Saturday, January 17, 2026

मलंगगड उर्फ हाजी मलंग

          मुंबई शहराच्या अगदी जवळ असुनही दुर्गप्रेमींकडून दुर्लक्षित झालेला प्राचीन दुर्ग म्हणजे कल्याणचा श्री मलंगगड.मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ किमी अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. हाजीमलंग या नावाने हा डोंगर ओळखला जातो.  या किल्ल्याच्या उल्लेखाशिवाय ठाणे जिल्ह्याचा इतिहास पुर्णच होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील प्राचीन गडांमध्ये मलंगगडाचा उल्लेख होतो. कल्याणच्या दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर हा किल्ला असून सह्याद्रीच्या मूळ रांगेपासून मलंगगड सुटावलेला माथेरान प्रबळगडापासून पुर्व-पश्चिम धावणाऱ्या तुटक रांगेत चंदेरी, पेबगडाच्या डोंगरधारेला बिलगुनच पश्चिमेच्या अगदी शेवटच्या टोकावर १८०० फूट उंच, दणकट अन रांगडा दिसणाऱ्या मलंगगडावरील देवणी सुळका आणि बालेकिल्ल्याचा वैशिष्ट्यपुर्ण शिखरमाथा दुरुनही लक्ष वेधून घेत असल्यामुळे निसर्गप्रेमी, गिर्यारोहक व दुर्गभ्रमण करणाऱ्या युवकांची पाऊले हमखासपणे इकडे फिरकत असतात.  दुर्गप्रेमींकडून हा किल्ला दुर्लक्षिला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे हे ठिकाण गडायेवजी धार्मिक स्थळ म्हणुन जास्त प्रसिध्द आहे. शिवाय या स्थळासाठी होणारी भाविकांची गर्दी व त्यामुळे येथे असणारा कमालीचा गलिच्छपणा. या किल्ल्याला प्राचीन इतिहास असुन आजही आपल्या अंगाखांद्यावर तो ते अवशेष बाळगुन असल्याने या दुर्गाला भेट देणे दुर्गप्रेमींसाठी अगत्याचे ठरते. शिवाय गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या चढाईच्या साहसामुळे हि भटकंती थरारक होते. 

 कल्याणजवळील हाजी मलंग गड
 
 आज मलंगगडावर अनेक हिंदु- मुस्लिम भाविकांचा वावर असला तरी त्यापैकी फार थोडेजण किल्ल्याच्या दुसऱ्या सोनमाचीपर्यंत जातात. तर गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या साहसामुळे (प्रस्तरारोहणामुळे) केवळ गिर्यारोहकच गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जातात. मलंगगडाच्या दुसर्‍या टप्प्यापर्यंत (माची पर्यंत) चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज लागत नाही. पण यापुढील टप्पा सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहणाचे साहित्य बरोबर असणे व तंत्र माहित असणे आवश्यक आहे.ठाणे व त्याला लागून असलेल्या सयगड जिल्ह्यातील इतर किल्ल्यांप्रमाणे माथ्यावर अवघड सुळका वा खाली थोडकी माची अशीच याही किल्ल्याची रचना आहे.पुर्वी मलंगगडाभोवती घनदाट जंगल होते. माचीवरील मलंगवाडीला तटा-बुरूजांचे संरक्षक कवच होते. खडकात खोदलेली पाण्याची टाकी. गडावर सापडलेल्या शिवलिंग, गणपती, मारूती इत्यादी देवतांच्या मुर्ती आणि धान्य कोठार, दारूगोळा कोठार, सैनिकांची घरे इत्यादींचे अवशेष आजही आपणांस पहावयास मिळतात.
         इ.स. १८१७ साली इंग्रज राजवट आल्यापासून ते आजतागायत सतत चर्चेत राहणारा. कल्याणच्या मलंगगड माहीत नाही असे म्हणणारा मुंबईकर व ठाणेकर तसा विरळच म्हणावा. दरवर्षी माघी पौर्णिमेला यात्रेनिमित्त सर्व जाती धर्माचे लाखो लोक बाबा मलंग समाधीचे दर्शन घेण्यास मलंगगडावर येतात. परंतु तेव्हा पायथ्यापासून दर्यापर्यंत शेकडो भिकाऱ्यांचा गराडा, धुळीचे साम्राज्य, टपऱ्यातील दुकाने, माणसांचा कोलाहल या साऱ्या भाऊगर्दीत गडाच्या प्राचीनतत्वाच्या खुणा, त्याचे ऐतिहासिक महत्व आणि आजुबाजूच्या रम्य परिसराचा परीसस्पर्श आपल्याला जाणवणे तसे कठीणच. तेव्हा गर्दीचा दिवस टाळूनच निवांतपणे गड पाहावा हे उत्तम.

  इतिहास :

 आता मलंगगडाचा इतिहास समजून घेउया.सर्व धर्मीय लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या मलंगबाबाची समाधी आणि गडाचा इतिहास मोठा उ‌द्बोधक आहे. गडाची निर्मिती नेमकी कोणत्या शतकात झाली याबद्दलचा निश्चीत पुरावा उपलब्ध नाही. मलंगगडचे कातळकोरीव रूप पहाता हा किल्ला शिलाहार काळात बांधला गेला असावा असे वाटते.
         परंतु आख्यायिका मात्र अशी आहे की, सातव्या शतकात नलदेव मौर्य राजाचा राजवाडा मलंगगडाच्या बालेकिल्ल्यावर होता. या नलदेव मौर्याचा बौद्ध सम्राट अशोकाच्या मौर्य घराण्याशी दुरान्वयी संबंध नाही.  राजा नलदेवाच्या कारकिर्दीत अरबस्थानातून आलेला हाजी अब्दुल रेहमान नांवाचा कोणी अवलीया मलंगगडाच्या या माचीवर झोपडे बांधून राहू लागला. तो सदाचरणी सत्पुरूष होता. त्या काळात अनेक अरब व्यापाऱ्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसाहती केल्या आणि इथल्या मातीशी एकरूप होऊन त्यांच्यापैकी काहींनी राजदरबारात मानाची पदेही भुषविली आहेत. राष्ट्रकुटांच्या राजवटीत याचे बरेच उल्लेख सापडतात. यावरून त्या काळात समाजमन संकुचित वृत्तीचे नव्हते तर विश्वात्मक जीवनाचा विशाल दृष्टिकोन दर्शविणारे, एकमेकांत स्नेह व आदरभाव निर्माण करणारे होते असे दिसून येते. नलराजाने त्या अवलियाला माचीवर राहण्यास हरकत घेतली नाही. परंतु हा खरोखरच सत्पुरुष आहे का ? याची त्याने परीक्षा घेतली. नलराजाने आपल्या मुलीला त्याच्याकडे पाठविले. नळ राजाची मुलगी त्या साधूची संवाचाकरी करू लागली. पुढे तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांनी ती मोठ्या निग्रहाने नाकारली. परंतु त्याने तिला आपली मुलगी मानले. या गोष्टीने ती मुलगी प्रभावीत होऊन त्या सत्पुरूषाची शिष्या बनली. राणीच्या कानावर हे सर्व आले. तेव्हा ती रागावली तिने त्या पुण्यपुरुषाला अपशब्द वापरले व 'माझी मुलगी परत दे. नाहीतर बघ' म्हणून दगड मारण्यास उचलला. तेव्हा त्या पुण्यपुरुषाने तपः सामथ्र्यनि युक्त अशी शापवाणी उच्चारली - 'तू दगड होशील.' त्याप्रमाणे तिचा दगड झाला. ह्या सत्पुरुषाच्या समाधीशेजारील समईसारखा पण उंच दगड आहे तोच तो असे भाविक मानतात त्यावर दिवा लावतात पुढे त्या सत्पुरुषाने देह ठेवला. त्याची समाधी बांधली गेली. कालांतराने समाधीची सेवा करीत राहिलेल्या त्या राजकन्येलाही देवाज्ञा झाली, तिची समाधी जवळच बांधण्यात आली. त्यानंतर या गडाचा व त्या महंताचा अठराव्या शतकापर्यंतचा सुसंगतपणे इतिहास उपलब्ध नाही.

