंड मध्ययुगीन. वाकाटक कालखंडानंतर पवनारचे वैभव लुप्त झाले, अवनती सुरू झाली. मध्ययुगात काचेच्या बांगड्यांसारखे लघुउद्योग सुरू झाले.
संदर्भ :
- Bakker, Hans, The Vakatakas: An Essay in Hindu Iconography, Groningen, 1997.
- Deo, S. B. & Dhavalikar, M. K. Paunar Excavation, Nagpur, 1968.
- Spink, Walter, Ed., Williams, J.W. Ajanta’s Chronology: Politics and Patronage, in Kaladarshan , Leiden, 1981.
- जामखेडकर, अरविंद, पुरासंचय- भाग १, पुणे, २०१६.
- देव, शांताराम भालचंद्र, ‘गंगा भगवतीचे पवनार’, दै. केसरी, १९८४.
कौंडिण्यपूर (Kaundinyapur)
भारतातील एक पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात अमरावतीपासून ईशान्येस सुमारे ४८ किमी. अंतरावर, वर्धा नदीकाठी कौंडिण्यपूर वसले आहे. या स्थळाचे कुण्डिनपूर, कुंडिनी इ. नावांनी प्राचीन साहित्यात उल्लेख मिळतात; तसेच हे स्थळ प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचे ज्ञात होते. पुराणांतील अनेक कथांत कौंडिण्यपूर गुरफटलेले आहे. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडिण्यपूरशी असल्याचे अनेक कथा सांगतात. हे स्थळ भीष्मक राजाची राजधानी असून त्याची कन्या रुक्मिणी हिचे श्रीकृष्णाने गावाबाहेरील अंबिकेच्या मंदिरातून हरण केले, अशी कथा प्रसिद्ध आहे.
कौंडिण्यपूरचे पुरातत्त्वीय महत्त्व तत्कालीन न्यायाधीश ए. आर. देशपांडे यांनी सर्वप्रथम उजेडात आणले (१९२८). त्यानंतर येथील अवशेषांचा अभ्यास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी १९३६ साली, तर डेक्कन कॉलेज, पुणे येथील संशोधकांनी १९५९ साली केला. येथे पांढरीचे प्राचीन वस्त्यांचे अवशेष असलेली अनेक टेकाडे आहेत. या वस्त्यांचे स्वरूप आणि कौंडिण्यपूरचा भारतीय सांस्कृतिक परंपरेतील नामवंत व्यक्तींशी असलेला संबंध जास्त स्पष्ट करण्याच्या हेतूने उत्खनन करण्यात आले (१९६२-६४), मात्र वाङ्मयात उल्लेखिलेल्या नामवंत व्यक्तींच्या काळांतील पुरावा उत्खननात उपलब्ध झाला नाही.
महाराष्ट्र शासनाने मोरेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली येथे मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले (१९६२-६४). यात येथील प्राचीन लोहयुगापासून मध्ययुगापर्यंचा सांस्कृतिक कालानुक्रम निदर्शनास आला. पुढे डेक्कन कॉलेज, पुणे येथील शास्त्रज्ञांनी पायरी खड्ड्यांची पद्धती अवलंबून उत्खनन केले (२००१).
पहिल्या उत्खननात एकूण सहा कालखंडांतील वस्त्यांचा पुरावा उपलब्ध झाला. पहिला कालखंड प्राचीन लोहयुगीन महापाषाण संस्कृतीशी निगडित असून नागपूरजवळील टाकळघाट व खापा येथील संस्कृतीशी समकालीन आहे. या कालखंडाची प्राचीनता इ.स.पू. २००० इतकी ठरविली गेली होती; अर्थात हा काल इ.स.पू. आठवे -सातवे शतक इतकाच प्राचीन होऊ शकतो, असे आता निश्चित झाले आहे. या काळातील लोक उत्कृष्ट बनावटीची काळी आणि तांबडी या वर्गांची मृद्भांडी वापरीत, लोखंडाची विविध शस्त्रे व दररोजच्या वापराच्या वस्तूही बनवीत. उत्कृष्ट नक्षीकाम केलेले दगडाचे मणी तयार करीत. त्याचप्रमाणे मुशीच्या साहाय्याने तांबे शुद्ध करीत असत. दुसरी वस्ती इ.स.पू.सु. ८०० ते ६०० या काळात झाली. या कालखंडात काळी आणि तांबडी या वर्गांची मृद्भांडी चालूच राहिली, परंतु त्यात काही नवे आकार वापरात आले. तिसऱ्या कालखंडात, इ.स.पू. ३०० ते १००, कौंडिण्यपूरची भरभराट झाली होती, असे दिसते. आहतनाणी, उत्कृष्ट चमकदार काळी मृद्भांडी, दगडांचे विविध रंगांचे मणी आणि कर्णकुंडले (ताटंक चक्र) इ.वस्तू तत्कालीन वैभवाची साक्ष देतात. ही सुबत्ता यानंतरच्या, इ.स.पू.१५० ते इ.स. सु. २००, सातवाहन कालखंडातही टिकली. विटांनी बांधलेली सांडपाण्याची शोषणकुंडे, पाटे, काचेचे आणि दगडांचे विविधरंगी मणी, काचेची कर्णकुंडले, दृष्टमणी, काजळ शलाका, कंगवे, हाडांच्या सुया, लोखंडी बाणाग्रे, भाले, कट्यारी इ. या काळात प्रचलित होती. विविध प्रकारचे मणी बनविण्याचे कौंडिण्यपूर हे या काळात केंद्र होते, असे दिसते. सातवाहनांच्या काळानंतर मात्र कौंडिण्यपूरला उतरती कळा लागली. वाकाटककालीन थरांत काही अर्चनाकुंडे सापडतात,तर मध्ययुगीन काळात घरांच्या घडीव दगडांच्या भिंतींचे अवशेष आढळतात. याशिवाय मुहम्मदशाह बहमनी पहिला, औरंगजेब यांची मध्ययुगातील नाणी पांढरीच्या टेकडांवर सापडली.
२००१ साली येथे केलेल्या उत्खननात वनस्पतींच्या केसरादी अवशेषांव्यतिरिक्त अनेक थरांमध्ये गहू, वाटाणा, हरभरे, विशेषत: फोलपटांसह तांदूळ इ.जळालेल्या धान्यांचे अवशेष सापडले. तांदळाचे प्रमाण सातवाहन कालखंडात अधिक आढळून आले. अशाच प्रकारे तांदळाचे अवशेष जवळपासच्या सुमारे दहा पुरातत्त्वीय स्थळांच्या सर्वेक्षणातही मिळाल्याने प्राचीन काळी येथे मुबलक पाणीपुरवठा व अनुकूल हवामान असावे, असा निष्कर्ष काढता आला. मात्र इ.स.सहाव्या शतकानंतर हवामानात प्रतिकूल बदल होत गेला व पर्जन्यमान कमी झाले असावे.
संदर्भ:
- Deotare, B. C., Joshi, P. S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra, Bharatiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
- Dikshit, M. G. Excavations at Kaundinyapur, Bombay, 1968.
- Shete, Gurudas ; Mishra, Sheila & Deotare, B. C. Geoarchaeology of Upper Wardha Valley, Bulletin of The Deccan College Post-Graduate and Research Institute, 2006-2007.
- Smith, Monica, How Ancient Agriculturists Managed Yield Fluctuations Through Crop Selection and Reliance on Wild Plants: An Example From Central India, Economic Botany, 2006.
- देव, शांताराम भालचंद्र, ‘रुक्मिणीचे कौंडिण्यपूर’, दै.केसरी, १९८४.
खोलापूर (Kholapur)
खोलापूर हे अमरावती जिल्ह्यात अमरावतीच्या पश्चिमेस सु. २९ किमी.वर पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. यादव राजवंशाचा सेनापती खोलेश्वर याने खोलापूर हे गाव वसविल्याचा उल्लेख अंबेजोगाई येथील इ. स. १२२८-१२२९ च्या शिलालेखात आहे. आजचे गाव आणि त्यासभोवतालच्या परिसरात, मुख्यत्वाने नदी आणि गाव यांमधील भागात, प्राचीन वस्तीमुळे तयार झालेली पांढरी पाहावयास मिळते. १९७९-८० मध्ये नागपूर विद्यापीठाचे अजय मित्र शास्त्री आणि चंद्रशेखर गुप्त यांनी केलेल्या समन्वेषणात येथील पांढरीचा विस्तार आजच्या गावापासून नदीकाठावरील खोलेश्वराच्या मंदिरापर्यंत आढळून आला; परंतु सद्यस्थितीत यातील बरीचशी पांढरी नाहीशी झाली आहे. १९२८-२९ साली खोलापूर येथून प्राप्त रोमन बनावटीच्या मृण्मयी पदकांच्या प्रसिद्धीनंतर या स्थळाचे प्राचीनत्व सर्वप्रथम माहीत झाले. कदाचित याच आधारे कौंडिण्यपूरच्या उत्खनन अहवालातील विदर्भाच्या नकाशात खोलापूर हे सातवाहनकालीन स्थळ म्हणून दाखविण्यात आले असावे. एकोणीसशे साठच्या दशकात केलेल्या येथील उत्खननात एक तलाव आणि दोन भक्कम बांध्याच्या विहिरी (बाव) आढळल्या होत्या. पुढे नव्वदच्या दशकात व्ही. कांबळे आणि एस. नाईक यांना या ठिकाणावरून उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे मिळाली. हे सर्व पुरावे येथील प्राचीन वस्तीचा विस्तार आणि काळ यांचे निदर्शक आहेत.
२००७-०८ आणि २००८-०९ या काळात डेक्कन कॉलेज, पुणे येथील भास्कर देवतारे यांनी या प्राचीन स्थळाचे उत्खनन केले. या उत्खननाचे तीन मुख्य हेतू होते: पहिला, येथील पांढरीचा कालानुक्रम समजून घेणे; दुसरा, पूर्णा आणि त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भाचा प्राचीन इतिहास जाणून घेणे आणि तिसरा, येथील प्राचीन पीकपद्धतीचा अभ्यास करणे. उत्खनन आरंभ करण्यापूर्वी संपूर्ण खोलापूर सहा विभागांमध्ये विभागण्यात आले. यातील एकूण पाच ठिकाणी उत्खनन करण्यात आले. गावालगत नैर्ऋत्येला खोलापूर ते दर्यापूर मार्गावर उजव्या बाजूला जी पांढरी आहे, तिला स्थान (लोकॅलिटी) २ असे संबोधण्यात आले. येथे मिळालेल्या अवशेषांच्या आधारे इ. स. पू. चौथ्या शतकात खोलापूरला प्रथम वस्ती झाली, हे सिद्ध झाले. या स्थानाच्या वरील ५० सें.मी. स्तरातून नक्षीकाम असलेले मातीचे मणी, कर्णालंकार, त्रिरत्न पदक आणि आहत नाणे; तर साधारणत: १·०५ ते १·२ मी. खाली उत्तरेकडील काळ्या रंगाची झिलाईदार खापरे आणि त्यासोबत आहत नाणे मिळाले. २·६ ते २·८ मी. दरम्यान अर्ध-मौल्यवान दगडापासून तयार केलेले चकतीच्या आकाराचे कर्णभूषण आणि उत्कीर्णीत मुद्रा (head scratcher) मिळाली. या मुद्रेचा उपयोग काय असावा, याबाबत निश्चितपणे सांगणे शक्य नसले, तरी दोन मतप्रवाह आहेत. मोरेश्वर दीक्षित यांनी ‘डोक्यातील कोंडा काढण्यासाठी या वस्तूचा उपयोग होत असावाʼ, असे मत आपल्या त्रिपुरी उत्खनन अहवालात मांडले आहे (१९५५), तर ही मुद्रा ‘पूजा-विधीʼ वस्तू असावी, असे मत रेश्मा सावंत यांनी मांडले. येथील प्राप्त मडक्यांचे काठ व त्यांचे आकार यांच्या स्तरनिहाय अभ्यासातून १·३५ मी. आणि २·४ मी. दरम्यान त्यांच्यात लक्षणीय बदल झाल्याचे निदर्शनास आले. या सर्व पुराव्यांच्या आधारे स्थान क्र. २ येथे इ. स. पू. तिसऱ्या आणि चौथ्या शतकांत वस्ती होती असे सिद्ध झाले. २·४ मी.पेक्षा खालील पांढरीत नासपती (पेअर) या फळाच्या आकारातील मडक्यांचे काठ बहुसंख्य प्रमाणात मिळाले. अशा प्रकारची काठ असलेली मडकी उत्तर भारतात इ. स. पू. सहाव्या ते तिसऱ्या शतकांत प्रचलित होती. त्यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच उत्तर भारताचा विदर्भाशी असलेला संबंध अधोरेखित होतो आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या भौतिक संस्कृतीवरील प्रभाव लक्षात येतो. १·८ मी.पासून वरती विटा आणि कवेलू हे तुकड्यांच्या स्वरूपात आढळले. यावरून इ. स. पू. चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचा वापर येथे सुरू झाल्याचे सिद्ध होते. गावाच्या पूर्वेला असलेल्या पांढरीवर स्थान क्र. ५ येथेही वरील काळातील पुरावशेष प्राप्त झाले.
खोलापूर-दर्यापूर मार्गाच्या डाव्या बाजूला स्थान क्र. १ आहे. येथील पुरातत्त्वीय उत्खननातून खोलापूरपासून साधारणत: ८० किमी. पश्चिमेला असलेल्या प्राचीन भोनशी साम्य दाखविणाऱ्या वस्तू मिळाल्या. ज्यामध्ये माती, अर्धमौल्यवान दगड आणि शंख यांच्यापासून तयार केलेले मणी आणि अंगठ्या, मातीपासून तयार केलेली पदके, कर्णभूषणे, लहान आकारातील प्राणी आणि अर्चनाकुंडे, शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, हाडांपासून तयार केलेली अणकुचीदार हत्यारे आणि इतर पुरातन वस्तू, तसेच ताम्र आणि लोखंडाची उपकरणे यांचा समावेश होतो. तसेच जोड साच्यांचा (double mould) वापर करून तयार केलेले मातीचे विविध आकारांतील मणी, त्रिरत्न (साधी आणि नक्षीकाम असलेली), मनुष्य आणि युग्मपदकेही मिळाली. भोन आणि खोलापूर येथील खापरांमध्ये साधर्म्य आढळून आले. या पुराव्यांच्या आधारे इ. स. पू. पहिल्या आणि दुसऱ्या शतकांत या भागात वस्ती झाल्याचे सिद्ध होते. येथे मिळालेली नाणी पूर्णत: गंजलेली असल्याने ती अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकली नाहीत. या कालखंडातील पांढरी नदीपासून बरीच जवळ आहे. पांढरीच्या नदीकडील बाजूस आणि दक्षिणेला उंच मातीचे संरक्षक कडे पाहावयास मिळतात. नदीबाजूचा कडा तुटक स्वरूपात नदीकाठाने लांबपर्यंत पसरलेला आहे; तर पूर्वेकडील जमिनीची उंची वाढत गेल्याने दक्षिणेकडील कडा काही अंतरापर्यंत जाऊन सभोवतालच्या जमिनीशी एकरूप झालेला आढळून येतो. दोन्ही कडे ज्याठिकाणी ९० अंशामध्ये मिळतात तेथे उंच मातीचे टेकाड आहे, ज्याला मालाची टेकडी म्हणून गावकरी संबोधतात. या टेकाडावरील उत्खननात वरील काळाशी संलग्न खापरे आणि विटा मिळाल्या. तसेच संपूर्ण टेकाड आणि बाजूचे कडे हे माती टाकून तयार केल्याचे दिसून आले. यावरून स्थान क्र. १ मधील वस्तीचे नदीपासून येणाऱ्या मोठ्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी हे मातीचे कडे बांधल्याचे, तर मालाची टेकडी म्हणजे दूरपर्यंत नजर ठेवण्यासाठी बांधलेले बुरूज असल्याचे सिद्ध झाले.
गावाच्या दक्षिणेला मुख्य रस्त्यापलीकडे जी पांढरी आहे, तिला स्थान क्र. ६ असे संबोधण्यात आले. येथेही स्थान क्र. १ प्रमाणे मोठ्या प्रमाणात अर्धमौल्यवान दगड, मृण्मणी व पदके आणि इतर प्रकारच्या पुरातन वस्तू मिळाल्या. हस्तिदंतापासून तयार केलेल्या कंगव्याचा यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल. परंतु १ व ६ या दोन्ही स्थानांवरील नक्षीयुक्त मृण्मणी आणि पदके यांच्यात फरक आढळून येतो. सातवाहन कालखंडाशी निगडित इतर ठिकाणांहून मिळालेल्या अलंकारांशी साम्य दाखवणारे येथील मातीचे अलंकार आहेत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेली मनुष्य आणि युग्मपदके येथे नाहीत. जोडसाच्यांमध्ये तयार केलेले आणि आतून पोकळ असलेले मातीच्या प्रतिमांचे अवशेष हे येथील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. या पद्धतीने तयार करण्याचे तंत्रज्ञान इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत प्रचलित असल्याचे सर्वमान्य आहे. याआधारे वरील ठिकाणी इ. स. च्या सुरुवातीपासून ते साधारणत: तिसऱ्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत वस्ती असल्याचे सिद्ध होते.
स्थान क्र. ३ गावाच्या सीमेलगत पश्चिमेला असून येथे विटांच्या आणि मातीच्या कड्या वापरून बांधलेल्या विहिरी आहेत. नदीकाठी दोन ठिकाणी प्राचीन विटा आणि कवेलू तयार करण्याच्या अवशेषयुक्त जागा सापडल्या आहेत. प्राचीन धान्यांच्या अवशेषांमध्ये तांदूळ, गहू, उडीद, तूर इ. धान्यांचा समावेश होतो.
यावरून खोलापूरच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कालखंडांत वस्ती झाल्याचे निदर्शनास येते. प्रारंभापासून खोलापूर हे या प्रदेशातील एक महत्त्वाचे राजकीय आणि व्यापारी केंद्र असावे. या प्राचीन स्थळावरून मध्ययुगीन नाणी आणि खापरे उपलब्ध झाली आहेत.
संदर्भ :
- Archaeological Survey of India, ‘IAR-Indian Archaeology : A Review,ʼ New Delhi, 1979-80.
- Deotare, B. C.; Shete, G.; Sawant, R. & Naik, S. ‘Preliminary Report on Excavation at Kholapur, District Amravati, Maharashtra,ʼ Man and Environment, 2012.
- Jain, B. ‘An Inventory of the Hoards and finds of coins and seals from Madhya Pradesh,ʼ The Journal of The Numismatic Society of India, vol.19, 1957.
- Kamble, V. & Naik, S. ‘Pottery Assemblage from Three New Historical/Protohistoric Sites in Purna Valley,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 1995.
- Sawant, Reshma ‘Head Scratchers : Fallacy and Reality,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 2006-2007.
- Shete, G. ‘Kholapur Pottery : An Attempt to Develop a Typological Basis for the Chronological Reconstruction of the Vidarbha Iron Age and Early Historic period,ʼ Bulletin of the Deccan College, Pune, 2014.
मांढळ (Mandhal)
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात, नागपूरच्या आग्नेयेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. १९७३ मध्ये येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या इमारतीचा पाया खोदताना मृत्तिकापात्रे व अन्य काही प्राचीन वस्तू सापडल्या. या कारणास्तव नागपूर विद्यापीठाच्या (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) पुरातत्त्व विभागाने शां. भा. देव यांच्या मार्गदर्शनाखाली याच ठिकाणी, राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात (मांढळ-१), चाचणी खड्ड्याद्वारे येथील सांस्कृतिक क्रम शोधण्याचा प्रयत्न केला व त्यात सातवाहन काळातील अवशेष आढळले (१९७३). मात्र स्तरक्रमात हस्तक्षेप झालेला असल्याने या उत्खननाला मर्यादा होत्या. जुलै १९७४ मध्ये वनखात्यातर्फे येथे वृक्षारोपणासाठी खड्डे खणत असताना वालुकाश्माच्या लकुलिश, सदाशिव व अष्टमुखशिव अशा तीन मूर्ती सापडल्याने हे स्थळ प्रकाशझोतात आले. पुढे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने अजय मित्र शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली १९७५-७६ व १९७६-७७ अशा दोन सत्रांमध्ये भोलाहुडकी (बीएचके-१), बोंगीहुडकी (बीएचके-२) व वऱ्हाडी तलाव (मांढळ-२) येथे विस्तृत उत्खनन केले. त्यानंतर १९८५ व १९९२ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे अरविंद जामखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मांढळ-२’ (वऱ्हाडी तलाव) या जागेत पुन्हा उत्खनन करण्यात आले.

राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात (मांढळ-१) झालेल्या उत्खननात सांस्कृतिक क्रम सातवाहन काळ व त्यानंतरचा आहे. सातवाहनकालीन अवशेषांमध्ये खापरी शोषणकुंड (ring-well), विविध नाणी व मणी, काळी-तांबडी खापरे, कवेलू (छपरावरील कौले) इत्यादींचा समावेश आहे.
भोलाहुडकी तसेच बोंगीहुडकी येथे विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन (इ. स. २५०–५५०) मंदिराचे अवशेष आढळले. तसेच वऱ्हाडी तलाव येथे आढळलेल्या मंदिराचे अवशेष वाकाटक आणि यादवकालीन असल्याचे दिसून आले. भोलाहुडकी येथील मंदिराची उभारणी १.२० मी. उंच, १८ मी. पूर्व-पश्चिम व १०.६० मी. उत्तर-दक्षिण अशा आकाराच्या चौथऱ्यावर केली होती. चौथऱ्याच्या मध्यभागी विटांनी बांधलेल्या मंदिराचे अवशेष सापडले. मंदिराच्या इतर भागाची कल्पना करता आली नाही. या मंदिराला उत्तरेकडून सोपानमार्गाने प्रवेश होता. मंदिराच्या मुख्य वास्तूपासून काही अंतरावर प्रदक्षिणामार्ग होता. मंदिराच्या ईशान्येला विटांनी बांधलेले पाण्याचे कुंड होते. याव्यतिरिक्त पुजाऱ्यांना राहण्याकरिता मंदिराच्या वायव्येला दोन निवासस्थाने होती. याच मंदिराच्या अवशेषांमध्ये एका ठिकाणी दहा शैव-वैष्णव संप्रदायाशी निगडित शिल्पसंपदा भग्न अवस्थेत एकावर-एक पुरलेली आढळली, तर दुसऱ्या ठिकाणी पहिल्याच थरात नंदिवर्धन शाखेतील वाकाटक नृपतींचे ताम्रपटांचे तीन संच सापडले. यांतील एक प्रवरसेन दुसरा याचा सोळाव्या राज्यवर्षातील, तर इतर दोन प्रवरसेन दुसरा याचा नातू पृथ्वीषेण दुसरा याच्या दुसऱ्या व दहाव्या राज्यवर्षातील आहेत. या ताम्रपटांची लिपी पेटिकाशीर्ष पद्धतीची ब्राह्मी असून भाषा संस्कृत आहे. प्रवरसेन दुसरा याच्या ताम्रपटांसोबत त्याची मोहर मांढळ येथे प्रथमच प्राप्त झाली.
बोंगीहुडकी येथे विटांनी बांधलेल्या मंदिराच्या वाकाटककालीन अवशेषांत गर्भगृह आणि मुखमंडप असलेले मंदिर उजेडात आले. हे मंदिर १४.७० मी. लांब व ११.७० मी. रुंद आकाराच्या उंच चौथऱ्यावर कल्पिले होते. गर्भगृहाची लांबी ५.६० मी. व रुंदी ४.५० मी., तर मुखमंडपाची लांबी ४ मी. व रुंदी ३.३० मी. होती. या मंदिराची एकूणच रचना भारतातील मंदिरस्थापत्याच्या इतिहासात वेगळेपण दर्शविणारी आहे.
वऱ्हाडी तलावाच्या काठावरील जागेत (मांढळ-२) नागपूर विद्यापीठाने (१९७६-७७) तसेच महाराष्ट्र शासनाने उत्खनन केले (१९८५; १९९२). या उत्खननांत शैव-वैष्णव संपद्रायाच्या मंदिराचे अवशेष आढळले. या मंदिराचे वास्तुकाम दोन काळांमध्ये झाल्याचे दिसून आले. यात पहिला काळ वाकाटक, तर दुसरा काळ यादव असल्याचे अनुमान येथील अवशेषांवरून करता आले. मंदिराची संपूर्ण व्याप्ती पूर्व-पश्चिम ११.५ मी. लांब व उत्तर-दक्षिण १० मी. रुंद आढळली. वाकाटककालीन मंदिराच्या भिंती विटांच्या असून त्या खूप रुंद होत्या व विटांचा आकार सेंमी. मध्ये ४४ सेंमी. लांब, २३ सेंमी. रुंद व ८ सेंमी. जाड होता. यादवकालीन मंदिराच्या भिंती तासून घडविलेल्या पाषाणापासून केलेल्या होत्या. दुसऱ्या काळातील मंदिर हे पहिल्या काळातील मंदिराच्या अवशेषांवर उभारले गेले होते. पहिल्या उत्खननात रोमन बनावटीशी साम्य असलेली खापरे मिळाली. यात झारीचा (स्प्रिंकलरचा) विशेष उल्लेख करता येईल. त्यानंतर झालेल्या उत्खननात प्रामुख्याने प्रतिहार व सिंह यांच्या प्रतिमा आढळल्या. या शिल्पसंपदेव्यतिरिक्त काही स्त्री-प्रतिमांचे अवशेष निदर्शनास आले. या स्त्री-प्रतिमांची अजिंठा येथील गंगा-यमुना शिल्पांशी तुलना करता येऊ शकेल, अशा त्या आहेत. येथे सापडलेल्या शिल्पांच्या तसेच शिवलिंगाच्या आधारावर या मंदिराच्या उभारणीचा काळ चौथ्या शतकातील शेवटच्या चतुर्थकापासून ते पाचव्या शतकातील पहिल्या चतुर्थकापर्यंत असल्याचे अनुमान केले गेले.
भोलाहुडकी (बीएचके-१) येथील उत्खननात शैव/वैष्णव संप्रदायांच्या शिव, महासदाशिव (द्वादशमुख), संकर्षण, ब्रह्मा, विष्णु, नैगमेष, पार्वती, गणेश व दुर्गा या मूर्ती; तर उत्खननापूर्वी वृक्षारोपणाकरिता खड्डे खोदताना अवचित सापडलेल्या मूर्तींमध्ये अष्टमुखी शिव, सदाशिव, लकुलिश इत्यादींचा समावेश होता. या सर्व मूर्ती शैव संप्रदायाच्या पाशुपत या पंथातील असून त्या वाकाटककालीन आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती ठेंगण्या यक्षमूर्तीच्या धर्तीवर घडविल्या आहेत. तौलनिक कालमापनानुसार त्यांचा काळ इ. स. ३५० ते ४०० असा निश्चित करण्यात आला आहे. वाकाटक कला व स्थापत्यविषयाचे पाश्चिमात्य अभ्यासक हन्स बाकर यांनी अष्टमुख शिवाची मूर्ती वऱ्हाडी तलाव (मांढळ-२) येथील प्रमुख देवता; तर द्वादशमुख शिवाची मूर्ती ही भोलाहुडकी येथील मंदिराची प्रमुख देवता असल्याचा तर्क केला आहे. तसेच मांढळ येथे आतापर्यंत उजेडात आलेल्या वाकाटक काळातील तीन मंदिरांमधील दोन मंदिरे ही शैव संप्रदायाची असावीत, असेही अनुमान केले आहे.
संदर्भ :
- Bakker, Hans, The Vakatakas: An Essay in Hindu Iconology, Groningen, The Netherlands, 1997.
- Deotare, B. C.; Joshi, P. S. & Parchure, C. N. ‘Glimpses of Ancient Maharashtra Through Archaeological Excavationsʼ, pp. 243-245, Pune, 2013.
- Sali, Chetan, ‘Vakatakas Culture : Archaeological Perspectiveʼ, Samshodhak, March, 1998.
- देगलूरकर, गो. बं. ‘मांढळ येथील अष्टमूर्ती प्रतिमाʼ, विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक, २५ (१९८२) : १६६-१७१, नागपूर, १९८३.
- जामखेडकर, अ. प्र. ‘स्थापत्य व कला – प्रारंभिक ऐतिहासिक काळ ते यादव काळʼ, महाराष्ट्र : इतिहास – प्राचीन काळ (खंड : १, भाग : २), महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर, मुंबई, २००२
तऱ्हाळे नाणेसंचय (Tarhala Coin Hoard)
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात (पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील मंगरूळ तालुक्यात) स्थित तऱ्हाळे गावात सप्टेंबर १९३९ मध्ये एका शेताजवळून वाहणाऱ्या नाल्याशेजारी जमिनीमध्ये गाडलेले एक मृद-भांडे सापडले. या मृदभांड्यात जवळपास १६०० सातवाहनकालीन नाण्यांचा संचय प्राप्त झाला. तत्कालीन ट्रेजर ट्रॉव्ह ॲक्ट अंतर्गत त्या काळातील प्रांतिक सरकारने सदर निधी ताब्यात घेतला व मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर यांच्याकडे पाठविला.
विदर्भामध्ये सापडलेला सातवाहनकालीन नाण्यांचा हा दुसरा महत्त्वाचा नाणेसंचय आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सापडलेला चांदा नाणेनिधी म्हणून प्रसिद्ध असलेला नाणेसंचय आढळून आला. तऱ्हाळे नाणेसंचयाचे संशोधन व प्रकाशन सर्वप्रथम वा. वि. मिराशी यांनी केले.
नाणेसंचयाचे वर्णन : नाणेसंचयातील १६०० नाण्यांपैकी १५२५ नाणी पूर्ण आकाराची तर, ७५ नाण्यांचे तुकडे आढळून आले. सर्व नाणी केवळ सातवाहन नृपतींची होती. परदेशी राजवंशाचे (उदा., रोमन) एकही नाणे नव्हते, हे या नाणेसंचयाचे वैशिष्ट्य. प्राप्त नाणी पोटीन या मिश्र धातूची (तांबे व शिसे या धातूंचे मिश्रण) होती. तथापि निरनिराळ्या नाण्यांमध्ये तांबे व शिसे यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे आढळून आले. काही नाणी शिसे या धातुप्रमाणे काळी तर काही तांब्याप्रमाणे तांबड्या चकचकीत रंगाची असल्याचे दिसून आले.
नाण्यांचे वर्णन : संचयातील सर्व नाणी एकाच प्रकारची व गोलाकार आहेत. त्यांच्या दर्शनी भागावर सोंड उंचावलेला हत्ती व गोलाकार कडेवर व ब्राह्मी लिपीत व प्राकृत भाषेत राजाचे नाव सांगणारा लेख तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह आहे. उज्जैन चिन्हाच्या चार बाजूंवरील मोठ्या वर्तुळांमध्ये एक लहान वर्तुळ (वर्तुळात वर्तुळ) आहे. काही वर्तुळांच्या वरच्या बाजूला चंद्रकोर आहे.
कर्ण सातकर्णी या राजाची नाणी वगळता उर्वरित नाण्यांवर दर्शनी भागावरील हत्तीचे तोंड उजवीकडे आहे. कर्ण सातकर्णीच्या नाण्यांवर मात्र हत्तीचे तोंड डावीकडे आहे, असे निरीक्षण मिराशींनी नोंदविले आहे. काही नाण्यांची चकती (planchet) लेखाच्या ठशापेक्षा लहान असल्यामुळे बऱ्याच नाण्यांवर लेख अपूर्णावस्थेत आहेत. नाणी वजनाने हलकी असून वजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. प्राप्त नाण्यांचे नृपतीनिहाय वर्णन पुढीलप्रमाणे :
गौतमीपुत्र सातकर्णी : नाण्यांची संख्या – ५७३. निधीतील सर्वाधिक नाणी या नृपतीची आढळतात. नाण्यांवर सिरि सातकणिस किंवा सिरि सातकणि हे लेख आढळतात. नाण्यांचे वजन – ३१- ६० ग्रेन्स दरम्यान.
वाशिष्ठिपुत्र पुळुमावी : नाण्यांची संख्या – १७४. नाण्यांवर रञो सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ४५ ग्रेन्स दरम्यान.
चौथा सातकर्णी : नाण्यांची संख्या – ३५. नाण्यांवर सिव सिरी सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : २६ – ३८ ग्रेन्स दरम्यान.
शिवश्री पुळुमावी : नाण्यांची संख्या – ३२. नाण्यांवररञो सिव सिरि पुळुमाविस अशा प्रकारचा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३७ – ५० ग्रेन्स दरम्यान.
स्कंद सातकर्णी : नाण्यांची संख्या – २३. नाण्यांवर (रञो) सिरि खद सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ५० – ५२ ग्रेन्स दरम्यान.
यज्ञ सातकर्णी : नाण्यांची संख्या २४८. नाण्यांवर रञो सिरि यञ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ३१ – ४५ ग्रेन्स दरम्यान.
विजय सातकर्णी : नाण्यांची संख्या : ४. नाण्यांवर (सिरि) विजय सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : ४० – ५० ग्रेन्स दरम्यान.
कुंभ सातकर्णी : नाण्यांची संख्या : ५६. नाण्यांवर (रञो) सिरि कुभ सातकणिस असा लेख आढळतो. नाण्यांचे वजन : सरासरी ३० ग्रेन्स.
कर्ण सातकर्णी : नाण्यांची संख्या – ७. नाण्यांवर सिरि कण सातकणिस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ३० – ३६ ग्रेन्स दरम्यान.
शक सातकर्णी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर सिरि सक किंवा सकस सातकणिस असा लेख दिसतो. नाण्यांचे वजन : ३४ – ३७ ग्रेन्स दरम्यान.
श्री पुळुहामवी : नाण्यांची संख्या – ४. नाण्यांवर (रञो सिरि) पुळुहामविस हा लेख आहे. नाण्यांचे वजन : ४० – ५१ ग्रेन्स दरम्यान.
याशिवाय ज्या नाण्यांवरचे लेख वाचता येत नाहीत, अशा नाण्यांची संख्या ३६५ एवढी आहे.
नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी प्रमाणेच नंतरच्या काळात सापडलेला तऱ्हाळे नाणेसंचय सातवाहनांच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा स्रोत ठरतो. आतापर्यंत सापडलेल्या सातवाहनकालीन नाणेसंचयामध्ये हा नाणेसंचय मोठा आहे. उत्तर सातवाहन काळातील सातवाहन नृपती व त्यांचा कालक्रम ठरविण्यासाठी या नाणेसंचयाची मदत होते. हत्ती व उज्जैन छापाची नाणी विदर्भात चलनात होती, हे या संचयामुळे सिद्ध होते. पुराणात वर्णन केलेल्या अनेक सातवाहन राजांची नाणी प्रथमच या नाणेसंचयाद्वारे प्राप्त झाली. तसेच पुराणात उल्लेख नसलेल्या काही राजांची नाणीदेखील या संचयामुळे प्रकाशात आली. सातवाहन राजवंशाच्या अगदी शेवटच्या काळात सातवाहनांची सत्ता विदर्भापुरती मर्यादित असल्याचे पुरावे या नाणेनिधीमुळे प्राप्त झाले.
संकेतशब्द : तऱ्हाळे, वाशिम, अकोला, सातवाहन, वा. वि. मिराशी, चांदा, गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठिपुत्र पुळुमावी, सातकर्णी चौथा, शिवश्री पुळुमावी, स्कंद सातकर्णी, यज्ञ सातकर्णी, विजय सातकर्णी, कुंभ सातकर्णी, कर्ण सातकर्णी, शक सातकर्णी, पुळुहामवी, विदर्भ
संदर्भ :
- Mirashi, V. V. ‘Studies in Indology’, Vol. 3, (Ancient Indian Coins), Vidarbha Samshodhan Mandal, pp.34-48, Nagpur, 1962.
- Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980.
- Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
- Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade – Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.
- पाठक, अरुणचंद्र संपा., महाराष्ट्र प्राचीन काळ (खंड :१), दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२.
अजिंठा : वाकाटककालीन शिलालेख
अजिंठा हे महाराष्ट्रातील प्राचीन लेणी, शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. ते औरंगाबाद जिल्ह्यात उत्तरेस सु. १०३ किमी. अंतरावर आहे. येथे एकूण तीस बौद्धधर्मीय लेणी (गुंफा) असून यांपैकी क्र. ९, १०, १९, २६ व २९ ही चैत्यगृहे व बाकीचे पंचवीस विहार आहेत. कालखंडाच्या दृष्टीने या लेण्यांपैकी ९ व १० ही चैत्यगृहे आणि ८, १२, १३ व ३० हे विहार हीनयान पंथाचे असून त्यांचा काल इ. स. पू. २ रे शतक ते इ. स. २ रे शतक असा आहे. बाकीची लेणी महायान पंथाची असून येथील अवशिष्ट शिलालेखांवरून असे दिसून येते की, ती वाकाटक वंशातील शेवटचा ज्ञात सम्राट हरिषेण ह्याच्या कारकिर्दित (सु. ४७५–५००) कोरली गेली असावीत. येथे सातवाहन काळातील लयन स्थापत्याच्या पहिल्या टप्प्यात, सामान्य व्यक्तींनी आपल्या ऐपतीप्रमाणे चैत्य आणि बौद्धविहारांसाठी अनेक घटकांचे दान दिलेले दिसते. दुसऱ्या टप्प्यात, महायान काळात मात्र प्रामुख्याने वाकाटकनृपती यांच्या राजाश्रयातून हे लयन स्थापत्य उभे राहिलेले दिसते. येथील गुंफा क्र. १६, १७ आणि २० येथील शिलालेख हरिषेण याच्या राज्यकालादरम्यानचे आहेत. हे लेख राजा हरिषेण याचे सामंत आणि मंत्री यांचे आहेत.
गुंफा क्र. १६ : (वराहदेवाचा लेख).
या लेखाचा शोध इ. स. १८६२ मध्ये प्राच्यविद्यापंडित भाऊ दाजी लाड यांनी लावला व त्याचे सर्वप्रथम वाचन केले. त्यानंतर स्कॉटिश पुरातत्त्वज्ञ जेम्स बर्जेस आणि भारतविद्याविशारद भगवानलाल इंद्रजी यांनी १८८१ मध्ये, प्राचीन भारतीय लिपींचे जर्मन अभ्यासक योहान गेओर्ख ब्यूलर (Johann Georg Buhler) यांनी १८८३ मध्ये आणि प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी १९४१ मध्ये या लेखाचे पुनर्वाचन केले.
प्रस्तुत लेख वत्सगुल्म शाखेतील वाकाटक नृपती हरिषेण याचा मंत्री वराहदेव याचा आहे. गुंफेच्या व्हरांड्याच्या एका टोकाला डावीकडील भिंतीवर दक्षिणी पद्धतीच्या पेटिकाशीर्ष ब्राह्मीलिपीत संस्कृत भाषेत हा लेख कोरलेला असून संपूर्ण लेख पद्यात आहे. मात्र यात देवटेक येथील लेखाप्रमाणे डोक्यावरील पेटिका पूर्णपणे खोदल्या आहेत. या लेखाच्या २७ ओळी असून त्यात ३२ पद्ये आहेत. लेख खूपच झिजला आहे. विशेषत: आठव्या ओळीपर्यंतचा मध्यभाग व डाव्या बाजूकडील अक्षरे वाचता येत नाहीत.
या लेखाचे मुख्यत: दोन भाग आहेत. पहिल्या भागात वाकाटक राजा हरिषेण याची त्या वंशाचा मूळ पुरुष राजा विंध्यशक्तीपासूनची वंशावळ दिली आहे. त्याला ‘द्विजʼ (ब्राह्मण) म्हणून गौरविले आहे. देवसेन आणि हरिषेण यांचे मंत्री हस्तिभोज आणि पुत्र वराहदेव यांचे वर्णन केले आहे. हस्तिभोज हा कुशल मंत्री आणि गजदळाचा अधिपती असून देवसेनाने निर्धास्तपणे त्याच्या हाती राज्यकारभाराची धुरा सोपवली होती. हरिषेणाच्या वर्णनादरम्यान कुंतल, अवंती, कलिंग, कोसल, त्रिकुट, लाट आणि आंध्र या प्रांतांची नावे आली आहेत. या ठिकाणी लेख भग्न झाला आहे. बहुधा हरिषेणाने जिंकलेल्या राज्यांची ती यादी असावी.
लेखाच्या दुसऱ्या भागात चैत्यमंदिर, मंडपरत्न, पाण्याची विशाल टाकी आणि नागराजाचे मंदिर (नागेंद्र वेश्मा) इ. बौद्धसंघाला अर्पण केल्याचा उल्लेख आहे. या दानाचे पुण्य आपल्या मातापित्यांना मिळावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अजिंठ्यापासून सु, १५ किमी. अंतरावर पश्चिमेस गुळवाडा येथे घटोत्कच गुंफा आहेत. येथे एक अठरा ओळींचा शिलालेख आहे. अक्षरांची धाटणी अजिंठा येथील १६ आणि १७ क्रमांकांच्या लेखांप्रमाणेच आहे. हा विहारदेखील वराहदेवानेच निर्माण केला होता. विशेष म्हणजे या लेखातून आपल्याला त्याच्या कुळाबद्दल सविस्तर माहिती मिळते. वराहदेव हा वाल्लूर येथील ब्राह्मण होता. यज्ञपति हे त्याच्या मूळ पुरुषाचे नाव होते. लेखात उल्लेख केलेले त्याचे सर्व पूर्वज वाकाटक राजांचे मंत्री असल्याचीही नोंद आहे.
वा. वि. मिराशी यांच्या मते, सन १९३६ मध्ये वाशीम ताम्रपट मिळेपर्यंत या वत्सगुल्म शाखेविषयी मुळीच माहिती नव्हती. या शाखेच्या कित्येक नृपतींची नावे अजिंठा येथील सोळा क्रमांकाच्या लेण्यातील लेखात आली आहेत; तथापि तो लेख अत्यंत खराब झाल्यामुळे त्यातील नावे बरोबर वाचता आली नव्हती. वाशीम ताम्रपटांतील माहितीवरून अजिंठा लेखातील खरी राजनामे उपलब्ध झाली आहेत. त्यावरून इंध्याद्री पर्वतराजीच्या दक्षिणेस वाकाटकांची दुसरी शाखा राज्य करीत होती, हे सिद्ध झाले आहे.
गुंफा क्र. १७ : (हरिषेणाच्या मांडलिकाचा लेख).
प्रस्तुत लेख गुंफेच्या व्हरांड्याच्या भिंतीवर कोरला आहे. हा लेख संस्कृत पद्यात असून त्यात २९ वृत्तबद्ध श्लोक आहेत. लिपी दक्षिणी पद्धतीची पेटीकाशीर्ष ब्राह्मी आहे. हा लेख प्रथम १८६३ मध्ये भाऊ दाजी लाड यांनी वाचला. त्यानंतर भगवानलाल इंद्रजी यांनी १८८३ मध्ये त्याचे पुनर्वाचन प्रसिद्ध केले. हा लेख अनेक ठिकाणी खंडित असल्याने त्याच्या अर्थपूर्ण वाचनात अडचणी येतात. ज्या राजाने हा लेख कोरविला होता, त्याचे नाव आता नष्ट झाले आहे. पण तो वाकाटकनृपती हरिषेणाचा मांडलिक असून बहुधा खानदेशावर राज्य करीत असावा, असे वा.वि. मिराशी यांनी प्रतिपादले आहे.
भगवानलाल इंद्रजी यांनी या लेखात अश्मक देशाच्या धृतराष्ट्र, हरिसांब, शौरिसांब, उपेंद्रगुप्त, प्रथम कच, भिक्षुदास, निलदास, द्वितीय कच, कृष्णदास व त्याचे पुत्र (नाव नाहीसे झाले आहे) आणि रविसांब या राजांच्या नावांचे वाचन केले. हे राजे वाकाटकांचे मांडलिक असावेत.
योहान गेओर्ख ब्यूलर यांच्या मते, ‘रविसांबʼ या आपल्या धाकट्या भावाच्या अकाली मृत्युमुळे त्याला ऐहिक जगाची नश्वरता समजली. मिराशी यांच्या मते, हाच राजा हरिषेण याचा मांडलिक असावा. गुंफा क्र. १७ येथील विहार आणि क्र. १९ येथील गंधकुटी निर्माण करणाऱ्या या राजाचे नाव नष्ट झाले आहे. जेतवनातील गौतम बुद्धाच्या निवासस्थानाला ‘गंधकुटीʼ असे म्हणत असत. प्रस्तुत लेखातही वाकाटक राजा हरिषेण याचा उल्लेख आल्याने हा लेख गुंफा क्र. १६ चा समकालीन असावा.
गुंफा क्र. २० : (उपेंद्रगुप्त याचा लेख).
जेम्स बर्जेस यांनी गुंफा क्र. २० येथील व्हरांड्यातील डाव्या भागाला एका अर्धस्तंभावर असलेल्या खंडित लेखात क्रि (खंडित अक्षरे) याचा पुत्र उपेंद्र (खंडित अक्षरे) याने मंडपाचे दान दिल्याची नोंद केली आहे. गुंफा क्र. १७ मधील लेखाच्या आधारे वॉल्टर एम. स्पिंक यांनी यातील पिता कृष्णदास असून त्याच्या मुलाचे नाव उपेंद्रगुप्त असल्याचे अनुमान केले आहे. कचप्रमाणे उपेंद्रउगुप्त हे नावदेखील या घराण्यात पुन्हा आले असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. यावरून गुंफा क्र. १७ आणि २० यांचा दानकर्ता उपेंद्रगप्त असावा, असे त्यांचे मत आहे.
आभिरांच्या आक्रमणामुळे वाकाटक राजघराणे अस्तंगत झाले. याचा प्रभाव अजिंठा येथे गुंफा क्र. २६ मधील लेखाच्या दाखल्यावरुन दिसून येतो. या लेखात संस्कृत भाषेतील सत्तावीस श्लोक आहेत. बर्जेस आणि इंद्रजी यांच्या मते, लेखातील ब्राह्मी लिपीची अक्षरवाटिका गुंफा क्र. १७ च्या काळानंतरची आहे. या लेण्याची देणगी मुनी स्थविराचल व भिक्षू बुद्धभद्र यांनी दिली आहे. भिक्षू बुद्धभद्र याने ही गुंफा आपला मित्र भव्विराज या अश्मक राजाच्या मंत्र्याच्या सन्मानार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. पाचव्या शतकाच्या अखेरच्या दशकापर्यंत आभिरांनी अजिंठ्याच्या परिसरात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचा हा दाखला आहे.
संदर्भ :
- Burgess, James & Bhagwanlal, Indraji, Inscritions From The Cave -Temples Of Western India, Archaeological Survey of Western India, Bombay, 1881.
- Fergussion, James & Burgess, James, The Cave Temples Of India, London,1880.
- Lad, Bhau Daji, ‘Ajunta Inscriptionsʼ, Journal of Bombay Branch of Royal Asiatic Society, Vol. 7, pp. 53-74, 1863.
- मिराशी, वासुदेव विष्णु, वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
नगरधन (Nagardhan)
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ते नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात नागपूर शहराच्या ईशान्येस ४० किमी. आणि रामटेकच्या दक्षिणेस ६ किमी. अंतरावर वसले आहे. येथील प्राप्त पुरातत्त्वीय अवशेष आणि अभिलेखीय संपदा लक्षात घेऊन नगरधन हे वाकाटक राजवंशाच्या राजधानीचे शहर प्राचीन नंदिवर्धन असावे, अशी शक्यता पुरातत्त्वज्ञ रावबहादूर हिरालाल यांनी सर्वप्रथम व्यक्त केली. प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनीही यावर शिक्कामोर्तब केले.

