नमस्कार, हि खास पोस्ट लिहण्याच एकमेव कारण म्हणजे माझ्या मनातली माकडांची भीती आणि त्या भीतीला कारण असलेले ट्रेकिंगचे अनुभव. जर तुमच्या मनातही भीती असेल, किंवा तुम्ही अश्या ठिकाणी ट्रेक ला जात असाल जिथे माकडे असू शकतात तर एकदा नक्की वाचा.
आधी थोडे अनुभव सांगतो म्हणजे कळेल कि नक्की कशी परिस्थिती समोर येते.
१. गोरखगड माझा दुसराच ट्रेक होता. आम्ही गुहांपर्यंत पोहचलो होतो. तिघे जण पुढे वाट कशी आहे ते बघायला गेले. ते आरामात येणार होते आणि मागे थांबलेल्या आम्हा तिघांनाही बऱ्यापैकी आराम करायचा होता त्यामुळे आम्ही शांततेत पडून होतो. जर तुम्ही या गडावर गेला असाल तर तुम्हाला माहित असेल कि गुहांपुढे मोठी दरी आहे. काही वेळाने त्या दरीतून एक माकड वर आले. मी समोरच बसलो होतो अगदी, म्हणून त्याच्याकडे एकटक कुतूहलाने बघायला लागलो. त्यानंतर नक्की काय झाले माहित नाही पण काही मिनिटांतच अजून चार पाच माकडे वर आली. आणि आता मी जरा घाबरलो. सोबत दोन मैत्रिणी होत्या. त्यांच्याशी बोलून आम्ही बॅग उचलल्या आणि परत जायला निघालो. तोपर्यंत माकडे बऱ्यापैकी शांत होती. पुढे गेलेल्या तिघांना आवाज द्यायचा प्रयत्न केला पण ते सुळक्याच्या दुसऱ्या बाजूस होते, आवाज गेला नाही. आम्ही गपचूप माघार घेतली आणि परतीच्या वाटेल लागलो. पण काही अंतरावर जाऊन थांबणं भाग होत कारण पुढे rock patch उतरायचा होता आणि त सौरभशिवाय उतरण योग्य नव्हतं. आम्ही त्या गुहांपासून जरा मागे आलो तेव्हा अजून एक ७-८ जणांचा ग्रुप भेटला. आणि तिथेच घोळ झाला. मला वाटले आता माकडे आम्हाला घाबरतील कारण आम्ही १० जण होतो. त्यामुळे आम्ही परत गुहांजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तसं जाताना उगाच समोर दिसणाऱ्या माकडांना चिडवत होतो. त्यांना घाबरवून पळवून लावायचा प्रयत्न करत होतो. त्या आमच्या करामतीमुळे माकडे भयंकर चिडली आणि जेव्हा गुहेचे जागा नजरेसमर दिसली तेव्हा कळलं कि तिथे त्यांचा खूप मोठा कळप होता जो त्याच दरीतून वर आला होता.
चिडून माकडांनी आमचा पाठलाग सुरु केला आणि आता मात्र आम्ही खूप घाबरलो होतो. त्यानंतर आम्ही त्या rock patch च्या तोंडाशी येऊन थांबलो कारण तिथून पुढे जात येत नव्हते. एक क्षण असा होता कि आम्ही दहा जण मध्ये उभे होतो एकमेकांना पाठ लावून आणि काही माकड आमच्याभोवती फेरा मारत होती. आमच्याकडे रागाने बघत. दात विचकवत. शेवटी आम्हाला जरा बुद्धी सुचली आणि आम्ही काहीही विरोध न करता गपचूप उभे राहिलो ( इतकं घाबरल्यावर दुसरा उपाय तरी काय होता म्हणा ). आणि काही वेळाने पुढे गेलेले तिघे परत आले. ते जसे आले तसं आम्ही खाली उतरायला सुरवात केली. तरीही काही माकडांनी आमचा पाठलाग चालू ठेवला होता. आम्ही पूर्ण rock patches खाली उतरून मंदिरापर्यंत येईपर्यंत ते पाठलाग करत होते. तिथून एकदाचा त्यांनी पाठलाग सोडला आणि आम्ही परतीच्या वाटेल लागलो.

हि घटना एवढे विस्तृत दिली कारण शब्दात जेवढं मांडता येईल त्यापेक्षा बराच भयंकर भीतीदायक अनुभव होता तो. आणि माकडांशी पहिलाच सामना असल्याने तेव्हापासून आजपर्यंत माझ्या मनात माकडांची भीती आहे.