 ब्रिटिशांनी काढलेले मलंगगडाचे जुने चित्र
 
        शिवकाळात इ.स. १६५७ साली शिवरायांनी कल्याण भिवंडी प्रांत काबीज केला त्याच दरम्यान मलंगगड स्वराज्यात सामील झाला असावा. २७ मार्च १६८९ या दिवशी मुघल सरदार मातब्बर खान याने कल्याण जिंकल्यानंतर मलंगगड ताब्यात घेतला. इ.स.१७३० साली बाजीराव पेशवे यांनी भिवंडीचा कांबे कोट जिंकल्यावर साष्टीची मोहीम ठरवण्यात आली. यावेळी रायाजी राउत व नानाजी देशमुख यांनी मलंगगडच्या पायथ्याशी सैन्याची जमवाजमव केल्याचे उल्लेख येतात. वसई मोहीमे दरम्यान २६ मार्च १७३८ रोजी रामचंद्र हरी पटवर्धन,रामजी महादेव बिवलकर व खंडोजी मानकर सैन्यासह गडावर होते.
   मलंगगडावरील पाण्याचे नळ : इसवी सन १८०६ सालातील मोडी कागदातून जी माहिती समजते त्यावरून मलंगगडावरील बालेकिल्ल्यावरून संपूर्ण किल्ल्यावर म्हणजेच सोनमाची आणि पीरमाची वर नळाद्वारे पाणी फिरवलेले होते या यंत्रणेमध्ये काही ठिकाणी नळ खराब झाल्यामुळे त्यांची दुरुस्ती केली गेली त्यासाठी कथिल आणि नवसागर वापरला गेला त्याचप्रमाणे इसवी सन 1804 साली पीरमाचीवरील दोन तळ्यांचे बांध पावसामुळे फुटले होते ते बांध दुरुस्त करून घेतले. मलंगगडावरील देवस्थानांमध्ये श्री रत्नाई भवानी असा एका देवस्थानाचा उल्लेख येतो. किल्ल्याला दोन माच्या असून खालची माची, पीरमाची आणि त्याच्या वर असलेली माची ही सोनमाची असल्याचे कागदपत्रांमधून समजते       
       सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात या किल्ल्यावर मराठे व इंग्रज यांच्यात चांगलीच लढाई जुंपली होती. सुरुवातीला, १७८० मध्ये ब्रिटिशांनी भारताचा एक पायाभूत भाग म्हणून मुंबई बेट जिंकून सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांना माहीम, सायन इत्यादी प्रमुख शहरे, बोर घाट आणि कसूर घाट सारखे घाट सुरक्षित करायचे होते. त्यांनी मुंबई आणि पुणे दरम्यानचे सर्व मार्ग तोडण्याची योजना आखली. त्यावेळी पुणे मराठ्यांच्या ताब्यात होते. नाना फडणवीस सैन्यासह येथे बरेच राहत होते.
कल्याण हे सर्वात अनुकूल ठिकाण होते, पुणे-खोपोली आणि उत्तरेला जोडणारे दोन प्रमुख मार्ग होते ज्यातून कसारा घाट जातो. मलंगगड किल्ला कल्याणच्या अगदी शेजारी आहे आणि वरून त्याचे सुंदर दृश्य दिसत होते. त्यानंतर इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेण्याची योजना आखली. पनवेल, तळोजा आणि कल्याण येथील किल्ले आणि ठिकाणे ताब्यात घेतल्यानंतर, आता इंग्रजांनी मलंगगडाकडे लक्ष वेधले. त्यावेळी हा किल्ला पांडुरंग संभाजी केतकर यांच्या ताब्यात होता. पावसाळ्यात गडावर मराठ्यांचे सैन्य कमी असते हे लक्षात घेऊन कॅप्टन ॲबिंग्डन याने इ.स. १७८० मध्ये भर पावसात मलंगगडाला वेढा घातला. सर्वप्रथम त्याने गडावर जाणाऱ्या सर्व वाटा बंद करून टाकल्या. यावेळी पीरमाचीवर पांडुरंग केतकर यांना ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. ४ ऑगस्ट १७८० रोजी इंग्रजांनी किल्ल्यावर हल्ला केला, पांडुरंग केतकर यांनी शौर्याने लढा दिला, परंतु तरीही इंग्रजांना पीर माची ताब्यात घेण्यात यश आले. या माचीवर हाजी मलंग दर्गा नावाचा दर्गा आहे.  पीरमाचीवर अचानक झालेल्या हल्ल्याने शे-सव्वाशे लोक सोनेमाचीकडे धावले तर उर्वरीत कल्याणच्या दिशेने गेले.
      पांडुरंग केतकर यांनी दुसरी माची म्हणजेच सोने माचीपर्यंत माघार घेतली. मराठ्यांनी या माचीवर उभे राहण्याचा निर्णय घेतला. काही काळानंतर, १७५ सैनिक किल्ला सोडून गेले, कारण किल्ल्यावर उपस्थित असलेल्या तीनशे सैनिकांसाठी पुरेसा धान्याचा साठा नव्हता. पांडुरंग केतकर काही महिने आपल्या सैन्यासह लढत राहिले.  मराठ्यांनी किल्ला ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आणि इंग्रजांचे बरेच नुकसान झाले. इंग्रजांना ताबा मिळाला पण त्यांना हुसकावून लावण्यात आले नाही. अ‍ॅबिंग्टनने कल्याण येथे वेस्टफॉलकडून मदत मागितली. त्यानंतर वेस्टफॉलने सैन्य पाठवून प्रतिसाद दिला. कर्नल हार्टलीने बेलापूर-तळोजा मार्गे मुंबईहून प्रवास केला आणि शिरवलीला पोहोचला. दुसरीकडे, अ‍ॅबिंग्टनने आता सोने माची आणि बालेकिल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला कारण पांडुरंग केतकर त्याच्या गरडी मस्केटियर्ससह लढत राहिले. त्यांनी इंग्रजांवर हल्ला करण्यात यश मिळवले आणि ते पीर माचीकडे माघारले. दरम्यान, गंगाधर कार्लेकर मराठ्यांना सर्व आवश्यक साहित्य आणि साहित्य पाठवण्यात यशस्वी झाले.  पांडुरंग केतकर त्यांचे दोन गारदी अझीझ खान जमादार आणि अबू शेख जमादार यांच्यासह इंग्रजांना त्यांच्या हल्ल्यांना उत्तर देत राहिले.
    ॲबिंग्डनने पीर माचीवर तीन तोफा चढवून त्यांचा सोने माचीवर मारा चालू केला पण तोफगोळे तेथवर पोहचत नव्हते. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी पाठवलेले ७०० शिपाई गडापर्यंत पोहचू शकले नाहीत. कॅप्टन ॲबिंग्डनने शिड्या लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. नाना फडणीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधो विश्वनाथ गोडबोले यांना तीन हजार सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवली या मलंगगडच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहचल्या पण त्यांचे इंग्रजांना हुसकावण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला मराठ्यांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या. मेजर वेस्टफॉलने ॲबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन येणाऱ्या मराठ्यांची तुकडीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. मराठ्यांनी इंग्रजांचे दळणवळण तोडल्याने कर्नल हार्टलेने बेलापूर, पनवेल, तळोजे मार्ग सुरक्षित केला तसेच शिरवलीच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून तळ उध्वस्त केला. आता ब्रिटिशांनी कॅप्टन कारपेंटरच्या हुकमतीत मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा भडिमार सुरू केला पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला. इंग्रजांचे बरेच सैनिक ठार झाल्याने इंग्रजांनी हल्ले थांबवले पण वेढा मात्र उठवला नाही. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार करून त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबरनंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. नाना फडणविसाने काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसईवर धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. हार्टलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेचच मराठ्यानी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली. अशाप्रकारे मराठ्यांनी मलंगगड अखेरपर्यंत शर्थीने लढवला.   मलंगगड किल्ल्यावर युद्ध सुरू होऊन दोन महिने झाले होते, पण मराठे अजूनही चिवटपणे लढतच होते. अखेर, नोव्हेंबर १७८० च्या सुमारास इंग्रजांनी किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला आणि मलंगगडाचा वेढा मागे घेतला. पण लवकरच कल्याण व मलंगगड इंग्रजांच्या ताब्यात गेले.
        मराठ्यांचे वारंवार होत असलेले हल्ले पाहुन अखेरीस इ.स.१७८२ च्या मराठे-इंग्रज तहात इंग्रजांनी तो पुन्हा मराठ्यांच्या स्वाधीन केला. हे सारें मलंगगडावरील सत्पुरुषाच्या कृपेने झाले, अशी पेशव्यांची भावना झाली त्यांनी कल्याणच्या श्री काशीनाथ केतकर यांची ह्या पूजास्थानाची व्यवस्था करण्यास पुजारी म्हणून नेमणूक केली.
ह्या समाधीची देखरेख, जीर्णोद्धार आदी कामे केतकरांनी केली. पुढे मुसलमान भक्तांची तेथे जा - ये वाढली व एक मुजावर तेथे झाडलोट करणे, स्वच्छता राखणे आदी कामे करु लागला. या उपयुक्त गोष्टींना कोणी हरकत घेतली नाही. याचाच फायदा घेऊन १८१७ मध्ये हाजी मलंग बाबा यांचा हा दर्गा आहे व तेथे आमचे पूजास्थान आहे, असा दावा मुस्लिम समाजातर्फे करण्यात आला.
इंग्रज कलेक्टरने या वादात समाधीचीच साक्ष काढली. चिठ्ठया टाकून जो कौल मिळेल तो मानावा अशी तडजोड निघाली. तीन वेळा चिठ्ठया काढल्या गल्या प्रत्येक वेळी कौल केतकर व हिंदूंच्या बाजूने लागला. काशीनाथ पंत केतकरांचे पणतू कृष्णाजीपंत केतकर १९०३ मध्ये निपुत्रिक वारले त्यांच्या पत्नीने (राधाबाई केतकर) एक दत्तक घेतले. त्यांचे नाव गोपाळराव केतकर ते व त्यांचे वंशज वहिवाटीच्या हक्काने पूजा करतात व ट्रस्टचेही ते विश्वस्त आहेत.
    हाजी मलंग बाबाची कथा
           हाजी मलंग बाबा हे एक सुफी संत आहेत जे १२ व्या शतकात मध्य पूर्वेतून येथे आले होते. असे मानले जाते की देवाने स्वतः मलंग बाबाला किल्ल्यावर पाठवले होते जेणेकरून भयभीत लोकांना वाचवता येईल. असे मानले जाते की हाजी मलंग बाबांचा एक घोडा 'दुलदुल' होता जो किल्ल्यावर त्यांचा साथीदार होता. त्या जुन्या आणि जंगली काळात, अल्लाहला हे मान्य नव्हते की शत्रु या पर्वतावर लोकांना आणि निष्पाप प्राण्यांना गिळंकृत करून त्रास देत होते. त्यावेळी असे म्हटले जाते की, टेकडी इतकी मोठी होती की तिच्या माथ्यावर जळणाऱ्या आगी मक्का-मदिनापर्यंत दिसत होत्या. जेव्हा अल्लाहने आग ओळखली तेव्हा त्याने हाजी मलंग बाबांना त्याबद्दल विचारले. बाबांच्या लक्षात आले की ही आग हिंदुस्तान नावाच्या देशातील एका किल्ल्यातून निघाली आहे आणि अल्लाहने क्रोधित होऊन मलंग बाबांना ताबडतोब हाजी मलंग गडाला भेट देऊन शत्रुला मारण्यास सांगितले. यामुळे हाजी मलंग बाबा त्यांच्या घोड्यावर आणि दोन साथीदारांसह शत्रुला पराभूत करण्यासाठी कोकणाकडे प्रवास करत होते.