इ. स. ३५० च्या दरम्यान वाकाटकसम्राट पृथिवीषेण यांनी वाकाटक साम्राज्याची राजधानी पद्मपूरवरून नंदिवर्धनला स्थलांतरित केल्याचा उल्लेख ताम्रपटातून प्राप्त होतो. वाकाटक कालखंडात नंदिवर्धनहून ११ ताम्रपट पारित केले होते. वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्ताच्या राज्यकाळाच्या तेराव्या वर्षी पारित केलेल्या पुणे ताम्रपटात नंदिवर्धनचा उल्लेख सर्वप्रथम आढळून येतो. सम्राट प्रवरसेन दुसरा याच्या उत्तरार्धात राजधानी नंदिवर्धनहून प्रवरपूर (पवनार-वर्धा) येथे स्थलांतरित झाल्याचे दिसून येते. त्या संदर्भात एकट्या दुसऱ्या प्रवरसेनाचे दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वाकाटक कालखंडांनंतरसुद्धा नल आणि राष्ट्रकूट राजवंशांनीही नंदीवर्धनवरून ताम्रपट पारित केल्याचे दिसून येते. येथे दक्षिणस्थित असलेल्या किल्ल्याचे गोंडराजवटीत बांधकाम झाले असून भोसलेराजवटीत किल्ल्याचे नूतनीकरण करण्यात आले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय यांनी १९८०–८५ च्या दरम्यान येथे केलेल्या पुरातत्त्वीय समन्वेषणात ऐतिहासिक कालखंडातील मृद्भांडी आणि शिल्पावशेष सापडले आहेत.

वाकाटक ताम्रपटांत वर्णित नंदिवर्धन हेच सध्याचे नगरधन आहे, याची पुरातत्त्वीय दृष्ट्या उकल करण्यासाठी, तसेच वाकाटक कालखंडातील वसाहतीक रचना आणि नगररचनेवर प्रकाश टाकण्यासाठी नगरधनचे उत्खनन केले गेले (२०१५-१८). महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय, नागपूर विभागाचे विराग सोनटक्के, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे श्रीकांत गणवीर आणि शंतनू वैद्य यांच्या निदर्शनाखाली या स्थळाचे संयुक्तपणे विस्तृत उत्खनन केले गेले.
या प्राचीन स्थळाची व्याप्ती साधारणत: १·५ किमी. क्षेत्रात पसरली आहे. सहा सांस्कृतिक कालक्रम नगरधनच्या उत्खननातून उजेडात आले आहेत, ज्यात पहिला कालखंड प्रारंभिक लोहयुगाशी निगडित असून दुसरा मौर्य आणि सातवाहनपूर्व काळ, तिसरा सातवाहन आणि क्षत्रप काळ, चौथा वाकाटक, पाचवा पूर्वमध्ययुगीन कालखंड आणि सहावा मध्ययुगीन कालखंड आहे. या उत्खननात प्रामुख्याने काळी-तांबडी, तांबडी, लाल लेपयुक्त, काळी अशा विविध रंगांतील मृद्भांडी आणि पाणतीराकृती (टॉरपिडो) कुंभ आदी अवशेष सापडले. किल्ल्यात केलेल्या उत्खननात वाकाटक कालखंडातील भव्य भिंतीचे अवशेष सापडले, जे राजप्रासाद किंवा राजकीय आश्रयातून निर्मित भव्य वास्तूचे अवशेष असण्याची शक्यता आहे. उत्खननात नागरी वसाहतीचे पुरावे प्राप्त झाले असून घरांची रचना सामान्य आहे. प्रामुख्याने घरांचा जोता विटांनी बांधलेला आहे. भिंती कुडाच्या असून विटांनी आच्छादित केल्या होत्या. गावाच्या पश्चिमेस असलेल्या कोटेश्वर देवस्थानाजवळ वाकाटक काळातील प्राचीन बंधाऱ्याचे अवशेष आढळून आले. यावरून येथील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धतीवर प्रकाश पडतो.
सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, विष्णुकुंडीन, इंडो-ससॅनियन आणि बहमनी या राजवंशांची नाणी उत्खननात प्राप्त झाली आहेत. वाकाटक राजवंशाची नाणी स्तरीय संदर्भातून प्राप्त झाली आहेत. या उत्खननात वाकाटक सम्राज्ञी प्रभावती गुप्ताची मुद्रा आढळून आली (२०१५-१६). ही मुद्रा सर्वांत उल्लेखनीय प्राचीन वस्तू होय. या मुद्रेवर पेटिका-शीर्ष ब्राह्मी लिपीत प्रभावती गुप्ताचे नाव लिहिले असून मुद्रेच्या वरील भागात शंखाचे अंकन केलेले आहे. घरगुती पूजेकरिता तयार केलेल्या मृण्मय लघु अर्चना देवालयाचे (terracotta miniature votive shrine) अवशेष आणि शंख, पद्म आदी धार्मिक प्रतिकांचे अंकन असणाऱ्या चौरस आकाराचे छोटे दगडी फलक या येथील महत्त्वपूर्ण प्राचीन वस्तू आहेत. नगरधनच्या उत्खननात प्राप्त धार्मिक प्रतिमांत नरसिंह, विष्णु, गणपती, योगेश्वरी, नैगमेषी, लज्जागौरी आदींच्या प्रतिमांचा प्रामुख्याने समावेश होतो.
येथील उत्खननादरम्यान ॲश्युलियन हत्यारे सापडल्याने या स्थळाची प्राचीनता प्रागैतिहासिक कालखंडापर्यंत गेली आहे. तसेच नागरी, सार्वजनिक आणि प्रशासकीय जीवनाशी संबंधित बांधकामाचे महत्त्वपूर्ण अवशेष येथे सापडले. एकूणच नगरधन येथील उत्खनन आणि समन्वेषण यांतून प्रागैतिहासिक कालखंडापासून मध्ययुगीन कालखंडापर्यंतच्या सांस्कृतिक कालक्रमाबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली.
संदर्भ :
- Joglekar, Jayendra J. ‘A Note on Acheulian Findings near Nagardhan, Nagpur District, Maharashtraʼ, Man and Environment, Vol. 42 (1), pp. 114-117, 2017.
- Hiralal, Raibahadur, Descriptive Lists of Inscriptions in Central Provinces and Berar, Nagpur, 1916.
- Shastri, Ajay Mitra, Vakatakas : Sources and History, New Delhi, 1997.
- Sontakke, Virag; Ganvir, Shrikant; Vaidya, Shantanu & Joglekar, P. P. ‘Excavations at Nagardhan, Nagpur District, Maharashtra (2015-16)ʼ, History Today, Vol. 17, pp. 43-51, 2016.
- मिराशी, वा. वि. वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
- सोनटक्के, विराग; वैद्य, शंतनू; गणवीर, श्रीकांत ‘नगरधन, जिल्हा नागपूर येथील पुरातत्त्वीय उत्खनन (२०१५-२०१७)ʼ, संशोधन क्षितिज वार्षिकांक, नागपूर, २०१७.
वाशिम (Washim)
महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, राजशेखरची काव्यमीमांसा, वत्सगुल्ममाहात्म्य इ. प्राचीन ग्रंथांतून तसेच वत्सगुल्म शाखेतील वाकाटक घराण्याच्या कोरीव लेखांतून वत्सगुल्मचा उल्लेख आहे. वत्सऋषींची तपोभूमी म्हणून ते विख्यात आहे. पौराणिक कथेनुसार येथील पद्मतीर्थात वासुकी ऋषीने प्रथम स्नान केले, म्हणून त्यास ‘वासुकी नगरʼ असेही नाव मिळाले. त्या शब्दाचे अपभ्रंश रूप ‘वाशिमʼ हे मुस्लिम राजवटीत रूढ झाले असावे. वाकाटकांच्या काळात वाशिम हे साहित्यिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र होते. प्राकृत भाषेची ‘वच्छोमीʼ (वत्सगुल्मी) ही साहित्यशैली येथेच विकसित व लोकप्रिय झाली. वाकाटक राजवटीनंतर मात्र वत्सगुल्मचे महत्त्व ओसरले.
वाशिमचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही; तथापि वाकाटक घराण्याच्या एका शाखेची येथे राजधानी होती. या घराण्यातील राजांनी ३३०-५५० पर्यंत सभोवतालच्या भूप्रदेशांवर राज्य केले. नवव्या शतकातील राजशेखर कवीने या शहराला विद्या, कला व संस्कृती यांचे केंद्र म्हटले आहे. येथे काही वर्षे राष्ट्रकूट व नंतर यादव (१२१०-१३१८) घराण्यांची सत्ता होती. मोगल काळात (१५३०-१७५७) ते हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारित होते. पुढे मराठे, पेशवे आदी सत्तांनी हा भाग ताब्यात ठेवला.
वाकाटक नृपती दुसरा विंध्यशक्ती याचा ताम्रपट १९३९ साली सापडल्यानंतर वाशिम पुन्हा प्रकाशझोतात आले. हा ताम्रपट ‘वत्सगुल्मʼ येथून राजाच्या ३७ व्या राज्यवर्धापनवर्षी देण्यात आला होता. वत्सगुल्म म्हणजेच वाशिम ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाकाटकांच्या पश्चिम शाखेची राजधानी होती. या पार्श्वभूमीवर १९९२-९३ व १९९४-९५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभाग, नागपूर यांच्यातर्फे येथे गवेषण, उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन फुकतपुरा येथील चामुंडेश्वरी मंदिरासमोर सर्वेक्षण क्र. २५६, श्री. इंगळे यांच्या शेतात आणि जैन क्षेत्रपालाचे आधुनिक देऊळ असलेल्या ‘लाला देऊळʼ अशा दोन ठिकाणी करण्यात आले.
श्री. इंगळे यांच्या शेतात केलेल्या उत्खननात १४×१२ मी. मापाचे अंडाकृती बांधकाम सापडले. या बांधकामासाठी भट्टीत भाजलेल्या विटा वापरल्या होत्या. या बांधकामाच्या केंद्रस्थानी विटांनी बांधलेला चौरस असून मध्यभागी एक अष्टकोनी खळगा आहे. हा बहुधा शिवलिंगाच्या शाळुंकेला आधार देण्यासाठी असावा. प्रत्येक कोपऱ्यात तारकाकार साधण्यासाठी इंग्रजी ‘एलʼ आकाराच्या भाजक्या विटांचा वापर केलेला दिसतो. समोर मंडपाचा चौथरा आहे. याशिवाय खापरे, मणी, मातीच्या मूर्ती व इतर वस्तू, लोखंडी वस्तू तसेच वाकाटक व क्षत्रप घराण्यांची नाणी सापडली. याच ठिकाणी शेतात उमा-महेश्वराची व शंखनिधीची प्रतिमा आढळली.
१९९४-९५ मध्ये लाला देऊळ या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन ८०×८० मी.हून थोडे अधिकच मोठे होते. या उत्खननात १ मी. जाडीची प्राकाराची भिंत सापडली. ती सुमारे ७० मी. पूर्वपश्चिम धावत होती. या भिंतीला लागून इतरही काही बांधीव अवशेष सापडले. त्यांपैकी एक बांधकाम अंडाकार असून त्याच्या केंद्रभागातील अष्टकोनी बांधकाम वगळता ते पहिल्या उत्खननात मिळालेल्या बांधकामाशी तंतोतंत मिळतेजुळते होते. या टेकाडाच्या नैऋत्येस एका साध्या तारकाकृती पायावर बेतलेले अंडाकार बांधकाम सापडले. या बांधकामाला देवकोष्ठाची रचना केली होती. तीर्थकुंडाजवळ अष्टकोनी गर्भगृह व आयताकार मुखमंडप होता. इतर अवशेषांमध्ये लघुरूप मृत्तिकास्तंभ महत्त्वाचे आहेत. हे स्तंभ विटांप्रमाणेच भट्टीत भाजलेले आहेत. त्यांचे अजिंठा येथील भित्तिचित्रांत आढळणाऱ्या खांबांशी साधर्म्य आहे. या व्यतिरिक्त तवली, तोटीचे भांडे आणि घडवंचीवरील थाळी या महत्त्वाच्या मृण्मयी वस्तू आहेत. लाल लेपन केलेल्या मृदभांड्यांची पातळ नकली आवृत्ती वाशिम येथे सापडली. तसेच येथे सापडलेल्या नाण्यांचे हमलापुरी येथील नाण्यांशी साम्य आहे.
संदर्भ :
- Deotare, B. C.; Joshi P. S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra, Bhartiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
- Sali, Chetan, ‘Vakataka Culture : Archaeological Perspectiveʼ, Sanshodhak, March, 1998.
- जामखेडकर, अ. प. पुरासंचय भाग – १, अपरांत प्रकाशन, पुणे, २०१६
पौनी (Pauni)
महाराष्ट्रातील एक प्राचीन ऐतिहासिक व पुरातत्त्वीय स्थळ. ते भंडारा जिल्ह्यात नागपूर-भंडारा मार्गावर नागपूरच्या आग्नेयेस सु. ८० किमी.वर वैनगंगा नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. शुंग-सातवाहन काळातील बौद्ध धर्माचे केंद्र, तसेच वाकाटक काळातील एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणून पौनी प्रसिद्ध आहे.
पौनी येथील पुरावशेष सर्वप्रथम पुरातत्त्वज्ञ हेन्री कझिन्स (१८७९), नंतर भारतीय पुरातत्त्व खात्याचे संचालक सर जॉन मार्शल यांच्या निदर्शनास आले (१९२६). पुरातत्त्वज्ञ एच. हरग्रीव्ह्ज यांनी पौनी येथील किल्ल्याची प्रेक्षणीय तटबंदी, बुरूज व खंदक यांचे वर्णन केल्याचे आढळते (१९२७). येथील पुरावशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन तत्कालीन शासनाने पौनी येथील किल्ला व आसपासचे पुरावशेष संरक्षित म्हणून घोषित केले. भारतीय पुरातत्त्व विभागाचे मध्य भारतातील साहाय्यक पर्यवेक्षक जे. सी. चंद्रा यांनी पौनी येथे मोठ्या प्रमाणावर पुरावशेष, विशेषत: स्तूपाचे अवशेष, असावेत असे आपल्या पत्रव्यवहारांत नमूद केले (१९३६). पौनीची प्राचीनता तेथे आढळणाऱ्या पुरावशेषांव्यतिरिक्त तेथील क्षत्रप रुपिअम्म याचा लेखयुक्त छायास्तंभ आणि वाकाटक राजवंशातील दुसरा प्रवरसेन याच्या ताम्रपटामुळे अधोरेखित झाली. प्राच्यविद्यासंशोधक वा. वि. मिराशी यांनी छायास्तंभ उजेडात आणला (१९५७), तर ज्येष्ठ साहित्यिक-संशोधक वि. भि. कोलते यांनी ताम्रपट प्रकाशित केला (१९६९).