२. मुंबईच राजीव गांधी नॅशनल पार्क. फोटो काढायला गेलो होतो तेव्हा मोकळ्या रस्त्यावर एका माकडाने पाठून हल्ला केला. फोटोसाठीचे काही प्रॉपर्टीस एक पिशवीत घालून ती पिशवी हातात घेतली होती. माकडाने बरोबर तीच पिशवी मागून पळवण्याचा प्रयत्न केला. हाताची पकड घट्ट होती तरी ती हातातून सुटून जमिनीवर पडलीच. माकडाने एका बाजूने ओढायला सुरवात केली आणि दुसऱ्या बाजूने मी त्याच्या हातातून खेचून घ्यायचा प्रयत्न करत होतो. पण तो जेव्हा दात विचकावुन गुरगुरला तेव्हा मी भीतीने सोडून दिली. तरी तिथेच उभा राहील. त्यानेही तिथेच बसून पिशवीत काय काय आहे ते एकदा सगळं बाहेर काढून बघितलं आणि त्याच्या उपयोगाचं काही भेटलं नाही म्हणून फेकून निघून गेला. मी गपचूप ती उचलली सामान भरलं आणि आपल्या मार्गाने निघालो.
३. विकटगड ला आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा एक सर्वोच्च ठिकाणी असलेल्या मंदिरात बसलो होतो. दिवसभर थकून शेवटी आणलेलं चांगलं चांगलं खायचं होतो. बराच खाऊन झालं होत आणि अचानक खालंच्या दरीतून एक माकड वर आलं, एक क्षणात एक डबा उचलला आणि परत खाली निघून गेलं. त्यात काही भेटलं नसेल त्याला पण तो डब्बा काही परत मिळू शकला नाही आम्हाला.
आम्ही तश्याच बॅग उचलून निघालो. तो माकड तिथेच फिरत असल्याने फोटो काढायचे राहिले. संपूर्ण ट्रेकची विडिओ शूट करत होतो त्यातून तो महत्त्वाचा भाग सुटला, कारण माकडाने कॅमेरा पळवला तर काय करायचं.
४. चौथा अनुभव जेव्हा मी एकटा रायगड ला गेलो होतो तेव्हाचा. संध्याकाळी ५ च्या आसपास चढायला सुरवात केल्याने रस्त्याला दुसरं कोणी माणूस नव्हतं. जे काही ३-४ भेटले ते उतरत होते. आणि त्याच वेळी वाटेत बरीच माकडं बसलेली दिसली. फाटून हातात आली कारण ती जवळपास १०-१५ होती आणि माझ्या सोबत कोणीच नव्हतं. मदतीला हाक मारायला पण लांब लांब पर्यंत कोणी नव्हतं. पण काही दिवस आधी चर्चा करताना सौरभ बोलला होता कि त्याच्याकडे लक्ष न देता जायचं. न घाबरता एकाच गतीने चालत राहायचं. अजिबात त्यांच्याकडे बघायचं नाही. तेवढंच फक्त लक्ष्यात होतं, आणि तेवढ्याने काम झालं. तसंही त्यांच्यातलं कोणी भुकेलं दिसत नव्हतं. कारण त्यांना पुरेसं भेटत होत दिवसभर. त्यामुळे त्यांचा काही त्रास न होता मी गडावर पोहोचलो.
* याशिवाय विकटगड ला पहिल्यांदा गेलो तेव्हा जसा दाब उघडला तसं काही माकडे तिथे आली होती. रॉक patch जवळ असल्याने डबे तसेच बंद करून आम्ही पुढे गेलो होतो. राजगड-तोरणा करताना पण राजगाद वरून निघताना शेवटच्या दरवाजाजवळ आम्ही सोबतच नाश्ता केला, तेव्हाही माकडे आली होती पण ती येईपरेंत आमचं झालं होतं त्यामुळे लगेच निघू शकलो.
या अश्या अनुभवांमुळं खरंच ट्रेकर्स ना माकडांसोबत कसं वागावं याच ज्ञान असणं गरजेचं वाटतं. त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी माहित असाव्यात.

माकडे बऱ्याचदा फक्त खायला काहीतरी मिळावं यासाठी जवळ येत असतात. अगदीच कधीतरी curiosity म्हणून जवळ येतील. खूपच कमी वेळा माकडे स्वतःहून हल्ला करतात, जवळपास नाहीच. पण बऱ्याचदा आपली कृती त्यांना घाबरवते किंवा आपण हल्ला करतोय असं त्यांना वाटत म्हणून ते प्रतिहल्ला करतात. काही योग्य गोष्टींची काळजी घेतली तर अघटित टाळता येऊ शकत.