 पीर माचीवरील हाजी मलंग बाबा दर्गा
 दर्ग्याच्या वाटेवरील दुकाने
 
 

 
 
 
 दर्गा परिसर रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला


हाजी अब्दुर रहमान मलंग बाबा दर्गा



हाजी मलंग बाबा दर्गा
 
हजरत हाजी मलंग शाह बाबा यांची पालखी
हाजी मलंग उर्स महोत्सवात पालखी मिरवणूक
उरुस महोत्सवाची झलक
उर्स महोत्सव साजर
उर्स दरम्यान सजवलेले हाजी मलंग बाबांचे पवित्र समाधीस्थळ

 
     टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या ब्राह्मणवाडी गावात पोहोचल्यावर, बाबा थकले, तहानलेले आणि थकलेले वाटले, तेव्हा केतकर या ब्राह्मण कुटुंबाने त्यांना एक पेला भरुन दूध आणि विश्रांतीसाठी जागा दिली.
      मग मलंग बाबा आणि त्यांचे साथीदार पहिल्या टप्प्यावर गेले, जिथे बाबांच्या एका साथीदाराने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला, ज्याला हाजी मलंग बाबा सहमत झाले. आता बाबा पुढे कसे जायचे याबद्दल शंका घेत होते, म्हणून त्यांनी त्यांचा घोडा दुलदुलला टेकडीच्या माथ्यावर पोहोचण्याची विनंती केली. मलंग बाबांनी टेकडीवरून उडी मारण्याचा विचार केला, कारण या पृथ्वीवर कोणीही कायमचे जगण्यासाठी जन्माला येत नाही, त्याला एक ना एक दिवस मरावेच लागते. त्याला आयुष्यात फक्त चांगले कर्म करावेच लागते. हाजी मलंग बाबांच्या या विचाराला दुलदुल सहमत झाला आणि त्याने आपल्या सर्व शक्तीने शेपूट हलवत तो मरण्यापूर्वी डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर पक्ष्यासारखा उडून गेला. हाजी मलंग बाबांच्या साथीदारांनी मग दुलदुलला तो जिथे मरण पावला तिथे पुरले आणि त्याची घोड्याची नाल जादूने तिथे बाहेर पडली. आजही कोणीही जादुई घोड्याच्या नालाचे दर्शन घेऊ शकतो.
 