येथील जगन्नाथ टेकाडाच्या भोवती नांगरटीमध्ये एका प्रचंड यक्षप्रतिमेचा अर्धा भाग, मौर्यकालीन अक्षरवटिकांचा उत्कीर्ण लेख असलेली स्तूपाच्या कठड्याची शीर्षशीला इ. प्राचीन बौद्धस्तूपाचे अवशेष अचानकपणे निदर्शनास आले. भारतीय पुरातत्त्व खाते व नागपूर विद्यापीठ यांनी संयुक्तपणे पुरातत्त्वज्ञ जगतपति जोशी व शांताराम भालचंद्र देव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उत्खनन केले (१९६९-७०). उत्खननाकरिता जगन्नाथ मंदिर, चांडकापूर (सुलेमान) व हरदोलाला अशा तीन टेकाडांची निवड करण्यात आली. यांतील पहिल्या दोन ठिकाणी शुंग-सातवाहन काळातील हीनयान पंथातील बौद्ध धर्माशी निगडित स्तूपाचे अवशेष प्राप्त झाले. त्यामुळे उत्तर व दक्षिण भारतामधील बौद्ध धर्माचा व त्या अनुषंगाने भारहूत व सांची येथील बौद्ध कलेचा प्रसार पौनी या केंद्रातून होत होता, हे आढळून आले.
जगन्नाथ मंदिर टेकाडाच्या उत्खननात एका प्रचंड स्तूपाचे अवशेष उपलब्ध झाले. या स्तूपाचा व्यास सु. ४१.२ मी. असून त्याचा घुमट विटांत पेटिकापद्धतीने बांधल्याचे आढळले. या स्तूपाभोवती ६ मी. रुंदीच्या फरश्यांनी आच्छादिलेला प्रदक्षिणापथ होता आणि त्याच्याभोवती सांची-भारहूतपद्धतीचा दगडी कठडा किंवा वेदिका होती, तसेच चार दिशांना प्रवेशद्वारे होती, असे आढळले. शिवाय या स्तूपाचा तीन कालखंडांमध्ये विस्तार झाल्याचे आढळून आले. स्तूपाचे अण्ड, हर्मिका व छत्रावली प्रदक्षिणापथाने वेढली होती. दर्शनी भागी एकपाषाणी ध्वजस्तंभ होता. प्रदक्षिणापथाचीही नव्याने रचना करून त्याची रुंदी ३.५० मी. इतकी केलेली आढळली. येथील अष्टकोनी स्तंभांच्या तीन बाजूंवर बौद्धधर्माची प्रतीके (स्तूप, बोधिवृक्ष, चैत्य व भद्रासन), भक्तगण, नाग मुचुलिंदाची कथा व फुलांची नक्षी कोरलेली शिल्पे असून आडव्या सूचीवर प्रदानलेख आहेत. सांची येथील स्तूपापेक्षा या स्तूपाचा परीघ मोठा असून तोरणावर शुंगकालीन शिल्पे कोरलेली आहेत. या स्तूपाचा काळ शुंगशैली, लेख व शिल्पे यांनुसार इ. स. पू. तिसरे शतक ते इ. स. तिसरे शतक असा ठरतो. या स्थानाला तत्कालीन समाजातील सर्व स्तरांतील समुदायाकडून आश्रय लाभला होता, असे वेदिकेवरील प्राकृत भाषेतील ब्राह्मी लिपीत कोरलेल्या अभिलेखांवरून ज्ञात झाले.
पौनी येथे आणखी एका भव्य हीनयानपंथीय बौद्ध धर्माशी निगडित स्तूपाचे अवशेष चांडकापुर टेकाड येथे केलेल्या उत्खननात सापडले (१९६९-७०). या स्तूपसमूहाचे अवशेष जगन्नाथ टेकाडाच्या दक्षिणेस सु. २ किमी. अंतरावर आढळले. या स्तूपाची बांधणी पायरीपद्धतीची असून त्याचा काळ इ. स. चे पहिले – दुसरे शतक असावा. या स्तूपाचा महत्त्वाचा भाग कालौघात नाहीसा झाला आहे. स्तूपाच्या अंतर्भागात अस्थिकलश होता; पण त्यावर अभिलेख आढळला नाही.
पुरातत्त्वज्ञ अमरेंद्र नाथ यांनी भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे पौनी येथील प्राचीन निवासी वसाहतींचा शोध घेण्यासाठी १९९४ मध्ये उत्खनन केले आणि या उत्खननात आढळलेल्या प्राचीन वसाहतींचा कालानुक्रम पुढीलप्रमाणे ठरविला आहे :
कालखंड १ : मौर्यपूर्व (इ. स. पू. सहावे शतक ते इ. स. पू. चौथे शतक)
कालखंड २ : मौर्य काल (इ. स. पू. चौथे ते इ. स. पू. दुसरे शतक)
कालखंड ३ : शुंग-भद्र (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. पू. पहिले शतक)
कालखंड ४ : क्षत्रप-सातवाहन (इ. स. पू. पहिल्या शतकाचा उत्तरार्ध ते इ. स. दुसरे शतक)
कालखंड ५ : वाकाटक (इ. स. तिसरे शतक ते इ. स. सहावे शतक)
यातील वाकाटक कालखंडात सातवाहन काळातील बांधकामसाहित्याचा पुनर्वापर करून मोठ्या दगडांची बांधलेली तटबंदी व विहिरीचे अवशेष आढळले. अशा प्रकारची तटबंदी बिहार राज्यातील राजगीर येथे सापडली होती, तर दक्षिणेत पौनी येथे ती प्रथमच निदर्शनास आली. प्रस्तुत तटबंदी व अन्य पुराव्यांच्या आधारे पौनी हे वाकाटक काळातील ‘पुरिकाʼनामक नगर असावे, असा तर्क उत्खनकांनी केला आहे. एकूणच प्राचीन काळी पौनी हे विदर्भातील हीनयान पंथाचे मोठे केंद्र होते आणि या केंद्राद्वारे दक्षिणेत बौद्ध धर्म व कला यांचा प्रसार झाला असावा, असे सूचित होते.
संदर्भ :
- Deo, S. B. & Joshi, J. P. Pauni Excavation (1969-1970), Nagpur, 1972.
- Deotare B. C.; Joshi, P. S. & Parchure, C. N. ‘Glimpses of Ancient Maharashtraʼ, Pune, 2013.
- Joshi, P. S. ‘Fragements of a Buddhist Pastʼ, Maharashtra Unlimited (Vidarbha Special), Mumbai, 2016.
- Nath, A. Further Excavations at Pauni : 1994, New Delhi, 1998.
- देव, शां. भा. ‘पवनी उत्खननʼ, विदर्भ संशोधन मंडळ, पृ. क्र. १२९-१३८, नागपूर, १९६९.
- मिराशी, वा. वि. सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख, मुंबई, १९७९.
मनसर (Mansar)
विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले आहे. या स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५ मी. इतकी आहे. सातपुडा आणि अंबागड पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे पसरलेल्या कमी उंचीच्या नैसर्गिक टेकाडावर प्राचीन काळातील स्थापत्याचे अवशेष विखुरलेले दिसतात. वा. वि. मिराशी यांच्या मते, या स्थळाच्या उत्तरेस असलेल्या तलावाच्या ‘मणीकालसरʼ या नावावरून या स्थळाला मनसर असे संबोधले जाते. रामटेकच्या लक्ष्मण मंदिरातील यादव राजा रामचंद्रांच्या शिलालेखात या स्थळाचा उल्लेख मणीकालकुंड असा येतो, तर सिंदूरगिरी माहात्म्य आणि महानुभावांच्या स्थान पोथीमध्ये यास अनुक्रमे मणीकाल आणि माणसील असे संबोधले जात होते.

ऐतिहासिक व पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून मनसर या स्थळाचे सर्वप्रथम सर्वेक्षण टी. वेलस्टेड याने १९२८ मध्ये केले. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमधील १९३३ च्या संशोधन प्रपत्रात मनसर येथील वाकाटककालीन पुरावशेष, स्थापत्य आणि हिंदू व बौद्ध धर्माशी निगडित वास्तू इत्यादीचे वर्णन वेलस्टेडने केले आहे. या स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन १९८९ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाने केले. या नंतर १९९४-९५ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, उत्खनन शाखा क्र. १, नागपूरतर्फे आणि अलीकडील उत्खनन बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्थेच्यावतीने जगत पती जोशी आणि अरुण शर्मा यांच्या संयुक्त निर्देशनाखाली १९९७ पासून नऊ सत्रामध्ये विस्तृत प्रमाणात करण्यात आले.
उत्खननांती मनसर येथे सातवाहन, वाकाटक आणि विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी शासन केल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. मनसर येथे स्थापत्य परंपरेची सुरुवात सातवाहन काळात झाली (इ. स. पू. २०० ते इ. स. २५०) असावी. मनसरच्या टेकाड क्र.१ मधील उत्खननात सर्वांत खालच्या स्तरात राजप्रासादाचे अवशेष मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे मत आहे. विटांनी बांधलेल्या या विस्तीर्ण राजप्रासादाचा आकार पूर्व-पश्चिम ५१ मी. तर उत्तर-दक्षिण ४४ मी. इतका होता. प्रासादात राहण्याकरिता अनेक लहान-मोठ्या खोल्या होत्या. राजप्रासादाच्या सुरक्षेकरिता चारही बाजूंनी विटांची संरक्षक भिंत देखील बांधली होती. राजप्रासादाच्या पश्चिमेकडे भव्य मंडप असून याचे आकारमान लांबी २३ मी. आणि रुंदी १९.५० मी. इतके आहे. या विशाल मंडपात विटांनी निर्मित ४२ चौकोनी स्तंभ एकमेकांशेजारी (२.२० मी. अंतरावर) स्थित आहेत. मंडपाच्या सभोवताल विटांच्या भिंतीचे पुरावे उत्खननात मिळाले आहेत. तसेच मनसर येथील हिडिंबा टेकडी (उत्खनन स्थळ क्र.३) परिसरात दोन बौद्ध स्तूपाचे आणि एका चैत्याचे अवशेष प्राप्त झाल्याचे उत्खननकर्त्यांनी नमूद केले आहे. स्थापत्याच्या अवशेषाव्यतिरिक्त सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचे नाण्याचे साचे, लाल चकाकीयुक्त खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, रोमन मद्यकुंभ (अम्फोरा), लज्जागौरी आणि कार्तिकेय यांचे शिल्प आणि लोह उपकरणे आदी प्राप्त झाली आहेत.
सातवाहनांच्या अस्तानंतर मनसर येथे विदर्भातील आद्य नरेश वाकाटकांनी प्रत्यक्ष शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत (इ.स. २५० ते ५५०). सातवाहन काळातील काही स्थापत्य अवशेषांवर वाकाटक काळात बांधकाम करण्यात आले आणि उर्वरित बांधकामाला भर टाकून समतल करण्यात आले. उत्खननकर्त्यांच्या मते, वाकाटक काळातील राजप्रासादाचे अवशेष हे वाकाटक नृपती प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४१०–४४०) याच्या काळातील असावे, कारण या राजाने नंदीवर्धन (सध्याचे नगरधन) येथून राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतर केली होती. उत्खननकर्त्यांनी मनसरची ओळख प्राचीन ‘प्रवरपूरʼ म्हणून केली आहे. वाकाटक काळातील राजप्रासाद तीन मजली असून आकाराने भव्य होता. यामध्ये पश्चिमेकडून पायऱ्याद्वारे प्रवेश करता येत होता. राजप्रासादामध्ये अतिथी कक्ष, सभागृह व त्याला परस्पर जोडलेल्या खोल्या अशी एकूण राजप्रासादाची रचना होती. तसेच प्रासादात लहान-मोठ्या अनेक खोल्या एकमेकांशेजारी बांधलेल्या होत्या. राजप्रासाद आणि त्यामधील कोनाडे व अर्धस्तंभ, चुन्याचा गिलावा आणि चित्रांनी अलंकृत केला होता. राजप्रासादाच्या बाहेर देखील अनेक खोल्यांचे अवशेष आढळले आहेत. इ. स. ४९३ मध्ये नल राजांनी वाकाटक साम्राज्यावर केलेल्या आक्रमणात प्रवरपूर येथील प्रासादाला जाळल्याचे आणि नष्ट केल्याचे पुरावे मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे म्हणणे आहे. उत्खननकर्त्यांना याच स्तरात कूर्मचिती, श्येनचिती व त्या संबंधित पुरुषमेध यज्ञाचे अवशेष आढळले आहे. उत्खननात वाकाटक काळातील अनेक मुद्रा आणि मुद्रांके प्राप्त झाली असून त्याद्वारे वाकाटकांच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. प्रवरसेन द्वितीयची पेटिका-शीर्षक लिपीत लिहिलेली ‘प्रवरस्यʼ मुद्रांक विशेष महत्त्वपूर्ण असून वाकाटक राजा प्रवरसेन द्वितीयने राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतरित केल्यानंतर या मुद्रांकाचा वापर केला असावा. वाकाटक काळातील अभ्रकयुक्त लाल रंगाची, लाल चकाकीयुक्त आणि साधी लाल रंगांची खापरे उत्खननात मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत.
वाकाटकांनंतर मनसरवर विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी काही काळ शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत. विष्णूकुंडीन काळातील स्थापत्य अवशेष मनसर येथील वाकाटक काळाच्या अवशेषांवर मिळाले. या काळातील बौद्ध स्तूप आणि विहाराचे अवशेष सर्वांत वरच्या स्तरात प्राप्त झाले आहेत. वाकाटकांच्या भव्य राजप्रासादाचे रूपांतर नंतर बौद्ध स्तूप आणि विहारात झाले असावे. राजप्रासादाच्या खोल्यांचा उपयोग बौद्ध भिक्खुंच्या निवासाकरिता होत होता. विष्णूकुंडीन नरेश महेंद्रवर्मन द्वितीयची तांब्याची नाणी हिडिंबा टेकडी परिसरात मिळाली आहेत. लाल रंगाची खापरे, अभ्रकमिश्रित लाल रंगाची खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, दगडी पाटे-वरवंटे, लोह आणि ताम्र उपकरणे इ. मिळाली आहेत.
मनसर येथील उत्खननात वाकाटक काळातील अनेक मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. येथील मंदिरे प्रामुख्याने शैव पंथीय असून केवळ एक वैष्णव (नरसिंह) मंदिर होते. हिडिंबा टेकडीवरील मंदिराला विद्वानांनी प्रवरसेन द्वितीयच्या ताम्रपत्रात उल्लेखित प्रवरेश्वरदेवकुलस्थान ‘प्रवरेश्वरʼ मंदिर मानले आहे. मनसर येथील नैसर्गिक गुहेत विटांचे बांधकाम करून शिवलिंग प्रस्थापित केले होते, तसेच जाडजूड संरक्षण भिंतीच्या पश्चिम आणि उत्तर-दक्षिणेस लघु आकारांच्या अनेक देवकुलिकात शिवलिंगे मिळाली आहेत. मनसर येथे आणखी एका विटांनी बांधलेल्या ताराकृती आकाराच्या शैव मंदिराच्या जोत्याचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
मनसर हे वाकाटक काळातील शिल्प परंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. वाकाटकांच्या काळातील अन्य कोणत्याही स्थळापेक्षा जास्त प्रमाणात शिल्पे मनसर येथून प्राप्त झाली आहेत. यात प्रामुख्याने शैव देव-देवता यांची शिल्पे असून गण, यक्ष, किन्नर, प्राणी, साधू आणि स्त्री-पुरुष इत्यादींचे अनेक शिल्पे सुद्धा मिळालेली आहेत. भारताच्या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयामधील प्रवेशद्वाराच्या मुख्य कक्षात प्रदर्शित ‘शिव-वामनʼ चे अद्वितीय शिल्प मनसर येथील शिल्प कलेचा परमोच्च बिंदू आहे. मनसर येथील यक्ष, विद्याधर, किन्नर इ. शिल्पांचे अजिंठा येथील चित्रांशी समरूपता दिसून येते, म्हणूनच प्रसिद्ध विद्वान हान्स बाकर यांच्या मते, मनसरची कला आणि अजिंठा येथील चित्रकला यांमध्ये विलक्षण साम्य आहे.
मनसर हे वाकाटक काळातील राजधानीचे ठिकाण म्हणून विशेष महत्त्वाचे असल्याचे उत्खननात प्राप्त झालेल्या विविध पुराव्यांवरून सिद्ध होते. मनसर येथून प्राप्त ताम्रपत्र, शंख लिपीतील लेख, धार्मिक पुरावशेष, सुंदर शिल्पे आणि भव्य स्थापत्यावरून वाकाटक काळातील राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थिती तसेच कला, स्थापत्य आणि धर्म इत्यादींविषयी नवीन माहिती समोर आली; तथापि उत्खननकर्त्यांनी येथील उत्खननाबाबतीत नमूद केलेल्या कालानुक्रमातील आणि काही अवशेषांवरील स्पष्टीकरणासंदर्भात इतर विद्वानांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
संदर्भ :
- Bakker, Hans, ‘Religion and Politics in the Eastern Vakataka Kingdomʼ, South Asian Studies, Vol. 18, pp. 1-25. 2002.
- Indian Archaeology: A Review, Archaeological Survey of India, New Delhi, 1994-95.
- Joshi, Jagat Pati & Sharma, A. K. ‘Excavations at Mansar, Distt. Nagpur, Maharashtra-1997-2000ʼ, Puratattva : Bulletin of the Indian Archaeological Society, no. 30, 127-131, 1999-2000.
- Sharma, A. K. Further Excavations at Mansar, B. R. Publishing Corporation, Delhi, 2013.
वाशिम (Washim)
महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आणि प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. वत्सगुल्म, वत्स्यगुल्म, वासिम, वंशगुल्म इत्यादी नावांनीही त्याचा उल्लेख आढळतो. महाभारत, वात्स्यायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, राजशेखरची काव्यमीमांसा, वत्सगुल्ममाहात्म्य इ. प्राचीन ग्रंथांतून तसेच वत्सगुल्म शाखेतील वाकाटक घराण्याच्या कोरीव लेखांतून वत्सगुल्मचा उल्लेख आहे. वत्सऋषींची तपोभूमी म्हणून ते विख्यात आहे. पौराणिक कथेनुसार येथील पद्मतीर्थात वासुकी ऋषीने प्रथम स्नान केले, म्हणून त्यास ‘वासुकी नगरʼ असेही नाव मिळाले. त्या शब्दाचे अपभ्रंश रूप ‘वाशिमʼ हे मुस्लिम राजवटीत रूढ झाले असावे. वाकाटकांच्या काळात वाशिम हे साहित्यिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र होते. प्राकृत भाषेची ‘वच्छोमीʼ (वत्सगुल्मी) ही साहित्यशैली येथेच विकसित व लोकप्रिय झाली. वाकाटक राजवटीनंतर मात्र वत्सगुल्मचे महत्त्व ओसरले.
वाशिमचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही; तथापि वाकाटक घराण्याच्या एका शाखेची येथे राजधानी होती. या घराण्यातील राजांनी ३३०-५५० पर्यंत सभोवतालच्या भूप्रदेशांवर राज्य केले. नवव्या शतकातील राजशेखर कवीने या शहराला विद्या, कला व संस्कृती यांचे केंद्र म्हटले आहे. येथे काही वर्षे राष्ट्रकूट व नंतर यादव (१२१०-१३१८) घराण्यांची सत्ता होती. मोगल काळात (१५३०-१७५७) ते हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारित होते. पुढे मराठे, पेशवे आदी सत्तांनी हा भाग ताब्यात ठेवला.
वाकाटक नृपती दुसरा विंध्यशक्ती याचा ताम्रपट १९३९ साली सापडल्यानंतर वाशिम पुन्हा प्रकाशझोतात आले. हा ताम्रपट ‘वत्सगुल्मʼ येथून राजाच्या ३७ व्या राज्यवर्धापनवर्षी देण्यात आला होता. वत्सगुल्म म्हणजेच वाशिम ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाकाटकांच्या पश्चिम शाखेची राजधानी होती. या पार्श्वभूमीवर १९९२-९३ व १९९४-९५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभाग, नागपूर यांच्यातर्फे येथे गवेषण, उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन फुकतपुरा येथील चामुंडेश्वरी मंदिरासमोर सर्वेक्षण क्र. २५६, श्री. इंगळे यांच्या शेतात आणि जैन क्षेत्रपालाचे आधुनिक देऊळ असलेल्या ‘लाला देऊळʼ अशा दोन ठिकाणी करण्यात आले.
श्री. इंगळे यांच्या शेतात केलेल्या उत्खननात १४×१२ मी. मापाचे अंडाकृती बांधकाम सापडले. या बांधकामासाठी भट्टीत भाजलेल्या विटा वापरल्या होत्या. या बांधकामाच्या केंद्रस्थानी विटांनी बांधलेला चौरस असून मध्यभागी एक अष्टकोनी खळगा आहे. हा बहुधा शिवलिंगाच्या शाळुंकेला आधार देण्यासाठी असावा. प्रत्येक कोपऱ्यात तारकाकार साधण्यासाठी इंग्रजी ‘एलʼ आकाराच्या भाजक्या विटांचा वापर केलेला दिसतो. समोर मंडपाचा चौथरा आहे. याशिवाय खापरे, मणी, मातीच्या मूर्ती व इतर वस्तू, लोखंडी वस्तू तसेच वाकाटक व क्षत्रप घराण्यांची नाणी सापडली. याच ठिकाणी शेतात उमा-महेश्वराची व शंखनिधीची प्रतिमा आढळली.
१९९४-९५ मध्ये लाला देऊळ या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन ८०×८० मी.हून थोडे अधिकच मोठे होते. या उत्खननात १ मी. जाडीची प्राकाराची भिंत सापडली. ती सुमारे ७० मी. पूर्वपश्चिम धावत होती. या भिंतीला लागून इतरही काही बांधीव अवशेष सापडले. त्यांपैकी एक बांधकाम अंडाकार असून त्याच्या केंद्रभागातील अष्टकोनी बांधकाम वगळता ते पहिल्या उत्खननात मिळालेल्या बांधकामाशी तंतोतंत मिळतेजुळते होते. या टेकाडाच्या नैऋत्येस एका साध्या तारकाकृती पायावर बेतलेले अंडाकार बांधकाम सापडले. या बांधकामाला देवकोष्ठाची रचना केली होती. तीर्थकुंडाजवळ अष्टकोनी गर्भगृह व आयताकार मुखमंडप होता. इतर अवशेषांमध्ये लघुरूप मृत्तिकास्तंभ महत्त्वाचे आहेत. हे स्तंभ विटांप्रमाणेच भट्टीत भाजलेले आहेत. त्यांचे अजिंठा येथील भित्तिचित्रांत आढळणाऱ्या खांबांशी साधर्म्य आहे. या व्यतिरिक्त तवली, तोटीचे भांडे आणि घडवंचीवरील थाळी या महत्त्वाच्या मृण्मयी वस्तू आहेत. लाल लेपन केलेल्या मृदभांड्यांची पातळ नकली आवृत्ती वाशिम येथे सापडली. तसेच येथे सापडलेल्या नाण्यांचे हमलापुरी येथील नाण्यांशी साम्य आहे.
संदर्भ :
- Deotare, B. C.; Joshi P. S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra, Bhartiya Itihas Sankalan Samitee and Deccan College Post-Graduate and Research Institute, Pune, 2013.
- Sali, Chetan, ‘Vakataka Culture : Archaeological Perspectiveʼ, Sanshodhak, March, 1998.
- जामखेडकर, अ. प. पुरासंचय भाग – १, अपरांत प्रकाशन, पुणे, २०१६
वाकाटक कला (Vakatak Art)
मध्य भारत आणि दख्खनमधील प्रसिद्ध प्राचीन राजवंश. विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापर्यंत वाकाटक राजवटीच्या घडामोडींचे अवलोकन गुप्त साम्राज्याच्या परिप्रेक्ष्यातच केले जात असे. विशेषतः या काळातील कला इतिहासाचे गुप्त-वाकाटक अशा संयुक्त शीर्षकाखालीच वर्णन केले गेले. त्यामुळे वाकाटक कालखंडातील कला ही शैलीच्या दृष्टीने स्वतंत्र अशी वैशिष्ट्यपूर्ण कला होती, याची दखल घेतलेली दिसत नाही. परंतु अलीकडे झालेल्या विपुल संशोधनानंतर वाकाटक कालखंडाचे भारतीय कलाइतिहासातील योगदान समोर आले. विशेषत: काही कला प्रकारांमध्ये हा काळ जागतिक कला इतिहासात मानाने गौरविलेला आहे. उदा., अजिंठा. प्रस्तुत नोंदीत शिल्पकला आणि इतर तत्कालीन कलाविशेषांचा विचार केला गेलेला आहे.