Don’ts ( काय करू नये )
१. कधीही स्वतःहून माकडाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. ( कितीही Cute दिसत असला तरी ). तुम्ही हल्ला करताय असं त्याला वाटू शकत.
२. काहीही झालं तरी माकडांना खायला देऊ नका. नाहीतर तुमचा पाठलाग करू शकतात.
३. त्याच्यावर ओरडू नका, किंवा दगड मारून त्याला हाकलवायचा प्रयत्न करू नका. तो माकड आहे, कुत्रा नव्हे. जास्त शक्यता आहे कि तो त्यापेक्षा जास्त जोरात हल्ला करेल.
४. शक्यतो त्याच्या डोळ्यात बघू नका. त्याच्याकडे बघून हसू नकाच. दात दाखवण्याचा अर्थ ते तुम्ही हल्ला करणार आहात असा घेतात.
५. त्याचा फोटो काढायचा प्रयत्न करू नका. असे हजारो असतात. शक्यता आहे कि तो तुमचा मोबाइल, कॅमेरा घेऊन पळून जाईल. आणि एकदा का तो कड्यावरून खाली गेला तर ती वस्तू परत मिल्ने अशक्य. त्यामुळे आपले मोबाइल, कॅमेरा खिशात किंवा बागेत ठेवा.
Do’s ( काय करावे )
१. जर तो बाजूला असेल आणि तुमचा मार्ग मोकळा असेल तर, शांतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करत तुमच्या मार्गाने हळू हळू चालत निघून जा. तुमचे हात टकले ठेवा, आणि ते त्यांना दिसू द्या कि तुमच्या हातात काही नाही.
२. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जेवणासाठी किंवा आरामासाठी बसला असाल आणि माकडे आली तर सर्वात आधी मौल्यवान गोष्टी म्हणजे मोबाइल, कॅमेरा, ट्रेक मॅप या उघड्यावर पडल्या नसल्याची खात्री करून घ्या. अश्या गोष्टी बॅगेत भरून ती बॅग सर्वात आधी पाठीला अडकवा ( म्हणजे बॅग खांद्यावर घ्या ). बाजूला पडलेली बॅगहि ते घेऊन जाऊ शकतात.
३. जर तुमच्या वाटेवरच ते बसले असतील तर काही काळ तिथेच उभं राहून बाजूला होतात का याचा अंदाज घ्या. जर नाहीच झाले तर हात मोकळे ठेऊन त्यांच्याकडे न बघता हळू हळू पुढे जा. तुम्ही जसे पुढे चालाल तसे ते हळू हळू बाजूला होतील.
४. जर तुमच्या अगदीच जवळ आला तर कुठेही पळून जाऊ नका तो तुमचा पाठलाग करणारच. त्या ऐवजी आपल्या मार्गाने हळू हळू पुढे आत राहा. हळू हळू.
जर तुमचे काही समान त्याने खेचून घेतलेच तर शक्यता आहे कि त्यात त्याच्या उपयोगाचं काही त्याला नाही सापडलं तर तो ते सोडून निघून जाईल.
ऐन प्रसंगी एवढ्या सगळ्या गोष्टी आठवण नक्कीच कठीण आहे, पण लक्षात ठेवा न घाबरता शांतपणे परिस्थितीला सामोरं जा. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी लढाई करू नका. अथवा त्यांच्यावर तुम्ही हल्ला करताय असं त्यांना वाटू देऊ नका. शक्यतो त्यांचा मोठा कळप त्यांच्या सोबत असतो.
( Note : माकडांच्या विरुद्ध, कुत्रे शक्यतो ट्रेक वर काही उपद्रव करत नाहीत. तिथले रहिवासी कुत्रे बऱ्याचदा दिसतात आणि बरेच असे ट्रेक आहेत जिथे जवळपास संपूर्ण ट्रेक एखादा कुत्रा तुमच्यासोबत येतो. )
नेहमीच ट्रेक वर माकडे हल्ला वगैरे करतात असं काही नाही. शक्यतो तुमच्यावर कधीही गंभीर अशी परिस्थिती ओढवणार नाहीच. पण माहिती असलेलं नेहमीच चांगलं. आणि खरंच भीती बाळगायचा एवढं काही कारण नाही, शेवटी ते आपले पूर्वज आहेत.
भटकत राहा, सह्याद्रीच्या डोंगररांगा धुंडाळत राहा. भेटू अश्याच एका आडवळणावर…
– Tejas Nadekar (तेजस नाडेकर)
No comments:
Post a Comment