 दर्ग्यात गाठी बांधण्याची धार्मिक परंपरा

 घोडे की ताप
 
     मलंग बाबाने हातात धरलेली शस्त्र जमिनीवर फेकून आणि ओठांवर अल्लाहचे नाव घेऊन, टेकडीवर स्नानासाठी पाणी निर्माण केले. हा चमत्कार झालेल्या त्या जागेला भक्त "चष्मा" किंवा कारंजे म्हणतात.

ज्या ठिकाणी हाजी मलंग बाबाचा घोडा "दुलदुल" पुरला होता
 
असे मानले जाते की जेव्हा हाजी मलंग बाबा त्यांचा घोडा "दुलदुल" घेऊन किल्ल्यावर पोहोचले बाबांचा घोड्याने टेकडीला जिथे स्पर्श केला तेव्हा त्याच ठिकाणाहून पाणी वाहू लागले. ते ठिकाण "घोडे की ताप" म्हणून ओळखले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाणी ताजे आणि स्वच्छ आहे आणि आजही ते वाहत आहे.
 हाजी मलंग बाबाचे सोबती :-
१ ) हजरत बकतावर शाह बाबा
        बकतावर शाह बाबा हे हाजी मलंग बाबांचे अनुयायी होते. ते बाबांना भारतातून  मध्य पूर्वेत  परत आणण्यासाठी आले. तथापि, बाबांनी परत जाण्यास नकार दिला कारण त्यांना उर्वरित वेळ लोकांच्या कल्याणासाठी घालवायचा होता. बाबांचा निर्णय ऐकून बकतावर शाह बाबांनी मलंगगडावर राहून बाबांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन, मलंग बाबा म्हणाले की ज्याला आशीर्वाद घ्यायचा आहे त्याने प्रथम बकतावर शाह बाबांना भेट देऊन आदर दाखवावा. तेव्हापासून हाजी मलंग दर्ग्याला भेट देण्यापूर्वी हजरत बकतावर शाह बाबा दर्ग्याला भेट देण्याची परंपरा बनली आहे, म्हणूनच हा दर्गा 'पहली सलामी' म्हणून प्रसिद्ध आहे.
पेहली सलामी - हजरत बक्तावर शाह दर्गा


 मीर सुलतान शाह बाबा दर्ग्याचे प्रवेशद्वार
 
पेहली सलामी - हजरत बक्तावर शाह बाबा दर्गा
 
२ ) मीर सुलतान शाह बाबा :-
      मीर सुलतान शाह बाबा हे हाजी मलंग बाबांचे अनुयायी आणि हजरत बकतावर शाह बाबांचे सहकारी होते. ते दोघेही मलंग बाबांना मध्य पूर्वेला परत नेऊ इच्छित होते. परंतु जेव्हा मलंग बाबांनी ते नाकारले तेव्हा ते दोघेही त्यांच्यासोबत राहिले आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य ब्राम्हणवाडी गावात, जे आता मलंग वाडी किंवा मलंगगड म्हणून ओळखले जाते, बाबांच्या सेवेत आयुष्यात घालवले.

   हाजी मलंग दर्ग्याकडे जाताना, हजरत बकतावर शाह बाबा दर्गा (पहली सलामी) ला भेट द्यावी, त्यानंतर मीर सुलतान शाह दर्गा , ज्याला 'दुसरी सलामी' म्हणून ओळखले जाते, येथे जावे. हाजी मलंग गड येथे पाळल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या परंपरेपैकी हि एक आहे.
३ ) मा फातिमा :-
      मा फातिमा या हाजी मलंग बाबांच्या आणखी एक शिष्या होत्या. हाजी मलंग दर्ग्यावरील यात्रेकरू मा फातिमा यांना आदरांजली वाहतात.

 हजरत हाजी मलंग बाबा आणि त्यांच्या शिष्या मा फातिमा यांच्या कबरी
 
४ ) पाच पीर :-
      हाजीमलंग बाबा यांच्यासोबत पाच सूफी आध्यात्मिक मार्गदर्शक होते, ज्यांना उर्दूमध्ये 'पीर' असे म्हणले जाते. मलंगगड किल्ल्याच्या विरुद्ध बाजुला असलेल्या पठारावर या पीरांची पवित्र कबर दिसतात. या पठाराला पीर माची असे नाव देण्यात आले आहे. हाजी मलंग दर्ग्यापासून पीर माचीला पोहोचण्यासाठी काही मिनिटे लागतात.
 
 

 पंच पीरच्या पवित्र कबरी
 
  पाच पीरला जाणारा मार्ग

        दरवर्षी फेब्रुवारीमध्ये मलंगगड पर्वतावर एक उत्सव आयोजित केला जातो . बाबा हाजी मलंग यांच्या वार्षिक पुण्यतिथीनिमित्त लोक "उर्स महोत्सव" साजरा करतात. विविध जाती आणि पंथाचे लोक उत्साहाने उर्स सोहळ्यात सहभागी होतात. हा उत्सव औपचारिक ध्वज फडकवण्यापासून सुरू होतो आणि नऊ दिवस चालतो. वार्षिक उत्सवाच्या पहिल्या दिवशी, बाबा हाजी मलंग यांची पालखी ज्याला "पालकी" म्हणून ओळखले जाते ती जुलूस (मिरवणुकीत) वापरली जाते. या कार्यक्रमाला "चंदन पालकी का गश्त" असे म्हणतात. ही मिरवणूक मध्यरात्री हाजी मलंग दर्ग्यापासून सुरू होते, संपूर्ण हाजी मलंग पर्वत व्यापते आणि पहाटे ५ वाजताच्या सुमारास दर्ग्यात परत येते. मिरवणूक हिंदू वहिवतदार माधव गोपाळ केतकर यांच्या नेतृत्वाखाली असते. हाजी मलंग बाबा पालकी नंतर, “मिलाद शरीफ”, “धमाल”, “मीर सुलतान शाह बाबा उर्स”, आणि “गुसल शरीफ” असे इतर कार्यक्रम त्यानंतरच्या दिवशी होतात.  मिरवणुकीदरम्यान, संपूर्ण पर्वत सुंदर रोषणाईने उजळून निघतो. हाजी मलंग बाबांची पालखी फुलांनी सजवली जाते. भाविक फुलांच्या चादर, कापडी चादर, चंदन आणि इतर सुगंधी अर्पणांनी आदरांजली वाहतात.
 