इ. स. तिसर्या शतकाच्या मध्यावधीत वाकाटक घराण्याचे स्वतंत्र अस्तित्व मध्य भारत (दक्षिण माळवा) आणि विदर्भात स्थापित झाले. इ. स. पाचव्या शतकाच्या अखेरपर्यंत वाकाटक प्रबळ राजसत्ता म्हणून दख्खन आणि त्या लगतच्या प्रदेशांवर राज्य करीत होते. या घराण्याच्या मुख्यत: नंदिवर्धन (नगरधन, जि. नागपूर) आणि वत्सगुल्म (वाशीम) अशा दोन प्रमुख शाखा होत्या. उपलब्ध पुरातत्त्वीय साधनांच्या आधारे या दोन शाखांचे ऐतिहासिक अस्तित्व दिसते. वाकाटक राजसत्तेचा परमोच्च सत्ताविस्तार हा प्रवरसेन दुसरा या राजाच्या कालखंडात झाल्याचे अभिलेखीय पुराव्यांवरून स्पष्ट होते. उत्तरेकडे विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेत कुंतल (उत्तर कर्नाटक) देश, तर पूर्वेकडे दक्षिण कोसल (छत्तीसगढ) पासून पश्चिमेकडे कोकणपर्यंत त्यांच्या राज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव जाणवतो. हा भौगोलिक विस्तार वाकाटक कालखंडातील कला समजण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
सातवाहन काळात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र हा सत्तेच्या केंद्रस्थानी होता. परंतु वाकाटक काळात हे सत्तेचे केंद्र पूर्व विदर्भाकडे स्थलांतरित झाल्याचे दिसते. हा प्रदेश अगदी प्रारंभिक काळापासून विविध प्रकारच्या जनजमातींच्या समुदायांनी व्यापलेला होता. या सामाजिक पार्श्वभूमीचा सुद्धा वाकाटक कलेच्या प्रारंभिक शैलीवर प्रभाव पडला असण्याची शक्यता आहे. वरील संक्षिप्तपणे वर्णन केलेल्या भू-राजकीय परिप्रेक्ष्यातच कलाइतिहास तज्ज्ञांनी वाकाटक कलेची निर्मिती, विस्तार व प्रभावाचा विचार केलेला आहे. वाकाटक कला आणि त्या कलेची वैशिष्ट्ये पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे : वाकाटक कलेची पार्श्वभूमी कशी तयार झाली? वाकाटक कलेची मानक वैशिष्ट्ये कोणती? वाकाटक कलेवर समकालीन इतर शैलींचा प्रभाव होता काय? वाकाटक शैलीचा वाकाटकोत्तर कालखंडात प्रभाव कसा आणि कितपत कायम राहिला? या सर्व प्रश्नांचा संक्षिप्त वेध खालीलप्रमाणे घेता येईल.
वाकाटक काळात स्थापत्य कला (लेणी व बांधीव मंदिरे), शिल्पकला, मृण्मयकला, कांस्य शिल्पकला, हस्तिदंत कला आणि चित्रकला इत्यादी कला प्रकार आढळतात. प्रारंभी शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे परिशीलन केले आहे. शिल्पकलेच्या अनुषंगाने वाकाटक कलेचे दोन कालखंड दृग्गोचर होतात. वाकाटक काळातील कलेचा प्रारंभबिंदू म्हणून मांढळ (जि. नागपूर) येथील उत्खननात मिळालेल्या शिल्पांचा विचार करता येईल. या उत्खननात विविध देवदेवतांच्या प्रतिमा मिळाल्या. या प्रतिमा तत्कालीन प्राचीन भारताचा धार्मिक इतिहास आणि दख्खन मधील शिल्पकलेचा संपूर्ण इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

सूक्ष्म अभ्यासांती मांडलेल्या निरीक्षणानुसार असे लक्षात येते की, वाकाटक कलेची वैशिष्ट्ये स्थानिक प्रेरेणेतूनच वृद्धिंगत झालेली असावी. या प्रेरणात्मक भागाची पृष्ठभूमी अमरावती, नागार्जुनकोंडा (आंध्र प्रदेश), वनवासी, कनगनहल्ली (कर्नाटक) आणि तेर (महाराष्ट्र) इ. ठिकाणी उपलब्ध झालेल्या शिल्पांवरून स्पष्ट होते. सुबक ठेंगणा बांधा, विस्तीर्ण खांदे, काहीसी जाड शरीररचना, लंब गोलाकार चेहरा, उठावदार विस्तीर्ण भाल प्रदेश, ओठाचा खालील काहीसा समोर आलेला जाडसरभाग, ठळक रेखीव डोळे, काहीसे पसरट नाक, विविध प्रकारची केशरचना (विशेषत: अगदी प्रारंभिक काळापासून कुरळ्या केसांचा अतिशय कल्पक वापर केशरचना करताना शिल्पकारांनी केलेला दिसतो), जाडेभरडे अधोवस्त्र आणि उत्तरीय, ठळक आणि मोजकेच अलंकार, आयुधे इत्यादी. या शिल्पांच्या आधारावर हे ही लक्षात येते की, तत्कालीन यक्ष प्रतिमांचा या शिल्पकलेवर प्रभाव असावा. त्यासोबतच सातवाहन-ईश्वाकु कालखंडाच्या उत्तर काळात ब्राह्मण आणि बौद्ध धर्मात आमुलाग्र बदल घडून येत होता. या बदलांमुळे विविध प्रतिमांच्या निर्मितीसाठी पोषक प्रेरणात्मक पार्श्वभूमी तयार होत होती. त्याची परमावधी आणि परिणती वाकाटक शिल्पकलेत झालेली आढळते.
मांढळ येथे मिळालेल्या प्रतिमांत अष्टमुख शिव (?), द्वादशमुख शिव (सदाशिव ?), संकर्षण (बलराम), वासुदेव (विष्णू), पार्वती, नैगमेष, देवी (दुर्गा) आणि ब्रह्मा इ. शिल्पांचा समावेश आहे. मध्य भारतात गुप्त साम्राज्याचा विस्तार होत होता. याच काळात (कुषाण/उत्तर कुषाण) सुदूर उत्तरेत मथुरेच्या आसपास आणि त्या लगतच्या प्रदेशात शिल्पकलेच्या संदर्भात आमुलाग्र बदल घडून येत होते. विविध कल्पनांचा वापर या ठिकाणी होत होता. या बरोबरच, याहीपलीकडे गांधार प्रदेशात बौद्ध आणि ब्राह्मण धर्मांच्या प्रतिमा निर्मितीच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग होत होते. वरील तीन मुख्य ठिकाणी प्रयोगांशी काही अंशी स्पर्धा करेल अशा कल्पनांचा वापर वाकाटक शिल्पकलेत दिसतो. या प्रयोगांच्या आधारावरच वाकाटक शिल्पकलेची मानके तयार झालेली असावी. या शिल्पकलेचे संपूर्ण सौंदर्यशास्त्र स्थानिक असल्याचे या आधारावर स्पष्ट होते. कारण या शिल्पांशी तुलना करावी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्ण अभाव या काळात दिसतो. या काळात तयार होत असलेल्या प्रतिमानिर्मितीवर प्रारंभिक काळातील वैष्णव आणि शैव धर्मांच्या संकल्पनांचा मोठा प्रभाव असल्याचे अभ्यासकांनी निदर्शनास आणले आहे.

वाकाटक कलेचा दुसरा आणि महत्त्वाचा कालखंड प्रवरसेन दुसरा याच्या काळात सुरू झाल्याचे दिसते. या काळातील शिल्पकलेचे नमुने रामटेक, पवनार, मनसर, भद्रावती, भटाळा, पातुर, हमलापुरी, नगरधन, अजिंठा, घटोत्कच आणि सालबर्डी (मध्य प्रदेश) इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात. या बदलांचे प्रतिबिंब त्यांच्या तत्कालीन ताम्रपत्रातील मजकुरावरसुद्धा पडल्याचे दिसते. या काळात वाकाटक शिल्पकला मोठ्या प्रमाणात कलेच्या दृष्टीने परिष्कृत झाल्याचे दिसते. आपल्या स्थानिक कलेचे सत्व न विसरता आवश्यक ते बदल या काळात केले गेले. या बदलावर याच काळात उत्तरेत आणि मध्य भारतात जे शिल्पकलेत बदल घडत होते, त्याचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. विशेषत: शिल्पांची प्रमाणबद्धता, सुबक आणि रेखीव शरीर रचना. उदा., पवनार (जि. वर्धा) येथील गंगेची प्रतिमा, गोलाकार चेहरा, सुंदर रेखीव डोळे, तलम वस्त्राचे अंकन, किंचित वाढलेले परंतु, सुबक अलंकरण उदा. मनसर येथील वामनशिव (?) प्रतिमा इत्यादी. या काळात शिल्पांच्या विषयात सुद्धा वैविध्य आढळते. उदा., पवनार येथे खोदकामात मिळालेल्या रामायण आणि कृष्ण लीलांशी संबंधित शिल्पपट. या शिल्पांमध्ये त्या त्या देवतेच्या प्रकृतीधर्मानुसार त्यांचे दर्शन शिल्पकारांनी घडवल्याचे जाणवते. या काळातील शिल्पांमध्ये एक प्रकारचा राजस भाव प्रदर्शित होतो. त्यासोबतच देवदेवतांच्या शिल्प विषयांचे वैविध्य आणि कल्पकता पुरेपूर जपल्याचे दिसते. उपलब्ध प्रतिमांवरून शैव आणि वैष्णव संप्रदायाचे स्थान या काळात दृढ झाल्याचे स्पष्ट होते.
या काळातील शिल्पकलेच्या परमावधीचे मानबिंदू म्हणून काही शिल्पांचा निश्चितच उल्लेख करता येईल. उदा., रामटेक येथील केवल नृसिंह/रुद्र नृसिंह, मनसर येथील वामन शिव (?) आणि पवनार येथील गंगेची प्रतिमा. ही शिल्पे वाकाटक कलेची स्वयंसिद्ध वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यास आणि समग्रपणे समजून घेण्यास पुरेशी आहेत. कलाइतिहास तज्ज्ञांनी या शिल्पांची प्रशंसा केलेली आहे. वरील उल्लेखित प्रतिमांत रामटेक येथील केवल नरसिंहाचे शिल्प वाकाटक राजवंशाच्या राजकीय प्रभाव आणि अस्तित्वाचे उत्कृष्ट उदाहरण ठरते.
वाकाटक काळातील शिल्पे ही मुख्यत: अग्निजन्य आणि वालुकाश्म या दोन प्रकारच्या दगडांत शिल्पांकित केली आहेत. माहुरझरी, पवनार, भोकरदन, मनसर, वाशीम आणि नगरधन आदी ठिकाणी उत्खननात उपलब्ध झालेल्या प्रतिमांत लज्जागौरी, नरसिंह, महिषासुरमर्दिनी, विष्णू, गणपती इ. देवतांच्या दगडाच्या प्रतिमा मिळाल्या आहेत. या सर्व प्रतिमा आकाराने जरी लहान असल्या, तरी शिल्पांकनाच्या दृष्टीने तत्कालीन आकाराने भव्य शिल्पांच्या प्रतिकृती वाटतात. या शिल्पांच्या आधारे प्रचलित लोकधर्मासोबतच शैव आणि वैष्णव संप्रदायाचा कसा प्रसार झाला, हे समजावून घेता येते.
अजिंठा येथील शैलगृहांमध्ये असेलेल्या शिल्पांतून बौद्ध धर्माशी संबंधित शिल्पकलेचा वाकाटक काळात कसा विकास झाला, याचे उत्कृष्ट दिग्दर्शन होते. येथील शिल्पकला वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेच्या साहाय्याने जरी विकसित झाली असली, तरीही तिचा नंदिवर्धन शाखेशी अन्योन्य संबंध आढळतो. उत्कृष्ट उठावात कोरलेली ही शिल्पे प्रमाणबद्धता, शरीर लय आणि बोलके भाव या वैशिष्ट्यांसाठी ओळखली जातात. अजिंठा येथील शिल्पकलेतून होणारे बुद्धाचे विलोभनीय दर्शन वाकाटक काळातील कलेचा परमोत्कर्ष म्हणून उल्लेख केला जातो. विशेषतः बुद्धाचे महापरिनिर्वाण शिल्प बुद्धाच्या महाकारुणिक अवस्थेचे अप्रतिम भावदर्शन म्हणून भारतीय कला क्षेत्रात उदाहरण दिले जाते. याठिकाणी असलेल्या शिल्पांची प्रमाणबद्धता ही तत्कालीन चित्रकलेशी साधर्म्य आणि संवाद साधणारी आहे, असे कलातज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.
या काळात शिल्पकलेची जी वैशिष्ट्ये वृद्धिंगत होत होती, त्या वैशिष्ट्यांचा प्रभाव आणि प्रसार वाकाटकांच्या प्रत्यक्ष अंमलाखाली असलेल्या प्रदेशासोबतच त्यांचे मांडलिक असलेल्या प्रदेशांतील शिल्पकलेवर पडलेले दिसते. उदा., कोकण मौर्य, कदंब, नल, पांडूवंशी, सोमवंशी इ.
वाकाटक सत्तेचा अस्त झाल्यानंतर दख्खनमध्ये वनवासीचे कदंब, बदामीचे चालुक्य, दक्षिण गुजरात, कोकण, माळवा आणि उत्तर महाराष्ट्रात महिष्मतीचे कलचुरी, दक्षिण कोसलमध्ये पांडूवंशी या राजवंशाच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशांत जे स्थापत्य आणि शिल्पकला निर्माण होत होती, या सर्वांवर वाकाटक कलेचा मोठा प्रभाव होता. पुढे राष्ट्रकुट काळात वाकाटक कलेच्या पार्श्वभूमीवर दख्खनमधील कलेचा विस्तार आणि प्रसार झाल्याचे दिसते.
वाकाटक काळात मृण्मय कलेचे स्वतंत्र स्थान होते. परंतु सातवाहन काळात मृण्मय कलेचे प्रयोग झाले, तसे वाकाटक काळात आढळत नाहीत. ज्या मोजक्या मृण्मय प्रतिमा पुरातत्त्वीय सर्वेक्षण आणि उत्खननांतून उपलब्ध झाल्या, त्यावरून या काळातील मृण्मय कलेचे आकलन करता येते. हाताने तद्वतच साच्यात तयार केलेल्या मृण्मय प्रतिमा या काळातील मिळतात. प्रतिमांचा विषय आणि त्यांची घडण यांवर तत्कालीन दगडी शिल्पकलेचा प्रभाव दिसतो. उपलब्ध मृण्मय प्रतिमांत विविध प्रकारचे प्राणी, लहान मुलांची खेळणी, अलंकार, शिक्के, शिक्क्यांचे छाप, गृह सजावटीच्या वस्तू, देवदेवतांच्या प्रतिमा मिळालेल्या आहेत. विशेषतः अलीकडेच मनसर, चंदनखेडा आणि नगरधन येथे झालेल्या उत्खननांतून वाकाटककालीन उत्कृष्ट मृण्मय प्रतिमा उपलब्ध झाल्या आहेत. चंदनखेडा (जि. चंद्रपूर) येथील उत्खननात आढळलेली मृण्मय प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. साच्यात तयार केलेली ही मृण्मय प्रतिमा मूळ स्वरूपात गोलाकार असावी. या प्रतिमेत दर्शनी बाजूस हलक्या उठावात स्त्री आणि पुरुष प्रतिमेचे अंकन असून ते गंधर्व युगल असावे. कारण या अंकनात आकाशस्थ विहरण्याचे प्रतिमांकन अतिशय जिवंतपणे केले आहे. या मृण्मय प्रतिमेवर तत्कालीन चित्रकला आणि शिल्पकलेचाही प्रभाव दिसतो.
वाकाटक काळातील कांस्य शिल्पांचे फार मोजकेच पुरावे उपलब्ध आहेत. या उपलब्ध पुराव्यांमध्ये हमलापुरी (जि. नागपूर) येथे खोदकामात मिळालेल्या कांस्य शिल्पांचा उल्लेख करता येईल. या बुद्ध प्रतिमा असून तत्कालीन कांस्य शिल्पात उत्कृष्ट प्रतिमा म्हणून गणल्या जातात. कांस्य धातूच्या ओतीव प्रकाराद्वारे या प्रतिमांची निर्मिती केली आहे. या कांस्य प्रतिमा सारनाथ (उत्तर प्रदेश) आणि नालंदा (बिहार) येथे प्राप्त झालेल्या कांस्य प्रतिमांशी कलात्मक साधर्म्य दर्शवितात.
वाकाटक काळात इतर कलेच्या प्रकारांमध्ये हस्तिदंतावरील कलाकुसरीच्या वस्तू, हाडांवरील कोरीव काम यांचा उल्लेख करता येईल. या वस्तूंचे प्रमाण तुलनेने फारच कमी आहे. उदा., कज्जलशलाका, सारीपाटच्या खेळातील सोंगट्या, केस विंचरण्याचा कंगवा, चाकू इत्यादी. परंतु कलात्मक दृष्ट्या विशेष उल्लेखनीय असे यांमध्ये आढळून येत नाही.
अशा प्रकारे प्रामुख्याने दोन मुख्य कालखंडात वाकाटक कलेचा विचार करता येतो. मांढळ हे प्रारंभिक काळातील, तर नंदिवर्धन (नगरधन), रामटेक, मनसर इ. ठिकाणी वाकाटक कलेच्या द्वितीय कालखंडातील शिल्पे उपलब्ध झाली. या दोन्ही कालखंडांच्या सूक्ष्म अवलोकनातून वाकाटक कलेचा अभिजाततेकडे झालेल्या प्रवासाचा समग्र अभ्यास करता येतो.
संदर्भ :
- Bakker, Hans, The Vākātakas : An Essay in Hindu Iconology, Groningen, 1997.
- Jamkhedkar, A. P. Eds., Gai, G. S. & Asher, M. ‘Narrative Sculptures from Paunar : A Reappraisal’, Indian Epigraphy ; Its Bearing on the History of Art, pp. 83-86, New Delhi, 1985.
- Sharma, A. K. & Joshi, Jagat Pati, Excavations at Mansar, Delhi, 2015.
- Singh, H. N. & Trivedi, Preety A. Mandhal Excavation (1975-77), Nagpur, 2019.
- Soundara Rajan, K. V. Art of South India-Deccan, Delhi, 1980.
- Welankar, Vaishali, Vaishnavism : An Iconographic Study, 2 vols., Delhi, 2009.
- जामखेडकर, अ. प्र. पुरासंचय (भाग १), पुणे, २०१६.
- मिराशी, वा. वि. वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ, नागपूर, १९५७.
- मेश्राम, प्र. शा.; खोब्रागडे, प्रि. आणि गणवीर, श्रीकांत, भद्रावतीचे पुरातत्त्वीय वैभव, नागपूर, २००४.
चित्रसंदर्भ : केवल नृसिंह शिल्प, रामटेक, जि. नागपूर (डॉ. अभिजित दांडेकर यांच्या सौजन्याने).
नागरा (Nagara)
वाकाटककालीन मंदिर-अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील एक प्राचीन स्थळ. ते गोंदिया जिल्ह्यात, गोंदिया-बालाघाट मार्गावर गोंदियापासून ६ किमी. अंतरावर आहे. नागरा येथील भैरव टेकाडाचे १९७९ ते १९८२ या कालावधीत सलग तीन वर्षे पुरातत्त्वीय उत्खनन केले गेले. यांतील पहिले उत्खनन सलग दोन वर्षे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागातर्फे अ. प्र. जामखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, तर तिसऱ्या वर्षी डेक्कन कॉलेज, पुणे यांच्यासोबत संयुक्तपणे शांताराम भालचंद्र देव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन झाले. या उत्खननांतून वाकाटककालीन मंदिराचे अवशेष उजेडात आले. येथील पुरावशेष १ किमी. त्रिज्येच्या परिसरात विखुरलेले आढळले. त्याचप्रमाणे या टेकाडावर आधुनिक काळात बांधलेले भैरवाचे देऊळ आहे. ही वसाहत तटबंदीयुक्त असल्याचे आढळून आले.
येथील उत्खननात विटांचे बांधकाम असलेल्या वाकाटक काळातील मंदिराचे अवशेष उजेडात आले. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुमारे २७ x ४२ मी. आकाराच्या जगती-सदृश (उंच अधिष्ठान) पीठावर उभारलेले आहे. विटांनी बांधलेल्या पायऱ्या पूर्वेकडे असून प्रवेश-सोपानाच्या दोन्ही बाजूंस दोन देवकोष्ठे (कोनाडे) आहेत व ती सर्व बाजूंनी घडीव रचनेने सुशोभित केलेली आढळतात. मंदिराच्या जगतीवरील वेदिबंध उल्लेखनीय आहे. खुरथरावर कुंभथर असून त्यावर घटांतून बाहेर येणाऱ्या पानांची नक्षी आहे. पीठाच्या दोन्ही बाजूंस निर्गम वा प्रवेशाची सोय आहे. सद्यस्थितीत असलेली २.५ मी. उंचीची जगती हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. गर्भगृह, अंतराळ व मंडप ५१७ चौमी. क्षेत्रफळ असलेल्या जागेत योजिले होते. गर्भगृह ५ चौमी. क्षेत्रफळ आकाराचे होते व याला भूतप्रणाल (पाणी वाहून नेणारी एक प्रकारची तोटी) आहे. भैरव टेकाडावर सापडलेले शिवलिंग याच मंदिराच्या गर्भगृहातील असावे, असा कयास केला गेला. या शिवलिंगाचा वरील भाग गोलाकार, तर खालील भाग चौरस आहे. एकंदर मंदिराचा आराखडा मध्य प्रदेशातील भूमरा येथील शिवमंदिराशी मिळतजुळता आहे. अ. प्र. जामखेडकरांच्या मते, हे मंदिर इसवी सनाच्या ५ व्या शतकातील असावे.
उत्खननातील इतर उपलब्धींपैकी विटांनी बांधलेल्या पाणी साठविण्याच्या टाकीचा उल्लेख महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या पणत्या, दिवे, झाऱ्या यांचे अवशेष व पेटिकाशीर्षक ब्राह्मीलिपीत ‘नारायणो’ असा उल्लेख असलेली स्पटिकमुद्रा सापडली. नागरा येथील पुरावशेषांचा कालखंड इ. स. २५० ते ५५० असा तौलनिक रीत्या निश्चित केला आहे.
संदर्भ :
- Deotare B. C.; Joshi P. S. & Parchure, C. N. Glimpses of Ancient Maharashtra Through Archaeological Excavations, Pune, 2013.
- जामखेडकर, अ. प्र. ‘स्थापत्य व कला – प्रारंभिक ऐतिहासिक कला ते यादव कलाʼ, महाराष्ट्र राज्य गॅझेटियर – महाराष्ट्र इतिहास प्रारंभिक कला , (खंड १ : भाग २), मुंबई, २००२.
विदर्भातील वाकाटककालीन विटांची मंदिरे
वाकाटक हे महाराष्ट्रातील एक प्राचीन व प्रसिद्ध राजवंश. या राजवंशाच्या काळातील मंदिरांचे अवशेष मागील काही दशकांपासून विदर्भातील वेगवेगळ्या भागांत उत्खननाद्वारे उजेडात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे मिळालेल्या शिलालेखामध्ये वाकाटक नृपती पहिला रुद्रसेन याने बांधलेल्या ‘धर्मस्थानाʼबद्दलची माहिती मिळते. ‘धर्मस्थानʼ म्हणजे धार्मिक उपासनेचे स्थळ अथवा मंदिर. वाकाटककालीन मंदिरे विटांची तर आहेतच; परंतु प्रस्तर मंदिरेही आढळतात. विटांनी बांधलेल्या वाकाटककालीन मंदिरांचे अवशेष विदर्भातील मांढळ, मुलचेरा, मनसर, नागरा व वाशिम येथे झालेल्या उत्खननात निदर्शनास आले आहेत. येथील मंदिरांचे अधिष्ठानापर्यंतचे अवशेष उपलब्ध होऊ शकले, मात्र मंदिरांच्या इतर भागांबाबत अंदाज करता आले नाहीत. असे असले तरी तत्कालीन मंदिरस्थापत्याच्या आधारे – उत्तर भारतातील गुप्तकाळातील मंदिरे – या मंदिरांच्या उर्वरित रचनेची कल्पना करता येते. त्याचप्रमाणे ही मंदिरे मंदिरस्थापत्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातील, प्राथमिक (मांढळ, मुलचेरा) तसेच प्रगत अवस्थेतील (नागरा, मनसर, वाशिम) आहेत.

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मांढळ येथे १९७५-७७, १९८५ व १९९२ मध्ये करण्यात आलेल्या उत्खननात तीन मंदिरांचे अवशेष प्राप्त झाले. बोंगी हुडकी, भोला हुडकी व वऱ्हाडी तलाव या नावाने ही ठिकाणे ओळखली जातात. येथील पहिली दोन मंदिरे शेजारी, तर तिसरे ५०० मी. अंतरावर आहे. बोंगी हुडकी येथील मंदिररचनेत गर्भगृह व मुखमंडप असलेल्या मध्यम आकाराच्या मंदिराचे अवशेष उपलब्ध झाले. शेजारील भोला हुडकी या ठिकाणी आयताकृती ओटा असून त्याच्या अरुंद बाजू दक्षिणोत्तर आहेत. दक्षिण व उत्तरेकडे ओट्यावर जाण्यासाठी जिने आहेत. या मंदिरापुढे खाली अरुंद होत जाणारे पाच फुटांहून अधिक खोलीचे एक कुंड आहे. मंदिराजवळच पुजाऱ्यांची घरे असावीत. या सर्व वास्तूंभोवती प्राकार होता. प्राकाराच्या आत शैव व वैष्णव मूर्ती भग्नावस्थेत एकाच खड्ड्यात आढळल्या. वऱ्हाडी तलाव येथील मंदिररचनेत गर्भगृह आणि त्यात प्रवेशासाठी पायऱ्या होत्या. सोपानाला ४·४९ मी. लांबीचा कठडा आहे. कठड्याच्या उभ्या बाजूंना नंतरच्या काळात वालुकाश्म घडीव चिरे लावलेले आढळतात. ही चिऱ्यांची भिंत प्रणालकाच्या पातळीपर्यंत आहे. उत्खननादरम्यान प्रतिहारीचे व सिंहाचे शिल्प तसेच गर्भगृहात शिवलिंग सापडले. या मंदिराचा काळ इ. स. चौथे–पाचवे शतक असा ठरतो.
गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे १९८७-८८ आणि १९८८-८९ या काळात झालेल्या उत्खननात दोन मंदिरांचे अवशेष उजेडात आले. गावाच्या सीमेलगत असलेल्या टेकाडातील (विवेकानंदपूर) उत्खननात मंदिराच्या तलविन्यासावरून मुखमंडप व त्याला लागून गर्भगृह अशी रचना दिसून आली. या मंदिराचे पीठ बांधताना पवनी येथील स्तूपामध्ये (जगन्नाथ टेकडी) अंमलात आणलेल्या तंत्राचा प्रभाव असल्याचे दिसून आले. दुसऱ्या मंदिराचे अवशेष विशेष उल्लेखनीय नाहीत.
नागपूर जिल्ह्यातील मनसर (ता. रामटेक) येथे गावापासून पूर्वेला १ किमी. अंतरावर प्राचीन काळातील विटांनी बांधलेली चार मंदिरे हिडिंबा टेकडीच्या उत्खननात उजेडात आली (१९९८–२००८). उत्खनकांच्या मते, यांतील भव्य शिवालय व शिवमंदिर समूह ही दोन मंदिरे ही वाकाटक काळातील होत, तर दुसरी दोन मंदिरे वाकाटकपूर्व काळातील असावीत. या मंदिरांच्या गर्भगृहांचा तलविन्यास तारांकित असून इ. स. दुसऱ्या शतकातील ही सर्वांत प्राचीन मंदिरे होत.
भव्य शिवालय : या मंदिराचे अवशेष हिडिंबा टेकडीच्या माथ्यावर पश्चिमेला निदर्शनास आले. पाषाणाची पायाभरणी केलेल्या या मंदिराच्या वास्तुरचनेचे दोन टप्पे आढळतात. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरास पूर्वेकडे अर्धमंडपास (४·३०×८ मी.) प्रवेशाकरिता पायऱ्या होत्या. अर्धमंडपाच्या पश्चिमेला मंडप (६×५ मी.) व त्यालगत गर्भगृहाचे (५×५ मी.) अवशेष आढळले. हे गर्भगृह फरश्यांनी आच्छादले होते, तर फक्त मंडपाच्या जोत्याचे बांधकाम पाषाणात केले होते. गर्भगृह व मंडपाभोवती २ मी. रुंद प्रदक्षिणापथ होता. मंदिराचा वरचा भाग विटांनी बांधलेला तसेच अलंकारित केलेला असावा, असे अनुमान करण्यात आले. त्याचप्रमाणे वाकाटक काळातील शिल्पपरंपरेतील शिल्पेही उत्खननात सापडली. या मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती याच मंदिराच्या नैर्ऋत्य भागातून १९७० साली सापडलेल्या प्रख्यात शिवाची (वामनठेवणीची) असावी. तसेच हे मंदिर वाकाटक नृपती प्रवरसेन (पहिला) याने बांधले असावे, तर प्रवरसेन (दुसरा) याने आपल्या आजोबांच्या (प्रवरसेन पहिला) स्मरणार्थ याचे पुनर्नामांकन केलेले ‘प्रवरेश्वर देवकुलस्थानʼ असावे, असे अनुमान उत्खनकांनी केले आहे.
शिवमंदिर समूह : वाकाटक काळातील दुसरे विटांचे भव्य मंदिर फक्त जोत्याच्या अवशेषरूपाने हिडिंबा टेकडीच्या उत्तर-नैर्ऋत्य-पश्चिम उतारावर आढळले. या मंदिराच्या वास्तुरचनेसंदर्भात दोन टप्पे दिसून आले. टेकडीची नैसर्गिक रचना कायम राखण्याकरिता बांधलेल्या विराट भिंतीच्या साहाय्याने टेकडीच्या माथ्यावर सपाट चौथरा करून त्यावर हे मंदिर उभारले गेले. या मंदिराच्या पहिल्या टप्प्यात मुख्य मंदिराच्या भोवती जोत्यावर लहान लहान २ मी. उंचीची प्रतिमागृहे (shrines) व त्यात देवकोष्ठे (niches) होती. ही अष्टकोनी पन्हाळीसदृश वास्तुरचना असलेली प्रतिमागृहे कौशल्यपूर्ण नियोजनातून तीन स्तरांवर निर्माण केली गेली व तेथे जाण्याकरिता पायऱ्या केल्या गेल्या. या मंदिरसमूहाची प्रतिमागृहे ऊर्ध्वरेषेत संकल्पित केली गेली. ही प्रतिमागृहे कमळाच्या कळीचा आकारात व भौमितिक त्रिकोणांचा कल्पकतेने वापर करून प्रतिमागृहांच्या शिखराचे प्रयोजन केलेले आढळते. उत्तरेकडील काही प्रतिमागृहांतून काही प्रतिमांचे भग्नावशेष मिळाले, तर पश्चिम आणि दक्षिणेकडील सोळा प्रतिमागृहांपैकी सहांमध्ये वैविध्यपूर्ण शिवलिंगे आढळून आली. पुरातत्त्वज्ञ अरविंद जामखेडकर यांच्या मते, वाकाटक काळातील ही मंदिरे पाशुपत संप्रदायाशी निगडित असावीत.
गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथील भैरव टेकडीवर १९७९-८२ दरम्यान उत्खनन केले गेले. यात भव्य वेदिबंध असलेल्या जगतीमध्ये (२७×४२ मी.) पूर्वाभिमुख मंदिरात पूर्वेकडे पायऱ्यांची रचना केली होती. पीठाचा पश्चिम भाग व्यापणाऱ्या गर्भगृहाच्या (५ चौमी.) आतबाहेर जाणाऱ्या बाह्यरेषेचे काही भाग पीठाच्या थरांवरही दिसून येतात. टेकाडाच्या पृष्ठभागावर आढळलेले शिवलिंग याच मंदिरातील असल्याचे मानले जाते.
येथील मंदिररचनेमध्ये भूतप्रणाल असलेल्या गर्भगृहाव्यतिरिक्त अंतराळ व मंडपाचे अवशेष सापडले. मंडपात जाण्याकरिता पायऱ्या व त्यांच्या दोन्ही बाजूंना छोटेखानी देवळे होती. वैशिष्ट्यपूर्ण जगतीवरील वेदिबंधात खूर थराच्या वर कुंभ थर असून त्याच्यावर साध्या चौरस अर्धस्तांभानी बनलेले देवकोष्ठ आहेत. मध्यप्रदेशातील भूमरा येथील शिवमंदिराशी साधर्म्य असलेले हे मंदिर इ. स. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले असावे.
वाशिम येथे १९९१-९२ आणि १९९४-९५ या काळात झालेल्या उत्खननांत दोन मंदिरांचे अवशेष उजेडात आले. यांतील पहिल्या उत्खननात फुकटपर भागात तारांकित तलविन्यास असलेले मंदिराचे १४×१२ मी. अंडाकृती आकाराचे बांधकाम निदर्शनास आले. इंग्रजीतील ‘एलʼ आकाराच्या विटांचा कौशल्यपूर्ण वापर करून मंदिराच्या पदविन्यासाचा तारांकित आकार प्राप्त केलेला आढळतो. एकूणच वास्तूच्या मधोमध अष्टकोनाकृत चौरस संरचना होती; त्यात शिवलिंग असण्याची शक्यता वर्तविली आहे. तारांकित तलविन्यास प्रकारच्या मंदिरविकासाची प्राथमिक अवस्था हे मंदिर सूचित करते.
वाशिममधील लाल देऊळ भागात झालेल्या उत्खननात (१९९४-९५) मंदिराच्या ७० मी. पूर्व-पश्चिम प्राकारालगत चार वास्तुशेष आढळले. त्यांतील एक अंडाकृती असून त्याचा तलविन्यास तारांकित असला, तरी तो बहुकोनविरहित आहे. येथील मंदिररचनेमध्ये अष्टकोनी गर्भगृह आणि आयताकार मुखमंडपाचे पुरावशेष निदर्शनास आले.
संदर्भ :
- Jamkhedkar, A. P. Ed., Doshi, S. ‘Ancient Structuresʼ, Marg, Vol. 37, Bombay, 1983.
- Sharma, A. K. & Joshi, Jagatpati, Excavations at Mansar, Delhi, 2015.
- Singh, H. N. & Trivedi, Preety A. Eds., Mandhal Excavations (1975-77), Nagpur, 2019.
- जामखेडकर, अ. प्र. ‘स्थापत्य व कला – प्रारंभिक ऐतिहासिक काळ ते यादव काळʼ, महाराष्ट्र : इतिहास – प्राचीन काळ (खंड : १, भाग : २), महाराष्ट्र राज्य गॅझिटिअर, मुंबई, २००२.
मनसर (Mansar)
विदर्भातील वाकाटक कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ. हे स्थळ नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी. अंतरावर ईशान्येस वसले आहे. या स्थळाची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५ मी. इतकी आहे. सातपुडा आणि अंबागड पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे पसरलेल्या कमी उंचीच्या नैसर्गिक टेकाडावर प्राचीन काळातील स्थापत्याचे अवशेष विखुरलेले दिसतात. वा. वि. मिराशी यांच्या मते, या स्थळाच्या उत्तरेस असलेल्या तलावाच्या ‘मणीकालसरʼ या नावावरून या स्थळाला मनसर असे संबोधले जाते. रामटेकच्या लक्ष्मण मंदिरातील यादव राजा रामचंद्रांच्या शिलालेखात या स्थळाचा उल्लेख मणीकालकुंड असा येतो, तर सिंदूरगिरी माहात्म्य आणि महानुभावांच्या स्थान पोथीमध्ये यास अनुक्रमे मणीकाल आणि माणसील असे संबोधले जात होते.

ऐतिहासिक व पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून मनसर या स्थळाचे सर्वप्रथम सर्वेक्षण टी. वेलस्टेड याने १९२८ मध्ये केले. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमधील १९३३ च्या संशोधन प्रपत्रात मनसर येथील वाकाटककालीन पुरावशेष, स्थापत्य आणि हिंदू व बौद्ध धर्माशी निगडित वास्तू इत्यादीचे वर्णन वेलस्टेडने केले आहे. या स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन १९८९ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाने केले. या नंतर १९९४-९५ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, उत्खनन शाखा क्र. १, नागपूरतर्फे आणि अलीकडील उत्खनन बोधिसत्व नागार्जुन स्मारक संस्थेच्यावतीने जगत पती जोशी आणि अरुण शर्मा यांच्या संयुक्त निर्देशनाखाली १९९७ पासून नऊ सत्रामध्ये विस्तृत प्रमाणात करण्यात आले.
उत्खननांती मनसर येथे सातवाहन, वाकाटक आणि विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी शासन केल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. मनसर येथे स्थापत्य परंपरेची सुरुवात सातवाहन काळात झाली (इ. स. पू. २०० ते इ. स. २५०) असावी. मनसरच्या टेकाड क्र.१ मधील उत्खननात सर्वांत खालच्या स्तरात राजप्रासादाचे अवशेष मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे मत आहे. विटांनी बांधलेल्या या विस्तीर्ण राजप्रासादाचा आकार पूर्व-पश्चिम ५१ मी. तर उत्तर-दक्षिण ४४ मी. इतका होता. प्रासादात राहण्याकरिता अनेक लहान-मोठ्या खोल्या होत्या. राजप्रासादाच्या सुरक्षेकरिता चारही बाजूंनी विटांची संरक्षक भिंत देखील बांधली होती. राजप्रासादाच्या पश्चिमेकडे भव्य मंडप असून याचे आकारमान लांबी २३ मी. आणि रुंदी १९.५० मी. इतके आहे. या विशाल मंडपात विटांनी निर्मित ४२ चौकोनी स्तंभ एकमेकांशेजारी (२.२० मी. अंतरावर) स्थित आहेत. मंडपाच्या सभोवताल विटांच्या भिंतीचे पुरावे उत्खननात मिळाले आहेत. तसेच मनसर येथील हिडिंबा टेकडी (उत्खनन स्थळ क्र.३) परिसरात दोन बौद्ध स्तूपाचे आणि एका चैत्याचे अवशेष प्राप्त झाल्याचे उत्खननकर्त्यांनी नमूद केले आहे. स्थापत्याच्या अवशेषाव्यतिरिक्त सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचे नाण्याचे साचे, लाल चकाकीयुक्त खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, रोमन मद्यकुंभ (अम्फोरा), लज्जागौरी आणि कार्तिकेय यांचे शिल्प आणि लोह उपकरणे आदी प्राप्त झाली आहेत.
सातवाहनांच्या अस्तानंतर मनसर येथे विदर्भातील आद्य नरेश वाकाटकांनी प्रत्यक्ष शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत (इ.स. २५० ते ५५०). सातवाहन काळातील काही स्थापत्य अवशेषांवर वाकाटक काळात बांधकाम करण्यात आले आणि उर्वरित बांधकामाला भर टाकून समतल करण्यात आले. उत्खननकर्त्यांच्या मते, वाकाटक काळातील राजप्रासादाचे अवशेष हे वाकाटक नृपती प्रवरसेन द्वितीय (इ.स. ४१०–४४०) याच्या काळातील असावे, कारण या राजाने नंदीवर्धन (सध्याचे नगरधन) येथून राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतर केली होती. उत्खननकर्त्यांनी मनसरची ओळख प्राचीन ‘प्रवरपूरʼ म्हणून केली आहे. वाकाटक काळातील राजप्रासाद तीन मजली असून आकाराने भव्य होता. यामध्ये पश्चिमेकडून पायऱ्याद्वारे प्रवेश करता येत होता. राजप्रासादामध्ये अतिथी कक्ष, सभागृह व त्याला परस्पर जोडलेल्या खोल्या अशी एकूण राजप्रासादाची रचना होती. तसेच प्रासादात लहान-मोठ्या अनेक खोल्या एकमेकांशेजारी बांधलेल्या होत्या. राजप्रासाद आणि त्यामधील कोनाडे व अर्धस्तंभ, चुन्याचा गिलावा आणि चित्रांनी अलंकृत केला होता. राजप्रासादाच्या बाहेर देखील अनेक खोल्यांचे अवशेष आढळले आहेत. इ. स. ४९३ मध्ये नल राजांनी वाकाटक साम्राज्यावर केलेल्या आक्रमणात प्रवरपूर येथील प्रासादाला जाळल्याचे आणि नष्ट केल्याचे पुरावे मिळाल्याचे उत्खननकर्त्यांचे म्हणणे आहे. उत्खननकर्त्यांना याच स्तरात कूर्मचिती, श्येनचिती व त्या संबंधित पुरुषमेध यज्ञाचे अवशेष आढळले आहे. उत्खननात वाकाटक काळातील अनेक मुद्रा आणि मुद्रांके प्राप्त झाली असून त्याद्वारे वाकाटकांच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. प्रवरसेन द्वितीयची पेटिका-शीर्षक लिपीत लिहिलेली ‘प्रवरस्यʼ मुद्रांक विशेष महत्त्वपूर्ण असून वाकाटक राजा प्रवरसेन द्वितीयने राजधानी प्रवरपूर येथे स्थलांतरित केल्यानंतर या मुद्रांकाचा वापर केला असावा. वाकाटक काळातील अभ्रकयुक्त लाल रंगाची, लाल चकाकीयुक्त आणि साधी लाल रंगांची खापरे उत्खननात मोठ्या प्रमाणात मिळाली आहेत.
वाकाटकांनंतर मनसरवर विष्णूकुंडीन राज्यकर्त्यांनी काही काळ शासन केल्याचे पुरावे मिळाले आहेत. विष्णूकुंडीन काळातील स्थापत्य अवशेष मनसर येथील वाकाटक काळाच्या अवशेषांवर मिळाले. या काळातील बौद्ध स्तूप आणि विहाराचे अवशेष सर्वांत वरच्या स्तरात प्राप्त झाले आहेत. वाकाटकांच्या भव्य राजप्रासादाचे रूपांतर नंतर बौद्ध स्तूप आणि विहारात झाले असावे. राजप्रासादाच्या खोल्यांचा उपयोग बौद्ध भिक्खुंच्या निवासाकरिता होत होता. विष्णूकुंडीन नरेश महेंद्रवर्मन द्वितीयची तांब्याची नाणी हिडिंबा टेकडी परिसरात मिळाली आहेत. लाल रंगाची खापरे, अभ्रकमिश्रित लाल रंगाची खापरे, काळी चकाकीयुक्त खापरे, दगडी पाटे-वरवंटे, लोह आणि ताम्र उपकरणे इ. मिळाली आहेत.
मनसर येथील उत्खननात वाकाटक काळातील अनेक मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. येथील मंदिरे प्रामुख्याने शैव पंथीय असून केवळ एक वैष्णव (नरसिंह) मंदिर होते. हिडिंबा टेकडीवरील मंदिराला विद्वानांनी प्रवरसेन द्वितीयच्या ताम्रपत्रात उल्लेखित प्रवरेश्वरदेवकुलस्थान ‘प्रवरेश्वरʼ मंदिर मानले आहे. मनसर येथील नैसर्गिक गुहेत विटांचे बांधकाम करून शिवलिंग प्रस्थापित केले होते, तसेच जाडजूड संरक्षण भिंतीच्या पश्चिम आणि उत्तर-दक्षिणेस लघु आकारांच्या अनेक देवकुलिकात शिवलिंगे मिळाली आहेत. मनसर येथे आणखी एका विटांनी बांधलेल्या ताराकृती आकाराच्या शैव मंदिराच्या जोत्याचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
मनसर हे वाकाटक काळातील शिल्प परंपरेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. वाकाटकांच्या काळातील अन्य कोणत्याही स्थळापेक्षा जास्त प्रमाणात शिल्पे मनसर येथून प्राप्त झाली आहेत. यात प्रामुख्याने शैव देव-देवता यांची शिल्पे असून गण, यक्ष, किन्नर, प्राणी, साधू आणि स्त्री-पुरुष इत्यादींचे अनेक शिल्पे सुद्धा मिळालेली आहेत. भारताच्या राजधानीच्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयामधील प्रवेशद्वाराच्या मुख्य कक्षात प्रदर्शित ‘शिव-वामनʼ चे अद्वितीय शिल्प मनसर येथील शिल्प कलेचा परमोच्च बिंदू आहे. मनसर येथील यक्ष, विद्याधर, किन्नर इ. शिल्पांचे अजिंठा येथील चित्रांशी समरूपता दिसून येते, म्हणूनच प्रसिद्ध विद्वान हान्स बाकर यांच्या मते, मनसरची कला आणि अजिंठा येथील चित्रकला यांमध्ये विलक्षण साम्य आहे.
मनसर हे वाकाटक काळातील राजधानीचे ठिकाण म्हणून विशेष महत्त्वाचे असल्याचे उत्खननात प्राप्त झालेल्या विविध पुराव्यांवरून सिद्ध होते. मनसर येथून प्राप्त ताम्रपत्र, शंख लिपीतील लेख, धार्मिक पुरावशेष, सुंदर शिल्पे आणि भव्य स्थापत्यावरून वाकाटक काळातील राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थिती तसेच कला, स्थापत्य आणि धर्म इत्यादींविषयी नवीन माहिती समोर आली; तथापि उत्खननकर्त्यांनी येथील उत्खननाबाबतीत नमूद केलेल्या कालानुक्रमातील आणि काही अवशेषांवरील स्पष्टीकरणासंदर्भात इतर विद्वानांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
संदर्भ :
- Bakker, Hans, ‘Religion and Politics in the Eastern Vakataka Kingdomʼ, South Asian Studies, Vol. 18, pp. 1-25. 2002.
- Indian Archaeology: A Review, Archaeological Survey of India, New Delhi, 1994-95.
- Joshi, Jagat Pati & Sharma, A. K. ‘Excavations at Mansar, Distt. Nagpur, Maharashtra-1997-2000ʼ, Puratattva : Bulletin of the Indian Archaeological Society, no. 30, 127-131, 1999-2000.
- Sharma, A. K. Further Excavations at Mansar, B. R. Publishing Corporation, Delhi, 2013.
विदर्भातील किल्ले (Forts in Vidarbha)
महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो. विदर्भातील किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. पवनी आणि आदम या दोन ठिकाणी झालेल्या उत्खननात भुईकोट किल्ल्याच्या बांधणीचे पुरावे मिळालेले आहेत. पुढे मध्ययुगीन कालखंडात म्हणजे इ. स. १२-१३ व्या शतकात राजकीय घडामोडींमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर किल्ले बांधणीला सुरुवात झाली. विदर्भात जवळजवळ असे एकूण ३० किल्ले आहेत. हे किल्ले दोन प्रकारांत बांधण्यात आले आहेत. यांतील काही किल्ले हे उंच टेकडीवर आहेत, ज्याला आपण गिरिदुर्ग म्हणतो तर काही किल्ले हे जमिनीवर म्हणजेच भुईकोट प्रकारात बांधलेली आहेत.