  जावे कसे ?
     मलंगगड कल्याण शहराच्या दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर असुन गडावर जाण्यासाठी एकुण तीन वाटा आहेत. यातील एक वाट ठाणे जिल्ह्यातील गडाच्या पायथ्याशी असलेल्या मलंगवाडीतून तर उर्वरित दोन वाटा रायगड जिल्ह्यातील वावंजे व शिरवली (कोंडपवाडी) गावातून गडाच्या पिरमाचीवर येतात. यातील पहिल्या दोन वाटा प्रामुख्याने वापरात असुन त्यावर पायऱ्या बांधलेल्या आहेत तर तिसऱ्या पायवाटेचा फारसा वापर केला जात नाही. 
 
 पायथ्यामधून दिसणारा मलंगगड
 
 मलंगगडाकडे जाणारा रस्ता
 
 मलंगगडाच्या पायथ्याचा बस स्टॉप

         मध्य रेल्वेच्या कल्याण स्टेशनवरून मलंगगडाकडे ठराविक अंतराने एस.टी.बस ये-जा करीत असते. त्यामुळे गडावर रोजचीच वर्दळ असते. विशेषतः मंगळवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी तर जास्तच गर्दी होते. कल्याण रेल्वे स्टेशनवरून पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचण्यासाठी तुम्हाला २०-३० मिनिटे लागतील. एसटी बस क्रमांक ४५ ही बस तुम्हाला प्रति व्यक्ती २० रुपयांत पायथ्याशी असलेल्या गावात सोडेल. कल्याण येथुन गडपायथ्याच्या मलंगवाडला जाण्यासाठी खाजगी रिक्षा तसेच दर तासाला बस असुन तासाभरात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो.
 
 वावंजे गावातून दिसणारा मलंगगड
 
 पनवेलहुन वावंजे गावांसाठी बस असुन वावंजे गावापासुन २ की.मी. अंतरावर गडाचा पायथा आहे. वावंजे गावातुन गडपायथ्याशी येण्यासाठी खाजगी रिक्षा मिळतात. गडावर येणारी गर्दी टाळायची असल्यास वावंजे गावातुन गडावर जाणे हा उत्तम पर्याय आहे. या दोन्ही वाटा साधारण तासाभरात आपल्याला पिरमाचीच्या सुरवातीस असलेल्या दुर्गादेवी मंदीराजवळ घेऊन येतात.

 
 
       मलंगगडावर जाण्यास दोन-तीन पायवाटा असल्या तरी नवख्या माणसांनी नेहमीच्या मार्गाने अर्ध्याकच्च्या दगडमातीने बांधलेल्या पायऱ्यांनी गड चढावा. साधारण पाऊण तासात आपण डोंगरधारेवर येतो. 
 
 
 
 
मलंगगडावर चढणारी पायर्याची वाट

येथून सुमारे अर्धा कि.मी. चालल्यावर डोंगरधारेवरील वाट मलंगगडाला भिडते व काटकोनात डाव्या बाजूला वळून माचीवरील मलंगवाडीत येते.

         मलंगगड तीन टप्प्यात विभागलेला आहे. पहिल्या टप्प्यावर मलंगगडावरील समाधी मंदिर (हाजी मलंग) आहे. पूर्वी ही किल्ल्याची माची होती. या माचीला " पीर माची " या नावाने ओळखले जाते. दुसर्‍या टप्प्यावर "सोन माची" व पूरातन अवशेष आहेत. तर तिसरा कठीण टप्पा म्हणजे "बालेकिल्ला’ यावरही प्राचीन अवशेष आहेत.


मलंगगडाची सर्वात खालची पातळी म्हणजे पीर माची जिथे  हजरत हाजी मलंग बाबा यांचा दर्गा आहे. तसेच, पठाराच्या शेवटी, पंच पीर (पंच पीर) आहे ज्याचे नाव " हाजी मलंग बाबा " यांच्या मागे मलंगगड किल्ल्यापर्यंत गेलेल्या पाच पीरांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. हाजी मलंग दर्ग्यापासून ते ४५ ते ६० मिनिटांच्या अंतरावर आहे. पुढे काठावर चष्मा नावाची जागा आहे जिथे लोक प्रार्थना करण्यासाठी येतात. हाजी मलंग बाबांच्या घोड्याने जमिनीवर हात मारल्यामुळे जमिनीतून पाणी बाहेर पडते असे लोक मानतात. आज मलंगगडावर अनेक हिंदु- मुस्लिम भाविकांचा वावर असला तरी त्यापैकी फार थोडेजण किल्ल्याच्या दुसऱ्या सोनमाचीपर्यंत जातात. तर गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या साहसामुळे (प्रस्तरारोहणामुळे) केवळ गिर्यारोहकच गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जातात.  

 
 पावसाळ्यात हिरवागार झालेला मलंगगड

      मलंगगडावरील समाधी मंदिरापर्यंत जाण्यासाठी व्यवस्थित पायर्‍यांचा मार्ग आहे. या मार्गाने आपण गडाच्या समाधी मंदिरापर्यंत आल्यावर, समाधी मंदिराच्या अलिकडे (मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर) उजव्या बाजूच्या दोन दुकानांच्या मधील बोळातून एक पायवाट डोंगरावर जाते. 
 
 
 
मधल्या पातळीवर हाजी मलंग गडाचा बुरुज
 
या पायवाटेने वर चढत गेल्यावर एक छोटीशी सपाटी येते. येथून दोन वाटा फूटतात. एक पायर्‍यांची वाट वर चढत दुसर्‍या माचीवर जाते. तर उजव्या बाजूची वाट डोंगरच्या कडेकडेने कातळभिंती खालील एका गुहेपाशी जाते. या ठिकाणी एक पाण्याचे टाक आहे.
 
 
 
 
 
सोन माचीचे पठार
 
 ही गुहा पाहून परत सपाटीवर येऊन पायर्‍यांची वाट पकडून चढायला सुरुवात करावी. या कमी अधिक उंचीच्या बांधीव पायर्‍यांचा मार्गाने साधारण २० मिनिटात आपण दोन बुरुज शाबूत असलेल्या उध्वस्त प्रवेशव्दारातून गडाच्या दुसर्‍या माचीवर पोहोचतो. या माचीला ’सोने माची" म्हणतात.
       या प्रवासात माकडांचा मोठा उपद्रव होतो.
 येथे येण्यासाठी असलेल्या पायर्‍या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. तसेच चढ उभा व दमछाक करणारा आहे. या दुसर्‍या टप्प्यापर्यंत (माची पर्यंत) चढण्यासाठी गिर्यारोहण साहित्याची गरज लागत नाही. पण यापुढील टप्पा सर करण्यासाठी मात्र गिर्यारोहणाचे साहित्य बरोबर असणे व तंत्र माहित असणे आवश्यक आहे.
गणेश , कार्तिक सुळके
 
    सोने माचीवर आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला मलंगगडाचे गणेश, कार्तिक कातळसुळके दिसतात तर डाव्या बाजूला लांबवर पसरलेली माची दिसते. या माचीची रुंदी कमी आहे. माचीला सर्व बाजूंनी तुटलेली तटबंदी असून त्यामध्ये बुरुज आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर समोरच जमिनीवर कातळात कोरलेले एक दार दिसते. 
 