मध्ययुगीन व उत्तर मध्ययुगीन काळात विदर्भावर वेगवेगळ्या राजवंशांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या व किल्ले बांधले. अंदाजे १२-१३ व्या शतकात पूर्व विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी विदर्भात वैरागड, गडबोली, राजोली, माणीकगड, सुरजागड इत्यादी ठिकाणी किल्ल्यांची बांधणी केली. किल्ल्यांच्या स्थापत्य कलेतून त्यांच्या बांधणीचा कालखंड निदर्शनास येतो. या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर नागांचे शिल्पांकन कोरलेले आहेत. त्यामुळे हे किल्ले नागवंशी राजांनी बांधले असावेत, असा समज आहे. माणीकगड हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. हा किल्ला आकाराने मोठा असून त्याची तटबंदी ही फार लांबवर पसरलेली आहे. किल्ल्यातील स्तंभ, कमानी, मेहरपी अगदी सुबक अशा कलाकुसरीने बनविलेल्या आहेत. वैरागड, सुरजागड, इत्यादी किल्यांची केवळ तटबंदी शिल्लक असलेली आढळून येते.
गोंड राजवटीचा उदय इ. स. १३ व्या शतकाच्या मध्यार्धात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. वैरागड, माणीकगड व सुरजागड हे किल्ले गोंडानी आपल्या ताब्यात घेऊन त्याचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख आहेत. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांनी बांधलेले किल्ले या भागात जास्त प्रमाणात आढळतात. बल्लारशहा, चंद्रपूर आणि नागपूर ही शहरे त्यांची राजधानीची ठिकाणे होती. बल्लारशहा हा किल्ला वर्धा नदीच्या उत्तर तीरावर स्थित आहे. हा किल्ला चंद्रपूर येथील किल्ल्याच्या तुलनेत आकाराने लहान असून किल्ल्याची तटबंदी व बुरुजे मजबूत स्थितीत आहेत. आतील भागांत काही बांधकामे निदर्शनास येतात, परंतु ती मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहेत. चंद्रपूर हा किल्ला आकाराने मोठा असून या किल्ल्यात मोठ्या प्रमाणात आधुनिक वसाहत निर्माण झाली आहे. किल्ल्याची तटबंदी व बुरुज काही भागांत सुस्थितीत आहेत.
गोंड राजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कोरीव काम असलेले अतिशय सुबक प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावरील हत्तीवर आरूढ सिंहाचे शिल्पांकन हे गोंड राजवटीचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. नगरधन, देवळापार, देऊळगाव, भद्रावती, रामटेक, नागपूरचा गोंडराजाचा किल्ला, आमनेर किल्ला, महदागड किल्ला, पवनीचा किल्ला, वैरागड किल्ला, माहुरगड, अंबागद, भिवगड, गडबोली किल्ला इत्यादी गोंडकालीन किल्ल्यांचे अवशेष आज विदर्भात पाहायला मिळतात. या किल्ल्यांची आज मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असून सध्या केवळ तटबंदी व प्रवेशद्वारे सुस्थितीत आहेत.
१३ व्या शतकात खिलजीच्या आक्रमणानंतर महाराष्ट्रात मुस्लीम राजवटीचा उदय झाला व पश्चिम विदर्भावर त्यांनी आपली सत्ता स्थापन केली. खिलजी, तुघलक आणि बहमनी राजसत्तांनी काही किल्ल्याची बांधणी केली. त्यामध्ये गाविलगड, नरनाळा, बाळापूर इत्यादी किल्ल्याचा समावेश होतो. गाविलगड हा किल्ला गवळी लोकांनी बांधला, अशी अख्यायिका स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु या संदर्भात कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. मुजाहिद वंशाच्या अहमदशहा वली पहिला यांनी गाविलगड किल्ला निर्माण केल्याचा उल्लेख फार्सी इतिहासकार फिरिश्ता करतो.
गाविलगड हा किल्ला उत्तरेतून दख्खनमध्ये येणारा जो मार्ग होता, त्या मार्गावर बांधण्यात आलेला होता. त्यामुळे या किल्ल्याला दख्खनचे प्रवेशद्वार मानले जात असे. उत्तरेतून येणाऱ्या मुस्लीम सरदारांना दख्खनमध्ये प्रवेश करताना काही प्रमाणात संघर्षाला सामोरे जावे लागत असे. हा किल्ला नंतरच्या काळात बहमनी, निजामशाही, इमादशाही यांच्या अधिपत्याखाली होता. शेवटी १८ व्या शतकात भोसल्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्याची नोंद उपलब्ध आहे. या किल्ल्याच्या तटबंदीत वेगवेगळ्या राजवटीत वाढ झाली व आतील भागांत अनेक बांधकामे केलेली आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने मशीद हे उत्तम उदाहरण आहे. याच भागात नरनाळा नावाचा किल्ला आहे. हा किल्ला दहाव्या शतकात गोंडानी बांधला, असे म्हटले जाते. पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धात अहमदशहा वली याच्या काळात या किल्ल्याचे नुतनीकरण झाल्याची नोंद सापडते. नंतरच्या काळात मोगलांनी हा किल्ला जिंकून घेतला.
नागपूरकर भोसल्यांनी १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात विदर्भावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून अनेक किल्ल्यांचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात. त्यामध्ये नगरधन, पवनी, रामटेक, गाविलगड इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात मुस्लीम राजवटींना सत्ता स्थापन करताना अनेक लढायांना सामोरे जावे लागले. त्यामुळे मुस्लीम व मराठा काळातील किल्ले अतिशय मजबूत, तसेच शत्रूच्या आक्रमणापासून सावध राहण्याकरिता केलेल्या सर्व उपाययोजनांनी युक्त आहेत. पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात भुईकोट प्रकारातील किल्ले निदर्शनास येतात. हा भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. या भागावर येथील स्थानिक गोंड राजांनी राज्य केले. गोंड राजांनी सुरुवातीपासून वेगवेगळ्या काळात मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पतकरल्यामुळे फार कमी प्रमाणात युद्धाला सामोरे जावे लागत असे.
संदर्भ :
- चितळे, श्रीपाद, विदर्भातील किल्ले, नागपूर, २००९.
- राजूरकर, अ. ज. चंद्रपूरचा इतिहास, चांदा (चंद्रपूर), १९५४.
अडम (Adam)
नागपूर जिल्ह्यातील पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ वैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसले असून वाघोर नदीच्या उजव्या तीरावर आहे. या स्थळाचे क्षेत्रफळ उत्तर-दक्षिण ८०० मी. आणि पूर्व-पश्चिम ५०० मी. इतके आहे. हे पुरास्थळ सभोवताल तटबंदीने वेढलेले असून याची जमिनीपासून सरासरी उंची ८ मी. इतकी आहे. या स्थळाचे उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, विभागाच्या नागपूर उत्खनन शाखेच्या वतीने सन १९८८ ते १९९२ या पाच सत्रांत अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अडम हे विदर्भातील आजपर्यंतचे सर्वांत विस्तृत पुरातात्त्विक उत्खनन आहे.

अडम येथील उत्खननात मध्याश्मयुगापासून ते ऐतिहासिक काळापर्यंतचे प्रमाण प्राप्त झाले असून येथील सांस्कृतिक स्तरक्रमाचे विस्तृत विवरण खालीलप्रमाणे :
कालखंड – १ : मध्याश्मयुग. या कालखंडात दगडाची विविध प्रकारची पाती, वेधण्या, लहान भूमितीय आकाराची (त्रिकोण, समांतर-द्विभुज-चौकोन, चंद्रकोर इ.) सूक्ष्म दगडी हत्यारे प्राप्त झाली आहेत. ही हत्यारे चाल्सिडोनी, अगेट, कार्नेलिअन यांसारख्या उत्तम पोताच्या गारगोटीच्या छिलक्यांपासून बनलेली आहेत. मृद्भांड्याचे कोणतेही पुरावे या कालखंडात प्राप्त झाले नाहीत. वर्तुळाकार झोपडीचे वासे उभे करण्यासाठीच्या पाच खड्ड्यांचे पुरावे मिळाले. उत्खनकांनी मध्याश्मयुगीन कालखंड इ. स. पू. ५००० ते इ. स. पू. २००० इतका निश्चित केला आहे.
कालखंड – २ : विदर्भ ताम्रपाषाण संस्कृती. या स्तरामध्ये आढळलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मृद्भांड्यांवरून या कालखंडाला ‘विदर्भ ताम्रपाषाण संस्कृतीʼ असे नाव दिलेले आहे. ही मृद्भांडी प्रामुख्याने लाल रंगाची असून यावर विविध रंगाचा लेप दिलेला आढळतो, तसेच खापराच्या बाह्य भागावर पांढऱ्या आणि काळ्या रंगाने चित्रकाम केल्याचे दिसून येते. या सोबतच काळ्या-आणि-तांबड्या रंगाची व काळी लेपयुक्त खापरे देखील मिळाली आहेत. यांमध्ये मडकी, विविध आकाराची वाडगी, थाळ्या, लहान भांडी इ. प्रामुख्याने आढळतात. मध्याश्मयुगीन काळाप्रमाणेच ताम्रपाषाणयुगीन लोकांनी दगडी हत्यारांचा उपयोग केला होता. हे लोक साध्या लाकडी वासे आणि छप्पर असलेल्या कुडाच्या घरात राहात. उत्खननात एका वर्तुळाकाराच्या आकारच्या घराचे आणि मातीने सारवलेल्या जमिनीचे पुरावे मिळाले आहेत. नवाश्युगीन काळातील दोन दगडी कुऱ्हाडी मिळाल्या असून त्या बहुधा धार्मिक प्रयोजनाकरिता वापरण्यात येत असाव्यात. या काळातील पुरावशेषांमध्ये तांब्याच्या बांगड्या, हाडांची अवजारे इ. प्रमुख आहेत. रेडिओ कार्बन कालमापन तिथीनुसार या कालखंडाला इ. स. पू. १७५० ते इ. स. पू. १४२५ इतका ठरविण्यात आले आहे.
कालखंड – ३ : लोहयुग. उत्खननकर्त्यांनी लोहयुगाला दोन टप्प्यांत विभागले आहे. लोहयुगाच्या प्रथम टप्प्यात लोखंडाचा सर्वप्रथम वापर सुरू होऊन लोखंडाची अनेक अवजारे प्राप्त झाली आहेत. या टप्प्यातील खापरे प्रामुख्याने लाल रंगाची असून सोबत काळ्या रंगाची आणि महापाषायुगीन संस्कृतीची काळी-आणि-तांबड्या रंगाची खापरे देखील आहेत. खापरांवरील लाल लेपामध्ये अभ्रकाचा सर्रास वापर लक्षणीय आहे. लाल रंगांच्या भांड्यावर पांढऱ्या किंवा काळ्या रंगाने चित्रे काढलेली खापरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुरावशेषांमधे तांब्याच्या, शंखाच्या आणि हाडांच्या वस्तू, अर्धमौल्यवान दगडी मणी, मृण्मय मणी, पांढऱ्या रंगात नक्षी केलेले कार्नेलिअनचे मणी इ. प्रमुख आहेत.
लोहयुगाच्या द्वितीय टप्प्यात काळ्या-आणि-तांबड्या रंगाच्या खापरांमध्ये वाढ झालेली दिसली व लाल रंगाच्या खापरांची संख्या कमी झाली होती. सोबतच पांढऱ्या रंगात चित्रे काढलेली खापरे या टप्प्यात मिळाली नाहीत. लाल लेपावर काळ्या रंगाने चित्रकारी केलेली खापरे, लोखंडाची बहुउपयोगी उपकरणे आणि हत्यारे, तांब्याची उपकरणे, अर्धमौल्यवान दगडी मणी, पांढऱ्या रंगात नक्षी केलेले कार्नेलिअनचे मणी, मृण्मय मणी आणि पक्षी शिल्पे, शंखाच्या बांगड्या इ. अवशेष बहुसंख्येने मिळाले आहेत. या कालखंडातील लोकांच्या आयताकृती आणि वर्तुळाकार आकाराच्या घरांचे अवशेष प्राप्त झाले आहे. काही वर्तुळाकार घरांसमोर मोकळी जागा (porch) असल्याचे प्रमाण आढळले आहेत. रेडिओ कार्बन कालमापन तिथीनुसार अडम येथील लोहयुगाचा कालावधी इ. स. पू. १४०० ते इ. स. पू. ७०० इतका निर्धारित केला आहे.
कालखंड – ४ : मौर्य आणि शुंग काळ. या कालखंडात अडमच्या सांस्कृतिक स्तरक्रमात विशेष बदल दृष्टिगोचर होत असून, काही नवीन वस्तू आणि पद्धतीचा प्रथमत: उपयोग दिसून येतो. या कालखंडात घरबांधणीकरिता पहिल्यांदा विटांचा वापर केलेला दिसला. या काळात घरांचा आकार वर्तुळाकार न राहता चौकोनी आणि आयताकृती झाला होता. पाण्याकरिता विटांनी बांधलेल्या विहीरी आणि छतावर कवेलूच्या आच्छादनाचा उपयोग याच काळात सुरू झाला असून, नाण्यांचा पुरावा याच काळापासून मिळतो. या कालखंडात मिळालेली उत्तरेकडील काळी झिलईदार खापरे वैशिष्ट्यपूर्ण असून सोबत काळी-आणि-तांबड्या रंगाची, काळ्या रंगाची खापरे सापडली आहेत. एकंदरीत या कालखंडामध्ये अडम येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रूपांतर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये होतांना दिसून येते. या कालखंडाच्या महत्त्वपूर्ण पुरावशेषांमधे आहत नाणी, पाटे-वरवंटे, अर्धमौल्यवान दगडी मणी, पांढऱ्या रंगात नक्षीकाम केलेले कार्नेलिअनचे मणी, पदके, हाडांच्या आणि हस्तिदंताच्या वस्तू, मृण्मय मातृदेवता विशेष आहेत. मडक्यात पुरलेली शवाधाने या कालखंडातील स्तरांत मिळाली आहेत. या कालखंडाला इ. स. पू. ३५० ते इ. स. पू. १०० इतके ठरविण्यात आले आहे.

कालखंड – ५ : भद्र, मित्र, सातवाहन, महाराठी आणि सेनापती. या स्तरात प्राप्त खापरे, मुद्रा-मुद्रांक, पुरावशेष आणि नाण्यांच्या आधारावर हा कालखंड भद्र, मित्र, सातवाहन, महाराठी आणि सेनापती म्हणून निर्धारित केला आहे. या काळातील प्रमुख खापरे ही विविध लेप असलेली लाल रंगाची, काळी-आणि-तांबड्या रंगाची, अभ्रकमिश्रित लाल रंगाची, साध्या लाल रंगाची, राखडी केओलिन आणि रौलेटेड प्रकारची असून यांमध्ये मडकी, थाळ्या, झाकण्या, विविध आकारचे वाडगे, रांजण इ. प्रमुख आहेत. खापरांवर विविध आकारचे त्रिरत्न, स्वस्तिक, पक्षी इ. अंकन मिळाले आहेत. मातीच्या खापरांव्यतिरिक्त दगडी भांडी मर्यादित स्वरूपात मिळाली आहेत. या काळातील लोकांची घरे ही चौकोनी, आयताकृती, वर्तुळाकार आणि लंबवर्तुळाकार आकाराची, विटांनी आणि दगडांनी बांधलेली आहेत. शेल प्रकारचे दगड नजीक उपलब्ध असल्याने या दगडांचा भरपूर उपयोग घरबांधणीकरिता करण्यात आल्याचे दिसून येते. आयताकृती घरामध्ये साधारणतः एका रांगेत दोन, तीन किंवा चार खोल्या असून बाहेरच्या बाजूला व्हरांडा आणि अंगण असे. या कालखंडातील मडक्यात पुरलेली, जमिनीत पुरलेली इ. प्रकारची मानवी शवाधाने आढळली.
अडम उत्खननातील सर्वांत महत्त्वाच्या पुरावशेषांपैकी एक असिकस जनपदस लिहिलेली मातीची मुद्रा याच कालखंडातील आहे. या स्तरातून मोठ्या प्रमाणात चांदीची आहत नाणी, तक्षशिला प्रकारची नाणी, तांब्याची नाणी, पितळ आणि शिसे या धातूची नाणी सापडली असून भद्र, मित्र आणि महाराठी यांची नाणी उत्खनित स्तरांतून मिळाली आहेत. सातवाहन राज्यकर्त्यांच्या नाण्यांव्यतिरिक्त नाण्यांचे साचे, विविध रंगाचे अर्धमौल्यवान दगडी मणी, हस्तिदंताच्या आणि हाडाच्या वस्तू, मृण्मय शिल्पे, मणी, खेळणी, काचेच्या आणि शंखाच्या बांगड्या, विविध धातूंच्या वस्तू आणि अवजारे, दगडी पाटे-वरवंटे इ. मोठ्या प्रमाणावर मिळाली आहेत. उपरोक्त पुरावशेषांच्या आधारावर हा कालखंड इ. स. पू. १५० ते इ. स. २५० इतका निर्धारित करण्यात आला आहे.
अडमच्या तटबंदीच्या उत्खननावरून असे निदर्शनास आले आहे की, तटबंदीची निर्मिती लोहयुगापासून सुरू झाली होती. लोहयुगाच्या प्रथम टप्प्यात तटबंदी आणि खंदकाचे निर्माण करण्यात आले असून लोहयुगाच्या द्वितीय टप्प्यात तटबंदीवर दगडी बाधंकाम केले गेले. मौर्य काळात तटबंदी ४.५० मी. ने उंच करण्यात आली होती. अडमच्या तटबंदीची आजची ६.४० मी. उंची आणि खंदकाची २६.५० मी. रुंदी सातवाहन कालखंडातील आहे. या पुरास्थळा नजीक असलेला स्तूप सातवाहन आणि महाराठी यांच्या काळातील आहे. हा स्तूप माती आणि दगडांत निर्मित असून याचे मेधी, अंड, हर्मिकेचे स्थापत्य अवशेष आणि पोच रस्त्याचे पुरावे उत्खननातून प्राप्त झाले आहेत. दोन टप्प्यांत निर्मित या स्तूपात तांब्याच्या नाणी, अर्धमौल्यवान दगडी मणी, मृण्मय मणी इ. वस्तू मिळाल्या आहेत.
अडमच्या उत्खननाने विदर्भाच्या इतिहासावर मोठा प्रकाश टाकला आहे. विदर्भाच्या आद्य शेतकरी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्ये आणि समकालीन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीपेक्षा वेगळेपण या उत्खननाने पुढे आणली. उत्खननात प्राप्त लोखंडी उपकरणे, अन्नधान्ये, पाळीव प्राण्यांची आणि घोड्यांची हाडे आणि तटबंदी व खंदक निर्मितीची सुरुवात प्रगत लोहयुगाची सुरुवात दर्शवतात. मौर्य-शुंग काळामध्ये अडम येथे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची सुरुवात झाल्याचे दिसून येते. उत्खननात प्रथमच अडम या पुरास्थळाला ऐतिहासिक काळात असिकस जनपदस म्हणून संबोधले जात होते, हे सिद्ध झाले आहे. उत्खननात आतापर्यंत अज्ञात असलेल्या पुष्कळ मुद्रा आणि मुद्राकांच्या प्राप्तीने महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या इतिहासात नवीन भर पडली आहे. या उत्खननात विविध काळाची एकूण ५३७४ नाणी मिळाली आहेत, जी महाराष्ट्राच्या उत्खननात सर्वाधिक आहेत. नाण्यांच्या इतक्या विशाल संख्येवरून ऐतिहासिक काळात अडम या स्थळाची आर्थिक भरभराट लक्षात येते. यामध्ये चांदीची आहत नाणी, असिक जनपद प्रकारची आहत नाणी, महाकोसल प्रकारची आहत नाणी, भद्र, दामभद्रची तांब्याची नाणी, मित्र आणि दत्त यांची नाणी, सातवाहनांची नाणी, चांदीची रोमन नाणी, क्षत्रपांची नाणी, महाराठीची नाणी इ. तत्कालीन इतिहासावर विपुल प्रकाश टाकतात. अडम उत्खननातून प्राप्त दामभद्राच्या मुद्रांकावरील नावेचे अंकन, रोमन नाणी, मृण्मय शिल्पे, रूलेटेड खापरे, उत्तरेकडील काळी झिलईदार खापरे, तक्षशिला प्रकारची नाणी इ. देशांतर्गत आणि विदेशी व्यापाराची साक्ष देत आहेत. उत्खननातून प्राप्त स्तूप आणि त्रिरत्न चिन्हे सातवाहन काळातील रहिवाशांवर बौद्ध धर्माचा प्रभाव सिद्ध करतात. सातवाहन साम्राज्याच्या आणि रोमन व्यापाराच्या अस्तानंतर अडम हे पुरास्थळ ओस पडण्यास सुरुवात झाली.
संदर्भ :
- Nath, Amrendra, ‘Excavations at Adam (1988-1992) : A city of Asika Janpadʼ, Memoirs of the Archaeological Survey of India, No. 109., 2016.
देवनीमोरी (Devnimori)
गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील मेशवो नदीच्या तीरावरील एक प्राचीन स्थळ (यापूर्वी साबरकांठा जिल्ह्यात हा भाग होता). पांढरीच्या या टेकाडाला स्थानिक लोक ‘भोज राजाची पहाडीʼ (भोज-राजा-ना-टिम्बो) म्हणून संबोधत असत. येथे लहान-मोठ्या आकाराच्या टेकड्या असून या टेकड्यांतील विटांचा उपयोग करून स्थानिक रहिवाशांनी हा प्राचीन भाग क्षतिग्रस्त केला होता. या टेकडी परिसराच्या काही अंतरावर विटांची टेकाडे, शिवलिंग आणि विटांचे मंदिर, गणेश प्रतिमा आणि मध्याश्मयुगीन दगडी हत्यारे इ. मिळाली होती. गुजरातमधील प्रसिद्ध शामलाजी मंदिर आणि पुरास्थळ या परिसरापासून २ किमी. अंतरावर आहे. या पुरास्थळाचा शोध प. अ. इनामदार यांनी लावला (१९३६).