 माची येथील चोर दरवाजा
 
त्यातून खाली उतरण्यासाठी कातळात पायर्‍या कोरलेल्या आहेत. या पायर्‍यांच्या शेवटी चोर दरवाजा आहे. माचीवर सुळक्याच्या विरुध्द दिशेला वाड्याचे चौथरे आहेत. 
 
 
त्यापुढे पाण्याची दोन कोरडी टाकी आहेत. माचीच्या शेवटी असलेल्या बुरुजावर झेंडा लावण्याची जागा आहे. आता शाबूत असलेल्या तटबंदीत एके ठिकाणी पायर्‍या व जंगी पहायला मिळते. हा माचीचा भाग पाहून कातळ सुळक्याच्या दिशेने जावे. या ठिकाणी कातळ सुळक्याच्या डाव्या बाजूने (कड्याला उजवीकडे ठेवत) एक पायवाट जाते. या वाटेने थोड चालत गेल्यावर बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी कातळ कड्यात कोरलेल्या पायर्‍या दिसतात. प्रथम तिकडे न जाता त्या पायर्‍यांच्या बाजूने सरळ पुढे चालत जावे, तेथे एक गुहा दिसते. या गुहेत दोन पाण्याची टाक आहेत. त्यापैकी एका टाक्यात मे- जून पर्यंत पाणी असते. सध्या या टाक्यांना "कुराण टाक" म्हणून ओळखतात. ही टाकी पाहून परत फिरून पायर्‍यांपाशी यावे.

पाईपच्या दोन तुकड्यांनी जोडलेले १४ फूट अंतर

  पन्नास - साठ पायर्‍या चढून गेल्यावर नंतरच्या पायर्‍या तुटलेल्या आहेत. तो भाग चढण्यासाठी दहा बारा फूटांचे दोन पाईप जोडून आडवे टाकलेले आहेत. या ठिकाणी पाईप व कातळकडा यात अंतर जास्त असल्यामुळे हाताच्या आधारासाठी दोर लावावा लागतो. (या ठिकाणी बर्‍याच वेळा एक माणूस बसलेला असतो व तो हा टप्पा पार करून देण्यासाठी दोर लाऊन देतो व प्रत्येक माणसाचे पैसे घेतो.) हा अवघड टप्पा पार केल्यावर कातळात कोरलेली एक छोटी गुहा लागते. येथून थोड्या पायर्‍या चढून पुढे एक वळसा घेऊन ( ट्रॅव्हर्स) गेल्यावर आपण दोन सुळक्यांमधील खिंडीत येतो.

 

 माचीच्या वाटेवर दरवाजा

 खिंडीतून समोरच्या सुळक्यावर चढण्यासाठी कमी जास्त उंचीच्या पायर्‍या आहेत. या दोन्ही बाजूंनी कुठलाही आडोसा/ आधार नसलेल्या या पायर्‍या चढण्यासाठी मध्ये - मध्ये लोखंडी कांब्या बसवलेल्या आहेत. तर दोन ठिकाणी लोखंडाच्या साखळ्या बसवलेल्या आहेत. याच्या आधाराने किंवा दोर लाऊन दहा ते वीस मिनिटांत गड माथ्यावर पोहोचता येते. 

 बालेकिल्लावरील दगडी बांधकाम
 
गड माथ्यावर छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक मोठा वाडा दिसतो. याला नल राजाचा वाडा म्हणतात. त्याच्या मागे कातळात खोदलेली दहा टाकी आहेत. या टाक्यांमधून पाईप लाईन टाकून खालच्या वस्तीला पाणी पुरवठा केला जातो. या टाक्यांमध्ये मे- जून पर्यंत पाणी असते. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराच झाड आहे आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे.
 

  बालेकिल्याच्या दुसर्‍या टोकाला गेल्यावर समोरच देवणीचा सुळका आहे. बालेकिल्ल्यावर उभे राहून हातात सात दगड घ्यावयाचे व ते त्या देवणीला मारावयाचे. एक जरी त्यास लागला तरी नगारा वाजू लागतो व मनोकामना पुरी होते असे मानतात. प्रत्यक्षात उलट्या वाऱ्यामुळे व अंतरामुळे ते अवघड आहे.
गिर्यारोहकांच्या मनात मात्र ह्या सुळक्यावर चढून जाण्यास कौशल्याचा भाग होता. ते आव्हान सह्यपुत्रांनी स्वीकारले. अवघ्या २८ मीटर देवणी सुळक्याचे आव्हान! पण ते तितकेच कठीण! मुंबईच्या क्लाइंबर्स क्लबचे श्री. विनायक नाडकर्णी व श्री. एम. आर. अमलडी यांनी नोव्हेंबर १९६२ मध्ये त्यावर चढून जाण्यास प्रथम यश मिळवले. (आधार दि क्लाइंबर्स क्लब बुलेटिन, खंड ७ वा. / एप्रिल १९६४).
येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते असे म्हणतात. मलंगगडावरुन गोरखगड, चंदेरी, पेब, ईरशाळ, प्रबळगड हे किल्ले ताहूली, म्हैसमाळ, माथेरान, हे डोंगर गणपती व कार्तिक हे सुळके आणि पनवेल,बेलापूर पर्यंतचा परिसर दिसतो. 

एकदा मलंगगडाचा  ट्रेक सुरू केला की पायथ्यापासून हाजी मलंग दर्ग्यापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक छोटी हिंदू मंदिरे दिसतात.

१ ) दत्त मंदिर 

२ ) हनुमान मंदिर
३ ) गणपती मंदिर 

४ ) शिवमंदिर 

५ ) दुर्गा देवी मंदिर –

६ ) वाघेश्वरी माता मंदिर –

७ ) साई बाबा मंदिर -
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून समाधी मंदिरा (हाजीमलंग दर्गा ) पर्यंत १ तास लागतो. समाधी मंदिरा (हाजीमलंग दर्गा ) पासून सोने माची अर्धा तास लागतो. सोने माची ते बालेकिल्
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
पावसाळ्याचे ४ महिने सोडून वर्षभर गडावर जाता येते.
सूचना :
१) मलंग गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी ताशीव कड्यावर दहा - बारा फूटांचा एक पाइप आडवा टाकलेला आहे. आणि हातांच्या आधारासाठी आपल्याला दोर लावला लागतो. हा अवघड टप्पा पार करण्यासाठी धैर्या बरोबरच गिर्यारोहणातील अनुभव व साहित्य असणे महत्वाचे आहे.
२) पाईप असलेल्या ठिकाणी बर्‍याच वेळा एक माणूस बसलेला असतो व तो हा टप्पा पार करून देण्यासाठी दोर लाऊन देतो व प्रत्येक माणसाचे पैसे घेतो. पण तो माणूस भेटेलच याची खात्री देता येते नसल्याने स्वत:चे गिर्यारोहण साहित्य बरोबर बाळगावे.
३) किल्ला उतरतांना पाईपच्या अलिकडून रॅपलिंग तंत्राचा वापर करुन सोने माचीवर उतरता येते.

न्यायालयीन वाद :-   

       मुसलमान व्यक्तीची कबर असली तरी त्याकाळापासून या दर्ग्याची सर्व व्यवस्था काशीनाथपंत केतकर यांच्या कुटुंबाकडे आली. ती आजतागायत सुरू आहे. येथे दर माघ पौर्णिमेला मोठा उत्सव सुरू केला, त्याला हिंदू, मुसलमान लोक ठाणे, पनवेल, कल्याणवरुन येतात असं गॅझेटियरमध्ये लिहिलं आहे.  महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागाच्या संकेतस्थळावर हे स्थळ एक दर्गा असल्याचं नमूद केलेलं आहे. सध्या मलंगगड हे स्थान हिंदूचे कि मुसलमानांचे यावर ठाणे स्थानिक न्यायालय, उच्च न्यायालयात आणि ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे दावे प्रलंबित आहेत. मलंगगडावरील समाधी हि नाथपंथीय श्री मछिद्रनाथ यांची असल्याचे मानले जाते. तसेच गोपाळ कृष्ण केतकर विरुद्ध मोहम्मद जफर मोहम्मद हुसैन या खटल्याच्या १९५४ साली दिलेल्या निकालामध्ये या स्थळाचा उल्लेख दर्गा असा करण्यात आलेला आहे.
या प्रकरणात दाखल दावे ही नाथपंथाचे मदन बलकवडे हे पाहत आहेत. मदन बलकवडे यांच्या म्हणण्यानुसार श्री मलंग गडावरील देवस्थान हे नाथपंथियांची दीक्षा गादी आहे. या ठिकाणी हिंदू येतातच, तसेच मुसलमानही भक्तीभावाने येत आहेत म्हणून गोपाळ कृष्ण केतकर यांनी १९५२ साली याची नोंदणी ‘श्री पीर हाजी मलंग साहिब दर्गा’ या नावाने केली. पेशवेकालीन इतिहास श्री मलंग गडाची नोंद आहे. त्यामध्ये श्री मलंग बाबा अशी नोंद सापडते.
    मात्र कालांतराने या ठिकाणी मुसलमानांनी वर्चस्व दाखवणे सुरु केले. पूर्वापार हिंदू धर्म परंपरेने सुरु असलेल्या पूजाविधीवर मुसलमान आक्षेप घेऊ लागले, पुढे पुढे तर हिंदूंना या ठिकाणी येण्यास प्रतिबंध करू लागले. म्हणून मग हे देवस्थान मूलतः हिंदूंचेच आहे, असे सर्व ऐतिहासिक पुराव्यानिशी श्री अनंत गोखले यांनी १/१९८२ मध्ये ठाणे कोर्टात खटला दाखल केला आणि या देवस्थानाच्या ‘श्री पीर हाजी मलंग साहिब दर्गा’ या नोंदणीलाच आव्हान दिले आहे.
    हा खटला चालवू नये म्हणून नासिर खान फाजल खान यांनी उच्च न्यायालयात ६५०९/२००२ याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने त्यांना परत खाली ठाणे कोर्टात पाठवले, जिथे अनंत गोखले यांचा खटला सुरु आहे. हा खटला न्यायप्रविष्ट असतानाही नासिर खान फाजल खान यांनी या देवस्थानाची गैरमार्गाने वक्फ बोर्डात नोंदणी करून घेतली.
    त्याला मदन बलकवडे यांनी ही नोंदणी चुकीची आहे म्हणून त्याविरोधात उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका दाखल केली. त्यात उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २००६ मध्ये वक्फ बोर्डाला या नोंदणीसाठी स्थगिती दिली. तसेच जोवर ठाणे कोर्टात प्रलंबित खटल्याचा निकाल लागत नाही, तोवर या देवस्थानाच्या कारभारात लक्ष घालण्यास पूर्ण मनाई केली.
    असे असूनही नासिर खान फाजल खान यांनी २००९मध्ये पुन्हा एकदा हे देवस्थान वक्फमध्ये रजिस्टर केले. वक्फनेही ते रजिस्टर करून त्याला प्रमाणपत्रही दिले. त्यावर मदन बलकवडे यांनी अवमान याचिका ५०८/२०१५ उच्च न्यायालयात दाखल केली. ती अजून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
    अशा प्रकारे सध्या उच्च न्यायालयात २००६/२००६ याचिका, १७१८ हा अर्ज आणि ५०८/२०१५ हे तीन दावे प्रलंबित आहेत. तसेच १/१९८२चा खटला ठाणे कोर्टात प्रलंबित आहे.
    तसेच २/२००९ हा अर्ज ठाणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यामध्ये या देवस्थानावर विश्वस्त नेमण्याची मागणी केली आहे. हा अर्ज सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाने करण्यात आला आहे. त्या अर्जावर आजवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अशा प्रकारे या देवस्थानाविषयी अनेक खटले विविध ठिकाणी प्रलंबित असतानाही स्थानिक मुसलमान त्याला दाद देत नाहीत. विशेष म्हणजे धर्मादाय आयुक्तांकडे ज्यांच्या नावाने अर्ज प्रलंबित आहे, ते एकनाथ शिंदे राज्य सरकारमध्ये महत्वाचे मंत्री असूनही धर्मादाय आयुक्त या अर्जाची दखल घेऊन विश्वस्त नेमण्यास तयार नाही.
    श्री मलंग गडावर एक दीक्षा गादी आणि दोन समाधीस्थळ आहेत. ही हिंदूंची देवस्थाने आहेत हे सिद्ध करण्यासाठी सर्व इतिहासकालीन पुराव्यांसह खटले दाखल आहेत, जे प्रलंबित आहेत. परंतु यात प्रतिवादी नासिर खान  फाजल खान यांना ते मुसलमानांचे श्रद्धास्थान आहेत हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. त्यांनी फक्त ब्रिटिश गॅझेटचा आधार करून हे स्थान मुसलमानांचे असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 

 
      मलंगगडावर आता देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवा अखेर सुरू झाली आहे. या फ्युनिक्युलर सेवेमुळे भाविकांना मलंगगडावर जाणं अधिक सोपं, सुरक्षित आणि जलद होणार आहे. मलंगगडावर, हाजी मंगलला कल्याण, मुंबई, नवी मुंबईतून अनेक भाविक येतात. जाण्यासाठी अंदाजे २६०० पायऱ्या चढून वर गडावर जावं लागतं. हा गड चढण्यासाठी जवळपास २ तास लागतात. मात्र आता फ्युनिक्युलर ट्रेन आजपासून सुरू झाल्याने हे २ तासांचं अंतर अवघ्या १० मिनिटांत पूर्ण करून जाता येईल. या सुविधेच्या देखरेखीसाठी ७० जण असून १२० जण यातून प्रवास करू शकतात, 

फ्युनिक्युलर ही एक प्रकारची केबल रेल्वे प्रणाली आहे, ट्रॉली सारखी सुविधा आहे. गुरुत्वाकर्षण आणि केबल्सचा वापर करून मागे-पुढे अशा दोन गाड्या एका उंच उतारावर चालवल्या जातात. फ्युनिक्युलर हा शब्द लॅटिन भाषेतील असून लहान दोरी असा त्याचा अर्थ होतो. फ्युनिक्युलर सेवा लिफ्ट आणि ट्रेन अशा दोघांची मिळून तयार झालेली सेवा आहे. 
 