हे स्थळ मेशवो नदीवरील श्याम-सरोवर धरणाच्या बुडीत क्षेत्रात येत होते. त्यामुळे बुडण्यापूर्वी या स्थळाचे विस्तृत सर्वेक्षण करण्यात येऊन या परिसरातील प्राचीन मानवी वसाहत आणि पुरावे तपासणे गरजेचे असल्याने येथे बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठाच्या प्राचीन भारत आणि पुरातत्त्व विभागातर्फे १९६० ते १९६३ या तीन सत्रांमध्ये उत्खनन करण्यात आले. सदर उत्खननाचे निर्देशन र. न. मेहता आणि स. न. चौधरी यांनी केले. या परिसरात एकूण सहा ठिकाणी उत्खनन करण्यात आले. उत्खननामध्ये मध्याश्मयुगीन दगडी हत्यारे, बौद्ध स्थळे आणि एका मंदिराचे अवशेष प्राप्त झाले.
उत्खननामध्ये सर्वांत खालच्या स्तरात मध्याश्मयुगीन लघु हत्यारे मिळाली. उत्खननात बौद्ध धर्माचे दोन विहार, विशाल शारीरिक महास्तूप, चार उद्देशिक स्तूप, चैत्यगृह, मंदिर आणि संरक्षक भिंतीचे अवशेष मिळाले, जे गुजरातच्या आणि भारताच्या इतिहासाकरिता अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
या उत्खननात एकूण पाच स्तूपांचे पुरावे मिळाले असून चार लहान आकाराचे उद्देशिक स्तूप, तर एक शारीरिक प्रकारचा महास्तूप होता. विशाल महास्तूप विटांनी निर्मित असून बांधकामपूर्व खालची काळी जमीन ठासून भक्कम केली होती. स्तूपाचा सर्वांत खालचा भाग २६ x २६ x ३ मी. इतका विस्तीर्ण असून यावरील पहिला थर २१ x २१ x ३ मी., दुसरा थर १६.४ x १६.४ x १.८ मी. इतका होता. दुसऱ्या थराच्या वर १६.४ मी. व्यास आणि ४ मी. उंचीचा स्तूपाचा अंड स्थिरावला होता. स्तूपाच्या हर्मिका आणि छत्रयष्टीचा भाग पूर्णपणे नष्ट झाला होता. स्तूपाच्या दोन्ही थरांमध्ये सभोवताल अलंकृत कोनाडे असून यामध्ये बुद्ध मूर्ती असाव्यात. स्तूपाच्या खालच्या थरांत ११ कोनाडे, तर वरच्या थरांत १० कोनाड्यांची रचना होती. महास्तूपाच्या आतील उत्खननात तळभागात मधोमध मातीच्या मडक्यात १२ सेमी. आकाराचा स्टिॲटाइट (सोप स्टोन) दगडाचा दंडगोलाकार अस्थिकरंडक (Casket) मिळाला. या अस्थिकरंडकाच्या वर विटांचा थर असून यामध्ये बुद्धांच्या ८ मूर्ती मिळाल्या.

प्रदक्षिणापथाच्या वर विटांच्या ३५व्या थरात मिळालेले अस्थिकरंडक या उत्खननाचा सर्वांत महत्त्वाचा पुरावा आहे. या अस्थिकरंडकामध्ये एक तांब्याचे भांडे, क्षत्रपांची चांदीची नाणी, सोने आणि चांदीचे पत्रे, सोन्याचे लघु पात्र, रेशमी वस्त्र आणि अस्थीअवशेष मिळाले आहेत. या अस्थिकरंडकावर उत्कीर्ण इ. स. चौथ्या शतकातील ब्राह्मी लिपीतील अभिलेखानुसार सदर स्तूप ‘पाशान्तिकपल्लिʼ येथे बांधण्यात आला होता आणि पाशान्तिकपल्लि हे देवनीमोरीचे प्राचीन नाव होते. अभिलेखानुसार बौद्ध भिक्खू अग्निवर्मा आणि सुदर्शन यांनी मिळून या स्तूपाचे निर्माणकार्य संचालित केले होते आणि यामध्ये मिळालेले अस्थीअवशेष ‘दशबलʼ यांचे होते. भगवान बुद्धांचे एक नाव दशबल असल्याने सदर अवशेष बुद्धांचे होते, हे सिद्ध होते. त्यामुळे भारतातील अत्यंत महत्त्वाच्या स्तूपांत याची गणना केली जाते. अभिलेखानुसार कथिका राजवंशाच्या १२७ व्या संवत वर्षात रुद्रसेनाच्या कारकिर्दीत हा स्तूप निर्माण केला होता. स्तूपातील नाणी आणि अभिलेखाच्या आधारावर हा महास्तूप क्षत्रप राजा रुद्रसेन तृतीयच्या काळात संभवत: इ. स. ३०५ ते इ. स. ३७५ या कालखंडातील असावा. काळाच्या ओघात स्तूपाची दुरुस्ती करण्यात आली होती आणि यामध्ये बुद्धांच्या खंडित मूर्ती, खंडित दगडांचे आणि विटांचे तुकडे भरण्यात आले होते. नदीच्या पुरापासून स्तूपाच्या सुरक्षेकरिता एक सुरक्षा भिंत बांधण्यात आली होती.
देवनीमोरीच्या महास्तूपामधील तीन थरांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून महास्तूपामधील दोन्ही अस्थिकरंडकांची ठेवण पाकिस्तानातील गझ ढेरी या स्तूपातील अस्थिकरंडकाशी साम्य दर्शवणारी आहे. महास्तूपाच्या उत्खननात बुद्धांच्या २६ मूर्ती प्राप्त झाल्या होत्या आणि या सर्व मूर्ती ध्यानमुद्रेतील आहेत. येथील प्रतिमा या मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून बुद्ध शिल्पांच्या केसजटांवर गांधार कलेचा प्रभाव दिसतो, तर शरीराची ठेवण कुषाण काळातील मथुरा कलेशी मिळती-जुळती आहे. उत्खननकर्त्यांच्या मते, देवनीमोरी येथील शिल्पे गांधार आणि मथुरा कलेच्या संयुक्त संगमातून उत्पन्न व एक मिश्र शैलीची असून त्यावर क्षेत्रीय प्रभाव स्पष्ट होतो.
विहार : महास्तूपाच्या दक्षिणेकडे विहार असून याचे प्रवेशद्वार उत्तरेकडून होते. विटांनी निर्मित या चौरस विहाराचे आकारमान ४१ x ३८ मी. इतके होते. विहाराच्या मधोमध मोठे अंगण असून सभोवताल ३० खोल्या आणि व्हरांडे होते. विहाराच्या प्रवेशद्वाराच्या समोर खोली क्र.१६ ही पूजेची जागा असून येथील जमीन अलंकृत विटा आणि दगडाने तयार केली होती. पूजागृह आकाराने सर्वांत मोठे असून याचा आकार साधारणतः ७.५ x ३ मी. इतका होता. विहारातील अन्य खोल्यांचा आकार साधारणतः ३ मी. लांब आणि २.५ मी. रुंद इतका होता. खोल्यात प्रवेश करण्याकरिता मधोमध द्वार असून, आतली जागा विटांनी निर्मित होती. विहाराच्या आत अलंकृत विटांनी निर्मित व्याख्यानपीठ मिळाले असून याचा उपयोग कदाचित उपदेश देण्याकरिता होत असावा. विहारात भिक्खूंना बसण्याकरिता विटांचे ओटे, सांडपाण्याचा निचरा होणेकरिता नाल्या, चुल्ही, कवेलूचे तुकडे, लोखंडी खिळे इ. मिळाले आहेत. विहाराचा बाहेरचा भाग अलंकृत विटांनी बांधला होता. या विहाराचे निर्माणकार्य व विस्तार दोन टप्प्यांत झाल्याचे, तर कमीतकमी दोनदा विहाराची दुरुस्ती झाल्याचे पुरावे प्राप्त झाले. उत्खननामध्ये विष्णू आणि महिषमर्दिनीच्या लघु प्रतिमा मिळाल्या. विहाराचे निर्माण महास्तूपांच्या पूर्वी झाले होते, असे उत्खननातून निदर्शनास येते.
देवनीमोरी येथील विहार क्र.१ आणि महास्तूपांच्या निर्मिती नंतर विहार क्र.२ आणि चार येथे उद्देशिक स्तूपांचे बांधकाम करण्यात आले होते. चौकोनी उद्देशिक स्तूपांचा आकार साधारणतः २ ते ३ मी. असून हे स्तूप एकमेकांशेजारी बांधण्यात आले होते. महास्तूपांच्या दक्षिण-पूर्वेकडे चापाकार आकाराच्या चैत्याच्या केवळ पायाचे पुरावे मिळाले आहेत. चैत्याचा पाया दगडी असून वर विटांचे १२ थर आहेत. स्तूप आणि विहाराच्या शेजारी एक शिव मंदिर होते. या मंदिराच्या विटांचा आकार बौद्ध स्थापत्यामध्ये वापरलेल्या विटांइतकाच असल्याने हे मंदिर समकाळातील असून दोन्ही संप्रदाय देवनीमोरी येथे नांदत होते असे दिसते.
उत्खननात रोमन अंफोरा प्रकारची, चित्रकारी आणि ठप्पा असलेली खापरे आणि लाल चकाकीयुक्त खापरे मिळाली आहेत. ही खापरे इ. स. दुसऱ्या शतकात या परिसरात वापरात असल्याने या स्थळाचे कालक्रम करणे सोपे झाले.
निष्कर्ष : देवनीमोरी येथे सर्वप्रथम विहारांचे निर्माण करण्यात आले होते, तदनंतर स्तूप बांधण्यात आले. देवनीमोरी येथे इ. स.चौथ्या शतकापासून बौद्ध विहारे आणि स्तूप परंपरा विकसित झाली होती. कालानुरूप वेळोवेळी येथील स्थापत्याचा विस्तार आणि दुरुस्ती करण्यात आली होती. महास्तूप आणि विहाराचा भाग विविध चिन्हांकित विटा आणि सुबक दगडांनी अलंकृत केला होता. उत्खननात गुप्त राजवंशांचे कुठलेही प्रमाण न मिळाल्याने सदर भाग क्षत्रप राजवटीत विकसित होऊन महत्त्वाचे धार्मिक स्थळ होते, हे सिद्ध होते. देवनीमोरी आणि शामलाजी येथील उत्खननात क्षत्रप राजवटीतील प्राप्त पुरावशेषांच्या अनुषंगाने हे क्षेत्र पश्चिम भारतामधील एक महत्त्वाचे धार्मिक आणि व्यापारी क्षेत्र म्हणून नावारूपास आले होते, असे प्रमाणित होते. इ. स. सातव्या शतकानंतर देवनीमोरी येथील विहारे ओस पडण्यास सुरुवात झाली होती. सन १९७१-७२ च्या सुमारास सदर क्षेत्र मेशवो नदीवरील श्याम-सरोवर या धरणांत समाविष्ट झाले. सांप्रत महास्तूपांच्या जागेवर एक लोखंडी खांब पाण्यात उभा आहे.
संदर्भ :
- Indian Archaeology: A Review, 1961-62, Archaeological Survey of India, New Delhi, pp 13-14.
- Mehta, R. N.; Choudhary, S. N. Excavations at Devnimori, Department of Archaeology and Ancient History, M.S. University of Baroda, 1966.
फणीगिरी (Phanigiri)
तेलंगणा राज्यातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ सूर्यापेट जिल्ह्यातील नगरम तालुक्यात सूर्यापेटच्या ईशान्येस सुमारे ४० किमी. आणि हैदराबादच्या पूर्वेस सुमारे १२५ किमी. अंतरावर आहे. प्राचीन बौद्ध स्थळाचे अवशेष गावाच्या उत्तरेस सुमारे १.५ किमी. अंतरावर उंच टेकाडावर आहेत. या प्राचीन अवशेषांचे समन्वेषण आणि उत्खनन तत्कालीन हैदराबाद सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक ख्वाजा मुहम्मद अहमद यांनी केले (१९४१-४४). या उत्खननात प्रामुख्याने विहारांचे अवशेष प्राप्त झाले असून चौरसाकृती विहारांच्या तीन बाजूस भिक्खुगृहांची योजना दिसून येते. या उत्खननात यक्षाचे शिल्प, वेदिकांचे अवशेष, सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप या राजवंशांची नाणी सापडली होती.

इ. स. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात केलेल्या उत्खननाचे मर्यादित स्वरूप लक्षात घेता आंध्र प्रदेश शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभागाने बी. बालसुब्रमन्यम, जे. विजय कुमार, जी. व्ही. रामकृष्ण राव आणि के. एस. बी. केशव यांच्या निदर्शनाखाली इ. स. २००१-२००७ या दरम्यान येथे उत्खनन केले गेले. या उत्खननाचा प्रमुख उद्देश हा प्राचीन बौद्ध स्थळाच्या स्थापत्यिक अवशेषांचे स्वरूप जाणून घेणे हा होता. या उत्खननात टेकाडाच्या दक्षिण भागात भव्य महास्तूपाचे अवशेष सापडले. स्तूपाची बांधणी चक्राकृती स्वरूपाची असून स्तूपाच्या अधिष्ठान, अंड आणि चार आयक जोते (स्तूपाच्या चार दिशेस असणारे स्तंभयुक्त जोते) यांचे अवशेष सुद्धा उत्खननात सापडले. या स्तूपासमोरील भागात एका तोरणद्वाराचे अवशेष मिळाले. मध्य भारतातील काही बौद्ध स्तूपांना उदा., सांची स्तूप क्रमांक १ आणि ३, भारहूत स्तूप यांना तोरणद्वार बसविलेले आढळून येते. ज्याला तोरणद्वार बसविले होते, असा दक्षिण भारतातील हा एकमेव स्तूप आहे. तोरणद्वाराच्या तुळईवर बुद्ध जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग: जन्म, महाभिनिष्क्रमण, मारविजय, धर्मचक्रप्रवर्तन, तपस्सू आणि भल्लीक यांचे दान वगैरेचे अंकन केलेले आहे. टेकाडाच्या उत्तर आणि वायव्य भागात चार अर्धवर्तुळाकृती चैत्यगृहांचे अवशेष प्राप्त झाले आहेत. चैत्यगृहांत स्तूपांचे अवशेष सुद्धा सापडले आहेत.

या उत्खननात उत्तर आणि पूर्वेकडील भागांत सहा विहारांचे अवशेष प्राप्त झाले. या विहारांचा तलविन्यास आयताकृती असून भिक्खुगृहांना सामाईक व्हरांडा आहे. या विहारात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारात पूर्णघटाचे अलंकरण विटात साचेबद्ध रूपात केलेले आढळून येते. विहारात असलेल्या भिक्खुगृहाच्या प्रवेशद्वारावर चंद्रशिला बसवलेली आहे. या उत्खननात बुद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या प्रतिमा, जातककथा शिल्पपट्ट, बुद्धपद व पूर्णकुंभ यांचे शिल्पपट्ट, दंपतीशिल्प, गिलावा (stucco) पद्धतीने तयार केलेली मानवी शीर्षे आदी शिल्पावशेष सापडले आहेत. आहत व रोमन नाणी आणि सातवाहन, पश्चिमी क्षत्रप, महातलवार व इक्ष्वाकू या राजवंशाची नाणी सापडली आहेत. ब्राह्मी लिपीतील आणि प्राकृत भाषेतील सातवाहन आणि इक्ष्वाकू कालखंडातील ४२ शिलालेख या उत्खननात सापडले. या शिलालेखांमध्ये इक्ष्वाकू राजा रुद्रपुरुषदत्त याच्या १८व्या राज्यवर्षातील शिलालेख उल्लेखनीय आहे, ज्यामुळे या राजवंशावर नवा प्रकाश पडला आहे.
तेलंगणा शासनाच्या हेरिटेज तेलंगणा विभाग आणि डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २०१८-२०१९ या दरम्यान फणीगिरीचे पुनः उत्खनन केले गेले. प्रस्तुत उत्खननाचा मुख्य उद्देश हा यापूर्वी या पुरातत्त्वीय स्थळावर केल्या गेलेल्या उत्खननात वेगवेगळ्या भागांत खोदकाम झालेले असल्यामुळे या उत्खननात प्राप्त प्राचीन स्थापत्यिक अवशेषांचे असलेला संबंध, त्यांचे या प्राचीन बौद्ध स्थळाच्या जडणघडणीतील आणि विकासातील स्वरूप जाणून घेणे आणि त्यांची कालसंगत मांडणी करण्याच्या दृष्टीने संशोधन करणे होता. हे उत्खनन हेरिटेज तेलंगणा विभागाचे साहाय्यक संचालक पी. नागराजू आणि डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेचे डॉ. श्रीकांत गणवीर यांच्या संयुक्त निदर्शनाखाली केले गेले. या उत्खननात स्तंभयुक्त मंडप, वर्तुळाकृती चैत्यगृह, विहार, काम्य स्तूप यांचे अवशेष सापडले.
टेकाडाच्या ईशान्य आणि मध्यवर्ती भागात चार विहारांचे अवशेष सापडले. या विहारात विविध आकारांची भिक्खुगृहे असून त्यांच्या आतील भिंतींवर प्लॅस्टरचे अवशेष सुद्धा प्राप्त झाले आहेत. ईशान्य भागात २४ स्तंभयुक्त मंडपाचे अवशेष सापडले. या मंडपात पाषाणी स्तंभ विटांनी बांधलेल्या चौरस किंवा आयताकृती जोत्यात बसविले होते. टेकाडाच्या मध्यवर्ती भागात वर्तुळाकृती चैत्यगृहाचे अवशेष सापडले, ज्यातील स्तूप हा जवळ-जवळ पूर्णतः नष्ट झालेला आढळून आला. पूर्णतः भाजक्या विटांचा वापर केला गेलेला नसल्यामुळे या चैत्यगृहातील स्तूप टिकून राहू शकला नाही. अशा प्रकारच्या वर्तुळाकृती चैत्यगृहाचे अवशेष आंध्र प्रदेशातील शालिहुंडम, थोतलाकोंडा, बावीकोंडा इत्यादी प्राचीन बौद्ध स्थळांवर सापडले आहेत. तांबडी लेपयुक्त मृद्भांडी, तांबडी मृद्भांडी, काळी-आणि-तांबडी मृद्भांडी, काळी लेपयुक्त मृद्भांडी आदींचे अवशेष मिळाले आहेत. सातवाहन, महातलवार व इक्ष्वाकू या राजवंशाची नाणी या उत्खननात सापडली आहेत.
फणीगिरी येथील बौद्ध पुरावशेषांच्या उत्खननातून दक्षिण भारतातील प्रामुख्याने पूर्व दख्खन प्रदेशातील बौद्ध स्थापत्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. इ. स. पहिल्या-दुसर्या शतकापासून ते इ.स. पाचव्या शतकापर्यंत साधारणतः तीनशे-चारशे वर्षे बौद्ध धम्माचे दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण केंद्र होते. सातवाहन राजवंशाच्या कारकिर्दीत प्रतिष्ठापित झालेले हे बौद्ध धम्मीय केंद्र इक्ष्वाकू राजवंशाच्या कारकिर्दीत बहरले.
[संकेत-शब्द: फणीगिरी, स्तूप, तोरण द्वार, विहार,मंडप, चैत्यगृह, ईक्ष्वाकू,सातवाहन,महातलवार]संदर्भ :
- Skilling, Peter, ‘New discoveries from South India: The life of the Buddha at Phanigiriʼ, Andhra Pradesh, Arts Asiatiques, 63: 96-118, 2008.
- Subrahmanyam, B.; Vijaya Kumar, J.; Rama Krishna Rao, G. V. & Kesava, K. S. B. Phanigiri: A Buddhist Site in Andhra Pradesh (An Interim Report 2002-2007), Hyderabad : Department of Archaeology and Museums, 2008.
- छायासौजन्य : हेरिटेज तेलंगणा विभाग, तेलंगणा शासन.
No comments:
Post a Comment