 संदर्भ ग्रंथः-
१ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
३ ) ठाणे जिल्हा गॅझेटियर
4 ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
५) दुर्गसंपदा ठाण्याची - सदाशिव टेटविलकर
६ ) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
 
 
 








 
 
 
   
 
 
 
 
 
 
 
 


सुमारे १५०० मीटर उंचीवर असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मलंगवाडी गावापासून दर्ग्यावर चढण्यासाठी जवळजवळ दोन तास लागतात. अर्ध्या उंचीवर चढाई पूर्ण केल्यानंतर, यात्रेकरू हजरत भक्तावर शाह बाबांच्या दर्ग्यावर पोहोचतात. 'पहली सलामी' हे या दर्ग्यावर अर्पण केलेल्या अर्पणाचे नाव आहे.
   काही मिनिटे पुढे गेल्यावर, तुम्ही हजरत सुलतान शाह दर्ग्यावर पोहोचू शकता, ज्याला 'दुसरी सलामी' असेही म्हणतात. कृतज्ञता म्हणून मजारवर फुले किंवा कापडाचे 'चादरे' अर्पण करता येतात.
मीर सुलतान शाह बाबा दर्ग्याचे प्रवेशद्वार
मीर सुलतान शाह बाबांची पवित्र कबर

दोन्ही सलामींना भेट दिल्यानंतर, यात्रेकरू मलंग बाबा दर्ग्याच्या मुख्य दर्ग्याला भेट देऊन आशीर्वाद घेण्यासाठी जातात. हाजी मलंग दर्ग्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण पायऱ्या अंदाजे १५०० आहेत. वाटेत, अनेक लहान दुकाने अल्पोपहार आणि धार्मिक उत्पादने विकतात.
दर्ग्याच्या वाटेवरील दुकाने
      पवित्र तीर्थस्थळांवर आशीर्वाद घेण्यासाठी यात्रेकरू पाळतात ती आणखी एक परंपरा म्हणजे कबरींना व्यवस्थित गाठी बांधणे. त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
दर्ग्यात गाठी बांधण्याची धार्मिक परंपरा
         तीन प्राचीन दर्ग्यांव्यतिरिक्त, मलंगगड टेकडीवर गणेश मंदिर, दत्त मंदिर आणि नवदुर्गा देवी मंदिर अशी अनेक हिंदू मंदिरे आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Malanggad, Haji Malang, Kalyan, Maharashtra

Malanggad also known as Haji Malang is a 700+ meter tall mountain near Kalyan City of Maharashtra. Malanggad lies in Matheran mountain range and separated from the main range by a khind and is a type of isolated hill jointed to another much taller mountain Tavli through a khind. Malanggad is distinct by its three pinnacle structure and is visible from any where during clear weather. Malanggad is a type of basaltic hill with three levels. Malanggad trek is an easy trek till Sone Machi and a crowded one.

1) Pir machi (where the Haji Malang Dargah is located.) 500m asl.
2) Sone Machi (the second plateau after the steep steps climb) 600m asl.
3) Balekilla (Saat Bawdi - the top most part after the pipes) 700m asl.

To reach Haji Malang one has to climb many steps through many shops and houses from bus stop. The base is the bus stop of Malanggad bus no 45. 

Malanggad has a huge history as the Ketkars were the Killedars. The fort was built in 7th Century by King Nalanda. Brief battle was fought between Marathas and British on Malanggad. Malanggad is a type of fort in which there are no windows to fire or protective walls. It sole depends upon its sheer walls for protection from invaders. This made the Britishers hard to capture and led to siege of the fort. Firing proved no use for them from Pir Machi. Another route is from Vavanje village where in a brief battle was fought. The structure of Malanggad is very strong. The last pinnacle is known as Devni or Bara Ansaar pinnacle.

Pir Machi is laden with shops and is a very big plateau and the far end is Panch Pir where there are graves of Disciples of Baba Malang while second step is Sone Machi which is 250m long and narrow and has 3 bastion and a Chor darwaja with many water cisterns. Also Malanggad is infested with monkeys. 

On the east side of Malanggad is a temple of Datta Mandir and a deep well and further Ganesh mandir in deep woods. One can also trek to Tavli or Dadi Maa where the main Dargah is located which is opposite mountain. It takes around 4 to 5 hours to Dadi Maa through forests. Tavli is second highest mountain in Matheran range after Matheran.

To reach the top one has to cross 15 feet pipes which are placed where the steps have been blown off. A person used to set ropes and charged some fee to cross but as on date by locals on Oct 2017 the person has stopped the service due to order by police due to some accident on pipes. The pipes have gone loose and harness removed. On top there are seven water cisterns (saat bawdi) which feeds water to Haji Malang through pipes and a dilapidated structure used to store grains and ammunition.

Malanggad has many temples and mosques on the way to Haji Malang. A Funicular railway is also being built to avoid climbing many steps which will gain 340m height on rails.

During Urs festivals the palki of Baba is taken on round around whole mountain and celebrated with pomp. The mountain is lit with lights and a sight worth watching.

How to Reach:

Bus No 45 of Malanggad straight to base from Kalyan Railway Station - Rs 20 / person.










16 comments:

  1. Any update of pipe fixed? As your Malangad part 2 on YouTube is waiting for same reast i guess.

    Reply
    Replies
    1. no, the pipes are closed and rope services are stopped by law, police stopped the person who use to attach ropes as casualties occured, however one can go on their own and fix it if needed.

    2. Any chance the pipes are now accessible?

    3. nope, pipes are permanently closed, one can go on their own if they have equipments and gear on own risk

  2. Could you please tell me what would be the approximate expense and items to carry along when trekking from the foothill to Balekila?

    Reply
    Replies
    1. no expense, some money to buy water or food, till dargah there are plenty of shops, shopkeepers can be irritating sometimes forcing to buy, shouting, etc, just keep moving :)

  3. Hi Gautam it was very nice video we are waiting for part2 of haji malang hope u will update soon ...

    Reply
    Replies
    1. sure, as soon as the pipes get repaired

  4. Hi Gautam it was a very nice video I have been there in haji malang very nice place
    Eagerly waiting for part2

    Reply
  5. You can certainly see your skills within the work you write.
    The sector hopes for even more passionate writers such as you who are not afraid to say how
    they believe. At all times follow your heart.

    Reply
  6. Hi there i am kavin, its my first time to commenting anywhere,
    when i read this artiicle i thought i could also make comment due to
    this good paragraph.

    Reply
    Replies
    1. thank you very much, i appreciate :)

  7. Hi sir ur videos are always awesome
    Waiting for part 2 from very long time sir
    Hope u will show 👆 part 2very soon

    Reply
    Replies
    1. thank you, the pipes are broken and closed by police, not unless it is repaired and allowed officially :)

  8. Any update if it is open after lockdown ?

 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...